IDEAL CHILD : The Mother
Second Edition : 21-02-1978
Publisher : Sri Aurobindo Society
ã Sri Aurobindo Ashram Trust
Pondicherry 605002
आदर्श बालक
अनुवादिका : विमल भिडे
विद्यार्थ्यांची प्रार्थना
आम्हांला वीर योद्धा बनव, हीच आमची आकांक्षा आहे. नवीन उदयास येणाऱ्या भविष्य काळाचे, टिकून राहूं पहात असलेल्या भूतकाळाविरुद्ध जें महान् युद्ध होणार आहे त्यामध्यें आम्ही लढून यशस्वी व्हावें. म्हणजे त्यांतून निर्माण होणाऱ्या नवीन गोष्टींचा स्वीकार करण्यास आम्ही पात्र होऊं.
अनुक्रमणिका
नेहमी मुलांनी काय ध्यानात ठेवावे ?
खेळाडूंकरिता नियम
चांगला खेळाडू
श्रीमाताजी व श्रीअरविंद यांची छायाचित्रे
आंतरात्मिक शिक्षण
श्रीअरविंद
उदासीनता
हे कधी विसरू नका
नेहमीं मुलांनीं काय ध्यानांत ठेवावे ?
पूर्ण मन:पूर्वकता अत्यंत आवश्यक आहे. सत्याचाच अखेर विजय होणार हें निश्चित. साध्य करून घेण्याची इच्छा ठेवली, तर निरंतर प्रगति होणें शक्य आहे.
पान क्र. ०१
सुस्वभावी असतो : मनाविरुद्ध कांहीं घडत आहे असें वाटलें किंवा स्वत:च्या बाजूनें निर्णय झाला नाहीं तरी त्यावेळीं तो रागवत नाहीं.
खेळाडू वृत्तीचा असतो : तो जें जें करतो तें आपल्या कुवतीप्रमाणें उत्तमांत उत्तम करतो आणि आपल्याला निश्चित अपयशच मिळणार हें माहीत असूनहि, आपलें कार्य शेवटपर्यंत चालूं ठेवतो. तो नेहमीं सरळपणें विचार करतो व सरळ वागतो.
सत्यनिष्ठ असतो : परिणाम कांहींहि होणार असला, तरी तो सत्य बोलण्यास भीत नाहीं.
पान क्र. ०२
धीराचा असतो : आपल्या प्रयत्नांचें फळ मिळण्यास दीर्घ काळ थांबावे लागणार असलें, तरी तो निरुत्साही होत नाहीं.
सहनशील असतो : अनिवार्य अडचणींना व दुःखकष्टांना कांहींहि कुरकुर न करतां तोंड देतो.
त्याच्या ठिकाणीं चिकाटी असते : तो आपल्या प्रयत्नांत कधींहि ढिलाई होऊं देत नाहीं; मग त्याला किती का वेळ लागणार असेना.
समचित्त असतो : यश प्राप्त झालें असतां किंवा अपयश आलें असतांहि तो मन सम राखतो.
धैर्यवान् असतो : अनेक अपयशांना तोंड द्यावें लागलें तरी अखेरच्या विजयप्राप्तीसाठीं तो नेहमीं लढत राहतो.
पान क्र. ०३
आनंदी असतो : कोणत्याहि परिस्थितींत हसतमुख कसें रहावें व चित्त प्रसन्न कसें ठेवावें हें त्याला माहीत असतें.
नम्र असतो : यश मिळालें तर त्यासाठीं गर्व करीत नाहीं किंवा आपल्या साथीदारांपेक्षां आपण कोणी विशेष आहोंत असेंहि तो समजत नाहीं.
उदार असतो : दुसऱ्याच्या अंगच्या सद्गुणांची तो प्रशंसा करतो आणि दुसऱ्यास यश मिळवून देण्यासाठीं मदत करण्यास नेहमीं तयार असतो.
