दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
  Senapati Bapat
 PDF    LINK

ABOUT

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.

THEME

philosophymetaphysics

दिव्य जीवन

Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Sri Aurobindo Birth Centenary Library (SABCL) The Life Divine Vols. 18,19 1070 pages 1970 Edition
English
 PDF    philosophymetaphysics
Sri Aurobindo symbol
Sri Aurobindo

Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.

Marathi Translations of books by Sri Aurobindo दिव्य जीवन 1879 pages 1960 Edition
Marathi Translation
Translator:   Senapati Bapat  PDF    LINK

001.jpg

 

श्रीअरविंद

 

 

 

दिव्य जीवन

 

('खंड पहिला')

1

 

श्रीअरविंद आश्रम

 

पाँडिचेरी

 

खंड पहिला

 

सर्वगत ब्रह्म आणि ब्रह्मांड

 

प्रकरण पहिलें *

 

मानवी आकांक्षा

 

ही उषा पहा. ही एकटी नाहीं. हिच्यापुढें अनेक उषा वाटचाल करीत आहेत. एका निश्चित  ध्येयाकडे जात आहेत. त्याच ध्येयाकडे त्यांच्यामागून ही उषा चालत आहे. हिच्यामागें अनंत उषांची रांग लागलेली आहे. या रांगेच्या अग्रभागीं ही आमच्या समोरची उषा आहे. ही उषा वाढत आहे. जीवांचें जग ही आमच्यासमोर उभें करीत आहे. मृत्युवश झालेल्या कोणाकोणाला ही जागें करून जीवन देत आहे. ......पूर्वीं प्रकाश देऊन गेलेल्या उषा आणि हिच्यानंतर निश्चितपणें प्रकाश देतील त्या अनंत उषा, या सर्वांशीं सुमेळ राखून सहकार करणारी ही आमची उषा आहे. तेव्हां हिचा, हिच्या प्रभावाचा व्याप केवढा थोर असेल बरें ! प्राचीन उषांकडे हिचा जीव ओढ घेतो, त्यांच्या प्रकाशांत आपला प्रकाश मिळवून त्यांना ही कृतार्थ करिते; तसेंच हिच्यानंतर येणाऱ्या उषांच्या दिशेनें आपला प्रकाश फेंकून त्यांच्याशींहि ही अद्भुत प्रेमाचें नातें जोडतें.

- कुत्स आंगिरस (ऋग्वेद) १. ११३. ८, १०.

 

विश्वामध्यें कार्य करीत असलेल्या या देवात्मशक्तीला जे श्रेष्ठ जन्म असतात, ते तीन आहेत. ते जन्म सत्य आहेत, ते स्पृहणीय आहेत. हा देवात्मा विश्वांत दूर दूरपर्यंत आणि अगदीं उघडपणें भ्रमण करितो. अनंताच्या पोटांत याचें भ्रमण चालते. त्याचा प्रकाश शुद्ध, तेजस्वी आणि अपूर्णाला पूर्ण करणारा आहे....मर्त्यामध्यें अमर्त्य असें कांहीं आहे. जें सत्य आहे, तें या अमर्त्यापाशीं आहे. हें अमर्त्य म्हणजे देवात्मा होय, देव होय. हा देव मर्त्यांच्या अंतरात कायम राहणारा

-------------------------

*हें प्रकरण महत्त्वाचें असल्यामुळें याचा अनुवाद जरा अधिक मोकळा व विस्तृत केला आहे.

 

पान क्र. १

 

आहे. याचें अंतरांतील स्वरूप दैवी कार्यशक्ति होय. आपणांत जीं दिव्य सामर्थ्यें उदयास येतात तीं या शक्तीच्या कार्यकुशलतेनें उदयास येतात. .....हे शक्तिदेवते ! उंच उडी घे, उच्चपदस्थ हो. सर्व पडदे फाड आणि आमच्या ठिकाणीं दैवी प्रकृतीचे गुण उदयास आण.

- वामदेव (ऋग्वेद) ४.१.७; ४.२.१; ४.४.५.

मानवी मनांत विचारशक्ति जागृत झाली, विचार खेळूं लागले, तेव्हां या मनाला सर्वथा व्यापून टाकणारी अशी जी एक आकांक्षा पूर्वकाळीं, सर्वप्रथम या मनांत उदयास आली, तीच या विचारी मनाची सर्वश्रेष्ठ आकांक्षा होय. ही मानवी मनाची मूलभूत अनिवार्य आकांक्षा आहे, असें उघड दिसतें; कारण हिला मनांतून कितीहि वेळां काढून लावली तरी, प्रत्येक वेळीं ती परत येऊन मनाची पकड घेते. संशयवादानें मनाला मधून मधून अतिदीर्घ काळपर्यंत व्यापून टाकलें तरी पुन: पुन: त्या संशयवादावर मात करून ही आकांक्षा मनाचा ताबा घेते. देवाचा व दैवी गुणांचा अंतप्रत्यय, पूर्णतेकडे ओढ, शुद्ध सत्याचा व निर्भेळ सुखाचा शोध, अप्रकट अमरतेचा प्रत्यय -- या गोष्टी, वर वर्णिलेल्या आकांक्षेचें स्वरूप व कार्य होत. ही आकांक्षा प्राचीन काळीं मानवी मनांत सतत तळपत होती, याचा पुरावा मानवी ज्ञानाच्या प्राचीन उषांच्या वर्णनांत सांपडतो. आजहि मानवता त्या आद्ययुगीन आकांक्षांना परत आपल्या अंतरांत स्थान देण्याच्या तयारींत असलेली दिसते; निसर्गाच्या बाह्यवस्तुजाताच्या यशस्वी विश्लेषणानें तिची तृप्ति न होतां, त्या विश्लेषणाचा वीट मात्र तिला आलेला आहे; व म्हणून ती आद्ययुगीन आकांक्षांकडे ओढ घेत आहे. देवदेव, ज्ञानविज्ञान, मुक्ति व अमरता या चतु:सूत्रींत अनुभवी ज्ञानसंपन्न चतुरता, आद्ययुगांत आपली आकांक्षा व्यक्त करीत होती, तीच चतु:सूत्री आजहि ज्ञानाची अंतिम चतु:सूत्री राहणार, असा रंग दिसत आहे.

प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन टिकलेलीं मानव वंशाचीं ध्येयें, या चतु:सूत्रींत व्यक्त झालीं आहेत. मानवाचा सर्वसामान्य अनुभव या ध्येयांना विरोध करणारा आहे. या ध्येयांत ज्या अनुभवांचा सत्यत्वानें उल्लेख आहे ते अनुभव मानवाला अपवादभूत असून, उच्च आणि खोल भूमिकेवरचे आहेत. त्यांचा समग्रतेनें सुव्यवस्थितपणें लाभ व्हावयाचा तर व्यक्तीला क्रांतिकारी प्रयत्न करावा लागतो किंवा मानवी समाजाचा

 

पान क्र. २

 

क्रमविकास एका विशिष्ट टप्प्यापर्यंत प्रगत व्हावा लागतो. चतुरतेची चिरंतन चतु:सूत्री आम्हापुढें कोणत्या गोष्टी ठेवीत आहे ? संक्षेपानें सांगावयाचें तर, पार्थिव निसर्गाचा क्रमविकास होत आहे आणि या क्रमविकासाचे अंतिम ध्येय पार्थिवांत, जडांत देवदेवाचें प्रकटीकरण हें आहे, असें ही चतु:सूत्री सांगत आहे. या संक्षेपाचा अधिक विस्तार करावयाचा तर चतु:सूत्री आम्हांपुढें पुढील कार्यक्रम ठेवीत आहे -

आमच्या जाणिवेंत पशुता आणि अहंता भरलेली आहे; अशा जाणिवेचा विकास करून आम्हाला देव जाणावयाचा आहे, त्याला आपलासा करावयाचा आहे व अंतीं मानवाचा, आमचा, देव व्हावयाचा आहे.

देहाशीं बांधलेलें आमचें मन अर्धवट अंधुक प्रकाशाचें स्थान आहे, त्याचें परिवर्तन करून त्याचें ठिकाणी उन्मनाचा, अतिमानसाचा, विज्ञानाचा पूर्ण प्रकाश आम्हीं आणावयाचा आहे.

आमचीं वासनापूर्तीचीं सुखें क्षणिक, त्यांना देहाच्या आणि भावनांच्या दुःखांचा सदा वेढा पडलेला; या सुखदुःखाच्या खेंचाखेंचींत जबर ताण आमच्या वांट्याला येतो; ही अशांतीची व परवश क्षणिक सुखाची परिस्थिति बदलून तिच्या ठिकाणीं शाश्वत शांतीची व स्वयंभू सुखाची उभारणी आम्हाला करावयाची आहे.

आमचें जग यांत्रिक अनिवार्य निसर्गनियत घटनांचा संघ असल्यासारखें दिसते; त्या जगांत अमर्याद आत्म-स्वातंत्र्य स्थापावयाचें आहे.

आमच्या शरीरांत सारखा बदल होत असतो व तें मृत्यूला वश होतें; अशा शरीरांत मृत्यूला वश न होणारें जीवतत्त्व, आत्मतत्त्व आहे, त्याचा शोध लावून तें आम्हाला आमचें स्वरूप म्हणून अनुभवावयाचें आहे.

परंतु मानवी जाणिवेच्या आजच्या रचनेंत जी तिची शक्ति प्रकट झालेली आहे, त्या शक्तीपलीकडे अधिक शक्ति जाणिवेंत नसून आजची शक्ति हीच जाणिवेच्या व्यापाची शेवटली मर्यादा आहे, असें सामान्य जडवादी बुद्धीचें आग्रही मत आहे. आज अनुभवाला येणारी जाणिवेचीं कार्यें, वरील ध्येयभूत कार्यक्रमांतील कार्यांशीं सर्वथा विरोधी असल्यानें, तो ध्येयभूत कार्यक्रम अशक्य कोटीतला आहे, असा जडवादी बुद्धिवाद्यांचा शेवटला बुद्धिवाद आहे. हा बुद्धिवाद त्यांच्या जडवादी मताला साजेसा आहे; परंतु तो वस्तुतः खोल अनुभवाच्या कसोटीस उतरणारा नाही. जगांतील घटनांचा खोल विचारपूर्वक अनुभव घेतला तर 'प्रत्यक्ष विरोध' (म्हणजेच घडलेल्या घटनांस विरोधी अशा घटना घडवून आणणें) हा निसर्गाच्या

 

पान क्र. ३

 

गहन कार्यपद्धतीचा एक भाग आहे असें दिसून येईल. ''योजलेल्या घटनेचा, अमुक एका घडलेल्या घटनेला सर्वथा विरोध आहे ना? तर मग योजलेली घटना घडावी, यांस माझी पूर्ण संमति आहे,'' असेंच जणुं योजलेल्या विरोधी घटनेवर निसर्ग शिक्कामोर्तब करीत असतो.

कारण, जीवनाचे सर्व प्रश्न तत्त्वत: संवाद-विसंवादाचे प्रश्न असतात. दोन गोष्टींमध्यें विसंवाद, विरोध आहे, तो मिटलेला नाहीं, असें नजरेस येतांच, तोच विरोध मिटण्यासारखा आहे, त्या दोन गोष्टींत मुळांत मेळ आहे, ऐक्य आहे, अशी आंतून अंतर्मन ग्वाही देते; जीवनाचे एकूण एक प्रश्न अशाच स्वरूपाचे असतात; मानवांत अधिक पशुतेकडे झुकणारा असा जो एक केवळ व्यवहारी भाग आहे त्याला, अनुभवास आलेला विसंवाद मिटविण्याची तितकी आवश्यकता वाटत नाहीं; विसंवादानें त्याचें ठिकाणीं विशेष असंतोष उत्पन्न होत नाहीं. परंतु पूर्णपणें जागृत झालेलें मन, विसंवाद अनुभवून संतुष्ट राहणें अशक्य असतें. व्यवहारी मनाला देखील, विसंवादाची अडचण मुळींच भासत नाहीं असें नाहीं. परंतु अशा अडचणींतून मार्ग काढण्याची व्यवहारी मनाची तऱ्हा, पूर्ण जागृत मनाहून वेगळी असते. एकतर, तें अडचणीला बगल देऊन जीवन चालवितें अथवा अडचणीवर मूलगामी उपाय न योजतां कांहीं अर्धवट कामचलाऊ, अज्ञानसुलभ तडजोड काढून, काम भागवून नेतें. निसर्ग हा स्वभावत: त्याच्या सर्व प्रांतांत सुमेळ, सुसंवाद घडवून आणण्याच्या खटपटींत असतो. मन आपले अनुभव एकत्रित करतांना कांहीं सुव्यवस्थेचें, मेळाचें तत्त्व उपयोगांत आणते, तशीच गोष्ट जडाच्या व प्राणाच्या प्रांतांतहि निसर्ग घडवीत असतो. रचनेसाठीं पुढें केलेला माल जितका अधिक अस्ताव्यस्त स्थितींत दिसत असेल, त्या मालांतील वस्तु एकमेकींशी जितक्या अधिक जुळत्या नव्हेत तर जितक्या अधिक कट्टर व अनिवार्य अन्योन्यविरोधी दिसत असतील, तितकी रचना सुव्यवस्थित करण्याची निसर्गाची स्फूर्ति अधिक जोरदार होते, आणि त्या स्फूर्तीमुळें अधिक सूक्ष्म आणि सामर्थ्यवान् सुव्यवस्था निर्माण होते. सोपी कामगिरी असतांना तशी कुशल रचना निर्माण होणें सामान्यत: शक्य नसतें. विरोधी गोष्टींचा मेळ घालून सुव्यवस्थित रचना निसर्गानें केली आहे, अशा एक दोन बाबी पहा. प्राण हा स्वयं गतिमान्, क्रियाशील आणि शरीर मात्र स्वयं गतिशून्य, निष्क्रिय, जड, भौतिक तत्वांचें. जडतत्त्व, हालविल्याशिवाय हालायचें नाहीं आणि सारखी हालचाल करीत राहणें हा तर प्राणाचा धर्म;

 

पान क्र. ४

 

म्हणजे दोन निखालस विधर्मी, विरोधी वस्तूंची सुंदर सुसंवादी रचना निसर्गानें निर्माण केली आहे. खनिजांतील रचनेपेक्षां वनस्पतींतील रचना, वनस्पतींतील रचनेपेक्षां प्राणिवर्गांतील रचना अधिक गुंतागुंतीची; व तिजपेक्षां आम्हां मानवांतील रचना अधिकच गुंतागुंतीची. गुंतागुंत जितकी अधिक तितकी रचनेची कार्यक्षमता अधिक, अशी निसर्गाची कार्यप्रणाली आहे. प्राण आणि शरीर यांची आमच्यांतील परस्पर सहकारिता, खनिज, वनस्पति व प्राणिवर्ग यांच्यातील सहकारितेपेक्षां श्रेष्ठ दर्जाची असली तरी, ती आहे त्याहून अधिक चांगली होऊं शकते; आमच्या मनाला आधारभूत असलेलें आमचें पशुसदृश प्राणि-शरीर आज अंशत: सुसंघटित आहे, तें समग्र सुसंघटित होऊन त्यांतील जड घटक देखील मृत्यूला दाद देणार नाहींत असें झालें म्हणजे निसर्गानें या बाबतींत 'अन्योन्य विरोधकांचा प्रश्न' पूर्णतया सोडविलासें होईल. ही झाली एक बाब. 'अन्योन्य विरोधकांचा प्रश्न' असलेली दुसरी बाबहि पाहाण्यासारखी आहे. मनाला स्वत:ची जाणीव आहे. मनाच्या इच्छेला स्वत:ची जाणीव आहे; पण शरीराला, प्राणाला तशी जाणीव नाहीं, त्यांच्यांत 'इच्छा' म्हणून जी कांहीं दिसते, ती यांत्रिक, जाणीवहीन इच्छा असतें. असें जाणीवयुक्त मन, जाणीवहीन प्राण व शरीर यांच्याशीं जोडून, निसर्गानें मानवांच्या व मानवेतरांच्या जीवनांत आश्चर्यकारक घटना, घडविल्या आहेत. या आश्चर्यांहून अधिक मोठी आश्चर्यें घडविण्याच्या खटपटींत निसर्ग आहे. आज आमच्या जाणिवेंत पशुता खेळत आहे; व आम्ही, म्हणजे आमची जाणीव, सत्य आणि प्रकाश यांच्या शोधांत आहे. ज्याच्या शोधांत आमची जाणीव आहे, त्या सत्याचें प्रत्यक्ष आणि समग्र ज्ञान तिला लाभलें आणि या लाभामुळें ती आपल्या कार्यक्षेत्रांत सर्वशक्तिमान् झाली, म्हणजे मन-प्राण-शरीर-संघटनाच्या बाबतींत निसर्गानें शेवटलें आश्चर्य घडविलें असें होईल. याप्रमाणें 'अन्योन्य विरोधकांचा प्रश्न' असलेली दुसरी बाब निसर्गानें कशी हाताळली आहे तें आपण पाहिलें. तेव्हां मानवांत जी उंच जाण्याची स्फूर्ति आहे, उच्च उच्चतर स्तरावरील अन्योन्य-विरोधी वस्तूंचा विरोध मोडून त्यांतून उच्चतम पातळीवर सुसंवादी जीवन निर्माण करण्याची मानवांत जी उमेद आहे ती बुद्धीला धरून आहे, हें आपणांस मान्य होण्यास हरकत नसावी. निसर्गाची जी मूलभूत कार्यपद्धति, त्याच्या सार्वत्रिक धडपडीचें जें धोरण आमच्या अनुभवास आलें आहे, त्या धोरणांत व त्या कार्यपद्धतींत निसर्गाचा जो नियम व जो

 

पान क्र. ५

 

यत्न आमच्या प्रत्ययास येत आहे, त्या नियमाची व यत्नाची तर्कशुद्ध अखेर, तर्कशुद्ध पूर्णता, एकच असूं शकते आणि ती म्हणजे वर सांगितलेली मानवामध्यें जागृत झालेली उंच उंच जाण्याची स्फूर्ति होय.

जडाच्या भूमींत प्राणाचा व मनाचा विकास होतो असें आपण बोलतों. परंतु 'विकास' या शब्दानें केवळ काय होतें तें सूचित केलें जातें, जें काय होतें तें कां होतें, हें त्या शब्दानें सांगितलें जात नाहीं. जडवस्तूंतून प्राण उदयास यावा, प्राणमय जडाच्या आकृतींत मनाचा संचार व्हावा, या गोष्टींना बुद्धीला पटण्यासारखें असें एकच कारण दिसतें आणि तें वेदांतांत सांगितलेलें आहे. जडाच्या पोटांत प्राण आणि प्राणाच्या पोटांत मन भरलेलें असतें; जडाच्या पडद्याआड प्राण असतो, प्राणाच्या पडद्याआड जाणीव, मनाची जाणीव किंवा मन असतें, असें वेदांतांत सांगितलेलें आहे. अर्थात् जडाच्या पोटांत जें प्राणाचें बीज असतें त्याला योग्य परिस्थितींत जडाच्या भूमींतून अंकुररूपानें वर येतां येतें व पुढें त्याची क्रमानें वाढ होतें, हें सर्व समजण्यासारखें आहे. हीच गोष्ट प्राणमय जड भूमींतील (किंवा जडमय प्राणभूमींतील म्हणा) मनाच्या बीजाची असते. याच रीतीनें विचार केल्यास असें म्हणावयास हरकत नाहीं कीं, मन किंवा मनाची जाणीव ही देखील या जाणिवेपेक्षां श्रेष्ठ अशा जाणिवेची भूमि असूं शकेल आणि ती जाणीव मनाच्या किंवा मनोमय जाणिवेच्या भूमींतून वर येऊन विकास पावूं शकेल. ही शक्यता मान्य केली कीं, ईश्वर, पूर्णज्ञान, शाश्वत आनंद, मुक्ति, अमरता या गोष्टी प्राप्त करून घेण्याची मानवाचें मनांतील अनावर आकांक्षा विकासविषयक तर्कशास्त्राच्या दृष्टीनें योग्यच आहे असें म्हणावें लागतें. निसर्गानें जडाच्या कांहीं रचनांत प्राण व प्राणविषयक ओढ पेरली आहे, प्राणाच्या कांहीं रचनांत मन व मनोविषयक ओढ पेरली आहे. त्याप्रमाणें मनाच्या कांहीं रचनांत त्यानें -- ''मनाहून मोठें कांहींतरी'' -- (उन्मन, अधिमन, अतिमन कांहीं म्हणा) -- आणि तद्विषयक ओढ पेरली आहे; ही सर्व पेरणी सारखीच स्वाभाविक, सारखीच सत्य, सारखीच न्याय्य, सारखीच अनिवार्य आहे. आजच्या मनाहून श्रेष्ठ असें कांहींतरी विकासक्रमानें उदयास आणण्याच्या खटपटींत निसर्ग आहे; ही विचारसरणि अगदीं निर्दोष दिसते. जडाच्या आणि प्राणाच्या भिन्न रचनांत नवतत्त्वाच्या (अनुक्रमें प्राणाच्या व मनाच्या) विकासाची ओढ भिन्न प्रमाणांत, कोठें कमी स्पष्ट, कोठें अधिक स्पष्ट दिसते; तिच्या कार्यकारी इच्छेचें सामर्थ्य चोहोंकडे सारखें

 

पान क्र. ६

 

असत नाहीं -- त्याचा सारखा चढता क्रम अनुभवास येतो; त्याप्रमाणें मनापलीकडील नवतत्त्वाच्या बाबतींतहि, विकासाचा पायरीपायरीचा चढतावाढता क्रम आहे, आणि या क्रमानें हें मनापलीकडील नवतत्त्व अवश्य ते अवयव, आणि अवश्य त्या शक्ती पूर्णपणें विकसित करणार हें निश्चित आहे; कारण तसें करण्यास तें निसर्गनियमानें बांधलेलें आहे. मनाचा विकासक्रम अवलोकन केल्यास, आरंभीं धातूंत व वनस्पतींत प्राणतत्त्वाच्या विशेष नाजूक प्रतिक्रियांच्या रूपानें व मानवामध्यें पूर्णपणें सावयव होऊन तें व्यक्त होतें; तीच गोष्ट मानवामध्यें व्यक्त होऊं घातलेल्या मनापलीकडील नवतत्त्वाची आहे; त्याच्याहि विकासाचा चढतावाढता क्रम आहे. मानवी जीवनापेक्षां उच्चतर, दैवी, दिव्य जीवनाच्या, त्याच्या तयारीच्या म्हणा, अनेक पायऱ्या एकावर एक अशा मानवांत व्यक्त होत आहेत. मानवेतर प्राण्याची सजीव प्रयोगशाळा करून निसर्गानें मानव बनविण्याची योजना यशस्वी केली असें म्हटलें जातें. त्याप्रमाणें मानव हा स्वत: सजीव आणि विचारयुक्त अशी निसर्गाची प्रयोगशाळा असून, त्या मानवामध्यें त्याच्या जाणीवयुक्त सहकारानें, निसर्ग, अतिमानव किंवा देव बनविण्याची आपली योजना यशस्वी करूं इच्छित आहे असें म्हटल्यास वावगें होणार नाहीं. त्यापेक्षां निसर्ग, मानवामध्यें देवदेव व्यक्तरूपांत आणण्याच्या खटपटींत आहे, असें देखील म्हणतां येईल. कारण, निसर्गाच्या पोटांत जें अगोदरच अव्यक्त रूपांत आहे, जें त्याच्या अंतरांत झोंपलेलें किंवा गुप्तपणें क्रियाशील आहे, त्याचें निसर्गानें क्रमश: व्यक्तीकरण करणें म्हणजे विकास होय. तसेंच निसर्ग स्वत: गुप्तरूपानें जो कांहीं आहे, तेंच त्यानें उघडपणे होणें, आपल्या खऱ्या स्वरूपावरील आवरण फाडून त्या रूपाचा खुला आविष्कार करणें, हाहि विकासाचाच प्रकार होय -- हेंहि तितकेंच खरें आहे. तेव्हां विकासाच्या अमुक पायरीपलीकडे निसर्गानें पाऊल टाकूं नये, असें आम्ही मानव निसर्गाला सांगूं शकत नाहीं. विकासावस्थेच्या पुढें पाऊल टाकण्याचा हेतु, निसर्ग कोणा मनुष्याच्या द्वारां दर्शवील अथवा कोणा व्यक्तीच्या द्वारां तसा प्रयत्न करील तर, एक पक्षीं बुद्धिवादी, 'रोग रोग' म्हणून किंवा 'आभास आभास' असा ओरडा करून निसर्गाच्या नव्या हेतूची व यत्नाची थट्टा करतो, किंवा दुसऱ्या पक्षीं, धर्मपंथी 'हा बेताल भ्रष्टाकार, हें घमेंडखोर पाखंड' अशीं नांवें ठेवून त्याची निर्भर्त्सना करतो असें करणें आपल्याला योग्य नाहीं; आपल्याला तसा अधिकार पोंचत

 

पान क्र. ७

 

नाहीं. कारण, जडांत चिन्मय आत्मा लपलेला आहे; दिसायला जो निसर्ग म्हणून दिसतो तो दडलेला ईश्वर आहे, निसर्गाचा मुखवटा घातलेला ईश्वर आहे. या गोष्टी जर सत्य आहेत तर, मानवानें पृथ्वीवर जीवन जगतांना आपल्या अंतरांत दिव्य आत्मतत्त्वाचें प्रकटीकरण करणें, आपल्या आंत व बाहेरहि सर्वत्र ईश्वराचा अनुभव घेणें, हें आपलें जीवितकार्य ठरविलें तर त्यांत वावगें काय आहे ? खरें पाहतां, असें त्यानें ठरविलें म्हणजे अत्यंत उच्च असूनहि अत्यंत स्वाभाविक व योग्य असा शक्य कोटीतला ध्येयवाद त्यानें आपल्या जीवनाचें लक्ष्य केलें आहे, असें म्हणतां येईल.

तेव्हां एकंदर निष्कर्ष असा कीं, मनुष्याची विचारनिष्ठ चिकित्सक बुद्धि आणि त्याची स्वाभाविक, सर्व परिस्थितींत टिकणारी सहज भावना किंवा अंतःस्फूर्ति या दोन्हीं निरीक्षक परीक्षकांचा निवाडा कित्येक मानवी विकासविषयक बाबतींत अगदीं सारखा मिळतो. मानवाच्या रचनेंत उच्च-नीच घटक असून खालच्या दर्जाच्या घटकाचे ठिकाणीं उच्चतर सत्य आत्मसात् करण्याची, अनुभवण्याची व जीवनांत व्यक्त करण्याची शक्ति आहे, ही गोष्ट दोन्ही परीक्षकांना मान्य आहे. मानवाच्या सामान्य प्राणिशरीरांत दिव्य जीवन, अनुस्यूत आहे, अप्रकटपणें आहे व तें प्रकट होऊं शकतें, ही गोष्ट नेहमींच अंतर्विरोधानें भरलेली आणि म्हणून अशक्य वाटणारी असली तरी, ती शाश्वत सत्याच्या वर्गांतील आहे, ही गोष्टहि दोन्ही परीक्षकांना मान्य आहे. मानवाचें शरीर मर्त्य आहे, पण या नष्ट होणाऱ्या निवासस्थानांत अनश्वर, अमर सत्याकांक्षा व सत्य वास करीत आहेत व त्यांची केव्हां ना केव्हां प्रकट होण्याची निश्चिति आहे; मानवी मनें मर्यादित, मानवी अहंकारी जीव परस्परांपासून विभक्त, असें दिसत असतां या मनांत, या जीवांत एकच विश्वव्यापी जाणीव, प्रज्ञा, चैतन्य, चेतना त्यांना आपले प्रतिनिधी बनवून त्यांच्या द्वारां काम करीत आहे, हें सत्य आहे व तें योग्य समयीं योग्य मनांत व जीवांत संपूर्णतया प्रकट होणार आहे; काल, स्थल, विश्व या मानवाच्या अनुभवास येणाऱ्या वस्तू स्वयंभू, स्वतंत्र नाहींत; त्यांना कालातीत, स्थलातीत, विश्वातीत-सर्वातीत अशा अनिर्वचनीय एकमेव स्वतंत्र स्वयंभू चैतन्यमय पुरुषोत्तमाचा आधार आहे. या पुरुषोत्तमाशिवाय त्या अस्तित्वांत येऊं शकत नाहींत व टिकूं शकत नाहींत, हें सत्य असून तें मानवाला विकासमार्गानें नियतसमयीं निश्चितपणें प्रत्ययाला येणार आहे.

 

पान क्र. ८

 

मानवी शरीर व अतिमानवी दिव्य जीवन यांच्या अवश्य भावी साहचर्याला ज्याप्रमाणें मानवी चिकित्सक बुद्धि व त्याची अचिकित्सक अंत:स्फूर्ति या दोघांची पूर्ण मान्यता आहे, त्याप्रमाणें वर सांगितलेल्या दुसऱ्या सर्व जोड्यांच्या भावी अटळ साहचर्याला त्यांची मान्यता आहे. सामान्य तर्कशास्त्राच्या विचारसरणीनें जे प्रश्न कित्येक वेळां असाध्य म्हणून ठरविले आहेत ते प्रश्न कायमचे बाजूला ठेवून मनुष्यांनीं पृथ्वीवरील आपल्या भौतिक जीवनाचे तांतडीचे व्यवहारांतले प्रश्न घेऊन, त्या प्रश्नांवर आपल्या मानसिक शक्तींना कामास लावावें व यापलीकडे त्यांनीं कोणत्याहि उठाठेवींत पडूं नये, असे बौद्धिक प्रचाराचे प्रयत्न मधून मधून होत असतात. परंतु ही 'असाध्य' प्रश्नांची टाळाटाळी नेहमींच प्रभावी होत नाहीं. 'असाध्य' प्रश्नांना बगल देण्याच्या कांहीं खटपटीनंतर, मानवतेला पूर्वींहून अधिक जोराची शोध करण्याची स्फूर्ति येते; किंवा पूर्वींहून अधिक आदळआपट करणारी व प्रश्नाचें ताबडतोब उत्तर मागणारी असह्य भूक लागते. या भुकेनें अंत:साक्षात्कारवादाला तेज चढतें आणि नवे धर्मपंथ उदयास येतात. जुने पंथ संशयवादाच्या आघातानें नष्ट किंवा अर्थशून्य झालेले असतात आणि संशयवाद स्वत: मानवी मनाला समाधान देत नाहीं; संशयवादाकडून त्याचें संशोधनाचें काम हवे तसें आणि तितकें होत नाहीं म्हणून मानवी मनाला तो समाधान देऊ शकत नाहीं; आणि म्हणूनच अंत:साक्षात्कारवादाच्या आश्रयानें, मानवी मनाची भूक भागविण्यासाठीं जुन्या पंथांच्या जागीं नवनवें पंथ उदयास येतात. एखादें सत्य त्याच्या बाह्य क्रियांत स्पष्टपणें प्रत्ययास येत नाहीं, प्रकाशविमुख प्रतिगामी निर्बुद्ध लोकभ्रम किंवा खुळा भोळा भाव या प्रतीकांनीच बहुधा तें प्रत्ययास येतें; म्हणून त्याचें सत्यत्वच नाकारणें किंवा तें दडपून टाकण्याचा प्रयत्न करणें हें देखील एक प्रकारचें निर्बुद्ध प्रकाशविमुख प्रतिगामित्वच आहे. एखादें विश्वव्यवस्थाविषयक अनिवार्य नैसर्गिक सत्य तत्काल स्पष्ट परिणाम करणारें नसतें व म्हणून साहजिकच तें सिद्ध करावयास अतिशय अवघड असतें. त्या सत्याचे परिणाम घडत राहतात, परंतु त्यांची व्यवस्था लावण्याचें काम त्या सत्याकडून झटपट न होतां सावकाशीनें, मंद गतीनें होत असतें, व म्हणून त्याची सत्यता पटणें व पटविणें अवघड होतें. तथापि त्याच्या सिद्धतेचा अवघडपणा बघून त्याला टाळण्याचा, त्याचें अस्तित्व नाकारण्याचा यत्न करणें हें, निसर्गमातेच्या मनांतील महाप्रभावी संकल्पाविरुद्ध बंड करण्यासारखें आहे. हें बंड

 

पान क्र. ९

 

अंततः यशस्वी होऊं शकणार नाहीं. असें बंड करण्यापेक्षां त्या दुर्गम सत्याला मान्यता देणें हें विचारशील चांगुलपणाला अधिक शोभून दिसेल. अंध पण स्वभावसिद्ध प्रेरणा, प्रकाशहीन अस्पष्ट अंतःस्फूर्ति, अनिर्बंध स्वैर आकांक्षा यांच्या प्रांतांत जोपर्यंत तें दुर्गम सत्य वावरत राहील, तोपर्यंत तें दुर्गमच राहील; व तें अमान्य करून बंड करण्याचा आम्हाला मोह होईल. याकरितां त्या प्रांतांतून त्या सत्याला वर उचलून घेऊन, डोळस, स्पष्ट, नियमबद्ध विचाराचा प्रकाश जेथें आहे, जाणीवपूर्वक आपला मार्ग आपण ठरविणारी विचारपूर्ण इच्छाशक्ति जेथें आहे, त्या प्रांतांत आणून त्याचें सत्यत्व पारखणें बरें. प्रकाशहीन अंतःस्फूर्तीचा प्रांत विचार-विवेकाच्या प्रांताच्या खालीं आहे, त्याप्रमाणें प्रकाशमय अंतःस्फूर्तीचा प्रांत विचार-विवेकाच्या प्रांताच्या वर आहे. निसर्गाची श्रेष्ठ सत्यें आपला स्वतःचा साक्षात्कार स्वतः घडवितांना प्रकाशमय अंतःस्फूर्तीच्या द्वारां मानवाला अंतरंगांत प्रतीत होत असतात. विचाराच्या प्रकाशाहून हा साक्षात्काराचा प्रकाश अर्थातच श्रेष्ठ असतो. मानवामध्यें या श्रेष्ठ प्रकाशाच्या कार्याचा कोठें अभाव आहे, कोठें या कार्याला अडविणारे अनेक मनोभाव आहेत, कोठें हें कार्य घडत आहे खरें, पण एकसारखें घडत नसून थांबून थांबून अंतरा अंतरानें घडत आहे, बुरख्याच्या आडून मधून मधून कोणी नजर बाहेर फेंकावी त्याप्रमाणें हा प्रकाश कोठें कोठें आपलें कार्य करीत आहे. भौतिक आकाशांत उत्तर ध्रुवाकडे मधून मधून बहुरंगी सुंदर प्रकाशप्रदर्शनें आपल्याला पहावयास मिळतात, त्याप्रमाणें या प्रकाशाचें प्रदर्शन कोठें कोठें प्रत्ययास येतें. असा हा श्रेष्ठ प्रकाश आम्ही आपला नित्य सहचर करूं अशी आशा आम्ही निर्भयपणें व निःसंकोचपणें बाळगावी. कारण, अंतर्बाह्य निसर्गाचें सूक्ष्म निरीक्षण करतां, आमच्या जाणिवेची आजच्या नंतरची लगतची उच्चतर अवस्था वर वर्णिलेल्या श्रेष्ठ अंतःस्फूर्तीच्या प्रकाशाची असण्याचा फार संभव दिसतो. आजची आमची जाणीव अर्थात् आमचें मन प्राणाच्या पडद्यांतून प्रकट झालें आहे, त्याप्रमाणें आमच्या मनाच्या पडद्यांतून त्यापेक्षां श्रेष्ठ अशी जाणीव प्रकट होणार आहे. या श्रेष्ठ जाणिवेच्या तेजोमय प्रकाशांतून आमच्या वाढत्या आत्मविस्ताराचा मार्ग असून, मानवतेचें अंतिम विश्रामस्थान म्हणून जी कोणती जाणिवेची श्रेष्ठतम अवस्था असेल तेथें, या मार्गानें आम्ही पोंचण्याची बरीच शक्यता आहे.

 

पान क्र. १०

 

 

प्रकरण दुसरें

 

दोन नकार

 

जडवादी नकार

 

त्यानें जाणीवशक्तीकडून श्रम घेतलें ( त्यानें विचाराचे तप केलें,) आणि या तपानें त्याला असें ज्ञान झालें कीं, जडतत्त्व हेंच ब्रह्म आहे. कारण सर्व भूतें जडांतून जन्म घेतात, जडानें वाढतात व येथून जातात तेव्हां तीं जडांत प्रवेश करतात. हें ज्ञान घेऊन तो, आपला पिता वरुण याजकडे गेला आणि म्हणाला, 'हे भगवन् ! मला ब्रह्म काय तें शिकवा'. वरुणानें त्याला उत्तर दिलें, 'तुझ्यांतील जाणीवशक्ति पुन: कामास लाव, तिच्याकडून (विचाराचें) तप करव; कारण तप हेंच ब्रह्म होय.'

- तैत्तिरीय भृगुवल्ली ३, , २.

 

पृथ्वीवर दिव्य जीवन असूं शकतें, मर्त्य अशा जीवनांत अमरत्वाचा अनुभव येऊं शकतो असें आम्हीं म्हटलें; या म्हणण्याला आधार काय ? यास आपल्या एका विशिष्ट मतप्रणालीचा-ज्ञानाचा आधार असतो. ही मतप्रणाली, हें ज्ञान येणें प्रमाणें : -- आपलें शरीर हें एक मंदिर आहे, त्या मंदिरांत राहणारा आत्मा अनश्वर आहे, हें मंदिर किंवा वस्त्र बदललें जातें, पण याचा वापरणारा बदलत नाहीं; तसेंच ज्या जडतत्त्वाचें हें निवासस्थान किंवा वस्त्र बनविलें जातें तें जडतत्त्व, मोठ्या किंमतीचा पण योग्य असा कच्चा माल आहे; या मौल्यवान् मालाचे पोषाख तो आत्मा सारखे एकामागून एक, स्वत:साठीं बनवीत असतो अथवा या मालाची कधीं न संपणारी मंदिरांची मालिकाच जणुं रहाण्यासाठी पुन: पुन: बांधत असतो. हें ज्ञान नसेल तर पृथ्वीवर दिव्य जीवन, मर्त्य जीवनांत अमर्त्य जीव, ही भाषा आपल्याला करतां येणार नाहीं.

 

पान क्र. ११

हें ज्ञान असून देखील शरीर धारण करून जीवन जगण्याचा वीट येण्याचा संभव आहे. हा संभव नाहींसा होण्यास उपनिषदांतील ज्ञान आत्मसात करून ''जडतत्त्व हें देखील ब्रह्मच आहे'' असें ब्रह्मवाद्यांच्याच भाषेंत आपल्याला म्हणतां आलें पाहिजे. अस्तित्वाच्या एका टोंकाला ब्रह्म (चैतन्य) वस्तु आणि दुसऱ्या टोंकाला जडवस्तु, या दर्शनीं कितीहि भिन्न दिसल्या तरी तत्त्वत: त्या अभिन्न आहेत, असें उपनिषदांत म्हटलें आहे. उपनिषदांत, जड विश्वाला ईश्वराचें स्थूल शरीर म्हटलेलें आहे. या जोरदार अलंकारिक वर्णनाचा पूर्ण अर्थ पूर्णपणें आम्हीं ध्यानांत घ्यावयास हवा व त्याचें पूर्ण मोल ओळखून पुढील मांडणी करावयास हवी. जडवस्तुहि ब्रह्म आहे हें उपनिषदीय ज्ञान आत्मसात् केलें तरी या दोन टोंकांना असलेंल्या दोन वस्तूंचें अभिन्नत्व, तादात्म्य तर्कनिष्ठ बुद्धीला पटावयास अवघड जातें; तीं दोन टोकें एकमेकांपासून फार दूर दिसत असल्यानें त्या दोहोंच्या मध्यभागीं त्यांना जोडणारी अनेक वस्तूंची चढती शिडी मानावी लागते. (ती प्राण, मन, अतिमन, तसेंच मन व अतिमन यांना जोडणाऱ्या दुव्यांची बनली आहे) ही शिडी मान्य केली म्हणजेच तर्कनिष्ठ बुद्धीला त्या दोहोंचें, म्हणजे ब्रह्माचें किंवा चैतन्याचें आणि जडाचें अभिन्नत्त्व पटूं शकतें; एरवीं तें पटूं शकत नाहीं. ही मधली शिडी मानली नाहीं तर एकमेकांचे कट्टर वैरी असलेंल्या दोन स्त्रीपुरुषांच्या विवाह संबंधाप्रमाणें चैतन्य व जड यांचा ऐक्यसंबंध, दुःखमय असला पाहिजें असें मानावें लागतें; आणि ज्याप्रमाणें त्या दोघा वैऱ्यांचा विवाहसंबंध त्या दोघांच्या सुखासाठींच तोडून टाकणें हें त्या प्रश्नाचें तर्कबुद्धीला पटणारें एकमेव समाधान असतें, त्याप्रमाणें चैतन्य व जड यांचा ऐक्यसंबंध तोडून टाकणें हेंच दोघांच्याहि हिताचें आहे असें तार्किक बुद्धीला सहजच वाटतें. जड व चैतन्य या दोहोंमध्यें प्राणादि कोणतेच दुवे नसतां त्यांचें अभिन्नत्त्व प्रतिपादणें, त्यांच्यापैकीं कोणतीही एक वस्तु दुसरीचें प्रतिनिधित्व करूं शकतें असें म्हणणें, ही कल्पना-प्रिय विचारशील मनाची कृत्रिम सृष्टि आहे व ती अनुभवप्रतिष्ठित तर्काला विरुद्ध असून केवळ तर्कशून्य, अंत:साक्षात्कारवादालाच मान्य होण्यासारखी व निर्माण करतां येण्यासारखी आहे.

विशुद्ध ज्ञानस्वरूप चैतन्य हें एक तत्त्व, आणि ज्ञानशून्य जड यंत्र-सदृश वस्तु किंवा शक्ति हें दुसरें तत्त्व; दुसऱ्याचें नांव निसर्ग व पहिल्याचें नांव ईश्वर किंवा आत्मा, या प्रकारची विश्वव्यवस्थेची मांडणी

 

पान क्र. १२

आम्हीं केली तर, त्या मांडणीचा अनिवार्य परिणाम ईश्वराला नकार देणें हा एक होईल, किंवा निसर्गाला अमान्य करून तिकडून तोंड फिरवणें, निसर्गनिवृत्त होणें हा होईल. वरील मांडणी मान्य केली असतां प्राण आणि मन, प्राणमय जीव आणि विचारशील मन या दोहोंनाहि, ईश्वर किंवा निसर्ग या दोहोंपैकीं कांहींतरी एक मानून दुसऱ्या तत्त्वाला नकार द्यावा लागेल; या प्रकारची निवड करणें हें त्याला अटळ होईल. मग ईश्वर हा कल्पनाजनित भ्रमरूप आहे असेंच विचारशील मन मानूं लागेल अथवा उलटपक्षीं निसर्ग हा इंद्रियांनीं निर्माण केलेंला भ्रम आहे असें तें मानील; त्याचप्रमाणें प्राण किंवा प्राणमय जीव जडेतर चैतन्यावर, दृष्टि स्थिर करून स्वतःचें जीवन जगणें तिरस्करणीय समजून सोडून देईल किंवा ईश्वराच्या चिंतनांत आत्मविस्मृति घडून आनंदातिशयाचा अनुभव मिळाल्यानें त्या आनंदासाठीं स्वतःचें स्वाभाविक जीवन टाकून देईल. दुसऱ्या पक्षीं तो आपलें अमृतत्व नाकारून ईश्वरापासून दूर, विरुद्ध दिशेला जाऊन आपलें जीवन पशुजीवनाप्रमाणें जगूं लागेल. सांख्यांची पुरुष आणि प्रकृति ही जोडी घ्या. यांत पुरुष हा ज्ञानमय निष्क्रिय असा आत्मा आहे, आणि प्रकृति ही ज्ञानशून्य क्रिया करणारी शक्ति आहे; या दोहोमध्यें दोघांना सारखी अशी एकहि गोष्ट नाहीं. दोघांची स्वयंप्रवृत्तिशून्यतादेखील दोन विरुद्ध प्रकारची; स्वयंप्रवृत्तिशून्य आत्मा निष्क्रिय तर निष्क्रियच राहणार, स्वयंप्रवृत्तिशून्य प्रकृति सक्रिय तर सक्रियच राहणार. अशा उभय तत्त्वांचा अन्योन्य विरोध दूर व्हावयाचा कसा ? प्रकृति थकून थांबली म्हणजेच हा विरोध दूर होतो. ज्ञानमय शांतीचा, निष्क्रिय शांतीचा अखंड उपभोग घेतांना आत्मा थकत नाहीं. आत्म्याला अनेक सोंगेंढोंगें एकामागून एक अखंडपणें दाखवीत प्रकृति यंत्राप्रमाणें सारखी भिरभिरत असतां, आत्म्यावर या प्रदर्शनाचा कांहींहि परिणाम न घडल्यानें, प्रकृति शेवटीं थकून थांबतें. याप्रमाणें प्रकृतिपुरुषांचा विरोध संपून पुरुष विजयी होतो. शंकराचार्यांचा 'आत्मा' हा एकच एक, अवाक् आणि अकर्ता आहे व त्यांची 'माया' ही बहुत्वाचा पसारा घातलेंली नामरूपमय आहे. येथेंहि पुरुष व प्रकृतिप्रमाणें दोन विसंवादी, अनिवार्यपणें विरोधी वस्तूंची ब्रह्म व माया ही जोडी विश्वव्यवस्थेचा पाया म्हणून घेतलेंली आहे. प्रकृति-पुरुष-विरोधाप्रमाणें या जोडीचा कट्टर अन्योन्य विरोध, मायेचा निरास होऊन (तिचा नामरूपाचा पसारा मिथ्या आहे, भ्रमरूप आहे असा निर्णय केल्यानें

 

पान क्र. १३

तिचा निरास होऊन) केवळ आत्म्याचा एकमेव शाश्वत, शांत, सत्य असा अनुभव येऊन थांबतो. मायेचा निरास करून शंकराचार्यांचा आत्मा विजयी होतो तर प्रकृतीची निराशा करून सांख्यांचा पुरुष विजयी होतो.

चैतन्यवाद्यांपेक्षां जडवाद्यांचें काम सोपें असतें. 'चैतन्यवस्तु नाहीं' असा चैतन्याला नकार देऊन, मनाला सहज पटणारा व पटविणारा सोपा युक्तिवाद करून जडवाद्यांना जडद्रव्याचें किंवा जडशक्तीचें खरेंखुरें अद्वैत पटवून घेतां येतें; तसेंच पटवून देतां येतें. चैतन्यवाद्यांना चैतन्य-अद्वैत इतक्या सुलभतेनें स्वत:ला व इतरांना पटवितां येत नाहीं. तथापि 'चैतन्य नाहींच,' केवळ जडच आहे, असें आपलें आग्रही प्रतिपादन कायमचें टिकवून धरणें जडवाद्यांना अशक्य होऊन जातें, विश्वापलीकडे दूर निष्क्रिय असें अज्ञेय कांहींतरी आहे अशा निर्णयावरच शेवटीं ते येतात. जसा शंकराचार्यांचा शांत आत्मा, सांख्यांचा निष्क्रिय पुरुष, तद्वतच जडवाद्यांचें हें 'अज्ञेय' तत्त्व. जडच सर्व कांहीं आहे ही कल्पना विचारशील बुद्धीला पटत नाहीं; बुद्धीच्या स्वाभाविक मागण्या जडवाद्याला सतावून सोडतात. अशा परिस्थितींत बुद्धीची समजूत काढून तिला तात्पुरती स्वस्थ बसविण्यासाठीं अज्ञेयाची स्पष्टार्थहीन कल्पना जडवाद्यांना उपयोगी पडते. जडाच्या पलीकडे संशोधनाचें क्षेत्र वाढवणें जडवाद्यांना टाळावयाचें असतें; व ही टाळाटाळी साधण्यासाठीं जडापाठीमागें कांहीं आहे, पण तें अज्ञेय आहे, अशी सबब ते काढतात.

विश्वाची व्यवस्था सांगतांना अन्योन्य विरोधक वस्तूंची एकत्र मोट बांधली जाते व त्यांतून कांहींच फलनिष्पत्ति होत नाहीं. म्हणून मानवी बुद्धीला या खटाटोपांत समाधान लाभत नाहीं. अंतर्बाह्य विश्वांत ज्या वस्तू आहेत, त्या सर्व सत्य आहेत, असें म्हणणाऱ्या पूर्ण अस्तिकवादांत मानवी बुद्धीला खरें समाधान लाभतें व म्हणून ती अशा पूर्ण अस्तिकवादाकडे झुकत असते. विश्वांतील सर्व वस्तूंचा भासमान विरोध व विसंवाद मिटवून, त्यांमध्यें सुस्पष्ट सुसंवाद निर्माण करण्यानेंच बुद्धीला अवश्य असणारा पूर्ण अस्तिकवाद शक्य होतो. हा सुसंवाद किंवा समन्वय सिद्ध करण्यासाठीं मानवी बुद्धीला मानवाच्या आंतरिक जाणिवेनें ठरविलेंल्या ज्ञानविकासाच्या पायऱ्या क्रमाक्रमानें चढाव्या लागतात; जड द्रव्याला जी बाह्य पृथक्करण पद्धति लावली जाते, ती प्राण व मन यांना लावून अथवा आंतर, आत्मगत संयोगीकरण व अंत:प्रकाशमंथन करून बुद्धीला आपलें इष्ट साधावें लागतें. हें इष्ट म्हणजे अगदीं अंतिम एकमेवाद्वितीयाची अचल शांति आणि त्या एकाच्या अंत-

 

पान क्र. १४

रंगाचे दर्शन घडविणारी त्याची अनेकता-निर्मायक व अनेकता-व्यापक शक्ति, या दोन गोष्टींची सारख्याच प्रमाणांत सत्यत्व सिद्धि. ही सत्यत्वसिद्धि साधली म्हणजे सर्व सुसंवाद सुगम होतो आणि त्यायोगें बुद्धीला अचल समाधान देणारा पूर्ण आस्तिकवाद शक्य होतो. असा समग्र सार्वत्रिक अस्तित्ववाद किंवा सर्वसत्यत्ववाद सिद्ध झाला म्हणजे अस्तित्वांतील दर्शनीं अन्योन्यविरोधी नानाकारधारी निसर्गदत्त गोष्टी एकमेकींशीं सुसंवादी करतां येतात, आणि आमच्या विचार व जीवन यांच्या प्रवाहाचें, नियमन करणाऱ्या नानाविध परस्परविरोधी शक्तींचा उगम कोणत्या मध्यवर्ति सत्यांत आहे व कोणत्या मध्यवर्ति सत्याचे हेतू नानाप्रकारें पूर्ण करण्याची कामगिरी करण्याकरितां त्यांचा येथें, त्या सत्याचे प्रतिनिधि म्हणून, अवतार झालेंला आहे या गोष्टीचा शोध त्यांच्या सहाय्यानें आपणांस लागतो. हें घडून आलें म्हणजे आमच्या विचाराला खरा मध्यवर्ति केंद्रबिंदु सांपडल्यानें त्याचें फेऱ्यामागें फेरें घेत घेत वृथा भ्रमन्ति करीत रहाणें थांबतें आणि तो उपनिषदीय ब्रह्माप्रमाणें काम करतो; अर्थात् ब्रह्माप्रमाणें सगळया विश्वांत दौरा करण्याचा खेळ खेळत असतां तो आपल्या मध्यवर्ति नितांत निश्चल उगमस्थानाला धरून निश्चल स्थिर असतो; तसेंच आपला प्राण किंवा प्राणमय जीवन, आपलें ध्येय ओळखून त्या ध्येयाची, केंद्रवर्ति सत्याची सेवा शांत आणि स्थिर आनंदानें व जाणिवेनें करीत राहतें आणि केव्हां कमी, केव्हां अधिक जोमानें व तालबद्धतेनें काम करणाऱ्या आपल्या शक्तीचाही ध्येयाच्या सेवेंत उपयोग करतें.

परंतु कोणत्याहि कारणानें विचाराचा आणि जीवनाचा, केंद्रसत्याच्या आश्रयानें चाललेंला सुसंवादी संसार, विसंवादमय होऊं लागला म्हणजे दर्शनीं विरोधी वस्तूंची वेगवेगळी परीक्षा घेऊन पाहणें मानवी बुद्धीला अवश्य असतें व उपकारकहि असतें. अशी परीक्षा केल्यानें मानवी बुद्धि पूर्वींपेक्षा अधिक दृढपणें त्या दोन वस्तूंच्या वास्तविक सुसंवादित्वाचा निर्णय पुन्हा आपलासा करतें. जडापासून परीक्षेला सुरुवात करतां येईल. जडच केवळ (जडद्रव्य किंवा जडशक्ति) सत्य आहे, ही मनाची बैठक कायम राहूं शकत नाहीं. त्याचे पाठीमागें कांहीं अज्ञेय आहे अशी मनाची समजूत काढावीच लागते, हें प्रत्ययास आलें म्हणजे पुढें जाऊन प्राणशक्ति, संवेदनाशक्ति, कल्पनाशक्ति यांची परीक्षा करितां येईल. जडापासून दुसऱ्या टोंकाला, चैतन्याला, जातांना मध्यें जाणिवेच्या विकासाचे प्राणादि टप्पे लागतात. त्यांचीहि जडाप्रमाणें परीक्षा करणें

 

पान क्र. १५

योग्य आहे. सर्व अंतर्बाह्य वस्तू, जडाची रूपें आहेत, या सिद्धान्ताची परीक्षा झाल्यावर सर्व अंतर्बाह्य वस्तू मूळ प्राणशक्तीची, मूळ संवेदनांची, मूळ कल्पनांची रूपें आहेत या सिद्धान्ताचा परामर्श घ्यावा. या एकांगी सिद्धांतांवर अवास्तवतेची छाया नेहमीच दिसते व ते सिद्धांत अवास्तव आहेत हें पटावयास फार वेळ लागत नाहीं. तर्कनिष्ठ बुद्धीला थोडा काळ ते बरे वाटतील, कारण तिचा व्यवसाय प्रत्यक्षातीत शुद्ध कल्पनांचा विचार करण्याचा असतो. पण प्रत्यक्षाचें, वास्तवाचें ज्ञान व ओढ असलेंल्या मनाला ते सिद्धांत समाधान देऊं शकत नाहींत. मनाला ही अनुभूति असतें कीं, त्याच्या पाठीमागें कांहीं आहे व तें कल्पनेच्या स्वरूपाचें नाहीं; तसेंच त्याला हेंहि कळतें कीं, त्याच्या आंत जें कांहीं आहे तें प्राणवायूहून वेगळें आहे, त्याच्याहून अधिक आहे. चैतन्य किंवा जड या वस्तु मनाला अंतिम सत्यासारख्या कांहीं काळ तरी वाटतात, परंतु या दोन टोंकामधील तत्त्वांचे तसें नाहीं. म्हणून बुद्धि अगोदर चैतन्य किंवा जड या टोंकाकडील वस्तूंची चिकित्सा करून नंतर मधील तत्त्वांचा परामर्श घेते. तिला असें करणें तिच्या स्वभावानुसार अपरिहार्य असते आणि असें करण्यानेंच तिची चिकित्सा लाभदायक होते. दोन सहकाऱ्यांच्या आधारानें बुद्धि आपलें काम करते. बाह्याचें किंवा आंतलें ज्ञान करून देणारा इंद्रियगण, हा एक सहकारी, व दुसरी सहकारी शक्ति म्हणजे वाणी. इंद्रियांना सगळें अस्तित्व ज्ञात होत नाहीं; अस्तित्वाचे वेगळे अंश तीं स्पष्टपणें जाणूं शकतात. तसेंच वाणी किंवा शब्दशक्ति इंद्रियगोचर वस्तूंचें काळजीपूर्वक वर्गीकरण करून त्यांच्या मर्यादा ठरविते, तेव्हांच तिचें त्या वस्तूंचें नामकरण स्पष्टतेनें युक्त होतें. या अशा दोन अंशदर्शी सहकाऱ्यांच्या सहाय्यानें काम करणाऱ्या बुद्धीला महान् तत्त्वभूत वस्तूंचा पसारा समोर दिसला आणि त्या अनेकतेंतून तिला एकता साधावयाची असली म्हणजे स्वभावतःच ती त्या समोर असणाऱ्या वस्तूंपैकींच एक वस्तु मूलभूत ठरवून बाकी वस्तू कशातरी दडपादडपीनें तिच्या पोटांत घालून मोकळी होते; किंवा एक सत्य ठरवून बाकी जबरदस्तीनें भ्रमरूप ठरवून टाकते. ही अशी ''प्रवेशबंदी''ची पद्धति उपयोगांत न आणतां अनेक तत्त्वांच्या एकतेचे, एकात्मतेचें खरें मूळ बुद्धीला तेव्हांच दिसूं शकेल, जेव्हां ती स्वत:च्या वर चढून जाईल (अर्थात् स्वत:पेक्षां श्रेष्ठ असलेंल्या जाणिवेच्या दृष्टीनें पाहील) किंवा सर्व चिकित्साचक्र फिरून संपवील. असें केलें म्हणजे तिच्या असें अनुभवास येईल कीं,

 

पान क्र. १६

जडापासून चैतन्यापर्यंतचीं, निसर्गापासून ईश्वरापर्यंतचीं विश्वसंसारांतील सर्व तत्त्वें, एका अनिर्वचनीय अव्याख्येय अर्थात्, तिला अज्ञेय परंतु मानवाला प्राप्त होण्यासारख्या, एका परम सत्याचीं वास्तव रूपें आहेत. कोणत्याहि मार्गानें आपण विचारप्रवास केला तर शेवटीं या अनिवर्चनीय, अज्ञेय परंतु अप्राप्य नसलेंल्या सत्याला आपण पोंचतो. आपण प्रवास मध्येंच थांबविला तर मात्र या सत्याची आपली भेट होत नाहीं.

तेव्हां ही चांगली शुभसूचक गोष्ट आहे कीं, अनेक प्रयोग व शाब्दिक निर्णयानंतर आमच्या पुढें दोनच कोटि उभ्या राहतात; जड ही एक कोटि, चैतन्य ही दुसरी कोटि; अनुभवाच्या कठीण परीक्षेंत प्राण, मन इत्यादि इतर कोटींपेक्षां या दोन टोंकांच्या दोन कोटि, उत्तम प्रकारें निभावून बराच काळ टिकून राहिल्या आहेत; आणि अनुभवाचा मार्ग क्रमतां क्रमतां शेवटीं या दोन कोटींचा परिणाम म्हणून जो मानवाच्या अनुभवाला आला आहे, तो त्याच्या स्वाभाविक, सार्वत्रिक, जन्मजात भावनेला समाधानकारक किंवा योग्य वाटत नाहीं. मानवजातीची जन्मजात सार्वत्रिक भावना किंवा भाव हाच विश्वव्यापक सारभूत सत्याचें प्रतिनिधित्व करणारा आणि गुप्त राहून पारख करणारा, संभाळणारा, मानवजातीचा खरा मित्र असल्यानें, त्यानें दिलेंला निर्णय हा आम्ही शुभसूचक मानतो. युरोपांत जडवाद्यांचा नकार आणि हिंदुस्थानांत संन्यासवाद्यांचा नकार प्रभावी आहे. आमचेच काय तें खरें असें ते दोघे आपापल्या क्षेत्रांत म्हणत आलें आहेत, आणि त्या त्या क्षेत्रांतील जीवनविषयक कल्पनेवर व जीवनसरणीवर तेथील प्रभावी तत्त्वज्ञानाचा रंग प्रामुख्यानें चढलेंला आहे. हिंदुस्थानांत संन्यासवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळें आध्यात्मिक संपत्ति - सर्व प्रकारची नाहीं तरी निदान कांहीं प्रकारची - खूप सांठली आहे, पण भौतिक जीवन पहावें तर त्याचें मोठ्या प्रमाणावर दिवाळें निघालें आहे. युरोपांत भौतिक संपत्ति भरपूर आहे. या जगांतील मुलुख आणि सत्ता यूरोपनें झगडून यशस्वितेनें आत्मसात् केली आहे, पण युरोपांत आध्यात्मिक गोष्टींचें दिवाळें - हिंदुस्तानाप्रमाणेंच मोठें दिवाळें - निघण्यास याच संपत्तीचा व सत्तेचा वाढता प्रपंच, कारणीभूत झाला आहे; आणि ज्या तत्त्वज्ञानानें हें घडून आलें आहे तें जडवादी तत्त्वज्ञानहि आतां यूरोपीय बुद्धीला समाधानकारक वाटेनासें झालें आहे.

या घटनांचा परिणाम म्हणून आतां अशी वेळ आलेंली आहे कीं, जगाचा कल प्रस्तुत जडवादी किंवा चैतन्यवादी एकांगी सिद्धान्ताला

 

पान क्र. १७

प्रतिकूल व प्राणमन आदि मधील टप्प्यांसुद्धां जड आणि चैतन्य दोघांनाहि सामावून घेणारा सर्वांगीण नवा सिद्धांत पटवून घेण्याला अनुकूल होत आहे. मानवाचे विचार व आंतरिक आणि बाह्य अनुभव या सर्वांना हा नवा सर्वसमावेशक सिद्धांत, स्थान देतो आणि या सिद्धान्ताचा उपसिद्धांत असा होतो कीं, मानवाचें वैयक्तिक व वांशिक जीवन सर्वांगपूर्ण, पूर्वीं कधीं नव्हतें इतकें संपन्न, कृतार्थ व आत्मतृप्तिसाधक बनविणें, हेंच मानवाला योग्य आहे.

चैतन्य आणि जड दोन्ही वस्तू एका 'अज्ञेयाच्या' प्रतिनिधिरूप आहेत, हें अज्ञेय तत्त्व, दोघांचेंही मूळ आहे, पण अज्ञेयाशीं या दोघांचें नातें सारखें नाहीं, भिन्न आहे. या नात्याच्या किंवा संबंधाच्या भिन्नतेमुळें, जडवादी नकार आणि संन्यासवादी किंवा चैतन्यवादी नकार, यांच्या परिणामकारकतेंत फरक पडतो. चैतन्यवादी नकाराहून जडवादी नकार, अधिक आग्रही असतो व तात्पुरतें यशहि त्याला अधिक लाभतें ; तसेंच सामान्य मानवतेला हा नकार पटविणें अधिक सोपें असतें -- तथापि हा नकार टिकाऊपणांत कमी पडतो, त्याचा अंतिम परिणाम कमी दिसून येतो. संन्यासवाद्यांचा चैतन्यवादी नकार, अधिक टिकाऊ, अधिक परिणामकारी, मनाला व्यापून टाकणारा आणि भयकारक धोक्याचा असतो. जडवादी नकार, कमी टिकाऊ व कमी परिणामकारक असण्याचें कारण असें कीं, या नकारावरचा उतारा देखील त्याच्या अंतरांतच असतो. या नकाराचा अत्यंत प्रभावी व मोठा भाग म्हणजे अज्ञेयवाद. जें कांहीं दिसत आहे त्याच्या पाठीमागें अज्ञेय असें कांहीं आहे, असें प्रतिपादन करून या अज्ञेयाच्या मर्यादा वाढवीत वाढवीत, आज जें अज्ञात आहे तें सर्व नित्य अज्ञेय रहाणार, असें हा वाद म्हणावयास लागतो. त्याचा या सिद्धान्ताला आधारभूत पक्ष असा आहे कीं, भौतिक इंद्रियें एवढीच काय तीं आपलीं ज्ञानसाधनें आहेत; म्हणून तर्कबुद्धि कितीहि जोरदार आणि दूरवर भराऱ्या मारूं इच्छीत असली, तरी या भौतिक इंद्रियांच्या क्षेत्राबाहेर तिला जातां येणार नाहीं; या इंद्रियांनीं पुरविलेंल्या किंवा सूचित केलेंल्या गोष्टींवरच बुद्धीनें आपली कसरत नेहमीं करावयास हवी; इंद्रियसूचित गोष्टीहि इंद्रियांशीं, इंद्रियप्रत्यक्षांशीं नेहमीं बांधून टाकलेंल्या असल्या पाहिजेत; इंद्रियसूचित गोष्टींच्या आधारानें इंद्रियप्रत्यक्षाचा मुलुख आम्ही मागें टाकता कामा नये; इंद्रियप्रत्यक्षसूचित गोष्टींचा सेतु बांधून, आम्हीं इंद्रियातीत क्षेत्रांत पाऊल टाकण्याचें धाडस करूं नये;

 

पान क्र. १८

या इंद्रियातीत क्षेत्रांत ज्ञानसाधनें अधिक समर्थ आणि कमी मर्यादाबद्ध असतात आणि तपासणीचा प्रकारहि तेथें वेगळा असून त्याचा त्या क्षेत्रांत उपयोग करावा लागतो म्हणून अशा क्षेत्रांत प्रत्यक्षाश्रित अज्ञेयवादानें जातां कामा नये.

भौतिक इंद्रियांशिवाय वेगळी ज्ञानसाधनें नाकबूल करणारा हा पक्ष अगदींच लहरी असून त्याची व्याप्ति अपुरी आहे, त्याचें विधान वस्तुस्थितीला पुरतेपणीं लक्षांत घेणारें नाहीं, म्हणून तो त्याज्य आहे, असें साहजिकपणेंच म्हणावें लागतें. या पक्षाला चिकटून रहावयाचें तर त्याला एकच मार्ग आहे आणि तो असा कीं, या विधानाला विरोधी असणारा पुरावा आणि अनुभव विस्तृत क्षेत्र व्यापणारा असतांहि, त्याची कशीतरी वासलात लावावयाची किंवा त्याकडे पाठ फिरवावयाची; इंद्रियप्रत्यक्ष नसलेंल्या अनेक उदात्त आणि उपयुक्त शक्ती आमच्यामध्यें आहेत, या शक्ती जाणीवपूर्वक काम करीत आहेत, किंवा कमी अधिक नेणिवेनें काम करीत आहेत, अथवा निदान सुप्तस्थितींत तरी आम्हां सर्वांमध्यें आहेत. इंद्रियप्रत्यक्षपक्षाला चिकटून राहिलें तर या सर्व शक्ती आम्हाला अमान्य तरी कराव्या लागतील किंवा त्यांचें महत्त्व कमी मानावें लागेल; त्याचप्रमाणें भौतिकाच्या पलीकडील घटनांचें संशोधन, परीक्षण करणें बहुतांशानें आम्हाला सोडून द्यावें लागेल; फक्त अशा अतिभौतिक घटनांचें परीक्षण आम्हाला करतां येईल कीं, ज्या घटनांचा जडाशीं संबंध आला आहे, जडाच्या संसर्गानें वा जडाच्या हालचालीच्या संसर्गानें, ज्या अनुभवास आल्या आहेत आणि जड शक्तींचें एक गौण कार्य, अशी ज्या घटनांच्या संबंधानें आमची निश्चित कल्पना झाली आहे. मनाचे आणि अतिमनाचे व्यवहार हें जडाचे गौण आनुषंगिक कार्य आहेत हा पूर्वग्रह टाकून देऊन, त्या व्यवहारांचें निरीक्षण-परीक्षण स्वतंत्रपणें आपण करूं लागलों म्हणजे अशा घटनांचा मोठा पसारा आपल्यासमोर उभा राहतो कीं, जो जडवाद्यांच्या आग्रही संकुचित सूत्राच्या घट्ट पकडींतून सर्वथा पार निसटून जातो. इंद्रियांच्या क्षेत्रापलीकडे ज्ञान होण्यासारख्या सत्यांचीं अनेक जगतें आहेत, ज्या शक्तींवर भौतिक इंद्रियांची निर्णायक सत्ता नसून, भौतिक इंद्रियांवरच ज्यांची सत्ता आहे, अशा शक्ती मानवामध्यें आहेत; आणि मानवाच्या खऱ्या पूर्ण अस्तित्वाचें बाह्य कवच असलेंल्या इंद्रियप्रत्यक्ष जगाशीं संबंध ठेवण्यासाठींच फक्त त्या शक्ति भौतिक इंद्रियांचा उपयोग करतात. या गोष्टी आमच्या वाढत्या अनुभवामुळें आम्हांला मान्य कराव्या लागतात.

 

पान क्र. १९

हा अनुभव आम्हाला आला कीं भौतिक अज्ञेयवादाचा सिद्धांत सत्यसृष्टींतून तत्काल नाहींसा होतो; त्यापेक्षां व्यापक सिद्धांत मांडावयास, व सारखी वाढती शक्ति-चिकित्सा करावयास आम्ही मोकळे होतो.

याप्रमाणें बुद्धिनिष्ठ भौतिकवादाच्या (जडवादाच्या) चक्रांत मानवता मधूनमधून थोडा थोडा काळ फेरे घालीत आली आहे. तरीपण या कालखंडांचा मानवाला अतिशय उपयोग झालेंला असून या अल्पकालीन भौतिकवादाची मानवाला फार आवश्यकता होती, हें मान्य करणें आपलें पहिलें कर्तव्य आहे. कारण, नव्या अनुभवांचे व पुराव्यांचें जें अफाट क्षेत्र, आपलें कांहीं काळ बंद राहिलेले दरवाजे आमच्यासाठीं, अलीकडे पुन: उघडीत आहे, त्या क्षेत्रांत सुरक्षितपणें पाऊल टाकावयाचें तर मानवाच्या बुद्धीला कडक शिस्त लागून ती अतिशय सरळ, स्वच्छ, व कुशाग्र व्हावयास हवी. या क्षेत्रांत अपरिपक्व मनाच्या लोकांनीं प्रवेश केला तर, तेथील अनुभवांनीं, फार अनिष्ट अशा, दिशाभूल करणाऱ्या कल्पना या लोकांच्या डोक्यांत निर्माण होण्याचा संभव असतो. पूर्वकाळीं असें खरोखर घडलेलें आहे. या क्षेत्रांत अनुभवलेलें वास्तव सत्य पोटांत आणि त्यावरील कवच सत्याचा विपर्यास करणाऱ्या वेडगळ भ्रमांचें, निर्बुद्ध श्रद्धांचे, असें पूर्वीं अनेकदां घडलेलें आहे, व त्यामुळें सत्यज्ञानाची वाढ अशक्य होऊन ती  थबकलेली आहे. असें घडल्यानेंच, तें खरोखरीचें सत्य आणि त्यावर चढलेला भ्रमांचा मुखवटा, दोन्ही थोडा काळ तरी उचलून दूर फेंकून द्यावींत आणि सत्यशोधनाला पुन: आरंभ करून सत्यज्ञानाची वाढ खात्रीनें होईल असा प्रयत्न करण्याला, संशोधनाचा मार्ग मोकळा करावा, हें अवश्य होऊन बसलें. जडवादांत जी बुद्धिनिष्ठा आहे, तिनें वरीलप्रमाणें सत्यशोधनाचा मार्ग मोकळा करून मानवजातीची फार मोठी सेवा केली आहे.

इंद्रियांच्या क्षेत्राबाहेर असणाऱ्या गोष्टींचें ज्ञान देणाऱ्या ज्या इंद्रियापलीकडील शक्ती मानवांत आहेत, त्यांना जड देहाच्या जड द्रव्यांत बसवून, त्या देहांत त्या जड देहाच्या द्वारां काम करावयाचें व्रत दिलें असल्यानें आणि भावनामय वासना, नाडीगत प्रेरणा यांजबरोबर त्यांना एकच संसारगाडा ओढावयास जुंपलें असल्यानें, त्यांचें कार्य अलगपणें, स्वतंत्रपणें होऊं शकत नाहीं, दुसऱ्या शक्तींचें कार्य व त्यांचें कार्य मिसळलें जातें आणि त्यायोगें त्यांच्याकडून एखाद्या सत्याचें सुस्पष्ट ज्ञान होण्याऐवजीं, सत्य आणि मिथ्या याचा अनाकलनीय गोंधळ मात्र संवर्धित होण्याचा

 

पान क्र. २०

धोका उत्पन्न होतो. ज्यांच्या मनाला कसलीच शिस्त लागलेली नाहीं, ज्यांच्या वासनांतील, विकारांतील मलिनता मुळींच दूर झालेली नाहीं, अशा लोकांनीं आध्यात्मिक अनुभवाच्या उच्च क्षेत्रांत चढून जाण्याचा यत्न केला तर वरील भिन्न शक्तींच्या कार्यांची भेसळ, विशेष धोक्याची होण्याचा संभव असतो. अशा लोकांनीं हे अविचारी अकालीं साहस केलें, आपली पूर्वतयारी नसतां उच्च आध्यात्मिक क्षेत्रांत प्रवेश करण्याचें धाडस केलें, म्हणजे त्यांचा जो गोंधळ उडतो त्याला सीमा नाहीं; दिखाऊ ढग, धूसर अर्धवट तेजाचें धुकें, अथवा गडद अंधार भरलेल्या प्रदेशांत जणुं ते जाऊन पडतात. त्या प्रदेशांत मधून मधून वीज चमकून जावी, तसें प्रकाशाचे-सत्याचे, क्षणिक अनुभव त्यांना येतात, त्यांच्यामुळें त्यांना खरें ज्ञान होण्याऐवजीं त्यांच्या अंधपणांत, अज्ञानांत अधिक भर पडते ! असें हें साहस करणें टाळण्यासारखें मात्र नसतें. निसर्गरूप प्रकृति, आपला विकास करून घेण्याचा जो मार्ग स्वेच्छेनें पसंत करते, त्या मार्गांत वरील प्रकारचें साहस हा एक अटळ भाग आहे. कारण विकासाचें गंभीर कार्य करीत असतां, तिला स्वत:ची करमणूक करून घेण्याचीहि लहर येते व वरील साहसांत तिची करमणूक होते. तें कसेंहि असलें तरी, मानवी बुद्धीच्या दृष्टीनें असल्या साहसाला अवेळीं केलेलें अविचारी साहस असेंच नांव द्यावें लागतें.

अविचारी साहसाच्या वरील कहाणीवरून हें लक्षांत येईल कीं, वाढतीं नवीन नवीन अतिभौतिक क्षेत्रें पायाखालीं घालीत जाणाऱ्या ज्ञानाचा पाया, स्वच्छ, शुद्ध व शिस्तीच्या बुद्धीचा असणें आवश्यक आहे. त्याचप्रमाणें हेंहि आवश्यक आहे कीं, या बुद्धीनें वेळोवेळीं इंद्रियप्रत्यक्ष घटना, भौतिक विश्वांतील दृश्य स्पर्श्य सत्य वस्तु यांजकडे वळून, त्यांच्या सत्यनिर्णायक नियंत्रणेच्या आधारानें, आपल्याकडून घडलेल्या किंवा घडूं पाहणाऱ्या प्रमादांचें संशोधन व शोधन करावें. मानव हा पृथ्वीचें अपत्य आहे. त्याला पृथ्वीचा स्पर्श, नेहमींच नवीन जोम, नवीन उत्साह देऊं शकतो. अतिपार्थिव ज्ञान मिळविण्याच्या मागें तो लागला असला तरी, पार्थिवाचा पाठिंबा त्याच्या उत्साहांत भर घालून त्याला ती ज्ञानप्राप्ति सुलभ करून देईल. असें देखील म्हणतां येतें कीं, अतिभौतिक क्षेत्र, वास्तवतेनें पूर्णपणें आपलेंसें करण्यासाठीं, (या क्षेत्राची उंच उंच ठिकाणेंहि मानवाच्या केव्हांहि आवांक्यांत येण्यासारखीं आहेत) भौतिकावर आपण आपलें पाय घट्ट रोंवलेले असावेत. उपनिषदांत असें म्हटलें आहे कीं,

पान क्र. २१

पृथ्वी त्याच्या - विराट् पुरुषाच्या - पायांचे ठिकाणीं आहे. विश्वांत व्यक्त होणाऱ्या चैतन्याचें स्वरूप वर्णन करतांना, उपनिषदांत वरील प्रकारचें विधान येतें (पहा. मुंडकोपनिषद् २ - १ - ४ ''पद्भ्याम् पृथिवी,'' बृहदारण्यक उपनिषद् १ - १ - १ ''पृथिवी पाजस्यम्'') आणि ही गोष्ट खरी आहे कीं, भौतिक विश्वाचें आपलें ज्ञान आपण जितकें अधिक विस्तृत व अधिक संशयातीत करूं, तितका श्रेष्ठतर अतिभौतिक ज्ञानासाठीं आपला पाया अधिक विस्तृत, अधिक मजबूत होतो; इतकेंच नव्हे तर श्रेष्ठतम ज्ञानाचा, ब्रह्मविद्येचा पाया म्हणून देखील, हा भौतिकाचा सुदृढ पाया उपयोगी पडतो.

तेव्हां, मानवी ज्ञानाच्या जडवादप्रधान विचारसरणीचा व तत्प्रधान कालखंडाचा निरोप घेतांना आपण फार काळजीपूर्वक एक गोष्ट केली पाहिजे. ती ही कीं, त्याचा अविचारानें सर्वस्वीं धिक्कार न करतां त्यांत उपलब्ध झालेल्या उपयुक्त गोष्टींपैकीं एकहि गोष्ट आपण हलगर्जीपणानें टाकून देतां कामा नये. असें आपण वागलों तरच नव्या अतिभौतिक क्षेत्रांत असें अनुभव आणि अशा शक्ती आपण मिळवूं शकूं कीं, ज्यांचें स्वरूप आम्हाला नीटपणें आकलन होईल, आणि ज्यांचा उपयोग आम्हाला निश्चितपणें करतां येऊन, ज्यांना जुन्या भौतिक अनुभवांच्या आणि शक्तींच्याप्रमाणें कामाला लावतां येईल. जडवादी युगांतील नास्तिक्यानें दिव्य शक्तीला उपयुक्त असें जें काम केलें आहे त्याला नांवें ठेवण्याऐवजीं त्याचा आपण कौतुकपूर्वक गौरव करावयास हवा. तसेंच त्या युगांतील अज्ञेयवादानें ज्ञानाच्याच अमर्याद वाढीसाठीं पूर्वतयारी करण्याचें जें विविध प्रकारचें काम केलें आहे त्याबद्दल आश्चर्य व आनंद वाटून त्याला धन्यवाद द्यावयास हवेत. सत्यसंशोधनांत घडलेला प्रमाद किंवा दोष हा सत्याचा मार्ग शोधून काढणारा सहाय्यक या नात्यानें आमच्या जगांत सारखें काम करीत आलेला आहे; कारण अर्धसत्य हेंच खरोखरीं प्रमादाचें खरें स्वरूप असतें; या अर्धसत्यरूप प्रमादाला अर्थातच फार मर्यादित कार्यक्षमता असल्यानें, कार्य करतांना अडखळल्यासारखें होतें; पुष्कळ वेळां प्रमाद हा पूर्ण सत्यानें घेतलेलें सोंग असतें -- त्या सत्याचें जें ध्येय असतें त्या ध्येयाप्रत कोणाच्या नकळत त्याला पोंचतां यावें असा या सोंगाचा हेतु असतो ! आपण जो महत्त्वाचा कालखंड मागें टाकीत आहों, त्या कालखंडात सत्यसंशोधनकार्यांत घडलेला प्रमाद हा अतिरेकी आत्मविश्वासानें धरलेल्या आडमार्गाच्या स्वरूपाचा नसून,

 

पान क्र. २२

अर्धसत्याच्या स्वरूपाचा होता; आपलें काम शिस्तीनें, सदसद्विवेकाला मान देऊन, सरळपणें करणारा आणि आपल्या मर्यादित कार्यक्षेत्रांत अवश्य त्या ज्ञानानें संपन्न असणारा, सत्याचा विश्वासू सहाय्यक असें त्याचें स्वरूप होतें. प्रमादाचें स्वरूप असेंच यापुढेंहि नेहमीं चालू राहील तर तें सत्यसंशोधनाला फार हिताचें होईल यांत संशय नाहीं.

सर्व ज्ञानाचें, सर्व ज्ञानशाखांतील ज्ञानाचें, ज्ञानाला सांपडणारें अंतिम सत्य एक प्रकारचा अज्ञेयवाद असतो. विश्वविषयक संशोधन करणाऱ्या कोणत्याहि ज्ञानशाखेच्या मार्गाचा शेवट आपण गांठला, म्हणजे विश्व हें एका अज्ञेय सत्याचें प्रतीकरूप आहे, त्या सत्याचें भासमान रूप आहे, असें आपल्या नजरेस येतें; त्या त्या ज्ञानशाखेनुसार या अज्ञेय सत्याला निरनिराळया मूल्यसंघाचें स्वरूप येतें; भौतिक, प्राणिक, संवेदनात्मक, बौद्धिक, ध्येयात्मक, आध्यात्मिक अशा अनेक प्रकारच्या मूल्यांचे संघ, अनेक प्रकारच्या ज्ञानशाखा, एका अज्ञेय सत्याचीं प्रतीकें, भासमान् रूपें म्हणून मानवापुढें ठेवतात. तें अज्ञेय सत्य आपल्याला जितक्या अधिक प्रमाणांत सत्य म्हणून प्रत्ययास येतें, तितक्याच अधिक प्रमाणांत तें, व्याख्येचें बंधन घालूं पाहणाऱ्या विचारापलीकडे व स्पष्ट सूत्रांचें बंधन घालूं पाहणाऱ्या शब्दापलीकडे असल्याचें, नेहमींच आपल्या अनुभवास येतें. ''मन तेथें पोंचत नाहीं, वाणीहि तेथें पोंचत नाहीं'' (केन १ - ३) असें आप्तवाक्य आहे. तथापि मायावादी जसें दृश्य पसाऱ्याच्या मिथ्यत्वाचें अतिरेकी प्रतिपादन करतात, त्याप्रमाणें अज्ञेयवादी अज्ञेय वस्तूच्या अज्ञेयत्वाचें अतिरेकी प्रतिपादन करण्याचा संभव आहे. म्हणून हें स्पष्ट करणें बरें कीं, आम्हीं 'अज्ञेय' हा शब्द जेव्हां सत्याला लावतो, तेव्हां त्याचा अर्थ खरोखर एवढाच असतो कीं, तें सत्य आमच्या बुद्धीच्या आणि वाणीच्या आवांक्यापलीकडचें आहे; कारण बुद्धि आणि वाणी हीं साधनें नेहमींच भेदप्रत्ययाला व भेददर्शक शब्दाला, व्याख्येला आपला वाटाड्या करून मार्गक्रमण करीत असतात; तथापि बुद्धीच्या, विचाराच्या आटोक्यांत न येणारें हें अज्ञेय सत्य, विशाल जाणिवेच्या महत्तम प्रयत्नानें प्राप्त होणाऱ्या अवस्थेंत, मानवाला लाभणारें आहे. ज्ञानाची एक प्रक्रिया तादात्म्याच्या रूपाची असते आणि या तादात्म्याच्या ज्ञानावस्थेंत, त्या अज्ञेयाचें उत्तरोत्तर ज्ञान होऊं शकतें, असें एका उच्च दृष्टीनें म्हणतां येतें. हें जें अज्ञेयाशीं तादात्म्य साधून मिळविलेलें अज्ञेयाचें ज्ञान, तें विचाराच्या आणि वाणीच्या द्वारां यशस्वी रीतीनें

 

पान क्र. २३

दुसऱ्यापुढें मांडतां येणार नाहीं, नव्हे तीं तादात्म्यस्थिति संपल्यावर स्वत:पुढें देखील विचार-वाणीद्वारां पुन्हां उभें करतां येत नाहीं हें खरें आहे; तथापि एकदां तें ज्ञान आपलें झालें म्हणजे, त्याचा परिणाम म्हणून, त्या परम सत्याचें स्वरूप व मूल्य, तें अज्ञेय असतां भासत होते त्यापेक्षां अगदीं वेगळें  आमच्या प्रत्ययास येतें. त्याचीं जुनीं प्रतीकें, सर्व क्षेत्रांतील सर्व प्रतीकें, नव्या विश्वव्यापक जाणिवेनें  भारलीं आणि भरलीं जाऊन वेगळींच बनतात, आमच्या आंतरिक अस्मितेंत क्रांति घडून येते आणि त्या क्रांतीच्या द्वारां आमचें बाह्य जीवनहि समूळ वेगळें बनतें. वर सांगितलेल्या तादात्म्याच्या या ज्ञानाखेरीज आणखी एक प्रकारचें ज्ञान आहे. या दुसऱ्या प्रकारच्या ज्ञानाच्या द्वारां, तें परम सत्य, आम्हाला असा अनुभव देतें कीं, दृश्य सृष्टींतील नामरूपें - नामरूपमय दृश्य-गोचर वस्तुजात हीं त्या सत्याचा खरोखरी बाह्य आविष्कार आहेत. सामान्य बुद्धीला हा सत्याचा आविष्कार, आविष्कार न भासतां, त्याला झांकून टाकणारा पडदा किंवा आवरण म्हणून प्रत्ययास येत असतो. दृश्याला सत्याचा आविष्कार म्हणून पाहणारी ही ज्ञानप्रक्रिया, सामान्य ज्ञानप्रक्रियेहून श्रेष्ठ आहे (अर्थात् ती श्रेष्ठतम ज्ञानप्रक्रिया नव्हे.) आणि ही श्रेष्ठ ज्ञानसरणि आपलीशी व्हावयास, जडवादी ज्ञानसूत्रांचा बांध उल्लंघून, प्राण, मन आणि अतिमन यांचीं वैशिष्ट्यपूर्ण - त्यांचे स्वभावधर्म विशिष्टतेनें दाखविणारीं - कार्यें आम्हीं तपासलीं पाहिजेत; जडाशीं त्यांचा सबंध घडविणाऱ्या, व जडाशीं जोडले जाण्याच्या हेतूनेंच होणाऱ्या, त्यांच्या दुय्यम हालचाली तपासून, दृश्याला सत्याचा आविष्कार म्हणून पाहणारी श्रेष्ठ ज्ञानावस्था आम्हाला लाभणार नाहीं.

तेव्हां, आज जें अज्ञात आहे, तें सदैव अज्ञेय आहे, हें म्हणणें चुकीचें आहे. (''तें ज्ञानाहून वेगळें  आहे, तें अज्ञानाच्या वरतीं आहे.'' - केन उपनिषद् १. ३) जें सांप्रत आम्हास अज्ञात आहे, तें नेहमीं आम्हास अज्ञात राहणार, असें कांहीं नियतीचें सूत्र नाहीं; आम्हींच अज्ञानांत रहावयाचें पसंत केलें, आमचीं पहिलीवहिलीं मर्यादित ज्ञानसाधनें कवटाळून बसलों,  तेथेंच कायमचा मुक्काम ठोकण्याचा हट्ट धरला, तर मात्र गोष्ट वेगळी. विश्वांत आहेत त्या सर्व गोष्टी ज्ञेय आहेत; आणि या ज्ञेय गोष्टींचा परामर्श घेऊं शकतील अशी अनुरूप ज्ञानसाधनें - ज्ञानशक्ती विश्वांत आहेत; मनुष्य हा विश्वाचीच लहानशी प्रतिमा आहे, आणि या प्रतिमारूप लहान विश्वांत, महान् विश्वांतील सर्व ज्ञानशक्ती नित्य उप-

 

पान क्र. २४

स्थित असून, एका विशिष्ट विकासावस्थेंत त्यांचें संवर्धन होणें क्रमप्राप्त असतें. अर्थात् हें क्रमप्राप्त संवर्धन मुळींच होऊं द्यावयाचें नाहीं, असें आम्ही मोठ्या यशस्वितेनें खुशाल ठरवूं शकतो; तसेंच, कांहीं ज्ञानशक्ती थोड्याफार वाढल्या असल्या तर, त्यांची ती वाढ अधिक होऊं न देणें, नव्हे, झालेंली वाढ अनुपयोगानें निरुपयोगी करून नाहींशी करणें, ही गोष्ट देखील आमच्या ताब्यांतील आहे व ती आम्ही करूं शकतो. तें कसेंहि असो, मुख्य मुद्दा हा कीं, जें जें ज्ञान म्हणून विश्वांत आहे, विश्वांत जें जें ज्ञान संभवनीय आहे, तें सर्व ज्ञान मानवाच्या आवाक्यांत आहे; आणि दुसरा मुद्दा हा कीं, मानवात आत्मज्ञानाची, आत्मानुभवाची निसर्गदत्त प्रेरणा आहे व ती अटळ, अनिवार्य असल्यानें, मानवी बुद्धीनें त्याच्या ज्ञानशक्ती एका निश्चित क्षेत्राच्या आंत डांबून ठेवण्याचा कितीहि अट्टाहास केला तरी, तो शेवटीं विफल होणार आहे, तो नेहमींच यशस्वी होऊं शकणारा नाहीं. आम्हीं जडद्रव्याची तपासणी करून त्यांतील गुप्त शक्तींचें ज्ञान प्राप्त करून घेतलें कीं, त्या जडाच्या चतुःसीमेंत वावरण्यांत ज्या ज्ञानाला आतांपावेतों सोईचें वाटत होतें तें ज्ञानच स्वत: ओरडून आम्हाला आदेश देईल, वेदांतील नियन्त्याप्रमाणें उद्घोष करून हांक देईल कीं, ''आतां मारा धांव, आणि दुसऱ्या क्षेत्रांतहि पुढें पुढें जाण्याचा विक्रम करा.'' (ऋग्वेद १ - ४ - ५)

भौतिक जीवनांत निर्बुद्धपणें संतोष मानण्यापलीकडे आधुनिक जडवादांत अधिक कांहीं नसतें तर, ज्ञानाची प्रगति किती काळपर्यंत दुरावली असती तें सांगता येत नाहीं. परंतु या जडवादाचा गाभाच मुळीं, ज्ञानाचा शोध करीत राहणें हा आहे आणि असें असल्यानें हा जडवाद अमुक ठिकाणीं ''थांबा पुरें आतां'' असें म्हणूं शकणार नाहीं. इंद्रियप्राप्त ज्ञान आणि त्यावर उभारलेली अनुमानांची इमारत, यांची मर्यादा या जडवादानें गांठली कीं, त्याची ज्ञानाची तृष्णा त्याला त्या मर्यादेच्या पलीकडे ओढून नेईल. दृश्य जगांतील ज्ञेयाला त्यानें किती त्वरित व किती निःसंदेहपणें आत्मसात् केलें आहे, हें आपण पाहत आहों. दृश्य जगाच्या पलीकडील जगांत पाऊल टाकल्यावर, जें कांहीं त्याच्या मार्गांत येईल, तें जिंकून आत्मसात् करण्याच्या कार्यांत, आजपर्यंत दृश्य जगांत दाखविलेली उत्साही शीघ्रकारिता आणि यशस्विता, तो आमच्या प्रत्ययास आणून देईल, असें त्याच्या आजवरच्या पराक्रमावरून म्हणतां येतें. दृश्यातीत क्षेत्रांत जडवादानें ज्ञानतृष्णेनें टाकलेलीं पहिलीं पावलें अस्पष्टपणें कां होईना

 

पान क्र. २५

आजच आपणांस दिसत आहेत.

ज्ञानाचें जुने-नवे मार्ग अनेक आहेत. या मार्गांपैकीं कोणत्याहि मार्गानें ज्ञानाच्या मागोमाग आम्ही गेलो, तर असें दिसून येईल कीं, केवळ अंतिम कल्पनेच्या बाबतींतच नव्हे, तर सर्वसाधारण फलनिष्पत्तींच्या बाबतींतहि, सर्व मार्गांतील ज्ञानाचा कल एकरूप, सारख्या स्वरुपाचें होण्याकडे आहे. आधुनिक भौतिक शास्त्र आणि वेदांत - मूळ वेदांत, अतिभौतिक तत्त्वज्ञानशाखांतील अनेक आचार्यांचा वेदांत नव्हे, तर उपनिषदांतील वेदांत - यांचे ज्ञानप्राप्तीचे मार्ग निरनिराळे आहेत; तरी वेदांतानें ज्या कल्पना सिद्ध केल्या व त्या ज्या सूत्रांत गोंवल्या, त्या कल्पना, जवळजवळ त्याच सूत्रांत आधुनिक भौतिक शास्त्रानें सिद्ध केल्या आहेत. भौतिक शास्त्राचा ज्ञानविषयक खटाटोप जडाच्या क्षेत्रांत, व वेदांताचा खटाटोप जडातीत क्षेत्रांत, असें असून दोघांच्या सिद्धान्तात व सूत्रांत जें एकरूपत्व आहे, भौतिक शास्त्रानें वेदांत-शास्त्राचें जें समर्थन केलें आहे, त्याचें स्वरूप व क्षेत्र इतकें लक्षांत भरण्यासारखें व इतकें सूचक आहे कीं, अशीं दुसरी गोष्ट सांपडणें विरळाच. आधुनिक भौतिक शास्त्रानें अनेक प्रकारचे शोध लावून जो नव्या ज्ञानाचा प्रकाश उपलब्ध करून दिला आहे, त्या प्रकाशांत जुन्या वेदांतप्रणीत सिद्धांतांकडे व सूत्रांकडे पाहिलें असतां, त्यांचा सारभूत संपन्न अर्थ, जितक्या पूर्णतेनें नजरेस भरतो, तितक्या पूर्णतेनें त्या प्रकाशाच्या अभावीं तो नजरेंत भरत नाहीं, भरूंच शकत नाहीं. उदाहरणादाखल वेदांतांतील एक सूत्रवाक्य देतां येईल. विश्वांतील वस्तूंचें वर्णन करतांना त्या सूत्रांत असें म्हटलें आहे कीं, विश्वनिर्मायक शक्तीनें, एक बीज, अनेक रूपें देऊन विश्वांत टाकलेलें आहे. (श्वेताश्वतर उपनिषद् ६-१२) मूळ सारभूत वस्तु एकच असून तिच्या अनेक वस्तू बनलेल्या आहेत. ती एकच वस्तु अनेक वस्तू झालेली आहे ही वेदांतील कल्पना आहे, आणि भौतिक शास्त्राची वाटचालहि याच कल्पनेच्या दिशेनें होत आहे. अनेकतेशीं सुसंवादी अशीं मूळ एकता, हीच विश्वविषयक कल्पना, भौतिक शास्त्राला अंतत: मान्य होत आहे; किंवा होणार आहे, ही गोष्ट विशेष उद्बोधक आहे. जडद्रव्य आणि जडशक्ति अशी द्वैती मांडणी भौतिक शास्त्र करीत आहे; ही मांडणी आग्रहानें करण्यांत येत असली तरी ती वस्तुत: वरील प्रकारच्या अद्वैताच्या आड येऊं शकत नाहीं. कारण मूलभूत जडद्रव्य इंद्रियांना ज्ञात होत नाहीं. इंद्रियांच्या दृष्टीनें तें वास्तव द्रव्य नव्हे, तर सांख्याच्या 'प्रधान' या तत्त्वा-

 

पान क्र. २६

प्रमाणें द्रव्याचें विचारदृष्ट रूप किंवा विचारदृष्ट द्रव्य आहे; आणि भौतिक शास्त्र हळूहळू अशा मुक्कामाला पोंचत आहे कीं, जेथें द्रव्य आणि शक्ति यांच्या स्वरूपांत मानलेला विचारदृष्ट भेद देखील तर्कशुद्ध नसून, केवळ आग्रही तर्कदुष्ट आहे असें स्पष्ट दिसतें.

संशोधनाचा मार्ग चोखाळीत असतां शेवटी संशोधकाला जडद्रव्य हें एका अज्ञात शक्तीचें साकार रूप आहे असें स्पष्ट होतें. प्राण किंवा जीव हा, जडवाद्यांना अद्यापि न उलगडलेल्या रहस्यांच्या वर्गांत आहे. तथापि तीहि एक शक्ति आहे, जडाच्या बनलेल्या आकारांत कोंडलेली अस्पष्ट संवेदनाशक्ति म्हणजे प्राण किंवा जीव, असें हळूहळू प्रत्ययास येत आहे; आणि जडद्रव्य व प्राण किंवा जीव यांच्यामध्यें यांना अलग करणारी मोठी दरी आहे असा भास उत्पन्न करणारें, आमचें भेददर्शी अज्ञान दूर होईल तेव्हां मन, प्राण आणि जड या तीनहि वस्तू एकाच शक्तीचीं रूपें आहेत, (वेदकालीन ऋषींचें त्रैलोक्य म्हणजे जड लोक, प्राणलोक, मनोलोक हे तीन लोक होत,) ही गोष्ट आमच्या निदर्शनास येईल अशी निश्चिति वाटते. याहून वेगळी वस्तुस्थिति नजरेस येईल अशी कल्पना करणें देखील अवघड आहे. इतकी प्रगति ज्ञानांत झाली म्हणजे जाणीवशून्य जडशक्ति ही मनाची माता आहे, ही जडवादी कल्पना तग धरूं शकणार नाहीं, आणि जग निर्माण करणारी शक्ति ही एक इच्छाशक्ति, संकल्पशक्ति असली पाहिजे, आणि संकल्पशक्ति ही, स्वभावत: केवळ जाणीवशक्ति आहे, कांहींतरी कार्य, कांहींतरी परिणाम घडवून आणण्याकडे लक्ष देणारी जाणीवशक्ति म्हणजेच संकल्पशक्ति किंवा इच्छाशक्ति होय, या गोष्टी संशोधकाला स्पष्ट होतील.

जाणीव-शक्तीनें योजिलेलें हें कार्य, त्याचें फल वा परिणाम यांचें स्वरूप काय असावें, याचा विचार करतां असें दिसतें कीं, आकारमय विश्व निर्माण करणें, आकारांच्या पोटांत स्वत: क्रमश: प्रवेश करून बसणें आणि नंतर या आकारांच्या पोटांतून क्रमश: स्वत: बाहेर पडणें आणि ही उठाठेव करून आकारमय विश्वांत स्वत:ची कांहीं एक प्रचंड रचनाशक्ति, कांहीं एका प्रचंड रचनेद्वारां, साकार करून पाहणें हीच जाणीव-शक्तीची योजना असावी. मानवाचें ठिकाणीं या शक्तीची जी विभूति आहे, तिची, अनंत जीवन, असीम ज्ञान, अनिर्बंध सत्ता मिळविण्याची व भोगण्याची इच्छा आहे. भौतिक शास्त्रालाहि मरणावर भौतिक विजय मिळविण्याचीं स्वप्नें पडत आहेत, त्याची ज्ञानतृष्णा कधींहि न शमणारी

 

पान क्र. २७

अशी आहे, असें त्याच्या धडपडीवरून दिसत आहे; मानवाला पृथ्वीवर जवळ जवळ सर्वशक्तिमान् कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् सत्ताधीश बनविण्याचा त्याचा खटाटोप चाललेला आहे. भौतिक शास्त्राच्या कामगिरींत स्थलाचें अंतर व कालाचें अंतर कमीकमी होत जवळ जवळ संपुष्टांत येत आहे, आलेलें आहे. मानवाला परिस्थितीचा दास न ठेवतां, कमीअधिक प्रमाणांत तिचा पूर्ण मालक बनविणें आणि या रीतीनें त्याला अडचणीचें असणारें, भौतिक कार्यकारणभावाच्या नियमांचें बंधन सैल करून शक्य तितका स्वतंत्र, खरा स्वतंत्र करणें या दिशेनें शेंकडों मार्गांनीं या शास्त्राचा प्रयत्न चालला आहे. मानवाच्या शक्तीला मर्यादा आहेत, मानवाला कांहीं गोष्टी अशक्य आहेत; या मर्यादेच्या व अशक्यतेच्या कल्पना थोड्याबहुत मिथ्या ठरूं लागल्या आहेत, मिथ्या वाटूं लागल्या आहेत आणि त्याऐवजीं असें दृष्टोत्पत्तीस येत आहे कीं, मनुष्य जें करण्याची इच्छा सतत बाळगील तें करण्याची शक्ति त्याला अखेर प्राप्त होणारच होणार; कारण मानवजातीची ज्ञानशक्ति धडपड करतां करतां शेवटीं मानवाला संकल्पित गोष्ट घडवून आणण्याचें साधन उपलब्ध करून देते. सर्वशक्तिमत्ता ही अर्थात् कोणाहि व्यक्तींत असल्याचें दिसत नाहीं, तर मानवजातीची जी सामूहिक इच्छाशक्ति, तिच्या ठिकाणीं ही सर्व शक्ति असते आणि ही सामूहिक सर्वसमर्थ इच्छाशक्ति, मानवी व्यक्तीचा साधन म्हणून उपयोग करून, तिच्या द्वारां आपलें काम करते. या घटनेचा आणखी खोल विचार केला तर असें दिसून येईल कीं, मानवी व्यक्तीचा, अधिष्ठान आणि साधन म्हणून जो उपयोग केला जातो आणि मानवी समष्टीचा, परिस्थिति व क्षेत्र अशा स्वरूपानें जो उपयोग करण्यांत येतो, तो उपयोग करून घेण्याचें काम, मानवी समष्टीच्या जाणीवयुक्त इच्छाशक्तीचें किंवा कार्यकारी जाणिवेचें नसून, तें मानवी जाणिवेच्या पलीकडे, वर उंच व खालीं खोल असलेल्या अतिमानवी, अतिमानसी जाणिवेचें, त्या जाणिवेच्या खऱ्या सर्वसमर्थ शक्तीचें, इच्छाशक्तीचें असतें. हें सर्व प्रकरण काय आहे आणि अतिमानसी शक्ति खरोखरी काय वस्तु आहे ? ही अतिमानसी शक्ति म्हणजे मानवांतील ईश्वर होय. अनंत एकरस एकतत्त्व, अनेकाकारधारी एकतत्त्व, सर्वज्ञ सर्वसमर्थ एकतत्त्व, हेंच मानवांतील ईश्वराचें स्वरूप होय. या ईश्वरानें मानवरूपानें आपली स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. या प्रतिमारूप मानवांत समष्टिमानव आणि व्यष्टिमानव, मानववंश आणि मानवव्यक्ति हीं रूपें अविभाज्य असून 'मी मी' करणारी व्यक्ति, आपल्या

 

पान क्र. २८

कार्याचें केंद्र म्हणून ईश्वरानें योजिली आहे, व मानववंश, समष्टि-नारायण, विश्वमानव हा आपल्या कार्याचा सांचा आणि आंखाडा म्हणून योजिला आहे. (- 'नारायण' हें विष्णूचें एक नांव आहे; हा मानवांतील ईश्वर असून नराशीं म्हणजे मानवाशीं अभेदाचें आणि भेदाचें असें दोन्ही प्रकारचें नातें नित्य ठेवीत असतो. मानवाशीं अभेदाचें नातें असलेल्या ईश्वराचें नांव 'विश्व-मानव'-) याप्रमाणें योजना करून आपल्या प्रतिमारूप व्यष्टि-समष्टि-मानवांत प्रतिमारूप नर-नारायणांत आपल्या मूळ ईश्वरीय एकत्वाची, सर्वज्ञत्वाची, सर्वसमर्थत्वाची म्हणजे आपल्या स्वयंकल्पित ईश्वरत्वाची छाया प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न ईश्वर करीत आहे. ''मर्त्यामध्यें अमर्त्य असें कांहीं आहे. हें अमर्त्य म्हणजे देवात्मा होय, देव होय. हा देव मर्त्यांच्या अंतरांत कायम राहणारा आहे. याचें अंतरांतील स्वरूप दैवी कार्यशक्ति होय. आपणांत दिव्य सामर्थ्यें उदयास येतात ती या शक्तीच्या कार्यकुशलतेनें उदयास येतात'' (वामदेव ऋग्वेद ४ - २ - १.) मर्त्यांमधील अमर्त्य देवाची वर वर्णिलेली विश्वव्यापी महान् प्रेरणा आधुनिक जग अजाणतां शिरोधार्य करून वागत आहे; आपण कोठें जात आहोंत याचें त्याला भान नाहीं, पण तें नेणतेपणें कां होईना आपल्या सर्व खटाटोपांत वरील महान् प्रेरणेनुसार कार्य करीत आहे, तिची सेवा करीत आहे, तिच्या योजनांची परिपूर्ति करीत आहे.

तथापि आधुनिक शास्त्रानें जें ज्ञान उपलब्ध होतें, त्या ज्ञानाला नेहमींच एक मर्यादा असते; म्हणजे त्याचा व्याप भौतिक क्षेत्रापुरताच असतो. तसेंच त्यामुळें जी सत्ता उपलब्ध होते, त्या सत्तेच्या व्यवहाराला नेहमींच एका गोष्टीचें ओझें, अडचण करणारें ओझें वागवावें लागतें. हें ओझें म्हणजे भौतिक साधनांचे ओझें होय. अशी आजची स्थिति असली तरी, आधुनिक शास्त्राची अगदीं अलीकडील प्रवृत्ति पाहिली तर, भावी काळांत आजच्या पेक्षां पुष्कळच अधिक अनिर्बंधपणें मानवाचे व्यवहार चालतील असा त्या प्रवृत्तींतून स्पष्ट अर्थ काढतां येतो. भौतिक शास्त्रीय ज्ञानाच्या क्षेत्रांतील दूरचीं ठाणीं अलीकडे अलीकडे भौतिक आणि अतिभौतिक यांना विभागणाऱ्या सीमारेषांवर अधिकाधिक बांधली जात आहेत, त्याप्रमाणें व्यवहारविषयक भौतिक शास्त्रानेंहि अलीकडे अलीकडे मोठे मोठे विक्रम केले आहेत. ज्या साधनांनीं हें शास्त्र पूर्वीं सर्वांत मोठे परिणाम घडवून आणीत होतें तीं साधनें संख्येनें कमी आणि कमी संकीर्ण करीत करीत जवळ जवळ शून्य करून ते पूर्वींचे परिणाम

 

पान क्र. २९

तसेंच आणि तशाच प्रमाणावर तें अलीकडे घडवून आणीत आहे. बिनतारी संदेशवाहन हें त्याचें एक उदाहरण आहे. निसर्गानें आपल्या कार्याची दिशा बदलण्यास आरंभ केला आहे या गोष्टीची सूचना आणि निशाणी या उदाहरणांत आहे. येथें भौतिक शक्ति एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे पाठवतांना जे प्रत्यक्ष भौतिक साधन पूर्वीं वापरीत, तें दूर केलें आहे; शक्ति हस्तगत करून तिला गति देणारें, संदेश देणारें स्थान आणि तिच्या मार्गक्रमणानंतर तिला थांबवून घेणारें तेथें संदेश घेणारें स्थान, असा फक्त दोन टोंकांनाच दृश्य भौतिक साधनांचा वापर केला जातो. शुद्ध व व्यावहारिक भौतिक शास्त्राची प्रगति होत होत, अतिभौतिकाचे नियम व शक्ति यांचा अभ्यास व्हावा, असें वाटूं लागेल आणि हा अभ्यास झाला म्हणजे वर सांगितलेलीं दोन टोंकांना वापरलीं जाणारीं दृश्य भौतिक साधनेंही नाहींशी होतील, होणारच; कारण योग्य रीतीनें योग्य ठिकाणापासून या नव्या अभ्यासाला आरंभ करून त्यांत चिकाटी धरली तर मनाला असें अतिभौतिक अदृश्य साधन नि:संशय सांपडेल कीं, ज्याच्या आधारें त्याला संदेशवाहक भौतिक शक्ति प्रत्यक्षपणें हस्तगत करतां येईल, आणि तिच्या हातीं संदेश देऊन, तो संदेश ज्या मार्गानें जावयाचा त्या मार्गानें व त्या ठिकाणीं तिला न चुकतां नेतां येईल अशी गति तिला देण्याची व्यवस्था करतां येईल. अतिभौतिक क्षेत्राची एकदां आपल्याला ओळख झाली व भौतिकाप्रमाणें त्याची सत्यता आपणांस पटली, आपण अभ्यासानें पटवून घेतली, म्हणजे आपल्याला कळेल कीं, अतिभौतिक क्षेत्रांत असे दरवाजे आहेत, जे उघडलें असतां आपणांसमोर भावी घटनांच्या अफाट व अद्भुत मालिकाच मालिका उभ्या राहतील.

तथापि हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, जड इहलोकाला लागून असलेल्या लगतच्या जगाचें पूर्ण ज्ञान आपण करून घेतलें व तेथें पूर्ण सत्ता गाजवूं शकलों तरी, या लगतच्या जगापलीकडे आणखीहि जग वा जगें असल्यानें, आपल्या कार्यशक्तीच्या व ज्ञानशक्तीच्या व्यापाला असलेल्या मर्यादा संपल्या, असें आपण या लगतच्या श्रेष्ठ जगांत वावरतांनाहि समजतां कामा नये. मग आमच्या मर्यादांचें बंधन संपतें कोठें ? आम्हाला बांधून गुलामगिरींत राबविणाऱ्या मर्यादांच्या दोरखंडाची शेवटली गांठ आहे कोठें व ती कशी सुटणार ? आमच्या बाहेर अमुक आहे, आमच्या आंत तमुक आहे असा आंत-बाहेरचा भेद आम्हीं करतो. हा भेद खोटा

 

पान क्र. ३०

आहे असें आम्हाला पटून सर्व आमच्या आंतच आहे, ही प्रतीति आम्हाला येईल, बाहेरचें आंतल्याशीं एकरूप होईल; आमचा 'मी' हें साधन, विशिष्ट कार्यप्रणालीचें साधन आहे, तें साधन सूक्ष्म होत होत शेवटीं शून्य होईल; आमच्या व्यवहाराचा नियम आज 'मी'ला अग्रस्थान देतो आणि अनेक 'मीं'च्या संघर्षांतून एक प्रकारची एकता साधणें हें त्याचें उद्दिष्ट आहे; ही स्थिति बदलून आमच्या व्यवहाराचा नियम मानवांच्या नव्हे, सर्व भूतांच्या एकतेला अग्रस्थान देईल, या सर्वव्यापी एकतेच्या पोटांत सर्व भिन्न भासणारे 'मी' घेतले जातील, आणि तेथें ते अभेदानें एका सर्वव्यापी 'मी'चे अवयव होतील, अंश होतील. याप्रमाणें आमचा 'मी' व्यापक होऊन, आजचें सर्व बाह्य आमच्या पोटांत आलें व आमचा वैयक्तिक मी नष्ट झाला म्हणजे आमची गुलामगिरी संपेल, आमच्या भौतिक, अतिभौतिक सर्व मर्यादा नाहींशा होतील व सर्व विश्व आमचें व्यवहारक्षेत्र होईल. आमच्यांत उपरिनिर्दिष्ट बदल झाला म्हणजे विश्वव्यापक ज्ञानाचें, जाणिवेचें, विश्वेश्वराचें मध्यवर्ति सिंहासन आम्हाला आमच्या अगदीं जवळ असलेलें दिसेल. या सिंहासनावरून ईश्वरी ज्ञानशक्ति आपल्या अति विस्तृत साम्राज्यावर आपली सर्वसमर्थ दृष्टि टाकीत असलेली दिसेल. या ईश्वरी ज्ञानशक्तीशीं एकरूप होण्यानें स्वाराज्याचा आणि साम्राज्याचा लाभ घडेल.

 

-------------------------

 

   ( १ २ प्राचीन ऋषींच्या प्रवृत्तियोगाचीं हीं दोन उद्दिष्टें होतीं; स्वाराज्य म्हणजे स्वत:वरची पूर्ण सत्ता आणि साम्राज्य म्हणजे स्वत:च्या विश्वावरची पूर्ण सत्ता; स्वाराज्य आणि साम्राज्याप्रमाणें सालोक्यमुक्तीचा व साधर्म्यमुक्तीचा लाभहि, ईश्वरीय ज्ञानशक्तीशीं एकरूप होणाराला घडूं शकतो, घडतो; सालोक्यमुक्ति म्हणजे ईश्वराच्या लोकांत जाणीवपूर्वक वावरणारें मुक्त जीवन, सदैव पूर्ण अशा सनातन पुरुषोत्तमाच्या आंतरिक आश्रयानें जगलें जाणारें मुक्त जीवन; साधर्म्यमुक्ति म्हणजे ईश्वराचा स्वभावधर्म आपला स्वभावधर्म करून साधलेलें मुक्त जीवन, आमच्या मानवी जीवनांत पूर्ण पुरुषोत्तमाच्या दैवी प्रकृतीचा अवतार, आविष्कार, घडवून साधलेलें, मानवाचें सर्वथा मुक्त ईश्वरी जीवन.)

 

प्रकरण तिसरें

 

दोन नकार

संन्यासी नकार

 

हें सर्व ब्रह्म आहे. हा आत्मा ब्रह्म आहे. आणि तो चार अवस्थांत चार रूपें धारण करून आहे. संबंधातीत, लक्षणहीन, अचिंत्य असा चौथा, चौथ्या अवस्थेंतील, मूळ अवस्थेंतील आत्मा आहे, तेथें सर्व शांत शांत आहे.

 

 माण्डूक्योपनिषद् श्लोक २ . ७

 

मागच्या प्रकरणांत आपण विश्वव्यापक जाणिवेपर्यंत आलों. पण विश्वव्यापक जाणीव कांहीं जाणिवेचीं शेवटली अवस्था नाहीं. तिच्या पलीकडेहि एक जाणीव आहे आणि तीहि आपण मिळवूं शकतों. वैयक्तिक जाणिवेहून विश्वव्यापक जाणीव जशीं फार श्रेष्ठ आहे, तशीच व्यक्ति आणि विश्व या दोघांच्याहि क्षेत्रांना सूक्ष्म अणुसमान लेखणारी विश्वातीत जाणीव, विश्वजाणिवेहून फार श्रेष्ठ आहे. अगदीं मोजतां येत नाहीं, मोजतां येणें अशक्य आहे एवढ्या अफाट पार्श्वभूमीवर अगदीं बारीकसें चित्र काढल्यास तें जसें त्या पार्श्वभूमीवर दिसेल तसें हें अफाट समजलें जाणारें आपलें विश्व त्या विश्वातीत जाणिवेच्या पार्श्वभूमीवर दिसतें. ती विश्वातीत जाणीव विश्वाच्या व्यवहाराला आधार देते, अथवा सहिष्णुतेनें तो चालूं देते, अशीहि वस्तुस्थिति असते. ती विश्वातीत जाणीव अफाट विश्वजीवन व्यापून टाकते, त्याला जवळ घेऊन पोटाशीं धरते, अथवा आपल्या अनंत क्षेत्रांतून त्याचीं हकालपट्टीहि करतें.

जडद्रव्य हेंच सत्य आहे असें जडवादी आपल्या दृष्टीनें म्हणतो, हें

 

पान क्र. ३२

संबंध-सापेक्ष जग ही एकच वस्तु, जिचें थोडेंबहुत निश्चित निःसंदेह ज्ञान होते अशीं सत्य वस्तु आहे, असें प्रतिपादितो. या जगाच्या पलीकडे खरोखरी कांहीं नाहींच, पण कांहीं आहे असें मानलें तरी तें सर्वथा अज्ञेय आहे, तें मनाचें एक स्वप्न आहे, विचारप्रिय बुद्धीचीं, सत्याला सोडचिठ्ठी दिलेली ती एक अवास्तव कल्पना आहे, असा युक्तिवाद करतो. हें जडवाद्याचें करणें जर न्यायसंगत असेल तर उलटपक्षीं संन्यासी जो पक्ष मांडतो तोहि न्यायसंगत मानला पाहिजे. संन्यासी हा विश्वातीत जाणिवेनें भारलेला, तिच्या मोहांत सांपडलेला असतो. तो आपल्या दृष्टीनें असें आग्रहानें प्रतिपादतो कीं, शुद्ध आत्मा हीच एक सत्य वस्तु आहे. कारण हीच एक अशीं वस्तु आहे कीं, जिच्यांत कमीअधिक होत नाहीं, जिला जन्म नाहीं, मरण नाहीं; त्याच्या दृष्टीनें संबंधसापेक्ष जग हें मनानें व इंद्रियांनीं निर्मिलेलें एक स्वप्न आहे. शुद्ध शाश्वत जाणीवरूप सत्यवस्तूपासून माघार घेऊन असत्यांत वावरणाऱ्या बुद्धीचीं ती एक अवास्तव कल्पना आहे.

जडवाद्याचें प्रतिपादन एका टोंकाला व संन्यासी प्रतिपादन दुसऱ्या टोंकाला, असें असतां एका प्रतिपादनाच्या बाजूनें जो अनुभवाचा पुरावा व युक्तिवाद दिला जातो त्याच्या इतकाच जोरदार व निर्दोष भासणारा अनुभवाचा पुरावा व युक्तिवाद दुसऱ्या प्रतिपादनाच्या बाजूनेंहि देतां येतो ही गोष्ट आपण लक्षांत ठेवली पाहिजे. आतां, जडद्रव्याचें जग हेंच फक्त सत्य आहे असें स्थूल भौतिक इंद्रियांचा अनुभव सांगतो; पण या इंद्रियांना अशीं शक्तीच नाहीं कीं, जिच्या उपयोगानें, त्यांना अभौतिकाचा, स्थूल जडद्रव्याचें रूप नसलेल्या कोणत्याहि वस्तूचा अनुभव घेतां येईल. असें असल्यानें या स्थूल इंद्रियांचा अनुभव विश्वसनीय मानल्यास, इंद्रियातीत तें तें सर्व असत्य असें आपणांस मानलें पाहिजे; पण असें आपण मानू शकत नाहीं. जें इंद्रियातीत तें असत्य, असें भासविणारीं आपलीं स्थूल शरीराचीं इंद्रियें अगदींच प्राकृत, निर्बुद्ध अडाणीपणाचीं चूक करतात; या चुकीला तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांतील युक्तिवादाच्या मांडणीचें रूप दिल्यानें, त्या चुकींतील दोष कमी होत नाहीं. स्थूल इंद्रियांचा दावा निराधार आहे हें उघड आहे. जडाच्या जगांत देखील अशा पुष्कळ गोष्टी आहेत कीं, ज्यांचें ज्ञान स्थूल इंद्रियांना होणें अशक्य असतें. स्थूल इंद्रियांना ज्ञात होणारी वस्तु तेवढी सत्यवस्तु असें इंद्रियें मानतात. इंद्रियांच्या दृष्टीनें या दोन वस्तूंचें नित्य साहचर्य दिसत असलें तरी तो भास

 

पान क्र. ३३

 

आहे, भ्रम आहे आणि 'इंद्रियातीत असें कांहीं नाहीं, इंद्रियातीताचा अनुभव हा निश्चितपणें भ्रमरूप आहे, भासरूप आहे' हें जडवाद्यांचें विधान या भ्रमावर आधारलेलें आहे. याप्रमाणें जडवादी जीं गोष्ट सत्य म्हणून सिद्ध करूं इच्छितात ती गोष्ट, (इंद्रिय प्रत्यक्षच केवळ सत्य ही गोष्ट) त्यांनीं प्रथमपासून गृहीत धरलेली आहे, आणि म्हणून त्यांच्या युक्तिवादांत चक्रापत्तीचा दोष आहे. असा युक्तिवाद निःपक्षपाती तर्कापुढें टिकूं शकत नाहीं.

आपल्या स्थूल इंद्रियांना ज्ञात होऊं शकत नाहींत अशा सत्य भौतिक वस्तु आहेत, इतकेंच नव्हे तर पुरावा व अनुभव यांनीं सत्यत्व परीक्षावयांचें तर आम्हाला स्थूल भौतिकातीत इंद्रियें सुद्धां आहेत. (या इंद्रियांना सूक्ष्म इंद्रियें म्हणतात. हीं इंद्रियें सूक्ष्म देहांत असतात, त्यांच्या साधनानें सूक्ष्म दर्शन घडते, सूक्ष्म अनुभव येतो, त्यांच्या दृष्टीला सूक्ष्म दृष्टि म्हणतात.) स्थूल शारीर इंद्रियांच्या सहाय्यावांचून जड जगाच्या सत्य वस्तूंचें ज्ञान या इंद्रियांना होऊं शकतें इतकेंच नव्हे, तर इतर दुसऱ्या अतिभौतिक जगांतील सत्य वस्तूशींहि हीं इंद्रियें आमचा संबंध आणतात. अर्थात् ज्या स्थूल जडद्रव्याचें साहित्य घेऊन आपला सूर्य आणि आपलीं पृथ्वी बनविलेली दिसतात, त्या द्रव्याहून कोणत्यातरी वेगळ्या द्रव्यावर अवलंबून असलेल्या अनुभवांची व जाणिवेची व्यवस्थित रचना अधिभौतिक जगांत आहे. आमचीं सूक्ष्म इंद्रियें त्या जगांतील सत्य वस्तूंशीं आमचा संबंध आणतात.

मनुष्य विचार करूं लागला तेव्हांपासून सतत हे अतिभौतिक विषयक व सूक्ष्मेंद्रियविषयक सत्य, त्याच्या अनुभवास आलेलें आहे व त्याच्या विश्वासाचा विषय झालेलें आहे; आणि आतां, जेव्हां भौतिक जगाचीं रहस्यें समजून घेण्याकडे सारें लक्ष देण्याचीं गरज राहिलेली नाहीं, तेव्हां या सत्याला नव्या शास्त्रीय संशोधन पद्धती पाठिंबा देऊं लागल्या आहेत. मनोमार्गीय विचार-वाहन आणि तत्सम घटना यांचें संशोधन होऊन त्यांची सत्यता संशोधकांना पटली आहे. भौतिक विश्वाप्रमाणें अतिभौतिक विश्व व सूक्ष्म इंद्रियें असल्याचा हा अगदीं सर्वांत उघड प्रत्यक्ष पुरावा आहे. अशा तऱ्हेचा पुरावा सारखा वाढत आहे. या पुराव्यानें अतिभौतिक विश्वाच्या व सूक्ष्म इंद्रियांच्या सत्यतेबद्दल बहुतेकांचीं खात्री लवकरच पटेल. अर्थात् कांहीं लोक या पुराव्याला दाद देणार नाहींत. ज्यांचीं मनें प्रतापी जडवादाच्या भूतकालीन विजयांनीं भरलेलीं व भारलेलीं आणि त्या विजयाच्या स्तुतीच्या कवचांत अडकून पडलेलीं आहेत,

 

पान क्र. ३४

 

ज्यांचीं बुद्धि सूक्ष्म परंतु संशोधनाचें व अनुभवाचें क्षेत्र मर्यादित असल्यानें मर्यादित झालेली आहे, किंवा ज्यांचीं बुद्धिमत्तेचीं व ज्ञानसंपन्नतेचीं कल्पना गोंधळाचीं असून ज्यांना असें वाटत असतें कीं, गेल्या शतकानें पढविलेल्या सूत्रांचा एक अक्षरहि न बदलता जप करीत राहणें, बुद्धीला पूर्वकाळीं केव्हांतरी पटलेल्या परंतु आतां मरणोन्मुख किंवा मृत म्हणून ठरलेल्या सांप्रदायिक मतांना मोठ्या काळजीनें चिकटून राहणें, यांतच खरी बुद्धि व खरें ज्ञान असल्याचा पुरावा आहे; असे तीन तऱ्हेचें लोक अतिभौतिक विश्वाच्या व सूक्ष्म इंद्रियांच्या सत्यत्वाच्या कोणत्याहि पुराव्याला दाद देणार नाहींत. असो.

आतां हें मात्र खरें आहे कीं, पद्धतशीर संशोधनानें अतिभौतिक सत्याचें जें ओझरतें दर्शन घडवलेलें आहे तें थोडेबहुत अपूर्ण व सदोष असल्यानें त्या सत्याचें सत्यत्व तितकें जोरदारपणें प्रतिपादतां येत नाहीं, आलेलें नाहीं. याचें कारण हें कीं, संशोधनाच्या चालू पद्धतींत अद्यापि बराच भोंगळपणा व सदोषता आहे. ज्या सूक्ष्म इद्रियांचा या नव्या युगांत पुन्हां शोध लागला आहे त्यांनीं कमीत कमी इतकें तरी दाखवून दिलें आहे कीं, स्थूल इंद्रियांना ज्या भौतिक घटना दिसत नाहींत, त्या भौतिक घटना सूक्ष्म इंद्रियांना निःसंशयपणें दिसतात. असें जर आहे तर जाणिवेच्या भौतिक रचनेच्या, म्हणजे आमच्या शारीर स्थूल इंद्रियांच्या क्षेत्रांत ज्या घटना येत नाहींत त्या अतिभौतिक घटना आम्हाला दिसतात असें त्यांनीं म्हटलें असतां, खोटे साक्षीदार म्हणून त्यांना तिरस्कारानें अविश्वासार्ह ठरविणें न्यायसंगत नाहीं हें उघड आहे. ही गोष्ट मान्य आहे कीं, स्थूल इंद्रियांचा किंवा कोणाचाहि कोणताहि पुरावा बुद्धीच्या नेतृत्वाखालीं जमवावा लागतो, बुद्धीनें तपासावा लागतो, बुद्धीनें त्याची व्यवस्थित मांडणी करावी लागते; त्याचा अर्थ लावतांना व संबंध ठरवतांना योग्य अशी पद्धति वापरून योग्य काळजी घ्यावी लागते, आणि नंतर या पुराव्यावरून त्या स्थूल इंद्रियांचे वा इतर कोणाचें कार्यक्षेत्र, कार्याचे नियम आणि प्रक्रिया निश्चित कराव्या लागतात. सूक्ष्म इंद्रियांच्या बाबतींतहि हें सर्व असेच तपशीलवार केलें जावें या गोष्टीला आमचीं पूर्ण मान्यता आहे. पण आमचें म्हणणें एवढेंच आहे कीं, स्थूल भौतिक द्रव्याच्या बनविलेल्या साधनांपेक्षां अधिक सूक्ष्म साधनांनीं दिसणारीं अधिक सूक्ष्म द्रव्याचे पदार्थ असलेलीं, सूक्ष्म अनुभवांचीं विस्तृत क्षेत्रें, या स्थूल भौतिक विश्वाबरोबर ब्रह्मांडांत आहेत आणि त्यांचीं सत्यता या

 

पान क्र. ३५

 

विश्वाच्या सत्यतेहून किंचितहि कमी दर्जाचीं नाहीं, ही गोष्ट तर्ककठोर संशोधनाचे अंतीं मान्य करावी लागते. तेव्हां अतिभौतिक जगें आहेत, त्यांत सर्वांत आपापली सर्वगामी तालबद्धता आहे, त्यांना आपापल्या भव्य योजना व रचना आहेत, स्वतंत्र नियम आहेत, महान् शक्ती आहेत, व स्पष्ट ज्ञान देणारीं अनुरूप ज्ञानसाधनें आहेत. या जगांचा प्रभाव आमच्या भौतिक जीवनांत, आमच्या भौतिक शरीरांत होत असतो. या आमच्या जीवनांत व शरीरांत स्वत:च्या आविष्कारासाठीं योग्य साधनांचीं जुळवाजुळव तीं जगें करतात; स्वतःचें दूत व स्वत:च्या अस्तित्वाचा पुरावा देणारे साक्षीदार येथें पाठवितात.

पण सर्व जगें, सर्व विश्वें हीं केवळ आम्हांला अनुभव मिळवून देणारीं मर्यादाबद्ध क्षेत्रें आहेत, आणि इंद्रियें हीं केवळ अनुभव घेण्याचीं सोईचीं साधनें आहेत. सर्वांच्या मुळाशीं जीं महान् वस्तु आहे ती म्हणजे आम्हांमधील जाणीव, अनुभव घेणारी जाणीव होय. ही जाणीव सर्वसाक्षी द्रष्टा आहे. या द्रष्ट्यासाठीं विश्व हें अनुभवाचें क्षेत्र व इंद्रियें हीं अनुभवाचीं साधनें आहेत. सर्व विश्वें आणि त्यांतील सर्व वस्तु आपण सत्य आहोंत किंवा कसे, याचा निर्णय करुन घेण्यासाठीं आम्हांमधील सर्वमूळ, सर्वाधार, सर्वसाक्षी दृष्ट्याकडे अंतिम अर्ज घेऊन येतात. विश्व एक आहे कीं अनेक विश्वें आहेत, भौतिक विश्व आहे कीं नाहीं, अतिभौतिक विश्व आहे कीं नाहीं, हें सर्व, या द्रष्ट्याचा अनुभव काय असेल त्यावरून ठरतें. आमच्यांतील या द्रष्ट्याच्या अनुभवाखेरीज दुसरा कोणताहि अस्तित्व-निर्णायक पुरावा, आम्हाला उपलब्ध नाहीं. असा युक्तिवाद करतात कीं, 'मानवाचीं प्राकृतिक रचना आणि त्याची त्याच्या भोंवतालच्या जगाकडे पाहण्याचीं दृष्टि, ही विशिष्ट प्रकारची असल्यानें, जगाचें व त्याचें वरील प्रकारचें विशिष्ट नातें उत्पन्न झालें आहे, असें नसून खरी वस्तुस्थिति अशीं आहे कीं, दृश्य अस्तित्वाचा हा स्वभावच आहे. अनुभव घेणारी जाणीव आणि क्रियाशील वस्तु किंवा अनुभवविषय, हे दोन घटक मिळूनच सर्व दृश्य अस्तित्व बनतें. वस्तुगत क्रिया ही द्रष्ट्याशिवाय घडूंच शकत नाहीं. कारण वस्तुरूप वस्तुमय विश्व हें द्रष्ट्या जाणिवेच्यासाठीं व जाणिवेच्या पोटीं असते, स्वतंत्र असूं शकत नाहीं, त्याला स्वतंत्र खरें अस्तित्व नाहीं.' या युक्तिवादाच्या उलट असाहि युक्तिवाद करतात कीं, 'भौतिक विश्व स्वयंभू आहे, शाश्वत आहे; प्राण आणि मन यांचा उदय होण्यापूर्वींपासून तें आहे; या दोघांचा

 

पान क्र. ३६

 

अवतार संपल्यानंतरहि तें राहील. भौतिक सूर्यांचें तालबद्ध भ्रमण जाणीवशून्य असलें तरी तें शाश्वत चालणारें आहे. प्राण, मन यांच्या वासना-विचारांच्या संकुचित धडपडी, अल्पकाळ चालणाऱ्या आणि वरील तालबद्धतेला उपसर्ग पोंचवणाऱ्या आहेत.' या दोन युक्तिवादांतील भेद दिसायला केवळ तात्त्विक दिसला तरी त्या भेदाचा व्यावहारिक आशय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या दोन युक्तिवादांपैकीं जो तुम्हाला मान्य असेल त्याप्रमाणें तुमचीं जीवनाकडे पहाण्याचीं दृष्टि होईल. तुमच्या खटपटींचें ध्येय तो युक्तिवाद ठरवील, तुमच्या शक्ती कोणत्या क्षेत्रांत कामाला लावावयाच्या तें क्षेत्र तो युक्तिवाद तुम्हाला आंखून देईल. या युक्तिवादांत विश्वाचें अस्तित्व सत्य कीं मिथ्या हा प्रश्न आणि त्यापेक्षांहि, मानवी जीवनाचें मूल्य काय व किती हा अधिक महत्त्वाचा प्रश्न अंतर्भूत झालेला आहे, म्हणून या युक्तिवादांचें व त्यांतील भेदाचें महत्त्व फार आहे.

यांपैकी जडवादी युक्तिवाद प्रथम घेऊं व त्याचा व्यावहारिक अर्थ पाहूं. या युक्तिवादाचीं कसून तपासणी केलीं तर अशा निर्णयाला आपण येतो कीं, मानवी व्यक्तीचें जीवन काय किंवा मानवी जातीचें जीवन काय, अर्थशून्य आहे, मिथ्या आहे; आणि या निर्णयांतून न्यायतः जीवनाचे दोन पर्याय आमच्यापुढें उभे राहतात. माणूस आज आहे उद्यां नाहीं, तेव्हां त्यानें ''जीवन जगून घ्यावे.'' अर्थात् जो काय भोग जीवनांत येनकेन प्रकारेण त्याला मिळण्यासारखा असेल त्यासाठीं त्यानें उसंत न घेतां धडपड तडफड करीत रहावे, हा एक पर्याय आणि दुसरा पर्याय असा कीं, त्यानें मानव जातीची किंवा मानवी व्यक्तीची विरक्तपणें निष्काम सेवा करावी. ही धडपड किंवा सेवा करतांना त्यानें ही जाणीव ठेवावी कीं, मानवी व्यक्ति ही सत्य नसून तो एक त्याच्या मज्जातंतूमय मनानें अर्थात् जड मज्जातंतूंच्या तालबद्ध गतीनें निर्माण केलेला अल्पकाळ टिकणारा भ्रम आहे आणि मानवजात वरील भ्रमाचे जरा अधिक काळ टिकणारें सामुदायिक रूप आहे. आम्ही काम करतो किंवा करमणूक करतो ती जड शक्तीच्या प्रेरणेनें करतो. ''शक्य तेवढी करमणूक करून जीवन जगून घ्यावें, आहे चार दिवस तोंवर'' ही प्रेरणा तिची; ''नैतिक ध्येय समोर ठेवून, बौद्धिक पूर्णतेचें ध्येय पुढें ठेवून माणसानें काम करीत रहावें'' ही प्रेरणाहि तिचीच, असें जडवाद सांगतो. अर्थात् दोन्ही प्रेरणा आमचीं फसवणूक करीत असतात. भ्रमांच्या भोंवतीं आम्हाला भिरभिरावयास

 

पान क्र. ३७

 

लावतात. इत्यर्थ असा कीं, अध्यात्मवादाच्या अद्वैताप्रमाणें जडवादाचें अद्वैत हि एक प्रकारची माया मानतें. ज्या वस्तूला आहे आणि नाहीं असें एकाच वेळीं म्हणावें लागते, ती माया. आमची इच्छा असो

वा नसो आमच्याकडून, आपल्या प्रभावानें करमणूक किंवा काम करवून घेते म्हणून, भोगी जीवनाची किंवा नैतिक, बौद्धिक जीवनाची ओढ, ही माया आहे असें म्हणावयाचे; या मायेचें कार्य वरवर दिसण्यापुरतें होणारे आणि अल्पकाळ टिकणारें असलें तरी ही माया नाहीं असें म्हणावयाचें. जीवन म्हणजे काय तर, प्राण आणि मन याचा व्यवहार. पण प्राण आणि मन, हीच मुळीं जडवादांत मायेच्या सदरात येतात. एक जड द्रव्य, जडशक्ति काय तें शाश्वत सत्य, आणि प्राण आणि मन ही त्यांतून उदय पावून कांहीं काळानें विलयास जाणारी माया आहे असें जडवादाचें ठाम मत आहे. आतां, जडवादाच्या उलट दुसऱ्या टोंकाला जो चैतन्यवाद (आत्मवाद-जाणीववाद) आहे त्यांत स्वतंत्र वस्तुरूप जगाची, अर्थात् जड विश्वाची मायारूपता किंवा असत्यता प्रतिपादिली आहे. या असत्यतेवर जर आपण भलताच जोर दिला तर दुसऱ्या मार्गानें वरच्याच प्रकारचें पण जास्ती कठोर सिद्धांत आपल्याला मानावे लागतात. व्यक्तीचा मी हा सर्वथैव भ्रमरूप आहे, मानवी जीवन निरर्थक आहे आणि मिथ्या आहे, सर्व अस्तित्वाच्या पलीकडे जें ''असत्'' किंवा संबंधनिरपेक्ष केवल चैतन्य आहे, जें आपलें मूलस्थान आहे, तेथें परत जाणें, त्यांत विलीन होणें हाच एक बुद्धीला पटण्यासारखा मार्ग आहे, भौतिक जीवन हा एक अर्थशून्य गोंधळ असून त्यांतून सुटण्याचा दुसरा मार्ग नाहीं हे सिद्धांत आपल्याला त्यामुळें मानावे लागतात.

पण तर्कशास्त्र ज्या आधारावर हें सिद्धांत बसवितें तो आधार कच्चा आहे. सामान्य भौतिक जीवन पाहून तर्कशास्त्र युक्तिवाद करतें, पण या भौतिक जीवनांत जडवादाला काय किंवा चैतन्यवादाला काय, आपलें सिद्धांत पक्केपणीं रचावयाला अनुभवाचा पुरता भरीव पाया मिळत नाहीं. त्यांत जागजागीं खड्डे किंवा अपुरे अनुभव असतात; आणि म्हणून दोन्हीहि युक्तिवाद निर्णायक होऊं शकत नाहींत. सामान्यतः पहातां, व्यक्तीच्या देहाशीं, व्यक्तीच्या शारीरिक जीवनाशीं निगडित नसलेला विश्वमानसाचा किंवा अतिमानसाचा अनुभव, निश्चित, नि:संदेह अनुभव, आमच्या अनुभव-भांडारांत नाहीं; उलटपक्षीं, आमच्या देहांत असणारा आत्मा, देहावर सर्वथा अवलंबून आहे, देहाच्या मरणानंतर तो जगणार नाहीं,

 

पान क्र. ३८

 

किंवा वैयक्तिक देहाच्या पलीकडे आपलें क्षेत्र तो वाढवूं शकणार नाहीं, किंवा त्याचें अनुभवक्षेत्र देहानें मर्यादित आहे, असें मानावयाला आधारभूत होईल असा कोणताहि अनुभव, आमच्या भांडारांत सामान्यत: सांपडत नाहीं. म्हणून जडवाद विरुद्ध चैतन्यवाद या जुन्या भांडणाचा निकाल लागावयाचा असेल तर, आमच्या जाणिवेचें क्षेत्र आजच्यापेक्षां फार मोठें, फार विस्तृत झालें पाहिजे; आज आमचीं जीं ज्ञानसाधनें आहेत त्यांत पुष्कळच भर पडली पाहिजे. मग या गोष्टी घडून येण्याचीं आशा असो वा नसो.

आमच्या जाणिवेचें क्षेत्र समाधानकारकपणें वाढावयाचें तर तें अनिवार्यपणें देहाच्या आंत, प्राणाच्या आंत, मनाच्या आंत वाढणार आणि वाढत वाढत वैयक्तिक देहासुद्धां, प्राणासुद्धां, मनासुद्धां सर्व विश्व आपल्या पोटांत येणार; अर्थात् आमची जाणीव आज व्यक्ति-जीवन जगत आहे, व्यक्तीचें अस्तित्व व्यापून आहे. ती पूर्ण वाढीअंतीं विश्वजीवन जगूं लागणार, विश्वाचें अस्तित्व व्यापून रहाणार. विश्वाचें अस्तित्व द्रष्ट्या जाणिवेच्यासाठीं, त्या द्रष्ट्या जाणिवेच्या पोटीं असतें, स्वतंत्र असूं शकत नाहीं, असें पूर्वीं म्हटलें आहे -- हा द्रष्टा म्हणजे विश्वाच्या पोटीं जन्म घेणारें देहधारी वैयक्तिक मन असूं शकत नाहीं, तर विश्वव्यापी जाणीवच द्रष्टा असूं शकतें. ही जाणीव तिनें निर्माण केलेल्या सर्व वस्तूंच्या व घटनांच्या पोटीं, अन्तर्यामीं प्रज्ञा म्हणून असते. विश्वाचा आणि या विश्व-चैतन्याचा संबंध दोन प्रकारचा असूं शकतो. विश्व हें, या चैतन्याचा नित्य आणि सत्य असा क्रियात्मक आविष्कार असूं शकतें किंवा तें या चैतन्यांत त्याच्या ज्ञानक्रियेनें किंवा ज्ञानयुक्त शक्तीनें उदय पावतें व विलीन होतें, असाहि दोघांचा संबंध असूं शकतों. तेव्हां विश्वाचें द्रष्टेपण विश्वाच्या पोटीं असलेल्या मनाकडे येऊं शकत नाहीं, तर जें चैतन्य नित्य आहे, शांत शांत आहे, जीवमान पृथ्वी आणि जीवमान मानवी शरीर या दोन्हीं ठिकाणीं दोहोंच्याहि अंतर्यामीं सारखेंच चिंतन करीत, चिंता करीत जें बसलें आहे, मन आणि इंद्रियें हीं ज्याचीं अवश्य नसणारीं अशीं साधनें आहेत -- तें चैतन्यच विश्वाचा द्रष्टा, धनी व स्वामी आहे, होऊं शकतें.

मानवांत विश्वव्यापी जाणीव उदय पावूं शकतें ही गोष्ट आधुनिक मानसशास्त्र हळू हळू मान्य करूं लागलें आहे; एकापेक्षां एक सोईचीं, कमी अधिक कामाचा बोजा व धक्का सहन करून सारखीच कार्यक्षम राहणारीं, ज्ञानप्राप्तीचीं साधनें जशीं निघूं शकतात, त्याप्रमाणें मानवाला विश्व-

 

पान क्र. ३९

 

जाणीवहि प्राप्त होऊं शकेल असें नवें मानसशास्त्र मानतें. परंतु, या जाणिवेची शक्ति व महत्त्व मान्य करूनहि, तें शास्त्र या जाणिवेला मनोभ्रम या वर्गांत घालतें. पौर्वात्य मानसशास्त्रांत विश्वजाणिवेला नेहमींच सत्यवस्तूंच्या वर्गांत स्थान दिलेलें आहे; आणि मानवाची आंतरिक प्रगति, विश्वजाणिवेचें ध्येय समोर ठेवून केलीं जावी, असें प्रतिपादलेलें आहे. हें ध्येय साधल्याची मुख्य खूण, या ध्येयाच्या सिद्धीचा सारभूत भाग म्हणजे, अहम् नें -- वैयक्तिक मी मी भावनेनें -- आम्हाला ज्या ज्ञानक्षेत्रांत कोंडून ठेवलें आहे, त्या क्षेत्राच्या सीमांचें उल्लंघन करून, सर्व जीवांत व आम्हाला जीवहीन भासणाऱ्या सर्व वस्तूंत गुप्तपणें योजना व चालना करीत असलेल्या विश्वजाणिवेशीं, 'विश्व मी' या जाणिवेशीं (खऱ्या आत्म-जाणिवेशीं) अंशत: किंवा पूर्णत: समरस होणें, हा आहे.

या विश्वचैतन्यांत आपण प्रवेश केला व त्याच्याशीं एकरूप झालों म्हणजे विश्वाचें अस्तित्व मूलत: एकवस्तुरूप आहे, विश्व मूलत: एकच जाणीवपूर्ण वस्तु आहे या सत्याचें स्वरूप, आपली इच्छा असल्यास, आपण कांहीं काळ पारखीत बसूं शकतो; असें केल्यास आपणांस कळूं लागतें कीं, विश्वाच्या एकतेचा अनुभव आल्यानें आपल्या जाणिवेच्या धारणा, इंद्रियांच्या संवेदना या सर्वांत बदल होऊं लागतो. आपल्याला असें स्पष्ट दिसतें कीं, एकचएक मूळ वस्तु, जड तत्त्व (अन्नतत्त्व), प्राणतत्त्व, मानसतत्त्व वगैरे प्रकारांनीं व्यक्त झाली आहे. जडतत्त्व होऊन त्या अद्वितीय वस्तूनें आपल्या एका जडरूपाचीं अनेक रूपें (शरीरें) करून तीं एकमेकांपासून भौतिक दृष्ट्या विभक्त केलीं आहेत आणि या विभक्त शरीरांना अर्थात् अंतरीं स्वत:ला धारण करणाऱ्या या अगण्य, अलग अलग, आकारांना परस्पर संबंध ठेवतां यावा म्हणून भौतिक साधनेंहि निर्माण केलीं आहेत. प्राणतत्त्वाची आणि मानसतत्त्वाची व्यवस्था याच प्रकारचीं दिसते. अनेक प्राणमय रूपांत प्राणतत्त्व विभागलें गेलें आहे; आणि अनेक मानसरूपांत मानसतत्त्व विभागलें गेलें आहे. सर्वत्र अंतर्यामांत चैतन्यवस्तूचें ठाण आहे आणि प्राणाच्या क्षेत्रांत प्राणमय व मानसक्षेत्रांत मनोमय साधनांनीं विभक्त प्राणरूपें व मनोरूपें एकमेकांशीं संबंध ठेवूं शकतील अशी व्यवस्था आहे. मानसतत्त्वाच्या वरतीं कांहीं पायऱ्यानंतर अतिमानसतत्त्व-विज्ञानतत्त्व आपल्या नजरेस येतें. या तत्त्वाचा संचार, व्यवहार, सर्व विश्वांत आहे आणि त्याच्याहून खालच्या पायरीवरील मन प्राण आदि तत्त्वांची हालचाल या तत्त्वाच्या इच्छेनुसार चाललेली आहे हें

 

पान क्र. ४०

 

आपणांस कळतें. याप्रमाणें अस्तित्वाच्या विश्वरूपाचें ज्ञान, बाहेरून आपल्याला होतें हा एक लाभ विश्वचैतन्यप्रवेशानें होतो; पण यापेक्षां महत्त्वाचा असा दुसराहि लाभ आपल्याला होतो; विश्वचैतन्याबरोबर विश्वरूपाच्या अंतर्यामीं बसून आपण अनुभव घेऊं शकतो; आपल्या इंद्रियांच्या संवेदना, आपल्या जाणिवेच्या अनुभूती आपण विश्वरूप, विश्वव्यापक करूं शकतो. पूर्वीं आम्हीं वैयक्तिक अहंभावानें जीवन जगत होतो, त्या ऐवजीं विश्वव्यापक अहंभावानें आम्हीं जीवन जगूं लागतो; 'विश्व मी' या जाणिवेनें आणि भावनेनें आम्ही क्रियाशील होतो; आमचें म्हणून मानलें गेलेलें, मी, आम्ही अशी ज्याला संज्ञा आहे अशा आमच्या मन-प्राण-शरीर या त्रिकुटापेक्षां दुसऱ्या जीवांच्या मन-प्राण-शरीरांशीं आमचा अधिक संबंध येऊं लागतो, त्यांच्याशीं अधिक एकात्मता आम्हीं अनुभवूं लागतो; या वाढत्या संबंधानें व एकात्मतानुभूतीनें आमच्या स्वतःच्या नैतिक व बौद्धिक प्रकृतीवर आम्ही मोठें परिणाम घडवून आणतो, एवढेंच नव्हे तर दुसऱ्या जीवांच्या आंतरिक प्रकृतीवरहि परिणाम घडवतो; आणि याहिपलीकडे भौतिक जगावर आणि त्यांतील घटनांवर देखील आम्ही परिणाम करूं शकतों. हे परिणाम घडवून आणण्याचीं आमचीं साधनें, दिव्य ईश्वरी साधनांच्या जवळपास असलेलीं अशीं असतात. आम्हीं व्यक्ति म्हणून जीवन जगतों तेव्हां अशीं दिव्यप्राय साधनें आम्हांला उपलब्ध होऊंच शकत नाहींत.

तेव्हां, विश्वचैतन्याशीं, विश्वात्म्याशीं ज्या कोणाचा थोडा बहुत संबंध आला असेल किंवा जो कोणी या विश्वात्म्यांत प्रतिष्ठित होऊन जीवन जगत असेल, त्याला भौतिक वस्तु जितकी खरी वाटते त्यापेक्षां हा विश्वात्मा, विश्व चैतन्य अधिक खरें वाटतें; तें स्वत: व त्याचे परिणाम, त्याचीं कार्यें या गोष्टी अनुभवी माणसाला भौतिक वस्तूइतक्या, नव्हे, अधिक खऱ्या वाटतात, असतात. भौतिक जगाच्या दृष्टीनें विश्वचैतन्य हें जसें भौतिक जगापेक्षां अधिक सत्य आहे; तसें विश्वचैतन्याच्या दृष्टीनें भौतिक जग सत्य आहे कीं नाहीं? या प्रश्नाचें उत्तर - 'भौतिक जग सत्य आहे,' - असें आहे. चैतन्याचा पूर्ण आविष्कार या रूपानें तें विश्व, अस्तित्वांत आहे; मात्र त्याचें अस्तित्व विश्वचैतन्याच्या अस्तित्वासारखें स्वतंत्र नसून विश्वचैतन्याच्या अस्तित्वावर व आविष्कृत होण्याच्या संकल्पावर अवलंबून आहे. विश्वचैतन्याशीं तादात्म्य पावल्यानें किंवा त्याच्याशीं घनिष्ठ संबंध आल्यानें आपल्याला जो अनुभव

 

पान क्र. ४१

 

येतो तो श्रेष्ठ तर असतोच, पण खालच्या पायऱ्यांवरील अनुभवांहून पुष्कळ अधिक अनिर्बंध व मुक्त असतो. या अनुभवावरून आपल्याला कळतें कीं, जाणीव आणि सत्ता, (अस्तित्व) या दोन एकमेकींपासून अलग अशा वस्तू नाहींत; सर्व अस्तित्व हें परात्पर चैतन्य (श्रेष्ठतम जाणीव) आहे. अर्थात् सर्व अस्तित्वांत प्रकट वा अप्रकटपणें तें आहे, आणि सर्व अस्तित्व त्याच्यांत आहे. सर्व चैतन्य (जाणीव) स्वयंभू अस्तित्व आहे, तें शाश्वत आहे, त्याचीं कार्यें सत्य आहेत; तें स्वप्न नाहीं, किंवा दुसऱ्या कशांतून विकास पावलेलें नाहीं. जग सत्य आहे तें एवढ्याच करितां कीं, तें चैतन्यामध्यें आहे, त्याच्या बाहेर नाहीं, त्याच्यावांचून नाहीं. जग म्हणजे वस्तुत: एक जाणीवयुक्त शक्ति आहे आणि ही शक्ति तिच्या निर्मात्या स्वयंभू अस्तित्वाशीं (पुरुषोत्तमाशीं) एकरूप असते. भौतिक आकार स्वतंत्रपणें अस्तित्वांत असणें अशक्य आहे. स्वयंप्रकाश शक्तीनें घेतलेलें रूप म्हणजे भौतिक आकार - भौतिक जग; अशी वस्तुस्थिति असतां, त्याला त्या शक्तीपासून कल्पनेनें अलग करून स्वतंत्र स्वयंभू अस्तित्व बहाल करणें ही गोष्ट वस्तुस्थितीला सोडून आहे, सर्वथा असत्यरूप आहे; असें जग म्हणजे स्वैर कल्पनेनें उभा केलेला भ्रमांचा देखावा आहे, तें एक भयंकर स्वप्न आहे, ती एक अशक्य अशी मिथ्या गोष्ट आहे.

वर जें पुरुषोत्तमनामक स्वयंभू जाणीवपूर्ण अस्तित्व जगाचें मूळ म्हणून सांगितलें, तें मनाच्या पलीकडे, पुष्कळ पलीकडे असलेल्या आपल्या अतिमानस तत्त्वाचें, अनंत असीम विज्ञानतत्त्वाचें, साह्य घेऊन जग आकारास आणतें. तें जगाच्या तालबद्ध घटनांत सर्वत्र आहे. तथापि तें जगाहून फार मोठें आहे, स्वतंत्र आहे. त्याची अनंतता शब्दशक्तीच्या पलीकडे आहे. जग त्याच्या आधारानें असतें, जगाचा आधार त्याला लागत नाहीं, जगावांचून तें असूं शकतें. ज्याप्रमाणें आम्हाला विश्वचैतन्यांत प्रवेश करून सर्व विश्वाच्या अस्तित्वाशीं एकरूप होतां येतें, त्याप्रमाणें विश्वातीत चैतन्यांत आम्हाला प्रवेश करतां येतो आणि असा प्रवेश करून विश्वाच्या अस्तित्वावांचून आम्हाला राहतां येतें. याप्रमाणें विश्वातीत विश्वनिरपेक्ष अस्तित्व, जीवन आम्हाला लाभलें म्हणजे आम्हीं विश्वाला, विश्वांतील अस्तित्वाला, जीवनाला रजा द्यावी काय - दिलीच पाहिजे काय? विश्व व विश्वांतील जीवन खोटें असें मानावें काय, मानलेंच पाहिजे काय ? या विश्वाचा आणि विश्वातीताचा संबंध कसा आहे ? हे प्रश्न उभे राहतात.

 

पान क्र. ४२

 

  विश्वातीताच्या दरवाजाशींच शुद्ध, पूर्ण आत्मा आम्हांला भेटतो. प्रकाशमय, निरंजन, विश्वाचा आधार परंतु अकर्ता, शक्तीच्या स्नायूंनीं रहित, द्वंद्वांचा दोष नसलेला, भेदाचा व्रण नसलेला, अद्वितीय, सम, एकच एक निःसंबंध, निर्गुण, ज्यांत संबंधाचा व अनेकतेचा आभासदेखील नाहीं असा - असें या आत्म्याचें वर्णन उपनिषदें करितात; हा अद्वैत वेदांताचा केवल पुरुष, अकर्तृ ब्रह्म, विश्वातीत शांत सत्ता होय. मन जेव्हां विश्वातीताच्या दरवाजाकडे जाणाऱ्या अनेक पायऱ्या क्रमाक्रमानें व्यवस्थेनें चढत न जातां एकदम उडी मारून तो दरवाजा गांठतें व आंत शिरतें, तेव्हां स्वत: ज्या विश्वांतील तें असतें त्या विश्वाची सत्ता मिथ्या आहे, भ्रमात्मक आहे आणि विश्वातीत शांति हीच एक एकमेव खरी वस्तु आहे, असें त्याला सुस्पष्टपणें वाटतें. मानवी मनाला येणाऱ्या व येऊं शकणाऱ्या अनुभवांत हा वरील अनुभव सर्वांत अधिक जोरदार, प्रभावी, निःसंदेह व निश्चयात्मक असा असतो. हा शुद्ध आत्मा किंवा त्याच्या पाठीमागें असणारा सर्व अनुभूत अस्तित्वाचा अभाव, ''असत्'' आत्मा, भेटला म्हणजे जडवाद्यांचा नकार (जें जड नाहीं त्याचें सत्यत्य नाकारणारा नकार) जसा एका बाजूला आहे तसा चैतन्यवाद्यांचा, आत्मवाद्यांचा नकार, (चैतन्याखेरीज, शुद्ध आत्म्याखेरीज इतर सर्वांचें, जडाचें - जडविश्वाचें सत्यत्व नाकारणारा नकार) दुसऱ्या बाजूला आत्मभेट झालेल्यांकडून घोषिला जातो. हा नकार दुसऱ्या नकारापेक्षां अधिक सर्वगामी, अधिक निश्चयात्मक, अंतिम स्वरूपाचा आणि ज्या व्यक्तींना किंवा समूहांना शुद्ध आत्म्याची भेट झाली, किंवा भेट घेण्याची इच्छा झाली, त्यांच्यावर अधिक अनिष्ट परिणाम करणारा असतो. या आत्मदर्शन झालेल्यांना व आत्मदर्शनासाठीं साधना करणारांना, संसार टाकून अरण्याचा आश्रय करा असा या दुसऱ्या नकाराचा आदेश असतो. हा आदेश असामान्य प्रभावाचा असतो. या नकाराला संन्यासी नकार असें नांव आहे.

दोन हजार वर्षांपूर्वी जेव्हां जुन्या आर्य जगांतील समतोलपणा बुद्धमतानें बिघडविला तेव्हांपासून जडाविरुद्ध आत्म्याचें हें बंड भारतीय मनावर अधिकाधिक प्रभाव गाजवीत आलें आहे. भारतीय विचारांत विश्वाच्या असत्यतेची, भ्रमरूपत्वाची भावना सर्वत्र भरलेली आहे असें नाहीं; जगन्मिथ्यावादाप्रमाणें दुसरेहि वाद भारतीय तत्त्वज्ञानांत आहेत; भारतीय धार्मिक ध्येयांत संन्यासी ध्येयापेक्षां वेगळीं ध्येयेंहि आहेत. अगदीं अतिवादी तत्त्वज्ञानांच्या वादांतहि जडतत्त्व आणि आत्मतत्त्व यांचा विरोध कमी

 

पान क्र. ४३

करून, दोहोंत समन्वय साधण्याचा प्रयत्नहि थोडाबहुत केलेला आढळतो, तथापि वरील महान् नकाराचीं छाया सर्वांच्या जीवनावर पडलेली आहे, सर्वांचें जीवनाचें अंतिम ध्येय संन्याशाची कफनी, हें आहे असें दिसेल. जीवनाचीं जीं सर्वसाधारण कल्पना आहे तींत कर्माच्या शृंखलेसंबंधाची बौद्ध उपपत्ति भरलेली असल्यामुळें बंध आणि मोक्ष - जन्मानें बंध आणि जन्म येण्याचें संपण्यानें मोक्ष - ही अन्योन्य विरोधी जोडी त्या कल्पनेंत आहे. या कारणानें या सर्व आवाजांतून असा एकच महान् सूर निघतो कीं, आम्हाला हवें असलेलें स्वर्गीय राज्य या द्वंद्वांच्या जगांत असूं शकणार नाहीं, तें या जगाच्या पलीकडे कोठेंतरी आहे; शाश्वत वृंदावनांतील आनंद-भोग, ब्रह्मलोकांतील श्रेष्ठ सुख, सर्व व्यक्ताच्या पलीकडे असलेलें अवर्णनीय निर्वाण, जेथें भेदाचा अनुभव समूळ संपतो असें निर्गुण अनिर्वाच्य एकरस शांत अद्वैत - या अवस्थांत कोठेंतरी स्वर्गीय राज्य आहे, या जगांत तें नाहीं व असूं शकणार नाहीं.

या स्वर्गांपैकीं कोठल्यातरी स्वर्गाकडे साधकांचें लक्ष लागलेलें आढळतें. या प्रवृत्तीनुसार शतकानुशतकें भारतांत शेंकडों महापुरुष हाच एक कळकळीचा, उच्च आणि दूरगामी संदेश देत आले आहेत कीं, ''भौतिक जीवनाचा संन्यास हा एकच ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे; भौतिक जीवनाचा अंगीकार ही अज्ञानाची प्रवृत्ति आहे, मानवाच्या जन्माचा खरा उपयोग जन्मापासून सुटका करून घेणें हा आहे. आत्म्याची हांक ऐका, जडापासून निवृत्त व्हा, जडाचा संबंध तोडून टाका.'' हा संदेश देणारे महापुरुष, संत आणि सद्गुरु यांची जणुं एक मोठी मालिकाच गेलीं कित्येक शतकें वरील संदेशांतील उपदेश स्वत: आचरून व त्याच्या

-------------------------

शाश्वत वृंदावन म्हणजे गोलोक. हा वैष्णवांचा स्वर्ग, येथें शाश्वत सौंदर्य व शाश्वत सुख आहे.

ब्रह्मलोक म्हणजे शुद्ध अस्तित्व, जाणीव आणि सुख असलेली परमोच्च स्थिति. अनिर्वाच्य अद्वैतात पूर्णपणें विलीन न होतां, लाभूं शकणारी ही स्थिति आहे.

निर्वाण म्हणजे लय, विलय : सर्वच अस्तित्वाचा विलय असा याचा अर्थ घेतला पाहिजे असें नाहीं. आपल्याला ज्याचा अनुभव येतो त्या अस्तित्वाचा लय - अहम्, वासना, अहंमूलक वृत्ति व कृति यांचा नाश, यांचा लय - एवढाच निर्वाण याचा अर्थ होतो.

 

पान क्र. ४४

सत्यतेचा स्वत: अनुभव घेऊन मग लोकांना तो कळकळीनें देत आलेली आहे; या थोर अनुभवी तेजस्वी संतांना आणि सद्गुरुंना भारत थोर मान देत आला आहे, त्यांची स्मृति तो पवित्र मानीत आला आहे. भारतीयांच्या कल्पनेमध्यें त्यांना फार प्रभावी स्थान आहे.

संन्यासी मनोवृत्तीशीं सहानुभूति बाळगणारें हें युग नाहीं. भारत सोडून सर्व जगांत, संसार सोडणाऱ्या विरक्तांना मान देण्याचा काळ संपला आहे किंवा संपत आला आहे. अशा काळी, अशा युगांत संन्यासाच्या थोर प्रवृत्तीचें कारण, भारतांतील प्राचीन आर्यजातीची जीवनशक्तीच कमी झाली होती हें आहे, असें प्रतिपादन करणें सोपें आहे. 'प्राचीन भारतीयांनीं मानवजातीच्या सर्वसामान्य प्रगतीच्या कार्यांत फार मोठा भाग घेतला, मानवी ज्ञानसंवर्धनांत आणि मानवी कर्तबगारींत त्यांनीं अनेक दिशांनीं भरपूर कार्य करून भर घातली आणि हें जें ओझें पुष्कळ काळ त्यांनीं शिरावर वागविलें त्यामुळें ते थकून गेले, त्यांची जीवनशक्ति आटून गेली आणि या कारणानें त्यांच्यामध्यें संन्यासाची प्रवृत्ति उदय पावून वाढत गेली,' अशीं कारणमीमांसा थोर पराक्रमी संन्यास-प्रवृत्तीच्या गळ्यांत आजच्या युगांत बांधली जाणें स्वाभाविक आहे, सोपें आहे. तथापि आपण ही गोष्ट नजरेआड करतां कामा नये कीं, मानवाच्या ज्ञानशक्तींत जी शक्यता आहे, त्या शक्यतेचें शिखर, ज्ञानाचें उंचांत उंच शिखर गांठून तेथें अस्तित्वाच्या श्रेष्ठतम सत्याचा पूर्ण साक्षात्कार त्यांनीं संपादन केला, आणि या साक्षात्काराच्या प्रभावामुळें त्यांनीं त्याला अनुरूप असा संन्यासमार्ग स्वीकारला व तो स्वीकारण्याचा साधकांना संदेश दिला. व्यवहार दृष्टीनें विचार करतां, मानवाच्या पूर्णतेला संन्यासी मनोवृत्ति आजहि एक आवश्यक गोष्ट आहे असें दिसेल; आणि मानवाच्या पूर्ण विकासाला साहाय्यक म्हणून नव्हे तर, स्वतंत्रपणें देखील संन्यासाची इष्टता व श्रेष्ठता प्रतिपादणें तोपर्यंत अटळ आहे, जोपर्यंत मानव आपली बुद्धि, आपली वासना-विकारांची रूढ जीवनसरणि, भोगैकपरायण, निर्बुद्ध, नित्य जुलुम करणाऱ्या पशुत्वाच्या दास्यांतून मुक्त करीत नाहीं.

आम्ही संन्यासाचा मार्ग थोर पराक्रमी मानीत असलों तरी आम्हाला संन्यासाचें ध्येय एकांगी वाटतें. संन्यासी किंवा जडवादी एकांगी जीवन आम्हाला इष्ट वाटत नाहीं. आम्हांला त्याहून महान् व पूर्णतर जीवन साधावयाचें आहे, म्हणून संन्यासी व जडवादी सिद्धांतांहून महान् व पूर्णतर सिद्धांत आम्ही प्रतिपादन करूं इच्छितों. आम्हांला हें मान्य आहे

 

पान क्र. ४५

कीं, ''एकमेवाद्वितीयं ब्रह्म'' या महान् वेदांती सूत्राला भारतीय संन्यासधर्म शिरोधार्य मानतो. परंतु ''सर्वं खलु इदम् ब्रह्म'' हें ''एकमेवाद्वितीयम् ब्रह्म'' या सूत्राइतकेंच वेदांती सूत्र आहे; व हीं दोन्ही सूत्रें  सारखींच शिरोधार्य आहेत ही गोष्ट या संन्यासधर्मानें दृष्टिआड केली आहे. दुसऱ्या सूत्राच्या प्रकाशाच्या साह्यानें पहिल्या सूत्राचें वाचन व मनन शांतपणें व सावकाशीनें जितकें करावयास हवें तितकें संन्यासधर्मीयांनी केलें नाहीं असें म्हणणें प्राप्त आहे. उंच उंच ठिकाणीं देवाधिदेव, परमात्मा, पुरुषोत्तम (एकमेवाद्वितीयम् ब्रह्म) आहे, त्याला भेटण्यासाठीं उंच उडी घेण्याची तीव्र भावनोत्कट आकांक्षा मानवाचें हृदयांत वागणें अवश्य आहे हें संन्यासधर्मानें ओळखलें. परंतु हा परमात्मा, हें ब्रह्म आपल्या उंच ठिकाणावरून खालीं वांकून, स्वतःचें दर्शन ज्यांत आहे त्या विश्वाला, त्या आपल्या साकार आत्म्याला, विश्वरूपाला नित्य पोटाशीं धरून असतें या गोष्टीकडे त्या धर्माचें दुर्लक्ष झालें. विश्वातीत ब्रह्म विश्वरूप ब्रह्माशीं नित्य जोडलेलें आहे. विश्व, जडाच्या पोटीं आहे, आणि जड, ब्रह्माच्या पोटीं आहे. विश्वातीत ब्रह्म (आत्मा), विशुद्ध आत्मा म्हणून प्रत्ययास येतें हें ब्रह्माचें आत्मविषयक सत्य संन्यासधर्मानें ओळखलें, अनुभविलें. परंतु जडांतला ब्रह्माचा भाव त्याला नीट आकलन झाला नाहीं. प्राचीन वेदांती महापुरुषांनीं ब्रह्माची समग्र उंची पूर्णतेनें ओळखली होती व त्याबरोबर त्याचा समग्र विस्तार, त्याचा समग्र समावेशक धर्म देखील पूर्णतेनें ओळखला होता. परंतु संन्यास धर्मीयांना ब्रह्माच्या समग्र उंचीचें पूर्ण आकलन झालें तरी त्याच्या समग्र विस्ताराचें आकलन झालें नाहीं. असो. आजवरच्या सिद्धांतांहून जो पूर्णतर सिद्धांत आम्हाला मांडावयाचा आहे, तो मांडतांना मानवी जीवन ऊर्ध्वगतीच्या दृष्टीनें शुद्ध आध्यात्मिक प्रेरणेनें जें कार्य केलें आहे त्याला कमी लेखण्याचा प्रमाद आमच्या हांतून घडतां कामां नये. भौतिक जडवादानें परमात्म्याचें हेतू कमी अधिक पूर्ण करण्याची जी मोठी कामगिरी नकळत केली आहे, ती आपण पाहिलीच आहे. संन्यास धर्मानें मानवी जीवनाची जडवादाहून कितीतरी अधिक व अधिक श्रेष्ठ अशी सेवा केली आहे. तेव्हां जडवादाप्रमाणें संन्यासवादालाहि आपण धन्यवाद दिले पाहिजेत. अंतिम सुसंवादी जीवनाचा म्हणून जो सिद्धांत आम्ही मांडणार आहोंत त्यांत भौतिक शास्त्रांतील सत्य गोष्टी आणि खरोखरी उपयुक्त अशा गोष्टी काळजीनें अंतर्भूत करणार आहों. या शास्त्राचीं आजचीं रूपें व सूत्रें

 

पान क्र. ४६

बरीचशीं किंवा सर्वच्या सर्व बाजूला ठेवावीं लागलीं किंवा मोडतोड करून वापरावी लागलीं तरी त्यांतील उपयुक्त व सत्य गोष्टी आम्ही अवश्य जपून ठेवूं. आर्यांच्या भूतकालीन आध्यात्मिक संपत्तीचा जो वारसा आमच्यापर्यंत आला आहे त्या वारशाची वहिवाट करतांना, सत्याची व उपयुक्त गोष्टींची जपणूक करण्याचें तत्त्व ज्या काळजीनें आम्हीं भौतिक शास्त्राला लावणार आहों, त्याहिपेक्षां अधिक काळजीनें तें तत्त्व या आमच्या आध्यात्मिक संपत्तीला लावणें आमचें कर्तव्य आहे.

 

पान क्र. ४७

प्रकरण चौथें

 

सर्वव्यापी सत्तत्व

 

तो परमात्मा असत्-ब्रह्म आहे असें ज्ञान ज्याला झालें तो केवल 'असत्' - अस्तित्व नसलेला - असा होतो. ब्रह्म आहे असें ज्ञान ज्याला झालें तो सत्य अस्तित्व, सत्य आत्मा, अस्तित्वांतील सत्य म्हणून ओळखला जातो.

- तैत्तिरीयोपनिषद् २.६

 

विशुद्ध आत्मा आणि विश्वमृत्तिका, विश्वाचें जड द्रव्य, या दोघांचेंहि हक्काचें मागणें आम्हीं मान्य केलें आहे; आम्हांमध्यें विशुद्ध आत्मा, त्याचें स्वभावगत पूर्ण अनंत स्वातंत्र्य व्यक्त करूं मागत आहे आणि जड विश्वद्रव्य या व्यक्ततेचा, आविष्काराचा सांचा होऊं मागत आहे, पाया होऊं मागत आहे. शुद्ध चैतन्य (आत्मा) आणि शुद्ध जड (विश्वद्रव्य) या दोन वस्तू दोन टोंकांच्या व सर्वथा अन्योन्य विरोधी भासतात आणि या दोन वस्तूंनीं दोन बाजूंनीं केलेल्या मागण्या आम्ही मान्य करीत असल्यामुळें आम्हाला असें एक सत्य गांठावयास हवें कीं, जें या दोन्ही वस्तूंचा समन्वय पूर्णपणें साधील, आमच्या जीवनामध्यें या दोन्ही वस्तूंना योग्य भाग पुरवील आणि आमच्या विचारामध्यें दोन्ही वस्तूंचे योग्य समर्थन करील. दोहोंपैकीं कोणाचाहि कोणताहि हक्क या सत्यानें बुडवितां कामा नये. दोहोंतहि परम सत्य वास करीत आहे ही गोष्ट या आमच्या समन्वयी सत्यानें नाकारतां कामा नये. चैतन्यवाद किंवा जडवाद आपापल्या परीनें चुकत असेल, अतिरेक करून कोणाला अन्यायानें बहिष्कृत करीत असेल, परंतु या चुका व हे अतिरेक त्या परमात्म्याच्या आश्रयानेंच होत असतात; त्या परमात्म्यांतूनच त्यांना सारखें बळ मिळत जातें, ही गोष्ट विसरून चालणार नाहीं. एखादा अतिरेकी सिद्धांत मांडला गेला आणि त्या सिद्धांतानें मानवी मनाला प्रबळ मोहिनी घातली कीं आपण निश्चितपणें असें समजावे कीं, तो अतिरेकी सिद्धांत सर्वथा चूक, सर्वथा

 

पान क्र. ४८

 

भ्रम किंवा आभास नसून त्या सिद्धांतांत कांहींतरी महान् श्रेष्ठ वस्तु किंवा शक्ति झांकलेली आहे आणि त्या वस्तूपुढें नतमस्तक होऊन तिचे ठिकाणीं निष्ठा ठेवणें हें आपलें कर्तव्य आहे. हें कर्तव्य आपण न केलें तर, त्या वस्तूला नकार दिला किंवा बहिष्कार घातला तर, या अपराधाचें शासन त्या वस्तूकडून आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाहीं; नकाराचा किंवा बहिष्काराचा बदला ती वस्तु घेईलच. जड आणि चैतन्य या दोन टोंकांच्या वस्तूंमध्यें दिसणारा विरोध मिटविण्यासाठीं कांहीं केवळ तडजोडीची व्यवस्था केली तर त्या व्यवस्थेनें विरोधाचा प्रश्न पूर्णपणें मिटत नाहीं, तडजोड ही समाधानकारक अंतिम व्यवस्था होऊं शकत नाहीं. तडजोड म्हणजे करार; दोन विरोधी शक्तींमध्यें झालेला, विरोधी हितसंबंधांचें एकमेकींनीं कमी अधिक संरक्षण करण्याचा व्यवहारी करारनामा. या करारनाम्यानें त्या दोन शक्तींचा खरा समेट, खरा मेळ घडून येत नाहीं. खरा मेळ व्हावयाचा तर दोन्ही शक्तींनीं एकमेकींचें अंतरंग सहानुभूतीनें समजावून घ्यावयास हवें, एकमेकींनीं एकमेकीस स्वत:मध्यें शक्य तेवढें सामावून घ्यावयास हवें, आणि या रीतीनें कमी अधिक प्रमाणांत दोघींची हृदयाची एकता, जिव्हाळ्याची एकता निर्माण व्हावयास हवी. तेव्हां जड आणि चैतन्य यांना आपण शक्य तितकें अधिकांत अधिक एकत्र आणूं शकलों, त्यांचा अधिकांत अधिक संयोग साधूं शकलों तरच त्या दोघांना खऱ्या समेटानें जोडणारें, दोघांचा खरा समन्वय साधणारें सत्य आम्हाला लाभेल आणि त्यायोगें व्यक्तीचें आंतरिक जीवन आणि बाह्य जीवन व्यवहारतः अन्योन्य सुसंवादी होण्यासाठीं लागणारा भरभक्कम पाया, सुदृढतम आधार आपणांस मिळेल.

विश्वचैतन्य (Cosmic Consciousness) हें चैतन्य आणि जड यांच्या संयोगाचें स्थान आहे हें आपण पाहिलें आहे. या ठिकाणीं चैतन्य आणि जड परस्परांना सत्यत्वानें सत्यवस्तु म्हणून ओळखतात. या दोन तत्त्वामध्यें मध्यस्थीचें काम प्राण आणि मन हीं दोन तत्त्वें करतात. पण ही व्यवस्था विश्वचैतन्यांत असते. सर्व साधारण मनाच्या अहंकारी अवस्थेंत चैतन्य असतांना, मन आणि प्राण वेगळ्या तऱ्हेनें वागतात. शुद्ध चैतन्य आणि जड यांना विभक्त करण्याचें, दोहोंमध्यें नसतें भांडण लावण्याचें काम त्यांजकडून होत असतें. मनाचीं अहंयुक्त सामान्य अवस्था संपून त्याला विश्वव्यापी जाणीव, अर्थात विश्वचैतन्याची अवस्था प्राप्त झाली म्हणजे त्याला नवा प्रकाश मिळतो, नवें ज्ञान मिळतें; एकता आणि

 

पान क्र. ४९

 

अनेकता दोन्ही गोष्टी सत्य आहेत, एकाच वेळीं सत्य आहेत, ही गोष्ट त्याला स्पष्ट दिसते. मग तें, या दोन सत्य वस्तूंच्या मध्यें असणारीं अन्योन्य व्यवहाराचीं सूत्रें आत्मसात् करतें; स्वत:मध्यें त्याला पूर्वीं अनुभवास येणारे सर्व विसंवाद या नव्या प्रकाशांत, त्यांचें कारण लक्षांत येऊन दूर होतात, त्यांचें ठिकाणीं दिव्य मेळ अनुभवास येतो, पूर्वींच्या विसंवादी गोष्टी सुसंवादी होतात; यामुळें त्याला संतोष वाटतो आणि ईश्वर व प्राणाधिष्ठित संसारी जीवन यांच्या पूर्ण अविभक्ततेची सिद्धि हें मानवाच्या विकासाचें अंतिम ध्येय आहे ही गोष्ट त्याला कळल्यानें आणि पटल्यानें, तें या सिद्धीचें साधन होण्यास स्वखुषीनें मान्यता देतें. विश्वचैतन्याच्या अवस्थेंतील प्रकाश मनाला उपलब्ध झाला म्हणजे त्याची विचारशक्ति सूक्ष्मदर्शी होते, प्राणाला उपलब्ध झाला म्हणजे इंद्रियें सूक्ष्मस्पर्शी होतात. या सूक्ष्म मनाला व प्राणाला जड द्रव्य हें, साकार होऊन सुविस्तृत संसार करूं पाहणाऱ्या चैतन्याच्या आकाराचें ठिकाणीं, शरीराचें ठिकाणीं आहे, असा साक्षात्कार होतो; आणि जड द्रव्याचें सारतत्त्व, सत्व, आत्मा आहे असे त्यांना स्पष्ट ज्ञान होतें; आणि या मध्यस्थ मन-प्राणरूपी दूतांच्या द्वारां एकमेकांची पुरी ओळख पटल्यानें आत्मचैतन्य जडाला आणि जड आत्मचैतन्याला दिव्य सत्यवस्तु म्हणून आणि स्वत:शीं तत्त्वत: एकरूप म्हणून मान्यता देतें. विश्वचैतन्याच्या प्रकाशांत हेंहि स्पष्ट होतें कीं, मन आणि प्राण हीं परात्पर चैतन्य-पुरुषाचीं साकार प्रतीकें व साधनें असून यांच्याद्वारां तो पुरुष संसार-विस्तार करून जड आकाराच्या घरांत, देहांत आत्मा म्हणून प्रवेश करतो, आणि या घरांत राहत असतां यांच्याच द्वारां दुसऱ्या अनंत जड देहांत असणाऱ्या आपल्या जाणीवकेंद्रांना, आत्म्यांना आपलीं ओळख पटवितो. परात्पर चैतन्यपुरुष विश्वाच्या प्रतीकांत आपलें जें सत्य व्यक्त करीत आहे, तें मनानें स्वतःमध्यें निर्मळ आरशाप्रमाणें प्रतिबिंबित करावें, यांतच त्याची कृतार्थता आहे आणि प्राणाची कृतार्थता यांत आहे कीं, त्यानें आपल्या शक्ती जाणीवपूर्वक त्या दिव्य परम पुरुषाच्या हवालीं कराव्या, अशाकरितां कीं, त्याला, त्या परम पुरुषाला आपलें पूर्ण अंतरंग पूर्णपणें व्यक्त करण्यासाठीं विश्वसंसारांत नित्य नवे आकार, नित्य नवे क्रियाप्रकार उभे करतां यावे.

मनाची आणि प्राणाची कृतार्थतेची जी कल्पना आतांच सांगितली तिजवरून, मनुष्याला विश्वांत  दिव्य जीवन जगणें शक्य आहे, असें दिसून

 

पान क्र. ५०

 

येतें. भौतिक शास्त्र, विश्वाच्या आणि पृथ्वीच्या क्रमविकासाविषयीं प्रतिपादन करीत असतें. मनुष्याला दिव्य जीवन शक्य असेल तर वरील क्रमविकासाचें तें एक बुद्धिगम्य ध्येय मानतां येईल, त्या क्रमविकासाला कांहीं जिवंत अर्थ आहे असें स्पष्ट होईल आणि दिव्य मानवी जीवन, व त्याची शक्यता यामुळें विकाससिद्धांतवादी भौतिक शास्त्राचा खटाटोप समर्थनीय ठरेल. त्याचप्रमाणें, दिव्य जीवनाच्या प्रयत्नानें, मनुष्याचा सामान्य आत्मा पार बदलून त्याचें ईश्वरी स्वरूप प्रकट होईल; अर्थात् सर्व महान् धर्मपंथाचें महान् ध्येय सिद्ध होऊन त्या धर्मांचेंहि भौतिकशास्त्राबरोबर समर्थन होईल.

कर्त्या ब्रह्माची ही गोष्ट झाली. पण ज्या अकर्त्या ब्रह्माची ओढ संन्याशाला असतें, विशुद्ध, स्वयंभू, स्वानंदी, असें ज्या अकर्त्या शांत ब्रह्माचें वर्णन केलें जातें व ज्याचा साक्षात्कार हा संन्याशाच्या संन्यासी पंथाचें कायमचें थोर समर्थन म्हणून आपण मान्य केला आहे त्या अकर्त्या ब्रह्माचें कर्त्या ब्रह्माशीं अनिवार्य विरोधाचें नातें आहे कीं काय? नाहीं. असें नातें मुळींच नाहीं. उलटपक्षीं दोहोंमध्यें सुसंवादाचें नातें आहे, हेंच प्रकाशमय सत्य आहे. एका ब्रह्मानें विश्वाची- 'भ्रमरूप विश्वाची' -उभारणी करावी, दुसऱ्या ब्रह्मानें त्याचें अस्तित्व नाकारावें, अशीं कांहीं खरी स्थिति नाहीं. कर्ते ब्रह्म आणि शांत अकर्ते ब्रह्म या वेगवेगळ्या वस्तू नसून एकाच अभेद्य ब्रह्माचीं हीं दोन रूपें, एक विधायक व दुसरें अ-विधायक, पण एकाचें दुसऱ्यावांचून चालत नाहीं अशीं हीं दोन रूपें आहेत. अ-विधायक शांत ब्रह्मांतूनच तो शब्द नित्य निघत असतो, जो शब्द विधात्याचें विधायक काम करून विश्वांची निर्मिति करीत असतो, आणि ही निर्मिति करणारा शब्द म्हणजे दुसरें तिसरें कांहीं नसून शांत ब्रह्माच्या पोटीं जें स्वत: लपून बसलेलें असतें, त्याचें स्वयमाविष्करण होय. अनंत अगण्य विश्वमाला निर्माण करणारी आणि त्या विश्वमालांमध्यें अखंडपणें नित्य क्रियाशील असणारी ब्रह्माची पूर्ण स्वतंत्र सर्वसमर्थता ही त्याच्या पूर्ण, सर्वसहिष्णु नित्य, साक्षीभूत अकर्तेपणामुळेंच संभवते. कारण ब्रह्माची क्रियाशीलता म्हणजे काय ? ब्रह्म मुळांत स्वयंभू ज्ञानशक्तिमय अस्तित्व आहे. तें आहे तसेंच नित्यशांत, अक्षर, अव्यय एकरस राहून आपल्या अनंतप्रसवा प्रवृत्तिशील प्रकृतीला कार्यप्रवृत्त होण्यास संमति देते. तिच्या प्रवृत्तींतून ज्या घटना घडणार त्यांना लागणारी विविध प्रकारची शक्ति, तसेंच त्या घटनांची अमर्याद

 

पान क्र. ५१

 

विविधता व्यक्त होण्यास आणि या विविध घटनांमध्यें सुमेळ, सुसंवाद घडून येण्यास लागणारें असीम सामर्थ्य, तें ब्रह्म आपल्या अनंत शक्तिभांडारांतून प्रकृतीला आत्मीयतेनें पुरवते - हीच ब्रह्माची क्रियाशीलता होय.

मनुष्य पूर्ण व्हावयाचा तर त्यानेंहि ब्रह्माची परम शांति आणि अनासक्ति आपल्या हृदयांत सुप्रतिष्ठित करावयास हवी आणि आपल्या अविश्रांत स्वयंस्फूर्त श्रमांना या शांतीचा आणि अनासक्तीचा आधार द्यावयास हवा. त्याचप्रमाणें ब्रह्माची दिव्य सहिष्णुता आणि त्याचा दिव्य संतोष मनुष्याच्या अनासक्त परिश्रमांत व्यक्त व्हावयास हवा. या प्रकारची पूर्णता ज्यांनीं मिळविली आहे, ज्यांच्या हृदयांत ब्रह्माची (ब्रह्मासारखी) शांति सुप्रतिष्ठित झाली आहे, त्यांना या शांतीतून विश्वांत काम करणाऱ्या शक्तींचा कधींहि न संपणारा पुरवठा, जिवंत झऱ्यांतून पाणी मिळावें त्याप्रमाणें, सारखा मिळत आहे असें दिसेल. तेव्हां शांत ब्रह्म, शांत आत्मा स्वभावत: विश्वगत विश्वविषयक उद्योगांत पडत नाहीं, तो सर्वकर्मसंन्यास, सर्व कर्मापासून अलिप्तता स्वभावतःच पसंत करतो, हें प्रतिपादन सत्याला धरून नाहीं. क्रियामय विश्वसंसार आणि निष्क्रिय शांति या दोन अवस्था अन्योन्य विसंवादी, अन्योन्य विरोधी आहेत, हें जें आपल्या मनाला भासतें, तें चूक आहे आणि मनाच्या मर्यादा ही चूक त्याजकडून घडवितात. अमुक जाणिवेंत एक गोष्ट आहे तर तिच्या विरुद्ध स्वरूपाची भासणारी दुसरी गोष्ट त्या जाणिवेंत नसली पाहिजे, नाहीं, अशा प्रकारच्या 'आहे-नाहीं'मय अन्योन्यविरोधी अनुभवांची व सिद्धांतांची सवय मर्यादाबद्ध मनाला झाल्यानें त्याला अशी कल्पनाच येऊं शकत नाहीं कीं, अशी एक सर्वसमावेशक, व्यापक व समर्थ जाणीव असूं शकते, जिच्यांत त्याला स्वत:ला विरोधी भासणाऱ्या गोष्टी, एकाच वेळीं एकत्र असतात. तेव्हां ही वस्तुस्थिति आहे कीं, शांत ब्रह्म, शांत आत्मा विश्वसंसार टाकीत नाहीं, तर त्याला आधार होऊन त्याचा योगक्षेम चालवितो; किंवा असेंहि म्हणतां येईल कीं, प्रवृत्ति आणि निवृत्ति या दोन्ही वृत्तींना शांत आत्मा, सारखाच निःपक्षपाती आधार देतो, आणि आत्म्यानें सर्व प्रकारचे कार्य करीत रहावें आणि त्याबरोबर शांत आणि मुक्त, अनासक्त असावें, या समन्वयाचा तो पक्षपाती आहे, या समन्वयाला तो मोकळेपणें मान्यता देतो.

(शुद्ध शांत अस्तित्व आणि साक्षेपी संसारी अस्तित्व हीं अविरोधी आहेत, सत् ब्रह्म निष्क्रिय असून सक्रिय आहे व म्हणून आत्मा शांत आणि

 

पान क्र. ५२

 

साक्षेपी एकाच वेळीं असूं शकतों, ही गोष्ट आपण पाहिली.) आतां असत् ब्रह्म व त्यांत विलीन होणें अर्थात् निर्वाण, ''अस्तित्वांतून कायमची निवृत्ति,'' या गोष्टींची चर्चा राहिली. ''आरंभी हें सर्व असत्'' होतें, या ''असत्'' मधून ''सत्'' उदयास आलें, असें प्राचीन शास्त्रग्रंथांत (तैत्तिरीय उपनिषद् २-७) म्हटलें आहे. अर्थात् शेवटीं असत् मध्यें सत् बुडून जावयास हवें, असा सिद्धांत निघतो. अनंत, अभिन्न, एकमेव सत् (अस्तित्व) अनेक, अनंत, भिन्न वस्तूंच्या द्वारां व्यक्त होतें, भेदाच्या सर्व शक्यतांना अस्तित्वांत येण्यास मान्यता देतें असें सिद्ध झालें असलें, तरी निदान असत् ब्रह्म म्हणून जी सर्वप्रथम अवस्था, जी एकमेव नित्यसत्यता आहे ती तरी सत्य विश्वाच्या शक्यतेला नकार देते कीं नाहीं? असा नकार असत् देत असेल तर, कांहीं बौद्धपंथ विश्वाचें आद्यंत आणि वर्तमान स्वरूप म्हणून ज्या शून्याचा पुरस्कार करतात, तें शून्यच खरें मानावें लागेल व संन्यासपंथाला विश्वाचें कोडे उलगडलें आहे असें म्हणावें लागेल आणि जशी व्यक्तीमधील अहंवृत्ति ही खोट्या बाह्य जाणिवेनें निर्मिलेली एक कल्पना मूर्ति आहे, तशीं आत्मा ही देखील तिनेंच तशीच निर्मिलेली दुसरी कल्पनामूर्ति आहे, असें मानावें लागेल.

परंतु असा शून्यवाद मानण्याचा प्रसंग येत नाहीं. असत्, अनास्तित्व हा केवळ शब्द आहे. आपलें मर्यादाबद्ध मन शाब्दिक भेदावर फार भिस्त ठेवतें. शब्दभेद पूर्णतया सत्य, अंतिम वस्तुभेद दाखवितात असा त्याचा समज होतो; आम्हाला अतिमानसक्षेत्रांत जें अनुभव येतात तें अनुभव आमचे मर्यादाबद्ध मन आपल्या संवयीच्या भेदनिष्ठ पद्धतीनें पाहते आणि त्यासंबंधानें अवास्तव भेदात्मक विरोधात्मक शब्दांत सिद्धांत बांधतें. सत् आणि असत् यांचा अनुभव हा अतिमानसिक अनुभव आहे. मनाला 'सत् च्या उलट तें असत्' असा अर्थ प्रतीत होतो, पण हा अर्थ खोटा आहे. असत् नें जी वस्तु दाखविली जाते तिचें परीक्षण केलें असतां असें कळून येतें कीं, खरोखरीचा अस्तित्वाचा सर्वस्वीं अभाव अशक्य आहे, ती एक मनाची कल्पना आहे, ज्याप्रमाणें सत् म्हणजे अस्तित्व, केवळ शांत विश्वहीन अनंत अस्तित्व अथवा आत्मा ही एक मनाची कल्पना आहे. सत् च्या पोटीं विश्व येतें ही जशी वस्तुस्थिति आहे त्याप्रमाणें या विश्वांत आपण असतां, जें वास्तव अस्तित्व आपल्या अनुभवाला येतें, किंवा ज्याची आपण कल्पना करूं शकतो त्या अनुभवांतील किंवा कल्पनेंतील जें सूक्ष्मांत सूक्ष्म, शुद्धांत शुद्ध वास्तव अस्तित्व असेल, त्याच्या पलीकडील

 

पान क्र. ५३

 

कांहींतरी अस्तित्व असा असत् चा अर्थ आहे. अमुक अशी स्पष्ट कल्पना देखील ज्याच्या संबंधानें आपण बांधूं शकत नाहीं तें असत्, अनास्तित्व; ही जी अनास्तित्वाची, अभावाची अवास्तव कल्पना आम्ही उभी करतो ती एवढ्याकरितां कीं, आम्हाला जे माहीत आहे किंवा होऊं शकतें, आम्ही जे कांहीं जाणीवपूर्वक आहोंत किंवा असतों, त्या सर्व गोष्टींच्या पलीकडील कांहीं गोष्ट आम्हाला सुचवावयाची आहे हें स्पष्ट व्हावें. सर्व ज्ञात, ज्ञेय गोष्टींना 'नाहीं नाहीं,' 'नेति नेति' म्हणून वगळण्याची पद्धति वरील अनस्तित्वाच्या कल्पनेच्या बाबतींत आम्हीं वापरली आहे. ही 'नेति नेति' पद्धति, अज्ञेय अननुभूत असें कांहीं व्यक्त करण्यासाठीं उपयोगात आणावी लागते. कांहीं दर्शनात ज्या शून्याचें मंडन सांपडतें, त्या शून्याचा बारकाईनें विचार केला तर आम्हाला दिसून येतें कीं, हें शून्य वस्तुत: ''सर्व,'' ''अनिर्वचनीय अनंत'' आहे. मनाला तें शून्य भासतें, याचें कारण मनाला सीमाबद्ध रचनाच फक्त समजतात. तेव्हां शून्य हें शून्य नसून त्याच्या उलट, एकच एक खरी सद्वस्तु आहे.*

सत्, असत् यांच्या संबंधानें विचार करण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. ''असत् पासून

सत् जन्मास आलें'' अशीं भाषा आपण वापरतो याचा अर्थ, ज्या वस्तू कालातीत कालनिरपेक्ष आहेत त्यांच्याविषयीं कालाची भाषा आपण वापरतों. 'असत्' नित्य शाश्वत स्वयंभू असतां त्याच्या इतिहासांत असा महान् दिवस येतो कीं, सत् (तसेंच शाश्वत् स्वयंभू) त्यापासून जन्म

-------------------------

*छांदोग्य उपनिषदांत म्हटलें आहे कीं, असत् पासून सत् चा जन्म होऊं शकत नाहीं. सत् चा जन्म सत् पासूनच होऊं शकतो. अर्थात् हें तैत्तिरीयांतील विधानाच्या बरोबर उलट विधान आहे. तथापि, असत् याचा अर्थ अभाव-सर्वाचा सर्वथा अभाव-असा न घेतां आपल्या अनुभवाच्या, आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेलें कांहींतरी 'क्ष' असा आपण घेऊं शकतो आणि हा अर्थ घेतला म्हणजे छांदोग्याच्या विधानांत जी अशक्यता प्रतिपादिली आहे ती प्रतिपादिण्याचा प्रसंग येत नाहीं. कारण हें 'क्ष' म्हणजे अद्वैताचें 'केवल ब्रह्म' असूं शकेल, त्याला बौद्धांचें 'शून्यहि' म्हणतां येईल, आणि हें 'क्ष' किंवा असत्, सत् चें जन्मस्थान होऊं शकेल; मग हें सत् तें स्वतःतून सृजनक्रियेनें किंवा आविष्करण क्रियेनें उभें करो, अथवा हें सत् कल्पनात्मक किंवा रूपात्मक मायेचा त्या असत् च्या आधारानें त्या आधारावर झालेला भ्रमोत्पादक व्यापार असो.

 

पान क्र. ५४

 

घेते ! आणि दुसरा असाच महान् भव्य दिवस येणार कीं, ज्या दिवशीं सर्व, मिथ्याभूत सर्व सत् (शाश्वत सत्) त्या शाश्वत शून्यांत विलीन होणार ! ही सर्व भाषा अर्थशून्य आहे. तेव्हां दोन्ही वस्तु आहेत असें म्हणावयाचें तर एकाच वेळीं दोन्ही आहेत असा अर्थ घेतला पाहिजे. या दोन वस्तु एकमेकींत मिसळत नाहींत पण एकमेकीला आधार देतात, एकमेकीला मान्यता देतात. कालाच्या भाषेंत बोलावयाचें तर दोन्ही शाश्वतकालीन आहेत; आणि यापैकीं एक शाश्वत सत् खरोखर नाहींच, आणि दुसरें शाश्वत असत् मात्र आहे, एकटें एक आहे, हें विधान शाश्वत सत् नें कसें मान्य करावें ! सर्वच्या सर्व अनुभव ''नाहीं'' या सदरांत घातला तर, सर्व अनुभवाचें समाधानकारक स्पष्टीकरण करणारें सत्य आम्हाला कसें सांपडणार?

तेव्हां सत् असत् यांसंबंधानें खोल विचार करतां पुढील निर्णय निघतो. शुद्ध सत् हें अज्ञेय परात्पराचें एक नांव आहे. असत् हें त्याचेंच दुसरें नांव आहे. विश्वाच्या सर्वच्या सर्व अस्तित्वाचा स्वयंभू पाया, आधार, अधिष्ठान या नात्यानें सत् हें नांव त्या परात्परानें घेतलें आहे. विश्वाच्या अस्तित्वाचा, विश्वाच्या कसल्याहि अस्तित्वाचा आधार म्हणा, बंधन म्हणा त्या परात्पराला नाहीं; तें तत्त्व सर्वथैव स्वतंत्र आहे. या दृष्टीनें त्याला असत् हें नांव दिलें जातें. वास्तव अस्तित्व व्यक्त करणारें कोणतेंहि भावात्मक नांव - जें विश्वांत व्यवहार करणाऱ्या जाणिवेला सुचूं शकेल तें - त्या परात्पराला देतां येत नाहीं, असा असत् या नांवाचा अर्थ आहे. विश्वांतील जाणिवेचा विषय होणारें अस्तित्व कितीहि तात्त्विक, कितीहि भेदातीत केवल स्वरूपाचें असो - तें अस्तित्व जेथें नाहीं तें, असा असत् या नावांतील भाव आहे. त्या अज्ञेय परात्पराला ''विश्वगत अस्तित्वापासून सर्वथैव स्वतंत्र'' म्हटलें आहे; त्यांत हा एवढा अर्थ भरलेला आहे. मात्र हें लक्षांत ठेवावें कीं, असत् या नांवानें असें सुचविलें जात नाहीं कीं, विश्वगत स्थूल, सूक्ष्म तात्त्विक केवल अस्तित्व, त्या परात्पराचें खरें आविष्करण नाहीं; तें नांव एवढेंच स्पष्ट करतें कीं, कोणतेंहि आविष्करण किंवा समुच्चयानें सर्व आविष्करण, त्या परात्पराला मर्यादित करीत नाहीं. तेव्हां हा निर्णय लागला कीं, असत् हें सत् ला तशीच अनुमति, मोकळीक देतें, जशी शांत सत् आपल्या प्रवृत्तिशील प्रकृतीला अनुमति, मोकळीक देतें. विरोधात्मक भासणारीं विधानें खरोखरी एकमेकांचीं पूरक विधानें असतात. सत् आणि असत् हीं पदें अशींच एकमेकांना

 

पान क्र. ५५

 

काट देणारीं नसून, एकमेकांचीं पूरक पदें आहेत. जो मानवात्मा जागृत झाला आहे त्याला एकाच वस्तूला एकाच वेळीं दिलेलीं (सत् आणि असत्) हीं दोन नांवें उपयोगी पडतात. आपला विज्ञानमय अंतरात्मा आणि त्याचे पलीकडे असणारें अज्ञेय तत्त्व, या दोन भिन्न गोष्टी नसून एकच सद्वस्तु - एकाच सद्वस्तूच्या दोन अवस्था - आहेत हा साक्षात्कार त्याला एकदम घडविण्यास हीं दोन नांवें कारणीभूत होतात. बुद्धानें निर्वाण प्राप्त करून घेऊन त्यानंतर विश्वांत अत्यंत प्रभावी कार्य केलें, याचें कारण त्याला वर सांगितलेला एकाच क्षणीं घडलेला दुहेरी साक्षात्कार होय. बुद्ध हा अंतर्यामी अत्यंत शांत त्रयस्थ वृत्तीचा असे, पण त्याच्या कार्यांत जगाला अत्यंत प्रभावी व्यक्तित्वाचा साक्षात्कार झाला. जगांत प्रभावी वैयक्तिक जीवन जगलेला व तितकेंच प्रभावी जागतिक कार्य करून गेलेला दुसरा महापुरुष विरळा.

ब्रह्मविषयक सत् असत् इत्यादि शब्दांचा जो ऊहापोह आतांपर्यंत केला आहे त्यावर विचार केला, तर हें लक्षांत येईल कीं, आपण जे शब्द वापरतों त्या शब्दांत स्वत:च्या योग्यतेबद्दल, खरेपणाबद्दल कितीहि अतिरेकी अहंभाव दिसला तरी त्यांत दुबळेपणाच पुष्कळ असतो, त्यांचा अहंभाव पुष्कळच मिथ्या असतो. त्याचप्रमाणें या शब्दांनीं कांहीं वस्तुभेद व्यक्त होत असला तरी तो वस्तुभेद पुष्कळसा भ्रामक व गोंधळ उत्पन्न करणाराच ठरतो. आम्ही विशिष्ट शब्दांच्या आहारीं जाऊन ब्रह्मावर ज्या मर्यादा घालीत असतों, त्याचें कारण वैयक्तिक मन, आपल्या अतिसंकुचित अनुभवाच्या आधारावर, अज्ञेय ब्रह्माच्या एखाद्या बाजूला आपल्या सर्व शक्तीनें उचलून धरतें आणि त्याच्या दुसऱ्या बाजू तुच्छ आहेत किंवा त्याला दुसऱ्या बाजू मुळीं नाहींतच असा आग्रह धरतें. त्या परात्पर केवल ब्रह्माविषयीं जें निश्चित किंवा अनुमानिक ज्ञान आपल्याला होतें त्याचा आपल्या विशिष्ट मर्यादित परिसराच्या भाषेंत अति कांटेकोरपणें अर्थ लावण्याकडे आपली प्रवृत्ति असते. याप्रमाणें, एकमेव अद्वितीय ब्रह्म एकच आहे, दुसरे म्हणून कांहीं नाहीं, त्यांत एकरसता आहे, त्याच्या पोटांत अनेकतेला वाव नाहीं, असें प्रतिपादन आम्हीं करतो तेव्हां, यांत आमचे वैयक्तिक एकांगी अनुभव आणि या अनुभवांवर आधारलेलीं आमचीं मतें, अहंभावानें आम्ही इतरांच्या तसल्याच एकांगी अनुभवापेक्षां आणि मतांपेक्षां वेगळी आहेत आणि निर्णायक आहेत, असें आवेशानें प्रतिपादीत असतो. अशी घाई करून मर्यादित अनुभवांवर भिस्त

 

पान क्र. ५६

 

ठेवून अहंतेनें सावेश एकांगी प्रतिपादन करण्यापेक्षां आपलें ज्ञान वाढावें, अनुभव वाढावा, बुद्धि वाढावी व सूक्ष्म व्हावी, यासाठीं वेळ देणें आणि अधिक ज्ञान व अनुभव मिळवून बुद्धि व्यापक व सूक्ष्म करणें अधिक शहाणपणाचें होईल. ब्रह्मासारख्या वस्तूचें मानवाच्या भाषेला यथार्थ वर्णन करतां येणें अशक्य आहे हें जाणून व आपल्याला पूर्णता मिळवावयाची तर या अवर्ण्य वस्तूंविषयी कांहीं भाषा करणें अवश्यच आहे, हें ओळखून आम्हीं प्रतिपादनाची भाषा शक्य तितकी व्यापक, लवचिक, सर्वसंग्रही ठेवावी आणि या व्यापक पायावर व्यापक व सर्वस्पर्शी सुसंवादाची उभारणी करावी, ही गोष्ट वर सांगितल्याप्रमाणें घाईघाईनें केलेल्या एकांगी प्रतिपादनापेक्षां अधिक समंजसपणाची होईल.

व्यक्तीच्या जाणिवेला खूप उंच चढतां येतें हें आम्ही वर मान्य केलें आहे. या जाणिवेला अशी अवस्था प्राप्त करून घेतां येतें कीं, जींत मर्यादित, सापेक्ष अस्तित्व समूळ विरून गेल्यासारखें भासतें, मुळींहि अनुभवास येत नाहीं; इतकेंच नव्हे तर शुद्ध अस्तित्व, ज्याला विशुद्ध आत्मा म्हणून आम्ही ओळखतो तो देखील असमाधानकारक कल्पना म्हणून विरून जातो. विशुद्ध आत्म्यालाच शांत आत्मा, ''सत्'' म्हणतात. या शांत आत्म्याच्या पलीकडे आणखी शांत अस्तित्व आहे, त्या शांत अस्तित्वाच्या - असत् च्या - अनुभवाची अवस्था वैयक्तिक जाणिवेला प्राप्त करून घेतां येते, ही गोष्ट आम्ही मान्य केली आहे. तथापि हा ''असत्'' चा अनुभव म्हणजे आमचा अंतिम सर्वच्या सर्व अनुभव किंवा हे शांत शांत ब्रह्म म्हणजे एकच एक सत्य वस्तु, बाकी सर्व वस्तु असत्य, या प्रतिपादनाला आम्ही मान्यता देतो असा याचा अर्थ नाहीं. कारण वस्तुस्थिति निराळी आहे. निर्वाण किंवा ''असत्'' मध्यें, शांत शांत ब्रह्मामध्यें आत्मा विलीन करणें, या क्रियेनें आत्म्याला अंतरींच्या अंतरीं निरतिशय शांति व स्वतंत्रता अनुभवास येते, हें जसें खरें आहे तसें हेंहि खरें आहे कीं, त्या आत्म्याला बाह्य संसारांत प्रभावी, परिणामकारक कार्य निर्हेतुकतेनें व निस्पृहतेनें करावयास ही अंतरींची गाढ शांति उपकारक होते. हा स्थूल, भौतिक जन्म दुख:मय - क्लेशमय आहे, त्यांतून कायमची सुटका करून घ्यावी अशी बुद्धाची निर्वाणाची शिकवण आहे असें जें मानण्यांत येतें, तें बरोबर नाहीं; इतकें क्षुद्र ध्येय त्याच्या शिकवणीनें आमच्या समोर ठेवलेलें नाहीं असें आम्ही मानतों. त्याच्या शिकवणीचें सार आम्हाला असें दिसतें कीं, आत्म्यानें प्राकृतिक अहंच्या पाशांतून स्वतःस मोकळें करावें; या अहं-

 

पान क्र. ५७

 

करितां, आत्मा जी कर्मांची शृंखला निर्माण करतो ती त्यानें निर्माण करूं नये; बदलणाऱ्या, रूपांतर पावणाऱ्या देह, मन इत्यादि नश्वर वस्तूंशीं तादात्म्य पावून, एकरूप होऊन वागणें त्यानें (आत्म्यानें) सोडून द्यावें; अंतरींच्या शांत शांत ब्रह्माशीं एकरूप व्हावें, तेथील आत्यंतिक निश्चलपूर्ण व्यक्तिशून्यता व पूर्ण शांति आपलीशी करावी आणि या भक्कम पायावर उभे राहून बाह्य संसारांत निरपेक्ष प्रेम, निरुपाधिक सत्य, निर्दोष साधुभाव या सनातन सत्प्रेरणांनीं आदेशिलेलीं कार्यें, आपलें सर्व सामर्थ्य ओतून करावीं. बुद्धाच्या शिकवणीसबंधींची आमची कल्पना खरी असो किंवा नसो, ही गोष्ट निश्चित आहे कीं, पूर्णतासंपन्न मनुष्य क्रियाशीलता आणि शांति, ''सत्,'' आपल्या ठिकाणीं एकत्र नांदवतो, त्याप्रमाणें पूर्ण जागृत जाणिवेचा आत्मा ''असत्'' चे निरतिशय स्वातंत्र्य मिळवूनहि ''सत्'' आणि विश्व यांजवरची आपली पक्कड सोडत नाहीं. ब्रह्म विश्वांत आहे, विश्वाच्या अनेकतेपलीकडे त्याचा पाया म्हणून आहे, आणि त्या पायापलीकडे विश्वनिरपेक्ष विश्वाधारनिरपेक्ष असेंहि त्याचें स्वरूप आहे. (अनुक्रमें सर्वगत ब्रह्म, सद्ब्रह्म, असद्ब्रह्म अशीं या तीन स्वरूपांचीं नावें आहेत). हा ब्रह्माचा, ब्रह्मजीवनाचा सनातन चमत्कार पूर्ण जागृत जाणिवेच्या आत्म्याच्या जीवनामध्येंहि नित्यशः प्रतिबिंबित होईल. अशा आत्म्याचें वैयक्तिक मन, सामान्य जाणिवेच्या अवस्थेंत, सर्व लक्ष लावून ''असत्'' चें ध्यान करूं लागलें म्हणजे त्याला पूर्ण जागृत मनाच्या उलट अनुभव येतो. त्या ध्यानानें ती व्यक्ति आत्मविस्मृतींत बुडून जाते, आणि विश्वकार्यांतून निवृत्त होते; पण हें विश्वकार्य शाश्वत ब्रह्माच्या जाणिवेंत सदैव चालूच असतें, ती व्यक्ति निवृत्त झाली असतांहि चालूंच असतें.

याप्रमाणें विश्वचैतन्यांत शुद्ध चैतन्य आणि जडतत्त्व यांचा समन्वय आपण साधला. नंतर विश्वातीत चैतन्यांत ''सर्व आहे'' आणि ''सर्व नाहीं'' या विधानांचा समन्वय कसा होतो हें आपण पाहिलें. तें अज्ञेय विश्वातीत ब्रह्मचैतन्य अमुक अवस्थेंत आहे, अमुक क्रिया करीत आहे, अशा अर्थाची ब्रह्मविषयक सर्व भावात्मक विधानें असतात, आणि ब्रह्माविषयींच्या त्याच गोष्टीसंबंधाच्या अभावात्मक विधानांचा अर्थ असा असतो कीं, त्या अमुक अवस्थेंत असतांना, ती अमुक क्रिया करतांना ब्रह्म पूर्णपणें स्वतंत्र व अलिप्त आहे; ती अमुक अवस्था, ती अमुक क्रिया, ब्रह्माला आवश्यक आहे असेहि मुळींच नाहीं. थोडक्यांत, तें ब्रह्म ''सर्व आहे'' आणि ''सर्व नाहीं'' हें आपण समजून घेतलें. तें आम्हाला सर्वथा

 

पान क्र. ५८

 

अज्ञेय, परात्पर, आश्चर्यमय, अवर्णनीय असें तत्त्व असून आमच्या जाणिवेला अविश्रांतपणें सारखे धक्के देत राहतें. आमच्या जाणिवेसमोर तें ब्रह्म एकामागून एक अनंत रूपें घेतें आणि टाकतें. त्याची ओळख करून घेण्यासाठीं आमची जाणीव सारखी धडपडत राहते. ब्रह्म तिला ही धडपड करावयास लावतें. अर्थात् एखाद्या लहरी जादुगाराची किंवा मत्सरी हीन देवतेची भूमिका कांहीं ब्रह्म घेत नाहीं. एक मिथ्या गोष्ट आम्हापुढें उभी करावी, ती नाहींशी करून तिजपेक्षां अधिक मिथ्या असणारी गोष्ट तिच्या जागीं आम्हासमोर ठेवावी, आणि असें करीत करीत सर्व कांहीं मिथ्या आहे, असें आम्हाला पटवून, आम्हाला संसाराचा वीट आणावा, हा कांहीं ब्रह्माचा उद्योग चाललेला नाहीं. हळू हळू अधिकाधिक ज्ञान देण्याचा कार्यक्रम ज्ञानी आंखतो त्याप्रमाणें ब्रह्मानें आमच्यासाठीं कार्यक्रम आंखलेला आहे. आम्हाला तें आपलीं सत्य रूपें, एकाहून एक अधिक सत्य अशीं रूपें क्रमानें दाखवीत जातें व अखेरीस आम्हाला आकलन होणें अशक्य नाहीं अशी सर्वांत मोठी व सर्वांत गंभीर मूर्ति, सत्याची मूर्ति, आपल्या स्वत:ची मूर्ति तें आम्हाला दाखवितें. ब्रह्म हें सर्वत्र सर्वदा वावरणारें सत्य आहे, सद्वस्तु आहे, तें सतत होणाऱ्या आभासाचें सर्वव्यापी अधिष्ठान किंवा सर्वगामी कारण नव्हे.

विश्वव्यापारांत आणि मनोव्यापारांत सुसंवाद, सुमेळ नांदावा यासाठीं ब्रह्मासंबंधाची वर सांगितल्याप्रमाणें फोड करून सुसंवादाला अवश्य असा भावात्मक आधार व पाया निर्माण केला गेला आहे. अशा भावात्मक आधारावांचून, पायावांचून आम्हाला इष्ट असलेला सुसंवाद लाभणें शक्य नाहीं हा आधार आम्ही मान्य केला म्हणजे अज्ञेय ब्रह्मासंबंधानें आमच्या मनानें जे सिद्धांत बसविले आहेत त्यांपैकीं प्रत्येक सिद्धांत मनाला, अग्राह्य अशा सत्यासंबंधानें कांहीं सांगत आहे, हें लक्षांत वागवून आम्हीं त्या सिद्धांतांची व्यवस्था लावली पाहिजे; या सिद्धांताचा अर्थ लावतांना शक्यतों त्यांचा अन्योन्यसंबंध नेहमीं लक्षांत ठेवला पाहिजे, शक्यतों त्यांचा जीवनावर होणारा संभाव्य परिणाम लक्षांत घेतला पाहिजे, केवळ एकेकटा सिद्धांत घेऊन त्याचा स्वतंत्रपणें, लागेल तो अर्थ लावतां कामा नये. कोणताहि सिद्धांत दुसऱ्या कोणत्याहि सिद्धांताला खोटें ठरवील, बहिष्कृत करील किंवा अगदींच गौण स्थान देईल, असा कोणत्याहि सिद्धांताचा अर्थ लावता कामा नये. खरें अद्वैत तें, जें सर्व वस्तू एक ब्रह्मच आहे (झालें आहे) हें मान्य करतें; त्या ब्रह्माचे दोन सारखे तुकडे करून

 

पान क्र. ५९

 

त्याच्या अस्तित्वांत बरोबर मध्यभागीं एक विभागणारी रेषा काढून, एका वस्तूंतून दोन अन्योन्य विसंवादी वस्तू निर्माण करूं पाहणें हें खऱ्या अद्वैताचें काम नव्हे : या दोन विसंवादी वस्तू शाश्वत सत्य व शाश्वत भ्रम, ब्रह्म आणि अब्रह्म, आत्मा आणि अनात्मा, खरा आत्मा आणि खोटी पण शाश्वत माया, अशा नांवानें ओळखल्या जातात. या वस्तू खरे अद्वैत ओळखीत नाहींत. ब्रह्म एकच जर आहे, आत्मा एकच जर आहे, तर सर्व जें कांहीं आहे तें आत्मा आहे, ब्रह्म आहे हें ओघानेंच येतें, आणि आत्मा म्हणा, ईश्वर म्हणा, ब्रह्म म्हणा, जर असहाय अवस्था, मर्यादित शक्ति किंवा सीमाबद्ध व्यक्ति अशापैकीं कांहीं नसून स्वत:ची पूर्ण जाणीव असलेलें सर्व (सर्वात्मक एक) आहे, तर त्या अव्यक्तानें हें व्यक्त विश्वाचें जें रूप धारण केलें आहे, तें धारण करण्यांत त्याचा कांहींतरी अंतरींचा चांगला हेतु असला पाहिजे, असें मानावें लागतें. हा हेतु काय असावा याचा बरोबर शोध लागण्यासाठीं, आम्हाला ही गोष्ट तात्पुरती तरी गृहीत धरून चालावयास हवी कीं, जें जें व्यक्त झालेलें आहे त्यांत सर्वत्र कांहींतरी गुप्त सामर्थ्य, कांहींतरी गूढ समंजसपणा, कांहींतरी खरे अस्तित्व, ब्रह्माचें अस्तित्व नांदत आहे. जगांत उघड दिसणारा जो बेबनाव, उघड दिसणारें जें अमंगल आहे, तें त्या त्या क्षेत्रांत आहे हें मान्य करूनहि आम्हाला हें तत्त्वत: मान्य करतां येणार नाहीं कीं, आम्हाला आमच्यातील बेबनाव व अमंगलता नेहमींच सतावीत राहतील, आमच्यावर त्यांची सत्ता नेहमींच अबाधित राहील. मानवाच्या मनांत अगदीं खोल अशी सहजभावना आहे कीं, विश्वाची उभारणी ही शाश्वत भ्रमाची, शाश्वत विडंबनाची उभारणी नव्हे; सर्वसृष्टिसमर्थ, अजिंक्य अशा अमंगलानें ही उभारणी केलेली नाहीं, तर या उभारणीच्या मुळाशीं पूर्ण प्रज्ञा आहे, गूढ व अंतत: विजयी होणारें मंगल आहे; आणि ही विश्वाची उभारणी करून त्यांत भ्रमंती करणारा महान् साहसी आत्मा, आपले महान् साहस चुकीचें झालें असे म्हणून निराश होऊन त्यापासून निवृत्त होणारा नाहीं, तर येथील सर्व आभासमय अमंगलावर, बेबनावावर शेवटीं विजय मिळवून कृतार्थ होणारा आहे - या भावनेनें प्रेरित होऊन विश्वव्यवस्थेमागें असलेली पूर्णप्रज्ञा पाहून नेहमीं मंगलाचा अंतिम विजय साधण्याचा यत्न करणें हेंच खरें शहाणपण आहे.

विश्वाचें मूळ कारण एकमेव सत्ता, एकच एक आत्मा आहे असें मान्य केल्यानंतर आम्हां मानवांना ही कल्पनाच करतां येत नाहीं कीं, या अद्वितीय आत्म्याला दुसऱ्या कोणाकडून, दुसऱ्या कशाकडून, ''बाहेरून''

 

पान क्र. ६०

 

कसलीहि सक्ती होत असेल; कारण या आत्म्याला ''बाहेर'' असें कांहीं नाहींच, कोणी नाहींच. या आत्म्याच्या बाहेर कांहीं नाहीं, हें मान्य करून कोणी असें म्हणेल कीं त्याचा जो एक अंश त्याच्या सगळ्या अस्तित्वाचा विरोधी आहे, त्या अंशाचें हा आत्मा नाखुषीनें ऐकतो; याचें सगळें अस्तित्व त्या अंशाला बहिष्कारीत असतें. परंतु तो अंश हा बहिष्कार पचवून सगळ्या अस्तित्वावर कुरघोडी करण्याइतका समर्थ असतो. पण ही अंशाची कल्पना, वेगळ्या शब्दांत वरचीच ''बाहेरून'' सक्ती होत असल्याची कल्पना आहे. ''सर्व'' आणि त्यावर सक्ती करणारें ''सर्वाच्या बाहेरचें कांहीं तरी'', असा हा अर्थशून्य विरोध आहे. विश्वाच्या अस्तित्वाचें कारण, आत्म्यावर झालेली किंवा होणारी ''बाहेरच्या'' किंवा ''आंतल्या'' कोणाची तरी, कशाची तरी सक्ती, ही कल्पना अर्थशून्य म्हणून टाकून दिल्यानंतर, आणखी एका कल्पनेचा विचार करणें प्राप्त आहे. आत्मा अगदीं तटस्थ आहे, कोणत्याहि गोष्टी घडोत, त्या घडूं देण्याची त्याची वृत्ति आहे, घडणाऱ्या व घडूं शकणाऱ्या घटना सारख्याच तटस्थ दृष्टीनें तो बघत असतो. आत्मा असा तटस्थ आहे म्हणूनच केवळ विश्व अस्तित्वांत येतें, अस्तित्वांत राहतें, अशी ही दुसरी कल्पना आहे. पण येथें असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, विश्व अस्तित्वांत येण्यास व अस्तित्वांत राहण्यास कोणाची तरी इच्छाशक्ति मूळ कारण म्हणून व आधार म्हणून आवश्यक आहे. मग ही इच्छाशक्ति कोणाची ? ''सर्व'' म्हणून जें एक तत्त्व, सर्वात्मक एकतत्त्व, आत्मा आहे त्यावांचून दुसऱ्या कोणाची ही इच्छाशक्ति असूं शके? कोणाचीहि असूं शकणार नाहीं. तेव्हां आत्मा तटस्थ असो, नसो; त्याच्या इच्छेनें विश्व होतें आणि राहतें, ही गोष्ट मानल्यावांचून गत्यंतर नाहीं. हा आत्मा, ब्रह्म, अविभाज्य आहे. विभक्त भासणाऱ्या सर्व वस्तूंत तें ब्रह्म अविभक्तपणें राहतें. कोणाच्याहि इच्छेनें या विश्वांत कांहींहि घडो, त्या घटनेच्या मुळाशीं अंतिम इच्छा ब्रह्माचीच असते. आमच्या मर्यादित, सीमासापेक्ष, अंशदर्शी जाणिवेला या विश्वांत अमंगल, अज्ञान, असुख अशा घटना प्रतीत होतात आणि या गोष्टींनीं घाबरून व हतबुद्ध होऊन, या उद्वेगजनक गोष्टी निर्माण करणारें तत्त्व ब्रह्माहून वेगळें कांहींतरी आहे अशी कल्पना, ही जाणीव करते, 'माया', 'मार', 'सैतान', 'स्वयंभू अमंगल तत्त्व' अशीं नांवे त्या तत्त्वाला देते; आमच्या मर्यादित जाणिवेकडून हा सर्व खटाटोप ब्रह्माला या जबाबदारींतून मोकळें करण्यासाठीं होत असतो. वस्तुत: ब्रह्म हेंच एक विश्वाचा आत्मा

 

पान क्र. ६१

 

आहे. ज्यांनीं विश्व बनते त्या सर्व वस्तू व घटना ब्रह्माची स्वयंकृत प्रतीकें आहेत; ब्रह्माचे ते विकार आहेत. (घट हा मातीचा विकार असतो त्याप्रमाणें) मात्र हे स्वयंनिर्मित विकार आहेत.

विश्व हें स्वप्न आहे, आभास आहे, भ्रम आहे, प्रमाद आहे असें म्हणण्यांत येतें. विश्व हें स्वप्न म्हटलें तर तें सर्वच्या सर्व स्वप्न आत्म्यानें, ब्रह्मानें आपल्या इच्छाशक्तीनें निर्मिलें आहे, त्याच्या आधारानें तें चाललें आहे आणि शाश्वत चालणार आहे; तें सत्याच्या, सद्रूपाच्या पोटांत चाललेलें आहे. ब्रह्म एकच एक असल्यानें विश्वाचा पायाहि तेंच आणि त्याला सामावून घेणारें ''आकाशहि'' तेंच. भांडें सोन्याचें हें मान्य केल्यावर, सोनें तेवढें खरें आणि भांडें खोटें आभासात्मक, मृगजलासारखें, ही कल्पना कशी करावी ! तेव्हां स्वप्न, आभास हे शब्द म्हणजे, आमच्या मर्यादित जाणिवेला संवयीच्या झालेल्या शाब्दिक कोट्या आहेत; या शब्दांत कांहीं थोर सत्यहि व्यक्त झालेलें आहे. तथापि तें विकृत, अवास्तव स्वरूपांत व्यक्त झालेलें आहे. आपण पाहिलें आहे कीं, असत् हें खरोखरी अस्तित्वाचा अभाव नसून त्या अभावावेगळा कांहीं भाव, भावात्मक वस्तु आहे; त्याप्रमाणें विश्वस्वप्नाची गोष्ट आहे. विश्वस्वप्न हें मनानें निर्माण केलेला आभास नव्हे, भ्रम नव्हे. विश्व ज्या घटनांचें बनतें, त्या घटना आभासात्मक नाहींत, त्या घटना, सत्याचीं सत्य-द्रव्यघटित रूपें आहेत.

सत्य, सद्वस्तु ब्रह्म सर्वव्यापी आहे ही आपली पायाभूत अनुभवाधिष्ठित कल्पना आहे. असत् एका टोंकाला, विश्व दुसऱ्या टोंकाला, या ब्रह्माच्या दोन अवस्था आहेत, नाण्याच्या जणुं दोन बाजू आहेत. असत् किंवा विश्व दोन्ही वस्तू अभावात्मक, आभासात्मक नाहींत, ब्रह्माच्या, सत्याच्या त्या दोन सत्य अवस्था आहेत. विश्वांत ब्रह्माचा जो सर्वांत श्रेष्ठ अनुभव येतो, त्यांत ब्रह्म हें केवळ, पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्वच नव्हे, तर सर्वोत्तम बोधशक्ति आणि क्रियाशक्ति, तसेंच स्वयंभू आनंद पण आहे अशी प्रतीति येते. विश्वाच्या पलीकडे ब्रह्माचें जें असत् रूप आहे तें अज्ञेय असें विश्वावेगळें अस्तित्व असून तेंहि सर्वोच्च सर्वशब्दातीत आनंदानें भरलेलें आहे. अशी वस्तुस्थिति असल्यानें, आम्ही असें तर्कशुद्ध अनुमान काढू शकतो कीं, विश्वांत जीं सुख-दुःख, मंगल-अमंगल, ज्ञान-अज्ञान आदि द्वंद्वें दिसतात, तीं आमच्या मर्यादित इंद्रियांच्या व मर्यादित मनाच्या संवेदनांनीं व कल्पनांनीं प्रतीत होतात; आमची बोधशक्ति,

 

पान क्र. ६२

 

आमची अनुभवशक्ति सध्यांच्या मर्यादा ओलांडून पूर्णपणें बंधनांच्या बाहेर पडली म्हणजे हीं द्वंद्वें आम्हाला दिसणार नाहींत, तर त्यांच्या जागीं पूर्ण ज्ञान, पूर्ण सुख आदि ब्रह्माचे अनुभवच आमच्या वांट्यास येतील. आज आम्ही द्वंद्वांच्या माऱ्यांत, त्यांच्या दडपणाखाली आहोंत, पण आजच्या द्वद्वांचें मुक्त स्थितींत होणारें स्वरूपांतर आमच्या अनुभवास येईल, ही आजची आमची कल्पना श्रद्धेच्या जोरावरच आम्हीं टिकवूं शकतों. ही श्रद्धा अयुक्त आहे असें आमची सूक्ष्मतम उच्चतम बुद्धि, आमचा अतिशांत आणि अतिव्यापक विचार सांगत नाहीं; उलट या श्रद्धेला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. पूर्णतेच्या दिशेनें चाललेला प्रवास करतांना भक्कम आधार असावा म्हणून ही सुविवेक-संमत श्रद्धा मानवतेला दिलेली आहे. मानवता विकासक्रमानें अशा अवस्थेला येणारच आहे कीं, जेव्हां ही श्रद्धा ज्ञानाचें आणि पूर्ण स्वानुभूतीचें रूप घेईल, आणि पूर्ण प्रज्ञा (ब्रह्म) जें विश्वकार्य चालवीत आहे, तें उत्कृष्ट रीतीनें चालवीत आहे असा निर्णय मानवता स्वयंस्फूर्तीनें देईल.

 

पान क्र. ६३

 

प्रकरण पाचवें

 

व्यक्तीची नियति

 

      अविद्येच्या आश्रयानें तें मृत्यु तरून पलीकडे जातात आणि विदयेच्या आश्रयानें ते अमृतत्वाचा आनंद भोगतात. जन्माच्या नाशाच्या आश्रयानें तें मृत्यु तरून पलीकडे जातात आणि जन्माच्या आश्रयानें ते अमृतत्वाचा उपभोग घेतात.

- ईशोपनिषद्, श्लोक ११ व १४

 

      अस्तित्व आणि जीवन अमर्याद असो, स-मर्याद असो, शारीर असो, अ-शारीर असो, जड असो, अ-जड असो, बुद्धियुक्त असो, निर्बुद्ध असो या सर्व प्रकारच्या अस्तित्वाचें व जीवनाचें सारतत्त्व, निःसंदेह सत्य, सर्वव्यापी सद्वस्तु, ब्रह्म हें आहे. ही सद्वस्तु एक आहे; या एकाची एकता अनेकांची बेरीज नव्हे, अनेकांचें संमेलन नव्हे. या सद्वस्तूनें स्वत: घेतलेली रूपें अनंत प्रकारें भिन्न भिन्न आहेत, कांहीं तर नेहमींच एकमेकांचा विरोध करणारीं आहेत; या अन्योन्यविरोधी रूपांपैकीं कांहीं आमच्या सामान्य अनुभवाच्या कक्षेंतली, अगदीं आमच्या जवळच आहेत; कांहीं आमच्या अनुभवाच्या कक्षेपासून फार दूर, व जवळ जवळ अवर्णनीय, शब्दातीत अशा प्रकारचीं आहेत. पण या सर्व रूपांत सद्वस्तु शुद्ध निर्भेळ एकतेनें नांदत आहे. ही जी शुद्ध एकतेची एक सद्वस्तु ब्रह्म, ती सर्व भेदांचें मूळ आहे, त्यांचा आधार आहे, त्यांचें पुन: परत एक होण्याचें स्थान आहे. या ब्रह्माविषयीं एक विधान अस्ति-अर्थी व दुसरे नास्ति-अर्थी, अशी एकमेकांना कांट देणारीं विधानें करण्यांत येतात. या अन्योन्य-निषेधक विधानांनीं क्रमश: अस्तिपक्षाचा विस्तार करण्यांत येत असतो. सर्व अन्योन्य विरोधी विधानांच्या जोड्या ब्रह्माची खरी ओळख करून देण्यासाठीं असतात. त्यांचा विरोध आभासात्मक असून ब्रह्मांत त्यांचें एकत्व स्वयंसिद्ध असतें. ब्रह्माविषयीं अतिव्यापक अस्तिपक्षी विधान

 

पान क्र. ६४

 

मांडण्याच्या हेतूनें अस्ति-नास्ति करणाऱ्या विधानांची सर्व मांडामांड करण्यांत येत असते. ब्रह्मन् हेंच ',' ब्रह्मन् हेंच ' ज्ञ,' ' ' ते 'ज्ञ' पर्यंत सर्व ब्रह्मांड ब्रह्मच आहे. ब्रह्म ही एकच एक वस्तु अस्तिपक्षी आहे. ब्रह्माखेरीज ब्रह्माच्या जोडीला दुसरें अस्तित्व कांहींहि नाहीं.

ब्रह्माची एकता अमुक प्रकारची म्हणून कोणत्याहि भाषेनें सांगण्यासारखी नाहीं. या एकतेचें स्वाभाविक स्वरूप व्याख्यातीत आहे. मनानें या एकाचें स्वरूप पाहण्याचा, दर्शन घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हां अनंत कल्पना, अनंत अनुभव यांची मालिका आम्हाला उभी करावी लागते. ही मालिकाहि त्याची साक्षात् कल्पना आम्हाला देऊं शकत नाहीं. आमच्या ज्या कल्पना, ज्या अनुभूती, मोठ्यांत मोठ्या, व्यापकांत व्यापक, असतील त्यांना नकार देऊनच शेवटीं आम्ही या सद्वस्तूचें स्वरूप ''अलक्षणम्'' - लक्षण करतां येत नाहीं, व्याख्या करतां येत नाहीं असें - आहे असें म्हणतो, ''नेति नेति'' - ''हें नव्हे, तें नव्हे'' हेंच सूत्र भारतीय ऋषींनीं त्या एकमेव ब्रह्माचें ''वर्णन'' म्हणून अखेर निश्चित केलें. कोणतीहि अनुभूति त्या ब्रह्माला आपल्या कक्षेंत आणूं शकत नाहीं, कोणतीहि कल्पना त्याची व्याख्या करूं शकत नाहीं.

तें ब्रह्म आम्ही स्वत: आहों. आमच्या इंद्रियांना जें कांहीं गोचर आहे, आमच्या विचारशील मनापुढें जें कांहीं येऊं शकतें त्या सर्व वस्तूंत जें एकमेव अस्तित्व (ब्रह्म) आम्हाला दिसत असतें, त्याविषयीं आमचें मन अधिकांत अधिक एवढेंच सांगूं शकतें कीं, तें अज्ञेय आहे. अस्तित्वाच्या अनेक अवस्था, अस्तित्वाचे अनेक धर्म, जाणिवेचे अनेक आकारप्रकार, कार्यशक्तीचे अनेक क्रियाकलाप यांच्या द्वारां तें आम्हाला अप्रत्यक्ष दर्शन देतें. त्या अज्ञेयाचें ज्ञान करून घ्यावयाचें, त्याच्या जवळ जावयाचें, तर त्याच्या अस्तित्वाचे, जाणिवेचे, शक्तीचे, आमच्या अनुभवास येणारे नाना आकार-प्रकार न्याहाळून, त्या आकारप्रकारांतील जीवन अनुभवून आणि त्यांच्या द्वारां हळू हळू पुढें प्रवास करीत राहून, आम्हाला त्याचें ज्ञान व त्याचें स्थान जवळ करणें शक्य आहे. परंतु ती सद्वस्तु आमच्या मनाला समजण्यासारखी, ग्रहण करण्यासारखी आणि जवळ नेहमीं टिकवून धरण्यासारखी आहे अशी कल्पना करून ती लवकर सांपडावी म्हणून जर आम्ही घाई केली, जी अनंत आहे, अमर्याद आहे ती सद्वस्तु आमच्या मनाच्या कवेंत धरण्याचा आग्रह जर आम्ही धरला आणि यासाठीं अस्तित्वाच्या कोणत्याहि विशिष्ट, स्पष्ट, मर्यादांच्या,

 

पान क्र. ६५

 

लक्षणांच्या अवस्थेशीं - मग ही अवस्था किती कां शुद्ध आणि शाश्वत असेना - त्या सद्वस्तूचें तादात्म्य कल्पून ती अवस्था म्हणजे एकच एक सद्वस्तु असें मानलें तर तें बरोबर होणार नाहीं; त्याचप्रमाणें अगदीं सर्वसमावेशक व व्यापक असलेला असा एखादा अस्तित्वाचा धर्म अथवा गुण, अगदीं अफाट क्षेत्र व्यापणारें असें जाणिवेचें एखादें निश्चित साकार रूप, अगदीं अमर्याद व्याप असलेला असा शक्तीचा किंवा क्रियेचा एखादा प्रकार, -- या वस्तूंपैकीं कोणत्याहि वस्तूला सद्वस्तु मानणें बरोबर होणार नाहीं -- या सगळ्या वस्तू एकत्र केल्या तरी ती सद्वस्तु होत नाहीं. कारण अस्तित्वाची एखादी विशिष्ट अवस्था व वरील तीन वस्तू मिळूनहि सद्वस्तूचा केवळ अंश आहेत - सगळी सद्वस्तु नव्हे. ती ''अज्ञेय'' आहे. मन आपल्या सोयीसाठीं अंशाशीं पूर्णाचें तादात्म्य कल्पितें. एक अंश घेऊन बाकीच्या अंशांवर बहिष्कार घालतें आणि सद्वस्तु सांपडली असें मानते. पण हें मनाचें करणें म्हणजे, सद्वस्तूच्या ''अज्ञेयत्व'' या स्वभावाविरुद्ध जाऊन तिला ''ज्ञेयांत'' जमा करण्यासारखें आहे, अशानें खरी सद्वस्तु मनाला सांपडत नाहीं; जी वस्तु अविभाज्य आहे, तिचें विभजन मात्र मनाकडून घडतें.

ही सद्वस्तूच्या अज्ञेयत्वाची, मनाच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे असण्याची वस्तुस्थिति, प्राचीनकाळीं, विचारवंतांना इतकी स्पष्टपणें व पक्केपणें पटली होती कीं, वेदांती ऋषींना जेव्हां ''सच्चिदानंद'' ही सर्वश्रेष्ठ कल्पना आली, त्या सच्चिदानंदाचा निःसंदेह साक्षात्कार झाला, मानवाच्या जाणिवेला घडणारें सद्वस्तूचें सर्वश्रेष्ठ दर्शन, त्या जाणिवेला प्रतीत होणारें सद्वस्तूचें सर्वश्रेष्ठ भावात्मक आविष्करण म्हणजे सच्चिदानंद, ही गोष्ट जेव्हां त्यांना अनुभवास आली, तेव्हां त्या ठिकाणीं तें थांबले नाहींत; त्यांनीं आपली चिकित्सा पुढें चालवली, त्यांनीं आपल्या अनुभवांत आणखी भर घालण्याचा क्रम चालू ठेवला आणि या रीतीनें शुद्ध अस्तित्वापलीकडे असणारें ''असत्,'' त्यांनीं आपल्या कल्पनेच्या आणि अनुभवाच्या कक्षेंत आणून सोडलें. आमचे मानवी अनुभव सर्वच्या सर्व निरपवादपणें ज्या एका अंतिम शुद्ध अस्तित्वाचे, जाणिवेचे, अनंत आनंदाचे आविष्कार - ''विकृत'' विकार म्हणा - आहेत त्या शुद्ध वस्तूहून हें ''असत्'' अगदीं वेगळें आणि तिच्याहून वरच्या दर्जाचें आहे, असा अनुभव त्या ऋषींना आला. तें अस्तित्व जाणीवरूप, आनंदरूप आहे असें मानावयाचें असेल तर आम्हाला या विश्वांत जे श्रेष्ठांत श्रेष्ठ, शुद्धांत शुद्ध अस्तित्व, जाणीव व आनंद अनुभवावयास मिळतो त्याच्यापेक्षां श्रेष्ठ आणि शुद्ध अशा

 

पान क्र. ६६

 

आनंदादि तीन वस्तू त्या असत् मध्यें समाविष्ट आहेत आणि म्हणून या विश्वांत या तीन नावांनीं ज्या वस्तू ओळखल्या जातात त्याहून अगदीं वेगळ्या, ''असत्'' मध्यें समाविष्ट असलेल्या त्या वस्तु आहेत, असें मानणें प्राप्त आहे. ही असत् ची कल्पना तत्त्वत: वेदांतांतील असून बुद्धप्रणीत धर्मानें ती घेतलेली आहे. या धर्माला अवैदिक धर्म असें धर्मशास्त्रकार म्हणतात हे थोडेंसें न्यायविसंगत आहे. कारण वेदांचें प्रामाण्य बुद्धप्रणीत धर्मानें अमान्य केलें असलें तरी, आतांच सांगितल्याप्रमाणें वेदांती ''असत्'' त्यानें मान्य केलें आहे. मात्र वेदांतांत, उपनिषदांत, जी शिकवण आहे ती अस्तिप्रधान व समन्वयात्मक शिकवण आहे; आणि म्ह्णून, सत् आणि असत् यांना वेदांत वस्तुत: अन्योन्य विरोधी, अन्योन्य निषेधक मानीत नसून, अज्ञेयाची ओळख नीट पटण्यासाठीं उभी केलेली, विरोधी भासणाऱ्या कल्पनांची, परंतु वस्तुत: एकमेकींना पूरक असणाऱ्या कल्पनांची शेवटली जोडी, या दृष्टीनें तो सत् आणि असत् यांचा उपयोग करतो. याप्रमाणें सत् आणि असत् एकाच अज्ञेयाची, एकाच क्षणींच्या दोन अवस्था दाखविणारीं नावें आहेत. सत्-असत् यांच्या समन्वयाप्रमाणें एक आणि अनेक यांचाहि समन्वय स्वयंसिद्ध आहे. ब्रह्म एक आहे आणि ब्रह्म सर्व (अनेक) आहे. म्हणून आमच्या भावात्मक जाणिवेच्या विधायक व्यवहारांत एक आणि अनेक यांचे चांगलें पटावें लागतें. एकाला अनेकाची व अनेकाला एकाची दखल घेणें, मानवाच्या पूर्णतेच्या दृष्टीनें आवश्यक असतें. एकाचें एकतेचें ज्ञान म्हणजे विद्या. विद्येनें ईश्वराची ओळख होते. 'विद्या' नाहीं, आणि नुसती 'अविद्या', म्हणजे मर्यादित अनेकदर्शी जाणीव आहे, असे असेल तर ही 'अविद्या' अंधारानें भरलेली रात्र, अज्ञानाचा व्यवस्थाशून्य पसारा असल्याचें प्रत्ययास येईल. परंतु उलटपक्षीं 'अविद्येचें,' अज्ञानाचें क्षेत्र आपण धिक्कारलें, 'अविद्या' ही वस्तु नाहींच, असली तर केवळ भ्रमरूप आहे असें म्हणून तिला बाजूला ढकलून दिले, आणि 'विद्या' मात्र जवळ केली तर, ती 'विद्या' एक प्रकारचा अंधारच होऊन बसेल, तिच्यामुळें मानव अपूर्ण होईल, मानवाची अपूर्णता दृढ होईल. 'विद्या' हा प्रकाश खरा, पण प्रकाशातिशयानें माणसें आंधळी - आंधळ्यासारखी - होतात, त्याप्रमाणें नुसत्या विद्येनें आपण आंधळे होऊं. ज्या क्षेत्रावर आम्हाला रहावयाचें आहे, काम करावयाचें आहे, तें क्षेत्र विद्येनें प्रकाशित केलेलें असून विद्येच्या प्रकाशातिशयांत आम्हाला दिसूं शकणार नाहीं.

 

पान क्र. ६७

 

आमच्या अतिप्राचीन ऋषींची शिकवण याप्रमाणें शांत हृदयानें दिलेली, शहाणपणानें भरलेली व नि:संदिग्ध अशी आहे. त्यांच्यामध्यें सत्य शोधून काढण्यासाठीं, ज्ञान मिळविण्यासाठीं लागणारी चिकाटी होती, शक्ति होती; आमच्या मानवी ज्ञानाला, ज्ञानशक्तीला मर्यादा आहेत हे मान्य करण्यासाठीं लागणारी बुद्धीची स्वच्छता व हृदयाची नम्रताहि त्यांच्याजवळ होती. ज्ञानाला ज्या मर्यादा आहेत त्या गांठल्यावर त्याच्यापलीकडे असलेल्या ज्ञानातीत वस्तूंत ज्ञानाला प्रविष्ट व्हावें लागतें हें त्यांना अवगत होतें. अतिप्राचीन ऋषींचा कालखंड संपल्यावर पुढें अशी मंडळी निघाली कीं, ज्यांच्या हृदयाला आणि बुद्धीला त्यांच्या पूर्वजांचा चिवटपणा आणि स्थैर्य लाभलें नाहीं. या जिज्ञासूंना घाई झाली, अंतिम आनंद लवकर मिळावा अशी अतिशय ओढ त्यांना लागली, शुद्ध अनुभूतीचा हव्यास त्यांच्या हृदयावर थोर सत्ता गाजवूं लागला, कठोर व सूक्ष्म बुद्धीचा असामान्य जुलूम त्यांना मान्य होऊं लागला, आणि म्हणून त्यांनीं 'एक' (ब्रह्म) आपलें करून 'अनेक' (ब्रह्म) नव्हेच असा पुकारा केला; उंच ठिकाणची हवा त्यांना पोटांत घ्यावयास मिळाल्यानें व ती फार प्रिय वाटल्यानें, खालीं खोल ठिकाणीं जें लपलेलें आहे त्याला त्यांनीं तुच्छ लेखलें, त्याच्यापासून घृणेनें ते परत फिरले. परंतु ईश्वराचें खरें ज्ञान होण्यासाठीं, तो सर्वत्र सारखा अभेदानें भरलेला आहे हा अनुभव घेणें, ज्या अन्योन्य विरोधी घटनांच्या द्वारां तो प्रकाशतो त्या घटनांना योग्य मान देऊन त्यांचा योग्य विचार करणें, परंतु त्यांचें आपल्या बुद्धीवर प्रभुत्व चालूं न देणें, या गोष्टींची आवश्यकता आहे हें ज्ञान त्या प्राचीन ऋषींनीं, त्या प्राचीन विद्येनें करून घेतलें होतें.

तेव्हां अपूर्ण तर्कशास्त्रानें केलेला कठोर भेद आपण दूर ठेवूं. 'एकत्व ही मूळ सद्वस्तु आहे, म्हणून अनेकत्व हा आभास आहे; केवलत्व हें सत् अस्तित्व आहे, म्हणून अ-केवलत्व, सापेक्षत्व हें असत् अनस्तित्व आहे;' हें एकांगी तर्कानें केलेले भेद आपण बाजूला ठेवूं आणि आम्ही अनेकत्वांत चिकाटीनें, धिमेपणानें फिरत राहून तेथें एकतत्त्व अनुभवण्याचा यत्न करूं. असें केल्यास आम्हाला त्या एकतत्त्वाचा आशीर्वाद मिळेल, अनेकांत मी आहे, मीच अनेक आहे असा आमच्या श्रद्धेवर सत्यतेचा शिक्का मारणारा एकतत्त्वाचा बोल, आम्हाला प्रत्यक्ष ऐकावयास मिळेल आणि याप्रमाणें आमची अनेकतेंतील सफर यशस्वी करून आम्हीं महानंद मिळवून परत फिरू.

 

पान क्र. ६८

 

आमचें मन आपल्या भ्रमंतीत कांहीं ठिकाणीं फार सामर्थ्यशील व्यापकता धारण करतें, अत्यंत सामर्थ्यशील अवस्थांतर अनुभवितें; अशा ठिकाणीं त्याला जी दृष्टि लाभते त्या विशिष्ट दृष्टीला ते प्रमाणाबाहेर अतिरेकी महत्त्व देतें. आमच्या मनाच्या या विशिष्ट दृष्टीला, आम्ही महत्त्व देतां कामा नये. मन आध्यात्मिक मार्ग क्रमून अध्यात्ममय झालें म्हणजे विश्व हें त्या मनाला स्वप्न वाटतें, मिथ्या वस्तु वाटते आणि भौतिकांत सारखी वाटचाल करणारें मन, भौतिकनिष्ठ बनून ईश्वर ही आभासात्मक कल्पना आहे, भौतिकाच्या पलीकडे सत्य वस्तु कांहीं आहे ही कल्पना भ्रमात्मक आहे, असें मानतें व म्हणतें. या दोन्ही मानसिक दर्शनांची व दृष्टींची त्यांच्या एकांगीपणामुळें सारखीच योग्यता आहे; व ती योग्यता आमच्या दृष्टीनें मर्यादित आहे. भौतिकनिष्ठ मनाला फक्त इंद्रियांचाच पुरावा घेण्याची व मानण्याची संवय झालेली असते; सद्वस्तु, सत्यता आणि साकारता, सशरीरता यांचा नित्यसंबंध त्याच्या परिचयाचा असतो; इंद्रियांखेरीज दुसऱ्या ज्ञानसाधनांचा उपयोग त्याला माहीत नसतो, त्याच्या संवयीचा नसतो. अतिभौतिक अनुभव त्याला आला तरी त्या अनुभवाला सत्याचा अनुभव मानण्याइतकी, आपली रूढ सत्यतेची कल्पना, तें व्यापक करूं शकत नाहीं आणि म्हणून ईश्वर वगैरे सर्व मिथ्या आहे असा पक्ष तें घेतें. अध्यात्मनिष्ठ एकांगी मनाची अशीच गोष्ट आहे. अशरीर सद्वस्तूचा, ईश्वराचा, ब्रह्माचा साक्षात्कार, त्याला भयंकर मोहिनी घालून महदाश्चर्यांत बुडवून, त्याचें स्वत्व निकालांत काढणारा झाल्यानें, हें अशरीर अतिभौतिक दर्शन तेवढेंच सत्य, इंद्रियांनीं घडविलेलें दर्शन हें आभासांचें, स्वप्नांचें दर्शन आहे अशी एकांगी भूमिका तें घेतें. इंद्रियांना ज्ञानसाधनें मानण्याची पात्रता अध्यात्मनिष्ठ मन गमावून बसते; अतिभौतिक साधनांना ज्ञानसाधनें म्हणून ओळखण्याची, ती वापरण्याची पात्रता भौतिकनिष्ठ मन कमावीत नाहीं. इत्यर्थ, दोन्हीकडे आवश्यक पात्रतेचा अभाव असल्यामुळें पूर्ण सत्यदर्शनाचाहि अभाव असतो. अध्यात्मनिष्ठ मनाची आग्रही मांडणी व भौतिकनिष्ठ मनाची तितकीच आग्रही मांडणी, या दोन्ही मांडणींत सत्य मुळींच नाहीं असें नाहीं - सत्य आहे पण तें विकृत रूपांत मांडलें गेलें आहे. आम्ही स्थूल विश्वांत राहत आहों; आकारमय विश्वांत आम्हाला आत्मसाक्षात्कारासाठीं आणून ठेवलेलें आहे; या विश्वांत फक्त त्याच गोष्टीला पूर्ण सत्याच्या वर्गांत घातलें जाईल, जी गोष्ट आमच्या भौतिक जाणिवेची

 

पान क्र. ६९

 

पकड घेऊं शकेल, आमच्या भौतिक जाणिवेचा विषय होऊं शकेल - ती गोष्ट जाणिवेच्या उंचांत उंच भूमिकेवर व्यक्त स्वरूपांत आहे, एवढ्यावरून तिला आमच्या स्थूल विश्वांत सत्यतेचा दाखला मिळणार नाहीं, तर त्या उंचांत उंच भूमीवरील आविष्काराशीं सुसंवादी असा तिचा आविष्कार या आमच्या अगदीं तळच्या स्थूल भूमीवर झाला पाहिजे, आमच्या स्थूल जाणिवेचा विषय ती झाली पाहिजे, तरच ती सत्य आहे असें म्हणतां येईल. भौतिकवादी मांडणींत हा सत्याचा अंश आहे, तसाच, पण वेगळा सत्यांश अध्यात्मवादी मांडणींत आहे : आकार आणि आकारद्रव्य स्वयंभू सत्यत्वाचा हक्क सांगूं लागल्यास तो हक्क खोटा आहे, अज्ञानानें उत्पन्न केलेला भ्रम आहे; अशरीर अतिभौतिक सद्वस्तूला, सत्य वस्तूला, स्थूल विश्वांत व्यक्त होण्यासाठीं कसल्यातरी स्थूल द्रव्याची, स्थूल रचनेची आवश्यकता असते; या आवश्यकतेमुळें आकार आणि आकारद्रव्य यांना सत्यत्वाचा मान दिला जातो; त्यांची उत्पत्ति ब्रह्माच्या, ईश्वराच्या जाणिवेंत, ईश्वरी जाणिवेच्या एका व्यापारांत आहे; त्यांच्या उत्पत्तीचा हेतु चैतन्याची एक विशिष्ट अवस्था व्यक्त व्हावी एवढाच आहे : हा सत्याचा अंश अध्यात्मवादी मांडणींत आहे.

ब्रह्मानें आकार धारण केला, आपलें अस्तित्व भौतिक द्रव्याच्या द्वारां व्यक्त केलें, हें कशांकरतां? या प्रश्नाचें उत्तर एवढेंच संभवतें कीं, मर्यादित स्थूल जाणिवेच्या मूर्तींत आपलें अस्तित्व, स्वत्व घालून या आत्मप्रगटनाचा जो काय आनंद असेल तो भोगावा; ब्रह्म या जगांत आहे तें जीवनाच्या मूल्यांच्याद्वारां आपलें स्वत्व व्यक्त करण्याकरता आहे. ब्रह्माच्या पोटांत जीवन उदयास येतें तें, स्वतःच्या पोटीं ब्रह्माचा शोध लावून अनुभव घेण्यासाठीं उदयास येतें. या जगांत मनुष्याचें विशेष महत्त्व आहे तें अशाकरतां कीं, तो जगाला असाधारण महत्त्वाची एक गोष्ट मिळवून देतो; तो जाणिवेचा इतका विकास जगाला मिळवून देतो कीं, पूर्ण आत्मदर्शनाच्या साह्यानें या जगाचें आमूलाग्र रूपांतर होऊं शकतें - (जगाला त्याच्या जाणिवेच्या विकासाच्या द्वारां मनुष्य पूर्ण आत्मसाक्षात्कार मिळवून देतो आणि या साक्षात्काराच्या प्रभावानें जगाला स्वतःचें स्वरूप आमूलाग्र बदलणे शक्य होतें.) - मनुष्याचें मनुष्यत्व, मानवाची मानवता खरी याच गोष्टींत आहे कीं, त्यानें जीवनांत ईश्वराला कृतार्थ करावे. ईश्वरी जीवन, दिव्य जीवन हें मानवाचें अंतिम

 

पान क्र. ७०

 

ध्येय आहे. पशु जीवन, पाशवी प्रवृत्ति-पसारा हा मानवी जीवनाचा केवळ आरंभ आहे.

परंतु विचार-क्षेत्राप्रमाणेंच जीवनक्षेत्रांतहि, आत्म्याचें आविष्करण करावयाचें तर त्याला एक नियम आहे. तो नियम म्हणजे जीवनानें वा विचारानें क्रमाक्रमानें नवें नवें क्षेत्र घ्यावयाचें, पण जुनें क्षेत्र सोडाववयाचें नाहीं. ब्रह्मानें रूप घेतांना जाणिवेच्या अनेक क्रमवार अवस्था, भूमिका निश्चित केल्या आहेत. या भूमिका सर्व एकाचवेळीं अस्तित्वांत आहेत, असतात; कालाच्या दृष्टीनें त्यांच्यांत क्रमवारी नाहीं, एककालिकता आहे; एक भूमिका विशिष्ट मर्यादेची, दुसरी शेजारची तिच्याहून व्यापक, तिसरी तिच्याहून अधिक व्यापक, अशा प्रकारची व्यापकतेची क्रमवारी आहे. ही क्रमवारी लक्षांत घेऊन जीवनानें आत्मविकासाचें कार्य केलें पाहिजे, त्यानें नित्य नवीं क्षेत्रें क्रमाक्रमानें चढत जाऊन आत्मसात् केलीं पाहिजेत; व हीं नवी क्षेत्रें आत्मसात् करतांना जुनीं क्षेत्रें सांभाळलीं पाहिजेत. आम्हीं आमच्या विचारशील मनाचें व क्रियाशील जीवनाचें उदात्तीकरण व अध्यात्मीकरण करतांना जुनें सांभाळून क्रमानें नवें मिळवणें हा नियम विसरतां कामा नये. स्थूल भौतिक जीवन हा आमचा पाया आहे. या जीवनाला आम्ही केव्हांहि टाकता कामा नये, क्षुद्र लेखतां कामा नये. स्थूल भौतिकाच्या वरची मानसिक जीवनाची पायरी आम्हीं चढलों कीं या नव्या पायरीवरून खालच्या पायरीवरील जीवन कोणाकोणाला क्षुद्र वाटूं लागतें, त्याज्य वाटूं लागतें; त्याचप्रमाणें मानसिक जीवनाच्या वरची आध्यात्मिक जीवनाची पायरी चढल्यावर खालचीं दोन्हीं जीवनें कोणाकोणाला त्याज्य वाटूं लागतात. वरच्या जीवनाच्या आकर्षणानें, हा त्यागाचा विचार येतो. पण आमच्या जीवनांत ईश्वर पूर्णतया व्यक्त व्हावा, यासाठीं त्याच्या आत्मप्रकटनाच्या अटी आम्हीं पाळल्याच पाहिजेत. त्या अटी, वर सांगितलेल्या नियमांत अंतर्भूत आहेत. म्हणून वर चढतांना किंवा चढल्यावर खालच्या क्षेत्राचा त्याग करण्याचा विचार त्याज्य आहे. आम्हीं हा विचार मनांत आणला तर आम्ही पूर्ण होऊं शकत नाहीं, अपूर्णतेला चिकटून राहतो - एवढेंच कीं आमचें अपूर्णतेचें क्षेत्र बदलतें; फारतर एक विशिष्ट मर्यादित उंची आम्ही गाठूं शकतो. समजा, आम्ही अगदीं असत् पर्यंत चढून गेलो, चढावयाचें बाकी कांहीं उरलें नाहीं, पण आम्ही आमचा स्थूल भौतिक जीवनाचा पाया विसरून गेलो, तर आमचें चढणें विफल होईल.

 

पान क्र. ७१

 

कोणत्याहि खालच्या पायरीवरील जीवन, वरच्या पायरीवरील जीवनानें - त्याच्या श्रेष्ठ प्रकाशानें - बदलून घेणें, यांत ईश्वरी प्रकृतीचें खरें कार्य आहे; यांत स्वाभाविक ईश्वरी जीवन, दिव्य जीवन साधण्याचा साधनमार्ग आहे - (कोणत्याहि खालच्या पायरीवरील जीवन टाकून देण्यांत, त्याच्यावर चढूनहि पूर्वीं तें होतें तसेंच राहूं देण्यांत, कांहींच दिव्यता नाहीं, दिव्य ईश्वरी स्वभावधर्माचा मुळींच आविष्कार नाहीं.) त्यांत ब्रह्म हें पूर्ण आहे, एकाच वेळीं अनेक ज्ञानभूमिका (जाणिवेच्या अवस्था) त्यांत एकीभूत असतात, एकतेनें अविरोधानें असतात. हा ब्रह्माचा स्वभाव आम्हाला आमच्या जीवनांत प्रकट करावयाचा तर, आम्हींहि त्याच्याप्रमाणें पूर्ण सर्वसमावेशक व्हावयास हवें.

संन्यासाची अतिरेकी ऊर्मि, स्थूल भौतिक जीवनांतून अंग काढून घ्यावयास साधकाला प्रवृत्त करते, त्याप्रमाणें या ऊर्मीच्या अतिरेकानें साधक दुसरी एक चूक करण्यास प्रवृत्त होऊं शकतो. आत्म्याच्या आविष्काराच्या समग्रतेचें, पूर्णतेचें ध्येय समोर ठेवल्यानें दुसरी चूकहि घडण्याचा संभव नाहींसा होतो. जाणिवेचे सर्वसाधारण तीन प्रकार आहेत; व्यक्तिजाणीव, विश्वजाणीव व विश्वातीत जाणीव. या तीन जाणिवांचें व्यक्तीच्या ठिकाणीं जें अन्योन्यविषयक नातें असेल, त्या नात्यावरून वैयक्तिक जीवनाची गांठ व गुंतागुंत आणि तिचें स्वरूप निश्चित होतें. जीवनाच्या धडपडींची सर्वसामान्य वांटणी पाहिली तर, व्यक्ति आपल्या स्वत:ला इतर सर्व व्यक्तींहून वेगळी चीज समजत असल्याचें दिसतें. आपला समावेश इतर भिन्न व्यक्तींबरोबर विश्वांत होतो आणि विश्व व स्वत: आपण, असे दोघेहि, दोघांहून पलीकडे असणारें जें तत्त्व, त्यावर अवलंबून आहोंत असें मानते. हें जें विश्वातीत तत्त्व, त्याला सामान्यत: ईश्वर हें नांव देतात. या व्यक्तीच्या कल्पनेला, हा ईश्वर विश्वाच्या वरचा पण विश्वाला जोडलेला वाटण्यापेक्षां, विश्वाहून अगदीं वेगळा, विश्वाशीं संबंध नसलेला वाटतो. याप्रमाणें व्यक्ति व विश्व दोघांनाहि या व्यक्तीच्या कल्पनेंत क्षुद्र स्थान मिळतें, त्यांची कांहीं किंमत तिला वाटत नाहीं आणि याप्रकारें विश्वातीत ईश्वर, विश्व व व्यक्ति यांचा नसता भेद मनांत भरला म्हणजे ईश्वराची प्राप्ति म्हणजे व्यक्ति व विश्व यांचा संबंध तोडणें - व्यक्ति व विश्व स्वतःपुरते नाहींसें करणें - अशीं या सर्वसामान्य व्यक्तीची तर्कशुद्ध दृष्टि बनते.

ब्रह्माच्या एकत्वाची पूर्ण दृष्टि लाभल्यास हे अपूर्ण दृष्टीचे परिणाम

 

पान क्र. ७२

 

अर्थातच टळतात. मानसिक आणि आध्यात्मिक जीवनाच्या सिद्धीसाठीं ज्याप्रमाणें स्थूल भौतिक शारीरजीवन टाकावें लागत नाहीं; त्याप्रमाणें विश्व जाणीव आपली करण्यासाठीं किंवा केल्यावर, तसेंच विश्वातीत जाणीव मिळविण्यासाठीं किंवा मिळविल्यावर वैयक्तिक क्रियाकर्में आम्हीं टाकलीं पाहिजेत असें समजण्याचें कारण नाहीं. आमचे वैयक्तिक व्यवहार आणि वरील दोन ज्ञानभूमिका यांजमध्यें विरोध किंवा विसंवाद जेथें नाहीं अशी दृष्टि, म्हणजे ब्रह्माच्या एकत्वाची पूर्ण दृष्टि आम्हाला लाभूं शकते. विश्वातीत विश्वाधिशायी ब्रह्म, विश्वाला सर्वांगानें सर्वांगी समालिंगन देऊन आहे, विश्वाशीं एकरूप आहे, विश्वाला त्यानें अंगाबाहेर टाकलेलें नाहीं; तसेंच विश्व, व्यक्तीशीं एकरूप आहे, व्यक्तीला सर्वथा अविभाज्य निजांग म्हणून बाळगून आहे, व्यक्तीला तें अंगाबाहेर टाकीत नाहीं. व्यक्ति ही पूर्ण विश्वजाणिवेचें केंद्र आहे आणि विश्व हें अशरीर, अलक्षण अशा ब्रह्मानें, स्वत:साठीं निर्मिलेलें आणि स्वत: अंतर्बाह्य पूर्णतया व्यापलेलें, असें त्याचें सलक्षण शरीर आहे.

ब्रह्माचें, विश्वाचें आणि व्यक्तीचें परस्पर नातें नेहमीं हेंच असतें. आमच्या अज्ञानानें किंवा वस्तूंच्या संबंधाची आमची जाणीव चुकीच्या मार्गावर गेल्यानें हें खरें नातें आमच्यापासून लपलेलें राहतें. आम्हाला ज्ञान झालें, वस्तुविषयक योग्य जाणीव आम्हाला लाभली, म्हणजे वर निर्दिष्ट केलेलें ब्रह्म-विश्व-व्यक्तीचें शाश्वत नातें तत्त्वत: अणुभरहि बदलत नाहीं; एवढेंच होतें कीं, वैयक्तिक केंद्रांतून जें पूर्वीं घडत होतें तें, आंतलें आणि बाहेरचें दर्शन, तत्त्वांत व तपशीलांत पार बदलून जातें आणि त्याचा परिणाम म्हणून व्यक्तीच्या व्यवहाराचा आत्मा, आशय व त्याचा परिपाक देखील पार बदलून जातो. विश्वांत आपलें कार्य करण्याचें साधन म्हणून, विश्वातीत ब्रह्माला, ज्ञान झालेल्या व्यक्तीची पूर्वींइतकीच आवश्यकता असते; आणि व्यक्तीला ज्ञान झालें म्हणजे तिला ब्रह्माचें कार्य करतां येणें अशक्य होतें, असेंहि नाहीं. उलटपक्षीं व्यक्तीमध्यें नेहमींच असलेल्या विश्वातीत ब्रह्माचा तिला साक्षात्कार होणें, तिला तिच्या अंतर्यामीं, जाणीवपूर्वक ब्रह्माचा सहयोग लाभणें, हेंच एक विश्वपुरुष, समष्टिपुरुष, आत्मसाक्षात्कारी होण्याचें साधन असल्यानें, विश्वाच्या खेळांत ही एक अनिवार्य आवश्यकता आहे कीं, आत्मज्ञान लाभलेल्या व्यक्तीनें विश्वाच्या कार्यांत पूर्वींप्रमाणें अखंडपणें भाग घेत रहावें. आत्मज्ञान झालें कीं त्या आत्मज्ञानी व्यक्तीला संसारांतून बाहेर गेले पाहिजे, विश्वकार्यांत तिला स्थान

 

पान क्र. ७३

 

नाहीं, असा कठोर निरपवाद नियम असेल तर, विश्व हें, अज्ञान, मृत्यु, दुःख यांनीं गांजलेल्या व यांतून सुटकेची आशा नसलेल्या अनंत जीवांचें शाश्वत प्रदर्शन म्हणून रहावें असा त्याला शाप मिळाला आहे असें मानावें लागेल; आणि असें विश्व एक तर क्रूरपणें सत्त्वपरीक्षा करणारें दिव्य तरी असलें पाहिजे किंवा केवळ गतिमान असणारें अचेतन भ्रमचित्र असलें पाहिजे.

संन्यासपर तत्त्वज्ञान विश्वाविषयीं अशीच कांहीं कल्पना करण्याकडे झुकतें. पण विश्व स्वत: भ्रम असेल, विश्वांतील अस्तित्व मिथ्या असेल, तर 'व्यक्तीचा मोक्ष' या भावनेला कांहींच खरा अर्थ राहणार नाहीं. अद्वैत दर्शनांत, व्यक्तीचा आत्मा ब्रह्माशीं एकरूप असतो, ब्रह्मापासून आपण वेगळे आहोंत ही त्याची भावना अज्ञानजन्य असते, या भेदभावनेपासून मुक्त होणें आणि ब्रह्माशीं स्वतःचा अभेद ओळखणे हाच व्यक्तीचा मोक्ष असतो. पण भेदभावनेपासून मुक्त होण्याच्या या व्यवहारांत, लाभ कोणाला होतो ? अर्थात् ब्रह्माला कांहीं लाभ होत नाहीं, कारण ब्रह्म हें सदा सर्वदा मुक्त, स्थिर, शांत, शुद्ध असतें. हेंच त्याचें ब्रह्मत्व असून तें त्याला टाकतां येण्यासारखें नाहीं. विश्वाला कांहीं लाभ होत नाहीं, कारण कोणतीहि व्यक्ति विश्वभ्रमापासून मुक्त झाल्यानें, विश्व - भ्रमरूप विश्व - कांहीं मुक्त होत नाहीं; तें बंधनांत असतें तसेंच नेहमीं बंधनांत राहतें. व्यक्तीला मात्र लाभ होतो. व्यक्तीचा आत्मा भेदांतून आणि भेदाच्या दु:खांतून सुटून शांति आणि समाधान मिळवतो आणि याप्रमाणें तो आपलें सर्वांत श्रेष्ठ असें हित करून घेतो. तेव्हां हें हित जर खरें मानावयाचें तर आत्मज्ञान आणि मोक्ष मिळाल्यावरहि व्यक्तीला विश्व आणि ब्रह्म या दोहोंपेक्षां भिन्न असें कांहीं खरें अस्तित्व असतें असें मानणें भाग आहे. पण मायावादाच्या दृष्टीनें व्यक्ति व व्यक्तीचा आत्मा हा भ्रमरूप आहे, हा आत्मा मुळीं अस्तित्वांतच नाहीं; मायेच्या अगम्य गूढ पसाऱ्यांत मात्र व्यक्तीच्या आत्म्याला अस्तित्व आहे. तेव्हां यांतून निष्पन्न काय होतें ? मुक्त होतो तो जीवात्मा - व्यक्तीचा आत्मा - खरा नसतोच मुळीं, भ्रमरूप असतो; त्याचा बंध हाहि भ्रमरूप, खरें अस्तित्व नसणारा; हा खोटा बंध ज्या विश्वांत त्याला बद्ध करीत असतो तें विश्वहि भ्रमरूप, अस्तित्वशून्य; आणि खोट्या आत्म्यानें खोट्या बंधनांतून मुक्ति मिळविणे, हें त्या खोट्या आत्म्याचें परम श्रेय, परम श्रेष्ठ हित, आणि या श्रेयासाठीं त्या खोट्या आत्म्यानें धडपड करावी हें त्याचें

 

पान क्र. ७४

 

आध्यात्मिक कर्तव्य ! ज्ञानाचा शेवटला सिद्धांत असा आहे. ''कोणी बद्ध नाहीं, कोणी मुक्त होत नाहीं, कोणी मुमुक्षु नाहीं.'' याप्रमाणें विद्या ही अविद्येसारखीच मायाघटित घटनांत अंतर्भूत होते. आम्ही मुक्ति म्हणून जी मिळवतो त्या मुक्तींतहि माया आम्हाला गांठते आणि हंसून आमच्या ''जितं मया'' म्हणणाऱ्या तर्कशास्त्राकडे बोट दाखविते. मायेची, तिच्या गूढाची गांठ तोडून टाकण्याचा 'पण' या तर्कशास्त्रानें केला होता ! आणि त्याला वाटत होतें कीं त्यानें विजय मिळविला ! पण तें विजयी तर्कशास्त्रहि मायेच्याच पोटांत आहे ! ही गोष्ट त्याच्या नजरेस आणून माया त्याला हास्यास्पद करतें.

या वरील गोष्टी अशा कां आहेत याचें स्पष्टीकरण मिळणें शक्य नाहीं असें सांगण्यांत येतें. प्रथमपासून अस्तित्वांत असलेला अनाकलनीय असा अद्भुत चमत्कार म्हणून, या गोष्टींकडे पहावें असें सांगण्यांत येतें. व्यवहारांत या गोष्टी वास्तविकपणें आहेत आणि आम्हाला त्या मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. आम्हाला संसाराच्या गोंधळांतून बाहेर पडावयाचें तें गोंधळाच्याच मार्गांनें बाहेर पडणें भाग असतें. व्यक्तीला आपल्या 'मी'ची गांठ तोडावयाची ती मीपणाचें - स्वार्थाचें - एक सर्वांत वरचें (सर्वांत खालचें) कृत्य करून तोडावयाची असते, त्याला दुसरा मार्गच नसतो ! त्याला आपल्या एकट्याच्या मुक्तीकडे सर्व लक्ष द्यावयाचें असतें. अर्थात् मायेच्या संसारांत आपण इतर सर्व व्यक्तींपासून अगदीं अलग आहों, आपल्या अस्तिस्वाचा, जीवनाचा, इतर व्यक्तींच्या अस्तित्वाशीं, जीवनाशीं कसलाच संबंध नाहीं असें व्यक्तीनें निःसंदेहपणें मानावयाचें असतें. या इतर व्यक्ती आपल्या मनानें निर्मिलेल्या अवास्तव मिथ्या प्रतिमा आहेत, त्यांची मुक्ति मुळींच महत्त्वाची नाहीं. केवळ आपला आत्मा मात्र सर्वथा सत्यरूप आहे आणि त्याची मुक्ति ही महत्त्वाची गोष्ट आहे असें व्यक्तीनें मानावयाचें असतें ! फलतः मायावादानुसार, माझ्याखेरीज इतर जीवात्मे (माझ्याशीं वस्तुत: एकरूप असलेले जीवात्मे) बंधनांत सोडून माझें बंधनांतून मुक्त होणें मी खरें मानतों !

विश्व आणि ब्रह्म किंवा आत्मा या दोहोंमध्यें अनिवार्य विरोध आहे ही कल्पना बाजूस ठेवली म्हणजे विश्वांतील व्यवहाराची व्यवस्था सरळ तर्कशास्त्रानें अगदीं समाधानकारक लागूं शकतें. जें व्यक्त झालें आहे त्या ब्रह्माची एकता मान्य करून त्याच्या व्यक्तीकरणांत अनेकता, अनेकमुखता त्यानें अंगीकारली आहे ही गोष्ट आम्हीं ओळखली पाहिजे. पहावें

 

पान क्र. ७५

 

तिकडे ही गोष्ट आमच्या नजरेस येईल, मात्र आम्ही पाहून न पाहिल्यासारखें वागणार नसलो तर. जें ज्ञानमय सत्, मूळ गूढ वस्तु आहे, त्या वस्तूची स्वाभाविक साधी गूढता यांतच आहे कीं, तें बंधनातीत आहे - स्वत:च्या एकतेचें बंधन त्याला नाहीं, स्वत:च्या अनेकतेचें बंधन त्याला नाहीं. तें याच अर्थानें पूर्ण स्वतंत्र आहे कीं, तें आपलें आविष्करण करीत असतां त्या आविष्करणाचीं रूपें शक्य त्या सर्व रूपांतून आपल्या इच्छेप्रमाणें पसंत करण्यास, व पसंत केलेल्या रूपांची मांडणी इच्छेप्रमाणें करण्यास सर्वस्वीं मोकळें आहे. ''कोणी बद्ध नाहीं, कोणी मुक्त होत नाहीं, कोणी मुमुक्षु नाहीं'' - कारण तें केवल पूर्ण स्वतंत्र ब्रह्म सदासर्वदा पूर्ण स्वतंत्र असतें, पूर्ण मुक्त असतें. तें इतकें स्वतंत्र आहे कीं, तें आपल्या स्वतंत्रतेनेंहि बांधलेलें नाहीं. तें बंधनांत असल्याचा खेळ, खऱ्या बंधनांत पडल्यावांचूनहि खेळूं शकतें. तें जें बंधन, जी शृंखला पत्करतें, ती स्वत: होऊन व स्वत:च्या सोयीसाठीं, स्वत:च्या अंगाला त्यानें बांधलेली असते. अहं किंवा मी हें एक बंधन या ब्रह्मानें कांहीं कालाकरितां, अवस्थांतराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीं एक युक्ति म्हणून, निर्माण केलें आहे व पत्करलें आहे. आपल्या खेळासाठीं निर्माण केलेल्या वैयक्तिक ब्रह्माचे ठिकाणीं विश्वब्रह्म आणि विश्वातीत ब्रह्म (खेळाच्या सोयीसाठीं अलग केलेलें) पुनरपि भरण्यासाठीं अहम् ची योजना आहे. ब्रह्म हें विश्वातीत विश्वरूप असून व्यक्तीचें रूप घेतें. या व्यक्तीच्या अहंपूर्ण रूपांत आपलें विश्वातीतत्व व विश्वरूपत्व घालून, आपलें व्यक्तिरूपी व्यक्तरूप पूर्ण करणें हा, अहम् चें बंधन पत्करण्यांतील बंधनातीत ब्रह्माचा उद्देश आहे.

विश्वातीत, विश्वाधिशायी ब्रह्म, हें स्वत: पूर्ण स्वतंत्र, सर्वसंबंधनिरपेक्ष, कालातीत, स्थलातीत, आणि सांत-अनंत या मनोनिर्मित विरोधी कल्पनेच्या अतीत असें आहे. परंतु विश्वामध्यें तें साकार होण्यासाठीं आपली स्वतंत्रता, अर्थात् आपली माया, उपयोगांत आणून आपली अशी एक आविष्कार योजना तयार करतें कीं तिच्यांत एकता आणि अनेकता एकमेकींच्या पूरक म्हणून काम करतात; आणि ही अनेकतानिष्ठ एकता तीन क्षेत्रांत - अधोमानसिक जाणीव, मानसिक जाणीव, अतिमानसिक जाणीव या तीन क्षेत्रांत किंवा अवस्थांत - ब्रह्मानें प्रतिष्ठित केलेली आहे. अधोमानसिक जाणिवेचें क्षेत्र म्हणजे जडाचें, भौतिकाचें क्षेत्र. हें क्षेत्र ब्रह्म आपल्या जाणिवेनेंच सर्वस्वीं चालवीत असतें. आमच्या भौतिक जगांत अनेक वस्तूंचा आकार घेतलेल्या अनेकतेच्या पोटीं एकता आहे. विश्व-

 

पान क्र. ७६

 

व्यापक क्रिया, विश्वव्यापक द्रव्य यांच्या रूपानें ही एकता व्यक्त होते; तथापि या द्रव्याला, या क्रियेला त्या एकतेचें वा अनेकतेचें ज्ञान, त्याच्या पृष्ठभागावर मुळींच होत नाहीं. मानसिक जाणिवेचें क्षेत्र म्हणजे आमचें क्षेत्र; येथें अहम् जागृत असतो. ही अहम् ची पृष्ठभागीय पातळी जाणीवमय असते; जडद्रव्याच्या पृष्ठभागाप्रमाणें जाणीवशून्य नसते. या अहमच्या जाणिवेला एकतेचें दर्शन घडूं शकतें, घडतें. पण हें एकतादर्शन दृश्य रूपापुरतें, दृश्य क्रियेपुरतेंच घडतें. या दृश्य रूपामागें, या दृश्य क्रियेमागें त्यांच्या अंतरंगात, त्यांच्या पोटीं जें घडत असतें त्या कशाचाच या अहम् ला पत्ता लागत नाहीं; आणि म्हणून त्याला ही गोष्ट अनुभवास येत नाहीं कीं, तो स्वत: एक वस्तु असला तरी त्याची स्वत:ची एकता स्वतंत्र नाहीं, बाकी सगळ्या वस्तू आणि तो स्वत: मिळून एक वस्तु आहे. वस्तुत: ''विश्व मी'' हा एकच खरा ''मी'' असतां या विश्व-मीचें, व्यक्तिगत अहंकारानें विभाग पडल्यानें आमची अपूर्ण व्यक्तिता निर्माण झाली आहे. पण अहम् कांहीं नेहमी व्यक्तीच्या व्यक्तित्वाच्या चौकटींत बंदिस्त राहत नाहीं. 'व्यक्ति-मी' या जाणिवेच्या पलीकडे तो जाऊं शकतो, अतिमानसिक जाणिवेची अवस्था त्याला लाभूं शकते. ही अवस्था त्याला लाभली म्हणजे पूर्वीं त्याच्या बाहेर म्हणून दिसणाऱ्या गोष्टी, त्याला त्याच्या आंत दिसूं लागतात. त्याचा क्षुद्र अभिमान गळून जातो. सर्व विश्व एक आहे ही जाणीव त्याला होते, विश्वातीत ब्रह्मांत तो प्रविष्ट होतो आणि हें अनेकरूपी एकता भरलेलें विश्व, त्या विश्वातीताचें व्यक्त स्वरूप आहे हें त्याला कळतें.

व्यक्तीच्या आत्म्याची मुक्ति कशी होईल या विचारालाच, ईश्वराच्या विशिष्ट निश्चित व्यवहारांत प्राधान्य असतें. ईश्वराला वैयक्तिक आत्म्याच्या मुक्तीची सर्वप्रथम आवश्यकता असते. या मुक्तीवर ईश्वराचे बाकीचे व्यवहार अवलंबून असतात. अनेक रूपांत स्वत:ची पूर्णतया अभिव्यक्ति करण्याची ईश्वराची इच्छा आहे. या अभिव्यक्तीचा आरंभ व्यक्तीच्या मुक्तीपासून होतो. ही मुक्ति, हा एक प्रकाशबिंदु आहे, जेथून ईश्वराच्या मनांतील स्वरूप-प्रकाशनाला - विश्वगत अनेकांच्याद्वारां करावयाच्या नियोजित पूर्णस्वरूप-प्रकाशनाला - आरंभ होतो. मुक्त आत्मा ज्याप्रमाणें आपल्या पातळींत एकतेचा अनुभव घेतो त्याप्रमाणें आपल्या पातळीच्या वर आणि खालीं ज्या भूमिका आहेत, त्या सर्वांची एकता अनुभवतो. विश्वातीताशीं तो एकरूप झाला कीं, विश्वाच्या अनेकतेशीं

 

पान क्र. ७७

 

तो एकरूप होतोच होतो. या दुसऱ्या एकरूपतेशिवाय पहिली एकरूपता अपूर्णच असते; आणि ही मुक्त आत्म्याची विश्वांतील अनेक आत्म्यांशीं जी एकरूपता होते, ती फलत: या अनेकांच्या मुक्तीला कारणीभूत होते. प्राणमय आत्मा, पाशवी आत्मा देहनिष्ठ असतो व आपल्यासारखे दुसरे देह निर्माण करतो, त्याप्रमाणें ब्रह्ममय, ब्रह्मनिष्ठ आत्मा आपल्यासारखे दुसरे ब्रह्ममय मुक्त आत्मे निर्माण करतो. तेव्हां केवळ एकच आत्मा मुक्त झाला तरी, लागलींच त्या मुक्त आत्म्याला लाभलेली जाणीव, आपलें क्षेत्र वाढवूं लागते. क्षेत्र-विस्तार करण्याची स्वाभाविकच प्रवृत्ति या जाणिवेमध्यें असते. केव्हां केव्हां पृथ्वीवरील अ-मुक्त आत्म्याच्या अंतरंगांत मुक्त आत्म्याच्या दिव्य जाणिवेच्या प्रभावानें तत्सम दिव्य जाणीव केवळ उदय पावते एवढेंच नव्हे तर, जोरानें उफाळून वर येऊं लागते. मुक्त आत्म्याच्या दिव्य जाणिवेचा प्रभाव पृथ्वीपुरताच असतो असें मानण्याचेंहि कारण नाहीं - पृथ्वीखेरीज इतर विश्वविभागांतहि तिचा परिणाम होत नसेल कशावरून ? मुक्त आत्म्याच्या दिव्य जाणिवेच्या क्षेत्र-विस्ताराला मर्यादा तरी कोठें घालतां येणार ? बुद्धासंबंधींची जी कथा प्रसिद्ध आहे, ती केवळ कथाच असेल काय ? असें म्हणतात कीं, निर्वाणाच्या उंबरठ्यावर बुद्ध उभा होता; असत् मध्यें प्रवेश करावयाच्या द्वाराचा उंबरठा त्यानें गांठला होता. पण त्यानें आंत प्रवेश करण्याचें नाकारलें. त्याचा मुक्त आत्मा परत फिरला. त्यानें असा निश्चय केला कीं, दुःखाच्या कोंडींतून, मीच्या बंधनांतून मुक्त न झालेला असा एकादा जीव जरी जोंपावेतों पृथ्वीवर आपला दुःखी जन्म कंठीत असेल तोंपावेतों, जेथून परत येतां येणार नाहीं अशा असत् च्या प्रांतांत, निर्वाणाचा उंबरठा ओलांडून मी केव्हांहि प्रवेश करणार नाहीं.

ही बुद्धासंबंधींची कथा खरी असो वा नसो; पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, विश्वांतील विस्तृत क्षेत्रांतून स्वत:ला पुसून न टाकतांहि 'असत् ची' सर्वश्रेष्ठ निर्वाणावस्था आत्मसात् करतां येतें. ब्रह्म हें अंतरांत एकटेंएक पूर्ण स्वतंत्र व बाहेर साकार अनेकरूप असें एकाच वेळीं असतें. व्यक्ततेपासून वेगळें राहणे आणि व्यक्ततेचा आश्रय करणें या दोन्ही गोष्टी ब्रह्म एकाच वेळीं करतें. अंतर्यामीं निराकार एकता, बाहेर साकार अनेकता या दोन बाजू ब्रह्म नेहमींच संभाळतें. आपणहि ब्रह्म आहों, म्हणून ब्रह्माची ही दिव्य आत्मसत्ता आम्हांला लाभूं शकते. जें जीवन खरोखरी दिव्य होऊं

 

पान क्र. ७८

 

बघत आहे, त्या जीवनामध्यें अंतरांत आणि बाह्य व्यवहारांत ब्रह्माच्या उपरिनिर्दिष्ट दोन वृत्ति-प्रवृत्ती सुसंवादीपणें राहतील अशी व्यवस्था असली पाहिजे. मुक्तीसाठीं खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर असें चढत चढत जावें लागते. असें करतांना केवळ मुक्तीच्या मागें लागून, चढून आलेल्या खालच्या पायऱ्यांचा संबंध तोडून टाकीत गेलें तर या नकार पंथानें जीव शेवटीं ईश्वरानें आपलें म्हटलेल्या या विश्वाचा त्याग करतो. उलटपक्षीं, विश्वांतील कोणतेंहि कार्य करीत असतां त्या कार्यांत बुडून जाणें, क्रियाशक्तींत तल्लीन होऊन बाकी गोष्टी विसरून जाणें, या मार्गानें आपण ईश्वराचें सर्वश्रेष्ठ स्वरूप ओळखीनासे होतो; आणि जडद्रव्य, जडशक्तीच सर्व कांहीं आहे, असा एखादा क्षुद्र सिद्धांत धरून बसतो. ईश्वरानें ज्या गोष्टींचा समन्वय केला आहे, ज्या गोष्टी एकत्र ठेवण्याची व्यवस्था केली आहे, त्या गोष्टी आम्ही एकमेकींपासून अलग कां कराव्या ? ईश्वर पूर्णपणें आपलासा करून घेणें असेल, तर ईश्वराप्रमाणें आपण पूर्ण व्हावयास हवें; असें पूर्ण होणें ही ईश्वराच्या पूर्ण प्राप्तीची अटच आहे.

आम्हीं अहम् च्या आश्रयानें जें आत्मप्रकटन करतो, त्यांत मुत्यु आणि दुःख यांचें साम्राज्य आहे; अहम् ची योजना तात्पुरती आहे. जडाकडून ब्रह्माकडे अहम् मधून जावयाचें असतें. अहम् चा अहंकारी आत्माविष्कार सुटून त्याची आध्यात्मिक प्रगति व्हावयाची ती अनेकतेच्या, अविद्यादृष्ट अनेकांच्या जीवनाशीं क्रमश: संबंध येत राहण्यानें होत असते. अविद्यादृष्ट अनेकांमध्यें विद्येच्या दृष्टीनें पूर्ण एकता अनुभवास येते आणि याप्रमाणें अविद्या व विद्या यांचें आमच्या ठिकाणीं साहचर्य असेल तर, विश्वांत कार्यमग्न राहून आम्ही अमृतत्व आणि आनंद यांचा पूर्ण उपभोग घेतो. सर्व साकार, सजन्म वस्तू सोडून पलीकडे असलेला सर्वातीत अजन्मा, निराकार, ब्रह्मपुरूष आम्हीं आपलासा केला म्हणजे, खालच्या पातळीवरील जन्यमृत्यूपासून आम्ही मुक्ति मिळवितो; आणि ब्रह्माप्रमाणें स्वेच्छेनें जन्म किंवा साकारता धारण केल्यानें मृत्यूच्या प्रांतांत आम्ही अमृत आनंद आणतो व मानवतेंत, मानवाच्या विश्वांत या अमर आनंदाचा जाणीवपूर्वक आविष्कार करणारीं प्रकाशमय केंद्रस्थानें होण्याचें भाग्य आम्हाला लाभतें.

 

पान क्र. ७९

प्रकरण सहावें

 

विश्वांत मानवाचें स्थान

 

      मानवाचा आत्मा हा एक प्रवासी आहे, तो ब्रह्मचक्रांत फिरत आहे, हें ब्रह्मचक्र अफाट आहे, येथें सर्व जीवांचा मेळा आहे, सर्व अवस्थांचा संसार आहे; प्रवासाला धाडणाऱ्यापासून स्वत:ला वेगळा समजतो म्हणून मानवाचा आत्मा या ब्रह्मचक्रांत फिरत राहतो. ब्रह्मानें (प्रवासाला धाडणाऱ्यानें) त्या आत्म्याला अंगीकारलें म्हणजे अमृतत्वाचें ध्येय त्या आत्म्याला हस्तगत होतें.

- श्वेताश्वतर उपनिषद् १.

 

विश्वाला कांहींतरी अर्थ आहे, विश्वाला कांहींतरी ध्येय आहे, विश्व ही कांहीं निर्हेतुक आभासमय वस्तु नव्हे, किंवा कशीतरी घडलेली 'आकस्मिक' घटना नव्हे. मग या विश्वाचा अर्थ काय ? एका महान् परात्पर, सर्वातीत, प्रकाशमय सद्वस्तूचें क्रमश: आविष्करण, हा विश्वाचा आमच्या मतें अर्थ आहे. या आविष्करणासाठीं जशा या दृश्य विश्वांतील अनंत मर्यादित सापेक्ष वस्तू व घटना आहेत, तशाच आम्हाला न दिसणाऱ्या दुसऱ्या विश्वांतीलहि मर्यादित सापेक्ष वस्तू व घटना या सद्वस्तूच्या आविष्करणासाठींच आहेत. या आविष्कारासाठीं साधनसामग्री म्हणून, कच्चा मसाला म्हणून, पूर्व तयारी म्हणून, आवश्यक क्षेत्र म्हणून, या व दुसऱ्या अदृश्य विश्वांतील सर्व वस्तूंचा व घटनांचा वापर केला जातो. विश्वाचें अस्तित्व ही मनाची फसवी कल्पना नाहीं, हा सिद्धांत ज्या न्यायसंगत विचारसरणीनें आम्ही बसवितो, त्याच विचारसरणीनें हें निश्चितपणें ठरतें कीं, विश्वाच्या पोटीं लपलेली एक ज्ञानशक्ति आहे; या ज्ञानशक्तीला विश्वाचा आरंभ आणि अंतिम ध्येय ठाऊक आहे, आणि ही ज्ञानशक्ति मार्गदर्शक या नात्यानें, विश्वाची गति व प्रक्रिया निश्चित करीत असते. 'विश्व म्हणजे, एकमेकांपासून भिन्न

 

पान क्र. ८०

 

अशा असार साकार वस्तूंचा स्वयंभू आंधळा असहाय मेळावा होय, या वस्तू अनंत काल आपापल्या कक्षांतून फिरत असतात, व फिरतांना एकमेकींशीं कधीं चिकटतात, कधीं झगडतात; विश्व हें एका अज्ञानमय शक्तीनें स्वत: निर्मिलेलें व स्वत: गतिमान् केलेलें प्रचंड शक्तिचक्र आहे' - विश्वासंबंधींच्या अशा कल्पना न्यायसंगत विचारसरणि मान्य करूं शकत नाहीं. न्यायसंगत विचारसरणीनुसार, विश्वातीत विश्वनिरपेक्ष अशी एक सत्ता आहे; अर्थात् ती पूर्णपणें स्वायत्त आहे, स्वत:ची पूर्ण मालक आहे; ही सत्ता सर्व दृश्य अस्तित्वाच्या (विश्वाच्या) आंत लपलेली आहे, हें दृश्य विश्व सर्वस्वीं तिच्या ताब्यांत आहे; ही स्वायत सत्ता आकार धारण करून व्यक्त होते. मानवी व्यक्तीमध्यें ही सत्ता आपलें स्वरूप उघडें करून दाखवितें.

व्यक्तीमध्यें त्या विश्वातीत सत्तेचा उदय होणें, प्रकाशमय उत्थान होणें, याला आमचे प्राचीन आर्यपुरुष अरुणोदय म्हणत, उषेचें आगमन म्हणत व या उषेची ते पूजा करीत. विश्वव्यापक विष्णु देवतेचें उंचांत उंच ठेवलेलें पाऊल म्हणजे या उषेचें - व्यक्तीमध्यें उदय पावलेल्या प्रकाशमय सद्वस्तूचें - पूर्णता पावल्यानंतरचें स्वरूप होय. मनाच्या अति शुद्ध स्वर्गांत सर्वत्र नजर फेंकणारा दिव्यदर्शनसमर्थ नेत्र, असेंहि या अत्त्युच्च स्थानाच्या विष्णूचें वर्णन प्राचीन आर्य करीत. अत्युच्च स्थानीं विष्णु (सद्वस्तु) आहे, विष्णूचा नेत्रहि आहे, विष्णूचें पाऊलहि आहे. आम्हाला कोठें पोंचावयाचें आहे तें स्पष्ट करण्यासाठीं हें विष्णूचें उच्च स्थानचें पाऊल आहे. विष्णूचा नेत्र आम्हाकडे पहात राहून आम्हाला मार्ग दाखवीत, त्याचें पाऊल ज्या सर्वोच्च स्थानीं आहे, तेथें आम्हाला पोंचविणार आहे. वस्तुत: सर्व कांहीं व्यक्त करणारें वस्तुजातांतील सर्वव्यापी सत्यतत्त्व या नात्यानें विष्णुतत्त्व, सद्वस्तु, सर्वप्रथम सर्वोच्च स्थानीं अस्तित्वांत असतेंच. हें विष्णुतत्त्व विश्वावर नजर ठेवतें. मर्त्य मनुष्याला आपला वेध लावतें; प्रथम मनुष्याच्या मनाला, त्याच्या जाणिवेला हा वेध, हें आकर्षण, ठाऊकहि होत नाहीं; निसर्गाची, निसर्ग निर्मात्याची सर्वसामान्य वाटचाल चालू असते, त्या वाटचालींत निसर्ग जसजसा निसर्गनिर्मात्याकडे आकर्षिला जातो तसतसा निसर्गाबरोबर त्याच्या पोटांतील मानवहि अजाणतां आकर्षिला जातो. पण शेवटीं मानवाच्या जाणिवेला दिव्य विष्णूच्या, सद्वस्तूच्या आकर्षणाचा स्पर्श होतो, मानव हळूहळू क्रमाक्रमानें अधिकाधिक जागृत होऊन आपल्या आत्म्याचें क्षेत्र व उंची

 

पान क्र. ८१

 

वाढवून सद्वस्तूच्या दिव्य, उच्च स्थानाकडे नेणारा मार्ग जाणीवपूर्वक, विचारपूर्वक चढत राहतो. दिव्य जीवनाच्या उच्च पायरीवर चढून जाणें हाच खरा मानवाचा मानवोचित प्रवास होय; त्याच्या सर्व कार्यांत हें कार्य श्रेष्ठ आहे, ईश्वराला आवडणारा, स्वीकार्य होणारा असा यज्ञ, असा त्याग, मानवाकडून या कार्यांत, या प्रवासांत घडतो. हा दिव्य प्रवास, हेंच एक मानवाचें या विश्वांतील खरें काम आहे, त्याच्या मानवी जीवनाला या दिव्य प्रवासानेंच केवळ सार्थता येते. हा दिव्य प्रवास जर तो न करील तर त्याचें जीवन केवळ सरपटत जाणाऱ्या किड्याप्रमाणें होईल; अनंत क्षणजीवी किड्यांत हा एक मानवरूपी किडा ठरेल; स्थूल भौतिक विश्वांत अद्भुत, अतिप्रचंड वस्तूंच्या बरोबर पृथ्वी म्हणून जें एक चिखल-पाण्याचें क्षुद्र ठिकाण तयार झालें आहे, त्या ठिकाणीं सरपटत जाणाऱ्या किड्यांत मानवाची गणना करावी लागेल.

दृश्य जगाच्या विरोधात्मक घटनांमधून जें सत्य, जी वस्तुजाताच्या अंतरांतील सद्वस्तु वर यावयाची आहे, व्यक्त व्हावयाची आहे ती सद्वस्तु कोणती ? ज्ञानी लोकांनीं असें सांगून टाकलें आहे कीं, ती सद्वस्तु म्हणजे अनंत, आनंदमय, आत्मज्ञानपूर्ण अस्तित्व किंवा सत्ता होय. ही सत्ता सर्वत्र, सर्व वस्तूंत, सर्वकाळीं, आणि कालापलीकडेहि एकाच स्वरूपांत सारखी असते. दृश्य वस्तूंच्या पोटीं, त्यांच्या पाठीमागें, ती जाणीवपूर्वक राहते. या दृश्य वस्तूंच्या अत्यंत जोरदार क्रियात्मक हालचाली, त्यांचे अति प्रचंड समूह या अदृश्य सत्तेचा पूर्ण आविष्कार करूं शकत नाहींत, त्या सत्तेला मर्यादित करूं शकत नाहींत. ही सत्ता स्वयंभू आहे, तिचा आविष्कार होवो न होवो, त्यावर कांहीं तिचें अस्तित्व अवलंबून नाहीं. तिचें अनेक आविष्कार तिचें प्रतिनिधित्व करतात, तिला लोकांच्या नजरेस आणतात. पण त्या आविष्कारांनीं ती सर्वच्या सर्व व्यक्त झाली असें कधींहि होत नाहीं, होऊं शकत नाहीं. हे आविष्कार तिच्याकडे बोट दाखवितात, दुरून तिची अंधुक कल्पना देतात, पण तिला आमच्या पुढें प्रत्यक्ष उभी करूं शकत नाहींत. त्या आविष्कारांना जे आकार, जीं रूपें लाभतात त्या रूपांच्या, त्या त्या आकारांच्या अंतरीं ती सत्ता, ती सद्वस्तु स्वत: स्वत:लाच केवळ प्रत्यक्ष होते. ती ज्ञानमय सत्ता स्थूल आकारांत, आपल्या स्वयंभू पूर्णत्वाचा क्रमश: पूर्ण विकास करण्यासाठीं स्थूल, साकार होते. विकासक्रमानें मानवाकार झालेली ज्ञानमय सत्ता आत्मविकासानें अंत:प्रकाश, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूति ही विकासाची

 

पान क्र. ८२

 

पायरी गांठते. मानवाच्या आकारांत ती अंतःप्रकाशादिकांच्या साह्यानेंच स्वत: स्वत:ला ओळखते. विश्वामध्यें ती आपलें स्वरूप जेव्हां धारण करते तेव्हां तिला स्वतःचें ज्ञान होतें. स्वरूपाच्या ज्ञानाच्या पूर्वीं स्वरूप घेणें हें श्रद्धेच्या बळावर शक्य होतें. विश्वामध्यें तिचें स्वरूप-धारण आणि स्वरूप-ज्ञान यांचा अन्योन्यसंबंध आहे. तिच्या स्वरूपांत सत्ता आणि ज्ञान एकत्र अविभाज्य आहेत व सत्ता आणि ज्ञान यांजबरोबर आनंदहि शाश्वतचा आहे. सच्चिदानंद हेंच या सत्तेचें स्वरूप. आकारांच्या, अवस्थांच्या आंत ही सत्ता सर्वस्वी स्वतंत्र, व स्वायत्त असते. ती आपल्या आकारांना व अवस्थांना आपला सच्चिदानंद स्वरूपाचा ज्ञानमय आनंद देऊं शकते, देते. मन-प्राण-शरीर यांत अनंत, आनंदमय, ज्ञानमय सत्तेनें याप्रमाणें साकार व्हावें, (या त्रयीचा आकार अर्थात् या सत्तेला आवश्यक नाहीं -- तिचें आकारनिरपेक्ष अस्तित्व स्वयंभू शाश्वत आहेच.) आणि वैयक्तिक अस्तित्वाचें अशा प्रकारें रूपांतर व अवस्थांतर व्हावें, अशी या स्वयंभू सत्तेची योजना आहे. वैयक्तिक अस्तित्वाचा हाच उपयोग आहे. व्यक्तता नसतांना ही अव्यक्त सत्ता नेहमींच स्वत:शीं एकरूप, सच्चिदानंदरूप असते. हें सच्चिदानंदत्व व्यक्ततेनंतर, व्यक्तीव्यक्तींच्या संबंधांत, व्यक्ति व समुदाय यांच्या संबंधांत व दुसऱ्या अनेक संबंधांतहि तिला दाखवतां येतें.

मानवी बुद्धीला शक्य असणाऱ्या सर्व ज्ञानाच्या पलीकडे ती मूळ सद्वस्तु आहे आणि ती स्वत:ला सच्चिदानंद म्हणून ओळखते, हा वेदांताचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत आहे. दुसरे सर्व सिद्धांत याच्या पोटांत येतात, किंवा यावर अवलंबून असतात. मानवी बुद्धीला अज्ञेय असणाऱ्या सच्चिदानंदाचा मानवी आत्म्याला अनुभव घेतां येतो. आत्म्यापुढचीं सर्व दृश्यें असार-परित्याग पद्धतीनें तपासलीं - त्यांचीं आवरणें, त्यांचे आकार दूर केले - म्हणजे काय शिल्लक राहते? तीं दृश्यें नाहींशीं होतात व एक सच्चिदानंद ब्रह्म शिल्लक राहतें. हीच एक वस्तु, हाच एक अनुभव शिल्लक राहतो. दृश्यांच्या नाशवंत नामांत व रूपांत त्यांचें तत्त्वभूत असें अविनाशी सत्य काय आहे ? अशा प्रकारें सार-परिग्रह पद्धतीनें आत्म्यापुढील सर्व दृश्यांची तपासणी केली तरी सच्चिदानंद ब्रह्म ही एकच वस्तु, हा एकच अनुभव शेवटीं शिल्लक राहतो. आपलें ध्येय जीवनाची परिपूर्ति हें असो, किंवा जीवनातीत स्थिति हें असो; आपलें ध्येय आत्म्याची शुद्धता, शांति व मुक्ति हें असो, किंवा आत्म्याचें सामर्थ्य, आनंद, समग्रता

 

पान क्र. ८३

 

(पूर्णता) हें असो -- या ध्येयांच्या मागें लागणारी आमची मानवी जाणीव, वस्तुत: सदासर्वदा सच्चिदानंदाच्याच शोधांत असते; अज्ञात, सर्वव्यापी, जिच्यावांचून कोणाचेंच चालत नाहीं अशी सच्चिदानंद ब्रह्म ही वस्तु आहे; आणि ज्ञानांत व भावनांत किंवा संवेदनांत व कृतींत, सच्चिदानंदाचा शोध करून अनुभव घेण्याकडे आमच्या जाणिवेचें सर्व लक्ष लागलेलें असतें.

विश्वातीत, अज्ञेय असें सच्चिदानंद हें, विश्व आणि व्यक्ति या दोन दृश्यांत उतरतें. हीं दोन दृश्यें सारभूत आहेत. या दोन वस्तूंच्यामध्यें अनेक समष्टी, समुदाय आहेत. पण ते सर्व या दोहोंच्या अन्योन्यावर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांतून निर्माण होतात. त्या अज्ञेयाकडे जावयाचें तर विश्व व व्यक्ति या दोहोंच्या द्वारांच जावयास पाहिजे. सर्वोत्तम सद्वस्तूचें हें खालीं येणें, स्वभावत: तिचें स्वत:ला लपविणें आहे. हें अवतरण किंवा लपणें क्रमाक्रमानें घडतें. एकाखालीं एक, अशा अनेक भूमी किंवा भूमिका, पायऱ्या किंवा पातळी या अवतरणाच्या क्रमांत तयार होतात. अवतरणाच्या क्रमांत ही सर्वोच्च सद्वस्तु लपण्याच्या उद्देशानें एकावर एक अशीं अनेक आवरणें घेत असते. ती अगदीं खालीं स्थूलाच्या भूमिकेवर, स्थूलाच्या आवरणांत एकदां येऊन पोंचली म्हणजे तिचा उलट क्रम - वर चढण्याचा, आवरण दूर सारून आत्मदर्शन देण्या-घेण्याचा क्रम - सुरूं होतो. अर्थात् ब्रह्माच्या अवतरणामध्यें ज्या क्रमवार अवतरण-भूमिका असतात त्याच उलटक्रमानें मनुष्याच्या क्रमवार आरोहण-भूमिका होतात. तें अज्ञात ब्रह्म जें जें आवरण क्रमानें घेत घेत लपतछपत खालीं येतें, तें प्रत्येक आवरण ब्रह्मभक्ताला, ब्रह्मशोधकाला क्रमश: उलट क्रमवारीनें ब्रह्मसाक्षात्काराचें साधन बनतें. जड, भौतिक, स्थूल निसर्ग ही सर्वांत खालची भूमिका, सर्वांत बाहेरचें आवरण. हा स्थूल, भौतिक निसर्ग म्हणजे जणुं झोंपलेलें ब्रह्मशरीर असतें. या झोंपेंत निसर्गाच्या हालचाली अगदीं तालबद्ध सुसंगत चाललेल्या असतात. निसर्गाच्या शक्तीच्या या सुव्यवस्थित हालचाली ज्या आत्म्याच्या किंवा तत्त्वाच्या योजनेमुळें होतात, त्या आत्म्याची किंवा तत्त्वाची जाणीव निसर्गाला नसते. निसर्गाला जणुं भौतिक समाधि, महासमाधि लागलेली असते. या समाधींत निसर्ग मौन धारण करीत असतो. ही ब्रह्माची सर्वांत खालच्या भूमिकेवरील अवस्था झाली. या अवस्थेंतून निसर्ग किंवा विश्व - किंवा विश्वरूप ब्रह्म म्हणा - धडपड करीत वरच्या प्राणमय जडाच्या अवस्थेंत चढून जातें. या अवस्थेंत

 

पान क्र. ८४

 

जड भौतिक अवस्थेंतील स्थिर एकमुखी तालबद्धता असत नाहीं. कमी अधिक अस्थिर, अव्यवस्थित परंतु विविध प्रकारची व द्रुतगतीची तालबद्धता, निसर्गाच्या जीवमान वर्गांत आढळून येते. या जीवाच्या, प्राणमय जडाच्या, तालबद्ध गतीला लागूनच, गतिमान् आत्मजाणिवेची हद्द असतें. विश्वरूप ब्रह्म, जडता अनुभवून, जीवता-प्राणमयता-अनुभवण्यासाठीं धडपडत वर चढतें त्याप्रमाणें प्राणमयता, जीवता अनुभवून वरतीं मनाच्या क्षेत्रांत तें चढतें. या मनाच्या क्षेत्रांत मनोमय जीव, स्वत:ला व विश्वाला ओळखूं लागतो. एवढी जागृति विश्वाच्या सर्वोच्च घटकांत आली, इतरांपासून वेगळेपणें स्वत:ला ओळखणारें व्यक्तित्व त्याच्या सर्वोच्च घटकांत आलें म्हणजे, त्याला (विश्वाला) आपल्या सर्वश्रेष्ठ कार्यासाठीं (विश्वातीताची प्राप्ति करून घेण्याच्या कार्यासाठीं) अवश्य असणारें आत्मोद्धाराचें साधन मिळाल्यासारखें होतें. परंतु विश्वाचें इष्ट कार्य, मन कांहीं शेवटपर्यंत करूं शकत नाहीं, पूर्ण करूं शकत नाहीं. विश्वानें आरंभिलेलें विकासकार्य केवळ कांहीं मर्यादेपर्यंत तें पुढें नेतें. मन हा एक श्रमिक आहे. त्याला तीव्र बुद्धि लाभलेली आहे, पण ही बुद्धि मर्यादित शक्तीची असून त्या क्षेत्रांतच फक्त ती काम करूं शकते. प्राणमय जीवनानें जो कमीअधिक अव्यवस्थित माल मनापुढें मांडलेला असतो तो घेऊन त्यांत, त्याच्या मर्यादित शक्तीनुसार कांहीं सुधारणा करणें, इष्ट कार्यासाठीं तो योग्य करून घेणें, त्याच्यांत विविधता येईल असें करणें, त्याचें वर्गीकरण करणें - हे इतके संस्कार, प्राणमय जीवनानें दिलेल्या मालमसाल्यावर करून, हा मसाला मन त्या कारागिराच्या हातीं देतें, जो कारागीर आमचें जीवन दिव्यतामय करण्याच्या कामांत सर्वश्रेष्ठ कर्तबगारीचा कलावंत आहे. हा कलावंत अतिमानसांत राहतो. अतिमानस म्हणजे अतिमानव. [अतिमानस (विज्ञान) ज्याला लाभलें तो अतिमानव] तेव्हां आमचें विश्व मनापर्यंत चढून आलें आहे, तें आणखी वर चढावयाचें आहे; मनापेक्षां श्रेष्ठ अशा जाणिवेच्या शक्तीनें, अतिमानसिक शक्तीनें युक्त व्हावयाचें आहे. ही श्रेष्ठ शक्ति किंवा तत्त्व, ही श्रेष्ठ अवस्था व क्रियासामर्थ्य विश्वाला लाभलें म्हणजे विश्व आणि व्यक्ति या दोघांना त्या विश्वातीताची, विश्वातीत परतत्त्वाची ओळख होते व प्राप्ति होते. हें परतत्वच वस्तुत: विश्व आणि व्यक्ति या रूपांनीं व्यक्त झालें आहे. ही अतिमानसिक किमया पूर्ण झाली कीं विश्व आणि व्यक्ति यांना एकमेकांचा संबंध स्पष्ट होतो, एक-

 

पान क्र. ८५

 

मेकांचें कार्य एकमेकांना पूरक आहे हें स्पष्ट होतें, आणि म्हणून या दोनहि परतत्त्वाच्या प्रतिमा अन्योन्यसंबंधांतील विसंवाद दूर करून पूर्ण सलोख्यानें वागतात, ऐक्यभावानें बांधल्या जातात.

प्राण आणि मन यांच्या व्यवहारांत जी अव्यवस्था असते ती अतिमानसिक दृष्टि लाभल्यानें दूर होते, कारण या दृष्टीला भौतिक व्यवस्थेपेक्षां अधिक पूर्ण अशा व्यवस्थेचें रहस्य दिसतें. प्राण आणि मन यांच्या खालच्या पातळीवर जें भौतिक द्रव्य असतें, त्यांत पूर्ण शांत अवस्था आणि अमर्याद शक्तीची प्रचंड क्रिया यांचा समतोल असतो. परंतु या गोष्टी त्या द्रव्याच्या स्वतःच्या नसतात, त्या स्वत:च्या आहेत हा अनुभव त्याला नसतो. त्याची शांतता त्याची नसते, ती शांतता म्हणजे जाणिवेवरील एक निस्तेज पडदा, ज्ञानशून्य जडतेचा पडदा असतो; ती एक जाणिवेच्या झोंपेची, संवेदनाहीन अवस्था असते; किंवा असें म्हणतां येईल कीं, जींत जाणीव आंत कोंडून टाकलेली, प्रतिबंधक औषधानें रुद्ध केलेली आहे, अशी ती जड भौतिक द्रव्याची वरची शांतता असते. हें जडद्रव्य एका शक्तीमुळें गतिमान् होतें; ही शक्ति त्या द्रव्याचा खरा आत्मा म्हणून असते, परंतु त्या द्रव्याला त्याच्या जड भौतिक स्थितींत या आत्म्याची जाणीव नसते; त्या आत्म्याच्या अनुभवांत त्याला भाग घेतां येत नाहीं; त्याच्या पोटीं काम करणाऱ्या तालबद्ध शक्तीच्या आनंदाचा, त्याच्या आत्म्याच्या आनंदाचा लाभ घेण्याइतकी जागृति त्याच्यांत असत नाहीं.

प्राण आणि मन यांच्यांत एवढी जागृति आलेली असते कीं, त्यांना 'आपला आत्मा' म्हणून कांहीं असावें असें वाटतें, त्याचा शोध घ्यावा असें वाटतें, त्याची तृप्ति व्हावी असें वाटतें; या गरजा त्यांना भासूं लागतात आणि म्हणून त्यांची धडपड सुरू होते. मनाच्या अज्ञानाची ज्ञानासाठीं व प्राणाच्या वासनेची भोगासाठीं धडपड सुरू होते. कितीहि धडपड केली तरी प्राणाची वासना, मनाची जिज्ञासा अतृप्तच राहते. तरीपण ही धडपड, आत्मज्ञान व आत्मतृप्ति प्राप्त होण्याची शक्यता निर्माण करते. आत्मतृप्तीचें, आत्मपरिपूर्तीचें क्षेत्र, प्राण आणि मन यांच्या क्षेत्राच्या पलीकडे आहे. प्राण आणि मन आपल्या प्रकृतींतून आपला उद्धार करून जेव्हां एक प्रकारची अतिप्राकृतिक अवस्था प्राप्त करून घेतात तेव्हां त्यांना आत्मज्ञानाचा व आत्मतृप्तीचा लाभ घडतो. जड भौतिक निसर्गांत दिसणारी, पूर्ण शांतता आणि प्रचंड क्रिया यांची समतोलता ही ज्याचें स्थूल प्रतिबिंब आहे ती खरी दिव्य समतोलता (स्थितप्रज्ञता), प्राण व मन

 

पान क्र. ८६

 

यांच्या पलीकडे आमच्या जाणिवेच्या अनुभवास येते. या अतिमानसिक क्षेत्रांत जीं शांतता असते ती जडता किंवा जाणिवेची रुद्ध अवस्था नसते, तर अमर्याद शक्तिसंपन्न असीम आत्मजाणिवेची केंद्रित अवस्था असते; तसेंच या क्षेत्रांतील अमर्याद शक्तीची प्रचंड क्रिया, ही अनिर्वचनीय आनंदाच्या अखंड लहरींनीं संपन्न असते; कारण या क्षेत्रांत शक्तीची हालचाल होते ती तडफडणाऱ्या वासनेची किंवा धडपडणाऱ्या अज्ञानाची हालचाल नसते, तर तिची प्रत्येक हालचाल अखंड असीम आत्मशांति आणि आत्मसामर्थ्य यांचा आविष्कार म्हणून होत असते. प्राण आणि मन यांनीं अतिमानसिक क्षेत्रांत पदार्पण केलें म्हणजे मनाच्या अज्ञानाला तो ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो, ज्या प्रकाशाची अंधुक एकदेशी छाया तें स्वत:च्या क्षेत्रांत असतें; त्याचप्रमाणें या क्षेत्रांत प्राणाच्या वासना पूर्णतया शांत होऊन लयास जातात, कारण येथें जी इष्टसंपन्नता व कृतार्थता त्यांना लाभते, तिच्यासाठींच वस्तुत: त्यांच्या पूर्वींच्या क्षेत्रांत असतां त्यांची धडपड चाललेली असते; अगदीं अतिपाशवी भौतिक भोगाची इच्छा जेव्हां या वासना करीत होत्या तेव्हां देखील, वस्तुत: या अतिमानसिक क्षेत्रांतील ''भोगासाठीं'' त्या आतुर होत्या; त्यांना डोळे नव्हते, त्यांचें स्थान खालीं अंधारांत होतें, त्या पतित स्थितींत काळ कंठीत होत्या म्हणून केवळ त्यांच्या आकांक्षा त्या वेळेला पतित, क्षुद्र, अधम असें बाह्य स्वरूप धारण करून होत्या. त्या आकांक्षांचें हृदय अतिमानसिक क्षेत्रांतील 'भोगांचीच' इच्छा करीत होतें म्हणून त्या क्षेत्रांतील उत्तम विशुद्ध भोग भोगून त्या पूर्णपणें तृप्त व शांत होतात.

विश्व आणि व्यक्ति या दोघांनाहि विश्वातीत परतत्त्वाकडे, ब्रह्माकडे चढण्याच्या कार्यांत एकमेकांची जरूर असते. नेहमींच विश्व आणि व्यक्ति एकमेकांकरितां जगत असतात आणि एकमेकांना लाभदायक होतात. विश्व हें अनंत काल व आकाश किंवा अवकाश यांत पसरलेलें सर्वरूप ब्रह्म, व व्यक्ति हें काल आणि आकाश किंवा अवकाश यांच्या मर्यादांत केंद्रित झालेलें तेंच सर्वरूप ब्रह्म होय. सर्वरूप ब्रह्माची एकरूप सर्वता, बाह्यतः अनंत विस्ताराच्या द्वारां व्यक्त करण्याचा प्रयत्न विश्व करीत असतें; परंतु हा प्रयत्न पूर्णतया यशस्वी होत नाहीं, कारण बाह्य विस्ताराच्या संसारांत एकच एक सद्वस्तु किंवा अस्तित्व हें अनेक अस्तित्वांच्या किंवा वस्तूंच्या बेरजेचें स्वरूप धारण करतें - अर्थात् ही बेरीज कांहीं ''मूळ एक'' किंवा ''अंतिमएक'' होऊं शकत नाहीं. आरंभ-शून्य

 

पान क्र. ८७

 

व अखेर-शून्य असा आवर्त दशांश, (recurring decimal) हेंच एक रूप बेरजेच्या अस्तित्वाला येऊं शकतें. विश्व हें अशा अडचणीत खऱ्या एकतेच्या ध्यासानें आपल्यामध्यें, सर्वरूप ब्रह्म जींत आत्मजाणिवेसह केंद्रित झालें आहे अशी व्यक्ति, निर्माण करतें. या व्यक्तीच्या द्वारां विश्वाला विश्वातीतापर्यंत पोंचण्याची आकांक्षा धरतां येते. प्रकृतीनें अगदीं खालच्या पातळीवरून परत फिरून पुरुषाकडे त्याच्या दर्शनासाठीं जाण्याचें ठिकाण म्हणजे आत्मजाणीवपूर्ण व्यक्ति हें आहे. व्यक्तीच्या द्वारां विश्व आपला आत्मा शोधून काढण्याच्या मार्गास लागतें; ब्रह्म पूर्णपणें निसर्गाचें रूप घेऊन ''कृतार्थ'' झाल्यावर, तो निसर्ग क्रमश: ब्रह्म होण्याच्या मार्गाला लागतो.

वर चढून विश्वातीत ब्रह्माची गांठ घेण्यासाठीं, विश्वाला व्यक्तीची आवश्यकता असते, त्याप्रमाणें व्यक्तीलाहि त्या कार्यासाठीं, विश्वाची आवश्यकता असते. व्यक्तीला आत्मज्ञानप्राप्ति, आत्माविष्कार करण्याची प्रेरणा व साधनसामग्री विश्वाकडून मिळते. व्यक्तीचें अधिष्ठान, उदयस्थान विश्व आहे; तिची साधनसंपत्ति, तिचें कार्यक्षेत्र, तिला जें दिव्य कर्म करावयाचें असतें त्या कर्माचा कच्चा मसाला, सर्व कांहीं विश्वांत आहे, विश्वच पुरवतें. व्यक्तींत विश्वगत ब्रह्मजीवन केंद्रित होऊन राहतें; अर्थात् या केंद्रीभूत ब्रह्माला मर्यादित जागेंत मर्यादित शक्तीनें व्यवहार करावा लागतो. मूळ ब्रह्म एक, अद्वितीय, अंतर्भेदशून्य, एकरस, एकतत्त्व असल्यानें त्याला मर्यादा, सीमा, बंधन कसलेंहि नसतें; पण तशी कांहीं 'व्यक्ति-ब्रह्माची' अवस्था नसते. म्हणून स्वतांत समाविष्ट असलेली 'मूळ-ब्रह्माची' सर्वता व्यक्तीनें व्यक्त करावयाची तर तिला अनिवार्यपणें जाणिवेची विश्वव्यापकता व अ-व्यक्तिता धारण करणें भाग असतें. व्यक्तीनें आपली जाणीव कितीहि विश्वव्यापक केलीं, आपली सामान्य व्यक्तिता कितीहि सूक्ष्म, शून्यवत् करून टाकली, तरी तिला विश्वामध्यें ईश्वरी कार्य करण्यासाठीं एक प्रकारचें गूढ व्यवहार साधन - सामान्य व्यक्तित्वांतील व्यक्तित्व - संभाळून ठेवावें लागतें. व्यक्तीची सामान्य व्यक्तिभावना ही या असामान्य विश्वावेगळ्या गूढ ''व्यक्तित्वाचें'' तमोमय अहंकारी प्रतीक असते. हें गूढ व्यक्तित्व जर व्यक्तीनें संभाळून ठेवलें नाहीं तर तिनें आपलें ध्येय साधलें नाहीं असें होईल, तिला घातलेला प्रश्न तिनें सोडून दिला, सोडवला नाहीं असें होईल; ज्या ईश्वरी कार्याकरितां तिनें जन्म अंगीकारला तें ईश्वरी कार्य तिजकडून होणार नाहीं.

 

पान क्र. ८८

 

क्रियामय, अतिव्यापक जीवन म्हणून व्यक्तीपुढें विश्व उभें राहतें. या महा-जीवनाचें महान् गतिचक्र कसें चालतें त्याचें पूर्ण रहस्य व्यक्तीनें हस्तगत करावयाचें असतें. विश्व म्हणून एकमेकांशीं संघर्ष करणारे, कार्यप्रवृत्त शक्तींचे अनंत परिणाम, व्यक्तीसमोर मोठा गोंधळाचा जमाव करून असतात, त्याचप्रमाणें भविष्य घडविणाऱ्या, कार्यरूप न घेतलेल्या प्रचंड कार्यकारी शक्तींचें, भोंवऱ्यासारखें भोंवळ आणणारें भ्रमण व्यक्तीच्या समोर चाललेलें असतें. या गोंधळांतून व्यक्तीला कांहीं श्रेष्ठ प्रकारची व्यवस्था, अननुभूत सुसंवादित्व निर्माण करावयाचें असतें. मानवाचें सुसंवाद निर्माण करण्याचें हें व्यवस्थाकार्य ''मानवाची प्रगति'' या शब्दांनीं दाखविलें जातें. भौतिक निसर्गानें एक प्रकारची सुव्यवस्था व सुसंवादित्व आपल्या व्यवहारांत निर्माण करून ठेवलेलेंच आहे. मानवी व्यक्तीनें थोड्याशा भिन्न स्वरूपांत भौतिक निसर्गानें केलेलेंच कार्य करावयाचें आहे, असा मानवी प्रगतीचा अर्थ नाहीं. त्याचप्रमाणे मनाच्या पातळीवर तेथील श्रेष्ठ साधनांचा उपयोग करून पाशवी जीवन जगणें हेंहि मानवी जीवनाचें ध्येय नाहीं. तसें असतें तर, ज्या समाजव्यवस्थेंत बराचसा सुखभोग आणि बरेंचसे भावनिक व बौद्धिक समाधान मानवाला मिळण्याची खात्री आहे अशा समाजव्यवस्थेनें मानव संतुष्ट झाला असता व त्याची प्रगति थांबली असती. आवश्यक वस्तू बऱ्याशा प्रमाणांत पशूला लाभल्या कीं तो तृप्त व संतुष्ट असतो. देवकोटींतले जीव झगझगाटाच्या वैभवांत असतात व त्या वैभवांत ते संतुष्ट असतात. पशूंना व देवांना ज्या श्रेयाची, श्रेष्ठ आत्महिताची कल्पना येत नाहीं त्या श्रेयाचा लाभ करून घेतल्याशिवाय कोणत्याहि स्थितींत मानव मात्र कायम विसांवा घेत बसत नाहीं. जीवमान प्राण्यांत मानव सर्वांत श्रेष्ठ आहे. कारण तो सर्वांत अधिक असंतुष्ट आहे. त्याला मर्यादांचें बंधन व दडपण सर्वांपेक्षां अधिक टोंचतें, बोंचतें, असह्य होतें. दिव्य हव्यासानें झपाटल्याप्रमाणें वेड लागल्याप्रमाणें दूरच्या ध्येयामागें लागणारा असा, मानव हा बहुधा एकच जीववर्ग आहे. अशा दिव्य वेडाची पात्रता इतर जीवांत, देवांत कोठेंहि नाहीं.

अशारीतीनें जीवनाचा, विश्वजीवनाचा जो आत्मा आहे, त्या विश्वात्म्याच्या इष्टसाधक सुप्तशक्ती मानवी व्यक्तींत सांठविल्या आहेत, केंद्रित झाल्या आहेत. सर्व जीवांत मानवी व्यक्ति हेंच प्रामुख्यानें विश्वात्म्याच्या इष्टसाधक सुप्तशक्तींचे केंद्रस्थान आहे. विश्वात्म्याला

 

पान क्र. ८९

 

इष्ट असें ईश्वराचें अवतरण स्वतांत घडवून आणण्यास लागणारी पात्रता 'मानव-पुत्र' पूर्णपणें मिळवूं शकतो. मानवाला मनु, मनन करणारा, मनोमय पुरुष, मनोमय आत्मा असें प्राचीन ऋषीनीं म्हटलें आहे. मानव हा केवळ उच्च प्रकारचा सस्तन प्राणी नव्हे, तो मननशील आत्मा आहे. जड द्रव्यानें बनलेल्या पशुदेहांत वास्तव्य करणारा मननशील आत्मा म्हणजे मानव होय. मानव हा ''नाम'' किंवा अज्ञेय तत्त्व आहे, त्यानें कांहीं कार्यासाठीं आकार किंवा देह स्वीकारला आहे. मानव या आपल्या देहाचा उपयोग एक माध्यम म्हणून करतो, आत्म्याला द्रव्याशीं व्यवहार करण्याचें मधलें साधन म्हणून करतो. जड द्रव्याच्या आश्रयानें, या द्रव्याच्या अंतरंगांतून जें पशुजीवन वर आलें आहे, तें पशुजीवन मानवाच्या जीवनाची एक खालची पायरी, पातळी किंवा भूमिका आहे. याच्या वरची भूमिका, मनाची किंवा मानसिक जीवनाची. या भूमिकेवर मानव पक्कें ठाण मांडून बसला आहे. विचार करणें, भावना करणें, इच्छा करणें जाणीवपूर्वक बुद्धिपुरःसर हालचाल करणें, हीं मानसिक जीवनाचीं किंवा मनाचीं अंगें आहेत. भौतिक जड द्रव्य व त्यांत व्यक्त होणाऱ्या प्राणशक्ती यांचा ताबा मिळविण्याचा मन प्रयत्न करीत असतें; त्याचप्रमाणे या द्रव्याला व या शक्तींना, क्रमवार प्रगमनशील रूपांतराचा आपला जीवननियम लावण्याचा प्रयत्नहि मन करीत असतें. मनाची किंवा मानसिक जीवनाची भूमिका ही मानवी जीवनाची शेवटली भूमिका नव्हे, तर ती मधली भूमिका आहे. या भूमिकेच्या वर मानवी जीवनाची शेवटची तिसरी भूमिका आहे. मानवी मन या सर्वोच्च भूमिकेच्या शोधांत असतें. ही सर्वोत्तम भूमिका लाभली म्हणजे मानवाला आपल्या देहाच्या व मनाच्या जीवनांत ही भूमिका व्यक्त करावयाची असते. आज मानवाचा आत्मा ज्या कांहीं गुणांनीं संपन्न आहे, त्यापेक्षां स्वभावत: श्रेष्ठ अशा गुणांनीं व शक्तींनीं संपन्न असें कांहीं तत्त्व, या सर्वोच्च भूमिकेवर आहे. या तत्त्वाला मानवी देहाच्या व मनाच्या व्यवहारांत कार्यान्वित करणें हा मानवाच्या दिव्य जीवनाचा पाया होय.

मानव हा मनाच्या भूमिकेवर आल्यावर त्याला स्वत:च्या आत्म्यासंबंधानें कांहीं कल्पना येते. ही कल्पना आत्म्याचें खरें स्वरूप दाखविते असें तो मानतो. आत्मविषयक अधिक खोल ज्ञान झाल्यानंतर ही त्याची प्राथमिक कल्पना त्याला समर्पक वाटेनाशी होते. त्याला भासमान होणाऱ्या नव्या आत्म्याला म्हणायचें काय, कोणतें सूत्र त्याचें यथार्थ वाचक होईल, याचा तो विचार

 


पान क्र. ९०

 

करतो; त्याचप्रमाणें या नव्या आत्म्याचें खोल ज्ञान झाल्यावर व्यक्त स्वरूप पाहण्याचाहि तो प्रयत्न करतो. याप्रमाणें आत्मवर्णनाच्या व आत्मदर्शनाच्या प्रयत्नांत तो असतां त्याला असें आढळून येतें कीं, हा नवा आत्मा, त्याचें अस्तित्व, दोन बाजूंनीं - त्याच्या वरच्या बाजूनें व त्याच्या खालच्या बाजूनें- शून्यानें मर्यादित झालेलें आहे; शून्यानें म्हणजे, या नव्या आत्म्याच्या शून्य भावानें, अभावानें. या आत्म्याच्या अभावाच्या ठिकाणीं दुसरें कांहीं अज्ञेय किंवा ज्ञेय असूं शकेल. मानवाची प्रगति सध्यां जेथवर झाली आहे, ज्या मनोमय आत्म्यापर्यंत तो सध्यां पोंचला आहे, त्याच्या पलीकडे आत्मज्ञानमय अनंत अस्तित्वाचा आत्मा आहे. या आत्म्याचें सामर्थ्य, त्याचा प्रकाश, त्याचा आनंद, मनोमय आत्म्याच्या मानवाला प्रतीत होतो, त्याच्यावर या अनंत आत्म्याचा प्रभाव पडतो. आपला या आत्म्यासंबंधींचा विचार वा अनुभव, मनाला सुलभ अशा शब्दांत मांडण्याचा तो प्रयत्न करतो. हा आत्मा अनंत, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान्, अमर, मुक्त, प्रेमरूप व आनंदरूप परमेश्वर आहे असें या आत्म्याचें तो वर्णन करतो. परंतु त्याला असें दिसतें कीं, हा आत्मसूर्य जेथें प्रकाशतो त्या क्षेत्राला दोन बाजूंनीं रात्रीनें मर्यादित केलेलें आहे; या सूर्याच्या वरतीं खालच्याहून व्यापक व गाढ अंधकार आहे; या आनंदरूप उपरिनिर्दिष्ट आत्म्याची, म्हणजे परमेश्वराची, पूर्ण ओळख करून घेण्याचा साधकानें प्रयत्न केला म्हणजे या आत्म्याचें स्वरूप बदलत बदलत अशा कोटीला जातें कीं, तो स्वरूपतः समूळ नाहींसा होतो. दुसरें असें कांहीं अज्ञेय तत्त्व त्याच्या जागीं येतें कीं, मनानें निर्मिलेलें कोणतेच वर्णनात्मक शब्द त्याला लागूं पडत नाहींत - मनाच्या कोणत्याहि एका शब्दानें किंवा सर्व शब्दांनीं मिळून या अज्ञेय तत्त्वाचें वर्णन होऊं शकत नाहीं. तेव्हां हा आत्मा, हा परमेश्वर बाजूला टाकून परमेश्वर नाहीं असें म्हणून त्याच्या पलीकडे असलेल्या अज्ञेय तत्त्वाला तो मानूं लागतो. निदान त्याच्या मनाला असें दिसतें कीं, परमेश्वर आपला स्वभाव टाकून दुसरेंच कांहीं तत्त्व बनतो; 'परमेश्वर' या कल्पनेला किंवा वर्णनाला योग्य असें त्याचें स्वरूप रहात नाहीं. ही वर पाहणाऱ्या मनाची गोष्ट झाली. येथेंहि विश्वामध्यें, त्याच्या स्वत:मध्यें, त्याच्या आजूबाजूला सर्वत्र, या नव्या आत्म्याच्या म्हणजे, परमेश्वराच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी त्याला दिसतात - परमेश्वर दिसत नाहीं. येथें मरण नेहमीं त्याच्या मागें लागलेलें असतें, त्याचें अस्तित्व आणि अनुभव मर्यादांनीं जखडलेलीं असतात; प्रमाद, ज्ञानशून्यता, दुर्बलता,

 

पान क्र. ९१

 

जडता, दुःख, व्याधि, दुष्टपणा यांचा नेहमीं त्याला जांच होतो, या गोष्टी त्याच्या धडपडीला अयशस्वी करतात. या कारणामुळें परमेश्वर नाहीं, असें त्याला वाटणें अटळ होतें. निदान त्याला असें दिसतें कीं, परमेश्वर स्वतःच स्वत:ला नष्टवत् करतो, आपलें खरें शाश्वत रूप टाकून कोणत्या तरी रूपाच्या किंवा घटनेच्या आंत दडतो.

ईश्वराच्या वरतीं, पलीकडे, जें अज्ञेय तत्त्व ईश्वराला स्वतांत विलीन करून घेतें, ईश्वर नाहीं असें करून टाकतें, तें तत्त्व अकल्पनीय म्हणून गूढ व मनाला न कळण्यासारखें असतें. परंतु येथें जें कांहीं ईश्वराला खऱ्या अस्तित्वांतून नाहींसें करतें तें कळण्यासारखें असतें, कळतें, निश्चित स्वरूपाचें असतें; तरीपण त्यालाहि गूढत्वाच्या वर्गांत घालणें भाग असतें. कारण ईश्वर नाहीं म्हणावयास लावणाऱ्या वस्तू किंवा घटना खरोखरी आहेत काय, कां आहेत, अस्तित्वांत आल्या कशा, हें प्रश्न त्याला येथें सुटत नाहींत. या वस्तूंच्या, घटनांच्या प्रक्रिया त्याला दिसतात, या प्रक्रियांचा त्याजवर परिणाम होतो, त्याला त्यांचा अनुभव येतो; परंतु त्यांचें रहस्य, त्यांचें सत्य, त्यांच्यांतील तत्त्व काय आहे तें त्याला शोधूनहि सांपडत नाहीं.

कदाचित् या वस्तू व घटना अनाकलनीयच आहेत, ज्याप्रमाणें ईश्वराच्या वरतीं, पलीकडे, त्याला नष्टवत् करणारें अनाकलनीय असें कांहीं आहे तसें, या वस्तूंचें व घटनांचें सत्य-स्वरूप खरोखरीच अनाकलनीय आहे असें कबूल करणें कदाचित् योग्य होईल. किंवा असाहि पक्ष घेतां येईल कीं, या वस्तूंत व घटनांत सत्य असें तत्त्व मुळीं नाहींच, त्या भ्रमरूप आहेत, 'असत्' आहेत. ईश्वराच्या पलीकडील, त्याला नष्टवत् करणारें तत्त्व, शून्य आहे असें केव्हां केव्हां म्हटलें जातें, तसें हें ईश्वराच्या खालीं असणारें तत्त्वहि वस्तुत: शून्य, अभावरूप, असूं शकेल; तें तसें आहे असें म्हणणारे निघतील, आहेतहि तथापि ज्याप्रमाणें ईश्वराच्याहून वरच्या पातळीवरील असत् - म्हणजे शून्य - ही अडचणींतून बाहेर पडण्याची पळवाट आम्हीं धरीत नाहीं, त्याप्रमाणें ईश्वराच्याहून खालच्या पातळीवरील, त्याला नष्टवत् करणारें असत् - म्हणजे शून्य - आहे ही गोष्ट आम्ही मानीत नाहीं. हें येथील 'असत्', पूर्णतया सत्यताशून्य आहे असें म्हणणें किंवा अनर्थकारक भ्रम हेंच त्याचें खरें रूप आहे असें कल्पून त्याच्या पासून पळून जाण्यासाठीं मार्ग शोधणें, या गोष्टींचा अर्थ असा होतो कीं, आमच्यापुढे असलेला प्रश्न आम्ही टाळतों, आमचें कर्तव्य आम्ही

 

पान क्र. ९२

 

टाळतों. ईश्वर नष्टवत् करणाऱ्या व सच्चिदानंदन-स्वरूपाच्या विरुद्ध असलेल्या वस्तूंना व घटनांना जीवन हें असत्य मानीत नाहीं, सत्य मानतें. या वस्तूंचें व घटनांचें अस्तित्व नित्य नसतें, परिमित कालाचें असतें एवढेंच. या वस्तू व घटना आणि साधुत्व, ज्ञान, आनंद, सुख, जीवित, मरणोत्तर अस्तित्व, सामर्थ्य, सत्ता, संवर्धन - या तद्विरोधी वस्तू व घटना विश्वात्म्याच्या व्यवहाराची, नियोजित कार्याची, आवश्यक साधनसामग्रीच आहेत.

अशी पुष्कळ शक्यता आहे कीं, वर सांगितलेल्या अन्योन्यविरोधी गोष्टी भ्रमाचा परिणाम नसून, व्यक्तीनें कल्पिलेल्या चुकीच्या संबंधांचा परिणाम असतील किंवा या संबंधांमुळें त्यांच्याबरोबर अनिवार्यपणें येणाऱ्या त्याच्या सहचारी गोष्टी असतील. या संबंधाला चुकीचा संबंध म्हणावयाचें तें अशाकरितां कीं, विश्वांत व्यक्तीचें जें स्थान आहे त्या संबंधीची खोटी कल्पना करून त्या खोट्या कल्पनेवर व्यक्तीनें हा संबंध आधारलेला असतो. व्यक्तीनें विश्वांतील आपल्या स्थानासंबंधीं खोटी कल्पना केली म्हणजे त्याबरोबर ईश्वर व निसर्ग यांजकडे, तसेंच स्वत: व परिस्थिति यांजकडे पाहण्याची व्यक्तीची दृष्टि व वृत्ति अवास्तव होते, वस्तुस्थितीला धरून असत नाहीं; आणि हा चुकीचा संबंध सर्व अनर्थाला कारण होतो. व्यक्ति ज्या विश्वांत राहते त्या विश्वाशीं, आणि स्वत:च्या ध्येयरूप अंतिम स्वरूपाशीं व स्वभावाशीं, विसंगत, विसंवादी असें तिचें वर्तन आणि वृत्ति, तिनें कल्पिलेल्या या चुकीच्या संबंधामुळें होत असल्यानें, म्हणजेच ती असावी तशी नसून वेगळीच बनली असल्यानें, तिला वस्तुजातांतील महान् गूढ सत्याचीं अन्योन्यविरोधी व्यक्त रूपें करतील तो जांचकांच सहन करणें भाग पडतें. अर्थात् हा जांचकांच मानव पतित झाल्याचें प्रायश्चित्त म्हणून केला जात नाहीं, तर मानवाची प्रगति व्हावी म्हणून केला जातो. हा जांचकांच मानवी प्रगतीला केवळ उपकारक नव्हे तर आवश्यक असतो; मानवाला जें कार्य करावयाचें आहे, व पूर्णतेनें पार पाडावयाचें आहे त्या कार्याच्या प्राथमिक अंगाप्रमाणें ह्या जांच करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या कार्याच्या जणुं पहिल्या पायऱ्याच आहेत; मानवाला जो मुकुट मिळावयाचा आहे, मिळविण्याची त्याला आशा आहे, त्यासाठीं द्यावी लागणारी किंमत म्हणजे वरील गोष्टींचा जांच सहन करणें होय. निसर्ग जडद्रव्याच्या रूपांतून वर चढून, पूर्ण जाणिवेंतील आपलें स्थान प्राप्त करूं इच्छितो, त्या निसर्गाला वर चढावयास

 

पान क्र. ९३

 

व जाणिवेंत शिरावयास जो अरुंद रस्ता मिळतो, तो या गोष्टींच्या अन्योन्य विरोधाचा रस्ता होय. या गोष्टी म्हणजे निसर्गाचा मौलवान् वस्तूंचा सांठा आहे; आणि हा सांठा व्यक्तीच्या उद्धारासाठीं देऊन टाकूनच निसर्ग स्वत: बंदींतून मोकळा होऊं शकतो.

या खोट्या संबंधातून व त्यांच्या साह्यानेंच निसर्गाला व मानवाला खरे संबंध शोधून काढावयाचे असतात. अविद्येच्या आश्रयानें आम्हाला मुत्यु तरून पलीकडे जावयाचें असतें. (अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते - ईशावास्योपनिषद् ) निसर्गांतील शक्तींच्या संबंधानें वेदहि गूढ भाषेंत असें सांगतात कीं, दुष्ट स्त्रियांप्रमाणें, या शक्ती दुष्टपणाची प्रेरणा घेऊन काम करतात, योग्य मार्गापासून दूर जातात, आपल्या स्वामीला उपद्रव देतात, स्वत: खोट्या आणि दुःखी असतात - पण आपल्या करणीनें शेवटीं ''हें बृहत् महान् सत्य'', आनंदरूप असणारें सत्य प्रस्थापित करतात. तेव्हां, मानवानें नैतिक शस्त्रक्रिया करून आपल्या अंतरंगांतून निसर्गांतील दुष्टपणा कापून काढून दूर केला किंवा जीवनाला रामराम ठोकला, तें अमंगल आहे म्हणून त्यापासून पळ काढला म्हणजे त्यानें स्वर्ग मिळविला असें होत नाहीं; तर मरणावर मात करून त्यानें आजच्या जीवनापेक्षां अधिक पूर्ण जीवन हस्तगत केलें पाहिजे; मानवी मर्यादेच्या आंत लहान लहान गोष्टी करण्यांत चूर न होतां त्या गोष्टींना ईश्वरी व्यापकतेचें व उदात्ततेचें रूप त्यानें द्यावयास हवें; आज ज्या दुःखाला आम्ही त्रासतो त्या दुःखाचें परिवर्तन आनंदांत करण्याची किमया त्यानें केली पाहिजे; जें अमंगल आहे त्याचें मांगल्यांत रूपांतर होईल अशी व्यवस्था त्यानें करावयास हवी; आज प्रमाद आणि असत्य म्हणून ज्या गोष्टी त्रास देतात त्या गोष्टींच्या पोटीं दडलेलें सत्य प्रकट करून त्या प्रमादाच्या व असत्याच्या जागीं या सत्याची स्थापना त्यानें केली पाहिजे - हें सर्व त्यानें यशस्वी रीतीनें घडवून आणलें तरच त्याचा जीवनयज्ञ सिद्धीस गेला असें होईल; त्याचा जीवनप्रवास योग्य रीतीनें शेवटास गेला असें म्हणतां येईल; तरच, त्याच्यामधील आणि त्याच्या बाहेरील स्वर्ग आणि पृथ्वी आपणहून सम पातळीवर येऊन परात्पर ब्रह्माचा आनंद भोगीत एकमेकांच्या हातांत हात घालून पूर्ण ऐक्यभावानें नांदतील.

पण अन्योन्यविरोधी गोष्टी आपापलें रूप टाकून सुसंवादी गोष्टींचें रूप घेतील कशा ? आमच्या मृत्युवश, पार्थिव जीवनाच्या शिशांतून अमर दिव्यजीवनरूपीं सोनें निर्माण करणारी किमया कोठें आहे? प्रश्न

 

पान क्र. ९४

 

ठीक आहेत. परंतु या गोष्टी तत्त्वत: विरोधी नसतील तर ? या गोष्टी एका सद्वस्तूंचीं व्यक्त रूपें असून त्यांचा गाभा एकाच सद्वस्तूचा असेल तर ? अशी वस्तुस्थिति असेल तर मात्र, आमच्या अदिव्य गोष्टींचें दिव्य गोष्टींत रूपांतर होणें संभवनीय आहे असें म्हणतां येईल.

आपण ही गोष्ट पाहिली आहे कीं, असत् म्हणून जी अवस्था आहे ती, शुद्ध अभावात्मक नसून अस्तित्वाची एक अकल्पनीय अवस्था असणें शक्य आहे; शब्दांनीं न सांगतां येण्यासारखा निरतिशय आनंद ''असत्'' च्या कल्पनेनें व्यक्त होत असेल, हेंहि शक्य आहे. निदान बौद्धमतांतील निर्वाणाचा प्रयत्न हा, या सर्वोच्च असत् अवस्थेची प्राप्ति करून घेण्याचा व त्या अवस्थेंत कायम विसांवा घेण्याचा एक महान् तेजस्वी प्रयत्न होता हें आपणांस ठाऊक आहे; आणि हेंहि आपण जाणतो कीं, जे मुक्त मुक्तीनंतर पृथ्वीवर राहतात त्यांच्या अंतर्यामांत नांदणारी निर्वाण-अवस्था किंवा असत्-अवस्था अवर्णनीय शांति व आनंद या स्वरूपाची असते. तिचा व्यावहारिक परिणाम सर्वदुःखविनाश हा असतो; कारण सर्व दुःखाचें मूळ जी अहंवृत्ति, अहंवेदना तिचा समूळ नाश निर्वाण घडवून आणतें. निर्वाणाचें हें विनाशक कार्य जसें उघड दिसतें, तसें त्याचें विधायक कार्यहि दिसतें; तें म्हणजे निर्वाणमय अंतरंगांत अनिर्वचनीय आनंद राहतो, अनिर्वचनीय शांति राहते; या शांतींत, या आनंदात, 'मी आहे' ही अस्तित्वाची कल्पना देखील विलीन होते, नाहींशी होते. निर्वाणाच्या एकरस सर्वशून्यमय शांतीहून, आमच्या मनाला कल्पितां येणारी शांति, फार निकृष्ट दर्जाची असल्यानें तिला शांति हें नांव देणें, कोणतेंहि नांव तिला देणें समर्थनीय वाटत नाहीं. सच्चिदानंद हें नांव निर्वाण स्थितीला देता येईल; परंतु आम्ही कल्पना करतों तें सत्, चित् व आनंद तेथें नसून, तेथील सत्-चित्-आनंद कल्पनेच्या आवांक्यापलीकडील आहेत हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. सर्व शब्द तेथें गैरलागू होतात, आपल्या जाणिवेला येणारा सर्वोच्च अनुभव, निर्वाणाच्या अनुभवाच्या फार अलीकडचा आहे.

सच्चिदानंदाच्या अस्तित्वाला एका दृष्टीनें काट देणारी, तिच्याहून श्रेष्ठ अशी सत्-चित्-आनंदाची ही जी असत् अवस्था, तिची गोष्ट झाली. या श्रेष्ठ असत् प्रमाणें सच्चिदानंदाला काट देणारें एक कनिष्ठ असत् आहे. हें कनिष्ठ असत् देखील सच्चिदानंदच आहे; विरोधी वाटलें तरी, तें सच्चिदानंदाहून वेगळें कांहींहि नाहीं; कारण एकच एक सद्वस्तु,

 

पान क्र. ९५

 

ब्रह्म, सर्व कांहीं झालें आहे. हें कनिष्ठ असत्, सच्चिदानंद असल्याची कल्पना बुद्धीला करतां येते, अंतदृष्टीला हें असत् सच्चिदानंद असल्याचें दिसूं शकते, इंद्रियांना देखील हें असत्, सच्चिदानंदाप्रमाणें संवेदना देऊं शकतें, आमच्या जाणिवेला असत् चा असाच सच्चिदानंद-अनुभव नेहमीं होऊं शकेल; पण कांहीं महान् मूलभूत प्रमाद घडलेला आहे, माया किंवा अविद्या किंवा मूलभूत अज्ञान यांनीं आमच्या जाणिवेवर मात करून आमची दृष्टि दूषित केलेली आहे; म्हणून सच्चिदानंदाचा अनुभव आम्हाला 'सच्चिदानंद' या स्वरूपांत न येतां, त्याच्या उलट स्वरूपांत येतो. सच्चिदानंदाचें विपरीत रूपानें दर्शन होणें, हें अज्ञानाचें कार्य असेल तर या आपत्तींतून सुटका होणें शक्य आहे. तर्ककठोर मनाला पटेल असें तत्त्वज्ञानात्मक प्रतिपादन करून, असत् म्हणजे सच्चिदानंदच, हें कदाचित् सिद्ध करतां येणार नाहीं; तथापि दिव्य जीवन केवळ आपल्या कल्पनेंत न ठेवतां आपल्याला व्यवहारांत आणावयाचें आहे; त्यासाठीं असत् म्हणजे सच्चिदानंदच असा आवश्यक तेवढा अनुभव आपल्याला मिळवतां येईल. सच्चिदानंदाच्या प्रांतांत दृष्टि टाकणें म्हणजे अज्ञेयाच्या अनिर्वचनीयाच्या प्रांतांत दृष्टि टाकणें आहे. आमच्या दृष्टीला खूप ताण देऊनहि, तर्ककठोर मनाला समाधानकारक होईल अशा तात्त्विक प्रतिपादनाला पुरेसा पुरावा मिळणें अवघड आहे असें आम्हीं वर सूचित केलेंच आहे. अशा प्रतिपादनाच्या भरीस आम्हीं पडणार नाहीं.

आतां, दिव्य जीवन जगूं लागण्यासाठीं जो अनुभव आम्हाला पायाभूत, आधारभूत म्हणून हवा आहे, तो अनुभव मिळण्यासाठीं आम्हाला काय करावयास हवें तें पाहूं. आमचें मन वस्तुजाताचा पृष्ठभाग पाहतें; हा पृष्ठभाग पहाण्याला सोपा असतो, तो स्वच्छ समग्र दिसतो. आमच्या मनाला या पृष्ठभागावरच लक्ष लावण्याची संवय झाली आहे. या पृष्ठभागाच्या खालीं जाण्याचे धाडस आम्ही करावयास हवें. या पृष्ठभागाखालीं आम्ही उतरलों म्हणजे, अति अफाट व अंधुक प्रकाशाचा प्रांत आमच्यासमोर येतो; त्या प्रांतांत आम्ही बारीक नजर लावली पाहिजे; जाणिवेच्या पृष्ठभागाखालीं खोल खोल, अगदीं तळ सांपडणार नाहीं अशा खोल जागा आहेत, तेथें प्रवेश करावयाचें धाडस आम्हीं करावयास हवे. जाणिवेच्या या खोल भागांत अस्तित्वाच्या अनेक अवस्था आहेत. या अवस्था आज आमच्या नसल्या तरी या अवस्थांशीं तादात्म्य पावण्याचें धाडस आम्हीं केलें पाहिजे. जाणिवेच्या खोल प्रांतांत हा जो

 

पान क्र. ९६

 

शोध आम्ही चालविणार, त्या शोधाला चांगली मदत होईल असा, आमच्या मानवी भाषेचा आवांका नाहीं. तथापि अल्पशी मदत आमची भाषा आम्हाला करूं शकेल. कांहीं प्रतीके, कांहीं उपमा आम्हाला ही भाषा पुरवील. आम्ही आमच्या शोधाच्या प्रवासांतून कांहीं उपयुक्त अनुभव घेऊन परत येऊं. हें अनुभव आमच्या मनासमोर मांडण्यास आमच्या भाषेनें पुरविलेलीं प्रतीकें व उपमा आम्हाला उपयोगी पडतील. हे अनुभव सत्याची थोडीबहुत कल्पना देण्यापुरतेच असणार. तरीपण, या अनुभवांनीं आमच्या आत्म्याच्या प्रकाशांत, ज्ञानांत, भर पडेल आणि या विश्वाची जी अवर्णनीय योजना सर्व घटनांच्या मुळाशीं आहे, त्या योजनेचें, त्या आराखड्याचें, थोडेंबहुत स्पष्ट असें प्रतिबिंब आमच्या मनावर पाडण्याचें कार्य हें आमचे अनुभव अवश्य करतील.

 

पान क्र. ९७

 

प्रकरण सातवें

 

अहम् आणि द्वंद्वें

 

निसर्ग-वृक्षावर आत्मा बसलेला आहे, तो निसर्गांत निमग्न झाला आहे, भ्रांत झाला आहे, आपण अनीश आहों या भावनेनें त्याला दुःख होत आहे; त्याच वृक्षावर ईश्वर आहे. दुःखी आत्म्यानें हा ईश्वर पाहिला आणि या ईश्वराला आपला आत्मा म्हणून ओळखून त्याच्याशीं, त्याच्या महिम्याशीं त्यानें ऐक्यभाव धारण केला म्हणजे त्याचें दुःख दूर होतें.

- श्वेताश्वतरोपनिषद् ४.७

 

वस्तुत: सगळेंच जर सच्चिदानंद आहे, तर मृत्यु, दुःख, दुष्टपणा, बंधन या गोष्टी कोठून आल्या? अर्थात् या गोष्टी वस्तुस्थितीचें विपरीत दर्शन घडविणाऱ्या जाणिवेनें निर्माण केल्या आहेत हें उघड आहे. या गोष्टी व्यवहारांत परिणामकारक आहेत यांत संशय नाहीं, परंतु त्यांना तात्त्विक अस्तित्व नाहीं. त्या आंतून पोकळ आहेत, वस्तुतत्त्व त्यांच्यांत नाहीं; त्यांच्यांत वस्तुतत्त्व नसतांना त्यांना व्यवहारांत वस्तुत्व देणारी विपरीत जाणीव तरी कशी अस्तित्वांत आली ? 'मुळांत जाणीव ही सर्वरूप, समग्र आणि एकच एक असून त्या जाणिवेचें हें समग्रतेचें, एकतेचें आत्मविषयक ज्ञान कसें तरी हरपलें, ती जाणीव पतित झाली, भेदाच्या भ्रमांत पडली, तिच्या ज्ञानाला एकांगित्व आलें आणि म्हणून ती विपरीत दर्शन घडवूं लागली व विपरीत जाणीव बनली.' हिब्रू लोकांच्या धर्मग्रंथांत जी विश्वनिर्मितीची काव्यमय बोधकथा आहे त्या कथेंत ''मानवाचें पतन'' म्हणून मूळ एकरूप जाणिवेचें हें पतन वर्णिलेलें आहे. प्रथम, मानव ईश्वरास पूर्णपणें मानीत होता. स्वत:च्या अंतरांतील ईश्वर, आपला निरंतरचा स्वामी म्हणून तो शुद्ध भावनेनें मानीत होता, ईश्वरच सर्व कांहीं आहे असें मानीत होता. ही त्याची शुद्ध आणि पूर्ण श्रद्धा जेव्हां ढांसळली तेव्हां त्याचें पतन झालें, त्याच्या ज्ञानाला फांटे फुटले, भेद-

 

पान क्र. ९८

 

ज्ञानामुळें व भेदज्ञानाचें सेवन केल्यामुळें द्वंद्वांची मालिका त्याच्यासमोर उभी राहिली; जीवन-मरण, साधुत्व-दुष्टत्व, सुख-दुःख, पूर्णता-अपूर्णता, हीं द्वंद्वें भेदज्ञानाची, तुकडे झालेल्या अस्तित्वाची प्रजा होय. भेद-ज्ञानाचें फळ ॲडॅम-ईव्ह, पुरुष-प्रकृति यांनीं - निसर्गानें मोहित केलेल्या आत्म्यानें - सेवन केलें. आजहि निसर्गानें मोहित केलेला आत्मा हें भेद-ज्ञानाचें फळ सेवन करीत आहे आणि द्वंदवांचें दुःख भोगीत आहे. निसर्गाच्या मोहांतून मानव कसा पार पडणार ? त्याचा उद्धार कसा होणार ? व्यक्तीमध्यें विश्वव्यापक जाणीव पुनरपि निर्माण झाली पाहिजे, भौतिक जाणिवेंत दिव्य आत्मवस्तूची प्रतिष्ठा पुनरपि झाली पाहिजे; हें घडून आलें म्हणजे मानवाचा उद्धार होईल. हें घडून आल्यावर निसर्गांत वावरणाऱ्या आत्म्यानें जीवनवृक्षाचें फळ सेवन करण्यास हरकत राहणार नाहीं. कारण मग हा आत्मा दिव्य आत्म्यासारखा, ईश्वरासारखा होऊन अमर होईल. साधुत्व आणि दुष्टत्व, सुख आणि दुःख, जीवन आणि मरण या द्वंद्वांसंबंधींचें खरें ज्ञान व्यक्तीला होईल; हें खरें ज्ञान, दिव्य आत्म्याच्या आणि विश्वात्म्याच्या श्रेष्ठ जाणिवेच्या साह्यानें होईल व या श्रेष्ठ ज्ञानामुळें द्वंद्वांचा विरोध हा आभास आहे असें कळेल. विश्वात्म्याच्या व्यवहारांत जीवन आणि मरण इत्यादि अन्योन्यविरोधी भासणाऱ्या वस्तू एकमेकांच्या पूरक आहेत असें ज्ञान होईल; सर्व विरोधी जोड्या एकाच वस्तूच्या दोन बाजू आहेत असें कळेल, एकच एक ब्रह्मवस्तु अनेक प्रकारें द्वंद्वरूप झाली आहे व त्या द्वंद्वांच्या क्षेत्रांत ब्रह्मवस्तु अभेदानें आहे अशी जाणीव होईल. द्वंद्वांची द्वंद्वता खोटी करून त्यांची अन्योन्य-पूरकता व दिव्य एकता सिद्ध करणें हें, ब्रह्मवस्तूचें भौतिक जाणिवेंत अवतरण होण्याचें किंवा अवतरण घडविण्याचें प्रयोजन आहे.

सच्चिदानंद सर्व वस्तूंत पसरलेलें आहे. क्षुद्रांत क्षुद्र वस्तु देखील सच्चिदानंदाचें वसतिस्थान आहे. कोणत्याहि भेदांना न मानता अगदीं नि:पक्षपातीपणें सर्वत्र सच्चिदानंद भरलेलें आहे. अशा व्यापक सच्चिदानंदाला मरण, दुःख, दुष्टत्व, बंधन या गोष्टी, तद्विरोधी जीवन, सुख इत्यादि प्रकाशमय गोष्टींच्या छायेप्रमाणें, नाण्याच्या दुसऱ्या बाजूप्रमाणें फारतर असणार. आम्हाला या गोष्टी संगतीची विसंगति करणाऱ्या, सुराचा बेसूर करणाऱ्या अशा भासतात. जेथें ऐक्य असावें, तेथें या गोष्टी बेकी उत्पन्न करतात; योग्य समज असावा, तेथें गैरसमज फैलावतात. एकाच वृंदवादनाचे सुरेल घटक म्हणून जेथें भिन्न घटकांनीं आपला सूर

 

पान क्र. ९९

 

इतर घटकांत मिळवून न्यावयास हवा, तेथें हीं द्वंद्वें अनेक, भिन्न, स्वतंत्र स्वरमेळ उभे करूं पाहतात. जाणिवेची समग्रता, पूर्णता हाच एक या द्वंद्वांच्या आपत्तीवर उपाय आहे. पूर्णता, समग्रता ही सुरेल व तालबद्ध असतेच असते; असमग्रतेमुळें ज्या गोष्टी इतर कांहीं गोष्टींशीं विरोध करून कर्कशपणा, बेसुरेलपणा माजवीत असतील त्या विरोधी गोष्टींना समग्रता आपला विरोध सोडावयास लावते, त्यांचे मेळ घालून देते. विश्वांत भौतिक आणि भौतिकेतर अनेक पातळ्या आहेत, तेथें सारख्या हालचाली चालू आहेत. यांपैकीं केवळ एक - कोणतीहि स्थूल भौतिक जाणिवेची कां होईना - पातळी घेतली तरी तेथेंहि समग्र दृष्टीनें व्यवहार पाहिला तर बेसुरेलपणा त्या पातळीपुरता दिसणार नाहीं. भौतिक जाणिवेच्या पातळीच्या पलीकडे वर, खालीं, मागें, पुढें अनेक पातळ्या आहेत - भौतिक पातळीसह त्या सर्वांचा समग्रतेनें व्यवहार पाहिला तरीहि बेसुरेलपणा मुळींच दिसणार नाहीं हें वेगळें सांगावयास नको. तेव्हां जाणिवेची समग्रता गेल्यामुळें जी द्वंद्वांची बेसूर बेताल दुःखद हालचाल विश्वांत निर्माण झाली आहे ती, जाणिवेच्या समग्रतेनें पुन: सुरेल होणारी आहे, पुन: तालबद्ध व सुखद होणारी आहे. विश्वांत सच्चिदानंद साकारत्वानें आहे. सच्चिदानंदाला साकार विश्वांत जीं द्वंद्वांचीं नांवें आपण लावतो तीं या साकारत्वाच्या पलीकडे गेलें कीं, तेथें लावतां येत नाहींत. विश्वातीत निराकार सच्चिदानंद ब्रह्म हें द्वैत कायम ठेवून, द्वंद्वांचा मेळ घालीत बसत नाहीं, तर त्यांच्यापेक्षां श्रेष्ठ असणारें कांहीं तत्त्व निर्माण करतें आणि या रीतीनें द्वंद्वांचें अस्तित्व बदलून टाकून त्यांचा विरोध पार लयास नेतें. असो.

समग्रतेची सुसंवादिता, सुरेल गोडी द्वंद्वांच्या आपत्तींतहि व्यक्तीला कशी लाभेल हें प्रथम पाहूं. या संबंधांत एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे ती ही कीं, (आणि ही गोष्ट लक्षांत घेतली नाहीं तर आपला प्रश्न सुटणार नाहीं) विश्वांत अनुभवास येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींना आमच्या सध्यांच्या जाणिवेनें जीं नांवें दिलीं आहेत तीं जरी आमच्या मानवी अनुभवाच्या व प्रगतीच्या दृष्टीनें जवळ जवळ योग्य असलीं तरी इतर कोणतींहि नांवें त्यांना योग्य होणार नाहींत असें नाहीं; एवढेंच नव्हे तर असेंहि असणें शक्य आहे कीं, त्या गोष्टींचें पूर्ण, अगदीं बरोबर वर्णन आमच्या नांवानीं होत नाहीं, त्या गोष्टींची अगदीं योग्य, पूर्ण, वर्णनात्मक आणि अखेरचीं निर्दोष नांवें वेगळीं असलीं पाहिजेत.

 

पान क्र. १००

 

आमचे भौतिक जग आमच्या इंद्रियांनीं, इंद्रियशक्तीनें आम्ही अनुभवतों, हेंच जग अनुभवणारीं आमच्या इंद्रियांहून वेगळ्या प्रकारचीं इंद्रियें व आमच्या इंद्रियशक्तीहून वेगळ्या प्रकारची इंद्रियशक्ति असूं शकते; त्यांना या जगाचा अनुभव आम्हापेक्षां अधिक पूर्णतेनें म्हणून अधिक चांगला घेतां येत असेल आणि तो अनुभव आमच्या अनुभवाहून वेगळा असूं शकेल, ही गोष्ट संभवनीय आहे. त्याचप्रमाणें हेंहि संभवनीय आहे कीं, आमचें आजचें मन विश्वाचें जें चित्र आपल्यासमोर उभें करतें त्यापेक्षां श्रेष्ठ असें विश्वाचें चित्र आमच्या मानसिक आणि अतिमानसिक दृष्टीनें दिसूं शकेल. जाणिवेच्या अशा अवस्था आहेत कीं, त्या अवस्थांत, मरण हें, अमर जीवनांतील एक बदल अथवा चालू जीवनाहून वेगळें जीवन म्हणून अनुभवास येतें; दुःख हें, विश्वव्यापी आनंदसागरांतील धक्का देणारा, त्या सागराचाच एक उलटा प्रवाह म्हणून भासतें; सीमेचें बंधन हें, असीम बंधनातीत अनंताचें एका दिशेनें मार्गक्रमण चालूं असतां मध्येंच तोंड फिरवून उलट दिशेनें किंवा दुसऱ्या दिशेनें चालू लागणें आहे असें दिसतें; दुष्टत्व हें, साधुत्वाचेंच त्याच्या स्वत:च्या पूर्णतेला प्रदक्षिणा घालणें आहे, असा अनुभव येतो; सारांश मरण, दुःख, दुष्टत्व व सीमाबद्धता हें सर्व केवळ आभास असून जीवन, आनंद, अनंतता, साधुत्व यांनाच केवळ खरें अस्तित्व आहे हें प्रतीत होतें. हे अनुभव केवळ वैचारिक चित्रें नसतात, तर इंद्रियप्रत्यक्षाप्रमाणें खरोखरीचे, नित्याचे, वास्तविक अनुभव असतात. व्यक्तीचा आत्मविकास होत होत शेवटीं तिला पूर्णता मिळावयाची आहे. या पूर्णतेकडे व्यक्ति प्रवास करीत असतां जीं महत्त्वाचीं, न टाळतां येणारीं पावलें तिला टाकावीं लागतात त्यांपैकीं सर्वांत अधिक महत्त्वाचें एक पाऊल या वर सांगितलेल्या ज्ञानभूमिकांचें (जाणिवेच्या अवस्थांचें) असतें असें म्हणतां येईल. पूर्णतेच्या सिद्धीसाठीं या ज्ञानभूमिका आपल्या ठिकाणीं सिद्ध करण्याचा प्रयत्न, प्रत्येक साधकानें अवश्य करावयास हवा.

तथापि, अशी श्रेष्ठ ज्ञानभूमिका जोंपर्यंत सिद्ध झाली नाहीं तोंपर्यंत, आमचीं इंद्रियें आणि आमचें इंद्रियाधिष्ठित द्वंद्वदर्शी मन आम्हाला जीं व्यवहारोपयोगीं मूल्यें देतील तीं मूल्ये त्या त्या क्षेत्रांत आम्हीं मानलीं पाहिजेत; आमच्या सर्वसाधारण जीवन-व्यवहारांत त्या मूल्यांना प्रमाण मानून आम्हीं वागलें पाहिजे. सामान्य ज्ञानभूमिकेहून श्रेष्ठ अशी उपरिनिर्दिष्ट ज्ञानभूमिका सिद्ध झाली म्हणजे आमचीं द्वंद्वात्मक मूल्यें, आपलें पहिलें विरोधात्मक स्वरूप बदलून एकमेकांशीं सुसंवादित्व धारण करतील

 

पान क्र. १०१

 

व हें सुसंवादित्व धारण करतांना व केल्यावरहि, ज्या सत्य वास्तव घटना त्या मूल्यांचें मूळ होत्या त्या घटनांवरची आपली पकड तीं मूल्यें सोडणार नाहींत. इंद्रियशक्ति वाढविणें आणि ज्ञानभूमिका मात्र सामान्य, जुनीच ठेवणें यामुळें व्यक्तीच्या अंतर्बाह्य व्यवहारांत अनेक तऱ्हेची गंभीर अव्यवस्था व अपात्रता निर्माण होण्याचा संभव आहे; व्यक्ति व्यवहाराला निरुपयोगी होण्याचा, आपली बुद्धि व्यवस्थेनें व शिस्तीनें वापरण्यास असमर्थ होण्याचा संभव आहे. इंद्रियशक्तीच्या वाढीबरोबर इंद्रियांकडून जीं जुन्या तऱ्हेचीं मूल्यें वाढत्या प्रमाणावर मिळणार, त्यांचा योग्य अर्थ लावून त्यांना सुसंवादित्व देणारी श्रेष्ठ ज्ञानभूमिका सिद्ध असेल तरच, वाढत्या इंद्रियशक्तीनें येणारी वर सांगितलेली आपत्ति टळेल. अशाच प्रकारची आपत्ति मानसिक जाणिवेच्या वाढीनेंहि एका विशिष्ट परिस्थितींत येऊं शकते. मानसिक जाणीव वाढली, अहम् नें निर्माण केलेल्या द्वंद्वांचा या वाढलेल्या जाणिवेनें परामर्श घेण्याचें सोडून दिलें, कुठल्यातरी प्रकारच्या समग्र जाणिवेशीं या वाढलेल्या मानसिक जाणिवेनें कशीतरी शिस्तशून्य एकता साधली आणि अर्धवट समग्रतेच्या अभिमानानें द्वंद्वांचें द्वंद्वत्व दृष्टिआड केलें, द्वंद्वांच्या कोंडींतून आपण बाहेर पडलो असा आंव आणून त्यांचा योग्य परामर्श घेण्याचें सोडून दिलें, तर त्यायोगें व्यक्तीच्या व्यवहारांत गोंधळ माजण्याचा फार संभव आहे. जगांत अन्योन्य सापेक्ष द्वंद्वमय घटनांचें जें सुप्रतिष्ठित राज्य आहे त्या राज्यांत व्यवहारी क्रियाशील मानवी जीवन योग्य रीतीनें जगण्याची पात्रता त्या व्यक्तींत फार कमी होण्याचा संभव आहे. गीतेमध्यें ज्ञानी माणसाला असा आदेश दिला आहे कीं, अज्ञानी माणसाच्या जीवनाची आणि विचाराची बैठक ज्यानें बिघडून जाईल, व त्याचा ''बुद्धिभेद'' होईल असें ज्ञानी माणसानें कांही करूं नये. हा आदेश देण्याचें कारण, बुद्धिभेदामुळें जीवन योग्य रीतीनें जगण्याची पात्रता अज्ञानी माणसाचें ठिकाणीं राहणार नाहीं हे आहे; ज्ञानी माणूस कसें आचरण करतों तें अज्ञानी माणूस पाहूं शकेल परंतु त्या आचरणाचें तत्त्व त्याला उमगणार नाहीं. ज्ञानी माणसाच्या आचरणाची नक्कल तो करूं लागेल तर त्यामुळें त्याची स्वत:ची मूल्य-संस्था तो गमावून बसेल, आणि तिजहून श्रेष्ठ जी तात्त्विक बैठक ती त्याला अप्राप्त असल्यामुळें त्याच्या जीवनांत गोंधळ निर्माण होणें अपरिहार्य होईल.

तात्पुरती गोंधळाची किंवा अपात्रतेची, अक्षमतेची अवस्था मान्य करून साधक आपली वाटचाल, जीवनाच्या क्षेत्रविस्तारासाठीं करीत

 

पान क्र. १०२

 

राहील हें संभवनीय आहे; नव्हे, अशी वृत्ति व कृति पुष्कळ महात्म्यांनीं आपल्या साधकावस्थेंत दाखविली आहे. जीवनाच्या क्षेत्राचा विस्तार करावयास संधि मिळण्यासाठीं तात्पुरता गोंधळ मान्य करणें, ही जणुं किंमत म्हणून ते देतात. तथापि अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या मर्यादा लांबरुंद करावयाच्या आणि वाढत्या जीवनांत व अस्तित्वांत गोंधळ अव्यवस्था, अपात्रता व अक्षमता यांचें राज्य मान्य करावयाचें, हा कांहीं मानवी प्रगतीचा योग्य आदर्श नव्हे. योग्य प्रगति व्हावयाची तर हें अवश्य आहे कीं, इंद्रियशक्ति किंवा मनाची शक्ति वाढून साधकाचें अस्तित्व व जीवन रुंदावलें कीं जुन्या मूल्यांचें पुन: निरीक्षण-परीक्षण करून, नव्या रुंदावलेल्या जीवनाला योग्य अशी त्यांची परिणामकारक समन्वयी पुनर्रचना केली पाहिजे; कारण नव्या जीवनाचा कायदा वेगळा असतो, जुन्या मर्यादांतील जीवनाचा कायदा येथें चालत नाहीं; याप्रमाणें जुनीं मूल्यें नव्या कायद्यानें सुधारून किंवा बदलून घेतलीं म्हणजे नव्या सत्यांची मालिका साधकाला प्राप्त होईल, आणि विश्वांत जें जीवनाचें साहित्य त्याच्यासमोर असेल त्यावर त्याच्या कर्तबगारीचा प्रयोग पूर्वींपेक्षां अधिक रसरशीत व अधिक समुचित होऊन साधकाचें जीवन पूर्वींपेक्षां अधिक सामर्थ्यवान् आणि सुसंगत होईल. पृथ्वीभोंवतीं सूर्य फिरतो अशी आपल्या इंद्रियांची साक्ष आहे. तेव्हां इंद्रियांच्या दृष्टीनें सूर्य-पृथ्वीचें हें नातें जीवनाचा केंद्र, जीवनव्यवस्थेचें केंद्रतत्त्व म्हणून एका काळीं मानलें गेलें; एक चुकीची कल्पना पायाभूत धरून जीवनाचा व्यवहार तिच्या तंत्रानें मानवांकडून आंखला गेला. सूर्याभोंवतीं पृथ्वी फिरते हें सत्य नंतर सांपडलें; पण जर नवीन भौतिक शास्त्र सिद्ध नसतें, तर हें सत्य सांपडूनहि कदाचित् त्याचा कांहीं उपयोग झाला नसता. नव्या सत्यकल्पनेला केंद्रस्थानीं बसवून तिच्या समर्थनार्थ तर्कसिद्ध सुव्यवस्थित ज्ञानाचा संग्रह करून इंद्रियांना घडणाऱ्या दर्शनाचा योग्य अर्थ सांगण्यास नवें शास्त्र सिद्ध होतें, म्हणून तर सूर्याभोंवतीं पृथ्वी फिरते या कल्पनेचा मानवाला उपयोग करतां येऊन जीवन पूर्वींपेक्षां अधिक यशस्वी करतां आलें. असाच प्रकार मानवाच्या आंत घडणाऱ्या घटनांच्या संबंधांत होतो. मानवाच्या मनाला, सामान्य मानसिक जाणिवेला, अहम्-वैयक्तिक मी - हाच पृथ्वीच्या ठिकाणीं मध्यवर्ति असून ईश्वर-सूर्य या 'मी' भोंवतीं फिरत असतो, ईश्वर जें कांहीं करतो तें व ज्या मार्गानें तो तें करतो तो मार्ग किंबहुना त्याच्या सर्व कृती व त्याचे सर्व मार्ग 'मी'च्या न्यायासनापुढें

 

पान क्र. १०३

 

हजर केले जातात; ईश्वराच्या कृती व रीती या सर्वांची तपासणी करून न्यायनिवाडा देण्यासाठीं 'मी'च्या संवेदना, भावना, कल्पना बसलेल्या असतात; या कृति-रीतींचा अर्थ त्या लावतात, त्या अर्थानुसार त्यांचें कमी-अधिक महत्त्व ठरवितात आणि या महत्त्वानुसार त्यांचा क्रम, श्रेष्ठ-कनिष्ठता ठरवितात. 'मी'नें दिलेला हा निकाल वस्तुजातांतील सत्याला धरून नसतो, या सत्याला त्या निकालांत विकृत किंवा निखालस उलटें स्वरूप आलेलें असतें. तथापि मानवी जीवनाच्या आणि प्रगतीच्या एका विशिष्ट विकासावस्थेंत 'मी'च्या निकालांत समाविष्ट झालेले ईश्वरी कृति-रीतींचे अर्थ आणि त्यांचें महत्त्वमापन, मूल्यमापन व्यक्तीला उपयुक्त असतें, तिच्या व्यवहाराला कांहीं कमी पडूं न देणारें असतें. आम्हाला विश्वांत जो अनुभव येतो त्या अनुभवाचें व्यवहारासाठीं व्यवस्थित स्थूल सूत्रीकरण 'मी' करीत असतो; आणि आम्ही जोपर्यंत एका विशिष्ट वैचारिक आणि आचारविषयक भूमिकेवर असतो तोंपर्यंत हीं व्यवहारसूत्रें आम्हाला शिरोधार्य होतात. मात्र मानवी जीवनाची आणि ज्ञानाची परमोच्च अंतिम अवस्था ही या व्यवहारसूत्रांनीं चाललेल्या जीवनापासून व या व्यवहारसूत्रांत प्रतिबिंबित झालेल्या ज्ञानापासून फार दूर आहे. ''सत्य हाच (जीवनाच्या कृतार्थतेचा) मार्ग आहे, असत्य नव्हे'', आणि हें सत्य आहे कीं, ईश्वर हा जीवनाचा केंद्रबिंदु आहे, 'मी' नव्हे. 'मी'च्या भोंवतीं ईश्वर फिरत नाहीं, 'मी'च्या द्वंद्वदर्शी दृष्टीला ईश्वरावर टीका करून बरें-वाईट म्हणण्याचा न्यायाधीशाचा अधिकार नाहीं, तर उलट 'मी' चा जो अनुभव असेल त्या अनुभवांतील खरें सत्य, खरा अर्थ 'मी'च्या संवेदना-भावना-कल्पनांनीं ठरवावयाचा नसून विश्वपुरुष आणि विश्वातीत पुरुष यांच्या दृष्टीनें ठरवावयाचा असतो. तथापि, विश्वात्मता आणि विश्वातीतता याविषयींचें ज्ञान अपूर्ण असतां, वैयक्तिक 'मी'च्या अनुभवासंबंधानें त्या 'मी'च्या कल्पना आपल्या व्यवहाराचा पाया म्हणून जर व्यक्तीनें वापरावयाचें ठरविलें, तर जुन्या अयुक्त कल्पनांऐवजीं नव्या, पण जुन्या इतक्याच खोट्या व निराधार कल्पना मान्य केल्यासारखें होईल आणि याचा परिणाम असा होईल कीं, वैयक्तिक 'मी'चा अधिकार असतांना जी गोंधळाची स्थिति होती तिच्यांत आणखी गोंधळ माजेल. नव्या तत्त्वज्ञानांचा व नव्या धर्मांचा उदय होतांना अशा प्रकारचा, रास्त मूल्यांसंबंधींचा विसंवाद, मानवसमाजांत बहुधा आढळून येतो; पण पुष्कळ वेळां त्यांतून उपयुक्त क्रांतीचा जन्म होतो. परंतु आम्हाला

 

पान क्र. १०४

 

खरें ध्येय गांठावयाचें तर आमची मध्यवर्ति कल्पना बरोबर पाहिजे आणि या कल्पनेच्या भोंवतीं तर्कप्रतिष्ठित परिणामकारक श्रेष्ठ ज्ञानाचें कडें आम्हाला उभें करतां आलें पाहिजे; व्यक्तीचें अहंकेंद्रित जीवन वापरीत असलेलीं सर्व मूल्यें ज्या ज्ञानानें शुद्धीकृत व रूपांतरित होऊन व्यक्तीला परत मिळतील असें तें श्रेष्ठ ज्ञान असेल. आम्हीं याप्रमाणें खरें ध्येय गांठलें म्हणजे आम्हाला सत्यांची नवी श्रेणी लाभेल व आज आम्ही जें जीवन जगत आहों त्याला रजा देऊन त्यापेक्षां अधिक दिव्य असें जीवन आम्हाला जगतां येईल; जीवनासाठीं आम्हाला जें साहित्य विश्व पुरवीत आहे त्यावर आमच्या शक्तींचा पूर्वींहून अधिक दिव्य आणि सामर्थ्यवान् प्रयोग, या नूतन सत्यांच्या बळावर आम्हाला करतां येईल.

आमच्या मानवी विचारपद्धतीला धरून दिव्य जीवनाचें लक्षण व्यक्त करणारीं जीं महान् सत्ये आहेत त्यांचा परिचय करून घेणें व तीं आत्मसात् करणें या गोष्टीवरच मानवी व्यक्तीचें नवें जीवन आणि नवें सामर्थ्य अवलंबून राहील. या नव्या जीवनासाठीं व्यक्तीच्या 'अहम्'नें प्रथम आपला चुकीचा दृष्टिकोन टाकून दिला पाहिजे, त्याला अगदीं खऱ्या वाटणाऱ्या पण खोट्या असणाऱ्या सर्व कल्पना त्यानें सोडून दिल्या पाहिजेत; हा अहम् म्हणजे पूर्ण वस्तु नाहीं; अनेक समष्टींचा तो घटक आहे. एक घटक या नात्यानें या अहम् नें त्या त्या समष्टीशीं योग्य नातें जोडून पूर्ण मेळानें वागलें पाहिजे. तो जसा अनेक समष्टीचा घटक आहे त्याप्रमाणेंच त्याच्याहून उच्च पातळींवरील अनेक वस्तूंच्या व विश्वातीत सत्यांच्या मेळाव्यांतून तो खालीं उतरलेला आहे. या उच्चस्थानीय वस्तूंशींहि योग्य नातें जोडून त्यानें पूर्ण गोडीनें वागलें पाहिजे; तसेंच या अहम् चे जे सत्याचे संकेत आहेत, जे व्यवहारनियम आहेत, त्यांच्याहून श्रेष्ठ असणारें सत्य आणि व्यवहारनियम त्यानें मोकळेपणानें आत्मसात् करण्याची तयारी ठेवली पाहिजे; हें श्रेष्ठ सत्य अहम् चें जीवन कृतार्थ करील आणि हा श्रेष्ठ व्यवहार-नियम अहम् ची सर्व बंधनांतून मुक्तता करील. या वरील क्रमानें जें नवें दिव्य जीवन घडावयाचें असतें त्याचा अंतिम हेतु, वैयक्तिक अहम् नें निर्माण केलेल्या मूल्यांचा त्याग करणें हा असतो; आणि सीमा, अज्ञान, मरण, दुःख, दोष आणि दुष्टत्व यांच्या पार जाणें, यांपासून सर्वथा मुक्त असें जीवन जगणें हा अशा जीवनाचा कळस असतो.

 

पान क्र. १०५

 

हा त्याग, ही मुक्तता या पृथ्वीवर, या आमच्या मानवी जीवनांत शक्य आहे काय ? अर्थात् दिव्य जीवन शक्य आहे काय ? जर आमची आजचीं अहम्-निर्मित मूल्यें आमच्या जीवनाशीं अटळपणें बांधलेलीं असलीं तर तें शक्य नाहीं. जीवन म्हणजे वैयक्तिक अहम् चा व्यवहार, अशीच जर जीवनाची निसर्ग-निर्मित घडण असेल, तें जर विश्वव्यापक अस्तित्वाचें, सद्वस्तूचें व्यक्त स्वरूप नसेल, तें जर महान् चैतन्यमय आत्म्याचें निश्वसन नसेल, तर या पृथ्वीवर मानवाला वर उल्लेखिलेली मुक्तता अथवा दिव्य जीवन शक्य नाहीं असेंच म्हणावें लागेल. व्यक्तीचा आणि वस्तूंचा संबंध आल्यानंतर, व्यक्तीच्या होणाऱ्या केवळ बाह्य प्रतिक्रिया या स्वरूपाचीं हीं द्वंद्वें नसून, सर्व जीवनाचें सार आणि पाया जर हीं द्वंद्वें असतील, सीमाबंधन हा जर, मन आणि शरीर यांच्या द्रव्याचा अपरिहार्य स्वभावधर्म असेल, मरणानें विघटन हीच जर सर्व जीवनाची प्राथमिक व अंतिम शर्त असेल, त्याचा प्रारंभ नि अखेर असेल, सुखदुःख हें जर संवेदनांचें अविभाज्य दुहेरी द्रव्य असेल, हर्ष आणि विषाद हा जर अन्य सर्व भावनांचा छाया-प्रकाशाप्रमाणें दुहेरी व अटळ सहयोगी असेल, सत्यता आणि भ्रम किंवा प्रमाद या दोन ध्रुवांभोंवतीं जर सर्व ज्ञान सदैव फेरे घालण्यास बांधलेलें असेल तर वर उल्लेखिलेली मुक्ति एकाच मार्गानें मनुष्याला प्राप्त होण्यासारखी आहे; आणि तो मार्ग म्हणजे सर्व अस्तित्वाच्या पलीकडे असलेल्या निर्वाणांत मनुष्यानें आपल्या जीवनाचा लय करावा किंवा या भौतिक दुनियेहून, इहलोकाहून अत्यंत वेगळ्या घडणीच्या जगांत म्हणा, किंवा स्वर्गांत म्हणा, त्यानें जाऊन रहावें.

माणसाचें रूढिप्रिय व रूढिबद्ध मन जुन्या संबंधांचा आणि चालू संबंधांचा नेहमीं रवंथ करीत असतें, या संबंधांचा त्याला फार ओढा असतो; त्या संबंधांना सोडून पलीकडचा, रूढ संवयीच्या गोष्टींपलीकडचा विचार किंवा कल्पना करणें त्याला जड जातें. मानवाच्या प्रस्तुतच्या कायम वाटणाऱ्या परिस्थितींत, त्याच्या सभोंवारच्या गोष्टींत, व त्याच्या स्वतांत आमूलाग्र बदल घडूनहि त्याचें मानवत्वहि राहूं शकतें अशी कल्पना करणें हें आमच्या पुराणप्रिय, व प्रस्तुतप्रिय संवयींचा गुलाम असलेल्या मनाला तितकेसें सोपें नाहीं. आमचा जो थोर विकास यापुढें होणार आहे, होणें संभवनीय आहे, त्याच्या तुलनेनें आमची आजची अवस्था डार्विनच्या विकास-विषयक सिद्धांतांतील मूळ वानराच्या अवस्थेप्रमाणें आहे. डार्विनचा वानर जुनाट अरण्यांत झाडाझुडपांच्या आश्रयानें आपलें जीवन आपल्या

 

पान क्र. १०६

 

जन्मजात सहजप्रेरणांनुसार जगत होता. त्याला अशी कल्पना करणें अशक्य झालें असतें कीं, पुढें एक दिवस त्याच्याहून एक वेगळा प्राणी या पृथ्वीवर जन्माला येईल, त्याला एक नवीन बुद्धि नांवाची शक्ति मिळालेली असेल, ही बुद्धि तो प्राणी आपल्या बाहेरील आणि आंतील अस्तित्वाच्या सामग्रीवर खर्च करून, आपल्या उपजत प्रेरणांवर आणि संवयींवर हुकुमत चालवील, आपल्या स्थूल भौतिक जीवनाची परिस्थिति या बुद्धीच्या प्रभावानें तो बदलून टाकील, तो स्वत:साठीं दगडाची घरें बांधील, निसर्गाच्या शक्ती तो आपल्या तंत्रांत आणील, समुद्रावर तो जहाजानें प्रवास करील, आकाशांत तो विमानानें भराऱ्या मारील, तो आचारांचे नियम बांधील, बौद्धिक व आध्यात्मिक विकासासाठीं तो ज्ञानपूर्वक, संकल्पपूर्वक चालावयाचे मार्ग हळूहळू, क्रमाक्रमानें तयार करील - पुढें जन्मास येणाऱ्या अशा प्राण्याची कल्पना करणें डार्विनच्या वानराला अशक्य झालें असतें. तथापि असें समजूं कीं, ही कल्पना त्याला करतां आली असती; तरीपण याच्यापुढें जाऊन त्याला अशी कल्पना करतां आली असती काय कीं, निसर्गांत प्रगति होत होत किंवा दीर्घकाळ पावेतों केलेल्या स्वत:च्या इच्छाशक्तीच्या व मनोवृत्तीच्या खटाटोपानें आपण स्वतःच क्रमविकासानें वर वर्णिलेला बुद्धिमान् प्राणी होऊं शकू ? त्या वानराला ही दुसरी कल्पना करणें निश्चितच फार फार अवघड होतें. पण मानवाला बुद्धि लाभली आहे, त्याला कल्पनाशक्ति आहे, त्याला अंत:स्फूर्तीची शक्ति आहे; या शक्तींचा तो भरपूर उपयोग करीत असतो, म्हणून त्याला स्वत:च्या जीवनापेक्षा श्रेष्ठ तऱ्हेचें जीवन कल्पनेनें आपल्या समोर उभें करतां येतें. एवढेंच नव्हे तर, स्वत:ची प्रस्तुत जीवनसरणी मागें टाकून, कल्पनेनें रंगवलेलें तें श्रेष्ठ श्रेणीचें जीवन आपण जगूं शकूं, अशीहि कल्पना त्याला करतां येते. परंतु श्रेष्ठांत श्रेष्ठ, सर्वोच्च, सर्वोत्तम जीवनाचें जें चित्र तो रंगवतो त्या चित्रांत तो स्वत:ला तें जीवन जगणारा म्हणून बसवावयास धजत नाहीं. त्याच्या स्वाभाविक आकांक्षेला ज्या गोष्टी स्पृहणीय वाटतात, त्याच्या विचारांना ज्या गोष्टी संग्राह्य वाटतात, त्या गोष्टींचें निरतिशय श्रेष्ठ स्वरूप त्याच्या सर्वोत्तम जीवनाच्या कल्पनेंत सामावलेलें असतें. सर्वोत्तम जीवनांत त्याला ज्ञान दिसतें; त्या ज्ञानाची पडछाया, भ्रम किंवा प्रमाद अर्थात् अ-ज्ञान दिसत नाहीं. सामान्य जीवनांत ज्ञान आणि अ-ज्ञान अविभाज्य असतात, तर सर्वोत्तम जीवनांत त्याला आनंद दिसतो. सामान्य जीवनांत अटळपणें अनुभवास येणारा, विरुद्ध प्रकृतीचा

 

पान क्र. १०७

 

त्याचा जोडीदार विषाद, उद्वेग, संताप, त्याला त्यांत दिसत नाहीं. सर्वोत्तम जीवनांत त्याला सामर्थ्य दिसतें; त्याला नेहमीं नष्टवत् करणारें अ-सामर्थ्य, अक्षमता, अपात्रता तेथें त्याला दिसत नाहींत. सर्वोत्तम जीवनांत त्याला अस्तित्वाची असीम शुद्धता, समृद्धता दिसते; त्यांच्या विरोधी गोष्टी - अशुद्धता किंवा दोष, असमृद्धता किंवा सीमाबद्धता - दिसत नाहींत. वानर जेव्हां देवांची कल्पना करतो, तेव्हां त्यांना हें सर्वोत्तम जीवन तो बहाल करतो; तो स्वर्गाची कल्पना करतो, तेव्हां त्या स्वर्गांत सर्वोत्तम जीवन सार्वत्रिक असल्याचें तो समजतो. परंतु पृथ्वीचें किंवा पृथ्वीवरील मानवतेचें कितीहि दूरचें, भावी चित्र काढलें तरी त्यांत त्याची बुद्धि सर्वोत्तम जीवन पाहूं शकत नाहीं. पृथ्वीचा केव्हांतरी स्वर्ग होईल व मानवाचा इथेंच देव बनेल हें त्या बुद्धीला संभवनीय वाटत नाहीं. परंतु मानवाचें जें स्वर्गाचें व त्यामधील देवांचें स्वप्न आहे, तें वस्तुत:, स्वत: तो पूर्णतेला पोंचल्यानंतर कसा असेल त्या स्थितीचेंच स्वप्न आहे. परंतु मानवाचा ''मूळ पुरुष'' जो वानर, त्याला 'तूं पुढें मनुष्य होणार' असें कुणी सांगितलें असतें तर त्यावर विश्वास ठेवणें जसें त्याला जड गेलें असतें, तसेंच मानवाला स्वत:च्या पूर्णतेचें स्वप्न येथें वास्तवांत आणणें व तें स्वतःचें अंतिम साध्य म्हणून निश्चित करणें जड जात आहे. त्याची कल्पनाशक्ति, त्याची धार्मिक आकांक्षा पूर्णतेचें साध्य त्याच्यासमोर ठेवील परंतु त्याची बुद्धि काम करूं लागली व तिनें 'आपलें तेंच खरें' असा हट्ट धरून एकदां का बुद्धीपलीकडील अंतःस्फूर्तीनें व कल्पनेनें रंगवलेलें चित्र स्वत:ला नापसंत म्हणून बाजूला टाकलें, म्हणजे मानवहि बुद्धीलाच प्रमाण मानतो आणि अंत:स्फूर्तीचें चित्र म्हणजे एक भव्य पण बिनबुडाची निराधार कल्पना असून भौतिक विश्वांतील रोखठोक वस्तूंच्या व घटनांच्या अगदीं उलट स्वरूपाचें व वास्तवांत बिलकुल न येण्याजोगें टाकाऊ चित्र आहे, असा निकाल तो देतो. अशक्य, असंभाव्य अशा ध्येयभूत अवस्थेचें तें दर्शन आहे असें तो फारतर मानतो; आणि आपलें सामान्य जीवन उंचावण्यासाठीं त्यापासून थोडीबहुत प्रेरणा, थोडीबहुत स्फूर्ति, तो घेत राहतो. आपल्या बुद्धीला प्रमाण मानून तो असें ठरवितो कीं, जें जीवन येथें शक्य आहे त्या जीवनांत ज्ञान, सुख, सामर्थ्य, सौजन्य या सर्व गोष्टी सापेक्ष, मर्यादित व अनिश्चित स्वरूपाच्या असणार.

तथापि बुद्धीच्या अतीत कांहीं श्रेष्ठ वस्तु आहे हें बुद्धितत्त्वांतच गृहीत धरल्यासारखें दिसतें. कारण बुद्धीचें सारसर्वस्व व एकमेव ध्येय म्हणजे

 

पान क्र. १०८

 

ज्ञानाच्या अर्थात् सत्याच्या शोधांत अविरत राहणें हें होय. सर्व असत्य व विपरीत ज्ञान नाहींसें करीत करीत सत्य व खरें ज्ञान आत्मसात् करणें हा बुद्धीचा उपजत गुण. फार चुकत असतें तेथें कमी चूक व्हावी, असत्याच्या, भ्रमाच्या कक्षा निमूळत्या करून त्यांचे प्रांत कमी कमी करावे हाच केवळ बुद्धीचा हेतु अथवा दृष्टि नसते. बुद्धीच्या दृष्टीपुढें सत्य म्हणून कांहीं स्वतंत्र व तिच्या उदयाच्या पूर्वींपासून अस्तित्वांत असणारी वस्तु असते; आणि खरें ज्ञान, खोटें ज्ञान या द्वंद्वाच्या मार्गानें हळूहळू क्रमाक्रमानें त्या वस्तूच्या जवळजवळ जात रहावें असा तिचा हेतु असतो. तें सत्य आहे याबद्दल बुद्धीला संशय नसतो. सत्यवस्तूच्या अस्तित्वाबद्दल जशी बुद्धीला खात्री असते तशी खात्री तिला मनुष्याच्या दुसऱ्या आकांक्षित गोष्टींबद्दल असत नाहीं. याचें कारण, तिच्या विशिष्ट प्रांतांत, सत्याच्या प्रांतांत, तिला ज्या स्वयंभू अंतःप्रकाशाचें साह्य मिळतें त्या प्रकाशाचें साह्य तिला इतर प्रांतांत मिळत नाहीं हें होय. सुखाची निरतिशय स्थिति आम्हाला प्राप्त होऊं शकेल अशी आम्ही कल्पना करूं शकतो याचें कारण, बुद्धीहून वेगळें हृदय म्हणून जें आमचें अंग आहे, ज्याला स्वभावत: सुखाचा ओढा असतो, त्या हृदयाला निश्चित-ज्ञानाचा एक प्रकार उपलब्ध असतो; अर्थात् त्याला श्रद्धा ठेवण्याची शक्ति असते आणि दुःखाचें मूळ जी अतृप्त इच्छा ती समूळ उपटून टाकतां येईल अशी भविष्यासंबंधानें आमच्या मनाला कल्पना करतां येते. हृदयाला निर्भेळ सुखाच्या अंतिम प्राप्तीची ज्याप्रमाणें खात्री असते, त्याप्रमाणें शारीर ज्ञानतंतूना दुःखसंवेदनांपासून व शारीरिक जीवनाला मरणापासून मुक्तता मिळण्याची खात्री आहे काय ? शारीर संवेदनांतील दुःखाचा अभाव, शारीर जीवनाच्या अंताचा अभाव आम्हाला कसा काय कल्पितां येणार ? मात्र वस्तुस्थिति अशी आहे कीं, संवेदनांत अशी उपजत प्रभावी भावना असते कीं, दुःख म्हणून नसावेंच, दुःख ही कांहींतरी आगंतुक गोष्ट आहे व ती नाहींशी होऊं शकेल. शरीरांत काम करणाऱ्या प्राणाला, स्वभावत: स्वतःचा अंत अस्वाभाविक वाटतो; हा अंत होतां कामा नये अशी त्याच्या अंतरांत सारखी मागणी चालू असते आणि ही 'हक्काची मागणी' आहे अशी त्याची प्रभावी प्रबल भावना असते. आमच्या बुद्धीला संवेदनांच्या व प्राणाच्या या गोष्टी म्हणजे नैसर्गिक, जन्मजात भावना, कल्पना व आकांक्षा आहेत असें वाटतें परंतु त्या केव्हांतरी पूर्ण होऊं शकतील अशी कल्पना तिला होत नाहीं.

 

पान क्र. १०९

 

परंतु यांत बुद्धीची अप्रबुद्धता दिसते. वस्तुत: एकच नियम सर्वत्र लावणें हें बुद्धीचें काम आहे. परंतु व्यवहारवादी बुद्धि अशी चूक करते कीं, जी गोष्ट स्पष्टपणें तिच्या प्रत्ययास येते तिच्या ती अतिरिक्तपणें अंकित होऊन राहते; आणि ज्या गोष्टी आज स्पष्ट प्रत्ययास येत नाहींत पण ज्या महत्त्वाच्या गोष्टींची शक्यता स्पष्ट प्रत्ययास येते त्या गोष्टींसंबंधानें ती तर्कशुद्ध रीतीनें विचार करून तर्कशुद्ध निर्णय घेत नाहीं, तसें धैर्य ती दाखवीत नाहीं. खरी गोष्ट अशी आहे कीं, आज जें जें अस्तित्वांत आहे, तें पूर्वीं एका काळीं 'शक्यतेच्या,' शक्य अस्तित्वाच्या वर्गांत होतें. तेव्हां आज जें शक्यतेच्या वर्गांत असेल, तें भावी कालांत 'वास्तव अस्तित्वाच्या' वर्गांत जाईल असा तर्क करणें युक्तिसंगत आहे. बुद्धि, हृदय, शारीर संवेदना, शारीरजीवन यांना ज्या गोष्टी हव्याशा वाटतात त्या गोष्टींची शक्यता आज स्पष्ट प्रत्ययास येत आहे. कारण, वस्तूंचें व घटनांचें अस्तित्व कशावर अवलंबून आहे, त्यांचीं कारणें कोणतीं, त्यांच्या प्रक्रिया कोणत्या या गोष्टींच्या ज्ञानानें वस्तूंवर व घटनांवर सत्ता प्राप्त होत असते आणि पूर्ण सत्याच्या आड येणाऱ्या प्रमादाचीं, भ्रमाचीं कारणें, नित्य सुखाच्या विरोधी असलेल्या मानसिक दुःखाचे हेतू, नित्य सुखाला दूर ठेवणाऱ्या शारीर दुःखाचें मूळ, नित्य जीवनविरोधी असलेल्या मरणाचें मूळ, या गोष्टींचें स्वच्छ ज्ञान जर आम्हाला शक्य झालें, तर हीं कारणें नाहींशीं करण्यासाठीं आम्ही प्रयत्न करूं शकूं आणि या प्रयत्नांत यशस्वी होण्याची आशा-अपेक्षा देखील थोडीबहुत बाळगूं शकूं. कारण ज्ञान ही सत्ता आहे, ज्ञान हेंच प्रभुत्व आहे.

वास्तविक गोष्ट अशी आहे कीं, प्रमाद, मानसिक दुःख आदि विरोधी, अनिष्ट गोष्टी शक्य तेवढ्या दूर करणें, नाहींशा करणें हें आम्ही आमचें ध्येय मानतो. प्रमादाचीं आणि मानसिक व शारीरिक दु:खांचीं कारणें शक्य तेवढीं कमी करण्यासाठीं आम्ही सारखा प्रयत्न करीत असतो. भौतिक विज्ञान वाढत आहे. वाढतें भौतिक शास्त्रीय ज्ञान जन्माचें नियमन करण्याचें, व आयुर्मर्यादा शक्य तितकी अधिक वाढविण्याचें स्वप्न पहात आहे; मरणावर पूर्ण विजय मिळविण्याची गोष्ट हें नवें शास्त्र अद्यापि काढीत नसलें तरी मरण खूप खूप दूर लोटण्याचें स्वप्न त्याला दिसत आहे, अनिष्ट गोष्टींचीं जीं कारणें दूर करण्याचा आम्ही यत्न करतों तीं, अगदीं मुळांतलीं कारणें नसून दुय्यम, बाह्य कारणें असतात; अर्थात् ही बाह्य, दुय्यम कारणें शक्य तितकी दूर हटविण्याचाच

 

पान क्र. ११०

 

विचार आम्ही करूं शकतो. आम्हाला जें नको आहे, ज्याच्या विरुद्ध आम्ही झगडतो त्या अनिष्टाचीं खरीं मुळें उखडून फेंकून देण्याचा विचार आम्ही करूं शकत नाहीं. कारण तीं खरीं मुळें हुडकून काढण्याचा यत्न आम्ही करीत नाहीं. मूळ सत्याचा शोध करण्याचा आमचा यत्न नसतो, तर दुय्यम अनुभव घेण्याकडे आमचें सर्व लक्ष असतें; वस्तूंच्या क्रिया-प्रक्रिया आम्ही जाणून घेतो, परंतु वस्तूंचें सारतत्त्व, वस्तूंचा गाभा आम्ही जाणून घेत नाहीं. अर्थात् परिस्थिति बदलण्याचें काम आम्ही प्रभावीपणें करूं शकतो, पण मुळावर सत्ता चालवणें, नियंत्रण ठेवणें आम्हास शक्य होत नाहीं. परंतु प्रमाद किंवा भ्रम, दुःख व मरण या गोष्टींचें तात्त्विक कारण काय आहे हें ज्ञान जर आम्हीं आत्मसात् केलें तर या अनिष्टावर मर्यादित नव्हे, तर पूर्ण हुकमत चालविण्याचें सामर्थ्य आम्हाला लाभेल, लाभणें शक्य होईल; इतकेंच नव्हे तर, अशी देखील शक्यता आहे कीं, या अनिष्ट गोष्टी आम्हाला अजिबात नाहींशा करतां येतील, आणि निर्भेळ, निरतिशय सौजन्य, सुख, ज्ञान आणि अमर जीवन आम्हाला मिळवितां येईल. आमच्या निसर्गजात अंतर्दृष्टीला मानवी अस्तित्वाची जी अंतिम, वास्तव अवस्था स्पष्टपणें दिसते ती याप्रमाणें आम्हाला लाभून, आमची जन्मजात बलिष्ठ भविष्यविषयक भावना बरोबर आहे असें आमच्या यशस्वी प्रगतीनें व अंतिम ध्येयप्राप्तीनें सिद्ध होईल, अशी आशा करण्याला भरपूर जागा आहे.

अनिष्ट गोष्टी नष्ट करून, इष्ट असलेल्या निरतिशय निर्भेळ सुखादि गोष्टी कशा मिळवितां येतील, या प्रश्नाचा आमच्या प्राचीन वेदांतानें विचार करून, आमच्यापुढें ब्रह्मविचार मांडला आहे. ब्रह्माचा स्वभाव सच्चिदानंद हा आहे. ब्रह्म ही एकच एक सर्वव्यापी मूळ सद्वस्तु सर्व विश्वघटनांच्या मुळाशीं आहे, हा विचार आणि अनुभव, आमचें अनिष्ट दूर करील आणि आमचें इष्ट आम्हाला देईल असें वेदांताचें आपल्यापुढील प्रश्नाला उत्तर आहे.

या वेदांती दृष्टीनुसार एका सर्वव्यापी अनश्वर सद्वस्तूची गतिशीलता, हें सर्व जीवांच्या जीवनाचें सारभूत स्वरूप आहे; सर्व संवेदना आणि भावना यांचें मूळस्वरूप, सर्वव्यापी स्वयंभू आनंदाचा -- अस्तित्वाच्या आनंदाचा -- खेळ, हें आहे, सर्वव्यापी सर्वांतर्यामी सत्यापासून स्वभावत: बाहेर पडणारे किरण, हें सर्व विचार आणि सर्व प्रत्यय यांचें सारभूत तत्त्व आहे; सर्वव्यापी स्वयंप्रकटनसमर्थ साधुत्वाचें, मांगल्याचें सदैव पुढें पुढें जाणें हें सर्व क्रियांचें हृदयभूत सर्वस्व आहे.

 

पान क्र. १११

 

पण हा खेळ, ही एकतत्त्वाची गतिशीलता अनेक आकारांत, अनेक वृत्तींत, अनेक शक्तींच्या परस्परांवरील अनेक प्रयोगांत व्यक्त होते. या अनेकत्वामध्यें वैयक्तिक 'मी'च्या अस्तित्वाला, त्याच्या हस्तक्षेपाला जागा असते, हा 'मी', सर्वव्यापी एकतत्त्वाच्या आविष्काराला कांहीं नियमित रूप देतो, आणि कांहीं काळपर्यंत या आविष्कारांत वैगुण्यहि आणतो. सर्वव्यापी जाणिवेनें स्वत:ला मर्यादित करणें, हा या 'मी' चा स्वभाव व स्वरूप आहे. सर्वव्यापी खेळाचा थोडासा भाग जाणिवेच्या क्षेत्रांत ठेवून, बाकी सर्व भाग बुद्धिपुरःसर जाणिवेंतून काढून टाकणें, हें 'मी'चें स्वरूप आहे. एका विशिष्ट रूपांत, आकारांत (बाकी सर्व विसरून) जाणिवेनें निमग्न होऊन राहणें, हें 'मी'चें स्वरूप आहे; एका विशिष्ट रूपांत, वृत्तींच्या एका विशिष्ट संघांत, शक्तींच्या एका विशिष्ट कार्यक्षेत्रांत सर्वव्यापी जाणिवेनें स्वत:ला कोंडून घेणें हें 'मी'चें स्वरूप आहे. प्रमाद किंवा भ्रम, मानसिक तथा शारीरिक दुःख, दुष्टत्व आणि मरण या गोष्टी, 'मी' उत्पन्न करतो; या गोष्टी 'मी'च्या प्रतिक्रियेनें जन्मास येतात. वस्तुत: एकच एक तत्त्व, आनंद-सत्य-शिवरूप अस्तित्व, आपल्या गतिशीलतेनें ज्या हालचालींना जन्म देतें त्या हालचालींचा, त्या जन्मदात्या एकतत्त्वाशीं योग्य तो संबंध असतो. पण हा संबंध आपला 'मी' ओळखीत नाहीं. तो आपल्या संकुचित दृष्टीनें या हालचाली बघतो आणि त्यांतील कोणाला प्रमाद किंवा भ्रम, कोणाला मानसिक दुःख इत्यादि नांवें, त्याच्या अनुभवानुसार देतो. 'मी' नें अनुभवलेल्या दु:खादि प्रतिक्रियारूप गोष्टी आम्हाला नाहींशा करतां येतील, जर आम्ही वरील हालचालींचा एका सद्वस्तूशीं असलेला संबंध अनुभवण्यास समर्थ होऊं. हा मूळ संबंध आम्हाला अनुभवतां आला तर दु:खादि रूपानें भासणाऱ्या गोष्टींचें खरें मूल्य, खरा अर्थ, आम्हाला कळेल. विश्वसमष्टीच्या जाणिवेशीं व्यक्तीनें योग्य संबंध ठेवला, ती जाणीव आपलीशी केली, तिच्यांतील योग्य तो वांटा आत्मसात् केला, त्याचप्रमाणें, ही समष्टि ज्या विश्वातीत जाणिवेचें व्यक्त रूप आहे त्या जाणिवेचाहि योग्य वांटा व्यक्तीनें आपलासा केला, म्हणजे विश्वातीत एकतत्त्वाच्या, विश्वांतील हालचालींचा योग्य संबंध व्यक्तीच्या पुन: अनुभवास येईल व संकुचित प्रतिक्रियेनें उदय पावणारे भ्रमादि अनुभवाचें प्रकार नाहींसे होतील.

उत्तर वेदांतामध्यें अशी कल्पना आली आणि रूढ होऊन बसली कीं,

 

पान क्र. ११२

 

मर्यादित 'मी' हा केवळ द्वंद्वांचें कारण नव्हे, तर विश्वाच्या अस्तित्वाचा मूळ पाया आहे. 'मी'चें अज्ञान दूर केल्यानें आणि त्याच्या अज्ञानजन्य मर्यादा नाहींशा केल्यानें आपण द्वंद्वें नाहींशीं करतों हें तर खरेंच, पण या द्वंद्वांच्या निकालाबरोबर आम्ही विश्वांतील आमच्या अस्तित्वाचाहि लय करतो. या कल्पनेनुसार मानवाचें अस्तित्व मुळांतच दुःखमय आणि भ्रमरूप आहे, आणि विश्वांत राहून पूर्णता मिळविण्याचा प्रयत्न करणें निरर्थक आहे. या विश्वांत सर्व कांहीं सापेक्षच लाभेल, चांगल्या बरोबर वाईटहि बांधलेलें आहे, अन्योन्यविरोधी गोष्टींचें भांडार म्हणजे विश्व, येथें इष्ट गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न आम्हीं करावा, पण तिची विरोधी, अनिष्ट गोष्ट तिला जोडलेली असल्यानें ती पत्करण्याची तयारी ठेवावी - अशी विश्वासंबंधींची व त्या विश्वांतील आमच्या जीवनासंबंधींची उत्तरवेदांताची कल्पना आहे. या कल्पनेहून अधिक विशाल आणि सत्यस्पर्शी कल्पना ही आहे कीं, 'मी' हा त्याच्या पलीकडे असलेल्या परम तत्त्वाचा मध्यस्थ प्रतिनिधिरूप आहे, परमतत्त्वाचें अल्पकालिक प्रतीक आहे. ही विशाल कल्पना आम्हीं आत्मसात् केली, तर पूर्णतेच्या प्रयत्नाची निरर्थकता ही खोटी कल्पना आहे, असें आमच्या प्रत्ययास येईल आणि आमचें जीवन पूर्णतासंपन्न करण्यासाठीं आम्ही वेदान्त उपयोगांत आणूं, जीवनांतून पळून जाण्यासाठीं त्याचा उपयोग करणार नाहीं. विश्वाचें अस्तित्व हें ईश्वर किंवा पुरुष या तत्त्वावर आधारलेलें आहे. विश्वाचा मूळ पाया, मूळ कारण ईश्वर आहे; व्यक्तीचीं रूपें, समष्टीचीं रूपें ईश्वर व्यक्त करतो व या रूपांत तो प्रवेश करून जीवन जगतो, हें विश्वाच्या अस्तित्वाचें स्वरूप आहे. वैयक्तिक 'मी', मर्यादित 'मी' हें जाणिवेचें एक मधल्या अवस्थेंतील रूप आहे; जाणिवेचा विकास एका विशिष्ट मार्गानें करण्यासाठीं या वैयक्तिक 'मी'ची आवश्यकता असते. या मार्गानें गेले असतां, व्यक्ति तिच्या पलीकडील ज्या सद्वस्तूची प्रतीक आहे त्या सद्वस्तूशीं एकरूप होऊन, शिवाय त्या सद्वस्तूचें ती प्रतिनिधित्व करूं शकते. अर्थात् हें प्रतिनिधित्व अंधारांत चांचपडणारा व मर्यादांच्या कोंडींत वावरणारा 'मी' होऊन किंवा राहून व्यक्ति करीत नाहीं, तर त्या दिव्य सद्वस्तूचें आणि विश्वपुरुषाचें ती एक केंद्रस्थान बनते; आणि वैयक्तिक म्हणून जे कांहीं नियतसंबंध असतील त्या सर्वांना हें दिव्य केंद्र व्यापून टाकते, त्यांचा दिव्य उपयोग करतें आणि दिव्य सद्वस्तूशीं त्या सर्व संबंधांचा व संबंधित गोष्टींचा सुंदर मेळ बसवितें.

 

पान क्र. ११३

 

ज्ञानमय पुरुषोत्तम हा भौतिक निसर्गाची समष्टि या रूपानें व्यक्त झाला आहे. ही समष्टि, भौतिक विश्वांतील मानवी अस्तित्वाचा पाया आहे. प्राण, मन व विज्ञान (अतिमानस) हीं आवरणें घेऊन हा पुरुषोत्तम, जड निसर्गांत दडला आहे. तो या निसर्गांत प्राणमय, मनोमय, व विज्ञानमय अशा रूपांनीं क्रमश: एकाहून एक श्रेष्ठ रूपांत व्यक्त होणें - हें आमच्या सर्व हालचालींचे मूळ कारण आहे. या अनिवार्य विकासक्रमामुळें मानव जडांत अवतरला. आपल्या शरीरांत ईश्वर क्रमश: व्यक्त करण्याचें सामर्थ्य हा विकासक्रम त्याला देईल - तो शेवटीं देहधारी विश्वपुरुष होईल, तो ईश्वराचा मानवदेहधारी विश्वव्यापी असा अवतार होईल. वरील विकास घडवून आणण्यासाठीं वैयक्तिक 'मी' ची रचना केलेली आहे. जड निसर्ग हा ईश्वराचें अगदीं खालचें समष्टिरूप. हें तळांतलें रूप आणि मानवाच्या पातळीवरील ईश्वराचें रूप, या दोहोंमध्यें 'हृद्य समुद्र' या शब्दांनीं ऋग्वेदांत वर्णिलेलें समष्टिरूप आहे. या समष्टिरूपांत स्पष्ट प्रकाश नाहीं, रचना नाहीं - रचनाहीन, वैशिष्ट्यशून्य, अमर्याद पसारा, असें या समष्टीचें रूप आहे. निश्चेतन समष्टीच्या वरील ही अर्धजड - अर्धचेतन समष्टि होय. मानवी पातळीवरील समष्टि ही चेतन समष्टि. हिच्यामध्यें वैयक्तिक 'मी' द्वंद्वें निर्माण करतो. जीवन-मरण, मानसिक सुखदु:ख, शारीरिक सुखदु:ख, सत्य-असत्य, साधुत्व-असाधुत्व या रचना मींच्या कर्तृत्वानें निर्माण होतात. निर्भेळ नित्य असें सत्य, साधुत्व, जीवन व सुख यांची मूर्ति म्हणजे विश्वसमष्टि. या समष्टीला, समष्टीच्या एकत्वाला बहिष्कृत करून आपली रचना ही विकासकार्यापुरती आहे हें न जाणून, आपलें स्वतंत्रत्व, स्वतंत्र एकत्व अनुभवण्याचा प्रयत्न करून, व्यक्ति -- वैयक्तिक मी -- स्वाभाविकपणें व अगतिकपणें द्वंद्वें उभीं करतो. विश्वाला व ईश्वराला ओळखून त्यांना सामावून घेण्यासाठीं विकासक्रमांत व्यक्ति, आपला ''आत्मा'', सुटा मोकळा करते; आणि असें झालें म्हणजे ''मी'' या रचनेचा उपयोग संपून ती नाहींशीं होण्याच्या मार्गास लागते. विश्व आणि विश्वेश्वर यांना आत्म्यांत सांठविण्याचा उद्योग व्यक्तीनें आरंभिला म्हणजे, जें श्रेष्ठांत श्रेष्ठ कृतार्थपण व्यक्तीला मिळावयाचें, वा मिळवावयाचें असतें त्याची साधना तिनें सुरू केली असें समजावें. ''मी'' चें जीवन हें, या कृतार्थतेच्या सिद्धीसाठीं अवश्य असणारी पूर्वभूमिका आहे, ज्याप्रमाणें मानवी जीवनाच्या सिद्धीसाठीं पशु जीवन ही एक आवश्यक पूर्वभूमिका आहे. मर्यादित 'मी' चें, संपूर्ण रूपांतर घडून व्यक्तीमध्यें

 

पान क्र. ११४

 

सर्वात्मक पुरुष अभिव्यक्त होतो, व्यक्ति सर्वरूप होते. हा मर्यादित 'मी', विश्वात्मा व विश्वातीत ईश्वर यांच्या दर्शनामुळें, आपलें संकुचित स्वरूप टाकून, ईश्वरी एकत्वाचें जाणीवयुक्त केंद्र बनतो, ईश्वरी स्वतंत्रतेचें ज्ञानपूर्ण केंद्र बनतो. याप्रमाणें मानव कृतार्थ होतो, व्यक्ति कृतार्थ होते, आणि विश्वांत ज्या अनेक व्यक्ती असतात त्या व्यक्तींच्या जीवनावर व जीवनक्षेत्रावर अशा कृतार्थ व्यक्तीच्या द्वारां, अनंत असीम अस्तित्व-सत्य-शिव-आनंद यांची पावन गंगा वाहूं लागते. या कृतार्थ व्यक्तीला निरतिशय पुष्टि-तुष्टि देणारा हा पवित्र प्रवाह, ती व्यक्ती स्वयंस्फूर्तीनें सभोवारच्या सहचर आत्म्यांच्या तुष्टि-पुष्टीसाठीं, त्यांच्या जीवनक्षेत्रांत नेऊन सोडते - आमच्या विकासाच्या फेऱ्या याच दिव्य फलाच्या सिद्धीसाठीं चालल्या आहेत. निसर्गमाता आपल्या उदरांत हें सर्वोत्तम फलरूपीं बाळ वागवीत आहे; या बाळाला विश्वाच्या कृतार्थतेसाठीं जन्म देऊन, आपण कृतार्थ व्हावें या उद्देशानें ती सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे.

 

पान क्र. ११५

प्रकरण आठवें

 

वेदान्ती ज्ञानाचे मार्ग

 

सर्व भूतांमध्यें असणारा हा गूढ आत्मा सामान्य दृष्टीला दिसत नाहीं; श्रेष्ठ, सूक्ष्म बुद्धीला, ज्यांना सूक्ष्मदृष्टि आहे अशा साधकांना श्रेष्ठ सूक्ष्म बुद्धीच्या साह्यानें तो दिसतो.

- कठोपनिषद् ३.१२

 

      मानवी व्यक्तीच्या विकासाचा शेवट, त्या व्यक्तीचा जीवनप्रवाह सच्चिदानंदमय होणें हा आहे, असें मागील प्रकरणाच्या शेवटीं सांगितलें. तेव्हां, विश्वांत सच्चिदानंदाचें कार्य काय आहे, तें कसें चालतें, तें स्वत: आणि त्याचें प्रतीक जो 'अहम्' या दोघांचे संबंध आरंभी काय असतात, ते कोणत्या प्रक्रियेनें निर्माण होतात, त्या संबंधांतून शेवटीं व्यक्तीचें सच्चिदानंदत्व स्थापित होतें तें कोणत्या मार्गानें - इत्यादि प्रश्न आतां विचारांत घेणें अवश्य आहे. कारण हे जे व्यक्ति आणि सच्चिदानंद यांचे संबंध आणि या संबंधांची जी आरंभींची व पुढची वाटचालीची प्रक्रिया, ती प्रक्रिया व ते संबंध यांजवरच दिव्य मानवी जीवनाचें तत्त्वज्ञान आणि आचरण सर्वथा अवलंबून आहे.

दिव्य अस्तित्वाची व ईश्वराच्या अस्तित्वाची कल्पना आम्हांला येते, या अस्तित्वाचें ज्ञान आम्हांला होतें, तें इंद्रियांचा पुरावा आणि स्थूल भौतिक मनाच्या भिंती ओलांडून पलीकडे गेल्यावर होतें. इंद्रियांचा पुरावा आणि स्थूल जाणीव यांच्या क्षेत्रांत जोंपावेतों आम्ही आपणांस कोंडून घेतों, तोंपावेतों भौतिक विश्व आणि त्या विश्वांतील घटना यांच्या पलीकडे कशाचीहि कल्पना आम्हांला करतां येत नाहीं, कशाचेंहि ज्ञान आम्हांला होत नाही. परंतु आमच्यांत कांहीं शक्ती अशा आहेत कीं, आमच्या मनाला केवळ भौतिक वस्तूंच्या, भौतिक अनुभवांच्या आधारावर करतां येत नाहींत अशा कल्पना, त्या शक्तींच्या

 

पान क्र. ११६

 

सहाय्यानें आम्हांला करतां येतात. आम्हांला दिसणाऱ्या भौतिक विश्वांतील गोष्टींना तर्कशास्त्रीय अनुमानपद्धतीची जोड देऊन किंवा कल्पनाशक्तीच्या विविधता-निर्मितीच्या सामर्थ्याची जोड देऊन या कल्पना आम्हांला उभ्या करतां येतात हें खरें. पण मुख्य मुद्दा हा कीं, या उभ्या केलेल्या कल्पनांना दृश्य भौतिक गोष्टींचा प्रत्यक्ष आधार असत नाहीं. आमची शुद्ध तर्कबुद्धि ही आम्हांला दृश्यातीत गोष्टींची कल्पना करून देणारी, एक प्रथम श्रेणीची शक्ति आहे.

मानवी बुद्धि दोन प्रकारचें कार्य करते. एक मिश्र व पराधीन, दुसरें शुद्ध किंवा स्वाधीन. बुद्धि मिश्र कार्य करते, तेव्हां इंद्रियांच्या अनुभवाचें क्षेत्र, एवढेंच तिच्या कार्याचें क्षेत्र असतें; इंद्रियांच्या अनुभवाचा, त्या अनुभवाच्या क्षेत्राचा नियम, हाच शेवटला सत्याचा नियम, शेवटलें सत्य ती मानते. अशी बुद्धि दृश्याचाच फक्त अभ्यास व शोध करते; अर्थात् दृश्यांचे अन्योन्यसंबंध, त्यांच्या प्रक्रिया, त्यांचें उपयोग यांच्याच अध्ययनाच्या, निरीक्षण-परीक्षणाच्या पाठीमागें ती असते. बुद्धीच्या या क्रियेंतून  वस्तूच्या मूळ तत्त्वाचें ज्ञान मिळणें शक्य नसतें; वस्तूचा दृश्य व्यापार मात्र तिला समजूं शकतो. अस्तित्वाची गभीरता व गहनता मापण्याचें साधन मिश्रक्रियेच्या बुद्धीजवळ नाहीं. त्या अस्तित्वांतून उदय पावलेल्या दुय्यम वस्तूंचें क्षेत्र तपासणें, एवढीच तिची शक्ति असते. सर्वथा स्वाधीन व शुद्ध कार्य करणारी बुद्धि ही इंद्रियांनीं दिलेले अनुभव मान्य करते; पण त्यांनीं आंखलेली मर्यादा अमान्य करते; त्या अनुभवांच्या निरीक्षणापासून ती आरंभ करते, पुढें त्या अनुभवांच्या मागें काय आहे हें ती पाहते, त्याचा शोध घेते, खऱ्या-खोट्याचा निर्णय करते, आपलें स्वतंत्र कार्य हें हक्काचें कार्य आहे असें ओळखून, त्या स्वतंत्र कार्याच्या साह्यानें सर्वसामान्य व बदलतां न येणारे असे सिद्धांत व कल्पना बसविते, बसविण्याचा प्रयत्न करते. या स्वतंत्र सिद्धांतांचा व कल्पनांचा संबंध वस्तूंच्या दृश्य रूपांशीं, व्यापारांशीं असत नाहीं, तर त्या दृश्य रूपांच्या, व्यापारांच्या मागें जें सत्य असतें त्याच्याशीं असतो. केव्हां केव्हां दृश्य वस्तु वा व्यापार पाहून, त्या दृश्याच्या पाठीमागें काय सत्य आहे तें स्वतंत्र बुद्धि एकदम ठरवून सांगतें. दृश्याच्या पाठीमागील वस्तूची, एकदम म्हणजे युक्तिवाद न करतां ठरविलेली कल्पना, ही इंद्रियांनीं दिलेल्या, दृश्याच्या अनुभवावर आधारलेली, त्या अनुभवाचा परिणाम आहे असें प्रथमदर्शनीं वाटण्याचा

 

पान क्र. ११७

 

संभव असतो, पण खरोखरी ती तशी नसते. ती बुद्धीच्या स्वतंत्र व शुद्ध कार्यानेंच जन्मलेली असते, ती स्वतंत्र बुद्धीचाच प्रत्यय, केवळ स्वतंत्र बुद्धीला प्रत्यक्ष होणारी गोष्ट असते. स्वतंत्र बुद्धीचें वरील कार्याहून वेगळें व तिचा स्वभावविशेष व्यक्त करणारें कार्य पुढीलप्रमाणें असतें : इंद्रियांनीं दिलेले अनुभव ती केवळ वरकरणी आपल्या कार्याकरतां घेते; या अनुभवांवर तिची भिस्त असत नाहीं; तिचा युक्तिवाद तिच्या स्वतंत्र प्रत्ययावर आधारलेला असतो; या अनुभवांना पार मागें टाकून त्या अनुभवांच्या अगदीं उलट विधान करणारा सिद्धांत तो निश्चित करतो. बुद्धीचें हें कार्य आवश्यक आहे आणि न्यायसंगत आहे. कारण आपल्या सामान्य अनुभवाचें क्षेत्र फार लहान असतें. या क्षेत्राच्या पलीकडे विश्वांतील अनेक सत्य घटना भरलेल्या आहेत; शिवाय हें जें लहानसें क्षेत्र सामान्य अनुभवाचें म्हणून असतें, त्या क्षेत्रांतहि या अनुभवांसाठीं जीं साधनें वापरण्यांत येतात तीं साधनें सदोष असतात; आणि म्हणून आपले हे सामान्य अनुभव बहुधा खोटीं 'वजनें-मापेंच' आपल्या पदरांत टाकतात. विश्वांतील वस्तूंच्या, घटनांच्या पोटीं जें सत्य आहे, त्याला आम्हांला भेटावयाचें, गांठावयाचें असेल, त्याच्या संबंधानें योग्य कल्पना हवी असेल, तर हा सामान्य खोट्याचा अनुभव -- खोट्याला खरें म्हणून पदरांत टाकणारा अनुभव -- मागें टाकलाच पाहिजे, स्वत:ला प्रमाणभूत मानावें ही त्याची आग्रहाची मागणी अमान्य केलीच पाहिजे. मनुष्यांत ज्या अत्यंत महत्त्वाच्या शक्ती विकास पावल्या आहेत, त्यांत, स्वतंत्र बुद्धीच्या उपयोगानें इंद्रियसंलग्न मनाकडून होणाऱ्या चुकांची दुरुस्ती करण्याची शक्ति विशेष महत्त्वाची आहे. पृथ्वीवरील प्राणिवर्गांत मनुष्य श्रेष्ठ ठरण्याचें मुख्य कारण ही बुद्धीची शक्ति होय.

असंमिश्र, स्वतंत्र बुद्धीचा पूर्ण उपयोग केल्यानें आम्ही भौतिक ज्ञानाच्या पलीकडील अतिभौतिक ज्ञानाच्या, तत्त्वज्ञानाच्या प्रांतांत प्रवेश करतो; परंतु तत्त्वज्ञानाच्या ज्या तात्त्विक कल्पना असतात, त्या कल्पनांनीं आमच्या संपूर्ण प्रकृतीचें समाधान होत नाहीं. शुद्ध, स्वतंत्र बुद्धीचें समाधान या कल्पनांनीं होतें. कारण तिची प्रकृति अशा कल्पनांचीच बनलेली असते. परंतु आपला स्वभाव असा आहे कीं, आपण नेहमीं दोन डोळे वापरतो; एका डोळ्यानें तात्त्विक कल्पना आणि दुसऱ्या डोळ्यानें वास्तव घटना पाहतो. प्रत्येक वस्तूसंबंधानें या दोन गोष्टी पाहिल्याशिवाय आपलें समाधान होत नाहीं. केवळ तात्त्विक कल्पना ही आम्हांला पूर्णशी भासत

 

पान क्र. ११८

 

नाहीं, आमच्या प्रकृतीच्या एका अंगाच्या दृष्टीनें ती जणुं असत्य वाटते, मिथ्या वाटते; ही कल्पना अनुभव म्हणून प्रत्ययास आली म्हणजे ती पूर्णशी वाटते व आमचें समाधान होतें. परंतु या तत्त्वज्ञान-विषयक कल्पनांच्या बाबतींत इंद्रियाधिष्ठित अनुभव शक्य नसतो. या तत्त्वज्ञान-विषयक सत्यांचा स्वभावच असा आहे कीं, हीं सत्यें इंद्रियांना दिसत नाहींत, बुद्धीलाच दिसतात. मग यांचा अनुभव आम्हांला कसा यावयाचा ? अनुभवाची ऐंद्रिय शक्ति येथें कामाची नसल्यानें, अनुभव घेणारी दुसरी शक्ति आम्हांला असली तरच आमचें तात्त्विक कल्पनांसंबंधाचें ज्ञान आम्हांला पूर्ण वाटेल. आम्ही आतां अतिभौतिक प्रांतांतील गोष्टींचा विचार करीत आहों, तेव्हां या गोष्टींचा अनुभव घ्यावयास, मानसिक प्रत्ययशक्तीचा क्षेत्रविस्तार करणें आवश्यक आहे.

एका अर्थानें आपला सगळाच अनुभव मानसिक (Psychological) अनुभव असतो. कारण आपण इंद्रियांच्या द्वारां जें ग्रहण करतों, त्याला कांहीं अर्थ किंवा मूल्य येण्यासाठीं इंद्रियस्थ, इंद्रियसंलग्न म्हणून जें मन आहे त्या मनाच्या भाषेंत त्याला कांहीं नांव मिळावें लागतें. या मनाला सहावें इंद्रिय असें आपल्या तत्त्वज्ञानांत म्हणतात. पण असें म्हणतां येईल कीं, मन हेंच एक अनुभव घेण्याचें इंद्रिय असून दृष्टि, श्रवण, स्पर्श, घ्राण, रसना ही मनाचीं विशेष कार्य करणारीं रूपें आहेत. सामान्य अनुभवासाठीं हें इंद्रिय-मन (Sense mind) जरी डोळे, कान इत्यादि इंद्रियांचा उपयोग करतें, तरी तें या इंद्रियांच्या मर्यादा ओलांडून स्वतंत्रपणें आपल्या स्वतःच्या शक्तीनें प्रत्यक्ष अनुभव घेऊं शकतें. कल्पना करणाऱ्या बुद्धीचे जसे शुद्ध व मिश्र असे दोन क्रियाप्रकार आहेत, तसेच अनुभव घेणाऱ्या मनाचेहि दोन क्रियाप्रकार आहेत. बाहेरच्या जगाचा, विषयांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करणें हा मिश्र प्रकार; स्वत:च्या विषयींचा अनुभव घेण्याचा प्रयत्न हा शुद्ध प्रकार. मिश्र क्रियेंत मन ज्ञानेंद्रियावर अवलंबून असतें, आणि तीं इंद्रियें पुरवतील त्या पुराव्यानुसार आपला अनुभव अमुक असें ठरविते. शुद्ध क्रियेंत तें स्वत: स्वतःचें ठिकाणीं काम करतें आणि एकप्रकारें त्या वस्तूंशीं एकरूप होऊन, वस्तूंचा अनुभव प्रत्यक्षपणें घेतें. आमच्या भावनांचा अनुभव आम्ही तादात्म्यानें घेतो; आम्ही क्रोधरूप होऊन क्रोधाचा अनुभव घेतो. आमच्या अस्तित्वाचा अनुभव आम्हांला तादात्म्यतेंतच घडतो; या ठिकाणी तादात्म्यानें घडणारें ज्ञान म्हणजेच अनुभव, ही गोष्ट स्पष्ट होते. वस्तुत: तादात्म्यानें घडणारें

 

पान क्र. ११९

 

ज्ञान हें सर्वच अनुभवाचें खरें, स्वाभाविक व आंतलें स्वरूप आहे. हें खरें स्वरूप आम्हांला स्पष्ट न होण्याचें कारण, जगामध्यें मी केवळ अनुभवणारा आणि बाकी सर्व माझ्या अनुभवाचा विषय, असा भेद करून, 'मी' खेरीज बाकी जगाला आम्हीं बहिष्कार घालून 'मी' च्या बाहेर ठेवलें आहे, आणि मग या बाहेर ठेवलेल्या जगाशीं पुन: एकरूप होण्यासाठीं कांहीं इंद्रियें, कांहीं प्रक्रिया आम्ही अगतिकपणें निर्मून बांधून राहिलों आहों. या बहिष्काराच्या स्थितींत जाणीवपूर्वक तादात्म्यानें प्रत्यक्ष ज्ञान आम्हांला होऊं शकत नाहीं. त्या ऐवजीं अप्रत्यक्ष ज्ञान आम्ही उपयोगांत आणतों. स्थूल भौतिक संसर्ग आणि मानसिक सहभावना -- सहानुभूति (Mental Sympathy) -- यांच्या द्वारा आम्हांला हें अप्रत्यक्ष ज्ञान घडल्यासारखें दिसतें. 'मी'नें ही ज्ञानाची कोंडी निर्माण केलेली आहे. शरीर आणि मन यांच्या मर्यादा घालून ज्ञानाची कोंडी करणें हें 'मी'चें प्राथमिक, पायाभूत कार्य आहे. हा वरील प्रकार 'मी'च्या एकंदर प्रवृत्तीचा एक नमुना आहे. प्रथम एक असत्य पाया म्हणून घ्यावयाचें आणि त्या अव्वल असत्याच्या आधारानें दुय्यम असत्यें निर्माण करून वस्तुजातांतील सत्य झांकून टाकावयाचें असा, 'मी'चा उद्योग चालतो. 'मी'च्या इतरांशी होणाऱ्या संबंधांतून निर्माण झालेलीं 'मी'ची ही दुय्यम असत्येंच आम्हांला व्यावहारिक सत्यें म्हणून कामाला येतात; कामाला आणावी लागतात.

मानसिक आणि इंद्रियमूलक ज्ञान सध्यां कोणत्या प्रकारें आपल्याला मिळतें, त्याचा स्वभाव काय हें आपण पाहिलें. त्यावरून आपणांस हें कळेल कीं, आज आपल्या ज्ञानप्राप्तीला ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा अनिवार्य आहेत असें मुळींच नाहीं. या मर्यादा विकासक्रमांत उत्पन्न झाल्या आहेत. या विकासक्रमांत मनाला अशी संवय झाली आहे कीं, भौतिक जगाशीं संबंध आणावयाचा, तर विशिष्ट शारीर क्रिया-प्रतिक्रिया यांचें सामान्यतः साह्य घेत जावें. परंतु असें असलें, तरी जगाचा अनुभव घेण्यासंबंधींचा आपला जो सामान्य नियम आहे, तो निसर्गाचा अटळ नियम नसून तो केवळ आम्हांवर सत्ता चालविणाऱ्या, पण आम्हांस दूर करतां येण्यासारख्या संवयींचा आम्हांवरील नियमित जुलूम आहे, हें आम्हीं विसरतां कामां नये. बाह्य जगाचें ज्ञान व्हावें असें जेव्हां आम्हांला वाटतें, तेव्हां तें ज्ञान आम्ही अप्रत्यक्षपणें ज्ञानेंद्रियांचे द्वारां मिळवितो, तसेंच तें आम्हांस मिळवावें लागतें; आणि यामुळें वस्तूंविषयीं व मनुष्यांविषयीं ज्ञानेंद्रियें कळवितील तितकेंच

 

पान क्र. १२०

 

सत्य आम्हांला कळूं शकतें. स्थूल भौतिक इंद्रियांच्या जुलमामधून स्वत:ची सुटका करून घेण्याची मनाची तयारी असेल, किंवा त्याची समजूत घालून तशी त्याची तयारी करतां येण्यासारखी असेल, तर स्थूल इंद्रियांच्या साह्याशिवाय इंद्रियांच्या विषयांचे ज्ञान प्रत्यक्षपणें मनाला करून घेतां येईल, नव्हे हा त्याचा स्वाभाविक धर्म आहे. संमोहनविद्येच्या प्रयोगानें घडलेलें संमोहन (Hypnosis) आणि त्यासारखे दुसरे मानसिक अवस्थाविशेष हे मनाच्या या स्वभावधर्माचा प्रत्यय आणून देतात. आमच्या जागृत अवस्थेंतील जाणिवेच्या व्यवहाराला बंधन असतें, मर्यादा असते; एकंदर जीवनाच्या विकासांत मन आणि जड-शरीर यांचें जें नातें उत्पन्न झालेलें आहे, त्या नात्याच्या मर्यादा जागृत मनाला पाळाव्या लागतात; त्या नात्यानेंच जागृत मनाची अनुभवशक्ति निर्मिलेली आहे व नियमित केलेली आहे. म्हणून जागृत मनाला जगांतील वस्तूंचे व घटनांचे प्रत्यक्ष ज्ञान करून घेणें सामान्यत: असंभव असतें. जागृत मनाची जागृति दूर करून त्याला सुप्त अवस्थेंत नेतां आलें, तर खरें मन -- जागृत मनाच्या तळाशीं असलेलें मन (Subliminal mind) -- काम करण्यास मोकळें होतें व त्याला जगाचें प्रत्यक्ष ज्ञान करून घेतां येतें. जागृत अवस्थेंत काम करीत असतां देखील, मनाला जगाचें ज्ञान प्रत्यक्षपणें घेतां येणें ही गोष्ट अवघड आहे, पण अशक्य मात्र नाहीं. कांहीं विशिष्ट मार्गांनीं ज्यांनीं मनावर बरेच प्रयोग केले आहेत त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे. सामान्यत: मात्र, जागृत मन सुप्तावस्थेंत नेले म्हणजे 'खरें मन' आपला नैसर्गिक विशेष दाखवितें; त्याचा विशेष हाच कीं, तेंच एकमेव अनुभव घेणारें परिपूर्ण शक्तीचें इंद्रिय आहे आणि इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांच्या बाबतींत आपली मिश्र आणि परतंत्र क्रिया उपयोगांत न आणतां, शुद्ध आणि स्वतंत्र क्रिया तें उपयोगांत आणूं शकतें, व आणतें आणि इंद्रियांच्या विषयाचें ज्ञान इंद्रियांच्या उपयोगावांचून प्रत्यक्षपणें करून घेतें.

इंद्रियसंलग्न मन (Sense mind) जी शुद्ध, स्वतंत्र क्रिया करतें, त्या क्रियेचा उपयोग करून आपल्याला उपलब्ध असलेल्या पांच इंद्रियांवेगळें इंद्रिय किंवा इंद्रियें तें निर्माण करूं शकते. उदाहरणार्थ, आपण हातांत धरलेल्या कोणत्याहि पदार्थाचें वजन कोणतेंहि स्थूल साधन उपयोगांत न आणतां अगदीं बरोबर ओळखण्याची शक्ति असलेलें इंद्रिय आपल्याला आपल्या अंतरांत अस्तित्वांत आणतां येतें. शुद्ध स्वतंत्र बुद्धि ज्याप्रमाणें कार्यारंभापुरतां इंद्रियांचा अनुभव स्वीकारते, त्याप्रमाणें या

 

पान क्र. १२१

 

वजन ओळखण्याच्या कार्यांत स्पर्श आणि दाब अनुभवणारें इंद्रिय केवळ कार्यारंभापुरतें उपयोगांत आणलें जातें. वजनाचा हिशोब स्पर्शेंद्रिय कांहीं मनाला सांगू शकत नाहीं; मन आपल्या स्वतंत्र क्रियेनेंच हा हिशोब बरोबर करतें, स्पशेंद्रियाचा उपयोग केवळ वस्तूशीं संबंध येण्यापुरता तें करतें. शुद्ध स्वतंत्र बुद्धि आणि शुद्ध स्वतंत्र मन या दोघांचें या बाबतींत साम्य हें आहे कीं, इंद्रियांचा अनुभव आरंभासाठीं घेऊन पुढें बुद्धि आपला सिद्धांत आणि मन (इंद्रियसंलग्न मन) आपला अनुभव, इंद्रियांच्या अनुभवापासून अगदीं वेगळाच नव्हे तर, त्या अनुभवाच्या अगदीं उलट स्वरूपाचा असा निश्चित करतें. ही ज्ञानाची व अनुभवाची शक्ति, सामान्य शक्तीच्या पुष्कळ पुढें आहे; आणि ही पुढारलेली, वाढलेली शक्ति वस्तूंच्या केवळ बाह्य अंगालाच स्पर्श करीत नसून वस्तूच्या पोटांतील गोष्टीहि जाणूं शकते. उदाहरणार्थ, दुसऱ्यांच्या मनांत काय विचार, काय भावना आहेत त्या जाणणें, आत्मसात् करणें हें देखील स्वतंत्र मनाला शक्य असतें. मनुष्य काय बोलतो, काय हावभाव करतो, काय कृति करतो, चेहेऱ्यावर काय भाव दाखवितो इकडे न पाहतां, या गोष्टींची बिलकुल दखल न घेतां, नव्हे या गोष्टी अंशत: भावदर्शन घडवीत असतील किंवा मिथ्या भावदर्शन घडवीत असतील तरीहि, स्वतंत्र मन समोरच्या मनुष्याच्या मनांतील खऱ्या हालचाली जाणूं शकतें. या कार्यांत आरंभाला इंद्रियांच्या द्वारां बाह्य वस्तूंचा, मनुष्याचा संपर्क होण्याची मात्र आवश्यकता असते. मनाची ज्ञानशक्ति या पलीकडेहि वाढू शकते. ज्याप्रमाणें स्थूल इंद्रियांचा आरंभीं उपयोग करून समोरील वस्तूंचें बाह्य अंग व अंतरंग मन पाहूं शकतें, त्याप्रमाणें मनुष्यांतील सूक्ष्म इंद्रियें, व सूक्ष्म इंद्रियशक्ति यांचा स्वतंत्रपणेंहि तें उपयोग करूं शकतें. इंद्रियशक्तींची स्थूल व सूक्ष्म किंवा शारीर व मानस अशी दोन प्रकारची कामगिरी असते. बाह्य जगांतील जीवनाकरितां स्थूल इंद्रियशक्तीचा आम्ही उपयोग करतो. आमची जी बाह्य भौतिक परिस्थिति आहे, तिचें ज्ञान आम्हांला बाह्य इंद्रियांनीं होतें. परंतु वस्तूंना जसें बाह्य अंग आहे, तसें अंतरंगहि आहे. या अंतरंगाचें ज्ञान सूक्ष्म इंद्रियांनी आम्हांला करून घेतां येतें. भौतिक स्थूल मनाला या पुढारलेल्या इंद्रियशक्ती अविश्वसनीय वाटतात, या शक्तींच्या कार्याबद्दल त्याला शंका वाटते; कारण आमच्या नेहमींच्या संवयीची जी अनुभवाची व जीवनाची पद्धति आहे, तिच्या दृष्टीनें या शक्ती असामान्य, अपवादात्मक आहेत. या शक्ती कामाला लावावयास कठीण जातें,

 

पान क्र. १२२

 

त्यांची व्यवस्था लावणें त्यापेक्षां कठीण आहे व म्हणून अनुभवाचें एक व्यवस्थित, निश्चित, उपयुक्त साधन या शक्ती होऊं शकत नाहींत. असें असलें तरी त्या आहेत हें मान्य करावें लागतें, कारण आमची जी सामान्य कार्यकारी वरवरची जाणीव आहे, ती लहानशा क्षेत्रांत कामास येते -- हें क्षेत्र वाढविण्याचा जो स्वयंस्फूर्त अव्यवस्थित लहरी प्रयत्न किंवा सशास्त्र नियमबद्ध व्यवस्थित शिस्तीचा खटाटोप करण्यांत येतो, त्या प्रयत्नाचा परिणाम म्हणून वर उल्लेखिलेल्या विस्तृत कार्यकारी मानसिक अनुभवशक्ती निश्चितपणें अस्तित्वांत येतात.

परंतु केवळ 'बुद्धि ग्राह्य' अशीं जीं 'अतीन्द्रिय' सत्यें आहेत, त्यांचा मानसिक अनुभव या वरील पुढारलेल्या शक्तीनींहि आम्हांला मिळत नाहीं; आणि तें तर आमचें उद्दिष्ट आहे. या पुढारलेल्या शक्ती आम्हांला आमचें ऐंद्रिय अनुभवाचें क्षेत्र मोठें करून देतात, आणि इंद्रियग्राह्य वस्तूंचा व घटनांचा अनुभव घेण्याची, त्यांचें निरीक्षण करण्याची सामान्य साधनांपेक्षां अधिक परिणामकारक साधनें आमच्या तैनातीस देतात; एवढेंच त्या आमच्याकरितां करूं शकतात. पण सत्य किंवा वस्तूंचें सत्यस्वरूप नेहमींच इंद्रियांच्या कक्षेच्या पलीकडे असतें. तथापि, विश्वाच्या घटनेचा असा एक अंगभूत नियम आहे कीं, बुद्धीला ग्राह्य होण्यासारखीं सत्यें ज्या ठिकाणीं आहेत, त्याच बुद्धिसंपन्न शरीरसंस्थेंत तीं बुद्धीनें शोधून काढलेलीं सत्यें अनुभवावयाचें कांहींतरी साधन असलेंच पाहिजे. आमच्या मनयुक्त शरीराच्या ठिकाणीं असलेल्या, अनुभव घेण्याच्या अनेक शक्ती आपण पाहिल्या. आतां बुद्धीच्या सत्यांचा अनुभव देणारी जी एक शक्ति त्याचे ठिकाणीं आहे, तिचा आपण विचार करूं. आपल्या अस्तित्वाचें ज्ञान आपल्याला कसें होतें ? मन अस्तित्वाशीं एकरूप होतें, तादात्म्य पावतें आणि मग 'मी आहे' असें ज्ञान होतें. एकरूपता किंवा तादात्म्य हें जें ज्ञानाचें साधन आहे, त्याचा विकास किंवा विस्तार करून बुद्धिसंस्थापित सत्यांचा अनुभव आपल्याला घेतां येईल. आपल्या आंत काय काय आहे त्यांचें ज्ञान आपल्याला होतें, याचें कारण 'आपण आहोंत' ही अनुभूति आपल्या मनासमोर कमी अधिक स्पष्टपणें जागृत असते, उपस्थित असतें हें आहे. या गोष्टी सामान्य सूत्रानें सांगावयाच्या, तर असें म्हणतां येईल कीं, पात्राच्या ज्ञानांत, पात्रगत वस्तूचें ज्ञान अंतर्भूत असतें. तेव्हां आपल्या स्वत: संबंधींच्या जाणिवेची जी शक्ति आपल्या मनाला उपलब्ध आहे, ती वाढवून आमच्या

 

पान क्र. १२३

 

बाहेर आमच्या पलीकडे असलेल्या, उपनिषदांत वर्णिलेल्या आत्म्याच्या, ब्रह्माच्या अनुभवाचें साधन जर तिला आम्ही नित्य करूं शकलों, तर ब्रह्माच्या पोटीं जी विश्वांतील सत्यें आहेत, त्यांचा अनुभव आम्हांला येईल. त्यांचें केवळ बुद्धिगत ज्ञान आम्हांपाशीं आहे, असें न होतां त्यांच्या अनुभूतीचा आम्हांला लाभ होऊन त्या सत्यांचे दुहेरी धनि आम्ही होऊं. या अनुभवाच्या शक्यतेच्या पायावरच भारतांतील वेदान्त उभारलेला आहे. ब्रह्माच्या ज्ञानाच्या द्वारां विश्वाचें ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न भारतीय वेदान्तानें केला आहे.

परंतु मनाचा अनुभव आणि बुद्धीचा सिद्धांत कितीहि श्रेष्ठ श्रेणीचा असला, तरी सर्वोच्च स्वयंभू तादात्म्य किंवा एकात्मता, एकरसता, एकता त्या अनुभवांत किंवा सिद्धांतांत अंतर्भूत होत नाहीं, या सर्वोच्च एकरसतेचें प्रतिबिंबच केवळ त्या मानसिक तादात्म्यांत असतें किंवा दिसतें इतकेंच, असा वेदांताचा सिद्धांत आहे. सर्वोच्च एकरसतेसाठीं आम्हांला मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे जावें लागतें. जागृतींत काम करणाऱ्या आमच्या जाणिवेंत जी बुद्धि क्रियाशील असते ती बुद्धि मध्यस्थासारखी आहे. आम्ही आमच्या उर्ध्वगति-विकासक्रमाला ज्या 'अर्धजागृत अर्धमनस्क सर्वांतून' (Subconscient All) सुरुवात केली आहे आणि या विकासाची गति ज्या 'अतिमानसिक सर्वाकडे' (Superconscient All) आम्हांला घेऊन जात आहे, त्या दोन सर्वात्मक वस्तूंमध्यें मध्यस्थाचें काम आमची जागृत अवस्थेंतील बुद्धि करीत आहे. एकाच सर्वात्मक महावस्तूच्या दोन अवस्था, दोन साकार मूर्ती 'अर्धमनस्क सर्व' आणि 'अतिमानसिक सर्व' या वस्तू आहेत. 'अर्धमनस्क सर्वांत' प्राणमयता-जीवता (Life) ही प्रधान गोष्ट आहे, 'अतिमानसिक सर्वाची' प्रधान गोष्ट प्रकाश किंवा ज्ञान (Light) ही आहे. 'अर्धमनस्क सर्वांत' ज्ञान किंवा जाणीव क्रियेच्या आंत सुप्त किंवा गुप्त असते. ती क्रियेचा पडदा वापरते. क्रिया हें 'जीवते'चें सार-तत्त्व आहे; 'अतिमानसिक सर्वांत' क्रिया प्रकाशाच्या पोटांत सुप्त किंवा गुप्त किंवा पडद्याआड होते. ती प्रकाशांत किंवा ज्ञानांत लपून जाते. तेथूनच ती निघालेली असते, व तेथेंच ती विकासक्रमानें परत जाते. त्या क्रियेंत कांहीं ज्ञान गुप्त वा सुप्त असत नाहीं. ती क्रियाच परमोच्च जाणिवेंत गुप्त होते, अंतर्हित होते. 'अर्धमनस्क आणि अतिमनस्क सर्व किंवा विश्व', या दोहोंना 'अंत:स्फूर्त ज्ञान (Intuitional Knowledge) कार्यकारी म्हणून सारखेच

 

पान क्र. १२४

 

उपलब्ध असतें. अंतःस्फूर्त ज्ञानाचा पाया ज्ञानपुरस्सर तादात्म्य किंवा एकात्मता -- ज्ञेय आणि ज्ञाता यांजमधील ज्ञानपुरस्सर संपूर्ण कार्यक्षम प्रभावी एकात्मता -- हा असतो; ज्ञेयाचें अस्तित्व व ज्ञात्याचें अस्तित्व एकरूप, अभिन्न असतें अशी ही अवस्था असते. या अवस्थेंत ज्ञाता ज्ञानानें ज्ञेयाशीं एकरूप झालेला असतो. 'अर्धमनस्क विश्वात', क्रियेच्या द्वारां कार्यक्षमतेच्या द्वारां, अंतःस्फूर्त ज्ञान व्यक्त होतें, आणि ज्ञान किंवा ज्ञान-पुरस्सर एकात्मता पूर्णतया किंवा कमी अधिक प्रमाणांत क्रियेच्या पोटांत लपलेली असते. उलट पक्षीं, 'अतिमानसिक विश्वांत', प्रकाश किंवा ज्ञान हें प्रधान तत्त्व आणि प्रधान व्यवहारनियम असल्यानें अंत:स्फूर्त ज्ञान आपल्या नैसर्गिक, खऱ्या स्वरूपांत प्रकट होतें; अर्थात् 'ज्ञानपुरस्सर तादात्म्यानें उदय पावलेलें ज्ञान', या स्वरूपांत तें प्रकट होतें. येथें फलद्रूप क्रिया, ही या ज्ञानाचा स्वाभाविक सहचर म्हणून किंवा स्वाभाविक परिणाम म्हणून आपल्या अनुभवास येते; अर्धमनस्क विश्वांत प्रधान वस्तु म्हणून क्रिया जो मुखवटा वापरीत असते, तो मुखवटा 'अतिमानसिक विश्वांत' तिला वापरता येत नाहीं. येथें प्रधान वस्तु ज्ञान हीच असते. या दोन अवस्थांच्या मध्यें मन आणि बुद्धि (mind and reason) मधल्या कारभाऱ्यांचें काम करतात. व्यक्तीनें क्रियेच्या कोंडवाड्यांतून ज्ञानाला मुक्त करावे आणि त्या ज्ञानाचा अग्रेसरत्वाचा, पहिल्या मानाचा जो हक्क आहे, तो त्याला परत वापरतां येईल अशी त्याची तयारी करावी, यासाठीं मन आणि बुद्धि हे मधले कारभारी, व्यक्तीला यशस्वितेनें मदत करतात. मनाचे ठिकाणीं जी आत्म-जाणीव, 'मी आहे' ही जाणीव असते, ती कोणत्याहि वस्तूला किंवा व्यक्तीला, स्वत:च्या आत्म्याला आणि दुसऱ्या आत्म्याला, वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या अंतरांतील गोष्टींना जाणून घेण्यासाठीं उपयोगांत आणली जाते व या सर्व बाबतींत तादात्म्यानें ज्ञान मिळवितां येतें. पण हें मनाचें तादात्म्य सर्वोच्च स्वयंभू तादात्म्य नसून, प्रतिबिंबरूप असतें असें वर सांगितलें आहे. हें मनाचें तादात्म्य आपला दर्जा ज्ञानानें वाढवीत वाढवीत, प्रकाशमय स्वयंभू तादात्म्य झालें, म्हणजे बुद्धि देखील आपला दर्जा वाढवून स्वयंप्रकाशी अंतःस्फूर्त ज्ञानाचें रूप घेते. आमच्या ज्ञानाची ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. येथें मन विकास पावून अतिमन, अतिमानस (विज्ञान) होऊन पूर्णतेला पोहोंचलेलें असतें.

अगदीं जुन्या वेदान्ताचे सिद्धान्त मानवी जाणिवेच्या ज्या रचनेवर आधारलेले आहेत, ती रचना वरील प्रकारची आहे. या रचनेचा पायावर

 

पान क्र. १२५

 

प्राचीन ऋषींनीं उभ्या केलेल्या सिद्धांतांची चर्चा करून, त्यांचें युक्तिसंगतत्व स्थापित करण्याचा उद्देश मजपुढें नाहीं. तथापि त्यांच्या मुख्य सिद्धान्तांपैकीं कांहीं सिद्धांतांचें संक्षिप्त समालोचन मला करावयास हवें. आपण सध्यां दिव्य जीवनाचा प्रश्न आपल्यासमोर ठेवला आहे, त्या प्रश्नाशीं या वेदांती सिद्धांतांचा जेवढा संबंध येतो, तेवढ्यापुरतेच हे सिद्धान्त मी तपासणार आहे. जी दिव्य जीवनाची इमारत नव्यानें पुन: उभी करावयाची आहे, तिच्या पहिल्या पायाच्या ठिकाणीं आम्हांला या सिद्धांतांत मांडलेल्या कल्पना उत्तम प्रकारें उपयोगी पडतील. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, सर्वत्र ज्ञानाचे बाबतींत जें करावें लागतें, तें या बाबतींतहि करावें लागेल. अर्थात् जुन्या सिद्धान्ताची जुनी भाषा बदलून त्या ठिकाणीं आजच्या मानसिक अवस्थेला जुळणारी नवी भाषा वापरावी लागेल; तसेंच जो नवा प्रकाश उपलब्ध झालेला आहे, त्या प्रकाशांत जुना प्रकाश अंतर्भूत करून आपलें काम करावें लागेल. केवळ कालच्या उषःकालीं उपलब्ध असलेल्या ज्ञानावर विसंबून काम करणें चुकीचें, प्रतिगामीपणाचें असतें. तथापि जुनें ज्ञान धि:कारणें हेंहि चुकीचें असतें. जुनें ज्ञान किंवा त्यापैकीं जेवढें आज हस्तगत करतां येईल तेवढें ज्ञान, आमचें आरंभीचें भांडवल म्हणून आम्हीं उपयोगांत आणणें, जुन्या ज्ञानाचा आमच्या वांट्याला आलेला खजिना जेवढा हातीं येईल तेवढा, प्रारंभीच्या भांडवलासारखा वापरणें, हेंच आमच्या हिताचें होईल. हें भांडवल आम्हीं कामास लावलें, तर नित्य नव्या होणाऱ्या, बदलणाऱ्या, व नित्य जुन्या कायम स्वरूपाच्या राहणाऱ्या अनंताशीं आम्ही जो व्यवहार करणार, त्या व्यवहारांत आम्हांला अधिकांत अधिक लाभ निश्चितपणें होईल.

वेदांतानें विश्वाचें जें विश्लेषण केलें, त्यांत जी शेवटली गोष्ट त्याला आढळली, ती सद्ब्रह्म ही होय. सद्ब्रह्म म्हणजे शुद्ध, अलक्षण, अनंत, असीम अस्तित्व. विश्वांतील ज्या आकारांनी आणि गतींनीं दृश्य सत्याचा पसारा बनलेला आहे, त्यांच्या पाठीमागें, त्यांच्या पलीकडे, त्यांच्या पोटांत जी मूळ पायाभूत आदिम सत्य-वस्तु वेदान्ती अनुभवाला उपलब्ध झाली, ती म्हणजे हें वर उल्लेखिलेलें सद्ब्रह्म होय. हें उघड आहे कीं, सद्ब्रह्म या वस्तूची कल्पना विश्वाच्या मुळाशी ठेवणें, ही गोष्ट कांहीं आमची सर्वसाधारण जाणीव करूं शकत नाहीं. आमचा सर्वसाधारण अनुभव, आमची सर्वसाधारण जाणीव ज्या गोष्टी जाणते, किंवा जाणूं शकते, त्यांच्या पलीकडील, सर्वथा त्यांच्या

 

पान क्र. १२६

 

कक्षेबाहेरील अशी सद्ब्रह्म ही वस्तु किंवा कल्पना आहे. आमचीं ज्ञानेंद्रियें, आमचें मनाचें इंद्रिय कसल्याहि शुद्ध असीम अस्तित्वाविषयीं कांहीं देखील जाणत नाहीं. रूप आणि गति या विषयींचा इंद्रियांचा अनुभव आम्हांस कांहीं सांगूं शकतो, सांगतोहि. रूपांना अस्तित्व आहे पण हें अस्तित्व शुद्ध अस्तित्व नव्हे, नेहमींच तें मिश्र असतें; संयुक्त, सांघिक, संबंधमय असतें. आम्ही आमच्या अंतरांत शिरलों, तर विशिष्ट निश्चित रूप आम्ही दूर करूं शकतो परंतु गति कांहीं आम्ही दूर करूं शकत नाहीं; बदलण्याची क्रिया कांहीं आम्ही दूर करूं शकत नाहीं. अवकाशांत जडद्रव्यानें गतियुक्त राहणें व कालाच्या ओघांत रूपांतरावर रूपांतर होत राहणें, अर्थात् रूपांतराचें चक्र फिरत राहणें, या दोन अनिवार्य गतींवर आमच्या अस्तित्वाचा पाया रचलेला दिसतो. वाटल्यास आम्ही असें म्हणूं शकतों कीं, ही दोन प्रकारची गति हेंच अस्तित्व आहे आणि 'शुद्ध अस्तित्व' ही कल्पना, शोधून सांपडण्यासारख्या सत्याची कल्पना नाहीं. एवढेंच कीं, आमच्या स्वत:च्या जाणिवेची - आत्मभानाची (Self-consciousness) जी घटना आहे, तिच्यांत किंवा तिच्या पाठीमागें केव्हांहि न हलणारें, न बदलणारें, जन्ममृत्यूच्या पलीकडे असलेलें, क्रिया, रूप, रूपांतर (बदल) यांच्या कक्षेबाहेरचें असें कांहींतरी तत्त्व आम्हांला क्षणभर केव्हां केव्हां ओझरतें दिसतें, व तें 'कांहींतरी' वस्तुत: आम्हीच आहोंत अशी अंधुक अनुभूति किंवा कल्पना आम्हांला होते. हा एक आत्मभानाचा दरवाजा आमच्या अंतरंगात असून, तो केव्हां केव्हां एकदम उघडतो आणि त्याच्या पलीकडे असलेल्या तेजस्वी सत्याचें दर्शन आम्हांला घडवितो; तो एकदम बंद होण्यापूर्वीं त्या तेजस्वी सत्याचा एखादा प्रकाशमय किरण, स्वयंप्रकाश-किरण आम्हांला स्पर्श करूं शकेल इतका वेळ उघडाहि राहतो. हा किरण आम्हांला स्वच्छ सत्यज्ञान देतो; स्वयंप्रकाश सत्यज्ञान आंतून मिळेल अशी जणुं अगत्याची सूचना देतो. आमची श्रद्धा बलवान् असेल, तर आम्ही हें क्षणभर लाभलेलें सत्याचें ज्ञान, अंतर्ज्ञान, आमच्या पकडींत घट्ट धरून ठेवूं शकतो आणि या अंतर्ज्ञानाच्या (Intuition) किरणाच्या आधारावर, या अंत:स्फूर्त ज्ञानानुसार जीवन जगण्याचा उपक्रम करून, सामान्य इंद्रियनिष्ठ मानसज्ञानाचें आमच्या जीवनांतील प्राबल्य कमी करण्याच्या मागें लागूं शकतो.

आम्हीं बारकाईनें आमच्या अंतरंगाची तपासणी केली, तर असें दिसून येतें कीं, आमचा पहिला गुरु अंतर्ज्ञान (Intuition) आहे. आमच्या

 

पान क्र. १२७

 

मनाच्या क्रिया चालूं असतात, तेव्हां या क्रियांच्या पाठीमागें अंतर्ज्ञान दडलेलें असतें. अज्ञात सत्याच्या अंतर्गृहांतून त्या सत्याचे जे तेजस्वी संदेश हें अंतर्ज्ञान आणून देते, त्या संदेशापासून मनुष्याला होणाऱ्या उच्च श्रेणीच्या ज्ञानप्राप्तीस आरंभ होतो. हा संदेशांचा संपर्क मनुष्याच्या मनाला झाल्यानंतरच बुद्धि या सोनेरी पिकांतलें आपल्याला काय मिळेल हें पहाण्याकरतां त्याच्या सान्निध्यांत येते. आम्ही आज काय आहोंत, आम्ही काय असल्यासारखे दिसतो, या संबंधींचें ज्ञान आम्हांला आहे. हें जें कांहीं आम्ही आहोंत किंवा असल्यासारखे दिसतो, त्याच्या पाठीमागें, पलीकडे असलेल्या थोर सत्याची अस्पष्ट कल्पना आम्हांला अंतर्ज्ञान करून देतें. आमची खालच्या पातळीवर काम करणारी बुद्धि आणि आमचा सामान्य अनुभव ह्यांनीं, ही अंतर्ज्ञानानें दिलेली कल्पना खोटी आहे, असें अट्टाहासानें सांगतलें, तरी ती कल्पना आमची पाठ सोडीत नाहीं; आम्हांला अस्पष्ट असणारी ती कल्पना आम्हीं स्पष्ट करून घ्यावी म्हणून अंतर्ज्ञान आम्हांला आंतून पुन: पुन: प्रेरणा देतें आणि या प्रेरणेनुसार आम्ही आमच्या मनाच्या समजुतीसाठीं ईश्वर, अमर जीवन, स्वर्ग, या आणि अशासारख्या भावात्मक स्पष्ट कल्पनांच्या द्वारां तें सत्य व्यक्त करतों. अंतर्ज्ञान हें निसर्गाइतकेंच बलवान् आहे. निसर्गाच्या आत्म्यांतून त्याचा उदय होतो; आमची बुद्धि किंवा आमचा अनुभव यांनी त्याच्या विरुद्ध कितीहि सांगितलें, तरी अंतर्ज्ञान त्याची पर्वा करीत नाहीं. वस्तुत: काय आहे, काय सत्य आहे, त्याचें पूर्ण ज्ञान अंतर्ज्ञानाला असतें. कारण तें स्वत: त्या सत्याचा अविभाज्य भाग असतें, त्या सत्यापासूनच तें आलेलें असतें. अर्थात् जें मूळ सत्य नसून केवळ त्याची एक दुय्यम रचना आहे, एक दुय्यम दृश्य आहे अशा मनाची, बुद्धीची त्या सत्यासंबंधींची वाटेल ती कल्पना असली, तरी त्या कल्पनेला मान तुकवून अंतर्ज्ञान आपली सत्याची दृष्टि सोडीत नाहीं. बाह्य अस्तित्वासंबंधीं नव्हे, तर अस्तित्वांत असणाऱ्या महान् सत्य-वस्तूसंबंधानें अंतर्ज्ञान आम्हांला कांहीं सांगतें. आमच्या आत्मभानाच्या प्रसंगीं केव्हां केव्हां जो श्रेष्ठ दरवाजा उघडतो व आम्हांला श्रेष्ठ प्रकाशाचा किरण वा कण क्षणभर कां होईना दाखवितो, तो त्या महान् सत्यवस्तूचाच किरण वा कण असतो. मूळ सत्याचें तें अविभाज्य अंगच असतें. या अंतर्ज्ञानाच्या संदेशाला प्राचीन वेदान्तानें आत्मसात् केलें आणि तीन महावाक्यांत त्यांनीं हा संदेश सूत्रबद्ध केला : ''सोऽहमस्मि'' (मी तो पुरुष आहे - ईशावास्य), ''तत् त्वमसि श्वेतकेतो''

 

पान क्र. १२८

 

(हे श्वेतकेतू, तें सत्य, तो आत्मा तूंच आहेस - छांदोग्य), ''सर्वं हि एतद् ब्रह्म'' ''अयमात्मा ब्रह्म'' (हें सर्वच ब्रह्म आहे, हा आत्मा ब्रह्म आहे - मांडूक्य).

परंतु आमच्या स्वभावाला ज्या व्यवस्थित स्पष्ट स्वरूपांत सत्याची मांडणी हवी असते, तशा स्वरूपांत अंतर्ज्ञान आम्हांला सत्य पुरवीत नाहीं, पुरवूं शकत नाहीं. कारण तें आम्हांमध्यें पडद्याआडून कार्य करतें, आमच्या अस्तित्वाचा जो भाग प्रकाशहीन, अस्पष्ट रचनेचा आहे, त्याठिकाणींच प्रधानत्वानें अंतर्ज्ञान काम करीत असतें. पडद्याच्या दुसऱ्या बाजूला उजेड आहे, पण तो आमच्या जागृतीचा उजेड, थोड्या क्षेत्रांतच आहे व थोड्या तेजाचा आहे, आणि या ठिकाणीं अंतर्ज्ञानाला जीं साधनें आपलें काम करण्यासाठीं मिळतात, तीं साधनें त्या ज्ञानाचें सांगणें नीट व पुरतें समजण्याच्या योग्यतेचीं नाहींत. अंतर्ज्ञानाकडून आम्हांला प्रत्यक्ष ज्ञान पुरतेपणीं मिळावयास, त्यानें पडद्याआडून काम करणें सोडून, आमच्या अंतरांतून वर येऊन, वरच्या पृष्ठभागाच्या अस्तित्वांत आपली संघटना करावयास हवी आणि आमच्या अस्तित्वाच्या या वरच्या थरांत अग्रभागीं राहून नेतेपण करावयास हवें. सध्यां या थरांत बुद्धीची संघटना आहे आणि ती आम्हांला आमच्या अनुभवांची, विचारांची, कृतींची व्यवस्था लावण्यास मदत करते. अगदीं प्राचीन उपनिषदांतील वेदान्ती विचार अंतःस्फूर्त ज्ञानाच्या युगांतील आहेत. हें अंतर्ज्ञानाचें युग कांहीं कालानें संपलें व त्याच्यानंतर बुद्धिनिष्ठ ज्ञानाचें युग आलें. अंतर्ज्ञानावर, अंत:श्रवणावर आधारलेली श्रुति मागें पडून अतिभौतिक आध्यात्मिक तत्त्वज्ञानाला प्राधान्य आलें. नंतर तेंहि आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचें युग संपून प्रायोगिक भौतिक शास्त्राचें युग आलें. अंतःस्फूर्त ज्ञान, अंतर्दृष्टीनें दिसलेला विचार, हा अतिमानस क्षेत्रांतून आलेला दूत असतो. अर्थात् आमची सर्वश्रेष्ठ ज्ञानशक्ति ही अंतर्दृष्टीचीच शक्ति आहे. तथापि तिचें युग संपून शुद्ध बुद्धीनें तिची जागा घेतली; ही बुद्धि एक प्रकारें अंतर्ज्ञानाच्या अनुपस्थितींत त्याचें काम करणारी दुय्यम दर्जाची कारभारी आहे; तिचें स्थान आपल्या अस्तित्वाच्या सर्वोच्च पातळीवर नसून, मधल्या पातळीवर आहे. या दुय्यम कारभाऱ्याचें युगहि मागें पडून कांहीं काळ मिश्र बुद्धीचे दिवस आले. ही मिश्रबुद्धि आमच्या नेहमींच्या परिचयाच्या मैदानांत (फार उंच ठिकाणीं नव्हे) किंवा थोड्याशा उंचीवर काम करते; भौतिक स्थूल मन, स्थूल इंद्रियें आणि त्यांना मदत करणारीं जीं

 

पान क्र. १२९

 

 

यंत्रें-तंत्रें आम्हांला आमच्या शोधक शक्तीनें सांपडतात, बनवितां येतात, त्या यंत्रतंत्रांच्या अनुभवाच्या क्षेत्रापलीकडे आमची मिश्रबुद्धि काम करूं शकत नाहीं. प्रथम दर्शनीं असें वाटतें कीं, ही गति 'अधोगति' आहे, उंच ठिकाण सुटून खालीं खालीं घसरणें आहे. परंतु वस्तुत: ही गति अधोगति नसून चक्रगति आहे; प्रगमनाची चक्रगति आहे, प्रगतीचें चक्र आहे. अंतर्ज्ञान, शुद्धबुद्धि, मिश्रबुद्धि या ज्ञानशक्ती आमच्या ज्ञानाच्या क्षेत्रांत सर्वाधिकार किंवा मुख्याधिकार चालवीत असल्या, तरी जेव्हां प्रत्येक कनिष्ठ शक्ति तिच्या वरच्या श्रेष्ठ शक्तीच्या जागीं येते, तेव्हां त्या श्रेष्ठ शक्तीनें मिळविलेलें ज्ञान जेवढें आत्मसात् करितां येईल तेवढें करून, तें ज्ञान आपल्या विशिष्ट पद्धतीनें सिद्ध करण्याचा यत्न करीत असते. स्वभावत:च हें तिला करावें लागतें. तिजवर पडलेल्या या कार्यभारानें शेवटीं श्रेष्ठ शक्तींशीं सलोख्यानें वागण्याची तिची विनम्र बुद्धि व क्षेत्र वाढतें. या प्रकारें एकीमागून एक ज्ञानशक्ति कार्यकारी झाली नाहीं, आणि एका शक्तीला स्वभावत: लाभणारें ज्ञान दुसऱ्या कनिष्ठ शक्तीने आत्मसात् करण्याचा प्रयत्न केला नाहीं, तर आमच्या प्रकृतीच्या एका अंगाला आम्हांवर पूर्ण स्वामित्व करूं देणें आम्हांला अटळ होईल. आमच्या प्रकृतीचीं दुसरीं अंगें अविकसित राहतील, दडपलेलीं राहतील, दुसऱ्या श्रेष्ठ शक्तीच्या अयोग्य, अन्याय्य हुकमतींत राहतील; तीं आपापल्या क्षेत्रापुरतीच कार्यकारी राहिल्यानें विकास-दृष्टीनें मागासलेलीं रहातील. पण ह्या ज्ञानशक्ती एकीमागून एक क्रमवारीनें प्रधानत्वानें कार्यकारी झाल्यानें आणि प्रत्येकीला स्वतंत्र विकासयत्न करण्याची सवड मिळाल्यानें त्या सर्व शक्तींमध्यें समतोल अवस्था उत्पन्न होते, आमच्या ज्ञानांगांमध्यें अधिक पूर्ण मेळ राहण्यास मदत होते.

उपनिषदें कांहीं काल भारतांत सर्वाधिकारी राहिलीं. नंतर दर्शनांचा (भाष्यांतील तत्त्वज्ञानाचा) भारतांत उदय झाला, अर्थात् श्रेष्ठ ज्ञानशक्तीनंतर तिच्याहून कनिष्ठ ज्ञानशक्तीला ज्ञानक्षेत्रांत मुख्य अधिकार प्राप्त झाला. याप्रमाणें ज्ञानांगांत समतोलता व सुसंवाद सुप्रतिष्ठित, होण्यास साहाय्यक होणारें वर उल्लेखिलेलें क्रमवार सत्ता-संक्रमण भारतांत घडलेलें आहे. वेद आणि वेदांत ज्या ऋषींनीं आम्हांला दिला, ते ऋषि अंत:स्फूर्त ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव यांजवरच सर्वथा विश्वासून असत. उपनिषदांत मोठाले वाद व चर्चा असें जें केव्हां केव्हां अभ्यासक सांगतात, तें त्यांचें सांगणें चुकीचें आहे. वादाचा-संभाषणाचा प्रसंग कांहीं

 

पान क्र. १३०

 

उपनिषदांत दिसून येतो -- पण हा देखावाच असतो, खरोखरीचा वाद-विवाद नसतो. त्यांत सामान्य वादासारखी चर्चा नसते, एक पक्ष व त्यास विरोधी दुसरा पक्ष, असा कांहीं भाग नसतो व तर्कशास्त्रीय अनुमानपद्धतीहि तेथें नसते. त्या वादाचा देखावा असलेल्या संवादांत, संवाद करणारे सभ्य विचारक तत्त्वज्ञ, परस्परांच्या अंतर्दर्शनांचा, अंतरनुभवांचा पाढा वाचीत; त्यांची तुलना करीत; त्या तुलनेंत कमी प्रकाशमय दर्शन वा अनुभव, अधिक प्रकाशमय दर्शनाला वा अनुभवाला मान्यता व मान देत असे. दोन दर्शनांत वा अनुभवांत एक संकुचित वा कमी व्यापक, दुसरा अधिक व्यापक वा कमी संकुचित, एक सदोष वा अपूर्ण, दुसरा निर्दोष किंवा कमी सदोष वा अधिक पूर्ण, एक कमी सारस्पर्शी दुसरा अधिक सारस्पर्शी, असें तुलनेंत आढळून आलें म्हणजे अर्थात् दुसऱ्या दर्शनाला किंवा अनुभवाला पहिला अनुभव किंवा दर्शन मान देऊन दूर होत असे. या वेदवेदांतांतील संवादांत एक विचारक दुसऱ्याला, ''तुम्हांला काय अनुभव आहे ?'' असा प्रश्न विचारी; ''तुमचें मत काय आहे ? तुमच्या युक्तिवादानें तुम्ही कोणत्या निर्णयाला आलां आहांत ?'' असे प्रश्न विचारले जात नसत. वेदांतमान्य सत्याला किंवा सत्यांना आधार म्हणून तर्कशास्त्रीय युक्तिवाद केला आहे असें एकहि स्थळ उपनिषदांत नाहीं. वेद-वेदांतकालीन ऋषींचे असें ठाम मत दिसतें कीं, तर्कशास्त्रीय युक्तिवाद, अंत:स्फूर्त ज्ञानासंबंधानें न्यायाधीशपण करण्यास समर्थ असूं शकत नाहीं; अंतर्ज्ञान कमी किंवा अधिक निर्दोष किंवा पूर्ण असूं शकतें - अधिक पूर्ण अंतर्ज्ञानानें कमी पूर्ण अंतर्ज्ञानांतींल चूक दाखवावी, दुरुस्त करावी पण तर्कशास्त्राला या बाबतींत कसलाच अधिकार असूं शकत नाहीं.

तथापि अंतर्ज्ञानानें दाखविलेल्या सत्यासंबंधीं देखील मानवाची बुद्धि स्वतःचें समाधान करणारी बौद्धिक तर्कपद्धति उपयोगांत आणूं शकते व आणते आणि अशी सत्यासत्यनिर्णयपद्धति वापरून सत्य-असत्याची पारख करण्याचा अधिकार तिला नि:संशय आहे. भारतांतील अंतर्ज्ञानाचें युग संपून बुद्धीचें व बुद्धीनें अनुमान बांधण्याचें युग आलें, तेव्हां बुद्धीचा वर सांगितलेला अधिकार लक्षांत घेऊन भारतीय दर्शनकारांनीं, ते ज्या सत्याचा शोध करीत होते त्या सत्यासंबंधानें, अंतर्ज्ञान आणि बुद्धि या दोघांनाहि यथोचित मान व मान्यता देणारी द्विमुखी मनोवृत्ति धारण केली; कारण प्राचीनांनीं त्यांच्या हवालीं केलेल्या वारशाविषयीं, ज्ञान-धनाविषयीं त्यांना

 

पान क्र. १३१

 

परिपूर्ण आदर होता व बुद्धीलाहि ते योग्य मान देत होते. श्रुति ही अधिकारानें बुद्धीच्या वरची आहे, बुद्धिप्रामाण्याहून श्रुतिप्रामाण्य श्रेष्ठ आहे असें ते मानीत. प्राचीनकाळी अंतर्ज्ञानानें प्राप्त झालेलीं सत्यें श्रुतींत आहेत, किंवा श्रुतिग्रंथ हे अपौरुषेय, ईश्वरोपदिष्ट आहेत असें ते मानीत. तथापि श्रुतींत आढळणाऱ्या गोष्टीसंबंधानें ते बुद्धीलाहि आवाहन करीत. बुद्धि आपल्या तर्कपद्धतीनें जे सिद्धांत स्थापन करी, त्यांतील श्रुतिमान्य सिद्धांत तेवढे प्रमाण मानावयाचे, असा त्यांचा रिवाज असे; कारण सर्वश्रेष्ठ अधिकार श्रुतीचा, असा त्यांचा विश्वास होता. तेव्हां त्यांचें कांहीं सिद्धांत असे असत कीं, जे श्रुति आणि बुद्धि या दोहोंनाहि मान्य असत. तत्त्वज्ञानाकडून (metaphysics) एक पातक नेहमीं घडत असतें तें हें कीं, तें ढगावर बसून लढत असतें, बिनबुडाचा वाद घालण्याकडे त्याचा कल असतो; शब्द हे शब्द आहेत हे विसरून, जणुं कांहीं ते वास्तव आहेत, संशयरहित घटना आहेत असें धरून तें चालतें; शब्द म्हणजे वास्तव नसून केवळ प्रतीकरूप आहेत हें लक्षांत घेऊन, त्यांची काळजीपूर्वक तपासणी करणें आणि ज्या वास्तव गोष्टी आणि घटना ते दाखवतात असें समजलें जातें, त्या वास्तव आहेत कां, व असल्या तर कशा स्वरूपाच्या आहेत, हें नेहमीं तपासून पाहणें अवश्य आहे; अंतर्ज्ञाननिष्ठ श्रुतीला स्वतःप्रमाण मानून, श्रुतींतील सिद्धांतांना पोषक असा युक्तिवाद करण्याचें तर्कनिष्ठ बुद्धीला उत्तेजन देणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानानें, तत्त्वज्ञानाकडून (metaphysics) बिनबुडाचा वाद घालण्यानें घडणारें पातक बऱ्याच प्रमाणांत टाळलें. भारतीय तत्त्वज्ञ प्रथम प्रथम आपलीं अनुमानें बांधतांना, त्या अनुभवांचा मध्यवर्ति सारभूत भाग, श्रेष्ठतम व खोलांत खोल अनुभवाशीं जुळता ठेवण्याची काळजी घेत. बुद्धि आणि अंतर्ज्ञान-अंतःस्फूर्ति -- हीं दोन महान् प्रमाणस्थानें त्यांना मान्य असल्यामुळें, या दोन्हींकडून ज्या सिद्धांतांना मान्यता मिळे ते सिद्धांत, 'निश्चित सिद्धांत' समजून ते आपली शोधक बुद्धि चालवीत असत. परंतु तत्त्वज्ञांचा हा क्रम कांहीं काळानें बदलला; अंतर्ज्ञानाला आपणाहून श्रेष्ठ समजण्याचें व त्याचा दुय्यम कारभारी म्हणून काम करण्याचें तत्त्वत: मान्य असलेलें एका काळचें व्रत या बुद्धीनें सोडून दिलें आणि आपण स्वत:प्रमाण आहों, आपल्यापेक्षां श्रेष्ठ प्रमाण-स्थान नाहीं, अशा भावनेनें तिचा कार्यक्रम चालूं झाला. अर्थात् याचा परिणाम म्हणून भारतांत अनेक अन्योन्यविरोधी दर्शनें - तत्त्वज्ञानें उदयास आलीं. प्रत्येक दर्शन आपला

 

पान क्र. १३२

 

आधार श्रुति आहे असें तत्त्वत: मान्य करी आणि श्रुतींतील वचनें घेऊन आपल्या विरोधकांवर त्यांचा शस्त्रांसारखा उपयोग करी. एकमेकांवर शस्त्रासारखीं वापरण्याजोगीं वचनें श्रुतींत सापडतात; याचें एक कारण असें आहे कीं, ज्या श्रेष्ठ अंतर्ज्ञानावर श्रुति आधारलेली आहे, तें अंतर्ज्ञान वस्तूंच्या मेळाव्याकडे बुद्धीच्या विश्लेषणात्मक बारीक दृष्टीनें न पाहतां समग्रतेच्या विशाल दृष्टीनें पाहतें. अविभाज्य महान् वस्तु हा अंतर्ज्ञानाचा मुख्य विषय असतो; या अविभाज्य वस्तूच्या निरनिराळ्या बाजू या दृष्टीनें, तिच्यांतील तपशिलांचा विचार तें करतें. अंतर्ज्ञानाचा ओढा नित्य आंतरिक समन्वयाकडे असतो, ज्ञानाच्या एकतेकडे असतो. बुद्धीची गोष्ट त्याच्या उलट आहे; विश्लेषण, विभाजन हा बुद्धीचा मार्ग; या मार्गानें मिळविलेल्या वस्तूंच्या तुकड्यांना एकत्र करून बुद्धि आपली ''समग्र'' वस्तु तयार करते. या कृत्रिम 'समग्र' वस्तूंत विरोधी गोष्टी, अपवादात्मक गोष्टी, तर्कशास्त्राला न खपणारे विसंवाद, एकत्र भरले जातात; आणि बुद्धीच्या हें नजरेस आलें, कीं ती स्वभावत: त्यांतील कांहीं गोष्टी योग्य म्हणून पसंत करून, त्यांच्याशीं विसंवादी अशा बाकीच्या गोष्टी बाजूला सारते आणि निर्दोष अशी तर्कशास्त्रसंमत व्यवस्था किंवा रचना उभी करते. असें असल्यानें आरंभीं अंतर्ज्ञानाचें राज्य असतां ज्ञानाची जी एकता होती व जी बुद्धीचें राज्य अंशत: सुरू झाल्यानंतरहि कांहीं काळ टिकली, ती एकता बुद्धीचें संपूर्ण साम्राज्य सुरू झाल्यावर नाहींशी झाली. अनेक युक्ती, अनेक अर्थ लावण्याच्या पद्धती, अनेक भिन्न मूल्यावर आधारलेले मूल्य-मापनप्रकार तार्किक तत्त्वज्ञांची कुशाग्रता वेळोवेळीं शोधून काढीत असे आणि या शोधांचा फायदा घेऊन त्यांना गैरसोयीच्या असणाऱ्या श्रुतिवचनांचा विरोध दूर करण्यांत तत्त्वज्ञ यशस्वी होऊं शकत, त्या वचनांना व्यवहारतः हरताळ लावूं शकत आणि त्यांचें स्वतःचें जें अनुमानरचित तत्त्वज्ञान असेल, त्याचा मोकळेपणें ते प्रचार करूं शकत.

याप्रमाणें जीं निरनिराळी दर्शनें या बुद्धीच्या पराक्रमानें तयार झालीं, त्यांत प्राचीन वेदांतांतील प्रमुख सिद्धांत, एका दर्शनांत कांहीं अंशीं, दुसऱ्यांत तसेच कांहीं अंशीं असे सर्व दर्शनांत थोड्या थोड्या अंशानें मान्यता पावून राहिले; आणि हे विखुरलेले सिद्धांत एकत्र करण्याचा व प्राचीन अंतर्ज्ञानाची एकता व सर्वसमावेशकता जींत प्रतिबिंबित झाली आहे अशी तत्त्वज्ञानाची इमारत या एकत्रीकरणानें उभी करण्याचा प्रयत्नहि मधून मधून केला गेला. त्याचप्रमाणें हीं दर्शनें वेगवेगळ्या विचारपद्धती वापरीत होतीं,

 

पान क्र. १३३

 

तरी सर्व दर्शनांत, त्यांतील सिद्धांताच्या पाठीमागें, मूळ पायाभूत असणारा वेदांती सिद्धांत टिकून राहिला. पुरुष, आत्मा, सद्ब्रह्म, शुद्ध अस्तित्व असणारी वस्तु (सद्वस्तु) या प्रकारें उपनिषदांनीं विश्वाचें मूळ वर्णिलें आहे. सर्व दार्शनिकांनीं या सिद्धांताला मान्यता दिली. कोठें कोठें बुद्धिनिष्ठ तत्त्वज्ञांनीं पुरुषाऐवजीं विशिष्ट विचार, भावना, मानसिक अवस्था हें विश्वाचें मूळ म्हणून कल्पिलें आहे. तथापि ज्याप्रमाणें वेदांताचा पुरुष, आत्मा हा अनिर्वाच्य, वाणीनें वर्णन करतां न येण्यासारखा, असा वर्णिलेला असतो, त्याप्रमाणें विश्वाचें मूळ म्हणून सांगितला जाणारा विचार, कल्पना वा मनोवस्था ही अनिर्वाच्य म्हणून प्राय: वर्णिली जाते. आमच्या अंतर्ज्ञानाला व बुद्धीला गोचर असें अद्वितीय एक कांहींतरी आहे, आणि आमच्या समोर विश्वहि आहे. विश्व म्हणजे सारखी गति, भ्रमन्ती आणि घडणें, रूप घेणें; सारखे फिरत राहणारें रूप-रूपांतर-चक्र, घटना-विघटना-चक्र. आतां या विश्वाचें आणि त्या एकाचें नातें काय आहे ? काय असावें ? काय असेल ? आमच्यांत मी आहे, अहम् आहे; आमच्या समोर जी रूप-रूपांतर-भ्रमंती चालली आहे, तिचें, हा 'मी' हें अपत्य असो वा तिचा जनक असो, तो वेदांतानें घोषिलेल्या खऱ्या आत्म्याकडे, ईश्वराकडे या ब्रह्माकडे परत जाणार आहे काय ? परत जाऊं शकतो काय ? हे प्रश्न भारतीयांच्या मनांत सदैव जागृत होते व आहेत; आणि भारतांतील बुद्धिनिष्ठ तत्त्वज्ञ व व्यवहारनिष्ठ साधक या दोन्ही वर्गांचें अंतःकरण वरील प्रश्नांनीं सदैव व्यापलेलें आहे.

 

पान क्र. १३४

 

प्रकरण नववें

 

शुद्ध सद्वस्तु

 

      एक अद्वितीय, अविभाज्य असें शुद्ध सत् अस्तित्व हेंच केवळ आरंभीं होतें.

- छांदोग्य उपनिषद् ६.२.१

 

      आम्ही सामान्यत: मर्यादित क्षणिक लाभाच्या गोष्टीकडे आमची अहंकेंद्रित दृष्टि सारखी लावून असतो. आमच्या दृष्टीचा हा अहंकेंद्रित व्यापार थांबवून आम्हीं जर जगाकडे तिऱ्हाईत जिज्ञासूपणानें बघितलें, केवळ सत्य काय आहे तें शोधण्याच्या बुद्धीनें बघितलें, तर आमच्या दृष्टीला प्रथम जी गोष्ट प्रतीत होते ती म्हणजे अनंत अस्तित्वाची, अनंत भ्रमन्तीची, अनंत क्रिया करणारी, अनंत अवकाशांत अनंत काल कार्य करीत अविश्रांतपणें वाटचाल करणारी, अखंड ओघाची अनंत सद्वस्तूची अनंत शक्ति. या शक्तिमय गतिशील सद्वस्तूची अनंतता पहावी तर आमचा मी, कोणताहि मी, कोणताहि थोरांत थोर असा 'मीं'चा मेळा तिच्या अनंत विस्तारांत अगदीं क्षुद्रसा भासतो. आमच्या अनेक युगांचा आमच्या नजरेला दिपविणारा पदार्थसंभार या अनंत सद्वस्तूच्या हिशोबानें एक क्षणाचा धूलिकण दिसतो, असंख्य कोटि जीव या सद्वस्तूच्या अगणित अगणनीय जीवराशींत अगदीं तुच्छ संख्येनें असल्याचें वाटतात. असें हें जगाचें भ्रमण अफाटपणें चाललेलें आहे. आम्हांला सहजप्रेरणेनें असें वाटतें कीं, हें भ्रमण आम्हांभोंवतीं चाललेलें आहें; आमचें वागणें, आमचे विचार, आमचें जीवन या भावनेनें चाललेलें असतें. आमचा मी हा जगाचा केंद्र आहे, जग हें या 'मी' साठींच आहे, आम्हांला मदत करण्यासाठीं, वेळीं त्रास देखील देण्यासाठींच हें जग भ्रमण करीत आहे, अशी आमची कल्पना होते. आमच्या 'मी'च्या वासना, भावना, कल्पना तसेंच ध्येयभूत गोष्टी या जशा आम्हांला जिव्हाळ्याच्या वाटतात, त्याप्रमाणें जगालाहि त्या जिव्हाळ्याच्या

 

पान क्र. १३५

 

वाटतात, त्यांची तृप्ति, परिपूर्ति करणें, त्यांचें समर्थन करणें हें जगाच्या नियत कार्यांतील एक कार्य आहे, असें आम्ही धरून चालतो; पण ही आमची भ्रांति असते. आम्हांला खरी दृष्टि आली म्हणजे असें दिसतें कीं, विश्व हें आमच्याकरितां अस्तित्वात नसून, स्वत:करितांच आहे. त्याला महान् ध्येयें आहेत, त्याला संकीर्ण सीमाहीन कल्पना आहेत, त्याला महान् वासना आहेत, महान् आनंद आहे व त्या वासनांची, आनंदाची, परिपूर्ति त्याला करावयाची आहे. आमचे क्षुद्र आदर्श पाहून व ते फार थोर आहेत अशी त्यांजबद्दलची आमची कल्पना पाहून, विशाल आदर्शाचे विश्व आम्हांला उपरोधिकपणें हंसतें व कनवाळुपणानें आम्हांला संभाळून घेतें. तरीपण आम्हीं दुसऱ्या टोंकाला जाऊन, आमची जगाला किंवा जगांत कांहींच किंमत नाहीं, अशी ठाम कल्पना करून घेणें हेंहि योग्य नाहीं. असें करणें हें अज्ञानाचेंच काम होईल, असें करण्यांत विश्वांतील कित्येक महान् गोष्टी आम्हीं दृष्टीआड केल्यासारखें होईल.

कारण विश्वाची अनंत भ्रमन्ती, मानवाला बिनमहत्वाचा समजते असें नाहीं. विश्वचक्राला त्याच्या भ्रमणकार्यांत मानवाचें महत्त्व आहे. भौतिक शास्त्रानें हें दाखवून दिलें आहे कीं, अखंड गतिशील विश्वशक्ति आपल्या लहानांत लहान व मोठ्यांत मोठ्या कार्यावर सारख्याच काळजीनें मेहनत घेते; बारीक सारीक तपशिलाच्या बाबतींत देखील खूप दक्षता दाखविणें, युक्तिप्रयुक्ति रचतांना खूप कुशलता कामास लावणें, खूप एकाग्रतेनें जीव लावून श्रम करणें, हें विश्वशक्तीचें तंत्र तिच्या सर्व लहानमोठ्या कार्यांत अगदीं सारखेंच प्रत्ययास येतें. श्रीमद्भगवद्गीतेंत 'समम् ब्रह्म' हें जें महान् वर्णनात्मक पद आहे, तें विश्वशक्तीचें वर्णन करणारें आहे. ती विश्वमाता समबुद्धि आणि निःपक्षपातीपणा या गुणांची खाण आहे. सूर्यमाला निर्माण करणें आणि चालविणें हें काम असो किंवा मुंग्यांचें वारूळ व त्यांतील जीवांची निर्मिति व जीवनाची संघटना हें काम असो, दोन्ही कामांत विश्वमाता सारखेंच शक्तिकौशल्य सारख्याच तीव्रतेनें खर्च करते. आम्ही एका कामाला मोठें म्हणतो, दुसऱ्याला क्षुद्र म्हणतो, यांत दोघांचा आकार आणि द्रव्यभार किंवा द्रव्यसंभार, द्रव्यसामग्री यांची तुलना आम्हांला भ्रान्त करण्यास कारणीभूत होते. यांत आकाराची, द्रव्यसामग्रीची फसवेगिरी आहे. उलटपक्षीं आम्ही द्रव्य सामग्रीच्या भाराकडे न पाहतां, असल्या दोन कामांतील गुणांची, गुणभारांची तुलना केली, तर सूर्यमालेपेक्षां त्या मालेच्या पोटांत राहणारी

 

पान क्र. १३६

 

मुंगी मोठी आहे; आणि सर्वच्या सर्व जड निसर्ग एकदम घेतला, तरी तो मनुष्यापेक्षां लहान आहे असें आपणाला म्हणावे लागेल. पण त्यांतहि आपण फसतो. द्रव्यभार फसवितो त्याचप्रमाणें गुणभार देखील फसवितो. विश्वशक्ति किंवा ब्रह्मशक्ति दोन बाजूंनीं आपण बघतो; गुणभार व द्रव्यभार या त्या दोन बाजू आहेत. कोठें गुणभार अधिक दिसतो, कोठें द्रव्यभार अधिक दिसतो. पण शक्तिभार लहानांत लहान व मोठ्यांत मोठ्या दोन्हीं कामांत, अगदीं सारखा असतो, असें बारीक निरीक्षणानें आपल्या लक्षांत येतें. अस्तित्वांत असणाऱ्या सर्व वस्तू, ब्रह्मवस्तूचें अस्तित्व सारख्या सारख्या वांट्यानें भोगतात, कार्य करणाऱ्या सर्व वस्तू, ब्रह्मवस्तूची शक्ति सारख्या सारख्या वांट्यानें आपल्या कार्यांत योजतात, असें आपल्याला म्हणतां येईल, म्हणावेंसें वाटतें. पण यांतहि एक प्रकारचा द्रव्यभाराचाच फसवा प्रकार आहे. खरी गोष्ट अशी आहे कीं, ब्रह्माचे असे विभाग व वांटणी होऊं शकत नाहीं. लहान मोठा वांटा, सारखा सारखा वांटा ही भाषा ब्रह्माच्या बाबतींत अगदीं खोटी भाषा आहे. ब्रह्म अविभाज्य आहे. सर्व ठिकाणीं, सर्व वस्तूंत, सर्व कामांत तें सर्वच्या सर्व असतें. वस्तू व कामें विभक्त दिसतात, त्यामुळें तें विभागलें गेलें आहे असा देखावा दिसतो. बुद्धीनें बनविलेल्या कल्पना बाजूस ठेवून आपण बारकाईनें निरीक्षण केलें, अंतःस्फूर्त ज्ञान आणि तादात्म्यानें होणारें ज्ञान यांच्या साह्यानें आपण या असीम ब्रह्मशक्तीकडे पाहूं लागलों, तर असें दिसतें कीं, मनाला व मनाच्या ज्ञानशक्तीला जें दिसतें, त्याहून अगदीं वेगळें दर्शन ब्रह्माच्या ज्ञानशक्तीला होतें -- तें असें कीं, सूर्यमाला व वारूळ यांच्या उभारणींत एकाच वेळीं सर्वच्या सर्व अविभक्त ब्रह्मशक्ति सारख्याच तीव्रतेनें काम करते -- ती आपले भाग करून सारखे सारखे कोणाला वांटीत बसत नाहीं -- सगळें ब्रह्म आणि वांटे पाडलेलें ब्रह्म अशी कांहीं गोष्ट नाहीं, असू शकत नाहीं. कोणतीहि वस्तु घ्या, सर्वच्या सर्व अविभक्त अविभाज्य ब्रह्म ती वस्तु आहे. सर्वच्या सर्व ब्रह्म तिच्यासाठीं राबत आहे. महत्त्वानें व प्रकारानें गुण वेगळे वेगळे असतील, द्रव्य हें वजनानें, बलानें वेगळें वेगळें असेल, परंतु सर्वत्र सर्वकाळ आत्मा किंवा ब्रह्म सम, अगदीं सारखें असतें. आत्मशक्ति आणि ब्रह्मशक्ति, शाश्वत आदींचा आदि असणारी आणि अंत नसणारी अशी ब्रह्मशक्ति, सर्व ठिकाणीं अगदीं समतेनें आहे, अभेदानें आहे. जे भेद असतात, ते ब्रह्माच्या क्रियाशक्तीचा प्रकार, कार्यपद्धति व परिणाम यांच्या बाबतींत असतात. बलवान् मनुष्य

 

पान क्र. १३७

 

आणि दुर्बल मनुष्य घ्या. बलवान् बलसंपादक-शक्तीनें बलवान् होतो, दुर्बल मनुष्य दुर्बलता-संपादक-शक्तीनें दुर्बल होतो. पण या दोन शक्ती अगदीं सारख्या असतात. दुर्बलता-संपादक शक्ति बलसंपादक-शक्तीहून एक कणभरहि कमी असत नाहीं. मनांतील भाव दाखविणें किंवा दाबून ठेवणें, एखाद्या सिद्धान्ताला पाठिंबा देणें किंवा तो खोडून काढणें, आवाज काढणें किंवा शांतता राखणें, या क्रियांच्या सर्वच जोड्यांत शक्ति खर्च करावी लागते, व ती सर्वत्र सारखीच खर्च होत असते.

तेव्हां, आम्हांला पहिली गोष्ट ही करावयास हवी कीं, विश्वाच्या अस्तित्वाची महाशक्ति, विश्वरूप अनंत आंदोलन, यांचा आणि आमचा जो संबंध आम्ही मानीत आलों आहों, त्या संबंधांत आम्हीं दुरुस्ती केली पाहिजे. सध्यां आम्ही या संबंधींचा जो हिशोब ठेवीत आहों, तो हिशोब खोटा आहे. विश्वाला आमचें महत्त्व अतिशय आहे, त्याला कांहीं मर्यादाच नाहीं असें आम्ही मानतो. त्याबरोबर आम्ही असें मानतो कीं, विश्वाचें महत्त्व आम्हांला कांहींहि नाहीं, असलें तरी अगदींच थोडे आहे, दुर्लक्ष करण्यासारखें आहे. आम्हीच आम्हांला महत्वाचे आहोंत. आमच्या खेरीज आम्हांला कोणीहि, कांहींहि महत्त्वाचें नाहीं. ज्याला मूळ अज्ञान म्हणतात, तें 'मी'चें मूळ असतें. त्याची खूणच ही आहे कीं, स्वतःला सर्व कांहीं महत्त्व दिल्याशिवाय, स्वतःला विश्व किंवा विश्वाचें केंद्र कल्पिल्याशिवाय, त्याला विचारच करतां येत नाहीं. स्वतः खेरीज बाकी जें आहे, त्यांतील त्याच्या मनाला पटेल तेवढें आणि परिस्थितीचे तडाखे त्याला जें मान्य करावयास लावतील तेंच तें मान्य करतें. हें 'मी' रूप, मूळ अज्ञान, तत्त्वविचार करूं लागलें म्हणजे, 'विश्व जें आहे तें स्वतःच्या जाणिवेत आहे; जाणिवेच्या बाहेर स्वतंत्र अस्तित्व विश्वाला नाहीं; जाणिवेंतच त्याला अस्तित्व येतें व आलें आहे,' असे सिद्धांत तें करीत नाहीं कां ? स्वतःच्या जाणिवेची अवस्था, स्वतःच्या मनानें ठरविलेली मूल्यें हीच सत्याची कसोटी तें मानतें. त्याच्या कक्षेच्या वा क्षितिजाच्या बाहेर जें असेल, तें खोटें किवा अविद्यमान आहे, असें मानण्याकडे त्याचा कल असतो. जोपर्यंत आमच्यामध्यें ही मनाची आत्मसंतुष्टता आहे तोपर्यंत जीवनाची खरी किंमत आम्हांला कळत नाहीं, त्याच्यापासून योग्य तो लाभ पूर्णपणें आम्हांला घेता येत नाहीं. कारण मनाची ही आत्मसंतुष्टता खोट्या हिशोबाची पद्धति सुरू करून आम्हांला खोटे जीवन जगाययास लावते. पण या त्याच्या आत्मप्रौढीच्या

 

पान क्र. १३८

 

गोष्टींत एका अर्थानें कांहीं तथ्य आहे -- एका सत्यावर त्याची प्रौढी वस्तुत: आधारलेली आहे. पण हें सत्य, तेव्हांच व्यवहारांत दृग्गोचर होतें, जेव्हां आमच्या मनाला आपलें अज्ञान लक्षांत येतें आणि आमचा मी खऱ्या विश्वपुरुषाचा अंकित होतो आणि आपलें वेगळें स्वत्व त्या विश्वपुरुषांत विलीन करतो. ज्याला आम्ही 'मी' म्हणतो, किंवा ज्या परिणामांना व रूपांना आम्ही 'मी' म्हणतो, तो 'मी' म्हणजे या विश्वरूपीं अनंत आंदोलनाचा एक लहानसा हिस्सा आहे हें आम्हीं ओळखलें पाहिजे. जें अनंत विश्व आम्हांला जाणावयाचें आहे, तें आम्हीं स्वत: जाणीवपूर्वक व्हावयाचें आहे, त्याची प्रामाणिकपणें आम्हांला परिपूर्ति करावयाची आहे, अर्थात् त्याचें जें इष्ट आहे तें साधावयाचें आहे हें आम्हीं ओळखलें पाहिजे. हें आम्हीं, आमच्या 'मी'नें ओळखलें म्हणजे खरें जीवन जगावयास आरंभ होतो. हें खरें किंवा दिव्य जीवन पूर्ण होण्यास दुसरी एक जाणीव आम्हांला व्हावयास हवी. ती जाणीव ही कीं, आम्हांला जसा 'मी' आहे, तसा आम्हांला खरा 'आत्मा'हि आहे; आणि हा खरा आत्मा अनंत आंदोलनाशीं किंवा विश्वाशीं, विश्वपुरुषाशीं एकरूप आहे, आमच्या 'मी'प्रमाणें त्याचा दुय्यम नाहीं - त्याचा सेवक नाहीं. आपला स्वभाव, विचार, भावना व कृती यांच्या द्वारां ही खऱ्या आत्म्याची जाणीव आणि तिचें आविष्करण आपल्या ठिकाणीं रूढ झालें म्हणजे, खरें किंवा दिव्य जीवन आपल्याला पूर्णपणें जगतां आलें असें होतें.

पण आपला जीवनाचा हिशोब पुरा होण्यासाठीं आणखी कांहीं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. हें जें अनंत, सर्वशक्तिमान् क्रियासामर्थ्य -- हें जें विश्व -- सारखें क्रियामग्न आहे, तें वस्तुत: काय आहे, याचें ज्ञान करून घेणें आवश्यक आहे. पण येथेंच नव्या अडचणी उत्पन्न होतात. शुद्ध स्वयं-तंत्र बुद्धि सांगते कीं, जसे आम्हीं विश्वरूप आंदोलनाचे अंशरूप आहोंत, त्या आंदोलनाचे अंकित आहोंत, त्याप्रमाणें गतिशील विश्व हें त्याहून वेगळ्या एका वस्तूचा एक अंश, एक अंकित अंश किंवा पैलू, या स्वरूपाचें आहे. ही वस्तु एक महान् अस्तित्व आहे, कालातीत स्थलातीत गतिशून्य सदा-स्थिर ''स्थाणू'' अशी वस्तु आहे; तिच्यांत बदल होत नाहीं, तिच्यांतील द्रव्य जसेच्या तसें राहणारें, कधींहि न संपणारें असें आहे, तिच्यांतील द्रव्य मुळींच खर्च होत नाहीं, ती कांहींहि क्रिया करीत नाहीं, मात्र सर्व क्रिया तिच्या पोटांत होतात; ती वस्तु क्रियाशक्ति नाहीं, केवळ शुद्ध गतिशून्य अस्तित्व, हें त्या वस्तूचें स्वरूप आहे. वेदान्तहि

 

पान क्र. १३९

 

असेंच विधान करीत असल्यासारखें दिसतें. पण ज्यांना केवळ विश्वशक्तीच दिसते, ते असें म्हणूं शकतात कीं, स्थिर वस्तु, शुद्ध अस्तित्व या शक्तीच्या मुळाशीं आहे हें म्हणणें सत्य नाहीं; अशी कांहीं वस्तु मुळींच अस्तित्वांत नाहीं. शाश्वत स्थिरता, अक्षर शुद्ध अस्तित्व या ज्या कल्पना आमच्या भांडारांत आहेत, त्या बुद्धीनें कल्पिलेल्या अवास्तव कल्पना आहेत, स्थिरतेसंबंधींच्या खोट्या कल्पनेवर या कल्पना आधारलेल्या आहेत; वस्तुत: स्थिर असें कांहींहि नाहीं; सर्व कांहीं अस्थिर, चंचल, गतियुक्त आहे, गतिमान् विश्वाशीं व्यवहार करायला कांहीं एक स्थिर बिंदु हवा म्हणून आमच्या मनाने स्थिरतेची कृत्रिम कल्पना उभी केली आहे. केवळ गतिमान् विश्वाकडेच पाहिलें, तर हा सिद्धान्त खरा असल्याचें दाखवितां येतें. गतिमान् विश्वांत स्थिर कांहींच नाहीं. जें कांहीं स्थिर दिसतें, तें खरोखरी स्थिर नसून तो हालचाल करणाऱ्या वस्तूंचा एक संच असतो. शक्ति सारखें कार्य करीत असते आणि क्रियामग्न शक्तीचें स्वरूप आम्हांला, आमच्या जाणिवेला अगदीं स्थिर असल्यासारखें दिसतें -- पृथ्वी फिरत असतां स्थिर भासते, आपण ज्या आगगाडींत बसलों असूं, ती गाडी धांवत असतां, आजूबाजूचा भाग धांवत आहे व आपली गाडी एका जागीं उभी आहे असें भासते. त्याप्रमाणें विश्वांतील सर्व वस्तूंची गोष्ट आहे. पण विश्वाच्या पोटांतील वस्तूंसंबंधानें जी गोष्ट खरी आहे, ती एकंदर विश्वासंबंधानेंहि खरी आहे. त्याला गतिहीन स्थिर वस्तूचा आधार नाहीं -- असें मानतां येत नाहीं. सदा गतिमान् विश्वाचें 'मूळ', सदा स्थिर असें शुद्ध अस्तित्व आहे असा निर्णय शुद्ध व स्वतंत्र बुद्धीनें दिला आहे. 'क्रियाशील शक्ति हेंच अस्तित्व' ही गोष्ट तिला मान्य नाहीं; शुद्ध अस्तित्व, शुद्ध सद्वस्तु, शक्तीचें उगमस्थान आहे असाहि शुद्ध बुद्धीचा सिद्धान्त आहे.

शुद्ध बुद्धीनें सांगितल्याप्रमाणें शुद्ध अस्तित्व, शुद्ध सद्वस्तु जर विश्वशक्तीचा उगम असेल तर त्या शक्तीप्रमाणें तें अस्तित्वहि अनंत असलें पाहिजे, हें समजणें अवघड नाहीं. शुद्ध अस्तित्वाच्या बाबतींत खरा शेवट, खरा अंत संभवनीय आहे असें बुद्धि, अनुभव, अंतर्ज्ञान, किंवा कल्पनाशक्ति यांपैकीं कोणीहि सांगत नाहीं. शेवट वा आरंभ मानला कीं त्या मानलेल्या शेवटापलीकडे, त्या मानलेल्या आरंभापलीकडे कशाचें तरी अस्तित्व आपण गृहीत धरतो. केवळ निःसंबंध शुद्ध अस्तित्वाचा शुद्ध अंत किंवा आदि या शब्दप्रयोगांत दोन अन्योन्यविरुद्ध कल्पना एकत्र

 

पान क्र. १४०

 

केल्या जातात; कारण आदि किंवा अन्त, हा निःसंबंध, शुद्ध असूंच शकत नाहीं. या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत. तेव्हां शुद्ध अस्तित्वाचा शुद्ध आरंभ किंवा शुद्ध शेवट हा शब्दप्रयोग विरोधमय असल्यानें अर्थशून्य आहे, वस्तुस्थितीच्याहि विरुद्ध आहे; वस्तुजाताचें अंतरंग, सारतत्त्व हें या कल्पनेला सर्वथा विरोध करणारें आहे; या सारतत्त्वाच्या बाबतींत आदि-अन्ताची कल्पना करणें हें सत्याचा अधिक्षेप करणें आहे, ती कल्पना केवळ मिथ्या आहे. सांताचा पसारा अनन्त अस्तित्वावांचून निराधार होतो. स्वयंभू अनन्त सद्वस्तु, सान्त दृश्याचा पसारा उभा राहण्यासाठीं अगदीं अवश्य आहे, अपरिहार्य आहे.

ज्या अनंत अस्तित्वाचा आधार सान्त पसाऱ्याला अनिवार्य असल्याचें आतां आपण पाहिलें, तें अनन्त अस्तित्व, काळदृष्टीनें व अवकाशदृष्टीनें अनंत, असें आपण समजावयाचें आहे. कालाचा अनंत प्रवाह, अवकाशाचा किंवा आकाशाचा अनंत विस्तार, शुद्ध सद्वस्तूनें व्यापलेला आहे असें दर्शन, शुद्ध बुद्धीला घडल्यानंतरहि तिचें संशोधन पुढें चालूं राहतें. काल व अवकाश या वस्तू काय आहेत याचा शोध ती करीत राहते. हा शोध ती आपल्या कठोर निःपक्षपाती स्वभावानुसार बारकाईनें करीत असतां, तिला असें दिसते कीं, काल व अवकाश (किंवा स्थल) या जाणिवेच्या बाहेरच्या वस्तू नसून, तिच्या विषयग्रहणाच्या कार्यांत तिला आवश्यक असणाऱ्या तिच्याच दोन अवस्था, दोन बाजू आहेत; दोन मूलभूत कल्पना आहेत. शुद्ध अस्तित्वावर बुद्धीनें आपली नजर स्थिरावली कीं काल व स्थल या वस्तु वस्तुदृष्ट्या नाहींशा होतात. शुद्ध अस्तित्वाचा विस्तार या संशोधनांत दिसला, तर तो विस्तार स्थलविस्तार म्हणून दिसत नाहीं, मन:कल्पित मनोविस्तार म्हणून प्रत्ययास येतो; शुद्ध अस्तित्वाची चिरंतनता या संशोधनांत दिसली, तर ती चिरंतनता कालाची दिसत नसून, मनाची व मनःकल्पित म्हणून प्रत्ययास येते. तेव्हां हें उघड आहे कीं, शुद्ध अस्तित्वाच्या बाबतींत अनंत स्थलविस्तार व अनंत कालविस्तार या गोष्टी, या कल्पना केवळ प्रतीकरूप आहेत. या प्रतीकद्वारां, जी वस्तु व्यक्त होते, ती बुद्धीच्या शब्दांत सांगतां येण्यासारखी नसते. तिचें ज्ञान करून घेण्याचा यत्न या प्रतीकद्वारां मन करीत असतें. भूत-वर्तमान-भविष्य सर्व घटना सामावून घेणारा, सदैव नवा असणारा एकच एक क्षण, ही अनंत कालप्रवाहाची बुद्धीला होणारी प्रतीति, तसेंच भूत-वर्तमान-भविष्य सर्व वस्तू सामावून घेणारा, सर्व वस्तू व्यापून राहणारा,

 

पान क्र. १४१

 

कोणतेंहि माप -- लांबी रुंदी उंची -- नसलेला एकच एक बिंदु, ही अनंत स्थलविस्ताराची बुद्धीला होणारी प्रतीति -- या दोन प्रतीती, असामान्य आहेत. त्यांच्या वर्णनांत अन्योन्यविरोधी शब्द एकत्र बसवावे लागतात; याचाच अर्थ मन आणि वाणी यांच्या स्वाभाविक मर्यादांतील हे प्रत्यय वा अनुभव नाहींत. शुद्ध सद्वस्तूची अनुभूति, शुद्ध बुद्धीला होते; पण जेव्हां त्या अनुभूतीचा ती शब्दांनीं उच्चार करूं पाहते, तेव्हां वाणीचे, मनाचे रूढ शब्दसंकेत अपुरे पडतात. विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र ठेवून वर्ण्य वस्तूचें वर्णन करावे लागते; आणि ती सद्वस्तु आहे, एकच एक आहे व अवर्ण्य, अनिर्वाच्य आहे, एवढाच निष्कर्ष या खटाटोपापासून निघतो.

शुद्ध बुद्धीच्या शुद्ध अस्तित्वासंबंधींच्या या संशोधनांत काल आणि स्थल (अवकाश व आकाश) नाहींसे होतात असें वर सांगितलें. पण असेहि कशावरून नसेल कीं, शुद्ध अस्तित्व ही खरी वस्तु नसून बुद्धीची कृत्रिम निर्मिति आहे ? केवळ शब्दजालानें उभी केलेली 'नसती' वस्तु आहे आणि अशा खोट्या, काल्पनिक, 'नसलेल्या', वस्तूला आम्ही आपल्या कल्पनाशक्तीच्या आग्रहास्तव, अस्तित्वांत असलेली खरी मूळ वस्तु म्हणून प्रतिष्ठा देऊं इच्छितों ? --आणि या आमच्या खटाटोपाचें फळ म्हणून काल आणि स्थळ यांना आम्ही निकालांत काढतों ? या शक्यतेचा विचार आम्हीं करावयास हवा. त्यासाठीं शुद्ध अस्तित्व या वस्तूकडे आम्हीं शुद्ध बुद्धीच्या साह्यानें बारकाईनें ध्यान द्यावयास हवें. असें ध्यान दिलें असतां ही गोष्ट लक्षांत येते कीं, जें कांहीं दृश्य आहे त्याच्या पाठीमागें कांहींतरी अनंत अनिर्वाच्य वस्तु आहे. कोणतेंहि दृश्य, कोणताहि दृश्यसंभार स्वयंभू आहे असें आपणाला म्हणतां येत नाहीं. सगळें दृश्य विचारानें एकत्रित करून शक्ति -- पायाभूत विश्वव्यापक अविभाज्य अशी क्रियामग्न क्रियाशक्ति एकच एक सदैव चंचल क्रियाशक्ति -- हें सर्व दृश्याचें स्वरूप आहे अशी कल्पना केली, तरी एवढेंच होतें कीं, आम्हांला एक अनिर्वाच्य असें दृश्य, दृश्यवस्तु लाभते. पण हें दृश्य चलायमान, चंचल, अस्थिर असल्यानें, अचंचल, स्थिर अशी कांहीं वस्तु त्याच्या मुळांत असावी असें तें सुचवितें; क्रिया करणारी सद्वस्तु क्रियेचें मूळ आहे असें प्रत्येक क्रिया सुचविते; शक्ति क्रियामग्न दिसलीं कीं ती शक्ति क्रिया थांबवून स्थिर होणारीहि असली पाहिजे, ही कल्पना अपरिहार्यपणें उभी राहते. केवळ निःसंबंध, स्वयंभू क्रियाविहीन शक्ति म्हणजेच स्वयंभू अस्तित्व होय. शुद्ध बुद्धीपुढें शेवटी मूळ सत्य म्हणून दोन पर्याय उभे राहतात. अनिर्वाच्य

 

पान क्र. १४२

 

शुद्ध अस्तित्व, आणि अनिर्वाच्य क्रियामग्न शक्ति या पर्यायांपैकीं दुसरा पर्याय खरा धरला, अर्थात् स्थिर असा कांहींहि अस्तित्वाचा पाया नसून, केवळ शक्ति मात्र आहे असें धरले, तर शक्ति ही क्रियेचा, नित्य गतीचा परिणाम म्हणून गृहीत धरणें प्राप्त होईल आणि नित्य गति हें मूळ समजावें लागेल. या पक्षांत अस्तित्व मूळ नाहीं. असत्, बुद्धपंथीयांचें निर्वाण हें मूळ सत्य, आणि कर्म किंवा गतिचक्र शाश्वत असून अस्तित्व हा त्याचा धर्म आहे, अशी मांडणी करावी लागेल. पण या मांडणींत शुद्ध बुद्धीचें समाधान होऊं शकत नाहीं. शुद्ध बुद्धीची अनुभूति वेगळी आहे, शुद्ध बुद्धीला जें मूलभूत दर्शन घडतें, त्याच्या विरुद्ध दुसरा पर्याय असल्यानें, तो ती 'मूळ सत्य' म्हणून मान्य करूं शकत नाहीं. शुद्ध बुद्धीला तिच्या सूक्ष्म संशोधनाअंतीं अनिर्वाच्य शुद्ध अस्तित्वाचेंच मूलभूत दर्शन घडतें आणि म्हणून अनिर्वाच्य क्रियामग्न शक्ति हें 'मूळ अस्तित्व' आहे असा निर्णय ती देऊं शकत नाहीं. असा निर्णय मान्य करणें म्हणजे दोन्ही बाजूला आधार नसलेल्या, आकाशांत जणुं लोंबकळणाऱ्या शिडीच्या अगदीं शेवटच्या पायरीवर एकदम जाऊन उभें राहण्यासारखें आहे. अशा रीतीनें अस्तित्व ही बुद्धीची कृत्रिम निर्मिति नव्हे किंवा शब्दजालानें उभी केलेली 'नसती' वस्तु नव्हे. अस्तित्व ही खरी वस्तु आहे, एकच एक अशी मूळ वस्तु आहे.

हें मूळ अस्तित्व अनिर्वाच्य, अनंत, काल-स्थलविहीन आणि स्वभावत: शुद्ध, केवळ, स्वयंपूर्ण, स्वयंभू आहे. कसल्याहि मापानें किंवा मापांनीं तें मोजतां येत नाहीं. कसलाहि गुण किंवा गुण-समूह त्याच्या रचनेंत नाहीं. रूप किंवा आकार यांचा समुदाय हें त्याचें स्वरूप नाहीं, कोणत्याहि रूपाचें किंवा आकाराचें मूळ आकार-बीजहि तें नाहीं. सर्व रूपें किंवा आकार, सर्व राशि, मापें, किंवा सर्व गुण नाहींसे झाले, तरी तें मूळ अस्तित्व, मूळ सद्वस्तु कांहीं नाहींशी होणार नाहीं; ती राहीलच. अशा तऱ्हेचें रूप- गुण-मानहीन अस्तित्व, आमच्या शुद्ध बुद्धीला कल्पितां येतें; एवढेंच नव्हें, तर जें सर्व दिसत आहे त्याच्या मुळाशीं असेंच अस्तित्व आमच्या बुद्धीला मानावें लागतें. हें अस्तित्व रूपादिहीन आहे याचा अर्थ, अर्थातच या रूपादिकांपेक्षां तें फार मोठें आहे; त्यांच्या पलीकडे आहे, त्याच्यांत रूप-गुण-मान विलीन झाले कीं त्यांचें रूपत्व, गुणत्व, मानत्व नाहींसें होतें -- त्यांतून चंचलाचा, गतिशील आंदोलनाचा कारभार सुरू झाला म्हणजे हीं विलीन रूपें, गुण आणि मापें पुनरपि उदयास येतात. हीं रूपें वगैरे

 

पान क्र. १४३

 

विलीन होतात याचा अर्थ, अनेक रूपांचें एक मूळ रूप, अनेक गुणांचा एक मूळ गुण, अनेक राशींचा एक मूळ राशि होऊन, मूळ अस्तित्वांत, सद्वस्तूंत राहतो असा नव्हे. कसलेंहि मूळरूपादि नांव देण्यासारखें त्या सद्वस्तूंत कांहीं राहत नाहीं. याप्रमाणें विश्वाचें गतिचक्र चालूं असतां ज्या गोष्टी या गतिशीलतेच्या कारणभूत अथवा अभिव्यक्तिरूप असतात, त्या सर्व, विश्वमूळ अस्तित्वांत विलीन होतात आणि या विलीन स्थितींत, त्यांना गतिमानतेंत असलेलें नांव देता येत नाहीं -- अशी त्यांची व्यवस्था होते. म्हणूनच या मूळ शुद्ध अस्तित्वाला, स्वयंपूर्ण सर्वसंबंधातीत निरपेक्ष एकरस कैवल्य म्हणतात. या कैवल्याचें ज्ञान विचारशक्तीला होत नाहीं. तथापि या कैवल्याशीं आम्ही एकरूप होऊं शकतो. ही एकरूपता, सर्वश्रेष्ठ एकरूपता होय. ज्ञान ज्या शब्दांत सांगितलें जातें असा कोणताहि शब्द या अज्ञेयाचें, या अज्ञेय केवलाचें यथार्थ वर्णन करूं शकत नाहीं. गतिशील विश्वसंसार, हा या केवलतेच्या उलट स्वभावाचा असतो. सर्व संबंधांचें हा क्षेत्र असतो. जें नि:संबंध स्वयंपूर्ण कैवल्य, गतिमय संसारांतील सर्व वस्तू आपल्यांत समाविष्ट करून असतें, तें प्रत्येक वस्तूंतहि अंतर्भूत असतें -- तेंच या सर्व वस्तू असतें. तें पूर्ण आणि या वस्तू अपूर्ण. पूर्णच अपूर्ण रूपांनीं व्यक्त होतें. निसर्गाच्या घटना आणि मूळ आकाशतत्त्व यांचा संबंध पूर्ण-अपूर्णाच्या संबंधासारखा आहे. नैसर्गिक घटनांत, वस्तूंत आकाशतत्त्व असतें, आकाशतत्त्वाच्याच त्या घटना व वस्तू बनलेल्या असतात, त्या आकाशतत्त्वांत त्या सर्व समाविष्ट असतात -- आणि आकाशतत्त्व नैसर्गिक घटनांहून, वस्तूंहून अगदीं वेगळें असतें. इतकें वेगळें कीं, या वस्तू त्या आकाशतत्त्वांत विलीन झाल्या कीं त्यांचें निसर्गांतील स्वरूप पार नाहींसें होतें. पूर्ण अस्तित्व व अपूर्ण गतिशील विश्वसंसारगत वस्तू यांचा संबंध स्पष्ट करण्यासाठीं वेदान्त हा आकाशतत्त्व आणि निसर्गवस्तू यांचा दाखला देत असतो. पूर्ण आणि अपूर्ण एक आहेत, अभिन्न आहेत आणि भिन्नहि आहेत. त्यांचा भेदांत अभेद कसा आहे हें दाखविण्यास, आकाश आणि निसर्गांतील वस्तुजात यांचा हा दृष्टान्त पुष्कळच समर्पक आहे.

तथापि या अपूर्ण वस्तू मूळच्या पूर्ण वस्तूंत परत जातात अशी भाषा आम्ही जेव्हां वापरतो, तेव्हां ती आमच्या कालनिष्ठ जाणिवेची भाषा आहे हें आम्ही विसरतां कामा नये. ही भाषा वापरतांना या जाणिवेचे भ्रम आम्हीं आमच्यापासून दूर ठेवले पाहिजेत. अक्षर अशा मूळ वस्तूं-

 

पान क्र. १४४

 

तून गतिमय संसार उदय पावतो, तो अमुक क्षणीं उदय पावतो अशी स्थिति नाहीं; तो नित्यनिरंतर उदय पावत असतो. ही कल्पना मनानें करणें अवघड असल्यानें मूळ स्थिर पूर्णापासून गतिमय संसाराचा आविष्कार सांगतांना, आपण मनाच्या कल्पनांना व अनुभवांना सोईची अशी कालनिष्ठ नित्यतेची भाषा वापरतो. या भाषेंत एका क्षणापासून दुसरा क्षण, त्यामागून तिसरा अशी कधीं न संपणारी क्रमवार कालगति म्हणजे नित्यता आणि या नित्यतेंत पुन: पुन: आरंभ आहे, मध्य आहे, अंत आहे, असें आम्ही म्हणतो व मानतो.

मूळ शुद्ध अस्तित्वासंबंधानें आमची शुद्ध बुद्धि काय सांगते तें आपण येथवर पाहिलें. पण शुद्ध बुद्धीच्या कल्पनांवर आम्हीं सर्व भार टाकावा कां ? या कल्पना कितीहि तर्कशुद्ध असल्या, तरी केवळ तर्कशुद्धतेमुळें त्या आम्हीं मान्य केल्याच पाहिजेत असें होत नाहीं. जी गोष्ट आम्हांला 'आहे' म्हणून अनुभवाला येते, त्या अनुभवसिद्ध गोष्टीलाच बुद्धीच्या कल्पनांहून अधिक ग्राह्य मानणें अवश्य आहे -- त्या अनुभवसिद्ध गोष्टींच्या आधारानेंच अस्तित्वासंबंधानें आमचा निर्णय आम्हीं घ्यावयास हवा. हा निर्णय बुद्धीच्या कल्पनांवर विसंबून ठेवणें न्यायसंगत नाहीं. जें अस्तित्व आमच्या नजरेसमोर आहे त्या अस्तित्वाकडे, अगदीं शुद्ध स्वतंत्र अंतःप्रज्ञेनें, अंतर्दृष्टीनें पाहिलें, तर आकाश किंवा अवकाश आणि काल या दोनहि ठिकाणीं सर्वत्र हालचाल दिसते, दुसरें कांहीं दिसत नाहीं. स्थल किंवा स्थलाधिष्ठित भ्रमण आमच्या बाहेर व कालाधिष्ठित भ्रमण आमच्या आंत सारखें चालूं असतें. स्थलांत दृश्य हिंडत असतें, कालांत द्रष्टा हिंडत असतो. कमीअधिक विस्तार, कमीअधिक चिरंतनता या सत्य गोष्टी आहेत; स्थल, काल या सत्य वस्तु आहेत. स्थलविस्तार ही बाह्य गोष्ट नसून मानसिक घटना आहे, एकच एक आणि अविभाज्य असें शुद्ध अस्तित्व मनाला ग्रहण करणें अवघड असल्यानें, विस्तारलक्षण स्थलाची कल्पना करून, त्यांत अनंत विस्ताराचे अस्तित्व आहे अशी मांडणी मन आपल्या समजुतीसाठीं करते, असें आपण म्हणूं शकतो. म्हणजे बाह्य स्थलाच्या पाठीमागें जाऊन त्याची बाह्य सत्यता काढून घेतां येते. पण कालासंबंधानें असें त्याच्या पाठीमागें जातां येत नाहीं. आमच्या आंत कल्पनांचा, विचारांचा क्रम असतो. हा क्रम म्हणजे कालक्रम. आमच्या विचारशक्तीचें, जाणिवेचें शरीरच जणुं कालाचें बनलेलें आहे, क्रमवार गतीचें बनलेलें आहे. आम्ही व आमचें जग, सारखी न थांबता भूतकालांतून

 

पान क्र. १४५

 

भविष्यांत वाटचाल करीत आहों. आमची आणि आमच्या जगाची वाढ होते, प्रगति होते म्हणजे काय होते ? आम्ही आणि आमचें जग ही एकसारखी अविरत चालणारी हालचाल आहे. भूतकालांतील, जुन्या एकामागून एक घडलेल्या गोष्टी वर्तमान क्षणांत आपण समाविष्ट करतो -- आणि भविष्य कालांतील एकामागून एक घडणाऱ्या गोष्टींचा आरंभ या वर्तमान क्षणांतून होतो, असें आम्ही समजतो; भूतकालीन क्रमवार घटनांचा वर्तमान क्षणांत समावेश करणें व वर्तमान क्षणाला भविष्यकालीन क्रमवार घटनांचा आरंभ समजणें, हाच आमच्या व आमच्या जगाच्या प्रगतीचा अर्थ आहे. या गतींत आम्हांला वर्तमान काल स्पष्टपणें प्रतीत होत नाहीं. कारण भूतकाल आणि भविष्यकाल यांच्या संधिस्थानीं 'वर्तमान' क्षणभर असतो, नसतो. तेव्हां कालाचा क्रम, भ्रमणक्रम *अविभाज्य अनंत असल्याचा आम्हांस प्रत्यय येतो. त्या कालाच्या प्रवाहाबरोबरच, आमच्या अविभाज्य जाणिवेचा सदा पुढें धांवणारा भ्रमन्तीचा कार्यक्रमहि आमच्या प्रत्ययास येतो. अर्थात् कालाच्या पोटांत शाश्वतपणें क्रमबद्ध हालचाल होणें, कालाच्या पोटांत बदलावर बदल होत राहणें, संक्षेपत: कालप्रवाह, किंवा घटनाप्रवाह, हेंच एक अंतिम सत्य आहे; घटना (घडणें, होणें) हेंच एक अंतिम अस्तित्व, सद्वस्तु आहे;

-------------------------

*अविभाज्य म्हणजे एकंदर भ्रमन्तीच्या दृष्टीनें अविभाज्य. अखंड कालाचा, जाणिवेचा प्रत्येक क्षण त्याच्या पूर्वींच्या व नंतरच्या क्षणाहून वेगळा समजतां येईल, शक्तीचें अनुक्रमानें घडणारें प्रत्येक कार्य नवीन म्हणून मानतां येईल -- तथापि असें असतांहि क्षणाक्षणामध्यें, कार्याकार्यामध्यें खंड पडतो असें मानण्याचें कारण नाहीं. क्षणामागून क्षण, कार्यामागून कार्य अखंडपणें अविभाज्य, अविभक्त रीतीनें चालूं असतें असेंच दिसून येतें. कालप्रवाह, जाणिवेचा प्रवाह किंवा ज्ञानप्रवाह या अखंडपणाशिवाय सिद्ध होत नाहीं. मनुष्य चालतो, धांवतो, उड्या मारतो, तेव्हां त्यांचीं पावलें वेगळीं वेगळीं पडतात, तथापि त्या सर्व पावलांना घेऊन त्याचें चालणें, थांबणे, उड्या मारणें या क्रिया अखंड करणारे असें कांहीं त्या क्रियांत अंतर्भूत असतें. हीच गोष्ट कालाच्या जाणिवेच्या क्षणांची, शक्तीच्या क्रमवार कार्यांची आहे. त्या सर्व क्षणांना, कार्यांना एकत्र जोडणारा अखंड धागा असतो -- व या धाग्यामुळेंच कालप्रवाह, ज्ञानप्रवाह अखंड असलेला आमच्या अनुभवास येतो.

 

पान क्र. १४६

 

शुद्ध अस्तित्व म्हणून कांहीं नाहीं, असें अस्तित्वाकडे पाहणारी शुद्ध अंतर्दृष्टि आम्हांला सांगते, अर्थात् शुद्ध बुद्धीचा निर्णय व शुद्ध अंतर्दृष्टीचा अनुभव यांत विसंगति दिसते.

पण ही विसंगति आभासात्मक आहे. खरोखरीच जर अंतर्दृष्टि आणि बुद्धि यांचा या बाबतींत एकमेकींना विरुद्ध असा निर्णय असेल, तर बुद्धीचा निर्णय आम्हांला मान्य करतां येणार नाहीं. परंतु गोष्ट अशी आहे कीं, अंतर्दृष्टीपुढें, अंतर्दृष्टीला घडणाऱ्या दर्शनापुढें, जेव्हां आम्हीं बुद्धीच्या निर्णयाविरुद्ध आमची बाजू मांडतो, तेव्हां अंतर्दृष्टीला घडणारें अर्धें दर्शन आम्ही पूर्ण दर्शन समजून चालतों. अंतर्दृष्टि जोपर्यंत घटनाप्रवाहावर खिळलेली आहे, तोपर्यंत तिला जें दिसते तें बुद्धीच्या निर्णयाला प्रतिकूल असलें तरी तें खरें असतें. आमचा जीवनप्रवाह नदीच्या प्रवाहासारखा असतो. बौद्ध तत्त्वज्ञानांत या प्रवाहाला ज्वालेचा दृष्टांत देतात. आम्ही काय होत आहों, यावरच अंतर्दृष्टि लक्ष देत आहे, तोंपावेतों आम्हीं अखंड हालचाल आहोंत, या गतीचें पाऊल सारखें पुढें पुढें पडत आहे, आमच्या जाणिवेंत सारखा बदल होत आहे, कालाच्या शाश्वत प्रवाहांत आमचा हा जीवन-प्रवाह सारखा चालू आहे, हेंच दर्शन आमच्या अंतर्दृष्टिला घडतें व घडणार आणि तें तेवढ्यापुरतें खरेंहि आहे. पण अंतर्दृष्टि एवढेंच पाहते व पाहूं शकते असें नव्हे. तिला या दर्शनाहून श्रेष्ठ असें दर्शनहि घडतें. आमचा पृष्ठभागावरचा आत्मा सोडून आम्हीं त्याच्या पाठीमागें अंतर्दृष्टीनें पाहूं शकतो आणि असें आंतरात्म्यांत पाहिलें म्हणजे आमच्या अंतर्दृष्टीला सर्वश्रेष्ठ दर्शन घडतें, सर्वश्रेष्ठ अनुभव येतो. आम्हांला तेथें असें स्पष्ट दिसतें कीं, आम्ही जें कांहीं होत असतो, आम्हांत जे कांहीं बदल होत असतात, आम्हांत क्रमवारीनें ज्या घटना घडत असतात -- हें सर्व होणें, फेरबदल घडून येणें, म्हणजेच क्रमवार घटनानिष्पत्ति ही एक आमच्या अस्तित्वाची प्रवृत्ति आहे. या प्रवृत्तिखेरीज आमच्यांत आणखी कांहीं आहे, तें या घटनाक्रमाच्या पलीकडे आहे, तें या घटनाक्रमांत बिलकुल सांपडत नाहीं. हें जें घटनातीत शुद्ध अचल नित्य अस्तित्व (सद्वस्तु) आहे, तें अंतर्दृष्टीला स्पष्ट दिसतें, या अस्तित्वाच्या क्षणिक, सारख्या घडत राहणाऱ्या घटनांच्या पडद्यामागें त्या अस्तित्वाचा आम्हांला ओझरता आंतरिक अनुभव येतो इतकेंच नव्हे, तर आम्ही बाह्य घटनाचक्रांतून निवृत्त होऊन या शुद्ध सद्वस्तूंत प्रवेश करूं शकतो, व तेथें जीवन जगूं शकतो, सगळें जीवन त्या ठिकाणीं राहून आम्हीं

 

पान क्र. १४७

 

जगूं शकतो; या आमच्या सद्वस्तूंमध्यें राहण्यानें आमच्या बाह्य जीवनांत आमूलाग्र बदल होऊन जातो. आमच्या वृत्तींतहि असाच बदल होतो. जगाच्या फिरत्या घटनांवर आमच्या कार्यप्रवृत्तीनें जो परिणाम होतो त्यांतहि, आमच्या सद्वस्तूंतील वसतीमुळें, सर्वांगीण बदल होतो; आणि ही जी सुस्थिर, अचल सद्वस्तु आमच्या निवासाचें ठिकाण होतें, ती सद्वस्तु, या नित्य चलायमान् विश्वसंसाराच्या पाठीमागें आहे, असें शुद्ध बुद्धि आपल्या शुद्ध स्वतंत्र तर्कपद्धतीनें स्थापित करते. तेव्हां अंत:स्फूर्त ज्ञान (अंतर्ज्ञान, अंतर्दृष्टि) आणि शुद्ध बुद्धीचा निर्णय यांच्यामध्यें अंतिम मूळ अस्तित्वाच्या विषयीं कांहीं विसंगति, विरोध नाहीं हें स्पष्ट आहे. जी विसंगति, व विरोध दिसतो तो अर्धवट अंतर्ज्ञानाला पूर्ण अंतर्ज्ञान समजल्यानें दिसतो. शुद्ध बुद्धीच्या तर्कपद्धतीचा उपयोग न करतांहि, हें शुद्ध अस्तित्व काय आहे याची अगोदर स्पष्ट जाणीव, स्पष्ट ज्ञान न मिळतांहि, त्या अस्तित्वाचा लाभ घेतां येतो हेंहि लक्षांत ठेवण्यासारखें आहे. तेव्हां निष्कर्ष हा कीं, हें सुस्थिर, निश्चल, अस्तित्व हें शुद्ध, नित्य, अनंत, अलक्षण असें आहे. कालाच्या क्रमवारीचा त्याला उपसर्ग पोंचत नाहीं; सर्व आकार किंवा रूप, राशी, गुण यांच्या पलीकडे तें आहे -- तें एकमेव स्वयंपूर्ण, स्वयंभू आत्मतत्त्व होय.

तेव्हां शुद्ध सद्वस्तु ही केवळ कल्पना नाहीं, ती अस्तित्वांत असलेली खरी वस्तु आहे; ती मूळ पायाभूत सत्य आहे हें उघड झालें. पण या मूळ सत्याबरोबर हेंहि ध्यानांत ठेवावयास हवें कीं, क्रियामग्न शक्ति, सारखें गतिशील विश्व, घटनाप्रवाह हेंहि सत्यच आहे. सर्वश्रेष्ठ अंतर्ज्ञान आणि तदनुरूप अनुभव हा, सारखे फिरणारें घटनाचक्र दाखविणाऱ्या अनुभवास व अंतर्ज्ञानास ओलांडून पुढें जातो, त्यांतील उणीव दाखवतो, त्यांना क्षणभर स्थगित करतो, पण त्यांना नाहींसें करीत नाहीं; सत्याच्या प्रांतांत त्यांना स्थान नाहीं असें सांगत नाहीं. अंतर्ज्ञान सत्यदर्शी आहे, आंतरनुभव सत्यस्पर्शी आहे. सत्य द्विविध असल्यानें अंतर्ज्ञान, आंतरनुभव द्विविध आहे इतकेंच. शुद्ध सद्वस्तु व विश्ववस्तु आणि सुस्थिर अस्तित्व व सारखी बदलती घटना, हीं दोन्हीं मूलभूत सत्यें आहेत. यापैकीं एक नाहीं असें म्हणणें सोपें आहे. दोन्हीहि जाणिवेंतील सत्य गोष्टी आहेत, हें सत्य मान्य करून त्या दोहोंचे नातें काय तें शोधून काढणें यांत जीवनसाफल्य साधणारी खरी सूज्ञता आहे.

 

पान क्र. १४८

 

स्वयंपूर्ण, स्वयंभू, मूळ सद्वस्तूच्या स्वरूपग्रहणासाठीं मनानें कल्पिलेल्या दोन समकालीन अवस्था म्हणजे सुस्थिरता आणि चंचलता, एकता आणि अनेकता या आहेत. वस्तुत: या अवस्थांत सद्वस्तु सामावत नाहीं; एकता आणि अनेकता, सुस्थिरता आणि चंचलता यांच्या ती पलीकडे आहे. चंचल अनेकताच्या रूपानें ती सद्वस्तु सुस्थिर एकता ही नित्य अवस्था घेऊन, स्वत:भोंवतीं अकल्पनीय रीतीनें, आत्मसंतोषानें अनंत फेऱ्या घालीत आहे. विश्वाचें अस्तित्व हें शिवाचें तांडव आहे. आत्मानंदातिशयांत शिवानें चालविलेलें नृत्य आहे, या नृत्यामुळें आमच्या नजरेसमोर शिवाचा देह अनंतरूपें घेतो -- वस्तुत: शुद्ध प्रकाशमय शिव आपल्या मूळ स्थानीं, आपल्या मूळ स्वरूपांत नित्यकाळ असतो, होता, असणार -- त्याचें नृत्य हें केवळ नृत्याच्या आनंदासाठींच चाललेलें आहे.

तें स्वयंपूर्ण केवल सद्वस्तुतत्त्व, खऱ्या स्वरूपानें कसें आहे याचें वर्णन करणें, याचा विचार करणें आम्हांला शक्य नाहीं -- तेथें सुस्थिरता आणि चंचलता, एकता आणि अनेकता एकसमयावच्छेदेंकरून आहेत. या पलीकडे त्या केवलाविषयीं आम्हांला कांहीं कल्पनाहि करतां येत नाहीं, मग भाषा करणें दूरच राहिलें. शिवाय एक गोष्ट ही आहे कीं, आमचा हेतु त्या केवलाचें वर्णन करण्याचा नाहीं. आहे त्या स्थितींत आम्हीं हेंच करणें योग्य आहे कीं, जीं दोन सत्यें, शिवतत्त्व आणि कालीतत्त्व (शक्तितत्त्व) आमच्या अनुभवाला येतात, तीं तशींच आम्हीं मान्य करावीं; स्थलकालातीत, निश्चल, अद्वितीय, शुद्ध अस्तित्व, ज्याला मेय वा अमेय दोन्ही शब्द लागूं शकत नाहींत, त्या केवल शिवतत्त्वाशीं, स्थलकालाच्या अनंत विस्तारांत जी अमेय अशी विश्वभ्रमन्ती चालली आहे, तिचा (काली तत्त्वाचा) संबंध काय आहे, हें शोधून काढण्याचा आम्ही यत्न करावा. शुद्ध बुद्धि, अंतर्ज्ञान आणि आंतरनुभव यांचें शुद्ध अस्तित्वाविषयीं, 'सत्' विषयीं काय म्हणणें आहे तें आम्हीं पाहिलें. आतां शक्तीविषयीं -- गतिमय विश्वपसाऱ्याविषयीं -- त्यांचें काय म्हणणें आहे हें आम्हांला पहावयाचें आहे.

या संबंधांत पहिली विचारणा करावयाची ती ही कीं, जी शक्ति आमच्यासमोर दिसत आहे, ती ज्ञानशून्य शक्ति आहे, केवळ जडाच्या हालचालीनें निष्पन्न झालेली शक्ति आहे, आणि या शक्तींतून जी जाणीव भौतिक सृष्टींत वर येतांना दिसते, ती जाणीव या शक्तीचा एक निव्वळ गतिमूलक परिणाम आहे, का उलटपक्षीं ती जाणीवच या शक्तीचा गूढ व

 

पान क्र. १४९

 

खरोखरींचा स्वभाव आहे ? वेदान्ताच्या भाषेंत बोलावयाचें तर, ही शक्ति केवळ प्रकृति अथवा क्रिया-प्रक्रिया-स्वरूप हालचाल आहे, कीं ती चित् ची म्हणजे सृजनशील आत्मजाणिवेची शक्ति अथवा क्रियासमर्थता आहे ? प्रकृति ही स्वतंत्र जडशक्ति आहे कीं चित् ची शक्ति आहे ? प्रकृतीचें वा विश्वशक्तीचें मूळ स्वरूप काय आहे ? हा मूलग्राही तात्त्विक प्रश्न आहे; व यावर इतर सर्व तात्त्विक व्यावहारिक गोष्टी अवलंबून आहेत.

 

पान क्र. १५०

 

प्रकरण दहावें

 

चिन्मय शक्ति

 

      ध्यानयोगाच्या आश्रयानें त्यांनीं देवाची आत्मशक्ति पाहिली. ही शक्ति तिच्या गुणांनीं -- तिच्या ज्ञानयुक्त क्रिया-प्रक्रियांनीं खोल ठिकाणीं झांकून टाकलेली, अतिगूढ केलेली अशी त्यांना दिसली.

- श्वेताश्वतर १.३

 

      जे झोंप घेतात, जे झोंपेंत असतात, त्यांच्यामध्यें त्यावेळीं जागा असणारा, जागा राहणारा जो हा पुरुष तोच ब्रह्म.

- कठोपनिषद ५.८

 

      जें कांहीं साकार रूपात्मक अस्तित्व आहे, त्याचें मूळ, शक्ति हें आहे. जेव्हां या शक्तीची क्रिया सुरूं होते, तेव्हां ही क्रियाशील शक्ति कमी अधिक भौतिक, कमी अधिक स्थूल किंवा सूक्ष्म रूपें व आकार धारण करते आणि हें आकार व हीं रूपें ती शक्ति आपल्या अनुभवाचा विषय करते. स्वत: निराकार शक्ति साकार होऊन आपला आपण अनुभव घेते. साकार अस्तित्वाचा हा कायदा आणि हें मूळ, प्राचीन विचारवन्तांनीं आपल्या मनाला नीट समजावें म्हणून अशी कल्पना केली आहे कीं, शक्तीचा जणुं अनंत सागर मुळांत सर्वत्र पसरलेला आहे. तो अगदीं शांत आहे आणि म्हणून त्यावर कसलेहि आकार दिसत नाहींत. ही आरंभींची शांत आकारहीन स्थिति कांहीं कारणानें संपते; सागरांत कशानें तरी कशीतरी हालचाल सुरू होते, आणि अशी हालचाल सुरू झाली कीं, अनिवार्यपणें आकार उदयास येतात. ही आकारनिर्मिति करणारी पहिली हालचाल हेंच सृष्टीचें बीज असतें; सृष्टीची उत्पत्ति शक्ति-सागरांतील या पहिल्या क्षोभानें होते.

जड भौतिक द्रव्य हें आपल्या बुद्धीला लवकर उमजणारे एक शक्ति-

 

पान क्र. १५१

 

रूप आहे. भौतिक मेंदूनें आमच्या मनाला वेष्टिलेलें आहे; हें मेंदुतंत्र-मन बाह्य भौतिक पदार्थांच्या विविध संसर्गांच्या प्रसंगीं विविध प्रकारें हालचाल करतें आणि या हालचालींनीं आमची बुद्धि जागृत होऊन विशिष्ट वळण घेते. आमची बुद्धि याप्रमाणें भौतिकाच्या आश्रयानें काम करायला शिकली असल्यानें, भौतिक द्रव्य हें जें शक्तीचें रूप, तें तिला समजायला सर्वांत अधिक सोपें जातें. भारतीय पदार्थविज्ञान-शास्त्रज्ञांच्या दृष्टीनें भौतिक शक्तीची मूळ अवस्था, स्थलगत (आकाशगत) शुद्ध भौतिक विस्ताराची अवस्था होय. या अवस्थेंत या शक्तीचा विशेष धर्म स्पंदन हा असतो. हें स्पंदन शब्दरूपानें आमच्या अनुभवास येतें. परंतु आकाशाच्या या अवस्थेंतील स्पंदन, रूपें व आकार घडविण्यास पुरेसें नसतें. शक्तिसागराच्या अखंड प्रवाहांत कांहीं अडथळा उत्पन्न व्हावा, कांहीं संकोच-विस्तार-रूप घटना व्हावी, स्पंदनाच्या विविध प्रकारांचा अन्योन्य संघर्ष घडून यावा, शक्तीच्या एका प्रकाराचा दुसऱ्या प्रकारावर आघात होऊं लागावा, तेव्हां कोठें थोडेबहुत, टिकाऊ अन्योन्यसंबंध स्पंदनप्रकारांमध्यें निर्माण होतात, यांच्यामध्यें अन्योन्यांवर थोडेबहुत परिणाम होऊं लागतात. कोणत्याहि रूपनिर्मितीच्या पूर्वीं हें सगळें घडून यावें लागतें. ही आरंभिक 'आकाशाची' अवस्था बदलून भौतिक शक्ति 'वायु' ही दुसरी अवस्था धारण करते. शक्ति-प्रकारांचा एकमेकांशीं संसर्ग हा या अवस्थेचा विशेष गुण होय. हा अन्योन्यस्पर्श सर्व भौतिक संबंधांचा पाया असतो. तथापि ज्यांना रूपें वा आकार म्हणतां येईल असें या स्थितींत कांहीं घडून येऊं शकत नाहीं. शक्तीचे विविध प्रकार मात्र या वायुस्थितींत घडून येतात. आकार होण्यासाठीं आकारधारक असें कांहीं तत्त्व लागतें. हें तत्त्व मूळ शक्तीच्या तिसऱ्या रूपांतरांतून मिळतें. या तिसऱ्या रूपांतरांत विशेषत: प्रकाश, वीज, अग्नि, उष्णता यांचा समावेश होतो. या रूपांतरानंतर त्यांच्या आश्रयानें आपापलीं विशिष्ट कार्यें करणारीं व आपापला स्वभावधर्म टिकवून धरणारीं अशीं शक्तीचीं विशिष्ट रूपें उपलब्ध होतात. परंतु सुस्थिर टिकाऊ अशीं जड द्रव्याचीं रूपें अद्यापिहि घडूं शकत नाहींत. भौतिक मूळ शक्तीच्या चौथ्या रूपांतरांत 'प्रसरण' हा विशेष धर्म असतो, आकर्षण-विकर्षण (दूर लोटणे) या क्रिया या चौथ्या रूपांत कायम होऊं लागतात. या चौथ्या रूपाला अलंकारिक रीतीनें 'आप' अथवा द्रव असें नांव दिलें गेलें आहे. मूळ भौतिक शक्ति आणखी एक पांचवें रूप धारण करते. या रूपांत द्रव्यकण एकमेकांना

 

पान क्र. १५२

 

चिकटून राहतात व संघात बनतो; या रूपाला पृथ्वी किंवा घनस्थिति म्हणतात. हीं पांच शक्तिरूपें म्हणजेच पंचतत्त्वें, पंचमहाभूतें होत. खऱ्या आकारासाठीं हीं पांच तत्त्वें अस्तित्वांत यावीं लागतात.

जडद्रव्याचीं जीं रूपें आमच्या परिचयाचीं आहेत, तीं सर्व आणि अगदीं सूक्ष्मांत सूक्ष्महि सर्व भौतिक वस्तू, वर सांगितलेल्या पांच तत्त्वांच्या संयोगानें बनलेल्या असतात. आमच्या इंद्रियांच्या द्वारां जो अनुभव आम्हांला येतो, तो सर्व अनुभव या पांच तत्त्वांवर अवलंबून असतो. स्पंदनांचें ग्रहण इंद्रियांनीं केलें म्हणजे शब्दाची संवेदना होते, शक्तिस्पंदनांच्या विश्वांत वस्तूंच्या संसर्गानें स्पर्शसंवेदना होते; प्रकाश, अग्नि, उष्णता यांच्या शक्तीनें उत्पन्न होणाऱ्या, रेखांकित केल्या जाणाऱ्या, टिकवल्या जाणाऱ्या आकारांमध्यें प्रकाशाचा व्यापार घडल्यानें दर्शनाची संवेदना होते, चौथ्या तत्त्वाच्या व्यापारानें रससंवेदना, पांचव्याच्या क्रियेनें गंधाची संवेदना होते. या सर्व संवेदनांचें स्वरूप, स्वभावत: शक्तीशक्तीमधील स्पंदनात्मक संसर्गांची प्रतिक्रिया हें असतें. शुद्ध निरुपाधिक शक्ति आणि तिचीं शेवटलीं रूपांतरें यांत जें महान् दरीसारखें अंतर आहे, तें भरून काढणारा सेतु, प्राचीन विचारवन्तांनीं वर सांगितलेल्या पांच तत्त्वांच्या बांधणीनें तयार केला. इंद्रियांना सर्व प्रकारें खरेखुरे, भरीव व टिकाऊ असे भासणारे आकार, वस्तुत: अल्पकाल टिकणारे आभास आहेत, आणि शुद्ध शक्तीसारखी वस्तु इंद्रियांच्या दृष्टीनें अभावात्मक, ग्रहण न होणारी, जवळजवळ अविश्वासार्ह वस्तु हीच एक सर्वकाळ टिकणारी विश्वव्यापी सत्य वस्तु आहे, ही गोष्ट सामान्य मानवी बुद्धीला मान्य करणें जड जातें. तिची ही अडचण प्राचीन विचारवंतांनीं उपरिनिर्दिष्ट पांच तत्त्वांच्या सेतूच्या उभारणीनें दूर केली.

जाणिवेचा, ज्ञानाचा प्रश्न या वर वर्णिलेल्या उपपत्तीनें सुटत नाहीं. शक्तीच्या स्पंदनांचा संसर्ग हा जडाचा कारभार. या कारभारानें ज्ञानमय संवेदना कां उत्पन्न व्हावी ? सांख्य-तत्त्व-प्रतिपादक विश्लेषणवादी विचारकांनीं या प्रश्नाचें उत्तर म्हणून, वर सांगितलेल्या पांच तत्त्वांत आणखी दोन तत्त्वांची भर घातली; महत् आणि अहंकार ही, पांच तत्त्वापूर्वींचीं तत्त्वें होत. हीं तत्त्वें भौतिक नाहींत, अतिभौतिक आहेत. विश्वव्यापी शक्तितत्त्व म्हणजेच महत्, 'मी'च्या निर्मितीला मूळ असणारें भेदतत्त्व म्हणजे अहंकारतत्त्व. हीं दोन तत्त्वें आणि बुद्धितत्त्व जाणिवेनें (ज्ञान पुरस्सर) क्रियाशील होतात, केवळ शक्तीच्या जोरावर होत नाहींत.

 

पान क्र. १५३

 

या ज्ञानमय क्रियाशीलतेसाठीं निष्क्रिय, साक्षीभूत अशा ज्ञानमय पुरुषाची या पुरुषांची, आत्म्याची वा आत्म्यांची नित्य उपस्थिति लागते; महत्, अहंकार व बुद्धि या तत्त्वांच्या द्वारां घडणाऱ्या शक्तीच्या क्रिया नित्य उपस्थित असणाऱ्या पुरुषांच्या जाणिवेंत प्रतिबिंबित होतात आणि या प्रतिबिंबांच्या द्वारां त्या जाणिवेचा रंग घेतात, ज्ञानयुक्त म्हणून प्रत्ययास येतात.

आधुनिक भौतिक जडवादी तत्त्वज्ञानाला जवळ असणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या सांख्य संप्रदायानें दृष्टीचें स्पष्टीकरण वरीलप्रमाणें केलेलें आहे. निसर्गांत यांत्रिक किंवा जड, ज्ञानहीन शक्ति कार्य करीत आहे ही कल्पना, दृष्टीच्या घडामोडींचें स्पष्टीकरण शक्य तितक्या व्यापक रीतीनें करण्यासाठीं; सांख्यांच्या भारतीय विचारशील गंभीर वृत्तीच्या बुद्धीनें मांडली आहे. सांख्य तत्त्वज्ञानांतील दोष कांहींहि असोत, यांतील मुख्य कल्पना इतकी वादातीत आहे कीं, सर्वसाधारणपणें सर्व प्राचीनांनी ती मान्य केली आहे. ती कल्पना ही कीं, निसर्ग हा शक्तिरूप आहे - निसर्गांत जाणीव दिसते ती कोठून व कशी आली याचें स्पष्टीकरण कांहींहि दिले जावो, निसर्ग जड स्फुरण असो किंवा ज्ञानमय तत्त्व असो, तो शक्तिरूप आहे यांत संशय नाहीं; सृष्टीचें मूळ, शक्तींच्या हालचालींत आहे, आकार किंवा रूपें शक्तीच्या हालचालींनीं निर्माण होतात, कोणताहि विशिष्ट आकार नसलेल्या शक्तीं-शक्तींमध्यें संसर्ग, सहकार, देवाणघेवाण घडूनच सर्व आकार उदयास येतात; सर्व संवेदना आणि कर्में यांचें तात्त्विक स्वरूप प्रतिक्रियात्मक आहे; शक्तींचे विविध प्रकार क्रियाशील असतांना, एका विशिष्ट प्रकारच्या शक्तीशीं त्यांचा संबंध येतो आणि या संबंधाचा, संसर्गाचा परिणाम म्हणून, ही विशिष्ट प्रकारची शक्ति, किंवा शक्तीचे हें विशिष्ट रूप कांहीं प्रतिक्रिया करते - ही प्रतिक्रिया म्हणजेच संवेदना किंवा कर्म. आमच्या अनुभवाला येणारें जग या प्रकारचें आहे आणि आम्हांला संशोधनाचा आरंभ करावयाचा, तर या अनुभवापासूनच करावयास हवा.

आधुनिक विज्ञान, जडाचें भौतिक पृथ:करण करून या वरील सिद्धान्ताचाच पुरस्कार करीत आहे. सामान्यत: हा सिद्धान्त नवीन भौतिक विज्ञानाला मान्य आहे. कांहीं थोडे संशय उरले असल्यामुळें कांहीं बाबतींत त्याला अद्यापि अखेरचा निर्णय घेतां येत नाहीं इतकेंच.

 

पान क्र. १५४

 

याप्रमाणें भौतिक विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचें या बाबतींत एकमत असून अंतर्ज्ञान आणि अनुभव यांचाहि त्यांना पाठिंबा आहे. या सिद्धान्तांत शुद्ध स्वतंत्र बुद्धीला तिच्या सारभूत कल्पनांचें समाधान झालेलें दिसतें. कारण 'जग हें सारदृष्टीनें जाणिवेचें कार्य आहे' या पक्षांतहि कार्य, क्रिया ही गोष्ट गृहित आहे, आणि क्रिया म्हटलें कीं शक्तीची हालचाल, सामर्थ्याची लीला तिच्या पाठीमागें आलीच.

आपल्या अंतरांत जाऊन आपण आपला अनुभव पाहिला, तरी विश्वाचा मूलभूत स्वभाव शक्तिकार्य हाच दिसतो. आपल्या सर्व क्रिया नजरेखालून घातल्या असतां, प्राचीन तत्त्वज्ञानानें सांगितलेल्या तीन शक्तींचा त्या क्रिया खेळ आहेत असें दिसेल. ज्ञानशक्ति, वासनाशक्ति व क्रियाशक्ति या त्या तीन शक्ती होत. या तीन शक्तींकडे बारकाईनें पाहिलें, तर एका आद्यशक्तीचे, मूलभूत अद्वितीय, सर्वथा एकरस शक्तीचे त्या तीन प्रवाह आहेत, असें दिसून येतें. आपल्या विश्रामक्षणांचा, क्रियाशून्य अवस्थांचा विचार केला, तर त्याहि अवस्था, त्या आद्य शक्तीच्या विविध भ्रमणाचा समतोल झाल्यानें अनुभवास येतात, असें दिसेल.

शक्तीची भ्रमन्ती, हालचाल हें विश्वाचें स्वरूप आहे हें मान्य केल्यावर दोन प्रश्न उभे राहतात. पहिला हा कीं, अस्तित्वाच्या पोटांत, स्थितिशील मूळ सद्वस्तूच्या पोटांत, ही गति निर्माण कशी झाली? अस्तित्वाचें सारच गति आहे; गति केवळ शाश्वतच आहे एवढेंच नव्हे तर अस्तित्वच सारतः गतिरूप आहे, असें मानले तर हा पहिला प्रश्न उभा रहात नाहीं. पण ही उपपत्ति आपण अमान्य केली आहे; कारण ज्याच्यावर गतीची सत्ता चालत नाहीं अशा ज्या अस्तित्वाचा अनुभव आम्हांला येतो, त्या अस्तित्वाच्या शाश्वत स्थितिशील स्वभावाला विरुद्ध अशी गति अशा अस्तित्वांत आली कशी व कोठून? या गतीचें मूळ कारण काय आहे ? या गतीची शक्यता त्या स्थितिशील अस्तित्वांत उत्पन्न कशी झाली ? कोणतें गूढ प्रेरक तत्त्व या गतीला कारण झालें ?

प्राचीन भारतीयांच्या बुद्धीनें बहुतांशीं मान्य केलेलें, या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, स्थितिशील अस्तित्वाच्या पोटांत गतिशील शक्ति स्वभावतःच असते. शिव आणि काली, ब्रह्म आणि शक्ति एकच एक वस्तु आहेत. त्या एकमेकांपासून अलग करतां येत नाहींत. अस्तित्वाच्या स्वभावांत असलेली शक्ति स्थिर असेल किंवा गतिमान्


पान क्र. १५५

 

असेल; स्थिर असली तर ती नाहींशीं होते असें नाहीं, ती कमी होते किंवा बदलते असेंहि नाहीं; स्थिर असेल तेव्हां ती अस्थिर नाहीं एवढेंच म्हणतां येईल, तिचे अस्तित्व नाकारतां येणार नाहीं. तिचे अस्तित्व नाकारणें म्हणजे शुद्ध सद्वस्तूचें अस्तित्व नाकारण्यासारखें होईल. कारण या दोन वस्तू अविभाज्यपणें एक आहेत. हें उत्तर सृष्टिधर्माशीं जुळणारें व बुद्धीला सर्वथा पटणारें असें आहे. आपणाला हें उत्तर मान्य करावयास कांहींच हरकत नाहीं; कारण दुसरें जें उत्तर शक्य आहे, तें बुद्धीला कदापि पटणारें नाहीं, तिच्या स्वभावाला विरोधी असें आहे -- तें उत्तर असें कीं, एक आणि अनंत असें अस्तित्व हें वेगळें आणि शक्ति वेगळी. अस्तित्वांत शक्ति बाहेरून प्रवेश करती झाली किंवा असें म्हणा कीं, अस्तित्वांत ती आरंभीं नव्हती पण पुढें कोणत्यातरी क्षणीं ती त्यांत उदयास आली. हें बुद्धिविरोधी उत्तर मान्य करणें अशक्य असल्यानें, पहिलें उत्तर मान्य करावयास आपण सहजच तयार होतो. मायावादी उपपत्ति असें सांगते कीं, स्वत:लाच भ्रमामध्यें ढकलण्याची व राहण्याची शक्ति ब्रह्मामध्यें आहे. हें प्रतिपादन करणाऱ्या मायावादाला हेंहि मान्य करावें लागेल कीं, ही जी भ्रान्तिशक्ति ब्रह्मामध्यें आहे ती, ब्रह्माप्रमाणेंच शाश्वत असली पाहिजे. मग प्रश्न येवढाच उरतो कीं, ही भ्रांतीची शक्यता वास्तवांत केव्हां उतरावयाची ? मायेचा संसार व्यक्त केव्हां व्हावयाचा ? कां तो अव्यक्तच रहावयाचा ? सांख्यांनींहि असें प्रतिपादन केलें आहे कीं, प्रकृति किंवा निसर्ग आणि पुरुष किंवा ज्ञानमय आत्मा दोघेहि शाश्वत आहेत. दोघेहि एकाच वेळीं अस्तित्वांत असतात. प्रकृति एकतर समतोलांत किंवा शांत निश्चल स्थितींत असते अथवा तसें नसेल तेव्हां चंचल स्थितींत, विषम तोलाच्या स्थितींत असते, आलटून पालटून या दोन अवस्था प्रकृति घेत असते.

शक्ति ही अस्तित्वांत स्वभावत: अंतर्भूत असल्यानें आणि शक्तीचा स्वभावधर्म आलटून पालटून निश्चलता किंवा चंचलता स्वीकारण्याचा असल्यानें -- म्हणजेच स्वत:मध्यें एकवटून राहणे (आत्मकेंद्रितता) किंवा सर्वत्र पसरणें (आत्मविस्तार) -- या शक्तीच्या दोन अवस्था स्वभावतःच आलटून पालटून व्यक्त होत असल्यानें, शक्ति गतिमान् कशी होते, शक्तिप्रेरणा कोठून येते, इत्यादि प्रश्न उभे रहात नाहींत. कारण आम्हांला हें सहज कळूं शकतें कीं, शक्तीला जे दोन पर्याय शक्य आहेत, ते म्हणजे कालदृष्ट्या एकीपाठीमागून दुसरी अशी आलटून पालटून चंचलता व

 

पान क्र. १५६

 

निश्चलता येत असेल किंवा अंतर्यामी सतत निश्चलता व त्याबरोबरच पृष्ठभागीं लाटांचा खेळ चालूं असलेल्या सागराप्रमाणें अक्षर अस्तित्वाच्या अंतर्यामीं शाश्वत, आत्मकेंद्रित, निश्चल शक्ति आणि त्या अस्तित्वाच्या पृष्ठभागीं शाश्वत चंचलता किंवा सतत बदलणारी, आकारांची घडामोड करणारी शक्ति, असा प्रकार होत असेल. हा पृष्ठभागावरचा खेळ आत्मकेंद्रित निश्चल शक्तीइतकाच कालदृष्टीनें जुना, अनादि व अखंड आणि शाश्वतचा असेल किंवा तो कालदृष्टीनें आरंभ आणि शेवट यांनी युक्त असून आरंभ-शेवट-आरंभ-शेवट-आरंभ..... असा तालबद्ध शाश्वततेचा असेल, अर्थात् शाश्वत अखंडता किंवा शाश्वत पौनःपुन्य हें त्या पृष्ठभागीय खेळाचें स्वरूप असेल.

शक्तीचा क्रियात्मक खेळ कसा सुरु होतो हा प्रश्न याप्रमाणें निकालांत निघतो. हा खेळ सुरूं होतोच कां या प्रश्नाचा आतां विचार करणें प्राप्त आहे. शक्ति गतिमान् होण्याची शक्यता शक्तींत आहे हें ठरलें, तरी ही शक्यता वास्तवांत कां यावी ? शक्ति गतिमान् कां व्हावी ? शाश्वतपणें आत्मकेंद्रित अवस्थेंत अस्तित्वाची शक्ति कां राहूं नये ? रूप-रूपांतर-विविधता यांपासून ती नित्य मुक्त अशी कां राहू नये ? अस्तित्व जाणीवशून्य आहे आणि जाणीव ही भौतिक शक्तीच्या विकासांतून निर्माण होते व ती अतिभौतिक आहे असें म्हणणें हा आपला गैरसमज आहे, असा पक्ष जर आपण खरा म्हणून स्वीकारला तर वरील 'कां' चा प्रश्न उभा राहत नाहीं. कारण आम्हीं असें म्हणूं शकतों कीं, गति-विश्रांति, गति-विश्रांति ही तालबद्धता अस्तित्वातील शक्तीचा स्वभाव-धर्म आहे आणि जी गोष्ट स्वभावत: स्वयंभू आणि नित्य असणारी अशी आहे, तिच्या संबंधांत कां, कारण काय, प्रारंभींचा प्रेरक हेतु काय, अंतिम प्रयोजन काय, -- असले प्रश्न अस्थानीं ठरतात; बुद्धीला सर्वथा अमान्य ठरतात. शाश्वत अशा स्वयंभू अस्तित्वाला तूं कशाकरिता अस्तित्वात आहेस ? अस्तित्वात आलेंस कसें ? हें प्रश्न विचारणें बुद्धि मान्य करणार नाहीं; तसेंच अस्तित्वाची जी आत्मशक्ति आहे आणि तिचा जो गतिविषयक स्वयंप्रेरणेचा स्वभाव आहे, त्यांनाहि वरील प्रश्न विचारणें बुद्धि अमान्य करील. अशा परिस्थितींत आपण फक्त पुढील प्रश्नापुरतेंच संशोधन करूं शकतो; शक्तीचे आत्माविष्करण कोणत्या प्रकारे होतें ? गतीचे आणि आकारधारणाचे तिचे मूळ नियम कोणते आहेत ? तिची विकासाची प्रक्रिया कोणती ? अस्तित्व आणि शक्ति दोन्ही जड गोष्टी असल्यास, एक जड स्थिति व दुसरी जड

 

पान क्र. १५७

 

प्रेरणा अशी वस्तुस्थिति असल्यास, दोन्ही जाणीवशून्य, बुद्धिशून्य असल्यास, विकासक्रमांत कांहीं प्रयोजन किंवा अंतिम हेतु असणार नाहीं, त्याचप्रमाणें विकासाचा कांहीं मूळ हेतु किंवा कारण असणार नाहीं.

परंतु मूळ अस्तित्व हें जाणीवयुक्त आहे; अर्थात् मूळ अस्तित्व म्हणजे ज्ञानमय पुरुष आहे अशी आपण कल्पना केली किंवा असा आपणाला अनुभव आला तर वरील 'कां' 'कशाकरिता' हे प्रश्न अवश्य उभे राहतात. आपल्याला अशी कल्पना करतां येईल कीं, हा ज्ञानमय पुरुष त्याच्या शक्तीचा, त्याच्या प्रकृतीचा अंकित आहे; ती त्याजकडून तिला लागेल तें काम करून घेऊं शकते, तिनें किंवा त्यानें विश्वात व्यक्त व्हावयाचें वा न व्हावयाचें या संबंधानें कांहीं ठरविण्याचा कसलाहि अधिकार त्याला नाहीं. तांत्रिक आणि मायावादी यांचा ईश्वर, शक्तीच्या किंवा मायेच्या अधीन आहे; मायावाद्यांचा ईश्वर मायावृत पुरुष आहे; तांत्रिकांचा ईश्वर शक्ति-तंत्र पुरुष आहे. पण आपण सर्वोत्तम, सर्वोच्च, अनंत अस्तित्व किंवा सद्वस्तु ही विश्वाचें मूळ म्हणून मान्य केली आहे. ती सद्वस्तु म्हणजे तांत्रिकांचा किंवा मायावाद्यांचा ईश्वर खास नव्हे. त्या सद्वस्तूनें किंवा ब्रह्मानें विश्वापुरतें धारण केलेलें रूप म्हणजे हा ईश्वर आहे. हें ब्रह्म तर्कत:, शक्ति किंवा माया यांच्या अगोदरचें आहे आणि या शक्तीचें किंवा मायेचें कार्य संपतांच तिला आपल्या सर्वातीत स्वरूपांत परत विलीन करून घेणारें आहे. जें ज्ञानमय अस्तित्व, जो ज्ञानमय पुरुष सर्वातीत, सर्वनिरपेक्ष असा आहे, आपल्या रूपांच्या अधीन जो नाहीं, आपल्या क्रियांनीं जो बद्ध होत नाहीं, कमी-अधिक होत नाहीं, त्या पूर्ण स्वतंत्र आदि पुरुषाला (ब्रह्माला) त्याची गतिशील होण्याची शक्यता, वास्तवांत आणण्याची किंवा न आणण्याची पूर्ण मोकळीक आहे हें आम्हांला मान्य करावें लागेल. प्रकृतीच्या हुकुमानें चालणारें ब्रह्म हें वस्तुत: ब्रह्म नव्हेच. असलें प्रकृति-तंत्र ब्रह्म हें जड असें अनंत अस्तित्व मानलें पाहिजे; कारण या अस्तित्वाच्या पोटांत असणारें क्रियाशील तत्त्व, त्याला धारण करणाऱ्या अस्तित्वावर मात करतें; किंवा असें म्हणतां येईल कीं, हें प्रकृति-तंत्र ब्रह्म म्हणजे शक्ति धारण करणारा ज्ञानमय पुरुष आहे. परंतु हा पुरुष आपल्या अंकिताचा (शक्तीचा) अंकित झाला आहे. ब्रह्म ही मूळ सद्वस्तु आहे आणि मूळ शक्तिहि आहे आणि शक्तीचें अंकित ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्म स्वतःचें अंकित आहे अशी कोटि केली, तर मूळ सद्वस्तूसंबंधाचा आपला सर्वोच्च सिद्धान्त आपण

 

पान क्र. १५८

 

अमान्य केल्यासारखें होणार आहे; कारण या शेवटल्या विवेचनाप्रमाणें मूळ सद्वस्तु ही वस्तुत: शक्तिस्वरूप आहे, असें म्हटल्यासारखें होतें. ही शक्ति स्थितिशील असेल किंवा गतिशील होईल -- ही शक्ति सर्वातीत स्वयंभू असेल, परंतु ती स्वयंभू सर्वातीत पुरुष असूं शकत नाहीं; मूळ सद्वस्तू ही सर्वातीत स्वयंभू ज्ञानमय पुरुष आहे असा तर आपला सर्वोच्च सिद्धान्त आहे.

आतां ज्ञानमय पुरुष आणि शक्ति अर्थात् ज्ञान आणि शक्ति, जाणीव आणि शक्ति यांच्या अन्योन्य संबंधाची चर्चा करणें अवश्य आहे. कारण जोपर्यंत यांचें परस्परांचें नातें स्पष्ट झालें नाहीं, तोंपर्यंत एकाचें स्थान दुसऱ्याला देण्याची चूक होणें अपरिहार्य आहे. या चर्चेंत आरंभींच ज्ञान (जाणीव) या कल्पनेचा अर्थ स्पष्ट करून घेणें अवश्य आहे. सामान्यत: या कल्पनेचा अर्थ, आपली जागृतींतील मानसिक जाणीव असा आपण घेतों. मनुष्य झोंपेंत नसतांना, त्याला मूर्छा आली नसतांना, झोंप किंवा मूर्छा यांखेरीज इतर कारणांनींहि संवेदना निर्माण करणाऱ्या स्थूल भौतिक बाह्य शारीर साधनांचा त्याला वियोग झाला नसतांना, शारीर अस्तित्वाच्या बव्हंश भागांत जागृतींतील जी मानसिक जाणीव त्याला असते, तिला आपण ज्ञान (जाणीव) हें नांव सामान्यत: देत असतो. या दृष्टीनें पाहतां, जाणीव ही भौतिक जगाचा नियम नसून ती अपवादभूत असते हें उघड आहे. असली जाणीव आम्हांलाहि नेहमी उपलब्ध नसते. परंतु जाणीव या कल्पनेचा हा अर्थ सामान्य विचारक्रमांत आणि सामान्य संदर्भांत जरी अद्यापि मान्य असला, तरी तत्त्वज्ञानविषयक मीमांसेंत जाणीवेच्या स्वभावाची ही प्राकृत उथळ कल्पना सर्वथा निश्चितपणें बहिष्कृत होणें अगदीं आवश्यक आहे. कारण, आपणाला हें ठाऊक आहे कीं, आम्ही गाढ झोंपेंत असतां, कांहीं औषधानें किंवा इतर कारणानें आम्ही मूर्च्छेंत किंवा बेशुद्धींत असतां, आमच्या स्थूल शारीर पुरुषाच्या दर्शनी जाणीव शून्य अशा सर्व अवस्थांत, आमच्यांतील कांहीं एक वस्तु जाणीवयुक्त असते. इतकेंच नव्हे तर आम्हांला प्राचीन विचारवंतांनीं सांगून ठेवलेली जाणिवेसंबंधाची एक गोष्ट आम्ही नि:शंकपणें खरी मानावी अशी आहे. ती गोष्ट ही कीं, आमच्या जागृत अवस्थेंत जी जाणीव म्हणून आम्ही ओळखतो, ती जाणीव म्हणजे आमच्या एकंदर ज्ञानमय अस्तित्वाचा फार थोडा भाग असतो. ही आमची जागृतीची जाणीव केवळ शारीर, पृष्ठभागावरची असते;

 

पान क्र. १५९

 

आमची मानसिक जाणीव देखील तिच्यांत सर्वच्या सर्व अंतर्भूत होऊं शकत नाहीं. जागृतीच्या या जाणिवेपाठीमागें अंतर्मन असतें, अर्धजागृत मन असतें. या मनांत आमची पुष्कळशी, अर्ध्याहून अधिक जाणीव राहते. येथें खोल भाग असतात, उंच भाग असतांत -- ज्यांची खोली, ज्यांची उंची अद्यापि कोणाहि मानवास मोजतां आलेली नाहीं. शक्तीचें व तिच्या कार्याचें खरें शास्त्र सिद्ध करण्यास आरंभींची पायरी म्हणून हें ज्ञान आपणांस उपयुक्त ठरतें. भौतिकाची चौकट व दर्शनी देखाव्यानें निर्माण होणारा भ्रम यांच्या कचाट्यांतून या ज्ञानामुळें आपण पार होऊन, आद्यशक्तीच्या स्वरूपाचा व कार्याचा विचार मोकळेपणानें करूं शकतों.

जडवाद आग्रहानें असें प्रतिपादन करतो कीं, जाणीव कितीहि विस्तृत क्षेत्र व्यापणारी असो, ती भौतिक घटना आहे; आमच्या स्थूल शारीर इंद्रियांपासून ती अलग कल्पितां येत नाहीं; इंद्रियांचा उपयोग करून घेणारी ती एक स्वतंत्र वस्तु नसून त्यांचा ती परिणाम आहे. हें भौतिकवादाचें परंपरागत मत आतां संशयानें व्याप्त झालेलें आहे; जसजसें ज्ञान वाढत आहे, तसतशी या मताची पक्कड ढिली होत आहे. या उपपत्तीनें वास्तव गोष्टींचें स्पष्टीकरण पुरतेपणीं होईनासें झालें आहे. हें स्पष्टीकरण करण्यांत बुद्धीला अधिक ताण द्यावा लागत असल्यामुळेंच या उपपत्तीची सदोषता उघड होत आहे. ही गोष्ट दिवसानुदिवस अधिकाधिक स्पष्ट होत आहे कीं, आमच्या एकंदर जाणिवेची समर्थता आमच्या अवयवांच्या, इंद्रियांच्या, नाड्यांच्या व मेंदूच्या सामर्थ्याहून पुष्कळच अधिक असतें; इतकेंच नव्हे, तर आमचा सर्वसामान्य विचारक्रम आणि जाणीव यांना आमच्या अवयवांनीं निर्माण केलें नसून, आमचे अवयव हे त्यांच्या सवयींचीं झालेलीं त्यांच्या कार्यसिद्धीचीं साधनें आहेत. मेंदू हा, जाणीवेनें आपल्या ऊर्ध्वगामी धडपडीनें निर्माण केलेली वस्तु आहे आणि ती आपल्या कार्यासाठीं या वस्तुचा उपयोग करून घेत असते. जाणीव कांहीं मेंदूनें निर्मिलेली नाहीं. हा मेंदू जाणीवेचा साधन म्हणून उपयोग करीत नाहीं. आमचे अवयव अवश्य व अपरिहार्य अशीं साधनें आहेत हा सिद्धान्त ज्यामुळें टिकूं शकणार नाहीं, अशींहि कांहीं असाधारण उदाहरणें सांपडतात -- हृदयाचें स्पंदन किंवा श्वास-उच्छ्वास हे जगण्यास अगदीं आवश्यकच आहेत असें नाहीं. तसेंच विचारासाठीं मेंदुगत संघटित पेशीहि आवश्यक नाहींत. एंजिन चालविणारी वाफ किंवा वीज एंजिनमुळें उत्पन्न झालेली नसते. एंजिनची रचना कांहीं वाफेच्या

 

पान क्र. १६०

 

किंवा विजेच्या -- चालकशक्तीच्या -- अस्तित्वाचें स्पष्टीकरण करूं शकत नाहीं. हीच गोष्ट, आमचें शरीरयंत्र आणि विचारशक्ति व जाणिवशक्ति यांना लागूं आहे. शक्ति अगोदरच आहे. आमचें शरीरयन्त्र आधींचें व शक्ति त्या यन्त्राची निर्मिति अशी वस्तुस्थिति नाहीं.

शरीर निश्चेष्ट, जड होऊन पडलेलें असलें, तरीहि त्यांत मानसिक जाणीव असतें असें आपण पाहतो. त्यावरून आपण असें म्हणूं शकतो कीं, भौतिक पदार्थांत सर्वगामी अर्धजागृत मन असूं शकेल; या मनाला योग्य तें अवयवरूप साधन उपलब्ध नसल्यानें तें आपलें अस्तित्व पृष्ठभागीं व्यक्त करूं शकत नाहीं, इतकेंच. भौतिक जड अवस्था ही कांहीं जाणीवशून्य अवस्था नव्हे -- जाणीव सुप्त असलेली अवस्था होय. विकासक्रमाच्या सिद्धान्ताच्या दृष्टीनें ही सुप्तावस्था मूळ आदिम सुप्तावस्था समजावयाची; मनुष्याच्या सुप्तावस्थेप्रमाणें विकासाच्या कोठल्या तरी मधल्या पायरीवरील अवस्था समजावयाची नाहीं एवढेंच. मनुष्याची सुप्तावस्था म्हणजे जाणीव नाहींशी होणें नव्हे, तर ती, अंतर्यामीं एकीभूत होणें. जागृतावस्थेंत बाह्य वस्तूंच्या संसर्गाच्या प्रसंगीं जाणीवयुक्त शारीर-प्रतिक्रिया होत असते. त्या प्रतिक्रियेचा त्याग करून दूर आंत एकवटून निष्क्रिय होणारी जाणीव म्हणजे मनुष्याची सुषुप्ति, हें आपण जाणतोंच. ज्या निसर्गांत, ज्या अस्तित्वांत बाह्य भौतिक जगाशीं संबंध ठेवण्यासाठीं लागणारीं साधनें विकसित झालेलीं नाहींत, त्या निसर्गाची, त्या अस्तित्वाची अवस्था मनुष्याच्या सुषुप्तीसारखीच आहे, असें समजावयास कांहीं हरकत दिसत नाहीं. जें कांहीं सुप्त अवस्थेंत आहे, त्यांत नेहमीं जागा राहणारा ज्ञानमय पुरुष, ज्ञानमय आत्मा आहे असें मानावयास काय प्रत्यवाय आहे?

आपण यापेक्षांहि पुढें जाऊं शकतों. ज्याविषयीं वर सांगितले तें अर्धजागृत मन बाह्य मनाहून निराळया प्रकारचें असत नाहीं, तर तें पृष्ठभागाखालीं काम करतें इतकेंच. त्याचें काम जागृत माणसाला ठाऊक होत नाहीं; तरी त्याचें काम वरच्या मनासारखेंच, पण अधिक विस्तृत क्षेत्रांत व अधिक खोल भागांत होत असतेंच. अर्धजागृत मनाबरोबर अंतर्मनाचा (Subliminal) उल्लेख वरतीं आला आहे. या अंतर्मनाचा व्याप मात्र अर्धजागृत किंवा जागृत मनाच्या व्यापाहून फार मोठा असतो. त्याचें कार्य या दोन मनांहून सामर्थ्यामध्यें फारच मोठें असतें आणि त्याच्या कार्याचा प्रकारहि जागृत मनाच्या कार्याहून वेगळा असतो.

 

पान क्र. १६१

 

अंतर्मनाच्या कार्यामुळें आम्हांला उन्मनाच्या, अतिमनाच्या किंवा अतिमानसाच्या अस्तित्वाचा (मनाहून श्रेष्ठ अशा ज्ञानावस्थेचा) पुरावा मिळतो. या ज्ञानावस्थेंत, मनाच्या क्षेत्राहून फार मोठ्या क्षेत्रांत, ज्ञान ग्रहण करणाऱ्या आपल्या सामान्य मनापेक्षां श्रेष्ठ शक्ती सुसंघटितपणें काम करतात. ही अतिमनाची ज्ञानावस्था आपल्यामध्यें आपणाला उपलब्ध होण्यासारखी आहे. ह्या श्रेष्ठ अवस्थेपर्यंत अंतर्मन जर जाऊं शकतें, तर मन, अर्धजागृत मन यांच्या खालीं असलेल्या कनिष्ठ ज्ञानावस्थेंत तेंच अंतर्मन प्रवेश करूं शकणार नाहीं काय ? प्राणमय कोश व अन्नमय कोश यांजमध्यें जी जाणीव आहे, ती मन व अर्धजागृत मन यांच्या खालच्या पायरीवरची जाणीव होय. अशा प्रकारची जाणीव वनस्पतीमध्यें व धातूमध्येंहि दिसून येते. जाणीव किंवा ज्ञान हा शब्द मनुष्याच्या मानसिक जाणिवेला किंवा ज्ञानाला लावण्याचा जुना प्रघात आहे. मानसिक जाणिवेचें विशिष्ट स्वरूप मनाच्या वरहि नाहीं, किंवा खालींहि नाहीं. तेव्हां जाणीव हा शब्द, खालच्या किंवा वरच्या ज्ञानावस्थांना लावला कीं त्याचा अर्थ, मानसिक जाणिवेहून वेगळा आहे, एवढे लक्षांत ठेवावयास हवें. असो.

मनाहून खालच्या पातळीवर जाणीव असते कीं नाहीं अशी शंका घेतली जाते. आपल्या शरीराच्या पेशींमध्यें आणि स्वयंचालित प्राणक्रियांमध्यें प्राणीय जाणीव असल्याचें आम्हांला दिसून येते, कारण आपल्या पेशीकडून व प्राणक्रियांकडून कांहींतरी विशिष्ट उद्देशानें व तो उद्देश साधण्यासाठीं कांहीं हालचाल होत असल्याचे आम्हांला ठाऊक आहे, त्याचप्रमाणें कांहीं गोष्टींचें आम्हांला आकर्षण वाटतें, आणि कांहीं गोष्टींची घृणा वाटते.

पण या घृणेचा किंवा आकर्षणाचा आमच्या मनाशीं कांहीं संबंध नसतो -- शारीर पेशींच्या क्रियांनीं व प्राणक्रियांनीं आमचे जे उद्देश साधतात, त्यांचाहि मनाशीं संबंध नसतो. याप्रमाणें आमच्यांत प्राणीय जाणीव (Vital consciousness) असल्याचें सिद्ध होतें. मानवेतर प्राण्यांत ही प्राणीय जाणीव विशेषच महत्त्वाचें जीवनकार्य करीत असते. वनस्पतीमध्यें ही जाणीव अंत:स्फुरित ज्ञानाच्या स्वरूपाची असते. कांहींतरी मिळविण्याची धडपड व कांहीं वस्तूंपासून दूर होण्याची क्रिया वनस्पतींमध्यें दिसतें, त्यांच्यांत सुखाची, असुखाची उर्मि आढळून येते; त्यांच्यांत झोंप, जागृति याहि अवस्था आढळतात. भौतिक शास्त्रीय पद्धतीचा

 

पान क्र. १६२

 

कांटेकोर उपयोग करून एका महान् भारतीय वैज्ञानिकानें या सर्व गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत; या सर्व जाणिवेच्या क्रिया आहेत -- पण अर्थात् च आम्ही ज्याला मन म्हणून ओळखतों, त्याच्या ह्या क्रिया नाहींत. या प्राणीय जाणिवेच्या आरंभींच्या प्रतिक्रिया मनासारख्या असतात; पण, ज्याप्रमाणें उच्च पातळीवरील अतिमानसी जाणिवेचें संघटन किंवा घडण मनाहून वेगळी असते, त्याचप्रमाणें मनाहून खालच्या पातळीवरील या प्राणीय जाणिवेचा स्वानुभव, तिच्या स्वानुभवाची घडण मनाहून वेगळ्या प्रकारची असते.

जाणिवेचा प्रांत वनस्पतीपर्यंत पोंचतो हें आपण पाहिलें; वनस्पतींचें जीवन प्राणिजीवनाच्या खालच्या प्रतीचें असतें व हें जीवन एका जाणिवेनें -- विशिष्ट प्राणीय जाणिवेनें -- चालतें याबद्दलची आपली शंका दूर झाली. पण जाणिवेचा प्रांत वनस्पतीच्या खालीं नाहीं असें आपण मानावयाचें काय? तसें आपण मानलें, तर असें म्हणावें लागेल कीं, जड द्रव्याशीं कांहीं नातें नसलेली एक जीवनाची व जाणिवेची शक्ति, कदाचित् दुसऱ्या जगांतून येऊन जड द्रव्यांत शिरते व स्थायी होतें* -- येथील जड-द्रव्यांत जर प्राण सुप्त नसेल, तर अर्थात् दुसऱ्या जगांतून तो येथें आला असें मानणें सयुक्तिक आहे. प्राचीन विचारवंत अशीं अनेक जगें मानीत. आमच्या जगांतील जीवन आणि जागृत असलेली जाणीव हीं जगें आपल्या प्रभावानें टिकवून धरतात, किंवा जागृत नसलेली जाणीव आपल्या दडपणानें जागृतींत आणतात, असें ते मानीत -- पण आपल्या प्रवेशानें आमच्या जगांत हीं दुसरीं जगें नसलेली जाणीव उत्पन्न करतात असें ते मानीत नव्हते. जडद्रव्यांत अगोदरच जें अंतर्भूत, अंतर्हित नाहीं, तें त्यांतून विकसित होऊं शकत नाहीं, असें तें मानीत.

आम्हांला हें त्यांचें मत पटावयास हरकत नाहीं. जीवन (प्राण) आणि जाणीव जड व ज्ञानशून्य दिसणाऱ्या भौतिक द्रव्यांत सुप्त अवस्थेंतहि असत नाहीं, जडद्रव्यापर्यंत ती खालीं उतरलेली आहे पण पुढें

-------------------------

*अशी एक विचित्र कल्पना प्रसृत झाली आहे कीं, येथें पृथ्वीवर जीवन आले ते दुसऱ्या जगतांतून नव्हे तर दुसऱ्या ग्रहावरून आलें. पण विचारवंताला हें स्पष्टीकरण पुरेसें वाटणार नाहीं. कोणत्याहि किंवा कोठल्याहि जडद्रव्यांत प्राण-तत्त्व (जीवन) आलें कसें, हा मूळ प्रश्न आहे, विशिष्ट ग्रहाच्या जड द्रव्यांत तें कोठून शिरलें हा मूळ प्रश्न नव्हे.

 

पान क्र. १६३

 

ती जडद्रव्यांत शिरलेली नाहीं असें मानावयास कांहीं कारण दिसत नाहीं. संशोधन जसें वाढत आहे, तसें हें स्पष्ट होत आहे कीं, धातूंमध्यें, जमिनीमध्यें आणि इतर जीवनरहित आकारांमध्यें अस्फुट असें जीवन, दडपलेली गतिशून्य अशी जाणीव -- निदान पुढें ज्या गोष्टीला जाणिवेचें स्वरूप येतें अशी कांहीं गोष्ट -- वसति करून आहे. एवढेंच कीं ज्याला आम्ही प्राणीय जाणीव म्हणतो, ती अस्पष्टपणें कां होईना वनस्पतीमध्यें जशी प्रतीत होते, ओळखतां येते, तशी गतिशून्य रूपांतील जाणीव, जड-लीन जाणीव आम्हांला सुलभपणें प्रतीत होत नाहीं, सुलभपणें कल्पितां येत नाहीं; आणि आम्हांला कळायला किंवा कल्पना करायला जें अवघड तें अस्तित्वांतच नाहीं, असा सिद्धान्त करण्याचा आम्हांला अधिकार आहे असें आम्ही समजतों. तथापि वनस्पतीपर्यंत जाणिवेचा प्रत्यय आम्हांला आल्यानंतर त्या वनस्पतिवर्गाच्या खालीं, जाणीव नसलेली ओसाड दरी निसर्गांत आहे, अशी कल्पना करणें आम्हांला कठीण जातें. असल्या जाणीवशून्य निसर्ग-विभागावर आमचा विश्वास बसत नाहीं. निसर्गांत एकरसता असावी, निसर्गाच्या सर्व विभागांत जाणिवेच्या बाबतींत एकरूपता असावी असा विचार, विचारशक्ति आम्हांस सुचविते व असा विचार सुचविण्याचा तिला अधिकार पोंचतो; कारण, निसर्गांतील जडद्रव्याचा भाग सोडतां, बाकी सर्व भागांतील वस्तू व घटना जाणिवेच्या बाबतींत एकरूपता दाखवितात, आणि जडविभागांतहि ही एकरूपता नाकारली जात नाहीं, केवळ इतर विभागांपेक्षां ती तेथें अधिक झांकलेली दिसते इतकेंच. तेव्हां निसर्गांत वरपासून खालपर्यंत सर्वत्र, जाणिवेच्या बाबतींत अखंड एकता आहे, असें आपण मानलें म्हणजे, शक्तीचे जितके प्रकार जगांत काम करीत आहेत त्या सर्वांचें पोटीं जाणीवशक्ति आहे असा सिद्धांत आपण करूं शकतो. सर्व रूपांत मनोमय पुरुष किंवा अतिमानसी पुरुष नसला, तरी त्या सर्वांत एक प्रकारची जाणीवशक्ति असून, त्या रूपांचा अगदीं बाहेरचा, अगदीं वरचा भाग देखील स्पष्टपणें किंवा गुप्तपणें जाणिवेनें युक्त असतो एवढें तरी आपण मानूं शकतो.

या निसर्गविषयक दर्शनांत, विवेचनांत, जाणीव या शब्दाचा पूर्वींचा परंपरागत अर्थ मात्र राहत नाहीं. जाणीव म्हणजे मन, असा परंपरागत सर्वसामान्य अर्थ बदलून जाणीव म्हणजे स्वत: स्वतःला ओळखणारी, जाणणारी अस्तित्वाची क्रियाशक्ती असा अर्थ घ्यावा लागतो. मन ही एक

 

पान क्र. १६४

 

अशी मधल्या ठिकाणची शक्ति आहे. मनाच्या पातळीखालीं ही अस्तित्वशक्ति प्राणमय आणि जड भौतिक हालचालींत व्यक्त होते. या हालचाली आपण अर्धजागृत मनाच्या सदरांत घालतों; मनाच्या वरच्या प्रदेशांत ही अस्तित्वशक्ति अतिमानस-शक्ति म्हणून काम करते. तेथें तिला अतिमानसी जाणीव म्हणतात. पण खालपासून वरपर्यंत ती एकच एक वस्तु आहे -- भिन्न ठिकाणीं तिनें आपली संघटना भिन्न करून घेतली आहे इतकेंच. भारतीय तत्त्वज्ञानांत 'चित्' म्हणून जी शक्ति कल्पिलेली आहे, तिचें स्वरूप वर वर्णन केल्याप्रमाणेंच आहे. एकच चित्-शक्ति अनेक रूपें धारण करून अनेक जगें निर्माण करते, अशी भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण आहे. मन हें जडाहून वेगळी शक्ति असूं शकत नाहीं, जडशक्तीचाच विकास होऊन मन बनलें आहे, असें एकतेचें प्रतिपादन भौतिक शास्त्रहि आपल्या बाजूनें करतें. भारतीय तत्त्वज्ञान खोलांत खोल विचार करून, भौतिक शास्त्राच्या उलट असें प्रतिपादन करतें कीं, मन आणि जडद्रव्य एकाच शक्तीचीं भिन्न अवस्थेंतील रूपें आहेत, अस्तित्वाची एकच जाणीवशक्ति भिन्न संघटित रूपें धारण करून मन बनते, जडद्रव्य बनते.

पण जाणीव-शक्ति, चित्-शक्ति हें नांव आद्यशक्तीला देणें योग्य आहे कीं नाहीं, हा एक प्रश्न उद्भवतो. जाणीव किंवा ज्ञान या कल्पनेंत बुद्धि, हेतुपुरस्सरता किंवा आत्मभान यांचा अंतर्भाव होतो. आमच्या मनाला परिचित अशा प्रकारची बुद्धि, हेतुपूर्वकता, आत्मभान आद्यशक्तीच्या जाणिवेंत, ज्ञानांत अनुभवास येत नसली, तरी थोड्या वेगळ्या प्रकारची कां होईना, ही त्रयी आद्य शक्तींत अनुभवास येत असेल तरच तिला, त्या शक्तीला, जाणीव किंवा ज्ञान हें नांव देतां येईल. ही कसोटी आद्यशक्तीला लावल्यास असें दिसून येईल कीं, विश्वांत जाणीवयुक्त शक्ति काम करीत आहे या विधानाला त्यामुळें बळकटीच येते. मानवेतर प्राण्यांची गोष्ट घ्या. या प्राण्यांची मनाची शक्ति अगदींच अल्प असते. या अल्पशक्तीच्या मानानें फारच पलीकडे असलेलें भौतिकशास्त्रीय सूक्ष्म ज्ञान, आणि ज्यांत पूर्ण हेतुपूर्वकता स्पष्टपणें प्रत्ययास येते अशीं कामें हें मनुष्येतर प्राणी करतांना दिसतात. मनुष्येतर प्राण्यांत हें जें सूक्ष्म शास्त्रीयज्ञान व योजनेचें पूर्णत्व प्रत्ययास येतें, तें ज्ञान व पूर्ण नियोजन मनुष्याला पुष्कळ काळपर्यंत शिक्षण घेऊन व अभ्यास करूनच बऱ्याच प्रमाणांत कमावता येत असलें, तरीहि मनुष्येतर प्राणी या सूक्ष्म ज्ञानाचा व नियोजनाचा प्रयोग जितक्या त्वरेनें व यशस्वीपणें करूं शकतात, तितक्या

 

पान क्र. १६५

 

त्वरेनें व यशस्वितेनें मनुष्याला आपलें ज्ञान व नियोजनकौशल्य उपयोगांत आणतां येत नाहीं. तेव्हां मनुष्येतर प्राण्यासंबंधानें व मनुष्यासंबंधानें जी सर्वसाधारण ज्ञानविषयक वस्तुस्थिति अनुभवास येते, तिच्यावरून असें म्हणतां येतें कीं, पृथ्वीवर कोणत्याहि व्यक्तीमध्यें जी सर्वांत उच्च अशी मानसिक शक्ति व्यक्त झालेली आहे, त्या शक्तीपेक्षां श्रेष्ठ अशी जाणीवशक्ति, कीटकवर्गांत व पशुवर्गांत काम करीत आहे. या जाणिवेंत उच्चतम मानवी मनापेक्षां अधिक बुद्धि आहे, अधिक हेतुपुरस्सरता किंवा नियोजनकौशल्य आहे, आपल्या हेतूंचें, आपल्या प्रयोजनांचें साधनांचें, परिस्थितीचें अधिक सूक्ष्म व नि:संशय असें ज्ञान आहे. जी गोष्ट सजीव निसर्गाची तीच अजीव मानल्या जाणाऱ्या निसर्गाचीहि आहे. तेथेंहि पशुवर्गाप्रमाणें, कीटकवर्गाप्रमाणें सर्वश्रेष्ठ गुप्त बुद्धि सर्वत्र काम करतांना आढळते. श्वेताश्वतरांत सांगितल्याप्रमाणें आपल्या गुणांनी अर्थात् क्रिया-प्रक्रियांनीं झांकून टाकलेली 'देवात्मशक्ति', सर्वश्रेष्ठ बुद्धि किंवा ज्ञानशक्ति, सर्वत्र काम करीत आहे.

या ज्ञानशक्तीच्या सार्वत्रिकतेविरुद्ध जो एक मुद्दा उपस्थित केला जातो, तो निसर्गांत आढळून येणाऱ्या निरर्थक क्रियांचा. निवडीचें, परिस्थितीशीं जुळवून घेण्याचें, विशिष्ट आकांक्षेनें हालचाल करण्याचें, हें सर्व बुद्धीचें हेतुपुरस्सर कार्य निसर्गांत चाललें आहे; या सर्व हेतुपुरस्सर कार्याच्या मुळाशीं, जाणीवयुक्त, बुद्धियुक्त कोणीतरी असलें पाहिजे या कल्पनेला विरोध करणारी निसर्गांतलीच एक गोष्ट म्हणजे, त्याच्या कार्यांत जो अर्थशून्य निरुपयोगी गोष्टींचा भरणा असतो किंवा दिसतो ती होय. आद्यशक्ति ही ज्ञानशक्ति आहे या सिद्धान्ताला बलवान् विरोध करणारा वस्तुत: हा एकच मुद्दा आहे. पण त्याला कारण आमची अगदीं मर्यादित अशी मानवी बुद्धि आहे. सर्वस्थळीं, सर्वकाळीं चालणाऱ्या विश्वशक्तीच्या क्रियांना मर्यादित मानवी बुद्धि आपलें युक्तायुक्ततेचें, निरर्थक-सार्थकतेचें मोजमाप लावूं पाहते. हें मोजमाप मानवी मर्यादित उद्दिष्टाच्या दृष्टीनें बरोबर असलें, तरी विश्वशक्तीच्या महाव्यापक संसाराला हें एकदेशीय बुद्धिवादी मोजमाप जाणूनबुजून लावणें चुकीचें ठरतें. कारण निसर्गाच्या हेतूचा, प्रयोजनाचा एखादा अंश आपण पाहूं शकतो, जाणूं शकतो. त्या अल्प प्रयोजनाला जें उपयुक्त नाहीं, तें सारें निरुपयोगी व निरर्थक, असें आम्हीं म्हणत असतो. आमचें मानवी कार्य पाहिलें, तर त्यांतहि विशिष्ट व्यक्तीच्या दृष्टीनें पुष्कळशी निरर्थकता नजरेस येते,

 

पान क्र. १६६

 

तथापि या निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी विश्वाच्या व्यापक हेतूंच्या दृष्टीनें उपयुक्त असतात, हेंहि आपण पाहूं शकतो. किंवा असेंहि म्हणतां येईल कीं, या निरर्थक भासणाऱ्या गोष्टींच्या मदतीनेंच निसर्ग आपला हेतु सफल करतो. आपल्याला निसर्गाचे जे हेतू कळतात, त्यासंबंधांनें ही गोष्ट लक्षांत घेतां, त्याचे जे हेतू आपल्याला कळत नाहींत, त्यांच्यासंबंधानें आपण निसर्गावर असा विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं कीं, आमच्या अल्पदर्शी मानवी बुद्धीला निरर्थक वाटणाऱ्या गोष्टींच्या द्वारां ते हेतू पूर्ण करून घेण्यास तो समर्थ आहे.

निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी, निसर्गाच्या व्यापक दृष्टीनें निरर्थक नसतात, हें सत्य ओळखलें म्हणजे निसर्ग निर्माण करणारी व चलविणारी आद्याशक्ति ही ज्ञानशक्ति आहे, या सिद्धान्ताला निःसंदेह मान्यता मिळावयास कांहींच अडचण राहत नाहीं. कारण पशुवर्ग, वनस्पतिवर्ग व जड वर्ग या सर्वांत विश्वशक्तीची, आद्याशक्तीची जी नानाविध क्रिया चालते, तिच्यांत निश्चित प्रयोजनाची आद्य प्रेरणा असते. दर्शनीं आंधळी वाटणारी प्रवृत्ति डोळस मार्गदर्शन करते, ठरलें असेल तें प्रयोजन अविलंबानें किंवा थोड्या विलंबानें कां होईना पण निरपवादपणें निश्चितपणें सफल होतें, या गोष्टी कोणालाहि नाकारतां येण्यासारख्या नाहींत. जडद्रव्य हा विश्वारंभ व जडद्रव्य हाच विश्वाचा शेवट असें भौतिक शास्त्रज्ञांच्या बुद्धीला जोंपावेंतों प्रामाणिकपणें वाटत होतें, पटत होतें, तोंपावेतों, निसर्गांत दिसणाऱ्या बुद्धियुक्त क्रियांचें मूळ कोणी श्रेष्ठ बुद्धीच असली पाहिजे, या कल्पनेला सत्य म्हणून मान्यता देणें वैज्ञानिकांना साहजिकच अप्रमाणिकपणाचें वाटे. परंतु आज ही स्थिति पालटली आहे. ''निसर्गाचें मूळ, बुद्धिशून्य व ज्ञानशून्य आंधळी प्रेरणा आहे; त्या मूळ आंधळ्या प्रेरणेंत, त्या मूळ नेणिवेंत, मानवी जाणिवेचें, बुद्धीचें, वा मानवी सामर्थ्याचें कसलेंहि अगदीं प्राथमिक स्वरूप देखील अंतर्भूत, अंतर्हित नव्हतें -- तरीपण त्या मूळ नेणिवेंतून मानवी जाणीव उदयास आली'', हा विरोधात्मक सिद्धान्त आज जीर्ण व निर्बुद्ध कल्पनांच्या वर्गांत जाऊन बसला आहे. मानवी जाणीव ही निसर्गाच्या जाणिवेचा एक प्रकार आहे, असलाच पाहिजे; निसर्गांत जाणीव असल्याशिवाय मानवांत जाणीव येऊं शकत नाहीं, हें सत्य आतां स्पष्ट झालें आहे. निसर्गांत मनाचा उदय होण्यापूर्वीं, जाणीव दुसऱ्या कमीअधिक गुप्त रूपांत काम करीत असते; नंतर ती जाणीव मानवांत मनाचें रूप घेते, आणि मनाच्या नंतर

 

पान क्र. १६७

 

मनापलीकडील श्रेष्ठ रूपेंहि ती धारण करणार आहे, अशी खरी स्थिति आहे; कारण विश्वाची उभारणी करणारी आद्यशक्ति ही जाणीवशक्ति आहे, ज्ञानशक्ति आहे; आणि या विश्वांत व्यक्त होणारें आद्य अस्तित्व, आद्य सद्वस्तु हा ज्ञानमय पुरुष आहे. विश्व म्हणजे अनंत रूपांचा संसार. ज्ञानमय पुरुषानें आपल्या ज्ञानशक्तीच्या द्वारां हा जो संसार निर्माण केला आहे, तो कशासाठीं, याचा विचार केल्यास असें म्हणावें लागतें कीं, त्या ज्ञानमय पुरुषांत जें जें कांहीं बीजरूपानें आहे, तें तें सर्व व्यक्त व्हावें, साकार व्हावें व ही साकारता सर्वथा पूर्ण अशी व्हावी हा एकच, या आकारमय विश्वाच्या निर्मितीचा, आविष्काराचा उद्देश आहे. आपल्या बुद्धीला पटण्यासारखें असें हें एकच उत्तर दिसते.

 

पान क्र. १६८

प्रकरण अकरावें

 

अस्तित्वाचा आनंद -- प्रश्न

     

जर आम्हांला हा अस्तित्वाचा आनंद आकाशाप्रमाणें वसतीसाठीं नसतां, तर कोण येथें श्वासोच्छ्वास करूं शकतें, कोण येथें जीवन जगूं शकतें?

- तैत्तिरीय उपनिषद् २.७

हीं सर्व भूतें आनंदांतून जन्मास येतात, आनंदाच्या आश्रयानें जगतात आणि वाढतात, शेवटीं आनंदांत परत विलीन होतात.

- तैत्तिरीय उपनिषद् ३.६

 

      सर्व वस्तुजाताचा आरंभ, शेवट व त्या वस्तुजाताला आपल्या पोटांत सामावून घेणारी अशी अनादि वस्तु म्हणजे शुद्ध अस्तित्व, सद्वस्तु हें आम्हीं मान्य केलें; या ब्रह्माचे पोटीं त्याच्या अस्तित्वापासून अलग न करतां येण्यासारखें, त्याचें स्वाभाविक असें आत्मज्ञान आहे; हें त्याचें ज्ञान स्थितिशीलता टाकून गतिशील ज्ञानमय शक्तीचें रूप घेऊन बाहेर पडून अनेक शक्ती, अनेक रूपें, अनेक जगें निर्माण करतें हेंहि आम्हीं मान्य केलें. पण अद्यापि एका मोठ्या प्रश्नाचें उत्तर आम्हीं जाणूं इच्छितों; तो प्रश्न हा कीं, जर ब्रह्म हें पूर्ण आहे, अनादि आहे, अनंत आहे, त्याला जर कोणत्याहि गोष्टीची उणीव नाहीं, आणि कसलीहि इच्छा नाहीं, तर त्यानें आपली ज्ञानशक्ति पुढें करून तिच्या द्वारां स्वत:चे पोटीं हीं अनंत रूपांनीं, आकारांनीं भरलेली विश्वें कां निर्माण करावीं ? या बाबतींत असें एक उत्तर देतां येतें कीं, या ब्रह्माची ज्ञानशक्ति, ब्रह्माची इच्छा नसतांहि त्याजकडून निर्मितीचें कार्य करविते; ब्रह्मात जी गतिशीलता व रूपशीलता सुप्तगुप्त बीजरूपानें वास करतें, ती ब्रह्मावर त्याच्या इच्छेविरुद्ध अधिकार चाल-

 

पान क्र. १६९

 

वून त्याला अनंत रूपें धारण करावयास लावते. - पण हें उत्तर आम्हीं अमान्य केलें आहे. कारण वस्तुस्थिति अशी आहे कीं, ब्रह्मांत अनंत रूपें धारण करण्याची जी सुप्तगुप्त शक्ति आहे त्या शक्तीनें तें बांधलेलें नाहीं, या शक्तीचा त्याजवर अधिकार चालत नाहीं; -- तें स्वतंत्र आहे, शक्तितंत्र नाहीं. तेव्हां ब्रह्म हें नित्य निश्चल राहण्यास किंवा निश्चलता टाकून चंचलता धारण करण्यास सर्वस्वी स्वतंत्र आहे; रूपें धारण करण्यास किंवा रूपें धारण करण्याची स्वतःची शक्ति तशीच नेहमीं सुप्त ठेवण्यास पूर्णपणें मोकळें आहे; असें असतां तें आपली गतिमान् होण्याची व रूपवान् होण्याची शक्ति कार्यान्वित करतें तें कां, कशाकरितां, कोणत्या हेतूनें ? या प्रश्नाचें उत्तर 'आनंदाकरिता' हें एकच संभवतें. निश्चल निराकार अस्तित्वांत आनंद आहे, तसाच चंचल साकार अस्तित्वांत आनंद आहे म्हणून निश्चल ब्रह्म चंचल होतें, निराकार ब्रह्म साकार होतें.

वेदान्ती दृष्टीनुसार आदिम, अंतिम, अनंत शाश्वत अस्तित्व हें, 'दुसऱ्या कसल्याहि गोष्टी त्यांत नसलेलें असें केवळ अस्तित्व' नव्हे; किंवा ज्याची जाणीव प्राकृत संस्कारहीन रुक्ष अशा शक्तीच्या स्वरूपाची आहे असें 'जाणीवयुक्त अस्तित्व,' देखील नव्हे; तर ज्या अस्तित्वाचा व जाणिवेचा गाभा निर्भेळ आनंद आहे असें जाणीवयुक्त अस्तित्व हें तें मूळ अस्तित्व होय. अनादि पूर्ण अस्तित्वांत कसलेंहि अनस्तित्व असूं शकत नाहीं, कसल्याहि प्रकारची नेणिवेची रात्र त्यांत असू शकत नाहीं, त्यांत कसलीहि शक्तीची उणीव, अक्षमता असू शकत नाहीं -- कारण यांपैकीं एखादी गोष्ट त्या अस्तित्वांत असेल, तर तें अस्तित्व 'अनादि, आदिम व पूर्ण' मानतां येणार नाहीं. अनादि पूर्ण अस्तित्वाविषयीं वरील गोष्टी जशा निश्चयानें सांगतां येतात, तसेंच हेहि सांगतां येतें कीं, त्यांत कसल्याहि प्रकारचें दु:ख असूं शकत नाहीं, आनंदाचा अभाव तेथें असूं शकत नाहीं. जाणीवयुक्त अस्तित्वाची पूर्णता म्हणजे त्याची अमर्याद आनंदमयता. 'अमर्याद आनंदमय अस्तित्व' 'पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्व' या दोन शब्दसमुच्चयांनीं एकच गोष्ट दाखविली जाते. जें कांहीं अमर्यादित, अनंत अनादि व पूर्ण असतें तें शुद्ध आनंदरूपहि असतें. आम्हां सापेक्ष व अपूर्ण मानवांना असा अनुभव येतो कीं, आम्ही जेव्हां असमाधानी असतो, तेव्हां कांहीं तरी मर्यादा, कांहींतरी व्यत्यय आमच्या असमाधानाला कारण असतो. आमच्यापासून जें कांही

 

पान क्र. १७०

 

काढून घेतलेलें आम्हांला परत मिळालें, आम्ही मर्यादा उल्लंघूं शकलों, आम्हीं व्यत्यय दूर करूं शकलों म्हणजे आम्हांला समाधान वाटतें, संतोष वाटतो. हें असें असण्याचें कारण, आमचें मूळ अस्तित्व निरपेक्ष, पूर्ण आहे. तें आपली अनंत अमर्याद आत्मजाणीव आणि आत्म-सामर्थ्य पूर्णतया स्वत:पाशीं बाळगून आहे, आणि अशा प्रकारची आत्मस्वाधीनता म्हणजेच आत्मानंद होय. आम्ही आपली परापेक्षता टाकून जितक्या प्रमाणांत आमची मूळ पर-निरपेक्षता, आत्मस्वाधीनता जवळ करूं शकतो, स्पर्शूं शकतो, तितक्या प्रमाणांत समाधान, आनंद यांच्या जवळ आम्हीं जाऊं शकतो, त्यांना आम्ही स्पर्श करूं शकतो.

ब्रह्माचें स्वत:चें पूर्ण अस्तित्व गतिहीन, गतिविमुख शांत स्वरूपांत स्वत:च्या अधीन, पूर्ण स्व-तंत्र असण्यांत त्याचा आत्मानंद आहे. पण गतिविमुखतेनें तो बांधलेला नाहीं. ब्रह्माची जाणीवशक्ति ज्याप्रमाणें अनंत आकार अनंत प्रकारें धारण करूं शकते, त्याप्रमाणें त्याचा आत्मानंदहि अनंत प्रकारें गतिमान् होऊं शकतो, अनंत बदल धारण करूं शकतो. अगण्य विश्वाच्या अफाट पसाऱ्यांत या आत्मानंदाच्या अनंत प्रवाहांच्या व प्रकारांच्या प्रतिबिंबांचें दर्शनच आम्हांला घडतें. हा पसारा आत्मानंदामुळें, आत्मानंदासाठींच अस्तित्वांत आला आहे. ब्रह्माची शक्ति विस्ताराचा, निर्मितीचा खेळ खेळते. असा खेळ खेळण्यास ब्रह्म तिला मोकळीक देतें. यांत आपला आत्मानंद अनंत गतींनीं गतिमान् व्हावा व अनंत रूपांनीं रूपवान् व्हावा आणि या गतींचा व रूपांचा आस्वाद आपण चाखावा हा एकच ब्रह्माचा हेतु असतो.

तेव्हां हें आपण लक्षांत ठेवावयाचें आहे कीं, या विश्वांत जो आकारांचा पसारा आहे तो सच्चिदानंदाचा स्वयंनिर्मित पसारा आहे. सच्चिदानंद किंवा ब्रह्म हें त्रिमुखी एकमेव अद्वितीय तत्त्व आहे -- अस्तित्व, जाणीव आणि आनंद हे त्याचे तीन पैलू आहेत. या त्रिमुखी तत्त्वाची जाणीव किंवा ज्ञान म्हणजे ब्रह्माची निर्मितीची किंवा आत्मप्रकटनाची शक्ति होय. आकारांचे आणि घटनांचे अनंत प्रकार उभे करून आपल्या ज्ञानमय अस्तित्वाचा विविध आविष्कार करणें आणि या सर्व असीम विविधतेचा आनंद नित्य भोगणें, हें या ज्ञानशक्तीचें कार्य असतें. अर्थात् अस्तित्वांत असलेल्या सर्व वस्तू त्या ब्रह्माच्या अस्तित्वाला, जाणीव शक्तीला, आनंदाला व्यक्त रूप देणाऱ्या आहेत. एकाच अक्षर अस्तित्वाचीं (ब्रह्माचीं) बदलणारी रूपें म्हणजे विश्वांतील वस्तू, एकाच

 

पान क्र. १७१

 

अस्तित्वगत असीम शक्तीचीं सीमित कार्यें म्हणजे विश्वांतील वस्तू, हें जसें खरें आहे, त्याप्रमाणें त्या अस्तित्वाचा एकच सर्वव्यापी व सर्वदा सारखा असा जो आनंद, त्याची आत्मप्रकटनात्मक विविध रूपें म्हणजेहि विश्वांतील वस्तू हेंहि खरें आहे. अस्तित्वांत असलेल्या प्रत्येक वस्तूंत जाणीवशक्ति आहे आणि त्या वस्तूंचें अस्तित्व आणि तिचें विशिष्ट स्वरूप त्या जाणीवशक्तीनें निश्चित होतें; हें जसें तसेंच अस्तित्वांत असणाऱ्या प्रत्येक वस्तूंत अस्तित्वाचा आनंद आहे, आणि तिचें अस्तित्व आणि तिचें विशिष्ट स्वरूप या आनंदानें निश्चित होतें, हीहि वस्तुस्थिति आहे.

विश्वाच्या उदयाची, जन्माची ही उपपत्ति वेदान्ती तत्त्वज्ञानानें प्राचीन काळीं बसविली; या उपपत्तीमध्यें मानवी मनाला एकदम प्रबळ असा जो विरोधाभास वाटतो तो दोन कारणांनीं : एक कारण, शारीरिक आणि मानसिक दुःखाचें व दुसरें कारण, पापाच्या नैतिक प्रश्नाचें. प्रथम दुःखाच्या प्रश्नाची चर्चा करून नंतर पापाच्या प्रश्नाकडे वळूं. हें विश्व सच्चिदानंदाचा आत्माविष्कार आहे, म्हणजे जाणीव-शक्तिमय अस्तित्वाचा नव्हे, अनंत आनंदमय अस्तित्वाचाहि आविष्कार आहे असें प्राचीन वेदान्ती म्हणतात -- या जाणीव-शक्तीचा आविष्कार म्हणजे हें विश्व आहें हें आम्ही मान्य करूं शकतो. पण हें विश्व आनंदाचा आविष्कार म्हणावें, तर जें मानसिक व शारीरिक दुःख सर्वत्र अनुभवास येतें, त्याची वाट कशी लावावयाची ? हें विश्व अस्तित्वाच्या 'आनंदाचें घर' असण्यापेक्षां विविध 'दुःखांचेंच घर' आहे असेंच आमच्या प्रत्ययास येत असतें. पण या प्रत्ययाविषयीं प्रथम असें म्हणतां येतें कीं, यांत अतिशयोक्ति आहे; यांत कांहींसा दर्शनविषयक प्रमाद (error of perspective) आहे. या प्रश्नाकडे तिऱ्हाईत दृष्टीनें पहा; अगदीं अचूक आणि भावनाविवशतेपासून दूर असलेलें असें यासंबंधींचें मत बनविण्याच्या दृष्टीनें या प्रश्नाकडे पहा; असें केल्यास आपणास काय दिसेल ? अस्तित्वाचें, जीवनाचें एकंदर सुख, व त्याचें एकंदर दुःख यांची तुलना करतां, सुख हें दुःखाहून पुष्कळ अधिक असतें असें दिसेल. कांहीं वैयक्तिक अनुभव आणि वरवर पाहतां दिसणारें दुःख यावरून दुःखच अधिक आहे असें भासत असलें, तरी वरील सिद्धान्तच बरोबर आहे असें आपल्या प्रत्ययास येईल. निसर्गांतील सर्वसाधारण स्वाभाविक स्थिति पाहिली असतां, तेथें जीवन प्रकट किंवा अप्रकट सुखानें भरलेलें आहे असेंच दिसून येईल. अर्थात् तेथें दुःख मुळींच नसतें असें नव्हें; तें असतें, पण केवळ

 

पान क्र. १७२

 

अस्वाभाविक स्वरूपाचें असतें, थोडा वेळ टिकणारें असतें, स्वाभाविक सुखी स्थिति थोडावेळ स्थगित करणारें, किंवा तिच्यांत मिश्रण करून तिच्यांतील सुख कांहीं काळ किंचित् कमी करणारें, असें निसर्गांत दुःखाचें स्वरूप असतें. निसर्गांत दुःख हें स्वाभाविक नसून अपवादात्मक आहे. याच कारणामुळें जीवनांतील दुःख हें त्याहून कितीतरी अधिक असलेल्या सुखापेक्षां, आम्हांला अधिक तीव्रपणें भासमान् होतें आणि सुखाहून तें अधिक आहे असा आभास उत्पन्न करतें. सुख नेहमींचेंच व स्वाभाविक असल्यानें आम्ही त्याची फारशी कदर करीत नाहीं.-- तें सामान्यत: आमच्या लक्षांतहि येत नाहीं -- जर तें कांहीं कारणानें विशेष तीव्र स्वरूपांत परिणत झालें, सुखाची एक मोठी लाटच आमच्यावर आली, बेभान करणारी आनंदलहरी आमच्या वांट्यास आली, या लहरीच्या उच्चतम शिखरावर आम्हीं फेंकले गेलों, तरच आमच्या लक्षांत सुख भरतें व आम्हीं त्याला 'सुख' 'आनंद' असें नांव देतो; असें अपवादात्मक सुख मिळावे असा आम्ही हव्यास धरतो. जीवनाचें जें स्वाभाविक सुख, अस्तित्वाचें जें नेहमीचें सुख, ज्याला कांहीं घडणें न घडणें मुळींच महात्त्वाचें नसतें, विशिष्ट हेतूनें किंवा विशिष्ट पदार्थानें जें सुख कमी अधिक होत नाहीं असें जें अस्तित्वाचें स्वाभाविक नित्य सुख तें आम्हांला सामान्यत: आकर्षणहीन वाटतें. सुख किंवा दुःख कांहींच नांव आम्ही त्याला देत नाहीं. कारण तशा रूपानें तें आम्हांला भासतच नाहीं; स्पष्ट रूपांत सुखदुःख नसलेल्या तटस्थ वृत्तीच्या रूपानें तें आम्हांला भासते. पण तें नित्य सुख, निस्तरंग शांत असें सुख असतें, आमच्या अस्तित्वाशीं निगडित असें तें असतें; ही व्यवहारांतील न विसरण्यासारखी मोठी गोष्ट आहे. कारण सुख जर असें नसतें, तर आत्मसंरक्षणाची अर्थात् अस्तित्वाच्या संरक्षणाची, अस्तित्व टिकविण्याची अनिवार्य सर्वंकष सार्वत्रिक सहज-प्रेरणा असण्याचें कांहींच कारण नव्हतें. तथापि आम्ही ज्या सुखासाठीं धडपड करीत असतों, तें हें ''तटस्थ'' वृत्तीचें ''सुख'', निस्तरंग शांत सुख, नसतें. आमच्या मानसिक शारीरिक भावना-संवेदनांच्या लाभहानीच्या हिशोबांत आम्ही या तटस्थ निस्तरंग सुखाला कोठेंच जागा देत नाहीं. या हिशोबांत एका बाजूला आम्ही आमची स्पष्ट, प्रक्षोभक, सुखें मांडतों आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक मानसिक दुःखें व असमाधान मांडतों; दुःख व असमाधान आम्हांला तीव्रपणें भासतें याचें कारण तें आमच्या अस्तित्वाच्या मूळ स्वभावधर्माशीं विरोधी आहे, न जुळणारें आहे, त्याला अपवादभूत

 

पान क्र. १७३

 

आहे; त्यामुळें असें दुःख आलें म्हणजे आमच्या स्वाभाविक जीवनक्रमावर कांहींतरी अत्याचार झाला आहे, असें आम्हांस वाटतें व जें जीवन आज नाहींतर उद्यां जगण्याचा आमचा सर्व खटाटोप आहे, त्या जीवनाला बाधक असा कोणीतरी बाहेरून त्याजवर हल्ला केला आहे -- असें आम्हांस वाटतें.

तथापि, दुःख हें अस्वाभाविक आहे, तें एकंदरीनें सुखापेक्षां अधिक किंवा कमी आहे हे मुद्दे अस्तित्वविषयक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें गैरलागू आहेत --  दुःख असावेंच कां ? हा अस्तित्वविषयक तत्त्वज्ञानाचा प्रश्न आहे; सच्चिदानंद ब्रह्म हेंच जर सर्व कांहीं झालें आहे, तर मानसिक, शारीरिक दुःख असावेंच कां ? तें अस्तित्वांत कसें येऊं शकतें, हा मूळ प्रश्न आहे. या प्रश्नाचा विचार करतांना, विश्वाहून वेगळा व्यक्तिरूप ईश्वर आहे या कल्पनेची आणि त्याच्या अनुषंगानें उद्धवणाऱ्या नैतिक अडचणींच्या कल्पनेची त्यांत भेसळ करून या प्रश्नाचा विचार अवघड व गोंधळाचा करण्यांत येतो. यांपैकीं व्यक्तिरूप ईश्वराचा मुद्दा हा वस्तुस्थितीवर आधारलेला नाहीं आणि अशा ईश्वराच्या नीतिमत्तेचा मुद्दा हा एकांगी दृष्टीचा आहे. प्रथम पहिल्या मुद्याकडे वळू.

यांतील पूर्वपक्षाचा युक्तिवाद असा -- सच्चिदानंद ब्रह्म म्हणजेच ईश्वर आहे. हा ईश्वर ज्ञानमय पुरुष आहे आणि आज जें अस्तित्व, जें जीवन आहे तें त्यानें निर्माण केलें आहे. तेव्हां प्रश्न असा कीं, त्यानें असें जग कसे निर्माण केलें, जेथें निर्मिलेल्या प्राण्यावर तो दुःख लादतो, जेथें दुःखक्लेश त्याच्या अनुज्ञेनें स्वैर थैमान घालतात, जेथें पापहि त्याच्या संमतीनें घडतें ! ईश्वर तर सर्वथा साधुतेनें संपन्न असणार, तेव्हां दुःख व पाप जगांत दिसतें, तें कोण निर्माण करतो ? आपण जर अशी कल्पना केली कीं, विश्वांतील दुःख हें प्राण्यांच्या परीक्षेसाठीं आहे, प्राण्यांसाठींच त्यानें निर्मिलेलें तें एक दिव्य आहे, तर अशा ईश्वराच्या नीतिमत्तेचा प्रश्न येथें उभा राहतो. ईश्वर नीतिमान् नाहीं, अनीतिमान् आहे; निदान नीति-अनीतीची त्याला क्षिति नाहीं असें म्हणणें प्राप्त होतें. ईश्वर विश्वाचा उत्तम शिल्पकार आहे, कुशल मानसशास्त्रज्ञ आहे; पण तो साधुता व प्रेम या गुणांना पारखा आहे आणि म्हणून तो पूजेस पात्र नाहीं; केवळ तो शक्तिमान् व सत्ताधीश आहे म्हणूनच त्याचा कायदा आम्ही पाळला पाहिजे, त्याची लहर संभाळली पाहिजे असा याचा अर्थ होतो. फारतर त्याची लहर संभाळून त्याला अनुकूल करून

 

पान क्र. १७४

 

घेण्याची आशा फक्त आम्ही बाळगूं शकूं. अशा प्रकारचें ईश्वराचें वर्णन करावें लागतें. प्राण्यांच्या परीक्षेसाठीं व दिव्यासाठीं छळाचे विविध प्रकार शोधून उपयोगांत आणणारा हा ईश्वर एकतर बुद्धिपुरःसर क्रूरता करणारा आहे असें म्हणावें लागतें किंवा नैतिक संवेदनेला तो सर्वस्वीं पारखा आहे, तो नैतिक पुरुष असलाच तर निदान त्यानें निर्माण केलेल्या प्राण्यांच्या श्रेष्ठ नैतिक प्रेरणेपेक्षां त्याची नीतिविषयक भावना हिणकस दर्जाची आहे असें तरी म्हणावें लागतें. ही नीतिविषयक अडचण दूर करण्यासाठीं आम्ही असें म्हणूं शकतों कीं, दुःख हें नैतिक दुराचाराचें अटळ फळ असून दुराचाराचें साहजिक प्रायश्चित्त आहे; पण असें म्हटल्यानें आमचा नैतिक प्रश्न सुटत नाहीं. दुःख हें दुराचाराचें फळ आहे हें म्हणणें जीवनांतील वास्तव घटनांशीं जुळत नाहीं; आम्हीं कर्मसिद्धान्त मानला, पुनर्जन्म मानला आणि प्रस्तुत जन्मापूर्वींच्या काळीं दुसऱ्या शरीरांत असतांना केलेल्या पापांचें फळ प्राण्याला या शरीरांत, या जन्मांत भोगावें लागतें, असें मान्य केलें तर मात्र दु:ख हें दुराचाराचें फळ असें मानणें तर्कशास्त्रदृष्ट्या समर्थनीय ठरेल; असें झालें तरीहि मूळ नैतिक प्रश्न शिल्लक उरतोच. ज्यामुळें दु:खयातनारूप प्रायश्चित्त प्राण्याला भोगावें लागतें, ते नैतिक दुराचार कोणीं कसे व कां निर्माण केले ? नैतिक दुराचार हा वस्तुत: मानसिक रोगाचा, वा अज्ञानाचा एक प्रकार आहे, हें लक्षांत घेतल्यास असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, मानसिक रोग वा अज्ञानाची क्रिया यांचें प्रायश्चित्त देणारा व तेंहि कधींकधीं अनन्वित राक्षसी छळाच्या स्वरूपाचें देणारा अटळ कायदा केला कोणी ? कर्माचा कठोर कायदा किंवा सिद्धान्त दयामय व सर्वश्रेष्ठ नीतिमान् व्यक्तिरूप ईश्वराच्या कल्पनेशीं जुळणारा नाहीं, हें लक्षांत घेऊन तर्कशुद्ध सुस्पष्ट विचार करणाऱ्या बुद्धानें असें प्रतिपादिलें कीं, सर्व विश्वावर सत्ता चालविणारा सर्वथा स्वतंत्र असा व्यक्तिरूप ईश्वर अस्तित्वांत नाहीं; सर्व प्रकारचें व्यक्तित्व ही अज्ञानाची निर्मिति असून तें कर्मसिद्धान्तानुसार कर्माचें अंकित आहे हें तत्त्वज्ञान त्यानें अंगीकारलें व प्रसृत केलें.

खरी गोष्ट अशी आहे कीं, विश्वांतील दु:खाचा प्रश्न सोडवावयास अतिशय अवघड होऊन बसण्याचें कारण आमची ईश्वराबद्दलची कल्पना आहे; ईश्वर वेगळा व विश्व वेगळें, हा ईश्वर आपल्यापासून वेगळें असें विश्व निर्माण करतो, तो स्वतः विश्वरूप नसतो; तो पाप व पुण्य, दुःख

 

पान क्र. १७५

 

व यातना निर्माण करतो पण स्वत: मात्र त्यांचेपासून वर अलिप्त राहून क्लेश भोगणाऱ्या व धडपडणाऱ्या जगाशीं स्वत:च्या मर्जीनुसार खेळ खेळून हुकुमत चालवितो व नजर राखतो; अथवा विश्वांतील चराचरावर एका निर्दय कायद्याची सत्ता तो विश्वेश्वर चालू देतो; त्या कायद्यानें जीवांना छळलें, तरी हा ईश्वर त्यांना साह्य करीत नाहीं किंवा केलें तरी तें पुरेसें नसतें; मग असा ईश्वर 'ईश्वर' राहत नाहीं, कारण तो सर्वशक्तिमान्, सर्वमंगलमय किंवा सर्वप्रेममय रहात नाहीं. विश्वाहून ईश्वर वेगळा आहे व तो नीतीला मान्यता देणारा आहे अशी कल्पना करून विश्वांतील पाप आणि दुःख यांच्या निर्मितीचें स्पष्टीकरण करतांच येत नाहीं. स्पष्टीकरणार्थ जो युक्तिवाद मांडण्यांत येतो, त्यानें समाधान तर होत नाहींच, उलट मुद्याचा प्रश्न बाजूला ढकलण्यांत येतो. किंवा विश्वाच्या मुळाशींच साधुता आणि असाधुता अशीं दोन स्वतंत्र तत्त्वें आहेत असें गृहीत धरून एक प्रकारचें द्वैत प्रकट वा अप्रकटपणें मान्य केलें जातें. अर्थात् हें द्वैत मान्य करणें म्हणजे ईश्वराचें ईश्वरत्व नाहींसें करणें आहे. या द्वैतानें ईश्वराच्या कृतीचा न्याय्यपणा दाखविण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा ईश्वराच्या कृतीची तरफदारी करण्यांत येते; पण या द्वैतानें तें विशेषसें न साधतां ईश्वराचें 'ईश्वरत्व' मात्र नाहींसें करण्याचें चांगलें साधतें. ज्या ईश्वराची चर्चा येथवर आपण केली, त्या ईश्वराला वेदान्त मान्यता देत नाहीं. वेदान्ताचा ईश्वर सच्चिदानंद हा एकच एक परम तत्त्व, परम पुरुष आहे; तो एकच एक अद्वितीय अस्तित्व, सद्वस्तु आहे; जें कांहीं आहे तें तो एकटा आहे. अर्थात् या विश्वांत जर दुःख असेल, दुष्टपणा किंवा पाप असेल तर तें पाप व तें दुःख भोगणाराहि तो ईश्वरच आहे. ज्या प्राण्याला त्या दुःखाचा वा पापाचा ताप होत असेल, त्या प्राण्याचें रूप, त्या प्राण्याचें शरीर ईश्वरानेंच धारण केलें असल्यानें, ईश्वरच त्या प्राण्याच्या ठिकाणीं, त्या प्राण्याच्या रूपानें त्याचे भोग भोगीत असतो. ईश्वरासंबंधाचा हा वेदान्ताचा सिद्धान्त मान्य केला म्हणजे दुःखाच्या प्रश्नाचें स्वरूप अगदीं बदलून जातें. आपण स्वत: निर्मिलेल्या जीवांना ईश्वरानें दुःख आणि दुष्टता यांच्या चक्रांत घातलें, तें कां ? तो या चक्राच्या बाहेर स्वभावतःच असतो, कारण ईश्वराला दुःख होऊंच शकत नाहीं, आणि दुष्टता त्याचे ठिकाणी असूंच शकत नाहीं. पण असें असून जीवांना मात्र दुःखाच्या आणि दुष्टतेच्या चक्रांत त्यानें घातलें तें कां ? -- असा पूर्वींचा प्रश्न होता. वेदान्ती ईश्वराला हा प्रश्न

 

पान क्र. १७६

 

गैरलागू आहे. आतां प्रश्न असा आहे कीं, हा ईश्वर एकच एक अनंत सत्-चित्-आनंद असूनहि त्यानें, आनंदाच्या सरळ सरळ अभावाला, आनंदविरोधी तत्त्वाला स्वत:मध्यें कसें येऊं दिलें?

याप्रमाणें प्रश्नाचें स्वरूप बदलल्यानें नैतिक अडचण अर्धी नाहींशी होते. म्हणजे अगदीं समर्पक उत्तर न देतां येण्याजोगा नैतिक अडचणीचा भाग आतां उरत नाहीं; निरुत्तर करणारी अडचण प्रश्नाच्या नव्या मांडणींत रहात नाहीं. मीं दुसऱ्यांना क्रूरतेनें वागविलें किंवा वागवूं दिलें, स्वत: दूर राहिलों किंवा पश्चात्ताप वा दया दाखवून दुसऱ्यांच्या यातनांत सहभागी झालों किंवा उलट मी एकटाच एक सर्वत्र सर्वरूपांनीं असल्यामुळें त्या यातना स्वतःच स्वत:ला करून घेतल्या, तर माझ्या वागण्याचा दुसरा प्रकार पहिल्या प्रकाराप्रमाणें नीतिदृष्ट्या आक्षेपार्ह होऊं शकत नाहीं. तरीहि नैतिक आक्षेप थोड्या बदललेल्या स्वरूपांत पुढें आणतां येईल. सच्चिदानंद सर्वदा सर्वत्र सर्वथा आनंदरूप आहे. जो सर्वथा आनंदमय, तो सर्वथा साधुता-संपन्न आणि सर्वथा प्रेमसंपन्न अवश्यमेव असणार, तेव्हां अशा पुरुषांत असाधुता व दुःख कसें असूं शकतें, येऊं कसें शकतें ? या पुरुषाचें अस्तित्व यांत्रिक स्वरूपाचें नाहीं. हा जाणीवयुक्त स्वतंत्र पुरुष आहे; असाधुता आणि दुःख या गोष्टी दोषमय ठरवून स्वत:पासून त्यांना दूर करण्यास व ठेवण्यास तो पूर्ण मोकळा असतांना, त्याला या असाधुतेचा व दु:खाचा उपसर्ग होतो कसा ? हा उपसर्ग तो करून कां घेतो ? हा मांडलेला आक्षेप तर्कदुष्ट आहे, कारण त्यांत अपूर्ण विधेयांत उपयोजिलेली परिभाषा, संपूर्ण विधेयावर लादली गेली आहें. या विभक्ततेच्या संसारांत निर्माण होणाऱ्या व अपूर्ण जीवाजीवांमधील संबंधावर आधारलेल्या साधुता, प्रेम या द्वैती कल्पना आपण एकच एक, सर्वरूप सर्वानंद पुरुषोत्तमाच्या एकजिनसी, परिपूर्ण, मूळ स्वरूपाला लागू करीत आहोंत. तेव्हां हा आक्षेप बाजूस ठेवून प्रथम आपण मूळ प्रश्न त्याच्या शुद्ध स्वरूपांत कसा दिसतो व त्याचें उत्तर काय मिळूं शकते तें पाहूं; सर्व भेदांत अभेदरूप असें जें एकच एक आनंदरूप तत्त्व आहे, त्यानें आनंदविरोधी दिसणाऱ्या तत्त्वाला आपल्या आत्म्यांत जागा कशी दिली हा तो मूळ प्रश्न आहे. या प्रश्नाचा विचार अगोदर करून नंतर या एकाच्या विभागांचा व विकासक्रमांतील त्याच्या रूपांचा, उदाहरणार्थ विभक्तता आणि द्वैत या पायावर आधारलेल्या जीवाजीवांतील संबंधांचा आणि ते कसे व कां उत्पन्न होतात याचा विचार करू.

 

पान क्र. १७७

 

मानवी दृष्टिकोन व मानवी अडचण यांनीं आपणांस बांधून न घेतां, आपण अविभक्त एकतत्त्वमय विश्वरूपाचा विचार केला, तर असें दिसून येईल कीं, ज्यांत आपण राहतों तें विश्व, नीतीनें (अर्थात् मानवकल्पित नीतीनें) बांधलेलें नाहीं. सर्व निसर्गांत नीतिमय व्यवस्था बघण्याचा व हरप्रयत्नानें शोधून काढण्याचा मनुष्याच्या मनाचा आग्रह हा अकारण हट्ट असून त्यामुळें तो स्वत:च्या विचारांचा गोंधळ मात्र करून घेतो, व त्यामुळें विश्वविषयक खरें ज्ञान आणि समग्र दर्शन त्याला लाभत नाहीं. मनुष्यांत कांहीं विशेष आहे, मर्यादांनीं बांधलेला व त्याच्या सवयीचा झालेला असा एक व्यवहारगत आत्मा त्याला आहे; विकासक्रमांत त्याला एक विशिष्ट वैयक्तिक दृष्टिकोन त्याच्या प्रयत्नानें लाभलेला आहे -- हा आपला विशेष, आपला सवयीचा आत्मा व आपला दृष्टिकोन सर्वच निसर्गावर मनुष्य आरोपित करतो आणि तेथें नीतिदृष्ट्या अमुक बरें अमुक वाईट असे सर्व घटनांसंबंधांनें निकाल देत बसतो. हें त्याचें करणें अनुकंपनीय आहे. असो. वस्तुस्थिति अशी आहे कीं, जड निसर्ग नीति-अनीतीच्या कक्षेबाहेर आहे. या निसर्गांत जो कायदा शासनाचें काम करतो, तो वस्तुधर्मांच्या व निश्चित अशा वस्तुगत संवयींच्या संघटित सहकार्याचा कायदा आहे. हा कायदा चांगलें-वाईट, पाप-पुण्य, साधुत्व-असाधुत्व जाणत नाहीं; तो एक शक्ति जाणतो. निर्माण करणारी, निर्मित वस्तूंची व्यवस्था लावणारी, त्यांना टिकविणारी व या वस्तूंमध्यें अव्यवस्था निर्माण करून त्यांना नष्ट करणारी ही विविध प्रकारची शक्ति मात्र तो जाणतो. शक्तीचा हा कायदा बरेंवाईट हा नीतिविषयक विचार न करतां, या सर्व क्रिया नि:पक्षपातीपणें करीत असतो; या शक्तीच्या कायद्याच्या पोटीं गुप्त अशी ईश्वरी इच्छाशक्ति असते. ही ईश्वरी इच्छाशक्ति आपल्या लहरीप्रमाणें रूपें धारण करते व तीं रूपें आपल्या लहरीप्रमाणें नष्ट करते आणि या दोन्ही क्रियांत ती नि:शब्द असा आनंद अनुभवते. जड निसर्गाप्रमाणेंच प्राणिविषयक व प्राणविषयक निसर्गांतील कायदाहि नीतिनिरपेक्ष आहे. एवढेंच कीं, प्राणिसृष्टि जेव्हां एकावर एक वरच्या दर्जाचे प्राणी उदयास आणते, तेव्हां या प्रगतीच्या किंवा उन्नतीच्या क्रमांत हा निसर्ग अशा प्रवृत्ती उद्भूत करतो कीं, ज्यांतून वरच्या दर्जाच्या प्राण्यांत नीतिप्रेरणा उत्पन्न व्हावी, विकासक्रमानें उदयास यावी. वादळ अनेक वस्तूंचा विध्वंस करतें, अग्नि हाल करून जीव घेतो, म्हणून वादळाला व अग्नीला आम्ही नीतिदृष्ट्या दोष देत नाहीं; तद्वतच

 

पान क्र. १७८

 

वाघ भक्ष्य जनावराला मारून खातो म्हणून वाघालाहि आम्ही दोषी धरीत नाहीं आणि वादळामध्यें, अग्नीमध्यें व वाघामध्यें जी ईश्वरी जाणीव-शक्ति -- इच्छाशक्ति -- काम करते तीहि स्वत:ला दोष देत नाहीं, स्वत:चा धिक्कार करीत नाहीं. दोष देणें व धिक्कार करणें या क्रियांपासून अथवा अधिक काटेकोरपणें बोलावयाचें, तर स्वत:ला दोष देणें व स्वत:चा धिक्कार करणें या क्रियांपासून खरें नीतिशासन सुरू होतें. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना दोष देतो व स्वत:ला दोष देत नाहीं, एकच कायदा आपणा स्वत:ला व इतरांना लागू करीत नाहीं, तोपर्यंत खऱ्या नीतीचा निर्णय आम्ही देतों असें होत नाहीं; नैतिक प्रेरणेनें व शास्त्रानें तयार केलेली भाषा केवळ आम्ही वापरतों इतकेंच. आम्हांला नाखुष करणाऱ्या व त्रासदायक होणाऱ्या गोष्टींबद्दल नापसंतीची भावना व्यक्त करण्यासाठीं आम्ही ही भाषा वापरीत असतो.

ही नापसंतीची अथवा घृणेची भावना नीतिशास्त्राच्या मूळ उगमस्थानीं आहे खरी, पण ही भावना स्वत:मात्र नैतिक नाहीं. वाघाला हरीण भितें, बलवान् प्राणी त्याच्यावर हल्ला करणाऱ्यावर संतापतो; ही भीति, हा संताप म्हणजे त्या त्या प्राण्याचा अस्तित्वाचा वैयक्तिक आनंद धोक्यांत आल्यानें उत्पन्न होत असतो. प्राण्याचा जीवनानंद धोक्यांत आल्यावर होणारी नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजेच ही भीति व हा संताप होय. प्राण्यांत मन जसजसें प्रगल्भ होतें, तसतशी हीच प्रतिक्रिया, शिसारी, नावड, नापसंति हीं संस्कारित रूपें धारण करते. आम्हांला भीतिदायक, त्रासदायक, इजा करणारें जें कांहीं असेल, तें आम्ही नापसंत करतों. आम्हांला खूष करणारें, संतोष देणारें जें काहीं असेल तें आम्ही पसंत करतों. या भावनांवर आणखी संस्कार होऊन आपल्या स्वत:च्या व इतरांच्या, आपल्या समाजाच्या व इतर समाजाच्या जें हिताचें, तें पसंत व अहिताचें तें नापसंत अशी हिताहित-विषयक पसंती-नापसंतीची सर्वसाधारण भावना उदयास येते. परंतु महत्त्वाची गोष्ट ही कीं, या भावनेचें स्वाभाविक मूळ-स्वरूप नंतरच्या प्रत्येक अवस्थेंत कायम राहतें. मनुष्य आत्मप्रकटन करूं इच्छितो, आत्म्याचा विकास, संवर्धन करूं इच्छितो; दुसऱ्या शब्दांत सांगावयाचें, तर मूळ अस्तित्वाची, सद्वस्तूची जी ज्ञानशक्ति तिची लीला स्वत:च्या ठिकाणीं प्रगत होत रहावी, अधिकाधिक उन्नत होत रहावी हें त्याला हवें असतें. त्याचा खरा, अगदीं आंतरिक पायाभूत आनंद अशा या आत्मप्रकटनलीलेंत, आत्मविकासलीलेंतच

 

पान क्र. १७९

 

आहे. या लीलेला जें बाधक असेल, त्याच्या विकासशील आत्म्याच्या समाधानाला जें प्रतिकूल असेल, तें त्याला अहितकारक असणार व वाटणार; जें कांहीं या विकासशील आत्म्याला साह्य करील, आधार देईल, उंच नेईल, विशाल करील, उदात्त करील तें त्याला हितकर असणार व वाटणार. आत्मविकासाची त्याची कल्पना मात्र बदलत जाते, हें लक्षांत ठेवणें अवश्य आहे. ही कल्पना क्रमाक्रमानें उंचावत व रुंदावत जाते; त्याच्या मर्यादित व्यक्तित्वाला मागें टाकून, इतर व्यक्तींचा व शेवटीं सर्वांचा समावेश ती त्यांत करते.

यावरून हें उघड होतें कीं, नीतिप्रेरणा ही विकासक्रमांतील एक पायरी आहे, पण विकासाच्या सर्व पायऱ्यांवर जी प्रेरणा काम करते ती सच्चिदानंदाची आत्माविष्काराची, आत्मप्रकटनाची प्रेरणा होय. ही प्रेरणा आरंभीं (जड सृष्टींत) नीतिनिरपेक्ष असते, नंतर प्राणिसृष्टींत ती आरंभीं नीतिनिरपेक्ष असून पुढें नीतीकडे अर्धवट वळलेली, पण नीति न कळलेली (नीत्यधोवर्ति, अधोनैतिक) अशी असते, नंतर बुद्धिमान् प्राण्यांत ती नीतिविरोधक देखील होते. दुसऱ्याला इजा करणें तिला पसंत असतें. पण तीच इजा स्वत:ला कोणी करणें हें तिला नापसंत असतें. या बाबतींत मनुष्यप्राणी आज देखील अर्धवट नीतिमान् (अर्ध-नैतिक) आहे. आम्हां मनुष्याच्या खालील जीवसृष्टि (व जडसृष्टि) नीतीच्या प्रांतांत नाहीं, अधोनैतिक प्रांतांत आहे. त्याप्रमाणें आमच्या प्रांताच्या वर -- नीतीच्या (नीति शब्दांत नीतिविरोधकता, अर्धनैतिकताहि येतात) प्रांताच्या वर असा प्रांत असूं शकेल, आहे, जेथे आम्हांला अंतीं जावयाचें आहे, आणि जेथें नीतिकल्पनेची आवश्यकता नाहीं; जो प्रांत अति-नैतिक आहे. नैतिक प्रेरणा व नैतिक वृत्ति ही मानवजातीला फारच महत्त्वाची वाटते आणि असतेहि पण ती एक साधनमात्र आहे; निसर्गांत नेणिवेच्या प्रांतांत सुसंवाद व व्यापक सर्वसमावेशकता असते पण नेणिवेमुळें तिला खालच्या दर्जाची म्हणतात. जीव, प्राण हा जड निसर्गांत उदयास आला म्हणजे व्यक्तित्व उदयास येतें व व्यक्तीव्यक्तींमधील विसंवाद उभे राहतात. या विसंवादांतून झगडत मार्ग काढून पुन: सुसंवादिता व सर्वसमावेशकता मानवी जीवांना साधावयाची असते. ही वरच्या दर्जाची म्हटली जाणारी सुसंवादिता व सर्वसमावेशकता साधावयास साधन म्हणून नैतिक प्रेरणा व नैतिक वृत्ति यांचा मानवास उपयोग होतो. ही नवी सुसंवादिता व सर्वसमावेशकता, सर्व अस्तित्वांतील चराचरांशीं ज्ञानपूर्वक

 

पान क्र. १८०

 

एकता संपादल्यानें सिद्ध होते, म्हणून तिला वरच्या दर्जाची म्हणतात. हें साध्य सिद्ध झालें म्हणजे त्याच्या साधनाची आवश्यकता संपते, नव्हे तें साधन अस्तित्वांतच राहत नाहीं. कारण हें नैतिक वृत्तीचें साधन ज्या मानवी गुणांवर व गुणविरोधांवर आपल्या अस्तित्वासाठीं अवलंबून असतें, ते गुण व गुणविरोध साध्य लाभाबरोबर किंवा त्याचे अगोदर नाहींसे झालेले असतात, सर्व चराचराशीं व्यक्तीचें ऐक्य, अंतिम अद्वैत स्थापित होण्यात नैतिकवृत्तीला आधारभूत असलेले सर्व गुणमय व गुणविरोधमय द्वैत सहजच समाप्त होत असतें आणि म्हणून अंतिम अद्वैत हें साध्य लाभलें म्हणजे द्वैतमूलक नैतिक प्रेरणा व प्रवृत्ति अस्तित्वांत राहत नाहीं.

नैतिक दृष्टिकोन हा विचारक्रमाच्या वाटचालींत एका विशिष्ट टप्प्यापुरतां अस्तित्वांत येतो, त्या टप्प्यांत, त्या विकासावस्थेंत या दृष्टिकोनाचें महत्त्व जरूर आहे. जीवसृष्टीखालीं जी सर्वसमावेशकता, विश्वात्मता, विश्वैक्य निसर्गाच्या व्यवहारांत असतें, तें मानवी जीवसृष्टींत पूर्णतया भंग पावतें व या द्वैताच्या अवस्थेंतून वर चढून पुन: जाणीवपूर्वक विश्वैक्य-अनुभव देणारी जी अवस्था मानव प्राप्त करून घेतो, ती नीतीच्या दृष्टिकोनाला मान देऊन प्राप्त करून घेतो. म्हणून या दृष्टिकोनाला फार महत्त्व आहे. कारण नेणिवेचें विश्वैक्य व जाणिवेचें विश्वैक्य यांमधील मोठा महत्त्वाचा प्रवास या दृष्टिकोनाच्या आधारें मानव करीत असतो. तथापि विश्वाचा प्रश्न सर्वच्या सर्व सोडविण्याला हा दृष्टिकोन उपयोगी पडूं शकत नाहीं; कारण तो सर्वस्पर्शी नाहीं, सार्वकालिक नाहीं. विश्वविकासाच्या एका विशिष्ट अवस्थेपुरता तो कांहीं काल मात्र असतो व काम करतो. विश्वाच्या प्रश्नाच्या उत्तरांत त्याला कांहीं स्थान आहे हें मात्र खरें, पण तें मर्यादित आहे हें विसरतां कामां नये. जें अंशमात्र उत्तर आहे, तें पूर्ण उत्तर समजून वागल्यास सत्याचा व वस्तुस्थितीचा पूर्ण विपर्यास होईल. नैतिक दृष्टिकोन सर्वत्र लावण्याचा आग्रह धरल्यास विश्वांतील सर्व वास्तव गोष्टी अवास्तव व खोट्या समजाव्या लागतील; आम्हां मानवांच्या पूर्वीं घडलेला विश्वविकास, व भावी विश्वविकास या दोन्ही विकासक्रमांचा अर्थ व उद्देश, नैतिक दृष्टिकोनाचा आग्रह धरल्यास, आम्हांला उमगणार नाहीं; हा अर्थ व हा उद्देश खोटा पडेल. विश्वाचे एकावर एक असे तीन थर आहेत, विभाग आहेत; अधोनैतिक, नैतिक आणि अतिनैतिक. या तीनहि विभागांत विद्यमान

 

पान क्र. १८१

 

असणारी गोष्ट आम्हीं शोधून काढली पाहिजे. विश्वाचा प्रश्न सोडवण्याचा हाच एक मार्ग आहे.

विश्वाच्या तीनहि विभागांत सर्वसामान्य अशी जी गोष्ट आपणाला शोधाअन्तीं सापडली आहे ती ही कीं, अस्तित्वाची, मूळ सद्वस्तूची जाणीवशक्ति (इच्छा-शक्ति) आपला विकासमार्ग चालण्याच्या क्रियेंत स्वत:साठीं रूपें निर्माण करीत असते आणि या रूप-निर्माण-क्रियेंत आत्मानंद शोधीत असते. ही इच्छाशक्ति सद्वस्तूच्या मूळ अरूप स्थितींत आनंदमयच असते आणि स्वतःकरितां रूपरचनाहि ती आनंदाकरितांच करते. या विश्वाचा तळाचा जड विभागहि गतिमान् अस्तित्वाच्या आनंदासाठींच मूळ ज्ञानमय शक्तीनें निर्माण केला ही गोष्ट आम्हांला उघड दिसते; आनंद हा मूळ ज्ञानशक्तीचा, इच्छाशक्तीचा स्वभाव आहे; आनंदाला ही शक्ति नित्य चिकटून राहते, आनंद हाच तिच्या सर्व खटाटोपांचा पाया असतो. आनंदासाठीं नवीं नवीं रूपें निर्माण करण्याची क्रिया चालूं असतां वरच्या दर्जाचीं रूपें स्वत:साठीं निर्माण करण्याच्या व्यापारांत, मध्येंच, म्हणजे तीं रूपें सिद्ध होण्याच्या अगोदर, आम्हांला दुःख, यातना म्हणून परिचित होणारें दृश्य अस्तित्वांत येतें; त्या ज्ञानशक्तीचा स्वभावधर्म जो आनंद त्याच्याशीं हें दृश्य अगदी न जुळणारें, अगदीं विरोधी वाटतें. आनंदरूप शक्तीच्या आनंदमूल व्यापारांत दु:ख-यातनामय दिसणारी ही उलटी घटना अस्तित्वांत येते कशी ? हा एकच एक मूळ प्रश्न आहे.

हा प्रश्न आम्ही कसा सोडविणार ? असें एक उत्तर सुचविलें जातें कीं, सच्चिदानंद हा कांहीं सृष्टीचा आरंभ व अन्त नव्हे; असत्-शून्य- हें सृष्टीचें मूळ व शेवट आहे. हें शून्य स्वत: कांहींच नसलें, तरी ते पक्षपात न करतां अस्तित्वशक्ति, जाणीवशक्ति, आनंदशक्ति आणि या शक्तींच्या विरोधी, अभावाची, नेणिवेची, दुःखाची शक्ति आपल्या पोटांत सामावून संभाळून आहे. या उत्तरांत सर्व गोष्टी समाविष्ट झाल्या असल्या, तरी आम्हांस हव्या असलेल्या एकीचेंहि स्पष्टीकरण त्यांत नाहीं. शून्य म्हणजे वस्तुत: कांहींहि नाहीं, असें ज्या वस्तूचें वर्णन त्या वस्तूच्या पोटीं सर्व कांहीं शक्तिरूपानें आहे असें तिचेंच वर्णन करणें यांत शब्दविरोध आणि वस्तुविरोध पूर्णतया विद्यमान आहे. आनंदाच्या विकासक्रमांत आरंभीं व अखेर आनंद असून मध्यें कांहीं काल दुःख कसें आलें ही लहानशी विसंगतीची अडचण दूर करण्यासाठीं आम्हीं या उत्तरांत दुसऱ्या एका विसंगतीची परिसीमा गांठली आहे. शून्यांत कसलीहि

 

पान क्र. १८२

 

शक्ति अंतर्भूत असूं शकत नाहीं. ज्यांत सर्व प्रकारची शक्ति, कांहीं पक्षपात न करतां सामावलेली आहे आणि ज्याला निश्चित व्यवस्थित स्वरूप कांहींच नाहीं, त्याला आम्ही शून्य हें नांव देऊं शकत नाहीं. त्याला 'व्यवस्थाशून्य द्रव्यपसारा' म्हणतां येईल -- तेव्हां 'शून्य' हें आमच्या प्रश्नाचें योग्य उत्तर नव्हे. तेव्हां आपण आपली सच्चिदानंदाची मूळ कल्पना घेऊन तिच्या पायावर आमच्यापुढील प्रश्नाचें योग्य उत्तर देतां येतें का तें पाहूं.

प्रथम आपण ही गोष्ट स्पष्टपणें आपल्या नजरेसमोर ठेवली पाहिजे कीं, ज्याप्रमाणें 'सर्वात्मक विश्व-जाणीव' ही मनुष्याच्या जागृत मानसिक जाणिवेहून निराळी, तिच्यापेक्षां फार व्यापक आणि मूलगामी जाणीव आहे, त्याप्रमाणें अस्तित्वाचा सर्वात्मक वैश्विक आनंद हा मानवी व्यक्तीच्या सामान्य भावना व संवेदना यांतील सुखाहून फार निराळा, व्यापक आणि मूलगामी आहे. सुख, संतोष, आनंद हीं नांवें आम्ही आमच्या ठिकाणीं उत्पन्न होणाऱ्या कांहीं मर्यादित ऊर्मींना देतों. या ऊर्मी कांहीं विशिष्ट संवयींच्या कारणांनीं आमच्या ठिकाणीं उत्पन्न होतात; सुखादींच्या उलट असलेलें दुःख, असंतोष, शोक याहि आमच्यांतील मर्यादित प्रासंगिक ऊर्मी असून विशिष्ट संवयींच्या कारणांतूनच त्यांचा उगम असतो; आणि या दोन्ही प्रकारच्या ऊर्मी स्वत: स्वत:तून उपजत नाहींत, त्यांना त्यांच्याहून अगदीं वेगळी अशी पार्श्वभूमि लागते. अस्तित्वाचा आनंद सर्वात्मक, अमर्याद व स्वयंभू असतो; विशिष्ट कारणांवर तो अवलंबून असत नाहीं, सर्व पार्श्वभूमींची पार्श्वभूमि, असा हा मूळ अस्तित्वानंद आहे. आमचें सुख-दु:ख आणि तटस्थ उदासीन वृत्ति हे सर्व अनुभव या मूळ अस्तित्वानंदांतून उगम पावतात. शुद्ध अस्तित्वानंद जेव्हां आपल्या पोटीं कांहींतरी होण्याचा, रूपधारणाचा आनंद घेऊं इच्छितो, तेव्हां त्याला गतिमान् व्हावें लागतें. मूळ ज्ञानशक्तीच्या, इच्छाशक्तीच्या भ्रमणाबरोबर या मूळ आनंदाचें भ्रमण सुरू होतें आणि या भ्रमणाच्या क्रमांत स्वत: हा आनंद भ्रमणाचे, हालचालीचे, ऊर्मीचे निरनिराळे आकार-प्रकार होतो, निरनिराळीं रूपें घेतो; सुख आणि दुःख हे अशा भ्रमणाचे, विजेच्या प्रवाहासारखे प्रकार आहेत. सुख हा 'धन प्रवाह' आहे, दुःख हा 'ऋणप्रवाह' आहे. जडामध्यें अस्तित्वानंदाची हालचाल नेणिवेंतल्यासारखी, झोंपेंतल्यासारखी होते; जड निसर्गाला त्याच्या पोटीं गतिमान् असलेल्या या अस्तित्वानंदाचें भान नसतें. मनाच्या पलीकडे अतिमानसाच्या क्षेत्रांत हा अस्तित्वानंद

 

पान क्र. १८३

 

आणि त्याच्या गतिमान् स्वरूपाचा आनंद, अतिमानसिक जाणिवेच्या मानवाला पूर्णतया अनुभवतां येतो. जीवाच्या आणि मनाच्या क्षेत्रांत अस्तित्वानंद हा स्वत: जेव्हां रूपधारणाचा आनंद होतो, तेव्हां जडाची नेणीव त्या क्षेत्रांत नसल्यानें रूपधारणाची क्रिया अधिकाधिक जाणीवपूर्वक तो करीत असतो. सरूप, साकार होण्याच्या अस्तित्वानंदाच्या क्रिया, प्रथम द्वंद्वात्मक, अशुद्ध असतात, दु:ख आणि सुख या दोन ध्रुवटोंकांमध्यें फेऱ्या घालीत असतात. परंतु स्वत:चें शुद्ध, श्रेष्ठ स्वरूप नसणारें पदार्थ आणि कारणरूप घटना यांच्यावर अवलंबून नसणारें स्वत:चें स्वयंभू स्वरूप आपल्या सरूप अवस्थेंत प्रकट करावयाचें हें या आनंदाचें ध्येय असतें. वैयक्तिक जाणिवेच्या व्यक्तींत सर्वात्मक व वैश्विक अस्तित्व प्रकट करण्याच्या मागें सच्चिदानंद ब्रह्म हें असतें. शरीर आणि मन या रूपांत रूपातीत जाणीव प्रकट करण्याच्या मागें तें असतें; त्याप्रमाणेंच विशिष्ट अनुभवांच्या आणि विषयांच्या नित्य प्रवाही अवस्थेंत सर्वव्यापी, स्वयंभू, पदार्थनिरपेक्ष असा आनंद प्रकट करण्याच्या मागें तें असतें. क्षणिक सौख्य आणि समाधान प्राप्त करण्याच्या उद्देशानें आम्ही त्या सुखसमाधानाला कारण होणाऱ्या पदार्थांच्या मागें आज लागत असतो. आम्हीं खरें स्वातंत्र्य प्राप्त केलें, आमचा खरा आत्मा आम्हीं आपलासा केला म्हणजे आम्ही या पदार्थांच्या मागें सुखाचे उत्पादक म्हणून लागणार नाहीं, तर हे पदार्थ आमच्या अंकित होतील, आमचा नित्य आत्मानंद प्रतिबिंबित करण्याचीं साधनें म्हणून आम्ही त्यांचा आमच्या इच्छेनुसार उपयोग करूं.

जडाच्या अंधुक प्रकाशाच्या कवचांतून बाहेर पडणारा मनोयुक्त पुरुष हा अहंवादी असतो. या अहंवादी मानवांत अस्तित्वाचा आनंद तटस्थ वृत्तीचा, अर्धसुप्त, अर्धनेणिवेच्या छायेनें झांकलेला असतो. भरपूर समृद्ध जमीन तिजवर उगवलेल्या रानानें झांकून टाकलेली असावी, तशी या अस्तित्वानंदाची स्थिति असते; या आनंदाच्या समृद्ध जमिनीवर जें रान माजलेलें असतें तें वासनांचें रान होय. वासनेचीं विषारीं झुडपें, तितकीच विषारीं फुलें या रानांत खूप वाढलेलीं व पसरलेलीं असतात. आमच्या अहंकेंद्रित जीवनांतील दु:खें, सुखें म्हणजे हीं विषारीं झुडपें व विषारीं फुलें होत. ईश्वराची जाणीवयुक्त शक्ति आमच्यांत आम्हांला न कळत आपलें काम करीत असते; वासनेचें वाढलेलें रान ही ईश्वरी शक्ति खाऊन टाकते, ऋग्वेदाच्या भाषेंत सांगावयाचें तर जेव्हां ईश्वरी

 

पान क्र. १८४

 

अग्नि पार्थिव अंकुरांचें रान जाळून टाकतो, तेव्हां आमच्या सुखांच्या आणि दु:खांच्या मुळाशीं जें लपलेलें आहे, या सुख-दुःखांचें जें कारण आहे, त्यांचें जें गुप्त जीवन आहे, अर्थात् त्यांच्यांत जो आनंदाचा जीवनदायी रस आहे, तो गुप्तता टाकून उघड होतो, नवे आकार, नवीं रूपें धारण करतो -- अर्थात् हीं रूपें, हे आकार वासनेचे नसतात, तर स्वयंभू स्वयंसिद्ध आनंदाचे असतात; आमचें नश्वर सुख नष्ट होऊन त्याची जागा अमर, स्वयंभू, निरतिशय नित्य सुखानें व्यापली जाते. आमच्या अहंकेद्रित सुखदु:खमय जीवनाचें हें असें महान् रूपांतर होऊं शकतें. कारण आमच्या सुखाच्या, तशाच दु:खाच्या संवेदनांचा, भावनांचा जो पसारा आहे, त्याचें सारभूत मूळ तत्त्व, त्याच्या जीवनाचा गाभा हें मूळ आनंदमय अस्तित्व किंवा मूळ अस्तित्वानंदच आहे; या भावनांचा खेळ तो आनंद व्यक्त करण्यासाठींच असतो. परंतु त्यांना तो व्यक्त करतां येत नाहीं, याचें कारण आमचें जीवन विभक्तता, आत्मविषयक अज्ञान आणि अहंपरायणता यावर आधारलेलें आहे, अर्थात् आमच्या जीवनाचा हा आधार दूर सारून अविभक्तता, आत्मज्ञान आणि विश्वात्मकता हा आमच्या जीवनाचा आधार आम्हीं केला म्हणजे स्वभावत:च आम्ही अमर स्वयंभू निरतिशय नित्य आनंदाचे स्वामी होऊं.

 

पान क्र. १८५

प्रकरण बारावें

 

अस्तित्वाचा आनंद - उत्तर

 

त्या ब्रह्माचें नांव आनंद आहे; आनंद म्हणून त्या ब्रह्माची आम्हीं पूजा केली पाहिजे, आणि आनंद म्हणून त्या ब्रह्माच्या प्राप्तीसाठीं यत्न केला पाहिजे, साधना केली पाहिजे.

- केन उपनिषद् ४.६

 

अगाध शांत सागर असावा आणि त्या सागराच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारें फेंसाळणाऱ्या लाटांचा खेळ चालावा, त्याप्रमाणें आमच्या जीवनाचें स्वरूप आहे. आमच्या जीवनांत खोल, अस्तित्वाच्या आनंदाचा अनंत अगाध सागर आहे; हा आनंद आमच्या जीवनाशीं अविभाज्यपणें निगडित आहे आणि त्यावर लाटांप्रमाणें आमच्या बाह्य पृष्ठभागीय संवेदनांचा खेळ चाललेला आहे. कधीं सुखसंवेदना, कधीं दुःखसंवेदना, कधीं ना दु:ख ना सुख असा तीन प्रकारचा खेळ भरती-ओहोटीप्रमाणें आमच्या जीवनाच्या आद्यस्थानीं व अन्तीं असलेल्या अस्तित्वानंदरूप सागराच्या पृष्ठभागावर चाललेला असतो. विश्वाचें मूळ आनंद असतांना, त्याच आनंदाच्या विश्व-रचनाव्यापारांत दुःख घुसलें कसें ? या प्रश्नाचें खरें उत्तर वरील प्रकारचें आहे. सृष्टीचा आत्मा म्हणजे अनंत, अविभाज्य व एकच एक असें अस्तित्व, सद्वस्तु. त्या अस्तित्वाचा मूलभूत स्वभाव किंवा शक्ति ही ज्ञानमय, आत्मजाणीवयुक्त पुरुषाची अनंत अमर शक्ति आहे; आणि या आत्मजाणिवेचा मूळ स्वभाव किंवा तिचें स्वतःविषयीचें मूलभूत ज्ञान हें अस्तित्वाचें अनंत अटळ सुख आहे. सृष्टीचें मूळ असलेली स्वयंभू सद्वस्तु आपला स्वाभाविक आत्मानंद नित्य टिकवून असते; अरूप असतांना, आणि धारण केलेल्या सर्व रूपामध्यें आपला आत्मानंद सद्वस्तु नित्य भोगीत असते; स्वतःच्या अनंत अविभाज्य अस्तित्वाचें त्या सद्वस्तूला असणारें ज्ञान, कधीं खंड न पावणारें, नित्य

 

पान क्र. १८६

 

आत्मानंदपूर्ण असतें. तिचीं विभक्त असणारीं, मर्यादित व नानाप्रकारचीं जीं रूपें असतात त्या रूपांमध्येंहि ही सद्वस्तु नित्य आत्मानंदपूर्ण असते. सामान्यतः स्वत:ची जी बाह्य कृत्रिम संवय किंवा आत्मजाणीवयुक्त जीवनाची जी विशिष्ट रीति असते, त्या संवयीच्या व त्या जीवनरीतीच्या बंधनांत राहून आमचा आत्मा व्यवहार करीत असतो; या बंधनांतून त्यानें स्वतःस वर काढलें म्हणजे त्याला जड द्रव्याच्या दर्शनी नेणिवेंत, अनंत जाणीवयुक्त शक्तीचें दर्शन घडतें; ही शक्ति जडांत नित्य वसति करून आहे, ती आपलें स्थान कधींहि सोडीत नाहीं, अचलपणें ध्यानमग्न अशी राहून कार्य करीत असते, असें ज्ञान आमच्या आत्म्याला होतें. त्याचप्रमाणें जडाच्या दर्शनी संवेदनाशून्यतेंत आमच्या बंधनमुक्त आत्म्याला अनंत ज्ञानयुक्त आनंदाचें दर्शन घडतें. जडांत हा आनंद सर्वव्यापी आहे, निरतिशय स्वरूपाचा आहे, कोणत्याहि कारणानें त्यांत न्यूनता येऊं शकत नाहीं, असें ज्ञान त्यास होतें आणि या ज्ञानामुळें तो जडांतील आनंदाशीं समरस होतो. हा जो आनंद आमच्या आत्म्याला जडांत प्रतीत होतो, तो त्याचाच आत्मानंद असतो; जडांत असणारा आत्मा त्याचाच आत्मा (तोच) असतो. हा आत्मा सर्वत्र व सर्वव्यापी असतो; परंतु आमचें सृष्टीविषयींचें व स्वत:विषयींचें जें सामान्य ज्ञान तें वस्तूच्या अंतरंगाला स्पर्शच करीत नाहीं, तें वरवरच्या भागांतच जागृत राहतें, वावरत राहतें. या ज्ञानापासून आमचा स्वतःचा आत्मानंद किंबहुना आमचा स्वतःचा आत्मा लपलेला राहतो. आमच्या सामान्य ज्ञानाच्या कक्षेंत आमचा आत्मा व आत्मानंद न आल्याकारणानें ते खोल खोल दूरवर आहेत अशीच सामान्य ज्ञानाची भावना होते. खरोखरी आत्मानंद जसा सर्व रूपांत तसाच तो सर्व अनुभवांतहि असतो. सुखाचे, दु:खाचे आणि उदासीनतेचे सर्व अनुभव वस्तुतः आत्मानंदपूर्ण असतात. या सर्व अनुभवांत आत्मानंद गुप्त, खोल व अर्धनेणिवेनें व्याप्त अशा स्थितींत असतो आणि यामुळेंच सर्व वस्तूंना व जीवांना अस्तित्वांत राहणें शक्य होतें. दुःखाच्या, निसर्गक्षोभाच्या प्रतिकूल परिस्थितींतहि तो अस्तित्व टिकवून धरतो. जड वस्तु व जीव अस्तित्वाला चिकटून राहतात, अस्तित्वांत राहण्याची इच्छा सर्व परिस्थितीवर मात करते, याचें कारण सर्वगत आत्मानंद होय. जीवांत जी स्वत:च्या संरक्षणाची उपजत प्रेरणा असते, केव्हांहि नष्ट न होण्याचा जो स्वभावधर्म जडांत असतो व मनांत जी अमरत्वाची आंतरिक भावना

 

पान क्र. १८७

 

असते त्या सर्वाचें मूळ, अस्तित्वाची दुर्दम्य इच्छा हें होय व त्या इच्छेचें मूळ गूढ आत्मानंद होय. सरूप, साकार अस्तित्व स्वत:चा विकास करीत असतें व त्या विकासाच्या सर्व अवस्थांत मुळाशी हा आनंद दडलेला असतो; एवढेंच काय पण कधीं कधीं, आत्महत्या करण्याची जी प्रेरणा प्राण्यास होते ती देखील अस्तित्वाची, आनंदरूप शुद्ध अस्तित्व टिकविण्याचीच दुर्दम्य इच्छा असते. एवढेंच कीं ती विपरीत रूपांत व्यक्त होत असते. वास्तविक आत्महत्येची इच्छा म्हणजे प्रस्तुत जीवनाहून वेगळ्या जीवनाचें आकर्षण होय. या आकर्षणामुळें प्रस्तुत जीवनाविषयीं घृणा उत्पन्न होत असते. आनंद म्हणजेच अस्तित्व, आनंद हाच सृष्टीचें गूढ कारण, आनंद हाच जन्माचें मूळ, आनंद हाच जीवनांत टिकण्याचें कारण, आनंद हाच जन्माचा शेवट असून आनंदांतच सृष्टि विलीन होते. उपनिषदांत म्हटलें आहे : ''आनंदांतूनच ही सर्व भूतें जन्म पावतात, आनंदामुळेंच ती जगतात नि वाढतात व शेवटीं आनंदाप्रत जाऊन त्यांत विलीन होतात.''

मूळ सद्वस्तु (आत्मा, पुरुष) वस्तुतः एकरूप आहे. परंतु आमच्या मनाला तिचीं सत् चित् आनंद अशीं तीन अंगें वेगवेगळीं कल्पावीं लागतात. केवळ विभक्त जाणिवेला भासणारीं मूळ एका तत्त्वाचीच हीं तीन अंगें किंवा मुखें आहेत. हें लक्षांत ठेवलें म्हणजे जुन्या दर्शनांच्या विभिन्न सूत्रांचा समन्वय लागूं शकतो व प्रत्येकाला त्याचें त्याचें स्थान प्राप्त होऊन त्यांच्यामधील अन्योन्यविरोध मिटूं शकतो. विश्व हें माया आहे, या सूत्राचा प्रथम विचार करूं. मूळ अस्तित्व शुद्ध, अनंत, अविभाज्य व अव्यय आहे. या मूळ अस्तित्वाशीं विश्वाच्या अस्तित्वाचा जो संबंध आहे तो लक्षांत घेतला आणि विश्वाकडे पाहतांना केवळ त्याच्या दर्शनी रूपांकडे लक्ष दिलें म्हणजे विश्व, विश्वाचें अस्तित्व हें माया असल्याचा प्रत्यय येऊं शकतो; आणि त्याचें वर्णन 'माया' या शब्दानें करण्याचा अधिकार आम्हांस पोंचतो. मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें दृश्य विश्व माया आहे असें आम्ही लेखावयास कोणतीच हरकत नाहीं. माया या शब्दाचा मूळ अर्थ 'समावेशक संग्राहक जाणीव' असा आहे; ही जाणीव आकार व रूपें घेणारी आहे, कारण ती विषयाला व्यापून, मापून मर्यादेंत बसविणारी आहे; अरूप अस्तित्वांत वस्तूची बाह्य-रेषा काढणें, तिची लांबी-रुंदी-उंची निश्चित करणें, आणि या प्रमाणें अरूपांत रूप ढाळणें हें मायेचें काम आहे; जें अज्ञेय आहे त्याच्या

 

पान क्र. १८८

 

विषयीं मनानें कल्पना करून त्याला ज्ञानाच्या कक्षेंत आणल्यासारखें करणें हें मायेचें काम आहे; भूमितीची निर्मिति करून तिच्या साह्यानें अमर्याद असलेल्याचें मोजमाप घेतल्यासारखें करणें हें मायेचें काम आहे. याप्रमाणें 'माया' शब्दाच्या मूळ अर्थात ज्ञान, कौशल्य, बुद्धि या गोष्टींचा समावेश होत असे. पण पुढें या शब्दाचें अवनतीकरण होऊन माया म्हणजे धूर्तता, फसवेगिरी, आभास असे मायेचे अर्थ झाले आणि नंतर दर्शनकारांनीं 'माया' हा शब्द आभास, इंद्रजाल या अलंकारिक अर्थानें आपल्या तत्त्वज्ञानांत वापरावयास आरंभ केला. सर्व दर्शनांत तो या अर्थानेंच येतो.

विश्व माया आहे, मिथ्या, असत्य आहे याचा अर्थ विश्वाला कसल्याच प्रकारचें अस्तित्व नाहीं असा नव्हे. कारण विश्व हें आत्म्याचें स्वप्न मानलें, तरीहि स्वप्न असेंपर्यंत आपल्याला तें सत्यच आहे. स्वप्न संपेल तेव्हां तें अस्तित्वांतून नाहींसें होईल, मिथ्या होईल असें फारतर कोणी म्हणूं शकेल. विश्वाला कोणत्याहि प्रकारें शाश्वत अस्तित्व नाहीं म्हणून तें मिथ्या असेंहि म्हणतां येत नाहीं; विशिष्ट विश्वें, विशिष्ट रूपें व आकार स्थूल दृष्टीनें, पदार्थ दृष्टीनें नाहींसे होऊं शकतात, होतात; मनाच्या दृष्टीनें त्यांच्यासंबंधानें असलेली व्यक्ततेची जाणीव अव्यक्ततेच्या जाणिवेंत रूपांतरित होते. परंतु या तात्त्विक वस्तू कांहीं केव्हांहि नाहींशा होत नाहींत; त्या शाश्वत टिकणाऱ्या आहेत. त्या वस्तू व्यक्तांतून अव्यक्तांत जातात व अव्यक्तांतून परत व्यक्तांत येतात; नित्य अगदीं अटळपणें त्यांची व्यक्तांत पुनरावृत्ति होत राहते. नित्य एका रूपांत त्या टिकत नसतील पण पुन: पुन: व्यक्तांतून अव्यक्तांत व अव्यक्तांतून व्यक्तांत येत जात राहतात. त्यांचें दृश्य-रूप नेहमीं बदलतें पण त्यांची एकंदर संख्या व त्यांचा मूळ पाया कधींहि न बदलणारा आहे. एवढेंच नव्हे तर नित्य असें जें जाणीवयुक्त अस्तित्व, आत्मतत्त्व आहे त्याच्यापुढें, कोणत्या ना कोणत्या प्रकारचें विश्व, कोणत्यातरी प्रकारच्या अस्तित्वाचा खेळ नसलेला कालखंड होता किंवा नव्हता अथवा तसा कधीं येईल किंवा नाहीं याविषयीं आम्हांला खात्री देतां येत नाहीं. असें एक अंतःस्फूर्त ज्ञान मात्र आम्हांला होऊं शकतें कीं, आम्हांला ज्ञात असलेलें विश्व त्या मूळ आत्मतत्त्वांतून येऊं शकतें आणि परत त्यांत जाऊं शकतें, त्यांतून तें येतें व त्यांत तें परत जातें, आणि ही ये-जा नित्य चाललेली असते.

 

पान क्र. १८९

 

विश्व माया आहे या सूत्रांत माया म्हणजे काय नव्हे तें वर सांगितलें. माया म्हणजे कसल्याहि प्रकारच्या अस्तित्वाचा किंवा शाश्वत अस्तित्वाचा अभाव असें नव्हे. विश्व माया आहे म्हणजे विश्व हें अनंत अस्तित्वाचें मूळ-सत्य नव्हे तर तें, या सत्याची, या आत्मज्ञानपूर्ण मूळ आत्मतत्त्वाची निर्मिति आहे, त्यानें केलेली रचना आहे. ही रचना मूळ शाश्वत सत्यानें मूळ शून्यांत किंवा मूळ शून्यापासूनहि केलेली नाहीं, तर आपल्या स्वतःच्या पोटीं आपल्या स्वत:तून केलेली आहे. -- या विश्वाची सामग्री, म्हणजेच त्याचा उगम, त्याचें सर्वव्यापक वसतिस्थान मूळ सत् किंवा अस्तित्व आहे. त्यांत जे आकार आहेत ते बदलणारे असले, तरी ते त्या सत्याचे स्वतःचे आहेत, व त्या सत्याला, त्याच्या ज्ञानयुक्त दृष्टीला ते तसे दिसतात. त्यांची सर्व रूपरेखा त्या सत्याच्या निर्मितिकुशल ज्ञानशक्तीनें ठरवलेली व रचलेली असते -- हे सत्याचे आकार व्यक्त होऊं शकतात, व्यक्ताचे अव्यक्त होऊं शकतात, अव्यक्त राहूं शकतात, अव्यक्त झालेले पूर्वींहून निराळ्या प्रकारें व्यक्त होऊं शकतात. व्यक्त आकार अव्यक्त झाल्यानंतर पुन: व्यक्त होतांना पूर्वींच्याच रूपांत व्यक्त झाला पाहिजे असा नियम नाहीं, त्याचप्रमाणें व्यक्त आकार नेहमीं एका रूपांत राहिला पाहिजे असाहि नियम नाहीं. आकारांची ही रूपविषयक व व्यक्तताविषयक अशाश्वति लक्षांत घेऊन त्यांना अनंत ज्ञानाचे आभास, अनंत जाणिवेचे भ्रम, असें आम्हीं हवें तर म्हणावें. पण असें म्हणण्यांत, जिला भ्रमाची, असत्याची पकड कधींच स्पर्श करणार नाहीं, अशा मनाहून श्रेष्ठ असलेल्या असीम जाणिवेला, मनाचे दोष चिकटविण्यासारखें होतें हें विसरून चालणार नाहीं. मन हें मर्यादित जाणिवेचें आहे, तें चुका करूं शकतें, त्यांत अक्षमता असते. पण मनाचे हे दोष किंवा त्यांची छाया असीम जाणिवेवर टाकणें हें एक असमर्थनीय धाडस आहे. अस्तित्वाचें मूळ-तत्त्व, मूळ-द्रव्य हें मिथ्या नाहीं, सत्य आहे; अविभक्त अविभाज्य आत्मजाणीवयुक्त मूळ अस्तित्वाचें कोणतें तरी एखादें सत्य, आमच्या विभक्त, मानसिक जाणिवेकडून घडणाऱ्या चुकांत, तिच्या विकृत वृत्तींत आणि कृतींत व्यक्त होत असतें; या गोष्टी लक्षांत घेतां विश्वासंबंधानें आम्हांला असें म्हणतां येतें कीं, तें सद्रूप ब्रह्माचें मूळ तात्त्विक सत्य नाहीं, तें सद्रूपाच्या मूलभूत अव्यय एकतेचें सत्य नाहीं, तर तें त्याच्या अनिर्बंध अनेकतेचें रूपात्मक दृश्य-सत्य आहे, तें त्याच्या अमर्याद

 

पान क्र. १९०

 

रूपांतर-योग्यतेचें, आकारविषयक अमर्याद रूपांतरक्षमतेचें दृश्य सत्य आहे. विश्वासंबंधानें आम्हांला एवढेंच म्हणतां येतें; यापलीकडे कांहीं म्हणतां येत नाहीं. (विश्व माया आहे या सूत्राचा अर्थ, या वरील विवेचनांत व विधानांत स्पष्ट केलेला आहे. ब्रह्माचीं सत्, चित् व आनंद हीं जीं मनानें कल्पिलेलीं तीन अंगें आहेत, त्यांतील सत् या अंगाशीं विश्वाच्या अस्तित्वाची तुलना करून, विश्वाला कोणत्या अर्थीं माया म्हणतां येतें व सद्ब्रह्माला सत्य कां म्हणतात तें वर दाखविलें आहे.)

मायावादांत विश्वाला माया म्हणतात, त्याप्रमाणें सांख्य दर्शनांत (प्रकृतिपुरुषवादांत) विश्व ही प्रकृतीची कृति आहे असें म्हणतात. सत् आणि आनंद हीं अंगें बाजूस ठेवून विश्वाच्या अस्तित्वाकडे केवळ जाणिवेच्या अंगाकडून, ब्रह्माच्या 'चित्' या अंगाकडून पाहिलें तर जाणीव ही शक्तिरूप असल्यानें विश्व हें शक्तीची कृति आहे अशी दृष्टि आपल्याला स्वीकारतां येते; शक्तीची कृति म्हणजे विश्व असें विश्वाचें वर्णन आपण करूं शकतो आणि तसा प्रत्ययहि आम्हांला येऊं शकतो. अर्थात् विश्वरचना करणाऱ्या या शक्तीला कामाला लावणारी ब्रह्माच्या जाणिवेची गुप्त इच्छाशक्ति आहे, किंवा जी ब्रह्मजाणीव विश्वाची मालक आहे व निरीक्षक आहे तिनें विश्वरचना करणाऱ्या शक्तीवर आपल्या मालक-निरीक्षकपणानें कांहींतरी अनिवार्य बंधन न कळत लादलें आहे व म्हणून ती शक्ति विश्वरचना करीत आहे असें म्हणणें आपणांस प्राप्त होतें. विश्व हें ब्रह्मजाणिवेच्या दृष्टीनें प्रकृतीची क्रीडा आहे; प्रकृति म्हणजे क्रियाशक्ति, जाणिवेची क्रियाशक्ति; पुरुष म्हणजे क्रियाशक्तीच्या कृतीकडे बघणारें, आणि दर्शनानंद भोगणारें जाणीवयुक्त अस्तित्व; पुरुषाच्या आनंदासाठीं, पुरुषाला राजी राखण्यासाठीं प्रकृति जो खेळ खेळते त्याचें नांव विश्व, असें या नव्या दृष्टीनें म्हणतां येतें; किंवा असेंहि म्हणतां येईल कीं, पुरुषाचें प्रतिबिंब शक्तीच्या (प्रकृतीच्या) हालचालींत पडतें, आणि या प्रतिबिंबयुक्त प्रकृतीच्या हालचाली माझ्याच आहेत असें पुरुष समजतो, असा हा प्रकृतीच्या पुरुष-प्रतिबिंबयुक्त हालचालींचा खेळ आहे. तेव्हां वस्तुजाताची जननी जी शक्ति किंवा प्रकृति तिचा खेळ म्हणजे विश्व होय; सर्व काळ न थांबतां अनंत आकार घेण्याची व घेत राहण्याची प्रेरणा या विश्वजननीचे ठिकाणीं आहे; नाना अनुभव स्वत: घेण्याचा व पुरुषाला देण्याचा हव्यास या प्रकृतीला आहे, आणि हा तिचा हव्यास शाश्वतचा आहे, कधीं पुरा न होणारा आहे.

 

पान क्र. १९१

 

मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें विश्वाला माया म्हणतां येतें; मूळ जाणीवशक्तीच्या दृष्टीनें विश्वाला शक्ति प्रकृतीचा पसारा म्हणतां येतें. आतां तिसरी दृष्टि मूळ आत्मानंदाची. शाश्वत अस्तित्व असणाऱ्या मूळ आत्म्याचा निजानंद आणि विश्व या दोहोंकडे एकदम दृष्टि टाकली कीं बालाचा आनंद, कवीचा आनंद, नटाचा आनंद, यंत्रनिर्मात्याचा आनंद ज्याप्रमाणें नाना प्रकारांनीं व्यक्त होतो त्याप्रमाणें मूळ आत्म्याच्या निजानंदाची लीला विश्वरूपानें व्यक्त झाली आहे, अशा प्रकारचें विश्वाचें वर्णन आपण यथार्थतेनें करूं शकतो आणि तसा प्रत्ययहि आपणांस येऊं शकतो. विश्वाचा वस्तुजाताचा आत्मा नित्य-युवा आहे, त्याचा आनंद कधींहि न संपणारा आहे. हा आनंदरूप आत्मा स्वत:च्या पोटांत स्वत:ला पुन: पुन: निर्माण करतो,  आणि हा व्याप ते केवळ स्वत:मध्यें स्वत:च्या निर्मितींत होणाऱ्या आनंदासाठींच करतो. स्वत:च्या आविष्कारांत त्याला जो आनंदलाभ होतो त्या आनंदलाभासाठीं तो स्वत:मध्यें आविष्कार करीत राहतो. या सर्व व्यापांत लीला तोच, लीला करणारा तोच, लीला-भूमि तोच -- अशी ही अद्‌भुत वस्तुस्थिति आहे.

शाश्वत निश्चल अक्षर सच्चिदानंदाच्या दृष्टीनें विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करतां माया, प्रकृति व लीला या तीन कल्पनांवर आधारलेलीं अशीं जीं तीन सामान्य विधानें आमच्या दर्शनग्रंथांत सांपडतात आणि जीं सामान्यत: अन्योन्यविरोधी म्हणून मांडण्यांत येतात तीं तीन विधानें वस्तुत: एकमेकांशीं पूर्णपणें सुसंवादी व एकमेकांना पूरक आहेत. विश्वाचा आणि जीवनाचा संपूर्ण पसारा समग्रतेनें ध्यानांत आणावयाच्या दृष्टीनें हीं तीन विधानें सर्व मिळून एकत्र मांडणें अवश्य आहे. ज्या विश्वाचा एक भाग आम्ही आहों तें विश्व म्हणजे शक्तीचा गतिमान् अस्तित्वाचा पिंगा घालणें आहे असें उघड उघड दिसतें. (अस्तित्व म्हणजे गतिहीन शक्ति व शक्ति म्हणजे गतिमान् अस्तित्व असा येथें अर्थ होतो.) परंतु या शक्तीच्या दृश्य धडपडीच्या अंतरंगांत आम्ही शिरलों तर ती शक्ति म्हणजे एका निर्मितिसमर्थ अशा ज्ञानाचें नित्य व तरीहि नित्य बदलणारें असें तालबद्ध स्पंदन आहे असें आमच्या प्रत्ययास येतें; हें ज्ञान आपल्या शाश्वत अनंत अस्तित्वाचीं दृश्य सत्य-रूपें आपणां स्वत:च्या पोटांत आपल्या तालबद्ध स्पंदनानें निर्माण करून आपल्यापुढें उभीं करीत असतें. आत्मप्रकटन करणारीं स्वत:ची असंख्य रूपें लीलेसाठीं निर्माण करण्यांत मग्न झालेला अस्तित्वाचा अनंत आनंद

 

पान क्र. १९२

 

हा या तालबद्ध ज्ञानस्पंदनाचें अंतरंग कारण व हेतु असल्याचें दिसून येतें. विश्वासंबंधानें  आम्हांला यथार्थ ज्ञान व्हावें यासाठीं हें सच्चिदानंदाचें त्रिमुखी दर्शन आम्हीं आरंभीं आत्मसात् करावयास हवें.

अस्तित्वाचा अनंत, अक्षर आनंद गतिशील होऊन, अनंत क्षर-रूपें धारण करण्याचा, अनंत क्षर आनंदाचा भोग घेत असतो -- हें विश्वाचें स्वरूप आहे, विश्वाच्या एकंदर प्रश्नाची गुरुकिल्ली या एका प्रत्ययांत आहे. तेव्हां, आमच्या संवेदनात्मक अस्तित्वांत ज्या सुख, दु:ख व उदासीन वृत्ति आलटून पालटून आमच्या वांट्याला येतात त्या सर्वाच्या पाठीमागें एक अविभाज्य जाणीवयुक्त अस्तित्व आहे, तें आपल्या नित्य स्वभावगत आनंदाचा आधार या सर्व सुखादि वृत्तींना, तसेंच अनुभवांना देतें, आपल्या आनंदाच्या विविध गतीनें या वृत्तींतील व अनुभवांतील विविधता निर्माण करतें, असें आम्हीं ओळखलें पाहिजे. हें आनंदमय ज्ञानमय अस्तित्व आमचा खरा आत्मा आहे. ज्या मनोमय पुरुषाला सुख, दु:ख आणि उदासीनता या तीन वृत्तींचा - स्पंदनांचा अपरिहार्यपणें अनुभव येतो, तो या आमच्या खऱ्या आत्म्यानें वस्तूचा संवेदनात्मक अनुभव घेण्यासाठीं पुढें केलेला त्याचा प्रतिनिधि आहे. विश्वाच्या विविध स्पर्शांना उत्तर म्हणून, त्यांची प्रतिक्रिया म्हणून घडणारें आमच्या विभक्त जाणिवेचें पहिलें तालबद्ध स्पंदन आमच्या संवेदनात्मक प्रत्ययांत आहे. हें उत्तर ही प्रतिक्रिया अपूर्ण व सदोष असते. हें स्पंदन संकीर्ण तालवैविध्यामुळें विसंवादपूर्ण असतें. आमच्या खऱ्या आत्म्याची पूर्ण एकता-प्रधान लीला आमच्यांत पुढें उदयास यावयाची असते. त्या भावी लीलेची पूर्वतयारी, प्रस्तावना या अपूर्ण, संकीर्ण व विसंवादी तालगतीच्या त्रिविध संवेदना करीत असतात; त्रिविध संवेदनाप्रत्ययांत खऱ्या पूर्ण स्वरमेळाचा, सुसंवादाचा अनुभव आम्हांला येत नाहीं. आमचा खरा आत्मा एकच एक विश्वात्मा आहे; कोणत्याहि अनुभवाचे प्रसंगीं, विविध अनुभव घडत असतां त्या एकच एक आत्म्याशीं आम्ही भावनेनें एकरूप व्हावयास शिकलों, त्याचा सर्वगामी पूर्ण स्वतंत्र सुसंवाद आम्ही आमच्या मनाचे ठिकाणीं अभ्यासानें प्रतिबिंबित करावयासं शिकलों म्हणजे विश्वांत सर्व संवेदनांच्या प्रसंगीं आत्म्याच्या पूर्ण स्वरमेळाचा, पूर्ण सुसंवादाचा आम्हांला अनुभव येऊं शकेल.

ही वरील दृष्टि व विचारसरणि बरोबर असेल, तर या दृष्टीचे

 

पान क्र. १९३

 

व विचारसरणीचे परिणाम म्हणून अपरिहार्यपणें कांहीं विशिष्ट गोष्टी आम्हांला मानाव्या लागतात. पहिली गोष्ट : आमच्या खोल अंतरांत आम्ही एकमेवाद्वितीय सच्चिदानंद ब्रह्म आहों, आमचें खरेंखुरें अस्तित्व पाहतां आम्ही अविभाज्य सर्वगामी जाणीव आहों आणि म्हणून स्वभावत: अटळपणें आम्ही सर्वागामी आनंद आहों, त्या अर्थीं आमच्या संवेदनात्मक अनुभवांत अनुस्यूत असलेलीं सुख, दुःख व उदासीनता हीं तीन स्पंदनें आमच्या अस्तित्वाच्या बाह्य व्यवस्थेचा भाग म्हणून असलीं पाहिजेत; आणि आमच्या जागृतींतील जाणिवेनें युक्त असा जो आमच्या अस्तित्वाचा सर्वांत बाहेरचा, सर्वांत वरचा मर्यादित भाग आहे, त्यानें ही व्यवस्था केलेली असली पाहिजे. या बाह्य व्यवस्थेच्या पाठीमागें खोल आमच्या अंतरांत वरच्या बाह्य जाणिवेपेक्षां पुष्कळच व्यापक खोल आणि सत्य असें कांहींतरी असलें पाहिजे आणि या आंतर वस्तूला बाहेरील सर्व अनुभवांत समानतेनें आनंदाचा नित्य अनुभव येत असला पाहिजे; वरचें मानसिक अस्तित्व या आंतरिक गूढ आनंदाच्या आधारानेंच काम करीत असलें पाहिजे. सर्व तऱ्हेच्या खटपटींत दुःखयातनांत कसोटीच्या प्रसंगांत -- रूपधारणाच्या या खळबळयुक्त घटनेंत मनोमय अस्तित्वाला अर्थात् पुरुषाला चिकाटीनें, धैर्यानें आपलें काम करीत राहण्याचें बळ या आंतरिक आनंदापासूनच मिळत असलें पाहिजे. आम्ही ज्याला आत्मा म्हणतो, मी म्हणतो, तो आमच्या अस्तित्वाच्या वरच्या पृष्ठभागावर कंपायमान असा एक आत्मकिरण असतो, त्याच्या पाठीमागें, त्याच्या खालीं सर्वत्र महान् अर्धजागृत जाणीव, तसेंच महान् अतिमानसिक जाणीव असते; या दोन्ही जाणिवांना बाहेरच्या सर्व प्रकारच्या अनुभवांतून कांहींतरी लाभ होत असतो; आमचा अर्धजागृत आणि अतिमानसिक जाणीवयुक्त आत्मा बाह्य 'मी'ला हे नानाविध अनुभव बुद्धिपुर:सर घ्यावयास लावीत असतो; विश्वांतील वस्तूंचा व घटनांचा संपर्क होण्यासाठीं हा बाह्य 'मी'चा एक प्रकारचा नाजुक ठसे घेणारा पडदाच जणुं आंतरिक द्विमुख आत्म्यानें अस्तित्वाच्या पृष्ठभागावर बसविलेला असतो; अर्धजागृत किंवा अधोमानसिक आणि अतिमानसिक जाणिवेचा महान् आत्मा स्वत: पडद्याआड असतो. बाह्य जगाचे संपर्क व त्यांचे अनुभव बाह्य 'मी'च्या पडद्याच्या द्वारां घेऊन तो आत्मसात् करतो आणि त्यांतून पहिल्यापेक्षां अधिक सत्य अधिक गूढ नि गाढ, अधिक सामर्थ्यवान व निर्माणकुशल अशी अनुभूति-अनुभूतिमूल्यें

 

पान क्र. १९४

 

तो अंतरात्मा अस्तित्वांत आणतो; हीं मूल्यें तो आपल्या खोल वसतिस्थानीं तयार करून मग वर पाठवितो; वरच्या 'मी' मध्यें वैयक्तिक बल, शील, ज्ञान, स्फूर्ति, या रूपांनीं तीं दृग्गोचर होतात; या महान् गुणांचीं बीजें येतात कोठून हें आम्हांला गूढ असतें; कारण आमचें मन फक्त वरतीं वरतीं फिरत, थरथरत असतें; त्याला एकाग्र होऊन खोल अंतरात्म्यांत राहून जीवन जगण्याचे ज्ञान आणि शिक्षण मिळालेले नसतें.

आमच्या सामान्य बहिर्मुख जीवनांत आमच्या खऱ्या आत्म्याचें हें सत्य आम्हांला अज्ञात असतें, आम्हांपासून लपलेलें असतें; केव्हां केव्हां या सत्याचें अंधुक दर्शन आम्हांला घडत असतें; हें सत्य आम्हांला सामान्य जीवनांत ज्ञात झालें, तरी तें आम्हांला पूर्णपणें ज्ञात होत नाहीं, पक्केपणें आमच्यांत तें स्थिर होत नाहीं. आम्ही आंतरिक जीवन जगण्यास शिकलों म्हणजे अगदीं निश्चितपणें आम्हांला आमच्या खऱ्या आत्म्याचें दर्शन घडतें; हा आमचा आत्मा खोल, गंभीर वृत्तीचा, शांत आनंदमय, सामर्थ्यसंपन्न आहे, विश्वाचा हुकुम त्याचेवर चालत नाहीं, तर विश्वावर त्याची सत्ता चालते, हा आत्मा स्वत: ईश्वर नाहीं, परंतु त्या ईश्वराचा आमच्या अंतरांत कार्य करणारा दिव्य तेजोमय अंश आहे; हा आमचा अंतरात्मा, ईश्वरांश आमच्या पृष्ठभागीं काम करणाऱ्या 'मी' ला आंतून आधार देतो, साह्य करतो, लहान बालकाप्रमाणें या 'मी'स तो वागवितो, 'मी'च्या चुका, त्याच्या रागलोभादि वृत्ती, त्याच्या सुखाच्या उड्या व दुःखाच्या हांका यांजकडे हा अंतरात्मा सस्मित होऊन पाहत असतो व त्या सर्व प्रसंगीं 'मी'ला धीर देऊन व सहानुभूति देऊन त्याचा हळूहळू विकास करीत असतो. एकदां आम्ही आंतरिक जीवन जगूं लागलों म्हणजे ही गोष्ट आमच्या प्रत्ययास येते. मुळांत जेथें होतों तेथें जर आम्ही परत गेलों -- अंतरात्म्यांत शिरलों --  आणि बाह्य अनुभवांशीं एकरूप न होतां आंतील ईश्वरी तेजोमय अंशाशीं एकरूप झालों, तर त्या आंतरिक तेजाच्या ईश्वरी वृत्तीनें जगांतील घटनांचा संपर्क आम्ही तोलूं शकूं, आमचें शरीर, प्राण, मन यांच्या संपर्कांच्या सुखदुःखांपासून दूर, आमच्या समग्र जाणिवेच्या स्थानीं आम्ही सुखेनैव राहूं शकूं; इतकेंच नव्हे तर, हे सर्व अनुभव आमच्या मर्यादित बाह्य जाणिवेचे अनुभव आहेत हें जाणून त्यांचा आम्ही योग्य तो उपयोग करूं; पण आमच्या आत्म्यावर -- आमच्या खऱ्या समग्र जाणिवेच्या अस्तित्वावर -- ज्यांचा परिणाम बाह्य जाणिवेवरील परिणामासारखा

 

पान क्र. १९५

 

होणार नाहीं. आंतील ईश्वरी अंशाशीं एकरूप झाल्यानें आम्हांला हें सर्व सहज करतां येईल. मनोमय कोशाच्या पाठीमागें आनंदमय कोश आहे; मनोमय कोश लहानसा मर्यादित आहे, तर आनंदमय कोश महान् आहे. तोच आमचा आनंदमय आत्मा आहे आणि विश्वसंपर्कानें क्षोभ पावणारी त्याची छाया म्हणजे मनोमय कोश किंवा मानसिक आत्मा होय. आमचा सत्य आत्मा वर पृष्ठभागावर नाहीं, तर तो आंत खोल आहे.

सुख, दुःख व उदासीनता ही स्पंदनव्यवस्था, आमच्या विकासाच्या अपूर्ण स्थितींतली वरवरची व्यवस्था असल्यानें, ही कायमची, अंतिम, अनिवार्य व्यवस्था होऊं शकत नाहीं, ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आम्हीं ध्यानांत घेतली पाहिजे. अमुक संपर्क झाला कीं त्याची प्रतिक्रिया म्हणून सुखाची वा दुःखाची अथवा उदासीनतेची अमुकच संवेदना झाली पाहिजे असा कांहीं अटळ नियम होऊं शकत नाहीं; संवयीप्रमाणें आमचे शरीर, प्राण, मन प्रतिक्रिया करतात; कांहीं एक विशिष्ट संपर्कानें आम्हांला सुख किंवा दुःख होतें याचें कारण एवढेंच कीं, तशी संवय आमच्या प्रकृतीला झाली आहे, तसें नातें आम्हीं त्या विशिष्ट संपर्काशीं नेहमींचें करून ठेवलें आहे. ज्या संपर्काला सुखसंवेदनेनें आम्हीं प्रतिक्रिया देत असतो, त्या संपर्काची प्रतिक्रिया उलट दुःखसंवेदनेनें देणें आणि जेथें आम्ही प्रतिक्रिया म्हणून दुःखसंवेदना प्रकट करतों, तेथें उलट सुखसंवेदना प्रकट करणें हें आम्हांला सर्वथा शक्य आहे. इतकेंच नव्हे, तर आमचे शरीर-प्राण-मनयुक्त बाह्य अस्तित्व विश्वाच्या संपर्कांना प्रतिक्रिया म्हणून सुख, दुःख किंवा उदासीन वृत्ति हें जें उत्तर संवयीने देतें, त्याचे ऐवजीं आमच्या खऱ्या महान् आनंदमय आत्म्याचा नित्यस्वभाव असलेल्या अक्षर आनंदाच्या रूपानें सर्वस्वीं स्वावलंबी असें उत्तर संवयीनें आम्ही देऊं शकूं, तें आमच्या स्वाधीन आहे. बाहेर शरीर-प्राण-मन यांना सुख-दुःख-उदासीनता यांची संवयीप्रमाणें प्रतीति होणें आणि खोल आंत आंतरात्म्यानें ह्या बाह्य प्रतिक्रिया नित्य अलिप्तपणें व आनंदानें स्वीकारणें यापेक्षां बाहेरच शरीर-प्राण-मन यांनीं सर्व संपर्कांना, अलिप्त आनंदानें उत्तर देणें यांत श्रेष्ठतर आत्मविजय असून, त्यात आत्मोपलब्धि-आत्मलाभ गाढतर व पूर्णतर झाल्याचा पुरावा आहे. आमचा खरा आत्मा पूर्णतया 'आमचा' झाला म्हणजे बाहेरच्या अनुभवांनीं आमच्या बाहेरच्या अस्तित्वांत उत्पन्न होणारी त्रिविध प्रतिक्रिया तत्काळ रूपांतर पावून, तिचे ठिकाणीं

 

पान क्र. १९६

 

आत्म्याचा नित्य आनंद प्रतीत होतो. सुख-दुःख व उदासीनता या प्रतिक्रिया आत्मदृष्टीनें अपूर्ण आणि खोट्या आहेत, त्या अपूर्ण प्रतिक्रिया बाहेर होत असतां आंतरात्मा नेहमींच त्या सर्वांचें सारखें स्वागत करतो व आपण नित्यानंदांत असतो. हाच आत्मा पूर्णपणें आम्हीं आपलासा केला म्हणजे बाह्य अस्तित्वांत देखील नित्य आनंद स्थिर होतो, सुख-दु:ख-उदासीनता या प्रतिक्रिया मुळींच होत नाहींत किंवा क्षणभरांत नाहींशा होऊन नित्यानंदाचें रूप घेतात.

मनाच्या ज्या प्रतिक्रिया असतात, त्यांत विशिष्ट संपर्काची प्रतिक्रिया सुख किंवा दु:ख होणें हें केवळ संवयीवर अवलंबून आहे, ही गोष्ट लक्षांत यावयास कठीण नाहीं. आमच्यांतील नाडीमय पुरुषाची (Nervous Being) गोष्ट निराळी आहे; त्याच्या बाबतींत प्रतिक्रिया थोडीबहुत नेहमींची ठरलेली असते, त्याच्या प्रतिक्रिया बदलूं शकणाऱ्या नाहींत असा त्याचा समज असतो, पण तो खोटा असतो. या नाडीमय पुरुषाला कोणत्याहि प्रकाराचा विजय, सिद्धि, मानसन्मान, सुदैव या गोष्टी जात्याच निरपवादपणें सुखद आहेत असें वाटतें. साखर ही जशी गोड लागलीच पाहिजे तशा या गोष्टी सुखद असल्याच पाहिजेत असें त्यास वाटतें; उलटपक्षीं कोणत्याहि प्रकारचा पराजय, असिद्धि, निराशा, अवमान, दुर्दैव या गोष्टी जात्याच निरपवादपणें दु:खद आहेत, कारलें जसें कडूच लागणार तशाच या वस्तू दु:खदच असणार, असें या नाडीपुरुषाला वाटतें. या प्रतिक्रियांत बदल करणें हें त्याच्या दृष्टीनें वास्तवापासून दूर जाणें आहे, अस्वाभाविक किंबहुना विकृत, रोगी वृत्तीचें आहे; नाडीमय पुरुष हा संवयींचा अंकित आहे, गुलाम आहे; विशिष्ट संपर्काला नेहमीं एका निश्चित प्रतिक्रियेनें मनुष्याकडून उत्तर मिळावें व संपर्कांसंबंधीं मनुष्याचा अनुभव विशिष्ट प्रतिक्रियांनींच व्यक्त व्हावा आणि त्यावरून मनुष्याच्या विश्वजीवनाशीं येणाऱ्या संबंधाचा निश्चित नकाशा तयार करतां यावा यासाठीं, या योजनेचें साधन म्हणून निसर्गानें नाडीपुरुष निर्मिला आहे. नाडीमय पुरुषाशीं तुलना करतां मनोमय पुरुष पुष्कळच स्वतंत्र आहे. कारण मनुष्यांत लवचिकपणा यावा, त्यांत बदल सुलभ व्हावा, त्यांत विविधता यावी, त्याची प्रगति सोपी व्हावी यासाठीं निसर्गानें या मनोमय पुरुषाची योजना केली आहे. हा पुरुष संवयींचा ताबेदार असला, तरी ती ताबेदारी जोंपर्यंत तो खुषीनें पत्करतो तोंपर्यंतच ती असते; त्याची इच्छा होईल तेव्हां

 

पान क्र. १९७

 

तो एक संवय टाकून दुसरी संवय लावून घेऊं शकतो; नाडीमय पुरुषाला स्वतःवर हुकमत करण्याची जोपर्यंत त्यानें मुभा दिली असेल, तोंपर्यंतच तो विशिष्ट संवयींचा गुलाम असतो; वस्तुत: नाडीमय पुरुष हा मनोमय पुरुषाचें एक साधन आहे, एक हत्यार आहे. मनोमय पुरुषाची सत्ता नाडीमय पुरुषावर चालते व चाललीच पाहिजे, ही स्वाभाविक सत्ता त्यानें न चालविण्याचें ठरविलें कीं नाडीमय पुरुषाची सत्ता त्याजवर चालू होते. वस्तुत: पराजय, अवमान, नुकसान या गोष्टींनीं मनोमय पुरुषाला दुःख झालें पाहिजे असें कांहीं त्याजवर बन्धन नाहीं; या गोष्टी आणि इतर अशा गोष्टी किंवा कोणत्याहि गोष्टी घडल्या असतां दुःख करणें किंवा त्यांजकडे पूर्णपणें कानाडोळा करणें किंवा त्यांचें मोठ्या आनंदानें स्वागत करणें ही त्याच्या खुषीची गोष्ट आहे; तो यांपैकी कांहींहि करूं शकतो. अशी वस्तुस्थिति असल्यानें मज्जातंतूव्यूह किंवा नाडीसंघ (Nerves) आणि शरीर यांची सत्ता आपल्यावर चालूं द्यावयाची नाहीं असें जितक्या प्रमाणांत मनुष्य ठरवितो व त्याच्या शारीर व प्राण-संबंधीं अंगांच्या विश्वविषयक संपर्कांशीं आणि प्रतिक्रियांशीं जितक्या प्रमाणांत तो तटस्थतेनें वागतो, तितक्या प्रमाणांत त्याचें जीवन स्वातंत्र्यसंपन्न होतें. तेव्हां, मनुष्य मनांत आणील तर बाह्य स्पर्शाची गुलामगिरी पार झुगारून देऊं शकेल आणि विश्वाच्या संपर्कांना कोणत्या प्रतिक्रियांनीं उत्तर द्यावयाचें हें तो आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार ठरवूं शकेल.

शारीरिक सुखदुःखाला वर दिलेला संवयींच्या सार्वत्रिक सत्याचा नियम लावणें थोडें अवघड आहे. कारण नाडीसंघ आणि शरीर यांचा हा खास प्रांत आहे. बाह्य संपर्क, बाह्य दडपण यांची ज्यावर स्वाभाविकपणें हुकमत चालते, त्याची वसतीची जागा, त्याचें केंद्र हा प्रांत आहे. तरीपण येथेंहि त्या सार्वत्रिक सत्याचें ओझरतें दर्शन घडते. आपण असें पाहतों कीं संवय असेल त्याप्रमाणें विशिष्ट शारीर संपर्क एकाला सुखद तर दुसऱ्याला दुःखद, एकाच मनुष्याला आज सुखद तर उद्यां भिन्न परिस्थितींत किंवा भिन्न विकासावस्थेंत दुःखद भासेल. आपण असेंहि पाहतो कीं, फार मन:क्षोभाचा किंवा फार उच्च नैतिक किंवा भावनिक ध्येयविलासाचा काळ असतांना किंवा ध्येयसिद्धीच्या फार मोठया आनंदाच्या काळांत, साधारण स्थितींत तीव्र यातना देणारे संपर्क आणि त्या संपर्काचे दुःख मनुष्याला भासत देखील नाहीं आणि

 

पान क्र. १९८

 

भासलेंच तर त्या संबंधानें तो बेफिकीरपणें वागतो, त्याची दखल घेत नाहीं. पुष्कळ उदाहरणें अशीं असतात कीं, अतिक्षोभाचा, अतिआनंदाचा काळ संपून मज्जातंतूंच्या स्वाभाविक शारीर प्रतिक्रियेला पुन: वाव मिळाला आणि त्या विशिष्ट प्रसंगीं दुःख करण्याचें मनाचें संवयीचें कर्तव्य किंवा धर्म आहे अशी मनाला आठवण करून देतां आली म्हणजे मन पुन्हां दु:ख करूं लागते; पण या संवयीच्या प्रतिक्रियेला परत वाव देणें किंवा मिळणें अपरिहार्य नाहीं. तोहि संवयीचाच प्रकार आहे, निसर्गाचा नियम नाहीं. संमोहन विद्येच्या प्रयोगांत (Hypnotism) असें दिसून येतें कीं, प्रयोगविषय झालेल्या मनुष्याला प्रयोगकाळीं अर्थात् प्रयोगनिर्मित अस्वाभाविक मनोवस्थेंत जखमेचें किंवा कापण्याचें दु:ख वाटतां कामा नये असा यशस्वी आदेश जसा देतां येतो तसा तो पुन: जागृतीवर आल्यावर देखील त्याला नेहमीच्या संवयीप्रमाणें दु:ख वाटतां कामा नये असाहि आदेश यशस्वीपणें देतां येतो. या घटनेचें कारण अगदीं सरळ आहे. नाड्यांच्या-मज्जातंतूंच्या नेहमींच्या प्रतिक्रियांची गुलाम असलेली प्रयोगविषयाची जागृतींतली नेहमींची जाणीव आपल्या मोहिनीक्रियेनें कामावरून दूर करून, हा मोहिनीप्रयोग करणारा मनुष्य तिच्या पाठीमागें खोल असलेल्या अंतर्यामींच्या मनोमय पुरुषाला विनवून कामाला लावीत असतो; हा अंतर्यामींचा पुरुष नाडीसंघ आणि शरीर या दोहोंचा मालक असून, आपल्या इच्छेनुसार तो आपली मालकी गाजवूं शकतो. अर्थात् या मालकाकरवीं जागृतींतहि, मोहिनीमुक्त झाल्यावरहि, दु:ख न करण्याचा आदेश मोहिनीप्रयोगकार प्रयोगविषयाला देत असतो. सुखदु:खांच्या प्रतिक्रियांपासून ही जी स्वतंत्रता, प्रयोगविषय झालेल्या मनोमय पुरुषाला लाभते, ती मोहिनीकाराच्या इच्छेनें, अस्वाभाविकपणें, मोहिनीनिर्मित कृत्रिम व्यवस्थेनें लाभते; ती त्वरेनें लाभते -- पण ही स्वतंत्रता ''परतंत्र'' असते, ती प्रयोगविषयाच्या खऱ्या मालकीची नसते; अर्थात् ती त्याला वाटेल तेव्हां उपलब्ध होऊं शकत नाहीं. तथापि मोहिनीकाराची इच्छाशक्ति जें घडवून आणते, तें आमची स्वत:ची इच्छाशक्तीहि घडवून आणूं शकते; अर्थात् त्याकरतां मनाला हळूहळू पाठ द्यावे लागतात. आपल्या स्वत:च्या इच्छाशक्तीनें स्वत:च्या मनाला पाठ देऊन शरीराच्या नाडीगत संवयीच्या प्रतिक्रियांवर जें प्रभुत्व मनाला प्राप्त होतें, तें त्याच्या स्वभावाचा भाग होऊन सर्वस्वीं त्याच्या मालकीचें होतें -- वाटेल तेव्हां त्याला तें गाजवतां येतें. हें प्रभुत्व पूर्ण व सर्वांगीण असेल किंवा

 

पान क्र. १९९

 

आंशिक व एकांगी असेल; तें आमच्या इच्छाशक्तीच्या कार्यक्षमतेवर व आकांक्षेवर अवलंबून राहील.

शारीर आणि मानसिक दुःख ही निसर्गाची अर्थात् आद्यशक्तीची योजना आहे. या शक्तीच्या उर्ध्वमुखी विकासक्रमांत, एक विशिष्ट संक्रमणविषयक हेतु साधण्यासाठीं ही दुःखाची व्यवस्था आहे. व्यक्तीच्या दृष्टीनें हा अनेक शक्तींचा, गुंतागुंतीचा, व्यक्तीला नाना प्रकारचे धक्के देणारा खेळ आहे. व्यक्ती म्हणजे मर्यादित अनेक घटकांचा बनलेला, बनविलेला असा जीव आहे; त्या जीवाची शक्ति मर्यादित आहे; विश्वाच्या संकीर्ण शक्तींच्या मध्यें त्याचें स्थान आहे; या विश्वशक्तींकडून त्याला अगणित धक्के बसतात; त्या धक्यांनीं त्याला जखमा होतात, त्याचा एखादा अवयव नाहींसा होतो, त्याचा देह-प्राणादि घटक-वर्ग मोडून तोडून जातो, जीर्णजर्जर होतो, शेवटीं तो ज्याला 'मी' म्हणतो त्याचाहि विनाश होतो. या सर्व गोष्टी व्यक्तीच्या बाबतींत होऊं शकतात; व्यक्तीला अपायकारक असा संपर्क किंवा धक्का यापासून शरीराला आणि नाडीसंघाला वांचविणारा व त्यापासून दूर करणारा शरीराचा आणि नाडीसंघाचा संकोचात्मक अथवा घृणादर्शक व्यापार, असें व्यक्तींच्या ठिकाणीं असलेल्या या दुःखाचें स्वरूप आहे. उपनिषदांत ज्या व्यापाराला 'जुगुप्सा' म्हणतात, त्याचा दुःख हा एक भाग आहे; आपणाहून दुसरें कोणी किंवा आपल्याशीं सहानुभूति नसलेलें, आपणाशीं विसंवादी अशा प्रकृतीचें जें कांहीं असेल, त्याच्यापासून दूर राहण्यासाठीं स्वतःच्या मर्यादित अस्तित्वाचा संकोच करणें, 'दुसऱ्यांच्या' हल्ल्याविरुद्ध, सहजप्रेरणेनें स्वसंरक्षणाची व्यवस्था करणें हा 'जुगुप्सा' शब्दाचा भावार्थ आहे. काय टाळावें तें सुचविणारी किंवा तें यशस्वीरीतीनें टाळतां न आलें, तर त्यावर उपाय करणें अवश्य आहे हें सुचविणारी निसर्गयोजना म्हणजे दुःख होय. शुद्ध जड जगतांत ही व्यवस्था नसते, असण्याचें कारणहि नाहीं, त्या जड जगतांत प्राणतत्त्व उदयास आलें म्हणजे ही व्यवस्था केली जाते; जड जगतांत दुःख टाळण्याची क्रिया यांत्रिक रीतीनें करतां येते -- जीववर्गांत यांत्रिक रीति पुरेशी नसते म्हणून 'दुःख संवेदनेची' रीति उपयोजिली जाते. जीव दुर्बळ व नाजूक शरीररचनेचा असतो. त्याची स्वतःच्या जडघटकांवरची सत्ता अगदीं तोकडी असते. म्हणून असा जीव जड जगतांत अस्तित्वांत येतांच ही 'दुःखसंवेदनेची' योजना बरोबर आणतो. जीवांत मनाचा अविर्भाव होऊन, त्याची जसजशी वाढ होत

 

पान क्र. २००

 

जाते, तसतशी त्याच्या बरोबर जन्माला आलेली व कामाला लागलेली दु:खयोजना वाढीस लागते. जोपर्यंत शरीर आणि जीव किंवा प्राण यांच्या बंधनांत मन वागत आहे, विश्वविषयक ज्ञानासाठीं व विश्वांत कृति करण्यासाठीं तें प्राणावर व देहावर अवलंबून रहात आहे, त्यांच्या मर्यादा तें स्वत:च्याच मर्यादा मानीत आहे व या मर्यादांमुळें उत्पन्न होणाऱ्या अहंमय स्वार्थी प्रेरणांना व हेतूंना शिरोधार्य मानून कार्य करीत आहे तोपर्यंत ह्या निसर्गनिर्मित दु:खसंवेदनेच्या योजनेची जरुरी असते. मनुष्याचें मन स्वतंत्र, अहंभावशून्य झालें, दुसऱ्या सर्व जीवांशीं आणि विश्वशक्तींच्या खेळाशीं जुळवून घेऊन खेळीमेळीनें राहण्याची कला त्याला साधली म्हणजे दु:खाचे नियोजित कार्य संपतें, त्याची उपयुक्तता संपते. जवळजवळ पूर्णपणें स्वतंत्र, अहंभावशून्य व विश्वमय झालेल्या मनुष्यांत जर तें दिसलें, तर त्याला जुन्या प्रकृतीचा केवळ अवशेष व संवयीचा निरुपयोगी प्रकार असें म्हणतां येईल. तरीपण नियतीच्या कार्यक्रमांत मनुष्याच्या आत्म्याचा अंतिम विजय निश्चित आहे. आज मनुष्याचा आत्मा जडाचें अंकितत्व करीत आहे; मनाच्या पातळीवरील अहंमयतेनें मर्यादित आहे. निश्चितपणें यांतून तो मुक्त होणार आहे आणि या मुक्ततेचा, या अंतिम विजयाचा एक महत्त्वाचा सारभूत घटक म्हणजे दु:खसंवेदनेचा अंतिम विलय हा असणार हेंहि निश्चित आहे.

दु:खसंवेदनांचा अंतिम विलय शक्य आहे याचें कारण मूळ अस्तित्वाचा आनंद हा सुखदु:खाच्या मुळाशीं आहे. सुख आणि दुःख दोन्हीहि या मूळ आनंदाच्याच प्रवाहांत आहेत. सुख-प्रवाह हा अपूर्ण प्रवाह आहे तर दु:ख-प्रवाह हा विकृत प्रवाह आहे. ही अपूर्णता आणि ही विकृति निर्माण होण्याचें कारण मूळ पुरुषाच्या जाणिवेचें अखंडत्व जाऊन, तिचें विभजन होऊन, त्यामुळें पुरुषाच्या आत्म्याचें विभजन झालें आहे हें आहे. मूळ पुरुषाला मर्यादा घालणारी व त्याचें मोजमाप करणारी जी माया, तिनें हें विभजन केलें आहे; या विभजनामुळें व्यक्ति व व्यक्तीचा 'मी' निर्माण झाला आहे आणि व्यक्तीच्या ठिकाणीं समग्र जाणिवेचा अभाव असल्यानें, तिला विश्वाच्या संपर्काचा अनुभव, खंडश: आणि 'मी'च्या अहंमय मर्यादित दृष्टीनें घ्यावा लागतो. हा खंडश: घेतलेला 'मी' दृष्टीचा अनुभव, मूळ आनंदाचे भिन्न भिन्न प्रवाह बनवून त्यांत कांहीं अपूर्ण व कांहीं विकृत करण्यास कारणीभूत होतो. जो आत्मा विश्वव्यापी आहे त्याला सर्व वस्तू आणि सर्व वस्तूंचे सर्व

 

पान क्र. २०१

 

संपर्क आनंदाच्या सत्त्वानें सुसंपन्न असेच वाटतात. या आनंदसत्त्वाला 'रस' म्हणतात; वस्तूंतील जीवनभूत द्रव्य किंवा सत्त्व आणि वस्तूंचा आस्वाद किंवा रुचि या दोन्ही गोष्टींना 'रस' हें नांव आहे. 'रस' हा सौंदर्यशास्त्रांतला शब्द आहे. आमचा ज्या गोष्टींशीं संबंध येतो, त्यांचा 'रस', त्यांतील आनंदसत्त्व आम्ही शोधीत नाहीं; सर्व वस्तूंत सर्व काळ असणाऱ्या आनंदसत्त्वाचें भान आम्हांला नसतें, आम्हांला आमच्या वैयक्तिक 'मी'च्या वासना, शंका, भीती, आवडीनिवडी यांचें तीव्र भान असतें आणि कोणत्याहि गोष्टीचा संबंध आला, कीं तिच्यामुळें आमच्या वासनादिकांवर काय परिणाम होतो इकडे आमचें सारें लक्ष असतें, म्हणून त्या गोष्टींतील आनंदरस आम्हांला त्याच्या स्वाभाविक स्वरूपांत प्रतीत होत नाहीं, तर तो केव्हां दुःख आणि यातना, केव्हां अल्पकालिक अल्प सुख, केव्हां औदासीन्य किंवा स्पष्ट संवेदनेची अक्षमता अशा नाना रूपांत अनुभवास येतो. आम्ही जर आमचे वैयक्तिक स्वार्थमय विचार आणि भावना पूर्णपणें दूर ठेवूं शकलों आणि आमच्या नाडीमय पुरुषावर आमची ही नितान्त निःस्वार्थता आम्हांला लादतां आली, तर आनंदरसाची विकृत आणि अपूर्ण रूपें, दुःखे आणि सुखें, हळूहळू आम्हांला नाहींशी करतां येतील आणि आमच्या आत्म्याचा स्वाभाविक धर्म असलेल्या अस्तित्वाच्या आनंदाचा खरा मूळ स्वाद विविध संपर्कांत व विविध प्रकारांनीं आम्हांला अनुभवतां येईल. कला आणि काव्य यांनीं आमच्यापुढें उभ्या केलेल्या वस्तूंचें व प्रसंगांचें आम्ही जेव्हां रसिकपणें ग्रहण करतों, तेव्हां सर्व वस्तूंत व सर्व प्रसंगांत एकच प्रकारचा नव्हे, तर विविध प्रकारचा आनंद अनुभवण्याची पात्रता, सामर्थ्य व शक्ति आमच्या ठिकाणीं थोडीबहुत असल्याचें आमच्या प्रतीतीस येतें. काव्यकृतींतील व कलाकृतींतील करुण, भयानक किंवा बीभत्स प्रसंग देखील आमच्या ठिकाणीं आनंदवृत्ति जागृत करतात; या विविध प्रसंगांतील करुण, भयानक, बीभत्स इत्यादि विविध रस आम्ही अनुभवूं शकतो व अनुभवतो. याचें कारण काव्यकृति व कलाकृति आम्ही अलिप्ततेनें बघत असतों; आमच्या वासनादिकांचा विचार, आमच्या संरक्षणाचा विचार (जुगुप्सा) त्या वेळीं आम्हांला त्रस्त करीत नसतो; केवळ समोरील चित्र आणि त्यांतील सारभूत भाग याकडेच आमचें सर्व लक्ष लागून राहिलेलें असतें. वस्तुसंपर्कांचें रसिकतेनें केलेलें हें रसग्रहण, ही आनंदप्रतीति, शुद्ध अस्तित्वानंदाच्या प्रतीतीचें अचूक प्रतिबिंब म्हणून

 

पान क्र. २०२

 

मानतां येत नाहीं. कारण शुद्ध अस्तित्वानंद हा मनाच्या क्षेत्रापलीकडील, कलातीत उच्च भूमिकेवरील अतिमानसिक आनंद आहे; या आनंदानें दुःख, भीति, भयानकता, बीभत्सता यांचा व त्यांच्या कारणांचाहि विलय होत असतो; कलेंतील आनंद असा विलय करीत नाहीं; तथापि वस्तुजातांत क्रमश: व्यक्त होतांना विश्वमय आत्म्याला जो अधिकाधिक आनंद अनुभवास येतो, त्या आनंदाची एक अवस्था अपूर्णपणें कां होईना कलानंद आमच्या प्रत्ययास आणतो, अपूर्णपणें ती अवस्था प्रतिबिंबित करतो. आमच्या स्वभावाच्या एका अंगास कलानंद मी-प्रधान संवेदनेपासून अलिप्त राहण्यास शिकवितो आणि विश्वात्मक वृत्तीहि शिकवितो. या वृत्तीमुळें आमचा एकचएक आत्मा एकाच परिस्थितींत आमच्या विभागलेल्या 'मी'हून वेगळ्या अनुभवाचा लाभ घेऊं शकतो; जेथें 'मी'ला अव्यवस्था आणि विसंवाद दिसतो, तेथेंच एकचएक आत्म्याला सुव्यवस्था, सुसंवाद, सौंदर्य प्रतीत होतें. आमच्या कलात्मक वृत्तींत आम्ही जी स्वतंत्रता व अहंमुक्तता उपभोगतों, ती जेव्हां आमच्या स्वभावाच्या सर्व वृत्तींत आमच्या वांट्यास येईल, तेव्हां आम्ही पूर्णपणें स्वतंत्र होऊं -- पूर्णपणे अहंमुक्त होऊं. आमचें ज्ञान वाढून आमचा दृष्टिकोन विश्वात्मक झाला, सर्वच वस्तूंसंबंधानें आमच्या ठिकाणीं अलिप्तता, असंगता निर्माण झाली, अनासक्ति असूनहि आम्ही आमच्या भावनात्मक व नाडीमय जीवनांत सर्वांशीं सहानुभूति ठेवून वागूं लागलों, म्हणजे आम्ही पूर्णपणें स्वतंत्र झालों व अहंमुक्त झालों असें होईल आणि आम्हांला सर्वत्र सौंदर्य प्रत्ययास येईल, सर्वत्र आनंदच आनंद लाभेल.

दु:खाचें स्वरूप, त्याचा स्वभाव आतां आपल्याला समजला. आम्हांमध्यें जी सामान्य जाणीव आहे, तिला विश्वाकडून होणाऱ्या आघातांना तोंड देण्याची, ते सहन करण्याची शक्ति नसते, म्हणून हे आघात टाळण्यासाठी किंवा हे आघात आल्यावर त्यांचा परिणाम म्हणून आमची जाणीव संकोचन पावते, आपलें अंग आंवरून घेते. हें संकोचन म्हणजे दु:ख होय. हें दु:ख होण्याचें कारण आमची आघात झेलण्याची व ते आत्मसात् करण्याची शक्ति सर्व आघातांच्या बाबतींत सारखी नाहीं; तसेंच, आमची आघात झेलण्याची शक्ति आणि आमच्यावर आघात करणारी विश्वाची स्वत:ची सर्वस्वामित्वशक्ति या दोहोंत सारखेपणां नाहीं; आम्ही आपली शक्ति 'मी' कल्पनेनें मर्यादित केलेली आहे; व विश्वशक्ति मात्र अमर्यादित आहे. आम्हीं 'मी' तंत्र होण्याचें कारण

 

पान क्र. २०३

 

आमचें खऱ्या आत्म्यासंबंधाचें अज्ञान, सच्चिदानंदविषयक अज्ञान हें होय. दु:खाचें हें स्वरूप आणि मूळ लक्षांत घेता दु:खाचें निर्मूलन कोणत्या मार्गानें होईल हें समजू शकतें. या निर्मूलनाची पहिली पायरी म्हणजे आघातप्रसंगींचें संकोचन - 'जुगुप्सा' - टाकून 'तितिक्षे'चा अंगीकार करणें ही होय. 'तितिक्षा' म्हणजे विश्वाच्या आघातांना तोंड देणें, ते सहन करून त्यांच्यावर जय मिळवणें. तितिक्षापूर्वक विजय मिळविल्यानें आम्ही हळूहळू दुसरें पाऊल टाकूं शकूं, ही दुसरी पायरी किंवा पाऊल म्हणजे 'वृत्तीची समता'. ही दोन प्रकारची असूं शकते. कोणताहि आघात असला, तरी उदासीन राहणें, आघाताचा कसलाच परिणाम स्वत:वर न होऊं देणें हा एक प्रकार, यांत सर्व आघातांना आम्ही सारखेच परिणामशून्य करतों. या उलट सर्व आघात सारख्याच आनंदानें स्वीकारावयाचे हा समतेचा दुसरा प्रकार. यापैकीं कोणतीहि समता आमची कायमची स्वाधीन होण्यासाठीं आम्ही प्रथम आमच्या 'मी' जाणिवेला (सुखदु:खबद्ध जाणिवेला) बाजूला करून, तिच्या जागीं सदानंद, सर्वानंद अशी 'सच्चिदानंद-जाणीव' पक्की केली पाहिजे. 'सच्चिदानंद-जाणीव' ही एकतर विश्वातीत किंवा विश्वापासून अलिप्त असूं शकेल; सारख्या औदासिन्यानें सर्व संपर्कांचा 'समाचार' घ्यावयाच्या मार्गानें ही दूरची आनंदावस्था प्राप्त होते; हा मार्ग संन्यास-मार्ग होय. तसेंच 'सच्चिदानंद-जाणीव,' विश्वातीत आणि विश्वमय अशी एकाच वेळींहि असूं शकेल; या सार्वकालिक व सर्वव्यापी आनंदावस्थेला पोंचण्याचा मार्ग म्हणजे समर्पण; 'मी'ने विश्वमय आत्म्याच्या स्वाधीन होणें, त्यांत विलीन होणें; सर्व संपर्कांचा सारख्याच सर्वस्पर्शी आनंदानें परामर्श घेणें हा आहे; प्राचीन वैदिक ऋषींचा हा मार्ग आहे. तथापि सुखाचे अपूर्ण संपर्क आणि दु:खाचे विकृत संपर्क, यांना सारख्याच औदासिन्यानें, तटस्थतेनें किंवा अलिप्ततेनें वागविणें ही गोष्ट आत्मनियंत्रणाचा पहिला प्रत्यक्ष व स्वाभाविक परिणाम असतो. ही गोष्ट साधल्यावर या तटस्थ वृत्तीचे रूपांतर सर्व संपर्कांचें सारख्याच 'गोडीनें' स्वागत करणाऱ्या आनंद-वृत्तींत हळूहळू घडून येऊं शकतें. सामान्यत: आत्मनियंत्रणाच्या मार्गानें साधक प्रथम सर्वत्र 'तटस्थ वृत्ति' व नंतर सर्वत्र 'आनंद-वृत्ति' सिद्ध करतो. सुख, दु:ख व उदासीन वृत्ति या त्रिमुखी स्पंदनाचें सर्वप्रेमी आनंदवृत्तींत एकदम रूपांतर करणें अशक्य नाहीं; परंतु मनुष्यप्राण्याला ही गोष्ट तितकी सोपी नाहीं. वर सांगितलेल्या

 

पान क्र. २०४

 

दोन टप्प्यांनीं हें ध्येय गांठणें त्याला अधिक सोपें असतें.

वेदान्तानें समग्रतेच्या दृष्टीनें जो सिद्धान्त प्रतिपादिला आहे, त्या सिद्धान्तावरून विश्वाचे वरील प्रकारचें दृश्य आपल्यासमोर उभें राहतें. वेदान्तानुसार एक अस्तित्व, सद्‌वस्तु आहे; ती अनंत आहे, अविभाज्य आहे. तिची शुद्ध आत्म-जाणीव पूर्ण आनंदमय आहे; ही जाणीव शक्तिरूप आहे, ही आनंदमय जाणीवशक्तीची शुद्ध निश्चल सद्‌वस्तु चलायमान होते, जाणीवशक्तीचा विविध खेळ उभा करते; प्रकृतीचा गतिमान् संसार व मायेचा खेळ उभा करते. जड भौतिक विश्वांत, तिच्या खेळाच्या पायाभूत विभागांत, जाणिवेच्या पातळीखालीं या सद्‌वस्तूचा अस्तित्वाचा आनंद असतो. तिच्या स्वतःच्या अंतरांत एकीभूत झालेला, जणुं आत्मध्यानमग्न असा तो असतो; नंतर हा आनंद एका तटस्थ वृत्तीचें, महान् सामूहिक तटस्थ स्पंदनाचें रूप घेतो; नेणिवेंतून किंचित् वर येतो; तथापि अद्यापि त्याला संवेदनेचें स्वरूप आलेलें नसतें; यानंतर मन आणि 'मी' उदयास येऊन वाढूं लागतांच हा आनंद त्रिमुखी स्पंदनाचें -- सुख-दुःख-औदासीन्याचें रूप धारण करतो; सर्वगत आनंदानें हें त्रिमुखी रूप घ्यावयाचें कारण म्हणजे रूपामध्यें, आकारामध्यें कोंडल्यामुळें त्याच्या जाणीवशक्तीचा संकोच झालेला असतो, तिला मर्यादा पडलेली असते आणि तिजवर आघात येतात ते सर्वव्यापी विश्वशक्तीचे येतात; हे आघात मर्यादित झालेल्या जाणिवेला परक्या शक्तीचे भासतात; तिचें स्वतःचें मोजमाप, प्रमाणमाप लहान झालेलें असल्यामुळें त्या मानानें तिला विश्वशक्ति अतिमहान् वाटते. तिच्याशीं या आकारबद्ध क्षुद्र शक्तीचें जुळत नाहीं आणि म्हणून विश्वशक्तीचा संपर्क तिला विसंवादी भासतो. अस्तित्वाचा मूळ आनंद याप्रमाणें भिन्न अवस्थांतून मार्ग क्रमून विश्वव्यापकता, समता, आत्मलाभ व प्रकृतीवरील विजय या मार्गानें शेवटीं मूळ सच्चिदानंद होतो. विश्वाच्या गतीचा मार्ग, प्रवाह, हा असा आहे.

आतां, असा एक प्रश्न विचारतां येण्यासारखा आहे कीं, एकच एक असें जें अस्तित्व मुळांत होतें व जें आनंदमय होतें त्याला, आपल्या अनुभवास येणाऱ्या या विश्वव्यापाराची आवश्यकता कां भासली ? त्याला अशा व्यापारांत आनंद कां वाटतो ? या प्रश्नाचे उत्तर असें देतां येतें कीं, मूळ सत् अनंत आहे. अनंत सद्रूपामध्यें अनंत शक्यता आहेत; या सद्‌वस्तूचा आनंद मूळ अक्षर अरूप स्वरूपांतहि आहे आणि क्षर,

 

पान क्र. २०५

 

बदलणारीं अशीं रूपें धारण करण्यांतहि आहे. अनंत स्वतंत्र सद्‌वस्तु कशानेंहि बांधलेली नाहीं. एकरूप वा अरूपच राहिलें पाहिजे असें कांहीं तिजवर बंधन असूं शकत नाहीं. तेव्हां अरूपाच्या पोटीं आपलें रूप विविध करण्यांत तिला आनंद होतो म्हणून ती तसें करते. ज्या शक्यता तिच्यांत आहेत, त्या अनेक प्रकारांनीं वास्तवांत आणणें यांतच साकारतेचा आनंद तिला भोगतां येतो. ज्या विश्वाचे आम्ही भाग आहोंत, तें विश्व म्हणजे त्या अनंत सद्‌वस्तूच्या पोटांतील अनंत शक्यतांपैकीं वास्तवांत आणलेली एक शक्यता होय. येथें सच्चिदानंद ही मूळ सद्‌वस्तु तिच्या अगदीं विरुद्ध स्वभावाच्या भासणाऱ्या वस्तूंत प्रथम लपते आणि शेवटीं या विरुद्धस्वभावी भासणाऱ्या वस्तूच्या पडद्यांत राहूनहि आपलें आवरणरहित स्थितींतलें मूळ सच्चिदानंदत्व प्रकट करते. अनंत असें मूळ अस्तित्व, दर्शनीं नास्तित्व भासणाऱ्या वस्तूच्या पोटी लपतें आणि तेथें पुढें अनंतत्व जणुं टाकून सांत आत्म्याच्या रूपानें प्रकट होतें. मूळ अनंत जाणीव दर्शनीं महान् रूपरेखाशून्य असलेल्या नेणिवेच्या पोटीं लपते. आणि पुढें तेथें मर्यादित उथळ जाणिवेच्या रूपानें प्रकट होते. स्वयंपूर्ण स्वप्रतिष्ठित आणि अनंत मूळ शक्ति, दर्शनीं अव्यवस्थामय अणूंच्या पसाऱ्याच्या रूपांत जणुं प्रथम नाहींशी होते आणि पुढें अस्थिर तोल असलेलें विश्व या रूपानें प्रकट होते. मूळ अनंत आनंद, दर्शनीं संवेदनाशून्य भौतिक द्रव्यांत लपतो आणि पुढें तेथें सुख-दुःख-औदासीन्य किंवा प्रेम-द्वेष-तटस्थता या त्रिमुखी बेसूर संवेदनांच्या रूपानें प्रकट होतो. मूळ अनंत एकत्व हें अव्यवस्थामय अनेकतेच्या रूपांत लपतें आणि पुढें तेथें शक्तींचा व जीवांचा संघर्ष या रूपांत प्रकट होतें. मूळ एकता परत स्थापण्यासाठीं एका जीवानें दुसऱ्याला अंकित करावें, त्याचा अंत करावा, भक्षण करावें; प्रत्येक शक्तीनेंहि असेंच करावे -- शक्तींचा व जीवांचा अशा स्वरूपाचा संघर्ष मूळ एकतेची जागा घेतो. ही अशी सृष्टि मूळ सच्चिदानंदांतूनच निर्माण होते. अशा या सृष्टींत खऱ्या मूळ सच्चिदानंदानें पुन: प्रकट व्हावयाचें आहे. या प्रक्रियेंत, व्यक्तीचें रूप घेतलेल्या मनुष्याला विश्व-समरस जीव होऊन विश्वमय जीवन जगावयाचें आहे; त्याची मर्यादित मानसिक जाणीव व्यापक होऊन अतिमानसिक एकतासंपन्न व्हावयाची आहे, जीमुळें मनुष्य सर्व चराचराला आपल्या आत्म्यांत समाविष्ट करून घेईल. आज आकुंचित व कृपण

 

पान क्र. २०६

 

असलेल्या मानवाच्या हृदयाला अनंत चराचराला आपल्या कवेंत घेण्यास व आपल्या तीव्र स्वार्थी वासना व विसंवाद टाकून सर्वांवर प्रेम करण्यास शिकावयाचें आहे. मनुष्याच्या संकुचित प्राणनिष्ठ जीवनास विश्वाचे कसलेहि आघात सहन करण्याजोगेंच नव्हे, तर कसल्याहि आघातांचें मोठ्या आनंदानें स्वागत करण्यास, सर्वत्र सर्व परिस्थितींत आनंदानुभव घेण्यास समर्थ व्हावयाचें आहे. त्याच्या शारीर जीवनास देखील सर्व जीवनाशीं भिन्नत्व नव्हे तर स्वतःचें ऐक्य अनुभवावयाचें आहे; मूळ अविभाज्य शक्तीचा सर्व ओघ स्वत:शी एकरूप मानून, त्या प्रचंड शक्तिप्रवाहाला आधारभूत होण्यासारखी शक्ति धारण करावयाची आहे. एकूण, त्याच्या वैयक्तिक रूपांत त्याच्या स्वभावाच्या सर्व अंगांत आणि एकंदर स्वभावांत, परात्पर सच्चिदानंदरूप मूळ सद्‌वस्तूची एकता, सुसंवादिता, सर्वतामय एकता आणि एकतामय सर्वता पुन: आविष्कृत केली जाणार आहे. आजच्या मानवी व्यक्तींत हें सर्व परिवर्तन व्हावयाचें आहे.

या सर्व लीलेंत सर्व परिस्थितींत गुप्त सत्य एकच आहे. तें म्हणजे सर्वदा सर्वत्र एकच एक समान असा अस्तित्वाचा आनंद. व्यक्तीच्या उदयापूर्वीं नेणिवेची सुषुप्ति असते, तेथें हा आनंद असतो; मूळ अस्तित्वाचा आनंद हा नेणिवेच्या सुषुप्तींत राहून व तेथील आनंद भोगून नंतर व्यक्तिकेन्द्रित अर्धवट जाणिवेच्या स्वप्नाचें रूप घेतो. या स्वप्नांत अनेक वळणें वळणें घेऊन मार्ग क्रमावा लागतो. या वळणांच्या गोंधळांत अस्तित्वाचा आनंद आपला स्वतःचा शोध घेत हिंडतो. या शोधाच्या खटपटींत त्याला आनंद असतो. या शोधासाठीं कराव्या लागणाऱ्या झगड्यांतहि त्याला आनंद असतो. शोधाची धडपड अनेक प्रकारची असते. कमी अधिक यश-अपयश यांनीं धडपडीला विविधता येते. शोधाची खटपट विकृतपणेंहि केली जाते, या खटपटीचें स्वरूप कधीं उच्च होते व पुन: मूळ पदावर येतें, या सर्व परिस्थितींत व परिवर्तनांत अस्तित्वानंद आनंद अनुभवतो. शेवटीं अर्धवट जाणिवेचें स्वप्न संपतें आणि व्यक्तिकेन्द्रांत पूर्ण जागृत स्थिति येते; (व्यक्तीला ही पूर्ण जागृति शेवटीं यावयाची आहे; या पूर्ण जागृतींत व्यक्ति अविभाज्य अशा सच्चिदानंद सद्‌वस्तूशीं एकरूप होणार आहे.) या जागृतींत अस्तित्वाचा आनंद हा पूर्ण जागृत व्यक्तीच्या रूपानें, अतिमानसिक पूर्ण जाणिवेनें युक्त असा, शाश्वत आत्मलाभाचा आनंद अनुभवतो. याप्रमाणें मूळ सद्‌वस्तु आनंदमय आणि तिची सर्व लीला आनंद-हेतुक व

 

पान क्र. २०७

 

आनंदमय आहे. या भौतिक विश्वांत आम्हांला जो विचाराचा दृष्टिकोन लाभलेला आहे, त्या दृष्टिकोनांतून आमच्या प्रकाशपूर्ण, बंधनशून्य व पूर्ण-मुक्त जाणिवेला एकच एक परमतत्वाच्या, परमेश्वराच्या, सर्वरूपाच्या खेळाचे जें दर्शन घडलें आहे, व जें परमतत्वानें घडविलें आहे तें हें असें आहे.

 

पान क्र. २०८

 

प्रकरण तेरावें

 

दैवी माया

 

परमेश्वर आणि प्रकाशमाता यांच्या नांवांचा उपयोग करून (त्यांच्या आज्ञेनें) मायापतींनीं त्या मातेच्या शक्तीला रूप दिलें, तिला मोजमाप दिलें. (तिला मर्यादा घातल्या.) त्या शक्तीचें विविध सामर्थ्य क्रमाक्रमानें झग्याप्रमाणें अंगावर घेऊन, मायापतींनीं या निराकार पुरुषोत्तमाचे ठिकाणीं आकार निर्माण केले.

- ऋग्वेद ३.३८.७

 

मायापतींनीं त्यांच्या मायेच्या आश्रयानें सर्व आकार तयार केले, सर्वांना रूप दिलें, या पितरांना, पूर्वजांना (मायापतींना) दिव्यदृष्टि आहे, ते पूर्वज (मायापती) त्या आकारांच्या पोटीं त्याला ठेवतात, जन्म घेणाऱ्या मुलाला ठेवावें त्याप्रमाणें; अर्थात् आकारांच्या पोटीं तो ठेवला गेला म्हणजे पुढें तो योग्यवेळीं जन्म घेतो -- साकार म्हणून उदयास येतो.

- ऋग्वेद ९.८३.३

 

आमचें वास्तव स्वरूप, आमच्या सर्व वृत्तींचें, सर्व वर्तनप्रकारांचें मूळ तत्त्व, आमचें करणें, होणें, निर्माण करणें या सर्व गोष्टींचें कारण, हेतु व साध्य एक महान् सद्‌वस्तु आहे, जी आपल्या सामर्थ्यानें कृतिशील होते आणि विविध निर्मिति करते; आणि हें सर्व स्वतःच्या जाणीवयुक्त अस्तित्वाच्या शुद्ध निर्भेळ आनंदासाठीं, आनंदाच्या प्रेरणेनें करीत असते. कवि, कलाकार, संगीतज्ञ कांहीं निर्माण करतो, तेव्हां त्याच्या अव्यक्त आत्म्यांतील कांहीं सामर्थ्य विकसित व व्यक्त करण्यापलीकडे तो वस्तुत: कांहीं करीत नाहीं; विचारक, मुत्सद्दी, यंत्रविशारद जेव्हां त्यांच्या अंतरांत गुप्तसुप्त असलेलें कांहीं आकारास आणतात, तेव्हां तें त्यांच्यापासून वेगळें असें कांहीं नसतें; आकारास येण्यापूर्वीं, आकारास आल्यानंतर तें

 

पान क्र. २०९

 

त्यांचेंच अव्यक्त वा व्यक्त रूप असतें -- ही जशी वस्तुस्थिति असते तशीच गोष्ट शाश्वत मूळ सद्‌वस्तु आणि हें विश्व यांची आहे. सर्व निर्मिति, सर्व रूप-धारण, सर्व नामरूप हें मूळ सद्‌वस्तूचें, निराकार अव्यक्त सद्‌वस्तूचें साकार होणें, व्यक्त होणें आहे, दुसरें कांहीं नाहीं. अस्तित्वांत अगोदरच असलेलें, रूपयुक्त होण्याची इच्छा नियतीनुसार धारण करणारें, रूप घेण्याचा आनंद पूर्वींच निश्चित झालेलें, असें जें कांहीं मूळबीजांत अगोदरच असेल, तेंच त्या बीजांतून वर येतें, विकसित होतें. मूळ जीव, बीजांत पुढें निर्माण होणारा जीव, अस्तित्वाची, जीवत्वाची शक्ति या रूपानें असतोच. जेथें जेथें रूप, आकार अस्तित्वांत येतो तेथें तेथें स्वतःला जाणणारी, विशिष्ट रूप स्वतःचें पोटीं धारण करणारी, आपल्या दृष्टीपासून लपलेली, शक्ति सर्वत्र असते. त्या शक्तीचे ठिकाणीं विशिष्ट रूपानें व्यक्त होण्याची अनिवार्य अशी प्रेरणा असते, अखेर या अनिवार्य प्रेरणेच्या दडपणामुळें ही शक्ति स्वतःचें विशिष्ट रूप, व्यक्त रूप धारण करते; एवढेंच कीं, व्यक्तिरूप मनुष्य आपणांतूनच सर्व कांहीं विकसित किंवा निर्माण करीत असूनहि त्याच्यामध्यें कार्य करणारी शक्ति व ज्या द्रव्याचा उपयोग कार्यासाठीं करण्यांत येतो किंवा ज्यावर क्रिया करण्यांत येतें तें द्रव्य, यांजमध्यें तो स्वत: एकता मानीत नाहीं -- हें सर्व भिन्न भिन्न आहे असें मानतो. खरी गोष्ट अशी आहे कीं, त्याच्यांत काम करणारी शक्ति तो स्वतःच असतो, ही शक्ति जिचा साधन म्हणून उपयोग करते, ती वैयक्तिक जाणीव तो स्वतःच असतो, जें द्रव्य ती वापरते, तें द्रव्यही तो स्वतःच असतो आणि या शक्तीचा वगैरे परिणाम म्हणून जें रूप, जो आकार बनतो, तें रूप, तो आकार तो स्वतःच असतो. दुसऱ्या शब्दांत हीच गोष्ट सांगावयाची, तर असें म्हणतां येईल कीं, एकच अस्तित्व, अस्तित्वाची शक्ति व अस्तित्वाचा आनंद असलेला असा आत्मा निरनिराळ्या स्थानीं स्वत:ला केन्द्रित करून, प्रत्येक स्थानासंबंधानें ''हा मी आहे'' असा वाक्प्रयोग करतो आणि त्या प्रत्येक स्थानीं स्वतःचीं निरनिराळी रूपें बनविण्यासाठीं स्वतःच्या शक्तीचा निरनिराळा प्रयोग करून काम करीत असतो.

या कार्यानें तो जें निर्माण करतो, तें अर्थांतच तो स्वतःच असतो; आणि स्वतःखेरीज दुसरें कांहीं तें असूंच शकणार नाहीं. कारण हा आत्मा आपल्या स्वतःचें अस्तित्व, स्वतःची जाणीवशक्ति व स्वतःचा अस्तित्वाचा आनंद आपल्या क्रियाव्यापारांनीं गतिमान् करून त्यांचा

 

पान क्र. २१०

 

एक विशिष्ट लीलाप्रयोग, एक विशिष्ट सुसंगत प्रयोग, एक विशिष्ट सुविकसित आकार उदयास आणण्यासाठीं धडपडत असतो. म्हणून विश्वांत जें कांहीं उदयास येतें, त्याची धडपड केवळ याचसाठीं चाललेली असते कीं, आपण अस्तित्वांत असावें, आपला नियोजित आकार आपणांस मिळावा, त्या आकारांत आपलें आत्मास्तित्व आपण विस्तृत करावें. आपल्यांत जी जाणीव व जी शक्ति आहे, ती कोणतीहि सीमा न मानतां आपण विकसित करावी, व्यक्त करावी, वाढवावी, कार्यान्वित करावी; व्यक्त रूपांत येण्याचा आनंद आपण उपभोगावा; अर्थात् विशिष्ट आकाराचा आनंद, विशिष्ट जाणीव-रागदारीचा आनंद, विशिष्ट शक्तिप्रयोगाचा आनंद आपण उपभोगावा; हा आनंद आपण वाढवावा, पूर्णतेस न्यावा व हें करतांना आपल्या खोल अंतरांत जो आत्मा (अस्तित्व-जाणीव-शक्ति-आनंदरूप आत्मा) सक्रिय झालेला आहे, त्यानें स्वतःसंबंधाची जी कल्पना सुचविली असेल, त्या कल्पनेला धरून सर्व शक्य साधनांचा सर्व दिशांनीं आपण उपयोग करावा -- कसेंहि करून वर सांगितलेला आपला त्रिविध आनंद वाढवावा व पूर्णतेस न्यावा.

विश्वांतील व्यक्तीच्या व वस्तुजाताच्या धडपडीला जर कांहीं साध्य असेल आणि पूर्णता हें जर तें साध्य असेल, तर व्यक्तीमध्यें आणि व्यक्तींनीं बनणाऱ्या मानवसमाजामध्येंहि स्वतःच्या अस्तित्वाची पूर्णता, स्वतःच्या शक्तीची आणि जाणिवेची पूर्णता, स्वतःच्या अस्तित्वानंदाची पूर्णता हेंच तें साध्य असणें शक्य आहे. विश्वांतील धडपडीचें दुसरें कोणतेंहि साध्य असणें शक्य नाहीं. पण ही ध्येयभूत पूर्णता, समग्रता, वैयक्तिक आकारांत कोंडलेल्या वैयक्तिक जाणिवेला लाभणें अशक्य आहे; असीम निरतिशय पूर्णता, सीमित साकाराचें ठिकाणीं शक्यच नाहीं. कारण सीमिताची स्वतःची स्वत:संबंधाची कल्पना, असीम पूर्णतेच्या कल्पनेला अर्थातच सर्वस्वीं विरोधी आहे. यासाठीं व्यक्तीमध्यें, सीमित जाणिवेच्या ठिकाणीं, असीम अनंत जाणीव उदयास येणें, उदयास आणणें हेंच एक व्यक्तीच्या धडपडीचें अंतिम ध्येय असलें पाहिजे; व्यक्तीनें आत्मज्ञान व आत्मप्रतीति यांच्या आधारानें आपलें मूळ स्वरूप, सत्य पुन: आपलेसें केलें पाहिजे; आपण मूळ रूपांत अस्तिवानें अनंत आहोंत, जाणिवेनें अनंत आहोंत, आनंदानें अनंत आहोंत हें तिनें ओळखलें पाहिजे आणि हा तिचा त्रिमुखी मूळ वास्तव आत्मा तिनें पुन्हां आपलासा केला पाहिजे; तसेंच आपलें सीमित रूप हें केवळ एक आवरण, विविध प्रकारच्या आविष्कारांचें

 

पान क्र. २११

 

साधन म्हणून आपण अंगीकारलें आहे, हें व्यक्तीनें पक्केपणीं जाणलें पाहिजे.

विश्वाचा जो खेळ सच्चिदानंदानें अस्तित्वांत आणला आहे, त्याचा स्वरूपधर्म पाहता असें दिसतें कीं, सच्चिदानंदानें आपलें मूळ अस्तित्व काल आणि आकाश (अवकाश) या कल्पनांच्या द्वारां अति विस्तृत करून, त्या विस्तृत आधारावर विश्वाचा खेळ उभारला आहे; या खेळांत कमी अधिक घन असें जड द्रव्य आहे, हें द्रव्य विभाज्य आहे, त्याच्या विभाज्यतेला सीमा नाहीं; या द्रव्याच्या पोटीं जाणीवयुक्त मूळशक्तियुक्त अस्तित्व, अर्थात् मूळ आत्मा लपतो, द्रव्यांत जणुं विलीन होतो -- समाधिस्थ होतो; द्रव्याची असीम विभाज्यता आत्म्याला मर्यादित व विविध आकार धारण करावयास उपयोगी पडते; जड द्रव्याच्या पोटीं चैतन्यानें -- चैतन्यशक्तीनें, आत्म्यानें लपणें हा विश्वलीलेचा पहिला अंक आहे; या लीलेच्या दुसऱ्या अंकांत, स्वतःला द्रव्याच्या पोटीं कोंडून घेणारी आत्मशक्ति प्रकट होते; साकार आत्मा, जीवयुक्त आत्मा, विचारसमर्थ आत्मा अशीं रूपें हा आत्मा प्रकट होऊन क्रमाक्रमानें घेतो; लीलेच्या तिसऱ्या अंकांत साकार विचारसमर्थ आत्मा, विचारमार्गानें प्रवास करून, शेवटीं असा साक्षात्कार संपादन करतो कीं, विश्व-खेळ खेळणारा एकच एक अनंत आत्मा मीच आहे -- याप्रमाणें अज्ञानाच्या बंधनांतून पूर्णपणें मुक्त होऊन, आरंभीं जडद्रव्यलीन झालेला आत्मा शेवटीं पुन: आपलें मूळस्वरूप, अनंत सत्-चित्-आनंदरूप प्रकटपणें साकारतेंत प्राप्त करतो; अर्थात् गुप्तपणें आजहि तो सच्चिदानंदच आहे, तो शाश्वतचाच सच्चिदानंद आहे, त्याचें वास्तव रूप सदासर्वदा, अरूप वा सरूप अवस्थेंत, सच्चिदानंद हेंच आहे व असावयाचें. असो. बुद्धीला दुर्गम असलेल्या विश्वखेळाचा सुगमतेनें बोध करून घ्यावयास या खेळाची तीन अंकांत केलेली वरील मांडणी उपयोगी पडेल. या तीन अंकांत गतिमान् सच्चिदानंदाची त्रिपदा-प्रवृत्ति समाविष्ट आहे.

जो क्रमविकासाचा आधुनिक सिद्धान्त विश्वांतील घटनांना लावण्यांत येतो, तो वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें प्राचीन वेदान्ताच्या विश्वात्मक सनातन सिद्धान्ताच्या पोटांत अंतर्भूत आहे. हा सनातन सिद्धान्त आधुनिक सिद्धान्तावर प्रकाश टाकून, त्याचा पूर्ण अर्थ आमच्या मनावर ठसवितो व त्याचें पूर्ण समर्थन करतो. आधुनिक सिद्धान्ताची पूर्ण सार्थता सनातन वेदान्ती सिद्धान्ताच्या साह्याशिवाय होतच नाहीं. जडद्रव्य आणि जडशक्ति यांच्या अभ्यासावरून आधुनिकांनीं क्रमविकासाचा

 

पान क्र. २१२

 

सिद्धान्त बसविला. पूर्ण निराकार विश्वात्मा कालदृष्ट्या क्रमाक्रमानें साकारतेंत (जडता, जीवता, विचारशीलता असा) स्वतःचा विकास करीत, मानवतेच्या आजच्या विकासावस्थेपर्यंत येऊन पोंचला आहे आणि मानव शेवटीं साकार ''व्यक्तीचा'' साकार विश्वात्मा होणार आहे किंवा विकासशील विश्वात्मा मानवाच्या आकारांत स्वतःचा पूर्ण विकास करून घेऊन, संकुचित व्यक्तित्व टाकून पुन: विश्वात्मा होणार आहे, असा सिद्धान्त प्राचीन वेदान्त्यांनीं विश्वाच्या सर्व अंगांचा अभ्यास करून प्रस्थापित केला. विश्वांतील विचारवन्त पाश्चात्यांचा नवा जडविकास-सिद्धान्त व पौर्वात्यांचा जुना आत्मविकास-सिद्धान्त दोन्ही एकत्र अभ्यासीत आहेत आणि विश्वांतील विचारसरणी आजच असें वळण घेत आहे कीं, जुनें पौर्वात्य व नवें पाश्चात्य या ज्ञानांचें मीलन झाल्यास ती गोष्ट दोघांनाहि लाभदायक आहे, कारण या मीलनानें दोघांनीं स्वतंत्रपणें प्रस्थापित केलेल्या सत्यविषयक सिद्धान्तांचा एकमेकांवर प्रकाश पडून, दोन्ही सिद्धान्तांतील सत्यांश पूर्वींपेक्षां अधिक स्पष्ट होतो.

विश्वांतील सर्व वस्तू, सर्व घटना या स्वरूपतः सच्चिदानंद आहेत, ही गोष्ट आपण शोधून काढली पण एवढ्यानें विश्वाचें स्पष्टीकरण पूर्ण होत नाहीं. विश्वाचें मूळ सत्य, अरूप रूप, आपल्याला सापडलें; पण हें मूळ अरूप सत्य आजचें विश्वाचें दृश्य रूप घेतांना कोणकोणत्या प्रक्रियांतून गेलें, तें अद्यापि आपण पाहिलेलें नाहीं. विश्वाच्या कूट प्रश्नाची गुरुकिल्ली आपल्या हातांत आलेली आहे, आतां ही गुरुकिल्ली कोणत्या कुलपांत चालतें तें पहावयाचें आहे. जादूगार आपलें जादूचें जग शब्दानें निर्माण करतो, तशी या विश्वाची किंवा विश्वांची उभारणी सच्चिदानंदानें कांहीं केवळ लहरी शब्दानें किंवा मंत्रानें केलेली नाहीं. येथें आपल्याला विशिष्ट कायदा, नियम, पद्धति, प्रक्रिया दिसते. मूळ सच्चिदानंद एकदम विश्वरूप घेत नाहीं, लहरीनेंहि घेत नाहीं -- तो मूळ पुरुष विशिष्ट कायद्यानें काम करतो.

आतां हें खरें कीं, येथें जो कायदा आम्हांला दिसतो, त्याचें विश्लेषण केल्यास आमच्या नजरेस प्रथमदर्शनीं असें येतें कीं, येथें विविध शक्तींचा समतुलनाचा खेळ चालला आहे आणि या खेळांत ज्या विशिष्ट प्रक्रिया किंवा क्रियापद्धती निश्चित होतात, त्या पूर्वयोजनेनें निश्चित होत नसून, विकासक्रियेंतील आकस्मिक व्यापार व घटना आणि अगोदरच जी शक्ति कार्यान्वित झाली आहे, तिची कार्य करण्याची सहज पडलेली

 

पान क्र. २१३

 

संवय, या दोन गोष्टींनीं निश्चित होतात. विश्वाच्या कायद्याचें हें जें स्वरूप दिसतें, तें दर्शनी व दुय्यम स्वरूप आहे. आपण जोपर्यंत केवळ शक्तीचा विचार करतों, तोंपर्यंत कायद्याचें हें दर्शनी स्वरूप त्याचें खरें अंतिम स्वरूप आहे असें आम्हांला वाटतें. पण शक्ति ही स्वयंभु सदवस्तूची स्वतःला व्यक्त करण्याची प्रवृत्ति आहे, सद्‌वस्तूचा आत्माविष्कार म्हणजे शक्ति हें आपण ध्यानांत घेतलें म्हणजे, जी कार्यपद्धति किंवा प्रक्रिया ही शक्ति अनुसरते; ती कार्यपद्धति किंवा प्रक्रिया मूळ सद्‌वस्तूच्या कोणत्यातरी निजीं-सत्याला धरून असते आणि त्या कार्यपद्धतीचें अंतिम साध्य आणि तें साधण्याचा कमी अधिक वळणाचा मार्ग हें सद्‌वस्तूचें विशिष्ट आत्मीय सत्य पूर्णाधिकारानें ठरवीत असतें, हें आपल्या लक्षांत येतें. जाणीव, ज्ञानमयता हा मूळ स्वयंभु सद्‌वस्तूचा स्वभावधर्म असल्यानें आणि ही जाणीव तिच्या शक्तीची प्रकृति असल्यानें, त्या सद्‌वस्तूचें विशिष्ट निजीं-सत्य पुरुषाचें विशिष्ट आत्मदर्शनरूप असलें पाहिजे; अर्थात् तें सत्य म्हणजे मूळ ज्ञानमय पुरुषाची स्वतःची कांहीं आंतरिक योजना असली पाहिजे, हें उघड आहे. त्याचप्रमाणें त्या सत्याची शासकता म्हणजे ज्ञानमय पुरुषाच्या ज्ञानामध्यें असलेली स्वाभाविक स्वयंशासकता होय. अर्थात् हें आत्मशासक ज्ञान स्वतःच्या शक्तीची प्रक्रिया ठरवितें व स्वतःच्या मूळ योजनेनुसार या प्रक्रियेचा मार्ग तर्कशुद्ध रीतीनें ठरवून आपल्या शक्तीला त्या मार्गानें, स्वत: निश्चित केलेल्या साध्यापर्यंत घेऊन जातें. अशी एकंदर ''शक्तीच्या प्रक्रियेची'' कथा आहे. तेव्हां, विश्वाची उभारणी सच्चिदानंदाच्या विश्वव्यापक ज्ञानानें आपल्या अध्यक्षत्वाखालीं, आपल्या मार्गदर्शकत्वाखालीं आपल्या पूर्ण पूर्वयोजनेनुसार केलेली आहे. त्याच्या विश्वात्मक ज्ञानांत स्वयंशासनाचें सामर्थ्य आहे, त्याच्या अनंत अस्तित्वाच्या स्वाभाविक आत्मजाणिवेमध्यें स्वतःमधील विशिष्ट सत्य बघण्याचें सामर्थ्य आहे; तसेंच या विशिष्ट सत्याच्या मार्गानें आपली निर्माणशक्ति, आविष्कारशक्ति चालविण्याचेंहि सामर्थ्य त्या आत्मजाणिवेमध्यें आहे.

अनंत ज्ञान, त्या ज्ञानाची एक क्रियाशील विशिष्ट शक्ति आणि नंतर विशिष्ट विश्वाचा आविष्कार अशी मांडणी वर केलेली आहे. अनंत ज्ञान आणि विश्वरचना, अनंत ज्ञान व त्याच्या क्रियाशीलतेचें फल या दोहोंच्यामध्यें त्या ज्ञानाच्या एका विशिष्ट शक्तीची योजना करण्याचें कारण काय ? अनंताची आत्मजाणीव जर स्वैरपणें रूपें निर्माण

 

पान क्र. २१४

 

करीत राहिली व त्या जाणिवेनें त्यांना विलीन होण्याचा आदेश देईपर्यंत तीं अनंतांत वावरलीं व नंतर तिच्या स्वैर आदेशानुसार विलीन झालीं, तर त्यांत बिघडेल काय ? ज्यू लोकांचा धर्मग्रंथ सांगतो : ''ईश्वर बोलला, प्रकाशानें आतां प्रकट व्हावें आणि ईश्वर असें बोलतांच प्रकाश प्रकट झाला''. आतां असें पहा कीं, ''प्रकाशानें प्रकट व्हावें, असें ईश्वर बोलला.'' असें आपण जेव्हां म्हणतो, तेव्हां आपण एक महत्त्वाची गोष्ट गृहीत धरीत असतो, प्रकाशाखेरीज इतर गोष्टींनीं दूर राहून प्रकाशानें मात्र पुढें यावें, हें अधिकारानें ठरविण्याची ईश्वराच्या ज्ञानशक्तीची एक क्रिया आपण गृहीत धरीत असतो. ईश्वराची ज्ञानशक्ति ही क्रिया करते असा आपल्या म्हणण्याचा आशय असतो. तसेंच ''आणि प्रकाश प्रकट झाला'' असें आपण म्हणतो, तेव्हां ईश्वराच्या ज्ञानशक्तीची दुसरी क्रिया -- निवडीनुसार मार्गदर्शनाची क्रिया -- आपण गृहीत धरतो. अनंत गोष्टींतून प्रकाश या गोष्टीची निवड करणें व नंतर त्या निवडलेल्या गोष्टीला योग्य मार्गदर्शन करून, तिच्या मार्गांतील विघ्नें दूर करून तिच्या ठरीव स्थानीं तिला बसविणें या ज्ञानशक्तीच्या दोन क्रिया गृहीत धराव्या, तेव्हांच ज्यू धर्मग्रंथांतील वरील वाक्य सार्थ होतें. अनंत ज्ञान अनंततेनें स्वैरपणें क्रियाशील झाल्यानें, अनंत स्वैर फलांची निष्पत्ति होणार, दुसरें कांहीं होणें शक्य नाहीं. कोणतेंहि विश्व निश्चित सत्याला किवा सत्यसंघाला धरून उभारावयाचें, त्या सत्याला किंवा सत्यसंघाला व्यक्त करण्यासाठीं उभें करावयाचें, तर असें सत्य किंवा असा सत्यसंघ निश्चित करणें व तदनुसार विश्वरचना करणें, या क्रियांसाठीं अनंत ज्ञानाच्या पोटीं विशिष्ट सान्त गोष्टीची निवड करणारी व त्या निवडीनुसार अनंतांत (अनंत निराकार सद्‌रूपांत) सान्त दृश्यरचना आकारास आणण्यास समर्थ असलेली व नियुक्त केलेली अशी एक विशिष्ट ज्ञानशक्ति असणें अवश्य आहे व अशी शक्ति अनंत सद्‌वस्तूच्या आत्मभांडारांत आहे.

या विशिष्ट ज्ञानशक्तीला वैदिक ऋषि ''माया'' म्हणत. अनंत अस्तित्वाच्या अमर्याद, अतिमहान् सत्यांतून नाम आणि रूप ग्रहण करण्याची, तें आपल्यांत सामावून घेण्याची आणि तें साकार करण्याची, ''मापून उभें करण्याची,'' अनंत जाणिवेची जी विशिष्ट शक्ति तिला वैदिक ऋषि माया म्हणत. मूळ अस्तित्व हें स्थितिशील सत्य आहे. स्थितिशील अस्तित्वाला गतिशील व्यवस्थाप्रधान अस्तित्वाचें रूप देणारी जी शक्ति, ती मायाशक्ति होय. तत्त्वज्ञानाच्या अधिक तात्त्विक भाषेंत असें

 

पान क्र. २१५

 

म्हणतां येईल कीं मूळ सर्वोत्तम अस्तित्वांत -- पुरुषांत भेदक जाणिवेचा पडदा नव्हता व सर्वच सर्वरूप होतें; त्यांत मायेनें साकार अस्तित्वपुरुष उदयास येतो व या साकार पुरुषांत प्रत्येकांत सर्व व प्रत्येक सर्वांत अशी व्यवस्था असते. या व्यवस्थेचा हेतु, एका अस्तित्वाचा दुसऱ्या अस्तित्वाबरोबर, एका जाणिवेचा दुसऱ्या जाणिवेबरोबर, एका आनंदाचा दुसऱ्या आनंदाबरोबर लीलेचा व्यवहार व्हावा हा असतो. पण हा हेतु एकदम सिद्ध होत नाहीं. प्रथम मनाचा खेळ सुरू होतो, त्यांत मायेचा भ्रम आम्हांला चकवितो -- ''प्रत्येकांत सर्व, प्रत्येक सर्वांत'' ही अनुभूति मनाचा खेळ चालूं असेपर्यंत पडद्याआड गुप्त रहाते; मन किंवा माया आमची प्रत्येकाची अशी कल्पना करून देते कीं, ''मी सर्वांत आहे. पण सर्व माझ्यांत नाहीं; आणि सर्वांत मी आहे तो अविभक्त सर्वांशीं अविभाज्यपणें एकरूप नसून विभक्तपणें आहे.'' मनाची माया संपून आणि ओलांडून आम्ही जेव्हां अतिमानसी क्षेत्रांत चढून जातों, तेव्हां आमची चूक संपते, आमचा भ्रम संपतो आणि मायेचें सत्य आमच्या अनुभवास येतें. अतिमानसी क्षेत्रांत एकमेव सत्य आणि त्याचीं अनेक प्रतीकें, अर्थात् ''प्रत्येक'' आणि ''सर्व'' एकाच वेळीं अटळपणें अस्तित्वांत असल्याचें आणि एका सत्याची आणि त्याच्या अनेक प्रतीकांची एकता अतूट असल्याचें आमच्या अनुभवास येतें. मनाची माया आज आहे, ही खालच्या प्रतीची आणि भुलविणारी माया आहे; ही आम्ही अगोदरच आपली स्वामिनी म्हणावयाची व नंतर हिच्यावर स्वामित्व मिळवावयाचें अशीं योजना आहे; या अपरा मायेच्या राजवटींत भेद, अंधार, मर्यादा; वासना, संघर्ष आणि दुःख यांनीं भरलेला खेळ ईश्वर खेळतो. स्वत:तून उदय पावलेल्या शक्तीचा तो अंकित होतो, ही शक्ति स्वत: अंधकारमय असते व या शक्तीच्या आवरणानें ईश्वर स्वत:ला झांकून घेतो. ही मनाची माया अतिमानसी मायेला आवरणरूप असते. म्हणून ती झांकलेली श्रेष्ठ माया आम्ही प्रथम बाजूला ठेवून, मनाची माया आपली करतों -- परंतु मनाच्या भ्रमवती मायेचें क्षेत्र ओलांडून आम्ही शेवटीं अतिमानसी सत्यवती माया आपली करतों -- अशी ईश्वरी योजना आहे. या श्रेष्ठ मायेच्या संसारांत, ईश्वराचा खेळ कनिष्ठ मायेच्या राजवटींतल्या खेळाहून अगदीं वेगळा असतो. येथें शक्तीचें अंकितत्व सोडून, ईश्वर मोकळा झालेला असतो, त्याचें स्वामित्व शक्तीवर चालते, ज्या हेतुकरितां ती त्याज-

 

पान क्र. २१६

 

पासून निघून कामाला लागली, तो हेतु तिला तो प्रकाशमय करून पूर्ण, सिद्ध करतो; येथें अतिमानसी मायेच्या क्षेत्रांत अस्तित्वाला मर्यादा नसतात - अनंत अस्तित्व आणि अस्तित्वप्रकार, तेजोमय ज्ञानाचे तेजस्वी प्रयोग, आत्मांकित शक्तीच्या वैभवशाली क्रिया, असीम प्रेमाचा विविध अमाप आनंद या गोष्टी अनुभवास आणून देणारा असा ईश्वरी खेळ या श्रेष्ठ मायेच्या क्षेत्रांत चालतो.

माया दोन प्रकारची आहे, कनिष्ठ माया आणि श्रेष्ठ माया. जें निराशावादी किंवा भ्रमवादी तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाला मायेचे हे दोन प्रकार आणि त्यांतील अंतर हें एकतर अज्ञान असतें किंवा या गोष्टीकडे त्याचें दुर्लक्ष झालेलें असतें. परंतु विश्वाच्या वास्तव रचनेंत हे दोन प्रकार आहेत आणि विश्वविषयक विचारांतहि हे दोन प्रकार आहेत. विचारांतील आणि वास्तवांतील हा दुवा -- दोन भिन्न मायांचें अस्तित्व हा दुवा -- दुर्लक्षित किंवा दुर्गम झाल्यानें निराशावादी व भ्रमवादी तत्त्वज्ञान अस्तित्वांत आलें आणि प्रसृत केलें गेलें. या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें मनाची माया किंवा फार तर अधिमानसी माया विश्वाची जननी आहे; आणि मनाच्या मायेनें निर्माण केलेलें विश्व हें सहजच अनिर्वचनीय अशा विरोधांनीं आणि विरोधाभासांनीं भरलेली घटना असणार; जाणिवेनें युक्त अशा जीवनाचें भयंकर, सतत बदलणारें परंतु कायमचें स्वप्न, असें या मनोनिर्मित विश्वाचें स्वरूप असणार; या अशा विश्वाला सत्यहि म्हणतां येणार नाहीं व असत्य किंवा भ्रमरूपहि म्हणतां येणार नाहीं -- भ्रमवादी तत्त्वज्ञानांत, निराशावादी तत्त्वज्ञानांत, विश्वाचें वर्णन वरील प्रकारचें येतें तें, अर्थात् त्यांची दृष्टि मनानें मर्यादित असल्यानें त्यांना साजेसेंच आहे व त्यांची दृष्टि खरी मानल्यास तें खरेंहि आहे. पण आम्हांला जें शिकावयाचें आहे, तें हें कीं, मन ही अंतिम अवस्था नाहीं, मधली अवस्था आहे -- निर्माण करणारें सर्वशासक ज्ञान (किंवा आत्मा) वरतीं आणि आपण निर्माण केलेल्या रचनांत कैद होऊन पडलेला आत्मा (किंवा ज्ञान) खालतीं आणि मध्यें मन अशी वस्तुस्थिति आहे. सच्चिदानंद परमात्मा ज्या लीला करतो, त्यांत एका कनिष्ठ लीलेंत तो आपल्या शक्तींत मग्न होऊन स्वतःला विसरतो, शक्तीहि तिच्या क्रियेनें निर्माण झालेल्या रूपांत गुप्त होते -- हा आत्मविस्मृत परमात्मा आत्मविस्मृति टाकून परत आपल्या मूळ ज्ञानरूपाकडे येतो; वरून खालीं येतांना व खालून

 

पान क्र. २१७

 

वर जातांना, मन हें एक साधन त्याला उपयोगी पडणारें आहे. निर्मितीचें कार्य वरून खालीं येत असतें -- वरून खालीं उतरणाऱ्या निर्माणकार्याचें एक साधन मन आहे; तें निर्माण करणारें ज्ञान नव्हे -- तसेंच खालून वर येण्याची जी आत्म्याची क्रिया, त्या क्रियेंत मन ही एक मधली पायरी आहे; आमचें मूळ, सर्वोच्च उगमस्थान, विश्वांतील आमच्या अस्तित्वाची सर्वोच्च अवस्था मनाच्या पुष्कळ वरतीं आहे, मन नव्हे.

मन हेंच विश्वाचें निर्माण करणारें आहे, असें कांहीं दर्शनें मानतात, कांहीं दर्शनें, विश्व निर्माण करणारें तत्त्व मनाहून वेगळें मानतात, पण या तत्त्वामध्यें व विश्वांतील रूपांमध्यें केवळ मनच मध्यस्थाचें काम करतें असें मानतात. या दर्शनांचे दोन वर्ग पडतात. रूपतत्त्ववादी (Noumenal) दर्शनें आणि कल्पनातत्त्ववादी किंवा आदर्शतत्त्ववादी (Idealistic) दर्शनें. ''विश्व हें मनाचें, विचाराचें, कल्पनेचें कार्य आहे; कल्पना स्वैररूप असूं शकेल, अस्तित्वाच्या कोणत्याहि सत्याशीं कल्पनेचा तात्विक संबंध असला पाहिजे असें नाहीं; असें कांहीं अस्तित्वाचें सत्य असेल, तर ते शुद्ध विश्वनिरपेक्ष असें असेल, ज्याच्यांत वस्तूंचे अन्योन्यसंबंध निश्चित आहेत, अशा विश्वाशीं त्याचा कांहीं संबंध नसेल, कोणत्याहि संबंधापासून तें अलिप्त असेल'': रूपतत्त्ववादी दर्शनांची विश्वविषयक कल्पना या प्रकारची आहे. समोर दिसणारें कल्पना-रूप आणि त्याच्या पाठीमागचें सत्य यांचा संबंध आहे असें कल्पनातत्त्ववादी दर्शनें मानतात; पण हा संबंध विरोधात्मक, विसंवादात्मकच असला पाहिजे असें मानीत नाहींत. येथें विश्वविषयक जो सिद्धान्त मी मांडीत आहे, तो कल्पनातत्त्ववादी असला, तरी वर्तमान कल्पनातत्त्ववादाच्या पुढें जाणारा असा आहे. या सिद्धान्तानुसार विश्व निर्माण करणारी कल्पना शून्यांतून उदय पावत नाहीं किंवा ती खोट्या, नसत्या गोष्टी निर्माण करीत नाहीं. ही विश्व निर्माण करणारी कल्पना सत्य-कल्पना आहे, ती सत्य अस्तित्वाला व्यक्त करणाऱ्या ज्ञानमय शक्तीचें एक अंगभूत सामर्थ्य आहे, ती सत्य अस्तित्वांतून उगम पावली आहे आणि सत्य अस्तित्वाचा जो स्वभावधर्म, तो या कल्पनेचा स्वभावधर्म आहे. माझ्या सिद्धान्तानुसार, विश्व निर्माण करणारी कल्पना ही आत्मज्ञानसंपन्न सद्‌वस्तु आहे. तिचा अरूप आत्मा अक्षर आणि अविनाशी आहे, या आपल्या अरूप आत्मद्रव्यांतून ती क्षर आकार निर्माण करते, अर्थात् ती स्वतःच क्षर आकार बनते -- आपल्या अक्षर आत्मद्रव्यांतून क्षर नामरूपात्मक आत्मे

 

पान क्र. २१८

 

ती निर्माण करते, अर्थात् ती स्वत: हे आत्मे बनते -- तेव्हां हें नामरूपात्मक विश्व, विश्वात्मक मनांतील स्वैर कल्पना नव्हे -- विश्वात्मक मनाच्या पलीकडे असणाऱ्या सद्‌वस्तूचें ज्ञानपूर्वक आकारास येणें आहे, एका सद्‌वस्तूनें स्वतःतून अनेक आकार बनवून, त्या आकारांत तिनें स्वत: जाणीवपूर्वक वसति केली आहे -- येथील सर्व आकारांना जाणीवयुक्त सत्य-अस्तित्वाचा आधार आहे. या आकारांच्या द्वारां तें सत्य-अस्तित्व आपलें स्वरूप व्यक्त करतें. याप्रमाणें व्यक्त झालेल्या किंवा होणाऱ्या अस्तित्वाच्या सत्याला अनुरूप, त्याशीं अनुस्यूत जें ज्ञान, तें अतिमानसी *सत्य-जाणीव या स्वरूपांत सर्वशासक असतें, तें सत्य-कल्पना व्यवस्थेनें संघटित करतें -- या सर्व सत्य-कल्पना एकमेकींशीं पूर्णतया सुसंवादी रहाव्या अशी त्यांची अतिमानसी ज्ञानाकडून सुसंघटित व्यवस्था केली जाते, व नंतर त्या सत्य-कल्पना, मन-प्राण-जडतत्त्व यांच्या सांच्यांत त्याचेकडून ओतल्या जातात. मन-प्राण-देह ही त्रिमूर्ति-जाणीव आहे, जाणिवेचेंच एक रूप आहे. परंतु तें रूप कनिष्ठ पायरीचें रूप आहे, तें सद्‌वस्तूचें व तिच्या जाणिवेचें व्यक्तीकरण आहे; पण अगदीं अल्पांशस्पर्शी असें व्यक्तीकरण आहे. विविध विकासाच्या मार्गानें स्वतःचें श्रेष्ठ रूप मिळविण्यासाठीं हें कनिष्ठ रूप झगडत असतें. मनापलीकडील अतिमानस ज्ञानामध्यें हें श्रेष्ठ रूप तयार असतेंच. त्या ज्ञानाच्या पायरीवर मूळ सत्य-कल्पना आहे. ही सत्य-कल्पना, मन-प्राण-देह ही त्रिमूर्ति, तिच्या स्वतःच्या परिस्थितीला धरून जेवढ्या प्रमाणांत व्यक्त करतां येईल, तेवढया प्रमाणांत व्यक्त करण्यासाठीं खटपट करीत असते.

आपण विकासक्रमाच्या मार्गानें खालून वर चढत आहों, तेव्हां या चढण्याच्या दृष्टीनें असें म्हणतां येईल कीं, सद्‌वस्तु, मूळ वास्तव पुरुष सर्व अस्तित्वाच्या पाठीमागें आहे; ही मूळ सद्‌वस्तु प्रथम एखाद्या आदर्श सत्य-कल्पनेचें रूप घेते. या रूपांत तिचें स्वतःशीं सुसंवादी असें एखादें सत्य

-------------------------

* ऋग्वेदांत ऋत-चित् असें एक पद येतें; सत्य चित्, ऋत चित्, बृहत् चित् किंवा सत्यं हृतं बृहत् (चित्) एवढा सगळा अर्थ ऋत-चित् पदानें दाखविला जातो : सत्यम् = अस्तित्वाच्या मूळ सत्याची जाणीव. हृतम् = क्रियाशील अस्तित्वाच्या सुसंघटित सत्याची जाणीव. बृहत् = महान् अनंत आत्म-जाणीव. महान् अनंत आत्म-जाणिवेच्या पोटींच सत्य-जाणीव आणि ऋत-जाणीव असूं शकते.

 

पान क्र. २१९

 

अंतर्भूत असतें; ही आदर्श सत्य-कल्पना बदलत जाणारें असें जाणीवयुक्त अस्तित्व -- ज्ञानयुक्त जीव उदयास आणते; हा जीव साकार सत्याचें रूप घेतो; या साकार सत्याची ओढ त्याच्या मूळ सत्याकडे अपरिहार्यपणें असते. या ओढीच्या जोरदार प्रेरणेनें हें साकार सत्य, हा ज्ञानयुक्त जीव, आपलें मूळ सत्य-स्वरूप पूर्णपणें आपलें करण्यासाठीं सामान्य क्रममार्गानें आदर्श सत्य-कल्पनेच्या (ज्या कल्पनेच्या द्वारां तो मूळ सत्यांतून दृश्य सृष्टींत अवतरला, त्या कल्पनेच्या) आश्रयानें खटपट करतो, किंवा हा स्वाभाविक सामान्य क्रममार्ग सोडून, एक तऱ्हेचें त्वेषयुक्त आंतरिक उड्डाण करून, आपलें मूळ स्वरूप तो मिळवूं पहातो. अशी ही व्यवस्था कल्पिली म्हणजे अनेक गोष्टींचा उलगडा होतो. मानवी-जीवन अपूर्ण सत्य असल्याचें मनाला दिसतें; मनोमय जीवांत पूर्णतेकडे जाण्याची किंवा पूर्णता प्राप्त करून घेण्याची स्वाभाविक आकांक्षा असते; पूर्णता आपल्या आवांक्यापलीकडे आहे असें मनाला नेहमींच वाटत असलें, तरीहि तें पूर्णतेचाच मार्ग क्रमीत असतें; ज्यांत सर्वत्र सुसंवाद अनुभवास येईल, असें आदर्श जीवन किंवा पूर्ण जीवन मनापासून लपलेलें असतें व मन त्याकडे ओढ घेत असतें, धांव घेत असतें आणि आदर्श जीवनाच्याहि पलीकडे सर्व आदर्शांचें मूळ-भांडार असलेलें जें सर्वातीत सत्य, त्याजकडे आत्मा उसळी मारून जाऊं पहातो -- वर जी व्यवस्था कल्पिली आहे, तिनें या सर्व गोष्टींचा उलगडा होतो. आमच्या जाणिवेच्या वास्तव गोष्टी, आमच्या जाणिवेची रचना, तिच्या निकडीच्या गरजा यावरून असें तर्कशुद्ध, निश्चित अनुमान करतां येतें कीं, विश्वव्यवस्थेंत मूळ सद्‌वस्तु, आदर्श सत्य-कल्पना आणि साकार जीव अशी तीन पायऱ्यांची त्रिपदी व्यवस्था आहे. एका टोंकाला केवळ निरपेक्ष सद्वस्तु आणि दुसऱ्या टोंकाला केवळ सापेक्षता-साकार, सत्य, अन्योन्यावलंबी जीवांचा पसारा -- अशी दोन पायऱ्यांची द्विपदी व्यवस्था नाहीं. या दुसऱ्या कल्पित व्यवस्थेंत दोन टोंकांच्या दोन वस्तूंचा जो अन्योन्यविरोध आहे तो मिटण्यासारखा व मिटवतां येण्यासारखा नाहीं -- आणि तो वस्तुस्थितीस सर्वस्वीं सोडून आहे.

विश्वांतील अस्तित्व उलगडून दाखविण्यास मन पुरें पडत नाहीं. मूळ अनंत जाणीवेनें प्रथम अनंत ज्ञानशक्तीचें किंवा आमच्या दृष्टीनें सर्वज्ञतेचें रूप घ्यावें लागतें. परंतु मन ही कांहीं ज्ञानाची शक्ति नव्हे, सर्वज्ञतेचें एक साधन असेंहि मनाचें स्वरूप नाहीं; ज्ञानाचा शोध

 

पान क्र. २२०

 

करण्याची शक्ति, या शोधानें जें ज्ञान लाभेल तें सापेक्ष विचाराच्या विशिष्ट सांच्यांत व्यक्त करण्याची शक्ति आणि तें ज्ञान विशिष्ट क्रियासामर्थ्य उत्पन्न करण्यासाठीं उपयोगांत आणण्याची शक्ति, अशी त्रिविध शक्ति म्हणजे मन होय. ज्ञानाचा शोध करून मनानें कांहीं सत्य हस्तगत केलें, तरी त्या सत्याचें स्वामित्व त्याला असाध्य असतें -- तें कोणतेंहि सत्य जवळ बाळगीत नाहीं, त्या सत्याचें चलनी नाणें थोडें बहुत जवळ बाळगतें -- स्मृति ही मनाची पेढी आहे, या पेढींत हें चलनी नाणें मन ठेवतें व त्याच्या गरजेनुसार हें नाणें पेढींतून तें वेळोवेळीं काढीत असतें. ज्याला सत्याची ओळख नसते, सत्याची ओळख करून घेण्यासाठीं जें धडपडतें, पण ज्याला मलिन कांचेंतून एखाद्या दृष्याचें दर्शन घडल्याप्रमाणें सत्याचें घडलेंच तर अगदीं अंधुक दर्शन घडतें तें मन. विश्वव्यापी अस्तित्वाचें सत्य मनासमोर असतें -- पण मन ज्या कार्यक्षेत्रांत वावरतें, त्या क्षेत्रांत व्यवहारोपयोगी होईल एवढाच आणि असाच अर्थ तें या विश्वव्यापी अस्तित्वाच्या सत्यांतून काढतें -- एवढीच मनाची शक्ति आहे. विश्वव्यापी अस्तित्वाला ओळखणारी, त्याला मार्गदर्शन करणारी शक्ति मन नव्हे; अर्थात् हें विश्वाचें अस्तित्व निर्माण करणारी अथवा आविष्कृत करणारी शक्ति मन नव्हेच नव्हे; ही शक्ति मन असूंच शकत नाहीं, हें उघड आहे.

आपणाला असलेल्या कोणत्याहि मर्यादा नसलेलें अनंत मन विश्वाची उत्पत्ति करतें, असें कोणी म्हटलें तर हें मान्य केलें पाहिजे कीं, अशा या मनाला विश्वाची उत्पत्ति करतां येईल ही गोष्ट खरी आहे. पण हें जें 'मन' म्हणून आम्ही कल्पितों, तें आमच्या मनाहून अगदीं वेगळें, आमच्या मनाच्या फार पलीकडलें, वस्तुत: अतिमानसिक तत्त्व आहे, हें आम्ही विसरतों. ज्याला आम्ही जाणतों, त्या मनाच्या अर्थानें मन ही संज्ञा त्या अनंत तत्त्वाला लावणेंच चुकीचें होईल. आमचें मन जसें बनलेलें आहे तशा बनावटीचें ''अनंत'' मन निर्मितीच्या भानगडींत पडलें, तर अनंत गोंधळ मात्र निर्माण करील, त्याचें ध्येय नेहमीं गोंधळाचें व अनिश्चित असणार -- या ध्येयाकडे तें चांचपडत धांवणार आणि अनेक संभवांचा, अपघातांचा, स्थित्यंतरांचा अनावर अफाट परस्परसंघर्ष असेंच आणि एवढेंच काय तें मनाच्या ''विश्वाचें'' स्वरूप असणार ! अनंत, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान् मन अशी मनाची कल्पना करणें, हें मनाच्या सर्वमान्य व्याख्येला दृष्टीआड करणें आहे. हीं विशेषणें अतिमानसिक

 

पान क्र. २२१

 

सत्यज्ञानालाच लावणें योग्य आहे. तेव्हां विश्वाची उत्पत्ति मनाकडून होणें शक्य नाहीं. तें कार्य अतिमानसिक ज्ञानाचें आहे.

आम्हांला जें मन माहीत आहे, तें प्रतिबिंब घेऊन दाखविणाऱ्या आरशाप्रमाणें आहे; अगोदरच अस्तित्वांत असलेल्या सत्याच्या अथवा वास्तव घटनेच्या, स्वतःच्या बाहेर असलेल्या, निदान स्वतःहून मोठ्या असलेल्या सत्याच्या अथवा घटनेच्या प्रतिमा, प्रतिबिंबें या मनाच्या आरशांत घेतलीं जातात. जें कांहीं दृश्य घडत असतें किंवा घडलेलें असतें, तें क्षणाक्षणाला स्वतःच्या समोर ठेवणें ही क्रिया मन करीत असतें; त्याला अशीहि शक्ति आहे कीं, जी घटना त्याच्यासमोर आली आहे, तिच्या प्रतिमांखेरीज दुसऱ्या शक्य अशा प्रतिमा स्वतःचे ठिकाणीं उभ्या कराव्या; म्हणजे जें दृश्य घडलें आहे, त्याच्या देखाव्याप्रमाणें, जें दृष्य घडूं शकेल त्याचाहि देखावा तें स्वतःचें ठिकाणीं उभा करूं शकतें -- अर्थात् त्यानें उभे केलेले भावी संभाव्य देखावे घडून येतीलच असा कांहीं त्याचा अर्थ नसतो. जें कांहीं घडलें असेल किंवा घडत असेल तेंच पुन: निश्चित घडणार अशी वस्तुस्थिति असेल, तरच मनाची तद्विषयक चितारणी खात्रींची, संभाव्य चितारणी होऊं शकते. मनाला आणखीहि एक शक्ति आहे : जें घडलें आहे आणि जें घडणे संभवनीय आहे, जी शक्यता पूर्ण झाली आहे आणि जी अपूर्ण आहे, अशा दोन गोष्टी एका ठिकाणीं करून, मन नवें कांहींतरी त्यांतून उभें करूं शकतें आणि हें नवें कांहींतरी वास्तवांत उभें करण्याच्या आधीं मन त्याचें भविष्य सांगू शकतें. हें भविष्य वर्तविल्यानंतर त्यानें योजलेली नवी रचना मन कधीं कधीं अगदीं योजनेनुसार यशस्वीपणें उभी करूं शकतें; कधीं कधीं असें करूं शकत नाहीं, परंतु सामान्यत: असें घडतें कीं, योजनेहून वेगळीच रचना त्याच्याकडून घडविली जाते; आणि ज्या हेतूनें, ज्या इच्छेनें ही रचना मन करीत असतें, तो हेतु किंवा ती इच्छा अपूर्ण राहून, ती रचना वेगळ्याच कामाला लाविली जाते.

अशा स्वभावधर्माचें मन, अनंत असेल तर असा संभव आहे कीं, तें एखादें विश्व आकस्मिकपणें उभें करूं शकेल; या विश्वांत अनेक शक्यता असतील व त्या अन्योन्यविरोधी असतील; तें अनंततासंपन्न मन या विश्वाला अशी एक वस्तु बनवील कीं, जी नेहमीं बदलत राहील, नेहमीं क्षणभंगुर असेल, नेहमीं कोठेंतरी अनिश्चितपणें वाहत जात असेल, धड सत्य नाहीं - असत्य नाहीं असें जिचें स्वरूप असेल आणि जिला कांहींहि

 

पान क्र. २२२

 

निश्चित प्रयोजन वा हेतु असणार नाहीं. सारखीं बदलणारीं अनेक क्षणिक प्रयोजनें त्या वस्तूला इकडे तिकडे सारखी खेंचीत असतील. अर्थात् त्यामुळें असल्या खेंचाखेंचींत कोणत्याहि निश्चित हेतूची पूर्तता ती केव्हांहि करूं शकणार नाहीं. ज्ञान हीच श्रेष्ठ मार्गदर्शक शक्ति असल्यामुळें, तें ज्ञानसामर्थ्य नसलेलें अनंत मन विश्व म्हणून कांहीं उभें करूं शकणार नाहीं. अशा अनंत मनाच्या कल्पना विश्वांतील रूपांच्या मुळाशीं आहेत असें शुद्धरूपतत्त्ववाद (Noumenalism) मानतो. शून्यवाद (Nihilism) भ्रमवाद (Ilusionism) किंवा अशा सारखा आणखी एखादा वाद हेंच एक असल्या रूपतत्त्ववादाचें तर्कशुद्ध फळ होऊं शकतें. रूपतत्त्ववादानुसार पाहिलें असतां, अनंत (ज्ञानशून्य) मनानें उभें केलेलें विश्व म्हणजे जी वस्तु जशी नाहीं तशी ती मनानें प्रतिबिंबित करणें, तशी ती स्वतःपुढें ठेवणें आहे, अर्थात् सदा सर्वदा शेवटपर्यंत असें विश्व म्हणजे असत्याचें प्रदर्शन असणार, जें आहे त्याचें विकृत प्रतिबिंब असणार; या विश्वांतील जीवन सर्वच्या सर्व मनाच्या अयशस्वी खटपटीच्या स्वरूपाचें असणार -- मन आपल्या कल्पना वास्तवांत पूर्णपणें आणण्याकरितां खटपट करीत रहाणार आणि नित्यश: त्याला अपयश येत रहाणार -- कारण या कल्पनांना आत्मसत्याचा सर्वशासक आधार नसतो. मन आपल्या शक्ती खर्च करीत रहाणार, त्याच्या भूतकालीन शक्तींचा दिशाशून्य प्रवाह त्याला कोठेंतरी ओढून नेत रहाणार, कांहीं निश्चित हेतूची सिद्धि अशा मनाच्या विश्वपसाऱ्यापुढें ध्येय म्हणून देखील नसल्यामुळें, कोठेंतरी कशीतरी भ्रमन्ती करीत, हें विश्व आणि तें उभें करणारें मन शेवटीं स्वतःचा नाश करून घेणार किंवा शाश्वत शांततेंत त्याचा अंत होणार आणि असा अंत त्याला नसेल, तर त्याची भ्रमन्ती शाश्वत चालणार. मनाच्या या प्रपंचाचा आमूलाग्र विचार केला, म्हणजे या प्रपंचांतून शून्यवाद आणि भ्रमवाद उभा करून तो पोसला जातो असें दिसून येईल. मनाला विश्वजनक मानावयाचें, तर या वादांतील तत्त्वज्ञान हेंच एक आमचें सांसारिक शहाणपण होऊं शकतें; जर आणि जोंपावेतों, आमच्या मानवी मनाला किंवा तत्सम शक्तीला श्रेष्ठतम विश्वशक्तीचा मान आम्ही देत राहूं, विश्वाच्या उभारणींतील मूळ योजकशक्तीचा मान देत राहूं, तर आणि तोंपावेतों आमचें संसारिक शहाणपण शून्यवाद आणि भ्रमवाद मान्य करण्यांतच आहे हें निःसंशय.

 

पान क्र. २२३

 

आमचें मानवी मन शक्तीनें संपन्न आहे; पण या शक्तीहून श्रेष्ठ अशी ज्ञानाची मूळ आद्यशक्ति विश्वांत आहे. या श्रेष्ठ शक्तीचा शोध आपल्याला लागला, कीं त्या क्षणीं वर उभी केलेली विश्वाची कल्पना आपल्या बुद्धीला अपुरी वाटते, अयथार्थ वाटते आणि म्हणून ती आपल्या बुद्धीला अमान्य व अप्रमाण होते. या वरील कल्पनेंत सत्य कांहींच नाहीं असें नाहीं; तींत सत्य आहे, पण सर्व सत्य तींतच आहे असें नव्हे. विश्व प्रथमदर्शनीं कसें दिसतें किंवा कसें दिसेल त्याचा नियम वरील विश्वकल्पनेंत आहे. परंतु विश्वाचें आद्य सत्य आणि अंतिम वास्तवता, वरील विश्वकल्पनेंतील नियमांत अंतर्भूत होत नाहीं. मन-प्राण-शरीर यांच्या व्यापाराच्या पाठीमागें कांहीं एका वस्तूचें आम्हांला दर्शन घडतें. ही वस्तु शक्तीच्या ओघाला आपल्या पोटांत वागविणारी असून, त्याजवर सत्ता चालविणारी, त्याचें नियंत्रण करणारी आहे, त्या शक्तीच्या ओघाच्या धारेंत सांपडून वाहवत जाणारी नाहीं; आपल्या अस्तित्वाच्या पोटीं या वस्तूनें विश्व निर्माण केलें आहे आणि या विश्वांत ती सर्वज्ञता भोगते -- ती विश्वाच्या पोटीं जन्म घेऊन, त्या जन्मदात्या विश्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणारी नाहीं; या वस्तूच्या जाणिवेच्या पोटीं तिचें स्वतःचें एक पूर्ण रूप वावरत असून, तें जाणिवेंतील निराकार रूप या विश्वांत ती क्रमाक्रमानें व्यक्त करीत आहे -- तिला अनावर झालेल्या भूतकालीन शक्तीच्या सर्वस्वीं आहारीं जाऊन, त्या शक्ती नेतील तिकडे वाहत जाणारी आणि अशी अगतिकपणें वाहवत असतां, आपल्यांतून स्वतःहून कांहीं वेगळी रचना उभी करण्यासाठीं बहुधा अयशस्वीपणें सदैव धडपडणारी अशी वस्तु नाहीं. मन-प्राण-शरीर यांच्या व्यापारांच्या पाठीमागें ज्या वस्तूचें दर्शन आम्हांला घडतें, ती वस्तु ही अशी आहे. मनाशीं तिची तुलना करून तिचें श्रेष्ठपण वर दाखविलें आहे. ही वस्तु विश्वाचें आद्य सत्य व अंतिम वास्तवता आहे. अगोदरच या वस्तूला स्पष्ट दिसत असलेल्या सत्याचें आविष्करण म्हणजे हें विश्व आहे; अगोदरच पुढची योजना निश्चित करणाऱ्या दिव्य संकल्पशक्तीचे-इच्छाशक्तीचे नियम हें विश्व पाळीत आहे; आद्य सत्याला स्वतःच्या ठिकाणीं जें विशिष्ट रूपविषयक दर्शन प्रतीत होतें, त्या दर्शनानुसार या विश्वांत रूपरचना प्रत्यक्षांत येत असते; जी दिव्य सृष्टि अगोदरच तयार असते, तिची क्रमाक्रमानें वाढत जाणारी प्रतिमा म्हणजे हें विश्व होय.

 

पान क्र. २२४

 

आमचें मन दृश्याच्या शासनाखाली काम करणारें आहे. जोंपावेतों या मनाच्या चालीनें आम्ही चालत असतों, तोंपावेतों सर्व दृश्याच्या व मन-प्राण-शरीर यांच्या व्यापाराच्या पाठीमागें, त्यांच्या पलीकडे आणि त्याबरोबर या सर्वांत, सर्वदा सर्वत्र भरून राहिलेलें तत्त्व आम्हांला अनुमानानेंच जाणावें लागतें, त्याचें अस्तित्व आम्हांला अगदीं अंधुकपणेंच प्रतीत होऊं शकतें. आम्हांला दृष्यांत व आमच्यांत प्रगति दिसते, वळणावळणानें, चक्राकार गतीनें ही प्रगति चाललेली आमच्या नजरेस येते आणि त्यावरून आम्हीं असें अनुमान करतो कीं, अगोदरच माहीत असलेल्या कसल्यातरी वस्तूची कोठेंतरी पूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे आणि ही वस्तु अवश्य अधिकाधिक पूर्ण होणार आहे. आम्हांला चोहोंकडे कायदा काम करतांना दिसतो आणि हा कायदा आत्मतत्त्वाच्या अस्तित्वावर आधारलेला, आत्मतत्त्वांतून निघालेला आहे असें दिसते; या कायद्याचें काम आंतून बारकाईनें पाहिलें, त्या कामांत दिसून येणारी कार्यकारणदृष्टि तपासली म्हणजे आपल्या लक्षांत येतें कीं, हा कायदा विश्वरूपानें व्यक्त होणाऱ्या, आत्मतत्त्वांत स्वभावत: असलेल्या ज्ञानाचें प्रकट रूप आहे आणि हें आत्मतत्त्व किंवा मूळ अस्तित्व ज्या शक्तीच्या द्वारां व्यक्त होतें, त्या शक्तीच्या कार्यांत हा कायदा तिचा अंगभूत म्हणून तिचें नियंत्रण करतो; तो ज्ञानानें बनविलेला असून प्रगतीला साहाय्यक होईल अशा तऱ्हेनें बनविलेला आहे. त्या कायद्यावरून असें अनुमान निघतें कीं, आमची व विश्वाची गति, चाल ज्या दिशेनें चालू  आहे, ती दिशा विश्वजनक दिव्य सत्तेनें ठरविलेली आहे आणि या सत्तेनें अगोदरच जें अंतिम साध्य आम्हांसाठीं व विश्वासाठीं ठरविलें आहे, त्या साध्याच्या दिशेनें आमची व विश्वाची वाटचाल चालूं आहे. आपल्या हेंहि लक्षांत येतें कीं, आमचें जें मन अगतिकपणें वहात जात असतें, त्या मनामधून बुद्धि बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि बाहेर आल्यावर त्या मनावर सत्ता चालविण्याच्या व त्याची अगतिक गति आपल्या स्वत:च्या धोरणानें ठरविण्याच्या कामांत ती मग्न होते. पुढें आमच्या प्रतीतीला असें येतें कीं, आमची बुद्धि मनाला मार्गदर्शक होत असली, तरी ती कांहीं स्वयंसिद्ध नाहीं -- ती केवळ दूताचें, प्रतिनिधीचें काम करणारी आहे, तिच्याहून श्रेष्ठ अशी जाणीव तिच्यापलीकडे आहे -- या श्रेष्ठ जाणिवेचें प्रतिनिधित्व, दूतकार्य बुद्धि करीत असते, या जाणिवेच्या छायेप्रमाणें ही बुद्धि आहे -- ती जाणीव बुद्धीप्रमाणें

 

पान क्र. २२५

 

बुद्धिवाद करून सत्य-स्थापना करीत नाहीं. तीच सर्व असल्यानें आणि जें जें आहे तें तें मी आहे अशी नित्य प्रतीति तिला असल्यानें, तिला बुद्धिवाद करून कोणत्याहि गोष्टीचें ज्ञान करून घेण्याचें कारण पडत नाहीं. या स्वयंभू सर्वरूप ज्ञानापर्यंत आपण पोंचल्यावर आपल्याला असें अनुमानतां येतें कीं, बुद्धीचें हें उगमस्थान आणि विश्वांत कायदा म्हणून शासन-व्यवहार करणारें ज्ञान ह्या दोन्हीं एकच वस्तु आहेत. हें ज्ञान आपला स्वतःचा कायदा पूर्णाधिकारानें, सार्वभौमत्वानें ठरविते; कारण, होऊन गेलेलें, विद्यमान असलेलें आणि भविष्यकाळीं घडणारें सर्व त्याला ज्ञात असतें. त्याला असें ज्ञान असण्याचें कारण तें स्वत: शाश्वत आहे, सार्वकालिक आहे आणि स्वतःचें त्याचें ज्ञान असीम व अनंत आहे. जें अस्तित्व, आत्मतत्त्व अनंत ज्ञानरूप आहे, जें अनंत ज्ञान सर्वसमर्थ शक्तिरूप आहे, तें एखादें विश्व -- अर्थात् स्वतःची एक सुरेल सुसंवादपूर्ण अमूर्त ''मूर्ति'' -- आपल्या जाणिवेचा जेव्हां विषय करतें, तेव्हां तें आपल्या विचारशक्तीला विश्वास्तित्व, विश्वात्मतत्त्व म्हणून प्रतीत होतें -- स्वतःचें सत्य या आत्मतत्त्वाला विदित आहे आणि स्वतःला विदित असणारें स्वतःचें जें सत्य तें नाना आकारांच्या द्वारां दृष्य सृष्टींत दाखल करतें, तें सत्यहि आमच्या विचारशक्तीला विश्वात्म-तत्त्वाचा स्वभाव म्हणून प्रतीत होतें.

पण विचारद्वारां येणारी प्रतीति वेगळी आणि प्रत्यक्ष अनुभूति वेगळी. आम्ही बुद्धिवाद करण्याचें सोडून, जेव्हां आमच्या अंतरांत खोल खोल उतरतों आणि जेथें मनाची धडपड शांत होते, अशा गुप्त स्थानीं पोंचतों, तेव्हांच बुद्धीहून श्रेष्ठ अशी अनंत आणि विश्वरूप जाणीव तेथें खरोखरी आमच्या प्रत्यक्ष अनुभवास येते; अर्थात् आम्हांला मानसिक प्रतिक्रियेची, मानसिक कोंडीची मर्यादितपणाची फार काळाची संवय असल्यानें, ही प्रत्यक्ष अनुभूति थोडीबहुत अपूर्णच असते; तथापि पूर्वीं बुद्धीच्या मंद आणि अस्थिर प्रकाशांत ज्या गोष्टी आम्ही विचारानें जाणून घेऊनहि ज्यांच्याविषयी कांहींसा संशय आमच्या बुद्धींत कायम राहिला, त्या गोष्टी या प्रत्यक्ष अनुभूतीनंतर अधिकाधिक उज्ज्वल प्रकाशांत आम्हांला स्पष्टपणें विदित होऊं शकतात आणि त्यांच्या विषयींचा आमचा संशय पार नाहींसा होतो. मन आणि बुद्धि यांच्या युक्तिवादाच्या पलीकडे खरें ज्ञान आहे. हें ज्ञान जिज्ञासूंची वाट पहात आपल्या सिंहासनावर बसलेलें आहे; हें सिंहासन अतिमहान् तेजोमय प्रदेशांत आहे; या

 

पान क्र. २२६

 

प्रदेशांत ज्ञानाला सर्व दिशांकडे आत्मदर्शन घडतें, या दर्शनाला कोणत्याच दिशेला सीमा असत नाहीं, या दर्शनाला कालाचीहि सीमा नसते.

(दिक्कालाद्यनवच्छिन्नानंत चिन्मात्र मूर्तये ।

स्वानुभूत्येकमानाय नम: शान्ताय तेजसे ।। -- भर्तृहरि)

 

पान क्र. २२७

 

प्रकरण चौदावें

 

अतिमानस हें सृष्टीची उभारणी करतें.

 

ईश्वरी ज्ञानानें स्वतःचें केलेलें विविध आविष्करण म्हणजे विश्वांतील सर्व वस्तु व घटना होत.

- विष्णु पुराण २.१२.३९.

 

मूळ निश्चल आत्मैकतुष्ट एकतत्त्व आणि अनेक चंचल वस्तूंचा हा विश्वांचा पसारा या दोहोंमध्यें एक मध्यगामी शक्ति आहे, मध्यवर्ति अस्तित्वदशा आहे. हें मध्यस्थ अस्तित्व आणि सामर्थ्य म्हणजे मन नव्हे, तर मनापेक्षां श्रेष्ठ, मनापलीकडे असणारें, क्रियाशील संकल्पाचें (इच्छाशक्तीचें) आणि ज्ञानाचें तत्त्व होय. या तत्त्वानें विश्वाचा पसारा निर्माण केला आहे. सृष्टीची उभारणी करण्याचें काम, या ज्ञानाचें, या अतिमानसिक विज्ञानाचें आहे. हें विज्ञानाचें तत्त्व आम्हांला अगदींच परकें आहे असें नव्हे; आम्हांहून अगदीं वेगळा असा एक आत्मा आहे आणि त्याच्या एकट्याच्या मालकीचें हें तत्त्व त्याजपाशीं असून त्याला तें इतरांना देतां येण्यासारखें नाहीं अशी स्थिति नाहीं; किंवा अशीहि गोष्ट नाहीं कीं, एक अस्तित्वाची अवस्था आहे, जेथें हें तत्त्व स्वभावत: असतें, जेथून गूढ रीतीनें आम्हांला बाहेर काढून जन्माला घालण्यांत येतें पण ज्या ठिकाणीं आम्हांला परत जातां येत नाहीं, परत येऊं दिलें जात नाहीं -- अशी अस्तित्वाची अवस्था नाहीं. ही गोष्ट खरी कीं, हें विश्वनिर्मायक तत्त्व आमच्या वरतीं, फार फार उंचावर असलेल्या प्रदेशांत प्रतिष्ठित असल्याचें आम्हांला दिसतें -- पण हा उंचावरचा प्रदेश आम्हांला परका नाहीं; आमच्या अस्तित्वाचाच तो भाग आहे आणि आम्हांला तेथें जातां येतें, वावरतां येतें ही गोष्टहि तितकीच खरी आहे. तें महान् सत्य आम्हांला केवळ अनुमानानेंच जाणतां येतें, त्याचें केवळ ओझरतेंच दर्शन आम्हांला

 

पान क्र. २२८

 

घडतें असें नव्हे, तर आम्हांला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतां येतो, तें आमचें स्वतःचें करण्याची शक्ति आम्हांत आहे. या सत्याच्या उंच प्रदेशीं चढून जावें असें आम्हांला वाटल्यास आम्ही तसें करूं शकतों, आम्ही आमचा क्रमाक्रमानें विकास करीत तेथें जाऊं शकतों किंवा ज्ञानाच्या प्रकाशाचा एकदम संस्कार घडून आम्ही आमच्या प्रस्तुत आत्मावस्थेंतून तत्काल वर चढून त्या प्रदेशांत तांतडीनें पाऊल टाकूं शकतों; हें आमचे त्या प्रदेशांत पाऊल टाकण्याचे क्षण आम्हीं एकदां अनुभवल्यानंतर ते आम्ही कधींहि, केव्हांहि विसरू शकत नाहीं; आम्हांला वाटल्यास आम्ही त्या उंच प्रदेशीं कांहीं तास, कांहीं दिवस घालवूं शकतों -- सामान्य मानवाच्या वांट्याला कधींच येणार नाहीं असा सर्वश्रेष्ठ दिव्य अतिमानवी अनुभव या तासांत, या दिवसांत आम्हांला सारखा येत असतो. या उंच प्रदेशावरून आम्ही परत खालीं उतरलों म्हणजे आमचा या प्रदेशाशीं संबंध तुटलाच पाहिजे असें नाहीं; आमचा प्रदेश आणि तो उंच प्रदेश जोडणारे दरवाजे आम्ही नेहमीं उघडे ठेवूं शकतों, किंवा ते सारखे बंद होत राहिले, तर पुन: सारखे उघडे करूं शकतों. आमची क्रमाक्रमानें विकास पावणारी जी मानवी जाणीव आहे, तिचें ध्येय आत्मलय नसून आत्मपूर्णता असेल, तर तिच्यासमोर सर्वोच्च अंतिम साध्य हेंच आहे कीं, वर वणिलेलें जें निर्मित आणि निर्मायक अस्तित्वाचें उंच आणि शेवटचें शिखरस्थान आहे, त्या स्थानावर तिनें कायम वस्ती करावी. हें शिखरस्थान म्हणजेच एकमेव मूळ सत्यानें सृष्टि-निर्माणासाठीं पुढें केलेली मूलभूत सत्य-कल्पना होय; हेंच स्थान विकासगम्य अंतिम सत्य व अंतिम सुसंवादपूर्ण अस्तित्व होय; येथूनच आम्ही विश्वांत उतरलों आणि विश्वांत आम्ही जें क्रमवार आत्म-आविष्करण करीत आहों, त्या आविष्करणाच्या द्वारां आम्हांला येथेंच पोंचावयाचें आहे; आमच्या आत्माभिव्यक्तीचें पूर्वनियत साध्य हेंच आहे.