न्यायप्रिय व आज्ञाधारक असतो : तो शिस्तपालन करतो व नेहमीं प्रामाणिक असतो.
पान क्र. ०४
नियम पाळा.
आपल्या साथीदारांवर पूर्ण विश्वास ठेवा.
बाणेदार वृत्ति ठेवा.
स्वत:ला उत्साही व ताजेतवाने राखा.
विजयामध्येंहि निगर्वी रहा.
अंतःकरण सुस्थिर ठेवा, मन शुद्ध राखा.
शरीर सुदृढ ठेवा.
बस् ; खेळ खेळा.
पान क्र. ०५
सभ्य असतो : क्रीडांगणात असतांना दुसऱ्या खेळाडूंच्या चुकांची चेष्टा करीत नाहीं; प्रतिस्पर्ध्याच्या पराभवांत आनंद मानीत नाहीं. त्यांना शत्रूप्रमाणें लेखीत नाहीं, तर पाहुण्याप्रमाणें त्यांना वागवतो.
शाळेंत असतांना अधिकारी, गुरुजन आणि सहाध्यायी यांच्याशीं समजूतदारपणानें वागतो.
जीवनांत दुसऱ्यांशीं आदरपूर्वक वागतों; दुसऱ्यांनीं आपल्याशीं जसें वागावें असें वाटतें तसेंच तो दुसऱ्यांशीं वागतो.
नम्र असतो : क्रीडांगणात असतांना स्वतःच्या मानाकरतां नव्हे, तर आपल्या संघाकरितां तो काम करतो. संघाच्या प्रतिष्ठे- करितां तो स्वत:च्या प्रतिष्ठेचाहि त्याग करतो. तो उमदा विजेता असतो.
शाळेंत असतांना आपल्या विजयाविषयीं तो गर्व करीत नाहीं किंवा आपल्या वर्गमित्रांपेक्षां स्वतःला अधिक श्रेष्ठहि समजत नाहीं.
पान क्र. ०६
जीवनांत वागतांना आपण काय करणार आहों त्याविषयीं डांगोरा पिटीत नाहीं किंवा जें कांहीं केलें असेल त्याविषयीं फुशारकी मारीत नाहीं.
उदार असतो : क्रीडांगणांत असतांना प्रतिस्पर्ध्याच्या क्रीडाकौशल्याची वाहवा करतो.
शाळेंत असतांना दुसऱ्यांच्या गुणांचें कौतुक करतो.
जीवनांत वागतांना, अधोगति झालेल्या मनुष्याची निंदा करीत नाहीं. स्वतःची मतें सरळपणें व स्पष्टपणें व्यक्त करण्यास तो कचरत नाहीं.
उत्साही असतो : क्रीडांगणावर असतांना सर्व शक्ती लावून तो खेळतो; पराभव झाला असला तरीहि तो कसोशीनें खेळत रहातो. विरुद्ध निर्णयहि तो स्वीकारतो, तो माघार घेतांनाहि उमदा असतो.
शाळेंत असतांना आपलें काम योग्य तऱ्हेनें करतो. अपयश येणार हें जवळ जवळ निश्चित असूनहि काम करीत रहातो. सरळपणानें विचार करण्याचें सामर्थ्य व सरळपणानें काम करण्याची हिंमत त्याच्या अंगीं असते.
पान क्र. ०७
जीवनांत वागतांना आपल्या वांट्याला आलेलें काम कितीहि कठीण असलें, तरी तो तें पार पाडतो. माघार घ्यावी लागली तरी तो ती हसतमुखानें घेतो आणि पुनः प्रयत्नास लागतो.
आज्ञाधारक असतो : क्रीडांगणांत असतांना खेळांचे नियम पाळतो.
शाळेत असतांना तेथील नियमांचेंहि तो पालन करतो. जीवनांत वागतांना परस्परांतील सुसंवाद वाढण्यास जे नियम साह्यभूत होतात त्यांचें तो आदरानें पालन करतो.