तथापि अशी शंका आम्हांला येणें वाजवी आहे कीं, मानवी बुद्धीला उमजेल अशा रीतीनें या उच्च अवस्थेची माहिती देणें आज किंवा केव्हांतरी शक्य आहे काय ? अशीहि शंका येणें रास्त आहे कीं, या उच्च अवस्थेंतील दिव्य व्यापार आमचें मानवी ज्ञान व मानवी कार्य उन्नत करण्यासाठीं उपयोगांत आणतां येतील किंवा नाहीं, त्यांच्या अशा उपयोगासाठीं कोणालाहि वापरतां येण्याजोगा मार्ग तयार करणें शक्य

 

पान क्र. २२९

 

 

आहे किंवा नाहीं ? असा संशय येण्याचें कारण कीं, या दिव्य शक्तीचें मानवी व्यवहारांतील कार्य दाखविणाऱ्या ज्या घटना आमच्या नजरेस आणल्या जातात, त्या एकतर फार विरळा घडतात व दुसरें, त्या घटना संशयातीत नसतात; तसेंच या दिव्यशक्तीचें कार्य आणि आमचें सामान्य मानवी, तपासण्यासारखें ज्ञान व अनुभव या दोहोंत फार फार अंतर आहे; पण या कारणांपेक्षां आमच्या संशयाचें जास्त प्रभावी कारण हें आहे कीं, मानवाचें मन आणि ईश्वरी दिव्य विज्ञान यांत त्यांच्या आंतर प्रकृतींच्या दृष्टीनें आणि त्यांच्या बाह्य व्यापारांच्या दृष्टीनें तीव्र अन्योन्यविरोधित्व आम्हांला प्रथम दर्शनीं तरी स्पष्ट दिसत आहे.

ही दिव्य विज्ञानाची, अतिमानसाची जाणीव आणि मानवी मन यांचें जर कांहींच नातें नसतें, मनोमय पुरुषाशीं (mental being) या जाणिवेचें कोठेंहि, कसलेंहि ऐक्य नसतें, तर आमच्या मानवी कल्पनाशक्तीला समजेल अशा रीतीनें या दिव्य जाणिवेचें कसलेंहि वर्णन देतां येणें अशक्य झालें असतें. तसेंच, हें दिव्य विज्ञान जर स्वभावत: 'केवळ ज्ञानाची दृष्टि' या स्वरूपाचें असतें आणि त्यांत ज्ञानाची क्रियाशील शक्ति नसती, तर या विज्ञानाच्या संपर्कानें आम्हांला मनाची प्रकाशमय आनंदमय स्थिति फक्त अनुभवतां आली असती, त्या संपर्कापासून विश्वांतील व्यवहारासाठीं आजच्याहून थोर प्रकाश व सामर्थ्य आम्हांला लाभलें नसतें. परंतु ही दिव्य विज्ञानशक्ति विश्वाची जननी आहे; अर्थात् ती केवळ निष्क्रिय ज्ञानावस्था नव्हे, ती ज्ञानाची क्रियाशील अवस्थाहि आहे; ती केवळ प्रकाशविषयक आणि दर्शनविषयक इच्छा नाहीं, तर सामर्थ्यविषयक आणि क्रियाविषयक इच्छाहि आहे. या विज्ञानशक्तीनें विश्वाची जी निर्मिति केली, तिचा एक भाग मनाची निर्मिति हा आहे. स्वतःच्या सामर्थ्याला स्वतःच मर्यादा घालून, मनाची निर्मिति विज्ञानानें केलेली आहे. विज्ञान स्वत: सर्वश्रेष्ठ, एकमेवाद्वितीय चैतन्याची मूळ क्रियाशक्ति आहे. विश्वनिर्मितिसाठीं ही शक्ति त्यानें स्वत:मधून उभी करून पुढें केली. विश्व आणि तें चैतन्य यांच्यामध्यें मध्यस्थाचें काम ही विज्ञानशक्ति करते. मनाचे आणि विज्ञानाचे (Supermind) वास्तवांतील आकार-प्रकार कितीहि भिन्न असले, त्यांच्या क्रियाव्यापारांच्या ठाम झालेल्या रीती कितीहि भिन्न असल्या, नव्हे त्यांत कितीहि अन्योन्यविरोध दिसत असला, तरी मनाची आणि विज्ञानाची आंतरप्रकृति एकच आहे आणि मनाच्या पोटीं विज्ञानाची शक्यता

 

पान क्र. २३०

 

गुप्तपणें भरलेली आहे. तेव्हां आमच्या बुद्धिप्रधान ज्ञानाच्या शब्दांत आणि त्याच्याच दृष्टीनें साम्य आणि वैषम्य दाखवून, जिज्ञासूंस या विज्ञानाची कांहीं कल्पना आणून देण्याचा प्रयत्न करणें खात्रीनें गैरफायद्याचें किंवा गैरवाजवी होणार नाहीं. ही जी कल्पना आम्ही आणून देऊं इच्छितों, ती कल्पना, जे शब्द आम्ही वापरणार ते शब्द, विज्ञानभूमीचें यथार्थ ग्रहण होण्यास अपुरे पडतील, ही गोष्ट शक्य आहे. तथापि मार्गदर्शक तेजोमय अंगुलीप्रमाणें त्यांचा उपयोग निश्चित होईल. त्यांच्यायोगें आम्हांला आमचा पुढचा मार्ग कांहीं अंतरापर्यंत तरी स्वच्छ दिसेल व तेवढा मार्ग आम्ही चालून जाऊं शकूं. मनाला विज्ञानाच्या उंचीवर चढणें अवघड असलें, तरी विज्ञानाच्या खालीं आणि सामान्य मनाच्या वर कांहीं ज्ञानभूमिका आहेत, तेथें मनाला फार प्रयास न करतां चढून जातां येतें. विज्ञानभूमींतील ज्ञानाचें सामर्थ्य आणि प्रकाश, कांहीं बदल होऊन या ज्ञानभूमीवर उतरत असतो; या प्रकाशाचें व सामर्थ्याचें प्रभावी कार्य मनाला अभूतपूर्व उज्ज्वल ज्ञान, स्फूर्ति, साक्षात्कार, संस्पर्श यांच्याद्वारां प्रतीत होतें. तथापि या उच्च ज्ञानभूमीवर वस्ती करून, तेथून विश्वाकडे पाहण्याची व विश्वांत कार्य करण्याची पात्रता अद्यापि मानवी मनाला लाभलेली नाहीं.

विज्ञानभूमीचें ज्ञान आमच्या बुद्धीला होईल असा प्रयत्न करावयाचे बाबतींत प्रथम, आमच्या प्राचीन ज्ञानाला विचारून, तेथें या अ-शोधित ज्ञानविभागासंबंधानें कांहीं मार्गदर्शक प्रकाश मिळतो कां तें पाहिलें पाहिजे. आम्हीं या विभागाला अतिमानस किंवा विज्ञान (Supermind) असें नांव दिलें आहे. अतिमानस म्हणजे मनाच्या श्रेष्ठ पातळीच्याहि वर असलेली ज्ञानभूमि; मनांत मूलभूत बदल केल्यानेंच प्राप्त होऊं शकेल अशी ज्ञानभूमि. ती मनाच्या पलीकडे असल्यामुळे तिला 'अतिमानस' म्हणतां येऊं शकेल. तथापि 'अतिमानस' या शब्दानें शेवटली ज्ञानभूमि, एकमेवाद्वितीय सच्चिदानंदाची भूमि समजावयाची नाहीं; असो. अतिमानसाचें थोडेसें स्पष्ट वर्णन केल्यानें, त्याचें बरोबर स्थान कोणतें, 'अतिमानस' या शब्दाला अर्थदृष्ट्या कोणती मर्यादा घातली पाहिजे हें लक्षांत येईल.

आमच्या वेद-वाङ्मयांत कांहीं गूढ भाषा असलेले मंत्र आहेत, ऋचा आहेत. या ऋचांत गूढपणें दिव्य अनश्वर अतिमानसाचें तारक ज्ञान भरलेलें आहे. या ऋचांतील गूढाच्या पडद्यांतून बाहेर पडणारे

 

पान क्र. २३१

 

कांहीं तरल प्रकाशाचें उज्ज्वल किरण आमच्या बुद्धीला मार्गदर्शक होतात. या तरल प्रकाशाच्या साह्यानें आम्हांला गूढ वेदवचनांतील अतिमानसाची कल्पना आत्मसात् करतां येते. ती कल्पना अशी आहे : अतिमानस ही ज्ञानभूमि अति महान् आहे, आमच्या सामान्य मानसिक जाणिवेचें आकाश अलीकडे आहे. त्याच्या पलीकडे अतिमानसाचें अति महान् आकाश आहे, या अतिमानसिक ज्ञानाकाशांत अस्तित्वाचें सत्य आणि हें अस्तित्व व्यक्त करणारे सर्व कांहीं अभिन्न आहे, एक आहे आणि प्रकाशमय आहे; तेथें अस्तित्व जितकें सत्य असतें, तितकेंच वस्तुदर्शन, आकार, व्यवस्था, शब्द, कृति, गति, गतीचे फल, कृतीचें आणि आविष्कृतीचें फल हेंहि सर्व सत्य असतें, तेथील कायदा हा कधींहि चूक न करणारा असतो -- तेथें ही सर्व सत्यता स्वाभाविक आणि अटळ अशी आहे. वेदांतील अतिमानसाच्या वर्णनांत जो सारभूत भाग -- जी सारभूत शब्द योजना आहे, ती अशी : ''अतिमानसांत सर्व कांहीं सामावलेलें आहे, अतिमहान् सर्वसमावेशकता हा अतिमानसाचा एक विशेष आहे. या अतिमहान् विस्तारांत अस्तित्वाचें प्रकाशमय सत्य, अस्तित्वाचा प्रकाशमय सुसंवाद आहे. तेथें गोंधळ नाहीं, अस्पष्टता नाहीं, आत्मविस्मृति नाहीं, अज्ञान नाहीं; तेथें अस्तित्वाचें सुसंवादपूर्ण सत्य जसें आहे, तसेंच तें व्यक्त करणारें कायद्याचें, कृतीचें व ज्ञानाचेंहि सत्य आहे'' -- अतिमानसाचें वैदिक वर्णन हें असें आहे. वेदांत देवदेवता आहेत. अतिमानसाच्या (विज्ञानाच्या) विविध शक्ती हेंच या देवांचें श्रेष्ठ गूढ स्वरूप आहे. हे देव अतिमानसापासून जन्म घेतात. अतिमानस हें त्यांचें खरें धाम, वसतिस्थान आहे, तेथें ते राहतात; त्यांचें ज्ञान 'सत्यदर्शी,' त्यांचें कार्य 'दर्शित्वसंपन्न संकल्पाचें' असतें. देवांची जाणीव-युक्त शक्ति जेव्हां कृति करण्याकडे, निर्मिति करण्याकडे वळते, तेव्हां जें कांहीं करावयाचें असेल, निर्मावयाचें असेल त्याचें प्रत्यक्ष पूर्ण ज्ञान, त्याचें अंतःस्वरुप, त्याचा कायदा, यांचें प्रत्यक्ष पूर्ण ज्ञान या देवांना असतें व तेंच त्यांना मार्गदर्शक होतें. या ज्ञानामुळें त्यांची संकल्पशक्ति पूर्णपणें परिणामकारक बनते; ती आपला मार्ग चालतांना किंवा परिणाम घडवितांना किंचितहि चांचपडत नाहीं; किंवा इकडे तिकडे ढळत नाहीं. तिच्या सत्य-दृष्टीला जें करावयाचें म्हणून दिसतें, तें ती कृतींत अटळपणें आणि स्वाभाविकपणें यशस्वीं करून टाकते. या देवांच्या बाबतींत, या अतिमानसाच्या क्षेत्रांत,

 

पान क्र. २३२

 

शक्ति आणि ज्ञान यांच्यांत अभेद असतो; इच्छाशक्तीचा ताल आणि ज्ञानाचें स्पंद एकरूप असतात आणि इच्छा व ज्ञान दोन्हींहि परिणामाशीं एकरूप असतात. ही एकरूपता अर्धवट नसते, तर परिपूर्ण असते; परिणाम अगदीं खात्रीनें, इच्छेनुसार होतो आणि हा परिणाम घडवितांना इच्छाशक्तीला व ज्ञानाला आयास करावें लागत नाहींत. परिणामाची 'ज्ञान-इच्छा' या जोडीशीं एकरूपता होण्यासाठींहि  कसलेच कष्ट पडत नाहींत. ईश्वरी प्रकृतींत दोन प्रकारची शक्ति आहे. जी वस्तु व्यक्त व्हावयाची असते, ती आपल्या सारभूत सत्त्वांतून आपला विशिष्ट आकार आणि आपल्यांतील घटकांची विशिष्ट व्यवस्था स्वभावत: स्वयंस्फूर्तीनें घेऊन व्यक्त होते; तिच्यांत जें मूळ सत्य असतें, तें या विशिष्ट आकारानें आणि व्यवस्थाप्रकारानें व्यक्त केलें जातें. याप्रमाणें आकार आणि अंत:संघटनविषयक स्वयंस्फूर्त स्वयंकारिता ही एक दिव्य प्राकृतिक वस्तूची शक्ति आहे; दुसरी शक्ति ज्ञानाचें आत्मगत सामर्थ्य; जी वस्तु व्यक्त व्हावयाची असते, तिच्यांत स्वभावत: हें आत्मसामर्थ्ययुक्त ज्ञान असतें; ती वस्तु या ज्ञानामुळें सहज स्वयंस्फूर्तीनें आपलें अटळ अंत:संघटन व अंतर्व्यवस्था करून घेते.

वरील सारभूत गोष्टीखेरीज कांहीं गौण परंतु महत्त्वाच्या अशा तपशिलाच्या गोष्टी वैदिक ऋषींनीं सांगितल्या आहेत. जो आत्मा सत्यदर्शी, सत्यज्ञानी असतो, त्याच्या ठिकाणीं दोन प्राथमिक शक्ती आढळतात असें वैदिक ऋषि सांगतात. या दोन प्राथमिक शक्ती म्हणजे एक पाहण्याची शक्ति व दुसरी ऐकण्याची शक्ति, अर्थात् सत्यदर्शन व सत्यश्रवण; सत्य-जाणीवसंपन्न आत्म्याला जें स्वाभाविक ज्ञान असतें, त्या ज्ञानाचें प्रत्यक्ष अतींद्रिय व्यापार, सत्यदर्शन आणि सत्यश्रवण या शब्दांनीं वर्णन करण्यासारखे असतात. आमच्या मानवी मनांत या वरील शक्तींचें दूरदूरचें प्रतिबिंब पहावयास मिळतें. मनाची अंत:साक्षात्कारशक्ति (Revelation) ही सत्यदर्शनशक्तीची छाया आहे व त्याची अंत:प्रेरणाशक्ति (Inspiration) ही सत्यश्रवणशक्तीची छाया आहे. अतिमानसाच्या एकमेकीपासून भिन्न अशा दोन प्रकारच्या ज्ञानक्रिया वेदवाङ्मयांत वर्णिल्या आहेत. एका ज्ञानक्रियेंत अतिमानसिक जाणीव ही ज्ञान-विषयाला व्यापून आपल्यांत समाविष्ट करून घेते; आमच्या मनाला जी तादात्म्य-अधिष्ठित, स्व-विषयक ज्ञानक्रिया परिचित आहे, तिला ही अतिमानसिक ज्ञान-क्रिया पुष्कळ जवळ आहे; दुसऱ्या

 

पान क्र. २३३

 

अतिमानसिक ज्ञानक्रियेंत, अतिमानसिक जाणीव ज्ञान-विषयाला व्यापीत नाहीं. ती ज्ञानविषयाकडे झेंप घेते, त्याच्यासमोर राहून त्याला स्पर्श करते; ही ज्ञानक्रिया बाह्यपदार्थविषयक ज्ञानाची प्रारंभिक क्रिया आहे. वेद वाङ्मयांत अतिमानसासंबंधानें ज्या सूचक गोष्टी सांपडतात, त्या वर दिल्या आहेत. आमच्या प्राचीन ऋषींचा, वर दिलेला अतिमानसविषयक अनुभव ध्यानांत घेऊन, अतिमानस या शब्दाला पर्याय शब्द म्हणून 'सत्य-जाणीव' हा शब्द आम्हीं वापरणें उचित होईल. अतिमानस या शब्दांत जी अतिव्याप्ति शक्य आहे, ती या पर्यायशब्दानें दूर केली जाते; या पर्यायशब्दानें अतिमानस या शब्दाचा अर्थ योग्य रीतीनें मर्यादित केला जातो.

अतिमानस किंवा सत्य-जाणीव या शक्तीच्या वर दिलेल्या विशेष गुणांवरून ही शक्ति मध्यस्थ शक्ति आहे हें उघड आहे; हिच्या वरतीं हिच्याहून श्रेष्ठ वस्तु आहे आणि हिच्या खालीं हिच्याहून कनिष्ठ वस्तु आहे. कनिष्ठ वस्तु हिच्याद्वारां श्रेष्ठ वस्तूंतून उदयास येतें, अर्थात् उलट मार्गानें ती कनिष्ठ वस्तु हिच्याद्वारां त्या सर्वश्रेष्ठ वस्तूकडे, आपल्या खऱ्या उगमस्थानाकडे जाऊं शकेल, हें स्पष्ट आहे. हिच्या वरतीं जी वस्तु आहे, ती सच्चिदानंद होय; शुद्ध सच्चिदानंदाची अविभाज्य, एकतामय, अद्वैती जाणीव ही सत्य-जाणिवेच्या वरतीं आहे; या अद्वैती, अभेदमय जाणिवेंत कसलेहि भेद, कसलेहि अलग अलग भाग नाहींत; हिच्या खालतीं मन आहे. मानसिक जाणीव ही विभाजक, विश्लेषक व भाग पाडणारी जाणीव आहे; दोन वस्तू एकमेकींपासून वेगळ्या करून, त्या दोहोंतला भेद शोधून, मानसिक जाणीव आपलें ज्ञान मिळविते; तिला ज्ञान मिळविण्याचा हा एकच मार्ग आहे; एकता, अनंतता या गोष्टी मनाला कळतात, पण अंधुकपणें कळतात; अप्रत्यक्षपणें समजून घ्याव्या लागतात. मन विभागणी करतें आणि विभागांची जुळणी करून, एक तऱ्हेची एकता पण निर्माण करतें, तथापि खरी अविभक्त, अविभाज्य एकता किंवा सर्वैकता त्याला आपल्या शक्तीनें कळणें अशक्य आहे. सच्चिदानंद आणि मन या दोहोंच्यामध्यें अतिमानस आहे, सत्य-जाणीव आहे; ही जाणीव सर्व-समावेशक व सर्व-निर्मायक आहे; या सत्य-जाणिवेची सर्वसमावेशक सर्वव्यापक ज्ञानशक्ति, ब्रह्माच्या-सच्चिदानंदाच्या, ''सर्व मी आहे'' या तादात्म्य-अधिष्ठित आत्मजाणिवेपासून जन्मास आलेली आहे -- ''सर्व मी आहे,'' ही ब्रह्माची नित्य

 

पान क्र. २३४

 

ज्ञानावस्था आहे; अतिमानसाची, सत्य-जाणिवेची दुसरी शक्ति -- विषयाकडे झेंप घेण्याची, त्याच्यासमोर जाऊन त्याला स्पर्श करण्याची ज्ञानशक्ति -- ही मनाच्या भेद-अधिष्ठित ज्ञानाच्या स्वाभाविक प्रक्रियेला जन्माला घालणारी आहे. ब्रह्माची कन्या आणि मनाची जननी अशी अतिमानसाची अथवा सत्य-जाणिवेची मध्यस्थाची भूमिका आहे.

वरतीं शाश्वत, स्थिर आणि अव्यय असें एकतत्त्व; खालतीं नित्य बदलणाऱ्या स्वरूपाची व सारख्या प्रवाही असलेल्या वस्तुजातांत स्थिर आणि अव्यय असा एखादा बिंदु शोधण्यांत मग्न असलेली अशी अनेकता आहे. परंतु असा स्थिर बिंदु तिला बहुधा सांपडत नाहीं; या दोहोंच्यामध्यें अतिमानसाचें स्थान आहे, हें स्थान सर्व त्रिमुखी वस्तूंचें व सर्व द्विमुरवी वस्तूंचें स्थान आहे. ''एकांत अनेक'' होऊन जें ''अनेकांत एक'' हें आपलें एकत्व टाकीत नाहीं, अशा सर्व वस्तुजाताचें तें स्थान आहे; आरंभीं एकच एक असणारें परंतु अनेक होण्याची पात्रता नित्य आपल्या अंतरीं ठेवणारें असें तत्त्व सर्वाच्या मुळाशीं असल्यानें 'एक-अनेक अनेक-एक' असें विश्वसंसारांतील सर्व वस्तूंचें व घटनांचें स्वाभाविक स्वरूप होऊं शकतें. एक स्थिर एकत्व आणि एक अस्थिर अनेकत्व अशा दोन वस्तूंमधली अतिमानस ही वस्तु, वरील कारणास्तव सर्व सृष्ट संसार आणि तेथील सर्व क्रम, व्यवस्था यांचा आरंभ आणि शेवट आहे व यांचा आद्य आणि अंत्य वर्ण आहे; सर्व भेदांचें आरंभस्थान या मधल्या वस्तूंत आहे, सर्व एकीकरणाचें स्थान येथेंच आहे; या सृष्ट संसारांत ज्या अनेक तालबद्ध, सुसंगत व सुंदर रचना झाल्या आहेत, किंवा होणार आहेत, त्या सर्वांची पूर्वयोजना, त्यांची उभारणी, त्यांची पूर्ण वाढ व परिपूर्णता याच ठिकाणीं होते. या मध्यस्थ वस्तूला मूळ 'एकच एक' वस्तूचें पूर्ण ज्ञान आहे आणि या एका वस्तूच्या पोटीं ज्या अनेक वस्तुसंभारांचा संसार दडलेला आहे, तो सर्व संसार बाहेर काढण्याचें काम ही मध्यस्थ वस्तु करीत असते; अनेकता व्यक्त करूनहि, ही मध्यस्थ वस्तु त्या अनेकतेच्या भेदाभेदांत स्वतःचें स्वरूप विसरत नाहीं व त्या अनेकांची एकताहि विसरत नाहीं. अनेकता व्यक्त करणारी ही मध्यस्थ वस्तु आणि हिच्या वरची अनिर्वचनीय एकत्व असणारी श्रेष्ठ वस्तु यांच्या पलीकडे, एकत्व आणि अनेकत्व या आपल्या मनाच्या कल्पनांना न मानणारी, यापैकीं कोणत्याहि एका कल्पनेनें बद्ध न होणारी, पूर्ण मुक्त अशी 'एकत्व-अनेकत्व-अतीत', मनाला सर्वस्वीं अचिंत्य अशी

 

पान क्र. २३५

 

वस्तु -- खरी केवलता, निःसंबंधता व सत्यता असलेली वस्तु -- असावी अशी आमची कल्पना आहे. ही वस्तु सर्वश्रेष्ठ स्थानीं ठेवली म्हणजे एक ईश्वर आणि अनेकतेचा विश्व-संसार या दोहीं संबंधींचें आमचें ज्ञान सत्यज्ञान म्हणून समर्थन करण्याची पूर्ण सोय होते.

या गोष्टी फार मोठ्या आणि मोठाले दुर्बोध शब्द वापरल्यानें समजायला अधिक कठीण आहेत. आतां आपण स्पष्ट अशा तपशिलांत शिरून, या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूं. एकच एक वस्तूला आपण 'सच्चिदानंद' म्हणतो -- म्हणजे तीन वस्तु आहेत असें प्रथम कल्पून, नंतर त्या एकत्र करून, एक त्रिमुखी वस्तु आम्ही बनवितों. अस्तित्व आहे, जाणीव आहे व आनंद आहे असें प्रथम कल्पून नंतर या तीन वस्तू भिन्न नसून, अभिन्न एक आहेत असें आम्ही म्हणतों. ही मांडणी मनाला परिचित व स्वाभाविक अशी आहे. मात्र एकताप्रधान एकत्वमय जाणीव अशी कल्पना करूं शकत नाहीं -- अस्तित्व म्हणजेच जाणीव, या दोहोंमध्यें किंचितहि अलगपणा असूं शकत नाहीं; जाणीव म्हणजेच आनंद, या दोहोंतहि कांहीं अलगपणा नाहीं. याप्रमाणें अस्तित्व, जाणीव व आनंद सर्वथा एकरूप आणि पूर्णतया अभिन्न असल्यानें, अशा एकापासून विश्व होऊं शकत नाहीं. असें एकतत्त्व हें जर एकच एक सत्य वास्तव तत्त्व असेल, तर विश्व नाहीं, विश्व केव्हांहि नव्हतें. विश्वाची कल्पनादेखील केव्हांहि करणें अशक्य होतें. जी जाणीव अविभाज्य आहे, ती जाणीव स्वभावत: अविभाजकहि असणार; भाग करणें व भागाभागांत भेद करणें हें अविभाज्य जाणिवेला अशक्य आहे. अर्थात् एकतत्त्व अविभाज्य सच्चिदानंद या मुळापासून विश्वाची उभारणी कल्पितां देखील येत नाहीं -- आणि विश्व तर आहे; तेव्हां वरील मांडणींतून आम्हांला अखेर एक ''निर्बुद्ध सिद्धान्त'' मात्र प्राप्त होतो. अशक्य व अनिवार्य असा अन्योन्यविरोध हा या सिद्धान्तानुसार आम्हांला विश्वाचा पाया म्हणून मानावा लागेल. विश्वाचा असा पाया आम्ही मान्य करूं शकत नाहीं.

सच्चिदानंदाची अभेद्य एकत्वाची कल्पना घेऊन आपण एका निर्बुद्ध सिद्धान्तापर्यंत प्रवास केला. आतां मनाच्या स्वभावधर्मापासून काय निघतें तें पाहूं. मनाला भेद स्पष्टपणें सत्य दिसतात. भिन्न वस्तू एकत्र जुळवून, एकतऱ्हेची समग्रता, संयुक्त एकता मनाला कल्पितां येते; मर्यादित वस्तूचा विस्तार होत राहून, ती वाटेल तितकी विस्तृत होऊं शकते हें मनाला समजतें; अलग असणाऱ्या वस्तूंचे समूह मन

 

पान क्र. २३६

 

कल्पूं शकतें आणि या समूहांतील सर्व घटक-वस्तूंत काय सामान्यधर्म आहे तें त्याला समजतें; समूहासमूहांतहि सामान्यधर्म मन ओळखूं शकतें; परंतु अंतिम शुद्ध एकता, अंतिम शुद्ध अनंतता या वास्तव गोष्टी म्हणून मनाच्या जाणिवेला ग्रहण करतां येत नाहींत. या गोष्टींना अवास्तव कल्पना असें नांव मन देतें; मनाला त्या स्वभावतःच अवास्तव वाटतात, असत्य वाटतात; आणि त्या सत्य आहेत व त्याच खऱ्या 'सत्य' आहेत, इतर गोष्टी सत्य नाहींत, ही गोष्ट तर मनाला अगदीं अनाकलनीय अशी असते. सच्चिदानंदाची अखंड एकरस एकत्वाची जी स्वाभाविक अभेद्य जाणीव वर वर्णिली, तिच्या अगदीं उलट ही मनाची जाणीव आहे. या मनाच्या जाणिवेंत अनेकता हीच स्वाभाविक आहे, या जाणिवेला एकत्वाची अनुभूति हवी असेल, तर स्वतःचा विलय करून घेणें हाच एक मार्ग तिला यासाठीं मोकळा आहे; पण असें तिनें केलें म्हणजे स्वतःची अनेकतेची जाणीव हा वस्तुत: भ्रम होता, खरोखरी तिला अस्तित्व नव्हतें, असें एकत्वाच्या अनुभूतीनें तिनें कबूल केल्यासारखें होतें. परंतु खरी गोष्ट अशी आहे कीं, अनेकतेची अनेकता सत्य आहे ही जाणीव मनाला होती, या जाणिवेनें एकतेच्या जाणिवेसाठी खटपट करून ती मिळविली, व ती मिळवण्यांत स्वतःचा विलय करून घेतला. तेव्हां, येथेंहि मनाच्या स्वाभाविक जाणिवेपासून आरंभ करून, आपण एका निर्बुद्ध सिद्धान्तापर्यंत आलों आहोंत. येथेंहि एकच गोष्ट 'आहे आणि नाहीं' असा बुद्धीला धक्का देणारा, अगतिक करणारा, अनिवार्य विरोधमय सिद्धान्त आमच्यापुढें उभा राहतो आणि तो आम्हांला मान्य होऊ शकत नाहीं.

मन हें सारभूत ज्ञानाचें साधन आम्ही मानतों, म्हणून अडचण उत्पन्न होते; पण तें तसें नाहीं, तें वियोजनाचें आणि संयोजनाचें साधन आहे. आमच्या जाणिवेची प्राथमिक अवस्था म्हणजे मन होय. अज्ञात स्वरूपाच्या मूळ वस्तूचा कांहीं भाग आपल्या वियोजनाच्या, विभाजनाच्या (विश्लेषण-पृथक्करणाच्या) शक्तीनें मन अस्पष्टपणें वेगळा काढतें आणि हा वेगळा मापलेला मर्यादित भाग, एक सगळी वस्तु आहे असें कल्पून, मन तिचे पुन: भाग पाडतें आणि या भागांना आपले विषय मानून त्यांचा अभ्यास करतें. वस्तूचे भाग आणि गौण गुणधर्म यांचें स्पष्ट दर्शन मनाला घडतें आणि त्याच्या कुवतीप्रमाणें याचेंच ज्ञान त्याला होते. वस्तूच्या समग्रतेसंबंधानें मनाची अशी स्पष्ट निश्चित कल्पना असते कीं, ती एकत्र केलेल्या भागाभागांची बनलेली

 

पान क्र. २३७

 

आहे, एकत्र केलेले गुणधर्म आणि असारभूत विशेष, यांची बनलेली आहे. कोणतीहि समग्र वस्तु दुसऱ्या वस्तूचा भाग आहे किंवा ती स्वत: भागाभागांची, गुणांची, विशेषांची झालेली आहे, यापेक्षां वेगळा समग्रतेचा प्रत्यय मनाला फार अंधुकपणें घडतो; वस्तूचें विश्लेषण करावें, दुसऱ्या एका समग्र वस्तूच्या पोटांत समोरच्या समग्र वस्तूला घालावें, तेव्हांच ''आतां मला ही वस्तु समजली'' असें मन म्हणूं शकतें; आणि खरी गोष्ट अशी असते कीं, मनाला ती वस्तु समजत नाहीं, ज्ञात होत नाहीं -- त्याला समजतें फक्त त्यानें केलेलें पृथक्करण आणि या पृथक्करणानें त्याला सांपडलेल्या भागांचे व गुणधर्मांचें त्यानें केलेलें एकीकरण. एवढेंच मनाचें खरें काम असतें, त्याची स्वाभाविक शक्ति इतकीच; यापेक्षां अधिक, अधिक खोल आणि खरेंखुरें ज्ञान हवें असेल तर तें मनाकडून मिळावयाचें नाहीं -- आपल्याला खरें खोल ज्ञान झालें अशी तीव्र भावना मनाच्या कांहीं खोल भागांना केव्हां केव्हां येते. त्या तसल्या आकारशून्य भावनेला खरें ज्ञान म्हणतां येत नाहीं. असल्या भावनेपलीकडे व पृथक्करणपूर्वक एकीकरणानें मिळणाऱ्या 'ज्ञाना' पलीकडे, खरें श्रेष्ठ दर्जाचें गाढ ज्ञान मिळावयास मनाच्या पलीकडे असलेल्या जाणिवेची आवश्यकता आहे. मनानें अर्धवट मिळविलेल्या ज्ञानाच्या वरतीं जाऊन, मनाच्या वरतीं जाऊन, त्याच्या क्रियेच्या उलट क्रिया करून, ही जाणीव मनानें अर्धवट मिळविलेलें ज्ञान पुरें करूं शकते. या जाणिवेला वस्तूचें खरें समग्र दर्शन, सार-दर्शन स्वाभाविकपणें घडत असतें. मनाच्या ज्ञानाची जी परिसीमा असते, ती मनाच्या पातळीवरून उडी मारून मनापलीकडे, त्याच्या वरतीं जावयास, त्याच्याहून श्रेष्ठ असलेल्या, खरें ज्ञान देणाऱ्या जाणिवेला उपयोगी पडते. जडाच्या अंधःकारमय बंदीखान्यांतून बाहेर पडलेल्या व आमच्या ठिकाणीं आलेल्या अर्धवट अंधुक दृष्टीच्या जाणिवेला शिस्त लावणें, तिनें बरोबर आणलेल्या आंधळ्या प्रेरणांना, भटक्या स्फूर्तींना, अस्पष्ट संवेदनांना आपल्या जवळच्या प्रकाशानें अनुक्रमें डोळस करणें, स्थिरता देणें, स्पष्टता देणें हें मनाचें खरें मोठयांत मोठें नियत कार्य आहे. जडांतून वर आलेली अर्धवट जड जाणीव, मनाच्या या शिस्तीनें व शिक्षणानें आपली ज्ञानपात्रता वाढवीत वाढवीत, मनापलीकडे चढून जाण्याला व तेथें जो प्रकाश आहे, तो आत्मसात् करण्याला समर्थ होते. अंतिम स्थानाकडे जाण्याचा मन हा केवळ मार्ग आहे, तें अंतिम स्थान नव्हे.

 

पान क्र. २३८

 

ही मनाची गोष्ट झाली. आतां, सच्चिदानंदाच्या अविभाज्य एकत्वाचा, शुद्ध एकरस जाणिवेचा विचार करूं. हें एकत्व, ही एकरस जाणीव पूर्णतया निर्वस्तुक आहे; विश्वांतील अखिल वस्तू या निर्वस्तुक मूळ एकत्वांतून, शून्यानें भरलेल्या एकत्वांतून बाहेर आलेल्या आहेत आणि शेवटीं या सर्व वस्तू त्या मूळ शून्यमय एकत्वांत विलीन होऊन नाहींशा होतात; ही एकत्वाची कल्पना सच्चिदानंदाशीं जोडली गेल्यानें अडचणी उत्पन्न होतात. एकत्वाची ही कल्पना विश्वाच्या उगमस्थानाशीं जोडणें स्वच्छ तर्कबुद्धीला केवळ अशक्य कोटींतील आहे. विश्वाच्या कालस्थलनिष्ठ आविष्कारांत जें जें कांहीं व्यक्त झालेलें आहे किंवा होणार आहे, तें सर्व कालस्थलातीत अशा सच्चिदानंदाच्या पोटीं पूर्णतया आत्मसमाविष्ट, आत्मकेन्द्रस्थित अशा मूळ स्वरूपांत असलेंच पाहिजे. अगदीं अचिंत्य व अनिर्वचनीय असें अस्तित्व आरंभीं सर्व कांहीं आंवरून, आत्मकेन्द्रस्थ एकत्व रूपानें असतें. शून्यवादी (Nihilist) आपल्या मनाशीं या अस्तित्वासंबंधानें अशी कल्पना करतो कीं, आम्ही जें कांहीं आहों आणि जें कांहीं जाणतों, त्या सर्वाचें मूलस्थान हें नकारात्मक अस्तित्व अथवा शून्य आहे; सर्वातीतवादी (Transcendentalist) या अस्तित्वासंबंधानें आपल्या मनाशीं अशी वेगळी कल्पना करतो कीं, आम्ही जें कांहीं आहों आणि जें कांहीं जाणतों, तें सर्व नकारात्मक अस्तित्वाच्या पोटीं नसून, भावात्मक अस्तित्वाच्या पोटीं आहे; हें भावनात्मक मूळअस्तित्व मूळ सत्य आहे, तें आमच्या मनाला अमुक म्हणून ओळखतां येत नाहीं, इतकेंच. वेदान्तांत ''आरंभीं एक अस्तित्व होतें, दुसरें कांहीं नव्हतें'' असें म्हटलें आहे. विश्वाच्या आरंभीं एकच एक अद्वितीय अस्तित्व होतें हें वेदान्ताचें म्हणणें बरोबर आहे; आरंभाच्या पूर्वीं काय होतें तें वेदान्तानें सांगितलेलें नाहीं. आरंभाच्या पूर्वीं, आरंभाच्या नंतर, आज, सर्व काळ आणि काळ नसतांना, काळाच्या पलीकडे अशी वस्तु आहे कीं, तिला अद्वितीय एक असें तर्कशुद्ध दृष्टीनें म्हणतां येत नाहीं. तिच्याविषयीं आपल्याला प्रथम हें कळतें कीं, ही मूळ वस्तु प्रथम सर्व कांहीं स्वतःच्या आत्म्यांत, निजरूपांत सांठवून राहिली; या तिच्या आद्य आत्मकेन्द्रीकरणाला अविभाज्य, अद्वितीय एकतत्त्व म्हणून ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करतों; यानंतर तिजविषयीं दुसरी गोष्ट आम्हांला अशी कळते कीं, या प्रथम धारण केलेल्या एकत्वरूपांत जें सांठविलें होतें, त्याचें एकत्व जणुं मोडून भाग भाग होतात व तें

 

पान क्र. २३९

 

चोहोंकडे पसरतात, विखुरले जातात. मन विश्वाची कल्पना करतें, ती या प्रकारची असते; आणि तिजविषयीं जी तिसरी गोष्ट आम्हांला कळते ती ही कीं, ती निश्चितपणें आणि व्यवस्थेनें स्वतःचा विस्तार करून सत्य-जाणीव, सत्य-कल्पना हें रूप धारण करते; यालाच अतिमानस, विज्ञान असें म्हणतात. हें विज्ञान स्वतःला आणि स्वत: जें जें बनतें त्याला सत्यत्वानें पूर्णपणें जाणतें; मनानें या पसाऱ्याला जें मोडतोडीचे स्वरूप दिलेलें असतें, तसें स्वरूप खरोखरीच त्याला येऊं नये, अशी काळजी हें विज्ञान घेतें. अधिकांत अधिक भेदाच्या पसाऱ्यांत तें अभेद, एकत्व राखतें; पराकोटीच्या अस्थिर पसाऱ्यांत स्थिरता जपून ठेवतें; सार्वत्रिक झगड्याच्या प्रदर्शनांत आग्रहानें सुसंवाद स्थापन करतें; व्यवस्थापूर्ण अशी विश्वरचना सर्व काळ संभाळून टिकवितें -- मनाची गति अशा व्यवस्थेपर्यंत होऊं शकत नाहीं -- मनाला विश्व हा अव्यवस्थित बाजार असतो, मनाच्या दृष्टीनें नित्यश: हा पसारा कांहींतरी व्यवस्थित आकार धारण करण्याचा प्रयत्न करीत असतो पण हा प्रयत्न त्याच्या दृष्टीनें नित्यशः अयशस्वी होत असतो. मनाला विश्वरूपाचें दर्शन हें असें घडत असतें.

विज्ञान किंवा अतिमानस हा ब्रह्माचा बृहत्, अतिमहान् आत्मविस्तार आहे. सर्वकांहीं सामावून घेऊन, त्याचा आपल्या पोटांत आविष्कार किंवा विकास करण्याचा या विस्तृत ब्रह्मरूपाचा धर्म आहे. अविभाज्य एकत्वाच्या स्वरूपांत असलेलें सत्-चित्-आनंद हें जें मूलतत्त्व, त्याचें कल्पनेच्या आश्रयानें, विज्ञान त्रिमुखी एकतत्त्व बनवितें. या तीन अंगांना विभागून अलग अलग न करतांहि, त्यांच्यामध्यें भेदाची कल्पना विज्ञान करतें. एकांतून तीन आविष्कृत करणें हें काम विज्ञान करतें. मन, तीन अलग अलग घटकांचें एक तत्त्व बनवितें. त्याच्या उलट विज्ञानाची ही कृति आहे, एकतत्त्वाचें त्रिमुखी एकतत्त्व बनवून, विज्ञान त्याच्यांत अनेकता आणि एकता एकाच वेळीं स्थापन करते. विज्ञान सर्वसमावेशक, सर्वज्ञतासंपन्न असल्यानें, त्याच्याकडून अभिव्यक्त झालेल्या पसाऱ्यांत एकता नित्य अनुस्यूत असते. प्रथम सच्चिदानंदाला सत्, चित्, आनंद असें त्रिधा भिन्न (अर्थात् एकत्व न सांडतां) कल्पून, विज्ञान हें विश्वाच्या आविष्काराला आरंभ करतें. या भेद-कल्पनेनंतर या तीनपैकीं कोणतीहि एक दिव्य वस्तु मुख्य म्हणून, मुख्य देवता म्हणून तें निश्चित करतें; या मुख्य देवतेंत दुसऱ्या दोन देवता अव्यक्त

 

पान क्र. २४०

 

किंवा अप्रकटपणें अंतर्भूत धरल्या जातात. यानंतर विज्ञान जे अनेक भेद कल्पितें, ते सर्व या नमुन्याप्रमाणें असतात. सर्वत्र विकासाची, अभिव्यक्तीची प्रक्रिया वरीलप्रमाणेंच -- एक मुख्य, दुसरें त्यांत अव्यक्त वा अप्रकटपणें अंतर्भूत -- अशीच असते. सच्चिदानंद या त्रिमुखी एकतत्त्वांतूनच तें नाना तत्त्वें, नाना शक्यता आविष्कृत करतें, विकसित करतें; कोणतेंहि तत्त्व वा शक्यता व्यक्त करणें, विकसित करणें, प्रकट करणें ही शक्ति विज्ञानांत आहे; अर्थात् या शक्तीची पूरक, म्हणजे अव्यक्त करणें, संकोचित करणें, अप्रकट करणें हीहि दुसरी शक्ति विज्ञानांत आहे. एका अर्थानें सगळी सृष्टि दोन अव्यक्तीकरणाच्या क्रियांमधील, दोन अव्यक्त-भांडारांमधील वाटचाल आहे. सृष्टीचें वरचें टोंक आत्मा हें एक अव्यक्त भांडार आहे, त्यांत सर्व कांहीं अव्यक्त रूपांत सांठविलेलें आहे; हें सर्व काही अव्यक्त आत्म्यांतून व्यक्त होत होत, सृष्टीचें दुसरें ध्रुवटोंक जें जडतत्त्व, तेथपर्यंत तळाला पोचतें; या तळाच्या जडतत्त्वांत सर्व व्यक्त सांठविले जातें, सर्व व्यक्त अव्यक्त होऊन बसतें -- तें क्रमानें त्या जडतत्त्वांतून बाहेर निघून पुनरपि व्यक्त होत होत, वरचें आत्म्याचें ध्रुवटोंक गांठतें.

तेव्हां सत्य कल्पनेच्या आश्रयानें सच्चिदानंदांत भेद कल्पून, नंतर त्या भेदांत आणखी भेद कल्पून विज्ञान विश्वनिर्मिति करतें. या विश्वनिर्मितीसंपादक एकंदर भेदप्रक्रियाव्यवहारांत विज्ञान खरोखरी अनेक तत्त्वें, अनेक शक्ती, अनेक आकार उभे करीत असतें; विज्ञानाची सर्वसमावेशक जाणीव या तत्वादिकांपैकीं प्रत्येकांत तदितर सर्व अस्तित्व समाविष्ट असलेलें पाहते; आणि त्याची सर्वस्पर्शी जाणीव या प्रत्येकाच्या पाठीमागें इतर सर्व अस्तित्व अव्यक्त दशेंत पाहते. म्हणजे 'सर्व प्रत्येकांत आहे आणि प्रत्येकाच्या पाठीमागें म्हणा, आंत म्हणा, सर्व आहे' असें नित्यज्ञान विज्ञानाला असतें. प्रत्येक वस्तुबीज अनंत शक्यता आपल्या अंतरीं सांठवून असतें; तथापि वाढीच्या क्रियेचा आणि अंतिम फळाचा एक विशिष्ट नियम तें पाळीत असतें -- हा नियम मूळ संकल्पशक्ति किंवा इच्छाशक्ति त्याला घालून देत असते. अर्थात् ही इच्छाशक्ति म्हणजे मूळ जाणीवयुक्त अस्तित्वाची (ज्ञानमय पुरुषाची) ज्ञानशक्ति असते. हा पुरुष, हा आत्मा, आत्माविष्कार करीत असतो; त्याच्या अंतरीं जी सत्य-कल्पना असते, तिचें त्याला असलेलें पूर्ण निश्चित ज्ञान कामाला लावून त्या कल्पनेनुसार आपले स्वत:चें

 

पान क्र. २४१

 

आकार आणि हालचाली तो अगोदरच योजून ठेवतो. ही योजना वर सांगितलेल्या विशिष्ट नियमाचें मूळ होय. मूळ स्वयंभू अस्तित्व -- ज्ञानमय आत्मा -- आपल्या अंतरीं आपल्या अस्तित्वांतील जें एखादें सत्य विशेष दृष्टीनें पाहतो, तें वस्तुबीज होतें; विशिष्ट आत्मदर्शनाचें तें विशिष्ट बीज जें फळ स्वतःतून निर्मितें, तें आत्म-व्यापाराचें सत्य होय; विकासाचा, आकार-धारणाचा, क्रियात्मकतेचा विशिष्ट स्वाभाविक नियम हेंच आत्म-व्यापाराचें स्वरूप होय; विशिष्ट आत्म-दर्शन हें विशिष्ट आत्मव्यापाराला अटळपणें कारणीभूत होतें; आणि आत्मदर्शनांत जें मूळ सत्य असतें, त्यांत गर्भित असलेल्याच विकासप्रक्रिया हा आत्मव्यापार कांटेकोरपणें कार्यान्वित करीत असतो. तेव्हां, सर्व निसर्ग हा केवळ ज्ञानमय, मूळ आत्म्याची कार्यमग्न ज्ञानशक्ति किंवा ज्ञानयुक्त इच्छाशक्ति आहे. ज्ञानमय आत्म्यानें प्रथम स्वत: कल्पनेचें रूप घेतलें, ही त्याची सत्यकल्पना जें सत्य स्वाभाविकपणें स्वत: जवळ बाळगीत होती, त्या सर्व सत्याला शक्तीच्या आणि आकाराच्या स्वरूपांत विकसित, संवर्धित करण्याचें काम, ज्ञानमय आत्म्याची ज्ञानशक्ति किवा ज्ञानयुक्त इच्छाशक्ति करते आणि हें कार्य म्हणजेच निसर्ग होय.

मानसिक जाणीव आणि सत्य-जाणीव यांतील सारभूत भेद कोणता तें वर दिलेल्या विवेचनावरून ध्यानांत येईल. अस्तित्व ही वस्तु वेगळी आणि विचार ही वस्तु वेगळी असें आपण मानतों; विचार ही द्रव्यमय वस्तु नाहीं, भावरूप आहे; सत्य वास्तव गोष्ट असें विचाराला म्हणतां येत नाहीं, विचार ही भावरूप, अद्रव्यरूप गोष्ट कोठून तरी उदयास येते, कोठून तें आम्हांला समजत नाहीं; द्रव्यमय सत्यविषयापासून ही अद्रव्यरूप गोष्ट स्वतःला अलग करते आणि मग त्या विषयाचें निरीक्षण करणें, तो विषय समजून घेणें, त्यासंबंधीं निर्णय घेणें या क्रिया ती करते; विचाराची हकीकत आमच्या मनाला ही अशी दिसते आणि आमचें मन म्हणजे एक सर्व विभागणारी, सर्व पृथक् पृथक् करणारी वस्तु असल्यानें, वर सांगितल्याप्रमाणें मनाला दिसणारें विचाराचें स्वरूप मनाच्या दृष्टीनें पूर्ण सत्य आहे. वस्तू वेगळ्या वेगळ्या करण्याचें, वस्तूमध्यें चिरा, भेगा पाडण्याचें, वस्तूचे तुकडे करण्याचें मनाचें आद्य कार्य आहे; वस्तु स्पष्टतेनें समजून घेण्याकडे मनाचें तितकें लक्ष नसतें; मनाच्या या स्वभावधर्मामुळें विचार आणि सत्य वस्तु, विचार आणि सत्य-अस्तित्व यांच्या अविभक्त सलग रूपामध्यें त्यांना विभक्त

 

पान क्र. २४२

 

व अलग करणारा चिरा मनानें कल्पिला आहे. अति-मानसाच्या क्षेत्रांत कोणतेंहि अस्तित्व जाणिवेपासून अलग असत नाहीं, जाणीव ही अस्तित्वाची नित्यसहचारिणी व त्याच्याशीं एकरूप अशी असते; कल्पना (जिचें वर विवेचन आलें आहे ती) जाणिवेचें स्पंदन आणि त्याचवेळीं अस्तित्त्वाचेंहि स्पंदन असते, दोन्हीं स्पंदनें अनेक परिणाम घडविणारीं असतात; अस्तित्वाचें स्पंदन हें नाना आकार व जाणिवेचें स्पंदन नाना जाणीवप्रकार उदयास आणतें; सत्य-कल्पना हें आरंभीचें निर्मायक आत्मज्ञान आहे; निष्क्रिय, निर्मितिविमुख अशी आत्मजाणिवेच्या पोटीं जें केन्द्रित झालेलें, एकत्र सांठविलेलें होतें, त्याचें निर्मायक आत्मजाणीवरूपानें आरंभींचें बहिरागमन म्हणजे कल्पना किंवा सत्य-कल्पना होय; हेंच अतिमानस, विज्ञान, सत्य-जाणीव वगैरे नांवांनीं ओळखलें जातें. जी निर्मायक आत्म-जाणीव किंवा कल्पना अ-निर्मायक आत्मजाणीवेच्या पोटीं दडलेली असते, तिचें बाहेर येणें हें सृष्टीच्या निर्मितींतील पहिलें पाऊल. ही जी कल्पना बाहेर येते, ती सत्य-कल्पना म्हणूनच बाहेर येते, तिचें सत्यत्व, सद्‌वस्तुत्व पुढें आत्मविकास करून घेतें; ही क्रिया तें नेहमीं आपल्या अंतर्गत ज्ञानाच्या आणि शक्तीच्या आश्रयानें चालवितें; तें नेहमीं स्वत:ला जाणतें, स्वत:चा स्वत: विकास घडवितें; कल्पनेच्या पोटीं स्वभावत:च इच्छाशक्ति असते, त्या शक्तीच्या बळावर तें आपला विकास करून घेतें; त्याच्या प्रत्येक प्रेरणेच्या पोटीं स्वभावत: असलेल्या ज्ञानाच्या बळावर तें आपला आविष्कार करीत असतें. निर्मिति व विकास हा असा चालतो. सर्व निमितीचें, सर्व विकासाचे वास्तव स्वरूप वर दर्शविल्याप्रमाणें असतें.

अतिमानसांत अस्तित्व, ज्ञानाची जाणीव व इच्छाशक्तीची जाणीव या गोष्टी विभागलेल्या नसतात; आमच्या मानसिक क्रियांमध्यें या गोष्टी अलग अलग भासतात; खरोखरी त्या तिन्ही मिळून एक वस्तु होते; तीन परिणामकारक अंगांची एकच कृति, तीन परिणामकारक घटकांचा एकच व्यापार या अस्तित्वादि त्रितयीनें व्यक्त होतो; प्रत्येक अंगाचा स्वतंत्र परिणाम असतो -- अस्तित्वामुळें त्या व्यापारांत द्रव्यत्वाचा परिणाम, जाणिवेमुळें त्यांत ज्ञानाचा परिणाम, स्वत:चें मार्गदर्शन करणाऱ्या, स्वत:ला आकार देणाऱ्या कल्पनेचा परिणाम, सर्वसमावेशक आणि सर्वस्पर्शी ज्ञानक्रियेचा परिणाम, इच्छाशक्तीमुळें त्या व्यापारांत स्वत:ची योजना-परिपूर्ति करणाऱ्या शक्तीचा परिणाम -- अशा विविध परिणामांचा

 

पान क्र. २४३

 

एक व्यापार, अतिमानसाच्या अस्तित्वादि त्रितयाच्या एकतेमुळें व अविभक्ततेमुळें घडून येत असतो. मूळ सद्‌वस्तु प्रकाशमय असते, या सद्‌वस्तूचा जो प्रकाश किंवा जें ज्ञान, त्यालाच कल्पना म्हटलें आहे; हें ज्ञान किंवा कल्पना म्हणजे, मानसिक विचार किंवा मानसिक कल्पना नव्हे; हें ज्ञान किंवा कल्पना म्हणजे सत्याची परिणामकारक आत्मजाणीव होय. ही कल्पना सत्य-कल्पना (Truth Idea) होय.

अतिमानस अवस्थेंत कल्पनेंत (Idea) जें ज्ञान असतें, तें त्या कल्पनेंतील इच्छाशक्तीपासून वेगळें निघालेलें नसतें; कल्पनेंतील ज्ञान अस्तित्वाशीं किंवा वस्तुद्रव्याशींहि एकरूप असतें. द्रव्याची प्रकाशमय शक्ति हेंच त्या ज्ञानाचें स्वरूप असतें; वस्तुद्रव्यापासून तें वेगळें निघालेलें नसतें. ज्याप्रमाणें अग्निद्रव्यापासून दाहक प्रकाशशक्ति वेगळी नसते, त्याप्रमाणें कल्पनेच्या शक्तीची गोष्ट आहे; जें मूळ अस्तित्व विस्तारप्रक्रियेनें कल्पनेचें आणि कल्पनेच्या विकासाचें रूप घेतें, त्या अस्तित्वाच्या घटकद्रव्याशीं कल्पनेंतील शक्ति एकरूप असते, त्या द्रव्यापासून वेगळी असत नाहीं. आमच्या मनाची स्थिति अगदीं निराळी आहे. आमच्या मनांत एक कल्पना येते, त्या कल्पनेला अनुरूप अशी इच्छा होते, किंवा आमच्या मनांत इच्छेची विशिष्ट प्रेरणा होते आणि त्या प्रेरणेंतून एक विशिष्ट कल्पना वेगळी होऊन मनांत उभी राहते; परंतु एक गोष्ट आम्ही न चुकतां करतों, ती ही कीं, कल्पना वेगळी, इच्छा वेगळी आणि आम्ही दोन्ही गोष्टींहून निराळे, हा सर्वांना स्पष्टपणें अलग अलग वस्तु समजणारा विचार, आम्ही सत्य मानतों. आमच्या मनाच्या दृष्टीनें वरील तीन वस्तू एकमेकींपासून अगदीं स्वतंत्र, अलग आहेत. मी आहे; माझ्यामध्यें कल्पना उदयास येते, ती कांहीं एखादी वस्तु नव्हे, ती केवळ एक भावना, गूढ वस्तुगुणरूप गोष्ट आहे; इच्छा ही माझ्यांत उदयास येणारी एक दुसरी गूढ गोष्ट आहे; वस्तुद्रव्याजवळ असलेली परंतु वस्तु नव्हे अशी शक्ति म्हणजे ही इच्छा आहे; पण एक गोष्ट निश्चित कीं, कल्पना असो वा इच्छा असो, या गोष्टी म्हणजे मी नव्हे, या गोष्टी मीपासून निराळ्या -- या मजमध्यें असतात, येतात, मला एकाएकीं सुचतात, भंडावतात; पण मी वेगळा व त्या वेगळ्या. माझी इच्छाशक्ति, तिचें साधन व तिचा परिणाम या गोष्टीहि 'मी' एकमेकींपासून निराळ्या समजतों; त्या एकमेकींमध्येंहि मोठी दरी 'मी' निर्माण करतो; इच्छेचीं साधनें, त्या इच्छेचे परिणाम म्हणजे माझ्या बाहेर

 

पान क्र. २४४

 

असणाऱ्या, मजपासून वेगळ्या सत्य वस्तू आहेत असें 'मी' मानतो. अर्थात् मी स्वत:, माझ्यांत उद्‌भवणारी कल्पना किंवा इच्छा यांपैकीं कोणीहि स्वत:ची स्वत: परिपूर्ति करूं शकत नाहीं. कल्पना कदाचित् मजपासून दूर होईल, इच्छा कदाचित् मला सोडून जाईल, साधन कदाचित् उपलब्ध होणार नाहीं किंवा या गोष्टींपैकीं एखादी किंवा सर्वच अनुपलब्ध होऊन, मी स्वत: अयशस्वी, अपूर्णकाम होईन -- असा संभव आमच्या मानसिक संसारांत असतो.

अतिमानसिक संसारांत मानसिक संसारासारखी निर्बळ करणारी विभागणी नसते; ज्ञान हें स्वत:मध्यें भाग भाग पाडीत नाहीं. शक्ति स्वतांत तुकडे पाडीत नाहीं, अस्तित्व स्वतांत विभाग करीत नाहीं. या वस्तू स्वत: परिपूर्ण, अखंडित राहतात आणि एकमेकींना धरून एकतेनें असतात; अतिमानस हें बृहत्, अतिमहान्, अति व्यापक, अति विस्ताराचें तत्त्व आहे; एकता किंवा अभेद हा त्या तत्त्वाचा आद्यमंत्र आहे, भेद नव्हे; मूलत: अतिमानस हें सर्वसमावेशक आहे; भेद ही तेथें गौण क्रिया आहे. म्हणून जेव्हां अस्तित्वाचें कोणतेंहि सत्य व्यक्त होत असेल, तेव्हां कल्पना त्या सत्याला अगदीं अनुकूल अशीच असेल, इच्छाशक्तिहि कल्पनेला पूर्ण अनुकूल अशीच असेल आणि परिणाम इच्छाशक्तीला अनुरूप असाच होणार. इच्छाशक्ति ही जाणिवेचें, अर्थात् कल्पनेचें स्वाभाविक सामर्थ्य असतें, म्हणून जेथें कल्पना, तेथें तिला अनुकूल इच्छाशक्ति स्वभावतःच असते. अतिमानसिक संसारांत एक कल्पना दुसऱ्या कल्पनांशीं विसंवादी नसते; त्याचप्रमाणें इच्छा-इच्छांचा किंवा शक्ती-शक्तींचाहि विसंवाद तेथें नसतो. हें सर्व विसंवाद-प्रकरण मनुष्यांत आणि त्याच्या विश्वांत मिळावयाचें; अतिमानसिक जाणीव ही अतिमहान्, अतिव्यापक जाणीव आहे; तिच्याबरोबर स्वभावत: अतिव्यापक इच्छाशक्ति असते -- अतिमानसिक जाणीव ही सर्व कल्पना स्वत:मध्यें समाविष्ट करून असते; सर्व कल्पना तिच्या स्वत:च्या असतात आणि या सर्वांमध्यें योग्य सुसंवादी संबंध ती निर्माण करते; त्याचप्रमाणें अतिमानसिक अतिव्यापक जाणिवेची स्वाभाविक सहचरी जी अति व्यापक इच्छाशक्ति, तिच्या पोटीं सर्व शक्ती तिच्या अंगभूत म्हणून वावरतात आणि या सर्वांमध्यें सुसंवादी संबंध ती निर्माण करते. अतिमानसिक जाणिवेच्या क्षेत्रांत, कल्पना व इच्छा एकोप्यानें काम करतात; ही जोडी अगोदर योजना ठरवून, त्या योजनेनुसार विशिष्ट प्रसंगीं अस्तित्वाचें एखादें सत्य पुढें नेते वा एखादें मागें ठेवते.

 

पान क्र. २४५

 

आज रूढ असलेल्या धर्मकल्पनांत ईश्वर हा सर्वव्यापी, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् आहे. या ईश्वरविषयक धर्मकल्पनांचें समर्थन वरील अतिमानसिक शक्तीमध्यें सांपडतें. या कल्पना बुद्धीला, विचारशक्तीला सोडून नाहींत; त्या पूर्णपणें बुद्धिसंमत विचारविहित आहेत. सर्वसंग्रही व्यापक तत्त्वज्ञानाचें तर्कशास्त्र किंवा निरीक्षण आणि अनुभव यांना वरील धर्मकल्पना विरोध करीत नाहींत. आमची चूक होते ती ही कीं, ईश्वर आणि मनुष्य, ब्रह्म आणि विश्व यांच्यामध्यें आम्ही सेतुदेखील बांधतां येणार नाहीं अशी, दोघांना एकमेकांपासून कायमचें दूर ठेवणारी महान् दरी आमच्या कल्पनेनें उभी करतों. या चुकीमुळें असें होतें कीं, अस्तित्व, जाणीव आणि शक्ति यांच्यामध्यें वास्तवांत व्यवहारासाठीं जे भेद आहेत, त्यांना आम्ही सारभूत मानतों; हे भेद वरवरचे किवा व्यवहारापुरते नसून, मुळांतच अस्तित्वादि वस्तु अलग अलग आहेत असें आम्ही मानतों. या प्रश्नाकडे विशेष लक्ष पुढें केव्हां तरी देऊं. सध्यां एवढेंच ध्यानांत ठेवावयाचें कीं, आपण विचाराच्या मार्गानें दिव्यनिर्मितिशील अतिमानसतत्त्वाची कांहीं कल्पना समजून घेतली आहे आणि हें तत्त्व 'आहे' असें ठरविलें आहे. आमच्या विचारदृष्टीप्रमाणें हें तत्त्व अभेदाधिष्ठित भेदाचें आहे; येथें मूळ अस्तित्व, जाणीव, इच्छाशक्ति आणि आनंद या गोष्टी भिन्न नसून एकरूप आहेत; सर्व कांहीं या चतुर्मुखी मूळ एकतत्त्वांत एकत्वानें, अभेदानें राहतें. या अभेदनिष्ठ एकतत्त्वामध्यें,  भेदाची अनंत अमर्याद शक्ति आहे. ही भेदशक्ति एकतत्त्वाचें एकत्व सांभाळून त्याचा अनंत विस्तार करते. या अनंत विस्तारांत जें द्रव्य आहे, तें सत्याचें आहे, सत्य आहे; मूळ सत्य अस्तित्त्वाचा हा सत्यविस्तार आहे. येथें मूळ सत्य हें कल्पनारूपानें व्यक्त होतें, तेंच सत्य आकारांत व्यक्त होतें; येथें ज्ञान आणि इच्छा अभिन्न सत्यरूप आहेत; मूळ अस्तित्वाचें ज्ञान व इच्छाशक्ति येथें अभिन्न असल्यानें, येथें आत्म-परिपूर्तीचें आणि म्हणून आत्मानंदाचेंहि सत्य राहतें; कारण आनंद हा आत्म-परिपूर्तींत असतो; या वरील कारणांसाठीं येथें नाना प्रकारचे संयोग, नाना प्रकारचीं रूपांतरे घडत असलीं, तरी या सर्व व्यवहारांत सर्वदा स्वयंभू स्वाभाविक अपरिहार्य असा सुसंवाद, मेळ, गोडवां असतो.

 

पान क्र. २४६

 

प्रकरण पंधरावें

 

परात्पर सत्य-संविद्

 

एक, अतिमानसरूप व सुषुप्तीच्या स्थानीं बसलेला आत्मा, प्रज्ञानाचा आणि प्रज्ञेचा घनीभूत सांठा आहे, तो आनंदमय आहे, आनंदभोक्ता आहे....हाच सर्वेश्वर, हाच सर्वज्ञ, हाच अंतर्यामी, हाच सर्वांचा प्रभव किंवा उगम होय.

- मांडुक्य उपनिषद् ५, ६

 

अतिमानस किंवा सत्य-संविद्, सत्य-जाणीव हा दिव्य अस्तित्वाचा दिव्य मूळ आत्म्याचा, परात्पराचा स्वभाव आहे; ही सत्य-संविद् सर्व-समावेशक, सर्व-जनक, सर्व-परिपूरक आहे. दिव्य अस्तित्वाचें किंवा आत्म्याचें सर्वातीत, केवळ, निःसंबंध, निष्क्रिय व स्वयंसिद्ध स्वरूप अर्थात् अतिमानसयुक्त नाहीं; स्वतःच्या विश्वांचें निर्माण करणारें आणि त्यांचें स्वामित्व करणारें जें त्या दिव्य आत्म्याचें सक्रिय स्वरूप, त्या स्वरूपाचा किंवा त्या क्रियाशील स्वरूपांतील दिव्य आत्म्याचा स्वभाव, सत्य-संविद्, सत्य-जाणीव किंवा अतिमानस हा आहे. आम्ही ज्याला ईश्वर म्हणतों, त्या संबंधीचें हें सत्य आहे. तो सत्य-जाणिवेचा मूळ, दिव्य आत्मा आहे. हा ईश्वर आणि पाश्चात्यांनीं कल्पिलेला ईश्वर वेगळे आहेत; पाश्चात्यांचा ईश्वर एक मर्यादित शक्तीची व्यक्ति आहे. तो मोठा केलेला निसर्गाच्या बाहेर, वरतीं, उंच असलेला एक मनुष्य आहे; मनुष्याचा 'मी' आणि सृष्टि निर्माण करणारें विज्ञान किंवा अतिमानस यांच्या परस्परांतील एका विशिष्ट नात्याची, मनुष्याला बरीच जवळ असणारी, महामानवी प्रतिमा वा छाया पाश्चात्यांच्या ईश्वरांत दिसते. ईश्वराला जी वैयक्तिक बाजू आहे, ती आपल्याला दुर्लक्षितां येत नाहीं. अव्यक्तिता किंवा सर्वता ही जशी अस्तित्वाची एक बाजू आहे, तशी व्यक्तिता पण दुसरी बाजू आहे; ईश्वर सर्व अस्तित्व आहे, त्याप्रमाणें तो एकमेव

 

पान क्र. २४७

 

सद्‌वस्तु आहे; एक आत्मा आहे; तो एकच एक ज्ञानमय अस्तित्व आहे--तसेंच अस्तित्व असलेला तो एक आत्मा आहे. पण सध्यां आपल्याला ईश्वराच्या व्यक्तित्वाकडे बघावयाचें नाहीं; दिव्य जाणिवेचें मानसिक, अव्यक्तिक, व्यक्तित्वातीत, सार्वत्रिक सत्य खोलपर्यंत समजून घेण्याचा, त्याचें पूर्ण मोजमाप करण्याचा आपण सध्यां प्रयत्न करीत आहों. त्याच्या महत्त्वाला अनुरूप अशी विस्तृत, स्पष्ट कल्पना निश्चित करण्याच्या उद्योगांत आपण सध्यां आहोंत.

सत्य-संविद् विश्वांत सर्वत्र विद्यमान आहे, व्यवस्था करणारें आत्मज्ञान हें त्याचें स्वरूप सर्व ठिकाणीं असतें, मूळ एकतत्त्व हें या सत्य-संविदेच्या आश्रयानें, त्याच्या ठिकाणीं शक्यतेच्या रूपांत असणाऱ्या अनंत, सुसंगत व सुसंवादपूर्ण रचना व्यक्त करतें. हें आत्मविषयक, व्यवस्था लावणारें ज्ञान जर नसतें, तर एकतत्त्वापासून जी अभिव्यक्ति झाली असती, ती व्यवस्थाशून्य, कोठें तरी कशी तरी वाहवणारी अशी झाली असती; एकतत्त्वाच्या अभिव्यक्तीची शक्यता असीम अनन्त असल्यानेंच, व्यवस्थातत्त्वाच्या अभावीं असीम आकस्मिकतेचा, अनियंत्रित यदृच्छेचा अनागोंदी पसारा चोहोंकडे आम्हांस दिसला असता. रचनांची अनंत शक्यता आहे पण त्यामध्यें मार्गदर्शक सत्याचा नियम किंवा सुसंवादपूर्ण आत्म-दर्शनाधिष्ठित रचनेचा नियम मात्र उपलब्ध नाहीं, अशी जर स्थिति असती, तसेंच विकासाकरितां व वाढीकरितां विकासक्षेत्रांत टाकलेल्या वस्तूच्या बीजाच्या पोटीं विकासाची पूर्वयोजना विद्यमान् नसती, तर विश्व हें प्रचंड, आकारशून्य व अश्चिततापूर्ण गोंधळाचा देखावा झाला असता. परंतु निर्माण करणारें जें ज्ञानतत्त्व आहे, त्यानें निर्माण अथवा व्यक्त केलेलें सर्व कांही त्यानें दुसऱ्या कोठून आणलेलें नसून स्वत:तूनच बाहेर काढलेलें असतें; त्याच्या स्वत:च्या शक्ती, त्याचे स्वत:चे आकार हेच त्या ज्ञानतत्त्वानें व्यक्त केलेले असतात; अर्थात् जी जी शक्यता किवा बीज, या ज्ञानतत्त्वाला विकसित करावयाचें असतें, त्या बीजाला लागूं असणारा सत्याचा विकासनियम, त्याला स्वत:चे ठिकाणीं स्पष्ट दिसत असतो; त्याचप्रमाणें प्रत्येक बीजाचें दुसऱ्या बीजाशीं असणारें नातेंहि त्याला स्वभावत:च अवगत असतें आणि या सर्वांपासून कोणत्या सुसंगत रचना होऊं शकतात, तेंहि या निर्मायक ज्ञानतत्त्वाला स्पष्ट दिसत असतें. विश्वाची सुसंगत, संपूर्ण कल्पना व योजना त्याच्या समोर असते. त्या योजनेंत सर्वसामान्य रचनासौष्ठवाबरोबर वर सांगितलेली प्रत्येक

 

पान क्र. २४८

 

बीजाची विकासयोजना चितारलेली असते; विश्वाच्या निर्मितीला कारण असणारें ज्ञान, याप्रमाणें विश्वाचें पूर्ण सुसंवादी चित्र आपल्या स्वतःच्या ठिकाणीं आंखून काम करीत असल्यानें, या चित्राचे घटक हे पूर्वयोजनेनुसार एकमेकांवर क्रिया-प्रतिक्रिया करीत राहून, अखेर पूर्वनियोजित सुसंवादी रचनासंभार अटळपणें उभा करतात; सृष्टिनिर्मिति करणारें ज्ञान हेच सृष्टींतील कायद्याचा उगम आहे, तेंच हा कायदा कार्यान्वित करून नेहमीं तो चालवितें; हा कायदा अर्थात् लहरी स्वैरपणा नसतो; व्यक्त होणाऱ्या वस्तूचा जो स्वतःचा स्वभाव असतो, त्याचें प्रकट रूप म्हणजे हा कायदा. प्रत्येक वस्तु तिच्या आरंभींच्या स्वरूपांत सत्य-कल्पनारूप असते. या वस्तुगत सत्यकल्पनेच्या पोटीं जें अवश्य कार्यकारी सत्य असतें, त्या सत्यानेंच वस्तूचा स्वभाव ठरत असतो. या स्वभावाचें प्रकट रूप म्हणजे त्या वस्तूचा विकास-नियम--विकासाचा कायदा होय. तेव्हां, आरंभापासूनच विश्वनिर्मितीचा सर्व व्यापार पूर्वनियोजनाप्रमाणें चालतो. तो व्यापार मूळ जाणीवयुक्त अस्तित्वाचा विकास असल्यानें, त्याचा विकासक्रम त्या अस्तित्वाच्या आत्मज्ञानांत अंतर्भूत असतो; या आत्मज्ञानानुसार तो चालतो. प्रत्येक क्षणीं जें विकासकार्य घडतें, तेंहि स्वकृत कार्याच्या स्वरूपाचें असतें; पूर्वनियोजनानुसार तें चालतें. विश्वव्यापाराच्या पोटीं प्रत्येक क्षणीं जें विवक्षित, स्वाभाविक मूळ विकाससत्य असेल, त्याप्रमाणें जें विकासकार्य अवश्य घडावयास पाहिजे तेंच घडत असतें. दुसऱ्या क्षणीं त्या अंतर्गत मूळ सत्याच्या प्रेरणेनें, ज्या बिंदूकडे विकासकार्य जावयास पाहिजे, तिकडे तें जातें आणि शेवटीं विश्वबीजांत जें नियोजनपूर्वक सांठविलें होतें, तें नियोजनानुसार प्रकट होणार हें निश्चित आहे.

विश्वाचा विकास, विश्वाची प्रगति ही त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या विकसित मूळ सत्याला धरून चाललेली असते हें आपण पाहिलें. ही अशी प्रगति होण्यासाठीं कालाचा अनुक्रम अवश्य आहे, स्थलाशीं संबंध अवश्य आहे; स्थलांतील संबंधित वस्तूवस्तूंमध्यें नियमबद्ध क्रिया-प्रतिक्रिया अवश्य आहे; कालानुक्रमानें या स्थलांतील वस्तुसंबंधाला कार्यकारणसंबंध असें स्वरूप येतें. काल आणि स्थल (अवकाश, आकाश) या वस्तू सत्य द्रव्यसृष्टींतील नसून, कल्पना-सृष्टींतील आहेत असें तत्त्वज्ञानी म्हणतात; परंतु खरी गोष्ट अशी आहे कीं, केवळ काल आणि स्थल नव्हे, तर सर्वच वस्तू मूळ ज्ञानमय आत्म्यानें (जाणीवयुक्त

 

पान क्र. २४९

 

अस्तित्वानें) आपल्या जाणिवेला दिलेले आकार आहेत; किंवा असें म्हणा, आपल्या जाणिवेच्या क्षेत्रांत आपण स्वत: घेतलेले आकार आहेत. तेव्हां, तत्त्वज्ञानी लोकांनीं काल, स्थल आणि इतर वस्तू यांमध्यें मानलेला भेद तितकासा महत्त्वाचा नाहीं. मूळ ज्ञानमय आत्म्याची स्वतःकडे पाहण्याची एक दृष्टि, काल आणि स्थल यांनीं व्यक्त होते; मूळ आत्मा आपलें एकत्व सांभाळून एकत्वाच्या पोटीं खूप विस्तार पावला, त्यानें महान् आत्मविस्तार केला. हा आत्मविस्तार आंत व बाहेर अशा स्वरूपाचा आहे; कालदृष्टि, ही अंतर्गत आत्मविस्ताराकडे पाहण्याची दृष्टि आहे; स्थलदृष्टि, ही बाह्य आत्मविस्ताराकडे पाहण्याची दृष्टि आहे; मूळ ज्ञानमय आत्माच काल आहे, तोच स्थल आहे; विषयदृष्टीनें तो स्थलरूप आहे, विषय-ज्ञानी, 'विषयी' या दृष्टीनें तों कालरूप आहे; विषय तोच झाला आहे, 'विषयी' तोच झाला आहे. सर्व अनुभव अनुभवण्याचे, काल आणि स्थल हे दोन सांचे आहेत. मनाच्या दृष्टीनें मोजणें, मापणें या त्याच्या क्रियेंतून हे सांचे निर्माण झाले आहेत. मनाचा स्वाभाविक व्यापार पृथक्करणाचा, विभाग करण्याचा. या व्यापाराला मोजमापाची अनिवार्य आवश्यकता आहे; मनाच्या दृष्टीनें काल हा आत्म्याचा हलता-फिरता विस्तार आहे; भूत, वर्तमान, भविष्य या अनुक्रमानें, या कालविभागणीनें हा हलता विस्तार मापला जातो; या क्रियेच्या व्यवहारांत मन एका विशिष्ट कालबिंदूंत उभें राहून, कालदृष्ट्या आपल्यामागें, आपल्यापुढें नजर टाकतें; स्थल हा स्थायी विस्तार आहे; येथें द्रव्य विभागतां येतें, द्रव्याची ही विभजनक्षमता स्थायी विस्ताराचें मोजमाप करावयास उपयुक्त ठरते; स्थायी विस्ताराचें विभाजन करतांना, मन एका स्थलबिंदूंत उभें राहून, आपल्या सभोंवर पसरलेल्या द्रव्याचा अंदाज घेतें व त्याचें मोजमाप करतें.

व्यवहारांत वस्तुस्थिति अशी आहे कीं, घटना ही कालाचें मोजमाप करण्याचें साधन म्हणून मन वापरतें आणि द्रव्याच्या साधनानें तें स्थलाचें मोजमाप करतें. परंतु घटना आणि द्रव्याची मांडणी यांचा उपयोग न करतां, काल व स्थल यांचा समावेश असलेली ज्ञानयुक्त शक्तीची शुद्ध क्रिया, शुद्ध मनाला जाणतां व अनुभवतां येणें शक्य आहे. काल आणि स्थल विश्वव्यापक जाणीवशक्तीच्या दोन बाजू आहेत; कापडाचे उभे-आडवे धागे असावे, त्याप्रमाणें जाणिवेच्या या दोन अंगांचे अन्योन्यसंबंधीं गुंतागुंतीचे क्रिया-प्रतिक्रियारूप व्यापार, जाणिवेचें स्वतःवर होणारें कार्य

 

पान क्र. २५०

 

घडवून आणतात. काल आणि स्थल यांचें हें स्वरूप शुद्ध मनाच्या लक्षांत येऊं शकतें. व्यवहारी मन हें घटनांच्या साधनानें काल मोजतें, द्रव्यानें स्थल मोजतें. शुद्ध मनाच्या आणि व्यवहारी मनाच्या पलीकडे जी श्रेष्ठ जाणीव आहे, तिला मनाला अनुभवाला येणारें भूत, वर्तमान, भविष्य एकाच दृष्टिक्षेपांत समोर दिसतें; ही जाणीव कालाच्या या तीन विभागांत विभागलेली किंवा सामावलेली नसून, हें तीन विभाग त्या जाणिवेच्या पोटीं सामावलेले आहेत. कालाच्या विवक्षित क्षणीं बसून, तिला कालदर्शनासाठीं इकडे तिकडे नजर टाकावी लागत नाहीं; अशा श्रेष्ठ जाणिवेला काल हा शाश्वत वर्तमानरूप असतो. त्याचप्रमाणें या जाणिवेला सर्व स्थानबिंदू सर्व प्रदेश तिच्या पोटीं असल्यानें, स्थलाच्या एखाद्या बिंदूवर उभें राहून, स्थलदर्शनासाठीं मागें पुढें पहावें लागत नाहीं आणि म्हणून तिला कालाप्रमाणेंच स्थलहि आपल्या आंतला विस्तार, अविभाज्य, अविभक्त असा अंतर्गत विस्तार वाटणें स्वाभाविक आहे. आपल्या जीवनांत असे क्षण येतात कीं, जेव्हां विश्वांतील विविध व्यापारांना, आपल्या जाणीवयुक्त आत्मगत अविभाज्य एकतेच्या पोटीं सामावून घेणारी व्यापक ज्ञानदृष्टि आपल्याला येते. काल आणि स्थल यांच्या अंतर्गत असणाऱ्या वस्तू, त्या ज्ञानदृष्टीला कालस्थलातीत, तात्विक सत्यस्वरूपांत दिसणार--त्या कशा दिसत असतील याचा विचार सध्यां अप्रस्तुत आहे. आपल्या मनाला या गोष्टीची कल्पना करणें देखील अशक्य आहे. आमच्या मनाला किंवा इंद्रियांना विश्वाचें जें ज्ञान होतें त्याहून निराळ्या प्रकारचें ज्ञान या एकतामय व अविभाज्य ज्ञानदृष्टीला होणें शक्य आहे, ही गोष्ट देखील आमचें मन मान्य करूं शकत नाहीं.

अतिमानस आपल्या व्यापक समावेशक रूपांत, कालाचे अनुक्रम व स्थलाचे विभाग अंतर्भूत करून घेतें आणि त्यांच्यांत एकता, अविभक्तता आणतें. कारण अतिमानसाला एका दृष्टिक्षेपांत सर्व स्थल-काल आणि त्यांचा व्यापार दिसतो; त्याची जाणीव सर्व कांहीं सामावून घेणारी आहे, ही गोष्ट समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विचाराचे थोडे कष्ट केल्यानें ही गोष्ट आम्हांला समजू शकेल. आतां प्रथम 'कालाचा अनुक्रम' ही बाब नाहींच अशी कल्पना करूं. बदल, प्रगति ही क्रमयुक्त काल-कल्पनेचा परिणाम असल्यानें, क्रमयुक्त काल नसेल तर बदल नाहीं, प्रगति नाहीं; त्यामुळें विश्वांत पूर्ण सुसंगतता शाश्वत काल व्यक्त होत

 

पान क्र. २५१

 

राहील; अनेक सुसंगत घटना जणुं एकाच शाश्वत क्षणांत, एकाच वेळीं आपल्याला दिसतील; कांहीं भूतकालीन व कांहीं भावी असा प्रकार दिसणार नाहीं. पण मनाला क्रमयुक्त काल असल्यामुळें, अतिमानसाला घडणारें दर्शन आणि मनाला घडणारें दर्शन यांत अंतर आहे. आम्हांला विश्वाची सुसंगत घटना एका दृष्टिक्षेपांत दिसत नाहीं, विकासशील घटना दिसते, सुसंगतीचा एक घटक आतां, एक नंतर, याप्रमाणें सारखा क्रम नित्य चाललेला प्रत्ययास येतो, एका घटकांतून दुसरा घटक निघतांना दिसतो, नंतरच्या घटकांत पूर्वींचा घटक गुप्त होऊन बसतो. ही कालाची गोष्ट झाली. आतां, विभागतां येण्याजोगें स्थल, ही गोष्ट नसती व विश्वाचें आत्म-अभिव्यक्तीचें कार्य चाललें असतें, तर आकारांआकारांत असलेले संबंध बदलणें, शक्तीशक्तींचा अन्योन्यांवर आघात प्रत्याघात होणें या गोष्टी घडल्या नसत्या; सर्व कांहीं एकाच वेळीं एकाच रूपांत अस्तित्वांत असलेलें प्रत्ययास आलें असतें-कांहीं क्रिया घडून अस्तित्वांत येणें, हा प्रकार दिसला नसता. स्थलाभावीं मूळ आत्मजाणीव आपल्या अंतरांत सर्व वस्तू सामावून राहिली असती. एकादा विश्वकवि हा विश्वस्वप्नदर्शी असावा आणि त्याच्या अंतरांत सर्व विश्व असावें, तसें सर्व विश्व आमच्या आंतरात्म्यांत सामावलेलें प्रत्ययास आलें असतें. बाह्य आत्म-विस्तार आणि त्या विस्तारांत वस्तूवस्तूंत आत्म-जाणीव विभागून राहिलेली, अशी परिस्थिति घडली नसती--कारण स्थल-कल्पनेच्या पोटीं हा प्रपंच शक्य असतो, एरव्हीं शक्य असत नाहीं. विश्व-वस्त्राचा ताणा-बाणा जो स्थल आणि काल, त्याचा अभाव कल्पिल्यानें विश्व कसें दिसलें असतें तें सांगितलें. आतां, काल सत्य आहे, पण स्थल नाहीं अशी कल्पना करून काय होतें तें पाहूं. काल आहे अर्थात् कालक्रम आहे; या कालक्रमाच्या आधारानें विश्वविकास व्हावयाचा, तर त्यांत स्थलाचा गोंधळ नसल्यानें, या सरळ असंकीर्ण विकासाची एक पायरी दुसऱ्या पायरींतून सहजपणें आंतरात्म्यांत उदयास येत जाईल. वाद्याचे ध्वनितरंग एकांतूनएक, एकसारख्या अविरत क्रमानें निघत रहावे किंवा कवीच्या मनांत एकामागून एक प्रतिमा व्यक्त होत रहाव्या, त्याप्रमाणें विश्वघटना सुसंगतपणें, क्रमवार व्यक्त होत रहातील. परंतु काल आणि स्थल दोन्हीहि सत्य असल्यामुळें, आम्हांला जो विश्वविकास प्रत्ययास येतो, त्यांत कालक्रम हा आकार आणि शक्ति यांच्या स्वरूपांत सुसंगत घटना निर्माण करतो आणि हे आकार व या शक्ती सर्वसमावेशक,

 

पान क्र. २५२

 

स्थलात्मक आत्मविस्ताराच्या क्षेत्रांत कांहीं विशिष्ट संबंधांनीं एकमेकींशीं बांधलेल्या असतात; म्हणजे अस्तित्वाच्या बाह्य क्षेत्राचें जें दर्शन घडतें, त्यांत वस्तूंच्या आणि घटनांच्या प्रतिमा आणि शक्ती अविरतपणें एकीपाठीमागून दुसरी अशा सारख्या उदय पावतांना आम्हांला दिसतात.

काल आणि स्थल यांच्या या विश्वरूप क्षेत्रांत, भिन्न भिन्न शक्यता, वस्तुबीजें व घटनाबीजें यांना आकार देण्यांत येतो; त्यांना स्थान देण्यांत येतें आणि त्यांचें अन्योन्यसंबंध ठरविण्यांत येतात. अर्थात् प्रत्येक वस्तुबीज आपल्या प्रकट आणि अप्रकट शक्तींसह दुसऱ्या वस्तुबीजांशीं जणुं सामना करीत असतें; याचा परिणाम असा होतो कीं, कालक्रमानें ज्या वस्तू एकामागून एक उदयास येतात, त्या मनाच्या दृष्टीनें स्वाभाविक स्वयंस्फूर्त क्रमवारीनें उदयास येत नसून, एकमेकींशीं झगडून पुढें होतात. खरें पाहतां, व वस्तूंच्या पोटीं त्यांच्या विकासाचा जो ज्ञानमय नियम असतो, तदनुसार स्वयंस्फूर्तरीतीनें वस्तूंचा विकास होत असतो. बाह्यतः जो झगडा आणि संघर्ष दिसतो, ती स्वाभाविक अंतर्विकासाची वरवरची गौण बाजू असते. एक आणि समग्र असें जें मूळतत्त्व आहे, त्याच्यांत स्वभावत: पूर्ण सुसंगति, सुमेळ असणार. या सुसंगत पूर्णतत्त्वाचा अंतर्यामींचा, अंतःस्वभावस्थ नियम, हाहि सुसंगतिपूर्ण असणार; त्या एकतत्त्वाचे जे भाग होतात, जीं रूपें होतात, त्यांच्या बाह्य प्रक्रियाविषयक नियमांवर या एकतत्त्वाच्या सुसंवादी अंतर्नियमाची यंत्रणा असते. हे भाग, हे आकार आम्हांला एकमेकांशी झगडतांना दिसतात; पण हा फक्त बाह्य देखावाच असतो. अतिमानस दृष्टीला, एकतत्त्वगत सर्वशासक सुसंवादाचे श्रेष्ठ आणि गूढ सत्य नेहमीं स्पष्ट दिसतें. मनाला जी गोष्ट दर्शनीं विसंवादपूर्ण वाटते, ती त्याला तशी वाटण्याचें कारण, प्रत्येक वस्तु स्वतंत्र, दुसऱ्या सर्व वस्तूंपासून अलग आहे, अशा कल्पनेनें मन त्या गोष्टीचा विचार करतें हें होय. वस्तुत: अतिमानसाच्या दृष्टीनें, विश्वरचना ही एक सुसंगत विकासशील रचना आहे. विश्वरचनेंत प्रत्येक क्षणीं सुसंगतपणा वसत असतो. मनाला दर्शनीं विसंगत, विसंवादी दिसणारी गोष्ट, ही या नित्य विश्वरचना-सुसंवादाचें एक आवश्यक अंग असते. अतिमानस हें विश्वाकडे अविभक्त दृष्टीनें पाहतें--एकच अनेक झालें आहे, होत आहे, अनेक एकाचेंच व्यक्तीकरण आहे हीं गोष्ट अतिमानसाला स्पष्ट दिसते; एका दृष्टिक्षेपांत भूत, भविष्य वर्तमान विश्व पाहण्याची शक्ति अतिमानसांत असल्यानें, त्याच्या दृष्टीला

 

पान क्र. २५३

 

मनाप्रमाणें विसंवादाचा अनुभव या विश्वपसाऱ्यांत येत नाहीं. मनाला फक्त विवक्षित काल आणि विवक्षित स्थल दिसतें; या कालांत, स्थलांत, 'घडून येण्याचा अधिक संभव असलेल्या' अनेक गोष्टी एकमेकींत मिसळलेल्या, एकमेकांत गोंधळ करीत असलेल्या त्याला दिसतात; म्हणजेच त्याला विसंवाद, विरोध व झगडा दिसतो. अतिमानसाची गोष्ट निराळी आहे; अतिमानस ही दिव्य ईश्वरी जाणीव आहे. तिला काल आणि स्थल यांचा अखिल विस्तार-पट दिसतो; मनाला दिसणाऱ्या सर्व संभवनीय गोष्टी आणि त्याला न दिसणाऱ्याहि कितीतरी अधिक संभवनीय गोष्टी तिला दिसतात; कोठेंहि चूक, चांचपडणें किंवा गोंधळ तिला दिसत नाहीं; याचें कारण, प्रत्येक संभवनीय गोष्टीची विकासशक्ति काय आहे, तिची मूलभूत निकड कोणती आहे, तिची इतर संभवनीय गोष्टींशीं योग्य नातीं कोणतीं आहेत, हें तिला दिसतें आणि प्रत्येक संभवनीय गोष्ट क्रमाक्रमानें विकसित होत, शेवटीं तिचें स्वरूप काय होणार आहे, या क्रमविकासाचे काल, स्थल, परिस्थिति या दृष्टीनें टप्पे कोणते आणि शेवटीं जें तिचें स्वरूप व्हावयाचें तें केव्हां, कोठें व कोणत्या परिस्थितींत वास्तवांत येणार आहे, हें सर्व अतिमानस दिव्य जाणिवेला स्पष्ट दिसत असतें. सर्व गोष्टी स्थिरपणे पाहणें व एका दृष्टिक्षेपांत समग्रतेनें पाहणें हें मनाला शक्य नाहीं; परंतु अशी स्थिर व्यापक समग्र दृष्टि हा, मनापलीकडे असलेल्या अतिमानसिक जाणिवेचा मात्र आंतरिक प्राकृतिक स्वभावच आहे.

अतिमानस स्वतःचे जे आकार आपल्या जाणीवशक्तीच्या द्वारां घडवितें, ते सर्व त्याच्या पोटीं सामावलेले असतात; ते सर्व स्वतःच्या पोटीं त्याला स्पष्ट दिसतात; शिवाय अतिमानसिक जाणीव या सर्व आकारांनाहि आंतून व्यापून असते; या विविध आकारांच्या पोटीं ती, आत्मप्रकाशक ज्योतीच्या स्वरूपांत, त्या आकारांना मार्गदर्शक म्हणून राहते. विश्वाच्या प्रत्येक आकारांत, प्रत्येक शक्तींत अतिमानस गुप्तपणें राहतें; आकार, शक्ति व विशिष्ट क्रिया हें सर्व अतिमानस स्वयंस्फूर्तपणें आणि सार्वभौमपणें ठरवितें; ज्या परिवर्तनाच्या व भिन्नतेच्या गोष्टी तें ठरवितें आणि आपल्या छंदानुसार घडवितें, त्या सर्वांना मर्यादा घालण्याचें काम पण तेंच करतें; तें जी शक्ति उपयोगांत आणतें, ती एके ठिकाणीं आणणें, विखरून पसरविणें किंवा कमी-अधिक करणें हीं कामेंहि तेंच करतें आणि हें सर्व तें त्या प्राथमिक आद्य नियमानुसार

 

पान क्र. २५४

 

करीत असतें. आकाराच्या जन्मक्षणीं, शक्तीच्या कार्यारंभक्षणीं तो नियम त्याच्या आत्मज्ञानानें ठरवून दिलेला असतो. (वेदामध्यें एका ठिकाणीं म्हटलें आहे : देवता आद्य नियमानुसार वागतात; हे नियम मूळतत्त्वाचे आणि म्हणून सर्वशासक असतात; वस्तूंच्या सत्य अंतस्तत्त्वानें निश्चित केलेला जो नियम, तोच आद्य नियम होय.) अतिमानस सर्व भूतांच्या हदयीं त्यांचा ईश्वर म्हणून वास करतें; यंत्रारूढ करून वस्तूंना फिरवावें त्याप्रमाणें मायाशक्तीनें तें सर्व भूतांना हिंडवीत असतें. (गीता १८-६१;) सर्व भूतांच्या पोटीं तें असतें आणि सर्वांना तें व्यापून असतें. दिव्य द्रष्टा (कवि) तेंच आहे; त्यानें सर्व वस्तू विविध रीतीनें विश्वांत स्थापिल्या आहेत व त्यांना विविध वर्तन-नियम त्यानें घालून दिले आहेत; प्रत्येक वस्तूला तिचें तत्त्व पाहून योग्य तें स्थान त्यानें दिलें आहे व योग्य तो नियम तिला लावून दिला आहे; ही व्यवस्था त्यानें शाश्वतची केली आहे. (ईश-उपनिषद् ८ वा श्लोक)

तेव्हां निसर्गातील प्रत्येक वस्तु, मग ती सजीव असो वा जड असो, मानसिक आत्मजाणिवेनें युक्त असो वा नसो, तिचें अस्तित्व, जीवन व तिचे व्यापार, त्या वस्तूच्या अन्तरंगांत वसत असलेल्या सर्व-दर्शी ज्ञानानें व सर्वसमर्थ शक्तीनें नियंत्रित केलेले असतात; आमच्या मनाला या ज्ञानाचें व शक्तीचें दर्शन घडत नसल्यानें, त्यांना आम्ही अधोमानसिक ज्ञान व शक्ति म्हणतों, नेणीवव्याप्त ज्ञान व शक्ति म्हणतों--पण हें ज्ञान व सामर्थ्य स्वतःला नेणीवव्याप्त असत नाहीं किंवा तें अधो-मानसिकहि असत नाहीं; तें मनाहून श्रेष्ठ, सर्वव्यापी, सखोल, आत्मजाणीवयुक्त असें ज्ञान व सामर्थ्य असतें. अशी वस्तुस्थिति असल्यामुळेंच प्रत्येक वस्तु, तिचें ठिकाणीं बुद्धि दिसत नसतांहि बुद्धीनें करावें तसें काम करीत असते; वनस्पति, मनुष्येतर प्राणी व मनुष्य सर्वजण त्यांच्या अंतरांत असलेल्या दिव्य अतिमानसाच्या सत्यात्मक कल्पनेच्या आदेशानुसार वागतात; वनस्पति व मनुष्येतर प्राणी, त्यांच्या कमी-अधिक अधोमानसिक जाणिवेच्या मध्यस्थीनें वरील आदेश घेतात व पाळतात; मनुष्य अर्धवट अशा (मानसिक) जाणिवेच्या मध्यस्थीनें वरील आदेश घेतो व पाळतो. सर्व वस्तूंच्या अंतरीं राहून, त्यांजवर सत्ता चालवणारें ज्ञान किंवा प्रज्ञा हें मानसिकज्ञान नसतें, मानसिकप्रज्ञा नसते; अस्तित्व आणि ज्ञान अविभाज्यपणें ज्या मूळ सद्‌रूपांत एकत्र असतात, त्या अस्तित्वाचें, त्या सद्रूपाचें स्वतःला पूर्णतया जाणणारें सत्य-थोडक्यांत, सत्याची

 

पान क्र. २५५

 

आत्म-जाणीव-सत्यजाणीव ही सर्व वस्तूंच्या अन्तरीं राहून, त्यांजवर सत्ता चालवीत असते; या सत्य-जाणिवेला, सत्य-प्रज्ञेला विचार करून निर्णय घ्यावे लागत नाहींत; आत्मपरिपूर्ति करणाऱ्या एकच एक मूळ अस्तित्वाचा, सद्‌रूपाचा व अचूक आत्मज्ञान आणि आत्मसामर्थ्य यांचा सांठा तिला उपलब्ध असल्यानें, त्या अचूक ज्ञान-सामर्थ्याचा वापर करून, ती वस्तुव्यवस्था करीत असते. मानसिक प्रज्ञा ही विचार केल्याशिवाय काम करूं शकत नाहीं; कारण मूळ सत्य-प्रज्ञेचें केवळ प्रतिबिंब मानसिक प्रज्ञेच्या रूपानें व्यक्त होतें; तिला खरें ज्ञान असत नाहीं-ज्ञानाचा शोध करणें हें तिचें कार्य असतें; ती कालाच्या आश्रयानें प्रथम एक पाऊल नंतर दुसरें पाऊल, अशीं पावलें टाकीत तिच्याहून श्रेष्ठ अशा ज्ञानाचें- प्रज्ञेचें कार्य समजून घेत असते; त्या श्रेष्ठ ज्ञानाच्या गुप्त आदेशानुसार वागत असते; हें श्रेष्ठ ज्ञान शाश्वत काल एकतामय आणि समग्र असतें; काल या ज्ञानाच्या पकडींत असतो, पोटांत असतो; भूत-वर्तमान- भविष्य सर्व कांहीं एका दृष्टिक्षेपांत या श्रेष्ठ ज्ञानाला जाणतां येतें, अनुभवतां येतें.

दिव्य अतिमानसाचें पहिलें क्रियातत्त्व हें कीं, तें विश्वव्यापक ज्ञान आहे; सर्वसमावेशक, सर्वव्यापक, सर्वांच्या अन्तर्यामीं रहाणारें, विश्वैकदर्शी, विश्वमय ज्ञान आहे. सर्व वस्तू अस्तित्वदृष्टीनें अतिमानसांत समाविष्ट आहेत; त्याचा क्रियारहित, काल-स्थलरहित आन्तरात्मा हा स्वतःच्या ज्ञानांत, आत्मविषयक ज्ञानांत सर्व वस्तूंचा आत्मस्थ म्हणून संग्रह करून असतो; आणि म्हणून त्याचें क्रियाशील ज्ञानहि सर्वसमावेशक असतें. कालांत व स्थलांत स्वतःला आकार देण्याचें, अर्थात् स्वतःमधील वस्तूंना आकार देण्याचें काम तो आपल्या स्वतःच्या नियंत्रणाखालीं चालवितो; हे कालस्थलबद्ध आकार, ज्ञानविषय किंवा पदार्थ बनून अतिमानसिक आत्मा त्यांचा ज्ञाता बनतो. ज्या ज्ञानाच्या स्वतःवरील क्रियेनें ज्ञाता आणि ज्ञेय ही जोडी निर्माण केली, तें ज्ञान, ती ज्ञानक्रिया या जोडीला जोडणारा दुवा बनते.

अतिमानसिक जाणिवेच्या क्षेत्रांत ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान (क्रिया) या मूलत: एकरूप असतात, वेगळ्या वेगळ्या वस्तू असत नाहींत हें वरील विवेचनावरून उघड आहे. या तीन वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत असें आपलें मन मानतें; कारण त्याला असा भेद केल्यावांचून आपलें कार्य करतांच येत नाहीं; असा भेद न मानल्यास मन गतिशून्य होऊन बसेल.

 

पान क्र. २५६

 

मी स्वतःकडे जेव्हां मनानें पाहतों, तेव्हां देखील मला माझ्यामध्यें असा त्रिधा भेद कल्पावा लागतो. मी आहे म्हणणारा, मी पाहतों म्हणणारा असा ज्ञाता; या ज्ञात्याचा ज्ञानविषय किंवा ज्ञेय, माझ्यामध्यें जें मी पहात असेन तें, म्हणजे मीच (ज्ञाताच) परंतु 'मी नव्हे' म्हणून बाजूला काढलेला मी, किंवा त्यापैकीं कांहीं अंश; ज्ञान म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय यांना जोडणारी क्रिया; या क्रियेनें 'ज्ञाता मी' आणि 'ज्ञेय मी' यांना 'ज्ञानक्रिया मी' हा एकत्र आणून जोडतो. ही जी विभागणीची क्रिया चालते, ती कृत्रिम आहे. व्यवहाराला सोईची म्हणून ती करण्यांत येते; वस्तूंच्या संबंधाचें पायाभूत सत्य या कृत्रिम भेदांत नाहीं, हें उघड आहे. वस्तुत: 'मी ज्ञाता' म्हणजे जाणण्याची क्रिया करणारी जाणीव. ज्ञान (क्रिया) ही सुद्धां ती जाणीवच होय. म्हणजे मीच क्रिया करणारा आहे, ज्ञेयहि मीच आहे. त्या एकाच जाणिवेनें घेतलेला आकार किंवा फेरी--या स्वरूपांतील मी आहे; या तीन दिसणाऱ्या वस्तू, वस्तुत: एकच अविभाज्य अशी वस्तु किंवा क्रिया आहेत; दिसतांना त्या विभागल्या सारख्या दिसतात एवढेंच; तीन रूपें जरी दिसलीं, तरी जाणीव ही वस्तु आणि क्रिया, तिहींमध्यें वांटून दिलेली नाहीं--दिसावयास मात्र, एक वस्तु व क्रिया तीन ठिकाणीं वाटून दिली आहे आणि म्हणून तीन वस्तू किंवा क्रिया वेगळ्या आहेत असें दिसते. हें खऱ्या एकतेचें ज्ञान मनाला विचारानें आत्मसात् करतां येतें, त्याची भावना तशी होऊं शकते. परंतु बुद्धिपुरस्सर व्यवहार करतांना, त्या व्यवहाराचा पाया म्हणून हें ज्ञान मन सहजासहजीं वापरूं शकत नाहीं. स्वतःसंबंधानें मन काय करतें, काय करूं शकत नाहीं हें सांगितलें. आतां, 'मी' असें ज्या जाणिवेच्या रूपाला नांव दिलें जातें, त्या 'मी' च्या बाहेरचे असणारे पदार्थ पाहिले तर, ते पदार्थ व 'मी' स्वत: एकच आहोंत ही एकता समजणें व्यवहारिक मनाला अधिकच दुर्लभ वाटतें, जवळ जवळ अशक्य कोटींतील वाटतें. अशी एकतेची भावना होणें देखील असामान्य खटपटीनें साधूं शकतें; परंतु ही भावना टिकविणें, तिला आपल्या क्रियाशील जीवनाची कायमची प्रेरणा म्हणून स्वीकारणें, ही गोष्ट तर मनाला केवळ अशक्यच आहे; मनाच्या क्षेत्रांत जीं कामें स्वाभाविकपणें मोडतात, त्या कामांहून हें अगदीं निराळें, परकें, नवें व मनाला न पेलणारें असेंच काम आहे. मनाला फार तर एवढें करतां येईल कीं, 'मी' ची आणि 'मी-बाह्य' जीवनांची अथवा वस्तूंची एकता नीट समजून घेऊन, तें ज्ञान जवळ

 

पान क्र. २५७

 

सांभाळून ठेवणें आणि आपल्या स्वाभाविक क्रिया करतांना किंवा केल्यावर त्यांतील झालेल्या किंवा होऊं शकतील अशा चुका दुरुस्त करणें, स्वाभाविकपणें योजिलेलें कार्य हें वरील एकतेचें सत्य लक्षांत घेऊन शक्य तेवढें बदलून करणें--अर्थात् वस्तू व जीव, वेगळे वेगळे आणि स्वतंत्र आहेत, या व्यावहारिक सिद्धान्ताला धरूनच मन आपलें हें कार्य करीत राहील; कार्यांत थोडासा बदल किंवा त्यांतील चुकीची दुरुस्ती करावयास एकतेची भावना उपयोगांत आणील. आमच्या बुद्धीला हें ठाऊक आहे कीं, पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरते. पण सूर्य पृथ्वीभोंवतीं फिरतो हें जें डोळ्यांना दिसतें, ती चूक या बुद्धीच्या सत्याचा उपयोग करून आपण दुरुस्त करतो, त्याप्रमाणेंच वरील गोष्ट समजावयाची. डोळ्यांना जें दिसतें, त्यांत फरक होत नाहीं, स्थूल इन्द्रिय-व्यवहाराला सोईची अशी जी रचना निसर्गानें केली आहे, ती कांहीं आम्हांला रद्द करतां येत नाहीं; ती तत्त्वत: गैरसोईची व कृत्रिम आहे, पण ती व्यवहारतः निसर्गाला सोईची आहे. त्याप्रमाणेंच विभागणीवर अवलंबून असलेली मनाची क्रिया निसर्गाला सोईची आहे. ती न बदलतां, 'मी' 'इतर' तत्त्वत: एक आहोंत, ही सत्य गोष्ट समजून घेऊन, मनाकडून घडणाऱ्या व्यवहारांत चूक दुरुस्तीसाठीं, थोड्याशा बदलासाठीं आपण तिचा उपयोग करतो.

अतिमानसाची गोष्ट वेगळी आहे. हें अतिमानस एकतेचें सत्य कधीं विसरत नाहीं; एकता हें मूलभूत सत्य आहे, हें नेहमीं दृष्टीसमोर ठेवून, अतिमानस आपला व्यवहार करतें; अतिमानसाला एकता हें स्वाभाविक सत्य आहे; पण मनाला तें तसें नाहीं; त्याच्या दृष्टीचा नैसर्गिक भाग हें सत्य नाहीं--त्याला तें समजून घेऊन प्रयत्नानें लक्षांत ठेवावें लागतें. विश्व आणि त्यांतील सर्व वस्तू मीच आहे असा प्रत्यय अतिमानसाला येतो; अविभाज्य अशी एकच ज्ञानक्रिया ही, हा प्रत्यय त्याला आणून देते; ही क्रिया त्याच्या जीवनाचा प्राण आहे, त्याच्या गतिमान् अस्तित्वाची गतिमानताच या क्रियेंत आहे. अतिमानसाची सर्व-समावेशक दिव्य जाणीव जेव्हां तिच्या इच्छाशक्तीच्या स्वरूपांत विश्वजीवनाचा विकास करते, तेव्हां नियंत्रण किंवा मार्गदर्शन करून ती हें कार्य घडवून आणीत नाहीं, तर आपल्या सर्वसमर्थ क्रियाशक्तीनें तें स्वतःच्या पोटांत पूर्ण करतें; याचें कारण, तिची ज्ञानक्रिया व तिची इच्छाक्रिया (शक्तिक्रिया) या दोन विभक्त गोष्टी नसून, एकच क्रिया असते; आणि या दोन्हीं क्रिया (किंवा एक क्रिया) अस्तित्वाच्या क्रियेशीं

 

पान क्र. २५८

 

एकरूप असतात; अस्तित्व, ज्ञान व शक्ति या तीन गोष्टी अतिमानसांत सर्वथैव एकरूप असतात. विश्वशक्ति व विश्वजाणीव एक असतात; कारण विश्वशक्ति हें विश्व-जाणिवेचें क्रियारूप आहे. याप्रमाणें ईश्वरी ज्ञान आणि ईश्वरी इच्छाशक्ति एक असतात; कारण ईश्वरी अस्तित्वाची मूलभूत क्रिया या ज्ञानानें आणि इच्छाशक्तीनें व्यक्त होत असते.

वस्तू व घटना, वेगळ्या वेगळ्या व स्वतंत्र आहेत अशा कल्पनेनें आमची पृथक्करण-अधिष्ठित मनाची जाणीव काम करते. ही कल्पना चूक आहे, ही चूक मनाच्या स्वभावांत आहे; ही प्राथमिक चूक आपण समजलों नाहीं व दूर ठेवली नाहीं, तर विश्वाचें खरें स्वरूप आपल्याला कळणार नाहीं. तें कळण्यासाठीं जें एक सत्य आम्हीं नेहमीं निर्धारानें आमच्यासमोर ठेवलें पाहिजे, तें अतिमानसिक सत्य होय. अतिमानस सर्वसमावेशक आहे--ही सर्वसमावेशकता विभागतां येत नाहीं--तें अविभाज्य आहे; आणि त्याची अविभाज्य एकता यत्किंचितहि कमी न होतां, त्यांत सर्व अनेकता, विश्वपसारा, सामावलेला आहे. हें अतिमानसिक सत्य नेहमीं समोर राहील, तरच विश्वाचा, विश्वरचनेचा उकल आम्हांस होणें शक्य आहे. बीजांत वृक्ष असतो, तो बीजांतून वर येतो व वृक्षांतून बीज येतें; आपण ज्याला वृक्ष म्हणतों, तें एक विश्वांतील रूप आहे; जें ज्ञानरूप एकतत्त्व विश्वांत अभिव्यक्त झालें आहे, त्या एकतत्त्वाच्या अभिव्यक्तीचें एक रूप म्हणजे वृक्ष आहे. या रूपाच्या शाश्वततेमध्यें एक सार्वभौम निश्चित नियम आहे, निश्चित व न बदलणारी प्रक्रिया आहे; तो नियम हाच कीं, वृक्षांतून बीज, बीजांतून वृक्ष. विवक्षित वृक्षाचा जन्म, जीवन आणि संतानोत्पादन या घटनेकडे पाहतांना, ही घटना स्वतंत्र आहे असें कल्पून मन तिचा अभ्यास करतें; तिचें वर्गीकरण व कार्यकारण दृष्टीनें तिचें स्पष्टीकरण करतें. वृक्षाचें अस्तित्व बीजामुळें व बीजाचें अस्तित्व वृक्षामुळें शक्य होतें--असा निसर्गनियम आहे, असा उद्‌घोष मन करतें. पण या उद्‌घोषानें स्पष्टीकरण मुळींच होत नाहीं. एक गूढ घटना कशी घडते ती प्रक्रिया, पृथक्करण पद्धतीनें शोधून टिपून ठेवणें एवढेंच खरोखरी मन या बाबतींत करतें. वृक्षाचा, वृक्षाच्या रूपाचा म्हणजेच वृक्षदेहाचा आत्मा ही गुप्त अशी जाणीवयुक्त शक्ति आहे, ही शक्ति हेंच वृक्षाचें खरें अस्तित्व आहे, बाकी सर्व या शक्तीची नियमबद्ध क्रिया आहे, अभिव्यक्ति आहे असें जरी मनाला कळलें, तरी वृक्ष, वृक्षाकार ही स्वतंत्र वस्तु आहे, तिचा निसर्गनियम स्वतंत्र आहे, तिची

 

पान क्र. २५९

 

विकास-प्रक्रिया स्वतंत्र आहे, असेंच त्याच्या स्वभावानुसार मन मानणार; असेंच मानण्याकडे त्याची प्रवृत्ति असणार. मनुष्येतर प्राणी आणि मनुष्य यांत म्हणजेच ज्यांच्यामध्यें मनाची जाणीव आली आहे त्या जीवांत, आपल्या विभक्ततेच्या प्रवृत्तीमुळें मन स्वतःलाहि स्वतंत्र वस्तु, जाणीवयुक्त ज्ञाता समजतें आणि इतर वस्तूंना आपले ज्ञेय पदार्थ म्हणजेच आपल्याहून वेगळे व स्वतंत्र असे पदार्थ समजतें. जीवनाला उपयुक्त व आवश्यक अशी ही मनाच्या कल्पनेची व्यवस्था आहे; जीवनाचा सर्व व्यवहार त्याच्या प्राथमिक अवस्थेंत या कल्पनेवर आधारलेला असतो. कल्पना केवळ कल्पनाच नसून मूळ शाश्वत सत्य आहे, अशी समजूत मन करून घेतें--व त्यामुळेंच अहंकाराच्या विभक्तपणाच्या सर्व चुका निर्माण होतात.

अतिमानसाची दृष्टि आणि सृष्टि वेगळी आहे. तेथें विभक्ततेचें नांव नाहीं. वृक्ष आणि त्याची प्रक्रिया ही जर स्वतंत्र वस्तु म्हणून असती, तर अतिमानसाच्या निर्मितिक्रियेंत ती अस्तित्वांतच आली नसती. ती आहे आणि विशिष्ट प्रकारची आहे याला कारण, वृक्षाचें विश्वाच्या अस्तित्वाशीं, विश्वशक्तीशीं आणि विश्वांत वृक्षाखेरीज दुसरे जे विश्वशक्तीनें घेतलेले आकार आहेत, त्या सर्वांशीं असलेलें जवळकीचें नातें हें एकतेचें आहे. जे जे आकार विश्वांत आहेत, त्यांचें विशिष्ट स्वरूप आणि विशिष्ट विकास, हाहि त्या नात्यावर अवलंबून असतो; या नात्याचा तो परिणाम असतो. विश्वांतील नानाविध आकारांचें अस्तित्व आणि विकास सर्वस्वीं विश्वाच्या अस्तित्वाची शक्ति घडवीत असते. वस्तूंच्या प्रकृतीचा जो भिन्न कायदा, तो सर्व निसर्गाच्या सार्वत्रिक कायद्याचें प्रसंगनिष्ठ विशिष्टीकरणरूप असतो; विश्वाचा जो सर्वसाधारण विकास ठरलेला असतो, त्यांत कोणत्याहि वस्तूचें जें स्थान असेल, त्याप्रमाणें त्या वस्तूचा विशिष्ट विकास ठरला जातो; वृक्षबीजाचें स्पष्टीकरण वृक्षांत सांपडत नाहीं, वृक्षाचें स्पष्टीकरण बीजांत सांपडत नाहीं; तर विश्व (विश्वविकास) हें दोघांचेंहि स्पष्टीकरण आहे आणि ईश्वर (ईश्वराची ज्ञानयुक्त इच्छाशक्ति) हें विश्वाचें स्पष्टीकरण आहे. अतिमानस एकाच वेळीं वृक्षबीज, वृक्ष आणि इतर सर्व पदार्थ यांना व्यापून असतें आणि यांच्या अंतरीं त्या त्या पदार्थाचा ''आत्मा'' म्हणून राहतें; हें त्याचें श्रेष्ठ आत्मज्ञान अविभाज्य आहे, एकतामय आहे आणि त्याला हें सदासर्वदा समोर असतें. या ज्ञानाच्या आश्रयानें

 

पान क्र. २६०

 

तें काम करतें; आपला जीवन-व्यवहार करतें; अतिमानसाच्या ज्ञानाची अविभाज्यता आणि एकता कठोरपणें अपरिवर्तनीय नाहीं; ती आपल्या पोटांत अनेकतेला वाव देणारी अशी लवचिक आणि व्यवहारी आहे. अतिमानसाच्या सर्वसमावेशक ज्ञानदेहांत स्वतंत्र असें अस्तित्वकेन्द्र कोठेंहि नाहीं. आमच्यांत आहे त्याप्रमाणें कोठेंहि वैयक्तिक अलग असा अहम् नाहीं; सर्व अस्तित्व त्याच्या आत्मजाणिवेच्या दृष्टीनें सर्वत्र सारखें विस्तारलेलें आहे; तें जसें एकतेमध्यें 'एक' आहे, तसें अनेकतेच्या विस्तारांतहि 'एकच' आहे; कोणत्याहि परिस्थितींत सर्वत्र सर्वदा एकच आहे. अतिमानसाच्या क्षेत्रांत एकाच अस्तित्वाला 'सर्व' आणि 'एक' अशीं दोन रूपें आहेत; येथें व्यक्तिरूप आत्मा केव्हांहि हें विसरत नाहीं, विसरूं शकत नाहीं कीं, तो सर्व आत्म्यांशीं, सर्व भूतांशीं एकरूप आहे आणि सर्वभूतप्रभव जें एकमेव आत्मतत्त्व, त्याच्याशींहि एकरूप आहे. कारण ही एकरूपता, एकात्मता अतिमानसिक जाणिवेंत स्वभावतःच भरलेली असते; मूळ एकता व सार्वत्रिक एकता हा तिच्या स्वयंभूपणाचा, स्वयंसिद्ध अस्तित्वाचा, सहजज्ञानाचा एक अविभाज्य भाग असतो.

अतिमानसिक अतिमहान् क्षेत्रांत एकता समतेनें विस्तारलेली असते, मूळ एक अस्तित्व येथें विभागलें जात नाहीं, वांटून दिलें जात नाहीं, त्याचा विस्तार त्यानें स्वत: समतेनें सारखेपणानें केलेला असतो; या सर्व विस्तारांत तें एकत्वानें सर्व व्यापून असतें, अनेक आकारांच्या अन्तरांत आत्मा म्हणून अविभक्तपणें तें राहतें, सर्वत्र एकाच वेळीं, एक आणि सम असें असणारें तें अस्तित्व वा ब्रह्म, कोठेंहि अधिकपणा, कमीपणा धारण करीत नाहीं. कारण काल आणि स्थल यांत ब्रह्म जें पसरलेलें आहे, तें त्याचें पसरणें आणि त्याचें सर्वाला व्यापून राहणें व सर्वांतरीं आत्मत्वानें राहणें--ही ब्रह्माची व्याप्ति त्याच्या सर्वनिरपेक्ष मूळ, केवळ, एकतेशीं व अविभाज्यतेशींहि निकटतेनें बांधलेली आहे. ब्रह्माचें मूळ स्वरूप केवल, एक व अविभाज्य असें असतें; या स्वरूपांतूनच त्याचें व्यापक स्वरूप उदय पावतें--अर्थात् त्या दोन स्वरूपांचा आन्तरिक नित्य-संबंध कधींहि तुटत नाहीं, बदलत नाहीं; अविभाज्य स्वरूपाच्या मूळ ब्रह्मांत कोठेंहि मध्यबिंदु, परीघ अशी व्यवस्था नसते; मूळ ब्रह्म अविभाज्य स्वरूपांत कालस्थलरहित एकत्वसंपन्न असतें. जेव्हां ब्रह्म स्वत:चा विस्तार करतें, तेव्हां विस्ताररहित ब्रह्माची ही अतिकेन्द्रित एकता अनिवार्यपणें सर्वत्र सारखेपणानें व्यापून राहते; सर्व वस्तू आपल्यांत

 

पान क्र. २६१

 

अविभाज्यपणें सामावून घेते, सर्वत्र अविभक्तपणें अन्तर्यामित्व धारण करते; सर्वत्र अशी एकता नांदविते कीं, अनेकतेचा कसलाहि प्रयोग त्या एकतेंत दोष उत्पन्न करीत नाहीं, तिच्यांत कमीपणा आणीत नाहीं, तिला दूर करण्याचें नांव घेत नाहीं. ''ब्रह्म सर्व वस्तूंत आहे, सर्व वस्तू ब्रह्मांत आहेत, सर्व वस्तु ब्रह्म आहे'' हें त्रिपदी सूत्र सर्वसमावेशक अतिमानसाच्या स्वरूपवैशिष्ट्याचें दर्शक आहे; ब्रह्माच्या आत्म-आविष्काराची त्रिविध एकता या सूत्रांत सांगितली आहे; हे तीन आविष्कार मिळून एकच सत्य आहे असें हें सूत्र सुचवितें; हे तीन आविष्कार अविभक्तपणें आपले स्वतःचे आहेत हें नित्य ओळखून, या पायाभूत ज्ञानावर अतिमानस आपला विश्व-रचनेचा खेळ उभा करतें.

अतिमानसाचें विश्व म्हणजे आपलें मनाचें विश्व नव्हे. तर मग मन-प्राण-जडद्रव्य या तीन स्वतंत्र वस्तू असलेलें हें विश्व आलें कोठून? अतिमानसिक जाणीव आणि मानसिक जाणीव या वेगळ्या जाणीवा आहेत. मानसिक जाणीव ही अर्थात् कनिष्ठ जाणीव आहे; या जाणीवेंत मन-प्राण-जड अशा तीन वस्तू अंतर्भूत आहेत. असें मन आलें कोठून? मनाची त्रिविध संघटना (आमचें मानसिक विश्व) कशी घडून आली? या प्रश्नांचा आतां विचार करावयाचा आहे. जें जें कांहीं अस्तित्त्वांत आहे, किंवा येतें, तें सर्व सर्वसमर्थ अतिमानसाच्या क्रियेचा परिणाम असतें; मूळ ज्या तीन अविभक्त वस्तू--अस्तित्व, जाणीव शक्ति आणि आनंद--या वस्तूंवर अतिमानसाची क्रिया घडून सर्व कांहीं अस्तित्वांत येतें. ही वस्तुस्थिति असल्यानें, अतिमानसांत, अतिमानसाच्या सृजनसमर्थ सत्य-जाणिवेंत अशी कांहीं शक्ति असली पाहिजे, कीं त्या शक्तीच्या मूळ तीन वस्तूंवरील विशिष्ट क्रियेनें त्या तीन वस्तूंतूनच आमच्या परिचयाच्या मन, प्राण व जडद्रव्य या तीन वस्तू उदयास येतील. अतिमानसाच्या सत्य-जाणिवेंत ही जी शक्ति आहे, ती म्हणजे स्वनिर्मित वस्तू स्वत:पासून दूर धरण्याची, त्या वस्तूसमोर बैठक घेण्याची आणि तिला स्पर्श करून, तिचें होईल तें ज्ञान करून घेण्याची त्या जाणिवेची शक्ति होय. या व्यवस्थेंत ज्ञान हें एका बिंदूत आत्मकेन्द्रित होऊन, आपण निर्मिलेल्या वस्तूंपासून दूर उभें राहून, त्या वस्तूंचें निरीक्षण करतें. सर्वसमावेशक समग्रदर्शी अतिमानस किंवा सत्यजाणीव स्वनिर्मित सर्व वस्तूंत जशी समतेनें राहते, तशी गोष्ट या तिच्या गौणशक्तीची नसते--ही सर्वत्र समतेनें रहात नाहीं; विशिष्ट बिंदूंत अधिक केन्द्रित होते; स्वनिर्मित

 

पान क्र. २६२

 

वस्तूंत विषमतेनें राहणें, हें या शक्तीचें वैशिष्ट्य आहे. स्वतःमध्यें भाग पाडण्याची क्रिया, जाणिवेच्या या विषम वांटणीमुळें सुरू होते--अतिमानसिक जाणिवेची, स्वनिर्मित वस्तूमध्यें तिच्या दुय्यम शक्तीच्या क्रियेनें घडणारी ही विषम वांटणी दृश्य विश्वांतील आत्म-विभाजन घडवून आणण्यासहि मूळ कारण होते.

ज्ञानग्रहणकर्ता म्हणून ज्ञानामध्यें स्वतःला केन्द्रित करणारा तो ज्ञाता; त्याची ज्ञानशक्ति त्याजपासून निघून, त्याच्या प्रत्येक आकारांत प्रवेश करते, तेथें काम करते; नंतर परत त्याच्यामध्यें जाते, पुन्हां त्याच्यापासून निघून जुना कार्यक्रम चालविते. असें सारखें पुन: पुन: चाललेलें असतें अशी प्रतीति या ज्ञात्याला होते. ही जी स्वतःमधील समतेचें राज्य घालवून, ज्ञाता, ज्ञेय, व ज्ञानक्रिया असा विषम व्यवहार घडवून आणणारी क्रिया, तिच्यापासून सर्व व्यावहारिक भेद निघतात; या भेदांवर विश्वांतील सापेक्ष-दर्शन, सापेक्ष-व्यवहार आधारलेले आहेत. ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे सर्व एकमेकांपासून वेगळे वेगळे आहेत, अशा व्यावहारिक मूळ भेदांतून ईश्वर, त्याची शक्ति आणि त्या शक्तीचीं अपत्यें आणि इतर कार्यें या वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत, असा एक भेद प्रस्थापित होतो; भोक्ता वेगळा, भोग वेगळा व भोग्य वेगळें अशी त्रिपुटी त्यांतूनच निघते; परमात्मा, माया व परमात्म्याच्या नामरूपात्मक विभूती, ही त्रिपुटीहि तेथूनच निघते. दृश्य विश्वांतील आत्मविभाजन हें असें त्रिपुटीयुक्त होत असतें. दृश्य विश्वांतील आत्मविभाजनाचा हा आरंभ होय.

यानंतर दुसरी गोष्ट घडते ती अशी : ज्ञानकेन्द्रित ज्ञानमय आत्मा किंवा पुरुष, त्याच्यापासून निघणारी जी शक्ति किंवा प्रकृति तिचें निरीक्षण आणि नियंत्रण करीत असतो--हा पुरुष त्याच्या प्रत्येक रूपांत, आकारांत आपली बैठक घालतो; जणुं त्याच्या ज्ञानशक्तीबरोबर तिनें घडविलेल्या वस्तूंत तो जातो आणि त्या वस्तूंत, त्या आपल्या रूपांत आत्मविभाजनक्रिया करतो; या क्रियेंतूनच ज्ञेय, ज्ञान या संवगडयांसह ज्ञातारूपी जाणीव निर्माण होते हें वर आलेंच आहे. प्रत्येक देहांत, आकारांत, रूपांत हा आत्मा किंवा पुरुष आपल्या प्रकृतीसह राहतो आणि दुसऱ्या देहांत असणाऱ्या स्वतःलाच त्या आपल्या विशिष्ट कृत्रिम व्यावहारिक ज्ञानकेन्द्रांतून बघत असतो. सर्व ठिकाणीं तोच एकच आत्मा, तोच एकच दिव्य पुरुष असतो; मूळ, अतिमानसिक, सर्वसमावेशक

 

पान क्र. २६३

 

समग्रदर्शी, एकतासंपन्न व समताप्रधान जाणिवेचें, केन्द्राची अनेकता हें एक व्यवहारदृष्टीचें कार्य आहे. भेदाचा खेळ उभा करणें हा या कार्याचा, या अनेक ज्ञानकेन्द्रांमागील अतिमानसिक हेतु आहे; मूळ अभेदाच्या पायावर व्यवहारापुरता भेदाचा खेळ उभारावा, त्या भेदांत अभेदाचा साक्षात्कार सर्वांनीं करून घ्यावा, भेदांतूनच निर्माण होऊं शकणारे अन्योन्यसंबंध निर्माण व्हावे, अन्योन्यांचें ज्ञान अन्योन्यांनीं करून घ्यावें, अन्योन्यशक्ती अन्योन्यांवर कार्यान्वित केल्या जाव्या, अन्योन्यांचा आनंद अन्योन्यांनीं भोगावा, या अशा अन्योन्य व्यवहारानें सर्वांचें ऐक्य सर्वांच्या अनुभवास यावें--ऐक्य हेंच मूळ असून, अन्योन्यता ही विशिष्ट वर सांगितलेल्या हेतूंसाठीं निर्माण केलेली दुय्यम गोष्ट आहे ही प्रतीति सर्वांना व्हावी--अनेक केन्द्रें करण्यांत अतिमानसाचा, सत्य-ज्ञानमय विभूतीच्या रूपानें क्रियाशील झालेल्या सच्चिदानंद ब्रह्माचा हा हेतु आहे.

सर्वव्यापक अतिमानस हें या वरील दशेला प्राप्त झाल्यानें, वस्तूच्या एकत्व-सत्यापासून आरंभिक त्रिपुटीदशेपेक्षां तें दूर झालेलें आहे. त्याचप्रमाणें विश्वाच्या अस्तित्वाला आवश्यक जी मूलभूत एकता, तिचें एकत्व ज्या अविभाज्य जाणिवेवर अनिवार्यपणें अवलंबून असतें, त्या जाणिवेपासूनहि वरील अतिमानसाची दुसरी दशा पहिल्या दशेपेक्षां अधिक दूर गेलेली आहे. अतिमानस जर आणखी थोडें दूर जाईल, तर तें अविद्या हें रूप घेईल; तें खरोखरीची 'अविद्या' होईल हें आपल्या लक्षांत येण्यासारखें आहे. अविद्या म्हणजे 'महान् अज्ञान,' अनेकता हेंच मूलभूत सत्य आहे असें तें मानतें; आणि खऱ्या एकतेला परत यावयासाठीं त्याला अहम् ची खोटी एकता खरी धरून प्रवासाला आरंभ करावा लागतो. तसेंच हेंहि आपल्या लक्षांत येऊं शकतें कीं, व्यक्तिकेन्द्र हा निर्णायक दृष्टिबिंदू म्हणून स्वीकारला, व्यक्तिकेन्द्र हाच ज्ञाता म्हणून पत्करला म्हणजे मानसिक संवेदना, मानसिक प्रज्ञा, मानसिक कृतिप्रवण इच्छाशक्ति या सर्व गोष्टींचे परिणाम घडून आल्याशिवाय राहणार नाहींत. तथापि आत्मा जोपर्यंत अतिमानसक्षेत्रांत कार्य करीत असतो, तोपर्यंत अविद्या त्याला बाधा करीत नाहीं; अविद्येचें क्षेत्र अतिमानसाच्या क्षेत्रांत अंतर्भूत होत नाहीं. त्या क्षेत्रांत ज्ञानाचे आणि क्रियेचे व्यवहार सत्य-जाणिवेवर आधारलेले असतात, त्यांचा पाया एकता हाच असतो.

कारण या अतिमानसिक क्षेत्रांत आत्मा (परमात्मा) ही गोष्ट विसरत नाहीं कीं, सर्वांमध्यें तो एकटा स्वतःच भरून राहिला आहे, सर्व त्याच्याच

 

पान क्र. २६४

 

विभूती आहेत आणि या सर्व विभूती त्याच्या पोटांतच वावरतात. ईश्वर (ईश्वररूप परमात्मा) हा त्याची शक्ति म्हणजे क्रियाशील स्वयम् आहे आणि प्रत्येक भूत अथवा विभूति आत्मदृष्टीनें आणि रूपदृष्टीनें तो स्वयम् आहे, ही गोष्ट विसरत नाहीं; भोक्ता (भोक्तारूप परमात्मा) अनेकतेच्या भूमींत भोग घेतो; तें भोग स्वत: स्वतःलाच भोग्य करून घेत असतो, ही गोष्ट तो विसरत नाहीं. सर्वसमावेशक समग्रदर्शी अतिमानसांत जो केवळ एकच खरा बदल झालेला असतो, तो हा कीं, जाणीव विषमतेनें वांटलेली असते, केन्द्राकेन्द्रांत विषमतेनें सांठविलेली असते आणि शक्ति अनेकतेच्या घटकांत सर्वत्र विभागलेली असते. जाणिवेमध्यें स्थानास्थानांत व्यवहारापुरता भेद मानला जातो, परंतु मूलत: जाणिवा सर्वत्र खरोखरीच वेगळ्या वेगळ्या आहेत असें मात्र अतिमानसिक परमात्मा मानीत नाहीं; त्याच्या स्वतःच्या स्वतःविषयींच्या ज्ञानांत खरें विभजन अतिमानसिक क्षेत्रांत होत नाहीं. सत्य-जाणीव, सत्य-ज्ञान हें अनेकतेंत अनेक त्रिपुटीयुक्त झाल्यानें, (प्रत्येक जीव त्रिपुटी असतो) अशा अवस्थेला आलेलें असतें कीं, त्यांतून आपली मनाची जाणीव निघूं शकते; तथापि अतिमानसाची ही अवस्था म्हणजे मनाची अवस्था नव्हे, मनाची जाणीव नव्हे. अतिमानसाच्या या अवस्थेचा अभ्यास आम्हीं करावयास हवा, कारण या अवस्थेंतून मनाचा उदय व्हावयाचा असतो; उंच आणि महान् विस्ताराचें जें सत्य-ज्ञान, तेथून त्याला पारखें होऊन, खऱ्या विभागणीच्या आणि अज्ञानाच्या क्षेत्रांत जी उडी घेतली जाते, ती या अवस्थेंतून घेतली जाते; येथें उगमापाशीं मन कसें असतें त्याचा अभ्यास आम्हीं करावयास हवा. सत्यज्ञानाच्या या अवस्थेला 'प्रज्ञान' म्हणतात. या अवस्थेंत शुद्ध, निर्भेळ, सर्वसमावेशकत्व, समग्रदर्शित्व टाकून (किंवा बाजूला ठेवून म्हणा) सर्वत्र त्रिपुटीयुक्त होऊन, ज्ञाता ज्ञेय व ज्ञान या पद्धतीनें अतिमानसानें अंशदर्शित्व स्वीकारलेलें असतें. याप्रमाणें अंशदर्शी झालेल्या अतिमानसाला 'प्रज्ञान' व मूळ समग्रदर्शी अतिमानसाला 'विज्ञान' हीं नांवें योग्य आहेत. विज्ञानालाच परात्पर-सत्य-संविद् हें नांव आहे; कारण प्रज्ञान हें अज्ञानाहून श्रेष्ठ म्हणजे पर; आणि विज्ञान हें प्रज्ञानाहून श्रेष्ठ म्हणजे परात्पर. या प्रकरणांत विज्ञानाचें स्वरूप विस्तारानें सांगितलें आहे व प्रज्ञानचर्चेला आरंभ केला आहे. प्रज्ञान हें आमच्या मानसिक जाणिवेला जवळ असल्यानें, त्याची नीट कल्पना करून घेणें अवघड नाहीं; विज्ञान हें मानसिक जाणिवेला दूर असल्यानें,

 

पान क्र. २६५

 

त्याची नीट कल्पना देण्यासाठीं आमच्या बुद्धीची भाषा पुरी पडत नाहीं; तथापि या भाषेचा उपयोग करून, विज्ञानाची कल्पना आणून देण्याचा प्रयत्न आम्हीं केला आहे. प्रज्ञानाची जी ज्ञानक्रिया असते, ती आमच्या मनाच्या ज्ञानक्रियेला जवळ असल्यानें, आमची ज्ञान-प्रक्रिया प्रज्ञानाच्या ज्ञान-प्रक्रियेची छायाच असल्यानें, प्रज्ञानाचें विवेचन आपल्याला विज्ञानाच्या विवेचनापेक्षां समजावयास सोपें जाईल. प्रज्ञान आणि मन यांच्या क्षेत्रांना विभागणारी तटबंटी पार करून जावयास अगदींच सोपी आहे असें नाहीं. तथापि विज्ञान आणि मन यांच्यामधील तटबंदीपेक्षां ही कमी कठीण आहे, कमी अवघड आहे.

 

पान क्र. २६६

 

प्रकरण सोळावें

 

अतिमानसाच्या तीन अवस्था

 

तो माझा आत्मा, जो सर्व भूतांचा आधार आहे, सर्व भूतांचें भूतत्व (अस्तित्व) जो स्वत: झाला आहे. ... मी तो आत्मा आहे, जो सर्व भूतांच्या आंत वसति करतो.

- गीता ९-५; १०-२०

प्रकाशाच्या तीन शक्ती ह्या तीन ज्योतिर्मय दिव्य विश्वें आपल्या सामर्थ्यानें चालवितात.

- ऋग्वेद ५.२९.१

 

आपण रहात आहों तें जग आपल्याला प्रज्ञानाच्या दृष्टिकोनांतून पहावयाचें आहे, समजून घ्यावयाचें आहे--मनाच्या मर्यादा ओलांडून मोकळा झालेला, दिव्य अतिमानसाच्या व्यापार-व्यवहारांत भाग घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला व्यक्तीचा आत्मा आणि अतिमानसिक प्रज्ञानात्मा यांचा दृष्टिकोन सारखाच असतो--या दृष्टिकोनांतून आपल्याला जग समजून घ्यावयाचें आहे; विज्ञानाच्या जगापेक्षां तें समजून घ्यावयास सोपें आहे, हें वर सांगितलेंच आहे--पण हें प्रज्ञानाचें विश्व तपासण्यापूर्वीं आम्हांला थोडी आवृत्ति केली पाहिजे. ईश्वराचें अस्तित्व, मूळरूप, निरतिशय घनीभूत एकतेचें असतें; त्यांतून अनेकतेचें जग तो आपल्या मायेनें निर्माण करतो--या व्यवहारांत ईश्वराची जाणीव कशी असते, या संबंधानें यापूर्वीं जें ज्ञान आम्हीं मिळविलें आहे त्याची आवृत्ति करावी आणि त्यासंबंधीं अधिक कांहीं ज्ञान मिळाल्यास मिळवावें व नंतर प्रज्ञानाच्या जगाची तपासणी करावी असें आम्हीं योजिलें आहे.

आमचा प्राथमिक सिद्धान्त आम्हीं यापूर्वीं सांगितलाच आहे कीं, सर्व अस्तित्व हें एकच एक 'सद्‌वस्तु' किंवा अस्तित्व आहे. तिचा प्राकृतिक सारभूत धर्म जाणीव हा आहे; सर्व अस्तित्व एकच एक 'जाणीव' असून, तिचा क्रियाशील स्वभावधर्म शक्ति किंवा इच्छाशक्ति

 

पान क्र. २६७

 

हा आहे. ही सद्‌वस्तु आनंदरूप आहे, ही जाणीव आनंदरूप आहे व ही शक्ति किंवा इच्छाशक्तीहि आनंदरूपच आहे. अस्तित्वाचा शाश्वत व अव्यय आनंद, जाणिवेचा, शक्तीचा किंवा इच्छाशक्तीचा शाश्वत व अव्यय आनंद, आत्मकेन्द्रित विरामस्थितींतील आनंद आणि क्रियाशील निर्मितिशील स्थितींतील आनंद--हें ईश्वराचें रूप आहे, हा ईश्वर आहे; आम्ही आपल्या सारभूत निराकार अस्तित्वाच्या किंवा स्वत्वाच्या स्थितींत हेंच ईश्वरी रूप आहोंत. हें ईश्वरी तत्त्व जेव्हां आत्मकेन्द्रित असतें, तेव्हां मूलभूत शाश्वत, अव्यय सुख हें त्याचें असतें किंवा असें सुख म्हणजेच आत्मकेंद्रित ईश्वरतत्त्व होय. तें क्रियाशील व निर्मितिशील झालें म्हणजे अस्तित्वाच्या, जाणिवेच्या शक्तीच्या किंवा इच्छेच्या लीलेचा आनंद त्याचा होतो किंवा असा आनंद हेंच क्रियाशील ईश्वरतत्त्व होय. ही जी लीला, तिलाच विश्व हें नांव आहे आणि विश्वाच्या अस्तित्वाचें कारण, हेतु व उद्देश केवळ विश्वलीलेचा आनंद हाच असतो. ईश्वरी जाणिवेला या लीलेचा आणि या आनंदाचा भोग शाश्वतचा आणि अटळपणें मिळतो; आमचें मूलभूत अस्तित्व, आमचा खरा आत्मा जो आमच्या खोट्या आत्म्यानें, मानसिक 'मी' नें झांकलेला आहे, आमच्यापासून लपविलेला आहे, त्याला सुद्धां विश्वलीला आणि या लीलेचा आनंद शाश्वतचा आणि अटळपणें भोगावयास मिळतो. आमचा खरा आत्मा ईश्वरी जाणिवेशीं एकरूप असल्यानें, आमच्या आत्म्याला त्या जाणिवेचा खेळ आणि आनंद भोगावयाला मिळणें स्वाभाविक आहे, अपरिहार्य आहे. तेव्हां आम्हांला जर दिव्य जीवन जगावें अशी आकांक्षा असेल, तर आमच्यांतील पडद्यामागें लपविलेला आत्मा, तो पडदा दूर करून आम्हीं प्रकट करणें अवश्य आहे. आज आम्ही खोटा आत्मा किंवा मानसिक 'मी' यांजमध्यें जी बैठक मारून बसलों आहों, ती बैठक सोडून, तिच्या वर चढून, आम्हीं दिव्यजीवनासाठीं आमच्या खऱ्या आत्म्याची श्रेष्ठ बैठक आमची करावयास हवी. दिव्य जाणिवेशीं आमच्या प्रकट जागृत मनाची एकता नाहीं; दिव्य जीवन जगावयाचें असेल, तर ती घालविलेली एकता त्यानें परत मिळवावयास हवी. आमच्यांत असलेलें अतिमानसिक तत्त्व हें ही एकता सदोदित भोगतें व म्हणूनच आमचें अस्तित्व आहे. या आंतरिक एकतेशिवाय आम्ही अस्तित्वांत असूं शकणार नाहीं.

सच्चिदानंदाची विश्वातीत एकता एका बाजूला आणि विभक्त मन

 

पान क्र. २६८

 

दुसऱ्या बाजूला--या दोन वस्तू अन्योन्यविरोधी आहेत--यांपैकीं एकच खरें तत्त्व आहे, असें आपण मान्य केलें म्हणजे दुसरें आपोआपच खोटें ठरतें. कोणत्याहि एकाचा आनंद भोगावयाचा, तर दुसऱ्याला कायमची रजा देणें भाग आहे. मन आणि त्याचे आकार यांच्या, म्हणजेच प्राण आणि देह यांच्या आश्रयानें आज आम्ही पृथ्वीवर अस्तित्वांत आहों. मन-प्राण-देह यांची आम्हांला असलेली जाणीव नाहींशी केल्याशिवाय, एकचएक सच्चिदानंद आम्हांला जर लाभणार नसेल, तर पृथ्वीवर दिव्य जीवन जगणें अशक्य आहे. विश्वजीवन केवळ भ्रम आहे, असें मानून तें सर्वथा टाकून देऊनच विश्वातीत सच्चिदानंदत्व आम्ही परत मिळवूं शकूं, विश्वातीत सच्चिदानंद परत होऊं शकूं. विश्वातीत सच्चिदानंद आणि मन यांच्या विरोधी जाणिवांना जोडणारा योग्य जाणिवेचा दुवा या दोहोंच्या मध्यभागीं नसेल, तर सच्चिदानंद लाभासाठीं विश्वजीवन भ्रम म्हणून टाकून देणें हा एकच मार्ग रहातो. कार्यकारण दृष्टीनें दोघांचें स्वरूप दोघांना स्पष्ट करून सांगणारी आणि दोघांमध्यें विशिष्ट नातें निर्माण करणारी--मन-प्राण-शरीरांत राहून एकचएक सच्चिदानंदाचा लाभ आम्हांला करून घेतां येण्यासाठीं दोघांमध्यें नातें निर्माण करणारी--जाणीव मध्यभागीं असेल, तरच विश्वजीवन टाकून देण्याचा प्रसंग येणार नाहीं; तरच आमचें हें विश्वजीवन आम्हांला दिव्य-जीवन करतां येईल.

सच्चिदानंद आणि मन या दोहोंच्या मध्यभागीं दोघांना जोडणारी अशी जाणिवेची सांखळी आहे, जाणिवेचा दुवा आहे. अतिमानस किंवा सत्य-जाणीव या नांवानें तो दुवा ओळखला जातो. मनाच्या वरतीं मनाहून श्रेष्ठ असें हें जाणीवतत्त्व आहे. जें वस्तूंचें सत्य म्हणजेच पायाभूत असलेली वस्तूंची जी एकता आहे, तिच्या क्षेत्रांत राहून ही जाणीव काम करते, वावरते; हिच्या उलट, वस्तूंचे दृश्य आकार, त्यांची दृश्यांतील विभागणी, विविध भेदाभेद यांच्यामध्यें मन राहतें, काम करतें व वावरतें. ज्या सिद्धान्ताला आमच्या मान्यतेंत आम्हीं आद्यस्थान दिलें आहे, त्या सिद्धांताच्या बैठकींतून अतिमानसाचें अस्तित्व तर्कदृष्ट्या अपरिहार्यपणें सिद्ध होतें. कारण सच्चिदानंद मूलत: कालातीत, स्थलातीत केवलतत्त्व, जाणीवयुक्त आनंदरूप अस्तित्वाच्या स्वरूपाचें असतें; (हेंच मूलसत्य हा आमचा आद्यसिद्धान्त आहे.) आणि विश्व हें त्याच्या उलट, काल आणि स्थल यांच्या पसाऱ्यांतील विस्तार आहे, तें गतिरूप

 

पान क्र. २६९

 

आहे; काल आणि स्थल यांच्या आधारावर कार्यकारणभावानें विविध संबंध आणि संभाव्य घटना यांची घडण आणि जोपासना म्हणजेच विश्व--असें विश्वाचें स्वरूप आहे. आम्हांला जो कार्यकारणभाव म्हणून भासतो, तो मूळ सत्यस्वरूपांत 'ईश्वरी नियम' आहे. विकास पावणाऱ्या वस्तूच्या (संबंधाच्या घटनेच्या) अन्तरंगांतील वस्तुसत्याचा, नियोजित सत्यमय वस्तुकल्पनेचा अपिरहार्य स्वयंविकास हें या नियमाचें अन्तरंगस्वरूप, सारभूत सर्वस्व आहे. संभवनीय अनन्त वस्तुसंबंध व घटनांपैकीं अमुक वस्तुसंबंध व घटना घडावयाच्या, अशी निश्चित पूर्वयोजना ईश्वरी नियमांत असते. सर्व वस्तूंचा या प्रकारें विकास करणारी शक्ति अर्थात् पूर्ण ज्ञानयुक्त, पूर्ण समर्थ इच्छाशक्ति असली पाहिजे; कारण मूळ अस्तित्त्वाचा  स्वभावधर्म ज्ञानमय शक्ति हा आहे आणि विश्वरचना, विश्व-आविष्कार ही या ज्ञानमय शक्तीची लीला आहे. अशी ही विश्वविकास करणारी ज्ञानयुक्त इच्छाशक्ति ही मनाची शक्ति खास नव्हे; कारण मनाला सत्याचें ज्ञान नसतें, ईश्वरी सत्यनियमाचें ज्ञान नसतें; तो नियम त्याच्या भांडारांतील नसतो, तो नियम त्याच्या अंकित नसतो; उलट मन त्या नियमाचें अंकित असतें, त्या नियमाचें शासन मनावर चालतें, त्या नियमाच्या परिणामांपैकीं मन हा एक परिणाम आहे. वस्तूंच्या स्वयंविकासाच्या दृश्य साकार परिणामांच्या क्षेत्रांत मन फिरत असतें, या स्वयंविकासाच्या मुळाशीं मनाचें अस्तित्व नसतें, मनाचें कार्य नसतें; स्वयंविकासानें ज्या गोष्टी घडून येतात, त्या भिन्न भिन्न आहेत अशा भावनेनें मन त्यांजकडे बघतें आणि या गोष्टींचें मूळ सत्यस्वरूप काय असावें, या गोष्टींच्या मुळाशीं काय असावें,  याचा शोध घेण्याचा मन प्रयत्न करीत असतें. विश्वांतील सर्व विविध वस्तूंचा विकास करणारी ज्ञानयुक्त इच्छाशक्ति ही, वस्तूंची मूळ एकता आत्मगत म्हणून अनुभवणारी आणि या मूळ एकतेंतून वस्तूंच्या अनेकतेचा, विविधतेचा, बहुत्वाचा आविष्कार करणारी अशी असते आणि अशी असणें अवश्य आहे; उलट वस्तूंची एकता मन मुळींच अनुभवीत नाहीं--अनेकतेचा थोडासा भाग थोड्याशा प्रमाणांत आत्मगत म्हणून अनुभवावा, एवढीच मनाची शक्ति आहे.

वर सांगितल्याप्रमाणें विश्वाची आणि मनाची रचना असल्यानें, मनाच्या रचनेंत ज्या उणीवा आहेत, त्या नसणारें मनाहून श्रेष्ठ असें जाणीवतत्त्व मनावरतीं असलें पाहिजे, हें उघड आहे. तसेंच हेंहि

 

पान क्र. २७०

 

उघड आहे कीं, हें जें श्रेष्ठ ज्ञानतत्त्व, तें सच्चिदानंदच असलें पाहिजे, मात्र हें मनाहून श्रेष्ठ ज्ञानतत्त्व म्हणजे, बदल न होणाऱ्या अनंत शुद्ध जाणिवेच्या अवस्थेंत आराम करीत राहणारें सच्चिदानंद तत्त्व नव्हे, तर या मूळ क्रियाहीन शान्त अवस्थेच्या पायावर, तिच्या सर्वसमावेशक उदरांत, शांतता टाकून गतिमान् व सक्रिय होणारें सच्चिदानंदतत्त्व हेंच, मूळ सच्चिदानंद आणि मन यांच्यामध्यें असणारें, मनाहून श्रेष्ठ, मध्यस्थ, सक्रिय ज्ञानतत्त्व होय. ही सक्रियता म्हणजे मूळ सच्चिदानंदाची साकार झालेली शक्ति होय. ही त्याची सक्रियताच विश्वनिर्मितीचें साधन आहे. अस्तित्वाची जी शुद्ध शक्ति असते, तिचें मूळ स्वरूप दुहेरी असतें--जाणीव आणि क्रियाशक्ति हें तिचें दुहेरी स्वरूप होय. हीं दोन तत्त्वें जुळ्यासारखीं एकमेकांना धरून असतात; अस्तित्व-शक्तीचें अन्तरंगच मूलत: या दोन तत्त्वांचें असतें. काल आणि स्थल यांच्या विस्तारांत नाना संबंधांनीं भरलेलें विश्व निर्माण करण्यासाठीं मूळ अस्तित्व-शक्ति ही, ज्ञान आणि इच्छाशक्ति यांचें रूप घेते; हें रूप घेणें तिला आवश्यकच असतें. हें ज्ञान आणि त्याची जोडीदार इच्छाशक्ति या विश्वांत गतिमानता आणि आकार या रूपांनीं जें जें व्यक्त करते, तें तें सर्व स्वत:च्या अन्तरंगांत नित्य समाविष्ट करून असते. ज्ञान आणि इच्छा ही जोडी अविभक्त एकत्वानें असते, तिचा विस्तार अनंत असतो; ती सर्वव्यापी, सर्वसंग्राहक, सर्वरूपनिर्मायक अशी असते; हेंच अतिमानस होय. मूळ अस्तित्व, मूळ सच्चिदानंद आपल्या मूळ अवस्थेंतून पुढें होऊन निश्चित, नियामक आत्मज्ञानाचें रूप घेतें; हें ज्ञान स्वत:मधील कांहीं सत्यें आपल्या नजरेसमोर ठेवतें आणि हीं सत्यें आपल्या कालस्थलविशिष्ट विस्तारयुक्त अस्तित्वांत (हा विस्तार अर्थात् त्याच्या मूळ कालस्थलरहित अस्तित्वाचा असतो.) व्यक्त करावयाची इच्छा या ज्ञानाला असते--मूळ आत्मकेन्द्रित निष्क्रिय अवस्था सोडून, पुढें झालेलें मूळ अस्तित्व म्हणजेच अतिमानस होय. मूळ अस्तित्वाच्या अन्तरंगांत जें असतें, तें आत्मज्ञानाचें रूप घेतें; हेंच सत्य-ज्ञान, हीच सत्य-कल्पना अतिमानस या नांवांनें ओळखली जाते. आत्मवीर्य, आत्मशक्ति, आत्मसामर्थ्य यांना सोडून हें आत्मज्ञान नसतें. जेथें ज्ञान तेथें वीर्य, ज्ञान तेंच वीर्य, अशी मुळांत व्यवस्था असल्यानें, कालस्थलपसाऱ्यांत मूळ-ज्ञान अनिवार्यपणें आपलें इष्ट आत्मसत्य, पूर्णतया आकारास आणतें.

दिव्य-जाणिवेचा मूळ स्वभाव हा असा आहे. ही जाणीव आपल्या

 

पान क्र. २७१

 

ज्ञानयुक्त शक्तीच्या व्यापारानें आपल्या उदरांत सर्व वस्तू निर्माण करते. या वस्तूंचा विकास तीच नियंत्रित करते. वस्तुगत सत्य-कल्पना किंवा वस्तुगत अस्तित्व-सत्य हें या सर्व वस्तू स्वयंविकासमार्गानें आकारास आणतें; सत्य-कल्पनेच्या पोटीं जें स्वाभाविक इच्छाशक्तियुक्त ज्ञान असतें, त्या ज्ञानाच्या बळावर सत्य-कल्पनेचें स्वयंप्रेरित वा स्वयंकृत-विकसन, संवर्धन हाच वस्तुविकास-नियंत्रणाचा मार्ग दिव्य-जाणीव स्वीकारते. अशा जाणिवेच्या मूळ महान् अस्तित्वालाच आम्ही ईश्वर म्हणतो; अर्थात् असा हा ईश्वर सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वसमर्थ, असला पाहिजे हें उघड आहे. त्याला एवढ्यासाठीं सर्वव्यापी म्हणावयाचें, कीं सर्व आकार त्याच्या ज्ञानयुक्त अस्तित्वाचे आकार आहेत; त्या अस्तित्वाच्या स्वतःच्या क्रियाशक्तीनें हे आकार निर्मिले आहेत. त्या अस्तित्वाचा कालस्थलाच्या रूपानें जो विस्तार त्यानें स्वत: केला आहे, त्या विस्ताराच्या क्षेत्रांत हे सर्व आकार आहेत; हा ईश्वर सर्वज्ञ कां म्हणावयाचा तर, सर्व वस्तू त्याच्या ज्ञानयुक्त अस्तित्वाच्या पोटांत आहेत, ज्ञानयुक्त अस्तित्वानेंच त्या रूपाला आणल्या आहेत आणि त्या वस्तू त्या अस्तित्वाच्या सर्वस्वीं स्वाधीन आहेत; त्याला सर्वसमर्थ म्हणावयाचें तें याकरितां, कीं सर्व वस्तू स्वाधीन ठेवणारी जी ईश्वरी जाणीव, तीच सर्व वस्तू स्वाधीन ठेवणारी शक्तीहि आहे, सर्व वस्तूंना आत्मा पुरविणारी इच्छाशक्ति सुद्धां तीच आहे. सर्वज्ञ, सर्वसमर्थ असें ईश्वरी ज्ञान आणि ईश्वरी इच्छा एकमेकांशीं संघर्ष करीत नाहींत; आमची इच्छा व ज्ञान एकमेकांशीं लढूं शकतात, एकमेकांच्या विरोधी होऊं शकतात; पण ईश्वरी ज्ञान व ईश्वरी शक्ति मात्र अन्योन्यविरोधी होऊं शकत नाहींत; कारण त्या वस्तू भिन्न नाहींत. एकाच दिव्य अस्तित्वाच्या एकाच क्रियेचीं तीं दोन अंगें आहेत. तसेंच या ज्ञानाला आणि इच्छेला दुसऱ्या कोणत्याहि आंतील किंवा बाहेरील इच्छेचा, शक्तीचा व ज्ञानाचा विरोध होईल हेंहि संभवत नाहीं--कारण जें एकच एक मूळ अस्तित्व, सत्तत्त्व आहे, त्याला ''बाहेरचें'' असें जाणिवेचें किंवा शक्तीचें तत्त्व असूंच शकत नाहीं; आणि त्याचें जें ''आंतील'' ज्ञान सर्व प्रकारच्या शक्तींच्या आणि आकारांच्या रूपानें त्याच्या अन्तरंगांत व्यक्त होतें, तें ज्ञान आणि त्याचे अन्तरंगांतील आविष्कार म्हणजे वस्तुत: तें एकतत्त्वच असतें; त्या वेगळें दुसरें कांहीं असत नाहीं; त्या एकाची एकच सर्व-निर्णायक इच्छाशक्ति आणि एकच सर्वसंवादी ज्ञान यांची लीला, हेंच केवळ, उपरिनिर्दिष्ट

 

पान क्र. २७२

 

सर्व ज्ञानरचित शक्तींच्या आणि आकारांच्या अन्तरंगांतील अभिव्यक्तीचें स्वरूप असतें. इच्छांचा आणि शक्तींचा संघर्ष आमच्या दृष्टीला दिसतो याचें कारण, आमचा व्यवहार व वसति समग्रतेंत, पूर्णांत नसून त्याच्या विशिष्ट अंशांत, तदंतर्गत अलग अलग विभक्त वस्तूंच्या पसाऱ्यांत आहे. आम्हांला समग्र व पूर्ण विश्वाचें दर्शन घडत नसल्यामुळेंच इच्छांचा आणि शक्तींचा संघर्ष येथें असल्याचें आम्हांला भासतें--याच संघर्षांना एका पूर्वनियोजित संवादी रचनेचे सहकारी घटक म्हणून अतिमानस ओळखते; ही संवादी, सुसंगत रचना अतिमानसाच्या दृष्टीला नेहमींच स्पष्ट दिसत असते; कारण समग्र विश्वरचनाच नित्य तिच्यासमोर असते.

दिव्य जाणिवेच्या क्रियेनें कोणतीहि बैठक किंवा कोणतेंहि रूप धारण केलें, तरी तिचा स्वभावधर्म सदोदित असाच असतो. या जाणिवेचें अस्तित्व मुळांत सर्वबंधनातीत असल्यानें, तिच्या विस्तारांतहि हें वैशिष्ट्य, हें बंधनातीतत्त्व असतेंच; आणि म्हणून क्रियाशील जाणीव एकच बैठक किंवा एकच रूप धरून राहते असें होत नाहीं. आम्ही माणसें, साकार विश्वाचा भाग म्हणून, जाणिवेचा एक विशिष्ट प्रकार धारण करतों, हा जाणीवप्रकार म्हणजेच आम्ही असतों; ही जाणीव कालस्थल यांच्या बंधनांत वावरते; म्हणजेच आम्ही स्थलकालाचें अंकित असतों; आमच्या वरच्या पृष्ठभागींच्या जाणिवेखेरीज आम्हांला आमची ओळखहि नसते; या बाह्य जाणिवेंत एका वेळीं एकच वस्तु, एकच रूप, एकच अस्तित्व-अवस्था, एकच अनुभवसंघ आम्ही असूं शकतों; आणि ही जी एकच वस्तु आम्ही असतों, तीच आमचें सत्य स्वरूप म्हणून आम्ही ओळखतों; भूतकालांत जाऊन जें जें आमच्या दृष्टीआड झालेलें आहे, किंवा जें भविष्यकालांत येणार असल्यानें, आमच्या दृष्टिपथांत अद्यापि आलेलें नाहीं तें तें सर्व, सत्यत्व संपलेलें सत्य किंवा सत्यत्व अद्यापि प्राप्त न झालेलें सत्य, या वर्गांत आम्ही घालतों, आणि प्रस्तुत क्षणीं आम्ही जें असतों, तेवढेंच आमचें सत्यरूप म्हणून आम्ही ओळखतों. दिव्यजाणीव अशी विशिष्ट रूपानें बांधलेली नसते, अशी मर्यादा तिला नसते, एकाच वेळीं ती अनेक वस्तू असूं शकते; अनेक स्थायी अवस्था सर्वकाल धारण करणें हें देखील दिव्य जाणिवेला शक्य असतें. विश्वाची स्थापना करणाऱ्या दिव्य जाणिवेनें, अतिमानसाच्या तत्त्वांत विश्वाधारभूत ज्ञानाच्या सर्वव्यापी अशा तीन स्थायी अवस्था धारण केल्या आहेत; अतिमानसाच्या

 

पान क्र. २७३

 

या तीन अवस्थांपैकीं पहिली अवस्था वस्तूंची अनिवार्य निर्भेळ एकता दृढतेनें स्थापित करते; दुसरी अवस्था या पायाभूत एकतेंत थोडा फरक करते; एकांत अनेक आणि अनेकांत एक अशा स्वरूपाच्या आविष्काराला आधारभूत होणारी एकता, अतिमानसाच्या या दुसऱ्या स्थायी अवस्थेंत उचलून धरण्यांत येते; अतिमानसाची तिसरी स्थायी अवस्था, मूळ एकतेंत दुसऱ्या अवस्थेतल्या पेक्षांहि अधिक बदल करते; या अवस्थेंत विविध व्यक्तींच्या विविध व्यक्तित्वाचा विकास घडवून आणावयाचा असतो. म्हणून त्या विकासाला उपकारक व आधारभूत होईल अशी एकता (मूळ एकतेहून दोन पायऱ्या खालची) प्रमाण धरण्यांत येते; अतिमानसाच्या तिसऱ्या अवस्थेंत हें जें व्यक्तित्व विकसित केलें जातें, त्या व्यक्तित्वावर अज्ञानाचा प्रयोग होऊं लागला, म्हणजे अतिमानसाच्या खालीं असलेल्या अज्ञानाच्या भूमीवर, त्या व्यक्तित्वांतून स्वतंत्र अहम्‌चा, भ्रमात्मक 'मी' चा आम्हांत उदय होतो.

वस्तूंच्या अटळ एकतेचा पाया घालून देणारी जी अतिमानसाची प्राथमिक आणि प्रमुख अवस्था किंवा बैठक, तिचा स्वभावधर्म काय आहे हें आपण गेल्या प्रकरणांत व या प्रकरणांत पाहिलेलें आहे. शुद्ध एकतेची जाणीव या बैठकींत नसते. शुद्ध एकतेची जाणीव हें सच्चिदानंदाचें कालस्थलरहित आत्मकेन्द्रित अस्तित्व असतें; या आत्मकेन्द्रित अवस्थेंत सच्चिदानंदाची जाणीव-शक्ति कोणत्याहि प्रकारच्या स्वत:च्या विस्ताराच्या भानगडींत पडत नाहीं; या अवस्थेंत तिच्या पोटीं विश्व असलेंच तर तें बीजरूपानें, अक्षय शक्यतेच्या रूपानें असतें, कालविशिष्ट वास्तव स्वरूपांत निश्चितच असत नाहीं. याच्या उलट अतिमानसिक प्राथमिक पायाभूत एकतेची जी अवस्था असते, ती सच्चिदानंदाचा समताविशिष्ट आत्मविस्तार या स्वरूपाची असते. हा समानतेनें विस्तार पावलेला सच्चिदानंद, सर्वसमावेशक, सर्वसंग्राहक, सर्वाकारधारक असा असतो. पण या स्वरूपांतील ''सर्व'' हें अभिन्न, अभेद्य व एक या स्वरूपाचें असतें, त्याला अनेकाचें स्वरूप आलेलें नसतें; त्यांत व्यक्तित्व उदयास आलेलें नसतें. आमचा मानसिक आत्मा शुद्ध आणि शांत झाला म्हणजे या अतिमानसाचें, अतिमानसाच्या या प्रथम प्रमुख अवस्थेचें प्रतिबिंब त्यांत पडतें; आणि त्याच्या प्रभावानें आमचें व्यक्तित्वाचें भान सर्वस्वीं हरपतें; कारण व्यक्तित्वाला आधार देणारी एकाग्र जाणीव, या प्रथम बैठकींतील अतिमानसांत मुळींच नसते. या

 

पान क्र. २७४

 

अतिमानसांत ''सर्व'' विकसित झालेलें असतें. पण तें एकतेंत आणि एकत्वाला बिलगून विकसित झालेलें असतें. ही प्राथमिक अतिमानसिक दिव्यजाणीव स्वतःच्या अस्तित्वाचे 'सर्व' आकार, कोणत्याहि प्रकारें अलग अलग नसलेले आकार किंवा पदार्थ या स्वरूपांत आपणामध्यें निर्माण करून, धरून व भरून असते. आमच्या मनांत जे अनेक विचार व कल्पना येतात, त्या आपण स्वतंत्र वस्तू मानीत नाहीं, आपल्या मानसिक जाणिवेनें घेतलेले आकार मानतो; तशीच गोष्ट प्राथमिक अतिमानसांत सर्व नामरूपांची असते. जाणीवयुक्त दिव्य अस्तित्वानें आपल्या सत्यक्रीडेचा व्यवहार म्हणून अनंतामध्यें शुद्ध दिव्य रूपें आणि कल्पना उभ्या करणें, असें अतिमानसाच्या या प्रथम अवस्थेंतील नामरूपांचें स्वरूप असतें. अर्थात् मनांत सुद्धां आपण असें रूपांचें आणि कल्पनांचें संघ उभे करतो; पण हा सर्व मानसिक खेळ असत्याचा, भ्रमाचा असतो; तसें दिव्य जाणिवेच्या खेळाचें स्वरूप नसतें. अशा अवस्थेंतील जाणीवयुक्त आत्मा आणि शक्तिरूप आत्मा यांजमध्यें दिव्य आत्मा फरक करीत नाहीं; कारण या अवस्थेंत सर्व शक्ति ही जाणिवेची क्रिया असणार; तसेंच तो जड आणि चैतन्य यांजमध्यें फरक करीत नाहीं; कारण या अवस्थेंत चैतन्य वस्तूच साकार होऊन, स्वतःला सांचविण्याचें व राहण्याचें स्थान बनलेली असणार.

अतिमानसाच्या दुसऱ्या अवस्थेकडे आतां वळूं. दुसऱ्या अवस्थेंत अतिमानसिक दिव्य जाणीव ही कल्पना आणि क्रिया असे आपले दोन विभाग कल्पिते. आपल्या कल्पनेंत ती स्वत: बैठक घेते, आपली क्रिया ती स्वतःच्या समोर धरते आणि विषय-ग्राहक-पद्धतीनें (ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान पद्धतीनें) या क्रियेची प्रतीति ती घेते--त्या क्रियारूप विषयाच्या मागोमाग ती कल्पनारूप जाणीव जाते, त्या क्रियेचीं कार्यें व्यापून तेथें राहते; हीं कार्यें-आकार जितके असतील, तितक्यांत वेगळी वेगळी व्यापून राहिल्यासारखी ती राहते. प्रत्येक नामरूपाचे ठिकाणीं दोन प्रकारची प्रतीति ती घेऊं इच्छिते, घेते; सर्व नामरूपांत समत्वानें राहणारा सुस्थिर ज्ञानमय आत्मा, ही एक प्रतीति आणि दुसरी प्रतीति ती घेते ती अशी : वर असें सांगितलेंच आहे कीं, स्वतःच्या कल्पनेंत ती स्वतःला केन्द्रित करते आणि तिच्या क्रियेनें बनविलेला प्रत्येक आकार स्वतःसमोर धरते. दुसऱ्या प्रतीतींत ती कल्पनारूप स्थितींत प्रत्येक आकारांत, कल्पनाकेन्द्रित ज्ञानमय आत्मा म्हणून वास करते आणि तेथें व्यक्तित्वाच्या

 

पान क्र. २७५

 

व्यापाराला आधारभूत होते, भिन्न आकारांतील व्यक्तित्वाच्या व्यापारांची भिन्नता, हा कल्पनाकेन्द्रित ज्ञानमय आत्मा उचलून धरतो--तेव्हां आत्मतत्त्व दृष्टीनें सर्वत्र एकरूप असलेलें आणि आत्म-आकार- दृष्टीनें भिन्नतेनें भरलेलें असें अतिमानसाचें दुहेरी रूप, त्याच्या दुसऱ्या अवस्थेंत असतें. भिन्न भिन्न आकारांना, भिन्नतेनें आधारभूत होणारा कल्पनाकेन्द्रित ज्ञानमय आत्मा हा, दिव्य व्यक्ति, व्यक्तिरूप दिव्यात्मा अथवा जीवात्मा (Individual Divine) म्हणून ओळखला जातो; सर्वाकारधारक एकच एक आत्मा हा, विश्वात्मक विश्वरूप दिव्यात्मा (Universal Divine) म्हणून ओळखला जातो. विश्वरूप दिव्यात्मा आणि व्यक्तिरूप दिव्यात्मा या दोहोंत आत्मतत्त्वदृष्ट्या कांहीं भेद नसतो; खऱ्या एकतेला धक्का न लावतां विश्वलीलेच्या सोईसाठीं व्यवहारत: मात्र दोहोंमध्यें भेद केलेला असतो. विश्वरूप दिव्यात्मा सर्व आत्मरूपें स्वत:चींच रूपें म्हणून ओळखतो; आणि तरीहि प्रत्येक वेगळ्या रूपाशीं वेगळें नातें ठेवतो; तसेंच प्रत्येकांत राहून इतर सर्वांशीं वेगळीं वेगळीं नातीं स्थापित करतो. व्यक्तिरूप दिव्यात्मा, आपलें स्वत:चे अस्तित्व हें एकाच विश्वरूपानें घेतलेला विशिष्ट आत्माकार व विशिष्ट आत्मक्रिया या स्वरूपाचें आहे हें ओळखतो; त्याचें सर्वसमावेशक ज्ञान हें विश्वरूपाशीं आणि स्वत:खेरीज इतर सर्व आत्मरूपांशीं असलेली त्याची एकच एक एकता त्याच्या प्रतीतीस आणून त्याला आनंद देतें. त्याचें त्रिपुटी-अधिष्ठित ज्ञान हें त्याची वैयक्तिक क्रिया स्वतःच्या आधारानें, साधार आणि समर्थित करून तिच्यांतील आनंदाचा आस्वाद त्याला देतें; तसेंच त्याची, एकत्वाशीं आणि एकत्वाच्या सर्व रूपांशीं असलेलीं एकताधारित भिन्न भिन्न नातीं, साधार आणि समर्थित करून, त्यांतील आनंदाचा आस्वादहि त्याला देतें. अतिमानसाची ही दुसरी अवस्था आपल्या शुद्धीकृत मानसांत प्रतिबिंबित झाली, तर आमच्या आत्म्याला स्वत:चें वैयक्तिक अस्तित्व राखून त्यांत व्यवहार करतां येईल; आणि असें करीत असतां, 'जें तत्त्व सर्व झालें आहे, सर्वांत रहात आहे, सर्व स्वतांत समाविष्ट करून आहे, तें एकतत्त्व आपण आहों' असा अनुभव त्याला घेतां येईल; त्याला स्वतःच्या विशिष्ट रूपांतहि ईश्वराशीं आणि इतर सर्व जीवात्म्यांशीं एकता अनुभवतां येईल. अतिमानसाच्या दुसऱ्या अवस्थेंत पहिलीहून जो वेगळेपणा आहे, तो एवढ्यापुरताच कीं, या दुसरींत एकतत्त्वानें स्वतांत गर्भित असलेली अनेकता व्यक्त केलेली आहे आणि या व्यक्त

 

पान क्र. २७६

 

केलेल्या अनेकतेंत त्याच्या एकतेचें सूत्र अखंडितपणें व्यापून आहे--हा एकात्म अनेकतेचा आणि अनेकात्म एकतेचा खेळ आणि हा खेळ अखंडपणें चालविण्यासाठीं लागणारा तत्त्वप्रपंच, एवढेंच काय ते अतिमानसाच्या दुसऱ्या अवस्थेंत पहिलीपेक्षां नवें असतें.

आतां, अतिमानसाची तिसरी अवस्था पाहूं. अतिमानसिक जाणीव ही कल्पनाकेन्द्रित होऊन, त्या जाणिवेच्या क्रियाशील भागाला पाठीमागून आधार देते; त्या भागांत प्रवेश करून त्याजपेक्षां वरिष्ठतेच्या बुद्धीनें त्याची दखल घेते; त्याजबरोबर त्यांतील आनंदाचा आस्वादहि घेते. अतिमानसाच्या दुसऱ्या अवस्थेंतील ही परिस्थिति बदलली व ती कल्पनाकेन्द्रित जाणीव सर्वस्वीं क्रियाशील जाणिवेंत स्वतःला फेंकून, स्वतःला बुडवून घेऊन, आपल्या वरिष्ठतेच्या दर्जाला व अलगपणाला मुकली व एक प्रकारें गुप्त होऊन बसली, म्हणजे अतिमानसाची तिसरी अवस्था उत्पन्न होते. दुसऱ्या अवस्थेंत विश्वक्रीडेचा जो प्रकार आढळतो, त्यांत आतां बदल होतो. व्यक्तिरूप दिव्यात्मा विश्वात्म्याशीं आणि त्याच्या इतर रूपांशीं त्याचें असलेलें भेदाचें नातें किंवा भेदाचीं नातीं हीं आपलीं मुख्य नातीं म्हणून ओळखील व त्याचा व्यवहार या नात्यांतच मुख्यत: चालेल; विश्वात्म्याशीं व त्याच्या इतर रूपांशीं व्यक्तिरूप आत्म्याचें जें पूर्ण एकतेचें नातें वस्तुत: असतें, तें नातें त्याला व्यवहारांत पदोपदीं अग्रेसर म्हणून आठवणार नाहीं. अनुभूतीचा सर्वश्रेष्ठ परिपाक म्हणून त्याला एकतेच्या नात्याचें भान गौणत्वानें होईल. दुसऱ्या अवस्थेंत एकतेचें भान प्रमुख व प्रभावी असतें, अनेकतेचें भान हें एकतेची लीला या रूपानेंच केवळ होत असतें; तर तिसऱ्या अवस्थेंत एकता बुडाशीं असते आणि वर द्वैत, अनेकता असते; येथें आनंदमय द्वैत हें गुप्त एकतेवर आधारलेलें असतें; दिव्य वैयक्तिक आत्मा आणि त्याचा उगम जो विश्वात्मा, यांजमध्यें तिसऱ्या अवस्थेंत आनंदमय द्वैताचा अनुभव हा मूलभूत अनुभव असतो; दुसऱ्या अवस्थेप्रमाणें येथें एकता मूलभूत आणि द्वैत गौण असा अनुभव नसतो. द्वैताला प्राथम्य व अद्वैताला गौणत्व आल्यानें अतिमानसाच्या तिसऱ्या अवस्थेंत कांहीं विशिष्ट परिणाम घडून येण्याची शक्यता उत्पन्न होते.

असाहि एक संभव आहे कीं, तिसऱ्या अवस्थेंत अद्वैत बुडाशीं गेल्यानें, गौण झाल्यानें त्याचा परिणाम म्हणून व्यक्तीच्या दिव्यात्म्यावर अविद्या झडप घालील. 'अनेकता हीच वास्तवता आहे, एकता ही

 

पान क्र. २७७

 

वस्तूंच्या बेरजेनें उत्पन्न होते; विश्वाची एकता म्हणजे विश्वांतील सर्व वस्तूंची गोळाबेरीज होय' ही अविद्येची विचारसरणी आहे. या प्रकारची अविद्या वैयक्तिक दिव्यात्म्यावर झडप घालण्याचा संभव असला, तरी हा संभव घडून आलाच पाहिजे अशी कांहीं वैयक्तिक दिव्यात्म्याची अगतिक स्थिति नसते. एकच एक तत्त्वाचें फळ आपण आहों, ही जाणीव दिव्यात्मा ठेवूं शकतो; 'एकतत्त्वानें आपल्या जाणिवेनें स्वतःची निर्मिति केलेली आहे, तें अनेक होऊन अनेकांपैकीं प्रत्येक वस्तूंत वसूं शकतें व वसत आहे, तें आपल्या या अनेकीभूत अस्तित्वावर सत्ता चालवितें आणि अनेक तऱ्हेचा आनंद या अनेक रूपांत घेतें--काल आणि स्थल यांची निर्मिति त्यानेंच केली असून, त्यांत विविध आनंदासाठीं स्वतःचा विस्तार त्यानें केला--या विस्तारांत जे दिव्यात्मे निर्माण केले गेले, त्यांपैकीं मी एक आहे; मी कांहीं स्वतंत्र अस्तित्व नव्हे; त्या एकतत्त्वापासून मी वेगळा नव्हे,'--ही जाणीव वैयक्तिक दिव्यात्मा ठेवूं शकत असल्यानें, अविद्येच्या डोहांत तो पडेलच असें नाहीं. ही दिव्य आध्यात्मिक व्यक्ति आग्रहानें एवढेंच म्हणेल कीं, स्थायी एकतेचें तत्त्व जितकें सत्य आहे, तितकीच अनेकता उत्पन्न करणारी एकतेची गतिमानताहि सत्य आहे; स्थायित्व आणि गतिमानता हीं एकाच अखंड सत्याचीं दोन टोंकें आहेत; एक टोंक विश्वलीलेचा पाया आहे, दुसरें टोंक विश्वलीलेचा कळस आहे; एकतेचा आनंद पूर्णतेला जावयाचा असेल, तर त्याला अनेकतेंतील भेदाचा आनंद भरीला घालणें अवश्य आहे.

अतिमानसाच्या ज्या तीन अवस्था आतांपर्यंत वर्णिल्या, त्यांत एकाच सत्य वस्तूचा उपयोग तीन प्रकारचा केलेला आहे; जें अस्तित्वाचें सत्य आनंदाचें स्थान आहे, तें तिन्हीं अवस्थांत एकच आहे; या सत्याचा उपभोग घेण्याची रीत प्रत्येक अवस्थेंत निराळी आहे--भोग घेणारा आत्मा तीन अवस्थांत तीन निराळ्या दृष्टींनीं भोग घेतो. प्रत्येक अवस्थेंत आनंद निराळा मिळेल, पण हा आनंद तीनहि अवस्थांत सत्यजाणिवेच्या मर्यादेंतच असेल. अविद्या व अज्ञान यांचा स्पर्श या आनंदाला होणार नाहीं. पहिल्या अवस्थेंत सर्व आनंद दिव्य एकतेंत सामावलेला असतो; दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेंत तो दिव्य अनेकतेंत वांटला जाऊन, दिव्य आत्म्याला वेगळ्या चवीचा म्हणून भोगतां येतो. या कोणत्याहि अवस्थेंत दिव्य आत्म्याला किंवा त्याच्या व्यवहाराला अविद्या, अज्ञान किंवा भ्रम असा दोष लावतां येत नाहीं. उच्च अनुभूतीचीं हीं

 

पान क्र. २७८

 

सत्यें उपनिषदांत सांगितलेलीं किंवा सुचविलेलीं आहेत. या सत्यांच्या बाबतींत प्राचीन सर्वश्रेष्ठ प्रमाण म्हणजे उपनिषदेंच होत. ईश्वरी अस्तित्वाच्या सत्याच्या अभिव्यक्तीसंबंधानें उपनिषदें जेव्हां वर्णन करतात, तेव्हां वर सांगितलेले अतिमानसिक अवस्थात्रयाचे सर्व अनुभव सत्य असल्याचें त्या वर्णनांत ध्वनित केलेलें सांपडतें. एकता आणि अनेकता यांत जाणिवेच्या दृष्टीनें एकता प्रथम आणि अनेकता नंतर--अनेकता सर्वथा आणि नित्य एकतेवर अवलंबून असते, ही गोष्ट सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक अनुभव आणि सर्व प्रकारचा वेदान्त मान्य करतो. अनेकता सत्य नव्हेच असा आग्रह कोणी धरतात, त्याचें कारण कालदृष्टीनें अनेकता नित्य दिसत नाहीं, ती एकतेंतून येते आणि तिच्यांत परत विलीन होते--तिचें 'सारभूत तत्त्व' एकता हें आहे व तिची अनेकता अनित्य असल्यामुळें 'असार' आहे, असा कांहीं वेदान्त्यांचा अभिप्राय दिसतो--पण असाहि युक्तिवाद करतां येईल : अनेकतेची अभिव्यक्ति पुन: पुन: होत असते, व्यक्त--अव्यक्त-व्यक्त--अव्यक्त--व्यक्त....याप्रमाणें अनेकता ही कालदृष्ट्या अखंडपणें पुन: पुन: अभिव्यक्त होत असल्यानें, कालातीत सर्वोत्तम दिव्य तत्त्वाचे, दिव्य एकता आणि दिव्य अनेकता असे दोन सारखेच शाश्वत पैलू असले पाहिजेत--अनेकता ही कालातीत सर्वोत्तमाची एकतेइतकीच वास्तव बैठक नसती, तर कालदृष्ट्या जी अनेकतेची अटळ व नित्य अशी पुनरावृत्ति होत असते ती झाली नसती.

खरी गोष्ट अशी आहे कीं, आमचें मानवी मन आध्यात्मिक अनुभवाचा परामर्श घेतांना, त्याच्या एका अंगावर सर्व जोर देऊन, इतर अंगांकडे बघत नाहीं; त्यानें जोर दिलेलें अंग हें केवळ एक अंग नसून सर्व शाश्वत सत्य तेंच आहे, असा सिद्धान्त करतें आणि सर्वाचें विभजन करण्यांत गुंतलेल्या मानसिक तर्कशास्त्राच्या भेदप्रधान परिभाषेंत आपला एकांगी सिद्धान्त मांडतें--तेव्हां तत्त्वज्ञानाच्या अन्योन्यविरोधी अन्योन्यमारक शाखांची आवश्यकता उत्पन्न होते. एकच एक जाणिवेचें निरतिशय एकत्व तें एकटेंच सत्य आहे असा अभिनिवेश धरून, आपण या एका दिव्य सत्यानें--दिव्य अद्वैतानें--उभा केलेला विश्वाचा खेळ पाहतो; या खेळांत अनेक वस्तूंचे जे भेद आहेत, ते वास्तव आहेत, एकतेच्या पोटांतले अवास्तव भेद नव्हेत, असें आपलें मन त्याच्या स्वभावाप्रमाणें पुकारा करतें; श्रेष्ठ अतिमानसिक तत्त्वाच्या आधारानें ही मनाची चूक

 

पान क्र. २७९

 

दुरुस्त करावी हा खरा मार्ग; पण हा मार्ग घेण्याचें सोडून, विश्वाचा भेदमय खेळ भ्रम आहे असें विधान आपण करतों. एकांगी आग्रही युक्तिवादाचें हें एक उदाहरण झालें. एकतत्त्वाचा अनेकतेच्या द्वारां चाललेला खेळ पाहून, एकतत्त्व हें नेहमींच अनेकताविशिष्ट आहे, असा आम्ही सिद्धान्त करतों, जीवात्मा म्हणजे परमात्म्यानें स्वतःच्या स्वरूपाला स्वत: दिलेला आकार आहे असें आम्ही म्हणतों, पण हें परमात्म्यानें जीवात्म्याच्या रूपानें स्वीकारलेलें विशिष्ट अस्तित्व शाश्वतचें आहे असें विधान आम्ही करतों. जीवात्मस्थितिहीन शुद्ध एकत्वजाणिवेची परमात्मस्थिति मुळांत नाहीं असा आग्रह आम्ही धरतों, शुद्ध अद्वैताचा अनुभव येतच नाहीं असा हट्ट धरतों; हें अस्थानीं आग्रहाचें दुसरें उदाहरण आहे. विश्वाचा जो विविधतेचा खेळ चाललेला आहे, त्याजवर जोर देऊन, परमात्मा आणि मानवी जीवात्मा हे नेहमींच विभक्त असतात, ते कधींहि एक नव्हते व नसणार असा आग्रह आम्ही धरतों; आणि हें विभक्तपण ज्या अनुभवानें नाहींसें होत असतें, विभक्तपणाच्या पलीकडला दोघांच्या अविभक्ततेचा, अविभाज्य एकतेचा जो अनुभव असतो, तो अनुभव खरा नव्हे असें विधान आम्ही करतों. हा तिसरा अत्याग्रहीपणाचा नमुना होय. याला द्वैतवाद म्हणतात. पहिल्या दोन आग्रही मतांना, अद्वैतवाद व विशिष्टाद्वैतवाद अशीं नांवें आहेत. आम्हीं जी तत्त्वज्ञानाची बैठक घेतली आहे, ती अशी आहे कीं, या तीन वादांत बहिष्कार आणि नकार यांचा आश्रय करून सत्याला जसा धक्का दिला आहे, तसा धक्का आम्ही सत्याला देऊं शकत नाहीं; या वादांतील बहिष्कार आणि नकार यांच्या भानगडींत आम्ही पडूं शकत नाहीं; आम्ही हें जाणतों कीं, या प्रत्येक वादांत सत्य आहे, पण त्याबरोबर त्याची अतिरेकी मांडणीहि आहे आणि त्या मांडणीमुळें त्या प्रत्येकांत सत्याच्या कोणत्या तरी अंगाचा अवास्तव निषेध केलेला आहे किंवा कोणत्या तरी अंगाला युक्तिविसंगत नकार दिलेला आहे, बहिष्कार घातलेला आहे. जें सर्वातीत परम सत्य आहे, तें सर्वस्वीं सर्वबंधनातीत, पूर्णमुक्त, पूर्णस्वतंत्र आहे असें आम्ही मानतों; आमच्या एकत्वाच्या किंवा अनेकतेच्या कल्पनेनें तें बांधलेलें नाहीं असें आम्ही मानतों; अनेकतेच्या अभिव्यक्तीसाठीं, अनेकतेचा आधार म्हणून तें एकतेचा आश्रय करतें; एकतेच्या दिव्य व विस्तृत अभिव्यक्तीचा आनंद लुटावा यासाठीं आणि परत एकतेचें स्थान गांठण्यासाठीं अनेकतेचा आश्रय तें करीत असतें, असा

 

पान क्र. २८०

 

आमचा सिद्धान्त आहे. अनंत दिव्य परमतत्त्वाला सर्व तऱ्हेचें निरतिशय स्वातंत्र्य आहे, हा आमचा पायाभूत सिद्धान्त आहे; आमच्या मनानें जे भेद कल्पिले आहेत, ज्या भेदाधिष्ठित व्याख्या केल्या आहेत, त्या भेदांच्या आणि त्या व्याख्यांच्या बंधनांत आम्ही परमतत्त्वाला टाकूं इच्छीत नाहीं--कारण असा सर्व खटाटोप हा सर्वथा विफल होणार अशी आमची खात्री आहे; म्हणून कोणत्याहि पक्षाशीं वाद घालावयाचा नाहीं असें आम्हीं येथें ठरविलें आहे.

 

पान क्र. २८१

 

प्रकरण सतरावें

 

दिव्य आत्मा

 

ज्याचा आत्मा सर्व भूतें झाला आहे, जो सर्वत्र एकतत्त्व पाहतो, त्याला ज्ञान हस्तगत असल्यानें, मोह कसा होईल? शोक कोठून होईल?

- ईश उपनिषद् ७.

 

अतिमानसाची कल्पना आपण समजून घेतली आहे, आपलें मानवी जीवन ज्या मनाच्या पायावर उभारलेलें आहे, त्या मनाच्या विरुद्ध गुण अतिमानसांत आहेत, हें आपण पाहिलेलें आहे. मन आणि अतिमानस या दोहोंची कल्पना आपल्याला याप्रमाणें स्पष्टतेनें आल्यानें, दिव्यता, दिव्यजीवन या संबंधींची आपली कल्पना आतां अंधुक, अस्पष्ट राहण्याचें कारण नाहीं; या संबंधींची स्पष्ट रेखीव कल्पना आतां आपण करूं शकतों, एवढेंच नव्हे, तर या दिव्यतेची आणि दिव्य जीवनाची कल्पना आतां आपण तत्त्वज्ञानी युक्तिवादाच्या भक्कम पायावर प्रतिष्ठित करूं शकतों. मानवता आणि मानवी जीवन यांच्याशीं, दिव्यत्व आणि दिव्य जीवन यांचें असलेलें नातें स्पष्टपणें पाहूं शकतों आणि विश्वाचा मूळ स्वभाव, आमचें विश्वगत पूर्ववृत्त आणि आमचा अटळ भावी विकास यांच्या आधारावर दिव्यता व दिव्य-जीवन या संबंधींची आमची आशा व आकांक्षा पूर्णपणें समर्थनीय आहे हें निःसंशय रीतीनें आपण जाणूं शकतों. आज आम्हांला फक्त मानवता व मानवी जीवन यांचाच अनुभव आहे. अतिमानसाची कल्पना नसतांना, मानवी जीवन व मानवता यांच्या पलीकडील दिव्य-जीवन व दिव्यता यांचा अनुभव मिळावा असें आम्हांस वाटलें, तरी या मोठ्या कल्पना स्पष्ट नव्हत्या, मोठी आकांक्षा व्यक्त करणाऱ्या अंधुक अशा ह्या कल्पना होत्या. अतिमानसाची ओळख झाल्यानें, दिव्यतत्त्व व ईश्वर म्हणजे काय याची आतां आमच्या बुद्धीला चांगली कल्पना येते, शाश्वत सत्य आमची बुद्धि ग्रहण करूं शकते व या शाश्वत सत्यांतून, ईश्वरी तत्त्वांतून विश्व कसें आलें हें आमच्या बुद्धीला कळूं शकतें. आम्हांला हेंहि समजतें कीं, ईश्वरापासून जें निघालें आहे, तें ईश्वराप्रत अवश्य परत गेलेंच पाहिजे. आतां आम्ही

 

पान क्र. २८२

 

विचारूं शकतों कीं, ईश्वराजवळ परत जावयाचें तर आहेच तेव्हां आमचा स्वभाव, आमचें जीवन, आमचीं इतरांशीं असलेलीं नातीं यांत आम्हीं कोणता बदल करावा? आम्हीं या सर्व बाबतींत कसें व्हावें म्हणजे ईश्वराचें सान्निध्य आम्हीं मिळविल्यासारखें होईल? आमच्या खोल अंतर्यामांत एकांत साधून, समाधि सुखाचा, ईश्वर सान्निध्याचा व ईश्वरांत विलीन होण्याच्या आनंदाचा अनुभव आम्हांला घेतां येईल; पण त्याचें आम्हांला जितकें आकर्षण आहे; तितकेंच दिव्य-जीवन जगून ईश्वररूप होण्याचें, ईश्वरसान्निध्य मिळविण्याचेंहि आकर्षण आम्हांला आहे; आणि याप्रमाणें दिव्य-जीवन जगणें म्हणजे काय हा प्रश्न, आतां अतिमानसाची ओळख झाल्यावर आम्ही विचारूं शकतों. या प्रश्नाचें उत्तर बरेंच स्पष्ट असें आतां आम्हांला मिळूं शकतें; आमचा प्रश्न आम्हांला लाभदायक होईल असा आतां संभव उत्पन्न झाला आहे. मात्र एक उणीवेची गोष्ट आमच्या आतांपर्यंतच्या विवेचनांत अशी आहे कीं मर्यादित निसर्गाकडे उतरून येत असतां, ईश्वरी-तत्त्वाचें स्वरूप कसें असतें, कसें बदलतें त्याची व्याख्या करण्याचा आम्हीं आतांपावेतों प्रयत्न केला आहे--आणि आम्ही कांहीं वरून खालीं येत नाहीं, आम्ही व्यक्तिभूत ईश्वरी तत्त्व आहों, आम्ही मर्यादित निसर्गांत आहों आणि आमचें मूळ ईश्वरी तत्त्व गांठण्यासाठीं आम्ही या निसर्गांतून वर चढत आहों--अर्थात् आतांपर्यंतचें विवेचन आम्हांला जसेंच्या तसें उपयोगी पडणारें नाहीं, ही त्यांतील उणीव आहे. असो. अतिमानसाचें क्षेत्र सच्चिदानंदाच्या खालचें; त्या क्षेत्रांत राहणारे, खालीं न उतरलेले तेथील देव व त्यांचें जीवन आणि मनाच्या क्षेत्रांतून वर चढून अतिमानसाच्या क्षेत्रांत जाणारे आम्ही, प्रथम देवत्व घालवून खालीं तळापर्यंत दौरा करून, परत वर चढून देवत्व मिळविणारे आम्ही मानव, ''देवभूत मानव'' यांचें जीवन; या दोन जीवनांत कांहीं फरक जरूर असणार आणि हा आमच्या ''देशाटनाच्या'' अनुभवाचा फरक असणार, खालीं न उतरलेल्या देवांपेक्षां आम्ही अनुभवानें अधिक श्रीमंत असणार! तथापि देवत्वाच्या सारभूत लक्षणांत मात्र, त्यांच्या आमच्यांत फरक असूं शकणार नाहीं. तेव्हां हें सारभूत देवत्व कशांत असतें? जें दिव्य-जीवन आम्ही जगूं इच्छितों, त्याचें सारभूत स्वरूप काय, तें आतां पहावयाचें आहे.

आम्ही ज्या दिव्य आत्म्याचें जीवन पहाणार आहों, तो दिव्य आत्मा

 

पान क्र. २८३

 

अज्ञानाच्या क्षेत्रांत उतरलेला नाहीं. त्याचें चैतन्य जडांत सुप्त झालेलें नाहीं, भौतिक जड निसर्गाचें त्या आत्म्याला ग्रहण लागलेलें नाहीं--असा उच्च शुद्ध स्थितींतला दिव्य आत्मा आपण पहात आहों; वस्तूंचें मूळ सत्य या आत्म्याचें जीवनक्षेत्र आहे, मूळ स्वयंसिद्ध एकत्व ही त्याची नित्य अनुभूति आहे, त्याचें अस्तित्व अनंत असून, स्वतःच्या अनंत अस्तित्वाच्या जगांत तो दिव्य आत्मा आपलें जीवन जगत आहे, ही त्याची जीवनकथा मूळ ईश्वराच्या जीवनाचीच कथा आहे, यापेक्षां वेगळा पैलूहि या दिव्य आत्म्याच्या जीवनाला आहे; ईश्वरी मायेच्या खेळांत तो भाग घेत आहे, सर्वसमावेशक सर्वदर्शी सत्य-जाणीव आणि त्रिपुटीबद्ध अंशदर्शी सत्य-जाणीव हे दोन सत्यजाणिवेचे प्रकार या दिव्य आत्म्याला उपलब्ध असल्यानें, तो ईश्वराशीं जसें एकत्व अनुभवतो, तसें त्यापासून वेगळेपण देखील अनुभवतो; तसेंच इतर आत्म्यांशींहि एकत्व आणि विभक्तत्व एकाच वेळीं त्याला अनुभवतां येतें व तो अनुभवतोहि. एकच एक परम ईश्वरी तत्त्व, स्वतःच अनेक झालें आहे. या त्याच्या एकत्वाधिष्ठित अनंत अनेकतेच्या लीलेंत, दिव्य आत्मा हा ईश्वराशीं आणि स्वतःसारख्या इतर आत्म्यांशीं एकत्व आणि अनेकत्व, अभेद व भेद सहजतेनें, अटळपणें अनुभवीत असतो. अशा दिव्य आत्म्याची जाणीव, अस्तित्व व जीवन आम्हांला ओळखीचें करून घ्यावयाचें आहे.

असा दिव्य आत्मा सच्चिदानंदाच्या ज्ञानपुरःसर लीलेमध्यें त्या लीलेचा शाश्वत घटक म्हणून असणार हें उघड आहे. अस्तित्वदृष्टीनें हा दिव्य आत्मा शुद्ध, अनंत व स्वयंभू अस्तित्व भोगणारा असेल; जीवनदृष्टीनें अमर जीवनाचा अमर्यादित मुक्त खेळ तो खेळत असणार; त्याला मृत्यु, जन्म, शरीरांतर या गोष्टी नसणार; कारण अज्ञानाचा पडदा, आमच्या भौतिक अस्तित्वाच्या अंधाराचा पडदा त्याच्यापासून दूर असेल. दुसरी गोष्ट, शक्तीच्या दृष्टीनें त्याची जाणीवशक्ति शुद्ध अनन्त असेल, तिचा पाया शाश्वत प्रकाशपूर्ण शान्ति हा असेल; तथापि ज्ञानाचे आकार, ज्ञानयुक्त शक्तीचे आकार मुक्तपणे धारण करून लीला करणारी अशी त्याची जाणीवशक्ति असेल; अडखळत मार्गक्रमण करायला लावणाऱ्या मनाच्या चुका हा दिव्य आत्मा करणार नाहीं; या चुकांच्या बाधेपासून तो अलिप्त, शांत असेल, आपल्या धडपडणाऱ्या इच्छाशक्तीकडून घडणाऱ्या गोंधळापासूनहि तो अलिप्त राहील; कारण सत्यापासून तो कधींहि दूर होत नाहीं; एकतेच्या अनुभूतीला तो कधीं पारखा होत नाहीं; त्याच्या दिव्य

 

पान क्र. २८४

 

अस्तित्वांत स्वयंभूपणें असलेला प्रकाश आणि स्वभावत: असलेला सुसंवाद या गोष्टींपासून तो केव्हांहि च्युत होत नाहीं. तिसरी गोष्ट आनंदाची. या दिव्य आत्म्याला शाश्वत अस्तित्वाचा जो अनुभव भोगतां येतो, तो अनुभव शुद्ध, स्वयंभू आनंदाचा असतो; तसेंच या आत्म्याला कालव्याप्त, कालव्यापी लीला क्रमप्राप्त असते, त्या लीलेंत त्याला आनंदाचे विविध प्रकार मुक्तपणें भोगावयास मिळतात; कारण आमच्या विकृती, घृणा, द्वेष, असमाधान, उद्वेग, या त्याला बाधा करीत नाहींत; आम्ही अस्तित्वांत विभागलेले आहोंत; आमची आग्रही इच्छाशक्ति सारखी चुकत असते; आमची वासना आंधळी प्रेरणा देऊन आम्हांला भलतें करावयास लावते; म्हणूनच घृणा, द्वेष, इत्यादि विकृतींचा ससेमिरा आमच्या पाठीमागें लागतो; दिव्य आत्मा या कटकटीपासून मुक्त असल्यानें, त्याला मुक्तपणें मूळ अस्तित्वाचा शुद्ध आनंद आणि लीलेचा विविध आनंद भोगावयास मिळतो.

या दिव्य आत्म्याची जाणीव, अनंत सत्याचा कोणताहि अंश पूर्णपणें जाणते, कोणत्याहि अंशापासून ती दूर नसते; दुसऱ्या आत्म्यांशीं या आत्म्याचीं जीं नातीं असतात, त्या नात्यांत या आत्म्यानें एखादी विशिष्ट बैठक स्वीकारली, तरी या बैठकीमुळें त्याला मर्यादा पडत नाहींत व त्यामुळें अनंत सत्याचा कोणताहि अंश त्याच्या नजरेआड होत नाहीं; त्यानें वरवर व्यक्तित्व धारण केलें, व्यवहारासाठीं भेद स्वीकारला, तरी त्याचें आत्मज्ञान पूर्ण असतें, त्यांत कमीपणा येत नाहीं. त्याची आत्मानुभूति त्याला नेहमीं निरतिशय परमतत्त्वाच्या निकट संगतीचा अनुभव देते. मी परमतत्त्वाच्या निकट आहे असाच अनुभव त्याला शाश्वतचा असतो. आम्हांला हें परमतत्त्व एक कल्पना मात्र आहे; ज्याची व्याख्या करतां येत नाहीं, अशा अस्तित्वाला आमची बुद्धि परमतत्त्व, परात्पर केवलतत्त्व, ब्रह्म अशी संज्ञा देते; तें अज्ञेय आहे, आमचें ज्ञान आणि स्वत: ब्रह्माचें स्वविषयक ज्ञान यांत अंतर आहे अशी कल्पना आमची बुद्धि बांधते; परंतु या ब्रह्माची संगति आम्हांला घडविणे हें कार्य ती करूं शकत नाहीं. दिव्य आत्म्याची गोष्ट याहून अगदीं वेगळी आहे. तो वस्तूंच्या सत्य रूपांत वावरतो, परमतत्त्वाचा मी एक आविष्कार आहे, ही नित्य जाणीव व नित्य अनुभूति त्याला असते. या आत्म्याचें जें अक्षर अस्तित्व असतें, तें अस्तित्व परात्पर परमतत्त्वाचें मूळ स्वरूप 'सच्चिदानंद' आहे, अशी जाणीव त्याला असते. त्याचा जो जाणीवयुक्त

 

पान क्र. २८५

 

अस्तित्वाचा--जीवनाचा--खेळ असतो, तो खेळ म्हणजे त्या परमतत्त्वाचा आविष्कार आहे, तो खेळ म्हणजे सच्चिदानंदाचे लीलामय आकार आहेत, अशी जाणीव त्याला असते. त्याची प्रत्येक ज्ञानक्रिया, ज्ञानस्थिति, म्हणजे अज्ञेय परमतत्त्वाच्या विविध आत्मज्ञानाची स्थिति, अशी जाणीव त्याला असते; त्याची सामर्थ्याची, इच्छाशक्तीची, वीर्याची प्रत्येक स्थिति व कृति म्हणजे परात्पराची स्वत:ला स्वाधीन ठेवण्याची क्रिया आहे, परात्पराच्या अस्तित्वाच्या व ज्ञानाच्या शक्तीचा एक सरूप आविष्कार आहे, अशी जाणीव त्याला असते; त्याची आनंदाची, प्रेमाची प्रत्येक अवस्था व कृति, परात्पराची स्वत:ला आलिंगन देण्याची कृति आहे, परात्पराचा जाणीवयुक्त आत्म-तर्पणाचा, आत्मसुख-भोगाचा तो एक प्रकार आहे, अशी जाणीव त्याला असते. या प्रमाणें दिव्य आत्म्याची जाणीव, सर्व अवस्थांत व सर्व कृतींत सदासर्वदा परात्परमय असेल. दिव्य आत्म्याला घडणारा परात्पराचा अनुभव म्हणजे एकाद्या वेळीं ओझरता आलेला किंवा प्रयत्नांतीं मिळविलेला, परंतु मुश्किलीनें टिकणारा अनुभव नसतो; नेहमींची अवस्था वेगळी आणि परात्पराचा अनुभव या अवस्थेला जोडून मिळालेला किंवा मिळविलेला, या अवस्थेवर कळस म्हणून लाभलेला, असा तो अनुभव नसतो; तर त्याचा हा अनुभव त्याच्या अस्तित्वाचा पायाच असतो. एकतेची काय किवा भेदस्थितिची काय, दोन्ही प्रकारची दिव्य आत्म्याची लीला ही परात्पराच्या या अनुभूतीवर अधिष्ठित असते. त्याचें सर्व जाणणें, संकल्प करणें, कृति करणें, आनंद अनुभवणें हें सर्व परात्परमय असतें; त्याचा कालातीत आत्मा आणि त्याच्या काळाचा प्रत्येक क्षण परात्पराच्या अनुभूतीनें भरलेला असतो. त्याचा स्थलातीत आत्मा आणि त्याचे स्थलनिष्ठ विस्तारांतील प्रत्येक स्वरूप परात्परमय असतें. सर्व कार्यकारणभाव आणि सर्व परिस्थिति यांच्या अतीत असलेली त्याची निर्भेळ सर्व-निरपेक्ष शुद्धता आणि त्याची परिस्थितिबद्ध पूर्वयोग-सापेक्ष कारणभावनियंत्रित अशी शुद्धेतर अवस्था, दोन्ही सारख्याच परात्परमय असतात. याप्रमाणें परात्पराची शाश्वत संगति दिव्य आत्म्याला लाभत असल्यानें, त्याला अनंत स्वातंत्र्य, अनंत आनंद यांचा लाभ होतो; परात्पराच्या लीलेंत त्याला कसलीहि असुरक्षितता स्पर्श करीत नाहीं; त्याच्या दिव्य अस्तित्वाचा व दिव्य जीवनाचा जीवनरस, सारभूत सत्त्व, मूळ आधार, त्याची ही शाश्वत परात्परमयताच त्याला पुरविते.

 

पान क्र. २८६

 

सच्चिदानंदाच्या शाश्वत अस्तित्वाचे जे दोन अविभाज्य पर्याय, परात्पराच्या आत्म-अभिव्यक्तीचे जे दोन अविभाज्य ध्रुवबिंदू--एकता आणि अनेकता-- यांचे दोन प्रकारचें जीवन दिव्य आत्मा एकाच वेळीं अनुभवील, व्यवहारांत आणील. वस्तुत: जें कांहीं अस्तित्वांत आहे, तें सर्वच याप्रकारें दोन पर्यायांचें जीवन जगत असतें; परंतु आमची आत्म-जाणीव विभागलेली आहे आणि तिला हे दोन पर्याय एकमेकांशीं विसंगत दिसतात; आणि म्हणून या दोहोंपैकीं एक जीवन ती पसंत करते; ती अनेकतेंत राहणें पसंत करते व असें करतांना प्रत्यक्ष आणि पूर्ण एकत्वाची अनुभूति, ती आपण होऊन दूर सारते किंवा ती एकतेच्या अनुभूतींत राहणें पसंत करते आणि असें करतांना अनेकतेची अनुभूति ती दूर सारते. दिव्य आत्मा याप्रकारें अकारण द्वैताचा, जीवनैक्यविच्छेदाचा दास होत नाहीं. त्याला एकाच वेळीं स्वतःमध्यें अनन्त आत्म-एकीभवन आणि अनन्त आत्म-विस्तार, आत्म-प्रसार यांचा अनुभव घेतां येतो. परात्पर एकतत्त्व, स्वतःच्या एकतामय जाणिवेंत अपार अनेकता ह्या संभाव्य म्हणून, अव्यक्त म्हणून धारण करतें; (आमच्या मनाला अर्थातच हें जें अव्यक्त, तें अभावासारखेंच वा अभावच वाटतें.) आणि तेंच एकतत्त्व, स्वतःच्या जाणीवयुक्त अस्तित्वाची, संकल्पाची व आनंदाची लीला म्हणून गतिमान् असणारी अशी व्यक्त अनेकता, स्वतःच्या विस्तारमय जाणिवेंत धारण करतें. आम्ही ज्याचें स्वरूप पाहत आहोंत, तो दिव्य आत्मा, स्वतःमध्यें परात्पर एकतत्त्वाचे हे दोन कारभार एकाच वेळीं समग्रतेनें अनुभवतो. एकतत्त्व आणि त्याचीं अनेक रूपें यांचें अन्योन्य-आकर्षण या दिव्य आत्म्याला स्पष्टपणें अनुभवावयास मिळतें; अनेक रूपांचा शाश्वत उगम व त्यांचें पायाभूत असें जें एकतत्त्व, त्याला आपल्याकडे आकर्षित करून, त्याच्या उच्च पातळीवरून त्याला आपल्या पातळीवर आणण्यांत नित्य मग्न असलेलीं अनेक रूपें या दिव्य आत्म्याच्या नजरेस पडतात; त्याचबरोबर जें एकतत्त्व या अनेक रूपांच्या भेदमय लीलेचें आनंदपूर्ण समर्थन करणारें आहे आणि या लीलेच्या शाश्वत कळसासारखें आहे, त्या एकतत्त्वाचा आकर्षणानें हीं अनेक रूपें त्याजकडे चढत जाण्याचा नित्य प्रयत्न करीत असलेलीं दिव्य आत्म्याच्या नजरेस पडतात. दिव्य आत्म्याच्या दृष्टीसमोर वस्तुजाताचा हा महान् देखावा नित्य असतो. हें महान् वस्तु-दर्शन दिव्य आत्म्याच्या सत्य-जाणिवेचें अंगभूत दर्शन आहे. वैदिक ऋषींनीं ''सत्यं कृतं बृहत्'' असें जें सत्य-जाणीवविषयक

 

पान क्र. २८७

 

मंत्र-गान केलें, त्याचा पाया हें महान् वस्तु-दर्शन आहे; अन्योन्य-विरोधी सर्व पर्यायांची ही एकात्मता, ही एकता हें खरें ''अद्वैत'' होय. परम अज्ञेयाचें ज्ञान ज्यांत सामावलें आहे, असा सर्वोच्च, सर्वसमावेशक शब्द ''अद्वैत'' हाच आहे. दिव्य आत्मा या अद्वैतांत आपलें जीवन व्यतीत करीत असतो.

एकतत्त्व हें मूलत: अनंत आहे, त्याची आत्मकेन्द्रित घनीभूत एकता ही असीम व अनंत आहे, त्याप्रमाणें त्याची विस्ताराची स्थिति हीहि अनन्त आहे. अनन्त एकतेचे हे दोन प्रकार आहेत, एक विस्तारशून्य घनीभूत आत्मैककेंद्रित एकता आणि दुसरी विस्तारमय प्रवाही आत्मप्रसार-विशिष्ट एकता. अस्तित्व, जाणीव, संकल्प आणि आनंद या मूळ एकतत्त्वाच्या चार पैलूंत नानाविधता उत्पन्न झालेली दिव्य आत्म्याच्या प्रत्यायास येते आणि ही नानाविधता मूळ घनीभूत एकतेचाच प्रवाह, विस्तार व प्रसार असून त्यांत वस्तुत: भेद आणि विभागणी यांचा कांहीं संबंध नाहीं. या नानाविधतेचें खरें स्वरूप म्हणजे मूळ घनीभूत, विस्तारशून्य एकतेनें, स्वत: होऊन घेतलेलें विस्तारमय रूप आहे. पूर्वीचें रूप आणि हें नवें रूप हीं दोन्हीं एकतेचींच रूपें आहेत, ही गोष्ट दिव्य आत्मा ओळखतो. स्वत:च्या अस्तित्वाच्या सारभूत अंशांत हा दिव्य आत्मा सदैव घनीभूत एकतेचा असेल आणि स्वत:च्या अस्तित्वाच्या विस्तारमय स्थितींत हा दिव्य आत्मा सदैव नानाविध रूपें घेऊन व्यक्त होत राहील. त्याचे ठिकाणीं जें कांहीं साकार होईल तें सर्व, एकतत्त्वांतील शक्तिबीजांचें व्यक्त स्वरूप असेल; अनाम, अशब्द शांतींतून नाम किंवा शब्द स्पंदन करीत त्याचे ठिकाणीं व्यक्त होईल; त्याचे ठिकाणीं निराकार सारतत्त्वाला आकार हा व्यक्तांत आणील; शांत शक्तीला प्रेरणा होऊन, तींतून क्रियाशील संकल्प वा वीर्य त्याचें ठिकाणीं बाहेर येईल; 'मी आत्मा' अशा जाणिवेचा किरण कालातीत आत्मज्ञानांतून सूर्यकिरणाप्रमाणें त्याचें ठिकाणीं पुढें येईल; शाश्वत आत्म-जाणिवेच्या एकरूप अस्तित्वांतून, 'मी अमुक' अशीं जाणीवयुक्त रूपें धारण करणारी विभूतींची लाट त्याचें ठिकाणीं उसळेल. जिवन्त झऱ्यांतून अखंडपणें पाणी वर यावें त्याप्रमाणें शाश्वत शांत सुखांतून आनंद आणि प्रेम नित्यश: त्याचे ठिकाणीं वर येत राहतील; दिव्य आत्म्याच्या अस्तित्वाचा गाभा परात्पर एकतत्त्वाचा असतो; त्यांत जें सर्व कांहीं शक्तिरूपानें, बीजरूपानें असतें, तेंच पुढें त्याच्या विस्तारमय रूपांत स्वयंप्रेरणेनें व्यक्त होतें. या दिव्य आत्म्याचा स्वत:चा आविष्कार म्हणजे परात्पराच्या अद्वैतमय द्वैताचा किंवा द्वैतमय अद्वैताचा

 

पान क्र. २८८

 

आविष्कार होय. या आविष्कारांत जें कांहीं अन्यसापेक्ष व्यक्त होतें, तें एकप्रकारें स्वतःपुरतें परात्परासारखेंच अन्यनिरपेक्ष असतें; कारण तें हें जाणून असतें कीं, मी परात्पराचा आविष्कार आहे; तसेंच त्याचे ठिकाणीं अज्ञान असत नाहीं; आणि म्हणून 'अन्यसापेक्ष इतर गोष्टी परक्या नाहींत' ही जाणीव त्याला असते, व स्वतःइतक्याच इतर अन्यसापेक्ष रचना पूर्ण आहेत, हीहि अनुभूति त्याला असते.

अतिमानसाच्या क्षेत्रांत अस्तित्वाच्या तीन पायऱ्या असतात हें आपण पाहिलें आहे; दिव्य आत्मा जेव्हां एकतत्त्वाच्या विस्तारमय अस्तित्वांत जीवन जगतो, तेव्हां वरील तीन पायऱ्या त्याच्या समोर असतात; पण आम्ही आमच्या मनाच्या पातळीवरून या पायऱ्यांना जशा तीन समजतो, तसा तीनपणा दिव्य आत्म्याच्या दृष्टीनें त्यांच्या ठिकाणीं नसतो; सच्चिदानंद परमतत्त्व साकार होतांना, व्यक्त होतांना या तीन पायऱ्यांचा एकाच वेळीं उपक्रम करतें; त्याच्या एकाच आविष्काराचे हे तीन पैलू आहेत अशी दिव्य आत्म्याची या तीन पायऱ्यासंबंधाची अनुभूति असते. सत्य-ज्ञानपूर्ण अतिमानसाचा पाया महान् सर्वसमावेशकता असतो; या कारणानें दिव्य आत्मा आपल्या सर्वसमावेशक आत्मविषयक अनुभूतीच्या पोटांत वरील तीन पायऱ्यांचा म्हणा, पैलूंचा म्हणा, एकदम एका ज्ञानक्रियेनें संग्रह करूं शकतो; सर्व वस्तूंसंबंधाचा, सर्व अस्तित्वासंबंधाचा या दिव्य आत्म्याच्या बुद्धीचा, मनाचा, इन्द्रियांचा अनुभव एकाच वेळीं तीन प्रकारच्या दिव्य स्वरूपाचा असतो :-- १) आत्माच सर्व वस्तु बनलेला आहे, हा आत्मा माझा आत्मा आहे, सर्वांचा आत्मा आहे; येथें सारभूत अस्तित्व (Self-being) हें आत्मा असून, विभूतिमय अस्तित्वहि (Self-becoming) आत्माच आहे; विभूतींत अलग अलगपणा नाहीं, माझ्या आत्मजाणिवेच्या पोटांत सर्व विभूती आहेत--त्यांना जाणिवेच्या बाहेर अस्तित्वच नाहीं; २) सर्व अस्तित्वें -- सर्व जीव एकाच आत्म्याचे आकार आहेत; प्रत्येक साकार आत्मा अस्तित्वदृष्टीनें मूळ एक आत्म्यांत आहे, या एकांत प्रत्येक आत्मविभूतीला विशिष्ट दृष्टिकोन आहे; या एकांतच रहाणाऱ्या दुसऱ्या सर्व विभूतींशीं प्रत्येक विभूतीचीं विशिष्ट नातीं आहेत. मात्र या एकावर सर्व विभूती अवलंबून आहेत; या एकाची व्याप्ति अनन्त असून, तींत प्रत्येक विभूति त्या एकाचा जाणीवयुक्त आकार आहे; स्वत: एकच हें स्वतःच्या निराकार अनन्त स्वरूपांत साकार होऊन, अनन्त जाणीवयुक्त रूपांनीं वावरत आहे; ३) सर्व जीवांना व्यक्तित्व आहे; प्रत्येक जीव

 

पान क्र. २८९

 

दिव्य-व्यक्ति आहे; या दिव्य व्यक्तीला तिचा स्वतंत्र दृष्टिकोन आहे; या प्रत्येक दिव्य-व्यक्तीच्या अन्तर्यामीं परम एकतत्त्व वसति करून आहे; आणि म्हणून प्रत्येक व्यक्ति केवळ आकार नव्हे, केवळ प्रतिमा नव्हे, पूर्ण अशा सत्यरूप एकतत्त्वाचा केवळ आभासमय भाग नव्हे; शांत अद्वैत सागरावरील केवळ पृष्ठभागची फेंसाळ लाट नव्हे, (जीवासंबंधानें मनानें या कल्पना बांधल्या आहेत आणि त्या सहजच अपूर्ण व सदोष आहेत) तर प्रत्येक व्यक्ति पूर्ण-एकरूपांत उदयास आलेलें, स्वत: पूर्ण असेंच रूप आहे; प्रत्येक व्यक्ति मूळ अनंत सत्यांत त्या सत्याला द्विरुक्त करणारें सत्यच आहे; पूर्ण सागराला स्वतःमध्यें पूर्णतया सामावून घेणारी, सागराची लाट, असेंच व्यक्तीचें सत्य स्वरूप आहे; प्रत्येक व्यक्ति अन्य-सापेक्ष रचना तर खरीच, परंतु ही रचना तिच्या आकाराच्या मागें जाऊन अवलोकन केली, तिचें पूर्ण स्वरूप पाहिलें म्हणजे असा प्रत्यय येतो कीं, ती स्वत: सर्व-निरपेक्ष, मूळ एकतत्त्वच आहे. दिव्य आत्म्याचे हे तीन दिव्य अनुभव त्याला एकाच वेळीं मिळणारे असे आहेत.

एका परम अस्तित्वाचे हे तीन पैलू आहेत. आत्मज्ञानाचा आधार या सर्वांना आहे. परम दिव्य-तत्त्वाच्या मानवी साक्षात्कारानुसार उपनिषदांत ही आत्मविषयक अनुभूति तीन प्रकारें वर्णिली आहे. १) आत्मज्ञानी अनुभवतो कीं, त्याचा आत्मा सर्वभूत झाला आहे. २) आत्मज्ञानी स्वतःच्या आत्म्याचे ठिकाणीं सर्व भूतें पाहतो. ३) आत्मज्ञानी सर्व भूतांचे ठिकाणीं स्वतःचा आत्मा पाहतो. आमची सर्व भूतांशीं एकता आहे, ती पहिल्या अनुभूतीवर आधारलेली आहे; आम्ही भिन्न व्यक्ति असून, अभिन्न-एक विश्वात्मा आहोंत, ही गोष्ट दुसऱ्या अनुभूतीवर आधारलेली आहे; आम्ही विश्वरूप असून, आम्हांला व्यक्तित्व आहे, ही गोष्ट तिसऱ्या अनुभूतीवर आधारलेली आहे. आमची मानसिक जाणीव अपूर्ण व सदोष आहे; कोणतीहि गोष्ट नीट आकलन होण्यासाठीं तिला एकांगीपणानें त्या गोष्टीवर, तिच्या भिन्नतेवर, अलगपणावर एकाग्रतेनें जोर द्यावा लागतो. अशी वस्तुस्थिति असल्यानें, आत्मविषयक ज्ञानाच्या, वर सांगितलेल्या तीन बाजू मनाला एकतेनें आकलन करतां येत नाहींत; तें एक बाजू सत्य मानून बाकीच्या असत्य मानतें; सत्याला बहिष्कार घालणारें त्याचें हें अपूर्ण दर्शन महान् सत्याच्या क्षेत्रांत मानवी प्रमादाला नेहमींच जागा करून देतें; सर्वसमावेशक एकतेच्या क्षेत्रांत अन्योन्यविरोधाला, अन्योन्यनिषेधाला नेहमींच डोक्यावर घेतें--अशी आमची

 

पान क्र. २९०

 

मानसिक क्षेत्रांतील शोचनीय अवस्था असली, तरी जो आत्मा अतिमानसिक जाणिवेचा आहे, दिव्यतासंपन्न आहे, त्याचें क्षेत्र त्याच्या स्वभावधर्मानेंच सर्वसमावेशक एकतेचें, अनंत समग्रतेचें क्षेत्र असल्यानें, वर आत्मविषयक जाणिवेच्या ज्या तीन बाजू सांगितल्या, त्या तीन बाजू एकाच आत्मज्ञानाच्या बाजू आहेत, हें तो दिव्य आत्मा ओळखतो; त्याच्या दृष्टीनें आत्मा सर्व भूतें आहे, आत्म्यांत सर्व भूतें आहेत, आत्मा सर्व भूतांचें पोटीं आहे, या तीन अनुभूती वेगवेगळ्‌या नसून एकाच महान् अनुभूतीचीं तीं तीन अंगें आहेत; तीन अंगांची ती एकच महान् अनुभूति आहे. प्रत्येकाची सर्व भूतांशीं एकता, प्रत्येकाची सर्वता, प्रत्येकाची व्यक्तिता या तीन स्वतंत्र अनुभूती नसून, एकाच अनुभूतीचीं तीन अंगें आहेत, हें दिव्य आत्मा अनुभवतो आणि या अनुभवानुसार त्याचें वागणें असतें.

या अतिमानसिक आत्म्यानें दिव्य व्यक्तीच्या व्यक्तित्वाची, व्यक्तित्वाच्या जाणिवेची बैठक घेतली, इतर व्यक्तीशीं वेगळेपणाचा संबंध लक्षांत घेऊन वागण्याचें या अतिमानसिक व्यक्तीनें ठरविलें, तरी तिच्या जाणिवेच्या पायांत ही महान् जाणीव अटळ आणि अढळ असेल : सर्व कांहीं मूळ पूर्ण एकतेच्या पोटीं उदयास आलें आहे, येत आहे; तसेंच या मूळ घनीभूत एकतेची प्रवाही आवृत्ति जी विस्तारमय एकता, तीहि या अतिमानसिक व्यक्तीच्या जाणिवेच्या पाठीमागें उभी असणार--आणि या दोन्ही एकता या व्यक्तीला केव्हांहि अनुभवतां येतील; व्यक्तित्वाच्या जाणिवेंतून उठून, केव्हांहि परत मूळ एकतेच्या किंवा विस्तारमय एकतेच्या जाणिवेंत या व्यक्तीला स्थान घेतां येईल आणि तेथून आपल्या व्यक्तित्वाकडे बारकाईनें पाहता येईल. या सर्व अवस्था देवता अनुभवतात, असें वेदांत दाखविलें आहे. तत्त्वदृष्टीनें सर्व देव एकच अस्तित्व आहेत; या एकच अस्तित्वाला ऋषी भिन्न नांवें देतात आणि ही भिन्न नांवें म्हणजेच देव होत. या देवांचें कर्म पाहिलें, तर महान् सत्य आणि ऋत यापासून तें उगम पावतें; या दोन तत्त्वांवर तें आधारलेलें असतें. या गोष्टीवर लक्ष ठेवून अग्नि किंवा इतर कोणतीहि देवता सर्वदेवतारूप आहे असें म्हटलें जातें; कोणतीहि एक देवता सर्व इतर देवता झाली आहे असें म्हटलें जातें; तसेंच कोणतीहि देवता सर्व देवतांना स्वतःमध्यें समाविष्ट करून आहे, रथचक्राच्या नाभीमध्यें चक्राचे आरे असतात, त्याप्रमाणें सर्व देवता प्रत्येक देवतेशीं संलग्न आहेत, असेंहि म्हटलें जातें. प्रत्येक देवता

 

पान क्र. २९१

 

मूळ एकतत्त्व, देवदेव आहे असेंहि वर्णन येतें. तथापि अग्नि स्वतंत्र देवता आहे, इतर सर्व देवतांना त्याची मदत होते, त्यांच्याहून अग्नीत सामर्थ्य अधिक आहे, ज्ञान अधिक आहे, तरीहि विश्व-व्यवस्थेंत अग्नीला इतर देवतांच्या खालचें स्थान आहे. त्याला इतर देवतांचा दूत, 'होता', कर्मकर्ता म्हणून काम देण्यांत येतें असेंहि वर्णन येतें. विश्वाचा जनक अग्नि आहे, विश्वाचा तो पिता आहे, तरी आमच्या क्रियांमधून तो जन्मास येतो, असें वर्णन येतें. तो जसा मूळ दिव्य आंतरात्मा आहे, तसेंच, व्यक्त झालेला दिव्य आंतरात्मा हेंहि त्याचें स्वरूप आहे, सर्व व्यक्त वस्तूंच्या अंतर्यामीं वास करणारें मूळ एकतत्त्व हेंहि अग्नीचें स्वरूप आहे, असा वेदांतील अग्नीच्या वर्णनाचा अभिप्राय आहे. अग्नीच्या वर्णनाप्रमाणेंच इतर देवतांचेंहि वर्णन वेदांत आढळतें. याचा इत्यर्थ हा कीं, एकता, सर्वता व व्यक्तिता या तीनहि अवस्था देव एकाच वेळीं अनुभवतात.

दिव्य आत्मा हा या देवांसारखा सर्वसमावेशक आत्म-जाणिवेनें युक्त असतो. त्याचा मूळ ईश्वर किंवा त्याचा परम आत्मा आणि दुसऱ्या रूपांतील त्याचे दुसरे आत्मे यांच्याशीं दिव्य आत्म्याचे संबंध त्याच्या सर्वसमावेशक आत्म-ज्ञानानेच निश्चित होतात. अस्तित्व, जाणीव आणि ज्ञान, संकल्प आणि शक्ति, प्रेम आणि आनंद एतद्विषयक हे दिव्य आत्म्याचे संबंध असतात. हे संबंध इतके भिन्न भिन्न असूं शकतात कीं त्यांची गणती करतां येत नाहीं. कोणत्याहि भेदांत एकतेचें भान अढळ राखणारा, आत्म्याआत्म्याचा कोणताहि संबंध या अगणित भिन्न संबंधांत अंतर्भूत होऊं शकेल. उदाहरणार्थ, दिव्य आत्म्याचे आनंदविषयक संबंध घ्या. दिव्य आत्म्याला स्वतःचे ठिकाणी जो अनेक प्रकारचा अनुभव येतो, त्या सर्व अनुभवांचा आनंद तो भोगतो; त्याचीं इतरांशीं जीं नातीं असतात, त्यामुळें त्याला मिळणारा सर्व प्रकारचा अनुभव त्याला आनंद देत असतो; हे इतर रूपांतील इतर आत्मे, विश्वांतील खेळांत विविधता येण्यासाठीं असतात; या इतर आत्म्यांशीं होणारें दिव्य आत्म्याचे हितगुज हें अर्थातच त्याला सर्व प्रकारें आनंददायक असतें; शिवाय या इतर आत्म्यांचे अनुभवहि स्वत:च्या अनुभवाप्रमाणेच दिव्य आत्म्याला आनंद देतात--आणि वस्तुत: हे इतर आत्मे कांहीं वेगळे नाहींत; दिव्य आत्म्याचे ते खरोखरीच अविभाज्य अंगरूप आहेत; आणि म्हणून त्यांचे अनुभव आणि त्यांचा आनंद तो दिव्य आत्म्याचा स्वतःचाच अनुभव आणि आनंद आहे. हा विविध

 

पान क्र. २९२

 

आनंदभोग दिव्य आत्म्याला प्राप्त होऊं शकतो याचें कारण, त्याला मूळ एकतत्त्वाची शाश्वत स्मृति व अनुभूति असते; तें जें एकतत्त्व, तो जो परम आत्मा, दिव्य आत्म्याचा आत्मा, तो सर्व आत्म्यांत वेगळा वेगळा वसति करीत असल्यानें भेदयुक्त दिसला, तरी हे सर्व आत्मे त्या एकतत्त्वाच्या पोटांत असल्यानें, सर्व प्रकारचे हे दर्शनी भेद अभेदाच्या पोटांतच असतात; दिव्य आत्म्याचे स्वतःचे अनुभव, त्याचीं इतरांशीं असलेलीं नातीं, इतरांचे अनुभव, त्या सर्वांची त्याच्या स्वतःशीं असलेलीं नातीं, या सर्व गोष्टी या मूळ एकतत्त्वाचा, स्वतःच्या आत्म्याचा विविध आनंद आहे, त्याची आनंदलीला आहे अशी अनुभूति व कायम स्मृति दिव्य आत्म्याला असते. ही त्याची शाश्वत जाणीव त्याला विविध संबंधांतील विविध आनंद भोगण्यास समर्थ करते. दिव्य आत्म्याचा जो जो अनुभव असतो, त्या त्या अनुभवाचा पायाभूत व प्राणभूत आधार ही एकता, ही एकतत्त्वानुभूतिच असते. या एकतेच्या अनुभूतीच्या पोटांत त्याचे सर्व अनुभव सामावलेले असतात, म्हणून तो सर्वदा आनंदमय असतो; आमच्या विभक्त त्रुटित जाणिवेनें निर्माण केलेले आनंद-विघातक विसंवाद व संघर्ष त्याला स्पर्श करीत नाहींत; तो या विसंवादांच्या पलीकडे असतो; विभक्ततेचा झेंडा मिरविणारा 'मी' व अज्ञान यामुळें आमच्या जाणिवेचे तुकडे पडतात. जाणिवेची एकता नष्ट करणारा अज्ञानाचा व 'मी' चा धक्का दिव्य आत्म्याला लागलेला नसतो, म्हणून दिव्य आत्म्याचे इतर आत्म्यांशीं असलेले विविध संबंध एकमेकांना उपकारक व पूरक असेच असतात. हे सर्व आत्मे बुद्धिपुरस्सर एकमेकांचे हित पाहतात. सर्व काळ चालणाऱ्या सुरेल संगीताचे एकमेकांत मिळून जाणारे भिन्न भिन्न अनंत अन्योन्यपूरक स्वर हीच उपमा या दिव्य आत्म्यांच्या परस्परसंबंधांना बरोबर लागूं पडते; हे संबंध नित्य आनंदपूर्ण असतात.

जी गोष्ट दिव्य आत्म्याच्या आनंदविषयक संबंधांची, तीच गोष्ट इतर संबंधांची--त्याचें अस्तित्व, ज्ञान व इच्छा आणि इतरांचें अस्तित्व, ज्ञान व इच्छा यांच्या परस्परसंबंधांना वरील सुसंवादाचा नियम लागूं आहे. कारण त्याचा अनुभव आणि त्याचा आनंद हा सर्व, त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवयुक्त आनंदमय शक्तीचा खेळ असतो; या खेळांत एकतेचें सत्य अविरतपणें पाळलें जातें आणि म्हणून ज्ञान आणि इच्छा यांमध्यें संघर्ष किंवा आनंदाचा ज्ञानाशीं वा इच्छेशीं संघर्ष अशी गोष्ट केव्हांहि शक्य नसते; तसेंच एका आत्म्याचें ज्ञान, इच्छा व आनंद दुसऱ्याच्या ज्ञानाशीं,

 

पान क्र. २९३

 

इच्छेशी व आनंदाशीं विसंवादी असत नाहींत, कारण त्या सर्वाना आपण एकाचे अंश आहोंत ही जाणीव सतत असते; आमच्या जीवनांत व अस्तित्वांत भाग पडलेले असल्यानें व ऐक्यभंग झालेला असल्यानें, विसंवाद, संघर्ष, आणि विरोध हे प्रकार आमच्या परस्परांच्या ज्ञान, इच्छा व आनंद यांच्या एकत्र येण्यानें निर्माण होतात; अतिमानसिक क्षेत्रांत स्थिति वेगळी असते; या भिन्न गोष्टींचें एकत्र येणें म्हणजे, एका असीम संगीताच्या भिन्न भिन्न स्वरांचें एकत्र येणें, एकमेकांत मिळणें, एकमेकांना पूरक होऊन जीवन-संगीताची गोडी वाढविणें, असा प्रकार तेथें असतो.

दिव्य आत्म्याचीं अंगें परस्पर सुसंवादी असतील आणि त्याचीं इतर आत्म्यांशीं असलेलीं सर्व नातीं सुसंवादमय असतील या गोष्टी आपण पाहिल्या. आतां, त्याचें ईश्वराशीं, त्याच्या परम आत्म्याशीं जें नातें असतें, त्याचा विचार करावयाचा. सर्वरूप आणि सर्वातीत दिव्य तत्त्वाशीं दिव्य आत्म्याच्या अस्तित्वाचें नातें पूर्ण एकतेचें असतें आणि त्याची अनुभूति त्याला निरंतर असते. त्याच्या व्यक्तिगत जीवनांत त्याचें ईश्वराशीं असलेलें वैयक्तिक एकतेचें नातें त्याला आनंद देतें; सर्व इतर आत्मे त्याचेच अंगभूत आहेत, ही अनुभूति त्याला असल्यानें, ईश्वराचें त्या आत्म्यांशीं असलेलें एकतेचें नातें, हेंहि दिव्य आत्म्याला वैयक्तिक एकतेच्या नात्याप्रमाणें आनंद देतें; सर्वता ही व्यक्तितेप्रमाणेंच दिव्य आत्म्याची नित्य अनुभूति असते आणि सर्वतेच्या पोटांत सर्वच आत्मे असतात--तेव्हां या सर्वांचें ईश्वराशीं असलेलें आनंदपूर्ण एकतेचें नातें, दिव्य आत्म्याला स्वतःच्या व्यक्तरूपाशीं असलेल्या एकतेच्या नात्याइतकेंच जवळचें असतें ही गोष्ट उघड आहे, दिव्य आत्म्याचें ईश्वराशीं जें वैयक्तिक आणि सार्वत्रिक एकतेचें नातें असतें, त्या नात्यांतील ज्ञानविषयक संबंध घेतले, तर या संबंधांत ईश्वराच्या सर्वज्ञतेचा खेळ त्याच्या अनुभवास येतो, ही गोष्ट स्पष्ट आहे; कारण ईश्वर ज्ञानरूप आहे. आपल्या मानसिक भूमीवर आपल्याला जें अज्ञान म्हणून अनुभवास येतें, तें अतिमानसिक भूमीवर वेगळ्या प्रकारें अनुभवास येतें; कांहीं ज्ञान अक्रिय शांत जाणिवेच्या रूपांत मागें ठेवणें व कांहीं सक्रिय करून विशिष्ट क्रियाशील आत्मजाणीवयुक्त व ज्ञानयुक्त रूपें आकारास आणणें, असा ईश्वरी ज्ञानाचा खेळ तेथें चाललेला दिसतो; कांहीं आत्मरूपें सक्रिय ज्ञानशील व्हावींत म्हणून कांहीं ज्ञान अक्रिय शांत जाणिवेच्या रूपांत अव्यक्त ठेवण्याचा खेळ सर्वज्ञ ईश्वर खेळत असतो. जें ज्ञान अव्यक्त ठेवलें जातें, तें आपल्याला मानसिक

 

पान क्र. २९४

 

भूमीवर अज्ञान म्हणून प्रत्ययास येतें. जी गोष्ट ईश्वरी ज्ञानाची, तीच त्याच्या इच्छाशक्तीची, आनंदाची व विभूतियोगाची (Becoming) असते. दिव्य आत्म्याचे अतिमानसिक क्षेत्रांतील इच्छाशक्तिविषयक संबंध पाहतां, या संबंधांत ईश्वराच्या सर्वसमर्थतेचा खेळ अनुभवास येतो; कारण ईश्वर अनिरुद्ध संकल्पशक्तिरूप, सामर्थ्यरूप आहे. आम्हांला येथें जी असमर्थता व जो दुबळेपणा म्हणून दिसतो तो म्हणजे तेथें, कांहीं संकल्पसामर्थ्य शान्त आत्मकेन्द्रित अवस्थेंत मागें ठेवून विशिष्ट शक्तिरूपांना व्यक्त स्वरूपांत पुढें करण्याचा खेळ असतो. प्रेम व आनंद यांच्या संबंधांतील दिव्य आत्म्याचा अनुभव पाहतां, येथें ईश्वरी आनंदातिशयाचा खेळ आपल्या प्रत्ययास येतो--कारण ईश्वर प्रेमरूप, आनंदरूप आहे; आम्हांला येथें ज्या ठिकाणीं प्रेमाचा आणि आनंदाचा अभाव दिसतो, त्या ठिकाणीं अतिमानसिक भूमीवर अशी वस्तुस्थिति असते कीं, ईश्वरी आनंदाच्या सागरांत, कांहीं आनंद अव्यक्त शांत स्थितींत मागें ठेवून, विशिष्ट ईश्वरी मीलनाचीं व आनंदाचीं रूपें, सागरांतील उसळणाऱ्या लाटांप्रमाणें, व्यक्त करून पुढें आणलीं जात असतात. दिव्य आत्मा जीं नाना रूपें धारण करतो त्यांत, वरील प्रेम, आनंद व संकल्पशक्ति इत्यादींच्या क्रियांची प्रतिक्रिया म्हणून ईश्वरी मूळ स्वरूपाचें, नाना विभूतींत रूपांतर होत असलेलें आपल्या प्रत्ययास येईल; या विभूति-योगाच्या क्रियासंभारांत आपल्याला येथें ज्या समाप्ति, मरण, विनाश अशा अवस्था दिसतात, त्या तेथें अतिमानसिक भूमीवर विसांवा, संक्रमण, निर्मितिशील आनंदमय मायेची तात्पुरती निवृत्ति, अशा सत्य स्वरूपांत प्रतीत होतात. सच्चिदानन्द शाश्वत अस्तित्वरूप असल्यानें मरणादि अवस्था तेथें असूंच शकत नाहींत. सर्वातीत सर्वरूप देवदेवाशीं असलेलें एकतेचें नातें दिव्य आत्म्याला कोणते अनुभव आणून देतें हें आपण येथवर पाहिलें. यांत आतां एवढीच भर घालावयाची आहे कीं, हें जें एकतेचें नातें दिव्य आत्मा अनुभवतो, त्यामुळें भेदाच्या नात्यांतील आनंदाला तो मुकतो असें होत नाहीं; दिव्य आत्मा ईश्वराशीं जसा एकरूप असतो, तसा त्याच्याशीं दिव्य व्यक्ति म्हणून भेद ठेवून, मूळ एकतेचा आनंद वेगळ्या स्वरूपांत लुटण्याला तो मोकळा असतो; ईश्वराचा प्रेमळ भक्त हा ईश्वराच्या आलिंगनांत सर्वश्रेष्ठ व सर्वज्येष्ठ आनंद अनुभवतो. या ईश्वरी आनंदपूर्ण मीलनाचे अनेक सौंदर्यपूर्ण प्रकार दिव्य आत्म्याला अनुभवतां येतात. ईश्वराशीं त्याची असलेली तात्त्विक एकता या आनंदमय द्वैताच्या आड येत नाहीं.

 

पान क्र. २९५

 

दिव्य आत्म्याच्या जीवनाचा स्वभावधर्म काय असतो तो आतांपर्यंत परोपरीनें वर्णन केला. हा स्वभावधर्म वास्तवांत कशा प्रकारें येत असेल? वास्तवांतील दिव्य-जीवनाची परिस्थिति कशी असेल? वास्तवांतील दिव्य-जीवन कोणत्या गोष्टींनीं युक्त असेल? या प्रश्नांचा आतां विचार करणें आहे. अस्तित्वाच्या शक्ती अव्यक्तांतून कांहीं आकार घेऊन व्यक्त होतात आणि या साकार शक्तींच्या द्वारां आम्हांला कोणत्याहि नात्यांत अनुभव मिळत असतो. शक्तींना आकार देणारी जी साधनसामग्री असते, तिला पदार्थांचे गुणधर्म, विशेष धर्म, क्रिया, सामर्थ्यें अशा नांवांनीं आपण ओळखतो. उदाहरणार्थ मन. मानसिक शक्ति साकार होऊन मानसिक जीवन व्यक्त होतें; निर्णय, निरीक्षण, स्मृति, सहानुभूति या मनाच्या स्वाभाविक शक्ती आहेत, त्या साकार झाल्यानें मानसिक जीवन बनतें. याप्रमाणेंच सत्य-जाणिवेचें अतिमानसिक जीवन हें अतिमानसाच्या स्वाभाविक शक्ती साकार होऊन बनत असणार; अतिमानसिक क्षेत्रांत एका आत्म्याचें दुसऱ्या आत्म्याशी जें नातें असेल, तें नातें व्यवहारान्वित करतांना, अतिमानसाला स्वाभाविक असणाऱ्या कांहीं शक्ती, सामर्थ्यें व व्यापार अतिमानसानें वास्तवांत आणले पाहिजेत; असें न होईल तर व्यवहारांत भेद म्हणून कांहीं दिसणारच नाहीं आणि म्हणून 'अतिमानसिक जीवन' या कल्पनेला अर्थहि राहणार नाहीं. अतिमानसिक जीवन कोणत्या अतिमानसिक व्यापारांचें व क्रियांचें असतें, तें दिव्य जीवनाच्या मानसिक पूर्वपरिस्थितीचा विचार करतांना पाहतां येईल; सध्यां  आपण त्या जीवनाचा तात्विक पाया पाहत आहोंत; त्याचा मूलभूत स्वभावधर्म आणि तत्त्वसंभार पाहत आहोंत. म्हणून सध्यां एवढें लक्षांत ठेवणें पुरेसें आहे कीं, भेद करणारें 'मी-मी पण' नसणें किंवा असेल तर तें नाहींसें करणें, जाणिवेचे स्पष्ट विभाग पडून तिची एकता नष्ट झालेली नसणें किंवा झालेली असल्यास ती रद्द करून जाणिवेची एकता पुन: स्थापित करणें-- ही एकच गोष्ट दिव्य जीवनाची अगदीं आवश्यक अशी पूर्वपरिस्थिति आहे. आमच्यामध्यें 'मी' आहे, एकता भंगलेली जाणीव आमच्यामध्यें आहे. ईश्वरी दिव्य जीवनाला मुकून आम्ही जें अध:पतित जीवन जगत आहों, त्या पतित व मृत्युव्याप्त जीवनाचा पाया या भेदक 'मी' नें व भंगलेल्या जाणिवेनें भरला आहे. आमचा 'मी', आमची भंगलेली जाणीव म्हणजेच आमची मर्त्यता आणि पतितता आहे. मनुष्याचें 'मूळ पातक' (Original Sin) त्याच्या दु:ख-

 

पान क्र. २९६

 

मय जीवनाचें कारण आहे असें कांहीं धर्मांत विधान आहे तें ''मूळ पातक'' म्हणजे आमच्या दृष्टीनें त्याची भग्न जाणीव आणि 'मी-मी पण' हें आहे. तत्त्वज्ञानाला शोभेल अशा भाषेंत बोलावयाचें, तर असें म्हणतां येईल कीं, आत्म्याच्या मूळ चैतन्याच्या सत्यापासून, ऋतापासून च्युत होणें, त्याची एकता, समग्रता व सुसंवादपूर्णता टाकून भलता वेगळा मार्ग धरणें, ही गोष्ट अज्ञानक्षेत्रांत, अज्ञानसागरांत मोठी उडी किंवा बुडी घेण्याची पूर्व तयारी म्हणून अवश्य होती. ''मूळ पातक'' करून म्हणा, चैतन्याचें सत्य सोडून देऊन म्हणा, घेतलेली उडी किंवा बुडी ही आत्म्याची साहसी, धाडसी क्रिया होती; आणि विश्वाच्या क्षेत्रांत धाडसाच्या हौसेनें आत्म्यानें घेतलेल्या या उडीमुळेंच ही दुःख भोगणारी आणि उच्च आकांक्षा धरणारी मानवता, मानवजाती, विश्वांत उदयास आली.

 

पान क्र. २९७

 

प्रकरण अठरावें

 

मानस आणि अतिमानस

 

मन हें ब्रह्म आहे, असा शोध त्याला लागला.

- तैत्तिरीय उपनिषद् ३, ४

 

तें ब्रह्म अविभक्त असून भूतांमध्यें विभक्तपणें असल्यासारखें आहे.

- गीता १३, १६

 

अतिमानसिक जीवनाचें सार काय आहे तें पाहण्याचा, त्याची कल्पना बांधण्याचा प्रयत्न आपण येथवर केला. सच्चिदानंदाच्या अस्तित्वाच्या पोटांत हें दिव्य-जीवन दिव्य आत्म्याला निर्वेधपणें लाभतें, मानवी आत्म्याला हें दिव्य-जीवन आपल्या राहणींत व्यक्त करावयाचें आहे, सच्चिदानंदानें येथें जो मानसिक आणि शारीरिक जीवनाचा सांचा अंगीकारला आहे, त्या सच्चिदानंदाच्या ऐहिक जीवनरूपी देहांत मानवी आत्म्याला दिव्य आत्म्याचें दिव्य-जीवन जगावयाचें आहे; ही त्याची आकांक्षा आहे, पण आपण जें जीवन वास्तवांत जगत आहों, पाहत आहों त्याच्याशीं आपल्याला माहीत झालेलें अतिमानसिक जीवन कोणत्याहि प्रकारें संबंध राखतांना दिसत नाहीं; तें त्याच्याशीं जुळणारें दिसत नाहीं; मन आणि शरीर या दोन क्षेत्रांत आमच्या मामुली जीवनाचें गतागत चाललेलें असतें; या जीवनाचें दिव्य-जीवनाशीं कांहींच नातें दिसत नाहीं. दिव्य-जीवन हें अशरीर आत्म्याचें जीवन असावें असें दिसतें; जेथें स्थूल भौतिक शरीर आत्म्यानें धारण केलेलें नाहीं, जेथें स्थूल भौतिक रूपें नाहींतच अशा विश्वांत अशरीर आत्मे अस्तित्वाची, जाणिवेची, सक्रिय संबंधांची अन्योन्यांना आनन्द देण्याघेण्याची जी स्थिति मिळवूं शकतात व भोगूं शकतात ती स्थिति म्हणजे दिव्य-जीवन असावें असें दिसतें; या शरीरशून्य विश्वामध्यें आत्म्या-आत्म्यांत भेद निर्माण झाला आहे पण या भिन्न आत्म्यांना भिन्न शरीरें मिळालेलीं नाहींत; आनंदमय, क्रियाशील मर्यादांनीं न बांधलेलें

 

पान क्र. २९८

 

अनन्त व्यापकतेचे आत्मे या विश्वांत असतात; येथें रूपांत वा आकारांत कोंडलेले आत्मे नसतात--दिव्य-जीवन जेथें जगलें जातें, त्या विश्वाचें असें वर्णन करतां येईल. तेव्हां असा संशय घेणें वाजवी आहे कीं, शारीर आकारांत कोंडलेले मन, आकारांत बांधलेल्या शक्ती, यांच्या मर्यादांत चाललेलें जें जीवन आपल्या परिचयाचें आहे, त्या जीवनाहून वेगळें दिव्य-जीवन या मर्यादांच्या बंधनांत राहून जगणें कसें शक्य आहे?

परमश्रेष्ठ अनन्त सद्‌रूप जाणीवशक्ति व आत्मानंद हेंच जगाचें आदिकारण आहे, आमचें मन हें या सच्चिदानंदाचें विकृत रूप आहे-- अशा या सच्चिदानंदाची कल्पना कांहींशी स्पष्ट करण्याचा येथवर आम्हीं प्रयत्न केला आहे. या सर्वातीत सर्वरूप अस्तित्व-भोक्त्यानें आपल्या आनंदमय अस्तित्वाचें व्यक्तरूप असलेल्या सुव्यवस्थित व सुनियंत्रित विश्वाची, कल्पनेंत व वास्तवांत रचना करून, आपल्या जाणीवमय शक्तीच्या प्रभावानें त्याचें शासन चालविलें आहे--सच्चिदानंदाच्या जाणीवमय शक्तीनें हा सर्व कारभार आपल्या दिव्य मायेच्या द्वारां, अर्थात् सत्य-ज्ञान अथवा सत्य-कल्पना यांच्या द्वारां सुरू केला व चालविला आहे; या दिव्य मायेसंबंधानें आपण कांहीं कल्पना मिळविली आहे. परंतु अनंत परात्पर अस्तित्व, ज्ञानमय शक्ति, स्वानंद आणि दिव्य माया (सत्य-ज्ञान किंवा सत्य-कल्पना) या चार दिव्य व महान् गोष्टींचा, आपल्या परिचयाच्या मन-प्राण-शरीर या तीन गोष्टींशीं काय संबंध आहे त्याचा विचार आपण अद्यापि केलेला नाहीं. मन-प्राण-शरीर ही दर्शनी अदिव्य माया आहे; हिच्यामुळें आपण धडपड, तडफड करतो व नाना प्रकारच्या आपत्ती व दुःखें भोगतो; ही अदिव्य माया दिव्य मायेंतून कशी उद्‌भवली, दिव्य सत्यांतून हिचा विकास कसा झाला, या गोष्टीची चिकित्सा आपण अद्यापि केलेली नाहीं. ही चिकित्सा आपण करूं. मूळ चार दिव्य गोष्टींचा, विशेषत: दिव्य मायेचा, आमच्या परिचयाच्या तीन दर्शनी अदिव्य गोष्टींशीं ज्या धाग्यानीं किंवा रज्जूंनीं संबंध घडतो, ते धागे किंवा रज्जू आपण जेव्हां शोधून काढूं किंवा तयार करूं, तेव्हांच आमच्या या विश्वाचें स्पष्टीकरण आम्हांला मिळाल्यासारखें होईल. हें स्पष्टीकरण जोपर्यंत मिळत नाहीं, तोंपर्यंत हें आमचें अदिव्य अधोवर्ती जीवन, त्या उच्च दिव्य जीवनाशीं एकरूप होऊन जाईल कीं नाहीं, एकरूप होऊन जाणें शक्य आहे कीं नाहीं, असा संशय घेण्याला जागा राहील. ही गोष्ट आम्ही

 

पान क्र. २९९

 

जाणतों कीं, आमचें जग सच्चिदानंदांतून आलें आहे, सच्चिदानंदाच्या पोटांतच त्याचें अस्तित्व आहे, त्याचें जीवन आहे; भोक्ता आणि ज्ञाता, स्वामी आणि आत्मा म्हणून या विश्वाच्या पोटीं सच्चिदानंद परमात्मा राहतो अशी आमची साधार कल्पना आहे; त्याचा जो आनंद, जें ज्ञानमय सामर्थ्य, जें दिव्य अस्तित्व, त्यांतूनच आमची द्वंद्वमय संवेदना, आमचें द्वंद्वमय मन, आमची द्वंद्वमय शक्ति त्यांची छाया म्हणून निघाली असली पाहिजे, हें आम्हांला कळतें. परंतु आमच्या जीवनांतील ही छायारूप त्रयी आणि सच्चिदानंद परमात्मा यांच्यांत इतका विरोध आहे व तो परमात्मा इतका वर आणि आम्हीं इतकें खालीं आहों कीं, जोंपर्यंत आम्ही आमच्या अस्तित्वाच्या तीन प्रकारांत कोंडलें गेलों आहोंत, तोपर्यंत आम्हांला दिव्य-जीवन प्राप्त होणें अशक्य आहे असेंच दिसतें. खालच्या प्रतीचें असलेलें आमचें जीवन उदात्त करून, आम्ही दिव्य-जीवनाच्या दर्जाला नेलें पाहिजे, किंवा शरीर टाकून शुद्ध अस्तित्वाचा, प्राणमय जीवन टाकून ज्ञानमय शक्तीच्या शुद्ध अवस्थेचा, संवेदना आणि मन टाकून शुद्ध आनंद आणि शुद्ध ज्ञान यांचा अंगीकार आम्हीं केला पाहिजे. आध्यात्मिक सद्‌वस्तूचें सत्य, वास्तव दिव्य-जीवन अशाच त्यागानें व अंगीकारानें आम्हांला लाभूं शकेल. पण हा दुसरा पर्याय स्वीकारावयाचा म्हणजे याचा अर्थ, आत्म्याची शुद्ध स्थिति किंवा वस्तुजाताचें सत्य व्यक्त करणारें, दिव्य ईश्वरी अस्तित्व, आनंद व शक्ति जेथें आहे असें विश्व किंवा विश्वें यांचा स्वीकार करून, पार्थिव, मर्यादित, मानसिक जीवन सर्वस्वीं टाकून द्यावयाचें असा होतो. हा दुसरा पर्याय स्वीकारावा लागत असेल, तर मानवाची पूर्णता मानवरूपांत होऊं शकत नाहीं असें मान्य केलें पाहिजे; किंवा मानवाचा जो पृथ्वीवर विकास झाला आहे, त्याचा कळस म्हणजे मानवाची मनःशक्ति विलय पावत पावत एका सूक्ष्म बिंदूत सामावणें व या बिंदूंतून उडी घेऊन निराकार अस्तित्वांत मानवानें स्थान घेणें हा आहे किंवा सशरीर मनाच्या आवांक्याबाहेर असलेल्या जगांत, त्या सूक्ष्म मनोबिंदूंतून मानवानें उडी घेणें यांत त्याच्या पार्थिव विकासाचा कळस आहे, या दोन पक्षांपैकीं एक पक्ष आम्हांला मान्य करणें भाग आहे.

परंतु सूक्ष्म विचार केल्यास दुसरा पर्याय आवश्यक आहे असें दिसत नाहीं. पहिला पर्याय म्हणजे आमचें खालच्या दर्जाचें जीवन वरच्या दर्जाचें म्हणजेच दिव्य करणें हें शक्य दिसतें. जीं चार दिव्य तत्त्वें (सत्,

 

पान क्र. ३००

 

चित्, आनंद आणि दिव्य माया) सर्व गोष्टींचें मूळ आहेत, त्यांच्या क्रियेंतूनच आम्हीं अदिव्य माया समजत असलेली मन-प्राण-शरीर ही त्रयी निर्माण झालेली आहे; ही स्थूल, सूक्ष्म रूपांची दुनिया निर्माण करण्यासाठीं जी क्रिया आवश्यक होती, त्या क्रियेंतूनच अदिव्य म्हटली जाणारी मन-प्राण-शरीर ही त्रयी उदयास आली आहे यांत संशय नाहीं. कारण या त्रयीच्या पूर्वीं, दिव्य तत्त्वचतुष्टयाखेरीज दुसरें कांहींच नव्हतें. विश्वासाठीं रूपें म्हणून जीं निर्माण केलीं गेलीं, तीं कांहीं दिव्य सत्-चित्-आनंद किंवा दिव्य सत्य-कल्पना (दिव्य माया) यांच्या क्षेत्राच्या बाहेर निर्माण केलीं गेलीं नाहींत; तर सत्-चित्-आनंदाच्या क्षेत्रांत, तसेंच जें चौथें दिव्य तत्त्व सत्य-कल्पना किंवा दिव्य माया त्याच्या क्षेत्रांत आणि त्याच्या क्रियाशीलतेनें निर्माण केलीं गेलीं. अर्थात् अशी कल्पना करण्याचें कांहींच कारण नाहीं कीं, उच्च दिव्य जाणिवेचा सत्यमय व्यापार, रूपांच्या दुनियेंत (मन-प्राण-शरीरांच्या दुनियेंत) शक्य नाहीं; तसेंच रूपें आणि त्यांचे निकटचे आधार--मानसिक जाणीव, प्राणशक्ति, रूपद्रव्य--हे त्यांजकडून व्यक्त होणारें सर्व कांहीं विकृत स्वरूपांतच व्यक्त करतील किंवा रूपांना आणि त्यांच्या आधारांना कशाचीच अविकृत अभिव्यक्ति करतां येणार नाहीं अशीहि कल्पना करण्याचें कारण नाहीं. उलट असें शक्य दिसतें, नव्हे बरेंच संभवनीय दिसतें कीं, मन-प्राण-शरीर यांना शुद्ध रूपें आहेत आणि या शुद्ध रूपांचें मन-प्राण-शरीर-त्रय दिव्य ईश्वरी सत्याच्या पोटांत आहे; या सत्याच्या दिव्य जाणिवेच्या दुय्यम क्रिया ह्या शुद्ध मन-प्राण-शरीर यांच्याच क्रिया असतात; सर्वश्रेष्ठ दिव्य शक्ति आपलें कार्य करतांना जी साधनसामुग्री वापरते, त्या पूर्ण साधन-सामुग्रीचा एक भाग म्हणजे शुद्ध मन-प्राण-शरीर ही त्रयी असते. तेव्हां, आपलें मन-प्राण-शरीर दिव्य होण्याची शक्यता भरपूर आहे, असली पाहिजे; नवें विज्ञान पार्थिव विकासाचें एक चक्र आम्हांला परिचित करून देतें--या चक्रांत म्हणजेच एकाद्या लहानशा कालखंडांत मन-प्राण-शरीर यांचें जें रूप आणि कार्य अनुभवास आलें आहे, तेवढेंच त्यांना शक्य असून, दुसरें कसलेंच रूप आणि कार्य त्यांना शक्य नाहीं, असा आग्रह धरणें चुकीचें होईल; सजीव शरीरांत मन-प्राण-शरीर सध्यां ज्या क्रिया करतात व करूं शकतात, त्याच तेवढ्या त्यांना शक्य आहेत, असें म्हणणें चुकीचें होईल. त्यांची ज्या प्रकारची क्रियाशक्ति अनुभूत आहे, त्यापेक्षां वेगळी उच्च प्रकारची अननुभूत क्रियाशक्ति त्यांजमध्यें असूं

 

पान क्र. ३०१

 

शकतें. ज्या दिव्य ईश्वरी सत्यापासून त्यांची उत्पत्ति झाली आहे, त्या आपल्या उगमाचा कांहींतरी कारणानें या त्रयीला विसर पडला आहे म्हणून त्यांच्या आजच्या अदिव्य क्रिया त्यांजकडून घडतात. ही जाणिवेची विभक्तता, ही सत्याची विस्मृति नाहींशी झाली--मानवतेंत जी दिव्य-शक्ति सुप्त आहे, तिच्या जागृतीनें, तिच्या विस्तारानें, आजची जाणिवेची विभक्तता, सत्य-विस्मृति दूर होणें शक्य आहे--ही गोष्ट वास्तवांत घडून आली आणि सत्यस्मृति व अविभक्त जाणीव परत आली, म्हणजे मन-प्राण-शरीराचें सध्यांचें क्रियास्वरूप बदलेल. विकासाचा उच्च टप्पा, प्रगतीचा उंचावरचा मार्ग मन-प्राण-शरीर चालून जातील आणि या विकासप्रक्रियेनें त्यांचें क्रियास्वरूप शुद्ध होऊन, सत्य-जाणिवेच्या (दिव्य मायेच्या) क्षेत्रांत ही त्रयी जसें काम करतें, तसें काम या पृथ्वीवरहि ती करूं लागेल.

मानवांतील ईश्वरी शक्तीच्या संवर्धनानें त्याची विभक्त जाणीव दूर होऊन, अविभक्त जाणिवेची प्रस्थापना त्याचें ठिकाणीं शक्य झाली, तर मानवी मनांत व शरीरांत दिव्य-जाणीव व्यक्त करून कायम ठेवतां येईल, इतकेंच नाहीं तर ही दिव्य-जाणीव, मन-प्राण-शरीर या तीनहि क्षेत्रांत आपला प्रभाव पाडून या तीनहि अंगांना नवें रूप देऊं शकेल. जें शाश्वत सत्य दिव्य-जाणिवेंत स्वभावत: सांठविलेलें असतें, त्या सत्याची प्रतिमा मन-प्राण-शरीर या त्रयीला अधिक पूर्णतेनें व्यक्त करण्याचें काम दिव्य-जाणीव करूं शकेल; दिव्य जाणिवेच्या प्रांतांत स्वभावतःच असलेलें स्वर्गीय राज्य, केवळ मानवाच्या आत्म्यांतच व्यक्त करून दिव्य-जाणीव राहणार नाहीं, तर त्याच्या मन-प्राण-शरीर रूपानें जें आत्म-अभिव्यक्तीचें द्रव्य तिला उपलब्ध असतें, तें द्रव्यदेखील स्वर्गीय दिव्यतेनें भरण्याचें काम दिव्य-जाणीव करूं शकेल; याप्रमाणें आत्मा आणि आत्मप्रकटनाचें साधनभूत द्रव्य, या दोन्हींचे द्वारां दिव्य-जाणीव या पृथ्वीवर स्वर्गीय राज्याचें अवतरण करूं शकेल. पृथ्वीवर कांहींजणांनीं, किंवा पुष्कळांनीं देखील म्हणतां येईल, आंतरिक विजय मिळविण्याचें व आत्म्याची विशुद्धता व दिव्यता सिद्ध करण्याचें कार्य केलेलें आहे; कोणीं हें कार्य पुष्कळच केलेलें आहे, कोणीं थोडेंफार केलेलें आहे; बाह्य विजय मिळविण्याचें कार्य, मन-प्राण-शरीर यांना दिव्यता आणण्याचें कार्य अद्यापि पार्थिव प्रकृतीच्या अप्रकट जाणिवेंतच बीजरूपानें दडून असलें; तरी तेंहि भविष्यकाळीं व्हावयाचें आहे; मानवी विकासाच्या कार्यांतील ईश्वराचा भावी

 

पान क्र. ३०२

 

मोठा विजय या बाह्य आत्म-साधनरूप मन-प्राण-शरीर या त्रयीच्या दिव्यतासंपन्नतेनें व्हावयाचा आहे, असें मानण्यास भरपूर जागा आहे. आमचें जें पार्थिव जीवन आहे, तें अपरिहार्यपणें सदासर्वदा अर्धवट सुखमय व अर्धवट दुःखमय धडपडींच्या चाकोरींत व्यतीत होत रहावें असें कांहीं नियतीचें ठरलेलें दिसत नाहीं; या जीवनांत ध्येयसिद्धि व्हावी, ईश्वराचें आनंदमय वैभव मानवी जीवनाच्या पूर्णतेच्याद्वारां या पृथ्वीवर प्रकट व्हावें, असा नियतीचा निश्चय असावा असें मानावयास हरकत दिसत नाहीं.

आमच्यापुढें आतां जो प्रश्न आहे, तो म्हणजे ज्या उच्च स्थानावरून मन-प्राण-शरीर ही त्रयी खालीं उतरली, त्या उच्च उगमस्थानीं या त्रयीचें मूळ स्वरूप काय होतें, हा आहे. कारण ईश्वराच्या आविष्कारांत जेव्हां समग्रता व पूर्णता येईल, तेव्हां वरील मूळ स्वरूपच मन-प्राण-शरीर धारण करतील, या पूर्ण आविष्कारांत मन-प्राण-शरीर या त्रयीचा आंतरात्मा सत्य-पूर्ण होईल, सत्यापासून अलग रहाणार नाहीं; आज अलगपणा आणि अज्ञान यांत जसें आम्ही वावरत आहों व मन-प्राण-शरीराचें ठिकाणीं सत्यापासून दूर आहों, तसें पूर्ण आविष्कारांत आम्ही असणार नाहीं. सत्यानें पूर्ण झालेली मन-प्राण-शरीर ही त्रयी म्हणजे मूळ स्वरूपांतील ही त्रयी होय. ही त्रयी तिच्या उच्च उगमस्थानीं पूर्णतासंपन्न आहे; पण आमच्या पार्थिव जीवनांत आम्ही त्या पूर्णतेच्या दिशेनें वाढत आहों, विकसित होत आहों; जड द्रव्याच्या, जड पार्थिव शरीराच्या बंधनांत आमचें मन पहिल्या वहिल्या नियंत्रित हालचाली करून, हळूंहळूं आपला विकास करीत आहे; चैतन्यानें जड आकारांत स्वतःला दडविले, त्या गोष्टीचे परिणाम अद्यापि आम्हांला अडवीत आहेत; पूर्ण प्रकाशानें आपल्या स्वतःच्या छायेंत बुडी घेतली व भौतिक निसर्गांत अंधकारमय द्रव्यगत चेतना निर्माण केली, त्या गोष्टीचे परिणाम अद्यापि आम्हांला आमच्या विकास-प्रवासांत अडथळा आणीत आहेत. अशा रीतीनें मन-प्राण-शरीराची मूळ पूर्णता मिळविण्याच्या मार्गावर आम्ही हळूंहळूं वाटचाल करीत आहोंत. ईश्वरी सत्य-कल्पनेच्या क्षेत्रांत आमची विकासाची परमसीमा, आमच्या भावी पूर्णतेची सर्वोच्च अवस्था अगोदरच वास्तवांत असली पाहिजे. त्या विद्यमान अवस्थेकडे जावयाचें व ती आत्मसात् करावयाची हेंच आमचें काम आहे. दिव्य ईश्वरी ज्ञानाच्या पोटांत अगोदरच जी गोष्ट अस्तित्वांत आहे, ती गोष्ट आमचें मन ध्येय म्हणून ठरवितें व मग तिच्या

 

पान क्र. ३०३

 

पाठीमागें तें लागतें, असा नियम आहे. आमच्या अस्तित्वाच्या परिस्थितींत जें शाश्वत सत्य अद्यापि आम्हीं साकार केलेलें नाहीं, त्याचे नांव ध्येय असें असतें. ध्येय म्हणजे अशी कांहीं गोष्ट नसते कीं, जी अस्तित्वांतच नाहीं, किंवा जी शाश्वत ईश्वरी आत्म्याला सुचलेली नाहीं पण आम्हांलाच फक्त--आम्हांसारख्या अपूर्ण जीवांना--सुचलेली आहे आणि जी आम्हीच फक्त अस्तित्वांत आणणार आहों.

याप्रमाणें ध्येयाच्या पाठीमागें लागणारें मन हें आमच्या मानवी जीवनाच्या शास्त्याचें काम करतें. अर्थात् मन कांहीं सर्वतंत्र, स्वतंत्र शासक नाहीं. त्याला बंधनें आहेत, त्याला विरोधक आहेत. तात्विक दृष्टीनें पाहतां, मन म्हणजे अशी जाणीव कीं, जी अविभाज्य अशा समग्र वस्तूचे भाग पाडते, त्यांना सीमाबद्ध करते, त्यांचे मोजमाप घेते आणि या भागांपैकीं प्रत्येक भाग स्वतंत्र व समग्र वस्तु आहे असें कल्पून त्यांचा संग्रह वा समावेश आपल्या पोटांत करून ठेवते. ज्या गोष्टी उघडपणें कोणत्या तरी वस्तूचे अंश असतात, तुकडे असतात, त्यांच्या संबंधांतहि मन आपल्या व्यवहाराचें हें स्वतंत्रतेचें काल्पनिक तत्त्व अंमलांत आणतें; ते तुकडे म्हणजे स्वतंत्र अलग अलग वस्तू आहेत, कोणत्याहि पूर्णाचे भाग नाहींत, असें कल्पून त्यांच्याशीं व्यवहार करतें. विशिष्ट वस्तू मूळ स्वरूपांत आपल्यासमोर नाहींत असें स्पष्ट माहीत असतां देखील, त्या मूळ स्वरूपांतच आपल्यासमोर आहेत अशी कल्पना मनाला करावी लागते; कारण त्याशिवाय त्या वस्तूंच्या संबंधांत त्याला आपली विशिष्ट क्रियासरणी अंमलांत आणतां येत नाहीं. असमग्राला समग्र समजून, अंशाला पूर्ण समजून व्यवहार करण्याचा मनाचा स्वभावधर्म त्याच्या सर्व क्रियांत व्यक्त होतो व सर्व क्रियांचा पाया असतो; त्याच्या कल्पना, त्याच्या अनुभूती, त्याच्या संवेदना, त्याच्या निर्मितिशील विचार-परंपरा--या सर्व गोष्टी त्याच्या स्वतंत्र वस्तुकल्पनेच्या पायावर आधारलेल्या असतात; मन आपली कल्पनाशक्ति, अनुभवशक्ति, संवेदनाशक्ति कामास लावून जेव्हां कांहीं वस्तू स्वतःसमोर उभ्या करतें, तेव्हां त्या वस्तु कोणत्यातरी सलग एकरूप पार्श्वभूमीचें, समग्र अखंड पदार्थाचे तुकडे आहेत असें समजत नाहीं, तर स्वतःला निर्मितिकरितां किंवा भोगाकरितां मिळालेले स्वतंत्र पदार्थ आहेत असें समजतें आणि या समजुतीप्रमाणें त्यांचा उपयोग करतें. एका अखंड पदार्थाचे तुकडे आपल्यासमोर आहेत, अशी जरी मनाला कल्पना झाली, तरी हे तुकडे कायमचेच पडलेले आहेत, त्यांचा व मूळ वस्तूचा कांहीं संबंध राहिलेला

 

पान क्र. ३०४

 

नाहीं, तें स्वतंत्र वस्तूप्रमाणेंच आहेत अशी मनाची समजूत असते. मनाची दृष्टि अशी असल्यानें, त्याची क्रिया असो वा भोग असो--त्यांचा विषय नेहमींच समग्र वस्तू हा असतो. या समग्र वस्तू ह्या, त्यांजपेक्षां मोठ्या अशा समग्र वस्तूचे अंश असतात, तसेंच भोग्य किंवा क्रिया-विषय असलेल्या दुय्यम समग्र वस्तूंचे तुकडे पाडून, मन त्या तुकड्यांना कांहीं उद्दिष्टांच्या दृष्टीनें समग्र वस्तूंच्याप्रमाणें लेखतें. तेव्हां, वस्तूच्या दुप्पट तिप्पट अशा गुणाकाराच्या क्रियेनें पटी करणें किंवा वस्तूंचे भाग पाडणें, त्यांची बेरीज करणें किंवा त्या दुसऱ्या कांहींतून वजा करणें या गणिती क्रिया हें मन करीत असतें; या क्रियांच्या पलीकडे त्याची धांव जात नाहीं. ही आपली नेहमींची चाकोरी सोडून खऱ्या समग्र वस्तूची कल्पना करण्याच्या भानगडींत मन पडलें, कीं भलत्याच अपरिचित वातावरणांत आल्यासारखें त्याला होतें; काय करावें तें त्याला उमगत नाहीं, आपल्या ओळखीच्या भक्कम पायाच्या जमिनीवरून स्पर्शातीत, इंद्रियातीत वस्तूच्या महासागरांत पडल्यासारखें त्याला होतें; अनन्ताच्या महान् दऱ्यांत लोटून दिल्याप्रमाणें तें किंकर्तव्यमूढ होतें, समोर असलेल्या वस्तूचा अनुभव, कल्पना किंवा संवेदना या भांबावलेल्या मनाला मुळींच होत नाहीं; निर्मितीसाठीं किंवा भोगासाठीं त्याच्या समोरच्या वस्तूचा त्याला मुळींच उपयोग करतां येत नाहीं. अनंताची कल्पना वगैरे मनानें केली, अनन्ताची प्राप्ति करून घेऊन, अनन्ताचा उपभोग मनानें घेतला असें जेव्हां आम्हांला वाटतें, तेव्हां खरोखरी अनन्ताशीं मनाची गांठ झालेली नसते; तसें केवळ दर्शनीं दिसतें इतकेंच. अनन्ताच्या विशिष्ट प्रतिमेची मनाला अनुभूति मिळते व ती खुद्द अनन्ताची अनुभूति आहे असा भास त्याला होतो अशी वस्तुस्थिति असते. अरूप, निराकार, महान् तत्त्वाचा अनुभव मनाला अंधुकपणें येऊं शकतो, पण वास्तव दिक्कालरहित अनन्ताचा अनुभव त्याला येऊं शकत नाहीं. अशा वास्तव अनन्ताचा विचार मन करूं लागलें, कीं त्याचा मर्यादा घालण्याचा, तुकडे पाडण्याचा जो अंगभूत स्वभाव तो आपलें काम करूं लागतो आणि मनापुढें खरें अनन्त उभें राहण्याऐवजीं, त्याच्या लहानमोठ्या प्रतिमा उभ्या राहतात. शब्द आणि आकार यांच्याशींच तें व्यवहार करतांना आढळतें. तेव्हां अनन्त हें, मनाच्या आवाक्यांत येणारी वस्तु नव्हे, अनंतानें आपल्याला पोटांत घ्यावें, अनन्तानें आपल्याला जवळ करावें, अशी भावना मनानें करावी हवी तर; कारण अनन्त हें मनावर आपली पांखर घालूं शकतें, त्याला

 

पान क्र. ३०५

 

जवळ घेऊं शकतें. मनाच्या मर्यादेच्या पलीकडे असलेल्या अस्तित्वाच्या स्तरांतून अनन्ताची सत्य वस्तूची तेजस्वी छाया खालीं येऊं शकते आणि या छायेंत मनाला बालकाप्रमाणें असहाय्य अनन्यगतिक होऊन, आनंदमय आराम करतां येतो. अनन्ताची प्राप्ति व्हावयाची, तर त्याकरितां मनाच्या वरतीं असलेल्या अतिमानसिक भूमिकांवर चढून गेलें पाहिजे. अनन्ताचें ज्ञान व्हावयास हवें असेल, तर मनानें नम्र झालें पाहिजे, सत्यज्ञानमय सद्‌वस्तूकडून जे आदेश व निर्देश खालीं येतात, त्यांना अविचल नम्रतेनें स्वीकारून तदनुसार मनानें वागलें पाहिजे.

याप्रमाणें मनाचें मौलिक सामर्थ्य आणि मौलिक मर्यादा काय आहेत तें आपण पाहिलें; मनासंबंधींचें सत्य हें असें आहे, त्याचा स्वभाव आणि स्वधर्म या सत्यावरून ठरतो. वरिष्ठ मायेच्या पूर्ण साधनसामुग्रींत मनाचें स्थान काय आहे, तें ईश्वरी आदेशानें वरीलप्रमाणें ठरविलें आहे. स्वयंभू सद्‌वस्तूची शाश्वत आत्म-कल्पना मनाला जन्म देते व त्याची जी कामगिरी ठरविते ती वरीलप्रमाणें आहे. थोडक्यांत, अनन्ताचें रूपांतर सान्ताच्या रूपांत करणें, अनन्ताला आपल्या मानदंडानें मोजून मापून, मर्यादा घालून, त्याचे अंश अंश करून सोडणें ही मनाची ईश्वरनियोजित कामगिरी आहे; आपल्या जाणिवेंत ही कामगिरी मन करतें आणि ती करतांना, अनन्ताची वास्तव संवेदना पार नाहींशी करून टाकतें. महान अज्ञान (Great Ignorance) म्हणून जो भाग विश्वरचनेंत असतो, त्याचें मूळ याप्रमाणें मनांत आहे. विभागणीचें, वांटणीचें काम मूलत: मनाचें असल्यानें, अशा मनापासूनच अज्ञानक्षेत्राला सुरुवात होते--विश्वाचें मूळ मन आहे, ईश्वरी माया सर्व मनच आहे असाहि कांहींजणांचा अभिप्राय आहे; पण तो चुकीचा समज आहे. वस्तुत: ईश्वरी माया ही, विद्या आणि अविद्या, ज्ञान आणि अज्ञान अशा दोन प्रकारची आहे. जें सान्त आहे, तें मूळ अनन्ताचें दर्शनीं रूप आहे, यापलीकडे कांहीं नाहीं; अनन्ताच्या क्रियाशीलतेंतून सान्ताची उत्पत्ति आहे, अनन्ताच्या कल्पनेचा, सान्त हा खेळ आहे, अशी वस्तुस्थिति आहे; अनन्ताशिवाय सान्त हें अस्तित्वांत येऊं शकत नाहीं, अस्तित्वांत राहूं शकत नाहीं; सान्त अनन्ताच्या पोटांतच राहतें, अनन्त हें सर्वत्र सान्ताची अपरिहार्य पार्श्वभू असतें; सान्त हें अनन्ताला मिळालेला आकार आहे, सान्त हें अनन्ताच्या शक्तीच्या व्यापारानें उदयास येतें, अशी एकंदर वस्तुस्थिति असल्यानें एक अशी मूळ जाणीव अवश्य असली पाहिजे कीं, जिच्या पोटांत सान्त आणि अनन्त दोन्ही

 

पान क्र. ३०६

 

वस्तू एकाच वेळीं असतात, दोन्ही वस्तूंचें दर्शन जिला एकाच वेळीं घडतें, या दोन वस्तूंचे जे संबंध आहेत, ते सर्व जिला अगदीं आतून पूर्णतया कळतात, अवगत होतात, अवगत असतात. या जाणिवेंत अज्ञानाला वाव नसतो; कारण तेथें अनन्ताचें ज्ञान असतें आणि अनंतापासून सान्त वेगळें काढून त्याला स्वतंत्र सत्याचा दर्जा दिलेला नसतो; तथापि येथें मर्यादा घालण्याची क्रिया गौण म्हणून कां होईना सुरू झालेली असते--विश्वाचें अस्तित्व या क्रियेशिवाय शक्य होत नाहीं--या मर्यादीकरणाच्या क्रियेनें, नित्य विभागणी करणारी आणि नित्य विभागलेले भाग एकत्र जोडणारी मनाची जाणीव, मूळ निराकार वस्तूच्या पोटीं साकार अस्तित्व धारण करते; त्याचप्रमाणें त्याच प्रधान मूळ क्रियेनें प्राणाचा-जीवनाचा-- वेगळ्या वेगळ्या दिशांनीं जाण्याचा आणि पुन्हां एका दिशेनें मार्गक्रमण करण्याचा व्यापार अस्तित्वांत येतो; तसेंच अनन्त विभाग झालेलें आणि अनन्त प्रकारें एकत्र येऊन, स्वयंसंघातरूप होणारें जड-द्रव्य त्याच गौण क्रियेनें अस्तित्वांत येतें. ही जी गौणक्रिया नित्याचा द्रष्टा आणि नित्याचा विचारकर्ता अनुसरतो, तिला ईश्वरी मन (Divine Mind) म्हणतां येईल--हा नित्य द्रष्टा पूर्णतया स्वयंप्रकाश आहे, स्वतःचें आणि सर्वांचें पूर्ण ज्ञान त्याला आहे, तो जें काय करतो, त्याचें पूर्ण ज्ञान त्याला असतें. सान्ताला जन्मास घालण्याची क्रिया तो करतो; पण ती करतांना त्या सान्तांतहि त्याला अनन्ताची पूर्ण जाणीव असते. ईश्वरी किंवा दिव्य मनाचें स्वरूप आपण पाहिलें. अतिमानस किंवा सत्य-कल्पना हें ईश्वराचें एकमेव क्रियासाधन आहे, त्या अतिमानसाचीच एक गौण-क्रिया दिव्य-मन ही असली पाहिजे, दिव्यमनरूपी क्रिया ही स्वतंत्र अतिमानसिक क्रिया नव्हे हें उघड आहे. सत्य-जाणिवेची (सत्य-कल्पनेची) जी बाह्य विषयग्राहक क्रिया वर वर्णिलेली आहे, ती क्रिया म्हणजेच दिव्य मनाची क्रिया होय.

कवि आपल्या जाणिवेंतून कांहीं वस्तू निर्माण करतो, त्या तो स्वत:समोर धरतो; स्वत: त्या वस्तूंचा तो निर्माता असतो, त्याच्या निर्मितिशक्तीतून त्या वस्तू त्याने निर्माण केलेल्या असतात, त्या वस्तू स्वत:पासून व स्वतःच्या निर्माणसामर्थ्याहून निराळ्‌या आहेत अशा भावनेनें त्यांना तो स्वतःसमोर धरून त्यांजकडे पाहतो, त्यांचें निरीक्षण-परीक्षण करतो; तथापि ह्या सर्व वेळीं त्या वस्तू त्याच्याहून (निर्मात्याहून) वेगळ्‌या नसतात, वेगळ्‌या केल्या जाऊं शकत नाहींत; त्याच्या अस्तित्वाचा,

 

पान क्र. ३०७

 

जीवनाचा, साकारतेचा 'खेळ' यापेक्षां त्या वस्तूंना खरेखुरें अस्तित्व नसतें--ही कवीची आणि त्याच्या कल्पनांची जशी गोष्ट, तशीच प्रज्ञानाची, अतिमानसाच्या गौण बाह्यग्राहक क्रियेची गोष्ट आहे. सर्वरूप हें एक अविभाज्य आहे, त्याच्या क्रियाशील रूपनिर्मायक अवस्थेंत त्याजकडून घडणारी क्रिया, प्रज्ञान त्या सर्वरूप एकासमोर ठेवतें. अर्थात् ही क्रिया निर्मितिशील ज्ञानाची क्रिया असते आणि सर्वरूप एक हा त्या क्रियेचा मूळ आरंभक आणि ज्ञाता असतो; त्या क्रियेचा मालक तो असतो, साक्षी तो असतो, त्याचीच त्याच्या एका विशिष्ट अवस्थेंत घडलेली ती क्रिया असते. सर्वरूप एकाची जाणीव क्रियाशील होऊन क्रिया करते व ती मूलत: ज्ञानशील असल्यानें स्वतःकडून घडलेली व घडणारी क्रिया ती अवलोकन करते; स्वतःच स्वतःला विषय करून बाह्य-ग्रहणाचें नाटक करणें म्हणजेच प्रज्ञान-कार्य. हें कार्य म्हणजे स्वतःच्या कल्पना स्वतःसमोर ठेवून, त्या स्वतंत्र म्हणून बघण्याच्या कवीच्या कार्याप्रमाणें आहे हें उघड आहे. याप्रमाणें प्रज्ञान हें मूळ विभागणी करतें; ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी ज्यांत आहे, अशा ज्ञानप्रकाराची उभारणी प्रज्ञान करतें; या विभागणींतून इतर सर्व विभाग-प्रकार उदयास येतात; मूळ एकरूप जाणिवेंत पुरुष आणि प्रकृति यांची उभारणी करणें ही मूळ विभागणी होय. पुरुष म्हणजे ज्ञाता आत्मा; हा आत्मा जाणतो, पाहतो, आपल्या दृष्टीनें सृष्टि-निर्मिति करून तिची व्यवस्था करतो; प्रकृति म्हणजे शक्तिरूप आत्मा, निसर्गरूप आत्मा; हा आत्मा पुरुषाच्या ज्ञानाहून वेगळा असत नाहीं; पुरुषाचें ज्ञान, त्याची दृष्टि, त्याची सृष्टि आणि त्याची सर्वनियामक शक्ति म्हणजे निसर्ग-आत्मा किंवा शक्ति-आत्मा किंवा प्रकृति होय. पुरुष आणि प्रकृति या कांहीं दोन वस्तू नाहींत. त्या एकच वस्तु किंवा एकच 'महाभूत' आहेत. मूळ एकच एक महाभूत असतें. नंतर तें आपल्या दृष्टीच्या प्रभावानें आपले अनन्त आकार उत्पन्न करते, तो स्वत: ज्ञाता व हे सर्व आकार त्याचे ज्ञान विषय; तो स्वत: निर्माणकर्ता व हे सर्व आकार त्याच्या क्रिया-शक्तीचा प्रभाव; ज्ञान तोच, ज्ञाता तोच, निर्माता तोच, निर्माणशक्तिहि तोच, ज्ञान-विषय व शक्ति-कार्यहि तोच. ज्ञात्यापुढें ज्ञान हें ज्ञान-विषय ठेवतें -- निर्मात्यापुढें क्रियाशक्ति ही शक्तिकार्य ठेवते. ही सर्व प्रज्ञानाची अतिमानसाच्या पोटांतील क्रिया होय. प्रज्ञानाची शेवटली क्रिया अशी आहे :-- पुरुष आपल्या अस्तित्वाच्या जाणीवपूर्वक केलेल्या विस्ताराला व्यापून असतो; तो

 

पान क्र. ३०८

 

या विस्ताराच्या प्रत्येक बिंदूचे ठिकाणीं विभक्तपणें असतो आणि त्याच वेळीं समग्र विस्तारांत समग्रतेनेंहि असतो; हा असा पुरुष, प्रत्येक रूपांत राहून, समग्र वस्तु जणुं स्वतःपासून, स्वतःच्या विशिष्ट साकार रूपापासून वेगळी आहे, अशा रीतीनें तिजकडे बघतो व तिजशीं व्यवहार करतो; आपल्या प्रत्येक रूपांतून तो याप्रमाणें समग्र वस्तूशीं विभक्तपणाच्या नात्यानें व्यवहार करतो; त्याचप्रमाणें त्याचीं जीं आत्मरूपें असतात, त्या विविध आत्मरूपांशीं कोणत्याहि एका आत्मरूपांतून व्यवहार करतांना, त्या विशिष्ट आत्मरूपांतील इच्छा आणि ज्ञान ज्या प्रकारचें असेल, त्याला अनुसरून, तो इतर सर्व संबंधित आत्मरूपांशीं विभक्तपणानें व्यवहार करतो. हा विभक्ततेचा व्यवहार ही प्रज्ञानाची शेवटची प्रक्रिया आहे.

विभक्ततेच्या मूलभूत गोष्टी याप्रमाणें अस्तित्वांत येतात. एकच एक परमतत्त्व अनन्त असतें, त्या अनन्ततेचा काल आणि स्थल दृष्टीनें कल्पनाकाशांत जो विस्तार होतो, ती पहिली क्रिया; नंतर ह्या जाणीवपूर्वक आत्मविस्ताराच्या कार्यानें घडलेल्या विस्तारांत सर्वत्र असणारें एकतत्त्वाचें सार्वकालिक अस्तित्व रूपांतरित होऊन, जाणीवयुक्त आत्म्याची अनेकता निर्माण होते; सांख्यांचे अनेक पुरुष बनतात; नंतर तिसरी पायरी म्हणजे अनेक आत्मरूपांचें एकात्मत्व जाऊन, प्रत्येक आत्म्याला वेगळा देह, वेगळें घर, अशी विभक्त संसाराची स्थिति निर्माण होते. एकतत्त्वाचाच विस्तार झालेला असतो परंतु ही वस्तुस्थिति मागें पडून, प्रत्येक आत्मा वेगळ्या घरांत राहत आहे अशी अनुभूति निर्माण होते, ही विभक्त संसाराची तिसरी पायरी होय. जितके पुरुष व आत्मे, तितकीं घरें व देह असा प्रकार होण्याचें कारण, प्रकृति व तिनें निर्माण केलेलें विश्व एक असून, या एकाच प्रकृतीचा, या एकाच विश्वाचा भोग सर्वांना घ्यावयाचा असतो--हे आत्मेहि एकाच परम आत्म्याचीं विविध रूपें असतात व त्यांचे एकमेकांशीं विविध संबंध असतात. प्रत्येक पुरुषाची प्रकृति व जग जर स्वतंत्र असतें, तर पुरुषागणिक घर असा प्रकार व्हावयाचें कारण नव्हतें. पुरुषागणिक प्रकृति नसल्यानें पुरुषागणिक घर व एक भोग्य प्रकृति अशी व्यवस्था अस्तित्वांत येते. प्रत्येक रूपांतील पुरुष त्या रूपाशीं एकरूप होतो. त्याचा व्यवहार या एकरूपतेनें आंखला जातो; आपण याच देहांत आहोंत, इतर देहांत जे इतर आत्मे आहेत, ते मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें माझ्याशीं एकरूप असले, तरी संबंधांच्या

 

पान क्र. ३०९

 

दृष्टीनें व विस्ताराच्या दृष्टीनें मजहून वेगळे आहेत, त्यांच्या हालचाली माझ्या परिमाणांच्या दृष्टीनें व दिशांच्या दृष्टीनें भिन्न आहेत, एकच वस्तुतत्त्व, शक्ति, जाणीव व आनन्द यांचा जो उपयोग आणि उपभोग प्रत्येकाकडून कोणत्याहि विशिष्ट काळीं व विशिष्ट स्थळीं व्यवहारांत होत आहे, त्यासंबंधींचा माझा आणि इतर प्रत्येकाचा दृष्टिकोन भिन्न भिन्न आहे--या गोष्टी त्याला त्याच्या जाणिवेंत स्पष्टपणें जाणवतात. एकच पुरुष सर्व रूपांत असला, तरी प्रत्येक रूपांत त्या रूपांशीं एकरूप होऊन वागणें आणि इतर रूपांतहि स्वतःच तो असला, तरी तीं रूपें विशिष्ट रूपांतील स्वतःच्या आत्म्याहून भिन्न आत्मे धारण करणारीं आहेत, अस्तित्वाखेरीज इतर गोष्टींत सर्वजण भिन्न भिन्न आहेत, ही जाणीव प्रतिरूपीं पुरुषाला प्रतीत होते, ही गोष्ट विभक्त संसाराचा उगम समजण्याच्या दृष्टीनें महत्त्वाची आहे. ईश्वरी किंवा दिव्य अस्तित्व पूर्णतया स्वतःविषयीं जागरूक असतें, स्वतःचें ज्ञान त्याला पूर्ण आणि अप्रतिहत असतें, म्हणून प्रज्ञानाची मर्यादीकरणाची क्रिया, विशिष्ट रूपगत आत्म्याची त्या रूपाशीं एकरूप होऊन वागण्याची क्रिया, ईश्वरी किंवा दिव्य अस्तित्वाला, जीवनाला बंधनकारक होऊं शकत नाही. कोणताहि रूपगत आत्मा त्या रूपाचा गुलाम होत नाहीं, त्या रूपापलीकडे इतर रूपांतहि मीच आहे ही गोष्ट तो विसरत नाहीं; म्हणून त्याचें वागणें सर्वात्मभूत आत्म्याचें वागणें असतें--आमची, अदिव्य आत्म्याची गोष्ट वेगळी आहे. आम्ही आमच्या देहाशीं एकरूप झालों आहों; या एकरूपतेचें आम्ही गुलाम होऊन बसलों आहों. आमच्या अहंप्रज्ञ 'मी' ची मर्यादा ओलांडून वागणें आम्हांला जमत नाहीं; काल आणि स्थल यांच्या बंधनांत आम्हाला वागावें लागतें; कालाच्या ओघांत आमची जाणीव विशिष्ट क्षणीं जी विशिष्ट हालचाल करील, तिजवर स्थलदृष्ट्या आमचें विशिष्ट कार्यक्षेत्र अवलंबून असतें; जाणिवेच्या या विशिष्ट हालचालीला दूर सारून, आम्हांला स्वतंत्रपणें कांहीं करतां येत नाहीं; जाणिवेच्या विशिष्ट काळाच्या विशिष्ट हालचालीचे आम्ही गुलाम असतों. आमच्या अस्तित्वाची व जीवनाची ही कथा दिव्य आत्म्याच्या अस्तित्वाला आणि जीवनाला लागूं नाहीं, हें आतांच सांगितलें आहे. तथापि क्षणाक्षणाला आत्मा आपल्या देहाशीं स्वैरपणें एकरूप होत असतो; हें एकरूप होणें क्षणाक्षणाला अस्तित्वांत येतें व अस्तित्वांतून जातें; याचें कारण प्रज्ञान आपलें विघटनेचें व विभागणीचें कार्य करीत असतां; तें आपलें संघटनेचें,

 

पान क्र. ३१०

 

मूळ एकतेचें ज्ञान कायमपणें जिवंत राखण्याचेंहि काम करीत असतें हें आहे. दिव्य आत्म्याचें हें अंगभूत एकत्व-ज्ञान कांहीं कारणानें शिथिल झालें, अकार्यक्षम केलें गेलें, कीं दिव्य आत्मा आपली दिव्यता टाकून विभक्ततेच्या साखळींत--कालाच्या अनुक्रमाच्या आणि स्थलाच्या विभागांच्या भक्कम साखळींत अर्थात् विभक्त जाणिवांच्या आणि विभक्त देहांच्या साखळींत--आपल्यासाठीं कोठलें तरी स्थान कायमचें म्हणून घेऊन बसेल; आमची जाणीव अशीच कालस्थलबद्ध होऊन बसली आहे. अर्थात् हें बंधन आत्मविकासाच्या दृष्टीनें केव्हांतरी दूर होणारें असल्यानें याला 'दर्शनीं बंधन' म्हणतां येतें. तथापि व्यवहारांत विशिष्ट विकास-टप्पा गांठण्यापूर्वीं आमची स्थिति कैद्याची स्थिति असते हें विसरतां येत नाहीं.

तेव्हां, प्रज्ञानाच्या अंतिम प्रक्रियेनें रूपगत साकार आत्म्यांचें (दर्शनी) विभक्तीकरण झालेलें असतें; एका रूपाचें दुसऱ्या कोणत्याहि रूपाशीं नातें हें, जणुं कांहीं तीं रूपें वेगळे वेगळे आत्मे आहेत अशा प्रकारचें झालेलें असतें; एका आत्म्याची इच्छा आणि दुसऱ्या कोणत्याहि आत्म्याची इच्छा यांचें नातें, जणुं कांहीं या इच्छा स्वतंत्र वेगळ्‌या वेगळ्‌या शक्ती आहेत अशा प्रकारचें झालेलें असतें; एका आत्म्याचें ज्ञान आणि दुसऱ्या कोणत्याहि आत्म्याचें ज्ञान यांचें नातें, जणुं कांहीं तीं ज्ञानें अगदीं विभक्त ज्ञानें आहेत अशा प्रकारचें झालेलें असतें. ''जणुं कांहीं'' हा शब्द महत्त्वाचा आहे; दिव्य आत्मा विभक्तपणाच्या देखाव्यानें फसत नाहीं असा त्या शब्दाचा अभिप्राय आहे; मूळ एकतामय निराकार अस्तित्वाचें, 'सर्व' हें साकार रूप आहे हें दिव्य आत्मा जाणतो आणि सत्य-अस्तित्वांतील आपल्या स्थानाला घट्ट धरून राहतो; आपलें एकत्व तो गमावीत नाहीं; आपल्या अनंत ज्ञानाची एक गौण अंगभूत क्रिया या दृष्टीनें तो मनाकडे पाहतो व त्याचा उपयोग करतो; अनंताची स्वतःला कायम असलेली जाणीव बाजूला न ठेवतां, वस्तूंचें विभक्तीकरण व त्यांचें लक्षण करण्याची गौण क्रिया करणारें एक साधन या नात्यानें तो मन वापरतो; मूळ वस्तूची जी मौलिक समग्रता त्याच्या जाणिवेंत स्पष्टपणें ठाम बसलेली असते, तिला प्राधान्य ठेवून, त्या समग्र वस्तूचे विभाग पाडून, त्यांच्या मर्यादा निश्चित करण्याचें काम करणारें साधन म्हणून दिव्य आत्मा मनाला उपयोगांत आणतो. मौलिक समग्रता वेगळी आणि बेरजेनें म्हणजेच एक एक वस्तु जमवून ढीग केल्यानें निर्माण होणारी 'समग्रता' वेगळी; ही दुसऱ्या प्रकारची समग्रता, किंवा दर्शनी अनेकता-अधिष्ठित

 

पान क्र. ३११

 

समग्रता घडविणें, घडणें हा साकारतेच्या व्यवहारांतील मनाचा एक व्यापार आहे; दिव्य आत्म्याच्या व्यवहारांत ही दुसऱ्या प्रकारची समग्रता उदयास आलेली नसते. अतिमानसिक क्षेत्रांत दिव्य आत्मा खऱ्या विभक्तपणाला पोंचत नाहीं. तो मर्यादा असलेल्या देहाशीं एकरूप होऊन वागला, तरी या मर्यादा ओलांडूनहि वागत असतो. त्याचे ठिकाणीं मर्यादा घालण्याची शक्ति असते पण या शक्तीच्या आहारीं तो जात नाहीं, तर तिला तो आपल्या सोईप्रमाणें राबवितो; एकमेकांपासून स्पष्टपणें अलग अलग म्हणून ओळखतां येणारे आकार आणि शक्ति यांचा खेळ खेळतां यावा या उद्देशानें मर्यादीकरण-शक्तीचा उपयोग करून, तो विभक्त वाटणाऱ्या रूपांचा आणि शक्तींचा संसार उभा करतो.

याप्रमाणें दिव्य आत्म्याचें मन, असहाय्यपणें मर्यादाबद्ध नसून, स्वतंत्रपणें मर्यादा घालणारें व काढणारें असतें; हें मन त्याच्याकडून घडणाऱ्या व्यवहाराचें स्वामित्व करतें, त्या व्यवहाराची वास्तव स्थिति तें जाणतें--याच्या उलट परतंत्र जीवाचे मन असहाय्यपणें मर्यादित असलेलें, स्वतःच्या व्यवहाराचें दास व त्या व्यवहारानें फसणारें असें असतें; दिव्य आत्म्याचें मन दिव्य तर अ-दिव्य सामान्य जीवाचें मन अ-दिव्य असतें. हें अ-दिव्य मन दिव्य मनांतून तयार होण्यासाठीं मूळ जाणीवशक्तीची कांहीं विशिष्ट, नवी प्रक्रिया अवश्य असते. ही नवी प्रक्रिया, हा नवा घटक म्हणजे अविद्या होय. अविद्या म्हणजे मूळ जाणिवेची आत्म-विस्मृतीची शक्ति, स्वतःला आत्म-ज्ञानच्युत करण्याची शक्ति, आत्म-नेणीवशक्ति; या शक्तीमुळें अतिमानसिक क्रिया आणि मनाची क्रिया यांच्यामध्यें भक्कम पडदा उत्पन्न होऊन, त्या दोन क्रिया एकमेकींपासून अलग होतात; या भक्कम पडद्याच्या आड राहून, अतिमानस हें मनाची क्रिया आपल्या शासनाखालीं ठेवतें; मनाची क्रिया मूलतः अतिमानसानेंच घडवून आणलेली असते व तिचें अनुशासन तें करीत राहतें; पण आत्म-विस्मृति-शक्तीच्या कार्यानंतर हें अनुशासन तें पडद्याआडून करतें एवढेंच. याप्रमाणें मन अतिमानसापासून वेगळें पडलें म्हणजे त्याला फक्त विशिष्ट गोष्टी दिसतात, सर्वव्यापक तत्त्व दिसत नाहीं; तें कल्पना करूं शकतें फक्त विशिष्ट गोष्टींची; या गोष्टी सर्वव्यापक तत्त्वाच्या पोटीं असूं शकतील अशी अंधुक कल्पना त्याला येऊं शकते, परंतु त्याची याविषयीं खात्री नसते. सर्वव्यापक तत्त्व आणि विशिष्ट गोष्टी दोन्ही अनंत एकतत्त्वाच्या साकारतेच्या लीलेचा भाग आहेत, हें दिव्य मनाला होणारें

 

पान क्र. ३१२

 

ज्ञान तर त्याला मुळींच होऊं शकत नाहीं. याप्रमाणें अविद्येच्या प्रक्रियेनें मर्यादित मन अस्तित्वांत येतें. हें मन प्रत्येक साकार वस्तूला मूळ वस्तु मानतें; ही वस्तु कोठल्या तरी समग्र वस्तूचा स्वतंत्र भाग म्हणून तें कल्पितें; ही समग्र वस्तु तिजपेक्षां मोठ्या वस्तूंत स्वतंत्रपणें असल्याचें दृश्य त्याला दिसतें; याप्रमाणें हें मर्यादित मन मोठाले वस्तुसंघ करूं शकतें, परंतु खऱ्या अनंतत्वाची कल्पना मात्र त्याच्या आवांक्याच्या बाहेर असते; ती त्याला कल्पितां देखील येत नाहीं. मूळ अनंतत्वांतून तें निघालेलें असलें, तरी त्या अनंतापासून तें कायमचें दुरावलेलें असतें. अनन्ताची एक क्रिया म्हणून मनाचा जन्म झाला असल्यानें, वस्तूचे अनंत विभाग पाडण्याची व वस्तू अनंतपणें एकाला एक जोडून अमर्यादपणें संघ करण्याची शक्ति त्या मनाला आलेली असते. हें मन अस्तित्वाचे, एकच एक अस्तिरूप पदार्थाचे, आपल्या विभाजन शक्तीनें अनेक समग्र पदार्थ घडवितें; या नव्या पदार्थांचे लहान लहान पदार्थ करतें, शेवटीं अणु, परमाणु कल्पितें आणि हा परमाणुहि तोडून शेवटीं शून्य बनविण्याच्याहि मार्गांत मन असतें; परंतु शून्य कांहीं त्याला यशस्वीपणें कल्पितां येत नाहीं, कारण मनाच्या विभागणीच्या व्यवहारामागें अतिमानसाचें खरें तारक ज्ञान असतें; प्रत्येक समग्र पदार्थ, प्रत्येक अणु परमाणु सर्व शक्तीचें, सर्वज्ञतेचें, सर्व अस्तित्वाचें केंद्रस्थान आहे, अणु परमाणूंचीं लहान मोठ्या पदार्थांचीं रूपें, हीं सर्वव्यापी शक्तीनें, ज्ञानानें व अस्मितेनें स्वतःच्या लीलेसाठीं घेतलेलीं रूपें आहेत, ही गोष्ट अतिमानस कधीं विसरत नाहीं. या रूपांचें विभजन, विभागलेल्यांचें पुन: विभजन असें होत होत, मनाच्या दृष्टीनें असीम शून्यत्व जेथें प्राप्त झाल्यासारखें दिसतें, तेथें अतिमानसाला शून्य दिसत नसून, ज्या ज्ञानयुक्त पूर्णानें आत्मसंकोच करून विशिष्ट रूप धारण केलें होतें, त्या पूर्णानें परत आपली मूळ अनंत अस्तित्वाची अवस्था स्वीकारली आहे असें त्याला दिसतें. अनंत विभजनानें किंवा अनंत विस्तारानें या पूर्णाची जाणीव ही एकाच स्थानाला किंवा एकाच अवस्थेला पोंचते. ती अवस्था म्हणजे तिचें मूळ स्वरूप--अर्थात अनंत एकता आणि शाश्वत सत्ता, अस्तित्वाची नित्यता. मूळ जाणीव, तिच्या साकार रूपांच्या विस्ताराची वाढ सारखी करीत राहिल्यानें किंवा त्यांचे तुकडे व तुकड्यांचे तुकडे अशी सारखी त्या साकार रूपांची सूक्ष्मता वाढवीत गेल्यानें, दोनहि मार्गांनीं (अनंत वाढीनें किंवा अनंत विभागणीनें) शेवटीं तिचें स्वाभाविक 'रूप' आपल्याला भेटतें.

 

पान क्र. ३१३

 

हें मूळ तत्त्व शाश्वत आहे, एक आहे, अनंत आहे व ज्ञानमय आहे. मनाची विभजनाची क्रिया चालूं असतां, मनाला या अतिमानसिक ज्ञानाचा जर विसर पडला नाहीं, अतिमानसिक एकत्व-अनुभूतीच्या पोटांत मनाची ही विभजन-क्रिया दुय्यम म्हणून चालू असली, म्हणजे विभजन-क्रियेचें खरें तत्त्व मनालाहि उमगतें. तें तत्त्व असें कीं, मनाची विभजन-क्रिया ही खरे तुकडे पाडीत नाहीं, तर मूळ पूर्णाचीं अनेक, अनंत रूपें बनविते; या रूपांत पूर्ण ज्ञानमय रूपें परस्परांशीं अनेक रीतींनीं संबंधित केलीं जातात; स्थलकालनिष्ठ रूपलीला शक्य व्हावी यासाठीं हा दर्शनीं विभजनाचा व्यापार मनाकरवीं केला जातो. मनानें पदार्थाचे तुकडे करून, अगदीं सूक्ष्मतम परमाणु गांठला किंवा पदार्थ वाढवीत वाढवीत, सगळीं विश्वें व विश्वमाला ज्याच्यांत राहतील असा महत्तम पदार्थ मनानें बनविला, तरी दोनहि क्रियांनीं मूळ वस्तु मनाच्या आवाक्यांत येत नाहीं. हे सर्व पदार्थ सूक्ष्मतम व महत्तम अशा एका मूळ शक्तीचीं रूपें आहेत, ही मूळ ज्ञानमय शक्तीच फक्त खरी सत्य आहे आणि तिचे बनलेले सर्व पदार्थ हे शाश्वत शक्तिमय जाणिवेचीं व्यक्त आत्मरूपें या एकाच दृष्टीनें फक्त सत्य आहेत.

आतां असा प्रश्न आहे कीं, आत्म्याच्या व्यापकतेला मर्यादा घालणारी ही अविद्या मुळांत येते कोठून? अतिमानस क्षेत्रांत वावरणारें दिव्य मन दिव्यता टाकून खालीं येतें कसें? या अधःपतनाचा परिणाम म्हणून येणारी विभागणी सत्य आहे, ही कल्पना कशी निर्माण होते? अतिमानसिक व्यापाराची विकृति होऊन अ-दिव्य मन, अविद्या अस्तित्वांत येते; पण कोणत्या व्यापाराची विकृति होते हा प्रश्न आहे. या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, अतिमानसिक क्षेत्रांत जो दिव्य वैयक्तिक आत्मा असतो, त्याच्या व्यापाराच्या विकृतीनें अविद्या अस्तित्वांत येते. हा दिव्य वैयक्तिक आत्मा आपली स्वाभाविक व्यापक दृष्टि सोडतो आणि आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनांतून सर्व गोष्टी पाहूं लागतो; अन्य सर्व दृष्टिकोन आपल्या कक्षेबाहेर ठेवतो म्हणून अविद्या मूळ धरते. इतर सर्व स्थानें वगळून, एका विशिष्ट स्थानीं आत्म्यानें आपल्या जाणिवेचें केंद्रीकरण करणें, काळाचें आणि स्थळाचें एक विशिष्ट कार्य हें आत्म्याच्या एकंदर जीवनलीलेचा केवळ एक भाग असतांना, तें कार्य म्हणजेच आपलें सर्व जीवन आहे अशी समजूत करून घेऊन, त्याच्याशीं आपलें पूर्ण तादात्म्य करून बसणें, ही जी दिव्य वैयक्तिक आत्म्याची चूक, तीच अविद्येचें मूळ आहे.

 

पान क्र. ३१४

 

कालाच्या एका विशिष्ट क्षणाचें कार्य, स्थळाच्या एका विशिष्ट बिंदूचें कार्य व या बिंदूंत या क्षणीं जें एक विशिष्ट रूप आत्म्याला असतें, तें विशिष्ट रूप -- या गोष्टी वैयक्तिक आत्मा आपल्या म्हणून मानतो आणि ही त्याची बुद्धि बरोबर असते; पण तो ही गोष्ट दृष्टिआड करतो कीं, दुसरे वाटणारे आत्मे तो स्वतःच झाला आहे, दुसऱ्यांचीं वाटणारीं कार्यें त्याचीं स्वत:चीच आहेत. अस्तित्वाच्या आणि जाणिवेच्या दुसऱ्याच्या म्हणून वाटणाऱ्या अवस्था सर्व त्याच्याच आहेत; आत्म्याला झालेली ही विस्मृति हीच अविद्येचें मूळ आहे. अमुक क्षण, अमुक क्षेत्र, अमुक रूप, अमुक व्यापार, यांजवर वैयक्तिक अविद्या-बद्ध आत्मा आपलें सर्व लक्ष केंद्रित करतो; अर्थात् दुसरे सर्व क्षण इत्यादि तो आपल्या कक्षेंतून घालवून बसतो; आणि मग हे घालविलेले क्षण वगैरे पुन्हां मिळविण्यासाठीं त्याला क्रमवारीनें येणारे क्षण, स्थलबिंदू, कालगत आणि स्थलगत रूपें, तसेंच कालगत आणि स्थलगत हालचाली एकत्र जोडून घ्याव्या लागतात. वस्तुत: काल अविभाज्य आहे, शक्ति आणि द्रव्य अविभाज्य आहेत; परंतु अविद्याबद्ध आत्मा हें अविभाज्यतेचें सत्य घालवून बसतो. मन वस्तुत: एक आहे, त्याचे अनेक दृष्टिकोन आहेत, हे अनेक दृष्टिकोन म्हणजेच अनेक मनें होत; प्राणशक्ति एक आहे, ती अनेक क्रियास्त्रोत उदयास आणते, हे अनेक क्रियास्त्रोत म्हणजेच अनेक प्राणमय वस्तू किंवा जीव; शक्ति आणि जाणीवयुक्त द्रव्य एक आहे, अनेक शक्ती आणि जाणीवयुक्त दर्शनी स्थितिशील वस्तू या द्रव्यांतून निर्माण होतात, त्या वस्तू म्हणजेच शरीरे आणि रूपें होत; दर्शनीं स्थितिशील दिसणारीं हीं रूपें आणि शरीरें वस्तुत: स्थितिशील नसतात, सारखीं गतिमान आणि परिवर्तनी असतात; कोणतेंहि रूप वा शरीर बदलतहि असतें आणि एक प्रकारें क्षणक्षणाला आपली पूर्वस्थिति कायम राखण्याचा प्रयत्नहि करीत असतें; येथवर सांगितलेली मनाची, प्राणाची व शरीराची (रुपाची) एकता (द्रव्यदृष्ट्या एकता) अविद्याबद्ध आत्मा विसरून जातो आणि अनेक मनें, अनेक प्राण (जीव) व अनेक शरीरें सत्य आहेत ही कल्पना धरून बसतो. अविद्याबद्ध आत्म्याचा किंवा मनाचा हा धर्म आहे कीं, तें मन प्रत्येक गोष्ट निश्चित ठाम आकारांत वा रूपांत बसविण्याचा प्रयत्न करतें, दर्शनी अपरिवर्तनी आत्मबाह्य घटकांची प्रत्येक गोष्ट बनलेली आहे असें कल्पिण्याचा प्रयत्न करतें; या कल्पनेच्या आश्रयावांचून या मनाला आपलें नियत-कार्य करतांच येत

 

पान क्र. ३१५

 

नाहीं; न बदलणारें असें वस्तुत: कांहींच नाहीं; बदल आणि पुनर्रचना हा सार्वत्रिक नियम आहे. ठाम रूप-तन्मात्र म्हणून कांहीं नाहीं, न बदलणारा बाह्य घटक कोठेंहि नाहीं. न बदलणारें ठाम कांहीं असेल, तर शाश्वत सत्य-कल्पना ही न बदलणारी आहे आणि सारख्या बदलणाऱ्या वस्तूप्रवाहांत रूपांची व संबंधांची कांहीं नियमबद्ध निश्चितता व शाश्वती, शाश्वत सत्य-कल्पनेच्या प्रभावानेंच केवळ शक्य होते; सत्य कल्पनेच्या या प्रभावासारखा प्रभाव, मन आपल्या परीनें आपल्या कार्यांत दाखवूं पाहतें व जें शाश्वत नाहीं तें शाश्वत आहे अशी वृथा कल्पना करून ती पक्की धरून बसतें. जीं सत्यें अविद्येमुळें मन घालवून बसतें, तीं सत्यें त्याला पुन्हां आत्मसात् करावयाचीं असतात, तीं त्याला शोधून काढून आपलीं करावयाचीं असतात; मनाच्या जाणिवेच्या गुप्त भागांत हीं सत्यें नेहमींच उपस्थित असतात, मनाच्या आत्मजीवनाच्या गुप्त प्रकाशांत हीं सत्यें तळपत असतात; पण हा गुप्त प्रकाश मनाला अंधारासारखा झालेला असतो याचें कारण, मनानें संकुचित होऊन अज्ञान निर्माण करून तें पांघरलेलें असतें; त्याचा धर्म अविभाज्याची विभागणी करून, त्या विभागणीचा आत्मलीलेसाठीं धनीपणानें उपयोग करण्याचा असतो; पण तें स्वतःच विभागणीला बळी पडून स्वतःचे तुकडे तुकडे करून घेतें. एका मनाचीं अनेक मनें करून बसतें व स्वत: जीं कार्यें केलेलीं असतात आणि जीं रूपें निर्माण केलेलीं असतात, त्या कार्यांत व रूपांत स्वत: परतंत्रपणें अडकून बसतें.

अज्ञान किंवा अविद्या ही मनुष्याच्या संबंधांत गाढतर होण्याचें कारण मनुष्य हा देहालाच 'स्व' किंवा आत्मा मानतो हें होय. मन हें शरीरावलंबी आहे, शरीराच्या कार्यावर मनाचें कार्य अवलंबून आहे, शरीर अगोदर व मन नंतर असा आपला समज होतो, याचें कारण मन शरीराच्या भानगडींत गुरफटलेलें असतें, त्याचें लक्ष शरीराकडेच सर्वथा किंवा प्रधानतः लागलेलें असतें, स्थूल क्रियांकडे तें लक्ष लावून बघत असतें. या स्थूल जड जगतांत मन जी जाणीवयुक्त वरवरची कृति करण्यांत गुंतलेलें असतें, त्या कृतीसाठीं शरीराच्या क्रियांचा त्याला उपयोग होतो म्हणून त्या क्रियांकडे तें सारखे लक्ष लावून असतें. मनाची शरीरांत राहून जी वाढ झाली, त्या वाढीच्या कार्यक्रमांत मेंदू आणि नाडीसंघ यांचा मनानें विकसित केलेला व्यापार मन नेहमीं उपयोगांत आणीत असतें; मेंदू व नाड्या यांची ही स्थूल यांत्रिक संघटना मनाला जी कांहीं सामग्री

 

पान क्र. ३१६

 

पुरविते, तिचें निरीक्षण परीक्षण करून तिचा उपयोग करण्यांत मन इतकें गढून गेलेलें असतें कीं मागें वळून शरीरावर अवलंबून नसणारें आपलें शुद्ध व स्वतंत्र कार्य करण्याकडे त्याचें लक्षच जात नाहीं. हें स्वतंत्र शुद्ध मानसिक कार्य, बहुतांशी मनाच्या सामान्य जागृत जाणिवेच्या खालीं असलेल्या अप्रकट जाणिवेंत होत असतें. तथापि स्थूल शारीरिक कार्याच्या निरीक्षणांत व उपयोगांत गढलेलें राहण्याची स्थिति विकासक्रमाच्या आवश्यकतेप्रमाणें एका विशिष्ट टप्प्यांत मनाला प्राप्त झालेली असते, ही गोष्ट आपण लक्ष्यांत ठेवली पाहिजे. पुढें विकासक्रमांत ही आवश्यकता दूर होऊन शारीर-कार्यावलंबित्व टाकून मन हें प्राण-कार्यावलंबी होतें. प्राणावलंबी मन, हा प्राणमय पुरुष असा अनुभव घेऊं शकतो कीं तो स्वत: कायम राहून त्याला एका शरीराच्या पतनानंतर दुसरें शरीर त्याच्या पतनानंतर तिसरें शरीर अशीं एकामागून एक शरीरें प्राप्त होत असतात. हा प्राणमय पुरुष किंवा हें प्राणमय मन, प्रत्येक शरीराबरोबर वेगळें निर्माण केलें जातें व त्या शरीराच्या पतनाबरोबर नाहींसें होतें, अशी वस्तुस्थिति नाहीं ही गोष्ट प्राणमय मनाला कळतें. प्रत्येक शरीराबरोबर निर्माण होऊन, जें त्याबरोबर नाहींसें होतें, तें शारीरमन होय; जडावर मनाचा जो भौतिक ठसा उमटविण्यांत येतो, तो शरीराच्या आंत मन राहूं लागल्यानंतर उमटवण्यांत येतो व हा ठसा, हें शारीर मन, शरीराच्या नाशाबरोबर नष्ट होतें. सर्वच्यासर्व मन कांहीं शरीरांत बनविलें जात नाहीं किंवा शरीराच्या नाशाबरोबर नष्ट होत नाहीं. शारीर-मन हें आमचें वरच्या दृष्य पातळीवरील मन आहे; आमच्या मनाचा पृष्ठभाग आहे. स्थूल भौतिक अनुभवासाठीं एकंदर मन आपला जो भाग पुढें करतें, तो भाग म्हणजे शारीर-मन होय. आमच्या पार्थिव शरीरांत देखील शारीर-मनाच्या पाठीमागें अर्धनेणिवेच्या प्रांतांत आमचें मन काम करीत असतें; जागृत जाणिवेच्या खालील भागांत काम करणाऱ्या या मनाला हें ठाऊक असतें कीं, आपण शरीराहून अधिक व्यापक आहों आणि शारीर-मनाला जें केवळ जडनिष्ठ कार्य करावें लागतें, त्यापेक्षां जडावर कमी अवलंबून असणारें अधिक कार्य आपल्याला करतां येतें. आमच्या पृष्ठभागीय मनाकडून जें विशेष व्यापक, खोल आणि जोरदार गतिशील कार्य घडतें, तें खरोखरी या अंतर्मनाचें, अर्धनेणिवेच्या मनाचें प्रत्यक्ष कार्य असतें. हें अन्तर्मन आपल्याला कळूं लागलें किंवा त्याचा आपल्यावर होणारा प्रभाव आपणाला कळूं

 

पान क्र. ३१७

 

लागला म्हणजे त्यालाच आपण आंतर-पुरुष किंवा प्राणमय पुरुष म्हणतो; आत्म्यासंबंधाची पहिली कल्पना म्हणजे हा प्राणमय-पुरुष होय.

या प्राणमय मनाकडून शारीर-मनाचे प्रमाद होत नाहींत. तथापि मनाची सर्वच क्रिया बिनचूक करणें ही गोष्ट या प्राणमय मनाकडूनहि घडत नाहीं. मूळ अविद्येचें कार्य त्याजवरहि स्वामित्व गाजवीत असतें; वैयक्तिक झालेला आत्मा आपल्या एकट्याच्या दृष्टिकोनांतून सर्व गोष्टी पाहतो व त्यांचें खरेंखोटेंपण, बरेंवाईटपण ठरवितो; हा वैयक्तिक दृष्टिकोन प्राणमय मनाचे ठिकाणीं असतो व त्याजकडून तो चुका घडवितो; वैयक्तिक झालेल्या आत्म्याला आणि या प्राणमय मनाला जें वस्तुजातांतील सत्य उमगतें तें आंतून व पूर्णतया उमगत नाहीं; बाहेरून त्याच्यासमोर वस्तू येतात आणि या समोर आलेल्या वस्तूंचें सत्य अंशत: त्याच्या प्रत्ययास येतें इतकेंच; या प्राणमय मनाची जाणीव काल-स्थल-विशिष्ट अशी स्वतंत्र जाणीव असते; त्याचा जुना आणि नवा अनुभव, जीं रूपें घेतो आणि जें परिणाम घडवितो ते या स्वतंत्र जाणिवेच्या द्वारां त्याच्या नजरेसमोर येतात आणि मग वस्तुजातांतील कांहीं सत्य त्याला कळतें इतकेंच; या अपूर्ण सत्यामुळें त्याच्या हांतून प्रमाद घडत राहतात. या प्राणमय मनाचें, पुरुषाचें सर्वच प्राणमय पुरुष वस्तुत: आत्मरूप असतात; परंतु तो ज्या शरीरांत राहतो, त्या शरीरांहून भिन्न शरीरांत राहणाऱ्या त्याच्या आत्म्यांचें ज्ञान त्याला प्रत्यक्ष मुळींच होत नाहीं; हे दुसरे आत्मे विचार, भाषा, कृति, कृतीचीं फळें यांच्याद्वारां आपलें जें अस्तित्व बाहेरून व्यक्त करतात तें फक्त, या प्राणमय मनाला किंवा पुरुषाला ज्ञात होतें; तसेंच शारीर पुरुषाला प्रत्यक्ष भासत नाहींत असे प्राणमय संबंध आणि प्राणमय आघात, दुसऱ्या आत्म्यांकडून एका विशिष्ट शरीरांतील आत्म्यावर किंवा प्राणमय पुरुषावर घडतात आणि या सूक्ष्म सूचक खुणांनीं इतर आत्म्यांची जाणीव विशिष्ट शरीरधारी प्राणमय मनाला किंवा आत्म्याला होत असते; अर्थात् या जाणिवेंत पूर्ण सत्य असत नाहीं व म्हणून प्राणमय मनाकडून किंवा पुरुषाकडून प्रमाद घडतात. ज्याप्रमाणें इतर आत्म्यांसंबंधीं पूर्णज्ञान प्राणमय मनाला होत नाहीं, त्याप्रमाणें स्वतःसंबंधींचें त्याचें ज्ञान देखील अपुरें असतें; कारण जी कालगत हालचाल त्याच्याकडून घडते, ती त्याला स्वतःसंबंधींचें जेवढें ज्ञान करून देतें तेवढेंच त्याचें स्वतःसंबंधींचें ज्ञान; अनेक देह क्रमवारीनें धारण करून, प्राणमय मन किंवा पुरुष आपल्या शारीर शक्तींचा विविध रीतींनीं विनियोग करतो.

 

पान क्र. ३१८

 

या क्रमवार देहधारणाच्या क्रियेनें होईल तेवढेंच त्याचें स्वतःसंबंधींचें ज्ञान; अर्थात् हें ज्ञान अपुरें असतें. प्राणमय मन किंवा पुरुष स्वत:संबंधींहि अज्ञानांत असतो असें म्हणतां येतें. यंत्रवत् कार्य करणारें शारीर-मन, 'शरीर सत्य आहे' या भ्रमानें कार्य करणारें असतें; त्याप्रमाणें नेणिवेच्या प्रांतांतील कृतिशील असलेलें मन किंवा प्राणमय मन, 'प्राण हेंच सत्य आहे' या भ्रमानें कार्य करणारें असतें. प्राणमय मन प्राणांत केंद्रित झालेलें व त्या प्राणानें मर्यादित झालेलें असतें; प्राणमय मन आपलें जीवन प्राणाशीं एकरूप करून असतें; त्याच्याशीं त्याचें तादात्म्य झालेलें असतें. मन आणि अतिमानस यांचा जेथें वियोग होतो, जेथें मन अतिमानसापासून वेगळें होऊन स्वतंत्रपणें कार्य करूं लागतें, तें दोघांच्या शेवटल्या मीलनाचें स्थान मात्र, प्राणमय-मन नव्हे. गतिशील प्राणमय मनाच्या पाठीमागें विचारमय शुद्ध मन आहे. हें मन प्राणाशीं तादात्म्य करण्याचें टाळूं शकतें, प्राण आणि शरीर या दोनहि वस्तू स्वतःपासून निराळ्‌या आहेत हें ज्ञान या विचारमय मनाला असतें. या दोन वस्तू आत्मसात् करून, आपलीं शक्तिकार्यें हें मन प्रत्यक्षांत आणतें. आपल्या विचारांत आणि इच्छाक्षेत्रांत जी शक्ति त्याला प्रतीत होते, त्या शक्तीचें कार्य खालच्या पातळीवर व्यक्त करण्यासाठीं, प्राण आणि शरीर यांचा आश्रय मी करीत आहे ही जाणीव या विचारमय मनाला स्पष्ट असते. शक्तीची कृतिशीलता, गतिमानता ही प्राण व शरीर यांच्याखेरीज व्यक्त होऊं शकत नाहीं. विचारमय शुद्ध मनाच्या क्षेत्रांत विचार आणि इच्छा यांचाच संभार असतो. या विचारांना आणि इच्छांना अनुरूप अशी शक्तिक्रिया करण्यासाठीं, या शुद्ध मनाला प्राण आणि शरीर यांचा आश्रय घ्यावा लागतो. आमच्यामध्यें शुद्ध विचारक म्हणून जो असतो, तो म्हणजे हें विचारमय मन. खरी स्वाभाविक मानसिक शक्ति म्हणजे हें विचारमय मन. या मनाला जें विश्व दिसतें, तें प्राणमय किंवा शरीरमय दिसत नाहीं, तर मनोमय दिसतें. विकासक्रमांत शारीरमन व प्राणमय मन यांचा अनुभव घेऊन, या शुद्ध विचारमय मनापर्यंत-- मनोमय पुरुषापर्यंत आपण जेव्हां पोंचतो-- (परत येऊन पोंचलों असें म्हणणें योग्य, कारण अगोदर मूळ चैतन्य हें जडाकडे जातांना या मनोमय पुरुषाच्या अवस्थेंतून खालीं प्राणमय व शारीर पुरुषाच्या अवस्थेंत उतरलें होतें व नंतर जडाशीं एकरूप झालें होतें.) तेव्हां या पुरुषाला आपण शुद्ध चैतन्य मानूं लागतों; जसें पूर्वीं गतिशील

 

पान क्र. ३१९

 

प्राणमय मनाला आपण आत्मा समजलों, तसेंच मनोमय पुरुषाला आपण आत्मा समजूं लागतो; तथापि हा आत्मा नव्हे. मनाचा मूळचा प्रमाद या शुद्ध विचारशील मनालाहि चुका करण्यास भाग पाडतो. शुद्ध मन हें, शारीर आणि प्राणमय मनाहून श्रेष्ठ दर्जाचें असतें. दुसरे आत्मे आपल्या शुद्ध स्वत्वाचीं दुसरीं रूपें आहेत, तें ज्या शरीरांत आहे त्या शरीरांत त्याचें एक रूप व इतर शरीरांत त्याचीं दुसरीं रूपें आहेत हें या श्रेष्ठ मनाला कळतें व या ज्ञानानुसार तें सर्वांशीं वागतें; या दुसऱ्या आत्म्यांचा अनुभव या श्रेष्ठ मनाला केवळ मानसिक संपर्कानें व संवादानें करून घेतां येतो. केवळ प्राण आणि शरीर यांच्याद्वारां मिळणाऱ्या सूचनांनीं इतर आत्म्यांची ओळख करून घ्यावी अशी स्थिति या श्रेष्ठ मनाची नसते; एकता हें तत्त्व या मनाला स्पष्टपणें उमगतें व या एकतेचें मानसिक प्रतीक तें बनवितें; याची कृति आणि इच्छा व्यापक असते, स्वतःच्या जीवनांत आणि मनांत ज्याप्रमाणें हें मन कांहीं निर्मिति करून, तिचा उपभोग स्वामित्वानें घेतें, त्याप्रमाणें इतर आत्म्यांच्या मनांत व जीवनांत आपल्या कृतीनें व इच्छेनें तें कांहीं निर्मिति प्रत्यक्षपणें करून, तिचा स्वामित्वानें उपभोग घेऊं शकतें. सर्वसाधारण भौतिक जीवनांत आपल्याला दुसऱ्यांच्या मनांत व जीवनांत कांहीं नवें निर्माण करावयाचें, तर तें प्रत्यक्षपणें निर्माण करतां येत नाहीं--शरीराच्या व प्राणमय मनाच्या द्वारां आपल्याला अप्रत्यक्षपणें नवनिर्मितीचें काम करावें लागतें हें सर्वांस विदित आहे. जी गोष्ट निर्मितीची तीच उपभोगाची. हा उपभोगहि अप्रत्यक्षपणें घेणें आम्हांला शक्य असतें. श्रेष्ठ मनाप्रमाणें प्रत्यक्षपणें सर्वांच्या जीवनांतील व मनांतील भोगांचा उपभोग आम्हांला घेतां येत नाहीं. असो. याप्रमाणें श्रेष्ठ शुद्ध विचारमय मनाला पुष्कळशा गोष्टी व्यापकपणें करतां येत असल्या, तरी मनाची मूलभूत भ्रांति येथेंहि असते. श्रेष्ठ मन हेंहि, आपल्या सर्वांहून अलग व स्वतंत्र असलेल्या आत्म्याला विश्वाचा निरीक्षक, परीक्षक व केंद्र मानतें आणि या स्वतंत्र आत्म्याच्या द्वारां आपल्या सर्वोच्च परमात्म्याला व वस्तुतत्त्वाला गांठण्याचा प्रयत्न करतें; दुसरे आत्मे याला 'दुसरे' असतात. एवढेंच कीं ते याच्या अंवतींभोंवतीं आपुलकीनें गोळा झालेले आहेत, असें हें श्रेष्ठ मन मानतें; याला मुक्त होण्याची इच्छा झाली म्हणजे प्राण आणि मन यांजपासून हें परावृत्त होतें आणि मूळ सत्यरूप एकतत्त्वांत विलीन होतें. अविद्येचा पडदा अद्यापि त्याजवर असल्यानें, हें असें श्रेष्ठ मनाचें वर्तन

 

पान क्र. ३२०

 

होतें. मन आणि अतिमानस यांच्या क्रिया अविद्येचा पडदा मध्यें आल्यानें वेगळ्‌या वेगळ्‌या होतात. अतिमानसिक क्षेत्रांत मुक्तपणें वावरणारें सत्य या पडद्यामुळें मनाच्या क्षेत्रांत उतरत नाहीं; या सत्याची छाया मात्र या पडद्यांतून मनांत उतरूं शकते.

अतिमानस आणि मानस यांना एकमेकांपासून विभक्त करणारा अविद्येचा पडदा फाडून टाकला, अनेकधा विभागलेलें मन अविद्येचा पडदा फाटून गेल्यानें निःसत्त्व झालें आणि अतिमानसाच्या क्रियांचा तें शांतपणें विनयशीलपणें मार्गदर्शक व आत्मोद्धारक म्हणून स्वीकार करूं लागलें म्हणजे वस्तुजातांतील मूळ सत्य या मनाला पुन: पूर्णपणें प्रतीत होऊं शकतें. अविद्येचा पडदा फाटला म्हणजे विचारमय मन प्रकाशानें भरलें जातें आणि दिव्य सत्यमय उन्मनाचें (सत्यकल्पनेचें) काम तें आज्ञाधारकपणें यंत्रवत् करूं लागतें. या ठिकाणीं विश्वाचें खरें स्वरूप आपल्याला स्पष्ट दिसतें; प्रत्येक प्रकारें आम्ही दुसऱ्यांत असल्याचें, दुसरें असल्याचें किंवा दुसरे आपण असल्याचें ज्ञान तितकेंच स्पष्टपणें होतें; आणि सर्वजण विश्वव्यापी एकतत्त्वच बनलें आहे, एकतत्त्वानें स्वतःला स्वयंप्ररणेनें अनेक रूपांनीं व्यक्त केलें आहे, एकतत्त्व स्वयंप्रेरणेनें सर्व बनलें आहे असा स्वच्छ प्रकाश आम्हांला प्राप्त होतो. वैयक्तिक दृष्टिकोन स्वतंत्रपणें व अलगपणें आतांपर्यंत काम करीत होता, लवचिकपणा किंचितहि त्यांत नव्हता; अशी स्थिति या नव्या ठिकाणीं राहत नाही. सर्व मर्यादा, बंधनें, भ्रम, प्रमाद यांचें मूळ म्हणजे हा बिनलवचिक वैयक्तिक दृष्टिकोनच असतो. अविद्येचा पडदा फाटल्यावर तो समूळ नाहींसा होतो. अविद्याबद्ध मन जें सत्य म्हणून समजत होतें, तें सत्य नव्हतें असें मात्र नव्हे; तें सत्यच होतें पण वक्रतेनें दूषित झालेलें, भ्रमाने भरलेलें व मिथ्या कल्पनेनें भारलेलें असें तें सत्य होतें हें आपण आतां उमजतों. आतांहि आपल्याला विभाग दिसतात; व्यक्ती, अणु, परमाणु यांची दृष्टि आतांहि आपल्याला प्रतीत होते; पण हें सर्व वस्तुत: काय आहे, आपण वस्तुत: काय आहों, हें ज्ञान आपल्याला या ठिकाणीं स्पष्ट असतें. दिव्य-मन आणि सत्यमय जाणीव किंवा अतिमानस यांचा अन्योन्यसंबंध येथें आपल्याला स्पष्ट दिसतो. दिव्यमन हें वस्तुत: सत्यमय जाणिवेचें एक गौण कार्य आहे, व्यवहाराचें एक गौण साधन आहे हें आपल्याला दिसतें. जोंपावेतों अतिमानसिक स्वामित्व-जाणिवेला, सर्वसमावेशक सर्वेशत्व-जाणिवेला अवमानून मन आपलें वेगळें आत्मत्व कल्पून,

 

पान क्र. ३२१

 

वेगळें घर करून वागत नाहीं, एक साधन म्हणून सर्वेशत्व-जाणिवेचें काम निमूटपणें करतें, आपल्या खासगी लाभासाठीं कांहीं गोष्ट आपल्या मालकीची समजत नाहीं, तोंपावेतों तें त्याचें नियत कर्तव्य सोज्ज्वळपणें करूं शकतें व करीत असतें. विश्वांत सत्य एक व रूपें अनेक अशी वस्तुस्थिति आहे. मन आपलें कर्तव्य जेव्हां योग्य रीतीनें करतें, तेव्हां हीं अनेक रूपें एकमेकांपासून वेगळीं ठेवण्याचें काम तें करतें, मात्र हें वेगळेपण त्यांच्या त्यांच्या मर्यादित व्यापारानुसार केवळ तांत्रिक वा वरवरचें असें कल्पिलेलें असतें. आत्म्याची एकच एक सर्वव्यापी स्पष्ट व निर्दोष अशी जाणीव, त्या तांत्रिक वेगळेपणाच्या मागें त्याचें व्यवहाराचें नियंत्रण व शासन करीत असते. हें दिव्य-मन सत्याच्या आश्रयानेंच नेहमीं काम करतें, सत्याला केव्हांहि दृष्टीआड करीत नाहीं; स्वत: वस्तुसत्य आत्मसात् करून, त्या सत्याची वांटणी सर्वोच्च सर्वव्यापी आत्मदृष्टीच्या व आत्म-संकल्पाच्या बिनचूक प्रतीतीनुसार व्यक्तीव्यक्तींत व रूपारूपांत करणें हें दिव्य-मनाचें काम असतें. क्रियाशील जाणीव, आनंद, शक्ति व द्रव्य यांचें व्यक्तीव्यक्तींत वांटप हें दिव्य-मन करतें आणि या वांटपाची सर्वसमर्थता, सत्यता व आनंदमयता, व्यक्तींच्या पाठीमागें असलेल्या अनिवार्य सर्वव्यापी आत्म्यामुळेंच शक्य आहे ही जाणीव दिव्य-मन नेहमीं ठेवतें. एकतत्त्वाचीं अनेक रूपें वरकरणीं विभक्त ठेवण्याचें, या रूपांचे अन्योन्यसंबंध निश्चित करण्याचें व या संबंधांना कमी अधिक स्थायी रूप देऊन हीं अलग झालेलीं सर्व रूपें पुन: एक होऊन एकमेकांत मिळतील असें करण्याचें काम दिव्य-मनाचें असतें. शाश्वत एकता आणि शाश्वत अन्योन्यसंमीलन हें सत्य नित्य पुढें ठेवून, त्याच्या पोटांत व्यक्ती अलग होऊन पुन: अन्योन्य-संपर्काचा आनंद भोगतील अशी व्यवस्था करण्याचें काम दिव्य-मनाचें असतें. मूळ सत्य एकचएक आत्मा हें आहे. या आत्म्यानें आपली मूळ एकता नित्य संभाळून, वरकरणी व्यक्ति होऊन, इतर व्यक्तींशीं नानाविध व्यवहार करण्याचा खेळ खेळावा अशी व्यवस्था करणें हें दिव्य-मनाचें काम आहे. विश्व हें वस्तुत: अशा खेळाचें क्षेत्र आहे; असा खेळ म्हणजेच विश्व होय. त्रिपुटीयुक्त (त्रिपुटी = ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान) सत्यमय जाणिवेचें अंतिम कार्य म्हणजे दिव्य-मन आणि या दिव्य-मनामुळेंच वर सांगितलेला एकतत्त्वाचा अनेकतामय व्यवहार शक्य होतो. अविद्या, अज्ञान म्हणून जें ओळखलें जातें, तें कांहीं नवी गोष्ट बनवीत नाहीं; किंवा सर्वस्वीं मिथ्या अशी गोष्टहि बनवीत नाहीं. तें केवळ

 

पान क्र. ३२२

 

यथातथ्यता टाकून अयथार्थतेनें आपणापुढें सत्य ठेवीत असतें. परम सत्य, एकचएक आत्मा विश्वरूपानें व्यक्त झाला आहे आणि हा विश्वरूपाचा खेळ सर्वथा सुसंवादित्वानें चाललेला आहे. हेंच परम सत्य, सर्व ज्ञानाचें मूळ आहे, या मुळांतूनच दिव्य-मनाचें ज्ञान येतें; दिव्य-मन त्याच्या ज्ञानाच्या उगमापासून--मूळ आत्म्यापासून--जाणिवेनें, कल्पनेनें विभक्त होणें म्हणजेच अविद्या, अज्ञान होय; मी वेगळा, आत्मा वेगळा अशी जाणीव म्हणजे अज्ञान वा अविद्या. विश्वाच्या सुसंवादमय खेळांत अविद्याग्रस्त किंवा अदिव्य मन विसंवाद आणि विरोध यांचा देखावा पाहतें, हे विसंवाद आणि विरोध तात्पुरते नसून कायम स्वरूपाचे आहेत, असा समज करून घेतें, पण हा त्याचा समज खोटा असतो, त्याला दिसणारा केवळ वरवरचा देखावाच असतो. वस्तुत: विश्वरूपानें झालेला परम सत्याचा आविष्कार सुसंवादमय आहे, यांतील कोणतेच दर्शनी विसंवाद कायम स्वरूपाचे नसून, व्यापक व अंतिम दृष्टीनें ते विश्वखेळाच्या सुसंवादित्वांत भर घालणारे आहेत. त्यांत जे विसंवाद, विरोध व जो कडक एकांगीपणा दिसतो, तोहि अज्ञानामुळे दिसतो. वस्तुत: या खेळांत लवचिक नियमांनीं काम चालत असतें. खोटाच कडकपणा, खोटाच विसंवाद व विरोध खरा म्हणून जें भासवितें तेंच अज्ञान. दिव्य-मन अतिमानसिक सत्यमय जाणिवेपासून सत्यज्ञान मिळवितें; तें या ज्ञानाच्या उगमापासून दूर होऊन वेगळें झालें, स्वतःला वेगळें व स्वतंत्र समजू लागलें म्हणजे अज्ञानाचा प्रभाव सुरू झाला, दिव्य मनाचें अदिव्य मन झालें असें समजावें.

तेव्हां, मनाची मूलभूत चूक ही कीं, तें आत्मज्ञानच्युत होतें, आत्मस्वरूपासंबंधाचें सत्यज्ञान तें घालवून बसतें; या च्युतीमुळें, या अध:पतनामुळें वैयक्तिक आत्मा आपलें व्यक्तित्व एक स्वतंत्र वस्तु आहे असें मानूं लागतो, एकमेव अद्वितीय सत्याचें अनन्तरूपांतील एक रूप आपण आहों याची विस्मृति त्याला होते; विश्वव्यापक, विश्वरूप एकमेव सत्याच्या अनेक, अनंत केंद्रांपैकीं एक केंद्र आपण आहों, या गोष्टीचा विसर त्याला पडतो आणि स्वतःला स्वतंत्र केंद्र समजून, आपल्याभोंवतीं स्वतंत्र विश्व उभें करण्याची चूक तो करतो. वैयक्तिक आत्म्याची मूलभूत चूक वर सांगितली-- या चुकीचा परिणाम म्हणून त्याचे ठिकाणीं नाना प्रकारचें विशिष्ट अज्ञान उत्पन्न होतें; तसेंच नाना प्रकारच्या विशिष्ट मर्यादा व बंधनें त्याला अडवितात आणि त्याचें जीवन संकुचित करतात. नदीच्या

 

पान क्र. ३२३

 

अखंड प्रवाहाप्रमाणें वस्तुजात हें प्रवाही आहे. या प्रवाही विश्वाचा कांहीं अंश वैयक्तिक आत्म्यावरून व आत्म्यांतून वाहत चोहोंकडे पसरतो, वैयक्तिक आत्मा हा अंशच फक्त बघतो; वैयक्तिक आत्मा या अंशदर्शित्वामुळें आपल्या अस्तित्वाला मर्यादा घालतो; त्याचें अस्तित्व मर्यादित झालें कीं त्याची जाणीव, अर्थात् त्याचें ज्ञान, जाणीवयुक्त शक्ति व इच्छाशक्ति अर्थात् सामर्थ्य, आणि आत्मानन्द अर्थात् जीवनानन्दहि मर्यादित होतो. वैयक्तिक आत्म्याला वस्तूंचें जें ज्ञान होतें तें, त्याच्या व्यक्तित्वावर वस्तूंचा जो ठसा उमटेल, त्याच्या व्यक्तित्वाला वस्तूंचा जो देखावा दिसेल त्यावरूनच केवळ होतें; अर्थात् या देखाव्यांत अंतर्भूत न होणाऱ्या अशा गोष्टींचें ज्ञान त्याला होत नाहीं; त्यांच्यासंबंधानें तो अज्ञानांत राहतो आणि म्हणून जें ज्ञान आपल्याला झालें असें तो मानतो, तेंहि बिनचूक असूं शकत नाहीं; सर्व अस्तित्व अन्योन्यावलंबी असल्यानें सर्वाचें ज्ञान, निदान सारभूत भागाचें ज्ञान असल्याशिवाय कोणत्याहि भागाचें यथार्थ ज्ञान होऊं शकत नाहीं. मानवी ज्ञानांत या कारणानें चुकीचा भाग सर्वत्र असतो. ही मानवी ज्ञानाची गोष्ट झाली. आमची इच्छाशक्ति सर्वेशाच्या इच्छाशक्तीचा एक अंशरूप असते; अर्थात् ही आमची आंशिक इच्छा ईश्वराची तदितर इच्छा जाणत नसल्यानें, कार्यप्रवणतेनें कामास लागली तरी कामांत निश्चितपणें चुका करते, तिचें कार्य प्रमादशील होणें अनिवार्य असतें आणि कमी अधिक असमर्थता आणि दुर्बळता तिच्या वांट्यांस अटळपणें येते; तसेंच त्याचा आत्मानन्द आणि वस्तुनिष्ठ आनंद हा सर्वेशाचा सर्वानन्द जाणत नाहीं, तो जाणून घेण्याची शक्ति त्याला नसते व भावनाहि त्याला नसते; त्याची इच्छाशक्ति दुर्बळ, त्याची ज्ञानशक्ति दुर्बळ अर्थात् जें विश्व तो स्वतःचें म्हणून मानतो, तें त्याला आपल्या तंत्रानें चालविणें अशक्य होतें--अर्थात् वस्तुनिष्ठ वस्तुशासनाचा आनंद त्याला हवा तसा प्राप्त होत नाहीं. एकंदरींत सर्वानन्दाच्या प्रतीतीच्या अभावीं, त्याचा आत्मानंद हिणकस आणि वस्तुविजयाच्या अभावीं वस्तुनिष्ठ आनंदहि हिणकस, अशी त्याची स्थिति होते; आत्मजयाचा आणि वस्तुजयाचा आनन्द मिळविण्याची अपात्रता त्याचे ठिकाणीं स्वतंत्र व्यक्तित्वामुळें आल्यानें, त्याला दुःखभोग अनिवार्य होतो. याप्रमाणें अविद्या, आत्मविषयक अज्ञान हेंच आमच्या जीवनाच्या एकंदर विकृतीचें एकमेव मूळ आहे, आत्मविषयक अज्ञानानें अहंभावाचें रूप घेतलेलें आहे, या अहंभावानें आत्म्याला मर्यादांचें बंधन

 

पान क्र. ३२४

 

घातलेलें आहे; हें बंधन व हा अहंभाव सर्व जीवनविकृतीचा भक्कम आधार होऊन बसला आहे.

तथापि एक गोष्ट ध्यानांत ठेवणें अवश्य आहे ती ही कीं, अज्ञान आणि विकृति ही कांहीं निर्भेळ असत्याचा खेळ नव्हे, तर वस्तुजातांतील सत्य आणि ऋत यांचा कमीअधिक विपर्यास मात्र आहे. मन हें स्वभावत: विभाग पाडतें, यांत कांहीं दोष नाहीं; पण स्वत: पाडलेल्या विभागांच्या पोटीं तें स्वतःला बंद करून घेतें आणि या बंदीखान्यांतून विश्वाकडे बघतें; म्हणून सर्व सत्यविपर्यास होतो. त्यानें जर स्वतःकडे आणि स्वत: पाडलेल्या सत्य वस्तूच्या विभागांकडे, तीं सत्याच्या-सच्चिदानन्दाच्या लीलेचीं साधनें वा लीलेसाठीं घडलेलीं दर्शनी रूपें आहेत, या दृष्टीनें पाहिलें, तर सत्यविपर्यास होण्याचें आणि त्याचा परिणाम म्हणून जीवन विकृत होण्याचें कांहीं कारण राहणार नाहीं. ज्या सत्याला विसरून दिव्य-मन पतित होऊन, सामान्य मानवी मन झालें, त्या सत्याचा आश्रय त्यानें जर परत केला, तर सत्यमय जाणिवेचें अंतिम त्रिपुटीयुक्त कार्य हें स्वरूप त्याला परत प्राप्त होऊन, या दिव्य अवस्थेंत प्राप्त होणाऱ्या सामर्थ्यानें व प्रकाशानें जे संबंध हें दिव्य-मन निर्माण करील, ते सर्व संबंध सत्यमय असतील; विकृतिमय असणार नाहींत. वैदिक ऋषि वस्तूंचें आणि घटनांचें ऋजु (सरळ गोष्टी) व वक्र (वांकड्या, वळणावळणाच्या गोष्टी) असें वर्गीकरण करतात. या उद्‌बोधक वर्गीकरणानुसार बोलावयाचें, तर सत्याचा परत आश्रय करणाऱ्या मनाकडून घडून येणारे वस्तुसंबंध ऋजू, सरळ असतील; वक्र, वळणावळणाचे असणार नाहींत; दुसऱ्या शब्दांत म्हणावयाचें, तर हें सत्याश्रयी मन दिव्य, ईश्वरी जीवनाचीं सत्यें पुन: प्रस्थापित करील; मन सत्याश्रयी झाल्यानें, वैयक्तिक आत्मा हा व्यक्तित्वाला त्याचें योग्य (ईश्वरी लीलेचें साधन म्हणून) स्थान देऊन, ईश्वरी अस्तित्वाशीं एकरूप होईल आणि त्या अस्तित्वाशीं निगडित असलेली आत्मतंत्र दिव्य-जाणीव, इच्छा व आनन्द आत्मसात् करून, आपल्या सर्व क्रिया, आपल्या स्वतःच्या अनन्त क्षेत्रांत पूर्ण सुसंवादित्वानें करीत राहील. सध्यां आमची वाटचाल सरळ मार्गानें होत नाहीं. मन आणि प्राण यांची वाटचाल म्हणजेच आजची आमची वाटचाल. यांची आजची हालचाल वाकड्‌यातिकड्‌या वळणावळणांनीं चाललेली आहे. आमचा आत्मा स्वतःचें खरें स्वरूप विसरून बसला असून, तें स्वरूप पुन: प्राप्त करून घेण्यासाठीं

 

पान क्र. ३२५

 

धडपड करीत आहे; या धडपडींत त्याला वेडेवांकडे अंगविक्षेप करावे लागत आहेत; आमचा आत्मा, आमचा प्राण व आमचें मन स्वतःचें म्हणजेच आत्म्याचें मूळ स्वरूप पुन: मिळावें यासाठीं वांकडीतिकडी धडपड करीत आहेत. या धडपडीचा हेतु थोड्‌या विस्तारानें सांगावयाचा, तर आमच्या भ्रमांचा अन्त होऊन सत्याचा पुन्हां उदय होण्यासाठीं ही धडपड आहे; आज आम्ही ज्याला सत्य किंवा भ्रम, न्याय किंवा अन्याय मानतों, तें सर्वच मूळ सत्याला मर्यादित करीत आहे किंवा विपर्यस्त करीत आहे; म्हणून हें सर्व भ्रांतीचें, प्रमादाचें भांडार नाहींसें करून, खऱ्या सत्याची पुन्हां प्रस्थापना करण्यासाठीं आमच्या आत्म्याची, मनाची व प्राणाची वेडीवाकडी धडपड चाललेली आहे; आज आम्ही जिला सामर्थ्य समजतों व जिला दुर्बलता समजतों, त्या दोन्ही गोष्टी मूळ शक्तीच्या खटाटोपाचा भाग आहेत आणि आमची आजची सर्व प्रकारची अक्षमता दूर होऊन, आमच्यांत खरी क्षमता येण्यासाठीं हा खटाटोप चालला आहे. आज आम्ही जिला सुख समजतों व जिला दुःख समजतों त्या दोन्ही गोष्टी संवेदनाशक्तीच्या तडफडीचा भाग आहेत आणि आजचें आमचें सर्व प्रकारचें दुःख दूर होऊन, त्याची जागा निरामय आनंदानें घ्यावी यासाठीं ही अंग मोडून तडफड चालली आहे; आज आम्ही ज्या गोष्टीला जीवन म्हणतो व ज्या गोष्टीला मरण म्हणतो, त्या दोन्ही गोष्टी मूळ अस्तित्वाच्या नित्याच्या खटपटीचा भाग आहेत आणि आम्हांपासून मरण दूर जाऊन, त्याची जागा अमरत्वानें घ्यावी, आमच्या अस्तित्वानें, जीवनानें परत आपल्या अमरत्वाची प्राप्ति करून घ्यावी यासाठीं ही खटपट चाललेली आहे; अर्थात् आमच्या अविद्याग्रस्त आत्म्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा पुनर्लाभ होणें म्हणजे पूर्णसत्य, सर्वसमर्थता, नित्यानन्द व अमरता यांचा पुनर्लाभ होणें आहे; व या पुनर्लाभासाठीं आमचा आत्मा, मन व प्राण यांची सारखी धडपड सुरू आहे.

 

पान क्र. ३२६

 

प्रकरण एकोणिसावें

 

प्राणशक्तिमय जीवन

 

प्राणशक्ति हीच भूतांचें जीवन होय; प्राणालाच विश्वव्यापी जीवनतत्त्व म्हटलें आहे.

- तैत्तिरीय उपनिषद् २, ३.

 

आमचें मानवी जीवन बनविणाऱ्या तीन कनिष्ठ घटकांपैकीं मन हें सर्वश्रेष्ठ घटकतत्त्व आहे. या मनाचें उगमस्थान, दिव्य ईश्वरी अतिमानसिक क्षेत्र आहे आणि हें मन सत्यमय जाणिवेशीं निगडित आहे; दिव्यमन कसें असतें आणि सत्यमय जाणिवेशीं त्याचा संबंध काय आहे हें आपण पाहिलें आहे. ईश्वरी जाणिवेचें एक खास विशिष्ट कार्य म्हणजे मन होय; किंवा असे म्हणतां येईल कीं, ईश्वरी जाणिवेच्या निर्मितिकार्याचा अंतिम भाग म्हणजे मन होय. पुरुषाला, आत्म्याला या मनाच्या शक्तीनें आपल्या विविध रूपांचे आणि शक्तींचे अन्योन्य संबंध व्यवस्थितपणें वेगळे वेगळे ठेवतां येतात. या मनाकडून जे दर्शनी भेद निर्माण केले जातात, त्यांचा ईश्वरी लीलेला उपयोग असतो; मात्र वैयक्तिक आत्मा सत्यमय जाणिवेच्या संपर्काला मुकला म्हणजे हे दर्शनी भेद मौलिक व खरेखुरे भेद आहेत अशी त्याची प्रामाणिक भावना होते; आणि या मूळ विकृतीपासून पुढें अनेक विकृती निर्माण होतात; अविद्येच्या, अज्ञानाच्या बंधनांत पडलेल्या आत्म्याच्या जीवनांत, स्वभावतःच जीं द्वंद्वें, जे विसंवाद गोंधळ घालतात, ते सर्व वर सांगितलेल्या मूळ विकृतीचीं फळें होत. जोपर्यंत आपल्या जन्मदात्या अतिमानसाला मन चिकटून असतें, तोंपर्यंत तें विकृतींना आणि असत्यांना थारा देत नाहीं, तर सर्वव्यापी सत्याच्या विविध प्रकारच्या निर्मिति-कार्याला आपल्या विशिष्ट शक्तीचा आधार देत असतें.

विश्वाची निर्मितिकारकता मनाकडे आहे, त्याच्याकडे विश्वव्यापी कार्यकर्तेपण आहे असें वरील गोष्टीवरून दिसतें. पण आम्हांला मनासंबंधींची जी सामान्य कल्पना आहे, त्या कल्पनेनुसार मन हें अनुभूतीचें

 

पान क्र. ३२७

 

साधनरूप इन्द्रिय आहे; जडद्रव्यांत शक्ति जें कार्य करतें, त्या कार्यानें बनलेल्या गोष्टींचा अनुभव आम्हांला आणून देणें, हें आम्हीं सामान्यत: मनाचें कार्य समजतों; मन स्वत: कांहीं निर्माण करीत असेल तर दुय्यम गोष्टी-शक्तीनें जडद्रव्याचीं जीं रूपें बनविलेलीं असतात, त्या रूपांचा एकमेकांशीं संयोग करून 'नवी' गोष्ट बनविणें, असलें दुय्यम रचनेचें काम मन करूं शकतें व करतें असें आम्ही मानतों; यापेक्षां मन अधिक कांहीं स्वतंत्र निर्मिति करूं शकतें असें आम्ही मानीत नाहीं. पण मनासंबंधींची ही आमची कल्पना आतां खोटी ठरत आहे. आम्हांला मनासंबंधींचें जें नवीन ज्ञान प्राप्त होत आहे आणि नवें भौतिक विज्ञान जे शोध लावीत आहे, त्यावरून आम्हांला हें समजूं लागलें आहे कीं, जडद्रव्य म्हणून जें आहे आणि जडशक्ति म्हणून जी शक्ति जडद्रव्यावर कार्य करून, कांहीं रचना करतांना दिसत आहे, त्या जडद्रव्यांत आणि जडशक्तींत मन गुप्तपणें कार्य करीत आहे; त्या दोघांच्याहि पोटीं अप्रकट मन आहे आणि जी रचना जडशक्तीनें केलेली दिसते, ती त्याच्या पोटीं असलेल्या अप्रकट मनामुळेंच शक्य होते; आम्हांला हें अवगत आहे कीं, जडांत मनाचा आविष्कार होतो. प्रथम जडाचे ठिकाणी मन विविध जीवप्रकारांच्या रूपानें व्यक्त होतें, नंतर पूर्वी घडलेल्या जीवांच्या आश्रयानें अप्रकट मन मानसिक शक्तीचे अनेक प्रकार निर्माण करतें, वनस्पति-जीवनांत आणि प्राथमिक देहधारी प्राण्यांच्या जीवनांत नाडीसंघद्वारां जाणीव काम करूं लागते; ही नाडीमय जाणीव जडाच्या पोटीं असलेल्या अप्रकट मनानें घेतलेलें रूप होय. पुढें कमीअधिक विकसित अशा मनुष्येतर प्राण्यांत आणि स्वत: मनुष्यांत, सारखी विकास पावणारी मानसिक संघटना काम करते. ही मानसिक संघटना अप्रकट मनाचें पुढारलेलें व्यक्त रूप होय. हा जो अप्रकट मनाचा आविष्कार क्रमवारीनें जडांत होत असतो, तो अप्रकट मन स्वत: करीत असतें. जडद्रव्य किंवा जडशक्ति ही कांहीं मनाला वर ढकलीत नाहीं--जड तें जड. उलट जडशक्ति ही, मनाचें एक शक्तिरूप आहे असेंच आपल्याला आढळून येईल. जडद्रव्य हें जडशक्तीनें घेतलेलें द्रव्यरूप आहे. मुळांत जडद्रव्य ही वस्तु नाहीं; मुळांत जडशक्ति आहे असें भौतिक विज्ञानाचें अलीकडे सिद्ध झालेलें तत्त्व आहे. या तत्त्वाचें संशोधन होऊन, जडशक्ति म्हणून मुळांत नाहींच, मुळांत मन आहे आणि त्याचें एक रूप जडांत काम करणारी शक्ति हें आहे, असा सिद्धान्त सिद्ध होईल असें मानण्यास

 

पान क्र. ३२८

 

भरपूर जागा आहे. जडशक्ति किंवा भौतिक शक्ति म्हणून जी दिसते, ती वस्तुत: ईश्वरी इच्छेची अप्रकट क्रिया आहे; आमच्यामध्यें काम करणाऱ्या इच्छाशक्तीला ज्ञानाचा आधार असतो, पण तो अर्धवट ज्ञानाचा, पूर्ण ज्ञानाचा नव्हे; भौतिक शक्ति मात्र पूर्ण अज्ञानाच्या अंधारांत काम करतांना दिसते. या दोन शक्ती तत्त्वत: एक आहेत; जडवादी विचारसरणीला हे ऐक्य वा तादात्म्य पटलेलें आहे. खालून केलेल्या जड वस्तूंच्या संशोधनानें व सहज-प्रेरणेनें, जडवाद्यांना हें ऐक्य मान्य झालेलें आहे. हेंच तादात्म्य वरून शोध घेत घेत आध्यात्मिक ज्ञानानें फार पूर्वीं सिद्ध केलेलें आहे. तेव्हां आम्हांला असें म्हणतां येतें कीं, कार्यकारी निसर्गशक्ति किंवा प्रकृति आपल्यांतून व्यक्त करून, तिच्याद्वारां अप्रकट मनानें किंवा बुद्धीनें हें भौतिक विश्व निर्माण केलें आहे.

परंतु मन ही स्वतंत्र वस्तु नाहीं, सत्यमय जाणिवेचें किंवा अतिमानसाचें अन्तिम कार्य, अन्तिम व्यापार म्हणजेच मन होय हें आपल्याला ठाऊक आहे. तेव्हां मन असेल तेथें अतिमानस असलेंच पाहिजे हें आपणाला समजतें. विश्वाच्या अस्तित्वाची खरी निर्माणकर्ती वस्तु अतिमानस किंवा सत्यमय जाणीव होय. आपली जाणीव अंधारमय करून, मन हें जेव्हां अतिमानसापासून विभक्त होतें, तेव्हां देखील मन ज्या क्रिया करतें, त्या क्रियांच्या पोटीं अतिमानसाची विशाल कर्तबगारी उपस्थित असते. मन ज्या कांहीं रचना करतें, त्या रचनांचे अन्योन्यसंबंध व्यवस्थित ठेवावे, कोणत्याहि रचनेच्या पोटीं जें अटळ फळ असेल, तें फळ विकासक्रमानें योग्य वेळीं उदयास आणावें, विशिष्ट योग्य बीजापासून विशिष्ट योग्य वृक्ष अस्तित्वांत आणावा, हें सर्व काम मनाच्या क्रियांच्या पोटीं असलेली गुप्त अतिमानसिक कर्तबगारी करीत असते. जड भौतिक शक्ति ही अंधारमय, प्रेरणाहीन व बुद्धिहीन असतांहि, त्या शक्तीचे व्यापार, हें नियमांनीं बांधलेलें, व्यवस्थायुक्त, योग्य संबंधांनीं युक्त असलेलें असें विश्व परिणामत: अस्तित्वांत आणतात; अव्यवस्थित व अकारण आकस्मिक घटनांनीं भरलेलें असें गोंधळाचें विश्व अस्तित्वांत येऊं देत नाहींत, या घटनेलाहि मनाच्या पोटीं असलेलें अतिमानसच कारण होय. अर्थात् ही जी व्यवस्था व हे जे योग्य संबंध विश्वांत गुप्त अतिमानसिक क्रियेनें स्थापित होतात, ते आदर्श सर्वोत्तम प्रकारचें नसतात. मनाचा व अतिमानसाचा जिव्हाळ्याचा संबंध जर कायम टिकला असतां, मन आपल्या जाणिवेनें अतिमानसापासून विभक्त झालें नसते, तर असे आदर्श

 

पान क्र. ३२९

 

संबंध निर्माण होऊं शकले असते. विभाग पाडण्यांत वाकबगार असलेल्या मनाच्या व्यापाराला अनुरूप अशीच, आज विश्वांतील व्यवस्था आहे; मनाच्या विभागणीच्या क्रियेनें वस्तूंचा व व्यक्तींचा अलगअलगपणा, विरोध, द्वंद्वमय पक्ष, एकाच सत्याचे, सद्‌वस्तूचे अन्योन्यविरोधी पक्ष उत्पन्न होतात; या सर्व मनोव्यापाराला अनुरूप अशी, अर्थात् सर्वश्रेष्ठ आदर्श व्यवस्थेहून निराळी, खालच्या दर्जाची व्यवस्था आज जगांत आहे. दिव्य ईश्वरी जाणीव स्वतःची द्वंद्वमय विभागणी करण्याचा निर्णय घेते; या निर्णयानंतर त्याला अनुरूप अशी सत्यमय कल्पना ती अस्तित्वांत आणते आणि या कल्पनेचा स्वाभाविक अटळ परिपाक म्हणून व्यवहारांत आपलें कनिष्ठ सत्य, विविध संबंधांची निर्मिति हें सत्य प्रस्थापित करतें; कारण विश्वांत सत्याचा किंवा सत्यनियमाचा असा स्वभाव आहे कीं, मूळ अस्तित्वांत जें अन्तर्भूत असतें, मूळ सद्‌वस्तूच्या स्वभावांत आणि सारभागांत जें न्यायतः अगोदरच असतें, दिव्य ईश्वरी ज्ञानाला वस्तूचा जो स्वभाव आणि स्वधर्म म्हणून स्पष्ट दिसतो त्यांत जें लपलेलें असतें, तें तत्त्व व्यक्त करावयाचें; त्या तत्त्वाचा त्याच्या धर्मानुसार आविष्कार व व्यवहार करावयाचा. अर्थात् या कार्यांत समग्र सत्यमय जाणीव ही विशिष्ट सत्यमय कल्पनेच्या पाठीमागें राहून तिचें व्यावहारिक रूपांतर नीटपणें होण्याच्या कामीं आपल्या सर्वश्रेष्ठ शासनाधिकाराचा उपयोग करीत असते. या सर्व ईश्वरी क्रियेचें सूत्रमय वर्णन एका उपनिषदांत (ईशोपनिषदांत) आलेलें आहे. थोडक्या साक्षात्कारी शब्दांत ज्ञानाचें विश्व आमच्या हातीं देणारीं जीं अनेक अद्‌भूत सूत्रें उपनिषदांत सांपडतात, त्यापैकींच पुढील सूत्र आहे : कविर्मनीषी परिभू: स्वयंभूर्याथातथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्य: समाभ्य: ।। परमात्मा स्वयंभू आहे, द्रष्टा आहे, चिंतनशील आहे; चिंतनशील द्रष्टेपणानें तो सर्वत्र सर्व स्थलें आपल्या विभूतींनीं व्यापून आहे; त्यानें आपल्या विभूतिमय विस्तारांत सर्व वस्तू व्यवस्थेनें मांडलेल्या आहेत; ही व्यवस्था शाश्वत कालाची आहे, त्या त्या वस्तूचें जें सत्य-स्वरूप आहे, त्या सत्यस्वरूपानुसार त्यांची त्यांची व्यवस्था त्या परमात्म्यानें शाश्वतकालीन अशी लावलेली आहे. (ईशोपनिषद्, ८)

आजपर्यंत जेवढा विश्वविकास वास्तवांत घडून आलेला आहे, त्या वास्तव विकासाच्या दृष्टीनें आमचें विश्व मन-प्राण-शरीर या तीन भागांचें--त्रिभागात्मक--आहे. जडामध्यें जो प्राण अंतर्हित होता, तो विचार-

 

पान क्र. ३३०

 

प्रवण आणि मानसिक जाणीवयुक्त अशा जीवनांत आतां वावरत आहे. विकासक्रमाच्या नियमानुसार या जीवनाचें रूप त्यानें आतां घेतलेलें आहे आणि या मनांत अतिमानस अंतर्हित असतें; तेव्हां जें मनाच्या पोटीं आहे, तें अर्थात् प्राणाच्या व जडाच्याहि पोटीं आहेच हें आपण जाणतो. अतिमानस हेंच मन, प्राण, शरीर या तिघांचें उगमस्थान व शासक आहे हेंहि आपण जाणतों. शरीर-प्राण-मन यांत अंतर्हित, गुप्त असलेलें हें जें अतिमानस, तेंहि विकासक्रमाच्या नियमानुसार व्यक्त झालेंच पाहिजे हेंहि उघड आहे. तेव्हां आमचें आजचें वास्तव विश्व जरी त्रिभागात्मक आहे, तरी उद्यां, भविष्यकाळी, तें चतुर्भागात्मक व्हावयाचें आहे हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. विश्वाच्या मुळाशीं बुद्धितत्त्व (Intelligence) असलें पाहिजे असें आम्ही म्हणतों याचें कारण, विश्वांत आम्हांला सर्वश्रेष्ठ असें जें तत्त्व प्रतीतीस येतें तें बुद्धितत्त्व होय. आमच्या सर्व कार्याचें आणि निर्मितीचें स्पष्टीकरण करणारें आणि नियंत्रण करणारें तत्त्व 'बुद्धि' हें आहे असें आम्हांस दिसतें. म्हणून आम्ही असें अनुमान करतों कीं, जर विश्वांत चेतना, जाणीव असेल, तर त्या जाणिवेचें स्वरूप बुद्धि, मानसिक जाणीव हें असलें पाहिजे. परंतु बुद्धीहून श्रेष्ठ असें तत्त्व (सत्य) मूळ सद्वस्तूंत आहे; या श्रेष्ठ तत्त्वाकडून (सत्याकडून) जें कार्य घडतें, तें आपल्या शक्तीनुसार बघणें, त्यावर मनन करणें आणि त्याचा व्यवहारांत उपयोग करणें हें बुद्धीचें काम आहे. तेव्हां बुद्धीच्या मागें राहून काम करणारी जी श्रेष्ठ सत्याची शक्ति आहे, ती त्या श्रेष्ठ सत्याला अनुरूप अशी, मानसिक जाणिवेहून वेगळी व तिजहून श्रेष्ठ प्रकारची जाणीव असली पाहिजे, हें उघड आहे. तेव्हां विश्वाच्या मुळासंबंधाची आमची कल्पना आम्हीं बदलली पाहिजे. अप्रकट मन किंवा बुद्धि विश्वरचना करीत नाहीं, तर ही रचना अतिमानसाकडून केली जाते, हें आपण आतां लक्षांत घेतलें पाहिजे. मनाच्या पोटीं अतिमानस गुप्त असतें, तें मनाला पुढें करतें; अतिमानसाच्या ज्ञानमय इच्छाशक्तीचें क्रियाशील असें त्याच्या लगतचें खास स्वरूप म्हणजे मन होय. हें मन दर्शनीं जडशक्तींत अप्रकट रूपानें असतें; ही दर्शनीं जडशक्ति म्हणजे अस्तित्वघटक द्रव्याच्या पोटीं असणारी गुप्त इच्छाशक्तीच होय; या गुप्त इच्छाशक्तीनें भरलेल्या जडशक्तीचा, कार्यकारी निसर्गशक्तीच्या किंवा प्रकृतीच्या रूपानें व नांवानें उपयोग करून, अप्रकट अतिमानसाकडून आपलें हें भौतिक विश्व याप्रमाणें निर्माण केलें जातें.

 

पान क्र. ३३१

 

विश्वविकासाच्या क्रमांत जडांत गुप्त असलेलें (अतिमानसगर्भ) मन, प्रथम शक्तीच्या एका विशिष्ट रूपानें--प्राणशक्तिमय जीवनाच्या रूपानें--व्यक्त होतें हें आपण पाहिलें. हें जीवन म्हणजे काय वस्तु आहे? अतिमानसाशीं या जीवनाचें (Life) नातें कोणतें आहे? सच्चिदानंद या त्रिमुखी मूळ सत्याचें निर्मितीचें कार्य हें, सत्यमय कल्पना, सत्यमय जाणीव यांच्याद्वारां चालत असतें--या सच्चिदानन्दाशीं आमच्या जीवनाचा संबंध कोणता आहे? सत्, चित्, आनंद या तीन तत्त्वांपैकीं कोणत्या तत्त्वांतून आमचें जीवन उदयास येतें? सत्याच्या किंवा भ्रमाच्या, दिव्य किंवा अदिव्य स्वभावधर्माचा परिपाक म्हणजे आमचें जीवन असेल, तर तो स्वभावधर्म, ती निकड कोणती असूं शकेल? प्राचीन काळापासून शतकानुशतकें एक आवाज कायम उठत आहे कीं, ''जीवन हें दोषमय आहे, आभासमय आहे, भ्रांतिमय आहे, वेडेपणानें भरलेलें आहे. शाश्वत आत्म्याची शांति आपणास हवी असेल, तर या जीवनांतून पळून जाणें हाच एक मार्ग आहे'' -- या आवाजांत, या उद्‌घोषांत कांहीं तथ्य आहे काय? तथ्य असेल तर हें असें कां केलें गेलें आहे? शाश्वत परमात्म्यानें आपणा- स्वतःवर म्हणा किंवा आपल्या मायेनें (सर्वांना मोह पाडणाऱ्या भयंकर मायेनें) उत्पन्न केलेल्या जीवांवर म्हणा, हें दोषमय, भ्रांतिमय वेडेपणाचें जीवन, कारण नसतां कां लादलें आहे? किंवा हा शतकानुशतकाचा उद्‌घोष खोटा तर नाहीं? विश्वांतील विविध जीवनाच्या रूपानें कोणतें तरी दिव्य ईश्वरी तत्त्व प्रकट झालेलें आहे अशी तर गोष्ट नाहीं? शाश्वत परमात्मा आनंदमय आहे, त्या सनातन पुरुषाच्या आनंदशक्तीला व्यक्त व्हावयाची इच्छा झाली आणि म्हणून त्या शक्तीनें काल-स्थल-अंकित क्षेत्रांत उडी घेतली असें तर नव्हे? विश्वांत अगण्य लोक आहेत आणि त्या अगण्य लोकांत अब्जावधि प्रकारचे जीव सारखे अस्तित्वांत येत आहेत, हा सारा प्रकार सनातन परमात्म्याची आनंदलीला तर नव्हे?

पृथ्वीवर जें जीवन व्यक्त होत आहे, त्याचा अभ्यास केला असतां असें दिसतें कीं, जडद्रव्य हें पार्थिव जीवनाचा पाया आहे आणि हें जीवन तत्त्वत: एकच एक असलेल्या विश्वशक्तीचें रूप आहे; 'विश्वशक्तीचा धन आणि ऋण दोनहि प्रकारचा अन्योन्यपूरक वेगवान् प्रवाह' असें या जीवनाचें रूप आहे; विश्वशक्ति अविरतपणें काम करीत आहे आणि या कामाचें स्वरूप रूपें घडणें, त्यांच्यांत चेतनेचा प्रवाह सारखा चालूं ठेवून त्यांना चैतन्यमय करणें, रूपांसाठीं लागलेलें जडद्रव्य सारखें वर खालीं

 

पान क्र. ३३२

 

करून, जुनें निकामी झालेलें दूर करून, त्याच्या जागीं नवें कार्यक्षम द्रव्य घालून रूपें कायम ठेवणें, या प्रकारचें असतें; हें चैतन्यमय रूपरचनेचें आणि रूपद्रव्याची काढघाल करून रूपरक्षण करण्याचें, अविरत चाललेलें विश्वशक्तीचें कार्य म्हणजे पृथ्वीवरील जीवन होय. या जीवनकथेवरून हें लक्षांत येईल कीं, आम्ही मरण आणि जीवन यांत जो स्वाभाविक विरोध मानतों, ती आमच्या मनाची चूक आहे. असा विरोध वस्तुत: नसतांना दर्शनी गोष्टींनीं फसून, आमचें मन असे अनेक खोटे विरोध विश्वाच्या अविभाज्य एकतेंत सारखें उभें करीत असतें. हे विरोध अर्थात् आंतरिक सत्याच्या दृष्टीनें खोटे असतात; वरवरचा व्यवहार फक्त पाहिला तर मात्र हे विरोध 'विरोध' म्हणून मान्य करावे लागतात. असो. तेव्हां मरण ही एक जीवनाची अंगभूत प्रक्रिया आहे, जीवनरूप क्रियेचा मरण हा एक अंश आहे, स्वतंत्र रीतीनें मरणाला कांहीं अस्तित्व नाहीं, त्यांत सत्यता नाहीं. जीवनाची अविरत प्रक्रिया म्हणजे रूपघटक द्रव्य विघटित करून बाजूला टाकणें आणि त्या दूर केलेल्या द्रव्याच्या जागीं नवें द्रव्य संघटित करून घालणें व या रीतीनें विशिष्ट रूप रक्षण करणें किंवा तें रूप निकालांत काढून विघटित करून इतर द्रव्यांतून नवें रूप बनविणें-- या जीवन प्रक्रियेंत ''मरण'' म्हटली जाणारी विघटनप्रक्रिया अंतर्भूत आहे. सामान्यत: रूपाच्या जीवनावस्थेंत रूपद्रव्याचें जें विघटन (व संघटन) हळूं हळूं चालूं असतें, ते ''मरण'' प्रक्रियेंत जोरानें व त्वरेनें होतें एवढेंच. विविध अनुभवांसाठीं जीवनाला विविध रूपांची नितांत आवश्यकता असते--मरणरूपी शीघ्र द्रव्यविघटनाची क्रिया जीवनाच्या वरील आवश्यकतेला साहाय्यक म्हणून घडून येत असते. शारीरिक मृत्यूच्या क्रियेंतसुद्धां जीवन कांहीं मरत नाहीं; फक्त त्याच्या एका रूपाचें द्रव्य मोडतोड करून, त्याच्यासाठी निश्चित केलेल्या दुसऱ्या रूपांच्या बनावटीसाठीं वापरण्यांत येतें. बाह्य शारीर आकाराच्या आंत मानसिक शक्ति, आत्मिक शक्ति असते, तीहि जीवशक्तीप्रमाणेंच अमर असते व मोडतोडीनें शरीर निकामी झालें म्हणजे तीहि तें शरीर सोडून दुसरीं शरीरे धारण करण्यासाठीं वाटचाल करूं लागते आणि योग्य वेळीं दुसरीं शरीरें धारण करते. सर्व कांहीं नवीं नवीं रूपें धारण करतें, नाश म्हणून कशाचाहि होत नाहीं, निसर्गाचा हा नियम सर्व गोष्टींना सारखाच लागूं असणारा आहे

पृथ्वीवरील जीवनाच्या या कथेवरून असा निष्कर्ष निघतो कीं,

 

पान क्र. ३३३

 

जीवनशक्ति किंवा गतिमय शक्ति सर्वव्यापी अशी एकच आहे; तिचा भौतिक विभाग हा तिचा सर्वांत बाहेरचा गतिप्रकार आहे; भौतिक विश्वांत जीं कांहीं रूपें आहेत, तीं सर्व रूपें या एका सर्वव्यापी क्रियाशील जीवनशक्तीनें निर्माण केलीं आहेत. ही एकच एक जीवनशक्ति, अविनाशी आणि नित्य स्वरूपाची असल्यानें, विश्वाची मूर्ति सर्वच्या सर्व नष्ट झाली, तरी ती शक्ति नष्ट होणार नाहीं; ती कायम काम करीत राहील आणि जुन्या विश्वाच्या जागीं नवें विश्व निर्माण करील. जीवनशक्तीपेक्षां श्रेष्ठ असणाऱ्या शक्तीनें तिला अडविलें किंवा तिनें स्वतःच काम थांबविण्याचें ठरविलें तर गोष्ट निराळी--एरवीं निसर्गनियमाप्रमाणें तिनें विश्वाची उभारणी सारखी करीत राहणें हें अटळ आहे. तेव्हां विश्वांत रूपांची बांधणी, राखण आणि विनाश करणारी शक्ति म्हणजे जीवनशक्ति असें ठरतें; पृथ्वीचें रूप हें या जीवनशक्तीचें एक व्यक्तरूप आहे; पृथ्वीवर उगवणाऱ्या वनस्पती हें त्याच शक्तीचें रूप आहे; वनस्पतींतील जीवन-शक्ति किंवा एकमेकांची जीवनशक्ति भक्षून, पचवून आपलें अस्तित्व टिकविणारे प्राणी, या जीवनशक्तीचींच रूपें आहेत. जें कांहीं सर्व अस्तित्वांत आहे, तें सर्वव्यापी जीवन आहे; जडाचेंहि रूप धारण करणारें सर्वव्यापी जीवन एकच एक आहे. विविध निर्मितीच्या उद्देशानें प्रथम हें जीवन भौतिक जड प्रक्रियेंत जीवनाची प्रक्रिया गुप्ततेनें ठेवील, नंतर मनाच्या खालची संवेदना-शक्ति हें रूप तें धारण करील, नंतर मनानें युक्त अशी प्राणमयता, जीवता हें रूप धारण करील--असा कांहींहि क्रम जीवनशक्तीनें स्वीकारला, तरी 'निर्मितिशील जीवनतत्त्व' हें त्या शक्तीचें मूळ स्वरूप, या सर्व विकासक्रमांत कायम असेल.

असा एक पक्ष पुढें येण्याचा संभव आहे कीं, जीवन म्हणून आम्ही जें ओळखतों, तें हें व्यापक जीवन नव्हे; विश्वशक्तीचा जो विशिष्ट परिणाम आमच्या नेहमींच्या अनुभवांतला आहे आणि जो वनस्पति, मनुष्येतर प्राणी व मनुष्य यांत व्यक्त झाला आहे--परंतु धातु, दगड, वायु यांत जो व्यक्त नाहीं, जो प्राणिवर्गाच्या पेशींत कार्यकारी आहे, पण जो शुद्ध भौतिक अणुपरमाणूमध्यें काम करीत नाहीं--तो विश्वशक्तीचा विशिष्ट परिणाम, आम्ही जीवन या नांवानें ओळखतो. या पक्षाची आतां चिकित्सा करूं. या पक्षानुसार ज्या विश्वशक्तीच्या परिणामाला जीवन हें नांव दिलें जातें, तो परिणाम काय वस्तु आहे, त्याचें स्वरूप काय, त्याचे बरोबर घटक कोणते याचें परीक्षण करून, जड वस्तूचे ठिकाणीं त्याच विश्व-

 

पान क्र. ३३५

 

शक्तीचा जो परिणाम होतो, ज्याला आपण जीवन हें नांव देतो, तो परिणाम आणि हा पक्ष ज्या परिणामाला 'जीवन' हें नांव देत नाहीं तो परिणाम--या दोन परिणामांत काय अंतर आहे तें आपण पाहूं. विश्वशक्तीच्या व्यापाराचीं पृथ्वीवर तीन क्षेत्रें आहेत. प्राणिवर्ग (मनुष्यप्राणी सुद्धां), वनस्पतिवर्ग आणि ज्यांत जीवन नाहीं असें आम्हीं मानतो तो तिसरा केवळ जड भूतवर्ग; आमच्यांतील जीवन आणि वनस्पतींतील जीवन, वनस्पतिजीवन आणि धातुवर्गाचें अ-जीवन--धातुवर्ग ज्या जुन्या खनिजवर्गांत (जड भूतवर्गांत) मोडतो त्या खनिज वर्गाचें किंवा नव्या भौतिक विज्ञानानें शोधून काढलेल्या नव्या रसायन वर्गाचें अ-जीवन (जडत्व)-- यांत काय अंतर आहे त्याचा आतां विचार करूं.

सामान्यत: जीवन याचा अर्थ प्राणिवर्गाचें जीवन असा आम्ही करतों ! हें जीवन हलतें, चालतें, श्वासोच्छ्वास करतें, खातें, सुखदुःख भोगतें, शीतोष्णादि ओळखतें, इच्छा करतें; वनस्पतीसंबंधानें जेव्हां जीवन हा शब्द आम्ही उपयोगांत आणतों, तेव्हां तो पुष्कळ अंशीं अलंकारिक रीतीनें; वनस्पति-जीवन ही शुद्ध जड-भौतिक प्रक्रिया आहे; त्यांत जीव-प्रक्रिया जवळजवळ नाहींच असा समज अलीकडे अलीकडे देखील होता. जीवनाचा श्वासोच्छ्वासाशीं जोडलेला संबंध--जीवन म्हणजे श्वासोच्छ्वास हा समज--फार जुना आहे : प्रत्येक भाषेंत अशा प्रकारची समजूत व्यक्त झालेली दिसते; श्वासोच्छ्वास म्हणजे जीवन हें सूत्र खरें धरावयाचें असल्यास श्वासोच्छ्वासाचा अर्थ बदलावा लागेल. असो. हें उघड आहे कीं, स्वयंचलन, स्थलान्तर करणें, श्वासोच्छ्वास करणें, खाणें पिणें, या क्रिया म्हणजे खुद्द जीवन नव्हे, तर त्या जीवनाकडून घडणाऱ्या जीवन-साहाय्यक क्रिया-प्रक्रिया आहेत; आमची जीवनशक्ति म्हणजे सतत चालना देणारी शक्ति होय. या शक्तीच्या उत्पत्तीसाठीं किंवा कार्यप्रवृत्तीसाठीं साधनभूत गोष्टी म्हणून, तसेंच आमचें द्रव्यघटित अस्तित्व टिकविण्यास जी द्रव्याची मोडतोड आणि पुनर्रचना अवश्य असते ती करण्यासाठीं साधनसंभार म्हणून, खाणेंपिणें, श्वासोच्छ्वास वगैरे गोष्टींचें महत्त्व आहे. तथापि श्वासोच्छ्वास, खाणेंपिणें या गोष्टी उपलब्ध नसतांहि आमची जीवनशक्ति टिकूं शकते, इतर साधनांनीं टिकवितां येते, ही गोष्ट लक्षांत घेणें अवश्य आहे. श्वासोच्छ्वास, हदयाचे ठोके किंवा याचेपूर्वीं अवश्य समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या कांहीं क्रिया कांहीं काळ थांबवूनहि मानवी जीवनशक्ति मनुष्याच्या शरीरांत टिकून

 

पान क्र. ३३५

 

राहते; आणि या शक्तीबरोबर त्याची जाणीवहि पूर्णपणें टिकून राहते, ही गोष्ट प्रयोगांनीं सिद्ध झालेली आहे. वनस्पतींच्या बाबतींत असा पुरावा पुढें आला आहे कीं, त्यांचा भौतिक जीवनक्रम आमच्या भौतिक जीवनक्रमासारखाच आहे, त्या जीवनाची संघटन-व्यवस्थाहि बाह्यतः वेगळी भासली, तरी आमच्यासारखीच आहे--मात्र आमच्याप्रमाणें वनस्पती ही प्रतिक्रिया जाणून करतात असें आम्हांला अद्यापि म्हणतां येत नाहीं.

नुकतेच जे शोध* लावले गेले आहेत, त्यांत एका सुविख्यात भारतीय विज्ञानकोविदानें या गोष्टीकडे विशेष लक्ष वेधलें आहे कीं, जीवनाची अचूक निशाणी म्हणजे प्रयोग-विषयाची बाह्य प्रेरणेला आंतून होणारी प्रतिक्रिया ही होय. या वैज्ञानिकानें वनस्पति-जीवनावर विशेष प्रकाश टाकला आहे; परंतु ही गोष्ट लक्षांत ठेवणें अवश्य आहे कीं, धातू हेहि वनस्पतींप्रमाणें प्रतिक्रिया दाखवितात हें या वैज्ञानिकानें सिद्ध केलें आहे. वनस्पती आणि धातू स्वतःमधील जीवनाची भावात्मक अवस्था व अभावात्मक अवस्था (अर्थात् मरण) या दोन्ही अवस्था, विशिष्ट प्रेरणांना विशिष्ट प्रतिक्रिया दाखवून आमच्या नजरेस आणतात. वनस्पतींत जीवन आहे या संबंधींचा पुरावा भरपूर आहे. धातूंच्या संबंधांत

-------------------------

*नुकत्याच झालेल्या वैज्ञानिक संशोधनांतील विचार या ठिकाणीं घेतले आहेत. जडांत जीवनाची प्रक्रिया व स्वभावधर्म या संबंधानें आम्हीं मांडलेल्या विचारांना अप्रत्यक्षपणें पुष्टिदायक म्हणून ते आम्हीं घेतले आहेत. आधुनिक विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचे प्रांत व चिकित्सापद्धती वेगळ्‌या आहेत. हीं शास्त्रें एकमेकांवर आपले सिद्धांत लादूं शकत नाहींत. तथापि आम्हीं जर हें मान्य केलें कीं, सत्ता (अस्तित्व) आणि निसर्ग यांची अवस्था कोणतीहि असो, त्या सर्व अवस्थांत त्या दोहोंमध्यें असणारें सामान्य सत्य व्यक्त करणारी समान गोष्टींची माला सर्व अवस्थांतून दृग्गोचर होते--आणि हें मान्य करणें युक्तीला, तर्काला धरून आहे--तर असें अनुमान करणें योग्य आहे कीं, विश्वांत जी आदिशक्ति काम करीत आहे, तिची प्रक्रिया आणि स्वभावधर्म यांजवर भौतिक विश्वाचीं सत्यें कांहीं प्रकाश टाकूं शकतील; हा प्रकाश अर्थातच सर्वांगपूर्ण असूं शकणार नाहीं--कारण भौतिक विज्ञान त्याच्या चिकित्सा-क्षेत्रांत अपरिहार्यपणें मर्यादाबद्ध व अपूर्ण असतें, आदिशक्तीच्या अप्रकट क्रियांचा पत्ता त्याला लागूं शकत नाहीं.

 

पान क्र. ३३६

 

तितका भरपूर पुरावा नाहीं; -- तथापि जेवढा पुरावा आहे तेवढा निःसंशय असल्यानें, धातु हे जीवनशक्तियुक्त आहेत असें ठरतें. धातूंमध्यें जीवन आहे; तसेंच तें धातूंच्या जातीचे दुसरे पार्थिव पदार्थ आणि स्वत: पृथ्वी यांतहि गुप्त किंवा प्राथमिक स्वरूपांत असलें पाहिजे, असें अनुमान करणें शास्त्रशुद्ध आहे. पृथ्वी व तिजवरील पदार्थ यांचें जीवनविषयक संशोधन आम्हीं बरेंच लांबवर नेलें, तर आम्हांला असें आढळून येईल कीं, पृथ्वी आणि तिजवर तयार होणारे धातू, त्याचप्रमाणें धातू आणि वनस्पती, तसेंच पृथ्वीचे घटक-अणू व मूलतत्त्वें आणि पृथ्वी यांजमध्यें जीवन हें सारखें, खंड न पडतां, भरलेलें आहे. अणु, पृथ्वी, धातु, वनस्पति अशा पायऱ्यांची जी अस्तित्वाची शिडी आहे, त्या शिडीच्या सर्व पायऱ्यांत जीवन अखंडपणें आहे, वरच्या वरच्या पायरींतील जीवन खालच्या पायरींत गुप्त असतें व विकासक्रमानें आधीं खालच्या व मग वरच्या पायरीवर व्यक्त होत असतें, एवढेंच. जीवन सर्वत्र आहे. तें गुप्त किंवा व्यक्त, संघटित किंवा प्राथमिक स्वरूपाचें, अंतर्हित किंवा विकसित, अशा कोणत्याहि स्वरूपांत असेल, पण तें सर्वत्र आहे, सर्वव्यापक आहे, अविनाशी आहे; केवळ त्याचीं रूपें भिन्न भिन्न असतील, त्याचें संघटन भिन्न ठिकाणीं भिन्न असेल येवढेंच.

प्रेरणा-प्रतिक्रियेच्या सिद्धान्तानुसार जीवन सार्वत्रिक आहे असें ठरतें. पण विशिष्ट भौतिक प्रेरणेला विशिष्ट भौतिक प्रतिक्रिया ही जी जीवनाची खूण आहे, ती श्वासोच्छ्वास, स्थलांतरक्रिया या आमच्या जीवनक्रियांप्रमाणेंच अंतर्गत जीवनशक्तीची बाह्य निशाणी आहे, हें आपण ध्यानांत ठेवलें पाहिजे. प्रयोग करणारी व्यक्ति प्रयोगविषयावर (उदाहरणार्थ, विशिष्ट वनस्पतीवर) असामान्य प्रेरकाचा, उत्तेजकाचा, प्रयोग करते आणि याला उत्तर म्हणून प्रयोग-विषयांतून स्पष्ट प्रतिक्रिया झालेल्या आपल्या नजरेस येतात. या स्पष्ट प्रतिक्रिया प्रयोगविषयांतील जीवनशक्तीचा निःसंदेह पुरावा म्हणून आपण मांडतों व समजतों. पण वनस्पति जेव्हां प्रयोगविषय नसते, तेव्हांहि ती अस्तित्वांत असतेच; आणि तिच्या अस्तित्वाच्या सर्व काळांत तिच्यावर परिसरातून सारखा प्रेरकांचा, उत्तेजकांचा, मारा चालूं असतो आणि या माऱ्याला उत्तरादाखल तिजकडून सारखी अविरत प्रतिक्रिया होत असते; याचा अर्थ त्या वनस्पतीचें ठिकाणीं सारखी टिकणारी शक्ति असते आणि या शक्तींत त्या वनस्पतीच्या परिसरांतून होणाऱ्या परिसरीय शक्तीच्या माऱ्याला योग्य उत्तर

 

पान क्र. ३३७

 

देण्याचें सामर्थ्य असतें. वनस्पतीवर उत्तेजकाचा मारा करणें याचा अर्थ गतिमान् शक्ति आघातार्थ तिच्यावर घालणें आणि वनस्पतीकडून प्रतिक्रिया होणें याचा अर्थ त्या आघाताला वनस्पतींतील गतिमान्, संवेदनशील व क्रियाशील शक्तीकडून उत्तर मिळणें असा होतो. प्रयोगविषय केलेल्या वनस्पतींत बाहेरच्या प्रेरणेचें कंपनयुक्त स्वागत होतें व त्या प्रेरणेला वनस्पतीकडून योग्य उत्तर मिळतें; तसेंच त्या वनस्पतींत वाढण्याची आणि अस्तित्वांत टिकून राहण्याची इच्छा व्यक्त होते. त्या वनस्पतीच्या रूपांत गुप्तपणें जाणीवयुक्त-शक्ति राहत आहे, त्या शक्तीचें मनाच्या उदयापूर्वींचें भौतिक संघटन, प्राणनिष्ठ (जीवननिष्ठ) संघटन झालेलें आहे हेंच या सर्व गोष्टी दर्शवितात. वनस्पतिविषयक व इतर प्रयोगांवरून एकंदर वस्तुस्थिति पाहिली, तर ती अशी दिसते कीं, विश्वांत जी गतिमान् क्रियाशील शक्ति सारखी वावरत आहे, ती शक्ति नानाविध सूक्ष्म व स्थूल भौतिक पदार्थांचीं रूपें घेते; प्रत्येक भौतिक पदार्थांत, वनस्पतींत, प्राण्यांत, धातूंत ही सारखी गतिमान् असलेली विश्वशक्ति सांठविली जाते व ही सांठविलेली शक्ति सारखी क्रियाशील राहते; विश्वांत मोकळेपणें वावरणारी शक्ति आणि प्रत्येक पदार्थात भरलेली तीच शक्ति यांच्या विशिष्ट अन्योन्य-संपर्कानें, अन्योन्य विनिमयानें, 'जीवन' म्हटली जाणारी प्रक्रिया तयार होते. क्रियाशील जीवनशक्तीचें कार्य म्हणजे, मोकळ्‌या व पदार्थगत विश्वशक्तीच्या प्रकारांचा अन्योन्यसंपर्क व अन्योन्यव्यवहार किंवा जीवनप्रक्रिया. भौतिक, प्राणिक किंवा जीवनिक आणि मानसिक क्रियाशील शक्ति अशीं विश्वशक्तीचीं भिन्न भिन्न क्रियाशील रूपें आहेत. अ-क्रिय किंवा स-क्रिय एकच एक विश्वशक्ति, विश्वांतील सर्व घडामोडींचें मूळ आहे.

एखादें रूप मरणाधीन झाल्याचें दिसलें, तरी ही सर्वव्यापक विश्वशक्ति अ-क्रिय रूपानें त्या रूपांत उपस्थित असते; तिचीं व्यक्त जीवनकार्यें स्थगित झालेलीं असतील, कायमचीं बंद होणार असतील, तरीपण ही शक्ति तेथें अ-क्रिय स्वरूपांत असतेंच. मरणाधीन झालेलें जीवरूप कांहीं मर्यादेच्या आंत पुन्हां जीवनांत आणतां येतें; जीवनाचीं संवयीचीं कार्यें, प्रेरणेला प्रतिक्रिया देणें, देहांत क्रियाशील शक्तीचा प्रवाह सारखा चालत राहणें -- हीं व इतर स्थगित झालेलीं कार्यें उत्तेजकाच्या माऱ्यानें कांहीं मर्यादेपर्यंत पुन्हां सुरू करतां येतात; याचा अर्थ दर्शनीं मरणानंतरहि शरीरांत जीवनशक्ति उपस्थित होती; फक्त या शक्तीच्या नेहमींच्या

 

पान क्र. ३३८

 

क्रिया बंद झाल्या होत्या इतकेंच. 'जीवन म्हणून जी स्वतंत्र वस्तु आहे, ती मरणानें शरीराच्या सर्वस्वीं बाहेर जाते आणि शरीरावर कोणीं उत्तेजकाचा मारा केला असतां, तो मारा या वस्तूला समजतो (समजतो कसा? हा प्रश्न आहे) आणि मग ही 'जीवन' नांवाची शरीराबाहेर गेलेली वस्तु शरीरांत परत येते,' अशी कोणी कल्पना करतात; पण ही कल्पना बुद्धीला न पटणारी आहे. मूर्च्छारोगांत जीवनशक्तीच्या बाह्य खुणा, बाह्य शारीरक्रिया बंद होतात; पण मन जागृत आणि स्वत्वपूर्ण असतें, फक्त त्याला शारीर हालचाली (बाह्य आघातानुरूप) शरीराकडून करवितां येत नाहींत. अशा स्थितींत मनुष्य असतां, तो शरीरदृष्ट्या मरण पावला आहे आणि मनानें जिवंत आहे, अर्थात् जीवन शरीर सोडून गेलें आहे आणि मन अद्यापि शरीरांत आहे असें म्हणणें सयुक्तिक नाहीं, वस्तुस्थितीस धरून नाहीं; मन क्रियाशील आहे, परंतु त्याला शारीर क्रिया घडवितां येत नाहींत, त्या तात्पुरत्या स्थगित झाल्या आहेत, असें म्हणणेंच वस्तुस्थितीस धरून होईल.

समाधीच्या कांहीं प्रकारांतहि शारीर क्रिया आणि मनाच्या बाह्य क्रिया स्थगित होतात व या क्रिया कांहीं बाबतींत बाहेरच्या प्रेरणेनें आणि सामान्यत: बाहेरची प्रेरणा नसतां, आंतूनच स्वयंप्रेरणेनें पुन्हां चालूं होतात असा अनुभव आहे. अशा बाबतींत असें घडतें कीं, वरवर व्यक्त कार्य करणारी मानसिक शक्ति अन्तर्मनांत ओढून घेतली जाते, त्याचप्रमाणें व्यक्त कार्य करणारी जीवनशक्ति क्रियाहीन जीवनशक्तींत ओढून घेतली जाते; आणि हा समाधिस्थ मनुष्य नेणिवेच्या अस्तित्वक्षेत्रांत पडून राहतो किंवा तो केवळ बाह्य जीवनाला नेणिवेच्या क्षेत्रांत ठेवून, आपलें आंतर-जीवन अतिमानसाच्या क्षेत्रांत वर नेतो व तेथील व्यवहारांत पडतो. तें कसेंहि असो. सध्यां लक्षांत घ्यावयाचा मुद्दा हा कीं, शरीरांत गतिमान् जीवनशक्ति राखण्याचें कार्य जी महान् शक्ति करते, ती कोणतीहि असो, ती समाधिस्थ मनुष्यांत आपलीं बाह्य कार्यें स्थगित करते, पण शरीररूपी संघटित द्रव्यरचनेंत उपस्थित असते--कांहीं अंशीं अक्रिय स्थितींत उपस्थित असते आणि बाह्य प्रेरणेनें किंवा स्वयंप्रेरणेनें ती पुन्हां काम करूं लागते. परंतु स्थगित क्रिया शरीराच्या सामान्य स्थितींत पुन्हां सुरूं करतां आल्या, तरी जर शरीर निकामी करण्यासारखी जखम वगैरे शरीराला झाली किंवा शारीरद्रव्याची अखेरची मोडतोड सुरू झाली, तर स्थगित क्रिया पुन्हां सुरू करतां येत नाहींत. मोडतोडीच्या प्रक्रियेनें असें होतें कीं,

 

पान क्र. ३३९

 

जीवनप्रक्रिया निर्माण करणारी व कायम ठेवणारी जी अंतर्गत महान् शक्ति, परिसरांतून येणाऱ्या शक्तीच्या आघाताला प्रत्युत्तर देऊन, आंतल्या आणि बाहेरच्या शक्तींचें अन्योन्य संमीलन करून जीवनप्रक्रिया निर्माण करीत होती व कायम ठेवीत होती ती आतां उत्तर देण्याच्या स्थितींत राहत नाहीं, बाह्य प्रेरणा ती अगदीं जडवत् अंगावर घेते. या घटनेचें कारण असें असतें कीं, शरीरद्रव्याचें संघटन मोडून, द्रव्य मोकळें करण्यांत शरीरांतील ही जीवनशक्ति खर्च होत असते. व्यक्त जीवनप्रक्रिया यामुळें बंद होते. शरीरद्रव्य मोकळें करण्याचा हेतु असा असतो कीं, त्या द्रव्यानें आपल्या मूळ अणु-परमाणु-स्वरूपांत शरीरांतून निघून जाऊन, दुसरीं शरीरें बनविण्यांत भाग घ्यावा. विश्वशक्तीच्या पोटीं असलेली विश्वात्म्याची जी इच्छाशक्ति शरीर-द्रव्य एकत्र करून, शरीर बनवून, तें रक्षण करीत होती, ती आतां शरीर संघटनाचें काम रद्द करून, शरीरद्रव्याचें विघटन करावयास लागते; यामुळें शरीराचें मरण अटळपणें ओढवतें. विश्वात्म्याच्या इच्छेनें शरीरद्रव्याचें अंतिम विघटन निश्चित होईपर्यंत शरीराला मरण येऊं शकत नाहीं.

तेव्हां, एका विश्वव्यापक शक्तीच्या क्रियाशील व्यवहाराला जीवन म्हणतात; या शक्तीच्या पोटीं मानसिक जाणीव आणि नाडीमय जीवनशक्ति कोणत्या तरी स्वरूपांत किंवा निदान मूलतत्त्वाच्या रूपानें नेहमीं उपस्थित असतात आणि म्हणून स्वभावत: नित्योपस्थित असलेल्या त्या गोष्टी आमच्या विश्वांत, जडद्रव्याच्या बनलेल्या रूपांत विकासक्रमानें व्यक्त व संघटित होतात. विश्वशक्तीनें निर्माण केलेल्या नानाविध रूपांच्यामध्यें एकमेकांकडून एकमेकांना उत्तेजक प्रेरणा देण्याचें व या प्रेरणांना उत्तर म्हणून योग्य प्रतिक्रिया त्यांजकडून घडविण्याचें कार्य हें विश्वशक्तीच्या जीवनलीलेचें स्वरूप असतें. आपण निर्मिलेल्या सर्व रूपांत, ही विश्वशक्ति आपलें कंपनात्मक आंदोलन सारखें अविरत चालूं ठेवीत असते; सर्वत्र वावरणाऱ्या विश्वशक्तींतील क्रियात्मकशक्ति आणि प्राणशक्ति प्रत्येक रूपाकडून सारखी स्वतःचे ठिकाणीं घेतली जात असते आणि स्वतःतून बाहेर फेंकली जात असते; दिल्या व घेतल्या जाणाऱ्या क्रियाशक्तीवर सर्व रूपांचें पोषण होत असतें; शक्तीचें सांठवण असलेलीं रूपें भक्षून किंवा मोकळ्या शक्तीला स्वतःचे ठिकाणीं प्रत्यक्षतः पचवून, विश्वांतील रूपें आपला निर्वाह करतात व पुष्ट होतात. ज्यांत जीवनशक्तीचें संघटन आमच्यांतील नाडीमय संघटनासारखें असतें, किंवा

 

पान क्र. ३४०

 

निदान जीवनाच्या बाह्य संकीर्ण क्रिया आम्हांला स्पष्ट दिसतील असें जीवनसंघटन जेथें असतें, तेथें आम्हांला जीवनक्रिया सहज व लवकर ओळखतां येते. वनस्पतींत जीवन आहे असें आम्ही मान्य करतो, तें याचसाठीं कीं, वनस्पतीच्या जीवनक्रिया आम्हांला स्पष्ट दिसतात. धातु, पृथ्वी, रासायनिक अणु यांत जीवन आहे असें आम्ही मोठ्या प्रयासानें मान्य करतों किंवा मान्य करीत नाहीं तें याचसाठीं कीं, त्यांतील व्यक्त जीवनक्रिया सूक्ष्म असल्यानें आम्हांला फार कष्टानें जाणतां येतात, कांहीं क्रिया तर कांहीं केलें तरी अवगतच होत नाहींत.

व्यक्त जीवन-प्रक्रियांमधील हें अंतर, मौलिक अंतर मानण्याचें कांहीं तर्कशुद्ध कारण आहे काय? आमच्यामधील जीवन आणि वनस्पतिजीवन यांमधील अंतर तपासूं : आम्ही स्थलान्तर करूं शकतों, वनस्पतीमध्यें ही शक्ति नाहीं; पण स्थलांतर करण्याची शक्ति ही कांहीं जीवनशक्तीची सारभूत क्रिया नाही; आम्हांला जाणीवयुक्त संवेदना आहे, वनस्पतींत ती दिसत नाहीं; पण आमच्या नाडीसंघाचेद्वारां  ज्या प्रतिक्रिया होतात, त्या प्रतिक्रियांबरोबर नेहमींच जाणीवयुक्त मानसिक संवेदना असते असें नाहीं. सर्व नाडीगत प्रतिक्रियांबरोबर जाणीवयुक्त संवेदनांची मानसिक प्रतिक्रिया असते असेंहि नाहीं. आतां एवढें खरें कीं, आमच्या नाडीगत प्रतिक्रिया बहुधा मानसिक संवेदनायुक्त असतात; शरीर, नाडी-संघ आणि मन या तिघांनाहि त्यांचें महत्त्व असतें. वनस्पतींमध्यें नाडीगत संवेदनांचीं चिन्हें दिसतात; आम्हांला सुखदुःख, जागृति-सुषुप्ति, आनंद, सुस्ती व थकवा होण्यास वा वाटण्यास ज्या नाडीगत संवेदना कारण होतात, अशा प्रकारच्या संवेदना वनस्पतींमध्यें दिसतात; वनस्पतींचें शरीर या नाडीगत संवेदनांनीं आंतून क्षोभयुक्त होतें; परंतु आमच्यासारख्या मानसिक जाणीवयुक्त संवेदना मात्र वनस्पतींत आढळत नाहींत; परंतु नाडीगत काय किंवा मनोगत काय संवेदना ती संवेदना--आणि जीवनशक्तिगत, नाडीसंघावलंबी संवेदना ही मानसिक जाणीवयुक्त संवेदनेप्रमाणें चैतन्याची खूण आहे, चेतनेचें (जाणिवेचें) एक रूप आहे. कोणी पानांना बोट लावूं लागलें, तर लाजाळूचें लहान झाड पानें मिटून घेतें हें आपण पाहिलें आहे; अशीं लाजाळू झाडें दुसरीहि आहेत; पानें मिटून घेण्याच्या त्यांच्या क्रियेवरून हें दिसतें कीं, त्यांना नको असलेली कांहींतरी आपत्ति आल्याचें त्यांच्या नाडीसंघाच्या द्वारां त्यांना कळतें; अशा झाडांत मानसिक जाणिवेच्या खालीं असलेल्या पातळीवरची (अधोमानसिक अवचेतन)

 

पान क्र. ३४१

 

संवेदना असते असा याचा अर्थ. आमच्यांत देखील अशा अधोमानसिक क्रिया चालतात. मनुष्यांत चालणाऱ्या अधोमानसिक क्रिया, अनुभूति आणि संवेदना नाडीसंघांत घडल्यानंतर आणि नाडीसंघावरील त्यांचा परिणाम नाहींसा झाल्यानंतर पुष्कळ काळानें त्या मनाच्या पातळीवर आणतां येतात. असा पुरावा सारखा वाढत्या प्रमाणावर मिळत आहे कीं, आमच्या जागृत जाणिवेपेक्षां पुष्कळच अधिक व्यापक अर्ध-जागृत जाणीव आमच्यामध्यें आहे; आमच्या जागृत मनापेक्षां आमचें अर्धजागृत मन, अंतर्मन फार मोठें आहे. वनस्पतींत वरचें जागृत मन नाहीं; त्यांतील अधोमानसिक संवेदना कळण्यासाठीं जें पृष्ठवर्ती मन अवश्य आहे, तें मन त्यांच्यांत नाहीं. पण म्हणून, मनुष्य आणि वनस्पति यांत ज्या संवेदनात्मक घटना तत्त्वत: एकरूप आहेत, त्यांच्या एकरूपतेंत कांहीं कमतरता मानण्याचें कारण नाहीं. घटना ज्याअर्थी एकरूप, त्याअर्थीं त्या घटना घडविणारी गोष्टहि एकच असली पाहिजे. अर्थात् वनस्पतींत मनुष्यासारखेंच अर्धजागृत मन, अंतर्मन असलें पाहिजे, असें मानावयास हरकत नसावी; आणि धातूंचा विचार करतां, अर्धजागृत इन्द्रियरूप मनाची प्राथमिक जीवनप्रक्रिया धातूंमध्यें आहे, मात्र त्यांच्यांत वनस्पतींप्रमाणें किंवा आमच्याप्रमाणें नाडीप्रतिक्रिया दाखविणारे शारीर-कंपन आढळत नाहीं, असेंहि मानतां येण्याइतका पुरावा मिळतो; शारीर क्षोभ नसला, तरी धातूचे ठिकाणीं जीवन-प्रक्रिया आढळत असल्यानें, तेथें जीवन आहे असें मानण्यास हरकत नसावी; वनस्पतींत स्थलांतर करण्याची शक्ति नाहीं, म्हणून तेथें जीवन नाहीं असें आम्ही मानीत नाहीं; तशीच गोष्ट धातूच्या बाबतींत समजावी. शारीर स्थलांतर, शारीर क्षोभ या गोष्टी जीवनाचीं चिन्हें असल्या, तरी त्याच केवळ जीवनदर्शक चिन्हें नाहींत. बाह्य उत्तेजक प्रेरणेला आंतून उत्तरादाखल प्रतिक्रिया होणें, हें जीवनचिन्ह धातु, वनस्पति व मनुष्य या सर्वांत सारखें आढळतें, म्हणून जीवन सर्वत्र आहे असें मानणें तर्कशुद्ध आहे.