न्यायनिष्ठ असतो : क्रीडांगणावर असतांना, खेळतांना सरळ सरळ, जणुं जीव लावून पण मित्रत्वानें स्पर्धा करतो. जखमी प्रतिस्पर्ध्याच्या मदतीस धावतो.
शाळेंत असतांना आपला स्वतःचा व शिक्षकांचाहि वेळ वायां जाऊ देत नाहीं. तो नेहमींच प्रामाणिक असतो.
जीवनांत वागतांना कोणत्याहि प्रश्नाच्या दोन्ही बाजू निःपक्षपणें पहातो.
( A.S.Barnes & Co. यांनीं प्रकाशित केलेल्या Introduction to Physical Education यांतील कांहीं भाग.)
पान क्र. ०८
आंतरात्म्याच्या साक्षात्कारास पोंचण्याचा मार्ग दीर्घ आहे, कठिण समस्या आणि विलोभनें यांनीं भरलेला आहे; आणि त्यांना तोंड द्यावयासाठीं त्यांच्या तोडीस तोड असें निश्चयाचें बळ पाहिजे. पूर्वीं कोणाहि माणसाचा शिरकाव न झालेल्या एखाद्या अरण्यांतून नव्या भूप्रदेशाच्या शोधार्थ निघालेल्या साहसी प्रवाशाच्या प्रवासाप्रमाणें, महान् शोधासाठीं करावयाचा हा प्रवास आहे. नवीन भूखंड शोधण्याच्या कामांत जितकी सहनशीलता, खंबीरपणा व मनोधैर्य लागतें, तितकेंच तें आंतरात्म्याच्या शोधार्थहि लागतें. ज्यांनीं हें कार्य हातीं घेण्याचा निश्चय केला आहे, त्यांच्यासाठीं चार उपदेशाचे शब्द उपयोगीं पडूं शकतील.
अगदीं पहिली आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही कीं, आध्यात्मिक विषयासंबंधीं मन कोणताहि निर्णय देऊं शकणार नाहीं, हें कधींहि विसरून चालणार नाहीं.
पान क्र. ०९
योगसाधनेसंबंधीं ज्यांनीं ज्यांनीं आजवर लिहिलें आहे त्या सर्वांनीं ही गोष्ट सांगितली आहे. परंतु या तत्त्वाचें प्रत्यक्ष आचरण मात्र फारच थोडे करतात. तरीपण या मार्गांत प्रगति करत रहावयाचें असेल तर त्यासाठीं सर्व प्रकारचे मानसिक निर्णय, मतें आणि मनाच्या प्रतिक्रिया यांपासून दूर राहिलें पाहिजे.
स्वतःच्या सुखसोयी, समाधान, स्वास्थ्य यांचा उपभोग घेण्याची वृत्ति सोडून द्या. केवळ प्रगति करत, सतत धगधगती अशी ज्वाला तुम्ही व्हा. तुमच्याकडे जें काय येईल त्या सर्वांचा, तुमच्या प्रगतीस उपयुक्त गोष्ट म्हणून स्वीकार करा आणि लगेंच आवश्यक ती प्रगति करून घ्या.
तुम्ही जें काय कराल त्या सर्वांतून आनंद घ्या; पण केवळ सुख मिळावें म्हणून कांहींहि करूं नका. कधींहि विचलित, निराश किंवा प्रक्षुब्ध होऊं नका. सर्व परिस्थितींत व अवस्थांत संपूर्ण शांत, निश्चल रहा; पण तरीहि, आपणांस अजून किती प्रगति करावयाची आहे याची सतत जाणीव ठेवून क्षणहि वायां न दवडतां ती प्रगति करण्याचा प्रयत्न करा.