शरीरांत जाणिवेनें घडणारी क्रिया नेणिवेच्या (Subconscient) प्रांतांत जाते आणि नेणिवेनें घडणारी क्रिया जाणिवेच्या प्रांतांत येते या घटनेचा अर्थ काय? दुसऱ्या कार्यभागांकडे दुर्लक्ष करून, जाणीवशक्ति, तिचा एखादा कार्यभाग करण्यांत एकाग्रतेनें जेव्हां गुंतविली जाते, तेव्हां हा दुसरा कार्यभाग नेणिवेच्या प्रांतांत उतरतो, अशी वस्तुस्थिति आहे. ज्याला आपण मन, प्रज्ञान (त्रिपुटीयुक्त ज्ञान) म्हणतो, तें ज्ञान, तें मन

 

पान क्र. ३४२

 

एकाग्रतेच्या कांहीं प्रयोगांत जाणिवेनें काम करण्याचें जवळ जवळ किंवा पूर्णपणें बंद करतें, तरी शरीराचें, नाडीसंघाचें व इंद्रियमनाचें कार्य चालूं राहतें; त्या कार्याची दखल जाणीव घेत नसली तरी तें सारखें आणि निर्दोषपणें चालू राहतें; याचा अर्थ तें नेणिवेच्या प्रांतांत उतरतें, अंतर्मनानें चालविलें जातें आणि पृष्ठवर्ती मन केवळ एकाच क्रियेच्या किंवा क्रियासंघाच्या बाबतींत जाणिवेनें क्रियाशील असतें. मी लिहीत असतांना लेखनाची शारीर क्रिया बहुधा किंवा सर्वांशीं अंतर्मन करीत असतें; न जाणतां कांहीं नाडीगत हालचाली शरीर करीत असतें; मन जागृत असतें, तें केवळ त्या विचाराच्या बाबतींत, जो त्याला व्यापून असतो, जो त्याच्यापुढें मननाकरितां ठेवलेला असतो. मनुष्य सर्वच्या सर्व अंतर्मनांत बुडी मारून बसला, तरी मनाची क्रिया दाखविणाऱ्या शरीराच्या सवयींच्या नित्याच्या हालचाली होत राहतात; याला उदाहरण म्हणून झोपेंत होणाऱ्या हालचालींचें देतां येईल. तसेंच असेंहि शक्य आहे कीं, मनुष्य मनाच्या खालीं न जातां, मनाच्या वर उन्मनाच्या, अतिमानसाच्या क्षेत्रांत चढून बसल्यावर शरीरांत जें पृष्ठांतर्वर्ती विशाल प्रच्छन्न मन आहे, तें काम करीत राहूं शकेल; --समाधींत वा योगनिद्रेच्या कांहीं प्रकारांत असें घडतेंहि. या सर्व गोष्टींचा इत्यर्थ हा आहे कीं, वनस्पतींतील संवेदना आणि आमच्यांतील संवेदना यांत फार थोडें अंतर आहे; विश्वांत काम करणारी जी जाणीवयुक्त शक्ति जडद्रव्याचे ठिकाणीं बाह्यतः झोंपेंत असते, तिची झोंप वनस्पतींतहि पुरती दूर झालेली नसते; ही जाणीवयुक्त विश्वशक्ति अतिमानसिक ज्ञानाच्या पायरीवर विश्वकार्य करण्यांत इतकी एकाग्रतेनें गुंतलेली असते कीं, जडामध्यें आणि अंशत: वनस्पतीमध्यें तिची जी कार्यकारी शक्ति काम करीत असते ती तिच्या उगमस्थानापासून म्हणजेच त्या विश्वशक्तीपासून अगदीं अलग होऊन जाते. अर्थात् ही अलग झालेली कार्यशक्ति जाणीवयुक्त असत नाहीं; तिला जाणीवयुक्त प्रेरणा मिळते, ती अंतर्मनांतून म्हणजेच बाह्यदृष्टीनें नेणिवेच्या प्रांतांतून मिळते. अंतर्मनांत जाणिवेनें काम करणारी ही कार्यशक्ति वनस्पतींत बाह्यदृष्ट्या नेणिवेंत असली, तरी मनुष्याचे ठिकाणीं ती बाह्यतः देखील जाणीवयुक्त होते. विश्वशक्तीची अतिमानसिक एकाग्रता, अंतर्मनांतील एकाग्रता कमी होऊन, ती मनुष्यांत बाह्य मनाचें रूप घेते आणि हें बाह्यमन, त्याचा आत्मा जो ज्ञानमय पुरुष, त्याचें थोडेसें ज्ञान अप्रत्यक्षपणें मिळवूं लागतें. जाणीवयुक्त विश्वशक्ति आमच्या ठिकाणीं, मानसिक

 

पान क्र. ३४३

 

जाणिवेचेद्वारां जीं कार्यें करते, तींच कार्यें अधोमानसिक जाणिवेच्याद्वारां ती वनस्पतींमध्यें करते; मानसिक जाणिवेच्या दृष्टीनें आणि कार्यपद्धतीच्या दृष्टीनें वनस्पतींमधील कार्य आणि मनुष्यांमधील कार्य यांत फरक असेल, असतोहि परंतु कार्यदृष्टीनें पाहतां दोन्हीं ठिकाणीं सारखींच आणि तींच कार्यें घडत असतात.

आम्हांमध्यें इच्छाशक्ति (संकल्पशक्ति) आणि वासनाशक्ति आहे, तिचें मूळ अणूंतील आकर्षणशक्तींत आणि उत्सारणशक्तींत आहे, अशी कल्पना करणें आतां शक्य झालें आहे. आकर्षण आणि उत्सारण (विकर्षण, अपसारण) या गोष्टी आमच्यामधील आवड आणि नावड, अनुराग आणि द्वेष यांसारख्या आहेत. अर्थात् अणूमध्यें या गोष्टी नेणिवेच्या प्रांतांतील आहेत. आमच्यांतील आकर्षण (अनुराग) व विकर्षण (द्वेष) जाणिवेनें युक्त असतें. अणुमध्यें तें अर्धनेणीव किंवा पूर्ण नेणीव यांनीं युक्त असतें हाच काय तो फरक. निसर्गामध्यें वासना (भोगाची इच्छा) व संकल्पशक्ति (कर्तृत्वाची इच्छा) सर्वत्र आहे; त्याचप्रमाणें बुद्धि आणि संवेदनाशक्ति सर्वत्र आहे; वासना, संकल्प, संवेदना व बुद्धि या सर्व शक्ती एकमेकींना धरून सर्वत्र आहेत--संवेदना आणि बुद्धि यांतूनच संकल्प आणि वासना यांचा उदय, आविष्कार होतो; आतां हें खरें कीं, संवेदना व बुद्धि निसर्गांत नेणिवेच्या किंवा अर्धनेणिवेच्या प्रांतांतून काम करतात आणि त्यांच्यापासून जन्म घेणारी संकल्पशक्ति व वासनाशक्ति याहि निसर्गांत त्याच नेणिवेच्या व अर्धनेणिवेच्या प्रांतांतून काम करतात. जडद्रव्याच्या प्रत्येक अणूंत, अर्थात् या अणूंच्या संयोगानें बनणाऱ्या प्रत्येक पदार्थांत या शक्ती असतात; अणूंत या शक्ती आल्या कोठून? अणु-परमाणूंची रचना करणारी, अणु-परमाणूंची घटकभूत असणारी जी महान् आदिम विश्वशक्ति, तिच्या ठिकाणीं या सर्व शक्ती अंतर्हित आहेत हें या प्रश्नाचें उत्तर होय. ही जी विश्वशक्ति, ती मूलत: वेदांतवर्णित चित्शक्ति (चित्तपस्) जाणीवयुक्त आदिपुरुषाची स्वभावगत जाणीवयुक्त शक्ति होय; ही शक्ति वनस्पतीचे ठिकाणीं अधोमानसिक संवेदनांनीं युक्त अशा नाडीगत शक्तीचें स्वरूप घेते; प्राथमिक प्राणिवर्गामध्यें वासनामय संवेदना व वासनामय संकल्प यांचें रूप व विकासमार्गावर पुढें गेलेल्या प्राण्यांत आत्म-जाणीवयुक्त संवेदना आणि आत्म-जाणीवयुक्त कार्यशक्ति यांचें रूप ती घेते, तर मनुष्यामध्यें, मानसिक संकल्पशक्ति आणि मानसिक ज्ञानविज्ञान यांचें सर्वश्रेष्ठ स्वरूप ती घेते. जाणीवयुक्त

 

पान क्र. ३४४

 

विश्वशक्तीची जडामधील नेणीव आणि मनुष्यांमधील व मनुष्येतर प्राण्यांमधील जाणीव या दोन टोंकांना जोडणारी शिडी किंवा मध्यस्थ-शक्ति म्हणजे जीवनशक्ति होय. जडामध्यें ही जीवनशक्ति गुप्त असते, ती आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानें अधोमानसिक क्रियाशील जीवनाचें अर्धगुप्त स्वरूप घेते; शेवटी तिजमधून या अर्धगुप्त स्वरूपांतून मनाचा आविष्कार होतो आणि या आविष्कारानें तिच्यांतील क्रियाशीलता पूर्णतया कामीं येते व तिचें कर्तृत्व कृतार्थ होतें.

विकासक्रमाच्या दृष्टीनें शक्तींच्या क्रमवार आविष्काराचा विचार केला, तरी वरील सिद्धांत तर्कशुद्ध ठरतो; जड प्राणहीन द्रव्य तळाशीं, मनोयुक्त प्राणिवर्ग वर आणि मध्यें प्राणयुक्त मनोहीन वनस्पतिवर्ग-- अर्थात् प्राणशक्ति किंवा जीवनशक्ति ही जडवर्ग आणि प्राणिवर्ग यांना जोडणारी मध्यस्थ शक्ति आहे, ही गोष्ट विकाससिद्धांतानुसार देखील तर्कशुद्ध रीतीनें सिद्ध होते. वनस्पतींतील जीवन प्राणि-जीवनाहून वेगळ्‌या रीतीनें संघटित केलेलें असलें, तरी तें एकाच शक्तीचें स्वरूप आहे ही गोष्ट उघड आहे; वनस्पतिवर्गाला प्राणि-वर्गाप्रमाणें जन्म, वाढ, मरण आहे; बीजद्वारां संतानोत्पत्ति होते, शक्तिक्षयानें, रोगानें, तीव्र आघातानें मरण येतें; बाहेरून पोषकतत्त्वें आपल्या पिंडांत ग्रहण करून व पचवून त्यांचें पोषण होत असतें; प्रकाश व उष्णता यांजवर वनस्पती अवलंबून असतात; त्यांच्यापैकीं कोणाला संतानोत्पादन शक्ति नसते, कोणाला ती पुष्कळ असते; त्यांना निद्रा आणि जागृति, शक्तिउद्रेक आणि शक्तिमांद्य या अवस्था असतात; त्यांना बालपण, वयांत येणें, वृद्धावस्था यांतून जावें लागतें; जीवनशक्तीचीं सत्त्वें वनस्पतींत असल्यानें, प्राणिवर्ग त्यांना आपलें स्वाभाविक अन्न करतो व त्यांतून जीवनसत्त्वें आत्मसात् करून आपलें पोषण करतो; वनस्पतींत प्राथमिक स्वरूपांतली कां होईना, पण नाडीसंघटना आहे; बाह्य प्रेरणेला त्यांजकडून योग्य प्रतिक्रिया घडते; त्यांच्यांत अधोमानसिक किंवा शुद्ध प्राणनिष्ठ अशा प्राथमिक संवेदना आहेत; प्राणि-जीवन व वनस्पति-जीवन यांजमधील हीं सर्व साम्यें पाहिलीं, म्हणजे त्यांच्यांत कार्य करणारी प्राणशक्ति किंवा जीवनशक्ति एकच आहे ही गोष्ट सहज पटते. अर्थात् प्राणहीन जडवर्ग आणि मनोयुक्त प्राणिवर्ग या दोहोंच्या मध्यें वनस्पति-वर्गाच्या जीवनाचें विकासक्रमांतील स्थान आहे ही गोष्ट उघड आहे. विकाससिद्धांतानुसार प्राण किंवा जीवन ही शक्ति जडांतून उदयास आली असून, तिच्यांतून

 

पान क्र. ३४५

 

विकासक्रमानें मनाचा उदय होणें हा तिचा परिपाक आहे, ही गोष्ट आम्हीं मान्य केल्यास, जडांत ही जीवनशक्ति सुप्तगुप्त स्थितींत आहे, जडाच्या अधोमानसिक अर्धनेणिवेंत अथवा पूर्ण नेणिवेंत ही जीवनशक्ति अप्रकट अशी उपस्थित असते, असें मान्य करण्यावाचून गत्यंतर नाहीं. कारण जडांत ही जीवनशक्ति नसेल, तर ती जडाचे ठिकाणीं कोठून व्यक्त होते? जडांतून प्राणशक्ति जर वर येते, तर ती जडांत पूर्वीं लपून असली पाहिजे. विकास याचा अर्थ पडदा दूर करून प्रकट होणें; पडदा घेऊन अप्रकट होणें हीच या क्रियेची पूर्वकालीन पूरक क्रिया असली पाहिजे. ही विकासाची कल्पना दूर सारली, तर जीवन-शक्ति ही, जड निसर्गांत नसलेली, जादूनें पैदा केली गेली, वगैरे कल्पना कराव्या लागतील. शून्यांतून जीवन-शक्ति पैदा केली गेली व ती जडावर लादली, ही कल्पना केवळ निराधार म्हणून त्याज्य आहे; भौतिक क्रिया जडाचे ठिकाणीं कांहींतरी कशातरी घडून जीवनशक्ति उदयास आली, त्या क्रियांमध्यें जीवनशक्तीशीं साम्य असणारी कोणतीहि गोष्ट नव्हती, ही दुसरी कल्पना पहिलीसारखीच बिनबुडाची म्हणून त्याज्य ठरते; तिसरी कल्पना, भौतिक विश्वाच्या वर अतिभौतिक विश्व असेल व तेथून जीवनशक्ति उतरून भौतिक विश्वांत आली असेल--ही कल्पना पहिल्या दोन कल्पनांहून सरस आहे, विचारार्ह आहे; या कल्पनेप्रमाणें वस्तुस्थिति असणें शक्य आहे; गुप्तलोकविद्या असें सांगते कीं, भौतिक विश्वापेक्षां श्रेष्ठ असणाऱ्या जीवनविश्वांतून येथील भौतिकावर दडपण येऊन, त्याचा परिपाक म्हणून येथें भौतिकांत, जडांत जीवनशक्तीचा-प्राणशक्तीचा-उदय होण्यास मदत झाली. गुप्तविद्येचें हें विधान खरें धरून चाललें, तरी जडांतून जीवनाचा उदय झाला, जड हेंच जीवनाचें उगमस्थान आहे, जीवनाची प्राथमिक आवश्यक हालचाल जडांतच सुरू झाली हें विधान कांहीं त्यावरून खोटें ठरत नाहीं. जडाच्या पातळीच्या वर जीवनाची पातळी अथवा विश्व आहे, एवढ्यावरून कांहीं, जडांतून जीवन वर येऊं शकत नाहीं; आदिपुरुष आपल्या अनेक शक्तींच्यामधून खालीं उतरत उतरत नेणिवेच्या प्रांतांत शेवटीं उतरला; या उतरण्याच्या क्रियेंत त्याला मध्यें जीवनाच्या पातळीवर येऊन खालीं उतरावे लागलें; याप्रमाणें उतरून आपल्या सर्व शक्तींसह तो जडांत अप्रकट होऊन बसला; अशी सर्व वस्तुस्थिति असली, तरच पुढें विकासकार्य सुरूं होऊन जीवनशक्तीनें जडांतून वर येणें शक्य होतें आणि जीवनशक्तीनंतर मानसिक शक्ति आणि त्यानंतर

 

पान क्र. ३४६

 

आणखी श्रेष्ठ शक्ति विकासमार्गानें वर येणें क्रमप्राप्त होतें. भौतिक जडवस्तूमध्यें जीवनशक्ति गुप्त असल्याचें अगदीं प्राथमिक स्वरूपाचें चिन्ह आढळून येत असेल किंवा असलें कोणतेंहि चिन्ह आढळून येत नसेल (गुप्त जीवनशक्ति पूर्ण झोंपेंत असल्यास चिन्ह मिळावयाचें नाहीं हें उघड आहे) -- हा चिन्हांचा प्रश्न मुळींच महत्त्वाचा नाहीं -- निदान विशेष महत्त्वाचा नाहीं. जडशक्ति (जडांत काम करणारी शक्ति) ही वस्तुघटक द्रव्य एकत्र करते, त्या एकत्रित द्रव्याला कसलें तरी रूप देते, त्या रूपांतील द्रव्याचें पुढें विघटन करते, * ही गोष्ट आमच्या परिचयाची आहे. जन्म, वाढ, मरण या घटनांच्याद्वारां जीवनशक्ति व्यक्त होते; अर्थात् जडशक्ति आणि जीवनशक्ति या दोन शक्ती एकाच मूळ शक्तीचे दोन पायऱ्यावरचे दोन प्रकार आहेत, हें उघड आहे; झोंपेंत काम करणाऱ्या अधोमानसिक जाणिवेकडून बुद्धीचें काम होत असतें आणि मनुष्याच्या मानसिक शक्तीकडून बुद्धीचें काम स्वाभाविकपणें होतें; यावरून जी शक्ति अधोमानसिक जाणिवेचें रूप घेते, तीच पुढें मानसिक जाणिवेचें रूप घेते, ही गोष्ट सहज कळूं शकते. जी शक्ति प्रथम जडशक्तीचें व नंतर जीवनशक्तीचें रूप घेते तीच त्यानंतर मानसिक जाणिवेचें रूप घेते. (जीवनशक्ति आणि अधोमानसिक जाणीवशक्ति एकच होत.) जडशक्तीचें स्वाभाविक स्वरूप आपण पाहिलें; त्यावरून, तींत जीवनशक्ति आणि मानसिकशक्ति गुप्त आहे, या शक्तींच्या विशिष्ट क्रिया व संघटित अवस्था मात्र जडशक्तीच्या कार्यात दिसत नाहींत--हें आपण तर्कशुद्ध रीतीनें म्हणूं शकतों.

-------------------------

* जन्म, वाढ, मरण या गोष्टी बाह्यदृष्ट्या द्रव्याचें एकत्रीकरण, त्याला कसलें तरी रूप देणें व शेवटीं त्या रूपाचें विघटन करून द्रव्य पुन्हां मोकळें करणें या क्रियांप्रमाणेंच आहेत. अर्थात् जन्म, वाढ, मरण यांची आंतरिक प्रक्रिया आणि महत्त्व द्रव्याच्या एकत्रीकरणादि भौतिक क्रियांहून वेगळें आहे आणि श्रेष्ठ आहे. आत्म्याची शरीरधारणाची क्रियाहि गुप्तविद्येच्या दृष्टीनें, बाह्यतः वरीलप्रमाणेंच असते. जन्मासाठींच आत्मा केंद्रस्थानीं बसून आपल्या भावी मानसिक, प्राणिक आणि स्थूल शरीराचीं घटक-द्रव्यें एकत्र करून आपणाजवळ ओढून घेतो; जीवनांत हीं शरीरें वाढवितो आणि हीं सोडतांना संघटित केलेलें द्रव्य विघटित करून मोकळें करतो -- आपल्या आंतरिक शक्ती मात्र आपल्या केंद्रांत ओढून घेतो-- पुन्हां जन्म घेतांना वरील क्रिया त्याला पुन्हां करावी लागते.

 

पान क्र. ३४७

 

तेव्हां अणूपासून मनुष्यापर्यंत जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति तत्त्वत: एकच आहे; अणूमध्यें तिचें स्वरूप अधोमानसिक सत्ता-द्रव्य आणि संचलन हें असतें व प्राण्यामध्यें मानसिक जाणीवयुक्त अस्तित्व आणि हालचाल असें तिचें स्वरूप होतें; प्राणिवर्ग आणि जडवर्ग यांच्यामधील वनस्पतिवर्गांत विकासाची मधली पायरी सांपडते. मूळ जाणीवयुक्त शक्ति विश्वव्यापी आहे व ती विश्वव्यापी क्रिया करीत असून जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति म्हणजे वस्तुत: या मूळ जाणीवयुक्त शक्तीचा विश्वव्यापी व्यवहार होय; ही प्राणशक्ति जडावर व जडांत काम करीत असतां अधोमानसिक स्वरूपाची असते; रूपें किंवा शरीरें निर्माण करणें, राखणें पुष्ट करणें, पुन: निर्माण करणें हें प्राणशक्तीचें विश्वव्यापी कार्य असतें; हीं जीं शरीरें निर्माण केलीं जातात, त्यांत नाडीशक्तीच्या व्यापारानें अर्थात् उत्तेजक शक्तीच्या अन्योन्ययोगी प्रवाहांच्याद्वारां जाणीवयुक्त वेदना जागृत करण्याची धडपड करणें हेंहि प्राणशक्तीचें सर्वव्यापी कार्य असतें. या जागृतीच्या कार्याच्या तीन पायऱ्या आहेत; पहिल्या तळाच्या पायरीमध्यें द्रव्य-आंदोलन हें जडाच्या झोंपेंत होत असतें; तें पूर्णतया अधोमानसिक असतें, पूर्णपणें यांत्रिक दिसतें--परतंत्र दिसतें; दुसऱ्या किंवा मधल्या पायरींत पूर्वींचें यांत्रिक आंदोलन 'मानसिक जाणिवेच्या सीमेवर असलेलें' असें अधोमानसिक प्रतिक्रियेचें स्वरूप घेतें; तिसऱ्या सर्वोच्च पायरींत जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति जाणीवयुक्त मनाचें एक विशिष्ट रूप घेते; अर्थात् मनानें अनुभवण्यासारख्या संवेदनेचें रूप घेते--इंद्रियस्वरूपाचें मन आणि बुद्धि यांच्या विकासाला ही संवेदना पायासारखी साहाय्यक होते. वर जी मधली पायरी सांगितली, ती एका बाजूला जडद्रव्य व दुसऱ्या बाजूला मन यांच्यापासून स्वरूपतः भिन्न अशा प्राणशक्तीची किंवा जीवनशक्तीची पायरी, असें आम्ही सामान्यत: मानीत असतो. परंतु ही भिन्नतेची कल्पना चुकीची आहे; एकच शक्ति तीन पायऱ्यांनीं विकसित होत जाते आणि या विकासक्रमांत जीवनशक्ति ही मध्यें असते; तळचें जडद्रव्य ती स्वतःपासून बनविते, जडद्रव्याची ती घटकभूत असते. अर्थात् ती स्वत: जडद्रव्य बनते आणि तिच्या पोटीं मन ही तिसरी श्रेष्ठ वस्तु गुप्त असते. मूळ जाणीवयुक्त शक्तीची क्रिया हेंच प्राणशक्तीचें स्वरूप असतें हें वर आलेंच आहे. वस्तु बनणें किंवा बनविणें, वस्तुद्रव्य बनणें किंवा बनविणें ही क्रिया अथवा मनाची क्रिया, वस्तु आणि वस्तूचा आकार यांना ज्ञानविषय करणारी

 

पान क्र. ३४८

 

मनाची क्रिया हेंच कांहीं केवळ, प्राणशक्तीचें किंवा मूळ जाणीवयुक्त शक्तीचें कार्य नव्हे; तर मुख्यत: मूळ ज्ञानमय पुरुषानें गतियुक्त होणें, क्रियाशील होणें हें त्या शक्तीच्या क्रियेचें खरें स्वरूप आहे; ही क्रियाशीलता व गतिमानता वस्तुद्रव्य बनण्यास कारण होते व त्या द्रव्याचा ती आधार असते; जाणीवयुक्त मानसिक विषयग्रहणाला मध्यगामी कारण व आधार हीच क्रियाशीलता व गतिमानता असते. जाणीवयुक्त पुरुषाचें वा सत्तेचें मध्यस्थ रीतीनें क्रियाशील होणें, हें जें प्राणशक्तीचें वा जीवनशक्तीचें स्वरूप, त्या स्वरूपाचें कार्य, जडशक्तींत संवेदनातुल्य क्रियाप्रतिक्रिया निर्माण करण्याचें असतें; मूळ सत्तेच्या निर्मितिशील शक्तीचा एक प्रकार हा स्वतःच्या घटकद्रव्याच्या स्वरूपांत कार्यमग्न झाल्यानें, तो अधोमानसिक किंवा पूर्ण नेणिवेच्या पद्धतीनें जडाचे ठिकाणीं कार्य करीत असतो. अस्तित्वांतील वस्तूंचें विषयरूपानें ग्रहण करणारी जाणीव अथवा मन यालाहि प्राणशक्ति मोकळें करून कामाला लावते व त्याला आपला आधार देते; या मनाला ही प्राणशक्ति गतिशील कार्यक्षम साधनसंभार पुरविते; या साधनांच्या आश्रयानें मन स्वतःच्या रूपांवर क्रिया करूं शकतें आणि त्याबरोबर जीवरूपांवर व जडरूपांवर देखील क्रिया करूं शकतें; तसेंच प्राणशक्ति मध्यस्थ होऊन मन आणि जडवस्तु यांना एकत्र आणते आणि त्या दोहोंमध्यें अन्योन्यांचा व्यवहार होण्यास मदत करते; प्राणशक्तीनें पुरविलेलें या अन्योन्य व्यवहाराचें साधन म्हणजे नाडीशक्तीच्या नित्य गतिशील प्रवाहधारा होत. या प्रवाहधारा जड वस्तुरूपांतील शक्ति-संवेदनारूपानें मनाकडे वाहून नेऊन, तिच्यायोगें मनावर त्याला बदलविणारे संस्कार करतात; आणि मनाची शक्ति, इच्छा वा संकल्प या रूपानें परत वस्तूंकडे वाहून नेऊन जड वस्तूंत बदल घडवून आणतात. नाडीशक्ति ही हें मध्यस्थाचें काम करणारी असल्यानें, प्राण-शक्ति किंवा जीवनशक्ति हें नांव आम्ही बहुधा या नाडी-शक्तीलाच देतो. परंतु प्राणशक्ति ही प्राणिवर्गाचे ठिकाणींच फक्त नाडीशक्ति हें रूप घेते; परंतु सर्वांचे तळाशीं असलेला अणु धरून, सर्व रूपांत प्राणशक्ति उपस्थित असते व या सर्व रूपांत मौलिक स्वरूप व कार्य सारखेंच असतें, ती सर्वत्र मूळ जाणीवयुक्त शक्तीची एक क्रिया असते. ही प्राणशक्ति स्वत: जीं रूपें धारण करते, त्या रूपांतील द्रव्य राखणें व त्यांत बदल करणें, रूपांचें अस्तित्व सांभाळणें व त्यांत बदल करणें हें अर्थात् तिचेंच कार्य असतें; संवेदनाशक्ति आणि मानसिक शक्ति गुप्तपणें या

 

पान क्र. ३४९

 

प्राणशक्तीबरोबर काम करीत असतात; मात्र प्रथम या दोन शक्ती, रूपांचे ठिकाणीं अप्रकट असतात, नंतर उदयोन्मुख होतात व शेवटीं पडदा दूर सारून बाहेर प्रकट होतात. प्राणशक्ति वा जीवनशक्ति सर्वव्यापी आहे; तिनें ही सर्व भौतिक सृष्टि व्यक्त स्वरूपांत आणली आहे; ती प्राणशक्ति सृष्टीच्या अंतर्यामीं सर्वत्र राहत असून या शक्तीचा एकंदर महत्त्वाचा व्यवहार व कार्यभाग वर सांगितलेल्या प्रकारचा आहे.

 

पान क्र. ३५०

प्रकरण विसावें

 

मृत्यु, वासना आणि असामर्थ्य

 

आरंभीं, सर्व कांहीं भुकेनें म्हणजे मृत्युनें झांकलेलें होतें; त्यानें स्वत:करितां मन बनविलें, अशाकरितां कीं, त्याला आत्म्याची प्राप्ति व्हावी.

- बृहदारण्यकोपनिषद् १, २. १

 

मर्त्य मनुष्यानें ही शक्ति शोधून काढली आहे; वासनांचा तांडा या शक्तीचे ठिकाणीं आहे; सर्व वस्तूंना संरक्षक आधार देण्यासाठीं ही शक्ति आहे, या वासना आहेत; ही शक्ति सर्व खाद्याची चव घेते आणि आत्म्याकरितां वसतिस्थान बांधते.

- ऋग्वेद ७-६

 

मागील प्रकरणांत आम्हीं प्राणशक्तीचा जो विचार केला, तो विकासमय भौतिक अस्तित्वाच्या दृष्टीनें आणि जडामध्यें प्राणतत्त्व उदयास कसें येतें, काय काम करतें या प्रश्नाच्या दृष्टीनें केला. विकासमय पार्थिव अस्तित्व, ज्या गोष्टी व घटना आम्हांला उपलब्ध करून देतें, त्या घेऊन त्यांवरून आम्हीं प्राणशक्तीसंबंधानें काय अनुमानें काढतां येतील तीं काढलीं. पण हें उघड आहे कीं, प्राणशक्ति कोठेंहि उदयास येवो, कसेंहि काम करो, कोणत्याहि परिस्थितींत तिचें काम चालूं असो, तिच्या उदयाचें व कार्याचें सामान्य तत्त्व सर्वत्र तेंच, एकच असलें पाहिजे. प्राणशक्ति ही विश्वव्यापक शक्ति आहे व तिचें काम द्रव्यमय रूपें निर्माण करणें, तीं गतिमान् करणें, तीं राखणें, तीं बदलणें, तीं नष्ट करून पुन्हां बनविणें आणि हीं रूपें अस्तित्वांत असतां, त्यांच्यामध्यें जाणीवयुक्त प्रकट वा अप्रकट शक्तींची परस्पर देवाण-घेवाण घडविणें हें आहे; हें रूपनिर्माण आणि ही देवाण-घेवाण प्राणशक्तीचा मूलभूत धर्म आहे. ज्या भौतिक पार्थिव जगांत आम्ही राहतों, त्या जगांत प्राणाच्या (जीवनाच्या) पोटीं मन हें गुप्त व नेणीवयुक्त आहे; मनाच्या पोटीं उन्मन (अतिमानस) हें गुप्त व नेणीवयुक्त आहे आणि प्राण (जीवन) जडाच्या पोटीं गुप्तपणें काम करीत आहे. म्हणून येथें दर्शनीं आरंभ वा विकासाचा दर्शनीं

 

पान क्र. ३५१

 

पाया जडद्रव्य हा आहे. उपनिषदांच्या भाषेंत म्हणावयाचें तर, पृथ्वीतत्त्व आमचा पाया आहे. भौतिक विश्वाच्या रचनेचा आरंभ असलेल्या, शक्तीनें भरलेल्या, साकार अणूच्या पोटीं नेणीवयुक्त वासना, संकल्प व बुद्धि या शक्तींचें आकारहीन द्रव्य भरलेलें असतें. आपल्या भौतिक विश्वाच्या जडद्रव्यांतून प्राणशक्ति (जीवनशक्ति) दृश्यरूपानें व्यक्त होते; ही प्राणशक्ति प्राणयुक्त शरीराच्याद्वारां, स्वतःतून स्वतःच्या पोटीं गुप्त असलेलें मन उदयास आणते व मनाला त्याच्या कार्यांत गुप्तपणें काम करीत असलेलें अतिमानस उदयास आणावयाचें काम पुढें करावयाचें आहे. ही आपल्या विश्वाची गोष्ट झाली. पण आपल्या विश्वापेक्षां वेगळ्‌या तऱ्हेनें बनविलेल्या विश्वाची आपण कल्पना करूं शकतों. या वेगळ्‌या रीतीनें बनविलेल्या विश्वांत मन आरंभीं गुप्त आणि नंतर प्रकट, अशी स्थिति नसून तें आरंभापासूनच प्रकट आहे, स्वतःची स्वभावगत शक्ति उपयोगांत आणून जडद्रव्यांतून जाणिवेनें मूळ रूपें निर्माण करीत आहे अशी आपण कल्पना करूं शकतों. या विश्वाची व्यवहारपद्धति आपल्या विश्वाहून अगदीं वेगळीं असली, तरी मनाच्या शक्तीचें निर्मितिकार्य ज्या साधनाच्याद्वारां या विश्वांत होईल, तें साधन प्राणशक्तीच असणार, हें आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. विश्वाची कार्यपद्धति उलटी झाली, तरी मनाच्या शक्तीचें निर्माणकार्य प्राणशक्तीच्या द्वारांच व्हावयाचें ही गोष्ट महत्त्वाची आहे.

मन आणि प्राण यांत हें एक साम्य आहे कीं, मन ज्याप्रमाणें स्वतंत्र शक्ति नसून तें अतिमानसाचें अंतिम कार्य आहे, त्याप्रमाणेंच प्राणहि स्वतंत्र शक्ति नसून, मूळ जाणीव-शक्तीचें अंतिम कार्य आहे. निर्माण करण्याचा धर्म असलेलें या शक्तीचें, सत्य-कल्पना हें विशेष प्रकारचें रूप आहे. शक्तिमय जाणीव हा मूळ अस्तित्वाचा, मूळ पुरुषाचा स्वभाव आहे आणि हा जाणीवयुक्त पुरुष, निर्मायक ज्ञानयुक्त संकल्प या स्वरूपानें व्यक्त झाला म्हणजे या व्यक्त स्वरूपाला सत्य-कल्पना, सत्य-संकल्प किंवा अतिमानस म्हणतात. अतिमानसिक ज्ञानविशिष्ट संकल्प म्हणजे मूळ पुरुषाची निर्मितिकार्यप्रवण जाणीवशक्ति होय. ही मूळ जाणीव-शक्ति अतिमानसिक ज्ञान-संकल्पद्वारां एका व्यवस्थेनें, सुसंवादपूर्ण रीतीनें एकीभूत अस्तित्वाचीं अनंत अविभक्त रूपें निर्माण करते. ह्या निर्मितीला विश्व हें नांव आपण देतों; विश्व म्हणजे अनेक रूपांचें सुसंवादी अविभक्त अस्तित्व. मन आणि प्राण या शक्ती

 

पान क्र. ३५२

 

देखील मूळ जाणीव-शक्ति, ज्ञान-संकल्प यांचींच रूपें आहेत. त्यांचें कार्य मात्र वेगळें आहे; अविभक्त अस्तित्वाचें विभक्त अस्तित्व करणें हें त्यांचें कार्य आहे. विश्वघटक रूपांचा अविभक्तपणा बाजूला करून, प्रत्येक रूप म्हणजे स्वतंत्र व्यक्ति अशी व्यवस्था करणें, हें मन आणि प्राण यांचें कार्य होय. रूपांरूपांमध्यें मर्यादा निर्माण करणें, त्यांना अन्योन्यविरोधी रूपांचें स्वरूप देणें, त्यांच्यामध्यें शक्तीचा विनिमय चालविणें, रूपांची व्यक्तिता स्पष्टपणें संभाळणें, म्हणजेच प्रत्येक रूपांतील आत्मा आपलें मन, आपला प्राण (जीवन) इतर मनांहून, प्राणांहून निराळें बनवील, निराळें मानील अशी व्यवस्था करणें व राखणें--हें सर्व मनाचें व प्राणाचें कार्य आहे. व्यक्तीव्यक्तीचें मन आणि प्राण वस्तुत: निराळे असत नाहींत, आत्माहि व्यक्तीव्यक्तीमध्यें निरनिराळा असत नाहीं--आत्मा एक, मन एक, प्राण एक व मूळ एका सत्तत्त्वाचीं, सत्याचीं, सद्वस्तूचीं रूपें मात्र निराळीं निराळीं अशी वस्तुस्थिति आहे. सर्वसमावेशक, सर्वग्राहक अतिमानसाची शेवटली व्यक्तीकरणाची क्रिया म्हणजे मन होय. या क्रियेमध्यें अतिमानसिक जाणीव प्रत्येक रूपापुरती वेगळी होते आणि वेगळेपणाने व्यवहार करते; प्रत्येक रूपाचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो, या स्वतंत्र दृष्टिकोनाचा उपयोग करून, त्या रूपांतील जाणीव विश्वांतील इतर रूपांशीं आपले संबंध निश्चित करते आणि या संबंधानुसार आपले वैयक्तिक व्यवहार करते; मन जशी अतिमानसाची शेवटली (व्यक्तीकरणाची) क्रिया, तसा प्राण (जीवन) ही जाणीवयुक्त सत्तेच्या शक्तीची शेवटली क्रिया होय; या क्रियेमध्यें, विश्वव्यापक अतिमानसाची सर्वेशत्व करणारी व सर्व-निर्मिति करणारी जी संकल्प-शक्ति, तिला आपलें साधन करून तिच्याद्वारां मूळ जाणीवयुक्त सत्तेची शक्ति, व्यक्तिरूपें अस्तित्वांत राखते, चेतनायुक्त करते, घडते, मोडते, पुन्हां घडते; व या रूपांत सशरीर झालेल्या आत्म्याच्या सर्व व्यवहारांचा पाया म्हणून काम करते. प्राणशक्ति ही ईश्वरी शक्ति आहे. विद्युत्‌यंत्रांत वीज निर्माण व्हावी त्याप्रमाणें, ही प्रत्येक रूपाचे ठिकाणीं स्वतःची सारखी निर्मिति करीत असते; कोणत्याहि रूपाच्या भोंवतालीं जीं रूपें असतात, त्या भोंवतालच्या रूपांवर त्या मध्यवर्ती रूपांतून शक्तीचा मारा ती करते, त्या रूपांना सारखे धक्के देत असते, त्याचप्रमाणें त्या भोंवतालच्या रूपांकडून, सर्व परिसरांतून, सभोंवारच्या विश्वांतून जे जीवनाचे धक्के त्या मध्यवर्ती रूपावर येऊन आदळतात व त्यांत प्रवेश करतात, त्या सर्व धक्क्यांचें ती त्या

 

पान क्र. ३५३

 

मध्यवर्ती रूपांतून स्वागत करते. प्रत्येक रूप एका दृष्टीनें मध्यवर्ती रूप, तर दुसऱ्या दृष्टीनें परिसरांतील रूप असतें. अर्थात् प्राणशक्तीच्या धक्क्यांचा अन्योन्यविनिमय हा सर्व रूपांत सर्व रूपांकडून सर्वत्र होत असतो.

याप्रमाणें प्राणशक्ति ही जाणिवेची एक शक्ति आहे आणि ती मन व जडद्रव्य यांच्यामध्यें असून, मनाची जडावर क्रिया होण्याचें साधन आहे हें स्पष्ट होतें; मनाचें एक शक्तिस्वरूपी अंग असेंहि प्राणाला म्हणतां येईल. एवढेंच कीं, कल्पना निर्माण करणें आणि त्यांच्याशीं विविध संबंध जोडणें हें कार्य, हें प्राणरूपी अंग करीत नाहीं, तर शक्तीचीं आंदोलनें निर्माण करतें, द्रव्याचीं रूपें बनवितें आणि या आदोलनांशीं व रूपांशीं विविध संबंध जोडतें. मनाचें व प्राणाचें हें नातें स्पष्ट केल्यावर हेंहि सांगितलें पाहिजे कीं, ज्याप्रमाणें मन ही स्वतंत्र वस्तु नाहीं, त्याप्रमाणें प्राण ही देखील स्वतंत्र वस्तु नाहीं. मनामागें सर्व अतिमानस उभें असतें आणि निर्मितीचें काम हें अतिमानस करीत असतें, मन हें केवळ या अतिमानसाचें व्यक्तीकरण-क्रियारूप असें शेवटलें कार्य आहे; प्राणामागें सर्व मूळ जाणीवयुक्त शक्ति असते, प्राणाच्या प्रत्येक क्रियेंत ही शक्ति काम करते, निर्माण केलेल्या वस्तूंत राहून काम करणारी ही शक्ति जाणीवयुक्त मूळशक्तीच होय. मन आणि जडद्रव्य किंवा जड शरीर यांच्यामध्यें जाणीव युक्त मूळ शक्तीची मध्यस्थ अंतिमक्रिया, एवढीच प्राणाची कामगिरी असते, हेंच त्याचें खरें स्वरूप असतें. मूळ जाणीवयुक्त शक्तीच्या या मध्यस्थ अंतिम प्राणक्रियेचें वर्णन वर आलेंच आहे. प्राणशक्ति याप्रमाणें स्वतंत्र नसून, परतंत्र असल्यानें, तिच्याविषयीं सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींत तिचें हें पारतंत्र्य लक्षांत ठेवलें पाहिजे. प्राणशक्ति काय आहे, तिचा स्वभाव काय, तिची प्रक्रिया काय या गोष्टींचें खरें आणि पूर्ण ज्ञान होण्यास, त्या प्राणशक्तींत काम करणारी जी जाणीवयुक्त आदिशक्ति आहे, तिचें ज्ञान, तिचा अनुभव आपणांस येणें आवश्यक आहे. या आदिशक्तीची बाह्य-साधनरूप बाजू म्हणजे प्राणशक्ति असल्यानें, तिच्या यथार्थ ज्ञानासाठीं मूळ शक्तीचेंहि ज्ञान अवश्य आहे. आपण ईश्वराचीं वैयक्तिक आत्मरूपें आहोंत, त्याची वैयक्तिक, मानसिक आणि शारीरिक साधनें आहोंत. त्या ईश्वराची इच्छा आमच्या जीवनांत ज्ञानपूर्वक समजून घेऊन, व्यवहारांत त्या इच्छेनुसार कार्य करावयाचें, तर आपण प्राणशक्तीचें यथार्थ ज्ञान करून घेणें अवश्य आहे. या यथार्थ ज्ञानाच्या आश्रयानेंच मन आणि प्राण यांना,

 

पान क्र. ३५४

 

अज्ञाननिर्मित वक्रता व विकृति क्रमश: टाकीत, कमी करीत, विश्वांतील व आम्हांमधील सत्याचा क्रमश: अधिकाधिक सरळ मार्ग धरतां येईल, क्रमश: अधिकाधिक सरळ व्यवहार करतां येईल. अविद्येच्या प्रभावानें मन अतिमानसापासून विभक्त झालें. त्या अतिमानसाशीं जाणीवपूर्वक एक होणें हें ज्याप्रमाणें मनाचें साध्य आहे, त्याप्रमाणें प्राणशक्तीच्या पोटीं गुप्तपणें काम करणाऱ्या मूळ जाणीवयुक्त शक्तीची ओळख करून घेऊन तिच्याशीं एकरूप होणें, हें प्राणशक्तीचें साध्य आहे. ही आदिशक्ति ज्या हेतूंसाठी, ज्या कल्पनेनें प्राणशक्तीच्या पोटीं काम करते, ते हेतू, त्या कल्पना प्राणशक्तीला अज्ञात राहतात, त्या हेतूंच्या व कल्पनांच्या सिद्धीसाठीं प्राणशक्ति आंधळेपणानें, अज्ञानपूर्वक धडपडत असते; हें असें होण्याचें कारण, जीवन जगविण्याच्या कार्यांत प्राणशक्ति आपलें सर्वस्व खर्चिते आणि तिचें सर्व लक्ष जीवनकार्यांत लागल्यानें, तिच्या पोटीं काम करीत असलेल्या आदि-शक्तीचें आणि तिच्या हेतूंचें ज्ञान तिला होत नाहीं; आमचें मन जीवनाला आणि जडाला मनोयुक्त करण्यांत सर्वस्वीं गुंतल्यानें त्याला जशी आपल्या वरिष्ठाची--अतिमानसाची--ओळख रहात नाहीं, तसाच हा प्राणशक्तीचा व्यवहार आहे. प्राणशक्ति आपल्या अंधारांतून बाहेर आली, तिला मूळ जाणीव-शक्तीची ओळख झाली म्हणजे त्या शक्तीचे हेतू आणि कल्पना ती ज्ञानपूर्वक लक्षांत घेईल आणि त्यांच्या सिद्धीसाठीं डोळसपणें ती झटेल, तें तिला टाळताच येणार नाहीं--या खटपटींत ती आपली सर्व शक्ति खर्च करील आणि त्यांत तिला निरतिशय आनन्दच होईल. या खटपटींत तिला मुक्तीचा, कृतार्थतेचा व आत्मतृप्तीचा अनुभव येईल.

आमचें मन अविद्याग्रस्त होऊन, अविभाज्य अद्वैताचे विभाग पाडण्याचा व्यवहार करतें आणि आमची प्राणशक्ति या अविद्याग्रस्त मनाला सेवकाच्या नात्यानें मदत करते; म्हणूनच प्राणशक्ति अंधारांत चांचपडते व स्वत: विभागमय होते. याचा परिणाम म्हणून मरण, मर्यादा, दुबळेपणा, दुःख व अज्ञानमय करणी या दोषांचा भोग तिला घडतो. जीवाचें मर्यादाबद्ध मन हें या दोषांचें कारण व उगमस्थान असतें. वैयक्तिक आत्मा (जीव) स्वतःला कोंडून घेतो, स्वतःच्या अमर्याद अस्तित्वाला मर्यादा घालून घेतो हें या विकृतीचें मूळ कारण आहे. या मर्यादा जीवाच्या आत्म-विषयक अज्ञानांतून, आत्मविस्मृतींतून उत्पन्न होतात. जीवाचें लक्ष आपल्या विभक्ततेवर मर्यादेबाहेर खिळल्यानें ही आत्मविस्मृति उत्पन्न होते.

 

पान क्र. ३५५

 

मी स्वतंत्र, स्वयंभू, दुसऱ्या व्यक्तींहून सर्वस्वीं अलग अशी व्यक्ति आहे, या कल्पनेचा जप जीव सारखा करीत राहिल्यानें तो बद्ध होतो, तो मर्यादांत कोंडला जातो. विश्वाचें कार्य त्याला खऱ्या स्वरूपांत दिसत नाहींसें होतें, त्याची विभक्त वैयक्तिक जाणीव -- ज्ञान, इच्छा, शक्ति, सुख, मर्यादित अस्तित्व -- या सर्व गोष्टी त्याची दृष्टि संकुचित करतात आणि विश्वकार्याकडे तो या संकुचित दृष्टीनें बघतो. या संकुचित दृष्टीचा त्याच्या जीवनावर परिणाम होऊन तें संकुचित व विकृत होतें. वस्तुत: हा जीव एकमेवाद्वितीय आदिसत्तेचें एक जाणीवयुक्त रूप आहे -- सर्व जाणीव, सर्व ज्ञान, सर्व इच्छा, सर्व शक्ति, सर्व सुख, सर्व अस्तित्व त्याच्या जाणिवेशीं, ज्ञानाशीं, इच्छेशीं, शक्तीशीं, सुखाशीं, अस्तित्वाशीं अविभक्त एकरूप आहे. पण अविद्येच्या प्रभावानें ही वस्तुस्थिति त्याच्या नजरेआड होते आणि वर वर्णन केल्याप्रमाणें तो संकुचित दृष्टीचा होतो. याप्रमाणें संकुचित मनाच्या बंधनांत पडलेला जीव, त्याच्यांत असलेल्या विश्व-व्यापक जीवनाला स्वतःच्या मर्यादांत कोंडतो, जीवाच्या वैयक्तिक कृतींत व्यापक जीवन कोंडलें जातें, विश्वव्यापक जीवनाचें विश्वव्यापकत्व जाऊन, तें विभक्त वैयक्तिक अपुऱ्या सामर्थ्याचें जीवन बनतें, त्याजवर त्याच्या सभोंवारच्या सर्व विश्वगत जीवनाचे आघात होतात, या असमर्थ मर्यादित जीवाला त्या आघातांचें इष्ट संपर्क म्हणून स्वागत करतां येत नाहीं; ते त्याला नकोसे वाटतात, पण भोगावे लागतात. हा जीव प्राथमिक स्थितीमध्यें अगदींच दुबळें, अगदीं मर्यादित असें वैयक्तिक जीवन जगत असतो आणि त्याच्या सभोंवार विश्वांत सारखा रूपगत शक्तीशक्तींचा (एकाच शक्तीच्या रूपकृत विविध प्रकारांचा) एकमेकींवर आघात, एकमेकींशीं व्यवहार चाललेला असतो -- या शक्ति-व्यापारांत दुबळा वैयक्तिक जीव असहायपणें तडाखे भोगीत असतो, राक्षसी शक्तिलीलेला मान लववीत असतो, त्याच्यावरील आघातांना केवळ यांत्रिक प्रतिक्रियेनें असहायपणें कांहींतरी उत्तर देत असतो -- हे बाह्य आघात करणाऱ्या शक्ती या दुबळ्या जीवाला तडाखे देतात, त्याला भक्षून टाकतात, त्याचा आपल्या सुखासाठीं उपयोग करतात, त्याला विविध कामाला लावतात, त्याला हांकीत हांकीत आपल्या उद्दिष्टाकडे नेतात. परंतु हळूहळू या दुबळ्या जीवांत जाणीव जागी होऊन वाढत जाते, त्याच्या मूळ सत्तेच्या प्रकाशाला दडविणारी जडाची विकासपूर्व अज्ञानमय झोंप दूर सारून तो प्रकाश प्रकट होतो आणि मग या वैयक्तिक अस्तित्वाच्या

 

पान क्र. ३५६

 

जीवाला, आपल्यांतील शक्तीची अंधुक जाणीव होते, तो प्रथम नाडीगत शक्तीच्याद्वारां आणि पुढें मनोगत शक्तीच्या द्वारां विश्वलीला आपल्या कह्यांत आणण्याचा, तिचा उपयोग करण्याचा आणि तिच्या द्वारां आपली करमणूक करून घेण्याचा प्रयत्न करूं लागतो. ही जी स्वतःमधील शक्तीची जाणीव जीवांत उत्पन्न होते, ती जाणीव म्हणजे त्याची आत्मविषयक क्रमवार जागृति असते; आत्मशक्तिविषयक जाणिवेला वाढत्या आत्मजागृतीचें स्वरूप येत जातें. कारण विश्वांतील प्राणक्रिया किंवा जीवनक्रिया ही शक्तिक्रिया असते, ही शक्ति जड नसून जाणिवेची असते, ही जाणीव-शक्ति वस्तुत: संकल्पाच्या किंवा इच्छेच्या स्वरूपाची असते आणि ही इच्छा किंवा हा संकल्प दुसऱ्या कोणाचा व्यवहार नसून, विश्वेशत्व करणाऱ्या आदिपुरुषाच्या जाणिवेचा, ज्ञानाचा, व्यवहार असतो. व्यक्तींतील जीवन हळूहळू अधिकाधिक जागृत होतें, आपल्यांतील खोल भागांत त्याला सच्चिदानंदाच्या संकल्पाचा अनुभव येतो, हा संकल्प आपणापासून विभक्त नाहीं, तर आपणहि सच्चिदानंदाच्या संकल्पांतच आहों, त्याची संकल्पशक्ति आणि आपण भिन्न नाहीं अशी जाणीव त्याला होते, ती संकल्पशक्ति विश्वाची स्वामिनी आहे, तेव्हां आपणहि व्यक्तिश: आपल्या विश्वाचें स्वामी व्हावयास हवें अशी आकांक्षा त्याचे ठिकाणीं जागृत होते. वैयक्तिक जीवनांत असें स्फुरण सारखें वाढत्या प्रमाणांत होत असतें कीं, आपली शक्ति जी गुप्त आहे ती आपल्या हस्तगत व्हावी आणि आपल्या विश्वाचें ज्ञान आपल्याला व्हावें, तसेंच आपल्या विश्वावर आपली पूर्ण सत्ता चालावी. विश्वगत अस्तित्वांत ईश्वराचा स्वरूपाविष्कार वाढत्या प्रमाणावर होत असतां, त्या आविष्काराचें एक महत्त्वाचें चिन्ह व प्रमाण हें वर सांगितलेलें, वाढतें स्फुरण असतें.

जीवन ही शक्तिक्रिया आहे आणि वैयक्तिक जीवनाची वाढ म्हणजे वैयक्तिक शक्तीची वाढ हें जरी खरें असले, तरी जीवन व जीवनशक्ति ही विभक्त, वैयक्तिक आहे; स्वतःच्या विश्वाचें स्वामित्व करण्याची जीवनाची आकांक्षा विफल होण्यास ही गोष्टच कारण होते, विश्वाचें स्वामित्व म्हणजे विश्वशक्तीचें स्वामित्व. हें विश्वशक्तीचें स्वामित्व विश्वचालक विश्वेशाच्या इच्छाशक्तीकडेच असूं शकतें; जी जाणीव विभक्त आणि व्यक्तिगत स्वरूपाची झाली आहे आणि म्हणून जिची इच्छाशक्ति व इतर शक्ती वैयक्तिक, विभक्त व मर्यादित आहेत, तिला विश्वशक्तीचें स्वामित्व प्राप्त होणें अशक्य आहे; विश्वेशाच्या विश्वसंचालक

 

पान क्र. ३५७

 

इच्छेशीं व्यक्ति एकरूप होऊं शकली, तर मात्र ती विश्वशक्तीशीं एकरूप होऊन विश्वाचें स्वामित्व करूं शकेल. हें होत नाहीं तोंपावेतों व्यक्तिरूपांत असलेलें व्यक्ति-जीवन अपरिहार्यपणें आपल्या मर्यादितपणाचीं, आपल्या कैदेचीं तीन चिन्हें आपल्या अंगावर नेहमीं वागवीत राहील -- मरण, वासना, असामर्थ्य.

वैयक्तिक जीवनाच्या ज्या आवश्यक पार्श्वभूत परिसरात्मक गोष्टी आहेत, त्यामुळें आणि विश्वांत कार्य करणाऱ्या विश्वशक्तीशीं वैयक्तिक जीवनाचे जे आवश्यक संबंध आहेत, त्यामुळें या जीवनाला मृत्यु ही अवस्था अपरिहार्य अशी झाली आहे. वैयक्तिक जीवन हा आदिशक्तीचा एक विशिष्ट व्यवहार आहे, या विशिष्ट व्यवहाराचा उद्देश, अनन्त रूपांतील एक रूप बनविणें, राखणें, चेतनायुक्त करणें व त्या रूपाची उपयुक्तता संपली कीं त्याचा नाश करणें हा आहे : विश्वाचा एकंदर खेळ सुव्यवस्थित खेळला जावा, यासाठीं आदिशक्ति हीं सर्व अनंत रूपें आपापल्या स्थळीं, काळीं, क्षेत्रीं अस्तित्वांत आणीत असते. कोणत्याहि शरीरांत, रूपांत जी जीवनशक्ति खेळते, तिला बाहेरून येणाऱ्या विश्वांतील विविध शक्तींचा मारा झेलावयाचा असतो, या बाह्य शक्ती आत्मसात् करून, त्यांवर आपली क्षुधा तिला भागवावयाची असते, तसेंच या बाह्य रूपांतील बाह्य शक्ती ह्याहि आपलें अन्न सारखें शोधीत असतात. त्यांच्या भक्ष्यस्थानीं या विशिष्ट रूपांतील शक्तीला सारखें पडावयाचें असतें. उपनिषदांत असें सांगितलें आहे कीं, सर्व भौतिक द्रव्य हें अन्न आहे; भौतिक विश्वाचें हें एक महत्त्वाचें सूत्र आहे कीं, अन्न म्हणून कोणाला तरी खाणारा हा स्वतःहि कोणाचें तरी अन्न होतो व खाल्ला जातो. (जीवो जीवस्य जीवनम्) तेव्हां, कोणत्याहि शरीरांत जें जीवन संघटितपणें काम करतें, त्याला बाह्य परिसरांतील जीवनाचे आघात होऊन विघटित होण्याचा, मोडतोड होऊन नष्ट होण्याचा सारखा धोका असतो; अर्थात् हें विघटन किंवा नष्ट होणें ही नव्या रचनेची, नव्या देहाच्या बांधणीची पूर्वतयारी असते; मरणाची प्रक्रिया ही पुनर्जीवनाची आवश्यक पूर्वक्रिया असते. बाह्य जीवनाचे आघात ही एक विशिष्ट शरीरांतील जीवनावरची शक्य आपत्ति झाली -- दुसऱ्याहि विघटनकारी किंवा विनाशकारी आपत्ती संभवतात. या विशिष्ट शरीरांतील जीवनाला प्राणरक्षणापुरती भक्षणशक्ति नसण्याचा संभव आहे, किंवा ती प्राणरक्षणापुरती असतांहि तिला पुरतें अन्न न मिळण्याचा संभव आहे,

 

पान क्र. ३५८

 

किंवा तिची भक्षणशक्ति आणि बाह्य जीवांना आपल्या भांडारांतून पुरेसें भक्ष्य पुरविण्याची तिची शक्ति, या दोन शक्तींचा तोल वा अन्योन्यप्रमाण नीट न राहण्याचा, बिघडण्याचा संभव आहे; या संभवनीय गोष्टींपैकीं एखादी गोष्ट घडल्यास, त्या विशिष्ट शरीरांतील जीवन स्वतःचें संरक्षण करण्यास असमर्थ होतें, तें दुसऱ्याकडून भक्षिलें जातें; कायम राहून, आपल्यांतील कमी पडलेली गोष्ट मिळवून, पुन्हां समर्थ होण्याची शक्ति त्यांत न राहिल्यानें तें हळूहळू क्षीण होतें आणि विघटित होऊन नष्ट होतें--अर्थात् मरणाच्या प्रक्रियेंतून त्याला जावें लागतें--या प्रक्रियेंतून गेल्यावर त्याला नवें रूप, नवें शरीर प्राप्त होतें हें वर आलेंच आहे.

वैयक्तिक जीवन मृत्युवश होण्याची कांहीं कारणें येथवर सांगितलीं. हा प्रसंग येण्याचीं आणखीहि कारणें आहेत. उपनिषदांच्या भाषेंत, प्राणशक्ति ही शरीराचें अन्न आहे आणि शरीर हें प्राणशक्तीचें (जीवनशक्तीचें) अन्न आहे. याचा अर्थ, आमच्यांत जी प्राणशक्ति असते, ती आमचें शरीर घडण्यासाठी आणि तें सारखें संभाळून नवें नवें करण्यासाठीं लागणारा माल पुरविते आणि त्याबरोबर स्वत: घडविलेल्या, संभाळलेल्या शरीराच्या द्रव्याचा सारखा उपयोग करून निकाल लावीत असते. या दोन क्रियांमधील तोल किंवा प्रमाण असावें तसें नसलें, किंवा बिघडलें किंवा शरीरांतील प्राणशक्तीच्या भिन्न भिन्न प्रवाहांचा सुसंघटित व्यवहार, अव्यवस्थित होऊं लागला कीं रोग येतो, शक्तिक्षय सुरू होतो आणि शरीरद्रव्य विघटित होऊन, शरीर मरणाच्या पंथाला लागतें. परिस्थितीवर बुद्धिपुरस्सर मात करण्याची जीवनाची धडपड, बुद्धीचा विकासयत्न व विकास या गोष्टी देखील जीवनाचें संरक्षण अधिक अवघड करणाऱ्या आहेत. कारण वरील गोष्टींमुळें शरीरांतील जीवनशक्तीचा खर्च एरवींपेक्षां पुष्कळच अधिक होतो, शरीराकडे जीवनशक्तीकरितां सारखी वाढती मागणी होऊं लागते, शक्तीचा मूळ पुरवठा पुरवूं शकणार नाहीं इतकी ही मागणी मोठी होत जाते; पुरवठा आणि मागणी यांचें मूळ प्रमाण बिघडून जातें -- नवें शरीरानुकूल प्रमाण बसण्यापूर्वीं कित्येक व्याधी शरीरांत उत्पन्न होतात, त्यायोगें शरीराची व्यवस्था बिघडते आणि जीवनाचा आयुर्दाय एरवींपेक्षां कमी होण्याचा संभव उत्पन्न होतो; शिवाय परिस्थितीवर मात करण्याची कोणत्याहि शरीरांतील जीवनाची धडपड, ही परिसरांतील शक्तीमध्यें विरोधी प्रतिक्रिया

 

पान क्र. ३५९

 

निर्माण करते -- या शक्तींनाहि आपापलें साध्य साधावयाचें असतें आणि म्हणून त्यांच्यावर मात करूं इच्छिणाऱ्या जीवनशक्तीचा खटाटोप त्यांना असह्य होऊन, त्या तिजवर उलटतात आणि बंड करून तिच्यावर हल्ला करतात. परिसरावर मात करूं पाहणारी व्यक्तिगत जीवनशक्ति आणि व्यक्तिबाह्य परिसरगत शक्ती यांचा समतोल याप्रमाणें बिघडतो, दोहोंमधील झगडा तीव्रतर होऊन या झगड्‌यांत व्यक्तिगत शक्ति शेवटीं अपुरी पडून पराजित होते व विघटनाच्या तडाख्यांत सांपडून मरणाच्या मार्गाला लागते-- व्यक्तिगत जीवनशक्ति अमर्याद असेल, तरच परिणाम टळेल, पण ती तर सामान्यत: अमर्याद असूं शकत नाहीं. मात्र व्यक्तिगत जीवनशक्तीनें परिसरगत शक्तींशीं बिघडलेलें नातें पुन्हां एखाद्या नव्या व्यवस्थेनें सुधारून घेतलें, दोघींमध्यें नवें सुसंवादित्व निर्माण केलें, तर मात्र ती झगड्‌यांतून सहीसलामत पार पडूं शकते.

वैयक्तिक जीवनाला मरण कां येतें या संबंधानें वर कांहीं गोष्टी सांगितल्या. आतां या संबंधांत सर्वांत महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे. शरीर धारण करण्यांत जीवनाचा जो हेतु असतो, शरीरधारी जीवनाचा जो स्वभावगुण असतो, तो हेतु व तो स्वभाव काय आहे हें पाहिलें असतां, वैयक्तिक जीवनाला मरणाची मूलभूत आवश्यकता कशी आहे तें आपणाला पटतें. सांताच्या आश्रयानें अनंत अनुभव गोळा करण्याचा हा हेतु, हा स्वभाव आहे. सांत आकाराचा देह असाच घडला जातो कीं, त्याच्या द्वारां मर्यादित अनुभव मिळणार -- तेव्हां अनंत अनुभव गोळा करावयाचा व तो सांत देहाच्या आश्रयानेंच करावयाचा, असें ठरल्यावर देह पुन्हां पुन्हां नष्ट करणें व नवा घेणें ही आवश्यकता अपरिहार्य होते. स्वभावत: अनन्त असलेल्या आत्म्यानें स्वतःला मर्यादा घालून घेतली; विशिष्ट क्षण, विशिष्ट क्षेत्र हेंच आपलें अनुभवस्थान म्हणून एकाग्रतेनें ठरवून टाकले, म्हणजे त्याला आपलें स्वाभाविक अननत्व कसें परत सांपडावयाचें? तें सांपडावयाचा मार्ग एकच आणि तो म्हणजे क्रमवारीचें तत्त्व. (Principle of succession) एक क्षण अनुभव घेतला, नंतर दुसरा क्षण उपयोगांत आणून अनुभव घेतला,-- याप्रमाणें क्रमवारीनें क्षणांचा उपयोग करून कालविशिष्ट अनुभव एकत्र करून ''माझा भूतकाल'' या सदराखालीं आत्मा ते सर्व अनुभव सांठवतो. हा जो काल, त्या कालांत, या क्षणांत एक क्षेत्र, दुसऱ्यात दुसरें क्षेत्र-- अशा क्रमवारीनें अनेक क्षेत्रांतून आत्मा प्रवास करतो, अनुभवापाठीमागून

 

पान क्र. ३६०

 

अनुभव, जीवनापाठीमागून जीवन आत्मा संपादतो; ज्ञान, सामर्थ्य, सुखभोग यांचा संग्रह अशाच क्रमवारीनें तो करीत असतो; हें सर्व धन आपल्या अधोमानसिक किंवा अतिमानसिक स्मृतिगृहांत तो सांठवितो -- कालक्रमांत 'भूतकालीन मिळकतीचा संग्रह' असें नांव, तो या स्मृतिमंदिरांत सांठविलेल्या अनुभवाला देतो. या अनुभवसंग्रहाच्या दृष्टीनें एकच देह, रूप, आकार ठेवून आत्म्याचें चालत नाहीं, देह बदलणें आवश्यक होतें-- आणि देहांत बंद होऊन धडपडणाऱ्या आत्म्याला, देह बदलणें याचाच अर्थ, असलेला देह निकालांत काढणें असा होतो--भौतिक विश्वांत विश्वजीवनाचा जो सर्व-नियंत्रक नियम चालूं आहे, त्या नियमानुसार देहबदल म्हणजे एक देह नष्ट करून, दुसरा नवा तयार करून घेणें असाच व्यवहार शक्य असतो; देहाला लागणाऱ्या द्रव्याचा पुरवठा आणि त्या द्रव्याची मागणी, या संबंधाचा विश्वजीवनाचा कायदा; देहादेहांत, जीवनाजीवनांत एकमेकांवर सारखा आपल्या शक्तीचा आघात करीत राहणें हें त्या विश्वजीवनाचें जीवनतत्त्व; एकमेकांना भक्ष्य करून आपापलें जीवन चालविण्याचा व्यवहार जेथें चालतो, अशा विश्वांत देहधारी जीवनाला जगण्याची धडपड करावयाची असते ही वस्तुस्थिति -- या तीन गोष्टींमुळें अनन्त अनुभव गोळा करण्यासाठीं, आत्म्याला आपला कोणताहि देह बदलावयाचा असेल, तर असलेला देह नष्ट करून दुसरा नवा तयार करून घेणें हा एकच मार्ग मोकळा असतो. वैयक्तिक जीवनाच्या संबंधांत मुत्युविषयक अटळ नियमाचें स्वरूप हें असें आहे.

मृत्यु अवश्य कां आहे, मृत्यु समर्थनीय कां आहे तें वर स्पष्ट केलें आहे; मृत्यु हा जीवनाचा अभाव करीत नाहीं, जीवनाच्या प्रक्रियेचा एक भाग हें त्याचें खरें स्वरूप आहे. आत्मा अमर आहे, अनन्त आहे -- पण सांत समर्याद जीवनयुक्त द्रव्य, सांत समर्याद मन (जीवमान शरीरांत कोंडलेलें मन) यांना, एकाला (जीवमान द्रव्याला) अमरता हवी, दुसऱ्याला (समर्याद मनाला) अनन्त अनुभव हवा, तर या गोष्टी मिळण्याचा मृत्युशिवाय दुसरा मार्ग नाही -- जीवमान् द्रव्य नवीं नवीं रूपें (देह) धारण करूनच अमरता संपादूं शकतें -- समर्याद मन नवे नवे अनुभव अनन्त कालपर्यंत घेऊनच अनन्तता संपादूं शकतें -- आणि नवे नवे अनुभव अथवा अनुभवांत सारखा बदल करीत राहणें, नवे नवे देह घेणें, देहांत सारखा बदल करीत राहणें, याचा अर्थ मृत्युसंस्थेचा उपयोग करणें हा होतो. जन्म आणि मृत्यु या दोन टोंकांच्या मध्यें,

 

पान क्र. ३६१

 

जुनें घटकद्रव्य टाकून, नवें घेऊन आपलें शरीर सारखें बदलत असतें -- त्याचा आकार सारखा तोच दिसत असला, तरी त्याचें घटकद्रव्य सारखें बदलून त्याचें जीवन चाललेलें असतें; पण द्रव्यबदलाच्या द्वारां एकाच देहांत हा जो अदृष्ट असा बदल होत राहतो, तेवढ्यानें आत्म्याचा देहधारणाचा हेतु पुरा होत नाहीं. सांताच्या आश्रयानें अनन्त अनुभव घेणें हा हेतु पुरा होण्यासाठीं मन एकाच देहांत कायम न ठेवतां, वेगवेगळ्या देहांत ठेवणें अवश्य आहे; नव्या नव्या देहांत, नव्या नव्या काल-स्थल-परिसराच्या परिस्थितींत मन जेव्हां जात राहील, तेव्हांच त्याच्याद्वारां आत्म्याला विविध अनुभव मिळूं शकेल. आत्म्याचें शारीर-जीवन म्हणजे विशिष्ट काल-स्थल-मर्यादित जीवन. या जीवनाच्या आश्रयानें अनन्त अनुभव मिळविणें हें विविध देहांच्या द्वारां विविध अनुभव घेऊनच साध्य होऊं शकतें. अर्थात् पुन्हां पुन्हां मृत्युवशता पत्करूनच ही गोष्ट होण्यासारखी आहे. तेव्हां मृत्यु ही गोष्ट फायद्याची आहे, अवश्यहि आहे. मृत्यूचें भय वाटतें, तो नकोसा वाटतो याचें कारण तो आमच्यावर लादला जातो, तो आमच्या मनाच्या इच्छेविरूद्ध येतो; दुसऱ्या कोणाचें तरी आक्रमण आपल्यावर होऊन, आपण या आक्रमणांत झगडून झगडून दुःख भोगतो व शेवटीं पराजित होतो; ही आमच्या मनाची भावनाच आमच्या भीतीचें व मृत्युद्वेषाचें कारण आहे. आम्ही देहपातानंतर व्यक्तिजीवन संभाळून असतों, देहीला मरण नाहीं, देहालाच केवळ मरण आहे असा आमचा दृढविश्वास असला, तरी आम्हांला (आमच्या देहाला) कोणी दुसरा खाऊन टाकतो, आमच्या देहाची मोडतोड करून जबरदस्तीनें आम्हांला देह सोडावयाला लावतो, ही गोष्ट आम्हांला असह्य होते; मृत्यूच्या दुःखाचें बीज या गोष्टींत, या कल्पनेंतच आहे.

पण एकमेकाला खाऊन टाकणें ही तर जडाधिष्ठित जीवनाची एक अटळ प्रक्रिया आहे, हा एक त्या जीवनाचा आद्य नियम आहे. उपनिषदांत म्हटलें आहे कीं, क्षुधा (वासना) ही मुत्यु होय; आणि जीवन म्हणजे क्षुधा (वासना) होय. भौतिक विश्व हें मृत्युरूप क्षुधेनें (अशनाया मृत्यु:) निर्माण केलेलें आहे. भौतिक द्रव्य हा आधार घेऊनच भौतिक जीवन अस्तित्वांत येतें व राहतें; हें भौतिक द्रव्य मूळ सद्‌वस्तूचें बनलेलें आहे -- ती सद्‌वस्तु विभागली जाऊन, तिचे अनन्त अणू बनले आणि हे अणू अनन्त रीतींनीं एकमेक मिळून अणुसंघ करूं

 

पान क्र. ३६२

 

लागले. अनन्त सद्‌वस्तु अनन्त विभागरूप झाल्यावर, त्या विभागांच्या अनन्त संघांच्या द्वारांच ती आपलें मूळ अनंतत्व अनुभवूं शकतें; अनन्त विघटन आणि अनन्त संघटन या दोन प्रेरणा सद्‌वस्तूचे ठिकाणीं सारख्या कार्यान्वित झाल्यानेंच, विश्वांचें भौतिक अस्तित्व अस्तित्वांत येतें व अस्तित्वांत राहतें. सद्‌वस्तूच्या विभजनक्रियेनें बनलेला जीवनयुक्त व्यक्तिरूप अणु, स्वतःला टिकविण्यासाठीं व वाढविण्यासाठीं सारखी धडपड करीत असतो : ही धडपड म्हणजेच वासना (क्षुधा) होय. एकच एक सद्वस्तूच्या अस्तित्वाचे तुकडे झाले, व्यक्तीचें रूप तिला प्राप्त झालें, तरी आपण अनन्त सद्‌वस्तु आहोंत, सर्व कांहीं आपल्या आत्म्याच्या पोटांत आहे, सर्व कांहीं आपल्या मालकीचें आहे, ही गुप्त नेणीवव्याप्त जाणीव या व्यक्तीच्या अंतरंगांत असते आणि त्यामुळें प्रत्येक व्यक्तींत ही एक अनिवार्य, मूलभूत, अटळ सहजप्रेरणा असते कीं, आपण अधिकाधिक व्यापक अनुभव घेऊन, अधिकाधिक व्यापकपणें विश्वांतील गोष्टी आपल्या करून, आपल्यांत सामावून घेऊन, पचवून, त्यांचा भोग घेऊन, आपली शारीर, प्राणिक, नैतिक, मानसिक (बौद्धिक) वाढ करून घ्यावी. अनन्त मूळ सद्‌वस्तूची सर्वसमावेशक सर्वसत्ताक अनन्तता व्यक्तींत गुप्त, नेणीवव्याप्त अशी असते, ती अनंततेची जाणीव पुन्हां प्रकटपणें व्हावी ही जी सहजभावना व्यक्तींत उदय पावते, ती विश्वचालक ईश्वरानें दिलेली स्फूर्ति असते; प्रत्येक व्यक्तिरूप जीवांत, देह धारण करून वसति केलेल्या महान् आत्म्याची ती तीव्र इच्छा असते -- आणि ही इच्छा पुरविण्यासाठीं व्यक्तिदृष्ट्या आपल्या जीवनशक्तीची सारखी वाढ व्हावी, विस्तार व्हावा यासाठीं व्यक्ति खटपट करीत असते. ही गोष्ट अपरिहार्य आहे, न्याय्य आहे, आत्म्याच्या हिताची आहे. ही जीवनविषयक, प्राणविषयक वाढ आणि विस्तार, भौतिक विश्वांत करून घ्यावयाचा, तर व्यक्तीनें परिसरांतील गोष्टींना आपलें भक्ष्य करणें, इतरांना आपल्या शरीरांत विलीन करून घेणें किंवा इतरांच्या जवळच्या वस्तूंना आपल्या शरीराचें खाद्य करणें ही गोष्ट अपरिहार्य असते; वासना किंवा क्षुधा, मग तिचें स्वरूप कोणतेंहि असो, ती या प्राण-संवर्धन-मार्गाच्या नितान्त आवश्यकतेमुळें, अपरिहार्यतेमुळें सर्वत्र समर्थनीय ठरते. परंतु जो भक्षण करील, तो भक्ष्यहि होईल ही भौतिक विश्वांत अटळ गोष्ट आहे. कारण भौतिक विश्वांतील प्राणव्यवहारांत, जीवनव्यवहारांत सर्वत्र, व्यक्ति व परिस्थिति या दोहोंमध्यें आघातांची देवघेव, क्रिया व

 

पान क्र. ३६३

 

प्रतिक्रिया व्हावयाची आणि व्यक्ति मर्यादित सामर्थ्याची असल्यानें, या लढ्यांत शेवटीं थकून परिस्थितीचा बळी होऊन निकालांत निघावयाची हा सार्वत्रिक नियम आहे.

व्यक्तींत जाणीवयुक्त मनाचा उदय होऊन, त्याची वाढ झाली म्हणजे नेणीवव्याप्त जीवनांत प्राणाची क्षुधा म्हणून असलेली प्रेरणा, श्रेष्ठतर रूपें धारण करते. केवळ शारीर-प्राणांत भक्ष्य-भक्षणाची जी प्राथमिक क्षुधा म्हणून असते, ती मनोयुक्त (शारीर) प्राणांत (जीवनांत) विविध भोगलोलुप वासनेचें रूप धारण करते, बुद्धियुक्त-विचारयुक्त, प्राणांत (जीवनांत) कार्यप्रवण कार्योत्सुक इच्छाशक्तीचें, संकल्पशक्तीचें रूप धारण करते. अशी ही इच्छेची (वासनेची, संकल्पाची) वाटचाल, प्रगति या पुढेंहि चालूं राहणार, राहिली पाहिजे आणि राहणें योग्य आहे. या वाटचालीनें व्यक्ति हळूहळू वाढून इतकी समर्थ होईल कीं, ती आपल्या घटकभूत शरीर-प्राण-मन यांचें पूर्ण नियंत्रण करूं शकेल आणि अनन्ताशीं तिची एकता वाढत जाऊन, ती आपल्या विश्वाची स्वामिनी होईल. ईश्वरी जीवनतत्त्व, इच्छा या तेजोमय तत्त्वाचा आश्रय करून, विश्वांत आपली सत्ता अबाधित चालविण्याचा हेतु सफल करीत असतें -- ही तळपती इच्छा विझवून टाकण्याचा प्रयत्न करणें -- निष्कर्मता हें ध्येय पुजून त्याच्या नादानें, निर्वासनता स्वांतरांत प्रस्थापित करण्यासाठीं तळपती इच्छा विझवून टाकण्याचा प्रयत्न करणें -- हें ईश्वरी जीवनतत्त्वाचा निषेध करणें आहे, तें अमान्य करणें आहे; या निषेधाचा वा अमान्यतेचा अर्थ, आत्म्याचें अस्तित्व पुसून टाकण्याची इच्छा करणें असा आहे -- आणि ही गोष्ट उघड उघड अज्ञान आहे; -- कारण व्यक्तीला व्यक्तित्व नाहींसें करावयाचें असेल, तर तिनें अनन्तत्व धारण केलें पाहिजे, दुसरा मार्ग नाहीं; व्यक्तिरूपानें असलेलें आत्म्याचें अस्तित्व पुसून टाकावयाचें, तर तिनें पुन्हां आपलें आद्य अनंतत्व मिळविले पाहिजे, दुसरा मार्ग नाहीं. आत्मा अस्तित्वांतून नाहींसा होऊं शकत नाहीं; तो नाहींसा होऊं शकतो ही कल्पना म्हणजे केवळ अज्ञान आहे. जेव्हां आमची इच्छा अनन्ताच्या इच्छेंत अस्त पावेल, तेव्हांच ती योग्य रीतीनें अस्त पावली असें होईल -- ती आपलीं दुसरीं सर्व रूपें टाकून 'अनन्ताची इच्छा' हें एकच रूप धारण करील. हें रूप घेण्यानें, ती आपली सर्वोत्तम पूर्णता प्राप्त करून घेईल -- या पूर्णतेचा आनंद तिला लाभेल --मूळ अनन्ततत्त्व सर्व स्वामित्वाचा जो आनंद भोगीत असतें, तो आनंद या

 

पान क्र. ३६४

 

पूर्णता पावलेल्या आमच्या इच्छेला भोगावयास सांपडून, या आनंदाच्या भोगांत तिला असीम समाधान लाभेल. पण हें घडून येण्यापूर्वीं आमची इच्छा ही स्वरूपतः पुष्कळच प्रगत व्हावी लागेल. आज आम्ही अन्योन्य अन्योन्यांचें भक्षण करण्याच्या मागें असतों; अन्योन्य-भक्षक क्षुधेचें हें रूप टाकून, आमच्या इच्छेनें अन्योन्य दातृत्वाचें रूप घेतलें पाहिजे; एकमेकांनीं एकमेकांना देण्याघेण्यांत घडणारा त्याग, तिला अधिकाधिक आनंदमय वाटत गेला पाहिजे. व्यक्ति ही भोंवतालच्या व्यक्तींना आत्मदानानें संतुष्ट करते, तर त्या दुसऱ्या व्यक्ती आत्मदानानें या व्यक्तीला समाधान देतात; कनिष्ठ जीव आत्मदान करून श्रेष्ठाची सेवा करतो, श्रेष्ठ त्याचप्रकारें कनिष्ठाची सेवा करतो; दोघेहि आपापली पूर्णता या अन्योन्य सेवेनें प्राप्त करून घेतात; मानव आपली मानवता ईश्वराच्या चरणीं अर्पण करतो आणि ईश्वर आपली ईश्वरता मानवाला अर्पण करतो; व्यक्तींत वास करणारा सर्वात्मा, विश्वांत वास करणाऱ्या सर्वात्म्याला सर्वस्व दान करतो आणि या सर्वस्व-दानाचा ईश्वरी दिव्य मोबदला म्हणून व्यक्तीला विश्वात्म्याच्या सर्वात्मतेची नित्य निरतिशय आनंदाची अनुभूति प्राप्त होते. या रीतीनें आमच्या व्यवहारांत आरंभीं सर्वगामी असलेला क्षुधेचा (अन्योन्य-भक्षणाचा) कायदा बाजूला पडून, त्याचे ठिकाणीं क्रमश: प्रेमाचा (अन्योन्य सेवेचा) कायदा सर्वगामी होतो; भेदाचा कायदा बाजूला पडून, त्याची जागा अभेदाचा, ऐक्याचा कायदा घेतो; मरणाचा कायदा बाजूला होऊन, आपली जागा तो अमरत्वाच्या कायद्याला बहाल करतो. विश्वांत जो वासनेचा कायदा काम करीत आहे, त्याची आवश्यकता काय, त्याचें समर्थन काय, त्याची परमोच्च अवस्था, कृतार्थता व परिपूर्णता कशांत आहे या गोष्टींची यथार्थ कल्पना वरील विवेचनावरून जिज्ञासूंना येऊं शकेल.

जीवन हें मरणाचा मुखवटा धारण करतें याचें कारण, मर्यादांत कोंडलेला आत्मा आपली अमरता व्यवहारांत आणण्याची धडपड करीत असतो हें आहे. मरण हा ज्याप्रमाणें जीवनाचा मुखवटा आहे, त्याप्रमाणें वासना हा त्या वैयक्तिक जीवनाच्या शक्तीचा मुखवटा आहे. मूळ अनन्त सत्तेची शक्ति, वैयक्तिक जीवनाबरोबर व्यक्तींत जेव्हां कोंडली जाते, तेव्हां वासना ही उदयास येते; वासना ही, वैयक्तिक जीवनशक्तींत उदयास येणारी सहजप्रेरणा आहे, सान्ताच्या चौकटींत क्रमश:, आपला मूळ अनन्त सच्चिदानन्दाचा आनंद आत्मसात् करण्याचा तिचा उद्देश

 

पान क्र. ३६५

 

असतो; काल-स्थलबद्धता हें व्यक्तिजीवनाचें स्वरूप असल्यामुळें स्थलदृष्ट्या क्रमवारीनें क्षणामागून क्षणांत व्यवहार करून, व्यक्तिरूप आत्मा सान्ताच्या चौकटींत आपलें मूळ अनन्त सुख प्राप्त करून घेण्याच्या खटपटींत असतो. ही खटपट हेंच वासनेचें रूप आहे -- आणि ही खटपट त्याला वैयक्तिक जीवनशक्तीच्या दुबळेपणामुळें, असामर्थ्यामुळें करावी लागते हेंहि उघड आहे. सच्चिदानन्दमूलक जीवन अमर आहे, जीवनशक्ति अनन्त (आणि म्हणून आनन्दमय) आहे. पण जीवनाला व जीवनशक्तीला वैयक्तिक स्वरूप प्राप्त झालें म्हणजे आपली मूळ अमरता व अनंतता (आनन्दमय अनन्तता) अनुक्रमें मरणाचा व वासनेचा मुखवटा चढवून आणि रूपापाठीमागून रूपें धारण करून, अमरता सिद्ध करणें आणि शारीर, प्राणिक, नैतिक, बौद्धिक, प्रेममय, ऐक्यमय, अशी एकापेक्षां एक वरिष्ठ रूपें वासनेला देऊन व सारखा वाढता आनंद प्राप्त करून घेऊन, आपली आनन्दमय अनन्तता सिद्ध करणें हें मूळ जीवनाला व जीवनशक्तीला प्राप्त होतें. मूळ अनन्तशक्ति सान्ताच्या चौकटींत बसून कार्य करूं लागली म्हणजे तिला 'जीवन' असें आपण म्हणतों. तिजकडून सान्तांत जें प्रकट वैयक्तिक कार्य घडतें, त्या कार्यांत तिचें मूळ सर्वसमर्थत्व हें अपरिहार्यपणें मर्यादित सामर्थ्याचें आणि अर्थात् त्याजबरोबर असामर्थ्याचें (मर्यादित) रूप धारण करतें; तथापि व्यक्तीच्या प्रत्येक व्यवहारामागें -- तो व्यवहार कितीहि दुबळेपणाचा, निरर्थक, थबकत, ठेंचाळत चालणारा दिसला, तरी त्याच्या पाठीमागें अनन्त सर्वसमर्थ अशी अतिमानसिक किंवा अधोमानासिक शक्ति गुप्त रूपानें उभी असते; अनन्त शक्तीच्या अशा उपस्थितीशिवाय विश्वांतील अगदीं क्षुद्रांत क्षुद्र हालचालहि होऊं शकत नाहीं; विश्वांतील एकूण एक सर्व व्यवहार प्रत्यक्षपणें वा अप्रत्यक्षपणें या शक्तीकडूनच होतात; सर्वसमर्थ सर्वज्ञता अतिमानस या रूपानें विश्वांत काम करीत आहे आणि या सर्वज्ञ मूळ सत्तेच्या हुकुमानें विश्वांत घडणारें प्रत्येक कार्य व आंदोलन तिच्या अनन्त शक्तीच्या एकंदर व्यवहाराच्या पोटांतच होत असतें; मात्र व्यक्तिरूप धारण करणाऱ्या जीवनशक्तीला अशीच जाणीव असते कीं, मी मर्यादित आहे, मी पुष्कळशी असमर्थ आहे; तिच्या भोंवतालीं तिच्या सारख्याच व्यक्तिरूप जीवनशक्तींचा तांडा असतो; या तांड्याला तोंड देणें तिला भाग पडतें; शिवाय अनन्त जीवन हेंहि तिच्यावर नियंत्रण करीत असून, केव्हां केव्हां तिचें कार्य विफल करतें; कारण केव्हां केव्हां अनन्त जीवनाची

 

पान क्र. ३६६

 

सर्वदर्शी, सर्वहितकारी, सर्वस्पर्शी इच्छा आणि कल एक असतो, तर मर्यादित व्यक्तिरूप जीवनाची इच्छा आणि कल दुसराच असतो. व्यक्तिरूप विभक्त जीवनशक्तीला तिचें एक विशिष्ट लक्षण म्हणून हें जें असामर्थ्य चिकटलेलें आहे, त्याची समर्थनीयता व अपरिहार्यता वरील विवेचनावरून लक्षांत येईल. व्यक्तिरूप जीवनशक्तींत मर्यादितता आणि म्हणूनच असमर्थता अपरिहार्य असली, तरी मूळ अनन्तशक्तीच्या गुप्त प्रेरणेनें आपली मत्ता व सत्ता वाढविण्याची भावना तिच्यांत असते; सर्वकांहीं आपल्या मत्तेंत जमा व्हावें, आपल्या सत्तेखालीं यावें, ही स्फूर्ति तिच्या मर्यादित शक्तीमुळें कांहीं मर्यादित होत नाहीं व तशी ती मर्यादित होऊं नये अशीच मूळशक्तीची योजना असते. सत्ता चालविण्याची शक्ति मर्यादित व स्फूर्ति मात्र अमर्यादित : या द्वंद्वांतूनच वासनेचा उदय होतो. कारण स्फूर्ति आणि शक्ति यांच्यांत जर अंतर नसतें, जो विषय हवासा वाटला, तो सहज ताब्यांत घेण्याइतकी शक्ति जर व्यक्तिरूप जीवनांत असती, तर वासना उत्पन्न होण्याचें कारणच नव्हतें; या काल्पनिक (जशी स्फूर्ति तशी शक्ति या) परिस्थितींत, वासनाविशिष्ट विषयाकरितां तळमळणारी वासना व्यक्तीचे ठिकाणीं व्यक्त न होतां, शांत, आत्मश्रद्धायुक्त असा निश्चयी संकल्प (ईश्वरी सत्य संकल्पासारखा संकल्प) व्यक्तींत उदय पावला असता आणि त्यानें आपला विषय सहज आपल्या ताब्यांत घेतला असता.

व्यक्तिरूप झालेली शक्ति ही, अविद्याग्रस्त मनाची नसून, अविद्यामुक्त मनाची असेल, तर तळमळणाऱ्या वासनेनें व्यक्तीच्या मनांत ठाण देणें आवश्यक व अपरिहार्य होणार नाहीं. कारण अविद्यामुक्त मन अतिमानसाला जाणतेपणें चिकटून असणार, त्यापासून विभक्त असणार नाहीं आणि असें अविभक्त दिव्य ज्ञानसंपन्न मन, आपल्या प्रत्येक नियोजित कार्यांतील मूळ अतिमानसिक हेतु जाणील, त्याचें क्षेत्र आणि त्याचा अटळ परिणाम यांचें ज्ञान त्याला असेल आणि म्हणून भलतीच तळमळ किंवा धडपड तें करणार नाहीं; जो तात्कालिक हेतु त्याच्यापुढें असेल, त्याच्या पूर्ततेला अवश्य तेवढीच स्वयंमर्यादित व कार्यक्षम शक्ति तें कामीं लावील. हेतु तात्कालिक नसून कालांतरानें पुरा करावयाचा असेल आणि अशा दूरच्या हेतूसाठीं कांहीं चळवळ हातीं घेतली असेल, तरीदेखील अतिमानसिक ज्ञानाशीं फारकत न झालेलें मन मर्यादितपणाच्या भावनेनें किंवा वासनेच्या तळमळीनें हैराण होणार नाहीं; कारण त्याची चळवळ तात्पुरती

 

पान क्र. ३६७

 

अयशस्वी झाली, तरी ही अयशस्विता सर्वज्ञ सर्वसमर्थ आदिशक्तीचेंच सहेतुक कार्य असतें, हें त्याला ठाऊक असेल. जेव्हां ईश्वरी सर्वज्ञ सर्वसमर्थशक्ति कोणतेंहि विश्वकार्य योजितें, तेव्हां त्याचा आरंभ कोणत्या वेळीं, कोणत्या परिस्थितींत करावयाचा, तें कोणत्या चढउतारांतून प्रगति-परागतींतून जावयाचें, त्याचें तात्कालिक परिणाम आणि अंतिम परिणाम काय असावयाचें हें सर्व ती ठरवून ठेवते -- अर्थात् मध्यें कांहीं ''अयशस्विता'' (परागति) नजरेस आली, तरी ती सहेतुक असते हें उघड आहे. ज्ञानसंपन्न अविद्यामुक्त मन, दिव्य अतिमानसाशीं संलग्न असल्यानें हें सर्व ज्ञान, ही सर्व सर्वनियामक शक्ति त्यालाहि असते आणि म्हणून वर सांगितल्याप्रमाणें अयशस्वितेनेंहि त्याला मर्यादितपणाच्या भावनेचा किंवा वासनेच्या तळमळीचा उपसर्ग किंवा स्पर्श होत नाहीं. परंतु आमचें अविद्याबद्ध मन, त्याच्या अतिमानसिक ज्ञानापासून विभक्त झालें आहे आणि आमची वैयक्तिक जीवनशक्ति ही अशा ज्ञानहीन विभजनासक्त मनाची शक्ति आहे; म्हणून या वैयक्तिक जीवनशक्तीचे जीवनाच्या इतर प्रान्ताशीं जे संबंध येतात, त्या संबंधांत तिचें सामर्थ्य मर्यादित असणें अवश्य आहे आणि अपरिहार्य आहे; शक्ति ज्ञानशून्य आणि ती व्यवहारांत मात्र सर्वसमर्थ -- मग त्या व्यवहाराचें क्षेत्र अगदीं मर्यादित कां असेना -- ही गोष्ट अकल्पनीय आहे. कारण त्या क्षेत्रांत ती शक्ति, सर्वज्ञ सर्वसमर्थ ईश्वरी शक्तीच्या विरुद्ध आपलें ठाण मांडील आणि निश्चित ठरलेली ईश्वरी योजना घोंटाळ्यांत आणील, अनिश्चित करून टाकील असा संभव उत्पन्न होतो आणि ही गोष्ट विश्वाच्या व्यवस्थेंत शक्य होऊं देतां येत नाहीं. यासाठीं ज्या शक्ती मर्यादित आहेत, त्यांनीं आपापलें सामर्थ्य, सहज किंवा जाणीवयुक्त वासनेच्या प्रेरणेनें झगडून वाढवावें हा जीवनाचा महान् कायदा आहे. वासनेसंबंधानें पूर्वीं जें सांगितलें, तें वासनाप्रेरित झगड्यालाहि लागूं आहे; झगडा हा आरंभीं पक्ष-प्रतिपक्षांमध्यें एकमेकांना नुकसान पोंचविण्याच्या हेतूनें, आपापला स्वार्थ साधण्याच्या हेतूनें होत असतो; तो पुढें या क्षुद्र पातळीवर न होतां, उच्च पातळीवरून, एकमेकाला लाभदायक होईल अशा हेतूनें व्हावयास हवा; व तसा तो विकासक्रमानें होऊंहि लागतो. दोन मल्ल स्नेही, कुस्ती खेळून एकमेकांची शक्ति अजमावतात व वाढवितात, त्याप्रमाणें संसारांत विकासक्रमांत विशेष प्रगत झालेल्या दोन जीवनशक्ती -- एक लढ्यांत हरणारी व एक जिंकणारी अशा दोन शक्ती -- लढ्यानें

 

पान क्र. ३६८

 

सारख्याच संवर्धित होतात, त्यांना लढ्यापासून सारखाच लाभ होत असतो; लढणाऱ्या शक्तींत एक खालच्या पातळीवर व दुसरी वरच्या पातळीवर असेल, तर दोन्ही शक्तींचा सारखाच फायदा लढ्यानें होत असतो; खालची हरणारी शक्ति आपल्या हीन प्रेरणेचें हीनत्व ओळखते व तिच्या त्यागाला तयार होते, वरची विजयी शक्ति आपल्या उच्च प्रेरणेचें यशस्वित्व अनुभवून, तिला चिकटून राहते, ती संवर्धित करते व तिचें दान इतरांना करते; याप्रमाणें झगड्यानें दोन्ही झगडणाऱ्या शक्तींचा फायदाच होतो. विकासाचा शेवट असा असतो कीं, झगडा हा झगड्याचें स्वरूप टाकून प्रेममय, प्रेमप्रेरित संमीलनाचें, सुखमय संसर्गाचें, संगतीचें, सहवासाचें, समालिंगनाचें रूप घेतो व दिव्य भावनांचा विनिमय परस्परांत होऊं लागतो; तथापि ज्या झगड्यामध्यें एकमेकांना हार देण्याच्या दृष्टीनें, एकमेक एकमेकांना त्वेशानें पेंच घालतात, पकडींत धरतात, असा झगडा हा विकासाच्या आरंभींच्या टप्प्यांत आवश्यक असतो व लाभप्रदहि असतो. मरण, वासना आणि (असामर्थ्यमूलक) झगडा हीं तीन विभक्त जीवनाचीं लक्षणें आहेत. हे तीन ईश्वरी जीवनतत्त्वाचे मुखवटे (त्याचें सत्यस्वरूप झांकणारे व ते अन्यथा भासवणारे मुखवटे) आहेत; हें जीवनतत्त्व व्यक्तिरूपांत, आपल्या मूळ विश्वव्यापक स्वरूपाच्या गुप्त प्रेरणेनुसार जी प्राथमिक धडपड करतें, त्या धडपडींत तें हे तीन मुखवटे धारण करतें -- आणि ही त्याची धडपड शेवटीं यशस्वी होते; शेवटीं तें व्यक्तिरूप झालेलें ईश्वरी जीवनतत्त्व, विश्वव्यापक जीवनाशीं एकरूप होतें.

 

पान क्र. ३६९

 

प्रकरण एकविसावें

 

जीवनाची ऊर्ध्वगति

 

पवित्र शब्दाचा मार्ग मार्गस्थांना देवतांकडे घेऊन जावो, हा मार्ग मनाच्या व्यापाराच्या द्वारां मार्गस्थांना आपोदेवतांकडे घेऊन जावो.

- ऋग्वेद १०.३०.७

 

हे ज्वाले ! स्वर्गरूपी सागराकडे तूं जातेस, देवतांकडे तूं जातेस; भिन्न लोकांतल्या देवता एकत्र भेटतील असें तूं करतेस, सूर्याच्या वरतीं असलेल्या प्रकाशमय क्षेत्रांत असणाऱ्या आपोदेवता आणि येथें खालीं असणाऱ्या आपोदेवता या एकत्र भेटतील असें तूं करतेस.

- ऋग्वेद ३.२२.३

 

आनंदाचा स्वामी तिसरें स्थान हस्तगत करतो; विश्वमय आत्म्याच्या इच्छेनुसार हा स्वामी विश्वाचें रक्षण करतो, विश्वाचें शासन करतो; श्येन किंवा गरुड एखाद्या पात्रावर बसतो व तें वर उचलतो, त्याप्रमाणें हा स्वामी विश्वरूपी पात्रावर बसून तें वर उचलतो; तो प्रकाश शोधून काढतो, चवथें स्थान आविष्कृत करतो आणि तेथें असणाऱ्या सागराला (जलकल्लोळांनीं हेलावत असलेल्या सागराला) चिकटून राहतो.

- ऋग्वेद ९.९६.१८.१९

 

विष्णूनें तीन पावलें टाकलीं; मूळ मृत्तिकेवर त्याचें पहिलें पाऊल होतें; तेथून आरंभ करून, आपलें पाऊल मृत्तिकेंतून वर उचलून, त्यानें तीन पावलें टाकलीं; विष्णु सर्व विश्वाचा रक्षणकर्ता आहे, तो अजिंक्य आहे; तीन पावलांनीं व्यापलेल्या त्रिलोकरूप विश्वाचे कायदे, त्रिलोकींच्या पलीकडे राहून तो विश्वांत चालवितो, उचलून धरतो; विष्णूचे व्यवहार बारकाईनें तपासा; या व्यवहारांचे नियम त्यानें कोठून आविष्कृत केले आहेत तें पहा; तें ठिकाण त्याचें सर्वात उंच टाकलेलें पाऊल आहे -- द्रष्ट्या ऋषींना तें नित्य दिसतें, स्वर्गांत दिव्य चक्षु सर्वत्र व्यापून असावा, असें तें विष्णूचें उंचांत उंच पाऊल, उंचांत उंच स्थान द्रष्ट्या ऋषींना नित्य

 

पान क्र. ३७०

 

दिसतें; ज्यांना अंतर्ज्ञान लाभलेलें आहे, ज्यांना जागृति आलेली आहे, ते विष्णूच्या सर्वोच्च पावलाचें तें स्थान (आपल्या प्रकाशानें, तेजानें) प्रकाशमय तेजोमय करतात.

- ऋग्वेद १.२२.१७ ते २१

 

विभक्त मर्त्य मन आणि विभजन करणाऱ्या मनाची क्रियाशील अशी जी जीवनशक्ति किंवा प्राणशक्ति यांचें स्वरूप आपण पाहिलें. विभक्त मन हें मर्यादा, अज्ञान, जीवनांतील द्वंद्वें यांच्या उगमस्थानीं आहे; तें अतिमानसाची केवळ अंधकारमय (अज्ञानमय) छाया आहे; आमच्या विश्वाचें आरंभींचें रूप, अतिमानसिक जाणिवेचें, स्वयंप्रकाश दिव्य जाणिवेचें नांवहि जेथें नाहीं अशा प्रकारचें, दिसावयाला दिसतें, तें पूर्ण नेणिवेनें भरलेलें, जाणिवेच्या विरोधी असें दर्शनीं असतें; या प्राथमिक दर्शनीं नेणीवमय विश्वरूपाशीं प्राथमिक व्यवहार करतांना अतिमानस, हें मनाचा -- आपल्या छायेचा -- उपयोग करीत असतें. ही विभक्त विनाशी मनाची गोष्ट झाली. अशीच विभक्त जीवनशक्तीची गोष्ट आहे. आपल्या भौतिक विश्वांतून जीवनशक्ति, प्राणशक्ति वर येते; जडद्रव्यांत बंद असलेल्या, बुडालेल्या नेणीवमय विभजनपर मनाची क्रियाशील शक्ति, हे भौतिकांतून वर येणाऱ्या, आविष्कृत होणाऱ्या या जीवनशक्तीचें - जीवशक्तीचें स्वरूप असतें; ही जीवशक्ति मरण, क्षुधा, असामर्थ्य यांचें उगमस्थान आहे; ही शक्ति, दिव्य अतिमानसिक शक्तीची केवळ नेणीवमय छाया आहे -- अमरता, तृप्तिपूर्ण आनंद, सर्वसमर्थता हीं मूळ दिव्य अतिमानसिक शक्तीचीं लक्षणें आहेत. दिव्य अतिमानसिक जाणिवेचें, तिच्या शक्तीचें आणि मर्त्य विभक्त संसारी मानवी मनाचें व प्राणाचें (जीवनाचें) हें जें अन्योन्यविषयक नातें आहे, त्यावरून विश्वाची महान् प्रक्रिया, अर्थात् विश्वाचें भाग असे आम्ही, त्या आमच्या विकासाची प्रक्रिया ठरते. आमच्या विकासाचा आरंभ, मध्य आणि अंतिम टप्पा वरील नातें ठरवितें. जीवनाचा आरंभ, अर्थात् आमच्या विकासाचा आरंभ पाहतां, त्या आरंभींच्या जीवनाचीं लक्षणें पुढीलप्रमाणें असतात. तेथें विभागणी असते, एकतत्त्वाचें एकत्व मोडून अनेक विभक्त वस्तू झालेल्या असतात; या वस्तूंचे ठिकाणीं नेणीवव्याप्त इच्छाशक्ति असते, तिच्या मागें जड शक्तीचा चाबूक असतो; ती प्राथमिक इच्छाशक्ति जडशक्तीकडून हांकली जात असते, अर्थात् तिचें दर्शनी रूप 'इच्छा' हें रहातच नाहीं, 'भौतिक

 

पान क्र. ३७१

 

जडशक्तीची जडमूक उसळी' हें त्या 'इच्छेचें' स्वरूप असतें; या प्राथमिक 'जीवनाचें' आणखी एक लक्षण असें असतें कीं, कोणतेंहि रूप (वस्तुरूप) आणि त्याची परिस्थिति यांजमध्यें जीवनाच्या अबाधित नियमानुसार जो शक्तिविनिमय होत असतो, त्या विनिमयावर भौतिक यांत्रिक शक्तींची अधिसत्ता चालते आणि या स्वतांतील व परिसरांतील सत्ताधीश असणाऱ्या यांत्रिक शक्तींपुढें वस्तुरूपाला मान लववावी लागते, त्या नेतील तिकडे मुकाटयानें, प्रतिकार न करतां जावें लागतें; अर्थात् प्राथमिक जीवनाचें तिसरें लक्षण, असामर्थ्य, दुर्बळता हें असतें. जडविश्वाचें जें चित्र भौतिक शास्त्रज्ञ पाहतो, त्यांत नेणीव, ज्ञानशून्यता आणि महाशक्तीचें सामर्थ्यशील व प्रभावी परंतु जाणीवशून्य कार्य त्याला दिसतें; भौतिक शास्त्रज्ञाला पायाभूत अस्तित्वाच्या सर्व क्षेत्रभर, जाणीवशून्य महाशक्तीचा प्रभाव दिसतो. जडांत जी जाणीव उद्‌भवलेली दिसते, ती म्हणजे नेणीवच स्वतः जाणीव झालेली असते; जीवन हें नेणीवव्याप्त व यांत्रिक आहे असें त्याचें ठाम मत असतें. असो. जी जीवनशक्ति, जीवशक्ति किंवा प्राणशक्ति वस्तुरूपांत बंद असते, ती त्या रूपांतून बाहेर येते, व्यक्त होते आणि हळूहळू जाणीवयुक्त मनाच्या उदयाची ती भूमि बनते; व्यक्त झालेल्या जीवनशक्तीचीं लक्षणें, जडांतील अव्यक्त जीवनशक्तीच्या लक्षणांपेक्षां श्रेष्ठ व वेगळीं असतात. अव्यक्त जीवनशक्ति हा आमच्या विकासाचा आरंभ किंवा पहिला टप्पा आणि व्यक्त जीवनशक्ति हा दुसरा किंवा मधला टप्पा होय. या दुसऱ्या किंवा मधल्या टप्प्यांत जीव मरणाधीन दिसतो आणि आम्हांला असेंहि दिसतें कीं, जीव परस्परांना भक्षण करतात, त्यांना क्षुधा, जाणीवयुक्त वासना असतात; आपलें क्षेत्र मर्यादित आहे अशी भावना त्यांना असते, आपलें सामर्थ्यहि मर्यादित आहे असें त्यांना कळतें; ते आपली मत्ता वाढविण्यासाठीं, विस्तृत करण्यासाठीं, परिसरावर विजय मिळविण्यासाठीं आणि त्याला आपल्या सत्तेखालीं आणण्यासाठीं झगडत असतात. डार्विनच्या जीवनविषयक उपपत्तीची, विकासकल्पनेची इमारत ज्या पायावर उभारलेली आहे, त्या पायाच्या अंगभूत अशा गोष्टी म्हणजे व्यक्त जीवशक्तीचीं वर सांगितलेलीं लक्षणें होत. जीवन म्हणजे झगडा -- अंगीं झगडण्याची शक्ति कमीअधिक असेल, तिजवरून जीवाची जीवनांतील यशस्विता ठरते. जो टिकण्यास अधिक लायक असेल, तोच जीवनाच्या झगड्यांत टिकतो; जीवाजीवांच्या झगड्यांत तो जीव टिकतो, जो टिकण्यास सर्वांत

 

पान क्र. ३७२

 

अधिक लायक असतो -- असा डार्विनचा विकासविषयक सिद्धान्त आहे. हा सिद्धान्त डार्विननें व्यक्त जीवशक्तीच्या लक्षणांवरून निश्चित केला. मरण हें व्यक्त जीवशक्तीचें लक्षण घ्या. मरण या घटनेंत, मरण टाळून टिकून राहण्याकरितां जीव झगडत असतो; या घटनेंत मरणाच्या अक्रियात्मक पडद्याआड राहून जीवन आपलें क्रियात्मक अस्तित्व मरणरहित, अमर व्हावें म्हणून त्याला झगडवीत असतें. जीवशक्तीचें दुसरे लक्षण क्षुधा आणि वासना. या लक्षणाच्या क्रियेंतहि झगडा असतो. आपली क्षुधा तृप्त व्हावी, आपली जीवनस्थिति सुरक्षित व्हावी यासाठीं जीवाचा हा झगडा असतो; वासना ही एक प्रेरक शक्ति असते, या प्रेरकशक्तीच्या द्वारां, जीवन हें आपल्या क्रियात्मक अस्तित्वाला, अतृप्त क्षुधारूपी अ-क्रिय अवस्थेंतून बाहेर पडून, अस्तित्वाचा आनंद पुरेपूर मिळविण्यासाठीं झगडवीत असतें. मर्यादित सामर्थ्य हें लक्षण घ्या. येथें विस्तारासाठीं झगडा असतो; आपल्या स्वतःवर व आपल्या परिसरावर विजय मिळवावा व तें आपल्या आधीन करून घ्यावें, यासाठीं येथें झगडा खेळला जातो; कारण वासना आणि उणीव या गोष्टी जीवनाची पडती बाजू दाखवितात -- या पडत्या बाजूला पुढें करून, जीवन हें आपल्या चढत्या बाजूला या पडत्या बाजूच्याद्वारां प्रेरणा देतें आणि त्याला आपली कमतरता पूर्णपणें दूर करण्यासाठीं, जी पूर्णता त्याला सदैव मिळवितां येण्यासारखी असते ती त्यानें मिळवावयासाठीं, त्याला झटावयास, झगडावयास लावतें. 'जीवनासाठीं झगडा' हा केवळ प्राणरक्षणार्थ झगडा नसून, आपली मत्ता वाढविण्यासाठीं, आपली उणीव दूर करून पूर्णता मिळवण्यासाठींहि तो असतो; कारण आपल्या परिसरांतल्या गोष्टींवर कमीअधिक ताबा मिळवूनच जीवाला आपलें अस्तित्व टिकवितां येतें ही गोष्ट उघड आहे -- मग हा ताबा परिस्थितीशीं मिळतें घेऊन मिळवा किंवा परिस्थितीला मुरड घालून मिळवा; परिस्थितीला मान्यता देऊन व चुचकारून मिळवा किंवा तिच्यावर विजय संपादून आणि तिच्यांत बदल घडवून आणून मिळवा. परिस्थितीवरचा ताबा, जीवाला आपलें अस्तित्व टिकविण्यास साहाय्यक होतो, हें जसें खरें आहे तसेंच हेंहि खरें आहे कीं, जीवाची पूर्णता जसजशी वाढते, तसतशी त्याला पुष्कळ काळपावेतों अखंडत्वानें जीवन जगण्याची शक्ति येते, नित्य जीवनाचीहि शक्यता या पूर्णतेच्या विशिष्ट वाढीनें उत्पन्न होते. जीवनाच्या झगड्यांत सर्वांत अधिक लायक असेल, तो सर्वांत अधिक टिकेल, या

 

पान क्र. ३७३

 

डार्विनच्या सूत्रांत हा वरील अर्थ भरलेला आहे.

परंतु डार्विनच्या सिद्धान्तांतील हा सर्व अर्थ भौतिक शास्त्रज्ञांच्या लक्षांत आला नाहीं. जड द्रव्यांतील अस्तित्वाला आणि त्यांतील सुप्त, यांत्रिक जाणिवेला लागूं असणारें, नेणिवेच्या परावलंबित्वाचें यंत्रतत्त्व त्यांनीं जडांतून उदयास येणाऱ्या जीवनालाहि लावलें -- जीवन हें जडतत्त्वाहून वेगळें तत्त्व असून, जडाच्या यांत्रिक अस्तित्वाचें कार्य आपल्या सत्तेनें चालविणें, आपल्या सोईनें चालविणें हें या नव्या तत्त्वाचें जन्मसिद्ध कार्य आहे, सहजधर्म आहे ही गोष्ट ज्याप्रमाणें वैज्ञानिकांच्या लक्षांत आली नाहीं, त्याप्रमाणेंच डार्विनच्या सूत्राची व्याप्तीहि त्यांनीं मर्यादेबाहेर नेली; जीवन आक्रमक आहे, व्यक्तिजीवन स्वयंपरायण आहे हें त्या सूत्रांतील तत्त्व त्यांतील आत्मरक्षणाचें, आत्मसत्ता स्थापनेचें, आक्रमकपणाचें वा सहजप्रेरणेचें तत्त्व त्यांनीं मर्यादेबाहेर लागूं केलें. वस्तुत: जडाचें यांत्रिक जीवन आणि जडाधिष्ठित अ-यांत्रिक जीवन, या दोन जीवनावस्थांच्या पोटीं एका तिसऱ्या तत्त्वाचा, तिसऱ्या अवस्थेचा श्रीगणेशा, बीजभाव असतो; या बीजभावाचा हळूहळू विस्तार होतो; शुद्ध जडांतून आणि प्राणयुक्त जडांतून वर येऊन मन जसजसें त्याचा स्वतःचा सहजधर्म अनुसरावयास लागतें, तसतशी जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेची प्रगति हळूहळू होत जाते. प्राणांतून विकसित होणारें मन आपल्या स्वतःच्या खास कायद्यानें चालू लागले म्हणजे तिसरी जीवनावस्था प्रगत होते आणि दुसऱ्या अवस्थेंतील गोष्टींत पुष्कळच बदल होतो -- जेव्हां मनाचा विकास होऊन तें अतिमानसाचा, आत्म्याचा टप्पा गांठतें, तेव्हां हा बदल आणखी कितीतरी वाढतो. जीवनाची टिकून राहण्याची, शाश्वत टिकून राहण्याची सहजभावना व धडपड एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला या धडपडीला विरोध करणारा मरणाचा कायदा -- अशी वस्तुस्थिति असल्यानें व्यक्ती ज्या जातीच्या असतात, ती जात टिकून रहावी यासाठीं, व्यक्तींकडून वैयक्तिक जीवन उपयोगांत आणलें जातें; असें करणें व्यक्तीला भाग पडतें; पण व्यक्तीला ही गोष्ट दुसऱ्या व्यक्तींच्या सहकार्याशिवाय करतां येत नाहीं. प्रेमतत्त्वाच्या उदयाला ज्या अनेक गोष्टी कारण होतात, त्यांत वरील सहकार्य ही एक गोष्ट आहे. सहकाराचें, परस्पर साहाय्याचें, दुसऱ्यांच्या इच्छेला मान देण्याचें तत्त्व, पत्नीची, अपत्याची, मित्राची, मदतगाराची, आपल्या संघाची इच्छा शिरोधार्य करण्याचें तत्त्व, मिळून मिसळून वागण्याचा अभ्यास, इतरांशीं बुद्धि-

 

पान क्र. ३७४

 

पुरस्सर मेळ करण्याचा अभ्यास, इष्ट गोष्टींची परस्परांनीं परस्परांत मनःपूर्वक देवघेव करण्याचा अभ्यास -- या गोष्टी प्रेमतत्त्वाच्या बीजाचे ठिकाणीं आहेत; यांतूनच अखेर प्रेमतत्त्व उदयास येतें. प्रारंभीं या प्रेमतत्त्वाचें स्वरूप विस्तृत स्वार्थ अथवा स्वार्थाचा विस्तार असें असतें. विकासाच्या वरच्या पायऱ्यांवरहि विस्तृत स्वार्थ या स्वरूपांतच प्रेमाचें राज्य चालतें -- आजहि असें राज्य चालूं आहे. तथापि मनाचा अधिकाधिक विकास होईल, त्याचें खरें स्वरूप त्याला कळूं लागेल व जीवनाचा प्रेमाचा, परस्पर सहकाराचा अनुभव त्याला येईल; त्याप्रमाणेंच त्याला हीहि गोष्ट पटेल कीं, निसर्गांत व्यक्ति किंवा व्यष्टि म्हणून जी आहे, ती समष्टीहून खालच्या दर्जाची सत्ता आहे आणि समष्टीच्या, विश्वसमष्टीच्या साह्यानेंच व्यष्टीचें जीवन चालणें शक्य होतें; ही गोष्ट एकदां मनुष्याला, मनयुक्त जीवाला कळली (आणि ही गोष्ट त्याला अपरिहार्यपणें कळणारच) कीं त्याची पुढली जीवनकथा, नियत, निश्चित झाली असें समजावें; कारण विश्वसमष्टीचें व व्यष्टीचें नातें लक्षांत आलें कीं, मनाला हें स्पष्ट होतें कीं, त्याजहून श्रेष्ठ असें कांहीं आहे; आणि त्या क्षणापासून त्या श्रेष्ठ वस्तूच्या दिशेनें, आत्म्याच्या दिशेनें, अतिमानसाच्या दिशेनें मनुष्याचा विकास अटळपणें होऊं लागतो -- मग हा विकास कितीहि सावकाशपणें होवो, कितीहि अजाणतां होवो.

तेव्हां जीवनाचा असा स्वभावच दिसतो कीं, त्याचा विकास होत होत तें पहिल्या अवस्थेंतून दुसरींत व दुसरींतून तिसरींत अपरिहार्यपणें जावयाचें असतें. त्याच्या आत्मव्यक्तीकरणाच्या गोष्टी, पहिल्या व दुसऱ्या अवस्थेहून तिसऱ्या अवस्थेंत भिन्न असतात; या अवस्थेचा, जीवनाच्या या उन्नतावस्थेचा विचार केला, तर या अवस्थेंतील त्याचीं कार्यें पहिल्या अवस्थांतील कार्यांच्या अगदीं उलट असतात; त्या कार्यांची परिणति, रूपांतर, परिपूर्णता या तिसऱ्या अवस्थेंतील कार्यांच्या रूपानें होते असें म्हणावें लागतें. अतिशय विभागलेलें जडद्रव्य व त्याचे बनविलेले अतिशय कठीण आकार, यापासून जीवनाचा आरंभ होतो; अणु हा कठिणपणाचा आणि बारीक विभागणीचा नमुना आहे; अणु हा सर्व जड आकारांचा पाया आहे. अणु हा दुसऱ्या अणूंशीं संयोग पावतो, तेव्हांहि तो दुसऱ्या अणूंशीं एकरूप होत नाहीं -- अलग राहून ''एक होतो''; त्याच्या विनाशासाठीं, विघटनेसाठीं कशीहि शक्ति खर्च केली, तरी त्याचा विनाश वा विघटन होत नाहीं -- दुसऱ्यांशीं मिसळून एकरूप होण्याचें जें

 

पान क्र. ३७५

 

तत्त्व निसर्गामध्यें आहे, त्याला विरोध करून अहम्, विभक्त मी, आपलें अस्तित्व टिकवीत असतो -- त्या मीचा केवळ भौतिक नमुना म्हणजे अणु होय. परंतु निसर्गामध्यें विभागणी किंवा भेद या प्रभावी तत्त्वाप्रमाणेंच एकता हेंहि एक तितकेंच प्रभावी तत्त्व आहे. एकता हें प्रमुख तत्त्व असून, अनेकता किंवा विभागणी हें त्या प्रमुख तत्त्वाच्या अंकित असणारें गौणतत्त्व आहे; म्हणून विभक्त असणारा प्रत्येक आकार एकतेच्या तत्त्वाला कोणत्या तरी प्रकारें प्रमुख म्हणून मान देऊन आपलें गौणत्व मान्य करीत असतो व असें त्याला करावेंच लागते : आपलें गौणत्व किंवा अंकितत्व तो यांत्रिक आवश्यकतेच्या रूपानें मान्य करील, त्याच्यावर झालेल्या सक्तीमुळें मान्य करील, त्याची समजूत घातली गेल्यामुळें राजीखुशीनें मान्य करील -- अशा कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारें विभक्त आकार, एकतेचें प्रभुत्व व आपलें अंकितत्व मान्य करीत असतो. सामान्यत: विघटनद्वारां दुसऱ्यांत सर्वस्वीं मिळून एक होण्याच्या क्रियेला विरोध करण्याची शक्ति निसर्ग स्वतःच्या कांहीं हेतूसाठीं अणूला देतो; त्याचा हेतु प्रमुखतः असा असतो कीं, त्याला जे संयुक्त पदार्थ तयार करावयाचे असतात, ते तयार करण्यासाठीं घट्ट असा पायाघटक मिळावा, म्हणूनच अणूला तो कठीणपणा देतो. निसर्गाला विविध आकार तयार करावयाचे असतात, त्या आकारांसाठी ठाम स्वरूपाचें बीज असावें म्हणून अणूला तो कठीणपणा देतो; विघटनाच्याद्वारां दुसऱ्यांत मिळून जाऊन, एकरूप होण्याची क्रिया अणूला निसर्ग करावयास लावीत नाहीं -- तथापि दुसऱ्याशीं एकता करण्याची दुसरी क्रिया, संघटनाची क्रिया मात्र निसर्ग त्यास करावयास लावतो. अणु हा निसर्गांत पहिला संघटित आकार, पहिला संघात आहे -- आणि संघटनात्मक एकता ज्यांत आहे असे आकार निर्माण करण्याचा प्रथम संघात, मूळ पायाघटक अणु हा आहे.

जीवनाच्या विकासाच्या पहिल्या अवस्थेचें स्वरूप येथवर आपण पाहिलें. जीवनाला विकासक्रमानें जेव्हां दुसरी अवस्था येते -- या दुसऱ्या अवस्थेला प्राणमयता, जीवता, प्राण म्हणून आपण ओळखतों -- तेव्हां भौतिक अवस्थेच्या उलट प्रकार आपणास पहावयास मिळतो; प्राणमय मीचा भौतिक आधार या दुसऱ्या अवस्थेंत विघटनाच्या क्रियेनें मोडून टाकला जातो -- ही विघटनाची क्रिया प्राणमय मीच्या भौतिक देहावर लादली जाते; या भौतिक देहाचे घटक विघटनानें अलग अलग केले जातात -- एका जीवाचे भौतिक घटक दुसऱ्या जीवांच्या देहांच्या बनावटीसाठीं

 

पान क्र. ३७६

 

वापरलें जातात; हा निसर्गाचा कायदा किती व्यापक आहे याची ओळख अद्यापि आम्हांला पूर्णतेनें झालेली नाहीं. जोंपावेतों मानसिक जीवन, आत्मिक जीवन यासंबंधींचें आमचें शास्त्र भौतिक जीवनाच्या आणि जडाच्या अस्तित्वाच्या शास्त्राइतकें विश्वसनीय बनलेलें नाहीं, तोंपावेतों वरील नैसर्गिक नियमाची व्याप्ति किती आहे हें आम्हांला पूर्णपणें कळणारहि नाही. तथापि आम्हांला ढोबळपणें असें म्हणतां येतें कीं, जसे आमच्या भौतिक देहाचे घटक, आमच्या जिवंतपणीं आणि आम्ही मेल्यावर, दुसऱ्यांच्या जीवनांत प्रवेश करतात, तसेच आमच्या सूक्ष्म प्राणमय देहाचे, आमच्या जीवनशक्तीचे घटक व आमच्या विविध शक्तींचे, झगड्यांचे, तीव्र संवेदनांचे व इच्छांचे घटक, दुसऱ्यांच्या जीवनांत, आमच्या जिवंतपणीं व आमच्या मरणानंतर प्रवेश करीत असतात. प्राचीन गुप्तविद्या असें सांगते कीं, भौतिक देहाप्रमाणें आम्हांला प्राणमय देह असतो आणि हा प्राणमय देह आमच्या भौतिक देहाच्या मरणानंतर विनाश पावतो आणि त्याच्या घटकांतून दुसरीं प्राणमय शरीरे बनविलीं जातात; ती विद्या असेंहि सांगते कीं, आम्ही जिवंत असतो तेव्हां आमच्या जीवनशक्ती अखंडपणें दुसऱ्या जीवांच्या जीवनशक्तींशीं मिसळत असतात. असाच नियम आमच्या मानसिक जीवनाच्या संबंधांतहि आहे. दुसरे जे विचारवन्त प्राणी आहेत, त्यांचें मानसिक जीवन आणि आमचें मानसिक जीवन हें, आमच्या आणि त्यांच्या जिवंतपणीं व मृत्यूनंतर एकमेकांत मिसळत असतें. मनाचे मनावर सारखे आघात होत असतात; मनाचें विघटन होणें, मनाच्या घटकांचें विखरून जाणें व त्या घटकांतून नव्या मनाची बांधणी होणें या क्रिया सारख्या चालूं असतात; मनामनाचे घटक एकमेकांत प्रविष्ट होणें एकमेकांशी मिळून एकरूप होणें, याहि क्रिया अखंडपणें चालूं असतात. जीवनाची प्रक्रिया, जीवनाचा अबाधित नियम असाच आहे कीं, जीवा-जीवांचे घटक एकमेकांत प्रविष्ट व्हावे, मिसळावे, एकमेकांशीं एकरूप व्हावे.

जीवनांत दोन विरुद्ध तत्त्वें काम करीत असतात, असें वरील हकीकतीवरून लक्षांत आलेंच असेल. एक तत्त्व हें कीं, स्वतःच्या इच्छेनें किंवा नैसर्गिक आवश्यकतेच्या दडपणानें, विभक्त मी, आपलें वेगळेंपण संभाळून आपलें वैशिष्ट्य टिकवून राहूं पहात असतो; दुसरें तत्त्व हें कीं, या विशिष्टत्व टिकवूं पहाणाऱ्यां 'मी' ला, दुसऱ्या 'मीं' शी एकरूप होऊन जाण्याची सक्ती निसर्ग करीत असतो. भौतिक विश्वांत, पहिल्या विशिष्टत्व टिकविण्याच्या प्रेरणेवर, तत्त्वावर निसर्ग जोर देतो; कारण टिकाऊ

 

पान क्र. ३७७

 

असे आकार त्या विश्वांत त्याला बनवावयाचे असतात. विकासक्रमांतील पहिलें आणि सर्वांत अतिशय कठीण असें निसर्गाचें कर्तव्य म्हणजे, विभक्त व्यष्टीचें विभक्तपणें जीवन घडविणें व टिकविणें आणि त्यासाठीं टिकाऊ असा आकार, देह तयार करणें हें असतें; विश्वांत शक्ति सारखी गतिमान् आहे, सारखी बदलत आहे आणि अनंत सत्ता ही सर्वव्यापी एकतेनें नांदत आहे; अशा परिस्थितींत विभक्तपणा आणि विभक्ततेचा टिकाऊपणा निर्माण करणें हें अतिशय अवघड कार्य आहे, यांत तिळमात्र संशय नाहीं. तेव्हां निसर्ग आपलें प्राथमिक कर्तव्य करण्यासाठीं अणुजीवनांत व्यष्टीचें टिकाऊ रूप बनवितो; व्यष्टिरूप अणु हा पुढील सर्व रचनांचा पाया असतो; हे अणु दुसऱ्या अणूंशीं जोडले जाऊन या संयुक्त अणुघटित देहांचें कमीअधिक दीर्घकालीन अस्तित्व, निसर्गयोजनेनुसार प्राणमय आणि मनोमय व्यष्टीच्या अस्तित्वाचा पाया म्हणून उपयोगिलें जातें. निसर्गाचें हें कार्य ठीकपणें पार पडलें, त्याच्या पुढील योजनेच्या दृष्टीनें बरीचशी टिकाऊ स्थूल देहरचना, बरीचशी टिकाऊ प्राणमय आणि मनोमय व्यष्टि तयार झाली म्हणजे, आपली पुढील योजना निसर्ग अंमलांत आणतो, आतांपर्यंत व्यष्टिदेह टिकाऊ करण्याकडे त्यानें लक्ष पुरविलें होतें तें आतां तो उलट्या दिशेला वळवितो; व्यष्टिदेह विघटित करून विनष्ट करावयाचा आणि समष्टि जीवनाला विनष्ट देहाच्या घटकांचा उपयोग होईल असें करावयाचें, इकडे आतां निसर्ग आपलें लक्ष पुरवितो. ही निसर्गाची प्रक्रिया विकासक्रमांतील कांहीं अखेरची प्रक्रिया नव्हे. देह टिकाऊ बनविणें व देह नष्ट करणें हीं वरील दोन तत्त्वें, व्यष्टित्व बनविणें आणि नंतर व्यष्टित्व समष्टींत विलीन करणें हीं दोन तत्त्वें, जीं परस्परविरोधक मार्गानें काम करतात, तो त्यांचा अन्योन्यविरोध नाहींसा होऊन त्यांजमध्यें सुसंवादित्व निर्माण करणें ही निसर्गाची पुढील प्रक्रिया आहे. हें सुसंवादित्व कसें घडून येतें? व्यष्टीची जाणीव व्यष्टि म्हणून कायम राहिली आणि ती नष्ट न होतां, तिच्या घटकांचा आधार तिला कायम राहून ती दुसऱ्या व्यष्टींशीं जाणीवपूर्वक एकरूप होऊं शकली, म्हणजे व्यष्टित्व व समष्टित्व यांचें सुसंवादित्व स्थापित होतें; आणि हीच निसर्गाची विकासक्रमांतील तिसरी उच्च प्रक्रिया आहे.

ही उच्च प्रक्रिया होण्यासाठीं मन पूर्णपणें विकसित होणें अवश्य आहे; कारण, केवळ प्राणमयता जेथें आहे, जेथें जाणीवयुक्त मन नाहीं, तेथें वर निर्दिष्ट केलेलें, स्थिर व चिरकालीन सुसंवादित्व निर्माण होऊं शकत

 

पान क्र. ३७८

 

नाहीं; तेथें अस्थिर व तात्कालिक सुसंवादित्व निर्माण होऊं शकतें; नंतर शरीर नष्ट होतें, व्यष्टि विस्कळित होऊन नाहींशी होते आणि तिचे घटक समष्टीच्या जीवनांत प्रविष्ट होतात. भौतिक प्राणमय जीवनाचा स्वभावच असा आहे कीं, ज्या अणूंच्या पायावर हें जीवन उभारलें जातें, त्या अणूंमध्यें असलेली टिकाऊपणाची सहजशक्ति, दीर्घकाळ व्यष्टित्वानें अस्तित्वांत राहण्याची शक्ति, या स्थूल भौतिक प्राणमय जीवनांत असत नाहीं. गुप्त आत्म्याला अभिव्यक्त करणारा किंवा करावयास लागलेला अन्त:पुरुष, हदयस्थ पुरुष (भावपुरुष) मनोमय पुरुषांत उदयास येऊन त्याला आधार देत असला म्हणजे मात्र, त्या मनोमय पुरुषाला, प्राणमय भौतिक पुरुषाला शक्य नसणारी गोष्ट शक्य होते; हा मनोमय पुरुष चिरकाल टिकूं शकतो; गत अनुभव भावी अनुभवाशीं तो जोडूं शकतो; त्याचा अनुभव अखंड प्रवाहाप्रमाणें अखंडत्वानें नांदूं शकतो; त्याचा बाह्य आकार वा देह नष्ट झाला व त्यायोगें देहगत स्मृति नष्ट होऊन त्याच्या अनुभवांत, भौतिक अस्तित्वांत खंड पडला, तरी त्याच्या मानसिक अस्तित्वांत व अनुभवांत खंड पडत नाहीं, खंड पडण्याचें कारण असत नाहीं; आणि हें अखंड मानसिक अस्तित्व, त्याच्या जुन्या देहाच्या मरणानें व त्याच्या नव्या देहाच्या जन्मानें, जुन्या देहगत स्मृतीचा घडलेला लोप भरून काढूं शकतें; मनाचा विशिष्ट पायरीपर्यंत विकास झाला कीं, नव्या देहांत आलेलें अखंड मन, एक प्रकारचा मानसिक पूल बांधून जुन्या देहांतील अनुभव नव्या देहांतील अनुभवांशीं जोडू शकतें. आज शरीरधारी मनाची वाढ बेताचीच आहे, अपूर्ण आहे; तरी मनोमय पुरुषाला ही जाणीव ढोबळपणें असते कीं, प्रस्तुत शारीर जीवनाच्या पूर्वीं व नंतर मनोमयाचें जीवन अखंड चालूं असतें; अशाप्रकारें वैयक्तिक जीवन, शारीर जीवनाच्या पूर्वीं व नंतरहि खंड न पडतां चालूं असतें; त्याला असेंहि कळतें कीं, अनेक वैयक्तिक जीवनें त्याच्या जीवनाला कारण झालेलीं आहेत, त्या जीवनांचा विशिष्ट विकास म्हणजे त्याचें जीवन आहे, थोड्याफार फरकानें त्याचें पुनर्जनन म्हणजे त्याचें जीवन होय; तसेंच त्याला हेंहि समजतें कीं, तो अनेक भावी वैयक्तिक जीवनें स्वत:मधून निर्माण करीत आहे. शिवाय त्याला हीहि जाणीव असते कीं, समष्टिजीवन त्याच्या पूर्वीं व नंतरहि चालूं असलेलें असें आहे; आणि या समष्टिजीवनांत त्याचें स्वतःचें जीवन एका अखंड धाग्याप्रमाणें अनुस्यूत आहे. आनुवंशिकता म्हणून जो भौतिक विज्ञानाचा

 

पान क्र. ३७९

 

सिद्धांत आहे, त्यांत हीच जीवनाच्या अखंडपणाची गोष्ट विज्ञानानें मान्य केलेली आहे. आनुवंशिकतेमध्यें जीवनाची अखंडता भौतिक विज्ञानाला प्रतीत होते -- मनोमय पुरुषामागें जो विकासशील आत्मा असतो त्याला, मरण न पावणारी टिकाऊ व्यक्ति अनुभवास येऊन ही अखंडता प्रतीत होते. ही आत्मजाणीव व्यक्त करणारा मनोमय पुरुष हाच, अमर व्यक्तिजीवन आणि अमर समष्टिजीवन यांच्या मीलनाचें स्थान आहे -- या पुरुषामध्यें या दोन जीवनांचें ऐक्य, या दोन जीवनांची सुसंवादी एकत्र राहणी शक्य होते.

जीवनाची ही जी तिसरी अवस्था असते तिच्यांत, व्यक्तींनीं एकमेकांशीं मिळून सहकारानें वागणें हें प्रमुख शासकतत्त्व असतें; या मिळण्यामिसळण्यामागें प्रेम हें गुप्त तत्त्व असतें; हें प्रेम पुढें विकासक्रमानें प्रकट व्हावयाचें असतें. सहयोगाची उच्चतम अवस्था, प्रेमपूर्ण सहयोग हीच पुढें उदयास यावयाची असते. प्रेम हीच जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेंतील अन्योन्यसंबंधांत प्रमुख प्रभावी शक्ति असते. प्रेम तत्त्वाच्या व्यवहारांत ज्या दोन गोष्टींची सारखीच आवश्यकता असते, त्या दोन गोष्टींपैकीं पहिली गोष्ट, व्यष्टीचें जाणीवपूर्वक व्यष्टित्वरक्षण ही आहे व दुसरी गोष्ट, व्यष्टीनें जाणीवपूर्वक दुसऱ्या व्यष्टींशीं सर्व प्रकारचा विनिमय करण्याची, दुसऱ्यांसाठीं आत्मदान करण्याची, दुसऱ्यांशीं मिळून एक होण्याची आवश्यकता मान्य करून, तशी मनापासून इच्छा करणें ही आहे. या दोन गोष्टींपैकीं कोणतीहि एक जेथें नसेल किंवा नाहींशी केली जाईल, तेथें प्रेम तत्त्वाचा व्यवहार थांबेल -- तेथें प्रेम तत्त्वाचा व्यवहार चालूं आहे असें म्हणतां येणार नाहीं -- तेथें असलेल्या व्यवहाराला मग कोणतेंहि स्वरूप असो, किंवा कांहींहि नांव द्यावें लागो. मनोमय पुरुषांत अशी एक भावना, अशी एक कल्पना उदयास येऊं शकते, कीं, पूर्ण आत्मबलिदान करून, पूर्ण आत्मविनाश करून घेऊन (अर्थात् आत्मविनाश हा भ्रम असतो) आपली प्रेमभावना पुरतेपणीं व्यक्त करावी; पण ही कल्पना, ही भावना जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेशीं जुळणारी नाहीं -- या तिसऱ्या अवस्थेच्या पलीकडे जीवनाचा विकास झाला आहे, याची ती निदर्शक आहे. जीवनाची जी तिसरी अवस्था असते, तिच्या व्यवहारांत आपण क्रमाक्रमानें, दुसऱ्या अवस्थेंतील कार्यक्रम -- अन्योन्यभक्षणानें जीवन जगणें, जीवनाच्या झगड्यांत भक्षणाचें सामर्थ्य दाखवून टिकण्याची पात्रता सिद्ध करणें -- हळूहळू टाकून देण्याचें काम करीत असतो; या तिसऱ्या अवस्थेंत एकमेकांना साह्य करून जीवनकलहांत टिकाव धरण्याचें काम

 

पान क्र. ३८०

 

चालूं असतें -- कलह कमी कमी व साह्य अधिकाधिक, अशी या तिसऱ्या अवस्थेंत आमची व्यवहारनीति असते; त्याचप्रमाणें एकमेकांशीं जुळतें घेऊन, एकमेकांमध्यें वस्तूंचा व विचारांचा विनिमय करून, एकमेकांच्या जीवनांत मिळून मिसळून जाऊन आम्ही या तिसऱ्या अवस्थेंत आमच्या जीवनाला, आमच्या आत्म्याला पूर्णता आणण्याच्या मागें असतो. जीवन हें पुरुषाचें, आत्म्याचें स्वत्वस्थापनेचें, 'मी' च्या इच्छेचा प्रभाव पाडण्याचें स्थान आहे, 'मी' च्या विकासाचें व जीवनकलहांत टिकण्याची पात्रता त्यानें मिळवण्याचें तें क्षेत्र आहे; जीवन म्हणजे स्वत्वस्थापना, 'मी' चा विकास व 'मी' चा टिकाव असें म्हणतां येईल; तथापि जीवनांत व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तींच्या अस्तित्वाची व सहकाराची गरज असते, जीवनांत मी हा दुसऱ्या 'मीं' ना जवळ करून आपणां स्वतांत मिळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्या दुसऱ्या 'मीं' च्या जीवनांत त्या दुसऱ्यांनीं आपल्याला मिळवून घ्यावें अशीहि भावना त्याला असते. जीवनविकासाच्या तिसऱ्या अवस्थेंत टिकाव धरून राहणाऱ्या व टिकण्याला अधिकांत अधिक पात्र अशा, व्यष्टी व समष्टी या पुढील गुणधर्मांनीं युक्त असतील : सहयोगाचा व प्रेमाचा कायदा या व्यक्तींनीं व समाजांनीं (गटांनीं) अधिकांत अधिक विकसित करून व्यवहारांत आणलेला असेल; एकमेकाला मदत करणें, दयाबुद्धि, स्नेहभावना, साथीभावना, एकता या गुणांचा विकास अधिकाधिक करून ते गुण या व्यक्तींनीं व गटांनीं व्यवहारांत आणलेले असतील; टिकून राहणें आणि एकमेकांना आत्मदानानें साह्य करणें या दोन क्रियांचा सुंदर समन्वय त्यांनीं अधिकांत अधिक साधलेला असेल; परस्परांच्या वस्तूंच्या व विचारांच्या विनिमयानें व्यक्ति आणि गट एकमेकाला समृद्ध करीत असतील; व्यक्ति गटाला, गट व्यक्तीला, व्यक्ति व्यक्तीला व गट गटाला वस्तु-विचार-विनिमयानें समृद्ध करीत असतील. हा जो तिसऱ्या जीवनावस्थेंतील विकास, त्याच्या मुळाशीं मनाचें*

-------------------------

* येथें जें मन विवक्षित आहे, तें जीवनांत प्रत्यक्ष काम करतें; प्राणमय अस्तित्वांत, हृदयाच्या द्वारां तें प्रत्यक्ष काम करीत असतें. सापेक्षतत्त्वरूप प्रेम (केवळ निरपेक्ष प्रेम वेगळें) हें प्राणमय जीवनांतील तत्त्व आहे, मनाचें तत्त्व नाहीं; तें स्वयंतंत्र आणि चिरंतन व्हावयाचें, तर मात्र, मनानें त्याचा स्वीकार करून त्याला आपला प्रकाश पुरवावा लागतो. शारीर आणि प्राणमय जीवन, यांतील जें ''प्रेम'' म्हणून असतें, तें क्षुधारूप असतें, त्याला चिरंतनता नसते, त्याला चिरंतनता असूं शकत नाहीं.

 

पान क्र. ३८१

 

वाढतें प्रभुत्व असतें; हें मन क्रमाक्रमानें आपला विशिष्ट कायदा भौतिक अस्तित्वावर अधिकाधिक लादीत असतें. मन हें प्राणाहून अधिक सूक्ष्म आहे. विशिष्ट व्यक्तीच्या प्राणमय जीवनाला, स्वतःचें अस्तित्व टिकविण्यासाठीं दुसऱ्याच्या जीवनाचें भक्षण करणें प्राप्त असतें; मनाची गोष्ट तशी नाहीं; दुसऱ्याच्या जीवनांतील आपल्या उपयोगाच्या वस्तू भक्षण न करतां, मनाला त्या आत्मसात् करतां येतात, आपल्या मत्तेंत जमा करतां येतात आणि आपलें स्वत्व त्यायोगें परिपुष्ट करून वाढवितां येतें; तें जसें दुसऱ्यांना देत जातें, तसें त्याला दुसऱ्यांकडून मिळतहि जातें; अधिक देण्यानें त्याला अधिक मिळतें व त्याची अधिक वाढ होते; इतरांत जसें तें अधिक मिसळून जाईल तसें इतरांनाहि तें आपल्या स्वतांत अधिक मिळवून घेईल आणि या रीतीनें आपल्या अस्तित्वाचा व जीवनाचा व्याप वाढवील, अशी स्थिति असते. दुसऱ्याला फार देत सुटलें तर व्यक्तीचें भौतिक जीवन थकून जाऊन संपुष्टांत येईल; तसेंच त्यानें दुसऱ्याला भक्षण करण्याच्या प्रवृत्तींत अतिरेक केला तर, तें स्वतःचा नाश करून घेईल. जडाच्या कायद्याच्या कक्षेंत ज्या प्रमाणांत मन असतें, त्या प्रमाणांत वरील मर्यादा त्यालाहि लागूं पडतात; परंतु त्याचा विशिष्ट कायदा ज्या प्रमाणांत तें आपल्या व्यवहाराला लावूं शकतें, त्या प्रमाणांत वरील मर्यादा तें मागें टाकूं शकतें आणि या भौतिक मर्यादा ज्या प्रमाणांत तें मागें टाकूं शकेल, त्या प्रमाणांत त्याचें दुसऱ्यांना देणें आणि त्यानें दुसऱ्याकडून घेणें या क्रिया एकरूप होतात. मन जसजसें उंच उंच जातें, तसें तसें विविधतेंत, भेदाच्या दर्शनीं व्यवहारांत एकता कार्यकारी असल्याची जाणीव त्याला स्पष्टपणें होते; व तें स्वत: या 'भेदांत अभेदाच्या' कायद्याला आपल्या व्यवहारांत कार्यान्वित करतें; सच्चिदानंदाच्या प्रकटावस्थेंत भेदांत अभेद हाच दिव्य कायदा काम करतो.

जीवनाच्या मूळ प्राथमिक अवस्थेंत जी नेणीवव्याप्त इच्छाशक्ति जडशक्तीच्या अंकित राहून काम करीत असते, ती जीवनाच्या दुसऱ्या विकासावस्थेंत क्षुधा आणि जाणीवयुक्त वासना यांचें रूप घेते -- या दोन प्रेरणाच मनाच्या मुळाशीं आहेत; या दोन प्रेरणांच्या बीजांतून मन उदय पावतें. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेंत वासनेचा कायदा अगदीं नाहींसा होत नाहीं, तर त्याचें रूपांतर होतें व या रूपांतरानें त्याची परिपूर्ति होते. तिसऱ्या अवस्थेंत सहयोगाचें तत्त्व आणि प्रेमाचें तत्त्व व्यवहार चालवूं लागतात आणि या तत्त्वांच्या प्रभावानें वासनेच्या कायद्याचें रूपांतर होऊन त्याचें

 

पान क्र. ३८२

 

इष्ट साध्य होतें. प्रेम ही एक वासना आहे, हिचा स्वभाव दुसऱ्यांना आत्मार्पण करण्याचा आहे आणि या आत्मार्पणाच्या बदल्यांत दुसऱ्यांकडून आत्मार्पणाची अपेक्षा प्रेमाला असते. अन्योन्यांनीं अन्योन्यांना घ्यावें द्यावें अशी प्रेमाची स्फूर्ति असते. भौतिक जीवन दुसऱ्याला कांहींहि देऊं इच्छित नाहीं, दुसऱ्याकडून घ्यावयाची मात्र त्याला हांव असते. मात्र हें खरें कीं, भौतिक जीवनाला आपल्या इच्छेविरुद्ध आपल्या मत्तेचा हिस्सा इतरांना द्यावा लागतो; कारण, जें जीवन कांहीं देत नाहीं, निव्वळ घेत सुटतें, तें निष्फल होतें, सुकून जातें आणि नष्ट होतें; या जगांत किंवा कोणत्याहि जगांत, कांहीं न देणारे व निव्वळ घेण्यापाठींमागें लागलेलें जीवन शक्य दिसत नाहीं -- एवढेंच कीं, देण्याचें काम हें भौतिक जीवन खुषीनें करीत नाहीं, निसर्गाची गुप्त प्रेरणा त्याला द्यावयास लावते; या प्रेरणेला जाणीवपूर्वक तें मानीत नाहीं. प्रेम जेव्हां कार्यान्वित होतें, तेव्हां त्याचें आत्मदान, प्रारंभीं भौतिक जीवनाप्रमाणें यांत्रिकतेनेंच चालतें; अणूंतील नेणीवव्याप्त इच्छा यांत्रिकतेनें अणूंकडून आत्मदान करविते. त्याप्रमाणेंच आरंभीं आरंभीं प्रेमाची गोष्ट असते; यांत्रिक आत्मदानानंतर, वासनेचा भुकेचा कायदा प्रेम पाळतें, दुसऱ्यांकडून त्यांना नाराज करूनहि कांहीं घेण्यांत, कांहीं वसूल करण्यांत, तें आनंद मानतें; देण्यांत, दुसऱ्यांना आत्मार्पण करण्यांत तितका आनंद मानीत नाहीं; दुसऱ्यांना देणें ही गोष्ट, आपली इच्छा पुरवून घेण्याची अटळ किंमत आहे, या भावनेनें तें देत असतें; देण्यांत त्याची ही भावना प्रमुख असते. अर्थात् प्रेमाचा विशिष्ट असा खास कायदा हा नसतो; समता, देण्याघेण्यांत समान आनंद हा त्याचा खास कायदा आहे. देण्यांतला आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षां हळूहळू अधिक होत जातों; पण हें घडूं लागलें म्हणजे, आपल्या खास कायद्याला मागें सारून, आपल्या विशिष्ट स्वरूपाला सोडून, प्रेम वरच्या प्रांतांत प्रवेश करीत असतें; अंतरंगांतील भावात्म्याची ज्योत त्याला तसें करावयास लावीत असते; नितान्त एकता अनुभवणें, हें आत्म्याचें अंतिम ध्येय असतें; सामान्य आत्म्याला जो अनात्मा दुसरा म्हणून प्रतीत होतो, तो आपला मोठा आणि स्वतःहून अधिक प्रिय आत्मा आहे ही, एकतेकडे वाटचाल करीत असलेल्या अंतरात्म्याची-भावात्म्याची भावना असते; आणि या आत्म्याच्या दडपणामुळें, प्रेम आपलें वैशिष्ट्य बाजूला ठेवून, देण्यांतला आनंद हा घेण्यांतल्या आनंदाहून अधिक मानूं लागतें. प्रेमाचा कायदा, त्याच्या मूळ जीवनतत्त्वाच्या दृष्टीनें पाहिला तर असा

 

पान क्र. ३८३

 

असतो कीं, दुसऱ्यांच्या जीवनांत आणि दुसऱ्यांच्या द्वारां स्वतःची, स्वत:च्या जीवनाची अनुभूति घ्यावयाची आणि दुसऱ्यांच्या जीवनांत त्यांच्या द्वारां स्वतःच्या जीवनाची, स्वतःची परिपूर्ति करून घ्यावयाची; दुसऱ्यांना श्रीमंत करून श्रीमंत व्हावयाचें, दुसऱ्यांच्या सत्तेखालीं स्वतःला देऊन दुसऱ्यांना आपल्या सत्तेखालीं आणावयाचें -- कोणीहि प्रेममय जीव स्वत: स्वतःवर तेव्हांच पूर्ण सत्ता गाजवूं शकतो, जेव्हां तो स्वतःला दुसऱ्याच्या सत्तेखालीं पूर्णतया देऊन टाकतो. पूर्ण प्रेमविषयाधीनता हीच त्याची पूर्ण स्वाधीनता असते.

जीवनाच्या पहिल्या अवस्थेंत, अणु-अवस्थेंत, अणु हा जड, गतिशून्य असतो; स्वतःला स्वतःच्या आधीन ठेवण्याचें त्याला सामर्थ्य नसतें; भौतिक व्यक्ति, अणु-व्यक्ति इतरांच्या अंकित असते -- या व्यक्तीला यांत्रिक जडशक्ती हवें तसें वागवितात. जीवनाची दुसरी अवस्था जाणीवयुक्त असते; मर्यादेची जाणीव, दुसऱ्यांना (अनात्म्याला) आपलें अंकित करण्यासाठीं धडपड, स्वतःला नियंत्रित करण्यासाठीं धडपड हीं दुसऱ्या जीवनावस्थेचीं लक्षणें होत. तिसरी जीवनावस्था उदयास आली, कीं मूळ ज्या गोष्टी पूर्वींच्या अवस्थांत एका स्वरूपाच्या होत्या, त्या या अवस्थेंत रूपांतर पावतात; पूर्वींच्या अवस्थांत त्या गोष्टींत जी अपूर्णता व विसंगति भासते, ती या अवस्थेंत नाहींशी होते -- येथें पूर्णता व सुसंवाद येतो. दुसऱ्याशीं सहकार व प्रेम हीं तत्त्वें येथें काम करूं लागतात आणि त्यामुळें दुसरा अनात्मा हा आपला मोठा आत्मा आहे अशी जाणीव येते व अनात्म्याची गरज ती आपली गरज, त्याचा कायदा तो आपला श्रेष्ठ कायदा, अशी भावना होऊन, त्या कायद्याप्रमाणें स्वखुषीनें वागण्याची स्फूर्ति होते; ही स्फूर्ति समष्टि-जीवनाला उपकारक होते -- या जीवनाची वाढती प्रेरणा व्यक्तींना आत्मसात् करण्याची असते -- अनात्म्याची जी गरज ती आपलीच, असें समजण्याची व्यक्तींच्या ठिकाणची स्फूर्ति या प्रेरणेला मदत करते आणि ही स्फूर्ति त्या प्रेरणेची परिपूर्ति करते; दुसऱ्यांचें जीवन तें आपलेंच जीवन, असें या तिसऱ्या अवस्थेंत व्यक्ति मानूं लागली असल्यानें, अनात्मा आपला करण्याची दुसऱ्या अवस्थेंतील तिची इच्छा आतां सहजच पुरी होते. याप्रमाणें दुसऱ्या अवस्थेंत असलेला, व्यष्टि व समष्टि यांचा विरोध तिसऱ्या अवस्थेंत नाहींसा होण्याच्या मार्गाला लागतो. आत्मा, अनात्मा, (व्यक्ति आणि विश्व) यांजमध्यें अन्योन्यांनीं अन्योन्यांसाठीं आत्मदान करण्याची जी प्रवृत्ति प्रेम-

 

पान क्र. ३८४

 

तत्त्वांत असते, ती व्यक्त व्हावयाची, पूर्ण व्हावयाची, सुरक्षित रहावयाची, तर हें अन्योन्य-विनिमयाचें नातें व्यक्तीव्यक्तीमध्यें, गटागटांमध्यें प्रस्थापित होणें अवश्य असतें. स्वत्वस्थापना आणि विश्वस्वातंत्र्य यांचा मेळ घालण्याचा अवघड प्रयत्न करून, मनुष्य आपली स्वाधीनता निर्माण करतो; सहयोग, प्रेम, बंधुभाव, साथीभाव या भावनांच्या प्रेरणेनें तो स्वत: दुसऱ्याकरितां त्याग करतो; सुसंवादी समतोल, न्याय, अन्योन्यभाव व समानता या ध्येयांनीं भारला जाऊन, व्यष्टि आणि समष्टि या विरोधी वस्तूंमध्यें तो समतोल निर्माण करूं पाहतो -- या सर्व गोष्टी म्हणजे निसर्गाचा मूळ प्रश्न, वा जीवनाचा प्रश्न सोडविण्याच्या मार्गांतील खटपटी असून अशा या खटपटींनीं तो प्रश्न सुटावयाचा हेंहि अटळपणें पूर्वींच ठरल्यासारखें आहे -- जडांत जें जीवन उदयास येतें त्याचा पाया, त्याची मूळ अवस्था, व्यष्टि आणि समष्टि यांच्या जीवन-संघर्षांनीं भरलेली असते; त्या विरोधी गोष्टींमधील विरोध नाहींसा करून, त्यांचा सुसंवादी समन्वय घडवून आणण्याकडे मनुष्याच्या सर्व खटपटींचा रोख असतो. प्राण तत्त्वाच्या पलीकडील श्रेष्ठ मनाच्या तत्त्वाचा आश्रय करून, वरील विरोध दूर करण्याचा मनुष्याकडून प्रयत्न करण्यांत येतो. कारण जी सुसंवादिता, जो समन्वय साधावयाचा असतो, त्याचा मार्ग या उच्च तत्त्वाला, श्रेष्ठ मनाला सांपडूं शकतो, याच्या खालच्या तत्त्वांना सांपडूं शकत नाहीं; तथापि हें मात्र खरें की, जी सुसंवादिता व जो समन्वय हवा असतो, तो पूर्णतया मनाला साधत नाहीं; मनाच्या पलीकडे जी एक शक्ति आहे, त्या शक्तीच्या क्षेत्रांतच पूर्ण सुसंवाद सिद्ध होतो.

ज्या वास्तव गोष्टी लक्षांत घेऊन, आमच्या विचारणेला आम्हीं आरंभ केला आहे, त्या गोष्टी जर बरोबर असतील, आम्ही म्हणतो तशा असतील, तर मन स्वतःची हद्द ओलांडून, स्वतःचें विशिष्ट स्वरूप मागें टाकून पुढें जाईल, तेव्हांच विकासमार्गाचा शेवट, आमचें ध्येय, साध्य होईल, सिद्ध होईल; कारण मनाच्या पलीकडे जी शक्ति आहे, जें तत्त्व आहे त्या तत्त्वाची, त्या शक्तीची एक कनिष्ठ कृति म्हणजे हें मन आहे; त्या शक्तीचें साधन हें मन आहे. प्रथम त्या शक्तीनें खालीं उतरून रूप धारण करावें आणि व्यक्तित्व स्वीकारावें, यासाठीं मन हें मधलें साधन आहे, माध्यम आहे. खालून वर असा जीवनाचा विकास (जडापासून आरंभ होऊन) चालला असतां, त्या रूपामध्यें जी वस्तु, जें सत्य साकार झालें, त्या अभिव्यक्तीद्वारां ज्या सत्याचें, ज्या वस्तूचें आविष्करण झालें, त्या

 

पान क्र. ३८५

 

सत्याच्या, त्या वस्तूच्या, त्या तत्त्वाच्या, त्या शक्तीच्या मूळ स्वरूपांत पुन्हां चढून स्थायी होण्याकरितां, तेंच मन माध्यमाचें, मधल्या साधनाचें काम करतें. अशी वस्तुस्थिति असल्यानें, जीवनाच्या प्रश्नाचें पूर्ण उत्तर हें सहयोग, विनिमय, प्रेमाचा जुळवून घेण्याचा व्यवहार, मनाचा कायदा, हृदयाचा कायदा यांच्या आश्रयानें मिळण्याचा संभव नाहीं; तर जीवनाच्या चौथ्या अवस्थेंत तें उत्तर सांपडणार आहे. या अवस्थेंत अनेकांची शाश्वत एकता (अद्वैत) आत्म्याच्या मूळ चैतन्याच्या द्वारां अनुभवास येते; या अवस्थेंत जीवनाच्या सर्व कृतींचा पाया, आत्मा एक आहे, आत्मा पूर्ण स्वतंत्र आहे या तत्त्वाचा व त्याच्या जाणीवपूर्वक अनुभवाचा असतो; देहांची विभक्तता, प्राणांच्या नाना वासना आणि क्षुधातृषा, मनाचे गट आणि क्षुद्र अपूर्ण मेळ, किंवा या सर्वांचें साहचर्य आणि सहकार्य या गोष्टी, उपरिनिर्दिष्ट चवथ्या जीवनावस्थेंत, जीवनाच्या कोणत्याहि कृतीचा पाया असत नाहींत आणि म्हणून केवळ या अवस्थेंतच, जीवनाच्या मूलभूत प्रश्नाचें पूर्ण समाधानकारक उत्तर सांपडतें.

 

पान क्र. ३८६

 

 

प्रकरण बाविसावें

 

जीवनाचा प्रश्न

 

प्राणाला सर्वायुष, सार्वत्रिक जीवन म्हणतात, प्राण हें सर्व भूतांचें जीवन म्हटलें जातें.

- तैत्तिरीय उपनिषद् २.३

 

ईश्वर सर्व भूतांच्या हृदयामध्यें वास करतो. तो सर्व भूतांना मायेच्या आश्रयानें यंत्रावर घातल्याप्रमाणें (यंत्रावर घालून) फिरावयास लावतो.

- भगवद्‌गीता १८.६१

 

सत्य-ज्ञान-अनंत ब्रह्म जो जाणतो, तो त्या सर्वज्ञ ब्रह्माच्या संगतींत सर्व विषय -- सर्व वासनांचे, इच्छांचे विषय -- उपभोगतो.

- तैत्तिरीय उपनिषद् २.१

 

जीवन हा मूळ सच्चिदानंदाच्या चित्‌शक्तीचा आविष्कार आहे. हा आविष्कार विशिष्ट विश्व-परिस्थितींत केलेला आहे; ही चित्‌शक्ति -- जाणीवयुक्त शक्ति स्वभावत: अनंत आहे, सर्वातीत सर्वनिरपेक्ष आहे, अनिर्बंध आहे; अद्वैतमय, एकतापूर्ण व आनंदपूर्ण आहे; तिची एकता आणि आनंद तिच्यापासून दूर करतां येत नाहीं. विश्व-परिस्थिति व विश्वप्रक्रिया आणि मूळ अनंत अस्तित्वाची शुद्धता व मूळ अविभाज्य शक्तीची स्वतंत्रता या दोहोंत अर्थात् कांहीं अंतर असतें; हें अंतर मुख्यत: अविद्याग्रस्त मन आपल्या विभागण्याच्या धर्मामुळें उत्पन्न करतें. अविभक्त, अविभाज्य शक्तीचें मनानें घडविलेलें हें विभागणी-कार्य, विभक्त जीवनद्वंद्वांच्या आभासांना, आभासिक विरोधांना व सच्चिदानंदाच्या स्वभावाला न जुळणाऱ्या, त्या स्वभावाच्या अगदीं उलट भासणाऱ्या गोष्टींना जन्म देतें. या गोष्टी मनाला कायम खऱ्या वाटतात; परंतु या गोष्टी, अनेक रूपधारी सत्याच्या वास्तविक स्वरूपाच्या विपर्यास करणाऱ्या, केवळ देखावारूप आहेत; ही वस्तुस्थिति

 

पान क्र. ३८७

 

मनापाठीमागें दडलेल्या दिव्य विश्वजाणिवेला दिसत असते. मनाच्या करणीनें विश्वाला अन्योन्यविरोधी सत्यांच्या झगड्याचें स्वरूप आलेलें आहे; या झगडणाऱ्या सत्यांपैकीं प्रत्येक सत्य आपली परिपूर्ति करून घेण्यासाठीं झटत असतें, प्रत्येकाला हा हक्कच असतो. अर्थात् या झगड्यामुळें विश्वाला नाना प्रश्नांच्या, नाना कूटांच्या पर्वतप्राय ढिगाऱ्याचें रूप येतें; हे सर्व प्रश्न, ही सर्व कूटें सोडविलींच पाहिजेत, अशी आमच्या पाठीमागें विश्वाची निकड लागते; या निकडीचें कारण हें कीं, विश्वाच्या दृश्य गोंधळाच्या पोटांत महान् सत्य लपलेलें आहे; महान् अद्वैत गुप्त आहे. विश्वांतील कूटें व प्रश्न सोडविण्याची निकड, हें अद्वैत सत्य लावीत असतें, कारण या कूटांच्या उलगड्यानें त्या सत्याला आपलें मूळ स्वरूप सर्व पडदे दूर करून, जसेंच्या तसें विश्वांत प्रकट करण्यास मदत होते.

विश्वांतील प्रश्न, कूटें सोडविण्याचें काम मनानें करावयाचें आहे हें तर खरेंच, पण मनाखेरीज जीवनाच्या इतर क्षेत्रांतहि विश्वाचा प्रत्येक प्रश्न सोडविला गेला पाहिजे; अस्तित्वाला जाणीव आणि कृति या दोन बाजू असतात; दोन्ही बाजूंनीं विश्वांतील प्रश्न सोडवावयाचा आहे. मूळ सत्तेच्या जाणिवेनें शक्तीच्या स्वरूपांत उतरून, विश्वआंदोलन आणि त्यांतील प्रश्न निर्माण केले आहेत; अर्थात् हें प्रश्न सोडविणें हें शक्तिरूप धारण करणाऱ्या जाणिवेचेंच काम आहे; विश्व-आंदोलनाच्या पोटीं जें सत्य आहे, जो अर्थ दडलेला आहे आणि जो अर्थ, जें सत्य आतां विकासाची वाटचाल करीत आहे, त्याची अटळ असलेली परिपूर्ति करून देणें, हें या जाणिवेचेंच कर्तव्य आहे. जाणिवयुक्त शक्तीनें अविद्यामय मनाच्या मध्यस्थीनें विश्वांत जें नानाप्रश्नमय, नानाकूटमय जीवन निर्माण केलें आहे, त्या जीवनानें विकासक्रमांत तीन रूपें धारण केलेलीं आहेत. पहिलें रूप जडाधिष्ठित भौतिक रूप. या रूपांत जाणीव व्यक्त स्वरूपांत दिसत नाहीं -- ती शक्तिरूपानें कृति करते व आकार धारण करते आणि या कृतींत व आकारांत ती गुप्त होते; कृति जाणिवेची निदर्शक असते, आकार जाणिवेचीं प्रतीकें असतात; परंतु खुद्द जाणीव ही कृतीच्या व आकारांच्या आड लपलेली असते. जीवनाचें, विकासाच्या क्रमवारींतील दुसरें रूप प्राणमयता, प्राणमय अस्तित्व. यांत जी जाणीव थोडीशी विकसित झालेली दिसते, तिचें अर्धवट दर्शन 'जिवंत राहण्याची शक्ति व वाढण्याची शक्ति' यांजमध्यें होतें आणि रूपाच्या हालचालींत, रूपाच्या मोडतोडींत अर्ध-विकसित जाणिवेचें अर्धवट दर्शन

 

पान क्र. ३८८

 

घडतें; पहिल्या जीवनावस्थेंत, जी सर्वच जाणीव कैदेंत बंद व गुप्त होती ती आतां बंदींतून अर्धवट सुटल्यासारखी भासते; ती सामर्थ्यानें स्पंदन करूं लागते; जीवाची वासना, वासना-तृप्ति किंवा अतृप्तीमुळें उबग येणें, या क्रियांत दुसऱ्या जीवनरूपांतील सामर्थ्य व्यक्त होतें; परंतु प्रकाशाचें स्पंदन या दुसऱ्या अवस्थेंत प्रथम प्रथम प्रतीत होत नाहीं, पुढें प्रतीत होतें. स्वतःच्या अस्तित्वाचें ज्ञान आणि परिस्थितीचें ज्ञान या रूपानें प्रकाशाचें स्पंदन पुढें प्रतीत होत असलें, तरी तें अल्प प्रमाणांतच प्रतीत होतें. जीवनाचें तिसरें रूप, तिसरी अवस्था मानसिक जीवन ही होय. येथें जाणीव ही पूर्णत: बंधनमुक्त झालेली असते. या मानसिक जाणिवेंत जीवनाची वास्तवता मानसिक संवेदनेच्या रूपानें प्रतीत होते, अनुरूप अनुभूतीच्या व कल्पनेच्या रूपानें प्रतीत होते आणि ही नवोदित जाणीव स्वत: नवी कल्पना या नात्यानें जीवनाची एक वास्तव गोष्ट बनूं पाहते, आंतरिक व्यवस्थेंत ती बदल करते; जीवाचें बाह्य जीवन आंतरिक नव्या व्यवस्थेनुसार बदलण्याचा प्रयत्न करते. भौतिक जीवनांत सच्चिदानंदाची जाणीव ही, आपल्या शक्तीनें केलेल्या कार्याच्या आणि घेतलेल्या आकाराच्या बंदिखान्यांत बंद होते. ती प्राणमय जीवनांत अर्धवटपणें व तिसऱ्या मानसिक जीवनांत पूर्णपणें बंधनमुक्त होते -- परंतु अद्यापि कार्य आणि आकार यांचें पूर्ण प्रभुत्व तिजकडे येत नाहीं; कारण ती वैयक्तिक जाणीव म्हणून बंधमुक्त झालेली असते आणि म्हणून त्या मूळ विश्वजनक जाणिवेच्या एकंदर कृतीपैकीं एक लहानसा अंशच फक्त, या वैयक्तिक जाणिवेचा विषय होऊं शकतो.

ही वैयक्तिक जाणिवेची आंशिक दृष्टि, ही मानवी जीवनांतील खरी अडचण आहे. मानव हा मनोमय जीवन जगणारा प्राणी आहे. त्याची मानसिक जाणीव मानसिक शक्तीचें काम करते; विश्वशक्तीचें ज्ञान, या मानसिक जाणिवेला थोडेंफार असतें, विश्वजीवनाचें ज्ञानहि या जाणिवेला थोडेंफार असतें -- व्यक्तिदृष्टीनें, तोहि विश्वशक्तीचा व विश्वजीवनाचा एक हिस्सा असतो. परंतु या विश्वजीवनाचें खरें पूर्ण ज्ञान (तो स्वत: विश्व-जीवन जगणारा आहे हें ज्ञान) त्याला नसल्यानें, त्याच्या स्वतःच्या सगळ्या वैयक्तिक जीवनाचें, सगळ्या वैयक्तिक अस्तित्वाचें पूर्ण ज्ञानहि त्याला नसल्यानें, सार्वत्रिक जीवन किंवा त्याचें स्वतःचें व्यक्तिजीवन प्रभुत्वानें, परिणामकारक रीतीनें शासित करण्याची शक्ति

 

पान क्र. ३८९

 

त्याला नसते. जड भौतिकाची ओळख करून घेण्यासाठीं तो धडपड करतो; हेतु हा कीं, जड भौतिक परिस्थितीवर त्याला सत्ता चालवितां यावी; प्राणमय जीवनाचें ज्ञान मिळविण्याचा यत्न तो करीत असतो तोहि त्यावर प्रभुत्व गाजविण्यासाठींच; मनाचें ज्ञान मिळविण्याचाहि याच दृष्टीनें तो यत्न करतो. मनाची हालचाल मोठी विस्तृत असते, पण ती पुष्कळशी अज्ञात अशी असते. मनुष्येतर प्राणी प्रकाशाची एक बारीकशी ज्योति बाळगून असतो. त्याला 'मी कोणीतरी आहे' एवढें आत्मज्ञान असतें; मनुष्य हा मनुष्येतर प्राण्यासारखें आत्मज्ञान बाळगून असतोच, पण त्याचें आत्मविषयक व अनात्मविषयक ज्ञान सारखें वाढत असतें -- ज्ञानाची ज्वाला त्याचें ठिकाणीं असते व ती सारखी मोठी मोठी होत असते. अशा वाढत्या ज्ञानज्वालेचा प्रभु असणारा मानव, मनाची महान् परंतु अज्ञात हालचाल, पूर्णतया जाणून घेण्याचा यत्न करीत असतो; हेतु हा कीं, त्या मनावर त्याला सत्ता चालवितां यावी. तेव्हां माणसाच्या खटपटीचें थोडक्यांत वर्णन करावयाचें, तर तो स्वतःवर प्रभुत्व गाजविण्याकरतां स्वतःसंबंधींचें ज्ञान व विश्वावर प्रभुत्व गाजविण्याकरतां विश्वासंबंधींचें ज्ञान मिळविण्यासाठीं खटपट करीत असतो, असें म्हणतां येईल. ही जी खटपट मानवाकडून घडते तिचें मूळ, त्याच्या अंतरंगांतील मूळ अनादि सत्तेचें अस्तित्व हें आहे. या सत्तेकडून त्याला प्रेरणा मिळते कीं, त्यानें स्वतःवर व विश्वावर प्रभुत्व गाजवावें व त्यासाठीं स्वतःचें व विश्वाचें ज्ञान करून घ्यावें -- त्याचे ठिकाणीं मूळ अनादि सत्ता आहे, त्याप्रमाणें तो मूळ चित् (जाणीव) आहे व या मूळ जाणिवेची निकड अनादि सत्तेच्या निकडीसारखीच आहे; मूळ जाणीवशक्तीच त्याचें जीवन बनलेली आहे आणि या शक्तीची सक्ती त्याजवर अनादि सत्तेच्या आणि अनादि जाणिवेच्या सक्तीसारखीच आहे -- शेवटीं हें लक्षांत ठेवावयाचें कीं, सच्चिदानंदच त्याच्या त्या वैयक्तिक रूपानें विश्वांत अवतरला आहे -- या विश्वांत सच्चिदानंद आपलें आविष्करण करतो -- मात्र त्याचा दर्शनी व्यवहार स्वतःच्या स्वभावाच्या उलट असतो, नव्हे तसा तो भासतो : जो सच्चिदानंद मानवाचें रूप धारण करतो, त्याची गुप्त इच्छा, मानवानें स्वतःवर व विश्वावर प्रभुत्व गाजवावें अशीच असल्यानें, ज्ञानसाधनेच्या द्वारां मानव तसा प्रयत्न करीत असतो. मानवांत ही जी प्रेरणा अंतरंगांतून उठते तिची परिपूर्ति कोणत्या परिस्थितींत होणें शक्य आहे, हा प्रश्न मानवासमोर आहे -- तीं परिस्थिति निर्माण करणें हा मानवाचा

 

पान क्र. ३९०

 

ध्यास राहणार व ती निर्माण करण्यासाठीं तो धडपडणार; त्याच्या जीवनाच्या प्रकृतीचा आणि त्याच्यामध्यें वास करणाऱ्या ईश्वराचा निकडीचा आदेशच त्याला तसा आहे; हा आदेश तो डावलूं शकत नाहीं -- मानवाच्या समोर असलेला हा प्रश्न सुटून त्याची अंतःप्रेरणा संतुष्ट होईपर्यंत मानवजात धडपड करीत राहणार, तिला विसांवा घेतां येणार नाहीं. मानवामध्यें ईश्वर जी प्रेरणा देत आहे, ती पूर्ण करून त्यानें आपली पूर्णता प्राप्त करून घेतली पाहिजे; आणि हें त्याला करतां येत नसेल, तर त्यानें हें करूं शकणारा असा एक नवा आणि स्वतःपेक्षां महान् असा पुरुष, असा आत्मा आपल्यांतून उदयास आणून, आपली असमर्थता व्यक्त केली पाहिजे. आजचा मानव हा स्वत: तरी ईश्वरी, दिव्य-मानव व्हावयास पाहिजे किंवा आपल्यांतून नवा ''अति मानव'' निर्माण करून आपली आजची विकासश्रेणींतील सर्वश्रेष्ठ जागा त्या ''अतिमानवाला'' त्यानें दिली पाहिजे.

हा निष्कर्ष वस्तुनिष्ठ तर्कशास्त्राला अपरिहार्यपणें काढावा लागतो. मानवाची आजची मानसिक जाणीव, ही कांहीं पूर्णतया प्रकाशमय जाणीव नव्हे; जडाच्या अंधारांतून ती बाहेर निघाली असली, तरी ती पूर्णतया बाहेर निघालेली नाहीं; जडाच्या अंधारांतून ही जाणीव पूर्णपणें बाहेर यावयाचें जें महान् कार्य आहे, त्या कार्यांतील एक प्रगत आणि प्रगामी असें स्थान व स्वरूप सध्यांच्या मानवी मानसिक जाणिवेचें आहे, एवढेंच फारतर म्हणतां येईल; अशी वस्तुस्थिति असल्यानें, विश्वाची विकासनिष्ठ निर्मिति त्याच्या सध्यांच्या मानसिक जाणिवेपाशीं थांबू शकत नाहीं; ती जाणीव तिच्या आजच्या स्थानाच्या व स्वरूपाच्या पुढें, पलीकडे, वरतीं गेली पाहिजे किंवा मानवाची विकासशक्ति संपली असेल, त्याच्यांत आपली जाणीव अधिक पुढें नेण्याची शक्ति नसेल, तर मानवाला बाजूला टाकूनहि विश्वाची ही विकासाधिष्ठित निर्मिति पुढें प्रगत झाली पाहिजे, तिसरा पर्याय शक्य नाहीं. जाणिवेच्या विकासक्रमांत जडतत्त्व बाजूला पडून वनस्पति पुढें आल्या, वनस्पति बाजूला पडून मनुष्येतर प्राणी आले -- त्याप्रमाणें, मनुष्येतर प्राण्यानंतर जाणिवेचा विकासाश्रय झालेला जो मनुष्य, तो बाजूला पडून जाणिवेला नवीन विकासाश्रय ''अति मानव'' प्राप्त होण्याचा संभव असेल. असो. आतां नवीन विकासाश्रयाचा विचार बाजूला ठेवून, मानवच स्वत: दिव्य-मानव व्हावयाचा तर काय होणें अवश्य आहे तें पाहूं. मानवी मनांतील कल्पना ही त्याच्या

 

पान क्र. ३९१

 

जीवनांतील घटना, वास्तव घटना होऊं पहात असते, ही गोष्ट जीवनाच्या तिसऱ्या विकासावस्थेचें वर्णन करतांना सांगितली आहे. मानवाचा दिव्य-मानव व्हावयाचा, तर ही क्रिया सारखी प्रगत होत राहिली पाहिजे -- शेवटीं, अस्तित्वाचें सर्व सत्य मानसिक जाणिवेंत -- मनाच्या कल्पनेंत -- उतरलें पाहिजे; लपण्याच्या हेतूनें आपण होऊन पांघरलेलीं सर्व पांघरुणें त्यानें दूर फेंकून मोकळें, प्रकट झालें पाहिजें; मन क्रमश: सत्यमय झालें पाहिजे, सत्याचे एक अंग म्हणून जाणिवेचा प्रकाश मनाचे ठिकाणीं पूर्णपणें उतरला पाहिजे; सत्याचें दुसरें अंग शक्ति, हीहि मानवांत कृतार्थ झाली पाहिजे. कारण मूळ अस्तित्व, मूळ सत्ता, मूळ सत्य हें, प्रकाश आणि शक्ति यांच्या द्वारांच व्यक्त होत असतें. सत्ता ही मुळांतच, जाणीव (किंवा प्रकाश) आणि शक्ति या द्विमुखी स्वरूपाची आहे; आणि हे दोन सत्ता-घटक आपल्या परिपूर्तिबरोबर अस्तित्वाचा समाधानपूर्ण आनंद हा तिसरा घटक आपल्याबरोबर वागवीत असतात. सत्, चित् व आनंद ही मूळ सत्याची अविभक्त आणि अविभाज्य अशीं तीन अंगें आहेत. तेव्हां निष्कर्ष हा निघतो कीं, मानव हा दिव्य-मानव होण्यासाठीं, मनाची प्रगति होऊन, सर्व सत्य -- सच्चिदानंद -- मानवांत अवतरलें पाहिजे. आपण मानव, विकासी जीवन जगणारे आहोंत; तेव्हां हें वर सांगितलेलें जें सर्वोच्च अटळ स्थान आपल्याला लाभावयाचें आहे, तें आपला विकास होऊन, मनाच्या पलीकडे असलेला आपला आत्मा आपल्याला लाभल्यानेंच लाभणार आहे. आपल्या मानवतेच्या बीजांत हा आत्मा होता -- आपलें जीवन, ज्या जाणीवयुक्त मूळ शक्तींतून निर्माण झालें, त्या जीवनाच्या पोटीं हा आत्मा होता; या आत्म्याचा लाभ झाला कीं त्याबरोबरच, मूळ जाणीवशक्तीनें तिच्या जीवननिर्मितीच्या व्यापारांत गुप्त करून ठेवलेल्या शक्ती प्रकट व कार्यकारी होतील. याप्रमाणें आमच्या मानवी जीवनाच्या पोटीं, जी महान् शक्ति गुप्त करून ठेवली गेली आहे ती सच्चिदानंद-शक्ति होय. आत्मलाभानें ही शक्ति प्रकट होणार आणि त्याचा परिणाम म्हणून, वैयक्तिक जीवन आणि विश्वजीवन यांचा सुंदर मेळ आणि ऐक्य होणार; सच्चिदानंदाचा मानवांतील आविष्कार हेंच स्वरूप धारण करूं शकतो. या आविष्कारानें एक सार्वत्रिक सर्वसामान्य जाणीव, एक सर्वसामान्य शक्तिकार्य, सर्वसामान्य आनंद मानवजातींत अवतरेल. सर्वातीत सद्वस्तूच (सच्चिदानंद) या विश्वांतील वस्तुजाताच्या रूपानें साकार झाली आहे, विकसित होत राहिली आहे; या विकास-

 

पान क्र. ३९२

 

क्रमाचा अंतिम टप्पा म्हणून व्यक्तिजीवन आणि विश्वजीवन यांचा मानवांत सुंदर समन्वय साधून ती आपलें सर्वस्व -- गुप्त ठेवलेलें सर्वस्व -- विश्वाला अर्पण करणार असें दिसत आहे.

जीवनाचा असा नियम आहे कीं, त्याची घटकभूत जाणीव जशा प्रकारची, जशा स्वरूपाची असेल तशा प्रकारचें, तशा स्वरूपाचें, तें जीवन असावयाचें. कारण जशी जाणीव, तशी तिची शक्ति असावयाची. (आणि जीवन हें शक्तीचें एक रूप आहे.) सर्वच जीवनाचा स्वभावधर्म त्याच्या घटकभूत जाणिवेच्या मौलिक अवस्थेवर अवलंबून असतो. जेथें जाणीव अनंत आहे, एकच एक आहे, कृती आणि आकार तिजकरवीं घडत आहेत, आकार धारण करून त्या आकारांच्या अंतरांत ती बसत आहे, कृती योजून त्या ती पार पाडीत आहे -- तथापि इतकें करूनहि कृतींच्या, आकारांच्या अतीत, अलिप्तपणें ती नांदत आहे, अशी जाणीव जेथें आहे, (सच्चिदानंदाची जाणीव अशी आहे) तेथें तिची शक्ति पण अनंत-क्षेत्रव्यापी, तिच्या सर्व कृतींत एकरूप व तिचें सामर्थ्य आणि आत्मज्ञान यासंबंधांत ती सर्वातीत अलिप्तपणा गाजविणारी असते. जेथें जाणीव भौतिक निसर्गाची असेल, अर्थात् जेथें ती आकारांत व कार्यांत बुडून गेलेली, आत्मविस्मृति झालेली असेल, तिच्या स्वतःच्या शक्तीच्या ओघांत, दर्शनी अजाणतां परवश होऊन काम करणारी असेल (मात्र हि गोष्ट विसरतां कामा नये कीं, जाणीव आणि शक्ति यांचे जें शाश्वतचें नातें आहे, त्याप्रमाणे जो शक्तीचा ओघ जाणिवेकडून आपल्या लहरीप्रमाणें काम करवून घेतांना दिसतो तो ओघ ती जाणीव स्वतःच ठरवीत असते) तेथें शक्तीहि या आत्मविस्तृत जाणिवेसारखीच असणार : या शक्तींचें कार्य महाभयंकर असणार, तें जडाचें, नेणीवमय राक्षसी कार्य असणार; या कार्य करणाऱ्या जडाला, आपल्या पोटांत काय आहे याची कल्पनाहि नसणार; त्याचें कार्य यांत्रिक रीतीनें, अपरिहार्यपणें पण आकस्मिकपणें, केवळ योगायोगानें पण अटळ योगायोगानें यशस्वी झालेलें दिसणार. (आणि वस्तुस्थिति पाहतां, या जडाच्या पोटीं गुप्त असणाऱ्या दिव्य ज्ञानमय पुरुषाची संकल्पशक्ति, जडासाठीं जो सत्याचा आणि न्यायाचा कायदा निश्चित करते, त्या कायद्याला अनुसरून जड निसर्ग बिनचूक काम करीत असतो,) जेथें जाणीव स्वतःच विभागलेली आहे, (मनामध्यें जाणीव विभागलेली असते) जेथें तिची अनेक केन्द्रें आहेत, जेथें प्रत्येक केंद्र मर्यादित जाणिवेचें आहे, प्रत्येक केंद्र

 

पान क्र. ३९३

 

दुसऱ्या केंद्राहून अगदीं अलग, त्या केंद्रांशीं आपलें नातें कांहींच न ओळखणारें, त्या केन्द्रांत काय चाललें आहे तें मुळींच न जाणणारें, परंतु आपलें इष्ट सिद्धीस नेण्यासाठीं, स्वतःपुरतें कृतार्थ होण्यासाठीं धडपडत आहे, त्यानें तसें धडपडावें अशी जेथें जाणीव व्यवस्था करीत असते; वस्तु काय किंवा शक्ति काय, त्यांचा एकमेकांना दर्शनी विरोध व एकमेकांपासून दर्शनी विभक्तपणा जाणिवेला जेथें खरा वाटतो आणि त्यांची वास्तविक एकता जेथें जाणिवेला प्रतीत होत नाही, -- अशी जाणीव जेथें आहे तेथें शक्तीहि तदनुरूप असेल -- आम्ही जगतो तें जीवन व आमच्या भोंवतालचें जीवन म्हणजे या अशा विभक्त जाणिवेला अनुरूप असलेल्या शक्तींचें कार्य आहे; येथें वैयक्तिक जीवनें एकमेकांत गुंतलेलीं आहेत आणि एकमेकांशीं झगडत आहेत; कोणत्याहि एका व्यक्तिजीवनाला, इतरांशीं त्याचें काय नातें आहे तें माहीत नाहीं; पण प्रत्येक जीवन स्वत: कृतार्थ होण्यासाठीं धडपडत आहे; येथें अनेक शक्ती एकमेकींपासून वेगळ्या आहेत, विभक्त आहेत, अन्योन्यविरोधीहि आहेत आणि या शक्तींचा कसा तरी जुलूमानें मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यांत येत आहे -- मनांतील विचारांकडे पाहिलें तर तेथेंहि विभक्त, विरोधी विचारांचा एकमेकांत गुंता होत आहे, एकमेकांवर आघात होत आहे, एकमेकांशीं कुस्ती होत आहे -- कांहीं विचारांचे कांहीं थोडा काळ टिकणारें असें एकीकरण होत आहे -- येथील शक्तींना काय, विचारांना काय, एकमेकांना एकमेकांच्या असलेल्या आवश्यकतेची, गरजेची प्रतीति होत नाहीं; त्या सर्वांच्या पाठीमागें जी एकच एक सद्वस्तु आहे, त्या सद्वस्तूचे, सर्व विचार व सर्व शक्ती हे घटकभूत आहेत; प्रत्येक विचाराला, प्रत्येक शक्तीला या सद्वस्तूच्या आविष्कारांत विशिष्ट स्थान आहे, त्यांच्या द्वारां ही सद्वस्तु आपलें स्वरूप व्यक्त करीत आहे; पण त्यांचे परस्पर विसंवाद व विरोध या सद्वस्तूच्या ठिकाणीं, या सद्वस्तूच्या अनुभूतीनें सर्वथा विलीन होतील हें ज्ञान येथील शक्तींना आणि विचारांना उपलब्ध नाहीं -- ही आमच्या जीवनाची गोष्ट झाली. जेथें जाणीव ही, एक आणि अनेक, एक सद्वस्तु आणि तिचे विविध आविष्कार या दोन्ही गोष्टी नीट जाणत आहे, जेथें एकतेचें शासन विविधतेवर जाणीवपूर्वक चालतें, जेथें विविधता ही एकतेच्या पोटांत जाणीवपूर्वक आपलें जीवन जगते, जेथें जाणिवेला समष्टीचा आणि व्यष्टीचा दोहोंचाहि वेगळा वेगळा कायदा, वेगळा वेगळा न्याय, वेगळें वेगळें सत्य एकाच वेळीं अवगत आहे आणि जेथें व्यष्टि

 

पान क्र. ३९४

 

आणि समष्टि जाणीवपूर्वक एकमेकींशीं तादात्म्य पावून सुसंवादी जीवन जगतात, जेथें जाणिवेचा स्वभावधर्म असा आहे कीं, -- 'एकच एक सद्वस्तु मीच सर्व विविध वस्तु बनलें आहें हें जाणते व विविध वस्तू आम्ही सर्व एकतेचा आविष्कार आहोंत हें जाणतात' -- जेथें जाणीव अशी द्विमुखी एकानेक समावेशक आहे, तेथें शक्तीहि तदनुरूप असेल -- जीवनहि तदनुरूप असेल : या जाणिवेनें घडलेल्या जीवनांत एकतेचा कायदा बुद्धिपुरःसर पाळला जाईल आणि त्याबरोबर विविधतेंतील प्रत्येक गोष्ट तिला लागूं असणाऱ्या विशिष्ट नियमानुसार, तिला नेमून दिलेल्या विशिष्ट व्यापाराच्या अनुरोधानें हें जीवन चालवील व शेवटास नेईल; या जीवनांत सर्व व्यक्ती एकाच वेळीं स्वतःच्यासाठीं आणि इतरांसाठीं, एकमेकांसाठीं जीवन जगतील; अशी स्पष्ट अनुभूति त्यांना असेल कीं, त्यांच्या रूपानें एकच एक ज्ञानमय सत्ता सर्व आत्म्यांत वसत आहे, एकच एक जाणीवशक्ति सर्व मनांत काम करीत आहे, एकच एक शक्तिजन्य आनंद सर्व जीवांत खेळत आहे, एकच एक आनंदमय सद्वस्तु सर्व हृदयांत व शरीरांत आपलें इष्ट पूर्णतया सिद्धीस नेत आहे -- सर्व आत्म्यांतील ज्ञानमय सत्ता, सर्व मनांतील जाणीवशक्ति, सर्व जीवांतील शक्तिजन्य आनंद, सर्व हृदयांतील व शरीरांतील आनंदमय सद्वस्तु मी आहे अशी अनुभूति प्रत्येक व्यक्तीला या अनेकाकार एकतामय जीवनांत असेल आणि या अनुभूतीनुसार सर्व व्यक्ती एकाच वेळीं स्वतःसाठीं व एकमेकांसाठीं, स्वतःच्या व सर्वांच्या हिताचें असें सुंदर समन्वयी जीवन जगतील.

जाणिवेच्या व तदनुरूप शक्तीच्या चार अवस्थांचें वर्णन येथवर केलें. पहिली अवस्था ही पुढील क्रमवार अवस्थांचा पाया व मूळ आहे. सच्चिदानंद सद्वस्तूच्या अस्तित्वांत, जाणीव आणि शक्ति अभिन्न असतात, तेथें शक्ति ही कार्यकारी जाणीव असते; ही जाणीव आपलें नियत कार्य करीत असतां आपलें जाणिवेचें रूप विसरत नाहीं, तसेंच जाणीव ही प्रकाशमय शक्ति असते; ती शक्ति कधीं स्वतःला विसरत नाहीं, आपला आनंद कधीं दृष्टीआड करीत नाहीं, स्वतःची आणि स्वतःच्या आनंदाची जाणीव तिला नित्य असते -- तसेंच 'पूर्ण प्रकाशाची आणि पूर्ण आत्मशासनाची, आत्मसत्तेची शक्ति', हें आपलें स्वरूपहि ही शक्ति केव्हांहि विसरत नाहीं. सच्चिदानंदाच्या सत्तेमध्यें जाणीव आणि शक्ति यांचें नित्य अभिन्नतेचें नातें असतें हें आतांच सांगितलें. सत्तेच्या अस्तित्वाच्या या मूळ अवस्थेवर बाकीच्या अवस्था आधारलेल्या आहेत. सत्तेची, अस्तित्वाची दुसरी

 

पान क्र. ३९५

 

अवस्था म्हणजे भौतिक निसर्गाची अवस्था; या अवस्थेंत सच्चिदानंद, 'मी सच्चिदानंद नाहीं' असा जणुं पुकारा करतो; कारण जाणीव आणि शक्ति यांची येथें फारकत झालेली दिसते; येथें जाणीवशून्यता, जडता, जडशक्ति अचूकपणें काम करीत आहे, सर्व घटनांवर प्रभुत्व गाजवीत आहे, असा अद्‌भुत देखावा दृष्टीस पडतो; वस्तुत: हा देखावा म्हणजे एक पडदा आहे, जाणिवेनें घेतलेला बुरखा आहे; परंतु आधुनिक विज्ञान या जडतेला विश्वचालक ईश्वराचा खरा मुखवटा मानतें. यानंतर, शक्ति आणि जाणीव यांचें तिसऱ्या अवस्थेंतील नातें पाहिलें, तर तेथें अस्तित्वानें, मूळ सत्तेनें मन आणि प्राण यांचें स्वरूप घेतलें आहे असें दिसतें; जडतेच्या क्षेत्रांत सच्चिदानंदाचें मूळ स्वरूप, शून्य किंवा दर्शनीं शून्यवत् झालें होतें, त्यांतून आतां प्राणमय जीवन आणि मानसिक जीवन वर आलेलें असतें, अर्थात् जाणीव ही शक्तीला थोडीबहुत साथ देऊं लागते; पण येथें भौतिक जडता जाणिवेला गोंधळांत टाकते. जाणीव ही झगडत राहते; जडतेपुढें मान वाकवावी व झगडा सोडून द्यावा ही गोष्ट जाणिवेला शक्य नसते, उलट आपण झगडा जिंकूं अशी अस्पष्ट कल्पना किंवा असें स्पष्ट ज्ञान जाणिवेला नसतें -- प्राणमय जीवनांत आणि मनोमय जीवनांत जाणिवेसमोर जे हजारों प्रश्न उभे राहतात, ते सोडविण्यासाठीं ती झगडत राहते. हे प्रश्न तिजपुढें उभे राहण्याचें कारण म्हणजे, मनुष्य हा जाणीवयुक्त व अर्धवट सामर्थ्य असलेला जीव, सर्वसमर्थ असें जें भौतिक दुनियेचें जडतत्त्व त्यांतून उदय पावलेला असतो, या उदयानें जाणिवेला गोंधळांत टाकलेलें असतें आणि या गोंधळाच्या स्थितींत ती सारखी झगडत राहते. अस्तित्वाच्या मूळ सत्तेच्या या तीन अवस्थांनंतर चौथी अवस्था अतिमानसिक क्षेत्रांतील अस्तित्व ही होय. येथें सत्ता कृतार्थ होते; सर्वशून्यतेंतून, सर्वजडतेंतून अल्पांशानें जाणिवेचें उत्थान होऊन, त्यामुळें जो संकीर्ण प्रश्नसमूह उत्पन्न होतो, तो येथें शेवटीं समूळ सोडविला जातो -- हा जो प्रश्नांचा उलगडा होतो, तो जाणिवेचें पूर्ण उत्थान होऊन होत असतो. सच्चिदानंदाचें जें अस्तित्व, दर्शनी विनष्ट करणाऱ्या महान् जडतेच्या पडद्याआड लपलेलें असतें, जें जडतेंतून पूर्णतया वर यावयाचें सामर्थ्य बाळगून असतें, जें विकासक्रमानें हळूहळू वास्तवांत गोचर व्हावयाचें असतें, तें सच्चिदानंदाचें अस्तित्व पूर्णपणें दृग्गोचर होऊनच, जडतेंतून अर्धवट वर आलेल्या जाणिवेमुळें उत्पन्न झालेला प्रश्नसंभार पूर्णतया उकलला जातो, सोडविला जातो. सच्चिदानंदाचें पूर्ण गोचरत्व,

 

पान क्र. ३९६

 

मनुष्याचे ठिकाणीं त्याचें पूर्णतया आविष्करण, हेंच खऱ्या मनुष्याचें खरें जीवन होय. आजची आंशिक अकृतार्थ मानवता व मानव जीवन हें या खऱ्या मानवतेच्या रोखानें प्रगत होत आहे, सरळ पावलें टाकीत आहे. या दिशेचें व गतीचें पूर्णज्ञान व पूर्ण मार्गदर्शनशक्ति, आमच्यांतील तथाकथित नेणिवेला, जाणिवेखालील अ-जाणिवेला, अचेतनाला आहे; आमच्यांतील जो जाणिवेचा भाग आहे, त्याला आमच्या या विकासक्रमाचें व विकासाच्या अंतिम अवस्थेचें केव्हां केव्हां अर्धवट अंधुक पूर्वदर्शन घडतें, केव्हां केव्हां अर्धवट साक्षात्कार होतो; त्या आदर्शस्थितीचें ओझरतें आल्हाददायक दर्शन केव्हां केव्हां घडतें, आकस्मिक अद्‌भुत अनुभव व अंतःप्रेरणा ह्या केव्हां केव्हां त्या खऱ्या मानवतेचें, विजेच्या झगमगाटाप्रमाणें क्षणिक दर्शन तिला घडवून जातात -- हीं तुटक व त्रोटक दर्शनें, साक्षात्कार, प्रेरणा व आंतरिक अनुभव अर्थात् सामान्यांच्या वांट्यास येत नाहींत, तर आमच्यांतील कवि, द्रष्टे, क्रांतदर्शी, अतींद्रिय ज्ञाननिष्ठ, साक्षात्कारनिष्ठ तत्त्वज्ञ, आणि महान् बुद्धीचे व महान् हृदयाचे उदारात्मे यांच्या वांट्यास ते येतात.

आम्हांला ज्या वास्तव गोष्टी आतां उपलब्ध झाल्या आहेत, त्यांवरून माणसाच्या प्रस्तुत मानसिक आणि प्राणिक अवस्थेमध्यें, त्याची जाणीव आणि त्याची शक्ति यांचें परस्पर नातें व एकंदर सामर्थ्य अपूर्ण असल्यानें ज्या अडचणी उत्पन्न होतात, त्या मुख्यत: तीन आहेत असें दिसतें. पहिली अडचण अशी कीं, मनुष्याला त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचा फार थोडा भाग अवगत असतो; वरवरचें मन, वरवरचें जीवन व वरवरचें भौतिक अस्तित्व एवढेंच काय तें त्याला अवगत असते आणि यांतीलहि सर्व गोष्टी त्याला माहीत नसतात; या वरच्या थराखालीं, त्याच्या अस्तित्वाचा फार मोठा भाग गुप्त असतो आणि त्याजवर त्याची सत्ता चालत नाहीं; उलट हा गुप्त भाग त्याला, त्याच्या वरच्या भागाला जाणतो व त्यावर हुकुम चालवितो : हा मोठा भाग म्हणजे त्याची प्रच्छन्न व अर्धजागृत जाणीव, त्याच्या प्रच्छन्न प्राणिक आणि अर्धजागृत वासनाप्रेरणा आणि त्याची अर्धजागृत भौतिक सत्ता. हा सर्व गुप्त भाग त्याचे ठिकाणीं, त्याला न कळत सारखा आंतून उठाव करून, त्याच्या जागृत  भागावर सत्ता चालवीत असतो. अस्तित्व, जाणीव आणि शक्ति या वस्तुत: अभिन्न, एकरूप असल्यानें, आमच्या अस्तित्वाच्या जेवढ्या भागाशीं आम्ही आत्म-जाणीवेनें एकरूप असूं किंवा होऊं, तेवढ्याच भागावर आम्हांला

 

पान क्र. ३९७

 

कांहीं खरी सत्ता चालवितां येते, आमची शक्ति कांहीं खरें प्रभुत्व गाजवूं शकते; अस्तित्वाचा जो भाग आमच्या आत्म-जाणिवेच्या कक्षेंत येत नाहीं, त्यावर सत्ता चालविणारी जाणीव म्हणजे प्रच्छन्न किंवा अर्धजागृत जाणीव होय; आमच्या वरवरच्या मन-प्राण-शरीराच्या खालीं गुप्तपणें, अज्ञातपणें ही काम करीत असते. गुप्त आणि प्रकट जाणीव या कांहीं दोन स्वतंत्र वस्तू किंवा क्रिया नाहींत, एकाच वस्तूचे किंवा क्रियेचे दोन भाग आहेत. म्हणून आमच्यांतील मोठा आणि अधिक सामर्थ्यशाली भाग त्यामानानें लहान असलेल्या व अल्प शक्तीच्या भागावर सत्ता चालवून, त्याचें कार्य निश्चित करतो हें स्वाभाविक आहे; अर्थात् आमच्यांतील अर्धजागृत आणि प्रच्छन्न अस्तित्व आमच्या जागृत अस्तित्वावर सत्ता चालविते; आम्ही ज्याला आत्मशासन म्हणतो, आत्मदिग्दर्शन म्हणतो, त्या आमच्या अवस्थांत देखील ज्या आमच्या नेणीवव्याप्त (अर्धजागृत आणि प्रच्छन्न) अस्तित्वाचीं आम्हीं यंत्रे आहोंत, साधनें आहोंत त्याच्या तंत्रांनें चालणारे आहोंत असें स्पष्ट दिसतें.

प्राचीन ज्ञानी लोकांनीं असें म्हटलें आहे कीं, 'स्वत:च्या स्वतंत्र इच्छेनुसार मी काम करीत आहे' अशी कल्पना मनुष्य करतो पण तो खरोखरी प्रकृतीनें कामाला लावलेला असतो, प्रकृतीनें त्याचीं सर्व कर्में ठरविलेलीं असतात. ज्ञानी देखील आपल्या प्रकृतीनुसार वागण्याला बांधलेले असतात, ते आपल्या इच्छेविरुद्ध देखील प्रकृतिधर्मानुसार वागतात; या पूर्वकालीन ज्ञानी लोकांच्या म्हणण्याचा अर्थ, मनुष्याच्या जागृत प्रकट अस्तित्वावर अ-जागृत, अप्रकट अस्तित्वाची सत्ता चालते असाच आहे. प्रकृति ही आमच्यांतील सद्वस्तूच्या जाणिवेची निर्मितिशक्ति आहे आणि ही सद्वस्तु, सच्चिदानंद आपल्या जड प्रकृतिरूपी उलट गुणाच्या क्रियेनें किंवा वस्तूनें झांकला गेला आहे व जणुं नाहींसा झाला आहे; म्हणून प्राचीन ज्ञानी लोक प्रकृतीला माया (भ्रम पाडणारी ईश्वराची शक्ति) म्हणत आणि 'सर्वांच्या हृदयांत बसून तो, सर्वजीव हे, मायेनें यंत्रावर घातल्यासारखे संसारांत भ्रमवीत आहे, फिरवीत आहे' असें विधान करीत. यावरून हें स्पष्ट आहे कीं, मनाच्या पलीकडे जाऊन मनुष्य जेव्हां आत्मजाणिवेमध्यें ईश्वराशीं एकरूप होईल, तेव्हांच तो आपल्या सर्व आस्तित्वाचा खरा धनी होईल. अर्थात् ही धनी होण्याची गोष्ट नेणिवेच्या प्रांतांत शक्य नाहीं, अर्धनेणिवेच्या प्रांतांत शक्य नाहीं; मागें पाऊल टाकून नेणिवेच्या प्रांतांत बुडी घेण्यानें मनुष्याला कांहीं लाभ नाहीं -- तेव्हां

 

पान क्र. ३९८

 

आंत खोल जावयाचें, तर जेथें ईश्वर बसलेला आहे तिकडेच जाणें युक्त आहे. आमच्या मनाच्या क्षेत्राहून उंच पातळीवर जें जाणिवेचें क्षेत्र आहे, त्या अतिमानसिक क्षेत्रांत पाऊल टाकणें युक्त आहे; तेथें गेलें तरच ईश्वराशीं एकरूपता सिद्ध होऊं शकेल आणि मनुष्य आपल्या सर्व अस्तित्वाचा खरा धनी होऊं शकेल. कारण अर्धनेणिवेच्या प्रांतांत उच्च दिव्य माया जें कार्य करते, त्याचा कायदा आणि त्यांतील सत्यता या गोष्टींची पूर्ण ओळख त्या अतिमानसिक क्षेत्रांत असते. अगदीं तळाला सच्चिदानंदाच्या बिलकुल उलट, पूर्ण नेणिवेचें, जडाचें क्षेत्र असतें; या क्षेत्रांतील नेणिवेला आणि जडतेला विकाससिद्धान्तानुसार क्रमश: जाणीव आणि चेतना यांचें रूप येत असतें -- हें परिवर्तन घडविण्याचें काम प्रत्यक्षतः कनिष्ठ मायेचें असतें. श्रेष्ठ माया किंवा परा प्रकृति जें इच्छितें व योजितें, तें घडवून आणणें हें काम कनिष्ठ मायेचें किंवा अपरा प्रकृतीचें असतें. दिव्य ईश्वरी ज्ञानामध्यें दोन शक्ती असतात, आभास निर्माण करण्याची शक्ति आणि सत्य ज्ञानाची शक्ति. आभासशक्ति विश्वांत देखावे निर्माण करते, परंतु या शक्तीवर सत्यशक्तीचें नियंत्रण असतें. देखाव्याच्या मागें काय सत्य आहे, तें या दिव्य ज्ञानाच्या सत्य-दर्शनशक्तीला ठाऊक असते. विश्वांतील देखावे ज्या सत्याच्या सिद्धीकडे, प्रकट आविष्काराकडे वाटचाल करीत असतात, तें सत्य, विकासशील जीवानें, मानवानें, प्राप्त करून घ्यावें यासाठीं दिव्य ज्ञानाची सत्यशक्ति तें तयार ठेवीत असते. आज येथें मानव जो पूर्ण नाहीं, अपूर्ण आहे आणि बराचसा आभासपूर्ण आहे, तो अतिमानसिक क्षेत्रांत पूर्ण आणि सत्यमय होईल. येथील अपूर्ण मानवाला तेथें पूर्ण मानव भेटेल. हा पूर्ण मानव आपलें पूर्ण अस्तित्व जाणण्याची शक्ति बाळगून असतो, कारण तो स्वयंभू सच्चिदानंदाशीं पूर्णतया एकरूप असतो; हा स्वयंभू आदिपुरूष आपल्या स्वतःच्या विश्वगत विकासक्रमाचा आणि विकासयात्रेचा सर्वज्ञ असा अधिपति आणि अधिसंचालक असतो.

मानवाची दुसरी अडचण ही कीं, विश्वसमष्टीपासून तो मन-प्राण-शरीरानें विभक्त असतो, विश्वरूपापासून त्याचें मन, प्राण व शरीर त्याच्या जाणिवेनुसार विभक्त असतें; अर्थात् त्याला ज्याप्रमाणें स्वतःच्या अस्तित्वासंबंधीं पूर्ण ज्ञान नसतें, त्याप्रमाणें त्याला इतर सहचारी जीवांसंबंधानेंहि ज्ञान नसतें; स्वतःचें ज्ञान करून घेणें त्याला इतकें अवघड नसतें, पण इतर जीवांचें ज्ञान करून घेणें त्याला फार अवघड असतें,

 

पान क्र. ३९९

 

स्वत:संबंधीं ज्ञान करून घेण्याला तो जितका असमर्थ असतो, त्यापेक्षां दुसऱ्यासंबंधींचें ज्ञान करून घेण्याला तो पुष्कळच अधिक असमर्थ असतो. अनुमानें, उपपत्ति, निरीक्षणें, थोडीबहुत सहानुभूति यांच्या आश्रयानें त्यांच्या संबंधानें, मानव कांहीं मानसिक ढोबळ कल्पना बांधतो; पण या ढोबळ कल्पना म्हणजे ज्ञान नव्हे. कोणासंबंधींहि खरें ज्ञान हे जाणीवपूर्वक तादात्म्यानें, एकरूप होण्यानेंच होऊं शकतें. स्वतःला जाणणारें अस्तित्व, अस्तित्वव्यापक ज्ञान, आत्मज्ञान हेंच खरें ज्ञान होय. आपण आपल्या अस्तित्वाचा जेवढा भाग जागृत जाणिवेनें जाणतों, तेवढ्या भागापुरतेंच आपण आपणाला जाणतो असें म्हणतां येतें; आपल्या अस्तित्वाचा बाकीचा भाग आपल्यापासून लपलेला, आपल्याला अज्ञात असतो; हीच गोष्ट आपल्या इतर गोष्टींच्या ज्ञानासंबंधीं समजावी. आपण आपल्या जाणिवेनें ज्या गोष्टीशीं आणि जितक्या प्रमाणांत एकरूप होऊं, तितक्याच प्रमाणांत त्या गोष्टीचें खरें ज्ञान आपल्याला होतें. ज्ञानाचीं साधनें अप्रत्यक्ष आणि अपूर्ण असतील, तर त्यांनीं मिळविलेलें ज्ञान अपुरें आणि अप्रत्यक्षच असणार. या अपुऱ्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला आपले कांहीं मर्यादित व्यावहारिक हेतू सिद्ध करतां येतील, कांहीं जरूरीच्या गोष्टी मिळवितां येतील, कांहीं सोयी करून घेतां येतील. आपल्याला ज्ञात झालेल्या वस्तूशीं किंवा जीवाशीं आपलें संबंध थोडे बहुत तात्पुरते सुसंवादमय करून घेतां येतील. अर्थात् हें सर्व कार्य ओबडधोबड रीतीचेंच होईल व फारसें टिकाऊहि होणार नाहीं. आमच्या मानसिक दृष्टिकोनानुसार आमचें कार्य आम्हांला जरूरीपुरतें निर्दोष म्हणतां येईल, हें खरें आहे; तथापि कोणत्याहि वस्तूशीं किंवा जीवाशीं खरें पूर्ण निर्दोष नातें जोडावयाचें, तर तें त्या वस्तूशीं किंवा जीवाशीं जाणीवपूर्वक एकरूप झाल्यानेंच आपण जोडूं शकतो, हें निर्विवाद आहे. तेव्हां आमच्या सहचर जीवांचें पूर्ण ज्ञान आम्हांला व्हावें, यासाठीं आम्हांला त्यांच्याशीं जाणीवपूर्वक एकरूप व्हावयास हवें; प्रेमानें त्यांच्याशीं सहानुभूति उत्पन्न होते, मानसिक ज्ञानानें त्यांच्यासंबंधानें कांहीं गोष्टी कळतात, पण हें जें सहानुभूतीनें, तर्कानें वगैरे ज्ञान होतें, तें त्यांच्या वरवरच्या अस्तित्वाचेंच होऊं शकतें; अर्थात् तें स्वभावतःच अपूर्ण आणि सदोष असतें आणि म्हणून हें ज्ञान खोटें आणि निष्फल ठरण्याचा पुष्कळच संभव असतो; दुसऱ्यांच्या अंतरंगांमध्यें व आमच्या अंतरंगामध्यें अर्धनेणिवेचा आणि प्रच्छन्न जाणिवेचा जो प्रांत आहे, तेथून

 

पान क्र. ४००

 

आम्हांला व त्यांना अज्ञात आणि आमच्या व त्यांच्या प्रभुत्वाला न जुमानणाऱ्या अशा गोष्टी एकदम वर उसळून येऊन, आमच्या अपुरत्या ज्ञानावर आम्हीं उभ्या केलेल्या रचना त्या पाडून टाकतील, परिणामशून्य करून टाकतील असाच संभव फार; तेव्हां असलें उथळ अपुरतें ज्ञान बाजूस सारून, आम्हांला इतर जीवांशीं पूर्ण जाणिवेनें एकरूप व्हावयास हवें -- या एकरूपतेनेंच आम्हांला त्यांचें खरें पूर्ण ज्ञान होईल व आमचे त्यांचे संबंध खरे निर्दोष होतील; पण हें जाणीवपूर्वक एकरूपत्व प्रस्थापित व्हावयास आम्हांला त्या ठिकाणीं पोहोंचलें पाहिजे, ज्या ठिकाणीं आम्ही त्यांच्याशीं एकरूप असतो -- अर्थात् विश्वसमष्टींत आम्हीं प्रवेश करावयास हवा. विश्वसमष्टींत सर्व जीवांची व आमची एकरूपता स्वभावतःच असते. अतिमानसिक क्षेत्रांत या विश्वसमष्टीची पूर्णता जाणीवयुक्त अशी असते. हें क्षेत्र आमच्या मानसिक जाणिवेच्या पलीकडे, वरतीं आहे; येथें आमच्या सामान्य अस्तित्वांत विश्वसमष्टीचा मोठा हिस्सा नेणीवव्याप्त असतो आणि म्हणून मन-प्राण-शरीराच्या सामान्य अवस्थेंत या समष्टीची प्राप्ति आम्हांला होत नाहीं. आमची जाणीवयुक्त कनिष्ठ अपरा प्रकृति, आपल्या सर्व क्रियांच्या बाबतींत 'मी'शीं बांधलेली असते, विभक्त व्यक्तित्वाच्या स्तंभाशीं जखडलेली असते, या प्रकृतीच्या पलीकडे असलेलें, फक्त अतिमानसाचें क्षेत्र असें आहे कीं, तेथें विविधता आणि एकता अविभक्त असतात, विविधतेच्या जाणिवेबरोबर एकतेची, अभिन्नतेची जाणीव तितकीच स्पष्ट आणि प्रखर असते.

मनुष्याची तिसरी अडचण ही कीं, त्याच्या विकासशील अस्तित्वांत, शक्ति आणि जाणीव यांची कमीअधिक फारकत झालेली असते व त्यांचा एकमेकांना विरोध होत असतो. विकासक्रमानेंच ही विभक्तता व विरोध निर्माण केला आहे -- अगोदर जड भौतिक देह, नंतर प्राण, नंतर मन अशी क्रमानें रचना करून व प्रत्येक रचनेचा वेगळा कायदा निश्चित करून, विकासक्रमानें या तीन रचनांत विभक्तता व विरोध निर्माण करून ठेवला आहे. प्राणशक्ति, जीवनशक्ति शरीराशीं झगडत असते, आपल्या वासना तृप्त करण्यासाठीं, आपल्या लहरी पुरविण्यासाठीं शरीरावर ती सक्ती करीत असते; शरीराची शक्ति मर्यादित असूनहि, अमर दिव्य शरीरालाच जें शक्य, तें मर्त्य शरीरापासून ही प्राणशक्ति, अपेक्षीत असते; उलटपक्षीं जुलुमाखालीं तडफडणारें शरीर दुःखी कष्टी होतें

 

पान क्र. ४०१

 

आणि प्राणशक्तीच्या भलत्याच मागण्या पाहून बंड करून उठतें, शरीरानें प्राणशक्तीविरुद्ध कायमचें निःशब्द असें बंड पुकारलेलें असतें. मन हें, शरीर आणि प्राण या दोहोशीं झगडत असतें; तें केव्हां केव्हां प्राणशक्तीला शरीराविरुद्ध मदत करतें, केव्हां केव्हां शरीरसंरक्षणार्थ प्राण-शक्तीच्या वासनांना तें दाबून टाकूं पाहते -- प्राणशक्तीच्या वासना, आवेग व मर्यादेबाहेर धडपडणाऱ्या ऊर्मी शरीराला भलतीच इजा पोंचवितील असें पाहून, मन त्यांना आळा घालूं पाहतें; केव्हां केव्हां आपल्या कांहीं इच्छा पुरविण्यासाठीं प्राणशक्तीस वेठीला धरण्याचा उद्योगहि मन करतें; कर्म करण्याची मनाची स्वतःची हौस पुरी व्हावी, त्याचे बौद्धिक हेतू, भावनात्मक हेतू, कलात्मक हेतू पुरे व्हावे, यासाठीं प्राणशक्तीवर ताबा चालवून मन तिला कामाला लावते -- आणि या जुलुमामुळें प्राणशक्ति पुष्कळ वेळां मनाविरुद्ध बंड करून उठते -- मन हें कांहीं सर्वज्ञ नव्हे, अर्धवट ज्ञान, अर्धवट शहाणपण, पुष्कळसें अज्ञान आणि मूर्खपण अशी तर मनाची अवस्था आणि असें हें मन प्राणावर अरेरावीचा जुलुम करूं पाहतें, तेव्हां साहजिकच प्राण बंड करून उठतो. मन-प्राण-शरीर यांची आपसांतील यादवी कांहीं मनाला थांबवितां येत नाहीं; या यादवीवर समाधानकारक उपाय कांहीं मनाला सांपडत नाहीं -- कारण मनानें हा प्रश्न सुटण्यासारखा नाहीं; मर्त्य शरीर आणि नश्वर प्राण यांच्या आश्रयानें अमर आत्म्याची आकांक्षा कशी पुरवावयाची, असा प्रश्न मनापुढें आहे आणि अर्थातच मनाला हा प्रश्न सुटणें अशक्य आहे. मन अनेक तडजोडी करून अमर आत्म्याला संतोष देण्याचा प्रयत्न करतें, केव्हां केव्हां प्रश्न सुटायला अशक्य आहे असें पाहून त्याचा नाद सोडून देतें -- जडवाद्याचा सिद्धान्त मान्य करून, आमचें दृश्य जीवन सर्वस्वीं नष्ट होऊन जाणारें आहे आणि दृश्य जीवनाखेरीज दुसरें जीवन नाहीं असा पक्ष घेऊन, त्याला न सुटणाऱ्या प्रश्नाचा नाद मन सोडून देतें; केव्हां केव्हां संन्यासवादी आणि धर्मवादी यांची विचारसरणी मान्य करून, पार्थिव जीवन गहर्य आहे, त्याज्य आहे असें मन म्हणतें आणि या पार्थिव जीवनांतून माघार घेऊन, या जीवनाहून अधिक सोईच्या व अधिक सुखाच्या जीवनाकडे तें धांव घेतें. पण मनाच्या पुढें असलेला प्रश्न सोडविण्याचा हा खरा मार्ग नव्हे; मनाच्या पलीकडे जें तत्त्व आहे, तें शोधून काढून तें आत्मसात् करणें हा खरा मार्ग आहे; या तत्त्वाचा कायदाच अमरत्व हा आहे; हें अमर तत्त्व आत्मसात् करून, आपलें मर्त्य जीवन अमर्त्य करणें, आपल्या जीवनाच्या

 

पान क्र. ४०२

 

मृत्युवशतेवर विजय मिळविणें हा खरा मार्ग आहे. अमर आत्म्याची अमर आकांक्षा अमर जीवनाच्या आश्रयानेंच पुरी होणार आहे; व हें अमर जीवन मनाच्या वरतीं अतिमानसाच्या क्षेत्रांत शक्य आहे, स्वाभाविक आहे.

विकासक्रमानें निर्मिलेल्या शरीर, प्राण व मन यांच्या विभक्तपणाबद्दल व विरोधाबद्दल वर सांगितलें. या विभक्ततेखेरीज, तिजपेक्षांहि मूलभूत अशी विभक्तता म्हणजे, प्रकृतीची शक्ति आणि जाणीवयुक्त अस्तित्व (पुरुष) यांजमधील विभक्तता होय. या विभक्ततेमुळें व तन्मूलक विरोधामुळें, स्वत:समोरील प्रश्न सोडविण्याच्या बाबतींतील, वर सांगितलेली मनाची असमर्थता उत्पन्न होते. मनाची असमर्थता मूलत: याच कारणामुळें उत्पन्न झाली आहे -- मानसिक, प्राणिक व शारीर या पुरुषांमध्यें वर सांगितल्याप्रमाणें विभक्तता आणि विरोध असून, शिवाय प्रत्येक पुरुष अंतर्गत विरोधानें भरलेला आहे. शरीराची शक्ति शारीर-पुरुषाच्या शक्तीपेक्षां कमी असते, प्राणिक शक्ति प्राणमय-पुरुषापेक्षां कमी असते आणि मानसिक शक्ति मनोमय-पुरुषाच्या शक्तीपेक्षां कमी असते; शारीर-पुरुष म्हणजे सहजभावना-पुरुष, प्राणमय पुरुष म्हणजे वासना-पुरुष, मनोमय पुरुष म्हणजे बुद्धिमय आणि भावनामय पुरुष. पुरुष किंवा आत्मा हा आंतरिक जाणिवेच्या रूपाचा असून, त्याला आपली इच्छा पूर्णतेनें पूर्ण करावीशी वाटते; ज्या आकाराच्या आश्रयानें तो असतो, त्या आकारांत अंतर्भूत असलेल्या शक्तीच्या आवांक्याबाहेर त्याची आकांक्षा असते. आंतरिक पुरुष आपल्या इच्छापूर्तीसाठीं या आकारांतर्गत शक्तीला सारखे धक्के देत असल्यानें, त्या पुरुषाच्या मागण्या पुरविणें तिला जड जातें. एवढेंच नव्हे, तर तिला आपलें सामर्थ्य क्रमाक्रमानें वाढविणेंहि अवघड होऊन बसतें. वर सांगितलेल्या तीन आंतरिक पुरुषांच्या मागण्या पुरविण्याच्या व्यवहारांत प्राकृतिक शक्ति मेटाकुटीस येते; ती सहजभावनेविरुद्ध सहजभावना, वासनेविरुद्ध वासना, हार्दिक भावनेविरुद्ध हार्दिकभावना, कल्पनेविरुद्ध कल्पना उभी करते आणि यापैकीं एखादीला संतुष्ट करावें, एखादीला अतृप्त ठेवून बाजूस सारावें, पुनर्विचार करून अतृप्ताची तृप्ति करावी, कांहींतरी तडजोड करावी, एक गोष्ट देतां आली नाहीं, तर तिच्या ऐवजीं भरपाईदाखल दुसरी एखादी गोष्ट द्यावी, पहिली तडजोड बिघडली, तर दुसरी तडजोड करून पहावी, असा अखंड व न झेपणारा व्यवहार प्राकृतिक शक्ति करीत राहते. पण सर्व गोष्टींचा सुंदर समन्वय

 

पान क्र. ४०३

 

साधणारें एकतेचें तत्त्व तिला सांपडत नाहीं. तसेंच तें, मनाला उपलब्ध असणाऱ्या जाणीवयुक्त शक्तीलाहि लाभत नाहीं -- कारण या शक्तीचें ज्ञान पुरें पडणारें नसतें, इच्छाशक्ति मर्यादित असते; -- आणि त्यांत पुन्हां हें मर्यादित ज्ञान व ही मर्यादित इच्छाशक्ति हीं तत्त्वें, एकमेकांशीं जुळतीं किंवा जुळवून घेणारीं नसतात; उलट त्यांचें वैमनस्यहि पुन्हां पुन्हां प्रकट होत असतें. इत्यर्थ हा कीं, मनाच्या वर, अतिमानसांत गेल्याशिवाय एकतेचें तत्त्व हाताला लागत नाहीं; एकतेचें तत्त्व तेथें आहे; सर्व भेदांना जाणीवपूर्वक एकसूत्रांत बांधणाऱ्या एकतत्त्वाची प्राप्ति तेथेंच होणार आहे; तेथें इच्छाशक्ति आणि ज्ञान या गोष्टी सारख्याच व्यापाच्या व दर्जाच्या आणि पूर्ण मेळानें वागण्याच्या अशा उपलब्ध होतील; त्या ठिकाणीं, जाणीव आणि शक्ति यांचा खालच्या पातळ्यांवरचा विरोध सर्वस्वीं नाहींसा होऊन, त्यांच्यामध्यें दिव्य समानता आणि सख्य, असलेलें किंवा उदयास आलेलें अनुभवास येईल.

मनुष्य ज्या प्रमाणांत आत्मजाणीवसंपन्न आणि खरोखरी विचारशील प्राणी होतो, त्या प्रमाणांत त्याला आपल्यांत व आपल्या घटकांत असणाऱ्या विसंवादाची, वैषम्याची, विरोधाची तीव्र जाणीव होऊं लागते; आपलें मन, प्राण, शरीर यांच्यामध्यें परस्पर मेळ उत्पन्न करण्यासाठीं तो झटतो; आपलें ज्ञान, संकल्पशक्ति आणि भावना यांचा मेळ व्हावा म्हणून तो प्रयत्न करतो; आपल्या सर्व घटकांत सुंदर सुसंवाद व्हावा व रहावा म्हणून खटपट करतो. या खटपटी करून कांहीं थोडी समाधानकारक व थोडी शांति देणारी तडजोड साधली, कीं बहुधा सामान्य मनुष्य अधिक भानगडींत पडत नाहीं. परंतु अशी तडजोड कांहीं मनुष्याच्या हृदयांतील ईश्वरी भूक पुरतेपणीं शांत करूं शकत नाहीं -- विकासमार्गावर थोडा विसांवा घेण्यापुरतीच ही तडजोड उपयोगी पडूं शकते; मनुष्याच्या हृदयांतील ईश्वर, तेव्हांच अंतिम समाधान पावेल, जेव्हां आमच्यांतील सर्व सुप्त शक्तींचा सर्वांगीण पूर्ण विकास होऊन, सर्वांमध्यें पूर्ण मेळ नांदूं लागेल. आमच्यापुढें, मानवापुढें जो प्रश्न आहे, त्याचें पूर्ण समाधान अशानेंच होणार आहे; यापेक्षां कांहींहि कमी असेल किंवा मनुष्य मध्येंच थांबेल तर त्यायोगें समोरील प्रश्न बाजूला सारल्यासारखें होईल -- प्रश्न सोडविल्यासारखें होणार नाहीं. थोडा वेळ विसांवा घेण्यासाठीं, पूर्णतेहून कांहीं कमी घेऊन मनुष्याला थांबतां येईल, परंतु मनुष्य सारखा वाढत असतां व चढत असतां त्याला कायमचें कोठेंहि मध्येंच थांबतां येणार

 

पान क्र. ४०४

 

नाहीं. वर निर्दिष्ट केलेली पूर्ण मेळाची अवस्था येण्यासाठीं, ज्या अगदीं आवश्यक गोष्टी हव्यात त्या म्हणजे : १) पूर्णतेस पोंचलेलें मन २) पूर्णतेस पोंचलेली प्राणशक्ति आणि ३) पूर्णतेस पोंचलेलें भौतिक अस्तित्व, या तीन होत. परंतु आम्हांला उपलब्ध असलेल्या अपूर्ण मनांत, प्राणांत व शरीरांत हें पूर्णतेचें तत्त्व आणि सामर्थ्य सांपडणें अशक्य आहे. मन हें विभक्तता आणि मर्यादितता यांनीं जन्मास घातलेलें आणि त्यांनीं व्यापलेलें आहे. विभागणाऱ्या व मर्यादा घालणाऱ्या मनाची, प्राण ही शक्ति असून, शरीर हें अशा मनाची भौतिक चौकट आहे -- अर्थात् अशा मनाकडून, प्राणाकडून व शरीराकडून पूर्णतेची अपेक्षा करतां येत नाहीं. मनाखालीं अर्धजागृत जाणिवेचा प्रांत आहे, तेथें पूर्णतेचें तत्त्व आणि सामर्थ्य आहे; पण तें कनिष्ठ मायेच्या पडद्याखालीं झाकलेलें आहे; आमच्या भवितव्याचें नि:शब्द स्वप्न म्हणून, सिद्ध न झालेलें आमचें साध्य म्हणून तें केव्हां केव्हां मनांत उपस्थित होतें, इतकेंच; मनाच्या वरचा जो अतिमानसिक प्रांत आहे, तेथें पूर्णतेचें तत्त्व आणि सामर्थ्य सिद्ध स्थितींत आहे, प्रकट अवस्थेंत आहे आणि आमची जणुं कांहीं वाटच पहात आहे; 'आमचें आत्मविषयक अज्ञान' एवढाच एक पडदा, त्याच्यामध्यें आणि आमच्यामध्यें आहे; तेव्हां आमच्या अस्तित्वाच्या घटकांमध्यें पूर्णता येण्यासाठीं जें समन्वयी सामर्थ्य आणि जें समन्वयी ज्ञान आम्हास हवें आहे, तें आम्ही आहों तेथे आम्हांला मिळणार नाहीं. मनाच्या खालीं जाऊनहि मिळणार नाहीं; तर आमच्या मनाच्या वरतीं प्रवास करूनच आम्हीं तें मिळवावयास हवें.

जसें स्वतःच्या अस्तित्वाच्या घटकांच्या बाबतींत, एकतेचें तत्त्व शोधून त्यांचा मेळ घालावा असें मनुष्याला वाटतें, तसेंच त्याचीं जगाशीं जीं नातीं आहेत, त्यांच्या बाबतींतहि त्याला वाटत असतें. या नात्यांत विसंवाद, अज्ञान यांचें साम्राज्य असतें, या साम्राज्याचा मनुष्याला वीट येतो; जसा जसा मनुष्याचा अधिकाधिक विकास होत जातो, तसा तसा अज्ञानाच्या आणि विसंवादाच्या जुलुमाचा त्याला अधिकाधिक वीट येऊं लागतो आणि मेळ, शांति, सुख व एकता यांचें तत्त्व हुडकून काढण्यासाठीं तो अधिकाधिक झटूं लागतो; हें शांतीचें, मेळाचें तत्त्व, मनाच्या वरतीं असलेल्या अतिमानसाच्या प्रांतांतच त्याला मिळू शकतें. मनुष्याचा आयुष्यक्रम व त्याचें जीवन त्याच्या सहचर जीवांच्या, सहचर भूतांच्या जीवनाशीं व आयुष्यक्रमाशीं एकरूप व्हावें आणि मानवी व्यक्तीला आपला

 

पान क्र. ४०५

 

विश्वव्यापी आत्मा परत मिळावा, हें आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टीनें मनुष्याच्या विकासाचें उद्दिष्ट आहे. आज आपली आणि इतरांचीं मनें, इच्छा, भावना, व प्राणिक शक्ति, अनेक तऱ्हेचा खोटेपणा, पाप, प्रमाद व विकृत व्यवहार करीत असतात; या सर्व अनिष्टांना थारा न देणारा, त्यांच्या प्रांताच्या वरील प्रांतांत स्वभावत: असणारा, प्रकाश आणि सत्याचा कायदा शिरोधार्य करून, आम्ही आपलें मन आणि इतर घटक समूळ बदलून टाकूं -- त्यांच्यांत क्रमश: विकास घडवून बदलून टाकूं -- तेव्हांच वर सांगितलेलें आमच्या विकासाचें उद्दिष्ट सिद्ध होणार आहे : आज आमचें मन दुसऱ्या मनांसंबंधानें अज्ञानांत आहे आणि त्यांजविषयीं भलते गैरसमज करून घेत आहे -- त्यांचीहि मनें अशींच आमच्या मनांसंबंधानें अज्ञानानें आणि अपसमजानें भरलेलीं आहेत; ही सर्व परिस्थिति पालटावयास हवी. आमच्या मनाला जशी आपली स्वतःची माहिती असते, तशी त्याला इतरांच्या मनाची माहिती असली पाहिजे; इतरांच्या मनाविषयीं अज्ञान आणि अपसमज ज्यांत नाहींत असें मन आणि त्यांच्यासंबंधानें खरें पूर्ण ज्ञान आहे असें मन, क्रमश: आम्हीं आमचे ठिकाणीं बनविलें पाहिजे; इतरांच्या इच्छांशीं एकरूप होणारी, इतरांच्या इच्छा स्वतःच्याच इच्छा आहेत असें जिला वाटते अशी इच्छा, आमच्या ठिकाणीं आम्हीं विकसित केली पाहिजे; आमचें भावनात्मक हदय, स्वतःच्या भावनांबरोबर तितक्याच आपुलकीनें इतरांच्याहि भावना साठवणारें, असें आम्हीं बनविलें पाहिजे; प्राणिक शक्ति आमचे ठिकाणीं अशी असली पाहिजे कीं, तिनें इतरांच्या प्राणिक शक्ती स्वतःच्याच आहेत असें जाणीवपूर्वक समजून, त्यांची इष्ट परिपूर्ति स्वतःच्या शक्तीच्या प्रमाणें करावयास झटलें पाहिजे; आमचें शरीरहि, आम्हांला जगापासून दूर ठेवणारें व आम्हांला तुरुंगाप्रमाणें असणारें न राहील, अशा तऱ्हेचें आम्ही बनविलें पाहिजे -- वर उल्लेखिलेला प्रकाशाचा आणि सत्याचा कायदा शिरोधार्य करून, या सर्व गोष्टी आम्हीं घडवून आणल्या पाहिजेत; असें केल्यानेंच वर सांगितल्याप्रमाणें आमचा विश्वात्मा आम्हांला पुनरपि लाभेल, आमचें मानवी जीवन, आध्यात्मिक व व्यावहारिक दृष्टीनें आमच्या सहचर भूतांच्या जीवनांशीं एकरूप होईल. मनाच्या खालच्या क्षेत्रांत, अर्धजागृत जाणिवेच्या क्षेत्रांत विश्वात्मा कार्य करीत आहे आणि मनाच्या वरतीं असलेल्या अतिमानसाच्या क्षेत्रांतहि विश्वात्मा कार्य करीत आहे; पण दोन्हीकडील परिस्थिति पाहतां, विश्वात्मा आमचा करण्यासाठीं खालीं

 

पान क्र. ४०६

 

प्रवास करण्याचें मनांत न आणतां, आम्हीं वरतीं प्रवास करण्याचें ठरविलें पाहिजे, असा निष्कर्ष निघतो. कारण ज्या मूळ प्रेरणेनें आमचा विकासशील आत्मा, आमच्या आजच्या मानवतेपर्यंत विकासमार्गानें विकास करीत आणला आहे, ती प्रेरणा आम्हांला आमच्या अस्तित्वाच्या विरळांत विरळ, सर्वश्रेष्ठ आकाशरूपी भागाकडे नेणारी आहे; तेथें असलेल्या ईश्वरी तत्त्वाकडे, शाश्वत प्रकाशाच्या सागरांत वसत असलेल्या दिव्य प्रकृतीकडे, देवदेवाकडे ती नेणारी आहे. (ऋग्वेद ३.२२.३) तमावर तमाचें पांघरूण असलेल्या सर्व तमोमय अशा दुसऱ्या सागरांत -- नेणीवेच्या सागरांत -- लपून असलेल्या दिव्य प्रकृतीकडे, देवदेवाकडे ती मूळची विकासप्रेरणा आत्म्याला नेत नाहीं. (ऋग्वेद १०.१२९.३)

तेव्हां मानवता, मानवजात बाजूला पडून, वर उल्लेखिलेली सिद्धि निर्माणोत्सुक, निर्माणकष्टप्रिय प्रकृतिमातेच्या दुसऱ्या नव्या भूतसृष्टीसाठीं राखून ठेवली जावयाची नसेल, तर आजच्या मानवानें उत्साहानें ध्येयनिष्ठ बनून, वर उल्लेखिलेली सिद्धि जेथें प्राप्त होणार आहे त्या उच्च स्थानावर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे -- असा प्रयत्न तो निश्चितपणें करीलच. या चढण्याच्या प्रयत्नांत, मानवाला प्रेमांतून, मानसिक प्रकाशांतून व सत्तेच्या आणि आत्मदानाच्या प्राणिक प्रेरणेतून जावें लागणार आहे; पण प्रेमादिकांच्या क्षेत्रांत त्याचा विकास संपत नाहीं -- त्याची इष्टसिद्धि होत नाहीं; त्या सिद्धीसाठीं प्रेमादिकांच्या पलीकडे, अतिमानसिक अद्वैताच्या क्षेत्रांत त्यानें पाऊल टाकून स्थायिक झालें पाहिजे -- हें क्षेत्र प्रेमादिकांची परिपूर्ति करणारें आहे आणि त्यांच्या पलीकडची सिद्धि देणारें आहे. मानवतेच्या कल्याणासाठीं, मुक्तीसाठीं अतिमानसिक सिद्धि व अतिमानसिक क्षेत्रांतील महान् अनुभूति हा मानवी जीवनाचा पाया असणें अवश्य आहे. अतिमानसिक क्षेत्रांत, एकच एक सच्चिदानंदाशीं जाणीवपूर्वक एकरूपता आणि सर्व भूतांशीं जाणीवपूर्वक एकरूपता प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाच्या सर्व घटकांत अनुभवास येते -- या अतिमानसिक अनुभूतीवर मानवी जीवन आधारलेलें असण्यांत मानवतेचें अंतिम कल्याण आहे, अंतिम मुक्ति आहे. विकासमार्गानें दैवी प्रकृतीकडे, देवदेवाकडे जीवन चढून जात आहे; या चढण्याच्या कार्यक्रमांत चौथी जीवनावस्था म्हणून जी पूर्वीं आम्हीं वर्णिली ती अवस्था म्हणजे वरील अतिमानसिक अद्वैतानुभूतीवर आधारलेले जीवन ही होय.

 

पान क्र. ४०७

 

प्रकरण तेविसावें

 

मानवांतील दोन आत्मे

 

पुरुष, अंतरात्मा, मनुष्याच्या अंगुष्ठाच्या मापाचा आहे, त्याहून मोठा नाहीं.

- कठ उपनिषद् ४.१२

- श्वेताश्वतर उप० ६.१७

 

अस्तित्त्वाचा मधु खाणारा, जें आहे आणि जें होणार आहे त्याजवर सत्ता चालविणारा असा जो आत्मा, त्याला जो जाणतो; तो मग कोणत्याहि गोष्टीची घृणा करीत नाहीं.

- कठ उपनिषद् ४.५

 

जो सर्वत्र एकत्व पाहतो त्याला शोक किंवा मोह कोठून व कां होईल?

- ईश उप० श्लोक ७

 

ब्रह्माचा आनंद जो अनुभवतो त्याला कोठूनहि भय नसतें.

- तैत्तिरीय उप० २.९

 

जीवनाच्या ज्या चार अवस्था आहेत, त्यांत पहिली अवस्था नेणिवेची आहे, या अवस्थेंत जी मूक प्रेरणा किंवा उर्मि असते, ती जाणीवयुक्त नसते -- या अवस्थेंत भौतिक किंवा जड वस्तूच्या पोटीं इच्छा गुप्तपणें वास करीत असते; या गुप्त इच्छेची नेणीवव्याप्त शक्ति भौतिक जड वस्तूंत क्रिया करीत असते, हें या अवस्थेचें वैशिष्ट्य होय. ही शक्ति स्वतंत्र नसते, ती स्वतःवर किंवा स्वतःच्या क्रियांवर किंवा त्यांच्या परिणामांवर सत्ता चालवूं शकत नाहीं; ती सर्वथा क्रियाशील विश्वशक्तीची ताबेदार असते. या विश्वशक्तीच्या पोटींच, व्यक्तित्वाचें अंधुक आकारहीन बीज, या रूपानें तिचा (जड वस्तुगत नेणीवव्याप्त शक्तीचा) जन्म होत असतो; जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेचें मूळ, वासना हें आहे; कांहीं-

 

पान क्र. ४०८

 

तरी आपल्या मालकीचें करावें ही वासनेची स्फूर्ति असते, पण ही स्फूर्ति मर्यादित शक्तीची असते; जीवनाची तिसरी अवस्था फुलाच्या कळीसारखी व चौथी फुलासारखी असते; कळीच्या तिसऱ्या जीवनावस्थेंत प्रेम हें प्रमुख सूत्र असतें; प्रेम घेऊं इच्छितें, देऊंहि इच्छितें; सत्ता चालवूं इच्छितें, अंकितहि होऊं इच्छितें. चौथी फुलासारखी जी जीवनावस्था ती जीवनाची पूर्णावस्था होय : तींत जीवनविकासारंभींची भौतिक वस्तूंतील गुप्त इच्छा, पूर्णपणें शुद्ध स्वरूपांत प्रकट झालेली असते; वासना (जी दुसऱ्या अवस्थेंत धडपड करीत होती ती) येथें प्रकाशयुक्त आणि परितृप्त झालेली असते; त्याचप्रमाणें तिसऱ्या अवस्थेंत बुद्धिपुरस्सर हरएक प्रिय वस्तुचें आदान-प्रदान करणारें प्रेम, या अवस्थेंत उच्च प्रकारच्या गाढ परितुष्टीनें संतुष्ट झालेलें असतें; कारण येथें अतिमानसिक क्षेत्रांत, अस्तित्वाचा पायाच मुळीं आत्म्यांची दिव्य एकरूपता, एकता हा असल्यानें, प्रेमस्थितींत स्वामी आणि अंकित असे जे दोन वेगळे जीव असतात ते, या चौथ्या अवस्थेंत वेगळे राहत नाहींत तर एकजीव होतात, एकरूप होतात. या सगळ्या अवस्थांचा बारकाईनें विचार केल्यास असें दिसून येतें कीं, वैयक्तिक आणि विश्वात्मक दृष्टीनें वस्तुजातांतील आनंद भोगण्याची इच्छा आत्मा करतो आणि या इच्छेला विकासमार्गांत चढते-वाढते आकार व अवस्था प्राप्त होतात. जीवनाची उर्ध्वगति म्हणजे स्वभावत: विश्वांतील दिव्य आनंदाची उर्ध्वगामी चाल आहे -- जडांत हा आनंद मूक असतो, पुढें अनेक परिवर्तनांतून व विरोधी स्वरूपाच्या स्थितींतून तो मार्ग क्रमतो व शेवटीं मूळ चैतन्याचे ठिकाणीं तो पूर्णता पावतो, तेजोमय होऊन सर्वांगसमृद्ध होतो.

विश्वाची व्यवस्था पाहतां, हें असें होणेंच स्वाभाविक आहे, यावेगळी गोष्ट घडणें शक्यच नाहीं. कारण सच्चिदानंदाचें सच्चिदानंदत्व झांकणारें विश्व, हें त्याचेंच रूप आहे. सच्चिदानंदाच्या जाणिवेचा स्वभावधर्म दिव्य आनंद, सर्वव्यापी आत्मानंद हा आहे. अर्थात् त्याची शक्ति क्रियाशील होऊन वावरूं लागली, म्हणजे तिला दिव्य आनंद हेंच ध्येय असणार, दिव्य आनंदांतच तिची कृतार्थता असणार. जीवन हें सच्चिदानंदाच्या जाणीवशक्तीची क्रियाशीलता आहे आणि म्हणून या क्रियाशील शक्तीच्या सर्व हालचालींचें गुप्त प्रेरक ध्येय, सर्व वस्तुजातांत स्वभावत: भरलेला गुप्त आनंद, हेंच असलें पाहिजे. या शक्तीच्या व्यापाराचें कारण, हेतु व ध्येय या आनंदाखेरीज दुसरें कांहीं असूं शकत

 

पान क्र. ४०९

 

नाहीं. वैयक्तिक 'मी'च्या विभक्ततेमुळें हा आनंद मिळेनासा झाला आहे, तो पडद्याआड दडून बसला आहे. त्याच्या विरोधकानें (ताप-संताप, उद्वेग-विषाद यानें या आनंदाची जागा घेतली आहे -- अस्तित्व मरणानें झांकलें गेलें आहे, जाणिवेनें नेणिवेचें रूप घेतलें आहे, शक्तीचें दुबर्लतेंत रूपांतर झाल्यासारखें दिसत आहे, शक्तीनें दुर्बळतेचें सोंग घेतलें आहे, हें खरें आहे -- पण हेंहि तितकेंच खरें आहे कीं, जो विश्वव्यापक आनंद व्यक्तीच्या अस्तित्वांतील गुप्तपूर्ण आनंद आहे, जो सर्वातीत आणि सर्वव्यापी, सर्वांतर्यामी सच्चिदानंदाचा, सर्व वस्तुजाताला पोटांत घेणारा, सर्वांच्या पोटांत वसति करणारा, सर्वांना आधार देणारा असा मूळ आनंद आहे, तो विश्वव्यापी आनंद हस्तगत केल्याखेरीज कोणताहि जीव समाधान पावणार नाहीं, स्वस्थ बसणार नाहीं, विश्वव्यापी आनंदापेक्षां कांहीं कमी घेऊन आपले प्रयत्न कृतार्थ झाले असें समजणार नाहीं. तेव्हां जीवनाची मूळ प्रेरणा, मूळ प्रयोजन आनंदाचा शोध हें आहे. आनंद शोधून काढणें, आनंद मिळविणें, आनंद पूर्वक नेणें हा, जीवनाचा एकच समग्र हेतु आहे.

आमच्यामध्यें असलेलें आनंदाचें हें तत्त्व कोठें आहे? जाणीवयुक्त शक्ति ही, ज्याप्रमाणें जीवन या रूपाच्याद्वारां विश्वांत प्रकट होते व आपल्या इष्टसिद्धीसाठीं जीवनाचा उपयोग करते, त्याप्रमाणें अतिमानस हें मनाच्याद्वारां विश्वांत व्यक्त होतें व त्याचा आपल्या इष्टसिद्धीसाठीं उपयोग करतें. त्याप्रमाणें विश्वाच्या कार्यात आनंदतत्त्व आमच्या कोणत्या घटकाच्या द्वारां व्यक्त होऊन आपल्या इष्टसिद्धीसाठीं काम करतें? विश्वनिर्मिति करणारें जें दिव्यतत्त्व, जो दिव्यपुरुष आहे, त्याचीं चार अंगें आम्ही मानतो : अस्तित्व, जाणीवयुक्तशक्ति, आनंद आणि अतिमानस. भौतिक विश्वांत अतिमानस सर्वत्र उपस्थित असतें, मात्र तें पडद्याआड लपलेलें असतें; दृश्य वास्तव घटना व वस्तु हाच पडदा अतिमानसाला झांकतो; या पडद्याआड राहून अतिमानस तेथें काम करतें; आपलें काम परिणामकारक होण्यासाठीं, आपणच निर्माण केलेलें व आपलें अंकित असलेलें 'मन' तें उपयोगांत आणतें. ईश्वरी जाणीवयुक्त-शक्ति हीहि भौतिक विश्वांत सर्वत्र आहे आणि गुप्तपणें पडद्याआड बसलेली आहे; वास्तव दृश्य घटनांच्या व वस्तूंच्या मागून लपून काम करीत आहे; स्वत: निर्मिलेल्या 'जीवन' या दुय्यम तत्त्वाच्या द्वारां, ही जाणीवयुक्त शक्ति आपलें स्वरूप विश्वांत व्यक्त करते. जड भौतिक तत्त्वाचें आम्हीं

 

पान क्र. ४१०

 

अद्यापि परीक्षण व विश्लेषण केलेलें नाहीं, तथापि जें दिव्य सर्वात्मक अस्तित्व भौतिक विश्वांत सर्वत्र आहे, तेंहि पडद्याआड आहे; वास्तव घटनांमागें तें दडून आहे आणि तें व्यक्त होतें तें प्रथम 'द्रव्य,' अस्तित्वाचें रूप, जडवस्तु या आपल्या निर्मितीच्या गौण स्वरूपाच्या द्वारां व्यक्त होतें -- असें आपल्याला दिसतें (याप्रमाणें आमचा देह-प्राण-मन हीं अंगें विश्व-रचनाकार दिव्य-पुरुषाच्या अस्तित्व, जाणीवयुक्त-शक्ति आणि अतिमानस या अंगांचीं उपांगें आहेत, साधनें आहेत -- असें झालें.) आतां दिव्य पुरुषाचें चौथें अंग दिव्य-आनंद हेंहि इतर तीन अंगांप्रमाणें विश्वांत सर्वत्र भरलेलें असलें पाहिजे, गुप्त असलें पाहिजे व वस्तुजाताचा आणि घटनांचा दृश्य पडदा त्याला झांकीत असला पाहिजे. अर्थात् विश्वाच्या कार्यक्रमांत, तें शेवटीं शोधून काढलें जाणार आहे आणि हस्तगत केलें जाणार आहे.

आमच्यामधील मूळ दिव्य आनंदाचें प्रातिनिधिक उपांग जें आहे, त्याला विशेष अर्थानें ''आत्मा'' हें नांव आम्ही केव्हां केव्हां देतो. हा आत्मा हें एक आंतरिक तत्त्व आहे; यांत या तिघांच्या सारभूत भागांना त्यांचा त्यांचा विशिष्ट आनंद प्राथमिक स्वरूपांत व उच्च स्वरूपांत मिळवून देण्याची गुरुकिल्ली आहे. प्रकाश, प्रेम, सुख, सौंदर्य व शुद्ध निर्मल जीवन या गोष्टी शरीर-प्राण-मनाला प्राथमिक स्वरूपांत उपलब्ध करून देणें व त्यांतील विशिष्ट आनंद या त्रयीला चढत्या वाढत्या स्वरूपांत प्राप्त होईल असें करणें, ही गोष्ट 'आत्मा' या आंतरिक तत्त्वाच्या स्वाधीनची आहे. आमच्यामध्यें वस्तुत: एकच आत्मा नसून दोन आत्मे आहेत; दुसरीहि विश्वतत्त्वें आमच्यामध्यें दोन दोन आहेत. मनें दोन आहेत, प्राण दोन आहेत, शरीरें दोन आहेत. दोन मनांपैकीं एक मन वरचें, मीचें, विकासक्रमांत व्यक्त झालेल्या व्यक्तीचें जागृत मन होय. जडांतून आम्ही वर आलों आणि येतांना आम्हीं हें वरचें जागृत मन निर्माण केलें. याखेरीज आम्हांला दुसरें प्रच्छन्न (Subliminal mind) गुप्त मन आहे; आमचा जो वास्तवांत मानसिक व्यवहार चालतो, त्याचीं जी कडक बंधनें असतात -- त्या व्यवहाराच्या, त्या बंधनांच्या पलीकडे अनिर्बंध विशाल महान् सामर्थ्य असलेलें असें आमचें दुसरें मन आहे. हें आमचें खरें मानसिक अस्तित्व आहे; वरची मानसिक व्यक्ति हें आम्ही आपलें खरें स्वरूप समजतो, पण ती चूक आहे; आमचें खरें मानसिक जीवन या वरच्या स्वरूपाच्या मागें लपलेलें आहे. आमच्या

 

पान क्र. ४११

 

प्राणमय जीवनाची तीच गोष्ट आहे. एक बाह्य व स्थूल 'प्रकट जीवन', दुसरें आंतर व सूक्ष्म, 'अप्रकट जीवन'. बाह्य जीवन म्हणजे शरीरांत कोंडलेलें जीवन; जडामधून विकसित होत आलेलें हें बाह्य जीवन, त्या गत विकासाच्या बंधनांनीं बांधलेलें आहे. हें जीवन शरीराबरोबर जन्मतें, त्याच्याबरोबर जगतें व मरतेंहि त्याच्याच बरोबर. दुसरे आंतर, गुप्त व प्रच्छन्न, 'अप्रकट जीवन' हें शारीर जन्म व शारीर मरण या दोन मर्यादांच्या मध्यें कोंडलेलें नसतें; हें आपलें खरें प्राणिक अस्तित्व असतें. आपण अज्ञानानें ज्याला आपलें खरें जीवन मानतो, तें जीवनानें घेतलेलें एक तात्पुरतें रूप असतें. मनें दोन, प्राण दोन, त्याप्रमाणेंच शरीरेंहि दोन आहेत. आमचें स्थूल शरीर ज्या जडतत्त्वाचें बनलें आहे, तें जडतत्त्वहि, स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन स्वरूपांत असतें; स्थूल जडाचें शरीर जसें आम्हांला आहे, तसें सूक्ष्म जडाचें शरीरहि आम्हांला आहे; या सूक्ष्म भौतिक तत्त्वापासून जसें आमचें सूक्ष्म भौतिक शरीर बनतें, तसें प्राण व मन यांसाठींहि त्याचे सूक्ष्म कोश बनतात; हें सूक्ष्म भौतिक द्रव्य आमच्या स्थूल भौतिक शरीराचा खरा आधार आहे -- आम्ही आमच्या स्थूल शरीराला, आमच्या चैतन्याचें एकमेव शरीर मानतो ही आमची चूक आहे; प्रकट व अप्रकट मन-प्राण-शरीर याप्रमाणें प्रकट आणि अप्रकट आत्मचैतन्यहि आमच्यामध्यें आहे. बाह्य, स्थूल, प्रकट असा आमचा आत्मा म्हणजे वासनामय आत्मा होय. आमची जीवनाची भूक किंवा भुका, त्याच्या भावना, त्याची सौंदर्यविषयक वृत्ति, सत्ता, ज्ञान, सुख यांसाठीं मनाची होणारी तळमळ या सर्व गोष्टी वासनामय आत्म्याचे विकार होत. या बाह्यसंलग्न आत्म्याच्या पाठीमागें, आंतर प्रच्छन्न चैतन्य-पुरुष असतो. शुद्ध प्रकाशमय सामर्थ्य, प्रेम, सात्विक आनंद व निर्मळ अतिशुद्ध सत्तातत्त्व हे त्याचें विशेष असतात; हाच आपला खरा आत्मा. बाह्य वासनात्मक चैतन्याला आपण आपला खरा आत्मा समजतों हें आपलें अज्ञान होय. हें विशाल शुद्ध चैतन्यतत्त्व, जेव्हां मनुष्याच्या बाह्य आचार-विचारांत प्रतिबिंबित होतें, तेव्हा आपण त्या माणसाला आत्मा आहे (हृदय आहे) असें म्हणतो; त्याच्या बाह्य विचारसृष्टींत हें शुद्ध चैतन्यतत्त्व दिसलें नाहीं, म्हणजे त्याला आत्मा नाहीं हृदय नाहीं) असें आपण म्हणतो.

आमच्या जीवनाचीं बाह्यरूपें हीं आमच्या क्षुद्र अहंभावाच्या जीवनाचीं असतात. आंतर जीवन आमच्या खऱ्या विशाल व्यक्तित्वाचें असतें. आंतर

 

पान क्र. ४१२

 

जीवनाचे व्यवहार आमच्या गुप्त अप्रकट अस्तित्वाचे व्यवहार असतात; या व्यवहारांत आमचें व्यक्तित्व आमच्या विश्वरूपाशीं संलग्न झालेलें असतें, नित्य दोघांचा संबंध येतो, व्यवहारविनिमय होतो -- आमचें अप्रकट मन, विश्वमनाला असलेलें विश्वज्ञान आत्मसात् करूं शकतें; त्याचप्रमाणें अप्रकट प्राणमय जीवन हें विश्वजीवनाच्या विश्वशक्तीशीं जोडलेलें असतें. आमचें उपरिस्थ बाह्य शरीर, प्राण, मन हे भाग विश्वात्मक शरीर-प्राण-मनापासून जाड भिंतीनीं वेगळे ठेवलेले असतात. या जाड भिंतींतून निसर्गाला (विश्वात्मक व्यवहाराला) आमच्यांत प्रवेश करावयाचा म्हणजे फार कष्ट पडतात, प्रवेश नीट होऊं शकत नाहीं; अर्धवट चतुर, अर्धवट अकुशल भौतिक साधनांनीं निसर्ग (विश्व व्यवहार) आमच्यामध्यें प्रवेश करण्यासाठीं धडपडत असतो : -- आंतर, अध:स्थ व अप्रकट शरीर-प्राण-मनाची गोष्ट अगदींच वेगळी असते; येथें जाड भिंती नसतात; अगदीं विरळ पडदे असतात -- हे विरळ पडदे विश्वव्यवहाराचा आमच्यांत प्रवेश घडावयास मदत करतात व त्या विश्वव्यवहारापासून आम्हांला दूरहि ठेवूं शकतात. जशी ही आंतर शरीर-प्राण-मनाची व विश्वशरीर, विश्वप्राण, विश्वमन यांची संलग्नता आम्हांला आंतरिक मार्गानें व्यापक करते, त्याप्रमाणेंच आमचा अंतस्थ, अप्रकट आत्मा हा विश्वात्म्याशीं जोडलेला असल्यानें त्या विश्वात्म्याच्या दिव्य सार्वत्रिक आनंदाचा भागीदार होऊं शकतो; विश्वात्म्याला आपल्या विश्वव्यापी अस्तित्वाचा आनंद असतो. अनंत जीवात्मे, अनंत प्रकारें विविध क्षेत्रांत जीवन जगत असतात; त्या जीवात्म्यांचा आनंद हाहि विश्वात्म्याचा आनंद असतो -- कारण हें अनंत जीवात्मे त्याचेच 'भाग,' त्याचेच प्रतिनिधी असतात; तसेंच शरीर-प्राण-मन यांचे जे व्यवहार चाललेले असतात, ते या जीवात्म्यांच्या करमणुकीसाठीं व विकासासाठीं चाललेले असल्यानें, त्या व्यवहारांतहि विश्वात्म्याला आनंद लाभतो. हा विश्वात्म्याचा विश्वानंद, उपरिस्थ बाह्य वासनात्मक आत्म्याला लाभत नाहीं -- कारण त्याच्यामध्यें आणि विश्वात्म्यामध्यें अहंभावाच्या जाड भिंती असतात. या भिंतींतून विश्वात्म्याचा विश्वानंद कांहीं द्वारांनीं प्रवेश करूं शकतो व करतोहि; परंतु दिव्य विश्वानंदाचे स्पर्श या द्वारांतून आमच्या बाह्य आत्म्याला झाले, तरी त्यांचें स्वरूप, हें 'मूळचे स्वरूप' राहत नाहीं -- ते एकतर महानाचे लहान होतात, केव्हां केव्हां विकृत होतात, केव्हां उलट रूपांचे मुखवटे देखील घालून येतात किंवा दुःखरूप होऊनदि येतात.

 

पान क्र. ४१३

 

वासनात्मक आत्मा जे व्यवहार करतो, त्यांत खऱ्या आत्म्याचें स्वरूप व्यक्त होत नाहीं; वासनात्मा हें अंतःकरणाचें विकृत रूप आहे, विश्वाचा स्पर्श या आत्म्याला झाला तर तो मूळ स्वरूपांत न होतां, विकृत किंवा उलट रूपांत होतो. विश्वांत व्यथा म्हणा, व्याधि म्हणा ही आहे कीं, व्यक्तीला आपला खरा आत्मा सांपडत नाहीं; आणि या व्याधीचे मूळ कारण असें आहे कीं, व्यक्ति जेव्हां बाह्य वस्तूंना आलिंगन देते, त्या वस्तू प्रेमानें जवळ करते, तेव्हां त्यांत विश्वाचा खरा आत्मा तिला लाभत नाहीं. अस्तित्वाचें, शक्तीचें, जाणिवेचें, आनंदाचें (सच्चिदानंदाचें) सारभूत सत्त्व बाह्य वस्तूमध्यें शोधून काढण्याचा प्रयत्न जीवात्मा करतो; परंतु तेथें त्यांपैकीं कांहींहि त्याच्या हातास न लागतां, त्या तत्त्वांच्या विरूद्ध गोष्टी, विरुद्ध स्पर्श आणि संस्कार, यांची गर्दी त्याजवर होते. त्याला हवें तें सारभूत सत्त्व जर बाह्य वस्तूंत त्याला लाभेल, तर एकच एक विश्वव्यापी सत्ता, सामर्थ्य, जाणीवयुक्त अस्तित्व आणि आनंदहि त्याला तेथें लाभेल; तें सारभूत सत्व, विश्वाला व्यापून असणारें ज्ञानमय सामर्थ्य आणि मूळ सद्‌वस्तु किंवा सत्य या नावांनीं एकच सत्य दाखविलें जातें; या सत्याची एकता आणि सुसंगति, सुसंवाद हाताशीं आल्यावर, बाह्य वस्तूंच्या द्वारां जी विकृत, विरोधी स्पर्शांची व संस्कारांची गर्दी जीवात्म्याच्या भोंवतीं होते, त्या गर्दीचा विरोध, विकृतपणा मूळ सत्याच्या सुसंवादाच्या व अद्वैताच्या अनुभवांत समूळ विलीन होतो. उपरिनिर्दिष्ट सारभूत सत्वाच्या लाभांत, व्यक्तीला आपल्या खऱ्या आत्म्याचाहि (true soul) लाभ होतो, आणि त्याच्या द्वारां परमात्म्याचा (Soul) लाभ होतो -- कारण व्यक्तीचा खरा आत्मा, त्याच्या परमात्म्याचा प्रतिनिधि असतो आणि व्यक्तीचा परमात्मा आणि विश्वाचा आत्मा हे एक आहेत. विचारमय मनांत, भावनामय हृदयांत व बाह्य स्पर्शांना प्रतिक्रियारूप उत्तर देणाऱ्या इंद्रियांत अहंजनित अज्ञान असतें, म्हणून विश्वात्म्याचें किंवा स्वतःच्या महान् आत्म्याचें दर्शन व्यक्तीला घडत नाहीं. या क्षुद्र अज्ञानमय अहंभावामुळें, व्यक्ति मोकळ्या विशाल हृदयानें, निर्भयपणें विश्वाला आलिंगन देत नाहीं -- तर विश्वाचा स्पर्श हा सुख किंवा दुःख देणारा असेल, समाधान देणारा किंवा भय उत्पन्न करणारा असेल, तृप्ति देणारा किंवा घृणा उत्पन्न करणारा असेल, त्याप्रमाणें व्यक्ति अज्ञानपूर्ण वासनामय अहंभावाच्या आहारीं जाऊन, विश्वाच्या अशा संपर्कांना प्रतिक्रिया

 

पान क्र. ४१४

 

म्हणून कधीं हांव सुटल्याप्रमाणें संपर्क करणाऱ्या वस्तूंकडे धांवते, कधीं उलट त्यांजपासून पळून आंखडता पाय घेते; कधीं फार सावधगिरीनें त्यांजकडे पाऊल टाकते, कधीं त्यांजकडे वेगानें उसळी घेते; कधीं कपाळाला आंठ्या घालून, नाराज होऊन, धाक घेऊन, रागावून त्या वस्तूंपासून मागें सरते. वासनामय आत्मा विश्व-जीवनाच्या संपर्कांना नीट ओळखत नाहीं -- त्यांच्याबद्दल भलता समज करून घेतो व त्यांना योग्य रीतीनें जवळ करीत नाहीं, म्हणून वस्तुजातांत जो शाश्वत दिव्य आनंद, दिव्य रस भरलेला आहे, त्याचें त्याला तीन प्रकारें विकृत दर्शन घडतें; तीन प्रकारचा विकृत अनुभव त्याला येतो. कांहीं संपर्क क्षणिक सुख देणारे, कांहीं क्षणिक दुःख देणारे व कांहीं तर कांहींच परिणाम न करणारे असे त्याच्या अनुभवास येतात.

अस्तित्वाचा आनंद आणि विश्व या दोहोंमध्यें जे अनेक प्रकारचे संबंध येतात, त्यांचा विचार करतां असें दिसून येतें कीं, सुख, दुःख व औदासीन्य या वृत्तींची आमची अनुभूति ही, अनुभवणाऱ्या जाणिवेच्या आंतरिक स्थितीवर अवलंबून असल्यानें, या वृत्तींना मोजावयास कायमचें वा नेहमीं कार्यक्षम असणारें माप नाहीं. सुख असो वा दुःख असो तें खूप वाढवितां येतें, खूप कमी करतां येतें किंवा पूर्णतया नाहींसेंहि करतां येतें; सुखाचें दुःख, दु:खाचे सुख असेंहि परिवर्तन होऊं शकतें; याचें कारण असें आहे कीं, या वृत्तींचें मूळ गुप्त-सत्य-स्वरूप एक कायमची वस्तु असून ही वस्तु संवेदना आणि भावना यांच्या क्षेत्रांत व्यक्त होतांना अथवा व्यक्त केली जातांना तिचीं रूपें भिन्न होतात, इतकेंच. उदासीन वृत्ति उत्पन्न होण्याचीं अनेक कारणें असूं शकतात. मनाच्या, संवेदनांच्या भावनांच्या व तीव्र आकांक्षांच्या गर्दीत वासनात्मा सांपडल्यामुळें, त्याचें वस्तुजातांतील रसाकडे (शाश्वत आनंदाकडे) लक्ष जात नाहीं, किंवा हा रस घेण्याची व त्याला अनुरूप प्रतिक्रिया करण्याची पात्रता वासनात्म्याच्या ठिकाणीं नसते; कांहीं बाह्य प्रतिक्रिया करावयाची नाहीं, असा वासनात्म्याचा निर्धार असेल किंवा आपली इच्छाशक्ति वापरून सुखदु:ख भावना दाबून टाकून, वस्तुजातांतील रसासंबंधानें केवळ अस्वीकारवृत्ति धरावयाची असा वासनात्म्याचा हेतु व उद्योग असेल -- यांपैकीं एक किंवा अनेक कारणें उदासीन वृत्तीच्या पोटीं असूं शकतात. बाह्यतः वासनात्म्याच्या निर्धारानें म्हणा, अपात्रतेनें म्हणा, कांहीं विशिष्ट प्रतिक्रिया दिसली नाहीं, तरी आंत अप्रकट आत्मा वस्तुजातांतील रस

 

पान क्र. ४१५

 

घेत असतो ही गोष्ट आपण लक्षांत ठेवली पाहिजे.

मानसिक प्रयोग व निरीक्षण यांच्या आधारें आपण असें म्हणूं शकतों कीं, अप्रकट मन हें, वस्तुजातांकडून होणारे सर्व आघात घेतें आणि ध्यानांत ठेवतें -- मग प्रकट मन त्यांजकडे खुशाल दुर्लक्ष करो, त्याचा हिशेब अप्रकट मन करीत नाहीं. ही जशी अप्रकट मनाची गोष्ट, तशीच अप्रकट आत्म्याची गोष्ट आहे. अनुभवांतील रस घेण्यास हा आंतरात्मा, खरा आत्मा कधींहि विसरत नाहीं -- बाह्य आत्मा कसाहि वागो, नावडता म्हणून रसाला तो दूर ठेवो किंवा त्याकडे दुर्लक्ष करून उदासीनता दाखवो. जोपर्यंत आम्ही आमचें बाह्य जीवन ओलांडून त्याच्या पलीकडे जात नाहीं, तोंपावेतों आम्हाला आमच्या आत्म्याचें ज्ञान होणें अशक्य आहे; बाह्यजीवन हें, कांहीं निवडक बाह्य अनुभवांचें बनलेलें असतें. आपले सर्व अनुभव कांहीं बाह्य जीवनांत अंतर्भूत होत नाहींत. बाह्य जीवन हें, अपुरा आवाज काढणाऱ्या वाद्याप्रमाणें आहे; बाह्य जीवन हें ग्रंथांतील तुकड्या तुकड्याचें, अनधिकारी माणसानें घाई घाईनें केलेल्या भाषांतरासारखे आहे -- केवळ बाह्य जीवनानें हा जीवनग्रंथ फारच अल्प प्रमाणांत व्यक्त केला जातो व तोहि व्हावा तसा व्यक्त होत नाहीं -- आमचें जीवन फार विशाल आहे -- आम्हीं या बाह्य जीवनाच्या पलीकडे आंत गेलें पाहिजे, अप्रकट जीवनाच्या खालच्या, अर्धनेणिवेच्या प्रांतांत व वरच्या अतिमानसिक प्रांतांत फेरफटका केला पाहिजे. त्यांचें आपल्या बाह्य जीवनाशीं काय नातें आहे तें पाहिलें पाहिजे -- असें आपण करूं, तरच आम्हांला खरें आत्मज्ञान होऊं शकेल. आमचें अस्तित्व हें अधोमानसिक, मानसिक, अतिमानसिक या तीन क्षेत्रांत आपला व्यवहार करतें. आमचें पूर्ण अस्तित्व म्हणजे या तीनहि क्षेत्रांतलें अस्तित्व होय. वास्तवांत कांहींहि भेद वा विविधता असो, अतिमानसिक पुरुष हा विश्वाच्या आत्म्याशीं एकरूप आहे. त्या भेदाची सत्ता अतिमानसिक पुरुषावर चालत नाहीं; वस्तुजातांतील सत्य, अतिमानसिक पुरुषाला पूर्णपणें कळतें; तें त्याच्या स्वाधीन असतें व वस्तुजातांतील शाश्वत आनंदहि तो पूर्णतया भोगतो. विशाल मानसिक जाणीव, हें अप्रकट मनाचें स्वरूप आहे. अतिमानसिक जाणिवेप्रमाणें अप्रकट विशाल मनाची जाणीव नाहीं -- परंतु विश्वविषयक अनुभवानें ती त्या विश्वात्म्याशीं जोडलेली असते. अप्रकट, आंतर-आत्मा वस्तुजातांतील रस जाणिवेनें अनुभवीत असतो; सर्व बाह्य-स्पर्श त्याला

 

पान क्र. ४१६

 

सारखेच आनंद देणारे असतात; बाह्य आत्मा, वासनात्मा जीं मूल्यें बाह्यस्पर्शाच्या बाबतींत ठरवितो -- जें सुख, दुःख वा औदासिन्य अनुभवतो तें सर्व आंतर-आत्माहि अनुभवतो; पण फरक असा कीं, हें सुख-दुःख-औदासीन्य आंतर-आत्मा त्याच्या शाश्वत आनंदाचे प्रकार म्हणून अनुभवतो -- सुखांत, दुःखांत व उदासीनतेंत आनंदाचा सारखाच ठेवा त्याला लाभतो. अर्थात् आपल्या खऱ्या आत्म्याला (आंतर आत्म्याला) सर्व अनुभव आनंदच देतात. या अनुभवांतून तो बळ मिळवितो, करमणूक मिळवितो, ज्ञान मिळवितो; या अनुभवांनीं तो आपली वाढ करून घेतो; आपल्या आनंदाचा व समृद्धीचा सांठा, या अनुभवांनीं तो मोठा करीत असतो. या खऱ्या आत्म्याच्या प्रभावामुळें वासनात्मक मनाला (आत्म्याला) आपल्या मर्जीविरुद्ध दुःख भोगावे लागतें; दुःखांत सुख पहावें लागतें, दुःख ओढवून घ्यावे लागतें; सुख दूर लोटावें लागतें, आपलीं स्वाभाविक मूल्यें कमी-अधिक बदलावीं लागतात; उलट सुलट देखील करावीं लागतात; उदासीनता पत्करून सर्व मूल्यें सारखीं मानावीं लागतात, किंवा सर्व मूल्यें एका आनंदाचीं विविध रूपें आहेत, जीवनाची विविधता सुख-दुःखादि अनुभवांच्या द्वारां प्रत्ययास येते, असें स्वतःला समजावून सांगून, विविधतेचा समान आनंद भोगावयास शिकावें लागतें. आमचा खरा अप्रकट आत्मा हें सर्व यासाठीं करतो कीं, विश्वात्मा त्याला सर्व प्रकारच्या अनुभवांच्या द्वारां आपली वाढ करून घेण्याची प्रेरणा देतो; आपण जर केवळ वासनात्म्याचें ऐकून जीवन जगूं लागलों, तर आपल्यांत कांहीं बदल होणें, कांहीं प्रगति होणें अशक्य आहे. वनस्पति किंवा दगडधोंडा यांच्याप्रमाणें आपण स्थितिशील राहूं किंवा जीवनाच्या ठरीव चाकोरींत फिरत राहूं; दगड धोंड्‌यांत व वनस्पतींत, आमच्याप्रमाणें, जीवन हें वरच्या बाह्य पातळींत जाणीवयुक्त नाहीं, म्हणून गुप्त वस्तुगत आत्मा (विश्वात्मा) त्यांचें जीवन त्यांच्या ठाम ठरलेल्या जन्मजात अरुंद चाकोरींतून बाहेर काढून प्रगत करूं शकत नाहीं -- आम्हांत जो वासनात्मा आहे, जाणीवयुक्त आत्मा आहे, त्याचा, गुप्त वस्तुगत आत्म्याला (विश्वात्म्याला) साधनासारखा उपयोग होतो; आणि या साधनाच्या द्वारां तो आमच्या खऱ्या आंतरात्म्याची वाढ घडवून आणतो -- वासनात्मा जें काय करील तें प्रमाण, असें ठरवून तेवढ्यांत संतुष्ट रहावयाचें म्हटलें, तर तो आपल्या ठरलेल्या चाकोरींत नित्य फिरत राहील व आमची वाढ बिलकुल होणार नाहीं.

 

पान क्र. ४१७

 

प्राचीन तत्त्वज्ञान्यांच्या मतें सुख आणि दुःख ह्या वेगळ्या वृत्ती नाहींत. जेथें सुख, तेथें दुःख ठेवलेलेंच आहे. ज्याप्रमाणें सत्य आणि असत्य, सामर्थ्य आणि असामर्थ्य, जन्म आणि मरण या जोड्‌या अविभाज्य आहेत, त्याप्रमाणें सुखदुःखाची जोडी अविभाज्य आहे. म्हणून या तत्त्वज्ञान्यांचें म्हणणें असें कीं, या सुख-दुःखापासून मुक्त व्हावयाचें, तर पूर्ण उदासीनतेचा, विश्वात्म्याच्या क्षोभक संपर्कांना कांहींच उत्तर न देण्याचा, पूर्ण वैराग्याचा अभ्यास हा एकच उपाय आहे. परंतु मानसिक ज्ञान सूक्ष्म प्रांतांत शिरलें असल्यानें, आम्हांला हें ठाऊक झालें आहे कीं, जीवनाच्या बाह्य गोष्टींवर वरील मत आधारलेलें असल्यानें, त्यांत या विश्वसंपर्कांना उत्तर देण्याच्या प्रश्नाचा सर्वांगीण विचार सामावलेला नाहीं. आमचा खरा आंतरआत्मा बाह्य स्थानीं येऊन कार्य करूं शकतो आणि असें आमच्या आंतर, खऱ्या आत्म्याचें बाह्य जीवनाशीं नातें जोडलें म्हणजे जेथें अहंभावामुळें सुख आणि दुःख अशी द्वन्द्वात्मक प्रतिक्रिया उत्पन्न होते, तेथें एकच, सारखी सर्वस्पर्शी, व्यष्टि-समष्टि व्यापक, वैयक्तिक-अवैयक्तिक आनंदात्मक प्रतिक्रिया उत्पन्न होऊं शकते. निसर्गप्रेमी हा निसर्गांतील सर्व वस्तूंत व घटनांत सर्वदा सर्वत्र आनंदाचा भोग घेतो, त्याला कोठें घृणा वाटत नाहीं, भीति वाटत नाहीं, आवड-नावड त्रास देत नाहीं; सामान्यांना जें क्षुद्र, हलके, अर्थशून्य, भकास, जंगली भयंकर, किळसवाणें असें वाटेल, तें निसर्गप्रेमी माणसाला सुंदर दिसतें; याचें कारण, निसर्गप्रेमी आपला अहंभावनिष्ठ बाह्य वासनात्मक आत्मा बाजूला ठेवून, त्याच्या जागीं आपला विश्वात्मनिष्ठ आंतर, अप्रकट खरा आत्मा पुढें करतो हें होय. कलावंत, कवि हेहि निसर्गभक्तासारखेच आपला आंतरात्मा पुढें करून, वासनात्मा बाजूला ठेवतात -- म्हणून सौंदर्यभावना, सौंदर्याची मानसिक मूर्ति, सौंदर्याची शारीर रूपरेखा, वस्तूची व जीवाची आंतरिक अर्थपूर्णता, आंतरिक समर्थता या गोष्टी त्यांना विश्वाच्या व्यवहारांत अनुभवास येतात आणि त्यांच्यामुळें विश्वांतील रसाचे, नित्य आनंदाचे ते कायमचे वांटेकरी होतात -- कलावंत व कवि यांना नित्य आनंद देणाऱ्या गोष्टींपैकीं कांहींकडे, त्या सुख देणाऱ्या म्हणून सामान्य माणसें आकर्षिलीं जातात, तर कांहींपासून त्या असुख देणाऱ्या म्हणून तीं पळ काढतात. ज्ञानाचा भोक्ता जिज्ञासु, ज्याला सर्वत्र आपला प्रेमविषय दिसतो तसा देशाचा प्रेमी भक्त, आध्यात्मिक जीवनाचा माणूस, बुद्धिप्रधान माणूस, संवेदनावादी व सौंदर्यवादी -- हे सर्व आपापल्या परीनें

 

पान क्र. ४१८

 

आपल्या बाह्य आत्म्याच्या जागीं आंतरआत्म्याकडून काम घेतात आणि त्यांना त्यांचें इष्ट ज्ञान वा सौंदर्य किंवा सुख अथवा ईश्वर समग्रतेनें पाहिजे असल्यास असें करावेंच लागतें. आंतरआत्म्याच्या अवैयक्तिकतेचें, अनहंकाराचें दिव्य-तत्त्व कांहीं व्यवहारांत वापरणें अतिशय कठिण असतें. पुष्कळांना कांहीं कांहीं व्यवहारांत ही गोष्ट अशक्य वाटते, पुष्कळांना ती भयंकर वाटते, घृणित वाटते -- हे व्यवहार म्हणजे, ज्या ठिकाणीं आमचा क्षुद्र 'मी' आम्हांला आंवरण्यासारखा नसतो, जेथें भावनेच्या किंवा शरीराच्या सुखाचा किंवा दुःखाचा प्रश्न असतो, सामान्य जीवनाच्या सुखाचा व दुःखाचा प्रश्न असतो, जेथें वासनात्मा अतिशय दुबळा आणि भित्रा असल्यानें सामान्य शारीर किंवा भावनिक सुख टाकणें व दुःख पत्करणें त्याच्या जिवावर येतें, असें व्यवहार होत. विज्ञान, कला, सामान्य अपूर्ण आध्यात्मिक जीवन यासंबंधींच्या व्यवहारांत अवैयक्तिकतेचें, तटस्थतेचें, तिऱ्हाईतपणाचें, अनहंकाराचें तत्त्व स्वीकारतांना 'मी'ला, वासनात्म्याला फार कठीण जात नाहीं -- कारण त्याला ज्या गोष्टी अगदीं निकडीच्या वाटतात, बाह्य-जीवन ज्या गोष्टींवाचून अडून बसतें किंवा अगदीं फिक्कें वाटतें त्या गोष्टींना, या विज्ञानादि प्रांतांतील अवैयक्तिकतेच्या तत्त्वाचा उपसर्ग पोहोंचत नाहीं. विज्ञान, कला, विशिष्ट आध्यात्मिक जीवन हे व्यवहार उच्च पातळीवरचे, स्वतंत्र वातावरणांतले व्यवहार होत -- या व्यवहारांत विशिष्ट जाणिवेच्या व क्रियाशीलतेच्या प्रांताचा संबंध असतो आणि अशा प्रांतांत त्याला अनुरुप व आवश्यक अशी मर्यादित समवृत्ति व तिऱ्हाईतपणाची तत्त्ववृत्ति लागत असते -- या व्यवहारांत आमच्या सामान्य जीवनाचा जो अहंभावनिष्ठ स्वार्थी पाया असतो त्याला धक्का लागत नाहीं. हे उच्च व्यवहार सोडून, जे सामान्य, खालच्या पातळीवरचे व्यवहार असतात, त्यांत तिऱ्हाईतपणाची, निःस्वार्थी तत्त्वदृष्टि वापरावयाची, तर आमच्या जीवनाचा सर्व पायाच बदलावा लागेल -- आणि ही गोष्ट वासनात्मा करूं शकत नाहीं; हें करणें त्याला अशक्य वाटतें.

अज्ञानमय मन-प्राण-शरीरापलीकडे, यांच्या जाड पडद्यानें झांकलेला असा आमच्यांतला गुप्त, खरा आत्मा हृदयाच्या खोल मंदिरांत तेजानें तळपत असतो. ही ईश्वरापासून निघणारी एक ज्वाला असते, ज्योति असते; हा आत्मा नेहमीं आमच्या हृदयाच्या हृदयांत प्रकाश देत असतो, आमचा बाहेरचा प्राकृतिक भाग, आत्मविषयक गाढ नेणिवेनें व्यापलेला

 

पान क्र. ४१९

 

असला, तरी या नित्यप्रकाशमय दिव्य ज्योतिरूप खऱ्या आत्म्याला त्या नेणिवेची बाधा होत नाहीं -- ही आत्मज्योति या नेणिवेनें विझत नाहीं -- ही ज्योति, अज्ञानाच्या क्षेत्रांत तेजोमय रहिवासी असते आणि अज्ञानाला ज्ञानाचें औत्सुक्य उत्पन्न होईपर्यंत सारखी वाढत राहते -- ही आत्मज्योति आमच्या सर्व अंतर्बाह्य कृतींची साक्षी, नियंत्रक, गुप्त मार्गदर्शक, सॉक्रेटिसानें डीमन् नांव दिलेला अंतःपुरुष, साक्षात्कारी पुरुषांना ज्ञात असलेला अंतःप्रकाश व अंतःशब्द होय. आमच्यामध्यें नित्य राहणारें असें हें तत्त्व आहे -- मरणाचा स्पर्श या आंतरात्म्याला होत नाहीं, तो जन्मोजन्मीं आमच्यामध्यें नित्य वसत असतां, मलाचा किंवा क्षयाचाहि त्याला डाग लागत नाहीं -- हा अनश्वर असा दिव्य ज्योतिर्मय ईश्वरअंश आहे. हा विश्वरूप विश्वातीत आत्मा नसला, तरी त्याचा तो प्रतिनिधि आहे; निसर्गांतील रूपांत कार्य करणारा असा त्याचा प्रतिनिधि, वैयक्तिक आत्मा, चैत्य पुरुष असें त्याचें स्थान आहे : मन-प्राण-शरीर यांना त्याचा आधार असतो; मनोमय, प्राणमय व सूक्ष्म भौतिक पुरुषांच्या पाठीमागें असणारा हा चैत्य पुरुष, त्यांच्यावर नजर ठेवीत असतो आणि त्यांच्या अनुभवानें आणि विकासानें आपलें हित करून घेत असतो. मनोमयादि तीन पुरुष या चैत्य पुरुषाचीं अंगेंच असतात. हीं अंगें देखील पडद्याआड असतात. हे अप्रकट मनोमयादि पुरुष, 'तात्पुरते पुरुष' (Temporary Personalities) असतात -- आमचें बाह्य व्यक्तित्व या तात्पुरत्या पुरुषांचें बनलेलें असतें -- या पुरुषांचें बाह्य संयुक्त कार्य आणि अस्तित्व याला आम्ही सामान्यत: आमचा ''आत्मा'' म्हणतों. चैत्यपुरुषदेखील असेच 'तात्पुरते पुरुष' पुढें करीत असतो; या पुरुषांत जन्माजन्मांत बदल होतो, त्याची वाढ होते, त्याचा विकास होतो -- हा प्रवासी चैत्य पुरुष, जन्म आणि मरण, मरण आणि जन्म असे मार्गावरचे टप्पे गांठतो व मागें टाकतो आणि आपला प्रवास सारखा करीत राहतो. निसर्ग त्याला जें मन आदि साधन पुरवितो, तें त्याच्या विविध प्रकारच्या व बदलणाऱ्या वस्त्राप्रमाणे असतें -- या चैत्य पुरुषाचें कार्य प्रथम प्रथम अप्रत्यक्ष असतें, पडद्याआडून चालतें, एकांगीं असतें; मनाच्या, प्राणाच्या व शरीराच्या द्वारां हें त्याचें कार्य होत असतें; मन आदि निसर्गाचे भाग आपल्या स्वरूपाच्या आविष्काराचीं साधनें म्हणून चैत्य पुरुषाला विकसित करावयाचीं असतात; -- या साधनांचा विकास नीट होईपर्यंत चैत्य पुरुष हा बंदींत पडल्यासारखा असतो; अज्ञानाच्या क्षेत्रांत राहून,

 

पान क्र. ४२०

 

मनुष्याला त्या अज्ञानांतून दिव्य जाणिवेच्या प्रकाशाकडे नेण्याचें काम त्याजकडे असतें; अज्ञानक्षेत्रांत जो जो अनुभव त्याला येतो, त्या त्या अनुभवाचें, एकंदर सर्व अनुभवांचें सत्व घेऊन, त्या सत्वानें तो निसर्गाचे ठिकाणीं आपल्या आत्मकेन्द्राचें पोषण करतो; अनुभवांचा बाकीचा भाग, मन-प्राण-शरीर या आपल्या साधनाची वाढ करण्यासाठीं तो वापरतो; ईश्वरी तत्त्वाचें व कार्याचें प्रकाशमय साधन हें स्वरूप, या खटपटीनें चैत्य पुरुष मन, प्राण, शरीर या त्रयीला आणून देतो. हा चैत्य पुरुष, गुप्त आंतरात्मा, हा आमच्यांतील मूळ सद्सद्विवेकाचें खरें तत्त्व आहे -- शिष्ट संप्रदायांचें बनलेलें, सामाजिक रूढ नीतिकल्पनांचें बनविलेलें, बरें वाईट सांगणारें असें एक आंतरिक तत्त्व 'सद्सद्विवेक तत्त्व' म्हणून नीतिशास्त्री जें पुढें करतात, तें मूळ तत्त्व नव्हे -- मूळ सद्सद्विवेक तत्त्व म्हणजे चैत्य पुरुषच होय. सर्वदा सत्य, शिव, सुंदर यांच्या दिशेनेंच चैत्य पुरुषाचा सद्सद्विवेक आम्हांला नेत असतो; प्रेम आणि मेळ यांजकडेच तो आम्हांला नेत असतो; आमच्यांत जी कांहीं दिव्यता येणें शक्य आहे, ती कशी, कोणत्या मार्गानें येईल याचीच तो नेहमीं चिंता वाहतो व त्या शक्य दिव्यतेच्या मार्गानें आम्हांला घेऊन जातो -- आमच्या स्वभावांत या सर्व दिव्य गोष्टी सजल्या, आमच्या स्वभावाचे ठिकाणीं आमची निकडीची गरज हें स्वरूप या दिव्य गोष्टींना प्राप्त झालें, म्हणजेच चैत्य पुरुषाची कामगिरी पूर्ण होते; ही कामगिरी पूर्णतेला पोहोंचेपर्यंत, त्याची आमच्या ठिकाणीं दिव्यता आणण्याची खटपट सारखी चालूं राहते. चैत्य पुरुष गुप्त राहून, आपला 'प्रतिनिधि पुरुष' बाह्य व्यवहारासाठीं पुढें करीत असतो, असें वर सांगितले -- हा आमच्या खऱ्या आत्म्याचा बाह्य प्रतिनिधि बलवान् असूं शकतो वा दुर्बल असूं शकतो. बलवान् असेल, तर आत्मज्ञान, ईश्वरज्ञान इकडे आमची वृत्ति नेतो; परम सत्य, परम मंगल, परम सुंदर, परम प्रेम, परम सुख या दिव्य, उच्च आणि विशाल स्थानांकडे तो आम्हांला वळवितो; अध्यात्मसुलभ सहानुभूति, विश्वात्मा, एकता यांचा सुखमय स्पर्श तो आम्हांला प्राप्त करून देतो -- आणि आमच्यांत संत, ऋषि किंवा द्रष्टे निर्माण होतात -- गुप्त चैत्य पुरुषाचे 'बाह्य प्रतिनिधि' बलवान झाले असल्यास तेच संत, ऋषि किंवा द्रष्टे होतात. कारण आमच्या बाह्य व्यवहारांतील प्राथमिक विकासावस्थेंतील मिरासदार जो वासनात्मा, त्याला हतबल करण्यास त्यांचें अध्यात्मबल

 

पान क्र. ४२१

 

समर्थ असतें. चैत्य पुरुषाचा बाह्य प्रतिनिधि बलवान झालेला नसेल, अर्धविकसित असेल, प्राथमिक अवस्थेंत असेल, तर वरच्या दर्जाच्या (कमी अधिक दिव्यतेच्या) अवस्था आणि क्रिया आमच्यांत नसतील किंवा सामर्थ्यानें कमी असतील. मन जोरदार आणि तेजस्वी असेल; हृदयांतील भावना, जीवनस्पर्शी भावना कठीण, जोमदार प्रभावी असतील; प्राणशक्ति प्रभुत्व गाजवणारी आणि यशस्वी असेल -- शारीर जीवन श्रीमंत, भाग्यवान्, दर्शनी विजयी आणि प्रभुत्वशील असेल -- हें सर्व प्रकारचें बळ पुरेपूर असून आत्मबळ (चैत्य-प्रतिनिधीचें बळ) कमी पडेल, तर वरच्या दर्जाच्या (कमीअधिक दिव्यतेच्या) अवस्था व क्रिया आमच्यांत असणार नाहींत किंवा सामर्थ्यहीन असतील. अशी स्थिति ही वासनात्म्याच्या अधिराज्याची द्योतक आहे. या स्थितींत वासनात्म्यानें विपर्यस्त केलेल्या आंतरात्म्याच्या सूचना व आकांक्षा, वासनात्म्याच्या स्वतःच्या कल्पना आणि ध्येयें, त्याच्या इच्छा आणि तळमळी यांना आपण खरी आत्मसंपत्ति, खरें आध्यात्मिक अनुभव-धन असें चुकीनें मानीत असतो. गुप्त आत्मा, गुप्त अंत:पुरुष आपला प्रतिनिधि पुढें करतो व त्याच्या द्वारां वासनात्मा करीत असलेल्या अहंनिष्ठ व्यवहारांत बदल करण्याचा प्रयत्न करतो हें आपण वर पाहिलें. हा अंतःपुरुष, आमचा खरा आत्मा, पूर्णतया पुढें होईल आणि वासनात्म्याला बाजूला ठेवून व्यवहार करील, पडद्याआड राहून थोडा हा, थोडा तो, असा तुटक व्यवहार करण्याऐवजीं, पडदा दूर करून उघडपणें आणि समग्रतेनें व्यवहाराचें शासन करील, बाह्य मन-प्राण-शरीर या निसर्गविभागाचें उघडपणें व समग्रतेनें शासन करील, तर जें सत्य आहे, मंगल आहे, सुंदर आहे, त्याच्या प्रतिमूर्तींचें रूप, त्याच्या आत्मिक प्रतिमांचें रूप, मन-प्राण-शरीर यांना येऊं शकेल आणि आध्यात्मिक जीवनाच्या पायरीवर चढून जाणें हा जो आमच्या जीवनाचा खरा हेतु व सर्वोत्तम विजय आहे, त्या हेतूसाठीं, त्या विजयासाठीं आमचा सर्वच्या सर्व स्वभाव शेवटीं क्रियाशील होईल -- अर्थात् आमचा वासनात्मा खऱ्या आत्म्यांत सर्वथा विलीन होईल.

वरील वर्णनावरून असें भासण्याचा संभव आहे कीं, आमचा खरा आत्मा, चैत्य पुरुष, बाह्य व्यवहारासाठीं आघाडीवर आणला, जीवनाचें नेतृत्व आणि नियंत्रण त्याजकडे सोपविलें म्हणजे आमच्या प्राकृतिक अस्तित्वाची पूर्णता, आम्हांला हवी तेवढी होऊं शकेल; आणि त्याबरोबर आत्म्याच्या राज्याचे दरवाजेहि आम्ही खुले करूं शकूं. असाहि आणखी

 

पान क्र. ४२२

 

युक्तिवाद करतां येईल कीं, आम्हांला दिव्य अवस्था, दिव्य पूर्णता प्राप्त होण्यासाठीं कदाचित् उच्च सत्य-जाणिवेचें किंवा अतिमानसिक तत्त्वाचें मध्यस्थपण जरूरहि पडणार नाहीं -- चैत्य पुरुष हें सर्व दिव्य-पूर्णत्व आम्हांला मिळवून देण्याचें काम करूं शकेल. पण हा युक्तिवाद चुकीचा आहे. आमच्या अस्तित्वाचें एकंदर समूळ रूपांतर होण्यासाठीं, मानसिक (Psychic) रूपांतर हें एक आवश्यक पूर्वकार्य असलें, तरी त्यानेंच सर्व कांहीं भागेल व श्रेष्ठांत श्रेष्ठ, मोठ्यांत मोठा आध्यात्मिक बदल आमच्यांत होण्यास, चैत्य पुरुषाच्या मानसिक परिवर्तनाच्या कार्याखेरीज अन्य कशाचीहि आवश्यकता राहणार नाहीं, ही गोष्ट खरी नाहीं. एक गोष्ट ही कीं, चैत्य पुरुष हा वैयक्तिक आत्मा आहे. अर्थात् आमच्या वैयक्तिक अस्तित्वाचीं जीं गुप्त दिव्य क्षेत्रें आहेत, त्यांचे दरवाजे उघडून तेथील प्रकाश, सामर्थ्य, अनुभूती तो मिळवूं शकेल व आपल्या कार्यांत प्रतिबिंबित करूं शकेल; पण विश्वात्मता आणि विश्वातीतता या ज्या आमच्या आत्म्याच्या अवैयक्तिक बाजू आहेत, त्या आम्हांला आत्मसात् होण्यासाठीं चैत्य पुरुषाच्या कार्याइतकीच, उच्च पातळीवरून महान् आत्म्यानें आमच्यांत आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे : चैत्य पुरुषावर सर्व भिस्त ठेवली, तर आत्म्याची विश्वात्मता किंवा विश्वरूपता आणि विश्वातीतता किंवा कैवल्य या धर्मांचा सर्वागीण सक्रिय अनुभव आम्हांला कधींच न होण्याचा संभव आहे. चैत्य पुरुष प्रगति करीत, सत्य-शिव-सुंदर या गुणांचे एक आत्मरूप तयार करून, तेथें थांबून त्यांच्या पूजेंत मग्न राहील; किंवा अधिक दोन पावलें टाकून, विश्वात्म्याचा निष्क्रिय दास होईल -- अर्थात् विश्वरूप अस्तित्व, जाणीव, सामर्थ्य, आनंद त्याच्यांत आरशाप्रमाणें प्रतिबिंबित होतील. परंतु या गोष्टींचा मालक, पूर्ण वांटेकरी तो होणार नाहीं; ज्ञान, भावना, ऐंद्रिय अनुभूती या बाबतींत विश्वात्म्याच्या जाणिवेशीं चैत्य पुरुषाचा निकट आणि सुखद संयोग घडला, तरी तो केवळ दान घेणारा निष्क्रिय पुरुष राहील; विश्वांत प्रभुत्व गाजविणें, विश्वांत कृती करून कृतार्थ होणें, ही गोष्ट त्याच्या आवांक्यांत येणार नाहीं; किंवा असेंहि होऊं शकेल कीं, विश्वाच्या मागें जो स्थितिशील आत्मा आहे, त्याच्याशीं चैत्य पुरुष एकता पावेल, विश्वव्यापारापासून आंतून अलग, अलिप्त राहील आपली व्यक्तिता आपल्या उगमस्थानीं (विश्वात्म्यांत) विलीन करील आणि त्या जन्मस्थानाला परत येऊन, तेथें स्थायिक होईल आणि मग त्याला त्याच्या जीवनाचें जें

 

पान क्र. ४२३

 

नियत कार्य -- ईश्वरापासून दूर गेलेला निसर्ग परत ईश्वरत्वाच्या साक्षात्कारानें भरून दिव्यत्वानें युक्त करणें हें जें नियत कार्य -- तें करण्याची इच्छा राहणार नाहीं व तें कार्य करण्याचें सामर्थ्यहि त्याला असणार नाहीं. चैत्य पुरुष जो निसर्गांत आला, तो विश्वात्म्यापासून, ईश्वरापासून आला आणि निसर्गांतून तो परत निःशब्द शांत विश्वात्म्यांत, विश्वात्म्याकडे जाऊं शकतो; त्याचा मार्ग निस्तब्धता, मौन आणि परमोच्च आत्मस्थैर्य हा आहे. चैत्य पुरुष हा ईश्वराचा शाश्वत अंश आहे. (गीता १५-७) अनंताच्या नियमानुसार हा शाश्वत अंश, ईश्वररूप दिव्य पूर्णतत्त्वापासून विभक्त असूं शकत नाहीं, राहूं शकत नाहीं; वस्तुत: हा अंश स्वतःच पूर्ण असतो -- फक्त त्याचें बाह्य स्वरूप, त्याची बाह्य विभक्त आत्मानुभूति एवढा भाग पूर्ण ईश्वरत्वापासून वंचित असतो; वस्तुत: पूर्ण (ईश्वर) असलेला हा अंशरूप जीवात्मा (चैत्य पुरुष) जागृत होऊन, आपलें मूळ सत्यस्वरूप ओळखून, त्या स्वरूपांत बुडी घेऊं शकतो; असें झालें म्हणजे त्याचें वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाल्यासारखें होतें; निदान ईश्वरांत तें विलीन होतें. चैत्य पुरुष हा अज्ञानमय निसर्गाच्या महान् क्षेत्रांत एक लहानसा चैतन्य-केंद्र असल्यासारखा असतो; उपनिषदांत याला 'अंगुष्ठ प्रमाण' म्हटलें आहे; असें हें अंगुष्ठ-प्रमाण लहानसें चैतन्य-केंद्र, आत्मशक्तीच्या वाढत्या सात्मीकरणानें मोठें मोठें होत जाऊन, सगळ्या विश्वाला व्यापूं शकतें, आपलें मन आणि हृदय विशाल करून, त्यांच्या द्वारां सर्व विश्वाशीं पूर्ण आंतरिक तन्मयता, एकात्मता पावूं शकतें. किंवा असेंहि होऊं शकेल कीं, ईश्वर आपला शाश्वतचा सोबती आहे, सखा आहे या अनुभूतीनें हा चैत्य पुरुष, जीवात्मा तृप्त होऊन, या सख्याच्या सान्निध्यांत नित्य राहण्याचें पसंत करील, कधींहि खंड न पावणारी अशी प्रेमाची एकरूपता आणि तन्मयता ईश्वरापाशीं भोगील -- अमर प्रियकर आणि प्रेयसी असें, ईश्वराचें आणि त्याचें शाश्वत प्रेमाचें नातें होईल : अत्यंत सुखमय आणि अत्यंत सुंदर असा हाच एक आध्यात्मिक अनुभव आहे; बाकीचे सर्व अनुभव याच्या खालीं बसण्याच्या योग्यतेचे आहेत. आध्यात्मिक स्व-स्वरूपलाभाच्या या सर्व सिद्धी निःसंशय महान् आहेत, भव्य, दिव्य आहेत; तरीपण या सिद्धी स्व-स्वरूपलाभाची अखेर, किंवा शिखरसिद्धी आहेत असेंच कांहीं म्हणतां येत नाहीं; आत्मतत्वाचा स्व-स्वरूपलाभ यापुढेंहि जाऊं शकतो.

वर ज्या स्वरूपसिद्धी वर्णिल्या, त्या आत्मनिष्ठ मनाच्या सिद्धी आहेत;

 

पान क्र. ४२४

 

आत्मनिष्ठतेनें मन, स्वतःच्या सामान्य व्यवहारापलीकडे पाऊल टाकूं शकतें, व टाकतें -- पण तें आपली पातळी न बदलतां आत्म्याचे दिव्य व्यवहार करीत असतें. मनाची आजची जी अवस्था आहे त्या अवस्थेपलीकडे अनेक उच्च पायऱ्या आहेत -- यांतील श्रेष्ठ उच्चतम पायरीवर मन चढून गेलें, तरी भेदनिष्ठतेनें कार्य करणें हा जो त्याचा स्वभावधर्म, तो तें बदलूं शकत नाहीं; तें करतें काय, तर शाश्वत ब्रह्माचीं अंगें एक एक स्वतंत्रपणें घेऊन, त्याला सर्व, समग्र ब्रह्माचा मान देतें -- कोणत्याहि एका ब्रह्म-अंगांत त्याला आपली जेवढी पूर्ण स्थिति दिसते, तेवढी पूर्णता प्राप्त करून तें संतुष्ट होतें. हें भेदनिष्ठ मन सद्‌वस्तूचीं अंगें एकमेकांविरुद्ध उभीं करतें; याप्रमाणें अनेक द्वंद्वें तयार करतें : ब्रह्माची शांति, विरुद्ध ब्रह्माची क्रियाशीलता क्रियाशील सगुण सत्ताधीश ब्रह्म, विरुद्ध क्रियाशून्य निर्गुण सत्तातीत ब्रह्म; अस्तित्व (ब्रह्म), विरुद्ध दिव्य पुरुष, ईश्वर -- अशीं द्वंद्वें उभीं करून, कोणत्याहि द्वंद्वांतील एकाला दूर ठेवून, दुसऱ्यांत तें बुडी घेतें आणि हें दुसरें द्वंद्व म्हणजेच एकच एक सत्य आहे, एकच एक शाश्वत सद्‌वस्तु आहे असें आपलें स्वतःचें समाधान करतें. ईश्वर हाच एक सत्य आहे किंवा ब्रह्मतत्त्व हेंच एक सत्य आहे, यांपैकीं कोणताहि पक्ष समग्र सत्य म्हणून मन घेऊं शकतें; शाश्वत प्रेमतत्त्व हेंच एक सत्य आहे आणि प्रेम करणारा ईश्वर हें केवळ या प्रेमतत्त्वाचें व्यक्त होण्याचें साधन आहे, असा पक्ष मन घेऊं शकतें -- उलट प्रेम करणारा ईश्वर हा एकच नित्य सत्य वस्तु आहे आणि प्रेम हें केवळ या ईश्वराचें आत्माविष्करण आहे, असाहि पक्ष तें घेऊं शकतें; शुद्ध तत्त्वमय अस्तित्व (ब्रह्म) हें एकच एक सत्य आणि अनेक जीव म्हणजे त्या तत्त्वाच्या व्यक्तिनिष्ठ नानाविध शक्ती, असा पक्ष तें घेईल किंवा एकच एक अनंत पुरुष हें मूळ सत्य आणि तात्त्विक वा व्यक्तिशून्य अस्तित्व हें त्या पुरुषाची एक भावावस्था आहे, असाहि पक्ष तें घेईल. मन आध्यात्मिक सिद्धीच्या मागें लागलें म्हणजे त्याचा श्रेष्ठ हेतु साधण्यासाठीं, तें वर सांगितलेल्या भिन्न मार्गांपैकीं कोणत्याहि मार्गानें जाईल -- अध्यात्मपरायण मनाचा व्यवहार हा असा असतो; मना पलीकडे अतिमानस - अतिमानसिक सत्य-जाणिवेचें उच्च स्थान असतें : या सत्यज्ञानमय अतिमानसाची अनुभूति मनाच्या अनुभूतीहून वेगळी व श्रेष्ठ प्रकारची असते : या श्रेष्ठ अनुभूतींत मनाच्या भूमिकेवरील द्वंद्वें नाहींशीं होतात व एकांगी अनुभव दूर सारले जातात : अतिमानसाच्या भूमीवर

 

पान क्र. ४२५

 

आत्म्याला शाश्वत सद्‌वस्तूचा सर्वांगीण, समग्र, सर्वोत्तम साक्षात्कार घडतो आणि त्या समृद्ध समग्रतेनें संपन्न झालेला आत्मा, मनाच्या भूमिकेवर मिळणारे एकांगी अनुभव दूर सारतो. आमच्यापुढें आम्हीं जें ध्येय ठेवलें आहे, तें हें असें आहे : येथें जें जीवन आम्ही जगत आहों त्याची पूर्णता साधावयाची हें आमचें ध्येय आहे -- ही पूर्णता साधावयास दोन गोष्टी आम्हांस कराव्या लागतील : १) अतिमानसिक सत्य-जाणिवेचा मनाच्या वर असलेला प्रांत चढून आपलासा करणें, २) आमचा जो मन-प्राण-शरीर स्वभाव आहे, त्या स्वभावांत, त्या प्रकृतींत त्या अतिमानसिक भूमीवरील सत्य-जाणिवेचा अवतार घडविणें. चैत्य पुरुषाच्या प्रभावानें आध्यात्मिक भूमिकेवर चढण्याचा विक्रम मन करतें -- हा विक्रम झाल्यावर त्याला पूर्णता आणण्यासाठीं, अतिमानसाच्या प्रभावानें समग्रतेचा पाठ मन घेतें -- तें वर वर चढत जातें आणि शेवटीं चढून जावयाचें जें आध्यात्मिक शिखर, तें गांठून आपल्या आध्यात्मिक विक्रमास पूर्णता आणतें.

अध्यात्माचें शिखर अतिमानसिक भूमीवर आहे. येथें खालचे सर्व विसंवाद आपलें स्वरूप बदलून सुसंवाद होतात. कारण येथें सत्य-दर्शन आहे व सत्य-ज्ञान आहे. व्यक्त झालेलें मूळ अस्तित्व, सद्रूप, हें मनाच्या भूमीवर अनेक द्वंद्वांत विभागलेलें असें आपणांस आढळतें; या द्वंद्वांची द्वंद्वता, विरोध, नाहींसा करणारी किमया अतिमानसाच्या सत्य-जाणिवेंत आहे. अध्यात्मसंपन्न झालेल्याचें देहधारी जीवन, अंतरांत आत्म्याची पूर्ण अवस्था आणि बाहेर अपूर्ण दोषमय क्रियाशीलता यांनीं संमिश्र असें बनलेलें दिसतें. अज्ञानाच्या क्षेत्रांत जोपर्यंत आम्ही असतों, तोंपर्यंत अध्यात्म आणि व्यवहार यांचा हा विरोध आम्हांला अटळ असतो. हा विरोध अतिमानसिक शक्तियुक्त सत्य-ज्ञानाच्या आश्रयानें नाहींसा करतां येतो; त्यायोगें अंतरांतील आत्मस्थिति आणि आमची विश्वांतील कृति या दोहोंमध्यें पूर्ण सुसंगति निर्माण करतां येते -- अज्ञानाच्या भूमिकेवर, अहंकारतत्त्व केंद्र करून, त्याच्या भोंवतीं निसर्ग सर्व मानसिक आंदोलन चालवीत असतो; गुप्त आध्यात्मिक पुरुष हा अज्ञानाच्या भूमिकेवर गुप्तच असतो, व्यवहाराचें केंद्र असत नाहीं. आम्ही जगांत वागत असतो, तेथें अनेक गुंतागुंतीचे संपर्क, अन्योन्यविरोध, द्वंद्वें, विसंवाद आमचा जीवनमार्ग व्यापून असतात -- या व्यापांत आम्हांला जे अनुभव येतात, आमचे व इतरांचे जे संबंध उत्पन्न होतात, त्या

 

पान क्र. ४२६

 

सर्वांना व्यवस्थितपणें एकत्र बांधावयास कांहींतरी सूत्र अवश्य असतें -- व हें सूत्र अज्ञानभूमिकेवर अहंकाराच्या रूपानें, निसर्ग आम्हांला उपलब्ध करून देतो. हें अहंकार-केंद्र आमचा संरक्षक असतें -- अनंताचे, विश्वाचे जे आघात आमच्यावर सारखे होत असतात, त्यांच्यापासून आमचें संरक्षण, अज्ञानावस्थेंत हा अहंकारच करीत असतो. अध्यात्मांत आम्ही शिरलों कीं हा अहंकार, हें अहंतत्त्व दूर करावें लागतें -- अर्थात् आमचा संरक्षक नाहींसा होतो आणि आमचें व्यक्तित्व हें महान् व्यक्तित्वशून्य चैतन्यतत्त्वांत विलीन होतें; या विलीनीकरणाचा परिणाम प्रथम असा होतो कीं, आमच्या कृतीमध्यें व्यवस्था आणणारें कांहींच सूत्र आमच्याजवळ रहात नाहीं. आम्ही सूत्रहीन होण्याचा परिणाम म्हणजे आमच्या एका अस्तित्वाचीं जणुं दोन विभक्त अस्तित्वें होतात; एक आंतरिक आध्यात्मिक अस्तित्व आणि दुसरें बाह्य प्राकृतिक अस्तित्व. आंतरिक अस्तित्व ईश्वरी साक्षात्कारयुक्त असतें व तें पूर्ण आंतरिक स्वातंत्र्याचा आनंद उपभोगीत असतें आणि बाह्य प्राकृतिक अस्तित्व निसर्गाचें जुनें कार्य करीत राहतें; जुनी निसर्गप्रेरणा बाह्य अस्तित्वांत यांत्रिकतेनें काम करीत असते. मर्यादित असलेलें व्यक्तित्व पूर्णतया चैतन्यांत विरून गेलें आहे, जुनी अहंकेंद्रित व्यवस्था कोलमडून पडली आहे -- अशा स्थितींत आंत आत्मप्रकाशानें सर्व तेजोमय असलें, तरी बाह्य प्राकृतिक व्यवहार गोंधळाचा होणें शक्य आहे. बाह्य व्यवहारांत जड, क्रियाशून्य परिस्थिति किंवा कोणतीहि शक्ति नेईल तिकडे जडवत् जाणारे, स्वत: क्रियाविमुख, स्वयंगतिशून्य जीवन आणि आंत प्रकाशपूर्ण जाणिवेनें युक्त -- अशी एक आमची अवस्था होऊं शकते; बाह्य व्यवहार बालकाप्रमाणें आणि आंत भरपूर आत्मज्ञान अशी दुसरी अवस्था; बाह्य व्यवहारांत विचारांत मेळ नाहीं; विचारांत, भावनांत कोठेंहि संगीत नाहीं -- सर्वत्र भ्रमिष्टासारखें वागणें आणि आंत पूर्ण शांति आणि गंभीरपणा अशी तिसरी अवस्था; बाह्य व्यवहारांत पिसाळलेपणाचा, विकृत मेंदूचा खेळ आणि आंत निर्मल, विशुद्ध, समतोल अशी आत्मस्थिति अशी चौथी अवस्था; -- अहंकेंद्रित व्यवस्था नाहींशी झालेली आणि व्यक्तित्व चैतन्यांत विरलेलें अशा स्थितींत आमच्या अशा चार अवस्था (जड, बाल, उन्मत्त, पिशाच्च) होऊं शकतात; विज्ञानाची भूमिका (अतिमानसिक भूमिका) प्राप्त झाली नसल्यास, या चार अवस्थांखेरीज आणखी कांहीं अवस्था शक्य आहेत. कारण जोंपर्यंत विज्ञान

 

पान क्र. ४२७

 

प्राप्त झालें नाहीं, तोंपर्यंत अज्ञानाचेंच कमीअधिक अधिराज्य असतें. अशी एक पांचवी अवस्था असूं शकते कीं, बाह्य व्यवहारांत व्यवस्था ठेवण्यापुरतें वरवरचे अहंकारतत्त्व आंत शिल्लक असतें, या अहंकाराकडे अंतरात्मा पसंतीच्या दृष्टीनें बघत नाहीं आणि अहंकारी व्यवहार अर्थात् आत्मनिष्ठ, आत्म-इष्ट व्यवहार असत नाहीं; त्यांत आत्मा आणि प्रकृति यांचा विसंवाद स्पष्ट असतो. मनाचें कांहीं क्रियाशील अंग आमचा बाह्य व्यवहार चालवीत असेल व म्हणून त्याच्यामध्यें कांहीं व्यवस्था असेल; तथापि असें असलें, तरी आंत जो आत्मसाक्षात्कार झालेला असतो, त्या साक्षात्काराचें आविष्करण या बाह्य व्यवहारांत होऊंच शकत नाहीं -- कारण मनाचें दिव्यत्व व भेदातीतत्व यांत नेहमींच फार अंतर राहणार -- अंतर्ज्ञानाचा, अंतःप्रकाशाचा लाभ मनाला मिळून त्यायोगें बाह्य व्यवहार उजळला, तरी या सर्वोत्तम बाह्य व्यवस्थेंत देखील मनाच्या ज्या स्वभावगत उणीवा आहेत त्या प्रतिबिंबित होणार. प्राणाच्या आणि शरीराच्या स्वाभाविक उणीवाहि प्रतिबिंबित होणार -- अंतःप्रकाश हा जणुं राजा आणि मन, प्राण, शरीर हे त्याचे अकार्यक्षम दुबळे प्रधान : अर्थात् बाह्य व्यवहार सदोषच असणार. अंतःप्रकाश हा खऱ्या ज्ञानाचा प्रकाश खरा, परंतु त्याचें कार्य करणारे, मन, प्राण व शरीर हे कारभारी अज्ञानावर पोसलेले -- तेव्हां या अज्ञानपुष्ट कारभाऱ्यांकडून खऱ्या ज्ञानाला अनुरूप असा व्यवहार होणें हें अशक्य. असो. इत्यर्थ हा कीं, अतिमानसिक सत्य-ज्ञान, सत्य-संकल्प, त्या दोहोंची पूर्ण एकता या गोष्टी, मन, प्राण व शरीर या कारभाऱ्यांत, त्यांच्या अंतरंगांत भरल्या पाहिजेत, त्यांचें अज्ञान नष्ट झालें पाहिजे, तेव्हांच आमच्यांत आंत व बाहेर सुसंवादी व्यवहार शक्य होईल. आत्म्याची स्वभावगत सुसंगति, सुसंवादिता आमच्या आंतर आणि बाह्य जीवनांत प्रस्थापित होण्यास, अतिमानसानें खालीं उतरून, वर चढूं लागलेल्या मन-प्राण-शरीर यांना हात देऊन, विज्ञान-संपन्न करणें अवश्य आहे.

मनाचा उगम अतिमानस, किंवा त्याच्यापलीकडील सच्चिदानंदाची जाणीव चित् हा आहे; जीवनाचा, प्राणशक्तीचा उगम सच्चिदानंदाची जाणीवयुक्त शक्ति हा आहे -- म्हणून मन आणि प्राणशक्ति यांना पूर्णता आणावयासाठीं, त्यांच्या उगमाच्या दिशेनें त्यांना न्यावें लागतें; हीच गोष्ट आमचा खरा आत्मा, चैत्य पुरुष (जीवात्मा) याची आहे; सर्वश्रेष्ठ सत्य, जें सच्चिदानंदतत्त्व, त्यांतील 'आनंद' ह्या तत्त्वापासून आमच्या

 

पान क्र. ४२८

 

खऱ्या आत्म्याची निर्मिति झाली असल्यानें, त्याला त्या आनंद-तत्त्वाच्या दिशेनें नेलें पाहिजे; म्हणजे त्याची संभाव्य पूर्णता त्याला प्राप्त होईल. मन आणि प्राणशक्ति यांना पूर्णता आणण्यासाठीं ज्याप्रमाणें अतिमानसाची मध्यस्थी लागते, त्याप्रमाणें चैत्य पुरुषाला पूर्णता आणण्यासाठींहि अतिमानसाची मध्यस्थी लागते; एकच एक अनंत सद्वस्तु (अस्तित्व) खालचा अर्ध गोल आणि वरचा अर्धगोल अशा दोन भागांत विभागल्यासारखी आहे. सत् चित् आनंद हा वरचा अर्धगोल; आत्मा मन प्राण शरीर हा खालचा अर्धगोल. या दोन अर्धगोलांना जोडणारे जें तत्त्व, तें अतिमानस होय. या अतिमानसाच्या सामर्थ्यानें मनाला काय, प्राणशक्तीला काय किंवा चैत्य पुरुषाला काय, पूर्णता प्राप्त करून देण्याचें काम पूर्णतेनें व समग्रतेनें करतां येतें; कारण अतिमानसाच्या द्वारां मन, प्राणशक्ति व चैत्यपुरुष यांना मूळ दिव्य सत्याच्या त्या त्या जनकभूत अंशाशीं, अंगाशीं पूर्णपणें संलग्न करतां येतें, पूर्णपणें तद्रूप करतां येतें. अतिमानसांत तो प्रकाश असतो, अतिमानसांत तें ज्ञानयुक्त सामर्थ्य असतें, त्या प्रकाशाच्या व सामर्थ्याच्या साह्यानें, चैत्य पुरुषाला मूळ परम आनंदांत सर्वत्र प्रवेश मिळतो; आपल्या जन्मदात्या सच्चिदानंदाच्या आनंदाशीं या प्रकाशाच्या आणि सामर्थ्याच्या साह्यानें चैत्यपुरुष, निकटपणें जोडला जातो; त्याच्याशीं तो एकरूप होतो. याप्रमाणें चैत्य पुरुष पूर्ण झाला म्हणजे अध्यात्म आणि व्यवहार यांजमधील विरोध सर्वथा नाहींसा होतो -- मन प्राण शरीर यांना संसारांत जी भीति, जी घृणा वाटत असते, ती सर्व दूर करून सुख आणि दुःख या द्वंद्वाला तो नाहींसें करतो आणि विश्वांतील जीवनांत जे नानाविध संपर्क ओघानेंच होतात, ते सर्व दिव्य आनंदानें भरून टाकतो.

 

पान क्र. ४२९

 

प्रकरण चोविसावें

 

जडतत्त्व

 

जडतत्त्व, (अन्न) ब्रह्म आहे असें ज्ञान त्याला झालें.

- तैत्तिरीय उप० ३.२

 

आतां आम्हांला, आमच्या बुद्धीला ही गोष्ट पटली आहे कीं, जीवन हें मूर्तिमंत अनाकलनीय स्वप्न नव्हे, तर सर्वव्यापी दिव्य सत्तेचें महान् स्फुरण आहे, महान् स्पंदन आहे. या जीवनाच्या पायाचा, या जीवनाच्या तत्त्वाचा थोडाबहुत भाग आम्हांला दिसत आहे; आमची नजर वरती लागली आहे. उंच उंच चढण्याची जीवनाची अंतर्गत शक्ति मोठी आहे; तिचा वास्तवांतील विक्रम पहाण्यासाठीं आमची नजर वरतीं लागली आहे; शेवटीं जीवन दिव्य फुलोऱ्यानें फुलून जाणार आहे, तिकडे उंचांत उंच स्थानाकडे आमची नजर लागली आहे -- आम्हांला उंच चढलेलें जीवन, दिव्यतेनें फुललेलें जीवन दिसणार आहे, अशी आमची निश्चिति आहे -- तरीपण, सर्वांच्या खालीं असणारें एक तत्त्व, आम्हीं अद्यापि फारसें विचारांत घेतलेलें नाहीं -- हें तत्त्व म्हणजे जड-तत्त्व होय. या जडतत्त्वावर जीवन उभें आहे, एखाद्या स्तंभावर उभें असावें त्याप्रमाणें -- किंवा असें म्हणतां येईल कीं, जडतत्त्वांतून जीवन वरतीं येतें; जसा पुष्कळ शाखा असलेला वृक्ष त्याला पोटांत सामावणाऱ्या एखाद्या बीजांतून वर यावा, तसें माणसाचें मन, प्राण, शरीर या भौतिक तत्त्वावर अवलंबून असतात; जीवनाला फुलोरा येतो त्याचें कारण, जाणीव; सच्चिदानंदाची चित् किंवा जाणीव. ही चित्, चेतना, जाणीव मनाचें रूप घेते -- विस्तृत क्षेत्र व्यापते, उंच स्थानें चढून जाते; तिचें मूळ सत्यस्वरूप, अतिमानसिक जीवनाच्या विशालतेंत अंतर्भूत असतें -- या आपल्या मूळ सत्य स्वरूपाच्या शोधार्थ, मूळ चैतन्याची चेतना (जाणीव) मनाच्या रूपांत जडांतून वर येऊन जे विस्तृत व्यापक होण्याचे, उंच चढण्याचे प्रयोग करीत राहते, त्या प्रयोगांमुळें जीवन फुलतें हें खरें असलें, तरी शरीररूपी घरकुल आणि जडद्रव्याचा पाया यांचाहि

 

पान क्र. ४३०

 

जीवनाच्या विकासाशीं घनिष्ठ संबंध आहे यांत संशय नाहीं. जीवनाच्या विकासाचें स्वरूप आणि गती ही, शरीर आणि जडतत्त्व यांजवरहि अवलंबून आहे, असें स्पष्ट दिसतें. शरीराचें महत्त्व उघड आहे; मनुष्यप्राणी इतर प्राण्यांच्या पेक्षां वरतीं चढला आहे याचें कारण हें कीं, दिवसेंदिवस वाढणाऱ्या मानसिक प्रकाशाला आंत घेऊन, त्याला मदत करणारें शरीर आणि मेंदु माणसाला दिला गेला आहे, किंवा त्यानें स्वत: विकसित केला आहे म्हणा -- त्याचप्रमाणें मनुष्य स्वतःच्या स्वाभाविक मर्यादांपलीकडे चढून जाऊन, पूर्ण दिव्य जीवन -- दिव्य मानवता -- केवळ विचारांत आणि आंतर व्यवहारांत नव्हे, तर बाह्य व्यवहारांतहि प्रकट करणार आहे -- आजच्या प्रकाशापेक्षां उच्चतर प्रकाश आंत घेऊन, त्याला मदत करील असें शरीर, मनुष्य विकसित करील किंवा निदान असलेल्या शरीराकडून नवा श्रेष्ठ प्रकाश आंत घेऊन, त्याला मदत करण्याचें कार्य होण्याजोगी, शरीराच्या क्रियाशक्तींत कांहीं व्यवस्था करील, तरच वर वर्णिलेली दिव्य मानवता तो अंतर्बाह्य व्यवहारांत प्रकट करूं शकेल. आमच्या मानवी जीवनांतून हें दिव्य जीवन आजच्या मानवांत जर विकसित होणार नसेल, तर अशी एक शक्यता आहे कीं, जीवन ज्या अपेक्षा निर्माण करून राहिलें आहे, त्या अपेक्षा अनाठायी आहेत; जीवनाचा आम्ही घेत होतो तो अर्थ खोटा आहे व तो टाकून दिला पाहिजे; पार्थिव जीव सच्चिदानंदप्राप्तीसाठीं आत्म-विलयासच तयार झाला पाहिजे; मन, प्राण, शरीर यांचा सर्वस्वीं त्याग करून शुद्ध अनंतांत त्यानें परत जावें, त्यांत विलीन व्हावें हा एकच सच्चिदानंदप्राप्तीचा मार्ग त्याला मोकळा आहे; ही एक शक्यता. दुसरी अशी शक्यता आहे कीं, मनुष्य हा दिव्य जीवनाचें ईश्वरी साधन नाहीं, त्याला जी प्रगतीची शक्ति आहे, दुसऱ्या सर्व पार्थिव प्राण्यांपेक्षां त्यांवेगळें विशिष्ट स्थान देणारें, जाणीवपूर्वक प्रगति करण्याचें जें सामर्थ्य त्याला आहे, त्या सामर्थ्याला एक नियत निश्चित मर्यादा आहे -- आणि ज्याप्रमाणें इतर जीवांना मागें सारून जीवनाच्या आघाडीवर तो आपल्या वैशिष्ट्याने आला आहे, त्याप्रमाणें त्याहून वेगळा प्राणी त्याला बाजूला सारून, त्याची आघाडीवरची जागा घेईल -- आणि तो नवा प्राणी दिव्य जीवनाचें ईश्वरी साधन होईल.

शरीर ही प्रथमपासूनच आत्म्याची मोठी अडचण मानली गेली आहे. आत्म्याच्या आध्यात्मिक प्रवासांत शरीर हें आत्म्याला सारखें अडखळायला लावतें आणि शरीराच्या खडकावर आपटून, आत्म्याची साधनारूपी नाव

 

पान क्र. ४३१

 

फुटते, असा प्रथमपासूनच शरीरासंबंधींचा आत्मोन्नतिपरायणांचा आक्षेप आहे. आध्यात्मिक कृतार्थता हें ज्यांचें ध्येय आहे आणि ज्यांना तें ध्येय लवकर मिळवावेंसें वाटतें, ते विश्वाच्या या जडतत्त्वाला, जड शरीराला निषिद्ध गोष्टींच्या यादींत घालून, दुसऱ्या सर्व वस्तुंपेक्षां जड शरीराला जास्त घृणित लेखून, या शरीरामुळें विश्वाचा आपल्याला उबग येतो असें म्हणतात. शरीर हें अंधकारमय ओझें आहे, हें आपल्याला सहन होत नाहीं अशी अध्यात्म-साधकांची तक्रार असते; शरीर हें हट्टीपणानें जड, ग्राम्य विषयांच्या मागें लागणारें आहे, असा त्यांचा सारखा धोसरा असतो आणि म्हणून अशा शरीराच्या बंधनांतून सुटका या दृष्टीनें तें संन्यासाचा आश्रय करतात. शरीराची कटकट मिटवावी या हेतूनें या साधकांनीं, शरीर हें सत्य नाहीं, जड विश्व सत्य नाहीं असें म्हणून त्यांचें अस्तित्व -- खरे अस्तित्व नाकारलें आहे; त्याची भ्रमांत गणना केली आहे. जडाला बहुतेक धर्मांनीं पापमूळ म्हणून शाप दिला आहे आणि धार्मिक सत्य, आध्यात्मिकता यांची कसोटी, शारीर जीवनाचा त्याग किंवा विरक्तपणें तें कांहीं काळ (एक जन्मापुरतें फार तर) कंठीत राहणें हीच ठरविली आहे. प्राचीन धर्मसंप्रदायांत जडासंबंधानें अधिक सहिष्णुता व अधिक खोल विचार आढळून येतो; कठीण कलियुगांत जो दुःखभार उचलावा लागतो, त्यामुळें आत्म्याचे हाल होतात, यांतून कधीं सुटेन असें वाटून तो उतावळा होतो -- असे हाल, अशी उतावळी प्राचीन धर्मसंप्रदायांच्या काळांत कोणाच्या अनुभवास आली नसेल : निदान आजच्या असहिष्णुतेचें उतावळीचें चिन्ह प्राचीन संप्रदायांत आढळत नाहीं : त्यांनीं शारीरजीवन आणि आत्मजीवन यांत अर्वाचीनांप्रमाणें भयंकर भेद मानला नाहीं : पृथ्वी ही माता आहे, स्वर्ग हा पिता आहे असें म्हणून त्यांनीं पार्थिव आणि अ-पार्थिव जीवनाचें महत्त्व सारखें लेखलें आहे; दोन्हींबद्दल तितकाच आदर, तितकेंच प्रेम प्रकट केलें आहे; पण प्राचीनांच्या रहस्यमय धर्मरीती आम्हांला गूढ आणि अनाकलनीय होऊन बसल्या आहेत -- त्यांचा विशेष विचार करणें आम्हीं सोडून दिलें आहे : आम्ही कोणी अध्यात्मवादी असूं, कोणी जडवादी असूं -- आम्हीं सर्वांनीं, जीवनाचा अवघड प्रश्न, जीवनाची निरगांठ उकलण्याचा प्रयत्न न करितां ती एका झटक्यानें तोडण्याचा, एका झटक्यानें जीवनत्याग करण्याचा मार्ग पसंत केला असून, जीवन त्यागून शाश्वत आनंदाच्या, निर्वाणाच्या किंवा शांतीच्या आश्रयाला पळून जाण्यांत आम्ही समाधान मानूं लागलों आहों.

 

पान क्र. ४३२

 

शरीर वा जड भौतिक तत्त्व, यांच्याशीं जें भांडण आम्ही अध्यात्मवादी भांडत आहों, तें भांडण अध्यात्माची शक्यता आम्हांत दिसूं लागल्यापासून सुरू झालें आहे असें नाहीं, तें भांडण जुनेच आहे : प्राणशक्ति, जीवनशक्ति जडांतून वर आली, तेव्हांपासूनच जडाचें आणि प्राणाचें भांडण सुरू झालें; प्राणशक्ति आणि जड भौतिक तत्त्व यांचें कांहीं जमेना; भौतिक तत्त्व वा देहतत्त्व हलविल्याशिवाय हालायचें नाहीं, त्याच्यांत नेणीव आमूलाग्र भरलेली, त्याचे अणु परमाणु एकमेकांपासून अलगपणें राहणारे, त्यांना स्वभावत: एकत्र राहण्याचा कंटाळा, कोणाकडून कांहीं कामासाठीं एकत्र जोडले गेले तर त्यांची वृत्ति, त्यांची प्रकृति तुटून फुटून अलग होण्याची व त्यांच्या जोडण्यानें बनलेला आकार तोडून टाकण्याची; भौतिक तत्त्वामध्यें स्वयंगतिशून्यता, नेणीव आणि अणु-विघटन या तीन शक्ती आहेत; प्राणशक्तीला, आपले विविध व्यवहार म्हणजेच प्राणयुक्त आकारांचे जीवपेशीचेच कमी अधिक टिकाऊ संयोग व समवाय वरील तीन शक्तींशीं झगडून करावे लागतात. या झगड्यांत प्राणशक्तीचा अखेर पराभव होतोसा दिसतो, जडतत्त्वाचा विजय होतोसा दिसतो -- कारण मरण म्हणजे प्राणाचा पाडाव होऊन त्याचें परत जडतत्त्व बनणें. जडांतून जीवन बाहेर आल्यावर सुरू झालेला हा झगडा, जीवनांतून मन वर आल्यावर अधिकच तीव्र होतो; जीवन (प्राण) आणि देह (जडतत्त्व) दोघांशींहि मनाचें भांडण असतें; या दोहोंच्या मर्यादा मनाला जाचक होतात; जडाची स्थूलता आणि गतिशून्यता, प्राणाची वासनामयता आणि दुःखमयता यांचा मनाला सारखा जाच होत असतो -- या गोष्टी, त्याला जडाचा आणि प्राणाचा कमी अधिक अंकित करतात आणि या दास्याविरुद्ध त्याला झगडावें लागतें; या झगड्यांत मनाला शेवटीं थोडाबहुत विजय मिळतो : (मिळतोच अशी खात्री मात्र देतां येत नाहीं) हा विजय अर्थातच पूर्ण नसतो, एकांगी असतो; शिवाय हा विजय मिळविण्यासाठीं मनाला फार नुकसान सोसावें लागतें; मनाच्या विजयांचें स्वरूप असें असतें; प्राणाच्या वासना मन हतबल करतें, दडपून टाकतें, मारूनहि टाकतें; शरीराची शक्ति कमी करून टाकतें; शारीर समतोल बिघडवितें -- आणि हें सर्व करून आपला मानसिक व्यवहार वाढवितें, आपली नैतिक पातळी उंच करतें. या झगड्याच्या व्यवहारांतच मनाला जीवनाविषयीं संताप येतो, शरीराची घृणा येते आणि जीवन व शरीर यांना सोडचिठ्‌ठी द्यावी आणि विशुद्ध नैतिक

 

पान क्र. ४३३

 

वा बौद्धिक अस्तित्व आपलेंसें करावें अशी विरक्ति मनाला उत्पन्न होते. मनापलीकडेहि अस्तित्व असल्याची जाणीव मनुष्याला झाली, म्हणजे त्याचें विसंवादाचें व झगडयाचें क्षेत्र वाढतें; मनहि नकोसें होतें; प्राण व शरीर यांच्या जोडीला मन बसवून, ही त्रयी दुष्ट सैतानाची, दोषमय दुःखमय विश्वाची आणि पातकी वासनामय मांसपिंडाची मदतनीस आहे, असा तिच्यावर आम्ही आरोप करतो आणि तिची संगत निषिद्ध ठरवितो. आमच्या सर्व दुःखाला कारण मन आहे असा सिद्धांत करून, आत्मा आणि त्याचीं व्यवहाराचीं साधनें (मन प्राण शरीर) यांच्यामध्यें आम्ही वितुष्ट उभें करतों, युद्ध माजवितों आणि या युद्धांत, मन-प्राण-शरीराच्या लहानशा घरकुलांत कोंडलेल्या आत्म्याला, आपलें कोंडमारा करणारें अडचणीचें लहान घरकुल टाकून देऊन, परत आपल्या मूळ अनंत क्षेत्रांत जाण्यानेंच मोकळें वाटणार आहे, त्यांतच आत्म्याचा खरा विजय आहे असा पक्ष आम्ही घेतों. आमच्या दृष्टीनें विश्व म्हणजे विसंवादाची व कलहाची मूर्ति आहे; आणि आम्ही असें मानूं लागलों आहों कीं, या विश्वाच्या गोंधळांतून निघावयाचें, तर कलहाची व विसंवादाची परिसीमा करून विश्वाशीं सर्व संबंध तोडण्यानें, अखेरची काडीमोड केल्यानें आमचें इष्ट साधेल, अन्यथा साधणार नाहीं.

पण यांत आमचा गैरसमज आहे, आमच्या पुढील जीवनाचा प्रश्न अशानें सुटत नाहीं -- त्या प्रश्नाला आम्हीं बगल दिल्याप्रमाणें तें होतें; आणि आम्हीं वर ज्या पराभवांचा आणि विजयांचा उल्लेख केला आहे, ते पराभव आणि विजय खरे नव्हेत, केवळ दर्शनी आहेत, केवळ आभास आहेत. जडतत्त्व प्राणशक्तीचा पाडाव करते ही गोष्ट खरी नाहीं; मरण ही घटना तडजोडीची आहे -- जीवन अखंड चालू राहावें यासाठीं मरण या घटनेचा उपयोग केला जातो. मनाचा प्राणावर वा जडावर जो थोडाबहुत विजय होतोसा दिसतो, तोहि खरा विजय नव्हे : मनाच्या ज्या शक्ती आहेत, त्यांपैकीं केवळ कांहीं थोड्या शक्तींचा अल्पसा विकास, प्राण व शरीर यांना दाबून दडपून मन करतें -- पण प्राण व शरीर यांचा चांगला उपयोग करून घेणें मनाला कित्येक बाबतींत शक्य असून, तसा उपयोग करून न घेतल्यानें, चांगल्या उपयोगावरच ज्या इतर शक्तींचा योग्य विकास अवलंबून असतो, त्या त्याच्या शक्ती अविकसित राहतात -- हा मनाचा पराजयच आहे. अशीच गोष्ट व्यक्तीच्या आत्म्याची आहे; हा आत्मा, मन-प्राण-शरीर या त्रयीवर खरोखरीचा विजय न मिळवितां,

 

पान क्र. ४३४

 

त्याजवर या त्रयीचा जो रास्त हक्क आहे तो अमान्य करून आणि त्याचें जें कर्तव्य आहे तें टाकून पळून जाण्यांतच ''विजय'' मानतो; हा वास्तविक त्याचा पराजयच आहे : चैतन्यानें, आत्म्याच्या आत्म्यानें ज्यावेळीं विश्वाचा आकार धारण केला, विश्वाच्या अंतरांत वसति केली त्यावेळीं जें कार्य करावयाचें पत्करलें, तें कार्य, आपलें कर्तव्य टाकून व्यक्तीचा आत्मा पळतो यांत कसला त्याचा विजय? त्याच्यापुढचा प्रश्न कायमच राहतो, ईश्वराचा विश्वांतील विकास-परिश्रम कांहीं थांबत नाहीं; जोपर्यंत परिश्रमाचें इच्छित फळ मिळालें नाहीं व जीवनाच्या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर मिळालें नाहीं, तोपर्यंत तो प्रश्न सुटला असें म्हणतां येणार नाहीं, तोपर्यंत ईश्वराला परिश्रम हे करीत रहावेच लागणार; आमच्या दृष्टीनुसार सच्चिदानंद हा, विश्वाचा आरंभ, मध्य आणि अंत सर्वकांहीं असल्यानें आणि त्याच्या अस्तित्वांत, प्रकृतींत शाश्वत आणि मूलभूत तत्त्वें म्हणून कलह आणि विसंवाद या गोष्टी असणें अशक्य असल्यानें -- या दोन गोष्टींचें विश्वांतील अस्तित्व आमच्या दृष्टीनुसार हें ध्वनित करतें कीं, जीवनाच्या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर मिळण्यासाठीं, कलह आणि विसंवाद यांचा अंतिम अंत होण्यासाठीं, परिश्रमांची आवश्यकता आहे; प्राणशक्तीला जडतत्त्वावर खरा विजय मिळणें म्हणजे प्राणशक्तीला शरीराचा पूर्ण स्वातंत्र्यानें, पूर्ण आणि उत्तम उपयोग करतां येणें हा होय; प्राणावर व शरीरावर मनाला खरा विजय मिळणें म्हणजे प्राणशक्तीचा आणि देहाचा मनाला पूर्ण स्वतंत्रपणें आणि पूर्णतेनें उत्तम उपयोग करतां येणें हा होय; त्याचप्रमाणें मन-प्राण-शरीर या त्रयीवर आत्मतत्त्वानें खरा विजय मिळविणें म्हणजे या त्रयीचा आपल्या इच्छेप्रमाणें आत्मतत्त्वानें पूर्ण जाणिवेनें पूर्ण ताबा घेणें होय; आमच्या दृष्टीनुसार हा शेवटला (आत्मतत्त्वाचा) विजय सिद्ध झाला, तरच दुसरे विजय खरोखरी शक्यतेच्या क्षेत्रांत येतील, अन्यथा येणार नाहींत; हे विजय म्हणजे जीवनाच्या प्रश्नाचें, सर्व विसंवादाचा अंत करणारें असें समाधानकारक उत्तर असून त्यासाठीं परिश्रमांची आवश्यकता आहे. हे विजय पूर्णतया कसे शक्य आहेत, हें समजण्यासाठीं अगोदर जडतत्त्वाच्या पोटीं सत्य वस्तु काय आहे याचा शोध आम्हीं घेतला पाहिजे; मौलिक ज्ञानाच्या पाठीमागें लागून मनाचें, आत्म्याचें, प्राणाचें (प्राणमय जीवनाचें) अंतर्गत सत्य आम्हीं जसे शोधून काढलें आहे, तसें तें जडतत्त्वाचेंहि शोधून काढणें, आमच्या उद्दिष्टासाठीं आम्हांला आवश्यक आहे.

 

पान क्र. ४३५

 

एका अर्थानें जडतत्त्व, जडद्रव्य हें खोटें आहे, त्याचें अस्तित्व मिथ्या आहे; याचा अर्थ, आमचें जडासंबंधाचें आजचें ज्ञान, आजची कल्पना, आजचा अनुभव यांत जडविषयक सत्य नाहीं; आम्ही सर्वव्यापी अस्तित्वाच्या -- सद्‌वस्तूच्या पोटांत आहों आणि तेथें हालचाल करीत आहों, त्या अस्तित्वाचा आमच्या ज्ञानेंद्रियांशीं कांहीं संबंध येतो, हा विशिष्ट संबंध - ही विशिष्ट संबंधाची घटना -- आमच्या आजच्या ज्ञानाचा, कल्पनेचा व अनुभवाचा विषय असते आणि ही घटना, हा संबंध म्हणजे कांहीं जडविषयक सत्य नव्हे -- संशोधन करून भौतिक शास्त्र जेव्हां अशा निर्णयाला येतें कीं, जड हें शक्तीनें धरलेलें रूप आहे, शक्तीचे नानाविध आकार म्हणजे जडद्रव्य आहे, तेव्हां त्याला एक सर्वव्यापी मौलिक सत्य सांपडलें आहे असें म्हणतां येतें; तसेंच तत्त्वज्ञान आपल्या संशोधनानें जेव्हां या निर्णयाला येतें कीं, आमची जी जाणीव आहे त्या जाणिवेला द्रव्याचा देखावा दिसतो, या देखाव्याला आम्ही जडद्रव्य म्हणतो; वस्तुत: एकच एक सत्य वस्तु आहे आणि ती वस्तु म्हणजे आत्मा, चैतन्य, शुद्ध ज्ञानमय सत्ता होय अशा निर्णयाला तत्त्वज्ञान येतें तेव्हां भौतिक शास्त्राच्या सत्यापेक्षां अधिक महान्, अधिक पूर्ण, अधिक मौलिक असें सत्य त्याला सांपडलें आहे असें म्हणतां येतें. आतां प्रश्न असा येतो कीं, शक्तीनें जडतत्त्वाचें रूप कां घ्यावे, 'शक्तीचे प्रवाह' याच रूपांत तिनें कायमचें कां राहूं नये; तसेंच जें शुद्ध चैतन्य आहे, त्यानें चैतन्याच्या विविध अवस्था, विविध आनंद याच रूपांत कायमचें न राहतां दर्शनी दिखाऊ जडतत्त्वाचें रूप घेणें पसंत कां करावें? जडतत्त्वाचें रूप शक्तीला किंवा चैतन्याला येणें हें मनाचें कार्य आहे, असा एक पक्ष आहे; मनांतील विचार वा क्रिया, वस्तूंचा जड आकार बनवीत तर नाहींच, पण त्याचें ज्ञानदेखील मनाला प्रत्यक्षपणें होत नाहीं, संवेदनेची मदत होते तेव्हां कोठें मनाला आकाराचें ज्ञान होतें; तेव्हां, मन हें शक्तीला वा चैतन्याला जडतत्त्वाचें रूप देत नसून, ही क्रिया संवेदनेची आहे असा दुसरा पक्ष आहे; अर्थात् हा पक्ष असें म्हणतो कीं, संवेदनाशील मन तीं रूपें बनवितें, जी त्याला दिसतात (असें भासतें आणि विचारशील मन या रूपांवर विचाराची क्रिया करतें, विचारानें त्यांत कमी अधिक करतें. परंतु हा व्यवहार करणारें मन हें व्यक्तीचें देहधारी मन असूं शकत नाहीं. जड-रूपांची सृष्टि, व्यक्तीच्या मनाकडून होऊं शकत नाहीं; पृथ्वीचें अस्तित्व हें मानवी मनाचें कार्य नव्हे; कारण पृथ्वीच्या

 

पान क्र. ४३६

 

अस्तित्वांतून हें मानवी मन उदय पावतें. विश्व हें केवळ आमच्या मनांचाच व्यापार आहे, विश्व आहे तें आमच्या मनांत आहे, तें कांहीं बाहेर नाहीं असें आम्हीं म्हटलें, तर आमच्या मनांचा गोंधळ दाखविणारी ती एक गोष्ट होईल -- कारण ती सर्वस्वी खोटी गोष्ट आहे. भौतिक विश्व आम्हां मानवांच्या पूर्वी होतें आणि आम्ही मानव पृथ्वीवरून नाहींसें झालों किंवा आमचें वैयक्तिक मन अनंतांत विलीन होऊन गेलें, तरी भौतिक विश्व असणार. तेव्हां मनाकडे विश्वाचें जनकत्व द्यावयाचें, तर तें मन, आमचें मानवी वैयक्तिक मन असूं शकणार नाहीं; त्याकरितां विश्वमनाची कल्पना करावयास हवी. हें विश्वमन विश्वरूप झालें आहे, विश्वरूपांत विश्वमनाची जाणीव आमच्या जाणिवेच्या खालच्या प्रांतांतील आहे; अर्थात् अर्धनेणीव ही 'नेणीव' या स्वरूपाची आहे, असें आम्हांला भासतें; परंतु विश्वमनाचें अंतरंग, हें आमच्या जाणिवेच्या वरच्या प्रांतीं असलेल्या अतिमानसिक जाणिवेनें युक्त आहे -- अशा प्रकारच्या विश्वमनानें विश्वाचें रूप आपल्या निवासाकरितां निर्माण केलें आहे. अतिमानसिक जाणिवेनें युक्त असें विश्वमन हें विश्वाच्या पूर्वीं होतें आणि विश्वानंतर असणार (आमच्या मनासारखें तें नव्हे) -- या अतिमानसिक जाणिवेच्या विश्वमनानें, विश्वव्यापक संवेदनेच्या साधनानें आपल्या स्वतःच्या पोटीं आकाराआकारांचें संबंध निर्माण केले आणि याप्रमाणें भौतिक विश्वाची सुव्यवस्था अस्तित्वांत आणली. विश्वाच्या निर्मितीची ही कल्पना एवढें सांगतें कीं, विश्वाचें जडतत्त्व हें विश्वमनाच्या अतिमानसिक जाणिवेचें कार्य आहे. परंतु, या जाणिवेनें आपल्या विश्वकार्याकरितां मूळ पाया म्हणून जडतत्त्व जें निर्माण केलें तें कोणत्या रीतीनें, कोणत्या प्रक्रियेनें निर्माण केलें हें ही कल्पना सांगत नाहीं.

ही प्रक्रिया समजण्यासाठीं आपण अगदीं मुळाकडे गेलें पाहिजे. मूळ सत्ता (जाणीवयुक्त सत्ता) क्रियाशील झाली म्हणजे ती जाणीवयुक्त शक्ति होते. ही शक्ति आपले व्यापार मूळ सत्तेच्या जाणिवेपुढें ठेवते; त्या मूळ सत्तेचीं, अस्तित्वाचीं विविध रूपें हेंच त्या व्यापारांचें स्वरूप असतें. ज्याअर्थीं एकच एक जाणीवयुक्त सत्ता मूलत: अस्तित्वांत आहे आणि शक्ति हें केवळ या सत्तेचें कार्य, क्रिया, व्यापार आहे, त्याअर्थीं या शक्तीचें, या व्यापाराचें फळ, मूळ जाणीवयुक्त सत्तेचीं विविध रूपें हेंच असणार, दुसरें कांहीं असूं शकत नाहीं. यावरून जडतत्त्व, जडद्रव्य

 

पान क्र. ४३७

 

हें चैतन्याचा (मूळ जाणीवयुक्त सत्तेचा) प्रकार आहे, आकार आहे, दुसरें कांहीं नाहीं हें उघड आहे. चैतन्याचा हा आकार आमच्या इंद्रियांना ज्या प्रकारें भासतो, ज्या प्रकारें दिसतो, तो प्रकार मनाच्या विभाग करण्याच्या क्रियेनें अस्तित्वांत येतो. विश्वाचा सर्व देखावा या विभाजनधर्मी मनामुळें निर्माण होतो. जाणीवयुक्त शक्तीचें कार्य प्राण-व्यवहार (जीवन) आहे आणि या प्राण-व्यवहाराचें कार्य भौतिक आकार आहे हें आपण पाहिलें आहे; या भौतिक रूपांत गुप्त असलेलें जीवन त्यांतून प्रथम वर येतें, तें नेणीवयुक्त शक्ति, जडशक्ति या रूपानें; पुढें तें विकसित होत होत, मनाचा आविष्कार करतें -- मनाच्या रूपानें मूळ जाणिवेचाच आविष्कार जीवन आपणांतून करतें; ही जाणीवच शक्तीचा आत्मा होते -- अर्थात् ही जाणीव अव्यक्त असतांना देखील शक्तीच्या पोटीं अस्तित्वांत होतीच. मन हें अतिमानसाचें, अर्थात् मूळ स्व-साक्षिक ज्ञानाचें गौण कार्य आहे, कनिष्ठ क्रियाशक्ति आहे; प्राणशक्ति ही या अशा मनाचीं कामें करणारी साधनरूप शक्ति आहे. मूळ जाणीव किंवा चित् अतिमानसाच्या द्वारां खालीं उतरून मनाचें रूप घेतें, मूळ जाणिवेची शक्ति (किंवा तपस्) अतिमानसाच्या द्वारां खालीं उतरून प्राणाचें रूप घेते. अतिमानसांत मनाचें श्रेष्ठ सत्य आहे, त्या सत्यापासून मन विभक्त होतें व त्याचें (मनाचें) साधन जो प्राण (जीवन) त्यालाहि आपली विभक्तपणाची दीक्षा देतें; अर्थात् जीवन विभागलेलें आहे असा देखावा उत्पन्न करतें. तसेंच आपल्या साधनरूप प्राणशक्तींत गुप्त होऊन, प्राण-व्यवहारांत मन अवचेतन होते -- आणि मग भौतिक विश्वांत ज्या क्रिया या मनाकडून घडतात, त्या जड शक्तीनें घडतात असा देखावा तें उत्पन्न करतें. तेव्हां, जडतत्त्वांत जें ज्ञानशून्यत्व, जें स्वयं-गतिशून्यत्व, अणु अणु अलग राहण्याचें जें तत्त्व आहे, तें सर्व मनाच्या विभाग करण्याच्या आणि स्वत: जीवनापोटीं गुप्त होण्याच्या क्रियेंतून निघालें आहे -- आमचें विश्व मनाच्या या व्यवहारांतून अस्तित्वांत आलें आहे. सृष्टिनिर्मितीच्या कार्यांत खालीं उतरतांना अतिमानस शेवटीं जी क्रिया करतें, ती मन बनते; मूळ जाणीवयुक्त शक्ति, मनाच्या खालीं येण्यानें निर्माण केलेल्या अज्ञानाच्या परिस्थितींत जें कार्य करते, तें प्राणमय जीवन बनतें, त्याप्रमाणें जाणीवयुक्त मूळ शक्तीचें वर उल्लेखिलेलें कार्य घडल्यानें, मूळ जाणीवयुक्त सत्ता जें अखेरचें रूप घेतें, तें रूप म्हणजे जडद्रव्य होय. जडतत्त्व हें मूळ जाणीवयुक्त एकच एक सत्ता-

 

पान क्र. ४३८

 

द्रव्य आहे, विश्वमनानें त्यांत देखाव्यापुरतें विभाग, अलग अलग तुकडे करण्याचें काम केलेलें आहे -- मूळ सत्ताद्रव्याच्या अनंत पोटांतच हें विभक्तीकरणाचें काम केलें गेलें आहे. आमचें वैयक्तिक मन हें विभक्तीकरण आपल्यापरीनें पुन्हां करीत असतें, या विभक्त तुकड्यांत वैयक्तिक मन निवास करतें. तथापि चैतन्याची मूळ सत्तेची एकता, मूळ शक्तीची एकता, मूळ जडतत्त्वाची एकता, यांत वैयक्तिक मनाच्या किंवा *विश्वमनाच्या विभजनक्रियेनें कांहीं तफावत होत नाहीं, कांहीं कमीपणा येत नाहीं -- तिजमुळें ती एकता रद्द होण्याचें अर्थात्‌च नांवहि नको.

एक अविभाज्य सत्तेचें, अस्तित्वाचें -- हें दर्शनी, व्यवहारी विभजन तरी कां केलें जातें? मूळ सत्तेची एकता कायम ठेवून, तिच्या पोटीं अनेकतेचें तत्त्व व्यवहारापुरतें कामास आणण्याचें ठरल्यावर, या तत्त्वाची अंतर्गत शक्ति तिच्या शेवटच्या परिसीमेपर्यंत कार्यान्वित करावयाचें काम मनाकडे येतें; आणि हें काम अलगपणा आणि विभागणी यांच्या आश्रयानेंच होणें शक्य आहे. यासाठीं प्राणशक्तीच्या पोटीं मन उडी घेतें. अनेकतेच्या निवासासाठीं रूपें, आकार बनविण्याकरितां ही उडी घेतें -- अस्तित्वाच्या सर्वव्यापी एकतत्त्वाला स्थूल भौतिक द्रव्याचें रूप मन देतें, तत्पूर्वींचें एकतत्त्वाचें शुद्ध रूप व सूक्ष्म रूप मनापुढें असलेल्या कार्याला उपयोगी नसतें, म्हणून स्थूल भौतिक द्रव्याचें रूप विश्वव्यापी सत्तत्त्वाला देणें मनाला भाग पडतें. विश्वव्यापी सत्तत्त्व किंवा सत्ताद्रव्य शुद्ध,

-------------------------

*विश्वमन हें अतिमानसिक जाणिवेचें मन आहे असें म्हटलें आहे. अतिमानस वेगळें आणि विश्वमन वेगळें. विश्वमनाला अधिमानस म्हणतां येईल. अतिमानसावर प्रत्यक्ष अवलंबून असलेलें, त्याच्या खालचें क्षेत्र अधिमानसाचें क्षेत्र होय -- अधिमानसापासून अज्ञानाच्या क्षेत्राला आरंभ होतो. आमच्या परिचयाचें जें मन आहे, त्याला संयोग व संयुक्त पदार्थ करण्याची अपार शक्ति आहे -- पण मूळ निर्मिति त्याजकडून होत नाहीं. सर्व सृष्ट रूपांची मूळ निर्मिति शरीर प्राण मन यांच्या पलीकडील अनंतांत होते. येथें अनंतपणें विभागलेलें जें मूळ द्रव्य, त्याच्या अति-सूक्ष्म विभागांच्या अणूंच्या, परमाणूंच्या संयोगीकरणानें, एकत्रीकरणानें अनंतानें सुचविलेल्या नमुन्याप्रमाणें ओबडधोबड रूपें तयार केलीं जातात. विश्वांतील रूपांच्या शाखा खालीं आहेत, विश्वाचें मूळ वर आहे, असें ऋग्वेदांत म्हटलें आहे तें वरील वस्तुस्थितीला उद्देशून म्हटलें आहे.

 

पान क्र. ४३९

 

सूक्ष्म आणि स्थूल या तीन स्वरूपांत, तीन जाणीव प्रकारांचा विषय होत असतें. शुद्ध जाणीव (सच्चिदानंदाची शुद्ध जाणीव) आणि विश्वाचें सत्ताद्रव्य यांचा संबंध-संपर्क झाला, म्हणजे स्वतःच्या शुद्ध शाश्वत सत्तेचाच कमीअधिक संपर्क झाला अशी अनुभूति शुद्ध जाणिवेला होते. सूक्ष्म संवेदनाशील जाणिवेचा आणि त्याच विश्व-द्रव्याचा संबंध आला, कीं हें विश्वद्रव्य लवचिक असून, जाणीवयुक्त मूळ सत्तेचें आविष्करण करण्याचें कार्य तें सुलभतेनें व विविधतेनें करूं शकतें अशी अनुभूति सूक्ष्म संवेदनाशील जाणिवेला येते. पण हे दोन्ही प्रकार आपापल्यापरी ठीक असले, तरी जें कार्य स्थूल संवेदनशील मन करूं शकतें, तें दोन्ही प्रकारच्या जाणीवांकडून घडूं शकत नाहीं -- अनेकतेच्या तत्त्वाची अंतर्गत शक्ति शेवटच्या परिसीमेपर्यंत व्यक्त करावयाची कामगिरी मनाकडे असल्यानें, त्याचा आणि शुद्ध विश्वतत्त्वाचा संपर्क झाला कीं मनाला या संपर्काला विशिष्ट दर्शनी स्वरूप द्यावें लागतें; तें हें कीं, हें विश्वतत्त्व कायमपणें अनेक पदार्थांच्या रूपांत वावरत आहे आणि या अनेक पदार्थांपैकीं प्रत्येक पदार्थ कठीण, स्थिर स्वरूपाचा आहे, लवचिक सूक्ष्मद्रव्याच्या स्वरूपाचा नाहीं किंवा मूळ शुद्ध सत्ताद्रव्याच्या शाश्वत सत्य स्वरूपाचा तर नाहींच नाहीं. मनाचा त्याच्या विषयांशीं संपर्क झाला म्हणजे जी अनुभूति मनाला येते, त्या अनुभूतीला संवेदना असें आम्ही म्हणतों. अनेकतेच्या संपूर्ण सिद्धीसाठीं ही संवेदना, बाह्य संवेदना असावी लागते, स्थूल असावी लागते, संपर्कविषयाची बाह्य वास्तवता सहज पटण्यासारखी, स्थायी भौतिक असावी लागते. तेव्हां, सच्चिदानंद अतिमानसाच्या द्वारां खालीं उतरलें, मनांत आणि प्राणांत त्यानें वसति केली कीं त्याचें शाश्वत शुद्ध ''द्रव्या''चें स्वरूप जाऊन, त्याला अशाश्वत भौतिक स्थूल द्रव्याचें स्वरूप अपरिहार्यपणें येतें. आपलें उच्च क्षेत्र सोडून खालच्या क्षेत्रांत जाऊन, अस्तित्वाचा, जीवनाचा अनुभव घ्यावयाचा व अनेक, अनंत जीव आणि त्यांच्या अलग अलग ज्ञानकेद्रांतून, जाणीव-केंद्रांतून विश्वांतील वस्तुंचा, घटनांचा अनुभव घेणें अशी त्या अनुभवाची पहिली श्रेणि असावयाची -- असा निर्णय एकदां सच्चिदानंदानें घेतला, कीं वर सांगितल्याप्रमाणें, त्याला म्हणजे त्याच्या शुद्ध ''द्रव्याला'' भौतिक द्रव्याचें स्वरूप येणें अपरिहार्य होतें. वस्तुजाताचा पाया जें चैतन्य, आत्मा आहे, तिकडे वळून आतां आपण या विश्वांतील द्रव्याची चिकित्सा करूं -- विश्वगत वस्तूंच्या आध्यात्मिक मुळाकडे आपण

 

पान क्र. ४४०

 

वळलों म्हणजे अगदीं शुद्धातिशुद्ध अवस्थेंतील विश्वद्रव्य, हें शुद्ध जाणीवयुक्त सत्ता आहे, स्वयंभू, स्वभावत: स्वतःचें ज्ञान असणारी, ''मी स्वयंभू सत्ता आहे'' असें तादात्म्याचें ज्ञान असणारी सत्ता आहे, असें आपल्या अनुभवास येतें -- या अतिशुद्ध स्थितींत स्वयंभू सत्ता आपल्या जाणिवेनें स्वतःकडे एक जाणिवेचा विषय म्हणून बघूं लागलेली नसते. शुद्ध ज्ञानमय सत्ता ही विश्वद्रव्याची अगदीं मूळ अवस्था. यानंतर त्याच्या खालीं अतिमानसाचा प्रांत असतो; येथें तादात्म्याचें, एकरूपतेचें, एकतेचें आत्म-ज्ञान पूर्वींसारखेंच कायम असतें. अतिमानसाच्या आत्म-विषयक जाणिवेचें सार व त्याच्याकडून जें स्वतःच्या निमितीचें कार्य घडतें, त्या कार्याला अवश्य असणारा प्रकाश, तादात्म्यज्ञानांतच असतो. मात्र येथें जें निमितीचें कार्य करावयाचें असतें, त्यासाठीं अतिमानस हें शुद्ध सत्तेला आपल्या क्रियाशील, क्रियाप्रवण जाणिवेचा विषय आणि विषयी करीत असतें -- ज्ञान ज्ञेय व ज्ञाता अशी त्रिपुटी येथें उत्पन्न होते. एक ज्ञाता वा अनेक ज्ञाते, एक ज्ञेय वा अनेक ज्ञेयें अशी एकता आणि अनेकताहि ज्ञेय आणि ज्ञाता यांच्या संबंधांत अतिमानसांत अस्तित्वांत येते. अतिमानसिक श्रेष्ठ-ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. १) सर्वसमावेशक, समग्रबोधात्मक २) ज्ञातृ-ज्ञेय-भेदात्मक, किंवा अ-समग्रबोधात्मक. समग्रबोधात्मक ज्ञानांत शुद्ध सत्ता आपल्या पोटांत स्वत: सर्वच्या सर्व ज्ञानविषय असते व स्वत: सर्वच्या सर्व ज्ञाता पण असते. ज्ञातृ-ज्ञेय-भेदात्मक (अ-समग्रबोधात्मक) ज्ञानांत शुद्ध सत्ता, एक ज्ञानविषय किंवा अनेक ज्ञानविषय (पदार्थ) या रूपानें केंद्रीय शुद्ध सत्तेच्या समोर ठेवण्यांत येते; येथें विशाल वर्तुल व त्याचें केंद्र, अशी ज्ञानक्षेत्राची वांटणी करण्यांत येऊन, केंद्रांत (दर्शन केंद्रांत) शुद्ध सत्ता ही ज्ञाता, साक्षी, पुरुष या रूपांत एका अंशानें स्थिर होते आणि आपल्या ज्ञानवर्तुलाच्या परिघाच्या पोटांत आपलाच दुसरा अंश, एक किंवा अनेक पदार्थ या रूपानें ज्ञानविषय म्हणून दूर उभा करते. वरील समग्र आणि असमग्र ज्ञानक्रिया एकाच वेळीं होत असते. जी अ-समग्र बोधात्मक किंवा ज्ञातृ-ज्ञेय-भेदात्मक अशी जाणीव असते, तिच्यांतून पुढें मनाची प्रक्रिया निघते. या प्रक्रियेंत व्यक्ति हा ज्ञाता असतो आणि तो स्वत:च्या विश्वव्यापी अस्तित्वाच्या कोणत्याहि रूपाला वेगळेपणानें आपला ज्ञानविषय म्हणून ओळखतो -- मन दिव्य अवस्थेत असतें तेव्हां या प्रकियेबरोबरच दुसरी प्रक्रियाहि घडत असते -- व्यक्ति आणि व्यक्तीचा ज्ञानविषय दोघांची एकता, दोघांच्या अस्तित्वाचा अभेद, हा या दुसऱ्या पूरक

 

पान क्र. ४४१

 

ज्ञानप्रक्रियेचा पुकार असतो. या दोन प्रक्रिया एकाच वेळीं घडत असल्यानें दिव्य मनांत भेदाचें ज्ञान हें ज्ञात्याला सर्वस्वीं 'खरें ज्ञान' असें भासतच नाहीं, एक क्षणभरहि त्याचा असा गैरसमज होत नाहीं. ही झाली अतिमानसाच्या पोटांतील दिव्य मनाची गोष्ट. मन दिव्यता टाकून भेदनिष्ठ बनलें, म्हणजे ज्ञानविषय आणि ज्ञाता यांच्या एकीकरणाचें जें कार्य जाणीवपूर्वक घडत होतें व अभेद स्थापित होत होता तें कार्य घडत नाहीं -- व्यक्ती वेगळ्या वेगळ्या आहेत अशी या भेदनिष्ठ मनाची जाणीव असते आणि येथें व्यक्तीचा व्यक्तीशीं वा वस्तुशीं संपर्क घडला असतां, मनाला बाह्य विषयाची संवेदना झाली असें आपण म्हणतो. अर्थात् ही संवेदना विकृत ज्ञान देणारी व अज्ञानपूर्ण अशी असते, ही गोष्ट आपण लक्षांत ठेवणें अवश्य आहे. या मानसिक संवेदनेंत भेदाच्या जाणिवेला प्रमुख स्थान असतें; अभेदाच्या, एकतेच्या जाणिवेला गौण स्थान असतें. या संवेदनेवर विचारशील मन विचार करून, भेद ही गोष्ट गौण आहे आणि अभेद, एकता ही गोष्ट प्रमुख आहे, अशा निर्णयाला येतें. मूळ एकतेंतून जी अनेकता उदय पावली (अ-दिव्य मनाच्या व्यापारानें) ती अनेकता अ-दिव्य मनाच्या विचारशील चिकित्सेनें पुन: आपलें गौण स्थान घेते आणि एकतेला, अभेदाला पूर्वींप्रमाणें प्रमुख स्थान बहाल करते. तथापि अभेद हा स्थिरपणें प्रस्थापित व्हावयाचा, तर अ-दिव्य मनाच्या वर अतिमानसाच्या क्षेत्रांत पाऊल टाकावें लागतें हें सांगणें नकोच. या सर्व विवरणाचा इत्यर्थ हा कीं, द्रव्य (अर्थात् भौतिक द्रव्य) हें जाणीवयुक्त मूळ सत्तेच्या, संवेदनशील मनाला घडणाऱ्या संपर्काचें रूप आहे. या मूळ सत्तेची ज्ञानक्रिया, ज्ञानप्रक्रिया हें मनाचें स्वरूप आहे.

मनाला, त्याच्या संवेदनेला जाणीवयुक्त सत्तेचें द्रव्य जें अनुभवास येतें, तें त्याच्या स्वाभाविक समग्रतेनें, एकतेनें अनुभवास येत नाहीं, तर मनाच्या स्वभावधर्मानुसार या द्रव्याची विभागणी मन करीत असतें. अगदीं सूक्ष्म कण किंवा अणू या रूपानें, मनाच्या संवेदनेला मूळ सत्ताद्रव्य भासतें; हे कण किंवा अणू किंवा बिंदू जोडून जोडून मन त्यांचे समूह, समुदाय बनवितें -- आणि या कणांत आणि कणांच्या गणांत विश्वमन उडी घेऊन स्थायिक होतें. सत्य-कल्पनामय अतिमानसाचें कार्यकारी अंग, या नात्यानें हें विश्वमन स्वाभाविक निर्माणशक्तीनें भरलेलें आणि निर्मितिप्रवण असतें. कणांत आणि कणांच्या गणांत, त्याला ज्या ज्या

 

पान क्र. ४४२

 

अनुभूती येतात, त्या त्या अनुभूतींचा उपयोग करून त्यांतून जीवनशक्ति उत्पन्न करणें, हा त्याचा (विश्वमनाचा) स्वभावधर्म असतो; सर्वमय सत्तावान् मूळ पुरुष सच्चिदानंद, स्वविषयक सर्व अनुभूती घेऊन त्यांतून शक्तीचे विविध प्रकार -- स्वतःच्या जाणीवयुक्त मूळ निर्मितिसामर्थ्याचे विविध प्रकार -- बनवितो, तशीच ही विश्वमनाची गोष्ट आहे; आपल्या सर्वगत, सर्वव्यापी अस्तित्वाचे, कणागणिक आणि कणगणागणिक जे अनेक दृष्टिबिंदू, दृष्टिकोन विश्वमनाला मूळ सत्ताद्रव्याच्या विभागणीनें प्राप्त होतात, त्यांतून विश्वव्यापी जीवनाचे तितकेच दृष्टिकोन तें तयार करतें : जड द्रव्याच्या पोटांत लाभलेले कणांचे वा अणूंचे दृष्टिकोन, अणुगत अणुमित अस्तित्वाचीं रूपें जीवनद्वारां घडविण्यासाठीं विश्वमन उपयोगांत आणतें -- हीं रूपें, जीवनानें स्वभावतःच भरलेलीं असतात आणि तीं बनविण्याची प्रेरणा देणाऱ्या संकल्पयुक्त मनाकडून त्यांचें शासन होत असतें. हे अणुपुरुष किंवा या अणु-वस्तू स्वतःच्या स्वभावधर्मानुसार गण करतात; हे गण, ते घडणाऱ्या गुप्त जीवनानें आणि ते घडण्याची प्रेरणा देणाऱ्या या गुप्त संकल्पयुक्त शासनधर्मी मनानें, व्यापलेले असतात -- या गणांपैकीं प्रत्येक गण, आपलें स्वतंत्र वेगळें व्यक्तिगत अस्तित्व आहे अशी अवास्तव कल्पना मिरवीत असतो. अशा प्रत्येक स्वतंत्र वस्तूंत किंवा जीवयुक्त अस्तित्वांत, मन अप्रकट किंवा प्रकट, गुप्त किंवा उघड वावरत असून, या मनाच्या स्वरूपानुसार त्याजमध्यें किंवा तिजमध्यें 'जड यांत्रिक मी' अथवा 'जाणीवयुक्त मी' रहातो व त्या वस्तूला किंवा जीवाला आधार देतो. 'जड यांत्रिक मी' हा जडशक्तीचा 'मी' असतो; त्याजमध्यें अस्तित्व टिकविण्याची इच्छाशक्ति निःशब्द आणि बंधनगत असली, तरी आपल्या कार्यापुरती पूर्ण समर्थ असते; जाणीवयुक्त मी हा मनोमय व स्वतःला जाणणारा असा असतो; बंधनमुक्त, ज्ञानयुक्त स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याच्या उद्देशानें अस्तित्व टिकविण्याची त्याची इच्छाशक्ति कृतिशील अशी असते.

जडद्रव्याची कथा वरीलप्रमाणें आहे. जड अणू अस्तित्वांत येतात ते विश्वमनाच्या क्रियाविशिष्टतेमुळें अस्तित्वांत येतात; विश्वमनाच्या व्यापाराचा स्वभावधर्म या जड अणूच्या मुळाशीं आहे; जडद्रव्य मूळ आहे, शाश्वत आहे आणि त्याचा विशिष्ट प्रकारचा मूळ शाश्वत नियम, जड अणु अस्तित्वांत आणतो अशी वस्तुस्थिति नाहीं. जड द्रव्य हें उत्पन्न केलें जातें -- मुळांत जड कांहीं नाहीं. या जड द्रव्याच्या

 

पान क्र. ४४३

 

उत्पत्तीसाठीं मूळ अनंत जाणीवयुक्त सत्तेचें (सत्ताद्रव्याचें) आत्यंतिक विभजन, अत्यंत सूक्ष्म तुकडे करणें अवश्य होतें; अनंताचा अनंतांश हाच जडाचा पाया वा मूळारंभ आहे. विरळ, अति विरळ आकाशतत्त्व हा जडाचा मूळारंभ, मूळ आधार म्हणून असूं शकतें व आहे; पण तें इतकें सूक्ष्म आहे कीं आत्मतत्त्वांत व त्याच्यांत फरक करणें अवघड पडतें; त्याच्या अतिसूक्ष्मतेमुळें भौतिक द्रव्य म्हणून, रूपात्मक सत्ता म्हणून, त्या आकाशतत्त्वाचें वर्गीकरण करणें ही गोष्ट आजच्या आमच्या ज्ञानाला तरी अशक्य आहे. आमच्या दृष्टीला दिसूं शकणारा, अणुसंघ वा साकार अणु घ्या आणि तो फोडून फोडून त्याचे निराकार मूळ सारभूत अणू करा -- सत्तेची अतिसूक्ष्म कणांची धूळ असें रूप तुमच्या साकार अणूला येईल असे त्याचे तुकडे करा -- असें केलें तरी अत्यंत सूक्ष्म कां होईना पण अणुभूत जडद्रव्यच तुमच्या खटाटोपानें निर्माण होईल; कारण हा खटाटोप करणारें मन आणि जीवनशक्ति (प्राणशक्ति) यांचा स्वभावधर्मच त्यांना, जडअणूच्या पलीकडे असणारें, अजड चैतन्यक्षेत्र, अणुशून्य सर्वशून्य शुद्ध एकरस जाणिवेचें क्षेत्र गांठूं देत नाहीं : साकार अणूचे अतिसूक्ष्म अंश, साकार अणूप्रमाणें स्थिर नसतील -- तरीपण ते अत्यंत अस्थिर निराकार अणुसारखे साकार होण्याच्या प्रयत्नांत राहतील; शक्तीच्या प्रवाहाचा आघात सारखा होत असल्यानें, निराकार अणू पुन: पुन: आकाराला येतील, पुन: पुन: निराकार होतील एवढेंच; ते कांहीं निरणुत्व पावणार नाहींत, तें कांहीं चैतन्यांत विलीन होणार नाहींत; कारण मन आणि प्राण हे त्या अणूंचे जन्मदाते आहेत आणि ते त्यांना चैतन्यांत विलीन करूं शकत नाहींत. ज्यामध्यें अणू-अणूंचा संयोग नाहीं असा द्रव्याचा अणूविरहित क्षेत्रविस्तार, आणि अवकाशांत अणूंची वांटणी झाल्यानें जें सह-अस्तित्व शक्य होतें, त्या सह-अस्तित्वावेगळें सह-अस्तित्व, या गोष्टी शुद्ध अस्तित्व, शुद्ध द्रव्य यांच्या संबंधांत वास्तव गोष्टी आहेत. या गोष्टी अतिमानसाच्या ज्ञानाच्या, त्याच्या कार्यकारी निर्मितिशील तत्त्वाच्या गोष्टी आहेत. विभजनशील मनाची निर्मिति करणारी, कल्पना ही वेगळी वस्तु आहे; अतिमानसिक ज्ञान आणि निर्माणतत्त्व (व्यापार तत्त्व) यांहून वेगळी वस्तु आहे; मन जेव्हां आपलें निर्माणकार्य करतें, तेव्हां या कार्याच्या पाठीमागें अतिमानसिक ज्ञान व निर्माणतत्त्व कार्यकारी असतें हें मनाला कळूं शकतें. जडद्रव्याच्या

 

पान क्र. ४४४

 

मुळांत जी सत्य वस्तु आहे, ती वरील अतिमानसिक ज्ञान आणि क्रिया होय. परंतु जडद्रव्य म्हणून ज्याला आम्ही नांव देतो, जें आमच्या दृष्टीला दिसतें, तें वेगळी वस्तु आहे -- तें शुद्ध अस्तित्व नव्हे, मूळ जाणिवेचा विस्तार नव्हे; (शुद्ध अस्तित्व हें अतिमानसिक ज्ञानरूप असतें आणि त्याचा विस्तार हा त्या ज्ञानाचा विस्तार असतो.) जडद्रव्य, प्राण आणि मन ही शुद्ध अस्तित्व आणि शुद्ध (ज्ञानमय) विस्तार यांच्याशीं एकरूप होऊं शकतात; पण ही एकरूपता स्थितिशील शुद्ध अस्तित्वाशीं वा शुद्ध विस्ताराशीं होऊं शकते -- हें शुद्ध अस्तित्व व विस्तार गतिशील होऊन, आत्म-अनुभूति व रूपात्मक सत्यनिर्मिति या क्रियांत, आपलें मूळ एकत्व कायम ठेवतात -- सर्व अनुभव व सर्व रूपे एकाचीच आहेत, ही जाणीव शुद्ध अस्तित्वाच्या व शुद्ध विस्ताराच्या क्रियाशीलतेंतहि कायम टिकते; तसें मन, प्राण, जडद्रव्य यांच्या व्यापारांत होऊं शकत नाहीं; त्यांच्या व्यापारांत अनेकतेचा प्रादुर्भाव होतो.

तेव्हां जड द्रव्यासंबंधानें आपल्याला पुढील सत्य मांडतां येतें : शुद्ध अस्तित्व हें ज्ञानमय, कल्पनामय आत्मविस्तार करतें, विश्वामध्यें हाच कल्पनामय शुद्ध-अस्तित्व-विस्तार द्रव्याचें किंवा जाणिवेच्या विषयाचें रूप धारण करतो; विश्वमन आणि विश्वप्राण आपल्या निर्मितिशील व्यापारानें, या मूळ ज्ञानमय ज्ञानविषयाला, मूळ कल्पनाद्रव्याला, अणुमय विभागणी व अणुमय संयोग या आपल्या क्रियांच्या द्वारां, आम्हीं ज्याला जडद्रव्य म्हणतो त्या द्रव्याचें रूप देतात. हें जडद्रव्य, मन आणि प्राण यांच्याप्रमाणें शुद्ध सत्ता किंवा ब्रह्मच असतें; ब्रह्मच आपलें आत्म-निर्मितीचें, आत्म-आविष्काराचें कार्य करतां करतां मन व प्राण यांच्या नंतर हें जडद्रव्याचें रूप घेतें. जाणीवयुक्त सत्ता (मूळ पुरुष) ज्या शक्तीनें युक्त असते, त्या शक्तीचा, तिचा मनानें योजलेला आणि प्राणानें बनविलेला आकार म्हणजे जडद्रव्य -- जडद्रव्याच्या पोटीं त्याचें वास्तव रूप जी जाणीव ती असते; ही जाणीव त्या जडद्रव्याला गुप्त असते, त्यापासून लपलेली असते; ही जाणीव स्वतःला आकार देण्याच्या कार्यांत तल्लीन होऊन, त्या आकारांत लपून स्वतःला त्या आकारापुरती विसरून जाते. जडद्रव्य वस्तुत: या स्वरूपाचें असल्यानें तें कितीहि ज्ञानशून्य वा संवेदनाशून्य दिसलें, तरी त्यांत दडलेल्या जाणिवेला, तिच्या आंतर अप्रकट अनुभूतीला तें वेगळ्या प्रकारें भासते -- गुप्त जाणिवेच्या संवेदनेचा विषय झालेला शुद्ध अस्तित्वाचा आनंद, हें रूप त्या

 

पान क्र. ४४५

 

जड द्रव्याला त्या गुप्त जाणिवेच्या दृष्टीनें असतें. हा आनंद त्या गुप्त जाणिवेला आपला भोग घेण्याची स्फूर्ती देऊन; या स्फूर्तीमुळें निर्माण झालेल्या वासनेच्या आकर्षणानें तिला प्रकट रूप घ्यावयास लावतो, तिला तिच्या गुप्त स्थानांतून वर आणतो. शुद्ध सत्ता द्रव्यरूपानें प्रकट झालेली, या सत्तेची शक्ति साकार झालेली, या सत्तेच्या अप्रकट आत्मजाणिवेनें प्रकट मूर्त रूपानें आत्म-अभिव्यक्ति केलेली, या सत्तेचा आनंद तिच्या स्वतःच्या जाणिवेला तिचा भोगविषय म्हणून तिच्यापुढें सतत उभा असलेला -- असा हा जडपदार्थ सच्चिदानंद नव्हे तर दुसरें काय आहे ! तेव्हां जडद्रव्य, जडपदार्थ हा सच्चिदानंद होय : मूळ सच्चिदानंदाला, त्याच्या अवतरणक्रमांत मन आणि मानसिक अनुभूति लाभली कीं या त्याच्या अनुभूतीला 'जड सच्चिदानंद' हा, मूर्त ज्ञान, क्रिया व अस्तित्वानंद यांचा साकार मूलाधार या रूपानें अनुभवास येतो.

 

पान क्र. ४४६

 

प्रकरण पंचविसावे

 

जडाची गांठ

 

जडशक्ति किंवा द्वंद्व यांना प्रमाण मानून मला प्रकाशमय ईश्वररूप सत्याकडे प्रवास करतां येत नाहीं; ... असत्याच्या पायाचें संरक्षण करतात ते कोण ? असत्य विश्वाची राखण करतात ते कोण ?

--- ऋग्वेद ५.१२.२-४

 

तेव्हां सत् (अस्तित्व) नव्हतें, असत् (अनस्तित्व) हि नव्हतें; तेव्हां अंतरिक्ष नव्हतें, आकाश नव्हतें, त्याच्या पलीकडे असणारें तेंहि नव्हतें; सर्व आच्छादणारें तेव्हां काय होतें ? तें होतें तें कोठे होतें ? कोणत्या आश्रयाला होतें ? घन अंधकारमय आणि खोल खोल असा तो महासागर -- तो काय होता ? तेथें मरण नव्हतें, अमरत्व नव्हतें, दिवस-रात्र हें ज्ञान नव्हतें. एक अद्वितीय तत्त्व तेव्हां होतें -- त्याचें जीवन श्वासोच्छ्वासावाचून चालत होतें, त्याच्या जीवनाचा नियम त्याचा स्वतःचा स्वनिर्मित होता, त्यावांचून दुसरें कांहीं नव्हतें, त्याच्या पलीकडेहि कांहीं नव्हतें. आरंभीं अंधकार होता, त्याला अंधकाराचेंच आवरण होतें; नेणिवेचा महासागर असा हा आरंभींचा सर्व प्रकार होता -- विश्वव्यापी एकसत्ता (अस्तित्व) भागाभागांच्या ढिगाऱ्यांत लपली होती. त्या एकसत्तेच्या महान् शक्तीच्या प्रभावानें, तें एक अद्वितीय तत्त्व जन्मास आलें. प्रथम तें अंतरांत वासनेच्या रूपानें हालचाल करीत होतें; मनाचें मूळ बीज या वासनेंत होतें -- या वासनेंतून मनाची उत्पत्ति झाली. सत्यद्रष्ट्या ऋषींनीं हा शोध लावला कीं, असत् मध्यें सत् ची जी जी उभारणी झाली, ती हृदयांतील इच्छाशक्तीनें आणि विचारानें झाली; इच्छा आणि विचार यांचा किरणमय प्रकाश एका समपातळींत पसरत गेला. या पातळींच्या खालतीं काय होतें ? तेथें बीज टाकणारे होते, तेथें महान् आत्मे होते -- खालतीं आपापला 'स्वधर्म' होता, वरतीं महान् इच्छाशक्ति होती.

- ऋग्वेद १०.१२९.१ ते ५

 

पान क्र. ४४७

 

आमचा व्यवहारांतील अनुभव आणि आमच्या मनाची दीर्घकाळची संवय यांनीं, चैतन्य (सच्चिदानंद) आणि जड द्रव्य यांच्यामध्यें तीव्र भेदाची विभक्ततेची भिंत उभी केली असली, तरी ही भिंत, हा भेद, ही विभक्तता मूलत: सत्य नाहीं, अशा निर्णयाला आपण, आपल्याला उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारानें आलों आहों. विश्व ही 'एक' वस्तु आहे, त्यांतील भेद हे एकतेच्या पोटांत आहेत; विश्व ही विविधतामय एकता आहे; एकता ही प्रमुख आहे, विविधता एकतेच्या पोटांत आहे. शाश्वतचे विसंवाद, बेसूर आणि त्यांच्यामध्यें तडजोड घडवून आणण्याचा सारखा चाललेला प्रयत्न, हें कांहीं विश्वाचें खरें स्वरूप नव्हे; कधींहि अन्योन्यांचा मेळ होणार नाहीं अशा विरोधी गोष्टी आणि त्यांच्यामध्यें चालणारा कायमचा झगडा, हें कांहीं विश्वाचें खरें स्वरूप नव्हे. एकतत्त्वाची अटळ एकता आणि या एकतेनें निर्माण केलेली अनंत विविधता, असा विश्वाचा मूळ पाया आणि आरंभ आहे; त्याची मधली स्थिति, या स्थितीचें खरें स्वरूप असें आहे : दर्शनी भेद आणि झगडा आहे, त्याच्या पाठीमागें सारखा समन्वय, मेळ होत आहे; सर्व प्रकारचें वैषम्य व वैमनस्य असलेले या मेळांत मोठ्या ध्येयांसाठीं एकत्र होत आहेत; हीं मोठीं ध्येयें एका गुप्त जाणिवेकडून आणि संकल्पशक्तीकडून ठरविलीं जात आहेत आणि तिजकडूनच मेळहि घडविला जात आहे -- ही ज्ञानयुक्त गुप्त संकल्पशक्ति एकच एक असून, ती तिच्याकडून घडणाऱ्या गुंतागुंतींच्या व्यापारावर पूर्ण हुकमत चालविणारी आहे : ही विश्वाची मधली स्थिति आहे -- आरंभ आणि मधली स्थिति ही अशी असल्यानें आम्हांला अशा अनुमानास जागा आहे कीं, विश्वाची अंतिम स्थिति पुढीलप्रमाणे होईल -- जाणीवयुक्त संकल्पशक्ति उदयास आली आहे, तिची पूर्णता होणार, ती पूर्णतेला प्राप्त होणार आणि सर्वत्र सुसंवाद प्रस्थापित होणार. जाणीवयुक्त संकल्पशक्तीनेंच द्रव्य हें रूप घेतलेलें आहे. या तिनें घेतलेल्या रूपावरच तिची क्रिया चालत असते; ह्या द्रव्यरूपाचें एक टोंक जडद्रव्य आणि दुसरें टोंक चैतन्य किंवा आत्मद्रव्य होय. या दोन वस्तू अभिन्न आहेत, एकरूप आहेत : जडद्रव्य म्हणून ज्या वस्तूची संवेदना आम्हांस होते, त्याचें वास्तव सत्य-गर्भ 'चैतन्य' हें आहे; ज्याला आम्ही चैतन्य म्हणून ओळखतों, त्याचा दृश्य आकार, त्याचा देह 'जड-द्रव्य' हें आहे.

तथापि ही गोष्ट खरी आहे कीं, चैतन्य आणि जडद्रव्य यांच्यामध्यें

 

पान क्र. ४४८

 

व्यवहारांत पुष्कळच भेद आहे; हा मोठा भेद असल्यानें विश्वांतील अस्तित्वाची एक माला झाली आहे, ही माला अर्थात् अविभाज्य माला आहे; या मालेंत एकाहून एक चढत्या दर्जाचें विश्वगत अस्तित्व गुंफलेलें आहे. द्रव्य म्हणजे जाणीवयुक्त सत्ता (अस्तित्व), संवेदनेचा विषय होणारें, संवेदनेपुढें एक पदार्थ म्हणून उभें राहणारे, जाणीवयुक्त अस्तित्व (चैतन्य); संवेदनेपुढें उभें राहणाऱ्या द्रव्याचा आणि संवेदनेचा जो कांहीं संबंध उत्पन्न होईल, तो संबंध पायाभूत धरून विश्वाची बांधणी करण्यांत येते, विश्वाची प्रगति घडविण्यांत येते. संवेदना आणि द्रव्य यांच्या मध्यें एकच प्रकारचा अपरिवर्तनीय संबंध उत्पन्न होतो अशी कांहीं वस्तुस्थिति नाहीं. वस्तुस्थिति अशी आहे कीं, या संबंधाची एक मालाच आहे; या मालेंत एकापेक्षां एक चढता, एकापेक्षां एक विकसित संबंध गुंफलेला आहे. आमचें स्थूल भौतिक जडद्रव्य ही जणुं आमच्या स्थूल शारीर संवेदनेची किमया आहे. शुद्ध मन ज्या द्रव्यांत काम करतें, तें द्रव्य या द्रव्याहून वेगळें आहे; मनाचें स्वाभाविक कार्यक्षेत्र असलेलें हें द्रव्य, आमच्या स्थूल जडद्रव्यापेक्षां कितीतरी सूक्ष्म, कितीतरी लवचिक, कितीतरी मृदु असतें. मनाचें द्रव्य असा शब्दप्रयोग आम्ही करूं शकतो, कारण या मनाच्या द्रव्यांत आकार तयार होतात, क्रिया चालतात (आमच्या शारीर द्रव्याप्रमाणें); या दोन द्रव्यांखेरीज शुद्ध गतिशील प्राणशक्तीचेंहि द्रव्य असतें; हें प्राणद्रव्य, अतिसूक्ष्म भौतिक द्रव्याहून निराळें असतें, या भौतिक सूक्ष्म द्रव्यापासून निघणाऱ्या स्थूल संवेदनाग्राह्य शक्तिप्रवाहाहून हें प्रवाही प्राणद्रव्य अधिक सूक्ष्म व वेगळें असतें, चैतन्य हें स्वत: शुद्ध द्रव्य, मूल शुद्ध सत्तेचें द्रव्यच आहे; अर्थात् येथें शारीर, प्राणिक किंवा मानसिक संवेदना यांच्यासमोर शुद्ध सत्ता उभी राहून त्यांचा विषय होऊन, स्वतांत द्रव्यत्व आणीत नाहीं -- येथें शुद्ध आध्यात्मिक संवेदनाशील ज्ञानाचा प्रकाश आणि शुद्ध सत्ता यांचा विषय-विषयी संबंध घडतो; या आध्यात्मिक ज्ञानप्रकाशाचा विषय होऊन शुद्ध सत्ता स्वतांत द्रव्यत्व आणते -- या ज्ञानावस्थेंत विषयी आणि विषय अगदीं एकरूप असतात, विषयीच आपल्या स्वतःचा विषय होतो -- शुद्ध ज्ञानमय सत्ता स्वतःचाच विषय होऊन द्रव्यत्व पत्करते : मूळ शुद्ध ज्ञानमय सत्ता कालस्थलातीत असते, तिचा शुद्ध आध्यात्मिक आत्मकल्पित आत्मविस्तार ती आपल्या जाणिवेसमोर धरून, त्या जाणिवेचें विषयत्व त्या आत्मविस्ताराला ती देते आणि याप्रमाणें त्याला द्रव्यत्व अर्पण

 

पान क्र. ४४९

 

करून, या मूळ द्रव्यानें, सर्व अस्तित्वाचा मूळ पाया घालते. या पायाच्या पलीकडे वरतीं विषय-विषयी, ज्ञाता-ज्ञेय हा जाणीवपुर:सर भेद सर्वथा नष्ट होतो; तेथें दोहोंत पूर्ण एकता, समरसता नांदते, तेथें द्रव्य हा शब्द आम्ही वापरूं शकत नाहीं.

तेव्हां, शुद्ध आध्यात्मिक विषय-विषयी या भेदाच्या कल्पनेंतून द्रव्य हें आरंभीं निर्माण झालें; शेवटीं हा आध्यात्मिक काल्पनिक भेद, स्थूल व्यावहारिक स्पष्ट भेदांत रूपांतर पावला आणि या रीतीनें प्रथम चैतन्य किंवा शुद्ध सत्ताद्रव्य, नंतर मानसिक द्रव्य, प्राणिक द्रव्य व शेवटीं स्थूल भौतिक द्रव्य, अशी द्रव्यांची माला तयार झाली. हीच माला खालून वर जातांना स्थूल भौतिक द्रव्य, प्राणिक द्रव्य, मानसिक द्रव्य आणि शेवटीं शुद्ध चैतन्यद्रव्य अशी प्रत्ययास येते. याप्रमाणें द्रव्यांची अनेकता विश्वांत दिसली, तरी येथें वस्तुत: एकच एक ब्रह्म वस्तु आहे आणि ही ब्रह्माची एकता केव्हांहि नाहींशी होत नाहीं. आपण विकासक्रमानें चढत चढत, अखेर वस्तुजाताकडे मूळ पूर्ण दृष्टीनें पाहूं लागलों, म्हणजे आपणांला असें दिसतें कीं, ब्रह्माची एकता अणुभरदेखील उणी झालेली नाहीं, सदोष झालेली नाहीं -- अगदीं भौतिक द्रव्याच्या स्थूलांत स्थूल, अलग अलग पडलेल्या कठीण बनावटीच्या वस्तू पाहिल्या, तरी तेथेंहि ब्रह्माची मूळ एकता प्रत्ययास येते. विश्वाचें मूळ कारण (कर्ता) ब्रह्म, त्याचा आधार ब्रह्म, त्यांत अंतर्यामित्वानें राहणारें ब्रह्म -- या गोष्टी तर खऱ्याच आहेत -- पण विश्वाचें घटकद्रव्य देखील ब्रह्म आहे -- आणि ब्रह्मच केवळ आहे, दुसरें कांहीं नाहीं, ही गोष्टहि नितांत सत्य आहे. भौतिक जडद्रव्य हें ब्रह्म आहे, ब्रह्माहून तें वेगळें नाहीं. भौतिक द्रव्य आणि चैतन्य यांची फारकत झालेली असती, यांचा संबंध सर्वस्वीं तुटला असतां, यांचा कांहींच संबंध नसतां, तर भौतिक द्रव्य हें ब्रह्म आहे असें म्हणतां आलें नसतें -- पण आपण हें पाहिलें आहें कीं, ईश्वरी सत्तेचा (अस्तित्वाचा) शेवटला आकार म्हणजे भौतिक द्रव्य आहे, ज्ञेयरूप ईश्वरी सत्ता ही शेवटीं भौतिक द्रव्य होते; या द्रव्याच्या पोटीं ईश्वर सर्वांशानें राहतो, नित्य राहतो; या द्रव्याच्या पाठीमागेंहि त्याचा सर्वांशानें नित्य निवास असतो; म्हणून भौतिक द्रव्य हें ब्रह्म आहे, ब्रह्माहून दुसरें, वेगळें कांहीं नाहीं असें म्हणणें पूर्ण सत्य आहे. स्थूल भौतिक द्रव्य दिसावयाला ज्ञानशून्य, गतिशून्य असें असलें, तरी त्यांत सर्वत्र आणि सर्वदा प्राणशक्तीचा महान् कार्यकारी सांठा स्वभावत: भरलेला

 

पान क्र. ४५०

 

आहे; ही कार्यकारी प्राणशक्ति दिसावयाला जाणीवशून्य असली, तरी तिच्या पोटीं सदा कार्यमग्न गुप्त असें मन असतें; तें मन ज्या गुप्त क्रिया करतें, त्या क्रियांनीं प्रकट होणारी शक्ति म्हणजेच प्राणशक्ति होय. प्राणयुक्त शरीरांतील हें मन अज्ञानपूर्ण, प्रकाशहीन, चांचपडत काम करणारें असतें, तरीपण त्याला अतिमानसाचा आधार असतो; अतिमानस हें मनाचा खरा आत्मा असतें, तें मनाला आधार देतें आणि सर्वशासक या नात्यानें त्याला मार्ग दाखवितें, त्याच्या वाटाड्याचें काम करतें; हें अतिमानस ज्याप्रमाणें मनाच्या पोटीं असतें, त्याप्रमाणें मनाच्या खालच्या भौतिक स्थूल द्रव्याच्या पोटींहि तें असतें -- या प्रकारचें स्थूल भौतिक द्रव्य, प्राण, मन आणि अतिमानस या सर्व वस्तू ब्रह्माच्या, शाश्वत चैतन्याच्या, सच्चिदानंदाच्या भिन्न भिन्न अवस्था आहेत -- ब्रह्म या सर्व वस्तूंत वस्ती करतें एवढेंच नव्हे, तर या सर्व वस्तू स्वरूपतः ब्रह्मच आहेत; ब्रह्मच या सर्व वस्तू बनलेलें आहे; मात्र या वस्तूंपैकीं एकहि वस्तु, त्याचें सर्वातीत सर्वनिरपेक्ष स्वयंपूर्ण स्वयंभू अस्तित्व (स्वरूप) नव्हे.

ब्रह्मच भौतिक द्रव्य बनलें आहे; ब्रह्माची व भौतिक द्रव्याची ताटा-तूट झालेली नाहीं; या गोष्टी खऱ्या असल्या, तरी ब्रह्मांत आणि भौतिक स्थूल द्रव्यांत व्यवहारतः अंतर आहे, विचारत: अंतर आहे आणि या अंतरामुळें ब्रह्माची, चैतन्याची आणि स्थूल द्रव्याची फारकत झाल्यासारखी भासते; इतकी कीं, चैतन्यात्मक आध्यात्मिक जीवन आणि भौतिक जीवन ही जीवनें अन्योन्यविरोधी दिसतात. भौतिक जीवनाचा कायदा आध्यात्मिक जीवनाच्या नियमाच्या अगदीं विरुद्ध दिशेचा असतो, भासतो आणि त्यामुळें ब्रह्मवादी, अध्यात्मवादी हा भौतिक जीवनाचा त्याग करूं पाहतो, करतो; त्याला त्याच्या अडचणींतून सुटण्याची त्याग हीच एकमेव जवळची वाट वाटते -- आणि ही जवळची वाट असतेहि : पण जीवनविषयक अडचणींतून जवळची वा लांबची पळवाट काढणें हा कांहीं जीवनाचा प्रश्न सोडविण्याचा मार्ग नव्हे. तथापि ही गोष्ट खरी आहे कीं, स्थूल भौतिक द्रव्य आमच्यापुढें मोठी अडचण उभी करतें; महत्त्वाची भानगड या द्रव्यामुळेंच उत्पन्न होते; या द्रव्याचा आश्रय घ्यावा लागतो म्हणून आमचें प्राणमय जीवन दुर्वासनामय होतें, त्याला फार मर्यादा पडतात, मरण त्याच्या मागें लागतें, दुःख त्याच्या वांट्याला येतें -- या भौतिक द्रव्यामुळें आमचें मन अर्धें अधिक आंधळें होतें, त्याचे

 

पान क्र. ४५१

 

पंख तोडल्यासारखे होतात, लहानशा जागेला त्याचे पाय बांधून टाकल्यासारखे होतात -- वरतीं त्याला अमर्याद विस्तार आणि स्वतंत्रता दिसत असते पण त्याला मात्र या विस्तृत क्षेत्रापासून आणि स्वतंत्रतेपासून, त्याच्या भौतिक आश्रयानें दूर ठेवलेलें असतें. शुद्ध अध्यात्माच्या साधकाला अशा या भौतिक द्रव्याचा गाळ किळस आणतो; दुर्वासनामय जीवनाची पशुता उबग आणते, मनाची अधोमुख दृष्टि, संकुचितपणा, बंधनप्रियता त्याला असह्य होते -- आणि हें सर्व कुंपण तोडून मोडून त्यांतून पार व्हावें, कर्मत्याग करावा, मौनाचा आश्रय करावा आणि या मार्गानें चैतन्याची, मूळ आत्म्याची कर्मातीत शांति आणि बंधनातीत अवस्था पुन्हां प्राप्त करून घेऊन मोकळें व्हावें असें या साधकाला वाटतें -- त्याच्या दृष्टीनें हें त्याचें वाटणें अगदीं रास्त आहे, तदनुरूप त्याचें वागणेंहि रास्त होईल. तथापि अध्यात्माचा दृष्टिकोन म्हणजे केवळ आतां वर्णिलेला दृष्टिकोन अशी कांहीं वस्तुस्थिति नाहीं -- अध्यात्माचा याहून वेगळा दुसराहि दृष्टिकोन असूं शकतो; अनेक तेजस्वी महात्म्यांचा वरील संन्यासी दृष्टिकोन होता, म्हणून तेंच सर्वोच्च अंतिमज्ञान आहे, त्यांतच सर्वांगपरिपूर्ण अध्यात्म आहे, असें आम्हीं मानावें असें नाहीं. आम्हांला आमच्या जीवनाचा जो वैताग येतो, उबग येतो, तो सर्व बाजूला ठेवून, तटस्थ निरीक्षकाच्या दृष्टीनें विश्वाच्या दिव्य संस्थेचा अर्थ आपण तपासला पाहिजे. भौतिक स्थूल जडद्रव्य हें, आत्मा आणि आत्मसत्ता जणुं नाहींच असा देखावा उभा करतें -- ही जडाची अवजड गुंतागुंतीची गांठ आम्हांला भेडसाविते, हिसका देऊन किंवा तिजवर कसातरी जोराचा आघात करून, घाव घालून आम्ही ती तोडूं इच्छितो -- पण असा आततायीपणा न करतां, आपण या गांठीचे पदर, तिचे धागे अलग अलग करून ती सैल करण्याचा, ती योग्य रीतीनें सुटेल असा प्रयत्न करूं. त्यानें जीवनाचा प्रश्न आम्हीं सोडविला असें होईल. आततायीपणाचा आश्रय करणें म्हणजे जीवनाचा प्रश्न डावलणें आहे; असो. भौतिक जडद्रव्य काय अडचणी उत्पन्न करतें, कोणत्या आत्मविरोधी गोष्टी आत्म्याच्या समोर उभ्या करतें, त्या आपण प्रथम पाहूं : ही विरोधी बाजू मांडतांना ती पूर्णपणें, कांटेकोरपणें मांडू, तिच्यांतून कांहीं वगळावयाचें नाहीं -- उलट तिच्यांत कांहीं अधिक घालून, ती अत्युक्तीनें सजवून मांडावयाची असें धोरण ठेवूं : याप्रमाणें आत्मविरोधी भौतिक-द्रव्याचा पक्ष मांडल्यानंतर, मग हा प्रश्न कसा सोडवावयाचा तें पाहूं.

 

पान क्र. ४५२

 

भौतिक द्रव्याचे ठिकाणीं, ज्ञानमय आत्म्याला विरोधी अशी जी मूलभूत गोष्ट आहे, ती अज्ञान या तत्त्वाची परिसीमा, पराकोटी होय : स्थूल भौतिक द्रव्याचे ठिकाणीं पराकोटीचें अज्ञान आहे. सच्चिदानंदाचें ज्ञान, आपलें कार्य करतां करतां, त्या कार्याच्या या स्थूल भौतिक रूपांत स्वतःला सर्वतोपरी विसरलें आहे -- मनुष्य एखादें काम करीत असावा, त्या कामासाठीं आपल्या शक्तीचा उपयोग करीत असावा आणि या व्यापारांत त्यानें आपलें अंतरंग उत्कटपणें ओतल्यानें, स्वत: कोण आहों हें त्यानें विसरून जावें, स्वतःचें अस्तित्वहि विसरून जावें -- केवळ काम आणि कामासाठीं लावलेली शक्ति, एवढेंच क्षणभर त्याचें स्वरूप व्हावें -- तशी ही सच्चिदानंदाच्या ज्ञानाची स्थूल भौतिकांतील अवस्था आहे. सच्चिदानंदाचें आत्मचैतन्य स्वयंप्रकाश आहे, शक्तीच्या सर्व प्रकारच्या क्रिया होत असतां, त्या क्रिया प्रभुत्वानें तें चालवितें, आणि स्वतःच्या प्रभुत्वाची जाणीव त्याला असतें; या जाणिवेला कोणतीहि मर्यादा नसते. अशी सामान्यत: चैतन्याची गोष्ट असतां, स्थूल भौतिकांत मात्र तें जणुं नाहींसें झाल्यासारखें, अस्तित्वांत नसल्यासारखें होतें, वागतें; दुसरीकडे कोठें तें असेल -- पण या स्थूल भौतिक द्रव्यांत तें स्वत: नाहींसारखेंच आहे, येथें केवळ जडशक्ति, जाणीवहीन हृदयशून्य भौतिक शक्ति ठेवून, तें नाहींसें झालें आहे -- ही शक्ति नित्यशः निर्माणाचा आणि संहाराचा व्यापार चालवीत असते. तिला स्वतःचें ज्ञान नसतें; ती काय निर्मिते, निर्माणाची उठाठेव ती कशासाठीं करते, निर्माण करून निर्मिलेल्याचा संहार ती कां करते, हें कांहीं तिला कळत नाहीं; तिला मन नाहीं, म्हणून कळत नाहीं. हृदय नाहीं, म्हणून कशाचीच फिकीर वाटत नाहीं. स्थूल भौतिक द्रव्याच्या, स्थूल भौतिक शक्तीच्या व्यवहारांत हा असा देखावा असतो. वास्तविक भौतिक विश्वांत देखील खरी वस्तुस्थिति अशी नाहीं, हा सर्व देखावा खोटा देखावा आहे; याच्या पाठीमागें मन आहे, इच्छाशक्ति आहे; मन आणि मनाची इच्छा याहून थोर, याहून दिव्य असें कांहीं आहे -- अशी वस्तुस्थिति आहे; पण या भौतिक विश्वांत, त्यांतून, त्याच्या अंधारांतून जी जाणीव वर येते, प्रकट होते, त्या जाणिवेला हा अंध:कारमय देखावा सत्य म्हणूनच भासत असतो; हा देखावा सत्य नसून मिथ्या आहे, आभास आहे असें जरी असलें, तरी हा आभास अत्यंत परिणामकारी आहे -- कारण आमचें बाह्य साकार सदेह जीवन हें या आभासाच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतें; आमच्या

 

पान क्र. ४५३

 

सर्व थोर आकांक्षा व प्रयत्न या आभासानें व्यापलेले असतात, वेढलेले असतात.

भौतिक विश्वांत हा एक भयंकर निर्दयतेचा राक्षसी चमत्कार घडून येत असतो कीं, त्यांतून, त्या मनाचा अभाव असलेल्या विश्वांतून, मन नव्हे, तर मनें वर येतात, उदयास येतात व अफाट अमर्याद अज्ञान हा ज्या भौतिक विश्वाचा कायदा आहे, त्या विश्वाच्या पसाऱ्यांत हीं मनें ज्ञानासाठीं धडपड करूं लागतात; या धडपडींत कांहीं जोर नसतो; व्यक्तिश: हीं मनें अगदींच अगतिक होतात; आत्मरक्षणासाठीं हीं मनें त्यांची वैयक्तिक बळाची पुंजी एकत्र करतात, संघटित होतात, तेव्हां कोठें त्यांची आत्यंतिक वैयक्तिक अगतिकता थोडीफार कमी होते. विश्वाच्या राक्षसी अज्ञानाला हृदय नाहीं. या हृदयशून्य अज्ञानाच्या क्षेत्रांत हृदयें उदयास आलीं आहेत, त्यांना या अज्ञानाच्या कडक कायद्याच्या कक्षेंत आपली हालचाल करावयाची असते; हीं हृदयें कांहीं उच्च आकांक्षा धरतात आणि या आकांक्षामुळें त्यांचे हालहाल होतात; विश्वाच्या लोहमय व मार्दवशून्य पसाऱ्यांत, अज्ञानाची आंधळी क्रूरता धिंगाणा घालीत असते; या धिंगाण्याच्या भारानें आणि मारानें, या पसाऱ्यांत उदयास आलेलीं हृदयें चिमटून फुटून रक्ताच्या थारोळ्यांत निश्चेष्ट होतात. विश्वाची आंधळी क्रूरता या हृदयांवर आपला कायदा लादते, या हृदयांना लाभलेली जाणीव ही आंधळी क्रूरता आत्मसात करते आणि ही हृदयें मग जाणीवयुक्त क्रूरतेनें, पाशवी, भयंकर हिंस्त्र क्रूरतेनें विश्वांत वावरूं लागतात. हा देखावा एक महान् गूढ आहे; गूढ दिसणाऱ्या या महान् चमत्कारपूर्ण देखाव्याच्या पाठीमागें खरोखरी काय चाललेलें असतें? सच्चिदानंदाची जाणीव, भौतिक स्थूल द्रव्यांत स्वतःला सर्वस्वीं विसरली होती, ती आपल्या आसुरी आत्मविस्मृतींतून बाहेर येत आहे; हा बाहेर येण्याचा क्रम हळूं हळूं चालला आहे, यांत दुःखाचा अनुभव घ्यावा लागत आहे; ती जाणीव जीवरूपानें जडभूतांतून वर येत आहे, या जीवरूपांत कोठें ती वर येऊं पहात आहे, कोठें अर्धवट वर आलेली आहे; कोठें अंधुक आहे, कोठें पूर्ण आहे; अशी ही क्रमश: दुःख भोगीत, हळूं हळूं वर येणारी जाणीव, जीवांत जीवदृष्टीनें पूर्ण होऊन, नंतर आणखी वर चढण्यासाठीं धडपडत असते; पुन्हां (आरंभीं होती तशी) दिव्य आत्मज्ञानानें युक्त, पूर्ण स्वतंत्र, अमर्याद, अमर होण्यासाठीं ती धडपडत असते. पण ही खटपट ती ज्या कायद्याच्या कक्षेंत करीत

 

पान क्र. ४५४

 

असते, तो कायदा या सर्व ध्येयभूत गोष्टींच्या विरुद्ध असतो; भौतिक स्थूलाच्या, म्हणजे अज्ञानाच्या परिसरांत आणि पकडींत असतांना तिला ही खटपट करावयाची असते. स्थूल जड भौतिक, ज्ञानशून्य व अनंत तुकडे पडलेलें जडद्रव्य, हें या जाणिवेच्या हालचाली ठरवितें, तिचीं साधनें तिला तयार करून देतें -- आणि या जडानें, अज्ञानानें ठरविलेल्या क्रिया व दिलेलीं उपकरणें, प्रगतीची धडपड करणाऱ्या जाणिवेला पावलोपावलीं अज्ञानानें अडवितात, मर्यादा घालतात.

पूर्ण ज्ञानमय स्वयं-तंत्र आत्म्याला, स्थूल भौतिक द्रव्य जसें पराकोटीच्या अज्ञानानें विरोध करतें, त्याप्रमाणें पराकोटीच्या परतंत्रतेनेंहि विरोध करतें; पराकोटीचें अज्ञान, हा जसा स्थूल भौतिकाचा एक मूलभूत आत्मविरोधी गुण आहे, तसा त्याचा दुसरा मूलभूत आत्मविरोधी गुण पराकोटीची परतंत्रता हा आहे -- यांत्रिक नियमाच्या पराकोटीच्या बंधनांत स्थूल भूत काम करतें; स्थूल भूताच्या आश्रयानें असलेला आत्मा आपली मुक्तता करून घेऊं इच्छितो, पण त्याच्या प्रयत्नाला स्थूल भूताचा यांत्रिक व्यवहाराचा कायदा आड येतो, त्याची अति महान् जडता त्याच्या आश्रिताच्या मुक्तिविषयक खटपटीला महान् विरोध करते. स्थूल भौतिक द्रव्याची जडता म्हणजे गतिशून्यता नव्हे, हें द्रव्य आत्यंतिक गतीनें गतिमान् असतें; अचिंत्य शक्तीनें शक्तिमान् असतें; अमर्याद क्रियाशीलता त्याचे ठिकाणीं असते; या भौतिक द्रव्याच्या भव्य हालचाली आम्ही पाहूं लागलों, तर आम्हांला अत्यंत आश्चर्य वाटतें, त्यांचें सारखें कौतुक आम्ही करूं लागतो. पण आत्मा आणि जड भौतिकद्रव्य यांत हा भेद आहे कीं, आत्मा स्वयं-तंत्र आहे, स्वतःचा धनी आहे, स्वतःच्या क्रियांचा प्रभु आहे, त्या क्रियांनीं बद्ध होणारा नाहीं; कायदा करणारा आहे, त्या कायद्याच्या अंकित राहणारा नाहीं; उलट स्थूल जडद्रव्य मात्र, महान् गतीनें, शक्तीनें आणि कर्तृत्वानें युक्त असलें, तरी तें दुसऱ्यानें लादलेल्या कडक बंधनांत काम करणारें आहे. त्यांच्यांत स्वयंकर्तृत्व नाहीं, त्याच्यावर ठाम यंत्राचा कायदा लादलेला आहे; हा कायदा या द्रव्याला उमजत नाहीं, त्यासंबंधानें या द्रव्यानें कांहीं विचार केलेला नसतो; यंत्राप्रमाणें, न उमजतां हा कायदा त्याला पाळावा लागतो; कोणीं हा कायदा केला, तो कसा व कशाकरितां केला गेला, याचें या भौतिक द्रव्याला मुळींहि ज्ञान नसतें. अशा या स्थूल भूतांत प्राण उदयास आला, जीवन जागृत झालें आणि त्यानें आपल्या भौतिक शरीरावर,

 

पान क्र. ४५५

 

भौतिक बळावर आपला स्वतःचा कायदा चालविण्याचा प्रयत्न सुरू केला व आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणें, स्वतःच्या गरजा भागविण्यासाठीं सर्व गोष्टींचा तें उपयोग करूं लागलें, म्हणजे भौतिक प्रकृति, या प्राणाचें, या जीवनाचें बळ चालूं देते, त्याचें ऐकते, त्याचा व्यवहार पसंत करून, त्याला मदतहि देते -- पण या सर्व गोष्टी थोड्याफार विरोधानंतर, नाराजीनें आणि कांहीं एका मर्यादेपर्यंतच भौतिक प्रकृति करीत असते. प्राण व जीवन यांच्या उदयानंतर मनाचा उदय होतो, मन जागृत होतें आणि स्थूल भौतिक शरीरांत राहून, मी कोण आहे, कशाकरितां येथें आहे, येथें कसें काम करावयाचें -- या सर्व गोष्टी काय आहेत, कशाकरितां आहेत, कशा होतात इत्यादि प्रश्नांचीं उत्तरें तें शोधावयास लागतें आणि याप्रमाणें त्याला मिळवितां येईल तें ज्ञान, आपला कायदा आणि व्यवहार सर्व वस्तुजातावर लादण्यासाठीं तें उपयोगास आणूं पाहतें -- अर्थात् हा कायदा प्राणाच्या कायद्याहून अधिक स्वतंत्र असतो, हा व्यवहार अधिक स्वयंनिर्णित असतो; मन याप्रमाणें करूं लागलें म्हणजे भौतिक प्रकृति जशी प्राणाच्या बाबतींत वागते, तशीच या मनाच्या बाबतींही वागते. म्हणजे थोडक्यांत, कांहीं एका मर्यादेपर्यंत त्याचें ऐकते, त्याला साह्य करते. पण ही मर्यादा संपली कीं, पुढें भौतिक प्रकृति प्राणापुढें आणि मनापुढें महान् अडचणी उभ्या करते, आपल्या हट्टी जडतेची, यांत्रिक व्यवहाराची धोंड त्यांच्या मार्गांत उभी करते, त्यांच्या योजनांना स्पष्ट नकार देते. त्यांना समजाविते कीं, त्यांना जो थोडा विजय मिळाला आहे, तेवढ्यावर त्यांनीं समाधान मानावें; अधिक कांहीं घडवून आणणें, आपलें इष्ट मिळविण्यासाठीं यशस्वी रीतीनें अधिक धडपड करणें त्यांना यापुढें जमणार नाहीं. प्राणमय जीवन हें विस्तृत व व्यापक होण्यासाठीं, दीर्घ काल टिकण्यासाठीं धडपडतें; या धडपडींत त्याला बरेंच यशहि येतें; पण तें जेव्हां आत्यंतिक व्यापकता मिळवूं पाहतें, तें जेव्हां अमरत्व मिळवूं पाहतें, तेव्हां स्थूल भौतिकाचें कठीण लोखंडी भिंताड त्याला अडवितें आणि आपली व्यापकता संकुचितच राहणार, आपल्याला मरण चुकणार नाहीं हें जीवनाला मान्य करावें लागतें; स्थूल भौतिकाच्या दोषांमुळें, संकुचित क्षेत्राला व मरणाला जीवन बांधलें गेलें आहे. प्राणमय जीवनांतून उदय पावल्यावर, मन हें जीवनाला साह्य करूं पाहतें; ज्ञान मिळविण्याची व दुसऱ्या कांहीं गोष्टी साधण्याची स्वतःची तीव्र इच्छा तृप्त करूं पाहतें

-- सर्व ज्ञान मिळवावें, सर्व प्रकाश आत्मसात् करावा, सत्य हस्तगत करावें,

 

पान क्र. ४५६

 

सत्यरूप व्हावें, प्रेम व्यवहारांत आणावें, आनंद व्यवहारांत आणावा, स्वत: प्रेममय व प्रेमरूप व्हावें, आनंदमय व आनंदरूप व्हावें अशी मनाची धडपड व तळमळ असते, तीव्र इच्छा असते व ही इच्छा तें तृप्त करूं पाहतें, पण त्याला तें साधत नाहीं; भौतिक जीवनाच्या वासना, भौतिक संवेदना, शरीरगत व इतर भौतिक उपकरणें मनाच्या आड येतात; भौतिक संवेदना आणि उपकरणें हीं मनाच्या मार्गांत अडथळे निर्माण करतात, त्याच्या इच्छांना नकार देतात; भौतिक जीवनवासना त्याला आडमार्गानें नेतात, त्याजकडून प्रमाद घडवितात, त्याला क्षुद्र विषयाकडे ओढतात. मनानें ज्ञान मिळविलें, तर त्यांत प्रमादांची गर्दी होते; त्यानें प्रकाश मिळविला, तर त्या प्रकाशाची पार्श्वभूमि आणि सहयोगिनी निश्चितपणें तमो-देवता (अंधकार) असते; मन जेव्हां सत्याचा यशस्वीपणें शोध लावतें, तेव्हां तें शोध लावलेलें सत्य हस्तगत होतांच तें सत्याच्या वर्गांतून बाहेर जातें -- असत्य ठरतें आणि शोधाचा रगाडा पुन्हां चालूं होतो; प्रेम व्यवहारांत येतें पण त्याची तृप्ति होत नाहीं; आनंदहि व्यवहारांत येतो, पण त्याच्या मागें न्याय दिसत नाहीं -- आणि क्रोध, द्वेष, तिटकारा, उबग, दुःख, यातना या गोष्टी प्रेमामागून, आनंदामागून त्यांच्या छायेप्रमाणें येऊन, आम्हांला सतावतात. याप्रमाणें मनाच्या आणि प्राणमय जीवनाच्या ज्या मागण्या असतात, त्या मागण्यांना भौतिक स्थूल द्रव्याच्या जडतेच्या यंत्रवत् व परतंत्र व्यवहाराचा विरोध होतो आणि म्हणून अज्ञानावर विजय मिळविणें आणि अज्ञानाचा स्वभावधर्म जी पाशवी शक्ति तिच्यावर सत्ता संपादन करणें, या गोष्टी मनाला व जीवनाला साधत नाहींत.