कोणत्याहि भौतिक घटनांच्या बाह्य रूपावरून त्यांची किंमत करूं नका. कारण कोणतेंहि बाह्य रूप म्हणजे त्यांतील कांहींतरी आंतरिक वास्तव सत्य व्यक्त करण्याचा तो
पान क्र. १०
वेडावाकडा प्रयत्न असतो. आपल्या वरवरच्या समजशक्तीच्या आवांक्यांतून ती सत्यवस्तु नेहमीं निसटून जात असते.
ज्या कारणामुळें दुसरा मनुष्य वाईट वागतो असें तुम्हांस वाटतें, तें कारण त्याच्या स्वभावांतून दूर करण्याचें सामर्थ्य तुमच्या अंगीं असल्याशिवाय त्याच्या वर्तनाबद्दल तक्रार करूं नका, आणि तसें सामर्थ्य असेल, तर तक्रार करण्यापेक्षां त्याचा स्वभाव बदलवून टाका.
तुम्हीं कांहींहि करीत असा, तुम्हीं तुमच्यासमोर ठेवलेल्या ध्येयांचा कधींहि विसर पडूं देऊं नका. या महान् आत्मशोधाच्या कार्यांत कोणतीच गोष्ट गौण किंवा प्रधान अशी नाहीं. सर्वच गोष्टी एकसारख्या महत्त्वाच्या आहेत. या महान् कार्यांत यश मिळवून देण्यांत त्यामुळें गति तरी मिळेल किंवा विलंब लागेल.
यादृष्टीनें भोजनास सुरुवात करण्यापूर्वीं कांहीं क्षण स्वस्थ बसून, एकाग्रचित्त होऊन संकल्पपूर्वक दृढ भावना करा कीं, तुम्ही खाणार असलेलें अन्न, तुमच्या महान् साक्षात्काराच्या साधनेस उपयुक्त व पायाभूत अशा घटकांचा तुमच्या शरीरास पुरवठा करील आणि तो प्रयत्न सातत्यानें आणि चिकाटीनें करण्यासाठीं लागणारी शक्ति देईल.
पान क्र. ११
निजण्याच्या अगोदरहि कांहीं क्षण एकाग्र होऊन अशी दृढ इच्छा करा कीं, तुमच्या शरीरांतील ज्ञानतंतुव्यूहास आलेला थकवा या झोपेमुळें पार नाहींसा व्हावा, तुमच्या मेंदूस स्वास्थ्यप्रद शांति वा सुस्थिरता प्राप्त व्हावी, व त्यामुळें दुसरे दिवशीं सकाळीं उठल्यावर नवीन उत्साहानें या महान् शोधयात्रेस तुम्हाला लागतां यावें.
कोणतेंहि कर्म करण्याच्या आधीं एकाग्रचित्त होऊन 'हें कर्म माझ्या महान् ध्येय-सिद्धीच्या मार्गावर सहाय्यभूत होवो, निदान कोणत्याहि रीतीनें अडथळा आणणारें न होवो,' असा दृढ संकल्प करा.
जेव्हां तुम्हाला कांहीं बोलावयाचें असेल तेव्हां तुमच्या तोंडून शब्द बाहेर पडण्यापूर्वीं चित्त एकाग्र करा, क्षणभर थांबा; म्हणजे तुमच्या शब्दांवर तुम्हीं संयम घालूं शकाल आणि तुमच्या आत्मशोधाच्या मार्गावरील प्रगतीस अत्यावश्यक असलेले तेवढेच किंवा तिला कोणत्याहि दृष्टीनें बाधक नसलेले तेवढेच शब्द तुम्हीं बोलूं शकाल.
थोडक्यांत म्हणजे तुमच्या जीवनाचा अंतिम उद्देश व समोर ठेवलेलें ध्येय यांचा कधींहि विसर पडूं देऊं नका. तुम्हीं जें काय करतां, जें काय वागतां, व जें काय असतां त्या सर्वांवर, तुमच्या अस्तित्वाच्या सर्व हालचालींवर प्रभुत्व गाजविणाऱ्या प्रचंड आकाश-पक्ष्याप्रमाणें या आत्मशोधाचा संकल्प तुमच्याभोंवतीं सतत भ्रमण करीत राहिला पाहिजे.
पान क्र. १२
तुमच्या अविश्रांत, दीर्घ चिकाटीच्या प्रयत्नांमुळें एकाएकीं तुमच्या आंतरिक जीवनाचें द्वार उघडेल आणि तुम्हीं अशा एका दिव्य झगझगीत प्रकाशांत याल कीं, ज्यामुळें तुम्हांला अमरत्वाची निश्चिति अनुभवास येईल. आपण नेहमींच अस्तिवांत होतो आणि यापुढें नेहमींच रहाणार आहोंत; बाह्य आकार केवळ नाश पावतात आणि आपलें जें वास्तविक खरें स्वरूप आहे त्या दृष्टीनें पहातां, हे बाह्य आकार म्हणजे, जीर्ण झाल्यामुळें टाकून देतात तशा कपड्यांप्रमाणें आहेत असा सुस्पष्ट अनुभव तुम्हांला येईल. नंतर, सर्व तऱ्हेच्या बंधनांपासून मुक्त होऊन, तुम्ही ताठ उभे रहाल आणि प्रकृतीनें तुमच्यावर लादलेल्या परिस्थितीच्या ओझ्याखालीं अत्यंत कष्टानें सहन करीत, दुःख भोगीत प्रगति करण्याऐवजी, परिस्थितीखालीं चिरडून न जातां, तुम्ही खंबीरपणानें, सरळ आपल्या नियतीविषयीं जागृत राहून आपल्या जीवनाचें स्वामी होऊन मार्ग आक्रमूं शकाल.
पान क्र. १३
प्रकृतीच्या विकासक्रमाची दिशा उत्तरोत्तर उच्चतर असते. दगडापासून वनस्पतीपर्यंत, वनस्पतीपासून पशूपर्यंत आणि तेथून तो विकास मानवापर्यंत येऊन पोहोंचला आहे. आजवर माहीत असलेल्या विकासक्रमाप्रमाणें सध्यां तरी मानव हा सर्वांत वरच्या पायरीवर आलेला दिसतो. अर्थात् त्यामुळेंच मनुष्याचा असा समज झाला आहे कीं, जगांतील विकासाचा अंतिम बिंदु आपण असून आपणापेक्षां जास्त उच्च असें कांहींहि या पृथ्वीवर असणें शक्य नाहीं. पण यांतच तो खरोखर चूक करीत आहे. वास्तविक पहातां भौतिक संवयी व सहजप्रवृत्ती या बाबतींत आणि एकंदर भौतिक प्रकृतीच्या दृष्टीनें माणूस पुष्कळांशीं पशूच आहे; फक्त विचार करूं शकणारा व बोलूं शकणारा पशू इतकेंच.
पान क्र. १४
अशा अपूर्ण मानवाच्या निर्मितींत प्रकृतीचा संतोष असणार नाहीं हें निःसंशय. उलट पशूला जसा मानव त्याचप्रमाणें आजचा मानव ज्याच्या तुलनेनें पशूप्रमाणें ठरेल, अशा उच्च भूमिकेवरील प्राणी निर्माण करण्याचा प्रकृति प्रयत्न करीत आहे. तो प्राणी बाह्य आकारानें मानवच असला तरीपण त्याची जाणीव मनाहून कितीतरी उच्च भूमिकेवरची असेल आणि तो अज्ञानाच्या दास्यांतून पूर्ण मुक्त झालेला असेल.