अज्ञान आणि जड यांत्रिकता या त्याच्या दोन स्वभाव-धर्मांचा महान् साहाय्यक म्हणजे स्थूल भौतिक द्रव्याचा तिसरा स्वभावधर्म, पराकोटीची विभागणी आणि संघर्ष हा आहे. आत्मा हा ज्ञानमय, स्वतंत्र आणि एकरस, अविभाज्य एकतेचें आदितत्त्व, तर स्थूल भूत हें अज्ञानमय, परतंत्र आणि अणूअणूंचें, तुकड्यातुकड्यांचें बनलेलें अंतिम तत्त्व -- अशी वस्तुस्थिति असल्यानें, आत्म्याच्या योजनांना आणि व्यापारांना स्थूल भूताकडून तीन प्रकारचा मूलभूत विरोध होतो. अज्ञानाचा विरोध, जडतेचा विरोध आणि तिसरा संघर्षमय भेदाचा विरोध. मनाचा आणि प्राणाचा (जीवनाचा) पराजय करण्यांत स्थूल भूताच्या जडतेला व अज्ञानाला यश येतें, याचें महत्त्वाचें कारण, स्थूल भूताचा तिसरा स्वभावधर्म, म्हणजेच संघर्षमय भेद हा आहे. स्थूल भौतिक द्रव्य मूलत: साकार

 

पान क्र. ४५७

 

सच्चिदानंद असल्यानें, वस्तुत: अभेद्य अविभाज्य व एकरूप आहे; परंतु या द्रव्याकडून ज्या क्रिया घडतात त्यांचा पाया भेदमयता, विभागमयता हाच असतो; हें द्रव्य दोन प्रकारांनीं अभेद एकता निर्माण करूं शकतें -- एक प्रकार म्हणजे त्याचे जे भाग असतात त्यांचा समुदाय बनविणें; दुसरा प्रकार म्हणजे त्या भागांपैकीं एका भागानें दुसऱ्या भागाला पचवून टाकणें; (या प्रकारांत पचविणाऱ्या भागाकडून दुसऱ्या भागाचा नाश होणें अपरिहार्य असतें) अभेद, ऐक्य निर्माण करण्याच्या या दोन्हीं प्रकारांनीं स्थूल भौतिकांतील विभागतत्त्व, भेदतत्त्वच स्पष्टपणें प्रत्ययास येतें; या तत्त्वाचा व्यवहार भौतिक द्रव्यांत अखंड चालत असल्याचें दोन्ही प्रकारच्या ऐक्यप्रयोगांनीं आमच्या अनुभवास येतें. जे भाग संघीकरणानें एकत्र आणले ते केव्हांतरी अलग होणार हा संभव कायम असतो; अर्थात् शेवटीं केव्हांतरी ते विलग होऊन संघ मोडणार हें निश्चित असतें. संघाची, संघाताची मोडतोड म्हणजे मरण; असें हें मरण नव्या संघाताच्या निर्माणासाठीं अवश्य असतें. याप्रमाणें संघीकरणाच्या प्रकारांत मरण हें जीवनाची आवश्यक पार्श्वभूमि असतें; दुसऱ्या प्रकारांत मरण हें जीवन टिकविण्याचें साधन असतें -- एकूण मरण हें दोन्ही ऐक्य प्रयोगांत अपरिहार्य असतें. मरणाप्रमाणेंच दुसरी अपरिहार्य गोष्ट, संघर्ष ही होय. विश्वांतील जीवनांत ज्या अलग अलग मूर्ती आहेत त्यांचा स्वत:च्या संरक्षणासाठीं एकमेकींशीं झगडा चालणें अपरिहार्य असतें; स्वत:च्या जीवनाला साहाय्यक असणारे द्रव्यसंघात टिकविणें, स्वत:ला विरोध करतील त्यांना कबजांत घेणें किंवा मारून टाकणें, आपल्याला जगतां यावें म्हणून दुसऱ्यांना अन्नादाखल भक्षण करणें -- मात्र आपल्यावर कोणी कबजा करूं पाहील, आपल्याला कोणी मारूं पाहील, भक्षूं पाहील, तर त्यापासून पळून जाणें, या संघर्ष-कथा विश्वजीवनाच्या अंगभूत आहेत. स्थूल भूतांत जेव्हां प्राणतत्त्व उदयास येतें, तेव्हां त्याचा व्यापार वर सांगितलेल्या या संघर्षाच्या व मरणाच्या पायावरच चालतो; आपण हें पाहिलेंच आहे कीं, प्राणमय जीवनाच्या, पहिल्या अवस्थेंत मरण, वासना, मर्यादित क्षेत्र, त्याचप्रमाणें भक्षणासाठीं, कबजासाठीं, प्रभुत्वासाठीं जीवाजीवांचा सारखा संघर्ष या गोष्टी अपरिहार्य असतात. स्थूल भूतांत प्राणानंतर मनाचें तत्त्व उदयास आलें म्हणजे त्यालाहि मर्यादांचें बंधन (ज्या सांच्यांत व ज्या द्रव्यांत तें काम करतें त्यांच्या स्वाभाविक मर्यादांचें बंधन) पत्करावें लागतें; तें शोध करीत राहतें --

 

पान क्र. ४५८

 

निश्चित सिद्धी त्याजपासून दूर राहते; तें जें कांहीं मिळवील, तें केव्हांतरी त्याच्यापासून हिरावून नेले जातें; जें काय काम तें करील, त्या कामाचे अंगभूत भाग आज एकत्र, तर उद्यां एकमेकांपासून तुटलेले अशी स्थिति त्याच्या कामाची होते; एकंदरींत मनोमय मनुष्य जें ज्ञान मिळवितो, तें संशयातीत कधींच नसतें, तें अज्ञान ठरण्याचा संभव नेहमीं असतो; त्याचे श्रम हे क्रिया-प्रतिक्रिया, जोडणें-मोडणें या आपत्तीच्या चक्रांतून सुटत नाहींत; कांहीं निर्माण करा, थोडे दिवस तें टिकवा, नंतर मरणाच्या, विध्वंसाच्या तें हवालीं करून, पुष्कळ दिवस थांबा -- पुन्हां निर्माणादि क्रिया करा, असें मनुष्याच्या सर्व प्रकारच्या श्रमाचें चक्र चालतें. निश्चित खात्रीची, संशयातीत प्रगति मात्र अशा श्रमांनीं होऊं शकत नाहीं.

अज्ञान, जडता आणि संघर्षात्मक भेद यांनीं व्यापलेल्या अशा स्थूल भौतिक द्रव्याच्या पोटांतून जीवन आणि मन उदयास येतें -- तेव्हां अर्थांतच या जीवनाला आणि मनाला वरील गुणत्रयीचा, दोषत्रयीचा परिणाम म्हणून दुःख, यातना व असमाधान हे भोग भोगावे लागतात. त्यांच्या वांट्याला आलेले हे भोग त्यांना अतिशय जाचक होतात. जर अज्ञान हें मनाच्या जाणिवेला सर्वथा व्यापून असतें, तर त्यानें मनाला असमाधान वाटण्याचें कांहीं कारण नव्हतें; तें अज्ञानव्याप्त पण अज्ञानाची जाणीवहि नसलेलें मन, एखादी रुढीची चाकोरी धरून नित्य व्यवहार करूं शकलें असतें; जाणिवेचा, ज्ञानाचा अमर्याद महासागर आपल्या भोंवतीं पसरलेला आहे, हें मनाला ठाऊक नसतें, तर त्याला आपल्या स्वतःच्या अज्ञानामुळें दुःख झालें नसतें; पण स्थूल भौतिकांतून प्राणानंतर मन उदयास आलें म्हणजे त्याला अनेक गोष्टी कळूं लागतात : ज्या विश्वांत आपल्याला रहावयाचें, त्यासंबंधीं आपल्याला पाहिजे तेवढें ज्ञान नाहीं हें त्याला कळतें; सुखी व्हावयासाठीं विश्वाचें ज्ञान हवें, त्यावर प्रभुत्व हवें ही गोष्ट त्याला कळतें; तें ज्ञान मिळवूं लागतें, पण हें मिळविलेलें ज्ञान अत्यंत मर्यादित आणि वांझ असतें आणि असणार हें त्याला समजतें; या ज्ञानानें जें सामर्थ्य प्राप्त होतें, जें सुख मिळतें, तें सामर्थ्य व सुख अगदीं अल्प आणि तेंहि केव्हां संपेल याचा नेम नाहीं, असा प्रत्यय त्याला येतो; कायमचें विजयी अमर्याद सुख हा ज्याचा स्वभावधर्म आहे असें अनंत चैतन्य, ज्ञान, वास्तव अस्तित्व आपल्या सर्व बाजूंना, वर, खालीं, पसरलेलें आहे, हें ज्ञानहि मनाला हळू हळू होतें;

 

पान क्र. ४५९

 

या अमर्याद ज्ञानाशिवाय अमर्याद नित्यसुख नाहीं, हेंहि त्याला उमजूं लागतें -- आणि या सर्व गोष्टी कळल्यानें त्याला असमाधान वाटणें, दु:ख वाटणें अपरिहार्य होतें. स्थूल भौतिकाच्या अज्ञान या धर्माच्या प्रतापाची ही कहाणी झाली. दुसरा धर्म जडता -- स्थूल भौतिकांत उदय पावणाऱ्या जीवनाला त्याच्यापुरतें कांहीं ज्ञान असतें, संवेदना असते, त्याचें अस्तित्व मर्यादित अर्धनेणिवेचें व अर्धजाणिवेचें असतें. या अर्धनेणिवेच्या जीवनाला जडता जर पूर्णपणें व्यापून असती, म्हणजेच आपल्या मर्यादित व्यवहारांत जर तें समाधान मानून राहिलें असतें, तर स्थूल भौतिकाची जडता अशा जीवनाला जाचक झाली नसती, त्याला असमाधान देणारी, तळमळावयास लावणारी झाली नसती; पण अमर जीवनाचा व अनंत शक्तीचा एक भाग आपण असून, त्या अनंत शक्तीच्या अमर जीवनाशीं संबंध तुटल्यासारखें विभक्तपणें आपण राहत आहों, वागत आहों, ही जाणीव जीवनाला असते आणि अशा जाणिवेच्या अंतरंगांत, एक प्रेरणा सतत त्याला टोंचून गति देत असते -- ती प्रेरणा ही कीं, आपण अनंत शक्तीच्या अनंतत्वांत अमर जीवनाच्या अमरत्वांत सहभागी व्हावें, त्यासाठीं धडपड करीत असावें. ही प्रेरणा नसती, या प्रेरणेला जागी करणारी अमर जीवनाची जाणीव प्राणमय जीवनाला नसती, तर अशा जडतामय जीवनाला आपल्या मर्यादित व्यवहारांत समाधानानें राहतां आलें असतें. पण प्रथमपासून त्याला आपलें अस्तित्व असुरक्षित वाटत असतें आणि तें टिकून रहावें असेंहि खूप वाटत असतें; आपलें अस्तित्व मर्यादितच असणार हें त्याला शेवटीं उमगतें -- आणि तें विस्तृत, विशाल व्हावें, खूप टिकावें, अनंत व अमर व्हावें अशी तळमळ त्याला लागते.

जीवन हें मनुष्येतर स्थितींत असतां त्याला जो झगडा, जी खटपट, जी आकांक्षा अटळ होती, ती आकांक्षा, ती खटपट, तो झगडा, पूर्ण आत्म-जाणीवयुक्त अशा मनुष्यांत आल्यावर त्याला आत्यंतिकतेनें करावा लागतो आणि शेवटीं त्याला विश्वांत इतकें दु:ख, इतका विसंवाद भासूं लागतो कीं, संतोष समाधान त्याला पार सोडून जातात. मनुष्य पुष्कळ काळपर्यंत आपल्या मर्यादांत समाधान मानून स्वस्थ राहीलहि, ज्या भौतिक विश्वांत त्याला रहावेंच लागतें, त्याजवर शक्य तेवढी सत्ता मिळविण्याचें ध्येय आपल्यासमोर ठेवून, त्या सत्तेसाठींच फक्त झगडावयाचें ठरवून स्वस्थ राहणें, त्याला पुष्कळ काळपर्यंत जमेलहि;

 

पान क्र. ४६०

 

जड-अचल-वस्तुविषयक वाढत्या ज्ञानानें जो बौद्धिक व व्यावहारिक विजय या जडावर मिळवितां येईल तेवढ्या विजयानें आपलें समाधान करून घेण्यांत त्याला पुष्कळ काळपर्यंत यश मिळेलहि, तसेंच विश्वांतील जड आसुरी शक्तींवर त्याच्या लहान परंतु केंद्रित शक्तीचा -- ज्ञानयुक्त इच्छाशक्तीचा आणि शरीरबळाचा -- जो कांहीं विजय होईल, तेवढ्यावर संतुष्ट राहण्याचें त्याला दीर्घ काळपर्यंत साधेलहि -- परंतु शेवटीं हा संतोष, हें समाधान, ही स्वस्थता नष्ट होतेंच होते; मोठ्यांत मोठे परिणाम त्यानें घडवून आणावे व ते शेवटीं अगदीं क्षुद्र निष्फल ठरावे, या वस्तुस्थितीचा -- आपल्या कोंडीचा, कैदेचा -- त्याला कंटाळा येतो आणि आपल्यापलीकडे तो पाहूं लागतो, त्याला असें पाहणें अटळ होतें. आपल्या स्वत:पेक्षा कोणी मोठें आहे, तें मर्यादितच असलें तरी आपल्याहून महान् आहे; आपल्या पलीकडे मर्यादातीत अनंत आहे आणि तें असाध्य नाहीं अशी जाणीव मर्यादित जीवाला असली किंवा झाली, तर तो जीव आपल्या जीवनांत समाधान मानून नेहमीं राहूं शकत नाहीं. ज्याला वास्तवांतच मर्यादा आहेत, तो जीव आपल्या स्थितींत कदाचित् समाधानांत राहूं शकेल; पण जो केवळ दिसायला मर्यादित आहे, पण आतून ज्याला 'मी मर्यादित नाहीं, वस्तुत: मी अमर्यादित अनंत आहे' असा प्रत्यय येतो किंवा आपल्या अंतरांत अनंत असून, त्याची प्रेरणा स्वतःला ओढीत असल्याचा ज्याला साक्षात्कार होतो तो जीव, त्याचें आणि अनंताचे मीलन झाल्याशिवाय -- अनंताला त्यानें किंवा अनंतानें त्याला कमी-अधिक प्रमाणांत कोणत्या तरी प्रकारें आपलेंसें, आत्मसात् केल्याशिवाय -- स्वस्थता पावणार नाहीं, समाधानांत राहूं शकणार नाहीं. मनुष्य हा असा सांत दिसणारा अनंत आहे आणि अनंताची ओढ लागणें हें त्याला टळणारें नाहीं, केव्हांतरी ही ओढ त्याला लागणारच. पृथ्वीनें जें प्राणी जन्मास घातले आहेत, त्यांत मनुष्य हेंच तिचें असें अपत्य आहे कीं, त्याला आपल्या अंतरांत ईश्वर असल्याची अंधुक कां होईना जाणीव होते, आपण अमर आहोंत, निदान अमर होणें आपल्याला अवश्य आहे, निकडीचे आहे अशीहि जाणीव त्याला होते -- आणि ही जाणीव त्याला झाली कीं ती त्याला चैन पडून देत नाहीं, चाबकाचें किंवा क्रूसाचें काम ही जाणीव करीत राहते; अर्थात् त्याला पुढें पुढें हांकीत असते आणि बेचैन व यातनामय करून भराभर पावलें टाकावयास लावीत असते. आरंभीं जी जाणीव चाबूक किंवा क्रूस असते, त्या अंधुक जाणिवेला

 

पान क्र. ४६१

 

शेवटीं, अनंत प्रकाश, आनंद आणि सामर्थ्य यांना जन्म देणाऱ्या दिव्य ज्ञानाचें स्वरूप मनुष्य प्राप्त करून देतो.

मनुष्याला स्थूल भौतिक द्रव्याचा देह घेऊन जीवनाची प्रगति करावयाची असते. या प्रगतीच्या कार्यांत भौतिकाचें अज्ञान आणि जडत्व हे कसे अडथळे आणतात, तें आतांपर्यंत सांगितलें -- आतां त्याचा तिसरा स्वभावधर्म विभक्तता हा प्रगतीला कसा विरोध करतो तें पहावयाचें : सच्चिदानंदाचें जें ज्ञान आणि संकल्पशक्ति, त्याची जी मूळ जाणीव आणि शक्ति स्थूल भूताच्या अज्ञानांत आणि जडत्वांत स्वत:ला विसरून लोपल्यासारखी झाली होती, ती हळू हळू त्यांतून वर येऊन आपली प्रगति करूं लागल्यावर, स्थूलाची विभक्तता ही या प्रगतीचा मार्ग कठीण करीत असते. केवळ जडता आणि अज्ञान यांचाच त्रास असता तर आधीं थोडा आनंद, नंतर क्रमश: अधिक अधिक आनंद अशी प्रगति होऊन, शेवटीं मनुष्य अनंत आनंदाचा वांटेकरी -- वाटेंत विशेष जळजळ, खळखळ आणि खोळंबा न होतां -- झाला असता. पण मर्यादित विभक्त मनाच्या, प्राणाच्या व देहाच्या, वैयक्तिक मीच्या जाणिवेंत मनुष्य कोंडला गेल्यानें हा स्वाभाविक विकासक्रम व्यवहार्य होत नाहीं. वैयक्तिक 'मी'मुळें शरीरामध्यें राग-द्वेष, संरक्षण-आक्रमण, विसंवाद आणि यातना यांचा कायदा अंमलांत येतो. प्रत्येक देह हा मर्यादित जाणीव युक्त सामर्थ्य आहे -- देहादेहांचा संबंध येतो, देहाचा व विश्वशक्तीचा संबंध येतो; विश्वशक्तींचे किंवा इतर देहाचें वा देहांचें आपल्यावर आक्रमण होणार अशी प्रत्येक देहाला भीति असते; प्रत्येकाला इतरांच्या संसर्गाची भीति असते -- संसर्ग संपर्क करणारी जाणीव आणि संपर्कविषय झालेली जाणीव यांचा मेळ बसला नाहीं, आपल्यावर कोणीतरी आपत्ति आणली आहे असा भास कोणत्याहि देहाला झाला किंवा प्रत्यय आला कीं त्याला दुःख होतें, त्रास होतो; केव्हां एकाला दुसऱ्याची ओढ लागते, केव्हां एकाला दुसऱ्याचा तिटकारा वाटतो व त्याच्यापासून दूर जावेंसें वाटतें; देहाला केव्हां आपलें संरक्षण करण्याचा प्रसंग येतो, केव्हां दुसऱ्यावर हल्ला करावा लागतो; नित्य असें घडतें कीं, जें सोसण्याची त्याची इच्छा नाहीं, तें त्याला सोसावें लागतें, जें असह्य आहे, तें सोसावे लागतें. देहाची ही जी अवस्था असते, तशीच अवस्था, भावनामय आणि संवेदनाशील मनाची असते. विभक्तता या मनाला त्रासवून सोडते. देहासारख्याच प्रतिक्रिया या मनामध्यें होतात -- देहाहून वेगळ्या मोलाच्या गोष्टी येथें

 

पान क्र. ४६२

 

असतात -- मानसिक दुःख आणि आनंद, प्रेम आणि द्वेष, जुलूम आणि वैताग येथें आळीपाळीनें मनाला सतावीत असतात. येथें वासना सगळ्यांच्या मुळाशीं असते -- वासनेसाठीं धडपड आणि खेंचाताणी चालते खेंचाताणींतून शक्तिविषयक अतिरेक किंवा उणेपणा अनुभवावा लागतो, असामर्थ्याचा, अक्षमतेचा अनुभव घ्यावा लागतो -- कांहीं गोष्टी सिद्ध होतात, कांहीं निराशा भोगवितात, कांहीं हस्तगत होऊन वीट आणतात. अशारीतीनें नित्यशः झगडा, त्रास, असमाधान हे भोग भावनाशील संवेदनामय मनाच्या वांट्याला येतात. एकंदरीनें स्थूलभूताच्या विभक्ततेचा कायदा शरीराहून किंवा प्राणाहून संवेदनामय, भावनामय मनाला अधिक जाचक होतो; आतां विचारशील मनाला होणारा तिचा जाच पहावयाचा. विभक्ततेमुळें दिव्य नियमाला बाध येतो -- दिव्य नियम असा कीं, जें अव्यापक असत्य आहे, त्यांतून क्रमश: व्यापक सत्य निघून, त्यांत अव्यापक सत्यानें विलीन व्हावें, लहान ज्योतीनें महान् ज्योतींत आत्मविसर्जन करावें; कनिष्ठ इच्छेनें श्रेष्ठ इच्छेला शरण जावें व आपलें कनिष्ठत्व ओळखून श्रेष्ठ इच्छेच्या तंत्रानें वागावें, क्षुद्र भोगांनीं माघार घेऊन, महान्, उदात्त भोगांना स्थान द्यावें, -- परंतु विभक्त मनांच्या विभक्त देह-प्राणांचा पसारा या दिव्य विकासनियमाचें कांहीं चालूं देत नाहीं -- विभक्ततेमुळें मनाचे ठिकाणीं द्वंद्वांचें राज्य चाललेलें असतें : सत्य आणि त्याचा पिच्छा पुरविणारा प्रमाद किंवा भ्रम, प्रकाश आणि अंधार, क्षमता आणि अक्षमता, ज्ञानविषयाचा यशस्वी पाठलाग आणि त्याचा आनंद एकीकडे तर पाठलागांत माघार घ्यावी लागते, प्राप्त ज्ञान अपुरें, अकार्यक्षम असतें म्हणून दुःख आणि संताप दुसरीकडे -- अशी मनाची कुतरओढ होत असते : प्राण आणि देह यांना होणारीं दुःखें, मन आपल्या स्वतःच्या दुःखाबरोबर आपलींच समजून अत्यंत दुःखी होतें -- मन, प्राण, देह या तिन्हीं ठिकाणीं दोष व अक्षमता पाहून प्राकृतिक जीवनाच्या या तीनहि विभागांत मन अस्वस्थ असतें : अज्ञान, जडता, विभक्तता हे तीन प्राकृतिक जीवनाचे दोष मनाला दुःखी करतात. या सगळ्याचा अर्थ, प्राकृतिक जीवनांत आनंदाची शून्यता -- सच्चिदानंदाच्या सत्, चित्, आनंद या तिन्ही मूळतत्त्वांचा अभाव. हा अभाव जर अटळ असेल, तर प्राकृतिक जीवन अर्थशून्य, वंध्य व निष्फल ठरेल. मूळ अस्तित्व आपल्या जाणिवेच्या शक्तीच्या खेळांत जी उडी घेते, ती निर्हेतुकपणे घेत नाहीं; आपली मूळ आनंदमय स्वस्थता, शांति, निष्कर्मता टाकून, मूळ

 

पान क्र. ४६३

 

अस्तित्व आपल्या जाणिवेचा आणि जाणिवयुक्त शक्तीचा जो खेळ उभा करतें, तो कांहीं निर्हेतुकपणे उभा करीत नाहीं -- तर या खेळांत विविध प्रकारचा आनंद भोगावा या हेतूनें उभा करतें; आणि जर या खेळानें त्याचा मूळ हेतु सिद्ध होत नसेल, खरें समाधान, खरी तृप्ति मिळत नसेल, तर हा शरीरधारण करणाऱ्या चैतन्याचा वातांतील एक भ्रम, महान् प्रमाद, निष्फल खटाटोप झाला, असें मान्य करून तो बंद करणें अगदीं योग्य होईल, अगदीं अनिवार्य होईल हें उघड आहे.

विश्वविषयक निराशावादाचा पाया वरील विश्वविषयक अनुभूतींत आहे. या भौतिक विश्वाच्या पार्थिव जीवनाच्या पलीकडे जीं दुसरी विश्वें आहेत, ज्या दुसऱ्या जीवनावस्था आहेत, त्यासंबंधानें हा निराशावाद आशावादी असतो -- पण पार्थिव जीवन व मनोमय जीवाची भौतिक विश्वांतील व्यवहारांत दृष्टोत्पत्तीस येणारी व अनुमानगम्य अशी नियति यांच्या संबंधांत निखालस निराशावादी असतो. या निराशावादाचें म्हणणें असें कीं -- ''भौतिक अस्तित्वाचा स्वभावधर्म विभक्तता व शरीरधारी मनाचें बीज आत्मबंधन, अज्ञान, अहंकार -- अशी वस्तुस्थिति असल्यानें पृथ्वीवर आत्म्याला समाधान लाभावें म्हणून खटपट करणें, विश्वाच्या खेळांत थोर फळाची आशा करणें, या खेळांत दिव्य हेतु आहे, या खेळाची अखेर दिव्य प्रकारें होणार आहे अशीं अनुमानें बांधणें हा भ्रम आहे, मूर्खपणा आहे : अस्तित्व, जाणीव यांचा दिव्य आत्मानंदाशीं आरंभीं जो योग होता, तो योग पुन्हां व्हावा असें वाटत असेल, तर या विश्वांत त्याची आशा करणें नको; दुसऱ्या आत्म्याच्या खास स्वर्गांत तो योग पुन्हां होणें शक्य आहे किंवा आत्म्याची खरी निष्कर्मता, खरी शांति हीच त्या वियोगाचा पुनर्योग घडवूं शकेल -- आत्म्याच्या या रूपात्मक प्रापंचिक धडपडींत तो योग पुन्हां येणें शक्य नाहीं. अनंताला स्वतःचा आत्मा दुरावला आहे; तेव्हां सांतांत मी स्वतःला पूर्णतया बसवूं शकेन, सांतांत माझें अनंतत्व मी व्यवहार्य करीन हा अभिमान अनंतानें सोडावा, सांताचा खेळ सुरू केला ही माझी चूक झाली, हा खेळ सुरू करण्यांत माझें पाऊल भलतीकडे पडलें अशी कबुली देऊन अनंतानें हा खेळ बंद करावा -- असें त्यानें केलें तरच त्याला आपलें दुरावलेलें अनंतत्व परत लाभेल -- भौतिक विश्वांत मानसिक जाणिवेचा उदय झाला म्हणून येथें दिव्य साफल्याची आशा करणें युक्त होणार नाहीं. कारण, विभक्तता हें तत्त्वच मनाचा मूळ धर्म आहे; स्थूल भौतिकद्रव्य

 

पान क्र. ४६४

 

हा केवळ मनानें उभा केलेला आभास आहे -- आणि या आभासांत वावरत असतां मनानें आपला स्वभावधर्म जो विभक्तता आणि अज्ञान, तो बरोबर स्वाभाविकपणेंच ठेवला आहे. अर्थात् या आभासमय भौतिक विश्वांत मनाला स्वतःच्या पलीकडे कांहीं लाभणें शक्य नाहीं : त्यानें विभक्त अस्तित्व निर्माण केलें आहे आणि या अस्तित्वांत विभक्तता, जडता, अज्ञान या त्रयीचा खेळ चालला आहे -- मनाला या त्रयीमध्येंच इकडून तिकडे, तिकडून इकडे हिडतां येईल, यापलीकडे आत्मतत्त्वाची एकता, एकरसता व आत्मिक जीवनाचें सत्य मनाला या भौतिक विश्वांत प्राप्त होणें शक्य नाहीं.''

भौतिक अस्तित्व हें स्वयंभू नाहीं; हें मूळ रूप नाहीं, एकरूपास सर्वश: विभागून टाकणारी प्राणशक्ति हें रूप निर्माण करते; एकरूप सर्वस्वीं विभागून टाकणारें मन, ज्या कल्पना प्राणशक्तीपुढें ठेवते, त्या कल्पनांना मनाला हवें तें रूप देणें हें प्राणशक्तीचें कार्य असतें. याप्रमाणें मनानें कल्पिलेलें व प्राणानें बनविलेलें रूप म्हणजे भौतिक अस्तित्व होय. प्राणाच्या साह्यानें विभागलेलें मनच, भौतिक अस्तित्व बनलें आहे -- अर्थात् या अस्तित्वांत स्थूल भूतांत असलेलें विभागणीचें तत्त्व विभागलेल्या मनानें आणलें आहे -- मूळ एकरूप अस्तित्व अज्ञान-जडता-विभक्ततायुक्त भौतिक रूपांच्या पसा-यांत परिवर्तित करणें, हें काम विभागणाऱ्या मनानें केलें आणि स्वतःच निर्माण केलेल्या या रूपांच्या अंधारकोठडींत त्यानें स्वतःला बंद करून घेतलें, स्वतःच बनविलेल्या या रूपांच्या साखळदंडांनी त्यानें स्वतःला बांधून घेतलें, अशी वस्तुस्थिति आहे. विभागणारे मन हेंच सृष्टिनिर्मितीचें प्रमुख आद्य तत्त्व असेल, तर विभागणारें मन हीच विश्वांत शक्य अशी अंतिम सिद्धि असणार हें उघड आहे. अर्थात् प्राण (जीवन) आणि स्थूल भौतिक द्रव्य यांशीं झगडा करीत रहावयाचें, शेवटीं या झगड्यांत अपयश घ्यावयाचें, त्यांना कांहीं अंशीं, कांहीं काळ काबूंत आणावयाचें -- पुन्हां त्यांजकडून हार खावयाची अशी चक्रगतीनें सतत झटापट -- अंतीं अयशस्वी झटापट -- करीत रहावयाची, ही मनाची वा मनोमय जीवाची कामगिरी, हीच विश्वांतील जीवनाची अंतिम सर्वोच्च कहाणी होऊं शकेल. परंतु भौतिक घन-द्रव्याच्या पोटीं जर आत्मा, चैतन्य, अमर अनंत चैतन्य दडलेलें असेल आणि तेथें आपल्या अतिमानसिक सर्वोच्च निर्मितिसामर्थ्यानें निर्माणकार्य करीत असेल, तर विश्वांतील जीवनाची अंतिम कथा वेगळी होणार हें निश्चित. अनेक-

 

पान क्र. ४६५

 

तेच्या पसाऱ्यांत एकतत्त्वाचा 'सच्चिदानंदाचा' विकासरूप खेळ, विशिष्ट प्रकारें व्हावा या उद्देशानें या खेळाचा आरंभ मनाच्या विभागणीनें, भौतिक स्थूल द्रव्याच्या म्हणजे सर्वात निकृष्ट तत्त्वाच्या अधिराज्यानें करण्याचें अनंत चैतन्यानें ठरविलें आहे, असा सिद्धांत आपल्याला करतां येतो; अर्थात् स्थूल द्रव्याच्या पोटीं चैतन्य काम करीत असेल, मन असलेला जीवच केवळ, विश्वांतील रूपांत झांकलेला, लपलेला नसून, अनंत सत्ता-ज्ञान-इच्छावान् पुरुष (सच्चिदानंद) जर या रूपांत दडलेला असेल आणि या स्थूल भौतिक रूपांतून प्रथम प्राण किंवा जीवन म्हणून व नंतर मन म्हणून तो प्रकट होत असेल, (यापुढें कोणत्या प्रकारें तो प्रकट होणार आहे तें आम्हांला अज्ञात आहे असें समजूं) तर बाह्यतः नेणिवेनें पूर्ण व्याप्त अशा स्थलांतून जी जाणीव वर येते, तिचें अंतिम विकासाचें स्वरूप मनाहून वेगळें आणि पूर्णतर असलेंच पाहिजे, त्याचें स्वरूप अतिमानसिक आत्मपुरुष हेंच असलें पाहिजे -- तो पुरुष आपल्या मानसिक, प्राणिक आणि शारीरिक व्यापारांवर विभक्त आणि विभाजक मनाच्यापेक्षां आपला श्रेष्ठतर व्यवहारनियम चालूं करणारा असला पाहिजे -- निदान असें त्या स्थूल जडांतून वर आलेल्या विकासशील जाणिवेचें अंतिम स्वरूप होणें अशक्य नाहीं -- उलट, विश्वांतील अस्तित्वाचें अटळ स्वाभाविक अंतिम स्वरूप, अतिमानसिक अध्यात्मपुरुष हेंच असणें सयुक्तिक व स्वाभाविक आहे, असें म्हणतां येतें.

हा जो आतिमानसिक अध्यात्मपुरुष विकासशील जाणिवेचें अंतिम स्वरूप म्हणून देहांत, प्राणांत व मनांत जागृत होणार, तो, मनाचें जें विभक्तपण, जडता, अज्ञान, या तीन दोऱ्यांची कठीण गांठ जमवून, आमचें जीवन दुःखमय करीत होतें तें, कठीण विभक्तपण दूर करून, त्यांची गांठ सोडवून मनाला मोकळें करील आणि सर्वव्यापक अतिमानसाचें एक गौण उपयुक्त कार्य या नात्यानें, मनाचें जें व्यक्तिरूप, त्याचा उपयोग करील; त्याचप्रमाणें प्राणाचें (जीवनाचें) जें विभक्तपण गांठ जमवून दुःख देत होतें, त्या गांठीच्या विभक्ततेंतून प्राणमय जीवन मोकळें करून, मूळ जाणीवशक्तीचें एक गौण उपयुक्त कार्य म्हणून हा अतिमानसिक पुरुष वेगळें वैयक्तिक जीवन वापरील. मूळ एक एकरस जाणीवशक्तीची सत्ता, तिचा आनंद हाहि एक, एकरस असतो -- सत्तेचा आणि आनंदाचा हा एकरस स्वभाव कायम ठेवून, त्या एकतेच्या पोटांत विविध सत्ताप्रकार, विविध आनंदप्रकार निर्माण करण्याचें काम, मूळ

 

पान क्र. ४६६

 

जाणीवशक्तीचें गौण कार्य जें व्यक्तिगत जीवन, त्याच्या द्वारां होत असतें आणि जाणिवेच्या, अस्तित्वाच्या व आनंदाच्या मूळ एकतेला, ती एकता कायम ठेवून विविधतेची जोड दिली, म्हणजेच वस्तुत: जाणीव, अस्तित्व व आनंद यांची कृतार्थता होते, खरी परिपूर्ति होते. अनंताचा मूळ एकरस आनंद वेगळा आणि त्याचा सांतांतील विविध आनंद वेगळा; या विविध आनंदासाठीं, व्यक्तिगत मन व व्यक्तिगत जीवन या वस्तू सच्चिदानंदानें अतिमानसाच्या साह्यानें त्याचें एक गौण कार्य म्हणून वस्तुत: अस्तित्वांत आणल्या. व्यक्तिगत शरीर हेंहि त्याच हेतूनें अस्तित्वांत आणलेलें असल्यानें, विकासक्रमांत अतिमानसिक पुरुष स्थूलांत प्रकट झाल्यावर ज्याप्रमाणें मनाला, प्राणमय जीवनाला ग्रंथिबद्धतेंतून सोडवून विविध जीवनाच्या सोईसाठीं तो वापरतो, त्याप्रमाणें शारीर जीवनाचा त्याचा सध्यांचा कडक नियम -- मरण, वेगळेपणा, अन्योन्यभक्षण -- या ग्रंथिरूप कडक नियमाच्या कचाट्यांतून सोडवून, मूळ जाणीवयुक्त एकरूप दिव्यसत्तेची उपयुक्त गौण मूर्ति -- अनंताला सातांत आनंद मिळविण्यास उपयोगी अशी मूर्ति म्हणून शरीर व शारीर जीवनहि तो उपयोगांत आणील असा संभव आहे : अनंत चैतन्यानें जो स्थूल आकार धारण केला आहे, त्या आकारांत वस्तीला राहून, त्यानें आपली या आकारावरची मालकी सार्वभौमपणें गाजवावी, निराकार असतांना त्याचें जें स्वातंत्र्य होतें तें स्वातंत्र्य त्यानें साकार स्वरूपांतहि उपभोगावें, स्थूलाचे झगे बदलीत असतां, आपण अमर आहों ही जाणीव त्यानें कायम राखावी, भौतिक विश्वाला आपला मूळचा एकतेचा, प्रेमाचा व सौंदर्याचा कायदा लावून, आपला मूळ आत्मानंद, स्थूल भौतिक शरीरांतहि त्यानें उपभोगावा -- हें सर्व शक्य आहे, संभवनीय आहे. एकांतिक विभक्ततेचा दोष काढून, मनाचें रूपांतर अतिमानसांत करावयाची क्रिया मनुष्यांत होणार असेल, तर असाहि संभव आहे कीं, दिव्य मन व दिव्य प्राण यांजबरोबर दिव्य शरीरहि तो विकासक्रमांत मिळवूं शकेल. मनुष्याच्या विकासासंबंधाची, शक्याशक्यतेची आपली कल्पना आज बरीच संकुचित असल्यानें, दिव्य शरीरादि भाषा आपल्याला अतिरेकी वाटण्याचा संभव आहे -- तेव्हां आपण असें म्हणूं कीं, मनुष्य आपलें खरें अस्तित्व आणि या अस्तित्वाचा (स्वरूपाचा) स्वाभाविक प्रकाश (ज्ञान), आनंद व सामर्थ्य यांचा विकास करीत करीत मनाचा, प्राणाचा व शरीराचा दिव्य उपयोग करूं लागेल -- आणि असें झालें म्हणजे मूळ चैतन्यानें

 

पान क्र. ४६७

 

खालीं उतरून रूपांत, दृष्य आकारांत जी वसति केली, तें त्याचें उतरणें व साकार होणें मानवी दृष्टीनें व अतिमानवी दिव्य दृष्टीनेंहि सफळ झालें, योग्य झालें असें निःशंकपणें म्हणतां येईल.

शेवटीं पृथ्वीवर मानवाच्या विकासाचा पल्ला येथवर न पोंचण्याला कांहीं कारण दिसत नाहीं -- मात्र एक गोष्ट आहे : भौतिक जडद्रव्य व त्या द्रव्याचे नियम या विषयींचा आमचा आजचा सिद्धांत विशिष्ट प्रकारचा आहे; आमची संवेदना आणि द्रव्य यांचा अन्योन्यसंबंध, ज्ञाता दिव्य-आत्मा आणि ज्ञेय दिव्य-आत्मा यांचा अन्योन्यसंबंध, केवळ याच विशिष्ट सिद्धांतानें व्यक्त होतो हें जर खरें असेल, तर मात्र या पृथ्वीवर मानवाला मन-प्राण-शरीराचा दिव्य उपयोग करतां येणार नाहीं. तसेंच, संवेदनाद्रव्य व ज्ञेय-ज्ञाता यांजमध्यें आमच्या आजच्या जड-भौतिक-विषयक सिद्धांतानें व्यक्त होणाऱ्या संबंधाहून अन्य संबंध शक्य असतील, पण ते संबंध इतर उच्च लोकांतील असून, या पृथ्वीवर मात्र जर शक्य नसतील, तरीहि मानवाला या पृथ्वीवर दिव्यता प्राप्त होण्याचा संभव नाहीं. दिव्य जीवनाचा 'ओनामा' देखील आम्हांला पृथ्वीहून उच्चतर लोकांत शिकावा लागेल; येथें कसलेंच दिव्य जीवन शक्य नाहीं, दिव्य जीवन सर्वतोपरि स्वर्गांतच शक्य आहे असा जो धर्मांचा दावा आहे, तो मग खरा ठरेल आणि आम्हांला जीवनाच्या दिव्यतेसाठीं स्वर्ग पहावा लागेल. धर्मात असेंहि सांगितलेलें आढळतें कीं, पृथ्वीवर देवाचें राज्य येणार आहे, पृथ्वीवर पूर्णतेचें राज्य येणार आहे -- हें धर्मातील विधान भ्रमात्मक आहे असेंहि मग म्हणावें लागेल. पृथ्वीवर आंतरिक साधना करावयाची, या साधनेंत सिद्धि मिळवावयाची; मन, प्राण व आत्मा या आंतरिक तत्त्वांना, त्यांच्या आंतरिक बंधनांतून मुक्त करावयाचें आणि ही तयारी झाल्यावर, जडतत्त्व अजिंक्य व अविजयी दशेंत ठेवून, पृथ्वी ही असंस्कार्य, अनियंत्रणीय, असंस्कारित, अनियंत्रित दशेंत ठेवून मग दिव्य जीवनासाठीं दिव्य शरीरद्रव्य आम्हांला लाभावें म्हणून इतर लोकांकडे प्रयाण करावयाचें -- असें आम्हांला करावें लागेल; पण आमच्या विकासकार्याला मर्यादा घालणारा जडविषयक सिद्धांत आम्हीं मान्य केलाच पाहिजे असें कांहीं सबळ कारण आम्हांला दिसत नाहीं : जडतत्त्वाच्या, जडद्रव्याच्या अवस्था अनेक आहेत, त्यापैकीं त्याची एकच अवस्था आम्हांला नडणारी अशी आहे; इतर अवस्था त्याला नाहींत असें नाहीं; शिवाय द्रव्याचे अनेक प्रकार आहेत, जडद्रव्य हा एकच प्रकार नाहीं;

 

पान क्र. ४६८

 

द्रव्यांची एक चढती दिव्य श्रेणी आहे; जडद्रव्य ही सर्वांत खालची पायरी आहे; या पायरीच्या वरतीं, द्रव्याच्या अनेक पायऱ्या आहेत यांत संशय नाहीं आणि आमचा अन्नमय पुरुष, शारीर जडपुरुष हा जर आपल्या स्वतःच्या नियमाहून श्रेष्ठ नियमाची सत्ता मानील, तर स्वतःचें रूपांतर घडवून आणूं शकेल -- हा श्रेष्ठ नियम त्यानें मान्य करणें अशक्य नाहीं; कारण हा नियम कांहीं परका नव्हे किंवा परक्याचाहि नव्हे. त्याच्या स्वतःच्या गूढ गुप्त अप्रकट अंगांत हा श्रेष्ठ नियम गुप्तपणें त्याचाच म्हणून असतो आणि त्यांत प्रकट होण्याची प्रवृत्ति व भवितव्यताहि असते.

 

पान क्र. ४६९

 

 

प्रकरण सव्विसावें

 

चढती द्रव्य (तत्त्व) मालिका

 

एक आत्मा जडतत्त्वाचा (अन्नमय) आहे, या आत्म्यांत भरलेला दुसरा आंतर आत्मा प्राणमय आहे, तिसरा प्राणमयाच्या आंत मनोमय आत्मा आहे, मनोमयाच्या आंत विज्ञानमय (सत्यज्ञानमय) आत्मा आहे, त्याच्या आंत आनंदमय आत्मा आहे.

- तैत्तिरीय उप० २.१ ते ५

 

उंचच उंच इंद्रावर, शिडीवर चढत जावें, त्याप्रमाणें साधक चढत जातात. चढतांना एक शिखर चढून जावें, तें मागें टाकून दुसरें त्यावरचें शिखर चढून जावें असा चढण्याचा कार्यक्रम साधक करीत असतो तेव्हां प्रत्येक शिखरावरून, पुढें आणखी कितीतरी चढावयाचें आहे, हें चढणाऱ्याच्या प्रत्ययास येतें. तें अत्युच्च सर्वोच्च परम तत्त्व आपलें अंतिम ध्येय आहे या गोष्टीची जाणीव, इंद्र साधकाला करून देतो.

श्येन किंवा गृध्र पात्रावर उतरून ठाण मांडून तें वर उचलतो, त्याप्रमाणें इंद्र साधकाच्या देहपात्रावर उतरून ठाण मांडून तें देहपात्र वर उचलतो, (तें साधनदृष्टीनें अधिक कार्यक्षम बनवितो); इंद्र नदाच्या प्रवाहा प्रमाणें आपल्या गतीचा, चालीचा वेग अप्रतिहत असा ठेवतो आणि प्रकाशाचे किरण (तम:प्रधान देहांत सत्वाचा उजेड पाडणारे किरण) आपल्या गतीनें, चालीनें शोधून काढतो, गांठतो; इंद्र या वाटचालींत आपलीं शस्त्रें, अस्त्रें जवळ बाळगून असतो -- म्हणून त्याला प्रकाश गांठता येतो; दिव्य अंतरिक्षगत प्रवाही तत्त्वाच्या सागरांत उसळणाऱ्या लहरींचा आश्रय इंद्र घेतो; हा महान्, राजाधिराज, चतुर्थ आत्मिक अवस्था साधकाला उद्‌घोष करून कळवितो; मर्त्य माणसानें आपलें शरीर विशुद्ध, पवित्र करण्याचा कार्यक्रम तांतडीनें करावा; युद्धांतील अश्व विविध संपत्ति जिंकून घेण्यासाठीं चौखूर उधळत जावा -- त्याप्रमाणें इंद्र उद्‌घोष करीत आमच्या सर्व कोशांतून वेगानें उतरतो आणि आमच्या देहपात्रांत प्रवेश करतो.

 

- ऋग्वेद १-१०-१,२; ९-९६-१९,२०

 

पान क्र. ४७०

 

जडाची जडता कशांत आहे याचा आम्ही विचार करतों, तेव्हां जडाची घनता, स्पर्शविषयता, त्याची स्थिति बदलूं पाहणाऱ्या शक्तीला सारखा वाढता विरोध, स्पर्शाला कठीणपणाची प्रतिक्रिया, इतक्या गोष्टी जडाच्या जडतेच्या निदर्शक आहेत, असें आमच्या लक्षांत येतें. तें द्रव्य अधिक जड आणि सत्य, जें अधिक घनतासंपन्न, अधिक रोधक आणि या गुणांमुळें जें आकारांत अधिक टिकाऊ व ज्यावर आमची जाणीव लक्ष केंद्रित करून अधिक काळ तद्विषयक विचार करूं शकते; तें द्रव्य कमी जड, जें अधिक सूक्ष्म, कमी रोधक आणि संवेदना, जाणीव ज्यावर कमी काळ पकड ठेवूं शकते. बाह्य दृष्टीनें जडाची अशी वर्गवारी होते. आमच्या सामान्य जाणिवेची जडाकडे बघण्याची ही जी वृत्ति ती, जड द्रव्य ज्या मुख्य हेतूनें निर्माण केलें गेलें आहे त्या हेतूचें प्रतीकच आहे. द्रव्य हें जड-अवस्था याकरितां धारण करतें कीं, ज्या जाणिवेला त्याच्याशीं त्याच्या द्वारां व्यवहार करावयाचा असतो, त्या जाणिवेला घट्ट पकडून ठेवण्यासारख्या टिकाऊ प्रतिमा पुरविणें त्याला शक्य व्हावें. अशा प्रतिमांवर मन आपलें लक्ष केंद्रित करूं शकतें आणि असें लक्ष केंद्रित करून त्याला ज्या कांहीं क्रिया त्यांच्यावर व त्यांच्या साह्यानें करावयाच्या असतात त्या तें करूं शकतें; त्याच्याप्रमाणें प्राण हा या प्रतिमांवर आपली कारागिरी करून ती कारागिरी कांहीं काळ तरी टिकेल असा विश्वास धरूं शकतो. जुन्या वैदिक विश्वतत्त्वांच्या वर्णनांत पृथ्वीतत्त्व हें नांव जडतत्त्वाला दिलेलें आढळतें. हें प्रतीकात्मक नांव जडद्रव्याला देण्याचें कारण, द्रव्याच्या 'घन प्रकारांत पृथ्वीचा समावेश, एक नमुन्याचें घनद्रव्य' म्हणून केला जात होता. आम्ही आणि आमच्यासमोरचे आजूबाजूचे पदार्थ यांच्यामध्यें, अनुभव घेणारा आणि अनुभवाचा विषय, हा संबंध असतो; अनुभव घेणाऱ्याचा अनुभव स्पर्श, रस, गंध, शब्द, रूप असा पांच प्रकारचा असतो; यांत स्पर्श हा मूळ अनुभव आहे; संवेदनेचें मूळ स्पर्शांत आहे; त्वचा हें स्पर्शाचें इंद्रिय आहे. त्वचेचा आणि स्पर्शविषयाचा प्रत्यक्ष स्थूल संबंध येतो. दुसरी रसना, घ्राण, श्रवण, नेत्र हीं इंद्रियें क्रमश: अधिकाधिक अप्रत्यक्ष व सूक्ष्म स्पर्शानें अनुभव घेतात; सांख्य दर्शनांत आकाश, वायु, तेज, आप व पृथ्वी अशीं पांच तत्त्वें मानतात; त्यांत आकाश हें सर्वांत सूक्ष्म व पृथ्वी हें सर्वांत स्थूल तत्त्व आहे. अतिसूक्ष्मापासून आरंभ

 

पान क्र. ४७१

 

करून कमी कमी सूक्ष्मता, अर्थात् अधिक अधिक स्थूलता क्रमानें सांख्यांनीं सांगितलीं आहेत; सर्वांत स्थूल, घनतत्त्व पृथ्वी हें आहे. तेव्हां एकंदरींत जडतेचें अधिकांत अधिक प्रमाण असणारें स्थूल, घनद्रव्य ही शुद्ध द्रव्याची शेवटली अवस्था आहे. शुद्ध द्रव्य चैतन्यमय असतें; या द्रव्यांत रूपांतरें होत होत, शेवटलें विश्वव्यवहारांसाठीं झालेलें रूपांतर म्हणजे घन जडद्रव्य होय. या शेवटल्या रूपांतराचें द्रव्य चैतन्यमय असण्याचें ऐवजीं आकारमय असते आणि या आकारमय द्रव्याचा आकार हा द्रव्यकणांचें केंद्रीकरण, रोधक शक्ति, स्थूलता, टिकाऊपणा व अगदीं अभेद्य अलगपणा या गुणांत श्रेष्ठांत श्रेष्ठ असा असतो आणि म्हणून भेद, अलगपणा, विभागणी यांची परमावधि या शेवटल्या द्रव्यावस्थेंत झालेली असते. भौतिक जड विश्वाचें लक्षणच भेद, अलगपणा, विभागणी हें आहे -- त्या विश्वाच्या निर्मितीचा हेतूच मुळीं विभागणीच्या तत्त्वाची परमावधि गांठावी हा आहे आणि या तत्त्वाची परमावधि विश्वाच्या व्यवस्थेत गांठलेलीहि आहे.

स्वभावतःच जडद्रव्य आणि चैतन्य यांजमध्यें जें अंतर आहे, तें द्रव्याच्या क्रमश: चढत्या पायऱ्यांनीं भरून काढलेलें आहे. या चढत्या पायऱ्यांत जडद्रव्याच्या ज्या खुणा वर सांगितल्या त्या क्रमश: कमी प्रमाणांत व त्यांच्याबरोबर उलट खुणा, उलट गुण क्रमश: अधिक प्रमाणांत सांपडतात -- चढत्या पायऱ्यांच्या शेवटीं शुद्ध आत्मिक विस्तार हें द्रव्याचें रूप सांपडतें. या चढत्या क्रमाचा अर्थ हा कीं, चढत्या पाय-यांवर क्रमशः आकाराचें अंकितत्व कमी होत जातें, द्रव्याची लवचिकपणाची आणि सूक्ष्मपणाची अवस्था, तशीच शक्तीची तत्सम अवस्था चढत्या पायऱ्यांवर अधिकाधिक प्रमाणांत दिसून येते; हें चढतें द्रव्य क्रमश: व रूपांरूपांत कठिणपणें अलग न राहतां मिसळणारें असतें -- चढत्या पायऱ्यांवरचे आकार एकमेकांत प्रविष्ट होण्यास अधिकाधिक पात्र असतात, एकमेकांना आत्मसात् करण्याची शक्ति अधिकाधिक प्रमाणांत त्यांच्यांत असतें, एकमेकांचीं रूपें घेण्याची पात्रता तेथें असते; बदल, रूपांतर, एकमेकांशीं एकरूप होणें या क्रियाप्रक्रिया चढत्या पायऱ्यांवर वाढत्या प्रमाणांत शक्य होतात. खालीं शेवटच्या जडतत्त्वाच्या पायरीवर आकाराचा टिकाऊपणा हा प्रमुख धर्म असतो; तेथून वर चढत असतां द्रव्याची सूक्ष्मता वाढत जाऊन, आकारधारक आत्मतत्त्वाच्या अधिकाधिक शाश्वततेचा अनुभव आम्हांस येत जातो; भौतिक जडाच्या रोधक आणि

 

पान क्र. ४७२

 

भेदक गुणांचा टिकाऊपणा, खालीं आमच्या प्रत्ययास येतो तर जसे आपण वर चढूं तसा आम्हांला उलट त्यांचा अनुभव अधिकाधिक प्रमाणांत येत जातो. अनंतता, एकता, अविभाज्यता या आत्मतत्त्वाच्या दिव्य सर्वोच्च स्वभाव धर्मांचा अनुभव, खालून वर चढत असतां द्रव्याच्या सूक्ष्मतेच्या वाढत्या मानामुळें आम्हांला वाढत्या प्रमाणांत येत जातो. स्थूल भौतिक द्रव्य आणि शुद्ध चैतन्य-द्रव्य या दोहोंचे मूलभूत गुण व व्यापार अन्योन्यविरोधी आहेत : स्थूल भौतिक जडांत चित् अर्थात् जाणीवशक्ति आपले अंश जागजागीं घट्टपणें एकत्र करून अनेक घन आकार निर्माण करते व हे घन आकार एकमेकांपासून अलग राहतात, एकमेकांना धक्के देतात, प्रतिकार करतात; उलट शुद्ध चैतन्यद्रव्यांत तीच चित्, शुद्ध जाणिवेच्या स्वरूपांत आपले जे अनेक आकार कल्पिते ते कल्पितांना आपलें स्वतंत्रत्व घालवीत नाहीं, कायम ठेवते; आपलें स्वरूप विसरत नाहीं, कायम ध्यानांत ठेवते; हे कल्पिलेले आकार स्वभावत: अविभाज्य तत्त्वाचे आहेत, हें ती विसरत नाहीं आणि या आकारांना जड द्रव्याप्रमाणें अलग आणि अमिश्रणार्ह ठेवीत नाहीं : या शुद्ध चैतन्यद्रव्यांत ते अन्योन्यांत स्वैरपणें मिसळतात, सारखे एकरूप होण्याच्या धडपडींत असतात -- जाणीवशक्ति या शुद्ध चैतन्यद्रव्याच्या क्षेत्रांत कितीहि विविध रूपांना जन्म देती झाली, तरी हीं रूपें एकमेकांत मिसळून जाणारीं, एकमेकांची जागा घेणारीं व द्रव्याची अविभाज्यता, एकता सारखी पटविणारीं अशीं असतात. जड भौतिक स्थूल घनद्रव्य आणि शुद्ध चैतन्य-द्रव्य हीं दोन टोंकाचीं द्रव्यें व या दोन टोंकांना जोडणारीं अनेक द्रव्यांची चढती म्हणा, उतरती म्हणा मालिका, अशी एकंदर विश्व-द्रव्याची व्यवस्था दिसते. एकाच शुद्ध चैतन्य द्रव्याच्या, क्रमश: स्थूल, स्थूलतर होणाऱ्या या सर्व अवस्था होत. सर्वांत शेवटीं, म्हणजेच सर्वात खालच्या पायरीवर जड घनद्रव्य ही चैतन्य-द्रव्याची अवस्था असते.

हे जे द्रव्याचे प्रकार अथवा चैतन्य-द्रव्याच्या अवस्था वर सांगितल्या, त्यांचा विचार दिव्य जीवनाच्या चर्चेंत फार महत्त्वाचा आहे. मानवी आत्मा पूर्णता पावला, म्हणजे त्याचा दिव्य प्राण व त्याचें दिव्य मन एका बाजूला आणि त्याचें स्थूल दर्शनी अ-दिव्य शरीर, अर्थात् भौतिक अस्तित्वाचा आकार दुसऱ्या बाजूला, अशी स्थिति कायम असणार कीं काय ? अशा स्थितींत या दोन अ-दिव्य व दिव्य अंगांचें नातें कसें

 

पान क्र. ४७३

 

व कोणतें असेल ? भौतिक विश्वाच्या आरंभीं, द्रव्य आणि संवेदना यांचें जें एक विशिष्ट नातें स्थापित झालेलें होतें, तें नातें स्थूल जड द्रव्याला जन्म देतें झालें आणि या द्रव्याचें कार्य म्हणजे आमचें भौतिक अ-दिव्य शरीर होय. संवेदना व द्रव्य यांच्या ज्या नात्यानें हें शरीर निर्माण झालें तेंच एक नातें या विश्वांत, संवेदना व द्रव्य यांजमध्यें नाहीं -- आणि म्हणून अ-दिव्य शरीर हें एकच शरीर विश्वांत आहे, अशीहि गोष्ट नाहीं. द्रव्याशीं असलेलें प्राणाचें व मनाचें जें नातें, हें अ-दिव्य शरीर व त्याचे नियम बनवितें, त्या नात्याहून प्राणाचें व मनाचें द्रव्याशीं वेगळें नातें असूं शकतें आणि आहे. या भिन्न नात्यांमुळें शरीराचे भौतिक नियमहि भिन्न होतात. शरीराच्या संवयी अगदीं संकुचित वृत्तीच्या न राहतां विशाल वृत्तीच्या होतात; सामान्य संवयींहून वेगळ्या संवयीहि शरीराला पडतात; शरीराचें द्रव्य देखील बदलतें -- हें बदललेलें शरीर-द्रव्य इंद्रियशक्तींत अधिक विशालता व स्वतंत्रता आणतें, जीवनाची क्रिया अधिक मोकळी व अनिर्बंध अशी बनविते, मनाची प्रक्रिया देखील अधिक स्वैरतेनें, स्वछंदतेनें चालेल असें करतें : आमचें जें भौतिक अस्तित्व आज आहे, त्यांत मरण, विभक्तता, शरीरांचें अन्योन्यांना विरोध करणें, शरीरांनीं अन्योन्यांना अगदीं दूर दूर धरणें (हीं शरीरें अर्थात् एकाच जाणीवयुक्त प्राणशक्तीचे निरनिराळे भौतिक संघ असतात) या गोष्टी या अस्तित्वाची विशिष्टता दाखविणाऱ्या आहेत. आमच्या भौतिक अस्तित्वाच्या या सूत्रभूत विशिष्ट गोष्टी प्राणिशरीरांत आम्हाला बंधनरूप होतात; आमच्या अंतरांत जी प्राण व मन हीं श्रेष्ठ तत्त्वें आहेत त्यांना या विशिष्ट बंधनरूप गोष्टींचें जोखड खांद्यावर वागवून पाउलें टाकण्याचा प्रयत्न करावा लागतो : इंद्रियशक्तीच्या व्यापाराला अगदीं संकुचित क्षेत्र; जीवनाच्या व्यापारांना क्षेत्र संकुचित, काल संकुचित, शक्तीहि अल्प; मनाचा व्यापार अंधारांत, खुरडत, लंगडत, मध्यें मध्यें शून्य होत, एकंदरींत अतिमर्यादित असा चालावयाचा; मूळ भौतिक अस्तित्वाच्या बंधनांचें जोखड वागविणाऱ्या श्रेष्ठ तत्त्वांचा म्हणजे प्राणशक्तीचा व मानसिक शक्तीचा असा लंगडालुळा व्यापार अपरिहार्यपणें आम्हाला पहावा लागतो. पण वर सांगितल्याप्रमाणें प्राणशक्ति आणि मन यांचें द्रव्याशीं एकच प्रकारचें नातें असलें पाहिजे किंवा आहे असें नाहीं. द्रव्य आणि संवेदना यांजमधील ज्या संबंधानें भौतिक स्थूल शरीर निर्माण केलें आहे, त्यापेक्षां वेगळेहि संबंध निसर्गांत, विश्वांत

 

पान क्र. ४७४

 

आहेत -- तालबद्ध निसर्गांत एकच ताल नाहीं, अनेक ताल आहेत; द्रव्याच्या व द्रव्यसंघांच्या, अनेक श्रेष्ठ-कनिष्ठ अवस्था आहेत. कनिष्ठतम भौतिक विश्वाप्रमाणें त्याहून श्रेष्ठ अशीं विश्वें आहेत; या श्रेष्ठ द्रव्य-अवस्थांचा, या श्रेष्ठ विश्वांचा नियमसंघहि श्रेष्ठ आहे -- मनुष्य हा विकासाची वाटचाल करीत आहे. त्याचें शरीरद्रव्य सध्यांच्या दोषांपासून व उणीवांपासून क्रमश: मुक्त होऊन उच्च प्रतीचें बनत आहे; आमचा आजचा जो देह आहे, आमच्या जीवनाचें जें आजचें साधन आहे त्याजवर वर सांगितलेल्या द्रव्याच्या श्रेष्ठ अवस्थांचें व श्रेष्ठ विश्वांचे नियम, आमचा विकास होऊन त्या विकासाच्या बळावर जर लादतां आले, तर आमचें दिव्य मन व आमची दिव्य इंद्रियशक्ति आमच्या स्थूल देहाच्या द्वारांहि प्रकट होऊं शकेल; आमचें दिव्य आंतरिक जीवन आमच्या शरीराच्या द्वारां बाह्य स्वरूप धारण करूं शकेल; इतकेंच नव्हे, तर आमचें मानवी शरीरदेखील आमच्या विकासाचा एक भाग म्हणून एकप्रकारची दिव्यता धारण करील; या पृथ्वीवर जीवन जगत असतांना या सर्व गोष्टी होऊं शकतील. मानवाच्या शरीराचें रूपांतर दिव्य शरीरांत होईल -- पृथ्वीमाता तिच्यांतील देवत्व, दिव्यत्व आमच्या द्वारां प्रकट करील -- असा संभव भरपूर आहे.

भौतिक जगाचा जो द्रव्यसंभार आहे त्यांतहि जड द्रव्याच्या प्रकारांची चढती श्रेणि आहे; अगदीं खालीं घनतम द्रव्य असतें; पुढें जसें जसें वर चढावें तसें तसें कमी घनद्रव्य लागतें; अगदीं खालीं स्थूलतम द्रव्य आहे व वरतीं चढत्या प्रमाणांत सूक्ष्म सूक्ष्मतर द्रव्य लागतें; या मालिकेंत सगळ्यांत वरची पायरी आम्हीं गांठल्यावर पुढें काय लागतें ? भौतिक जडद्रव्य व भौतिक जडशक्ति ही सगळ्यांत वरच्या थरांत अति सूक्ष्म आकाशाच्या सूक्ष्मतेहूनहि सूक्ष्म अशी असते -- पुढें काय असतें ? अगदीं शून्य पुढें असतें कीं काय ? पुढें सर्व पूर्ण पोकळी आहे कीं काय ? पुढें शून्य नाहीं, पोकळी नाही; आमच्या संवेदनाशक्तीला न आकलन होणारी अशी कांहीं वस्तु पुढें असते; आपल्या मनाला, आपल्या अतिसूक्ष्म जाणीवशक्तीलाहि ती अनाकलनीय आहे, एवढेंच. या अनाकलनीय वस्तूला आम्ही पोकळी म्हणतों; शून्य म्हणतों; अति-सूक्ष्म जड द्रव्याच्या पलीकडे शून्य नाहीं -- खरें शून्य नाहीं; किंवा हें अतिसूक्ष्म जडद्रव्य विश्वाचें शाश्वत असें आरंभक द्रव्यहि नाहीं; आपणास हें ठाऊक झालें आहे कीं, जडद्रव्य, जडशक्ति या वस्तू शुद्ध (चैतन्य) द्रव्य व शुद्ध

 

पान क्र. ४७५

 

(चैतन्य) शक्ति यांच्या व्यापाराचा अंतिम परिणाम म्हणून उदयास येतात. या शुद्ध द्रव्याच्या व शुद्ध शक्तीच्या पोटीं जाणीव अथवा चैतन्य असतें आणि या चैतन्याची आत्मजाणीव नित्यप्रकाशमय असते व हें चैतन्य नित्य आत्मतंत्र असतें, जाणीवपुरस्सर आत्मतंत्र असतें; हें चैतन्य (वा जाणीव) जडद्रव्यांत स्वत:ला विसरलेलें असतें, त्याला जणुं झोंप लागते आणि त्याची हालचाल परतंत्र होते; जड द्रव्यांत व शक्तींत जाण्यानें, नेणीव आणि स्वयंगतिशून्यता हे गुण मूळ जाणिवेच्या व जाणीवयुक्त शक्तीच्या ठिकाणीं येतात; अशा भौतिक जडद्रव्याच्या वरच्या पायऱ्यांवर व शुद्धद्रव्याच्या खालच्या पायऱ्यांवर काय असतें ? त्या दोन वस्तूंच्या मध्यभागीं, अशा पायऱ्या अवश्य आहेत; जडतेच्या निरतिशय जाणिवेंतून एकदम चैतन्याच्या निरतिशय जाणिवेंत आम्ही प्रवेश करीत नाहीं, यांत कांहीं संशय नाहीं; नेणीव युक्त द्रव्य आणि पूर्ण आत्मजाणीवयुक्त आत्मविस्तार किंवा जडतत्त्व आणि आत्मतत्त्व या दोन टोंकांच्या वस्तूंच्या दरम्यान अनेक पायऱ्या, द्रव्याच्या अनेक अवस्था असल्या पाहिजेत आणि आहेत.

जडतत्त्वाच्या वरच्या दर्जाच्या आणि शुद्ध चैतन्यतत्त्वाच्या खालच्या दर्जाच्या द्रव्यावस्था कांहीं साधकांनीं अनुभवल्या आहेत. त्यांचा अनुभव असा आहे कीं, भौतिक विश्वाचा जो कायदा आहे तो कायदा या सूक्ष्म, सूक्ष्मतर द्रव्यांस लागू पडत नाहीं. जडतत्त्व, प्राण, मन, अतिमानस (विज्ञान) आणि त्रिमुखी दिव्य सच्चिदानंद ही जशी चढती तत्त्व श्रेणी आहे, त्याप्रमाणें या श्रेणीला अनुरूप अशी चढती द्रव्यश्रेणी आहे. जसें तत्त्व, तसें विश्वांतील त्याच्या आत्म-प्रकटनाला अनुकूल असें खास द्रव्य, अशी एकंदर व्यवस्था आहे. द्रव्य हें तत्त्वाच्या आत्मप्रकटनाचें साधन आहे. प्रत्येक तत्त्व आत्म्याप्रमाणें आणि तदनुकूल द्रव्य त्याच्या देहाप्रमाणें, कोशाप्रमाणें -- अशी विश्वांतील व्यवस्था आहे. जडमय (अन्नमय) आत्मा हा जड (अन्न) शरीराच्या द्वारां पूर्णतया प्रकट होतो; प्राणमय आत्मा प्राणानुकूल सूक्ष्म द्रव्याच्या बनलेल्या प्राणशरीराच्या द्वारां पूर्णतया प्रकट होतो, इत्यादि व्यवस्था विश्वांत आहे.

या भौतिक विश्वांत भौतिक द्रव्याच्या सूत्रावर सर्व व्यवहार आधारलेला आहे. प्राचीनांनीं ज्या भौतिक तत्त्वाला पृथ्वीतत्त्व अशी संज्ञा दिली आहे, त्या तत्त्वावर भौतिक विश्वांतील संवेदना, प्राण, विचार आधारलेले आहेत; त्यांचा आरंभ भौतिक पृथ्वीतत्त्वापासून, त्यांना

 

पान क्र. ४७६

 

कायदा भौतिकाचा, त्यांचा व्यापार भौतिकाशीं जुळते घेणारा, भौतिकाची मर्यादा ती त्यांची मर्यादा -- अशी स्थिति आहे. -- कांहीं नव्या गोष्टी त्यांना (संवेदना, प्राण, विचार यांना) करावयाच्या असल्यास, भौतिकाच्या मर्यादा वाढावयाच्या असल्यास या विकासक्रमाच्या कार्यांतहि मूळ सूत्राकडे त्यांना लक्ष ठेवावें लागतें; मूळ सूत्राचा हेतु व दिव्य विकासक्रमाकडून मूळ सूत्राच्या अपेक्षा, या सर्व गोष्टी लक्षांत घेऊन व त्यांना योग्य तो मान देऊन मगच नव्या गोष्टी, भौतिकाच्या मर्यादा वाढविण्याच्या गोष्टी, संवेदना-प्राण-विचार यांना, आपल्या व्यवहारांत आणणें शक्य होतें. संवेदनाशक्ति स्थूल भौतिक इंद्रियांच्या आणि इतर साधनांच्या द्वारां काम करते; प्राणशक्ति ही भौतिक नाडीसंघ आणि जीवनसाहायक भौतिक अवयव यांच्या द्वारां काम करते; मनाला शारीर अवयवांच्या पायावर आपला व्यवहार उभारावा लागतो आणि या व्यवहारासाठीं भौतिक साधनांचा उपयोग करावा लागतो -- मनाची जी शुद्ध क्रिया असते त्या शुद्ध क्रियेला वर दिलेल्या साधनांनीं मिळालेला अनुभवच, आपलें कार्य क्षेत्र म्हणून उपयोगांत आणावा लागतो; या अनुभवाच्या कच्च्या मालावरच आपली इमारत उभारावी लागते. मनाचा, संवेदनाशक्तीचा, प्राणाचा जो स्वभावधर्म आहे त्यानुसार वरीलप्रमाणें भौतिक साधनांवर त्यांनीं अवलंबून रहावें असें नाहीं; भौतिक इंद्रियें कांहीं संवेदना निर्माण करीत नाहींत, उलट हीं इंद्रियें विश्वात्म्याच्या संवेदनाशक्तीनें आपल्या सोईसाठीं निर्माण केलेलीं आहेत; भौतिक नाडीसंघ आणि जीवनअवयव हे कांहीं प्राणाची क्रिया-प्रतिक्रिया निर्माण करीत नाहींत तर विश्वात्म्याच्या प्राणशक्तीनें आपल्या सोईसाठीं त्यांना निर्माण केलें आहे; मेंदू कांहीं विचार निर्माण करीत नाहीं, तर विश्वात्म्याच्या मनानें आपल्या सोईसाठीं तो मेंदू निर्माण केला आहे. संवेदना वगैरेंना या भौतिक विश्वांत भौतिक अवयवांचा उपयोग आवश्यक असतो -- तो कांहीं त्यांना सर्वत्र आवश्यक नसतो. ईश्वरानें, विश्वात्म्यानें आपल्या इच्छेनें या भौतिक विश्वांत संवेदना आणि तिचा विषय यांच्यामध्यें भौतिक नातें निर्माण करण्याच्या हेतूनें भौतिक इंद्रियें निर्माण केलीं आहेत; संवेदना, प्राण, विचार यांना भौतिक साधनांची, अवयवांची पडणारी आवश्यकता म्हणजे ईश्वराच्या विशिष्ट इच्छेचें फळ आहे. ईश्वरानेंच मूळ जाणीवयुक्त शक्तीला या भौतिक विश्वांत, भौतिक द्रव्याचें व नियमाचें बंधन घातलें आहे आणि ती शक्ति या भौतिक

 

पान क्र. ४७७

 

नियमानुसार जाणीवयुक्त मूळ अस्तित्वाला विविध भौतिक आकार देते आणि हा भौतिक आकार या विश्वांत विकासाचा आरंभ करणारी, सर्वशासक, सर्वनियंत्रक वस्तु होते. अस्तित्वाचा मूळ पायाभूत नियम, संवेदना-प्राणमन यांनीं भौतिक द्रव्याच्या व नियमांच्या बंधनांत वागावे हा नाहीं -- हें बंधन आतांच सांगितल्याप्रमाणें, एक रचनात्मक तत्त्व म्हणून ईश्वरानें योजिलें आहे; भौतिक द्रव्यानें बांधलेल्या विश्वांत, मूळ चैतन्याला, आत्मतत्त्वाला आपला विकास घडवून आणण्याची इच्छा झाली, म्हणून त्यानें, त्या ईश्वरानें संवेदनादिकांना या भौतिक विश्वापुरती भौतिक अवयवांचीं बंधने निर्माण केलीं.

जड भौतिक द्रव्य ही द्रव्याची सर्वात खालची अवस्था. या द्रव्यांत आकार व जडशक्ति या गोष्टी सर्व व्यवहाराच्या मुळाशीं असतात, सर्व व्यवहारावर सत्ता चालवितात, त्याचें स्वरूप ठरवितात. या भौतिक द्रव्याच्या शेजारचे, वरच्या दर्जाचें जें द्रव्य आहे, तेथें आकार आणि जडशक्ति यांऐवजीं, जीवन (प्राण) आणि जाणीवयुक्त वासना या जेव्हां पायाभूत, प्रधान, निर्णायक गोष्टी असतात, तेव्हां या भौतिक विश्वापलीकडील विश्वाचा पाया, जाणीवयुक्त विश्वव्यापी क्रियाशील जीवनशक्ति प्राणशक्ति तिची भूक आणि तिच्या विविध वासना आणि त्यांचें प्रकटीकरण हा असतो; भौतिक शक्तीचें रूप घेणारी नेणीवमय इच्छा किंवा अर्धजागृत इच्छा, हा काही या वरच्या जगाचा पाया नसतो. या जगांत जाणीवयुक्त प्राणशक्ति ही पायाभूत गोष्ट असल्यानें, जडद्रव्य आणि मन यांना या पायाभूत गोष्टीशीं जमवून घ्यावे लागतें, त्यांचें अंकित होऊन काम करावे लागतें. या जगांत जे आकार, शरीरे, शक्ती, प्राणांचीं आंदोलने, संवेदनाशक्तीच्या हालचाली, विचाराचे व्यापार, विकासक्रम, अंतिम सिद्धी व आत्मपरिपूर्तिरूप घटना घडतात, त्या सर्वांवर जाणीवयुक्त जीवनशक्तीचा छाप अवश्यमेव असतो; ही जीवनशक्ति या सर्व गोष्टींचें स्वरूप ठरवितें व त्यांजवर सत्ता चालविते; जडद्रव्य आणि मन यांना, वर सांगितल्याप्रमाणें या जीवनशक्तीचें अंकित होऊन काम करावे लागतें; या जीवनशक्तीस मूळ आधार करून आपला व्यवहार आरंभावा लागतो; या शक्तीच्या मर्यादांनीं मर्यादित व्हावें लागतें; अर्थात् या शक्तीच्या ज्या नियमावली, पात्रता, क्रिया सामर्थ्यें असतील, तीं जडद्रव्याचें संकुचित क्षेत्र वाढवितील, मनाचें विशाल क्षेत्र संकुचित करतील; या जीवनशक्तीच्या जगांत मनाला आपल्या शक्ती

 

पान क्र. ४७८

 

वाढविणें असेल, तर वासनशक्ति हा जो जीवनशक्तीचा मूळ कायदा, तो मनानें लक्षांत घेतला पाहिजे; या कायद्याचा हेतु ध्यानांत घेतला पाहिजे आणि दिव्य आत्मतत्त्वाचें प्रकटीकरण हा मनाचा हेतु असला, तरी जीवनशक्तीच्या वासनांना प्राधान्य देऊन त्या वासनांना झेपेल एवढेंच दिव्यतेचें प्रकटीकरण त्यानें केलें पाहिजे; अर्थात् त्या वासनांचें साधेल तेवढेच उदात्तीकरण करणें हेंहि मनाचेंच काम आहे.

प्राणद्रव्य हें जसें भौतिक द्रव्याहून वरच्या दर्जाचें, तसें मनाचें द्रव्य प्राणद्रव्याहून वरच्या दर्जाचें आहे. भौतिक विश्वांत भौतिकद्रव्य प्रधान, प्राणमय जगांत प्राणद्रव्य प्रधान, तसें मनोमय जगांत मनोद्रव्य प्रधान. या मानसिक द्रव्याचें नियंत्रण मनानें करावयाचें असतें. मन जे आकार योजील, ते आकार हें मनोद्रव्य घेऊं शकतें आणि घेतें -- हें द्रव्य प्राणद्रव्याहूनहि सूक्ष्म आणि लवचिक असतें. हें द्रव्य मनाचे व्यवहार-नियम पाळते; मनाची आत्मप्रकटीकरणाची, आत्म-परिपूर्तीची मागणी पुरवितां येईल, अशा रीतीनें मनाचें प्रमुखत्व मान्य करून, हें द्रव्य आपलें कार्य करतें; संवेदना आणि द्रव्य यांचीं नातीं द्रव्याच्या सूक्ष्मतेनुरूप सूक्ष्म आणि लवचिक असतात; भौतिक इंद्रियें आणि भौतिक पदार्थ यांच्या संबंधांप्रमाणें मनोमय जगांतलें मन आणि पदार्थ यांचे संबंध बिनलवचिक व कठीण नसतात; मन जसें सूक्ष्म, तसे त्याचे विषयीभूत पदार्थ, तत्त्वें, विषयीभूत द्रव्य हेंहि सूक्ष्म असतें; या सूक्ष्म द्रव्यावरच मनाचें कार्य होत असते. अशा मनाच्या जगांतील जीवन (प्राण) मनाचें सेवक असतें; आमच्या भौतिक जगांत आमच्या मनाचे व्यापार दुबळे असतात आणि आमच्या प्राणशक्तीचे व्यवहार मर्यादित, खडबडीत, बंडखोरपणाचे असतात : असल्या भौतिक जगांत, प्राणशक्ति आणि मन यांचें जें नातें असतें त्यावरून मनोमय जगांतल्या त्यांच्या परस्परनात्याची कल्पना करतां येणार नाहीं. मनाच्या जगांत मन प्रबळ असतें आणि प्राणशक्ति त्याच्या सेवेचें काम नम्रपणें करते. मनाच्या जगांत मनाची सत्ता चालते; मूळ व्यवहारसूत्र मन हें असतें; मनाचें प्रयोजन, सर्व प्रयोजनांहून श्रेष्ठ मानलें जातें, मनाची जी मागणी असेल, ती दुसऱ्या सर्व मागण्या मागें सारून पुरवावीं लागते; विश्वांत दिव्यतेचा जो कशा आविष्कार नियोजित आहे, त्या आविष्कारांत मनाचें प्रभुत्व सर्वप्रथम, सर्वश्रेष्ठ मानून व्यवहार होत असतो. (ज्याप्रमाणें भौतिक जगांत भौतिक रूपाचें प्रभुत्व, प्राणाच्या जगांत प्राणाच्या वासनेचे प्रभुत्व, तसें मनाच्या जगांत मनाच्या

 

पान क्र. ४७९

 

मताचें प्रभुत्व) मनाच्या वरचें जग, मनापेक्षां श्रेष्ठ अशा तत्त्वाला, विज्ञानाला (अतिमानसाला) प्राधान्य देतें -- विज्ञानानें भारलेलीं, विज्ञानापेक्षां कमी दर्जाचीं पण मनाहून वरच्या दर्जाचीं तत्त्वें, विज्ञान आणि मन यांच्या मधल्या विश्वविभागांत प्रधानपदस्थ असतात; विज्ञानाच्या वरतीं, शुद्ध आनंद, शुद्ध जाणीवशक्ति, शुद्ध अस्तित्व हीं तत्त्वें क्रमश: प्रधान असतात : विश्वाचे, मनाच्या वरचे विज्ञानलोकादि विभाग हे प्राचीन वैदिक ऋषींनीं, प्रकाशमय दिव्य अस्तित्वाचीं क्षेत्रें म्हणून वर्णिले आहेत. या प्रकाशमय विश्वविभागांत वा विश्वांत अमर जीवन आहे -- हींच विश्वें अमरत्वाला मूलाधार आहेत. अर्वाचीन भारतीय धर्मांनीं या अमरताप्रधान विश्वांना ब्रह्मलोक, गोलोक इत्यादि नांवें दिलीं आहेत. मूळ जी चैतन्य सत्ता, आत्मसत्ता ती आपलें आविष्करण सर्वोच्च पायरीवर गोलोक-जीवन, ब्रह्मलोक-जीवन या स्वरूपांत करते. या सर्वोच्च आत्मस्वरूपाची आत्मजीवनाची प्राप्ति, जो विकासशील आत्मा करून घेतो, तो सर्वबंधमुक्त होतो आणि सर्वश्रेष्ठ पूर्णतेला प्राप्त होतो -- शाश्वत देव-देवत्वाचें निरतिशय सुख आणि असीम अनंत जीवन त्या आत्म्याला लाभतें. याप्रमाणें अन्नलोक किंवा जडलोक, प्राणलोक, मनोलोक, विज्ञानलोक, आनंदलोक, चित्‌लोक (ज्ञानलोक), सत्-लोक (सत्यलोक) अशी एकंदर लोकांची व्यवस्था आहे आणि जडलोकांत उतरलेला आत्मा, पुन: विकासक्रमानें सत्-लोकांत (सत्यलोकांत) पोंचतो, अशी दिव्य विचारसरणी आहे.

आमचें भौतिक जग सर्वांत खालीं आणि त्याजवर सारखीं एकापेक्षां एक श्रेष्ठ अशीं जगें -- त्यांत श्रेष्ठ आणि श्रेष्ठतर असा अनुभव आणि साक्षात्कार -- ही जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचें प्रमुख तत्त्वच हें आहे कीं, विश्वांतील जीवन हें तालबद्ध संगीतमय जीवन आहे -- मात्र या जीवनांतील ताल व संगीत साधें सरळ नसून गुंतागुंतीचें, संकीर्ण व संमिश्र असें आहे; आमचें सामान्य मानवी मन आणि जीवन ज्या मर्यादित जाणिवेच्या कोंडींत कमीअधिक समाधानानें व्यतीत होत असतें व व्यवहार करीत असतें, त्या कोंडीच्या मर्यादांनीं विश्वांतील जीवन मर्यादित होत नाहीं. अस्तित्वाची उंचच उंच अशी जणुं शिडी आहे; या शिडीला अनेक पायऱ्या आहेत; अस्तित्व आणि त्याचे सहयोगी जाणीव, शक्ति व द्रव्य यांची तळपायरीवर अवस्था काय असते ती आम्ही जाणतोंच. तळपायरी आमचें भौतिक अस्तित्व व त्याचे सहयोगी यांचें स्थान; हेंच आमचें भौतिक विश्व. या तळपायरीच्या वर अनेक पायऱ्या आहेत;

 

पान क्र. ४८०

 

प्रत्येक पायरीवर तिच्या खालच्या पायरीपेक्षां, अस्तित्व अधिक विस्तृत क्षेत्राचें असतें; जाणीव विस्तारानें, विशालतेनें व आनंदानें अधिक संपन्न असते; शक्तीमध्यें तीव्रता, वेग आणि कार्यक्षमतेचें सुख अधिक असतें. द्रव्य अधिक सूक्ष्म, लवचिक, हलकें व वांकणारें असें असतें -- त्याचें मूळ स्वरूप, जें चैतन्य-द्रव्य, त्या मूळ स्वरूपाचे गुण वरच्या वरच्या पायरीवर अधिकाधिक प्रमाणानें तें आपल्या ठिकाणीं व्यक्त करतें. द्रव्यांत सूक्ष्मतेच्या प्रमाणांत शक्तीचें प्रमाण असतें; जें द्रव्य अधिक सूक्ष्म, तें अधिक शक्तिमान् अशी व्यवस्था आहे; अधिक शक्तिमान म्हणजे वस्तुत: अधिक व्यवहारक्षम म्हणतां येईल -- कारण अधिक स्थूल द्रव्याला बंधनें अधिक, आणि अधिक सूक्ष्म द्रव्याला बंधनें कमी, टिकाऊपणा अधिक, आणि त्याचें मूळ अस्तित्व जसें अधिक टिकाऊ आणि कमी बंधनाचें, तसें त्याचें सरूप व साकार अस्तित्व अधिक व्यापक -- कारण तें अधिक मृदु आणि लवचिक असल्यानें त्याचे अनेक आकार सहज करतां येतात. अस्तित्व हें जणुं अनेक पठारें एकावर एक असलेल्या टेंकडीसारखें, डोंगरासारखें आहे; अधिक वरच्या पठारावर अधिक विस्तृत अनुभव मिळतो, अधिक उंच अशी जाणिवेची पातळी प्राप्त होते, अधिक संपन्न असें विश्व, आम्हांला जीवन जगण्यासाठीं लाभतें.

आमचें जें भौतिक जीवन आहे त्या जीवनांत, दिव्यतेच्या दृष्टीनें, कमीअधिक होण्याची शक्यता, या वर वर्णिलेल्या चढत्या तत्त्वश्रेणीमुळें, द्रव्यश्रेणीमुळें कितपत आहे ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. वर वर्णिलेल्या श्रेणींतील प्रत्येक जाणीव-भूमिका, प्रत्येक जीवन-विश्व, प्रत्येक द्रव्य-प्रकार, प्रत्येक विश्व-शक्तिप्रकार -- या वस्तू, श्रेणींतील खालच्या आणि वरच्या, अगोदरच्या आणि नंतरच्या स्ववर्गीय वस्तूंपासून सर्वथा तुटलेल्या असतील, तर या श्रेणीमुळें आमच्या भौतिक जीवनांत, दिव्यतेच्या दृष्टीनें, कांहींहि कमीअधिक होऊं शकणार नाहीं; परंतु श्रेणीतील वस्तू एकमेकींपासून तुटलेल्या नाहींत. विश्व किंवा विश्वसंघ हा सर्व, एका चैतन्याचा एकसंधी आविष्कार आहे; हा आविष्कार साधा, सरळ, एकरंगी, एकढंगीं नाहीं; -- अनेक तत्त्वें यांत गुफलेलीं आहेत; नाना रंगांच्या धाग्यांची, गुंतागंतीच्या वेलबुट्टीची शाल असावी तसें हें चैतन्याचें विश्व-वस्त्र आहे, यांत एकाच तत्त्वाची सरळ वीण कोठेंहि नाहीं; प्रधान प्रकट वीण एका तत्त्वाची, इतर सर्व तत्त्वें त्यांत गौणत्वानें, गुप्तत्वानें गुंफलेलीं -- अशी प्रत्येक तत्त्वाची व्यवस्था या विश्ववस्त्रांत आहे. एक अखंड वस्त्र असावें

 

पान क्र. ४८१

 

तसा हा अखंड चैतन्याविष्कार विश्वपसाऱ्याच्या रूपानें आपणासमोर उभा आहे. आमचें हें भौतिक विश्व, इतर सर्व विश्वांचा परिणाम म्हणूनच अस्तित्वांत आलें आहे; कारण जडेतर सर्व तत्त्वें जडांत उतरल्यानेंच जडतत्त्वाचें हें विश्व निर्माण झालें आहे; जडाचा प्रत्येक कण, हीं सर्व जडेतर तत्त्वें आपल्या पोटीं सामावून आहे; जडाची, जड कणाची प्रत्येक हालचाल ही, प्रत्येक क्षणीं, हीं जीं जडेतर तत्त्वें त्याच्या पोटीं लपलेलीं आहेत त्या तत्त्वांच्या व्यापारावर अवलंबून असते. जडतत्त्व हें, खालीं उतरलेल्या चैतन्याचें सर्वांत खालचें, तळचें रूप आहे; अर्थात् जडीभूत चैतन्याच्या विकासाचा आरंभ, या जडाच्या हालचालीपासून आहे -- जडाच्या अस्तित्वांत, जडेतर सर्व ज्ञानभूमी, जीवनक्षेत्रें, द्रव्यप्रकार व शक्तिप्रकार, आपापल्या धर्मासह गुप्तरूपानें जें अंतर्भूत आहेत ते सर्व, जडांतून विकास-क्रमानें प्रकट होण्याच्या या सामर्थ्यानें युक्त आहेत. यासाठीं जडतत्त्वाचा संसार अनेक वायू, अनेक रासायनिक संयुक्त पदार्थ, अनेक भौतिक शक्तिप्रकार, अनेक भौतिक हालचाली, अनेक सूर्य, पृथ्वीसारखे अनेक ग्रह, अनेक तेजोमेघ -- एवढ्यानें संपत नाहीं; तर या संसारांत प्राणतत्त्वाचा विकास, मनाचा विकास, शेवटीं विज्ञानाचा किंवा अतिमानसाचा विकास आणि त्याच्याहि वरतीं असलेल्या, आनंद, ज्ञान व सत्ता या सच्चिदानंदाच्या तत्त्वत्रयीचा विकास अंतर्भूत धरला पाहिजे. -- जडांत प्राणाचा उदय, प्राणांत मनाचा उदय -- वगैरे विकासक्रम घडून येतो कसा, याचा विचार केल्यास असें दिसतें कीं, हा विकासक्रम घडून येण्यास जडाच्या पातळीवर जडेतर उच्च पातळ्यांचें, सारखें अप्रतिहत दडपण येत असतें. जडाच्या पोटांत जीं जडेतर तत्त्वे दडून असतात, तीं तत्वें जडानें आपल्या पोटांतून बाहेर दवडावीं, असें जडेतरांचें दडपण जडावर सारखें येत असल्यानें जडेतर तत्त्वें जडांतून क्रमशः उदयास येतात, वाढतात व आपल्यांतून आपल्यापेक्षां उच्च तत्त्वांना प्रकट करतात. हें जडेतर भूमिकांचें दडपण जडावर न येतें, तर जडाच्या कठीण कवचांतून कदाचित् जडेतरांचा उदय, विकास झाला नसता, जडेतर तत्त्वें कायमचीं जडाच्या बंदिखान्यांत कोंडलेलीं राहिलीं असतीं, अशी कल्पना होणें शक्य आहे; पण ही कल्पना तितकीशी सयुक्तिक नाहीं -- कारण जडेतर तत्त्वें जडाच्या पोटांत येऊन राहिलीं -- याचा अर्थ तीं तत्त्वें त्या जडांतून बाहेर येऊन आपला विकास करण्याकरितां राहिलीं, असाच खरोखर होतो; तथापि जडेतर पातळ्यांचें जडावर दडपण येत नसतांहि जडांतून जडेतर तत्त्वें केव्हांतरी वर आलीं

 

पान क्र. ४८२

 

असतीं, हें जरी खरें असलें, तरी हें दडपण वास्तवांत येत असतें आणि जडेतर तत्त्वें जडांतून बाहेर येण्यास या दडपणाचा पुष्कळ उपयोग होतो हेंहि खरें आहे.

प्राण, मन, अतिमानस, आत्मचैतन्य (सच्चिदानंद) या, जडाच्या वरच्या तत्त्वांना जडतत्त्व आपल्या पोटांतून उदयास आणतें, तें नाखुषीनें आणतें आणि हीं तत्त्वें जडांतून जडाचे ठिकाणीं उदयास आलीं तरी जडाच्या क्षेत्रांत त्यांचा फारसा विकास होत नाहीं, होऊं शकत नाहीं. या तत्त्वाचें दर्शन जडांत आपणांस घडूं शकतें, अल्पसा विकासहि जडाच्या क्षेत्रांत होऊं शकतो -- आणि अल्पशा विकासावरच या तत्त्वांना जडाच्या क्षेत्रांत संतुष्ट रहावें लागतें, असें वाटण्याचा संभव आहे; पण वस्तुस्थिति अशी नाहीं. हीं जडेतर तत्त्वें जडांतून वर आलीं, जागृत झालीं, आपआपली शक्ति किती आहे, कोणती आहे हें त्यांना कळूं लागलें, त्या शक्तीचा तीं उपयोग करूं लागलीं व हा उपयोग अधिकाधिक करावा असें त्यांस वाटूं लागलें (आणि हें सर्व क्रमश: घडून येतेंच) कीं उच्च जडेतर पातळ्यांचें त्यांजवरचें दडपणहि वाढत जातें, त्या जडपणाची शक्ति वाढते, चिकाटी वाढते, परिणामकारकता वाढते. सर्व विश्वें, जड व जडेतर, एकमेकांशीं अगदीं लागून आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत; म्हणून वर सांगितल्याप्रमाणें त्या त्या जडेतर विश्वाचें दडपण त्याच्या त्याच्या प्रधान तत्त्वावर व इतर जागृत तत्त्वांवरहि वाढत्या प्रमाणांत येत राहून त्या सर्वांचा सारखा विकास होत राहतो. खालून जडांतून हीं जडेतर तत्त्वें जडांत प्रकट होतात; अर्थात् हा त्यांचा आविष्कार मर्यादित आणि विशिष्ट बंधनांनीं बद्ध असा असतो -- पण त्याबरोबर वरच्या भूमिकांवर, आपापल्या विशिष्ट क्षेत्रांत काम करीत असलेलीं हीं जडेतर तत्त्वें आपल्या विशिष्ट सामर्थ्यासह जडपुरुषांत उतरणें अपरिहार्य असतें आणि तीं उतरून आपलें पूर्ण तेज, जडपुरुषांत आणतात. या जडेतर तत्त्वांच्या क्रिया, जडामध्यें विकासक्रमानें अधिकाधिक व्यापक होत जातात आणि या क्रियांना जडपुरुषांत जागा मिळणें अवश्य असतें, अपरिहार्य असतें; योग्यतऱ्हेचें पात्र, माध्यम वा साधन, जडेतरतत्त्वांच्या व्यापक होत जाणाऱ्या या व्यापारांना मिळालें कीं तीं तत्त्वें आपला संसार वाढवीत जातात -- आणि असें माध्यम मनुष्याच्या शरीरांत, प्राणांत, जाणिवेंत जडेतर तत्त्वांना उपलब्ध होतें.

स्थूल शरीराच्या ज्या कार्यमर्यादा, शक्तिमर्यादा आहेत, त्या मर्यादांनीं

 

पान क्र. ४८३

 

मनुष्याच्या शरीर-प्राण-मनाची ही त्रयी बांधली गेली असेल, तर (आणि या मर्यादांचें बंधन स्थूल भौतिक इंद्रियें आणि भौतिक मेंदूचें मन यांना सर्वथा मान्य आहे) जडेतर तत्त्वांचा विकास जडांत फारच अल्पप्रमाणांत होऊं शकेल; आणि आज जें जीवन मनुष्य जगत आहे, त्यापेक्षां तत्त्वत: श्रेष्ठ असें जीवन जगण्यासारखी पात्रता त्याला आपल्या ठिकाणीं आणतां येण्याचा संभव जवळजवळ मुळींच असणार नाहीं; पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, हें जें आमचें स्थूल शरीर आहे, तें आमच्या भौतिक अस्तित्वाचा एक अंश आहे, आमचें शरीरद्रव्य सर्वच कांहीं घनद्रव्य -- स्थूल शरीरद्रव्य -- नव्हे. प्राचीन गुप्तविद्येनें ही गोष्ट शोधून काढली होती. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय किंवा आत्मिक -- अशा पांच आत्म्यांचा मनुष्य बनला आहे, असें मनुष्याच्या अस्तित्वाच्या पांच पाय-यांचें किंवा पातळ्यांचें वर्णन जुन्या वेदांतांत आहे. मनुष्याचा आत्मा जसा पांच आत्मिक अवस्थांचा आहे, तसें प्रत्येक आत्मिक अवस्थेला अनुरूप असें द्रव्य आहे आणि आपल्या अनुरूप द्रव्याच्या बनलेल्या शरीरांत प्रत्येक अवस्थेंतील आत्मा राहतो. जुन्या अलंकारिक भाषेंत या शरीरांना कोश अशी संज्ञा दिली आहे. अर्वाचीन भारतीय मानसशास्त्रानें या पांच कोशांचा तीन देहांत अंतर्भाव केला आहे; स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह; आत्मा या सर्व देहांत राहतो, एकाचवेळीं या सर्व देहांत त्याचें वास्तव्य असतें; आपल्याला, म्हणजे आपल्या बाह्य जाणिवेला स्थूल जड शरीराचेंच भान सांप्रत काळीं, सांप्रत स्थळी असतें -- पण आमच्या दुसऱ्या देहांत, तसा प्रयत्न केल्यास आम्ही जाणीवपूर्वक काम करूं शकतो व या आमच्या जडेतर शरीराचे आणि जड स्थूल शरीराचे संबंध तोडणारा पडदा दूर होऊं शकतो; हा पडदा दूर होऊन आमच्या अंगभूत शारीर, मानसिक, विज्ञानमय व्यक्तींमध्यें किंवा आत्म्यांमध्यें अन्योन्यसंबंध स्थापित झाल्यानें कांहीं गूढ घटना, कांहीं मानसिक चमत्कार घडतात : या घटनांचा व चमत्कारांचा अभ्यास अधिकाधिक प्रमाणांत होऊं लागला आहे, तरीपण एकंदरीनें हा अभ्यास अद्याप अल्प आणि अव्यवस्थित असाच आहे; मात्र या चमत्कारांचा व गूढ घटनांचा स्वार्थासाठीं खूप उपयोग केला जात आहे. भारतांतले जुने तांत्रिक आणि हठयोगी यांनीं फार पूर्वींच, मानवी जीवनाचे आणि शरीराचे जे श्रेष्ठ प्रकार आहेत, त्यांच्या अभ्यासाचें एक शास्त्रच बनविलें होतें. आमच्या स्थूल शरीरांत सहा नाडीमय जीवनकेंद्रें आहेत, आमच्या सूक्ष्म शरीरांतील सहा जीवन-

 

पान क्र. ४८४

 

गत आणि मानसिक शक्तिकेंद्रांचा या सहा स्थूल केंद्राशीं निकट संबंध आहे व तो क्रमवार आहे हें त्यांनीं शोधून काढलें होतें; असे सूक्ष्म शारीरिक व्यायामहि त्यांनीं शोधून काढले होते कीं, त्यांच्या योगानें आज बंद असलेलीं स्थूल जीवनकेंद्रें उघडतां येतात आणि स्थूल जीवनाहून श्रेष्ठ असें सूक्ष्म जीवन आम्हांला जगतां येतें; असेंहि व्यायाम त्यांनीं शोधले होते कीं, त्यांच्या आश्रयानें विज्ञानमय आणि आनंदमय (आत्मिक) जीवनाचा अनुभव, ज्या शारीर आणि प्राणिक अडचणींमुळें आम्हांला घेतां येत नाहीं, त्या अडचणी समूळ दूर करतां येतात. हठयोगी आपल्या अभ्यासानें स्थूल भौतिक प्राणशक्ती आपल्या अंकित करतात, ही गोष्ट अनेक उदाहरणांनीं सिद्ध झालेली आहे. हठयोग्यांनीं प्राणशक्ति आपल्या अंकित केल्यामुळें, भौतिक शास्त्रानें शारीर जीवनाचें जे नियम म्हणून निश्चित केले आहेत, मान्य केले आहेत, त्यापैकीं कांहीं सामान्य नियमांचें बंधन हठयोग्यांना असत नाहीं, ही गोष्ट अनेक हठयोग्यांनीं प्रत्यक्षांत दाखविली आहे. वर जे नियम म्हणून सांगितले, ते नियम म्हणजे शारीर जीवनाच्या सर्वसाधारण संवयी होत. त्या संवयी हठयोगी जुमानीत नाहींत, विशिष्ट अभ्यासानें बदलून टाकतात व आम्हां सामान्य माणसांना चमत्कार वाटण्यासारख्या गोष्टी करून दाखवितात.

भौतिक-मानसिक असें जें प्राचीनांचें विज्ञान आहे, त्या विज्ञानानें, शास्त्रानें शोधून काढलेल्या गूढ गोष्टी वर सांगितल्या आहेत. या गोष्टींच्या पाठीमागें, त्या शक्य करणारी जी महान् गोष्ट आहे, आमच्या अस्तित्वाच्या संबंधींचा जो महान् नियम आहे तो हा कीं, आमच्या अस्तित्वाचा (जीवनाचा) आकार, त्या जीवनाची जाणीव, त्यांत अंतर्भूत असणारी शक्ति विकासक्रमांत आज कोणत्याहि तात्पुरत्या स्वरूपाची असो -- या वैशिष्ट्यांनी युक्त अशा आजच्या आमच्या बाह्य अस्तित्वाच्या (जीवनाच्या) पाठीमागें (आंत) त्याहून श्रेष्ठ, त्याहून अधिक वास्तव, अधिक सत्यमय असें आमचें अस्तित्व असलें पाहिजे आणि आहे -- आणि त्या अधिक सत्यमय अस्तित्वाचा एक बाह्य परिणाम म्हणजे आमचें भौतिक अस्तित्व आहे, भौतिक इंद्रियांना ग्रहण करतां येण्यासारखा एक देखावा आहे. आम्हांला भौतिक स्थूलद्रव्याचें शरीर आहे, पण आमच्या आत्म्याचा साधनभूत द्रव्यसंभार सर्व कांहीं स्थूल शरीरांत संपतो असें नव्हे; पार्थिव स्तंभ म्हणा, पाया म्हणा, असें हें स्थूल शरीर आहे -- आत्म्याच्या विकासाची इमारत या पायावर, या स्तंभावर उभारलेली

 

पान क्र. ४८५

 

आहे; विकासाचें भौतिक आरंभस्थान होणें, हें या स्थूल शरीराचें नियत कार्य आहे. आमची जागृतींतील मानसिक जाणीव एवढीच कांहीं आमची जाणीव नव्हे, तर तिच्या पाठीमागें, आंत तिच्यापेक्षां पुष्कळच अधिक व्यापक क्षेत्रांचे जाणिवेचे अनेक थर आहेत; ह्यांतील आमच्या बाह्य जाणिवेच्या खालच्या दर्जाचे कांहीं थर तिच्या खालीं आहेत, कांहीं वरच्या दर्जाचे तिच्या वर आहेत -- वरचे आणि खालचे दोन्ही प्रकार आमच्या जाणिवेच्या कक्षेंत नसल्यानें, आम्हांला सामान्यत: त्यांचें भान नसतें; कधीं कधीं कांहीं असामान्य गोष्ट घडून या अज्ञात अननुभूत जाणीव-प्रकारांचा अनुभव आम्हांला येतो. ही जशी आमच्या जाणिवेची गोष्ट आहे, तशीच आमच्या जाणिवेच्या साधनभूत आवरणाची, देहाची गोष्ट आहे; आमच्या स्थूल देहापाठीमागें, त्याच्या आंत सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम द्रव्याचे देह आम्हांला आहेत; या देहांची शक्ति, त्यांचे व्यवहार-नियम हे स्थूल देहापेक्षां अधिक सामर्थ्यवान्, अधिक बारकाईनें काम करणारे आहेत; आमच्या स्थूल देहाला त्यांचा आधार आहे; त्या आंतरिक सूक्ष्म देहांना त्यांच्या त्यांच्या विशिष्ट जाणिवांचें साधन म्हणून काम करावें लागतें -- या आंतरिक विविध प्रकारच्या उच्चतर जाणिवांच्या क्षेत्रांत विशिष्ट अभ्यासानें आम्हांला प्रवेश मिळतो; हा प्रवेश मिळाल्यावर, या जाणिवांचीं जीं श्रेष्ठ शक्तीचीं व सूक्ष्म नियमानें कार्य करणारीं शरीरें व शरीरद्रव्यें आहेत, त्यांच्या शक्तीचा व नियमांचा प्रभाव आमच्या स्थूल भौतिक द्रव्याच्या शरीरावर पाडतां येतो आणि त्यायोगें आमचें आजचें क्षुद्र आणि पाशवी वासनांनीं आणि संवयींनीं व्यापलेलें आणि अनेक मर्यादांनीं मर्यादित असलेलें भौतिक शरीर, बदलून टाकून त्याचे जागीं अधिक विशुद्ध, उच्चतर असें भौतिक शरीर आम्हांला बनवितां येतें. इत्यर्थ असा कीं, आजच्या शरीरांतून उदात्त, दिव्य भौतिक शरीर विकसित होईल ही कल्पना स्वप्न नव्हे, भ्रम नव्हे; आजचें मानवाचें भौतिक शरीर अनेक मर्यादांच्या व बंधनांच्या कोंडींत आहे; पशूप्रमाणें जन्मणें, पशूप्रमाणें जगणें, पशूप्रमाणें मरणें; भरणपोषण अवघड, प्रकृतींत बिघाड होणें सोपें, रोग जडणें सोपें; गुलामगिरी क्षुद्र आणि अतृप्त वासनांची; -- अशा प्रकारचें आजचें मानवी भौतिक शरीर हें कांहीं न बदलू शकणारे असें शरीर नव्हे; यांतून उदात्त, दिव्य, भौतिक शरीर मानवाला प्रयत्नानें उदयास आणतां येईल, ही कल्पना भ्रम नव्हे, स्वप्न नव्हे, तर ती, वर वर्णिलेली द्रव्याच्या व द्रव्यगत ''आत्म्याच्या'' चढत्या

 

पान क्र. ४८६

 

श्रेणीची व्यवस्था लक्षांत घेतां पूर्णपणें बुद्धिगम्य, बुद्धिमान्य तात्विक सत्यावर आधारलेली आहे.

आमचा प्राणमय आत्मा, मनोमय आत्मा जर आम्हांला क्रमानें विकसित करून दिव्य करतां येतो, तर आमचा अन्नमय आत्माहि दिव्य करतां आला पाहिजे ही गोष्ट तर्कशुद्ध विचारसरणीला धरून आहे. कारण हे सर्व आत्मे एकमेकांशीं अखंडपणें संलग्न आहेत. अर्थात् यांपैकीं दोघांना दिव्यतेची शक्यता असावी आणि तिसऱ्याला ती नसावी हें युक्तीला, तर्काला धरून नाहीं. आत्मदृष्टीनें भौतिक जीवनापासून आरंभ करून चढत चढत मनुष्य अतिमानसिक जीवन गांठतो, तेव्हां हेंहि शक्य असलें पाहिजे कीं, या चढत्या आत्म्याचें व्यवहार-साधन जें द्रव्य किंवा द्रव्यात्मक शरीर, तेंहि चढत्या प्रमाणांत सूक्ष्म व अधिक कार्यक्षम होत असावें -- कारण हें जें विज्ञानमय अतिमानसिक आत्म्याचें शरीर तें याप्रमाणें मानसिक शरीरापेक्षां अधिक सूक्ष्म, अधिक कार्यक्षम असलें पाहिजे आणि आहे. अतिमानस किंवा विज्ञान हें त्याच्या खालच्या मानवी आत्म्यावर सत्ता चालवितें, प्राणमय आत्मा आणि मनोमय आत्मा या विज्ञानमय आत्म्याच्या मार्गदर्शनाखालीं व नियंत्रणाखालीं दिव्यता धारण करतो -- अर्थात् हें शक्य असलें पाहिजे कीं, अतिमानसिक शरीरद्रव्याचा, शरीरशक्तीचा भौतिक द्रव्यावर, भौतिक शरीरावर परिणाम होऊन त्याच्या ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा नष्ट व्हाव्या आणि त्यालाहि दिव्यता प्राप्त व्हावी. हें सर्व सिद्ध होणें याचा अर्थ, अगदीं अनिर्बंध अशी जाणीव विकसित होणें, मन आणि संवेदनाशक्ति भौतिक अहंच्या भिंतींच्या कोंडींतून मोकळी होणें, भौतिक इंद्रियें देतील तेवढ्या ज्ञानाच्या क्षुद्र पायावर मनाला आणि संवेदनाशक्तीला जी आज आपली कसरत करावी लागते ही स्थिति पालटून भौतिक इंद्रियांच्या कोंडींतूनहि त्यांची मोकळीक होणें, जीवनशक्ति मर्त्य अशा भौतिक मर्यादांच्या बंधनांतून पायरीपायरीनें मुक्त होणें, दिव्यतासंपन्न आत्म्याला योग्य असें त्याचें भौतिक जीवन होणें, अर्थात् त्यानें मरणावर मात करणें, पार्थिव अमरता मिळविणें -- इतक्या गोष्टी घडून येणें असा आहे. आमची आजची जी शरीरकोटी, शरीराची चौकट आहे, तिलाच जीवनानें कायम चिकटून राहणें, असा पार्थिव अमरतेचा, मरणावर मात करण्याचा अर्थ नाही, तर भौतिक शरीराचा जो कायदा आहे, त्या कायद्याच्या बंधनांतून मोकळें होणें असा पार्थिव अमरतेचा अर्थ आहे. मन आणि प्राण यांजबरोबर पार्थिव शरीरालाहि दिव्य-द्रव्यसंपन्नता आणि दिव्य कार्यक्षमता प्राप्त

 

पान क्र. ४८७

 

होणार आहे हें निश्चित; कारण वस्तुत: मूळ दिव्य सत्तेचा, अस्तित्वाचा आनंद बरोबर घेऊन अमरतेचा प्रभू आपल्या मूळ सर्वातीत स्थानावरून उतरून खालीं येत आहे; आमचें वसतिस्थान जीं मनोयुक्त, जीवयुक्त जडद्रव्याचीं पात्रें, त्या पात्रांत तो प्रभु, त्या आपल्या परम आनंदाची सुधा, सोम या गूढ नांवानें प्रसिद्ध असलेली सुधा, ओतीत ओतीत खालीं येत आहे; सौंदर्यसंपन्न, अमरत्वसंपन्न असा तो आनंदमय, आनंदरूप प्रभु आमच्या द्रव्यघटित कोशांत प्रवेश करीत आहे, आमचें अस्तित्व, स्वभाव, जीवन सर्वथा सर्वांगांनीं संपूर्ण समग्र रूपांतरित दिव्यतासंपन्न करून टाकण्यासाठीं तो आमच्या द्रव्यमय कोशांत प्रवेश करीत आहे.

 

पान क्र. ४८८

 

 

प्रकरण - सत्ताविसावें

 

अस्तित्वाच्या सात तारा (तंतू)

 

माझें मन अज्ञानांत गुरफटलेलें आहे, या अज्ञानामुळें, माझ्या अंतरांत या ज्या देवांच्या सात पायऱ्या आहेत त्यांच्या संबंधानें मी विचारपूस करीत आहे. देव हे सर्वज्ञ; एक वर्षाचें बाळ घेऊन त्याच्या अंगाभोंवतीं त्यांनीं सात तारांनीं (तंतूंनी) हें वस्त्र विणून घातलें आहे.

- ऋग्वेद १.१६४.५

 

येथवर आम्हीं अस्तित्वाच्या सात पायऱ्यांची तपासणी केली; या सात महान् पायऱ्या, विश्वाच्या एकंदर अस्तित्वाच्या पायाच्या ठिकाणीं आहेत, विश्वाचें सात प्रकारचें स्वरूप या पायावर आधारलेलें आहे, असा सिद्धांत प्राचीन ऋषींनीं केला; या पायऱ्या तपासून आम्हीं त्यांच्या प्रकटनाचे (विकासाचे) आणि तिरोधानाचे क्रमवार टप्पे पाहून घेतले; याप्रमाणें आम्हांला इष्ट असणारें पायाभूत ज्ञान आम्हीं प्राप्त करून घेतलें आहे. ईश्वरी सत्ता स्वभावत: सर्वातीत सर्वनिरपेक्ष अनंत अस्तित्व, अनंत जाणीव व अनंत आनंद या त्रिमुखी एकतत्त्वाची आहे आणि विश्वांत जें कांहीं आहे त्याचें मूळ हें त्रिमुखी एकतत्त्व आहे, त्याला पोटांत सामावणारें आहे, त्याचें मूळारंभींचें अंतिम सत्य आहे, ही गोष्ट आम्हीं नमूद केली आहे. मूळ जाणिवेच्या (ज्ञानाच्या) दोन बाजू आहेत, एक प्रकाशक आणि दुसरी कार्यकारी; एक आत्म-जाणिवेची सामर्थ्यशील अवस्था, दुसरी आत्मशक्तीची सामर्थ्यशील अवस्था; मूळ अस्तित्व, मूळ पुरुषोत्तम या द्विमुखी मूळ जाणिवेनें युक्त असतो; अक्रिय स्वस्थता किंवा सक्रिय गतिमानता, या मूळ अस्तित्वाच्या दोन अवस्था होत; या दोनहि अवस्थांत द्विमुखी मूळ जाणीव, मूळ अस्तित्वाला धरून असते; मूळ अस्तित्व ज्यावेळीं निर्मितीच्या क्रिया करतें, त्यावेळीं त्याच्या पोटांत गुप्तपणें काय काय सांठविलें आहे याचें ज्ञान, त्याचें सर्वसमर्थ आत्म-ज्ञान त्याला करून देतें; हें गुप्त भांडार प्रकट करणें म्हणजेच निर्मितीची क्रिया; मूळ अस्तित्वाला, त्याच्या सर्वज्ञ आत्मशक्तीच्या आश्रयानें ही प्रकटनाची किंवा निर्मितीची क्रिया करतां येतें; याच शक्तीच्या आश्रयानें

 

पान क्र. ४८९

 

मूळ अस्तित्वाला आपल्या प्रकटित गुप्त भांडाराच्या विश्वावर सत्ता चालवितां येतें. सत्, चित्, आनंद या तत्त्वत्रयाच्या अविभाज्य मिळणीनें ज्याचें स्वरूप बनलें आहे, त्या मूळ सर्वसत्तात्मक पुरुषोत्तमाचें निर्मितिकार्य, विश्वनिर्मितीचें कार्य घडून येण्यास, चौथ्या तत्त्वाची आवश्यकता असते; हें तत्त्व म्हणजे अतिमानस किंवा सत्य-कल्पना होय. सर्वातीत सच्चिदानंदाचें हें सर्वनिर्मायक स्वरूप आहे. सत्य-कल्पना, सत्य-संकल्प, सत्य-ज्ञान किंवा अतिमानस अथवा विज्ञान या नांवांनीं हें स्वरूप ओळखलें जातें; खालीं विश्व, वरतीं सच्चिदानंद आणि मध्यें सत्यज्ञानमय विज्ञान, अशी व्यवस्था आहे. विज्ञानांत जें दिव्य ज्ञान असतें, तें आत्मसत्ता आणि आत्म-ज्ञान यांच्याशीं एकरूप असें दिव्यज्ञान असतें; तशीच विज्ञानांत जी मूळ सत्तेची इच्छाशक्तिहि असते, ती दिव्यज्ञानाशीं पूर्ण मेळ असलेली अशी असते -- कारण ही इच्छाशक्ति स्वभावत: व स्वरूपतः आत्मज्ञानयुक्त आत्म-सत्ता वा स्वयंभू सत्ताच असते; प्रकाशमय कार्य करणारी, गतिमान अशी स्वयंभू आत्मज्ञानी सत्ता म्हणजेच विज्ञानांतील इच्छाशक्ति. विज्ञानांत याप्रमाणें दिव्यज्ञान आणि त्याशीं समरस अशी इच्छाशक्ति असल्यानें, विश्वांतील वस्तूंची हालचाल, त्यांचा आकार व त्यांच्या व्यवहाराचा कायदा या गोष्टी, त्या वस्तूंच्या पोटीं जें स्वयंभू सत्य असतें, त्याच्या धोरणानें व त्याला अनुरूप अशा तऱ्हेनें न चुकतां निश्चित करण्याचें कार्य विज्ञानाला करतां येतें; अर्थात् या स्वयंभू सत्याचा आविष्कार म्हणजेच विश्वांतील वस्तूंची निर्मिती, असें असल्यानें या आविष्काराचा जो मूळ हेतु असतो त्या हेतूशीं सुसंगत अशाच प्रकारें वस्तूंची हालचाल वगैरे विज्ञानाकडून ठरविली जाते. विश्वनिर्मितींत एकता आणि अनेकता हीं दोन तत्त्वें एकाच वेळीं उपयोगांत आणलीं जातात; या दोन तत्त्वांवर विश्वनिर्मिति अवलंबून असते; मूळ एकता आणि नियोजित अनेकता या दोन टोंकांच्या मध्यें निर्मितीची क्रिया चाललेली असते; विविध कल्पना, विविध शक्ती, विविध आकार या गोष्टी प्रकट होणें याला निर्मिति म्हणतात; मूल एकतत्त्वांतून या गोष्टी प्रकट होतात, या विविध गोष्टी त्या एकतत्त्वाचाच आविष्कार असतात; निर्मितीला आधार लागतो, सत्याचा पाया लागतो; शाश्वत एकतत्त्व हाच निर्मितीचा मूळ आधार आहे, एकतत्त्व हेंच तिच्या बुडाशीं असलेलें सत्यतत्त्व आहे; अनेक विश्वांचा पसारा आणि त्यांतील व्यवहार हा या एकतत्त्वाच्या सत्य मूलाधारामुळेंच शक्य होतो : म्हणून निर्मितीची कल्पना

 

पान क्र. ४९०

 

व क्रिया एकता आणि अनेकता मिळून पूर्ण होते, असें म्हणावें लागतें. निर्मितीचें कार्य हें विज्ञानाचें -- अतिमानसाचें -- कार्य आहे. हें कार्य करण्यासाठीं ज्ञानाच्या दोन प्रकारांचा विज्ञान उपयोग करतें; एकता-बोधात्मक (समग्र बोधात्मक, समष्टि बोधात्मक) ज्ञान आणि अनेकता-बोधात्मक (व्यष्टि बोधात्मक, अ-समग्र बोधात्मक) ज्ञान : हीं दोन प्रकारचीं ज्ञानें विज्ञानांत अंगभूत असतात; एकतत्त्व हें मूळ असल्यानें, विज्ञानाला तेथूनच आरंभ करावा लागतो; अनेकता ही या एकतेंतूनच ज्ञानविशेषाच्या व्यष्टिबोधात्मक ज्ञानाच्या आश्रयानें निर्माण केली जाते; विज्ञान प्रथम एकतेवर भर देतें; एकतत्त्वाचीं अनेक अंगें म्हणून विज्ञान सर्व वस्तूंचा स्वतांत समावेश करून असतें; नंतर इच्छेचा विषय, ज्ञानाचा विषय म्हणून प्रत्येक वस्तूकडें, विषयदृष्टीनें बघून या वस्तू वेगळ्या आहेत, परंतु या सर्व वस्तू स्वतांमध्येंच आहेत अशा ज्ञानाचा पुरस्कार व अंगीकार विज्ञान करतें. विज्ञान हें सच्चिदानंदाचें विश्व-निर्मायक स्वरूप असल्यानें त्यामध्यें प्रथम, त्याचें मूळ आत्मज्ञान प्रभावी होतें : या ज्ञानानुसार, सर्व वस्तू या एक अस्तित्व, एक जाणीव, एक इच्छा किंवा संकल्प व एक आत्मानंद आहेत; अर्थात् एकच अस्तित्व एकच जाणीव इ० सर्व वस्तूंना व्यापून आहे. वस्तूंचा गतिमान् व्यवहार एक आणि अविभाज्य आहे; या प्रत्ययापासून, विज्ञान आपल्या निर्मितिकार्याला आरंभ करतें आणि मग निर्मितीच्या कार्यांत एकतेकडून अनेकतेकडे, अनेकतेकडून एकतेकडे फेऱ्या घालून त्या दोन तत्त्वांत, एक व्यवस्थित अन्योन्यसंबंध निर्माण करतें; अर्थात् विज्ञान हें वस्तूंत देखाव्यापुरती विभाग करीत जातें, ही विभागणी वास्तविक विभागणी असत नाहीं; ही अशी सूक्ष्म विभागणी असते कीं, विभागलेल्या वस्तू ह्या वस्तुत: अविभक्तच असतात; अविभाज्य एकतत्त्वांत मधून मधून रेषा आंखून भेदाचा देखावा करावा व त्या रेषाहि कायमच्या नसाव्या, असा विभागणीचा कार्यक्रम, विज्ञान हें या एकतत्त्वांत करीत असतें. विज्ञानाची ही विश्वनिर्मितीची क्रिया अशी असते; विज्ञान हें ईश्वरी ज्ञान असून त्याचें कार्य, विश्वमाला निर्माण करणें, तिचें रक्षण करणें आणि तिजवर सत्ता चालविणें हें आहे. आमचें ज्ञान आणि अज्ञान या दोहोंना हें ईश्वरी ज्ञान किंवा गूढ ज्ञान आपला आश्रय देऊन आपापलें कार्य करावयास लावतें

सत्, चित्, आनंद व विज्ञान या चार दिव्य तत्त्वांची, विश्वदृष्टीनें

 

पान क्र. ४९१

 

आपण ओळख करून घेतली. त्याचप्रमाणें मन, प्राण आणि जडद्रव्य यांचेंहि स्वरूप आपण पाहिलें आहे. अज्ञानाचा पुरस्कार करून चार दिव्य तत्त्वें वागू लागलीं, म्हणजे त्यांतूनच मन, प्राण व जडतत्त्व हीं उदयास येतात. विभागणी, अनेकता हा खेळ सच्चिदानंदरूप एकतत्त्व विज्ञानरूपानें खेळत असतां, तें स्वतःला विसरण्याचा देखावा करतें; या प्रकारचें अज्ञान एकतत्त्वानें बाह्यतः पांघरलें, म्हणजे मन, प्राण व जडतत्त्व यांचा आविष्कार होतो; हीं तत्त्वें, चार दिव्य तत्त्वांचेंच गौण व अज्ञानांकित पर्याय आहेत; विज्ञानाचा गौण अज्ञानांकित पर्याय मन आहे. मन या विभागणीच्या मागें एकत्व, एकतत्त्व आहे ही गोष्ट पार विसरून विभागणी खरी धरून चालणारें तें मन; विज्ञान मनाला पुन्हां एकत्वाची आठवण करून देऊं शकतें; सच्चिदानंदाच्या कार्यकारी शक्तीचा गौण पर्याय, हें प्राणाचें रूप होय; मनानें जे वस्तुविभाग अज्ञानानें खरें म्हणून कल्पिलेले असतात, त्या विभागांच्या आश्रयानें सच्चिदानंदाची कार्यकारी शक्ति आकारांची निर्मिति करते आणि या आकारांच्या आधारानें शक्तीचा खेळ खेळते; हा खेळ म्हणजे प्राणाची क्रिया होय. जडतत्त्व हा सच्चिदानंदाच्या मूळ सत्-रूप द्रव्याला चित्‌शक्तीनें अज्ञानांकित होऊन दिलेला आकार होय : सच्चिदानंदाची चित् म्हणजे जाणीव आणि तदभिन्न कार्यकारी शक्ति व अज्ञानाच्या, विस्मृतीच्या प्रभावानें जें कार्य बाह्यतः करतात, त्या कार्याला सच्चिदानंदानें प्राधान्य दिलें व त्याचें अंकितत्व पत्करलें म्हणजे त्याचें सत्-तत्त्व जो आकार घेतें, तें जडतत्त्वाचें रूप होय; इत्यर्थ असा कीं, सच्चिदानंदच विस्मृती पांघरून सत् अंशानें जडद्रव्य झालेलें आहे; आणि तें आपल्या विश्वनिर्मायक विज्ञानरूपांत विस्मृती पांघरून मन झालें आहे.

मन, प्राण आणि जडतत्त्वाचें शरीर याखेरीज अज्ञान-विश्वांत या तीन तत्त्वांच्या संगतींत चौथें एक तत्त्व व्यक्त होतें; या तत्त्वाला आम्ही आत्मा हें नांव देत असतों. हा आत्मा दोन प्रकारचा आहे; बाह्य व्यवहारांत वासनात्मा काम करीत असतो; वस्तु मिळवाव्या, वस्तुगत आनंद भोगावा असा वासनात्म्याचा व्यवहार असतो; याच्या पाठीमागें, यानें पुष्कळ अंशीं झांकलेला किंवा सर्वथा झांकलेला दुसरा आत्मा, खरा आंतरिक पुरुष, असतो; चैतन्याला येणारे अनुभव, या खऱ्या आत्म्यांत सांठविलें जातात. हा दोन प्रकारचा आत्मा किंवा दोन रूपांचा आत्मा, सच्चिदानंदाच्या आनंद या अंशाचा अज्ञान-विश्वांतील पर्याय आहे, आनंदाचें तो

 

पान क्र. ४९२

 

कार्य आहे, आनंदाची अज्ञान-विश्वांत पुढें टाकलेली प्रतीकमूर्ति आहे; आमची जी मानसिक जाणीव व या विश्वांत असणाऱ्या आत्मविकास-क्रमाच्या आमच्या ज्या पार्श्वभूमिका, त्यांना अनुसरून आणि त्यांना अनुरूप असें जें आनंदाचें कार्य, तेंच द्विविध आत्मरूपानें आमच्या मन, प्राण, शरीर या त्रयीच्या संगतींत कामाला लागलें आहे. परमात्म्याचें अस्तित्व स्वभावत: अनंत ज्ञानानें आणि या ज्ञानाच्या आत्म-शक्तीनें युक्त असतें आणि हें अनंत ज्ञान, स्वभावत: शुद्ध असीम आनंदानें युक्त असतें; परमात्म्याच्या या आत्मानंदाचा, शुद्ध असीम आत्मानंदाचा गाभा आत्म-सत्ता आणि आत्म-जाणीव व आत्म-स्वामित्व आणि आत्म-परिज्ञान यांचा बनलेला असतो. परमात्म्याच्या आत्मानंदाचा एक व्यवहार म्हणजेच विश्व होय. विश्वरूप परमात्मा या विश्वाच्या व्यवहाराचा आनंद पूर्णत्वानें भोगतो. व्यष्टिभूत जीवात्मा बाह्यतः अज्ञान आणि विभक्तता यांच्या कोंडींत सापडल्यामुळें त्याच्या वांट्याला हा आनंद येत नाहीं -- व्यष्टीच्या अस्तित्वाचा, जाणिवेचा बाह्य पृष्ठभाग आनंदहीन असला, तरी त्याच्या या बाह्य जाणिवेच्या आंत प्रच्छन्न तलवर्ती व अतिमानसिक जाणीव असते; व ही जाणीव विश्वक्रीडेचा पूर्ण आनंद भोगीत असते. व्यष्टीची वैयक्तिक जाणीव क्रमश: विकसित करून, विश्वमय आणि विश्वातीत करतां येते; हा विकास-प्रयत्न वाढता आत्मानंद देणारा असतो आणि हा प्रयत्न पूर्णतया यशस्वी झाला म्हणजे परमात्म्याचा पूर्ण आत्मानंद भोगावयास मिळतो.

याप्रमाणें एकंदर अस्तित्वाचीं तत्त्वें सात अधिक एक (आत्मा) अशीं आठ समजण्यास हरकत नाहीं. (वेद-ऋषींनीं किरण (तत्त्वें) सात, आठ, नऊ, दहा व बारा असे भिन्न ठिकाणीं भिन्न संख्येचे मानले आहेत) हीं आठ तत्त्वें पुढील प्रमाणें आहेत : --

सत् (अस्तित्व)            जडतत्त्व (शरीर)

चित् (जाणीव-शक्ति)       प्राण

आनंद                   आत्मा (आंतरात्मा)

विज्ञान (अतिमानस)        मन

परमात्म्याच्या अस्तित्वाचीं सत्, चित्, आनंद व विज्ञान हीं अंगें आणि जीवात्म्याची शरीर, प्राण, आत्मा व मन हीं अंगें यांचा अन्योन्यसंबंध वर वर्णिलेला लक्षांत घेतां, आमचें जीवन (अस्तित्व) परमात्म्याच्या अस्तित्वाचें एक प्रकारचें परावर्तित स्वरूप आहे हें ध्यानांत येतें. शुद्ध

 

पान क्र. ४९३

 

सत् (अस्तित्व) पासून उतरत उतरत चित् आनंद आणि निर्मितीचें माध्यम विज्ञान मागें टाकून, परमात्मा विश्वपुरुष होतो, विश्व होतो आणि आम्ही जडद्रव्याच्या शरीरापासून चढत चढत विकासक्रमांतून जाणाऱ्या प्राण, आत्मा, मन यांना मागें टाकून, प्रकाशमय माध्यम जें विज्ञान त्यांत चढून जाऊन पुढें परमात्म्याच्या शुद्ध अस्तित्वाकडे वाटचाल करून तेथेंहि पोचूं शकतों. अस्तित्वाचा वरचा अर्ध (परार्ध) आणि खालचा अर्ध (अपरार्ध) यांची गांठ, विज्ञान आणि मन यांच्या भेटीच्या स्थानीं आहे. विज्ञान आणि मन यांच्यामध्यें पडदा आहे. हा पडदा नाहींसा करणें, फाडून टाकणें ही क्रिया मानववंशांत दिव्य जीवन, दिव्य मानवी जीवन शक्य होण्यास आवश्यक आहे. मधला पडदा दूर झाला, वरच्या श्रेष्ठ अस्तित्वाचा प्रकाशमय स्वभावधर्म खालच्या अस्तित्वाच्या अंतरांत उतरला आणि खालचे कनिष्ठ अस्तित्व जोर करून वरच्या श्रेष्ठ अस्तित्वाचा स्वभावधर्म आत्मसात् करूं लागलें, म्हणजे मन, आत्मा, प्राण, शरीरद्रव्य हीं आमच्या अस्तित्वाचीं तत्त्वें पार बदलून जातील : मनाला सर्वज्ञ सर्वसमावेशक विज्ञानांतील दिव्य प्रकाश, त्याच्या मूळ स्वभावांतील, स्वरूपांतील दिव्य प्रकाश परत मिळेल; आत्म्याला सर्वसंग्रही, सर्वमुखी आनंदाच्या स्वरूपांत आपलें दिव्य निजरूप प्राप्त होईल; प्राणाला सर्वसमर्थ ज्ञानशक्तीच्या व्यापारांत प्रकट होणारी स्वतःची दिव्य शक्ति परत मिळेल आणि जडतत्त्वाला (शरीराला) 'परमात्म्याच्या सत् अंशाचें एक रूप' या नात्यानें त्याची स्वाभाविक असलेली मोकळीक, दिव्य मुक्तता लाभेल. विश्वांत जडांतून नाना श्रेणींचे जीव व श्रेष्ठतम मानवेतर जीवांतून मानव, असा विकास होऊन मानवाचा आणखी पुढें सारखा विकास होत आहे; या विकासक्रमांत मानव हा विकासाचा मुकुट म्हणून आज वावरत आहे; हा विश्वांतील विकास कांहीं हेतूनें चालला असेल, या विकासाचें अंतिम ध्येय कांहीं असेल तर -- मानवी प्राण्याचें आतांच वर्णन केल्याप्रमाणें महान् ओजस्वी तेजस्वी रूपांतर होणें आणि त्याचे ठिकाणीं परमात्म्याची, पुरुषोत्तमाची, मूळ सच्चिदानंदाची पूर्णता पूर्णतया प्रकट होणें, हेंच तें परम उदात्त ध्येय, हाच तो परमोच्च हेतु असला पाहिजे -- मानवानें जन्माचे अकारण फेरे करीत रहावे, अकारण चक्राकार येरजाऱ्या कराव्या आणि एखाद्या भाग्यवान् व्यक्तीनें या जन्ममरणाच्या चक्रांतून आपली सुटका करून घ्यावी यापेक्षां विश्वांतील मानवी जीवनाला कांहीं दुसरें ध्येय नाहीं; जीवनांत निराशा अनुभवून या जीवनाच्या मायाक्रमांतून मानवानें जागें व्हावे,

 

पान क्र. ४९४

 

विश्वाचा विश्वप्रयत्न निराशेच्या आघातांनीं निष्फळ झालेला पाहून या प्रयत्नाचा मानवाला उबग यावा आणि या प्रयत्नांत सहयोगी होण्याचें मानवानें पूर्णतया सोडून द्यावें -- हीच गोष्ट युक्त आहे, असें सांगणारे दुसरे पक्ष आहेत -- पण मानवांत असलेल्या शक्तींना कांहीं मर्यादा नाहीं, चैतन्य आणि जडतत्त्व यांच्यामध्यें मध्यस्थी करून त्यांचें मीलन करण्याची शक्ति असलेला मानव हा एकच प्राणी या विश्वांत आहे, ही वस्तुस्थिति लक्षांत घेतां निराशावादी पक्ष चुकत आहेत व मानवाच्या जीवनाचें ध्येय जड देहांतच पूर्णतया सच्चिदानंदत्व प्राप्त करून घेणें हेंच आहे असें म्हणावें लागतें.

मानवाच्या जीवनाचें आमूलाग्र रूपांतर होणें व तें दिव्य होणें शक्य आहे हें आपण पाहिलें. हें जें शक्य आहे तें वास्तवांत घडून येण्याकरितां कांहीं मानसिक व व्यावहारिक पार्श्वभूमीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीसंबंधानें विचार करण्यापूर्वीं, जें सच्चिदानंद ब्रह्म आपल्या सर्वातीत स्थानावरून उतरून विश्वरूप धारण करतें झालें, त्या ब्रह्माच्या उतरण्याविषयींच्या तत्त्वांचा जसा आपण विचार केला, तसा त्याची विश्वांत कार्य करण्याची तऱ्हा काय आहे या संबंधींची त्याची योजना ढोबळपणें तरी आपण पाहिली पाहिजे; त्याचप्रमाणें सच्चिदानंदाची जी जाणीवशक्ति आमच्या अस्तित्वाच्या परिस्थितीवर सत्ता चालविते, त्या शक्तीच्या व्यक्त सामर्थ्याचा स्वभावधर्म आणि व्यवहार काय आहे, कसा आहे याकडेहि आम्हीं लक्ष दिलें पाहिजे. सध्यां प्रथम ही गोष्ट आपण लक्षांत ठेवली पाहिजे कीं, आपण जीं सात किंवा आठ तत्त्वें तपासलीं तीं सर्व तत्त्वें विश्वाच्या अस्तित्वाला आणि विश्वांतील वस्तूंच्या अस्तित्वाला आवश्यक आहेत; या वस्तूंमध्यें व्यक्त वा अव्यक्त स्थितीमध्यें तीं अवश्य असतात, आमच्यामध्येंहि तीं सर्व व्यक्त व अव्यक्त आहेत; आम्ही ''वर्षाचें बाळ'' आहोंत, अजूनहि ''एक वर्षाचें बाळच'' आपण आहोंत; विकासशील निसर्गांत आम्ही अजून प्रौढत्व पावलों नाहीं. आमच्या अप्रौढ अवस्थेंत, बाल्यावस्थेंत त्या सात किंवा आठ तत्त्वांपैकीं कांहीं व्यक्त झालीं आहेत; कांहीं व्यक्त व्हावयाचीं आहेत, तीं आज अव्यक्त स्थितींत आम्हांमध्यें आहेत. सत्-चित्-आनंद ही सर्वश्रेष्ठ तत्त्वत्रयी सर्व अस्तित्वाची आणि अस्तित्वाच्या सर्व व्यवहाराची मूळ जननी आहे, मूळ पाया आहे; सर्व विश्व हें या त्रयीरूप मूळसत्याचा आविष्कार आहे, कार्य आहे; आणि तसें तें असलें पाहिजे. कसलेंहि

 

पान क्र. ४९५

 

विश्व -- आकारलेलें अस्तित्व -- शुद्ध शून्यांतून उदय पावून आकाराला येत नाहीं, अगदीं अभावाच्या पोकळींत भावरूपानें उभें राहत नाहीं; तसें तें येऊं शकत नाहीं व राहूं शकत नाहीं. अनंत अस्तित्वाचा पुरुषोत्तम आरंभीं आणि सर्व आकारांच्या अतीत असलेल्या त्या पुरुषोत्तमांतून विशिष्ट आकार घेतलेलें त्याच्या पोटांत वावरणारें अस्तित्व, हें विश्वाचें स्वरूप असलें पाहिजे किंवा विश्व आणि विश्वपुरुष (पुरुषोत्तम) एकच आहेत अशी तरी स्थिति असली पाहिजे; तिसरी गोष्ट शक्य नाहीं. वस्तुस्थिति अशी आहे कीं, विश्वाच्या अस्तित्वाशीं, विश्वपुरुषाशीं आम्ही एकरूप होतो तेव्हां -- अनंतसत्तेचा विश्वपुरुष (पुरुषोत्तम) -- हा विश्वपुरुष अनंत प्रकारें जे स्वतःचे प्रमाणबद्ध आकार स्वतःच्या कालस्थलांकित कल्पनामय विस्तारांत उभे करतो, ते आकार मिळून हें विश्व आहे ही गोष्ट आम्हांस स्पष्ट होते. आकारातीत अनंत सत्तेचा पुरुषोत्तम अनंत प्रकारें साकार झालेला म्हणजेच विश्व; हें विश्वाचें एकंदर स्वरूप आहे. अनंत निराकार अस्तित्वांत, साकार अस्तित्व अनंत प्रकारें उदयास येणें, हें जें विश्वनिर्मितीचें कार्य, तें अस्तित्वगत अनंत शक्तीचें कार्य आहे; ही शक्ति विश्वांतील सर्व आकार व आंदोलनें निर्माण करते व त्यांचें नियंत्रण करते; या शक्तीची स्थितिगति ही अनंत जाणिवेचें कार्य आहे. कारण ही शक्ति स्वभावत: विश्वविषयक संकल्पाच्या स्वरूपाची असते -- कोणतेहि संबंध निश्चित करणें आणि ते संबंध विशिष्ट ज्ञानक्रियेनें जाणणें हें या विश्वविषयक संकल्पशक्तीचें काम असतें -- आणि हें काम करावयास त्या शक्तीच्या पाठीमागें तिला आधार म्हणून सर्वसमावेशक जाणिवेची आवश्यकता आहे. मूळ निराकार अस्तित्व क्रमश: साकार होणें या क्रियेला विश्वनिर्मिति म्हणतात -- या निर्मितीच्या व्यापारांत वस्तू-वस्तूंचे अनेक संबंध अस्तित्वांत आणावें लागतात; हे संबंध ठरविणें, कायम करणें, ते विश्वगत जाणिवेनें ग्रहण करणें या सर्व गोष्टी सर्वसमावेशक अनंत जाणिवेच्या आधाराशिवाय, विश्वविषयक संकल्पशक्तीला करतां येणार नाहींत.

विश्व निर्मितीचा जो व्यवहार होतो त्यांत अनंत अस्तित्वसंपन्न पुरुष, अनंत अस्तित्वाची अनंत शक्ति, त्या शक्तीची जननी आणि सहयोगिनी अनंत सर्वसमावेशक जाणीव (ज्ञान) आणि शेवटीं अनंत आनंद इतक्या गोष्टी अनुस्यूत असतात. विश्वनिर्मात्याची जाणीव सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ असते, तिला आपली सर्व अंगभूत संपत्ति स्पष्टपणें ज्ञात असते

 

पान क्र. ४९६

 

आणि अशी सर्वसंपन्न, सर्वज्ञ, सर्वसमर्थ जाणीव स्वभावत: व अपरिहार्यपणें आनंदरूप असते; कारण ती तशी नसणें असंभाव्य आहे. म्हणून विश्वातीत पुरुषानें विश्वरूप धारण करण्यांत, महान् सर्वव्यापी आनंद, आत्मानंद हा त्याला प्रेरक होत असला पाहिजे, विश्वाच्या निर्मितीचें आणि अस्तित्वाचें सार आणि उद्दिष्ट असा आनंदच असला पाहिजे, हें उघड आहे. एका प्राचीन ऋषीनें म्हटलें आहे : ''अस्तित्वाच्या आनंदाचें आकाश, सर्व स्थिरचराला वेष्टून आहे, आम्ही या आकाशाच्या पोटांत वावरत आहों, तें आनंद-आकाश आमचेंहि आकाश आहे -- असें जर नसतें तर आम्ही कोणीहि श्वासोछ्वास करूं शकलों नसतों, आम्ही कोणीहि जिवंत राहूं शकलों नसतों.'' हा आत्मानंद आमच्या ज्ञानाच्या, भानाच्या पातळीच्या खालीं दडलेला असेल, वरच्या जागृत जाणिवेला त्याची ओळख होत नसेल, पण आमच्या मुळांत, आमच्या मूळ स्वरूपांत हा आनंद असलाच पाहिजे; हा आनंद शोधून काढून त्याला आत्मसात् करण्याकरितां सर्व अस्तित्व, सर्व जीवन हें धडपडत आहे; अशी धडपड हीच सर्व अस्तित्वाची, सर्व जीवनाची प्रेरक शक्ति असली पाहिजे. विश्वांतील कोणताहि जीव ज्या प्रमाणांत स्वतःचें मूळ स्वरूप शोधून काढील व आत्मसात् करील, त्या प्रमाणांत त्याच्या मूळ स्वरूपांत असलेला गूढ आत्मानंद त्याला अवश्य लाभेल. कोणी आपलें मूळ स्वरूपांतील संकल्प-सामर्थ्य आणि क्रिया-सामर्थ्य शोधून परत मिळवील, कोणी आपला मूळ प्रकाश आणि ज्ञान मिळवील, कोणी आपलें विस्तृत अस्तित्व पुन: आपलेसें करील, कोणी आपलें मूळ प्रेम आणि प्रेमसुख पुन: गांठील. ज्या प्रमाणांत या मूळ स्वरूपाच्या अंगांची पुन:प्राप्ति कोणी जीव करूं शकेल, त्या प्रमाणांत सध्यां गूढ असलेला स्वरूपानन्द त्याला पुन: लाभेल. जीवन हें विकास पावत जातें; विकासशील जीवनाच्या श्रेष्ठांत श्रेष्ठ पायरीवरच अस्तित्वाचा असीम आनंद लाभतो; ज्ञानाचा मार्ग आनंदमय आत्मसाक्षाकार व परमात्म-साक्षात्कार हा होतो; संकल्प व सामर्थ्य किंवा निर्मितिसामर्थ्य यांच्या योगें आत्मविश्वाचें राज्य मिळून सुखातिशयाची प्राप्ति होते; प्रेमाची, प्रेमानंदाची विश्वाशीं व विश्वपुरुषाशीं एकता, एकरूपता होऊन पराकोटीचें समाधान होतें -- या आनंदमय गोष्टींचा लाभ विकासी जीवाला होण्याचें कारण, त्या त्याच्या मूळ स्वरूपांत आहेत आणि त्या आज त्याला अप्राप्त असलेल्या अदृष्ट अशा उंच पायरीवर त्याच्यासाठीं वाट पाहत आहेत हें होय. अस्तित्वाचें सार या आनंदमय गोष्टींत

 

पान क्र. ४९७

 

आहे आणि व्यक्त विश्वांतील अस्तित्वांत पाऊल टाकलेल्या विकासी जीवाला त्या योग्य वेळीं लाभणें अपरिहार्य आहे. व्यक्त विश्वाचें अस्तित्व जेथें जेथें असेल, तेथें तेथे त्या अस्तित्वाच्या पाठीमागें, त्याचा पाया म्हणून आणि त्या अस्तित्वाच्या पोटीं विकासशील वस्तु म्हणून, सत्, चित् व आनंद ही त्रयी असणारच असणार, हें एक महान् आध्यात्मिक सत्य आहे.

पण अनंत निराकार सत् चित् आनंद यांनीं व्यक्त स्वरूप धारण करावें अशी कांहीं निकड त्यांना असते अशी गोष्ट नाहीं. त्यांनीं लहरीनुसार व्यक्त स्वरूप धारण केलें, तर तें नियमबद्ध असावें अशीहि कांहीं अपरिहार्यता नाहीं; अनंत रूपें क्रमशून्य, संबंधशून्य अस्ताव्यस्त पसरलेली अशीहि अभिव्यक्ति होऊं शकते. नियमबद्ध अभिव्यक्ति, ज्याला आम्ही विश्व असें नांव देतों तें अस्तित्वांत यावयाचें असेल, तर मात्र विज्ञान (दिव्य ज्ञान) म्हणून जी वस्तु आहे ती सच्चिदानंदाच्या पोटीं असली पाहिजे व ती वस्तु सच्चिदानंदानें प्रथम व्यक्त केली पाहिजे. विश्व किंवा सच्चिदानंदाचा व्यवस्थित आविष्कार जेथें जेथें आहे, तेथें तेथें ज्ञान आणि संकल्प यांचें जोड-सामर्थ्य असलेली विज्ञानमूर्ति असली पाहिजे; ती अनंत शक्य वस्तुसंबंधांतून निश्चित वस्तुसंबंध नियोजित विश्वासाठीं पसंत करून घेऊं शकते; बीजांतून फल विकसित करूं शकते, त्या विश्वाच्या व्यवस्थेचा महान् कायदा प्रमाणबद्ध अंगांचा असा रचूं शकतें आणि या विश्वांतील सर्व विभागांवर देखरेख ठेवून सर्वांचें नियमन करूं शकते : ही विज्ञानमूर्ति अथवा विज्ञानपुरुष, या विश्वाचा अमर अनंत असा साक्षी आणि संचालक अधिपति असतो (कवि: मनीषी परिभू: स्वयंभू: असें वर्णन ईशोपनिषदांत आहे : कवि: -- द्रष्टा; मनीषी -- मनन चिंतन करणारा; परिभू: -- सर्वत्र साकार होणारा; स्वयंभू: -- अजन्मा) सच्चिदानंद स्वत:च विज्ञानाचें रूप घेतो; विज्ञान हें सच्चिदानंदाचें विश्वनिर्मायक शक्तिरूप असतें. स्वत:च्या अस्तित्वाच्या पोटांत जें असतें तेंच हें विज्ञान निमितिक्रियेनें व्यक्त करतें; म्हणून विश्वाचा कायदा हा विश्वांतर्गत सत्याचा कायदा असतो; तो कांहीं बाहेरून लादलेला नसतो, तर वस्तूंच्या आंतूनच तो कार्य करीत असतो; विश्वांतील सर्व प्रकारचा वस्तुविकास हा त्या वस्तूचा आत्म-विकास, स्वतःच्या कायद्यानें स्वतःचा घडविलेला विकास असतो; विश्वांत जें कांहीं बीज असेल, तें वस्तुविषयक सत्याचें बीज असतें; जें कांहीं फळ त्या बीजाला

 

पान क्र. ४९८

 

येतें, तें त्या बीजाच्या शक्य फळांपैकीं, त्या बीजाच्या स्वतःच्या कायद्यानुसार ठरलें गेलेले फळ असतें. हा जो वस्तूंचा कायदा असतो, तो बाहेरून लादलेला नसून वस्तूंचा स्वतःचाच तो कायदा असल्यानें, तो नेहमीं एकसारखा रहाणारा नसतो; कोणताहि कायदा न बदलणारा नसतो; न बदलणारें, सारखें एकरस राहणारें, केवळ एक अनंत ब्रह्म आहे; या ब्रह्माच्या सच्चिदानंदाच्या पोटीं चाललेल्या विश्वलीलेंतील प्रत्येक वस्तु ही अनंत शक्यता आपल्या पोटांत सांठवून असते; तिचें विशिष्ट रूप आणि वाटचाल जी विशिष्ट काळीं, स्थळी निश्चित झालेली दिसेल, त्याहून अगदीं वेगळीं अनंत रूपें आणि गती तिला शक्य असतात; या सर्व गती व आकृती, ती वस्तु स्वत: स्वतःला वेगळ्या वेगळ्या मर्यादा घालून धारण करते -- तिला असीम स्वतंत्रता असते -- ब्रह्माच्या अनंत शक्य कल्पनांतून ती कांहीं एक विशिष्ट कल्पना पसंत करते आणि नंतर त्या कल्पनेनुसार आपली स्थितिगति, रूप-आकार ठरविते व धारण करते. सर्व वस्तूंच्या पोटीं -- सूक्ष्मांत सूक्ष्म कणांच्या, परमाणूंच्या पोटीं अनंत सर्वरूप ब्रह्म आहे आणि ब्रह्माच्या स्वभावांत स्वतःला मर्यादा घालून घेण्याची सत्ता अपरिहार्यपणें अंगभूत आहे. जें अनंत असीम आहे, त्याला सीमित सांत अशा नानाविध अनंत वस्तु होण्याची शक्ति व सत्ता नसेल तर त्याला अनंत, असीम कसें म्हणतां येईल ! जें सर्वसंबंधनिरपेक्ष स्वयंभू तत्त्व आहे, तें सहजच स्वयंनिर्णयाची अपार सत्ता बाळगून असतें -- स्वयंभू सर्वनिरपेक्ष केवळ तत्त्वाला ज्ञान, कार्यशक्ति, संकल्पशक्ति, आविष्कार शक्ति या सर्व बाबींत अकुंठित स्वयंनिर्णय नसेल तर त्याला वेगळें नांव द्यावें लागेल. असो. या अनंत स्वयंभू सच्चिदानंद ब्रह्मानें विश्वनिर्मितीसाठी जें विज्ञानाचें रूप धारण केलें तें स्वभावत: ''सत्याची वास्तवाची कल्पना'' या स्वरूपाचें आहे. ब्रह्म हें सत्य आहे पण तें निर्मितिक्षम व्हावयाचें, तर स्वतांच्या पोटांतील अनंत सत्यांचें ज्ञान त्यानें समोर ठेवून तदनुसार विश्व उभारणें त्याला अवश्य आहे -- म्हणून सत्य-ज्ञान, सत्य-कल्पना हेंच जिचें स्वरूप अशी आपली विभूति सत्याला, ब्रह्मांत पुढें करावी लागते. ही विभूति म्हणजे विज्ञान होय. विश्वशक्ति, विश्वसत्ता ही कसल्याहि प्रकारची असो, तिच्या पोटीं विज्ञान ही विभूति स्वभावत: अंतर्हित असते; ही विभूति, स्वत: अनंतत्व धारण करणारी असून, विश्वाच्या व्यक्त पसाऱ्यांत नाना संबंध, क्रमव्यवस्था व व्यक्ताच्या महान् रूपरेषा ही ठरविते, त्यांत अनेक

 

पान क्र. ४९९

 

संयोग घडवून आणते व एकंदरीनें सर्व पसारा आपल्या आधारानें चालविते. वैदिक ऋषींच्या भाषेंत अनंत अस्तित्व, अनंत ज्ञान, अनंत आनंद हीं अनाम ब्रह्माची तीन गूढ, सर्वश्रेष्ठ नामें आहेत आणि विज्ञान हें त्याचें चौथें नाम आहे. (तुरीयम् स्विद् = चौथी विशिष्ट स्थिति; तुरीयम् धाम = चौथी अवस्था [अस्तित्वाची] किंवा स्थिति असें विज्ञानाला प्राचीन वैदिक शब्द आहेत.) चौथें वरून खालीं किंवा खालून वर; सत्, चित्, आनंद व विज्ञान हा वरून खालीं येण्याचा ब्रह्माचा क्रम जड शरीर, प्राण, मन, विज्ञान हा आमचा खालून वर चढण्याचा क्रम -- दोन्ही क्रमांत विज्ञानाचा क्रमांक चौथा आहे.

सत्, चित्, आनंद व विज्ञान या चार उच्च तत्त्वाप्रमाणें मन, प्राण व जडतत्त्व या तीन कनिष्ठ तत्वांचीहि विश्वाच्या रचनेला आवश्यकता आहे. आमच्या पृथ्वीवर, भौतिक विश्वांत मन, प्राण, जडद्रव्य ज्या स्वरूपांत आहेत, त्यांच्या ज्या क्रिया होतात, ज्या परिसरांत तीं तत्त्वें वावरतात, तसेंच सर्व कांहीं त्यांचें स्वरूप वगैरे असलें पाहिजे असें मात्र नाहीं. त्यांची क्रिया, येथील त्यांच्या क्रियेपेक्षां प्रकाशमय असेल, बलवान् असेल, सूक्ष्म असेल -- असा फरक शक्य आहे; पण कोणत्या तरी स्वरूपांत मन, प्राण व जडद्रव्य या तत्त्वांची सत्, चित्, आनंद व विज्ञान यांच्या इतकीच विश्वाच्या अस्तित्वाला आवश्यकता आहे एवढेंच खरें. मन ही विज्ञानाचीच एक क्रिया आहे, क्रियाशक्ति आहे; या शक्तीचा धर्म मापणें, मर्यादा घालणें हा आहे; ही शक्ति विशिष्ट मर्यादित केंद्रें निर्माण करते आणि या केंद्रांतून विश्वाची हालचाल व विश्वांतील नानाविध क्रिया-प्रतिक्रिया पाहते, अनुभवते. असें विश्व, अस्तित्वाची भूमि वा विश्वव्यवस्था असूं शकेल कीं, जेथें मनाला मर्यादांचें बंधन नाहीं; किंवा असें म्हणूं कीं, जेथें जो पुरुष मन वापरतो, एक अप्रधान शक्ति म्हणून वापरतो त्याला मर्यादांचें बंधन नाहीं -- तो स्वतःच्या केंद्राखेरीज इतर केन्द्रांतून, इतर स्थानांतून, सर्व विश्वाच्या मध्यवर्ति केंद्रांतून देखील विश्वांतील व्यवहार अनुभवूं शकतो; तो आपला आत्मा सर्व विश्वभर पसरून सर्व गोष्टी पाहूं, अनुभवूं शकतो -- अशा प्रकारचें विश्व असूं शकेल -- पण या पुरुषाला, कांहीं दिव्य व्यवहाराकरितां त्याचें म्हणून एक ठाम ठिकाण नेहमीं वापरण्यासाठीं असलें पाहिजे आणि सामान्यत: तो या ठिकाणाला धरून वागला पाहिजे, वागूं शकला पाहिजे; असें असेल तरच त्या विश्वाला

 

पान क्र. ५००

 

विश्व हें नांव लावतां येईल : जर तेथें सर्व पुरुष, सर्व आत्मे सर्वत्र व्यापून राहत असतील, जर तेथें अनंत केंद्रें असतांहि प्रत्येक केन्द्राला कांहीं स्वयंमर्यादित कार्य नसेल, तर त्या पसाऱ्याला विश्व हें नांव देतां येणार नाहीं. त्या ठिकाणीं मूळ पुरुष आपल्या अंतरांत कल्पनेच्या अनंत मूर्ती बनवितो असें म्हणतां येईल; कवि किंवा निर्माता आपली निश्चित व्यवस्थित कृति रचण्यापूर्वीं अनेक मनोमय मूर्ती निर्माण करीत बसतो, तशी मूळ पुरुषाची विश्वरचनेच्या पूर्वींची कल्पनाविलासाची अव्यवस्थित क्रीडा तेथें चालली आहे, असें म्हणतां येईल. असें अनियंत्रित कल्पनाविलासाचें स्थानहि अस्तित्वाच्या अनंत श्रेणीमध्यें कोठेंतरी असेल -- असलें पाहिजे -- पण या स्थानाला आम्ही विश्व हें नांव देत नाहीं. या कल्पनाविलासाच्या स्थानांत कांहीं व्यवस्था असलीच तर ती सारखी बदलती असेल; विज्ञान असें कांहीं सारख्या बदलत्या व्यवस्थेचें कच्चें विश्व किंवा विश्वाचा मसाला असलेलें भांडार निर्मीतहि असेल, आणि असें कच्चें विश्व निघून नंतर निश्चित वस्तुविकासाची, वस्तूच्या मोजमापाची, मर्यादांची व्यवस्था करीत असेल; नाना संबंधांनीं बांधलेल्या वस्तूंच्या अन्योन्य क्रिया-प्रतिक्रिया नंतर निश्चित करीत असेल. हें जें वस्तूंचें मर्यादीकरण, वस्तुमापन, वस्तूंची क्रियाप्रतिक्रिया निश्चित करणें -- हें मनाचें कार्य आहे. या क्रियांसाठीं मनाची आवश्यकता आहे. पार्थिव निसर्गांत व्यवहार करणारें आमचें मन, स्वनिर्मित कैदेंत राहणाऱ्या अहंच्या पायावर जीवाजीवाचे व जीवाचे जडाचे परस्परसंबंध व परस्पर क्रिया-प्रतिक्रिया निश्चित करतें, विकसित करतें, संवर्धित करतें. पण हें आमच्या मनाचें रूप, सर्व ठिकाणच्या मनाचें स्वरूप असलें पाहिजे असें नाहीं -- विज्ञानाचें एक अप्रधान परंतु विश्वरचनेच्या दृष्टीनें अवश्य असें कार्य करणारें अंग, एवढींच आपल्या स्वरूपासंबंधानें मनानें जाणीव ठेवली, तरी त्याला मन ही संज्ञा यथार्थपणें लागू होते आणि हेंच मनाचें मूळ स्वरूप आहे. असो.

मन अस्तित्वांत आलें कीं, त्याच्या पाठीमागून प्राण आणि एक प्रकारचें द्रव्य या वस्तु अवश्यमेव अस्तित्वांत येतात. प्राण हा मूळ ब्रह्माच्या जाणीवयुक्त क्रियाशील शक्तीचा खेळ आहे. मनानें अनेक कमीअधिक स्थिर अशीं जाणीवकेंद्रें आपल्या धर्मानुसार निर्माण केलीं, म्हणजे या केंद्रांतून मूळ शक्तीचा व्यापार सुरू होतो; केंद्राकेंद्रामध्यें शक्तीची देवघेव, क्रियाप्रतिक्रिया सुरू होते. विभक्त केंद्रांतून होणारी

 

पान क्र. ५०१

 

देवाणघेवाण व अन्योन्यविषयक हें जें शक्तीचें कार्य, त्यालाच प्राण ही संज्ञा आहे. स्थिर जाणीव-केंद्र असें वर म्हटलें आहे; ही केंद्राची स्थिरता, कालांतील किंवा स्थलांतील स्थिरताच असली पाहिजे असें नव्हे. सुसंवादमय विश्वांत, शाश्वत ब्रह्मापासून निघालेल्या ब्रह्मकोशरूप साकार आत्म्यांचें, पुरुषाचें टिकाऊ व त्या सुसंवादाला आधारभूत असें सहजीवन म्हणजेच स्थिर जाणीवकेंद्रांचें सहजीवन होय. काल आणि स्थल या कल्पना अस्तित्वांत व व्यवहारांत येण्यापूर्वींहि हें सहजीवन शक्य असतें. हा जो कालस्थलातीत जीवनव्यवहार, तो आपल्या परिचयांतील व आपल्या संकुचित कल्पनाक्षेत्रांतील जीवनव्यवहाराहून फार वेगळा असेल. तथापि या विश्वांत ज्याला आम्ही जीवतत्त्व म्हणतो त्या तत्त्वाचाच प्रामुख्यानें तो कालस्थलातीत व्यवहार असतो. या जीवतत्त्वाला प्राचीनांनीं वायु, प्राण असें नांव दिलें. प्राण म्हणजे जीवनशक्ति किंवा विश्वांत कार्य करणारी मूळ चैतन्याची संकल्पशक्ति -- मूळ अस्तित्वाला निश्चित रूप, निश्चित क्रिया, जाणीवयुक्त निश्चित गतिशीलता यांनीं संपन्न करणारी, ब्रह्माची संकल्पशक्ति म्हणजेच जीवन-शक्ति किंवा प्राणशक्ति होय. मनामागून याप्रमाणें प्राणशक्ति उदयास येते व वर सांगितल्याप्रमाणें द्रव्यहि प्रकट होतें. आमच्या अहंबद्ध मनाहून विज्ञानकार्य -- मन जसें कांहींसें वेगळें व त्या मनाला लागून उदयास येणारी प्राणशक्ति जशी आमच्या परिचयाच्या प्राणशक्तीहून कांहींशी निराळी, त्याप्रमाणें त्या प्राणामागून उदयास येणारें द्रव्य पण आमच्या परिचयाच्या जड भौतिक शरीरद्रव्याहून निराळें असेल; तें पुष्कळ लवचीकपणानें वागणारें असेल, रोधक शक्तींतहि आमच्या भौतिक द्रव्याहून लवचीक असेल; त्या द्रव्यानें बनलेलें शरीर आमच्या शरीराप्रमाणें आत्म्याच्या कारागृहाचे काम न करतां आत्म्याच्या साधनाचें काम करीत असेल; तथापि विश्वांत वस्तूंची अन्योन्य क्रिया-प्रतिक्रिया ही आवश्यक गोष्ट असल्यानें, या अन्योन्य व्यवहारापुरता कांहींतरी निश्चित आकार व निश्चित द्रव्यप्रकार विज्ञान - उपकारक द्रव्याच्या बाबतींतहि असणार हें निःसंशय. विज्ञानकार्य पूर्ण होण्यासाठीं जो आकार वा जें अतिमानसिक द्रव्याचें शरीर ब्रह्माच्या आत्मरूपांना मिळेल, तें केवळ मानसिक-द्रव्याचें मानसिक शरीर असेल किंवा त्यापेक्षांहि अधिक प्रकाशमय अधिक सूक्ष्म आणि अधिक समर्थपणें प्रतिक्रियाशील असेल.

तेव्हां, विश्व या संस्थेसंबंधानें ही गोष्ट स्पष्ट आहे कीं, या संस्थेला

 

पान क्र. ५०२

 

सात (किंवा आठ) तत्त्वांची नितांत आवश्यकता असते. सत्, चित्, आनंद, विज्ञान, मन, (आत्मा) प्राण, जडद्रव्य हीं तत्त्वें मिळून विश्व बनतें. यांपैकीं कोणतेंहि एक तत्त्व दिसायला पुढें असेल -- यामुळें कदाचित् सर्व विश्व यापुढें प्रकट असलेल्या तत्त्वाचेंच वस्तुत: बनलेलें आहे आणि या विश्वांत दुसरी जीं कांहीं तत्त्वें नंतर प्रकट होतील, तीं या प्रथमदर्शनीं अद्वितीय विश्वघटक असणाऱ्या किंवा भासणाऱ्या तत्त्वापासून निघालेलें फल, परिणाम असून या इतरांची विश्वरचनेला आवश्यकता नाहीं, अशी समजूत होण्याचा संभव आहे. पण ही समजूत भ्रामक आहे. विश्वाचें हें एकतत्त्वमय भासणारें स्वरूप त्याच्या पोटांतील वास्तव स्थितीला पांघरुणाखालीं लपविणारें आहे. तें फसव्या मुखवट्यासारखें आहे. सत्य हें आहे कीं, विश्वांत कोणतेंहि तत्त्व प्रकटपणें कार्यकारी असो, त्याच्याबरोबर बाकी सर्व तत्त्वेंहि तेथें असतात आणि तीं गुप्तपणें कार्यकारी असतात. असें एखादें विश्व संभवतें कीं, ज्याच्या सुसंवादमय अस्तित्वपटांत सातहि तत्त्वें उच्च प्रकारच्या किंवा खालच्या दर्जाच्या क्रियाशीलतेचा आश्रय करून प्रकटपणें कार्य करीत असतील; असेंहि एखादें विश्व संभवतें कीं, जेथें एक तत्त्व प्रकट व इतर सर्व तत्त्वें त्या प्रकट तत्त्वाच्या आड राहून काम करणारीं असतील, त्या प्रकट तत्त्वाच्या पोटांत क्रमवार अंतर्हित झालेलीं असतील -- ही अंतर्हित तत्त्वें क्रमवार विकसित व्हावयाचींच हें अशा विश्वाचें निश्चित भवितव्य असतें. (असें देखील विश्व संभवतें कीं, एक तत्त्व प्रधान व इतर तत्त्वें गौण रीतीनें काम करणारीं, एका तत्त्वांत इतरांचा अंतर्भाव झालेला : अशा ठिकाणीं एका तत्त्वांत इतर तत्त्वांचें क्रमवार अंतर्धान नसल्यानें त्यांचा क्रमवार विकासहि नसतो.) असो. तेव्हां हा सिद्धांत स्पष्ट झाला कीं, एका तत्त्वाच्या पोटांत विश्वघटक इतर तत्त्वें जेथें क्रमवार अंतर्हित होऊन विश्वरचनेला प्रारंभ झाला असेल, त्या विश्वाची नियति वा नियोजित भवितव्य हेंच असतें कीं, त्याच्या अस्तित्वाचीं सातहि अंगें, सातहि 'नांवें' (सत्, चित् इत्यादि) क्रमवार विकसित होऊन सार्थ व्हावयाचीं, प्रकटपणें कार्यकारी व्हावयाचीं. या सिद्धान्तानुसार, भौतिक विश्व हें त्याच्या पोटीं गुप्त असलेलें जीवतत्त्व (प्राणतत्त्व) स्वभावतःच प्रकट करणार, विकासक्रमानें प्रथम उदयास आणणार हें ठरल्यासारखें होतें; यानंतर तें गुप्त मन प्रकट करणार; आज या गोष्टी प्रकट झाल्या आहेतच : यानंतर स्वाभाविकपणेंच त्याच्या पोटीं गुप्त असलेलें विज्ञान, प्रकट विज्ञानरूप धारण करील आणि नंतर

 

पान क्र. ५०३

 

मूळ चैतन्य प्रकट होऊन भौतिक विश्वांत सच्चिदानंदाची त्रिमुखी तेजोमय मूर्ति कार्यकारी होईल. हा स्वाभाविक विकासक्रम आहे आणि तो निश्चितपणें व्यवहारांत येणार -- प्रश्न एवढाच आहे कीं, हें विज्ञानाचें व सच्चिदानंदाचें प्रकटीभवन या पृथ्वीवर होणार कीं इतर भौतिक विश्वांत ? आज पृथ्वीवर विकसित होत असलेल्या मानवतेंत प्रकट होणार कीं, इतरत्रच्या मानवसमान जीवांत प्रकट होणार ? या युगांत प्रकट होणार कीं, कालांतरानें अन्य युगांत प्रकट होणार ? विज्ञानाच्या व सच्चिदानंदाच्या प्रकटीकरणार्थ मानव हाच साधन व पात्र होणार कीं मानवाहून श्रेष्ठ कोणी जीव साधन व पात्र होणार? प्राचीन ऋषींची श्रद्धा होती कीं, अप्रकट विज्ञान व सच्चिदानंद, मानवांत प्रकट होणें शक्य आहे; स्वतःचे ठिकाणीं विज्ञान व सच्चिदानंद प्रकटपणें कार्यकारी करणें हीच मानवाची दिव्य नियति आहे. आधुनिक विचारवंत या शक्यतेची कल्पना मनांत देखील आणीत नाहीं; समजा अशी कल्पना त्याच्या मनांत आलीच, तर ही गोष्ट संशयास्पद आहे असें तो म्हणतो किंवा ती अशक्य आहे असेंहि आपलें मत देतो. या आधुनिक विचारवंताला भविष्यदर्शनांत या अतिमानवाचें दर्शन घडलेंच, तर आतांच्यापेक्षां पुष्कळ अधिक प्रमाणांत ज्याच्यांत मानसिक किंवा प्राणिक शक्तीचा विकास झाला असेल अशा मानवाचें दर्शन घडतें; या दोन तत्त्वांखेरीज इतर श्रेष्ठ तत्त्वांची शक्यता मानवाचे ठिकाणीं त्याला दिसत नाहीं; या तत्त्वांनी आम्हां मानवांसाठीं एक मर्यादित विकासचक्र निर्मिलें आहे व नेमून दिलें आहे, त्या चक्राच्या पलीकडे मानव जाऊं शकेल हें त्यांना पटत नाहीं. पण हें विश्व प्रगतिशील आहे, यांतील मानवप्राणी दिव्य तेजाचा स्फुल्लिंग आपल्या ठिकाणीं धारण करीत आहे; अशा स्थितींत, वर सूचित केलेली विज्ञान व सच्चिदानंद यांच्या प्रकटीकरणाची आकांक्षा आम्हीं बाळगावी, यांत खरें शहाणपण आहे, ही आकांक्षा फोल आहे असें मानण्यांत अर्थ नाहीं; तसेंच मानसिक व प्राणिक शक्तीच्या संभाव्य वाढीच्या अरुंद क्षेत्रांत आम्हीं आपली आशा मर्यादित करून ठेवावी, यांतहि शहाणपण नाहीं. कारण, मानसिक व प्राणिक क्षेत्रें, हीं आम्हांला आमचें आत्मविकासकर्तव्य शिकून घेण्यासाठीं स्थापन केलेलीं मध्यस्थानींचीं अभ्यासमंदिरें आहेत; यापलीकडे त्यांना महत्त्व नाहीं. विश्वांत जी व्यवस्था आहे, ती अध्यात्मावर आधारलेली आहे आणि या अध्यात्मनिष्ठ व्यवस्थेंत आपण जितकी उंच दृष्टि ठेवूं, आकांक्षा जितकी उदात्त ठेवू, तितकी उच्च भूमिकेवरील श्रेष्ठतर सत्यें

 

पान क्र. ५०४

 

आम्हांमध्यें प्रकट होण्याची शक्यता अधिक वाढेल -- कारण असें सत्य आमच्या अंतरंगांत प्रथमपासूनच आहे आणि या व्यक्त निसर्गांत, त्याला झांकून टाकणारें जें आवरण त्याजवर, त्याजभोंवतीं आहे व त्याला बंदींत ठेवीत आहे, तें आवरण दूर करून मला मोकळें करा अशी त्या सत्याची हांक आमच्या अंतरंगांत उठत आहे.

 

पान क्र. ५०५

 

 

प्रकरण अठ्ठाविसावें

 

अतिमानस, मानस आणि अधिमानसी माया

 

सूर्य आपले घोडे (किरण) सोडतो (त्यांना विसांवा देतो) त्या ठिकाणीं एक शाश्वत तत्त्व आहे, एक शाश्वत सत्य आहे; दुसऱ्या सत्यानें (विखुरलेल्या किरणांच्या तेजानें) हें शाश्वत सत्य झांकलेलें असतें. सहस्त्र सूर्यकिरण (विसाव्यासाठीं मोकळे केल्यावर) एकत्र आले -- त्या ठिकाणीं तें शाश्वत तत्त्व, शाश्वत एकमेव सत्य आहे. देवांमध्यें सर्वांत अधिक भव्य दिव्य देवमूर्ति मीं पाहिली; एकमेव सत्य ही देवमूर्ति मीं पाहिलीं.

- ऋग्वेद ५.६२.१

 

सत्याचें मुख हिरण्याच्या झांकणानें झांकलेलें आहे; हे, सृष्टीचें पोषण करणाऱ्या सूर्या ! तें झांकण दूर कर; सत्याचा धर्म आम्हांला दिसावा यासाठीं तें झांकण दूर कर; हे सूर्या, तूं एकमेव कवि आहेस; तुझे किरण इतस्तत: विखुरलेले आहेत, ते व्यवस्थेनें एकत्र आण; तुझें सर्वांत सुखमय असें रूप मला पाहूं दे; सर्वत्र असणारें ज्ञानमय पुरुषतत्त्व हें तें सर्वांत सुखमय असें तुझें रूप आहे -- तो पुरुष मी आहे.

- ईश उपनिषद् श्लो० १५, १६.

 

सत्यम् ऋतम् बृहत्

- अथर्ववेद १२.१.१

 

तें ब्रह्म सत्य झालें, अनृतहि तेंच झालें; हें सर्व जें जें आहे, तें तें तेंच झालें आहे.

- तैतिरीय उपनिषद् २.६

 

आतां पर्यंतच्या विवरणांत अनेक गोष्टी आम्हीं स्पष्ट केल्या; परंतु एक गोष्ट स्पष्ट करावयाची राहिली आहे; सच्चिदानंद हें विज्ञानांतून अज्ञानांत कसें उतरलें ? ही गोष्ट स्पष्ट करावयाची राहिली आहे. मन, प्राण, जड द्रव्य यांचा जो मूळ स्वभावधर्म आम्हीं पाहिला त्यांत, त्यांनीं ज्ञानस्थितीपासून च्युत व्हावें अशी कांहीं अपरिहार्य गोष्ट दिसली

 

पान क्र. ५०६

 

नाहीं. अज्ञानाचा पाया, मूळ जाणिवेच्या विभागणींत आहे, इतकीच गोष्ट दाखविली गेली आहे : विश्वातीत आणि विश्वरूप अशा पुरुषाच्या जाणिवेचा एक अगदीं अंगभूत, आणि तत्त्वत: अविभाज्य असा भाग म्हणजे व्यक्तीची जाणीव असते; पण व्यक्तीची जाणीव विश्वातीत आणि विश्वमय जाणिवेपासून विभक्त केली गेली आहे; अतिमानसाच्या (विज्ञानाच्या) सत्याचें एक गौण कार्य, हें मनाचें वास्तविक स्वरूप असून, तें मन, त्या विज्ञान-सत्यापासून विभक्त केलें गेलें आहे; मूळ सत्तेच्या, जाणीवयुक्त शक्तीचा एक प्रयोग, हें ज्या प्राणाचें (जीवनाचें) सत्यस्वरूप, तो प्राण (तें जीवन) मूळ शक्तीपासून विभक्त केला गेला आहे; मूळ जाणीवयुक्त सत्तेचा, सत्ताद्रव्याचा एक प्रकार, हें ज्या जडाचें वास्तविक स्वरूप, तें जड, मूळ सत्तेपासून (अस्तित्वापासून) विभक्त केलें गेलें आहे : ही विविध विभक्तता प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, मूळ जाणिवेची विभागणी आहे आणि या विभागणींतून अज्ञान उदयास आलें आहे, इतकी गोष्ट दाखविली गेली आहे; पण जें अविभाज्य सच्चिदानंद, तें वर निर्दिष्ट केलेल्या विविध विभागणीनें कां व कसें विभागलें गेलें ? या प्रश्नाचा उकल केला गेलेला नाहीं; सच्चिदानंदाच्या -- मूळ पुरुषाच्या -- जाणीवशक्तीनें स्वतःला स्वतःच कमी करण्याचा किंवा शून्य करण्याचा उद्योग कसातरी व कशाकरितां तरी केला; आणि म्हणून अविभाज्यांत विभागणी आली, एवढे आपल्याला खास म्हणतां येईल. सर्व जें आहे तें जाणिवेच्या शक्तीचें किंवा जाणीवयुक्त शक्तीचें स्पंदन असल्यानें, कार्य असल्यानें, या शक्तीनें आपली स्वाभाविक पूर्ण प्रकाशमयता आणि पूर्ण समर्थता स्वतःच दडपून व दडवून टाकण्याचा कांहीं उद्योग केला आणि म्हणूनच मूळ जाणीव (ज्ञान) अखंड ज्ञान खंडित होऊन, विभागमय होऊन, अज्ञानाचें गतिमान परिणामकारक दृश्य उभें राहिलें यांत संशय नाहीं. तथापि या उद्योगासंबंधाचा प्रश्न सध्यां चर्चिण्याची आवश्यकता नाहीं. आमची जाणीव ज्ञान-अज्ञानयुक्त आहे, दोन्ही वस्तू आमच्या जाणिवेंत आहेत; अंधार आणि प्रकाश यांचें बनलेलें मिश्र स्वरूप आम्ही अनुभवीत आहों. अतिमानसिक सत्याचा पूर्णप्रकाशमय दिवस आणि भौतिक पूर्णनेणिवेची रात्र या दोन टोंकामध्यें, अर्धवट प्रकाशाचा भाग असावा तशी आमच्या ज्ञान-अज्ञानयुक्त जाणिवेची स्थिति आहे. या स्थितीची बारकाईनें तपासणी पुढें ज्यावेळीं करूं, त्यावेळीं मूळ जाणीवशक्तीनें आपली प्रकाशमयता दडपून दडवून टाकण्याचा उद्योग कां केला, कसा

 

पान क्र. ५०७

 

केला, या संबंधानें चर्चा करूं. सध्यां एवढी गोष्ट नमूद करणें अवश्य आहे कीं, वर निर्दिष्ट केलेल्या उद्योगाचें व त्याच्या परिणामाचें स्वरूप थोडक्यांत पुढें दिल्याप्रमाणें असलें पाहिजे : जाणीवयुक्त मूळ पुरुषाच्या अस्तित्वाच्या, एका स्थितिशील अवस्थेवर आणि एका गतिशील अवस्थेवर, अर्थात् जाणिवेच्या व अस्तित्वाच्या विशिष्ट अंगावर सर्व लक्ष केंद्रित करण्याचें मूळ जाणीवशक्तीनें ठरविलें आणि म्हणून जाणिवेचा इतर सर्व भाग आणि अस्तित्वाचा इतर सर्व भाग तिला बाजूला ठेवावा लागला; अर्थात्, अस्तित्वाच्या एका विशिष्ट अवस्थेच्या अल्प जाणिवेला, हा बाजूला ठेवलेला भाग, पडद्या-आडचा भाग बनला. आपलें (अल्पज्ञ) मन एकाच विषयावर केंद्रित केलें गेलें, म्हणजे तें केंद्रित आहे तों पावेतों, बाकीचे सर्व विषय त्याला 'पडद्या आड' होतात, तशीच गोष्ट सर्वज्ञ मूळ जाणिवेची समजावी.

आपल्याला परिचित असलेलें मन आणि अतिमानसिक सत्य ज्ञान -- ज्याचा एक गौण व्यापार हें मनाचें अगदीं मूळ स्वरूप आहे -- यांजमध्यें फार मोठी खिंड आहे. या खिंडीचा विचार येथें करणें अगत्याचें आहे. आत्मा (सच्चिदानंद) उतरत उतरत जडामध्यें गुप्त होऊन बसला. जडांतून वर येऊन तो आत्मा परत आपल्या मूळ रूपाला प्राप्त व्हावयाचा आहे. आत्म्याचें अवतरण अतिमानसांतून एकदम आमच्या मानसांत होणें व आमच्या मानसांतून एकदम अतिमानसांत त्याचें ऊर्ध्वगमन होणें जवळ जवळ अशक्य आहे -- इतकी मोठी खिंड आमच्या मनाच्या आणि विज्ञानाच्या (अतिमानसाच्या) मध्यभागीं आहे. तेव्हां या दोन वस्तूंमध्यें, दोन भूमिकांमध्यें जाणिवेच्या कांहीं भूमिका असल्या पाहिजेत, ज्या भूमिकांमुळें आत्म्याला उतरणें व चढणें शक्य आणि सोईचें होईल. आमचें मन हें अज्ञानाची एक 'विभूति' आहे : हें मन सत्याच्या शोधांत असतें, मोठ्या संकटांशीं झुंज घेत, तें सत्यासाठीं चांचपडत चांचपडत शोध करीत मार्ग चालत असतें, -- शेवटीं मूळ सत्य त्याच्या हातीं लागत नाहीं, तें दूर राहतें व त्याच्या (सत्याच्या) कमी अधिक अंधुक वा स्वच्छ छायाचित्रांची रांग किंवा पट्टी तें (मन) आपल्या यत्नानें निर्माण करूं शकतें; सत्याचीं शब्दचित्रें, कल्पनाचित्रें, सत्याच्या इंद्रियरचित मनोरचित प्रतिमा, मूर्ती, प्रतीकें निर्माण करून त्यांच्या द्वारां मूळ सत्याची काय कल्पना करतां येईल ती करीत बसणें एवढेंच आमच्या मनाला -- अज्ञानाच्या 'विभूतीला' -- साधूं शकतें. विज्ञानाची गोष्ट मनाच्या अगदीं उलट आहे. विज्ञानाला

 

पान क्र. ५०८

 

सत्य स्वभावत: विदित असतें, विज्ञानाच्या हातीं खरेंखुरें सत्य स्वाभाविकपणेंच असतें; सत्याचीं स्वतःचीं रूपें, विज्ञान आपल्यासमोर आपल्या करणीनें उभीं करतें; सत्याच्या छायाचित्रांवर, सूचक प्रतीकांवर, कल्पित रचनांवर, विज्ञानाला, मनाप्रमाणें भागवावें लागत नाहीं. विकासक्रमांतील आमचें मन आणि तिरोधान क्रमांतील मूळ मन यांची तुलना केली, तर मूळ मनाची शक्ति आमच्या मनाहून पुष्कळ अधिक आहे असें दिसून येतें. आमच्या विकासी मनाला, प्राण आणि शरीर यांच्या अंधःकारमय कोठडींत रहावें लागत असल्यामुळें, त्याची सत्य-शोधनाची शक्ति ही, कोठडींत बंद नसलेल्या मूळ मनाइतकी असूं शकत नाहीं; हें मूळ मन त्याच्या क्षेत्रांत, आपल्या मनापेक्षां पुष्कळ अधिक मोकळेपणानें वावरू शकतें; सत्यभांडार असलेलें जें विज्ञान, त्याच्या तें बरेंच जवळ असतें, म्हणून त्याच्या सत्यविषयक रचनांत, सत्याचा प्रकाश बराच सामावलेला असतो; सहज भासमान होण्याइतका सत्याचा प्रकाश त्यांत असतो; त्यानें बनविलेल्या सत्याच्या प्रतिमा, आमच्या मनानें बनविलेल्या प्रतिमांहून पुष्कळच अधिक सूक्ष्म, सार्थ, प्रेरणामय व सत्याचा अप्रत्यक्ष साक्षात्कार घडविणाऱ्या अशा असतात; तथापि तें मन देखील, क्रियादृष्टीनें आमच्या मनाहून तत्त्वत: वेगळें असत नाहीं -- विज्ञानाच्या सत्य-ज्ञानाचा अविभक्त भाग, हें कांहीं त्याचें स्वरूप नसतें; त्या ज्ञानापासून फुटून विभक्त होऊन तें अज्ञानांत उतरलेलें असतें; आणि आमचें मन अज्ञानांत वावरत असतें; असो. विज्ञानाचे अंगभूत ज्ञानवेष्टित मन आणि अज्ञानांत प्रथम उडी घेणारें, अज्ञानवेष्टित मन या दोन जाणिवेच्या पातळ्यांमध्ये जी मोठी खिंड आहे, ती खिंड जाणिवेच्या विशिष्ट पातळीनें भरलेली असली पाहिजे -- या पातळीवरच्या ज्ञानाला, जाणिवेला निर्मायक शक्तीहि असली पाहिजे; या निर्मायकशक्तियुक्त जाणिवेंत, विज्ञानांतून आणि विज्ञानांगभूत ज्ञानवेष्टित मनांतून सच्चिदानंद उतरतें व नंतर तेथून तें अज्ञानांत, अज्ञानवेष्टित मनांत उडी घेतें, असें कांहींतरी घडत असलें पाहिजे, असें दिसतें; -- हीच मधली निर्मायक ज्ञानभूमि, आमच्या सच्चिदानंदाला विकासक्रमांत, अज्ञानांतून विज्ञानांत जाण्याला, मधल्या टप्प्यासारखी उपयोगी पडूं शकते. विकासक्रमांत आकारशून्य शक्ति ही संघटित जडाचा आकार घेते, जीवहीन जडांतून जीवतत्त्व वर येतें, मनोहीन जीवतत्त्वांतून विषयग्रहणसमर्थ, भावयुक्त, क्रियाशील जीवतत्त्व निघतें; प्राथमिक पशुसुलभ मनांतून विचारशील, तर्कशील, जीवतत्त्वावर देखरेख करून सत्ता चाल -

 

पान क्र. ५०९

 

विणारें आणि स्वतःचेंहि निरीक्षण करणारें मन उदयास येतें; हें मन स्वतंत्र जीवाप्रमाणें काम करूं शकतें व स्वतःच्या पलीकडे जाण्याचा यत्न बुद्धिपुरस्सरपणें करूं शकतें; सच्चिदानंद तिरोधानक्रमांत शेवटीं व्यवस्थाशून्य, आकारशून्य, जडशक्तींत तिरोभूत होतें -- तेथून मनापर्यंत वर चढतें. -- या अज्ञानवेष्टित मनांतून सत्यपूर्ण विज्ञानांत तें एकदम जाणें अशक्य दिसतें; मध्यें एक वा अधिक ज्ञानभूमिका असाव्यात असें तर्कदृष्टीनें व व्यवहारदृष्टीनें म्हणणें प्राप्त होतें; कारण अज्ञानग्रस्त मन आणि विज्ञान, यांमधील खिंड फार मोठी आहे आणि विकासक्रमांतील ज्या पायऱ्या वर दिल्या आहेत त्या सुखानें चढतां याव्या म्हणून प्रत्येक दोन पायऱ्यांमध्यें कांहीं पोट-पायऱ्याहि आपल्याला आढळतात; तेव्हां अशाच पोटपायऱ्या, अज्ञान आणि विज्ञान यांच्यामधील खिंड सुखानें चढण्यासाठीं, भरण्यासाठीं असाव्यात हें तर्काला व व्यवहाराला धरून आहे. तिरोधान क्रमांतहि या पोट-पायऱ्या असणें सोईचें असणार. याप्रमाणें या पोटपायऱ्यांची उपयुक्तता व संभवनीयता सिद्ध होते.

अज्ञानांतील मनांतून, विज्ञानांगभूत ज्ञानसंपन्न मनाकडे चढतांना कांहीं पायऱ्या -- ज्ञानभूमी -- असल्या, तर त्या पायऱ्या सामान्य मनाच्या जाणिवेपलीकडे असल्या पाहिजेत हें उघड आहे. अस्तित्वाच्या, मनोमय अवस्थेहून श्रेष्ठ अवस्था या मधल्या ज्ञानभूमीवर आहेत आणि त्या अवस्था सामान्य मनाला, त्याच्या सामान्य स्थितींत अनुभवांत येत नाहींत; त्या अवस्थांत आमच्या मनाला, त्याच्या सामान्य स्थितींत प्रवेश मिळूं शकत नाहीं. मनुष्याची जाणीव मनानें मर्यादित झालेली आहे -- नव्हे, मनाच्या विशिष्ट विभागानें मर्यादित झाली आहे असें म्हटलें पाहिजे : जें मनाच्या किंवा या विशिष्ट विभागाच्या खालीं आहे, तें आम्हांला अर्धनेणिवेनें व्याप्त किंवा जवळजवळ पूर्ण नेणिवेचें भासतें. जें मनाच्या वर आहे, त्याला जणुं जाणीवच नाहीं, प्रकाशमय नेणीव हें त्याचें स्वरूप आहे, असें आम्हांला भासतें. ध्वनि व रंग यांच्या बाबतींत आम्ही असें पहातों कीं, आम्हांला जे ध्वनी ऐकूं येतात व जे रंग दिसतात, त्यांच्या वर आणि खालींहि ध्वनी व रंग असतात पण ते आम्हांला दिसत नाहींत, ऐकूं येत नाहींत व त्यांपैकीं कांहीं कोणाला दिसले, ऐकूं आले तर तें स्पष्ट नसतात. श्रवणेंद्रियाची व नेत्रेंद्रियाची जी अवस्था, तीच मन या अंतरिद्रियाची अवस्था आहे. मनुष्याप्रमाणें मनुष्येतर प्राण्यांना मन आहे, अर्थात् तें मन मनुष्याच्या मनाइतकें प्रगल्भ नाहीं; पण जें आहे तें स्वभावधर्मानें

 

पान क्र. ५१०

 

मनुष्याच्या मनासारखें आहे. असें असून मानवी मनाला मानवेतर मनाशीं फारसा संपर्क ठेवतां येत नाहीं; उलट हें मानवेतरांचें मन मनच नव्हे, खरी जाणीव मानवेतर प्राण्यांत नाहीं असेंहि म्हटलें जातें; कारण एवढेच कीं, त्या प्राण्यांच्या जाणिवेच्या क्रिया मनुष्याहून वेगळ्या व मनुष्याहून कमी व्यापक असतात; ज्या अस्तित्वाला मन मिळालेलें नाहीं, त्या अस्तित्वाचें मानव बाहेरून निरीक्षण करतो, त्याच्याशीं हितगुज करूं शकत नाहीं, त्याच्या अंतरंगांत शिरूं शकत नाहीं; मानवी जाणिवेच्या वर जें स्थान आहे, तेंहि त्या जाणिवेच्या खालीं असणाऱ्या गोष्टींप्रमाणें मानवी मनाला अज्ञात असतें, तें स्थान सर्वथैव रितें असल्यासारखेंच त्याला भासतें. तेव्हां मनाच्या जाणिवेपेक्षां उच्च अशा जाणिवेच्या भूमिका असल्या, तरी त्या भूमिकांशी मनुष्याला कांहीं संबंध ठेवतां येत नसल्यानें, असा संबंध ठेवण्याचें कांहीं साधन त्याच्याजवळ दिसत नसल्यानें, ह्या उच्च ज्ञानभूमिका त्याला पायऱ्यासारख्या उपयोगीं पडूं शकणार नाहींत असें प्रथमदर्शनीं भासतें; व जर त्याला या पायऱ्या उपलब्ध नाहींत, तर त्याला वापरतां येणाऱ्या मर्यादित मनापाशींच त्याचा विकास थांबतो. निसर्गानें त्याच्या ऊर्ध्वगामी प्रयत्नासंबंधानें, या मर्यादित मनापाशींच 'विकासाची समाप्ति' असा लेख लिहून टाकला आहे असें म्हणावें लागतें.

पण प्रथमदर्शनीं मन जितकें पंगु दिसतें, तितकें तें पंगु नाहीं असें बारीक निरीक्षणानें लक्षांत येतें; मनाचा मर्यादितपणाचा सामान्य धर्म आम्हांला फसविणारा आहे, मन आपल्या सामान्य मर्यादा अनेक दिशांनीं उल्लंघून जात असते अशी वास्तविक स्थिति आहे; मनाला आत्मोल्लंघनाचें वावडें नाहीं; मनाच्या आत्मोल्लंघनाच्या वाटा त्याला, आत्मप्रकटन करणाऱ्या आत्म्याच्या (सच्चिदानंदाच्या) उच्च ज्ञानभूमिकांकडे नेतात. या वाटा अर्धवट किंवा पूर्णपणें अप्रकट वा गुप्त अशा आहेत किंवा पडद्याआड आहेत; अंतःस्फूर्ति नांवाची अशीच एक वाट आहे : मनुष्याच्या ज्ञानप्राप्तीच्या साधनांपैकीं अंतःस्फूर्ति हें एक साधन आहे, हे आपण पूर्वीं पाहिलें आहे; अज्ञानक्षेत्रांतील मनांत, मनापेक्षां श्रेष्ठ ज्ञानभूमीवरून ज्ञानाचा प्रकाश टाकण्याचा जो विशिष्ट प्रकार आहे, तो अंतःस्फूर्ति या नांवानें ओळखला जातो. मानवी मनांत येणारी अंतःस्फूर्ति सामान्य बुद्धीच्या व्यापारानें पुष्कळशी झांकली जाते; फारच क्वचित् आमच्या मनोव्यापारांत आम्हांला शुद्ध अंतःस्फूर्तीचा प्रत्यय लाभतो; सामान्यत: अंतःस्फूर्ति मनांत येण्याचा अवकाश, कीं तो प्रकाशाचा बिंदु सामान्य

 

पान क्र. ५११

 

मानसिक व्यापारांनीं, त्यांच्या पुटांनीं व्यापला जातो; केव्हां केव्हां अंत:स्फूर्ति विजेसारखी मनांत चमकतांच, त्या चमकणाऱ्या ज्ञानतेजाला व्यवस्थित आकारास येण्याला वाव न देतां, तिची नक्कल करणारा सामान्य बुद्धीचा व्यापार, तिला व्यवस्थेनें मनांत येऊं देण्याच्या आड येतो; तत्सम बौद्धिक सूचनेचें खरें-खोटें नाणें त्या स्फूर्तीच्या खऱ्या नाण्याऐवजीं चालवितो; असें जरी असलें तरी श्रेष्ठ ज्ञानभूमीवरून आमच्या अज्ञानवेष्टित मनांत ज्ञानप्रकाश येतो ही गोष्ट मात्र, मनाचा त्याच्या वरतीं असलेल्या ज्ञानभूमीशीं संबंध जोडण्यास पुरेशी आहे. आम्ही आमच्या मनांतून अंतःस्फूर्तीच्या वाटेनें जाऊन, आत्म्याच्या (सच्चिदानंदाच्या) श्रेष्ठ ज्ञानभूमींमध्यें प्रवेश करूं शकतों. अंतःस्फूर्ति ही आमच्या मौलिक मननांत, तसेंच विषयांचें यथातथ्य ग्रहण करण्याच्या मनोव्यापारांत आपल्या अनावृत, आवृत किंवा अर्ध-आवृत अशा तेजानें कार्यकारी स्वरूपांत उपस्थित असते, ही गोष्ट सुद्धां वर सांगितल्याप्रमाणेंच चैतन्याच्या (सच्चिदानंदाच्या) श्रेष्ठ भूमिकांशीं आमचा संबंध येऊन, त्या भूमिकांत आमचा प्रवेश घडून येण्यास उपकारक होते ही महत्त्वाची बाब आहे. श्रेष्ठ ज्ञानभूमीला जाण्यासाठीं अंतःस्फूर्ति ही जशी एक वाट आहे, तशी दुसरीहि एक वाट आहे. अहंची मर्यादा ओलांडून, मन अनहंभावानें, विश्वभावानें कोणत्याहि गोष्टीकडे अथवा घटनेकडे जें पाहूं शकतें, पाहतें, त्या मनाच्या व्यापारांत ती वाट अंतर्भूत आहे. विश्वात्म्याची पहिली विशिष्टता अनहंभाव, अवैयक्तिकता, 'मी-शून्यता' ही आहे; विश्वात्म्याचें विषयग्रहण, विषयज्ञान सर्वांगीण असतें; सर्वांगस्पर्शित्व, एकाच दृष्टिकोनानें मर्यादित नसणें, मर्यादा असलेल्या कोणत्याहि दृष्टिकोनानें बांधून न घेणें हें विश्वात्म्याच्या विषयग्रहणाचें, विषयज्ञानाचें वैशिष्ट्य आहे. तेव्हां, मनाच्या अनहंभावाच्या, विश्वभावाच्या व्यापारानें मनाचें मर्यादित क्षेत्र विस्तार पावून, विश्वाच्या क्षेत्राशीं एकरूप होण्याच्या मार्गाला लागतें हें उघड आहे; व्यापक क्षेत्र ही उच्च मानसिक भूमिकांची एक विशिष्टता असते; हा विशिष्ट गुण अनहंभावी मन मिळवितें ही गोष्ट स्पष्ट आहे; जें विश्वव्यापक विश्वमानस आमच्या मनाच्या मर्यादांपलीकडे दूर आहे, त्याची व्यापकता, विश्वदृष्टीनें वस्तुजातांकडे बघूं लागलेल्या मनाला क्रमश: येऊं शकते : मुळांत मन प्रथम विश्वमनच होतें, विश्वव्यापकत्व ही मनाच्या व्यापाराची मूळ स्थिति होती; पण नंतर त्या मनापासून, त्याचा एक कनिष्ठ व्यापार म्हणून आमचें मर्यादित मन उदयास आलें.

 

पान क्र. ५१२

 

मन मी-शून्य होऊन विश्वदृष्टीनें व्यवहाराकडे बघूं लागतें, या त्याच्या व्यापारांत मनाला त्याचें जन्मक्षेत्र - विश्वमानस पुन: लाभण्याचा मार्ग आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. मनाच्या पोटीं केव्हां केव्हां चमकणारी अंतःस्फूर्ति, मनाचा अनहंभावयुक्त विश्वभाव हे दोन मार्ग, मन आणि ज्ञानाच्या श्रेष्ठ भूमिका यांचा संबंध जोडणारे आहेत हें आपण पाहिलें. तिसरा मार्ग प्रतिभा नांवानें ओळखला जातो. श्रेष्ठ ज्ञानभूमींतून कांहीं ज्ञानप्रकार सरळ मनांत उतरतात. प्रतिभेचे व्यापार हे असे ज्ञानप्रकार आहेत. आमच्या मनाच्या पलीकडे, मनाच्या वर, जणुं मस्तकाच्या वर दिव्य-ज्ञानप्रकाशानें भरलेली जाणीव आहे -- या दिव्य जाणिवेच्या उच्च क्षेत्रांतून खालीं, मनांत, प्रतिभारूपानें जें ज्ञान उतरतें, तें मूळ तेजाळपणासह व व्यापकतेसह मनांत व्यवहार करीत नाहीं -- सामान्यत: विशिष्ट मर्यादित क्षेत्रांत प्रतिभा कार्य करते, तिच्या विशिष्ट शक्तीच्या व्यवहारासाठीं तिची स्वतंत्र संघटित व्यवस्था नसते, ती स्थिरतेनें कार्य करीत नाहीं, लहरीपणा हा तिचा स्वभाव दिसतो, तिची चाल बेजबाबदार दिसते; विचित्रपणा, असाधारण उच्चपणा, असाधारण विलक्षणपणा अशा प्रकारच्या गोष्टी, मनांतील तिच्या राज्यांत प्रत्ययास येतात; मनांत प्रतिभेच्या द्वारां जें ज्ञानतेज उतरतें, तें मनाच्या द्रव्याशीं आपलें कार्य जुळवून घेते -- एकंदरीत मूळ ज्ञानतेजाची दिव्यता, तें तेज प्रतिभेच्या द्वारां मनांत उतरल्यावर प्रत्ययास येत नाहीं, मनाचे ठायीं त्या तेजाचा तेजस्वीपणा कमी झालेला, मंद झालेला असा भासतो. या सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी, केव्हां केव्हां आमच्या मनांत एकदम उच्च विचार स्फुरतात, कांहीं साक्षात्कारी दर्शन घडतें, अंतःस्फुरणानें कांहीं विषयग्रहण घडतें, कांहीं निर्णय सुचतो; आणि या गोष्टी सामान्य मानसिक व्यापाराच्या आटोक्यांतल्या नाहींत, या गोष्टींत मनापेक्षां विशेष प्रकाश व विशेष सामर्थ्य यांचें दर्शन घडतें म्हणून मनाहून श्रेष्ठ ज्ञानभूमीच या गोष्टींचें मूळ स्थान आहे हें निःसंकोचपणें मान्य होतें. तेव्हां, अंत:स्फूर्ति, अनहंभाव आणि प्रतिभा या तीन वाटा मनांतून श्रेष्ठ ज्ञानभूमींत प्रवेश घडविणाऱ्या आहेत. आतां चौथी वाट : अध्यात्माचें आणि विविध योगाचें महान् क्षेत्र ज्या नानाविध दिव्य अनुभूतींनीं भरलेलें आहे, त्या अनुभूतींतून ही वाट जाते. या क्षेत्रांत जागोजाग अनुभूतींचे दरवाजे उघडे झाले आहेत, त्यांच्या द्वारां आमची जाणीव सांप्रतच्या तिच्या मर्यादा उल्लंघून पार दूर जाऊं शकेल. येथें एकच अडचण आहे; 'नको तें संशोधन' या तामस वृत्तीची, 'मनाला

 

पान क्र. ५१३

 

ज्या मर्यादा आहेत, त्या ठीक आहेत' या तामस संतोषीपणाची. या वृत्तींमुळें वर उल्लेखिलेले दरवाजे आम्ही बंद करून टाकतों, त्या दरवाज्यांतून दिसूं शकणाऱ्या, दूरपर्यंत पसरलेल्या दिव्य देखाव्याला आम्ही मुकतो. असो. आम्हीं जें संशोधन चालविलें आहे, त्या संशोधनाच्या प्रसंगीं आम्हांला या वरील आध्यात्मिक आणि योगसिद्ध अनुभूतींकडे दुर्लक्ष करतां येत नाहीं; आमची जाणीव समृद्ध व उच्च करण्याची जी शक्यता, मानवी प्रयत्नाचें हें क्षेत्र आम्हांला दाखवीत आहे, जी शक्ति आम्हांला समर्पित आहे, तिचा योग्य उपयोग करणें आम्हीं आमचें कर्तव्य समजतों; मानवजातीला, मानवाला त्याच्या आत्म्यासंबंधाचें, त्याला गूढ असलेल्या मूळ, सद्वस्तुसंबंधाचें त्याच्या सामान्य ज्ञानाहून पुष्कळ अधिक ज्ञान अध्यात्मसाधना व योगसाधना देऊन चुकल्या आहेत; या ज्ञानाकडे आम्हांला कानाडोळा करतां येत नाहीं. अध्यात्मशास्त्र आणि योगशास्त्र यांचा प्रकाश, आम्हांला सामान्यत: उपलब्ध होणाऱ्या मनाच्या प्रकाशाहून फार मोठा आणि व्यापक आहे; या महान् व्यापक प्रकाशामुळें त्या शास्त्रांना आमच्यावर शासन करण्याचा अधिकार पोंचतो; हा महान् व्यापक प्रकाश ही या शास्त्रांची अंगभूत आंतरिक महाशक्ति आहे, या महाशक्तीनें त्यांचें अस्तित्व शक्तिमान् झालेलें आहे. आमच्या जाणीवयुक्त अस्तित्वाच्या ज्या श्रेष्ठ भूमिका आहेत त्यांत प्रवेश मिळवावयाचा हेतु आम्ही धरून असलों, तर तो आम्ही पूर्ण करूं शकतो; एका पाठीमागून एक करावयाचे, असे जाणिवेचे दोन व्यापार आहेत; हे व्यापार अवघड आहेत पण आमच्या आवांक्याबाहेरचे नाहींत : हे व्यापार, पहिल्या पहिल्यानें व त्यानंतर दुसरा, असें आम्हीं केल्यास श्रेष्ठ ज्ञानभूमीवर, अस्तित्वभूमीवर आमचें पाऊल पडूं शकेल. पहिला करावयाचा जाणिवेचा व्यापार म्हणजे अंतर्मुख व्यापार. आम्ही सामान्यत: वरच्या मनांत, बाह्य मनांत राहून आपलें जीवन जगत असतों; हें बाह्यमन आणि अंतर्मन, आमचा बाह्य पुरुष आणि अंत:पुरुष यांच्यामधील भिंत आम्हीं अन्तर्मुख मनोव्यापारानें पाडावी, हें आमचें पहिलें काम. हें भिंत पाडण्याचें काम हळू हळू शिस्तीचा यत्न करून साधूं शकतें; एकदम जोर करूनहि हें काम साधूं शकतें; आमची इच्छा नसतांहि कधींकधीं ही मधली भिंत तिजवर कोठूनतरी जोराचा आघात होऊन कोसळते. अंतर्मनाला बाह्य मनापासून अलग ठेवणारी भिंत, आमच्याकडून वा इतराकडून एकदम जोराचा आघात होऊन कोसळणें हें आमच्या मनाच्या जीवनाला अपाय-

 

पान क्र. ५१४

 

कारक आहे, सुरक्षितपणाचें नाहीं : मन त्याच्या सामान्य मर्यादांच्या आंत सुरक्षितपणें व्यवहार करण्यास शिकलेलें असतें -- त्याला एकदम अफाट विस्तारांत ढकलणें, म्हणजे त्याच्या सुरक्षित व्यवहाराला बाधा आणण्यासारखें होतें -- तें कसेंहि असो -- मधली भिंत सुरक्षितपणें वा असुरक्षितपणें पाडली जाऊं शकते इतकें खरें. ही भिंत पडली म्हणजे आम्हाला आमच्या अस्तित्वाचा जो अंतर्भाग, गुप्तभाग प्रकट होतो तेथें आम्हाला आमचा अंतःपुरुष भेटतो, आत्मा भेटतो; तेथें आंतलें मन असतें, आंतलें जीवन (प्राण) असतें, सूक्ष्म-भौतिक आंतलें शरीर असतें; या आत्म्याच्या व इतरांच्या शक्ती, बाह्य मन-प्राण-शरीरापेक्षां पुष्कळच अधिक आणि मोठ्या असतात; ही आंतील मंडळी बाह्य मनाहून, प्राणाहून, शरीराहून अधिक लवचिक, अधिक सामर्थ्यवान् असते; विविध ज्ञान मिळविण्याची, विविध कार्य करण्याची त्यांची पात्रता, क्षमता बाह्य मनाहून, प्राणाहून व शरीराहून पुष्कळच अधिक असते. तेव्हां बाह्य पुरुष (बाह्य मनप्राणशरीरयुक्त) आणि अंतःपुरुष (अन्तर्वर्ती सूक्ष्म मनप्राणशरीरयुक्त) मिळून आमचें अस्तित्व असतें, आणि अंत:पुरुष बाह्यपुरुषाहून सर्व साधनांनीं अधिक सामर्ध्यवान् असतो; विशेषत: विश्वपुरुषाशीं आणि त्याच्या विश्वव्यापी व्यापारांशीं या अंत:पुरुषाला आपलें प्रत्यक्ष नातें जोडतां येतें; विश्वभर काम करणाऱ्या शक्ती, विश्वव्यापीं आंदोलने, विश्वांतील सर्व पदार्थ हे आमच्या अंत:पुरुषाला प्रत्यक्ष पाहतां येतात; त्याच्या भावना संवेदना त्या गोष्टींनीं व्याप्त होतात, त्या गोष्टी त्याला हाताळतां येतात, त्यांच्यावर कांहीं प्रत्यक्ष क्रिया हा अंतःपुरुष करूं शकतो, इतकेंच नव्हे, तर त्याचे वैयक्तिक मन-प्राण-शरीर त्याला ज्या मर्यादा घालतें त्या मर्यादा उल्लंघून हा अंत:पुरुष विस्तृत, व्यापक होऊं शकतो; आपण विश्वपुरुष आहोंत असें देखील त्याला अधिकाधिक स्पष्टपणें वाटू लागतें. आमच्या अतिसंकुचित मानसिक, प्राणिक, शारीर अस्तित्वाच्या सांप्रतच्या भिंती त्या अंतःपुरुषाला कोंडू शकत नाहींत. आमचा अंतःपुरुष आपली व्याप्ति वाढवीत वाढवीत शेवटीं विश्वपुरुषाच्या, विश्वमानसाच्या जाणिवेंत पूर्णतया प्रविष्ट होतो, होऊं शकतो. विश्वजीवनाशीं पूर्ण ऐक्य पावूं शकतो; इतकेंच नव्हे, तर विश्वद्रव्याशींहि एकरूप होऊं शकतो. परंतु हें सर्व घडलें तरी विश्वगत पूर्ण सत्याशीं तो एकरूप होऊं शकतो असें नाहीं, तर तो ज्याशीं एकरूप होतो तें अपूर्ण व भंगलेले विश्वसत्य असतें, किंवा विश्वव्यापक अज्ञान असतें.

 

पान क्र. ५१५

 

पण एकदां आम्ही आमच्या अंतरंगांत विशेष साधना करून अंत:पुरुषाची गांठ घेतली, कीं आमच्या अज्ञानप्रदेशांतील मनाची पातळी ओलांडून ज्ञान प्रदेशांत जाणें आम्हाला अवघड रहात नाहीं. आमच्या जाणिवेच्या अंतर्मुख व्यापारानें आम्ही प्रथम अंत:पुरुष गांठतो व नंतर हा अंतःपुरुष ऊर्ध्वमुख वाटचालीनें उच्चतर ज्ञानभूमिकांवर आम्हाला घेऊन जाऊं शकतो. आमच्या अंत:पुरुषानें ऊर्ध्वमुख होऊन वर चढणें सुरूं केलें -- आणि मनाच्या वर असलेल्या उच्च ज्ञानभूमींत प्रवेश केला, कीं सामान्यत: तेथें त्याला प्रथम दर्शन घडतें तें कर्मातीत, अचल, शांत, महान् आत्म्याचें. आमचें खरे पायाभूत अस्तित्व, आम्ही जें कांहीं आहों, त्या सर्वाचा मूलाधार हा सर्वगत, सर्वातीत, शांत, स्थिर पुरुष आहे अशी अनुभूती आम्हाला होते, असा भाव आमचे ठिकाणीं उत्पन्न होतो. या शांत आत्म्याचे ठिकाणीं आमच्या कर्मपर आत्म्याचें विलीन होणेंहि घडून येऊं शकतें. आमची कर्मपरता, आमचें आत्मभान, सर्वकांहीं या अलक्षण, अनिर्वचनीय सद्‌वस्तुमध्यें (सत्यामध्यें) निर्वाणाला प्राप्त होऊं शकतें. आमचें व सर्वांचेंच मूळ असें आत्मतत्त्व, विश्वाच्या अस्तित्वाचें पायाभूत सत्य हा शांत व अचल पुरुष आहे अशी प्रतीति आपल्याला येते, येऊं शकते. सर्व प्रकारच्या वैयक्तिकतेचें निर्वाण भोगणें, ही आमची अंतिम स्थिति होऊं शकते; शांत, अचल, आत्मरूप सांपडल्यावर आम्ही तेथें बैठक मारून कायमचें बसणें ही गोष्ट शक्य आहे; विश्वव्यवहार वरवरचा खेळ आहे, भ्रमात्मक व्यापार आहे -- मूळच्या शांत आत्म्यावर हा व्यापार आरोपित केलेला आहे, लादलेला आहे, अशी समजूत करून घेऊन, विश्वातीत अशी अचल, अव्यय व एकप्रकारची सर्वश्रेष्ठ अवस्था, शांत आत्मस्थिति, आम्ही आमच्या अस्तित्वाला आणून देऊं शकतो. श्रेष्ठ ज्ञानभूमीचा हा एक प्रकारचा अनुभव आमच्या अंत:पुरुषाच्या ऊर्ध्वगामी प्रयत्नानें आम्हांला मिळतो. दुसरा याहून वेगळा भावात्मक व क्रियात्मक अनुभवहि आम्हाला मिळूं शकतो. आमचा शांत आत्मा आम्हांला प्राप्त होऊन, त्याची अचल शांति आम्ही अनुभवीत असतां, वरून महान् प्रकाश, ज्ञान, सामर्थ्य, आनंद या व आणखी दुसऱ्या असामान्य शक्तींचा जोरदार, अधोमुख प्रवाह आमच्या शांत आत्मक्षेत्रांत पडत असतो; तसेंच आम्ही शांत आत्मस्थितींतून वर चढून जाऊं शकतो; चैतन्याच्या उच्चतर क्षेत्रांत चढूं शकतो; जेथें वर उल्लेखिलेल्या महान् प्रकाशमय शक्ती, शांत आत्मस्थितीच्या मूलाधारावर

 

पान क्र. ५१६

 

आपलें महान् कार्य करीत असतात. शांत आत्मा असो किंवा त्यावरचा क्रियाशील आत्मा असो -- दोन्ही ज्ञानभूमी, आध्यात्मिक श्रेष्ठ भूमी आहेत -- आणि अज्ञानबद्ध मनांतून, आपण प्रथम अंतर्मुख साधना आणि नंतर आपल्या अंतःपुरुषाची ऊर्ध्वमुख साधना या क्रमवार साधनाबळानें, दोनहि ज्ञानमय आध्यात्मिक भूमींवर जाऊं शकतों, इतकें ठरलें. क्रियाशील ज्ञानभूमीवर मूळ जाणीवशक्तीचा महान् चैतन्यव्यापार संघटित व असंघटित अशा दोन अवस्थांत चालूं असतो; या व्यापाराच्या संघटित अवस्थेंत ज्ञानमय, अध्यात्मसंपन्न, सद्‌वस्तु ओळखणारें, सद्‌वस्तुसंबंधींची नेणीव नष्ट झालेलें असें मन कार्य करीत असतांना आढळतें; हें मन कांहीं विज्ञानाच्या पातळीवरलें मन असत नाहीं, पण तेथील सत्यज्ञानांतून उदयास आलेलें आणि तेथील तेजोमय ज्ञान थोडेंबहुत जवळ आणलेलें अशा प्रकारचें मन असतें; मन असतें असें म्हणण्यापेक्षां मनांची रांग, शिडी, श्रेणी असते असें म्हणणें, अधिक सत्यास धरून होईल.

आमच्या मनांतून आम्हीं अतिमानसांत, विज्ञानांत जावयाचें, तर आमचें अज्ञानबद्ध मन आणि विज्ञान यांच्यामध्यें मोठी खिंड असल्यानें ही खिंड भरून काढणारी शिडी, ज्ञानाची -- ज्ञानमय मनाची -- शिडी आम्हांला हवी होती, ती मनाच्या वरील रांगेमध्यें आम्हांला मिळते. येथें चढणीवर अनेक टप्पे आहेत; यामुळें ही चढण सोईनें, हळू हळू चढून जाऊन शेवटीं विज्ञानांत पाऊल टाकतां येतें; प्रत्येक वरचा टप्पा खालच्यापेक्षां अधिक खोल, अधिक व्यापक ज्ञान व सामर्थ्य देणारा असतो; अर्थात् हें सर्व ज्ञान व सामर्थ्य वरून येत असतें. हे टप्पे सच्चिदानंदाला विज्ञानांतून क्रमश: खालीं उतरून, आमच्या मूळ अज्ञानमय मनांत येण्याला, तसेंच विकास-क्रमांत, खालून आमच्या कोठीबंद (शरीर-प्राणाच्या कोठींत बंद असलेल्या) मनांतून वर विज्ञानांत चढण्याला उपयोगी पडतात. आमच्या मनाच्या वर उच्चमन, नंतर प्रकाशित किंवा प्रकाशमय मन, नंतर खरी अंतःस्फूर्ति किंवा स्फूर्तिमय मन, नंतर अधिमानस अशा चार पायऱ्यांनी आम्ही अतिमानसाला पोंचतों. आम्ही आमच्या मनांतून वर उच्च मनाकडे (Higher Mind) चढू लागलों म्हणजे या उच्च मनांतून आमच्यावर जणुं स्वयंभू ज्ञानाचा सागर वर्षाकाळच्या मेघासारखा ज्ञानाचा पाऊस पाडूं लागतो; या ज्ञानाला विचाराचें रूप येतें -- विचाराचें रूप हें ज्ञान घेतें -- पण आम्हाला परिचित असलेली विकासाची प्रक्रिया येथें असत नाहीं. येथें सत्याच्या शोधाची भानगड

 

पान क्र. ५१७

 

नाहीं; बौद्धिक रचना करण्याचा त्रास नाहीं; कल्पना श्रमवावी लागत नाहीं, शोधाची कठीण प्रक्रियाच नाहीं; स्वयंसिद्ध, स्वयंचालित ज्ञान, उच्च मनांत ज्याचें भांडार असतें, तें ज्ञान आमच्यावर पावसासारखें वर्षत असतें : उच्चमन सत्य सांठवून असतें; दडलेलें, दडवलेलें सत्य शोधीत बसण्याचें काम उच्च मनास करावें लागत नाहीं. उच्च मनांतील सत्यगर्भ विचार हा एका दृष्टिक्षेपांत ज्ञानाचा डोंगर जणुं हाताळू शकतो; त्याचें स्वरूप विश्वव्यापी असतें, व्यक्तिगत विचाराचा शिक्का त्याच्यावर मुळींच आढळत नाहीं. या उच्च मनाच्या पलीकडे प्रकाशित मन (Illumined Mind) आपलें कार्य करीत असतें. -- येथे उच्च मनाच्या सत्य-विचाराच्या ऐवजीं, सत्य-दर्शनाचा प्रकाश असतो; सत्य-दर्शनांतून मग त्याची एक गौण क्रिया म्हणून सत्य-विचार उभा राहूं शकतो. प्रकाशित मनांत विजेच्या किंवा विजांच्या झगमगाटासारखे महान् प्रकाशझोत सारखे हेलावत असतात; उच्च मनांतील प्रकाश हा स्थिर सूर्यप्रकाशासारखा असतो. प्रकाशित मनांतील तेज जसें उच्च मनाहून पुष्कळ अधिक असतें, तशी त्या श्रेष्ठ तेजाची क्रियाशक्तीहि अधिक असते; त्याची तीव्रता आणि सामर्थ्यहि अधिक असतें. प्रकाशित मनाच्या वर खरी अंत:स्फूर्ति (Intuition) असते. येथें सत्य-शक्ति प्रकाशित मनाहून अधिक क्रियाशील व अधिक सामर्थ्यवान् असते; येथें सत्य-दर्शन अगदीं पूर्ण आणि अचूक असतें; सत्य-विचार, सत्य-संवेदना, सत्य-भावना, सत्य-व्यापार या सर्व गोष्टी अंत:स्फूर्तिमय मनांत अगदीं अचूक आणि अंत:स्पर्शी असतात. बुद्धीहून वरच्या प्रकारचें प्रत्यक्ष ज्ञानाचें कोणतेंहि आंतरिक साधन 'अंत:स्फूर्ति' या नांवानें सामान्यत: ओळखले जातें. पण खरी अंत:स्फूर्ति आतां वर्णन केल्याप्रमाणें स्वयंभू ज्ञानाची एक खास क्रिया-प्रक्रिया आहे. आमच्या मनांत होणाऱ्या स्फुरणांना या खऱ्या अंत:स्फूर्तीपासूनच त्यांचें विशेष स्वरूप प्राप्त होतें; या अंत:स्फूर्तीला जो सत्य-प्रकाश कायमचा उपलब्ध असतो; त्या प्रकाशाशीं प्रत्यक्ष नातें आमच्या मनाला अर्थातच जोडतां येत नाहीं; या खऱ्या अंत:स्फूर्तीच्या द्वारांच आमचें मन त्या प्रकाशाशीं जोडलें जाऊं शकतें. या खऱ्या अंत:स्फूर्तीच्या उगमस्थानीं अधिमानस (Overmind) असतें. अधिमानसाचें थोडक्यात वर्णन करावयाचे तर तें ज्ञानमय विश्वमन आमच्या मानसिक जाणिवेच्या पलीकडे असलेलें, अतिमानसिक सत्यज्ञानाशीं प्रत्यक्ष संपर्क ठेवणारें असें श्रेष्ठ जाणिवेचें विश्वमन असतें. या विश्वमनाच्या खालीं होणाऱ्या

 

पान क्र. ५१८

 

सर्व हालचाली हें विश्वमन ठरवितें, चालवितें; त्या सर्व हालचालींचें मूळ-संयोजक हें विश्वमन आहे. सर्व मानसिक शक्तींच्या व्यापारांचें मूळहि या विश्वमनांत आहे; ज्ञान आणि अज्ञान या जोडीनें व्यापलेला, ब्रह्मांडाचा खालचा गोलार्ध, या विश्वमनाच्या पंखाखालीं जणुं सुव्यवस्थितपणें काम करीत आहे; या गोलार्धाची निर्मिति बहुतांशीं याचेंच कार्य आहे; अतिमानसिक सत्यज्ञानाशीं या गोलार्धाचा संबंध जोडण्याचें काम या मनाकडे आहे; हें काम तें करतें; तथापि स्वतःच्या तेजानें हें विश्वमन अतिमानसाचें सत्य-ज्ञान आम्हांपासून लपवितें -- आपल्या प्रकाशाचें, 'हिरण्य'समान तेजोमय झांकण त्यावर टाकून लपवितें; आपल्या अनंत शक्यतांचा महापूर, अतिमानस आणि खालचा गोलार्ध यांच्यामध्यें, विश्वमन वाहवितें -- हा महापूर एका दृष्टीनें आम्हां खालच्या गोलार्धांतल्या जीवांना अडचणीसारखा, तर दुसऱ्या दृष्टीनें अतिमानसांत प्रवेश देऊं शकणाऱ्या, सोईच्या मार्गासारखा असतो -- आमच्या अस्तित्वाचा आध्यात्मिक व्यवहारनियम शोधून काढणें, त्याचें श्रेष्ठांत श्रेष्ठ प्राप्तव्य, त्याचें गूढ सत्य शोधून काढणें व आत्मसात् करणें हें जें आमचें कर्तव्य, तें नीटपणें पार पाडण्याच्या कामांत विश्वमनाच्या अनंत शक्यतांचा महापूर मदतहि करतो आणि अडचणहि करतो -- या महापुरांतून पुढची वाट असल्यानें तो आमचा मदतगार आहे; हा महापूर आपल्या झगमगाटानें आम्हांला मोह पाडून स्वतःच्या क्षेत्रांत थांबवूं शकतो, म्हणून तो आम्हांला अडचणीसारखा आहे. असो. तेव्हां हें अधिमानस ही वस्तु, विज्ञानाशीं आमचें अज्ञानक्षेत्र जोडून देणारी महाशक्ति आहे -- याच गूढ दुव्याच्या शोधांत आम्ही होतो. हा दुवा म्हणजे श्रेष्ठांत श्रेष्ठ ज्ञान आणि विश्वव्यापक अज्ञान या दोन वस्तूंना एकाचवेळीं जोडणारी आणि तोडणारी अशी महाशक्ति आहे.

अज्ञानाकडे येणारा विज्ञानाचा प्रतिनिधि, हें अधिमानसाचें स्वरूप आहे : अधिमानसाचा स्वभावधर्म आणि कायदा हा त्याला हें प्रतिनिधीचें स्वरूप देणारा आहे; अज्ञानावर विज्ञान जी उद्धारक क्रिया करूं इच्छितें, ती क्रिया त्यानें प्रत्यक्षपणें करणें अवघड असतें -- कारण विज्ञानाचा श्रेष्ठ प्रकाश प्रत्यक्षपणें अज्ञानावर कार्य करूं लागला, तर तो प्रकाश वा त्याचा संपर्क सहन करण्याचें सामर्थ्य अज्ञानांत नसतें; तेव्हां अप्रत्यक्षपणें, एकाद्या पडद्याआडून, विज्ञानाला अज्ञानावर कार्य करणें भाग पडतें -- हा पडदा अधिमानस होय. आमच्या अज्ञानाला संभाळण्याचें व सुधारण्याचें

 

पान क्र. ५१९

 

अशीं दोन्हीं कामें हा पडदा करतो -- कारण त्याच्याद्वारां विज्ञानाचें सुधारक - उद्धारक कार्य अज्ञानावर घडत असतें आणि हें कार्य अज्ञानाला झेपेल अशा सावकाशीच्या क्रमानें घडत असतें. या पडद्यांत अतिमानसाशीं साम्य आणि वैषम्य हे दोन्ही गुण आहेत. म्हणून याला अतिमानसाची संरक्षक प्रत -- दुसरी प्रतिमा म्हणतां येईल. प्रत म्हणण्याचें कारण अधिमानस अतिमानसाचेंच काम करतें; संरक्षक म्हणण्याचें कारण अज्ञानावर एकदम तेजाचा विध्वंसक बोझा न आणतां, त्याला संभाळून संभाळून, ज्ञानाची दीक्षा देण्याचें काम तें करतें. अज्ञान आणि अचेतना हीं क्षेत्रें शक्य होण्याचें कारणहि अधिमानस आहे. अतिमानस हें अत्यंत देदीप्यमान प्रकाशाचें माहेरघर -- यानें प्रथम आपणांतून स्वतःपेक्षां कमी देदीप्यमान असा बेताचा प्रकाश असणारें अधिमानस पुढें केलें, तेव्हा नंतर त्यांतून ज्ञान, आणखी कमी व विखुरलेल्या प्रकाशाचें अज्ञान आणि नंतर सर्व प्रकाश गिळून टाकणारी छाया किंवा अचेतनता हीं क्षेत्रें शक्य झालीं. विज्ञान आपल्या सर्व वास्तव गोष्टी अधिमानसाच्या हवालीं करतें, पण त्या गोष्टींचें संचलन कसें करावयाचें, त्या संचलनापाठीमागें कोणती जाणीव ठेवावयाची तें त्याच्याकडून अधिमानसावर सोंपविलें जातें -- अधिमानस हें काम करतांना सत्याचें दर्शन न सोडतां, अज्ञानाला जन्म देण्यात अग्रेसर होतें. अतिमानस (विज्ञान) आणि अधिमानस या दोहोंना विभागणारी एक सीमारेषा आहे; या सीमारेषेचें तन्त्र असें आहे कीं, वरच्या (विज्ञानाच्या) शक्तीच्या नजरेस दिसणारें किंवा स्वाधीन असणारें सर्व कांहीं खालच्या (अधिमानसाच्या) शक्तीच्या हातीं येऊं शकतें; कांहींहि अडथळा न होतां अधिमानस तें सर्व आपल्या हातीं घेऊं शकतें; परंतु ही स्थानांतराची, सत्तान्तराची व्यवस्था होत असतां, एक महत्त्वाचा बदल अटळपणें घडवून आणला जातो : अतिमानस समग्रेतेनें काम करणारें असतें; वस्तुजाताचें मूळ सत्य, समग्र सत्य आणि त्यानेंच उदयास आणलेल्या वैयक्तिक आत्मनिर्णयांचें सत्य पूर्णपणें आणि स्पष्टपणें, एकत्र एकमेकांत गुंफून, नित्य तसें गुंफलेलें ठेवण्यांत तें हयगय करीत नाहीं; या दोन सत्यांच्या व्यवहारांत अतिमानस अभेद्य ऐक्य ठेवतें, दोन्हीं सत्यें एकमेकांत अगदीं पूर्णपणें मिसळून असतात; दोन्हीं सत्यें एकमेकांची पूर्ण जाणीव स्वयंस्फूर्तीनें ठेवीत असतात : याच्या उलट अधिमानसांत समग्रतेला, समग्र सत्याला, मूळ सत्याच्या अधिकाराला फांटा दिला जातो. हें मधल्या सीमारेषेचें तंत्र आहे : या रेषेच्या एका अंगाला

 

पान क्र. ५२०

 

समग्र सत्याचा नित्य व्यवहार व दुसऱ्या अंगाला अ-समग्र सत्यांचा स्वतंत्र व्यवहार. अधिमानसाला समग्र सत्य, मूळ सत्य पूर्णपणें सदैव परिचयाचें असतें; वैयक्तिक सत्यांचा तें उपयोग करतें, पण त्यांनीं तें स्वत: बांधलें जात नाहीं, मर्यादित होत नाहीं; वैयक्तिक स्वयंनिर्णय एकसत्याचीं अंगें आहेत ही गोष्ट अधिमानस जाणतें, त्याच्या आध्यात्मिक दृष्टीला ही एकता स्पष्ट दिसते -- पण तें कार्याचा जो पसारा घालतें, तो सुरक्षित चालण्यासाठीं जरी एकतेची आठवण तें ठेवीत असतें, तरी हा पसारा, हा आंदोलनाचा व्याप एकतेच्या आश्रयानें तें करीत नाहीं. जें एकच एक परम सत्य (सच्चिदानंद) सर्व कांहीं सामावून घेणारें, अविभाज्य आणि सामग्र्यानें राहणारें आहे, त्याच्या अनेक शक्ती आहेत, त्याचीं अनेक अंगें आहेत; हीं अनेक अंगें, या अनेक शक्ती वेगळ्या वेगळ्या करणें, त्या वेगळ्या केलेल्या शक्ती एकत्र जोडणें -- हें जोडण्यातोडण्याचें काम करण्याची अमर्याद शक्ति अधिमानसाचे ठिकाणीं असते. या शक्तीचा वापर करून अधिमानस आपला पसारा अस्तित्वांत आणतें : मूळ सत्याचें एक अंग किंवा शक्ति घेऊन, अधिमानस त्या अंगाला किंवा शक्तीला स्वतंत्र कार्य देतें; या कार्यांत अर्थातच या अंगाला किंवा शक्तीला स्वतःचें स्वतंत्र महत्त्व पूर्णतया प्राप्त होतें, आणि या स्वतंत्र महत्त्वाच्या व अधिकाराच्या बळावर, ही शक्ति किंवा हें अंग आपलें स्वतःचें जग निर्माण करूं शकतें. उदाहरणार्थ, पुरुष आणि प्रकृति (ज्ञानमय आत्मा आणि प्राकृतिक कार्यशक्ति) विज्ञानाच्या क्षेत्रांत, एका सत्याचीं दोन अंगें म्हणून सुसंवादित्वानें राहतात; पुरुष किंवा ज्ञानमय आत्मा हें सद्वस्तूचें अस्तित्वरूप अंग आहे; आणि प्रकृति किंवा प्राकृतिक कार्यशक्ति ही त्या सद्वस्तूचीं क्रियारूप बाजू आहे -- या दोन बाजूंत किंवा अंगांत समतोलाचा अभाव, एकानें अधिक सत्ता घेऊन, दुसऱ्यावर हुकमत चालवावी अशी गोष्ट विज्ञानाच्या क्षेत्रांत घडत नाहीं. अधिमानसाच्या क्षेत्रांत हीं दोन अंगें, एका सद्वस्तूचीं अंगें न राहतां, स्वतंत्र वस्तू होतात; सांख्यांचें तत्त्वज्ञान हें अशा अधिमानसी व्यवहाराचें दर्शन आहे. प्रकृति पुरुषावर मात करूं शकते, त्याचें स्वातंत्र्य, त्याचें सामर्थ्य आपल्या प्रभावानें, असून नसल्यासारखें करूं शकतें, दडपून दडवून टाकूं शकते; त्यानें केवळ बघणाराचें, साक्षीचें, द्रष्ट्याचें काम करावे, ती (प्रकृति) काय रूपें घेईल, काय करणी करील, त्या रूपांचें, त्या करणीचें त्यानें स्वागत करावें आणि स्वस्थ रहावें, अशी घटना प्रकृति घडविते. उलटपक्षीं पुरुष आपल्या

 

पान क्र. ५२१

 

साधनेनें आपलें स्वतंत्र अस्तित्व परत मिळवूं शकतो; प्रकृतीनें आपल्या ज्या मूळ भौतिक तत्त्वाच्या सामर्थ्यानें पुरुषावर मात करून, त्याचें सामर्थ्य झांकून दडपून टाकलेलें असतें, त्या भौतिक तत्त्वाचा परित्याग करून, पुरुष आपलें स्वतंत्र आत्मराज्य, सार्वभौम आत्मराज्य परत मिळवितो आणि या सार्वभौम आत्मराज्याचा उपभोग सर्वकाळ घेऊं शकतो. याप्रमाणें प्रकृति-पुरुष या जोडीचा विज्ञान क्षेत्रांतील आणि अधिमानस क्षेत्रांतील अन्योन्यसंबंध अगदीं निरनिराळा आहे. दिव्य सत्याच्या, मूळ सद्वस्तूच्या, अनेक दुसऱ्या अंगभूत शक्तींसंबंधानें हीच गोष्ट दिसून येते. एकत्व आणि अनेकत्व, दिव्य व्यक्तित्व आणि दिव्य व्यक्तित्वशून्यता (तत्त्वमयत्व वा भावमयत्व) अशा सद्वस्तूच्या अनेक अन्योन्यपूरक अंगांच्या जोड्या अधिमानस फोडून टाकतें आणि प्रत्येक अंगाला स्वतंत्र वस्तु म्हणून कार्य करण्यास वाव देतें; मग प्रत्येक अंग, आपलें स्वतंत्र वेगळें अस्तित्व कामास लावून, त्यांत अंतर्भूत असलेल्या शक्यता वास्तवांत आणतें, आणि वेगळेपणाचे क्रियात्मक सर्व परिणाम अधिमानसी संसारांत उभें करतें. एवढें मात्र खरें कीं, अधिमानस क्षेत्रांतील सद्वस्तूच्या स्वतंत्र बनविलेल्या अंगांचा वेगळा संसार मूळ एकतेच्या पायावर, अप्रकटपणें कां होईना पण निश्चितपणें उभारलेला असतो. अधिमानसाला सर्व वस्तूंच्या मूळ एकतेची स्मृति नित्य असते; आणि म्हणून एका मूळ सद्वस्तूच्या, विविध शक्ती आणि अंगें स्वतंत्रपणें कामास लावलीं गेलीं, तरी एक विशिष्ट नातें कोणाहि दोन अंगांमध्यें किंवा शक्तींमध्यें कायमचें उभें केलें जात नाहीं -- अनेक प्रकारें शक्तींना व अंगांना एकत्र आणलें जातें, स्वतंत्र केलें जातें; त्यांच्या शक्तीचा परस्पर विनिमय मोकळेपणानें घडेल अशी व्यवस्था असते, त्यांचे अन्योन्यसंबंध जेवढे संभवनीय असतील, तेवढे सर्व केव्हांहि वास्तवांत येण्याची व्यवस्था असते.

मूळ सद्वस्तूच्या, सत्याच्या, सच्चिदानंदाच्या शक्तींना आपण देवता मानावयाचें ठरविलें, तर असें म्हणतां येईल कीं, अधिमानस लाखों देवता कामाला लावतें; प्रत्येकीनें आपापलें विश्व बनवावें आणि अशा सर्व विश्वांचा एकमेकांशीं संबंध रहावा, दळणवळण रहावें अशी योजना करतें. वेदांमध्यें देवतांच्या स्वभावासंबंधानें, स्वरूपासंबंधानें वेगवेगळीं सूत्रें आहेत, वेगवेगळीं वर्णनें आहेत : अस्तित्व, मूळ वस्तु, मूळ देव एकच आहे, या एका सत्याला ऋषी अनेक नांवें देतात, म्हणून अनेक देव आहेत असा समज होतो -- असें वेदांत एका ठिकाणीं म्हटलें आहे. तथापि दुसऱ्या

 

पान क्र. ५२२

 

प्रकारचींहि वर्णनें आहेत : प्रत्येक देवता अथवा देव म्हणजे मूळ सत्य आहे अशा भावनेनें प्रत्येक देवाची पूजा केली जाते, सर्व देव मिळून हा देव आहे, सर्व देव या देवाच्या रूपांत अंतर्भूत आहेत, असें प्रत्येक देवासंबंधानें म्हटलें जातें; प्रत्येक देव स्वतंत्र आहे, तो आपल्या साथी-देवांबरोबर केव्हां मेळानें काम करतो, केव्हां स्वतंत्र काम करतो, केव्हां इतर देवांच्या विरूद्ध दिसेल असें काम करतो; असेंहि वर्णन सांपडतें. विज्ञानाच्या क्षेत्रांत एका सद्‌वस्तूच्या या सर्व शक्ती एकमेकींशीं सुसंवादी राहून आपला व्यवहार करतात, एका सद्‌वस्तूचीच विविधरूपाची लीला असें स्वरूप या शक्तींच्या व्यवहाराला असतें. वर जे देवांच्या व्यवहाराचें प्रकार सांगितले -- १) प्रत्येक देवानें स्वतंत्र व्यवहार करणें २) इतर देवांशीं सहकार्य करणें ३) इतर देवांना विरोध करणें -- यांपैकीं प्रत्येक व्यवहारप्रकाराला अधिमानसक्षेत्रांत पूर्ण वाव मिळतो -- त्या देवांची पायाभूत एकता जणुं विसरल्यासारखी होते आणि प्रत्येक व्यवहार-प्रकाराचे सर्व परिणाम पूर्ण आकाराला येतात. मात्र हें सर्व व्यवहार-प्रकार एकमेकांशीं मिळून जाऊं शकतात आणि अशा मेळानें एक प्रकारची मिश्र तालबद्धता देव-व्यवहारांत निर्माण होते. सच्चिदानंदाच्या अस्तित्व, जाणीवशक्ति (जाणीव आणि शक्ति) व आनंद अशा तीन अविभाज्य अंशांपैकीं विश्वाच्या मुळाशीं जें अस्तित्व आहे, त्या एका अस्तित्वाचे अधिमानसक्षेत्रांत नाना प्रकार (देव) कसे बनतात वगैरे वर्णन आतांपर्यंत केलें. आतां जाणीव आणि शक्ति यांच्या संबंधानें काय होतें तें पाहूं. एक जाणीव फोडून तिचे स्वतंत्र असे जाणिवेचे आणि ज्ञानाचे अनेक आकार-प्रकार केले जातात. प्रत्येक स्वतंत्र जाणीव व स्वतंत्र ज्ञान आपल्यांत अंतर्भूत असलेलें सत्य, आपल्या विशिष्ट मार्गानें आकारास आणतें. अनेकांगीं असलेली एक सत्य-कल्पना फोडून, प्रत्येक अंग वेगळें वेगळें केलें जातें, प्रत्येक अंग स्वतंत्र कल्पना-सामर्थ्य बनून, आपलें अंतर्भूत अंतर्हित स्वरूप वास्तवांत आणतें. एकच जाणीव-शक्ति अनंत जाणीव-शक्तींच्या रूपांनीं दिसूं लागते; या अनंत रूपांपैकीं प्रत्येक शक्तिरूपाला आपलें अंतर्गत सत्य वास्तवांत आणण्याचा अधिकार असतो -- केव्हां केव्हां इतर सर्वांच्या वरतीं अधिकाराची जागा घेऊन, त्या इतर सर्वांचा आपल्या कार्यासाठीं उपयोग करून घेण्याचाहि हक्क असतो व हा हक्क वास्तवांत बजावला जातो : जी गोष्ट एका अस्तित्वाची, एका जाणीवेची, तीच गोष्ट एका अविभाज्य आनंदाची. अस्तित्वाचा एकरूप आनंद फोडून

 

पान क्र. ५२३

 

नानाप्रकारचे आनंद अधिमानसांत आकारास येतात आणि त्यांपैकीं प्रत्येक आनंद स्वतंत्रपणें आपलें उच्चतम वा आत्यंतिक स्वरूप प्राप्त करून घेण्यास मोकळा असतो. या प्रमाणें अधिमानसाच्या समोर एकमेव सत्-चित्-आनंद आलें, कीं या एकाचे अनंत प्रकार होतात, तेथें अनंत संभव निर्माण होतात आणि प्रत्येक प्रकारांतून, प्रत्येक संभवांतून स्वतंत्र विश्व निर्माण होऊं शकतें -- अर्थात् अनंत विश्वें अधिमानस उभीं करूं शकतें, किंवा सर्व संभवांचें एकीकरण करून एक महान् विश्व उभें करूं शकतें -- या महान् एकीभूत विश्वांत संभवांचा हा विविध खेळ अनंत प्रकारें विश्वांतर्गत रचना करतो, तेथील व्यवहार-पद्धती, तेथील कार्यक्रम आणि तेथील अखेरचें दृश्य अनंत प्रकारें ठरवूं शकतो.

विश्वनिर्माणाचें कार्य शाश्वत सद्वस्तूच्या जाणीवशक्तीचें असल्यानें, विशिष्ट विश्वाचा स्वभावधर्म हा त्या विश्वांत जाणिवेनें आपला जो स्वयंरचित प्रकार व्यक्त केला असेल, आकारास आणला असेल त्या जाणीवप्रकारावर अवलंबून राहील. त्याचप्रमाणें प्रत्येक व्यक्तींत ही जाणीव ज्याप्रकारचें रूप धारण करून असेल, त्या आकारांत वा अवस्थेंत असेल त्या रूपावर, आकारावर वा अवस्थेवर त्या व्यक्तीचीम, ती रहात असलेल्या विश्वाकडे बघण्याची दृष्टि अवलंबून राहील. आमचें मानवी मन (मानसिक जाणीव) जेव्हां विश्वाकडे बघतें तेव्हां बुद्धि आणि संवेदना यांनीं पाडलेल्या विभागांचें विश्व बनलें आहे असें त्याला दिसतें; हे विभाग एकत्र करून, कांहीं रचना केलेली आमच्या मनाला दिसते; पण या रचनेंतहि विभागणीचें तत्त्व अंतर्भूत असतें; जें घर हें मन आपल्या दृष्टीनें उभें करतें त्यांत त्याच्या योग्यतेनुसार सत्याचा एकादा दुसरा, सामान्य स्वरूपाचा प्रकार राहूं शकतो; सत्याचे बाकीचे सर्व प्रकार घराच्या बाहेर ठेवले जातात किंवा त्यांतील कांहींना पाहुणे म्हणून किंवा घर-मालकावर अवलंबून असलेले घरांतील इतरेजन या नात्यानें घरांत जागा दिली जाते. याच्या उलट, अधिमानसिक जाणिवेला सर्व समावेशक, व्यापक शक्ति आहे; दिसायला मूलभूत असे अनेक भेद समन्वयी दृष्टीनें एकत्र वागविण्याची शक्ति अधिमानसिक जाणिवेला स्वभावत:च असते. आमची बुद्धि (मानसिक बुद्धि) व्यक्ति आणि तत्त्व यांत विरोध मानते, तत्त्वमय अस्तित्व हें मूळ अस्तित्व आहे आणि व्यक्ति वा व्यक्तित्व या, त्या तत्त्वावर आरोपिलेल्या, अल्पकाल टिकणाऱ्या, अज्ञानाच्या भ्रमात्मक रचना आहेत, असा सिद्धांत ही

 

पान क्र. ५२४

 

बुद्धि करते; किंवा याच्या उलट असाहि सिद्धांत ती मांडूं शकते कीं, व्यक्ति (पुरुष) हीच मूळ सद्वस्तु आहे आणि जें तत्त्व दिसतें, तें मनानें रचलेला भाव किंवा कल्पना आहे, तत्त्व हें पुरुषाचें व्यक्त होण्याचें साधन आहे. अधिमानसिक बुद्धि ही तत्त्व आणि व्यक्ति या दोन वस्तू एका अस्तित्वाच्या, सद्वस्तूच्या, वेगळेपणानें वावरण्यासारख्या दोन शक्ती आहेत असा सिद्धांत करते; तत्त्व आपल्या परीनें, व्यक्तित्व आपल्यापरीनें आपलें अंतरंग व्यक्त करून आपला आपला संसार स्वतंत्रपणें थाटूं, शकतें, त्याचप्रमाणें या दोन वस्तू आपल्या भिन्न कार्यपद्धती एकीकृत करूं शकतात, एकमेकीला जोडूं शकतात; त्यांचा संसार स्वतंत्र असो वा सामयिक असो, त्यांत जाणिवेच्या आणि अस्तित्वाच्या ज्या भिन्न भिन्न अवस्था अंतर्भूत होतात, त्या सर्व अवस्था सत्य, सत्यमय व न्यायसंगत असूं शकतात आणि त्या सर्व एकाच वेळीं अस्तित्वांत राहूं शकतात, सहजीवन जगूं शकतात. केवळ तात्त्विक व्यक्तिशून्य अस्तित्व आणि जाणीव ही कांहीं केवळ कल्पना नाहीं -- वास्तव गोष्ट आहे आणि असूं शकते; पण त्याबरोबरच पूर्णतया व्यक्तिगत जाणीव आणि अस्तित्व हीहि गोष्ट वास्तव आहे आणि असूं शकते; व्यक्तिशून्य तत्त्वरूप ईश्वर (निर्गुण ब्रह्म) आणि व्यक्तिरूप ईश्वर (सगुण ब्रह्म) हीं, एका नित्य सद्वस्तूचीं दोन समान, सह-अस्तित्वच असलेलीं अंगें आहेत. ब्रह्म एकाच वेळीं सगुण आणि निर्गुण असून त्याचें निर्गुणत्व व सगुणत्व सारख्याच दर्जाचें आहे. तात्त्विक निर्गुण ब्रह्म आविष्कृत होतांना, सगुण ब्रह्म, त्याच्या आविष्काराचा एक प्रकार म्हणून निर्गुणाच्या खालच्या पायरीचें होऊ शकतें; तसेंच व्यक्तिरूप ब्रह्म हें मूळ सत्य आणि निर्गुणत्व म्हणजे त्याच्या स्वभावाचा एक आविष्कार अशीहि व्यवस्था असूं शकते; जाणीवयुक्त मूळ अस्तित्व, सद्‌वस्तु ज्या अनंत प्रकारांचीं व्यक्त होतें, जें अनंत प्रकारचें विविध अस्तित्व मूळ अस्तित्वांतून व्यक्त झालें आहे, त्या व्यक्त पसाऱ्यांत वर सांगितलेलें दोनहि आविष्कार-प्रकार आहेत आणि ते एकमेकांच्या समोर वावरत आहेत. मानसिक बुद्धीला जे भेद समन्वय करण्यास अशक्य वाटतात, तेच अधिमानसिक बुद्धीला सह-अस्तित्वाला पात्र व समर्थ असे अन्योन्यसंबंधीं अन्योन्य-उपकारक व्यवहार व व्यवहारविषय वाटतात; मानसिक बुद्धीला ज्या गोष्टी अन्योन्यविरोधी दिसतात, त्या अधिमानसिक बुद्धीला अन्योन्यपूरक दिसतात. आमचें मन विश्वाकडे पाहून, काय निर्णय घेत असतें, तें आपल्याला ठाऊक

 

पान क्र. ५२५

 

आहे : सर्व वस्तुजाताला जडद्रव्य किंवा जडशक्ति जन्म देते, त्यांना अस्तित्वांत टिकविते, शेवटीं वस्तुजाताचा लय जडद्रव्य किंवा शक्ति यांतच होतो -- म्हणून जडतत्त्व (अन्न) हें शाश्वत तत्त्व आहे, मूळ सत्य आणि अंतिम सत्य किंवा ब्रह्म हें जडतत्त्वच (अन्न) आहे, हा एक निर्णय आमचें मन घेतें -- तसेंच त्याचे दुसरे निर्णय हे, प्राण, मन, विज्ञान, आनंद (आनंदरूप चैतन्य) या वस्तू अलग अलग स्वतंत्रपणें सर्व वस्तुजाताला जन्म देणाऱ्या, अस्तित्वांत टिकविणाऱ्या आणि शेवटीं पोटांत घेऊन नष्ट करणाऱ्या आहेत, असे मानणारे आहेत -- या प्रत्येकाला स्वतंत्रपणें ब्रह्म ही संज्ञा मनानें दिलेली आहे. मनाची दृष्टि सामग्र्यानें बघणारी नसून, विभागणारी व विभागनिष्ठ अशी असते; म्हणून अन्न, प्राण, मन, विज्ञान व आनंद यांपैकीं जेव्हां एकाला मन ब्रह्म ठरवितें, तेव्हां तें इतर तत्त्वांना ब्रह्मबाह्य ठरवितें. अधिमानस सामग्र्यानें बघू शकतें; सामग्र्य बुद्धीसमोर ठेवून तें प्रत्येक अंगाला, स्वतंत्रपणें आपलें विश्व उभारण्याची प्रेरणा देतें -- म्हणून अन्न, प्राण, मन, विज्ञान व आनंद यांपैकीं प्रत्येकाचें स्वतंत्र जग आहे, या स्वतंत्र जगांत तें तें तत्त्व प्रधानत्वानें व्यवहार करणारें असतें; पण हीं सर्व तत्त्वें मिळून एक विश्व निर्माण करतात; हीं सर्व तत्त्वें, या एका विश्वाचे, सहकारी समान घटक बनतात, हीहि गोष्ट खरी आहे, असा अधिमानसाचा सिद्धान्त आहे. सर्व विश्वांची जननी जी मूळ सद्वस्तूची जाणीव-शक्ति, त्या शक्तीचें जें स्व-रूप आमचें जग निर्माण करण्यांत अधिमानसानें उपयोगांत  आणलें आहे, त्यांत आमच्या विश्वाचा पाया दर्शनी अचेतनता हा आहे; या अचेतनांत सर्वोच्च जाणीवयुक्त सद्‌रूप लपलेलें आहे; अस्तित्वाच्या सर्व शक्ती लपलेल्या आहेत; जडतत्त्वाचें  विश्व (अचेतनाचें विश्व) पायाभूत असून, तें आपल्या ठिकाणीं प्राण, मन, अधिमानस, अतिमानस (विज्ञान) आणि सच्चिदानन्द (मूळ आत्मतत्त्व) क्रमानें व्यक्त करतें; कोणतेंहि तत्त्व व्यक्त झालें कीं तें इतर सर्व तत्त्वांना आपल्या आविष्काराचीं साधनें म्हणून जवळ करतें, उपयोगांत आणतें; जडतत्त्व हें आत्मदृष्टीला, आत्माविष्काराचें एक स्वरूप असते; आत्मतत्त्वाचें एक व्यक्त रूप म्हणजे जडतत्त्व अशीच नेहमींची आत्मदृष्टि आहे -- अधिमानसाला हा सृष्टिपर्याय स्वाभाविक आणि रचनेला सुकर असाच वाटतो. त्याला योजनाशक्ति व योजना कार्यरूपानें परिणत करण्याची कार्यकारी शक्ति भरपूर आहे. मूळ सद्वस्तूच्या अनेक सामर्थ्यांची विविध संघटना, अधिमानस आपल्या योजना-

 

पान क्र. ५२६

 

शक्तीचा व कार्यकारी शक्तीचा उपयोग करून वास्तवांत आणतें; अधिमानसिक प्रेरणेनें प्रत्येक सद्‌वस्तुसामर्थ्य आपलें सत्य स्वतंत्रपणें व्यक्त करतें व शिवाय त्यांचे अनेक प्रकारचे संयोग त्याच प्रेरणेनें एकाच वेळीं संघटित होतात; अधिमानस हा जणुं जादूगार कारागीर आहे, मूळ एका सत्याची गुंतागुंतीची विश्वमाला बनविणें हें त्याचें कार्य आहे; या रचनेंत विविध रंगांचा ताणाबाणा घेऊन, हा कारागीर आपलें बहुरंगी विश्ववस्त्र विणून चैतन्याला सादर करतो.

अधिमानसाची निर्मिति सत्याची,ज्ञानाची, सत्यमय व ज्ञानमय असते; सत्यापासून, ज्ञानापासून च्युतीची, पतनाची प्रक्रिया गोंधळ, विरोध इत्यादि गोष्टी अधिमानसनिर्मित विश्वांत आलेल्या नसतात; सद्‌वस्तूच्या अनेक शक्तींचा, शक्यतांचा समकालिक विकास, प्रत्येक शक्तीचा स्वतंत्र विकास किंवा अनेकींचा सामुदायिक विकास अधिमानसिक कारागिरीनें चाललेला असतो; सत्यांची निर्मिति अधिमानस करतें; भ्रमांची, असत्यांची निर्मिति करीत नाहीं; कोणत्याहि अधिमानसिक आंदोलनांत, शक्तिव्यापारांत सत्यच वास्तवांत आणलेलें असतें, विकसित केलेलें असतें; सद्‌वस्तूचें जें अंग, सामर्थ्य, कल्पना, शक्ति, आनंद -- सद्‌वस्तूचें अंगभूत असें जें कांहीं स्वतंत्र क्रियेसाठीं मोकळें केलें असेल त्याचें, त्या सद्‌वस्तुसंबंधित वस्तूचें सत्य फलित करणें, त्या वस्तूच्या सत्याचे स्वतंत्र व्यवहारांत जे परिणाम घडतील ते सत्यदृष्टीनें संघटित करणें, हें काम अधिमानस करतें. अधिमानसिक व्यवहारांत सत्य वस्तूचा कोणताहि अंश घेऊन, हा अंश म्हणजे सर्व सत्य किंवा प्रधान सत्य आणि बाकीचे अंश म्हणजे 'कनिष्ठ सत्यें,' असा विचार मुळींच नसतो; प्रत्येक देव (शक्ति) सर्व देवांना ओळखतो, अस्तित्वांतील त्यांचें स्थान ओळखतो; प्रत्येक कल्पना दुसऱ्या सर्व कल्पनांना, आपल्या इतकाच अस्तित्वाचा हक्क देते आणि त्यांचें स्वागत करते; प्रत्येक सामर्थ्य इतर सर्व सामर्थ्यांना त्यांचें त्यांचें योग्य स्थान देणें मान्य करतें, त्यांचें सत्य आणि त्यांचें परिणाम यांचें स्थान मान्य करतें -- वेगळें यशस्वी अस्तित्व, वेगळेपणें घेतलेला अनुभव हा आनंद देणारा असतो, पण असा कोणताहि विशिष्ट, वेगळ्या अस्तित्वाचा किंवा अनुभवाचा आनंद हा इतर वेगळ्या अस्तित्वांत, अनुभवांत आनंद नाहीं असें म्हणत नाहीं -- किंवा तो आनंद स्वतःहून कमी दर्जाचा व त्याज्य असाहि दावा करीत नाहीं. अधिमानस हें विश्वदृष्टीचें सत्य आहे, विश्वगत सत्याचें तत्त्व आहे; असीम, अतिव्यापक सर्वसमावेशकता हा या तत्त्वाचा आत्मा

 

पान क्र. ५२७

 

आहे; त्याची कार्यशक्ति सर्वगत आणि व्यक्तिगत दोन्ही प्रकारची आहे; अतिमानसाचें कनिष्ठ रूप, किंवा दुसऱ्या दर्जाचें अतिमानस असें नांव अधिमानसाला शोभेल; अतिमानस आणि अधिमानस यांच्या स्वरूपांत आणि व्यवहारांत अर्थांतच कांहीं भेद आहे. अतिमानसाचा संबंध मूळ अंतिम वस्तूशीं, सत्-चित्-आनंद या वस्तूंशीं असतो -- अधिमानसाचा संबंध या वस्तूंच्या गतिशील शक्तींशीं, व्यावहारिक अंगांशीं असतो; मूळ सत्याचा विचार अतिमानस करतें; अधिमानस, त्या सत्याचीं जी व्यावहारिक रूपें, क्रियाशील सामर्थ्यें, त्यांचा विचार करतें; अंतिम सत्याशीं अतिमानसाचा कायमचा अटळ संबंध असतो, तर त्या सत्यांची जी निर्माणशक्ति -- व्यावहारिक मूल्यें, रचनात्मक मूल्यें निर्माण करण्याची जी शक्ति, त्या शक्तीशीं अधिमानस निगडित असतें. अतिमानस सर्वसमावेशक आहे, तसेंच अधिमानसहि सर्वसमावेशक आहे; पण या दोन, समान दिसणाऱ्या गुणांत एक मोठा भेद आहे; अतिमानसाची सर्वसमावेशकता सामग्र्याधिष्ठित आहे, एकताप्रधान आहे; अधिमानसाची सर्वसमावेशकता अनेकताप्रधान आहे, संयोगाधिष्ठित आहे; स्वतंत्र अलग अलग असणाऱ्या सत्यांचा, अधिमानस मेळ करून व त्यांना एकत्र आणून त्यांचा एक महान् संघांत समावेश करतें -- अतिमानस मुळांतच सर्वांना व्यापून असतें; अगोदर एकता व नंतर त्यांतून अनेकांचा आविष्कार अशी अतिमानसाची पद्धति असते -- अनेकता करण्याचें कार्यच मुळीं अधिमानसाकडे सोंपविलेलें असतें; अधिमानसाला एकतेचें भान असतें, वस्तुजाताचा पाया एकता हें त्याला कळतें, व्यक्त विश्वांत एकता व्यापून आहे हेंहि अधिमानस ओळखतें -- पण अधिमानसाचें मुख्य काम एकाचे अनेक करण्याचें असल्यानें, अतिमानस ज्या निष्ठेनें एकतेला वस्तुजाताचें अगदीं आंतरिक व सार्वकालिक, सार्वभौम, सर्वांना नित्य पोटांत वागविणारें, सर्वांची क्रियाशक्ति आणि स्वभावधर्म सुसंवादी होईल व राहील अशी रचना करण्याचें काम प्रकटपणें नेहमीं करणारें असें गूढ तत्त्व, म्हणून मान्यता देतें, तसें कांहीं अधिमानस करीत नाहीं.

अधिमानसाची अतिमानसाशीं तुलना करून, अतिमानसाची समावेशकता व्यापक पण संयोगावलंबी आहे असें आपण पाहिलें. आतां ही समावेशकता आणि आमच्या मनाची भेदप्रधानता, अगदींच दुबळी संयोगशीलता यांचें तुलनात्मक दृष्टीनें अवलोकन करूं. आमच्या भौतिक विश्वांत जे व्यवहार चालतात, त्यांजकडे आमचें मन कसें पाहतें आणि

 

पान क्र. ५२८

 

अधिमानस कसें पाहतें तें पाहिल्यास अधिमानस आणि आमचें मन, यांजमधील अंतर आम्हांला नीट कळेल. आमच्या जगांत अनेक धर्म आहेत, अनेक तत्त्वज्ञानें, अनेक राजकीय सिद्धान्त व त्या सिद्धान्तानुसार अनेक राजकीय व्यवहार चालूं आहेत; अधिमानसाला सर्व धर्म, एका शाश्वत धर्ममार्गाचा आपापल्यापरी विकास करणारे म्हणून, खरे वाटतात; सर्व तत्त्वज्ञानें सत्यवादी आहेत -- प्रत्येक तत्त्वज्ञान त्याच्या क्षेत्रांत, त्याच्या दृष्टीनें विश्वविषयक सत्यनिरूपण करणारें आहे, असा अधिमानसाचा सिद्धान्त असतो; प्रत्येक राजकीय सिद्धान्त आणि त्याचा व्यवहार हा कल्पनाशक्तीचा रास्त व्यवहार आहे, निसर्गाच्या ज्या शक्ती विश्वांत काम करीत आहेत, त्यांच्या समवेत, मानवी मनाच्या हरतऱ्हेच्या कल्पनाशक्तीला काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मानवी व्यवहारावर जसा निसर्गशक्तीचा परिणाम घडतो, तसा तो मानवी कल्पनाशक्तीचाहि घडतो -- आणि ती शक्ति निसर्गशक्तींतूनच निघालेली आहे; तेव्हां निसर्गशक्तीच्या व्यवहारांतील अधिकाराइतकाच, मानवी कल्पनाशक्तीचा व्यवहारांतील अधिकार न्याय्य मानला पाहिजे -- असें अधिमानसाचें तर्कशास्त्र आहे. आमच्या भेदनिष्ठ मानसिक जाणिवेला या गोष्टी अशा दिसत नाहींत -- या जाणिवेला क्वचित् सर्वसमावेशकतेचा स्पर्श होतो, पण ही गोष्ट विरळाच घडते -- या जाणिवेला धर्म धर्म हे केवळ वेगळे नव्हे, तर अन्योन्यविरोधी दिसतात. तीच गोष्ट तत्त्वज्ञानें, राजकीय सिद्धान्त आणि व्यवहार यासंबंधीं. कोणताहि धर्म, तत्त्वज्ञान वा राजकीय व्यवहाराचा सिद्धान्त घ्या : मी सत्य व दुसरे असत्य असेंच प्रत्येकजण मानीत असतो, म्हणत असतो व त्यानुसार वागत असतो; दुसऱ्यांचा पाडाव किंवा नाश करण्यासाठीं, प्रत्येक धडपडत असतो; स्वत: सत्य म्हणून जगावें व दुसरे नाहींसे व्हावेत, निदान दुसरे आपल्याहून कमी दर्जाचे, कमी प्रमाणांत सत्य-आविष्कार करणारें, इतकें तरी सिद्ध व्हावें, यासाठीं धडपडत असतो. अधिमानसिक बुद्धीला ही बहिष्काराची प्रवृत्ति बिलकुल मंजूर नसते; एकंदर विश्वव्यवहाराला सर्वच धर्म, सर्वच तत्त्वज्ञानें, सर्वच राजकीय सिद्धान्त आणि व्यवहार आवश्यक असल्यानें, सर्वांनींच जगावें, प्रत्येकानें आपापलें स्थान सांभाळावें, प्रत्येकाला त्याचा विशिष्ट प्रयत्न करण्याला, त्याचें ध्येय वास्तवांत आणण्याला क्षेत्र नेमून दिलें जावें व तेथें त्याला मोकळेपणानें खटपट करतां यावी, असें अधिमानसिक बुद्धि सांगते. आमचें मन आणि अधिमानस यांत इतकें अंतर

 

पान क्र. ५२९

 

पडण्याचें कारण, अधिमानस हें ज्ञानक्षेत्रांत अतिमानसाच्या (पूर्ण सत्यज्ञानाच्या) अगदीं शेजारचें आहे आणि आमचें मन पूर्णतया अज्ञानात, त्याच्या विभक्ततेच्या 'तत्त्वज्ञानांत' गवसलेलें आहे. सत्य हें अनंत आहे, विश्वव्यापक आहे, त्याचे आविष्कार अनेक प्रकारचे होऊं शकतात, अनेक रूपांनीं तें व्यवहारांत येऊं शकतें -- ही मूळ दृष्टि पार नाहींशी होऊन मनाला, मानसिक जाणिवेला सत्य म्हणजे एक कांटेकोर विधान असें वाटतें -- इतर सर्व विधानांना असत्य मानणारें, केवळ तीं विधानें वेगळीं आहेत म्हणूनच तीं असत्य असा आग्रह धरणारें, त्या सत्यांचा व्यवहार स्वतःहून वेगळ्या मर्यादांनीं बांधला आहे, वेगळ्या आधारावर सुरळीत चालला आहे म्हणून तीं खोटी असा पक्ष घेणारें जें कांटेकोर विधान, तें सत्य असें आमच्या मानसिक जाणिवेला वाटतें. आमच्या मनाला आपली जाणीव, तसें पाहिलें तर, पुष्कळच व्यापक करतां येते; समावेशकता, सर्वसंग्राहकता पुष्कळशी मिळवितां येते; परंतु या जाणिवेनुसार कृति करणें, जीवन संघटित करणें ही गोष्ट मात्र त्याच्या शक्तीबाहेरची दिसते. विकासक्रमांत जडांतून व जीवांतून वर आलेलें मन, मग तें व्यक्तीचें असो किंवा व्यक्तिसमुदायाचें असो, अनेक भिन्न भिन्न दृष्टिकोन व कार्यप्रणाली उभ्या करतें आणि या दृष्टिकोनांनीं, या कार्यप्रणालींनीं मिळूनमिसळून काम करावें, सहकार्य करावें किंवा अन्योन्यविरोधी व्हावें किंवा कांहीं सहकार्य, तर कांहीं विरोध असें वागावें, अशी व्यवस्था करतें; त्याच्या विश्वांत कोठें कोठें सुसंवादमय संसार तें उभें करूं शकतें -- पण एकंदर सर्व घटनांची सुसंवादी व्यवस्था करण्याची सामुदायिक वा व्यक्तिगत शासनपात्रता मनाचे ठिकाणीं नाहीं. उलट, विश्वमन, विकासशील अज्ञानाच्या क्षेत्रांत देखील सर्व घटनांची सुसंवादी घटना करण्यांत निपुण असलेंच पाहिजे; अज्ञानाच्या क्षेत्रांतील सुसंवाद हा अर्थातच कांहीं मेळ, कांहीं तेढ यांची कुशलतेनें एकत्र गुंफण करण्यानेंच उत्पन्न करतां येतो; या मेळ-तेढीची सुसंवादी व्यवस्था वरच्या पातळीवर विश्वमन करीत असतां, त्या पातळीच्या खालीं त्याला आधार व सामर्थ्य देणारें पायाभूत एकतेचें कार्यकारी तंत्र काम करीत असतें; परंतु पूर्णतया एकतातत्त्व विश्वमनांत फार खोल असतें. हें तत्त्व अतिमानस-अधिमानसांची संयुक्त पातळी आपल्या ठिकाणीं खोल, विश्वमनाला आधार म्हणून वागवितें; पण विकासक्रमांत जें व्यक्तिगत मन उदयास येतें, त्याला ही एकतेची दृष्टि विश्वमन देऊं शकत नाहीं; निदान

 

पान क्र. ५३०

 

अद्यापि, खोल तळांतून ही एकता विश्वमनानें पृष्ठभागावर आणून, व्यक्तिगत मनाच्या हवालीं केलेली नाहीं. अधिमानसाचें विश्व हें सुसंवादमय असावयाचेंच; आणि जेथें आम्ही आहों, तें अज्ञानाचें विश्व विसंवाद आणि विरोध यांनीं भरलेलें आहे आणि असेंच तें असावयाचें.

पण हें अज्ञान आलें कोठून ? अधिमानसांतून. मूळ विश्वमाया, अज्ञानाची नव्हे, ज्ञानाची विश्वमाया हें अधिमानसाचें स्वरूप आहे आणि या ज्ञानाच्या मायेनेंच अज्ञान हें केवळ शक्य नव्हे, तर अटळ, अनिवार्य केलेलें आहे. एका सत्याच्या अंगभूत असलेल्या प्रत्येक तत्त्वाला अधिमानस हें स्वतंत्रपणें कार्य करण्यास प्रवृत्त करतें, आणि याप्रमाणें कोणतेंहि तत्त्व स्वतंत्रपणें कार्य करूं लागलें, म्हणजे त्या कार्याचे सर्व परिणाम त्याला पूर्णपणें वास्तवांत आणणें भागच आहे. विभागणीचें तत्त्वहि या नियमानुसार वागतें, त्याला असें वागूं देणें प्राप्तच होतें; विभागणीच्या तत्त्वाचा पूर्ण प्रवास व या प्रवासाची अखेर अधिमानसाच्या सामान्य नियमानुसारच होते : मूळ जाणिवेने हें विभागणीचें तत्त्व अनुसरावयाचें ठरविलें कीं या ठरावानुसार ती खालीं उतरत उतरत, तिचे अनंत तुकडे होऊन, त्या अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म कणांच्या -- त्या जाणिवेला अंधारांत टाकणाऱ्या कणांच्या -- आश्रयानें ती शेवटीं जड निश्चेतनांत गुप्त होते. विभागणीच्या तत्त्वाच्या प्रवासाची अखेर या निश्चेतनांत मूळ अनंत जाणीव प्रविष्ट झाल्यानेंच होते. या निश्चेतन पसाऱ्याला ऋग्वेदांत अचेतनाचा सागर म्हटलें आहे; एक (सच्चिदानंद) या अचेतनांतून आपल्या महान् पराक्रमानें वर येतें, त्यांतून जणुं जन्म घेतें; हें एकतत्त्व प्रथम अलग अलग भागनिष्ठ, भागभूत अस्तित्व आणि जाणीव यांत लपलेलें असतें; आमचें अस्तित्व आणि जाणीव अशी भागभूत आहे; आम्हांला एखादा व्यापक गण तयार करावयाचा, तर तुकडे तुकडे एकत्र करून तो उभारावा लागतो. झगडा सर्व वस्तूंच्या मुळाशीं आहे, असें जें सूत्र हेराक्लायटस् या ग्रीक तत्त्ववेत्यानें आपल्या तत्त्वज्ञानांत घातलें, त्याचा अनुभव आम्हांला कोणताहि गण हळूहळू मोठ्या अडचणींना तोंड देऊन उभा करतांना येत असतो : प्रत्येक कल्पना, शक्ति, विभक्त जाणीव, विभक्त जीव त्याला स्वाभाविक असलेल्या अज्ञानामुळें दुसऱ्याशीं झगड्याला प्रवृत्त होतो; आपलें तें खरें या भावनेनें स्वतंत्रपणें जगण्याचा, वाढण्याचा, कृतार्थ होण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो; आपल्याखेरीज इतर जें कांहीं अस्तित्वांत आहे, त्याच्याशीं मेळ राखून जगण्याचा

 

पान क्र. ५३१

 

कोणीहि यत्न करीत नाहीं. आमचा आरंभींचा प्रवास असा नित्य झगड्याचा असला, तरी विश्वाच्या पोटीं लपलेलें एकतत्त्व, आम्हांला न कळत, हळूहळू कसल्यातरी प्रकारच्या सुसंवादी जीवनाकडे आमची इच्छा नसतांहि आम्हाला नेत असतें; तें आम्हाला अन्योन्याश्रयी व्हावयास लावतें; तें आम्हाला आमच्या तेढी दूर करावयास, तेढींच्या जागीं मेळ करावयास लावतें; कष्टानें कां होईना, आम्हाला तात्पुरतें ऐक्य करावयास लावतें. आमच्या या गुप्त एकतत्त्वाच्या प्रेरणेनें होणाऱ्या सुसंवाद-यत्नांना थोडेंसें फळ जरूर येतें; पण एकंदरीनें आमचे हे प्रयत्न निर्दोष नसतात, सदोष आणि अपूर्ण असतात; आम्ही ज्या सुसंवादी म्हणून रचना करतों, त्यांतहि अपूर्णता आणि सदोषता असते; आम्ही एक रचना करतों -- ती उणी पडते म्हणून दुसरी करतों. अशा, आदर्शाच्या जवळ जाणाऱ्या परंतु आदर्श कधींहि न गांठणाऱ्या, नेहमीं बदलाव्या लागणाऱ्या रचना आम्ही करीत असतों, करूं शकतों; टिकाऊ आदर्श रचना आम्ही करूं शकत नाहीं. ही आमची स्थिति तेव्हांच पालटेल, जेव्हां क्रमविकासानें आमच्यांत, विश्वसत्याच्या शक्ती, आज आमच्या जाणिवेच्या पलीकडे असलेल्या श्रेष्ठ अतिचेतन शक्ती, आणि त्या शक्ती ज्या परमसत्यांत एकीभूत होतात, तें परमसत्य विकसित होईल : त्या अतिचेतन शक्ती आणि तें परम चैतन्य आमच्यांत विकसित झालें, म्हणजे आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक नसेंत सुसंवाद आणि एकता क्रियाशील स्वरूपांत भरून राहील आणि आमच्या अस्तित्वाचें जें वास्तवांत आविष्करण होईल, त्याच्या प्रत्येक अंगांत एकता आणि सुसंवाद नांदेल. जर आमचें आजचें अज्ञानग्रस्त जीवन संपून, ज्ञानमय व विश्वमय जीवनांत आमचा प्रवेश, आमचा जन्म व्हावयाचा असेल, तर आध्यात्मिक मनाचे उच्चतर प्रांत आमच्या अस्तित्वाला, आमच्या जाणिवेला खुले व्हावयास हवेत; इतकेंच नव्हे, तर या आध्यात्मिक मनाच्या पलीकडे असलेलें परम सत्यहि आमच्यांत प्रकट व्हावयास हवें -- अशा जन्माचा, अशा दिव्य-जन्माचा संभव आम्हाला, मानवाला आहे आणि तो शक्यतेच्या स्थितींतून अनुभवाच्या स्थितींत यावयाचा आहे, येवढें मात्र खरे.

अधिमानस आणि अतिमानस यांचे प्रांत निराळे करणारी जशी सीमारेषा आहे, त्याप्रमाणें अधिमानस आणि विश्वव्यापक अज्ञान याचे प्रांत वेगळे करणारी सीमारेषा आहे. विश्वव्यापक सत्य हें अधिमानसाचें स्वरूप आहे. अधिमानसानें प्रवृत्त केलेली, मूळ सत्याच्या अंगा-

 

पान क्र. ५३२

 

अंगाची स्वतंत्र क्रिया व हालचाल आपल्या सहकारानें, मूळ जाणीवशक्ति जेथें जोरदार करते आणि या अंगांच्या एकतेची जाणीव दुबळी करून, दडवून, दडपून टाकते तेथें अधिमानस किंवा विश्वव्यापक सत्य आणि विश्वव्यापक अज्ञान यांचे प्रांत अलग करणारी सीमारेषा असते; कारण, जाणीवशक्तीच्या वरील व्यापारानें, मन त्याच्या अधिमानसी उगमापासून फोडलें जातें; स्वतंत्र भिन्न विभागांवर व त्यांच्या स्वतंत्र भिन्न हालचालींवर लक्ष केंद्रित करणें आणि एकतेची वस्तुस्थिति विसरून जाणें हें, अज्ञानक्षेत्रांतील मनाचें स्वरूप आहे. अधिमानस आणि अतिमानस यांच्यामधील सीमेचा पडदा व अधिमानस आणि (अज्ञानक्षेत्रांतील) मानस यांच्यामधील सीमेचा पडदा यांत अंतर आहे. पहिला पडदा पारदर्शक आहे -- त्यांतून अतिमानसिक गोष्टींचें अधिमानसांत जाणीवयुक्त स्थानांतर होऊं शकतें; अतिमानसाशीं अधिमानसाचा प्रकाशमय संबंध राहूं शकतो; दुसरा पडदा पारदर्शक नाहीं; त्यामुळें अधिमानसिक गोष्टी मनांत स्पष्टपणें येऊं शकत नाहींत -- मनाशीं त्यांचें जें नातें घडतें, तें अप्रकट व अस्पष्ट असेंच घडतें. मन अधिमानसापासून विभक्त झालें म्हणजे तें अगदीं स्वतंत्र तत्त्व असल्याप्रमाणें वागतें. प्रत्येक मनोमय पुरुष, प्रत्येक मूलभूत मानसिक कल्पना, शक्ति, स्वतंत्र असल्याप्रमाणें व्यवहार करतात; इतर पुरुषांशीं, कल्पनांशीं, शक्तींशीं त्यांनीं संबंध ठेवलाच, त्यांच्याशीं ऐक्य केलेंच तर हा संबंध ठेवतांना, हें ऐक्य करतांना अधिमानसिक व्यापक ममत्वानें, मुळांत एकता आहे या भावनेनें, तो संबंध केला जात नाहीं, तें ऐक्य केलें जात नाहीं, तर आम्ही सगळे स्वतंत्र आहोंत आणि कांहीं हेतूनें एक स्वतंत्र संघ संघटित करीत आहोंत, या भावनेनें सगळें घडतें. विभक्ततेच्या स्पष्ट भावनेनें वागण्याची ही जी प्रवृत्ति, हीच विश्वव्यापक सत्य आणि विश्वव्यापक अज्ञान यांना अलग करणारी प्रवृत्ति आहे. या पातळीवरचें विश्वमन स्वतःचें ऐक्य ओळखतें, पण आपला उगम चैतन्यांत, सच्चिदानंदांत आहे, सच्चिदानंद आपला पाया आणि मूलाधार आहे या गोष्टीची त्याला जाणीव रहात नाहीं. या गोष्टीची जाणीव त्याला झालीच, तर ती जाणीव बुद्धीच्या व्यापारानें होते, सतत टिकणारा असा तो अनुभव नसतो. हें मन जो व्यवहार करतें, तो आपला स्वतंत्र व्यवहार म्हणून काम करतें; त्याला त्याच्या व्यवहारासाठीं जो माल मिळतो, तो अर्थात् विश्वव्यापक सत्यानें युक्त अशा अधिमानसाकडून मिळतो; पण या अधिमानसाचा व त्याचा प्रत्यक्ष कांहीं

 

पान क्र. ५३३

 

संबंध नसतो, त्याची ओळखहि या विश्वमनाला नसते. या विश्वमनाचे घटक म्हणजे व्यक्तिगत मनें; हीं मनेंहि एकमेकांना न ओळखतां, एकमेकांविषयीं अज्ञानांत राहून, तसेंच विश्वमनाविषयींहि अज्ञानांत राहून आपआपलीं कामें स्वतंत्रपणें करीत राहतात -- या व्यक्तिगत मनांना एकमेकांचें किंवा विश्वमनाचें जें काय थोडे ज्ञान होतें, तें फक्त बाह्य संपर्कानें वा व्यवहारानेंच. आम्ही सर्व मनें एक आहोंत, एका विश्वमनाचे घटक आहोंत, हें मूलभूत ज्ञान त्यांना नसतें व म्हणून या ज्ञानामुळेंच शक्य असलेलें अन्योन्यांचें अंतरंगज्ञान आणि अन्योन्यांशीं एकरूपतेनें वागणें त्यांजकडून घडत नाहीं. मानसिक शक्ति अज्ञानक्षेत्रांत अज्ञान आणि अज्ञानकृत भेद यांच्या पायावरच आपला सर्व व्यवहार करीत असते; हा सर्व व्यवहार एक प्रकारें जाणीवयुक्त असतो, ज्ञानानें केला जातो हें खरें; तथापि हें ज्ञान, ही जाणीव एकांगी असते; खरें समग्र आत्मज्ञान, खरें समग्र विश्वज्ञान याठिकाणीं असत नाहीं. ही ज्ञानाची एकांगिता प्राणाच्या व्यवहारांत, सूक्ष्म जडद्रव्याच्या क्रियांत अनुस्यूत असते आणि सच्चिदानंद निश्चेतनांत अंतर्हित झाल्यावर त्या निश्चेतनांतून जी भौतिक दुनिया, स्थूल विश्व प्रकट होतें, त्या विश्वांत मानसिक शक्तीचा, प्राणशक्तीचा आणि जडाचा अज्ञान-अधिष्ठित एकांगी ज्ञानाचा व्यवहार पुन्हां आपलें दर्शन घडवितो.

अधिमानसाशीं संबंध तुटलेलें हें जें मन, तें आमच्यांतील प्रच्छन्न अंतर्मनाप्रमाणें, आमच्या प्रकट मानवी मनाहून पुष्कळ अधिक शक्तिमान् असतें. आमच्या प्रकट मनाला इतर मनांशीं दळणवळण ठेवतां येत नाहीं, अन्योन्यांचें अंतरंग नीट समजत नाहीं, तशी कांहीं या अधिमानसाच्या खालच्या मनाची स्थिति नसते. त्याला आमच्या मनापेक्षां अधिक मोकळेपणानें वावरतां येतें, त्याच्या संवेदनांना आमच्या मनापेक्षां पुष्कळ अधिक वाव असतो -- या मनाच्या क्षेत्रांत अज्ञान पूर्णतेला गेलेलें नसतें; तेथें मनामनांत बुद्धिपुरःसर सुसंवाद घडवून आणतां येतो -- आमच्या मनापेक्षां तेथें मूळ मनांत म्हणजेच अधिमानसापासून विभक्त झालेल्या मनांत एकमेकांसंबंधानें योग्य नातें आणि अन्योन्यावलंबी संघटन निर्माण करतां येतें. आमचें मन अंध प्राणशक्ति आणि प्रतिक्रियाशून्य जडद्रव्य यांनीं जसें व्यापलेलें आणि दुबळें केलेलें आहे, तशी त्या मूळ मनाची स्थिति नसते. मनाची ती पातळी अज्ञानाची असली, तरी तेथें खोटें पिकत नाहीं, प्रमाद घडत नाहींत; त्या मनाच्या पातळीवर असत्य आणि

 

पान क्र. ५३४

 

प्रमाद घडावा अशी अनिवार्य स्थिति उत्पन्न झालेली नसते -- तेथील अज्ञान मर्यादा घालणारें असतें, खोटें करणारें तें असलेंच पाहिजे असें नाहीं -- मर्यादा घालण्यानें अप्रत्यक्षत: क्वचित् खोटें निपजेल इतकेंच. तेथील अज्ञानांत ज्ञानाला मर्यादा घातलेली असते, एकांगीं सत्यें पुरस्कारलीं जातात; परंतु सत्य किंवा ज्ञान यांना विरोध नसतो. त्यांचा इन्कार केला जात नाहीं. या मनानंतर प्राण आणि सूक्ष्म जडद्रव्य यांची पातळी निर्माण होते -- या मनाची जी विभक्तता असते आणि तिजवर आधारलेलें त्याचें एकांगी सत्यांचें जें भांडार असतें, ती किंवा तसली म्हणा, विभक्तता आणि तो किंवा तसला एकांगी सत्यांचा पसारा, प्राण आणि सूक्ष्म जडाच्या पातळ्यांवरहि असतो; मूळ जाणीवशक्ति मनापासून प्राण आणि सूक्ष्म जडद्रव्य यांना विभक्तपणें कार्य करावयास लावते; पण मन आणि प्राण यांचा संबंध समूळ तोडून टाकीत नाहीं, मन आणि प्राण यांच्यामध्यें अभेद्य भिंत उभी करीत नाहीं; त्याचप्रमाणें सूक्ष्म जडद्रव्यहि मन आणि प्राण यांच्यापासून पूर्णपणें अलग केलें जात नाहीं. निश्चेतनता ही अवस्था, ही पातळी परत एकदां आली आणि त्या पातळींतून, त्या अंधकारमय योनींतून आमचें विविध अज्ञानाचें विश्व वर आलें म्हणजे मग जड, प्राण आणि मन यांजमध्यें अभेद्य भिंती उभ्या राहतात. सच्चिदानंदाचा तिरोधानक्रम चालला असतां, त्या तिरोधानाच्या पायऱ्या सर्वच कमीअधिक ज्ञानमय असतात; प्राण आणि सूक्ष्म जडद्रव्य देखील थोडेसें ज्ञान बाळगून असतात. मूळ जाणीवयुक्त शक्तीचे ते विशिष्ट संघटित प्रकार असतात. अधोमानसापासून निघालेलें मन काय किंवा प्राण आणि सूक्ष्म जडद्रव्य काय, सर्व मूळ जाणीवशक्तीचीं विशिष्ट रूपें आहेत. त्यांचा स्वभावधर्म स्वतंत्रपणें वागण्याचा असतो -- प्रत्येकाचें व्यवहारकेंद्र त्याच्या स्वतांत असतें; स्वतःसाठीं मन जगतें, प्राण जगतो, सूक्ष्म जडतत्त्व जगतें -- सर्वजण स्वत:साठीं व्यवहार करतात, स्वतांत काय शक्ति असेल ती कार्यरूपानें प्रकट करतात; पण जें कांहीं प्रकट केलें जातें तें सर्व सत्य असतें; मन मनाचीं सत्यें प्रकट करील, प्राण प्राणाचीं, सूक्ष्म जड त्याची स्वत:चीं : कोणीहि असत्य वा भ्रम उभा करणार नाहीं किंवा ज्ञान आणि अज्ञान यांची भेसळ कोणीहि उभी करणार नाहीं. मूळ जाणीवशक्ति आपलें सर्व लक्ष एकेका तत्त्वावर केंद्रित करीत करीत मन, प्राण, सूक्ष्म जडद्रव्य येथपर्यंत आल्यावर, पुढें शक्ति आणि आकार या दोन गोष्टींवर ती

 

पान क्र. ५३५

 

आपलें सर्व लक्ष केंद्रित करूं लागते; जाणीव आणि शक्ति यांच्या जोडीची एकता फुटून जाणीव वेगळी आणि शक्ति वेगळी अशी परिस्थिति मूळजाणीव निर्माण करते -- ही परिस्थिति निर्माण झाली, जाणिवेनें आकार आणि शक्ति यांच्यांत गुप्त लुप्त होऊन, अंधकारमय झोंपेंत राहण्याचें ठरविलें म्हणजे मग जाणिवेला धडपड करून परत जागृतींत यावयाला फार त्रास पडतो -- विकासक्रमांत ही जाणीव पूर्णतेनें पूर्वस्थितींत एकदम येऊं शकत नाहीं -- तुकड्या तुकड्यांनीं तिला मार्ग क्रमावा लागतो; जड आकारांत लीन झालेल्या जाणिवेचा विकास अंशाअंशांनीं होतो आणि या आंशिक विकासामुळें तिच्याकडून प्रमाद आणि असत्य घडविलें जातें, घडतें. तरीपण, मूळ अभावांतून उदयास आलेला भ्रम, भ्रमाचा पसारा हें कांहीं या असत्यांचें व प्रमादांचें स्वरूप नसतें. अचेतनतेंतून उदयास आलेलीं विश्वांतील अपरिहार्य सत्यें, असेंच त्यांचें वास्तविक स्वरूप असतें. कारण अज्ञान हें वस्तुत: ज्ञान असतें; अचेतनेचा पडदा किंवा बुरखा घेऊन, स्वतःचा शोध करीत ज्ञान प्रवास करूं लागलें म्हणजे त्याला अज्ञान हें नांव दिलें जातें. असें हें पडद्याआडून स्वतःचा शोध करणारें ज्ञान, आपलें इष्ट मिळविण्यांत एकदम यशस्वी होऊं शकत नाहीं -- तें चुकतें, सांवरतें; हरवतें, गांठतें; पूर्ण ज्ञानानें अचेतनतेंत उडी किंवा बुडी घेतल्याचा सरळ परिणाम असाच असणार; अज्ञानरूपानें प्रवास करणारें ज्ञान असेंच चुकत, चांचपडत आपला विकास करूं शकणार -- एकदां पूर्ण च्युति झाल्यावर, ज्ञानानें पुन: आपला मार्ग चालावयाचा म्हणजे तो त्याला असाच चालावा लागणार -- ज्ञानाच्या पुनरुद्धाराचा अगदीं रास्त मार्ग म्हणजे चुकणें, सांवरणें -  चुकणें, सावरणें हाच आहे. सच्चिदानंद उतरत उतरत पूर्णतया खालीं उतरलें म्हणजे सत् (अस्तित्व) हें दर्शनी असत् (अस्तित्वाचा अभाव) मध्यें, ज्ञान हें दर्शनी अचेतनामध्यें व अस्तित्वाचा आनंद विश्वव्यापी संवेदनाशून्यतेंत बुडून बसतो : सच्चिदानंदाच्या खालीं उडी घेण्याचा हा पहिला परिणाम होय; यानंतर स्वतःला शोधीत सच्चिदानंद वरचा प्रवास करूं लागला म्हणजे, अंशाअंशानें झगडत अनुभव घेऊन त्याला प्रवास करावयाचा असल्यानें, त्याच्या जाणिवेचें, ज्ञानाचे सत्य-असत्य, ज्ञान आणि प्रमाद असे भाग पडणें, जीवन आणि मरण असे त्याच्या अस्तित्वाचें भाग पडणें, दु:ख आणि सुख असे त्याच्या आनंदाचे भाग पडणें अगदीं स्वाभाविक आहे : स्वत:ला परत शोधून काढण्याची जी धडपड सच्चिदानंद अचेतन-

 

पान क्र. ५३६

 

तेंत बुडी मारल्यानंतर करीत असतें, त्या धडपडीची प्रक्रिया ही अशीच असणें स्वाभाविक, अपरिहार्य आहे. या आत्मशोधाच्या प्रक्रियेंत सत्याचा शुद्ध अनुभव, ज्ञानाचा, आनंदाचा, अमर अस्तित्वाचा शुद्ध अनुभव येणें वास्तवाला धरून होणार नाहीं. विकासशील प्राणी सबंध विकासक्रमांत, त्यांच्या अंतरंगांत असलेल्या आत्मतत्त्वानुरोधानें वागले, त्या आत्मतत्त्वाच्या प्रेरणेनुसार शांतपणें वर्तन करूं लागले, निसर्गाच्या सर्व व्यवहाराच्या पोटीं असलेल्या अतिमानसाच्या प्रेरणेनुसार वागूं लागले, तर मात्र सत्य, ज्ञान, आनंद, अमर सत्ता यांचा शुद्ध अनुभव शक्य होईल. परंतु अधिमानसाचा कायदा याठिकाणीं काम करीत असतो : प्रत्येक शक्ति या कायद्यानुसार आपल्या शक्यता वास्तवांत आणीत असते. मूळ अचेतनता आणि जाणिवेची विभागणी या मुख्य तत्त्वावर ज्या जगाची उभारणी आहे, त्या जगांत स्वाभाविकपणें प्रथम प्रथम कांहीं विशिष्ट गोष्टींचाच संभव आहे : त्या जगांत सर्वप्रथम अज्ञानाचे अंधाराचे शक्तिगण प्रामुख्यानें उभे राहणार आणि ज्या अज्ञानावर ते जगतात तें अज्ञान सांभाळून ठेवण्याच्या प्रेरणेनें ते क्रियाशील होणार हें ठरलेलें आहे : त्या जगांत ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न हा अज्ञानानें अडखळत चालणारा प्रयत्न असणार आणि या प्रयत्नाचा अपरिहार्य भाग म्हणून असत्य आणि प्रमाद यांचा पसारा निर्माण होणार; या जगांत जीवनाचा झगडा, अज्ञानानें उभा केलेला आणि पोसलेला झगडा असणार आणि त्यापासून अन्याय आणि अमंगल यांचा तांडा निघणार; या जगांत आनंदासाठीं, मौज करण्यासाठीं अहंभावप्रेरित संघर्ष चालणार आणि त्यापासून सुख, दुःख, यातना, 'मी मी' करणाऱ्या प्राण्यांना येतां जातां भोगाव्या लागणार; अचेतनता आणि विभक्त जाणीव या तत्त्वांवर उभारलेल्या जगांत या गोष्टी प्रथम प्रथम स्वभावत: असणार; आमच्या विकासशील अस्तित्वाच्या प्राथमिक अनिवार्य अनुभवांचा पाढा हा असा असणार -- अर्थात् याच्याहून अधिक असें त्या अस्तित्वांत कांहींच शक्य होणार नाहीं असें नाहीं -- पण त्या अस्तित्वाचा सामान्य आराखडा प्रथम प्रथम हा असाच असणार हें मात्र खरें. निराकार सच्चिदानंद जडाकार झालें म्हणजे, आमच्यासमोर सत्‌चा अभाव दिसतो; पण त्यांत सत् लपलेलें असतें; आमच्यासमोर अचेतन दिसतें पण त्यांत चित् (चेतना, ज्ञान, जाणीव) लपलेली असते; आमच्यासमोर संवेदनाशून्यता दिसते, पण तिच्या पोटीं आनंद लपलेला असतो, सुप्त आनंदाचें तें रूप असतें -- या गूढ अशा सत्, चित् व आनंद या सत्यांना विकास-

 

पान क्र. ५३७

 

क्रमानें प्रकट झाल्यावांचून गत्यंतरच नसतें. तेव्हां विकासाची प्राथमिक पायरी कांहींहि दृश्य दाखवो, शेवटीं जडाच्या भूमींत सत् चित् आनंद यांचा आविष्कार होणें अटळ आहे : अधिमानस, अतिमानस हीं तत्त्वेंहि जडापोटीं लपलेलीं आहेत; अंधकारमय अनंत जडांतून प्रथम या तत्त्वांना विरोधी असा संघटित संसार जरी उभा राहिला, तरी या दर्शनीं विरोधी संसारांत अधिमानस आणि अतिमानस या तत्त्वाचें कार्य पूर्णतया होऊन, तीं तत्त्वेंहि कृतार्थ होणार यांत संशय नाहीं.

विश्वांत जो विकास चाललेला आहे, त्याची अखेर वर सांगितल्याप्रमाणें फारशी अडचण न येतां होईल असें म्हणावयास दोन कारणें आहेत. एक कारण हें कीं, अधिमानस भौतिक सृष्टीकडे खालीं उतरत असतां, स्वतःच्या कार्यांत मदत करणारीं आपलीं रूपांतरें -- स्फूर्तिमय मन, प्रकाशमय मन, उच्च मन हीं रूपांतरें -- निर्माण करून कामास लावतें. हीं जीं रूपांतरें किंवा पर्याय, त्यांच्याकरवीं आमच्या मानसिक जाणिवेंत वस्तुजाताचें गूढ सत्य आम्हांला कळेल अशा स्वरूपांत आणलें जातें; विशेषत: स्फूर्तिमय मन हें, सत्याचे विजेच्या झगझगाटासारखे तेजस्वी झोत आमच्या मानसिक क्षेत्रांत टाकून, त्यांतील कांहीं भाग, कांहीं क्षेत्र प्रकाशानें पुरेपूर भरून टाकतें, या स्फूर्तिच्या प्रकाश-झोतांनीं व प्रकाशमय मनाच्या आणि उच्च मनाच्या क्रियांनीं आम्हांला ज्या गूढ सत्याचें ज्ञान पुरविलें जातें, त्याचा आम्हीं उपयोग केला, तर आमचा विकास द्रुत गतीनें होऊं शकतो; प्रथम आमच्या आंतरात्म्यांत उच्च मन आदिकांकडून, आमच्या मनाच्या वरील उच्चतर जाणिवेच्या प्रांतांतून, जे संदेश येतात, त्यांचा उपयोग करून आम्हीं आपला आंतरात्मा त्या संदेशानुसार रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे -- तसेंच आंतरात्म्यांतून आमच्या बाह्य आत्म्याकडे वरच्या श्रेष्ठ ज्ञानप्रांतांतील संदेश आम्हीं घेतले पाहिजेत, आणि बाह्य व्यवहारांतहि त्या संदेशानुसार आम्हीं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे; असें आम्ही करीत राहिलों, तर कालांतरानें आम्ही स्फूर्तिप्रधान, अधिमानसप्रधान आत्मे होऊं, आम्हांला बुद्धीच्या आणि बाह्य संवेदनांच्या मर्यादेंत रहावें लागणार नाहीं; आमचें ज्ञान खूप व्यापक होईल, प्रत्यक्ष सत्य, सत्याचा आत्मा आणि देह यांना आम्ही कोणत्याहि मध्यस्थाशिवाय स्पर्श करून, अनुभव आत्मसात् करूं शकूं. वस्तुस्थिति अशी आहे कीं, उच्च मन, प्रकाशमय मन, स्फूर्तिमय मन व अधिमानस यांजकडून त्या श्रेष्ठ ज्ञानेभूमींवरून विजेच्या किंवा सूर्याच्या

 

पान क्र. ५३८

 

लकाकीप्रमाणें ज्ञानाच्या प्रकाशाचे, सत्याच्या प्रकाशाचे कमीअधिक तेजोमय फवारे आजहि आमच्या अंतरंगांत येत असतात; पण हें त्याचें येणें कधींमधीं होतें; तें आमच्या अस्तित्वाच्या एखाद्याच कोपऱ्याचे ज्ञान करून देणारें असतें; आम्ही स्वत: त्या सत्यांच्या व्यापकतेनुसार आमच्या मनाची व्यापकता बनविण्याचा, त्या सत्यांच्या स्वरूपानुसार आमचें स्वरूप बनविण्याचा प्रयत्न करूं लागलों, उच्चतर सत्यें आमच्या वृत्ती-प्रवृत्तींत आणण्याची आमच्यामध्यें जी शक्ति आहे, ती शक्ति आम्ही कामास लावूं लागलों, कीं अधिमानसानें आमची जी सोय आपल्या दुय्यम पर्यायांच्या द्वारां करून ठेवलेली आहे, तिचा फायदा घेऊन, आम्ही आपला विकास वेगानें करून घेऊं शकूं. सच्चिदानंद अधिमानस अतिमानस या तत्त्वांची, विशेष अडचण न येतां, आमच्या पार्थिव संसारांत पूर्ण अभिव्यक्ति सुखानें होण्यांत विश्वांतील विकासाची अखेर होईल, असें जें आम्हीं म्हटलें त्याचें एक कारण आतांपर्यंत सांगितलें. दुसरें कारण हें कीं, अधिमानस, स्फूर्तिमय मन व अतिमानस हीं तत्त्वें अचेतन जडांत तिरोभूत स्थितींत आहेत व म्हणून तीं अटळपणें विकसित व्हावयाचीं आहेत, एवढेंच नव्हे, तर तीं आजहि मन, प्राण, जडतत्त्व यांच्या विश्वव्यापी क्रियांत भाग घेत असतात; अर्थात् हा भाग तीं सामान्यत: प्रकटपणें घेत नाहींत, पडद्याआड राहून घेतात; पण मधून मधून स्फूर्तिच्या प्रकाशानें तीं प्रकटपणेंहि कार्यकारी होतात : या तत्त्वांचें कार्य सामान्यत: लपून केलें जातें, तेव्हांहि भौतिक, प्राणिक, मानसिक व्यापारांनीं त्या त्या क्षेत्रांत तें आच्छादलें जाऊन ओळखावयास अवघड होऊन बसतें, ही गोष्ट खरी आहे. पण हीं तत्त्वें आजहि मनाच्या, प्राणाच्या व जडतत्त्वाच्या विश्वव्यापी कार्यांत क्रियाशील आहेत ही महत्त्वाची बाब आहे. विश्वांतील विकासाची अखेर विशेष अडचण न येतां दिव्य मानवी जीवनांत होणार आहे, असा सिद्धान्त करावयास, अधिमानस स्फूर्तिमय मन व अतिमानस यांची आजची आतांच सांगितलेली क्रियाशीलता हें दुसरें कारण आहे. असो. अतिमानस विश्वाच्या विकासांत आरंभीच प्रकट होत नाहीं याचें कारण उघड आहे : अतिमानसिक शक्ति ही विश्व निर्मिणारी शक्ति आहे. ही शक्ति आरंभींच व्यक्त रूप धारण करील, तर अज्ञानक्षेत्रहि असणार नाहीं, अचेतन क्षेत्रहि असणार नाहीं; विकासक्रम हा सावकाशीचा असतो व म्हणून विविध लीला शक्य होते; अतिमानस हें प्रकट होऊन विकास करूं म्हणेल, तर तो विकास अतिदृतगतीनें होऊन

 

पान क्र. ५३९

 

त्या क्रमाला विकासक्रमहि म्हणतां येणार नाहीं -- एकदम रूपांतर, देखावा क्षणांत बदलणें याला विकास कसें म्हणणार ? पण अतिमानस विकासारंभीं उभे ठाकून आपलें कार्य करूं म्हणेल, तर असा कांहीं प्रकार होणार हें निश्चित. तेव्हां, विकासी विश्वलीला व्हावयास अतिमानसाचें जडांत अंतर्धान होणेंच इष्ट आहे व जडांतून प्राण, मन, या क्रमानें विश्वाचीं घटकभूत तत्त्वें प्रथम विकसित होणेंच इष्ट आहे. असो. अतिमानसाचा आणि अधिमानसाचा प्रत्यय आम्हांला विश्वसंसारांत नित्य कोठें पहावयास मिळतो, त्याजविषयीं दोन शब्द लिहूं. भौतिक शक्ति विश्वांत कामें करीत आहे, तें आपण पाहतों; या भौतिक शक्तीच्या कार्यांत जो अटळपणाचा, अनिवार्यपणाचा प्रत्यय आम्हांला येतो तो प्रत्यय अतिमानसाच्या निर्माणशक्तीचा प्रत्यय आहे हें आम्हीं ओळखलें पाहिजे; अचूक, अटळ कार्य हा अतिमानसाचा स्वाभाविक विशेष आहे. प्राणशक्ति, मनाची शक्ति ह्या आपल्या आपल्या शक्यता आपल्या आपल्या पद्धतीनें वास्तवांत आणण्याच्या कार्यांत मग्न असतात, त्यांच्या कार्यांचे विविध संयोग-वियोग घडून येतात, हा अधिमानसाचा अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष संसार आहे, हें आम्हीं ओळखावें. प्राण व मन या तत्त्वांना जडाच्या भूमींत आपलें आपलें विशिष्ट जीवन जगण्यास मोकळीक मिळाली आहे, त्याप्रमाणें योग्य वेळीं अधिमानस, अतिमानस या श्रेष्ठ ज्ञानमय तत्त्वांना -- गुप्त सच्चिदानंदाच्या श्रेष्ठ शक्तींना -- तिरोधानाच्या गुप्ततेंतून प्रकट होतां येईल आणि आमच्या जीवनांत त्यांचा सर्वोत्तम प्रकाश भरून जाईल; तो प्रकाश आज आमच्या पातळीच्या फार वर आहे, पण तो योग्य वेळीं खालीं उतरून, आमचें जीवन उजळून दिव्य करील ही गोष्ट निश्चित. सत् चित् आनंद या त्रयींविषयीं वेगळें सांगणें नको. जेथें अतिमानस तेथें सच्चिदानंद, जेथें यंत्र तेथें यंत्री; अतिमानस हें निर्माणयंत्र आहे, यंत्री सच्चिदानंदच आहे.

तेव्हां शेवटीं इतकेंच सांगावयाचें कीं, जें विश्व अभिव्यक्त झालें आहे, त्या विश्वांत मानवाचें जीवन दिव्य होणें केवळ संभवनीयच नाहीं, तर निसर्गाचा जो विकासयत्न चालला आहे, त्याचा अटळ परिणाम, त्याची अनिवार्य परिणति, पूर्णता अशा दिव्य जीवनांतच आहे. आज आमचें जीवन अज्ञानांत आपला खडतर मार्ग क्रमीत आहे, पण आमच्या अज्ञानाला शेवट आहे, आमच्या कष्टांना शेवट आहे आणि तो शेवट आमच्या कष्टांतूनच कष्टाचें गोड फळ, कष्टाचा मोबदला म्हणून आम्हांला

 

पान क्र. ५४०

 

दिव्य जीवनाच्या रूपानें अनुभवावयास मिळणार आहे. अंतर्बाह्य निसर्ग आम्हांला जसा दिसत आहे, दिसला आहे, तसाच वास्तवांत असेल, तर त्याच्याकडून होत असलेला विकासाचा खटाटोप मानवी जीवन दिव्य करूनच पूर्ण होणार आहे, हे निःसंशय.

 

पान क्र. ५४१

***

Divya Jeevan - 2.jpg


श्रीअरविंद

 

 

 

दिव्य जीवन

 

 (खंड दुसरा, भाग पहिला)

II (Part – I)

 

 

 

 

श्रीअरविंद आश्रम

पाँडिचेरी


प्रथम आवृत्ति : १९६२

पुनर्मुद्रण : २००१

 

 

 

 

अनुवादक

सेनापति पां. म. बापट

 

 

 

 

ISBN 81-7058-630-5

© श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट २००१

प्रकाशक : श्रीअरविंद आश्रम, पाँडिचेरी - २

मुद्रक : श्रीअरविंद आश्रम प्रेस, पाँडिचेरी - २

 

 

LIFE DIVINE by Sri Aurobindo; Translated into Marathi by Senpati P.M.Bapat. Published by Sri Aurobindo Ashram, Pondicherry and Printed at Sri Aurobindo Ashram Press, Pondicherry (India).

First Edition : 1962; Reprint : 2001

 

 

 

खंड दुसरा

 

ज्ञान आणि अज्ञान

आध्यात्मिक विकास

 

 


 

''विश्वांतील जीवनाचें निरीक्षण सूक्ष्मपणें केल्यास वस्तुस्थिति अशी दिसते कीं, स्वतःचें रूपांतर ज्ञानांत करण्यासाठीं अज्ञान धडपडत आहे, तें आपला अंधकार क्रमश: अधिकाधिक उजळून, प्रकाशपूरित करून, स्वतःच्या पोटीं काम करीत असलेल्या, तेथें अगोदरच गुप्तपणें वस्तीस असलेल्या ज्ञानाचें रूप घेण्यासाठीं प्रयत्न करीत आहे. अज्ञानाचें याप्रमाणें ज्ञानांत रूपांतर झालें, म्हणजे विश्वाचें सत्य, त्या सत्याचें खरें तत्त्व आणि खरी साकारता प्रकट होईल; आणि त्याबरोबरच विश्वसत्याचें हें खरें तत्त्व आणि त्याची खरी साकारता परात्पर सर्वगामी सत्याचेंच तत्त्व आहे, आणि त्या सर्वगामी सत्याचीच साकारता आहे हें आम्हांला स्पष्टपणें कळून येईल.''

 

- श्रीअरविंद

 

 

 

अनुक्रमणिका

 

खंड दुसरा -- भाग पहिला

 

 

प्रकरण

 

पृष्ठ

निर्विशेष वस्तु, विश्वगत विशेष आणि अनिर्देश्य वस्तु

ब्रह्म, पुरुष, ईश्वर -- माया, प्रकृति, शक्ति

४९

ब्रह्म आणि जीव                

१२७

दिव्यत्व आणि अदिव्यत्व   

१७०

विश्वभ्रम : मन, स्वप्न व आभास

२१५

ब्रह्म आणि विश्वभ्रम

२५९

ज्ञान आणि अज्ञान

३३१

स्मृति, आत्म-जाणीव आणि अज्ञान

३६४

स्मृति, अहम् आणि आत्मानुभव

३८१

१०

अभेद-अधिष्ठित ज्ञान आणि भेद-अधिष्ठित ज्ञान  

४०३

११

अज्ञानाच्या सीमा   

४५४

१२

अज्ञानाचा उगम    

४७७

१३

जाणीवशक्तीची अनन्य एकाग्रता व अज्ञान

५०४

१४

असत्य, प्रमाद, अन्याय, आणि अमंगल (पाप) यांचे मूळव निराकरण

५३१

 

 

 

भाग पहिला

अनंत जाणीव आणि अज्ञान

 

 


 

प्रकरण पहिलें

निर्विशेष वस्तु, विश्वगत विशेष

आणि

अनिर्देश्य* वस्तु

 

जें दिसत नाहीं, ज्याच्याशीं कसलाहि व्यवहार करतां येत नाहीं, जें हातांनीं धरतां येत नाहीं, ज्याला कसलेंच चिन्ह नाहीं, ज्याचा विचार करतां येत नाहीं, ज्याला नांव देतां येत नाहीं -- एक 'आत्म्याचा प्रत्यय' हेंच ज्याचें सार आहे, ज्याचे ठिकाणीं प्रपंच शांत होतो, जें शांत आहे, शिव आहे, आनंद आहे -- तें आत्मतत्त्व होय. त्या आत्म्याचें ज्ञान करून घेतलें पाहिजे.

- मांडूक्य उपनिषद्

 

आश्चर्य (गूढ) म्हणून त्याजकडे कोणी पाहत बसतो, आश्चर्य म्हणून कोणी त्याचें वर्णन करतो, आश्चर्य म्हणून कोणी त्याचें वर्णन ऐकतो, -- कोणालाहि त्याचें ज्ञान होत नाहीं.

- गीता २-२९

 

जें कधींहिं बदलत नाहीं, अमुक म्हणून जें दाखवितां येत नाहीं, जें अव्यक्त आहे, जें सर्वव्यापी आहे, ज्याच्याविषयीं विचार करतां येत नाहीं, जें सर्वांत उंच असें शिखरस्थ आत्मतत्त्व आहे, जें हलत डोलत नाहीं, जें नित्य आहे, त्या तत्त्वाच्या शोधांत जे असतात, सर्वांशीं समचित्तानें वागतात, सर्वांचें कल्याण करण्यांत तत्पर असतात, असे साधक मजकडे येतात.

- गीता १२-३, ४

-------------------------

*अनिर्देश्य वस्तु = अज्ञेय विशेष किंवा असंभाव्य विशेष

पान क्र. १

 

बुद्धीच्या पलीकडे उंच स्थळीं महान् आत्मा आहे, त्याच्या पलीकडे अव्यक्त आहे, अव्यक्ताच्या पलीकडे जाणीवयुक्त पुरुष आहे -- या पुरुषापलीकडे कांहीं नाहीं; हा पुरुष हें अंतिमांत अंतिम तत्त्व आहे, हें अंतिम तत्त्व मानवाची सर्वश्रेष्ठ गति होय.

- कठ उप० ३-१०, ११

 

तो महात्मा दुर्लभ आहे, ज्याला सर्व वासुदेव, सर्व ईश्वरच असा अनुभव येतो.

- गीता ७-१९

 

सर्व विश्वांची निर्माणकर्त्री, निसर्गांत गुप्त राहून कार्य करणारी, अस्तित्व म्हणून जेवढें आहे तेवढ्या सर्व अस्तित्वाच्या पोटीं स्वभावत: असणारी, लपली असली तरी सारखी कर्मनिरत अशी वस्तु, म्हणजे (सच्चिदानंदाची) जाणीव-शक्ति होय. आमच्या भौतिक जगांत आणि आमच्या मानवी अस्तित्वांत या जाणिवेचीं दोन रूपें आहेत; ज्ञानशक्ति व अज्ञानशक्ति हीं तीं दोन रूपें होत. जें अस्तित्व अनंत आहे, आत्म-जाणीवयुक्त आहे, त्याची जाणीव अनंत असते, आणि या जाणिवेंत, तिच्या कार्याच्या प्रत्येक बारीक अंशांत देखील ज्ञान सर्वत्र प्रकटपणें कार्यकारी किंवा गुप्तपणें असलेंच पाहिजे; पण आमच्या भौतिक जगांत वस्तुजाताच्या आरंभस्थानीं निर्माणकर्त्या विश्वशक्तीचा, स्वभाव म्हणा किंवा पाया म्हणा, जो आम्हांला दिसत आहे तो म्हणजे अचेतनता किंवा सर्वांगी पूर्ण ज्ञानशून्यता हा होय. आमचें भौतिक जग हें, आपल्या पसाऱ्याचा आरंभ या अचेतनतेच्या सांठ्यापासून करतें. चेतन आणि ज्ञान अचेतनतेंतून प्रकट होतात, तीं अतिसूक्ष्म अतिदुर्गम हालचालींच्या रूपांत, बिंदू बिंदूत, अगदीं लहान कणांत प्रथम प्रकट होतात; या सूक्ष्म हालचाली, हे बिंदू, हे लहान कण एकत्र येऊन संघटित होतात; चेतना आणि ज्ञान यांचा विकास अगदीं हळूंहळूं आणि अनेक अडचणींना तोंड देऊन होत असतो; चेतनेच्या कार्याची साधनसामग्री हळूंहळूं वाढते, तिचें वाढतें संघटन होतें, तिची हळूंहळूं सुधारणा होते; ज्ञानशून्यतेच्या कोऱ्या पाटीवर याप्रमाणें, चेतनेच्या आणि ज्ञानाच्या अधिकाधिक लाभाचा हिशेब लिहिला जातो. ज्ञानाच्या शोधांत असलेल्या अज्ञानानें मिळविलेल्या गोष्टी आणि रचलेल्या रचना असें, या उपरिनिर्दिष्ट लाभांचें स्वरूप असतें; अज्ञान हें ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत असतें, समोर

पान क्र. २

 

दिसणाऱ्या घटना समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतें, कांहीं गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करीत असतें; हळूं हळूं स्वतांत बदल करून, धडपड करीत करीत स्वत: ज्ञान होण्याचा, ज्ञानांत स्वतांचें रूपांतर करण्याचा प्रयत्न करीत असतें. असें प्रयत्नशील अज्ञान, काही गोष्टी मिळवितें, कांहीं रचना करतें; त्या गोष्टी आणि त्या रचना ज्ञानशून्यतेच्या कोऱ्या पाटीवर क्रमाक्रमानें अधिकाधिक लिहिल्या जात असतात. या परिसरांत प्राण उदयास येतो व या परिसरांतच मृत्यूचा सार्वत्रिक अधिकार चालतो; अशा मृत्युमय परिसराच्या पायावर प्राण उभा राहतो, आपलें कार्य चालूं करतो व मोठ्या कष्टानें तें चालवितो; प्रथम हें प्राणाचें कार्य अगदीं सूक्ष्म बिन्दूंत सुरू होतें; प्राणाचीं सूक्ष्म रूपें, सूक्ष्म प्राणशक्तियुक्त प्राणरूपें प्रथम उदयास येतात; हीं रूपें एकत्र येऊन वाढतीं रूपें होतात; हीं वाढतीं प्राणशक्तियुक्त प्राणरूपें अधिकाधिक गुंतागुंतीचीं प्राणशरीरें, अधिकाधिक गुंतागुंतीची जीवनाची उपकरणसामग्री तयार करतात -- याप्रमाणें आपला संसार उभा करीत असतांना चेतना, जाणीव हीहि मूळ अचेतनेच्या अंध:कारांत, मूळ सार्वत्रिक अज्ञानाच्या काळोखांत आपला जम बसवूं लागते, आपला प्रकाश हलकें हलकें तेथें टाकून तो तेथें कायम राहील व वाढत राहील असा प्रयत्न करीत असते; अर्थात् जाणिवेच्या या आरंभींच्या धडपडी चालूं असतां, तिच्या प्रकाशांत निश्चिति असत नाहीं; तो सरळपणें कायम राहील, सरळपणें वाढेल अशी निश्चिति नसते.

अज्ञानाच्या व अचेतनतेच्या काळोखांत धडपडून, जाणीव जें ज्ञान आपल्या प्रकाशानें मिळवीत असतें तें ज्ञान, वस्तुजातातील सत्याचें ज्ञान असत नाहीं, अस्तित्वाच्या पायाभूत गोष्टींचें तें ज्ञान असत नाहीं; तर केवळ दृश्य वस्तूंचें व घटनांचें तें ज्ञान असतें. दृश्याच्या पाठीमागें शोध घेत असतां आमच्या जाणिवेला या दृश्याचा पाया म्हणून दिसणारी कांहीं वस्तु भेटली, तर ती वस्तु स्वच्छ कोऱ्या पाटी सारखी दिसते -- केव्हां केव्हां 'शून्य' असें हि त्या वस्तूचें स्वरूप भासते -- एकंदरींत या जाणिवेपुढें मूळ वस्तु-स्थिति, विशेषशून्य अशी उभी राहते, आणि या निर्विशेष मूळांतून निघालेल्या परिणामांचा पसारा मात्र खूप मोठा असा तिला दिसतो; हे परिणाम त्या मुळांतून स्वभावत: निघाले पाहिजेत -- ते तेथें गुप्त होते असें कांहीं जाणिवेला ज्ञान होत नाहीं;  मूळ जें दिसतें त्यांतून हे परिणाम तर्कत: निघू शकत नाहींत, तर्कत: स्पष्टपणें आवश्यक

पान क्र. ३

 

ठरत नाहींत; त्या मुळावर, त्या पायाभूत अस्तित्वावर रचनेचा, बांधणीचा डोलारा तर भव्य असतो -- पण मूळ पायाशीं या डोलाऱ्याचा कांहीं स्वाभाविक संबंध आहे असें स्पष्ट दिसत नाहीं. विश्वाच्या अस्तित्वाचें आरंभींचें स्वरूप म्हणजे एक अनंत वस्तु होय. आमच्या मानसिक ग्रहणशक्तीला ती निर्विशेष, अलक्षण अशीच भासते; तिच्यांत विशेष दाखवितां येणारच नाहीत व तिचें लक्षण करतां येणारच नाहीं असें म्हणतां न आलें, तरी आमच्या मनाला ती दिसते निर्विशेष, अलक्षण; अशी ही वस्तुस्थिति आहे. या अनंताचे ठिकाणीं विश्व जें दिसतें तें शक्तीच्या दृष्टीनें किंवा रचनेच्या दृष्टीनें निर्विशेषस्वरूप विशेष आहे, असीम अशी सीमित वस्तु आहे असें म्हणणें प्राप्त आहे. हें विश्वाचें वर्णन विरोधाभासात्मक आहे; परंतु हेंच खरें वर्णन आहे; या वर्णनांतील अन्योन्यविरोधी शब्द अपरिहार्य आहेत : या अपरिहार्य विरोधाभासात्मक वर्णनावरून एवढें स्पष्ट होतें कीं, विश्वाच्या मुळाशीं, आम्हांला बुद्धिगम्य अशी वस्तु भेटत नाहीं, तर बुद्धीच्या ग्रहणापलीकडे असलेली एक गूढ वस्तु भेटते, एक रहस्यमय वस्तु भेटते. या असीम सीमित व निर्विशेष विशेषरूप विश्वांत -- सामान्य आणि विशिष्ट अशा -- सविशेष, सलक्षण वस्तु फार मोठ्या संख्येनें व फार मोठ्या विविधतेच्या अशा कोठून तरी येऊन उभ्या राहतात. मूळ अनंत अशा वस्तूच्या स्वभावांत असें कांहीं दिसत नाहीं कीं या सविशेष वस्तु त्यांतून सहजगत्या निघाव्या; या वस्तू त्या मूळ वस्तूवर लादल्या गेल्यासारख्या दिसतात; त्या वस्तूनें स्वतःच या वस्तु स्वतःवर लहरीनें लादून घेतल्या असतील असेंहि म्हणतां येतें; या विशेष वस्तू निर्माण करणाऱ्या शक्तीला आम्ही प्रकृति असें नांव देतो, निसर्ग असें नांव देतो; पण या नांवानें कांहीं विशेष बोध होतो असें नाहीं -- बोध झाला तर एवढाच होतो कीं, वस्तुजाताची प्रकृति, निसर्ग ज्या स्वरूपाचा आपणांस दिसतो, त्या स्वरूपाचा दिसण्याचें कारण एक विशिष्ट शक्ति आहे -- अशी शक्ति कीं जी वस्तुजाताच्या पोटीं असलेल्या गूढ स्वभावगत सत्याच्या अनुरोधानें वस्तूंची व्यवस्था लावते; पण हें जें गूढ सत्य, त्याचा स्वभाव कांहीं आपणांस स्पष्ट होत नाहीं; या सविशेष वस्तू आहेत तशा त्या कां आहेत ? ही गोष्ट कोठेंहि स्पष्ट होत नाहीं. मानवानें जें भौतिक शास्त्र निर्माण केलें आहे, त्या शास्त्रानें भौतिक वस्तुविषयक अनेक प्रक्रिया शोधून काढल्या आहेत; परंतु हें ज्ञान मूळ मुख्य प्रश्नावर कांहींएक प्रकाश पाडीत नाहीं; मूळ विश्व-

पान क्र. ४

 

विषयक प्रक्रियांची तार्किक उपपत्ति, मूलभूत बुद्धिगम्य कारणपरंपरा, आज उपलब्ध झालेल्या भौतिक ज्ञानानें कांहीं आम्हांला मिळत नाहीं; या प्रक्रियांचीं फलें जीं आमच्यापुढें आहेत, तीं त्या प्रक्रियांतून तार्किक आवश्यकतेनुसार निघालीं आहेत, असें कांहीं सिद्ध होत नाहीं -- तीं फलें निघालीं आहेत खरीं; त्या प्रक्रियांचा व्यावहारिक वास्तव परिणाम या फलांच्या रूपानें आमच्यापुढें उभा राहतो खरा, एवढेंच आम्हांला म्हणतां येतें. तेव्हां शेवटीं असें कबूल करावें लागतें कीं, मूळ वस्तु ही निर्विशेष व अलक्षण आहे म्हणा, किंवा अनिर्देश्य, जिचें लक्षण करतां येणार नाहीं अशी आहे म्हणा - या मूळ वस्तूमध्यें किंवा या वस्तूमधून, आम्ही पाहतों त्या सविशेष, सलक्षण, निर्देशसुलभ वस्तू कशा आल्या तें आम्हांला कळत नाहीं; या वस्तू तर अगदीं व्यवस्थित क्रमवार येतात आणि जेथें व जेथून येतात असें दिसतें तें स्थान तर कोऱ्या सपाट पाटीसारखें आहे -- तेव्हां हें सर्वच एक मोठें कोडें आहे : वस्तुजाताच्या मुळाशीं, आमच्या समोर एक अनंत वस्तु उभी राहते, आणि त्या अनंत वस्तूच्या क्षेत्रांत आकस्मिक अकारण अशा अनंत सांत वस्तूंचा ढिगारा आम्हांला दिसतो; ही मूळ वस्तु जशी अनंत, तशी अविभाज्य आणि अक्षर (बदल न होणारी) असते -- पण तिच्यांत अनंत विभाग पडलेले, अनंत बदल निर्माण झालेले किंवा विशेष निर्माण झालेले आम्हांला दिसतात; वस्तुजाताच्या मुळाशीं विश्वविषयक विरोधाभास आहे, दर्शनी अनुपपन्न व अबुद्धिगम्य अशी विश्वविषयक वस्तुस्थिति आहे; या दर्शनी विरोधाची, अनुपपन्नतेची, अ-बुद्धिगम्यतेची गुरूकिल्ली (समाधानकारक उपपत्ति) आम्हांला उपलब्ध नाहीं.

असें म्हणतां येईल कीं, अगोदर अनंत अशी वस्तु आहे आणि तिच्या पोटीं आमचें साकार व्यवस्थित विश्व उभें राहिलें आहे अशी कल्पना करण्याची उठाठेव कशाला ? एक अनंत वस्तु मुळाशीं आहे, ही कल्पनाच करणें नको. कारण अशा कल्पनेची कांहीं आवश्यकता दिसत नाहीं. हा पक्ष संभवनीय आहे, विचारार्ह आहे. प्रथम हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, मूळ पायाभूत अनंत वस्तूची कल्पना केल्याशिवाय आमचें मन त्याचें स्वतःचें कार्य, त्याच्या विशिष्ट कल्पना उभारण्याचें कार्य करूं शकत नाहीं; मर्यादित स्थलाची किंवा अवकाशाची, मर्यादित कालाची, मर्यादित अस्तित्वाची (सारभूत अस्तित्वाची) कल्पना मनाला करावयाची असते -- पण या मर्यादित स्थल-काल-अस्तित्वापलीकडे, त्याच्या पूर्वीं व त्याच्यानंतर कांहीं नाहीं अशी कल्पना मन करूं शकत नाहीं --

पान क्र. ५

 

म्हणून मन अनंत अस्तित्व, अनंत काल व अनंत स्थल (अवकाश, आकाश) या कल्पना मूलभूत धरून, नंतर त्यांच्या आधारावर मर्यादित स्थलादिकांची कल्पना करतें; अशा मूळ अनंताच्या ऐवजीं मूळ शून्याची, मूळ शुद्ध पोकळीची कल्पना गृहीत केली, तर तिचा अर्थ इतकाच होतो कीं, अनंताच्या खोल दरींत डोकावण्याचें आम्ही टाळीत आहों; अनंत गूढ वस्तु (क्ष) गृहीत करण्याच्याऐवजीं (त्या दरींत डोकावण्याचें टाळून) अनंत गूढ शून्य किंवा अभाव गृहीत धरून आम्ही त्या पायावर, आम्हांला जें अस्तित्व दिसतें तें उभें करीत आहों. तेव्हां अनंत हें असें न टळणारें गूढ आहे, तथापि हें अनंत आम्हीं टाळलें, या अनंताचें सत्यत्व बाजूला ठेवलें आणि भौतिक विश्व हेंच सत्य मानलें आणि हें भौतिक विश्व सांत असलें तरी तें सारखें विस्तार पावत आहे व हा विस्तार अनंत असणार -- या भौतिक अनंत विस्तारशील सांत विश्वांत सविशेष वस्तूंचा अफाट अनंत पसारा उभा राहणार -- हें सत्य मानलें, तरी या सत्यांत गूढता पूर्वींइतकीच राहते. अनंत अस्तित्व, अनंत अभाव (शून्य), अनंत सांत (विश्व) यांपैकीं कोणतीहि कल्पना घेतली, तरी ती निर्विशेष किंवा अज्ञेयविशेष (अनिर्देश्य) अशा मूळ वस्तूची कल्पना आहे हें उघड आहे; या कल्पित वस्तूंपैकीं कोणत्याहि वस्तूचे ठिकाणीं, स्पष्ट विशेष किंवा लक्षण आम्ही कल्पूं शकत नाहीं; या मूळ वस्तूमध्यें किंवा तिजमधून जे अनंत विशेष उभे राहतात ते तिच्या अमुक लक्षणापासून व तर्कशुद्ध अमुक प्रक्रियेनें उभे राहतात, असें कांहीं आम्ही म्हणूं शकत नाहीं. विश्वाचें पायाभूत मूळ स्वरूप, अवकाश (आकाश) आहे, काल आहे, किंवा आकाश-काल आहे असें म्हटल्यानेंहि आम्हांला कांहीं मदत होत नाहीं; एकतर, काल स्थल या कल्पना म्हणजे आमच्या बुद्धीनें निर्माण केलेले भाव आहेत, वस्तू नाहींत; या आमच्या बुद्धिनिर्मित कल्पना आम्ही विश्वावर लादीत असतो, विश्वाचें चित्र आमचें मन उभें करीत असतां त्याला या कल्पनांचें साह्य घेणें भागच पडतें; दुसरी गोष्ट काल, स्थल किंवा काल-स्थल हे काल्पनिक भाव न मानले, तरी या गोष्टी वस्तुत: निर्विशेष वस्तू आहेत, आणि या वस्तूंच्या पोटीं जे विशेष उभे राहिलेले दिसतात, त्या विशेषांना मूळ काय, याचें सोपपत्तिक स्पष्टीकरण या वस्तूंच्या स्वभावांत नाहीं, विश्वांत वस्तू ज्या विशेषयुक्त होतात, त्या तशा होण्याची जी अद्‌भुत प्रक्रिया ती स्पष्ट करणारे कांहींहि आमच्या बुद्धीला अद्यापि सांपडलेलें नाहीं; अर्थात् वस्तूंच्या शक्ती व

पान क्र. ६

 

त्यांचे गुणधर्म यांचें स्पष्टीकरण सांपडत नाहीं; या वस्तूंचा खरा स्वभावधर्म, त्यांचें खरें मूळ, त्यांचा खरा हेतु यांसंबंधीं कांहींहि स्पष्टीकरण आम्हांस मिळत नाहीं.

हें अनंत, निर्विशेष अस्तित्व आमच्या आधुनिक भौतिक शास्त्राला शक्तीच्या स्वरूपांत दिसतें; ही शक्ति अर्थात् स्वत: स्वस्वरूपानें ज्ञात नाहीं, तर ती जीं कार्यें घडवून आणते त्या कार्यांच्या द्वारां ती कळते; ही शक्ति गति-लहरी उठविते, सामर्थ्य-लहरी प्रसृत करते, आणि या लहरींच्या पोटीं सूक्ष्म द्रव्यकणांचा पसारा निर्माण करते; हे सूक्ष्म कण संघटित होऊन मोठे कण निर्माण करतात; शक्तिमूलक सर्व रचनांचा पाया या कणांत व कणांच्या गणांत असतो; भौतिक पायापासून दूर, अति दूर असलेल्या रचनांचा देखील मूलाधार हेंच कण असतात. या शक्तिनिर्मित मूलकणांपासून संघटित जडद्रव्याचें विश्व निघते, त्यापासून प्राणाचा उदय होतो, जाणीवहि त्यांतच उदयास येते; विकासशील निसर्गाच्या, अद्यापि आम्हांला न समजणाऱ्या क्रियांची उत्पत्ति देखील या कणांतूनच होते. मूळची जी कोणती (गूढ) प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेवर, असंख्य प्रक्रिया उभ्या केल्या गेल्या आहेत; या प्रक्रिया आम्हांला दिसतात, त्यांचें निरीक्षण परीक्षण करतां येतें, त्यांचा उपयोग करून आमचीं इष्ट फलें उभीं करतां येतात; परंतु या प्रक्रियांचें मूळ आमच्या बुद्धीला स्पष्ट होत नाहीं. विजेची गोष्ट घ्या. विजेचे कण आणि रासायनिक मूलतत्वांचे कण यांचा संबंध आहे : एक रासायनिक मूलतत्त्वाचा कण निर्माण होण्यास कणांचा, विशिष्ट कणव्यवस्थेचा व विशिष्ट कणसंख्येचा गण लागतो; दुसरें मूलतत्त्व होण्यास, दुसरी कणसंख्या व कणव्यवस्था असलेला गण लागतो -- या रासायनिक मूलतत्त्वांचे गुण, स्वभाव, सामर्थ्यें निरनिराळीं असतात; हें सर्व घडलेलें आम्ही पाहतों, पण आम्हांला हें समजत नाहीं व शोधून सांपडत नाहीं कीं, विद्युत्-कण-व्यवस्था निराळी झाली कीं निराळें रासायनिक मूलतत्त्व उत्पन्न होतें तें कां

? आतां रासायनिक मूलतत्त्वांची गोष्ट घ्या. या अदृश्य रासायनिक कणांचे कांहीं विशिष्ट संयोग हें, असें कांहीं दृश्य व नवे विशेष उत्पन्न करतात, कीं त्यांचा स्वभावधर्म, गुण, सामर्थ्य हें घटकभूत अदृश्य रासायनिक कणांच्या गुणादिकांहून अगदीं निराळें असतें. पण हें असें घडतें तें कां ? हें आम्हांला शोधूनहि सांपडत नाहीं : ऑक्सिजन, हायड्रोजन एका विशिष्ट प्रमाणांत एक केले कीं पाणी तयार

पान क्र. ७

 

होतें -- पाणी हें वायुमिश्रण आणि अधिक आणखी कांहीं, असें आहे. पाणी ही नवी रचना आहे, नवा पदार्थ आहे, नव्या गुणांची भौतिक व्यक्त वस्तु आहे; ही अशी वस्तु अशा संयोगानें उत्पन्न होते ती कां उत्पन्न होतें हें आम्हांला शोधूनहि सांपडत नाहीं. तिसरें उदाहरण बीज आणि वृक्ष यांचें घ्या. बीजाचा वृक्ष होतो हें आपण पाहतों, तो बीजांतून कसा निघतो व वाढतो तें आपण पाहूं शकतों, आणि या ज्ञानाचा आपण उपयोगहि करूं शकतो; पण बीजांतून वृक्ष निघावाच कां ? हें आम्हांला शोधून सांपडत नाहीं; बीजाच्या द्रव्यांत किंवा शक्तींत वृक्षाचा आकार आणि जीवन गुप्त राहतें तें कसें राहतें, बीज वाढत वाढत वृक्ष कां होऊं शकतें, तें आम्हांला शोधूनहि सांपडत नाहीं. चौथें उदाहरण आनुवंशिक गुणांचें : स्त्रीबीजांतील, पूबीजांतील गुणधारक सूक्ष्म बीजकण (Genes) आणि वरील गुणधारक जीवबीजकणघटित सूत्रे, Chromosoms हीं गुणांच्या आनुवंशिकतेला कारण असतात; केवळ शारीरिकच नव्हेत, तर मानसिक भेद देखील वरील भौतिक वस्तूंच्या संख्येवर व व्यवस्थेवर अवलंबून असून, त्यांच्या द्वारां पितरांकडून ते अपत्यांना प्राप्त होतात असें जीवशास्त्रज्ञ म्हणतात -- पण आम्हांला हें शोधूनहि सांपडत नाहीं कीं, अचेतन भौतिक वस्तूच्या द्वारां मानसिक गुण कां आनुवंशिक व्हावेत ? या भौतिक अचेतन वस्तूंत मानसिक गुण राहतात तरी कां ? व कसे ? याचा शोध आम्हांला लागत नाहीं. पांचवें उदाहरण उच्च वाङ्मयाचें व विचाराचें : निसर्गाच्या प्रक्रियेचें निर्दोष अचूक वर्णन म्हणून आम्हांला असें सांगण्यांत येतें कीं, विजेचे कण, रासायनिक कण, कणांचे गण, पेशी, ग्रंथि, रासायनिक रसोत्सर्ग, जीवनप्रक्रिया यांची संयुक्त क्रिया शेक्सपिअर, प्लेटो यांच्या नाडीसंघावर व मेंदूवर होऊन तींतून किंवा तिच्या निमित्तानें हॅम्लेट किंवा सिम्पॉझिअम् किंवा रिपब्लिक निर्माण होतें किंवा होऊं शकतें -- पण आम्हांला हें समजत नाहीं व शोधूनहि कळत नाहीं कीं, वरील भौतिक क्रिया ह्या वाङ्मयाचें, विचाराचें वरील सर्वश्रेष्ठ लिखाण कशा करूं शकल्या असतील ? अशा लिखाणाला त्या कशा प्रेरक (आवश्यक निमित्त) होऊं शकल्या असतील ? या ठिकाणीं कारण आणि कार्य, हेतु आणि फल, निमित्त आणि घटना या दोहोंमध्यें एवढी मोठी दरी आहे कीं वैज्ञानिकांनीं गृहीत धरलेल्या कारणांतून, आम्हांला व त्यांना सर्वांनाच मान्य असलेलें कार्य त्यांनीं सांगितल्याप्रमाणें ज्या प्रक्रियेनें घडून येतें ती

पान क्र. ८

 

आम्हांला समजत नाहीं; अर्थात् ती प्रक्रिया आम्हांला कामीं लावतां येत नाहीं. नवीन भौतिक शास्त्राचीं हीं सूत्रें व्यवहारदृष्टीनें बरोबर असतील, बिनचूक असतील; निसर्गाच्या प्रक्रियांची परिणाम आणणारी रीति, हीं सूत्रें निश्चित करीत असतील; परंतु मुळांतच हें कसें घडतें, कां घडतें ही गोष्ट, त्यांचीं सूत्रें स्पष्ट करूं शकत नाहींत; जादुगार जादूचा मंत्र म्हणतो आणि विवक्षित घटना घडवितो तसा या सूत्रांचा प्रकार दिसतो; विश्वकर्त्या जादुगाराच्या मंत्रांसारखी हीं सूत्रें आहेत; प्रत्येक सूत्र त्याच्या क्षेत्रांत अचूक काम करणारें, कोणत्याहि अडचणीला न जुमानतां काम करणारें, स्वयंगतीनें यशस्वी होणारें असें असतें -- पण या सर्व सूत्रांमध्यें अशी गोम आहे कीं, त्यांचा आणि मूळ वस्तुस्थितीचा, आमच्या बुद्धीला उमगेल असा, संबंध वैज्ञानिक सांगूं शकत नाहींत; त्या सूत्रांचें तार्किक विवरण मूलत: अ-बुद्धिगम्य किंवा तर्कदुष्ट असतें.

आम्हांला गोंधळांत टाकणाऱ्या आणखीहि गोष्टी आहेत; मूळ निर्विशेष शक्ति आपल्यांतून सामान्य सविशेष वस्तू उभ्या करते -- या सविशेष वस्तू, ज्या विविध वस्तू स्वतांतून निर्माण करतात त्यांच्या दृष्टीनें या सविशेषांनांहि निर्विशेष (सामान्य निर्विशेष) वस्तू म्हणतां येईल -- निर्विशेष मूळ शक्तींतून निघालेल्या सविशेष वस्तू तपासल्या, तर शक्तिमय द्रव्याच्या वस्तुगणिक अनुरूप अवस्था आपल्याला दिसतात, तसेंच त्या द्रव्याचे वस्तुगणिक निश्चित नियत आकारहि आपल्याला दिसतात; हे आकार संख्येनें पुष्कळ असतात, केव्हां केव्हां विविध प्रकारचे असंख्य आकार मूळ द्रव्यशक्तीच्या आधारावर उभे राहिलेले आपणांस आढळतात; परंतु गोष्ट ध्यानांत घ्यावयाची ती ही कीं सामान्य निर्विशेष वस्तु जी या विविध आकारांचा पाया व मूलाधार असते, तिच्या स्वभावांत असें कांहीं दिसत नाहीं कीं, ज्यांतून या विविध आकारांपैकीं कोणताहि आकार तर्कदृष्टीनें आवश्यक म्हणून उदयास यावा, उत्पन्न व्हावा. विद्युत्‌शक्ति घ्या; ही धनाकार, ऋणाकार आणि अनियताकार अशीं आपलीं तीन रूपें व्यक्त करते; यापैकीं प्रत्येक रूप लहरींचा आणि कणांचा आकार धरून असतें; शक्तिद्रव्याची वायुरूप अवस्था घ्या; हें वायुरूप शक्तिद्रव्य अनेक भिन्न भिन्न वायू उत्पन्न करतें; धनावस्थेंतील शक्तिद्रव्य घ्या; यांतून पृथ्वीतत्त्व निघतें, यांतून जमिनीचे, खडकाचे विविध प्रकार, धातू आणि खनिज पदार्थांचे विविध प्रकार क्रमाक्रमानें

पान क्र. ९

 

तयार होतात; प्राणतत्त्व घ्या; यांतून वनस्पतिसृष्टि निर्माण होते : लता, वृक्ष, फळें, फुलें यांचा असंख्य आणि विविध प्रकारचा पसारा या वनस्पतिसृष्टींत असतो; प्राणिजीवनाचें तत्त्व घ्या; यांतून अगणित विविध जातीचे, पोटजातीचे जीव उत्पन्न होतात; व्यक्तीव्यक्तींत अनंत भेद यांतून उत्पन्न होतात; एकरूप वस्तूंतून विविध रूप निघण्याची हीच गोष्ट पुढें मानवी जीवन, मानवी मन, मानवी मनाचे नमुने यांच्या बाबतींत आपल्या नजरेस येते; विकासक्रमाचें अद्यापि न लिहिलेलें, न संपलेलें, अद्यापि गुप्त असलेलें प्रकरण, मानवी मनाहून वरच्या पायऱ्यांवरील वस्तूंच्या बाबतींत एकरूपाचीं असंख्य विविधरूपें नोंदणारें असेंच असणार असें म्हणावयास हरकत नाहीं. सर्वत्र एक नियम आमच्या नजरेस येतो तो हा कीं, मूळ सविशेष वस्तु सामान्यत: एकरूप असते, -- द्रव्यदृष्टीनें, गुणधर्माच्या दृष्टीनें एकरूप अशी असते आणि हिच्यांतून प्रचंड विविधता निर्माण होते; या मूळ सविशेष वस्तूंतून सविशेष जाती निर्माण होतात, सविशेष व्यक्ती निर्माण होतात आणि या जातींत व व्यक्तींत विविधता पहावी तर ती अमाप असते; जात किंवा पोटजात घेतली आणि तींतून निघणाऱ्या व्यक्तींच्या विविधतेकडे व त्यांच्या विविध गुणांकडे लक्ष दिलें, तर तेथेंहि -- मूळ वस्तु सामान्यत: एकरूप असावयाची आणि तींतून निघणाऱ्या असंख्य वस्तू विविध रूपांच्या असावयाच्या -- असाच नियम दृष्टोत्पत्तीस येतो. पण पायाभूत सामान्य सविशेष वस्तूंत असें कांहीं आम्हांस दिसत नाहीं कीं, ज्यातून विविध विशेष स्वभावत: उत्पन्न व्हावेत. पायाभूत वस्तूंत अपरिवर्तनीय अटळ एकरसता आणि स्पष्टीकरण देतां न येण्यासारखी वरती अनाकलनीय स्वैर विविधता असावयाची असा नियम सर्वत्र दिसतो; पण ही अटळ एकरूपता आणि  ही विशेषनिर्मिति करणारा कोण आहे, करणारें काय आहे ? हे विशेष, एकरूपाचे ठिकाणीं निर्माण होण्याचें, बुद्धीला पटण्यासारखें कारण कोणते ? या विशेषनिर्मितीच्या पोटीं मूळ सत्य कोणतें आहे ? या विशेषनिर्मितीचा मूळ अर्थ, मूळ हेतु काय आहे ? इतकी विविध प्रकारची शक्यता या निर्मितींत येते ती कशाच्या प्रेरणेनें ? कोणाच्या इच्छेनें ? या विविधतेचा उद्देश काय ? निर्मितीचा आनंद, सौंदर्यनिर्मितीचा आनंद, हा एक हेतु विविधतेच्या पोटीं असूं शकतो, हा एक हेतु दिसतो, दुसरा कांहीं हेतु दिसत नाहीं, कल्पितां येत नाहीं : कदाचित् या विविध निर्मितीच्या मुळाशी एखादें मन, शोधक जिज्ञासु नव-निर्माणकुशल असा एखादा

पान क्र. १०

 

विचार, गुप्त इच्छाशक्ति, नियोजक गुप्त अशी एखादी इच्छाशक्ति, असूं शकेल -- परंतु भौतिक निसर्गाचें जें पहिलें पायाभूत दृश्य स्वरूप, त्या स्वरूपाचे ठिकाणीं अशा मनाचा, विचाराचा, इच्छाशक्तीचा कांहीं मागमूस लागत नाहीं.

आमच्यासमोर घडणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचें पहिलें स्पष्टीकरण असें संभवतें कीं, स्वयंचालित स्वयंसंघटित लहरी संभव, निसर्ग घटनांच्या मुळाशीं असावा; हें स्पष्टीकरण विरोधाभासात्मक आहे -- तरीपण निसर्गांत, दृश्य विश्वांत एका बाजूला अटळ व्यवस्था व दुसऱ्या बाजूला अगम्य लहर आमच्या नजरेस येत असल्यानें, वरील विरोधाभासात्मक स्पष्टीकरण प्रथम आम्हांला सुचतें : अचेतन अव्यवस्थित शक्ति कशातरी क्रिया करते, आणि या अव्यवस्थित क्रियांतून संभवाच्या अनिश्चिततेनुसार हें किंवा तें कांहींतरी उत्पन्न होतें; निश्चित निर्मिति करणारें कोणतेंहि व्यवस्थित तत्त्व या ''कांहींतरी'' उत्पन्न होण्याच्या बुडाशीं नसतें; या विश्वांत विशिष्ट निश्चित वस्तू दिसण्याचें कारण, पुन: पुन: एखादी क्रिया होत राहणें हें आहे -- एखाद्या क्रियेचे, कांहीं क्रियांचे पौन:पुन्य, हे साहजिकपणेंच विशिष्ट वस्तु आकारास आणतें : निसर्गाची शक्ति ही अशी, अचेतन आणि अव्यवस्थित आहे. या कल्पनेंत ही गोष्ट गृहीत धरणें भाग होतें कीं, विश्वाच्या मूळ ठिकाणीं अनंत शक्यता सांठवलेली आहे, तेथें जणों अनंत शक्यता भरलेली गर्भाची पिशवी आहे आणि मूळ शक्ति या गर्भांतील शक्यता कशातरी व्यक्त करण्याचें काम करीत असते; विश्वाच्या मुळांत अचेतन अनाकलनीय वस्तु आहे, तिला अस्तित्व वस्तु म्हणावें कीं नास्तित्व अवस्तु म्हणावें हे नीट उमजत नाहीं -- मात्र कांहींतरी -- मग त्याला कोणतेंहि नांव द्या -- मुळांत असल्याशिवाय शक्ति, तिचें उभें राहणें आणि कार्य करणें या सगळ्या क्रमाला कांहीं अर्थ रहात नाहीं. ही लहरी संभवाच्या उपपत्तीची गोष्ट झाली. मूळ-शक्ति कांहींतरी हालचाल करते आणि तींतून कांहीं अव्यवस्थित डोलारा उभा राहिला तरी कांहीं व्यवस्थित टिकाऊ इमारतहि कशीतरी उभी राहते, ही जी लहरी संभवाची उपपत्ति, ती बरोबर नाहीं असें दाखविणारी विश्वव्यवहाराची दुसरी बाजू आपणांस ठाऊक आहे. व्यवस्था, क्रम यावर निसर्गांत फार जोर दिलेला आढळतो; कोणत्या संभवनीय गोष्टी कोणत्या क्रमानें व्यक्त व्हाव्या यासंबंधीं विशिष्ट नियमावर, कायद्यावर, निसर्ग फार भर देतो असें आपल्या नजरेस येतें. यावरून आपण असें गृहीत

पान क्र. ११

 

धरूं शकतों कीं, वस्तुजाताच्या पोटीं कांहीं आंतरिक सत्य आहे, शासन करणारें सत्य आहे; हें सत्य आपल्याला दिसत नाहीं; पण अनेक प्रकारें व्यक्त होण्याचें सामर्थ्य या सत्यांत आहे; तें आपणामधून आपलीं अनंत शक्य रूपें, भिन्न भिन्न रूपें अभिव्यक्तीसाठीं पुढें करतें आणि मग निर्माणशक्ति आपल्या क्रियेनें अव्यक्त सत्य-रूपांना व्यक्त स्वरूप देते. ही वस्तुस्थिति, लहरी संभवाची उपपत्ति सोडून दुसरी यांत्रिक अनिवार्यतेची उपपत्ति अधिक ग्राह्य म्हणून आमच्या पुढें ठेवते. निसर्गांमध्यें अनेक यांत्रिक नियम आहेत, ते अशा मूळ अनिवार्य यांत्रिकतेचे साक्षीदार समजतां येतील; वस्तुजाताच्या पोटीं गुप्त आंतरिक वस्तुसत्य आहे आणि विश्वांत चालणाऱ्या प्रक्रिया अनिवार्यपणें स्वयंचालित होतील अशी व्यवस्था तें आपोआप करीत आहे, अशी ही यांत्रिक उपपत्ति आहे. परंतु ही दुसरी उपपत्तीहि निसर्गांत घडणाऱ्या गोष्टींचें पुरें स्पष्टीकरण देण्यास अपुरी पडते, विकासशील निसर्गांत भेदांचा अमर्याद, अनाकलनीय व स्वैर खेळ चालला आहे -- त्यांत यांत्रिक अनिवार्यता शुद्ध स्वरूपांत दिसत नाहीं -- या अनिवार्य अभिव्यक्ति-क्रमाच्या पाठीमागें, किंवा या क्रमाच्या अंतरंगांत दोन कायद्यांचा सहयोग अर्थातच असला पाहिजे असें दिसतें; एकतेचा, एकरूपतेचा कायदा आणि त्याचा दुय्यम सहयोगी असा अनेकतेचा, अनेकरूपतेचा कायदा, हे दोनहि कायदे अनिवार्यतेच्या पोटीं किंवा पाठीमागें शासन करीत असून, दोनहि कायदे अभिव्यक्तीच्या कार्यक्रमांत अनिवार्यपणें सहयोगी असतात. पण एकता कशाची ? अनेकता कशाची ? या प्रश्नांचें उत्तर यांत्रिक अनिवार्यतेची उपपत्ति देऊं शकत नाहीं. यानंतर जाणिवेचा उदय अचेतनांत झाल्यानें आणखी एक अडचण उभी राहाते; यांत्रिक निश्चेतनांत चेतना कां व कशी उत्पन्न होते, हें यांत्रिक जड अनिवार्यतेची उपपत्ति सांगू शकत नाहीं. जाणिवेच्या अचेतनांतील उदयाला ही अनिवार्यतेची उपपत्ति लागू करावयाची असेल, तर असें म्हणावें लागेल कीं, अचेतनांत जाणीव गुप्त, तिरोहित होती; ती विकासाची वाट पाहत होती; व विकासक्रमाच्या शर्तीनुसार जाणिवेच्या उदयाची सर्व तयारी झाल्याबरोबर ती अचेतनाच्या पोटांतून, अचेतनाच्या बंदिवासांतून अनिवार्यपणें बाहेर आली आणि आपलें काम करूं लागली. आतां अशी कल्पना आपल्याला करतां येण्यासारखी आहे कीं, वस्तुजाताच्या व्यवहारांत यांत्रिक आवश्यकतेची हुकमत खरोखरी नाहीं; आमची कल्पनाच निसर्गांत नियतीचें राज्य (यांत्रिक अपरिहार्यतेचें राज्य)

पान क्र. १२

 

असल्याचें कल्पिते : वस्तुत: निसर्गांत विशिष्ट शक्ति आपल्या लहरीप्रमाणें प्रयोग करीत बसली आहे आणि या लहरी शक्तीचें, सूक्ष्म द्रव्यकणावर पुन:पुन्हा सारखेंच घडणारें कार्य, निरनिराळे निश्चित विशेष निसर्गांत उत्पन्न करते -- अशी कल्पना आम्ही करूं शकतो; पण अशी कल्पना करणें म्हणजे आमच्या अस्तित्वाच्या पायाच्या संबंधींच्या, अपरिहार्य यांत्रिकतेच्या उपपत्तीला सोडून, पुन्हां परत लहरी संभवाची उपपत्ति मान्य करण्यासारखेच आहे; आणि शिवाय असें केल्यानें मन, जाणीव यांच्या अचेतनांतील उदयाचा प्रश्न सुटत नाहींच -- तो आणखीच अवघड होऊन बसतो. जड शक्तीनें ही जाणीव लहरीनें उत्पन्न केली -- जड शक्तीच्या प्रयोगांत लहरी संभवानें ही जाणीव उत्पन्न झाली आणि ती मूलभूत अचेतनतेंतून उत्पन्न झाली -- हा पक्ष समर्थन करावयास फार अवघड आहे; या पक्षाचें जें समर्थन आतांपर्यंत आमच्यासमोर आलें आहे, तें या पक्षाला आमची मान्यता मिळविण्यास सर्वस्वीं असमर्थ आहे. या पक्षांत दोन महान् विरोध एकदमच आमच्या बुद्धीला अगतिक करतात. मुळांत पाया आहे अचेतनतेचा, जाणीवशून्यतेचा आणि या जाणीवशून्य जडांतून जाणीव उदयास येते असें हा पक्ष सांगतो; हा एक महान् 'मुळाचा-फळाचा' विरोध; आणि विश्वनिर्माण झालें तें अचेतन व जड अशा आकस्मिकतेनें, संभव-लहरीनें; आणि या विश्वाचें भव्य अंतिम फळ काय, तर व्यवस्था, क्रमशीलता, तर्कप्रियता, तर्कशुद्ध विचारशीलता यांनीं संपन्न असें मन; हा एक दुसरा 'मुळाचा-फळाचा' महान् विरोध. या दोन महान् विरोधांच्या एककालीन आघातामुळें आमची बुद्धि हतबल होऊन, या विरोधांना लीलेनें डोक्यावर घेणाऱ्या पक्षाला मान्यता देण्यास असमर्थ होते.

विश्वाच्या उत्पत्तीसंबंधानें 'अनियत संभव' (यदृच्छा) आणि 'यांत्रिक नियति' या उपपत्ती मागें टाकणें आवश्यक झाल्यावर आतां, 'जाणीव ही विश्वाची जननी आहे, मूळ दर्शनी अचेतनांतून जाणीव विश्वाची निर्मिति करते', ही उपपत्ति पुढें आणणें शक्य होतें. मन, इच्छा यांनीं कल्पनाचित्रें काढून हें विश्व संघटित केलें आहे, आणि या विश्वाच्या, स्वतः केलेल्या निर्मितीच्या मागें, तें मन, ती इच्छा लपून राहिली आहे असें दिसतें; अचेतनशक्ति आणि भौतिक द्रव्य (भौतिक रूपांतील द्रव्य, द्रव्याचें भौतिक रूप) हा पडदा मनानें, इच्छेनें प्रथम निर्माण केला; या पडद्यानें, मनाला, इच्छेला स्वतःला लपवितां येतें; स्वतःचे रूप

पान क्र. १३

 

लपविणारें एक सोंग म्हणून हा अचेतनशक्तीचा, भौतिक द्रव्याचा पडदा मनाला, इच्छेला उपयोगी पडतो; याशिवाय याचा दुसराहि एक उपयोग आहे, तो हा कीं, मन, इच्छा यांना आपली नियोजित निर्मिति करावयास जो कच्चा माल लागतो, त्या कच्च्या मालाचें काम हा पडदा करतो; हा पडदा लवचीक, मऊ, वाटेल तो आकार घेण्यासारखा असा बनविलेला असतो; आकार, नमुने तयार करतांना तक्रार न करणारा, सर्व आघातांना निमुटपणें सोसून कारागिराला पाहिजे तो आकार घेणारा कच्चा माल कारागिराला लागत असतो -- मन, इच्छा यांना अचेतन शक्तीचा, भौतिक द्रव्याचा उपयोग अशा कच्च्या मालासारखा होतो. आमच्या भोंवतीं या ज्या सर्व वस्तू आहेत त्या या नव्या उपपत्तीनुसार विश्वातीत ईश्वराच्या कल्पना आहेत; हा ईश्वर एक व्यक्ति आहे, तो सर्वशक्तिमान् आहे, सर्वज्ञ आहे, त्याची इच्छा सर्वसमर्थ आहे, त्याचें मन सर्वज्ञ आहे; भौतिक विश्वांत जो 'गणिती कायदा' काम करीत आहे तो कायदा त्यानें केलेला आहे; या विश्वांत जी कलात्मक कारागिरी आहे, सौंदर्य आहे तें त्यानें निर्माण केलें आहे; या विश्वांत समानता आणि अ-समानता, अभेद आणि भेद, मेळ आणि तेढ, अन्योन्यविरोधी वस्तूंचा संयोग आणि संमिश्रण हा जो खेळ चालला आहे तो या ईश्वरानें चालविलेला खेळ आहे; येथें जाणीव उठून उभें राहण्याची धडपड करते, अचेतन विश्वव्यवस्थेंत जाणिवेची ही धडपड चालते, या अचेतन पसाऱ्यांत जाणीव आपलें स्वरूप आणि स्वकार्य, थोडक्यांत आपलें स्वत्व स्थापित करण्यासाठीं झगडत असते; हा जाणिवेचा खटाटोप या ईश्वराच्या इच्छेनें चाललेला आहे; अशी ही नवी उपपत्ति आहे. या संबंधीं जर कोणी अशी अडचण सांगेल कीं या उपपत्तींतला ईश्वर आम्हांला दिसत नाहीं, आमच्या इंद्रियांना, मनाला तो आकलन होत नाहीं तर त्यास हें उत्तर आहे कीं, जो ईश्वर विश्वाच्या बाहेर आहे, जो विश्वाच्या पसाऱ्यांत नाहीं आहे, तो आम्हांला येथें स्वत: प्रकट होत नाहीं, व त्याची प्रत्यक्ष खूण या विश्वांत आम्हांला सांपडत नाही, ही गोष्ट न्याय्यच आहे व आमच्या बुद्धीला सहज उमजण्यासारखी आहे. हा ईश्वर आम्हांला दिसला नाहीं, तरी तोच या विश्वाचा कर्ता आहे याला पुरेंसें प्रमाण, पुरेसा पुरावा पुष्कळ आहे : हें विश्व अशा कृतींनीं सर्वत्र भरलेलें आहे, कीं ज्या कृती महान् बुद्धीच करूं शकते -- अशा कृतींच्या स्पष्ट खुणा विश्वांत सर्वत्र नजरेस येतात : येथें कायदा आहे, योजना आहे,

पान क्र. १४

 

व्यवहारसूत्रें आहेत, साधनसाध्याचा मेळ आहे, येथें नवनिर्मिति सारखी अखंड चालली आहे, नवीन शोध लावणारी बुद्धि सारखे शोध लावीत आहे, या शोधांना व या शोध लावणाऱ्या बुद्धीला जणों सीमा नाहींतच असें शोधांचें काम येथें चाललें आहे; व्यवस्था लावणाऱ्या बुद्धीनें मर्यादेंत ठेवलेली अशी प्रतिभा, कल्पनाशक्ति येथें आपलीं कल्पनाचित्रें चितारीत आहे -- या सर्व महान् बुद्धीच्या निदर्शक अशा गोष्टी, या विश्वाचा कर्ता ईश्वर आहे असेंच दर्शवितात. 'हा ईश्वर विश्वाच्या बाहेर आहे, तसा तो विश्वाच्या पोटांतहि आहे', असा पक्ष घेतला, तरी वर ज्या त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दिल्या आहेत त्या खुणांखेरीज इतर खुणा आम्ही सामान्य जाणिवेचीं माणसें मागूं शकत नाहीं हें उघड आहे -- या अचेतनमूलक जगांत चेतना, जाणीव हळूंहळूं विकसित होत आहे -- ही विकासशील जाणीव विकासक्रमांत एखाद्याचे ठिकाणीं अशा स्थानाला येऊं शकते कीं, त्या स्थानावरून हा विशिष्ट विकसित जाणिवेचा आत्मा विश्वाच्या अंतर्यामांत असलेल्या ईश्वराचें दर्शन घेऊं शकतो. विशिष्ट पायरीपर्यंत विकसित झालेली ही जाणीव सोडली, तर इतर अवस्थेंतील सामान्य जाणिवेला ईश्वराचें प्रत्यक्ष ज्ञान होण्याचा संभव नाहीं हें उघड आहे. आतां असें कोणी म्हणेल कीं, सामान्य जीवांत ही जाणीव उदयास येते ती विकासशील असते आणि ती एखाद्या जीवांत ईश्वर प्रत्यक्ष जाणण्यासारखी विकसित होऊं शकते -- हें कसें ? यास उत्तर हेंच कीं, सर्वसमर्थ जाणिवेचें ईश्वरी मन विश्वाच्या मुळाशीं आहे, हें मान्य केल्यावर, हें ईश्वरी सर्वसमर्थ मन त्यानें स्वत: निर्माण केलेल्या जीवांत स्वतःच्या जाणीवशक्तीचा कांहीं अंश घालूं शकतें आणि घालतें हें मान्य करावयास तशी कांही अडचण पडूं नये. ईश्वरनिर्मित जीवांत जाणीव-शक्ति उदयास येणें आणि ती विकासशील असणें, हें कांहीं ईश्वराच्या जाणिवेच्या सर्वसमर्थतेच्या विरुद्ध नाहीं. तेव्हां विश्वातीत विश्वांतर्यामी ईश्वर हा विश्व निर्माण करतो, या उपपत्तीविरुद्ध आम्हांला निरुत्तर करण्यासारख्या अडचणी अद्यापि आमच्यापुढें आल्या नाहींत. आतां मात्र तशी दिसणारी अडचण पुढें मांडण्यांत येत आहे : ही जी सृष्टि ईश्वरानें केली असें म्हणण्यांत येते, त्या सृष्टींत लहरीपणा फार दिसतो, तिचें प्रयोजन काय हें आम्हांला उमजत नाहीं; येथें अज्ञान आहे, झगडा आहे, दुःख आहे -- आणि हें सर्व अनावश्यक असें आहे; अशा दुःखाचा, अज्ञानाचा, झगडयाचा जेथें कायदा आहे, अगदीं जंगली निरर्थक कायदा

पान क्र. १५

 

आहे, तें जग ईश्वरानें केलें असें कसें म्हणावें ? हें सर्व दुःखादि ज्या जीवनांत आहे, तें जीवन कांहीं विशेष उद्देश साध्य न होतांच समाप्तहि होतें -- तेव्हां यांत कांहीं योजना आहे असेंहि दिसत नाहीं. खरोखरीच या अडचणीचा उकल सोपा नाहीं. विश्वाचा पसारा हा खेळ आहे असें एक उत्तर संभवतें. खेळांत, नाटकांत दुःखादि सर्व असतें. पण हें उत्तर दिल्यास त्याला पुन्हां प्रतिउत्तर असें संभवतें कीं, ईश्वर हा कांहीं आसुरी स्वभावाचा असूं शकत नाहीं -- देवाचा, देवदेवाचा, ईश्वराचा स्वभाव करुणामय असला पाहिजे -- आणि मग त्याच्या खेळांत आसुरी गोष्टी, आसुरी स्वभावलक्षणें, आसुरी घटना इतक्या मोठ्या प्रमाणावर कशा दिसतात ? यावर असें एक उत्तर सुचवितां येतें कीं, या सर्व दृश्य गोष्टी वस्तुत: कल्पना आहेत, ईश्वराच्या कल्पना आहेत -- आणि ही गोष्ट खरी आहे -- पण मग असें विचारतां येतें कीं, या भयंकर कल्पनांहून, विचारांहून दुसरे विचार ईश्वराला खात्रीनें सुचूं शकले असते; वस्तुत: सर्व विचारांत उत्तम विचार ईश्वराला हा सुचावयास हवा होता कीं, हें दुःखमय आणि रहस्यमय वा अनाकलनीय असें विश्व निर्माण करण्यापेक्षां स्वस्थ बसणें, निर्मिति न करणें चांगलें. तेव्हां ही लहरी दुःखमय आसुरी घटनामय सृष्टि ईश्वराची कशी ही शेवटली अडचण मोठी आहे आणि ईश्वर वेगळा, त्यानें निर्मिलेली सृष्टि त्याहून वेगळी, ईश्वर सृष्टीच्या बाहेर असतो व बाहेरून सृष्टि चालवतो आणि कदाचित् थोडाबहुत सृष्टीच्या पोटीं अंतर्यामित्वाचा भागहि त्याचा आहे -- ही ईश्वरवादाची सृष्टिविषयक उपपत्ति वरील शेवटल्या अडचणीचा समाधानकारक उकल करूं शकत नाहीं -- ही उपपत्ति मांडणाऱ्याला या अडचणीच्या प्रश्नाची टाळाटाळच करावी लागते. ही अडचण दूर तेव्हांच होऊं शकते जेव्हां आपण अशी कल्पना करतों कीं, सृष्टिकर्ता सृष्टिहून व्यापक असो, पण तो सृष्टिव्यापी, सृष्टींत कोठेंतरी बसणारा नव्हे, तर सृष्टीच्या प्रत्येक परमाणूंत बसलेला असा आहे, नव्हे प्रत्येक परमाणूहि त्याचेंच स्वरूप आहे -- अशी ईश्वराची कल्पना आपण केली तर मग कसलीच अडचण उभी राहत नाहीं. ईश्वर खेळ करणारा आहे, खेळहि तोच आहे; अशी ही सर्व अडचणी दूर करणारी ईश्वराची कल्पना आहे; ईश्वर एक अनंत तत्त्व आहे, अनंत पुरुष आहे, त्याच्या अंतरंगांत अनंत शक्यता आहेत, या अनंत शक्यता तो विकासशील विश्वरचना करून त्या सुबद्ध रचनेच्या द्वारां क्रमवारीनें व्यक्त करण्याच्या मागें आहे -- नव्हे तो

पान क्र. १६

 

अनंतशक्यतामय पुरुष विकासशील विश्वरचनेच्याद्वारां स्वत: क्रमश: व्यक्त होण्याच्या मागें आहे. ही सृष्टिमय अव्यक्त ईश्वराची, ईश्वरमय व्यक्त विकासशील सृष्टीची कल्पना सर्व अडचणींना तोंड देणारी आहे.

विश्वनिर्मितिविषयक या शेवटल्या उपपत्तीनुसार भौतिक शक्ति जें कार्य करते, त्याच्या पाठीमागें मूळ जाणीव असते -- त्या कार्यांत, अगदीं वरून खालीं उतरून दडलेली मूळ जाणीव त्या शक्तींत असते; ही जाणीव विश्वमय असते, अनंत असते; ही जाणीव भौतिक शक्तीला प्रथम पुढें करून, तिच्या कार्याच्या द्वारां स्वत:च्या विकासशील अभिव्यक्तीचीं साधनें तयार करते; जाणीव ही जी निर्मिति करते ती, ती स्वत: मधून करीत असते; भौतिक विश्वाचा अनंत-सान्त पसारा हा या निर्मितीचा मसाला आणि दडपण्याचें व विकासाचें क्षेत्र असतें. भौतिक शक्ति दिसावयास अचेतन असते; पण भौतिक शक्तीची ही दृश्य अचेतनता, भौतिक विश्वद्रव्य निर्माण करावयास आवश्यकच असते; हें भौतिक विश्वद्रव्य, मूळ जाणिवेला स्वत:च्या तिरोधानासाठीं वापरावयाचें असते; अशा अचेतनशक्तिमूलक अचेतनतम द्रव्यामुळें मूळ जाणिवेला पूर्णतया अंतर्धान पावतां येतें, आणि पूर्ण नेणिवेंतून जाणिवेचा विकास, पूर्ण अचेतनतेंतून चेतनेचा विकास असें स्वरूप मूळ जाणिवेला, आपल्या विश्वलीलेला देतां येतें. अनंत जाणीव (चित् ज्ञान-सच्चिदानंदाची, सत्यं-ज्ञानमनन्तम्‌ची चित् ज्ञान, जाणीव) स्वतांतून भौतिक रूपांतील द्रव्याच्या पायावर सृष्टिनिर्मितीची क्रिया करूं इच्छिते व करूं लागते, तेव्हां या निर्मितीचा वास्तविक अर्थ, हा त्या जाणिवेच्या मूळ स्वरूपांत जीं सत्यें, ज्या शक्ती असतात त्या सत्यांचें, त्या शक्तींचें भौतिक बुरखा वापरून आविष्करण करणें, प्रकटीकरण करणें, असाच असतो व असला पाहिजे. या सत्यांचीं, या शक्तींचीं जीं रूपें, जीं ''वाहनें'' तीं, आज निसर्गांमध्यें ज्या सर्वसामान्य किंवा पायाभूत सविशेष गुणयुक्त भौतिक वस्तू आपण पाहतों त्याच होत; या पायाभूत सर्वसाधारण सविशेष वस्तूंच्या पोटीं जीं सत्यें किंवा ज्या शक्ती असतात, त्या सत्यांतील, त्या शक्तींतील असंख्य शक्यता व्यक्त करणारीं ''वाहनें'' किंवा भौतिक रूपें हीं, तपशिलाचीं सविशेष वस्तुरूपें होत. मूळ जाणिवेंतील सत्याचीं वाहनें (रूपें) म्हणजे अस्पष्ट गुणयुक्त वस्तुपसारा असतो आणि या सत्यांतील शक्यतांची वाहनें म्हणजे स्पष्ट गुणयुक्त वस्तू असतात. सत्यमय निराकार जाणीव, तींतून साकार सत्यें, त्यातून साकार पोट-सत्यें (किंवा सत्याच्या

पान क्र. १७

 

आंतरीं असणाऱ्या शक्यता) -- असा आविष्काराचा कार्यक्रम असतो. जी जाणीव अनंत, अनिर्बंध आहे, तिच्या पोटीं अनंत शक्यता, भिन्न भिन्न अनंत शक्य रूपें स्वैरतेनें, गुप्तपणें खेळत असतात. ही जाणीव जड भौतिक द्रव्याच्या पोटीं लपलेली असते आणि म्हणून तिला ती साकार होतांना अचेतन लहरी-संभवाचें, यदृच्छेचें रूप येतें. प्राथमिक सत्यांच्या आंतरीं असंख्य शक्यता (पोटसत्यें) असतात व या शक्यता (हीं पोटसत्यें) तपशीलवार विशिष्ट रूपें घेतात; हें निसर्गांतील तपशीलवार साकारतेचें स्पष्टीकरण आहे. अनंत शक्यतांनीं युक्त अनंत अनिर्बंध मूळ जाणीव ही जडाच्या पोटीं लपलेली असते व ती स्वैरपणें शक्यता साकार करीत जाते; हें निसर्गांतील अचेतन यदृच्छेचें स्पष्टीकरण आहे. त्याप्रमाणे जाणीवयुक्त अनंताच्या शक्ती, सत्यरूप शक्ती आपल्या स्वतःच्या आंतरिक नियमांनुसार आपली स्वतःची वाढ व उदिष्टसिद्धि करीत असतात -- आणि हा सर्व कार्यक्रम जडाच्या पोटीं लपून ती अनंत जाणीवशक्ति करीत असते; हें नियतीचें वा यांत्रिक अनिवार्यतेचें स्पष्टीकरण आहे. अचेतनता, यांत्रिक नियति हे फक्त देखावे असतात. वस्तुत: सर्व कार्य चेतना, जाणीव करीत असते; आणि या जाणिवेनें ठरविलेलें सत्याच्या अविष्काराचे नियम, सर्व कार्य ''यांत्रिक'' भासणाऱ्या निश्चित नियतव्यवस्थेनें चालवित असतात. या सर्व कार्यांत गणिती रचनेचें नियामक तत्त्व सर्वदा काम करतांना दिसतें. त्यांत रूपरेखात्मक योजना असते, त्यांत संख्यात्मक परिणामकारक व्यवस्था असते, त्यांत साध्यानुकूल साधनांची जुळवणी असते, त्यांत अपार कुशलता व शोधक बुद्धि दिसते, त्यांत सारखें प्रयोग-कौशल्य दिसतें; आणि प्रयोजनाची स्वयंपूर्तिसाधक व्यवस्था दिसते -- आणि बाह्यतः या सर्व गोष्टी अचेतनशक्ति करतांना दिसते -- हें कसें घडतें तें वर स्पष्ट केलें आहे; चेतनेनें बाह्यतः अचेतनाचें सोंग घेतलें आहे, हें या सर्व लीलेचें स्पष्टीकरण आहे. अचेतन भौतिक पसाऱ्यांतून चेतना, जाणीव उदयास येते ही गोष्टहि, अचेतनता हें सोंग मानलें म्हणजे समजायला सोपी जाते; अचेतनता ही वस्तुस्थिति मानली तर चेतनेचें तींतून उदयास येणें सर्वस्वीं दुर्गम व दुर्बोध आहे.

निसर्गांत ज्या प्रक्रिया सारख्या होत असतात, आणि अचेतनता हा मूळ पाया कल्पिल्यानें ज्यांचें स्पष्टीकरण अशक्य होतें, त्या प्रक्रियांचें सुबोध स्पष्टीकरण, विश्वाचा मूळ पाया अचेतनता नसून चेतना हा त्याचा मूळ पाया आहे, असें मानल्यानें होऊं शकतें. निसर्गांतील सर्व

पान क्र. १८

 

प्रक्रिया अर्थपूर्ण आहेत, प्रत्येक प्रक्रिया आपापल्या स्थानीं महत्त्वाचें कार्य करीत आहे असें, चेतना-जाणीव हा विश्वाचा मूळ पाया मानल्यानें आपल्याला नीट कळतें. उदाहरणार्थ, जडशक्ति जडद्रव्य निर्माण करते असें आपल्याला प्रथमदर्शनीं दिसतें, (नवे वैज्ञानिक असेंच सांगतात) -- पण वस्तुस्थिति काय आहे ? जाणीव-शक्ति कांहीं अंतराळीं असत नाहीं; अस्तित्व असेल तरच जाणीव-शक्ति त्याच्या आधारानें असूं शकते -- कसलेंच अस्तित्व नाहीं -- मग जाणीव-शक्ति असणार कोठून ? आणि कोठें ? म्हणून जाणीवशक्ति आणि अस्तित्व अविभाज्य आहेत. जडशक्ति जी कार्य करतांना दिसते ती, या मूळ निराकार जाणीवशक्तीचें व्यक्त स्वरूप आहे आणि द्रव्य जें दिसतें तें गुप्त निराकार अस्तित्वाचें व्यक्त स्वरूप आहे. जाणीवशक्तीचें पोटीं, तिचें स्वभावसिद्ध अंगभूत असें अस्तित्व असतें; त्याचप्रमाणें कार्य करतांना दिसणाऱ्या जड शक्तीच्या पोटीं तिचें स्वभावसिद्ध अंगभूत असें द्रव्य असतें. प्रथमदर्शनीं दिसतें त्याप्रमाणें द्रव्य कांहीं जडशक्तीकडून निर्माण केले जात नाहीं, अस्तित्व कांही जाणीवशक्तीकडून निर्माण केलें जात नाहीं; तशीच गोष्ट द्रव्याची, म्हणजे अस्तित्वाच्या व्यक्त स्वरूपाची असते. हें अस्तित्वरूपी द्रव्य मुळांत अतिभौतिक (आध्यात्मिक) द्रव्य असल्यानें आमच्या भौतिक इंद्रियांना तें दिसूं शकत नाहीं -- त्याला जेव्हां जाणीवशक्ति (दर्शनी जडशक्ति) भौतिक द्रव्याचा आकार देते. तेव्हांच तें भौतिक इंद्रियांना ग्रहण करतां येतें. याप्रमाणें निसर्गांत, ''शक्ति द्रव्य निर्माण करतें'' ही जी प्रक्रिया दिसते तिचा खरा अर्थ, गुप्त जाणीवशक्ति ही विश्वाचें मूळ मानल्यानें आपल्याला स्पष्टपणें कळतो. आतां वस्तूंची रूपरेखा, राशि, संख्या आणि त्यांचे गुणधर्म यांच्या संबंधींची गोष्ट घेऊं : अस्तित्वद्रव्याचे ठिकाणीं रूपरेखा, राशि, संख्या या शक्ती असतात; जाणीव आणि तिची शक्ति अस्तित्वाच्या ठिकाणीं गुप्त असतात; या गुप्त जाणिवेचें व तिच्या शक्तीचें सामर्थ्य, गुणधर्म हें रूप घेतें : अर्थातच अस्तित्वाचें व्यक्तरूप जें द्रव्य, त्याच्या तालबद्ध क्रियेनें अस्तित्वगत रूपरेखा, राशि, संख्या यांच्या व्यक्त पायावर अस्तित्वगत जाणीव-शक्तीचे अंतर्गत गुणधर्म व्यक्त होऊं शकतात, व्यक्त होतात. व्यक्त वस्तूंत संख्या आणि गुण यांचा अविभाज्य संबंध दिसला, तरी तो कांहीं नवीन निर्माण होत नाहीं, तर अव्यक्तांत तो संबंध अव्यक्त असतो आणि व्यक्तांत तोच व्यक्त होतो एवढेंच. हीच गोष्ट बीजांतून वृक्ष होणें यासारख्या घटनांची आहे.

पान क्र. १९

 

बीजांत सत्य-कल्पना अंतर्हित असते; हें ज्ञानयुक्त सत्य, आपलें कार्य स्वयंप्रेरणेनें शेवटास नेत असतें; अनंत सच्चिदानंद आपल्या इच्छेनें विशिष्ट बीजाच्या पोटीं आपलें विशिष्ट रूप (सत्य-कल्पना) अंतर्हित करीत असतें; या विशिष्ट रूपाचें ज्ञान या बीजाच्या अंतरंगांत गुप्त असतें -- आणि विकासमार्गांत तें बीज पडलें म्हणजे हें रूपज्ञान स्वयंगतींनें योग्य तें वृक्षरूप बीजांतून बाहेर आकारास आणतें; सूक्ष्म जीवबीजकण, जीवबीजसूत्रें भौतिक जड वस्तू असतात, या जड वस्तू मानसिक गुण आपल्या पोटीं सांठवतात आणि मानवी बीजांतून जो मानव तयार होतो त्या मानवाच्या शारीर रचनेंत हे गुण संक्रांत करतात. हें जें सत्य नव्या विज्ञानानें शोधून काढलें आहे त्याचेंहि स्पष्टीकरण बीज-वृक्षाप्रमाणेंच आहे; भौतिक वस्तूंच्या पोटीं आत्मज्ञानयुक्त विशिष्ट सत्य-कल्पना (योजना) अंतर्हित असते ती, विकासक्रमानें योग्य परिस्थितींत, योग्यवेळीं व्यक्त होते; आमच्या अंतरंगांत काय, किंवा आमच्या बाहेर असणाऱ्या पदार्थांत काय, एकच सत्यमय जाणीवशक्तीचा कायदा काम करीत असतो : आमच्या अंतरंगांत आमचें मेंदूनाडीघटित भौतिक अंग, मानसिक जाणीव-विरहित अर्धनेणिवेनें व्याप्त असें असतें -- पण त्यांत मानसिक व्यवहार, भूतकालीन संस्कार, संवयी, प्राणिक आणि मानसिक विशिष्ट निश्चित रूपें, शीलाचीं निश्चित रूपें -- या सर्व गोष्टी अंतर्हित असतात आणि आमचें भौतिक अंतरंग, कांहीं विशिष्ट गूढ प्रक्रियेच्या आश्रयानें आमच्या जागृतीच्या जाणिवेंत, या अंतर्हित गोष्टी पाठवीत असतें, आणि याप्रमाणें आमच्या जागृत जाणिवेंत या तळच्या गोष्टी आल्या, म्हणजे कांहीं क्रिया केवळ या तळच्या गोष्टी वर आल्यानें आम्ही करतों; तसेंच आमच्या जागृत जाणिवेच्या कांहीं व्यवहारांवर या तळच्या वर आलेल्या गोष्टीचा परिणाम होऊन त्यांचें स्वरूप बदलून जातें. तेव्हां मुख्य गोष्ट ही कीं, जडशक्ति व जडद्रव्य कांहींहि करूं शकत नाहीं -- जें त्यानें केल्यासारखें दिसतें तें सर्व त्याच्यापोटीं गुप्त असलेली सत्यमय जाणीवशक्ति करीत असते.

जाणीवशक्ति निसर्गाच्या मुळांत आहे अशी कल्पना केली म्हणजे मनाच्या विशिष्ट क्रिया शारीर इंद्रियांच्या व्यापारांनीं निर्णित केल्या जातात ही गोष्ट समजावयास अडचण पडत नाहीं -- कारण शरीर हें अचेतन द्रव्य आहे हें मत मुळीं असत्य आहे; वस्तुत: शरीर ही गुप्त जाणीवयुक्त शक्तीची रचना आहे; जाणीवयुक्त शक्तीनें शरीर हें रूप धारण

पान क्र. २०

 

केलें आहे. याप्रमाणें शरीर हें गुप्त जाणिवेनें भरलेलें आहे, व त्याबरोबर तें प्रकट झालेल्या, विकास-क्रमांत जडांतून उदयास आलेल्या, जाणिवेचें आविष्काराचें साधन आहे, वाहन आहे; भौतिक शक्तियुक्त अशा द्रव्याच्या या आमच्या शरीरांत ही विकसित जाणीव, स्वत:ला ओळखणारी आत्मजाणिवेनें युक्त अशी असते. शरीराचे व्यापार हे साधनरूप आहेत, आवश्यक साधनाच्या रूपाचे आहेत; शरीरांत राहणाऱ्या मानसिक पुरुषाच्या हालचाली या शारीर साधनांवर अवलंबून असतात; शारीर यंत्र गतिमान् केलें म्हणजे नव्हे, गतिमान् करूनच त्याच्या ठिकाणीं, त्याच्यांतून विकास पावणारा जाणीवयुक्त जीव आपल्या मानसिक रचना, इच्छाविषयक रचना संक्रामित करूं शकतो; भौतिक द्रव्याच्या पसाऱ्यांत आपल्या मनोमय, इच्छामय व्यापारांना तो भौतिक व्यक्त रूप देऊं शकतो. मनोरचना ह्या, मनांतून भौतिकांत व्यक्त होतांना, भौतिक साधनाच्या क्षमतेनुसार आणि प्रक्रियेनुसार थोड्याफार वेगळ्या होणें, मूळ स्वरूपाहून थोड्याफार वेगळ्या स्वरूपाच्या होणें अपरिहार्य असतें; भौतिक पसाऱ्यांत मनोरचना व्यक्त होण्यापूर्वीं भौतिक साधनाचा व्यापार अवश्य असल्यानें, या व्यक्त होण्याच्या क्रियेंत या व्यापाराचा त्या मनोरचनांवर कमीअधिक परिणाम होणें अपरिहार्य असतें : शरीर हें साधन वापरणारा जो जीव, त्यावर कांहीं बाबतींत तर हें साधन आपली सत्ता गाजवतेहि; उदाहरणार्थ, विशिष्ट मनोव्यापार विशिष्ट हालचालीनें व्यक्त करण्याची एकदां कां शरीराला संवय झाली, म्हणजे मग मन किंवा इच्छा यांचा बुद्धिपूर्वक नियंत्रक व्यापार होण्यापूर्वींच शरीरस्थित जाणिवेच्या संवयीचा प्रतिक्रियारूप विशिष्ट व्यापार शरीराकडून जाणिवेला सुचविला जाऊन वास्तवांतहि आणला जाईल. शरीरस्थित जाणिवेच्या या अनैच्छिक प्रतिक्रिया वास्तवांत येण्याचें कारण, शरीराचे ठिकाणीं त्याची अवमानसिक जाणीव असते हें आहे; आमच्या एकंदर आत्मप्रकटीकरणांत या अवमानसिक शारीर जाणिवेचा व्यापार आम्हांला टाळतां येत नाहीं; केवळ बाह्य शारीर प्रतिक्रियेकडेच पाहिलें, तर असेंहि म्हणतां येईल कीं, शरीर हें मनोव्यापार निश्चित करतें; तथापि ही गोष्ट गौण आहे; प्रधान सत्य हेंच आहे कीं, मन शारीर व्यापार ठरवितें. बारीक निरीक्षणाअंतीं असेंहि दिसून येईल कीं, मनाच्या पातळीहूनहि सत्य खोल आहे; भौतिक द्रव्याच्या पोटांत त्या द्रव्यानें झांकलेलें एक आत्मतत्त्व, एक आत्मिक पुरुष असा त्या द्रव्याचा आत्मा आहे आणि हा आत्मा मूलत:,

पान क्र. २१

 

मन आणि शरीर या दोघांचेहि व्यापार निश्चित करीत असतो, हें तें महान् सत्य आहे. शरीर हें मनावर व मनाच्या व्यापारांवर सत्ता चालवितें, त्यांच्यावर आपला ठसा उमटवितें व केव्हां केव्हां सर्वस्वीं आपल्या प्रेरणेनें मनोव्यापार उत्पन्न करतें : ही जशी शरीरमनांच्या नात्याची एक बाजू, तशी दुसरी बाजू ही आहे कीं, मन शरीरावर सत्ता चालवितें, स्वत:च्या कल्पना, इच्छा शरीराकडे संक्रामित करतें, नव्या नव्या क्रियांसाठीं साधन म्हणून त्या शरीराला शिस्त लावून, तें त्याची तयारी करतें; शरीरावर तें इतकें वजन आणूं शकतें, इतका संस्कार करूं शकतें कीं, स्वत:च्या नेहमींच्या मागण्या शरीराच्या स्वभावांत तें मुरवितें आणि मग मनाला त्या मागण्यांचें भान नसतांना देखील शरीराची स्वयंप्रेरणा त्या मागण्या आपोआप पुरविते; मन हें, कांहीं असाधारण बाबतींत तर शरीराला यापेक्षांहि अधिक शिस्त लावूं शकतें -- शरीराच्या व्यापारांचा स्वाभाविक नियम बाजूस सारून, शरीराच्या सामान्य स्वभावाविरुद्ध क्रिया प्रतिक्रिया, त्याजकडून विशिष्ट अभ्यासानें मन करवून घेऊं शकतें; पण हें घडतें कसें ? जीवयुक्त भौतिक द्रव्य गुप्त जाणिवेनें भरलेलें आहे, जीवमान शरीरांत ही गुप्त जाणीव आहे, हें त्याचें उत्तर आहे. विकसित प्रकट जाणीव, शरीरावर प्रभुत्व गाजविणारी प्रकट जाणीव आणि शरीरांत वास करणारी गुप्त जाणीव, या परस्पर साहाय्यक आहेत; शरीरांतील गुप्त जाणीव ही शरीरावर प्रभुत्व गाजविणाऱ्या प्रकट जाणिवेकडून शरीराला येणारे आदेश गूढ रीतीनें जाणते, समजते आणि त्यांप्रमाणें प्रकट जाणिवेच्या मागण्या पुऱ्या करते. शरीर आणि मन यांच्या संबंधांत घडणाऱ्या क्रियांचें स्पष्टीकरण, शरीरांत म्हणेजच शरीरद्रव्यांत गूढ असलेल्या जाणिवेनें होतें, हें आपण पाहिले. आतां शेवटीं हें सांगावयाचें कीं, ईश्वरी मन आणि इच्छा आणि यांनीं विश्व उत्पन्न केलें ही जी कल्पना आहे तीहि, भौतिक द्रव्याच्या पोटीं जाणीवशक्ति काम करीत आहे, या उपपत्तीनें सयुक्तिक ठरते : विश्वांत अनुभवास येणारें दु:ख, अज्ञान इत्यादि गोष्टी या ईश्वरनिर्मित सृष्टींत न शोभणाऱ्या आणि म्हणून आम्हांला ज्या गोंधळांत टाकतात त्याचें स्पष्टीकरण ही उपपत्ति देते -- तें स्पष्टीकरण असें कीं, ही जी ईश्वरी जाणीवशक्ति भौतिकाच्या पोटीं गुप्त आहे, ती हळूंहळूं विकास पावून भौतिकाच्या पसाऱ्यांत क्रमानें प्रकट होत आहे -- अचेतन भौतिक द्रव्य, हें मूळ ईश्वरी चैतन्याचें, जाणिवेचें, अगदीं विरोधी रूप, त्या रूपां-

पान क्र. २२

 

तून त्या रूपाच्या आधारावर ईश्वरी चैतन्यानें, जाणिवेनें स्वत: हळूंहळूं क्रमश: विकास पावण्याची जी क्रिया, ती या विश्वांत दिसणाऱ्या व असणाऱ्या दुःख-अज्ञानादींच्या मुळाशीं आहे -- तथापि ईश्वरी चैतन्याचा हा क्रमविकास, या विरोधी घटनांवर शेवटीं विजय मिळविणार आहे आणि आपलें खरें स्वाभाविक स्वरूप प्रकट करून दु:ख-अज्ञानादींचा देखावा नाहींसा करणार आहे. विकासशील चैतन्याच्या, सच्चिदानंदरूप चैतन्याच्या विकास-व्यापाराचें ध्येयच मुळीं, विरोधी घटनांवर विजय मिळवून आपलें मूळ स्वरूप प्रगट करावयाचें हें आहे.

अर्थात् जाणीवशक्ति विश्वाच्या मुळांत असल्याची ही जी उपपत्ति आम्हीं येथपर्यंत विस्तारानें विवेचिली आहे ती, किंवा दुसरी कोणतीहि, निसर्ग आणि त्याची कार्यप्रणाली विशद करणारी उपपत्ति, बरोबर आहे अशी निश्चिति मात्र अस्तित्वाच्या भौतिक टोंकाकडून निसर्गाकडे पाहिलें असतां आम्हांला मिळत नाहीं; कारण, भौतिक अस्तित्वाच्या बाजूस मूळ अचेतनतेचा पडदा इतका जाड आहे कीं मनाला तो त्याच्या आड असलेलें कांहीं पाहूं देत नाहीं -- या पडद्यांत एखादें भोंक पाडून आंतलें दडलेलें कांहीं मनाला पाहतां येत नाहीं; आणि जें व्यक्त होत आहे त्याचें गुप्त मूळ तर या जाड पडद्याआड आहे; निसर्गाची जी भौतिक बाजू आहे त्या बाजूला ज्या घटना, ज्या प्रक्रिया आम्हांला दिसतात त्यांच्यामागें, त्यांच्या खालीं जीं सत्यें, ज्या शक्ती काम करीत आहेत त्या सर्व, अचेतनतेच्या जाड पडद्याआड बसल्या आहेत. आमच्या उपपत्तीसंबंधानें खात्रीलायक पुरावा मिळावयाचा तर तो विकासशील जाणिवेचा वक्रगतीचा विकासमार्ग एका विशिष्ट टप्प्यापर्यंत चालून गेल्यानेंच, आम्हांला मिळूं शकतो; विकासशील जाणीव विकसित होत होत इतक्या उंचीवर चढते, व इतक्या विस्ताराची होते कीं तेथें विस्तृत उच्च पातळीवरचें तिचें आत्मज्ञान, स्वतःचें मूळ स्वरूप स्पष्टपणें प्रकट करते -- ही विकासशील जाणीव दुसरी तिसरी कोणतीहि नसून वस्तुजाताच्या, विश्वाच्या पोटीं जी गुप्त मूळ जाणीव आहे तीच असते; या मूळ जाणिवेंत जें जें सत्य, जी जी शक्ति दडलेली असते, तें तें सत्य, ती ती शक्ति विकासाच्या क्रमांत प्रकट होणें अपरिहार्यच असतें. विकासाच्या क्रमांत ही गुप्त जाणीव अचेतनतेंतून प्राणाच्या उदयापर्यंत सरकते, पण प्राणाच्या कार्यसंभारांत पाहिजे तो जाणिवेचा पुरावा आम्हांला मिळूं शकत नाहीं. कारण प्राणाच्या व्यवहारांत जाणीव ही अधोमानसिक असते, आणि

पान क्र. २३

 

आम्हां मानसिक जाणिवेच्या जीवांना ती अचेतन किंवा अवचेतन व्यवहारासारखी भासते, आणि म्हणून जसें जड अचेतन द्रव्याचें बाहेरून केलेलें निरीक्षण आम्हांला मूळ सत्य मिळण्याच्या दृष्टीनें निरुपयोगी असतें, तसें हें बाहेरून केलेलें प्राणव्यवहारनिरीक्षणहि त्या दृष्टीनें निरुपयोगीच असतें. मनाचा उदय प्राणाच्या विकासानें हळूंहळूं होतो, पण प्राणाच्या पोटीं विकास पावलेलें मन निदान प्रथम तरी केवल क्रियानिरत असतें; प्राणाच्या, शरीराच्या गरजा आणि विशिष्ट लहरी पुरविणें एवढेंच काम तें करीत असतें; अनेक ऊर्मी, वासना, संवेदना, भावना यांच्या पसाऱ्यांत तें गुंतलेलें असतें, -- या गोष्टी स्वत:पासून दूर धरून त्यांचें निरीक्षण करणें, त्यांतील तत्त्व जाणणें हें, प्राणांत उदय पावलेल्या मनाला प्रथम प्रथम कांहीं साधत नाहीं. मनुष्यापर्यंत प्राणशक्तीची उन्नति झाल्यावर मनुष्यांत खुद्द जो मनाचा विकास घडून येतो तो मात्र, आम्हांला सत्य मिळण्याची आशा उत्पन्न करूं शकतो; वस्तूंचें स्वरूप समजण्याची, कांहीं शोध लावण्याची व बुद्धीनें स्वतंत्रपणें गोष्टी आत्मसात् करण्याची आशा मनुष्यांतील मनाला प्रथम उत्पन्न होते, येथेंच आत्म-ज्ञान आणि विश्व-ज्ञान प्राप्त करून घेण्याची शक्यता प्रथम उत्पन्न होते. तथापि घटनांचें निरीक्षण करणें, प्रक्रियांचें निरीक्षण करणें हें काम प्रथम प्रथम मन करूं शकतें -- या निरीक्षणावर विसंबून कांहीं अनुमानें काढणें, कांही उपपत्ति बसवणें, कांहीं चर्चा करणें, कांहीं कल्पना करणें हें कामहि मन करूं शकतें -- पण या पलीकडे तें कांही करूं शकत नाहीं -- आणि मूळ जाणीवशक्तीचें गुपित शोधून काढायला तर मनाला स्वत:ची ओळख व्हावयास हवी; स्वत:च्या स्वरूपाचें सत्य काय, स्वत:च्या प्रक्रियेचें सत्य काय हें निश्चित करण्याची ताकद हवी. पण ही ताकद त्यांत तर मुळींच नसतें; ज्याप्रमाणें मनुष्येतर प्राणिवर्गांत जाणीव उदयास आली म्हणजे ती प्राणिक हालचालींत गुंतून पडते, त्याप्रमाणेंच जवळजवळ, मनुष्यांत उदयास येणाऱ्या मानसिक जाणिवेची परिस्थिति असते. ही मानसिक जाणीव तिच्या विचारांच्या भोंवऱ्यांत असहायतेनें फिरत असते, तिला उसंत कशी ती लाभत नाहीं; तिचे तर्कवाद, तिची कल्पना-उभारणी स्वतंत्रतेनें, सत्याच्या नियमानुसार केली जात नाहीं, तर आमच्या स्वभावाच्या स्वरूपानुसार केली जाते. आमच्या स्वभावांत जो विशेष असेल, मनाची जी ठेवण असेल, जुन्या ज्या मानसिक क्रिया असतील, मानसिक शक्ति कामास लावण्याची जी जुनी रीति असेल, मनाचा जो प्रसंगोपात्त कल

पान क्र. २४

 

असेल, त्याच्या ज्या आवडीनिवडी असतील, स्वाभाविकपणें त्याला ज्या पसंती-नापसंती असतील -- तो आमचा स्वभावविशेष, ती आमच्या मनाची ठेवण इत्यादि इत्यादि गोष्टींनीं आमचा तर्कवाद, आमची  कल्पना-उभारणी निर्णीत होते; वस्तुजातांतील सत्याच्या दृष्टीनें मात्र आमची मानसिक जाणीव चिकित्सा करीत नाहीं -- करूं शकत नाहीं. अर्थात् प्राणिक जाणीव जशी पदार्थ व व्यवहार दूर ठेवून त्याजकडे पहाण्यास अगदीं असमर्थ असते, तसें मात्र या मनुष्यगत मानसिक जाणिवेचें नसतें. मानसिक शक्तीचें चलन वलन व आमच्या अंतर्गत चालणारे तिचे व्यवहार त्यांजपासून दूर राहून, कांहींशा अलिप्तपणानें ही जाणीव त्यांची तपासणी करूं शकते, त्यांचें निरीक्षण करूं शकते; पण हें निरीक्षण मानसिक शक्तीच्या प्रक्रियेचेंच फक्त होऊं शकतें; मनाचे जे निर्णय होतात, मनाचे जे विशेष असतात, त्यांचा मूळ उगम मात्र आम्हांला, आमच्या मानसिक जाणिवेला दिसत नाहीं. मनाच्या क्रियापद्धतीबद्दल आम्ही कांहीं उपपत्ति कांहीं कल्पना बसवूं शकतों; परंतु आमचें जें गुप्त अंतरंग आहे, आमच्या अंतरंगांत जी गुप्त जाणीव आहे, आमचा संपूर्ण स्वभावधर्म जो आहे, तें अंतरंग, ती जाणीव, तो संपूर्ण स्वभाव मात्र आम्हांला प्रत्यक्ष प्रतीत होत नाहीं; एका पडद्यानें झांकलेला असाच आम्हांस तो प्रतीत होतो.

मनाची क्रियाच जेव्हां योगपद्धतीनें थांबवावी, तेव्हां आमच्या अंतर निरीक्षणाचा, आत्मनिरीक्षणाचा दूरवर खोलवर परिणाम घडणें शक्य होतें. योगपद्धतीनें, योगप्रक्रियेनें मनाची क्रिया थांबली, मन शांत शांत झालें म्हणजे अंतर्निरीक्षणानें आम्हांला मनाचें खरें स्वरूप कळतें -- मन हें सूक्ष्म द्रव्याचें बनलेलें आहे, मन ही एक सर्वसाधारण विशेष वस्तु किंवा विशेषगर्भनिर्विशेष वस्तु आहे आणि मानसिक शक्ति या निर्विशेष मनोद्रव्यावर क्रिया करूं लागली म्हणजे त्या मनोद्रव्याचे आकार तयार होतात, वेगळे वेगळे विशेष या निर्विशेष मनोद्रव्यांतून निघतात. मानसिक शक्तीच्या क्रियेनें विचार, कल्पना, वस्तुचित्रें, भावना, इच्छा, सुखादि प्रतिक्रिया इत्यादि आकार मन घेतें : मानसिक शक्ति निष्क्रिय झाली, कीं त्या शक्तीनें आपल्या क्रियेनें उभे केलेले हे मनाचे आकार, बनविले असतील तसे जगून तगून राहतात; मात्र सुस्तावल्यासारख्या गतिशून्य स्थितींत किंवा शांत समाधानी अस्मितेच्या स्थितींत ते पडून राहतात. मनासंबंधानें दुसरी गोष्ट ही कळते कीं, त्याच्यामध्यें जें विशेष,

पान क्र. २५

 

जे विशिष्ट आकार दिसतात, ते सर्व त्याच्याच द्रव्यांतून व त्याच्यांतीलच शक्तीनें मूळ बनलेले असतात असें नव्हे -- आमच्या बाहेरून मानसिक शक्तीचे प्रवाह, लहरी आमच्या मनांत शिरत असतात; या प्रवाहांना, लहरींना आमच्या मनांत विशिष्ट आकार प्राप्त होतात; केव्हां केव्हां बाहेरील मानसिक शक्तिलहरी बाहेरच आकार घेऊन मग आमच्या मनांत शिरतात. लहरीरूपानें आमच्या मनांत शिरणाऱ्या किंवा आकार घेऊन आमच्या मनांत शिरणाऱ्या विश्वमनांतून किंवा आमच्या व्यतिरिक्त इतर मनांतून अशा लहरी निघून त्या आमच्याकडे येत असतात : आमच्या मनाबाहेरील या सर्व मनोलहरी आमच्या मनांत आल्यावर आम्ही त्या आमच्या मनाच्याच लहरी म्हणून समजतो -- वस्तुतः बाहेरून आलेले विचार, विकार आम्ही आमचे म्हणून पत्करतो. तिसरी गोष्ट ही कळते कीं, आमच्या बाह्य सामान्य मनाच्या खालीं, एक अंतर्मन-गुप्तमन-आमच्यांत आहे : या अंतर्मनांतून विचार, वस्तुचित्रें, इच्छा-उर्मी, सुखदुःखादि भावना वर येत असतात. चौथी गोष्ट : आम्हांला जाणिवेच्या पातळ्या, भूमी प्रतीत होतात; या भूमींवरून उच्च मानसिक शक्ति आमच्यावर क्रिया करतांना आम्हांला दिसते. पांचवी गोष्ट : आतांपर्यंत जो मानसिक प्रपंच वर्णिला तो प्रपंच पाहणारा मनोमय पुरुष आमच्या ठिकाणीं असतो, मनोद्रव्याला या पुरुषाचा आधार असतो, मानसिक शक्तीलाहि याचेंच अधिष्ठान असतें. या मनोमय पुरुषाच्या समर्थ आधाराशिवाय मनोद्रव्य, मनःशक्ति क्रिया करूं शकत नाहींत, एवढेंच नव्हे, तर अस्तित्वांतहि राहूं शकत नाहींत. या मनोमय पुरुषाचें पहिलें दर्शन आम्हांला घडतें तेव्हां तो शांत, निष्क्रिय, साक्षी असा भासतो. वस्तुत: हा पुरुष निष्क्रिय, शांत, साक्षीच असेल, तर मग मनाचे वेगवेगळे विशेष आकार ही एक वरवरची दृश्यक्रिया आहे आणि निसर्गानें किंवा प्रकृतीनें ती पुरुषावर लादली आहे, असा पक्ष आम्हांला घ्यावा लागेल; प्रकृतीनें ही सर्व रचना करून पुरुषापुढें ती ठेवली आहे, असें म्हणावें लागेल; निसर्ग हा विचाराचें विश्व निर्माण करून तें पुरुषापुढें पाहण्यासाठीं उभें करतो, अशी मनांतील व्यवहाराची उपपत्ति द्यावी लागेल. पण अधिक निरीक्षणाअन्तीं असें दिसतें कीं, आपली शान्त पहाणाराची व होत असतें तें मान्य करण्याची भूमिका हा पुरूष सोडतांना दिसतो. तो प्रतिक्रिया करतांना आढळतो : मान्य करणें किंवा अमान्य करणें, नियंत्रण करणें, व्यवस्था लावणें, आज्ञा देणें, समजून घेणें इत्यादि गोष्टी करतांना तो

पान क्र. २६

 

आढळतो. असेंहि नजरेस येतें कीं, मनोद्रव्यांतून हा पुरुष उदय पावतो -- हें मनोद्रव्य त्याच्या अभिव्यक्तीचें साधन असतें -- मनाची शक्ति ही त्याची जाणीव-शक्ति असते. अर्थात् असा निर्णय देतां येतो कीं, मनाचे सर्व व्यवहार, मनांतील सर्व विशेष हे या पुरुषाच्या अस्तित्त्वांतून, अस्तित्वद्रव्यांतून उत्पन्न होतात. तथापि या निर्णयाला धक्का देणारी, त्याच्या अचूकपणाविषयीं शंका उत्पन्न करणारी एक गोष्ट येथें सांगितली पाहिजे ती ही कीं, एका दुसऱ्या दृष्टिकोनांतून मनाकडे पाहिलें असतां व्यक्तीचें मन हें विश्वमनाच्या अनेक रूपांपैकीं एक रूप आहे असें दिसतें; विश्वमनाच्या अंगभूत असलेली ही व्यक्तिमनाची रचना विशिष्ट हेतूनें केलेली असते : विश्वमनांतील विश्वविषयक, विश्वव्यापक विचारलहरी, कल्पना-प्रवाह, संकल्प-सूचना, विकार-तरंग, संवेदना व आकार यासंबंधींच्या सूचना व्यक्तीच्या मनानें घ्याव्या, त्यांत कमीअधिक बदल करून त्यांचा प्रसार करावा हा, व्यक्तिगत-मन निर्माण करण्यांत विश्व-मनाचा हेतु असतो असें दिसतें. आतां हें खरें कीं, व्यक्तीच्या मनांत कांहीं गोष्टी अगोदरच मूर्त झालेल्या असतात, त्याचे कांहीं पूर्वसंस्कार असतात, कल असतात, स्वभावविशेष असतात : विश्वमनांतून येणाऱ्या गोष्टींना या व्यक्ति-मनांत स्थान मिळावयाचें, तर या व्यक्तीच्या-पुरुषाच्या-वैयक्तिक प्रकृतीशीं, त्याच्या अभिव्यक्त स्वरूपाशीं त्या जुळत्या असून, त्या प्रकृतींत, त्या अभिव्यक्त स्वरूपांत त्या नीट बसाव्या लागतात. व्यक्तीच्या मनांतील व्यवहाराचा हा प्रश्न असा गुतागुंतीचा असल्यामुळें, ही गोष्ट अनिर्णीत राहते कीं, आम्हांला जो विकासक्रम दिसत आहे, जी हालचाल दिसत आहे, हा सर्व वरचा देखावा कोणा विश्वशक्तीनें निर्माण केला आहे आणि मनोमय पुरुषापुढें या देखाव्याचें प्रदर्शन त्या विश्वशक्तीनें मांडलें आहे असें आम्हीं मानावयाचें, कीं मानसिक शक्तीनें पुरुषाच्या निर्विशेष किंवा अज्ञेयविशेष अस्तित्वावर लादलेली अशी ही सर्व हालचाल आहे, असें मानावयाचें किंवा ही सर्व विकासाची वगैरे उठाठेव विश्वाच्या पोटीं असलेल्या आत्मसत्यानें, क्रियाशील आत्मतत्त्वानें अगोदरच नियोजित केलेली असून तिचें आविष्करण, प्रदर्शन मात्र मनाच्या पृष्ठभागावर केलें जात आहे असें मानावयाचें ? या अनिर्णीत गोष्टीचा छडा लावून तिच्यांतील खरें-खोटें उकलण्यासाठीं आम्हांला आमच्या मर्यादित मनाच्या पलीकडे जावयास हवें : मर्यादित मनाचा अनुभव मर्यादितच असणार आणि या मर्यादित अनुभवानें वरील गोष्टीचा उकल होणार नाहीं हें उघड

पान क्र. २७

 

आहे. विश्वव्यापी अस्तित्व, विश्वव्यापी जाणीव -- अस्तित्वाची आणि जाणिवेची विश्वव्यापी अवस्था -- आम्हांला लाभली, तेथें आमचा प्रवेश झाला तरच या वरील गोष्टींचा उकल होऊं शकेल; कारण एकंदर समग्र वस्तुजात, आणि या वस्तुजाताची व्यवस्था लावणारें सर्वांगीण संपूर्ण व्यवस्थातत्त्व आमच्या मानसिक मर्यादित जाणिवेपेक्षां त्या विश्वव्यापी जाणिवेला अधिक स्पष्टपणें व अधिक पूर्णपणें प्रतीत होत असलें पाहिजे.

वरील विशिष्ट प्रश्नाच्या निर्णयासाठीं जशा प्रकारची विश्वव्यापी जाणीव हवी म्हणून वर सांगितलें आहे, तशा प्रकारची जाणीव अधिमानसिक जाणीव ही आहे; व्यक्तीच्या मानसिक जाणिवेच्या पलीकडे, अज्ञानक्षेत्रांतील विश्वमनाच्याहि पलीकडे हें अधिमानसिक तत्त्व आहे; जाणिवेची अधिमानसिक अवस्था आहे. विश्वगत सत्याचें अधिकृत ज्ञान, विकासक्रमांत पहिल्यानें भेटणारें प्रत्यक्ष सामर्थ्ययुक्त विश्वसत्य-ज्ञान या जाणिवेंत असतें; विश्वांतील वस्तुजाताची मूळ हालचाल, मूळ कार्यप्रणाली या ठिकाणीं आम्हांला कळण्याची, समजण्याची आशा आहे; विश्वप्रकृतीची पायाभूत हालचाल कशी व कां होते, या संबंधानें कांहीं अंतरंग-ज्ञान या ठिकाणीं आम्हांला मिळण्याचा संभव आहे. या ठिकाणीं आणखी एक गोष्ट स्पष्ट होते कीं, व्यक्ति काय किंवा विश्व काय दोन्ही वस्तू एका सर्वातीत सत्यांतून, सद्वस्तूंतून उदय पावतात -- ती सद्वस्तु या दोन रूपांनीं व्यक्त होते. अधिमानसिक जाणिवेला हें सत्य, एक स्वयं प्रकाश, स्वयंसिद्ध सत्य असतें; अर्थात् यावरून हें उघड आहे कीं, व्यक्तीचें मन आणि जीवन, व्यक्तीचा निसर्गांतील आत्मा, विश्वात्म्याचें आंशिक आविष्करण विश्वात्म्याचा अंशाविष्कार असला पाहिजे; तसेंच तो सर्वातीत सद्वस्तूचा, सत्याचाहि, प्रत्यक्षत: आणि विश्वात्म्याच्या द्वारां अंशाविष्कार असला पाहिजे; मात्र हा आविष्कार परिस्थितिसापेक्ष आणि अर्धवट झांकलेला, आवरणयुक्त असा असतो, हें लक्षांत ठेवावयास पाहिजे. या आविष्कारासंबंधानें आणखी दुसरी एक गोष्ट आम्हांला दिसते ती ही कीं, व्यक्ति स्वत: हें ठरवितें कीं तिचे ठिकाणीं विश्वात्म्याचा वा विश्वातीत आत्म्याचा आविष्कार कोणता व कसा व्हावा, कोणत्या अंशाचा किती व्हावा : व्यक्तीचा स्वभाव हा विश्वात्म्याचा किंवा विश्वातीत सद्वस्तूचा जो अंश घेऊं शकेल, पचवूं शकेल, आणि मूर्त करूं शकेल, तो अंशच व्यक्ति घेते; तिचें मन, जीवन, शारीर अवयव हे, विश्वात्म्यापासून व विश्वातीत

पान क्र. २८

 

सद्वस्तूपासून घेतलेल्या अंशाला, त्यांना जमेल तो आकार देतात. हें इतकें विश्वविषयक सत्य-ज्ञान अधिमानसाच्या क्षेत्रांत आम्हांला मिळतें, पण मूळ प्रश्न कांहीं अधिमानसिक ज्ञानानें सुटत नाहीं : मूळ प्रश्न हा कीं, मनोमय पुरुषाचे ठिकाणीं जे विचार, जे अनुभव तयार होतात, वस्तुचित्रांचें जें विश्व त्याच्या मनांत उभें केलें जातें -- ही सर्व रचना त्या पुरुषाचा स्वतःचा आत्माविष्कार असतो, त्याच्या आत्मिक अस्तित्वाच्या एखाद्या सत्याचें स्वयंरचित रूप असतें, त्या सत्याच्या गतिमान् शक्यतांचें प्रकटीकरण असतें हा पक्ष खरा आहे, का प्रकृति, निसर्ग ही सर्व रचना करून मनोमय पुरुषाला ती नजर करतो आणि त्या रचनेला वैयक्तिक स्वरूप देण्याचें कार्य, निसर्गाचा अंश असलेला हा पुरुष करतो या अर्थानें ती त्या पुरुषाच्या तंत्रानें झालेली आहे असें म्हणणारा हा दुसरा पक्ष खरा आहे, किंवा व्यक्तीच्या मनांतील विचार, अनुभव, वस्तुविश्व हें सर्व विश्वात्म्याच्या कल्पनेचा खेळ आहे, अनंताच्या प्रतिभेचा अद्‌भुत कल्पनाविलास आहे आणि तो इतरत्र कोठें उभा केला नसून त्याच्या स्वतःच्या शाश्वत शुद्ध अस्तित्वरूप कोऱ्या अज्ञेयविशेष अनिर्वाच्य पटावरच उभा केलेला आहे, हा तिसरा पक्ष खरा आहे ? विश्वनिर्मिती-संबंधानें आपापलें स्पष्टीकरण देणारे हे तीन पक्ष आहेत. या तीन पैकीं प्रत्येक पक्ष खरा असण्याचा संभव आहे, खरा असण्याच्या संभवाचें प्रमाण सर्वांच्या बाबतींत सारखेंच आहे : या पक्षांपैकीं अमुकच खरा व इतर खोटे असा निर्णय घेणें मनाला अशक्य आहे; त्याच्यांत ती पात्रता नाहीं -- कारण प्रत्येक पक्षाला मानसिक तर्काचा सारखाच आधार आहे, अंतःस्फूर्तीचें ज्ञान आणि अनुभव यांचाहि आधार सर्वांना सारखाच आहे. अधिमानस या गोंधळांतून कांहीं मार्ग काढूं शकत नाहीं -- उलट या गोंधळांत भर घालतें; कारण अधिमानसाचें व्यवहारतत्त्वच असें आहे कीं, जी कांहीं शक्यता सत्याच्या पोटांत असेल त्या प्रत्येक शक्यतेनें स्वतंत्रपणें हक्कानें आपलें आपलें मूर्त रूप घ्यावें, आणि आपलें आपलें अस्तित्व ज्ञानाच्या क्षेत्रांत, गतिमान् आत्मप्रकटीकरणाच्या क्षेत्रांत, आत्मसमर्थक अनुभवाच्या क्षेत्रांत अभिव्यक्त करावे.

अधिमानस आणि मनाचे उच्च प्रान्त या सर्व ठिकाणीं, दोन गोष्टी एकाच वेळीं अस्तित्वांत दिसतात : ज्यांत कांहीं विशेष, गुण, संबंध नाहींत असा शुद्ध, शांत, स्वयंभू, स्वयंपूर्ण, स्वाधिष्ठित असा आत्मा या ठिकाणीं दिसतो आणि त्याबरोबरच नियोजक ज्ञान-शक्ति, निर्मितिशील

पान क्र. २९

 

जाणीव आणि तन्निष्ठ शक्ती महान् गतीनें कार्य करतांना आणि विश्वांतील नानाविध आकार धारण करून, त्यांच्या पोटीं क्रियाशील बैठक घेतांना दिसतात. या दोन गोष्टी एका दृष्टीनें अन्योन्यविरोधी आहेत -- पण वास्तविक त्या अन्योन्यपूरक आहेत : शांत आत्मा व क्रियाशील आत्मा ही जशी जोडी अधिमानसाच्या क्षेत्रांत दिसते, तशी निर्गुण व सगुण ब्रह्म हीहि सर्वश्रेष्ठ जोडी तेथें दिसते : निर्गुण ब्रह्माच्या दिशेनें आत्मानुभव घेत आम्ही चाललों, तर शेवटीं असा अनुभव येतो कीं, अस्तित्वाचा आदि आणि अन्त अनिर्वचनीय असें एक सर्वसंबंधशून्य, सर्वविशेषहीन, सर्वश्रेष्ठ केवल तत्त्व आहे. उलट सगुण ब्रह्माच्या दिशेनें आम्ही अनुभव घेत चाललों, तर शेवटीं सर्वश्रेष्ठ, सर्वव्यापी, व्यक्तिरूप ईश्वर आम्हांला दिसतो; हा ईश्वर जसा विश्वरूप, तसा विश्वातीतहि आहे. सर्व संबंध, सर्व विशेष यांचा अनिर्बंध धनी आहे, तो आपल्या अनंत अस्तित्वाच्या पोटीं कोटि कोटि विश्वें धारण करतो; आपल्या स्वयंभू प्रकाशाच्या एका एका किरणानें, आपल्या अनिर्वचनीय स्वरूपाच्या एका एका अंशानें एक एक विश्व सर्वथा व्यापून असतो. शाश्वत वस्तूच्या या दोन सत्य स्वरूपांना अधिमानस सारख्याच दर्जाचे समजतें आणि सारख्याच दक्षतेनें आपल्या क्षेत्रांत स्थान-मान देतें; मनाला मात्र यांपैकीं एक ग्राह्य, तर दुसरें अग्राह्य असतें; हे दोन अन्योन्यविरोधी पर्याय आहेत अशी त्याची श्रद्धा असते; मूळ सद्वस्तूचींच हीं दोन सर्वश्रेष्ठ रूपें आहेत, असें अधिमानस मानतें; अर्थात् या दोहोंच्या पलीकडे यांच्यापेक्षांहि श्रेष्ठ असें सर्वातीत तत्त्व, यांना जन्म देणारें म्हणा किंवा यांना आपल्या निरतिशय काळातीत स्वरूपाच्या पोटीं धारण करणारें म्हणा -- कोठेंतरी असलें पाहिजे, हें उघड आहे. हें तत्त्व एक अनिर्देश्य, अनिर्वाच्य असें, मनाला कोणत्याहि प्रकारें ग्रहण करण्यास अशक्य असें मूळ रहस्य असणार, हें सांगावयास नकोच. या रहस्याचे साक्षात्कार, अनुभव कांहीं प्रमाणांत त्याच्या कार्यकारी शक्तींकडे पाहून, त्याच्या प्रकट अंगांकडे पाहून, त्याच्या मूलभूत अभावात्मक आणि भावात्मक नित्य अखंडपणें घडणाऱ्या दर्शनांकडे पाहून आम्हांला येऊं शकतात -- या रहस्याच्या दोन सारख्या तोलाच्या अंगभूत सर्वश्रेष्ठ सत्यांचा, एकेकाचा वेगळा किंवा दोहोंचा एकदम मागोवा घेणें त्याच्या आतांच निर्देशिलेल्या शक्तींच्या, अंगांच्या दर्शनांच्या द्वारांच शक्य असतें व याप्रमाणें आम्ही त्याचा मागोवा घेऊन, तें पूर्णतया उकलण्याचा प्रयत्न करीत असतों -- परंतु हा सर्व प्रयत्न शेवटीं

पान क्र. ३०

 

अपुरा पडून सर्वाधिक, सर्वश्रेष्ठ मानसिक जाणिवेलाहि, तें रहस्य अज्ञेय व अगम्य आहे असें कबूल करणें भाग पडतें.

श्रेष्ठांत श्रेष्ठ मनाच्या दृष्टीनें अगम्य असणारें हें रहस्य, हें श्रेष्ठांत श्रेष्ठ केवल तत्त्व जर खरोखरीच शुद्ध गुणहीन, विशेषहीन, गुणसंभव-विशेषसंभवहीन असेल, तर निर्मिति, आविष्कार, विश्व अस्तित्वांत येणें अशक्य आहे. पण विश्व तर आहे. मग प्रश्न असा येतो कीं विशेषहीन मूलतत्त्व आणि विशेषमय विश्व ही अन्योन्य-विरोधकांची जोडी अस्तित्वांत कोणीं आणली ? एकाच मूलतत्त्वांत एक भाग निर्गुण दुसरा सगुण असा स्वगत विभाजनाचा पराक्रम कोणीं केला ? ज्याला उत्तरच नाहीं असें हें कोडें कोणीं निर्माण केलें ? अशक्याची शक्यता कोणीं घडवून आणली ? हें काम करणारी कोणीतरी शक्ति असली पाहिजे, हें उघड आहे; आणि मूल केवळ तत्त्व, ही एकच मूळ सद्वस्तु असल्यानें, सर्वांचें मूळ तीच असल्यानें, ही अशक्य शक्य करणारी शक्ति, या सद्वस्तूवर अवलंबून असली पाहिजे, असें मानावें लागतें : असें न मानलें तर मूळ सद्वस्तु, मूळ परब्रह्म वेगळें व ही शक्ति, ही विश्वाभास निर्माण करणारी कल्पनाविशारद माया वेगळी, असा पक्ष घ्यावा लागेल आणि सांख्यांच्या प्रकृतिपुरुष द्वैतासारखाच ब्रह्ममायावाद विश्वाच्या मुळाशीं उभा करावा लागेल. ही आपत्ति टाळण्यासाठीं विश्वनिर्माण करणारी शक्ति ही, निर्गुण सगुणातीत सद्‌वस्तूचीच अंगभूत एकच एक शक्ति आहे असें वर कल्पिल्याप्रमाणें मानलें, तर तर्कबुद्धीला सर्वस्वी अमान्य अशी ही गोष्ट खरी मानल्याप्रमाणें होतें : कारण ब्रह्म (मूळ सद्‌वस्तु) सर्व संबंध व सर्व विशेष यांजपासून दूर आहे; यांची शक्यताहि त्याचे ठिकाणीं किंचिन्मात्रहि नाहीं; आणि याच गोष्टी माया (त्याची एकमेव शक्ति) त्याजवर आपल्या कल्पनाविलासानें लादते, त्याला या गोष्टी बघावयास लावते, त्याचा स्वतःचा आधार देऊन मान्य करावयास लावते, असा तर्कबुद्धीला सर्वस्वी अग्राह्य असा पक्ष घ्यावा लागतो. ब्रह्मानें अस्तित्व एक प्रकारचें आणि या अस्तित्वाची अंगभूत शक्ति सर्वस्वी विरुद्ध प्रकारची -- असा हा तर्कबुद्धीला सुतराम् दुर्बोध असा पक्ष आहे. हा पक्ष मान्य करावयाचा तर, बुद्धीच्या पलीकडे असणारें, बुद्धीहून वरच्या पातळीवरचें हें रहस्य आहे, त्याला सत्य असत्य कांहींच नांव देतां येत नाहीं -- तें अनिर्वचनीय आहे, असें म्हणून या पक्षाला मान्यता द्यावी लागेल. पण या बाबतींत इतक्या अडचणी आहेत कीं, दार्शनिक शोध, संशोधन व चिकित्सा करून

पान क्र. ३१

 

जर हा पक्ष, या शोधाचा, संशोधनाचा व चिकित्सेचा शेवटला शिखरपक्ष म्हणून आमच्यापुढें अटळपणें, अनिवार्यपणें उभा राहिला, किंवा आध्यात्मिक अनुभवाचा शेवटला टप्पा म्हणून जर हाच पक्ष आम्हांला अटळपणें प्रतीत झाला, तरच तो मान्य करतां येईल. विश्वांतील वस्तुजातासंबंधानें दोन पक्ष संभवतात -- १ सर्व वस्तू आभासात्मक आहेत : या आभासात्मक वस्तू ज्या निर्मिल्या आहेत त्या निदान निर्मात्याच्या मनांत तरी अस्तित्वांत आहेत, असें या कल्पनेंत मानणें भाग असतें; आणि हा निर्माता मूळ एकमेव ''पुरुषा'' हून दुसरा कोण असणार ? या एकमेव पुरुषाच्या अस्तित्वाशीं निगडित जी जाणीव, जें मन, त्या जाणिवेंतच, त्या मनांतच हा आभासात्मक वस्तुसंसार असणार अर्थात्, या पक्षीं, अनिर्वचनीय, अज्ञेयविशेष अशा मूळ ''पुरुषाच्या'' मनानें उभे केलेले विशेष म्हणजे विश्वांतील वस्तूंचा पसारा असें मानावें लागतें. असो.  हा एक पक्ष झाला. आतां दुसरा पक्ष असा कीं, मूळ एकमेव ''पुरुषाच्या'' शक्तीनें विश्वांतील विशेष, विश्वांतील वस्तू निर्माण केल्या असून, त्या वस्तू आभासात्मक नाहींत तर खऱ्या, सत्यमय अस्तित्वाच्या आहेत. या पक्षांत प्रश्न हा येतो कीं, कोणत्या मूळ द्रव्यांतून या वस्तू, हे विशेष निर्माण केले गेले ? मूळ ''पुरुषाहून'', मूळ केवळ तत्त्वाहून वेगळें असें शून्य, अभाव म्हणून कांहीं आहे आणि त्यांतून हा विश्वांतील वस्तूंचा पसारा निर्माण केला गेला हें एक उत्तर संभवतें -- पण या उत्तरांत, नवेंच द्वैत उभें केल्यासारखें होतें : मूळ एकमेव केवल तत्त्व वा पुरुष हें एक ''क्ष'' अनिर्वचनीय तत्त्व म्हणून आहे आणि हें दुसरें ''शून्य,'' ''अभाव'' नांवाचें ''भावात्मक'' तत्त्व त्याच्या जोडीला उभें करून, त्यांतून विश्वनिर्मिति केली जात आहे, हें नवें द्वैत तर्कबुद्धि मान्य करूं शकत नाहीं. म्हणून शेवटीं हा निर्णय घ्यावा लागतो कीं, मूळ सत्य, मूळ केवल तत्त्व वा पुरुष ठामपणें विशेषहीन किंवा विशेषसंभवहीन असूं शकत नाहीं. जें कांहीं विशेष निर्माण होईल तें त्या तत्त्वाचेंच आणि त्या तत्त्वांतच उदयास येईल हें निश्चित; आणि या सत्य तत्त्वाचें द्रव्य ज्याच्या निर्माणास लागलें आहे तें सर्व विशेषांचें भांडार सत्यच असणार, आभास असणारच नाहीं; मूळ शाश्वत सत्य वा मूळ अनंत अस्तित्व जें आहे त्यांतून, सत्याचें नांव धारण करून, सत्याच्या उलट असलेल्या निराधार असत्याचा महान् पसारा निर्माण होणें आणि दुसरें कांहींहि निर्माण न होणें ही गोष्ट

पान क्र. ३२

 

असंभवनीय आहे, अशक्य आहे. मूळ केवल तत्त्व कोणत्याहि विशेषानें मर्यादित होऊं शकत नाहीं, विशेषांच्या कसल्याहि महत्तम संख्येनेंहि मर्यादित होऊं शकत नाहीं, अशा अर्थानें जर मूळ केवल-तत्त्व हें विशेषहीन वा विशेषसंभवहीन आहे असें म्हटलें, तर तें म्हणणें समजण्यासारखें आहे, मान्य करण्यासारखेंहि आहे. परंतु तें तत्त्व स्वत: स्वतःमध्यें हवे ते विशेष निर्माण करण्यास असमर्थ आहे, या अर्थानें जर तें विशेषहीन वा विशेषसंभवहीन आहे असें म्हटलें तर तें समजण्यासारखें वा मान्य करण्यासारखेंहि नाहीं. सर्वोच्च अस्तित्व, सर्वश्रेष्ठ सत्य जें आहे, तें आपल्या सत्य-अस्तित्वाच्या पोटीं हवे तेवढे सत्य-विशेष निर्माण करण्यास समर्थ असलेंच पाहिजे; तें आपल्या स्वयंभू अनंत अस्तित्वाच्या पोटीं, स्वतःच्या नानाविध सत्यस्वरूपाचें प्रकटीकरण करण्यास, स्वतःतून स्वत: विविध प्रकार निर्माण करण्यास व ही स्वयंनिर्मित किंवा स्वयंप्रकटीकृत सृष्टि आपल्या पोटांत धारण करण्यास सर्वथा समर्थ असलेंच पाहिजे -- तें तसें नाहीं असें म्हणणें तर्कबुद्धि मान्य करूं शकत नाहीं.

तथापि अधिमानसांत या प्रश्नाचा शेवटला स्पष्ट निकाल लागत नाहीं. या प्रश्नाच्या बाबतींत कांहीं प्रत्यक्ष, कांहीं तर्क असा प्रकार अधिमानसाच्या क्षेत्रांतहि असतो. अधिमानसांतून योगप्रक्रियेनें अतिमानसांत पाऊल टाकावें तेव्हां कुठें तेथील ज्ञानसरणींत या प्रश्नाचें समाधानकारक व सर्वथा प्रत्यक्षसिद्ध, अनुभवसिद्ध असें उत्तर सांपडूं शकतें. तेथील जाणीव ही सत्यमय, सत्यप्रकाशित, सत्यप्रकाशक व सत्यधारक अशी जाणीव असते. अनंत, शाश्वत, मूलतत्त्वाची आत्मजाणीव म्हणजे अतिमानस; तसेंच, या आत्म-जाणिवेंत स्वभावत: असणारी तदंगभूत आत्म-सविशेषीकरणाची शक्ति म्हणजेहि अतिमानस. अतिमानसिक सत्य-जाणिवेंत या दोन गोष्टी नित्यसंबंधित व नित्यनिगडित असतात. अतिमानसाचा, अतिमानसिक सत्य-जाणिवेचा पायाभूत स्थायीभाव म्हणजे अनंताची आत्म-जाणीव हा आहे; आणि अनंताचें आत्मसविशेषीकरण ही तिच्या स्वयंभू अस्तित्वांतील अंगभूत क्रियाशीलता आहे; क्रियाशील स्वरूपशक्ति आहे. कालातीत अनंताची आत्म-जाणीव ही, अनंत आत्म्याचे ठिकाणीं जें जें कांहीं त्याच्या अस्तित्वाचें व स्वरूपाचें सत्य पाहतें, तें तें सत्य त्याची जाणीवयुक्त क्रियाशील स्वरूपशक्ति अनंत कालाच्या पटावर व्यक्त व आविष्कृत करीत असल्याचें अतिमानस बघत असतें. अतिमानसाच्या ज्ञानसरणींत प्रत्यक्षाचाच सर्वत्र व्याप असतो --

पान क्र. ३३

 

अनुमानादिकांचें तेथें काम नसतें व स्थान नसतें. असें हें अतिमानस प्रत्यक्षपणें स्पष्टपणें जाणतें कीं, (अधिमानसा सारखा प्रत्यक्षाधिष्ठित तर्क करीत नाहीं कीं) मूल सर्वश्रेष्ठ तत्त्व ठामपणें विशेषसंभवहीन नाहीं; तें कांहीं सर्व-निषेधक केवल तत्त्व नाहीं. अनंत अस्तित्व, हें स्वतःच्या शुद्ध स्वरूपांत कोणताहि बदल न होऊं देणारें असें स्वयंपूर्ण अस्तित्व आहे. त्यांत एकच एक शुद्ध जाणिवेची शक्ति आहे. कधींहि कोणताहि बदल न होणाऱ्या अनंतकालिक अस्तित्वाकडे सारखें बघत राहणें व या शुद्ध स्वयंभू अस्तित्वाच्या अचल आनंदाचा अखंड भोग घेत राहणें हें या शक्तीचें काम आहे. मूळ सर्वोत्तम केवल तत्त्वाचें हें स्वरूप, अतिमानसाच्या सत्यदृष्टीनें सत्य आहे -- पण हें कांहीं त्याच्या दृष्टीनें पूर्ण सत्य नव्हे, अनंत अस्तित्व हें ज्याचें स्वरूप आहे त्याचें अनंत शक्ति हें तत्पूरक स्वरूप असलेंच पाहिजे; अनंत अस्तित्व + अनंत शक्ति हेंच मूळ केवलाचें पूर्ण स्वरूप असूं शकतें, व आहे; या मूळ केवलाच्या पोटीं अक्षय व शाश्वत स्वस्थता आणि शांति आणि त्याबरोबरच शाश्वत क्रियाशीलतेचें, निर्माणकार्याचें सामर्थ्य, अशी वस्तुस्थिति असली पाहिजे; त्याची शाश्वत घडणारी क्रिया त्याच्या स्वरूपांतच घडत असली पाहिजे; त्याजकडून घडणारी शाश्वत, अनंत निर्मिति हीहि त्याच्या शाश्वत अनंत स्वरूपांतून आणि स्वरूपांतच घडत असली पाहिजे; निर्मितीचा पाया हा दिसायला या मूळ केवलाच्या अस्तित्वाहून वेगळा दिसत असला, तरी तो पाया या केवलाच्या पोटांतच असला पाहिजे; कारण मूळ केवलतत्त्वाच्या दृष्टीनें 'दुसरें' असें मुळांत कांहींच नसतें. आतां, अनंत शक्ति म्हटली कीं, शुद्ध, निष्क्रिय, सम, शांत व परिवर्तनशून्य स्थितींत आराम करणारी शक्ति, एवढें एकच कांहीं तिचें स्वरूप असूं शकत नाहीं; तिच्या क्रियाशील पोट-शक्ती अनंत असणें स्वाभाविक आहे; जी जाणीव (शक्ति) अनंत आहे, तिच्या पोटीं आत्म-जाणिवेचीं अनंत सत्यें असणें अटळ आहे. हीं सत्यें क्रियाशील झालीं म्हणजे आमच्या ज्ञानशक्तीला तीं जाणीवयुक्त सद्वस्तूचीं अंगें म्हणून दिसतील, आमच्या आत्मिक ''इंद्रियशक्तीला'' ही सत्यें या सद्वस्तूच्या कृतिशील स्वरूपांतील क्रिया म्हणून दिसतील, आमच्या सौंदर्य (आनंद) दृष्टीला हीं सत्यें अस्तित्वाच्या आनंदाचीं साधनें आणि मूर्त रूपें म्हणून दिसतील. निर्मिति म्हणजे मूळ अनंताचें, अनंत केवलाचें आत्म-प्रकटीकरण, ही गोष्ट वरील विवेचनावरून उघड होत आहे; अनंताच्या पोटीं अनंत शक्यता असतात, कांहीं

पान क्र. ३४

 

नियमानुसार या शक्यतांचें व्यवस्थित आविष्करण म्हणजेच निर्मिति -- म्हणजेच सृष्टि. कोणतीहि शक्यता म्हटली कीं तिच्यापाठीमागें, सद्वस्तूच्या स्वरूपांतील एक सत्य असलेंच पाहिजे; अशा सत्याचा आधार हाच शक्यतांचा अपरिहार्य पाया असतो; अशा आधारावांचून शक्यता अस्तित्वांत येऊंच शकत नाहींत. आतां, जेव्हां या सद्‌वस्तूंतील कोणत्याहि पायाभूत सत्याचें प्रकटीकरण (निर्मिति) होतें, तेव्हां दिव्य मूळ केवल तत्त्वाचें एक मूळ आत्मिक अंग म्हणून आमच्या ज्ञानशक्तीला तें सत्य दिसतें; या सत्यांतून त्याच्या सर्वच्या सर्व शक्यता प्रकट होतात, त्याचीं अंगभूत सर्व गतिशील, कृतिशील यंत्रे तंत्रे प्रकट होतात; या गतिमान् शक्यता, विशिष्ट अर्थवाहक आकार, विशिष्ट अर्थवाहक शक्ती, विशिष्ट अर्थवाहक प्रक्रिया स्वतःच्या पोटांत अव्यक्त असलेल्या व्यक्त करतात : कोणत्याहि शक्यतेचें अव्यक्तांत जें सत्यरूप, स्वरूप, तदनुसार त्या शक्यतेंतून प्रकट झालेल्या वस्तूचा स्वभाव असतो, बनतो. विश्वनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया वरीलप्रमाणें असते. आपल्या मनाला ही प्रक्रिया पूर्णतया दिसत नाहीं; शक्यता वास्तवांत येतात एवढें आमच्या मनाला दिसतें; पण शक्यतांची शक्ति व वास्तवांची वास्तवता निश्चित करणारें सत्य, शक्यतांच्या व वास्तवतेच्या पाठीमागें असणारें अनिवार्य आज्ञेच्या स्वरूपाचें नियोजन व सद्वस्तूचें नियोजन करणारें हें अंगभूत सत्य, हें आमच्या मनाला दिसत नाहीं, त्यासंबंधाची निश्चिति आमच्या मनाला नसते; आमचें मन या संबंधानें केवळ तर्क करीत असतें, कल्पना बांधीत असतें. आमच्या मनाला वास्तवांतील गोष्टी दिसतात, त्यांमागील शक्यता तें अनुमानानें शोधून काढतें, पण कोणत्याहि निर्मितींतील रूपांच्या आणि हालचालींच्या पाठीमागें, तीं रूपें आणि त्या हालचाली अपरिहार्य करणाऱ्या ज्या गूढ अनिवार्य प्रेरणा असतात, त्या कांहीं मनाला दिसत नाहींत; कारण विश्वांतील अस्तित्वाच्या दर्शनीय भागीं, केवळ शक्ती असतात व या शक्तींच्या अंगभूत सामर्थ्यांचा एकमेकांवर आघात-प्रत्याघात होऊन ज्या शक्तींचें पारडें जड होईल, त्यांच्या दिशेनें अंतिम फलें उदय पावतात. आमचें मन या गोष्टी पाहूं शकतें; पण या सर्व शक्तींचा, मूळ एक किंवा अनेक नियामक वा प्रेरक, कांहीं आमच्या अज्ञानव्याप्त मनाला दिसूं शकत नाहींत; हे मूळ नियामक वा प्रेरक आणि आज्ञारूप अनुल्लंघनीय अशा त्यांच्या मूळ गूढ प्रेरणा अतिमानसाला, अतिमानसिक सत्यज्ञानाला स्पष्ट दिसतात; या अतिमानसाचें निरीक्षण,

पान क्र. ३५

 

अनुभव अशा ''गूढ'' गोष्टींतच वावरत असतो; या गूढ गोष्टीच त्याच्या अनुभवाचे, निरीक्षणाचे विषय असतात. अतिमानसांत निर्मितीची क्रिया पाहिली असतां -- मूळ सत्याच्या अनुल्लंघनीय अशा प्रेरणा, सत्यांतील शक्यता आणि त्या शक्यतांचे वास्तवांतील परिणाम, या तीन गोष्टी मिळून एक अविभाज्य पूर्ण व्यापार होतो. शक्यता आणि त्यांचीं वास्तव रूपें हीं, त्यांच्या अंतरंगांत, त्यांना निर्माण करणारी अनुल्लंघनीय मूळ प्रेरणा वागवीत असतात; जे कांहीं परिणाम, ज्या कांहीं निर्मिती (रचना) या अविभाज्य व्यापारांत वास्तव सृष्टींत उदयास येतात, त्या सर्व मिळून मूळ सत्याचें शरीर वा सत्याचें व्यक्त रूप बनतें; सर्वमय मूळ सद्वस्तूच्या सत्याच्या अर्थवाहक हेतुमय शक्ती व पूर्व नियोजित असलेले असे आकार या वास्तवांतील परिणामांच्या आणि रचनांच्या द्वारां व्यक्त होत असतात.

केवलाचें, परब्रह्माचें आपलें मूळ पायाभूत ज्ञान व त्याविषयींचा आपला सारभूत आत्मस्पर्शी आध्यात्मिक अनुभव, हा अंत:स्फूर्त अंतदृष्टीचा किंवा अतिमानसिक प्रत्यक्ष अनुभव असतो. या अनुभवानुसार हें परब्रह्म, अनंत सत्-चित्-आनंद असतें; स्थलकालांनीं अपरिच्छिन्न असें तें अस्तित्व असतें -- जाणीवयुक्त, आनंदयुक्त असें तें अस्तित्व असतें. त्याचें अस्तित्व, जाणीव व आनंद सर्वदा सर्वत्र एकरूप व अविभाज्य असतात. अधिमानसिक व मानसिक जाणिवेंत, केवलाचीहि मूलभूत एकता फोडून त्याचीं तीन अंगें वेगळीं कल्पितां येतात, वेगळीं वेगळीं ठेवता येतात. प्रत्येक अंग स्वतंत्र व स्वयंभू तत्त्व म्हणून मानतां येतें : कारण तेथें वस्तुनिरपेक्ष शुद्ध व अखंड आनंद इतक्या तीव्रतेनें आमच्या अनुभवास येऊं शकतो कीं, आम्ही केवळ आनंदच होऊन जातों; आमचे अस्तित्व, आमची जाणीव यांचें भान आम्हांस राहत नाहीं -- तीं या आनंदांत विलीन होऊन जातात, त्यांचें स्वतंत्र अस्तित्व मुळींच प्रतीत होत नाहीं; सर्वनिरपेक्ष शुद्ध जाणिवेची व अस्तित्वाची गोष्टहि अशीच आहे. शुद्ध जाणिवेशीं व शुद्ध अस्तित्वाशीं, शुद्ध आनंदाप्रमाणेंच आम्ही स्वतंत्रपणें एकरूप होऊन जाऊं शकतों. अतिमानसिक जाणिवेंत मात्र हीं तीन अंगें सर्वदा अविभाज्य असतात; सत् चित् आनंद मिळून एक त्रिमुखी अविभाज्य मूळ आत्मतत्त्व असतें; सत्‌चित्आनंद या तीनहि तत्त्वांना आपलीं आपलीं प्राथमिक रूपें, स्वाभाविक व स्वरचित असे स्वत:चे आकार असतात; हीं सर्वाचीं सर्व प्राथमिक रूपें वा आत्मिक

पान क्र. ३६

 

विशेष, त्रिमुखी मूळ केवल आत्मतत्त्वाच्या एकतेच्या पोटीं जन्म घेतात. सत् तत्त्व त्याचे आपले, चित् तत्त्व त्याचे स्वतःचे, आनंदतत्त्व त्याचे आत्मिक विशेष, प्रत्येक तत्त्व इतर दोहोंच्या नित्य संगतींत राहून, व्यक्त करीत असतें : अस्तित्वाच्या दिव्य आनंदानें प्रेम, हर्ष, सौंदर्य हे आपले प्राथमिक व पायाभूत विशेष व्यक्त केले आहेत; आनंदाच्या स्वभावांतून, द्रव्यांतून हे विशेष निर्माण झाले आहेत हें सहज समजण्यासारखें आहे; केवलाच्या स्वरूपावर बाहेरून लादलेल्या या गोष्टी नाहींत; किंवा केवलानें आधार दिलेल्या परंतु त्याच्या बाहेर निर्माण झालेल्या अशाहि या गोष्टी नाहींत. केवलाच्या अस्तित्वांतील, मूळ स्वरूपांतील सत्यें, त्याच्या जाणिवेचे स्वाभाविक अंश, त्याच्या अस्तित्वाच्या अंगभूत शक्तीचे समर्थ आविष्कार हेंच, आनंदजन्य प्रेम, हर्ष आणि सौंदर्य या विशेषांचें खरें स्वरूप आहे. केवलाच्या सर्वनिरपेक्ष शुद्ध जाणिवेचे प्राथमिक पायाभूत विशेष, आणि सर्वनिरपेक्ष शुद्ध अस्तित्वाचे प्राथमिक पायाभूत विशेष यांचीहि गोष्ट वरीलप्रमाणेंच आहे. ज्ञान आणि इच्छा (संकल्प) हीं सत्यें व या शक्ती, मूळ जाणीव-शक्तीच्या स्वभावांतून विशेषरूपानें व्यक्त झालीं आहेत; आत्मन्, ईश्वर, पुरुष हे तीन विशेष, केवळ शुद्ध अस्तित्वाचे आहेत; हे तीन विशेष तीन वेगळे वेगळे नाहींत, तर 'एकच त्रिमुखी विशेष' हें यांचें खरें स्वरूप आहे. मूळ अस्तित्वाचें, सद्‌वस्तूचें सर्व आत्मप्रकटन, आत्मनिर्माण हें या त्रिमुखी विशेषांवर सर्वस्वीं अवलंबून असतें -- या त्रिमुखी विशेषाच्या अपरिहार्य प्राथमिक गृहीत पायावर, सद्‌वस्तूपासून होणारी सर्व आत्म-सृष्टि, सर्वथा उभारली जात असते.

सत् चित् आनंद ब्रह्माच्या आत्म-निर्माणाची, आत्म-आविष्काराची प्रक्रिया आणखी तपासीत गेल्यास आम्हांला असें दिसतें कीं, वर जीं सच्चिदानंदाचीं ज्ञान, प्रेम इत्यादि व्यक्त प्राथमिक रूपें सांगितलीं त्यांतील प्रत्येक रूप वा प्रत्येक शक्ति म्हणा, क्रियाशील होतांना त्रिपुटीचा उपयोग करते, त्रिपुटीशिवाय ज्ञान, प्रेम इत्यादि कोणत्याहि सच्चिदानंदजन्य प्राथमिक विशेषाला कार्यकारी होतांच येत नाहीं : ज्ञान हा एक प्राथमिक विशेष, शक्ति वा रूप घ्या : ज्ञाता, ज्ञेय व ज्ञान अशी त्रिपुटीची बैठक अटळपणें ज्ञानाला घ्यावी लागते; प्रेम घ्या : प्रेम करणारा, प्रेम-विषय आणि प्रेम ही प्रेमाची त्रिपुटी; संकल्पकर्ता, संकल्पविषय आणि संकल्पपूर्तिकारक शक्ति ही संकल्पत्रिपुटी; भोक्ता,

पान क्र. ३७

 

भोग्य आणि त्यांना जोडणारा हर्ष ही हर्षाची त्रिपुटी; विषयग्राहक, विषय आणि विषयविषयी यांना एकत्र धरणारी आत्म-जाणीव ही आत्मन्‌ची त्रिपुटी. अनंत केवलाच्या प्राथमिक आत्मिक स्वयंनिर्मित विशेषांचा विचार येथवर झाला : या प्राथमिक पायाभूत विशेषांतूनच विश्वगत असें दुसरें सर्व विशेष निघतात; 'मूळ अस्तित्व, जाणीव, शक्ति, आनंद यांचे अर्थपूर्ण व हेतुपूर्ण संबंध, शक्ति, रूपें' -- हें वर्णन कमीअधिक सर्व प्राथमिक विशेषांना लागू पडतें : ब्रह्माच्या जाणीव-शक्तींतून उदय पावणाऱ्या सत्याविष्कार-प्रक्रियेच्या विविध शक्ती, विविध परिस्थिती, तिचे विविध पंथ आणि मार्ग ब्रह्माच्या सत्याच्या आविष्काराच्या पाठीमागील अनुल्लंघनीय प्रेरणा, आविष्कारविषयक शक्यता, आणि वास्तवांतील त्याचे आविष्कार या सर्व गोष्टी अ-प्राथमिक विशेषांच्या वर्गांत पडतात. ब्रह्मगत शक्तींचें, शक्यतांचें आणि त्यांच्या स्वाभाविक परिणामांचें हें व्यवस्थित प्रकटीकरण, पृथक् पृथक् विभागलेलें असें असत नाहीं; तर एकतेनें व्यापलेलें, अंतर्यामींच्या अभेदानें व ऐक्यानें एकरूप असलेलें असें दिसतें : अतिमानसिक जाणीवच या सर्व विशेषांना ही अंतरंग-एकता देते; मूळ महान् सत्याच्या पायावर, हें प्रकटीकरण अतिमानसच जाणीवपूर्वक घडवून आणतें.  सर्व विशेष, कोणतीं तरी सत्यें व्यक्त करीत असतात, त्यांचें मूळ स्वाभाविक स्वरूप हीं सत्येंच असतात, आणि हीं सत्यें परस्परसंवादी असल्यानें, त्यांना व्यक्त करणाऱ्या विशेषांच्या मध्येंहि अतिमानस परस्पर-संवादित्व राखतें. अतिमानसाच्या क्षेत्रांत कोठेंहि सत्यसृष्टीवर निराधार कल्पना लादल्या जात नाहींत, कोठेंहि नियोजनहीन लहरींची निर्मिति केली जात नाहीं, कोठेंहि विभक्तता, भेदभाव नसतो, कोठेंहि सत्याचे तुकडे तुकडे करून ते अलग ठेवण्याची क्रिया नसते, मिटवतां न येण्यासारखा अन्योन्यविरोध कोठेंहि नसतो, दूर न होण्यासारखें विसंवादित्व कोठेंहि नसतें. अज्ञानव्याप्त मनांत मात्र कायमचा विसंवाद, विरोध इत्यादि घटना प्रादुर्भूत होतात : कारण तेथें जाणीव मर्यादित असते, आणि ती प्रत्येक विशेषाकडे, वस्तूकडे, 'ती स्वतंत्रपणें वस्तु आहे, ज्ञानविषय म्हणूनहि ती स्वतंत्र आहे', अशा पृथक्‌पणाच्या दृष्टीनें बघते आणि तदनुरूप तिच्या संबंधांत पृथक्-पणाचा व्यवहार करते; अर्थात् ही मानसिक जाणीव सर्व वस्तूंचें ज्ञान त्या पृथक् पृथक् आहेत या भावनेनें मिळवूं पाहते, सर्व वस्तूंचा उपभोग या भावनेनें घेऊं पाहते, सर्व वस्तूंवर स्वामित्व या भावनेनें गाजवूं पाहते;

पान क्र. ३८

 

या प्रयत्नांत ती केव्हां यशस्वी होऊन त्यावर आपली मालकी गाजवते, तर केव्हां त्यांच्या अंकित होऊन बसते व त्यांच्या सत्तेखालीं जाऊन त्यांचा जाच सोसते. परंतु मनाच्या अज्ञानाचा हा खटाटोप चालला असतां, त्याचे पलीकडील आत्मा कशासाठीं धडपडत असतो हें पाहिलें, तर मूळ सत्य, सद्‌वस्तु, मूळ जाणीव, मूळ शक्ति, मूळ आनंद हा, मनाला पृथक् पृथक् वाटणारे त्याचे ज्ञानाचे व भोगाचे विषय ज्यांच्या आधारानें अस्तित्वांत येतात व अस्तित्वांत राहतात त्यांच्या प्राप्तीसाठीं धडपडत असतो. खरा शोध, खरा ध्यास कशाचा करावा, कशाचा धरावा, खरें ज्ञान कोणतें हें त्याला शिकावयाचें असतें हें ज्ञान, हा ध्यास त्याच्या अंतरंगांत चालू असतो -- मात्र तो या मनापासून एका पडद्यानें झांकलेला असतो : मनाला आपली अज्ञानाची झोंप दूर करून, जागें होऊन मूळ सत्य, मूळ जाणीव, मूळ शक्ति व मूळ आनंद यांचें ज्ञान करून घेऊन, त्यांची प्राप्ति करून घ्यावयासाठीं क्रमवार पाठ घ्यावयाचे असतात. सर्व वस्तूंतील सत्य गाभा हा त्या एका मूळ सत्यांतूनच आला आहे, सर्व जाणिवा (वैयक्तिक) त्या एका मूळ जाणिवेच्याच प्रतिमा आहेत, कोणत्याहि वस्तूंत जी कांहीं अस्तित्वशक्ति आहे, ती त्या मूळ शक्तींतूनच तिला मिळालेली आहे, कोणताहि आनंद हा त्या मूळ आनंदाचेंच अंशमात्र प्रतिबिंब आहे, हें मनाला क्रमानें शिकावयाचें असतें, अनुभवावयाचें असतें. मूळ आत्म्याचें, सच्चिदानंदाचें जें आत्म-प्रकटीकरण, जें आत्म-सविशेषीकरण चाललें आहे त्याचाच, त्या प्रक्रियेचाच एक भाग म्हणजे जाणीव मर्यादित करणें आणि या मर्यादित जाणिवेनें पूर्ण जाणिवेचा प्रांत स्वतःच्या क्रमवार जागृतीनें गांठणें हा आहे. मर्यादित जाणिवेच्या अनुभवाला येणाऱ्या वस्तू वरवर पाहतां, मूळ सत्याच्या विरोधक दिसत असल्या तरी त्यांच्या खोल अंतरांत, त्यांच्यांतील सत्यांशाच्या दृष्टीनें त्या दिव्य अर्थाच्या वाहक असतात, दिव्य हेतूच्या धारक असतात; अनंतांतील कोणते तरी सत्य, कोणती तरी शक्यता या वस्तूपैकीं प्रत्येक वस्तू व्यक्त करीत असते. अतिमानस आपल्या अस्तित्वाचा, सृष्टिनिर्मितीच्या रहस्याचा, सृष्टीच्या प्रयोजनाचा, हेतूचा, अर्थाचा उलगडा करील, वृत्तांत लिहील, तर वरीलप्रमाणें तो लिहील; कारण त्याला सर्वत्र मूळ सत्याचा संसार दिसत असतो, आणि या सर्वगामी सत्य-व्यवहाराचा वृत्तान्त मनाच्या भाषेंत लिहावयाचा तर तो वरीलप्रमाणेंच लिहावा लागेल, हें उघड आहे.

पान क्र. ३९

 

मूळ केवल तत्त्व हें आपल्या स्वतांतून व स्वतःच्या इच्छेनुसार अनंत विशेष व्यक्त करूं शकतें व करतें; अर्थात् तें स्वायत्त, स्वनियत आहे, ही जशी एक गोष्ट आम्ही केवलाविषयीं शिकलों, तशी दुसरी गोष्ट त्या संबंधानें शिकावयाची आहे ती म्हणजे, तें अनात्मनियत नाहीं व होऊं शकत नाहीं, ही होय. अतिमानसिक जाणिवेला जशी केवलाची आत्म-नियतता स्पष्ट दिसते, तशी त्याची अनियतता, अनियमनीयता, हीहि स्पष्ट दिसते. आमचा आध्यात्मिक अनुभवहि दोन्ही प्रकारचा असतो. अस्तित्व आणि वस्तूंचा विश्वांतील पसारा, यांजकडे जेव्हां अतिमानस लक्ष देतें, तेव्हां केवलाच्या पूर्ण दर्शनांत आत्म-नियतता आणि अनात्म-नियमनीयतेचा अभाव हीं दोन्हीं लक्षणें येतात. कोणताहि एक विशेष अथवा विशेषांची कितीहि मोठी संख्या ही केवलाचें लक्षण होऊं शकत नाहीं, ती केवलाला मर्यादित करूं शकत नाहीं म्हणजे तें अनात्मनियत नसतें -- उलट पक्षीं, शुद्ध अस्तित्वाचें शून्य, ही जी केवलाची एक अनियत, विशेषशून्य अवस्था, तीहि केवलाला बन्धनकारक असूं शकत नाहीं; म्हणजे तें आत्मनियत असतें : या आत्मनियमनाच्या धर्मानुसार अनंत विशेषांना तें स्वतांमध्यें उदयास आणतें; तेव्हा अनियतता आणि आत्म-नियतता हे केवलाचे धर्म एकमेकाचे पूरक आहेत; त्याची अस्तित्वाची आणि अस्तित्वगत शक्तीची अनंतता त्याच्या अनियततेवर, अनियमनीयतेवर स्वभावत: अटळपणें आधारलेली आहे; तें कोणतीच एक वस्तु, कोणतीहि एक वस्तु-संख्या नाहीं; म्हणूनच अनंत वस्तू तें स्वतःच्या इच्छेनुसार होऊं शकतें. केवल तत्त्व हें मूलत: अनियत अनियमनीय आहे ही गोष्ट कांहीं विशिष्ट मूलभूत आध्यात्मिक अनुभवांच्या द्वारां आमच्या जाणिवेंत उतरते : आत्मा हा अक्षर, अविकारी व अचल आहे, ब्रह्म हें निर्गुण आहे, मूळ अस्तित्व हें शुद्ध, लक्षणहीन आहे, तें पुरुषात्मक नाहीं, तें शान्त, क्रियाशून्य आहे, तें "अस्तिचा'' अभावरूप आहे, तें वर्णन करतां येण्यासारखें नाहीं, तें ज्ञानविषय होण्यासारखें नाहीं -- केवलाविषयींचे हे नकारयुक्त भावात्मक अनुभव त्याची अनियत अनियमनीय वस्तुता दर्शवितात. उलटपक्षीं, आत्मा हा सर्वरूप व सर्व वस्तु होणारा आहे, ब्रह्म सगुण आहे, एकच (ब्रह्म) अनेकत्व पावलेलें आहे, तें अनंत ''पुरुष'' असून, विश्वगत सर्व पुरुषांचा व व्यष्टीचा उगम आणि पाया आहे, तें सृष्टीचा स्वामी आहे, तें शब्दरूप आहे, तें सर्व क्रियांचा, व्यवहारांचा चालक, मालक आहे, तें कळलें कीं सर्व कळतें, त्याच्या

पान क्र. ४०

 

ज्ञानांत सर्व विश्वाचें ज्ञान अंतर्भूत आहे : हे मूलभूत आध्यात्मिक अनुभव शुद्ध भावात्मक असून, वरील नकारात्मक अनुभवांचे ते पूरक असे अनुभव आहेत : सर्व विशेषांचा उगम व सर्व विशेषांचें सार म्हणजे आपल्या स्वव्यक्त क्रियेनें सर्व विशेष उत्पन्न करणारें -- अर्थात् सर्वस्वीं आत्मनियत असें -- तें मूळ केवल तत्त्व आहे, ही गोष्ट या अनुभवांनी आमच्या जाणिवेंत उतरते. अतिमानसिक जाणिवेला एका केवलाच्या अस्तित्वाच्या दोन बाजू अलग करतां येणें अशक्यच असतें; निर्गुण, सगुण इत्यादि केवलाच्या दोन बाजू आहेत, असें म्हणणें देखील त्याला जड जातें; कारण या दोन बाजू एकमेकांत भरून असतात; त्या सहअस्तित्वाने असणाऱ्या आहेत असें म्हणणेंहि थोडें सदोषच आहे; त्या वस्तुत: एका अस्तित्वानेंच असतात आणि नित्य अशाच एकत्वानें राहतात. त्यांच्या शक्ती एकमेकांना आधार देतात, आणि असा अतिनिकटचा अन्योन्यसबंध राखूनच अनंताच्या आत्मप्रकटीकरणाचा त्या पाया होतात, मूल आधार होतात.

तथापि केवलाचे, अन्योन्यविरोधी अनुभव वेगळे वेगळे ठेवणें, जाणिवेचे स्वतंत्र विषय करणें यांतहि अज्ञानाची निर्भेळ चूक होते असें नाहीं -- स्वतंत्र अनुभूति या नात्यानें ते भ्रम असतात असेंच कांहीं नाहीं : या अनुभूतीहि कार्यदृष्ट्या उपयुक्त असतात आणि अध्यात्मदृष्ट्या सत्य व संग्राह्य असतात. केवलाचा आविष्कारक्रम वरून खालीं आणि खालून वर असा दुहेरी असतो हें आपण जाणतो. केवलाचा भौतिकाच्या तळांतून खालून वर जाण्याचा हा क्रम पाहिला म्हणजे आरंभाला अचेतनाचा पाया लागतो, नंतर या पायांतून कांहीं विशेष उभे राहतात, त्यांतून दुसरे विशेष, असा क्रम चालतो -- तद्वत केवलाच्या, अतिभौतिकाच्या शिखरावरून खालीं येण्याच्या क्रमांत आरंभाला शुद्ध अविकारी आत्मा, नंतर त्याचे विशेष, नंतर त्या विशेषाचे विशेष, असा प्रकार अनुभवास येतो. म्हणून ज्याप्रमाणें खालून वर होणाऱ्या आविष्कारक्रमांत प्रत्येक पायरी उपयुक्त आहे, त्याप्रमाणें वरून खालीं होणाऱ्या आविष्कार-क्रमांतहि प्रत्येक पायरी उपयुक्त आहे हें आपण विसरूं नये. केवलाचें अगदीं प्राथमिक विशेष घेतले, तर त्यांची उपयुक्तता थोड्या विचाराअन्तीं आपल्या लक्षांत येते : हे विशेष, 'नेति' 'नेति' या स्वरूपाचे, नकारात्मक जे आहेत ते काय करतात ? तर अनंत केवलतत्त्व पूर्ण स्वतंत्र आहे व स्वतःच्या स्वत: उभ्या केलेल्या कोणत्याहि एका किंवा सर्व विशेषांनीं तें बांधलेलें नाहीं, ही गोष्ट आपल्या मनांत ठसवितात. नकारात्मक

पान क्र. ४१

 

विशेषांचा हा साक्षात्कार आम्हांला झाला, म्हणजे आमचा आत्मा अंतर्यामीं असंग होतो, बंधनांतून मोकळा होतो. परमात्म्याच्या, केवलाच्या सर्वसत्ताधारित्वांत सहभागी होऊं शकतो : उदाहरणार्थ, आत्मा अविकारी आहे, आत्म्याला विकार नाहीं, हा नकारात्मक अनुभव एकदां आम्हांला आला, म्हणजे प्रकृतीनें वा निसर्गानें जे कांहीं विशेष, ज्या कांहीं रचना निर्माण करून आम्हांला बंधनांत घातलें असेल, मर्यादित केलें असेल -- त्या बंधनांतून, त्या मर्यादांच्या कोंडींतून आम्ही आपला अंतरात्मा मोकळा करतों, आम्हीं अंतर्यामीं अविकारी निश्चल होतों. हा निश्चल आत्म्याचा जसा साक्षात्कार उपयोगी पडतो, तसा उलटपक्षीं चंचल, सर्वरूप होणाऱ्या क्रियाशील आत्म्याचा साक्षात्कारहि उपयोगी पडतो : पूर्ण स्वतंत्र आत्मा (केवल आत्मा) आपल्या जाणिवेनें विशेषांनीं, वस्तूंनी भरलेलें विश्व निर्माण करतो -- पण कोणत्याहि विशेषांनीं तो बांधला जात नाहीं -- म्हणून जें तो निर्माण करतो त्यापासून तो अलग होतो आणि अधिक उच्चतर सत्य घेऊन तदधिष्ठित नवा वस्तुसंसार तो उभा करतो; व्यष्टीचा आत्मा निश्चल केवलाच्या साक्षात्कारानंतर, क्रियाशील सर्वरूप केवलाच्या साक्षात्कारानें संपन्न झाला, म्हणजे तोहि त्या केवलाप्रमाणें आपलें कोणतेंहि, स्वतांतून निर्माण केलेलें अंतर्बाह्य विश्व, बाजूला ठेवून उच्चतर विश्व उभें करूं शकतो. व्यष्टीला मनाच्या अवस्थेंतून निघून अतिमानसाच्या अवस्थेंत जावयाचें असतें, तेव्हां असा एक अनुभव अगदीं अवश्य नसला, तरी स्वतंत्रता मिळवून देण्याच्या दृष्टीनें अतिशय उपयोगी असा असतो; हा अनुभव मिळतोच असें नाहीं; पण मिळाला, तर आतांच सांगितल्याप्रमाणें व्यष्टीला खरी स्वतंत्रता मिळण्याच्या दृष्टीनें अतिशय उपयोगी होतो. हा अनुभव म्हणजे पूर्ण निर्वाणाचा, मनाच्या आणि मानसिक 'मी' च्या पूर्ण विलयाचा, आत्म्याच्या शांतींत, निःशब्द शांतींत प्रवेश मिळाल्याचा अनुभव होय. असा शुद्ध, शांत, निश्चल आत्म्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट सिद्ध होत नाहीं हें मात्र निर्विवाद आहे : व्यक्त अस्तित्व अनेक पायऱ्यांचें, वरून खालीं नेणाऱ्या व खालून वर आणणाऱ्या पायऱ्यांचें आहे, हा पायऱ्यांचा जिना स्पष्टपणें व्यष्टीला जेथून दिसेल, असें एक जाणिवेचें उंच स्थान आहे, या उंच ठिकाणीं व्यष्टि पोंचली, म्हणजे तिला वर उल्लेखिलेल्या आध्यात्मिक जिन्याचें स्पष्ट दर्शन घडतें; एवढेंच नव्हे, तर तिला एक श्रेष्ठश्रेष्ठ आध्यात्मिक सामर्थ्य व अधिकार, या जिन्या-

पान क्र. ४२

 

वरून मोकळेंपणें उतरण्याचा व चढण्याचा अधिकार (आणि सामर्थ्य) -- व्यष्टीला प्राप्त होतें; पण मन आणि अतिमानस यांच्या मध्यें असलेलें हें मधलें उंच ठिकाण, व्यष्टीला शुद्ध व शांत आत्म्याचा साक्षात्कार झाल्याखेरीज चढतां येत नाहीं. अनंत केवलाची जी जाणीव, तिच्यांत हा स्वाभाविक अंगभूत धर्म असतो कीं, केवलाचे जे प्राथमिक विशेष, प्राथमिक शक्ति त्यांपैकीं प्रत्येक विशेषाशीं, प्रत्येक शक्तीशीं स्वतंत्रपणें पूर्ण तादात्म्य पावणें. हा जो अनंत जाणिवेचा धर्म, तोच अधिमानसाच्या विशिष्ट जाणिवेचा आणि संकल्पशक्तीचा, क्रियाशक्तीचा पाया आहे : केवलाच्या प्रत्येक अंगाचा, शक्तीचा, शक्यतेचा स्वतंत्रपणें पूर्ण आविष्कार घडवून आणणें ही अधिमानसाची कामगिरी, त्याच्या विशिष्ट जाणिवेचें आणि क्रियाशक्तीचें-इच्छाशक्तीचें कार्य असतें. जेव्हां आमचें मन केवलाच्या प्राथमिक विशेषांकडे बघतें, तेव्हां त्याला प्रत्येक विशेष हा केवलाचा अंशभूत नसून एक स्वयंपूर्ण वस्तु आहे असा भास होतो. तें त्या विशिष्ट विशेषाच्या कोंडींत अडकून पडतें; केवलाचें अनेक विशेष आहेत व ते सर्व एकाचे अंशभूत आहेत, एकता हा त्यांचा प्रधान धर्म आहे ही गोष्ट मनाला दिसत नाहीं, अनुभवास येत नाहीं -- म्हणून मनाचें कोणत्याहि विशेषाशीं होणारें तादात्म्य त्याला संकुचित करतें; अतिमानसाची (आणि अधिमानसाचीहि) गोष्ट वेगळी असते. सर्व विशेष, सर्व वस्तू, सर्व घटना एकांतून निघालेल्या, एकाच्या व एकताप्रधान आहेत, हा आध्यात्मिक अनुभव कोणत्याहि अवस्थेंत अतिमानस दृष्टिआड करीत नाहीं; कोणत्याहि विशेषाचें स्वतंत्र मूल्य, शक्ति, आनंद त्याला बहाल करूनहि, अतिमानस सर्वांच्या एकतेचा विसर स्वतःला पडूं देत नाहीं; त्याच्या नकारात्मक विशेषांचें सत्य पूर्णपणें मान्य करून व नजरेसमोर ठेवूनहि, अतिमानस केवलाच्या भावात्मक विशेषांना विसरत नाहीं; अधिमानस हीच परंपरा पुढें चालवितें; सर्वाधार एकतेची अनुभूति तें नित्य जागृत ठेवतें; प्रत्येक विशेषाचा वेगळा वेगळा अनुभव घेतांना व त्याला त्याचें स्वतंत्र कार्य पूर्णपणें करावयास साह्य करतांना एकतेच्या अनुभूतीचा अधिमानसाला एकाद्या दृढ पक्क्या आसनासारखा उपयोग होतो. सामान्य मनाची गोष्ट मात्र निराळी. मनाच्या वरच्या पातळींत सर्व विशेष एकाचे अंशभूत आहेत ही जाणीव येथें नाहींशी होते; येथें प्रत्येक विशेषावर स्वतंत्र भर दिला जातो. हा भर देतांना इतर विशेषांकडे सर्वस्वीं दुर्लक्ष केलें जातें -- तरीपण अज्ञानव्याप्त मनाच्या

पान क्र. ४३

 

पातळीखालीं सर्व विशेषांच्या एकतेचें सत्य वरच्या त्या मनाच्या खोल भागांत उपस्थित असतें; आणि हें पूर्ण सत्य अंतःस्फूर्त सखोल ज्ञानाच्या रूपानें किंवा प्रभावी कल्पनेच्या, भावनेच्या रूपानें या मनाच्या वरच्या पातळींत केव्हां केव्हां येऊं शकतें, आणलें जाऊं शकतें; आध्यात्मिक मनांत एकतेच्या या पूर्ण सत्याचा सामान्य मनाला केव्हां केव्हां येणारा अनुभव सार्वकालिक करतां येतो, अखंड करतां येतो.

सर्वगत ब्रह्माच्या सर्व अंगांचें, सर्व रूपांचें मूळ सत्य हें सर्वश्रेष्ठ 'सद्‌रूपांत', सत्तेंत असतें. या सर्वश्रेष्ठ चेतन सत्तेंतच सर्व रूपांचा उगम आहे. अचेतन सृष्टि ही व्यक्त शक्ति वा बाजू घ्या : ही सृष्टि दर्शनीं मूळ पूर्णचेतन सद्‌वस्तूची विरोधी वस्तु दिसते. त्या मूळ चेतनाला नकार देणारी, त्याचे नास्तित्व सिद्ध करणारी भासते -- परंतु तीहि, आत्मज्ञ व सर्वज्ञ अनंताच्या पोटीं असलेल्या एका सत्याची मूर्ति आहे, प्रतिनिधि आहे; अनंत आपली जाणीव समाधींत, आत्मभानशून्य अवस्थेंत नेऊ शकतें, या सत्याचें दर्शन अचेतन सृष्टीत आम्हांला घडतें; अचेतनांत पूर्ण चेतन आत्मा आपली चेतनता पूर्णपणें गुंडाळून ठेवून बैठक घालतो, आपली स्वतःची स्मृति पूर्णतया दूर करून बसतो; स्वत: निर्माण केलेल्या अंधतमाच्या खोल दऱ्यांत अंधतमाचें पांघरूण घेऊन राहतो -- या अंधतमांत कांहींहि चेतना दृष्टीस पडत नाहीं. परंतु सर्व कांहीं, आम्हांला अगम्य अशाप्रकारें, अस्तित्वांत असतें आणि क्रमश: व्यक्त पण होतें; आपल्या अवर्णनीय गुप्ततेंतून, सुप्ततेंतून प्रकट होतें, क्रमश: दृष्टिगोचर होतें. आत्म्याचें जेथें सर्वोच्च स्थान आहे तेथेंहि अनंताच्या, विश्वात्म्याच्या आत्मसमाधीचा प्रत्यय आम्हांस घडतो; उच्चतम आत्मिक पातळीवरची ही आत्मसमाधि आमच्या मनाला, प्रकाशमय सर्वोत्तम अतिचेतनता या स्वरूपाची दिसतें; दुसऱ्या टोंकाला, आत्म्याच्या अस्तित्वाच्या दुसऱ्या तळच्या टोंकाला, आतांच सांगितल्याप्रमाणें अनंताच्या, विश्वात्म्याच्या आत्मसमाधीचें स्वरूप त्या टोंकाला शोभेलसें, उलट प्रकारचें आमच्या मनाला दिसते. -- येथें स्वतःच्या अस्तित्वाचीं जीं त्रिकालाबाधित सत्यें, त्या सत्यांना विरोधक अशा गोष्टी आपल्या स्वतःला नजर करण्याचें सामर्थ्य अनंत, विश्वात्मा हा येथील आत्मसमाधींत दाखवितो, आमच्या मनाला दाखवितो. येथें आम्हांला अस्तित्वाच्या अभावाची खोल दरी दिसते, अचेतनतेची घनांधःकारमय रात्र दिसते, संवेदनाशून्यतेची अंतशून्य महामूर्च्छा दिसते : अशी ही, अस्तित्वाच्या खालच्या टोंकाची आत्मसमाधि,

पान क्र. ४४

 

वरच्या टोंकाच्या आत्मसमाधीप्रमाणें आत्माविष्काराच्या पूर्वींची बैठक असते. वरच्या टोंकाची समाधि संपवून म्हणा किंवा लपवून म्हणा, अनंत आत्मा ज्याप्रमाणें पायरीपायरीनें आपल्यांतील सत्यें व्यक्त करीत तळापर्यंत पोंचतों व तेथें समाधिमग्न होतो, त्याप्रमाणें ही तळची समाधि संपवून म्हणा वा लपवून म्हणा, अनंत आत्मा उलट्‌या क्रमानें अचेतनाच्या पायावर क्रमश: चेतनाचे आविष्कार करीत खेळत असतो; अचेतनतेच्या समाधींतून सर्व प्रकारच्या अस्तित्व, जाणीव व आनंद या तत्त्वांच्या, मूर्ती व्यक्त होतात, आकारास येतात; आकाराला येतांना हीं तत्त्वें सीमांच्या बंधनांत स्वत:ला घालतात, स्वत:चे आकार हळूं-हळूं व्यक्त करतात, हळूं-हळूं क्रमाक्रमानें संवर्धित करतात -- स्वत:ला विरोधक असे आकारहि अस्तित्वाच्या तळांतून अस्तित्वाच्या शिखराकडे जाणाऱ्या या आविष्कारक्रमांत, हीं तत्त्वें घेत असतात; गुप्त सर्वरूप अस्तित्व, आनंद, ज्ञान (सच्चिदानंद) क्रमश: व्यक्त होण्याचा हा खेळ खेळत असतें; हा खेळ खेळतांना स्वत: पत्करलेली आत्मविस्मृति, आत्मविरोध, आत्ममर्यादा लक्षांत ठेवून त्या अवस्थांचे नियम सच्चिदानंद कांटेकोरपणें पाळतें. विकासक्रमांत आत्मविस्मृति, आत्मविरोध, आत्ममर्यादा उल्लंघून पुढें जाण्याचा काळ येतोच : हा काळ, हा क्षण, येईपर्यंत या अवस्थांतील व्यवस्थानियम सच्चिदानंद कांटेकोरपणें पाळत असतें. भौतिक विश्वांत अचेतना, अज्ञान कार्यमग्न आहेत, सारखी धडपड करीत आहेत हें आम्हीं पाहतों, आमचें मन पाहतें. ही अचेतना, हें अज्ञान वस्तुत:  काय आहे तें आतां आपण समजावून घेतलें आहे. अनंत अमर अस्तित्वाचें नास्तित्व सिद्ध करणें हा कांहीं अचेतनाचा, अज्ञानाचा धर्म नाहीं : त्या अस्तित्वाचा एक आविष्कार, एक आकार हें अचेतनाचें, अज्ञानाचें खरें स्वरूप आहे.

विश्वाच्या अस्तित्वाचें वरच्याप्रमाणें समग्र निरीक्षण, समग्र ज्ञान करून घेतलें म्हणजे, अज्ञानाचें जें दृश्य या विश्वांत आहे, त्या अज्ञानाला, अज्ञानाच्या दृश्याला विश्वाच्या आध्यात्मिक व्यवस्थेंत निश्चित अर्थाचें स्थान आहे हें समजतें. आम्हांला जें दिसतें तें जर केवलावर लादलेलें असेल, केवलामध्यें उभ्या केलेल्या मिथ्या सृष्टीच्या स्वरूपाचें असेल, तर विश्वाचें, तसेंच सृष्टीचें अस्तित्व हें स्वभावत: अज्ञानानें उभें केलेलें दृश्य आहे असें मानावें लागेल. विश्व आणि व्यष्टि हें सर्व अज्ञान ठरल्यावर खरें ज्ञान म्हणजे सर्वथा अज्ञेय, अलक्षण, अनिर्वाच्य असें

पान क्र. ४५

 

स्वत:ला ओळखणारें केवल तत्त्व मात्र आहे हें ज्ञान, असें मानणें भाग होईल. केवल ब्रह्म साक्षी आहे आणि त्याच्यासमोर विश्वरचना कशीतरी आकस्मिकपणें स्वयंचालित अशी उभी आहे असा पक्ष घेतला तर ही रचना, सत्य अशा द्रष्ट्या ब्रह्मावर लादल्यासारखीच मानावी लागते. अशा विश्वाचे ज्ञान म्हणजे अज्ञानच होय; तें कांहीं सत्याचें ज्ञान होऊं शकत नाहीं; सत्य अशा ब्रह्मासमोर हा विश्वरचनेचा आकस्मिक पसारा येतो आणि नाहींसा होतो; हें विश्व म्हणजे क्षणिक अस्तित्वाची आणि जाणिवेची उभी केलेली इमारत; नित्य अशा साक्षी-ब्रह्माच्या नजरेसमोर क्षणभर येऊन नाहींशीं होणारी, संशयपूर्ण अस्तित्वाची इमारत; असल्या या विश्वाचें ज्ञान म्हणजे सत्याचें ज्ञान नव्हे, तें अज्ञानच मानावें लागेल. पण हें दोन प्रकारचें अज्ञान वेगळें आणि विश्वाच्या, आम्ही वर्णिलेल्या आध्यात्मिक व्यवस्थेंत निश्चित स्थान असलेलें अज्ञान वेगळें. विश्वाच्या अस्तित्वाकडे सामग्र्यानें पाहिलें म्हणजे ही गोष्ट लक्षांत येते कीं, येथें जें कांहीं आहे तें सर्व सत्याचें व्यक्त स्वरूप आहे; व्यक्त झालेलें सत्य आहे; तें स्वत:हि सत्यच आहे, कारण त्याचें द्रव्य, त्याचें अंतर्बाह्य, सत्याचें बनलेलें आहे व त्याच्यापोटीं सत्याचें नित्य आसन आहे, वसति आहे. अशा सत्य, सत्यमय पसाऱ्यांत व्यष्टिपुरुषाचें आणि विश्वपुरुषाचें अस्तित्व आणि त्याचें ज्ञान हा अनंताच्या आत्मज्ञानाचा आणि सर्वज्ञानाचा एक खेळ आहे : या खेळाचें मूळ, अनंत आत्मतत्त्वाच्या स्वभावांत आहे, ही जाणीव येते. ही जाणीव आली म्हणजे या सत्यमय पसाऱ्यांत अज्ञानाचें स्वरूप आणि स्थान कोणतें तें लक्षांत येतें. अशा सत्यमय पसाऱ्याचा अंगभूत गौण व्यापार म्हणजेच अज्ञानाचा व्यापार असतो; अज्ञान हें या पसाऱ्यांत ज्ञानच असतें. मात्र तें निरुद्ध, मर्यादित, एकांगी, अपूर्ण हळूंहळूं क्रमश: विकास पावणारें, वाढत जाणारें असें ज्ञान असते आणि त्याच्या पोटीं व पाठीशीं अनंताचें समग्र सत्य, आत्मज्ञान आणि सर्वज्ञान लपलेलें असतें आणि तें अज्ञानाच्या ज्ञानाची  क्रमश: वाढ करून त्याजकडून कार्य करून घेत असतें. अनंताच्या लीलेंतील वरील स्वरूपाचें 'अज्ञान' अर्थातच कायम टिकणारें नसतें; कांहीं काळानें नष्ट होणारें असतें; विश्वाच्या अस्तित्वाचें तें कारण नसतें, तें या विश्वाचें सारभूत रूप नसतें; त्याचें अटळ अंतिम फळ म्हणजे आत्म्याला, मूळ चैतन्याला विश्वांतच आपलें मूळ समग्र आत्मज्ञान आणि सर्वज्ञान परत लाभणें, हें असतें. आम्हीं वर्णिलेल्या, विश्वाच्या आध्यात्मिक व्यवस्थेंत


 

पान क्र. ४६

 

मूळ आत्मा विश्वपसाऱ्यांत राहण्यास कंटाळून तो पसारा सोडून आपलें विश्वातीत केवल आत्मसाक्षित्वाचें स्वरूप पुन्हां पत्करीत नाहीं, तर येथें या विश्वांतच समग्र आत्मज्ञानाचा व सर्वज्ञानाचा तो पुन्हां स्वामी होतो.

अतिमानसिक ज्ञान हें स्वत:च्या एकतेंतून अनेकता निर्मिणाऱ्या सत्याचें ज्ञान असतें हें आपण पाहिलें. पण असें कोणी म्हणूं शकेल कीं तें सत्याचें स्वरूप असलें तरी तें अंतिम सत्याचें ज्ञान नव्हे. अतिमानसिक भूमीच्या वरतीं व्यक्त झालेल्या आत्म्याचीं सर्वांत उंच स्थानें आहेत; अतिमानस ही, सच्चिदानंदाचा पूर्ण अनुभव घेण्यासाठीं उंच चढून जाण्यासाठीं उपयोगी पडणारी, मन आणि अधिमानस यांच्या वरील आणि सच्चिदानंदाच्या उच्च स्थानांच्या खालील मधली पायरी आहे. सच्चिदानंदाच्या उंच ठिकाणीं अनेक वस्तूंच्या रूपानें एक तत्त्वाचें आविष्करण हा कांहीं अस्तित्वाचा मूलभूत प्रकार नसेल; तेथें केवळ एकता, एकरसता हेंच आत्म्याचें, चैतन्याचें व्यक्त स्वरूप असेल; पण ही कल्पना बरोबर नाहीं. सच्चिदानंदाच्या या उंच ठिकाणीं अतिमानसिक सत्यज्ञान नसतें असें नाहीं; अतिमानस ही सच्चिदानंदाची अंगभूत शक्ति असल्यानें जेथें सच्चिदानंद, तेथें त्याची शक्ति - अतिमानस असणारच. या उंच ठिकाणांत आणि खालच्या ठिकाणांत फरक आहे कीं, सच्चिदानंदाच्या स्वरूपांत त्याच्या उच्च स्थानीं ज्या मर्यादा पडतात त्या लवचीक व एकमेकांत घुसणाऱ्या असतात; त्या स्वरूपांत जे विशेष उभे राहतात ते लवचीक व एकमेकांत मिसळणारे असतात -- प्रत्येक विशेष अमर्यादित विस्ताराचा असतो; तेथें सर्व विशेष प्रत्येक विशेषांत व प्रत्येक विशेष सर्व विशेषांत मूलत:च अंतर्भूत असतो. सच्चिदानंदाची समग्रता ही प्रत्येक विशेषांत व सर्व विशेषांच्या संघातांत अनुस्यूत असते; तेथें मूलभूत एकतेचें, एकरसतेचें भान सर्वविशेषांत पराकोटीचें असतें; त्या बरोबरच विशेषांच्या विशिष्ट जाणिवा एकमेकींत घुसणाऱ्या आणि एकमेकींना आपल्या आंत घेऊन अन्योन्य-संबंध दृढ करणाऱ्या असतात; आम्ही इंद्रियांच्या द्वारां घडणाऱ्या ज्या वस्तु-अनुभवाला ज्ञान म्हणतो तसलें ज्ञान तेथें मुळींच नसतें; कारण अशा अप्रत्यक्ष ज्ञानाची तेथें गरज नसते; तेथें सर्व क्रिया, जाणीव प्रत्यक्ष स्वत:च करीत असते; ती आपलें स्वत्व विसरत नाहीं, स्वत:शीं सदा पूर्णतया एकरूप असते, स्वत:चें ज्ञान आणि सर्वज्ञान या ठिकाणच्या सच्चिदानंदाच्या व त्याच्या

पान क्र. ४७

 

विशेषांच्या जाणिवेंत स्वाभाविकपणें अंतर्यामीं सदा जागृत असते. तेथें विशेषांच्या जाणिवांचीं परस्पर नातीं असतात; अस्तित्वाचा आनंद हा या जाणिवांचा देवघेवीचा विषय असतो. अस्तित्वाची आत्मशक्ति प्रत्येक विशेषांत असते व विशेषाच्या या आत्मशक्तीचा एकमेकींशीं नाना प्रकारचा संबंधहि येथें असतो. थोडक्यांत म्हणजे, सच्चिदानंदाची हीं उच्च स्थानें, या सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक भूमिका कोऱ्या वा विशेषसंभवहीन भूमी नसतात; शुद्ध अस्तित्वाच्या शून्यानें भरलेल्या जागा नसतात. सच्चिदानंदाच्या आविष्काराच्या उंच, अतिमानसाच्याहि वर असणाऱ्या, उंच ठिकाणांची गोष्ट वरीलप्रमाणें असेल, पण आविष्काराच्या सर्व विश्वांच्या पलीकडे असलेलें सच्चिदानंद ब्रह्म आपल्या शुद्ध, सर्वातींत अस्तित्वाच्या जाणिवेच्या आणि स्वरूपानंदाच्या ज्ञानानें भरलेलें -- एकमेवाद्वितीय सर्वविशेषशून्य असें -- असेलच असेल, असा पक्ष कोणी घेईल. याहिपलीकडे जाऊन कोणी असेंहि म्हणेल कीं, सत्, चित्, आनंद हेहि अनंत केवलाचे मूळ स्वनिर्मित विशेष असतील, आणि मूळ अनिर्वचनीय केवलांत हे मूळ विशेषदेखील, इतर नंतरच्या विशेषांप्रमाणें शेवटीं विलीन होऊन, अखेर तें अनिर्वचनीय एकमेवाद्वितीयच, सत्-चित्-आनंद शून्य असें, उरत असेल. या कल्पनांसंबंधानें आमचें म्हणणें एवढेंच आहे कीं, जी सर्वश्रेष्ठ केवल सत्ता असेल, त्या सत्तेचे अंगभूत असे विश्वांतील सर्व विशेष -- सत् चित् आनंद हे ''मूळ विशेष'' धरून -- असले पाहिजेत. केवलामध्यें या विशेषांचें सत्यभूत सार, त्यांचें परमोच्च सत्य, त्या विशेषांच्या आविष्कारापूर्वीं असलेंच पाहिजे; मग सर्वोच्च स्थानीं या विशेषांचें स्वरूप, वर्णन करण्याच्या पलीकडचे असेल तर असो; आध्यात्मिक मनाच्या सर्वश्रेष्ठ अनुभूतीला ज्या स्वरूपाचे हे विशेष दिसतात त्या स्वरूपाचे ते सर्वोच्च स्थानीं नसतील व त्याहून वेगळ्या अनिर्वचनीय स्वरूपाचे असतील तर असोत : त्या संबंधानें आमचा आग्रह असा कांहींच नाहीं; त्या संबंधांत आम्ही वाद करू इच्छित नाहीं. मूळ केवल-तत्त्व हें गूढ तत्त्व असलें, तरी तें ''कोरे अनंत'' नाहीं, किंवा तें नकारांची ''नेति नेतींचीं'' सर्वोच्च संहति वा मोठ्यांत मोठी बेरीज नाहीं; या मूळ सर्वगामी सत्य अशा केवल तत्त्वाची कोणती तरी अंगभूत शक्ति प्रत्येक व्यक्त विशेषाच्या मुळाशीं असते, असली पाहिजे; अशा शक्तीच्या मूलाधाराशिवाय कोणत्याहि विशेषाचा आविष्कार होणें अशक्य आहे, एवढेंच आमचें म्हणणें आहे.

पान क्र. ४८

 

प्रकरण दुसरें

ब्रहम, पुरुष, ईश्वर; माया, प्रकृति, शक्ति

 

      भूतांचे ठिकाणीं तें अविभक्त आहे आणि विभक्त असल्याप्रमाणेंहि आहे.

- गीता १३-१६

 

      ब्रहम हें सत्य ज्ञान अनंत असें आहे.

- तैत्तिरीय उप० २-१

 

      पुरुष आणि प्रकृति दोन्ही शाश्वत आहेत असें जाण.

- गीता १३-१९

 

      माया ही प्रकृति आणि महेश्वर हा मायेचा स्वामी आहे हें आम्हीं ओळखावें.

- श्वेताश्वतर उप० ४-१०

 

      ब्रहमचक्र फिरविलें जात आहे, तें लोकांत व्यापून असलेल्या देवाच्या महिम्यानें फिरविलें जात आहे; त्याला आम्हीं ओळखलें पाहिजे. तो ईश्वरांचा ईश्वर आहे, परम महेश्वर आहे, तो सर्व देवतांचे परम-दैवत आहे, त्याची शक्ति ही पराशक्ति आहे, तिच्या ज्ञानाची स्वाभाविक क्रिया आणि तिच्या बलाची स्वाभाविक क्रिया ही विविध प्रकारची आहे. देव एकच आहे, तो सर्व भूतांचे ठिकाणीं लपलेला आहे, तो सर्व भूतांचा आंतरात्मा आहे. तो सर्वव्यापी आहे, तो केवळ आहे व तो निर्गुण आहे; अध्यक्ष म्हणून सर्व कर्मे पाहणारा तो आहे; तो साक्षी आणि ज्ञाता आहे.

- श्वेताश्वतर उप० ६-१, , , ११.

 

एक शाश्वत अशी परम सत्य सद्‌वस्तु या विश्वांत आहे. ती केवल आहे, अनंत आहे. ती केवल व अनंत आहे म्हणून ती तत्त्वत: अनिर्वचनीय अशी आहे. सान्त मनानें त्या वस्तूची व्याख्या करूं म्हटलें,

पान क्र. ४९

 

तरी त्याजकडून तिची व्याख्या होणें, तिचें कल्पनाचित्र रंगविलें जाणें हें देखील अशक्य आहे. वाचा ही मनानेंच निर्मिलेली असल्यानें, अशा वाचेनें तिचें वर्णन करतां येणें अशक्य आहे. 'नेति नेति' ती हें नव्हे, तें नव्हे, म्हणून तिचें वर्णन करणें अशक्य आहे. तसेंच 'इति इति', ती हें आहे, तें आहे अशा प्रकारेंहि तिचें वर्णन करतां येत नाहीं, ती निश्चित करतां येत नाहीं. आहेपक्षीं व नाहींपक्षीं वाक्यें आणि विधिवाक्यें व निषेधवाक्यें हीं दोन्हींहि त्या सद्‌वस्तूचें निश्चित स्वरूप दाखविण्यास कमी पडतात. अशाप्रकारें आम्हांला ती वाचेनें आणि मनानें अज्ञेय असली, तरी ती अगदींच, सर्व प्रकारेंच अज्ञेय नाहीं; ती स्वयंसिद्ध आहे, ती स्वत: स्वतःला स्वत:प्रमाण आहे, तसेंच आमच्यामध्यें जो आत्मपुरुष आहे, त्याला तादात्म्य-अधिष्ठित ज्ञानाच्या द्वारां ती स्वत:प्रमाणें व स्वत:सिद्ध अशी ज्ञात होऊं शकते आणि आमच्यांतील आत्मा हा, त्या केवलाचें, त्या सद्‌वस्तूचें तादात्म्य-अधिष्ठित ज्ञान मिळविण्यास समर्थ असतो. कारण या आत्म्याचें सारस्वरूप, त्याचें मूळ अंतर्यामी सत्य पाहिलें, तर परमश्रेष्ठ सद्‌वस्तूच तो आहे, तिजवांचून दुसरें कांहीं नाहीं, हीहि गोष्ट निर्विवाद आहे.

ती सद्‌वस्तु अनंत अद्‌वितीय असल्यानें तिचें मूळ स्वरूप आमच्या मनाला निश्चित करतां येत नसलें, तरी आम्हांला शोधाअंतीं असें नजरेस येतें कीं, विश्वांत व्यक्त केलेल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या मूलभूत सत्यपैलूंच्या द्वारां, ही सद्‌वस्तु आमच्या जाणिवेला आपलें स्वरूप स्पष्ट करून दाखवीत असते. सद्‌वस्तूचीं हीं सत्य-अंगें, विश्वाच्या पलीकडचीं असतात; पण तीं विश्वांत व्यक्त केलीं जातात, तीं विश्वाच्या अस्तित्वाचा पायाच असतात. आमची ज्ञानशक्ति ही बुद्धीप्रधान व कल्पनातंत्र अशी ज्ञानशक्ति आहे. सर्वगामी सद्‌वस्तूचीं मूलभूत अंगें म्हणून, त्या सद्‌वस्तूचें आम्हांला शक्य तें दर्शन घडविणारारीं अंगें म्हणून तिच्यापुढें ही सत्यें येतात. वस्तुत: बुद्धीला सद्वस्तुगत सत्यांचें ज्ञान प्रत्यक्षपणें होत नाहीं, तर आत्मिक अंतर्ज्ञानानें,

अंत:स्फूर्त दृष्टीनें हीं सत्यें आम्ही प्रत्यक्ष करूं शकतो; आमच्या जाणिवेच्या खास अंतरंगांत आम्हांला जो आध्यात्मिक अनुभव शक्य असतो, त्या अनुभवानें सद्वस्तूचीं अंगभूत सत्यें आम्हांला प्रतीत होत असतात. तरीपण आमच्या बुद्धीनें जर लवचीक व विशाल कल्पनांचा आधार घेतला, तर अप्रत्यक्षपणें कां होईना पण बरीच समर्पक अशी, या सत्यांची कल्पना तिला

पान क्र. ५०

 

येऊं शकते; आणि हीं बुद्धीनें ग्रहण केलेलीं सत्यें तिला व्यक्तहि करतां येतात; मात्र लवचीक अशा भाषेंत त्यांची कांटेकोर व्याख्या करण्याचा आग्रह धरतां उपयोगी नाहीं; या सत्यांची आमच्या लवचीक बुद्धीनें जी विशाल, सूक्ष्म कल्पना आम्ही करूं, ती कल्पना भाषेनें मर्यादित वा संकुचित करण्याच्या मागें आम्हीं असतां उपयोगी नाहीं. सद्‌वस्तुगत सत्यांचा जो आध्यात्मिक साक्षात्कार आम्हांला होतो किंवा आमची लवचीक बुद्धि त्यांच्या संबंधाची जी कल्पना उभी करते, तो साक्षात्कार वा ती कल्पना जर यथार्थपणें भाषेनें व्यक्त करावयाची म्हटलें तर त्यासाठीं एक नवीच भाषा निर्माण करावी लागेल -- अशी भाषा कीं जशी वेदांत आणि उपनिषदांत आम्हांस आढळते : या ग्रंथांची भाषा वजनदार, भारदस्त आहे; सूक्ष्म अर्थ व्यक्त करणारी, थोड्‌या शब्दांत पुष्कळ अर्थ भरलेली अशी ती आहे. गूढार्थ व्यक्त करणारी काव्यमयता, साक्षात्कार-प्रधान तत्त्वज्ञानाला शोभणारा गंभीरपणा व प्रसाद हे गुण तिच्यांत एकत्र आहेत, या भाषेंत अर्थपूर्ण प्राणमय जिवंत दृष्टांत आहेत; विवेचनाचा गूढ विषय जवळ जवळ प्रत्यक्ष करण्यासारख्या सूचक, आकर्षक व स्पष्ट सोदाहरण लक्षणांनीं ही भाषा समृद्ध आहे. तत्त्वज्ञानाची सामान्य भाषा अशी नसते. ती आपला विषय दुरून दुरून हाताळते, वास्तवाच्या प्रदेशांत न उतरतां, कल्पनांचा अमूर्त डोलारा उभारून ती आपल्या विषयाचें अर्धवट दर्शन जिज्ञासूला घडवितें; अर्थात् अशा भाषेचा आम्हांला अगदींच उपयोग नाहीं असें नाहीं -- आमच्या बुद्धीला अशा भाषेचाहि उपयोग होतो; आमची तर्काची विवेचक पद्धति अशा भाषेवरच उभी आहे व तर्कप्रक्रियेला अशी भाषा सोयीचीहि आहे. तथापि आमच्यापुढें असलेल्या विषयाचें -- सद्‌वस्तुविषयक सत्यांचें -- नीट आकलन होण्यास आमची भाषा व आमची बुद्धि आपलें परंपरेचें स्वरूप टाकून, थोडी वेगळी व्हावयास हवी. सान्त वस्तूंचा परिणामकारक ऊहापोह करणारा तर्कप्रपंच वेगळा आणि अनन्ताचा परिणामकारक ऊहापोह करणारा तर्कप्रपंच वेगळा; ही गोष्ट लक्षांत घेऊन आमच्या बुद्धीनें (व अर्थात् भाषेनें) सान्तविषयक तर्काच्या मर्यादा मागें टाकून, अनन्तविषयक तर्काची संवय स्वत:ला लावून घेतली पाहिजे. बुद्धीनें हें दिव्य केलें, निरीक्षणाचा आणि परीक्षणाचा हा मार्ग आपलासा केला, तरच 'सद्‌वस्तु ही भाषेचा विषय होऊं शकत नाहीं' हीं भाषा बुद्धीला अर्थशून्य वाटणार नाहीं, विरोधमय भासणार नाहीं. उलटपक्षीं, अनंताला

पान क्र. ५१

 

सान्ताची तर्कभाषा, तर्कसरणी लावण्याचा आग्रह जर आम्ही धरला, तर सर्वगामी सद्‌वस्तु आम्हांला सांपडणार नाहीं, आमच्या बुद्धीच्या आटोक्यांत ती येणार नाहीं; तिची एक पोकळ छाया, तिचा एक जणुं प्राणशून्य आकारच फक्त आमच्या हातीं लागेल; ही छाया वा हा आकार तार्किक भाषेंत बसवितां येईल, तिचा, त्यांचा रेखामय रेखीव आलेख करतां येईल, पण सद्‌वस्तूचें यथार्थ स्वरूपवर्णन मात्र आम्हांला मिळणार नाहीं. ही तार्किक भाषा वास्तविक सद्‌वस्तुविषयक असूनहि सद्‌वस्तूची खरी कल्पना मुळींच न देणारी अशी ती होईल. ज्याचें ज्ञान करून घ्यावयाचें असेल त्याला अनुरूप असा, ज्ञान करून घेण्याचा मार्ग आम्हीं धरावयास हवा. असें जर आम्ही न करूं तर आम्हांला खरें ज्ञान मिळणार नाहीं, ज्ञानाचें सोंग आमच्या हातीं लागेल; ज्ञानविषयाची ओळख दुरून दुरून करून देण्याचा प्रयत्न करणारी कल्पनांची मालिका मात्र आमच्या समोर उभी राहील.

अनुरुप ज्ञानमार्ग धरल्यानें मूळ सद्वस्तूचें जें सर्वोत्तम दर्शन आम्हांला घडतें, त्या दर्शनांत ही सद्वस्तु शाश्वत् अनंत, केवल, स्वयंभू आत्मजाणीवयुक्त व आत्मानंदी अशी आम्हांस दिसते. वस्तुजाताचा पाया या प्रकारची सद्वस्तु आहे व सर्व वस्तू या सद्‌वस्तूनें व्यापल्या आहेत; आणि सर्वांना हिचा गुप्त आधार आहे. या सर्वश्रेष्ठ दर्शनानंतर या स्वयंभू सद्‌वस्तूच्या सार-स्वभावाच्या तीन अंगांचा किंवा धर्माचा आम्हांला साक्षात्कार होतो. आत्मा, पुरुष व ईश्वर हीं तीं ब्रह्माची (सद्‌वस्तूचीं) तीन अंगें होत; तीन धर्म होत; एकाच ब्रह्माला, त्याच्या कार्यानुरूप अशी आत्मा, पुरुष व ईश्वर हीं तीन नांवें दिलीं आहेत, असेंहि म्हणता येईल. या तीन अंगांचा किंवा धर्माचा साक्षात्कार अंतःस्फूर्तीच्या द्‌वारां झाला आणि ही तीन नांवें अंतःस्फूर्तीनेंच मुळांत सुचविलीं. या नांवांत व्यापक अर्थ रेखीवपणें दाखविण्याचें सामर्थ्य आहे. बुद्धीगत कल्पनेसारखी अतिरेकी कठोर मर्यादितता या नांवांत नाहीं, त्यांचा अर्थ अस्पष्ट आहे असेंहि नाहीं; -- म्हणूनच या नांवांचा उपयोग लवचीकपणें करतां येतो. असो. पाश्चात्य तत्त्वज्ञानांत ज्याला ॲबसोल्यूट (Absolute) म्हणतात, तें आमचें परब्रहम होय; तें (ॲबसोल्यूट) केवल व निःसंबंध असतें. आमचें ब्रह्म नि:संबंधहि असतें आणि सर्वगामी सर्वसंबंधयुक्तहि असतें. अर्थात् जें जें संबंधयुक्त, सापेक्ष तें तें, केवळ ''निसंबंध'' ब्रहमाचें साकार-

पान क्र. ५२

 

रूप असतें; ब्रहमाचेंच तें स्पंदन, स्फुरण वा आंदोलन असतें. या केवल ब्रह्माच्या कक्षेंत, सर्व प्रकारच्या सापेक्ष गोष्टी येतात. उपनिषदांत अशीं विधानें आहेत : सर्व ब्रह्म आहे, मन ब्रह्म आहे, प्राण ब्रह्म आहे, जडद्रव्य (अन्न) ब्रह्म आहे. जो बाह्य वायुतत्त्वाचा आणि शरीरगत प्राणतत्त्वाचा स्वामी गणला जातो, त्याला उद्देशून -- ''हे वायू तूं व्यक्त ब्रहम आहेस'' असें उपनिषदांत म्हटलें आहे; मनुष्य, पशु, पक्षी, कीटक यांपैकीं प्रत्येकाला स्वतंत्रपणें, 'तूं ब्रहम आहेस' असें म्हटलें आहे. ''हे ब्रह्मन तूं हा वृद्ध मनुष्य आहेस, हा मुलगा, ही मुलगी, हा पक्षी, हा कीटक तूंच आहेस'' असें एक उपनिषदांतील वाक्य आहे. जें कांहीं अस्तित्वांत आहे, त्या सर्वांत स्वत:ला ओळखणारी जी जाणीव असते, ती ब्रह्मच होय; देव, दानव, असुर यांजमध्यें जी शक्ति काम करते, त्या विविध शक्तीचा आधार असणारी मूळ महाशक्ति ही ब्रह्मच होय; मनुष्य, मनुष्येतर प्राणी, निसर्गांतील सर्व आकार आणि शक्ती यांजमध्यें कार्य करणारी महाशक्ती ब्रह्मच होय; ज्या आनंदाच्या आकाशावांचून कोणीहि श्वासोछ्वास करूं शकत नाहीं, जिवंत राहूं शकत नाहीं असा अस्तित्वाचा गूढ आनंद, तें आनंदाकाश ब्रह्मच होय; ब्रह्मच सर्वामध्यें आंतरात्मा झालें आहे; सर्व सृष्ट रूपांत ब्रह्म राहतें; त्या त्या सृष्ट रूपाला अनुरूप असें रूप ब्रह्म धारण करतें; ब्रह्म सर्वेश्वर आहे; तो चेतनांत चेतन, अचेतनांतहि चेतन असा आहे; निसर्गशक्तीच्या हातांत निष्क्रिय असा जो अनेकांचा पसार, त्या अनेकांचा नियंता आणि स्वामी हा सर्वेश्वर आहे; तो काल आहे; कालातीत अकाल आहे; तो आकाश (अवकाश) आहे आणि आकाशांत जें जें आहे तें तें तो आहे; तो कार्यकारणभाव आहे. कारणहि तोच आणि कार्यहि तोच आहे. तोच विचार करणारा आणि विचार, योद्धा आणि त्याचें वीर्य, द्यूत खेळणारा आणि त्याचे फांसे टाकणें -- सर्व कांहीं तोच आहे; सर्व सत्यें, सर्व रूपें, सर्व सोंगे ब्रह्मच आहे; ब्रह्म हें केवल, सर्वातीत व अनिर्वचनीय आहे. विश्वाचा आधार असें विश्वातीत तत्त्व आहे, सर्व जड जीवांचा आधार असा विश्वात्मा आहे; प्रत्येक व्यक्तीचा आत्माहि ब्रह्मच आहे; व्यक्तींतील चैत्य पुरुष (जीव) हा ईश्वराचा शाश्वत अंश आहे, ईश्वराची परा (श्रेष्ठ) प्रकृति, जाणीवशक्ति ही जीवलोकामध्यें जीव झाली आहे. ब्रह्म एकच एक अस्तित्त्वांत आहे आणि तें आहे म्हणूनच सर्व आहेत; कारण सर्व ब्रह्मच झालें आहे;

पान क्र. ५३

 

आमच्या आंत, अंतरंगांत आणि निसर्गांत जें जें कांहीं आहे, त्यांतील सत्य, हें महान् सत्य ब्रह्मच आहे; ब्रह्म हें ईश्वर आहे; आपल्या योगमायेनें ईश्वरानें हें सर्व, निर्माण केलें आहे; आत्माविष्कारासाठीं आपली जाणीवशक्ति कामास लावून ईश्वरानें हें सर्व जन्मास घातलें आहे; तोच ज्ञानमय जीव, आत्मा, चैतन्य व पुरुष आहे; आपल्या प्रकृतीच्या सामर्थ्यानें, आपल्या जाणीवयुक्त स्वयंभू अस्तित्वाच्या सामर्थ्यानें त्यानें सर्व चराचर उभें केलें आहे तो ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान्, सर्वसत्ताधारी, सर्वशासक आहे; तो आपल्या जाणीवयुक्त शक्तिचा आश्रय करून, कालविशिष्ट रूप घेतो आणि विश्वाचें आधिपत्य करतो. ही आणि अशींच वर्णनात्मक वाक्यें एकत्र घेतलीं, म्हणजे ती ब्रह्माचें सर्वसमावेशकत्व स्पष्टपणें व्यक्त करतात; मन यांत काटछाट करून कांहीं कांहीं भाग निवडून घेऊन, त्यावर विशिष्ट चौकटीचे दर्शन (तत्त्वज्ञान) उभारूं शकतें; आणि या चौकटींत न बसणारा बाकीचा भाग, कांहींतरी कारणे देऊन अग्राहय ठरवूं शकतें; परंतु आम्हांला जर संपूर्ण, परिपूर्ण, सर्वांगपूर्ण असें ज्ञान हवें असेल, तर असें करून भागणार नाहीं; सर्व प्रकारचीं ब्रह्मविषयक सर्व विधानें सारख्याच काळजीनें एकत्र करून, या सर्व विधानांचा आधार घेऊन, आम्हांला आमचा पाया भक्कम केला पाहिजे आणि त्यावर आमचें तत्त्वज्ञान उभारलें पाहिजे.

आमच्या आध्यात्मिक अनुभवांत पहिलें व सर्वश्रेष्ठ असें सत्य अनंत केवल तत्त्व हें आहे, तें स्वयंभू ज्ञानमय, आनंदमय व विश्वातीत असून विश्वव्यापी आहे, विश्वाचा गुप्त आधार तें आहे. तें मूळ अस्तित्व केवळ भावरूप नसून पुरुषरूपहि आहे; तें आत्मा आहे, पुरुष आहे आणि ईश्वरहि आहे; हीं जशीं मूळ अस्तित्वाचीं तीन व्यक्त रूपें आहेत, तशींच त्याच्या जाणीवशक्तीचीं सुद्धां तीन रूपें आम्हांला प्रतीत होतात; माया, प्रकृति व शक्ति हीं तीं तीन रूपें होत. ब्रह्माची किंवा आत्म्याची जी माया तीच सर्व वस्तूंची कल्पनारूपें निर्माण करते; प्रकृति ही पुरुषाच्या अध्यक्षत्वाखालीं मायेच्या कल्पनांनुसार साक्षेपी कारागिरी करून वस्तू निर्माण करते; शक्ति ही ईश्वराची जोडीदार; कल्पनामय निर्मिति आणि तदनुसार वास्तवांतील कारागिरी वा कार्यकारिता हीं दोन्हीं अंगें शक्तीच्या स्वभावांत अंतर्भूत आहेत. ईश्वरी कार्यांच्या सर्व वैचारिक योजना व त्या योजनांनुसार वस्तूंची व घटनांची वास्तवांत उभारणी, हें दुहेरी काम ईश्वराच्या शक्तीकडे असतें. ब्रह्माचीं

पान क्र. ५४

 

हीं तीन अंगें (आत्मा, पुरुष व ईश्वर) आणि त्यांच्या शक्ती (माया, प्रकृति, शक्ति) यांजवर सर्व अस्तित्व आधारलेलें आहे, त्यांनींच सर्व अस्तित्व बनलेलें आहे; हींच अंगें व शक्ती, सर्व निसर्गाचें द्रव्य, त्याचा आधार आहेत; या सर्वांचा एकत्र, एकच पूर्ण वस्तू म्हणून विचार केला, म्हणजे विश्वातीत केवळ सद्वस्तु, विश्वरूप व्यापक वस्तु आणि आमचें वैयक्तिक विभक्त अस्तित्व, यांजमधील अन्योन्यविसंवाद (दर्शनी विसंवाद) दूर होतो; केवल तत्त्व, विश्वप्रकृति आणि आम्ही व्यक्ती, यांजमध्यें एकता, सुसंवाद प्रतीतीस येतो; एका सत्याचे, एका ब्रह्माचे तीन अविभाज्य अंगभूत भाग असें आम्हां तिघां आविष्कारांचें परस्पर निकटचें नातें आहे हें आम्हांला कळतें. जर केवल सद्‌वस्तु हें एकच सत्य आहे असें धरलें, तर संबंधपूर्ण विश्वाला आणि आम्हांला आमच्या वैयक्तिक अस्तित्वाला सत्याच्या क्षेत्रांत जागा उरत नाहीं. परंतु परब्रह्म हें केवलत्व रूपानेंच फक्त अस्तित्वांत आहे, असें नाही, तर तें केवल असून सर्वसंबंधांचे ठिकाणींहि सत्यत्वानें अस्तित्वांत आहे, -- तें सर्वसंबंधनिरपेक्ष तर आहेच, पण त्या बरोबरच, सर्व संबंधांना आधारहि त्याचाच आहे; सर्व सापेक्ष वस्तूंना व घटनांना तें व्यापून आहे; त्यांचें शासन करणारें तें आहे; नव्हे त्या वस्तू व घटना, ब्रह्मरूपी द्रव्याच्याच बनतात. सर्वगामी ब्रह्मच सर्व कांहीं झालें आहे. असें कांहींच नाहीं, आणि असूं शकत नाहीं कीं, जें ब्रह्म नाहीं. एकाच ब्रह्माचे अंगभूत तीन भाग आणि त्यांच्या तीन शक्ती यांचा एकत्रित विचार केला, म्हणजे आमच्या सामान्य तर्कबुद्धीला अशक्य वाटणारी ही गोष्ट आम्हांला उमजते.

मूळ स्वयंभू ब्रह्म आणि त्याचा क्रियासंसार हें एक पूर्ण व अनंत दृश्य आहे. तें एक अविभाज्य नानारंगी नानाअंगी वस्तु आहे या दृष्टीनें या दृश्याकडे पाहिल्यास त्याचा परिणाम आमच्या मनावर होतो, त्याच्या सत्यतेची खात्री आम्हांला पटते. पण तर्कबुद्धि त्याचें पृथक्करण करूं लागली म्हणजे तिला अनेक अडचणी भासूं लागतात; असीम अस्तित्वाच्या अनुभूतीवर, तर्कशुद्ध व तर्कमान्य असें तत्त्वज्ञान कोणीहि उभें करूं लागला, तर त्याला अशा अडचणी यावयाच्याच; कारण अनुभूति ही, संकीर्ण अशा महान् सत्याची असते; तिचे, त्या सत्याचे तुकडे पाडून त्यांतील कांहीं घ्यावें, कांहीं टाकावें तेव्हां कोठें तर्कमान्य व सुसंगत असें तत्त्वज्ञान तयार होतें -- असें तुकडे पाडण्याचें काम न करावें, तर सर्वसंग्राहक आणि सत्यपूर्ण, पण तर्काला अमान्य असें तत्त्वज्ञान तयार

पान क्र. ५५

 

होतें. वस्तुस्थिति अशी आहे कीं, जें मूळ तत्त्व अनिर्देश्य, अनिर्वचनीय आहे तें स्वत: अनन्त आणि सान्त अशीं रूपें धारण करतें; ज्याच्यांत केव्हांहि कसलाहि बदल होत नाहीं, तें तत्त्व सारखें बदलत असतें आणि या त्याच्या भेदांना अन्त नसतो; जें एकच एक आहे, तेंच असंख्य वस्तूंचा पसारा होतें; जें अमूर्त निर्व्यक्तिक आहे, तें स्वत: व्यक्ति बनतें, व्यक्ति निर्माण करते, व्यक्तींना आधारभूत होतें; तें आत्मतत्त्व असलें, तरी त्याला प्रकृति आहे आणि शिवाय प्रकृतीहून तें वेगळें आहे; तें शुद्ध अस्तित्व आहे, पण या अस्तित्वाचीं नाना रूपें बनतात, तरीपण ही रूपें वेगळीं आणि शुद्ध अस्तित्व वेगळें असतें, वेगळें राहतें; तें विश्वव्यापी आहे, तथापि हें विश्वरूप व्यक्तिरूप होतें आणि व्यक्ति विश्वरूप होते; तें ब्रहम निर्गुण आहे, पण त्याबरोबर अनंत गुण त्याचे ठिकाणी संभवतात; तें क्रिया करतें, क्रियाशील कर्माध्यक्ष असते, पण त्याबरोबर तें अकर्ता व निसर्गाच्या व्यापारांचा शांत निष्क्रिय द्रष्टा असतें. निसर्गांत या क्रिया आम्हांला दिसतात. आम्हांला या गोष्टी बघण्याची संवय झाली आहे. या सर्व स्वाभाविक घटना आहेत असें म्हणून कांहीं विचार न करतां आम्ही निसर्गाच्या क्षेत्रांत हिंडत असतो -- मेंदूला विशेष त्रास न देतां हिंडत असतो. पण आम्हीं जर मेंदूला जरासा त्रास दिला, या गोष्टींचा बारकाईनें विचार केला, तर निसर्ग जें कांहीं घडवितो, तें सर्व एकत्रित करून पहा किंवा वेगळें वेगळें पहा, तें सर्व अद्भुत चमत्कार आहे, आम्हांला अनाकलनीय अशा जादूची क्रिया आहे असें आम्हांला कबूल करावें लागेल. स्वयंभू सद्वस्तु घ्या, त्या सद्‌वस्तूचे ठिकाणीं उभें राहिलेलें विश्व घ्या -- या दोनहि वस्तू एकत्रितपणें, किंवा वेगळ्या वेगळ्या अस्तित्वांत असणें, येणें, राहाणें, ही बुद्धीला न उमगणारी एक गूढ गोष्ट आहे, हें आम्हांला विचारान्तीं मान्य करावें लागतें. विश्वांत बुद्धिगम्यता व बुद्धिमूलकता आम्हांला दिसते याचें कारण, भौतिक सान्त वस्तूंच्या व घटनांच्या प्रक्रिया नियमबद्ध, सुसंगत दिसतात आणि हें नियम शोधूनहि काढतां येतात; पण ही बुद्धिगम्यता व बुद्धिमूलकता बारकाईनें तपासली, कीं प्रत्येक क्षणीं बुद्धीहून खालच्या पायरीवरचें तत्त्व विश्वांत क्रियाशील, क्रियामग्न असल्याचें आमच्या प्रत्ययास येतें; बुद्धीशीं या दोन्ही तत्त्वांचें कांहीं जुळत नाहीं; वस्तूंच्या, घटनांच्या प्रक्रिया जडाच्या क्षेत्रांत थोड्‌याबहुत सुसंगत वाटतात, त्यांचे नियम थोडेबहुत निश्चित करता येतात -- पण जडांतून पुढें, वर जीवा-

पान क्र. ५६

 

कडे आपण गेलों, कीं ही प्रक्रियांची सुसंगति कमी होते व प्रक्रियांचें स्वरूप निश्चित करणें अवघड होतें; जीवाच्या पलीकडे, वरतीं मनाकडे आपण गेलों, कीं प्रक्रियांची सुसंगति आणखी कमी होते, त्यांचें स्वरूप, आकलन आणखी अवघड होतें; सान्त भौतिक वस्तु व घटना थोडीबहुत बुद्धीच्या नियमानुसार चालतांना दिसली, तरी अतिसूक्ष्म अणु-परमाणूंच्या क्षेत्रांत आम्ही गेलों, कीं स्थूल दृश्य भौतिकाचे नियम तेथें मुळींच लागू होत नाहींत, -- अनंताकडे आम्ही गेलों तर तें बुद्धीला मुळींच आकलन होत नाहीं. विश्वाचा व्यवहार आणि विश्वाचें प्रयोजन या संबंधानें विचार करतां आपल्याला कांहींच निश्चित सांगतां येत नाहीं; आत्मा, चैतन्य, ईश्वर असें कोणी असेल, तर त्याचा विश्वाशीं आणि आमच्याशीं चाललेला व्यवहार आम्हांला मुळींच समजण्याजोगा नाहीं -- या व्यवहारांत असा धागा कोठेंच सांपडत नाहीं, कीं ज्याच्या आश्रयानें आम्हीं विश्वाचें कोडें उलगडूं शकूं. ईश्वर काय, निसर्ग काय किंवा आम्ही काय सर्वांचाच व्यवहारमार्ग गूढ आहे; या मार्गावर कोठें कोठें थोडासा प्रकाश पडतो, परंतु एकंदरीनें तो अनाकलनीय या वर्गांतच पडतो. माया आपला जो कारभार करते, तो बुद्धीच्या वरतीं असलेल्या जादुगिरीच्या सामर्थ्यानें चालला आहेसा दिसतो. ही अतिबौद्धिक शक्ति आपल्या व्यवहारनैपुण्यानुसार किंवा आपल्या कल्पनाविलासानुसार येथील कारभार करीत आहे; पण हा कल्पनाविलास, हें व्यवहारचातुर्य आम्हांला समजण्यासारखें मात्र नाहीं -- तें आमच्या बुद्धीच्या आवांक्यांतील मात्र नव्हे. चैतन्य-पुरुष वस्तुजातांत आत्माविष्कार करीत आहे, तो स्वत: वस्तुजात प्रकट करीत आहे असें म्हटलें, तरी हा आत्माविष्कार इतक्या गूढपणें व अस्पष्टपणें केला जात आहे कीं, आम्हांला हा पुरुष जादुगार वाटावा आणि त्याची शक्ति निर्माणकुशल मांत्रिकशक्ति वाटावी. मांत्रिकाची शक्ति आभास उत्पन्न करूं शकते, तशी अद्‌भुत आश्चर्यकारक सत्यवस्तु देखील निर्माण करूं शकते; आणि आम्हांला जें कोडें पडलें आहे तें हें कीं, बुद्धि हतबुद्ध करून टाकणारी ही जी अतिबौद्धिक प्रक्रिया आमच्यासमोर विश्वांत चालूं आहे, ती आभास उभारीत आहे कीं सत्यसृष्टि रचीत आहे ?

परंतु आम्हांला हें असें कोडें पडण्याचें कारण या विश्वरूप किंवा विश्वातीत स्वयंभू चैतन्यांत आम्हांला सांपडत नाहीं -- त्याच्या

पान क्र. ५७

 

कल्पनाविलासांत, आभासनिर्मायक शक्तींत सांपडत नाहीं -- खरोखरीच पाहतां अशी कांहीं वस्तुस्थिति नाहीं कीं, आमच्या समोर खरोखरीच कांहीं आभास उभे आहेत आणि त्यामुळें आम्हांला कोडें पडलें आहे. तर आमच्या बुद्धीच्या अक्षमतेंतच आमच्या या आकलनविषयक अपात्रतेचें बीज आहे; विश्वातीत किंवा विश्वरूप स्वयंभू चैतन्याच्या बहुविध अस्तित्वाची गुरुकिल्ली आमच्या बुद्धीला सांपडत नाहीं व या चैतन्याच्या व्यापाराचा गूढ आराखडा वा नमुना आमच्या बुद्धीला शोधूनहि मिळत नाहीं, म्हणून आम्ही विश्वाच्या व्यवहारासंबंधानें निश्चित ज्ञान मिळविण्यास अपात्र ठरलों आहों. मूळ स्वयंभू तत्त्व हें अनंत आहे आणि या विश्वाचें ''जीवन'' आणि व्यवहार अनंताला शोभेसा असणार, हें उघड आहे; आमची जाणीव कांहीं अनंत नाहीं, ती मर्यादित आहे; आमची बुद्धि आणि तिचा व्यापार सान्तावर आधारलेला आहे; अर्थात् मर्यादित जाणीव आणि बुद्धि ही अमर्याद तत्त्वाचें मोजमाप करूं शकेल ही गोष्ट अशक्य आहे; बुद्धि क्षुद्र आणि तें तत्त्व अतिमहान्; त्या संबंधींचा कोणताहि अंतिम निर्णय क्षुद्र बुद्धि कसा घेऊं शकेल ! बुद्धि दरिद्री, तिचीं साधनें दरिद्री, त्या साधनांचा उपयोग करण्याची बुद्धीची शक्ति ही देखील मर्यादित -- उलटपक्षीं, त्या मूल स्वयंभू तत्त्वाची सत्यसंपदा अमर्याद आणि त्या संपदेची व्यवस्थाहि भव्य श्रीमंतीला शोभेल अशी चाललेली -- तेव्हां या व्यवस्थेची कल्पना दरिद्री बुद्धीला येणें शक्य नाहीं, हें उघड आहे; बुद्धीचें ज्ञान अर्धवट, अज्ञानव्याप्त, आणि विश्वाचा व्यवहार तर सर्वज्ञ तत्त्वानें चालविलेला -- अर्थात् बुद्धीला हा व्यवहार अनाकलनीय असणें स्वाभाविकच आहे. भौतिक निसर्गांच्या मर्यादाबद्ध व्यापारांच्या अनुभवांवर आमची तर्कबुद्धीची इमारत उभारली जाते; व्यापार करणारा भौतिक निसर्ग हा अगोदर मर्यादित क्षेत्रांत व्यवहार करतो; अशा निसर्गाचें आमचें ज्ञान अनिश्चित असतें; त्याचें जें निरीक्षण आम्ही करतों तेंहि अपूर्ण व एकदेशी असतें आणि या अशा मर्यादित पायावर आमची बुद्धि आपला विचार-व्यवहार उभारीत असते; असा विचार-व्यवहार उभारून आमच्या बुद्धीनें दृष्ट वस्तूंच्या संबंधांत ज्या कांहीं कल्पना निश्चित केल्या आहेत, त्या कल्पना ती सर्ववस्तुजाताला लावूं पाहाते, विश्वाला लावूं पाहाते; जें कांहीं या तिच्या कल्पनांना विरोधी व त्यांच्याशीं न जुळणारें दिसेल, तें खोटें आहे, गूढ आहे, सदोष आहे असा निकाल ती देते. परंतु असा निकाल देणें चुकीचें

पान क्र. ५८

 

आहे. सत्याचे, वास्तवाचे अनेक भिन्न भिन्न वर्ग आहेत, प्रकार आहेत; कांहीं कल्पना, मापें वा कसोट्‌या सत्य वस्तूंच्या एका वर्गाला बरोबर लागूं होतील, पण दुसऱ्या वर्गाला त्या गैरलागूं असूं शकतील. आमचें भौतिक अस्तित्व अत्यंत सूक्ष्म भौतिक कणांवर, परमाणूंवर उभारलेलें आहे. या परम सूक्ष्म कणांचा संघात आमच्या भौतिक अस्तित्वाचा पाया आहे. या भौतिक अस्तित्वांत विद्‌युत्कण आहेत, पदार्थांचे अणु आहेत, अणूंचे बनलेले द्व्यणुक, त्र्यणुक असे छोटे संघहि आहेत, जीवपेशी आहेत; पण या सूक्ष्म कणांचा जो क्रियाविषयक नियम आहे, त्या नियमानें मानवी शरीराच्या भौतिक क्रियांचेंहि स्पष्टीकरण सर्व बाबतींत होऊं शकत नाहीं; अर्थात् मानवाच्या अतिभौतिक जीवासंबंधीं, मनासंबंधीं, आत्म्यासंबंधींच्या क्रियांचें स्पष्टीकरण भौतिक सूक्ष्मकणविषयक नियमांनीं होऊं शकत नाहीं, हें निराळें सांगावयास नको. शरीरामध्यें अनेक सान्त वस्तू तयार केल्या गेल्या आहेत. या वस्तूंच्या संवयी, धर्म व विशिष्ट क्रियापद्धती वस्तुगणिक भिन्नभिन्न आहेत; शरीर हेंहि अशीच एक सान्त वस्तु आहे, ही वस्तु तिच्या पोटांतील वस्तूंची बेरीज नव्हे, तर तिला स्वतंत्र अस्तित्व आहे, तिचा क्रियानियम तिच्या घटकभूत वस्तूंच्या क्रिया-नियमांहून वेगळा आहे; तिच्या घटकभूत वस्तू, ही शरीररूपी वस्तु स्वत:च्या व्यवहांराचीं साधनें म्हणून वापरते; या घटकभूत वस्तूंना आपण शरीराचीं अंगें म्हणतों, अवयव म्हणतो -- हे सर्व अवयव शरीराला त्याच्या व्यवहारांत साधनें म्हणून उपयोगी पडतात. या अवयवांचे क्रियानियम स्वतंत्र आहेत आणि ते वापरणाऱ्या शरीराचे क्रियानियम स्वतंत्र आहेत. अर्थात् हे स्वतंत्र नियम थोडेबहुत अन्योन्यावलंबी आहेत. भौतिक शरीराहून प्राण व मन या वेगळ्या वस्तू आहेत, त्या अतिभौतिक वस्तू आहेत. त्यांची क्रियापद्धति जशी वेगळी आहे, तशी भौतिक शरीराच्या क्रियापद्धतीहून ती सूक्ष्महि आहे; भौतिक अवयवांवर प्राण आणि मन यांच्या क्रिया थोड्‌याबहुत प्रमाणांत अवलंबून असल्या, तरी त्यांना स्वतंत्र नियम आहेत; भौतिक अवयव हे प्राण आणि मन यांच्या व्यवहाराला साधनभूत असल्यानें, प्राण आणि मन त्यांजवर, त्यांच्या क्रियानियमांवर थोडेबहुत अवलंबून असणारच; तथापि त्यांना स्वतंत्र अस्तित्व व स्वतंत्र व्यवहारनियम आहेत हेंहि तितकेंच खरे आहे; भौतिक शरीराच्या क्रिया आणि प्राणिक मानसिक शक्ती व त्यांच्या क्रिया, तसेंच प्राणिक, मानसिक अस्तित्व आणि शारीरिक

पान क्र. ५९

 

अस्तित्व यांत वेगळेपणा आहे. प्राणिक, मानसिक अस्तित्वांत शारीरिक अस्तित्वाहून कांहीं अधिक आहे. शिवाय प्रत्येक सान्त वस्तु अनंतावर आधारलेली आहे. प्रत्येक सान्त वस्तूचें सत्य-स्वरूप अनंत आहे. प्रत्येक सान्त वस्तूच्या पाठीमागें अनंत वस्तू आहे. प्रत्येक सान्त वस्तू आपलें व्यक्त रूप म्हणून अनन्तानेंच उभी केली आहे. या सान्त वस्तूला आधार अनंताचा, मार्गदर्शनहि अनंताकडून अशी वस्तुस्थिति आहे. अर्थात् सान्त वस्तूचें अस्तित्व, तिचा व्यवहारनियम, तिची प्रक्रिया पूर्णतया समजून घ्यावयाची, तर या वस्तूच्या पोटीं, तिच्या पाठीमागें जी अनंत वस्तू गूढपणें बसली आहे, तिचें ज्ञान अवश्य करून घेतलें पाहिजे. आमचें मर्यादित ज्ञान, मर्यादित कल्पना, मर्यादित मापें, प्रमाणें, कसोट्‌या त्यांच्या मर्यादित क्षेत्रांत बरोबर असतील, उपयुक्तहि असतील; परंतु या सर्व गोष्टी अपूर्ण आणि संबंधसापेक्ष आहेत, संबंधनिरपेक्ष पूर्ण अनंताला त्या गैरलागूं आहेत. कालस्थलांनीं विभाग पडलेल्या गोष्टींचें निरीक्षण करून, जो क्रिया-नियम शोधून काढला जातो, तो नियम अविभाज्य अशा अनन्ताच्या अस्तित्वाला आणि व्यवहाराला कसा लावतां येईल ? कालस्थल-अतीत अनंताला तो नियम लागूं होणार नाहीं, इतकेंच नव्हे तर कालस्थल-विशिष्ट अनंतालाहि तो लागूं करतां येणार नाहीं. आमचें उपरितन अस्तित्व, बाह्य अस्तित्व ज्या नियमानें चालतें, तो नियम आमच्या आंतर, गूढ अस्तित्वाला लागूं पडणार नाहीं; आमच्या बुद्धीची गोष्ट घेतली, तर ती विचार-क्रियेवर आधारलेली आहे; व जी गोष्ट विचारक्रियेच्या पातळीखालीं आहे, त्या गोष्टीसंबंधानें कसें वागावें हें विचारतंत्र बुद्धीला कळत नाहीं. जीवनक्रिया, प्राणव्यवहार हा विचाराच्या पातळीखालीं आहे; या व्यवहाराला विचारविशारद बुद्धि आपला नियम लावूं लागली कीं भलताच परिणाम होतो; प्राणव्यवहारावर बुद्धि नियंत्रण घालतें, त्याला सक्तीनें मर्यादा घालते, कृत्रिम बंधन निर्माण करते आणि त्यायोगें त्या व्यवहाराचा एक तर अन्त करते, किंवा तो खुरटवून दगडासारखा गतिहीन बनविते; किंवा विशिष्ट कठोर संकेतांनीं तो बांधून टाकते; हे कठोर संकेत जीवनाची शक्ति लुळी करतात किंवा तिला कोंडून कोंडून पिसाळल्यासारखी करतात आणि मग जीवन बंड करून उठतें, बुद्धीनें त्याजवर उभारलेल्या इमारती आणि व्यवस्था बंडखोर

पान क्र. ६०

 

जीवन नीट राहूं देत नाही -- त्यांत पडझड घडवून आणतें, त्या जमीनदोस्त देखील करून टाकतें. जीवनव्यवहार नीट चालण्यासाठीं सहजप्रेरणेची जरूरी असते; ही सहज-प्रेरणा वा उपजत-बुद्धि, विचारवंत बुद्धीला हवी तेव्हां उपलब्ध होणारी नसते, आणि योगायोगानें ही उपजत-बुद्धि विचारी बुद्धीच्या मदतीला धांवली, तर ही विचारी बुद्धि त्या उपजत-बुद्धीला तुच्छ मानून तिचें सांगणें ऐकत नाहीं, असेंच बहुधा घडतें. विचाराच्या पातळीच्या खालीं, जीवनासारख्या व्यवहाराची ही गोष्ट झाली; त्या पातळीच्या वर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीशीं विचारतन्त्र बुद्धीचा संबंध आला, म्हणजे ती अधिकच अडचणींत पडते; आत्म्याचें क्षेत्र हें विचारातीत आहे, त्या क्षेत्रांतील हालचाल फार मोठ्‌या प्रमाणावर चालते, फार सूक्ष्म असते, फार गुंतागुंतीचीहि असते; अशा हालचालीच्या कड्‌यांत विचारतंत्र बुद्धि सांपडली कीं ती गोंधळते, तिला कांहींच समजत नाहीं -- येथें अंत:स्फुरण, अंतर्ज्ञान, अंतर्दृष्टी ही मार्गदर्शन करूं शकते. तसेंच अंतर्दृष्टी ज्या अतिमानसिक सत्य-जाणिवेच्या एका तीव्र किरणासारखी आहे, ती सत्यजाणीवहि या आत्म्याच्या क्षेत्रांत पूर्णत्वानें मार्गदर्शन करणारी दुसरी वस्तु आहे : अतिबौद्धिक क्षेत्रांत एक अंतःस्फूर्ति किंवा दुसरी सत्य-जाणीव या खेरीज तिसरी मार्गदर्शन करणारी वस्तु नाहीं; अर्थात् अतिबौद्धिक सत्य-जाणीव, अतिबौद्धिक पूर्णदृष्टि आणि जान हें आत्म्याच्या क्षेत्रांत अंतिम प्रकाश देणारें तत्त्व आहे; प्रकाशाची येथें परिसीमा होते.

विचारतंत्र बुद्धि आत्म्याच्या क्षेत्रांत, अनंताच्या क्षेत्रांत गोंधळते, तिच्या तर्कदृष्टीला अनंताच्या क्षेत्रांतील सगळाच व्यवहार सर्वस्वी तर्कदुष्ट वाटतो; हें खरें असलें, तरी अनंताचें अस्तित्व आणि व्यवहार वस्तुत: तर्कशून्य जादूगिरी आहे असें मानण्याचें कारण नाहीं. खरोखरी अनंताच्या व्यवहारांत आमच्या बुद्धीच्या व्यवहारापेक्षां अधिक तर्कशुद्धता आहे. अर्थात् मानसिक किंवा बौद्धिक तर्क निराळा आणि हा अनंताच्या क्षेत्रांतील तर्क निराळा. या क्षेत्रांत आध्यात्मिक, अतिमानसिक तर्कपद्धति व्यवहार ठरवीत असते, चालवीत असते; अनंताच्या आध्यात्मिक क्षेत्रांत नाना प्रकारचे संबंध असतात, नातीं असतात; हीं नातीं, हे संबंध बिनचूक रीतीनें योजलेले असतात आणि बिनचूकपणें वास्तवांत आणले जातात. जेथें निरीक्षण, नियोजन आणि कारभार बिनचूकपणें चालतो, तेथें तर्कदृष्टि नाहीं असें कसें म्हणतां येईल ? अर्थात्

पान क्र. ६१

 

आमच्या मर्यादित बुद्धीला त्या अमर्याद अनंताच्या व्यवहारांत आमच्या बौद्धिक व्यवहारांतलें तर्कज्ञान किंवा तार्किक मांडणी दिसत नाहीं, तर सर्व जादुगिरी, अगम्य घटना वाटते ही गोष्ट वेगळीं पण ती जादुगिरी नसते, आपल्या बुद्धीच्या अतीत अशा विचाराची, महान् विचाराची, महान् तर्काची ती कारागिरी असते; या विचाराचा, तर्काचा कारभार फार गुंतागुंतीचा, फार सूक्ष्म, फार मोठ्‌या क्षेत्रावर चाललेला असतो; आमच्या मर्यादित निरीक्षणांतून सुटणाऱ्या अशा सर्व गोष्टी अतिमानस बघूं शकतें, बघतें, आणि या महान् पायावर आपले निर्णय ठरवितें; अर्थात् हे निर्णय आमच्या बुद्धीला दुर्बोध असतात; तिची विचारपद्धति, तर्कपद्धति दोन प्रकारची : अनेक विशेषांवरून सामान्य सिद्धान्त बसविणारी एक, आणि गृहीत वा अनुभवसिद्ध सामान्य सिद्धान्तावरून विशेष सिद्धान्त बसविणारी दुसरी -- ही दुसरी निगमनपद्धति व पहिली अनुगमन पद्धति, दोन्हीहि पद्धती अतिमानसिक तर्कानें ठरविलेले निर्णय घेऊं शकत नाहींत, समजूं शकत नाहींत; कारण आमच्या बुद्धीला जीं अनुमानें, जे निर्णय घ्यावे लागतात ते अगदीं तुटपुंज्या अनुभवावर घ्यावे लागतात -- अनुमानाचा पाया अरुंद, उथळ, ठिसूळ, दोषमय व अपुरा असल्यानें, अनुमान त्यासारखेंच सदोष असणार; असें असल्यानें आम्हीं अनुमानलेला निर्णय आणि अतिमानसिक निर्णय, यांत महान् अंतर न पडलें तरच आश्चर्य. आम्हीं एखादी घटना पाहिली कीं तिच्या परिणामावरून आम्ही तिजसंबंधानें निर्णय घेतों, परिणामावरून तिचें स्पष्टीकरण करतों. त्या घटनेचे अगदीं बाहेरचे घटक काय आहेत, बाहेरची परिस्थिति काय आहे, बाहेरचीं कारणें काय आहेत या गोष्टी बघून त्या घटनेबद्दल आम्ही आपलें स्पष्टीकरण तयार करतों, पण कोणतीहि घटना जी घडते, तिच्या मुळाशीं अनेक शक्ती असतात, अनेक शक्तींचा संघात असतो, त्या शक्ती आम्हांला दिसत नाहींत, दिसूं शकत नाहींत; सर्वच शक्ती आमच्या दृष्टीला न दिसण्यासारख्या आहेत; परंतु अनंताच्या आत्मिक दृष्टीला, चैतन्यदृष्टीला त्या सर्व स्पष्ट दिसतात, त्या शक्तींपैकीं कांहीं कार्यमग्न असतात, वास्तवांत उतरलेल्या असतात, नवी वास्तव घटना तयार करण्याच्या खटपटींत असतात. कांहीं वास्तवपूर्ण वास्तवोन्मुख अशा शक्यतेच्या अवस्थेंत असतात, वास्तवांत उतरलेल्या शक्तींच्या निकट व त्यांच्या संघातांत थोड्‌याबहुत अंतर्भूत झालेल्या अशा असतात; वास्तवापासून दूर असलेल्या कांहीं शक्यतारूप शक्ती,

पान क्र. ६२

 

वास्तवांत उतरलेल्या शक्तींच्या संघातांत एकदम प्रविष्ट होतात -- या सर्वांच्या पाठीमागें अनंतगत आदेश अनेक किंवा एक, प्रेरक म्हणून काम करीत असतो आणि हा आदेश वास्तवांत प्रकट व्यवहाराच्या वा घटनेच्या रूपानें व्यक्त करण्यासाठीं, सर्व शक्यता धडपडत असतात. शिवाय शक्तींच्या एका संघातांतून, अनेक भिन्नभिन्न शक्य परिणाम वास्तवांत होऊं शकतात, मग या भिन्न शक्य परिणामांतून एक विशिष्ट परिणाम वास्तत्वांत येतो तो कसा ? त्याला कारण, अनंताचा दिव्य निश्चित आदेश. हा आदेश अनेक शक्य परिणामांतून अमुक परिणाम वास्तवांत यावा, ही गोष्ट ठरवितो. अर्थात् हा आदेश कांहीं एकदम येत नाहीं -- योजनेंत सर्वकाळ अंतर्भूत असतो, पण एकदम आल्यासारखा तो येतो आणि पूर्वी जणुं वेगळा कार्यक्रम ठरला होता व याच्या ''अकस्मात्'' येण्यामुळें तो जणुं बदलला असा भास निर्माण करतो. आमच्या बुद्धीला हें  'आदेशाचें प्रकरण' कांहीं कळत नाहीं -- अनंताची कोणतीच योजना व कारभार कळत नाहीं -- कारण ती अज्ञानसेवक व अज्ञानाचें साधन असते; तिची नजर फार दूर पोंचत नाहीं, तिचा ज्ञानाचा जो कांहीं अल्प सांठा असतो, तो सुद्धां तितकासा विश्वसनीयहि नसतो आणि प्रत्यक्ष ज्ञानाला ती नेहमींच पारखी असते -- अंत:स्फूर्ति ही प्रत्यक्ष ज्ञानजन्य असते आणि बुद्धि ही मोठ्‌या कष्टानें अज्ञानांतून कांहीं चिन्हांच्या व सूचनांच्या आधारें उभें राहिलेलें जें अप्रत्यक्ष ज्ञान त्याची कार्यरूप असते. अर्थात् प्रत्यक्ष ज्ञानकार्य जी अंतःस्फूर्ति व अप्रत्यक्ष ज्ञानकार्य जी आमची बुद्धि, त्यांच्या कारभारांत व फळसंभारांत फरक पडणारच. तेव्हां आमच्या बुद्धीला आणि इंद्रियसंघाला जें उघड दिसत नाहीं तें अनंताच्या जाणिवेला स्वयंस्पष्ट असें प्रतीत होतें, यांत कांहीं नवल नाहीं. या अनंताला इच्छा असेल, तर ती अनंताची इच्छा वर सांगितल्याप्रमाणें पूर्ण ज्ञानावर आपली इमारत उभारीत असते हें उघड आहे. ही क्रियाशील इच्छा, स्वत: मुळीं सर्वांगीण, स्वयंप्रकाश, वस्तुज्ञानांतून आपोआप पूर्णरूपांत स्फुरलेली असणार. स्वयंप्रकाशपूर्ण ज्ञानांतून उभी राहिलेली ही अशी स्वयंस्फूर्त पूर्ण इच्छा किंवा क्रियाशक्ति ही अर्थात् भौतिक विकासक्रमांत कार्य करणारी, चांचपडत, अडखळत पाऊलें टाकणारी शक्ति नव्हे; स्वत: जें उदयास आणतें त्यानें ही विकासशक्ति बांधली जाते आणि म्हणून ती अडखळत असतें. त्याचप्रमाणें अनंताची ही इच्छाशक्ति किंवा क्रियाशक्ति म्हणजे कांहीं

पान क्र. ६३

 

मनोराज्य उभारणारी, अगदीं शून्य अवकाशांत स्वैर लहरीप्रमाणें कल्पनामय इमारती उभारणारी, आमची कल्पनाशक्ति पण नव्हे -- ती अनन्तांतील सत्यमय वस्तु आहे, सान्ताच्या क्षेत्रांत कोणत्या विशेष रचना उभ्या कराव्याच्या, त्या कशा उभ्या करावयाच्या हें ठरविणारी आणि त्याप्रमाणें करणारी सर्वाधिकारसंपन्न नियोजक आणि कारागीर आहे.

अनंताची जाणीव आणि इच्छा वर वर्णन केल्याप्रमाणें सर्वदर्शी आणि सर्वसमर्थ असल्यानें, त्यांजकडून जें कार्य घडेल तें आमच्या मर्यादित बुद्धीच्या निर्णयाशीं जुळतें असेल असें नाहीं -- आणि तसें तें जुळतें असण्याचें कारणहि नाहीं; आमच्या बुद्धीला संवयीची झालेली कांहीं व्यवहारपद्धति आहे, ही पद्धति आमच्या विचारांनीं रचलेल्या पद्धतिविषयक कल्पनांना पसंत अशी आहे; पण ही पद्धति अनंतानें वापरलीच पाहिजे असें कांहीं म्हणतां येत नाहीं. आमची नीतिविषयक विचारपद्धति, कांहीं मर्यादित, एकदेशी कल्याणाकरितां योजना व कारभार करीत असते -- अशा नीतीच्या अंकित रहाण्याचेंहि अनंताला परवडत नाहीं -- तेव्हां आमच्या विचारपद्धतीला ज्या अविचारी व अनैतिक वाटतील अशा गोष्टीहि अनंताची जाणीव आणि इच्छा आपल्या कारभारांत, विचारी आणि नैतिक ठरवितील -- एकंदर सार्वत्रिक अंतिम हिताच्या दृष्टीनें, विश्वाच्या योजनेंतील कांहीं प्रयोजन यशस्वी करण्याच्या दृष्टीनें अवश्य म्हणून, विचारी आणि नैतिक ठरवितील व त्यांना आपल्या कार्यक्रमांत स्थान देतील, ही गोष्ट शक्य आहे, नव्हे, अपरिहार्य आहे. कांहीं विशिष्ट गोष्टी, हेतु, उद्देश यांच्या दृष्टीनें एखादा मार्ग अविचारी, दूषणीय ठरेल -- त्या हेतूहून उच्चतर हेतू त्या गोष्टींहून व्यापक गोष्टी, त्या उद्देशाहून व्यापक उद्देश यांच्या दृष्टीनें तोच मार्ग पूर्णतया विचारी आणि स्पृहणीय, अनुमोदनीय व अनुसरणीयहि ठरेल. आमच्या बुद्धीची नजर एकदेशी; ती कांहीं निर्णय आपल्या एकदेशी अनुभवांवर विसंबून घेते आणि या निर्णयांना सामान्य ज्ञानसंग्राहक नियमांचें, कार्यनिर्वाहक नियमांचें रूप देते -- या नियमांशीं जो अनुभव, जें कार्य जुळणार नाहीं किंवा कांहींतरी युक्तीनें जुळवून घेतां येणार नाहीं, तो अनुभव, तें कार्य अग्राह्य म्हणून आमची बुद्धि शेरा मारते; अनंत जाणीव असे कांहीं कडक नियम करून स्वत:ला बांधून घेत नाहीं; ती विशिष्ट परिणाम, विशिष्ट फळ घडवून आणावयाचें असें ठरवून त्या फळाच्या, त्या परिणामाच्या उदयासाठीं, आपल्या अंतर्गत असलेल्या सत्यांपैकीं

पान क्र. ६४

 

कांहीं स्वाभाविक, विशिष्ट, विशाल सत्यांची योजना करून ठेवते; हीं सत्यें स्वयंगतीनें, दुसऱ्या कोणत्याहि प्रेरणेची जरूर न ठेवतां, ठरलेला परिणाम घडवून आणण्यास समर्थ असतात; अशा प्रकारची अनंताची व्यवस्था असल्यानें, अमुकच पूर्वघटनांच्या घडण्यावर तो परिणाम अवलंबून असत नाहीं; पूर्वघटना एकंदरीनें वेगळ्या वेगळ्या घडून सुद्धां परिणाम ठरलेलाच घडून येतो -- ही वस्तुस्थिति पाहून, अनंताच्या व्यवहारांत कांहीं नियम नाहींत, कांहीं निश्चित क्रम वा योजना नाहींत असें आमच्या सीमित संकोचित तर्कबुद्धीला दिसते; सर्व कारभार लहरी दिसतो पण तसा तो नसतो; विशिष्ट सत्यरूप स्वयंप्रभावी कारण आणि त्याचें विशिष्ट दूरवर्ती कार्य, हे ठरलेलें असतें; मधली घटना-परंपरा मात्र लवचीक असते, ही गोष्ट आमच्या सीमित बुद्धीच्या लक्षांत येत नाहीं. आमचें अस्तित्व चोहोंकडून सीमाबद्ध, तर अनंताचें अस्तित्व सर्वथा सीमाशून्य; अशा परिस्थितींत त्याच्या अस्तित्वाचीं मोजमापें व त्याच्या कारभाराच्या फूटपट्टया वेगळ्या असणार आणि आमच्या वेगळ्या असणार हें उघड आहे. अनंताला ज्या अवस्था आणि उद्दिष्टें स्वाभाविक, त्याच अवस्था आणि उद्दिष्टें आम्हांला शक्यतेच्या पलीकडील असणें, वाटणें अगदीं संभवनीय आहे; म्हणून त्यांचें असणें, करणें आमच्या मापांनीं मोजून तें बरें कीं वाईट, योग्य कीं अयोग्य, हें आम्हीं ठरविणें म्हणजे लहान तोंडीं मोठा घांस घेणें आहे. आमची जाणीव मानसिक व तुकड्‌यातुकड्‌यांची; ही जाणीव ज्ञानाचे तुकडे तुकडे जोडून कांहीं एक ''पूर्ण'' वस्तु बनविते. मनाला सर्वांगीण दृष्टि असत नाहीं, तर अनंताची दृष्टि पूर्ण सर्वांगीण असते, सारग्राही असते; अर्थात् त्याचें ज्ञान पूर्ण असतें, त्याला अनुभवाचे तुकडे तुकडे जोडून वस्तूचें वा घटनेचें ''पूर्ण'' ज्ञान बनवावें लागत नाहीं -- एका दृष्टिक्षेपांत सर्व वस्तू त्यांच्या आंतरिक गाभ्यासह अनंताला दिसतात. हा जो अनंताच्या व आमच्या ज्ञानांतील फरक, तो वर सांगितल्याप्रमाणें अनंताच्या आणि आमच्या व्यवहारांतील व निर्णयांतील फरकांना कारणीभूत होत असतो. आमच्या व्यवहारांत जोपर्यंत आम्हांला आमची बुद्धि मुख्य मार्गदर्शक म्हणून वापरावी लागत आहे, तोपर्यंत अर्धवट अंत:स्फूर्तीला मार्गदर्शक म्हणून पत्करणें आणि बुद्धीला बाजूला ठेवणें आम्हांला परवडणार नाहीं; तथापि ही गोष्ट आम्हीं केलीच पाहिजे : आमच्या बुद्धीला आम्ही लवचीकपणा शिकविला पाहिजे; अनंताचें अस्तित्व, अनंताचा व्यवहार

पान क्र. ६५

 

पाहतांना या व्यवहारांत विशाल शक्यता वास्तवांत येतात, विशाल अवस्था अस्तित्वांत येतात, हें लक्षांत ठेवून बुद्धीनें वागावें; असें शिक्षण आम्हीं तिला देणें आवश्यक आहे. अनंत हें अनंत आहे, सीमाबद्ध नाहीं, सीमाबद्ध होण्यासारखें नाहीं; या अनंताच्या बाबतींत आमचे मर्यादित आणि मर्यादा घालणारे निर्णय आम्ही सत्यस्थितीचे दर्शक म्हणून समजणें चुकीचें होईल. अनंताच्या एका अंगावर लक्ष केंद्रित करावयाचें आणि या एकदेशाला सर्वरूप समजायचें, अशी चूक आमच्या मर्यादित बुद्धीकडून होण्याचा संभव आहे, ही गोष्ट आम्हीं केव्हांहि दृष्टिआड करतां कामा नये. आंधळे आणि हत्ती या गोष्टींत प्रत्येक आंधळा हत्तीच्या एका एका अंगाला चांचपून पाहतो आणि सगळा हत्ती मी ओळखला या गैरसमजुतीनें हत्तीचें वर्णन म्हणून आपण चांचपलेल्या अंगाचें वर्णन पुढें करतो -- असेंच कांहींसें वर्तन, अनंताच्या बाबतींत आमच्या बुद्धीकडून होतें, होऊं शकतें, ही गोष्ट नेहमीं ध्यानांत वागवून बुद्धीला आम्ही लवचीक केली पाहिजे, सावधगिरीनें निर्णय देण्यास तिला शिकविलें पाहिजे, अनंताच्या कोणत्याहि अंगाचा अनुभव हा 'त्या अंगाचा' अनुभव या दृष्टीनें सत्यपूर्ण असतो; परंतु या अनुभवावरून अनंताचें स्वरूप ठरविणें चुकीचें असतें. आध्यात्मिक अनुभव अनेक दृष्टिकोनांतून घेतां येतात; अनंतविषयक अनुभव हे वेगळे वेगळे असतात; कोणताहि एक अनुभव जमेस धरावयाचा, बाकीचे दूर ठेवावयाचे आणि जमेस धरलेल्या एका अनुभवावरून अनंताविषयीं कल्पना करावयाची, ही पद्धति दोषपूर्ण आहे, सत्यदर्शन घडविणारी नाहीं. अनंत हें एकाच वेळीं तीन स्वरूपांचें असतें. तें सर्वातीत सारभूत सत्तत्व आहे, तें असीम एकमय सर्वरूप आहे आणि तें गणरूप आहे, जमावरूप आहे, त्यांत अनेक घटक आहेत, विभाग आहेत. अनंताची पुरी ओळख करून घ्यावयाची, तर त्याच्या या तीनहि स्वरूपांची ओळख करून घेणें अवश्य आहे. अनंताचे विभाग वेगळे वेगळे जाणून घेतले, पण त्याचें एकात्म सर्वरूप जाणून घेतलें नाहीं किंवा हें सर्वरूप विभागांच्या बेरजेपेक्षां वेगळें नाहीं, असें असम्यक्-ज्ञान त्या एकात्म सर्वरूपाविषयीं मिळविलें, तर तें ज्ञान जरुर आहे, पण तें अज्ञान सुद्धां आहे; तसेंच केवळ एकात्म सर्वरूपाचें ज्ञान हेंहि ज्ञान आणि अज्ञान यांचें मिश्रण आहे; कारण एखादा विभाग सर्वरूपाहून श्रेष्ठ महान् असूं शकेल -- सर्वातीताचा तो विभाग असेल तर तो सर्वरूपाहून श्रेष्ठ, महान्

पान क्र. ६६

 

असणार आणि त्यासंबंधानें ज्ञान नसणें हें अज्ञान दुर्लक्ष करण्यासारखें नव्हे; तसेंच अनंताचें साररूपच केवळ पाहिलें आणि त्याच्याद्‌वारां आपण सर्वातीताजवळ बैठक घेतली (कारण साररूप सरळ सर्वातीताकडे घेऊन जातें) आणि त्याच्या एकात्म सर्वरूपाकडे व विभागमय जमावरूपाकडे दुर्लक्ष केलें, तर तेंहि ज्ञान -- अगदी अंतिम ज्ञानाच्या शेजारचें उपान्त्य ज्ञान -- म्हटलें जाईल, पण त्याबरोबर तें मोठें अज्ञानहि समजलें जाईल. ज्ञान पूर्ण होईल अशी खटपट हवी; ज्ञान पूर्ण हवें आणि बुद्धि लवचीक हवी. सर्व अंगांच्या, सर्व बाजूंचा परामर्श घेण्याची पात्रता तिच्यामध्यें असावयास पाहिजे आणि या अंगांच्या, या बाजूंच्या दर्शनानें, निरीक्षणानें, ज्या एका तत्त्वांत त्यांचा देखावा उभा होतो, त्या तत्त्वाचें आकलन करण्याचा प्रयत्न या बाजूंच्या, अंगांच्या दर्शनाद्वारां, निरीक्षणाचे द्‌वारां केला गेला पाहिजे.

आपण अनंताचें आत्मरूप पाहून त्यावरच दृष्टि खिळविली, तर त्या आत्मरूपाची स्थितिशीलता, शांति यांचा अनुभव आपणांस येईल; पण त्या अनंताचें क्रियाशीलत्व आमच्या अनुभूतीच्या बाहेर राहील. उलटपक्षीं अनंताचें ईश्वर रूप पाहून त्यावर आमची दृष्टि खिळली, तर त्याचें क्रियाशीलत्व आम्ही अनुभवूं, पण त्याची शाश्वत निश्चलता आणि शांति यांच्या अनुभवाला आपण पारखे राहूं. अनंताचें क्रियाशील अस्तित्व, क्रियाशील ज्ञान, क्रियाशील आनंद यांचा आम्हांला अनुभव मिळेल; परंतु त्याचें शुद्ध अस्तित्व, ज्ञान, आनंद यांचा लाभ आम्हांला मिळणार नाहीं. पुरुष-प्रकृति या जोडीवर आमची दृष्टि खिळली तर आत्मा आणि निसर्ग, चैतन्य आणि जड या द्वैताचा अनुभव आम्हांला मिळेल; परंतु त्या दोन तत्त्वांचें ऐक्य आमच्या अनुभवास येणार नाहीं. अनंताचा व्यवहार विचारांत घेतांना एका साधकानें केलेली चूक आपण करतां उपयोगी नाहीं -- 'मी ब्रहम आहे' असें तो साधक घोकीत होता; हत्तीच्या माहुतानें या साधकाला रस्त्यांतून बाजूला होण्याची सूचना दिली, ही सूचना त्या साधकानें मानली नाहीं. हत्तीनें त्याला आपल्या सोंडेनें उचलून बाजूला केलें, गुरुपाशीं या शिष्यानें याबद्दल तक्रार केली. गुरुजी म्हणाले, तूं ब्रहम आहेस, हें खरें आहे; पण, माहुत ब्रहम आहे व हत्तीहि ब्रहम आहे हें कां विसरलास ? हत्ती-ब्रहमाचा रस्ता, माहुतब्रह्माच्या सूचनेप्रमाणें मोकळा करणें तुझें काम होतें. या गोष्टीचा इत्यर्थ असा कीं, सत्याची एक बाजू उचलून धरणें आणि इतर बाजूंकडे

पान क्र. ६७

 

दुर्लक्ष करणें कामाचें नाहीं. अनंताच्या बाबतींत असें होण्याचा संभव फार असतो, म्हणून आपण जागरुक असले पाहिजे. ''मी ब्रहम आहे'' ही गोष्ट खरी आहे. असा साक्षात्कार आम्हांला झाला असेल तर तो आमच्या व्यवहाराचा पाया करण्यास आम्हांला अधिकार आहे -- पण ''सर्व ब्रहम आहे'' हेंहि सत्य, ''मी ब्रहम आहे'' या सत्याबरोबर आम्हांला प्रत्यक्ष झालें नसेल, तर आमचा व्यवहार धोक्याचा होईल. आमच्या आत्म्याचें अस्तित्व ही वास्तव गोष्ट आहे, पण त्याबरोबर दुसरे आत्मे अस्तित्वांत आहेत हेंहि आम्हीं जाणलें पाहिजे; त्या दुसऱ्या आत्म्यांत आणि आमच्या आत्म्यांत एकच परमात्मा व्यक्त झालेला आहे, हें आम्हीं जाणलें पाहिजे; आमचा आत्मा आणि दुसरा प्रत्येक आत्मा या सर्वाहून परमात्मा मोठा आहे यांच्याहून पलीकडे तो आहे हेंहि आम्हीं जाणले पाहिजे. एकच अनंत वस्तु असंख्य वस्तूंच्या पोटीं काम करीत आहे; आणि या अनंत वस्तूंचें कार्य समजून घ्यावयाची पात्रता 'सामान्य' बुद्धींत नाहीं -- असामान्य श्रेष्ठ बुद्धि, सर्वोत्तम बुद्धि मात्र अनंताच्या कार्याचा सम्यक् बोध करून घेऊं शकते, ही बुद्धि (अनंताच्या बुद्धीशीं एकरूप झालेली बुद्धि) सर्व वस्तुजात एका दृष्टिक्षेपांत पाहूं शकते; एकतेची जाणीव तिच्या ठिकाणीं अखंड असते; वस्तूवस्तूंत भेद असतात तरी या भेदांत स्वतःची एकता ती पाहूं शकते आणि त्याबरोबर भेदांनाहि योग्य तो मान ती देते. कारण भेदहि तिनेंच केलेले असतात; अर्थात् अनंताच्या (एकव्याप्त अनेकांच्या) संसारांत प्रत्येक वस्तूला, प्रत्येक जीवाला, त्याचें त्याचें स्वरूप असतें, त्याचा त्याचा स्वधर्म असतो; आणि अनंताच्या एकंदर व्यवहारांत, या सर्व वस्तूंना आणि जीवांना योग्य मान आणि स्थान असतें. अनंताचें ज्ञान, अनंताचा व्यवहार हा अगदी अमर्याद भेदांनीं भरलेला असला, तरी त्यांत एकतेचा व्याप आणि व्यापार असतो; या व्यवहारांत अनंत भेदहि असावयाचे आणि तरीहि त्यांत एकतेचेंहि सूत्र असावयाचें, अशी अनंताची ज्ञानसरणी आणि व्यवहारसरणी आहे; परिस्थिति भिन्न प्रकारची आणि व्यवहार एकाच प्रकारचा, किंवा भिन्न प्रकारचा व्यवहार आणि या भिन्न भिन्न व्यवहारांत एकतेच्या सूत्राचा अभाव, सुसंवादितेचा अभाव -- या दोन्हीहि गोष्टी अनंताच्या दृष्टीनें (अनंत सत्याच्या दृष्टीनें) चुकीच्या आहेत; आमचा व्यवहार अनंताच्या या व्यवहाराप्रमाणें आंखण्याचें आम्हीं ठरविलें तर आमच्या एकट्याच्या

पान क्र. ६८

 

अस्मितेवर जोर देणें किंवा केवळ दुसऱ्यांच्या अस्मितेवर जोर देणें, या दोन्ही गोष्टी चुकीच्या म्हणून आम्हीं त्याज्य मानल्या पाहिजेत; सर्वांचा जो एक आत्मा आहे तो आमच्या सर्व व्यवहाराचा आम्हीं पाया करावयास हवा; हा पाया करून, आमच्या व्यवहारांत एकता व एकसूत्रता आम्हीं आणावयास हवी, त्याबरोबरच एकंदर सर्वच व्यवहारांत आत्यंतिक लवचीकपणा ठेवून भिन्न भिन्न क्रिया सुसंवादीपणानें घडतील अशी क्रियाकुशलता आम्हीं दाखवावयास हवी : अनंताच्या व्यवहाराचा जो स्वाभाविक धर्म, तो अशा प्रकारें आमच्या व्यवहारांत आम्हांला प्रकट करतां येईल.

विशाल लवचीक विचारपद्धतीनें, अनंताची तर्कपद्धति लक्षांत घेऊन, आम्ही सर्व-निरपेक्ष सर्व-व्यापी सत्याची, ब्रहमाची कल्पना यथार्थतेनें उभी करण्याच्या कार्यांत आमच्या बुद्धीला ज्या अडचणी येतात त्यांजकडे याप्रमाणें जर पाहिलें, तर या अडचणी वस्तुनिष्ठ नसून शाब्दिक व वैचारिक आहेत असें आपल्या लक्षात येतें. केवल ब्रह्माची आमच्या बुद्धीसमोर कांहीं कल्पना असते. ही कल्पना तपासतां बुद्धीला असें वाटतें कीं केवल ब्रहम हे निर्गुण, निर्विशेष व गुणांचा वा विशेषांचा संभवहि ज्यांत नाहीं असें असलें पाहिजे; पण या ब्रह्मापासून गुणांचें, विशेषांचें विश्व निघालें आहे आणि हें विश्व या ब्रह्मामध्यें वावरत आहे असें याच बुद्धीला स्पष्ट दिसतें; केवल ब्रह्म ही एकच वस्तु अस्तित्त्वांत असल्यानें, त्या ब्रह्माखेरीज दुसऱ्या कशापासून विश्व निघणार आणि कोठें राहणार ? आमच्या बुद्धीला हा देखावा जसा अगम्य वाटतो, तसाच हा देखावा म्हणजे केवल ब्रह्मानेंच घेतलेलें रूप आहे असा त्या देखाव्यावर सरळपणें निघणारा सिद्धांत हाहि आम्हांला अगम्य वाटतो -- तिला तो गोंधळांत पाडतो. निर्गुणांतून सगुण विश्व नव्हे निर्गुणच सगुण विश्व ही वस्तुस्थिति आमच्या बुद्धीला, ती शब्दाच्या, विचाराच्या (वास्तवनिरपेक्ष शब्दाच्या आणि विचाराच्या) चक्रांत फिरत आहे तोंपावेतों अगम्यच वाटणार, विरोधमय भासणार. पण केवलाच्या स्वरूपाचा नीट विचार केल्यास ही विरोधमयता नाहींशी होते. केवल ब्रह्म निर्गुण आहे, याचा अर्थ ते गुणमुक्त आहे, गुणांच्या बंधनापासून मुक्त आहे, स्वत: उभ्या केलेल्या गुणांच्या, विशेषांच्या बंधनापासून मुक्त आहे; तसेंच त्याच्यावांचून दुसरें कांहीं अस्तित्वांत नसल्यानें व अस्तित्वांत येण्याची शक्यता नसल्यानें स्वतःहून वेगळ्‌या अशा

पान क्र. ६९

 

कोणाच्या बंधनाचाहि त्याला स्पर्श नाहीं व होण्यासारखा नाहीं, असा निर्गुण याचा भावात्मक अर्थ आहे. निर्गुणता ही कांहीं गुणविषयक अक्षमतेची त्याजवर लादलेली आपत्ति नव्हे; त्याचे ठिकाणीं गुणांचा अभाव आहे आणि तो कायमचा राहणार असा कांहीं निर्गुण शब्दाचा अभावात्मक अर्थ घ्यावयाचा नाहीं; ही गोष्ट लक्षांत आली, म्हणजे वर उल्लेखिलेली विरोधमयता ब्रह्माच्या स्वरूपांतून नाहींशी होते. अनंत हें मुक्त आहे, असीम स्वतंत्रतेनें युक्त आहे, आपल्या ठिकाणीं अनंत गुण वा विशेष उभे करण्यास पूर्ण मोकळें आहे, स्वत: निर्माण केलेल्या वस्तुंच्याकडूनहि कोणतेंहि बंधन त्याला घडूं शकत नाहीं, कोणतेंहि नियंत्रण त्याजवर येऊं शकत नाहीं. 'निर्मिति' हा शब्दच मुळीं वस्तुस्थितिदर्शक नव्हे. अनंत निर्माण करीत नाहीं; त्याच्या अंतरांत जें असतें, तें तें प्रकट करतें, सर्व सत्यांचें सार म्हणजे अनंत होय; या सारभूत अनंतनामक सत्याच्या शक्ती हें बाकीच्या सत्यांचें खरें स्वरूप आहे. बनविणें व बनविलें जाणें हा, निर्माण करणें व निर्माण केले जाणें या शब्दांचा अर्थ आम्ही समजतो; या अर्थानें केवल तत्त्व निर्मीत नाहीं, निर्मिलें जात नाहीं. या केवलाच्या संबंधांत निर्मिति शब्द वापरावयाचाच, तर त्याचा अर्थ असा घ्यावा लागेल : जें सद्रूप स्वयंभू आहे, सारत: आणि स्थितिदृष्टीनें स्वयंसिद्ध आहे तें साकार होणें, गतिशील होणें; जें निराकार शांत आहे तें साकार स्पंदनयुक्त होणें. यांत नवें कोणी कांहीं बनवीत नाहीं, कांहीं बनविलें जात नाहीं; जें स्वयंसिद्ध आहे तेंच आकारयुक्त, आंदोलनयुक्त होतें. अनंताच्या निर्गुणतेवर, गुणातीततेवर म्हणजे गुणबंधनातीततेवर जोर देणें ही गोष्ट एवढ्‌यासाठींच आवश्यक आहे कीं, स्वत:च्या ठिकाणीं अनंतप्रकारें 'विशेष' उभे करण्याची पात्रता त्याचे ठिकाणीं आहे हें स्पष्ट व्हावें. ही बंधनातीत अवस्था, अनंतगुणयुक्त होण्यास आवश्यक अशी पूर्वस्थिति आहे; ही बंधनमुक्तता नसेल, तर 'निश्चित गुणयुक्त शाश्वत वस्तु' असें रूप मूळ सद्वस्तूला येईल किंवा 'अनिश्चित गुणयुक्त परंतु निश्चित संख्येची गुणशक्यता अंगभूत असलेली वस्तु' असें रूप तिला येईल. अर्थात् अशा वस्तूला अनंत हें नांवहि शोभणार नाहीं. अनंत, अमेय, असीम अशी जी वस्तु आहे, ती स्वत: स्वत:चें नियंत्रण करण्यास, स्वत:च्या इच्छेनुसार अनंत रूपरूपांतरें धारण करण्यास मोकळी नाहीं असा तिच्या निर्गुणाबाबत अर्थ केल्यास अंतर्विरोध उत्पन्न होतो; वर दिलेला गुणबंधन-

पान क्र. ७०

 

मुक्तता हा निर्गुणत्वाचा अर्थ केल्यास असा अंतर्विरोध उत्पन्न होत नाहीं. अनंत केवल सद्‌वस्तूचा स्वभावच द्विमुखी आहे; ती शांत सारस्वरूप आहे आणि ती क्रियाशील आत्मनिर्माणकुशल, आत्माविष्कारकुशल आहे; या द्‌विमुखी स्वभावांत अंतर्विरोध वस्तुत: मुळींच नाहीं; जें शुद्ध आणि अनंत असें सारभूत सत्तत्त्व असेल, तेंच अनंत प्रकारें साकार होऊं शकेल. अनंत निराकार सार आणि अनंत साकार संसार, ही अनंत सद्वस्तूविषयींचीं दोन विधानें अन्योन्यपूरक आहेत, अन्योन्यमारक नाहींत; अन्योन्यसंवादी आहेत, अन्योन्य विसंवादी नाहींत; विधानें दोन, पण एकाच वस्तूचें द्विमुखी स्वरूप दाखविणारीं आहेत -- मानवी बुद्धि जेव्हां मानवी भाषा वापरून मूळ अनंत सद्वस्तूचें यथार्थ वर्णन करूं पाहते, तेव्हां तिला अशीं दोन अन्योन्यपूरक विधानें करणें अवश्य होतें, अपरिहार्य होतें.

मूळ सद्‌वस्तूच्या वास्तव स्वरूपाकडे अंतर्यामींच्या सरळ दृष्टीनें बारीक नजरेनें, स्वरूपाचा कोणताहि तपशील यथार्थतेनें आकलन करण्याच्या निश्चयानें पाहिलें, म्हणजे आमच्या सामान्य मनाला व बुद्धीला विसंवादी वाटणाऱ्या गोष्टी, त्या वस्तूंत एकत्र सुसंवादानें नांदत असलेल्या दिसतात. ती अनंत वस्तू सारदृष्टीनें कोणत्याहि गुणांनीं, धर्मानीं, लक्षणांनीं बांधलेली नाहीं, असें आपल्या सरळ नजरेला दिसतें; त्याचबरोबर या अनंत वस्तूच्या पोटीं असंख्य गुण, धर्म, लक्षणें, आहेत असेंहि आपल्याला दिसतें. कोणत्याहि गुणांचें वगैरे कसलेंहि बंधन अनंत वस्तूला नाहीं, याचा अर्थ त्या वस्तूंत गुण वगैरे नाहींत असा अभावात्मक नाहीं, निषेधात्मक नाहीं; जे गुण वगैरे आमच्या सरळ नजरेला दिसतात ते तेथें नाहींत, असा 'अनंत वस्तु गुणबंधनाच्या अतीत आहे' याचा अर्थ नाहीं. ते गुण भ्रमात्मक आहेत, आभासात्मक आहेत असाहि अर्थ नाहीं; तर बंधनातीतता हा अनंत वस्तूचा स्वभाव असल्यानें ती आपलें स्वरूप अनंत गुणांच्या, लक्षणांच्या द्‌वारां प्रकट करू शकते; बंधनातीतता हा असंख्य गुणधर्मांच्या, आविष्काराचा आवश्यक स्वाभाविक पाया आहे, असा 'अनंत वस्तु बंधनातीत आहे' या म्हणण्याचा अर्थ आहे. गुण आम्ही कशाला म्हणतो ? जाणीवयुक्त अस्तित्वाचे ठिकाणीं, जीवाचें ठिकाणीं असलेल्या कोणत्याहि वृत्तीच्या, प्रवृत्तीच्या, शक्तीच्या स्वरूपाला गुण असें नांव आम्हीं देतों; अथवा असें म्हणतां येईल कीं, जीवाची जाणीव जेव्हां स्वतःमधली वृत्ति, प्रवृत्ति व्यक्त करीत असतें, व्यक्त

पान क्र. ७१

 

केल्या जाणाऱ्या विशिष्ट वृत्ति-प्रवृत्तीवर, तिला इतरांपासून चटकन् ओळखतां येईल असा जो तिचा अंगभूत शिक्का ती मारते, त्या शिक्क्याला आम्ही गुण म्हणतो. धैर्य हा गुण घ्या. धैर्य हा गुण जीवाच्या (माझ्या) अस्तित्वांतील एक शक्ति, एक प्रवृत्ति आहे; माझ्या जाणिवेचा एक विशिष्ट पैलू आहे. त्यांत माझ्या अस्तित्वाची एक वृत्ति साकार झालेली आहे; माझा क्रियाशील स्वभाव ज्या एका विशिष्ट शक्तीनें युक्त आहे, ती शक्ति या गुणानें दाखविली जाते; किंवा हा गुण, माझी जाणीव निर्माण करते किंवा व्यक्त करते असें म्हणा. धैर्य हा असा माझा गुण, तसा रोज बरा करण्याचा औषधाचा जो शक्तिधर्म, तो त्या औषधाचा गुण होय; हा गुण म्हणजे त्या औषधाचें मूळ असलेल्या विशिष्ट वनस्पतीची किंवा खनिज वस्तूची विशिष्ट शक्ति : ही शक्ति आली कोठून ? त्या वनस्पतीच्या किंवा खनिज वस्तूच्या पोटीं जी जाणीव अंतर्हित असते, त्या जाणिवेच्या अंतरंगांतील सत्य-कल्पना ही त्या खनिज वा उद्भिज्ज वस्तूची विशिष्ट शक्ति निर्माण करते, निश्चित करते; मूळ सद्वस्तूची एक सत्-कल्पना किंवा सत्य-कल्पना, विशिष्ट खनिज वा उद्भिज्ज वस्तूच्या विशिष्ट शक्तीच्या मुळाशीं असते, हा इत्यर्थ. सर्व गुण, धर्म, लक्षणें आतांच उल्लेखिलेल्या धैर्य किंवा रोगपरिहारकता या गुणांप्रमाणें जाणीवयुक्त अस्तित्वाच्या शक्ती किंवा प्रवृत्ती असतात. केवल अनंत सद्‌वस्तूच, आपल्या अंतरंगांतून या सर्व प्रवृत्ती व्यक्त करीत असते; सर्व कांहीं तिच्या अंतरंगांत आहे; सर्व कांहीं व्यक्त करण्याचें अनिर्बंध सामर्थ्य तिला आहे; पण केवल अनंत वस्तु म्हणजे धैर्य किंवा रोग बरा करण्याची शक्ति, अशी कांहीं अनंताची व्याख्या आम्ही करीत नाहीं, करूं शकत नाहीं; या शक्ती, अनंताचें खास स्वरूप दाखविणाऱ्या लक्षणाच्या ठिकाणीं आहेत, असें देखील आम्ही म्हणूं शकत नाही; या गुणांची बेरीज करून, या बेरजेला ''ही पहा अनंत वस्तु'' असें जसें आम्ही गौरवूं शकत नाहीं, तसेंच उलटपक्षीं, केवल अनंत वस्तु, कोऱ्या पाटीसारखी आहे, हे गुण व्यक्त करण्याची शक्ति तिच्यामध्यें नाहीं असेंहि आम्ही म्हणूं शकत नाहीं. कारण, सर्व प्रकारची शक्ति तिजमध्यें आहेच आहे; सगळ्या गुणांच्या, प्रवृत्तींच्या शक्ती या वस्तूंत अंगभूत आहेत, तिच्या स्वभावांतच आहेत. ''केवल अनंत वस्तु ही या समोरच्या वस्तूंपैकीं एकहि नव्हे, या वस्तू कांहीं

पान क्र. ७२

 

अनंत नाहीत.'' ''केवल अनंत वस्तु हीच या सर्व वस्तू झाली आहे, या वस्तू अनंत वस्तूंहून कांहीं वेगळ्या नाहींत, कारण अनंत वस्तु ही एकच वस्तु अस्तित्वांत आहे -- सर्व अस्तित्व अनंताचेंच अस्तित्व आहे'' हीं दोन विधानें एकाच वेळी एकाच वस्तूबद्दल करणें मनाला जड जातें; त्याच्या स्वाभाविक मर्यादित तर्कबुद्धीला हें तर्कदुष्ट वाटतें. या ठिकाणीं जी अडचण आहे, ती कांहीं वस्तुस्थितींतील अडचण नाहीं. विचाराची व शब्दाची भलतीच मर्यादित बारकाई -- मर्यादेच्या कोंडींत विचाराला व विचार व्यक्त करणाऱ्या शब्दाला आपली कसरत करावी लागते ही गोष्ट -- मनाला अडचणींत आणते. केवल वस्तु म्हणजे धैर्य किंवा आरोग्य देणारी शक्ति, अथवा धैर्य आणि आरोग्य देणारी शक्ति म्हणजे केवल वस्तु हें म्हणणें मूर्खपणाचें होईल; तसेंच केवल वस्तु आपलें स्वरूप व्यक्त करतांना, त्या स्वरूपाचा आविष्कार म्हणून धैर्य किंवा आरोग्य देणारी शक्ति प्रकट करण्यास असमर्थ आहे व असणार हें म्हणणेंहि मूर्खपणाचें होईल हें कांहीं सांगावयास नको. कोंडींतलें बुद्धीचें तर्कशास्त्र जेथें उणें पडतें, तेथें त्याच्या पाठीमागें अनंताचें तर्कशास्त्र, आपल्या मोकळ्या अप्रतिहत दृष्टीला प्रत्यक्ष काय दाखवितें तें पाहणें अवश्य आहे. ही दृष्टि आम्हीं वापरली, तर आम्हांला हें स्पष्ट दिसतें कीं, केवल अनंत वस्तु ही गुणांनीं, धर्मांनीं, लक्षणांनीं अनंत आहे, तथापि कितीहि गुणांची, धर्मांची व लक्षणांची बेरीज केली, तरी ती अनंताची अनंतता व्यक्त करूं शकत नाहीं.

जी गोष्ट निर्गुण-सगुण या अनंताच्या स्वरूपाची, तीच गोष्ट एक-अनेक या त्याच्या स्वरूपाची. मनाच्या तर्कशास्त्राला अडचणींत टाकणारी, पण अनंताच्या तर्कशास्त्रानुसार अगदीं सरळ, सुबोध. केवल, आत्मा, ईश्वर, चैतन्य, पुरुष हीं अनंताचीं नांवें आहेत -- तें एक आहे; सर्वातीत जसें एक, तसेंच सर्वरूप विश्वरूपहि पण एकच; तथापि पुरुष अनेक आहेत, प्रत्येक पुरुषाला ''स्वतंत्र'' आत्मा आहे, स्वतंत्र चैतन्य आहे; सर्व पुरुषांचा स्वभाव सारखाहि आहे आणि वेगळा वेगळाहि आहे, ही गोष्ट आपल्या अनुभवाची आहे. वस्तुजाताचें सारतत्त्व, अंतर्यामीचें तत्त्व एक असल्यानें, या सर्व विविध वस्तू व पुरुष तें एकच बनलें असलें पाहिजे असें आपल्याला मान्य करावें लागतें; पण जें मर्यादित आहे, जें संबंधित आहे तें, संबंधनिरपेक्ष अमर्यादित असें केवल तत्त्व कसें असूं शकेल ? मनुष्य, पशु, पक्षी हा ईश्वर कसा असूं शकेल

पान क्र. ७३

 

असा संशय मर्यादित मनाला येतो. गणितांत जो मर्यादित एकम् (एक) हिशोबासाठीं घेण्यांत येतो, त्या एकम् प्रमाणें केवल वस्तु आहे; गणितांतील एकम् चें एकत्व आणि केवल वस्तूचें एकत्व सारखें आहे, अशी कल्पना मन करुन घेतें; गणितांतला एक हा मर्यादाक्षेत्रांतील एक आहे; हा एक त्या क्षेत्रांतील दोनहून कमी आहे; या एकाचे दोन तुकडे करून किंवा एकांत एक मिळवून अथवा एकाला दोन या संख्येनें गुणून 'दोन' होतात. मूळ एक (वस्तु) अनंत एकत्वाची आहे; या मूळ एकाचें अनंत सारभूत एकत्व हें गणितांतील एकाहून, त्याच्या एकत्वाहून अगदींच वेगळें आहे -- या मूळ एकांत शंभर, हजार, लाख, कोटी, अब्ज, हवी ती मोठी संख्या अंतर्भूत असते; ज्योति:शास्त्र किंवा खगोलशास्त्र मोठमोठ्‌या संख्याकरितां प्रसिद्ध आहे. त्या संख्या किंवा त्याहून मोठ्‌या संख्या घ्या; त्या एकमेकांवर रचा, त्यांचा हवा तसा गुणाकार करा; केवढीहि मोठी संख्या याप्रमाणें निर्माण करा; ही संख्या मूळ एकाच्या एकत्वाच्या पोटांतच राहणार, त्या एकत्वाच्या बाहेर ती असूं शकत नाहीं, जाऊं शकत नाहीं. उपनिषदांत या एकतत्त्वाचें असें वर्णन आहे : ''हें एकतत्त्व हलत नाहीं, पण जेव्हां तुम्ही धांवत जाऊन तें गांठूं पहातां, तेव्हां तें तुमच्या पुढें पुढेंच, तुम्हांला गांठतां येणार नाहीं अशा दूर अंतरावर, तुम्हांला दिसतें.'' त्या अनंत एकाविषयीं असें म्हणतां येईल कीं, त्याला 'अनंत एक' म्हणतां येण्याचें कारणच, त्याच्यामध्यें अनंत प्रकारें अनेक होण्याची शक्ति आहे हें आहे. ही शक्ति नसती, तर त्याला 'अनंत एक' म्हणतां आलें नसतें -- तथापि याचा अर्थ असा नव्हे कीं, तें स्वभावतःच अनेकत्वानें नटलेलें आहे किंवा अनेकांचीं बेरीज असें त्याचें यथार्थतेनें वर्णन वा मर्यादाबंधन करतां येईल. अनेकता हें बंधन त्याला नाहीं आणि विचारदृष्टसीमित एकता हेंहि बंधन त्याला नाहीं; म्हणूनच तें 'अनंत अनेक' होऊं शकतें. 'अनंत एक' म्हणून 'अनंत अनेक' अशी त्या मूळ एकाची स्थिति आहे. अनेकतावाद हा खरा नव्हे, बरोबर नव्हे; कारण आत्मे अनेक असले, तरी ते अन्योन्यसंबंधित, परतंत्र, अन्योन्याश्रयी आत्मे (वस्तु, सत्पदार्थ) आहेत; ते सर्व एकत्र केले, म्हणजे मूळ 'एक आत्मा' बनतो असें नाहीं, विश्वगत सर्वरूपहि या बेरजेनें व्यक्त होत नाहीं; ते अनेक आत्मे, मूळ एक आत्म्यावर अवलंबून असतात, त्याच्या एकत्वानें त्यांना अस्तित्व लाभतें आणि तें टिकवितां येतें; याप्रमाणें अनेकतावाद 'अनेक

स्वतंत्र आत्मे

पान क्र. ७४

 

आहेत' हा सिद्धान्त खोटा असला, तरी आत्मे अनेक आहेत ही गोष्ट सत्य आहे; जें मूळ एक आत्मतत्त्व आहे, तेंच या अनेक आत्म्यांत व्यक्तिरूप आत्मा म्हणून वावरतें आणि हें अनेक आत्मे एकाच्या पोटीं आणि त्याच्या शाश्वतत्वाच्या आधारानें शाश्वतत्व भोगणारे आहेत, ही गोष्ट सत्य आहे. मानसिक विचारसरणीला, बुद्धीला हें ग्रहण करण्यास अवघड जातें; ती बुद्धि, अनंत वस्तु आणि सीमित वस्तु, यांत विरोध मानते; सीमितत्व आणि अनेकता एकत्र असूं शकतात, असीमत्व आणि एकता एकत्र नांदतात -- असीमत्व आणि अनेकता किंवा सीमितत्व आणि एकता या अन्योन्यविरोधी वस्तू असून, त्या एकत्र असूं शकत नाहींत असें ती मानते : पण अनंताची तर्कपद्धति व विचारसरणी निराळी आहे; तेथें अशा तऱ्हेचा अन्योन्यविरोध, अन्योन्यबहिष्कार नाहीं. तेथें अनंताच्या क्षेत्रांत 'एक' शाश्वत, व त्याचे पोटीं 'अनेकहि' शाश्वत; अनंताच्या स्वभावांत या गोष्टी शक्य आहेत आणि वस्तुत: त्या तेथें आहेत.

तें अनंत आत्मतत्त्व, शुद्ध स्थिर अवस्थेंत, निश्चल शांतींत असतें; त्याचबरोबर तें आत्मतत्त्व स्फुरत असतें, असीम स्पंदन पावत असतें; तें निश्चल सर्वदा चल, चंचल, हालचाल करणारें आहे; तें स्फुरणशील क्रियाशील, अनंत आत्मतत्त्व स्वत:चा स्वत:मध्यें विस्तार करतें, सर्व वस्तू या आत्मविस्तारांत उभ्या करतें. शांत निष्क्रिय अवस्था आणि क्रियाशीलता व चंचलता या गोष्टी आमच्या मानसिक विचाराला एकत्र कल्पितां येत नाहीत; त्याला त्या वस्तूंत, अवस्थांत विरोध दिसतो. पण अनंताच्या विचाराला, तर्काला असा विरोध दिसत नाहीं, असत नाहीं. चलनशक्ति वापरीत नसलेलें केवळ शांत निश्चल अनंत, हें अनंताचें दर्शन, एक एकदेशी दर्शन म्हणून मानतां येईल. पण मुळांतच, शक्तिहीन व सामर्थ्यहीन आत्मतत्त्व, हें अनंताचें स्वरूप, सूक्ष्म बुद्धि कबूल करूं शकत नाहीं. जें अनंत आहे त्याची क्रियाशक्ति अनंत असलीच पाहिजे; जें सर्वनिरपेक्ष तत्त्व आहे, त्याचे ठिकाणीं सर्वरूप सामर्थ्य असलेंच पाहिजे; जें चैतन्य आहे, त्याचे ठिकाणीं अमर्याद शक्ति-तत्त्व असलेंच पाहिजे. तथापि शांति आणि स्वस्थता, नि:स्पंदता हाच स्पंदनाचा, आंदोलनाचा मूलाधार असतो, पाया असतो; असीम चंचलतेच्या अवस्थेची आवश्यक अशी पार्श्वभूमि म्हणजेच शाश्वत निश्चलता होय. असीम चंचलतेचें क्षेत्र व सारभूत तत्त्व, शाश्वत निश्चलताच आहे; अस्तित्वाच्या अंगभूत शक्तीची महान् क्रिया,

पान क्र. ७५

 

सुस्थिर अस्तित्वरूप पार्श्वभूवर व पायावर आधारलेली असते, ही वस्तुस्थिति लक्षांत ठेवणें अवश्य आहे. ही जी शांति, सुस्थिरता, निश्चलता सांगितली ती आम्हीं प्रथम आत्मसात् करावी लागते; कांहीं प्रमाणांत ती आम्हांला आत्मसात् करतां आली, म्हणजे मग विशेष सामर्थ्यसंपन्न व बलसंपन्न क्रिया, आम्हांला त्या शांतीच्या, सुस्थिरतेच्या, निश्चलतेच्या पायावर उभी करतां येते. आमच्या मनाच्या वरच्या पृष्ठभागावर अस्थिरता, खळबळ चालूं असतां, असें विशेष सामर्थ्य दाखविणें आम्हांला अशक्य असतें, अकल्पनीय असतें. आत्म्याची शांति आणि त्याची क्रियाशीलता या दोन गोष्टी अन्योन्यपूरक सत्यें आहेत, अविभाज्य सत्यें आहेत : त्यांच्यामध्यें अन्योन्य विरोध जो आम्ही मानतो, तो म्हणजे आमच्या मर्यादित बुद्धीची करामत असते. शांत निश्चल आत्मा, आपली अनंत क्रियाशक्ति शांत आणि निश्चल अवस्थेंत आपल्या ठिकाणीं धारण करूं शकतो; या क्रियाशक्तीनें तो बांधला जात नाहीं, तिचा तो दास व साधनरूप नसतो, तिच्या लहरीसाठीं तो सक्रिय होत नाहीं -- पण ही विविध क्रियाशक्ति त्याची अंकित असून तो त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार तिला क्रियाप्रवण करतो, या शक्तीच्या द्‌वारां तो शाश्वत आणि अनंत क्रिया करूं शकतो, तो थकत नाहीं, त्याला विसांवा घ्यावा लागत नाहीं; आपली क्रिया अविश्रांतपणें करीत असतां, त्या क्रियेच्या पोटीं तिचें सारभूत तत्त्व म्हणून जी शांति आत्म्याचे ठिकाणीं असते ती, क्षणभरहि ढळत नाहीं, क्रियेमुळें, आंदोलनामुळें, तिच्यांत अणुभरहि बदल होत नाहीं; निसर्गाचे आवाज आणि व्यवहार अविरत चालूं असतां, त्यांच्या सर्वांच्या, अंशाअंशांच्या पोटीं आत्म्याचें नितांत शांत साक्षित्व उपस्थित असतें, अखंडपणें सदासर्वदा उपस्थित असतें : आम्हांला या गोष्टी त्वरित समजण्यास अवघड जातात; कारण, आमच्या पृष्ठगत उपरी मनाची, प्राणाची व शरीराची शांतिविषयक शक्ति व क्रियाविषयक शक्ति अगदीं अल्प व मर्यादित आहे आणि आम्ही ज्या कल्पना करतों त्या, आमच्या या मर्यादितपणावर आधारलेल्या असतात; या मर्यादांनीं आणि संबंधांनीं बांधलेल्या कल्पना या अमर्याद, नि:संबंध व केवल मूळ सद्वस्तूला लागूं पडत नाहींत, ही गोष्ट थोड्‌या विचाराअंतीं आम्हांला पटण्यास हरकत नसावी.

अनंतासंबंधाची, अनंत आत्म्यासंबंधींची आमची कल्पना, 'तो निराकार आहे' अशी आहे आणि आमच्या भोंवतीं सर्वत्र आकार पसरलेले

पान क्र. ७६

 

आहेत; त्या परमपुरुषासंबंधानें असें म्हणतां येतें कीं, तो आकार आहे आणि त्याचवेळीं निराकारहि आहे, आणि तसें म्हटलेंहि जातें; कारण येथेंहि विरोध हा दर्शनी आहे, वस्तुगत नाहीं; निराकार असणें म्हणजे आकारशक्तीचा अभाव असणें नव्हे; निराकारता हा तर अनंताच्या स्वच्छंदी साकारतेचा पाया आहे. अनंत आत्मा हा जर निराकार नसता, तर 'एकच आकार' हें त्याचें स्वरूप झालें असतें किंवा सांत अशा विश्वांत निश्चित संख्येचेच आकार त्याला शक्य झाले असते; 'अनंत आकार' हें त्याचें वास्तव स्वरूप त्याला आलें नसतें. अनंताचें जें आत्म-सार, त्याचा स्वधर्म निराकारता हा आहे; सद्‌वस्तूचें जें आत्मद्रव्य, त्याचा स्वधर्म निराकारता हा आहे; सान्त वस्तू, सत्य वस्तू त्या आत्म-द्रव्याच्या शक्ती आहेत, आकार आहेत, त्या आत्मद्रव्यानें स्वत: धारण केलेले आकार आहेत. दिव्य मूळतत्त्व ब्रह्म हें नामरूपातीत आहे, तथापि असें तें असल्यानेंच स्वत:च्या अस्तित्वाचे, नांवाचे अनेक आकार-प्रकार व शक्य ते सर्व नामरूपात्मक देखावे तें व्यक्त करूं शकतें; आकार, रूपें हीं कांहीं शून्यांतून लहरीप्रमाणें उभीं केलेलीं, सर्वथा नवीं अशीं दृश्यें नव्हेत -- तीं पूर्वी अव्यक्तांमध्यें स्वतःच्या अव्यक्त रूपांत असलेलींच, ब्रह्म व्यक्त करीत असते. आकार म्हणजे त्यांत विशिष्ट रेषा, रंग, द्रव्यभार व मांडणी असावयाची. आकाराचा आत्मा या गोष्टींत सांठवलेला असतो : आणि हें उघड आहे कीं, या गोष्टी सार्थ असतात, सप्रयोजन असतात; नव्हे, या गोष्टी म्हणजे, न दिसणारी सद्‌वस्तु दृश्य करणारी त्या सद्‌वस्तूचीं मूल्यें असतात असें म्हणतां येतें; या मूल्यांवांचून अदृश्य सद्वस्तु दृश्य झाली नसती, इंद्रियांना ती अग्राह्य व गूढ राहिली असती; हीं मूल्येंच त्या गूढ वस्तूला देह पुरवून आम्हांला, आमच्या इंद्रियांना ती ग्रहण करतां येईल असें रूप देतात. निराकाराची अटळ अभिव्यक्ति, आत्माभिव्यक्ति म्हणजे आकार; निराकाराची स्वाभाविक काया म्हणजे आकार असें म्हणतां येतें. बाहय आकारांनाच केवळ हें विधान लागूं पडतें असें नव्हे, तर मन आणि प्राण यांच्या प्रांतांतील जे अदृश्य, केवळ विचारग्राहय आकार, त्यांच्यासंबंधानें देखील हें विधान खरें आहे; मनापलीकडील आंतर-जाणीव आपल्या सूक्ष्म ग्रहणशक्तीनें जे सूक्ष्म आकार ग्रहण करते, त्यांजसंबंधानेंहि असेंच म्हणतां येतें कीं, निराकाराचे ते स्वाभाविक आकार आहेत, निराकाराची ती अटळ आत्माभिव्यक्ति आहे. नाम-

पान क्र. ७७

 

रूप या जोडशब्दांत नाम हा जो शब्द आम्ही वापरतो, त्याचा खोल अर्थ, एखाद्‌या वस्तूचें वर्णन करणारा अक्षरसमुच्चय हा नव्हे, तर आकारानें व्यक्त झालेल्या सद्‌वस्तूचें एकंदर गुणधर्म असा आहे; हा खोल अर्थ, हे एकंदर गुणधर्म विशिष्ट ध्वनीनें, समजण्यासारख्या नांवानें, आम्ही व्यक्त करतो आणि त्याला नाम म्हणतो. मूळ अनंत सद्‌वस्तु ही नामातीत आहे पण तिच्या या नामातीत अवस्थेंत, शक्य तीं सर्व नामें, अर्थात् शक्य त्या सर्व देवतागत शक्ति, गुण, स्वभावधर्म, शक्य त्या सर्व सत्यांची व सत्य वस्तूंची रूपें आणि नांवें अगोदरच अंतर्भूत असतात, अगोदरच चितारलेलीं असतात : जें सर्व सत्तारूप अनंत अस्तित्व आहे, त्यांत शक्य ते सर्व गुणधर्म, शक्तिप्रकार गुप्तरूपांत अंगभूत म्हणून सांठवलेले असतात आणि म्हणूनच त्याला नामातीत, अनाम असें नांव दिलें जातें.

वरील विवेचनावरून हें स्पष्ट होईल कीं, सर्वरूप सर्वात्मक पुरुषाचा स्वभावच, अनंत आणि सांत यांचें साहचर्य हा आहे; दोन विरोधी वस्तूंचें हें साहचर्य नव्हे, दोन विरोधी वस्तूंचा हा अन्योन्य-अंतर्भाव नव्हे तर सूर्याचे ठिकाणीं प्रकाश आणि तेज यांचें साहचर्य जितकें स्वभावसिद्ध व अनिवार्य असें असतें, तितकेंच सर्वात्मकाचे ठिकाणीं सान्त-अनंताचें साहचर्य स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे. सान्त वस्तु ही अनंत वस्तूची दर्शनीय बाजू आहे, ती वस्तु म्हणजे अनंत वस्तूनें स्वत: घेतलेलें मर्यादित रूप आहे; सान्त वस्तूला स्वयंभू अस्तित्व नसतें व असूं शकत नाहीं; आपलें अस्तित्व टिकवून धरणें, ही गोष्टहि ती वस्तु स्वतःच्या सामर्थ्यानें करूं शकत नाहीं; सर्वस्वी अनन्त वस्तूच्या अस्तित्वावरच तिचें अस्तित्व अवलंबून असतें; अनन्त वस्तूचें आणि तिचें सारतत्त्व एक असतें, म्हणून तिला अस्तित्व लाभतें व म्हणूनच तिचें तें परावलंबी अस्तित्व टिकून राहतें. अनन्त वस्तु याचा अर्थ, कालस्थलांत अमर्यादपणें व्यापून राहिलेली वस्तु एवढाच नाहीं, तर कालस्थल-अतीत वस्तु, असाहि त्याचा अर्थ आहे -- ही कालस्थल-अतीत वस्तु स्वयंभू आहे, अलक्षण आहे, अमर्याद आहे. ती आपलें स्वरूप अगदीं सूक्ष्मतम वस्तूंच्या द्वारां आणि अति महान् वस्तूंच्या द्‌वारां, सारखेंच व्यक्त करूं शकते; ती एका क्षणांत, एका बिंदूंत, एखाद्‌या तात्पुरत्या परिस्थितींत सारखीच व्यक्त होऊं शकते. सान्त वस्तु म्हणजे अविभाज्य अनन्ताचा एक तोडलेला भाग असें समजलें जातें; पण हा समज चुकीचा आहे. हा विभाग तोडलेला जो दिसतो तो केवळ

पान क्र. ७८

 

दिसतोच, वस्तुत: अविभाज्य अनन्त विभागलें जात नाहीं, त्याचे अलग अलग तुकडे पडत नाहींत. एकसंधी पदार्थावर खुणा करून त्याचे अनेक अंश दाखवावे त्याप्रमाणें अनन्तांत सान्ताच्या खुणा असतात. एखाद्या वृक्षाकडे किंवा वस्तूकडे चर्मचक्षूनें न बघतां आंतरदृष्टीनें आपण बघतों, तेव्हां ती वस्तु, तो वृक्ष अनंत वस्तूपासून वेगळा दिसत नाहीं, तर त्याचे ठिकाणी आम्हांला अनन्त वस्तु दिसते; त्या वस्तूचा वा वृक्षाचा पिंड अनन्त वस्तूचा बनला आहे, त्या पिंडाचा अणून् अणु अनन्तानें व्यापलेला आहे, ती अनंत वस्तूंच आपल्या अंतरंगांतून अणून् अणु बनवीत आहे, त्या पिंडाची सर्व प्रकृति, त्याच्या बनावटीची प्रक्रिया, त्याच्या अंतर्गत शक्तीची क्रिया ती अनंत वस्तूच स्वत: घडवीत आहे, असें आम्हांला स्पष्टपणें दिसतें; या सर्व गोष्टी स्वत: अनंत सद्‌वस्तूच आहे आणि होत आहे असें आम्हांला दिसतें; ही अनन्त वस्तु, अविभक्तपणें सर्वत्र पसरलेली आहे, सर्व वस्तूंना जोडीत आहे -- कोणतीहि वस्तु तिजपासून व इतर कोणत्याहि वस्तूपासून, विभक्त नाहीं हें आमच्या सूक्ष्म दृष्टीला दिसतें. ''अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम्'' (भूतांचे ठिकाणीं अविभक्तपणें असून ती विभक्त असल्यासारखी दिसते -- गीता.) याप्रमाणें प्रत्येक वस्तु म्हणजे, ती अनंत वस्तूच आहे; आणि सारभूत अस्तित्वाच्या दृष्टीनें प्रत्येक वस्तु इतर सर्व वस्तूंशीं एकरूप आहे. थोडक्यांत म्हणजे सर्व वस्तू म्हणजे अनंत वस्तूचीं नामें आणि रूपें; अर्थात् तिच्या विविध शक्ती, तिचे विविध गुणधर्म होत.

दर्शनी अगण्य भेदांत, अगण्य विविध प्रकारांत, अतूट अफूट अभेद्‌य एकता, ही अनंत वस्तूची गणिती प्रक्रिया आहे : ''पूर्णमद: पूर्णमिदम् । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावष्यिते'' (ईशोपनिषद्) 'हें पूर्ण आहे, तें पूर्ण आहे, पूर्णांतून पूर्ण वजा करतां बाकी पूर्ण राहतें' -- हें अनन्ताचें गणित आहे; वजाबाकीची प्रक्रिया आणि गुणाकाराची प्रक्रिया, अनंताचें बाबतींत पूर्णता आणि एकता अभेद्‌य अभंग ठेवून, एकसारखीच केली जाते. अनंत सद्‌वस्तु, अनन्तपणें आपलें स्वरूप गुणते, आपलें स्वरूप अनंत-गुणित करते, तेव्हां त्याची मूळ एकता खंडित होत नाहीं. एकच अनेक होतें; अनेक एकाहून कांहीं वेगळें नसतें, अनेक होऊनहि एक एकच राहतें. सान्त वस्तु उदयास आल्या, म्हणून या दर्शनी अनेकत्वानें त्या मूळ एकाचें विभाजन होत नाहीं; एक जी अनंत वस्तु असते, तीच 'अनेक सान्त वस्तू' या रूपानें आमच्यासमोर येते; या

पान क्र. ७९

 

अनेकांच्या निर्मितीनें अनंतांत कांहीं एक भर पडत नाहीं; निर्मितीनंतरहि निर्मितीपूर्वीं जशी होती, तशीच ती अनन्त वस्तु राहते. सर्व वस्तूंची बेरीज म्हणजे अनंत नव्हे; सर्वच्यासर्व वस्तू आणि अधिक कांहीं, म्हणजे अनंत वस्तु होय. अनंताचें हें तर्कशास्त्र आमच्या मर्यादित बुद्धीच्या कल्पनांशीं जुळत नाहीं याचें कारण, तें बुद्धीच्या पलीकडील आहे; मर्यादित दृश्याच्या आधारावर तें आपलें सिद्धान्त बसवीत नाहीं, तर मूळ अनंत सद्‌वस्तु ही त्याचा पाया आहे; या वस्तूला तें व्यापून आहे, या वस्तूच्या सत्यतेंत सर्व दृश्य वस्तूंची सत्यता अंतर्भूत आहे, ही गोष्ट या तर्कशास्त्राला दिसते. या दृश्य वस्तू, अनंताच्या तर्कशास्त्राला एकमेकींपासून तोडलेल्या, अलग, स्वतंत्र दिसत नाहींत; तर, सर्व जड आणि जीव, सर्व आंदोलनें, नामें, रूपें, एकतत्त्वाच्या पोटांत एकतेंत गुंफलेलीं दिसतात; या सर्व गोष्टी शून्यांतील दृश्यें असतीं, तर त्या स्वतंत्र, अलग अलग असूं शकल्या असत्या, कारण शून्यांत त्यांना कांहींच सर्वसामान्य आधार असूं शकत नाहीं -- त्यांना कांहीं सर्वसाधारण सारतत्त्व असूं शकत नाहीं आणि म्हणूनच मूलभूत रीतीनें, त्यांचा एकमेकींशीं कांहीं संबंध नसल्यानें केवळ व्यवहारापुरता अन्योन्यसंबंध असलेल्या त्या एकमेकीजवळ परंतु स्वतंत्र अशा अस्तित्वांत राहूं शकल्या असत्या. पण त्या शून्यांत उभ्या नाहींत; त्या आभासरूप नाहींत; त्या सत्यवस्तू आहेत आणि त्यांचें अस्तित्व एका सत्य मूळ सत्तत्त्वाच्या अस्तित्वांतून उदय पावलेलें आहे. त्या शून्यांत उभ्या नसून, पूर्णांत, एक-तत्त्वांत उभ्या आहेत; त्यांना अलगपणा, स्वतंत्र अस्तित्व असल्यासारखें दिसतें; त्यांचें बाहयरूप, आंतररूप, त्यांची हालचाल स्वतंत्रशी दिसते पण ही दर्शनी स्वतंत्रता पूर्णपणें परतंत्र आहे. त्यांचें उगमस्थान जें अनंत सत्तत्त्व त्याच्या तंत्रानें नित्य वागणारी अशी ती ''स्वतंत्रता'' आहे; सर्व वस्तू मुळांत, त्यांच्या गूढ मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें एकमेव अद्‌वितीय एकरस अनंत सत्तत्वाशीं एकरूप आहेत; म्हणूनच त्यांना दर्शनीं थोडेबहुत, रूपारंगाचें व हालचालींचें स्वातंत्र्य लाभलेलें आहे; या ''स्वातंत्र्याचें'' उगमस्थान व आधार मूळ सत्तत्त्वच आहे. त्यांतच या सर्व वस्तूंचा उगम आहे, तेंच त्यांना आकार देणारें आहे. त्यांच्या विविध शक्ती या सत्तत्त्वाच्या शक्तीचींच विविध रूपें आहेत, त्यांची घडण या एकरस सत्तत्त्वाच्या द्रव्यानेंच झालेली आहे.

पान क्र. ८०

 

जे एकरस तत्त्व आहे तें सदासर्वदा अपरिवर्तनीय, कोणताहि बदल केव्हांहि स्वतःमध्यें न होणारें असें असलें पाहिजे, अशी आमची कल्पना असते. त्यांत बदल झाले, त्याच्या पोटीं भेद उदयास आले, तर त्याचें एकरसत्व रहात नाहीं -- पण आम्हांला सर्वत्र दिसतें काय, तर एकता हें मूळ असून त्या एकतेपासून अनंत भेदांची निर्मिति होत आहे. निसर्गाचें हें भेदपूर्ण एकत्व जणुं त्याचा स्वभावच आहे, त्याचें आद्य व्यवहारतत्त्वच आहे असें दिसतें. मूळ शक्ति (मूळ अनन्त सद्‌वस्तूची शक्ति) एक आहे, पण ती स्वत:मधून अगणनीय विविध शक्ती व्यक्त करते; मूळ सत्-द्रव्य एक, पण तें स्वतःमधून अनेक भिन्न द्रव्यें निर्माण करतें, एकमेकांपासून अगदीं वेगळे वेगळे असे लाखों पदार्थ उदयास आणतें; मूळ मन एक, पण मनाच्या अनेक भिन्न अवस्था त्यांतून निर्माण होतात; मानसिक मूर्ति, विचार, वस्तुचित्र एकमेकांपासून वेगळीं वेगळीं अशीं आणि एकमेकांशीं सुसंवादित्वानें राहणारीं किंवा एकमेकांना विरोध करणारीं अशीं एका मनांतून उदयास येतात; मूळ प्राण किंवा जीवन एक; पण प्राणाचे, जीवनाचे प्रकार असंख्य आणि एकमेकांपासून भिन्न असे विश्वांत आहेत; मानवता निसर्गांत एक आहे, पण मानववंश वेगळे वेगळे आहेत, एवढेंच नव्हे तर प्रत्येक मनुष्य दुसऱ्या सर्व मनुष्यांहून वेगळा आहे, प्रत्येकांत कांहींतरी वैशिष्टय आहे; वृक्ष एक, पण या वृक्षाच्या पानापानांवर रेषा वेगळ्या वेगळ्या चितारलेल्या असतात; असा निसर्गाचा व्यवहार आहे. एका मनुष्याच्या हाताच्या आंगठ्‌यावरील रेषा दुसऱ्या कोणत्याहि मनुष्याच्या आंगठ्‌यावरील रेषांशीं जुळत नाहींत, या गोष्टीचा उपयोग मनुष्य ओळखून काढण्याला केला जातो; इतकी भिन्नतेची हौस निसर्गाला आहे तथापि मूळ तत्त्वाच्या दृष्टीनें सारी माणसें सारखीं असतात. सारतत्त्वाच्या दृष्टीनें माणसामाणसांत कांहीं भेद नसतो. एकता व अभेद, सर्वत्र आहे; सर्वत्र भेदहि पण आहे; सर्वांच्या अंतरंगांत जी एक सद्‌वस्तु आहे तिचें हें विश्व बांधण्याचें तत्त्व, एक बीज आणि त्या बीजाचे कोटिकोटि भिन्न भिन्न प्रकार विकासक्रमानें बनविणें हें सर्वांच्या अंतरंगात असलेल्या एकमेव सद्‌वस्तूचें, विश्वाच्या बांधणीचें, रचनेचें तत्त्व दिसतें. (एकं बीजम् बहुधा य: करोति -- श्वेताश्वतर उप०) ही गोष्टहि अनंताच्या तर्कशास्त्रांतलीच आहे. मूळ सद्वस्तु सारत: नित्य सारखीच, एकरूप, एकरस राहात असल्यानें, तिला रूपांच्या दृष्टीनें, गुणांच्या,

पान क्र. ८१

 

स्पंदनांच्या दृष्टीनें, असंख्य भेद स्वतःमध्यें उभे करतां येतात. तिचे स्वतःचेच हे भेद असतात. अभेदय् एकरूपतेच्या पोटीं हे भेद व भिन्न आकारप्रकार ती सुरक्षितपणें धारण करूं शकते; हे भेद कोटि, अब्ज कोणत्याहि महान् संख्येपर्यंत गेले तरी शाश्वत, एकरूप, एकरस मूळ सद्‌वस्तूच्या पायाभूत एकतेंत कांहीं फरक पडत नाहीं. एकतेचा पाया असा भक्कम असल्यानेंच, भेदांचा हवा तेवढा महान् डोलारा होऊनहि तो ढासळूं शकत नाहीं. जीवांत व जडांत एकच एक आत्मा व चैतन्य सर्वत्र आहे, म्हणून निसर्गाला वा प्रकृतीला अनंत भेद उभे करण्याची आपली हौस फेडून घेतां येते. हा आत्म्याचा भक्कम पाया नसता, सर्व कांहीं बदलत असूनही, कांहींहि बदलत नाहीं अशी वस्तुस्थिति ज्या योगें आहे तें आत्मतत्त्व जर प्रकृतीच्या मुळाशीं नसतें, तर तिची सर्व सृष्टि, तिची सर्व कारागिरी कोसळून तिचे तुकडे तुकडे होऊन, सर्वत्र गोंधळाचें साम्राज्य माजलें असतें; तिच्या भिन्न भिन्न, एकमेकींशीं न जुळणाऱ्या रचना आणि व्यापार एकत्र आंवरून धरून कार्यक्षम करावयास सदैव अभिन्न आत्मतत्त्वच उपयोगी पडतें. त्याच्या अभावीं तिचा पसारा कोलमडून सर्वत्र बेबंदशाही झाली असती. मूळ अनंत सद्‌वस्तु एकरस आहे, भेदरहित आहे, तिच्यांत भेदाचा संभव नाहीं, याचा अर्थ, तिच्यांत ती स्वत: भेद उभे करूं शकत नाहीं असा नव्हे, तर बाहेरून तिच्यावर कोणी भेद लादूं शकत नाहीं (कारण तिच्याबाहेर कांहीं नाहींच) असा आहे. तिची अद्‌वितीय एकता स्पष्ट करण्यासाठीं तिच्या ठिकाणीं भेदाचा असंभव सांगितला आहे; एकच एक कंटाळवाणा स्वर, त्यांत बदल कसा तो नाही, बदल होऊंहि शकत नाहीं -- अशी कांहीं ती मूळ सद्वस्तु नाहीं. तिच्या ठिकाणीं असणें आणि होणें हे दोन प्रकार आहेत. तिचें असणें, तिचें सारभूत अस्तित्व हें एकरस, कधींहि न बदलणारें असें आहे; तिचें होणें अर्थात् तिच्या एकरस अस्तित्वाला आकारांचे पीक येऊन ती व्यक्त होणें ही वेगळी गोष्ट आहे. हें पीक अनंत आहे. हें भेदांचें पीक कितीहि आलें तरी मूळ असण्यांत, सारभूत एकरस अस्तित्वाच्या एकरसतेत, अभेदांत कांहींहि कमतरता वा उणीव येत नाहीं. ती एकरसता नष्ट तर होत नाहींच नाहीं. निराकार मूळ अस्तित्व एक, एकरस; तिचें साकार स्वनिर्मित अस्तित्व (होणें) हें भेदपूर्ण व अमर्याद, अशी ती सद्‌वस्तु आहे. ही अमर्याद व आकारनिष्ठ भेदक्षमता त्या एकरस निराकार वस्तूचे ठिकाणीं स्वभावतःच

पान क्र. ८२

 

आहे. ती सद्‌वस्तु, आत्मवस्तु कीटक बनते, पक्षी बनते, पशु बनते, मनुष्य बनते. पण या सर्व भेदांत ती एक व अभिन्न असते, तिची अभिव्यक्ति, ती अनंतप्रकारें विविध रूपें घेऊन करते; या विविधतेला सीमा नाहीं; पण ही विविधता अभिव्यक्तींत आहे, मूळच्या अव्यक्त अस्तित्वांत नाहीं. आमची बाहयनिष्ठ बुद्धि या व्यक्त विविधतेला ''मिथ्या'' म्हणूं शकते, ही विविधता खरी नाहीं, केवळ आभास आहे असे, ती तर्क वापरून प्रतिपादन करूं शकते; पण आम्हीं जर खोल दृष्टि टाकली, तर आम्हांला दिसेल कीं विविधता खरी आहे आणि एकताहि खरी आहे, खरी एकता खऱ्या विविधतेनें खरी व्यक्त होत आहे; खरी एकता किती अपार सामर्थ्यानें भरली आहे तें खरी विविधता दाखविते, खरी एकता -- एकच एक सद्‌वस्तु, आत्मवस्तु - स्वत: काय आहे आणि काय होऊं शकते तें खरी विविधता स्पष्ट करते; शुद्ध पांढरा रंग अनेक रंगांना स्वत:च्या पोटीं धारण करीत असतो; लोलक त्या पांढऱ्या रंगाचे अंगभूत अनेक रंग व्यक्त करून दाखवितो, तद्‌वत खरी वस्तु-विविधता मूळ खऱ्या सद्वस्तूच्या एकरस शुभ्रतेंत अंतर्भूत असलेले अनंत विविध रंग आमच्या नजरेस आणते; या गोष्टी आम्हांला, आम्हीं खोल विचार केल्यास, दृष्टि सूक्ष्म केल्यास, स्पष्ट होतील, स्पष्ट दिसतील. मूळ आत्मतत्त्व एकता टाकून देतें, एकताच्युत होते असें, विविध वस्तुजात बघून आमच्या बाह्यनिष्ठ बुद्धीला वाटतें; पण वस्तुजाताची अनंत विविधता ही, आत्मतत्त्वाची खरी असीम आत्म-अभिव्यक्ति आहे. आपल्या एकतेचा, एकतेंतील आपल्या अनंत शक्तीचा, अनंत वस्तुजाताच्या द्वारां तें आत्मतत्त्व खरा देखावा उभा करीत आहे हें आपण ओळखलें पाहिजे. विविधतेचा हा अनंत देखावा, ही विश्वाची माया म्हणजे विश्वाचें अद्भुत गूढ आश्चर्य होय; पण हें आश्चर्य, हा चमत्कार, ही माया अनंत आत्मतत्त्वाच्या तर्कशास्त्राला धरून आहे; ती अगदीं अनंताच्या स्वभावांत आहे; अनंताची दृष्टि स्वतःवर खिळली, अनंतानें स्वतःचा अनुभव स्वत: घेण्याचें ठरविलें म्हणजे ही माया त्या दृष्टींतून, त्या ठरावांतून स्वभावतःच व्यक्त होते.

मूळ आत्मतत्त्वाची, ब्रहमाची माया यांतच आहे कीं एक अद्‌वितीय तत्त्व, अनंत भेदांनीं व्यक्त होतें; यांत चमत्कार आहे, जादु आहे, यांत शुद्ध तर्कशास्त्र आहे, एक आणि अनेक एकत्र, हें ब्रहमाचें तर्कशास्त्र, ही वस्तुस्थिति ब्रहमाच्या ठिकाणीं तर्कशुद्ध वागणूक आहे आणि आम्हांला,

पान क्र. ८३

 

आमच्या बुद्धीला ती जादु आहे, गौडबंगाल आहे. ब्रहमाचें एकत्व, आहे तसें जर अनंत भेदांनीं व्यक्त होण्याच्या सामर्थ्यानें युक्त नसतें, तें मर्यादित असतें, एकसुरी असतें, त्यांत भेदांना वाव नसता, तर आमच्या बुद्धीला आणि तर्कशास्त्राला विषय तरी कोठें सांपडला असता ? तर्कशास्त्राचा विषय म्हणजे वस्तूवस्तूंतील संबंध बरोबर ओळखणें हा असतो. बुद्धीचें अतिश्रेष्ठ कार्य म्हणजे विश्वांत ज्या अनेक भिन्न भिन्न, परस्परविरोधी, परस्परविसंवादी घटना व वस्तू आहेत, त्यांना जोडणारी, एक करणारी जी गुप्त सद्वस्तु आहे, जी एक गुप्त नियमावली आहे ती शोधून काढणें, हें होय. विश्वांतील सर्व अस्तित्व दोन टोंकांमध्यें वावरत आहे. (१) एकाचे पोटीं भेद होणें, अनेक होणें (२) भेदांचें, अनेकांचें एकत्व साधणें : एक आणि अनेक हीं ब्रहमाचीं दोन मूळ अंगें असल्यानें विश्वगत अस्तित्व, वर सांगितलेल्या दोन टोंकांमध्यें वावरणें अनिवार्य आहे. ब्रहम हें आत्मज्ञ आहे, सर्वज्ञ आहे; त्याचें आत्म-ज्ञान आणि सर्वज्ञान हें त्याचें अप्रकट अस्तित्व प्रकट करतें; ब्रहमाची जी अभिव्यक्ति होत आहे तींत, ब्रहमाच्या अस्तित्वांतील सत्याची अभिव्यक्ति होत आहे हें उघड आहे -- या सत्याची व्यक्त होण्याची जी क्रिया तिलाच ब्रहमाची लीला म्हणतात.

ब्रहम सर्वव्यापी अस्तित्वाचें, विश्वाचें रूप धारण करतें, विश्वरूप बनतें, त्याचें तर्कशास्त्र वरीलप्रमाणें आहे. मायेची असीम बुद्धि आपलें विचारकार्य जें करतें त्याची मूलभूत प्रक्रिया वरीलप्रमाणें आहे. ब्रहमाच्या अस्तित्वासंबंधानें एक अनेक, अनेक एक (एकाचें अनेकत्व, अनेकांचें एकत्व) हें अनिर्बंध संकोच-विकासाचें कार्य, लीलाकार्य विश्वांत चालूं असल्याचें वर सांगितलें; तीच गोष्ट ब्रहमाच्या मायेची म्हणजे त्याच्या जाणिवेची आहे. ही जाणीवहि अनिर्बंध संचार करणारी आहे. ती सीमित होते; पण हें सीमित स्वरूप, तिला बांधून ठेवूं शकत नाहीं; कोणतीहि एक अवस्था, क्रियेचा कोणताहि एक नियम या ब्रहमजाणिवेला बांधूं शकत नाही; एकाचवेळीं ही जाणीव अनेक रूपें धारण करूं शकते; तिच्या अनेक हालचाली एकमेकींशीं जुळत्या अशा, एकाच वेळीं चालूं असतात. आमच्या बुद्धीला या हालचालींत परस्परविरोध दिसतो; पण असा विरोध तिच्या स्वत:च्या दृष्टीनें मुळींहि नसतो; ती मूलतः एकच एक आहे -- पण तिचीं रूपें अनेक,

असंख्य आहेत; ती लवचीक आहे, तिच्या लवचीकपणाला सीमा नाहीं;

पान क्र. ८४

 

ती सर्व परिस्थितींशीं जुळवून घेणारी आहे; या तिच्या शक्तीलाहि मर्यादा नाहींत. शाश्वत अनंत ब्रहमाची सर्वश्रेष्ठ विश्वव्यापक जाणीव आणि शक्ति म्हणजे माया; ती स्वभावत:च अनिर्बंध आणि अमर्यादित आहे; एकाच वेळीं अनेक ज्ञानभूमिका ती उभ्या करूं शकते; आपल्या शक्तीचे अनेक व्यूह ती उभे करूं शकते; आणि असें करूनहि तिची मूळ अवस्था नेहमीं, शाश्वत काल कायम टिकते; मूळ जाणीवशक्तीच्या रूपांत केव्हांहि कांहींहि अंतर न होतां, अनेक ज्ञानावस्था आणि शक्तिव्यूह ती व्यक्त करूं शकते. एकाच वेळीं ती विश्वातीत, विश्वरूप आणि व्यक्तिरूप असते, होते; विश्वातीत परमपुरुष हें या जाणिवेचें सर्वोत्तम रूप -- हा परमपुरुष ''मी सर्वमय आहे, मी विश्वरूप आहे'' हें जाणतो; विश्वात्मा, विश्वप्रकृतीची जाणीवशक्ति मी आहे असें ज्ञान विश्वातीत परमपुरुषाला असतें; याप्रमाणें विश्वातीत परमात्मा व विश्वात्मा हीं दोन रूपें एकाचवेळीं त्या जाणीवशक्तीनें धारण केलेलीं असतात व त्याबरोबर व्यक्तिगत अस्तित्व आणि जाणीव हेंहि रूप या मूळ जाणीवशक्तीला एकूण एक सर्व सत्तावान् पदार्थांत घेतां येतें. व्यक्तिगत जाणीव स्वत:ला वेगळी व मर्यादित म्हणून ओळखते; पण त्याबरोबर स्वत:च्या या मर्यादा उल्लंघून आपण विश्वव्यापी आहों आणि विश्वातीत आहों हेंहि ज्ञान त्या जाणिवेला होऊं शकतें. याचें कारण मूळ जाणीव ही मूलत:च त्रिमुखी आहे; तिची विश्वातीत अवस्था घ्या, विश्वरूप अवस्था घ्या किंवा व्यक्तिरूप अवस्था घ्या -- प्रत्येक अवस्थेच्या तळाशीं किंवा प्रत्येक अवस्थेला व्यापून ही त्रिमुखी मूळ जाणीवशक्ति आपला व्यवहार करीत असते. एकमेव अद्‌वितीय ब्रहम याप्रमाणें कोणत्याहि अवस्थेंत असतांना तीनहि रूपें अनुभवूं शकतें -- वरची विश्वातीत अस्तित्वाची स्थिति असो, मधली विश्वात्म्याच्या अस्तित्वाची स्थिति असो, किंवा खालची व्यक्तिगत जाणीवयुक्त अस्तित्वाची स्थिति असो, कोठेंहि कोणत्याहि स्थितींत असतां एकमेव ब्रहम आपल्या तीनहि रूपांचा अनुभव एकाच वेळीं घेऊं शकतें : या व्यवहारांत त्याला कांहीं अडचण भासत नाहीं, भासूं शकत नाहीं. ही गोष्ट स्वाभाविक आणि तर्कशुद्ध आहे हें मान्य करण्यास आम्हांला देखील अडचण नसावी. एकच एक असा जो आदिपुरुष सच्चिदानंद आणि त्याच्या जाणिवेच्या अनेक अवस्था सर्वच सत्य, वास्तव असूं शकतात; जें सत्तत्व ब्रहम पूर्णतया स्वतंत्र आहे, आणि अनंत आहे, तें एकाच अस्तित्व-अवस्थेला वा जाणीव-अवस्थेला बांधलें

पान क्र. ८५

 

जाऊं शकत नाहीं. जी जाणीव अनंत आणि स्वतंत्र आहे, तिला आपल्या स्वरूपांत हवे ते फेरबदल करण्याचें सामर्थ्य आणि स्वातंत्र्य नक्कीच असलें पाहिजे; तिच्या स्वभावांतच अशा सामर्थ्याचा व स्वातंत्र्याचा अंतर्भाव होत असला पाहिजे -- या गोष्टी आम्हीं मान्य करावयास पाहिजेत आणि त्या आम्हीं मान्य केल्या म्हणजे ब्रह्म एकाच वेळीं विश्वातीत, विश्वात्मगत व व्यक्तिगत या तीन जाणिवा अनुभवूं शकतें वगैरे जें वर सांगितलें आहे तें तर्कशुद्ध आणि स्वाभाविक आहे हें मान्य करण्यास कोणतीहि अडचण आम्हांला येणार नाहीं. जाणिवेच्या अनेक अवस्था एकाच वेळीं अनुभवण्याची पात्रता मूळ जाणिवेंत आहे हें एकदां मान्य झालें म्हणजे अवस्था कशा भिन्न असाव्या, कशा भिन्न कराव्या या संबंधानें कांहीं मर्यादा जाणिवेवर घालतां येत नाहींत. एवढीच गोष्ट जाणिवेनें पाळावयाची असते कीं, त्या सर्व अवस्थांचा अनुभव एकाच वेळीं तिला घेतां आला पाहिजे. जें सत्तत्व ब्रह्म एकच एक आहे आणि अनंत आहे तें याप्रमाणें सर्वच जाणिवेनें युक्त असणार, यांत कांहीं अस्वाभाविक नाहीं; उलट तें असें असणेंच स्वाभाविक आहे हें सर्व मान्य झाल्यावर एक अडचण ही राहते कीं, आमची मर्यादित प्रयत्नरचित जाणीव, अर्थात् आमची अज्ञान अवस्था आणि स्वयंभू अनंत आत्म-जाणीव, सर्वजाणीव या दोहोंमध्यें संबंध काय, या दोहोंचें परस्पर नातें काय व तें कसें अस्तित्वांत येतें ही गोष्ट समजण्यास अवघड आहे. पण ही गोष्टहि अधिक विचारान्तीं आमच्या बुद्धीला ग्रहण करतां येईल.

अनंत जाणिवेचा एक महान् धर्म, एक महान् शक्ति -- एकाच वेळीं विश्वातीत, विश्वरूप आणि व्यक्तिरूप धारण करण्याची आणि अनुभवण्याची शक्ति -- वर सांगितली. दुसरी एक महान् शक्ति तिच्या ठिकाणीं असल्याचें आम्हीं मान्य करणें युक्त आहे. ती दुसरी शक्ति म्हणजे स्वत:ची व्यापकता मर्यादित करण्याची शक्ति होय. तिचें मूळ स्वरूप अमर्याद संपूर्ण ज्ञानाचें असतें; या पूर्णरूपाच्या पोटांत दुय्यम आत्मरूपें, मर्यादित जाणिवेचीं रूपें घेण्याची हालचाल पूर्ण जाणीव करूं शकते आणि करते. अनंत ब्रह्माला आपलें रूप हवें तसें बनविण्याची शक्ति त्याच्या अनिर्बंध स्वातंत्र्याच्या पोटीं असल्यानें त्या शक्तीनुसार मूळ जाणीव आपल्या पोटीं मर्यादित जाणिवेचीं रूपें धारण करते ही गोष्ट स्वाभाविकच आहे; अनंत ब्रह्माच्या आत्म-तंत्रतेचा तो आवश्यक परिणामच आहे. पूर्ण आत्मसत्तेचीं जीं मर्यादित आत्मरूपें आत्म-

पान क्र. ८६

 

सत्तेच्या आत्म-स्वातंत्र्यानुसार तयार होतील, त्यांपैकीं प्रत्येक आत्मरूपाला, स्वत:मधील आत्म-सत्य आणि आत्म-प्रकृति यांची स्वतंत्र जाणीव असली पाहिजे. असें पाहिजे तर म्हणा कीं, या आत्मरूपांत जो पुरुष आहे, त्याला वरीलप्रमाणें आपल्यांतील सत्याची आणि प्रकृतीची स्वतंत्र जाणीव असली पाहिजे. आत्मचैतन्यमय व्यक्ति याचा अर्थच असा आहे कीं, व्यक्तिरूप आत्मा हा आत्मदर्शनाचा आणि सर्वदर्शनाचा केन्द्र असला पाहिजे. या दर्शनाचा असीम परीघ सर्व आत्म्यांकरितां एकच असेल; परंतु केन्द्र मात्र प्रत्येक आत्म्याचें निराळें असेल : हें केन्द्र कांहीं स्थलगत वर्तुळातील स्थलबिंदु असत नाहीं, तर हें मानसिक केन्द्र असतें; दुसऱ्या मानसिक केन्द्रांशीं त्याचा जो संबंध येतो, तो विश्वरूपाच्या पोटीं विविध जाणीव असलेल्या अनेक आत्म्यांचें सहअस्तित्व असतें त्यामुळें येतो. विश्वामधील प्रत्येक व्यक्ति तेंच विश्व पाहणार, परंतु तें आपल्या स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वांतून पाहणार आणि स्वत:च्या प्रकृतीच्या मार्गानें पाहणार : अनंताच्या पोटीं अनेक सत्यें आहेत त्यांतील, विशिष्ट व्यक्तीचें जें सत्य असेल तेंच ती व्यक्ति व्यक्त करणार; प्रत्येक व्यक्तींत तिचें वेगळेंच विशिष्ट आत्मतंत्र असणार, विश्वांतील नाना घटनांकडे विशिष्ट व्यक्ति तिच्या विशेष रीतीनेंच पाहणार व त्यांच्याशीं ती तिच्या विशेष रीतीनेंच व्यवहार करणार; ''विविधतेच्या पोटीं एकता'' हा जो विश्वाचा कायदा आहे, त्या कायद्यानुसार कोणत्याहि व्यक्तीचें विश्वदर्शन हें मूलभूत बाबतींत इतर व्यक्तींच्या सारखेंच असेल; तरीपण प्रत्येक व्यक्ति ही तिच्या विशिष्ट गुणधर्मानुसारच विश्वसंबंधाची आपली अनुभूति व कल्पना वेगळ्या प्रकारची अनुभवणार आणि बनविणार. आपण पाहतोच कीं, विश्वांतील विशिष्ट वस्तूंसंबंधानें व घटनांसंबंधानें सर्व माणसें एका दृष्टीनें जी ''मानवी'' कल्पना करतात, ती सर्वांची जवळजवळ तीच असते; वस्तु किंवा घटना तीच, तर तिजसंबंधानें सर्वांची ''मानवी'' कल्पनाहि सारखीच असावयाची असा साधारणत: नियम असतो; पण या सर्वसधारण कल्पनेंत देखील प्रत्येक व्यक्तीचें स्वत:चें असें कांहीं विशेष असतेंच कीं, जें इतरांपासून वेगळें असतें. हें जें व्यक्तीव्यक्तीचें वेगळेपण, तें मूलभूत असणार नाहीं, तर सर्वसामान्य विश्वव्यापी सार्वत्रिक अनुभूतीचा किंवा कल्पनेचा व्यक्तीपुरता तो खास विशिष्ट प्रकार असेल. या विशिष्ट वेगळ्या कल्पनेनुसार व्यक्तीचा व्यवहारहि वेगळा असणार.

पान क्र. ८७

 

मूळ सत्य एकच पण त्याचे पोटीं प्रत्येक व्यक्तिरूप आत्मा आपापलें सत्यकेन्द्र संभाळून असेल आणि या आपल्या केन्द्रांतून, आपल्या विशिष्ट आत्मप्रकृतीनुसार वागेल; तरीपण सर्व व्यक्तिरूप आत्मे एकाच पायावर उभे आहेत, ही गोष्ट कोणताहि विशिष्ट व्यक्ति-आत्मा विसरणार नाहीं; दुसऱ्या सर्व आत्म्यांचें आणि त्या आत्म्यांच्या प्रकृतींचें योग्य ज्ञान त्याला असेल आणि त्यांशीं योग्य सहानुभूतीहि त्याचे ठिकाणीं असेल. येथें आत्म-जाणीव पूर्ण असणार आणि ती स्वत:ला ज्ञानपुरस्सर मर्यादा घालून घेत असणार; येथें अज्ञानाचा व्यवहार मुळींच असणार नाहीं. अनंताची जाणीव याप्रमाणें स्वत:ला मर्यादा घालून व्यक्तिरूप बनते, पण येथेंच तिचें कर्तृत्व थांबत नाहीं; व्यक्तिरूप आत्मा हें स्वरूप ज्याप्रमाणें ती घेते त्याप्रमाणेंच स्वत:च्या अनंततेला मर्यादा घालून, विश्वरूप आत्मा हेंहि स्वरूप ती घेत असते; अनंत जाणीव आपल्या व्यवहाराला मर्यादा घालून विशिष्ट विश्वाचा पाया बनूं शकते; आणि या पायावर विश्व उभारून तें विश्व आपल्या सोयीच्या व्यवस्थेनें, सुसंगत नियमबद्धतेनें चालविते; तें विश्व चालविण्यासाठीं विश्वाध्यक्ष म्हणूनहि एक रूप तिला घ्यावें लागतें; हें रूप धारण करतांना स्वत:च्या दुसऱ्या शक्ती, म्हणजेच विश्वाशीं असंबंधित अशा शक्ती तिला अर्थातच बाजूला ठेवाव्या लागतात. स्वत:ला मर्यादा घालून घेणें या तत्त्वावर ज्याप्रमाणें व्यक्तिरूप आत्मा, विश्वरूप आत्मा आणि विश्व यांची रचना अनंत ब्रह्म करतें, त्याप्रमाणें त्याच तत्त्वावर मन, प्राण, जडद्रव्य या आपल्या अंतर्गत शक्तीहि अनंत ब्रह्म आविष्कृत करतें. अशा प्रकारची कृति अनंताला अशक्य आहे असें म्हणतां येत नाहीं, कारण सर्व मर्यादा त्याच्या पोटांत आहेत, त्याला कोणतीहि मर्यादा लागूं नाहीं. त्याच्यामध्यें अनंत शक्ति आहे, त्या शक्तीचा अंश या आविष्कारांच्या द्वारां तें प्रकट करतें एवढेंच; पण मन, प्राण, जड हे आविष्कार, व्यक्तिरूप व विश्वरूप आत्मा इत्यादिकांप्रमाणें अनंतानें स्वत:वर मर्यादा घालून घेऊन रचले असल्यानें या आविष्कारांमध्यें एकमेकांपासून खरा वेगळेपणा नसतो, खरी विभागणी नसते. कारण पूर्ण सर्व अनंत जाणीव यांच्या सभोंवार पाठीमागें राहून यांना आधार देत असते आणि प्रत्येक आविष्कार स्वभावत: स्वत:ची जाणीव ठेवतो एवढेंच नव्हे, तर त्याच्या पाठीमागें असलेल्या पूर्ण जाणिवेचीहि जाणीव सारत: त्याला असते. या आपल्या आविष्कारकार्यांत कोठेंहि

पान क्र. ८८

 

तुकडा पडलेला नाहीं, खरा विभाग पडलाच नाहीं, हें अनंताची पूर्ण जाणीव जाणीत असणार त्यांत नवल नाहीं, हें अनिवार्यच आहे : पण सान्त अशी जी अनन्ताची विश्वरूप कृति, तिची एकंदर अविभक्त जाणीव, अनन्ताच्या विश्वात्मरूप आविष्काराचे ठिकाणींहि स्वभावत:च असणार. अनन्ताच्या स्वत:च्या जाणिवेसारखी ती सदा जागृत नसेल, परंतु विश्वात्म्याच्या अंतर्यामांत, विश्वाच्या अविभक्ततेची जाणीव स्वभावत:च अर्धजागृत अशी असणार, हें निश्चित. अनन्ताला, स्वत: जाणीवपूर्वक मर्यादा उत्पन्न करून व्यक्तिरूप आत्मे आणि विश्वरूप आत्मा वा आत्मे (विश्वें अनेक आहेत) निर्माण करण्याची, व्यक्त करण्याची शक्ति आहे हें उघड आहे आणि आमची बुद्धि, विशालता धारण करून, ही गोष्ट मान्य करूं शकते; अनंत आत्मा स्वच्छंदानें आपल्या पोटीं आत्मे उभे करूं शकतो, ही गोष्ट आमच्या विशाल बुद्धीला अमान्य होण्याचें कारण नाहीं. पण आम्हांला ज्या प्रकारच्या जाणिवेची ओळख आहे, तिचें स्पष्टीकरण आतांपर्यंत वर्णिलेल्या अनंताच्या सामर्थ्यावरून मिळत नाहीं. आमच्या स्वत:च्या जाणिवेंत खरी विभक्तता दिसते, अज्ञानमय वेगळेपणा दिसतो, अंधत्व आणणारी, बंधनांत घालणारी मर्यादा दिसते -- हें सर्व कसें आलें ? हा प्रश्न अद्यापि प्रश्नच राहिलेला आहे. त्याचा उलगडा आतां करावयाचा आहे.

अनंत जाणिवेच्या दोन शक्ती सांगितल्या, त्याप्रमाणें आणखी तिसरी शक्ति या जाणिवेच्या ठिकाणीं असते ती म्हणजे स्वत:मध्यें बुडून जाण्याची शक्ति. या आत्ममज्जन स्थितींत शुद्ध आत्मजाणीव असते पण सर्वज्ञान नसतें; शुद्ध व सर्वशून्य अशा आत्मजाणिवेंत सर्व कांहीं लपून जातें, अंतर्यामींची जाणीव (आत्मजाणीव) देखील शुद्ध अस्तित्वांत, सन्मात्रांत विलीन होते. ही जी सन्मात्राची शुद्ध अवस्था, जिला अतिचेतन अवस्था हें नांव आहे, ती प्रज्ञातीत अतिचेतनता यथार्थतेनें अतिचेतनता असते; येथें स्वत: किंवा सर्व असा कांहींच विषय प्रज्ञेला, चित्-ला असत नाहीं आणि ती शुद्ध सत्-च्या ठिकाणीं बुडी मारून असते. सामान्यत: अतिचेतनता हा शब्द आम्ही, आमच्या मानसिक चेतनेला जें ग्रहण होत नाहीं तें ग्रहण करणारी मनाहून श्रेष्ठ चेतनता, प्रज्ञा, वा जाणीव अशा अर्थानें वापरतो. ही सामान्य अतिचेतनता आत्मजाणिवेनें युक्त असते. आम्हांला मात्र तिची जाणीव शक्य नसते. अनंत जाणिवेची आत्ममज्जनाची अवस्था किंवा आत्मजाणीवशून्य

पान क्र. ८९

 

आत्मसमाधि जी वर सांगितली ती, प्रकाशाच्या जाणिवेच्या दृष्टीनें अतिचेतन अवस्था म्हटली जाते. दुसऱ्या, नेणिवेच्या दृष्टीनें जी अवस्था अचेतन अवस्था म्हटली जाते, तीहि अनंताची आत्मसमाधीच असते; येथें अनंताचें अस्तित्व, सन्मात्र स्पष्ट अनुभवास येतें पण हें अस्तित्व नेणिवयुक्त दिसत असल्यानें तें नास्तित्व, असत्, अनंत असत् असल्यासारखें आम्हांला भासतें. या असत् दर्शनामध्यें अर्थातच आत्मजाणीवशून्य जाणीव व शक्ति असतेच; कारण या अचेतन, असत्-च्या शक्तीनें, व्यवस्थायुक्त विश्व निर्माण केलें जातें; आत्मसमाधीच्या अवस्थेंत हें विश्व निर्माण केलें जातें; या अवस्थेंत अनंताची शक्ति स्वयंप्रेरणेनें काम करीत असते, तिला जणों कोणी प्रेरक असत नाहीं -- तंद्रींत नेत्र काम करीत नसतां मनुष्य वाट चालतो त्याप्रमाणें, विश्व- निर्मिति करतांना अनंताची शक्ति जणों नेत्रांवांचून, चालकावांचून आपोआप काम करीत असते; तिचें काम याप्रमाणें आंधळ्यासारखें चाललें असलें, तरी तें अगदीं चोख होत असतें; अनंताच्या सत्याची शक्ति तें अटळपणें, चोखरीतीनें चालवीत असते. अनंताला ज्याप्रमाणें अनंतपणें, अतिचेतनता आणि अचेतनता ही आत्मसमाधि घेतां येते, त्याप्रमाणें त्याला सान्तपणें एकदेशी, मर्यादित व विशेषगत आत्मसमाधि घेतां येते, एका विशिष्ट अवस्थेपुरती, व्यक्तिविशिष्ट, विश्वविशिष्ट आत्मसमाधि अनंताला घेतां येते -- हें आपण मान्य केलें, म्हणजे अनंत मर्यादितपणें एकाग्र होऊन, आपल्या अनंत अस्तित्वाच्या कोणत्याहि एका पैलूलाच ''मी'' म्हणून इतर पैलूंहून आणि स्वत:हून (अनंताहून) वेगळेपणें ओळखतें, या गोष्टीचें स्पष्टीकरण आपल्याला मिळतें. या मर्यादित आत्ममज्जन-शक्तीमुळें मुळांतच अनंताच्या दोन अवस्था होतात, हे आपण समजूं शकतो : निर्गुण आणि सगुण या त्या दोन अवस्था होत. सगुणापासून निर्गुण ब्रह्म वेगळें पडतें, तें स्वत:च्या शुद्धतेंत निश्चलतेंत मग्न असतें, त्याचें दुसरें स्वरूप (सगुण-स्वरूप) पडद्याआड ठेवलें जातें. त्याच्या खास ''निर्गुण'' स्थितींत या दुसऱ्या स्वरूपाला येण्यास मज्जाव असतो. या निर्गुण या स्थितीप्रमाणेंच, अस्तित्वाच्या एका क्षेत्राची अथवा एका आंदोलनाची जाणीव आहे आणि इतर सर्व कांहीं जाणिवेबाहेर, पडद्याआड आहे, अशा एका अवस्थेची कल्पनाहि आम्ही करूं शकतो. जाणिवेची या प्रकारची विशिष्ट अवस्था, जागरुक एकाग्रतेनें सिद्ध करतां येते. अशा ठिकाणीं अनंत जाणीव पूर्णतया उपस्थित असते, ती कांहीं

पान क्र. ९०

 

नष्ट होत नाहीं; ती पुन: आत्मसात् करतां येते, पण विशिष्ट मर्यादित ज्ञानावस्थेंत ती प्रकटपणें क्रियाशील असत नाहीं, आंतून गूढपणें कार्य करीत असते, किंवा या विशिष्ट अवस्थेच्या द्वारां कार्य करते; स्वत:च्या अनंत शक्तीनें व स्वरूपानें कार्य करीत नाहीं. क्रियाशील अनंत जाणिवेच्या ठिकाणीं तीन शक्ती आहेत. १) विश्वातीत, विश्वरूप आणि व्यक्तिरूप एकाच काळीं असण्याची शक्ति २) आपल्या अनंत आत्मस्वरूपाला मर्यादा घालण्याची शक्ति ३) आत्ममज्जनाची, आत्मसमाधीची शक्ति. अनंताच्या या तीन शक्ती आमच्या बुद्धीला मान्य होण्यासारख्या आहेत -- या शक्ती अनेक प्रकारें कार्य करीत असतात. या कार्य करण्याच्या मार्गांचा विचार केल्यास मायेच्या व्यवहारांचें इंगित आपणाला आकलन करतां येईल.

शुद्ध जाणीव, शुद्ध अस्तित्व व शुद्ध आनंद यांचा, जगांतील भरपूर क्रियाशीलता, विविध व्यवहार आणि अस्तित्व-जाणीव-आनंद यांच्या जगांत दिसून येणाऱ्या अनंत बदलत्या अवस्था, या सर्व गोष्टींशीं विरोध आहे असें आमची बुद्धि मानीत असते. शुद्ध जाणीव आणि शुद्ध सत्ता ही अवस्था अनुभवतांना आम्हांला काय वाटत असतें ? निराकार, निर्विषय, असंकीर्ण, अक्षर, स्वयंभू, एकरस सत्ता व जाणीव हीच एक खरी वस्तु आहे, असें आम्हांस वाटतें; ब्रह्माची दुसरी  क्रियाशील अवस्था अनुभवतांना, ही क्रियाशीलता आम्हांला पूर्णपणें स्वाभाविक आणि सत्य वाटते, इतकेंच नव्हे, तर शुद्ध निष्क्रिय जाणिवेचा अनुभव हा खोटा अनुभव आहे, शुद्ध निष्क्रिय जाणीव असूंच शकत नाहीं असें देखील आम्हांस वाटतें. सक्रिय-अक्रियांचा विरोध असला पाहिजे ही आमच्या बुद्धीची भावना, एकदां एक सत्य, तर दुसऱ्या वेळीं दुसरें सत्य असें आम्हांला मानावयास लावते; पण अनंताच्या तीन शक्तींचा ऊहापोह जो वर आला आहे, त्या ऊहापोहामुळें आम्हांला हें पटतें कीं, अनंत जाणिवेला अक्रिय आणि सक्रिय अवस्था एकाच वेळीं शक्य असतात; अनंताच्या दृष्टीनें त्या अवस्था अन्योन्यविरोधी नसून अन्योन्यपूरक असतात; विश्वव्यापक जाणिवेंत दोन्ही अवस्थांचें स्थान एकाच वेळीं असतें; शुद्ध जाणीव केव्हां प्रेक्षकाचें काम करते तर केव्हां करीतहि नाहीं, पण दुसऱ्या क्रियाशील अवस्थेला नेहमींच निश्चितपणें आपला आधार देते; क्रियांच्या पसाऱ्याच्या पोटीं शांत अक्रिय जाणीव उपस्थित असते; शांत

पान क्र. ९१

 

समुद्र स्वत:च्या पृष्ठभागावर चंचल लहरींचा पसारा उठवितो, तद्वत् शांत जाणीव आपल्या पृष्ठभागावर क्रियेचा पसारा उभा करते. तेव्हां अनंताच्या व्यवहाराविषयींच्या, सामान्य बुद्धीच्या भावना व कल्पना सत्यस्पर्शी नसतात, मिथ्या असतात हें आपण पाहिलें. अनंतच आमच्या ठिकाणीं विकसित होत असल्यानें, अनंताप्रमाणें आमच्यामध्येंहि, आमच्या अस्तित्वाच्या विशिष्ट अवस्थांमध्यें, एकाच वेळीं जाणिवेच्या अनेक भिन्न अवस्थांचा आम्हांला अनुभव येऊं शकतो. योगसाधना करीत असतां आम्हांला अशा एका अस्तित्वाच्या अवस्थेचा अनुभव येतो कीं, जेथें आम्ही जाणिवेच्या दोन अवस्था एकदमच अनुभवत असतों. तेथें आमची पृष्ठभागची जाणीव वेगळी असते आणि आंतली जाणीव वेगळी असते, पृष्ठभागची जाणीव अल्प असते, अज्ञान असते, धडपडत असते, नाना प्रकारचे विचार विकार, सुखें दु:खें, नाना प्रतिक्रिया या पृष्ठभागच्या जाणिवेंत गोंधळ घालीत असतात, तिच्यावर मात करीत असतात; आणि हें सर्व चालूं असतां, आंतली जाणीव शांत असते, ती महान् असते, समत्वभावानें भरलेली असते, पृष्ठभागच्या खळबळयुक्त जाणिवेकडे ती दृढ अचल अलिप्ततेनें पहात असते, किंवा तिचें कौतुक करीत असते, किंवा ती वरची खळबळ, क्षोभ शांत व्हावा, वरच्या अस्तित्वाला आणि जाणिवेला व्यापकता यावी, त्यांचें उच्चतर अवस्थेंत रूपांतर व्हावें म्हणून योजना करीत असते. ही दोन समकालीन जाणिवांची अनुभूति, योगाभ्यासानें ज्याप्रमाणें आम्हांला येऊं शकते, त्याप्रमाणें योगाभ्यासानें आम्हीं एका उच्चस्थानीय जाणिवेच्या बैठकीवर चढून, आमच्या अस्तित्वाचे विविध विभाग -- आंतर आणि बाह्य मानसिक, प्राणिक, शारीरिक विभाग -- न्याहाळूं शकतो; सर्वांच्या खालीं अवचेतन विभाग आहे तोहि आम्ही तपासूं शकतो; -- एवढेंच नव्हे, तर आमच्या जाणिवेच्या उच्च स्थानावरून या खालच्या सर्व पसाऱ्यावर किंवा त्याच्या कोणत्याहि एका भागावर उद्धारक परिणाम होईल असें प्रभावी कार्य करूं शकतो. अशा या दोन योगावस्था आपण पाहिल्या. यानंतरची तिसरी योगावस्था अशी आहे कीं, वर ज्या उच्च ज्ञानभूमीवर पोंचण्याची व तेथून न्याहाळण्याची वगैरे गोष्ट सांगितली तेथून किंवा कोणत्याहि उच्च ज्ञानभूमीवरून खालच्या कोणत्याहि ज्ञानभूमीवर किंवा अज्ञानभूमीवर उतरतां येतें आणि या खालच्या भूमीवरील मर्यादित प्रकाश किंवा अंधकार आपलें कार्यक्षेत्र करतां येतें; अर्थात् हें करतांना त्यासाठीं वापरल्या

पान क्र. ९२

 

जाणाऱ्या शक्ती सोडून आमच्या बाकीच्या शक्ती, आमचें बाकीचें अस्तित्व आम्ही तात्पुरतें बाजूला ठेवतो, पाठीमागें ठेवतो; हें बाजूला किंवा पाठीमागें ठेवलेलें आमचें शक्तियुक्त शेष उच्च अस्तित्व, आम्हांला अनेक प्रकारें उपयोगी पडतें; खालच्या भूमीवर कार्य करतांना तेथून आम्हांला आधार मिळू शकतो, प्रकाश आणि प्रभावी सामर्थ्य मिळूं शकतें, वाटल्यास खालून तेथें पुन: चढून जाऊन खालच्या हालचालींचें निरीक्षण करतां येतें. चौथी योगावस्था समाधीची; या योगक्रियेंत आम्ही स्वत:च्या आंतरात्म्यांत शिरतों, बाहेरच्या सर्व गोष्टी बहिष्कृत करून आमच्या आंतरात्म्यांतील स्फुरण मात्र आम्ही आपल्या जाणिवेचा विषय करून असतों; अथवा या समाधीपेक्षांहि गाढतर समाधींत आम्ही जाऊं शकतों -- जेथें पहिल्या समाधींतील आंतर-जाणीव मागें टाकून आम्हीं आणखी खोल असलेल्या जाणिवेंत, किंवा कोणच्या तरी उच्च अतिचेतनेंत प्रवेश करतो, तेथें स्वत:ला विलीन करतो. आणखीहि एक योगावस्था आहे. तींत आम्हांला विश्वव्यापक एकरस जाणिवेचा आश्रय घेतां येतो. या जाणिवेच्या अवस्थेंत प्रवेश केल्यानें आम्हांला एका सर्वव्यापी दृष्टिक्षेपानें आमचें सर्वव्यापी अस्तित्व पाहतां येतें. येथें एका अखंड, एकरस, सर्वगामी, अभेद्य जाणिवेनें आमचें सर्वच्या सर्व अस्तित्व आम्ही अवलोकन करूं शकतो. आमच्या बाह्यनिष्ठ अल्प बुद्धीला हें सर्व चमत्कारिक, निसर्गबाह्य, काल्पनिक, अस्वाभाविक वाटणार; कारण तिला मर्यादित जाणिवेचा, अज्ञानदशेचा आणि या दशेंतील हालचालींचाच केवळ अनुभव असतो. आमचा एकंदर वास्तव अस्तित्वपसारा, आमचा आंतर उच्चतर सत्य सत्ताप्रदेश, याजपासून, तिचा स्वाभाविक अज्ञानप्रांत, मर्यादित जाणिवेचा प्रांत अलग झालेला असतो. तथापि अनंताला स्वाभाविक असलेली विशाल बुद्धि आणि विशाल तर्कशास्त्र यांच्या दृष्टिकोनांतून या गोष्टी सहज समजण्यासारख्या आणि पटण्यासारख्या आहेत. या अनंताशीं सारत: एकात्म असलेल्या अंतर्यामींच्या स्वभावांत अमर्याद शक्ती आहेत. ही वस्तुस्थिति आम्हीं मान्य केल्यास, वरील गोष्टी समजण्यास व पटण्यास अवघड जाणार नाहींत.

ब्रह्म ही मूळ सत्य वस्तु आहे, ती स्वयंभू आहे, ती सर्वनिरपेक्ष केवल तत्त्व आहे; माया ही या स्वयंभू सद्‌वस्तूची जाणीव आणि शक्ति आहे; विश्वाच्या दृष्टीनें ब्रह्म हें सर्व अस्तित्वाचा आत्मा, विश्वात्मा झालेलें आहे आणि त्याबरोबर तें विश्वरूपातीत परमात्मा असून प्रत्येक

पान क्र. ९३

 

अस्तित्वांत (जीवांत) तें असतें. तेथें (जीवांत) व्यक्तित्व आणि विश्वव्यापित्व हीं त्याचीं स्वरूपें आहेत. माया ही या विविधरूपी आत्म्याची आत्मशक्ति आहे. आत्मा, विश्वात्मा या रूपानें आम्हांला ब्रह्माचा अनुभव येतो तो प्रथम सामान्यत: आमच्या सर्व अस्तित्वांत शांतीचा पूर्ण प्रभाव या रूपानें येतो; निदानपक्षीं वरचें अस्तित्व धडपडत असतां बाकीचें अस्तित्व त्या धडपडीपासून अलग राहतें, अंतर्मुख होऊन शांत राहतें; या शांत आंतरिक अस्तित्वांत आम्हांला आत्मा या नात्यानें ब्रह्माचा अनुभव येतो; या अनुभवांत आत्मा शांत, अचल, अक्षर, स्वयंभू, सर्व विश्व व्यापून असणारा, सर्व वस्तूंच्या पोटीं असणारा, पण क्रियाशून्य व सर्वदा चंचल अशा मायाशक्तीपासून अलिप्त असा आम्हांला दिसतो, भासतो, अनुभवास येतो. ब्रह्माचें विश्वात्मा हें रूप जसें आमच्या अनुभवास येतें, तसें प्रकृतीपासून वेगळा असलेला पुरुष, हेंहि त्याचें दुसरें रूप आमच्या अनुभवास येतें; प्रकृतीच्या, निसर्गाच्या क्रियासंभारापासून दूर राहणारा जाणीवयुक्त पुरुष, असें या पुरुषाचें दर्शन आम्हांला घडतें. तथापि या दर्शनांत आम्ही ब्रह्माचा एकच भाग एकाग्रतेनें पाहतो, ब्रह्माच्या स्थितिशील आत्मस्थितीकडे सर्व लक्ष देतो, त्या आत्म्याची क्रियाशीलता सर्व दूर सारतो; हेतु हा कीं, स्वयंभू सद्‌वस्तु जें ब्रह्म, त्याच्या पूर्ण स्वतंत्रतेचा साक्षात्कार आम्हांला घडावा व या ब्रह्माकडून जें कार्य घडतें, जें आत्मप्रकटन घडतें, त्या कार्यानें किंवा अभिव्यक्तीनें तें बांधलें जात नाहीं, ही गोष्ट आमच्या प्रत्ययास यावी. अर्थात् हा साक्षात्कार म्हणजे ब्रह्माच्या तत्त्वाचा, सारभूत अंगाचा साक्षात्कार असला, तरी त्याला ब्रह्माचा पूर्ण साक्षात्कार म्हणतां येत नाहीं. कारण पुरुषाची जाणीवयुक्त शक्ति, जी क्रियाशील होते आणि निर्मिति करते ती माया म्हणजे ब्रह्माचें सर्वज्ञत्वच असतें. माया म्हणजेच शक्ति, आत्मशक्ति, पुरुषाची शक्ति. प्रकृति म्हणजे पुरुषाची कृति; पुरुष स्वाभाविकपणें क्रियाशील होणें म्हणजेच प्रकृति. तेव्हां पुरुष आणि विश्वशक्ति (प्रकृति), शांत आत्मा आणि निर्मितिशील आत्मशक्ति, हें जें द्वैत आम्हांला भासतें तें खरें नव्हे -- येथें दोन वेगळ्या वस्तू वस्तुत: नाहींतच; ती द्विमुखी एकमेव वस्तु आहे : अग्नि आणि अग्नीची शक्ति आम्ही ज्याप्रमाणें दोन वस्तू मानूं शकत नाहीं, त्याप्रमाणें दिव्य सद्‌वस्तु आणि तिचें जाणीव-सामर्थ्य, चित्‌शक्ति या दोन वेगळ्या वस्तू आम्ही मानूं शकत नाहीं : अग्नीची शक्ति, अग्नीपासून आम्ही वेगळी करूं शकत

पान क्र. ९४

 

नाहीं, त्याप्रमाणें दिव्य सद्‌वस्तूपासून, ब्रह्मापासून, आत्म्यापासून, पुरुषापासून आम्ही त्याची चित्‌शक्ति वेगळी करूं शकत नाहीं. आत्म्याचा जो पहिला साक्षात्कार, ज्यांत आत्मा अतिशय शांत असतो, शुद्ध निष्क्रिय असतो, तो कांहीं आत्म्याच्या सत्याचा पूर्ण साक्षात्कार असत नाहीं; दुसराहि साक्षात्कार-आत्मा शक्तिमान् आहे, शक्तिप्रयोग करीत आहे, विश्वाची हालचाल, विश्वाची सत्ता यांचा आधार म्हणून आत्मा क्रियाप्रवण आहे, असा आत्म्याचा दुसराहि साक्षात्कार -- होऊं शकतो; तथापि आत्मा हें ब्रह्माचें एक मूलभूत स्वरूप आहे, या स्वरूपांत व्यक्तिशून्यतेवर, व्यक्तिनिरपेक्षतेवर भर आहे. येथें व्यक्तिरूप नसतें, पुरुषरूप नसतें; म्हणून आत्मशक्ति ही तिला कोणी चालक असल्यावांचून आपोआप कार्य करीत आहे अशा शक्तीचें रूप घेते; आणि या शक्तीच्या क्रियाकलापांत क्षणभरहि न अडकतां, आत्मा हा या क्रियांचा केवळ साक्षी आहे, क्रियांना आरंभ करून देणारा, आधार देणारा, त्यांचा भोग घेणारा आहे असा अनुभव येतो. हा साक्षी, अलिप्त आत्मा आम्हांला अंतरांत भेटला, म्हणजे त्याचें स्वरूप जें आम्हांला दिसतें तें असें : तो शाश्वत आहे, अज आहे, विदेही आहे, कर्मापासून अलिप्त आहे; जीवाच्या आकाराच्या अंतरांत हा आत्मा जसा भरलेला दिसतो, तसा तो जीवाला वेढून असलेलाहि दिसतो; त्याच्या वरतीं असलेलाहि दिसतो; जीव शरीरामागून शरीर धारण करीत असतो, ही क्रिया हा आत्मा ''अध्यक्ष'' म्हणून वरून बघत असतो; हा आत्मा सर्व ठिकाणीं असतो, प्रत्येक वस्तूच्या ठिकाणीं तो सारखाच असतो; तो अनंत शुद्ध व अग्राह्य (इंद्रियांना अग्राह्य) असा आहे. हा आत्मा व्यक्तीचा आत्मा म्हणून अनुभवास येऊं शकतो, त्याप्रमाणेंच विचारकाचा, कार्यकर्त्याचा व भोक्त्याचा आत्मा या नात्यानेंहि हा आत्मा अनुभवास येतो. पण तेथेंहि त्याचें व्यापक स्वरूप स्पष्ट दिसतें; त्याचें स्वरूप एकटेंच प्रतीत होत नाहीं -- त्याबरोबर त्याचें विश्वव्यापित्वहि प्रतीत होतें; व्यक्तित्व हें सहज विश्वव्यापित्व धारण करूं शकतें; त्या पलीकडे विश्वातीतत्व हेंहि या ''व्यक्तिगत'' आत्म्याला धारण करतां येतें; त्याला केवलतत्त्वांत पूर्णतया आणि अनिर्वचनीय रीतीनें विलीन होतां येतें. आत्मा हें जें ब्रह्माचें स्वरूप आहे, तें एकाच वेळीं व्यक्तित्व, विश्वात्मत्व आणि विश्वातीतत्व धारण करूं शकतें. या आत्म्याची अनुभूति करून घेणें हा व्यक्तीच्या मुक्तीचा सरळ जवळचा मार्ग आहे, लवकर संपणारा मार्ग आहे; या मुक्तींत

पान क्र. ९५

 

व्यक्ति विश्वव्यापक बनते, क्रियामुक्त होते; प्रकृतीच्या, निसर्गाच्या बंधनांपासून मुक्त होते; असाहि अनुभव साधकाला येतो कीं, हा आत्मा सर्व वस्तूंचा आधार, सर्व वस्तूंना व्यापून असणारा, सर्व वस्तूंच्या सभोंवार असणारा आहे, एवढेंच नव्हे तर सर्व वस्तूंचा घटक पण तो आहे, सर्व वस्तूंचें घटकद्रव्य हा आत्माच आहे. तसेंच निसर्गांत या आत्म्याचीं अनेक नामरूपें होतात, त्या नामरूपांशीं या आत्म्याची एकरूपता अनुभवास येते, पण ही एकरूपता त्याला बंधनकारक नसते. तो सर्व नामरूपांशीं एकरूप होतो आणि त्याचबरोबर त्या नामरूपांच्या अतीतहि असतो. निर्व्यक्तिकता आणि स्वतंत्रता या गुणांचा या आत्म्याशीं नित्यसंबंध असतो. त्याच्या शक्तीनें जीं कार्यें विश्वांत घडत असतात, त्या कार्यांची या आत्म्यावर मात्रा चालत नाहीं, हा आत्मा त्या कार्यांचा दास होत नाहीं; पुरुष दिसतांना प्रकृतीचें दास्य करतांना दिसतो, त्याप्रमाणें हा विश्वव्यापक, विश्वातीत असा व्यक्तिगत आत्मा आपल्या अंकित शक्तीचें, दास्य करीत नाहीं. या आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे आपल्या चैतन्याच्या शाश्वततेचा आणि स्वतंत्रतेचा साक्षात्कार होय. पुरुष म्हणजे प्रकृतीच्या नामरूपांचा आणि कृतींचा आरंभ करणारा, साक्षी, आधार, मालक आाणि त्यांचा उपभोग घेणारा आत्मा होय. आत्मा मूळरूपानें विश्वातीत असतो; विश्वरूप आणि व्यक्तिरूप घेऊन त्यांत तो गुंतला गेला, त्या रूपांशीं ऐक्य पावला, तरी त्याचें मूळस्वरूप विश्वातीतत्व कायम असतें. या आत्म्याशीं पुरुषाचें साधर्म्य असें आहे कीं, पुरुष मूलत: सारत: विश्वरूप आणि व्यक्तिरूप असतो आणि प्रकृतीशीं नित्य निगडित असतो, अगदीं आंतून बांधलेला असतो : प्रकृतीपासून तो वेगळा केला गेला, तरी प्रकृतीशीं असलेलें त्याचें नातें दूर होत नाहीं किंवा त्याच्या व्यक्तित्वांत वा विश्वरूपत्वांत बाधा येत नाहीं. ब्रह्मच आत्मा, ब्रह्मच पुरुष मूलत: विश्वातीतत्व हें आत्म्याचें स्वरूप; मूलत: व्यक्तित्व, विश्वत्व हें पुरुषाचें स्वरूप. पुरुष आपलें विश्वरूपत्व (निर्व्यक्तिकत्व आणि शाश्वतत्व) कायम ठेऊन, व्यक्तित्वहि धारण करतो. अर्थात् तो प्रकृतीच्या क्षेत्रांत, व्यक्ति असतोहि आणि नसतोहि -- प्रकृतीपासून त्याची ताटातूट पूर्णतया कधींच होत नाहीं, प्रकृतीशीं त्याची सांगड नेहमींच असते. प्रकृति ही पुरुषाकरितांच क्रियाशील होते, त्याच्या अनुमतीनेंच कार्य करीत असते, त्याच्या इच्छेनुसार आणि त्याच्या संतोषाकरितांच खपत असते; प्रकृतीला चैतन्य, चेतना, प्रज्ञा, जाणीव

पान क्र. ९६

 

पुरुषापासून मिळते; प्रकृतीला जी जाणीव पुरुष देतो, त्या जाणिवेंत तिच्या क्रिया प्रतिबिंबित होत असतात, आरशांत व्हाव्या त्याप्रमाणें या प्रतिबिंबरूप क्रिया पुरुष बघत असतो; विश्वशक्ति या नात्यानें, प्रकृति जे आकार त्याजकरितां निर्माण करते आणि त्याला देते ते तो मान्य करतो किंवा तिच्या खटपटीला दिलेली आपली मान्यता काढून घेतो. प्रकृतीच्या कृतिशीलतेला मान्यता देणें, न देणें, दिलेली मान्यता काढून घेणें, हें पुरुषाचे स्वाधीन असतें. पुरुष व प्रकृति यांचें हें नातें व्यवहारदृष्ट्या फार महत्त्वाचें आहे. देहधारी जीवांत जाणिवेचा सर्व खेळ या दोघांच्या संबंधावर अवलंबून असतो. आमच्यांतील पुरुष जर सहिष्णू तटस्थता धारण करून प्रकृतीला वाटेल तें करूं देईल, ती जें काय त्याजपुढें -- त्याच्या इच्छेविरुद्धहि -- ठेवील तें मान्य करील, तिच्या करणीला सर्वदा बिनतक्रार मान्यता देईल, तर आमचें मन, प्राण व शरीर यांतील हा पुरुष, प्रकृतीचा अंकित होईल, ती बनवील त्या रूपांची, घटनांची सत्ता त्याजवर चालेल, ती करील त्या खटपटी त्याला त्यांच्या दिशेनें हांकीत नेतील; आमची अज्ञानाची स्वाभाविक अवस्था या प्रकारची असते; आमच्या अज्ञानाच्या अवस्थेचें स्वभावचित्र या तटस्थ सहिष्णु पुरुषाच्या वर्णनांत आहे. आमच्यांतील या पुरुषाला स्वतंत्रतेच्या दिशेनें, मुक्तीच्या दिशेनें पहिलें पाऊल टाकावें लागतें. ''प्रकृतीचा, तिच्या उलाढालींचा मी साक्षी आहे'' ही जाणीव येऊन पुरुष प्रकृतीपासून दूर उभा राहतो, तेव्हां स्वतंत्रतेच्या दिशेनें त्यानें पहिलें पाऊल टाकल्यासारखें होतें; कारण, या अलिप्त स्थितींत प्रकृतीचें ज्ञान तो करून घेऊं शकतो, तिच्या उलाढालींत तो गुंतला नसल्यानें तो स्वतंत्रपणें या उलाढाली मान्य किंवा अमान्य करूं शकतो. प्रकृतीला आपली मान्यता बिनतक्रार देण्याचें रद्द करून, जाणीवपूर्वक खऱ्या स्वतंत्रपणें व परिणामकारकपणें तो तिचे व्यवहार मान्य किंवा अमान्य करतो; स्वत:मध्यें तिनें काय करावें, न करावें हें तो ठरवून देतो; किंवा तिच्या उलाढालीपासून तो अगदीं दूर होऊन, त्या उलाढालींचें व आपलें नातें सर्वस्वीं तोडून टाकून तो आत्मशांतींत प्रवेश करूं शकतो; किंवा प्रकृतीचे जे बनाव त्याच्यासमोर असतात, ते सर्व अमान्य करून, आपली अज्ञानावस्था त्याज्य आहे हें जाणून आध्यात्मिक उच्च स्थानावर स्वत: चढून जावें आणि तेथून स्वतःचें अस्तित्व आणि जीवन यांची नवनिर्मिति करावी -

पान क्र. ९७

 

असेंहि तो करूं शकतो. याप्रमाणें पुरुष हा प्रकृतीचा अंकित ''अनीश'' राहण्याचें सोडून, प्रकृतीचा स्वामी ''ईश्वर'' होऊन राहूं शकतो.

सांख्य तत्त्वज्ञानांत पुरुष-प्रकृति या संबंधाची कल्पना पूर्णपणें विस्तारानें विशद केलेली आहे. या दोन वस्तू शाश्वत काल वेगळ्या राहतात, पण त्यांचा परस्पर संबंध असतो; प्रकृति ही निसर्गशक्ति, कार्यकारी शक्ति, जाणिवेपासून वेगळी अशी शक्ति आहे. जाणीव केवळ पुरुषाचा धर्म आहे; प्रकृति पुरुषावांचून असते ती जणुं यांत्रिक अचेतन असते; आपल्याकरितां शरीर हवें आणि कार्याचा पाया हवा म्हणून प्रकृति मूळ जड द्रव्य तयार करते; या द्रव्याचे पायावर, त्याच्या पोटीं प्राण, इंद्रियवर्ग, मन, बुद्धि व्यक्त करते; ही बुद्धि मूळ जडाचा परिणाम असल्यानें, निसर्गाची करणी व त्याचा विभाग असल्यानें, अचेतन, यांत्रिक व जडच असते; जड विश्वामध्यें अचेतन द्रव्याची क्रिया व तेथील व्यवस्था इतकी चोख कां असते याचें कारण, सांख्यांच्या बुद्धिसंबंधींच्या कल्पनेंत सांपडतें. बुद्धीला स्वत:चा प्रकाशच नसतो; बुद्धि आणि इंद्रियरूप मन यांना प्रकाश मिळतो पुरुषाकडून; त्यांची यांत्रिक हालचाल पुरुषाकडून मिळालेल्या प्रकाशानें व प्रकाशांत चालत असल्यानें, जड विश्वांतील क्रिया-संभारांत इतकी चोख व्यवस्था असते; पुरुषाच्या संमतीनें बुद्धि आदिक खटपट करतात व ती खटपट पुरुषाच्या प्रकाशांत करतात. पुरुषाच्या संमतीखेरीज त्यांना हालचाल करतां येत नाहीं व त्याच्या प्रकाशाशिवाय त्यांची हालचाल होत नाहीं; पुरुषाला मोक्ष मिळतो तो प्रकृतीपासून दूर झाल्यानें मिळतो. जडाच्या संगतींत त्याच्या तंत्रानें रहाण्याचें सोडण्यानें प्रकृतीचें स्वामित्व पुरुषाला लाभतें. प्रकृतीचें कार्य तीन गुणांनीं चालतें; तिच्या द्रव्याचे आणि कृतीचे प्रकार या तीन तत्त्वांनीं घडलेले व विभागलेले असतात. आमच्यामध्यें आमचें शारीरद्रव्य व मानसिक द्रव्य वरील तीन मूल घटकांचें आहे आणि त्यांच्या क्रिया वरील तीन मूलतत्त्वांवर चालतात. तमोगुण हा जडतेचें तत्त्व होय. रजोगुण हा क्रियेचें, गतीचें तत्त्व आणि सत्वगुण हा समतोल, प्रकाश, सुसंवादित्व यांचें तत्त्व होय. हीं तत्त्वें जेव्हां विषम गतींची असतात, तेव्हां प्रकृति क्रियाशील होते; हीं तत्त्वें जेव्हां समतुलित असतात, तेव्हां प्रकृति शांत व निष्क्रिय होते. पुरुष अनेक आहेत, प्रकृति एक आहे; तथापि एकतेचें तत्त्व कांहीं केवळ निसर्गांतच नाहीं. प्रत्येक पुरुष एकेकटा स्वतंत्र आहे, तो प्रकृतीचा भोग स्वतंत्रपणें घेतो, तो

पान क्र. ९८

 

प्रकृतीपासून मुक्ति स्वतंत्रपणें मिळवितो. सांख्याच्या या कल्पना अनुभवानें खऱ्या ठरल्या आहेत. व्यक्तिरूप आत्मा आणि विश्वप्रकृति यांचा जेव्हां प्रत्यक्ष आंतरिक संबंध आम्हांला घडतो, तेव्हां सांख्याच्या कल्पना बरोबर आहेत हें आम्ही अनुभवानें जाणतों; तथापि या कल्पनांतील सत्य व्यवहारापुरतेंच बरोबर आहे. आत्मा किंवा प्रकृति यांच्या संबंधाचें मूलभूत सत्य, संपूर्ण सत्य मात्र वेगळें आहे. प्रकृति जड विश्वांत अचेतन म्हणून आमच्या अनुभवास येते, पण जाणिवेची शिडी चढूं लागलें म्हणजे, ती क्रमाक्रमानें अधिकाधिक जाणीवयुक्त अशी दिसते. तिचें अचेतन रूप देखील आपल्या पोटांत जाणीव लपवून होतें, असें आमच्या अनुभवास येतें. हें जसें प्रकृतिसंबंधाचें मूलभूत सत्य आहे, तसेंच आत्म्यासंबंधाचेंहि मूलभूत सत्य, या सांख्यदर्शनांतील कल्पनेहून वेगळें आहे : व्यक्तिरूप आत्मे वा पुरुष अनेक असले, तरी त्या सर्वांत मूळ जाणीवयुक्त आत्मा वा पुरुष एकच आहे; पुरुषांचें सारभूत आत्मतत्त्व एकच आहे, एकच आत्मा हा अनेक व्यक्तिरूप आत्मे बनला आहे. शिवाय, प्रकृति वेगळी, पुरुष वेगळा हें द्वैत अनुभवास येत असलें, तरी ते दोन्ही मिळून एकतत्त्व आहे, ते वेगळे नाहींत, एकाच तत्त्वाचीं तीं दोन अंगें आहेत, हा अनुभवहि द्वैत अनुभवाइतकाच खरा आहे. स्वत: केलेले आकार आणि व्यवहार प्रकृति ही पुरुषावर लादूं शकते, याचा अर्थ काय ? हें घडतें कसें ? प्रकृति ही पुरुषाचीच अंगभूत शक्ति आहे म्हणून हें घडतें; ती कोणी दूरची, परकी वस्तु नाहीं. तिनें जें केलेलें आहे तें आपणच केलेलें आहे हें पुरुष जाणतो; म्हणून तिनें दिलेलें सर्व कांहीं आस्थेनें तो घेतो; दुसरी गोष्ट, पुरुष हा प्रकृतीचा स्वामी होऊं शकतो, हें कसें घडतें ? हें घडतें याचें कारण, प्रकृति ही त्याचीच प्रकृति आहे; तो तिजकडे जोंवर तटस्थतेनें बघत होता, तोंवर ती त्याजवर आपलें करणें लावीत होती -- पण त्यानें तटस्थता सोडतांच, प्रकृतीचा तो स्वभावत:च मालक होतो आणि तिचें नियंत्रण करतो -- कारण ती कांहीं त्याला परकी नाहीं, त्याचीच ती आहे; तो जेव्हां तटस्थ आणि सहिष्णु असतो तेव्हां देखील प्रकृतीला आपली करणी करण्यासाठीं त्याची संमति घ्यावी लागते -- या संमतीच्या आवश्यकतेवरूनच प्रकृति आणि पुरुष एकमेकांस परकी नाहींत हें सिद्ध होतें. प्रकृति आणि पुरुष यांचें द्वैत ही केवळ पुरुषाच्या आत्मप्रकटनासाठीं घेतलेली बैठक आहे; ही द्वैताची बैठक शाश्वतची नाहीं; आणि तशी ती असू शकत नाहीं; कारण ती मूलभूत

पान क्र. ९९

 

अवस्था नाहीं. सत् आणि चित् (चित्-शक्ति) या दोन वस्तू नाहींत, सच्चित् ही एक मूळ सद्‌वस्तु आहे, तद्वतच प्रकृति आणि पुरुष याहि दोन वस्तू नाहींत. प्रकृति-पुरुष ही एक वस्तू आहे.

मूळ सद्‌वस्तु, ब्रह्म, आत्मा हाच पुरुष होतो. स्वत:च्या प्रकृतीचे व्यवहार बघणारा आणि ते मान्य करणारा किंवा त्यांजवर नियंत्रण घालणारा असा पुरुष होतो; हें दर्शनी द्वैत ब्रह्म, अद्वितीय अशासाठीं उभें करतें कीं, प्रकृतीचें कार्य स्वतंत्रपणें होत रहावें; तसेंच प्रकृतीच्या नियंत्रणाचें, तिजकडून काम करून घेण्याचें पुरुषाचेंहि कार्य स्वतंत्रपणें व जोरदारपणें होत रहावें. प्रकृति-पुरुषांचा वेगळेपणा यासाठींहि अवश्य असतो कीं, पुरुषाला हवें तेव्हां प्रकृतीच्या कोणत्याहि रचनांपासून अलग होतां यावें, तिच्या रचना वाटल्यास नाहींशा करतां याव्या, नव्या रचना, उच्चतर रचना तिजवर लादतां याव्या वा तिजकडून करून घेतां याव्या. स्वत:च्या प्रकृतीशीं, शक्तीशीं पुरुषाचें जें नातें असतें, त्या नात्यांत या सर्व गोष्टी घडण्याची शक्यता असते. पुरुष या सर्व गोष्टी प्रसंगानुसार करीत असतो हें आपल्या अनुभवास येतें. ब्रह्माच्या अनंत जाणिवेच्या ज्या स्वाभाविक शक्ती आहेत, त्या शक्तींच्या पोटांत या पुरुषप्रकृतीच्या विवक्षित व्यवहारांचा तर्कशुद्ध रीतीनें अंतर्भाव होतो; पुरुष हें ब्रह्माचें एक अंग, प्रकृति हें दुसरें अंग. अनंत अस्तित्व (सत्) हें पुरुषरूप अंग, अनंत जाणीव (चित्) हें प्रकृतिरूप अंग; हीं दोन अंगें नेहमीं एकत्र असतात. जेथें जशी प्रकृति असेल तेथें तसा पुरुष असावयाचा. सर्वोच्च स्थानीं पुरुषोत्तम आणि पराप्रकृति ही जोडी असते. प्रकृति मन होते, तेथें पुरुष मनोमय पुरुष होतो; ती प्राण होते, तेव्हां तो प्राणमय होतो; ती जड शरीर झाली, कीं तो शारीर अन्नमय पुरुष होतो; ती अतिमानस किंवा विज्ञान होते, तेव्हां तो अतिमानसिक विज्ञानमय पुरुष होतो, तिनें सर्वोत्तम रूप घेतलें, कीं तो आनंदरूप शुद्धसत्तारूप होतो. आम्हीं ज्या देहधारी व्यक्ती आहोंत त्यांजमध्यें, म्हणजेच आम्हांमध्यें, पुरुष हा चैत्य पुरुष, आंतरात्मा या स्वरूपांत आमच्यांतील इतर सर्व ''पुरुषांच्या'' पाठीमागें असतो. जाणिवेच्या आत्मिक अस्तित्वाच्या ज्या कांहीं रचना आमच्यामध्यें असतात आणि होतात, त्या सर्वांच्या पाठीमागें राहून त्यांना आधार देण्याचें कार्य करीत 'चैत्य पुरुष' आम्हांमध्यें वावरतो; पुरुष आम्हां व्यक्तीमध्यें व्यक्ति, विश्वामध्यें विश्वव्यापी आणि विश्वापलीकडे विश्वातीत, केवल या स्वरूपांत असतो. मूळ

पान क्र. १००

 

सत्य-ज्ञान-अनन्त ब्रह्माशीं, पुरुषाशीं, पुरुषाची एकरूपता आहे -- पुरुष कांहीं त्या ब्रह्माहून अगदीं वेगळा नाहीं; हा ब्रह्मपुरुष व्यक्तित्व आणि अव्यक्तित्व (विश्वत्व) स्वत:चे ठिकाणीं एकत्र अनुभवतो. सर्व वस्तूंत आणि जीवांत व्यक्ति-अव्यक्ति एकदमच असणारा हा ब्रह्मपुरुष, स्वत:च्या ज्ञानशक्तीकडून घडणाऱ्या व्यवहारांची व्यवस्था त्या त्या ठिकाणीं अवश्य तें रूप घेऊन, अवश्य ती बैठक घेऊन करीत असतो. प्रत्येक व्यक्तींत व्यक्ति-पुरुषाची प्रतिष्ठा करणाऱ्या कार्यांत, ब्रह्मपुरुष अध्यक्षाचें काम करतो, म्हणून त्याला व्यक्तित्व आहे, आणि या व्यक्तित्वानें त्याच्या व्यापक स्वरूपांत भाग पडत नाहींत व त्याच्यांत व्यक्तिगुण नसतात म्हणून तो अव्यक्ति आहे, तो विश्वरूप आहे असें म्हटलें जातें. पुरुष-प्रकृति यांचें परस्पर नातें व्यक्तींत कांहींहि असलें, तरी त्याच्या विश्वव्यापी स्वरूपांत पुरुष हा आपल्या प्रकृतीचा नियंता व स्वामी असतो, तो जेव्हां तिला स्वत:शीं हवें तसें खेळूं देतो, तेव्हांहि त्याच्या संमतीशिवाय तिला हा खेळ खेळतां येत नाहीं; तिच्या सर्व हालचालींना त्याची संमति लागते. ब्रह्माचा तिसरा अंगभूत भाग किंवा पुरुष, हा ईश्वर असतो. विश्वाचा निर्माता आणि नियंता, शास्ता असा हा ईश्वर असतो. कोणत्याहि व्यक्तींत पुरुष हा आपलें मूलभूत विश्वेश्वरत्व व्यक्तीच्या प्राकृतिक व्यवहारांत अधिकाधिक दाखवितो, दाखवूं शकतो. पण हें प्रकृतीचें स्वामित्व खास ईश्वराच्या स्वरूपांत अधिक स्पष्टपणें नजरेस येतें. ईश्वरस्वरूपांत ब्रह्मपुरुष हा पुरुषोत्तम या नात्यानें पुढें येतो. विश्वातीत आणि विश्वव्यापी जाणीव आणि शक्ति ही, या पुरुषोत्तमाची खास जाणीव आणि शक्ति असते, आणि या जाणीव-शक्तीचा भोक्ता आणि स्वामी म्हणून जेव्हां पुरुषोत्तम पुढें येतो, तेव्हां तो आपलें दर्शन अनेक प्रकारें घडवितो; तो सर्वज्ञ सर्वसमर्थ आहे, सर्व शक्तींचा नियंता आहे, जाणीवयुक्तांमध्यें आणि जाणीव-शून्यांमध्यें हा पुरुषोत्तम जाणिवेनें व्यवहार करतो, सर्व व्यक्तींच्या आत्म्यांत, मनांत, हृदयांत, शरीरांत, अंतर्यामी म्हणून राहतो, सर्व क्रियाकलापांचा नियंता आणि शास्ता म्हणून अधिकार गाजवितो. सर्व आनंदाचा भोक्ता तो आहे; सर्व सृष्टीचा, सर्व वस्तुजाताचा निर्माता तो आहे; स्वत:च्या स्वरूपाच्या पोटांत सर्व वस्तुजाताचा निर्माता तो आहे. स्वत:च्या स्वरूपाच्या पोटांत सर्व वस्तुजाताचें निर्माण त्यानें केलें आहे, तो सर्व-पुरुष आहे, विश्वपुरुष आहे, सर्व व्यक्ति-पुरुष त्याचे

पान क्र. १०१

 

अंश आहेत; सर्व जीव त्या विश्व-पुरुषाचीं व्यक्तिरूपें आहेत. तो मूळ महान् शक्ति आहे; विश्वांतील सर्व शक्ती त्याच्यापासून उदयास येतात; सर्वांतील आत्मचैतन्य तो आहे; सर्व जें आहे त्याचें पितृत्व त्याच्याकडे, त्याच्या अस्तित्वाकडे आहे; त्याची जाणीवशक्ति जी आहे, तिच्या रूपानें तो सर्वांची दिव्य माता आहे; सर्व जीवांचा तो मित्र आहे; सर्व आनंदाचा सांठा, सर्व सौंदर्याचें आगर तो आहे; विश्वांतील सौंदर्य आणि आनंद त्याचीच अभिव्यक्ति करतात व त्याच्या स्वरूपाचा आपल्यापरी आम्हांला साक्षात्कार घडवितात; तो सर्वांच्या प्रेमाचा विषय आहे आणि सर्वांवर प्रेम करणारा आहे. ब्रह्मपुरुष हा एकाच वेळीं केवलपुरुष  (विश्वातीत), जीवपुरुष (व्यक्तिरूप विश्वपुरुष) आणि विश्वेश्वर पुरुष, या तीन पुरुषांच्या रूपानें असतो. आतांच, ब्रह्माच्या ज्या तिसऱ्या स्वरूपाचें, विश्वेश्वराचें स्वरूपनिरूपण केलें, त्यावरून हें स्वरूप सर्वांत अधिक व्यापक आहे हें दिसून येतें. सर्व ब्रह्मरूपें विश्वेश्वर या रूपांत समाविष्ट असलेलीं दिसतात; कारण ईश्वर विश्वातीत असून विश्वान्तर्यामी आहे; व्यक्तित्वाच्या अतीत असा हा असून, व्यक्तिरूप व सर्व व्यक्तींचा आधारहि तोच आहे; सर्वश्रेष्ठ आणि सर्वगत ब्रह्म हाच आहे, केवल पुरुष हाच आहे, परमात्मा हाच आणि पुरुषोत्तमहि हाच. पण हा ईश्वर, लोकांमध्यें रूढ असलेल्या धर्मांना अभिप्रेत असलेला ईश्वर नव्हे हें स्पष्ट आहे. लोकमान्य धर्मांत ईश्वर हा एक व्यक्ति आहे, त्याचे गुणांनीं तो मर्यादित आहे, तो इतर व्यक्तींपासून, इतर देवदेवतांपासून निराळा आहे; ब्रह्माचें तिसरें स्वरूप म्हणून आम्हीं जो ईश्वर वर्णिला आहे तो असा नाहीं -- सर्व व्यक्तिरूप देवदेवता आमच्या ईश्वराच्या मर्यादित प्रतिनिधी, त्याच्या अंगभूत दिव्य विभूती आहेत. लोकमान्य ''ईश्वर'' हाहि या दृष्टीनें आमच्या ईश्वराची एक विभूति आहे. सर्व व्यक्तिरूप देवदेवता, त्याच एका ईश्वराचीं गुणवाचक, कर्मवाचक नामें आहेत (एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति।) हा ईश्वर सगुण ब्रह्महि नव्हे; हें गुणयुक्त कर्मप्रवण ब्रह्म, ईश्वराचें एक अंग आहे; निर्गुण ब्रह्म, निश्चल गुण रहित ब्रह्म, ही ईश्वराची दुसरी बाजू आहे; ब्रह्म ही मूळ सद्‌वस्तु, आत्मा, चैतन्य आहे; स्वत:च्या स्वयंभू अस्तित्वाचा स्वामी आणि भोक्ता, विश्वाचा निर्माता आणि विश्वाशीं एकरूप असणारा आणि त्याबरोबरच विश्वातीत असणारा, शाश्वत, अनंत,

पान क्र. १०२

 

अनिर्वाच्य, दिव्य सर्वातीत तत्त्वाच्या स्वरूपाचा, असा अनुभवास येणारा जो ब्रह्मरूप मूळ आत्मा, त्याला आम्हीं ईश्वर म्हटलें आहे.

व्यक्तित्व आणि व्यक्तित्वशून्यत्व या दोन गोष्टी आम्ही अन्योन्य-विरोधी मानतो; आमचें हें मत भौतिक विश्वांतील दृश्यांवर आधारलेलें आहे. आपल्या मर्यादित दृष्टीच्या विचारसरणीनें, भौतिक सृष्टीतील दृश्याच्या पायावर आमच्या मनानें हा विरोध उभा केला आहे. भौतिक सृष्टींत ज्या अचेतनापासून सर्वांचा उगम झालेला दिसतो, तें अचेतन तत्त्व सर्वथा व्यक्तित्वशून्य दिसतें; अचेतन अशी जी निसर्गशक्ति, तीहि सर्वथा व्यक्तित्वशून्य दिसते; तिचें तात्विक रूप आणि तिचा व्यवहार सर्वथा व्यक्तित्वशून्य असाच भासतो. सर्व प्रकारच्या शक्ती, व्यक्तित्व-शून्यतेचें हें आवरण घेऊन, बुरखा घेऊन काम करतात; सर्व गुण, सर्व जीवधर्म, प्रेम, आनंद, स्वत: जाणीव या सर्व वस्तू व्यक्तित्वशून्य दिसतात. व्यक्तित्वशून्य भौतिक सृष्टींत व्यक्तित्व ही वस्तु जी उदयास येते ती जाणिवेची निर्मिति असते. अचेतनांत व्यक्तित्व नाहीं -- चेतना अचेतनांत उदयास आल्यानंतर त्या चेतनेकडून व्यक्तित्व निर्माण केलें जातें -- असा देखावा आम्हांला दिसतो; व्यक्तित्वामध्यें निसर्गव्यवहारांतील व्यापक शक्तींचा, गुणांचा, नित्यक्रमांचा संकोच केलेला प्रत्ययास येतो; अस्मितेचें, अहंभावाचें लहानसें मर्यादित वर्तुळ जे असतें त्या वर्तुळांत, त्या कोंडींत अल्पशा निसर्गशक्तींनीं वावरणें म्हणजे व्यक्तित्व, असा आमचा व्यक्तित्वाचा अनुभव असतो, हें व्यक्तित्व उल्लंघून जाणें हें आमचें कर्तव्य असतें; आमच्या आत्म्याला व्यापकता, विश्वमयता येण्यासाठीं हें संकुचित व्यक्तित्व झुगारून देणें आम्हांला अपरिहार्य असतें; विश्वमयतेच्या पलीकडील विश्वातीत अस्तित्वाचा अनुभव घ्यावयाचा असेल तर अर्थातच व्यक्तित्वाचा विलय करणें अधिकच आवश्यक असतें. आम्ही व्यक्तित्व म्हणून जी वस्तु ओळखतो ती वरच्या, बाह्य, पृष्ठभागाच्या जाणिवेची रचना असते, तिच्या पाठीमागें, खालीं विश्वपुरुष असतो. हाच विश्वपुरुष अनेक भिन्नभिन्न व्यक्तिरूपें घेत असतो. तो स्वत: एक शाश्वत सत्य पुरुष असून, एकाच वेळीं अनेक व्यक्तींचीं रूपें तो घेत असतो, घेऊं शकतो, या विश्वपुरुषाची एक शक्ति, एक गुणधर्म म्हणजे व्यक्तित्वशून्यता असें आपल्याला विशाल दृष्टिकोनांतून म्हणतां येतें; अस्तित्व या गोष्टीला, अस्तित्व असलेला कोणीतरी असेल तरच अर्थ येतो; जाणिवेला जाणीववाला आवश्यक असतो; आनंद, आनंद-

पान क्र. १०३

 

भोक्त्यावांचून निरुपयोगी, निरर्थक आहे; प्रेम, प्रेम करणारावांचून उभें राहूं शकत नाहीं व आपली पूर्ति करून घेऊं शकत नाहीं. सर्वशक्ति, सर्वशक्तिमान् वापरणारा असल्यावांचून निरर्थकच होणार. या सर्व गोष्टी अगदीं सुगम आहेत. या गोष्टीप्रमाणेंच व्यक्तित्वशून्यतेची गोष्ट आहे; व्यक्तित्व शून्यता ही वस्तु आधारावांचून राहणें अशक्य. तिचा आधार तोच पुरुष, जाणीवयुक्त वस्तु. विश्वांत ही जाणीवयुक्त वस्तु जाणीवशून्य वस्तूंतून बाहेर येतांना, तिचा परिणामरूप या स्वरूपाची, बाहेर आलेली दिसते; वस्तुत: असें होत नाहीं. जाणीवशून्य वस्तु, अचेतन तत्त्व, हेंच मुळीं गुप्त जाणिवेचें फल असतें; उदयस्थान आणि उदय पावणारी वस्तु, या दोहोंत उदयस्थान खालच्या दर्जाचें आणि उदय पावणारी वस्तु श्रेष्ठ दर्जाची असते, असा विकासक्रमाचा इतिहास सांगतो -- जडांतून मन उदयास येतें; मनांतून आत्मा, आत्म्यांतून परमात्मा प्रकट होतो. परमात्मा सर्वांत अधिक गूढ वस्तु, त्याचें प्रकट होणें म्हणजे सर्वश्रेष्ठ वस्तूचें प्रकट होणें; ही गोष्ट विकासक्रमाच्या अगदीं शेवटीं घडते. हा परमात्मा म्हणजेच पुरुष, पुरुषोत्तम, सर्वमय पुरुष, सर्वगामी ज्ञानमय सद्‌वस्तु होय. आम्हांमध्यें हा खरा पुरुष असतो पण आमच्या मनाला याची माहिती नसते. आमचा अहम्, आमचें मर्यादित व्यक्तित्व याचाच फक्त मनाला अनुभव असतो. पुरुष म्हणजे हा अहम् अशी आमच्या मनाची खोटी समजूत होते, अचेतन अस्तित्वांतून मर्यादित जाणिवेचा, व्यक्तित्वाचा उदय  झालेला दिसतो, त्यायोगें मनाची दिशाभूल होते; या सर्व गोष्टी सद्‌वस्तूच्या निर्व्यक्तिकत्व व व्यक्तित्व या दोन अंगांत, आमच्या मनाला परस्परविरोध मानावयास लावतात -- पण वस्तुत: असा विरोध मुळींच नाहीं. शाश्वत, अनंत, स्वयंभू अस्तित्व ही सर्वश्रेष्ठ सत्यवस्तु आहे; पण स्वयंभू अस्तित्व या गोष्टीला आणि या सत्याला सार्थत्व व सत्यत्व येतें, तें सर्वोत्तम सर्वातीत शाश्वत पुरुषामुळें (अस्तित्ववान् वस्तूमुळें) येतें. हा सर्वातीत पुरुष सर्व श्रेष्ठ आत्मा, चैतन्य असून अनन्त असतो; याला अनन्त व्यक्ति असें पाहिजे तर म्हणावें. कारण सर्व व्यक्तींच्या व्यक्तित्वाचें सारतत्त्व व उगमस्थान म्हणजे या अनन्त व्यक्तीचें (पुरुषाचें) अस्तित्व होय. स्वयंभू अस्तित्व म्हणजे स्वयंभू पुरुष, त्याप्रमाणें विश्वाचें अस्तित्व म्हणजे अर्थत: आणि वस्तुत: विश्वपुरुष, विश्वात्मा, विश्वचैतन्य, विश्वरूप व्यक्ति; हा पुरुष आपली अनेकता व्यक्त करतो, तेव्हां व्यक्तिरूप अस्तित्व उदयास येतें -- व्यक्ति-

पान क्र. १०४

 

गत अस्तित्वाची सत्यता, सार्थता ही या अनेक रूपांनीं व्यक्त होणाऱ्या विश्वपुरुषाच्या अस्तित्वांतच आहे.

पुरुषोत्तम, दिव्य पुरुष, सर्वपुरुषमय सर्वमय पुरुष हा ईश्वर होय असा सिद्धान्त आम्हीं केला, म्हणजे एक अडचण उभी राहते, ती या ईश्वरानें चालविलेलें विश्वाचें राज्य समजण्याची. विश्वाचा राज्यकर्ता ही कल्पना आमच्यासमोर आली कीं मानवी राज्यकर्ता असतो तसाच हा असणार असें आम्ही मानूं लागतों; आम्ही या ईश्वराचें जें चित्र रेखाटतों, त्यांत त्याला आमच्यासारखेंच मन आहे, मानसिक इच्छाशक्ति आहे, आणि केवळ या साधनांनींच तो आपलें राज्य चालवितो असें आपण गृहीत धरतों; तो लहरीनें वागतो असें गृहीत धरतों, तो सर्वसत्ताधारी व लहरी असल्यानें आपल्या लहरी मनाच्या कल्पनाच विश्वाचे कायदे म्हणून विश्वावर लादतो असें आम्ही गृहीत धरतों, त्याची इच्छा म्हणजे त्याच्या व्यक्तित्वाची स्वैर लहर असा अर्थ आम्ही घेतों. पण आमचीं गृहीतें हीं सर्व चूक असतात, ईश्वर हा आमच्यासारखा मनानें मर्यादित झालेला नाहीं; तो सर्वस्पर्शी, सर्वदर्शी जाणिवेनें व ज्ञानानें संपन्न असतो; सर्व वस्तूंमधील सत्य त्याला स्पष्ट दिसतें, स्वत:चें सर्वज्ञत्वहि तो नित्य स्मरतो; वस्तूंच्या सत्यत्वाला धरून त्यांच्याकडून कार्यें करून घेण्याचें काम त्याची सर्वज्ञता व सर्वशक्तिमत्ता करीत असते; वस्तूंमधील शक्यता, अर्थ, त्यांची निकड, त्यांच्या स्वभावांतील अनिवार्य स्वत्व, वस्तुत्व या गोष्टी ईश्वराला स्पष्ट दिसतात व त्यांच्या अनुरोधानें व आपल्या सर्वज्ञतेच्या सामर्थ्यानें तो त्या वस्तूंशीं व वस्तूंचा व्यवहार करीत असतो -- येथें लहरीचा संभवच असत नाहीं -- येथें  ''लादणें'' याला अर्थ नाहीं. लहर आणि लादणें या गोष्टी अज्ञानी व असमर्थ मानवाच्या व्यवहारांत शक्य असतात. सर्वज्ञ व सर्वसमर्थ ईश्वराच्या व्यवहारांत त्या शक्य नाहींत. कोणत्याहि कायद्यानें ईश्वर स्वत:ला बांधून घेत नाहीं -- पण त्याच्या विश्वांतील व्यवहारांत ''कायदे'' आणि ''पद्धती'' जरूर असतात. हे कायदे आणि या पद्धती किंवा प्रक्रिया, वस्तूंच्या सत्य वस्तुत्वांतून उद्‌भवतात, वस्तुसत्यांचें प्रकटीकरण असें या कायद्यांचें स्वरूप असतें; वस्तुसत्यांत दोन प्रकार असतात. यांत्रिक ''गणिती'' बाह्य सत्यें आणि आंतरिक ''आत्मिक'' सत्यें -- दोन्ही सत्यांचें प्रकटीकरण या विश्वाच्या कायद्यांत होतें. आत्मिक आंतरिक वस्तुसत्यांत वस्तूंचें आंतरिक मूळ स्वरूप, भविष्यकाळीं त्याचें जें स्वरूप

पान क्र. १०५

 

व्हावयाचें असतें तें स्वरूप, मूळ स्वरूपांतून कोणतीं रूपें प्रस्तुतच्या रूपांपूर्वीं घेतलीं आहेत तीं रूपें आणि प्रस्तुतचें रूप, इतक्या गोष्टी येतात. चराचर वस्तूंचें विकासकार्य, याप्रमाणें, त्यांच्या अंतर्गत व बाह्य सत्यांवर आधारलेल्या स्वाभाविक नैसर्गिक कायद्यांनीं ईश्वर करीत असतां तो स्वत: त्या व्यवहाराच्या पोटांत असतो; पण तो त्या व्यवहाराच्या अतीतहि असतो; असा कोणताहि व्यवहार रद्द करण्याचें कामहि तो प्रसंगीं करतो, करूं शकतो; कारण त्याच्या प्रकृतीला, निसर्गाला त्याचें कार्य कांहीं सूत्रांनुसार, नैसर्गिक नियमानुसार करावें लागतें -- या कार्यांत ईश्वराची निसर्गाला संमति असते, आधार असतो -- पण हा निसर्ग, ही प्रकृति कार्य करीत असतां तिच्यावर वरून देखरेख होत असते; दिव्य परा प्रकृति ही देखरेख करीत असते. अर्थात् या देखरेखींत, "अपरा'' प्रकृतीच्या या कार्यांत कांहीं दोष दिसला, तर तो दूर करण्यासाठीं पराप्रकृति हस्तक्षेपहि करते; अर्थात् हा हस्तक्षेप ''लहरी'' वा ''नियमबाह्य" असूं शकत नाहीं. तो श्रेष्ठतम नियमानुसार होत असतो. आमच्या मनाला हा हस्तक्षेप चमत्कारिक व चमत्कारवत् भासतो, अद्‌भुत इंद्रजालवत् भासतो; पण परा प्रकृतीच्या दृष्टीनें तो अगदीं स्वाभाविक असतो. येथील प्रकृति (अपरा प्रकृति) ही दिव्य परा प्रकृतीचें मर्यादित केलेलें रूप आहे आणि म्हणून त्या पराप्रकृतीचा श्रेष्ठ प्रकाश, शक्ति व प्रभाव यांना, अपरा प्रकृतीच्या व्यवहारांत हस्तक्षेप करून त्यांत कमीअधिक बदल करण्याचा स्वाभाविक अधिकार आहे. वस्तुजातांच्या संबंधांत यांत्रिक, गणिती व स्वयंगतिक असा कायदा आहे ही गोष्ट अगदीं खरी आहे; पण या कायद्याच्या पोटांत कार्य करणारा, जाणिवेचा आध्यात्मिक कायदा आहे; हा आंतरिक आध्यात्मिक कायदा बाहेरच्या निसर्गशक्तींनीं टाकलेल्या यांत्रिक पावलांना आंतरिक महत्त्व व आंतरिक वळण देतो. त्यांत कांहीं अर्थ आणि नैतिक औचित्य भरतो, त्यांची गूढ जाणिवेच्या दृष्टीनें अनिवार्यता व आवश्यकता स्पष्ट करतो; आणि मुख्य गोष्ट, या आंतरिक कायद्यानें आधार दिलेल्या बाह्य यांत्रिक कायद्याच्या कार्यक्षेत्रावर व कारभारावर नजर ठेवणारी सर्वस्वी स्वतंत्र आध्यात्मिक परा प्रकृति असते, तिला मूळ चैतन्याचें विश्वसंचालक सर्वश्रेष्ठ सत्य पूर्णपणें अवगत असतें आणि त्या सत्यानुसारच, विश्वांतील वस्तुजाताच्या यांत्रिक कायद्यानुसार होणाऱ्या हालचालींचें ती नियंत्रण करते. विश्वाचें ईश्वराकडून घडणारें हें शासन व नियमन

पान क्र. १०६

 

आणि विश्वांतील व्यवहाराचें रहस्य यासंबंधानें आम्ही जी उपपत्ति बसवितो, तींत मानवी दृष्टि, यांत्रिक दृष्टि प्रधानतः किंवा पूर्णतया आम्ही वापरतो, ही दृष्टि टाकणें आम्हांला शक्य होत नाहीं; याप्रमाणें बसविलेली मानवी किंवा यांत्रिक उपपत्ति अगदीं चूक असते असें नाहीं; तींत सत्याचा अंश असतोच; पण विश्वशासनांतील, विश्वव्यवहारांतील मानवी यांत्रिक प्रक्रिया सर्वगामी नाहीं, ती एक बाजू आहे हें लक्षांत ठेवणें अवश्य आहे; आणि पूर्ण सत्य हें आहे कीं, विश्वाचा शासक व नियंता पुरुषोत्तम, एकच एक अद्वितीय असा पुरुषोत्तम आहे, सर्व वस्तूंच्या पोटीं आणि वरतीं त्याचें स्थान आहे; त्याची जाणीव, ज्ञान अनन्त आहे -- अशा अनन्त ज्ञानाचें तर्कशास्त्र आणि विधिशास्त्र आमच्या मानवी अत्यल्प ज्ञानाच्या तर्कशास्त्राहून आणि विधिशास्त्राहून अगदींच भिन्न असणार, हें उघड आहे, विश्वाचें प्रयोजन, विश्वाची रचना, विश्वांतील हालचाल अनन्त पुरुषोत्तमाच्या अनन्त ज्ञानानें निर्मिलेल्या तर्कशास्त्रानुसार व विधिशास्त्रानुसार निश्चित होत असतें हें लक्षांत वागवून आम्हीं तें प्रयोजन, ती रचना, ती हालचाल समजून घेण्याचा प्रयत्न करावयास हवा.

मूळ सद्‌वस्तु (ब्रह्म, आत्मा, पुरुषोत्तम) एकच एक आहे : तिची ईश्वरता आणि ईश्वरतेप्रमाणेंच तिचे अंगभूत असणारे दुसरे पैलू, एक दृष्टिक्षेपानें अवलोकन केले, म्हणजे शाश्वत, अचल, स्वयंभू आत्मसत्ता आणि जाणीवशक्तीची क्रियाशीलता, विश्व अभिव्यक्त करणारी क्रियाशीलता यांचा समग्र अन्योन्यसंबंध आपल्याला पूर्णपणें स्पष्ट होतो. शांत, अचल, स्थिर, अ-क्रिय अशा मूळ आत्म्याच्या स्वयंभू स्वरूपाचे ठिकाणीं आम्हीं बैठक घेतली, तर आम्हांला हें स्पष्ट दिसतें कीं, या शांत आत्म्याला सहयोग देणारी त्याची सहचारिणी जी माया आहे, ती क्रियाशील आहे. ती माया म्हणजे कल्पनाकोविद जाणीव-शक्ति आहे. आपल्या सर्व कल्पना, व्यवहारांत, वास्तवांत आणू शकणारी ती जाणीवशक्ति आहे. तीच सर्व कांहीं करीत आहे; या मायेचें आसन शाश्वत, अचल, स्थिर, आत्मसत्तेच्या शांत अधिष्ठानावर आहे. या बैठकीवर बसून ही माया आत्मसत्तेचें आत्मिक द्रव्य हाताळून त्याला नाना प्रकारचे आकार देते; तिच्या या व्यवहाराला शांत आत्म्याची मूक संमति असते, हा व्यवहार त्याला एकरस सुख देणारा असतो; निर्मितिशील गतिमान् अस्तित्वाचें स्थिर सुख, मायेच्या या व्यवहारापासून शांत आत्म्याला लाभतें. या

पान क्र. १०७

 

आत्म्याला असुख देणारी किंवा त्याला असंमत अशी गोष्ट मात्र माया करीत नाहीं, करूं शकत नाहीं. हें जें गतिमान् अस्तित्व आहे तें आभासात्मक असो वा सत्य असो, त्याचे घटक, त्याची घडण, त्याचें सार व प्रयोजन वर सांगितल्याप्रमाणें असलें पाहिजे, असतें यांत संशय नाहीं. जाणीवशक्ति आत्म्याच्या अस्तित्वाशीं खेळते, निसर्गशक्ति आपल्या लहरीप्रमाणें या अस्तित्वाला वागविते. आपल्या रचना, घटना घडविण्यासाठीं घटक-द्रव्य म्हणून या अस्तित्वाचा उपयोग करते -- पण आत्म्याची संमति मात्र प्रत्येक पावलाला अवश्य असते, या गुप्तपणें दिलेल्या संमतीवांचून निसर्गाला, जाणिवेला कोणतेंहि पाऊल उचलतां येत नाहीं. विश्वव्यवहाराचें हें जें दर्शन, त्यांत सत्यता आहे, यांत संशय नाहीं; आमच्या स्वत:च्या अंतरांत आणि आमच्या सभोंवार सर्वत्र, जें कांहीं घडत असतें तें या प्रकारचेंच असतें; विश्वव्यवहाराचें हें सत्य, मूळ केवल आत्म्याच्या एका अंगभूत, मूलभूत सत्याचें प्रतिबिंब असलें पाहिजे हें उघड आहे. तथापि वस्तुजाताच्या गतिशील बाह्य देखाव्यांतून मागें सरून, साक्षीभूत शांत आत्म्याच्या बैठकींत आमचें पाऊल न ठेवतां, गतिशीलतेच्या अनुभवांत अंतरांतून सहभागी होणाऱ्या आत्म्याच्या बैठकींत आम्हीं आमचें पाऊल ठेवलें, तर विश्वाची उठाठेव करणारी जाणीवशक्ति, माया व निसर्गशक्ति ही त्या आत्म्याची, स्वयंभू ईश्वराची शक्ति आहे असा देखावा आम्हांला दिसतो. हा आत्मा (ईश्वर) या शक्तीचा स्वामी आहे, सर्व वस्तुजाताचा स्वामी आहे; हें विश्व ईश्वरानें प्रकट केलें आहे, याचा निर्माता आणि शास्ता ईश्वर आहे, आपल्या सार्वभौम सत्तेच्या अधिकारानें तोच या विश्वांत सर्व उलाढाल करीत आहे, हें दृश्य आम्हांला दिसतें, हा ईश्वर स्वस्थ उभा राहून निसर्गशक्तींना हवें तें करूं देतांना दिसला, निसर्गांतील चराचर वस्तूंना व जीवांना हवें तसें वागूं देतांना दिसला, तरी त्याच्या सार्वभौमत्वाला बाधा येत नाहीं -- कारण चराचराच्या निसर्गशक्तीच्या प्रत्येक पावलाला त्याची संमति लागते. ''तथास्तु'' असें ईश्वरानें आपल्या ठिकाणीं म्हटल्याशिवाय कोणीहि पाऊल उचलूं शकत नाहीं. या संमतीशिवाय कांहींहि घडूं शकत नाहीं, कोणीहि कांहींहि करूं शकत नाहीं. आत्मा आणि त्याची जाणीवशक्ति, आत्मा आणि प्रकृति (निसर्ग) मूलत: ''दोन'' असूं शकत नाहींत. प्रकृति करते तें सर्व, वस्तुत: आत्म्याकडून केलें जात असतें; हें अद्वैतहि सत्य आहे. पडदा भेदून आम्हीं आंत गेलों आणि

पान क्र. १०८

 

जिवंत सद्वस्तूचा आम्हांला आमच्या कणाकणांत अनुभव आला, म्हणजे हें सत्य आम्हांला मान्य करावें लागतें; ही जिवंत सद्‌वस्तु सर्व कांहीं स्वत:च आहे आणि स्वत:च सर्व कांहीं ठरविते व ती सर्वसमर्थ आणि सर्वसत्ताधीश आहे असा आमचा तिजसंबंधाचा अनुभव असतो -- तेव्हां केवल आत्म्याचें एक मूलभूत सत्यदर्शन जसें आत्मा आणि प्रकृति यांचें द्वैत आहे, तसें दुसरें सत्यदर्शन आतां वणिलेलें अद्वैत आहे.

आणखी कांहीं अनुभूती विचारार्ह आहेत : शांत आत्म्याचे ठिकाणीं आम्ही विलीन झालों, आम्हीं एकाग्रतेनें समाधि लावली, तर निर्मितिशील जाणीव आणि तिचा कार्यसंभार शांत शांत आत्म्यांत सर्वथा दिसेनासा होतो, प्रकृति आणि तिचा संसार आम्हांला मिथ्या होतो किंवा शून्य होतो. उलटपक्षीं, एकचएक अस्तित्वभोक्ता पुरुष, विश्वाचा शास्ता या आत्मस्वरूपाकडे आम्ही एकाग्रतेनें लक्ष लावलें, तर हा आत्मा ज्या व्यक्तीच्या द्वारां सर्व व्यवहार करतो, ती शक्ति त्याच्या ठिकाणीं त्याच्या अलौकिक स्वरूपांत दडी घेते, किंवा त्याच्या विश्वव्यापी व्यक्तित्वाचा धर्म म्हणून भासते आणि हा आत्मा विश्वाचा अनियंत्रित स्वामी आहे असा साक्षात्कार आम्हांला घडतो. या दोन्ही अनुभूती मनाला गोंधळांत टाकतात : आत्मशक्तीची सत्यता, शांत निष्क्रिय व अवस्थेंतील वा क्रियाशील अवस्थेंतील आत्मशक्तीची सत्यता, मनाला भासत नाहीं, पटत नाहीं; अथवा आत्म्याचा जो अनुभव मनाला असतो तो विधायक क्रियाशील आत्म्याचा अनुभव नसून, केवळ अ-क्रिय आत्म्याचाच अनुभव असतो; अथवा विश्वाचा शास्ता किंवा पुरुषोत्तम या स्वरूपाकडे मन मानवी दृष्टीनें बघून, मानवी शास्त्याच्या कल्पना विश्वाच्या शास्त्यावर आरोपित करतें -- या दोन तीन कारणांमुळें मनाला वर सांगितलेल्या दोन्ही अनुभूती गोंधळांत टाकतात, उमजत नाहींत. दोन्ही अनुभूती सत्याच्या अनुभूती असतात. या अनुभूतींनीं आम्ही अनन्ताचें दर्शन घेत असतों; आणि हें उघड आहे कीं, अनंताची अनंत आत्मशक्ति, अन्योन्य विसंवादी वाटणाऱ्या परंतु सर्वथा सुसंवादी व सत्य अशा अनेक हालचाली करूं शकते. शांत आत्मा, विश्वशास्ता आत्मा हीं जशीं एका अनंताचीं दोन रूपें -- मनाला न उमजणारीं परंतु सत्य अशीं -- आहेत, त्याप्रमाणेंच व्यक्तित्व आणि व्यक्तित्वशून्यता हीं दोन वस्तुसत्यें एकाच अनंताचीं रूपें आहेत. हीं दोन अलग सत्यें नसून एकाच सत्याचीं दोन अंगें आहेत. आत्मा आणि आत्मशक्ति यांजकडे या व्यक्तित्व-

पान क्र. १०९

 

विश्वत्वाच्या (विश्वत्व-व्यक्तित्वशून्यता) एकतेच्या दृष्टीनें, अर्थात् आत्मा व आत्मशक्ति मिळून एक सत्य आहे या दृष्टीनें पाहिलें म्हणजे आत्मा हा पुरुष (ईश्वर) आणि आत्मशक्ति ही ईश्वराची शक्ति, अर्थात् ईश्वर-शक्ति अशी एकरूप जोडी आम्हांला दिसूं लागते. येथें शक्ति ही निर्व्यक्तिक, व्यक्तित्वशून्य, विश्वरूप दिसते आणि आत्मा हा व्यक्तिरूप दिसतो. परंतु एक दुसऱ्यावांचून असत नाहीं; दोन्ही मिळून एक द्विमुखी व्यक्ति होते असें म्हणतां येईल. ईश्वर हा सृष्टिजनक आणि शक्ति ही सृष्टि-जननी, दोघे मिळून सृष्टीच्या उत्पत्तीचा व स्थितीचा खेळ खेळतात. ईश्वर आणि शक्ति हीं दोन तत्त्वें स्वयंभू परमात्मतत्त्वांत एकमेकांत मिसळलेलीं, एकमेकांत विलीन झालेलीं, एकमेकांपासून अलग करतां न येण्यासारखीं, एकरूप दिसणारीं, अशीं असतात. हें स्वयंभू केवलतत्त्व, हें परमसत्य जाणिवेच्या टप्प्याच्या पलीकडे आहे. विश्व हें गतिशील जाणिवेची कारागिरी आहे : विश्वाची गतिशीलता हें शुद्ध आध्यात्मिक सत्य नसून, आत्मिक-व्यावहारिक सत्य आहे. या सत्याच्या व्यवहारांत ईश्वर आणि प्रकृति -- स्वयंभू परमात्मतत्त्वांत एकरूप असलेलीं तत्त्वें -- प्रकटरूप धारण करून क्रियाशील होतात. दिव्य मातृशक्ति विश्वाची जननी, माया, पराप्रकृति, चित् शक्ति या स्वरूपांत, या नात्यानें विश्वात्मा ईश्वर आणि स्वतःची आत्मशक्ति (प्रकृति) अशीं दोन तत्त्वें अभिव्यक्त करते : या मातृशक्तीच्या द्वारां पुरुष, आत्मा, ईश्वर, कार्य करीत असतो. तिच्या साह्यावांचून तो कांहींहि करीत नाहीं; अर्थात् त्याची इच्छा या मातृशक्तीच्या अंतरांत उपस्थित असते, पण कार्य व्हावयाचें तें सर्व या मातृशक्तीच्या हांतून होत असतें, ही शक्ति म्हणजेच परमश्रेष्ठ जाणीवशक्ति होय; हिच्या पोटांत सर्व आत्मे असतात, सर्व जीव असतात; हिजकडे सर्व कारभार सोंपविलेला असतो; कृतिशील निसर्ग म्हणजे हीच मातृशक्ति होय : या निसर्गाच्या नियमानुसार सर्व अस्तित्व, सर्व कर्तृत्व विश्वांत जीवन जगून धडपडत असतें; सर्व कांहीं जें आहे तें मूळ जाणीवशक्ति आहे; ही जाणीव पुरुषाला व्यक्तरूप देत आहे आणि त्याच्याशीं खेळत आहे, लाखों रूपें त्याला ती देत आहे, लाखों व्यवहारांत, आंदोलनांत त्याला ती घालत आहे; असा हिचा त्याच्याशीं खेळ चाललेला आहे. एका पुरुषाचे आमच्यासारखे लाखों पुरुष करून, त्यांना लाखों व्यवहारांत घालून प्रकृति (जाणीवशक्ति) पुरुषाशीं खेळ खेळत आहें : या प्रकृतीच्या खटाटोपापासून आम्ही दूर

पान क्र. ११०

 

व्हावयाचें ठरविले कीं सर्व खटाटोप शांत शांत होऊन आम्ही शांतीत प्रवेश करूं शकतो; कारण प्रकृति आमच्या निर्णयाला मान देऊन आपली धडपड थांबविण्याचें मान्य करते. आम्हांला शांति लाभते ती प्रकृतीच्या शांततेमुळें लाभते, हें आम्हीं लक्षांत ठेवावें. प्रकृतीच्या तंत्रानें आम्ही वागत नाहीं -- आम्ही स्वतंत्र आहों हें व्यक्त करण्यास आम्ही पुढें झालों, तर प्रकृति या विचारांतहि आम्हांस मदत करते : ईश्वर सर्वव्यापी, सर्वशक्तिमान् आहे, त्याची शक्ति सर्वश्रेष्ठ आणि सर्वगामी आहे ही गोष्ट प्रकृति आम्हांला दाखवून देते. आम्ही त्या ईश्वराच्या स्वरूपाचे अंश आहोंत हेंहि ती आम्हांला पटविते. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, ती जी ईश्वराची सर्वश्रेष्ठ शक्ति ती, प्रकृति स्वतःच असते आणि तिच्या श्रेष्ठ स्वरूपांत, पराप्रकृतींत, आम्ही ईश्वराचे अंश असतो. शांति आणि प्रकृतीच्या तंत्रापासून मुक्तता किंवा स्वतंत्रता ही जशी आम्हांला प्रकृतीच्या द्वारां प्राप्त होते, तिच्या सहकार्यानें लाभते, त्याप्रमाणें प्रस्तुत अवस्थेहून श्रेष्ठतर अवस्था प्राप्त करून घेणें असेल, तर तें इच्छित देखील प्रकृतीच्या साह्यानें आम्हांला लाभूं शकतें; आत्म्याची श्रेष्ठ जाणीवशक्ति, दिव्य शक्ति, दिव्य प्रकृति हीच आम्हांला आमचें इच्छित मिळवून देऊं शकते; तिच्या द्वारांच आम्हांला तें मिळवणें शक्य असतें; आम्हीं दिव्य पुरुषाचे चरणीं आत्मार्पण करावयाचें तें या दिव्य मातेच्या द्वारांच करावयाचें असतें; या आत्मार्पणाखेरीज श्रेष्ठतर अवस्था आम्हांला प्राप्त होऊं शकत नाहीं; कारण श्रेष्ठतर अवस्था म्हणजे श्रेष्ठतर प्रकृतीच्या बैठकीवर जाणें होय; हें चढणें शक्य होण्यासाठीं अतिमानसिक शक्ति आम्हांला साह्य व्हावी लागते; तिनें आमचें मन ताब्यांत घेऊन, त्या मनाला रूपान्तरित करून, स्वतःच्या अतिमानसिक अवस्थेला न्यावयाचें असतें. तेव्हां मूळ ब्रह्म, स्वयंभू आत्मा वा पुरुषोत्तम हाच अनेक पुरुष व हाच ईश्वर होत असल्यानें त्यांच्यांत अन्योन्यविरोध असण्याचें कारण नाहीं -- तसेंच ब्रह्माची माया, तीच अनंत पुरुषांना खेळविणारी प्रकृति व तीच ईश्वराची पराप्रकृति असल्यानें, या तीन प्रकृतीच्या अवस्थांमध्येंहि अन्योन्यविरोध असण्याचें कारण नाहीं. विश्व जें व्यक्त दिसत आहे त्याची निर्मिति, त्याची गतिमानता आणि क्रियाशीलता याला कारण एक मूळ जाणीवशक्ति, आत्मशक्ति (माया,प्रकृति, शक्ति) आहे आणि ही शक्ति मूळ पुरुषाची, मूळ सद्‌वस्तूची आहे; ही सद्‌वस्तु, हा पुरुषोत्तम व्यक्त विश्वाचा पाया आहे, आधार आहे,

पान क्र. १११

 

आत्मा आहे. हाच अनेक पुरुषांपैकीं पुरुष होऊन या विश्वाचा अनुभव घेतो, हाच ईश्वर होऊन आपल्या इच्छेनें विश्वनिर्मितीचा वगैरे संकल्प करतो, या विश्वाला आपल्या प्रभुत्वाखालीं ठेवतो.

एका आत्म्याचीं, एका चैतन्याचीं हीं तीन रूपें एकमेकांशीं जुळतीं नाहींत, असें आमच्या मनाला भासतें आणि यांच्यामध्यें मनाला दिसणारा विसंवाद आम्हांला खटकतो, पण या दर्शनी विसंवादाचे कारण या वस्तुस्थितींत नसून, चैतन्यदृष्टीनें जिवंत आणि नितान्त सत्य अशी खरी वस्तु, मूर्त वस्तु दर्शविण्यासाठीं आम्ही जी अमूर्तवाचक ''भाववाचक'' भाषा वापरतो, ज्या अमूर्त कल्पना उपयोगांत आणतो, त्या कल्पनांत आणि भाषेंत आहे; चैतन्यमय मूर्त जिवंत वस्तूंची व्याख्या ज्या अमूर्त कल्पनांच्या द्वारां आम्ही करतो, त्या कल्पना एकमेकींपासून स्पष्टपणें भिन्न असतात. भेदाच्या भिंतींनी वेगळ्यावेगळ्या झालेल्या कल्पना, चैतन्यमय सद्वस्तूच्या भिन्न अंगांचें यथार्थ चित्र रंगवूं शकत नाहींत. हीं ''भिन्न'' अंगें पुष्कळ असलीं, तरी वस्तुत: भिन्न नसून एकमेकांत मिळून जाणारीं, मिळून गेलेलीं, कायमची भिन्नता बिलकुल नसलेलीं, विशिष्ट कार्यासाठीं तात्पुरती विशिष्टता असलेलीं अशीं असतात. जर कल्पनांनीं व भावचित्रांनीं सद्‌वस्तूचें सत्य व्यक्त करावयाचें असेल, तर या कल्पना आणि हीं भावचित्रें अतिभौतिक मनोमय असलीं तरी तीं त्याबरोबर जिवंत, वस्तुमय असावयास हवींत, शुद्ध बुद्धीला हीं चित्रें प्रतीकात्मक भासलीं, तरी अंत:स्फूर्त ज्ञानदृष्टीला तीं केवळ प्रतीकात्मक नसून, किंवा मुळींच प्रतीकात्मक नसून खऱ्या वस्तू असतात; आध्यात्मिक गतिमान अनुभवाचीं सत्यें, हें त्या ''प्रतीकांचें'' खरें स्वरूप असतें. सत्याची निर्व्यक्तिक बाजू, वस्तुजाताचें निर्व्यक्तिक सत्य, शुद्ध बुद्धीला सुगम अशा  ''भाववाचक'' सूत्रांनीं प्रकट केलें जाऊं शकेल, पण सत्याला दुसरी बाजू आहे, ही बाजू आत्मिक किंवा गूढ आंतरिक दृष्टीला दिसणारी असते, या दुसऱ्या बाजूचें आंतरिक दर्शन घडल्याखेरीज नुसत्या अमूर्त कल्पनांनीं व शब्दांनीं केलेलें सत्याचें वर्णन अगदीं अयथार्थ होतें व अपुरें पडतें. वस्तुजाताची जी गूढ बाजू आहे ती खरी बाजू आहे; त्या बाजूंत वस्तूजाताचें खरेंखुरें सत्य सामावलेलें आहे; अमूर्त प्रतीकांनीं या सत्याचें प्रतिबिंबभूत दर्शन दिलें जाऊं शकतें. बुद्धि जें दर्शन घडविते तें यापलीकडे कांहीं नसतें, असूं शकत नाहीं -- गूढदर्शन हेंच खरें सत्यदर्शन होय. प्रत्यक्षमूर्तिदर्शन आणि त्या मूर्तीच्या रेखाचित्राचें दर्शन यांत जो फरक

पान क्र. ११२

 

आहे तोच सत्याच्या गूढ आत्मिक दर्शनांत आणि बुद्धिद्वारां घडणाऱ्या दर्शनांत आहे. दार्शनिक मीमांसा ही सत्याच्या बौद्धिक मांडणीवर बहुतांशानें अवलंबून असते, हें खरें; परंतु ही बौद्धिक प्रतिमा सत्याची पूर्ण मूर्ति नाहीं हें लक्षांत ठेवणें अवश्य आहे. सत्याचें पूर्ण आकलन आणि पूर्ण निरूपण करणें ही गोष्ट त्याचें प्रत्यक्ष दर्शन घडल्याशिवाय अशक्य आहे. शिवाय यथार्थ निरूपणाकरितां प्रस्तुत भाषेपेक्षां अधिक जिवंत आणि सर्वांगपूर्ण अशा भाषेचीहि आवश्यकता आहे.

येथें एक सद्वस्तु आणि अनेक वस्तू, एक ईश्वर आणि अनेक जीवात्मे, अथवा ईश्वर आणि जीवात्मा यांचा संबंध खरोखरी काय असतो, हें पाहणें युक्त होईल. सामान्य ईश्वरवादांत असें सांगितलें जातें कीं, कुंभार मडकीं करतो त्याप्रमाणें ईश्वर अनेक जीव निर्माण करतो; निर्माणकर्त्यावर निर्मित वस्तू अवलंबून असतात, त्याप्रमाणें जीव ईश्वरावर अवलंबून असतात. हा सामान्य दृष्टीचा ईश्वरवाद आहे. पण अंत:स्फूर्त दृष्टीच्या साह्यानें ईश्वराविषयींचें जें विशाल दर्शन बुद्धीला घडतें, त्या दर्शनानुसार अनेक जीवात्मे हे त्यांच्या अंतर्यामांत ईश्वरच असतात, जीवात्म्यांचें आंतील सर्वांत खोल सत्य ईश्वरत्व हेंच आहे; व्यापक सर्वोत्तम स्वयंभू एकमेव पुरुषापासूनच अनेक व्यक्ति-पुरुष होतात; त्या एकाकी पुरुषाप्रमाणेंच हे अनेक पुरुष शाश्वत असत; अर्थात अनेकांची शाश्वतता त्या एकाच्या शाश्वततेंतच अंतर्भूत असते -- स्वतंत्र शाश्वतता त्यांना नाहीं, असूं शकत नाहीं; आमचें भौतिक अस्तित्व हें प्रकृतीचें, निसर्गाचें केलेलें आहे, निसर्गघटित आहे; पण आमचा आत्मा हा ईश्वराचा नित्य अमर असा अंश आहे, आणि त्याच्या पलीकडे, त्याच्यामागें त्याला आधारभूत असा ईश्वर स्वत: त्याच्या अंतरांत आहे. एकच एक सद्वस्तु वा पुरुष हें सत्तेचें, अस्तित्वाचें मूलभूत सत्य आहे; या एकाच्या सत्तेमुळें त्याच्या इच्छेनें आणि आश्रयानें अनेकांना अस्तित्व लाभतें आणि भोगावयास मिळतें -- अर्थात् व्यक्त पुरुष, जीवात्मा हा ईश्वरावर सर्वथा अवलंबून असतो, हें यावरून स्पष्ट आहे. आमची  ''अस्मिता'', अहम्‌वृत्ति स्वत:ला ईश्वरापासून व इतर जीवाजडापासून अगदीं वेगळे समजते, आपलें अस्तित्व अगदीं स्वतंत्र आहे असें अज्ञानामुळें मानते; आणि या कल्पनेनुसार स्वतंत्र असल्या सारखें जगण्याचा प्रयत्न करते. आम्ही सर्वस्वी ईश्वरावर अवलंबून आहोंत ही गोष्ट या धडपडींत दृष्टिआड होते; पण वस्तुत: जीव प्रत्येक पावलाला विश्वशक्तीवर

पान क्र. ११३

 

अवलंबून असतो, हें पावलागणिक आमच्या प्रत्ययास येतें; त्याचें अस्तित्व विश्वशक्तीनें निर्मिलें आहे; विश्वात्म्याच्या अस्तित्वाचा एक अंश, हें त्याच्या अस्तित्वाचें वास्तविक स्वरूप आहे; हें जीवाचें अस्तित्व, त्या विश्वशक्तीच्या प्रेरणेनें हालचाल करीत आहे; विश्वशक्तीच्या व्यवहाराचा जीव-व्यवहार हा एक भाग आहे, जीवाच्या द्वारां विश्वशक्तीच हालचाल करीत असते -- या गोष्टी जीवाच्या प्रत्येक व्यवहाराचे प्रसंगीं उघड होतात; पण जीव स्वतःला स्वतंत्र समजतो, स्वतंत्र म्हणून व्यवहार करूं पाहतो, यांतच त्याची चूक होते; आमच्या खोल अंतरांत स्वयंभू पूर्ण स्वतंत्र तत्त्व, पुरुष आहे. त्या सत्याचें असत्य प्रतिबिंब जीवाच्या ''स्वतंत्र'' भूमिकेंत दिसतें. तें अंतर्यामींचें स्वयंभू तत्त्व खरें स्वतंत्र आहे, जीवतत्त्व खरें स्वतंत्र नव्हे, तें पूर्णतया परतंत्र आहे, परतत्त्व जें ईश्वरतत्त्व त्याच्या तंत्रानें चालणारें आहे. विश्वप्रकृतीच्या बाहेरचें असें अहंतत्त्वांत कांहीं नाहीं; विश्वप्रकृतीच्या बाहेरचें, तिला श्रेष्ठ असलेलें असें 'कांहीं' आमच्या अंतरात्म्यांत आहे, हें आंतरतत्त्व अहंतत्त्वाप्रमाणें विश्वप्रकृतीच्या तंत्रानें चालणारें नाहीं, तें तिच्या अतीत आहे. पण ही त्याची प्रकृतीपासून स्वतंत्रता जी आहे, ती त्याला प्रकृतीहून श्रेष्ठ अशा तत्त्वावर अवलंबून राहण्यानें प्राप्त होते, अशी वस्तुस्थिति आहे. आमच्या अंतर्यामांत जो ईश्वर आहे, त्याला आमचा प्राकृतिक अंश आणि जीव अंश आम्हीं समर्पण करावा, त्याचे चरणीं आत्मसमर्पण करावें, तेव्हांच आमचें जे परम आत्मतत्त्व, परम सत्य त्याची प्राप्ति आम्हांला होते -- कारण ईश्वर हेंच आमचें परम सत्य आणि परम आत्मतत्त्व आहे. आमचें स्वयंसिद्ध अस्तित्व, नित्यत्व हें केवळ त्या ईश्वराच्या स्वयंसिद्ध अस्तित्वावर आणि नित्यत्वावर अवलंबून आहे; जीवाचें हें ईश्वरावलंबित्व ईश्वराशीं जीवाच्या असणाऱ्या तादात्म्याला विरोधी वाटतें, पण तें तसें नाहीं; उलट ईश्वराशीं असलेल्या तादात्म्याचा साक्षात्कार घडण्यास जीवाला त्याचें ईश्वरावलंबित्व उपयोगी पडतें; ईश्वरतंत्रतेच्या द्वारां जीव ईश्वरत्व संपादन करूं शकतो. द्वैताचा उगम अद्वैतांत, द्वैत हें अद्वैताचें व्यक्त स्वरूप आणि या व्यक्त स्वरूपांतून परत मूळ अद्वैतांत जाण्यासाठीं द्वैताला मोकळा मार्ग, अशी ही विश्वरचना आहे. विश्वाच्या मूलभूत व्यवहाराचें हें रहस्य सर्वत्र पदोपदीं प्रत्ययास येतें. अनंताच्या अनंत जाणीवशक्तीचें एकच एक अव्यक्त तत्त्व आणि त्याची अभिव्यक्ति करणाऱ्या अनेक व्यक्त वस्तू यांच्या-

पान क्र. ११४

 

मध्ये हें द्वैताद्वैतमय सत्य सर्व प्रकारचीं नातीं निर्माण करूं शकतें; मनाला एकतेचा, अद्वैताचा साक्षात्कार, हृदयांत अद्वैताची उपस्थिति, आमच्या सर्व अंगांत, अंगांअंगांत, अद्वैताचा संचार हा जो जीवाला अनुभव येतो तो सर्वश्रेष्ठ अनुभव होय; एकतत्त्वाचें आणि अनेक व्यक्तींपैकीं कोणत्याहि व्यक्तीचें या अनुभूतींत जें नातें व्यक्त होतें तें जीवशिवाचें आणि जीवाजीवाचें सर्वश्रेष्ठ नातें होय. पण दुसरीं अनेक जीं व्यक्तिगत नातीं असतात तीं हें सर्वश्रेष्ठ नातें नष्ट करीत नाहीं, तर तीं नातीं मान्य करून, त्यांना आपला पाठिंबा देऊन, त्यांच्यांत पूर्णता व निर्दोषता उत्पन्न करतें, या नात्यांतला जो आनंद, त्याला पूर्णता आणते, त्या नात्यांचा जो हेतु आणि अर्थ तो समग्र प्रत्ययास आणतें. अनंताची ही ''जादू'' आहे पण अनंताच्या तर्कबुद्धीची व्यवहारपद्धति हीच आहे. ''जादू'' आहे आमच्या दृष्टीनें, पण अनंताच्या दृष्टीनें हा आहे तर्कशुद्ध व्यवहार.

आतां एक महत्त्वाचा प्रश्न विचारांत घेऊं : अव्यक्त केवल तत्त्व आणि व्यक्त विश्व या दोन वस्तू एकमेकांशीं विसंवादी आहेत, विरोधी आहेत असा एक युक्तिवाद आहे. असें म्हटलें जातें कीं, व्यक्त विश्वासंबंधानें विचार करतांना विश्वांतील ज्या कित्येक अन्योन्यविरोधी म्हणून गोष्टी भासतात, त्या तशा नाहींत; अनंताच्या तर्कशुद्ध व्यवहारांत त्या सर्व व्यवस्थितपणें सुसंवादित्वानें बसतात -- ही विचारसरणी मान्य करतां येईल; पण व्यक्त विश्व ही सत्य वस्तु असली तरी, ती खालच्या दर्जाची आहे, अव्यक्त सत्यवस्तूचा एक अंश म्हणजे व्यक्त विश्व आहे; तेव्हां त्या श्रेष्ठ वस्तूचे ठिकाणीं तिच्या अंतरांत आम्हीं प्रवेश केला म्हणजे हीं खालचीं विश्वगत, विश्वविषयक सत्यें सत्यतेला मुकतात; हीं मिथ्या होतात. अव्यक्तांतील बैठक आणि व्यक्तांतील व्यवहार या परस्परविरोधी गोष्टी असल्यानें अव्यक्तप्रविष्टाला व्यक्तव्यवहार हा अप्रस्तुत आहे, अ-कर्तव्य आहे, अ-शक्य देखील असावा : असा एक युक्तिवाद आहे. अव्यक्त केवल तत्त्व हें कालातीत तत्त्व आहे. त्याचे ठिकाणीं आत्यन्तिक नित्यता आहे, तें स्वयंभू आहे. तें सर्वनिरपेक्ष आहे, त्याच्या निरपेक्षतेला सीमा नाहीं; त्याच्या पलीकडे स्वयंभू कांहीं नाहीं -- अशा या तत्त्वाकडे जाण्याला, त्याची ओळख करून घेण्याला व्यक्त विश्व, या विश्वाच्या मर्यादाबद्ध वस्तू कांहींहि मार्गदर्शन करूं शकत नाहींत. एखादा मार्ग यांनीं सुचविलाच, तर तो अपूर्ण ठरल्यानें भ्रामक, फसवा म्हणून त्याज्य होतो, अशी वस्तुस्थिति असल्यानें, काल

पान क्र. ११५

 

आणि कालातीत चैतन्य यांचें नातें काय, हा प्रश्न उभा राहतो; या नात्याचा शोध घेणें अवश्य आहे. कारण, आम्हीं अशी कल्पना केली आहे कीं, कालातीत नित्य वस्तूंत जें कांहीं अव्यक्त आहे, तेंच कालविशिष्ट नित्य वस्तु म्हणून प्रकट होतें; कालातीत नित्य अव्यक्तच नित्यकालिक म्हणून व्यक्त होत असतें; आणि असें जर आहे, तर कालविशिष्ट व्यक्ताची परिस्थिति कितीहि भिन्न असो, हें व्यक्त कितीहि तोकडें अंशस्पर्शी असो, या व्यक्तांत, या कालविशिष्ट अभिव्यक्तींत जें कांहीं मूलभूत असेल, तें कोणत्या तरी स्वरूपांत कालातीत अव्यक्तांत अगोदरच असलें पाहिजे, आणि त्या कालातीत सत्यांतून, सद्‌वस्तूंतून व्यक्तांत आणलें गेलें असलें पाहिजे. असें जर नसेल, तर या ज्या मूलभूत गोष्टी त्या, जें कालातीतहि नाहीं व कालाविशिष्टहि नाहीं अशा सर्वनिरपेक्ष केवलांतून कोणत्याहि मध्यस्थाचा उपयोग न करतां व्यक्तांत आल्या असल्या पाहिजेत; या पक्षीं कालातीत चैतन्य वा आत्मा हें नकारात्मक आध्यात्मिक तत्त्व, सर्वश्रेष्ठ तत्त्व, अनिर्वचनीय तत्त्व असून तें, केवलाच्या अनिर्बंधतेचा, कालांत व्यक्त होणाऱ्या वस्तूंच्या द्वारां सीमित वा बंधनमुक्त न होणाऱ्या केवलाच्या धर्माचा, पाया वा आधार असलें पाहिजे : कालविशिष्ट चैतन्य हें सद्‌रूप, क्रियात्मक, तर कालातीत चैतन्य त्याच्या उलट असद्‌रूप, अक्रिय, अशी व्यवस्था असली पाहिजे; निर्गुण आणि सगुण यांच्या अन्योन्यसंबंधाप्रमाणें कालातीत आणि या कालविशिष्ट चैतन्याचा संबंध असला पाहिजे. कालातीत चैतन्य याचा आमचा अर्थ अस्तित्वाची आध्यात्मिक अवस्था -- म्हणजेच कालगत व्यवहाराच्या अधीन नसलेली, भूत, वर्तमान, भविष्य या प्रकारचा जो अन्योन्यसापेक्ष कालगत अनुभव, त्या अनुभवानें बांधली न जाणारी, अशी अस्तित्वाची आध्यात्मिक अवस्था -- असा होय. हें कालातीत चैतन्य म्हणजे कोऱ्या पाटीसारखेंच असलें पाहिजे अशी कांहीं आवश्यकता नाहीं; सर्वकांहीं त्याच्या पोटांत असूं शकेल; अर्थात् सारभूत अंशानें सर्वकांहीं त्याच्या पोटीं असूं शकेल; हें सर्व नित्य एकरूपतेनें त्याच्या अंतरंगांत राहूं शकेल. या सर्वाचा काल, रूप, परिसर, संबंध हा संसार मात्र, त्या कालातीत चैतन्यांत असणार नाहीं. काल आणि कालातीत चैतन्य या दोन्ही ठिकाणीं 'नित्यता' हा सामान्य धर्म आहे. कालातीतांत जे अव्यक्त, अंतर्हित, सारत: आहे, तेंच गतिमान् होऊन कालांत अवतरतें; निदान, कालांत त्याला योजनेचें, संबंधाचें, परिणामांचें

पान क्र. ११६

 

परिस्थितीचें रूप येतें : एकच नित्यतत्त्व कालातीत आणि कालगत या दोन स्वरूपांत दिसतें. अस्तित्व आणि जाणीव यांची स्थिर नित्य स्थिति आणि या स्थितीच्या आधारानें त्यांची नित्य गति, अशा दोन चैतन्यावस्था, आम्ही कालातीत आणि कालगत चैतन्य म्हणून ओळखतों.

मूळ सद्‌वस्तु काल-स्थलातीत आहे; ही वस्तू आपल्या पोटांत अनेक गोष्टी धारण करते; या गोष्टी व्यक्त संसाररूपानें मांडण्यासाठीं मूळ सद्वस्तु (कालगत आणि स्थलगत असा) स्वत:चा विस्तार स्वत: करते; या आत्मविस्तृत सद्‌वस्तूला काल, स्थल अशीं नांवें मिळतात. चैतन्याच्या, सद्‌वस्तूच्या या दोन स्वरूपांत दर्शनी विरोध असला, तरी वस्तुत: त्यांत विरोध नाहीं. स्वतांच्या सारभूत भागाकडे, सारभूत अस्तित्वाकडे लक्ष देऊन राहणारें चैतन्य, तें कालातीत चैतन्य; आणि तेंच चैतन्य आपल्या सारतत्त्वाच्या क्रियाशील संसाराकडे लक्ष देणारें झालें, म्हणजे त्याला कालगत, स्थलगत चैतन्य, असें आपण म्हणतो. एकाच चैतन्याला आत्मकेंद्रित आणि आत्मविस्तृत अशा दोन अवस्था घेतां येतात; दुसऱ्या अवस्थेला आम्हीं कालस्थल या नांवानें व नांवांनीं ओळखतो. काल-स्थल हीं जीं आत्मविस्तृत चैतन्याचीं नांवें, त्यांत स्थल म्हणजे आकाश, सर्वव्यापी स्थल किंवा अवकाश होय. आकाशांत सर्व वस्तू एका विशिष्ट क्रमानें एकत्र स्थितींत किंवा गतींत असतात. आकाश हा गतिशून्य विस्तार असतो; उलट काल हा गतिमान विस्तार असतो; कालाचें मोजमाप हालचालींनीं होतें, घटनांनीं होतें. याप्रमाणें आकाश म्हणजे अनंत स्थिर स्थान आणि काल म्हणजे अनन्त अस्थिर हालचाल, अशी आपली आकाशासंबंधानें आणि कालासंबंधानें कल्पना आहे. या कल्पनेनुसार आकाश म्हणजे आत्मविस्तृत स्थितिशील ब्रह्म, आणि काल म्हणजे आत्मविस्तृत गतिशील ब्रह्म, असें म्हणतां येईल. पण आकाश ही स्थिर वस्तु आहे, ही आपली कल्पना चुकीची असूं शकेल : आकाश हें अखंडगतिशील असेल, नित्यश: गतिशील असेल; आकाशांतील वस्तूंचें नित्यत्व आणि त्यांचे कालविषयक नित्यसंबंध, यामुळें आकाश स्थिर आहे असा भास होत असेल; गतिमान आकाशांत होणारी हालचाल ही, स्थिर आकाशांत काल गतिमान आहे असा भास उत्पन्न करीत असेल. असेंहि म्हणतां येईल कीं, आकाश किंवा अवकाश म्हणजे आकार आणि पदार्थ एकत्र सांठविण्यासाठीं, ठेवण्यासाठीं स्वत: विस्तारलेलें

पान क्र. ११७

 

ब्रह्म होय आणि काल म्हणजे, आकार आणि पदार्थ जिच्या पोटीं आहेत ती ब्रह्माची आत्मशक्ति गतिमान झाली असतां त्या गतिमान आत्मशक्तीच्या हालचाली व्यवस्थित होण्यासाठीं स्वत: विस्तारलेलें ब्रह्म होय. विश्वमय नित्य वस्तूचें, ब्रह्माचें आत्मविस्ताराचें स्वरूप एकच असून या स्वरूपाला काल आणि आकाश किंवा अवकाश हीं दोन अंगें आहेत अशी या कल्पनेंत मांडणी आहे.

शुद्ध भौतिक आकाश हें जड द्रव्याचा धर्म मानतां येईल; पण क्रियामग्न शक्ति ही, जडाची जननी आहे. तेव्हां भौतिक विश्वांतील अवकाश म्हणजे जड शक्तीचा मूलभूत आत्मविस्तार आहे, असें मानतां येईल; जडशक्तीनें स्वतःकरितां तयार केलेलें अस्तित्वाचें स्थान, असेंहि अवकाशाला नांव देतां येईल; अवकाश म्हणजे जाणीवशून्य अनन्ताची जडशक्तीनें केलेली प्रतिमा. या प्रतिमेच्या अनन्तांत जडशक्ति आपला व्यवहार करीत असते, या अनन्ताच्या आकृतींत जडशक्ति आपल्या कृतीच्या आत्मनिर्मितीच्या हालचाली आणि रचना सांठवीत असते -- असें अवकाशासंबंधानें निरूपण करतां येईल.

जडशक्तीच्या आत्मनिर्मितिविषयक हालचालीचा क्रम म्हणजे काल असें कालासंबंधानें म्हणतां येईल. हालचालीचा क्रम असें न म्हणतां, हालचालीनें आमच्या मनावर निर्माण केलेला संस्कार, असेंहि कालाचें वर्णन करतां येईल. या संस्कारांत कांहीं एक वस्तु आपलें दर्शन आम्हांला एकदम न घडवितां, अगदीं व्यवस्थित क्रमानें घडवितें असें आम्हांला भासतें : यांत वस्तूची वाटचाल अखंड असते, पण त्याबरोबर त्या वाटचालीच्या पावलांचा क्रमहि दाखविला जातो, क्रमाच्या खुणा या अखंड हालचालीच्या वाटेवर बसविलेल्या दिसतात. तेव्हां जडशक्तीच्या आत्मनिर्मितिविषयक क्रमवार अखंड हालचालीनें आमच्या मनावर घडविलेला संस्कार म्हणजे काल असें म्हणतां येतें. जडशक्तीच्या क्रियेच्या पूर्णतेकरितां अवकाशाच्या तीन अंगांना चिकटून असणारें चौथें अंग, असेंहि कालाचें वर्णन करतां येईल; लांबी, रुंदी, उंची आणि काल अशीं अवकाशाचीं चार अंगें मानतां येतील. मात्र काल ही एक मानसिक वस्तु, आमच्या मनाला भासणारी पण इंद्रियांना न दिसणारी अशी वस्तु आहे, आणि अवकाश ही बाह्य इंद्रियनिर्मित किंवा इंद्रियदृष्ट पदार्थ विस्ताररूप वस्तु आहे, असा आमचा समज असल्यानें आम्ही अवकाशाचें एक चौथें अंग म्हणून कालाला अवकाशाच्या पोटांत ढकलीत नाहीं.

पान क्र. ११८

 

चैतन्य किंवा आत्मा ही मूलभूत सत्य वस्तु आहे; काल आणि अवकाश यांना दोन प्रकारें या मूलभूत चैतन्याशीं जोडतां येईल; चैतन्याच्या शक्तीची हालचाल चालते, त्या हालचालीकडे बघण्याचे चैतन्याचे वैचारिक वा काल्पनिक दृष्टिकोन म्हणजे काल व अवकाश असें म्हणतां येईल; किंवा असें म्हणतां येईल कीं, चैतन्य ही जी मूलभूत सत्य वस्तु आहे तिच्या अंगभूत मूलभूत गोष्टी, हेंच काल व अवकाश यांचें स्वरूप आहे आणि चैतन्याच्या जाणिवेच्या ज्या अनेक अवस्था, अनेक भूमिका आहेत त्या भिन्न भिन्न भूमिकांनुसार काल आणि अवकाश यांचें रूप भिन्न भिन्न होतें. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचें, तर आमच्या जाणिवेच्या प्रत्येक पातळीवर त्या त्या पातळीपुरती काल आणि अवकाश ही जोडी वेगळी वेगळी असते; एवढेंच नव्हे, तर प्रत्येक पातळीवर काल आणि अवकाश या जोडीच्या चळवळी अनेक भिन्न भिन्न स्वरूपांत चालत असतात : तथापि या सर्व चळवळी, मूलभूत जी दिक्‌काल रूप  (अवकाश आणि काल रूप) आध्यात्मिक सत्यवस्तु, तिचेच नाना पैलू प्रकट करीत असतात. अनुभवाची गोष्ट अशी आहे कीं, आम्ही भौतिक अवकाश टाकून त्याच्या पाठीमागें जाऊन बसलों, म्हणजे आम्हाला अशी जाणीव होते कीं, बाहेरची अवकाशगत विस्ताराची हालचाल ही आंतील आत्मिक विस्ताराच्या हालचालीवर अवलंबून आहे; आंतील आत्मिक विस्तार हा बाहेरील भौतिक विस्ताराचा आधार व पाया आहे; आंत चैतन्य किंवा आत्मा हा स्वतःच्या शक्तीची सर्व हालचाल स्वत:च्या पोटांत सांभाळून, बाहेरच्या भौतिक अवकाशाला आधारभूत होत आहे. आम्ही भौतिक विश्व सोडून अंतर्मुख झालों, म्हणजे अवकाशाची ही मूलभूत सत्यता, त्याचें मूळ अतिभौतिक आहे ही गोष्ट आम्हांला स्पष्टपणें कळतें; कारण अंतर्मुखतेंत आम्हांला आंतरिक आत्मगत अवकाश-विस्ताराची जाणीव होते; मन स्वत: या आत्मिक अवकाशांत वावरतें, व्यवहार करतें -- भौतिक अवकाश-काल आणि हा आंतर अवकाश अगदीं भिन्न असतात, तरी मन आपल्या मानसिक अवकाशांत अशा प्रकारें फिरूं शकतें कीं, जड भौतिक अवकाशांतहि मानसिक हालचालीला अनुरूप अशी हालचाल उत्पन्न व्हावी; भौतिक अवकाशांत दूर अंतरावर असलेल्या वस्तूवर परिणाम होईल, अशी हालचालहि मन आपल्या मानसिक अवकाशांत करूं शकतें; याप्रमाणें मानसिक अवकाश हा भौतिक दिक्कालाहून भिन्न असला, तरी त्या

पान क्र. ११९

 

भौतिक दिक्‌कालांत त्याचा (मानसिक अवकाशाचा) प्रवेश होऊं शकतो. ही मानसिक पातळीवरच्या जाणिवेची गोष्ट झाली; याच्या पलीकडे, याच्याहून खोल जी जाणिवेची पातळी आहे, तेथें शुद्ध आध्यात्मिक अवकाशाचा अनुभव आम्हांला येतो; या अनुभवांत काल नाहींच असा भास आम्हांला होऊं शकतो, कारण या शुद्ध आध्यात्मिक अवकाशांत सर्व हालचाल स्थगित झालेली असते, अथवा हालचाल कांहीं होत असली तर ती, कालाचा क्रम आमच्या अनुभवाला न येतां होत असते.

भौतिक अवकाश मागें टाकून आम्ही अंतर्मुख झाल्यावर, या अवकाशाला अतिभौतिक मानसिक अवकाशाचा आधार आहे वगैरे गोष्टी आपण पाहिल्या. आतां, भौतिक कालाच्या पाठीमागें आंत जाऊन, भौतिकांत न गुंततां, त्याजकडे पाहूं लागलों म्हणजे काय दिसतें तें पाहूं. काल स्वत: सत्यवस्तु आहे आणि अनंत व शाश्वत आहे; पण कालाची गति आणि कालाचें आम्हांला प्रत्ययास येणारें मोजमाप, हीं परिस्थितिसापेक्ष आहेत, सर्वत्र सारखीं प्रत्ययास येत नाहींत असा अनुभव भौतिक कालाच्या मागें जाऊन त्यांत न गुंतता कालाकडे लक्ष लावून बघितले असतां आम्हांला येतो. कालाचें आमच्या प्रत्ययास येणारें मोजमाप, एक तर जे ''माप'' आम्ही वापरूं त्यावर अवलंबून असते, शिवाय आमच्या जाणिवेची पातळी कोणती असेल, त्या पातळीवरहि अवलंबून असतें -- मोजमाप घेणारा कोठून मोजमाप घेत आहे त्या स्थानावरहि तें अवलंबून असतें -- जाणिवेच्या पातळीप्रमाणें कालाचा हिशोब, कालाचा क्रम वेगळावेगळा असतो, भौतिक अवकाशांत कालाची गति जी आम्हांला प्रत्ययास येते, ती गति मानसिक अवकाशांत, मानसिक  जाणिवेंत आमच्या प्रत्ययास येत नाहीं; जाणिवेची जी अवस्था मनांत असेल, त्याप्रमाणें कालाची मनाच्या अवकाशांतील गति सावकाशीची किंवा घाईची अशी प्रत्ययास येते. जाणिवेच्या प्रत्येक अवस्थेंत तिचा तिचा काल असतो, तरीहि सर्व अवस्थांतील कालांमध्यें कांहींतरी नातें असतें, संबंध असतात; आम्हांला अनेक कालविषयक अवस्था आहेत, अनेक कालविषयक गती आहेत आणि कालाच्या या अनेक अवस्था आणि अनेक गती एकाच जाणिवेंत एकाच वेळीं एकमेकांबरोबर राहतात, वावरतात असा अनुभव आम्ही भौतिक पृष्ठभागाच्या पाठीमागें गेलों म्हणजे आम्हांला येतो. स्वप्नांतील कालाच्या अनुभवानें ही गोष्ट उघड होते. भौतिक कालाच्या

पान क्र. १२०

 

एका किंवा फार थोड्या क्षणांत स्वप्नांतील घटना, दीर्घ काल  (स्वप्नांतील दीर्घ काळ) टिकणाऱ्या कित्येक घटना एकामागून एक घडून जातात. यावरून हें उघड आहे कीं भिन्न भिन्न काल-अवस्थांमध्यें कांहींतरी संबंध असतो पण या भिन्न कालांच्या मापांत अन्योन्यसंबंध काय असतो, त्याचा पत्ता अद्यापि लागलेला नाहीं. एक गोष्ट मात्र या अनुभवांवरून स्पष्ट दिसते कीं, काल ही कांहीं इंद्रियग्राह्य बाह्य वस्तु नाहीं, नसावी. आमच्या अस्तित्वाची स्थिति आणि गति, यांसंबंधांत आमची क्रियाशील जाणीव आपल्या कृतीनें जी भिन्न भिन्न आंतर परिस्थिति निर्माण करते, त्या परिस्थितीच्या भिन्नतेवर कालविषयक भिन्न भिन्न प्रत्यय अवलंबून असतो. अर्थात् काल ही वस्तु आमच्या जाणिवेची आंतर निर्मिति आहे, याखेरीज कांहीं नाहीं; कालाला बाह्य भौतिक अस्तित्व वस्तुत: नाहीं. अवकाश किंवा आकाश याची स्थिति देखील कालासारखीच दिसते. जड आकाश आणि मानसिक आकाश यांचा परस्परसंबंध पाहतां, आकाशहि जाणिवेचीच आंतर निर्मिति आहे; त्यालाहि बाह्य अस्तित्व नाहीं असें दिसतें. थोडक्यांत, काल आणि आकाश या दोन्ही वस्तू आत्म्याच्या मूळ आत्मविस्ताराच्या अंगभूत अशा वस्तू आहेत : शुद्ध मन हें या वस्तूंना, ज्ञात्याच्या अंतर्गत असणाऱ्या मानसिक क्षेत्राचें स्वरूप देतें. एकाच जाणिवेच्या दोन बाजू असतात : एक ज्ञाता आणि दुसरी ज्ञेय, एक आंतर वस्तु आणि दुसरी बाह्य वस्तु, एक विषयी आणि दुसरा विषय, आंतरिकता आणि बाह्यता. मूळ गोष्ट अशी आहे कीं, विवक्षित काळ अथवा आकाश किंवा विवक्षित आकाश-काळ, हें 'एकरूप द्वन्द्व' ही अस्तित्वाची एक अवस्था आहे; या अवस्थेंत अस्तित्वाची अंगभूत जाणीव आणि शक्ति क्रियाशील असते आणि ही क्रियाशीलता, ही नाना प्रकारची हालचाल, नाना प्रकारच्या घटना व रचना निर्माण करीत असते म्हणा किंवा व्यक्त करीत असते म्हणा; या ज्या घटना, रचना घडविल्या जातात, त्या घडविणारी शक्ति आणि त्याजकडे पाहणारी, त्यांचा अनुभव घेणारी जाणीव, यांचें जें परस्पर नातें आहे, त्याला आम्ही विवक्षित काळ, आकाश किंवा काळ-आकाश हें 'एकरूप द्वंद्व' म्हणतो, मानतों. हें नातें अस्तित्वाच्या स्थितिशील अवस्थेंत स्वभावत: असतें, उदयास येतें; आमची ही अवस्था, आम्हांला कालाचा प्रत्यय कसा व्हावयाचा तें निश्चित करते; कालाची गतिमानता, कालविषयक संबंध, कालाचें माप यांची जाणीव आमच्या-

पान क्र. १२१

 

मध्यें तीच निर्माण करते; कालासंबंधानें मूलभूत सत्य असें आहे कीं, शाश्वत ब्रह्माची शाश्वतता म्हणजेच मूळ अवस्थेंतील काल होय किंवा कालाची मूळ अवस्था होय; आकाशासंबंधानें असेंच आहे. आकाशाचें मूलभूत सत्य अनन्त ब्रह्माची अनन्तता हेंच आहे.

मूळ ब्रह्म आणि मूळ पुरुष शाश्वत आहे; आणि ही त्याची शाश्वतता (काळदृष्ट्या अनन्तता) त्याच्या जाणिवेच्या तीन भिन्न अवस्थांमध्यें व्यक्त होते, व्यक्त होऊं शकते; आपल्या शाश्वततेच्या संबंधांत मूळ पुरुष आपल्या जाणिवेच्या तीन भिन्न अवस्था धारण करूं शकतो. पहिली अवस्था, कालातीत शाश्वततेची; जाणिवेच्या या अवस्थेंत मूळ पुरुष, मूळ आत्मा अचल असतो, त्याचें सारभूत अस्तित्वच या अवस्थेंत एकमेव विद्यमान असतें. या अवस्थेंत हा आत्मा स्वत:मध्यें स्वत:ला विसरण्याइतका मग्न असतो किंवा स्वत:च्या अस्तित्वाखेरीज दुसरें कशाचेंहि भान त्याला नसतें; पण स्वत:मध्यें मग्न होऊन तो स्वत:ला विसरला असला किंवा स्वत:चें एकमेव भान त्याला असलें तरी दोन्हीहि स्थितींत गतीची किंवा घटनेची निर्मिति करणारी किंवा दखल घेणारी जाणीव आत्म्याला असत नाहीं. मूळ आत्म्याच्या जाणिवेची शाश्वताविषयक दुसरी अवस्था जी असते, ती कालातीत नसून कालगत अवस्था असते; या अवस्थेंत पूर्ण काल एकदम जाणिवेचा विषय होतो; कालाची स्थितिशील, स्थायी, स्थिर अवस्था असें या अवस्थेला म्हणतां येईल; या अवस्थेंत नियोजित किंवा आरंभ झालेल्या विश्वप्रदर्शनांतील सर्वच्या सर्व वस्तूंची कालक्रमवार मांडणी ही जाणिवेचा विषय असते -- होऊ घातलेले (नियोजित) व्यक्त विश्व, किंवा होत असलेलें व्यक्त विश्व, समग्र साधना जाणणारी जाणीव, मूळ आत्म्याच्या जाणिवेच्या या दुसऱ्या अवस्थेंत असते. आम्ही भूत, वर्तमान, भविष्य असे घटनांचे विभाग पाडतो; हे सर्व विभाग या समग्रदर्शी जाणिवेंत एकत्र उभे असतात व एकत्र एकदम जाणिवेचा विषय होतात. नकाशांत किंवा नियोजित रचनेच्या रेखाचित्रांत सर्व गोष्टी आपल्या नजरेसमोर एकदम येतात त्याप्रमाणें कालाचा सर्व पसारा ही समग्र जाणीव एकदम बघूं शकते; कलाकार, चित्रकार, स्थापत्यकार आपल्या मनांत नियोजित कलाकृतीचें, चित्राचें, वास्तूचें क्रमवार, तपशीलवार रचनेचे दृश्य एकदम बघतो, तशी आत्म्याची ही समग्र जाणीव भूत, वर्तमान, भविष्यकालीन सर्व नियोजित व्यक्त विश्व एका दृष्टिक्षेपांत जाणते. आम्हांला कालाचें

पान क्र. १२२

 

असलें समग्र दर्शन सामान्यत: घडत नाहीं. घटना एकामागून एक घडतात तशा त्या एकामागून एक आमच्या मर्यादित जाणिवेला ज्ञात होतात. भूतकालीन घटनांच्या बाबतींत मात्र एका दृष्टिक्षेपांत सर्व भूतकाल -- आम्हांला ज्ञात असलेला भूतकाल -- आम्ही एकदम बघूं शकतो. तथापि समग्रदर्शी, समग्रकालस्पर्शी जाणिवेची अवस्था केव्हां केव्हां आम्हांला प्राप्त होते; अपवादभूत अशीच ती आमच्या बाबतींत असते, पण या अपवादभूत प्रसंगावरून अशी समग्रदर्शी जाणीव असू शकते ही गोष्ट सिद्ध होते. आत्म्याच्या जाणिवेची तिसरी अवस्था म्हणजे, कालाची गतिशील अवस्था होय. या अवस्थेंत आत्म्याची जाणीवशक्ति क्रमाक्रमानें घटना घडवीत असते -- ज्या घटना स्थितिशील कालाच्या समग्र दर्शनांत जाणिवेला एकदम दिसतात, त्याच घटना क्रमवार घडविण्याचें व क्रमवारीनें पाहण्याचें काम या तिसऱ्या अवस्थेंत जाणीव करीत असते. जाणिवेच्या या तीन अवस्था एकाच शाश्वत अनंत वस्तूच्या आहेत. सर्व गति देखील या एका शाश्वत वस्तूंतच होते; स्थितिशील, नित्य अनंत वेगळें आणि गतिशील, नित्य अनंत वेगळें अशी वस्तुस्थिति नाहीं. या अनन्ताकडे पाहतांना, जाणीव वेगळी वेगळी बैठक घेऊन बघते. या बैठकीच्या वेगळेपणामुळें स्थितिशील अनन्त वेगळें आणि गतिशील अनन्त वेगळें असा भास होतो. जाणिवेला सर्व कालविकसनाची क्रिया, त्या क्रियेच्या बाहेर राहून, त्या क्रियेच्या पातळीच्या वरतीं राहून बघतां येते, ही जाणिवेची एक शक्ति, एक बैठक; तिची दुसरी शक्ति व बैठक अशी कीं, कालविकसनव्यापाराच्या पोटांत स्थायी आसन ती मांडूं शकते; या आसनावरून वर्तमानाबरोबरच ती, ज्या निश्चित नियोजित क्रमानें भूत आणि भावी घटना घडावयाच्या असतात, घडलेल्या असतात, घडत असतात त्या सर्व एका दृष्टिक्षेपांत पाहूं शकते. जाणिवेची तिसरी शक्ति व बैठक : काल-विकसन-चळवळींत स्वत: ती अस्थायी गतिशील ''बैठक'' घेऊं शकते. गतिमान कालाबरोबर जाणीव गतिमानता स्वीकारते; कालाचे एकामागून एक क्षण जसे वाट चालतात, तशी जाणीवहि त्यांच्याबरोबर वाटचाल करीत राहते आणि घडून गेलेल्या गोष्टी भूतकालांत जमा होतांना आणि घडून न गेलेल्या परंतु पुढें घडणाऱ्या गोष्टी भविष्यकालांतून तिजकडे येतांना ती पाहते; जाणीव आपल्या गतिशील बैठकीवरून हा उद्योग करते किंवा एखाद्या क्षणावर आल्यावर, त्या क्षणावर बैठक मारून सर्व

पान क्र. १२३

 

लक्ष त्यांतील घटनेवर केन्द्रित करते, अर्थात् या केंद्रीकरणामुळें त्या क्षणीं आणि त्याच्या निकटच्या मागल्या पुढल्या क्षणीं काय घडलें असेल, घडत असेल, घडणार असेल एवढेंच तिला दिसतें, दुसरें कांहीं दिसत नाहीं. अनंत पुरुषाची जाणीव या तीनहि बैठकी एकाच वेळीं घेऊं शकते; अनंत पुरुषाला या तीन बैठकींतील अनुभव एकाच वेळीं येऊं शकतात, या तीन बैठकींतून दिसणाऱ्या भिन्न भिन्न घटना अनंताला एका दृष्टिक्षेपांत पूर्णतया दिसूं शकतात. अनंत पुरुषाला कालाकडे, कालाच्या आंतून व बाहेरून पाहतां येतें. कालाच्या प्रवाहांत न सांपडतां, कालाच्या प्रवाहाच्या सर्वस्वी पलीकडे राहून, कालाचें निरीक्षण अनन्ताला करतां येतें; कालाचा गतिमान संसार उभा करूनहि कालातीत तत्त्व कालातीतच राहतें, हें सर्व अनन्ताला दिसतें, कालाचा गतिमान संसार सर्व एका दृष्टिक्षेपांत बघणें, किंवा गतिमान दृष्टीनें कालाची सर्व गतिमान करणी बघत राहणें या दोन्ही गोष्टी अनंत पुरुष करूं शकतो; कालाच्या क्षणाक्षणांत जें दर्शन त्याला घडतें, त्याची जी दृष्टि बघते, त्या दर्शनांत आणि दृष्टींत अनंत पुरुष आपलें अनंतत्व अंशत: भरूं शकतो. या वर सांगितलेल्या सर्व क्रिया एकाच वेळी अनंत पुरुष करूं शकतो आणि करतो. आमची जाणीव मर्यादित क्षणाला बांधलेली; तिला अनंताचें हें समकालीन, एककालीन होणारें, अनेक भिन्न व्यवहारांचें संचालन आणि निरीक्षण उमजत नाहीं. अनंताची मायेची अद्भूत जादुगिरी, असेंच आमची मर्यादित जाणीव अनंताच्या या व्यवहाराला नांव देते; आमच्या जाणिवेला सुसंवादित्व संभाळून काम करावयाचें, तर मर्यादा घालून घटना पहाव्या लागतात; एका वेळीं एक अवस्था शक्य आहे आणि युक्त आहे असें आमच्या जाणिवेला वाटतें. एका वेळी अनेक अवस्था, अनेक बैठकी घेऊन अनंत पुरुष काम करतो ही कहाणी आमच्या जाणिवेला घोटाळ्यांत पाडणारी आहे; या कहाणींत तिला सुसंगति दिसत नाहीं; ही सर्व अवास्तव मिथ्या कथा आहे असें तिला वाटतें. पण जी जाणीव अनंत आहे तिला समग्र समकालीन सर्व दर्शन, सर्वानुभूति ही गोष्ट कांहीं अनुपपन्न नाहीं, अगदीं तर्कशुद्ध व्यवहाराची आहे, अगदीं पूर्णपणें सुसंगत आहे. अनेक भिन्न व्यवहार हे, अनन्ताच्या एका समग्र दर्शनाचे घटक होऊं शकतात. एकच मूळ वस्तु अनेक तऱ्हेचीं रूपें घेऊन प्रकट होत आहे, एका मूळ सत्य वस्तूच्या अनेक सहयोगी पैलूंचें विविध दर्शन घडत आहे अशी वस्तुस्थिति असल्यानें, अनन्त

पान क्र. १२४

 

पुरुषाच्या समग्र पूर्ण दृष्टीला या दर्शनासाठीं एक दृष्टिक्षेप पुरतो -- सर्व विविधता त्याचीच करणी असल्यानें आणि त्याची दृष्टि, जाणीव अप्रतिहत, सर्वगामी असल्यानें आम्हांला जे अतर्क्य, तें त्याला तर्कशुद्ध व सहज व्यवहारांतलें आणि म्हणून सुकर असतें.

एकच एक सद्वस्तु आपलें स्वरूप प्रकट करतांना एकाच वेळीं अनेक रूपें घेते, अनेक अवस्था एकाच वेळीं धारण करते ही गोष्ट जर घडूं शकते, तर कालातीत अनंत आणि कालस्पर्शी अनंत एकाच वेळीं अस्तित्वांत असणें अशक्य असूं शकत नाहीं. अनंत वस्तु एक आणि तिजकडे पाहण्याचे दृष्टिकोन दोन; अनन्त स्वत:कडे दोन भिन्न दृष्टिकोनांतून बघतें, अशी कालातीत अनंत आणि कालस्पर्शी अनंत यांची एकता आहे आणि म्हणून त्यांच्यांत अन्योन्यविरोध नाहीं. मी कालातीत आहे, मी कालव्यापी आहे अशी अनन्त पुरुषानें स्वत:विषयीं दोन विधानें करणें आणि त्या विधानांत दर्शविलेल्या अवस्था स्वीकारणें या व्यवहारांत अन्योन्यविरोध कोठें येणार ? कालदृष्टया व स्थलदृष्ट्या अनंत आणि कालस्थलातीत अनंत अशा पुरुषाला दोन प्रकारची आत्म-जाणीव असते आणि या जाणिवेंत शक्ति असते. एक शक्तियुक्त जाणीव, स्थितिशीलता आणि अव्यक्तता धारण करण्याची आणि दुसरी शक्तियुक्त जाणीव, स्वयंसंचालित क्रियेची, हालचालीची, आत्म-अभिव्यक्तीची. या दोन समर्थ जाणिवा अनंताचे ठिकाणीं एककालीन वा समकालीन असतात. आमच्या पृष्ठभागीय मर्यादित जाणिवेला अनंताच्या या दोन समकालीन जाणिवा अन्योन्यविरोधी वाटणें स्वाभाविक आहे, परंतु या जाणिवा समकालीन असणें ब्रह्माचे ठिकाणीं -- अनन्त आत्मज्ञान आणि सर्वज्ञान जिचें स्वरूप आहे त्या ब्रह्माच्या मायेच्या ठिकाणीं -- स्वाभाविक आहे, अगदीं अंगभूत आहे; जें ब्रह्माला स्वाभाविक तें ईश्वराला, सच्चिदानंदाला तितकेंच स्वाभाविक. सच्चिदानंद हें स्वयंभू मूळ तत्त्व; त्याचेहि ठिकाणीं मूळ जाणीवशक्ति असते; ईश्वर हा अनन्त ज्ञानयुक्त आणि ज्ञानशक्तीनें संसार उभा करणारा -- ब्रह्म, ईश्वर, सच्चिदानंद या समकालीन अवस्था एका अनंताच्या आहेत -- याच्या ज्ञानशक्ती सामान्यत: माया या शब्दानें दाखविल्या जातात. या मायेच्या सामर्थ्यानें कालातीत आणि कालव्यापी अशी दोन रूपें ब्रह्म-ईश्वर-सच्चिदानंद-स्वरूपी अनंत पुरुष एकाच वेळीं धारण करून, शांत शांत स्थितिशील पायावर आपल्या गतिशील अंगानें

पान क्र. १२५

 

सारखा गतिमान असणारा विविध प्रकारचा चराचरांचा संसार उभा करतो, चालवितो, अव्यक्तांत घालवितो, पुन: व्यक्तांत उभा करतो, चालवितो. -- ''अघटितघटनापटीयसी'' |  मानवी मनाला अघटित वाटणारी घटना घडविण्यांत अतिप्रवीण अशी मायेची ''सत्यकथा" वेदान्तात कथन केलेली आहे.

पान क्र. १२६

 

 

प्रकरण तिसरें

ब्रह्म आणि जीव

 

      तो मी आहे.

- ईश उपनिषद् श्लोक १६

 

माझाच नित्य अंश जीव लोकामध्यें जीव झाला आहे...... देहामध्यें असणारा, भोग घेणारा, देहांतून निघून जाणारा ईश्वर ज्ञानचक्षूला दिसतो.

- गीता १५-७,१०.

 

एकाच वृक्षावर दोन पक्षी आहेत, या वृक्षाला घट्ट धरून बसले आहेत; ते सुंदर पंखाचे पक्षी आहेत, ते एकमेकांचे मित्र आणि साथी आहेत. या दोघांपैकीं एक त्या वृक्षाचें गोड फळ खातो, दुसरा पक्षी त्याजकडे बघत राहतो, फळ मात्र खात नाहीं.... सर्वांचा मालक, जगाचा पालक जो ईश्वर त्यानें, त्या सर्वज्ञानें, मला अज्ञाला स्वत:जवळ, स्वत:च्या छत्राखालीं घेतलें -- पंख असलेले (पक्ष्याप्रमाणें भराऱ्या मारणारे) जीवात्मे, ''ईश्वराच्या अमरत्वांत आमचाहि वांटा आहे'' या ज्ञानाचा त्यांना लागलेला शोध जेथें उद्‌घोषून सांगत भराऱ्या मारतात, तेथें सर्वज्ञ जगत्पालकानें मला अज्ञाला आपला म्हणून आपल्या छत्राखालीं घेतलें.

- ऋग्वेद १-१६, ४-२०,२१.

 

विश्वांत सर्वश्रेष्ठ मूलभूत सत्य हें आहे कीं, सर्वत्र एकसमयावच्छेदेंकरून असणारी एक सद्‌वस्तु विश्वांत आहे, ही सत्यवस्तु व्यक्त विश्वपसाऱ्याच्या वर आहे, तशीच ती या पसाऱ्यांतहि आहे; दोहींकडे ती सर्वगामी आहे, शिवाय प्रत्येक जीवांत ती 'अंतर्यामि' रूपानें आहे. ही अव्यक्त सद्‌वस्तु स्थितिशील निश्चल आहे, पण या सर्वगामी निश्चल सद्‌वस्तूचे ठिकाणीं गतिशील शक्ति आहे; तिचे ठिकाणीं जी अनंत जाणीव-

पान क्र. १२७

 

शक्ति आहे ती निर्मितीचें, अव्यक्त सद्‌वस्तूच्या अव्यक्त रूपाला व्यक्त रूप देण्याचें कार्य करीत असते. अनन्त जाणीवशक्ति आत्मअभिव्यक्तीचें जें कार्य करीत असते, त्या कार्याच्या ओघांत ती जडामध्यें उतरून तेथें दर्शनी नेणिवेचें रूप घेते; जीव या नेणिवेच्या पातळींतून जागृतींत येतो, नेणिवेंत झोंपलेला जीव जागृतींत येऊन विकासाच्या मार्गाला लागतो; या जीवाचा विकास होत होत मूळ सद्‌वस्तूची आध्यात्मिक अतिमानसिक जाणीव आणि सामर्थ्य त्याला प्राप्त होतें; या जीवात्म्याचा जो विश्वचालक आणि विश्वातीत आत्मा, जो जीवात्म्याच्या उगमस्थानीं असतो तो आत्मा (परमात्मा) हाहि विकासक्रमांत जीवात्म्याला प्राप्त होतो; जीवात्मा विकासक्रमाचे अन्तीं या परमात्म्यांत प्रवेश करतो, परमात्मारूप होतो. हा परमात्मा, म्हणजेच मूळ सद्‌वस्तु होय. आमच्या पार्थिव अस्तित्वांत सत्य काय आहे, पार्थिव निसर्गाच्या क्षेत्रांत आम्हांला दिव्य जीवन शक्य आहे कीं नाहीं, शक्य असल्यास किती प्रमाणांत शक्य आहे या संबंधाच्या आमच्या कल्पना आम्ही, जीवविकासविषयक आतांच वर्णिलेल्या वस्तुस्थितीच्या पायावर उभ्या करावयास हव्यात. या बाबतींत मुख्य गरज आहे ती, अचेतन जडांतून उदय पावणाऱ्या अज्ञानाचा खरा उगम आणि खरें स्वरूप काय आहे त्याचा शोध घेण्याची. जडघटित देहांत जें अज्ञान आपलें अस्तित्व प्रकट करतें, त्याचें खरें उगमस्थान व खरें स्वरूप शोधून काढण्याची आणि त्याच्या जागीं ज्या ज्ञानाची उभारणी किंवा मांडणी करावयाची त्या ज्ञानाचें स्वरूप काय, याचा शोध घेण्याची गरज दिव्य जीवनाचा विचार करतांना प्रथम महत्त्वाची आहे. निसर्ग त्याच्यांतील अव्यक्त गोष्टी क्रमानें व्यक्त रूपांत आणीत असतो; या निसर्गव्यापाराची प्रक्रिया काय आहे, त्याचा शोध लावणें आणि जीवात्मा आपली जी स्वाभाविक उच्च अवस्था पुन्हां मिळवितो, या आत्मोद्धाराची प्रक्रिया काय आहे त्याचा शोध लावणें या गोष्टीहि प्रथम महत्त्वाच्या आहेत. ज्या ज्ञानानें आमच्यांतील अज्ञानाची जागा घ्यावयाची असतें, तें ज्ञान अज्ञानाच्या पोटांतच लपलेलें असतें; तें स्वत:च स्वत:ला प्रकट करीत असतें, तें कांहीं नवीन मिळवावयाचें नसतें; त्याच्यावर जें आवरण असतें तें दूर करण्याचाच फक्त प्रश्न असतो; तें ज्ञान शिकावें लागत नाहीं. आत्मविकास आम्हांला अन्तरांत आंत आंत जसा घेऊन जातो आम्हांला उंच उंच जसा घेऊन जातो तसें ज्ञान स्वतःच स्वत:ला अधिकाधिक अंशानें

पान क्र. १२८

 

प्रकट करीत असतें. विकास म्हणजे आवरणांचा क्रमश: विनाश. ज्ञानाच्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून प्रथम एक अडचण दूर करूं. अडचण अशी आहे : आमच्यामध्यें ईश्वर (ब्रह्म) अंतर्यामित्वानें आहे. आमची वैयक्तिक जाणीव ही, ईश्वरत्वाचा, ब्रह्मत्वाचा आमच्यामध्यें क्रमश: विकास, क्रमश: अभिव्यक्ति होण्याचें साधन आहे; या गोष्टी मान्य केल्या तरी जीवात्मा कोणत्याहि अर्थानें शाश्वत आहे ही गोष्ट मान्य करणें जड जाते; जीवात्म्याला आत्मज्ञान होऊन आणि एकच एक जें ब्रह्म त्यांत प्रविष्ट होऊन तो मुक्त झाला, तरीहि तो व्यक्ति म्हणून मुक्तिनंतरहि असतो ही गोष्ट मान्य करणें जड जाते.

ही अडचण तर्कबुद्धीची आहे. तार्किक बुद्धीहून विशाल आणि सर्वगामी प्रकाशमय बुद्धीच्या आश्रयानें ही अडचण दूर करणें शक्य आहे आणि अवश्य आहे. आध्यात्मिक अनुभव ही अडचण निर्माण करीत असेल तर, श्रेष्ठतर विशालतर आध्यात्मिक अनुभव ती दूर करूं शकेल. तार्किक मनाला शब्दयुद्ध संवयीचें असतें. असें शब्दयुद्ध (वाद-प्रतिवाद) करूनहि वरील अडचण दूर करतां येण्यासारखी आहे, पण ही रीत अगदीं कृत्रिम; पुष्कळ वेळां हें वाग्युद्ध निष्फळ होतें आणि नेहमींच तें अंतिम निर्णय न लावणारें असतें. याचा अर्थ तर्कशुद्ध युक्तिवाद निरुपयोगी वस्तु आहे असा नाहीं. असा वाद उपयोगी आहे, अवश्यहि आहे पण जें तर्कवादाचेंच क्षेत्र असेल तेथें तो उपयोगी आणि अवश्य असतो; या वादविवादानें मनाचा, त्याच्या कल्पना आणि प्रतीकरूप शब्द वापरतांना, गोंधळ उडण्याची शक्यता कमी होते; त्याला ते रेखीवपणें, अचूकपणें वापरतां येतात, त्याला ते वापरण्यांत शब्दपटुत्व व सूक्ष्म अर्थग्राहकता दाखवितां येते. शब्दांच्या आणि कल्पनांच्या बाबतींत मन तर्कशुद्ध युक्तिवादाच्या अभ्यासानें असंदिग्धता, अचूकपणा आणि सूक्ष्मता शिकलें म्हणजे या गुणांचा सत्यनिर्णयाच्या कामीं त्याला फार उपयोग होतो. निरीक्षण आणि अनुभव आमच्यापुढें  ''सत्यें'' उभीं करतात; भौतिक इंद्रियांनीं, मनानें, आत्म्याच्या द्वारां आम्ही ''सत्यें'' पहात असतो; या सत्यांच्या यथार्थ ग्रहणाच्या आड अनेक गोष्टी येऊं शकतात; आमची सर्वसाधारण मानवी बुद्धि, अनेक संदेहांनीं आणि गोंधळांनीं पछाडलेली असते; दिसते तें सर्वच खरें आहे असें मानण्याकडे तिचा कल असतो; अर्धवट सत्य तिला भलत्या मार्गाला नेऊं शकतें; तिच्या घाईमुळें अर्धवट सत्य तिला भलता निर्णय

पान क्र. १२९

 

घ्यावयास लावूं शकतें; तिचे निर्णय अत्युक्तिपूर्ण होऊं शकतात; विशिष्ट भावनांमुळें व विशिष्ट बौद्धिक घडणीमुळें पक्षपात करण्याकडे तिची प्रवृत्ति होऊं शकते. एक सत्य दुसऱ्या सत्याशीं, याप्रमाणें अनेक सत्यें जोडीत जोडीत पूर्ण ज्ञान आम्ही मिळवूं शकतो -- पण सत्यें जोडण्यांत आमची सामान्य मानवी बुद्धि योग्य पात्रतेच्या अभावीं घोडचुका करते; आमच्या सामान्य मानवी बुद्धीकडून सत्यग्रहणाचें कार्य, तिच्यांतील आतां सांगितलेल्या दोषांमुळें, व्हावें तसें न होण्याचा फार फार संभव असतो, आमची बुद्धि तर्कशुद्ध युक्तिवादाच्या अभ्यासानें, शब्दांच्या आणि कल्पनांच्या व्यवहारांत असंदिग्धता, अचूकपणा व सूक्ष्मता शिकली म्हणजे हा संभव पुष्कळच कमी होतो. सामान्य मनाला अशी संवय असते कीं, जें सत्य त्याला दिसतें त्या सत्यालाच, अनेक प्रमादांचा व असत्यांचा जनक बनवावयाचें. या संवयीच्या कचाट्यांतून सुटावयाचें, तर मनाला निःसंदिग्ध, निर्मळ, सूक्ष्म, लवचीक बनवावयास हवें. अर्थात् ही किमया तर्कशुद्ध वादविवादानें बऱ्याच प्रमाणांत होऊं शकते. एकदां कां स्वच्छ व तर्कशुद्ध विवेचनाची संवय लागली, म्हणजे मनांतला गोंधळ दूर होऊन, रेखीव व अचूक विचार करण्याची शक्ति वाढते आणि तत्त्वज्ञानांत वाद-प्रतिवादाची पद्धति परिणामकारक रीतीनें वापरतां येते. याच कारणाकरितां विश्वविषयक व ईश्वरविषयक ज्ञानाची पूर्वतयारी, तर्कशुद्ध विवेचनाच्या संवयीमुळें फार चांगली होते हें मान्य केलें पाहिजे. परंतु केवळ तर्कशुद्ध युक्तिवाद हा विश्वाचें किंवा ईश्वराचें ज्ञान करून देण्यास पुरा पडत नाहीं, भिन्न भूमिकांवर भिन्न आध्यात्मिक अनुभव येतात; ते अनुभव अन्योन्य सुसंवादी आहेत ही गोष्टहि तर्क ठरवूं शकत नाहीं. खालच्या भूमिकेवरील आध्यात्मिक अनुभव आणि वरच्या भूमिकेवरील आध्यात्मिक अनुभव यांत तर्काला सुसंवादित्व सांपडणें कठीण होतें. या दोन अनुभवांत संगति दाखविण्याचें काम हें, ईश्वरविषयक आणि विश्वविषयक ज्ञान मिळविण्याच्या कामापेक्षांहि तर्काला अवघड जातें. आमच्याकडून सत्याच्या शोधांत चुका न व्हाव्या ही गोष्ट तर्काला चांगली साधते; पण सत्याचा लाभ केवळ तर्क आम्हांला करून देऊं शकत नाहीं. नवीन सत्याचा आविष्कार करण्याच्या कार्यापेक्षां शोधाची, संशोधनाची व मूल्यमापनाची प्रक्रिया बिनचूक करण्याचें कार्य फक्त तर्काला अधिक परिणामकारक रीतीनें करतां येतें. आम्हांला जें ज्ञान अगोदरच मिळालेलें आहे, त्याच्या आधारावर,

पान क्र. १३०

 

सामान्य सिद्धांतावरून विशेष सिद्धान्त प्रस्थापित करण्याच्या अनुमानपद्धतीचा आश्रय करून, तर्क देखील कांहीं नवीन सत्यें अनपेक्षित रीतीनें हुडकून काढूं शकतो, ही गोष्ट येथें नमूद केली पाहिजे पण या सत्यांचें सत्यत्व केवळ तर्कानें सिद्ध होत नाहीं; तर्काला अनुभवाची जोड द्यावी लागते. तर्क एवढेंच सांगूं शकतो कीं, अनुभवानें अमुक विशेष सिद्धान्त खरा निघावा असें दिसतें. अनुभव आणि तर्क यांचें सहकार्य झालें, म्हणजे सिद्धान्त नि:संदेहपणें मान्य करतां येतो. तर्कापेक्षां श्रेष्ठ आणि विशाल अशा सत्यस्पर्शी सत्यदर्शी शक्ती आमच्या अंतरंगांत आहेत, त्यांच्यापुढें तर्क हा, त्याच्या पद्धतीनें शोधलेलीं सत्यें खरीं कीं खोटीं हें ठरविण्याकरितां मांडीत असतो. सत्यांच्या शोधांत आणि प्रस्थापनेंत तर्काचें स्थान आहे पण तें गौण आहे ही गोष्ट वरील विवरणावरून दिसेल. वस्तूंमध्यें जे भेद असतात त्यांच्यावर तर्कशास्त्र जोर देतें; भेदांचा विचार करून तें आपलें सिद्धान्त बसवितें; भेद शोधून काढून, सत्याच्या शोधाचें कार्य तर्कशास्त्र करीत असतें. या प्रकारच्या तर्कशास्त्राच्या विचारसरणीची बुद्धीला संवय झाली, म्हणजे एकता-साधक जें ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या क्षेत्रांत अशा तार्किक संवयीच्या बुद्धीला काम करणें जड जातें, विश्लेषणाची, वियोजनाची, भेदनिर्मितीची संवय झालेली तार्किक बुद्धि, ज्या क्षेत्रांत संश्लेषण, संयोजन, भेदनिराकरण हे मुख्य आहे त्या क्षेत्रांत एकप्रकारें अडचणच होऊन बसते. बुद्धीनें भेदनिष्ठा कह्यांत ठेवून अनुभवाकडे केवळ शुद्ध सत्यनिष्ठेनें बघावें, तेव्हांच तिला एकता-साधक ज्ञानाच्या सूक्ष्म क्षेत्रांत सत्यग्रहण करतां येतें. असो. व्यक्तीला विश्वगत एकतेचा आणि विश्वातीत एकतेचा अनुभव येतो, त्यावेळी तर्कमय भेदानें बुद्धि गोंधळून जाते. या सामान्य बुद्धीच्या, एकतेच्या अनुभवाच्या प्रसंगीं सत्यग्रहण-विषयक ज्या अडचणी असतात, त्यांचा आपण विचार करणार आहोंत आणि हा विचार अशासाठीं करणार आहोंत कीं, या अडचणींचें खरें मूळ आमच्या लक्षांत यावें व या अडचणींतून मार्ग कसा काढावयाचा तेंहि आम्हांस कळावे. याप्रमाणें आमची तयारी झाली म्हणजे, विश्वाशीं आणि विश्वातीत तत्त्वाशीं व्यक्तीची एकता असल्याचा जो अनुभव येतो तो वस्तुत: कोणत्या स्वरूपाचा आहे हें आम्हांला कळेल; तसेंच सर्व जीवांशीं व्यक्ति एकरूप होते, ब्रह्म जे अनंत आहे, त्या ब्रह्माच्या अद्वैताचा व्यक्ति भोग घेते,

पान क्र. १३१

 

अद्वैताच्या बैठकीवर विराजमान होते -- अर्थात् व्यक्तीची परमोच्च विकासावस्था तिला लाभते -- म्हणजे खरोखरी काय होतें हेंहि आम्हांस कळेल.

बुद्धीची पहिली अडचण अशी कीं, व्यक्तीचा आत्मा आणि अहंकार एकच वस्तु आहे असा बुद्धीचा समज, अहम्‌चे आत्म्याशीं तादात्म्य गृहीत धरण्याच्या संवयीनें दृढ झाला आहे; अर्थात् अहम्‌च्या ज्या मर्यादा त्याच आत्म्याच्या मर्यादा, अहम् ज्या गोष्टींना स्वत:मध्यें अन्तर्भूत करीत नाहीं, त्या गोष्टी आत्म्यांतहि अंतर्भूत होत नाहींत, असा बुद्धीचा दृढ संवयीचा समज आहे. हा समज खरा धरून चालल्यास व्यक्ति अहम्‌च्या पलीकडे जाणें, म्हणजे तिनें आपलें अस्तित्व नष्ट करणें असेंच होणार; आमचा जीवनहेतु म्हणजे 'अहम्', आत्मा आहे; हें जर खरें असेल, तर आमच्या ''अस्मितेचा'' लय विश्वव्यापी जड द्रव्यांत करून टाकणें किंवा जड द्रव्याखेरीज असलेल्या प्राण, मन, आत्मा या व्यापक वस्तूंपैकीं कोणत्या तरी वस्तूंत आमच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा आत्यंतिक लय करणें हा आमचा जीवनहेतु होणार : किंवा आणखी कांहीं निर्विशेष निर्गुण वस्तु असेल, अहम्-विशिष्ट नाना गुण, नाना विशेष जेथून निघाले अशी कांहीं जड, प्राण-मन-आत्मा यावेगळी निर्विशेष वस्तु असेल, तर तींत आमच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा आत्यंतिक लय करणें, हा आमचा जीवनहेतु असणार -- जर अहम् आणि आत्मा एक असेल आणि अहम्-चें जीवन आम्हांला दु:खमय, क्षुद्र म्हणून त्याज्य वाटत असेल तर. असो. आतां, अहम् ही काय वस्तु आहे, भेदाचा जोरदार असा अनुभव देणारी, मी वेगळा, हे सर्व जीव वेगळे असा ''आत्मानुभव'' देणारी ही अहम् नांवाची वस्तु वस्तुत: काय आहे याचा विचार करूं : सूक्ष्म विचारांनीं हें स्पष्ट दिसतें कीं, अहम् ही वस्तु मूलभूत सत्य नाहींच. आमच्या जाणिवेचें तें एक व्यवहारासाठीं निर्मिलेलें रूप आहे; निसर्गाच्या ज्या क्रिया आमच्यामध्यें होत असतात, त्यांना केन्द्रिभूत करण्यासाठीं, त्यांच्या सोईसाठीं एक केंद्रस्थान असावें, म्हणून अहम् या वस्तूची निर्मिति केलेली आहे. आमच्या कांहीं मानसिक, प्राणिक व शारीरिक अनुभवांची एक ''मूर्ति'' आमच्या अस्तित्वाच्या इतर अंगांपासून अलग होते आणि या अलग झालेल्या अनुभवघटित मूर्तीला ''मी'', निसर्गांत वावरणारा ''मी'' असें आम्ही मानतों व म्हणतो. आमच्या व्यापक अस्तित्वाची व्यक्तिमर्यादित ''विभूति'', आमच्या व्यापक सत्तेनें, पुरुषानें धारण केलेली व्यक्तिरूप आकृति, असें ''मी'' चें

पान क्र. १३२

 

खरें स्वरूप आहे. याप्रमाणें आमच्या व्यापक अस्तित्वाचा एक अंश, हें जरी ''मी''चें खरें स्वरूप आहे, तरी हें अंशरूप, आम्हांला ''सर्व मी'' आहे असें वाटतें आणि हा ''मी'' अस्तित्वांत आहे तोपर्यंतच आम्ही अस्तित्वांत असतो, आमचें अस्तित्व किंचित्काल टिकणारें आहे, तसेंच कालगत अस्तित्वच फक्त आम्हांला आहे (कालातीत अस्तित्व आम्हांला नाहीं) असा आमचा समज होतो; असाहि समज होऊं शकतो की, व्यक्तित्व निर्मिणारा, व्यक्तित्वाला आधार होणारा असा कोणी संभवत: अमर परंतु व्यक्तित्वानें मर्यादित असा पुरुष म्हणजे ''आम्ही,'' आमचा  ''मी''. अहम्‌चा आमचा अनुभव या प्रकारचा असतो, अहम्‌ची आमची कल्पना या प्रकारची असते. सामान्यत: आमच्या व्यक्तिगत अस्तित्वासंबंधाचें एवढेंच ज्ञान आम्हांला असतें.

परंतु अखेर आम्हांला हें मान्य करावें लागतें कीं, आमचें व्यक्तिरूप हें केवळ बाह्य वा पृष्ठभागाचें रूप आहे, व्यवहारासाठीं निवडलेलें तें अनुभव-संघटन आहे. मर्यादित असें हें जाणीवयुक्त संघटन (व्यक्तिरूप) एका देहांतील जीवनाच्या अल्पकालिक उपयोगासाठीं आहे, किंवा फार तर अनेक क्रमवार येणाऱ्या देहांतील क्रमवार जीवनांच्या सोईसाठीं त्या जीवनांतून नित्य बदलणारें, नित्य विकास पावणारें असें अनुभव-संघटन म्हणजे आमची ''व्यक्ति'' होय, ही गोष्ट अखेर आमच्या लक्षांत येते; या वैयक्तिक मीच्या पाठीमागें एक जाणीव, एक पुरुष असतो; तो वरील व्यक्तिरूपानें किंवा अनुभवसंघटनानें बांधला जात नाहीं, मर्यादित होत नाहीं; उलट हा पुरुष त्या व्यक्तीला आधारभूत असतो, तिचें स्वरूप निश्चित करतो, तिच्या पलीकडे तिला पोटांत घेऊन तो वावरणारा असतो. व्यक्तिरूप बनविण्यासाठीं ज्या अनुभवांतून तो कांहीं भाग निवडून घेतो, तो त्याचा अनुभव म्हणजे विश्व-मूर्तीचा, विश्व पुरुषाचा एकंदर अनुभव होय. तेव्हां आमचें व्यक्तिरूप जें अस्तित्वांत येतें आणि टिकतें त्याला मूळ दोन गोष्टी असतात; एक गोष्ट विश्वाचें अस्तित्व आणि दुसरी गोष्ट एक जाणीव किंवा पुरुष जो या विश्व-अस्तित्वाचा उपयोग करतो, जो या विश्वाच्या अस्तित्वांतून शक्य तीं व्यक्तिरूपें उभीं करण्याकरितां अनुभवांचे संघात निवडतो. आम्हांला व्यक्तित्वाचा जो अनुभव येतो, तो अनुभव येण्यासाठीं पुरुष आणि विश्वगत अनुभवद्रव्य या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात, हें याप्रमाणें सिद्ध होतें. व्यक्तिरूप अनुभवसंघाताची उभारणी करणारा हा पुरुष नष्ट झाला, कोठेंतरी विलीन झाला,

पान क्र. १३३

 

त्यानें आपल्या या अस्तित्वाचा कसा तरी अंत केला, तर त्यानें निर्माण केलेलें व्यक्तित्व नाहींसें होतें -- कारण या व्यक्तित्वाला त्या पुरुषरूप वस्तुतत्त्वाचा आधार असतो म्हणूनच तें टिकतें. पुरुष राहिला आणि विश्व-अस्तित्व नष्ट झालें, तरी व्यक्तिमत्वाची तीच गति होते; कारण विश्वाचा अनुभव हें तर व्यक्तित्वाच्या रचनेसाठीं अवश्य लागणारें द्रव्य आहे. तेव्हां आमचें व्यक्तिगत अस्तित्व दोन घटकांवर अवलंबून आहे हें आम्हीं लक्षांत बाळगलें पाहिजे. एक घटक विश्वाचें अस्तित्व आणि दुसरा घटक व्यक्तिरूप निर्माण करणारी जाणीव किंवा पुरुष. आम्हांला जो आत्म-अनुभव म्हणून येतो, आम्हांला जो विश्व-अनुभव येतो त्याला कारण विश्वांतर्गत विशिष्ट जाणीव किंवा पुरुष होय.

या पुरुषासंबंधानें आणखी असें अनुभवास येतें कीं, हा आमचें व्यक्तित्व निर्माण करणारा, व्यक्तित्वाचा आत्मा असणारा पुरुष, सर्व विश्व व्यापतो, दुसरे सर्व प्राणी आपल्यांत समाविष्ट करतो; स्वत:चा जाणीवपूर्वक विस्तार करून, सर्व चराचर, सर्व विश्व तो आपल्या अस्तित्वाच्या पोटांत घेतो, विश्वाच्या अस्तित्वाशीं तो एकरूप होतो, विश्वाशीं तो एकरूपता अनुभवतो. याप्रमाणें स्वत:चा जाणीवपूर्वक विस्तार करीत, व्याप्ति वाढवीत, पूर्वीं व्यक्तिरूप झालेला पुरुष आपलें व्यक्तिरूप ओलांडून पुढें जातो, वर जातो; 'व्यक्तित्व' हा त्याचा जो प्राथमिक अनुभव, तो तो मागें टाकतो; आपल्या मर्यादा, मर्यादा घालण्याच्या स्वत:च्या क्रिया व व्यक्तित्वाच्या सर्व भिंती पाडून टाकतो; आपली अनंतता, विश्वव्यापकता त्याला अनुभवास आली, म्हणजे आपण स्वतंत्र वेगळी व्यक्ति आहोंत, मर्यादित अस्तित्वाची व्यक्तिता आपली आहे, ही जाणीव सर्वथा मागें टाकतो. अर्थात् या क्रियेनें, तो स्वत:ला मर्यादा घालून घेणारा अहम्, हें आपलें स्वरूप रद्द करतो, तो या पुढे 'अहम्' रहात नाहीं; दुसऱ्या शब्दांत ही प्रक्रिया सांगावयाची तर, स्वत:ला मर्यादा घालणें हें स्वत:च्या अस्तित्वाला आवश्यक आहे, व्यापक अस्तित्वाच्या इतर अंगांपासून आणि इतर व्यक्तींहून मी वेगळा आहे आणि असा मी वेगळा आहे तोंवरच मला अस्तित्व आहे ही खोटी जाणीव, व्यापक झालेला आत्मा टाकून देतो; विशिष्ट मन आणि देह यांच्या आश्रयानें असणारें कालाश्रयी व्यक्तिरूप हेंच आपलें खरें स्वरूप आहे ही खोटी कल्पना, व्यापक झालेला आत्मा दूर फेकून देतो. आमच्या आत्म्याला ही व्यापकता आल्यावर व्यक्तित्व आणि व्यक्तित्व-

पान क्र. १३४

 

निर्मिति यांतील सत्यत्व सर्वथा नष्ट होतें कीं काय हा प्रश्न आहे; व्यक्तित्व निर्माण करणारा पुरुष नाहींसा होतो कीं काय, आपलें व्यक्तिविशिष्ट पुरुषत्व टाकून, विश्वपुरुषत्व धारण करून अनंत अगण्य मनांमध्यें व शरीरांमध्यें हा पुरुष अगदीं आत्मीयतेनें राहतो व वावरतो असें होतें कीं काय ? या प्रश्नांचीं उत्तरें अशीं आहेत : पुरुष हा आपलें व्यक्तित्वनिर्मितीचें कार्य करीतच राहतो, तो आपलें पुरुषत्व टाकीत नाहीं, तो टिकून असतो आणि व्यक्तिरूप निर्मूनहि व्यापक जाणिवेचा, विश्वव्यापकत्वाच्या जाणिवेचा तो धनी होतो; एवढेंच कीं मर्यादित, अल्पकाल टिकणारें व्यक्तित्व म्हणजे ''मी'' ही भावना त्याचें मन टाकून देतें, हें व्यक्तित्व म्हणजे त्याच्या अस्तित्वाच्या अनंत सागरांत उठलेली एक लहर आहे, त्याच्या विश्वव्यापक अस्तित्वाच्या अनंत केंद्रांपैकीं एक केन्द्र आहे, अनंत आकारांपैकीं एक आकार म्हणजे व्यक्तित्व आहे, अशी जाणीव त्याच्या मनांत पक्की होते. आत्म्यानें विश्वव्यापकता धारण केल्यावरहि विश्वांतील रचना या वैयक्तिक अनुभवाचें द्रव्य म्हणून तो वापरीत असतो. मात्र आतां हें द्रव्य स्वतःच्या बाहेर आहे, स्वतःपेक्षां विस्तृत स्वरूपाचें आहे, त्याचा आपल्याला उपयोग करावयाचा असतो, त्याचा आपल्यावर बाहेरून कमीअधिक परिणाम होतो, त्याचें ताळतंत्र पाहून आपल्याला आपली योजना त्याच्याशी जुळती करावी लागते -- इत्यादि कल्पना तो अवास्तव म्हणून टाकून देतो आणि हें सर्व विश्वद्रव्य आपल्या स्वतःच्या पोटांत आहे, अन्तरंगांत आहे ही गोष्ट, तसा अनुभव आल्यानें सत्य म्हणून स्वीकारतो, त्याची जाणीव अनिर्बंध व विशाल झाली असल्यानें, विश्व-द्रव्य आणि स्थलकाल-मर्यादित व्यवहारांचा वैयक्तिक अनुभव, या दोनहि गोष्टी त्या जाणिवेंत अन्तर्भूत होतात. ही जी नवी जाणीव आध्यात्मिक पुरुषाला प्राप्त होते, त्या जाणिवेनें या पुरुषाला असा अनुभव येतो कीं, आपला खरा आत्मा कालस्थलातीत, विश्वातीत तत्त्वाशीं एकरूप आहे, त्या तत्त्वांत त्याची  (आपल्या खऱ्या आत्म्याची) बैठक आणि वस्ती आहे; तसेंच त्याला हें ज्ञान होतें कीं, व्यक्तित्व म्हणून जें तो निर्मितो, तें विश्वाचा अनुभव घेण्यासाठीं उपयोगी पडणारी अशी एक रचना असते. विश्वाच्या अनुभवाचें साधन या पलीकडे व्यक्तित्वाला काहीं महत्त्व नाहीं व स्थान नाहीं ही गोष्ट त्याला स्पष्टपणें कळतें.

पान क्र. १३५

 

      विश्वसत्तेशीं आम्ही एकरूप होतों, तेव्हां आम्हांला जी जाणीव होते किंवा असते ती, आम्ही एका महान् आत्म्याशीं एकरूप झालों आहों अशी असते. हा महान् आत्मा एकाच वेळीं विश्वामध्यें विश्वरूप झाला आहे आणि व्यष्टिपुरुषाच्या रूपानें व्यष्टिरूप झाला आहे, अशी ती जाणीव असते. तसेंच विश्वाच्या अस्तित्वांत, आमच्या विशिष्ट व्यष्टि- पुरुषाच्या अस्तित्वांत आणि इतर सर्व व्यष्टींच्या अस्तित्वांत ज्या नाना घटना व्यक्तरूपानें वावरतात, उदयास येतात, त्या सर्व घटना या एका आत्म्याच्या स्वरूपाचा आविष्कार आहेत आणि या सर्व घटनांचा भोक्ता हा आत्मा आहे, ही गोष्टहि आपल्या जाणिवेंत अन्तर्भूत असते. आम्हांला हा जो अनुभव येतो त्यावरून हें सिद्ध होतें कीं, हा आत्मा सत्तेच्या, अस्तित्वाच्या दृष्टीनें द्वैतहीन, एकच एक, अभिन्न, भेदशून्य आहे; आणि त्याबरोबर त्याचे ठिकाणीं स्वत:चें एकत्व कायम राखून विश्वरूप होण्याची आणि नाना व्यष्टींच्या रूपानें व्यक्त होण्याची स्वाभाविक शक्ति आहे. एकत्व हें या आत्म्याचें स्वरूप असून, स्वत:च्या एकत्व-सत्तेहून भिन्न असणाऱ्या विश्वसत्तेची, तसेंच अनेक भिन्न भिन्न व्यष्टीच्या सत्तेची स्वत:तून उभारणी करणें हे स्व-सत्तेचे धर्म आहेत. या एकच एक आत्म्याचा आनंद ही उभारणी करण्यांत आहे. त्याच्या जाणिवेचा, ज्ञानाचा स्वभावधर्मच मुळीं अशी उभारणी नित्य करीत राहणें हा आहे. अशा आत्म्याशीं आम्ही एकरूप झालों, अर्थात् त्याच्याशीं बहुतांशीं किंवा पूर्णांशानें आम्ही एकता पावलों, तर त्याचे जे धर्म, ज्या शक्ती, जो आनंद आतांच सांगितला तो त्याचे ठिकाणीं राहूं नये अशी इच्छा आम्हीं कां करावी, असा प्रयत्न आम्ही कां करावा ? असा प्रयत्न किंवा इच्छा आम्ही करणें याचा अर्थ, त्याच्याशीं एकरूपता पूर्णपणें आम्हांला नको आहे, केवळ कांहीं अंशानें आम्हांला त्याच्याशीं एकता हवी आहे असा होतो. त्या आत्म्याच्या दिव्य अस्तित्वाशीं, केवल निष्क्रिय अस्तित्वाशीं आम्ही एकरूप होऊं इच्छितो पण त्याच्या क्रियाशील शक्तीशीं, जाणिवेशीं, अनंत आनंदाशीं आम्ही एकरूप होऊं इच्छित नाही, असा आमच्या उपरिनिर्दिष्ट प्रयत्नाचा व इच्छेचा अर्थ होतो. व्यक्तीला शांति हवी असेल, तिला शांतीची भूक तीव्रतेनें लागली असेल, तर दिव्य निश्चल आत्मसत्तेशीं तिनें एकरूपता इच्छावी हें क्रमप्राप्त आहे; या दिव्य आत्म्याचा स्वभावधर्म, क्रियाशीलता, क्रियाशक्ति, क्रियामग्नता, विविध आनंद देणारी आहे;

पान क्र. १३६

 

पण शांतीची, विसांव्याची भूक लागलेल्या व्यक्तीला दिव्य आत्म्याची आनंदमय क्रियाशीलता त्याज्य, अग्राह्य वाटते आणि म्हणून ती तिकडून सर्व लक्ष काढून घेऊन, शांत निश्चल आत्मसत्तेवर तें केंद्रित करते आणि शांतीचा लाभ करून घेते. हें ठीक आहे, पण आमच्या आस्तित्वाचा, जीवनाचा अन्तिम हेतु अशी शान्ति हाच असला पाहिजे, आमची अन्तिम पूर्णता अशी शान्ति मिळविण्यांत आहे, असा आग्रह धरणें आवश्यक नाहीं, हें मात्र खरें.

अशी शक्यता आहे कीं, ''शांत निश्चल अशा आत्मजाणिवेशीं, स्थितिशील आत्मजाणिवेशीं एकरूप होण्यांतच व्यक्तीला पूर्ण भेदातीत एकरूपता साधते; आत्म्याच्या जाणिवेच्या शक्तीशीं व क्रियाकलापाशीं एकरूप होणें ही कांहीं खरी एकरूपता नव्हे,'' असा युक्तिवाद कोणी करतील; कोणी असा युक्तिवाद करतातहि. या संबंधांत पहिली गोष्ट ही सांगणें प्राप्त आहे कीं, दिव्य आत्म्याशीं जागृतिपूर्ण एकरूपता व्यक्तीनें साधणें या क्रियेंत अनुभवाची भिन्नता असते आणि ती असणें अपरिहार्य आहे; अशा जागृत एकतेच्या ऐवजीं व्यक्ति आत्मसत्तेच्या ठिकाणीं एकाग्रतेनें सुषुप्तींत गेली, तिची वैयक्तिक जाणीव एकमेवाद्वितीय आत्मतत्त्वांत एकाग्रतेनें विलीन झाली, तर अर्थात् शुद्ध एकरूप अनुभव तिला येईल, भेदाचा अनुभव तिला येणार नाहीं. जागृत, क्रियाशील, एकरूपतेंत, एकरूपता साधण्याच्या प्रक्रियेंत, व्यक्तिरूप पुरुष आपली स्थितिशील जाणीव आणि क्रियानिष्ठ अनुभव या दोनहि गोष्टीच्या मर्यादा विस्तृत करीत असतो आणि या विस्ताराच्या आश्रयानें, त्याच्या स्वत:चा आणि विश्वाच्या अस्तित्वाचा जो दिव्य आत्मा, त्याच्याशीं तो एकरूपता साधतो; पण असें करण्यांत तो आपलें व्यक्तिरूप गमावीत नाहीं.  अर्थात् त्या दिव्य आत्म्यापासून आणि इतर समान व्यक्तिरूप पुरुषांपासून स्वत:ची भिन्नताहि त्याच्या जाणिवेंतून जात नाहीं. अनुभवाची व जाणिवेची विशालता साधून जो पुरुष दिव्य आत्म्याशी एकरूप होतो तो, तदितर सर्व पुरुष स्वत:चे अंगभूत आहेत, अंशभूत आहेत अशा अनुभवानें संपन्न असतो; या अंगभूत पुरुषांशीं क्रियाशील एकरूपता साधून तो स्वत:च्या विश्वव्यापी जाणिवेंत या इतर पुरुषांचें मानसिक व व्यावहारिक कर्म, स्वत:च्या कर्माप्रमाणें चालत असल्याचें पाहतो, पाहूं शकतो; या इतर पुरुषांना, त्यांच्या कार्याच्या बाबतींत त्यांच्याशीं आन्तरिक ऐक्य साधून कांहीं मदत करूं शकतो; ती कार्ये तो निश्चित

पान क्र. १३७

 

करूं शकतो; तरी पण तो आणि इतर पुरुष हा भेद कांहीं व्यवहारत: तो दूर करीत नाहीं. दिव्य आत्मा त्याच्या स्वत:मध्यें जें कार्य करीत असतो त्या कार्याशीं तो प्रत्यक्ष आणि विशिष्ट प्रकारें बांधलेला असतो. या दिव्य आत्म्याचें इतरांत जें कार्य चालतें त्याच्याशीं स्वत:च्या विश्वव्यापक स्वरूपानें, म्हणजेच अप्रत्यक्षपणें, तो संबद्ध असतो. त्यांच्याशीं आणि दिव्य आत्म्याशीं त्यानें सांधलेल्या एकरूपतेमुळें हा संबंध उत्पन्न झालेला असतो. तेव्हां दिव्य आत्म्याशीं घडलेल्या जागृत एकरूपतेंत व्यक्तिपुरुष विद्यमान असतो; एवढेंच कीं, क्षुद्र भेदनिष्ठ अहम् च्या तो अतीत असतो; त्याचप्रमाणें विश्व-सत्ता विद्यमान असते आणि तिला हा व्यक्तिपुरुष आपल्या विस्तारित अस्तित्वानें व्यापून टाकतो. परंतु ही विश्वसत्ता व्यक्तिपुरुषाचें व्यक्तित्व स्वत:त सर्वथा विलीन करून घेत नाहीं, नाहींसें करीत नाहीं; एवढेंच कीं, त्याचें अहम्-व्यक्तित्व, मर्यादित-व्यक्तित्व त्याच्या विश्वरूपतेनें मागें टाकलेलें असतें, पराभूत केलेलें, प्रभावहीन केलेलें असतें.

विश्वातीत पुरुष, विश्वपुरुष आणि व्यष्टिपुरुष या तीन रूपांनीं दिव्य आत्मा अनुभवास येतो. यापैकीं व्यष्टिपुरुष अहम्‌शीं, वा अहम् व्यक्तित्वाशीं एकरूप नाहीं. तो दिव्य आत्मा, विस्तार करून विश्वपुरुषाशीं एकरूप होऊं शकतो. तो विश्वातीत पुरुषाच्या केवलतेशीं, शांत निश्चल जाणिवेशीं एकरूप होऊन शांति भोगूं शकतो, हें आपण पाहिलें. ही शांति म्हणजे सर्वोत्तम स्थिति अशी एक समजूत आहे. व्यष्टिपुरुष, त्याचा विश्वातीत केवलाशीं असलेला ''भेद'', त्या विश्वातीताच्या कैवल्यांत बुडी मारून दूर करूं शकतो; विश्वपुरुषाची निष्क्रिय जाणिवेची अवस्था म्हणजेच विश्वातीतता, विश्वातीत पुरुषत्व; व्यष्टिपुरुषाला या निष्क्रिय जाणिवेंत बुडी घेण्यानें विश्वपुरुषाशीं पूर्ण ऐक्य साधतें, एरव्ही त्याला तें साधत नाहीं ही समजूतच चुकीची आहे. विश्वपुरुष व्यष्टिपुरुष होतो, हा भेद उत्पन्न करूनहि तो ज्याप्रमाणें आपली एकता गमावीत नाहीं, त्याप्रमाणें आम्ही व्यष्टिपुरुषत्व कायम ठेवून विश्वपुरुषाशीं पूर्ण एकता साधूं शकतो; हा अनुभव शांतीच्या अनुभवापेक्षां कमी दर्जाचा कां मानावा ? आमच्या व्यष्टिपुरुषाला, त्याची इच्छा असल्यास विश्वपुरुषाचा निष्क्रिय, स्थितिशील, शांत अस्तित्वाशीं केव्हांहि एकरूप होतां येतें, आणि शिवाय त्याच्या सक्रिय भेदपूर्ण अस्तित्वाशींहि एकरूप होतां येतें -- या व्यवहारांत विश्वपुरुषाचें एकत्व

पान क्र. १३८

 

जसें कायम राहतें, तसेंच आमचें त्याच्याशीं घडविलेलें एकत्वहि कायम राहातें. त्यांत उणेपणा येत नाहीं -- कारण आम्ही आमचें अहम्-व्यक्तित्व नाहींसें केलेलें, विश्वपुरुषांत विलीन केलेलें असतें; आमच्या मनाची अहम्‌मुळें जी खेंचाताणी होत असते तींतून आम्हीं मोकळें झालेलें असतों. विश्वपुरुषाशीं, त्याच्या सक्रिय रूपांशीं एकत्व साधल्यानें आम्हांला शांति लाभणार नाहीं असेंहि नाहीं -- तों जसा अनंत क्रिया करीत असतां शांतिरूप असतो, तसेंच आम्हीहि त्याच्याशीं ऐक्य साधल्यानें अखंड कार्य करूनहि शांति भोगूं शकूं, भोगूं शकतो. मग व्यष्टित्व टाकावयाचें कां ? केवळ ''भेद नको'' या भावनेनें तें त्याज्य मानलें व टाकून दिलें तर  ''अभेदाचा'' आनंद अवश्य मिळेल; पण हा जो भेद दिव्य आत्म्यानें निर्माण केला आहे, तो एका दिव्य हेतूच्या सिद्धीसाठीं निर्माण केला आहे हें विसरून कसें चालेल ? व्यष्टित्व विलीन केल्यानें जो अभेदाचा, एकतेचा आनंद पुरुषाला मिळतो, त्यापेक्षां श्रेष्ठ एकतेचा, श्रेष्ठ अभेदाचा आनंद व्यष्टित्व टिकवून विश्वव्यापक झाल्यानें पुरुषाला होतो ही वस्तुस्थिति आहे. व्यष्टित्व आणि अहम्-व्यक्तित्व या दोहोंत फार अन्तर आहे. अहम्-व्यक्तित्वानें भेदांतून भेद निघून, भेदांचा पसारा व अशान्तीचा पसारा माजतो; व्यष्टित्व हें उलटपक्षीं भेदांचें भेदत्व नाहींसें करून ऐक्य वाढविणारें आहे : विस्तारशील व्यष्टित्व इतर व्यष्टींशीं आणि सर्वांमध्यें वास करणाऱ्या ईश्वराशीं ऐक्य जोडतें आणि या ऐक्याचा आनंद लुटतें; आम्ही विश्वपुरुषाच्या अनेकत्वाचा, अनेक रूपांशीं व्यक्त होण्याचा त्याचा व्यवहार त्याज्य ठरवून, त्याच्या एकत्वाचाच केवळ आश्रय केला, तर आतांच सांगितलेला, अनेकांशीं ऐक्य करण्याचा, अनेकांतील एका ईश्वराशीं एकरूप होण्याचा आनंद कोठून मिळणार ? ही गोष्ट स्पष्ट करणें बरें कीं, केवल दिव्य पुरुष आपली एकता आधीं घालवितो व नंतर परत मिळवितो असा व्यवहार कांहीं वरील प्रकारांत होत नाहीं. दिव्य व्यष्टिपुरुषासंबंधींची वरील कहाणी आहे -- तो दिव्य ईश्वरी विश्वात्म्याच्या एकतेशीं एकरूप होतो व शांति मिळवितो अशी एक कहाणी वर सांगितली आहे व तोच या एकतेशीं एकरूप होऊन त्याबरोबर विश्वाच्या एकतेशीं एकरूप होतो आणि विविध आनंदाचा भोग घेतो, अशी दुसरी कहाणी सांगितली आहे. वाटल्यास सर्वथा एकतेंत विलीन होण्याचें, विश्वातीत एकतेंत विलीन होण्याचें पसंत करून आम्हीं शांतीचा उपभोग घ्यावा; पण ईश्वरी सत्तेचें

पान क्र. १३९

 

जें आध्यात्मिक सत्य आहे त्या सत्याच्या दृष्टीनें, असें कोणतेंहि प्रभावी कारण अस्तित्वांत नाहीं कीं, ज्यासाठीं ईश्वरी विश्वात्मक सत्तेच्या विशालतेंत आणि आनंदांत -- जी विशालता आणि जो आनंद आमच्या व्यष्टित्वाला पूर्णता, कृतार्थता देणारा आहे त्यांत -- आम्ही सहभागी होऊं नये.