मानवांस हें सत्य शिकविण्यासाठीं श्रीअरविंद या पृथ्वीवर आले. श्रीअरविंदांनीं आपणांला असें सांगितलें कीं, मानवाची भूमिका ही अखेरची नसून ती एक केवळ मधली पायरी आहे; मानव हा मनोमय भूमिकेवर जगणारा एक प्राणी आहे. परंतु याहीपेक्षां नवीन अशा, उच्चतर सत्यचेतनेची प्राप्ति करून घेण्याची पात्रता मात्र त्याच्या ठिकाणीं आहे. ही सत्यचेतना, म्हणजेच श्रीअरविंद जिला 'अतिमानस चेतना' म्हणत असत ती, स्वतःच्या ठिकाणीं प्रस्थापित करून आपल्या भोंवतालीं एकत्र झालेल्या सर्व साधकांनाहि ती प्राप्त करून घेण्याच्या कामीं मदत करण्यांतच श्रीअरविंदांनीं आपलें अखिल जीवन व्यतीत केलें.
(‘आश्रमांतील बालकांस’वरून)
पान क्र. १५
तुम्ही निराश आणि दुःखी राहिलात तर भगवंताप्रत कधींच पोहोंचूं शकणार नाहीं. तुम्ही तुमच्या हृदयांत नेहमीं अविचल श्रद्धा राखली पाहिजे, विश्वास बाळगला पाहिजे आणि विजय निश्चित होणारच, अशी मनांत खात्री बाळगली पाहिजे.
तुमच्या आणि माझ्या दरम्यान ही जी छाया येत आहे व तुमच्या दृष्टीपासून मला लपवून ठेवत आहे, तिला दूर करा. सुनिश्चिततेच्या शुद्ध प्रकाशांत राहूनच तुम्हांला माझी उपस्थिति जाणवेल.
*
तुम्ही जितके उदास रहाल, जितका जास्त शोक कराल तितके तितके तुम्ही माझ्यापासून दूर दूर जाल. भगवंत कांहीं उदास नाहीं. भगवंताचा साक्षात्कार होण्यासाठीं तुम्हांला संपूर्ण उदासपणाला आणि भावनिक दुर्बलतेला तुमच्या रोमरोमांतून बाहेर काढून टाकलें पाहिजे.
पान क्र. १६
धैर्यवान् बना आणि स्वत:ला फार महत्त्व देऊं नका. तुमच्या लहानशा अहंकार-केंद्राभोंवतींच तुमच्या सर्व मनोवृत्ती गुंफलेल्या असतात, म्हणूनच तुम्ही उदास आणि असंतुष्ट रहाता.
स्वतःला विसरून जा. हाच सर्व प्रकारच्या दुःखांवर उपाय आहे.
हें कधीं विसरूं नका
तुम्ही एकटे नाहीं आहांत, हें कधींहि विसरूं नका. भगवान् तुमचा साथी असून तुम्हांस सतत मदत करीत राहिला आहे, मार्गदर्शन करीत राहिला आहे. तोच एक असा सोबती आहे कीं, जो कधींहि तुमची सोबत सोडून जात नाहीं. तो तुमचा असा मित्र आहे कीं, ज्याचें प्रेम तुम्हाला धीर देतें, बळ देतें.
श्रद्धा ठेवा म्हणजे तो तुमच्यासाठीं सर्व कांहीं करील. - श्रीमाताजी
२८ मार्च १९५२.
पान क्र. १७
आदर्श बालकाला --
...शाळेमध्यें असतांना अभ्यास करायला आवडते.
...क्रीडांगणावर असतांना खेळायला आवडतें.
...जेवायच्या वेळीं जेवायला आवडतें.
...झोंपण्याच्या वेळीं झोंपावयास आवडतें आणि त्याच्या भोंवतालच्या सर्वांविषयीं त्याच्या हृदयांत ओतप्रोत प्रेम वसत असतें.
...भगवत्कृपेवर त्याचा पूर्ण विश्वास असतो.
...भगवंताविषयीं त्याच्या मनामध्यें नितांत आदर असतो.
-- श्रीमाताजी
***
Home
Disciples
Vimal Bhide
Books
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.