आमचा दिव्य व्यष्टिपुरुष विश्वपुरुषांत प्रविष्ट होतो ही कांहीं त्याची अंतिम गति किंवा एकच एक गति नव्हे; विश्वपुरुष आणि तो व्यष्टिपुरुष जेथें एकमेकांत मिळून एक होऊन जातात असें एक स्थान आहे, त्या स्थानींहि व्यष्टिपुरुष प्रविष्ट होतो. हें स्थान म्हणजे मूळ दिव्य आत्मा. येथूनच त्याची विश्वरूपी विभूति आणि व्यष्टिपुरुषरूपी, विश्वांत वावरणारी त्याची विभूति, या दोन्हीहि विभूती उदय पावतात, व्यक्त होतात. विश्वसत्तेच्या पोटीं, व्यष्टिसत्ता अपरिहार्यपणें असते; अर्थात् या दोन विभूतींचीं परस्पर-नातीं नेहमींच असतात आणि व्यवहारामध्यें या दोन विभूती अन्योन्यावलंबी असतात; पण आमच्या असें अनुभवाला येतें कीं, व्यष्टिपुरुष शेवटीं स्वत:च्या जाणिवेंत, आत्मजाणिवेंत सर्व विश्वाचा अन्तर्भाव करूं शकतो; आणि हा अन्तर्भाव करण्याच्या प्रक्रियेंत त्याचें आध्यात्मिक व्यष्टित्व तो गमावीत नाहीं, तर उलट आपली व्यष्टिजाणीव तो या प्रक्रियेंत विशाल आणि पूर्ण करीत असतो. यावरून व्यष्टित्वाच्या पोटीं विश्व नेहमींच होतें व जें नेहमींच होते पण गुप्त अवस्थेंत होतें तेंच, व्यष्टिविकासानें प्रकट होतें असा सिद्धान्त करणें प्राप्त आहे. अर्थात् हें व्यष्टित्व म्हणजे आध्यात्मिक पुरुषाचें अस्तित्व होय. बाह्य पृष्ठभागीय व्यक्तित्व, अहंकार, अहम्-युक्त जाणीव अज्ञानमय असल्यानें, मर्यादांनीं बांधलेली असल्यामुळें त्या जाणिवेंत विश्वाचा अन्तर्भाव होऊं शकत नाहीं. तेव्हां हें बाह्य अहम्-व्यक्तित्व सोडून, आन्तर आध्यात्मिक व्यष्टिपुरुषाविषयीं आम्ही बोलूं लागलों, म्हणजे सामान्य बुद्धीला न उमगणारी, न पेलणारी भाषा आम्हांला वापरावी लागते; व्यष्टि आणि विश्व एकमेकांत पूर्णतया अन्तर्भूत होतात किंवा असतात. मी विश्वांत आहे, तसें विश्व माझ्यांत आहे, सर्व माझे ठिकाणीं आहे, तसा मी सर्व ठिकाणीं आहे, ही मुक्त आत्म्याची आत्मविषयक अनुभूति असते; पण ही मुक्त आत्म्याची अनुभूति व्यक्त करणारी वरील भाषा, सामान्य बुद्धीच्या आटोक्याबाहेरची आहे, हें उघड आहे. अशी भाषा वापरावी लागण्याचें कारण असें आहे कीं,

पान क्र. १४०

 

आम्ही जे शब्द उपयोगांत आणतों ते मनानें बनविले आहेत आणि त्यांना जे अर्थ दिले गेले आहेत तेहि अशा बुद्धीकडून दिले गेले आहेत कीं, जी भौतिक स्थल (अवकाश) आणि भौतिक परिसर यांच्या कल्पनांना बांधली गेली आहे, जिच्या स्थल (अवकाश) विषयक आणि परिसरविषयक कल्पना भौतिकाच्या पलीकडे जाऊं शकत नाहींत. मुक्त आत्म्याचा अनुभव म्हणजे श्रेष्ठ मानसिक-आध्यात्मिक पातळीवरचा अनुभव आणि हा अनुभव सांगणारी दृष्टांताची भाषा, स्थूल भौतिक जीवनाच्या आणि स्थूल इंद्रियांच्या अनुभवावरून बनविलेली -- असा योग असल्यानें बुद्धीला अनाकलनीय अशा प्रकारें आम्हांला मुक्त आत्म्याच्या अनुभवाचें वर्णन करावें लागतें. मुक्त आत्मा जाणिवेच्या ज्या पातळीवर चढतो, ती पातळी भौतिक जगावर अवलंबून नसते : जें विश्व आमच्या व्यष्टिपुरुषाच्या आत्म्यांत अंतर्भूत होतें, आणि ज्या विश्वाच्या पोटांत आमचा व्यष्टिपुरुष अन्तर्भूत होतो तें विश्व भौतिक-विश्व नव्हे, तें विश्व ईश्वराचें सुरेलपणें व्यक्त झालेलें अस्तित्व असतें, त्यांत त्याच्या जाणीवशक्तीच्या आणि आत्मानंदाच्या कांहीं उच्चतर सुसंवादपूर्ण तालबद्ध लहरी असतात. तेव्हां हें जें व्यष्टिपुरुषाचें आणि विश्वाचें एकमेकांत मिसळून जाणें असतें, तें भौतिक पातळीवरचें नसून मानसिक-आध्यात्मिक पातळीवरचें कार्य असतें. अनेकता हा जो अद्वैत सद्‌वस्तूचा व्यक्त व्यवहार आहे, त्याचे जे दोन भाग, ''सर्वता'' आणि ''व्यष्टिता'', त्या दोन भागांचा एकत्रित आध्यात्मिक अनुभव, हा या दोन भागांचें एकमेकांत सर्वथा मिळणें-मिसळणें झाल्यानें घडतो : या अनुभवांत एक आणि अनेक हे भाग शाश्वतपणें एकचएक वस्तूचे अंगभूत भाग आहेत, ते कधींहि विलग नसतात हा प्रत्यय येतो. विश्वामध्यें एकतेपासून अलग होण्याचें आणि परत एकतेंत मिळून जाण्याचें कार्य सारखें चाललेलें असतें; या व्यवहारांत एकता ही अनेकतेची शाश्वत बैठक आहे हें दिसून येतें. विश्व आणि व्यष्टि एका सर्वातीत स्वयंभू आत्म्याचीं व्यक्त रूपें आहेत, हा सर्वातीत केवल आत्मा अविभाज्य आहे, त्याचे विभाग पडलेले दिसतात; पण हा देखावा मात्र आहे. हा अविभक्त आत्मा सर्वत्र उपस्थित असतो. तेव्हां वस्तुस्थिति अशी आहे कीं, सर्व प्रत्येक वस्तूंत आणि प्रत्येक वस्तु सर्वत्र, सर्व ईश्वरांत आणि ईश्वर सर्वत्र आहे. आमचा व्यष्टिरूप आत्मा मुक्त झाला, अर्थात् या सर्व-अतीत केवल आत्म्याशीं एकता

पान क्र. १४१

 

पावला, म्हणजे त्याला स्वत: व विश्व या संबंधांत वर सांगितलेला अनुभव येतो. हा अनुभव मनाच्या भाषेंत सांगावयाचा तर, मुक्त आत्मा आणि विश्व एकमेक एकमेकांत सर्वथा वस्ती करतात; दोघांची दिव्य एकता शाश्वत टिकणारी असते; ही दिव्य एकता, शुद्ध एकतेचे एकमेकांत मिळून जाण्याचें व एकमेकांना आलिंगन देऊन राहण्याचें अशीं रूपें एकाच वेळीं घेते -- अशा शब्दसमुच्चयानें सांगावा लागतो.

बुद्धीला जो अनुभव सामान्यत: येतो तो अनुभव, या उच्चतर अनुभवांचा सत्यांशीं जुळता नसतो. पहिली गोष्ट बुद्धि अहम् ला व्यक्तित्वाचा मान देते; पण केवळ अज्ञानाच्या अवस्थेंत अहम् ला व्यक्तित्वाचा मान मिळूं शकतो. खरी व्यक्ति, अहम् नसून अहम् च्या मागें अनेक अहम् निर्माण करणारी असते; ही खरी व्यक्ति अहम् प्रमाणें स्वत:ला अलग, स्वतंत्र समजत नाहीं, दुसऱ्या सर्व व्यक्तींशीं तिचें कायमचें नातें असतें आणि हें नातें अहम् प्रमाणें विभक्ततेचें नसून, व्यवहारांत एकमेकांशीं मिळून जाण्याचें असतें; या अन्योन्य मीलनाचा पाया हा आहे कीं, सर्व व्यक्ती तत्त्वत: एक वस्तु असतात, एकत्व हा सर्व व्यक्तींचा गाभा असतो. आत्मिक व्यक्तींच्या या तात्त्विक, आंतरिक एकतेवरच, त्यांचें व्यावहारिक अन्योन्य-सहकाराचें नातें आधारलेलें असतें; दिव्य अस्तित्वाची पूर्ण अभिव्यक्ति अशा ह्या पूर्ण अन्योन्य-सहकारांत स्पष्ट होते. असा अन्योन्य-सहकार हा दिव्य जीवनाचा अनिवार्य पाया आहे, त्याचें मूलभूत रहस्य आहे. या पायाशिवाय असलेलें कसलेंहि जीवन, दिव्य जीवन होऊं शकत नाहीं. बुद्धीला परिचित असलेलें अहम् चें जीवन आणि हें दिव्य जीवन यांत फारच अन्तर आहे. ही बुद्धीची पहिली अडचण. तिची दुसरी अडचण अशी कीं, या जीवनाच्या वर्णनासाठीं आम्ही जी भाषा वापरतों, ती बुद्धीच्या मर्यादित व खालच्या दर्जाच्या अनुभवासाठीं निर्माण झालेली. भौतिक विश्वांतील घटना आणि वस्तू सीमांनीं बद्ध असतात. या घटना आणि वस्तू कांहीं विशेषांनीं एकमेकांपासून वेगळ्या अशा ओळखण्यासाठीं आणि त्यांचे वर्ग पाडण्यासाठीं आपल्या बुद्धीनें विशिष्ट भाषा बनविली आहे. घटनेची भिन्नभेददर्शक व्याख्या करून बुद्धि घटना आणि वस्तु यांची ओळख करून घेते. दिव्य व असीमित वस्तूंवर आधारलेले, उच्च असीमिततेचे आत्मानुभव व्यक्त करण्यास आम्हांला ही भेदनिष्ठ भाषा वापरावी लागते व यांत बुद्धीला कांहीं गम्य नसल्यानें तिचा गोंधळ होतो.

पान क्र. १४२

 

उदाहरणार्थ ''व्यक्ति'' हा बुद्धीचा शब्द -- अहम् ला लावला जाणारा -- आम्हांला वापरावा लागतो आणि मग अहम् वेगळा व खरी व्यक्ति वेगळी अशी पुस्ती आम्हांला जोडावी लागते. ''मनुष्य'' हा बुद्धीचा शब्द आम्हांला वापरावा लागतो आणि त्याबरोबर खरा मनुष्य आणि दर्शनी मनुष्य अशी पुस्ती जोडावी लागते. हें उघड आहे कीं, मनुष्य, दर्शनी, खरा, व्यक्ति, हे सगळेच शब्द आमचे उच्च अनुभव व्यक्त करण्यास एकएकटे अगदीं अपुरे पडतात, ते वापरतांना हें लक्ष ठेवावें लागतें कीं आमच्या मनांतला थोडासाच भाव ते व्यक्त करतात; आमचा पूर्ण खरा भाव व्यक्त करावयास असे अनेक शब्द एकत्र आणावे लागतात.  ''व्यक्ति'' हा शब्द घ्या. सामान्यत: व्यक्ति म्हणजे इतर सर्व वस्तूंपासून वेगळी असणारी वस्तु; पण वस्तुत: अशी ''वेगळी'' वस्तु कोठेंहि अस्तित्वांत नाहीं; आमच्या मनाची ती व्यवहारासाठीं उपयोगी पडणारी कल्पना आहे, पण ती सत्यास सर्वांशानें व्यक्त करणारी नाहीं, सत्याचा एक अंश ती दाखविते असें म्हणतां येईल; पण मनाला त्यानें निर्मिलेले शब्दच बंधनांत टाकतात; या शब्दांचा प्रभाव त्याजवर मर्यादेबाहेर पडतो आणि त्याला या गोष्टीचा विसर पडतो कीं, त्याच्या शब्दानें केवळ सत्याचा अंशच व्यक्त होतो आणि सत्याच्या इतर सर्व अंशांशीं -- जे त्याला विरोधी दिसतात त्या अंशांशीं -- त्याचा जेव्हां योग होतो, तेव्हांच तें आंशिक सत्य, 'खरें सत्य' होतें, एरव्हीं त्यांत नेहमींच लहान मोठ्या प्रमाणांत ''असत्य'' भरलेलें असतें. उदाहरणार्थ, आम्ही ''व्यक्ति'' विषयीं बोलूं लागलों, म्हणजे आमचा अर्थ सामान्यत: मानसिक-प्राणिक-शारीर असें त्रिमुखी व्यक्तिभूत अस्तित्व, असा असतो; ही व्यक्ति (व्यक्तिभूत अस्तित्व) इतर सर्व व्यक्तींपासून वेगळी, स्वत:च्या व्यक्तित्वामुळें त्या व्यक्तींशीं मिळून जाण्याला अपात्र, असमर्थ अशी असते. या त्रिमुखी व्यक्तीपलीकडील, व्यक्तिरूप आत्मा हा आमच्या बोलण्याचा विषय झाला, तरी आमची पहिल्या त्रिमुखी व्यक्तीची ''विभक्तता'' येथेंहि असते असें अजाणतां आम्ही धरून चालतो. हा आत्मा खालच्या व्यक्तीप्रमाणें इतर आत्म्यांपासून नेहमीं वेगळा राहणारा, त्यांच्यांत न मिसळूं देणारा त्यांना आपल्या अंतरंगांत न मिळूं देणारा, फार तर एकमेकांचा संसर्ग सहन करणारा आणि इतरांशीं सहानुभूति ठेवणारा, या पलीकडे इतरांशीं ऐक्य वा तादात्म्य करण्यास व त्यांना आपल्याशीं करूं देण्यास सर्वथा

पान क्र. १४३

 

असमर्थ असा असतो, अशीच आमची भावना असते. ''व्यक्ति'' या शब्दाच्या सामान्य अर्थाचा पगडा आमच्यावर प्रमाणाबाहेर आम्ही बसूं दिल्यानें आत्म्यासंबंधानें आपली अशी भावना, अशी कल्पना होत असते; आणि म्हणून आम्हांला हें जोर देऊन स्पष्ट करावें लागतें कीं, खरी व्यक्ति (आत्मा) ही अशी ''वेगळी'' आणि ''वेगळी राहणारी'' वस्तु नसून, तें एकच एक अनन्त ब्रह्माचें एक ज्ञानयुक्त समर्थ अंग आहे; ब्रह्माची एक ज्ञानयुक्त समर्थ शक्ति आहे; आणि ही शक्ति, हें अंग त्याच्या इतर अंगांपासून, इतर शक्तींपासून केव्हांहि ''वेगळें'' होऊं शकत नाहीं. हीं सर्व अंगें, या सर्व शक्ती ऐक्यानेंच असतात, ऐक्यानेंच वागतात; ब्रह्माशीं व इतर ब्रह्मशक्तींशीं प्रत्येक शक्तीचें सनातन ऐक्य असतें; या ऐक्यावांचून त्यांना अस्तित्वच नाहीं, मग जीवन कोठलें ? ही जी खरी व्यक्ति (आत्मा) तिला मुक्ति, अमरता यांचा लाभ होत असतो, आणि तो आत्मज्ञानानें होत असतो.

सामान्य बुद्धि आणि उच्चतर बुद्धि यांजमध्यें व्यक्तिविषयक विचार करतांना कसा विरोध उत्पन्न होतो हें आपण कांहीं अंशानें वर पाहिलें. खरी व्यक्ति म्हणजे सामान्य बुद्धीची 'अहम् व्यक्ति' नव्हे, हें स्पष्ट करावें लागलें. हें स्पष्ट करतांना खरी व्यक्ति म्हणजे ब्रह्माची ज्ञानयुक्त शक्ति, अशी आम्हीं व्याख्या केली. पण या व्याख्येंत शक्ति हा भाववाचक शब्द आम्हीं वापरला. वस्तुत: खरी व्यक्ति ही भावमय वस्तु नसून पुरुषरूप वस्तु आहे. स्वत:ला व्यष्टिरूपें घेऊन ब्रह्म नानाविध अनुभव घेत असतें. खरी व्यक्ति या व्यष्टिरूपांपैकीं एक रूप, या पुरुषांपैकीं एक पुरुष असते. ती कांहीं अमूर्त भावरूप वस्तु नसते. मुक्ति या पुरुषाला मिळते, अमूर्ताला नव्हे; हा पुरुष मुक्ति भोगूं शकतो, भोगतो. अमूर्त कांहीं मुक्ति भोगूं शकत नाहीं. तेव्हां उच्चतर बुद्धीला आकलन होणारा 'मी' आणि सामान्य बुद्धीचा 'मी' यांत किती अंतर आहे, किती विरोध आहे तें वरील विवेचनावरून स्पष्ट होईल. खऱ्या 'मी' संबंधानें आतां असें म्हणतां येतें कीं, मी विश्वांत आहे, विश्व मजमध्यें आहे, एवढेंच नव्हे, तर ईश्वर मजमध्यें आहे, मी ईश्वरामध्यें आहे याचा अर्थ असा नव्हे कीं, ईश्वराचें अस्तित्व मानवावर अवलंबून आहे; याचा अर्थ असा आहे कीं, ईश्वर स्वत:च्या पोटीं जो पुरूष प्रकट करतो, त्या पुरुषाच्या पोटीं तो स्वत:ला व्यक्त करतो; सर्वातीताच्या पोटीं व्यष्टिपुरुष असतो आणि या व्यष्टि-

पान क्र. १४४

 

पुरुषाच्या पोटीं सर्वातीत पुरुष गुप्तपणें पण पूर्णपणें उपस्थित असतो. वर सांगितल्याप्रमाणें सत्तादृष्टीनें ईश्वराशीं 'मी' अगदीं एकरूप असतो, तरी व्यवहारांत ईश्वराशीं माझें अनेक प्रकारचें नातें असूं शकतें. मी मुक्त झालों म्हणजे सर्वातीत ईश्वराशीं एकात्म होऊन, मी या एकात्मतेचा भोग घेऊं शकतो व त्याबरोबर माझ्यासारख्या इतर पुरुषांतील ईश्वराच्या आणि विश्वात्मक ईश्वराच्या आनंदाचाहि भोग त्यांच्याशीं एकरूप होऊन घेऊं शकतो. सामान्य बुद्धीला या गोष्टी आकलन होण्यासारख्या नाहींत. जी सर्वातीत केवल वस्तु आहे, तिचीं तीन रूपें, स्व-रूप (सर्वातीत रूप) व्यष्टिरूप, आणि विश्वरूप मुळांतच असतात; ती वस्तु सर्वथा स्वतंत्र, नित्य एक आणि नित्य एकतेहून अधिक अशी आहे; तिच्या जाणिवेंत तीन शक्ती नित्यरूप आहेत. सर्वातीत सत्ता, व्यष्टिसत्ता आणि विश्वसत्ता या त्या तिच्या तीन सनातन शक्ती होत : आमच्या मुक्त जाणिवेला, आमच्यांतील त्या अद्वैत वस्तूच्या जाणिवेला हें सर्व स्पष्ट दिसतें, पण मानवी भाषेंत हें आम्हांला नीट मांडतां येत नाहीं. भावात्मक वा अभावात्मक कोणतेच शब्द, आमच्या सामान्य बुद्धीला या अनुभवांची खरी कल्पना देण्यास समर्थ नाहींत. ती अद्वैत वस्तु सर्वथा अवर्णनीय अशी आहे. सर्व वर्णन तिच्या स्वरूपाची केवळ अंशमात्र सूचना, अगदीं अल्प अशी भावना मात्र देऊं शकतें, आणि अशी कल्पना देण्याचा प्रयत्न वर आम्हीं केला आहे.

पण सामान्य मनाला (बुद्धीला) वर वर्णन केलेल्या गोष्टीसारख्या गोष्टींचा बिलकुल अनुभव नसल्यानें, त्या गोष्टी जरी मुक्त जाणिवेला जोरदारपणें खऱ्या म्हणून प्रतीत होत असल्या, तरी हें सामान्य मन (बुद्धि) उच्चतर बुद्धीला आकलन होण्यासारख्या वरील गोष्टींना अशक्य म्हणून ठरवून टाकते. या गोष्टी अन्योन्य-विरोधांनीं भरलेल्या आहेत; सामान्य बुद्धीला हा बुद्धिविरोधी अन्योन्य-विरोधात्मक ''अनुभवांचा'' पसारा विश्वसनीय वाटत नाहीं. ती स्वाभाविकपणें म्हणते :  ''केवल सर्वातीत सर्व-निरपेक्ष वस्तु म्हणजे ज्या वस्तूचे ठिकाणीं कसलेहि संबंध नसतात ती वस्तु. संबंधमय वस्तु आणि निःसंबंध वस्तु या दोन वस्तू सहजच अन्योन्यविरोधी आहेत; यांतील विरोध दूर करतां येण्यासारखा नाहीं; अर्थात् दोनहि वस्तू खऱ्या, हें मी मान्य करूं शकत नाहीं. अन्योन्यविरोधी दोन विधानें असतील, तर त्यांपैकीं एक खरें आणि दुसरें

पान क्र. १४५

 

खोटें असलेंच पाहिजे; दोनहि विधानें खरीं ही गोष्ट घडूं शकत नाहीं. हा माझा सर्वस्पर्शी नियम आहे, तेव्हां ईश्वराशीं एकरूप होणें आणि त्याबरोबर ईश्वराशीं अनेक संबंध ठेवून त्याच्या या संबंधांतील आनंद भोगणें, या दोन गोष्टी परस्परविरोधी असल्यानें दोन्ही गोष्टी खऱ्या असूं शकत नाहींत. जी गोष्ट माझ्या विचारसरणीचा पायाभूत नियम पाळीत नाहीं, त्या नियमाशीं (विरोध-विषयक नियमाशीं) जी विरोधी आहे ती गोष्ट बुद्धीला (मला) पटणार नाहीं. ती बुद्धीला (मला) खोटी आणि व्यवहारांत अशक्य असलीच पाहिजे. केवलांत, नि:संबंध वस्तूंत कांहीहि संबंधमय चीज असूं शकत नाहीं आणि संबंधमय वस्तूंत केवल वस्तु कोठेंहि असूं शकत नाहीं. केवल अशा ईश्वराशीं एकरूप झाल्यावर, या एकतेंत भोगविषय आणि भोक्ता राहिले कोठें ? या एकतेंत एक ईश्वर केवल असतो, दुसरें कांहींहि भोग घेणारें असत नाहीं आणि दुसरें कांहींहि भोगविषय म्हणून असत नाहीं. तेव्हां जर भोगाची भाषा खरी धरावयाची, तर ईश्वर, व्यक्ति आणि विश्व या तीन वेगळ्या वस्तू असल्या पाहिजेत; अशा या तीन वेगळ्या वस्तू असतील, तरच त्यांजमध्यें संबंध असूं शकतील व भोगाची भाषा खरी होऊं शकेल. या तीन वस्तू वेगळ्या वेगळ्या नसतील, तर त्यांजमध्यें कसलेहि संबंध असूं शकणार नाहींत. तेव्हां संबंध खरे मानावयाचे, तर ईश्वर, व्यक्ति आणि विश्व हे नित्य वेगळे पदार्थ असले पाहिजेत असें मानलें पाहिजे. किंवा निदान वर्तमानकाळीं ते वेगळे वेगळे आहेत, मुळांत कदाचित् अभिन्न एकरूप वस्तु असून, पुन: भविष्यकाळीं कदाचित् तशीच वस्तु ते होतील असें मानलें पाहिजे. अद्वैत, एकता कदाचित् असेल केव्हांतरी, होईलहि कदाचित् पुन: केव्हांतरी, पण आज एकता नाहीं; आणि विश्व व व्यक्ति आहेत तोंवर एकता नसणार; तोंवर एकता असूं शकत नाहीं; विश्वातीत एकतेशीं ज्ञानानें विश्वपुरुष एकरूप व्हावयाचा, तर त्यानें आपलें विश्वरूपत्व विसर्जन करावयास हवें; तसेंच व्यक्तीला विश्वपुरुषाशीं किंवा विश्वातीताशीं एकरूप व्हावयाचें, तर तिनें आपलें व्यक्तित्व गमाविलें पाहिजे. आतां, अद्वैत, एकता हें ''कदाचित्'' होतें, ''कदाचित्'' होईलहि, अशी वस्तुस्थिति नसून, तें अद्वैत, ती एकता नित्यवस्तु आहे असा पक्ष मान्य केला, तर विश्व आणि व्यक्ति वस्तुत: अस्तित्वांत नाहींत असेंच मानलें पाहिजे. या गोष्टी भ्रमरूप आहेत, आभासरूप आहेत; अद्वैत ब्रह्मानें, विश्वातीत केवलानें हे आभास

पान क्र. १४६

 

स्वत: वर उभे केले आहेत असें मानलें पाहिजे. या कल्पनेंतहि आत्मविरोध-सत्यानें स्वत:चे ठिकाणीं, स्वत:चे आधारावर असत्य उभें केलें असा, ज्याला परिहार नाहीं असा आत्मविरोध -- आहे; पण ब्रह्मांत असा आत्मविरोध कल्पिणें मला (बुद्धि म्हणते) परवडते -- माझ्या क्षेत्रांत तो मला मुळींच परवडणार नाहीं. कारण माझ्या क्षेत्रांत, मला तर्कशुद्ध विचार करणें प्राप्त असतें आणि मला व्यवहार करावयाचा असतो. तेव्हां मी अद्वैत पक्ष आणि द्वैत पक्ष यांपैकीं कोणता तरी एक पक्ष खरा असा आग्रह जो धरीत आहे त्यानें, मला विश्व एकतर व्यवहाराला खरें धरतां येतें आणि त्यांत विचार आणि आचार करतां येतो किंवा तें खोटें म्हणून, त्याचा त्याग करून विचार आणि आचार स्थगित करतां येतो आणि हेंच मला तर्कदृष्ट्या सोईचें आहे -- यांत मला द्वैत-अद्वैत-एकता कल्पिण्यांत दिसणारा तर्क-विरोध दूर करण्यासाठीं खपण्याचा प्रश्न उत्पन्न होत नाहीं -- माझ्या पलीकडे आणि विश्वाच्या पलीकडे जें कांहीं आहे, त्याची जाणीव करून घेणें, त्याच्या ठिकाणीं जाणिवेनें राहणें आणि तेथें राहून त्याच्या पायावर, त्याच्या आधारानें, ईश्वराप्रमाणें विरोधमय विश्वाशीं व्यवहार करणें या भानगडींत, माझ्या तर्कशुद्ध बैठकीमुळें मला पडावें लागत नाहीं. मी एक व्यक्ति आहे आणि व्यक्ति राहून ईश्वराप्रमाणें वागणें, वागण्याचा प्रयत्न करणें, एकाच वेळीं तीन वस्तू होणें, तीन भूमिका (विश्वातीत पुरुष, विश्वपुरुष, व्यष्टिपुरुष या तीन भूमिका) घेणें यांत मला तर्कदृष्ट्या विचाराचा गोंधळ आणि व्यवहारदृष्ट्या पूर्ण अशक्यता दिसते'' -- सामान्य बुद्धीचें हें सर्व म्हणणें, तिची ही वृत्ति अगदीं सरळ आहे; तिनें आपल्या विचारसरणींत स्वच्छ, नि:संदेह असे भेद मान्य करून, अन्तर्भूत केले आहेत; तेथें असामान्य अशी बौद्धिक कसरत नाहीं. स्वत:च्या मर्यादा उल्लंघन करूं इच्छिणारी बुद्धि अशी कसरत करीत असते. या प्रकारच्या कसरतीनें, अनाकलनीय अशा छायांच्या आणि अर्धवट प्रकाशाच्या क्षेत्रांत बुद्धि वाट मात्र चुकते आणि गोंधळांत पडते. वर दिलेल्या सामान्य बुद्धीच्या बैठकींत कसलीहि कसरत नाहीं, तसेंच कसलीहि गूढ घटना मान्य करण्याची प्रवृत्ति नाहीं -- अथवा असें म्हटलें पाहिजे कीं, ''ब्रह्म स्वत:च स्वत:वर भ्रम (विश्वभ्रम व व्यक्तिभ्रम) लादून घेतें,'' या एका तुलनात्मक दृष्टीनें पहातां सरळ व सोप्या अशा ब्रह्मविषयक गूढवादाखेरीज इतर

पान क्र. १४७

 

कोणत्याहि संकीर्ण गूढवादांना तिच्या बैठकींत स्थान नाहीं. अशी ही बैठक आणि विचारसरणी बुद्धिनिष्ठ अशा सामान्य मनाला अगदीं समाधानकारक वाटते. पण या विचारसरणींत तीन दोष आहेत : १) केवल, सर्व निरपेक्ष, संबंधशून्य असें ब्रह्म आणि संबंधमय, अन्यसापेक्ष वस्तू यांच्या दरम्यान न तुटणारें असें अंतर न भरणारी अशी दरी या विचारसरणींत कल्पिली आहे. २) विरोधाचा नियम या विचारसरणींत अगदीं सरळ आणि अति कडक असा कल्पिला आहे आणि त्याचें क्षेत्र वास्तवाबाहेर अतिव्यापक असें कल्पिलें आहे. ३) ज्या वस्तू नित्य अशा मूळ वस्तूंत, दिक्कालातीत ब्रह्मांत जन्म घेतात आणि आपली पहिली बैठक त्यांतच ठेवतात, त्या वस्तूंचा जन्म कालाच्या उदरीं झाला आहे अशी अवास्तव कल्पना वरील विचारसरणींत आहे.

सर्वनिरपेक्ष, केवल वस्तु आम्ही त्याच वस्तूला म्हणतों, जी आमच्यापेक्षां, आम्ही ज्या विश्वांत राहतो त्या विश्वापेक्षां, महान् आहे; जी सर्वातीत पुरुष, सर्वश्रेष्ठ सत्य आहे; जी ईश्वर या नांवानें आम्ही ओळखतों; जें आम्हांला अस्तित्वांत दिसत आहे, ज्याची अस्तित्वांत असल्याची जाणीव आमचे ठिकाणीं आहे, तें कांहींहि अस्तित्वांत असणें, अस्तित्वांत टिकणें, जी नसती तर शक्य नव्हतें. भारतीय विचारवंत त्या वस्तूला ब्रह्म म्हणतात, युरोपीय विचारवंत तिला सर्वनिरपेक्ष केवल वस्तु म्हणतात -- कारण ती स्वयंभू आहे. सर्वसंबंधमय वस्तूंच्या सर्व बंधनांच्या बंधनापलीकडे ती आहे. संबंधमय वस्तू अस्तित्वांत येण्यासाठीं व टिकण्यासाठीं, त्या सर्व वस्तूंचे सत्य, वस्तुत्व जिच्या ठिकाणीं आहे, त्यांच्या शक्ती, गुणधर्म जिच्यांतून निघतात, जिच्यांत राहतात, जी त्या वस्तूंच्या पलीकडेहि आहे, जी त्या सर्व वस्तूंना पोटांत घेऊन उरली आहे अशा वस्तूची आवश्यकता आहे; प्रत्येक संबंधसापेक्ष वस्तु आणि अशा ज्ञात व ज्ञेय वस्तूंची वाटेल तेवढी मोठी राशी, त्या संबंधातीत वस्तूचे व्यवहारांतील अंशमात्र, निकृष्ट असें प्रकट रूप असतें. ही संबंधातीत केवल वस्तु मुळांत असली पाहिजे, ही गोष्ट आमच्या सूक्ष्म बुद्धीला पटते; आध्यात्मिक अनुभव या वस्तूची जाणीव आम्हांला करून देतो; परंतु या वस्तूची अगदीं सूक्ष्म आणि सर्वांगीण जाणीव जरी आम्हांला झाली, तरी तिचें वर्णन आम्हांला करतां येत नाहीं -- कारण आमची भाषा, आमची

पान क्र. १४८

 

विचार-प्रक्रिया संबंधमय वस्तूंशींच व्यवहार करणारी आहे. या सर्वसंबंधातीत केवल वस्तूला अनिर्वचनीय असें नांव आम्हीं यासाठींच दिलें आहे.

ब्रह्मासंबंधानें येथवर सांगितलेली गोष्ट बुद्धीला अनाकलनीय नाहीं. तिचा कांहीं गोंधळ येथवर होत नाहीं, तिला येथवर कांहीं समजुतीची अडचण येत नाहीं, पण पुढें मात्र, भेदनिष्ठ, द्वंद्वनिष्ठ विचार करण्याची तिला संवय असल्यानें ब्रह्मासंबंधानें ती अवास्तव कल्पना करूं लागते. सापेक्षतेच्या, सापेक्ष वस्तूंच्या मर्यादांनीं ब्रह्म बांधलेलें नाहीं एवढेंच म्हणून बुद्धि थांबत नाहीं; ही जी बंधनातीतता, संबंधबंधनमुक्तता, संबंधातीतता, तिनें ब्रह्म बांधलेलें आहे अशी कल्पना बुद्धि करते : त्याचे ठिकाणीं संबंधशक्तीच मुळीं नाहीं, स्वभावतःच तें संबंध उभे करूं शकत नाहीं, त्याचें अंग अंग संबंधविरोधी आहे, तें नित्यश: संबंध-शत्रु आहे अशी कल्पना बुद्धि करते. आमच्या बुद्धीची ही ''तर्कशुद्ध'' कल्पना मात्र तिला, आम्हांला, मोठ्या अडचणींत आणते; या कल्पनेमुळें आमचें अस्तित्व, आमच्या विश्वाचें अस्तित्व तर्कदृष्ट्या अकल्पनीय, अशक्य होऊन बसतें, तें एक महान् गूढ होऊन बसतें. कारण संबंधयुक्तता जिला अशक्य आहे अशी केवल वस्तु, जिच्यांत संबंधमय वस्तू असूं शकत नाहींत अशी केवल वस्तु आहे, आणि असें असून संबंधयुक्ततेचा उगम, निदान आधार ती वस्तु आहे, आणि संबंधमय सर्व वस्तु तिजमध्यें आहेत, त्यांचें वस्तुत्व, गाभा, त्यांचें सत्य, घटकद्रव्य ती वस्तु आहे अशी वस्तुस्थिति आमच्यापुढें आम्हांला दिसते. या गूढांतून, या पेंचप्रसंगांतून सुटण्याचा तर्काला मान्य, अमान्य मार्ग एकच आहे. कालातीत, अरूप, निःसंबंध व केवल वस्तु हीच एक सत्य वस्तु आहे, जिच्या आधारानें विश्व ही मिथ्या कालग्रस्त वस्तु, किंवा स्वयंपरिणामकारी भ्रमरूप वस्तु  ''अस्तित्वांत'' आहे. केवल सत्य वस्तूवर हा विश्वाचा भ्रम उभा करण्याचें काम, फसवी व आडमार्गाला नेणारी आमची व्यक्तिगत जाणीव करीत असते. ही जाणीव, ब्रह्म हें ब्रह्म म्हणून न ओळखतां, ब्रह्माला चुकून विश्व म्हणून ओळखते; दोरीला कोणी चुकून साप म्हणून केव्हां केव्हां ओळखतो, त्याप्रमाणें. ही भ्रमाची कल्पना वर वर्णन केलेल्या पेंचप्रसंगांतून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे; पण या कल्पनेचा अर्थ काय होतो तो पहा : आमची व्यक्तिगत जाणीव (जी भ्रम निर्माण करते असें आम्ही म्हणतो ती जाणीव) सापेक्ष वस्तु आहे व तिला ब्रह्माचा आधार

पान क्र. १४९

 

आहे. या ब्रह्मामुळेंच तिचें अस्तित्व शक्य आहे, ती कांहीं 'खरी' स्वयंभू सत्य वस्तु नाहीं; किंवा असें म्हणूं कीं, तिचें सत्यत्व जें आहे तें तिचें ब्रह्मत्वच आहे. ब्रह्मस्वरूपांतच केवळ ती सत्य आहे, असें असल्यानें आमच्यांतील ब्रह्मरूप जाणिवेवर ब्रह्मच भ्रम उभा करते; मग तो भ्रम दोरीवर सापाचा भ्रम असो किंवा अनिर्वचनीय अशा स्वतःच्या  (ब्रह्म) स्वरूपावर विश्वाचा भ्रम असो; स्वतःच्या मूळ शुद्ध सत्य स्वरूपावर न म्हणतां, त्या स्वरूपांतून निघालेल्या, त्या स्वरूपावर सर्वस्वी अवलंबून असलेल्या मायेच्या क्षेत्रांत उभ्या केलेल्या आमच्यांतील  (ब्रह्माश्रय) जाणिवेवर असें म्हणू पाहिजे तर -- पण या म्हणण्यांत तत्त्वत: ब्रह्मानें ब्रह्मावर (स्वतःवर) भ्रम उभा केला असाच अर्थ होतो. तेव्हां भ्रमाची कल्पना तर्कविरोधी गूढ वस्तुस्थितीचें कांहीं खरें स्पष्टीकरण होऊं शकत नाहीं. संबंधातीत मूळ वस्तु ही संबंधयुक्त वस्तूंनीं व संबंधांनीं भरलेली आहे, या वस्तुस्थितींत तर्काला जो विरोध दिसतो तो कांहीं भ्रमाच्या कल्पनेनें दूर होत नाहीं -- आमच्या हट्टी तर्कशास्त्रानें नसता भ्रम उत्पन्न करून आमच्या मनांत गोंधळ उत्पन्न केला आहे. आमच्या मनाला विश्वाचा (संबंधमय वस्तुसंघाचा) आविष्कार ब्रह्मांतून  (निःसंबंध वस्तूंतून) कसा होतो हें समजणें अवघड जातें, ही गोष्ट खरी. पण मूळ ब्रह्माला स्वतांतून विश्व प्रकट करणेंहि तसेंच अवघड आणि म्हणून अशक्य आहे असा निष्कर्ष आमच्या बुद्धीनें काढणें -- स्वतःला ती गोष्ट समजत नाहीं या आधारावर वरील निष्कर्ष काढणें -- हा तार्किक अहंकाराचा अतिरेक आहे. अर्थात् बुद्धीच्या या अहंकाराचा परिणाम कांहीं मूळ वस्तूवर होत नाहीं ही गोष्ट वेगळी. ब्रह्म सर्व-अतीत राहून, कांहीं अडचण न येतां सर्व-विश्व आविष्कार करतें. मनाच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे विज्ञानभूमि आहे, तेथें ब्रह्माची ही कामगिरी तर्कशुद्धच गणली जाते. अर्थात् हा तर्क विज्ञानभूमीवरील तर्क होय. अनन्त आणि सान्त, अनुपाधिक आणि सोपाधिक एकदम एकावेळीं एकत्र सहजीवन, सह-अस्तित्व अनुभवतात. यांत विज्ञानाच्या (अतिमानसाच्या बुद्धीला) कांहीं तर्कविरोध दिसत नाहीं. आमच्या मानसिक बुद्धीला तो प्रकर्षानें भासतो. सान्त आणि अनन्त या वस्तू जिव्हाळ्याचे अन्योन्यसंबंधी आहेत हें अनन्त केवलाची ''बुद्धि'' मानते. एकाच सत्यवस्तूचे ते अन्योन्यविरोधी आविष्कार आहेत असें मानीत नाहीं; अनन्त सत्तेची जाणीव ही आमच्या मानसिक व इन्द्रियगत जाणिवेहून

पान क्र. १५०

 

फार मोठी, विशाल आहे, वेगळ्या स्वरूपाची आहे; या जाणिवेंत अनन्त-सान्त, निरुपाधिक-सोपाधिक या वस्तू तिच्या क्रियाशीलतेंतून निघणाऱ्या सहचारी अवस्था म्हणून उदय पावतात व टिकतात; अनन्त सत्तेचें तर्कशास्त्र हेंहि अर्थात् आमच्या बुद्धीच्या तर्कशास्त्राहून अगदीं वेगळें आहे. आमची बुद्धि शब्दांशीं, कल्पनांशीं खेळत असते; या कल्पना, हे शब्द दुय्यम घटनांतून निघालेले असतात; आणि यामुळें कांहीं वस्तूंच्या दरम्यान आमच्या बुद्धीला अगदीं न मिटण्यासारखा विरोध दिसतो -- पण मूळ वस्तु, अनंत सत्ता, आपल्या मूळ प्राथमिक घटनांच्या पोटांत वरील ''अन्योन्य विरोधी'' वस्तूंना एकत्र व ऐक्यानें वागविते, वागवूं शकते; कारण मूलत: त्यांच्यांत विरोध नसतो -- आमच्या मर्यादित बुद्धीला तो दिसतो.

आम्ही अशी एक चूक करीत असतो कीं, ज्याची ( ज्या केवल वस्तूची, ब्रह्माची) व्याख्या करतां येणें शक्य नाहीं, त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न करतांना नकारात्मक, सर्वबहिष्कारी नकारात्मक अशी त्याची व्याख्या करून ही व्याख्या योग्य झाली असें आम्ही मानतों; आणि त्याबरोबरच हें ब्रह्म भावात्मक आहे, सर्वश्रेष्ठ भावरूप वस्तु आहे (अभावरूप नाहीं) आणि सर्व भावरूप वस्तूंचा उगम आहे, अशीहि ब्रह्मासंबंधानें कल्पना करणें आम्हांला अपरिहार्य असतें. याप्रमाणें ब्रह्माचें भावात्मक, अभावात्मक वर्णन विचारांत घेऊन कांहीं थोर सूक्ष्मदृष्टीचे तत्त्वचिन्तक, अस्तित्वाच्या घटना पाहून, शाब्दिक भेदांकडे दुर्लक्ष करून, असें ठरवितात कीं, ब्रह्म ही वस्तु शून्यरूप आहे, बुद्धीनें उभी केलेली बिनबुडाची कल्पना आहे, शाब्दिक वादांतून निघालेली कल्पना आहे. ब्रह्म ही वस्तु वस्तुत: नाहींच, जें आहे तें नित्यश: होणारें व जाणारें क्षणिक कालग्रस्त घटनांचें चक्र आहे -- आमच्या अस्तित्वांत अशा शाश्वत घटनाप्रवाहावांचून नित्य असें कांहींहि नाहीं. आमचे प्राचीन तत्त्वज्ञ असे घटनाप्रवाह-वादी नव्हते व शून्यवादीहि नव्हते; ते नेति नेति  (ब्रह्म हें नव्हे, ब्रह्म तें नव्हे) असें ब्रह्माचें वर्णन करीत. पण त्याबरोबर ब्रह्म हें आहे, ब्रह्म तें आहे, ब्रह्म सर्व आहे असेंहि भावात्मक वर्णन करण्यास चुकत नसत. कारण त्यांना हें ठाऊक होतें कीं, भावात्मक व्याख्या असो, अभावात्मक व्याख्या असो, कोणतीहि एक व्याख्या ब्रह्माला बांधूं शकत नाहीं -- कोणत्याहि एका व्याख्येनें त्याला मर्यादा घालणें म्हणजे सत्यापासून च्युत होणें आहे. ते म्हणत अन्न, (जड)

पान क्र. १५१

 

हें ब्रह्म आहे; प्राण, मन, विज्ञान, विश्वानंद, सच्चिदानंद या सर्व वस्तूंना ब्रह्म असें प्राचीन तत्त्वज्ञ म्हणत, पण ब्रह्माची व्याप्ति येथें खुंटली असें ते मानीत नसत. सर्व कल्पनांत विशाल अशी कल्पना सच्चिदानंद ही आहे. पण ब्रह्म म्हणजे सच्चिदानन्द ही व्याख्या देखील प्राचीन तत्त्वज्ञांना अपुरी व अयथार्थ वाटत होती. आमची मानसिक जाणीव कितीहि विशाल व उंच झाली, तरी तिनें जें एकादें भावात्मक, भावविषयक विधान केलें असेल, त्या विधानाला विरोधी असें अभावात्मक, अभावविषयक विधान केल्याशिवाय तिला आपला आशय पुरतेंपणीं व्यक्त करतां येत नाही, अशी या आमच्या विश्वांतील व्यवहारांत आमच्या जाणिवेची स्थिति आहे. अभावात्मक, अभावविषयक म्हणून जें आतांच सांगितलें, त्या विधानांत वस्तुत:  ''अभाव'' किंवा ''शून्य'' हा अर्थ अभिप्रेत नसतो. आमच्या जाणिवेला प्रतीत होणारा ''अ-भाव'' किंवा ''शून्य'' शक्तीनें पुरेपूर भरलेलें असतें; अस्तित्वाची शक्ति, भावी किवा वर्तमान वस्तू त्या ''शून्यांत'' भरगच्च भरलेल्या असतात. या ''शून्याचा'', ''अभावाचा'' आम्हांला प्रत्यय येतो, त्याचें अस्तित्व आमच्या अनुभवास येतें म्हणून, त्याचा विरोधी  ''भाव'' अस्तित्वांत नसला पाहिजे किंवा तो भ्रमरूप, असत्य असला पाहिजे असा मात्र अर्थ नाहीं. हा ''भाव'' (किंवा भावविषयक विधान) वस्तुजाताचें सत्य अंशमात्र व्यक्त करतो, नव्हे त्या ''भावाचें'' स्वत:चेंहि सत्य अंशमात्रच व्यक्त करतो, पूर्णतया व्यक्त करीत नाहीं, एवढाच त्याचा अर्थ आहे. वस्तुस्थिति अशी आहे कीं, भाव आणि अ-भाव एकमेकाला लागून अस्तित्वांत असतात. एवढेंच नव्हे तर त्यांचे एकमेकांचे अपरिहार्य संबंध असतात. कोणाहि एकाचें अस्तित्व दुसऱ्याशिवाय अशक्य असतें. त्यांचें अस्तित्व अन्योन्याश्रयी असतें. ते एकमेकाला पूरक असतात. एकाची उणीव दुसरा भरून काढतो, एकाचें स्पष्टीकरण दुसरा पुरवितो -- अर्थात् हें ज्ञान सर्वस्पर्शी दृष्टीला होऊं शकतें, आमच्या मर्यादित मानसिक दृष्टीला होऊं शकत नाहीं. भाव आणि अ-भाव यांपैकीं एकच घेऊन त्याचें ज्ञान पूर्णतेनें, यथार्थतेनें मिळवीन म्हटलें तर तें शक्य नाहीं. जो कोणता पर्याय तुम्ही ज्ञानासाठीं घ्याल, त्याचें सखोल ज्ञान तेव्हांच होऊं लागतें, जेव्हां त्याच्या दर्शनी-विरोधी पर्यायांत सूचित झालेल्या गोष्टींचा अन्तर्भाव तुम्ही पहिल्या पर्यायांत करतां. मूळ केवळ वस्तूकडे बघतांना, तिच्या स्वरूपाचा, सामर्थ्याचा विचार करतांना, तर्कसूचित विरोधांवर, अन्योन्यविरोधी पर्यायांवर विसंबून न राहतां,

पान क्र. १५२

 

आतांच सांगितलेल्या सखोल सर्वसंग्रही व्यापक अन्तर्ज्ञानावर भर देणें हें आमच्या बुद्धीनें आपलें कर्तव्य समजणें योग्य होईल.

ब्रह्मासंबंधानें ब्रह्म '''' आहे, ब्रह्म '''' नाहीं, ब्रह्म '''' आहे, ब्रह्म '''' नाहीं अशा भावात्मक आणि अभावात्मक व्याख्या केल्या जातात. आमच्या जाणिवेला ब्रह्म स्वत:चें रूप कसें दाखवितें तें, कोणतीहि भावात्मक व्याख्या व्यक्त करते; आणि त्या व्याख्येची विरोधी (पूरक) व्याख्या ब्रह्माची इतर सर्व रूपें व्यक्त करते -- कोणत्याहि भावात्मक व्याख्येनें, व्यक्त झालेल्या रूपानें ब्रह्म बांधलेलें नाहीं, मर्यादित झालेलें नाहीं ही गोष्ट पूरक अ-भावात्मक व्याख्या व्यक्त करते; ब्रह्माच्या आद्यसंबंधसापेक्ष दर्शनांत सान्त व अनन्त, सोपाधिक व निरुपाधिक, सगुण व निर्गुण हीं दर्शनें येतात. या ज्या तीन ब्रह्मसंबंधदर्शक नांवांच्या व रूपांच्या जोड्या आहेत, त्यापैकीं प्रत्येक जोडींतील नकारात्मक नाम आणि रूप तत्पूरक भावात्मक नामांत व रूपांत असणारी सर्व शक्ति गुप्तपणें धारण करीत असतें : यापैकीं भावात्मक रूप हें, अ-भावात्मक रूपांतूनच व्यक्त होत असतें, त्याच्या पोटींच व्यक्त होण्यापूर्वीं तें असतें; अर्थात् या दोन विरोधी भासणाऱ्या रूपांचा विरोध मुळींहि नसतो. ब्रह्माची वरील आद्यसंबंधसापेक्ष रूपांनंतरचीं, सूक्ष्मतेच्या खालच्या पातळीवर असणारीं वास्तवरूपें हीं, विश्वातीत पुरुष आणि विश्वपुरुष, विश्वपुरुष आणि व्यष्टिपुरुष या जोड्यांनीं दाखविलीं जातात. या जोड्यांत प्रत्येक जोडींतील प्रत्येक घटक तद्विरोधी भासणाऱ्या दुसऱ्या घटकांत सर्वांशीं समाविष्ट असतो. विश्वपुरुष हा विश्वपुरुष राहून अंशभूत व्यष्टिपुरुष बनतो, व्यष्टिपुरुष स्वत:च्या अंतरीं विश्वपुरुषाच्या सर्व समष्टी धारण करतो. विश्वपुरुषाची विश्वजाणीव ही असंख्य व्यष्टींच्या विविध जाणिवांच्या द्वारां आपलें विश्वरूप सर्वांशांनीं व्यक्त करते. व्यष्टिभेद दडपून टाकून ती आपली अभिव्यक्ति करीत नाहीं; व्यष्टिजाणीवहि पूर्णतया आपली परिपूर्ति करतांना विश्वाशीं, विश्वपुरुषाशीं भावैक्यानें एकरूप होण्याइतकी आपली व्यापकता वाढविते, अहम् च्या मर्यादांनीं स्वत:ला मर्यादित करून राहत नाहीं. विश्वपुरुष स्वत:मध्यें सर्व व्यष्टी धारण करतो, त्याप्रमाणें स्वत:च्या विश्वरूपांत आणि स्वत:मधील प्रत्येक व्यष्टीच्या रूपांत, विश्वातीत तत्त्व वा पुरुष अन्तर्यामित्वानें पूर्णपणें धारण करतो; त्याची स्वत:च्या विश्वातीत अस्तित्वाची जाणीव ही त्याच्या विश्वमयत्वाचा आधार असते; व्यष्टि-

पान क्र. १५३

 

पुरुषाचे ठिकाणीं विश्वपुरुष असतो, त्यालाहि त्या त्या व्यष्टीचे ठिकाणीं आणि सर्व वस्तुजाताचे ठिकाणीं आपल्या विश्वातीत दिव्य अस्तित्वाची अनुभूति स्वत:च्या अस्तित्वाला आधार म्हणून लागत असते. विश्वातीत पुरुष (परब्रह्म) विश्व आपल्या पोटीं धारण करतो; हें विश्व तो व्यक्त करतो, विश्वाचे घटकद्रव्य आणि घडणारा तोच असतो; विश्वाच्या या आविष्कारानें तो स्वत:मधील अनन्त सुंदर सुरेल सुरस सुसंवादमय विविध वस्तू अभिव्यक्त करतो, अनावृत करतो, प्रकाशांत आणतो. संबंधमयतेच्या खालच्या ज्या पातळ्या आहेत, तेथेंहि भाव आणि अ-भाव हा खेळ आहे; आणि हा खेळ खेळत आम्हांला मूळ नि:संबंध केवल ब्रह्म गांठावयाचें असेल, तर या जोडीपैकीं कोणत्याहि घटकाला छाटून किंवा त्यांचा दर्शनी विरोध अतिरेकाला नेऊन ती गोष्ट साधणार नाहीं, तर वरच्या पातळीवर चढून त्या दोन घटकांचा दिव्य समन्वय करणें हाच ब्रह्म गांठण्याचा मार्ग आहे. ब्रह्माचे ठिकाणीं संबंधमय वस्तुसंघात कां अस्तित्वांत येतो व राहतो, याचें कारण आणि समर्थन सांपडलें; ब्रह्म या संबंधमय संसाराचा उगम आहे, त्याचें (संसाराचें) सत्य रूप ब्रह्मच आहे, तो कांहीं आभास नव्हे -- संबंधमय संसार आपला नव्हे असें कांहीं ब्रह्म म्हणत नाहीं, त्याच्या मिथ्यत्वाचा पुरस्कार करीत नाहीं -- असा, ब्रह्माचा अनुभव घेणाऱ्यांचा अनुभव आहे. विश्व काय किंवा व्यष्टि काय त्यांचा उगम ब्रह्मांतच आहे; विश्वाचें खरें सत्य, व्यष्टीचें खरें सत्य ब्रह्म आहे, ही गोष्ट आम्हीं आपल्या हृदयांत पक्केपणीं ठसविली पाहिजे. ब्रह्म म्हणजे कांहीं संशयात्मा तर्कशास्त्री नव्हे. आपणच एक विधान करावें आणि त्या विधानाला नकार आपणच करावा हें तर्कशास्त्राचें व्यसन आहे; ब्रह्म हें, असलें व्यसन असणारा तर्कशास्त्री नसून तें एक महान् अनंत अस्तित्व आहे. सर्वथा भावात्मक वस्तु आहे, कोणत्याहि सीमांनी कोंडली न जाणारी वस्तु आहे -- कोणतेंहि सान्त, सीमित अस्तित्व, वस्तु या अनंत ब्रह्म-वस्तूला व्यापूं शकणार नाहीं, स्वत:च्या व्याख्येनें, सीमेनें बांधूं शकणार नाहीं -- संबंधमय संसारांत जें जें कांहीं आहे तें तिचें तिनें स्वत: केलेलें ''विधान'' आहे, ''आत्माविष्करण'' आहे; त्याचा नकार करणें हें त्या वस्तूकडून कधींहि घडणार नाहीं आणि कोणत्याहि आविष्कारानें तिचें पूर्णतया प्रकटन होणार नाहीं, तिची अनन्तता खरी अनन्त आहे.

पान क्र. १५४

 

ब्रह्म-वस्तूची वास्तव स्थिति वरीलप्रमाणें असल्यानें, आमच्या बुद्धीनें प्रमाण मानलेला विरोधाचा नियम तिला बांधूं शकत नाहीं. आम्हांला तो नियम उपयोगी पडणारा आहे, आवश्यक आहे. त्या नियमाच्या आश्रयानें आम्हांला व्यावहारिक अंशस्पर्शी सत्यें शोधून निश्चित करतां येतात. वस्तूंचा स्वच्छ निश्चित उपयुक्त विचार करतां येतो. विशिष्ट प्रयोजनांच्या सिध्यर्थ त्यांचें नीट वर्गीकरण करतां येतें, आणि आम्हीं केलेल्या स्थलविभागांत, आकारभेदांत, गुणभेदांत, काल विभागांत, त्या वस्तूंशीं जो व्यवहार आम्हांला करावयाचा असतो तो, आमच्या विरोधविषयक नियमाच्या आश्रयानें विशिष्ट प्रयोजनांच्या सिध्यर्थ परिणामकारक रीतीनें आम्हांला करतां येतो. विरोधांचा नियम हा अस्तित्वाच्या क्रियाशील रूपविषयक सत्याचा व्यवहार कसा चालतो, कसा चालवावा तें दाखविणारा नियम आहे; अगदीं बाहेरचा भौतिक असा जो वस्तुजाताचा भाग, तेथें हा नियम विशेष जोरदार असतो; आपण बाह्य भौतिक टाकून जसजसें उच्चतर भूमीवर जातों, तसतसा हा नियम कमी बंधनकारक होत जातो. भौतिक घटना व वस्तु आणि भौतिक शक्ति यांच्याशीं व्यवहार करतांना, यांच्या द्वारां व्यवहार करतांना, आमच्या बुद्धीनें शोधलेला विरोधाचा नियम आम्हांला विशेषत: उपयोगी पडतो, आवश्यक असतो; या घटनांचा, वस्तूंचा, या शक्तींचा सामूहिक विचार करून चालत नाहीं -- प्रत्येक घटना, प्रत्येक वस्तु, प्रत्येक शक्ति स्वतंत्र आहे असें धरून विचार व व्यवहार करावा लागतो : एका वेळीं एकच घटना, एकच वस्तु, एकावेळीं एकच शक्ति विचारांत घ्यावी लागते; भौतिक घटनांचे, वस्तूंचे प्रकट, व्यवहारी, परिणामकारक गुणधर्म दिसतील तेवढेंच यांचे गुणधर्म आहेत असें धरून चालावे लागतें; असें न केलें, तर या वस्तूंचा, घटनांचा, शक्तींचा उपयोग आम्हांला करतां येत नाहीं; पण येथेंहि मानवी विचाराला हें लक्षांत येत आहे कीं, बुद्धीनें केलेले भेद, विज्ञानानें केलेले वर्ग आणि प्रयोग, त्या त्या प्रयोजनापुरते, त्या त्या क्षेत्रापुरते पूर्णपणें उपयुक्त आणि न्याय्य असले, तरी वस्तुजाताचे सत्य, पूर्णतया किंवा वास्तवतया त्यांचे ठिकाणीं नसतें; वर्गीकृत सर्व वस्तुजात घ्या किंवा कोणतीहि एक वस्तु घ्या, पृथ:करणाकरतां इतर वस्तूंपासून वेगळी काढलेली वस्तु घ्या; या पृथक् वस्तूंतील किंवा वस्तुसंघांतील खरें किंवा पूर्ण सत्य, वर्गीकरणाच्या प्रक्रियेनें, भेद करण्याच्या प्रक्रियेनें आमच्या हातीं लागत नाहीं. वस्तु

पान क्र. १५५

 

वेगळी काढल्यानें तिचा व तिजसंबंधींचा प्रयोग, व्यवहार आम्हांला परिणामकारक रीतीनें करतां येतो हें खरें आहे; आणि आमचा हा यशस्वी प्रयोग व व्यवहार आम्हांला असा विचार प्रथम सुचवितो कीं, आम्ही पृथक्करणानें जें ज्ञान मिळवितों तें पूर्ण आहे, पूर्ण सत्य आहे -- पुढें या पृथक्करणाच्या पलीकडे आम्ही गेलों, म्हणजे पृथक्करणानें लाभलेल्या सत्यापेक्षां थोर सत्य आणि महत्तर यशस्वितताहि आम्हांला प्राप्त होते, असा आम्हांला अनुभव येतो.

प्राथमिक ज्ञानासाठीं वस्तूचें विभक्तीकरण अवश्य असतें, वस्तु वेगळी काढून पाहणें अवश्य असतें. हिरा आणि मोती उदाहरणार्थ घेऊं. हिरा हा हिरा आहे, मोती हा मोती आहे; प्रत्येकाचा वर्ग वेगळा आहे. दुसऱ्या वर्गाच्या वस्तूपासून निराळेपणा हा प्रत्येक वर्गांतील वस्तुवस्तूचा विशेषधर्म असतो; प्रत्येकाचा आकार, त्याचा गुणसंघ वेगळा असतो; पण याप्रमाणें हिरा आणि मोती यांचे गुणधर्म, आकार भिन्न आहेत हें खरें असलें, ते वेगळ्या वर्गांत पडतात हें खरें असलें, तरी हिरा व मोती दोघांनाहि समान असे गुणधर्म आहेत, समान असे घटक आहेत, शिवाय  'भौतिक वस्तु' या वर्गाला ज्या गुणधर्मांनीं व घटकांनीं स्वतंत्र वर्गत्व येतें ते गुणधर्म व घटकहि हिरा व मोती या दोघांमध्येंहि आहेत. हिरा किंवा मोती यांचें अस्तित्व हें त्या त्या वस्तूच्या विशेष गुणामुळेंच शक्य होतें असें नसून, त्या दोघांचे जे सामान्य गुण आहेत, त्यांचीहि या दोन वस्तूंच्या अस्तित्वासाठीं आवश्यकता असते; नव्हे, या सामान्य गुणधर्मांचीच या दोन वस्तूंच्या अस्तित्वासाठीं अधिक मूलभूत आवश्यकता असते. सर्व भौतिक वस्तूंचें मूळ वस्तुत्व, मूळ पायाभूत अमर सत्य शोधलें, तर हेंच सांपडतें कीं, या सर्व वस्तू मुळांत एक शक्ति, एक द्रव्य आहेत; किंवा पाहिजे तर असें म्हणूं कीं, या सर्व भौतिक वस्तू मुळांत ''विश्वव्यापी गति'' आहेत. या गतीच्या स्वतःच्या सत्तेंत कांहीं तालबद्ध निश्चित स्वरूपाच्या शक्यता आहेत; आकार, गुणधर्म या संबंधांत या गतीच्या निश्चित शक्यता आहेत, त्या शक्यता, ते विविध आकार व गुणधर्म, ही मूळ विश्वव्यापी गति आपल्या ओघांत वर फेकीत असते, व्यक्त करीत असते, एकमेकाशीं जोडीत असते, आम्हांला प्रतीत होणाऱ्या वस्तूंच्या रूपांत प्रकट करीत असते. हिरा व मोती याविषयींचें भेदांचे ज्ञान घेऊन आपण थांबलों व व्यवहार करूं लागलों तर हिरा व मोती ज्या रूपांत असतात त्या रूपांत आम्ही त्यांचा व्यवहार

पान क्र. १५६

 

नीट करूं शकतों; त्यांच्या किंमती ठरविणें, त्यांचे उपयोग ठरविणें, त्यांचे प्रकार निश्चित करणें हीं कामें आम्ही करूं शकतों. सामान्य व्यवहारांत त्यांचा उत्तमांत उत्तम उपयोग करूं शकतों, त्यांच्यापासून अधिकांत अधिक लाभ घेऊं शकतों, पण आम्ही त्यांच्या घटकांचे ज्ञान मिळविलें, या घटकांवर ताबा मिळविला, ते ज्या वर्गांतील आहेत त्या वर्गांतील वस्तूंच्या सर्वसामान्य गुणधर्मांची ओळख करून घेतली आणि या गुणधर्मांचे नियंत्रण करू शकलों, तर आमच्या इच्छेनुसार आम्हांला हिरा बनवितां येईल, मोती बनवितां येईल; आणखी पुढें जाऊन, भौतिक वस्तूंचा जो गाभा आहे, त्याचें ज्ञान करून घेऊन त्यावर आम्हीं स्वामित्व मिळविलें, तर आम्हांला एका वस्तूचें दुसरींत रूपांतर करण्याचें सामर्थ्य लाभेल आणि भौतिक निसर्गावरील आमचा ताबा पराकोटीला पोंचेल. तेव्हां असें झालें कीं, भेदांचें ज्ञान आम्हांला तेव्हांच आयतें परिणामकारक रीतीनें उपयोगी पडतें आणि तेव्हांच त्याचें महत्तम सत्य आम्हांला सांपडतें, जेव्हां हे भेद सुसंवादी करणाऱ्या तत्त्वाचें सखोल ज्ञान आम्हांला लाभतें. सर्व भेदांच्या मागें, तळाशीं एक तत्त्व आहे व त्या तत्त्वांत सर्व भेदांचा प्रादुर्भाव होत असल्यानें, त्या भेदांत विरोध नसून सुसंवादित्व आहे, हें ज्ञान जेव्हां आम्हांला होतें तेव्हां भेदज्ञानांतील महत्तम सत्य आणि महत्तम परिणामकारकता आमच्या प्रत्ययास येते. हें उच्चतम, गाढतम ज्ञान झालें म्हणजे पूर्वीचें जें सामान्य पातळीवरचें ज्ञान असतें ते फोल ठरतें, परिणामशून्य ठरतें असें मात्र नाहीं. आम्हांला भौतिकाचा खोल अभ्यास करून शेवटीं हा शोध लागला कीं, मुळांत जडद्रव्य नाहींच, केवळ शक्ति आहे, गति आहे; ही शक्ति, ही गति द्रव्य उभें करतें किंवा असें म्हणूं कीं, द्रव्याच्या रूपानें ती शक्ति, ती गति व्यक्त होते -- पण हा शोध लागला म्हणून असा सिद्धांत आम्हांला करतां येत नाहीं कीं, हिरा व मोती या वस्तू खऱ्या अस्तित्त्वांत नाहींत, त्या केवळ मिथ्या वस्तू आहेत. आमच्या ज्ञानेन्द्रियांना व कर्मेंद्रियांना भ्रम झाल्यानें त्या सत्य वाटतात इतकेंच; आमच्या शोधावरून आम्हांला असें म्हणतां येत नाहीं कीं, एक द्रव्य किंवा त्याचें शोधलेले मूळ, शक्ति किंवा गति हेंच काय तें शाश्वत सत्य आहे आणि म्हणून आमच्या विज्ञानाचा बुद्धीला पटणारा खरा उपयोग एवढाच कीं, हिरा, मोती पृथक्करणानें विरवून, दुसऱ्याहि सर्व वस्तू विरवून हें मूळ सत्य, ही मूळ ''वस्तु'' गांठावी -- या ''बनावट''

पान क्र. १५७

 

वस्तूचे गुणधर्म आणि आकार सर्वथा निकालांत काढून मोकळें व्हावें. एकंदर सत्याचा शोध घेतां असें मान्य करावें लागतें कीं, वस्तुजाताचें सारभूत सत्य म्हणून जसें कांहीं एक आहे, तसेंच वस्तूची समष्टिता म्हणून कांहीं एक आहे आणि वस्तूंची व्यक्तिता पण आहे. वस्तूंची समष्टिता आणि त्यांची व्यक्तिता यांच्या पलीकडे त्या वस्तूंची सारभूत सत्यता असते; वस्तूंची समष्टिता आणि व्यक्तिता या वस्तुसाराच्या वास्तव शाश्वत शक्ती आहेत, वस्तुसार, वस्तुसमष्टि आणि वस्तुव्यष्टि या तीन ''वस्तू'' मिळून ''अस्तित्व'' बनतें; या घटकांपैकीं कोणत्याहि एका घटकाचें अस्तित्व दुसऱ्या दोहोंवांचून असूंच शकत नाहीं. अस्तित्वाचे शाश्वत असे हे तीन घटक नित्य एकत्र असतात.

प्रकरण चौथें

दिव्यत्व आणि अदिव्यत्व

 

सर्वद्रष्टा, तत्त्वचिंतक, स्वयंभू, सर्वस्थानीं सरूप होऊन राहणारा जो परमात्मा त्यानें सर्व वस्तुजाताची व्यवस्था अनादि काळापासून यथोचित केलेली आहे.

- ईश उपनिषद् श्लोक ८

 

अनेकजण ज्ञानतपानें शुद्ध होऊन माझ्याशीं समान अवस्थेचे झाले आहेत; त्यांच्या जीवनविषयक नियमाच्या बाबतींत माझ्याशीं समानधर्मी झाले आहेत. 

- गीता ४-१०; १४-२

 

तेंच ब्रह्म आहे हें ओळख; माणसें ज्याची येथें उपासना करतात तें हें ब्रह्म नव्हे. -- केन - उपनिषद् १-४

 

सर्व भूतांचें नियमन करणारा सर्वांचा अन्तरात्मा एकच आहे ... विश्वाचा नेत्र सूर्य, बाह्य नेत्र-दोषांनीं स्पर्शिला जात नाहीं, त्याप्रमाणें हा भूतांचा अन्तरात्मा विश्वांतील दुःखांनीं स्पर्शिला जात नाहीं.

- कठ उपनिषद् ५-१२, ११

 

ईश्वर सर्वभूतांच्या हृदयांत वास करतो.

- गीता १८-६१

 

काल-स्थलदृष्ट्या अनंत, अव्यक्त अशा विश्वगर्भ सद्वस्तूची विश्व ही अभिव्यक्ति आहे; ती दिव्य सद्‌वस्तु, तो दिव्य पुरुष, जें जें कांहीं आहे त्याच्या अंतर्यामीं वास करतो; आमचा आत्मा तोच आहे. आमचें खोलांत खोल अस्तित्व तोच आहे; आमच्या अन्तरांत गुप्तपणें वास करणारा विज्ञानमय पुरुष त्या दिव्य जाणिवेचा आणि त्या तत्त्वाचा  (दिव्यपुरुषाच्या तत्त्वाचा) एक अंश आहे. आमच्या अस्तित्वासंबंधानें आम्हीं जी दृष्टि स्वीकारली आहे व प्रतिपादली आहे ती वरील प्रकारची आहे : दिव्य-जीवन म्हणून एक जीवनपद्धति आहे. मानवी विकास शेवटीं मानवाला तें दिव्य जीवन उपलब्ध करून देणारा आहे, असेंहि आम्हीं

पान क्र. १७०

 

प्रतिपादिलें आहे. अर्थात् आमचें प्रस्तुतचें जीवन आणि आम्हां मानवांच्या खालीं असणारें प्राणिजीवन हें सर्व अदिव्य जीवन आहे, असा आमच्या प्रतिपादनांतून ध्वनि निघतो. सकृत् दर्शनीं हें प्रतिपादन स्वत: मांडलेल्या सिद्धांताच्या विरोधी सिद्धांताचें समर्थन करणारें दिसतें. सर्वच विश्वव्यवहार ईश्वराच्या दिव्य अभिव्यक्तीचा व्यवहार आहे, असें म्हटल्यावर दिव्य जीवन आणि अदिव्य जीवन असा भेद करण्यापेक्षां, दिव्य जीवनाच्या एका पातळीवरून तिच्याहून उंच अशा पातळीवर आम्ही जाऊं इच्छितों व जातों आणि ह्या दोन्ही जीवनभूमिका ईश्वरी दिव्य अभिव्यक्तीच्या पोटांत आहेत, अशी मांडणी करणें अधिक तर्कशुद्ध होईल व तात्विक दृष्ट्या पाहतां हें म्हणणें मान्य करावें लागेल. वस्तुजाताच्या पोटीं जी सद्‌वस्तु आहे तिच्याकडेच केवळ लक्ष दिलें, बाह्य परिसरांत घडणाऱ्या गोष्टींमुळें ज्या कल्पना उभ्या राहतात त्यांकडे दुर्लक्ष केलें, तर आमच्या विकाराचें स्वाभाविक स्वरूप, निसर्गांत आम्ही जें रूपान्तर पावणार आहों त्याचें स्वरूप, एका दिव्य विकासभूमीवरून तिजहून उंच असलेल्या विकास भूमीवर जाणें याच प्रकाराचें आहे; विश्वव्यापी दृष्टि ज्याला लाभली आहे, ज्याची दृष्टि एकांगीं नाहीं, ज्ञानअज्ञान या द्वंद्वाचा ज्या दृष्टीला उपसर्ग, संपर्क नाहीं, दोष नाहीं, मंगलअमंगल, पुण्य-पाप, सुख-दुःख या द्वंद्वांची बाधा ज्या दृष्टीला नाहीं  -- सच्चिदानंदाच्या अप्रतिहत जाणिवेचा आणि आनंदाचा भोग ज्या दृष्टीला उपलब्ध आहे -- त्या दृष्टीला, आम्ही दिव्य जीवनाच्या एका विकासभूमीवरून तिच्याहून उंच अशा विकासभूमीवर मार्गक्रमण करीत आहों असेंच दृश्य दिसेल, हें स्पष्ट आहे. पण ही तात्विक दृष्टि झाली; मूळ सद्वस्तूची दृष्टि, त्या सद्वस्तूशीं एकरूप झालेल्याची दृष्टि झाली. दुसरीहि दृष्टि आहे; आमची सापेक्ष दृष्टि, व्यवहारी दृष्टि ही ती दुसरी दृष्टि होय. या दुसऱ्या दृष्टीला दिव्य जीवन आणि अदिव्य जीवन या दोन गोष्टी स्पष्टपणें भिन्न दिसतात; ही भिन्नता, हा भेद या दृष्टीला सारखा जाचत असतो; या दृष्टीला हा भेद अर्थपूर्ण आहे; टाळण्यासारखा नाहीं. तेव्हां या प्रश्नावर कांहीं प्रकाश टाकणें, या प्रश्नाचें महत्त्व मापणें आम्हांला आवश्यक आहे.

दिव्य जीवन आणि अदिव्य जीवन हा जो भेद आम्ही करतो, त्याचा व्यावहारिक अर्थ असा कीं, ज्ञानावर आधारलेलें जीवन, आत्मजाणिवेनें चाललेलें जीवन, ज्ञानाच्या सामर्थ्यानें चाललेलें जीवन म्हणजे

पान क्र. १७१

 

दिव्य जीवन आणि उलटपक्षीं अशा ज्ञानाच्या अभावानें, अज्ञानानें चाललेलें जीवन म्हणजे अदिव्य जीवन. अचेतनाच्या पायांतून विश्व हळू हळू वर येत आहे, विकास पावत आहे, अनेक अडचणींना तोंड देऊन विकास पावत आहे; चेतना आणि ज्ञान जेथें हळू हळू ज्ञानशून्य अचेतनांतून उदित होत आहे, वाढत आहे अशा विश्वांत अज्ञानाचें जीवन म्हणजे अदिव्य जीवन आणि ज्ञानाचें जीवन म्हणजे दिव्य जीवन असाच भेद आम्हांला करावा लागतो : अचेतन ज्ञानशून्यता हाच ज्या जीवनाचा पाया आहे त्या जीवनांत मौलिक अपूर्णता असणारच. असें जीवन आत्मसंतुष्ट असूं शकेल पण जें अपूर्ण आहे, विसंवादी आहे, विसंगत गोष्टींची गोधडी हेंच ज्याचें स्वरूप आहे असेंच हें ''आत्मसंतुष्ट'' जीवन असणार यांत संशय नाहीं; कारण त्याचा पाया, मूलाधार जड अचेतन द्रव्य आहे. ज्याचा अचेतन जड हा पाया नाहीं असें शुद्ध प्राणिक जीवन, मानसिक जीवन त्याच्या त्याच्या मर्यादित क्षेत्रांतहि ''पूर्ण'' असूं शकेल. आत्मशक्ति, आत्मज्ञान त्या जीवनांत मर्यादित असलें, तरी तें सुसंवादी असूं शकतें आणि हा सुसंवाद ''पूर्ण''तेचें मुख्य लक्षण आहे. सुसंवादी आत्मशक्तीवर, आत्मज्ञानावर आधारलेलें जीवन म्हणजे पूर्ण ''जीवन'', दिव्य जीवन. अदिव्य जीवन तें कीं, ज्या जीवनांत कायमची विसंगति, विसंवाद आहे, कायमची अपूर्णता आहे; दिव्य जीवन पायरीपायरीनें विकास पावत असतें -- पण प्रत्येक पायरीवर त्याचें तात्विक आणि तपशिलाचें स्वरूप सुसंवादानें परिपूर्ण असतें. दिव्य जीवन ही अशी पक्की भूमि असते कीं, तिच्यावर खरी स्व-तंत्रता आणि पूर्णता स्वभावत:च फुलते, फळते, आणि त्यांचें जें अंतिम श्रेष्ठ स्वरूप तें त्यांना क्रमश: स्वभावत: प्राप्त होतें; स्वतंत्रता आणि पूर्णता दिव्य जीवनाच्या भूमीवर शुद्ध, शुद्धतर, शुद्धतम होत जातात, विस्तारानेंहि सारखें अधिकाधिक क्षेत्र व्यापीत जातात आणि याप्रमाणें त्यांना शक्य असलेलें सूक्ष्मतम, शुद्धतम, महत्तम वैभव स्वभावत: क्रमश: शेवटीं त्यांना प्राप्त होतें. दिव्य जीवन आणि अदिव्य जीवन यांतील अंतराचा विचार करतांना सर्व प्रकारची पूर्णता व सर्व प्रकारची अपूर्णता विचारांत घ्यावयास हवी; पण सामान्यत: आम्ही या दोन जीवनांतील अंतराचा जेव्हां विचार करतों, तेव्हां आम्ही तो विचार मानव या नात्यानें करीत असतो -- आम्ही मानवजीवनाच्या अनेक अडचणीशीं झगडत जीवन कंठीत असतों, आम्हांला आपत्तींत टाकणाऱ्या ज्या अगदीं निकटच्या गोष्टी असतात, आम्हांला क्षणोक्षणीं बोचणारीं जीं कोडीं

पान क्र. १७२

 

असतात, त्या कोड्यांचा आणि आपत्तींचा विचार हाच दिव्य आणि अदिव्य जीवनांतील अंतर ठरवितांना आमच्यासमोर प्रामुख्यानें असतो; आम्ही दुष्टपणा आणि सुष्टपणा जो संसारांत अनुभवतों, दुःख आणि सुख जें आमच्या वांट्यास येतें त्याचाच विचार, दिव्य-अदिव्य जीवनाचा प्रश्न आम्हांपुढें असतांना, आमच्या लक्षांत प्रामुख्यानें येतो. वस्तुजाताच्या पोटीं दिव्य ईश्वरी सत्ता आहे कीं नाहीं, विश्व हें ईश्वरापासून निघालें आहे कीं नाहीं, विश्वांतील व्यवहार ईश्वराच्या नियंत्रणाखालीं चालतो किंवा कसें, या गोष्टींचा जेव्हां आम्ही आपल्या बुद्धीनें विचार करतों, तेव्हां विश्वांत जो दुष्टपणा दिसतो, विश्वांत जें दुःख दिसतें, मानसिक, शारीरिक दुःख व क्लेश यांजकडे निसर्गांत जो मोठा प्रभावशाली कार्यभाग सोंपविलेला दिसतो, त्यावरून, त्यायोगें आमची बुद्धि ''हतबुद्ध'' होते; या क्रूरतेच्या गोष्टी आमच्या बुद्धीला पटत नाहींत आणि याचा परिणाम, आमची स्वाभाविक मानवी श्रद्धा नाहींशी करण्यांत होतो. विश्वाची उत्पत्ति ईश्वरानें केली आहे, विश्वाचें नियंत्रण ईश्वर करीत आहे, ईश्वर सर्वव्यापी, सर्वदर्शी, सर्वनियामक आहे, ही आमची स्वाभाविक श्रद्धा आमच्या समोर असलेल्या क्रौर्याच्या घटनांनीं पार नाहींशी केली जाते. चांगुलपणा, वाईटपणा आणि सुखदुःख या द्वंद्वांहून इतर अडचणीहि संसारांत आहेत -- पण त्याचें कांहींतरी स्पष्टीकरण फार डोकें न चालवितां आम्ही देऊं शकूं आणि या सुलभ स्पष्टीकरणानें संतोष मिळवूं शकूं : वरील क्रूर द्वंद्वांचें मात्र तसें नाहीं; त्यांनीं आमच्या श्रद्धेला धक्का बसणें अटळ आहे. आमच्या बुद्धीची ही सर्व अडचण लक्षांत घेऊनहि असें म्हणतां येतें कीं, दिव्य-अदिव्यत्व ठरविण्यास आम्हीं हें जें न्यायाचें माप घेतलें आहे, तें तितकेसें व्यापक नाहीं; तें फारच मोठ्या प्रमाणांत केवळ मानवी दृष्टीचें माप आहे. मानवी दृष्टीच्या पलीकडे अधिक व्यापक दृष्टीनें चांगलें-वाईट आणि सुख-दुःख या द्वंद्वांकडे पाहिल्यास हीं द्वंद्वें डोळ्यांत भरण्यासारखीं असलीं, वाईट आणि दुःख या घटना दुर्लक्षिण्यासारख्या नसल्या, तरी त्या कांहीं आमच्या जीवनांतील अपूर्णता व दोष पूर्णतया दाखविणाऱ्या नाहींत; आमच्या जीवनांतील मूळ उणीव या घटनांत नसून ती वेगळीच आहे, असें दिसून येतें. विश्वांत अपूर्णता, दोष अनेक प्रकारचे आहेत; वर उल्लेखिलेले दोन दोष म्हणजे कांहीं दोषांची संपूर्ण यादी नव्हे; आमचें आत्मिक-भौतिक जीवन साधुता आणि सुख गमावून पतन पावलें आहे, आमच्या प्रकृतीला

पान क्र. १७३

 

असाधुता आणि दुःख यांजवर विजय मिळवितां आलेला नाहीं, हें खरें असलें, तरी एवढेंच कांहीं आमचें पतन नव्हे, एवढाच कांहीं आमचा पराभव नव्हे. नैतिक बुद्धीचें समाधान नाहीं, सुखवादी बुद्धीचें समाधान नाहीं अर्थात् चांगुलपणा जगांत फार थोडा आहे, आनंदहि फार थोडा आहे, हें तर खरेंच, पण ईश्वरी मापाच्या दृष्टीनें आणखीहि दोष या विश्वांत आहेत : ज्ञान, सत्य, सौंदर्य, सामर्थ्य, ऐक्य या गोष्टी दिव्य जीवनाच्या घटकांत मोडतात, आणि या गोष्टीहि फार काटकसरीनें अगदी कद्रूपणे आम्हांला दिल्या गेल्या आहेत. ईश्वरी स्वभावांत, खऱ्या दिव्य जीवनांत या गोष्टींची उपस्थिति सामान्य प्रमाणांत नसून अगदी उच्चतम प्रमाणांत असते. ज्ञानाची व इतर उपरिनिर्दिष्ट गुणांची पराकोटी ईश्वरी प्रकृतींत अन्तर्भूत असते.

आम्हां मानवांची व आमच्या विश्वाची अदिव्यता, अपूर्णता यथार्थपणें वर्णन करावयाची, तर केवळ नैतिक दोष, दुष्टपणा आणि इन्द्रियगत दुःख यांचेंच महत्त्व या वर्णनांत असतां उपयोगी नाहीं : विश्वाच्या कोड्यांत या दोन गोष्टीइतकेंच महत्त्व इतर अनेक दोषांनाहि आहे, हें आतां स्पष्ट झालें आहे. नैतिक दोष किंवा पाप आणि दुःख ही फळें आहेत. एका सर्वसाधारण तत्त्वाची आम्हांला फार जांचणारीं फळें आहेत. तें तत्त्व म्हणजे, ''अपूर्णता'' होय. या अपूर्णतारूपी मूळ दोषाचा बारकाईनें विचार केल्यास असें दिसते कीं, जीं ईश्वरी तत्त्वें आमच्यामध्यें आहेत, तीं मर्यादांनीं संकुचित झालेलीं आहेत; ईश्वरी तत्त्वांचा हा मर्यादितपणा, त्यांचें ईश्वरीयत्व वस्तुत: नाहींसें करून टाकतो, त्यांची दिव्यता संपुष्टांत आणतो; मर्यादांनीं ईश्वरी गुणांची दिव्यता नाहींशी झाल्यानंतर त्यांच्यांत अनेक प्रकारची विकृति उत्पन्न होते; ईश्वरी गुणांचे विरोधी ''गुण'' या विकृतींतून निघतात, मूळ अस्तित्वाचें, सद्वस्तूचें जें ध्येयभूत सत्य त्यापासून दूर व त्याला खोटें पाडणारें असें असत्य आमच्या प्रकृतींत येऊन बसतें -- अपूर्णतेचा हा असा आविष्कार क्रमशः आमच्या ठिकाणीं होतो. आमच्या मनाला सद्वस्तूचें सत्य प्रत्ययाला येत नाहीं पण तें सत्य काय असावें याची कल्पना आमचे मन करूं शकतें. या कल्पनेमुळें आम्ही त्या सत्यापासून किती दूर आहोंत, या गोष्टीचा प्रत्यय आमच्या मनाला येतो. हा दूरभाव आमचें मन दोन तऱ्हांनीं स्वतःपुढें चित्रित करतें : एक, आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या वर उंच होतों आणि कांहीं कारणानें तेथून खालीं पडलों आहों असें एक चित्र

पान क्र. १७४

 

मन स्वतःपुढें ठेवतें; दुसरें, आमची शक्ति, शक्यता आमच्या कल्पनेला दिसणाऱ्या सत्याला आत्मसात् करण्याची आहे पण तें आम्हांला आत्मसात् करतां येत नाहीं, तें ध्येय म्हणूनच नेहमीं आमच्यासमोर आम्हांला आकर्षण करीत उभें असतें, आम्ही सत्यापासून दूर आहोंत, या वस्तुस्थितीचें चित्र आमचें मन चितारीत असतें. आमच्या अन्तरांत जो आत्मा आहे त्याला एकदां कधीं पूर्वीं व्यापक जाणीव आणि ज्ञान उपलब्ध होतें; महान् आनंद, प्रेम, सौंदर्य, सामर्थ्य, पात्रता, सुसंवाद, मांगल्य आणि साधुत्व एकदां एके काळीं त्याचे ठिकाणीं होतें. त्या सर्व गोष्टी आतां तो गमावून बसला आहे, या गोष्टी फारच अल्प प्रमाणांत आज त्याचे ठिकाणीं आहेत; महान् आत्म्याचें हें पतन, हा अधःपात आमचे ठिकाणीं झाला असला पाहिजे एक; किंवा आमच्या समोर आम्हांला स्वभावत: प्रिय, इष्ट असें दिव्य अस्तित्व आणि जीवन आहे पण आमच्या प्रकृतींत धडपड चालू असून तिला तें इष्ट जीवन साध्य होत नाहीं, आमची प्रकृति तें जीवन जगण्यास असमर्थ ठरली आहे अशी तरी वस्तुस्थिति असली पाहिजे. हा अधःपात म्हणा किंवा असमर्थता म्हणा, त्याचें मूळ बारकाईनें तपासून शोधूं लागल्यास आपल्याला असें आढळेल कीं, हें मूळ एकाच गोष्टींत, एकाच प्राथमिक वस्तुस्थितींत आहे : ईश्वरी दिव्य अस्तित्वाची मूळ एकता, अद्वितीयता, अभिन्नता, भेदशून्यता मोडली, तेथें अनेकता, फूट, भेद आला : मग हा भेद, तत्त्व म्हणून आला असो वा परिणामकारक अतात्विक घटना म्हणून आला असो, या भेदाच्या पायावर आमचें अस्तित्व, आमची जाणीव, सामर्थ्य, वस्तुविषयक अनुभव या सर्व गोष्टी उभ्या आहेत : अर्थात् आमच्या अस्तित्वाच्या, जाणिवेच्या व इतर गुणांच्या गाभ्याला भेदाचा स्पर्श नाहीं; तो फक्त त्यांच्या पृष्ठभागच्या व्यावहारिक स्वरूपाला आहे. एकतेचे तुकडे पडल्याचा अटळ असा व्यवहारांतला परिणाम असा होतो कीं, दिव्य ईश्वरी जाणीव व ज्ञान, दिव्य ईश्वरी आनंद आणि सौंदर्य, दिव्य ईश्वरी सामर्थ्य आणि पात्रता, दिव्य ईश्वरी सुसंगति आणि साधुता या सर्व गोष्टींना आमच्या ठिकाणीं मर्यादा पडतात; पूर्णता ''अपूर्ण'' होते; मर्यादित होते. या दिव्य गोष्टी आम्हांला यथार्थतेनें दिसत नाहींत -- आमच्या दृष्टीला जणों अंधत्व येतें; या गुणांचा आमचे ठिकाणीं जो उपयोग आम्ही करूं इच्छितों, तो जणु आमच्या पंगुत्वानें आम्हांला नीट करतां येणें अशक्य होतें, आम्हांला या गुणांचा जो अनुभव येतो तोहि तुकडया-

पान क्र. १७५

 

तुकड्यांचा येतो, त्यांतील समर्थता, तीव्रता, सत्व आमच्या अनुभवाला, मूळ स्वरूपांत न येतां, पुष्कळ कमी होऊन येतात : हें सर्व घडण्याची कारणें दोन असूं शकतात. आध्यात्मिक उच्च स्थानावरून खालीं पडल्यानें, खालीं उतरल्यानें या गोष्टी घडूं शकतात किंवा अचेतनाच्या संवेदनाशून्य स्थितींतून जाणीव नुकतीच वर आलेली असल्यानें असे अनुभव येऊं शकतात. आम्ही उंच आध्यात्मिक भूमीवर असतांना आमचे गुण ज्या तीव्रतेनें स्वभावत:च आमच्या ठिकाणीं प्रकट होतात, ते गुण त्या उत्कट स्वरूपांत आम्ही खालीं उतरल्यावर राहत नाहींत; आम्हांला जडाच्या आश्रयानें जें अस्तित्व लाभतें, त्या भौतिक अस्तित्वाच्या खालच्या दर्जाच्या धर्मांशीं जुळून दिसतील अशा प्रकारें उच्च गुणांची उच्चता आणि तीव्रता आमच्या भौतिक जीवनांत कमी केली जाते. या भौतिक अस्तित्वांतील उणीवांचा एक दुय्यम परिणाम असा होतो कीं, उच्च गुणांची विकृति होते, मर्यादित मनाला असंवेदना आणि भ्रामक संवेदना यांची बाधा होते; आमच्या प्रकृतींत सर्वत्र अज्ञान भरून राहतें. आमचें ज्ञान आणि इच्छाशक्ति अपूर्ण व त्यांत त्यांना भलतें वळण, तसेंच आमच्या संकुचित जाणीवशक्तीच्या स्वाभाविक प्रतिक्रिया व आमच्या घटकद्रव्याच्या दरिद्रतेमुळें होणाऱ्या सदोष प्रतिक्रिया या सर्व कारणांमुळें मुळांत जे दिव्य गुणधर्म होते त्यांच्या विरोधी असे अनेक गुणधर्म आमच्या ठिकाणीं उत्पन्न होतात : अक्षमता, जडता, असत्य, प्रमाद, दु:ख, संताप, अपकृत्य, वैर, दुष्टता वगैरे. आमच्यामध्यें या ज्या दुःखदायक गोष्टी उदयास येतात त्यांना दूर करावें, त्यांच्यांत काटछाट करावी, त्यांना सर्वस्वीं नष्ट करावें, अशा प्रवृत्ती आमच्या ठिकाणीं जरी प्रकट जाणिवेंत प्रकट दिसल्या, तरी खोल कोठेंतरी भेदाचें जीवन आम्हांला गोड वाटत असतें, एकतेच्या अस्तित्वाऐवजीं भेदमय अस्तित्वाचें आकर्षण आमच्या अंतरांत कोठेंतरी प्रभावी असतें आणि म्हणून वर निर्देशिलेल्या दु:खजनक गोष्टी आम्हांला कमी करतां येत नाहींत, दूर करतां येत नाहींत. जाणीवशक्ति आणि आनन्द हीं ईश्वरी सत्तेचीं आद्यतत्त्वें ईश्वरी आविष्काराच्या मुळाशीं आहेत आणि म्हणून अशी कोणतीहि गोष्ट या विश्वांत (ईश्वरी आविष्कारांत) उदयास येणार नाहीं व टिकणार नाहीं कीं, जिला आमच्या स्वभावातीत इच्छा-पुरुषाची (आत्म्याची) संमति व आमच्या कोणत्या तरी अंगाला

पान क्र. १७६

 

होणारें गुप्त वा विकृत, कसलें तरी टिकाऊ सुख, यांचा आधार नाहीं.

सर्व जें कांहीं प्रकट होत आहे तें, ईश्वराचें दिव्य व्यक्त स्वरूप आहे असें आम्ही जेव्हां म्हणतों, ज्याला आम्ही अदिव्य असें नांव देतों तेंहि दिव्य ईश्वरी व्यक्त स्वरूप आहे, असें जेव्हां आम्ही म्हणतों, तेव्हां त्याचा अर्थ, तत्त्वत: सर्व व्यक्त विश्वाचा गाभा दिव्य आहे असा असतो. व्यक्तांतील कांहीं गोष्टी, कांहीं व्यक्त रूपें आमच्या बुद्धीला आकलन होत नाहींत, आमच्या भावनांना धक्का देतात, 'नकोत ते प्रकार' असा तीव्र उबग आमच्या मनांत उत्पन्न करतात -- तरी त्याच्याहि पोटीं खोल, दिव्यत्व आहे, ईश्वरी तत्त्व आहे असा, ''सर्व व्यक्त विश्व ईश्वरी तत्त्वाचा आविष्कार आहे'' या आमच्या म्हणण्याचा अर्थ असतो. तीच गोष्ट दुसऱ्या एका प्रकारें मांडल्यास आमच्या बुद्धीला लवकर उमजेल व पटेल : आमचे म्हणणें असें आहे कीं, सर्व वस्तूंच्या पोटीं एक आदिम सत्य, सद्वस्तु आहे; आत्मा, ईश्वर, ब्रह्म कोणतेंहि नांव त्या वस्तूला द्या. हें आदितत्त्व नित्य, शुद्ध, पूर्ण, आनंदरूप, अनन्त असें आहे : संबंधमय वस्तूंच्या मर्यादांनीं त्या अनन्ताला मर्यादा पडत नाहींत; आमच्या पापांनीं आणि दुष्टतेनें त्याची शुद्धता व मांगल्य कलंकित होत नाहीं; आमच्या मानसिक शारीरिक दु:खांनीं त्याच्या आनंदांत कमतरता येत नाहीं; जाणीव, ज्ञान, इच्छाशक्ति, ऐक्यभाव या संबंधांत आम्हांमध्यें जे दोष आणि उणीवा आहेत, त्यांयोगें त्याच्या पूर्णतेंत कांहीं अपूर्णता येत नाहीं. उपनिषदांत असें वर्णन सांपडेल कीं, आत्मा, दिव्यपुरुष हा अग्नि आहे, सूर्य आहे -- सर्व रूपांत हा अग्नि प्रविष्ट झाला आहे, त्या त्या रूपानुरूप असें रूप त्यानें घेतलें आहे; हा सूर्य सर्व रूपांना सारखेंच तेज व प्रकाश देतो. आमच्या दृष्टींत दोष असतात ते दोष कांहीं या सूर्याला बाधा करीत नाहींत. मूळ दिव्य सद्वस्तुसंबधानें हीं जीं विधानें केलीं गेलीं आहेत, त्यांनीं आमच्यापुढील प्रश्न सुटत नाहींत : जें आदितत्त्व स्वत: सर्वदा शुद्ध, पूर्ण, आनंदरूप, अनन्त आहे त्यानें आपल्या व्यक्त स्वरूपांत अपूर्णता, संकुचितता, अशुद्धता, दु:ख, असत्य, अमांगल्य यांना सवड द्यावी, नव्हे यांना उत्तेजन द्यावें आणि संरक्षण द्यावें (कारण असा प्रकार आम्हांला भासतो) असें कां, हा आमचा प्रश्न आहे; वरील ब्रह्मविषयक औपनिषदीय वचनांत जें द्वैत (शुद्ध ब्रह्म आणि अशुद्ध विश्व) आमच्या प्रश्नांत अन्तर्भूत आहे तें स्पष्टपणें मांडलें आहे; त्या द्वैताचें स्पष्टीकरण व समाधान त्या वचनांत नाहीं.

पान क्र. १७७

 

अस्तित्वांत असणाऱ्या, विशुद्ध ब्रह्म आणि अशुद्ध विश्व या एकमेकींशीं न जुळणाऱ्या दोन गोष्टी, जर त्यांचें कांहीं समाधानकारक स्पष्टीकरण न शोधतां आम्हीं आमच्यासमोर राहूं दिल्या, तर असा निर्णय घेणें प्राप्त होईल कीं, या दोन गोष्टींत संगति नाहीं आणि संगति असणें शक्य नाहीं. शुद्ध तात्विक वस्तुगर्भांतील सद्‌वस्तु-ब्रह्म जो आनंद आम्हांला देतें, त्या आनंदाचा अनुभव अधिकाधिक खोल आणि आत्मस्पर्शी करून त्याला चिकटून राहावें आणि बाहेरचा जो विसंवादी पसारा आहे त्याच्याशीं कसें तरी जुळवून घ्यावें -- प्रयत्न मात्र असा असावा कीं, या विसंवादी पसाऱ्यांत त्याच्या अगदीं विरुद्ध स्वभावाच्या ईश्वरी दिव्य तत्त्वाचा व्यवहारनियम अमलांत शक्य तितक्या लवकर यावा. शुद्ध ब्रह्म आणि अशुद्ध विश्व यांचा समन्वय आम्हांला न साधल्यास वरीलप्रमाणें आम्हांला वागतां येईल किंवा समन्वयाच्या अभावीं द्वैताच्या प्रश्नापासून पळण्याचा, दूर जाण्याचा मार्गहि आम्हांला घेतां येईल. आम्हांला असें म्हणतां येईल कीं, अंतर्यामींची सद्वस्तु हें सत्य आहे आणि बाह्य विसंवादी पसारा सर्व असत्य आहे, मिथ्या आहे, अज्ञानाच्या गूढत्वानें उभा केलेला तो आभास आहे; या मिथ्या पसाऱ्यांतून गूढ सद्‌वस्तूच्या सत्यांत हें व्यक्त विश्वरूप प्रविष्ट कसें व्हावयाचें, हाच काय तो आमच्यापुढील खरा प्रश्न आहे, दोन सत्य वस्तूंचा प्रश्नच आमच्यापुढें नाहीं. द्वैताचा प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधीत न बसतां, सद्‌वस्तु सत्य आणि विश्व मिथ्या असें म्हणण्याचा जसा एक पंथ आमच्यापुढें आश्रयार्थ आहे, तसा बौद्ध पंथहि आहे. बौद्ध पंथ म्हणतो : द्वैताचें स्पष्टीकरण कशास हवें ? अपूर्णता ही व्यवहारांत अनुभवास येणारी गोष्ट आहे. अनित्यता ही तशीच गोष्ट आहे; आत्मा, ईश्वर, ब्रह्म हें सर्वच आमच्या जाणिवेनें उभारलेला आभास आहे. तेव्हां आम्हांला अपूर्ण, अनित्य जंजालांतून मुक्ति हवी असली, तर आमच्या कल्पनांची चिवट इमारत, आमच्या कर्माची चिवट शक्ति जी अनित्याच्या पसाऱ्यांत, प्रवाहांत नित्यतेचा, अखंडतेचा डोलारा उभा करून आम्हांला सतावते ती शक्ति आणि ती इमारत आम्ही अस्तित्वांतून दूर केली पाहिजे, तिच्यापासून आम्ही दूर झालें पाहिजे. बौद्ध पंथांत निर्वाणांत मुक्ति आहे. अर्थात् ''अहम्'' म्हणून जो चिवट कर्मकल्पनासंघ आहे, त्याच्या नाशांत मुक्ति आहे. अहम्-नाश झाला कीं विश्वाचा प्रश्न उरतच नाहीं. हा एक आपत्तींतून सुटण्याचा मार्ग आहे, पण हाच

पान क्र. १७८

 

एक मार्ग आहे व हाच एकटा खरा मार्ग आहे असें दिसत नाहीं. दुसऱ्या उत्तरांनींहि पूर्ण समाधान होत नाहीं. खरी गोष्ट ही आहे कीं, विसंवादी व्यक्त विश्व, केवळ बाह्य अ-तात्विक वस्तु आहे असें मानून आमच्या आंतरिक जाणिवेंतून ती दूर ठेवली, अंतरांत जी शुद्ध पूर्ण सद्‌वस्तु अनुभवास येते तिलाच आम्ही सर्वस्व मानून धरून राहिलों, तर व्यक्तिदृष्टीनें या निःशब्द शांत दिव्य वस्तूचा आम्हांला खोलपर्यंत सुखमय संपर्क होतो, या वस्तूच्या पवित्र अंतर्गृहांत आम्ही प्रवेश करूं शकतों, तेथील दिव्य प्रकाश आणि दिव्य सुख यांचा आम्हाला अखंड लाभ होतो. नित्य, सत्य, ब्रह्मावर ध्यानानें सर्व चित्त एकाग्र करून, बाह्य विश्वापासून सर्वथा दूर होतां येतें. त्या ब्रह्मांत विलीन होतां येतें आणि या आत्मलयाचा आश्रय करून, विश्वांतील विसंवादांचा आमच्या अंतरावरचा पगडा सर्वस्वीं दूर करतां येतो, हें खरें आहे. पण आमच्या अंतरंगांत खोल अशी एक वृत्ति आमच्या अनुभवास येते कीं, विश्वाला दूर करणारी जाणीव ही पूर्ण जाणीव नव्हे. पूर्ण जाणिवेची, सर्वांगीण जाणिवेची तीव्र इच्छा आमच्या अंतरंगांत आम्हांला प्रतीत होते; सर्वस्पर्शी सर्वात्मक पूर्ण ईश्वरत्व अनुभवावयास हवें, अशी निसर्गाला सार्वत्रिक गूढ अशी क्षुधा जणों लागलेली दिसते; अस्तित्वाची समग्र जाणीव, अस्तित्वाचा समग्र आनंद, अस्तित्वाचें समग्र सामर्थ्य अनुभवास यावें, म्हणून त्या दिशेनें धडपडण्याची प्रवृत्ति आमच्या अंतरंगांत प्रत्ययास येते. पूर्ण अस्तित्वाची ही तीव्र इच्छा, पूर्ण ज्ञानाची ही तीव्र इच्छा, थोडक्यांत पूर्णतेची तीव्र इच्छा जी आमच्या स्वभावांत खोल बसलेली आहे तिचें समाधान आतांपर्यंतच्या उत्तरांनीं पुरेसें होत नाहीं. विश्व हें ईश्वराचें दिव्य प्रकट रूप आहे, असें विश्वाचें स्पष्टीकरण जोपर्यंत आम्हांला शक्य होत नाहीं, तोपर्यंत ईश्वराची, ब्रह्माची ओळख आम्हांला पूर्णपणें झाली असें म्हणतां येत नाहीं; कारण ''विश्वहि तें ब्रह्म आहे''. आमच्या जाणिवेला आणि जाणिवगत शक्तींना हें विश्व दिव्य ईश्वर स्वरूप म्हणून जोपर्यंत भासत नाहीं आणि दिव्य ईश्वर-स्वरूप म्हणून आत्मसात् करतां येत नाहीं, तोपर्यंत ईश्वराचें पूर्णत्वानें आमच्या आत्म्याच्या ठिकाणीं ज्ञान व स्थान झालें, आम्हांला पूर्ण ईश्वर लाभला असें होणें नाहीं.

विश्वासंबंधींचा, विश्वाच्या दिव्यतेचा हा प्रश्न, विश्वव्यवहार अदिव्य दिसत असतांहि सोडविण्याचा -- किंवा सोडून देण्याचा म्हणा -- एक मार्ग आहे :

पान क्र. १७९

 

विश्वाच्या पोटीं ब्रह्म, दिव्य सारभूत सद्‌वस्तु आहे याबद्दल वाद नाहींच : प्रश्न या वस्तूच्या व्यक्त स्वरूपाचा आहे. हें व्यक्त स्वरूप दिव्य आहे असें म्हणून त्याचें समर्थन आम्हाला असें करतां येईल कीं, दिव्यतेसंबंधाची, अर्थात् पूर्णतेसंबंधाची जी मानवाची दृष्टि आहे ती चुकीची आहे, ती मानसिक, मर्यादित अतिमर्यादित मानदंड घेऊन पूर्णतेचें माप घेते, म्हणून ती दूर ठेवावयास हवी; ती दूर ठेवली किंवा निर्दोष करून घेतली, कीं विश्वांतील सर्व वस्तूंचें व व्यवहारांचें दिव्यत्व, पूर्णत्व पटावयास अडचण येणार नाहीं. वस्तुजातांतील आत्मतत्त्व निखालस पूर्ण आणि दिव्य आहे, एवढेंच नव्हे तर प्रत्येक वस्तु सापेक्ष दृष्टीनें दिव्य आणि पूर्ण आहे; प्रत्येक वस्तु स्वत: पूर्ण आणि दिव्य आहे इतकेंच नव्हे, तर अस्तित्वाच्या शक्यता ज्या तिला व्यक्त करावयाच्या आहेत त्या व्यक्त करावयाचें कामहि ती पूर्णतेनें करीत आहे; एकंदर सद्‌वस्तु-प्रकटनांत तिचें जें योग्य स्थान आहे तेंहि, पूर्णता व दिव्यता प्रकट होईल अशा रीतीनें तिनें घेतलें आहे. प्रत्येक वस्तु स्वत: दिव्य आहे, कारण ती ईश्वराची कल्पना आहे, ती ईश्वरनियोजित घटना आहे, ईश्वराचें ज्ञान आणि संकल्प त्या वस्तूच्या द्वारां कार्यान्वित होत आहे, प्रकट होत आहे. या विशिष्ट प्रकटनाचा जो ईश्वरी नियम आहे त्या नियमानुसार न चुकतां हें प्रकटन होत आहे. जी गोष्ट वस्तुसंबंधानें खरी आहे, ती जीवासंबंधानेंहि खरी आहे. प्रत्येक जीवाला ज्ञान, शक्ति, अस्तित्वाचें सुख (त्यांचा प्रकार व त्यांचें प्रमाण) त्या जीवाच्या प्रकृतीला योग्य तेंच लाभलेलें आहे; अनुभवांच्या क्रमवार श्रेणींत प्रत्येक जीव क्रमवार पावलें टाकीत अनुभव घेत असतो; त्याच्या अंतरींची गूढ, दिव्य इच्छाशक्ति, त्याच्या प्रकृतीचा नियम, त्याच्या आत्म्याची स्वाभाविक शक्ति आणि एकंदर आविष्काराचें गूढ प्रयोजन ही अनुभवाची श्रेणी ठरवून देत असतात; याप्रमाणें या जीवाकडून ज्या घटना घडतात त्या त्याच्या जीवनाच्या दिव्य नियमानुसार घडत असतात; अर्थात् घटना व जीवननियम यांचें नातें पूर्णतायुक्त असतें. त्या नियमांशीं सर्व घटना सुसंवादी असतात, त्या नियमांतून त्या निघत असतात. त्या नियमाचा जो हेतु त्या हेतूशीं जुळत्या अशा त्या घटना असतात -- त्या जीवाच्या अंतरंगांत ईश्वरी ज्ञान आणि संकल्प कार्यान्वित करीत असतात आणि हें त्यांचें कार्य अचूक व निर्दोष होत असल्यानें त्या जीवाचें बाह्यवर्तन आणि आन्तरिक दिव्य नियम यांचा सर्वथैव सुसंवाद असतो.

पान क्र. १८०

 

एकंदर विश्वसमष्टींत त्या जीवाचें स्थान निश्चित असतें, त्याच्या नियतस्थानींच तो असतो, अर्थात् समष्टीशीं असलेलें त्याचें नातें पूर्ण आणि दिव्य असतें; या नात्याच्या दृष्टीनेंहि जीव पूर्ण आणि दिव्य असतो, या समष्टीला जीवाची जरुरी असते, या समष्टीच्या व्यवहारांत जीव कांहीं विशिष्ट भाग घेतो; हा भाग, ही भूमिका जीवानें घेतल्यानें सामष्टिक सुसंवादाच्या तात्कालिक आणि भावी विकासी पूर्णतेला मदत होते; प्रत्येक जीव याप्रमाणें वागत असल्यानें समष्टीचें जें सामष्टिक प्रयोजन, त्या प्रयोजनाच्या सिद्धीला सर्व जीवांची मदत होते. याप्रमाणें विश्वव्यवहार दिव्य आणि पूर्ण आहे. आम्हांला हा व्यवहार कोठें कोठें अदिव्य भासतो, ईश्वराच्या स्वभावाशीं अमुक घटना जुळत नाहीं असें म्हणून आपण तिचा धिक्कार करतों याचें कारण, ईश्वराचा हेतू आणि प्रयोजन या विश्वव्यवहारांत कोठें काय आहे याचें पूर्ण ज्ञान आम्हांला नाहीं, हें आहे. आम्हांला सर्व विश्व, सर्व विश्वव्यवहार एकदम दिसूं शकत नाहींत -- विश्वाचे तुकडे, विश्वव्यवहाराचे तुकडे आम्हांला दिसतात, या तुकड्यांकडे पाहून जणुं कांहीं सर्व आम्हांला दिसतें अशा आविर्भावानें आम्ही त्या तुकड्यांवरून सर्व विश्वाची, सर्व विश्वव्यवहाराची किंमत करतों, त्याला बरें-वाईट ठरवितों; दुसरी गोष्ट ही कीं, आम्हांला बाह्य घटना दिसतात, त्या घटनांच्या मागें काय हेतु आहे तो दिसत नाहीं; आणि असें असूनहि आम्ही त्या घटनेला बरी-वाईट ठरवितों; अर्थात् अशा तऱ्हेनें मत बनविणें व निर्णय घेणें मुळांतच चुकीचें असतें. कोणतीहि वस्तु किंवा घटना वेगळी वेगळी पूर्ण असत नाहीं. विश्वसमष्टि ही समष्टिदृष्टीनें दिव्य सुसंवादानें परिपूर्ण आहे आणि म्हणून पूर्ण आहे; या समष्टीच्या सुसंवादाला तिच्यांतील प्रत्येक वस्तूची व घटनेची आपआपल्या परीनें मदत होत असते. समष्टीचा अंश म्हणून समष्टीच्या पूर्णतेच्या पोटीं प्रत्येक वस्तु व घटना ''पूर्ण'' असते, ती वेगवेगळी पूर्ण असत नाहीं, असूं शकत नाहीं -- वेगळी वेगळी वस्तु वा घटना हा आभास आहे, विश्वसमष्टि हेंच एक सत्य आहे, ही गोष्ट विसरतां उपयोगी नाहीं.

वरील गोष्टी आणि त्याजवरून घेतलेला निर्णय कांहीं एका मर्यादेपावेतों बरोबर आहे. तरीपण हें कांहीं आमच्या प्रश्नाला पूर्ण उत्तर नव्हे. यानें कांहीं आमचें पूर्ण समाधान होत नाहीं. यांत मानवी जाणिवेला योग्य तें महत्त्व दिलेलें नाही. ज्या मानवी दृष्टिकोनांतून

पान क्र. १८१

 

आम्हांला विश्वाच्या निरीक्षणाला प्रारंभ करावा लागतो त्या दृष्टिकोनाला अवश्य तें महत्त्व वरील उत्तरांत दिलेलें नाहीं. विश्वांत, विश्वव्यवहारांत सुसंवाद आहे असें वर म्हटलें आहे, पण असें म्हणणारा कोणी हा सुसंवाद आमच्या नजरेस आणून देत नाही. सुसंवाद आहे असें केवळ म्हटल्यानें आम्हांला सुसंवादाची प्रतीति होत नाहीं; अर्थात् या म्हणण्यानें आमची खात्री पटत नाही -- आमची सुसंवादाच्या अनुभूतीची मागणी पुरी होत नाहीं -- उलट विश्वांत आम्हांला जें दुष्टत्व, अमांगल्य, अपूर्णत्व तीव्रतेनें अगदीं शंभर टक्के सत्य म्हणून प्रतीत होते, त्याला असत्य ठरविण्यासाठीं बुद्धीनें उभी केलेली कोरडी भावनाशून्य कल्पना, वरील उत्तरांत आमच्या पुढें मांडली गेली आहे; दुसरी गोष्ट, आमच्या अन्तरात्म्यांत जें आत्मतत्त्व आहे, ज्याला ज्ञानाची व सत्याची भूक आहे, तीव्र आकांक्षा आहे, आत्मविजयाची -- अपूर्णता आणि दुष्टत्व यावर विजय मिळविण्याची -- प्रबळ इच्छा आणि आशा आहे, त्या आत्मतत्त्वाला वरील उत्तरांत कांहींच मार्गदर्शन घडत नाहीं. या उत्तरांत वस्तुजाताचें जें दर्शन घडविलें आहे, त्या दर्शनांत सामान्य जनांत जो एक सुलभ ''सिद्धांत'' रूढ आहे त्यापेक्षां अधिक कांहीं नाहीं. हा सिद्धान्त असा कीं, जें कांहीं आहे तें अगदीं बरोबर आहे; कारण ईश्वरानें आपल्या दिव्य प्रज्ञेनें सर्व गोष्टी निर्दोष रीतीनें निश्चित केल्या आहेत. या उत्तरांत सुखासीनतेचा बौद्धिक, तात्विक आशावाद आहे, त्या पलीकडे कांहीं नाहीं; शारीरदु:ख, मनस्ताप, विसंगति आणि वैर या गोष्टी मानवी जाणिवेला अहोरात्र सतावीत असतांना, आम्हांला नित्य बेचैन करीत असणाऱ्या या सर्वथा सत्य घटनांवर कांहींच प्रकाश या उत्तरामध्यें टाकलेला नाहीं -- एक कल्पना मात्र या उत्तरांत अशी सुचविली आहे कीं, या सर्व बेचैन करणाऱ्या घटनांचा उलगडा करणारी गुरुकिल्ली, या घटनांच्या मागें जी ईश्वरी प्रज्ञा आहे तिच्यांत आहे -- अर्थात् ही गुरुकिल्ली आमच्या हाताला लागण्यासारखी नाहीं. ही सूचना कांहीं आमच्या असंतोषाला आणि उच्च आकांक्षेला समाधान देऊं शकत नाहीं. आमच्या अस्तित्वाच्या पोटीं खोल कांहीं दिव्य सत्य, सद्‌वस्तु आहे, म्हणूनच आजच्या आमच्या ''अदिव्य'' स्थितींत आम्हांला असमाधान वाटत असते आणि दिव्य स्थितीकडची ओढ, आकांक्षा आम्हांला नित्य अस्वस्थ करीत असते यांत संशय नाहीं. आमचें असमाधान, आमची आकांक्षा अगदीं शुद्ध नसते, त्याजमध्यें दुसरे भावनिक हेतू मिसळलेले

पान क्र. १८२

 

असतात, त्यांच्या प्रतिक्रिया अविचारी असतात हें खरें; पण आमच्या अंतरंगांत खोल कांहीं तरी दिव्य आकर्षक सत्ता असल्याखेरीज अदिव्यत्वानें असमाधान आणि दिव्यत्वाची ओढ आम्हांला अनुभवास आली नसती. पूर्ण दिव्य तत्त्व जर त्याच्या अंशांच्या अपूर्णतेच्या कारणानें दिव्य असेल, तर त्याची पूर्णता केवळ अपूर्णतेंतील पूर्णता असण्याचा खूपच संभव आहे; क्रमानें सिद्ध होणारें पण सिद्ध न झालेलें असें कांहीं प्रयोजन, त्या पूर्ण होऊं घातलेल्या तत्त्वाला आहे आणि सिद्धीच्या मार्गावरील एक विशिष्ट टप्पा तें ''पूर्णतत्त्व'' पूर्णत्वानें दाखवितें, एवढाच त्याच्या पूर्णत्वाचा अर्थ असूं शकतो; तें तात्कालिक ''पूर्ण'' आहे, अंतिम ''पूर्ण तत्त्व'' नव्हे. या पूर्णाच्या दृष्टीनें दिव्य असा पुरुष पुढें केव्हांतरी दिव्य होणारा असतो, आज तो दिव्य नसतो. क्रमाक्रमानें तो दिव्य होत असतो. याप्रकारें वरील परिच्छेदांत वर्णिलेला ईश्वर, दिव्य पुरुष, अदिव्य ठरतो, अपूर्ण ठरतो; खरा ईश्वर आमच्या अंतरांत गूढ रूपानें आहे, आमच्या पातळीच्या वरच्या सर्वोच्च पातळीवर आहे असें मग ओघानेंच मानावें लागतें : हा आमच्या अंतरांत खोल लपून असलेला आणि आमच्या भूमीच्या वर उंच ठिकाणीं राहून आमच्यावर हुकमत गाजविणारा ईश्वर शोधून काढणें आणि त्याच्याशीं समरस होणें यांतच आमच्या प्रश्नाचें खरें उत्तर आहे; तो पूर्ण आहे तसें आम्ही पूर्ण होणें, त्याच्याशीं सादृश्य, साधर्म्य मिळवून मुक्तिलाभ करून घेणें यांतच आम्ही आमचा प्रश्न सोडविण्याचें कार्य होणार आहे.

मानवी जाणिवेला अपूर्णता ही विश्वांत अपरिहार्य भासत असेल, विश्व अपूर्ण आहे या प्रतीतीशीं मानवी जाणीव कायमची बांधली गेली असेल, आमच्या जीवनाचा धर्म, आमच्या अस्तित्वाची खास विशिष्टता अपूर्णता आहे ही गोष्ट मान्य करणें आम्हांला अटळ असेल, ज्याप्रमाणें पशू सामान्यत: बुद्धिशून्य अशा आपल्या स्वभावानुसार अपूर्णतेच्या नियमाला आंधळेपणानें मान्यता देतात, त्याप्रमाणें आमच्या बुद्धियुक्त स्वभावानुसार बुद्धीचा उपयोग करून अपूर्णता-नियमाला विचारयुक्त मान्यता आम्हांला द्यावयाची असेल, तर आम्हांला असें म्हणतां येईल कीं, ईश्वराच्या आत्म-आविष्काराची मानवीप्राण्यांत जी मर्यादा ठरली आहे ती मर्यादा आम्हीं गांठलेली आहे, आमचे ठिकाणीं जो ईश्वराचा स्वरूपाविष्कार आज दिसत आहे तोच त्याची मानवांतील अंतिम मर्यादा आहे; आम्ही अशीहि श्रद्धा ठेवूं शकतों कीं, आम्हांला अनेक तऱ्हेच्या अपूर्णतेपासून, दोषां-

पान क्र. १८३

 

पासून आणि दु:खांपासून त्रास होत असला, तरी एकंदर विश्वांत सुसंगति आणि पूर्णता नांदण्यासाठीं आमच्या दोषांचा आणि दुःखांचा उपयोग होत आहे. आम्हांला मानसिक शहाणपण बेताचेंच आहे, आमच्या प्राणिक वासना उतावळ्या, अनावर अशा आहेत, अशा स्थितींत आमच्या जीवनांत, जीवनाच्या मार्गांत जे खाचखळगे आहेत ते टाळून मार्गक्रमण करणें काहीं आम्हांला विशेष साधेल असें नाहीं; आम्हांला वेळोवेळीं खड्ड्यांत पडून दु:ख भोगणें पडेल, तथापि शक्यतोंवर आमची बुद्धि वापरून व्यवहारी शहाणपण दाखवून आम्ही खड्डे टाळण्याचा प्रयत्न करूं, ते न टळतील तेथें तत्त्वज्ञान्याची तटस्थ आणि स्वार्थनिरपेक्ष वृत्ति स्वीकारून आमचीं दु:खें आणि दोष जगाच्या सुखाला, सुसंवादाला, पूर्णतेला आवश्यक आहेत अशी आमच्या जखमांवर फुंकर घालणारी, जखमांना रामबाण मलमासारखी उपयोगी पडणारी श्रद्धा आम्ही बळकट करून ठेवूं. ही तत्त्वश्रद्धा अपुरी पडली, तर तिच्या जोडीला धर्मश्रद्धा घेऊं : ईश्वराची इच्छा असेल तसें जग व आमचें जीवन चालतें व चालणार. त्याच्या इच्छेपुढें मान वांकविणें यांतच आमचें कल्याण आहे, हें जग सुटल्यावर दुसऱ्या जगांत, स्वर्गांत आमच्या येथील दु:खांची, दोषांची भरपाई आम्हांला करून दिली जाईल, तेथें आमची प्रकृति अधिक विशुद्ध, अधिक पूर्ण असेल आणि आमचें जीवन अधिक आनंदमय असेल. तत्त्वश्रद्धा जेथें अपुरी पडेल तेथें आम्ही ही धार्मिक श्रद्धा, आत्मसात करू. या श्रद्धेंत, तत्त्वश्रद्धेंहून अधिक समाधान देण्याची शक्ति आहे; तिचा आम्ही उपयोग करूं; पण मानवांत जशी पशूपेक्षां त्याचें वैशिष्ट्य दाखविणारी श्रेष्ठ बुद्धि आहे तशी दुसरी एक, त्याच्या क्रियाशील जाणिवेचा सारभूत भाग म्हणून असणारी वस्तु आहे. पशूंत थोडी बहुत बुद्धि सांपडते म्हणून मानव हा बुद्धिगुणांत पशूहून थोर आहे एवढेंच म्हणतां येतें; पण ही दुसरी शक्ति पशूंत जवळ जवळ मुळींच सांपडत नाहीं म्हणून पशु आणि मानव यांच्यातला भेद स्पष्टपणें दाखविणारा असा हा त्याच्या (मानवाच्या) जाणिवेचा सारभूत भाग आहे; ही दुसरी शक्ति म्हणजे आत्मिक शक्ति होय. मानसिक शक्ति (बुद्धि), वर सांगितल्याप्रमाणें आमच्यांतील व आमच्या विश्वांतील ''अपूर्णता'' विवेक करून मान्य करते, उलट ही आत्मशक्ति ''अपूर्णता'' अमान्य करते. आमच्या पार्थिव जीवनाचा अपूर्णता हा अटळ नियम आहे ही गोष्ट आत्म्याला मान्य नाहीं; किंवा असें म्हणतां येईल कीं, प्रकृतीं-

पान क्र. १८४

 

तील अपूर्णता हा नियम आम्हांला जेवढा अटळ भासतो तेवढाच अटळ नियम ''या अपूर्णतेविषयीं आत्म्याला तीव्र असमाधान वाटणें आणि ती सर्वथा आमच्या प्रकृतींतून दूर करण्याची दृढ आकांक्षा आत्म्यानें धरणे'' हाहि आहे. प्रकृतींतून अपूर्णता दूर करावयाची ती अर्थातच स्वर्गांत दूर करावयाची असा अर्थ नाहीं -- तेथें स्वभावत: पूर्णता आम्हाला लाभते. अपूर्ण सदोष वर्तन तेथें आपोआपच अशक्य होतें -- अपूर्णता दूर करावयाची ती येथें पृथ्वीवर आणि या प्रस्तुतच्या जीवनांत दूर करावयाची, अशी आत्म्याची तीव्र आकांक्षा असते; येथें पार्थिव जीवनांत अपूर्णता दूर करावयाचें काम क्रमविकासाच्या, झगड्याच्या मार्गानेच करणें शक्य असतें, आणि हा मार्ग पत्करून झगडा करून क्रमश: पूर्णता मिळविणें ही आत्म्याची आकांक्षा असते. अपूर्णतेविषयीं तीव्र असमाधान ही दिव्य वस्तु आहे, पूर्णतेसाठीं तीव्र-आकांक्षा-प्रेरित क्रमविकासगत अंतर्गत युद्धाचा कार्यक्रम हीहि दिव्य वस्तु आहे. तेव्हां अपूर्णता आणि अपूर्णताविरोध (पूर्णताविकास) दोन्हीहि गोष्टी ईश्वरानें आमच्या प्रकृतींत ठेवल्या आहेत. आमचे ठिकाणीं एक महान् तेजोमय शक्ति आहे, या शक्तीचें अंगभूत प्रकाशमय तेज आमचे ठिकाणीं अपूर्णतेविषयीं दिव्य तिटकारा आणि पूर्णतेविषयीं सक्रिय दिव्य आकांक्षा उत्पन्न करून नित्य जागृत ठेवते ती एवढ्याकरतां कीं, आमच्यांत खोल आत्मिक गूढस्थानांत जी गुप्त सद्‌वस्तु ब्रह्म किंवा ईश्वर आहे ती तेथेंच गुप्त न राहतां आमच्या पार्थिव प्रकृतींत तिनें क्रमविकासाच्या मार्गानें स्वतःला पूर्णतया प्रकट करावें.

या नव्या मांडलेल्या ईश्वरी योजनेच्या प्रकाशांत विश्वव्यवहाराकडे पाहतां असें म्हणता येईल कीं, हा व्यवहार ईश्वरी प्रज्ञेच्या प्रकाशांत अगदीं निर्दोषपणें चाललेला आहे व शेवटीं ईश्वरी प्रयोजन या व्यवहारानें सिद्ध होणार आहे; आणि म्हणून पूर्वी सांगितल्याप्रमाणें आज जेथें जी वस्तु व घटना आहे ती तेथें असणेंच बरोबर आहे; मात्र प्रत्येक वस्तु व घटना योग्य ठिकाणीं आहे असें आम्ही जें म्हणतों त्याचें कारण आतांच सांगितल्याप्रमाणें पुढें जें होणार आहे, होऊं शकतें त्यावरून म्हणतो; आतांच्या वस्तुस्थितीचें समर्थन भावी गोष्टीवर, पुढें जें घडून येणार असें आम्हांला दिसतें त्यावर अवलंबून आहे. पुढें जें कांहीं व्हावयाचें आहे तें होणार नाहीं, अशी आमची भावना व कल्पना असती, तर आजच्या दुःखमय दोषमय वस्तुस्थितीचें समर्थन आम्हांला

पान क्र. १८५

 

करतां आलें नसतें; ही गोष्ट निःसंशय आहे कीं, व्यवहार जो दिसतो त्याचें पूर्ण समर्थन ईश्वरी योजनेंत आहे. आमच्या आजच्या बुद्धीला सामान्यत: विश्वव्यवहाराचें बाह्य स्वरूप मात्र दिसतें, त्याचा बाह्य अर्थ मात्र उमजूं शकतो; या व्यवहाराला आंतलें अंग आहे, तें सूक्ष्म आहे, खोल आहे; या व्यवहाराचा गूढ अर्थ बाह्य अर्थाहून अगदीं वेगळा आहे, आणि तोच त्याचा खरा अर्थ आहे -- आणि असें असल्यानें बाह्यविश्व-व्यवहार चालला आहे तो ठीक चालला आहे, असें त्या व्यवहाराचें समर्थन दिव्य ईश्वरी बुद्धि करूं शकते -- पण आम्हाला अप्राप्त अशा ईश्वरी बुद्धीनें केलेल्या समर्थनानें आमचें समाधान होऊं शकत नाहीं -- त्या समर्थनावर आम्ही विश्वास ठेवूं शकतो, पण या विश्वासानें आमचें समाधान होऊं शकत नाहीं. आमच्या अस्तित्वाचा धर्मच, विश्वव्यवहाराची जी आध्यात्मिक ईश्वरी गुरुकिल्ली असेल तिचा शोध करणें आणि ती मिळविणें, हा आहे. या गुरुकिल्लीच्या प्राप्तीची खरी खूण, आजच्या पातळीवरून वर चढून, आध्यात्मिक ज्ञान व सामर्थ्य मिळविणें आणि त्या योगें आमच्या जीवनाचे बाह्य आचार, त्यांचे नियम सर्व बदलून, विश्वव्यवहाराचा जो ईश्वरी हेतु आहे, जें ईश्वरी ध्येय आहे त्या हेतुनुसार, त्या ध्येयानुसार आमच्या आचारांचें आणि आचारनियमांचें स्वरूप शक्य तेवढें घडवून आणणें, ही आहे. जें चाललें आहे तें ठीक आहे, कारण आम्हांला न कळण्यासारखें कांहीं ईश्वरी प्रयोजन या सर्व व्यवहाराच्या बुडाशीं आहे असा, तत्त्वज्ञान्याला सुलभ अशा आकलनाचा आणि अपरिहार्यापुढें समाधानानें मान लवविण्याचा विचार म्हणजे कांहीं विश्वव्यवहाराची आध्यात्मिक गुरुकिल्ली सांपडल्याची खरी खूण नव्हे. दुःख आणि दोष शांतपणें ईश्वराची इच्छा म्हणून सहन करणें हें बरोबर आहे, शहाणपणाचे आहे; पण केव्हां ? आमच्या अवयवांवर, अंगांवर अपूर्णतेचा नियम बंधनकारक आहे, ईश्वरानें तो बंधनकारक केला आहे. त्याच्या इच्छेला, आजच्या या इच्छेला शिरोधार्य मानलें पाहिजे, असा सहिष्णुतेचा विचार शहाणपणाचा म्हणतां येईल -- पण केव्हां ? जेव्हां ईश्वराची दुसरी इच्छा आम्ही या इच्छेप्रमाणेंच शिरोधार्य करूं तेव्हां. दोष आणि दुःख यांतून आम्हीं पार गेलें पाहिजे; आमचे दोष दूर करून आम्हीं पूर्णता मिळविली पाहिजे; ईश्वरी प्रकृतीचा जो उच्चतर नियम आहे त्या नियमानुसार आम्हीं आपला आचार विचार उच्चतर केला पाहिजे; हीहि पण ईश्वराची

पान क्र. १८६

 

इच्छा आहे हें ओळखून आम्ही तदनुसार वागूं, तेव्हांच आज असलेल्या दोषमय प्रकृतीचा जाच शांतपणें तात्पुरता सहन करणें शहाणपणाचें ठरेल. आमच्या मानवी जाणिवेंत खऱ्या अस्तित्वाचा आदर्श आहे, दिव्य स्वभावाचा आदर्श आहे, देवत्वाचा, प्राथमिक देवत्वाचा आदर्श आहे -- त्या उच्च आदर्श जीवनाच्या सत्याशीं तुलना करतां, आमची आजची अपूर्णतेची दोषमय जीवनावस्था अदिव्यच म्हणावी लागते, ज्या विश्वपरिसरांत आम्ही आमचें जीवन जगण्यास आरंभ करतो तो परिसर अदिव्य आहे असेंच म्हणावें लागतें -- आज अनुभवास येणारे विश्वांतील व आमच्या जीवनांतील दोष, ईश्वरी अस्तित्वाचे आणि ईश्वरी प्रकृतीचे नियोजित आविष्कार आहेत असें मात्र नव्हे. ते ईश्वरी अस्तित्वानें आणि ईश्वरी प्रकृतीनें वापरलेले प्राथमिक बुरखे आहेत हें आम्ही लक्षांत ठेवणें अवश्य आहे. आमच्या अंतरंगांत गुप्तपणें जो ईश्वर राहत आहे त्या ईश्वरानें आमच्यांत उच्चतर जीवनाची आकांक्षा उत्पन्न केली आहे, ध्येयभूत जीवनाची प्रतिमा त्यानेंच आमच्या अंतरंगांत चितारलेली आहे व आमचा आजच्या दोषमय जीवनासंबंधांतील असंतोष त्यानेंच जागृत ठेवला आहे; ईश्वरानें घेतलेला दोषांचा बुरखा फाडून टाकून, काढून टाकून आमच्या (आम्हां पार्थिव प्राण्यांच्या) प्रकट आत्म्यांत, मनांत, प्राणिक व्यवहारांत, शरीरांत त्याला (ईश्वराला) साकार करून प्रकट करावें अशी प्रेरणा तोच ईश्वर देतो. आमची आजची प्रकृति तात्पुरत्या उपयोगाची आहे, आमची आजची अपूर्ण दोषशील अवस्था आमच्या जीवनाची प्राथमिक अवस्था आहे, ही अवस्था म्हणजे एक दिव्य संधि आहे. या अवस्थेचा, या संधीचा उपयोग करून हिच्याहून उच्चतर, विस्तारानें व्यापक आणि गुणांनीं महान्, महत्तर अशी अस्तित्वाची आणि जीवनाची अवस्था आम्हांला प्राप्त करून घ्यावयाची आहे. ती अवस्था दिव्य आणि पूर्ण असेल; केवळ आमच्या अंतरंगांत खोल लपून बसलेल्या ईश्वराच्या गुप्त सांनिध्यामुळें नव्हे, तर आमच्या प्रकट बाह्यतम जीवनाच्या स्वरूपाच्या दृष्टीनेंहि ती दिव्य आणि पूर्ण असेल. अशा भावी दिव्य आणि पूर्ण जीवनाची प्राथमिक पायरी म्हणून आजची अपूर्ण दोषमय जीवनाची ''संधि'' आम्हांला दिलेली आहे, ही विचारप्रणालीच सत्याला धरून आहे, असली पाहिजे.

विश्वांतील अस्तित्वाच्या दृश्य घटना आणि आमचा आंतरिक आत्मानुभव यांजवर वरील अन्त:स्फूर्त किंवा बुद्धिसंमत प्राथमिक विचार

पान क्र. १८७

 

आधारलेले आहेत; अज्ञान, अपूर्णता, दु:ख यांचें खरें मूळ आणि विश्वाच्या योजनेंत किंवा व्यवस्थेंत त्यांचें स्थान, जेव्हां आम्हांला कळेल तेव्हांच या विचारांची यथार्थता आम्हांला पूर्णतया सिद्ध करतां येईल, पूर्णतया पटेल. ईश्वर आहे अशी श्रद्धा असणाऱ्या मानवतेची सर्वसामान्य जाणीव आणि विवेक-बुद्धि ईश्वर आणि विश्व यांच्या संबंधांत तीन सिद्धांतांना मान्यता देते : या तीन पैकी एक सिद्धान्त -- विश्वाच्या विशिष्ट स्वरूपामुळें अपरिहार्य होणारा सिद्धान्त -- दुसऱ्या दोहोंशीं जुळत नाहीं, आणि या विसंगतीमुळें आमचें मानवी मन विरोधी भावनांच्या असामान्य गोंधळांत पडतें आणि संशय आणि नास्तिकता यांचा शेवटीं आश्रय करतें; अगदीं इच्छा नसतांहि शेवटीं संशयवादी आणि नास्तिक बनतें. शुद्ध, पूर्ण, आनन्दरूप सत्य सर्वव्यापी ईश्वर आहे, त्यावांचून कांहींहि अस्तित्वांत असूं शकत नाहीं, कारण जें कांहीं अस्तित्वांत असतें तें तें त्याच्या कर्तृत्वानें आणि आश्रयानें, त्याच्या अस्तित्वाच्या पोटांतच अस्तित्वांत असतें. नास्तिकवाद, भौतिकवाद आणि प्राथमिक मानवधर्मी ईश्वरवाद सोडला, तर ईश्वरविषयक विचार वरील सिद्धान्त मान्य करूनच सुरूं होतो किंवा आरंभींच हा सिद्धान्त मान्य न करतां युक्तिवादाच्या कांहीं पायऱ्यानंतर ईश्वरविषयक विचारक्रम या सिद्धांताला मान्यता देतो. कांहीं धर्मांत विश्वावेगळा ईश्वर मानला आहे असें दिसतें; ईश्वराचें अस्तित्व वेगळें, विश्वाचें वेगळें; ईश्वराच्या पोटांत विश्व नसून ईश्वराच्या बाहेर ईश्वरानें विश्व निर्माण केलें आहे असें कांहीं धर्म मानतांना दिसतात. पण या धर्माचें आध्यात्मिक तत्त्वज्ञान किंवा देवपुराण तयार केलें जातें, तेव्हां या धर्मांतहि ईश्वराचें सर्वव्यापित्व, सर्वांतर्यामित्व मान्य केलें जातें. आत्मविषयक विचार ईश्वराच्या, परमात्म्याच्या सर्वव्यापित्वाच्या सिद्धान्ताशिवाय पुरा होतच नाहीं. हा सिद्धान्त अध्यात्मांत अनिवार्यपणें येऊन बसतो. ईश्वर, परमात्मा, परात्पर सत्य कोणतेंहि नांव द्या, हें जर परम तत्त्व आहे तर तें सर्वगामी आहे, एकमेव अद्वितीय आहे, अविभाज्य आहे, त्याच्या अस्तित्वाच्या बाहेर कसलेंच कशाचेंच  ''अस्तित्व'' असूं शकत नाहीं, त्याच्या खेरीज इतर कशापासून कशाचाहि जन्म होऊं शकत नाहीं; त्याचा आश्रय नाहीं असें काहींही असूं शकत नाहीं, त्याला सोडून स्वतंत्र असें अस्तित्व कशालाहि असूं शकत नाहीं, त्याच्या अस्तित्वाच्या प्राणानें प्राणयुक्त आणि त्याच्या अस्तित्वाच्या सामर्थ्यानें सामर्थ्ययुक्त न झालेलें असें कांहीं असूं शकत नाहीं --

पान क्र. १८८

 

जें कांहीं आहे त्या सर्वांत त्याचाच प्राण आणि सामर्थ्य भरलेलें आहे. अज्ञान, अपूर्णता, किंवा दोष, दुःख जें या विश्वांत अनुभवास येतें, त्याला ईश्वराच्या सत्तेचा आधार नाहीं, त्याचा ईश्वराशीं कांहीं संबंध नाहीं असें कोठें कोठें प्रतिपादण्यांत येत असतें; हे प्रतिपादन मान्य करावयाचें तर दोन ईश्वर मानणें भाग पडेल; आर्मझ्‌द (पुण्यमय ईश्वर) आणि अह् रिमन (पापमय ईश्वर), सत्प्रेरणा देणारा ईश्वर आणि असत् प्रेरणा देणारा ईश्वर, असे दोन ईश्वर एका पंथांत (पारशी धर्मपंथांत) मानले आहेत; ख्रिस्तशकारंभकाळीं ग्नॉस्टिक (ज्ञानवादी : श्रद्धेनें मोक्ष नाहीं, ज्ञानानें मोक्ष असें मानणारे) विश्वातीत, पूर्ण, विश्वांतर्यामी ईश्वर आणि विश्वनिर्माता अपूर्ण ईश्वर असे दोन ईश्वर मानीत; दिव्य ईश्वर आणि अदिव्य असा ईश्वराहून वेगळा निसर्ग, अशाहि दोन विभूती मानून विश्वांतील दुःख, दोष, अज्ञान, यांचा ईश्वराशीं संबंध नाहीं असा पक्ष घेतां येईल. हे पक्ष शक्य आहेत, पण आमची श्रेष्ठांत श्रेष्ठ विवेकबुद्धि हे पक्ष असंभवनीय मानते. दोन ईश्वरांचीं वगैरे जी कल्पना आहे ती असंभवनीय नसली, तर निदान गौण तरी खास आहे. विश्वाचें मूळ सत्य, विश्वाचें पूर्ण सत्य दोन ईश्वर वगैरे कांहीं असूं शकत नाहीं; तसेंच सर्वात राहणारा एकच एक आत्मा आणि सर्वांची निर्मिति करणारी शक्ति एकमेकांपासून भिन्न आहेत, त्यांचें स्वरूप अन्योन्यविरोधी आहे, त्यांची वेगळी वेगळी इच्छा आहे, वेगळें वेगळें प्रयोजन आहे -- या गोष्टीहि आम्ही मान्य करूं शकत नाहीं. एकच एक विशुद्ध, सर्वनिरपेक्ष, पूर्ण ईश्वरी अस्तित्व (सद् वस्तू) सर्व वस्तूंच्या ठिकाणीं आहे, सर्व जीवांमध्यें आहे; सर्व वस्तु आणि जीव हेंहि या सद्‌वस्तूच्या पोटांत आहेत, या सद्‌वस्तूच्या इच्छेनें आणि आश्रयानें अस्तित्वांत आहेत, या सर्वांतर्यामी, सर्वाधार सद्‌वस्तूच्या अस्तित्वाशिवाय कांहींहि अस्तित्वांत असूं शकत नाहीं, कांहींहि घडूं शकत नाहीं -- हें सर्वोच्च सत्य आहे अशी आमच्या बुद्धीची ग्वाही आहे, आमच्या अन्त:स्फूर्त जाणिवेची अनुभूति आहे, आमच्या आध्यात्मिक अनुभवाची साक्ष आहे.

वरील प्रकारचा ईश्वर आहे असें गृहीत धरल्यावर आमची बुद्धि त्यावरून स्वभावत: असा सिद्धान्त करते कीं, या सर्वव्यापी ईश्वरानें आपल्या सर्वोच्च जाणिवेचा, सर्वोच्च शक्तीचा, परिपूर्ण सर्वविषयक ज्ञानाचा आणि दिव्य प्रज्ञेचा उपयोग करून विश्वांतील सर्व व्यवहार, त्यांचे पायाभूत अन्योन्य संबंध आणि त्यांच्या प्रक्रिया व्यवस्थेनें ठरविल्या

पान क्र. १८९

 

आहेत आणि आपल्या शासनाखालीं चालविल्या आहेत. आतां विश्वांतील व्यवहार पहावे, तर त्यांची आमच्या अनुभवास येणारी प्रक्रिया, त्यांचे आमच्या अनुभवास येणारे संबंध हे दोषमय, संकुचित, कडक मर्यादांनीं जखडलेले असे आहेत; येथें एक प्रकारची विसंगति, विकृति, दिव्य ईश्वरी सत्तेची आमची कल्पना खोटी ठरविणारी परिस्थिति आहे; ईश्वर नाहींच असें प्रबळपणें भासविणारीं दृश्यें, निदान ईश्वराच्या सत्तेला ओंगळ स्वरूप देणारीं किंवा अदिव्य आवरणानें दृष्टीआड करणारीं दृश्यें येथें आहेत. विश्वांतील व्यवहाराचें हें स्वरूप पाहून तिसरा सिद्धान्त आमची बुद्धि असा करते कीं, ईश्वरी मूळ सत्य आणि विश्वरूपी सत्य या दोन सत्यांत तत्त्वत: भेद आहे, निदान त्यांच्या दर्जांत भेद आहे; आणि हा भेद इतका मोठा आहे कीं, विश्वांतील ईश्वर हवा असेल तर विश्वाचा त्याग केला पाहिजे : विश्वाचा तो शास्ता आहे, विश्व त्यानेंच निर्मिलें आहे किंवा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या पोटीं अव्यक्ताचें व्यक्त केलें आहे, आणि तो येथे नित्य वस्तीला आहे, पण तो हवा असेल तर त्याचें हें विश्व आम्हीं सोडावयास हवें, इतका त्याच्यांत आणि त्याच्या विश्वांत तत्त्वाचा किंवा दर्जाचा भेद आहे; असे हे तीन सिद्धान्त आहेत. पहिला सिद्धान्त अटळ आहे, दुसराहि अटळ आहे; जर सर्वव्यापी ईश्वर, विश्वांत राहणारा ईश्वर विश्वाच्या आविष्काराशीं, बांधणीशीं, रक्षणाशीं, शासनाशीं कांहीं संबंध ठेवीत असेल तर दुसरा सिद्धान्तहि अटळ आहे -- आणि तिसरा तर स्वयंसिद्ध भासतो पण तो दुसऱ्या दोहोशीं न जुळणारा आहे; आणि ही विसंगति आमच्या पुढें असा प्रश्न उपस्थित करते कीं ज्याचें समाधानकारक उत्तर मिळणार नाहीं असें वाटतें, ज्याला समाधानकारक उत्तर असणें शक्य नाहीं असें दिसतें.

ही विसंगतीची अडचण दूर करण्याचा मार्ग सांपडणार नाहीं असें नाहीं. तत्त्वज्ञानी युक्तिवाद किंवा देववादी युक्तिवाद असा उभा करतां येईल कीं, ज्यायोगें वरील विसंगतीचा प्रश्न दूर होईल. एपिक्युरस मानीत होता तशा देवासारखा, कांहीं न करणारा, स्वत: आनंदमग्न असणारा ईश्वर मानतां येईल : प्रकृतीचा यांत्रिक नियम, विश्व बरें वाईट चालवीत आहे आणि निजानंदमग्न ईश्वर त्याजकडे तटस्थतेनें बघत आहे, असें मानतां येईल. विश्वामध्यें साक्षी आत्मा आहे, शांत आत्मा आहे, शांत पुरुष आहे. प्रकृति काय करील तें तिला हा

पान क्र. १९०

 

पुरुष करूं देतो, आणि ती जें काय करील, जी व्यवस्था, अव्यवस्था करील ती आपल्या निष्क्रिय निर्मळ जाणिवेंत प्रतिबिंब रूपानें घेऊन त्या प्रतिबिंबाकडे शांतपणें बघण्यांत कृतार्थता मानतो, अशी कल्पना करतां येईल. परमात्मा, पुरुषोत्तम हा स्वयंपूर्ण, शांत, अक्रिय, संबंधशून्य असा आहे, त्याच्यापासून किंवा त्याला आधारुन विश्व किंवा विश्वभ्रम अतर्क्य रीतीनें उत्पन्न झाला आहे -- या विश्वांतील किंवा विश्वभ्रमांतील व्यवहाराशीं परमात्म्याला कांहीं कर्तव्य नाहीं, कालग्रस्त जीवांना मोह पाडणें आणि दुःख देणें हेंच या विश्वाचें किंवा विश्वभ्रमाचें कार्य आहे, अशीहि कल्पना करतां येईल. या सर्व कल्पनांत विश्वासंबंधींचा आमचा अनुभव आणि ईश्वरासंबंधींची आमची भावना व आध्यात्मिक अनुभूति यांच्यामधील विसंवाद प्रतिबिंबित झालेला आहे. आमच्या अनुभवांचा समन्वय यांत नाहीं, त्यांचें स्पष्टीकरण यांत नाहीं; प्रकट किंवा अप्रकट द्वैत उभें करून, जें मूळ तत्त्व अविभाज्य आहे, त्याचें मुळांतच विभाजन करून, आमच्या अनुभवाला येणारी विसंगति मान्य केली आहे, वेगळ्या शब्दांत आमच्यापुढें ठेवली आहे. व्यवहारत: दोन ''ईश्वर'' या कल्पनांत मानले आहेत. आत्मा किंवा पुरुष आणि प्रकृति असें ''ईश्वराचें'' द्वैत या कल्पनांत आहे. पण वस्तुजातांतील शक्ति  (प्रकृति) ही आत्म्याचीच, पुरुषाचीच शक्ति असली पाहिजे -- ती कांहीं स्वतंत्र वस्तु नाहीं. अर्थात् ती जें कांहीं करील त्याला आत्म्याची संमति असली पाहिजे, तिच्या खटपटीवर आत्म्याच्या संमतीचा किंवा निषेधाचा (असंमतीचा) परिणाम होत असला पाहिजे. प्रकृतीचा कारभार म्हणजे जड शक्तीचा पुरुषाच्या जडवत् तटस्थतेवर होत रहाणारा अत्याचार होय, अशी कांहीं प्रकृतीच्या कारभाराची कल्पना करतां येत नाहीं. असो. अक्रिय साक्षी आत्मा आणि क्रियाशील निर्माणकर्ता ईश्वर अशा जोडीचीहि कल्पना करतां येईल. पण ही कल्पनाहि आपल्या उपयोगी पडणार नाहीं; कारण निर्माता ईश्वर हा क्रियाशील एकाच साक्षी आत्म्याचा क्रियाशील अंश आहे किंवा साक्षी आत्मा हा एकाच ईश्वराचा अक्रिय अंश आहे असा या जोडीचा शेवटीं अर्थ होतो. या कल्पनेंत क्रियाशील पुरुष आणि ज्ञानशील द्रष्टा पुरुष या एकाच आत्म्याच्या दोन अंगांत विरोध प्रतिपादला असून, या विरोधाचा परिहार तींत नाहीं, जणुं हा विरोध अटळ आहे असें मत या कल्पनेंत अन्तर्भूत आहे. यानंतर अशीहि कल्पना करतां येते कीं, मूळ सद्‌वस्तु जें ब्रह्म, त्या ब्रह्माला दोन प्रकारची

पान क्र. १९१

 

जाणीव आहे किंवा त्याला दोन स्वतंत्र जाणिवा आहेत. एक स्थितिशील आणि दुसरी क्रियाशील. स्थितिशील जाणीव ही सारभूत आत्मिक जाणीव आहे. या जाणिवेचा आत्मा (ब्रह्म) पूर्ण आणि सर्वनिरपेक्ष आहे; दुसरी जाणीव रूपनिष्ठ, व्यावहारिक; या जाणिवेच्या आश्रयानें ब्रह्म अनात्म वस्तू होतें, विश्व होतें. सर्वनिरपेक्षत्व आणि पूर्णत्व यांशीं या जाणिवेचा कांहीं संबंध नसतो. मूळ पूर्ण ब्रह्म हें कालातीत सत्य असतें आणि अनात्मत्व धारण करणारें ब्रह्म हें कालग्रस्त असतें; कालातीत ब्रह्माच्या पोटीं कालनिष्ठ ब्रह्माची उभारणी होते. कालग्रस्त अनात्मरूप ब्रह्माशीं पूर्णत्वाचा (पूर्ण ब्रह्माचा) कांहींच संबंध येत नाहीं. ही कल्पना बुद्धीला नसत्या गोंधळांत टाकणारी आहे; कारण कालाश्रयी  (कालग्रस्त, कालनिष्ठ) जाणीव आणि तिच्या रचना, शेवटीं एका आत्म्याच्या, ब्रह्माच्या शक्तीच आहेत, त्या एकच एक ब्रह्मावर अवलंबून आहेत, त्याच्या आश्रयानेंच अस्तित्वांत येऊं शकतात आणि राहूं शकतात; ब्रह्माच्या सामर्थ्याच्या आश्रयानेंच जें मूळ सत्य अस्तित्वांत येतें आणि अस्तित्वांत राहतें त्याचा त्या ब्रह्मांशीं (पूर्ण सर्वनिरपेक्ष - ब्रह्माशीं) कांहीं संबंध नसणें अशक्य आहे; तसेंच स्वत:च्या शक्तिप्रभावानें बनलेल्या विश्वाशीं या ब्रह्माचा (पूर्ण ब्रह्माचा) संबंध नसणेंहि अशक्य आहे. आम्ही केवळ विश्वगत अर्ध-अस्तित्व व अर्ध-जाणिव भोगतो. परंतु आम्ही विश्वांत म्हणजे पूर्ण-ब्रह्माच्या जीवनरूप अर्धस्वप्नांत राहतों, आणि निसर्गानें आम्हाला या स्वप्नांत न टाळतां येणारें नित्याचें भयंकर कर्तव्य-भोक्तव्य दिलेलें आहे व या स्वप्नाला पूर्ण सत्य मानूनच आम्हांला आमचा व्यवहार करावा लागतो; असें असल्यानें दोन स्वतंत्र जाणिवांचें ब्रह्म वगैरे जी कल्पना आम्हापुढें मांडण्यांत येते तिचें नुसतें गूढ स्वरूप उकलून पाहणें आम्हाला भाग पडते. तें उकललें म्हणजे पूर्ण विश्वनिरपेक्ष ब्रह्माचा आणि विश्वाचा अन्योन्य संबंध निश्चित आहे असें वर सांगितल्याप्रमाणें स्पष्ट होतें. असो. विश्व हें सर्वश्रेष्ठ आत्म्याच्या अंगभूत शक्तीनें अस्तित्वांत येतें असें ठरल्यावर त्याची व्यवस्था, त्यांतील संबंध त्या शक्तीचाच कारभार असला पाहिजे हें उघड ठरतें; मूळ आत्म्याची जाणीव व अस्तित्व यांचा कोठला तरी नियम, विश्वाला त्याचे नियम घालून देत असला पाहिजे हेंहि ठरतें. ब्रह्माच्या अस्तित्वांत जी विश्व-जाणीव असते, त्या जाणिवेची जाणीव ब्रह्माला असली पाहिजे, एवढेंच नव्हे, तर विश्वजाणिवेच्या पोटींहि ब्रह्म

पान क्र. १९२

 

जाणिवेनें असलें पाहिजे. ब्रह्माची शक्ति, कोठली तरी शक्ति विश्वांतील घटना व व्यवहार नित्य ठरवीत असली पाहिजे, निदान संमत करीत असली पाहिजे; प्रकृति, निसर्ग असें कांहीं स्वतंत्र तत्त्व, मूळ शाश्वत ब्रह्मापासून न निघालेले विश्वव्यवहार चालवीत आहे अशी वस्तुस्थिति असणें शक्य नाहीं, कारण अशा स्वतंत्र तत्त्वाचें अस्तित्व एकमेवाद्वितीय ब्रह्मावेगळें संभवत नाहीं. जाणीवयुक्त असें ब्रह्म सर्वगामी आहे, एवढी गोष्टच विश्व उभें करण्यास समर्थ आहे, विश्वाचे व्यवहार निश्चित करण्यास समर्थ आहे; आणि ब्रह्माची विश्वनिर्मिति-समर्थ, विश्वसंचालन-समर्थ जाणीव आपलें सामर्थ्य कार्यान्वित करीत असली पाहिजे. विश्वाच्या कारभाराची धडपड अनंत ब्रह्मांत आहे, त्याप्रमाणें त्या धडपडीच्या व तत्संबंधी जाणिवेच्या पाठीमागें शांत, निःशब्द, स्थितिशील अवस्था पण ब्रह्मजाणिवेंत आहे असा आध्यात्मिक अनुभव आहे -- विश्वाचा, सृष्टीचा स्थितिशील अचल द्रष्टा असें या शांत जाणिवेचें स्वरूप असतें; पण आध्यात्मिक अनुभव शांत ब्रह्माच्या अनुभवांत सर्व येऊन जातो असें नाहीं. ज्ञानाची ती एक बाजू आहे, पण ज्ञानाच्या एका अंगाच्या आश्रयानें विश्वाचें मूलभूत सर्वस्पर्शी स्पष्टीकरण मिळणें शक्य नाहीं.

विश्वाचें शासन ईश्वर करीत आहे ही गोष्ट मान्य केल्यावर शासनाची ईश्वरी सत्ता पूर्ण आहे, अनियंत्रित आहे, सर्वंकष आहे हेंहि मान्य करणें आवश्यक आहे. हें मान्य न केलें तर अनन्त आणि अनियंत्रित अस्तित्व आणि जाणीव ज्याचें ठिकाणीं आहे, त्याला वस्तुजाताच्या नियंत्रणाच्या बाबतींत मर्यादित ज्ञान, मर्यादित इच्छा आहे, असें मानावें लागेल किंवा त्याचें ज्ञान व त्याची इच्छा पुरी करतांना त्याचें कार्य कोणाकडून तरी अडविलें जात आहे, त्यांच्या कार्यांत कोठून तरी विघ्न येत आहे, असें मानावें लागेल. अशी एक कल्पना मान्य करतां येईल कीं, ईश्वर हा सर्वांतर्यामी, सर्वश्रेष्ठ, सर्वसत्ताधारी असला, तरी त्याच्या पूर्ण स्वरूपाच्या कक्षेंत कोणी एक शक्ति, स्वत: अपूर्ण आणि अपूर्णता निर्माण करणारी अशी उदयास आली आहे व ईश्वर या शक्तीकडे तिला पटेल त्याप्रकारें करण्याकरतां कांहीं काम सोंपवीत आहे, तिला मर्यादित कर्मस्वातंत्र्य बहाल करीत आहे; स्वत: अपूर्ण आणि अपूर्णता निर्माण करणारी अशी एक शक्ति, निसर्ग, अचेतन निसर्ग, अज्ञानग्रस्त निसर्ग ही आहे; क्रियाशील मानवी मन, मानवी इच्छा ही दुसरी अपूर्ण शक्ति आहे; पायाभूत अचेतनतेच्या आधारानें वावरणारी, जाणीवपूर्वक दुष्ट

पान क्र. १९३

 

तामसी कार्य करणारी, अनेक प्रकारची तमोमय अमंगल शक्ति ही तिसरी अपूर्ण आणि अपूर्णता निर्माण करणारी शक्ति ईश्वराच्या पूर्ण स्वरूपाच्या कक्षेंत निर्माण झाली आहे -- या सर्व अपूर्ण शक्तींकडे कांहीं काम ईश्वरानें सोंपविलें आहे व तें काम त्यांनीं त्यांना पटेल त्या रीतीनें करावें असें कांहीं कर्मस्वातंत्र्य त्यांना ईश्वरानें दिलेलें आहे. या कल्पनेचा आतां आपण विचार करूं. हा विचार करतांना प्रथम ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे कीं, या ज्या अपूर्ण शक्ती वर सांगितल्या, त्या ईश्वराच्या अस्तित्वावर, स्वभावावर, जाणिवेवर अवलंबून आहेत, स्वतंत्र नाहींत आणि या ईश्वराच्या उपस्थितींत व त्याच्या संमतीनें त्या काम करूं शकतात, स्वतंत्रपणें काम करूं शकत नाहींत. मानवाचें स्वातंत्र्य निरपेक्ष नाहीं, सापेक्ष मर्यादित आहे; त्याच्या स्वभावांतील अपूर्णतेबद्दल, दोषांबद्दल तो स्वतःच केवळ जबाबदार आहे असें म्हणतां येणार नाहीं. निसर्गांत अचेतनता आहे, अज्ञान आहे पण ही अचेतनता, हें अज्ञान कांहीं स्वयभू नाहीं, तर तें स्वयंभू, एकमेव ईश्वराच्या पोटीं उदयास आलेलें आहे; अर्थात् निसर्गाची, प्रकृतीची कामगिरी जर दोषपूर्ण असेल, तर त्या दोषाचा वांटा सर्वांतर्यामी ईश्वराच्या इच्छाशक्तीकडे अवश्यमेव येतो हें निश्चित : ही इच्छाशक्ति दोषापासून अजीबात सुटते असें होऊं शकत नाहीं. हें मान्य करतां येईल कीं, एकदां एखाद्या शक्तीला चालना दिली कीं त्या शक्तीचा जो गतिनियम असेल, त्या नियमानुसार तिला आपलें कार्य पूर्ण करण्यास मुभा द्यावी लागते; पण ही शक्ति सर्वज्ञ, सर्वसमर्थ ईश्वरानें आपल्या सर्वव्यापी अस्तित्वाच्या पोटीं उदयाला येऊं दिली, कामावर येऊं दिली, तेव्हां ती जें काय करील तें ईश्वरानें करण्याचें ठरविलें होतें व केलें असेंच आम्हांला मानावें लागतें; कारण या ईश्वराच्या आज्ञेशिवाय ही शक्ति आणि तिचें कार्य उदयास आलेंच नसतें, अस्तित्वांत टिकून राहिलेंच नसतें हें उघड आहे. ईश्वरानें हें विश्व व्यक्तांत आणलें आहे, अर्थात् अशा या विश्वाशीं त्याचा कांहीं संबंध असेल, तर तो विश्वाचा स्वामी हाच संबंध आहे; या विश्वाचें स्वामित्व इतर कोणाकडे जाऊंच शकत नाहीं. तो स्वयंभू सर्वगामी ईश्वर विश्वाचें स्वामित्व टाळूं शकत नाहीं, तें त्याजकडे अनिवार्यपणें येतें; तेव्हां विश्वांत अपूर्णता आहे, दोषमयता आहे, दुःख आहे, अनिष्ट आहे या वस्तुस्थितीचा विचार करतांना व तिचें कारण शोधतांना ईश्वराचें विश्वस्वामित्व आणि या स्वामित्वांत अन्तर्भूत होणारीं सत्ये आम्हीं

पान क्र. १९४

 

दृष्टिआड न करतां या सत्यांच्या पायावरच आमच्या विचाराची उभारणी आम्हीं करावयास हवी.   विश्वांतील वस्तुस्थितीचा व तिच्या कारणांचा विचार करतांना प्रथम ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे, आपल्याला पटली पाहिजे कीं, विश्वांत अज्ञान आहे, प्रमादांचें राज्य आहे, मर्यादितता संकुचितता आहे, दु:ख आहे, भेदाभेद आणि वैमनस्यें आहेत एवढयावरूनच विश्वांत ईश्वर नाहीं, ईश्वरी ज्ञान, सामर्थ्य, ईश्वरी जाणीव, संकल्प, आनंद विश्वांत नाहीं असा जो आपण घाईघाईनें सिद्धान्त करतो तो अविचाराचा आहे : विश्वाच्या कारभाराचा सामग्ऱ्यानें विचार केला म्हणजे या समग्र दर्शनांत अज्ञान, प्रमाद आदि गोष्टींना जें स्थान आणि महत्त्व आहे तें आपल्या स्पष्टपणें निदर्शनास येतें आणि मग असा अविचाराचा सिद्धान्त आपण करीत नाहीं. कोणत्याहि पूर्ण वस्तूचा एखादा तुकडा आपण वेगळा काढून त्याचेकडे पाहूं लागलों, तर तो दोषमय, विद्रूप, अनाकलनीय असा दिसेलहि -- पण तोच वस्तूंत, जेथें आहे तेथेंच, पाहिला तर त्या वस्तूच्या सुसंबद्ध रचनेचा तो एक आवश्यक भाग आहे असें आपल्या नजरेस येईल; तो जेथें आहे तेथें त्याला कांहीं अर्थ आहे, उपयुक्ततेच्या दृष्टीनें कांहीं महत्त्व आहे असें आपल्याला कळेल. हीच विचारसरणी ईश्वरी विश्ववस्तूला लागूं पडते. ईश्वरी विश्वगत व विश्वातीत अस्तित्व जे अनंत अमर्यादित आहे, त्या अमर्यादित अस्तित्वाच्या पोटांत जिकडे तिकडे मर्यादित अस्तित्व आपल्या नजरेस येतें. आमचेंच अस्तित्व घेतलें, तर त्याचा आरंभ मर्यादित अस्तित्व हाच असतो. आमचा संकुचित अहम् आणि त्याच्या स्व-केंद्रित धडपडी आमच्या मर्यादित अस्तित्वाचा पुरावाच आहेत. पण आम्हांला आमच्या आत्म्याचें सामग्ऱ्यानें ज्ञान झालें म्हणजे आमच्या अस्तित्वाला मर्यादा नाहींत, आम्हीहि अनंत आहोंत हें आम्हांला दिसतें. आमचा  'मी' हा विश्वपुरुषाचा एक अंश आहे, एक अंग आहे, त्याला स्वतंत्र अस्तित्व नाहीं; आमची दर्शनी विभक्त व्यक्तिता ही वरवरची पृष्टभागावरची हालचाल आहे. तिच्या पाठीमागें आमची खरी व्यक्तिता आहे; ही खरी व्यक्ति चहूं बाजूंनीं व्यापक, सर्व वस्तूंशीं एकता धारण करणारी, त्याचप्रमाणें वरतीं, उच्च पातळी चढून सर्वातीत दिव्य अनन्ताशीं एकता साधणारी अशी आहे. तेव्हां आमचा 'मी' अस्तित्वाला मर्यादित करणारा असा जो दिसतो, तो वस्तुतः अनन्ताची

पान क्र. १९५

 

एक शक्ति आहे. विश्वांत वस्तूंचा व जीवांचा अमर्याद बाजार आहे, ही अमर्याद अनेकता मूळ अमर्याद अनंततेचा पुरावा आहे, त्या अनन्ततेचाच परिणाम आहे; मूळ वस्तु मर्यादित आहे असें कांहीं विश्वांतील अमर्याद अनेकता सिद्ध करीत नाहीं; मूळ मर्यादित वस्तूपासून अमर्याद अनेकता निघाली नसती. विश्वांतील दर्शनी विभक्तता वास्तव विभक्तता होऊं शकत नाहीं; या दर्शनी विभक्तपणाला अविभाज्य एकतेचा आधार आहे. विभक्तपणा जो दिसतो तो या एकतेमुळें सहजच खोटा ठरतो; मूळ अविभाज्य एकता कोणत्याहि विभक्तीकरणाच्या व्यापारानें विभक्त होऊं शकत नाहीं. विश्वांत 'मी' आहेत, दर्शनी विभक्तता आहे. त्यांचा दर्शनी स्वतंत्र कारभार आहे, तरीपण त्यावरून एकता आणि अविभाज्यता हा जो ईश्वरी अस्तित्वाचा स्वभावधर्म तो असिद्ध होत नाहीं; ईश्वरी अनंत एकतेची एक शक्तिप्रक्रिया म्हणजे विश्वांतील अनंत अनेकता आहे आणि या अनंत अनेकतेचे दर्शनी वरच्या थरांतले परिणाम 'मी', 'विभक्तता' आणि त्यांचे विभक्त व्यापार हे होत.

तेव्हां ईश्वराच्या अस्तित्वाचे, सत्ताद्रव्याचे तुकडे वास्तवांत कोठें पडलेले नाहींत; सर्वगामी ईश्वरी अस्तित्वाच्या सत्याला मूलत: विरोध करणारें असें कांहीं विश्वांत नाहीं. तथापि ईश्वरी जाणिवेला मात्र वास्तव मर्यादा पडलेल्या आहेत असें दिसतें; आत्म्याचें अज्ञान, आंतरिक ईश्वरत्वाला झांकणारा पडदा या वस्तू मात्र विश्वांत दिसतात. विश्वांत जी अपूर्णता, जी दोषमयता दिसते ती या पडद्याचा, अज्ञानाचा परिणाम म्हणून अस्तित्वांत येते. आमची जी वरवरची अहंची जाणीव आहे, त्या जाणिवेशी शरीरतः, प्राणतः आणि मनानें आम्ही एकरूप होऊन राहतों; हा अहम् म्हणजेच आम्ही, आमचा आत्मा, असा आमचा प्राथमिक अनुभव असतो; हा अनुभव आमच्या कणाकणांत नित्य भरून राहिलेला असतो -- अर्थात् या आमच्या एकांगीं एकरूपतेनें मूळ सत्यापासून, अविभाज्य एकतेपासून आम्ही वस्तुत: दूर जातो असें होत नाहीं -- तथापि व्यवहारांत हें आमचें एकांगीं तादात्म्य आमच्यावर विभक्तता लादतें आणि अर्थात् या विभक्ततेचे अनिष्ट असे व्यावहारिक परिणामहि आम्हांला भोगावे लागतात. पण येथेंहि एक गोष्ट आमच्या शोधक बुद्धीला समजून येते ती ही कीं, ईश्वराच्या कारभाराच्या दृष्टीनें विश्वांत 'अज्ञान' म्हणून ज्याला आम्ही नांव देतों तें खरें अज्ञान नसून ईश्वरी ज्ञानाची ती एक प्रक्रिया आहे -- आमच्या

पान क्र. १९६

 

वरवरच्या बहिर्मुख मर्यादित दृष्टीला ''अज्ञानाचें'' कांहींहि अनुभव येवोत,  ''अज्ञानाच्या'' कसल्याहि प्रतिक्रिया घडोत, वस्तुत: ''अज्ञान'' ही ईश्वरी ज्ञानाची एक प्रक्रिया असते, ही गोष्ट आमच्या शोधक बुद्धीला कळूं शकते. अविभाज्य सर्वज्ञान पाठीमागें आणि अज्ञान पुढें, ही त्याची दृश्य, वरवरची क्रिया; अशी ही व्यवस्था असते. एका विशिष्ट क्षेत्राला बांधून घेणारी सर्वज्ञता म्हणजे अज्ञान; कांहीं विशिष्ट मर्यादांच्या आंत कांहीं विशिष्ट ज्ञानक्रिया करणारी सर्वज्ञता म्हणजे अज्ञान; सर्वज्ञता ही अज्ञानरूपी ज्ञानक्रिया करतांना त्या प्रक्रियेंत वापरलेल्या ज्ञानाखेरीज करून बाकीचें आपलें ज्ञान, पाठीमागें आपल्याजवळ कार्याची वाट पाहणारा गुप्त संचय म्हणून संभाळून ठेवते. निसर्गांत आमच्या जीवनाचा जो विकास व्हावयाचा असतो त्या विकासाच्या कार्यासाठीं ही सर्वज्ञता हा गुप्त ज्ञानाचा आणि शक्तीचा सांठा वापरीत असते. पुढें केलेलें  ''अज्ञान'' त्याच्यांतील उणीवांमुळें दुर्बल असतें; या उणीवा भरून काढणें, अज्ञान अडखळेल तेथें त्याला मदत देणें व मार्गीं लावणें, हें काम सर्वज्ञता आपल्या गुप्त ज्ञानशक्ति-संचयाच्या द्वारां गुप्तपणें करीत असते; अज्ञानाच्या अडखळण्यामुळें, सर्वज्ञतेंत पूर्वीं योजून ठेवलेला परिणाम न घडून येतां दुसरेंच कांहीं घडण्याचा जो संभव असतो तो अज्ञानाला विघ्नप्रसंगीं हात देऊन सर्वज्ञता दूर करते; जीवाचा अज्ञानक्षेत्रांत विकास व्हावयाचा असतो, या विकासाला उपयुक्त असा धडा अनुभवांतून घेण्याच्या क्रियेंत सर्वज्ञता त्याला गुप्तपणें मदत करते; जीवाची जी व्यक्तिता अनुभवासाठीं निसर्गांत हालचाल करीत असते, त्या व्यक्तीला दुःखाचे, प्रमादाचे जे अनुभव मिळतात त्यांतूनहि स्वतःच्या विकासाला उपयुक्त अशी सामग्री वापरण्यास व निरुपयोगी झालेली सामग्री दूर ठेवण्यास, जीवाला गुप्त सर्वज्ञताच शिकवीत असते. विशिष्ट मर्यादित क्रियेसाठीं सर्वज्ञता आपल्या ज्ञानशक्तीचें एकाग्रतेनें केंद्रीकरण करते. हें एकाग्रतेचें केंद्रीकरण म्हणजेच दर्शनी अज्ञानशक्ति होय : आमच्या मानसिक व्यक्तींत विशिष्ट कार्यांत सर्व लक्ष केंद्रित करण्याची शक्ति आहे; याप्रकारें विशिष्ट कार्यांत विशिष्ट हेतूसाठीं आम्ही गढून गेलों म्हणजे आम्ही या कार्याला, या हेतूला आवश्यक तेवढेंच ज्ञान, तेवढ्याच कल्पना उपयोगांत आणतों, असें आम्हांला वाटतें; त्या कार्याला, त्या हेतूला निरुपयोगी किंवा विरोधी असें ज्ञान, अशा कल्पना आम्ही तात्पुरत्या बाजूला ठेवतों असें आम्हांला वाटतें; परंतु

पान क्र. १९७

 

वस्तुत: आमची जाणीव, आमचें ज्ञान अविभाज्य आहे; ही अविभाज्य जाणीवच, काय बघायचें तें शांतपणें बघत असते, काय करायचें तें शांतपणें करीत असते; आमच्या जाणिवेचा एकादा तुकडा, बहिष्कारी अज्ञान हें कांहीं खरेंखुरें ज्ञान, खरा ज्ञाता किंवा खरा कर्ता नसते. आमच्या मानवी मनाचा जसा हा शक्तिकेंद्रीकरणाचा व्यापार असतो, तसाच व्यापार आमच्यांतील सर्वज्ञतेचा असतो : तिचें विशिष्ट मर्यादित क्रियेसाठीं केंद्रीकरण म्हणजेच दर्शनी अज्ञान होय.

मानवी मनांत ज्या शक्ती आहेत त्या सर्वांत श्रेष्ठ शक्ति, निदान श्रेष्ठ शक्तींपैकीं एक शक्ति म्हणजे, मन एके ठिकाणीं एकाग्रतेनें लावण्याची शक्ति, असें आपण मानतों तें योग्यच आहे; आमच्या जाणिवेच्या हालचालींचें मूल्यमापन करतांना, वरील मानसिक शक्ति सर्वांत जास्त मोलाची आहे; निदान जास्त मोलाच्या शक्तीपैकीं एक आहे असें आपण समजतों तें न्याय्यच आहे. आमच्या जाणिवेला जें माप आम्ही लावतों, तेंच ईश्वरी जाणिवेला लावणें युक्त आहे. अर्थात् जी ईश्वरी जाणिवेची शक्ति आम्हांला अज्ञान म्हणून भासते, पण जी वस्तुत: दर्शनी मर्यादित ज्ञानानें काम करण्याची शक्ति असते, ती ईश्वरी जाणिवेच्या ठिकाणच्या श्रेष्ठ शक्तींपैकीं एक शक्ति आहे, असें आम्हीं मान्य केलें पाहिजे. कार्य करतांना स्वत:ला मर्यादा घालून घेणें आणि अशा दर्शनी ''अज्ञानाच्या'' द्वारां स्वत:चे सर्व हेतू पूर्णतया सिद्धीस नेणें, ही किमया केवळ सर्वश्रेष्ठ व स्व-सत्ताक ज्ञानालाच शक्य आहे. विश्वांत हें सर्वश्रेष्ठ ज्ञान काम करीत आहे; अनेक अज्ञानांच्या द्वारां तें काम करीत आहे; या अज्ञानांपैकीं प्रत्येक अज्ञान आपल्या आंधळेपणानें जमेल तसें कार्य करीत आहे; असें असतां या सर्व आंधळ्या अज्ञानांच्या द्वारां कार्य करून विश्वांतील सर्वश्रेष्ठ ज्ञान, त्याला इष्ट असलेल्या विश्वव्यापी सुसंबद्ध रचना उभारीत आहे, पार पाडीत आहे. आम्हांला ''अचेतन'' जें भासतें त्याचें कार्य पहा : या कार्यांत ईश्वरी जाणिवेची सर्वज्ञता किती अद्‌भुत कामगिरी करूं शकते, तें सर्वात अधिक प्रभावी तऱ्हेनें आमच्या समोर मांडलें जातें. विजेचा अणु, रासायनिक अणु, जीवपेशी, वनस्पति, कीटक, अगदीं तळाजवळचे प्राथमिक प्राणी यांजकडे पहा : यांजमध्यें पूर्ण किंवा अपूर्ण नेणीव, आमच्या मानवी अज्ञानाहून खूपच गाढ अशी नेणीव आहे : या पदार्थांत कोठे पूर्ण अचेतन प्रेरणा, तर कोठें सहज किंचित् चेतन प्रेरणा दिसून येते; पण या प्रेरणांच्या पाठीमागें, प्रेरणांच्या

पान क्र. १९८

 

पडद्यामागें सर्वज्ञ ईश्वरी जाणिवेनें कांहीं साध्य योजून उभें केलेलें आहे; अणु, पेशी इत्यादि सर्व पदार्थ म्हणजे या साध्याला वास्तवांत आकार देण्यासाठीं निर्मिलेलीं यांत्रिक अस्तित्वें आहेत; या यंत्रीभूत अस्तित्वांना, पदार्थांना ईश्वरी साध्याचें कांहींच ज्ञान नसतें; हें साध्य या पदार्थांतील अचेतन सचेतन सहज प्रवृत्तींच्या द्वारां, त्यांना अज्ञात अशा रीतीनें आपली सिद्धी करून घेत असतें : या पदार्थांच्या विश्वांत त्यांच्या पूर्ण अपूर्ण नेणिवेच्या द्वारां सर्वज्ञ ईश्वरी जाणीव सुंदर व्यवस्था उभारीत असते. आपल्या साध्याच्या दिशेनें या पदार्थांना, त्यांतील प्रेरणांना न कळत नेत असते, आणि ही कामगिरी अगदीं शंभर टक्के व्यवस्थित होत असते. हें सर्व पाहिलें म्हणजे अणुसारख्या ''अचेतन'' किंवा कीटकासारख्या किंचित् चेतन विश्वांत अचेतनता किंवा अज्ञान जरी काम करतांना दिसत असलें, तरी तें अचेतन हें खरें अचेतन नव्हे, तें अज्ञान हें खरें अज्ञान नव्हे, तर तें, सर्वज्ञ आत्मजाणीव, सर्वज्ञ विश्वजाणीव जी सर्वत्र कार्यकारी आहे तिची एक शक्ति आहे, एक निशाणी आहे, एक पुरावा आहे, हें आम्हीं मान्य केलें पाहिजे, हें आम्हांला मान्य करावें लागतें. अज्ञानाच्या पाठीमागें अविभाज्य सर्वज्ञता काम करीत असते, याला निसर्गांत बाह्य पुरावा सर्वत्रच मिळतो; पण याला आमच्या अंतरांतील वैयक्तिक पुरावा आम्हाला पाहिजे असेल, तर तोहि अगदीं हवा तितका भरपूर मिळूं शकतो; मात्र त्याकरतां आम्हीं आमच्या पृष्ठभागीय ''अज्ञानाच्या'' पडद्याच्या मागें पाऊल टाकलें पाहिजे. तेथें आमचें खोल आंतर-अस्तित्व आहे, विशाल उच्च आध्यात्मिक पातळी आहे. तेथें दिव्य ईश्वरी कल्पना, दिव्य ईश्वरी इच्छा आम्हाला प्रतीत होऊं शकते; या प्रतीतीनें, संपर्कानें अविभाज्य सर्वज्ञतेचा पुरावा आम्हांला भरपूर प्राप्त होतो : तेथें आम्हांला हें स्पष्टपणें जाणवतें कीं, आम्ही आमच्या अज्ञानांत स्वत: म्हणून जें कांहीं करीत होतों, केलें तें सर्व, अदृश्य अविभाज्य सर्वज्ञ पुरुष आपल्या नजरेखाली घालून, स्वनियोजित फलाच्या दिशेनें आमच्या कार्याला गति देत होता; आमचें करणें अज्ञानाचें असलें, तरी त्याला संभाळून योग्य दिशेनें नेणारें महान् ईश्वरी कर्तृत्व त्याच्या मागें असतें, हें तेथें आमच्या लक्षांत येतें. त्या कर्तृत्वाचें ध्येय, प्रयोजन, आमच्याकडून त्याला काय करून घ्यावयाचें आहे तें साध्य, आम्हांला तेथें प्रत्ययास येतें : आणि हें घडल्यावर आज ज्यांची आम्ही केवळ श्रद्धाळूपणानें पूजा करतो, त्याचें ज्ञान आम्हांला

पान क्र. १९९

 

तेथें होतें, त्याचें दर्शन तेथें आम्हांला घडतें; शुद्ध विश्वात्मा, सर्व निसर्गाचा आणि जडाजडाचा स्वामी तेथें आम्हांला भेटतो आणि त्याला तेथें आम्ही पूर्णतया ओळखतो.

जी गोष्ट अज्ञानाची तीच त्याच्यापासून घडणाऱ्या परिणामांची. हे परिणाम म्हणजे अक्षमता, दुर्बलता, असामर्थ्य, शक्तिसंकोच, आमच्या इच्छाशक्तीनें चालविलेला विघ्नांनीं भरलेला झगडा, तिचा कोंडमारा झालेला परिश्रम. हे परिणाम ईश्वराच्या, त्याच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनें आपण पहावे, म्हणजे त्यांचें स्वरूप वेगळें असल्याचें दिसेल : ईश्वरी शक्ति सर्वज्ञ आहे पण त्या सर्वज्ञ शक्तीनें आपल्या स्वतंत्र इच्छेनें आपल्या स्वत:ला योग्य त्या मर्यादा घालून काम चालविलेलें आहे. जें काम करावयाचें त्या कामाला लागेल तेवढीच शक्ति पृष्ठभागाकडे पाठवावयाची असा तिचा क्रम आहे. पृष्ठभागीय शक्ति, तिला जो प्रयत्न करावयाचा त्या प्रयत्नाला लागेल तेवढीच असावी. या शक्तीला जें यश किंवा अपयश यावयाचें ठरलेलें असेल त्याला अनुरूप येवढीच ती शक्ति असावी (अपयश हें कार्यदृष्टीनें अवश्य असेल, तर अपयश यावें अशीच ईश्वरी योजना असते), तसेंच अनेक शक्ती जेथें काम करीत असतात तेथें विवक्षित पृष्ठभागीय शक्ति या शक्तिसंघाताचा केवळ एक भाग असल्यानें, या भागकार्यापुरतीच ती असावी अशी व्यवस्था सर्वज्ञ शक्तीला करावी लागते; तसेंच शक्तिसंघाताच्या एकंदर कार्याचा कांहीं एक थोर परिणाम ठरविलेला असतो आणि या विवक्षित पृष्ठभागीय शक्तीच्या परिणामांचे स्वरूप, या थोर परिणामाचे अविभाज्य भाग, असें असतें म्हणून त्या नियोजित थोर परिणामाला आवश्यक तेवढी ही पृष्ठभागीय शक्ति असावी अशीहि व्यवस्था सर्वज्ञ शक्तीला करावी लागते : सर्वज्ञ शक्तीचा हा सर्व कार्यक्रम लक्षांत घेतां, वर अज्ञानाचे परिणाम म्हणून अक्षमता, दुर्बळता वगैरे जी यादी केली, त्या यादींतील प्रत्येक बाब म्हणजे सर्वज्ञ शक्तीनें आपल्या स्वेच्छेनें स्वत:ला योग्य त्या मर्यादा घालून उभी केलेली बाब आहे -- अर्थात् अक्षमता ही खरी अक्षमता नसून कार्यानुरूप मर्यादित क्षमता आहे व ती स्वेच्छेनें सर्वज्ञ सर्वसमर्थ शक्तीनें कार्यानुरूप घेतलेलें रूप आहे, हें आपल्या बुद्धीला समजतें. जी गोष्ट अक्षमतेची तीच दुर्बळता इत्यादि गुणांची व कर्मांची समजावयाची. पुढें पृष्ठभागीय शक्ति ही मर्यादित असावयाची आणि तिच्या पाठीमागें सर्व-शक्ति असा-

पान क्र. २००

 

वयाची; पुढें जी मर्यादित शक्ति असते तिच्याद्वारां सर्व-शक्ति हीच वस्तुत: काम करीत असते : अनेक मर्यादित क्रियाशक्तींच्या कार्यसंघाच्या द्वारां अविभाज्य सर्वसमर्थ ईश्वरी शक्ति आपलीं साध्यें अचूकपणें सिद्ध करून घेते -- सर्वज्ञ सर्वसमर्थ शक्तीची विश्वकार्यांतील ही अशी व्यवस्था आहे. याप्रमाणें आपली शक्ति मर्यादित करण्याचें सामर्थ्य, या मर्यादित शक्तीच्या द्वारां कार्य करण्याचें सामर्थ्य, अर्थात् परिश्रम, संघर्ष, अडचणी दर्शनी अपयशांची किंवा अर्धवट यशांची मालिका यांच्याद्वारां कार्य करण्याचें सामर्थ्य, आणि या कार्यांच्या द्वारां आपला गुप्त हेतु सिद्ध करण्याचें सामर्थ्य, हें जें विश्वांत आपल्या नजरेस येतें तें, सर्वश्रेष्ठ अद्वितीय सर्वसमर्थ शक्ति विश्वांत काम करीत असल्याचा सर्वश्रेष्ठ पुरावा आहे. हा कांहीं असामर्थ्याचा पुरावा नव्हे. दर्शनी अज्ञान हा जसा सर्वज्ञतेचा, तसेंच दर्शनी असामर्थ्य हा सर्वसमर्थतेचा पुरावा विश्वांत आमच्या प्रत्ययास येतो.

आतां दुःखाचा प्रश्न घेऊं. विश्वांत अनुभवास येणाऱ्या दु:खामुळें विश्वाचें कोडें उलगडण्यास अवघड पडतें. हें दुःख जाणिवेच्या मर्यादितपणाचा परिणाम आहे, शक्तीच्या मर्यादितपणाचा परिणाम आहे; आम्हाला जी शक्ति, आमच्या शक्तीहून भिन्नशक्ति वाटते त्या भिन्नशक्तीचा आमच्यावर आघात झाला, तिचा आम्हाला संपर्क घडला तर तो संपर्क, तो आघात पचविण्याची, आत्मसात् करण्याची क्रिया आम्हांला आमच्या मर्यादित शक्तीमुळें, मर्यादित जाणिवेमुळें करतां येत नाहीं -- ही अक्षमता, ही विसंवादाची अवस्था संपर्काचा आनंद आम्हांला होऊं देण्याच्या आड येते, उलट संपर्कामुळें असमाधानाची, दुःखाची प्रतिक्रिया घडविते; संपर्कानें आम्हांला कांहींतरी उणें पडतें, किंवा नको इतकें अधिक होतें. दोन शक्तींच्या विसंवादानें आम्हांला आंतरिक किंवा बाह्य इजा होते : ही सर्व प्रक्रिया म्हणजे, आमच्या अस्तित्वाची शक्ति आणि आम्हांशीं संपर्क करणाऱ्या अस्तित्वाची शक्ति यांच्यामध्यें विभक्तपणा असल्याच्या कल्पनेचा परिणाम आहे. पृष्ठभागीय ''मी'' ला विभक्तपणाच्या कल्पनेमुळें दुःख होणें अटळ आहे. त्याच्या पाठीमागें आमचा खरा आत्मा आमच्या अंतरीं असतो, त्याचे अंतरीं सर्वव्यापी सर्वात्म्याचा सर्वानंद सर्वदा उपस्थित असतो, प्रतीत होतो; हा सर्वव्यापी आत्मा ''भिन्न'' शक्तीच्या घडलेल्या संपर्काची, स्पर्शाची नोंद घेतो; या संपर्कानें ''अप्रिय'', दुःख झालें असेल तें, सहिष्णुतेनें

पान क्र. २०१

 

सोसण्याचा आनंद प्रथम भोगतो; नंतर तें दु:ख आपलें दु:खत्व टाकून देईल असा आनंदमय विजय त्यावर मिळवितो, आणि शेवटीं दु:खाचें आनंदांत रूपान्तर करण्याचा आनंद मिळवितो : मूळ अस्तित्वाचा सर्वगामी आनंद हाच, शारीरिक मानसिक दु:ख हें विकृत रूप, धारण करीत असतो आणि या विकृत रूपाला त्याचें मूळ आनंदरूप घेण्याचें सामर्थ्य असतें. सर्वानंद हा सर्वात्म्यांतच असतो असें नसून, तो आमच्या बाह्य ''मी'' मागील वैयक्तिक आंतरात्म्यांतहि असतो; हा अन्तरात्मा, त्याला अनुभवास येणाऱ्या अनुकूल प्रतिकूल सर्व गोष्टींचा उपयोग करून, त्याच्या अनुभवांपैकीं त्याज्यांचा त्याग व ग्राह्यांचा संग्रह करून वाढत असतो -- आम्हाला अतिशय ताप देणाऱ्या दु:खांतून, संकटांतून, आपत्तींतून कांहीं दिव्य ईश्वरी धडा तो हुडकून काढतो आणि त्याचा आपल्या संवर्धनासाठीं उपयोग करतो. अन्तरात्म्याचे आणि सर्वात्म्याचे ठिकाणीं हा जो सर्वगामी आनंद उपस्थित आहे त्यालाच, आमच्यावर किंवा स्वत:वर वर सांगितलेलें अतिकटु अनुभव लादण्याचें किंवा लादून घेण्याचें धाष्टर्य किंवा धैर्य होऊं शकतें; या आनंदाखेरीज कशालाहि, कोणालाहि असला उद्योग करणें शक्य झालें नसतें : त्याचप्रमाणें असले अनुभव स्वत:च्या उपयोगाला आणणें किंवा या अनुभवांना आमच्या हिताला उपकारक असें स्वरूप देणें, या अनुभवांच्या द्वारां आमचें हित करून देणें, ही गोष्टहि या सर्वानंदाखेरीज इतर कशालाहि, कोणालाहि शक्य झाली नसती. सर्वात्म्याचा सर्वानन्द ज्याप्रमाणें एक किमयागार आहे त्याप्रमाणें सर्वात्म्याची स्वभावगत एकता, अद्वितीयता हीहि किमयागार आहे. या स्वाभाविक अनिवार्य एकतेमुळें विश्वांत सुसंगति, सुसंबद्धता व सुसंवादाचें सौंदर्य अनिवार्यपणें असतें किवा येतें; कारण अस्तित्वाच्या स्वाभाविक एकतेंत स्वाभाविक सुसंगति अटळपणें, अढळपणें उपस्थित असते. या स्वाभाविक सुसंगतीलाच हें शक्य होत असतें कीं विश्वांत अनेक प्रकारें भयंकर विसंगति, दिसण्यापुरती उत्पन्न करावी; शेवटीं ही सर्व प्रकारची दर्शनी विसंगति विश्वांत सुसंगतीच्या स्थापनेलाच मदत करणारी होते, स्वत:च वर्धिष्णु अशा सुसंगतीची घटकभूत होते : ही सर्वात्म्याच्या स्वभावगत एकतेची किमयागारी आहे. तेव्हां आमच्या पृष्ठभागीय जाणिवेला जें जें ''अदिव्य'' या नांवानें संबोधावें लागतें -- आणि आमच्या दृष्टीनें ही संज्ञा बरोबरही असते -- त्या अदिव्याच्या पाठीमागें दिव्य सत्‌वस्तु आहे हा शोध आम्हांला अनुभवाच्या

पान क्र. २०२

 

सर्व क्षेत्रांत लागतो, ही गोष्ट आम्ही आमच्या नजरेसमोर सतत ठेवावयास हवी. ''अदिव्य'' गोष्टी दर्शनी पडद्यासारख्या आहेत, या पडद्यापाठीमागें दिव्य ईश्वरी पूर्णता बसलेली आहे; हा पडदा सध्यां आवश्यक असला, तरी तो कांहीं वस्तुस्थितीचें खरें आणि पूर्ण चित्र नव्हे, हें आम्हीं लक्षांत ठेवावें.

तथापि दर्शनी गोष्टी म्हणजे खोट्या गोष्टी असें नव्हे : विश्वाचें अन्त:स्वरूप दिव्य असल्याचें आपण पाहिलें, पण त्या बरोबरच, आमची मर्यादित मानवी जाणीव विश्वांत ज्या गोष्टी पाहते त्या सर्वथा खोट्या आहेत, मूलत: भ्रामक आहेत असें म्हणून त्या दुर्लक्षिणें आम्हांस योग्य नाहीं. शारीरिक मानसिक दु:ख, यातना, चुक्या, खोटेपणा, अडाणीपणा, दुबळेपणा, दुष्टपणा, अकार्यक्षमता, करावयाचें तें न करणें, जें न करावें तें करणें, संकल्पच्युति, संकल्पविरोध, संकल्पविध्वंस, अहंकार, संकुचितता, ज्यांच्याशीं अगदीं ऐक्यभावानें वागावें त्यांच्यापासून विभक्तता -- थोडक्यांत ज्या गोष्टी आम्ही अनिष्ट म्हणून म्हणतो, आमच्याकडून अनिष्टाची प्रभावी मूर्ति ज्या गोष्टींची बनविली जाते त्या गोष्टी म्हणजे कांही कल्पित रचना नाहींत, मिथ्या भ्रमरूप नाहींत; तर विश्वाच्या संबंधीं आमचें जें ज्ञान, त्या ज्ञानाचा एक भाग, खरा भाग आहेत. -- अर्थात् एक गोष्ट खरी कीं, आमच्या अज्ञानामुळें या गोष्टींचा जो आम्ही अर्थ करतो, या गोष्टींचें जें मूल्य आम्ही समजतों, तो अर्थ, तें मूल्य कांहीं त्यांचें खरें, पूर्ण मूल्य किंवा अर्थ नव्हे. मात्र आम्ही बाह्य दृष्टीनें जो अर्थ लावतो, तो त्यांच्या खऱ्या अर्थाचा एक आवश्यक भाग आहे, त्यांचें जें मूल्य आम्ही मानतों तें, खऱ्या दृष्टीनें खरें मूल्य पूर्ण होण्यास आवश्यक आहे, हेंहि आम्हीं विसरूं नये. आम्हीं बाहेरची मर्यादित जाणीव सोडून आमच्या अंतरीची विशाल आणि खोल जाणीव आमची केली, म्हणजे हें एक सत्य आम्हांला दिसतें कीं, आम्हांला बाह्य दृष्टीनें जें हितविरोधी व अनिष्ट असें दिसतें तें, विश्वाच्या व आमच्या वैयक्तिक हिताच्या दृष्टीनें उपयोगी असतें; दु:ख, अज्ञान, प्रमाद, दुर्बलता, अपयश, भेदाभेद किंवा बेकी, दुही -- या अनिष्ट गोष्टींचा विचार केल्यास त्यांचें इष्टत्व कशांत आहे तें समजून येतें. दु:खाचा अनुभव नसेल, तर या दु:खांतून जें दिव्य सुख जन्मावयाचें असतें त्याचें अगणित मोल आमच्या अनुभवाला येणार नाही; अज्ञान हें ज्ञानाच्या तेजोगोलाभोवतीं छायेच्या परिघाप्रमाणें आहे; अर्थात् अज्ञानाच्या मार्गानें आपण ज्ञानाचें तेज जवळ

पान क्र. २०३

 

करीत असतों; प्रमाद हा सत्याचा शोध लागण्याची शक्यता दाखवितो, त्या शोधासाठीं चाललेल्या प्रयत्नाचा तो भाग असतो -- अर्थात् प्रत्येक प्रमाद हा आपल्याला कोठल्यातरी सत्याच्या जवळ नेत असतो; दुर्बलता आणि अपयश यांच्याद्वारां, बळ आणि यश आपल्यापासून किती दूर आहेत त्याचा अजमास घेत घेत आपण त्यांच्या दिशेनें पुढें पुढें जात असतो; अनेक प्रकारचे भेद, बेकी, दुही या घटनांतील हेतु हाच असतो कीं, अनेक प्रकारचे ऐक्य सिद्ध करण्यांत विविध गोडीचा आनंद आहे, हा अनुभव आम्हांला आणून द्यावा. वर ज्या गोष्टी अनिष्ट म्हणून वर्णिल्या त्या सर्व अनिष्ट गोष्टींतून वर सांगितल्याप्रमाणें शाश्वत इष्ट निघत असतें; सर्व अनिष्ट, वाईट हें अपूर्णतेचें लक्षण आहे आणि अचेतनांतून चेतनाचा जो विकास होतो, त्या विकासाच्या नियमानुसार भरपूर अपूर्णता ही पहिली पायरी चढून, गुप्त दिव्य ईश्वरत्व पुढें अधिकाधिक पूर्णतेनें प्रकट रूप घेत जातें; तेव्हां अपूर्णता, अनिष्ट, वाईट, अमंगल हा विकासी चेतनाचा, पूर्ण ईश्वरत्व स्वत:चें ठिकाणीं प्रकट करण्याचा ईश्वरनियोजित मार्ग आहे आणि म्हणून तो समाधानानें चालत जाणें युक्त आहे. तथापि आपल्यामध्यें अमंगलासंबंधानें, सदोषतेसंबंधानें जी विरुद्ध भावना उसळून येते, तीहि आम्हीं महत्त्वाची आणि आवश्यक अशी भावना मानली पाहिजे; आम्हीं या अमंगल, सदोष गोष्टींना प्रथम निभवून घ्यावयाचें, त्या सहन करावयाच्या, अशी जरी नैसर्गिक व्यवस्था असली, तरी आम्हांवर ही अखेर जबाबदारी आहे, आम्हाला शेवटीं अशी आज्ञा आहे कीं, या अनिष्ट गोष्टींना काढून टाकून, त्यांजवर विजय मिळवून आम्हीं आमचें जीवन, आमची प्रकृति बदलावयास हवी. या अनिष्ट गोष्टी आम्हांला आपल्या दोषांनीं सारखें डिवचीत असतात यांतील हेतूच हा आहे कीं, आम्हीं, आमच्या आत्म्यानें, ''अज्ञान'' या महान् दोषाचे परिणाम नीट ओळखून लक्षांत ठेवावे. त्या परिणामांच्या प्रतिक्रिया अनुभवाव्या आणि या प्रतिक्रियांची टोंचणी ही आपल्याला एक प्रकारें अनिष्टांवर हुकमत मिळविण्याची प्रेरणा आहे, अशा तीव्र भावनेनें आम्हीं या विजयासाठीं धडपड करावी व शेवटीं आमची प्रकृति बदलून टाकण्यासाठीं सामान्य प्रकृतीचा प्रांत ओलांडून उच्चतर दिव्यप्रकृतीच्या क्षेत्रांत प्रवेश करण्यासाठीं आम्ही पहिल्यापासूनहि अधिक खटपट करावी. आम्हीं बाहेरून आंवरतें घेऊन अंतरंगांत खोल प्रवेश केला व तेथील नियमानुसार वागूं

पान क्र. २०४

 

लागलों, म्हणजे आंतरिक साम्याची व शांतीची अवस्था आम्ही भोगूं शकतों; या अवस्थेंत बाह्य निसर्गाच्या प्रतिक्रिया आम्हांला स्पर्श करीत नाहींत, विचलित किंवा विव्हल करीत नाहींत. ही अवस्था मोक्षाचीच अवस्था आहे; मात्र ही कांहीं पूर्ण मोक्षाची अवस्था नव्हे -- आमची बाह्य प्रकृति, आंतील प्रकृतीप्रमाणें शांतिमय झाली म्हणजेच आम्हीं पूर्ण मोक्ष मिळविला असें होऊं शकेल : आंतील प्रकृतीप्रमाणें बाह्य प्रकृतीचाहि मोक्षावर हक्क आहे आणि तो हक्क तिला मिळेपर्यंत आमचा आंतरिक मोक्ष हा अपूर्णच समजला पाहिजे. आणखीहि एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, आम्ही स्वत: अंतर्बाह्य मोक्ष पूर्णतया मिळवून बसलों, तरी दुसरे जीव आहेत, त्यांना दुःख आहे, विश्व त्रस्त आहे तों पावेतों आम्हांला -- महान् आत्म्याला -- तटस्थ उदासीन राहतां येणार नाहीं. सर्व जीव एक-मूल आहेत, आमच्या अंतरात्म्याला सर्व जीवांशीं स्वतःची एकरूपता प्रतीत होते आणि म्हणून या सर्व जीवांची मुक्ति स्वतःच्या मुक्तीचाच एक अंगभूत भाग आहे अशी त्याची तीव्र भावना असते, आणि तशी ती असणें योग्य आहे, आवश्यक आहे.

येथें अनुभवास येत असलेल्या सदोषतेचें, अपूर्णतेचें मूळ, ईश्वराच्या आविष्काराचा नियम हेंच आहे, हें आम्हीं वर पाहिलें. आविष्काराचा क्रमविकास-नियम (येथील अपूर्णतेचें मूळ) हा केवळ आविष्काराचा नियम आहे आणि तोहि, आम्ही ज्या आंदोलनाचा भाग आहोंत त्या आंदोलनापुरता, खास नियम आहे ही गोष्ट खरी आहे. आविष्काराची हालचालच नसती, निदान ज्या हालचालींत आम्ही जीवन जगत आहोंत ती हालचाल नसती, तर हा (अपूर्णतेचें मूळ असलेला) विशिष्ट क्रमविकासनियम अस्तित्वांतहि आला नसता, ही गोष्टहि खरी आहे. परंतु आविष्कार ठरला आणि प्रस्तुतचा आविष्काराचा विशिष्ट आंदोलन-प्रकार ठरला, म्हणजे आम्हांला परिचित झालेला (अपूर्णतेचा जनक) क्रमविकासनियम हाहि क्रमप्राप्तच ठरतो, अनिवार्यच ठरतो. हा अपूर्णतेचा जनक क्रमविकासनियम आणि त्याच्या अंगभूत द्वंद्वात्मक गोष्टी, हें सर्व भारूड -- मिथ्या भारूड -- आमच्या मानसिक जाणिवेनें उभें केलें आहे -- ईश्वराचे ठिकाणीं या मिथ्या नियमादि गोष्टी नाहींत; या द्वंद्वांकडे -- सुखदुःखाकडे, चांगल्या वाईटाकडे तटस्थ रीतीनें पाहणें, किंवा या ईश्वराच्या आविष्काराच्या क्षेत्रांतून ईश्वराच्या विशुद्ध अस्तित्वांत उडी घेऊन विलीन होणें, हेंच एक खरें शहाणपण आहे, असें म्हटलें

पान क्र. २०५

 

जातें; पण हें म्हणणें अर्थ-सत्य आहे : आमच्या मानसिक जाणिवेनें या सर्व द्वंद्वात्मक गोष्टी उभ्या केल्या आहेत हें खरें, पण आमचें मन कांहीं स्वतंत्रपणें, प्रमुखपणें या गोष्टीबद्दल जबाबदार नाहीं, त्याची जबाबदारी आहे ती गौण, दुय्यम जबाबदारी आहे -- आपण वर पाहिलेंच आहे कीं, या गोष्टी ईश्वरी जाणिवेनें निर्माण केल्या आहेत असें, खोल जाऊन अनुभव घेतांच आपणांस दिसतें, आणि हेंच यांतील आन्तरिक पूर्ण सत्य आहे : ईश्वर आपलें सर्व ज्ञान मागें ठेवून, मन या मर्यादित ज्ञानाच्या वस्तूला पुढें करतो आणि या रीतीनें आपल्या स्वतःच्या सर्वशक्तिमत्ता, सर्वज्ञता, सर्वानंद, सर्वभूतमय अस्तित्व, अद्वितीय एकता या स्वभावधर्मांच्या विरुद्ध असणाऱ्या मर्यादित, अनित्य दुःख-सुखादि गोष्टी, 'मर्यादित मन' या वस्तूच्या द्वारां वास्तवांत निर्माण करतो. याप्रमाणें मनाची द्वंद्वाबद्दलची जबाबदारी दुय्यम प्रकारची आहे. ईश्वरी जाणीव ही, दुःखप्रमादादि ज्या गोष्टी निर्माण करते, त्या गोष्टी आणि त्या निर्माण करणारी ईश्वरी क्रिया, यांना आम्ही शाश्वत सत्य नसणाऱ्या आणि मूलभूत सत्य नसणाऱ्या गोष्टी, या अर्थानें ''मिथ्या'' हें नांव देऊं शकतों; अस्तित्वाचें जें मूलभूत आणि अंतिम सत्य, त्याच्या विरोधी या गोष्टी आहेत म्हणून त्यांना आम्ही ''असत्य''हि म्हणूं शकतों; तथापि आमची सध्यांची जी अवस्था आहे -- ईश्वरी आविष्काराची जी सध्यांची पातळी आहे त्या पातळीच्या -- त्या अवस्थेच्या दृष्टीनें या सर्व गोष्टींमध्यें अविचल सत्यहि आहे आणि त्यांना अटळ महत्त्वहि आहे. ईश्वरी ज्ञानाकडून कांहीं तरी चूक होऊन या गोष्टींची निर्मिति झाली, त्यांना ईश्वरी प्रज्ञेच्या दृष्टीनें कांहीं प्रयोजन नाहीं, कांहीं अर्थ नाहीं असें नव्हे. ईश्वरी आनंद, ईश्वरी सामर्थ्य, ईश्वरी ज्ञान यांचा कांहीं हेतु या गोष्टींच्या अस्तित्वामुळें साधतोच साधतो; आणि म्हणून त्यांचें अस्तित्व या ईश्वरी दृष्टीनें समर्थनीय आहे. आम्ही बाह्य अनुभवाच्या कोंडींत जीवन कंठीत आहों तोंपर्यंत ईश्वरी योजनेचें हें कोडें आम्हांला कोडेंच राहणार, गूढच राहणार एवढें मात्र निश्चित.

निसर्गांत आमचें पृष्ठभागीय जीवन अंतर्भूत आहे. हेंच जीवन आमचें खरें जीवन असें आम्हीं मान्य केलें, निसर्गांत जीवनाचा नियम मनुष्याखेरीज इतरत्र जसा कायम ठशाचा अविकासबद्ध आहे, निसर्गांत मनुष्येतर वस्तू व प्राणी आपआपल्या गुणधर्मांनीं जसे कायमचे बांधलेले आहेत, त्याप्रमाणें मनुष्यहि त्याच्या अपूर्णतेला, दोषसंघाला कायमचा

पान क्र. २०६

 

बांधलेला आहे, त्याचें अज्ञान, पाय, दुबळेपण, दुष्टपण, दुःख हें सर्व अनिवार्यपणें त्याच्या जीवनांत निसर्गनियमानुसार कायमचें राहणारें आहे अशी आम्ही भूमिका घेतली, तर आमच्या जीवनांत, आमच्या जीवनाला, खरा अर्थ कांहीं राहत नाहीं. मनुष्य आपल्या प्रकृतींत असलेल्या अंधारांतून, अपूर्णतेंतून बाहेर पडण्यासाठीं सारखा धडपडत असतो; ही त्याची धडपड, त्याचें जीवन खरोखरी कायम ठशाचें असल्यास, या जगांत तो असेपर्यंत फलद्रुप होणें अशक्य आहे -- कदाचित् या जीवनांतून, या जगांतून, मनुष्याच्या कोटींतून तो बाहेर पडल्यावर त्याचें ध्येय त्याला प्राप्त होईल; अर्थात् देवलोकांत किंवा ईश्वराच्या लोकांत किंवा अनिर्वचनीय ब्रह्माच्या कैवल्यांत मनुष्य येथून गेला, म्हणजे त्याची येथील कायमच्या अपूर्णतेंतून सुटका होईल; सुटका होत असेल कदाचित्. तें पुढचें कांहीं असो. मनुष्याला विकासनियम अज्ञात किंवा अमान्य असेल, तर त्याच्या आन्तरात्म्यांत असलेल्या शाश्वत पूर्णतेच्या गोष्टी तो या जीवनांत तरी प्रकट करूं शकणार नाहीं -- सत्य आणि ज्ञान यांना, असत्य आणि अज्ञान यांच्या कोंडीतून तो बाहेर काढूं शकणार नाहीं; मांगल्य आणि सौंदर्य यांना, अमांगल्य आणि कुरूपता यांच्या बंदीतून मोकळें करूं शकणार नाहीं; सामर्थ्य, आणि सुयश यांना, दुर्बलता आणि दुष्टता यांच्या कांचांतून सोडवूं शकणार नाहीं; सुखसमाधान आणि आनंद यांना, दुःख, असमाधान आणि यातना यांच्या जाचांतून सोडवूं शकणार नाहीं -- अपूर्णतेच्या गोष्टींच्या पाठीमागें आंतरात्म्यांत पूर्णतेच्या गोष्टी उपस्थित असतात आणि त्यांनी अपूर्णतेच्या गोष्टींच्या विरोधी परिस्थितींतून मार्ग काढून प्रकट व्हावें असा ईश्वरी विकासाचा नियम आहे. हा नियम मनुष्याला अमान्य किंवा अज्ञात असेल, तर वर सांगितल्याप्रमाणें तो अपूर्णतेंतून बाहेर पडण्यासाठीं विकासमार्गीय प्रयत्न करण्याऐवजीं, अपूर्णतेंतील द्वंद्वें -- अज्ञान आणि मानवी ज्ञान, अमंगल आणि मानवी मंगल, दुर्बलता आणि मानवी बळ आणि सामर्थ्य, संघर्ष व यातना -- यांजबरोबर मानवी प्रेम आणि मानवी सुख हीं द्वंद्वें टाकून देईल आणि देवलोकांची वगैरे आशा धरून सयत्न होईल. आमच्या सध्यांच्या प्रकृतींत ज्ञान-अज्ञान, सुख-दुःख इत्यादि जोड्या अभेद्य आहेत; आणि या जोड्यांचा कायाकल्प जर होणार नसेल, त्यांचें उन्नतीकरण, परिवर्तन होऊन त्यांतून शुद्ध शाश्वत ज्ञान, सुख आदि गोष्टी जर निघणार नसतील, सामान्य मनुष्यत्वाची परिणति

पान क्र. २०७

 

या जगांतच जर दिव्य मनुष्यत्वांत होणार नसेल, तर हीं द्वंद्वें, या जोड्या टाकून देऊन मनुष्यानें मोकळें होणेंच युक्त ठरेल : यांतून मुक्त होणारा मनुष्य दिव्य कैवल्य भोगील किंवा ईश्वराचें सांनिध्य सुख अनुभवील, किंवा ईश्वराचें साधर्म्य प्राप्त करून घेईल -- धर्म आणि दर्शनें (तत्त्वज्ञानें) यासंबंधांत भिन्न भिन्न गोष्टी सांगतात. मनुष्याचें पृथ्वीवरील जीवन, या जीवनाच्या नियमानुसार शाश्वत अपूर्णतेला बांधलेलें आहे. दिव्य ईश्वरी अस्तित्वाच्या पोटीं मनुष्याचें अस्तित्व हें अदिव्य, ''अनीश्वरी'' दोषमय प्रदर्शन आहे आणि हें अस्तित्व असेंच नित्याचें दोषपूर्ण राहणार आहे, त्यांत केव्हांहि बदल होणार नाहीं, होणें अशक्य आहे हें मत मात्र वरील विश्वविरक्त दर्शनांत व धर्मांत सारखेंच सांपडतें. आत्मा मनुष्यत्व धारण करून जन्म घेऊन या जगांत आला तेव्हांच, जन्म घेण्याच्या क्रियेनेंच तो पतित झाला, दिव्यत्वापासून च्युत झाला, मौलिक पाप करून बसला, निदान मोठा प्राथमिक गुन्हा करून बसला; त्याला कळूं लागलें, आपल्या परिस्थितीचें व आत्म-स्थितीचें ज्ञान त्याला झालें, म्हणजे आपली मुळांतली चूक, मनुष्यत्व धारण करून जन्म घेण्याची चूक, समूळ दुरुस्त करणें हाच त्याचा एकच आध्यात्मिक आत्मोद्धारक हेतु असला पाहिजे, आपण केलेल्या पापाचें, गुन्ह्याचें प्रायश्चित्त पूर्णपणें त्यानें घेतलें पाहिजे, असें वर सांगितलेल्या दर्शनांचें व धर्माचें सर्वसामान्य सांगणें आहे.

मनुष्याचें अपूर्ण व दोषपूर्ण अस्तित्व ईश्वराच्या पूर्ण निर्दोष अस्तित्वाच्या पोटीं कायमचें अपूर्ण व दोषपूर्ण राहणारें आहे, हें जर खरें असेल, तर या विरोधमय ईश्वरी कृतीचें स्पष्टीकरण हें एकच असूं शकतें कीं, ही विश्वरचना ईश्वरी लीला आहे, ईश्वराची करमणूक आहे; ईश्वर अदिव्यपणाचें सोंग घेतो, केवळ मनोरंजनार्थ नाटकाच्या हेतूनें तो नटासारखा भलता मुखवटा धारण करतो असें दिसेल किंवा ईश्वरानें अदिव्यत्व, अज्ञान, पाप, दु:ख आदि गोष्टी विविध निर्मितीच्या आनंदाचा भोग घेण्यासाठीं निर्माण केल्या असतील; अथवा कांहीं धर्म विचित्र कल्पना करतात त्या कल्पनांप्रमाणें, ईश्वरानें हीन जीव अशासाठीं निर्माण केले आहेत कीं, या हीन जीवांनीं त्याची (ईश्वराची) स्तुति करावी, त्याचा अखंड चांगुलपणा, शहाणपणा, आनंद, सर्वसमर्थता यांचें कौतुक करावें आणि स्वत: किंचित् त्याच्यासारखे होऊन त्याच्या आनंदांत अल्पांशानें सहभागी व्हावें किंवा हा त्यांचा प्रयत्न विफल

पान क्र. २०८

 

झाल्यास (आणि बहुसंख्य जीवांचा प्रयत्न त्यांच्या अपूर्णतेमुळें विफल होणारच) या विफलतेबद्दल देहदंड (शाश्वत देहदंड असें कांहीं धर्मांत आहे) भोगावा. लीलेची ही विचित्र अतिप्राकृत कल्पना पुढें आली कीं तिला उत्तर म्हणून असें चटकन् सांगतां येतें कीं, ईश्वर स्वत: आनंदमय, स्वत: निर्माण केलेल्या दुसऱ्या जीवांच्या दु:खानें सुखांत रमणारा, स्वत: अपूर्णयुक्त जीव निर्माण करून त्या अपूर्णत्वांतून होणाऱ्या चुकांबद्दल जीवांना धारेवर धरणारा -- हा असा ईश्वर खरा ईश्वरच नव्हे; मनुष्याला जी नैतिक बुद्धि आहे आणि तार्किक विचारशक्ति आहे ती अशा ईश्वराला मानणार नाहीं किंवा असा ईश्वरच (त्याचें अस्तित्वच) मानणार नाहीं : विश्व ही ईश्वरी लीला आहे. ईश्वराचाच एक अंश मनुष्याचा आत्मा आहे, मनुष्यांतील ईश्वरी चैतन्य अपूर्णतेचा मुखवटा धारण करतें, तें मनुष्याच्या रूपांत तेथें असलेलें अपूर्णतेचें नाना प्रकारचें दु:ख भोगण्यास तयार होतें, अशी कल्पना घेऊन निर्णयास येतां येतें कीं, मनुष्याचा आत्मा ईश्वरी चैतन्याकडे ओढला जावा अशी ईश्वरी योजना आहे. येथें जो अपूर्णतेचा खेळ आहे, त्या खेळांत ईश्वर आणि मनुष्यजीव हे खेळगडी आहेत, आणि या विश्वाहून इतरत्र ईश्वराच्या पूर्ण अस्वित्वाच्या पूर्ण आनंदांत मानवी जीव सवंगडी म्हणून सहभागी होणार आहेत -- ईश्वरी लीलेच्या या कल्पना वस्तुत: रहस्यमय व आत्मविरोधयुक्त असल्या तरी, त्यांत क्रूरतेचा भाग नाहीं, त्यांत शिसारी आणण्यासारखा भाग नाहीं; ही लीला विचित्र आहे, आणि आमच्या बुद्धीला या लीलेचें रहस्य कळण्यासारखें नाहीं, एवढेंच आम्ही या लीलेबद्दल म्हणूं. मनुष्याचा आत्मा जाणीवपूर्वक या खेळाच्या आविष्काराला आपली संमति देत असेल; तसेंच हा खेळ अर्थयुक्त, प्रयोजनयुक्त असून, ईश्वरी सर्वज्ञता हा खेळ सकारण खेळत असेल आणि तें ईश्वरी कारण, प्रयोजन आमच्या बुद्धीला पटण्याजोगें असेल, तर मात्र या ईश्वरी खेळाचें, लीलेचें रहस्य, आम्हांला ''रहस्य'' राहणार नाहीं; ही लीला ठीक आहे असें आम्ही म्हणूं.

विश्वलीलेंत निश्चित रूप व निश्चित गुण यांच्या साकार श्रेणी आहेत; प्रत्येक श्रेणी ही ईश्वरी निसर्ग-व्यवस्थेंतील एक पायरी आहे; जडाच्या बनलेल्या रूपांत, सशरीर झालेल्या आत्म्यांच्या क्रमवार प्रगतीसाठीं, उन्नतीसाठीं प्रत्येक श्रेणी ही एक भक्कम पायरी आहे; ईश्वरी आविष्कार क्रमाक्रमानें व्हावा यासाठीं, ही नैसर्गिक आधारश्रेणींची

पान क्र. २०९

 

व्यवस्था आहे -- ईश्वरत्वाचा आविष्कार अचेतनाच्या पायापासून सुरूं होतो व तो अतिमानसिक भूमिका, सर्वज्ञतेची भूमिका येथपर्यंत अनेक पायऱ्यांवरून प्रगति (ऊर्ध्वगामी) करीत मार्गक्रमण करतो; मानवी जाणीव ही या आविष्कार-विकासाची मधली महत्त्वाची पायरी आहे; या पायरीपाशीं विकासाचें निश्चित मार्गान्तर होत असतें -- ईश्वरी लीलेसंबंधानें वरील गोष्टी शोधक बुद्धीला कळल्या म्हणजे ही लीला विशेष विचित्र व अंतर्‌विरोधपूर्ण वाटत नाहीं : अपूर्णता ही अशा विकासलीलेचा एक आवश्यक भाग असणार, हें बुद्धीला सहज पटतें; कारण अचेतनाच्या पोटांत सर्व ईश्वरी प्रकृति जी गुप्तपणें उपस्थित आहे, ती क्रमाक्रमानेंच अचेतनाच्या आवरणांतून बाहेर प्रकट करतां येणें शक्य असतें. अर्थात् तशीच क्रमाक्रमानें ती मोकळी करणें भाग असतें. ही क्रमवार प्रकटनाची योजना, स्वभावत:च ईश्वरी प्रकृतीचा थोडासा अंश अगोदर थोडासा, त्यानंतर थोडासा, त्याहून पुढें थोडासा थोडासा, असा प्रकट करण्याची योजना होते; आणि हें अल्प अंशानें ईश्वरी प्रकृतीचें आविष्करण, अर्थातच अपूर्णतेला वाव देते, अपूर्णता अपरिहार्य करते. क्रमविकासमार्गानें आविष्करण होणें जेथें अनिवार्य आहे, तेथें विकासाच्या पायऱ्या, पातळ्या बनणेंहि अनिवार्य असतें; आणि या पायऱ्या जेथें आहेत तेथें अशी एक विकासाची मधली अवस्था येते कीं, त्या अवस्थेच्या खालीं विकासाच्या पायऱ्या आहेत आणि वरहि विकासाच्या पायऱ्या आहेत; मनुष्याची मानसिक जाणीव ही अशी एक मधली अवस्था आहे : या अवस्थेंत विकासी-जाणिवेची थोडें ज्ञान, थोडें अज्ञान अशी मिश्र ज्ञान-अज्ञानाची भूमिका असते; ही अवस्था अस्तित्वाच्या विकासक्रमांत मधली स्थिति असते; हिचा आधार अचेतनता हा असतो; अचेतनतेंतून अस्तित्व वर आलेलें असतें, पण अचेतनतेच्या आधारावांचून त्याला विकासमार्ग क्रमतां येत नाहीं; तें या आधारानेंच हळूंहळूं, वरती वरती सर्वज्ञ ईश्वरी प्रकृतीच्या स्थानाकडे जात असतें; तें स्थान गांठल्यावांचून विकासी अस्तित्वाला विसांवा नाहीं. अस्तित्वाचें कांहीं अंशानें प्रकटीकरण, विकसन झालेलें -- अर्थात् या आंशिक विकासनाबरोबर अपूर्णता आणि अज्ञान अस्तित्वाचे सहचर झालेले, अशा स्थितींत आणखी एका वस्तूचें साहचर्यहि अटळ होतें, अटळ होऊं शकतें; अस्तित्वाचें मूळ सत्य हें दर्शनी विकृत, विपरीत अवस्थेंत अंशत: विकसित अस्तित्वाचें अज्ञानाबरोबर साहचर्य करतें, करूं शकतें : कांहीं विशिष्ट

पान क्र. २१०

 

क्रियांसाठीं आधार म्हणून, पाया म्हणून या विकृत मूळाचा उपयोग आंशिक अस्तित्वाला होत असतो. अपूर्णता, अज्ञान, अंशविकसित अस्तित्वाला पूर्ण विकासाच्या दिशेनें मार्गक्रमण करावयाला अवश्य असतें -- आणि हें अज्ञान टिकावयाचें तर, त्याला विकृत मूळ सत्य समोर दिसावें, भासावें लागतें : मूळ सत्य अस्तित्व, ईश्वरी प्रकृति, एकता, सर्वज्ञता, सर्वसमर्थता, सर्व-सुसंगति, सर्व-हित, सर्वानंद या लक्षणांनीं युक्त असतें; याच्या उलट अनेकताकृत संकुचितता, विसंवाद, नेणीव, विसंगति, असमर्थता, भान-शून्यता, दुःख, अमंगळ या गोष्टी समोर दिसणें, भासणें, अनुभवणें, हें, अज्ञान, अपूर्णता टिकाऊ व विकाससाहाय्यक होण्यासाठीं अवश्य असतें. मूळ ईश्वरी प्रकृतीचें विकृत स्वरूप समोर नसेल, तर अपूर्णतेला आधार राहत नाहीं, ती आपलें स्वरूप, स्वधर्म मोकळेपणें प्रकट करूं शकत नाहीं आणि गुप्त ईश्वरत्वाला विरोध करून आपलें स्वरूप, स्वधर्म टिकवूं शकत नाहीं. अंशज्ञान म्हणजे अपूर्णज्ञान आणि अपूर्णज्ञान अपूर्णतेच्या पुरतें ईश्वरी प्रकृतीच्या सर्वज्ञतेच्या विरोधी अज्ञान असतें. अज्ञानाच्या (म्हणजे अंश-ज्ञानाच्या) आवांक्याबाहेर, क्षेत्राबाहेर ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींसंबंधानें ''अज्ञान'' विचार करूं लागलें, म्हणजे तें ईश्वरी ज्ञानाचें अकरणात्मक, विरोधक न राहतां, करणात्मक विरोधक बनतें : चूक, खोटें ज्ञान, वस्तूंशी अन्याय्य व्यवहार, जीवनाशीं कर्तृत्वांशीं चुकीचा व्यवहार या गोष्टी करणात्मक अज्ञान करूं लागतें; चुकीचें खोटें ज्ञान हें चुकीच्या संकल्पाचें स्वरूप धारण करतें; प्रथम ही गोष्ट दुर्लक्षानें घडत असेल, पण पुढें इच्छापूर्वक चुकी करणें घडूं लागतें -- बुद्धिपुरःसर चुकीचा संकल्प करण्यांत येतो, कोणत्यातरी आकर्षणानें, आसक्तीनें चुकीची इच्छा बुद्धिपुरःसर केली जाते, खोट्या गोष्टी बोलण्यांत, करण्यांत आनंद वाटतो, म्हणून खोटे बोलण्याचा, करण्याचा संकल्प बुद्धिपुरःसर केला जातो : ईश्वरी ज्ञानाचा सामान्य विरोध हें ज्या अज्ञानाचें मूळ स्वरूप असतें तें अज्ञान, संकीर्ण विकृतीचें स्वरूप धारण करतें. अचेतनता, अज्ञान यांना एकदां मान्यता दिली, कीं वरील सर्व विकृती अगदीं तर्कशुद्धरीतीनें, या मान्यतेचा स्वाभाविक परिणाम म्हणून पुढें येतात, आणि त्यांचाहि जीवनाचे अवश्य घटक म्हणून स्वीकार करावा लागतो; प्रश्न शेवटीं हा उत्पन्न होतो कीं, या प्रकारचे विकासी क्रमवार स्वरूप-आविष्करण (दुःखमय आविष्करण) ईश्वराला करावें लागतें तें कां ?

पान क्र. २११

 

आमच्या बुद्धीला आकलन न होणारा हा एवढाच प्रश्न आतां बाकी आहे.

याप्रकारचें ईश्वराचें व्यक्तीकरण किंवा स्व-निर्माण, किंवा लीला समर्थनीय समजावयाची, तर ती जीवावर लादली जात नाहीं ना, हें पाहिलें पाहिजे; जीवाची इच्छा नसून त्याला या लीलेंत भाग घ्यावा लागत नाहीं ना, हें पाहिलें पाहिजे; प्रकृति पुरुषाच्या संमतीशिवाय कोणतेंहि कार्य करूं शकत नाहीं, या वस्तुस्थितीकडे लक्ष दिल्यास देहधारी चैतन्य  (जीव) लीलेला संमति देत असतें हें उघड आहे; विश्वनिर्माण शक्य होण्यास ईश्वरी पुरुषाची इच्छा निर्माणाची असावी लागते, इतकेंच नव्हे तर व्यक्तिपुरुषाचीहि या निर्माणास संमति असावी लागते -- कारण त्याच्या (विश्वनिर्माणाच्या) पोटीं व्यक्तीचें आविष्करण असतें व या आविष्करणाला व्यक्तिपुरुषाची संमति आवश्यक असते. तेव्हां ज्या अर्थीं आमच्यासमोर व्यक्तिसहित विश्व आहे, त्या अर्थीं ईश्वराची आणि जीवात्म्याची दोघांचीहि संमति या व्यक्तियुक्त विश्वाच्या निर्मितीस लाभलेली आहे असें गृहीत धरण्यास हरकत नाहीं. पण असा एक मुद्दा उपस्थित होऊं शकेल कीं, इतकें अवघड आणि दु:खमय ईश्वरत्व-प्रकटन ईश्वरानें कां संकल्पावें, कां इच्छावें ? त्याला यामध्यें आनंद कसा होतो हें गूढ आहे, तसेंच जीवात्मा या असल्या दु:खमय दिव्यत्वप्रकटनाला संमति कां देतो हेंहि गूढ आहे -- आणि या दोन गूढांचा उकल होणें युक्त आहे. यासंबंधांत आपण आपल्या स्वत:च्या आजच्या स्वभावाकडे नजर टाकणें उपयुक्त होईल. या स्वभावांत जें कांहीं नजरेस येईल तशासारखेंच कांहीं, विश्वाच्या आरंभीं ईश्वराच्या आणि जीवात्म्याच्या प्रकृतींत असावें, असा तर्क आम्ही करूं शकतों. त्यांच्या प्रकृतींतून आमची व्यक्तिगत बाह्य प्रकृति उदयास आली आहे; या व्यक्तिगत बाह्य प्रकृतीचा उदय ईश्वराच्या आणि जीवात्म्याच्या प्रकृतीच्या ज्या धडपडींतून झाला ती धडपड आमच्या आजच्या प्रकृतीच्या धडपडीसारखी असावी, असली पाहिजे असा तर्क आपण केल्यास वावगें होणार नाहीं. आम्ही असें पाहतों कीं, अतिशय आकर्षक असा खेळ जर कोणता असेल, अतिशय आनंद जर कोणत्या खेळांत मिळत असेल, तर तो 'लपवलेलें हुडकून काढण्याचा' खेळ होय -- एकानें लपवावें दुसऱ्यानें हुडकून हस्तगत करावें, यापेक्षां, आपणच प्रामाणिकपणें लपवावें आणि आपणच शोधून मिळवावें यांत खूपच अधिक आनंद असतो. हा आपला स्वभाव आहे आणि मुळांत तर आत्मवस्तु लपविण्याचा आणि

पान क्र. २१२

 

शोधून काढण्याचा खेळ, ईश्वर आणि जीवात्मा खेळत आहेत; तेव्हां त्यांचा आनंद अतुलनीय असणार यांत संशय नाहीं; असो. अडचणींवर मात करून विजय मिळविण्यांत मनुष्याला अप्रतीम आनंद मिळतो; ज्ञान काय, सत्ता काय, निर्मिति काय, या सर्व बाबतींत अडचणींवर मात करून, अशक्य वाटणारें शक्य करून विजय मिळविण्यांत मनुष्याला अपार आनंद लाभतो; श्रम -- दु:खपूर्ण श्रम -- करून सिद्धि मिळविण्यांत, यातनेच्या कठीण दिव्यांतून पार पडून सिद्धि मिळविण्यांत, मनुष्याला पराकाष्ठेचा आनंद होतो. प्रिय माणसाचा विरह घडल्यानंतर जें दोघांचें मीलन होतें त्यांत मनुष्याला उत्कट सुख भासतें. आपलाच आत्मा जणूं आपणांपासून दूर झाला आणि तो परत भेटला म्हणजे तें भेटीचें सुख आम्हांला बेभान करतें. अज्ञान आम्हांला शोधाचा आनंद देतें म्हणून, अज्ञानाचें देखील माणसाला आकर्षण आहे; शोधाचा खटाटोप करतां करतां नवीन, अगदीं अनपेक्षित अशी कांहीं निर्मिति, हातून घडते व या निर्मितीचा आनंद फार मोठा असतो, म्हणून या आनंदाला कारण होणारें अज्ञान आम्हांला आकर्षक वाटतें; जीवात्मा साहसाचा आनंद अज्ञानामुळेंच मिळवूं शकतो, म्हणून अज्ञान त्याला कडू वाटत नाहीं, गोड वाटतें; प्रवासाचे, संशोधनाचे श्रम करून कांहीं गोष्ट प्राप्त करून घेण्यांत मनुष्याला आनंद आहे; लढाई लढून विजय-मुकुट प्राप्त करून घेण्यांत आनंद आहे; परिश्रम करून त्याचें फळ मिळो न मिळो, परिश्रमांत, लढण्यांत, संशोधनांत, प्रवासांत, साहसांत -- या क्रियांतच मुळीं मनुष्याला आनंदलाभ होत असतो. असा आमचा आजचा स्वभाव आहे या वरून, मुळांत काय घडलें असेल याचा तर्क आपण करूं शकतों : विश्व अस्तित्वांत येण्याचें, आणण्याचें रहस्य अस्तित्वाचा आनंद असेल, तर आतांपर्यंत वर्णन केलेला व्यक्ति-पुरुषाचा आनंद हें एक अज्ञानांकित, द्वंद्वमय, दर्शनी दिव्यत्वविरोधी, विश्वलीलेचें कारण आहे असें मानण्यास हरकत नाहीं. दु:खमय दिव्य प्रकटनाला जीवात्म्याची संमति कां मिळते हें कळलें. आतां ईश्वरानें हें अवघड ईश्वरत्वप्रकटन कां इच्छावें याचें उत्तर हवें. तें उत्तर असें आहे कीं, सच्चिदानंद, ईश्वर, आपल्या स्वभावाच्या बरोबर उलट अशा, अचेतनांत, अचेतनाच्या सांच्यांत आपलें सच्चिदानंदत्व पूर्णतया प्रकट करूं इच्छितो. अनंताला अनंतप्रकारें अभिव्यक्त होण्याचा अधिकार स्वभावत:च आहे आणि अचेतनाच्या सांच्यांत आपलें पूर्ण सच्चिदानंद स्वरूप भरणें हा अभिव्यक्तीचा एक

पान क्र. २१३

 

प्रकार आहे; तेव्हां हा प्रकार त्यानें पसंत करून त्याकरितां, त्यांतील आनंदाकरितां दर्शनी अवघड मार्ग पत्करावा यांत बुद्धीला न पटण्यासारखें कांहीं नाहीं.

पान क्र. २१४

 

प्रकरण पांचवें

विश्वभ्रम

मन, स्वप्न, आणि आभास

 

तूं या अनित्य आणि दु:खमय लोकांत आला आहेस, म्हणून तू मजकडे ये.

- गीता ९-३३

 

हा आत्मा विज्ञानमय पुरुष आहे, हृदयांत आंतर तेजाच्या रूपानें असतो; अस्तित्वाच्या सर्व अवस्थांमध्यें समानत्वानें असणारा असा हा जाणीवयुक्त पुरुष आहे; दोनहि विश्वांत हा संचार करीत असतो. हा स्वप्न-पुरुष होऊन या विश्वाच्या आणि त्यांतील मृत्युवश आकारांच्या पलीकडे जातो.... या पुरुषाचीं स्थानें दोन आहेत, हें विश्व आणि परलोक; स्वप्नस्थान हें तिसरें स्थान या वरील दोन स्थानांना जोडणारें स्थान आहे; या संधिस्थानीं जेव्हां हा पुरुष असतो तेव्हां, त्याला हें विश्व आणि परलोक दोन्हीं स्थानें दिसतात; तो निजतो तेव्हां, जेथें सर्व कांहीं आहे त्या या विश्वाचें द्रव्य बरोबर घेतो आणि स्वत:च्या प्रकाशांत, स्वत:च्या तेजानें, असलेल्या रचना मोडण्याचें आणि नवीन रचना उभारण्याचें काम करतो; हा पुरुष निजला म्हणजे आपल्या तेजानें प्रकाशमय होतो; ... तेथें रस्ते नाहींत, रथ नाहींत; तेथें मोदाच्या, आनंदाच्या गोष्टी नाहींत; तेथें तलाव नाहींत, पुष्करिणी नाहींत, नद्या नाहींत -- पण या सर्व वस्तू तो आपल्या तेजानें निर्माण करतो; तो कर्ता आहे. लोकदृष्ट्या झोंपेचा आश्रय करतांना तो आपलें शरीर सोडून जातो, आणि स्वत: न झोंपतां शरीरादि जे झोंपतात त्यांना, पाहत असतो; आपल्या प्राणानें हें खालचें घरटें तो संभाळतो आणि या घरट्यांतून तो अमृत-पुरुष बाहेर पडतो; तो त्याच्या इच्छेला येईल तिकडे जातो; तो अमर हिरण्मय पुरुष एकाकी हंसासारखा विहार करतो...... असें म्हणतात कीं, जागृतींतला देश हाच

पान क्र. २१५

 

केवळ त्याचा देश असतो, कारण जागृत असतांना ज्या गोष्टी तो पाहतो, त्याच केवळ त्याला झोपेंत दिसतात; पण झोपेंत हा स्वयंज्योति असतो. 

- बृहदारण्यक ४-३, ; ९-१२,१४

 

मनरूपी देव स्वप्नामध्यें दृष्ट आणि अदृष्ट, अनुभूत आणि अननुभूत, असणारें आणि नसणारें सर्व पाहतो; सर्व होतो आणि सर्व पाहतो.

- प्रश्न उपनिषद ४-५

 

मानवाचा विचार, मनोमय मानवाचा अनुभव हा निरपवादपणें, अस्ति आणि नास्ति, आहे आणि नाहीं, या दोन टोंकामध्यें सारखा घोंटाळत असतो. त्याच्या मनाला कोणतेंहि विचाराचें किंवा अनुभवाचें सत्य, आहे आणि नाहीं या दोनहि प्रकारें प्रतीत होऊं शकते. व्यक्ति, विश्व, सर्व वस्तूच्या अंतर्यामीं असणारी किंवा सर्व वस्तूंच्या तळाशीं असणारी सद्‌वस्तु, व्यक्ति आणि विश्व याहून वेगळी, यांच्या पलीकडे असणारी सद्‌वस्तु या वस्तुसंबंधानें मनाला काय वाटतें किंवा दिसतें तें तपासल्यास, यांपैकीं केव्हां केवळ एक, केव्हां यापैकीं कोणत्याहि दोन, केव्हां सर्व ''आहेत'', एकाच वेळीं आहेत असा आपला अनुभव असल्याचा मन पुकारा करतें -- पण या वस्तूंपैकीं प्रत्येकीसंबंधानें मनानें ''नाहीं'',  ''नाहीं'' असाहि पुकारा केल्याचें आपण पाहतो : मनाला याप्रमाणें वागणें प्राप्त आहे, कारण विचारशील मन स्वभावतःच अज्ञानग्रस्त आहे,  ''शक्य'', ''अशक्य'' इतकाच विचार, व्यवहार, तें करूं शकतें; शक्यतेच्या पाठीमागें असणारें सत्य त्याला प्राप्त नसतें. एक किंवा अनेक शक्यता एकदम परीक्षून किंवा एकीमागून एक परीक्षून, त्यांच्याविषयीं एखादें निश्चित मत तें बनवू शकेल, एखादा ठाम विश्वास त्याचे ठिकाणीं जागा होईल, कांहीं पक्कें ज्ञान त्याला मिळवतां येईल; पण केवळ सापेक्ष गोष्टींच्या व संभवनीय गोष्टीच्या विश्वांत त्याचें राहणें असल्यानें, त्याला अंतिम निश्चितता, टिकाऊ अविवाद्य निर्धार, कोणत्याहि बाबतींत शक्य होत नाहीं. जें वास्तवांत आहे, त्याचा अनुभव त्याला आलेला आहे, तें देखील स्याद् वा न स्याद्, असेल कदाचित्, नसेलहि कदाचित्, अशा स्वरूपाचें त्याला भासूं शकतें; ''आहे'' पण नसणें शक्य होतें आणि पुढें नसणार असें लक्षण दिसतें -- या प्रकारची कहाणी, वास्तवांतील, अनुभवलेल्या गोष्टींविषयी मन स्वतःला सांगत राहतें. ही मनाची गोष्ट झाली. आमचें प्राणमय अस्तित्व याच प्रकारच्या अनिश्चिततेनें

पान क्र. २१६

 

भरलेलें आहे : अमुक ध्येयाच्या साधनेंत जीवन विसांवलें, असें कधीं होत नाहीं. खात्रीचें अंतिम समाधान कोणत्याच ध्येयापासून त्याला लाभत नाहीं; कोणतेंहि ध्येय कायमचें मोलाचें आहे, शाश्वत मूल्याचें आहे असें त्याला वाटत नाहीं. कांहीं वास्तव गोष्टी व घटना सत्य म्हणून घेऊन आमची प्रकृति आपलें कार्य सुरू करते : पुढें तिच्यावर कोठून तरी दडपण येऊन, या वास्तव गोष्टींच्या पलीकडे ती ढकलली जाते. अनिश्चित शक्यतांच्या मागें ती लागते, शेवटीं सत्य म्हणून जें जें तिनें गृहीत धरलें होतें, तें तें सर्व असत्य तर नाहीं ना ? अशी शंका तिच्या ठिकाणीं ठाम येऊन बसते. असें घडण्याचें कारण हेंच कीं, मूलभूत अज्ञान हा आमच्या प्रकृतीचा कार्यारंभ असतो, निश्चित सत्य तिच्या हातीं नसतें; सत्य म्हणून कांहीं गोष्टींचा आश्रय ती कांहीं काळ करते; पण या सर्व ''सत्य'' गोष्टी संशयास्पद सत्यें आहेत, अपूर्ण सत्यें आहेत, अंशसत्यें आहेत, असें लवकरच आमच्या प्रकृतीच्या अनुभवाला येतें.

प्रारंभीं मनुष्य जडाश्रित भौतिक स्थूल मनांत राहतो. जें वास्तवांत आहे, भौतिक स्वरूपाचें आहे, इन्द्रियग्राह्य विषयाच्या स्वरूपाचें आहे त्याचें ज्ञान या मनाला होतें; या भौतिक गोष्टी खऱ्या गोष्टी म्हणून तें गृहीत धरतें आणि या गोष्टी स्वयंसिद्ध सत्य, संशयातीत सत्य म्हणून तें मान्य करतें. जें वास्तव नाहीं, भौतिक नाहीं, इन्द्रियविषयक नाहीं तें असत्य आहे, अननुभूत आहे असें हें मन म्हणतें आणि तें वास्तव, इंद्रियग्राह्य होऊं शकलें, तरच त्याला पूर्ण सत्याची प्रतिष्ठा देण्यास हें मन तयार होतें. स्वतःचें अस्तित्व ही, इंद्रियगम्य गोष्टीइतकी वास्तव गोष्ट आहे, असें भौतिक मन मानतें; दृश्य इंद्रियग्राह्य अशा शरीरांत स्वतःची वसति असल्यानें आपलें अस्तित्व सत्य आहे असें तें मानतें; दृश्य शरीरांतील स्वतःचें अस्तित्व, हाच तें सत्य असल्याचा भक्कम पुरावा आहे अशी त्याची धारणा असते. स्वतःखेरीज दुसरे जे इंद्रियविषय न होणारे जीव आणि वस्तुप्रकार आहेत, त्यांचेंहि सत्यत्व, वरीलसारख्या पुराव्याच्या आधारानेंच भौतिक मन मानीत असतें; हे जीव व वस्तुप्रकार, बाह्य जाणिवेचे विषय झाले म्हणजे आमचें भौतिक मन त्यांना सत्यत्व बहाल करतें; अशाप्रकारें ते बाह्य जाणिवेचे विषय न झाले, तर निदान त्यांनीं बुद्धीला -- बाह्य-जाणिवेनें पुरविलेल्या पुराव्याच्या आधारानें विचार करणाऱ्या, खरें-खोटें ठरविणाऱ्या बुद्धीला -- तिच्या मार्गानें आपलें सत्यत्व पटवून दिलें पाहिजे,

पान क्र. २१७

 

म्हणजे भौतिक मन त्यांना सत्यत्व बहाल करण्यास तयार होतें.  (बाह्य जाणिवेनें पुढें केलेला पुरावा हाच एक खऱ्या ज्ञानाचा पक्का आधार, पाया होऊं शकतो, असें मानणारी बुद्धि या ठिकाणीं विवक्षित आहे : बुद्धीचे दुसरे प्रकारहि आहेत.) भौतिक शास्त्र हें असल्या भौतिक मनाचें, भौतिक बुद्धीचें महान् क्षेत्रावर पसरलेलें स्वरूप आहे. इंद्रियें चुका करतात, त्या चुका भौतिक शास्त्र दुरुस्त करतें; इंद्रियस्वरूप इंद्रियनिष्ठ मन फार मर्यादित आहे, त्याला भौतिक शास्त्र आपल्या शोधांनीं मदत करतें; आपल्या शारीर इंद्रियांनीं ज्या गोष्टी ग्रहण होऊं शकत नाहींत आणि म्हणून ज्यांचा पदार्थ-क्षेत्रांत समावेश केला जात नाहीं त्या गोष्टी (घटना आणि वस्तु) भौतिक शास्त्रानें शोधून काढलेल्या उपायांनीं किंवा यंत्रांनीं पदार्थक्षेत्रांत आणल्या जातात; इंद्रियांनीं केलेल्या चुका दुरुस्त करण्यालाहि वरील भौतिकशास्त्रनिर्मित उपायांचा व यंत्रांचा उपयोग होतो. कोणत्याहि गोष्टींचें सत्यत्व ठरविण्याची, भौतिक शास्त्राची व भौतिक मनाची कसोटी एकच आहे. बाह्य पदार्थत्व, भौतिक वास्तवत्व ही ती कसोटी होय. भौतिक बुद्धि आपल्या भौतिक पद्धतीनें ज्याचें सत्यत्व तपासून मान्य करील, तें सत्य; बाह्य वस्तुमय पुरावा ज्याचें सत्यत्व ठरविण्यास पुढें आणतां येईल, तें सत्य -- अशी भौतिक शास्त्राची सत्यत्व निर्णयपद्धति आहे.

भौतिक मनाप्रमाणें मनुष्याला प्राणाश्रित मन पण आहे. हे मन इच्छा, वासना, कामना यांचें साधन म्हणून काम करतें. हें मन केवळ वास्तव गोष्टींनीं समाधान पावत नाहीं. शक्यता, संभवनीय गोष्टी या मनाच्या व्यवहाराचा विषय, व्यवहाराचें क्षेत्र असतात; नवीन कांहींतरी मिळवावें अशी त्याला तीव्र इच्छा असते. वासनेच्या तृप्तीसाठीं अनुभवाचें क्षेत्र वाढविण्याच्या मागें हें मन असतें; चैन करावयास मिळावी, आपलें प्रस्थ खूप वाढविण्यास मिळावें, आपल्या सत्तेचें आणि फायद्याचें क्षेत्र खूप मोठें करतां यावें यासाठीं त्या मनाची धडपड नेहमीं चाललेली असते. वास्तवांतल्या गोष्टी हें मन चाहतें, भोगतें, स्वाधीन करून घेतें; पण त्याबरोबरच अननुभूत संभाव्य गोष्टींचा ध्यास तें घेत असतें, या संभाव्य इष्ट गोष्टी वास्तवांत आणण्यासाठीं उत्कट प्रयत्न करतें, त्या स्वाधीन करून घेऊन त्यांचा उपभोग घेण्यासाठीं तडफडत असतें. हें प्राणमय मन नसतें, तर भौतिक मन स्वत: पुरतें पशूंचें जीवन जगून समाधानांत राहिलें असतें, पशूचें प्राथमिक वस्तुगत जीवन आणि त्याच्या

पान क्र. २१८

 

मर्यादा, या भौतिक मनानें आपलें सर्व शक्य जीवन आणि शक्य मर्यादा म्हणून मान्य केल्या असत्या; भौतिक निसर्गाच्या नियमबद्ध व्यवस्था असलेल्या क्षेत्रांत फिरत राहून त्यांतच या भौतिक मनानें समाधान मानलें असतें; अधिक कशासाठीं तें तळमळलें नसतें. पण त्याच्या जोडीला प्राणमय मन, अशान्त प्राणिक वासनांचें मन आपल्या मागण्या घेऊन येतें आणि या वास्तवाच्या मर्यादित खोपटांत राहणाऱ्या भौतिक मनाच्या जड रूढ समाधानाचें असमाधान करून टाकतें. प्राणाश्रित मन हें वासना, कामना सारख्या वाढवीत असतें; असमाधान, अशान्ति सारखी उत्पन्न करीत असतें; त्याला जीवन जें कांहीं देतें, देऊं शकतें, त्यापेक्षां अधिक कांहींतरी मिळविण्यासाठीं तळमळ उत्पन्न करीत असतें -- आम्हांला ज्या गोष्टी शक्य आहेत, त्या शक्य गोष्टींपैकीं बऱ्याच गोष्टी या अशान्त प्राणिक मनाच्या धडपडीमुळें वास्तवांत उतरतात आणि आमचें भौतिक वास्तवाचें क्षेत्र खूप मोठें होतें; तथापि हें मन कांहीं केल्या समाधान पावत नाहीं, अधिकाधिक हवें अशी त्याची सारखी मागणी असते; अधिकासाठीं मागणी सारखी वाढत असते, नवीं नवीं क्षेत्रें जिंकून घ्यावीं, परिस्थितीच्या मर्यादा मागें टाकून पुढें, सारखें पुढें जात रहावें, स्वत:च्या स्वरूपाच्या मर्यादाहि उल्लंघून पार जावें -- अशा तळमळीनें प्राणमय, वासनांकित मन सारखें व्यापलेलें असतें. याप्रमाणें आमच्या जीवनांत खूप अशान्ति आणि अनिश्चितता प्राणिक वासनिक मन आणून सोडतें -- यानंतर विचारशील मन येतें आणि आमची अशांति आणि अनिश्चिति आणखी वाढवितें : हें विचारधर्मी मन, प्रत्येक गोष्टीची तपासणी करतें, प्रत्येक गोष्टीसंबंधानें शंका उपस्थित करतें, सिद्धान्त उभे करतें आणि सिद्धांत पाडून टाकतें, सत्य म्हणून कांहीं गोष्टी घेऊन त्यांचीं शास्त्रें, वाद, विद्या, पंथ बनवितें पण शेवटीं खात्रीचें म्हणून एकहि शास्त्र नाहीं असा निर्वाळा तें देतें; इन्द्रियांचा पुरावा मान्य करते, संशयित म्हणून अमान्यहि करतें; बुद्धि निर्णय देईल तें मान्य करून कांहीं वाटचाल करतें, पण हे निर्णय नापसंत करून दुसरे वेगळे किंवा विरोधी निर्णय तें घेत असतें आणि याप्रमाणें सारखी धरसोड अनंत काळपर्यंत नव्हे, अनिश्चित काळपर्यंत करीत राहतें. मनुष्याच्या विचाराचा, त्याच्या धडपडीचा इतिहास हा असा आहे; मर्यादा उभ्या करावयाच्या आणि मोडावयाच्या हें काम विचारधर्मी मन सारखें अखंडपणें करीत राहतें; पण मर्यादा सारखें मोडीत असलें, तरी त्याचा

पान क्र. २१९

 

मार्ग जुन्याच दिशेचा किंवा त्या दिशेला जवळ असलेल्या दिशेचाच असतो; हा मार्ग सरळ नसतो, वक्र रेषेचा असतो, चक्र गतीचा असतो; बंद चक्रांत मन फिरत नाहीं; त्याची गति-चक्रें एकाच वक्ररेषेचीं एकानंतर एक अशीं शेवट नसलेलीं एकाच किंवा जवळजवळ एकाच दिशेनें जाणारीं असतात. गतिचक्रें मोठीं होत जातात, पण त्यांची दिशा फारशी बदलत नाहीं. मानवी मन याप्रमाणें सारखें शोधांत असतें, सारखें क्रियामग्न असतें; जीवनाचे खरे हेतू, जीवनाचीं खरीं साध्यें अमुक, असें ठामपणें कधीं त्याचें ठरत नाहीं, स्वतःची निश्चित आणि ठाम वाटणारीं मतें, ठामपणें खरीं आहेत, असा त्याचा निश्चय कधीं होत नाहीं; अस्तित्वाची, जीवनाची अमुक एक कल्पना स्वतःची म्हणून पक्की बनविली आहे, अमुक एका जीवनाच्या कल्पनेचा पक्का पाया स्वतःच्या जीवनाच्या उभारणीला भक्कम बांधून ठेवला आहे, असें कांहीं विचारधर्मी मनाच्या हांतून केव्हांहि घडत नाहीं.

याप्रमाणें अशान्ति आणि अनिश्चिततेच्या यातना सारख्या चालूं असल्यानें एक क्षण असा येतो कीं, भौतिक मनाला पदार्थांसंबंधीं जें सत्यत्व पटलेलें असतें तें सत्यत्वहि डळमळीत होतें, आणि तें अज्ञेयवादी बनतें, त्याचे ज्ञानाचे, जीवनाचे जे आदर्श असतात, त्यांसंबंधांत त्याला संशय वाटूं लागतो; हें सर्व खरोखरीच ''सत्य'' आहे कां, असाहि संदेह तें करूं लागतें, हें सर्व सत्य असलें तरी तें निरुपयोगी, व्यर्थ नाहीं असें म्हणतां येईल कां, असाहि प्रश्न त्याच्यापुढें उभा राहतो; ही झाली भौतिक जडाश्रित मनाची गोष्ट. प्राणाश्रित मन हेंहि भौतिक मनाप्रमाणें त्याहूनहि अधिक संशयखोर बनतें; जीवनांत त्याला कांहीं हवें तें सगळें लाभत नाहीं, त्याची पदोपदीं निराशा होत असतें, सुखाच्या म्हणून ज्या गोष्टी तें जवळ करतें त्याहि त्याला पुरतें समाधान देत नाहींत, शेवटीं त्याला उबग येतो, तीव्र निराशा त्याला पछाडते, आणि जीवनांतील सर्व कांहीं व्यर्थ आहे, निष्फळ आहे, जीवाला उगीचच सतावणारें आणि म्हणून नाउमेद करणारें आहे, संताप आणणारें आहे असा सिद्धान्त करून तें, जीवन आणि अस्तित्व ''मिथ्या'' म्हणून टाकून द्यावयासहि तयार होतें; ज्याच्या पाठीमागें तें लागत होतें तें सर्व  ''माया'' आहे असा शेरा मारून त्याचा सर्वस्वी त्याग करण्यास तयार होतें; ही प्राणाश्रित वासनामय मनाची गोष्ट झाली. आतां विचारधर्मी मनाची कहाणी पहावयाची. ही कहाणी थोडक्यांत अशी कीं, त्यानें

पान क्र. २२०

 

'आहे आहे' म्हणून म्हटलेल्या सर्व गोष्टी त्याला 'नाहीं नाहीं' म्हणून नाकाराव्या लागतात; आणि शेवटीं तें या निर्णयाला येतें कीं, त्यानें खऱ्या वास्तव म्हणून घेतलेल्या सर्व रचना म्हणजे स्वतःची आंतरिक कामगिरी आहे, त्यांना खरी वास्तवता मुळींच नाहीं; त्यांच्या पोटीं सत्य वस्तु आहे असेंहि नाही. त्याचा निष्कर्ष असा होतो कीं, सत्य हें या अस्तित्वाच्या पलीकडे आहे, तें एकमेव अद्वितीय असें आहे, तें कुणी केलेलें, बनविलेलें असें नाहीं, असें असूं शकत नाहीं, तें सर्वातीत, सर्वनिरपेक्ष, सार्वकालिक, कालातीत असें आहे; जें जें म्हणून सापेक्ष आहे, परावलंबी आहे, कालाश्रित आहे, तें स्वप्न आहे, आभास आहे, वातांतील दर्शन आहे, महान् विश्वभ्रम आहे, अस्तित्वाचें खरें स्वरूप नसून दर्शनी अस्तित्वाचें फसवें चित्र आहे. अस्तित्वासंबंधानें, विश्वासंबंधानें याप्रमाणें अस्ति - तत्त्वाचा पराजय होऊन, नास्ति - तत्त्वाचा विजय होतो आणि हें नास्तिक्य सर्वच्या सर्व गोष्टींना व घटनांना निरपवादपणें, अनिवार्यपणें व्यापून टाकतें. विश्वाचें सत्यत्व नाकारणारे धर्म आणि दर्शनें या नास्तिक्यांतून निर्माण झालीं आहेत; या नास्तिक्यांतून जीवनविषयक आसक्ति ही जीवनविषयक विरक्ति बनून, या विश्वाखेरीज इतरत्र कोठें निर्दोष आणि नित्य जीवन लाभेल कां, या शोधांत ती गढून जाते किंवा अचल, अक्रिय, सद्‌वस्तूचे ठिकाणीं विलीन होण्याच्या इच्छेंत तिचें परिवर्तन होतें; अथवा मूळ असत्, शून्य हेंच मूळ सत्य आहे असें मान्य करून, त्या शून्यांत विलीन होण्याच्या आसक्तींत जीवनासक्तीचें परिवर्तन होतें. भारतांत बुद्ध आणि शंकर हे त्याच्या (भारताच्या) सर्वश्रेष्ठ विचारवंतांपैकीं दोघेजण, विश्वमिथ्यात्व प्रतिपादणाऱ्या तत्त्वज्ञानाचे प्रणेते आहेत : त्यांची मांडणी असामान्य महत्त्वाची आणि प्रभावाची आहे. बुद्ध आणि शंकर यांच्या दरम्यानच्या कालखंडांत व शंकरांनंतरहि अनेक बरेच महत्त्वाचे तत्त्वज्ञानविषयक पंथ निर्माण झाले; यांपैकीं कांहीं पंथांना पुष्कळ अनुयायी मिळाले; विचाराची बारकाई या पंथांत भरपूर आहे; प्रतिभाशाली आध्यात्मिक दृष्टीच्या विचारवंतांनीं हे पंथ निर्माण केले आहेत; बुद्ध आणि शंकर यांच्या सिद्धांतांची चिकित्सा व विरोध या पंथांतील विचारवंतांनीं बऱ्याच यशस्वीपणें केला आहे, तथापि बुद्ध आणि शंकर यांच्या प्रतिपादनांतील प्रभावीपणा त्यांना साधलेला नाहीं, त्यांच्या व्यक्तित्वांत बुद्ध आणि शंकर यांच्या व्यक्तित्वाइतकें अलौकिक सामर्थ्य अनुभवास येत नाहीं आणि प्रतिपादनांतील व व्यक्तित्वांतील

पान क्र. २२१

 

या उणेपणामुळें त्यांचा परिणाम बुद्ध आणि शंकर यांच्या इतका व्यापक आणि भक्कम असा सामान्य जनतेवर झाला नाहीं. भारताच्या तत्त्वचिंतक मनाची ऐतिहासिक प्रक्रिया पाहतां, बुद्धानें जें तत्त्वज्ञान प्रतिपादिलें तें शंकरानें घेतलें, पूर्ण केलें आणि या रीतीनें जनमनांत बुद्धाची जागा शंकरानें घेतली. बुद्ध आणि शंकर यांच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानांची, त्या तत्त्वज्ञानांतील सारभूत भागाची पकड भारतीय विचारावर, धर्मावर, सर्वसामान्य जनमनावर फार पक्की आणि अतिशय जोराची अशी आहे; बौद्ध आणि शांकर तत्त्वसाराची प्रचंड छाया सर्वत्र पसरलेली आढळते : कर्माची शृंखला, पुनर्जन्माचें चक्र आणि त्यांतून सुटका व माया -- या तीन महान् सूत्रमय उद्‌घोषांची छाप भारतीय जनमनावर, भारतीय धर्मावर व विचारावर सर्वत्र आढळते; म्हणून विश्वाचें अस्तित्व नाकारणारी जी विचारसरणी आहे, त्या विचारसरणीमागें जी कल्पना आहे किंवा जें सत्य आहे त्याकडे पुन: नजर टाकणें आवश्यक झालें आहे. विश्वमिथ्यात्व प्रतिपादणाऱ्या विचारसरणीचा संक्षेपानें कां होईना पण पुनर्विचार करणें योग्य आहे, निकडीचें आहे. या विचारसरणींत जें मुख्य सिद्धान्त व ज्या प्रमुख सूचना असतील त्यांचें मूल्यमापन करणें अवश्य आहे; या सिद्धांतांना, सूचनांना कोणत्या सत्याचा आधार आहे, आमच्या बुद्धीला किंवा अनुभवाला हे सिद्धान्त, या सूचना कितपत आवश्यक, अपरिहार्य वाटतात तें निदान संक्षेपानें तपासणें अवश्य आहे. सध्यां महान् विश्वभ्रमाची, मायेची जी कल्पना आहे, त्या कल्पनेचे अंगभूत किंवा निकटवर्ती जे प्रमुख विचार आहेत, त्यांजकडे नजर देणें आणि त्याबरोबर आमची जी विचारसरणी व दृष्टि आहे त्या दृष्टीला व विचारसरणीला धरून जे विचार आहेत, त्यांजकडेहि नजर देणें आणि या दोन्ही विचारपंथांना समोरासमोर ठेवून तारतम्यानें त्यांचें मूल्यमापन करणें, एवढी तपासणी पुरेशी होईल : मूळ सद्‌वस्तु आहे आणि ती एकमेवाद्वितीय आहे येथूनच दोन्ही विचारपंथ विचाराला आरंभ करतात; पण एक विचारसरणी 'सर्व माया आहे' या निर्णयाला येते, दुसरी 'सर्व सत्य आहे' या निर्णयाला येते; एकमेवाद्वितीय सद्‌वस्तु विश्वातीत आहे आणि त्या सद्‌वस्तूच्या आधारानें सर्वस्वी मिथ्या किंवा सत्य-मिथ्या असें विश्व उभें आहे असें प्रतिपादन एक विचारसरणी करते; तर दुसरी विचारसरणी, मूळ सद्‌वस्तु विश्वातीत आणि त्याबरोबर विश्वरूप, विश्वव्यापी आहे आणि तिच्या आधारानें हें जें विश्व

पान क्र. २२२

 

उभें आहे तें तिच्या इतकेंच सत्य आहे, असें प्रतिपादन करते. प्राणमय पुरुषाला, प्राणाश्रित वासनामय मनाला नको हें जीवन असा उबग येतो, परंतु हा उबग येतो एवढ्याच कारणासाठीं तो योग्य आहे, निर्णायक आहे आणि या उबगाखेरीज दुसरें कोणतेंहि कारण नसतां जीवन हें त्याज्य ठरविण्यासारखें आहे, असें मात्र म्हणतां येत नाहीं. प्राणाश्रित वासनामय मनाची, पुरुषाची निराशा त्याला जाचक होते आणि पुढें कसलीहि आशा न दिसल्यानें तो अगदीं निरुत्साही होतो, हें सर्वात बलिष्ठ असें कारण, त्या पुरुषाला जीवन नकोसें होण्याच्या मुळाशीं असतें. उलटपक्षीं, ध्येयवादी कल्पनामय पुरुष, सारखी आशा करीत असतो, त्याची श्रद्धा अतूट असते, ध्येयसिद्धीचा, कल्पनासिद्धीचा त्याचा संकल्प अभंग असतो. परंतु जशी एकाची निराशा, तशीच दुसऱ्याची आशा. निराशा निर्णायक नाहीं, आशाहि निर्णायक नाहीं, जीवनाची त्याज्यता एकाच्या निराशेनें सिद्ध होत नाहीं, जीवनाची ग्राह्यता दुसऱ्याच्या आशेनें सिद्ध होत नाहीं; तथापि वासनामय प्राणाश्रित मनाला जी निराशा ग्रासते, त्या निराशेला विचारधर्मी मन जो पाठिंबा देते त्या पाठिंब्याला, अगदींच अयोग्य, निराधार असें म्हणतां येत नाहीं -- विचारधर्मी मनाच्या निराशामय विचाराला थोड्याबहुत प्रमाणांत न्याय्य म्हणतां येतें : कारण या मनापुढें अनेक निराशजनक दृश्यें असतात : मानवी प्रयत्न, पृथ्वीवर मानव करीत असलेली खटपट त्याला भ्रममूलक अपयशी दिसते, मानवाचा राजकीय, सामाजिक आदर्शवाद, पूर्णतेसाठीं केला जाणारा मानवी प्रयत्न, मानवाचा मानवतावाद आणि सेवावाद, त्याचा कर्मवाद, कीर्ति - सत्ता - यशविषयक मानवी धडपड, धडपडीनें मिळविलेली कोणतीहि सिद्धि -- सर्व कांहीं भ्रामक, आभासमय, शेवटीं अपयशी आहे असें दृश्य विचारधर्मी मनाला दिसत असतें म्हणून तें स्वाभाविकपणें वासनामय प्राणाश्रित मनाच्या निराशावादाला जोराचा पाठिंबा देतें. मानवी राजकीय, सामाजिक प्रयत्न हे चक्रांत फेरे घेत राहतात, त्यांना कोणतेंच साध्य ठामपणें साधतां येत नाहीं; माणसाचा स्वभाव आणि जीवनमार्ग नेहमीं तसाच राहतो, नेहमीं अपूर्ण राहतो; कायदे, संस्था, शिक्षण, तत्त्वज्ञान, नीति, धर्मांतील शिकवणी या कशानेंहि, एकहि पूर्ण मानव तयार झालेला नाहीं; पूर्ण मानवजातीची गोष्ट अर्थात् दूरच राहिली आहे; कांहीं करा, कुत्र्याचें शेंपूट वांकडे तें वांकडेंच राहणार, अशी म्हण आहे ती मानवाच्या बाबतींत यथार्थ ठरली आहे.

पान क्र. २२३

 

परहितवाद, मानवतावाद, सेवा, ख्रिस्तोपदिष्ट प्रेम, बुद्धोपदिष्ट दया  -- कशानेंहि या जगांत कालच्यापेक्षां आज किंचितहि अधिक सुख आलेलें नाहीं; या सर्व दयादि भावना, कोठें कोठें थोडासा क्षणिक आराम देऊं शकतात, देतात, इतकेंच; जगांत दुःखाची मोठी आग भडकलेली आहे, त्या आगीवर थोडेसे पाण्याचे थेंब शिंपडावे तसें या दयादि भावनांचें कार्य आहे. कोणतेहि हेतू मनांत धरून त्यासाठीं मानवानें खटपट केली, तरी शेवटीं ते हेतू व्यर्थ ठरतात, ती खटपट अल्पकाळ उपयुक्त वाटते, पण शेवटीं ती निरुपयोगी व असमाधानकारक ठरते. मानवी कार्यें पहावीं, तर इतके श्रम व यशापयश वांट्यास येऊन शेवटीं त्यांतून कांहींहि निश्चित साध्य, सिद्ध होत नाहीं असें दिसतें; मानवाच्या जीवनांत कांहीं बदल घडतात, पण हे बदल जीवनाच्या बाह्य रूपांत घडतात आणि हे बदलहि एकामागें एक चक्रांत भ्रमन्ति करीत शेवटीं आपलें व्यर्थत्व सिद्ध करतात; कारण जीवनाचा सारभूत भाग, जीवनाची सर्वसामान्य घडण, सदाकदा सारखीच राहते, सारखीच राहिलेली आहे, राहत आलेली आहे. मानवी विश्वाच्या या वर्णनांत, या दर्शनांत अतिशयोक्ति असेल पण त्यांत परिणामकारकता आहे यांत संदेह नाहीं; मानवाच्या कित्येक शतकांचा अनुभव या दर्शनांत वर्णिल्यासारखाच आहे, आणि हें दर्शन व वर्णन फार अर्थपूर्ण आहे, महत्त्वपूर्ण आहे; मनावर याचा केव्हां केव्हां फार परिणाम होतो; त्यांतील प्रत्येक गोष्ट स्वयंसिद्ध गोष्टीच्या रुबाबानें मनाला हतबुद्ध करते, त्याजवर ताबा मिळविते, आणि पृथ्वीवरील अस्तित्वाचे जे मूलभूत नियम आहेत, जीं मूलभूत मूल्यें आहेत, तीं मूल्यें व ते नियम जर न बदलणारे असतील आणि जर पृथ्वीवरील अस्तित्व, जीवन सारखें चक्राकार लहान मोठे फेरे घालण्यांतच खर्च होणारें असेल (आणि असे तें आहे अशी कल्पना पुष्कळ काळापासून प्रभावी आहे) तर आतांच जी दृष्टि वर्णन केली ती यथार्थ आहे असें म्हणावें लागेल, तिच्यांतून सुटका होणें बहुधा शक्य होणार नाहीं. कारण अपूर्णता किंवा दोषमयता, अज्ञान, निराशा, दुःख आणि यातना या गोष्टी प्रस्तुत विश्व-व्यवस्थेच्या अंगभूत गोष्टींपैकीं प्रधान गोष्टी आहेत; ज्ञान, सुख, यश, पूर्णता किंवा निर्दोषता या वरच्या उलट असणाऱ्या गोष्टी, कोठें दिसल्या तर त्या नेहमीं फसव्या, तात्कालिक स्वरूपाच्या असतात असा अनुभव आहे; वरील याद्यांतील अन्योन्य

पान क्र. २२४

 

विरोधी गोष्टी विश्वजीवनांत अगदीं सर्वस्वीं मिसळलेल्या सांपडतात. ज्ञान-अज्ञान, यश-अपयश, सदोषता-निर्दोषता असें मिश्रण सर्व जीवनांत आढळून येतें; या अन्योन्यविरोधी गोष्टी एकमेकींपासून वेगळ्या काढतांच येत नाहींत; तेव्हां ही जीवनावस्था जर गतिमान् नसेल, अधिक उच्चतर अशा जीवनाकडे जर आजच्या जीवनाची गति नसेल, जर विश्वव्यवस्था याच स्वरूपाची नेहमीं राहणार असेल, तर असा सिद्धांत करणें अटळ होईल कीं, अचेतन शक्तीनें ही सर्व विश्वव्यवस्था निर्माण केली आहे आणि म्हणून जाणीव जी प्रकट झाली आहे ती कोणत्याहि उच्च स्थानाला गांठण्यास असमर्थ आहे; किंवा या सिद्धांताऐवजीं दुसरा असा सिद्धांत करावा लागेल कीं, हें विश्व एक ''दिव्य'' आहे आणि येथें जीवांना यश मिळावें हा, विश्व निर्माण करणाराचा हेतूच नाहीं; या विश्वाच्या पलीकडील लोकांत जीवाला या विश्वाच्या दिव्यांतून गेल्याबद्दल काय फळ मिळावयाचें तें मिळणार आहे -- हे दोनहि सिद्धांत टाकून तिसरा असाहि सिद्धांत निघूं शकतो कीं, हें विश्व हा एक महान् भ्रमाचा, आभासाचा डोलारा, मायेचा पसारा आहे, या पसाऱ्याच्या मागें पुढें कसलाहि हेतु नाहीं, कसलेंहि प्रयोजन नाहीं. विश्वव्यवस्था आहे तशीच कायमची राहणार असेल, तर या तीन सिद्धांतांपैकीं कोणता तरी एक सिद्धांत आम्हांला अटळपणें मान्य करावा लागेल.

या तीन सिद्धांतांपैकीं दुसरा सिद्धांत, आमच्यापुढें मांडला जातो त्या स्वरूपांत, तत्त्वविचारी बुद्धीला विचारार्ह वाटण्यासारखा नाहीं -- हें विश्व आणि परलोक यांचा संबंध या सिद्धांतांत नीट समाधानकारक रीतीनें स्पष्ट केलेला नाहीं, त्या संबंधाची अनिवार्यता दाखविलेली नाहीं, विश्व 'दिव्य' आणि या 'दिव्यांत', विश्वजीवनांत येणारे अपयश, या गोष्टींचा संबंध अनिवार्य कसा, यांतील मूलभूत हेतु काय, अर्थ काय तें या सिद्धांतांत स्पष्ट नाहीं; निर्माणकर्त्या ईश्वराची लहर, हें एक स्पष्टीकरण देतां येईल; पण तें कांही खरें बुद्धीला पटण्यासारखें स्पष्टीकरण नव्हे. विश्वरूपी अज्ञानाच्या क्षेत्रांत उतरण्याचें साहस अमर आत्म्यांनीं स्वत:च्या पसंतीनें केलें आहे; हें साहस करण्यापूर्वीं अज्ञानाच्या क्षेत्राची इत्यंभूत माहिती, अज्ञानाच्या स्वरूपाची माहिती मिळविण्याची सवड त्यांना दिली होती, ही सवड त्यांजवर लादली होती; आणि या सवडीचा फायदा घेऊन अज्ञानाच्या स्वरूपाची माहिती मिळविल्यानंतर त्यांना अज्ञानक्षेत्रांत जाण्याचें रद्द करतां आलें असतें; तरी तसें न

पान क्र. २२५

 

करतां त्यांनीं या क्षेत्रांत उतरण्याचें साहस स्वखुशीनें केलें, असा भाग या दुसऱ्या सिद्धांतांत असता, तर बुद्धीनें विचार करण्यासारखा हा सिद्धान्त झाला असता. तथापि हें अज्ञानाचें विश्वक्षेत्र अतिशय मोठें आहे, अतिशय संकीर्ण आहे आणि त्यांत पुन: तें कायम टिकणारें शाश्वत स्वरूपाचें आहे; असें हें महान्, शाश्वत, अज्ञानयुक्त विश्व या अमर आत्म्यांचें केवळ तात्पुरतें निवासस्थान म्हणून निर्माण केलें, ही कल्पना बुद्धीला पटण्यासारखी नाहीं; अशा या महान् विश्वाच्या निर्मितीपाठीमागें, निर्मितीचा हेतु वरीलपेक्षां पुष्कळच उदात्त असला पाहिजे. अमर आत्मा येथें स्वखुशीनें येतो इतका भाग ठीक आहे, पण येथें केवळ ''दिव्य'' भोगण्याचें कर्म त्याजकडे आहे -- येथें त्याची प्रगति होत नाहीं इत्यादि भाग अश्रद्धेय आहे. हें विश्व अमर आत्म्याच्या प्रगतीसाठीं आहे असें मान्य करणें भाग आहे : येथें दिव्य सत्याची, दिव्य शक्यतेची अभिव्यक्ति होत आहे, या अभिव्यक्तीच्या विशिष्ट अवस्थेंत अज्ञान हा एक आवश्यक प्राथमिक घटक असतो, हें अज्ञान अनिवार्यपणें ज्ञानाच्या दिशेनें वाटचाल करीत असतें; अपूर्णता ही पूर्णतेच्या दिशेनें, निराशाजनक अपयश हें यशाच्या दिशेनें, दु:ख व यातना या अस्तित्वाच्या दिव्य आनंदाच्या दिशेनें वाटचाल करीत असतात; आणि याप्रमाणें अज्ञान ही एक मधली अवस्था लक्षांत घेऊन विश्वाची व्यवस्था आत्म्याच्या प्रगतिसाठीं आहे, हें ठरल्यावर निराशा, निरुत्साह, विश्व-भ्रमाची कल्पना, सर्व व्यर्थ असल्याची कल्पना, अकारण व अयोग्य आहेत हें मान्य करावें लागतें; अवघड विकासपंथांतील स्वाभाविक गोष्टी या अयोग्य भावनांच्या मुळाशीं असतात; या स्वाभाविक गोष्टी म्हणजे विकासक्रमांतील झगडा आणि परिश्रम, यश आणि अपयश, दु:ख आणि सुख, ज्ञान-अज्ञान-मिश्रण वगैरे होत : या गोष्टी अमर आत्म्याच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अनुभवासाठीं आहेत. आत्मा, मन, प्राण, शरीर सर्वांनाच, हा अनुभव स्वत:च्या वाढीसाठीं उपयोगी पडतो -- त्यांच्या ठिकाणीं पूर्ण प्रकाश उजळेपर्यंत त्याची वाढ होत राहते. अर्थात् अमर आत्मा, अचेतनांतून निघून प्राणादि साधनांच्या साह्यानें शेवटीं पूर्ण प्रकाशाचा धनी होत असतो. अशा स्थितींत अचेतनाचें विश्वकर्तृत्व, लहरी ईश्वराचें विश्वकर्तृत्व किंवा विश्व हा महान् भ्रम आहे, माया आहे हें म्हणणें, अमान्य करावें लागतें.

प्राणमय विचारमय मनाची निराशा वगैरे जो, विश्व ही माया

पान क्र. २२६

 

आहे, या कल्पनेचा आधार असतो तो पक्का नसतो हें आतांपर्यंतच्या विवेचनावरून ठरलें; पण या विश्वभ्रम-कल्पनेला श्रेष्ठ मनाचा आणि आत्म्याचा आधारहि दिला जातो. हा आधार दुसऱ्या आधाराहून अधिक पक्का, अवश्य भासतो व असतो. विश्व हें स्वभावतःच भ्रम आहे, माया आहे असा श्रेष्ठ मनाचा, आत्म्याचा दावा आहे; माया आणि भ्रम असें आपण विश्वाला कां म्हणतो याची चिकित्सा, विश्वाला माया आणि भ्रम म्हणणें चुकीचें आहे असें शेवटीं आम्हांला मान्य करावयास लावते असें आपण आतांपर्यंत पाहिलें; विश्वाला माया मानण्याची आतांपर्यंत सांगितलीं गेलेलीं कारणें टिकाऊ नाहींत असा आमच्या चिकित्सेनें निर्णय दिला; पण विश्वाला माया मानण्याचें आतां जें कारण सांगितलें जात आहे तें वेगळें आहे : सद्‌वस्तु, मूळवस्तु, सत्य एकच एक आहे आणि तें सत्य विश्वातीत सद्‌वस्तु होय; याप्रमाणें विश्व वेगळें आणि सत्य वेगळें, अशी भूमिका घेतली म्हणजे विश्वांत जरी दिव्य पूर्णता आली, आमचें विश्वांतील जीवन उच्च होऊन जरी तें देव-जीवन झालें, तरी हें पूर्ण देवजीवन विश्वमायेचा उज्ज्वल भाग म्हणतां येईल, त्याला सत्याची प्रतिष्ठा येणार नाहीं; कारण सत्य हें विश्वातीत वस्तु आहे, आणि त्याशिवाय जें कांहीं, तें मिथ्या, मायारूप, भ्रमरूप आहे, अशी भूमिका आपण घेतली आहे. ही भूमिका न घेतां असें म्हणतां येईल कीं, विश्व सत्य आहे पण हें सत्य विश्वातीत सत्याहून कमी दर्जाचें आहे आणि म्हणून ब्रह्म (विश्वातीत वस्तु) हें एकच खरें सत्य आहे हा साक्षात्कार आत्म्याला झाला म्हणजे विश्वाचें सत्यत्व आपोआप नाहींसें होतें. मग दिव्य तत्त्वाचें प्रकटीकरण, जडामध्यें आत्म्याचा विजय, आत्म्याची अस्तित्वावरची सत्ता, निसर्गांत दिव्य जीवन या सर्व गोष्टी असत्य वर्गांत पडतात, निदान ब्रह्म या एकच एक सत्यावर थोडा वेळ लादलेल्या, निर्भेळ सत्य नसलेल्या गोष्टी, या सदरांत त्या पडतात. या विवेचनांत, मनाची सत्याची कल्पना काय आहे, मनोमय पुरुषाचा सत्याचा अनुभव काय आहे -- ती कल्पना, तो अनुभव कितपत न्याय्य आहे, अनिवार्य आहे यावर सर्व अवलंबून राहतें; आध्यात्मिक अनुभव हा या 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' कल्पनेचा आधार म्हणून दिला जात असेल, तर हा अनुभव निरपवादपणें अंतिम आहे काय ? हा एकच अनुभव आत्म्याला अनिवार्यपणें अंतिम असतो काय ? असे प्रश्न विचारतां येतात.

विश्वभ्रम या कल्पनेची आणखी एक मांडणी अशी आहे कीं, विश्व

पान क्र. २२७

 

हें आंतरिक असत्य अनुभवाच्या स्वरूपाचें आहे. या अनुभवांत आकार, घटना चित्ररूपानें प्रत्ययास येतात, वस्तुजाताची शाश्वत सुषुप्ति या चित्रमय अनुभवाला कारण होते; स्वप्नजाणिवेंत, विशुद्ध विशेषशून्य आत्मज्ञ अस्तित्वाच्या स्वप्नजाणिवेंत, थोडा वेळ विश्वरूप चित्रसंघ अनुभवास येतो, अनन्ताच्या स्वप्नदशेंत अनन्ताला विश्वाचें स्वप्न पडतें अशी एक विश्वभ्रमाची मांडणी आहे. मायावादी दर्शनांत (मायावादी दर्शनें अनेक आहेत, त्यांचा पाया एक परंतु तपशिलाच्या गोष्टी भिन्न भिन्न आहेत.) विश्वाला स्वप्नाची उपमा दिली जाते, पण विश्वमाया म्हणजे स्वप्न आहे असें म्हटलें जात नाहीं. आमचें वस्तुनिष्ठ भौतिक मन हें मान्य करूं शकत नाहीं, हें मान्य करणें त्याला फार जड जातें कीं, आम्ही, आमचें जीवन आणि जग या गोष्टी खरोखरी अस्तित्वांत नाहींत, आमच्या जाणिवेमुळें या खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून वाटतात. हें समजावून सांगण्यासाठीं स्वप्न आणि आभास यांचें उदाहरण दिलें जातें; स्वप्नांतल्या गोष्टी स्वप्नांत आपण आहों तोंपर्यंत खऱ्या वाटतात, त्याप्रमाणें विश्वांत आम्ही असतों तोंपर्यंत विश्वाचा अनुभव आम्हांला खरा वाटतो; पण आम्ही विश्वापासून अलग होऊन त्याजकडे पाहिलें, म्हणजे त्याचें खोटेंपण आम्हांला पटतें. स्वप्नासारखें, स्वप्नांतील दृश्यासारखें हें विश्वाचें दृश्य आहे असें सांगण्यांत येत असतें म्हणून स्वप्नांतील दृश्याचा आणि विश्वदृश्याचा पाया एकच आहे कां, सारखा आहे कां, हें बारकाईनें पाहणें उपयुक्त होईल. विश्व हें मनाचें स्वप्न आहे, आत्म्याचें स्वप्न आहे, अनंताचें स्वप्न आहे -- असेंहि भिन्न प्रकारें, स्वप्न म्हणून विश्वाचें वर्णन कोठें कोठें करण्यांत येत असतें आणि या सर्व प्रकारच्या वर्णनाचा मानवी भावनेवर व विचारावर परिणाम होऊन, विश्व हें माया आहे, या मानवी कल्पनेला मानवी मनाचा ताबा घेण्यास फार मदत होते. ही स्वप्नाची कल्पना आम्हीं तपासावयास हवी : विश्व हें स्वप्न नव्हे असें ठरलें, तर ही स्वप्नाची कल्पना विश्वाला कां लावतां येत नाहीं तीं कारणें देऊन, तिला एकदम बाजूला करणें योग्य होईल. ही जर अंशत: कां होईना बरोबर असेल, तर ती काय आहे व ती कोठवर बरोबर आहे तें पाहिलें पाहिजे; तसेंच विश्व हा भ्रम आहे, परंतु तो स्वप्नभ्रम नव्हे असें ठरलें तर विश्वाच्या भ्रमाचें स्वरूप काय, स्वप्नभ्रमापासून तो कसा निराळा आहे हें आपल्याला स्पष्ट केलें पाहिजे.

पान क्र. २२८

 

स्वप्न मिथ्या कां वाटतें ? स्वप्न मिथ्या वाटतें याचें पहिलें कारण, आम्ही आमच्या जाणिवेच्या स्वाभाविक स्थितींत, जागृतीत आलों, म्हणजे आमच्या जाणिवेच्या स्वप्नदशेंत आम्हीं अनुभवलेलें दृश्य नाहीसें होतें आणि अर्थशून्यहि होतें. पण स्वप्नदृश्य मिथ्या म्हणण्यास हें कारण पुरेसें होऊं शकत नाहीं; जाणिवेच्या अनेक भिन्न अवस्था असूं शकतील आणि प्रत्येक अवस्थेंतील दृश्यें त्या अवस्थेपुरतीं सत्य असतील : एक अवस्था संपली, तिच्यांतील दृश्यें विसरलीं गेलीं किंवा स्मरणांत आणल्यावर दुसऱ्या अवस्थेंत तीं मिथ्या वाटूं लागली, तरी संपलेल्या अवस्थेंत तीं सत्य नव्हतीं असें म्हणतां येत नाहीं; नवी दुसरी जाणिवेची अवस्था मात्र सत्य आणि संपलेली पूर्वींची अवस्था असत्य, असेंहि म्हणतां येत नाहीं. पृथ्वीवरील दृश्यें दुसऱ्या जगांत किंवा दुसऱ्या जाणीवभूमिकेवर जाणाऱ्या जीवाला खोटीं भासली, तरी तीं येथें खोटी नसतात; हें जसें, तसें आध्यात्मिक शांतीच्या किंवा निर्वाणाच्या एखाद्या अवस्थेच्या प्रांतांत आम्ही गेलों, म्हणजे या जगाचें अस्तित्व आम्हांला मिथ्या भासतें म्हणून तें प्रथमपासून मिथ्याच होतें व आहे असें होत नाहीं. विश्वांत राहणाऱ्या जाणिवेला विश्व हें सत्य असतें; निर्वाणांत विलीन झालेल्या जाणिवेला शुद्ध निरुपाधिक अस्तित्व सत्य असतें -- एवढेंच काय तें वरच्या अनुभवांनीं सिद्ध होतें. तेव्हां स्वप्न हें मिथ्या असल्याचें ठरविण्याकरितां दिलेलें पहिलें कारण पुरेसें नाहीं. दुसरें कारण असें आहे कीं, स्वप्न थोडा वेळ टिकतें आणि त्याला शेंडा बुडखा नसतो -- त्याला कारणरूप पूर्वघटना, कार्यरूप उत्तरघटना नसतात; त्याच्या घटकांतहि सुसंगति नसते. आमच्या जागृत जाणिवेला समजेल असा कांहीं अर्थ त्याच्यांत सांपडत नाहीं. जागृतीतील आमचें जीवन सुसंगत असतें, झोंपेपूर्वींच्या जागृतींतील घटना, झोंपेनंतरच्या जागृतींतील घटनांशीं सुसंगतपणें जोडल्या जातात, त्याप्रमाणें प्रत्येक रात्रींची झोंप पूर्वींच्या रात्रींच्या झोंपेशीं स्वप्न-घटनांच्या सुसंगत क्रमानें जोडली गेली, तर आमच्या स्वप्नासंबंधानें आमचें मन आजच्याहून वेगळा विचार करील -- तीं त्याला वेगळ्या स्वरूपाचीं दिसतील. तेव्हां आमचें जागृतींतील जीवन आणि स्वप्न यांत सादृश्य नाहीं, त्यांचें स्वरूप वेगळें वेगळें, त्यांच्यांतील व्यवस्था वेगळी वेगळी, त्यांच्यांतील अनुभवांची सत्यता वेगळी वेगळी अशी स्थिति आहे. आमचें जीवन अल्पकाळ टिकणारें आहे आणि एकंदरींत त्यांतील घटनांत विशेष आंतरिक

पान क्र. २२९

 

सुसंगति आणि हेतुयुक्तता नसते अशी तक्रार करण्यांत येते; पण त्याच्यांतील हेतुयुक्ततेची अपूर्णता आमच्या बुद्धीच्या समजशक्तीच्या अपूर्णतेनें, मर्यादिततेनें उत्पन्न झाली असेल; आम्ही आमच्या अंतरंगांत जातों व तेथून आमच्या जीवनावर दृष्टि टाकतों तेव्हां आमच्या जीवनांत हेतुयुक्तता पूर्णतेनें आहे, जीवनाच्या सर्व घटना सुसंबद्धपणें जोडल्या गेल्या आहेत असें आपल्याला दिसतें; बाह्य जीवनामध्यें विसंगति दिसत नाहीं. त्यांतील घटना एकींतून दुसरी याप्रकारें पक्क्या कार्यकारणभावाला धरून निघते असें दिसतें; ही क्रमवारी आणि संगति जीवनांत नसतांना आमच्या मनानें ती निर्मिली आहे; अर्थात् ती एक भ्रमरूप गोष्ट आहे, वस्तुस्थिति नाहीं असें कल्पिलें, तरी स्वप्नाचा आणि जागृतीचा वेगळेपणा असिद्ध होत नाहीं. कारण स्वप्नांतील घटनांत, द्रष्ट्या आंतरिक जाणिवेनें निर्माण केली जाणारी संगति असत नाहीं; जी कांहीं घटनांची क्रमवारी तेथें भासते, ती जागृतींतल्या संबंधाची अस्पष्ट अयथार्थ नक्कल असते, तींत जाणीव असत नाहीं, निर्दोषता असत नाहीं, ती मोडकी तोडकी असते आणि पुष्कळदां तिचा अभावहि असतो. शिवाय जागृतींत जाणीव ही परिस्थितीवर थोडाबहुत ताबा ठेवते, तिचें नियंत्रण करते; स्वप्नांत हें नियंत्रण, हा ताबा शून्य असतो; तेथें मनुष्याच्या विकसित मनाची संघटनशक्ति आणि संकल्पशक्ति मुळींच प्रत्ययास येत नाहीं, तर निसर्गांत जसें नेणिवेचें यांत्रिक रचनाकार्य होत असतें, तसेंच तें स्वप्नांत होत असतें. अल्पकाळ टिकणें हा स्वप्नाचा मूलभूत विशेष आहे, एका स्वप्नाचा दुसऱ्या स्वप्नाशीं कांहीं संबंध असत नाहीं; जागृतींतील जीवन स्वप्नासारखें अल्पकालिक नसतें -- त्यांतील तपशील स्वप्नासारखा अल्पकालिक असतो, पण एकंदर जीवन अखंड सार्वकालिक असतें; विश्वाच्या अनुभवाची सुसंगतियुक्त समग्रता अल्पकालिक आहे असा पुरावा नाहीं. आमचीं शरीरें मरतात पण विश्वानुभव घेणारे आत्मे, एका जन्मानंतर दुसरा जन्म, असे जन्म युगानुयुगें घेत असतात; ग्रह आणि तारे प्रकाशवर्षाचीं अनेक युगें टिकून नाहींसे होत असतील पण विश्व व विश्वाचें अस्तित्व हें असें केव्हांहि नाहींसें होणारें नाहीं, जसें तें अखंड आहे, तसें तें अनंत आहे असें मानावयास जागा आहे; अनंत शक्तीनें तें निर्मिलें आहे, अनंतशक्ति तें निर्मितें आणि या शक्तीला किंवा तिच्या क्रियेला आरंभ व अन्त आहे असा कांहींएक पुरावा नाहीं. स्वप्न-जीवन आणि जागृत-जीवन यांच्यामध्यें याप्रमाणें फारच अंतर

पान क्र. २३०

 

असल्यानें, अतिशय वेगळेपण असल्यानें, विश्व (जागृत जीवन) स्वप्नाप्रमाणें आहे असें म्हणण्यास जागा नाहीं.

आतां असा प्रश्न उपस्थित होऊं शकतो कीं, आमचीं स्वप्नें सर्वथा असत्य, सर्वथा अर्थशून्य असतात हें म्हणणें बरोबर आहे काय ? या प्रश्नाचा निर्णय लावण्याकरितां थोडक्यांत संक्षेपानें कां होईना, पण झोंपेच्या स्वरूपाची आणि स्वप्नाच्या पोटांतील दृश्यांच्या स्वरूपाची तपासणी आम्हीं करावयास हवी; तीं कोठून कशीं येतात हें पहावयास हवें. आम्हांला जेव्हां झोप येते, तेव्हां जागृतीच्या अनुभवांच्या क्षेत्रांतून आमची जाणीव मागें सरते; ही मागें सरलेली जाणीव विसांवा घेते असें आम्ही मानतों; तिची हालचाल बंद होते, ती कार्यशून्य होते असें आम्ही मानतों; पण ही कल्पना उथळ आहे, बाह्यापुरतीच बरोबर आहे. जागृतींत ज्या क्रिया जाणीव करीत असते, त्या स्थगित होतात, मनाच्या वरचा थर किंवा वरचें पृष्ठभागीय मन विसांवा घेत असतें; आमच्या अस्तित्वाचा जो शारीर भाग, त्याच्याकडून होणारें जाणीवयुक्त कार्य, तेंहि स्थगित होत असतें. आंतरिक जाणीव कांहीं निष्क्रिय होऊन बसत नाहीं, नव्या आंतरक्रिया ही जाणीव करूं लागतें; या क्रियांपैकीं कांहीं भाग आम्ही आठवूं शकतों; ज्या क्रिया आमच्या पृष्ठभागीय मनाच्या खालीं, जवळच्या भागांत होतात, त्या तेवढ्या आम्ही आठवूं शकतों. झोंपेंत याप्रमाणें पृष्ठभागाजवळ खालीं अर्धचेतन, अवचेतन असें आमचें अंधकारप्रधान अंग असतें, तेथें आमचें स्वप्नीय अनुभव घेऊन सांठविले जातात; स्वप्नीय अनुभव या अवचेतन भागांतून प्रवासहि करतात. हें अवचेतन स्थान स्वत: स्वप्नरचनाहि करीत असतें; या अंगाच्या खालीं, पाठीमागें, प्रच्छन्न तलवर्ति खोल आणि सघन असें मन पसरलेलें असतें; आमचें गुप्त आन्तर् अस्तित्व आणि जाणीव, सर्वच्या सर्व समग्रतेनें या प्रच्छन्न मनांत असतें. बाह्य जाणीवेहून आणि अवचेतनेहून ही आंतर प्रच्छन्न जाणीव अगदीं वेगळी, वेगळ्या वर्गांतील असते. शुद्ध अचेतनता आणि बाह्य चेतनता यांच्यामध्यें असलेली, अवचेतन जाणीव ही सामान्यत: वर सांगितलेल्या तिच्या पृष्ठभागीय थरांत, स्वत: बनविलेल्या रचना स्वप्नरूपानें धाडते, आणि बाह्य मनाजवळ, निकट, खालीं जो अवचेतनेचा भाग असतो तेथें आम्हांला या रचना स्वप्नरूपानें दिसतात. या स्वप्नीय रचना दर्शनीं क्रमशून्य आणि विसंगत अशा असतात; स्वप्नांतील क्षणिक रचना पुष्कळशा

पान क्र. २३१

 

आमच्या जीवनाच्या प्रस्तुत परिस्थितीवर उभारलेल्या असतात, या परिस्थितीच्या गोष्टी कशातरी कोणत्यातरी घेऊन, त्यांच्यांतून रचना करण्यांत आलेल्या असतात असें दिसतें. त्यांत कांहीं कल्पित गोष्टीहि विविधतेसाठीं मिसळलेल्या दिसतात; दुसऱ्या कांहीं रचना, पूर्वीच्या घटनांवर आधारलेल्या असतात; पूर्वींच्या विशिष्ट घटना व विशिष्ट व्यक्ती घेऊन, तेथून कांहीं क्षणिक रचना उभारण्यास या दुसऱ्या रचना-प्रकारांत आरंभ केलेला असतो. अवचेतनांतून निघणारीं कांहीं स्वप्नें सकृद्दर्शनी निव्वळ कल्पनारचित गोष्टींचीं असतात; पण जी नवी मनोविश्लेषण पद्धति निघाली आहे आणि जी स्वप्नांकडे नव्या वैज्ञानिक दृष्टीनें पाहण्याचा प्रयत्न करीत आहे ती, या केवळ दर्शनीं कल्पनारचित भासणाऱ्या स्वप्नांचाहि अर्थ लावूं लागली आहे; या स्वप्नांत ज्या गोष्टी घडतात त्यांचा, जागृतींतील जाणिवेनें विचार करून उपयोग करावयाचा असतो : स्वप्नांत येणाऱ्या अनुभवांचें स्वरूप आणि त्यांचें महत्त्व मनोविश्लेषणामुळें सर्वच बदलतें; स्वप्नांतील अनुभवाच्यामागें कांहींतरी सत्य वास्तव गोष्टी असतात आणि या गोष्टी व्यवहारत: बऱ्याच महत्त्वाच्या असतात असें मनोविश्लेषण-पद्धतीनें सिद्ध केल्यासारखें दिसतें.

आमचीं सर्व स्वप्नें अवचेतन जाणीव तयार करते असें नाहीं. आमचें जें आंतर गूढ अस्तित्व आहे त्याची, अचेतनाच्या प्रांताला लागून असलेली अगदीं शेवटची भूमि म्हणजे, अवचेतन भूमि होय. अचेतन धडपड करीत करीत या अवचेतन जाणिवेचें, अर्धचेतनेचें रूप घेतें. आमची पृष्ठभागची भौतिक जाणीव जेव्हां जागृतीच्या पातळीवरून खालीं उतरते आणि अचेतनाकडे मार्गक्रमण करते, तेव्हां ती या मधल्या अर्धजागृत अवचेतन भूमींत आपलें बिऱ्हाड लावते. अचेतनाच्या घराची एक बाहेरची खोली, असेंहि अवचेतनाचें वर्णन करतां येईल. या खोलींतून अचेतनांतील रचना जागृत जाणिवेकडे किंवा तलवर्ती जाणिवेकडे येतात. आम्ही झोंपतों तेव्हां आमचा भौतिक पृष्ठभागीय भाग, त्याचें मूळ जें अचेतन त्या अचेतनाकडे जातो, जातांना तो मध्यें अवचेतनांत प्रवेश करतो; येथें त्याला त्याच्या जुन्या संवयींचे, जुन्या अनुभवांचे संस्कार भेटतात; पृष्ठभागीय मनाच्या जुन्या सर्व संवयी आणि पुन: पुन: घडणारे अनुभव हे अवचेतनावर संस्कार करतात आणि या संस्कारांच्या द्वारां या संवयी आणि अनुभव पुन्हां जागृत मनावर आक्रमण करतात. या आक्रमणामुळें, बाजूला पडलेल्या जुन्या संवयी

पान क्र. २३२

 

जागृत मनाला आपल्या रीतीनें पुन्हां वागायला लावतात; ज्या प्रेरणा कांहीं काल कार्यकारी राहून नंतर सुप्त झाल्या होत्या किंवा दडपून निष्क्रिय केल्या गेल्या होत्या, स्वभावांतील ज्या गोष्टी त्याज्य म्हणून दूर केल्या गेल्या होत्या त्या प्रेरणा, त्या स्वभाव-प्रक्रिया अवचेतनांतून तेथील संस्कारांच्या द्वारां पुन्हां वर येतात आणि पुन्हां जागृत मनाला आपल्या रीतीनें वागायला लावतात; दडपलेल्या व त्यागिलेल्या प्रेरणा -- परंतु ज्या सर्वस्वी नाहींशा केलेल्या नाहींत अशा प्रेरणा ओळखतां न येण्यासारख्या परिणामांचें रूप घेऊनहि वर येतात. स्वप्नजाणिवेमध्यें या परिणामांचें जें आगमन होतें, तें दर्शनीं अगदीं काल्पनिक घटनांच्या रूपानें होतें; दडपून पुरून टाकलेले संस्कार हा या घटनांचा पाया असतो. जागृत जाणिवेला त्यांचा अर्थ कळत नाहीं, कारण अवचेतनाच्या प्रांतांत यांचा अर्थ कसा लावण्यांत येतो, तें जागृत जाणिवेला ठाऊक नसतें. कांहीं वेळ हें चित्रदर्शन केल्यानंतर अवचेतनाची हालचाल कमी कमी होऊन तें अचेतनाचें रूप घेतें; याच अवस्थेला गाढ स्वप्नरहित झोंप असें नांव आपण देतों. ही अवस्था संपते व आम्ही तेथून स्वप्नाच्या क्षेत्रांत किंवा जागृतीच्या पृष्ठभागांत प्रवेश करतो.

स्वप्नरहित झोंप म्हणून ज्या अवस्थेला आम्ही नांव देतों त्या अवस्थेंत, अवचेतनाच्या अधिक खोल, सघन अशा स्तरांत आम्ही प्रवेश करीत असतो; ही अवस्था फार गुंतागुंतीची, फार अंधकारमय, फार जड आणि सुस्त अशी असल्यानें तिच्या घडामोडी पृष्ठभागावर येणें अवघड व अशक्य असतें; तेथें आम्ही स्वप्न पाहत असतों, पण अवचेतनाच्या स्वप्न नमूद करून ठेवणाऱ्या स्तरांत तें नमूद करणें वा तें समजणें हें त्याच्या अति अस्पष्टतेमुळें कांहीं जमत नाहीं. असेंहि घडतें कीं, या स्वप्नरहित म्हटल्या जाणाऱ्या झोंपेंत, शरीर खरें झोंपेंत असतें आणि आंत मनाचा हालचाल करणारा भाग आमच्या अस्तित्वाच्या खोल भागांत म्हणजे तलवर्ती मनाच्या, प्राणाच्या, सूक्ष्म भौतिकाच्या भागांत शिरतो आणि मग त्याचें वरील पृष्ठभागीय मनाशीं, प्राणाशीं, भौतिकाशीं असलेलें सर्व क्रियाशील संबंध तुटतात. आम्ही या खोल भागाच्या जवळच्या विभागांत असतो तोंवर, जेथें झोपेंतील जागृति काम करते तो अवचेतनाचा वरचा भाग आमच्या अनुभवांची कांहींशी नोंद करूं शकतो. तथापि ही नोंद तेथील विशिष्ट लिपींत होत असते, पुष्कळशी विसंगति या नोंदींत सांपडते आणि नेहमी, विसंगति अगदीं कमी असेल

पान क्र. २३३

 

तेव्हांहि, हे अनुभव जागृतींतील अनुभवांच्या चित्रांचें रूप किंवा विकृत रूप घेत असतात. आम्ही खूप खोल गेलों असलों तर नोंद होऊं शकत नाहीं किंवा झाली तरी आम्हांला स्वप्न-जागृतींत ती मिळूं शकत नाहीं आणि मग आम्ही या स्थितीला स्वप्नशून्य झोंप म्हणतों; तथापि आंतरिक स्वप्नजाणीव ही अक्रिय अवचेतन पृष्ठभागाच्या पडद्यामागें काम करीतच असते; आम्हांला आंतर जाणिवेनें आजच्यापेक्षां अधिक काम करतां येऊं लागलें म्हणजे अवचेतनाच्या खोल जड स्तरांत आम्ही प्रवेश करूं शकतों आणि मग, ही पडद्यामागें काम करणारी ''स्वप्नशून्य झोंपेंतील'' स्वप्नक्रिया आम्हांला प्रतीत होऊं शकते; ही स्वप्नक्रिया होत असतां आम्हीं ती पाहूं शकतों किंवा स्मरणशक्तीच्या द्वारां  ''स्वप्नशून्य झोंपेंतील'' ही स्वप्नक्रिया आम्ही आठवूं शकतों. झोंप आम्हांला आमच्या अस्तित्वाच्या इतर भूमींवर नेऊं शकते, भौतिकाच्या वर असलेल्या अतिभौतिक विश्वांत नेऊं शकते, आणि आम्ही आमच्या तलवर्ती अस्तित्वांत जाणिवेचा वापर करूं लागण्याइतके प्रगत झालों म्हणजे, या अतिभौतिक विश्वांतील व आमच्या अस्तित्वाच्या उच्च भूमीवरील अनुभव आम्हांला झोंपेंत स्वप्नरूपानें घेतां येतात. अवचेतनापेक्षां तलवर्ती चेतना ही स्वप्नरचना करण्यांत अधिक कुशल आहे.

तलवर्ती जाणीव स्वप्नजाणिवेच्या क्षेत्रांत स्वप्नें निर्माण करूं लागली म्हणजे, त्या जाणिवेची बुद्धि त्या स्वप्नांत केव्हां केव्हां काम करतांना आढळते; स्वप्न हें विचारांची व्यवस्थित पंक्ति बनतें, हे विचार पुष्कळ वेळां चमत्कारपूर्ण रीतीनें, पुष्कळ वेळां स्पष्टपणें चित्रित केले जातात; आमच्या मनांत घोळणारे न सुटलेले प्रश्न या स्वप्नांत सुटतात; सामान्यत: विसंगत रचनेचीं स्वप्नेंच अवचेतन भूमींत आम्हांला दिसतात -- पण तलवर्ती जाणिवेंतून वर आलेलीं स्वप्नें सत्यकथा कथन करणारीं असतात : तीं भावी गोष्टींची सूचना देतात, लक्षणें सांगतात, सावधपणा सुचवितात; प्रतीकरचनाहि या स्वप्नांत येतात; यांपैकीं कांहींचें स्वरूप हें मानसिक (बौद्धिक), कांहींचे प्राणिक (वासनिक) असतें; बौद्धिक स्वरूपाचीं प्रतीकें अर्थ स्पष्ट रीतीनें दाखवितात, कांटेकोरपणें त्यांचें चित्रण केलेलें असतें; वासनिक (प्राणिक) प्रतीकें संकीर्ण गोंधळाचीं, आमच्या जागृत मनाला न उमगणारीं अशीं असतात; तरी पण या गोंधळाच्या स्वप्नांचा अर्थ लावून देणारा धागा सांपडला, तर या स्वप्नांतहि वस्तुत: गोंधळ नसून एक विशिष्ट सुसंगति आहे आणि मह-

पान क्र. २३४

 

त्त्वाचा अर्थ आहे असें आपणांस आढळून येतें; आमच्या अस्तित्वाच्या सामान्य पातळीहून वेगळ्या अशा ज्या पातळ्या आहेत, तसेंच विश्वपुरुषाच्या अस्तित्वाची जी व्यापक पातळी आहे त्या पातळ्यांत, आमचा प्रवेश झोंपेंत होऊं शकतो (तलवर्ती जाणिवेचा उपयोग आम्हांला करतां येऊं लागला म्हणजे झोपेंमध्यें या पातळ्यांत आमचा प्रवेश होऊं शकतो हें वर आलेंच आहे) आणि तेथें आम्हाला विविध अनुभव येतात -- हे अनुभवहि स्वप्नांच्या द्वारां आमच्या समोर येऊं शकतात. प्रतीकस्वप्नांप्रमाणें या स्वप्नांचा आमच्या आंतील बाहेरील जीवनांशीं, दुसऱ्यांच्याहि जीवनाशीं केव्हां केव्हां दाट, दृढ संबंध असतो, आमच्या व इतरांच्या मानसिक, प्राणिक, बौद्धिक, वासनिक अस्तित्वाचे व जीवनाचे घटकभूत गुणदोष या स्वप्नामध्यें आमच्या नजरेस आणले जातात, या जीवनावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडत आहे तें या स्वप्नांत आमच्या नजरेस येतें : आमच्या जागृत जाणिवेला यांपैकीं कोणतीच गोष्ट अल्पांशानेंहि विदित असत नाहीं. तलवर्ती जाणिवेनें रचलेल्या कांहीं स्वप्नांत असा संबंध असत नाहीं, तर आमच्या भौतिक अस्तित्वाहून अगदीं स्वतंत्र अशा सुसंघटित ज्ञानभूमीवर घडणाऱ्या गोष्टींचें चित्र त्यांत उभें केलेलें असतें. आमच्या झोंपेंतील सामान्य अनुभवाचा मोठा भाग अवचेतनांतून निर्माण झालेल्या स्वप्नांचा असतो. आमच्या स्मृतींत सामान्यत: हींच स्वप्नें राहतात; केव्हां केव्हां मात्र तलवर्ती जाणिवेनें उभीं केलेलीं स्वप्नें इतकीं प्रबल असतात कीं, तीं आमच्या जागृतींतील जाणिवेला आठवूं शकतात. आम्ही आमचें आंतर अस्तित्व विकसित केलें, आंतलें जीवन जगूं लागलों -- सामान्यत: माणसें आंतलें जीवन जगत नाहींत किंवा फार अल्प अंशानें जगतात -- सामान्य माणसांहून अधिक प्रमाणांत अधिक दृढतेनें आम्ही आन्तर जीवन जगूं लागलों, म्हणजे अवचेतन-रचित स्वप्नें कमी होऊन तलवर्ती-जाणीवरचित स्वप्नें अधिक संख्येनें आम्हांला पाहावयास मिळतात, आमचा स्वप्नसंसार मोठा होतो; अवचेतनी स्वप्नांचे अर्धवट काल्पनिकत्व ज्यांत मुळींच नाहीं अशीं, खऱ्या वास्तव गोष्टी, सार्थ घटना दाखवणारीं तलवर्तीजाणिव-रचित स्वप्नें मोठ्या संख्येनें आमच्या स्वप्नसंसारांत दाखल होतात.

झोंपेमध्यें सर्वस्वीं जाणीवपूर्वक व्यवहार करणेंहि शक्य आहे; आमचा स्वप्न-अनुभव आरंभापासून अखेरपर्यंत जाणिवेनें पाहणें, निदान या अनुभवाचें मोठें क्षेत्र जाणिवेनें पाहणें आम्हांला शक्य आहे : याप्रमाणें

पान क्र. २३५

 

जाणिवेच्या दृष्टीनें स्वप्नव्यवहार पाहिला, म्हणजे आम्ही एका जाणीव-भूमिकेंतून दुसऱ्या, दुसरींतून तिसऱ्या असे अनेक भूमिकांतून प्रवास करीत आहों असें आम्हांला दिसतें; या प्रवासानंतर स्वप्नशून्य प्रकाशमय शांतिपूर्ण विरामाचा लाभ आम्हांला होतो. जागृतींत खर्च झालेल्या शक्तीचा सांठा या विसांव्यानें पुन्हां भरून येतो; हा विसांवा संपतो आणि आम्ही पुन: जुन्या मार्गानें जागृतीच्या क्षेत्रांत येतो. आम्ही जेव्हां स्वप्नांत एका भूमिकेंतून दुसऱ्या भूमिकेंत जातो तेव्हां सामान्यत: जुन्या भूमिकेंतील अनुभव आम्ही मागें टाकतों, विसरून जातों; आम्ही परत जेव्हां जागृतीवर येतों तेव्हां जागृतीचा पृष्ठभाग ज्या स्वप्नीय अनुभवांना जवळचा असेल किंवा जें स्वप्नीय अनुभव अतिशय स्पष्ट असतील ते तेवढे स्मरणांत राहतात. तथापि जागृतीच्या पृष्ठभागाजवळ नसलेले, अस्पष्ट असलेले असेहि स्वप्नीय अनुभव कांहीं प्रमाणांत स्मरणांत ठेवणें शक्य आहे; तसेंच जें स्वप्न किंवा स्वप्नभूमि स्मरणांत असेल त्या स्वप्नाच्या किंवा स्वप्नभूमीच्या मागें जाणें, तेथून आणखी मागें जाणें आणि याप्रमाणें सर्व स्वप्नीय अनुभव जागृत जाणिवेच्या कक्षेंत आणणें ही गोष्ट स्मरणशक्तीचें संवर्धन करून साधतां येते. झोंपेतील जीवनाचें सुसंगत ज्ञान संपूर्णपणें मिळविणें शक्य आहे; अर्थात् ही गोष्ट सोपी नाहीं व असें मिळविलेलें ज्ञान टिकवून धरणेंहि सोपें नाहीं.

अचेतनाच्या शक्तीचें कार्य म्हणून जसें आमचें पृष्ठभागीय भौतिक अस्तित्व निर्माण झालें आहे, तशी गोष्ट आमच्या तलवर्ती अस्तित्वाची नाहीं; मूळ उच्च स्थानावरून जाणीव आवरणें घेत खालीं उतरते व पूर्ण आवृत होऊन अचेतन झाल्यानंतर अचेतनांतून विकासक्रमानें ती वर येत असते : खालीं उतरणारी व वर चढणारी अशा या दोन जाणिवांची भेटीची जागा म्हणजे तलवर्ती अस्तित्व होय. या अस्तित्वांत आंतरमन, आंतरप्राण, आंतर सूक्ष्म भौतिक अस्तित्व असतें -- हें आंतर अस्तित्व बाह्य अस्तित्वाहून, बाह्य प्रकृतीहून फार मोठें, विशाल असतें; आमच्या पृष्ठभागीय अस्तित्वांत, जीवनांत जें कांहीं आहे, जें कांहीं घडतें तें मूळ या तलवर्ती गुप्त अस्तित्वांतून बहुतांशीं निघालेलें आहे, असतें -- याला अपवाद तीन गोष्टी (१) प्राथमिक अचेतन विश्वशक्तींतून ज्याची घडण होते तें, (२) आमच्या पृष्ठभागीय जाणिवेचें जें स्वाभाविक विकासजन्य कार्य आहे तें (३) बाह्य विश्वप्रकृतीच्या आघातांची प्रतिक्रिया म्हणून पृष्ठभागीय जाणिवेचें जें कार्य घडतें तें; या तीन

पान क्र. २३६

 

गोष्टींच्या बाबतींतहि तलवर्ती जाणिवेचा हात थोडा फार असतो, तिचा अप्रत्यक्ष प्रभाव तर या तीनहि गोष्टींवर खूपच होत असतो. आमच्या या तलवर्ती अस्तित्वांत जी जाणीव असते ती विश्वाशीं, विश्वजाणिवेशीं, विश्वशक्तीशीं प्रत्यक्ष संबंध राखूं शकते, आमचें पृष्ठवर्ती अस्तित्व, विश्वाशीं, विश्वशक्तीशीं इन्द्रियें आणि इंद्रियरूप मन यांच्या द्वारां अप्रत्यक्ष संबंध ठेवीत असतें; त्याला त्या शक्तीशीं प्रत्यक्ष संबंध ठेवतां येत नाहीं. या तलवर्ती अस्तित्वांत, आन्तर इंद्रियें असतात, स्पर्श, दृष्टि, श्रुति, हीं तलवर्ती अस्तित्वाचीं सर्व इन्द्रियें स्वतंत्र असतात; पण हीं सूक्ष्म इन्द्रियें बाह्य इंद्रियांप्रमाणें अप्रत्यक्ष माहिती देणारीं यंत्रें नसून, वस्तुजाताचें प्रत्यक्ष ज्ञान आंतरपुरुषाला घडविणारीं ज्ञानवाहकें असतात. ज्ञानाकरितां तलवर्ती पुरुषाला सूक्ष्म इंद्रियांवरहि अवलंबून रहावें लागत नाहीं; वस्तूंचें ज्ञान त्याला प्रत्यक्षतः होतें, त्याच्या सूक्ष्म इंद्रियांकडून केवळ या ज्ञानाला विशिष्ट आकार, रूप दिलें जातें; जागृत मनाच्या बाह्य इन्द्रियांच्या द्वारां, जागृत मनामध्यें वस्तूंचें आकार येतात. मग हें जागृत मन हे आकार नोंदून ठेवतें, किंवा त्यांच्या आधारावर तर्कशास्त्रानें आपल्या प्रत्यक्ष अनुभवाची रचना करतें. तलवर्ती पुरुषाच्या बाबतींत त्याचीं सूक्ष्म इंद्रियें ज्ञानाला आकार देतात; पृष्ठवर्ती पुरुषाच्या बाबतींत वस्तूंचें आकार प्रत्यक्ष असतात; स्थूल इन्द्रियद्वारां प्रत्यक्ष होतात, या प्रत्यक्ष आकारांवरून तर्कानें अप्रत्यक्षरीत्या वस्तूंचें ज्ञान जमविलें जातें. विश्वजाणिवेमध्यें मानसिक, प्राणिक, सूक्ष्म भौतिक भूमी असतात, तेथें तलवर्ती पुरुषाला हक्कानें प्रवेश मिळतो. केवळ भौतिक भूमीला आणि भौतिक विश्वाला चिकटून राहण्याची आपत्ति त्याजवर नसते. मूळ जाणीव खालीं अचेतनांत गुप्त होण्यासाठीं उतरत येते, तेव्हां उतरतां उतरतां अनेक विश्वांची रचना करीत करीत ती उतरत असते; या विश्वाशीं संबंध ठेवण्याचीं साधनें तलवर्ती पुरुषाला उपलब्ध असतात. अचेतनांत गुप्त झालेली मूळ जाणीव (अतिचेतन जाणीव) पुन: वर चढून मूळ स्थानाला जावी म्हणून तिच्या चढण्याच्या कार्यासाठीं, ती उतरत असतां बनविलेल्या विश्वाशीं सुसंवादी समानरूप अशीं जीं विश्वें निर्माण करण्यांत येतात, किंवा निर्माण होतात त्या विश्वांशींहि संबंध ठेवण्याचीं साधनें तलवर्ती पुरुषाला उपलब्ध असतात. बाह्य विषयापासून आणि व्यवहारापासून स्वत:ला आवरून परावृत्त करून झोंप घेणें, आंतरिक वस्तूवर एकाग्र होणें किंवा समाधिद्वारां आंतरिक

पान क्र. २३७

 

चैतन्यांत बुडी घेणें या तीन मार्गांनीं आमचें मन आणि प्राणमय अस्तित्व आतांच वणिलेल्या विशाल तलवर्ती अस्तित्वांत प्रवेश करीत असतें.

जागृत जाणिवेला तलवर्ती अस्तित्वाशीं असलेलें तिचें नातें, तिचा संबंध लक्षांत येत नाहीं; या तलवर्ती अस्तित्वांतून जागृत पुरुषाकडे अनेक गोष्टी येतात पण या गोष्टींचें मूळ, जागृत पुरुषाला, जाणिवेला समजत नाहीं -- आंतरप्रकाशमय ज्ञान, स्फूर्ति, कल्पना, इच्छाविषयक सूचना, इंद्रियगत अनुभवविषयक सूचना, क्रियाविषयक प्रेरणा या गोष्टी आमच्या अमर्यादित पृष्ठवर्ती अस्तित्वाच्या पाठीमागून पुढें किंवा खालून वर येत असतात. समाधि ज्याप्रमाणें तलवर्ती अस्तित्वाचा दरवाजा आम्हांला उघडून देते, त्याप्रमाणें झोंपहि तो दरवाजा उघडून देते; कारण दोन्ही अवस्थांत आम्ही आमची मर्यादित जागृत व्यक्तिता सोडून, तिच्या पाठीमागें, व्यक्तितेच्या पडद्यापाठीमागें जात असतो, आणि या पडद्यापाठीमागें तलवर्ती अस्तित्वाचें क्षेत्र असतें. झोंपेंतील अनुभवाची जी नोंद आमचेकडे येते ती स्वप्नद्वारां येत असते; स्वप्नीय चित्रांच्या द्वारां झोंपेंतले अनुभव आम्हांला कळतात; समाधींतील अनुभव आंतरिक जागृतीच्या द्वारां आम्हांला मिळतात; समाधीच्या अवस्थेचें सर्वांत सुलभ स्वरूप म्हणजे आंतरिक जागृति होय : तलवर्ती जाणीव आणि जागृत जाणीव यांचा संबंध, प्रसंगत: किंवा नित्याचा, जाणीवपूर्वक घडूं लागला म्हणजे अतिप्राकृतिक, असामान्य अशी स्वच्छ दृष्टि आणि दुसरें प्रकाशमय व्यावहारिक मार्ग तलवर्ती जाणिवेला प्राप्त होतात, आणि या मार्गांनीं, जागृत जाणिवेला काय ज्ञान वगैरे द्यावयाचें तें ती देऊं शकते. पडद्याआड असलेला पुरुष, अन्तर्वर्ती पुरुष तलवर्ती अवचेतन अस्तित्वाला स्वत:च्या क्षेत्राला जोडून घेतो : हा अवचेतनयुक्त तलवर्ती पुरुष आंतरिक वस्तूंचें आणि अतिभौतिक वस्तूंचें ज्ञान प्रत्यक्ष (स्वत:च्या दृष्टीनें) मिळवितो; पृष्ठवर्ती अवचेतनांत या ज्ञानाची नक्कल स्वप्नद्वारां केली जाते. उपनिषदांत तलवर्ती पुरुषाला स्वप्न-पुरुष हें नांव दिलेलें आहे. कारण सामान्यत: तलवर्ती पुरुषाचे अनुभव आम्हांला स्वप्नांच्या, आभासांच्या, एकाग्र अन्तर्दशीं अवस्थांच्या द्वारां प्रत्ययास येतात; उपनिषदांनीं अतिचेतन पुरुषाला सुषुप्त-पुरुष हें नांव दिलेलें आहे; कारण सामान्यत: सर्व मानसिक आणि ऐंद्रिय अनुभव आम्हीं अतिचेतन अवस्थेंत प्रवेश करतांच आम्हांला नाहींतसे होतात. अतिचेतनाचा स्पर्श मनाला गाढ समाधींत बुडवितो, आणि या समाधींत मनाला आलेला अनुभव किंवा

पान क्र. २३८

 

त्या अनुभवाची नक्कल, त्याचें चित्र (स्वप्न) सामान्यत: आमच्या जागृत जाणिवेला लाभत नाहीं. अतिचेतन अवस्थेंतील अनुभव, अतिचेतनाचे घडलेले संपर्क, तेथून आलेल्या सूचना, संदेश, आमच्या पृष्ठवर्ती जागृत जाणिवेला ज्ञात होऊं शकतात; पण आमच्या मनाचा विकास असामान्य प्रमाणांत झाला असेल, आम्हीं त्याचा याच हेतूनें खास विकास केला असेल तरच हें घडतें. म्हणजे मनाच्या असामान्य अवस्थेंतच हें घडूं शकतें. नेहमींच्या संकुचित व बंदिस्त मनाला योग्य योगसाधनेनें एखादी चीर पाडली जाते, एकादें भोंक पाडलें जातें तेव्हां त्या चिरेंतून किंवा भोंकांतून अतिचेतनाचे व्यवहार, संदेश, संपर्क आमच्या सामान्य पृष्ठवर्ती जागृत जाणिवेला ज्ञात होऊं शकतात. स्वप्नस्थिति, सुषुप्तस्थिति हीं नांवें, जाणिवेची तलवर्ती स्थिति आणि तिची अतिचेतन स्थिति यांना अलंकारिक रीतीनें दिलीं जातात; या दोन जाणीव-भूमींत  (तलवर्ती आणि अतिचेतन या भूमींत) सत्याचा प्रत्यय येतो. भौतिक वस्तूंचा संपर्क असलेल्या आमच्या जागृत जाणिवेच्या क्षेत्राइतकींच तीं अगदीं वास्तवाचीं क्षेत्रें आहेत असें, त्यांना अलंकारिक नांवें (स्वप्नस्थिति, सुषुप्ति) देणारे उपनिषत्कार मानीत. जागृतींत विषयग्राहक जाणिवेचे व्यवहार म्हणजे स्थूल भौतिक वस्तूंची नोंद घेणें, स्थूल भौतिक विश्वाच्या संपर्कांची नोंद घेणें या प्रकारचे असतात. अतिमानसिक वस्तू अतिचेतन जाणिवेचा विषय असतात आणि सूक्ष्म भौतिक, प्राणिक, मानसिक वस्तू तलवर्ती जाणिवेचा विषय असतात. हीं सर्व वस्तुक्षेत्रें वास्तव सत्यवस्तूंचीं क्षेत्रें आहेत. तथापि वास्तवाचीं हीं सर्व क्षेत्रें, जाणिवेच्या या तीनहि अवस्था, पृष्ठवर्ती, बहिःप्रज्ञ, बहिश्चेतन किंवा जागृत अवस्था, तलवर्ती, अन्तःप्रज्ञ, अन्तश्चेतन किंवा स्वप्नीय अवस्था, ऊर्ध्ववर्ती अतिचेतन प्राज्ञ किंवा सुषुप्त अवस्था व या तीनहि अवस्थांतील अनुभव, आभासमय जाणिवेच्या रचना या वर्गांत, घालतां येतील; स्वप्न आणि सुषुप्ति यांच्याप्रमाणें जागृति ही देखील आभासमय आहे असें म्हणतां येईल; आत्म्याची चौथी (तुरीय) अवस्था, अनिर्वाच्य असें अद्वैत आहे आणि तेंच एकमेव अद्वितीय सत्य आहे, वास्तव वस्तु आहे, हा पक्ष घेतला म्हणजे, वरील तीनहि अवस्था आभासमय ठरतात; तथापि एका सत्याच्या तीन सत्य परंतु भिन्न भिन्न अवस्था असेंहि या तीन अवस्थांना म्हणतां येईल. आत्म्याचा आणि विश्वाचा अनुभव तीन भिन्न श्रेणींचा असतो. प्रत्येक श्रेणीचा अनुभव जाणिवेच्या एका अवस्थेंत

पान क्र. २३९

 

साकार होतो; याप्रमाणें जागृत, स्वप्न व सुषुप्त या जाणिवेच्या तीन अवस्थांत तीन भिन्न श्रेणींचा आत्मानुभव आणि विश्वानुभव साकार होत असतो.

स्वप्न-अनुभवाचें हें वर दिलेलें वर्णन जर खरें असेल, तर स्वप्नांना मिथ्या वस्तूंचीं मिथ्याचित्रें असें म्हणतां येणार नाहीं; आमच्या अर्ध-नेणिवेवर हीं मिथ्या चित्रें थोडा वेळ सत्य म्हणून लादलीं जातात असेंहि स्वप्नांचें वर्णन करतां येणार नाहीं. 'विश्व हा आभास आहे' या विश्वविषयक उपपत्तीला आधार म्हणून, 'विश्वाभास हा स्वप्नांतील आभासासारखा आहे' असें म्हटलें जातें; पण स्वप्नाची कहाणी ही वस्तुत: केवळ आभासाची कहाणी नसल्यानें विश्वाला स्वप्नाचा दाखला देणेंहि चुकीचें ठरतें. तथापि अशी मांडणी करतां येईल कीं, स्वप्नें स्वत: कांहीं सत्य वस्तू नसतात; सत्य वस्तूंचीं चित्रें, सत्य वस्तूंच्या प्रतीकांचा समुदाय हें स्वप्नांचें स्वरूप असतें. या स्वप्नाप्रमाणें आमचा जागृतींतील विश्वअनुभव हा स्वत: सत्यरूप नसून, सत्याचें चित्र, अनुकरण, नक्कल असतो. या अनुभवांत प्रतीक-प्रतिमांचा संग्रह असतो, किंवा अनेक संग्रह वा संग्रहांची माला असते. म्हणजे विश्व हें स्वप्नासारखें आहे असें या दृष्टीनें म्हणतां येतें, पण हें म्हणणें टिकत नाहीं. इतकें मात्र खरें कीं, आम्हांला जें भौतिक जग आरंभाला दिसतें तें, आमच्या इन्द्रियांवर जी प्रतिमांची माला लादली जाते, छापली जाते त्या प्रतिमांच्या द्वारां दिसतें; तसेंच असें म्हणतां येतें कीं, एका दृष्टीनें, एका अर्थीं आमचे अनुभव आणि आमचे व्यवहार हे देखील प्रतीकरूप आहेत -- एकच जें सत्य आहे तें आमच्या जीवनांनीं, प्रतीकांनीं व्यक्त करण्याचा (सध्यां अंशतःच आणि अपूर्णतेनेंच तें आम्हांला व्यक्त करतां येत आहे) आम्ही प्रयत्न करीत असतो. एवढेंच जर असतें, तर अनंताच्या जाणिवेमध्यें स्वतःचा आणि वस्तूंचा स्वप्नीय अनुभव म्हणजे आमचें जीवन, असें म्हणतां आलें असतें. पण आत्मानुभवांत यापेक्षां अधिक गोष्टी आहेत; वस्तूंच्या इंद्रियगत प्रतिमा हा वस्तूंच्या अस्तित्वाचा प्राथमिक पुरावा असतो, जाणिवेंतील सहज स्वयंचलित अंतर्ज्ञान या प्रतिमांना पूर्णता आणतें, व्यवस्थायुक्त करतें, क्रमबद्ध करतें; तसेंच जाणिवेंतील हें सहजज्ञान वरील उद्योग करून प्रतिमा आणि जिची प्रतिमा ती वस्तु, यांचा संबंध तात्काल जोडतें आणि वस्तूचा स्पष्ट अनुभव घेतें; अर्थात् आपण सत्याचें केवळ इंद्रियगत चित्र पहात आहों असा आपला अनुभव नसतो, तर

पान क्र. २४०

 

इंद्रियगत प्रतिमेच्या द्वारां आपण सत्य वस्तु पहात आहों असा आपला एकंदर अनुभव असतो. येथेंच आपला अनुभव थांबत नाहीं; आमची बुद्धि काम करते; ज्या इंद्रियांना वस्तु भासतात, इंद्रियांवर आपली प्रतिमा (चित्र) उठवितात, त्यांचा क्रियाविषयक नियम ती शोधून काढते, वस्तूंचें इन्द्रियगत चित्र बारकाईनें तपासते आणि त्यांत कांहीं चुका असल्या, तर त्या दुरुस्त करते. तेव्हां आम्हांला असा सिद्धान्त करतां येतो कीं, वस्तू इंद्रियांवर ज्या प्रतिमा उठवितात, त्यांच्यावर आमच्या सहजज्ञानाचा आणि बुद्धीचा प्रयोग करून, आम्ही सत्य-विश्वाचा अनुभव घेतों. सहजज्ञानानें प्रतिमाद्वारां वस्तूचा स्पर्श आम्ही अनुभवतों आणि या प्रतिमांत, स्पर्शांत कांहीं प्रमाद असेल, तर बुद्धीनें तो दूर करून वस्तूचें खरें स्वरूप अनुभवतों.  आणखी एक गोष्ट : आम्हांला विश्वाचा अनुभव प्रत्यक्ष येत नाहीं, प्रतीकांच्या, प्रतिमांच्या द्वारां येतो हें खरें असलें आणि आमची प्रतिमा, प्रतीकें विश्ववस्तूंचें कांटेकोरपणें बरोबर असें चित्र नसून, थोडेसें असें तसेंच असतें हें जरी खरें असलें, तरी प्रतीक हें कसल्यातरी सत्याचें, सत्यवस्तूचें प्रतीक असतें हें कांहीं खोटें होत नाहीं. हीं प्रतीकें कांहीं आभासाचीं चित्रें असत नाहींत. झाड, दगड, प्राणी आम्हीं पाहिला असें आम्ही म्हणतों व मानतों तेव्हां या वस्तू कांहीं नसत्या वस्तू, आभासमय वस्तू असत नाहींत, इतकें अगदीं खरें आहे. इंद्रियगत प्रतिमा मूळ झाडासारख्या, प्राण्यासारख्या अगदीं तंतोतंत नसतील, दुसरीं आमच्याहून वेगळीं इंद्रियें त्या वस्तूंच्या वेगळ्या प्रतिमा घेऊन वेगळें दर्शन घडवितील हें आम्ही मान्य करूं, पण झाडाची वगैरे प्रतिमा इंद्रियावर छापली आहे त्या अर्थीं, ती खऱ्या झाडाची वगैरे प्रतिमा आहे आणि मूळ झाडाशीं वगैरे थोडीफार तरी जुळती आहे हें कांहीं आम्ही अमान्य करूं शकत नाहीं. मायावादांत एकच एक वस्तु सत्य आहे, अनिर्वचनीय, अलक्षण, केवल, निर्गुण, सन्मात्र ब्रह्म ही एकच सत्य वस्तु आहे; या सत्य वस्तूंत, तिच्या पोटांत कांहींच नाहीं; ती एकदम निर्गुण आहे. प्रतीकांना कांहीं मूळ आधार लागतो सत्यवस्तूंचा. ब्रह्मांत कांहीं निश्चित वस्तू असत्या, त्याचीं कांहीं अंगभूत अव्यक्त सत्यें असतीं आणि तीं व्यक्त करावयाचीं असतीं, तर आमच्या जाणिवेनें त्यांना कांहीं नामांच्या, रूपांच्या द्वारां व्यक्त केलें असतें. हीं नामरूपें त्या सत्यांचीं अगदीं यथार्थ किंवा थोडीफार चुकीचीं प्रतीकें झालीं असतीं, पण ब्रह्मांत कांहींच व्यक्त

पान क्र. २४१

 

करण्यासारखें नसल्यानें प्रतीकांचा प्रश्नच येत नाहीं. म्हणून विश्व हें स्वप्नासारखें आहे, असें स्वप्नसादृश्य सत्यत्वानें विश्वाचे ठिकाणीं मुळींच कल्पितां येत नाहीं. आम्हांला विश्वांत जे अनुभव येतात त्यासंबंधानें आमच्या मनाची एक विशिष्ट वृत्ति स्वप्नाचें रूपक चांगल्या तऱ्हेनें विशद करूं शकते आणि असा स्वप्नरूपकाचा वापर केव्हांहि करण्यास हरकत नाहीं. पण तत्त्वज्ञानदृष्टीनें विश्वाची तपासणी करतांना, अस्तित्वाच्या सत्यतेची, मूलभूत अर्थाची, प्रयोजनाची आणि त्याच्या (अस्तित्वाच्या) मूळ उगमाची तात्विक चिकित्सा करतांना, स्वप्नासारखें विश्व आहे या कल्पनेला कांहींहि किंमत देतां येत नाहीं.

स्वप्नाची उपमा विश्वाला देण्याऐवजीं मनोभ्रमाची, इंद्रियभ्रमाची, आभासाची उपमा विश्वाला दिली, तरी त्यायोगें मायावादावर कांहीं विशेष प्रकाश पडतो किंवा तो नीट समजण्यास मदत होते असें दिसत नाहीं. भ्रमाचे, आभासाचे, दोन प्रकार असतात; मानसिक, वैचारिक, काल्पनिक भ्रम आणि दृष्टिभ्रम अथवा कसला तरी इंद्रियभ्रम. जेथें ज्या वस्तू नाहींत, तेथें त्या त्या वस्तूंच्या प्रतिमा आम्हांला दिसल्या म्हणजे त्याला आम्ही दृष्टिभ्रम म्हणतो, येथें नेत्र या इन्द्रियाची चूक असते; प्रतिमेची चुकीची रचना इंद्रिय (नेत्रेंद्रियादि इंद्रियें) करीत असतें, तेथें इंद्रियभ्रम घडतो. जेथें घटना आमच्या अंतरांत घडते आणि आम्ही ती अंतरांतील घटना आंतरिक न समजतां बाहेरची मानतों, तेथें रचना करण्यांत मनाची चूक होत असते, म्हणून अशा भ्रमाला मनोभ्रम म्हणतात; मनांतील कल्पनेला, मानसिक प्रतिमेला जेथें आपण बाहेरच्या विश्वांत चुकीनें स्थान देतों तेथें मनोभ्रम घडतो. मृगजल हें इंद्रियभ्रमाचें उदाहरण आहे. जातां जातां हें नमूद केलें पाहिजे कीं, ज्या गोष्टींना आम्ही भ्रम म्हणून म्हणतों त्यांपैकीं पुष्कळ गोष्टी वस्तुत: भ्रम नसतात, तर प्रतीक-प्रतिमा असतात; या प्रतिमा तलवर्ती अस्तित्वांतून वर येतात. तलवर्ती जाणीव किंवा तलवर्ती इंद्रियगण पृष्ठभागावर येतो, आणि ही जाणीव व इंद्रियें अतिभौतिक सत्याशीं आमचा संपर्क घडवितात. याप्रमाणें आलेले अतिभौतिकांचे अनुभव आम्ही चुकून ''भ्रम'' या वर्गांत घालतों : आमचें मानसिक संकुचितपण मोडून आम्ही विश्व-जाणिवेमध्यें प्रवेश करतों, महान् सत्याचा अनुभव घेतों, तेव्हां हा अनुभव सत्याचा अनुभव नसून भ्रम आहे असें म्हटलें जातें. वस्तुत: हा अतिभौतिक सत्याचा अनुभव तलवर्ती

पान क्र. २४२

 

जाणिवेनें वर येऊन दिलेला असतो. असो. सामान्य भ्रम घ्या, मनोभ्रम किंवा दृष्टिभ्रम घ्या, तत्त्वज्ञानांत ज्याला 'अध्यास' म्हणतात, त्या अध्यासाचें तो उदाहरण असतो : सत्यवस्तूवर असत्याचा, असत्य वस्तूच्या प्रतिमेचा आरोप असतो; मृगजलाच्या, गंधर्वनगराच्या भ्रमांत, शुष्क रखरखीत अरण्यांतील हवेवर खोट्या जलाच्या प्रतिमेचा, खोट्या नगराच्या प्रतिमेचा आरोप असतो, रज्जुसर्प भ्रमांत खऱ्या समोरच्या रज्जूवर, समोर नसलेल्या सर्पाचा, सर्पाच्या खोट्या प्रतिमेचा, आरोप असतो. विश्व हा एक प्रकारचा भ्रम आहे, ब्रह्मावर म्हणजेच, सर्वकाल अस्तित्वांत असणाऱ्या एकच एक शुद्ध सत्यावर, अस्तित्वांत नसणाऱ्या खोट्या विश्वप्रतिमेचा आरोप केला जातो असें म्हणतां येईल. पण हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, प्रत्येक भ्रम-अनुभवांत जी खोटी प्रतिमा असते ती अगदीं अस्तित्वांत नसणाऱ्या गोष्टीची नसते. ती प्रतिमा खऱ्या अस्तित्वांत असलेल्या गोष्टीची असते; एवढेंच कीं, ज्या ठिकाणावर ती लादली जाते त्या ठिकाणीं ती नसते. मनाच्या किंवा इंद्रियांच्या चुकीनें ती त्या ठिकाणीं लादली जाते, आरोपिली जाते. दृष्टिभ्रमांतील नगर किंवा जल, मनोभ्रमांतील सर्प आम्हांला फसवितात याचें कारण, नगर कोठेंतरी अस्तित्वांत असतें, जल कोठेंतरी असतें, सर्प कोठेंतरी असतो. तेव्हां विश्वभ्रम हा रज्जुसर्प भ्रमासारखा, गंधर्वनगराच्या किंवा मृगजलाच्या भ्रमासारखा भ्रम आहे असें निर्दोषपणें प्रतिपादितां येत नाहीं. ब्रह्मावर लादलेली आमची विश्वाची प्रतिमा, कोठेंतरी अस्तित्वांत असलेल्या खऱ्या विश्वाची खोटी प्रतिमा असती, तर आमचें प्रतिपादन निर्दोष होऊं शकलें असतें. मायावादांतील विश्व हें कोठेंच सत्यत्वानें अस्तित्वांत नसतें म्हणून मायावादांतील विश्वाला इंद्रियभ्रम, मनोभ्रम यांसारखा भ्रम म्हणतां येत नाहीं.

या भ्रमाच्या उपमेंत दोन अगदीं वेगळ्या प्रकारचे भ्रम एकत्र केले आहेत, चुकून त्यांच्यामध्यें सारखेपणा कल्पिला आहे. जे मनोभ्रम, इंद्रियभ्रम असतात, त्यांत खऱ्या अस्तित्वांत असलेल्या, असूं शकणाऱ्या, सत्य अस्तित्वाच्या क्षेत्रांत असणाऱ्या किंवा अशा क्षेत्राशीं संबंध असलेल्या वस्तू, आहेत त्याहून वेगळ्या प्रकारच्या दाखविल्या जातात; असतील त्या ठिकाणाहून वेगळ्या ठिकाणीं दाखविल्या जातात; अशक्य अशा वस्तुसमुदायांत गोंवल्या जातात किंवा त्यांच्याहून खोट्या गोष्टी निघाल्या आहेत, त्यांना 'न आलेलें' स्वरूप 'आलेलें' आहे असें दाखविलें जातें;

पान क्र. २४३

 

मनोभ्रम, मानसिक प्रमाद हे अज्ञानाचे परिणाम असतात. मनापुढें जो पुरावा असतो तो अज्ञानामुळें अयोग्य रीतीनें मिसळला जातो, जें ज्ञान मनाला मिळालेलें असतें किंवा मिळण्यासारखें असतें त्यावर अज्ञानामुळें भलतीच खोटी इमारत उभारली जाते; विश्वभ्रम या प्रकारचा नाहीं. येथें भ्रमाला सत्याचा, वास्तवाचा पाया मुळीं नाहींच; वास्तवाचा पाया नसलेला, मूलभूत व सर्वांचें मूळ झालेला असा हा भ्रम आहे. एकच एक असलेल्या सद्‌वस्तूवर, जिच्यांत कसलीहि घटना, कसलाहि आकार, कसलेंहि नांव केव्हांहि नव्हतें आणि केव्हांहि नसणार त्या सद्‌वस्तूवर शुद्ध कल्पित नांवें, आकार, घटना लादणारा, असा हा मायावादांतला विश्वभ्रम आहे. विश्वभ्रमाला मनोभ्रमाची उपमा यथार्थतेनें द्यावयाची, तर आम्हीं नामरूप संबंधरहित ब्रह्म व नामरूप संबंधयुक्त विश्व या दोन सारख्याच दर्जाच्या सत्य वस्तू आहेत असें मानलें पाहिजे आणि या दोन वस्तूंपैकीं एकीचा आरोप दुसरीवर केला जात आहे असें मानलें पाहिजे -- सर्पावर रज्जूचा किंवा रज्जूवर सर्पाचा आरोप केला जावा त्याप्रमाणें हें घडत आहे असें मानलें पाहिजे : सगुणाच्या क्रिया, कारभार, व्यवहार शांतिपूर्ण निश्चल निर्गुणावर आरोपित केले जातात, असें मानलें पाहिजे. पण सगुण आणि निर्गुण दोन्ही सत्य असतील, तर एकाच सत्य वस्तूची निर्गुण व सगुण हीं दोन भिन्न रूपें असलीं पाहिजेत, किंवा एका अस्तित्वाचीं ऋण व धन दोन सारख्या दर्जाचीं टोंकें असावींत तशीं एका अस्तित्वाचीं सारख्या दर्जाचीं हीं दोन अंगें असलीं पाहिजेत. या दोन सत्य अंगांसंबंधांत मनाचा जर घोंटाळा झाला आणि त्याजकडून चुकीनें एकाला दुसऱ्याचें नांव दिलें गेलें, एकाच्या ठिकाणीं दुसऱ्याची कल्पना केली गेली, तर या चुकींतून सर्वांचें मूळ असणारा विश्वभ्रम उत्पन्न होऊं शकत नाहीं -- 'दोन सत्य वस्तूंचें अयथार्थ ज्ञान' असें या मनाच्या चुकीला म्हणतां येईल किंवा मनाच्या अज्ञानामुळें दोन सत्यांत अ-यथार्थ संबंध कल्पिला गेला आहे असें म्हणतां येईल, एवढेंच.

मायेचा व्यवहार आम्हांला नीट समजावा म्हणून स्वप्न आणि इंद्रियभ्रम, मनोभ्रम यांखेरीज दुसऱ्याहि उपमा या व्यवहाराला देण्यांत येतात : या सर्व उपमांत, विश्वभ्रमाला त्या गैरलागू आढळून येतात, हा मोठा दोष निघाल्यानें त्यांची किंमत, त्यांचा प्रभाव शून्य होतो. शुक्ति आणि रजत हा दाखला रज्जु आणि सर्प या दाखल्यासारखा मनाच्या

पान क्र. २४४

 

एका चुकीचा प्रभाव आहे : समोर असलेली सत्य वस्तु आणि समोर नसलेली सत्य वस्तु यांच्यांतील सादृश्य हें या चुकीस कारण होत असतें. एकमेव अक्षर सद्‌वस्तूवर, अनेक पदार्थमय क्षर असद् वस्तु ज्या मायावादांत आरोपिली जाते त्या वादाला हा शुक्ति-रजताचा दाखला अर्थातच गैरलागूं होतो. एक दृष्टिभ्रम असा असतो कीं, त्यांत वास्तवांत एक पदार्थ असून दृष्टीला त्याचे दोन होतात, अनेक होतात. एक चंद्राचे दोन चंद्र दिसतात, हा एक दृष्टिभ्रमाचा दाखला आहे. या दृष्टिभ्रमांत एका पदार्थाचे, त्याच्या रूपाचे दोन किंवा अधिक पदार्थ होतात : पैकीं एक सत्य पदार्थ असतो आणि दुसरा किंवा दुसरे आभासरूप, भ्रमरूप असतात. ब्रह्म आणि विश्व यांच्या जोडीला हा दाखला उपयोगी पडत नाहीं, कारण मायेच्या व्यवहारांत वर दिलेल्या दृष्टिभ्रमाहून पुष्कळच अधिक संकीर्णता असते; एका अक्षर अविभाज्य सद्वस्तूवर, अनेक वस्तूंचा आरोप भ्रमानें करण्यांत येतो इतकें खरें; एकच ब्रह्म अनेकता धारण करीत आहेसें भ्रमानें दिसतें हें खरें; पण मूळ सत्यवस्तूंत जे आकार आणि व्यवहार मुळींच नाहींत ते नानाप्रकारचे आकार आणि व्यवहार या भ्रमरूप अनेकतेंत असतात. भ्रमरूप मानलेल्या निसर्गामध्यें असे अनंत आकार, व्यवहार असतात, इतकेंच नव्हे, तर त्यांच्यांत एक व्यवस्था असते, संघटना असते. स्वप्नें, दृष्टिभ्रमाचे देखावे, कलाकार किंवा कवि यांच्या कल्पना अशी संघटित नानात्वाची खोटी इमारत उभी करूं शकतात; अस्तित्वांत असलेल्या खऱ्या संघटित नानात्वाची नक्कल स्वप्नांत वगैरे आम्हांस प्रतीत होते; निदान अशा नकलेपासून स्वप्नांतील वगैरे देखाव्यास सुरुवात होते आणि या देखाव्यांत कितीहि विविधता व कितीहि नवनिर्मिति प्रत्ययास आली, तरी या विविधतेंत आणि नवनिर्मितींत थोडेंतरी नकलेचें, अनुकरणाचें अंग अवश्यमेव असते. पण मायावादांत जो मायेचा व्यवहार सांगितला जातो तो यापासून अगदीं भिन्न आहे. मायेच्या व्यवहारांत नक्कल बिलकुल नसते, कोठेंहि अस्तित्वांत नसलेले खोटे आकार व व्यापार ही माया स्वतःच्या मूलभूत सर्वस्वीं स्वतंत्र क्रियेनें उभे करते. मूळ सद्‌वस्तूंत कांही तिला आढळतें आणि त्या गोष्टीचें माया अनुकरण करते, तिचें प्रतिबिंब उभें करते, ती बदलून वेगळी दाखविते, तिचा विकास करून आपली खोटी इमारत उभी करते -- असें मुळींच घडत नाहीं. मूळ सद्‌वस्तु एकमेव आणि एकरस असल्यानें, तेथें मायेला नक्कल करतां

पान क्र. २४५

 

यावी असें कांहींहि असत नाहीं. मन जो भ्रम निर्माण करते त्या अनुकरणप्रधान भ्रमाच्या व्यवहारानें मायेच्या अफाट मौलिक गूढतम व्यवहारावर मुळींच प्रकाश पडत नाहीं. मायेनें जो हा महान् अतिभव्य विश्वभ्रम उभा केला आहे, त्याला तुलना नाही, त्याच्याशीं तुलना करण्यासारखें दुसरें कांहींहि अस्तित्वांत नाहीं, तो एकटा एक आमच्या समोर उभा आहे. मनाच्या कोणत्याच व्यापारानें ज्यावर प्रकाश पडत नाहीं असा हा तथाकथित विश्वभ्रम - भ्रम म्हणून मानलेला विश्वाचा पसारा - भ्रम नसून सत्य वस्तूंचा आणि व्यापारांचा पसारा तर नसेल, असा संशय स्वभावतःच विचारी मनाला येतो. आम्हांला विश्वांत निसर्गाचा जो व्यवहार दिसतो, त्या मूलभूत व्यवहारानें मूळ एका सद्वस्तूला सर्वत्र विविध रूपें दिलीं जातात असा अनुभव आहे; आणि ही विविधता भ्रम म्हणून भासत नाहीं, तर एका मूळ सत्य वस्तूपासून हे विविध, सत्य आकार निर्माण केले गेले आहेत असेंच दिसतें. एकच एक सद्‌वस्तु हें मूळ सत्य आहे आणि तें सत्य स्वत:ला प्रकट करीत आहे. जे सत्य असे अनंत आकार आणि ज्या सत्य अशा अनंत शक्ती त्या मूळ सत्याच्या अंगभूत आहेत, त्या तें मूळ सत्य व्यक्त करीत आहे, हेंच दृश्य आम्हांला सर्वत्र दिसतें. या प्रकटीकरणाच्या, अभिव्यक्तीच्या व्यवहारांत गूढता आहे हें निर्विवाद; नव्हे, हा व्यवहार ऐंद्रजालिक जादूच्या व्यवहारासाररवा आहे असेंहि म्हणतां येईल. पण ही जादुगिरी भ्रमोत्पादक जादुगिरी आहे असें म्हणण्यास, असें मानण्यास निसर्गांत कोठेंहि आधार सांपडत नाहीं; उलट मूळ सद्‌वस्तु, ब्रह्म सर्वसमर्थ आहे, त्याचे ठिकाणीं त्याची जी अंगभूत जाणीव आणि शक्ति आहे त्या शक्तीचें आणि जाणिवेचें हें सर्व काम आहे; ते मूळ सत्य, ब्रह्म, आपल्या नित्यज्ञानाच्या, आत्मज्ञानाच्या बळावर ही विश्वरूपी, निसर्गरूपी आत्मनिर्मिति करीत आहे असें मानण्यास निसर्गांत, विश्वांत भरपूर आधार सांपडतो; निदान असें न मानण्यास कांहींच पुरावा आमच्या समोर नाहीं, असें निर्धास्तपणें म्हणतां येतें.

मायेनें उभारलेल्या तथाकथित विश्वभ्रमाची आमच्या मनोभ्रमाशीं मुळींच तुलना करतां येत नाहीं वगैरे प्रतिपादन येथपर्यंत झाल्यानंतर, मूळ मन ही काय वस्तु आहे, त्याचें स्वरूप, स्वधर्म काय आहे याचा विचार करणें अपरिहार्य आहे. विशिष्ट स्वरूपाच्या भ्रमांचें जनकत्व मनाकडे असतें हें आपण पाहिलें. आतां त्याच्या प्रकृतीचा आणि मूळ

पान क्र. २४६

 

अस्तित्वाशीं त्याच्या असलेल्या नात्याचा विचार करूं. मूळ भ्रम, मूळ स्वयंभू भ्रम, मायाकृत भ्रम अर्थात् अनिर्वचनीय भ्रम हा मनाचा जनक आहे कीं काय ? अशा भ्रमाचें व्यवहारसाधक साधन मन आहे कीं काय ? कीं तें स्वत:च आद्य विपरीत निर्मितिकारक शक्ति किंवा जाणीव आहे ? किंवा त्याचें, त्याच्या अज्ञानाचें स्वरूप, मूळ अस्तित्वाच्या सत्यांचें अयथार्थ ग्रहण हें आहे काय ? मूळ सत्यमय जाणिवेचें, खऱ्या विश्व-निर्मात्या सत्यज्ञानाचें तें विकृत रूप, विमार्गस्थ रूप आहे काय हे प्रश्न आमच्यापुढें आहेत. प्रथम ही गोष्ट स्पष्ट आहे कीं, आमचें मन हें कांहीं जाणिवेची आद्य मूलभूत निर्मिति-शक्ति नव्हे; तें आणि त्या सारख्या स्वरूपाचें कोणतेंहि मन, दुय्यम दर्जाचें साधनरूप निर्मितिकार आहे : तें मध्यवर्ती (अतिचेतन आणि अचेतन यांच्यामध्यें) निर्मितिकार आहे आणि याच प्रकारचें तें असणार, असें तें असणें अपरिहार्य आहे आणि असें असल्यानें, आद्य निर्मितिकार भ्रम, सर्वकल्पक, सर्वकर्ती माया जो व्यवहार करते तो व्यवहार आणि त्या भ्रमाचें, मायेचें स्वरूप स्पष्ट करण्याला, मनाच्या चुकांपासून घेतलेले दाखले सहजच पुरे पडत नाहींत; मनाच्या त्या चुका मध्यवर्ती अज्ञानामुळें घडतात, मध्यवर्ती अज्ञानाच्या प्रांतांत मन असतें -- वर अतिचेतन जाणीव व खालीं अचेतन  (शुद्ध नेणीव) यांच्यामध्यें मनाचा, मध्यवर्ती अज्ञानाचा, प्रांत आहे. मनाला अतिचेतनापासून एक प्रकारची शक्ति प्राप्त होते, अचेतनापासून त्या शक्तीच्या विरुद्ध अशी शक्ति मिळते. एका बाजूला गुप्त तलवर्ती आंतरिक अस्तित्व आणि दुसऱ्या बाजूला बाह्यवर्ती विश्वदृश्य यांच्या मधोमध मन आहे. तलवर्ती आंतरिक अस्तित्वाची कल्पना मनाला नसते; पण तेथून त्याजकडे असामान्य सूचना, स्फूर्ति, कल्पना, ज्ञानप्रवण करणाऱ्या, कृतिप्रवण करणाऱ्या प्रेरणा, आंतर सत्यांच्या प्रतिमा, आंतर शक्यतांच्या या रचना सारख्या येत असतात; वस्तुसृष्टींत साकार झालेल्या गोष्टी आणि तज्जनित भावी शक्य गोष्टींच्या सूचना त्याला बाहेरच्या दृश्य विश्वपसाऱ्यातून प्राप्त होतात. आंतून बाहेरून प्राप्त होणाऱ्या गोष्टी त्याला सत्य-गोष्टी असतात. तात्विक सत्य, शक्य सत्य आणि वास्तवांत उतरलेले सत्य अशीं तीन प्रकारचीं सत्यें किंवा सत्य गोष्टी त्याला प्राप्त होतात; मन भौतिक विश्वांतील वास्तव गोष्टींपासून आपल्या व्यवहाराला आरंभ करतें. तें या गोष्टीवर अंतरीं विचार करतें आणि या आंतरिक आत्मनिष्ठ क्रियेनें त्या गोष्टींच्या पोटीं ज्या

पान क्र. २४७

 

वास्तवांत न आलेल्या शक्यता असतात, त्या शक्यता तें प्रकट करतें; त्या गोष्टींच्या पोटीं ज्या शक्यता असतात, त्या शक्यतांच्या कांहीं सूचना त्या गोष्टींपासून मनाला मिळतात, त्या सूचित शक्यताहि मन प्रकट करतें; तसेंच तार्किक विचारसरणीनें समोरच्या वास्तव गोष्टींपासून आरंभ करून एका गोष्टींतून दुसरी, दुसरींतून तिसरी अशा कित्येक शक्य गोष्टी मनाला आकलन करतां येतात, या शक्यताहि तें हुडकून काढतें आणि जगासमोर मांडतें. या ज्या शक्यता मन हुडकून काढतें त्यांपैकीं कांहीं शक्यता घेऊन त्या तें आंतरक्रियेचा विषय करतें, त्या शक्यतांना आपल्या कल्पनेनें कांहीं आकार देतें. आंतर व्यापारानें त्यांच्या कांहीं रचना रचतें आणि या रचनांशीं, आकारांशी तें आंतल्याआंत खेळतें; हुडकून काढलेल्या शक्यतांपैकीं दुसऱ्या शक्यता, वास्तवांत आणण्यासाठीं निवडून त्यांना वास्तवांत आणण्याचा तें खटाटोप करतें. बाह्य विश्वांतून मनाला सूचना मिळतात त्याप्रमाणें आंतून आणि स्वत:च्या वरच्या पातळीवरूनहि अदृश्य स्थानांतून त्याला अन्त:सूचना मिळतात; बाह्य वास्तवाच्या निरीक्षणानें त्याला कांहीं सत्यें सुचतात त्याप्रमाणें आंतर स्थानांतूनहि त्याला सत्यांचा प्रत्यय येतो आणि या अंतरस्थ सत्यांचाहि तें दोन प्रकारें उपयोग करतें; त्यांना कांहीं स्वकल्पित आकार देऊन किंवा असतील तशीं घेऊन तें आंतल्या आंत त्यांच्याशीं खेळतें, किंवा त्यांपैकीं कांहीं वास्तवांत आणण्यासाठीं निवडून त्यांना वास्तवांत आणण्याचा खटाटोप तें करीत बसतें.

वास्तव गोष्टी पाहणें आणि उपयोगांत आणणें; माहीत नाहींत, वास्तवांत आलेलीं नाहींत अशीं सत्यें, तत्त्वें कल्पनेनें पाहणें आणि हस्तगत करणें; तसेंच तत्त्व किंवा सत्य आणि त्याची वास्तव साकारता यांच्यामध्यें असलेल्या शक्यतांचा व्यवहार करणें; इतक्या गोष्टी मन करीत असतें. पण अनंत जाणिवेला जी सर्वज्ञता असते, ती अर्थातच मनाच्या वांट्याला आलेली नसते; त्याचें ज्ञान मर्यादित असतें आणि हें त्याचें मर्यादित ज्ञान कल्पनेनें आणि शोधानें त्याला व्यापक करावें लागतें -- मर्यादित ज्ञानांत कल्पनाशक्तीची आणि शोधकशक्तीची, कल्पनांची आणि शोधांची भर घालून त्याला आपला व्यवहार शक्य तेवढा व्यापक आणि बिनचूक करावयाचा असतो. अनंत जाणीव, तिला जें ज्ञान असतें तें, व्यक्त करते, प्रकट करते. मनाला अज्ञात शोधून काढावयाचे असतें; अनंतांतील शक्यता मन ग्रहण करतें -- पण त्या शक्यता आपल्याच

पान क्र. २४८

 

अमर्याद कल्पनाशक्तीच्या रचना आहेत, निर्मिती आहेत, क्लृप्ती आहेत असें तें मानतें; कांहीं एक सत्य किंवा तत्त्व गुप्त असतें आणि त्या सत्याला विविध आकार अनंत देऊं शकतें, त्यांतून विविध परिणाम अनंत घडवूं शकतें; अनंताच्या इच्छेनें हे जे विविध आकार आणि परिणाम विशिष्ट सत्यांतून उदयास येऊं शकतात, त्यांना अनन्तांतील शक्यता म्हणतात : ही गोष्ट मनाला विदित नसते, तें आपल्या कल्पनाशक्तीचेंच कौतुक करीत असतें; अनंत शक्ति-जाणीव-युक्त अनंत शक्ति -- ज्या सर्वसमर्थतेची स्वामिनी आहे, ती सर्वसमर्थता मनाला उपलब्ध नाहीं; मनाकडून अमुक करून घ्यावयाचें असें विश्वशक्ति ठरविते, आणि असें जें ठरविलें गेलें असेल तेवढेंच मनाला करतां येतें; त्याच गोष्टी मनाला वास्तवांत आणतां येतात, ज्या त्याजकडून घेण्याला अनंत विश्वशक्ति मान्यता देते; अतिचेतन आणि तलवर्ती गुप्त दिव्य शक्तीकडून मन हें साधन म्हणून वापरण्यांत येत असतें : निसर्गांत अमुक गोष्ट प्रकट व्हावी असें ही शक्ति ठरविते आणि असें तिनें ठरविलें, म्हणजे मनाला ती गोष्ट वास्तवांत आणण्यास मुभा मिळते आणि त्याच्यांत तेवढें सामर्थ्य असल्यास ती गोष्ट त्याजकडून वास्तवांत येते. याप्रमाणें विश्वशक्ति, अतिचेतन दिव्य शक्ति आणि तलवर्ती दिव्य शक्ति यांच्या लहरींवर, मनाकडून काय घडावें, तें अवलंबून असतें. मनाचें ज्ञान मर्यादित आणि प्रमादशील असतें; त्यालाच अज्ञान हें नांव आहे. हें अज्ञान किंवा अज्ञानग्रस्त मन वास्तव गोष्टींशीं व्यवहार करतांना, पाहण्यांत (निरीक्षणांत) चूक, उपयोगांत चूक, निर्मितींत चूक -- अशा सर्वत्र चुका करण्यास पात्र असतें; शक्यतांशीं व्यवहार करतांना त्यांच्या ग्रहणांत चूक, त्यांच्या एकत्रीकरणांत चूक, त्यांच्या उपयोगांत चूक, त्यांच्या जागा ठरविण्यांत चूक -- अशा सर्वत्र चुका करण्यास पात्र असतें; त्याला जीं सत्यें, तत्त्वें वरून बहाल केलीं जातात, ज्या तत्त्वांचें, सत्यांचें ज्ञान त्याला उच्च पातळीवरून दिलें जातें तीं सत्यें, तीं तत्त्वें वापरतांना त्यांचें रूप विकृत करणें, त्यांचें अयथार्थ दर्शन घडविणें, त्यांच्यांतील सुसंवाद घालवून त्यांच्यामध्यें विसंवाद उत्पन्न करणें -- अशा चुका करण्यास मन पात्र असतें. वास्तवांत असलेल्या गोष्टींशीं ज्या अगदीं जुळत नाहींत, ज्या वास्तवांत येण्याची मुळींच शक्यता नाहीं, ज्यांना त्यांच्या मागील सत्याचा, तत्त्वाचा बिलकुल पाठिंबा नाहीं अशा रचना मन स्वत:च्या लहरीनें करूं शकतें व करतें;

पान क्र. २४९

 

पण एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, मनाच्या या रचना वास्तव गोष्टींशीं, शक्यतांशीं आणि तत्त्वांशीं अगदीच संबंध ठेवीत नाहींत असें नाहीं : वास्तव गोष्टींचा अन्याय्य अयोग्य विस्तार, शक्यतांचा (विश्वशक्तीला) असंमत उपयोग, सत्यांचा किंवा तत्त्वांचा अन्याय्य वापर मनाच्या या लहरी रचनांत नजरेस येतो ! याप्रमाणें मन निर्मिति करतें पण तें स्वतंत्र मूळ आद्य निर्मितिकार नाहीं; तें सर्वज्ञ नाहीं, सर्वसमर्थ नाहीं, दुय्यम निर्मितिकार आहे; आणि या दुय्यम निर्मितींतहि तें नेहमीं कार्यक्षमता दाखवितें असेंहि नाहीं. उलट पक्षीं, माया, भ्रम निर्माण करणारी मायाशक्ति ही आद्य निर्मितिकार आहे, असलीच पाहिजे; कारण अगदीं शून्यांतून ती आपल्यासमोर असणारा आणि नसणारा सर्व वस्तूंचा पसारा निर्माण करते; अगदीं शून्यांतून माया आपली निर्मिति करते असें मानावयाचें नसेल, तर आम्हांला असें मानावें लागेल कीं, मूळ सत्य, सद्‌वस्तु, ब्रह्म जें आहे त्याच्या अंगभूत द्रव्याचा उपयोग करून माया विश्वनिर्मिति करते -- पण असें मानल्यास त्याबरोबर, ती जें निर्मिते तें कोणत्यातरी प्रकारें सत्य असलेंच पाहिजे असेंहि म्हणणें भाग आहे; असो. शून्यांतून सर्व पसारा निर्माण करणाऱ्या मायेला, जें तिला निर्माण करावयाची इच्छा आहे त्या संबंधाचें पूर्ण ज्ञान असतें, तिला लहर लागेल तें निर्माण करण्याची पूर्ण शक्ति असते; केवळ स्वत: निर्माण केलेल्या भ्रमांवरच कां होईना, पण मायेला सर्व प्रकारची सत्ता असते, आणि त्याविषयींचें संपूर्ण ज्ञान असतें; त्या भ्रमामध्यें ती सुसंगति निर्माण करते, त्यांची सांखळी जोडते; या कार्यांत तिला जादुगाराची अद्‌भुत शक्ति, अद्‌भुत सार्वभौम सत्ता असून, अद्‌भुत यशस्विता तिच्या पदरीं पडते; स्वत: निर्माण केलेल्या रचना, क्लृप्ती विश्वांतील जीवांच्या बुद्धीला सत्यें किंवा तत्त्वें, शक्यता आणि वास्तव गोष्टी वाटाव्या अशी व्यवस्था करण्यांत ती पूर्ण यशस्वी होते.

आमच्या मनाला आत्मविश्वासानें आणि उत्तम तऱ्हेनें तेव्हांच काम करतां येतें, जेव्हां त्याला कांहींतरी द्रव्य, कांहींतरी पदार्थ कामासाठीं दिला जातो, जेव्हां त्याला कोणत्यातरी वस्तूवर काम करावयाचें असतें, निदान असल्या क्रियांना आरंभ करण्यासाठीं त्यांना आधार म्हणून, त्याच्या क्रियांचा पाया म्हणून जेव्हां एखादी वस्तु मिळते, तेव्हां तें आत्मविश्वासानें उत्तम काम करूं शकतें; त्याला ज्ञात झालेली विश्वांतील एखादी शक्ति जेव्हां त्याला त्याच्या व्यवहारांत वापरावयास मिळते, तेव्हाहि तें

पान क्र. २५०

 

आत्मविश्वासानें उत्कृष्ट काम करतें. वास्तव गोष्टीशीं त्याचा व्यवहार असला म्हणजे त्याला प्रत्येक पाऊल नि:संदेहपणें टाकतां येतें; वास्तव गोष्टी ज्या बाह्य पदार्थांच्या रूपांत आहेत, त्यांच्याशीं व्यवहार करावयाचा, त्या घेऊनच पुढें नवनिर्मितीचा प्रयत्न करावयाचा, हा जो मनाचा व्यवहारनियम तो, भौतिक शास्त्राला जें महान् यश मिळालेलें आहे त्या यशाच्या मुळाशीं आहे. पण या निर्मितींत भ्रमांची निर्मिति नसते, शून्यांतून कांहीं गोष्टी अस्तित्वांत आणून त्या गोष्टींना दर्शनी वास्तवता द्यावयाची, ही जी विश्वभ्रमाची कामगिरी, विश्वमायेची जादुगिरी, ती भौतिक शास्त्राच्या नवनिर्मितींत (मनाच्या कोणत्याहि निर्मितींत) दिसून येत नाही. मन निर्मिति करतें ती शून्यांतून करीत नाहीं. कोणत्यातरी पदार्थांतूनच करतें, द्रव्यांतूनच करतें; त्या पदार्थांत, त्या द्रव्यांत जें निर्माण करण्याची शक्ति असेल तेंच केवळ मन त्यांतून निर्माण करतें, निर्माण करूं शकतें. निसर्गशक्तीशीं मन व्यवहार करीत असेल, तर त्या शक्तीकडून जें कार्य निसर्गनियमानुसार घडणें शक्य असेल, तेंच कार्य मन त्या शक्तीकरवीं घडवून आणतें, घडवून आणूं शकतें. मनाला कांहीं नवनिर्मिति करावयाची किंवा कांहीं शोध लावावयाचा तर निसर्गाच्या अंगभूत सत्यांत, त्याच्या शक्यतेंत जें अंतर्भूत असेल तेंच मन शोधून काढील, शोधून काढूं शकेल. मन नवनिर्मिति म्हणून तेंच केवळ निर्माण करील, निर्माण करूं शकेल. मनाला आंतून आणि वरून निर्मितिविषयक अन्त:प्रेरणा, अन्त:सूचना येत असतात. या सूचनांत खरें सत्य किंवा खरी शक्यता अन्तर्भूत असेल -- मनाची काल्पनिक सत्यता किंवा शक्यता उपयोगी पडत नाहीं -- तरच त्या मनाकडून साकार होऊं शकतात. जें खरें नाहीं, जें शक्यतेच्या वर्गांतील नाहीं, असें कांहीं जर मनानें योजलें तर तें निसर्गांत अस्तित्वांत येऊं शकत नाहीं, तें निर्माण केलें जाऊं शकत नाहीं. मायेची गोष्ट वेगळी आहे. ब्रह्म हें सत्य मायेला आधाराला असतें हें खरें आहे, -- पण या सत्याशीं, या आधाराशीं कसलाहि संबंध नसलेली, ब्रह्मांत जी सत्य नाहीं, जी शक्य नाहीं असली इमारत माया उभी करते. ब्रह्मरूप सत्याच्या अंगभूत, घटकभूत द्रव्यांतून आपली इमारत माया उभी करते असें म्हटलें, तर या द्रव्यांतून ती असल्या गोष्टी निर्माण करते कीं, ज्या मूळ सत्याला निर्माण करणें शक्य नसतें, मूळ सत्याशीं ज्या अगदीं विरोधी असतात.

पान क्र. २५१

 

उदाहरणार्थ, माया आकाराचा पसारा उभा करते आणि मूळ सत्य ब्रह्म हें निराकार समजलें जातें; माया विविध विशेष निर्माण करते, आणि ब्रह्म सर्वथा निर्विशेष समजलें जाते, सर्वथा विशेषसंभवहीन समजलें जातें.

मनाच्या संबंधांत त्याच्या कल्पनाशक्तीची गोष्ट थोडी मायेसारखी आहे : या कल्पनाशक्तीच्या बळानें मन निर्मिति करून ही निर्मिति सत्यवस्तूंची आहे अशी स्वतःची निश्चिति करूं शकतें; ही थोडी मायेसारखी मनाची स्थिति दिसते. अज्ञानाचें व्यवहारसाधन हें आमच्या मनाच्या कल्पनाशक्तीचें स्थान आहे. मनाची ज्ञानशक्ति मर्यादित, क्रियाशक्ति मर्यादित, अशा अज्ञानप्रधान मनाला कल्पनाशक्तीचा आश्रय करणें भाग असतें. ज्ञानाची, ज्ञानशक्तीची, क्रियासामर्थ्याची उणीव भरून काढणें हाच मनाच्या कल्पनाशक्तीचा हेतु असतो. दिसणाऱ्या उघड गोष्टींतून कल्पनासामर्थ्यानें मन अदृश्य, गुप्त गोष्टी शोधून काढतें; शक्य काय, अशक्य काय, त्याच्या रचना मन कल्पनेनेंच करतें; बाह्य अनुभवाशीं न जुळणाऱ्या आभासमय ''वास्तव'' गोष्टी, तें कल्पनेनें उभ्या करतें; वस्तुजातांतील सत्य, जें कल्पनेनें अजमावलें आहे किंवा कल्पनेनें रचलें आहे, त्या रचलेल्या किंवा अजमावलेल्या सत्याच्या प्रतिमा, बाह्य अनुभवाशीं न जुळणाऱ्या प्रतिमा, मन आपल्या कल्पनासामर्थ्यानें रेखाटतें. मनाच्या व्यापाराचें दृश्य चित्र निदान या प्रकारचें असतें : वस्तुत: जें घडत असतें तें निराळेंच असतें : मूळ अस्तित्वांत अनंत शक्यता असतात, त्या शक्यता तेथून वर आणणें हें काम वर सांगितलेल्या कल्पनेच्या व्यापारानें मन करीत असतें; अनंताच्या अज्ञात शक्यता, शक्ती हस्तगत करण्याचें, शोधून काढण्याचें काम, कल्पनेच्या वरील व्यापाराच्या द्वारां मन करीत असतें; हें काम मनाला ज्ञानाच्या आधारानें करतां येत नाहीं; कारण समर्थ ज्ञान त्याला उपलब्ध नसतें : अशा ज्ञानाच्या अभावीं, मन सत्याच्या प्रायोगिक रचना करतें, शक्यतेच्या प्रायोगिक रचना करतें, आणि वास्तवांत न आलेल्या वास्तवाच्याहि प्रायोगिक रचना करतें. सत्याचें ज्ञान अन्त:सूचनेनें मिळण्याची मनाची पात्रता मर्यादित असल्यानें मन सत्याची कल्पना करतें, सत्यासंबंधांत उपपत्ति रचतें, सत्य हें असेल कां, तें असेल कां असा युक्तिवाद करतें; खऱ्या शक्यता जाणून घेण्याची आणि व्यवहारांत आणण्याची मनाची शक्ति मर्यादित असल्यानें तें कल्पनेनें अशा शक्यता उभ्या करतें कीं ज्या वास्तवांत आणण्याची

पान क्र. २५२

 

त्याला आशा आहे, निदान इच्छा आहे; भौतिक विश्वाकडून त्याला होणाऱ्या विरोधामुळें वास्तवांत आणण्याची त्याची शक्ति फार मर्यादित होत असल्यानें स्वत:च्या अंतरंगीं तें शक्यता वास्तवांत आणल्याचें चित्र कल्पनेनें उभें करतें; आणि या रीतीनें निर्मिति करण्याची स्वत:ची इच्छा तृप्त करून स्वत:पुढें स्वत:ची निर्मिति उभी करण्याचा आनंद भोगतें. तथापि हें ध्यानांत ठेवलें पाहिजे कीं, मन जरी कल्पनेच्या बळावर आपल्या इमारती उभ्या करीत असलें, आणि या इमारती बऱ्याचशा अ-वास्तव असल्या तरी कल्पनेच्या बळावर सत्याचें चित्र त्याला थोडेंबहुत तरी लाभतेंच लाभतें; तसेंच त्या बळावर कांहीं शक्यताहि त्याला सांपडतात, ज्या पुढें वास्तवांत येतात; आणि विश्वांत ज्या वास्तव घटना घडतात, त्या घटनांवर मन आपल्या कल्पनेच्या बळावर परिणामकारक प्रभाव गाजवूं शकतें. मानवी मनांत सारख्या टिकून राहणाऱ्या बऱ्याचशा कल्पना, वायुयानानें प्रवास करण्याची कल्पना वास्तवांत आली त्याप्रमाणें शेवटीं यशस्वीपणें पूर्ण होतात. व्यक्ति विचार-रचना करते; या रचनांत जोर असला, त्या रचना करणाऱ्या मनांत हवा तितका जोर असला, तर त्या रचना वास्तवांत येऊं शकतात. व्यक्तीच्या कल्पना स्वत:च्या वास्तवविषयक शक्यता उत्पन्न करतात, समाजमनांत या वैयक्तिक कल्पना स्थान मिळवूं शकल्या, तर खासच त्या वास्तवांत उतरण्याची शक्यता वाढते; समाजमनाचा पाठिंबा कोणत्याहि कल्पनेला सारखा मिळत राहिला, तर शेवटीं विश्वपुरुषाच्या इच्छेचें, संकल्पाचें पाठबळ, संमति देखील त्या कल्पनेला मिळते आणि मग ती हमखास वास्तवांत येते. वस्तुस्थिति अशी आहे कीं, जेवढ्या म्हणून कल्पना केल्या जातात, केल्या जाऊं शकतात, तेवढ्या सर्व कल्पना संभाव्य गोष्टीच चित्रित करीत असतात; या कल्पनांपैकीं कांहीं कल्पना कोणत्या तरी रूपांत केव्हांतरी वास्तवांत येतात -- हें वास्तवरूप मूळ कल्पिलेल्या रूपांपेक्षां पुष्कळ भिन्न असूं शकतें; कल्पनांपैकीं बऱ्याचशा - वास्तवांत जितक्या येतात त्यापेक्षां अधिक - वंध्य ठरतात याचें कारण, ईश्वरकृत प्रस्तुत निर्मितियोजनेंत त्यांचा समावेश नसतो, किंवा व्यक्तीच्या बळानें यशस्वी व्हावयाच्या ठरलेल्या कल्पनांत त्यांचा समावेश नसतो अथवा समावेशक विश्वसत्तेच्या स्वरूपाशीं, स्वभावाशीं, भवितव्याशीं, तिच्या सामूहिक तत्त्वाशीं, वर्गीय तत्त्वाशीं त्यांचा मेळ नसतो, विरोध असतो.

पान क्र. २५३

 

मन ज्या कल्पना कल्पितें त्या कल्पना, आतांच दाखविल्याप्रमाणें मूलत: शुद्ध भ्रमरूप, शुद्ध आभासरूप केव्हांच नसतात; मनाला जे वास्तवाचे अनुभव आलेले असतात, त्यांच्या आधारावर तें कल्पना उभारीत असतें; निदान त्या अनुभवांपासून कल्पनाशक्ति कल्पना रचण्याला आरंभ करते; वास्तवगोष्टींत कमीअधिक करून कल्पनाशक्ति आपल्या विविध कल्पना उभ्या करते; अनंताच्या पोटीं ज्या भावी शक्यता असतात, ज्या भूतकालीन ''वंध्य'' शक्यता असतात, त्या शक्यता मनाची कल्पनाशक्ति चित्रित करीत असते; अनन्तांतील कांहीं सत्यें, जीं व्यक्त झालीं नाहींत, तीं व्यक्त झालीं असतीं तर अमुक घडूं शकलें असतें, आज ज्या शक्यता क्रमवार लावल्या आहेत त्या क्रमवार शक्यतांचा क्रम बदलेल तर अमुक घडूं शकेल, ज्या संभाव्य गोष्टी शक्य गोष्टींच्या वर्गांत आज पडलेल्या आहेत त्यांहून वेगळ्या कांहीं गोष्टी शक्यतेच्या वर्गांत घातल्या गेल्या तर अमुक घडूं शकेल -- इत्यादि प्रकारें अनंतांतील भावी आणि भूत संभाव्य घटनांचें चित्र मनाची कल्पनाशक्ति चितारीत असते. कल्पनाशक्तीच्या द्वारां आमच्या भौतिक प्रांताहून वेगळ्या, अतिभौतिक प्रांतांतील आकार आणि शक्ती आमच्या मानसिक अस्तित्वाशीं संबंध ठेवतात. कल्पना अगदीं अतिशयोक्त अतिरेकी असल्या, आभासांचा, भ्रमांचा पसारा त्यांनीं उभा केला, तरी या पसाऱ्यासाठीं वास्तवांतील घटनांचा, निदान शक्य गोष्टींचा त्या आधार घेत असतात. सागरी नारीच्या (मर्मेडच्या1) कल्पनेंत दोन वास्तव गोष्टी एकत्र केल्या आहेत, हें एकत्रीकरण पृथ्वीवरील सामान्य शक्यतांच्या पलीकडील आहे. देवदूत (एंजल्2) ग्रिंफिन्3 किमेरा4 यांना आमची कल्पना निर्मिते ती याच तत्त्वावर. केव्हां केव्हां अतिरेकी कल्पनेंत, स्मृतीच्या

-------------------------

1 मर्मेड् : सागरी नारी. डोकें व शरीर कमरेपर्यंत सुंदर स्त्रीचें, पुढें माशाची शेपटी.

2 एंजल : देवदूत. सुंदर ठेवण, तरुण, लांब झगा, पंख.

3 ग्रिंफिन् : एक पशु. शरीर, पाय सिंहाचे; वांकडी चोंच आणि पंख गरुडाचे, घारीचे.

4 किमेरा : अग्नी ओकणारा राक्षस, डोकें सिंहाचें, शेपटी सर्पाची, शरीर बोकडाचें.

पान क्र. २५४

 

सांठ्यांतील जुन्या वास्तव गोष्टी घेतलेल्या असतात; उदाहरणार्थ ड्रॅगन.  (ड्रॅगन -- पंख असलेला सर्प) केव्हां केव्हां अतिशयोक्त कल्पनेंत अशी घटना किंवा वस्तु कल्पिलेली असते कीं, जी कोणत्यातरी भौतिकेतर पातळीवर, अस्तित्वाच्या इतर अवस्थांत खरी आहे, किंवा खरी असूं शकेल. वेडा मनुष्य कल्पनेनें आभास उभे करतो त्यांत देखील वास्तव गोष्टीच असतात पण त्यांचें मिश्रण निर्बुद्धपणाचें असतें इतकेंच. उदाहरणार्थ एक वेडा स्वत:, इंग्लंड आणि राजपद यांचें कल्पनेंत मिश्रण करतो आणि कल्पनेनें, प्लॅटाजेनेट, टयूडर यांच्या सिंहासनावर बसतो. मनाकडून जी चूक घडते त्या चुकीची बारकाईनें तपासणी केली असतां सामान्यत: आम्हांला असें आढळून येतें कीं, मनाला आलेला अनुभव, त्याला प्राप्त झालेलें ज्ञान हेंच त्या चुकीच्या मुळाशीं असतें; या अनुभवाचे अंश, या ज्ञानाचे अंश मन घेतें आणि तें भलत्या रीतीनें एकत्र करतें, भलत्या स्थानीं ठेवतें, त्यांचा भलता उपयोग करतें, त्यांचा भलता अर्थ करतें, त्यांचा भलता व्यवहार करतें -- इत्यादि. भलत्या गोष्टी अयोग्य, अनुचित गोष्टी ज्ञानाचे अनुभवाचे अंश, म्हणजे मनाची चूक, चुका असें यावरून स्पष्ट होतें. मनाहून अधिक सत्यमय जाणिवेसाठीं अंत:स्फूर्तीची, अन्त:सूचनेची शक्ति जें काम करीत असते, तें काम मनाची कल्पनाशक्ति मनासाठीं करीत असते. सत्यमय जाणिवेला अन्त:सूचना संभाव्य गोष्टी सुचविते, मनाला त्या कल्पनाशक्ति सुचविते. मन जसजसें सत्यदर्शी जाणिवेच्या उच्चतर स्थानाकडे प्रगति करीत जातें, चढत जातें तसतशी त्याची कल्पनाशक्ति सत्यदर्शी-कल्पना होत जाते. मनानें जें ज्ञान अगोदर मिळविलें असेल व व्यवस्थितपणें साकार केलें असेल (तें ज्ञान मनाच्या कार्याला पुरेसें असो, अपुरें असो) त्यांत ही सत्यदर्शी-कल्पना उच्चतर सत्याचा रंग आणि प्रकाश ओतते; वरच्या भूमिकांवरचा प्रकाश या सत्यदर्शी-कल्पनाशक्तींत वाढ करून तिचें रूपांतर करीत असतो; अशी रूपान्तरित सत्यदर्शी-कल्पनाशक्ति स्वरूपांतर करीत करीत स्वतःच अन्त:सूचनाशक्ति, अन्त:स्फुरणशक्ति बनते. याप्रमाणें मन उन्नत झालें म्हणजे तें आभास, भ्रम, प्रमाद इत्यादि उभे करीत नाहीं. प्रमादकार, भ्रमकार या भूमिका टाकून तें अप्रमादी सत्यरचनानिष्ठ बनतें. असो. मनाच्या प्रगतीची, ऊर्ध्वगतीची गोष्ट सोडून देऊं, आणि मनाची प्रस्तुत अवस्था प्रस्तुतच्या मनाकडून कसल्या प्रकारची निर्मिति घडविते त्याचा पुन्हां थोडा विचार करूं. मन वस्तूंची निर्मिति

पान क्र. २५५

 

करतें पण तें सार्वभौम, सर्वसमर्थ निर्मातें नाहीं; नसत्या अस्तित्वांत, मुळींच नसलेल्या वस्तूंची निर्मिति सार्वभौमत्वानें तें करीत नाहीं; शून्यांत तें वस्तू निर्माण करीत नाहीं; अशी सार्वभौम सर्वसमर्थता त्याचे ठिकाणीं नाहीं. मन हें अज्ञान आहे, जिज्ञासू आहे, ज्ञानासाठीं प्रयत्न करणारें अज्ञान आहे; त्याचे जे आभास असतात त्यांना देखील वास्तवाचा कांहीं आधार असतो; मनाच्या ज्ञानाच्या मर्यादितपणामुळें, त्याच्या अर्धवट ज्ञानामुळें, अज्ञानामुळें हे आभास निर्माण होतात. विश्वाच्या अज्ञानाचें मन हें उपकरण आहे, विश्वाच्या भ्रमाचें तें उपकरण नाहीं. विश्वभ्रमाच्या उपकरणासारखें त्याचें वागणें नाहीं. शून्यांतून निर्मिति ही गोष्ट वेगळी आणि वास्तवांतून वास्तवाच्या आश्रयानें कमीअधिक चुकीची निर्मिति ही गोष्ट वेगळी. शून्यांतून निर्मिति करणाऱ्या मायेचें, खऱ्या विश्वभ्रमाचें मन हें उपकरण नाहीं, साधन नाहीं. विश्वांत अज्ञान-विभाग आहे, ज्ञान-विभाग आहे; पैकीं अज्ञान-विभागांत मन हें काम करतें. विश्वगत अज्ञानाचें, अज्ञान-विभागाचें मन हें उपकरण आहे, साधन आहे. मन हें अज्ञानांतून ज्ञानाकडे प्रवास करीत असतें, तें सत्यें किंवा तत्त्वें, शक्यता आणि वास्तवता यांच्या शोधांत असतें. या गोष्टींचा शोध तें लावते, तसेंच या गोष्टी तें स्वत: निर्माण करतें किंवा करूं इच्छितें; तें आद्य जाणीव आणि आद्य शक्ति यांजपासून अस्तित्वांत आलेलें आहे; त्यांनीं त्याला अस्तित्वांत आणलें आहे. अर्थात् ही आद्य जाणीव आणि आद्य शक्तीच तत्त्वें (सत्यें), शक्यता, वास्तवता यांची निर्माती असली पाहिजे असा तर्क करण्यास हरकत नाहीं. या आद्य जाणिवेची आणि शक्तीची कारागिरी, मनाप्रमाणें मर्यादित क्षेत्रांत चालत नसून, सर्व विश्व व्यापणारी आहे. या कारागिरींत चूक होण्याचा संभव नाहीं; कारण येथें अज्ञानाचा सर्वथा अभाव आहे; ही जाणीव आणि शक्ति सार्वभौम सर्वसमर्थ साधन, सर्वसमर्थ परमात्म्याची आत्मशक्ति आहे. परात्पर, सर्वज्ञ, सर्वसमर्थ पुरुषाची - शाश्वत ज्ञान आणि विज्ञान ज्याचें स्वरूप आहे त्या परमात्म्याची - आत्मशक्ति म्हणजेच आद्य जाणीव आणि आदिशक्ति होय.

आतांपर्यंत केलेल्या स्वप्न, आभास व मन यांच्या विषयींच्या विवेचनानंतर आमच्या समोर जें भेदमय विश्व आहे त्याच्या स्वरूपासंबंधानें आणि उत्पत्तिसंबंधानें ज्या दोन उपपत्ती शक्य आहेत त्यांचा थोडक्यांत परामर्ष घेऊं. मायावादानुसार अशी कल्पना करतां येईल कीं, माया

पान क्र. २५६

 

नांवाची अशी एक आद्य जाणीव आणि शक्ति आहे कीं, जी आभासमय, मिथ्या वस्तु निर्माण करते; मानवी सृष्टींत आणि पशु सृष्टींत, मानवी आणि पाशवी जाणिवेंत या मूळ मायेनें, शक्तिमय जाणिवेनें मन हें आपलें साधन म्हणून ठेवलेलें आहे; आमच्या समोर जी भेदमय सृष्टि दिसत आहे ती मिथ्या आहे, मायेची कल्पित रचना आहे; भेदशून्य, विशेष-शून्य, अनिर्वचनीय, सर्वनिरपेक्ष अशी कांहीं सद्‌वस्तु, ब्रह्म हीच एक सत्य वस्तु आहे. ही एक उपपत्ति. दुसरी अशी कीं, भेदमय विश्व हें मिथ्या नसून सत्य आहे, आणि हें सत्य-विश्व, आद्य, सर्वश्रेष्ठ, विश्वव्यापी सत्य-जाणिवेनें निर्माण केलें आहे; या विश्वामध्यें तिचें साधन मन, हें अपूर्ण जाणिवेच्या रूपानें काम करतें : तें अज्ञानमय आहे, त्याला थोडें कळतें, थोडें कळत नाहीं, तें अंशत: जाणतें, अंशत: नेणतें आहे : अर्थात् या कारणानें तें चुकी करण्यास पात्र आहे, त्याला जें ज्ञात आहे त्याचें स्वरूप विपरीत करून दाखविणें, त्याच्यावर जी रचना करावयाची ती चुकीची, भलत्याच प्रकारची करणें, अज्ञाताकडे चांचपडत चांचपडत, अडखळत, अनिश्चित प्रकारें प्रवास करणें, वस्तुनिर्मिति, वस्तुरचना अर्धवट आणि अर्धवटपणें करणें, सत्य आणि असत्य, ज्ञान आणि अज्ञान यांच्याविषयीं नेहमीं दोलायमान अवस्थेंत राहणें, कधीं इकडे कधीं तिकडे झुकणें -- अर्धवट जाणतें, अर्धवट नेणतें मन या गोष्टी स्वभावत:च करीत असतें. हें मन, हें अज्ञान, त्याच्यांत कोठेंहि दोष असले, तरी ते त्याला असलेल्या ज्ञानावरच आपल्या रचना आधारतें आणि अधिक ज्ञानाच्या दिशेनें प्रवास करीत असतें; हें रचना करण्याचें काम आणि अधिक ज्ञानाकडे प्रगति करण्याचें काम तें अडखळत ठेंचा खात करीत असतें ही गोष्ट वेगळी; शिवाय आपल्या मर्यादा, आपला आकुंचितपणा तें टाकून देऊं शकतें, त्याच्यांत ही शक्ति स्वभावत: आहे, अंगभूत आहे; या शक्तीच्या आधारें तें आपलें ज्ञान-अज्ञान मिश्रणाचें आकुंचित स्वरूप टाकून, मोकळें होऊन, सत्य जाणिवेचें स्वरूप, आद्यज्ञानाच्या शक्तीचें विशाल व मर्यादाशून्य स्वरूप स्वत: धारण करूं शकतें. आम्हीं जी या विषयाची तपासणी केली आहे, त्या तपासणींत दुसऱ्या उपपत्तीची सयुक्तिकता आमच्या नजरेस आलेली आहे. या तपासणींत हा सिद्धांत सयुक्तिक म्हणून ठरत आहे कीं, आमच्या जाणिवेचें स्वरूप असें नाहीं कीं तिच्यापुढें असलेल्या प्रश्नाचें उत्तर विश्व हा भ्रम आहे, माया-कार्य आहे या उपपत्तीनें देणें समर्थनीय होईल. प्रश्न आमच्या समोर आहे हें

पान क्र. २५७

 

निःसंशय -- पण तो प्रश्न असा आहे कीं, ज्ञान आणि अज्ञान यांचें मिश्रण जें आमच्या आत्मविषयक आणि वस्तुविषयक जाणिवेंत असतें तें मिश्रण हा दोष आहे, अपूर्णता आहे, ज्ञानाची अपूर्णता आहे; ही अपूर्णता आली कोठून, कां आणि कशी ? या प्रश्नाचें उत्तर देण्यासाठीं आद्य भ्रमोत्पादक मायाशक्तीची कल्पना करण्याचें कारण नाहीं. अशा कल्पनेची आवश्यकता नाहीं. शाश्वत अशा ब्रह्माचे ठिकाणीं माया ही नेहमींच उपस्थित असते, गूढपणें उपस्थित असते अशी एक कल्पना आहे; ती अशी नेहमींच ब्रह्माला चिकटलेली नसून, मध्येंच उपस्थित होते अशी दुसरी कल्पना आहे : पण ब्रह्माची जाणीव ही अतिचेतन जाणीव आहे; ती नित्य, शुद्ध, सर्वनिरपेक्ष आहे आणि या सर्वथा निराकार व निर्गुण वस्तूवर माया ही मिथ्या, भ्रमरूप, वास्तवताशून्य आकाराचें विश्व लादते; आपल्या लहरीनें, ब्रह्माच्या इच्छेविरुद्ध उभें करते, अशी मायावादाची उपपत्ति आहे. आमच्यापुढील प्रश्नाला हेंच उत्तर दिलें पाहिजे अशी कांहीं या प्रश्नाची अगतिक स्थिति नाहीं, ही गोष्ट आमच्या या विषयाच्या चिकित्सेंत आमच्या नजरेस स्पष्टपणें आलेली आहे.

पान क्र. २५८

 

प्रकरण सहावें

ब्रह्म आणि विश्वभ्रम

 

ब्रह्म हें सत्य आहे, विश्व हें मिथ्या आहे, अनृत आहे.

- विवेकचूडामणि श्लोक २०

 

मायेचा स्वामी मायेनें हें विश्व निर्माण करतो, आणि या विश्वमायेंत दुसरा बंधनांत पडतो; माया म्हणजे प्रकृति, मायेचा स्वामी हा सर्वांचा महान् प्रभु आहे हें आम्हीं समजून घ्यावें.

- श्वेताश्वतर उप० ४-९,१०

 

पुरुषच हें सर्व आहे : जें आहे तें, जें होऊन गेलें तें, जें होणार आहे तें सर्व पुरुषच आहे : तो अमृतत्वाचा आणि जें अन्नानें वाढतें त्याचा स्वामी आहे.

- श्वेताश्वतर उप० ३-१५

 

सर्व कांहीं ईश्वरच आहे.

- गीता ७-१९

 

आमच्या चौकशीचें क्षेत्र पुढच्या भागाच्या एका अंशापुरतें आम्हीं स्वच्छ केलें आहे; या क्षेत्राचा मागचा भाग आतां पहावयाचा आहे : या मागच्या भागांत प्रश्न सुटलेला नाहीं; संपूर्ण प्रश्न जसाच्या तसा न सुटलेला आमच्या पुढें आहे. पुढच्या भागाच्या एका भागांत असलेला आमच्या जाणिवेचा प्रश्न आम्हीं त्यावर स्वच्छ प्रकाश टाकून हातावेगळा केला आहे. मागच्या भागांत प्रश्न आहे तो मूळ जाणिवेचा आहे; त्या मूळ जाणिवेचें, त्या मूळ शक्तीचें स्वरूप काय हा प्रश्न आहे. तिनें हें विश्व निर्माण केलें आहे म्हणा, कल्पनेनें रचलें आहे म्हणा किंवा अव्यक्ताचें व्यक्त केलें आहे म्हणा, तिचें स्वरूप काय आणि तिच्याशीं आमच्या विश्वजाणिवेचें नातें काय हा प्रश्न आहे. विश्व हें सर्वश्रेष्ठ अशा भ्रमोत्पादक मायाशक्तीनें आमच्या मनावर लादलेली जाणिवेची एक क्लृप्ति, मिथ्यारचना आहे कीं तें आद्य जाणिवेनें केलेली अस्तित्वाची

पान क्र. २५९

 

सत्य रचना आहे, हा प्रश्न आहे; आम्हांला विश्वाचा जो अनुभव येत आहे, त्या अनुभवांतील ज्ञान आज अज्ञानमिश्र असलें तरी तें वाढत आहे -- त्यांतील अज्ञानाचा अंश कमी कमी होत आहे; तें आमचें ज्ञान सत्य रचनेचें सत्य ज्ञान आहे कीं, मिथ्या रचनेचें मिथ्या ज्ञान आहे हा प्रश्न आहे. खरा प्रश्न केवळ मनाचा नाहीं, मनाच्या विश्वस्वप्नाचा नाहीं, मनानें निर्माण केलेल्या विश्वाच्या आभासाचा नाहीं, तर मूळ सद्‌वस्तूच्या, ब्रह्माच्या स्वरूपाचा आहे; या ब्रह्मांत जें निर्माणकार्य घडतें  (म्हणतात) किंवा या ब्रह्मावर जें निर्माणकार्य आरोपिलें जातें, लादलें जातें (म्हणतात) त्याच्या त्या कार्याच्या सत्यासत्यतेचा प्रश्न आहे. त्या ब्रह्माच्या जाणिवेंत, आमच्या जाणिवेंत सत्य असें कांहीं भांडार भरलेलें आहे कीं नाहीं हा प्रश्न आहे; आम्ही विश्वाकडे बघतो, ती ब्रह्माची जाणीव विश्वाकडे पाहते, या आमच्या व ब्रह्माच्या विश्वदर्शनांत कांहीं सत्य भांडार भरलेलें आहे कीं नाहीं हा प्रश्न आहे. आरंभापासून अखेरपर्यंत सत्य सर्वत्र भरलेलें आहे असा अस्तित्वाच्या सत्यासंबंधींचा जो आम्हीं सिद्धांत मांडला आहे, त्याला उत्तर म्हणून मायावादी असें म्हणू शकतात कीं विश्वभ्रमाच्या पोटांत अस्तित्वाचें सत्य सर्वत्र सत्य म्हणून धरून चालण्यास मायावादाचा विरोध नाहीं; विश्वव्यापक विश्वजनक माया अज्ञानाच्या क्षेत्रांत या ''सत्य'' व्यवहार-सहाय्यक यंत्राच्या संस्थेच्या (विश्वसंस्थेच्या) द्वारें आपलें बिऱ्हाड कायम ठेवते आणि आपला व्यवहार चालविते. या विश्वसंस्थेंत जीं सत्यें, ज्या शक्यता, ज्या वास्तवता आढळतात त्यांना कांहीं हरकत न घेतां मायावाद सत्यता, वास्तवता बहाल करतो; मात्र त्याचा मुद्दा असा आहे कीं विश्वभ्रमाच्या पोटांत, मायामय विश्वाच्या क्षेत्रांत त्यांना सत्यता आहे, त्याच्या पलीकडे त्यांना सत्यता नाहीं; या गोष्टी शाश्वत सत्यांत मोडत नाहींत; अशाश्वत अल्पकाल टिकणाऱ्या अशा या गोष्टी आहेत; ज्ञान असो अज्ञान असो, दोन्ही ''सत्य वस्तूंचीं'' कार्यें विश्वमायेच्या मायिक जादूच्या रंगणांत मात्र सत्य असतात; या रंगणाबाहेर त्यांना बिलकुल सत्यता नाहीं. ज्ञान हें देखील मायाभ्रमाचें उपयुक्त उपकरण आहे. या उपकरणाच्या साह्यानें मायाभ्रम स्वतःची स्वतःपासून सुटका करून घेतो, मनाचे ठिकाणीं असलेला मायाभ्रम ज्ञानाच्या सहाय्यानें स्वतःची हत्या करूं शकतो, आणि ही आत्महत्या त्याला मान्य आहे; भ्रमनिरास करणारें आध्यात्मिक ज्ञान जीवाला लाभणें अति आवश्यक आहे, त्याशिवाय जीवाचें भलें

पान क्र. २६०

 

होणें अशक्य आहे हें सर्व मायेला मान्य आहे, मायावादाला कबूल आहे. पण त्याच्यामतें सत्य एकच एक एकरस ब्रह्म हें आहे. हें ब्रह्म ज्ञान-अज्ञान या द्वैतांपलीकडे आहे. तेंच एक शाश्वत सत्य आहे. त्याला शुद्ध नित्य सद्‌वस्तु, संबंधांतीत नित्य केवल वस्तु, परमात्मा कांहीं म्हणा - सत्य एक तो आत्मा आहे. बाकी सर्व मायेचा संसार आहे -- अशी मायावादाची विचारसरणी आहे. विश्व माया कीं सत्य या प्रश्नाच्या बाबतींत सर्व कांहीं मनाच्या सत्यासंबंधींच्या कल्पनेवर आणि सत्यविषयक प्रतीतीवर अवलंबून आहे. मन त्याच्या या कल्पनेनुसार आणि अनुभवानुसार त्याच्या समोर असलेल्या आणि आलेल्या पुराव्याचा अर्थ लावणार हें उघड आहे : विश्वांतील वस्तू व घटना, वैयक्तिक अनुभव, परात्पर सर्वातीत तत्त्वाचा साक्षात्कार या गोष्टी कोणत्याहि मनासमोर सारख्याच उभ्या आहेत, उभ्या होऊं शकतात. या गोष्टींचा जो अर्थ कोणतेंहि मन लावील (आणि हा अर्थ तें त्याच्या सत्यविषयक कल्पनेनुसार आणि अनुभवानुसार लावणार हें उघड आहे) त्यावर त्याची विश्वविषयक दृष्टि अवलंबून राहील, आत्मविषयक दृष्टि अवलंबून राहील. मनाला जें कोणतेंहि ज्ञान होतें, त्या ज्ञानाच्या क्रियेंत तीन घटक असतात; ज्ञाता, ज्ञानक्रिया आणि ज्ञानविषय. हे तीन घटक सर्व सत्य आहेत, सर्व मिथ्या आहेत, या घटकांपैकीं एक (कोणताहि) सत्य आहे आणि दुसरे दोन असत्य आहेत, आणि तिसरा असत्य आहे -- या नाना पक्षांपैकीं कोणताहि पक्ष घेतां येण्यासारखा आहे. तेव्हां आतां प्रश्न असे उभे राहतात कीं, या घटकांपैकीं कांहीं सत्य असतील, एखादा सत्य असेल तर तो सत्य घटक कोणता, किंवा ते सत्य घटक कोणते ? आणि ही त्याची किंवा त्यांची सत्यता जी आहे तिचा प्रकार कोणता, तिचें प्रमाण किंवा व्यापकता किती ? विश्वमायेचीं साधनें तीनहि घटक आहेत असें मानून जर त्यांना कोणालाच सत्यता नाहीं असें ठरविलें, तर या निर्णयांतून असा प्रश्न उभा रहातो कीं, सत्यतत्त्व म्हणून कांहीं या घटकांच्या बाहेर आहे काय ? आणि असें तत्त्व असेल तर पुढचा प्रश्न हा कीं, त्या तत्त्वाचा आणि मायेचा, माया-भ्रमाचा संबंध कोणता आहे ? कशा प्रकारचा आहे ?

ज्ञानविषय, वस्तूरूप विश्व सत्य आहे आणि ज्ञाता आणि त्याचें ज्ञान असत्य आहे, किंवा कमी सत्य आहे असा पक्ष घेतां येतो. जड भौतिक द्रव्य हेंच केवळ सत्य आहे असें प्रतिपादणारी जी उपपत्ति आहे,

पान क्र. २६१

 

त्या उपपत्तीनुसार जाणीव किंवा ज्ञान ही केवळ एक जड द्रव्यांतील जड शक्तीची क्रिया आहे, जड मेंदूच्या पेशीचें स्पंदन किंवा या पेशींनीं रक्तामधून कांहीं द्रव्य बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे ज्ञान किंवा जाणीव होय; भौतिक वस्तूंच्या प्रतिमांचें भौतिक मेंदूनें ग्रहण करणें आणि या प्रतिमांना प्रतिक्रिया म्हणून त्या मेंदूनें कांहीं उत्तर, भौतिक उत्तर देणें, म्हणजे ज्ञानक्रिया; भौतिक द्रव्याच्या संपर्कांना भौतिक द्रव्याकडून मिळणारें नाडीगत इच्छाशून्य प्रतिक्रियारूप उत्तर म्हणजे ज्ञानक्रिया अशी ज्ञानाची व्यवस्था जडवादांत प्रतिपादली आहे. या प्रतिपादनांतील कठोर आग्रह कोणी जडवादी कमी करतात आणि ज्ञान किंवा जाणीव केवळ भौतिक जडाची हालचाल नव्हे असा पक्ष घेतात, तरीपण जाणीव अल्पकालीन वस्तु आहे, अन्यसाधित वस्तु आहे, शाश्वत सत्य नव्हें असें प्रतिपादतात. ज्ञान जिला होते ती व्यक्ति, जडवादानुसार, केवळ जडवस्तुरूप असते; शरीर आणि मेंदू म्हणजे व्यक्ति; यांत्रिक प्रतिक्रिया या व्यक्तीच्या शरीराकडून व मेंदूकडून घडूं शकतात, या प्रतिक्रियांना आपण समुच्चय दृष्टीची जाणीव हें नांव देतो. व्यक्ति ही अल्पकाल टिकणारी सत्य वस्तु आहे, तिला स्वतंत्र किंमत नाही, जड विश्वाचा एक नाशवंत घटक एवढीच तिची किंमत, तिची योग्यता, असें जडवादांतील प्रतिपादन आहे. पण जड भौतिक द्रव्य हें सत्य नसून मिथ्या आहे, अन्यसाधित आहे, स्वतंत्र वस्तु नाहीं, जड शक्तीचें तें कार्य आहे, असें आतां ठरत असल्यानें, शक्ति ही सत्य वस्तु, एकमेव सत्य वस्तु म्हणून मानावी लागणार : ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय ही त्रिपुटी शक्तीची फलरूप म्हणून ठरणार. पण ही शक्ति, जडशक्ति तिला धारण करणारा कोणी पुरुष, आत्मा नसेल, तिचा पुरवठा करणारी कसली जाणीव कोठेंहि नसेल, ती शून्यांत स्वतंत्र आदिशक्ति म्हणून धडपड करते असें मानावयाचें असेल तर,  (ही शक्ति भौतिक क्षेत्रांत धडपड करतांना दिसते पण हें क्षेत्र जडशक्तिनिर्मित आहे, तेव्हां शून्य हेंच शक्तीच्या व्यापाचें मूळ क्षेत्र ठरतें) या मान्यतेचा अर्थ जवळ जवळ असा होतो कीं, ही शक्ति ही एक मनाच्या कडून अस्तित्वांत येणारी रचना अर्थात् असत्य रचना आहे; हा पक्ष घ्यायचा नसेल तर शून्य, अनंत शून्य हें एकच शाश्वत सत्य वस्तु असून, त्या शून्यांत केव्हांतरी कांहीं काळ अचानकपणें हालचाल, गतिमानता उत्पन्न होते, ही गतिमानता म्हणजे शक्ति, ही अर्थात् सुरू होते तशी अचानकपणें बंदहि होते, अर्थात् तिच्या गतिमानतेनें उत्पन्न होणारा

पान क्र. २६२

 

दृश्याचा पसारा हाहि तिच्या सारखाच नाशवंत असणार, शून्य हेंच अविनाशी एकमेव सत्य आहे, असा पक्ष घ्यावा लागेल. बुद्धाचा सिद्धान्त असा आहे कीं, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी कर्मफलरूप आहे, विश्वांतील कर्माकडून होणारी रचना आहे; या सिद्धान्ताच्या परिणामीं तर्कदृष्ट्या असत् किंवा शून्य हेंच शाश्वत सत्य आहे असा बौद्ध सिद्धान्त प्रतिपादला गेला. अशी शक्यता आहे कीं, शक्ति, जडशक्ति ही स्वतंत्रपणें काम करीत नसून जाणीव ही खरी काम करणारी आहे; जड भौतिक द्रव्य तपासलें असतां तें स्वत: स्वतंत्र सत्य वस्तु नसून जडशक्ति ही त्याच्या मुळाशीं आहे असें ज्ञान होतें; ही शक्ति आमच्या प्रत्यक्ष अनुभवास येत नाहीं, तर तिचें परिणाम, तिचीं कार्यें आम्हांला तिचें अस्तित्व पटवितात -- हें जसें जड द्रव्याचें व जड शक्तीचें नातें आहे, तसेंच नातें जड शक्ति आणि जाणीव यांचें असण्याची शक्यता आहे; जड द्रव्य तपासतां जड शक्ति हें तिचें मूळ हातीं लागतें त्याप्रमाणें जड शक्ति तपासतां ती जाणिवेचें कार्य आहे, असें आपल्या प्रत्ययाला येऊं शकतें; अर्थात् ही जाणीवहि तिच्या क्रियेवरून व परिणामावरून आम्ही ओळखूं शकतो. ही जाणीव शून्यांत काम करते अशी कल्पना केली (जशी जड शक्ति शून्यांत काम करते ही कल्पना आहे) तर त्या दुसऱ्या कल्पनेच्या परिणामीं जो सिद्धान्त आम्हांला करावा लागला तोच सिद्धान्त जाणीवपक्षींहि करावा लागतो; अर्थात् असें मानावें लागतें कीं, ही जाणीव, थोडा काळ टिकणारे दृश्याचे आभास उत्पन्न करणारी आणि स्वत: आभासरूप अशी आहे आणि शून्य, अनंत शून्य, अनादि आद्य असत् हीच एक शाश्वत सत्य वस्तु आहे. पण या कल्पना, हे सिद्धान्त आम्हीं मानलेच पाहिजेत असा कांहीं तर्कशास्त्राचा आग्रह असूं शकत नाहीं; कारण अशीहि कल्पना करतां येते कीं, जशी जडद्रव्यामागें जड शक्ति, जशी शक्तिमागें जाणीव तशी जाणीवेमागें सद्‌वस्तु, अनादि आद्य सद्‌वस्तु आहे, असद् वस्तु नाहीं. एकदां सद्‌वस्तु ही मूळ सत्य वस्तु ठरली कीं तिची जाणीवयुक्त शक्ति ही सत्य वस्तु ठरणार; ही शक्ति सद्वस्तूच्या सत्ताद्रव्याचे अतिसूक्ष्म परमाणु, इंद्रियानीं अग्राह्य असें परमाणु घेऊन कांहीं रचना करते, या रचनाहि इंद्रियानीं ग्रहण करतां येण्यासारख्या नसतात; शक्ति याप्रमाणें रचना करण्याचें काम करीत शेवटीं रचनाकार्याच्या एका विशिष्ट अवस्थेंत, इंद्रियांना ग्रहण होईल असें भौतिक द्रव्य तयार करते; अर्थात् सत्य सद्‌वस्तूच्या सत्य सत्ताद्रव्यांतून निर्माण

पान क्र. २६३

 

केलेलें जड भौतिक द्रव्य हेंहि सत्य असणार; पुढें या सत्य द्रव्याच्या विश्वांत, मूळ सत्य, सद्‌वस्तूपासून जाणीवयुक्त आत्मा, पुरुष या रूपानें व्यक्ति उदय पावते ती व्यक्तीहि सत्यच असणार; जी जाणिवेची धारण करणारी आद्य सद्‌वस्तु म्हणून कल्पिली ती विश्वव्यापी आध्यात्मिक पुरुषरूप असूं शकेल, विश्वांशीं एकरूप अशी विश्वदेवता असूं शकेल किंवा दुसरें एखादें स्वरूप तिचें आहे अशी कल्पना करतां येईल; पण एक गोष्ट निश्चित की, विश्व हें भ्रमरूप असणार नाहीं, केवळ दृश्य (सत्य नसणारें असें दृश्य) असणार नाहीं, तर पूर्णतया सत्यस्वरूप असेंच विश्व मूळ, सत्य सद्‌वस्तूच्या जाणिवेची क्रिया म्हणून अस्तित्वांत येईल.

मायावादाच्या प्रमुख सिद्धान्तांत, एकच एक सत्य वस्तु आहे आणि ती सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक अस्तित्व या स्वरूपाची आहे असें मानतात; ती तत्त्वत: आत्मस्वरूप आहे, पण ज्या प्रकृतिगत जीवांची, ही सत्य आत्मस्वरूप वस्तु आत्मा आहे ते जीव क्षणिक आहेत, केवळ अल्पकाल टिकणारे देखावे आहेत; ती मूळ वस्तु सर्वनिरपेक्ष व सर्व वस्तूंचें पायाभूत अधिष्ठान आहे; पण या पायाभूत अधिष्ठानावर उभारलेली दुनिया ही असत्, मिथ्या आहे, केवळ दिसायला सत् आहे, सत्य पण असत्यमय अशी आहे, भ्रमरूप आहे -- विश्व हें खरें नसून आभासरूप आहे -- असा मायावादाचा प्रमुख सिद्धान्त आहे. मूळ सद्‌वस्तु ब्रह्म एकमेवाद्वितीय आहे, तें शाश्वत आणि अक्षर आहे, तेंच एक अस्तित्व आहे; दुसरें कांहींहि अस्तित्वांत नाहीं; हें जें मूळ अस्तित्व, त्याच्यापासून कांहींहि खरीं रूपें बनत नाहींत; तें नाम, रूप, लक्षण, संबंध, घटना यांपासून अलिप्त आहे आणि असेंच नेहमीं निर्लेप राहणारें आहे; या अस्तित्वाला जाणिवेची जोड आहे असें मानतां येईल पण ही जाणीव असणार ती शुद्ध असणार, -- स्वतःच्या सर्वनिरपेक्षतेची जाणीव असणार. अशा स्थितींत, हें सत्य आणि भ्रम (विश्वभ्रम) यांचें नातें काय ? हा भ्रम कोणत्या अद्‌भुत जादुगिरीनें निर्माण होतो ? कालाच्या कक्षेंत हा भ्रम उदयास येतो कसा आणि कालाबरोबर अखंड शाश्वतीनें टिकतो कसा ? हे प्रश्न या ठिकाणीं उद्‌भवतात.

ब्रह्म हें एकच एक मूळ सत्य आहे, असा पक्ष घेतल्यावर, सत्यवस्तू उत्पन्न व्हावयाच्या तर त्या या ब्रह्मापासूनच उत्पन्न होणार; सत्यत्वानें उत्पत्ति करणारें, सत्यत्वानें सत्यवस्तु उत्पन्न करणारें असें हें ब्रह्मच एक

पान क्र. २६४

 

असू शकणार; अर्थात् ब्रह्म म्हणजे ब्रह्माची जाणीव, ब्रह्माची शक्ति -- खरा स्रष्टा आणि सत्य वस्तूंचा स्रष्टा ही ब्रह्माची जाणीव किंवा त्याची शक्ति असणार, कारण ब्रह्माखेरीज दुसरें कांहीं मूळ सत्य नाहींच. पण येथें अशी अडचण उभी राहते कीं, ब्रह्म हें एकच एक सत्य असल्यानें, शुद्ध सर्वनिरपेक्ष ब्रह्माखेरीज दुसरें कांहींहि सत्य नसल्यानें, ब्रह्माची निर्माणशक्ति सत्य अशी मानतां येणार नाहीं. सत्य जीव, सत्य आकार, सत्य घटना यांचें ज्ञान ब्रह्माच्या जाणिवेला होतें, असें मानलें कीं, मूळ अस्तित्वाप्रमाणें त्यांतून घडणाऱ्या वस्तूंना, घटनांना सत्यत्व येतें, विश्व हें आत्मदृष्टीनें, भौतिक दृष्टीनें सत्य आहे असें मानावें लागतें; सर्वश्रेष्ठ मूळ सत्याचा साक्षात्कार झाला कीं हें गौण विश्वसत्य असत्य ठरतें; शिवाय ब्रह्म हें एकच सत्य आहे हा सिद्धान्त मानल्यावर विश्व देखील सत्य आहे हा सिद्धान्त तर्कदृष्टीनें अपसिद्धान्त ठरतो. मायेची सृष्टि -- जीव, नामें, रूपें, घटना, वस्तु या गोष्टी उभ्या करणें हीच मायेची सृष्टि -- सत्य मानतां येत नाहीं; कारण अलक्षण अनिर्वचनीय शुद्ध एकमेव अस्तित्वाला ही सृष्टि विरोधी आहे. तेव्हां माया ही सत्य नाहीं, सत्य अस्तित्व हें मायेचें स्वरूप नाहीं, अस्तित्वशून्यता हें मायेचें स्वरूप आहे : माया ही स्वत: अस्तित्वशून्य भ्रमरूप आहे; आणि अगण्य भ्रमांना जन्म देणारी आहे. पण मायेचें हें भ्रमरूप आणि या भ्रमांतून निघणारे असंख्य भ्रम यांना कसलें तरी ''अस्तित्व'' असतें असें मानणें भाग आहे, आणि म्हणून कसलें तरी ''सत्यत्व'' पण त्यांचे ठिकाणीं मानणें भाग आहे; आमचें हें भ्रमरूप विश्व कांहीं शून्यांत उभारलेलें नाहीं, तें ब्रह्मावर आरोपिलेलें आहे; अर्थात् कसें कां होईना विश्वाला ब्रह्माचा आधार आहे असें मायावाद मानतो; भ्रमाच्या पोटांत असणारे आम्ही, या भ्रमांतील रूपें, नामें, संबंध, घटना ब्रह्मापासून होतात असें मानतों, ब्रह्मच हें सर्व आहे अशी जाणीव आम्हांला होते, ब्रह्माचा साक्षात्कार या असत्य गोष्टींच्या द्वारां आम्हांला घडतो. तेव्हां मायेला कांहीं सत्यता आहे -- म्हणजे माया सत्य आहे आणि असत्यहि आहे; अस्तित्वांत आहे आणि अस्तित्वांत नाहीं; किंवा असें म्हणतां येईल कीं माया सत्य नाहीं, असत्यहि नाहीं; ती एक विरोधमय घटना आहे, बुद्धीला न उलगडतां येणारी कूट रचना आहे. पण हें कूट, हें गूढ आहे काय ? त्याला कांहीं सोडवणूक, उकल आहे कीं नाहीं ? ब्रह्माच्या अस्तित्वात

पान क्र. २६५

 

मध्येंच हें भ्रमाचें, मायेचें दृश्य उभे राहतें कसें ? मायेच्या या असत्य सत्यत्वाचें स्वरूप काय आहे ?

विचारकाला प्रथमदर्शनीं ही कल्पना सुचतें कीं, मायेचा द्रष्टा कोणत्या तरी प्रकारें ब्रह्म हें असलें पाहिजे, कारण ब्रह्म हें एकच सत्य अस्तित्व असल्यानें ब्रह्म जर मायेचा द्रष्टा, ज्ञाता नसेल तर मायेला दुसरा कोण पाहणारा, जाणणारा भेटणार ? आमच्यामध्यें जो पुरुष, जी व्यक्ति दर्शनी द्रष्टा म्हणून मायेला पाहत असते, ती स्वत: सत्य नसून, मायेच्या पोटांतील, मायेच्या सृष्टींतील एक दृश्य घटना आहे, असत्य वस्तु आहे. तेव्हां ब्रह्म हेंच मायेचा खरा द्रष्टा, ज्ञाता आहे; पण जर ब्रह्म हाच द्रष्टा असेल तर माया, भ्रम एक क्षणहि टिकेल कसा ? कारण आपला (मायावादी) सिद्धान्त असा आहे कीं, ब्रह्माला शुद्ध जाणीव असते, अर्थात् ब्रह्माच्या खऱ्या जाणिवेला आत्म्याखेरीज, स्वतःच्या शुद्ध निर्गुण निराकार अस्तित्वाखेरीज कांहींहि जाणतां येत नाहीं, कांहींहि दिसत नाहीं. ब्रह्माच्या खऱ्या जाणिवेचा विषय विश्व आणि वस्तू होतील तर विश्व आणि वस्तू खऱ्या होतील -- तेंच विश्व आहे, तेंच वस्तू आहे असें होईल; पण शुद्ध अस्तित्वांत या गोष्टी येऊं शकत नाहींत, त्याअर्थी हें विश्वाला सत्यत्व बहाल करणारें मत सत्यवादी धरलें जाऊं शकत नाहीं. विश्वाला, विश्वांतील वस्तूंना फारतर मूळ सत्य अस्तित्वाचीं रूपें असें म्हणतां येईल आणि या रूपांचें दर्शन घडतें तें ब्रह्माच्या खऱ्या शुद्ध जाणिवेला घडत नसून, अज्ञान म्हणून जी वस्तु ब्रह्माच्या ठिकाणीं प्रकट झाली त्या अज्ञानाच्या जाणिवेला घडतें असें म्हणतां येईल. तथापि विश्व ही एक वास्तव घटना आहे ही गोष्ट आम्ही नाकारूं शकत नाहीं -- या घटनेला वास्तव म्हणून तात्पुरती मान्यता देणें आम्हांस भाग पडतें, जी गोष्ट अशक्य म्हणून मायावाद सांगतो ती वस्तुत: अस्तित्वांत आहे असें आम्हांला तात्पुरतें तरी मान्य करावें लागतें -- कारण माया प्रभावी आहे, तिचीं कार्ये टिकाऊ आहेत, तीं कार्यें सत्य आहेत अशी आमच्या आत्म्याची भावना, खोटी कां होईना माया करते, मायेच्या प्रभावानें आम्हांला ही भावना सारखी व्यापून असतें. माया आणि ब्रह्म यांचें जें कोडें आम्हांला सोडवायचें आहे, तें सोडवितांना मायेची ही प्रभावी कारवाई आम्हांला नजरेसमोर ठेवलीच पाहिजे. या कारवाईच्या पायावरच कोड्याच्या उत्तराची इमारत रचणें आम्हांला भाग आहे.

पान क्र. २६६

 

माया जर कोणत्याहि प्रकारें सत्य असेल, तर असा निर्णय घ्यावा लागेल, कीं, ब्रह्म हें जें मूळ सत्य आहे, तें मायेचा त्या विशिष्ट प्रकारें द्रष्टा आहे. माया ही या ब्रह्माची भेदकारक जाणीवशक्ति असूं शकेल. ब्रह्माची शुद्ध जाणीव त्याचें एकमेवाद्वितीय आत्मत्व पाहणारी असते, त्याची मायानामक जाणीव या शुद्ध जाणिवेहून वेगळी म्हणजे भेददर्शी निर्मितिकार जाणीव असते, असूं शकते. जर असा पक्ष घेतला कीं, भेदकारकता हा मायाशक्तीचा सारभूत धर्म नसून, त्या धर्माचा परिणाम आहे, तर ब्रह्माच्या जाणिवेची भेदकारक नव्हे तर दुसरी कोणतीतरी शक्ति असें मायेचें स्वरूप आहे असें मानावें लागेल; कारण भ्रम, आभास जो आमच्या समोर आहे तो बघणें किंवा निर्माण करणें; (बघणें = निर्माण करणें,) ही गोष्ट जाणिवेशिवाय कशालाहि शक्य नाहीं, आणि ब्रह्माची जाणीव हीच एक मूळ निर्माणकर्ती जाणीव असूं शकते. कारण दुसरी जाणीवच मुळांत नाहीं. आतां ब्रह्म असें आहे कीं त्याला स्वतःची जाणीव नित्य आणि अखंड अशी असते. तेव्हां असा सिद्धान्त निघतो कीं, ब्रह्म-जाणीव दुहेरी, दोन प्रकारची, कायमची आहे : एक जाणीव, ब्रह्म हें एकमेव सत्य आहे ही गोष्ट जाणणारी जाणीव; दुसरी, असत्य गोष्टी जाणणारी जाणीव : ही दुसरी जाणीव या असत्य गोष्टी बघते, जाणते आणि या दर्शनाच्या, ज्ञानाच्या क्रियेनेंच या गोष्टींना एक प्रकारचें दिखाऊ अस्तित्व बहाल करते. ब्रह्माच्या अंगभूत द्रव्यापासून कांहीं या असत्य गोष्टी बनल्या जात नाहींत, कारण तशा त्या बनल्या तर त्या सत्यच म्हणाव्या लागल्या असत्या. हा पक्ष (ब्रह्माला दोन भिन्न प्रकारची जाणीव आहे व ब्रह्मापासून विश्व बनत नाहीं हा पक्ष) घेतला तर उपनिषदांचें महत्त्वाचें म्हणणें आम्हांला अमान्य करावें लागतें : सर्व हि एतद् ब्रह्म (मांडुक्य उप०) ब्रह्मच हें विश्व बनलें आहे, ब्रह्मांतूनच हें विश्व उद्‌भवले आहे (तथाऽक्षरात् संभवतीह विश्वम्-मुण्डक १-१-७) : हीं उपनिषदांचीं वचनें, एकमेवाद्वितीय ब्रह्मच सर्व झालें आहे, त्यापासूनच सर्व उद्‌भवलें आहे असें सांगतात. पण मायापक्षीं आम्हांला असें म्हणावें लागतें कीं, विश्वाचें भौतिक कारण ब्रह्म नव्हे : आमचें विश्व, आमचा निसर्ग, आमची प्रकृति -- आत्मा नव्हे ती (आत्मविरोधी) प्रकृति -- आत्मद्रव्याची बनलेली नाहीं. ती मायेच्या असत्य सत्याची बनलेली आहे : आमचें आध्यात्मिक अस्तित्व मात्र त्या आत्मद्रव्याचें बनलेलें आहे : तें वस्तुत: ब्रह्मच आहे; मायेच्या पलीकडे ब्रह्म आहे : पण

पान क्र. २६७

 

स्वत:च्या सृष्टीकडे तें ब्रह्म वरून (मायेच्या पलीकडून) आणि मायेच्या प्रांतांतूनहि पहात असतें. ब्रह्माची दुहेरी जाणीव ही कल्पना आमच्या समोरच्या कूटांचें संभाव्य स्पष्टीकरण म्हणून युक्तियुक्त वाटते : आमच्या समोरचें कूट आहे तें असें : सत्य असा शाश्वत ज्ञाता, असत्य ज्ञेय आणि असत्य अशा ज्ञेयांची अर्ध-सत्यरूप निर्माणकर्ती अशी ज्ञानक्रिया. असो.

असा जर पक्ष घेतला कीं, ब्रह्माला ही दुहेरी जाणीव नसून माया हीच एक ब्रह्माची जाणीवयुक्त शक्ति आहे, तर पुढील दोन पक्षांपैकीं एक सत्य मानावा लागेल; १) शक्ति या नात्यानें मायेची सत्यता अशी आहे : ब्रह्म-जाणिवेची आत्मगत क्रिया म्हणजे माया : ब्रह्माच्या शांत, नि:शब्द, निश्चल, अतिचेतन अवस्थेंतून ही आत्मगत क्रिया उदय पावते; या आत्मगत जाणिवेला अनुभव येतात ते सत्यहि असतात, असत्यहि असतात : सत्य याकरितां कीं, ते ब्रह्माच्या जाणिवेचे अंगभूत असतात, असत्य याकरितां कीं ते या ब्रह्माच्या सत्ता-द्रव्याचें अंगभूत असत नाहींत; २) मायेची सत्यता अशी कीं, माया ही ब्रह्माची विश्वविषयक कल्पना-शक्ति आहे, ही कल्पनाशक्ति त्याच्या (ब्रह्माच्या) शाश्वत अस्तित्वाचा एक अंतस्थ, अंगभूत भाग आहे; ही शक्ति शून्यांतून नामें, रूपें, घटना (कसल्याहि प्रकारची सत्यता नसणाऱ्या) निर्माण करीत असते. याप्रमाणें माया ही ब्रह्माची अंगभूत कल्पनाशक्ति असेल, तर ती सत्य आहे असें ठरेल पण तिचीं कार्यें निखालस मिथ्या ठरतील, शुद्ध काल्पनिक ठरतील -- पण ब्रह्माचे ठिकाणीं गतिशील निर्माणशील एकच शक्ति आहे आणि ती त्याची कल्पनाशक्ति होय असें विधान आम्हांला करतां येईल काय ? कल्पनाशक्ति ही अपूर्ण अस्तित्वाची निकड आहे. या अस्तित्वाची जाणीव अज्ञानग्रस्त असते -- तिच्या ठिकाणच्या अज्ञानाची उणीव कल्पनाशक्ति, अनुमानशक्ति थोडीबहुत भरून काढते -- पण अशा तऱ्हेच्या शक्तीची, कल्पनेची, अनुमानाची एकच एक ब्रह्माच्या जाणिवेला मुळींच आवश्यकता नसते, तिला असत्यें रचण्याचें कांहींच कारण नसतें, ती सदा शुद्ध, सदा स्वयंपूर्ण असते. जें अस्तित्व एकमेवाद्वितीय आहे, तत्वत: परिपूर्ण आहे, शाश्वत आनंदमय आहे, ज्याचे ठिकाणीं प्रकट करावयास कांहीं नाहीं, कालातीत पूर्णता ज्याचे ठिकाणीं आहे, त्यानें असत्य असा काल आणि अवकाश निर्माण करावा आणि तो खोट्या प्रतिमांच्या आणि घटनांच्या विश्वव्यापी अमर्याद देखाव्यानें अनंत

पान क्र. २६८

 

काल भरावा अशी प्रेरणा त्या अद्वितीय अस्तित्वाला, पुरुषाला त्याच्या अस्तित्वांतून मिळते अशी कल्पना करणें कठीण आहे. कल्पनाशक्ति ही ब्रह्माची एकमेव निर्माणशक्ति आहे ही कल्पना तर्कदृष्ट्या सर्वथा अग्राह्य आहे.

दुसरी कल्पना, माया ही ब्रह्माची शुद्ध आत्मगत सत्यवस्तु आहे, ब्रह्माची आत्मगत असत्यमिश्र सत्यवस्तु आहे -- ती ब्रह्मजाणिवेची आत्मगत क्रियारूप असत्यमिश्र सत्यवस्तु आहे ही होय. ही जी कल्पना मनाला सुचते ती, भौतिक निसर्गांत वस्तुनिष्ठ अनुभव आणि आत्मनिष्ठ अनुभव असा जो भेद मन मानतें त्या भेदावरून सुचते. या दोन अनुभवांपैकीं अगदीं पूर्णतया सत्य असा अनुभव म्हणजे वस्तुनिष्ठ अनुभव अशी मनाची निश्चिति असते. पण हा आंतर-बाह्य भेद ब्रह्म-जाणिवेंत कल्पिणें अयुक्त आहे, तेथें असा भेद असणें शक्य नाहीं -- कारण तेथें ज्ञाता आणि ज्ञेय दोन्हीं वस्तू नाहींत; किंवा असें म्हणा कीं, ब्रह्मजाणिवेचा एकच एक विषय व एकच एक विषयी ब्रह्म हेंच आहे. ब्रह्माच्या बाहेर कांहींहि नसल्यानें तसला बाह्य विषय ब्रह्मजाणिवेला असूं शकत नाहीं -- ब्रह्म जर एकच एक आहे, तर आंत, बाहेर या संज्ञा अर्थशून्य आहेत. ब्रह्मजाणीव आत्मगत विचार करते, ब्रह्माखेरीज काल्पनिक वस्तूंचें विश्व निर्माण करते, एकच एक ज्ञान-विषय जें ब्रह्म (ब्रह्म-अस्तित्व) त्याला विकृत रूप देते, इत्यादि जी कल्पना आहे ती आमच्या मनानें ब्रह्मावर लादली आहे -- स्वत: मन अपूर्ण आहे आणि आपल्या अपूर्णतेचें एक लक्षण तें पूर्ण ब्रह्मावर लावीत आहे हें उघड आहे : पूर्ण ब्रह्माच्या जाणिवेच्या ठिकाणीं असा दोष संभवत नाहीं. ब्रह्माचें अस्तित्व आणि ब्रह्माची जाणीव हा जो भेद केला जातो, तोहि अयुक्त आहे; कारण या दोन भिन्न स्वतंत्र वस्तू नाहींत. त्या स्वतंत्र वस्तू असत्या तर ब्रह्मजाणीव ब्रह्म-अस्तित्वावर आपलीं खोटी चित्रें लादते  (त्याला विकृत रूप देते) या वाक्याला कांहीं अर्थ आला असता, पण ब्रह्मअस्तित्व हें पूर्णतया जाणीवयुक्त आहे. तेव्हां सर्वश्रेष्ठ एकमेव अस्तित्व हें ब्रह्माचें स्वरूप घ्या किंवा मायेच्या क्षेत्रांतील सत्य-असत्य व्यक्तीचा आत्मा हें ब्रह्माचें स्वरूप घ्या, या दोन्हीं स्वरूपांतील ब्रह्माला त्याजवर जे भ्रम लादले जातील त्यांचें ज्ञान त्याच्या सत्य जाणिवेच्या द्वारां होईल आणि ते काय आहेत हें त्याला कळेल : मायाशक्तीच्या काल्पनिक रचना मायाशक्तीला किंवा तिच्या एखाद्या अंशाला फसवूं

पान क्र. २६९

 

शकतील, किंवा ही मायाशक्ति किंवा तिचा विशिष्ट अंश त्यांनीं न फसतां फसल्यासारखें वागेल, फसल्यासारखा सुखी दुःखी वगैरे होईल. ही दुहेरी अवस्था अज्ञानांत वागणाऱ्या आमच्या जाणिवेची होते : निसर्गाच्या जाणीवशून्य व्यापारांतून आमची जाणीव वेगळी होते, तेव्हां तिला स्वतःच्या अंतरांत असलेला आत्मा हाच एक सत्य आहे अशी प्रतीति होते; तसेंच त्यावांचून दुसरें सर्व अनात्मा आणि असत्य असें वाटतें, पण पृष्ठभागावरील (बाह्य) व्यवहारांत हा अनात्मा सत्य आहे असें धरूनच तिला वागावें लागतें. ब्रह्माचें अविभाज्य एकच एक शुद्ध अस्तित्व आणि शुद्ध जाणीव वरील दुहेरी जाणिवेच्या कल्पनेशीं विसंगत असल्यानें दुहेरी जाणिवेची व्यवस्था सत्य धरली तर ब्रह्माची शुद्धता असत्य ठरते; ब्रह्माच्या निर्विशेष निर्गुण एकरस स्वरूपांत द्वैताची उभारणी होते; सांख्यांच्या पुरुष-प्रकृति द्वैतासारखेंच हें द्वैत आहे. एकंदरीनें आमच्या प्रश्नाचीं हीं द्वैतयुक्त उत्तरें असमाधानकारक आहेत. अस्तित्वाच्या अनेक अवस्था आहेत, असा पक्ष घ्यावयाचा नसेल, ब्रह्म शुद्ध एकरस आहे हा पक्ष सोडावयाचा नसेल तर द्वैताचा आश्रय करणारीं हीं उत्तरें त्याज्य मानलीं पाहिजेत.

ब्रह्माचे ठिकाणीं दोन प्रकारची जाणीव आहे ही गोष्ट मान्य केल्यास ही दुहेरी जाणीव ज्ञान आणि अज्ञान यांची मिश्रशक्ति आहे असें कांहीं आम्हांला म्हणतां येत नाहीं -- कारण ज्ञान-अज्ञान ही मिश्र शक्ति विश्वांत रहाणाऱ्या आमच्या ठिकाणीं आहे आणि ती युक्तच आहे - पण ही शक्ति सर्वश्रेष्ठ मूळ अस्तित्वाचे ठिकाणीं कल्पिणें अयुक्त आहे. मायेच्या बंधनांत आम्ही असल्यानें ज्ञान-अज्ञान ही मिश्र शक्ति आमच्या वांट्याला येते; ब्रह्म कांहीं मायेच्या बंधनांत नाहीं आणि असूं शकत नाहीं : ब्रह्माची आत्मजाणीव अखंड आणि शाश्वत असते. त्या जाणिवेला अज्ञान व्यापतें असें म्हणणें म्हणजे आमची मर्यादित जाणीव ब्रह्मावर लादण्यासारखें आहे. आमचें अज्ञान ब्रह्माच्या अभिव्यक्तीच्या कार्यक्रमांत मध्यें उदयास येणारी गोष्ट आहे, मूळ ब्रह्मजाणिवेच्या एका गौण व्यापाराचा तो परिणाम आहे, ईश्वराच्या विश्वविषयक योजनेचा तो भाग आहे, त्याला आत्मविकासदृष्टीनें कांहीं अर्थ आहे. असलें आत्मविकास-सहाय्यक अज्ञान तर्कदृष्ट्या युक्तियुक्त आहे -- पण हें अज्ञान ब्रह्माच्या मूळ जाणिवेच्या ठिकाणीं कल्पिणें, किंवा भ्रमाची त्या जाणिवेच्या ठिकाणीं कल्पना करणें याला कांहीं अर्थ नाहीं, आणि ही

पान क्र. २७०

 

कल्पना करणेंहि अकल्पनीय आहे. निरपेक्ष केवल ब्रह्माच्या सत्यावर अशी मानसिक अतिरेकी रचना लादणें केव्हांहि जमणार नाहीं. तेव्हां ब्रह्माचे ठिकाणीं दुहेरी जाणीव कल्पावयाची असेल तर ती अज्ञानरूप अज्ञानमिश्र कल्पितां येणार नाहीं -- ती दुहेरी जाणीव अशा प्रकारची असली पाहिजे : एकतर तिचे ठिकाणीं आत्मजाणीव पूर्णतया असली पाहिजे आणि या जाणिवेच्या जोडीला इच्छा, स्वयंस्फूर्त संकल्परूपी जाणीव असली पाहिजे : हा संकल्प भ्रमांचें विश्व उभारण्याचा असूं शकेल : हे भ्रम ब्रह्माच्या बाह्य जाणिवेचे विषय होतील -- ही बाह्य जाणीव आत्मजाणीव असून शिवाय भ्रमरूप विश्वाचीहि जाणीव असेल -- अर्थात् भ्रमाला चुकून सत्य मानणारी अशी ती असणार नाहीं, भ्रमांनीं फसून जाणारी असणार नाहीं. भ्रमरूप विश्वांत असणाऱ्या आमची भ्रम फसवणूक करतील. विश्वांत असणारें ब्रह्म किंवा आत्मा विश्वाचा भ्रमांचा खेळ अलग, अलिप्त राहून पाहतें किंवा त्यांत स्वेच्छेनुसार मोकळेपणें भागहि घेतें; या खेळाची जादु निसर्गांतील मानवावर मात्र आपला प्रभाव गाजविते; हें मन मायेनें आपल्या कार्यासाठीं निर्माण केलेलें असतें आणि या कार्याला हें उपयुक्त असतें कीं, विश्वभ्रमाचा प्रभाव विश्वस्थ निसर्गजनित मनावर पडावा. ही वस्तुस्थिति पाहतां असें म्हणावें लागतें कीं, ब्रह्म हें स्वतःच्या शुद्ध सर्वनिरपेक्ष कैवल्य स्थितींत समाधान मानून राहूं शकत नाहीं -- त्याला निर्मितीची आवश्यकता वाटते, सर्व काल नामें-रूपें, घटना यांच्या नाटकाची, एकटें राहून आपण अनेक आहोंत असें नाटक करण्याची निकड त्याला भासतें; तें तसें राहून ज्ञान-अज्ञान, सुख-दुःख, असत्य अस्तित्व आणि मुक्तता (असत्य अस्तित्वापासून मुक्तता) या जोड्यांचा नाटकी अनुभव घेऊं इच्छितें, -- असा अनुभव घेण्याची गरज त्याला भासतें. मायेचें कार्य असणाऱ्या व्यक्तीसाठीं मुक्ति असते. ब्रह्माला कांहीं मुक्तीची जरूर नसते, त्याचा विश्वभ्रमाचा मायेचा खेळ अखंड नित्य चालूं राहतो. ब्रह्माला विश्वभ्रम नाटकाची निकड असते असें मानावयाचें नसेल तर असें म्हणूं कीं, त्याला विश्वनाटक उभें करण्याची इच्छा, तीव्र इच्छा होते, अथवा असें म्हणूं कीं कोठून तरी त्याला जोराची प्रेरणा होते; किंवा स्वयंस्फूर्त इच्छानिरपेक्ष यांत्रिकता त्याजकडून विश्वभ्रम उभा करविते असें म्हणूं; निकड आणि इच्छा या विरोधी प्रेरणांच्या यांत्रिक कार्यानें ब्रह्माकडून विश्वभ्रमाची आपोआप उभारणी होते असें म्हणूं -- पण ब्रह्म हें एकमेवाद्वितीय

पान क्र. २७१

 

आणि नित्य शुद्ध अस्तित्व आहे असा आग्रह आम्हीं धरला तर या सर्व कल्पना अशक्य आणि अगम्य ठरतात. ब्रह्माचे ठिकाणीं क्रियाशील, निर्मितीशील जाणीव कल्पिणें हें त्याच्या सत्य अशा स्थितीशील स्वभावाच्या शुद्ध अस्तित्वाच्या विरोधी गोष्ट आहे. तेव्हां ब्रह्माच्या ठिकाणीं वर सांगितलेली दुहेरी जाणीव कल्पिल्यानें विश्वाच्या देखाव्याचा कांहीं उलगडा होत असला, तरी हें स्पष्टीकरण, हा उलगडा मूळ ब्रह्माची रहस्यात्मकता कमी करणारा नाहीं; आणि निर्माणाची इच्छा, व्यक्त होण्याची वा व्यक्त करण्याची इच्छा ब्रह्माचे ठिकाणीं निःसंशय दिसत असली तरी ती इच्छा स्वत:च्या सत्य अस्तित्वाला विरोधी अशा अस्तित्वांत नसणाऱ्या गोष्टींचा पसारा उभा करून, भ्रममय विश्व निर्माण करण्याची इच्छा आहे अशी कल्पना करवत नाहीं; अशी कल्पना बिलकुल विश्वासार्ह वाटत नाहीं. निर्माणाची इच्छा ब्रह्माचे ठिकाणीं असेल तर ती केवळ सत्य वस्तूच निर्माण करण्याची इच्छा असली पाहिजे, स्वत:च्या सत्य अस्तित्वांतून अनेक सत्य गोष्टी उभ्या करण्याचीच इच्छा असली पाहिजे; ब्रह्माचे ठिकाणीं अव्यक्त व्यक्त करण्याची इच्छा असेल, तर ती स्वतःच्या कालातीत अस्तित्वाचा अव्यक्त प्रवाह अनंतकालाच्या नित्य कक्षेंत व्यक्त करण्याची इच्छा असली पाहिजे. पण ब्रह्म हें शुद्ध निर्गुण अस्तित्व आहे या सिद्धान्ताला कोणतीच निर्माण-कल्पना मानवत नसल्यानें, विश्वाच्या व ब्रह्माच्या रहस्याचा उलगडा समाधानकारक असा अद्यापि आमच्या विवेचनाच्या ओघांत आम्हांला सांपडला नाहीं असें कबूल करणें भाग आहे.

आमच्या समोरच्या कोड्याला समाधानकारक उत्तर अजून सांपडलें नाहीं, त्याअर्थीं आम्हीं मायेला जी कांहीं थोडी सत्यत कल्पित आहों ती चुकीची असण्याचा संभव आहे. माया मूलत: भ्रमरूप, तिचीं कार्यें मूलत: भ्रमरूप आहेत असें आम्हीं मानलें आहे. पण कांहींतरी कोणत्यातरी प्रकारची अल्पशी कां होईना सत्यता तिचे ठिकाणीं व तिच्या कार्याचे ठिकाणीं आम्हीं वर कल्पिलेली आहे; कदाचित् हें आमचें करणें चुकीचें असेल आणि म्हणून आमच्या कोड्याचें समाधानकारक उत्तर आम्हांला मिळत नसेल. माया आणि तिचीं कार्यें सर्वथा असत्य आहेत हा पक्ष आम्हीं घ्यावा आणि तिच्या कार्याच्या असत्यतेचें गूढ न विसरतां, या गूढतेच्या प्रश्नाचें उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा हें बरें : या गूढतेला तोंड देण्यांतच आमच्या कोड्याचें समाधानकारक उत्तर

पान क्र. २७२

 

मिळण्याचा संभव आहे. मायावादाच्या कांहीं उपपत्तींत, मायावादाचें समर्थन करणाऱ्या कांहीं विचारांत माया व तिचीं कार्यें सर्वथैव असत्य आहेत असा पक्ष घेतलेला दिसतो. या पक्षाचा प्रथम विचार करणें युक्त आहे. हा विचार झाल्यानंतर विश्वाचे ठिकाणीं सापेक्ष आंशिक सत्यता मानणाऱ्या दुसऱ्या उत्तरांचा विचार, त्यांची तपासणी निःसंकोचपणें करतां येईल. असा एक बुद्धिवाद आहे कीं, विश्वाचा भ्रम निर्माण कसा झाला, ब्रह्म हें एकमेव शुद्ध अस्तित्व असून त्याचे ठिकाणीं विश्व येऊन उभें कसें राहिलें हे प्रश्न अयोग्य आहेत. विश्व हें नाहींच, माया सत्य नाहींच, ब्रह्म हें एकच सत्य आहे, नित्य स्वयंभू सत्य आहे व म्हणून विश्वाचा प्रश्नच आमच्यासमोर नाहीं, मायेचा प्रश्न आमच्यासमोर नाहीं -- जें नाहींच त्याचा प्रश्न कसला ? ब्रह्म हें कोणत्याहि प्रकारच्या भ्रममय जाणिवेनें स्पर्शिलेलें नाहीं, त्याच्या कालातीत सत्यस्वरूपांत कसलेंहि विश्व उभें राहिलेलें नाहीं -- हा बुद्धिवाद प्रश्न टाळणारा आहे. या वादांत अर्थशून्य तर्कट आहे, शब्दशूर तर्काची कसरत आहे; आमच्या समोर जो बुचकळ्यांत पाडणारा खरा प्रश्न आहे तो दृष्टिआड करणें, त्याचें उत्तर शोधण्याचें टाळणें एवढाच उद्योग हा बुद्धिवाद शब्दांच्या आणि कल्पनांच्या गर्दीच्या आड लपून करीत आहे; हा बुद्धिवाद अर्थहीन न मानला तर त्यांत त्यालाच जड जाणारा अतिरेकी अर्थ आहे असें मानावें लागेल; कारण माया आणि ब्रह्म यांचा अर्थाअर्थीं संबंध नाहीं, मुळींहि संबंध नाहीं हें सांगण्यांत परिणामत: असें सांगितलें जातें कीं, माया ही स्वतंत्र परिपूर्ण असत्य वस्तु आहे आणि तिनें निर्माण केलेलें विश्व ही देखील तशीच असत्य वस्तु आहे. खरें विश्व अस्तित्वांत नाहीं असें ठरलें तर खोटें, आभासमय विश्व अस्तित्वांत आहे असें त्याबरोबर ठरतें; आणि आम्हांला सहजच पुढील प्रश्नांचा विचार करणें प्राप्त होतें; हें आभासमय विश्व अस्तित्वांत आलें कसें, हें अस्तित्वांत टिकून राहतें कसें, जी सत्यवस्तु ब्रह्म आहे तिच्याशीं या विश्वाचा काय संबंध आहे, तिच्याशीं याचा संबंध नसेल तर हा संबंधाचा अभाव कशा प्रकारचा आहे, आम्ही मायेच्या पोटांत अस्तित्वांत आहों या म्हणण्याचा अर्थ काय, मायेच्या अखंड भ्रमन्तीला आम्ही बांधलेले आहों, मायेच्या आधीन आम्ही आहों या म्हणण्याचा अर्थ काय, मायेच्या बंधनांतून आम्हीं मुक्त होतो म्हणजे काय होते ? या प्रश्नांचा विचार करणें आम्हांला क्रमप्राप्त आहे. कारण या पक्षा-

पान क्र. २७३

 

नुसार आम्हांला अशी कल्पना करावी लागते कीं, ब्रह्म हें मायेचा द्रष्टा, ज्ञाता नाहीं : माया ही ब्रह्मजाणिवेची अंगभूत अशी शक्ति नाहीं, ब्रह्म हें अतिचेतन पातळीवर, अतिमानसिक पातळीवर, अतिमानसिक जाणीव धारण करणारें आहे. स्वतःच्या शुद्ध अस्तित्वांत तें मग्न आहे. स्वतःच्या निरपेक्ष परिपूर्णतेची जाणीव एवढीच त्याची जाणीव आहे, मायेशीं त्याचा कांहींहि संबंध नाहीं, मायेशीं त्याला कांहीं कर्तव्य नाहीं; पण ब्रह्म आणि माया यांचा कांहींहि संबंध नसेल आणि ब्रह्म ही एकच वस्तु अस्तित्वांत असेल, तर माया ही आभास म्हणून देखील अस्तित्वांत येऊं शकत नाहीं, टिकूं शकत नाहीं; अर्थात् मायेचें अस्तित्व असेल तर असें मानावें लागेल कीं, ब्रह्म ही एक वस्तु आणि माया ही दुसरी स्वतंत्र वस्तु आहे; ब्रह्म ही केवळ स्वतःला जाणणारी अतिमानसिक जाणिवेची सत्यवस्तु आणि दुसरी माया ही भ्रमोत्पादक भ्रमरूप वस्तु, खोटें विश्व निर्माण करणारी आणि त्याचें ज्ञान धारण करणारी खोटी वस्तु. या सर्व काथ्याकूटाचा अर्थ असा आहे कीं, आम्हीं लांबच्या नागमोडी मार्गानें पहिल्याच ठिकाणीं येऊन पोचतों व आमच्या समोरचा विश्वाच्या उत्पत्तिस्थितीचा प्रश्न जसाच्या तसा न सुटलेला आमच्यासमोर आम्हांला सतावीत उभा रहातो. एक मार्ग या अडचणींतून सुटण्याचा आहे, तो हा कीं, सर्व तत्त्वज्ञान मायेच्या पोटांतच येतें, तेव्हां तें सर्व आभासमय आहे. अर्थात् प्रश्नांचा सुकाळ आणि निश्चित उत्तराचा अभाव हीच स्थिति कायमची असणार, असें म्हणून आम्हीं स्वस्थ बसावें, शुद्ध स्थितिशील अक्षर ब्रह्म आणि क्रियाशील भ्रमरूप वस्तु, आभासमय क्रियाशीलता -- दोन्हीं सर्वथा अन्योन्यविरोधी गोष्टी आमच्यासमोर आहेत आणि या दोहोंच्या पलीकडे त्यांचा समन्वय साधणारें, त्या दोहोंचें रहस्य स्वतःचे ठिकाणीं धारण करणारें आणि म्हणून त्यांची संगति लावूं शकणारे आणि त्यांचा विरोध मिटवूं शकणारें असे उच्चतर सत्य नाहीं. निदान आम्हांला असें सत्य ज्ञात नाहीं अशा आपत्तींत सांप्रत आम्ही आहों; आमच्या चर्चेनें आम्हांला येथवर आणलें आहे.

मायेचें ज्ञान ब्रह्माला होत नाहीं, ब्रह्म मायेचा ज्ञाता, द्रष्टा नव्हे, असें असेल तर व्यक्ति हा मायेचा ज्ञाता असेल, असला पाहिजे; पण हा ज्ञाता मायेनेंच निर्माण केला आहे आणि म्हणून असत्य आहे; ज्ञानविषय जें विश्व हेंहि मायाकृत आभास आहे, आभासकृत आभास आहे आणि अर्थात्‌च असत्य आहे; ज्ञानविषयाचें ज्ञान करून घेणारी जाणीव

पान क्र. २७४

 

हीहि आभासमय आहे आणि म्हणून असत्य आहे. खरें अस्तित्व व्यक्तिरूप ज्ञात्याला नाहीं, त्याच्या ज्ञान करून घेणाऱ्या जाणिवेला नाहीं, त्याच्या ज्ञानविषयाला (विश्वाला) नाहीं -- अशा वस्तुस्थितींत आमचें आत्मिक अस्तित्व, आमची मायेपासून मुक्ति, आमचें कालगत अस्तित्व, आमची मायामग्नता या सर्व गोष्टी सारख्याच अर्थशून्य ठरतात, सारख्याच असत्य आणि महत्त्वशून्य ठरतात. वरील कल्पनेंतील अतिरिक्त कठोरता टाकून थोडी सौम्य कल्पना अशी करतां येईल कीं, ब्रह्म हें ब्रह्म म्हणून मायेपासून नित्यमुक्त आहे पण ब्रह्म हें जेव्हां व्यक्तिरूपानें मायेचा द्रष्टा होतें, किंवा विश्वांतील सर्व अस्तित्वाचा आत्मा होतें, तेव्हां तें मायेंत प्रविष्ट असल्यानें, व्यक्तिगत मुक्तीसाठीं मायेपासून अलग होणें त्याला अवश्य असतें आणि हें अलग होण्याचें कार्य तें व्यक्तिगत ब्रह्म करूं शकतें, आणि ही मुक्त होण्याची क्रिया व्यक्तीला (व्यक्तिरूप ब्रह्माला) अत्यंत महत्त्वाची असते. पण या कल्पनेंत ब्रह्मावर दुहेरी अस्तित्व आरोपिलें जातें, आणि एका बाजूला विश्वमायेंतील व्यक्तीला, ब्रह्माच्या व्यक्तिरूपाला सत्यता बहाल केली जाते; (सर्वांचा आत्मा म्हणून जी मायेंत वावरणारी ब्रह्माची ''मूर्ति'' असते त्या मूर्तीला, विभूतीला मायेच्या दृश्याचें कांहींच बंधन नसतें.) व्यक्तिरूप ब्रह्म खरोखरीचें बंधन भोगीत असेल तरच त्याच्या मुक्तीला महत्त्व आहे; माया आणि तिचें विश्व खरें असेल तरच मायाबंधनाला खरेंपण येऊं शकेल (माया खोटी मानली तर तिचें बंधन खोटें आणि मग या खोट्या बंधनांतून मुक्त होणें या गोष्टीला कांहींच महत्त्व रहात नाहीं) तेव्हां या सौम्य कल्पनेंत मायेचें संपूर्ण मिथ्यात्व नाहींसे होतें आणि बरीच व्यापक सत्यता, व्यावहारिक कालनिष्ठ सत्यता मायेला बहाल करण्यांत येते. ही आपत्ति टाळण्यासाठीं असा पक्ष घेतां येईल कीं, आमचें व्यक्तित्व खोटेंच आहे, आमच्या या खोटया व्यक्तित्वांत ब्रह्माचें प्रतिबिंब आहे -- या आपल्या प्रतिबिंबापासून ब्रह्म अलग होतें, निवृत्त होतें -- अर्थात् त्यायोगें प्रतिबिंबाचा ब्रह्माचे ठिकाणीं लोप होतो आणि हा लोप म्हणजे त्याची मुक्ति. पण ब्रह्माला बंधनानें दुःख होत नाहीं, मुक्तीनें लाभ होत नाहीं -- तें सदा सर्वदा मुक्तच आहे; आणि जें केवळ प्रतिबिंब आहे त्याला मुक्तीची जरूर काय ? त्याला खरें बंधन होऊं शकत नाहीं, अर्थात् खरी मुक्ति त्याला घडत नाहीं. ब्रह्माचें जें प्रतिबिंब असतें तें जाणीवयुक्त असतें, आणि म्हणून त्याला खरें दुःख होतें

पान क्र. २७५

 

आणि मुक्तीनें खरें सुख होतें असा पक्ष घेतला, तर असा प्रश्न निर्माण होतो कीं, या खोट्या अस्तित्वांत (प्रतिबिंबांत) राहून ज्या जाणिवेला दुःख भोगावें लागते ती जाणीव कोणाची ? कारण खरी जाणीव केवळ एकच एक सद्‌वस्तूची आहे, ब्रह्माची आहे; तेव्हां शेवटीं ब्रह्माला दुहेरी जाणीव कल्पिली जाते, मायेपासून नित्यमुक्त असणारी एक जाणीव, आणि मायेनें बद्ध होणारी दुसरी जाणीव. अर्थात् या पक्षांत मायेंतील आमचें अस्तित्व आणि आमचा अनुभव याला कांहीं सत्यता बहाल केली जाते. आमचें अस्तित्व हें कांहीं प्रमाणांत ब्रह्माचेंच आहे, आमची जाणीव अंशतः त्याचीच आहे, असें असेल तर तितक्या प्रमाणात तितक्या अंशानें आमचें अस्तित्व आणि जाणीव सत्य आहेत, हें उघड आहे -- आणि आमचें अस्तित्व जर सत्य असेल तर विश्वाचें अस्तित्व सत्य कां नसावें ?

शेवटीं असा एक पक्ष संभवतो कीं, ज्ञाती व्यक्ति आणि ज्ञेय विश्व या वस्तू खोट्या आहेत पण ब्रह्मावर माया स्वतःला आरोपित करीत असल्यानें एक प्रकारची सत्यता मिळविते, आणि ही सत्यता व्यक्तीला -- आणि विश्व मायेंतील तिच्या अनुभवाला -- व्यक्ति या विश्वमायेंत आहे तोपर्यंत माया देत असते. येथें असा प्रश्न येतो कीं, अनुभव जो खरा असतो तो कोणाला खरा असतो, सत्यता जी लाभते ती कोणाला लाभते, आणि मुक्तीनें म्हणा, लोपानें म्हणा, निवृत्तीनें म्हणा ही सत्यता संपते ती कोणाची ? आभासरूप असत्य व्यक्ति सत्यता अंगीकारूं शकत नाहीं, सत्य बंधनाचें दुःख भोगूं शकत नाहीं, किंवा या बंधनांतून, सत्य असें पलायन करून किंवा सत्य असा आत्मलोप करून, मोकळी होऊं शकत नाहीं; सत्यतेचें अस्तित्व हें कोणातरी सत्य आत्म्याला, सत्य अस्तित्वालाच भासेल, प्रत्ययास येईल; पण मग हा सत्य आत्मा कोणत्यातरी प्रकारें, कोणत्यातरी प्रमाणांत माया (सत्यता अर्पिणारी माया) आपली स्वामिनी करून तिचा अंकित बनत असला पाहिजे, हा सत्य आत्मा ब्रह्माची जाणीव असला पाहिजे किंवा ब्रह्माचें अस्तित्व असला पाहिजे (कारण सत्यता तेथेंच आहे.) म्हणजे शेवटीं ब्रह्माची जाणीव, त्याचें अस्तित्व मायेंत प्रविष्ट होतें आणि तेथून निवृत्त होतें असें म्हणावें लागतें; आणि ब्रह्मावर स्वतःला आरोपित करणारी माया कोण आणि कोठून येते, हाहि मोठा प्रश्न आहे. माया ब्रह्मांतच असते, त्याच्या शाश्वत जाणिवेची माया ही एक क्रिया आहे, त्याची जाणीव मानसिक जाणिवेच्या वरच्या पातळीची, सत्यमय सत्यदर्शी आहे

पान क्र. २७६

 

आणि या जाणिवेचा एक व्यापार माया आहे असें मानलें तर मायेची उपपत्ति समजूं शकते; पण असें जर नसेल तर ब्रह्माखेरीज कोठें कांहीं नसतांना माया आली कोठून हा प्रश्न निरुत्तर करणारा ठरतो. ब्रह्म या एकमेव सत्य पुरुषोत्तमाची जाणीव किंवा त्याचें अस्तित्व मायेच्या परिणामांनीं प्रभावित होत असेल, सुखी दुःखी वगैरे होत असेल तरच मायेच्या फेऱ्यांना सत्यता येऊं शकेल, महत्त्व येऊं शकेल; नाहींतर मायेचा विश्वरूपी खेळ हा ब्रह्मानें आपल्या मनोरंजनासाठीं चालविलेला कालपटावरील खोट्या बाहुल्यांचा खेळ होईल. या चर्चेचा इत्यर्थ हा कीं, ब्रह्माला दुहेरी अस्तित्व, दुहेरी जाणीव आहे; एक अस्तित्व, जाणीव, मायातीत आणि दुसरें अस्तित्व, जाणीव, मायांकित, मायांतर्गत; तसेंच मायेलाहि कांहीं व्यावहारिक दर्शनी सत्य अस्तित्व आहे असा जुना पक्ष आम्हांला पुन्हां घ्यावा लागतो. आमच्या विश्वांतील अस्तित्वाचें योग्य स्पष्टीकरण, विश्व आणि आमचें अस्तित्व मिथ्या मानल्यास, सर्वथा असत्य मानल्यास, मिळूं शकत नाहीं. आमच्या अस्तित्वाची आणि विश्वाची सत्यता मर्यादित आंशिक अमौलिक दुय्यम प्रकारची असूं शकेल; पण तिचा सर्वथा अभाव मानल्यास आमचें विश्वांतील अस्तित्व हें कोडें न सुटणारें आहे, त्याला उत्तरच नाहीं, त्याला उत्तर असूं शकत नाहीं. माया ही मौलिक स्वयंभू आहे, विश्वव्यापी आहे, अनादि, मूलत: आधारशून्य आहे असा पक्ष घेतला तर या मायेला सत्यता कोठली असणार ? ब्रह्म हें एकमेव अद्वितीय सत्य असल्यानें त्याच्या आधाराशिवाय मायेला सत्यता प्राप्त होऊं शकत नाहीं. माया अनिर्वचनीय आहे, बुद्धीला अगम्य, बुद्धीहून वरची अशी गूढ गोष्ट आहे, एवढेंच अशा ''मौलिक'' मायेसंबंधानें म्हणतां येतें.

माया संपूर्णपणें असत्य आहे हा पक्ष टाकून तिला थोडेसें सत्यत्व दिलें, तर मात्र आमच्या पुढील कोड्याला दोन उत्तरें शक्य आहेत. उपनिषदांत सुषुप्ति आणि स्वप्न या अवस्थांतील निर्मितीची जी कहाणी आली आहे, त्या कहाणींतील निर्मिति म्हणजे आत्मगत भ्रमात्मक विश्वदर्शन असा अर्थ जर आपण घेऊं, तर आत्मगत भ्रमविषयक जाणीव ही ब्रह्माची, मूळ अस्तित्वाची, मूळ सद्‌वस्तूची जाणीव असते अशा कल्पनेच्या पक्षाला आधार, पाया आपल्याला मिळतो. उपनिषदांत असें विधान आहे कीं, ब्रह्म आत्मा या नात्यानें चार प्रकारचा, चार अवस्था अनुभवणारा असतो. आत्मा ब्रह्म आहे, सर्व जें आहे ते ब्रह्म आहे, आणि जें सर्व

पान क्र. २७७

 

आहे तें आत्मा आहे, पहाणारा आत्मा आहे. आत्म्याच्या चार अवस्था आहेत : या चार अवस्थांत आत्मा स्वत:ला पाहत असतो, या चार अवस्थांतील पहाणाऱ्या आत्म्याचा ज्ञानविषय, दर्शनविषय आत्मा म्हणजे सर्व जें आहे तें, असें उपनिषदाचें म्हणणें आहे. पहिली, शुद्ध आत्मस्थिति असतां ब्रह्माला जाणीव नेणीव (आमच्या परिचयाची, आमच्या कल्पनेची जाणीव नेणीव) कांहींहि नसते. ती अतिचेतन अवस्था आत्मअस्तित्वांत मग्न अशी अवस्था असते, ती आत्मशांतीची, आत्मसुखाची अवस्था असते, किंवा ती अतिचेतन सर्व-समावेशक सर्वाधार पण सर्वातीत (सर्वापासून अलिप्त, सर्वाच्या अर्थात् कशाच्याहि बंधनांत नसलेली अशी) अवस्था असते. दुसरी अवस्था सुषुप्त आत्मस्थिति : ही प्रकाशमय असते, या अवस्थेंत ब्रह्माची जाणीव घनरूप धारण करते, विश्वाच्या अस्तित्वाचा उदय येथून होतो, या गाढ झोंपेच्या अवस्थेंत सर्वसमर्थ ज्ञान व बुद्धि जागरुक असते; ही अवस्था विश्वाची बीजावस्था किंवा कारणावस्था आहे; ही सुषुप्त अवस्था भोगणारा आत्मा, दुसरी स्वप्नस्थिति भोगणारा आत्मा आणि तिसरी जागृति भोगणारा आत्मा -- या तीन आत्म्यांच्या अनुभवांचें क्षेत्र म्हणजे मायेचें एकंदर क्षेत्र. स्वप्नस्थ आत्मा सूक्ष्म आंतरिक किंवा अतिभौतिक अनुभवाचा संग्राहक, समावेशक असतो; जागृतींतील आत्मा सर्व भौतिक अनुभवाचा आधार असतो. गाढ झोंपेंतील मनुष्य स्वप्नस्थितींत येतो, तेथें स्वप्नें पहातो, स्वत:च रचलेल्या अस्थिर रचना -- नाम, रूप, संबंध, घटना आदि रचना -- स्वप्नांत पाहतो; जागृतींत येऊन स्वत:ला बाह्यरूपें देतो -- स्वप्नस्थ रूपांहून हीं रूपें, या बाह्य नामादि रचना अधिक टिकाऊ पण शेवटीं विनाशी अशा असतात. या रचना त्याची भौतिक जाणीव तयार करीत असते. ही जशी अहंरूप व्यक्तीची गोष्ट तशीच आत्म्याची गोष्ट असते : प्रज्ञानघन अशा घनीभूत जाणिवेच्या अवस्थेंतून आत्मा आंतरिक आत्मगत व बाह्य वास्तव विश्व अनुभवणाऱ्या अवस्थांत प्रवेश करीत असतो. आत्म्याची जागृति जी असते ती मात्र खरी जागृति नसते. विश्वकारण, विश्वबीज असलेल्या सुषुप्त अवस्थेंतून (घनीभूत जाणिवेच्या अवस्थेंतून) आत्मा जागृतींत येतो असें आम्ही म्हणतो, तेव्हां त्या जागृतीचा अर्थ, असा असतो कीं, स्वप्न-जाणिवेच्या आत्मगत सूक्ष्म पदार्थांचा अनुभव टाकून, त्याच्या भौतिक जाणिवेनें बनविलेल्या वस्तूंचा अनुभव -- त्या वस्तू स्थूल, बाह्य असून सत्य आहेत असा अनुभव -- आत्मा घेऊं लागतो.

पान क्र. २७८

 

आत्म्याची खरी जागृति ती कीं ज्या अवस्थेंत आत्मनिष्ठ जाणीव आणि अनात्म किंवा वस्तुनिष्ठ जाणीव, तशीच तिसरी घनीभूत प्रज्ञेची विश्वबीज असलेली अवस्था या तीनहि स्थिती टाकून, त्यांतून निवृत्त होऊन आत्मा सर्व प्रकारच्या जाणिवेपलीकडे अतिचेतन स्थितींत जातो. सर्व प्रकारची जाणीव, सर्व प्रकारची नेणीव म्हणजेच अतिचेतन अवस्था सोडून बाकीच्या तीन अवस्था हें मायेचें क्षेत्र होय. माया सत्यहि आहे आणि असत्यहि आहे असें वरील आत्मस्थितीच्या चार प्रकारांवरून म्हणतां येतें : माया ही अतिचेतन शाश्वत सत्याचा अनुभव घेणारी आत्म्याची अवस्था नसल्यानें असत्य आहे, पण बाकीच्या तीन अवस्थांत आत्म्याला आत्म्याचाच अनुभव येत असतो, म्हणून माया सत्य म्हटली पाहिजे. आत्म्याचा कांहीं अंश मायेंत प्रविष्ट होऊन तिच्या घटनांनीं प्रभावित होतो, तिच्या घटना हा अंशभूत आत्मा खऱ्या म्हणून घेतो, त्यांजवर विश्वास ठेवून वागतो, स्वत:च्या जाणीवयुक्त अस्तित्वांतून या घटना निघत असल्यानें त्या त्याला खऱ्या असतात, म्हणून माया सत्य आहे असें म्हणावें लागतें. येथें मूळ अस्तित्वाचे दोन स्वतंत्र तुकडे झालेले नसतात : एकाच अस्तित्वाच्या अनेक अवस्था असतात : येथें मूलत: दुहेरी जाणीवहि नसते, एक शुद्ध आत्मदर्शी जाणीव आणि दुसरी संकल्परूप जाणीव -- शून्यांतून भ्रमरूप, आभासमय वस्तु निर्माण करूं इच्छिणारी जाणीव -- असा प्रकार येथें नसतो : एकच आत्मा दोन जाणिवांचा असतो; एक अतिचेतन जाणीव आणि दुसरी सामान्य जाणीव. प्रत्येकीला तिच्या स्वभावानुसार आत्मानुभव येतो, आत्मानुभवाचें स्वरूप, प्रत्येकीचें वेगळें असतें; खालच्या, सामान्य जाणिवेच्या अवस्था सत्य असल्या, तरी त्या अवस्थांत आत्मगत आंतरिक आत्मरचना -- मूळ सत्याची सत्यता नसणाऱ्या रचना -- रचल्या जातात व पाहिल्या जातात. या अवस्थांत एकच एक आत्मा स्वत:ला अनेक झालेला पाहतो, पण हें अनेकत्व आत्मगत आंतरिक असतें, आत्म्याला जाणिवेच्या अनेक अवस्था असल्या तरी त्या सर्व आत्मगत आंतरिक असतात; खऱ्या आत्म्याचा खरा आंतरिक अनुभव येथें असतो, पण बाह्य वास्तव विश्व येथें असत नाहीं.

ही गोष्ट येथें नमूद करणें योग्य आहे कीं, आत्म्याची सुषुप्तादि अवस्थात्रयी मायिक आहे, मायेची करणी आहे असें उपनिषदांत कोठेंहि म्हटलेलें नाहीं. असें मात्र वेळोवेळीं म्हटलेलें आढळतें कीं, हें जें आहे तें

पान क्र. २७९

 

सर्व -- हें विश्व जें मायाकृत असल्याचें सध्यां आम्हीं धरून चाललों आहों तें विश्व-ब्रह्म आहे, मूळ एकमेव सत्य आहे. या सर्वभूतांचें रूप ब्रह्म स्वत: घेतें; आत्म्याचे (ब्रह्माचे) ठिकाणीं सर्व भूतें आहेत असा प्रत्यय घ्यावा, सर्व भूतांचें ठिकाणीं ब्रह्म आहे असा प्रत्यय घ्यावा, हीं सर्व भूतें ब्रह्मच आहेत अशी दृष्टि असावी -- कारण आत्मा ब्रह्म आहे एवढेंच नव्हे तर आत्मा सर्व आहे, जें सर्व आहे तें ब्रह्म आहे, सत्य आहे. उपनिषदांतील हीं जोरदार विधानें भ्रमरूप मायेला कांहीं स्थान ठेवीत नाहींत. पण अशींहि आग्रही विधानें आहेत कीं, अनुभव घेणाऱ्या आत्म्याखेरीज, त्याहून वेगळें स्वतंत्र असें दुसरें कांहींहि अस्तित्वांत नाहीं; जाणिवेच्या एका अवस्थेला सुषुप्ति आणि एकीला स्वप्न हें नांव देऊन त्यांचें तसें केलेलें वर्णन व वरील विधानें, या गोष्टीकडे लक्ष दिलें म्हणजे सत्य सार्वत्रिक आहे, ब्रह्म सर्व कांहीं आहे या प्रकारच्या विधानावरील जोरदार निष्ठा कमी होते, नाहींशी होते, या विधानांचा जोरदारपणा संपुष्टांत येतो; द्रष्ट्याखेरीज कांहीं अस्तित्वांत नाहीं अशा सारखीं विधानें मायेची कल्पना उभी व्हावयास मदत करतात, या विधानांच्या पायावर मायेची कठोर सर्वंकष उपपत्ति उभी केली गेली आहे. उपनिषदांत वर्णिलेल्या आत्म्याच्या चार अवस्थांचा (जागृति, स्वप्न, सुषुप्ति आणि चौथी अद्वैत) सूक्ष्म विचार केला, तर आपली विश्वविषयक जी दृष्टि असेल त्या दृष्टीनुसार आपणांला त्यांत मायिक सृष्टीची शक्य, संभाव्य पद्धति, प्रक्रिया दिसेल किंवा निर्मितिशील आत्मज्ञानाची आणि सर्व-ज्ञानाची प्रक्रिया, अ-मायिक निर्मितीची प्रक्रिया दिसेल. आत्मा प्रथम अद्वैत स्थितींत, विषयविषयीशून्य अतिचेतन स्थितींत असतो, तेथून तो प्रकाशमय घनीभूत जाणिवेच्या समाधिस्थितींत येतो, या स्थितींतून तो आत्ममग्न जाणिवेच्या स्थितींत आणि तेथून बाह्यलग्न जाणिवेच्या स्थितींत जातो. मांडुक्य उपनिषदांतील चार अवस्थांच्या वर्णनाचा अर्थ, तें वर्णन अलंकारिक आहे असें धरून वरील प्रकारें लावतां येतो; आणि असा अर्थ लावला म्हणजे वर सांगितल्याप्रमाणें आपल्या दृष्टीनुसार त्या औपनिषदिक वर्णनांत निर्मितीची मायिक किंवा अ-मायिक प्रक्रिया आढळून येते.

औपनिषदिक वर्णनांत सुषुप्त आत्म्याला प्राज्ञ,1 स्वप्नस्थ आत्म्याला

-------------------------

1 प्राज्ञ : बृहदारण्यक उपनिषदांत याज्ञवल्क्य असें स्पष्टपणें म्हणतो कीं, पुरुषाला दोन स्थानें आहेत; ही दोन स्थानें म्हणजे दोन विश्वें होत. स्वप्नस्थितीमध्यें पुरुषाला हीं दोन्हीं विश्वें दिसूं शकतात; कारण स्वप्नस्थिति ही या दोन स्थानांच्या मध्यें असणारी स्थिति आहे; स्वप्नस्थान वरील दोन स्थानांना जोडणारें स्थान आहे. या विधानावरून हें स्पष्ट आहे कीं, दर्शनी स्वप्नाविषयी बोलतांना याज्ञवक्य वस्तुत: तलवर्ती जाणिवेविषयीं बोलत आहे : जाणिवेची तलवर्ती अवस्था अशी असते कीं, तेथें भौतिक आणि अतिभौतिक दोन्हीं विश्वांतील गोष्टी भेटतात; स्वप्नशून्य सुषुप्तीचें जें वर्णन आहे, तें गाढ झोपेला लागूं होतें तसें समाधीलाहि लागूं होते; या दोन्हीं अवस्थांत पुरुष जाणिवेच्या घनीभूत अवस्थेंत जातो; या अवस्थेंत अस्तित्वाच्या सर्व शक्ती असतात, पण त्या सर्व स्वकेंद्रित, स्वतांत मग्न अशा असतात; या शक्ती क्रियाशील होतात, तेव्हां अशी जाणीव उदय पावते कीं, ''सर्व मीच आत्मा आहे''. हें उघड आहे कीं, जाणिवेची ही स्थिति आत्म्याच्या उच्च स्थानांवर आम्हांला नेणारी आहे, आत्म्याच्या उच्च, उच्चतर पातळ्यांवर आमचा प्रवेश करून देणारी आहे; या पातळ्या, हीं स्थानें सामान्यत: आमच्या जागृतींतील जाणिवेच्या पलीकडे असतात. त्यांना अतिमानसिक, अतिचेतन अशीं नांवें आहेत.

पान क्र. २८०

 

सूक्ष्माचा भोक्ता द्रष्टा, जागृत आत्म्याला स्थूल भौतिक अस्तित्वाचा भोक्ता, द्रष्टा म्हटलें आहे; या वर्णनांतील सुषुप्ति आणि स्वप्न ही नांवें अलंकारिक असून, त्या नांवांनीं जागृतीच्या पलीकडील पाठीमागील अतिचेतन आणि तलवर्ती अस्तित्वाच्या अवस्था दाखवल्या जातात असें म्हणावयास जागा आहे : सामान्यत: स्वप्न आणि सुषुप्ति किंवा समाधि  (कारण समाधीला एक प्रकारची स्वप्नाची किंवा सुषुप्तीची अवस्था म्हणतां येईल.) यांच्या द्वारांच, पृष्ठभागीय (जागृतींतील) मानसिक जाणीव बाह्य वस्तुजातांचें ग्रहणकार्य टाकून, आतील तलवर्ती जाणिवेचें (Subliminal) किंवा उच्च अतिमानस अथवा अधिमानस जाणिवेचें रूप घेऊं शकते. म्हणून सुषुप्ति व स्वप्न हीं नांवें वर लिहिल्याप्रमाणें अनुक्रमें अतिचेतन (अतिमानसिक) आणि तलवर्ती अवस्था दर्शविण्यासाठीं वापरली आहेत असें म्हणतां येतें. बाह्यग्राहक जाणीव आंत जाऊन तलवर्ती जाणीव झाली म्हणजे तिला अतिभौतिक वास्तव गोष्टी स्वप्नकृतींच्या रूपानें, स्वप्नदृश्यांच्या मिषानें दिसतात; ती उच्च अतिमानसिक जाणीव झाली तर स्वतःला ती घनरूप जाणिवेंत विलीन करते, ती घनरूप जाणीव होते -- विचार, प्रतिमा कांहींहि या घनीभूत

पान क्र. २८१

 

अवस्थेंत ती ग्रहण करूं शकत नाहीं. या तलवर्ती आणि अतिचेतन अवस्था अगोदर अनुभवून नंतरच आम्हांला सर्वोच्च आत्मस्थिति, परात्पर अशी अतिचेतन अवस्था प्राप्त करून घेतां येते. आत्म्याच्या या उच्च अवस्थांकडे, स्वप्न किंवा सुषुप्ति यांच्या तंद्रींतून (समाधींतून) प्रवास न करतां आम्हीं जर हा प्रवास आध्यात्मिक जागृतीच्या द्वारां केला, तर त्या सर्व उच्च अवस्थांत आम्हांला निरपवादपणें होणारी एक जाणीव म्हणजे एकमेव ब्रह्म सर्वत्र आहे ही होय; या प्रवासांत भ्रमरूप, भ्रमोत्पादक मायेची प्रतीति होतेच असें नाहीं; एवढाच अनुभव येतो कीं, आम्हीं मनाच्या क्षेत्रांतून मनाच्या पलीकडे असलेल्या जाणिवेच्या क्षेत्रांत गेलों आहों, आणि तेथें, मनानें रचलेलें आमचें विश्वविषयक चित्र निकामीं आहे; मनाच्या अज्ञानमिश्रित ज्ञानानें रचलेल्या चित्राऐवजीं दुसरें सत्यचित्र त्या उच्च क्षेत्रांत आमच्या जाणिवेचा विषय होत असतें. हें उच्च स्थानांतर यशस्वीपणें झाल्यास, अस्तित्वाच्या सर्व अवस्थांचें ज्ञान एकाच वेळीं आम्हांला होऊं शकतें, सर्व प्रकारची आत्मस्थिति आम्ही जागृत जाणिवेनें एकाच वेळीं भोगूं शकतों, सर्व अवस्था अन्योन्यसुसंवादीं, ऐक्यपूर्ण अशा आमच्या अनुभवास एकाच वेळीं येऊं शकतात, आणि ब्रह्म हें सर्वत्र प्रतीतीस येऊं शकतें. पण, एकांगी एकाग्रतेनें आम्ही सुषुप्तीच्या गूढदर्शी तंद्रींत गेलों, किंवा जागेपणीं एकदम अतिचेतनाच्या एखाद्या अवस्थेंत गेलों, तर या प्रवासांत मनाला विश्वशक्ति आभासमय आहे, तिचीं कार्यें असत्य आहेत असें वाटूं शकतें; हे आभास विचारानें स्वत:पुरते दूर करून मन श्रेष्ठ अशा अतिचेतन अवस्थेचा आश्रय करते. माया विश्वाची जननी आहे ही जी कल्पना आहे, तिचें आध्यात्मिक समर्थन मनाच्या या अनुभवांत आहे; पण या अनुभवांहून वेगळा अधिक पूर्ण व्यापक अनुभवहि मनाला वेगळ्या प्रक्रियेनें येऊं शकतो म्हणून विश्वाची जननी माया आहे हा सिद्धान्त अखेरचा होऊं शकत नाहीं.

मायेच्या स्वरूपासंबंधानें जे सिद्धान्त आतांपावेतों प्रतिपादले गेले आहेत, ते सर्व असमाधानकारक आहेत; कारण त्यांत अपरिहार्यता, अनिवार्यता हा गुण नाहीं. मायावाद तेव्हांच मान्य करतां येईल जेव्हां त्यावांचून अन्य उत्तर विश्वाच्या प्रश्नाला नाहींच असें सिद्ध होईल; शाश्वत मूळ सद्‌वस्तु जें ब्रह्म त्याचें सत्य स्वरूप जें गृहीत केलें गेलें आहे, आणि विश्वरूप मायेचें जें तद्विरोधी स्वरूप मान्य केलें गेले आहे, त्या दोन स्वरूपांच्या मध्यें मोठी खिंड आहे; ही खिंड मायेसंबंधींच्या कोणत्याहि

पान क्र. २८२

 

उपपत्तीनें भरून निघत नाहीं, या खिंडीवर पुलासारखी होऊन, दोन विरोधी स्वरूपांना जोडणारी अशी मायेची उपपत्ति अद्यापि आमच्या पुढें आलेली नाहीं. विश्व, माया आणि ब्रह्म या विरोधी वस्तू सह-अस्तित्वानें असूं शकतात, हें सह-अस्तित्व बुद्धीला समजण्यासारखें आहे, कल्पितां येण्यासारखें आहे, इतकें फारतर मायेची सर्वश्रेष्ठ उपपत्ति आम्हांला पटवूं शकते; पण हीच उपपत्ति बुद्धीनें मान्य केली पाहिजे अशी आमची खात्री करून देण्यासारखा तर्काचा जोर या उपपत्तींत नाहीं. विश्वमायेची उपपत्ति ही मूळ विरोधाचा गूढ प्रश्न, त्या प्रश्नाला दुसरें उत्तर शक्य असतांहि, ज्या प्रश्नाला उत्तर मिळण्यासारखें नाहीं असा दुसरा नवा गूढ प्रश्न निर्माण करून कसा सोडविते तें पहा : आम्हांला अनुभव असा असतो किंवा आमची कल्पना अशी असते कीं, एक केवल सत्यवस्तु आहे, जी नित्य एकच एक असते, जी विश्वातीत आहे, स्थिर, निश्चल, अक्षर आहे, जिच्यांत बदल होऊं शकत नाहीं; स्वतःच्या शुद्ध अस्तित्वाची जिला आत्मगत जाणीव आहे -- अशा एकमेव सत्य वस्तूच्या अनुभवाबरोबर किंवा कल्पनेबरोबर आमच्या समोर एक दृश्य उभें असतें : विश्व, क्रियासाधनसंभार, गति, बदल होण्याची पात्रता, मूळ शुद्ध अस्तित्वाची त्यांत फेरबदल होऊन निर्माण झालेलीं रूपें, भेद, अनंत अमर्याद वस्तुसंभार, मूळ एक वस्तु आणि अनंत वस्तूंचें दृश्य इत्यादि प्रकारांत विरोधाचें, अंतर्गत विरोधाचें दर्शन घडतें अशी कल्पना करून, दृश्य हें नित्यभ्रमरूप आहे असें म्हणून मायावादी दृश्याची वाट लावतो. पण असें करण्यांत काय होतें ? दृश्य खरें मानण्यानें एकच एक मूळ वस्तूला एकत्व आणि अनेकत्व असें दुहेरी अस्तित्व (दोन अन्योन्य-विरोधी अस्तित्वें) मान्य करावें लागतें, ही आपत्ति समजून मायावाद दृश्याला ''भ्रम'' म्हणून असत्यांत ढकलतो आणि असें करतांना एकच एक वस्तूला दुहेरी जाणीव -- अन्योन्यविरोधी दोन जाणिवा -- बहाल करतो. एक अंतर्विरोध दुसऱ्या अंतर्विरोधांनें नाहींसा करण्याचा हा प्रयत्न आहे. मूळ एक निराकार अदृश्य सत्य वस्तु आहे आणि साकार होऊन दृश्य होतांना ती अनेक वस्तूंच्या, अनेक सत्य वस्तूंच्या रूपानें दिसतें असें मूळ अंतर्विरोधांत मानण्यांत येतें. मूळ वस्तूची साकारता, दृश्यता, अनेकता मिथ्या ठरवून हा अंतर्विरोध मायावाद दूर करतो -- पण असें करण्यांत मूळ सत्य जाणीवयुक्त सद्‌वस्तु आपलें एकत्व ओळखणाऱ्या सत्य जाणीवशक्तीबरोबर दुसरी खोटी अनेकता निर्माण करणारी, खोटी जाणीवशक्ति

पान क्र. २८३

 

बाळगून असते असा तिजवर आरोप करून पहिल्या अंतर्विरोधापेक्षां कठीण अंतर्विरोध मायावाद उभा करतो. मायावादानुसार मूळ एकच एक ब्रह्म स्वत:च्या शुद्ध एकरस अस्तित्वाची जाणीव नित्य बाळगून असतें, पण या जाणिवेबरोबर स्वत:तून आभासमय रचना निर्माण करणारी कल्पनाहि नित्य बाळगून असतें : या आभासमय रचनेंत अनेक असंख्य अनंत अज्ञानी दु:खी जीव आभासमय विश्वाला सत्य मानणारे असतात. या जीवांना आत्मज्ञान नसते; यांतून एक जीव आत्मज्ञान मिळवून अज्ञानाच्या निद्रेंतून जागा होतो आणि आपलें मिथ्या दु:खी जीवत्व-व्यक्तित्व मायेचें मायेंत टाकून देऊन, आपलें खरें आत्मस्वरूप धारण करतो, ब्रह्मरूप होतो. प्रत्येक जीवाला असेंच केव्हांतरी व्यक्तिश: जागें व्हावें लागतें आणि आपलें व्यक्तित्व टाकावें लागतें.

मायावाद एक कोडें सोडविण्यासाठीं दुसरें अधिक अवघड कोडें उभें करतो हें पाहून असा संशय येणें सहाजिकच आहे कीं, ज्या मूळ पूर्वविधानांतून मायावादाचें कोडें निर्माण होतें, तें पूर्वविधान अपुरें विधान असावें; कांहींतरी कोठेंतरी त्या विधानांत अपुरेंपणा असावा, चूक नव्हे. तें विधान संपूर्ण नसून पायाभूत प्राथमिक विधान असावें. मूळ सद्वस्तूसंबंधानें, ब्रह्मासंबंधानें संपूर्ण विधान असें करतां येईल कीं, ब्रह्म हें नित्य एक स्थिर, शुद्ध अस्तित्व, रूपान्तरसंभवहीन तत्त्व या मूळ स्वरूपाचें असून, नित्य क्रियाशीलता, गति, अमर्याद अनेकता आणि विविधता या त्याच्या दुसऱ्या स्वरूपाला तें पहिल्या स्वरूपाचा कायमचा आधार देत आहे. ब्रह्माची रूपान्तरसंभवहीन एकता व गतिशून्य स्थिति स्वत:मधून क्रियाशीलता, गति आणि अनेकता उदयास आणते : क्रियाशीलतादि गोष्टी ब्रह्माची नित्य अमर्याद एकता नष्ट करीत नसून, तिला स्पष्टता व उठावदार स्वरूप देतात. मायावादानुसार ब्रह्माची जाणीव सक्रिय व अक्रिय, दोन वा अधिक, अनेक रूपें जर घेऊं शकतें, तर ब्रह्माचें अस्तित्व दोन किंवा अनेक रूपें घेण्यास असमर्थ आहे असा आग्रह मायावादानें किंवा कोणीहि कां धरावा तें समजत नाहीं -- तर्कबुद्धीच्या दृष्टीला ही असमर्थता असमर्थनीय आहे. याप्रमाणें ब्रह्माच्या अस्तित्वाला अनेक रूपें घेतां येतात असें ठरलें म्हणजे विश्वजाणीव ही निर्मायक भ्रमस्वरूप दिसणार नाहीं, तर ब्रह्माच्या अंगभूत विशिष्ट सत्याचा अनुभव हें या जाणिवेचें स्वरूप आहे असें दिसेल. विश्व-दृश्याचें हें स्पष्टीकरण निदान मायावादांतील विश्वाच्या स्पष्टीकरणाइतकें

पान क्र. २८४

 

तर्कशुद्ध आहे, आणि त्या वादापेक्षां अधिक व्यापक, अध्यात्मदृष्ट्या अधिक फलसंभार देण्यासारखें आहे; आम्हांला आत्मविषयक ज्ञानांत एकत्व आणि अनेकत्व, अक्रियत्व आणि सक्रियत्व इत्यादि अनुभवास येणाऱ्या जोड्यांचा समन्वय या स्पष्टीकरणांत समाधानकारक रीतीनें केला गेला आहे; मायावादापेक्षां या स्पष्टीकरणांत वरील जोड्या अधिक सुसंवादानें एकत्र नांदण्याची व्यवस्था आहे.

विश्वदृश्याचें जें समाधानकारक स्पष्टीकरण आपल्या समोर आहे तें शंकराचार्यांच्या विशिष्ट मायावादाला जवळ आहे. शुद्ध मायावाद फार गोंधळांत टाकणारा असल्यानें, विश्वदृश्याचा उलगडा मांडुक्यांतील ''आत्म्याच्या चार अवस्था'' ज्या सौम्य आंशिक मायावादानें करतात तो आंशिक मिश्र मायावाद आपण पाहिला. माया हा विश्वाचा पाया धरून, शुद्ध मायावाद सोडल्यास मांडुक्यांतर्गत सौम्य मिश्र मायावाद हें जसें एक उत्तर विश्वाच्या प्रश्नाला देतां येतें, तसें दुसरें उत्तर शंकराचार्यांच्या विशिष्ट मायावादानें देतां येतें. शंकराचार्यांच्या उत्तरांत खूप जोरदारपणा आणि व्यापकपणा आहे; या गुणांमुळें या उत्तराचा मनावर खूप प्रभाव पडतो. शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानांत मायेला विशिष्ट विशेषयुक्त सोपाधिक सत्यता सशर्त कल्पिली आहे; माया अनिर्वचनीय गूढ वस्तु आहे असें जरी शंकराचार्य म्हणतात, तरी आम्हांला बेचैन करणाऱ्या विरोधाचा बुद्धिगम्य उलगडा ते देतात; हा उलगडा प्रथमदर्शनीं पूर्ण समाधानकारक वाटतो. विश्व सत्य आहे अशी जी जोरदार आणि अखंड बुद्धि आमचे ठिकाणीं अनुभवास येते, तसेंच जीवन आणि सर्व दृश्य घटना फलशून्य, बलहीन, दंभयुक्त, अर्थहीन, क्षणिक, एक प्रकारें मिथ्या आहेत असा जो अनुभव आम्हांला येतो, त्या अनुभवांचे मुळाशीं काय आहे ते शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानांत सांगितलें आहे : या तत्त्वज्ञानांत सत्याचे दोन वर्ग कल्पिले आहेत. पारमार्थिक व्यवहारातीत आणि व्यावहारिक, निरुपाधिक आणि सोपाधिक, कालातीत आणि कालव्याप्त असे ते दोन वर्ग आहेत : ब्रह्माचें शुद्ध अस्तित्व पहिल्या वर्गांत पडतें, तें निरुपाधिक विश्वातीत कालातीत सत्य आहे; मायांकित ब्रह्म हें दुसऱ्या वर्गांत पडतें; तें विश्वगत, कालव्याप्त सोपाधिक सत्य आहे. या मांडणीत आम्हांला आणि विश्वाला सत्यता लाभली आहे; कारण व्यक्तिरूप आत्मा हा वस्तुत: ब्रह्मच आहे; मायेच्या क्षेत्रांत व्यक्तिरूपानें मायेचा अंकित म्हणून दृश्य पसाऱ्यांत वावरणारा पुरुष, आत्मा हा वस्तुत:

पान क्र. २८५

 

ब्रह्म असतो, या मायादास्य करणाऱ्या सोपाधिक कालव्याप्त जीवाला आपल्या कालातीत विशुद्ध स्वरूपांत ब्रह्म शेवटीं प्रविष्ट करवून मुक्त करतें. सोपाधिक सत्यांच्या कालव्याप्त क्षेत्रांत ब्रह्म सर्व वस्तु झालें आहे. कालातीत ब्रह्म विश्वात्मा आणि वैयक्तिक आत्मा झालें आहे हा आपला अनुभव खरा मानण्यांत येतो; मायेंतून मुक्त होण्याचा टप्पा म्हणजे वरील अनुभव होत अशी वस्तुत: शांकर तत्त्वज्ञानाची मांडणी आहे. विश्वविषयक अनुभव आमच्या कालव्याप्त जाणिवेला येतात ते खरे असतात, विश्व हें या जाणिवेला खरें असतें आणि ही जाणीव स्वत: खोटी नसून खरी आहे. खरेपणाच्या, सत्यतेच्या या कथेनंतर प्रश्न उभा रहातो तो या सत्यतेच्या स्वरूपाचा आणि व्याप्तीचा. विश्व आणि आम्ही या वस्तू खालच्या वर्गाचीं परंतु सर्वथा खरीं सत्यें मानतां येतील; अंशत: सत्य अंशत: असत्य अशा मिश्र सत्यांच्या वर्गांत या वस्तू टाकतां येतील; किंवा असत्य सत्यांच्या वर्गांत त्यांना स्थान देतां येईल. जर आम्ही आणि विश्व खऱ्या वस्तू असूं तर मायेच्या उपपत्तीला कांहीं स्थान रहात नाहीं; भ्रमरूप निर्मिति, आभासविश्व कोठेंच नसल्यानें मायेच्या सिद्धान्ताची आवश्यकताच नाहीं. अंशत: सत्य, अंशत: असत्य असें जर आम्ही आणि आमचें विश्व असलों तर ही मिश्र सत्यता किंवा मिश्र असत्यता आम्हांला अनुभवास येण्याचें कारण शोधलें पाहिजे. हें कारण विश्वात्म्याच्या आत्मजाणिवेंत असेल, त्या जाणिवेंत कांहीं चूक होत असेल; हें कारण आम्हां स्वत:कडे आणि विश्वाकडे बघण्याच्या आमच्या दृष्टींत असेल, या दृष्टींत कांहीं चूक असेल आणि या चुकीमुळें अस्तित्वाच्या संबंधांत, ज्ञानाच्या संबंधांत, अस्तित्वाच्या क्रियासिद्धीच्या संबंधांत चुका होऊं शकत असतील. पण आमच्या किंवा विश्वात्म्याच्या चुकीला अज्ञान किंवा ज्ञान-अज्ञान मिश्रण कारण असणार; आणि या पक्षीं मूळ विश्वभ्रम हा कांहीं स्पष्टीकरणासाठीं प्रश्न असणार नाहीं, तर स्पष्टीकरण या गोष्टीचें द्यावें लागेल कीं, अनाद्यनंत सनातन ब्रह्माची निर्मितीशील जाणीव किंवा त्याचें गतियुक्त क्रियायुक्तत्व यांचा व्यापार चालूं असतां मध्यें अज्ञान कोठून आलें ? पण जर तिसरा पक्ष घेतला आणि आम्हीं व विश्व असत्य सत्याच्या वर्गांत घातलें गेलों तर मात्र आपत्ति उत्पन्न होते : असत्य सत्य याचा अर्थ विश्व आणि आम्ही, अज्ञानांत आहों तोपर्यंत सत्य; खरें ज्ञान आम्हांला झालें कीं विश्व आणि आम्ही असत्य. खरें ज्ञान विश्वातीत, व्यवहारातीत जाणिवेचें. तेथें एकच एक एकरस

पान क्र. २८६

 

अस्तित्व मात्र सत्य -- विश्वादि सर्व असत्य. या पक्षीं एकदां सत्य म्हणून मान्य केलेलें आम्हांसह विश्व (मायाक्षेत्रांत ही मान्यता मिळते) नेहमीं सत्य राहत नाहीं -- मायेचें क्षेत्र ओलांडलें, निर्माय ब्रह्माचें क्षेत्र आलें कीं हें सत्य असत्य होतें. माया, आम्ही आणि विश्व तीनहि वस्तू अज्ञानाच्या (मायेच्या) क्षेत्रांत खऱ्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रांत खोट्या असा हा पक्ष आहे.

ही गोष्ट बुद्धीला पटण्यास अवघड आहे कीं, आम्ही आणि विश्व या वस्तूंना सत्यता, कोणत्या तरी प्रकारची सत्यता आहे असें एकदां मान्य केलें, तरी ती सत्यता तिच्या मर्यादित क्षेत्रांतहि कायमची सत्य राहत नाहीं. जें व्यक्त होत आहे तें ब्रह्म महान् व्यापक सत्य आहे आणि त्याची अभिव्यक्ति म्हणून जी आहे, ती तिच्या पृष्ठभागाकडे पाहतां, ब्रह्माहून पुष्कळ मर्यादित असें सत्य आहे ही गोष्ट मान्य करतां येईल. आमचें विश्व हें ब्रह्माच्या अभिव्यक्त सुसंगत रूपांपैकीं एक रूप आहे, या अभिव्यक्त रूपाचें तत्त्वसार सोडलें, तर बाकीचें रूप संपूर्ण सत्य नाहीं हें मान्य करावयास हरकत नाहीं -- पण तें संपूर्ण सत्य नाहीं, एवढ्या करितांच तें असत्य आहे म्हणून बाजूला ढकलणें समर्थनीय आहे असें वाटत नाहीं. हीहि गोष्ट खरी आहे कीं, मन स्वतःपासून आणि स्वत: उभ्या केलेल्या रचनांपासून निवृत्त झालें म्हणजे विश्व असत्य आहे असें त्याला वाटतें, पण मनाला असें वाटण्याचें कारण तें अज्ञानाचें साधनभूत यंत्र आहे हें आहे; हें असें मन जेव्हां स्वतःच्या रचनांपासून निवृत्त होतें, त्यानें रेखाटलेलें विश्वाचें अज्ञानसुलभ आणि सदोष चित्र जेव्हां तें बाजूला सारतें, पाठीमागें टाकतें, तेव्हां सहजच त्याला अशी प्रबल भावना होतें कीं, त्यानें रेखाटलेलें चित्र खऱ्या विश्वाचें चित्र नव्हे, तर त्यानें स्वत: अंतरांत केलेल्या निराधार कल्पनांचें चित्र आहे; केवळ मिथ्या रूपांचें चित्र आहे; त्याचें स्वतःचें अज्ञान आणि सर्वश्रेष्ठ सत्य आणि ज्ञान यांमधील अंतर एवढें मोठें असतें कीं, विश्वातीत सत्य आणि विश्वसत्य यांच्यामधील खरा संबंध शोधून काढण्याची पात्रता त्याचे ठिकाणीं असत नाहीं, अर्थात् त्याला तो संबंध सांपडत नाहीं, प्रतीत होत नाहीं. मनापेक्षां जी जाणीव श्रेष्ठ आहे, उच्च पातळीवरची आहे, त्या जाणिवेला, मनानें ही जाणीव प्राप्त करून घेतली म्हणजे त्या मनाला, विश्वातीत सत्य आणि विश्वसत्य यांच्यामधील संबंध सांपडतो आणि मग विश्वाची असत्यता मागें पडते, मायेची उपपत्ति अनावश्यक

पान क्र. २८७

 

होते, गैरलागू होते. श्रेष्ठांत श्रेष्ठ जाणीव विश्वाकडे बिलकूल पाहत नाहीं, किंवा पाहत असली तर ती एक काल्पनिक मिथ्या रचना आहे असें मानते आणि तिचें स्वत:चेंच आत्मरूप जें कालप्रतिष्ठ आहे, त्या आत्मरूपाला मात्र ही खोटी रचना खरी वाटते आणि तें आत्मरूप ही विश्वरचना खरी म्हणून सर्व व्यवहार करते -- इत्यादि कथा सत्यकथा म्हणजे अंतिम सत्याची कथा असूं शकत नाहीं; अर्थात् मायावाद हें अखेरचें सत्य असूं शकत नाहीं. विश्व अस्तित्वांत येणें किंवा टिकणें ही गोष्ट विश्वातीत सत्यावर, ब्रह्मावर सर्वथा अवलंबून आहे, कालातीत सनातन ब्रह्माला कालाधिष्ठित ब्रह्माचें कांहींतरी महत्त्व भासत असलेंच पाहिजे, त्याचा कांहींतरी उपयोग त्याला असलाच पाहिजे; असें नसेल तर वस्तुजाताच्या अंतरंगांत आत्मा म्हणून, चैतन्य म्हणून कांहीं नाहीं असें होईल आणि मग कालांकित अस्तित्वाला कांहीं आधार नसल्यानें तें अस्तित्व असूंच शकणार नाहीं.

विश्वाला असत्य म्हणण्याचें दुसरें कारण असें दाखविलें जातें कीं, तें केव्हांतरी नष्ट होणार आहे, विश्व म्हणजे निराकार अविनाशी ब्रह्मावर आरोपिलेलें साकार विनाशी रूप असल्यानें त्याला शेवटीं असत्यता चिकटतेच चिकटते. मृत्तिका आणि घट यांचें उदाहरण देऊन, विश्वाच्या असत्यत्वाचे समर्थन केलें जात असतें; मृत्तिका ही सत्य आणि घटादि तिचे बनलेले आकार नश्वर असल्यानें असत्य आहेत -- घटादि आकार भग्न झाले कीं मूळ सत्यांत, मृत्तिकेंत ते विलीन होतात. पण हें उदाहरण जरा बारकाईनें तपासलें तर घटाच्या असत्यत्वाचे तें समर्थन करीत नसून, त्याच्या सत्यत्वाचेंच तें समर्थन करतें असें दिसून येईल. मृत्तिका सत्य आहे, मृत्तिकेच्या घटकभूत द्रव्यांतूनच घट तयार होतो म्हणून तो मृत्तिकेप्रमाणेंच सत्य आहे, तो कांहीं आभास नव्हे, आणि तो फुटला आणि त्याची पुन्हां माती झाली तरी त्याचे भूतकालीन अस्तित्व असत्य, किंवा आभासमय होऊं शकत नाही. मृत्तिका आणि घट यांचें नातें मूळ सत्य आणि नामरूपात्मक असत्य असें नाही, तर मूळ सत्य आणि तत्फलभूत, तदवलंबी सत्य, असें आहे; मृत्तिकेचें मूळ स्वरूप अदृश्य असें नित्य अव्यक्त आकाशतत्त्व असते -- त्याचें आणि घटाचें नातेंहि मूळ सत्य आणि फलभूत मूलावलंबी सत्य, मूळ अकाल नित्य अव्यक्त सत्य आणि कालांकित व्यक्त सत्य असेंच असतें, मूळ अरूप सत्य आणि सरूप असत्य असें नसतें. आणखी ही गोष्ट लक्षांत

पान क्र. २८८

 

घेतली पाहिजे कीं, मृत्तिकेच्या किंवा मृत्तिकामूल जे आकाश त्याच्या द्रव्यांतून घटरूप आकार निर्माण होण्याची शक्यता अनित्य स्वरूपाची नसून नित्य स्वरूपाची आहे, तें मूलद्रव्य अस्तित्वांत आहे तोंवर घटादि आकार केव्हांहि व्यक्त दशेस आणतां येतो. कोणताहि आकार नाहींसा होणें म्हणजे अदृश्य होणें आहे, तो पुन्हां दृश्य, व्यक्त होऊं शकतो : विश्वहि असेंच नाहींसें होते, अदृश्य होतें; तथापि विश्वाचें अस्तित्व अनित्य दृश्यरूप आहे असा पुरावा नाहीं; उलट पक्षीं, ब्रह्माचे ठिकाणीं व्यक्त होण्याची शक्ति अंगभूत आहे असें मानतां येतें, ही व्यक्तीभवनशक्ति काळाच्या नित्य क्षेत्रांत अखंडपणें काम करीत राहते, किंवा नित्यकाल पुन: काम करते, अर्थात् तिची आवर्तनशक्ति नित्यकाली नित्य असते; दुसऱ्या शब्दांत सांगावयाचें तर ब्रह्म कालाच्या नित्य क्षेत्रांत सारखें अखंडपणें व्यक्त होत रहातें किंवा व्यक्त, अव्यक्त, व्यक्त असें आवर्तन अखंडपणें करीत राहतें. विश्वसत्य हें विश्वातीत सत्याहून वेगळ्या प्रकारचें सत्य आहे, परंतु एवढ्याकरितां तें विश्वातीत सत्याला अस्तित्वांत नसल्यासारखें किंवा असत्य आहे असें मानण्याचें कारण नाहीं. नित्यकाल राहील तेंच सत्य, किंवा कालातीत असेल तेंच सत्य यापैकीं सत्याच्या कोणत्याहि अर्थानें शाश्वत सद्‌वस्तु हीच एक सद्‌वस्तु आहे अशी जी शुद्ध बौद्धिक कल्पना आहे, ती कल्पना मनानें रचलेली रचना असल्यानें, सर्वांगपूर्ण आणि सत्यवस्तुघटित साक्षात्काराला या मनोरचित कल्पनेनें बाधा येऊं शकत नाहीं. कालातीत नित्यता सत्य आहे म्हणून काल ही वस्तु सत्य अस्तित्वाची असूं शकत नाहीं असें म्हणतां येत नाहीं. काल वस्तु आणि अ-काल वस्तु किंवा कालांकित वस्तु वा कालातीत वस्तु यांत जें अन्योन्यविरोधाचें नातें दिसतें तें वस्तुत: शाब्दिक विरोधाचें नातें आहे; एक वस्तु, कालांकित वस्तु, दुसरीवर, कालातीत वस्तुवर अवलंबून आहे -- अशा प्रकारचें आधार-आधेयाचें नातें हें त्यांचें खरें वास्तव नातें असण्याचा संभव अधिक आहे.

अकालवस्तु ही सत्य म्हणून कालवस्तु ही असत्य, ही विचारसरणी जशी चुकीची, तशीच गोष्ट, केवल शांत सद्‌वस्तु सत्य म्हणून क्रियाशील सद्‌वस्तु असत्य या विचारसरणीची आहे. वस्तुजाताचें व्यावहारिक सत्य असत्य आहे असा त्याजवर (व्यावहारिक सत्यावर) शिक्का मारणें बुद्धीला पटत नाहीं. कारण आध्यात्मिक सत्य आणि याचा कांहींच संबंध नाहीं असें नाहीं -- मूळ केवल शांत आत्मा, सद्‌वस्तु,

पान क्र. २८९

 

ब्रह्म जेव्हां क्रियाशील होते, तेव्हां या क्रियाशीलतेंतून जी गति, जी शक्ति उत्पन्न होते त्या शक्तीचा, त्या गतीचा परिणाम म्हणून व्यावहारिक सत्य अस्तित्वांत येत असतें; तेव्हां त्याला असत्याच्या वर्गांत कसें ढकलता येईल ? आध्यात्मिक सत्य किंवा पारमार्थिक सत्य आणि व्यावहारिक किंवा प्रापंचिक सत्य या दोन सत्यांत भेद करणें युक्त आहे, पण त्या दोहोंमध्यें विरोधाची, आत्यंतिक विरोधाची कल्पना करणें चुकीचें आहे : या आत्यंतिक विरोधाच्या कल्पनेचा अर्थ असा होतो कीं, मूळ सद्‌वस्तु किंवा ब्रह्म शांत आणि निश्चल असतें व हें शांतपण आणि निश्चलपण हेंच त्याचें खरें आणि संपूर्ण अस्तित्व आहे -- अर्थात् या कल्पनेचा अर्थ मूळ केवळ ब्रह्मांत गति, क्रिया सर्वथा अभावानें असते, आणि जी जी म्हणून गति आणि क्रिया आहे ती दिव्य मूळ वस्तूला सर्वथा विरोधी, तिच्या सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ प्रकृतीला सर्वथा विसंगत अशी समजली पाहिजे. पण कोणत्याहि प्रकारचें कालांकित किंवा विश्वांकित सत्य म्हणून जर कांहीं अस्तित्वांत असेल, तर तें अस्तित्वांत आणणारी अशी क्रियाशील शक्ति मूळ सद्‌वस्तूच्या ठिकाणीं अंगभूत स्वभावधर्म या प्रकारची असली पाहिजे; आणि असेंहि अनुमान करणें अयुक्त होईल कीं, मूळ सद्‌वस्तूंत क्रियाशक्ति असलीच तर ती आभास उभे करण्याची शक्ति असणार, दुसरी कांहीं सत्यमय रचना करण्याची शक्ति नसणार. उलट पक्षीं असें मानणें युक्त आहे कीं, निर्माण करणारी शक्ति ही सर्वसमर्थ सर्वज्ञ जाणिवेचीच शक्ति असली पाहिजे, सर्वनिरपेक्ष सत्यानें निर्माण केलेल्या गोष्टी सत्यच असल्या पाहिजेत, त्या आभासरूप असूं शकत नाहींत, आणि ज्या अर्थीं मूळ सत्य हें एकच एक अस्तित्व आहे, त्या अर्थी या त्याच्या शक्तीनें निर्मिलेल्या रचना आत्मरचना असल्या पाहिजेत, त्या मूळ शाश्वत वस्तूच्या अभिव्यक्तीचीं रूपें असलीं पाहिजेत; हीं रूपें शून्याची, मूळ शून्यांतून, अस्तित्वाच्या किंवा जाणिवेच्या शून्यांतून, मायेनें निर्माण केलेलीं कदापि नसलीं पाहिजेत. विश्व हें सत्य नाहीं असें जें म्हणण्यांत येतें, त्या म्हणण्याच्या बुडाशीं सद्‌वस्तुसंबंधाची एक कल्पना असते, किंवा तिचा विशिष्ट अनुभव असतो. ही कल्पना किंवा हा अनुभव असा असतो कीं, ही मूळ सद्‌वस्तु रूपांतर होण्यासारखी नाहीं, ती निर्गुण निर्विशेष आहे, ती अक्रिय आहे; ही कल्पना किंवा हा अनुभव आमच्या जाणिवेला त्या अवस्थेंत येतो, ज्या अवस्थेंत ती शांत निश्चल झालेली असते. विश्व हें अशा निश्चल अक्रिय शाश्वत सद्वस्तूहून

पान क्र. २९०

 

अगदींच निराळें असल्यानें त्याचा आणि सद्‌वस्तूचा विरोध कल्पून सद्वस्तु सत्य तर विश्व असत्य असा सिद्धान्त सहाजिकच करण्यांत येतो. क्रियाशक्ति क्रिया करूं लागल्यानेंच विश्व हें उत्पन्न होतें, अस्तित्वाची शक्ति क्रियारूप धारण करूं लागली म्हणजे विश्व बनत जातें; शक्ति, मग ती विचारशक्ति असो, यांत्रिक शक्ति असो, आत्मिक शक्ति असो, मानसिक प्राणिक वा भौतिक शक्ति असो -- हीं शक्ति सुप्त स्वस्थ न राहतां, जागृत होऊन काम करूं लागली म्हणजे विश्वरचना होऊं लागते; आणि मूळ सद्‌वस्तूची जी शांत जाणिवेला होणारी अनुभूति किंवा कल्पना आहे, त्या अनुभूतीला किंवा कल्पनेला क्रिया हीच मुळीं विरुद्ध असल्यानें क्रियाशीलता म्हणजे सद्‌वस्तूच्या आत्म्यांत विकृति असें समीकरण शांत-सद्‌वस्तुवादी करतात, आणि या विकृतीच्या फळाला, विश्वाला असत्याच्या वर्गांत ढकलतात. पण सद्वस्तु अक्रिय आहे अशी जी आमच्या या विचारशक्तीला सद्‌वस्तुविषयक कल्पना सुचते, ती कांहीं अटळ अनिवार्य आहे असें नाहीं -- आपण अशीहि कल्पना पूर्ण विचारानें करूं शकतो कीं, मूळ सद्‌वस्तु ही अक्रिय आहे आणि सक्रियहि आहे. सद्‌वस्तूची शाश्वत अस्तित्वाची अवस्था स्वत:च्या अंतरंगीं शाश्वत शक्ति धारण करून असते, अस्तित्वाच्या अंतरंगींची ही शक्ति सहजच क्रियासामर्थ्य, गतिसामर्थ्य या स्वरूपाची असते आणि हें सामर्थ्य ती प्रकट करूं शकते, प्रकट करते -- म्हणजे सद्‌वस्तु क्रियाशील होते; अर्थात् सद्‌वस्तु अक्रिय अस्तित्वाच्या अवस्थेंतहि सत्य असते -- ही विचारसरणी पूर्णपणें तर्कशुद्ध आहे. अस्तित्व अक्रिय आणि सक्रिय, स्थिर आणि गतियुक्त एकाच वेळीं असूं शकतें, नव्हे गतीला स्थिरता ही आधार म्हणून लागते आणि यासाठीं अस्तित्व स्थिर आणि गतिशील एकाच वेळीं असणें अटळ आहे ही गोष्टहि बुद्धीला पटवितां येते : गतिमानता आणि क्रिया कांहीं परिणाम किंवा निर्मिति तेव्हांच करूं शकतें, जेव्हां तिला स्थिरतेचा, स्थिर वस्तूचा आधार असतो; असा आधार नसेल तर कोणतीहि निर्मिति, निर्माण केलेली वस्तु टिकाऊ होणार नाहीं, घनरूप राहणार नाही; केवळ गति, एकाहि आकाराच्या निर्मितिशिवाय सारखे नुसतें भ्रमण होत राहील. फलयुक्त परिणामकारी गतीसाठीं, क्रियेसाठीं रूपयुक्त अस्तित्व अर्थात् स्थिर अस्तित्व आवश्यक आहे. भौतिक विश्वांत जड गतियुक्त शक्ति ही (दर्शनी तरी) मूळ सत्य वस्तु आहे, पण तिला स्वत:ला स्थायी स्वरूप देणें भाग

पान क्र. २९१

 

पडतें; टिकाऊ आकार, टिकाऊ जीव ती तयार करते, एवढ्याकरितां कीं, तिला जें कार्य करावयाचें असतें त्या कार्यासाठीं, त्या गतियुक्त क्रियेसाठीं स्थितिशील वस्तूचा आधार असावा. आधारभूत वस्तूची ही स्थितिशीलता, स्थिरता अल्पकाल टिकणारी असेल, असते; अणूंच्या सूक्ष्म अखंड गतीनेंच दृश्य स्थिर वस्तूचें वस्तुपण तयार होतें व टिकतें हें खरें असलें, तरी हें वस्तुपण आहे तोंवर तें खरेंच असतें आणि तें संपलें तरी तें खरें होतें असें आम्ही मानतों. क्रियेला आधार स्थिर वस्तूचा लागतो हें तत्त्व शाश्वत सनातन आहे आणि तें अनंत कालक्षेत्रांत सार्वत्रिक आणि सर्वकालीन असें आहे, सर्व काल अखंडपणें त्याचें शासन चालू असतें. गतिशील शक्ति आणि तिची आकारनिर्मिति यांच्या मुळाशीं असलेली मूळ स्थिरवस्तु जेव्हां आम्हांला सांपडते, तेव्हां शक्तीनें निर्माण केलेल्या सर्व आधारांची स्थिरता अल्पकाल टिकणारी आहे हें आम्हांला स्पष्टपणें कळतें; कोणत्याहि वस्तूचें द्रव्य एका आकारांत स्थिरपणें राहण्याचें कारण, त्या द्रव्याच्या घटक-अणूंची गति एकाच दिशेनें एकाच स्वरूपांत अखंडपणें चालूं रहाते हें असतें -- अर्थात् ही वस्तूची स्थिरता स्वयंभू नसून शक्तिनिर्मित असते, आणि म्हणून ती नेहमीं टिकणारी नसते; स्वयंभू स्थिरता, नित्य स्थिरता केवळ मूळ शाश्वत सद्‌वस्तूला आहे; या वस्तूची शक्ति सर्व आकारनिर्मितीच्या मुळाशीं असते. तथापि अल्पकाळ टिकणारे आकार असत्य मानण्याचें कांहीं कारण नाहीं; कारण सद्‌वस्तु सत्य तशी तिची शक्ति सत्य आणि ही सत्य शक्ति जे आकार बनविते त्यांचें घटकद्रव्य सद्‌वस्तूच्या घटकद्रव्यांतून घेतलें जात असतें, सद्‌वस्तूच्या शक्तीनें निर्मिलेले आकार सद्‌वस्तूचेच आकार असतात. तेव्हां सद्‌वस्तु स्थिरतेंत सत्य असते, तशी ती नित्य क्रियाशील असतांहि सत्यच असते -- सद्‌वस्तूची स्थिरता आणि गतिशीलता दोन्हीं सत्यच असतात, आणि त्या समकालीन, एककालीन असतात; स्थिरता गतीचें, क्रियेचें स्वागत करते आणि क्रिया स्थिरतेला बाध आणत नाहीं, नष्ट करीत नाहीं. शाश्वत स्थिरता आणि शाश्वत गतिमानता मूळ सद्‌वस्तूच्या ठिकाणीं सारख्याच सत्यतेनें आहेत; स्थिरता आणि गतिमानता यांच्या, या दोन अवस्थांच्या पलीकडे सद्‌वस्तु आहे, या दोन अवस्थांना पुरून उरणारी आहे; अचल ब्रह्म आणि चंचल ब्रह्म ही एकाच सद्‌वस्तूचीं दोन रूपें आहेत. अनुभव असा आहे कीं, मन शांत झालें म्हणजे शांत अशा अनंत नित्य सद्‌वस्तूचा साक्षात्कार आम्हांला घडतो; ही सामान्यत:

पान क्र. २९२

 

सद्‌वस्तूच्या अनुभूतीची गोष्ट आहे, मन आणि इंद्रिय ज्या विश्वाचें दर्शन आम्हांला घडवितात, त्याच्या पाठीमागें असणारी वस्तु स्पष्टपणें, प्रभावीपणें आमच्या प्रतीतीस यावयास मनाच्या शांतीची, निश्चलतेची आवश्यकता असते. विचाराची वस्तुग्रहणाची क्रिया, जीवनाची अस्तित्वाची क्रिया सत्यावर, सद्‌वस्तूवर एकप्रकारचें आवरण होऊन त्याला दृष्टीआड करतात, सान्ताचें ग्रहण विचाराला, जीवनाला करतां येतें, अनंताचे ग्रहण त्यांच्या आंवाक्याबाहेर असतें; कालातीत वस्तूशीं विचाराचे व जीवनाचे व्यवहार होतात, कालातीत सत्य या विचाराच्या क्षेत्रांत येत नाहीं. या संबंधांत असा युक्तिवाद करण्यांत येतो कीं, विचाराची कोणतीहि क्रिया ही मर्यादा घालणारी गोष्ट आहे; सद्‌वस्तु अमर्याद; तिचें ग्रहण या मर्यादानिष्ठ गोष्टीकडून होत नाहीं; आम्हीं निर्विशेष अविभाज्य अशा सद्‌वस्तूच्या जाणिवेंत प्रवेश केल्यावर या क्रियांकडून घडणाऱ्या रचना नाहींशा होतात; या रचना अ-काल क्षेत्रांत असत्य असतात -- कालाच्या क्षेत्रांत त्या कितीहि सत्य दिसल्या किंवा असल्या तरी अकाल कालातीत क्षेत्रांत त्यांना सत्यत्व असत नाहीं. क्रिया अज्ञानाची जननी आहे, निर्मितीचा आणि सान्ताचा संसार क्रियेंतून उभा होतो, क्रिया आणि निर्मिति या गोष्टी रूपांतरसंभवहीन सद्‌वस्तूला, शुद्ध अनिर्मित अस्तित्वाला विरोधी अशा गोष्टी आहेत. हा युक्तिवाद सर्वथा बिनचुक नव्हे, कारण विचारद्वारां वस्तुग्रहण आणि विश्वाच्या असत्यत्वाचा पुरावा म्हणून जी दुसरी क्रिया या युक्तिवादांत मांडली आहे, ती क्रिया पृष्ठभागीय मनाची आहे, विश्व आणि विश्वातीत हालचाल यांचें ग्रहण पृष्ठभागीय मनाला होतांना घडणारी त्या मनाची ग्रहणक्रिया या युक्तिवादांत पुरावा म्हणून घेतली आहे -- ही क्रिया आमच्या वरवरच्या अस्तित्वाची आहे, पृष्ठभागीय मनाची आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे -- हें मन, हें अस्तित्व कालक्षेत्रांत सारखें स्थानांतर करीत असते, त्याची गति कमी अधिक होत असते, अर्थात् त्याची विश्वविषयक दृष्टि तुकडे तुकडे बघणारी, पृष्ठभागापुरती, मर्यादांनीं बांधलेली अशी असते; ती सर्वस्पर्शी, वस्तुजाताचें अंतरंग गांठणारी, अंतरंगात बुडी घेणारी नसते आणि म्हणून तिच्यावरून ठरविलेले निर्णय सत्य असूं शकत नाहींत. पृष्ठवर्ती अस्तित्वाच्या क्षणांकित जाणिवेला मागें टाकून अनंत अस्तित्वाच्या खऱ्या कालातीत आणि कालव्यापी जाणिवेंत आम्ही प्रवेश केला म्हणजे, क्रिया ही बंधनकारक, मर्यादा

पान क्र. २९३

 

निर्मिणारी असलीच पाहिजे ही कल्पना खोटी ठरते. मुक्त मनुष्याला किंवा शाश्वत वस्तूला क्रिया मर्यादित करूं शकत नाहीं, बांधू शकत नाहीं; आमचें जें खरें अस्तित्व आहे त्यालाहि क्रियेनें बंधन किंवा मर्यादा पडूं शकत नाहीं. आमच्या अंतरीं जो आत्मा किंवा चैत्य पुरुष असतो, त्याच्यावर क्रियेचा बंधनकारक परिणाम होत नाहीं; बंधन आणि मर्यादा क्रियेच्याद्वारां केवळ पृष्ठवर्ती कृत्रिम व्यक्तीला पडत असते. ही व्यक्ति आमच्या आत्म्याचें एक व्यक्त रूप असतें, तें अल्पकाल टिकतें, आत्म्याचा बदलणारा व्यक्त आकार म्हणजे व्यक्ति -- या व्यक्तीला अस्तित्व येतें, तें आत्म्याच्या इच्छेमुळें, योजनेमुळें येतें; तिचें घटकद्रव्य आत्म्यांतून येतें, ती टिकते आत्म्याच्या इच्छेनुसार -- ही व्यक्ति अल्पकाल टिकणारी असली तरी असत्य नसते, सत्य असते. आमचा विचारव्यवहार आणि क्रियाकरणी यांतून आमची व्यक्तिरूप अभिव्यक्ति होत असते, ही व्यक्ति विकासी असते, अपूर्ण असते; आमच्या कालांकित निसर्गक्षेत्रीय नैसर्गिक अस्तित्वांतून विकासप्रक्रियेनें व्यक्तीचा उदय होतो. या अपूर्ण विकासी व्यक्तीला विचार आणि क्रियाव्यवहार मदत करतात, यांच्यामुळें ती वाढते, तिच्यांत बदल होतात, तिच्या मर्यादा बदलतात, विस्तृत होतात; पण त्याबरोबर व्यक्तीच्या मर्यादा सांभाळण्याला त्यांची मदत होते : विचार आणि आचार व्यक्तीच्या मर्यादा सांभाळण्यास, टिकविण्यास मदत करतात म्हणून त्यांना तेवढ्यापुरत्या मर्यादा घालणाऱ्या, बंधन घालणाऱ्या वस्तू म्हणतां येईल -- आत्म्याच्या अभिव्यक्तीची एक साधनभूत संस्था म्हणजे आचार आणि विचार ही जोडी होय; पण ही संस्था कांहीं आत्म्याची निर्दोष आणि पूर्ण अभिव्यक्ति घडविणारी नाहीं; तिच्यांत अपूर्णता व सदोषता आहे. वरच्या पृष्ठवर्ती व्यक्तित्वांतून आम्ही निवृत्त होऊन, अंतरंगांत, खऱ्या आत्म्यांत, चैत्य पुरुषांत प्रविष्ट होतों, तेव्हां विचार आणि आचार यांचें कसलेंहि बंधन, कसलीहि कोंडी आम्हांला अडवीत नाहीं, कोंडीत नाहीं. त्यावेळीं विचार आणि आचार आमच्या आत्मजाणिवेची व आत्म-शक्तीची ऐच्छिक अभिव्यक्ति म्हणून उदय पावतात, या आत्म्याचें निसर्गस्थित व्यक्तिरूप त्याच्या स्वत:च्या इच्छेनुसार वेळोवेळीं निश्चित करण्याच्या कार्यांत, या विचार-आचाराचा उपयोग केला जातो, आत्मगत गुणांचें प्रकटन करण्यासाठीं, निराकार, अमर्याद आत्मतत्त्वाचें कालाच्या क्षेत्रांत योग्य प्रकारें साकार समर्याद रूप रचण्यासाठीं विचार-आचार यांचा उपयोग केला जातो. विकासी

पान क्र. २९४

 

आत्मरूपाला मर्यादा ही आवश्यक उपाधि असते. ही मर्यादा, ही उपाधि जर मूळ अस्तित्वाची पूर्णता, समग्रता आणि तत्त्वस्वरूपता बदलून टाकील, तर ती गोष्ट मूळ सत्यांत विकृति करणारी, आत्मत्व व्यवहारत: नष्ट करणारी, पतित करणारी ठरेल आणि यास्तव ती असत्य ठरेल. आत्मरूपाच्या विकासासाठीं जी मर्यादेची उपाधि त्याला आवश्यक असते, ती जर आत्म्यानें स्वत: निर्माण केलेली नसून, अनात्म्यांतून आली असेल व आत्मरूपावर लादली गेली असेल आणि ही उपाधि जर विश्व निर्माण करणाऱ्या आणि विश्वाचें साक्षित्व करणाऱ्या मूळ जाणिवेला झांकून टाकून, तिच्या स्वाभाविक प्रभुत्वांत उणीव आणीत असेल, किंवा मूळ पुरुषाची आत्मजाणीव, किंवा नामरूपानें व्यक्त होण्याची इच्छा बाजूस सारून त्यांना विरोधी अशी रचना करीत असेल, तर मूळ पुरुषाला, आत्म्याला, सद्वस्तूला, ब्रह्माला या उपाधीनें गुलामींत टाकल्यासारखें होईल आणि ही गोष्ट अर्थातच आत्मसिद्ध न्यायाला धरून नसल्यानें, ती करणारी आत्मरूपाची उपाधि सत्यविरोधी, असत्य ठरेल. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, कोणतीहि क्रिया किंवा रूपरचना मूळ अस्तित्वाचें तात्विक स्वरूप बदलीत नाहीं; मर्यादांची उपाधि स्वखुषीनें पत्करली असल्यानें मूळ सद्‌वस्तूच्या समग्रतेंत तिच्यामुळें कांहीं उणीव येत नाहीं. मर्यादा ह्या अनात्म्यांतून, बाहेरून लादल्या जात नसून, आत्मा स्वत:च स्वत:च्या व्यक्तरूपावर त्या घालतो, म्हणून गुलामीचा प्रश्न उत्पन्न होत नाहीं; आमचें जें मूळ संपूर्ण स्वरूप आहे, तें कालांकित कालक्षेत्री व्यवहारांत व्यक्त करावयासाठीं मर्यादांचा उपयोग असतो, मर्यादा हें, समग्र मूळ सदरच्या कालक्षेत्रांतील अभिव्यक्तीचें साधन आहे; आमच्या आंतरिक आध्यात्मिक पुरुषानें आमच्या बाह्य निसर्गस्थित रूपावर त्याच्या विकासासाठीं घातलेलें बंधन म्हणजे त्याच्या मर्यादा होत -- या मर्यादा सर्वदा स्वतंत्र अशा आत्म्यावर पारतंत्र्य लादणाऱ्या मुळींच नसतात. या प्रकारची वस्तुस्थिति असल्यानें, मनानें विषय ग्रहण करण्यांत, शरीरानें व्यवहार करण्यांत ज्या मर्यादा आवश्यक असतात, त्या मर्यादांमुळें कालस्थित व्यवहार सर्व असत्य आहे असें मानण्याचें मुळींच कारण नाहीं; मूळ चैतन्याचें, आत्म्याचें जें व्यक्त होणें, साकार होणें, स्वनिर्मिति करणें, तें सर्व असत्य आहे असें मानण्याचें कारण नाहीं; हें सर्व नामरूपात्मक व्यक्तिभवन सत्याच्या कालांकित वर्गांत पडतें, पण हें सर्व व्यवहारसत्य मूळ सत्यानेंच उभें केलेलें सत्य

पान क्र. २९५

 

आहे, दुसऱ्या कोणीं तें अस्तित्वांत आणलेलें नाहीं. गतिमानतेंत, आंदोलनांत, क्रियाकलापांत, निर्माणांत जें कांहीं आहे, तें ब्रह्म आहे; मूळ अस्तित्वाच्या हालचालींतच चलनशील अस्तित्व अंतर्भूत असतें. चलनशील अस्तित्व म्हणजे नामरूपात्मक अस्तित्व; काल ही कालातीत वस्तूची अभिव्यक्ति होय -- कालातीताच्या अभिव्यक्तीसाठीं कालाची योजना आहे, अनंत रूपात्मकतेंत देखील ही एकता अखंडित आहे : असत्य विश्वमाया आणि सत्य विश्वातीत सद्‌वस्तु असें, एकमेव अस्तित्वाचें व जाणिवेचें द्विधा छेदन करण्याचें वस्तुत: कांहीं प्रयोजन नाहीं.

शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानांत एक विरोध फार जोरदारपणें मांडला आहे -- या विरोधांतून त्यांनीं मार्ग काढला आहे, विरोधाच्या प्रश्नाचा अंतिम वाटण्यासारखा निकाल त्यांनीं केला आहे असें मात्र नाहीं. जो विरोध त्यांनीं जोरदारपणें मांडला आहे, तो अंतर्दृष्टि आणि तार्किक बुद्धि यांचा विरोध आहे; अंतर्दृष्टि एक गोष्ट आमच्या मनावर ठामपणें बिंबविते, तीव्र तर्कबुद्धि दुसरी गोष्ट आम्हांला पटविते. सर्वनिरपेक्ष सर्वातीत सर्वांतर सद्‌वस्तु एकमेव सद्‌वस्तु म्हणून अंतर्दृष्टीला स्पष्ट दिसते. तीव्र बुद्धीला विश्व दिसतें तें सत्य दिसतें. नामरूपात्मक विश्वाकडे बुद्धीच्या दृष्टीनें शंकराचार्य पाहतात; या विश्वांत न्याय देणारी बुद्धीच आहे, तिलाच विश्वासंबंधांत खरें खोटें वगैरे ठरविण्याचा सर्वाधिकार आहे; बुद्धीच्या पलीकडील, बुद्धीपेक्षां वरच्या स्थानीं असणारी आत्मशक्ति, आत्मजाणीव विश्वाच्या बाबतीत बुद्धीच्या विरुद्ध काही म्हणेल तर तें मान्यता देण्यासारखें आम्हीं, विश्वस्थांनीं मानूं नये -- पण जो प्रांत अंतर्दृष्टीचा आहे, त्या प्रांतांत बुद्धीलाहि, निदान भेदनिष्ठ मर्यादित बुद्धीला तसेंच बंधन आहे हे तिनें विसरता उपयोगी नाहीं, असें शंकराचार्यांचें म्हणणें आहे. दृश्य विश्वापाठीमागें जें विश्वातीत सत्य आहे त्याचा आणि विश्वाचा संबंधहि बुद्धीला ठरवितां येणार नाहीं, अर्थात् विश्वाचें, त्याच्या उत्पत्तिस्थितीचें रहस्य बुद्धीला उलगडतां येणार नाहीं. दृश्यरूपात्मक अस्तित्वाची सत्यता बुद्धीला पटते; ती तिनें मान्य करावी, या अस्तित्वांतील सत्यें सत्य म्हणून पत्करावीत -- पण ही सर्व सत्यता दृश्य अस्तित्वाच्या क्षेत्रापुरतीच असते. शाश्वत सत्य, शाश्वत अस्तित्व कालांत व्यक्त होते तें, दृश्य विश्वाच्या रूपानें व्यक्त होते म्हणून तें विश्व सत्य मानावयाचें असतें; पण ते मूळ सत्य कांहीं विश्व नव्हे; विश्व सोडून शाश्वत अस्तित्वरूप सत्यांत आपण प्रवेश केला म्हणजे विश्व

पान क्र. २९६

 

विश्वाचें ठिकाणीं अस्तित्वांत राहत असलें, तरी आमच्या नव्या मूळ सत्य पाहणाऱ्या जाणिवेला विश्वाची सत्यता संपते, तें असत्य होतें. कारण तें ब्रह्मसत्यदर्शी जाणिवेला दिसत नाहीं, भासत नाहीं किंवा आभासमय भासते. अस्तित्वाच्या या दोन बाजू, मूळ अस्तित्व आणि दृश्य अस्तित्व, आमच्या मनाला -- तें दोन्हीं बाजू पाहून दोहोंच्या मध्यें असतें तेव्हां -- अन्योन्यविरोधी म्हणून दिसतात. या विरोधाचा निकाल शंकराचार्य देतात तो असा : बुद्धीनें आपल्या मर्यादा ओळखाव्या आणि मान्य कराव्या, असा आग्रह ते धरतात : तिचें म्हणून जें क्षेत्र (दृश्य विश्वाचें क्षेत्र) ठरतें, त्या क्षेत्रांत तिचें सार्वभौमत्व निरंकुशपणें तिनें गाजवावें. मात्र त्याबरोबर आत्म्याला अंतर्दृष्टीनें जें विश्वातीत सत्य दिसतें, तेंहि आपल्याहून श्रेष्ठ अशा आत्मशक्तीनें अनुभवलेलें म्हणून तिनें मान्य करावें आणि त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद करावा; या मायेनें मनावर लादलेल्या स्वरचित (मायारचित) मर्यादा ओलांडून, आत्मा मोकळा होतो या गोष्टीचेंहि समर्थन या युक्तिवादानें होतें. कारण या युक्तिवादानें सर्व विश्वदृश्य, सर्व बुद्धिमान्य व्यवहारपोषक वस्तुरचना सत्य अस्तित्वाच्या बाहेर हांकलली जाते; मिथ्या, नष्टवत् केली जाते; मायिक ठरते; मायिकांतून आत्मा बाहेर निघून अमायिक सत्यांत प्रविष्ट होतो हें युक्तच आहे, असा युक्तिवाद बुद्धीनें करावा असें शंकराचार्यांचें म्हणणें आहे. दृश्य अस्तित्व आणि मूळ अस्तित्व यांजमधील विरोधांतून असा मार्ग शंकराचार्यांनीं आपल्या तीव्र बुद्धीनें काढला आहे. शंकराचार्यांचें तत्त्वज्ञान फार खोल आणि वेगळें असल्यानें त्या तत्त्वज्ञानाचा अर्थ अनेक प्रकारे अनेकांनीं लावला आहे. आमच्या बुद्धीला त्यांत जो अर्थ दिसतो तो असा की, एक विश्वातीत वस्तु आहे, जी स्वयंभू अक्षर आहे, नित्य आहे; हें विश्व केवळ दृश्यरूपात्मक आणि कालघटित आहे. तें स्वयंभू सत्य दृश्य विश्वाच्या संबंधांत आत्मा आणि ईश्वर या दोन रूपांनीं व्यक्त होतें. ईश्वर आपली रूपरचनाकार शक्ति जी माया तिच्या बळानें हें विश्व बनवितो, हें विश्व कालक्षेत्रापुरतेंच बनलेलें असतें : या विश्वांतील वस्तू मूळ सत्यांत मुळींच नसतात : शुद्ध आत्मज्ञ सद्‌वस्तु, अतिमानसिक जाणिवेची सद्‌वस्तु या ईश्वरनिर्मित, मायानिर्मित विश्वानें आच्छादिली जाते, हें झांकून टाकण्याचें काम माया करते -- आमची विषय ग्रहण करणारी, कल्पना रचणारी जी जाणीव आहे, त्या जाणिवेच्या द्वारां माया आपलें विश्व मूळ सद्वस्तूवर लादण्याचें

पान क्र. २९७

 

काम करीत असते. या दृश्यरूपांनीं भरलेल्या विश्वांत, मूळ सद्‌वस्तु, ब्रह्म जीवनक्षम साकार व्यक्तीचा आत्मा म्हणून व्यक्तरूप घेतें; या आत्म-व्यक्तीचें व्यक्तित्व, अंतर्दृष्टीनें झालेल्या ज्ञानानें नाहींसें होतें; अर्थात् तिचें दृश्यरूपात्मक अस्तित्व आत्मिक अस्तित्वाचें रूप घेतें. या व्यक्तित्व नष्ट झालेल्या आत्म्यावर मायेचा प्रभाव मग चालत नाहीं; व्यक्तित्वाच्या देखाव्यांतून मोकळा झालेला हा आत्मा मूळ ब्रह्मांत विलीन होतो, पण विश्व मात्र अस्तित्वांत राहतें; ईश्वरानें मायाबळानें रचलेल्या या विश्वाला आदि नाहीं, अंत नाहीं.

शंकराचार्यांच्या या उपपत्तींत आत्मिक अंतर्ज्ञान आणि बुद्धि व इंद्रियें यांनीं दिलेलें ज्ञान यांचा संबंध विशिष्ट तऱ्हेचा आहे; या संबंधाचा विचार करून या दोन्हीं ज्ञानांचा विरोध दूर करतां येण्यासारखा आहे; आत्मिक सत्य आणि व्यावहारिक सत्य या दोन सत्यांचा शंकराचार्याच्या उपपत्तींत विरोध आहे आणि हा विरोध आचार्यांनीं मिटविला नाहीं. त्यांच्या मतें, माया सत्य आहे, असत्यहि आहे; विश्व कांहीं निव्वळ आभास नव्हे, कारण तें अस्तित्वांत आहे आणि कालदृष्ट्या सत्यहि आहे, कालाच्या क्षेत्रांत विश्वाचें अस्तित्व सत्य कोटींतलें आहे; पण शेवटीं विश्वातीत सत्याच्या दृष्टीनें हें काल-सत्य असत्य ठरतें. विश्वाची, मायेची, ही सत्य-असत्यता शुद्ध मूळ आत्मवस्तूखेरीज बाकी सर्व गोष्टींना चिकटते. ईश्वराला, वैयक्तिक आत्म्याला सत्य-असत्यता चिकटून त्यांचें स्वरूप संशयित करते : ईश्वराला माया फसवूं शकत नाहीं, माया ही त्यानेंच निर्माण केली आहे, असें असलें तरी ईश्वर स्वत: ब्रह्म नसून ब्रह्माचें एक व्यक्तरूप आहे असें दिसतें, त्याचे सत्यत्व त्यानें निर्मिलेल्या कालांकित विश्वापुरतें सत्य आहे असें दिसतें -- वैयक्तिक आत्म्याची गोष्ट ईश्वराप्रमाणेंच आहे : मायेनें आपला व्यवहार थांबविला तर ईश्वर, व्यक्ति (जीवात्मा) आणि विश्व यांपैकीं कांहींहि असणार नाहीं -- पण माया सर्वथा शाश्वत स्वरूपाची आहे. ईश्वर आणि विश्व कालापुरतें शाश्वत आहेत, ज्ञानानें आत्मविसर्जन करीपर्यंत व्यक्ति, जीवात्मा टिकून असतो. या विधानांचा विचार बुद्धीला दमवितो, आणि शेवटीं, बुद्धीला न उमजणारें अनिर्वचनीय असें बुद्धि-अतीत रहस्य विश्वाच्या मुळाशीं आहे, त्याचा उकल कधींहि होऊं शकणार नाहीं अशी कल्पना करून बुद्धि आपले विचारचक्र थांबविते. पण संशयित ईश्वर, संशयित जीव या गोष्टी व विचाराच्या प्रक्रियेच्या शेवटीं आणि वस्तुजाताच्या आरंभीं

पान क्र. २९८

 

अनाकलनीय रहस्य आहे ही मान्यता, या शांकर तत्त्वज्ञानांतील अंगांचा विचार करतां असें वाटूं लागतें कीं, शांकर विचारसरणीच्या सांखळींत कोठेंतरी दुवा कमी पडला आहे, कोठेंतरी उणीव आहे. ईश्वर हा स्वत: मायेची निर्मिति नव्हे; तो सत्य आहे -- असें जर आहे तर तो विश्वातीत सद्‌वस्तूच्या सत्य अंगांपैकीं एक सत्य अंग असला पाहिजे, किंवा विश्वातीत सद्‌वस्तु, ब्रह्म -- त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या पोटांत व्यक्त होणाऱ्या विश्वाचा व्यवहार करणारें ब्रह्म -- म्हणजेच ईश्वर असें असलें पाहिजे. विश्व हें जर सत्य असेल तर तेंहि विश्वातीत ब्रह्माच्या अंगभूत सत्यांपैकीं कोठल्यातरी सत्याचें प्रकट रूप असलें पाहिजे -- कारण सत्यता विश्वातीत ब्रह्माखेरीज, त्याच्या अंगभूत सत्यांखेरीज इतरत्र असूं शकत नाहीं. व्यक्तिभूत आत्मा स्वतःचें खरें स्वरूप शोधून काढूं शकतो आणि विश्वातीत शाश्वत ब्रह्मांत प्रवेश करूं शकतो असें जर आहे आणि त्याची ही मुक्ति जर फार महत्त्वाची गोष्ट आहे तर हें उघड आहे कीं, हा व्यक्तिरूप आत्मा विश्वातीताची सत्यता स्वतःचे ठिकाणीं धारण करणारा असला पाहिजे; त्याला व्यक्तिश: स्वतःचें खरें स्वरूप शोधून काढावें लागतें, याचा अर्थ त्याच्या व्यक्तित्वालाहि विश्वातीताच्या सत्यत्वांत भाग आहे असा होतो; त्याच्या व्यक्तित्वाचा विश्वातीतांगभूत सत्य अंश त्याच्यापासून कोणत्यातरी आवरणानें दूर केलेला असतो, झांकलेला असतो, तो त्याला परत मिळवावयाचा असतो आणि तो सत्य अंश तो व्यक्तिरूपांतील आत्मा परत मिळवितो आणि विश्वातीतांत प्रविष्ट होतो, मुक्त होतो. या सर्व व्यवहारांत आभासाचा, मायेचा, मायिक व्यक्तीचा, मायिक विश्वाचा कांहीं संबंध येत नाहीं; मायेवर विजय मिळविण्याचा खटाटोप येथें नाहीं. खटाटोप आहे तो, आमच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याचें आणि विश्वाचें अज्ञान दूर करण्याचा आहे, अज्ञानावर आम्हांला विजय मिळवावा लागतो; मायेवर नव्हे.

विश्वातीत ब्रह्म हें बुद्धीच्या पलीकडे आहे तें अंतर्ज्ञानानेंच कळण्यासारखें आहे, त्याचा साक्षात्कार बुद्धीला नव्हे तर अंतर्दृष्टीला होणारा आहे हें जसें खरें आहे, तसें हेंहि खरें आहे कीं, विश्वाचें रहस्य बुद्धीला आकलन होण्यासारखें नाहीं, तें बुद्धीच्या पलीकडील, बुद्धीहून श्रेष्ठ अशा आंतरिक ज्ञानदृष्टीलाच आकलन होणारें आहे. विश्वाचें रहस्य अशा प्रकारचें असण्याचें कारण विश्व हें विश्वातीत सत्याचें रूपात्मक स्वरूप आहे. जर तें विश्वातीताचें दृश्य स्वरूप नसतें तर आमच्या

पान क्र. २९९

 

बुद्धीला विश्वरहस्याचा उकल झाला असता. विश्वरहस्यासंबंधीं वस्तुस्थिति या प्रकारची असल्यानें आम्हांला बुद्धीच्या पलीकडे जाऊन तें उकललें पाहिजे. ज्या उत्तरानें विश्व आणि विश्वातीत ब्रह्म यांचा विरोध मिटविला नाहीं, तें अंतिम उत्तर होऊं शकत नाहीं. वस्तुत: हा विरोध केवळ दिखाऊ आहे पण बुद्धि त्याला सत्यपण देते, तो कायमचा करून ठेवते, आत्मा, ईश्वर, व्यक्ति, सर्वोच्च अतिमानसिक जाणीव, मायिक विश्व-जाणीव, या, ब्रह्माचे तुकडे करणाऱ्या, ब्रह्माला विरोधी असणाऱ्या कल्पना बुद्धि उभ्या करते आणि या रीतीनें ब्रह्म आणि विश्व यांचा दिखाऊ विरोध खरा, पक्का आणि टिकाऊ करते. वस्तुत: ब्रह्म जर एकच एक अस्तित्वांत आहे तर आत्मा, ईश्वर सर्व ब्रह्मच असले पाहिजेत. ब्रह्म-जाणिवेमध्यें वरील कल्पनांचा भेद सर्व दूर होऊन नष्ट होत असला पाहिजे. आत्म-दर्शन, ब्रह्माचें स्वतःकडे पहाणें हें, या सर्व काल्पनिक भेदांना एका सूत्रांत आणून त्याचें एकत्व अनुभवीत असलें पाहिजे : आपल्याला हें ऐक्य अनुभवावयाचें असेल तर बुद्धीचें क्षेत्र आम्हीं ओलांडलें पाहिजे, आध्यात्मिक अनुभव घेतला पाहिजे; आत्मा, ईश्वर आदि ब्रह्मरूपें कोठें एकत्र येतात, आणि एक होतात, किंवा त्यांच्यांत दर्शनी भेद, अंतर, उत्पन्न होतें, त्या भेदाची, अंतराची, आत्मदृष्टीनें सत्यता काय, या गोष्टी आध्यात्मिक अनुभवानेंच कळणाऱ्या आहेत. ब्रह्माच्या जाणिवेंत वरील भेद असणारच नाहींत, असूं शकणार नाहींत, आम्हीं त्या जाणिवेंत प्रवेश केला कीं हें सर्व भेद जाऊन ऐक्य त्याची जागा घेणार; बुद्धीनें केलेले भेद कोणत्यातरी सत्याला धरून असतील, असणार; परंतु हें सत्य शुद्ध एकत्वाचें नसून अनेकरूपीं एकत्वाचें सत्य असलें पाहिजे. मन आणि इंद्रियें आम्हांला जें विश्व दाखवितात त्या विश्वाकडे बुद्धानें आपली अंतर्दृष्टि आणि तीव्र बुद्धि लावली आणि या विश्वाची रचना कशी, कोणत्या तत्त्वानें होतें तें शोधून काढलें, तसेंच कोणत्याहि प्रकारच्या रचनांच्या बंधनांतून मोकळें कसे होतां येतें त्याचाहि शोध लावला, पण बुद्ध येथें थांबला. शंकराचार्य पुढें एक पाऊल सरकले, बुद्धानें बुद्धि-क्षेत्रापलीकडील सत्य पडद्याआडच राहूं दिलें, त्याची वाच्यता केली नाहीं. त्यानें असें प्रतिपादलें कीं, आमच्या जाणिवेनें रचलेल्या रचना पाडून टाकल्यानें त्या सत्याचें दर्शन घडूं शकतें, मात्र बुद्धीला शोध करूनहि तें सांपडण्यासारखें नाहीं : शंकराचार्यांनीं एक पाऊल पुढें टाकलें तें हें कीं, त्यांनीं बुद्धिक्षेत्राच्या पलीकडील सत्याकडे नजर

पान क्र. ३००

 

लावली; विश्वाकडेहि पाहिलें आणि विश्वातीताकडेहि पाहिलें आणि ठरविलें कीं विश्व-रहस्य हें अखेर बुद्धिगम्य नाहीं, शब्दग्राह्य नाहीं, अनिर्वचनीय आहे; पण त्यांनीं बुद्धिदृष्ट, इंद्रियग्राह्य जग हें बुद्धीच्या क्षेत्रांत सत्य आहे असा सिद्धान्त केला; यासाठीं त्यांना असत्य-सत्य अशा मायेची उपपत्ति उत्पन्न करावी लागली. शंकराचार्य आणखी एक पाऊल पुढें टाकतें तर त्यांना मायेची कांस धरावी लागली नसती : विश्वाची सत्यता जाणावयाची तर बुद्धि-अतीत जाणिवेच्या दृष्टीनें विश्वाकडे पहावयास हवें; बुद्धि-अतीत जाणीव, विश्वाचे पलीकडे राहून विश्वाला संभाळते, आधार देते, विश्वाचें सत्य अर्थात् तीच जाणूं शकते; आमची जाणीव त्या विश्वातीत जाणिवेनें कार्यक्षम केली आहे, कार्यक्षम ठेवली आहे, या लहान मर्यादित जाणिवेला तिच्या जनकस्थानीं असलेल्या जाणिवेची, त्या जाणिवेच्या कार्याची खरी पुरी ओळख होणें अशक्य आहे, तिला विश्व हें रहस्यच वाटणार. पण सर्वोच्च जाणीव जी आत्मनिर्मितिकुशल आहे आणि जी स्वतःची प्रकट प्रतिमा म्हणून विश्वाला निर्मिते, तिला कांहीं विश्व रहस्य वाटूं शकत नाहीं, तें कांहीं तिला भ्रमरूप असूं शकत नाहीं, सत्य-असत्य असूं शकत नाहीं; ब्रह्माला विश्वरहस्य कांहीं तरी प्रयोजनानें, दिव्य प्रयोजनानें युक्त असेंच असलें पाहिजे. विश्वातीत ब्रह्म आपल्या विश्वातीत आणि विश्वांतर्यामी अतिमानसिक जाणिवेनें विश्वाला आधार देऊन राहिलें आहे, तेव्हां त्याच्या या विश्वरूप अस्तित्वाचा अर्थ, हेतु, खरा भाव त्या ब्रह्माला अगदीं स्पष्ट असला पाहिजे.

एक ब्रह्मच जर आहे, आणि सर्व जर ब्रह्म आहे तर विश्व त्याहून वेगळें असूं शकत नाहीं, तेंहि ब्रह्मच आहे, सत्यच आहे. आकार आणि शक्ति यांनीं विश्व भरलेलें आहे; हे नाना आकार आणि नाना शक्ती विश्वाची ब्रह्मता, सत्यता आमच्या प्रत्ययास आणीत नाहींत. अवकाश आणि काल यांच्या क्षेत्रांत सारखी गतिमानता, विविध प्रकारची बदलणारी अशी हालचाल, अखंड हालचाल असेंच विश्वाचें स्वरूप आम्हांला दिसतें; हें सर्व खरें असलें तरी त्यावरून विश्व असत्य आहे, विश्व हें कोणत्याहि प्रकारें तें मूळ सत्य, ब्रह्म नव्हे असें म्हणतां येत नाहीं. आम्हांला विश्वाचें जें स्वरूप दिसतें तें तसें दिसण्याचें कारण, त्याची असत्यता, अब्रह्मता नसून, त्या ब्रह्माची, त्या सत्याची क्रमश: पायरीपायरीनें होत असलेली कालक्षेत्रांतील अभिव्यक्ति, त्यानें स्वतःच

पान क्र. ३०१

 

केलेली स्वतःची विकासी अभिव्यक्ति हें विश्वाचें स्वरूप आहे, हें आहे. पण आमच्या जाणिवेला ही ब्रह्माची आत्म अभिव्यक्ति व तिचा अर्थ सामग्र्यानें दिसत नाहीं, तिला या अभिव्यक्तीचें सारतत्त्व प्रतीत होत नाहीं. विश्व हें कोणत्याहि आकाराच्या किंवा आकारांच्या कोणत्याहि समूहाच्या द्वारां मूळ ब्रह्म सर्वच्या सर्व व्यक्त करूं शकत नाहीं; तरीपण त्यांतील सर्व आकार ब्रह्माच्या घटकभूत द्रव्याचे बनलेले असतात, ब्रह्माच्या अस्तित्वाचे बनलेले असतात, या अर्थानें मात्र विश्व हें ब्रह्म आहेहि आणि नाहींहि असें म्हणतां येतें. सान्त मर्यादित वस्तू त्यांच्या आत्मिक तत्त्वाच्या दृष्टीनें अनंत अमर्याद सद्‌वस्तु किंवा ब्रह्मच असतात; आम्हीं या वस्तूंच्या अंतरंगांत खोल पाहूं तर आम्हांला अनंत एकमेव तत्त्व तेथें दिसेल, दिसते; आमच्या अंतर्दृष्टीला हें दर्शन घडतें. ''ब्रह्म नित्य आत्म-जागृत, स्वतःला नित्य प्रकट असतें, त्याला प्रकटनाची आवश्यकता नाहीं, म्हणून विश्व हें त्याचें प्रकट स्वरूप असूं शकत नाहीं;'' असा एक पक्ष आहे. या पक्षाला असा एक प्रतिपक्ष उभा करतां येतो कीं, ब्रह्माला स्वतःला फसविणारा किंवा अन्य कोणत्याहि प्रकारचा आभास (विश्वाला मायावादी आभास म्हणतात) प्रकट करण्याची, मायिक विश्व निर्माण करण्याची आवश्यकता नाहीं. जें सर्वनिरपेक्ष केवळ तत्त्व आहे त्याला आवश्यकता अशी कशाचीच नसते. तथापि स्वत:च्या शक्तीचा कोणत्यातरी रूपानें आविष्कार करावा, आपल्या शुद्ध अस्तित्वाला रूपात्मक स्वरूप द्यावें अशी इच्छा त्याच्या ठिकाणीं उत्पन्न होणें शक्य असतें आणि या इच्छेचा, स्फूर्तीचा परिणाम म्हणून, त्याच्या स्वतंत्रपणाला बाधक, बंधक म्हणून नव्हे, तर त्या कालातीत केवलाला कालक्षेत्रांत आपलें कालांकित स्वरूप पाहण्याची शक्ति व इच्छा आहे म्हणून, स्वतःला (अरूपाला) स्वत: निर्माण करण्याची (सरूप करण्याची) निकड उत्पन्न होणें शक्य आहे, त्याची सर्वश्रेष्ठ स्वयंफलवती शक्ति त्याचे ठिकाणीं अटळपणें प्रभावी होणें शक्य आहे. ही प्रभावी निकड, ब्रह्माची निर्माणाची इच्छा, आत्म-प्रकटनाची इच्छा या स्वरूपांत आम्हांला कळते, प्रतीत होते -- पण वस्तुत: तिचें अधिक समर्पक वर्णन करावयाचें तर असें म्हटलें पाहिजे कीं, केवलाच्या  (ब्रह्माच्या) ठिकाणीं जी अस्तित्वाची अंगभूत शक्ति (कर्तृत्वशक्ति) असते, ती स्वभावत: कर्तृत्वरूपानें प्रकट होते, तिला कर्तृत्वरूपानें प्रकट होण्याची स्वाभाविक प्रभावी निकड असते, ब्रह्माच्या अंगभूत कर्तृत्वशक्तीचें कर्तृत्व उत्स्फूर्त असतें, त्याला इच्छाकृत म्हणणें देखील थोडें अ-समर्पक

पान क्र. ३०२

 

आहे, सदोष आहे. असो. स्वत:चें नित्य कालातीत स्वरूप केवलाला स्वयंसिद्ध, स्वयंप्रकट असतें, हें अगदीं खरें आहे. पण हेंहि तितकेंच खरें आहे कीं, कालाच्या नित्य गतिमान् क्षेत्रांतहि तें केवल ब्रह्म स्वत: स्वत:ला प्रकट होऊं शकतें, प्रकट करूं शकतें. विश्व हें आविष्कारसत्य आहे, मूळ सत्य नव्हे हें खरें असलें तरी, तें मूळाचें, ब्रह्माचें आविष्कारसत्य -- ब्रह्माचें प्रकट-स्वरूपरूपीसत्य -- आहे हें कांहीं खोटें नाहीं; सर्व ब्रह्म आहे, त्या अर्थीं सर्व प्रकटरूप, सर्व आविष्कार ब्रह्म असलें पाहिजे यांत संशय नाहीं; या प्रकट रूपाला असत्य म्हणणें, त्यावर असत्यता आरोपित करणें हें निष्कारण गोंधळांत पाडणारें आहे, विश्वाच्या असत्यतेची कल्पना अनावश्यक आहे, निरुपयोगी आहे; ब्रह्म आणि विश्व यांत कांहीं भेद आहे ही गोष्ट सत्य आहे -- पण हा भेद, ब्रह्म कालातीत नित्य वस्तु आहे, आणि विश्व ही कालांकित वस्तु आहे ही कल्पना, तसेंच ब्रह्म ही मूळ वस्तु आहे आणि विश्व हें ब्रह्माची अभिव्यक्ति आहे ही कल्पना, या दोन कल्पना पूर्णपणें व्यक्त करतात, म्हणून हा भेद दाखविण्यासाठीं असत्यतेच्या, आभासाच्या, मायेच्या कल्पनेची आवश्यकता बिलकुल नाहीं.

असत्य-सत्य या संज्ञेनें कशाचें समर्पक वर्णन होत असेल तर तें आमची जी वेगळेपणाची कल्पना आहे तिचें होतें; अनंतामध्यें स्वतंत्र विभक्त व्यक्ति व वस्तू आहेत ही व्यक्तीची जी कल्पना आहे, अनंतामधील सर्व सान्त मर्यादित वस्तू स्वतंत्र स्वयंभू अस्तित्व असणाऱ्या वस्तू आहेत ही जी आमची कल्पना आहे, त्या कल्पनेचें वर्णन असत्य-सत्य कल्पना असें करणें योग्य होईल. मी इतरापासून वेगळी व्यक्ति आहे ही कल्पना, वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत ही कल्पना व्यवहाराला अवश्य आहे; आमची जी पृष्ठवर्ती व्यक्तिता आहे, तिला व्यवहारासाठीं वरील भावना व कल्पना आवश्यक आहेत; या भावना व कल्पना व्यवहारांत उत्तम परिणाम घडवून आणणाऱ्या असल्यानें समर्थनीय आहेत, आणि म्हणून आमच्या व्यक्तीच्या मर्यादित बुद्धीच्या आणि मर्यादित अनुभवाच्या दृष्टीनें या कल्पना व भावना सत्य आहेत; पण आम्ही आमच्या मर्यादित जाणिवेच्या क्षेत्रांतून निघून मूळ अनंत जाणिवेच्या क्षेत्रांत परत आलों म्हणजे, दर्शनी पुरुषाचा प्रांत सोडून खऱ्या पुरुषाचा प्रांत आम्ही आमचा केला म्हणजे -- आमचा जो सान्त मर्यादित पुरुष वा आमची जी व्यक्ति अस्तित्वांत राहते ती, अनन्ताची अभिव्यक्ति, अनंताची

पान क्र. ३०३

 

अंगभूत, अनंताची शक्तिभूत म्हणून अस्तित्वांत राहते -- स्वतंत्र, विभक्त व्यक्ति म्हणून आमची सत्यता नाहींशी होते; याप्रमाणें आम्ही वेगळी व्यक्ति आहों ही भावना सत्यहि आहे, असत्यहि आहे -- अर्थात् सत्य-असत्य आहे. असो. व्यक्तीच्या सत्यत्वासाठीं, व्यक्ति स्वतंत्र असली पाहिजे, व्यक्ति इतर व्यक्तींपासून अगदीं निराळी असली पाहिजे अशी आवश्यकता नाहीं; हें निराळेंपण, ही स्वतंत्रता कांहीं सत्यत्वाचे घटक-अंश नाहींत. हे व्यक्तीचे आकार, ब्रह्माच्या अभिव्यक्तीचे घटकभूत असलेले हे आकार नाहींसे होतात -- हें नाहींसे होणें या आकारांच्या असत्यतेचें निदर्शक आहे असेंहि म्हणतां येत नाहीं -- कारण हें नाहीसें होणें याचा अर्थ अभिव्यक्तीतून निवृत्त होणें एवढाच असूं शकेल. कालातीत ब्रह्माचें विश्वरूपानें जें आविष्करण, प्रकटन होतें तें कालाच्या क्रमवार पद्धतीनें होतें; या क्रमवार आविष्करणपद्धतींत ब्रह्माचे जे आकार प्रकट होतात, ते पृष्ठवर्ती अस्तित्वाच्या दृष्टीनें स्वभावत:च अल्पकाल टिकणारे असणार, त्यांचें नित्यत्व त्यांच्या आविष्कार-शक्तीच्या नित्यत्वांत असतें; वस्तुजाताच्या तात्विक अस्तित्वांत, जाणिवेच्या तात्विक स्वरूपांत हे प्रकट होणारे आकार नेहमीं शक्यतेच्या रूपानें अंतर्भूत असतात : कालातीत जाणीव, शक्यतेच्या रूपांत तिजमध्यें नित्य अंतर्भूत असलेले हे आकार केव्हांहि कालांकित वास्तवांत आणूं शकते. जर विश्व आणि विश्वांतील आकार हे केवळ कल्पनारचित असते, त्यांत मूळ अस्तित्वाच्या द्रव्याचें अस्तित्व, घटकत्व जर मुळींच नसतें, मूळ सत्यानें, ब्रह्मानें आपल्या जाणिवेंत उभारलेल्या आणि नष्ट केलेल्या (कायमच्या नष्ट केलेल्या) अस्तित्वशून्य कल्पना हेंच जर विश्वाचें आणि विश्वांतील वस्तूंचें खरें स्वरूप असतें, तर विश्वाला असत्य म्हणतां आलें असतें. पण अभिव्यक्ति किंवा अभिव्यक्तीची शक्ति ही जर ब्रह्माचे ठिकाणीं नित्य असेल, सर्व जें आहे तें जर ब्रह्माचें अस्तित्व असेल, तर विश्वावर व विश्वांतील वस्तूंवर आरोपित केली जाणारी असत्यता किंवा भ्रमरूपता ही विश्वाची किंवा विश्वांतील वस्तूंची मूळ प्रकृति, स्वभाव, स्वरूप असूं शकणार नाहीं.

विश्वाचें अस्तित्व असत्य आहे. तें आभासरूप आहे अशा अर्थाची जी मायेची उपपत्ति आहे, तिनें जितक्या प्रश्नांचा उकल होतो त्यापेक्षां अधिक प्रश्न ती उत्पन्न करते. अस्तित्वाच्या प्रश्नाचा खरोखरीचा उकल ती करीत नाहीं, हा प्रश्न उकलावयास नेहमींच अशक्य करून टाकण्याचें

पान क्र. ३०४

 

काम मात्र ती करते. कारण माया असत्य माना किंवा असत्य-सत्य माना, मायेची उपपत्ति अशा अंतिम सिद्धांताकडे आम्हांला घेऊन जाते कीं, या सिद्धांतामुळें, सर्व जें आहे तें ''नाहीं'' ठरतें, सर्व रचनांचा समूळ विध्वंस करून ती मोकळी होते. माया आहे याचा अंतिम अर्थ अगदीं साधा, ''कांहींहि नाहीं'' असा करावा लागतो. आम्ही व आमची दुनिया मायेच्या ''मायेनें'' अस्पष्ट होत होत नाहींसे होतों -- थोडासा काळ थोडेंसें सत्य आम्हांला चिकटविलें जातें -- जें सत्य केवळ काल्पनिक रचनेहून थोडेसेंहि वेगळें असत नाहीं. माया शुद्ध असत्य आहे असा जो सिद्धान्त आहे, त्या सिद्धांतानुसार सर्व अनुभव, सर्व ज्ञान आणि अज्ञान, बांधणारें अज्ञान आणि सोडविणारें ज्ञान, विश्वभोग आणि विश्वत्याग सर्व आभास आहे, भ्रम आहे -- आभासाच्या, भ्रमाच्या दोन बाजू अज्ञान नि ज्ञान, विश्वभोग नि विश्वत्याग आहेत असें, शुद्ध असत्यरूप मायेचा सिद्धान्त सांगतो; कारण या सिद्धांतानुसार भोगायला, त्यागायला कांहीं नाहीं; भोगणारा, त्यागणारा कोणी नाहीं. आहे तें एक अतिचेतन अतिरूपरूपांतर ब्रह्म, हें एकच एक सर्वदा एकरस असें असतें. बंधन आणि मोक्ष दोन्ही गोष्टी, दिखाऊ व्यापार आहेत, त्या सत्य गोष्टी नाहींत. विश्वांतील जीवनाचें आकर्षण, आसक्ति ही सर्व माया आहे, त्याप्रमाणें मुमुक्षा, मोक्ष मिळवण्याची इच्छा ही देखील मायेचाच भाग आहे; मायेच्या क्षेत्रांत या इच्छेचा आणि इच्छा करणाऱ्याचा जन्म होतो, आणि तिची परिपूर्ति झाली कीं ती इच्छा आणि ती इच्छा करणारा मायेच्या क्षेत्रांतच नष्ट होतात. असा हा विध्वंसक मायावाद, आध्यात्मिक मायावादानें ठरविलेल्या त्याच्या मर्यादा उल्लंघून पुढें जाऊं नये असें त्याजवर असलेलें, त्याजवर विशिष्ट अध्यात्मवाद्यांनीं घातलेलें बंधन मानीलच असें नाहीं. व्यक्तीला विश्वांत येणारे अन्य सारे अनुभव जर आभास आहेत, तर तिला येणारे आध्यात्मिक अनुभव मात्र आभास नाहींत असा खात्रीलायक पुरावा कोठून आणावयाचा ? असा खात्रीलायक पुरावा कोठें आहे ? कोणचा आहे ? व्यक्तीला एकाग्रतेनें लाभणाऱ्या समाधींत परमात्म्याचा जो साक्षात्कार घडतो आणि जो साक्षात्कार सर्वथा सत्य आहे असें सांगण्यांत येतें, तो साक्षात्कार आध्यात्मिक अनुभवांपैकीं एक असल्यानें तो आभासमय आहे असें न मानण्यास खात्रीलायक पुरावा कोठें आहे ? विश्व जर असत्य आहे तर विश्व-जाणिवेचा आमचा अनुभव, विश्वात्मा आहे हा आमचा अनुभव, ब्रह्म या सर्व

पान क्र. ३०५

 

जीवाच्या ठिकाणीं आत्मा म्हणून आहे हा अनुभव, हे सर्व जीव ब्रह्मच आहेत हा अनुभव, एकच ब्रह्म सर्वांतरीं आहे हा अनुभव, एकाच ब्रह्माच्या पोटीं सर्व आहे हा अनुभव -- या अनुभवांना, यांपैकीं कोणत्याहि अनुभवाला पक्का पाया नाहीं असें होतें; कारण विश्व हें या सर्व अनुभवांच्या पायाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि विश्व तर आभास आहे, मायेची रचना आहे. हे सर्व जीव ब्रह्म आहेत हा जो आमचा आध्यात्मिक अनुभव त्यांतील सर्व जीव माया आहेत, आभासमय आहेत असा मायावादाचा सिद्धांत आहे, तेव्हां त्या आध्यात्मिक अनुभवाचा पाया ढांसळून तो निराधार होतो हें उघड आहे; अनुभवाचा दुसरा भाग, ब्रह्म शुद्ध शांत स्थिर केवल सद्‌वस्तु : हा केवलाचा अनुभव आम्हांला जो येतो त्याच्या सत्यतेची तरी खात्री काय ? कारण हा अनुभव येतो आमच्या मनाला; मन हें आभासाचें बनलेलें, ज्या शरीरांत तें बनविलेलें आहे तें शरीरहि मायेनेच निर्मिलेलें; तेव्हां ब्रह्मानुभवाच्या सत्यतेची संशयितता आम्ही दूर करूं शकत नाहीं. केवल ब्रह्माचा अनुभव हा सत्य आहे, अंतिम आहे, हाच एक सत्य आहे, हाच एक अंतिम आहे व पुरावा म्हणून असें म्हणतां येईल कीं, हा अनुभव, हा साक्षात्कार घडतो तेव्हां तो स्वयंप्रमाण सर्वथा संशयातीत पूर्णपणें सत्य असाच भासतो; पण हा पुरावा निरुत्तर करणारा नव्हे; सर्वव्यापी ईश्वर, सत्य विश्वाचा स्वामी आहे हा आध्यात्मिक अनुभव आणि दुसरे असेच अनुभव आहेत कीं ज्यांच्या संबंधानें ते स्वयंप्रमाण, सर्वथा संशयातीत पूर्णपणें सत्य भासतात असें म्हणतां येतें. गोष्ट अशी आहे कीं, बुद्धीला एकदां ब्रह्माच्या, परमात्म्याच्या अस्तित्वाखेरीज बाकी सर्व वस्तू असत्य आहेत असें निश्चितपणें वाटूं लागलें कीं ब्रह्म देखील असत्य आहे, सर्वच अस्तित्व असत्य आहे असें ती एक पाऊल पुढें जाऊन म्हणूं शकते, व म्हणतेहि. बुद्धधर्माच्या अनुयायांनीं असें पाऊल टाकलें होतें, आत्मा ही असत्य वस्तु आहे, कारण इतर वस्तूंप्रमाणें आत्मवस्तूची रचना देखील मनाकडूनच होते असा सिद्धांत त्यांनीं केला : ईश्वरालाच केवळ त्यांनीं असत्य ठरविलें असें नव्हे, तर शाश्वत आत्मा, तात्विक निर्गुण ब्रह्म हें देखील त्यांनीं सत्याच्या चित्रांतून पुसून टाकलें.

      निर्भेळ बिनतडजोडीचा मायावाद आमच्या अस्तित्वाचा कोणताहि प्रश्न सोडवूं शकत नाहीं; व्यक्तीला त्याच्यापुढील अस्तित्वाचा प्रश्न सोडविण्यांत मदत न करतां, मायावाद हा प्रश्न टाळून पळून कसें

पान क्र. ३०६

 

जावयाचें हें मात्र व्यक्तीला दाखवून देतो. आमचें अस्तित्व आणि त्याचें कार्य, आमचा अनुभव, उच्च आकांक्षा, प्रयत्न यांना कांहीं अर्थ मायावादांत राहत नाहीं -- मायावाद स्वीकारल्यास या गोष्टींचें समर्थन होऊं शकत नाहीं -- या गोष्टी असून नसल्यासारख्या होतात. सर्व गोष्टी आभासमय अस्तित्व या नांवाखालीं व्यर्थ ठरतात; सर्व गोष्टी विश्वमायेचा एक भाग किंवा मायिक या सदराखालीं घातल्या जातात : एकच गोष्ट यांतून सुटते ती म्हणजे नि:संबंध अनिर्वचनीय मूळ सत्य ब्रह्म आणि प्रपंच सोडून या ब्रह्माकडे जीवानें वळणें. ईश्वर, आम्ही जीव, आणि विश्व या सर्व मायिक कथा होतात; ईश्वर म्हणजे मायेंत पडलेलें ब्रह्माचें प्रतिबिंब; जीव म्हणजे मायिक व्यक्तींत पडलेलें ब्रह्माचें प्रतिबिंब; विश्व म्हणजे अनिर्वचनीय स्वयंभू ब्रह्मावर मायिक रचनेचा अध्यास, अध्यारोप -- अशी ईश्वर, जीव, विश्व यांची बोळवण निर्भेळ मायावाद करतो. हा मायावाद थोडा कमी तीव्र करून, मायेच्या पोटींच कां होईना पण जीवाला कांहीं सत्यता अर्पण केली, आम्ही जीव ज्या अनुभवाचे व ज्ञानाचे बळानें वाढून आत्मत्व संपादन करतो त्या अनुभवाला आणि ज्ञानाला कांहीं सत्यता बहाल केली, तर वर वर्णिला इतका सर्वगामी विध्वंस घडून येत नाहीं; पण ही सत्यता आमच्या अस्तित्वाला व अनुभवाला द्यावयाची याचा अर्थ कालांकित अस्तित्व आणि त्यांतील अनुभव सत्य आहेत अशी मान्यता द्यावयाची, ही मान्यता दिली गेली म्हणजे मग असत्याला सत्य करणाऱ्या मायेचा प्रश्न आमच्यापुढें राहत नसून, सत्याला विपरीत करणाऱ्या अज्ञानाचा प्रश्न आमच्यापुढें राहतो. मायावाद जर निर्भेळ ठेवला तर पुढील आपत्ती निर्माण होतात : या मायावादानुसार सर्व जीवांचा आत्मा ब्रह्म आहे; पण जीव जर आभासमय तर जीवांचा आत्मा हा आभासाचा एक भाग असल्यानें तोहि आभासच ठरेल; अर्थात् ब्रह्माचें आत्मत्व हा आभास ठरेल (ब्रह्म तेवढें सत्य राहील); आत्म्याचा अनुभव हाहि आभासच ठरणार : ''मी तें (ब्रह्म) आहे'' हा अनुभव घेऊं; या अनुभवांत ''मी'' अनुभविला जातो तो खोटा असतो, आभास असतो, वस्तुत: ''मी'' नाहींच, केवल ''तें (ब्रह्म)'' मात्र आहे; अर्थात् ''मी तें आहे'' हा अनुभव आभास ठरतो. दुसरा अनुभव ''मी तो (ईश्वर) आहे'' हा घेऊं; येथें निर्भेळ मायावादानुसार ''मी'' नाहीं व ''तो ईश्वर'' पण नाहीं -- दोन्ही आभास आहेत; ''मी तो (ईश्वर) आहे'' या अनुभवांत

पान क्र. ३०७

 

ज्ञानयुक्त ब्रह्म विश्वेश विश्वपुरुष या रूपानें आहे असें मानलें आहे पण विश्व हेंच आभास आहे असें जो मायावाद म्हणतो त्याचा ईश्वर, विश्वेश्वर आभासच असणार. तेव्हां ब्रह्माच्या आत्मत्वाप्रमाणें ब्रह्माचें विश्वेश्वरत्वहि आभास ठरून एकटें शुद्ध ब्रह्म काय तें सत्य राहतें. अस्तित्वाचा प्रश्न समाधानकारक रीतीनें सोडवावयाचा, तर आमचें अस्तित्व आणि विश्वाचें अस्तित्व अशा एका सत्यावर आधारलें पाहिजे कीं तें सत्य या दोन्ही अस्तित्वांचें योग्य स्पष्टीकरण असावें, त्यानें या दोन अस्तित्वांच्या सत्यांचा परस्पर समन्वय साधावा; तसेंच सर्वमूल, सर्वातीत सत्याशीं त्याचा समन्वय साधावा, आणि सर्वमूल सत्याशीं या विश्वसत्याचें व जीवसत्याचें असलेलें सत्य नातें त्यानें स्पष्ट करावें. पण अस्तित्वाचें असें सत्यनिष्ठ स्पष्टीकरण शक्य व्हावयासाठीं व्यक्तीला आणि विश्वाला कांहीं सत्यता असली पाहिजे, आणि मूळ एकमेव अस्तित्व आणि सर्व अस्तित्वें (वस्तू) यांचा कांहीं सत्य संबंध असला पाहिजे, अर्थात् केवळ निरपेक्ष सद्‌वस्तु आणि सापेक्ष अनुभव यांचा कांहीं सत्य संबंध असला पाहिजे.

      विश्वाच्या प्रश्नाची गुंतागुंत मायावाद सोडवीत नाहीं; तो ती तोडून टाकून मोकळा होतो; अशा या मायावादाला प्रश्न सोडविणें म्हणतां येणार नाहीं, हें प्रश्न सोडून देणें आहे; मायावादानुसार आमचा आत्मा विश्वमाया टाकून आपल्या उच्च स्थानाला परत उडून जाऊं शकतो पण या नामरूपात्मक अस्तित्वाच्या विश्वांत देह धारण केलेल्या आत्म्याला हें विश्व टाकून, उडून आपल्या उच्च स्थानीं परतणें म्हणजे समाधानकारक विजयाची गोष्ट नव्हे; आमच्या आत्म्याचें हे उड्डाण निसर्गापासून, प्रकृतीपासून आम्हांला वेगळें करतें; तें कांहीं आमच्या प्रकृतीचें बंधमुक्त होणे नव्हे, पूर्ण होणें नव्हे. आत्म्याच्या उड्डाणानें आमच्या अस्तित्वाच्या एका घटकाला समाधान लाभतें, एका कामनेचें उन्नतीकरण घडून येतें. आमचें बाकीचें अस्तित्व, आमच्या बाकीच्या कामना मायेच्या असत्य सत्यतेच्या अंधुक संधिप्रकाशांत थंडीनें कुडकुडत काळ काढून शेवटीं नष्ट होतात. विज्ञानांत काय किंवा तत्त्वज्ञानांत काय कोणत्याहि प्रश्नाचें उत्तर अशाच सर्वसाधारण अंतिम सिद्धांतांत सांपडण्याचा संभव आहे कीं जो सिद्धांत सर्वसंग्राहक आहे, सर्व अंगांची मीमांसा करून, त्यांचें योग्य तें समर्थन करणारा आहे, ज्याच्यांत अनुभवाच्या प्रत्येक सत्याला योग्य स्थान आहे, प्रश्नविषयक वस्तूच्या

पान क्र. ३०८

 

घटकभूत सत्यांपैकीं कोणतेंहि सत्य ज्या सिद्धांतांत वगळलेलें नाहीं, जो सिद्धांत प्रत्येक प्रश्न वस्तु-घटक सत्याला, त्या वस्तूच्या क्षेत्रांत जें त्याचें स्थान आहे तें देतो. या दृष्टीनें सर्वोच्च ज्ञान त्याच ज्ञानाला म्हणतां येईल, सर्वश्रेष्ठ ज्ञान तेंच ज्ञान असण्याचा पुष्कळ संभव आहे कीं, जें सर्व प्रकारच्या सर्व ज्ञानाचा गाभा आपल्या प्रकाशानें स्पष्ट करतें, जें हें सर्व ज्ञान एकत्रित आणि संघटित करतें, जें या ज्ञानाच्या सर्व अंगांचा सर्व अंगांशीं सुसंवाद स्थापित करतें; जें आमच्या अज्ञानाची आणि भ्रमाची व्याधि दूर करतें पण त्याबरोबर हें अज्ञान आणि हा भ्रम उत्पन्न होतो कसा, त्यांचें प्रयोजन काय, हें स्पष्ट करून, त्याच्या तात्पुरत्या अस्तित्वाचें समर्थन करतें. हें सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणजे सर्वोत्तम अनुभव होय. हा सर्वोत्तम अनुभव, सर्व प्रकारचा अनुभव एका सत्यांत समाविष्ट करतो; परात्पर सर्वसमन्वयी एकत्व, एकतत्त्व हें तें सर्वसमावेशक एकमेव सत्य होय. मायावाद ''सर्व'' निकालांत काढून एकत्व स्थापित करतो; कोणत्याहि ज्ञानाला, अनुभवाला तो सत्यता, सार्थता देत नाहीं -- केवळ एकाच अनुभवाला तो सार्थता, सत्यता देतो तो म्हणजे जीवाचा ब्रह्मनिर्वाणाचा सर्वोत्तम अनुभव होय; अर्थात् मायावादनिष्ठ सर्वोत्तम अनुभव आणि सत्यवादनिष्ठ सर्वोत्तम अनुभव यात महदंतर आहे. हें अंतर सहज लक्षांत येण्यासारखें आहे.

      हा जो युक्तिवाद आतांपर्यंत आम्ही केला आहे त्याचें क्षेत्र हें बुद्धीचें क्षेत्र आहे, बुद्धि आणि आत्मा या वेगळ्या वस्तू आहेत; बुद्धीच्या क्षेत्रांत, वादविवाद करून, सत्यांची सत्यता पारखण्यांत येते पण ही परीक्षा आत्मविषयक आत्मिक सत्यांच्या बाबतींत अंतिम होऊं शकत नाहीं; आत्मिक सत्यांच्या बाबतींत अंतिम कसोटी बुद्धिवाद नव्हे; आत्मानुभव ही या बाबतींत अंतिम कसोटी असते. आत्मा ही नित्य वस्तु आहे, आत्म्याच्या प्रकाशांत आत्मा हा आत्मिक सत्य पाहतो व त्याची सत्यता, असत्यता, कमीअधिक सत्यता ठरवितो, बुद्धि या सत्यांविषयीं खल करूं शकते पण अंतिम निर्णय आत्म्याच्या अनुभवावरच अवलंबून राहतो. आत्म्याचा संशयित अनुभव पारखून घ्यावयासाठीं आत्म्यानें दुसरे अनुभव घ्यावे लागतात. आत्मिक सत्यांच्या बाबतींत शेवटला पंच बुद्धि होऊं शकत नाहीं. एखाद्या सत्याविषयीं तर्कबुद्धीनें मोठी पूर्वोत्तर पक्षाची इमारत रचून निर्णय दिला, तरी तो निर्णय एकाच निश्चयात्मक आत्मानुभवानें संशयित, खोटा ठरूं शकतो, त्याला आधार म्हणून उभारलेली

पान क्र. ३०९

 

मोठी तार्किक इमारत त्या अनुभवाच्या धक्क्यानें एकदम भुईसपाट होऊं शकते. मायावादानें या बाबतींत पक्की बैठक घेतलेली आहे, फार भक्कम पायावर त्यानें आपल्या सिद्धांताची इमारत रचली आहे. मायावाद ही केवळ मनानें रचलेली विचारांची एक तत्त्वज्ञानी रचना असली, तरी जो अनुभव या रचनेच्या मुळाशीं आहे तो अनुभव अत्यंत प्रबळ आणि ''अंतिम'' वाटणाऱ्या आध्यात्मिक साक्षात्काराचा सहचर आहे. विचार शांत झाला, मनानें स्वतःच्या रचनांपासून तोंड फिरविले, रचनाकार्य सोडून तें अंतर्मुख झालें, शुद्ध आत्मस्थितींत आम्हीं प्रवेश केला, सर्व व्यक्तित्व, विश्वत्व ज्या अवस्थेंत सर्वथा बहिष्कृत असतें, मुळींच प्रतीत होत नाहीं अशा विशुद्ध आत्मस्थितींत आम्ही प्रविष्ट झालो म्हणजे स्वयंभू सत्याचा, अनादि ब्रह्माचा आम्हांला साक्षात्कार होतो, आम्ही आतांच खरे जागे झालों आहों, खरेंखुरें सत्य दाखविणारी जागृति आतांच आम्हांला आली आहे, अशी जोरदार भावना ब्रह्मसाक्षात्कारानें -- मी ब्रह्म आहे या साक्षात्कारानें -- निर्माण होते. अशा स्थितींत ब्रह्मनिष्ठ आत्मव्याप्त मन व्यक्ति आणि विश्व यांजकडे पाहूं लागलें म्हणजे त्याला सहजच तें सर्व आभासरूप दिसतें, एक स्वयंभू ब्रह्म सत्य आहे आणि नामें, आकार, आंदोलनें यांचा एक सुसंहत संघात त्या एकमेव सत्यावर खोटा खोटा उभा केला आहे असें त्यास सहजच प्रतीत होतें. मन शांत शांत झाल्यानें आम्हांला शांत विशुद्ध आत्मस्थिति -- 'मी ब्रह्म आहे' या साक्षात्काराची आत्मस्थिति -- प्राप्त होते. मीचें मनपण जाऊन त्याला आत्मत्व आलें, ब्रह्मत्व आलें (आत्मा = ब्रह्म) कीं साक्षात्काराची सीमा झाली असें नव्हे. आत्मत्वांत सत् आणि चित् आणि शांत आनंद (प्रगाढ शांति) यांचा सहभाव असतो. असें आत्मत्वहि ध्यानानें मागें पडतें; ज्ञान आणि अज्ञान शुद्ध जाणिवेंत (चित् मध्यें) विलीन होऊन जी चिन्मय आत्मस्थिति येते, ती मागें टाकून आत्मा शुद्ध सत् च्या चिन्मयातीत समाधिस्थितींत जातो; आणखी एक पाऊल पुढें टाकून, तो सन्‌मात्र स्थिति सोडून, प्रगाढ शांतीच्या समाधिस्थितींत जातो. या स्थितींत जाणिवेचें, चित्‌चें भान नसतें; अस्तित्वाचें, सत्‌चेंहि भान नसतें; कालाचें, अवकाशाचें कशाचेंहि भान नसतें, अनन्त शांति निर्विषय शांति असें स्वरूप या चित्-सत्-अतीत समाधिस्थितींत आत्मा धारण करतो. हे सर्व साक्षात्कार त्या त्या ठिकाणीं पूर्णपणें सत्य आहेत यात शंका नाहीं. अध्यात्मप्रवण

पान क्र. ३१०

 

साधकाला वरील प्रत्येक साक्षात्कार, आत्मा एकच एक सत्य आहे या अनुभवाची खात्री पटवितो हें नाकारतां येत नाहीं. पण एक गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे ती ही कीं, कोणताहि आध्यात्मिक अनुभव घ्या, तो अनुभव अनंताचा अनुभव असतो, आणि हा अनंतविषयक अनुभव अनेक बाजूंनीं अनेक प्रकारें घेतां येतो; वर जो अनुभवाचा प्रकार आपण पाहिला, त्या प्रकारांत दिव्य केवळ तत्त्व इतक्या जवळून साधक अनुभवतो,या त्याच्या अनुभवांत केवलाच्या सत्यसांनिध्याची प्रतीति इतक्या व्यापकतेनें आणि घनतेनें भरलेली असते, केवलाहून कनिष्ठ अशा सर्व गोष्टींच्या बंधनांतून आपण मोकळे झालों आहों, या मुक्तीच्या भावनेनें या अनुभवांत एवढी शांति आणि आत्मशक्ति साधकाला व्यापून टाकते कीं, साधकाला ही अनुभूति सर्वथा पूर्ण आणि ''अंतिम'' आहे अशी निश्चिति, निःसंदेह निश्चिति वाटते -- पण या अनुभवाच्या उपरिनिर्दिष्ट प्रकाराप्रमाणें दुसरेंहि कांहीं प्रकार तशीच आणि तितकीच निःसंदेह निश्चिति साधकाच्या मनांत उत्पन्न करणारे आहेत, ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. सर्वश्रेष्ठ सत्याजवळ जाण्याचे शेकडों मार्ग आहेत; ज्या मार्गाचा आम्ही अवलंब करूं, त्या मार्गाच्या स्वरूपानुसार ''अंतिम'' तत्त्वानुभवाचें स्वरूप असणार; या ''अंतिम'' अनुभवांतून साधक त्या अनिर्वचनीय तत्त्वांत, सत्यांत प्रवेश करीत असतो, जें तत्त्व, जें सत्य साधक आपल्या मनाला वर्णून सांगूं शकत नाहीं, ज्याला वर्णावयास कोणतीहि भाषा पुरी पडूं शकत नाहीं. हे सर्व ''अंतिम'' अनुभव खऱ्या अंतिम अनुभवाच्या, केवलानुभवाच्या अलीकडील ''उप-अंतिम'' अनुभव म्हणतां येतील. मनाच्या मर्यादा ओलांडून आत्मा ज्या पायरीच्या आश्रयानें केवलांत उडी किंवा बुडी घेतो ती पायरी म्हणजे उप-अंतिम अनुभव होय. आतां प्रश्न असा आहे कीं, वर जो निश्चल शुद्ध आत्मस्थितीचा, व्यक्तिविश्वशून्य आत्मस्थितीचा अनुभव सांगितला, तो अनेक उप-अंतिम अनुभवांपैकीं एक अनुभव समजावयाचा कीं खरा अंतिम -- सर्व मार्गांच्या शेवटीं सर्व साधकांना येणारा, दुसरे सर्व अनुभव खालच्या पायरीवरचे ठरवून त्यांना आपल्या उपस्थितीनें नाहींसें करणारा असा अंतिम अंतिम - अनुभव समजावयाचा ? हा अनुभव खरा अंतिम समजावा असा एक पक्ष आहे. दुसरें सर्व ज्ञान आणि दुसरे सर्व अनुभव हा अनुभव मागें टाकीत असेल, तर हा अनुभव खरा अंतिम आहे हें मान्य करावें लागेल. पण या अनुभवाला मागें टाकणारे अनुभव आहेत, असा प्रतिपक्ष आहे. आत्मस्थितीचा,

पान क्र. ३११

 

व्यक्तिविश्वशून्य आत्म्याचा हा अनुभव ''आत्मा आहे''चा अनुभव आहे -- याच्या पलीकडचा, या अनुभवाला मागें टाकणारा अनुभव ''असत्''चा शून्याचा, ज्या असत्‌मध्यें, शून्यामध्यें आत्मा शून्य होतो, त्या शून्याचा अनुभव आम्हांला घेतां येतो; तसेंच विश्व-जाणीव आणि एकमेव अस्तित्व (ज्या अस्तित्वामध्यें विश्व-जाणीव निर्वाण पावते, नष्ट होते तें अस्तित्व) या दोन अनुभवांच्या पलीकडे शून्याचा जसा अनुभव घेतां येतो, तसा या दोन गोष्टी ज्याची (ज्या पूर्ण सत्याची) दोन अंगें आहेत अशा एकच एक दिव्य पुरुषोत्तमाचाहि अनुभव घेतां येतो. असें एक वचन आहे : द्वैत आणि अद्वैत यांच्या पलीकडे असें एक परम तत्त्व आहे कीं ज्याच्या आश्रयानें हीं दोन तत्त्वें एकत्र राहतात; हें परमतत्त्व मूळ सत्य आहे आणि त्या मूळ सत्याच्या पोटांत द्वैत आणि अद्वैत हीं तत्त्वें असल्यानें, त्यांना सत्यत्व प्राप्त झालें आहे. तेव्हां व्यक्तित्व-विश्वत्वशून्य आत्मस्थितीचा प्रत्यय हा केवलाकडे पोंचणारा एक श्रेष्ठ उप-अंतिम अनुभव आहे असेंच म्हटलें पाहिजे. आध्यात्मिक प्रत्यय जेवढे म्हणून आहेत, जेवढे म्हणून शक्य आहेत ते सर्व खरे आहेत असा प्रत्यय जो आध्यात्मिक अनुभव घेतो आणि जो या सर्व अनुभवांच्या सत्याला आपल्या पोटांत घेतो, जो प्रत्येक अनुभवाला त्याचें त्याचें पूर्णरूप, प्राप्तव्य प्राप्त करून देतो, सर्व प्रकारचे सर्व ज्ञान आणि सर्व प्रकारचा सर्व अनुभव एका सर्वश्रेष्ठ सत्याचीं अंगें म्हणून जो एकत्र सुसंघटित करून, त्या सर्वांगपूर्ण सत्याचें दर्शन घेतो, तो आध्यात्मिक अनुभवच सर्वोच्च अनुभव समजला पाहिजे, तोच खरा अंतिम अनुभव असला पाहिजे. त्यांतच व्यापकतम सर्व-प्रकाशक सर्व-उद्धारक वस्तुसत्य आहे, त्यांतच सर्वश्रेष्ठ अनंत सर्वातीत सत्य आहे -- हा सर्वोच्च अनुभव व बाकी सर्व अधिकांत अधिक उप-अंतिम अनुभव अशी वर्गवारी करणें युक्त होईल. ब्रह्मासंबंधानें उपनिषदांत असें म्हटलें आहे कीं, जें जाणल्यानें सर्व जाणलें जातें तें ब्रह्म, तें परम सत्य होय -- पण मायावादानुसार ब्रह्म तें की जें जाणलें असतां सर्व असत्य होतें, सर्व अनाकलनीय रहस्य बनते. आतांच ज्या अनुभवाचें वर्णन केलें, त्या अनुभवांत ब्रह्म, श्रेष्ठ सत्य जाणल्यानें सर्व गोष्टींना त्यांचें त्यांचें खरें अर्थत्व, महत्त्व येतें; अनंत शाश्वत केवल सत्याच्या पोटांत सर्व गोष्टींना त्यांची त्यांची सत्यता लाभते.

सर्व सत्यें, जीं सत्यें अन्योन्यविरोधीं असतात तीं देखील आपापल्यापरी आपापल्या स्थानीं सार्थ आणि मोलाचीं असतात; एवढेंच कीं,

पान क्र. ३१२

 

या विरोधी सत्यांना सामावून घेणारें, त्यांचा समन्वय साधणारें त्यांच्यापेक्षां मोठें व्यापक असें सत्य त्यांना आश्रयार्थ आवश्यक असतें; सर्व दर्शनें, तत्त्वज्ञानें मोलवान् असतात, उपयुक्त असतात; अनंताचें जें हें अनंतमुखी आविष्करण विश्वांत आहे, त्याचा अनुभव आत्मा घेत असतो; या आत्म्यानें विशिष्ट दृष्टिकोनांतून घेतलेला परमात्म्याचा आणि विश्वाचा अनुभव त्या त्या दर्शनांत, तत्त्वज्ञानांत मांडलेला असतो -- हा आत्म्यानें घेतलेला विशिष्ट अनुभव अनंतांतील अनेक ज्ञातव्यांपैकीं कोणत्या तरी ज्ञातव्यावर, जाणावयाच्या वस्तूवर कांहीं प्रकाश अवश्य टाकीत असतो -- म्हणून प्रत्येक दर्शन, प्रत्येक तत्त्वज्ञान मोलाचें आहे, उपयुक्त आहे असें म्हणावयास प्रत्यवाय नाही. सर्व आध्यात्मिक अनुभव खरे असतात, पण ते सर्व अशा एका उच्चतम आणि व्यापकतम सत्याकडे बोट दाखवितात कीं, जें सत्य या अनुभवांतील सत्य मान्य करतें आणि स्वत: त्या सत्याहून अधिक मोठें आणि श्रेष्ठ असतें. या सर्व अनुभव-चर्चेचा अर्थ असा कीं, सर्व सत्यें, सर्व अनुभव सापेक्ष असतात; ज्ञान करून घेणारें, अनुभव घेणारें मन आणि मनुष्य ज्या प्रकाराची बाह्यविषयक दृष्टि आणि आंतरविषयक दृष्टि बाळगीत असेल, त्या दृष्टीवर सत्य आणि अनुभव अवलंबून राहील; भिन्न दृष्टि तर भिन्न सत्य, भिन्न अनुभव अशी अनुभवाची व सत्याची स्थिति असणार. असें म्हटलें जातें कीं, प्रत्येक माणसाचा धर्म त्याच्या प्रकृतीनुसार वेगळा वेगळा असतो; हीच गोष्ट तत्त्वज्ञानाला लागू आहे; प्रत्येक माणसाचें तत्त्वज्ञान त्याचें त्याचें स्वतःचें स्वतंत्र असतें, अस्तित्वाकडे बघण्याची पद्धति प्रत्येकाची वेगळी असते, अस्तित्वाचा अनुभव प्रत्येकाचा निराळा असतो -- आणि या अनुभवांतून व दर्शनपद्धतींतून तत्त्वज्ञान निर्माण होत असल्यामुळें, प्रत्येकाचें तत्त्वज्ञान स्वतंत्र असतें -- अर्थात् सर्वच कांहीं आपल्या तत्त्वज्ञानाला शाब्दिक सूत्रांचें स्वरूप देऊं शकत नाहींत, पण सर्वांचें ज्याचें त्याचें स्वतंत्र तत्त्वज्ञान असतें. हीच गोष्ट दुसऱ्या तऱ्हेनें मांडावयाची तर असें म्हणतां येईल कीं, अनंताला अनंत अंगें आहेत; मानसिक किंवा आध्यात्मिक अनुभवांत, त्याच्या एका किंवा अनेक अंगांचें ओझरतें किंवा संपूर्ण दर्शन प्रत्येक बघणाराला घडतें; या अनुभवांत साधकाला अनंताच्या एखाद्या अंगाचा स्पर्श घडतो, किंवा साधक त्या अंगानें अनंतांत प्रवेश करतो. मनाचा विकास एका विशिष्ट अवस्थेपर्यंतच झाला असला म्हणजे हे सगळे दृष्टिकोन आणि त्यांतून पडलेली विविध दर्शनादि अनुभूति

पान क्र. ३१३

 

अनिश्चितता, संशययुक्तता धारण करते आणि विशाल सर्वसमावेशक अथवा सर्वसहिष्णु संमिश्र स्याद्‌वृत्ति अथवा संशयी वृत्ति त्यांची  (विविध अनुभूतींची) जागा घेते; किंवा असेंहि घडूं शकतें कीं, एक अनुभव सोडून बाकीचे अनुभव त्याला गतार्थ होतात आणि या अनुभवांत अंतिम सत्य भरलें आहे असा साक्षात्कार त्याला होतो, त्याचें सर्व चित्त या अंतिम साक्षात्कारांत विलीन होऊन जाते. असें झालें म्हणजे त्याला असें वाटण्याचा संभव उत्पन्न होतो कीं, त्यानें तोंपावेतों जें पाहिलेलें असतें, तोंपावेतों जो विचार केलेला असतो, त्याच्या स्वतःचा किंवा त्याच्या विश्वाचा भाग म्हणून जो अनुभव त्याला तोंपावेतों आलेला असतो तो सर्व अनुभव, तो सर्व विचार, तें सर्व पाहिलेलें खोटें आहे. स्वत: पाहिलेलें सर्व खोटें आहे यावरून सर्व विश्व खोटें आहे असा निर्णय हें मन घेतें; किंवा त्याला असें वाटतें कीं विश्वांत तुकडे तुकडे सत्य आहेत, पण सर्व तुकड्यांना एकत्व आणणारें संघटक तत्त्व विश्वांत नाहीं; सर्व रूपात्मक अस्तित्वाला नकार देणारा शुद्ध अस्तित्वाचा अनुभव या मनाला आला, म्हणजे त्याला सर्व वस्तू नाहींतशा होतात, आणि शांत, निःशब्द, निश्चल एकतत्त्व ही एकमेव वस्तु त्याला प्रतीत होते. पण आमच्या जाणिवेनें येथेंच थांबलें पाहिजे असें नाहीं. तिनें जर नव्या एकतत्त्वमय दृष्टीनें पूर्वींच्या विविध वस्तूंकडे पाहिलें, तर असें शक्य आहे कीं, तिला त्या सर्व वस्तू एकतत्त्वाच्या पोटांत दिसतील, एकतत्त्वाचें सत्य त्या सर्व वस्तूंना सत्यता समर्पीत आहे असें दिसेल; निर्वाणाचें सत्य (विश्वशून्यतेचें सत्य) आणि विश्वपूर्णतेचें सत्य हीं दोन्हीं सत्यें त्या एकतत्त्वाचे आविष्कार आहेत, स्वत: तें एकतत्त्व या दोन प्रकारच्या देखाव्यांनीं स्वतःचा आविष्कार करीत आहे असें आमच्या जाणिवेच्या अनुभवास येईल. आत्म्याच्या जाणिवेच्या मानसिक, अधिमानसिक, अतिमानसिक अशा तीन अवस्था आहेत. मानसिक जाणिवेला विश्व हें एकताशून्य तुकड्यांचें दिसतें किंवा एकतत्त्वच सत्य आणि सर्व तुकडे असत्य असा साक्षात्कार होतो. अधिमानसिक जाणिवेला एकतत्त्व विविधरूपांनीं नटलेलें आहे असें दिसतें; हाच अनुभव अतिमानसिक जाणिवेला विशेष स्पष्ट स्वरूपांत येतो. अधिमानसिक जाणिवेला एकंदर विविधतेंत जें सुसंवादित्व प्रत्ययास येतें, तें सुसंवादित्व अधिक स्पष्टपणें आणि अधिक पूर्णपणें अतिमानसिक जाणिवेच्या प्रत्ययास येतें. अतिमानसिक जाणीव आणि अधिमानसिक जाणीव यांच्या संधिस्थानावर

पान क्र. ३१४

 

आत्मा उभा राहिला व तेथून अस्तित्वावर त्यानें नजर टाकली, म्हणजे त्याला महान् सुसंवादी, एकत्वप्रधान विश्वव्यवस्था अनुभवास येते.

      विश्वसत्यत्वाच्या या अनुभवाची शक्यता तपासून काय फलनिष्पत्ति होते तें आतां पहावयाचें आहे. विश्वमायेचा सिद्धांत आतांपावेतों तपासला; अस्तित्वाच्या रहस्याचें स्पष्टीकरण करण्यास हा मायेचा सिद्धांत आवश्यक आहे असें नाहीं. मनाच्या भ्रमंतीच्या एका विशिष्ट स्थळीं मायावाद जोरानें मनाची पकड घेतो हें खरें असलें, तरी अंतिम सत्याच्या मागें लागलेल्या जिज्ञासु साधकाला मायावाद अपरिहार्य नाहीं; सत्यवादानेंहि अस्तित्वाच्या रहस्याचा उलगडा होऊं शकतो, असा प्रत्यय आल्यावर मायावाद बाजूला ठेवून सत्यवादाची तपासणी करणें युक्त आहे. सत्यवादांत सत्याचा आणि सत्याच्या विकृतीचा अनुभव तपासावयाचा असतो; अर्थात् ज्ञान (सत्यदर्शी) आणि अज्ञान (विकृत सत्यदर्शी) यांचा प्रश्न सत्यवादांत आमच्या समोर असतो.

      सत्य म्हणजे काय ? या प्रश्नाच्या उत्तरावर ज्ञान-अज्ञानाच्या मीमांसेची फलनिष्पत्ति अवलंबून आहे. आमची विषयग्रहण करणारी जाणीव मर्यादित आहे, अज्ञानव्याप्त आहे. या मर्यादित जाणिवेचा अस्तित्वाशीं जो संबंध येतो त्या संबंधावर, त्या संबंधाच्या, संपर्काच्या पद्धतीवर सत्याविषयींच्या आमच्या कल्पना अवलंबून असतात; मूळ अंतिम जाणीव अस्तित्वाकडे ज्या तऱ्हेनें बघते त्या तऱ्हेपेक्षां आमच्या जाणिवेची तऱ्हा पुष्कळच वेगळी असणें शक्य आहे; तात्विक सत्य आणि त्यावर अवलंबून असणारें, त्यांतून निघणारें रूपात्मक सत्य, या दोहोंमध्यें अंतर असतें हें लक्षांत घेतलें पाहिजे; तसेंच आमची इंद्रियगत अनुभवशक्ति आणि आमची बुद्धि वरील तात्विक आणि अ-तात्विक सत्यांसंबंधानें आम्हांला जी संकुचित विकृत कल्पना किंवा अनुभूति करून देतात ती कल्पना किंवा अनुभूति आणि तात्विक, अ-तात्विक सत्यें यांजमध्येंहि अंतर असतें, हें आम्हीं लक्षांत घेतलें पाहिजे. आमच्या इंद्रियांना पृथ्वी सपाट दिसते आणि पुष्कळशा व्यवहारांत, कांहीं मर्यादेपर्यंत आम्हांला ही इंद्रियदृष्ट सत्यता सत्य मानून चालावें लागतें; खरी साकार सत्यता ही निराळी आहे, या सत्यतेच्या दृष्टीनें पृथ्वीचा सपाटपणा असत्य आहे; साकार सत्यतेच्या शोधांत असणारे भौतिक विज्ञान, पृथ्वी जवळजवळ गोलाकार आहे असें धरून आपले प्रयोग करीत असतें. साकार वस्तूंचें खरें सत्य ठरवितांना, इंद्रियांचा पुरावा विज्ञान रद्द ठरवितें अशा पुष्कळच

पान क्र. ३१५

 

बाबी आहेत, तरी इंद्रियांनीं खरी म्हणून घालून दिलेली वस्तुविषयक व्यवस्था आम्हांला त्या त्या वस्तुसमुदायाशीं वा वस्तूशीं व्यवहार करतांना खरी धरून चालणें प्राप्त होतें; कारण ही व्यवस्था खऱ्या व्यवहारी सत्यांतूनच निघालेली असते आणि व्यवहाराला उपयुक्त असते; ही इंद्रिय-पुरस्कृत वस्तुव्यवस्था खोटी समजत व्यवहार करणें धोक्याचें असतें, ती दुर्लक्षून व्यवहार करणें अडचणींत टाकणारें असतें, म्हणून मूळ सत्याला ती धरून नसली, तरी व्यवहारासाठीं सत्य मानावी लागते. ही इंद्रियदृष्ट सत्याची गोष्ट झाली. आमची बुद्धि इद्रियांनीं दिलेल्या गोष्टी विश्वासानें घेऊन त्यांच्यापुढें जाते, त्यांचा विचार करून स्वतःचे सत्य-असत्याचे आडाखे ठरविते; पहाणारी व्यक्ति ज्या दृष्टिकोनांतून हा सर्व पाहण्याचा व तपासणीचा व्यवहार करीत असेल, त्या दृष्टिकोनावर हे आडाखे, नियम अवलंबून असतात आणि म्हणून ते बघणाराप्रमाणे निरनिराळे होऊं शकतात. ही झाली सामान्य बुद्धीची आणि तिच्या सत्यांची गोष्ट. आतां वैज्ञानिकाचे भौतिक विज्ञान काय करतें तें पाहूं. हें विज्ञान वस्तुसत्य, साकारसत्य आणि या सत्याच्या प्रक्रिया शोधून काढतें आणि या पायावर आपलें सत्यविषयक आणि व्यवहारविषयक निकष आणि सूत्रावलि उभी करतें. या वैज्ञानिकाच्या दृष्टीला, मन हें जडद्रव्याचा आंतरिक ज्ञातृविषयक परिणाम आहे असें दिसूं शकेल; आत्मा, चैतन्य ही असत्यें आहेत, असें त्याचें मत बनूं शकेल. निदानपक्षीं या वैज्ञानिकाला त्याचा विज्ञाननिष्ठ व्यवहार करतांना असेच गृहीत धरावें लागेल कीं, खरें अस्तित्व म्हणजे जडद्रव्य आणि जडशक्ति हेंच आहे; भौतिक वस्तुसत्य हें स्वतंत्र सत्य आहे; मन हें केवळ या सत्याचा द्रष्टा आहे; मनाच्या व्यापारामुळें भौतिक सत्याच्या अस्तित्वांत कांहींहि कमीअधिक होत नाहीं. विश्वदर्शी बुद्धि, विश्वात्मा म्हणून कोणी आहे व त्याच्या असण्यामुळें किंवा हालचालीमुळें भौतिक सत्याच्या स्वरूपांत कांहीं बदल होऊं शकतो असेंहि नाहीं. वस्तुवैज्ञानिकाची ही गोष्ट झाली. आतां मनोवैज्ञानिक कांहीं निराळेंच सांगतो. हा वैज्ञानिक स्वतंत्रपणें मनाचा शोध घेतो, मनाची जाणीव आणि नेणीव यांच्यात उतरून तेथील वस्तुस्थिति पाहतो, आणि या तपासणींतून त्याला सत्यांचें वेगळेंच आंतरिक, मानसिक क्षेत्र प्रतीत होतें. या क्षेत्राचे नियम स्वतंत्र आहेत, या क्षेत्राची प्रक्रिया स्वतंत्र आहे असें त्याला दिसून येतें; मन हेंच सत्याची गुरुकिल्ली आहे; जडक्षेत्र हें केवळ मनाच्या व्यवहारासाठीं

पान क्र. ३१६

 

आहे; मनाहून वेगळें असें चैतन्य किंवा आत्मा कांहीं खरोखरी अस्तित्वांत नाहीं; अशी सत्यविषयक कहाणी मनोवैज्ञानिक सांगतो. परंतु जिज्ञासूची तपासणी अधिक पुढेंहि जाऊं शकते. या अधिक खोल तपासणींत आत्मा, चैतन्य या गोष्टी सत्य म्हणून प्रतीत होतात. आत्मसत्याची प्रतीति झाली म्हणजे आंतरिक मानसिक सत्यें, बाह्य भौतिक सत्यें यांजविषयींचीं आमचीं अगोदरचीं मतें बदलतात -- हीं दोन्हीहि सत्यें गौण दुय्यम बनतात आणि प्रमुख मूलभूत सत्यें म्हणून आत्मा, चैतन्य यांचा स्वीकार होतो. मन आणि जडद्रव्य आत्मसत्यदृष्टीला कमी प्रतीचीं सत्यें वाटतात, आणि हीं कमी प्रतीचीं सत्यें सत्येंच नव्हेत, मिथ्या वस्तू आहेत असाहि प्रत्यय आत्मसत्यदृष्टीला येऊं शकतो.

      आमच्या बुद्धीला सान्त मर्यादित गोष्टींशीं नेहमीं व्यवहार करावा लागतो. या संवयीमुळें आमची बुद्धि सत्याच्या बाबतींत, कांहीं घ्यावें, कांहीं टाकावें असा प्रकार करीत असते; कोणतीहि गोष्ट तिजसमोर आली कीं तिचा एखादा भाग घेऊन तो भाग म्हणजे पूर्ण वस्तु आहे अशा तऱ्हेनें बुद्धि तिच्याशीं तिच्या संबंधांत व्यवहार करते; कोणत्याहि सत्याची अशीच चिरफाड करून, त्यांतला एखादा भाग पूर्ण सत्य आहे अशा आविर्भावानें बुद्धि व्यवहार करते. बुद्धीच्या स्वाभाविक कार्याला अशा चिरफाडीची आणि अंश-स्वीकार, अंश-त्याग या गोष्टीची आवश्यकता असते. बुद्धीचा व्यवहार सांत, मर्यादित वस्तूंशींच असल्यानें बुद्धीनें जी अंश-त्यागाची व्यवस्था आपल्या व्यवहारासाठीं पत्करलेली असते ती आम्हांला मान्य करावी लागते. ही व्यवस्था मान्य न केल्यास बुद्धीचा व्यवहार होऊंच शकत नाहीं. आमच्या सत्यजिज्ञासेच्या प्रवासांत आम्ही सत्यापर्यंत आलों, तरी बुद्धि आपला स्वभाव दाखविते; आत्मिक सत्य हें पूर्ण असतें किंवा पूर्णाला सामावून घेणारें असें असतें; पण तेथेंहि बुद्धि आपलें चिरफाडीचें, वर्गीकरणाचें काम करण्यास चुकत नाहीं. सांताच्या ज्ञानाला ज्या व्याख्या आवश्यक असतात, त्या बरोबर घेऊन बुद्धि आत्म्याच्या पूर्णतेच्या क्षेत्रांत प्रवेश करते व आपल्या सान्तविषयक व्याख्या तेथेंहि कामास लावते. अनन्त आणि सान्त, आत्मा आणि त्याचें व्यक्त रूप किंवा व्यक्त रूपें, असा भेद करून बुद्धि एकाला अनंताला, आत्म्याला सत्याच्या वर्गांत व दुसऱ्याला सांताला, व्यक्ताला असत्याच्या वर्गांत घालते. मूळ व अंतिम जाणीव अस्तित्वाच्या सर्व गोष्टी एका संपूर्ण दृष्टिक्षेपांत आकलन करते म्हणून ती बुद्धीप्रमाणें

पान क्र. ३१७

 

तुकडे पाडीत नाहीं. तिला सर्व अस्तित्व तात्विक दृष्टीनें मूळ आध्यात्मिक तात्विक सत्य म्हणून प्रतीतीस येते आणि तिला जें व्यक्त दिसतें तें सर्व या तात्विक सत्याचें प्रकट स्वरूप आहे असें दिसतें. जर या व्यापक आध्यात्मिक जाणिवेला वस्तुजात सर्व असत्य दिसलें असतें आणि स्वतःच्या आत्मसत्याशीं त्या वस्तुजाताचा कांहीं संबंध नाहीं असें दिसलें असतें -- अर्थात् ही जाणीव सत्यदर्शी जाणीव आहे असें आपण धरून चालतो, जाणतो -- तर या सत्यविरोधी असत्य वस्तुजाताला कालक्षेत्रांत कायमच्या किंवा पुनःपुनः आवर्तन करणाऱ्या अस्तित्वांत त्या जाणिवेनें निश्चितच ठेवलें नसतें, तसें ठेवण्याचें तिला कांहीं कारण नव्हतें; पण हें वस्तुजात ज्याअर्थीं अस्तित्वांत ठेवलें जात आहे, त्याअर्थीं आत्म्याच्या सत्यावर तें आधारलेलें आहे हें उघड आहे. याप्रमाणें व्यक्त सत्याकडे मूळ पुरुषाच्या समग्रतेच्या दृष्टीनें पाहिलें म्हणजे मर्यादित पुरुषाच्या बुद्धीला आणि इंद्रियांना दिसणाऱ्या सत्यापेक्षां त्याला तें पुष्कळच वेगळें दिसेल; त्याला खोल सत्यत्वाचें, महान् अर्थाचें अंतरंग आहे असें प्रत्ययास येईल, त्याच्या हालचाली, त्याचे अस्तित्वविषयक, जीवनविषयक व्यवहार फार संकीर्ण आणि सूक्ष्म आहेत असें अनुभवास येईल. मर्यादित बुद्धीनें आणि इंद्रियवर्गानें सत्याच्या ज्या कसोट्या उभ्या केलेल्या असतात, जे विचाराचे नमुने तयार केलेले असतात, ते विचार-प्रकार आणि त्या सत्यनिर्णायक कसोट्या मूळ महान् जाणिवेला अर्धवट रचना म्हणून भासतील; त्या रचनांत कांहीं सत्य आहे, कांहीं असत्य किंवा चुकीचें आहे असें दिसेल; अर्थात् या रचनांना सत्य आणि असत्य असें एकाच वेळीं म्हटलें तर तें वावगें होणार नाहीं, पण बुद्धिकृत रचना असत्य-सत्य ठरल्या म्हणून व्यक्त विश्व हें कांहीं असत्य किंवा असत्य-सत्य होऊं शकणार नाहीं; त्याला विशिष्ट आध्यात्मिक सत्यता असलेली दिसेल. हें सान्त व्यक्त विश्व अनन्ताची एक शक्ति आहे, एक हालचाल आहे, एक व्यवहार-प्रक्रिया आहे असा प्रत्यय त्या महान् जाणिवेला घडेल.

      मूळ अंतिम जाणीव ही अनन्ताची जाणीव असते, ती स्वभावतःच एकात्म असते, विविधतेकडे ती एकात्मतेच्या दृष्टीनें बघते; ती समग्रतायुक्त असते; सर्वसंग्राहक, सर्वसमावेशक, सर्वनिर्णायक, सर्वविशेषविधायक आणि म्हणून सर्वभेदसंपादक, सर्वदर्शी आणि अविभाज्य अशी ती जाणीव असते. या जाणिवेला वस्तुजाताचें तत्त्व दिसतें. या तात्विक सत्यापासून उदय पावलेले त्याचे गौण परिणाम म्हणून ती विश्वांतील

पान क्र. ३१८

 

सर्व रूपांकडे आणि हालचालींकडे बघते. बुद्धीचा असा दावा असतो कीं, सत्य, विरोधी गोष्टींच्या कसल्याहि विरोधापासून मुक्त असलें पाहिजे. बुद्धीच्या या आग्रहानुसार, दृश्य जग तात्विक ब्रह्माचे विरोधी असल्यानें किंवा तसें दिसत असल्यानें तें असत्य म्हटलें पाहिजे; व्यक्तिरूप आत्मा हा विश्वातीत आणि विश्वरूप आत्म्याला विरोधी असल्यानें किंवा तसा दिसत असल्यानें तो असत्य म्हटला पाहिजे. आमच्या बुद्धीचा पाया सान्त वस्तु असल्यानें तिला विरोधी वस्तूचा विरोध जेथें तेथें भासतो -- पण ज्या बुद्धीचा पाया अनन्त आहे, त्या विशाल बुद्धीला, दृष्टीला, सान्त बुद्धीला दिसणारे विरोध हे विरोध म्हणून भासणार नाहींत हें शक्य आहे. आमच्या बुद्धीला अन्योन्यविरोधी भासणाऱ्या गोष्टी अनन्त जाणिवेला अन्योन्यपूरक दिसतील; तत्त्व आणि त्यावर आधारलेलें, त्यांतून निघालेलें मूर्त दृश्य या गोष्टी अन्योन्यपूरक आहेत; त्या कांहीं अन्योन्यविरोधी गोष्टी नव्हेत. तत्त्वाचें व्यक्त रूप म्हणजे त्यापासून उदय पावलेलें दृश्य; सान्त, मर्यादित वस्तु ही अनन्ताची विरोधी वस्तु नसून अनन्ताची अंगभूत गोष्ट आहे; व्यक्तिरूप आत्मा हा, विश्वात्मा आणि विश्वातीत आत्मा यांचें प्रकट स्वनिर्मित स्वरूप आहे; हा आत्मा त्या दोन आत्म्यांचा विरोधी नाहीं किंवा त्यांहून वेगळाहि नाहीं; हा व्यक्तिरूप आत्मा विशिष्ट स्थानीं केंद्रीभूत झालेला आणि विशिष्ट आवडीनिवडीचा विश्वात्माच आहे, त्याचें अस्तित्वाचें आणि स्वभावाचें तत्त्वरूप विश्वातीत आत्म्याच्या तत्त्वरूपाशीं एकरूप आहे. अरूप तत्त्व हें आपल्या पोटीं रूपांचा मोठा पसारा धारण करतें या गोष्टींत एकात्म सर्वसमावेशक दृष्टीला कांहीं अंतर्विरोध दिसत नाहीं; अनन्त हे स्थितिशील राहून गतिशीलता धारण करतें, अनन्त एकत्व हें जीवांचा, अंगांचा, शक्तींचा, आंदोलनांचा मोठा पसारा उभा करून, त्याच्या द्वारां आपलें अंतर्गत स्वरूप प्रकट करतें, या गोष्टींत कांहीं अंतर्विरोध दिसत नाहीं. याप्रकारें विश्वाची निर्मिति होण्यांत अस्वाभाविकता कांहींहि नाहीं, ही निर्मितीची क्रिया अनंताकडून अगदीं स्वाभाविकपणें, अनिवार्यपणें घडत असतें; अनन्त हें क्रियाशील होतांच ही क्रिया घडणें अपेक्षित असतें, आणि या क्रियेंतून कसलाहि प्रश्न उत्पन्न होत नाहीं. प्रश्न उत्पन्न होतो तो मर्यादित बुद्धीमुळें उत्पन्न होतो; बुद्धीच बुद्धीला (स्वत:ला) प्रश्न उत्पन्न करून ठेवते; बुद्धि मर्यादित आणि मर्यादिणारी असल्यानें, अनन्ताचें अस्तित्व वेगळें, त्याची शक्ति वेगळी, अनन्ताची स्थितिशीलता वेगळी,

पान क्र. ३१९

 

गतिशीलता वेगळी, त्याचें तात्विक एकत्व वेगळें आणि त्याचें स्वाभाविक अनेकत्व वेगळें असा भेद करते. हा नसता वेगळेपणा कल्पून त्या वेगळ्या गोष्टींत विरोधाची कल्पना करते; मूळ एक आत्माहि फोडून, आत्मा वेगळा आणि प्रकृति वेगळी अशी कल्पना करून, त्या दोहोंचा विरोध कल्पिते, अनन्ताची विश्वप्रक्रिया आणि शाश्वताची कालप्रक्रिया आम्हांला नीट समजून घ्यावयाची असेल, तर आमची जाणीव तिचें मर्यादित बुद्धीचें स्वरूप, मर्यादित इंद्रियशक्तीचें (संवेदनशक्तीचें) स्वरूप टाकून पुढें, वर गेली पाहिजे, विशाल बुद्धीचें, आध्यात्मिक संवेदनेचें स्वरूप तिनें धारण केलें पाहिजे; अनन्ताची जाणीव समजूं शकेल, अनन्ताचें तर्कशास्त्र उमजूं शकेल इतकी उन्नत, आमची विशाल बुद्धि व आध्यात्मिक संवेदना व्हावयास हवी; अनंताचें तर्कशास्त्र हें मूळ अस्तित्वाचेंच तर्कशास्त्र असतें; अनंत अस्तित्व आपल्या सत्यांचा जो स्वनियोजित व्यवहार करतें, त्या व्यवहारांतूनच त्याचें तर्कशास्त्र निर्माण होतें; या अनंताच्या तर्कशास्त्रांत ज्या क्रमवार पायऱ्या असतात, त्या अस्तित्वाच्या पायऱ्या असतात, विचाराच्या पायऱ्या नसतात; विचारांच्या क्रमवार पायऱ्यांचें तर्कशास्त्र हें मर्यादित बुद्धीचें तर्कशास्त्र असतें.

      असा आक्षेप घेतला जाऊं शकतो कीं, आतां वर्णिलेली जाणीव ही विश्व-जाणीव आहे, विश्व-जाणीव आणि व्यक्ति-जाणीव ह्या, पूर्ण निरपेक्ष केवल तत्त्वाला मर्यादा घालतात आणि विभागतात, म्हणून या दोन्ही जाणिवा असत्य आहेत, विश्व असत्य आहे, व्यक्ति असत्य आहे. या आक्षेपाला उत्तर असें आहे कीं, केवल तत्त्वाला खरोखरीच कशानेंहि मर्यादा पडत नाहीं, बंधन होत नाहीं. अरूपता किंवा सरूपता दोन्ही गोष्टी केवलाला बांधूं शकत नाहींत. एकता व अनेकता, निश्चलता वा चंचलता, अक्रियता वा सक्रियता कोणीहि केवलावर कांहींहि दडपण, बंधन, मर्यादा आणूं शकत नाहीं. केवल तत्त्वरूप प्रकट करतें, पण कोणत्याहि रूपानें तें मर्यादित होऊं शकत नाहीं, तें अनेकता प्रकट करतें पण ही अनेकता त्याला विभागूं शकत नाहीं, तें गति आणि रूपात्मक अस्तित्व प्रकट करतें पण गतीनें तें हालत नाहीं किंवा रूपात्मक अस्तित्वानें तें बदलत नाहीं; निर्मिति तें करते, स्वत: अरूपाचें सरूप होतें म्हणून तें जसें दमत नाहीं, (सरूपानें त्याचें अरूपत्व पूर्णतया प्रकट होत नाहीं) तसेंच तें त्या निर्मितीनें, सरूपतेनें मर्यादित देखील होत नाहीं. जड वस्तू देखील, त्या स्वत: ज्या वस्तू व्यक्त करतात त्या

पान क्र. ३२०

 

व्यक्त वस्तूंहून वरच्याप्रमाणें श्रेष्ठ असतात; माती ही मातीच्या वस्तूंनीं बांधली जात नाहीं; हवा ही तिच्या पोटीं निर्माण होणाऱ्या वादळांनीं बांधली जात नाहीं, समुद्रावरील लाटांनीं समुद्र बांधला जात नाहीं. मर्यादा, बंधन हें मनानें व संवेदनाशक्तीनें निर्माण केलेलें कल्पित चित्र आहे; मनाला, इंद्रियसंवेदनेला सांत गोष्टी स्वतंत्र दिसतात, अनन्तांतून फुटून वेगळ्या झाल्यासारख्या दिसतात, त्यांतून मर्यादा घालून तोडल्यासारख्या दिसतात; ही जी मनाची, हंद्रियसंवेदनेची कल्पना आहे ती कल्पना खोटी आहे, आभासरूप आहे; अनन्त कांहीं आभासरूप नाहीं, अनन्तांतून निघालेलें सान्त रूपहि आभासरूप नाहीं -- कारण संवेदना आणि मन यांच्या कल्पनेवर कांहीं अनन्ताचें, सान्ताचें अस्तित्व अवलंबून असत नाहीं -- केवल तत्त्वाच्या पायावर, त्याच्या आधारावर त्यांचें अस्तित्व सुप्रतिष्ठित असतें.

      स्वयंपूर्ण केवल तत्त्व हें बुद्धीनें व्याख्या करण्यासारखें नाहीं, शब्दांनीं वर्णन करण्यासारखें नाहीं. बुद्धि त्याची व्याख्या करूं शकत नाहीं. शब्द त्याचें वर्णन करूं शकत नाहींत. अनुभव हा एकच, केवलाकडे जाण्याचा मार्ग आहे. तें व्याख्यातीत, शब्दातीत तत्त्व अनुभवातीत नाहीं, अनुभव आम्हांस त्याच्याजवळ नेऊं शकतो, त्याचा संपर्क घडवू शकतो. अस्तित्वाचा संपूर्ण अभाव, एकाग्रतेनें सत्य कल्पून, आम्हांला त्या केवल तत्त्वाचें सान्निध्य घडूं शकतें; सर्वोच्च असत्, रहस्यरूप अनन्त शून्य हें त्या केवल तत्त्वाचें स्वरूप एकाग्रतेनें कल्पून, आम्हांला त्याचें दर्शन घडूं शकतें; अस्तित्वाच्या पूर्ण निषेधानें (विलयानें) ज्याप्रमाणें आम्हांला केवल तत्त्वाची भेट होऊं शकते, त्याप्रमाणें आमच्या अस्तित्वाचीं जीं पायाभूत अंगें आहेत, त्या अंगांचें एकैकश: पूर्णत्व एकाग्रतेनें दृष्टीसमोर ठेवूनहि, त्या तत्त्वांचें दर्शन आम्हांला घडूं शकतें. प्रकाश आणि ज्ञान या अंगांची पूर्णता, प्रेम व सौंदर्य या अंगांची पूर्णता, सामर्थ्य या अंगाची पूर्णता, शांति किंवा मौन या अंगाची पूर्णता -- या सर्व पूर्णता किंवा यांपैकीं कोणतीहि पूर्णता एकाग्रतेनें भाविल्यानें त्या केवलाची जवळीक आम्हांला लाभूं शकते. पूर्ण असताचा अनुभव हा त्या केवलाचा अनुभव आहे, पूर्ण ज्ञानाचा, प्रेमाचा, सामर्थ्याचा, शांतीचा अनुभव हा त्या केवलाचा अनुभव आहे, पूर्ण अस्तित्वाचा, पूर्ण जाणिवेचा, अस्तित्वाच्या पूर्ण शक्तीचा, अस्तित्वाच्या पूर्ण आनंदाचा अनुभव या सर्व वस्तू ज्यांत एकरूप झाल्या आहेत तो सर्वश्रेष्ठ अनुभव -- हे सर्व अनिर्वचनीय

पान क्र. ३२१

 

अनुभव केवलाचा अनुभव घडविणारे आहेत; आम्ही योग्य साधना करून वर वर्णन केलेल्या अनिर्वचनीय स्थितींत जाऊं शकतो, अस्तित्वाची प्रकाशमय अवस्था अनुभवूं शकतो, आणि अतिमानसिक जाणीव, केवल तत्त्वाचा जणुं दरवाजा असलेली जाणीव, मिळवूं शकतो. अशी एक कल्पना आहे कीं, व्यक्ति आणि विश्व यांचा विलय करूनच आम्हांला केवल तत्त्वांत प्रवेश करतां येतो; पण केवलाच्या अनुभवाकरितां वस्तुत: व्यक्तीनें आपलें क्षुद्र स्वतंत्र मीपणाचें अस्तित्व दूर करण्याची फक्त आवश्यकता आहे; व्यक्तीला जें आध्यात्मिक अस्तित्व असतें, त्या अस्तित्वाचें उन्नतीकरण त्यानें करावें, आपलें मी अस्तित्व दूर करावें, म्हणजे त्याचा केवलानुभवाचा मार्ग मोकळा होतो; व्यक्ति आपलें आध्यात्मिक अस्तित्व हें विशाल, उन्नत करून, त्यांत विश्व सामावून घेऊं शकते, आणि याप्रमाणें विश्वातीत होऊन, विश्वातीत केवलाचें सान्निध्य मिळवूं शकते; व्यक्ति स्वत:ला नष्टवत् करूं शकते, आणि याहि मार्गानें स्वत:च्या मर्यादित व्यक्तित्वाच्या पलीकडे जाऊन, अमर्यादित केवलांत प्रवेश करूं शकते; व्यक्ति आपलें अस्तित्व उन्नत व विशाल करून, सर्वोच्च सर्वश्रेष्ठ अस्तित्वांत प्रविष्ट होऊं शकते, आपल्या जाणिवेचें उन्नतीकरण करून, सर्वोच्च जाणिवेंत प्रविष्ट होऊं शकते, आपल्या आनंदाचें उन्नतीकरण करून, सर्वोच्च जीवनानंदांत प्रविष्ट होऊं शकते. व्यक्ति क्रमश: एकीहून एक उच्च अवस्था धारण करूं शकते, ती विश्वजाणीव आत्मसात् करून, ती पोटांत घेऊन, तिच्या पलीकडे पाऊल टाकून, त्या जाणिवेला आणि स्वत:ला अशा अवस्थेंत व्यक्ति चढवूं शकते कीं, जेथें एकत्व आणि अनेकत्व पूर्ण मेळानें एकत्र राहतात. ही मेळाची अवस्था केवलाच्या व्यक्ततेची सर्वोच्च अवस्था असते. या अवस्थेंत प्रत्येक व्यक्तींत सर्व व्यक्ती असतात, प्रत्येक व्यक्ति सर्वांत असते, आणि हा सर्व पसारा विशेषशून्य व्यक्तित्वशून्य अशा केवल एकतत्त्वांत असतो; या अवस्थेंत क्रियाशील एकत्व आणि अन्योन्यता पूर्णतेला गेलेली असते. केवलाकडे जाण्याचा जो अस्तित्वाश्रयी मार्ग आहे, त्या मार्गावर ही केवलाच्या व्यक्ततेची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे आणि ही साधकाला केवलाच्या अगदीं जवळ नेऊन पोहोंचविणारी आहे. दुसऱ्या सर्व अस्तित्वाश्रयी मार्गावरील अवस्थांपेक्षां ही अवस्था केवल तत्त्वाच्या अधिक जवळची आहे, केवल तत्त्वाचा साक्षात्कार अस्तित्वाच्या पूर्ण विलयाच्या द्वारां घेतां येतो, तसाच अस्तित्वाच्या अंगांचा किंवा अस्तित्वाचा पूर्ण

पान क्र. ३२२

 

पुरस्कार करून घेतां येतो आणि तो अनेक मार्गांनीं घेतां येतो. हा जो साक्षात्कार-मार्गासंबंधींचा दर्शनीं विरोध आमच्या अनुभवास येतो, त्या विरोधाचा अर्थ लावला पाहिजे. या विरोधाचा अर्थ असा आहे कीं, केवल तत्त्व हें असें सर्वोच्च अस्तित्व आहे कीं, तें आमच्या अस्तित्वाच्या कल्पनेहून फार वरतीं राहणारें आहे, आमची अस्तित्वविरोधी नास्तित्वाची कल्पना देखील या केवलाच्या अस्तित्वाच्या पोटांत येते. जें आहे तें सर्व तें (ब्रह्म) आहे हें केवलासंबंधींचें ऋषींचें विधान आहे : आमची ''आहे''ची कल्पना व अनुभूति आणि ''नाहीं''ची कल्पना व अनुभूति दोन्ही ब्रह्माच्या, केवलाच्या अस्तित्वाच्या पोटांत समाविष्ट होत असल्यानें, कोणतेंहि ''आहे'' पूर्णतेपर्यंत पोचवलें, कोणतेंहि ''नाहीं'' पूर्णतेपर्यंत पोंचवलें कीं त्या पूर्णतेच्या स्थानीं केवलाचा, केवलाच्या अस्तित्वाचा साक्षात्कार होतो. आम्ही ज्याला अस्तित्व, किंवा ज्याला नास्तित्व म्हणतों, त्या सर्व वस्तूंच्या पोटीं सारभूत, अंतर्यामी तत्त्व म्हणून केवल ब्रह्म असतें. हें तत्त्व अनिर्वचनीय आहे, सर्व तत्त्वांच्या वरतीं, सर्व तत्त्वांच्या खालतीं, सर्व तत्त्वांच्या पोटीं, सारतत्त्व म्हणून हे केवल तत्त्व, ब्रह्म नांदतें व आनंदमय क्रीडेंत मग्न असतें.

      केवल ब्रह्म हें सर्वश्रेष्ठ अस्तित्व आहे, सर्वोच्च सत्य आहे असें आमचें आद्य विधान आहे. प्रश्न आहे तो या केवलाखेरीज जें आमच्या अनुभवास येतें त्या संबंधांचा आहे, हें अनुभवास येणारें दुसरें सर्व, सत्य कीं असत्य असा प्रश्न आहे. अस्तित्व आणि व्यक्त अस्तित्व असा फरक करून, अस्तित्व हें सत्य आहे आणि व्यक्त अस्तित्व हें असत्य आहे असा पक्ष केव्हां केव्हां उभा करण्यांत येतो. जर अनिर्मित स्वयंभू शाश्वत केवल तत्त्व आणि निर्मित वस्तु, स्वयंभू अस्तित्व व निर्मित अ-स्वयंभू, अस्तित्वें यांत स्पष्ट भेद असेल, अमीट असें अंतर असेल, कायमचें तोडलेलें वेगळेपण असेल तर, हा पक्ष समर्थनीय होऊं शकेल. अशा परिस्थितींत स्वयंभू तेवढेंच सत्य असें म्हणतां येईल. परंतु वस्तुस्थिति अशी नाहीं; जें व्यक्त अस्तित्व आहे तें अस्तित्वाला (अव्यक्त अस्तित्वाला) रूप, आकार देणारें अस्तित्व आहे. अर्थात् व्यक्त अस्तित्वांत मूळ अस्तित्व-द्रव्य आणि त्याला दिलेला आकार अशा दोन गोष्टी आहेत. तेव्हां हें व्यक्त अस्तित्व असत्य होऊं शकत नाहीं. व्यक्त अस्तित्व हें, असत्, अनास्तित्व साकार करीत असेल, शून्यांतून निर्माण होत असेल तरच तें असत्य होऊं शकेल. अस्तित्वाच्या ज्या अवस्थांच्या

पान क्र. ३२३

 

द्वारां आम्ही केवलाकडे जाऊं शकतो, व त्यांत प्रवेश करूं शकतो, त्या अवस्थांत सत्यत्व असलेंच पाहिजे, कारण जें असत्य आहे त्याच्या द्वारां महान् सत्यांत, केवलांत प्रवेश होऊं शकणार नाहीं. तसेंच केवलांतून ज्याचा उदय होतो, शाश्वत तत्त्व ज्याला आधार होऊन, ज्याचे पोटीं राहून, ज्याला आपल्या अंतरीं प्रकट करतें त्यालाहि सत्यत्व असलें पाहिजे. अव्यक्त केवळ तत्त्व आणि व्यक्त विश्व यांत व्यक्त विश्व हें अव्यक्त सत्याचें प्रकट रूप असल्यानें तें सत्यच असलें पाहिजे; कालातीत अव्यक्त तत्त्व आणि कालव्याप्त व्यक्त वस्तुव्यवहार यांत कालांकित व्यक्त व्यवहार जो असेल, त्याचा पाया कालातीत अव्यक्त-तत्त्वांत असणें अनिवार्य आहे. माझा आत्मा, माझें चैतन्य सत्य असेल, तर माझे विचार, माझ्या भावना, माझ्या सर्व प्रकारच्या शक्ती या आत्म्याच्या प्रकट मूर्ती असल्यानें त्यांना सत्यत्व असणें अपरिहार्य आहे; माझें शरीर हें त्या आत्म्यानें आपल्या पोटीं निर्माण केलेला आकार आहे, या आकारांत हा आत्मा वस्ती करीत आहे, असें असल्यानें तें शरीर एक शून्याचें स्वरूप आहे किंवा तें एक सत्वहीन छाया आहे असें म्हणतां येत नाहीं -- तें केवळ शून्य किंवा केवळ छाया होऊं शकत नाहीं. वरील वस्तूंतील दर्शनी विरोध मिटविणारें स्पष्टीकरण असें आहे कीं, जें शाश्वत केवळ तत्त्व आहे, त्याचीं दोन अंगें आहेत, एक कालातीत नित्य वस्तु आणि दुसरें कालांकित नित्य वस्तु; हीं दोन्हीं अंगें सत्य आहेत. एक अंग सत्याच्या एका वर्गांत आहे, दुसरें अंग सत्याच्या दुसऱ्या वर्गांत आहे. कालातीत तत्त्वांत जे अव्यक्त असतें, तेंच कालक्षेत्रांत स्वतःला व्यक्त करीत असतें; अस्तित्वांत जें जें आहे तें सत्य आहे, व्यक्ततेचा अंश कोठें कमी असेल, कोठें अधिक असेल इतकेंच. ज्ञानमय अनन्त जें व्यक्त होत असतें, तें या व्यक्त अस्तित्वांतील वस्तूंकडे, आपल्या रुपांकडे याच दृष्टीनें बघत असतें.

      अस्तित्वावर जशी अभिव्यक्ति (व्यक्त अस्तित्व) अवलंबून असते, तशी ती जाणिवेवरहि अवलंबून असते; जाणिवेच्या पायऱ्या आहेत; जाणिवेच्या पायरीवर, अवस्थेवर व्यक्त अस्तित्वाची पायरी, अवस्था अवलंबून असते. अचेतन म्हटली जाणारी चेतनेची, जाणिवेची अवस्था घ्या. ही जाणिवेची घडीबंद, घनीभूत, आत्मकेंद्रित अवस्था असते. या अवस्थेंत अस्तित्वाची अवस्था तत्सम असते, म्हणजे अभिव्यक्तिशून्य अनास्तित्वासारखी असते. ज्या अवस्थेंत व्यक्त चेतना नाहीं, त्या अवस्थेंत व्यक्त अस्तित्वहि नाहीं, असा चेतनेचा (जाणिवेचा) आणि

पान क्र. ३२४

 

अस्तित्वाचा घनिष्ठ संबंध असतो; जड विश्वाची अभिव्यक्ति मूळ सत् चित् ने (अस्तित्व सहभावी जाणिवेनें) घेतलेल्या असत्-अचित्, (अनास्तित्व सहभावी अचेतन) रूपांतून झाली आहे; अचेतन ही जशी चेतनेची (जाणिवेची) एक निकृष्टतम अवस्था आहे, तशी अतिचेतन ही दुसरी उत्कृष्टतम अवस्था आहे. या अवस्थेंत अस्तित्वाची अवस्थाहि तत्सम म्हणजे उत्कृष्टतम, पूर्णतम अशी असते. या पूर्णतम अस्तित्वांत पूर्णतम चेतना (जाणीव) लुप्त होऊन बसते. पूर्णतम अस्तित्वांत लुप्त झालेली जाणीव स्वतःला पारखी झाल्यासारखी होते, स्वतःला ती जाणत नाहीं -- या अवस्थेंतून ती व्यक्त होऊं लागते. अस्तित्वाची जाणीव, ज्ञान, आत्मदृष्टि, अस्तित्वाची शक्ति या गोष्टी जाणिवेच्या घडीबंद स्थितींतून वर येतात असें दिसतें; जाणिवेचें हें प्रकट होणें म्हणजे मूळ श्रेष्ठ सत्यतेच्या अवस्थेंतून कमी सत्यतेच्या अवस्थेंत येण्यासारखें दिसतें; तथापि एकच मूळ सत्य, व्यक्त जाणीव आणि अतिचेतन जाणीव या दोन्ही जाणिवांचा दर्शनविषय असतें, आणि दोन्हीं जाणिवा या मूळ सत्याचींच रूपें असतात, मूळ सत्याचें स्वरूपच असतात. परम तत्त्वाची अशी एक अवस्था आहे कीं, जेथें अस्तित्व आणि जाणीव वेगळीं करतां येत नाहींत, वेगळीं भासत नाहींत, दोन्ही अंगें इतकीं एकरूप असतात कीं, त्यांच्यामध्यें भेद करणें अशक्य होतें. ही अस्तित्वाची सर्वश्रेष्ठ अवस्था अस्तित्वाच्या शक्तीची पण सर्वश्रेष्ठ अवस्था असते, आणि म्हणून जाणीवशक्तीची सर्वश्रेष्ठ अवस्था असते; या अवस्थेंत अस्तित्वाची शक्ति आणि त्याच्या जाणिवेची शक्ति एकरूप असतात, त्या विभक्त करतां येत नाहींत. सर्वश्रेष्ठ परमेश्वराची सुस्थिर अवस्था म्हणजे ही अविभक्त शाश्वत अस्तित्वाची आणि शाश्वत जाणीवशक्तीची एकता होय. केवलाची क्रियाशील अवस्था म्हणजे या एकताविशिष्ट ईश्वरी अस्तित्वाची शक्ति होय. विश्वाचा अभाव या अवस्थेंत नसतो, या अवस्थेंत विश्वगत सर्व अस्तित्वाचें सारतत्त्व आणि सामर्थ्य अंतर्भूत असतें.

      पण, सत्यांतून सत्यच निघणार या दृष्टीनें विश्व सत्य असलें तरी विश्वांत असत्य म्हणून कांहीं आहे हें कांहीं खोटें नाहीं; सर्व कांहीं ब्रह्म आहे, अर्थात् सर्व कांहीं सत्य आहे हें जर खरें असेल, तर या सत्यांत असत्याचा जो अंश सांपडतो, तो तेथें कसा आला, कसा येतो तें आपण पाहिलें पाहिजे. अस्तित्वाचा भाग म्हणून कांहीं असत्य या विश्वांत

पान क्र. ३२५

 

असूं शकत नाहीं, असत्य अस्तित्व अशी वस्तु जर जगांत नाहीं, तर असत्य हा जाणिवेचा रचलेला आकार असला पाहिजे. जाणिवेची अशी एक अवस्था किंवा पायरी, पातळी असली पाहिजे कीं, ज्या पायरीवर जाणिवेचे व्यवहार, जाणिवेचे आकार पूर्णपणें किंवा अंशत: असत्य असतात, बनतात. मूळ विश्वमाया या असत्यतेच्या मुळाशीं आहे असें म्हणतां येत नसेल, मानतां येत नसेल तर विश्वांतच आभास निर्माण करणारी अज्ञानाची शक्ति आहे ती या असत्यतेच्या मुळाशीं आहे असें म्हणतां येईल. मनाला अशी शक्ति आहे कीं, त्या शक्तीच्या आश्रयानें सत्य नसणाऱ्या वस्तूंची कल्पना तें करतें, अशीहि शक्ति मनाला आहे कीं, जिच्या आधारानें त्या पूर्ण किंवा अंशत: असत्य गोष्टी निर्माण करतां येतात; मनाची स्वतःसंबंधाची कल्पना, आणि विश्वासंबंधांची कल्पना ही देखील पूर्णपणें सत्य नाहीं, पूर्णपणें असत्य नाही अशा प्रकारची रचना आहे. असत्याचा हा अंश कोठें सुरू होतो, कोठें थांबतो ? या असत्याचें कारण काय ? हें कारण आणि त्याचा परिणाम दोघांनाहि अस्तित्वांतून काढून टाकल्यावर काय घडतें ? हे प्रश्न आपल्यासमोर येतात. विश्वाचें अस्तित्व सर्वच स्वभावत: असत्य नसलें, तरी ज्या अज्ञानाच्या विश्वांत आम्ही वावरतों, त्या विश्वाला असत्य म्हणतां येणार नाहीं काय ? हें अज्ञानाचें विश्व स्वभावत: सारख्या होत रहाणाऱ्या परिवर्तनांचें, जन्म-मृत्यूचें, निराशेचें, यातनेचें विश्व आहे; हें असें अज्ञानाचें विश्व असत्य आहे असें म्हणण्यास काय प्रत्यवाय आहे ? अज्ञान हें असें विश्व आम्हांला निर्माण करून देतें -- तें अज्ञान नष्ट झाल्यावर त्यानें निर्मिलेल्या विश्वाची सत्यता आमच्यापुरती नष्ट होते अशी वस्तुस्थिति आहे कीं नाहीं ? या अज्ञानाच्या विश्वांतून निघून जाणें ही गोष्ट स्वाभाविक असून, अज्ञानाचें विश्व ज्यांच्या वांट्यास येतें ते आम्ही त्यांतून (यातना, निराशा इत्यादिकांतून) सुटण्यासाठीं एवढीच गोष्ट करूं शकतों ही वस्तुस्थिति आहे कीं नाहीं ? आमचें अज्ञान जर शुद्ध अज्ञान असतें, त्यांत ज्ञानाचा, सत्याचा अंशहि नसता, तर या अज्ञानाच्या विश्वांतून निघून जाणें एवढाच मार्ग, जन्ममृत्यू, निराशा, यातना यांतून सुटण्यास आम्हांला उपलब्ध होता ही गोष्ट खरी आहे. पण आमची जाणीव खरें आणि खोटें यांचें मिश्रण आहे, या जाणिवेचे व्यवहार, तिच्या रचना शुद्ध काल्पनिक नसतात, पायाशून्य इमारती नसतात. ही जाणीव जी इमारत उभारते, विश्वाचा जो आकार, वस्तूचा जो आकार ती घडते, ती इमारत,

पान क्र. ३२६

 

ते आकार सत्य आणि असत्य यांची भेसळ नसतो, तर जें सत्य आहे त्याचें अर्धवट ग्रहण, अर्धवट प्रकटन असें आमच्या जाणिवेनें निर्माण केलेल्या इमारतीचें, आकारांचें स्वरूप असतें. जेवढी जेवढी म्हणून जाणीव आहे, तेवढी शक्ति असते, सर्व प्रकारची जाणीव शक्तिरूप असते; अर्थात् निर्माणाचें, भावी निर्मितीचें मूळ जाणीवरूपी शक्तींत असते; असें असल्यानें अज्ञान ही जी जाणिवेची अवस्था तिचा परिणाम हा, चुकीची निर्मिति, चुकीची अभिव्यक्ति, चुकीची क्रिया किंवा थोडक्यांत, अस्तित्वाच्या शक्तीची अयथार्थ कल्पना करून तिला भलत्या दिशेनें कार्यकारी करणें अशा प्रकारचा होतो. विश्वांतील सर्व अस्तित्व हें अव्यक्त अस्तित्वाची अभिव्यक्ति आहे. आमचें अज्ञान हें अभिव्यक्तीचें एक साधन आहे -- मात्र ही अज्ञानकृत अभिव्यक्ति अंशप्रधान, मर्यादित असते -- मूळ अस्तित्व, जाणीव आणि अस्तित्वाचा आनंद ती अंशत: व्यक्त करते आणि अंशत: कसल्यातरी सोंगाखालीं लपविते. विश्वाची ही स्थिति कायमची असेल, तिच्यांत कांहीं बदल होणें अशक्य असेल, आमचें विश्व सध्यांच्या अज्ञानचक्रांत नेहमीं फिरत राहणार असेल, अज्ञान हें अभिव्यक्तीची एक पार्श्वभू, एक परिस्थिति नसून, सर्व वस्तुजाताचें, सर्व क्रियाकलापाचें कारण कसलें तरी अज्ञानच असेल, तर व्यक्तीच्या अज्ञानाची समाप्ति विश्वाच्या अस्तित्वांतून निघून जाण्यानेंच होऊं शकेल, आणि विश्वाच्या अस्तित्वाचा विनाश होण्यानेंच विश्वात्म्याच्या अज्ञानाची समाप्ति होऊं शकेल, विश्वात्म्याच्या अज्ञानाची समाप्ति म्हणजे विश्व-प्रलय असें होईल. पण विश्वाच्या मुळाशीं जर विकासाचें तत्त्व असेल, आमचें अज्ञान हें अर्धवट ज्ञान असून, तें जर विकासक्रमानें पूर्ण ज्ञानाकडे जाणारें असेल, तर आमच्या जड निसर्गामधील अस्तित्वाची कहाणी वरच्यापेक्षां वेगळी होणें, आमच्या येथील अस्तित्वामधून वरच्यापेक्षां वेगळा आत्मिक परिणाम घडून येणें शक्य आहे, या विश्वांत अव्यक्त पूर्णाची प्रस्तुतपेक्षां महान्, महत्तर अभिव्यक्ति होणें शक्य आहे.

      असत्यविषयक आमच्या कल्पनांत वर जे भेद दाखविले आहेत त्यांहून कांहीं अधिक भेद येथें दाखविणें अवश्य आहे. अज्ञानाचा प्रश्न हाताळतांना या भेददर्शनाचा उपयोग होईल; या भेददर्शनानें हा प्रश्न हाताळतांना होणारा आमचा गोंधळ टळेल. असत्य-सत्याच्या बाबतींत मनाची किंवा मनाच्या एक अंगाची सत्य ठरविण्याची एक विशिष्ट कसोटी आहे. ही कसोटी व्यावहारिक आहे. जी गोष्ट वास्तव असेल,

पान क्र. ३२७

 

घडलेली असेल ती सत्य असा या मनाचा, मनाच्या अंगाचा आग्रह असतो. अस्तित्वांतील वास्तव गोष्ट असेल ती या मनाला सत्य असते, पण या वास्तवतेचें क्षेत्र या मनाला जड विश्वांतर्गत पृथ्वीवरील अस्तित्व एवढेंच असतें. पण भौतिक अस्तित्व, पार्थिव अस्तित्व हा पूर्णाच्या अभिव्यक्तीचा एक अंशमात्र आहे, पूर्ण अस्तित्वाच्या (पुरुषाच्या) वास्तवांत आलेल्या शक्यतांचा एक संघ म्हणजे पार्थिव भौतिक अस्तित्व होय. या पूर्ण पुरुषांत दुसऱ्या अनेक शक्यता आहेत, ज्या वास्तवांत उतरल्या नाहींत, निदान या पृथ्वीवर वास्तवांत उतरल्या नाहींत. कालांकित अभिव्यक्तीच्या बाबतींत नवीं नवीं सत्यें उदयास येऊं शकतात, वास्तवांत न आलेलीं अस्तित्वाचीं सत्यें त्यांच्यांतील शक्यता पुढें करून भौतिक पार्थिव अस्तित्वांत वास्तवांत येऊं शकतात; अतिभौतिक अशी अस्तित्वाचीं सत्येंहि असूं शकतात; अभिव्यक्तीचें पार्थिव क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांत वास्तवांत येणारीं अशीहि सत्यें असूं शकतात; कोणत्याहि विश्वांत वास्तवांत न आलेलें असेंहि अस्तित्वाचें सत्य असूं शकतें; व्यक्त अस्तित्वाचें एकादें रूप धारण केलें नाहीं, यासाठींच केवल अस्तित्वाच्या कोणत्याहि सत्याला असत्य म्हणतां येत नाहीं. परंतु मनाला किंवा मनाच्या विशिष्ट अंगाला वास्तवांत आलेलें तेवढेंच सत्य आणि वास्तवांत आलेलें नाहीं तें असत्य असें मानण्याची संवय झालेली आहे. तेव्हां केवळ व्यावहारिक असत्य म्हणून एक वर्ग मन मानतें. अर्थात् या वर्गांतील असत्यें वस्तुत: असत्यें नसतात, वास्तवांत न आलेलीं सत्यें हें त्यांचें स्वरूप असतें -- हीं सत्यें आमच्याकडून वास्तवांत येण्यासारखी नसतीलहि किंवा प्रस्तुत परिस्थितींत तीं वास्तवांत येण्यासारखीं नसतील, किंवा आमचें जें वास्तवाचें विश्व आहे, त्यांत ती येऊं शकत नसतील अशा सत्यांना असत्यांच्या वर्गांत घालणें हें व्यवहारासाठीं सोईचें असलें तरी, ही असत्यें खरीं असत्यें म्हणतां येणार नाहींत, अस्तित्वाच्या दृष्टीनें तीं कांहीं असत्यें नव्हेत. वर्तमान घटना या दृष्टीनें, ज्ञात घटना या दृष्टीनें, मात्र ती असत्यें आहेत, कारण त्यांचा वर्तमान ज्ञात घटनांत अंतर्भाव नसतो. असत्यांचा आणखी एक वर्ग आहे. सत्याचें चुकीचें संवेदन, चुकीची कल्पना झाल्यानें हें असत्य उत्पन्न होतें; हें असत्यहि अस्तित्वाचें असत्य असण्याचें कारण नाहीं -- अस्तित्वांतील जाणिवेनें, अज्ञानाच्या मर्यादा तिला पडल्यानें, ज्या अस्तित्वांतील सत्याची रचना विपरीत केलेली असते, असें हें सत्य असतें. अज्ञानाचे हे गौण

पान क्र. ३२८

 

व्यवहार आहेत; आमच्यापुढें जो प्रश्न आहे त्याचा गाभा या दुय्यम व्यवहारांत नाहीं. आमची जाणीव आणि जगाची जाणीव सामान्यत: सर्वच व्याधिव्याप्त झाली आहे; अज्ञान हें विश्वव्यापी आहे हा आमच्यापुढील प्रश्नाचा खरा गाभा आहे. अस्तित्वाचा जो अनुभव आम्हांला घडतो, जें दर्शन आम्हांला घडतें, तो सर्व अनुभव, तें सर्व दर्शन जाणिवेच्या मर्यादितपणानें व्याप्त, संकुचित झालेलें असतें; जाणिवेचा मर्यादितपणा हा कांहीं आमचाच विशेष नव्हे, भौतिक जगाच्या मुळाशींच हा मर्यादितपणा आहे असें दिसतें. मूळ आणि अंतिम जाणीव सत्य समग्रतेनें पाहते -- ती जाणीव येथें नसून, मर्यादित जाणीव येथें काम करते, येथील निर्मिति एकांगी असते, सदोष असते; विश्वाची हालचाल एका नित्य चक्रांत चालत असते, बदल होत असतात पण या बदलांना कांहीं अर्थ दिसत नाहीं -- अशा अर्थशून्य बदलांच्या नित्य चक्रांत विश्वाची हालचाल येथें चालूं असते. मूळ सत्याच्या अभिव्यक्तीचा एखादा अंश आमची जाणीव बघते किंवा कांहीं अंश तिच्या नजरेंत येतात, या अंशाला किंवा अंशांना स्वतंत्र वस्तु म्हणून आमची जाणीव वागविते; आमच्या सर्व चुका, आमचे सर्व भ्रम यांना कारण आमची मर्यादित जाणीवच असते, वस्तू स्वतंत्र आहेत ही मर्यादित जाणीव असत्यें निर्माण करते, जें सत्य आहे त्याचेविषयीं चुकीच्या कल्पना ही मर्यादित जाणीव उभ्या करते. आमच्यापुढील प्रश्नाची गूढता वाढण्यास एक कारण असें घडतें कीं, आमचें भौतिक जग हें मूळ चिन्मय अस्तित्व आणि त्याची जाणीव यांच्यांतून निघतांना आम्हांला दिसत नाहीं तर, अचेतनांतून, शून्यांतून (दर्शनी शून्यांतून) निघतांना आम्हांला दिसतें; आमचें अज्ञान देखील याचप्रकारें अचेतनांतून मोठ्या प्रयासानें, मोठ्या झटापटीनंतर वर आलें आहे असें आम्हांस दिसतें.

      तर मग हा आमच्यापुढील रहस्यमय प्रश्न आहे. अमर्याद जाणिवेचे आणि सामर्थ्याचें समग्र अस्तित्व (सद्‌वस्तु) मुळांत असतां, आमची मर्यादित, सर्व वस्तू विभक्त, स्वतंत्र बघणारी जाणीव तेथून निघाली कशी ? समग्राचें, संपूर्णाचें, विभक्त विभक्त अस्तित्व कसें झालें ? अमर्याद जाणीव आणि शक्ति मर्यादित कशी झाली ? समग्र अमर्याद सत्याच्या साम्राज्यांत या विभक्ततेचा, या मर्यादेचा अर्थ काय ? अभिप्राय काय ? प्रयोजन काय ? येथें रहस्य आहे तें मूळ भ्रमाचें, मूळ आभासाचें नव्हे तर अज्ञानाचें आणि अचेतनतेचें आहे; हें अज्ञान आणि अचेतनता आली कोठून हा

पान क्र. ३२९

 

रहस्यमय प्रश्न आहे; भ्रमाचा, आभासाचा प्रश्न येथें नाहीं; अज्ञान आणि अचेतनता आली कोठून हा जसा आमच्यासमोर प्रश्न आहे, तसा मूळ जाणिवेशीं, मूळ अतिमानसिक चैतन्याशीं आमच्या ज्ञानाचा, अज्ञानाचा संबंध काय आहे हाहि प्रश्न आमच्यासमोर आहे.

पान क्र. ३३०

 

प्रकरण सातवें

ज्ञान आणि अज्ञान

 

ज्ञात्यानें ज्ञान आणि अज्ञान यांजमधील भेद जाणून घ्यावा.

- ऋग्वेद ४.२.११

 

अनन्ताच्या गुप्त भांडारांत ज्ञान आहे, अज्ञान आहे; अज्ञान विनाशी आहे, ज्ञान अविनाशी आहे; ज्ञान आणि अज्ञान या दोहोंवर सत्ता चालवणारा या दोहोंहून वेगळा आहे.

- श्वेताश्वतर उपनिषद् ५.१

 

दोन अजन्मे आहेत, जाणणारा एक व ज्याला ज्ञान नाहीं असा दुसरा; ईश एक, ज्याला ईशत्व नाहीं असा दुसरा; एक अजा आहे आणि तिचे ठिकाणीं भोग्य आहे व भोक्ता आहे.

- श्वेताश्वतर उपनिषद् १.९

 

सत्याच्या शक्ती आणि मायेच्या शक्ती एकत्र झाल्या आहेत; एकत्र जोडल्या गेल्या आहेत; या संयुक्त शक्तींनीं महान् अपत्य गर्भरुपानें उभें केलें, त्याला जन्मास घातलें आणि त्याची वाढ होण्यासाठीं त्या त्याचें संगोपन, पोषण करीत आहेत.

- ऋग्वेद १०.५.३

 

सत्, चित्, आनंद, विज्ञान, मन, प्राण, अन्न (जड द्रव्य) या सात अस्तित्व-तत्त्वांची छाननी करतांना असें आढळून आलें कीं, त्यांचें पायाभूत मूळ तात्विक स्वरूप, सत्य स्वरूप एक आहे; या सात वस्तू एकाच सत्य वस्तूचीं विविध रूपें आहेत; अन्न किंवा जड द्रव्य घ्या. जडांत जडभौतिक विश्वाचें घटक जड द्रव्य हें चैतन्याची (सच्चिदानंदाची) एक अस्तित्वदशा आहे; जी चैतन्याची अस्तित्व-दशा इंद्रियसंवेदनाचा विषय म्हणून काम करते, तिला जड द्रव्य म्हणतात. रूपें घेण्यासाठीं जी त्याची अस्तित्व-दशा चैतन्याच्या जाणिवेला उपयोगी पडते, तिला जड

पान क्र. ३३१

 

द्रव्य असें नांव आहे; जड द्रव्याप्रमाणेंच प्राणिक शक्ति, मानसिक जाणीव आणि विज्ञान किंवा अतिमानसिक जाणीव याची गोष्ट आहे. प्राणशक्ति स्वत: जड द्रव्याचें रूप घेते; मानसिक जाणीव प्राणाचें रूप घेते; विज्ञान किंवा अतिमानसिक जाणीव मन या शक्तीस जन्म देते (अतिमानसिक जाणिवेच्या अनेक शक्तींपैकीं मन ही एक शक्ति आहे); जड द्रव्याप्रमाणें प्राण, मन, अतिमानस या वस्तू चैतन्यच आहेत, या वस्तूमध्यें त्याचें द्रव्य-स्वरूप दिसायला वेगळें आहे, त्याचें क्रियाशील स्वरूप दिसायला वेगळें आहे -- पण त्याचें तात्विक स्वरूप अगदीं बदललेलें नाहीं. सत्, चित्, आनंद, विज्ञान आदि सर्व शक्ती एका मूळ चैतन्याच्या अस्तित्वाच्या शक्तीच्या पोटशक्ती आहेत; मूळ चैतन्य हें सर्व-अस्तित्व, सर्व-जाणीव, सर्व-संकल्प, सर्व-आनंद या स्वरूपाचें आहे, प्रत्येक दृश्य स्वरूपाच्या पाठीमागें हें सत्य स्वरूप असतें -- प्रत्येक दृश्यांतील खरें सत्य हेंच असतें. मूळ सत्याचे, सद्वस्तूचे जे सात प्रकार वर सांगितले ते सत्यदृष्टीनें एक आहेत, एक वस्तु आहेत एवढेंच नव्हे, तर सात प्रकारचें त्यांचें कार्य असलें, तरी या विविधतेंतहि त्या सात वस्तू एकमेकींपासून अलग नसतात, अलग करतां येत नाहींत, त्या एकरूप, एकरस राहून भिन्न भिन्न कार्यें करतात. या सात वस्तू म्हणजे अनंत ईश्वरी चेतनेचे (चेतनेच्या प्रकाशाचे) सात किरण आहेत, सात रंग आहेत. या सात रंगांच्या, किरणांच्या बळावर चैतन्यानें आपल्या स्वयंभू अस्तित्वाच्या पटावर अदभुत चित्रें चितारलीं आहेत; चैतन्यानें आपल्या कल्पनाशक्तीनें या पटाचा विस्तार केला आहे; या पटाचा ताणा वस्तूभूत अवकाश आणि बाणा वस्तुज्ञानसंग्राहक काल, चैतन्यानें बनविला आणि या अवकाश-काल-घटित अस्तित्व-पटावर वरील सात रंगांच्या, किरणांच्या, कुंचल्यानें अनंत अदभुत चित्रें, स्वत:च्या रूपनिर्मितीचीं चित्रें त्यानें चितारलीं आहेत; या रूपरचनेचे आद्य नियम, तिच्या अतिविशाल चौकटी (योजना) महान् आहेत, साध्या आहेत, सुरूप घडणीच्या आहेत; चैतन्याच्या रूपांची विविधता, क्रियांची विविधता, त्यांच्या संबंधांची विविधता, सर्वांचा प्रत्येकावर होणारा परिणाम, प्रत्येकाचा सर्वांवर होणारा परिणाम -- या अन्योन्यविषयक परिणामांची विविधता खूप संकीर्ण आणि आश्चर्योत्पादक अशी आहे. सत् आदि सात वस्तू यांना चैतन्यचेतनेच्या प्रकाशाचे सात रंग, सात किरण असें म्हणतां येतें, त्याप्रमाणें त्यांना, प्राचीन ऋषींनीं ऐकलेले सात महान् शब्दहि म्हणतां येतें. आम्हांला जें

पान क्र. ३३२

 

विश्व माहीत आहे, त्यांतील आणि या विश्वाच्या पाठीमागें असलेलीं -- आम्हांला ज्यांचें प्रत्यक्ष ज्ञान नाहीं अशीं -- जीं विश्वें आहेत त्यांतील सुसंवादी, सुसंगत, सुसंबद्ध रचना ज्या आज विकसित स्वरूपांत अनुभवास येतात आणि ज्या विकसित होण्याच्या मार्गावर आहेत -- त्या रचना या ऋषिश्रुत सात शब्दांनीं जन्मास घातल्या आहेत, या रचनांचा अर्थ या सात शब्दांच्या अर्थाच्या साहाय्यानेंच समजून घेणें प्राप्त आहे. चैतन्याचा प्रकाश एक आहे, त्या प्रकाशाचें कार्य सात प्रकारचें आहे; चैतन्याचा मूळ शब्द एक आहे, त्या मूळ शब्दाचें कार्य सात प्रकारचें आहे.

चैतन्याच्या निर्मितीची, स्व-रूप-रचनेच्या विविधतेची कहाणी कथन केल्यानंतर आतां, आपल्या समोर जें जग आहे तें कसें आहे हें आपण पाहणें क्रमप्राप्त आहे. हें जग मूळ अचेतनाच्या पायावर रचलेलें आहे, येथें जाणीव जी साकार झालेली आहे ती, ज्ञानाच्या दिशेनें परिश्रम करीत राहणारें अज्ञान या स्वरूपांत साकार झाली आहे. ईश्वरी सृष्टीच्या क्रमांत अज्ञानानें मध्यें घुसावें, या सृष्टीच्या सुसंवादितेंत विसंवादानें वावरावें, या सृष्टीच्या प्रकाशमयतेंत अंधारानें राज्य करावें, या सृष्टीच्या अमर्याद आत्मजाणीवयुक्त एकरूप पसाऱ्यांत मर्यादा, विभक्तता यांनीं तुकडे पाडावे या गोष्टीला कांहीं तात्विक कारण दिसत नाहीं. मूळ अस्तित्वाचें स्वरूप पाहिलें किंवा त्या स्वरूपाचीं सात पोटतत्त्वें त्यांच्या मूळ स्वभावधर्माच्या दृष्टीनें आणि त्यांच्या मूळ अन्योन्य संबंधांच्या दृष्टीनें तपासलीं, तर तेथें अज्ञान आदिक गोष्टींनीं ईश्वरी सृष्टींत मध्यें घुसून गोंधळ घालावा याला कांहीं सबळ तात्विक कारण दिसत नाहीं. अशा सुसंवादपूर्ण विश्वाची आम्ही कल्पना करूं शकतों कीं, ज्यांत वरील विसंवादी गोष्टी नाहींत आणि येऊं शकत नाहींत. आम्ही ज्याची कल्पना करूं शकतो त्याची कल्पना ईश्वर अर्थातच करूं शकतो -- आणि जी कल्पना ईश्वर करतो ती वास्तवांत आणण्याची, त्या कल्पनेनुसार सुसंवादमय विश्व कोठेंतरी निर्माण करण्याची क्रियाकुशलता व क्रियासामर्थ्यहि ईश्वराजवळ असतें -- अर्थात् असें विश्व कोठेंतरी असलें पाहिजे, हें क्रमप्राप्त आहे. ईश्वरानें असली आत्म-अभिव्यक्ति-सुसंवादी विश्वाची अभिव्यक्ति -- केली आहे, असें वेदकालीन ऋषी मानीत होते; अशा विश्वाचा त्यांना अनुभव होता; हें आमचें जग कनिष्ठ पातळीवर आहे व तें सुसंवादमय जग वरच्या पातळीवर आहे, तें जग या जगापेक्षां मोठें आहे, तेथें येथल्यापेक्षां स्वतंत्रता पुष्कळच अधिक आहे,

पान क्र. ३३३

 

जाणीव आणि अस्तित्व यांची, या जगापेक्षां अधिक लांबरुंद आणि अधिक मोकळेपणा असणारी ती पातळी आहे; तें जग सृष्टिकर्त्यानें सत्य-सृष्टि म्हणून निर्मिलें आहे असें वेदयुगीन कवी मानीत -- या सत्यसृष्टीचा त्या ऋषींना अनुभव होता. ते ऋषी त्यांनीं अनुभवलेल्या या सुसंवादपूर्ण सत्यमय सृष्टीचें वर्णन अनेक प्रकारें करीत. ''सदनं ऋतस्य'' ''स्वे दमे ऋतस्य'' (सत्याचें स्थान, सत्याचें स्वतःचें घर) ''ऋतस्य बृहते'' (अतिमहान् सत्य) ''ऋतम् सत्यम् बृहत्'' (सत्य, साधुतामय (समुचित), अतिमहान्), सत्यानें झांकलेलें सत्य -- जेथें ज्ञानाचा सूर्य आपला प्रवास संपवितो, आपले घोडे सोडतो, जेथें जाणिवेचे इतस्तत: विखुरलेले सहस्त्र किरण एकत्र येतात, अर्थात् जेथें एकच एक पुरुषोत्तम आहे, ईश्वराची सर्वश्रेष्ठ मूर्ति आहे -- अशा अनेक प्रकारांनीं वेदकालीन ऋषी, त्यांनीं अनुभवलेल्या सुसंवादपूर्ण सत्य-सृष्टीचें वर्णन करीत. या ऋषींना आमचें जग, वरील जगाहून अगदीं वेगळें दिसत होतें. या जगाचा पसारा भिन्नरंगी ताणाबाणा असलेल्या पटासारखा दिसत होता. येथें सत्याचा ताणा (अनृतस्य भूरे: ऋग्वेद ७.६०.५) भरपूर असत्याच्या बाण्यानें विद्रूप करून टाकला आहे; येथें एकमेव प्रकाशाला आपलें अफाट बळ खर्चून मूळ अंधकाराच्या, अचेतनेच्या सागराच्या पोटीं जन्म घ्यावा लागतो. येथें अमृतत्व आणि देवत्व या वस्तू मृत्यू, अज्ञान, दुर्बळता, यातना, मर्यादितपणा यांच्या जोखडाखालीं असणाऱ्या अस्तित्वांतून, महान्, परिश्रमानें जीवाला स्वतःच्या ठिकाणीं क्रमश: उदयास आणाव्या लागतात. मनुष्य स्वतःच्या ठिकाणीं ही जी प्रकाशाची, अमृतत्वाची, देवत्वाची क्रमश: उभारणी करतो, त्या उभारणीला त्या दुसऱ्या सुव्यवस्थित सुसंवादपूर्ण जगाची, अनंत अस्तित्वाच्या उच्च सुसंगतपणाची मनुष्यानें स्वतःच्या ठिकाणीं निर्मिति करणें; अनंत ईश्वरांत जें सुसंगत सुव्यवस्थित, पूर्ण आणि शाश्वत असें जग अगोदरच आहे, त्याची मनुष्यानें स्वतःच्या ठिकाणीं निर्मिति करणें; असें ते ऋषी अलंकारिक रीतीनें म्हणत. हें आमचें जग कनिष्ठ आणि तें दुसरें जग श्रेष्ठ आहे, हें कनिष्ठ जग अनुभवून या अनुभवांतून तें दुसरें जग आम्ही प्राप्त करून घ्यावयाचें आहे, अशी योजना आहे असें तें ऋषी मानीत; अंधकार, अचेतनता, भेद आणि असत्य हीं या आमच्या जगाचीं वैशिष्ट्यें. पण अंधकार हें प्रकाशाचें घन शरीर आहे, अचेतनानें आपल्या पोटांत अतिचेतन नीट लपवून संभाळून ठेवलेलें आहे; भेद आणि असत्य आमच्यासाठीं एकतेचें

पान क्र. ३३४

 

धन, सत्याचें धन स्वतःच्या अर्ध जाणिवेच्या गुहेंत सुरक्षित ठेवीत आहेत -- आणि हा प्रकाश, ही अतिचेतन जाणीव, ही एकता आणि सत्य वस्तु आम्हांला आमच्या श्रमानें लाभणार आहे, असें ते ऋषी मानीत. वैदिक ऋषींची, आद्ययुगीन गुप्तपंथी साक्षात्कारी साधकांची भाषा रहस्यमय आहे; पण या भाषेंत त्यांनीं आमच्या येथील वास्तविक अस्तित्वाचा अर्थ वरीलप्रमाणें लावला आहे, आमच्या जगाचें समर्थन वरीलप्रमाणें केलें आहे; जाणून किंवा नेणून आम्ही देवत्वप्राप्तीचा जो प्रयत्न करतो, त्याचें इंगित वरीलप्रमाणें असल्याचें म्हटलें आहे. देवत्व आणि जीवत्व या गोष्टी सकृद्‌दर्शनी अगदीं विरुद्ध गोष्टी आहेत, जीवानें जीवाच्या जगांत राहून देवाच्या जगांत जाण्याची कल्पना करावी, आकांक्षा धरावी; क्षणजीवी, दुर्बळ, अज्ञानी, संकुचित प्राण्यानें अमृतत्व, पूर्णज्ञान, सामर्थ्य, आनंद, दिव्य अविनाशी अस्तित्व यांची अपेक्षा करून आकांक्षा बाळगावी, ही एक सकृद्‌दर्शनीं अशक्यप्राय गोष्ट वाटते; पण ती अशक्यप्राय आकांक्षा जीवाचे ठिकाणीं आहे. ही जी वस्तुस्थिति, तिचा अर्थ वैदिक ऋषींनीं वरीलप्रमाणें लावला आहे.

आमची ही सांप्रतची सृष्टि आणि आदर्श सृष्टि या दोहोंमध्यें फार अंतर आहे. आदर्श सृष्टींत अनंत आत्मा पूर्ण आत्म-जाणिवेनें युक्त असतो, पूर्ण आत्मतंत्रतेनें युक्त असतो, पूर्ण एकतेचा अनुभव घेतो -- याच्या बरोबर उलट स्थिति आमच्या सृष्टींत आहे. येथें मूळ साम्राज्य अचेतनाचें आहे. हें अचेतन, विकासक्रमानें प्राणशक्तींत रूपांतरित होतें; प्राणमय वस्तूंत (जीवांत) मर्यादित आणि विभक्ततेच्या आत्म-जाणिवेचे रूप तें घेतें; येथे मुळांत आंधळी स्वयंसिद्ध शक्ति जड वस्तूंना हांकीत असते आणि येथील वस्तू या शक्तीच्या दास्यांत निमूटपणें मुळांत वागत असतात; आत्मविकासानें प्राणमय वस्तूंत या जड दास्याला झगड्याचें रूप येतें, प्राणमय वस्तूंत (जीवांत) मर्यादित विभक्त आत्मजाणिवेचा पुरुष जडवस्तूप्रमाणें जडशक्तीचें दास्य करीत नाहीं, तर स्वतःचा आत्मा आणि भोंवतालच्या सर्व गोष्टी स्वतःच्या अधीन करून घेण्यासाठीं व स्वतःच्या अधीन ठेवण्यासाठीं झगडत असतो, आंधळ्या यांत्रिक शक्तीच्या साम्राज्यांत ज्ञानयुक्त इच्छेचें आणि सत्यज्ञानाचें राज्य स्थापण्यासाठीं झगडत असतो. यांत्रिक जड शक्ति (वास्तवांत अशी शक्ति नाहीं हें आतां आपण जाणतो) आम्हांला जेथें तेथें अडविते; सर्वांचे अगोदर ही शक्तीच येथें साम्राज्य करीत असते; ही शक्ति सर्वव्यापी

पान क्र. ३३५

 

आहे, येथील मूलभूत कायदा जडशक्तीचाच आहे; येथें जडशक्तीच महान् सर्वंकष शक्ति आहे -- आणि दुसऱ्या बाजूला जी कांहीं ज्ञानयुक्त इच्छाशक्ति आहे ती केवळ आमचीच आहे, आणि ती येथें जडशक्तींतून निघाली आहे, तिचा ती एक परिणाम आहे, ती एकांगी, अ-प्रधान, मर्यादित, मधून मधून उसळणारी अशी शक्ति आहे; म्हणून या दोन शक्तींमधील झगडा, आमच्या इच्छाशक्तीनें चालविलेला झगडा, अगदीं अनुकूल परिस्थितींतहि आमच्या दृष्टीनें एक साहस आहे. फार संशयित आणि फार धोक्यानें भरलेलें हें साहस आहे, असें म्हटल्यावांचून राहवत नाहीं. आमच्या दृष्टीनें पाहिलें, तर अचेतन हा आमच्या विश्वाचा आरंभ आहे आणि शेवट आहे; अल्पकाळ टिकणारी आकस्मिक वस्तु या रूपानें आत्मजाणीवयुक्त आत्मा या विश्वांत आम्हांला दिसतो; विश्वाचा अश्वत्थ वृक्ष अफाट विस्ताराचा, अंधकारमय राक्षसी प्रवृत्तीचा आहे आणि या वृक्षावर क्षणांत सुकून जाणारें फूल यावें आणि गळावें तसा हा आमचा आत्मजाणीवयुक्त आत्मा आहे. आत्मजाणीवयुक्त आत्मा शाश्वत टिकणारा आहे हा पक्ष स्वीकारला, तर हा आत्मा येथचा मूळचा रहिवासी नसून, परलोकींहून येथें आलेला आहे असें म्हणावें लागतें; या पाहुण्याला अचेतनाच्या या साम्राज्यांत फारसें चांगलें वागविलें जात नाहीं असेंहि म्हणणें भाग पडतें; अतिचेतन प्रकाश हा, या अचेतनाच्या अंधकारांत आत्म्याच्या रूपानें आकस्मिक रीतीनें येऊन पडला नसेल, तर असें म्हणणें भाग आहे कीं, येथें खालीं उतरण्यांत त्याची चूक झाली आहे.

विश्वासंबंधाची ही दृष्टि जर पूर्णपणें बरोबर असेल, तर मानवी प्रयत्न यशस्वीपणें देवत्व मिळवूं शकेल, किंवा या सृष्टींत ज्ञानाचें राज्य स्थापण्यांत मानवाला पूर्ण यश लाभेल ही कल्पना नि:सीम ध्येयवाद्याखेरीज कोणीहि स्वत:पुढें किंवा अश्रद्ध संशयी लोकांपुढें आत्मविश्वासानें ठेवूं शकणार नाहीं. हा नि:सीम ध्येयवादी न जाणो, कदाचित् उच्चतर जीवन असलेल्या कोणत्यातरी श्रेष्ठ लोकांतून येथें आलेला, पाठविलेला असेल, त्याला स्वत:चे जीवितकार्य विसरणें शक्य नसेल, दिव्य अंत:स्फूर्तीनें त्याला अजिंक्य उत्साह दिला असेल, स्थूल दृष्टीला न दिसणाऱ्या ईश्वराच्या शब्दानें, शक्तीनें आणि तेजानें त्याचें अंतरंग भरलें असल्यानें सृष्टीच्या प्रतिकूल परिस्थितींत त्याला शांतपणें असीम सहिष्णुतेनें आपला महान् संदेश लोकांपुढें ठेवण्याचें काम चिकाटीनें करतां येत असेल. तें कांहीं

पान क्र. ३३६

 

असो -- विश्वांतील वस्तुस्थिति अशी आहे कीं, बहुतेक माणसें सत्यज्ञानाचें राज्य येथें स्थापण्याचा प्रयत्न मुळापासूनच करीत नाहींत, अशा प्रयत्नाला यश येईल ही आशा मुळापासूनच धरीत नाहींत; किंवा या बाबतींत काहीं उत्साह आरंभीं आरंभीं दाखवितात, पण लवकरच आपली खटपट अशक्य गोष्टीसाठीं आहे असें सिद्ध झाल्याचें ठरवून ती बंद करतात. निर्भेळ जडवादी, धर्मवादी आणि तत्त्वाभ्यासी साक्षात्कारवादी या तीन प्रकारच्या लोकांचा कार्यक्रम, विश्वाच्या संबंधांतील त्यांच्या दृष्टीनुसार, तीन प्रकारचा असतो. निर्भेळ जडवादी हा सत्ता, ज्ञान, सुख यांजसाठीं धडपडत असतो; निसर्गाची अचेतन शासित व्यवस्था, धडपडणाऱ्या मानवी ''मी''ला थोडीशी, थोडावेळ टिकणारी सत्ता, ज्ञान व सुख देऊं शकते : मानवानें आपल्या मर्यादा मान्य कराव्या, निसर्गाचे नियम पाळावे, या नियमांचा आपल्या ज्ञानयुक्त इच्छेच्या बळावर त्यानें नीट उपयोग करावा -- हे नियम जड यांत्रिक भावनाशून्य असतात हें लक्षांत घेऊन, त्यांचा त्यानें शक्य तितका नीट उपयोग करावा म्हणजे थोडीबहुत सत्तादि ''संपत्ति'' थोडाबहुत काळ पावेतों मानवाला भोगावयास मिळावी अशी निसर्गांत व्यवस्था आहे; हें जाणूनच निर्भेळ जडवादी हा त्या थोड्या व थोडा वेळ लाभणाऱ्या सत्तेसाठीं, ज्ञानासाठीं व सुखासाठीं धडपडत असतो. धर्मवादी माणूस या लोकांतील प्राप्तव्यें तुच्छ लेखून, परलोकाकडे दृष्टि लावून धडपडत असतो, त्या परलोकांत त्याला हवें असलेलें देवाचें राज्य तो पाहत असतो. तेथें निर्भेळ आणि निरंतरचें ज्ञानयुक्त इच्छाशक्तीचें, प्रेमशक्तीचें राज्य त्याच्या दृष्टीला दिसत असते व त्यासाठीं तो कष्ट करतो. तत्त्वाभ्यासी साक्षात्कारवादी हा, इहलोक आणि परलोक दोन्हीहि मनोभ्रम म्हणून त्याज्य लेखतो, टाकून देतो आणि कसल्या तरी निर्वाणांत 'मी'चा विलय करूं इच्छितो, किंवा लक्षणशून्य केवल तत्त्वांत बुडी मारून राहूं इच्छितो; मायेच्या प्रभावाखालीं असणाऱ्या व्यक्तीच्या मनाला किंवा आत्म्याला या अज्ञानव्याप्त क्षणभंगुर जगात ईश्वरी साक्षात्काराचें स्वप्न पडलें असेल, दिव्यत्वाचा अनुभव येथें येऊं शकेल असें स्वप्न पडून, अशी कल्पना येऊन त्या स्वप्नाच्या, त्या कल्पनेच्या पाठीमागें एखाद्या व्यक्तीचें मन किंवा आत्मा लागला असेल, तर त्याला आपली चूक शेवटीं कळून येईल व तो आपली व्यर्थ धडपड सोडून देईल हें ठरलेलें आहे -- अशी तत्त्वाभ्यासी साक्षात्कारवादी माणसाची दृष्टि आहे. पण, जडवादी, धार्मिक आणि तत्त्वप्रिय

पान क्र. ३३७

 

रहस्यवादी यांचा कार्यक्रम वरीलप्रमाणें असला, तरी अस्तित्वाला एक प्रकृतीचें (निसर्गाचें) अज्ञान आणि दुसरें पुरुषाचें (आत्म्याचें) ज्ञान, या दोन बाजू असल्यानें आणि या दोहोंच्या पाठीमागें एकमेव सद्‌वस्तु ब्रह्म असल्यानें, अस्तित्वाच्या दोन बाजूंचा समन्वय शक्य असला पाहिजे, वेदांतील रहस्यमय रूपकांत या दोन बाजूंमधील खड्डा बुजला जाणार असल्याचें जें भविष्यकथन आहे, त्या भविष्यकथनानुसार हा खड्डा बुजविणें शक्य असलें पाहिजे हें उघड आहे. या शक्यतेची तीव्र जाणीव शतकानुशतकें भिन्न ठिकाणीं भिन्न रूपें घेऊन मानवासमोर सारखी वावरत आहे. अपूर्ण मानव पूर्ण होऊं शकेल, अपूर्ण मानवसमाज पूर्ण होऊं शकेल या दोन अंतर्दृष्टींवर आधारलेल्या श्रद्धा वरील जाणिवेचीं रूपें आहेत; विष्णूचा आणि देवांचा पृथ्वीवर अवतार होणार हें 'अल्वार'-दर्शन वरील जाणिवेचेच रूप आहे; साधूचें राज्य, ब्रह्मपूर, सत्ययुग, ख्रिस्तपंथांतील अभिनव स्वर्ग आणि पृथ्वी या, सर्व थोर साधकांच्या अंतर्दृष्टीला दिसलेल्या गोष्टी, वरील तीव्र जाणिवेनें घेतलेली रूपें आहेत. मानवाच्या आणि मानवसमाजाच्या भवितव्याचीं हीं अंतर्दर्शनें यांना निश्चित ज्ञानाचा आधार नसल्यानें, मानवी मनाची पूर्ण पक्कड घेऊं शकत नाहींत. मानवी मन हेलकावे खात राहतें; अंतर्दृष्टीला दिसणारी हीं दृश्यें भवितव्याविषयीं केवळ उज्ज्वल आशा उत्पन्न करतात, आणि वर्तमान वास्तव विश्व आपल्या निस्तेज मलिन रंगाढंगांनीं मनाला भेडसावितें -- समोरची मलिनता आणि दूर दिसणारी निर्मलता यांच्यामध्यें मानवी मन आंदोलित होत राहतें. पण समोरची मलिनता दिसते तशी वस्तुत: आहेच, अशी कांहीं गोष्ट नाहीं; तसेंच ती कायम टिकणारी आहे असेंहि निश्चितपणें म्हणतां येत नाहीं -- एकंदरींत पृथ्वीवरील निसर्गाच्या पोटीं दिव्य जीवन विकास पावत आहे, तयार होत आहे असें मानण्यास भरपूर जागा आहे -- असें विकासशील दिव्यजीवन हें अशक्य स्वप्न आहे असें मानण्याची आवश्यकता खास नाहीं. आम्हांला आमच्या दिव्य जीवनविषयक धडपडींत अपयश येणार असें जें आपण म्हणतो व आमची विकासशक्ति मर्यादित आहे, असें जे आपण विश्वासपूर्वक मानतो त्याचें कारण आम्ही स्पष्टपणें किंवा अस्पष्टपणें हें मानतों कीं, मुळांत तत्त्वत: अद्वैत नसून द्वैत आहे, मुळांतच दोन तत्त्वें आहेत. या मूलभूत दोन तत्त्वांना स्पष्ट-अस्पष्ट मान्यता देऊन आम्ही मग या दोन तत्त्वांत अन्योन्यविरोध मानतों. अचेतन आणि चेतन,

पान क्र. ३३८

 

स्वर्ग आणि पृथ्वी, ईश्वर आणि जग, असीम एक आणि सीमित अनेक, ज्ञान आणि अज्ञान अशीं दोन तत्त्वें मूलभूत मानून त्यांत विरोध कल्पिल्यानें, आमच्या मर्यादा अनुल्लंघनीय आहेत, दिव्यत्वासाठीं होणारी आमची धडपड अयशस्वी होणार असें आम्हांला वाटत असतें. आम्ही जी विचारसरणी मांडली आहे तिच्या बळावर आम्ही या निर्णयाला आलों आहोंत की, आमचें इंद्रियनिष्ठ मन आणि त्रोटक अनुभवावर आधारलेली आमची तर्कबुद्धि, मुळांत द्वैत आहे, मुळांतलीं दोन तत्त्वें अन्योन्यविरोधी आहेत अशी आमची चुकीची कल्पना करून देतात आणि आम्हांला आमच्या दिव्यजीवनविषयक धडपडींत अपयश येईल असा आमचा चुकीचा समज करून देतात. आम्हांला दिव्यत्वप्राप्तीच्या खटाटोपांत यशाची आशा धरण्याला भरपूर व बुद्धीला मान्य होण्यासारखा आधार आहे हें आम्हीं पाहिलें आहे. अस्तित्वाच्या ज्या पातळीवर आमचें सांप्रतचे जीवन चाललेलें आहे, ती पातळी बाह्य आहे, कनिष्ठ आहे आणि या पातळीच्या अंतरंगांत तिच्याहून श्रेष्ठ अशी अस्तित्वाची पातळी आहे; अंतरंगांतील अस्तित्व हें आमच्या बाह्य अस्तित्वाचें खरें सारभूत स्वरूप आहे, बाह्य अस्तित्व क्रमश: स्वतःच्या मर्यादा उल्लंघून रुपांतरित होऊन, आपलें पूर्ण रूप, सारभूत स्वरूप धारण करणार अशी विकासयोजना असल्याचा पुरावा आमच्या बुद्धीस मिळालेला आहे.

येथें ज्ञान आणि अज्ञान यांचें सह-अस्तित्व आहे, अज्ञानाच्या पोटीं ज्ञानाचें अस्तित्व आहे, आणि क्रमविकासानें अज्ञानाचें ज्ञानांत रूपान्तर होणार आहे. अज्ञानाचे स्वरूप आमच्या नित्य अनुभवाचें आहे. ध्येयभूत दिव्य सत्याच्या विरोधी अशा परिस्थितींत आमच्या विकासाला आरंभ होतो हें उघड आहे. विरोधी परिस्थितीचे घटक पाहिले तर ते सर्व जीवाच्या स्वतःच्या आणि विश्वाच्या, सर्वांच्या आत्म्यासंबंधींच्या अज्ञानावर आधारलेले आहेत असें दिसतें. जीवाचें अज्ञान हें मूळ विश्वारंभक अज्ञानाचें परिणामरूप असतें. जीवाच्या अज्ञानामुळें जीव स्वतःला मर्यादा घालून घेतो, आणि विभक्तता हा आपल्या जीवनाचा पाया करतो. अस्तित्वाची विभक्तता, जाणिवेची विभक्तता, इच्छेची आणि शक्तीची विभक्तता, ज्ञानाची विभक्तता, ज्ञान, शक्ति, प्रेम या सर्व गोष्टींत मर्यादा आणि विभक्तपणा या प्रकारें जीवाच्या जीवनाचा पाया अनेकमुखी विभक्ततेचा आणि मर्यादितपणाचा असतो : अशा पायाच्या जीवनांतून मूळ सत्याला प्रत्यक्ष विरोधी अशा पुढील गोष्टी उदयास येतात. अहम्-भाव,

पान क्र. ३३९

 

अंधता, अक्षमता, ज्ञानाचा आणि इच्छाशक्तीचा दुरुपयोग, विसंवाद, दुर्बळपणा, दुःख. अज्ञानाचें हें असें स्वरूप आहे. जडद्रव्य (शरीर) आणि प्राण (प्राणिजीवन) यांत अज्ञान वावरतें. पण मनाच्या स्वभावधर्मांत अज्ञानाचें मूळ आहे. मनाचा स्वभावधर्म, स्वाभाविक प्रवृत्ति म्हणजे नियोजित कार्य मोजणें, मापणें, मर्यादा घालणें, वैशिष्ट्य स्पष्ट करणें, आणि अशा रीतीनें वस्तु वस्तु विभक्त करणें ही आहे. पण मन हें एखाद्या समग्र वस्तूवर निशाण्या करून, तिचे विशेष विभाग करणारें जसें आहे तसेंच तें व्यापक तत्त्व आहे, तें ब्रह्म आहे, तें मूलत: एक आहे, आणि म्हणून विभक्त वस्तूचें एकीकरण करण्याची, ज्ञानाला व्यापक व सर्वसमावेशक स्वरूप देण्याचीहि ऊर्मि मनाचे ठिकाणी आहे. विभक्तीकरणाची जी मनाची शक्ति आहे, ती मूळ प्रमुख शक्ति नव्हे, तर ती मूळ प्रमुख उच्च शक्तीची (सर्वसमावेशक एकत्वनिष्ठ शक्तीची) पोट-शक्ति आहे; ही पोटशक्ति मूळ शक्तीपासून दूर राहून, वेगळी पडून, स्वतःचा स्वाभाविक धर्म जो विभाग करणें तो वापरून तुकडे पाडण्यांतच रमूं लागली, म्हणजे या पोटशक्तीच्या कार्याला अज्ञान हें स्वरूप येतें. अज्ञान स्वरूपांतील मन ज्ञानाचा विभक्तीकरणांत गुंतलेला भाग वजा करून बाकीचा भाग सरळपणें बहिष्कृत करतें, समग्र वस्तूचे तुकडे पाडण्यांतच गर्क राहते, वस्तूंची मूळ एकता बाजूला टाकते; तिची कल्पना अंधुक करून टाकते; तुकडे पाडण्याचे आपलें काम संपले म्हणजे मग एकतेची आठवण करून, तुकड्या तुकड्यांची बेरीज तें करतें, आणि याप्रमाणें बेरजेची एकता हीच मूळ स्वयंभू एकतेऐवजी प्रमाण समजूं लागतें. मूळ स्वयंभू एकतेच्या ज्ञानाचा बहिष्कार हें अज्ञानाचें सारस्वरूप आहे.

मूळ जाणिवेचे ठिकाणीं ही अज्ञानरूपी आश्चर्यकारक शक्ति आहे, ही शक्ति आमच्या सर्व दुर्भाग्यांची, दुखण्यांची, अनिष्टांची जननी आहे; मूळ जाणिवेची ही आश्चर्यकारक शक्ति आपलें काम कसें करते, तिचें मूळ काय, तिचा शेवट काय, ती दूर करण्याचा उपाय काय याचा विचार आतां करावयाचा आहे : अज्ञान ही वस्तु अस्तित्वांत येते कशी ? मूळ जाणीव, आत्म-जाणीव अनंत अमर्याद अशी असते, या जाणिवेच्या ठिकाणीं असें एक तत्त्व किंवा शक्ति उभी राहिली की, जी तिचें मूळ आत्म-ज्ञान सर्व मागें सारून, स्वतःचें विशिष्ट मर्यादित मर्यादिण्याचें कार्य

पान क्र. ३४०

 

करण्यांत मग्न झाली हें घडलें कसें ? कांहीं तत्त्वज्ञ1 म्हणतात कीं, हा प्रश्न सुटण्यासारखा नाहीं, मूळ रहस्यांतच या प्रश्नाची गणना आहे, याचें स्पष्टीकरण स्वभावतःच अशक्य आहे; या संबंधांत अज्ञानाची वस्तुस्थिति सांगणें, आणि तींतून सुटण्याच्या कार्याची पद्धति विशद करणें एवढेंच शक्य आहे; तेवढेंच करावें. सर्वांच्या अगोदरचें सर्वोच्च असें जें अस्तित्व (सत्) किंवा नास्तित्व, शून्य (असत्) त्याचें स्वरूप काय, हा प्रश्न सोडवण्याची आवश्यकता नाहीं किंवा तो सोडवतां येण्यासारखा नाहीं म्हणून तो बाजूला ठेवणें बरें असें कांहीं तत्त्वज्ञांचें मत आहे. माया आहे, तिचें मूळ तत्त्व अज्ञान किंवा आभास हे आहे; ब्रह्माची शक्ति माया आहे, ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही शक्ती स्वभावतःच या मायेच्या पोटीं आहेत. त्या उदित किंवा अनुदित स्वरूपांत आम्हांला अनुभवास येतात; या वास्तव गोष्टी आम्ही लक्षांत घ्याव्या आणि अज्ञानांतून आम्हांला बाहेर कसें पडतां येईल, याचा आम्ही विचार करावा, ज्ञानाच्या पलीकडे जें आहे तें, आम्हीं अज्ञानाबाहेर पडून मिळवावे -- जीवनाचा, संसाराचा त्याग करावा, संसारांतील सर्व वस्तू अशाश्वत आहेत ही गोष्ट मनांत पक्की करावी, जगांत राहणें हें फोल आहे ही खूणगांठ मनाशीं बाळगावी, जगाचें अस्तित्वच फोल आहे हें पक्कें लक्षांत ठेवावें -- या मार्गानें, या ज्ञानाच्या मार्गानें अज्ञानांतून बाहेर पडावे, ज्ञान आणि अज्ञान या दोहोंच्या पलीकडील सत्यवस्तु आम्हीं आपलीशी करावी, हाच एक शहाणपणाचा मार्ग आहे असा एक सरळ पक्ष आहे.

-------------------------

 

1 या बाबतींतील तत्त्वज्ञानविषयक प्रश्न विचारांत घेण्याच्या बुद्ध विरुद्ध होता; आमची खोटी वैयक्तिक ''अस्मिता'' कशी तयार होते, दुःखमय जग अस्तित्वांत कसें राहतें, या दुःखमय जगांतून आम्हांला बाहेर कसें पडता येईल या गोष्टी बुद्धाला महत्त्वाच्या वाटत होत्या. कर्म ही एक वास्तव घटना आहे; वस्तू उभ्या करणें, खरी नसलेली वैयक्तिक ''अस्मिता'' उभी करणें या गोष्टी आमच्या दुःखाच्या मुळाशीं आहेत; आमच्या सर्व खटपटी ह्या कर्म, अस्मिता आणि दुःख दूर करण्याच्या हेतूनें व्हावयास हव्या; या अनिष्ट गोष्टी दूर झाल्या, नाहींशा केल्या गेल्या म्हणजे या गोष्टींपासून मुक्त असें जें कांहीं शाश्वत सत्य असेल, तें आम्हांला प्राप्त होतें; या अनिष्ट गोष्टींपासून मुक्त होण्याचा मार्गच केवळ बुद्धाला महत्त्वाचा वाटत होता.

पान क्र. ३४१

 

पण या पक्षांत सर्वमूळ जें कांहीं असेल तें शोधिलें जात नाहीं, त्याजकडे दुर्लक्ष केलें जातें, हें आमच्या मनाला, बुद्धपंथीय मनाला देखील बरें वाटत नाही. मूळ प्रश्नाला बगल देणारीं तत्त्वज्ञानें अशीं कांहीं दूरगामी विधानें करतात कीं, अज्ञानाचा व्यवहार, अज्ञानाची लक्षणें, अज्ञानाचा मूळ स्वभाव विशिष्ट प्रकारचा असतो असें त्या दूरगामी विधानांत गृहीत धरलें जाते -- आणि या गृहीत गोष्टींवर अज्ञानांतून सुटण्याचे उपाय ही तत्त्वज्ञानें आधारतात; मूलगामी चिकित्सेशिवाय उपाय-योजना करणें अर्थातच केवळ प्रायोगिक आणि संशयित असणार. आम्ही मूळ प्रश्न डावलला, तर आमचीं विधाने चुकीची की बरोबर, आम्हीं सुचविलेले उपाय खात्रीचे किंवा कसे, हे कसे कळणार ? आमच्या चिकित्साहीन तंत्रानें आम्ही जे उपाय सुचवितो, त्या उपायाहून अन्य उपाय नाहींतच हें तरी आम्ही कसें गृहीत धरावे ? कदाचित् असे दुसरे उपाय असूं शकतील कीं, त्यायोगें आमच्या सांसारिक व्याधींची पूर्णतया आणि स्वाभाविकपणें इतिश्री होईल. चिकित्साहीन तंत्राचा उपायांत जो तीव्रपणा असतो, जो विनाशक अतिरेक असतो, जी शस्त्रक्रियेंतील अंगहीन करणारी कापाकापी आणि प्रसंगीं रोग्याचा अंत करणारी कारागिरी असते ती, या दुसऱ्या उपायांत कांहींहि नसून, शिवाय त्यांत रोग पूर्ण बरा करण्याची स्वाभाविक शक्ति असते, असूं शकते असें आम्हीं कां मानूं नये ? आणखी असे आहे कीं, विचारवंत जो आहे त्याचें काम सर्व विषयांत ज्ञान मिळविणें हें आहे : ज्ञान मिळविण्याचें टाळणें हें विचारवंताला शोभत नाहीं. कोणताहि प्रश्न डावलणें ही गोष्ट विचारवंताच्या जन्मजात अधिकाराला विरोधी आहे. आतां ही गोष्ट खरी आहे कीं, विचारवन्ताला मनाच्या साधनानें अज्ञानाचें सारस्वरूप समजणार नाहीं, विश्वांतील कोणत्याहि गोष्टीचें तात्विक रूप त्याला त्याच्या मनाच्या साधनानें समजणार नाहीं. अज्ञान किंवा विश्वांतील कोणतीहि वस्तु, तिच्या तात्विक स्वरूपाच्या दृष्टीनें, व्याख्येचा विषय करण्याइतपत मनाच्या साधनानें विचारवंताला समजूं शकणार नाहीं हें खरें आहे. कारण वस्तूची व्याख्या करावयाची, तर तिच्या खाणाखुणा, स्वभावधर्म, आकार, गुण, कार्य, दुसऱ्या वस्तूशीं तिचा संबंध -- या गोष्टी मनाला कळाव्या लागतात. वस्तूचें गुप्त निजी अस्तित्व, निजी तत्त्व हें मनाला त्याची व्याख्या करण्यासारखें कांहीं आकलन करतां येत नाहीं. तरीपण कोणत्याहि वस्तूचें व अज्ञानाचेहि तात्विक स्वरूप मनाला

पान क्र. ३४२

 

नाहीं तर आत्म्याला व्याख्यातीत असें आकलन करतां येतें. अज्ञानाचा दर्शनी व्यवहार आणि स्वभावधर्म आम्हीं निरीक्षण करावा, या निरीक्षणांत अधिकाधिक बिनचुकपणा आणावा, असें करीत गेल्यास एका विशिष्ट निरीक्षण-स्थानी आम्हांला अज्ञानाचें खरें प्रयोजन स्पष्ट होतें आणि याप्रकारें त्याचें तात्विक आकलन होतें -- अर्थात् हें आकलन बुद्धीनें होत नाही; अंतर्दर्शन, सत्याची आंतरिक अनुभूति, आमच्या स्वत:च्या आत्म्याचे ठिकाणी सत्याची साक्षात् प्रतीति -- याप्रकारें आम्हांला अज्ञानाचें तात्विक आकलन होतें. माणसाचें जें उच्चतम बौद्धिक ज्ञान आहे, त्याची प्रक्रियाच अशी आहे : मनानें वस्तू सर्व प्रकारें हाताळणें, त्या वस्तूचे भाग, पोटभाग पाडून तिचें तपशीलवार निरीक्षण करणें, निरीक्षण अधिकाधिक बिनचूक करीत जाणें -- या मार्गानें असें एक स्थान गांठलें जातें कीं, तेथें वस्तूला झांकणारा पडदा फाटला जातो आणि वस्तु आम्हांला स्पष्ट दिसते : शेवटी आध्यात्मिक ज्ञान आमच्या मदतीस येतें; आम्ही जें पाहतों तें आम्ही अध्यात्माच्या आश्रयानें स्वत: बनतों, अध्यात्माच्या आश्रयानें आम्ही त्या उज्ज्वल प्रकाशांत प्रवेश करतो कीं ज्यांत अज्ञान लेशहि नाहीं.

आम्ही माणसें मनोमय जीव आहोंत. आमची बुद्धि अज्ञानाच्या क्षेत्रांतच जगते आणि व्यवहार करते, ती त्या उच्च स्थानाला किंवा पातळीला पोहोंचत नाहीं, जेथें समग्रता विभागली गेली आणि या विभागणीमुळें वैयक्तिक मन अस्तित्वांत आलें -- अर्थात् अज्ञानाची अगदीं प्रथम उदयाची भूमि आमच्या मनाच्या कक्षेपलीकडे आहे. पण सर्वच वस्तूंचें प्रथम मूळ आणि पायाभूत सत्य आमच्या कक्षेच्या पलीकडे आहे -- आमच्या मानवीं मनाला तें आकलन होण्यासारखें नाहीं. तेव्हां अज्ञान काय किंवा कोणतीहि वस्तु काय, त्यांच्या मूळ उगमाच्या बाबतींत आम्हांला सामान्यत: अज्ञेयवादाचीच कास धरावी लागते. तरीपण मूळ उगमाची ही अज्ञेयता दूर करण्याचा मार्ग आहे : अज्ञानाच्या क्षेत्रांत आम्हीं काम करीत असावें, अज्ञानाच्या परिस्थितींत आम्ही नित्य नवीन नवीन कांहीं शिकत असावें, अज्ञानाचें ज्ञान मिळवितां येईल तेवढें -- अगदीं त्याच्या क्षेत्रमर्यादेपर्यंतचें -- आम्हीं मिळवावें, अज्ञान आणि ज्ञान (सत्य) यांची सामान्य मर्यादा लागली कीं मग सत्यावरचें शेवटलें प्रकाशमय झांकण आम्हांला दिसेल -- हें दिसल्यानंतर आम्ही आमच्या ठिकाणीं कांहीं नव्या शक्ती विकसित करू शकतों आणि या शक्तींच्या बळावर प्रकाशमय झांकणाची

पान क्र. ३४३

 

अडचण -- कठीण दिसणारी परंतु वस्तुत: पोकळ असणारी अडचण -- आम्ही दूर करूं शकतो आणि सत्याचा साक्षात्कार घेऊं शकतो.

तेव्हां आतां आम्हांला अज्ञान या तत्त्वाच्या म्हणा, शक्तीच्या म्हणा, स्वभावधर्माचें आणि व्यवहाराचें बारीक निरीक्षण करावयास हवें; तें एवढ्याकरितां कीं, त्यायोगें आम्हांला त्याच्या उगमाची आणि स्वरूपाची स्पष्ट कल्पना यावी. प्रथम, अज्ञान या शब्दाचा अर्थ काय तो स्पष्ट करून, तो आम्ही पक्केपणी मनांत वागविला पाहिजे. ऋग्वेदाच्या मंत्रांत प्रथम ज्ञान आणि अज्ञान यांच्यांत भेद दाखविला आहे. येथें ज्ञान याचा अर्थ सत्याची जाणीव, ऋताची (न्यायाची) जाणीव, सत्य आणि ऋत यांच्या वर्गांतल्या सर्व गोष्टींची जाणीव असा घेतला आहे : सत्य आणि ऋत यांची नेणीव (अचिति), सत्य आणि ऋत यांच्या कार्यास विरोध आणि यांच्या विरोधी आणि खोट्या कार्याची उभारणी असा अज्ञान याचा अर्थ ऋग्वेद-मंत्रांत घेतला आहे. अतिमानसिक सत्याचें दर्शन घडविणारा दिव्य चक्षु नसणें म्हणजे अज्ञान; आमच्या जाणिवेंत सत्याचें आकलन न करणारें तत्त्व आहे तें अज्ञान; या जाणिवेंत सत्य ग्रहण करणारें जाणीवपूर्ण दर्शन आणि ज्ञान असतें, त्याला विरोधी जें तत्त्व तें अज्ञान (अज्ञान = अचित्ति, ज्ञान = चित्ति) या अज्ञानाचा व्यवहार पाहिला तर असें दिसतें कीं, सत्याचें अनाकलन  (अज्ञान) म्हणजे कांहीं संपूर्ण नेणीव, अचेतनता नव्हे; हें विश्व ज्या नेणिवेच्या सागरांतून उत्पन्न झाले आहे, तो नेणिवेचा सागर (अप्रकेतम् सलिलम्) ''अज्ञान'' शब्दानें दाखविला जात नाहीं; सत्याचें अनाकलन म्हणजे कांहीं हा नेणिवेचा सागर नव्हे; तर मर्यादित ज्ञान, असत्य ज्ञान, अविभक्त अस्तित्वाचे विभाग कल्पून, त्या विभक्ततेवर उभारलेले ज्ञान, तुकड्यातुकड्यांवर, अल्प अंशावर उभारलेलें ज्ञान म्हणजे अज्ञान होय, म्हणजे सत्याचें अनाकलन होय. सत्य म्हणजे वस्तुजाताची समग्रता, समृद्धता, प्रकाशपूर्ण परिपूर्णता; या सत्यावर आधारलेलें जें ज्ञान तें सत्यज्ञान, खरें ज्ञान; याच्या विरूद्ध अल्प अंशांवर, तुकड्यातुकड्यांवर आधारलेलें ज्ञान तें असत्य ज्ञान, अज्ञान; हें अज्ञान म्हणजे मर्यादांनीं बांधलेलें ज्ञान -- या मर्यादांमुळें या मर्यादित ज्ञानांतून (अज्ञानांतून) निवळ असत्य निर्माण करतां येतें; या असत्याला जन्मास घालून पाठिंबा देणारे मनुष्याच्या अंतरंगांत उपस्थित असतात. विभक्तता आणि अंधकार यांचे पुत्र, मित्र; मनुष्याच्या दिव्य प्रयत्नाचे विरोधक, त्याजवर हल्ला करणारे

पान क्र. ३४४

 

दरवडा घालणारे, त्याचा ज्ञानप्रकाश आपल्या अंधकारानें झांकून टाकणारे आणि त्याला अ-दिव्य मार्गाला लावणारे असे त्याचे शत्रु त्याच्या अंतरंगांत उपस्थित असतात. मर्यादित ज्ञानाला यासाठीं ऋग्वेदांत ''अदेवी माया'' म्हटलें आहे; मानसिक खोटे आकार आणि खोटीं दृश्यें निर्माण करणारी अशी ही अदेवी (अदिव्य) माया असते; माया या शब्दाचा मूळ अर्थ, ज्ञानाची आकार बांधणारी शक्ति असा होतो; दिव्य जादुगाराची खरी जादुगिरी असें या मायेला म्हणत असत; वरच्या शक्तीला विरोधी अशी कनिष्ठ ज्ञानाची रूपरचनाशक्ति याच नांवानें ती ओळखली जात होती; राक्षसी जादुगिरी, फसवी, भ्रामक, आभासोत्पादक राक्षसी जादुगिरी माया नांवानेंच ओळखली जात होती. हा दुसरा अर्थ माया या शब्दाला वेदोत्तर कालीं विशेष रीतीनें चिकटला. अदेवी मायेच्या उलट देव-माया (दिव्य माया) या नांवानें वस्तुजातांतील सत्याचें ज्ञान ओळखलें जातें : दिव्य माया म्हणजे वस्तु-सत्य, वस्तु-सार, वस्तु-धर्म, वस्तु-प्रक्रिया यांचें ज्ञान : देवांना हें ज्ञान असतें, या ज्ञानावर ते आपलें शाश्वत कार्य आणि निर्मिति उभारतात, मनुष्यांत स्वतःच्या दैवी शक्ती उभ्या करून, त्यांचें संवर्धन करण्याचें काम देव या ज्ञानावर आधारतात. देव-माया, अदेवी-माया या भाषेनें ज्या गोष्टी वैदिक गुप्तपंथीयांनीं मांडल्या आहेत, त्याच तत्त्वज्ञानाच्या भाषेंत सांगावयाच्या तर असें म्हणतां येईल कीं, अज्ञान हें मुळांत विभाग पाडणारें मानसिक ज्ञान आहे; वस्तूंचें एकत्व, सारस्वरूप, स्वयंभू स्वभावधर्म या विभक्ततानिष्ठ ज्ञानाला कळत नाहीं, वस्तूंचें एकच एक मूळ आणि वस्तूची सर्वगामिता या ज्ञानाच्या कक्षेबाहेर असतात; हें ज्ञान विभक्त विभक्त अशा विशिष्ट गोष्टींवर आपली क्रिया उभारतें, अलग अलग दृश्य घटना या ज्ञानाच्या व्यवहारांना आधार असतात; एकांगी संबंधांवर हें ज्ञान आपल्या रचना उभ्या करतें : वरील अलग अलग गोष्टी या सत्य आहेत असेंच या ज्ञानाला भासत असतें; विभागणीमागें जाऊन वस्तूंचें एकच एक मूळ समजून घेतल्याशिवाय, इतस्तत: विखुरलेल्या भासणाऱ्या गोष्टींमागें जाऊन त्यांना एकत्र आणणारी सर्वगामी वस्तु अनुभवल्याशिवाय, विभक्त व विखुरलेल्या गोष्टींचें खरें ज्ञान होणार नाहीं हें अ-ज्ञानाला समजत नाहीं. ही तत्त्वज्ञानाच्या भाषेंत अ-ज्ञानाची कथा झाली. ज्ञानाची कथा त्या भाषेंत अशी होईल : ज्ञानाचा ओढा एकीकरणाकडे असतो, ज्ञान हें अतिमानसिक शक्ति मिळवितें आणि त्या शक्तीच्या बळावर अस्तित्वाची एकता,

पान क्र. ३४५

 

सारस्वरूप, स्वयंभूव्यवहार-नियम ओळखतें आणि अगण्य वस्तूंचा जो पसारा असतो, त्याजकडे एकत्वाच्या, प्रकाशाच्या आणि समृद्धतेच्या दृष्टीनें तें पाहतें आणि याच दृष्टीनें त्यांच्याशीं व्यवहार करतें -- ईश्वर आपल्या उंच स्थानावरून सर्व विश्व आपल्या कवेंत घेतो आणि त्या उंचस्थानावरील प्रकाशानें विश्वांतील अनंत वस्तूंशीं व्यवहार करतो व त्यांजकडे बघतो. तसाच, ईश्वरासारखाच व्यवहार ज्ञान कांहीं प्रमाणांत करीत असतें; या विवेचनांत ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे कीं, अज्ञान हें एक प्रकारचें ज्ञानच असतें, मात्र हें ज्ञान मर्यादित असल्यानें त्यांतून केव्हांहि कोठेंहि असत्य आणि प्रमाद निघूं शकतात; त्यांतून वस्तूंची अयथार्थ कल्पना उभी राहूं शकते -- आणि खऱ्या ज्ञानाला ही अज्ञान- निर्मित कल्पना विरोधी असते.

वेदांत जो ज्ञानाचा अज्ञानाचा विचार आहे, त्या विचाराचा उपनिषदांत संबंध आला, तेव्हां विद्या व अविद्या या नव्या शब्दांचा उपयोग केला गेला. हे नवे शब्द उपयोगांत आणतांना थोडासा नवा अर्थहि त्यांच्या ठिकाणीं योजण्यांत आला. ज्ञानाचा स्वाभाविक धर्म सत्य शोधून काढणें हा आहे आणि मूळ सत्य ''एकतत्व'' आहे -- (तें सत्य, तें एकतत्त्व असा उल्लेख वेदांमध्यें पुनःपुनः येतो) म्हणून विद्या (उच्चतम आध्यात्मिक ज्ञान) या शब्दाचा अर्थ, मूळ एकतत्त्वाचें ज्ञान इतकाच कडकपणें ठरविण्यांत आला आणि अविद्या (अज्ञान) शब्दाचा अर्थ, विभक्तपणें असणाऱ्या (दिसणाऱ्या) अनेक वस्तूंसंबंधाचें ज्ञान इतकाच कडकपणें ठरविण्यांत आला. अविद्या शब्दानें व्यक्त होणारें अनेकविषयक ज्ञान हें, या मूळ सत्याच्या एकीकरण करणाऱ्या ज्ञानापासून, एकतत्त्वापासून अलग झालेलें असतें, जसें तें आमच्या विश्वांत आहे. उपनिषदांतील वेदान्तभाषा वेदांतील भाषेहून अधिक कांटेकोर अशी आहे, अधिक शास्त्रीय अशी आहे. वेदांतील भाषा सैल, लवचीक, मनोभावना व्यक्त करणारी अशी आहे. अर्थात् वेदांतील ''चित्ती'', ''अचित्ती'', ''अदेवी माया'' इत्यादि शब्दांनीं अनेक संकीर्ण कल्पना व्यक्त होत असत; त्या शब्दांत भरपूर अनेकविध अर्थ असे, मूळ अर्थाशीं संबंधित अनेक कल्पना, उपकल्पना त्या शब्दांनीं सुचत असत, अनेक अर्थपूर्ण चित्रें ते शब्द आमच्या दृष्टीसमोर उभीं करीत असत. अर्थाचा हा सर्व पसारा नव्या कांटेकोर शब्दांमुळें आम्हांला नष्ट झाल्यासारखा झाला. तरीपण एक गोष्ट लक्षांत घेणें अवश्य आहे कीं, अविद्या या नव्या शब्दानें उपनिषदांत जो

पान क्र. ३४६

 

अर्थ घेतला जात होता, त्याहून वेगळा अर्थ तदनंतरच्या वेदान्ती वाङ्मयांत घेतला जाऊं लागला. आत्मा, चैतन्य यांच्या खऱ्या सत्यापासून समूळ विभक्तता, मूळ आभास, स्वप्नासारखी, भ्रमासारखी जाणीवदशा हे अर्थ अविद्या शब्दानें उपनिषदांत व्यक्त केले जात नव्हते. पुढच्या वेदान्ती वाङ्मयांत हे अर्थ अविद्येला, अविद्या शब्दाला दिले गेले. उपनिषदात अविद्येसंबंधानें एका ठिकाणीं म्हटलें आहे कीं, अविद्येच्या क्षेत्रांत वावरणारा माणूस, आंधळ्याप्रमाणें, आंधळ्यानें जावें तसा, अडखळत अडखळत भ्रमन्ती करतो आणि शेवटीं त्याच्याकरितां पसरून ठेवलेल्या लांबरुंद अशा मृत्यूच्या जाळ्यांत नित्य पकडला जातो -- पण दुसऱ्या ठिकाणीं असेंहि म्हटलें आहे कीं, अविद्येच्या मागें जाणाऱ्या माणसाला अंधतमांत जावें लागतें, पण केवळ विद्येच्या मागें जाणाऱ्या माणसाला त्याहून अंधकारमय अशा अंधतमांत जावें लागतें; मात्र जो मनुष्य, ब्रह्म हें अविद्या आणि विद्या दोन्हीहि आहे, एक आणि अनेक दोन्हीहि आहे, सत् आणि असत् दोन्हीहि आहे, हें जाणतो तो अविद्येच्या बळावर, अनेकतेच्या अनुभवानें मृत्यु (मृत्युलोक) तरून जातो आणि विद्येच्या बळावर अमृतत्व प्राप्त करून घेतो. उपनिषदांच्या मतें, स्वयंभू ब्रह्म खरोखरच या विश्वांतील सर्व जीव अजीव बनलें आहे; म्हणून उपनिषद सरळ भावानें, गंभीरपणें, श्रोत्यांना अन्यथा, मिथ्या गोष्टी सांगण्याचा, श्रोत्यांची दिशाभूल करण्याचा यत्किंचितहि उद्देश न ठेवतां म्हणतें कीं, हें ब्रह्मन्, काठीच्या आधारानें चालणारा हा म्हातारा माणूस, तो मुलगा, ती मुलगी, हा निळ्या पंखांचा पक्षी, तो रक्तवर्ण नेत्राचा पक्षी तूंच आहेस. ''हे ब्रह्मन्, अविद्येनें स्वतःची फसवणूक करणाऱ्या मनाला तूं म्हातारा माणूस, मुलगा, मुलगी, पक्षी दिसतोस'' असें कांहीं उपनिषद् म्हणत नाहीं. मूळ अस्तित्व (निराकार, निर्गुण अस्तित्व) आणि साकार, सगुण अस्तित्व या दोहोंत दुसरी अवस्था कनिष्ठ आणि पहिली श्रेष्ठ आहे -- पण मूळ निराकार, निर्गुण अस्तित्वच विश्वांत जें कांही (साकार, सगुण) आहे तें स्वत: बनलेलें आहे, ही वस्तुस्थिति आहे.

विद्या आणि अविद्या यांजमध्यें जो भेद मानला गेला, तो उपनिषदांच्या कालीं जरी तीव्र नव्हता, तरी पुढें तीव्र न होणें अशक्य होतें; पृथक्करणनिष्ठ आणि विवादपटु तर्कशास्त्र विद्येला, अविद्येच्या निवळ विरोधी रूप देण्यांत यशस्वी झालें, अद्वैताचें ज्ञान हें विद्या, आणि

पान क्र. ३४७

 

द्वैताचें, अनेकतेचें ज्ञान हें अविद्या हें एकदा ठरल्यावर तर्कशास्त्रानें त्या दोन शब्दांत व कल्पनांत कसलीहि तात्विक एकता, संवादिता मानण्याचें अमान्य केलें. अर्थात् विद्या हीच केवळ ज्ञान आहे आणि अविद्या ही शुद्ध अज्ञान आहे, असें ठरविलें गेलें : या अविद्येनें, शुद्ध अज्ञानानें केवळ सत्यज्ञानाचा अभाव दाखविला जात नाहीं, ते भावात्मक असतें : अर्थात् आभास आणि भ्रम, दिसायला सत्य अशीं असत्यें, तात्पुरत्या कार्यक्षम अशा खोट्या गोष्टी तें निर्माण करतें. याप्रमाणें विद्या आणि अविद्या यांचा विरोध स्पष्ट ठरल्यावर हें ओघानेंच आलें कीं, अविद्येचा विषय खऱ्या शाश्वत अस्तित्वाला अपात्र ठरला, अनेक वस्तू सर्वथा आभासात्मक ठरल्या, विश्वाला खरें अस्तित्व नाहीं असें ठरलें. अर्थात् विश्वाला एक प्रकारचें अस्तित्व असतें, तें टिकतें तोंपर्यंत एक प्रकारच्या अस्तित्वाचा उपभोग तें घेतें -- स्वप्न, बराच काळ टिकणारा भ्रम (वातानें झपाटलेल्या किंवा वेड लागलेल्या मेंदूंतील भ्रम) एक प्रकारचें अस्तित्व उपभोगतो, तशीच गोष्ट विश्वाच्या अस्तित्वाची समजावयाची. उत्तरकालीन वेदान्तानुसार मूळ एकतत्त्व अनेक झालें नाहीं, आणि तें केव्हांहि अनेक होऊं शकत नाहीं. मूळ आत्मा, ही सर्व चराचर अस्तित्वें (वस्तू) झाला नाहीं, होऊं शकत नाहीं; ब्रह्मानें स्वतःच्या पोटीं सत्य विश्व व्यक्त, आविष्कृत केलें नाहीं व अशी गोष्ट तें करूं शकत नाहीं. ब्रह्म हें एकच एक आहे, त्यांत कसलाहि विशेष नाहीं, तें एकच सत्य आहे, तत्त्वत: निर्विशेष असल्यानें खऱ्याखुऱ्या विशेष गोष्टी आणि रूपरूपान्तरें तें आविष्कृत, प्रकट करूं शकत नाहीं. जे विशेष, जे नानाविध नामरूपांचे प्रकार आम्हांला विश्वांत दिसतात, ते ब्रह्मावर मनानें किंवा मन ज्यापासून निघालें आहे त्या वस्तूनें किंवा शक्तीनें, आरोपित केलेले आहेत : असा एक पक्ष आहे; दुसरा पक्ष असा आहे कीं, हे सर्व नामरूपात्मक प्रकार ब्रह्मानें प्रकट केले असले तर तें नामरूपात्मक ब्रह्म कालांकित, अल्पकालीन अस्तित्वाचें सत्य असून नाहींसें होणारें आहे, सत्यज्ञानाचा उदय होतांच तें आपोआप असत्य ठरणारें आहे.

अंतिम सत्यासंबंधानें आणि मायेच्या खऱ्या स्वभावधर्मासंबंधानें आम्हीं जो विचार केला आहे, त्या विचारामुळें, उत्तरकालीन वेदान्तानें वादप्रिय बुद्धीच्या बळावर वरील प्रकारचे जे अतिरेकी सिद्धान्त केले

पान क्र. ३४८

 

आहेत, त्या सिद्धान्तांना आम्ही मान्यता देऊं शकत नाहीं, आमचा विचार आम्हांला मूळ वेदान्ती कल्पनाच ग्राह्य म्हणून घ्यावयास लावतो.

उत्तरकालीन वेदान्ताचे अंतिम सिद्धान्त आत्यंतिक आहेत, तेजस्वी निर्भीडपणा त्यांत स्पष्ट दिसत आहे, त्यांत तडजोडीला वाव न देणारा तार्किक जोम आहे, त्यांत बुद्धीची सूक्ष्मता व्यक्त झालेली आहे, त्या सिद्धान्तांना आधारभूत म्हणून घेतलेलीं प्रमेयें सत्य म्हणून मान्य केलीं, तर ते सिद्धान्त अमान्य करतां येण्यासारखे नाहींत, या सर्व गोष्टी आम्ही मान्य करतों व त्याबद्दल ते सिद्धान्त बांधणारांना धन्यवाद देतों; तसेंच या सिद्धान्तांचा पुरस्कार करणारे ज्या गोष्टी आमच्यापुढें मांडतात, त्यांपैकीं दोन गोष्टी सत्य आहेत अशी आम्ही एकदम मान्यता देतो -- त्या दोन गोष्टी अशा -- एक : ब्रह्म हें एकमेव सत्य आहे; दुसरी गोष्ट : आमच्या स्वतःविषयीच्या आणि आमच्या विश्वाविषयींच्या आमच्या सर्वसाधारण कल्पना अज्ञानाचा शिक्का मारलेल्या, अर्थात् अपूर्ण, सदोष, दिशाभूल करणाऱ्या असतात. या दोन गोष्टी उत्तरकालीन वेदान्ती सांगतात तशाच आहेत हें आम्ही मान्य करतों पण हें सर्व करूनहि मायेच्या उत्तरकालीन वेदान्ती कल्पनेनें आमच्या बुद्धीवर जें भयंकर दडपण आणलेलें आहे, तें दडपण दूर सारणें आम्हांला अपरिहार्य झालेलें आहे. आमची विशिष्ट अनुभूति व विचारसरणी आम्हांला तसें करण्यास भाग पाडीत आहे. मायेची पकड, उत्तरकालीन पकड, आतां बरीच जुनी झाली आहे, बरीच घट्ट झालेली आहे. ही पकड, हें दडपण, ढिलें होऊन दूर व्हावयाचें तर अविद्येचा, अज्ञानाचा आणि विद्येचा, ज्ञानाचा खरा स्वभावधर्म आम्हीं खोलपर्यंत तपासून पाहिला पाहिजे. या तपासणींत जर असें दिसून आलें कीं, मूळ जाणिवेचीं हीं दोन अंगें स्वतंत्र आहेत, समान आहेत, आरंभापासूनच स्वतंत्र आणि समान आहेत, तर विश्व हें भ्रमरूप, आभासरूप असण्याचा संभव आम्हांला मान्य करणें अटळ होतें. विश्वांतील आमच्या अस्तित्वाचें स्वरूप, लक्षण अज्ञान हेंच असेल, तर विश्व हें स्वत: आभासमय असेल किंवा नसेल पण विश्वविषयक आमचा अनुभव मात्र आभासरूपच असणार यांत संशय नाहीं. आमच्या प्राकृतिक अस्तित्वाच्या कणाकणांत अज्ञान भरलेलें नसून, अज्ञान हें मूळ जाणिवेची एक शाश्वत आदिशक्ति असेल तर, विश्व हें एक सत्य असूं शकेल, पण हें सत्य विश्वांत आम्ही आहों तोंवर आम्हांला आकलन करतां येणार नाहीं. आम्हांला खरें ज्ञान तेव्हांच

पान क्र. ३४९

 

होईल, जेव्हां आम्ही मनापलीकडे, विचारापलीकडे जाऊं, या विश्वरचनेच्या पलीकडे जाऊं, विश्वातीत जाणिवेनें वरून विश्वाकडे बघूं; शाश्वत ब्रह्माशीं एकरूप झालेले, त्याच्या पोटीं राहून वावरणारे, सृष्टींत जन्मास न येणारे, विश्वपसारा नष्ट झाला असतां त्या नाशानें दुःखित न होणारे असे जे आत्मे आहेत, त्यांना जी विश्वातीत जाणीव असते, त्या जाणिवेनें जेव्हां आम्ही विश्वाकडे बघूं तेव्हां आम्हांला खरें ज्ञान लाभेल. पण मायेचा हा प्रश्न नीट हाताळावयाचा तर केवळ शब्दांची तपासणी करून भागणार नाहीं, केवळ कल्पनांची तपासणी करून भागणार नाहीं, केवळ पक्ष-प्रतिपक्षनिष्ठ युक्तिवाद करून भागणार नाहीं -- तर जाणिवेची बारीक तपासणी केली पाहिजे, जाणिवेच्या वस्तुभूत अंगांची तपासणी केली पाहिजे, आमची सामान्य पातळीची जाणीव, तिच्यावरील, तिच्या खालील जाणीव, समोरच्या जाणिवेच्या पाठीमागें असणारी जाणीव -- या सर्व जाणिवांत ज्या वास्तव घटना घडतात, त्या सर्व बारकाईनें पाहून खरोखर तपासल्या पाहिजेत, आणि त्यांचा अर्थ यशस्वी रीतीनें शोधून काढला पाहिजे; असें केलें तरच मायेचा व एकंदर ज्ञान-अज्ञानाचा प्रश्न नीट हाताळल्यासारखें होईल आणि या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर आम्हांला मिळूं शकेल.

उत्तरकालीन वेदान्ती तर्ककुशल होते पण तर्ककुशल बुद्धि सारभूत किंवा आध्यात्मिक सत्यासंबंधीं निर्णय द्यावयास पुरेशी नसते. शब्द आणि अवस्तुनिष्ठ कल्पना यांच्याशीं तर्कबुद्धीचा सामान्यत: व्यवहार असतो आणि या गोष्टी स्वतःला बंधनकारक अशीं वस्तुभूत सत्यें आहेत अशा आविर्भावानें तर्कबुद्धि त्यांच्याविषयीं वाद घालीत असते. या तिच्या स्वभावामुळें पुष्कळवेळां हे वादविषयक शब्द आणि भाव (कल्पना) तिला बेड्यांप्रमाणें होतात, तिची गति खुंटवितात आणि तिला दूर बघूं देत नाहींत -- आमच्या अस्तित्वाच्या सारभूत आणि सर्वस्पर्शी घटना तिच्या दृष्टीच्या टप्प्याच्या पलीकडे राहतात. शब्द आणि अ-वास्तव भाव यांच्या कोंडींतच ती वावरते. बुद्धीनें केलेलें विधान वस्तुत: एक प्रतिवृत्त असतें; तें बुद्धीच्या माहितीसाठीं व समजुतीसाठीं केलेलें असतें. त्यांत युक्तिवादानें विशिष्ट वस्तुविषयक दर्शनाचें समर्थन केलेलें असतें; हें दर्शन बुद्धीला युक्तिवाद करतां करतां, युक्तिवादाचा परिणाम म्हणून घडलें असा त्या समर्थनांत देखावा असतो, पण वस्तुत: आमच्या मनाच्या, स्वभावाच्या विशिष्ट वृत्तींत, प्रवृत्तींत हें दर्शन अनिवार्यपणें, समर्थनपर

पान क्र. ३५०

 

युक्तिवादाच्या अगोदरच घडलेलें असतें आणि गुप्तपणें त्या युक्तिवादाच्या मुळाशीं असतें. अर्थात् असा हा युक्तिवाद तेव्हांच निर्णायक होऊं शकेल, जेव्हां, ज्या मनोगत, स्वभावगत दर्शनावर तो आधारलेला असतो तें दर्शन सत्यमय आणि सर्वांगीण, संपूर्ण असेल. प्रस्तुत प्रसंगीं आम्हांला जें संपूर्ण आणि सत्य दर्शन हवें आहे तें आमच्या जाणिवेचें, तिच्या स्वभावाचें आणि क्षमतेचें दर्शन हवें आहे; आमच्या मनाचें, त्याच्या उगमाचें आणि व्यापाचें, क्षेत्राचें दर्शन हवें आहे. हें दर्शन आम्हांला घडलें तरच आमच्या अस्तित्वाचें व स्वभावाचें, विश्वाच्या अस्तित्वाचें व स्वभावाचें सत्य आम्हांला अवगत होईल. आम्हांला हव्या असलेल्या संपूर्ण वास्तव दर्शनासाठीं आम्ही जी तपासणी करणार, तिचें तत्त्व हें असलें पाहिजे कीं, आम्ही वस्तु पाहून तिचें ज्ञान करून घ्यावयाचें. या कार्यांत तर्कबुद्धीला काम द्यावयाचें तें आमची दर्शनविषयक आणि ज्ञानविषयक पूर्वतयारी शक्य तेवढी निर्मळ, निर्दोष करण्याचें आणि या तयारीनें घडलेलें दर्शन आणि ज्ञान समर्पक भाषेंत मांडावयास आम्हांला साह्य करण्याचें. या पलीकडे तिला आम्हीं आमच्यावर सत्ता चालवूं द्यावयाची नाहीं -- वस्तु पाहून जी आमची कल्पना होईल, ज्या आमच्या कल्पना होतील, त्या कल्पनांवर तर्कबुद्धीला अधिकार चालवूं द्यावयाचा नाहीं -- वस्तू पाहून जें सत्य आम्हांला प्रतीत होईल, तें तर्कबुद्धीच्या बिनलवचीक तार्किक चौकटींत बसत नाहीं या सबबीवर आम्हीं बहिष्कृत करावयाचें नाहीं. आमच्या तपासणीचीं हीं तत्त्वें असणार, असलीं पाहिजेत. माया (आभास) ज्ञान, अज्ञान हे सर्व आमच्या जाणिवेचे प्रकार आहेत, विकार आहेत; आमच्या जाणिवेंत खोल शिरून, खोल बघून ज्ञान आणि अज्ञान, किंवा (असलीच तर) माया (आभास) आणि ब्रह्म (सत्य) यांचें स्वरूप आणि संबंध आम्हांला शोधून काढतां येतील, निश्चित करतां येतील. तपासणीचा मूलभूत विषय हा मूळ अस्तित्व, मूळ सद्‌वस्तु हा आहे ही गोष्ट खरी. वस्तु स्वत: आहेत काय आणि त्यांचा स्वभावधर्म काय हाच मूळ अस्तित्वाचा प्रश्न पण अस्तित्वाच्या प्रश्नाकडे आम्हांला जाणिवेच्या द्वारांच जावें लागतें; म्हणून वर दर्शविल्याप्रमाणें जाणिवेचा शोध घेणें सर्वप्रथम महत्त्वाचें आहे. असें म्हणतां येईल कीं, मूळ अस्तित्व, मूळ सत्य सद्‌वस्तु आमच्या जाणिवेच्या पलीकडे, अतिमानसिक अतिचेतन असल्यानें ती गांठावयाची, तिच्यांत प्रवेश करावयाचा, तर त्याचा मार्ग आमच्या जाणिवेचा लय करणें हा आहे, आमच्या

पान क्र. ३५१

 

जाणिवेच्या पलीकडे जाणें हा आहे; किंवा असें म्हणतां येईल कीं, आमच्या जाणिवेनें स्वतःच्या मर्यादा उल्लंघून पलीकडे जाणे, स्वतःचें रूपान्तर करून घेणें हा सद्‌वस्तूच्या भेटीचा मार्ग आहे; पण या म्हणण्यांतहि हें स्पष्ट आहे कीं, आमच्या जाणिवेच्या द्वारांच आम्हांला हें कळतें कीं, सद्‌वस्तु अमुक आहे, आणि त्या सद्‌वस्तूच्या भेटीसाठीं अमुक मार्गाची आवश्यकता आहे; जाणिवेच्या लयाची म्हणा, रूपान्तराची म्हणा, स्वात्म-उल्लंघनाची म्हणा जी प्रक्रिया अवश्य आहे, तीहि आम्हांला आमच्या जाणिवेच्या द्वारांच समजणार हें स्पष्ट आहे. तेव्हां इत्यर्थ असा कीं, अतिचेतन सत्य, सद्‌वस्तु जी आहे तिचें ज्ञान आमच्या जाणिवेच्या द्वारां करून घेणें ही आमची सर्वश्रेष्ठ गरज आहे, आणि आम्हांला आमच्या जाणिवेच्या द्वारां जो सर्वांत महत्त्वाचा शोध लावावयाचा आहे तो, आमची जाणीव अतिचेतन, अतिमानसिक स्वरूप धारण करण्यासाठीं आपली कोणती शक्ति उपयोगांत आणणार आणि कोणत्या प्रक्रियेनें इष्टसिद्धि करणार त्या प्रक्रियेचा व त्या शक्तीचा शोध हा होय.

जाणीव आणि मन हीं एकच आहेत, असा देखावा आमच्या ठिकाणीं आहे; निदान ही गोष्ट खरी आहे कीं, आमच्या अस्तित्वाचा प्रमुख भाग मन हा आहे; तेव्हां या मनाच्या मूलभूत हालचाली तपासण्याचें काम सर्वप्रथम महत्त्वाचें आहे, सर्वांत अधिक निकडीचें आहे. तथापि ही गोष्ट लक्षांत घेणें अवश्य आहे कीं, आम्ही म्हणजे मन अशी कांहीं वस्तुस्थिति नाहीं; आमच्या एकंदर अस्तित्वांत मनाबरोबर प्राणशक्ति आहे, देह आहे, अवचेतन जाणीव आणि अचेतना आहे; शिवाय आमच्या ठिकाणीं आत्मा आहे, आत्मवस्तु आहे, गुप्त आंतरिक चेतना (जाणीव) आणि अचेतना यांच्या प्रांतांत ही आत्मवस्तु आम्हांला घेऊन जाते, तिचें उगमस्थान आणि गूढ सत्य अतिचेतनेंत (पराचेतनेंत) आणि आंतरिक चेतनेंत आहे. मन, मानसिक जाणीव हीच सर्व कांहीं असती, किंवा वस्तुजातांतील मूळ जाणिवेचा (चेतनेचा) स्वभावधर्म मनासारखाच असता, तर आमच्या नैसर्गिक अस्तित्वाचा उगम आभास किंवा अज्ञान आहे असें मानतां आलें असतें; कारण ज्ञानाचा मर्यादितपणा आणि अस्पष्टपणा यांस मनाचा स्वभावधर्म कारण आहे आणि मर्यादित आणि अस्पष्ट ज्ञान हें चुका आणि भ्रम यांच्या मुळाशीं असतें; मनाच्या व्यापारानें निर्माण झालेले आभास आमच्या जाणिवेंतील प्राथमिक घटनांपैकीं घटना आहेत. या वस्तुस्थितीवरून असें अनुमान करण्यास जागा

पान क्र. ३५२

 

आहे कीं, मन हें अज्ञानाची मूस आहे, आणि हें मनांत जन्मणारें आणि वाढणारें अज्ञान आमच्याकडून खोट्या विश्वाची निर्मिति करवितें, खोटे विश्व आमच्यापुढें उभें करतें -- हें विश्व वस्तुत: आमच्या बाहेर असत नाहीं, आमच्या जाणिवेनें आमच्या आंत घडलेली एक रचना या पलीकडे या आमच्या विश्वाला अस्तित्व नसतें. अशीहि कल्पना करतां येईल कीं, माया किंवा अविद्या मनाहून अगोदरची आहे, ही अविद्या किंवा माया मनाच्या मुशींत खोट्या अशाश्वत जगाचें बीज टाकते आणि त्या बीजांतून विश्वाचा वृक्ष उभा होतो -- या कल्पनेनुसार मन हें विश्वाची जननी, वंध्या माता (कारण तिचें अपत्य विश्व हें असत्य आहे) ठरते आणि अविद्या किंवा माया विश्वाची आजी ठरते, कारण मन हें स्वत: मायेचें किंवा अविद्येचें अपत्य मानावें लागतें. पण या कल्पनेंत अडचण अशी आहे कीं, या आजीचें, या मायेचें, या गूढ रहस्यमय दुर्ज्ञेय विश्वमाता महीचें स्वरूप उमजणें फार कठीण जातें; आम्हांला या पक्षीं अशी कल्पना करावी लागते कीं, शाश्वत मूळ सद्वस्तूचें ठिकाणी मिथ्या विश्व-कल्पना, आभासमय, आभासजनक जाणीव आहे : याचा अर्थ असा होतो कीं, ही मूळ सद्‌वस्तु, हें ब्रह्म स्वत:च मिथ्यारचना करणारें मन आहे, किंवा असें मन ब्रह्माचा अंश आहे, किंवा अशा मनाला ब्रह्माचा आधार आहे; किंवा मनाहून मोठी पण मनाच्याच धर्माची रचनाकुशल जाणीव ब्रह्माचा आधार घेऊन काम करते, ब्रह्माचा अंश म्हणून काम करते अथवा अशी जाणीवच ब्रह्म आहे; ब्रह्म स्वत:च्या भ्रमाचें आणि प्रमादाचें निर्मातें आहे, भ्रमाच्या निर्मितीला ब्रह्म पाठिंबा देतें, अनुमति देतें म्हणून किंवा तें स्वत:च भ्रमाची उत्पत्ति आपल्या करणीनें करतें म्हणून त्याच्याकडे भ्रमाचें उत्पादकत्व येतें; ब्रह्म हें स्वत:च्या भ्रमाचें जनक आहे, तसें तें या भ्रमानें, प्रमादानें फसणारें पण आहे, मन स्वत: भ्रम निर्माण करून, त्या भ्रमानें फसतें त्याप्रमाणेंच ब्रह्महि स्वत: भ्रम निर्माण करून त्यानें फसतें. ब्रह्माचे ठिकाणीं मायेचा आरोप केल्यास त्या आरोपाचा हा इतका अर्थ होतो : आणि हा अर्थातच आम्हाला गोंधळांत पाडणारा आहे. आणखीहि एक पक्ष आहे व तोहि आमच्या मनांत कांहीं कमी गोंधळ उत्पन्न करीत नाहीं -- मन हा आरसा आहे, या आरशांत मूळ मायेचें प्रतिबिंब पडतें, सद्‌वस्तूच्या (ब्रह्माच्या) खोट्या छायेचें प्रतिबिंब पडतें, खोटी छाया पडते, असा तो पक्ष आहे. या पक्षांत मन हें जें प्रतिबिंबाचें माध्यम आहे, आरसा आहे, तें आलें

पान क्र. ३५३

 

कोठून हा प्रश्न सोडवितां येत नाहीं, तसेंच खोटी छाया येते कोठून हेंहि उकलून दाखवितां येत नाहीं. निर्विशेष, निर्गुण ब्रह्म मनाचे ठिकाणीं जर आपली छाया प्रतिबिंबित करणार, तर ती अर्थात् निर्विशेष, निर्गुण अशीच असावयास पाहिजे; विविध साकार वस्तूंचा पसारा असलेलें विश्व ही कांहीं ब्रह्माची छाया होऊं शकत नाहीं आणि मनाचे ठिकाणीं तर हें विश्व दिसतें. विश्वाचा पसारा मनाचे ठिकाणीं दिसण्याचें कारण मन हें चंचल, लहरी लहरी उठणाऱ्या जलसंचयाप्रमाणें आहे हें आहे -- ब्रह्म एकच एक असलें तरी मनाच्या ठिकाणीं तें मनाच्या हालचालीमुळें विभागल्यासारखें दिसतें, असा कोटिक्रम करतां येईल. पण या कोटिक्रमांत ब्रह्माचे ठिकाणीं मुळींच नसणारा खोटा नामरूपात्मक पसारा मनाचे आरशांत कसा दिसतो त्याचें स्पष्टीकरण होऊं शकत नाहीं -- चंचल मनाच्या आरशांत ब्रह्माचे तुकडे तुकडे झालेले दिसणें मान्य करतां येईल पण हे तुकडे ब्रह्म या सत्य वस्तूचें सत्य भागच असतील हें उघड आहे. ब्रह्म एक तसें अनेक असलें पाहिजे -- मनांत जें प्रतिबिंब पडतें, तें ब्रह्माच्या अनेकता-सत्याचें प्रतिबिंब असतें. नसलेली अनेकता मनांत प्रतिबिंबित होत नसून, असलेली अनेकता त्यांत प्रतिबिंबित होते असें मानणें सयुक्तिक आहे. मात्र हें प्रतिबिंब अपूर्णतेनें, अयथार्थतेनें दूषित असतें याचें कारण मन मर्यादित व विषमतायुक्त असतें. तेव्हां वरच्या विवेचनांतून असें सार निघतें कीं, विश्व हें असत्य नसून, तें सत्य असणें शक्य आहे, आणि मन त्याचें जें चित्र चितारतें, तें मात्र सदोष असतें, यथार्थ असत नाहीं. पण विश्व जर सत्य असेल, तर मनाची संवेदना व विचारमालिका जी ज्ञानसिद्ध्यर्थ साधना म्हणून असते, त्या साधनेहून वेगळ्या स्वरूपाचें असें ज्ञान, स्वयंसिद्ध सत्यज्ञान असलें पाहिजे; या सत्यज्ञानांत, मूळ सत्य ब्रह्म आणि ब्रह्मांतर्गत सत्य विश्व या दोन्हीहि सत्यांचा अंतर्भाव होत असला पाहिजे.

आमच्या तपासणींत आम्हांला जर असें आढळून आलें कीं, सर्वोच्च सत्यवस्तु (ब्रह्म) अस्तित्वांत आहे आणि मन हें अस्तित्वांत आहे, तिसरें कांहीं खरें अस्तित्वांत नाहीं -- तर अविद्या, अज्ञान ही ब्रह्माची मूळ शक्ति आहे, आणि ही अविद्या किंवा माया विश्वांतील सर्व वस्तूंची व घटनांची जननी आहे हें आम्हांस मान्य करावें लागेल. माया ही ब्रह्माची शाश्वत शक्ति; ब्रह्म स्वतःला नित्य ओळखणारें; या ब्रह्माची ही माया-शक्ति ब्रह्माला स्वतःला फसविणारी असते, किंवा जें ब्रह्माला

पान क्र. ३५४

 

स्वतःसारखें दिसतें, जें मायेनें निर्मिलें आहे त्याला म्हणजे जीवात्म्याला, मनाच्या द्वारां फसविणारी असते : मायेचा एक अंश म्हणून जीवात्मा अस्तित्वांत असतो आणि मन ही या जीवात्म्याची अज्ञानग्रस्त जाणीव असते; माया ही ब्रह्माची शक्ति ब्रह्मावर नामरूपात्मक पसारा लादते, मन ही ब्रह्मशक्ति, हा नामरूपात्मक पसारा आपणावर घेते आणि तो सत्य आहे असें मानते. किंवा असें म्हणतां येईल कीं, माया ही ब्रह्मशक्ति आभास उत्पन्न करणारी, आभास हे आभास आहेत हें जाणून, ते उत्पन्न करणारी आहे; आणि मन ही ब्रह्माची शक्ति हे आभास आभास आहेत हें विसरून त्यांचें स्वागत करणारी आहे -- ब्रह्म आणि मन या दोनच वस्तु खऱ्या अस्तित्वांत आहेत असें मानल्यास वरील सर्व गोष्टी मानाव्या लागतील. पण ब्रह्म हें स्वतःला नित्य एकच एक म्हणून जर तत्त्वत: ओळखीत असेल, त्याची नित्य आत्म-जाणीव जर एकत्वमय असेल, तर वरील गोष्टी शक्य होणार नाहींत. वर दर्शविल्याप्रमाणें ब्रह्म जर स्वतःची विभागणी करूं शकत असेल, जाणतें आणि न जाणतें असें जर तें एकाच वेळीं होत असेल, किंवा एका भागानें जाणतें व दुसऱ्यानें न जाणतें असें स्वरूप जर ब्रह्म घेऊं शकत असेल, किंवा जर तें स्वत:चा कांही अंश मायेंत प्रविष्ट करूं शकत असेल -- तर ब्रह्माला दोन किंवा विविध जाणिवा, जाणिवेच्या क्रिया शक्य आहेत असें मानलें पाहिजे. सत्याची जाणीव ही ब्रह्माची एक जाणीव, आभासाची जाणीव ही दुसरी जाणीव; अथवा एक जाणीव अज्ञानमय (मानसिक) आणि दुसरी जाणीव अतिमानसिक. ही जाणिवेची द्वैताची किंवा विविधतेची दशा तर्कशास्त्राच्या दृष्टीनें ब्रह्माचे ठिकाणीं असणें अशक्य आहे -- पण ब्रह्म आणि अज्ञानमय मन या दोनच वस्तू अस्तित्वांत आहेत या पक्षाला ही अशक्य गोष्ट खरी अस्तित्वांतील गोष्ट म्हणून मान्य केलीच पाहिजे. ही गोष्ट अर्थात्, एक अध्यात्माचें रहस्य म्हणून किंवा बुद्धीची गति जेथें पोहोंचत नाहीं अशी एक विरोधात्मक वस्तुस्थिति म्हणून मान्य करावी लागते. आतां, वस्तुजाताचें उगमस्थान एक बुद्धि-अतीत रहस्य आहे ही गोष्ट एकदां मान्य झाली म्हणजे एकच एक ब्रह्म नित्य अनेक असतें किंवा होतें आणि अनेक जें आहे तें नित्य एक (ब्रह्म) होतें किंवा असतें ही आमच्या प्रत्ययास येणारी अस्तित्वाची शाश्वत वस्तुस्थिति, हा आमच्या अनुभवाचा, अस्तित्वाचा शाश्वत कायदा मान्य व्हावयास अडचण राहत नाहीं -- कारण तर्काला अमान्य, बुद्धीला

पान क्र. ३५५

 

अग्राह्य असें वस्तुजाताचें उगमस्थान आहे, त्याचें अस्तित्व तर्कानें सिद्ध करतां येत नाहीं, तरी तें अस्तित्व बुद्धि-अतीत रहस्य म्हणून मान्य करावें असें, ब्रह्म आणि अज्ञानमय मन हें द्वैत मानणाऱ्या पक्षाची समीक्षा करतांना, अनिवार्यपणें ठरलें आहे. पण हा नवा पक्ष मान्य केला तर माया, आभासोत्पादक माया विश्वरचना करते हा पक्ष अनावश्यक ठरतो -- मायेच्या मध्यस्थीची गरजच राहत नाहीं. आणखीहि एक पक्ष आहे : ब्रह्म शाश्वत आहे, अनंत आहे; ब्रह्माची जाणीव अनंत आहे, ब्रह्माचें सत्यस्वरूप अगाध आणि अमर्याद आहे; आपल्या अनंत जाणीव-शक्तीच्या बळावर ब्रह्म आपलें अमर्याद स्वरूप-सत्य अनेक रूपांच्या, अनेक प्रक्रियांच्या द्वारां प्रकट करतें; असंख्य अर्थपूर्ण आकार आणि व्यवहार यांच्या द्वारां प्रकट करतें; ब्रह्म अनंत सत्य आहे आणि त्या सत्याला व्यक्त करणारे, त्याचे फलरूप असणारे सर्व व्यवहार, आकार, प्रक्रिया रूपसंभार हे सत्य आहेत; अचेतना आणि अज्ञान यांनाहि ब्रह्माचें अनंत स्वरूप व्यक्त करणाऱ्या रूपांत, सत्यरूपांत, स्थान देतां येतें; जाणीव सर्वथा गुप्त होऊन राहणें ही अचेतना आणि जाणिवेनें आपलें ज्ञान मर्यादित करून, त्या मर्यादित रूपांत तिनें राहणें हें अज्ञान -- जाणिवेच्या या स्व-रूप विरोधी उलट्या रूपांचा उपयोग ब्रह्माच्या कालनिष्ठ विशिष्ट व्यवहाराला आहे, सत्यब्रह्माचें तिरोधान आणि क्रमविकास या ब्रह्माच्या कालांकित व्यवहारासाठीं अचेतना आणि अज्ञान या रूपांची आवश्यकता आहे. हा पक्ष आम्ही स्वीकारला आहे; याचाहि पाया बुद्धि-अतीत रहस्यांत आहे; पण हा पक्ष कांहीं सर्वथा अंतर्विरोधात्मक नाहीं. अनंताविषयीची सर्वसाधारण कल्पना बदलून ती विशाल केल्यास, हा आमचा पक्ष कोणालाहि मान्य करतां येईल. येथेंहि मायेच्या मध्यस्थीची बिलकुल आवश्यकता नाहीं.

आमच्यापुढील प्रश्नाची तपासणी करतांना केवळ मनाला, मनाच्या अज्ञानशक्तीला आम्ही धरून बसलों (ही शक्तीच फक्त विचारांत घेतली) तर वरील पक्षांची सत्यासत्यता आम्हांला अजमावतां येणार नाहीं; सत्य विश्व, विश्वाची सत्यता आम्हांला कळणार नाहीं. आम्हीं हें जाणलें पाहिजे कीं, मनाला अज्ञानाचा ओढा आहे त्याप्रमाणें ज्ञानाचाहि ओढा आहे, ज्ञानाचीहि शक्ति आहे; त्याचें विचारमंदिर अविद्येप्रमाणें विद्येचेंहि स्वागत करावयास तयार असतें; त्याचा कार्यारंभ अविद्येंत होतो, त्याचा रस्ता चुकांच्या वळणावळणांनीं जातो हें खरें असलें, तरी

पान क्र. ३५६

 

त्याचें प्राप्तव्य नेहमीं ज्ञान (विद्या) हेंच असतें. त्याच्या अंतरीं ज्ञानाच्या शोधाची, सत्याच्या शोधाची स्वाभाविक प्रेरणा असते; गौण आणि मर्यादित कां होईना पण सत्य शोधून काढण्याची, सत्यरचनेची शक्ति पण त्याचे ठिकाणीं असते. सत्याच्या छाया, सत्याचीं प्रतीकें, सत्याचीं वैचारिक रूपें याच गोष्टी मन आम्हांपुढें ठेवूं शकतें. पण या गोष्टी त्यांच्या त्यांच्या परीनें सत्याच्या रचना, सत्याचीं प्रतिबिंबें असतात हें आम्हीं विसरूं नये. ज्या सत्यांना हीं रूपें मन देतें त्या सत्यांची अधिक वास्तव रूपें आमच्या जाणिवेच्या अधिक खोल किंवा अधिक उंच अशा थरांत अस्तित्वांत असतात. जडद्रव्य आणि प्राणमय अस्तित्व या सत्यांच्या रूपांना, अपूर्ण अशा रीतीनें मनाचा केवळ स्पर्श होतो; आत्मा अशा गूढ श्रेष्ठ दिव्य सत्यांनीं भरलेला आहे कीं, मन या सत्यांना केवळ अंशत: आणि अर्धवटपणें जाणूं शकतें व त्यांची अर्धवट अंशत: नक्कल करून इतरांकडे त्यांची अर्धवट पाठवणी करूं शकतें, इतरांना तीं सत्यें अंशत: आणि अर्धवट स्वरूपांत देऊं शकतें. तेव्हां मनाच्या व्यापक तपासणीखेरीज, जाणिवेच्या दुसऱ्या थरांचीहि तपासणी केली पाहिजे. मनाच्या सामान्य शक्तींहून त्याच्याच खोल व उंच ठिकाणच्या शक्तींची, तसेंच मनाहून वर (अतिमानसिक) आणि मनाहून खालीं (अधोमानसिक) असणाऱ्या जाणिवेच्या शक्तींची तपासणी केली पाहिजे. अशी तपासणी केली, तरच समग्र सत्याची ओळख आम्हांला होऊं शकेल. जाणिवेच्या अनेक थरांची यादी वर दिली पण सर्वश्रेष्ठ जाणीव, अतिचेतन जाणीव, सर्वश्रेष्ठ सत्यवस्तूची (ब्रह्माची) जी जाणीव आहे ती आणि मानस, अतिमानस, अधोमानस आणि अचेतन या जाणिवेच्या प्रकारांचा, थरांचा त्या सर्वश्रेष्ठ ब्रह्माच्या सर्वश्रेष्ठ अतिचेतन जाणिवेशीं असलेला संबंध या गोष्टी वगळून विश्वाच्या सत्यासत्यतेचा निर्णय घेतां येणार नाहीं. शेवटीं सर्व कांहीं या शेवटीं दिलेल्या सत्य ओळखीवर अवलंबून राहील.

जाणिवेच्या खालच्या आणि वरच्या पायऱ्या आम्हीं बारकाईनें पाहिल्या आणि एकच एक जें सर्वशक्तिमान् सर्वगामी सत्य आहे, त्याच्या ठिकाणीं या सर्व पायऱ्यांची एकता संपादन केली, अनुभवली म्हणजे आमच्या समोरील दृश्य सर्वच बदलून जातें. आमचें अस्तित्व आणि विश्वाचें अस्तित्व यांतील वस्तुभूत घटना जर आम्हीं पाहिल्या, तर अस्तित्व हें अखंडपणें एक आहे असें आमच्या निदर्शनास येतें; विश्वांत

पान क्र. ३५७

 

आणि आमच्यांत अनेकता फार मोठ्या प्रमाणांत दिसली, तरी एकता ही सर्वप्रधान आहे, अनेकतेला एकतेचें शासन मानावें लागत आहे, असें आपणांस दिसेल; तथापि अनेकता ही पण आहे, अस्तित्वांत केवळ एकरस एकता नाहीं हेंहि नाकबूल करतां येत नाहीं, निदान दर्शनीं देखावा तरी अनेकतेचा निःसंशय मानावा लागतो. वरच्या दृश्य थराच्या खालीं आंत आम्ही गेलों की, द्वैत, अनेकता ही बंधनकारक नाहीं हें आम्हांला कळतें; बुद्धि जे विरोध, विसंवाद निर्माण करते, ते सर्व एकमूळ सत्याचीं अंगें आहेत, मूळ एका सत्याचीं अंगें म्हणून ते विरोध, विसंवाद अस्तित्वांत असतात, असें आमच्या प्रत्ययास येतें; एकता आणि अनेकता एका सत्याचीं दोन टोंकें आहेत -- आमच्या जाणिवेला ज्या जोड्यांचा, द्वंद्वांचा ताप होतो, तीं द्वंद्वें एकाच अस्तित्वाच्या सत्याची अंगभूत अशीं भिन्न (विसंवादी) सत्यें आहेत हें आम्हांला कळतें. अनेकता बारकाईनें तपासल्यास ती आविष्काररूप आहे, अभिव्यक्तिरूप आहे; एक अस्तित्व, त्या अस्तित्वाची एक जाणीव, त्या अस्तित्वाचा एक आनंद यांचा आविष्कार, अभिव्यक्ति अनेकतेच्या द्वारां झालेली आहे हें सत्य आम्हांला कळतें; एकच अस्तित्व अनेक झालेलें, एकच जाणीव अनेक जाणिवा बनलेली, एकच आनंद अनेक आनंदांचें (सुख दुःखांचें) रूप घेतलेला आम्हांस विश्वांत अनुभवास येतो. सुख आणि दु:ख या द्वंद्वाचा विचार पूर्वीं आम्हीं केला, त्यांत असें दिसून आलें कीं, अस्तित्वाचा आनंद एकच आहे, दुःख म्हणून जें भासतें, ती जाणिवेची विकृत प्रतिक्रिया असते, आनंदाचा जो संपर्क आम्हांला, आमच्या जाणिवेला घडतो, त्या संपर्काच्या संबंधांतील आमच्या जाणिवेची विकृत प्रतिक्रिया म्हणजे दु:ख होय. आनंदाची विरोधी मूलभूत वस्तु हें कांहीं दु:खाचें स्वरूप नव्हे. दुःखाचें रूपान्तर सुखांत, सुखाचें रूपान्तर दुःखांत होऊ शकतें, होतें आणि सुख आणि दुःख दोन्हीं संवेदना मूळ आनंदाचें रूप घेऊं शकतात. या अनुभवावरून हें सिद्ध होतें कीं, आनंद आणि दुःख अशा मूलभूत विरोधी वस्तू अस्तित्वांत नसून, एक आनंदच मूलभूत वस्तु आहे आणि दुःख ही आमच्या जाणिवेची वर सांगितल्याप्रमाणें विकृत प्रतिक्रिया आहे. ही विकृत प्रतिक्रिया घडण्याचें कारण आमच्या शक्तिहीनतेंत असतें. आम्हांला एकच अस्तित्वाच्या महान् एक आनंदाचा जो शक्तिमान् संपर्क घडतो, तो संपर्क पचविण्याची शक्ति आमच्यांत असेल, तर तो आनंद आम्हांला आनंदरूपानेंच प्रतीत होईल -- पण पचविण्याची शक्ति आम्हांत

पान क्र. ३५८

 

पुरती नसेल, तर तो आनंद आम्हांला, आमच्या जाणिवेला आनंदरूप, सुखरूप न भासतां दुःखरूप भासेल. एकच आनंद सुख-दुःखरूपानें कसा प्रतीत होतो हें आपण पाहिलें. आनंद आणि दुःख मूलभूत विरोधी वस्तू नाहींत हें आम्हीं जाणून घेतलें. आमच्या शक्तिहीनतेमुळें आनंद आम्हांला दुःखरूप भासतो ही वस्तुस्थिति जाणून घेतल्यानंतर, शक्तिहीनता ही काय वस्तु आहे तें आपण पाहूं. ईश्वराची एकच एक इच्छाशक्ति म्हणा, एकच एक विश्वशक्ति म्हणा, सर्वसमर्थ आहे. कोणत्याहि प्रकारची, कोणत्याहि प्रमाणांतली शक्तिहीनता, ही सर्वशक्तिमान् विश्वशक्तीची म्हणा, ईश्वरी संकल्पशक्तीची म्हणा एक विशिष्ट क्रिया असते. आत्म्याची पूर्ण शक्ति आणि त्याची अल्प शक्ति (असमर्थता, अक्षमता, शक्तिहीनता) या मूलभूत विरोधी वस्तू नाहींत. ज्याप्रमाणें आत्म्याचा आनंद आणि त्याचें दुःख या मूलभूत विरोधी वस्तू नाहींत, त्याप्रमाणें पूर्ण शक्तीच्या ठिकाणीं आपलें शक्तिकार्य विशिष्ट प्रकारें थांबवून धरण्याची, विशिष्ट प्रकारें मोजून मापून मर्यादित करण्याची, विशिष्ट प्रकारें तें इतर गोष्टींशीं संबंधित करण्याची शक्ति सहजच असते आणि आपल्या क्रियेची विशिष्ट व्यवस्था करण्याची जी शक्ति पूर्ण शक्तीच्या किंवा पूर्ण शक्तिमान् आत्म्याच्या ठिकाणीं असते, ती असमर्थतेचें, शक्तिहीनतेचें अल्पशक्तीचें रूप घेऊन आमच्यासमोर येते. पूर्ण शक्तीची आवश्यकतेहून कमी क्रिया किंवा प्रतिक्रिया म्हणजे असमर्थता, दुर्बळता असते. एकच एक ईश्वरी आनंद दुःखाचें रूप कसें घेतो, एकच एक ईश्वरी पूर्ण शक्ति, दुर्बळतेचें रूप कसें घेते हें पाहिल्यानंतर एकच एक ईश्वरी ज्ञानशक्ति किंवा माया अज्ञानाचें, अविद्येचें रूप कसें घेते हें समजण्यास अवघड जाऊं नये. अज्ञान, अविद्या ही एक ईश्वरी ज्ञानाची किंवा मायेची शक्ति आहे. ईश्वराची एकच एक जाणीवशक्ति (ज्ञानशक्ति) आपल्या ज्ञानक्रियेला विशिष्ट प्रकारें थांबविण्याची, नियंत्रित करण्याची, मर्यादित करण्याची, इतर गोष्टींशीं संबंधित करण्याची शक्ति बाळगून असते -- ही विशिष्ट शक्ति आमच्या दृष्टीनें अज्ञानाचें अविद्येचें रूप घेतें. यावरून ज्ञान आणि अज्ञान, विद्या आणि अविद्या एकमेकांशीं न जुळणारीं तत्त्वें नाहींत, एका तत्त्वानें (अज्ञानानें) विश्व अस्तित्वांत आणावें व दुसऱ्या तत्त्वानें (ज्ञानानें) तें असह्य मानून विलयास न्यावें अशीं अन्योन्यविरोधी तत्त्वें तीं नाहींत. दोन्हीं तत्त्वें एकाच वेळीं विश्वांत काम करतात. विश्वाच्या व्यवहारांत त्यांचा कार्यक्रम भिन्न भिन्न असतो

पान क्र. ३५९

 

परंतु त्यांचें सारतत्त्व एकच आहे, स्वाभाविक क्रमानें ज्ञानाचें अज्ञानांत आणि अज्ञानाचें ज्ञानांत रूपान्तर होऊं शकतें; एवढेंच कीं विश्वांत ज्ञान आणि अज्ञान दोन्हींहि तत्त्वें काम करीत असलीं, तरी त्यांचा मूलभूत अन्योन्यसंबंध समानतेचा नाही, अज्ञान हें ज्ञानावर अवलंबून आहे, ज्ञानाचें मर्यादाबद्ध स्वरूप (ज्ञानाची स्वत:ला मर्यादित करण्याची क्रिया) किंवा ज्ञानाची आत्मविरोधी क्रिया म्हणजे अज्ञान होय.

आम्हांला ज्ञान मिळवावयाचें असेल तर आमच्या अज्ञानव्याप्त हट्टी बुद्धीनें ज्या घट्ट, बिनलवचीक रचना केल्या असतील, त्या रचना मोडून टाकून अस्तित्वाच्या वस्तुभूत घटनांकडे आम्हीं मोकळ्या, फिरत्या, सैल, अनाग्रही दृष्टीनें पाहिलें पाहिजे. अस्तित्वाची अंगभूत अशी एक मूलभूत गोष्ट जाणीव ही आहे, जाणीव ही शक्ति आहे; तीन प्रकारें ही जाणीव काम करतांना आम्हाला दिसते; एक जाणीव सर्वांच्या पाठीमागें, सर्वांना बाहेरून आंतून व्यापणारी अशी आहे. ही जाणीव स्वत:ला नित्य सर्वत्र सर्वनिरपेक्षतेनें ओळखणारी अशी आहे. एकरूप असतांना, अनेकरूप असतांना, एक आणि अनेक एकाच वेळी असतांना, किंवा एक आणि अनेक या रूपांपलीकडे केवल निरपेक्षरूपी असतांना, ही जाणीव केव्हांहि स्वत:ला विसरत नाहीं. मी एक आहे, अनेक आहे, एकाच वेळीं एक आणि अनेक आहे, एक आणि अनेक यांपलीकडे मी निरपेक्ष केवलरूप आहें हें आत्मज्ञान या जाणिवेला नित्य व्यापून असतें, सर्वत्र व्यापून असतें, सर्व नसतांनाहि (कांही नसतांनाहि) व्यापून असतें. सर्वोच्च दिव्य ईश्वरी आत्मज्ञान, सर्वोच्च दिव्य ईश्वरी सर्व-ज्ञान म्हणजे ही परिपूर्ण जाणीव होय. अस्तित्वाच्या अंगभूत असणाऱ्या मूलभूत जाणिवेचा ''परिपूर्ण जाणीव'' हा एक क्रियाप्रकार आतांपर्यंत वर्णिला. वस्तुजाताच्या एका टोंकाला ही परिपूर्ण जाणीव असते, तर दुसऱ्या टोंकाला या परिपूर्ण जाणिवेच्या विरोधी प्रकार, दर्शनी विरोधी प्रकार काम करीत असून, त्या सर्वांवर या परिपूर्ण जाणिवेला आपली यंत्रणा ठेवावी लागते; परिपूर्ण जाणिवेची आत्यंतिक विरोधी अशी परिपूर्ण नेणीव, दर्शनीं परिपूर्ण नेणीव दुसऱ्या टोंकाच्या अखेरीला काम करतांना दिसते -- ही नेणीव परिणामकारक रीतीनें गतिमान् होऊन, निर्मितीचें काम चोखपणें करतांना दिसते. (परिपूर्ण जाणीव, ईश्वरी ज्ञान, दर्शनीं परिपूर्ण नेणिवेच्या पोटीं फलविषयक निश्चितीनें काम करीत असतें हें आम्ही जाणतों) परिपूर्ण जाणीव आणि दर्शनीं परिपूर्ण नेणीव हे

पान क्र. ३६०

 

अस्तित्वाच्या अंगभूत जाणिवेचे दोन क्रियाप्रकार सांगितल्यानंतर, तिसरा प्रकार सांगावयाचा. ही तिसऱ्या प्रकारची क्रियाशील जाणीव वर सांगितलेल्या दोन अन्योन्यविरोधी प्रकारांच्या मधल्या ठिकाणीं मध्यस्थ म्हणून काम करते. ही मधली जाणीव स्वतःला अर्धवट ओळखणारी असते; हें अर्धवट आत्मज्ञान वरकरणी देखाव्यापुरतें असतें, कारण तिच्या पाठीमागें राहून, तिच्या द्वारां परिपूर्ण ईश्वरी सर्वज्ञ जाणीव काम करीत असते. अस्तित्वाची अंगभूत मौलिक गोष्ट जी जाणीवशक्ति, तिचे हे तीन क्रियाशील प्रकार आम्हांला दिसतात. या प्रकारांपैकीं तिसरा प्रकार जो सांगितला, हा प्रकार जाणिवेची मध्यगामी अवस्था आहे; दुसऱ्या दोन अवस्था अन्योन्यविरोधी आहेत. एक सर्वोच्च जाणीव (अतिचेतनता), आणि दुसरी नेणीव (अचेतनता) या त्या दोन अवस्था होत; मध्यगामी अवस्था ही या दोन अवस्थांच्या मध्यें असणारी कायमची अपरिवर्तनीय, दोहींशीं मिळतीजुळती अशी तडजोडीची जाणिवेची अवस्था दिसते. परंतु आमच्यासमोर असलेल्या पुराव्याचा विशाल दृष्टीनें विचार करतां, आमच्या लक्षांत येतें कीं, आत्म्याच्या अंतरंगांत खोल जें ज्ञान, जी जाणीव परिपूर्ण अवस्थेंत असते, तें ज्ञान किंवा ती जाणीव बाहेर, दृश्य पातळीवर येत असतां, तिच्या अपूर्ण आविष्काराच्या, अभिव्यक्तीच्या स्थितींत तिला मधली अवस्था म्हटलें जातें -- ती कांहीं कायम टिकणारी अवस्था नव्हे. या विकासी अवस्थेला आम्ही आमच्या दृष्टीनें अज्ञान हें नांव देतों; कारण, आत्मा आपलें पूर्ण आत्मज्ञान पूर्णतया प्रकट न करतां, स्वेच्छेनें जें मागें ठेवतो, त्या मागें ठेवण्याचा आमच्या ठिकाणचा आमचा स्वतःचा विशिष्ट प्रकार अज्ञान हा आहे. जाणीवशक्तीच्या या तीन अवस्था उदयास कोठून व कशा येतात आणि त्यांचा अन्योन्यसंबंध बरोबर कशा प्रकारचा आहे हें शक्य तर शोधून काढणें हें कार्य आमच्यापुढें आहे.

अज्ञान आणि ज्ञान, अविद्या आणि विद्या या मूळ सत्याच्या जाणिवेच्या दोन स्वतंत्र पोटशक्ती आहेत असें जर तपासणीअन्तीं आम्हांस आढळून आलें, तर जाणिवेच्या अत्युच्च टोंकापर्यंत आम्हांला या दोन शक्तींचा भिन्न मार्ग, भिन्न व्यवहार दिसेल आणि त्या टोंकापाशीं मूळ निरपेक्ष केवल सत्यांत या दोन्ही वस्तू, दोन्ही शक्ती एकरूप झालेल्या दिसतील; कारण येथूनच त्या दोन शक्ती एकदम उदयास आल्या होत्या.1

-------------------------

1 परात्पर ब्रह्माचे ठिकाणीं विद्या आणि अविद्या या शाश्वत शक्ती आहेत असें उपनिषदांमध्यें म्हटलेलें आढळतें. पण या विधानाचा असा अर्थ घेतां येतो कीं, अनेकतेची जाणीव (अविद्या) आणि एकतेची जाणीव या दोन जाणिवा ब्रह्माच्या आत्म-जाणिवेच्या अंगभूत आहेत, त्यांचें ब्रह्मांतील सह-अस्तित्व ब्रह्माच्या अभिव्यक्तीचा पाया आहे, ब्रह्माच्या शाश्वत आत्म-जाणिवेचीं वरील दोन जाणिवा हीं दोन नित्य सहचारीं, सहकारीं अंगें आहेत.

पान क्र. ३६१

 

ज्ञान आणि अज्ञान या आतांच म्हटल्याप्रमाणें स्वतंत्र शक्ती असतील, तर असा निर्णय करतां येईल कीं, अतिचेतन केवल ब्रह्माचें सत्य हेंच एक सत्य-ज्ञान आहे, आणि आमची जाणीव, आमचें विश्व, आमचें विश्वांतील अस्तित्व या त्रयींत ब्रह्माचें सत्य अगदीं अल्प अंशानें साकार झालें असून, त्यावर अज्ञानाची छाया कायमची पडलेली आहे, अज्ञानाच्या छायेनें तें कायमचें वेढलेलें आहे, त्याजवर त्याच्या नित्य सहचारी अज्ञानाचें कायमचें दडपण आहे. असें देखील म्हणतां येईल कीं, विश्वाच्या अस्तित्वाच्या मुळाशीं दोन समान शाश्वत तत्त्वें आहेत. एक, परिपूर्ण ज्ञान : हें तत्त्व विश्वांत सत्य, व्यवस्था, सुसंवाद यांची स्थापना करतें; दुसरें तत्त्व, परिपूर्ण नेणीव (अचेतनता) : या तत्त्वावर केवळ स्वैर कल्पना, विसंवाद, अव्यवस्था यांचा विश्वांतील खेळ आधारलेला आहे : विश्वांत खोटेपणा, अन्याय, क्लेश यांचा अतिरेक या तत्त्वाच्या बळावर होत असतो; हीं दोन तत्त्वें समान दर्जाचीं आहेत. हीं एकमेकांत मिसळून एकमेकांना विरोध करणारीं आहेत. प्रकाश आणि अंधकार, साधुत्व आणि दुष्टत्व असें या दोन समबल विश्वव्यापक, विश्वनिर्मायक तत्त्वांचें वर्णन करतां येईल. कांहीं तत्त्वज्ञांच्या मतें विश्वांत परिपूर्ण साधुत्व आहे आणि परिपूर्ण दुष्टत्व पण आहे, दोन्ही मार्गांनीं केवल एकतत्त्वाकडे जातां येतें; ज्ञान आणि अज्ञान स्वतंत्र समबल अशा मूळ जाणिवेच्या, मूळ सद्‌वस्तूच्या दोन अंगभूत शक्ती असल्यास, हें मत यथार्थ ठरतें, ठरूं शकतें. पण आमच्या तपासणींत ज्ञान आणि अज्ञान यांचें नातें वरीलप्रमाणेंच आढळून येईल असें नाहीं. मूळ ब्रह्माची जाणीव ही, प्रकाश आणि छाया यांनीं युक्त आहे, ज्ञान हा तिचा प्रकाश आणि अज्ञान ही तिचीच छाया आहे, अज्ञानाचा आरंभ म्हणजे ज्ञानाला मर्यादा घालण्याचा आरंभ होय, ज्ञानाचें कमी अधिक मर्यादितपण कमी अधिक भ्रमाचें आणि प्रमादाचें मूळ कारण आहे, ज्ञानाला मर्यादा पडल्यानें भ्रम आणि प्रमाद

पान क्र. ३६२

 

यांच्या शक्यतेला जीवनाचा दरवाजा खुला होतो; ही शक्यता, हा संभव पूर्णपणें वास्तव स्वरूप धारण करतो, अशी वेळ येते; ती वेळ म्हणजे ज्ञान स्वत: सहेतुकपणें भौतिक अचेतनतेंत बुडी घेऊन बसतें तेव्हांची वेळ होय; या बुडीनंतर भौतिक अचेतनांतून चेतना (जाणीव) वर येते, तसें त्या चेतनेबरोबर ज्ञानहि वर येत असतें -- या गोष्टी आमच्या तपासणींत जर आमच्या निदर्शनास आल्या, तर आम्हांला अशी स्वतःची निश्चिति करण्यास हरकत नसावी कीं, परिपूर्ण अज्ञान हें विकासक्रमानें परत मर्यादित ज्ञानाचें स्वरूप घेत आहे आणि शेवटीं या ज्ञानाची मर्यादा सर्वथा दूर केली जाऊन, वस्तुजातांतील पूर्ण सत्य, प्रकटपणें दिसेल, विश्वाचें सत्य विश्वगत अज्ञानाच्या बंदींतून, आवरणांतून मुक्त होईल, स्वतःला मुक्त करील. विश्वांतील जीवनाचें निरीक्षण सूक्ष्मपणें केल्यास वस्तुस्थिति अशी दिसते कीं, स्वतःचें रूपान्तर ज्ञानांत करण्यासाठीं अज्ञान धडपडत आहे, तें आपला अंधकार क्रमश: अधिकाधिक उजळून, प्रकाशपूरित करून, स्वतःच्या पोटीं काम करीत असलेल्या, तेथें अगोदरच गुप्तपणें वस्तीस असलेल्या ज्ञानाचें रूप घेण्यासाठीं प्रयत्न करीत आहे. अज्ञानाचें याप्रमाणें ज्ञानांत रूपान्तर झालें म्हणजे विश्वाचें सत्य, त्या सत्याचें खरें तत्त्व आणि खरी साकारता प्रकट होईल; आणि त्याबरोबर विश्वसत्याचें हें खरें तत्त्व आणि त्याची ही खरी साकारता परात्पर सर्वगामी सत्याचेंच तत्त्व आहे, आणि त्या सर्वगामी सत्याचीच साकारता आहे हें आम्हांला स्पष्टपणें कळून येईल. अस्तित्वाचा हा अर्थ आम्हीं स्वीकारला आहे. या अर्थाची सत्यता सिद्ध करण्यासाठीं, पडताळून पहाण्यासाठीं आमच्या बाह्य पृष्ठगत जाणिवेचें स्वरूप, तिच्या आंत, खालीं, वर जें कांहीं आहे त्याच्याशीं तिचा विविध संबंध, या सर्व गोष्टींचें सूक्ष्म निरीक्षण करणें आम्हांस अवश्य आहे. अज्ञान काय आहे, त्याचें स्वरूप काय, त्याचा व्याप काय या गोष्टी या निरीक्षणानें आम्हांला स्पष्ट होतील. अज्ञान ज्या ज्ञानाचें मर्यादित आणि विकृत स्वरूप असतें, त्या ज्ञानाचें स्वरूप आणि व्यापहि या निरीक्षणाच्या क्रमांत आमच्या नजरेस येईल. ज्ञानाचें पूर्ण स्वरूप, परिपूर्ण ज्ञान म्हणजे मूळ चैतन्यपुरुषाचें शाश्वत आत्मज्ञान आणि शाश्वत विश्वज्ञान होय.

पान क्र. ३६३

 

प्रकरण आठवें

स्मृति, आत्म-जाणीव आणि अज्ञान

 

विश्वाचें कारण ''स्वभाव'' आहे असें कोणी म्हणतात, कोणी तें कारण ''काल'' आहे असें म्हणतात.

- श्वेताश्वतर उप० ६.१

 

ब्रह्माचीं दोन रूपें आहेत. एक कालातीत रूप आणि दुसरें काल. 

- मैत्री उप० ६.१५

 

प्रथम रात्र जन्मास आली, त्या रात्रीपासून अस्तित्वाचा प्रवाही सागर जन्मास आला, या सागरावर काल जन्मास आला; दृष्टि (जाणीव) असलेला प्रत्येक प्राणी, कालाच्या शासनाखालीं (दिलेला) आहे.

- ऋग्वेद १०-१९०-१,

 

नाम... आकाश यांहून स्मृति श्रेष्ठ आहे, स्मृति नसेल तर मनुष्यांना विचार करतां येणार नाहीं, आणि ज्ञान मिळवितां येणार नाही; ... स्मृतीची गति जेथवर आहे, तेथवर (स्मृति ब्रह्म आहे या भावनेनें स्मृतीची उपासना करणारा जो आहे) त्याची गति त्याच्या इच्छेनुसार होऊं शकते.

- छान्दोग्य उप० ७.१३

 

आमच्या ठिकाणीं जो पाहतो, स्पर्श करतो, ऐकतो, हुंगतो, चव घेतो, विचार करतो, जाणतो, क्रिया करतो तोच विज्ञानात्मा पुरुष होय.

- प्रश्न उप० ४.९

 

आमची सामान्य अवस्था पाहतां, आमची जाणीव अज्ञानाच्या अवस्थेंतून ज्ञानाच्या अवस्थेंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे हें आम्हांस स्पष्ट दिसतें, म्हणून आमच्या दुहेरी जाणिवेची तपासणी करतांना अगोदर अज्ञानाची तपासणी करणें युक्त आहे. अज्ञान म्हणजे आत्म्याचें आणि वस्तुजाताचें मर्यादित ज्ञान; पूर्ण आत्मविषयक व वस्तुविषयक ज्ञान आणि पूर्ण नेणीव (अचेतनता) या दोन जाणीवदशा दोन बाजूंना

पान क्र. ३६४

 

(एक वर व एक खालीं) आणि मध्यें अज्ञान अशी अज्ञानाची मध्यस्थ दशा आहे. या अज्ञानाच्या कांहीं मूलभूत हालचाली प्रथम तपासावयाच्या आणि नंतर या अज्ञानाच्या (पृष्ठस्थ जाणिवेच्या) खाली जी श्रेष्ठतर जाणीव आहे, त्या जाणिवेशीं या अज्ञानाचें नातें काय आहे तें शोधून काढावयाचें असा तपासणीचा क्रम ठेवणें अवश्य आहे. अशी एक विचारसरणी आहे कीं, स्मरण जें कार्य करतें तें अत्यंत महत्त्वाचें आहे; मनुष्य म्हणजे त्याची स्मरणक्रिया, जेवढी ज्याच्यांत स्मरणक्रिया तेवढेंच त्याच्यांत मनुष्यत्व, आमचें व्यक्तित्व स्मृतीनें बनतें, आमच्या मानसिक अस्तित्वाचा पाया स्मृतीच्या मळलेल्या चुन्यानें (सीमेंटनें) भक्कम टिकाऊ बनतो; आमचे अनुभव एकत्र जोडण्याचें काम स्मृतीचें सीमेंट (दगडी चूर्ण, मळलेला चुना) करतें, तसेंच हे जोडलेले अनुभव एकाच व्यक्तीला जोडण्याचें कामहि स्मृतीच करते. स्मृतीचें हें अनेकविध महत्त्वाचें कार्य लक्षांत घेऊन मनुष्याची स्मृति म्हणजेच मनुष्य असें कोणी कोणी म्हणतात. या कल्पनेंत कालाच्या क्रमांतील जें आमचें अस्तित्व त्या अस्तित्वावर भर दिलेला आहे. तात्विक मूलभूत सत्य क्रमबद्ध क्रियेच्या-प्रक्रियेच्या अंकित असतें, अशी या कल्पनेंतील गृहीत गोष्ट आहे; आमचें सर्वच अस्तित्व प्रक्रियारूप आहे, कारण-कार्य रूप आहे, स्वयंनियंत्रित शक्तीच्या कार्यकारणमय विकासाच्या स्वरूपाचें आहे, कर्मरूप आहे असें कांहीं या कल्पनेंत मान्य केलेलें नाहीं, पण तात्विक किंवा मूलभूत सत्य हें प्रक्रियारूप, प्रक्रियांकित असतें ही गोष्ट या कल्पनेचा गाभा आहे; म्हणून ही वस्तुस्थिति स्पष्ट करणें अवश्य आहे कीं, प्रक्रिया किंवा क्रियाक्रम ही साधन-सामग्री आहे. वस्तुजाताचें खरें जें सत्य, त्याला उपयोगी पडणारें असें एक साधन म्हणजे विशिष्ट प्रक्रिया होय. वस्तूंच्या कांहीं विशिष्ट परिणामकारक संबंधाचा कांहीं विशिष्ट परिणाम घडवून आणण्यासाठीं रूढ झालेला उपयोग म्हणजे विशिष्ट प्रक्रिया. परिणाम भिन्न हवे असले, तर प्रक्रिया भिन्न उपयोगावी लागेल. एकाच परिणामासाठीं भिन्न भिन्न वस्तुसंबंध सारखेच उपयोगी पडूं शकतील. इत्यर्थ हा कीं, प्रक्रियेमध्यें वस्तुसत्य नसतें, तें प्रक्रियेच्या मागें असतें; प्रक्रियेचें स्वरूप निश्चित करणें, तिची नियंत्रणा करणें, ती घडवून आणणें हें काम प्रक्रियेच्या मागें राहून खरें वस्तुसत्य करीत असतें. वस्तुक्रिया (प्रक्रिया) वेगळी आणि वस्तुसत्य वेगळें; वस्तुसत्य हें वस्तुक्रियांकित (प्रक्रियांकित) किंवा वस्तुक्रियारूप नसतें;

पान क्र. ३६५

 

वस्तुक्रिया ही वस्तुसत्यांकित असते. वस्तुसत्य हें क्रियेंत (विशिष्ट परिणाम घडवून आणण्याच्या क्रियेंत) नसून या क्रियेच्या पाठीमागें जी इच्छा, जी शक्ति असते, त्या इच्छेंत, त्या शक्तींत असतें. किंवा असें म्हणणें अधिक सत्य आहे कीं, जाणीवयुक्त आत्मा हें खरें वस्तुसत्य आहे, कारण जाणिवेचें एक रूप, क्रियाशील रूप म्हणजे इच्छा किंवा संकल्प आणि आत्म्याचें क्रियाशील रूप किंवा गुण म्हणजे शक्ति होय. स्मृति ही विशिष्ट प्रक्रिया, आमच्या जाणिवेची एक क्रियापद्धति आहे; ती एक उपयुक्त साधन-सामग्री आहे. आमच्या अस्तित्वाचा गाभा, आमचें सगळें अस्तित्व, व्यक्तित्व म्हणजे स्मृति असें होऊं शकत नाहीं; प्रकाशाची एक क्रिया किरणोत्सर्ग ही असते, तशी जाणिवेची एक क्रिया स्मृति ही आहे. स्मृति म्हणजे मनुष्य नव्हे. आत्मा म्हणजे मनुष्य -- अथवा आम्ही आमच्या बाह्य सामान्य अस्तित्वाचाच विचार करावयाचें म्हटलें तर मन म्हणजे मनुष्य होय. मनाच्या ठिकाणीं अनेक शक्ती आहेत, अनेक प्रक्रिया आहेत, त्यांपैकीं एक ही स्मृति होय, आणि मन हें आत्मा, विश्व आणि निसर्ग यांच्याशीं घडणाऱ्या आमच्या व्यवहारांतील सांप्रतची मुख्य अशी मूळ आत्माच्या जाणिवेची क्रिया होय.

अज्ञानाच्या स्वरूपाची छाननी करतांना प्रथम या स्मृतीच्या तपासणीपासून सुरुवात करणें उपयुक्त होईल. आमच्या जाणीवयुक्त अस्तित्वाच्या कांहीं महत्त्वाच्या बाजूंवर स्मृतीच्या तपासणीनें प्रकाश पडू शकेल. स्मृतीची शक्ति किंवा प्रक्रिया दोन प्रकारें मन उपयोगांत आणीत असतें. आत्म्याची (आपली स्वतःची) स्मृति आणि अनुभवाची स्मृति हे ते दोन प्रकार होत. आमचें जाणीवयुक्त अस्तित्व (आत्मा) ही जी सत्यवस्तु आहे, तिच्या संबंधांत मन आपल्या स्मृतीचा उपयोग करते आणि या अस्तित्वाचा (आत्म्याचा) कालाशीं संबंध जोडतें. मनाचा हा मूलभूत, प्रथम व्यापार होय. मन आत्मरूपानें म्हणतें : ''मी आतां आहे. पूर्वीं होतों म्हणून पुढेंहि असेन; वर्तमान, भूत, भविष्य हे कालाचे जे नित्य अस्थिर पोटभाग, त्या सर्व भागांत मी तोच तो आहे'' आत्मा  (जाणीवयुक्त अस्तित्व) नित्य आहे असें मनाला वाटतें, पटतें पण त्याला तसें ज्ञान होऊं शकत नाहीं, त्याला ही गोष्ट सिद्ध करतां येत नाहीं, पण त्याला जें वाटतें तें कालाच्या भाषेत तें ''मी आतां आहे वगैरे''

अशा प्रकारें मांडण्याचा, स्वतःसाठीं मांडण्याचा प्रयत्न करतें. स्मृतीचा उपयोग करून आपलें भूतकालीन अस्तित्व मनाला समजतें, वर्तमान

पान क्र. ३६६

 

क्षणांतील त्याचें अस्तित्व त्याला प्रत्यक्ष आत्म-जाणिवेनें कळतें; स्वत:च्या अस्तित्वाचा केवळ भूतकालीन भाग स्मृतीच्या योगें मनाला ज्ञात होतो; प्रत्यक्ष आत्मज्ञानानें केवळ वर्तमान क्षणांतील आपलें अस्तित्व मनाला ज्ञात होतें, पण स्वत:च्या भविष्यकालांतील अस्तित्वाची कल्पना जी मनाला येते, ती केवळ अनुमानानें येऊं शकते; वर्तमान क्षणांतील अस्तित्वाची प्रत्यक्ष आत्म-जाणिवेनें होणारी जाणीव, पुढील क्षणीं अनुमानानें गृहीत धरून, अस्तित्वाची प्रत्यक्ष जाणीव अखंडपणें बराच काळ टिकून असल्याची ग्वाही स्मृति देत असते; त्या ग्वाहीचा अनुमानाला पाठिंबा घेऊन, 'आपण भविष्यकाळांत टिकणार,' अशी कल्पना मन करीत असतें. आपला भूतकाल आणि भविष्यकाल किती दूर न्यावयाचा हें मनाला निश्चित करतां येत नाहीं. स्मृतीच्या बळावर मन आपला भूतकाळ स्मृति म्हणेल तेथवर, मागें नेतें, स्मृतीची मर्यादा आली म्हणजे दुसऱ्यांचा पुरावा घेऊन, सभोंवतालच्या घटना, जीवनाच्या घटना लक्षांत घेऊन मन असें अनुमान करतें कीं, त्याला आठवत नाहीं अशा भूतकाळांत आत्मा (जाणीवयुक्त अस्तित्व) अस्तित्वांत होता; तें स्वत: अस्तित्वांत होतें. बालमन, विचार करण्यास असमर्थ असें मन स्मृतींतून नाहींसें होतें, पण असें मन असतां 'आपण अस्तित्वांत होतो' असें, दुसऱ्यांच्या व जीवन घटनांच्या पुराव्यानें प्रौढ मन म्हणूं शकतें; पण शारीर जन्म होण्यापूर्वीं, प्रस्तुत देहधारणापूर्वीं आपलें अस्तित्व, आत्म्याचें अस्तित्व होतें कीं नाहीं हें मर्त्य मन, स्मृतीच्या क्रमांत खिंड पडल्यानें, मुळींच सांगूं शकत नाहीं. भविष्यकाळाची गोष्ट अगदींच वेगळी; त्या संबंधानें मनाला मुळींच ज्ञान नसते, पुढल्या क्षणी स्वत:चें व आत्म्याचें अस्तित्व टिकून राहील, असें तें केवळ प्रबळ संभवाच्या आधारावर म्हणूं शकतें; पण या पुढल्याहि क्षणीं कांहीं तरी अनपेक्षित घडून त्याचें संभाव्य अस्तित्व संपुष्टांत येऊं शकतें; त्याचा, आत्म्याचा, जाणीवयुक्त अस्तित्वाचा भौतिक समाप्तीबरोबर, देहाच्या अंताबरोबर कायमचा अंत होतो किंवा कसें या संबंधानें मनाला कांहींहि ज्ञान असणें, मिळणें शक्य नाहीं, तरीपण आत्मा टिकून राहतो, देहाबरोबर आत्म्याचा व स्वत:चाहि अंत होत नाहीं ही भावना मनाला असते, आणि ही भावना आत्मा नित्य टिकणारा आहे, आपण नित्य आहों अशा निश्चयाचें रूप सहज घेते, घेऊं शकतें.

      मनामध्यें ही नित्यत्वाची निश्चिति कोठून येते ? अनन्त भूतकाल मनानें अनुभवलेला असतो, पण तो विसरलेला असतो; या विसरलेल्या

पान क्र. ३६७

भूतकाळाचा आकारशून्य संस्कार त्याचे पोटीं राहतो; या संस्काराचें प्रतिबंब स्वत:च्या नित्यत्व-निश्चितीच्या रूपानें प्रस्तुत देहांतील मनात उमटतें असें म्हणतां येईल. असेंहि असूं शकेल कीं, आमच्या अस्तित्वाच्या प्रस्तुत पातळीच्या वरच्या, किंवा तिच्या खालीं खोल असलेल्या विशिष्ट पातळीवर आमच्या नित्य अस्तित्वाचें ज्ञान आम्हांला असतें, हें ज्ञान प्रस्तुत मनाला त्या पातळीवरून कांहीं कारणानें प्राप्त होतें आणि या आत्म-ज्ञानाची छाया म्हणून त्याला स्वत:च्या व आत्म्याच्या अमरत्वाची, नित्यत्वाची निश्चिति वाटते. तिसरी शक्यता आत्म्याचें अमरत्व हा भ्रम असूं शकेल. आमचें मरण आमच्या भविष्यदर्शी जाणिवेनें आम्हांला निश्चितीनें जाणतां येत नाहीं, आपलें मरण ही आपल्या बुद्धीची एक कल्पना असते, ठळक असें त्याचें चित्र आम्ही मनांत उभें करूं शकतों, पण, आम्ही केवळ वर्तमान क्षणींचें जीवन अनुभवूं शकत असल्यानें आमच्या भावी मरणाचा अनुभव आम्हांला येऊं शकत नाहीं -- तथापि मरण वा देहाची इतिश्री ही व्हावयाचीच असते, आणि प्रस्तुत देहांत आम्ही कांहीं एका अनिश्चित मुदतीनंतर असूं शकूं ही आमची (आमच्या मनाची) कल्पना भ्रमरूप असते, -- तशी आत्म्याच्या (जाणीवयुक्त अस्तित्वाच्या) नित्यतेची, अमरत्वाची त्याची कल्पनाहि भ्रमरूप असूं शकेल. चौथी शक्यता : विश्व हें नित्य आहे, किंवा विश्वातीत असें कांहीं तत्त्व नित्य आहे -- अर्थात् आम्हांहून इतर कांहींतरी जाणीवयुक्त किंवा जाणीवशून्य असें नित्य टिकणारें आहे ही जाणीव आम्हांला, आमच्या मनाला होते आणि तें मन ही नित्यता स्वत:कडे, स्वत:च्या आत्म्याकडे अकारण ओढून घेते -- आणि वस्तुत: हा आमचा आत्मा, हें आमचें जाणीवयुक्त अस्तित्व, त्या खऱ्या नित्यवस्तूचें अनित्य असें रूप आहे, अनित्य असा विकार आहे.

      आमचें पृष्ठवर्ती मन हे प्रश्न स्वत:च्या बळावर सोडवूं शकत नाहीं. या प्रश्नांवर तें अनंत विचार उभे करूं शकतें. कमी अधिक युक्तिसंगत अशीं मतेंहि तें या प्रश्नासंबंधानें बनवूं शकतें. पण आत्म्याचें अमरत्व काय, किंवा मर्त्यत्व काय दोन्ही बाबतींत आम्ही केवळ श्रद्धेला शरण जातों; दोन्ही केवळ विश्वासाच्या बाबी आहेत. जडवादी हें सिद्ध करूं शकत नाहीं कीं, आमची जाणीव देह मरतांक्षणीं नाहींशी होते; अद्यापि असाहि खात्री करणारा पुरावा नाहीं कीं, आमचें शरीर पडल्यानंतर आमच्यांतील जाणीवयुक्त कांहींतरी अस्तित्वांत राहतें -- एवढेंच जडवादी म्हणूं शकेल. पण उलट पक्षीं, शरीर पडल्यानंतर असें कांहीं

पान क्र. ३६८

 

तरी अस्तित्वांत राहत नाहीं असाहि पुरावा नाहीं, आणि असूं शकत नाहीं. शरीर पडल्यानंतर मनुष्य-व्यक्ति अस्तित्वांत असते ही गोष्ट शंकेखोराला पुढें पटवून दिली जाईल, हें शक्य आहे; पण त्यावरून एवढेंच सिद्ध होईल कीं, शरीराहून आंतील जाणीवयुक्त व्यक्ति अधिक टिकणारी आहे; ती नित्य टिकणारी आहे, असें कांहीं त्यावरून सिद्ध होणार नाहीं.

      मनाची नित्यताविषयक जी कल्पना आहे तिची तपासणी केल्यास असें दिसतें कीं, काल नित्य आहे व नित्यकालांत अस्तित्वाच्या क्षणांचा क्रम अखंड असतो, अशी ती कल्पना आहे. जाणीवयुक्त अस्तित्व (आत्मा) एक क्षण, दुसरा क्षण, तिसरा क्षण असें अखंडपणें, क्षणांनीं बनणाऱ्या नित्यकालांत टिकणारें आहे -- अशी ती कल्पना मांडतां येते. यांत आत्म्याची नित्यता सांगितली नसून, काळाची नित्यता सांगितली आहे. नित्यकालाच्या घटकभूत क्रमशील क्षणाक्षणांत आत्मा अखंडपणें असतो असें तें आत्म्यासंबंधींचें विधान आहे. आतां मनाची तपासणी केल्यास असा मानसिक पुरावा मुळींच सांपडत नाहीं कीं, ज्यावरून ''नित्य-काल'' अशी वस्तु अस्तित्वांत आहे असें म्हणतां येईल, आत्मा  (जाणीवयुक्त अस्तित्व) एखाद्या अखंडित अस्तित्वक्रमाकडे ज्या रीतीनें बघतो ती रीति म्हणजे काल, असें या संबंधींच्या मानसिक पुराव्यावरून म्हणतां येतें. अखंड प्रवाहाप्रमाणें असणाऱ्या अस्तित्वाच्या नित्यतेकडे बघण्याची आत्म्याची रीति म्हणजे (नित्य) काल असेंहि म्हणतां येईल. अनुभवाची क्रमिकता, क्रमवारी आणि समकालीनता (एककालिकता) या आपल्या कल्पनांनीं आत्मा हा अस्तित्वाचा अखंड प्रवाह मापीत, मोजीत असतो : अस्तित्वाचा अखंड प्रवाह, क्रमिक किंवा अक्रमिक (एककालिक) अनुभव म्हणूनच आत्म्याच्या प्रतीतीस येऊं शकतो. तेव्हां अखंड प्रवाही नित्य अस्तित्वाकडे बघण्याची आत्म्याची रीति म्हणजे नित्यकाळ असें म्हणतां येईल. मन जो पुरावा देऊं शकतें त्यावरून, ''नित्य-काल'' अशी स्वतंत्र वस्तु अस्तित्वांत आहे असें म्हणतां येत नाहीं, तर नित्य अस्तित्वाकडे बघण्याची आत्म्याची रीति म्हणजे नित्यकाल असा निष्कर्ष निघतो. नित्य अस्तित्व म्हणून कांही असेल आणि हें अस्तित्व जाणीवयुक्त अस्तित्व अर्थात् सचेतन पुरुषाच्या स्वरूपाचें असेल, तर हें अस्तित्व, हा पुरुष, हा आत्मा कालातीत असला पाहिजे, काल त्याच्या पोटांत असला पाहिजे; वेदांन्तांत नित्य आत्मा म्हटला आहे तो हाच.

पान क्र. ३६९

 

हा आत्मा आपल्या स्वत:च्या प्रकट केलेल्या स्वरूपाकडे बघतांना जी वैचारिक दृष्टि वापरतो ती दृष्टि म्हणजे काल होय अशी कल्पना आपल्याला करतां येते. या नित्य आत्म्याचें कालातीत असें जें स्वत:संबंधीचें ज्ञान, तें मनाच्या पलीकडे असतें. तें ज्ञान अतिमानसिक असतें; आमच्या मानसिक जाणिवेच्या पलीकडे तें आहे; आमच्या जागत्या मनाची कालांकित हालचाल शांत केली किंवा ती हालचाल मागें टाकून आम्ही पुढें गेलों, खोल असलेल्या नीरवतेंत, नि:शब्द अवस्थेंत प्रवेश मिळविला, किंवा या अवस्थेंतून पुढें जाऊन नित्यतेची जाणीव आत्मसात केली -- तरच तें अतिमानसिक ज्ञान, आत्म्याचें कालातीत आत्मज्ञान आम्हांला मिळूं शकतें.

      या सर्व विवेचनाचें सार हें आहे कीं, मन स्वभावत:च अज्ञानरूप आहे; अज्ञान म्हणजे परिपूर्ण नेणीव नव्हे; अज्ञान म्हणजे अस्तित्वाचें मर्यादित व सोपाधिक ज्ञान; वर्तमानाचें प्रत्यक्षज्ञान, भूतकालाचें स्मृतिज्ञान, भविष्याचें आनुमानिक ज्ञान असें या ''अज्ञान'' रूप ज्ञानाचें स्वरूप आहे. अर्थात् स्वत:चें आणि स्वत:च्या अनुभवांचें मनाला होणारें ज्ञान वा दर्शन हें कालांकित, क्रमांकित असतें; मनाचें बघणें आणि जाणणें काल आणि क्रम या उपाधींच्या अंकित असें असतें -- मग हें बघणें-जाणणें, दर्शन-ज्ञान आत्मविषयक असो वा अनुभवविषयक असो. खरें अस्तित्व कालांकित नित्यतेचें असेल, तर मनाला या खऱ्या अस्तित्वाचें ज्ञान नसतें असें म्हणावें लागतें; कारण त्याचें स्वत:चें भूतकालीन अस्तित्व देखील स्मृतीच्या संग्रहांत असेल तेवढेंच त्याला ज्ञात असतें; स्मृतीच्या सांठ्यांतून गळून गेलेलें त्याचें अस्तित्व त्याला नसल्यासारखेंच असतें, तें विस्मृतीच्या अंधारांत पडून असतें; त्याचें भविष्यकालीन अस्तित्व त्याच्या पकडीच्या बाहेर असतें; गाढ अज्ञानाची भिंत त्याला तें अस्तित्व दिसू देत नाही; त्याचें वर्तमान अस्तित्व मात्र त्याला स्पष्टपणें ज्ञात असतें -- पण हें अस्तित्व क्षणाक्षणास बदलणारें असतें; नांवें, रूपें, घटना या एकामागून एक असहायतेनें येत जात असतात; त्याचें नियंत्रण ज्यावर चालत नाहीं, त्याला जें नीट उमगतहि नाहीं असें महान् विश्वव्यापी आंदोलन, वस्तूंचें व घटनांचें आवागमन, त्याच्यासमोर चालूं असतें -- या अनाकलनीय गतिमान् विश्व-संसाराचें दृश्य, स्पृश्य त्याच्या अस्तित्वांत सारखा बदल करीत असतें. खरें अस्तित्व कालांकित नित्यतेचें नसून, कालातीत नित्यतेचें असेल, तर मनाला या अस्तित्वाचें ज्ञान हें दुसऱ्या अस्तित्वाच्या

पान क्र. ३७०

 

ज्ञानापेक्षां पुष्कळच कमी असतें हें उघड आहे; कारण, कालातीत अस्तित्व, कालस्थलांकित असें जें आपल्या स्वरूपाचें आविष्करण करतें, त्या आविष्करणाचा या क्षणीं थोडा, त्या क्षणीं थोडा असा तुटक तुटक अनुभव घेऊन, कालातीताचें काय थोडेंसें ज्ञान मन मिळवूं शकेल, तेवढेंच त्याचें तत्संबंधीं ज्ञान असूं शकतें.

      तेव्हां मन हें आमचें सर्व अस्तित्व असेल, किंवा आमचें दर्शनी मन हें आमच्या अस्तित्वाच्या स्वरूपाचें निदर्शक असेल, तर आम्ही अज्ञानरूप असूं -- कालाच्या क्षेत्रांत इकडून तिकडे उड्या मारणारें आणि मधून मधून ज्ञानाचे लहान लहान तुकडे मिळविणारें असें अज्ञान हेंच आमचें स्वरूप असेल -- यापेक्षां अधिक आमचें अस्तित्व असणार नाहीं. पण मनाच्या पलीकडे तत्त्वरूपानें कालातीत असणारी अशी आत्मज्ञानाची शक्ति असेल आणि काल तिच्या नजरेखालीं असेल, भूत वर्तमान भविष्य हें तिला एकदम सर्वसंबंधांसहित दिसत असेल, तिच्या कालातीत स्वरूपाची एक स्वनिर्मित उपाधि हें कालाचें स्वरूप असेल, तर ज्ञान आणि अज्ञान (वेदान्तांतील विद्या आणि अविद्या) या दोन जाणिवेच्या शक्ती आमच्या अस्तित्वाचे ठिकाणीं असतील; या दोन शक्ती भिन्न आणि एकमेकांपासून वेगळ्या असतील, त्यांचा उगम वेगळा वेगळा, त्यांचे कार्यहि वेगळें वेगळें, दोन्ही शक्ती स्वतंत्र, स्वयंभू आणि त्यांच्यामध्यें कायमचें द्वैत असें असेल किंवा या दोन शक्ती वेगळ्या वेगळ्या नसतील, त्या जर वेगळ्या नसल्या, त्यांच्यामध्यें अन्योन्यसंबंध असला, तर तो असा असेल : ज्ञान हें जें जाणिवेचें स्वरूप तें आपला कालातीत आत्मा जाणत असेल आणि स्वतःच्या अंतरंगांत त्याला काळ हा स्वतःची एक दृष्टि म्हणून दिसत असेल आणि अज्ञान हें जें जाणिवेचें दुसरें स्वरूप, तें पहिल्या स्वरूपाची ज्ञानाची पृष्ठवर्ती एकांगी क्रिया असेल -- हें अज्ञान कालाच्या पोटीं स्वतःचें अस्तित्व बघत असेल; आपलें अस्तित्व कालांकित व कालाच्छादित आहे ही अर्थातच अज्ञानाची स्वतःची कल्पना असणार; या कल्पनेचा पडदा या अज्ञानाला त्याच्या मूल स्वरूपापासून, ज्ञानापासून दूर ठेवील; हा पडदा अज्ञान दूर करील तेव्हां तें आपलें मूळ स्वरूप जें नित्य कालातीत आत्मज्ञान तें प्राप्त करून घेईल.

      मूळ पुरुषाचें अतिमानसिक ज्ञान हें काल, स्थल, कारणभाव व त्यांचीं कार्यें जाणण्यास असमर्थ होण्याइतकें अलिप्तपणानें अस्तित्वांत असेल, अशी कल्पना करणें निर्बुद्धणाचें वाटतें. कारण असें त्याचें असणें

पान क्र. ३७१

 

म्हणजे अज्ञानाची दुसरी आवृत्तीच म्हणावी लागेल. सर्वनिरपेक्ष, सर्वातीत, कालातीत, केवल पुरुष आंधळा आणि इकडे कालांकित कालांतर्वर्ती पुरुषहि आंधळा : जाणीवयुक्त अस्तित्वाचीं हीं दोन ध्रुव टोकें मानावीं लागतील. जाणीवयुक्त अस्तित्व अर्थात् आत्मा, आपलें एकंदर स्वरूप जाणूं शकत नाहीं; एक तर त्याला स्वतःचें अस्तित्व (स्वत्व) मात्र दिसतें, स्वतःचीं कार्यें दिसत नाहींत; किंवा त्याला स्वतःचीं कार्यें मात्र दिसतात, स्वतःचें अस्तित्व (स्वत्व) दिसत नाही, अशी आपत्ति मूळ पुरुषाच्या ''अलिप्तपणाच्या'' कल्पनेनें उत्पन्न होते. कालांकित पुरुष कालातीत पुरुषाला जाणत नाहीं म्हणून अज्ञानी, आणि कालातीत पुरुष कालांकिताला जाणत नाहीं म्हणून अज्ञानी, अशी ही आपत्ति उभी करणारी विचारसरणी निर्बुद्धपणाची वाटते. तेव्हां, ही विचारसरणी टाकून प्राचीन वेदान्ताचा विशाल दृष्टिकोन आम्हीं घ्यावा हें योग्य आहे : दोन पुरुष एका ठिकाणी बांधलेले असें आमचें स्वरूप आहे, ही कल्पना आम्हीं टाकून दिली पाहिजे. एकच पुरुष, जाणीवयुक्त अस्तित्व, आम्ही आहोंत. आमची जाणीव मात्र दोन अवस्थांतून जाणारी (असणारी) आहे. एक अवस्था आमच्या मनाच्या ठिकाणची, अल्पज्ञ; आणि दुसरी अवस्था अतिमानसिक; एका अवस्थेंत ज्ञान कालाच्या पोटीं राहणारें असतें, कालगत उपाधींत काम करतें, आणि याकरितां आपलें स्वत:संबंधींचें ज्ञान मागें ठेवतें; दुसऱ्या अवस्थेंत ज्ञान कालातीत असतें, सर्वसमर्थपणें आणि पूर्ण ज्ञानाच्या आधारावर स्वतःकरितां स्वत: योजलेली कालस्थिति (कालगत उपाधि) निर्माण करतें; एका अवस्थेंतील जाणीव, तिचा कालगत अनुभव वाढेल त्या प्रमाणांतच स्वतःचें स्वत्व ओळखते; दुसऱ्या अवस्थेंतील जाणीव, आपलें कालातीत स्वत्व जाणते आणि ज्ञानपुरःसर आपलें स्वत्व व्यक्त करते : कालगत अनुभव हें तिचें व्यक्त स्वरूप होय.

      ब्रह्म विद्या आहे, ब्रह्म अविद्याहि आहे : विद्या (ब्रह्म) आणि अविद्या  (ब्रह्म) एकाच वेळीं जाणणें हा अमरत्वाचा मार्ग आहे, असें जें उपनिषदांत म्हटलें आहे त्याचा अर्थ आतां आपणांस स्पष्ट होतो. कालातीत स्थलातीत, निरुपाधिक आत्म्याच्या जाणिवेची स्वाभाविक शक्ति म्हणजे ज्ञान किंवा विद्या. विद्या हेंच खरें पूर्ण ज्ञान होय : तें नित्य सर्वातीत असून, केवळ स्वतःचें स्वत्व जाणतें असें नाहीं, तर विश्वांतील नित्य, क्रमिक, कालांकित घटना स्वतःच्या ठिकाणीं धारण करतें, त्या व्यक्त

पान क्र. ३७२

 

करतें, त्यांचा आरंभ करून देतें, त्यांचें स्वरूप निश्चित करतें आणि त्या सर्वप्रकारें ओळखतें. अज्ञान किंवा अविद्या अस्तित्वाच्या एकतेचें ज्ञान मागें टाकतें; काळाच्या एका क्षणांत, नंतर दुसऱ्या क्षणांत, नंतर तिसऱ्या, चवथ्या असें क्रमवारीनें, कालाच्या क्रमबद्ध क्षणाक्षणांत अस्तित्व राहत जातें अशी अविद्येची जाणीव असते; क्षणवर्ती अस्तित्वामुळें अविद्येचें ज्ञान तुकड्यातुकड्यांचें असतें, स्थलाच्या तुकड्यातुकड्यांत आणि अनेक संबंधांत अस्तित्वाचें राहणें होत असल्यामुळें, आत्मा विभक्त, विभागयुक्त आहे (अनेक आत्मे आहेत) अशी अविद्येची आत्मविषयक कल्पना असते; एकच अस्तित्व ज्या अनेक क्रिया करतें, त्या क्रियांच्या अनेकतेंत अविद्या स्वतःला कोंडून घेऊन कैदी बनते. एकतेचें ज्ञान मागें टाकल्याने अविद्येला स्वतःच्या स्वत्वाचें खरें पूर्ण ज्ञान असत नाहीं, असूं शकत नाहीं आणि विश्वाचेंहि खरें पूर्ण ज्ञान असूं शकत नाहीं; सर्वातीत एकतत्त्वाचें तसेंच विश्वतत्त्वाचें खरें पूर्ण ज्ञान अविद्येला असूं शकत नाहीं. आत्मा अविद्येच्या अंकित असतां, एका क्षणांतून दुसऱ्या क्षणांत, एका स्थलांतून दुसऱ्या स्थलांत, एका संबंधांतून दुसऱ्या संबंधांत असा वाट चालत असतो, त्याचें ज्ञान त्रुटित असल्यानें तो चुका करीत, चांचपडत अडखळत वाट चालत असतो. (अविद्यायाम् अन्तरे वर्तमाना... जंघन्यमाना: परियन्ति मूढा: अन्धेनैव नीयमाना यथान्धा: -- मुण्डक उप० १-२-८. अविद्येच्या क्षेत्रांत ते वसति करतात आणि वावरतात, म्हणून ते अडखळत, ठेंचाळत एकाच बिन्दूभोंवतीं फेऱ्या घालीत राहतात; ते भ्रमांत भ्रमण करीत राहतात; आंधळ्या वाटाड्यामागें आंधळ्यांनीं जावें त्याप्रमाणें ते अविद्येच्या क्षेत्रांत मार्ग क्रमीत असतात.) अविद्या म्हणजे ज्ञानाचा कांहीं पूर्ण अभाव नव्हे, सत्याचें दर्शन आणि अनुभव अविद्येंत असतो, पण हें दर्शन, हा अनुभव अंशत: खरा, अंशत: खोटा असा असतो; वस्तुजाताचें तत्त्व दुलक्षिणारें, नकारात्मक पसाऱ्याचा इथला एक भाग, तिथला एक भाग उडत उडत पाहणारें असें जें ज्ञान, तें असेंच कांहीं खरें व कांहीं खोटें असणार. ही अविद्येची गोष्ट झाली. केवळ विशेषशून्य एकरस एकतत्त्वाची जाणीव व त्या एकतत्त्वाच्या (ब्रह्माच्या) व्यक्त स्वरूपाचें अज्ञान अशी ज्ञान-अज्ञानाची जोड जिच्यांत आहे, ती विद्या अविद्येप्रमाणें अंधतमच आहे असें उपनिषदांत (ईशावास्य उप०) वर्णन आहे. वस्तुत: विद्या किंवा अविद्या दोन्हींहिं तम किवा अंधकार या कल्पनेने यथार्थ वर्णितां येणार नाहींत. वस्तुत: विद्या हा डोळे दिपविणारा

पान क्र. ३७३

 

केंन्द्रित प्रकाश आहे. डोळे दिपले म्हणजे नीट दिसत नाहीं, म्हणून या प्रकाशाला तमाची उपमा देतां येईल. वस्तूंचे आकार असतील तसे न दाखवितां, अविद्या त्यांना फसवीं रूपें देते, अंधुक विखुरलेला, मध्यें मध्यें तुटलेला प्रकाश असावा, दाट धुकें नव्हे, पण अर्धवट धुकें, दृष्टीला थोडासा वाव देणारें धुकें असावें तशी अविद्या आहे. तेव्हां अविद्या असो, विद्या असो, ईश्वरी दिव्य जाणीव ही विद्येंत बंद झालेली नाहीं; अविद्येंत बंद झालेली नाहीं : परिवर्तनीय अनेक वस्तू (अविद्येचा विषय) आणि अपरिवर्तनीय एकतत्त्व (विद्येचा विषय) दोन्ही गोष्टी ईश्वरी दिव्य जाणिवेंत एकत्र विद्यमान असतात. ही जाणीव म्हणजे एकसंघ शाश्वत ज्ञान, आत्मज्ञान; सर्व वस्तूंना विविध संबंधांनी जोडणारें, सर्व वस्तूंना एकत्रतेनें जखडणारें असें शाश्वत एकसंध एकरस आत्मज्ञान म्हणजे ईश्वरी दिव्य जाणीव होय. या जाणिवेंत एकमेव अक्षर वस्तु आणि अनेक क्षर वस्तू एकत्र विद्यमान असतात.

      स्मृति ही भेदनिष्ठ जाणिवेची, मनाची कुबडी आहे. या कुबडीच्या आधारानें मन अडखळत आपला मार्ग क्रमीत असतें; कालाचा प्रवाह जोरानें वाहत असतो, आणि या प्रवाहांत थांबण्याचा, विसांवा घेण्याचा, कांहींहि अवकाश मनाला मिळत नाहीं -- तें या प्रवाहांत असहायपणें स्मृतीच्या (कुबडीच्या) आधाराने अडखळत अडखळत चालत असतें, कालाच्या प्रवाहानें ओढलें जात असतें. स्वतःचें (आत्म्याचें) प्रत्यक्ष पूर्ण नित्यज्ञान आणि वस्तुजाताचें प्रत्यक्ष पूर्ण ज्ञान मनाला होत नाहीं -- या ज्ञानाऐवजीं त्याला स्मृति मिळालेली असते -- मनाच्या दरबारांत दरिद्री स्मृति ही प्रत्यक्ष पूर्ण ज्ञानाचें स्थान घेत असते. स्वतःच्या वर्तमान अस्तित्वाच्या क्षणीं मात्र स्वतःचें प्रत्यक्ष ज्ञान मनाला असतें, होतें; तसेंच वर्तमान क्षणीं आणि निकट स्थलीं इंद्रियें ज्या वस्तूंचें ग्रहण करतात, त्या वस्तू मनापुढें ज्ञानविषय म्हणून येतात आणि या वस्तूंचें अर्धवट प्रत्यक्ष ज्ञान मनाला होतें. त्याच्या ज्ञानांत याप्रमाणें मोठी उणीव राहते, ती उणीव भरून काढण्यासाठीं, स्मृति, कल्पना, विचार, अनेक प्रकारचीं काल्पनिक प्रतीकें यांचा मन उपयोग करतें. त्याला इंद्रियें हीं साधनें वर्तमान क्षणींच्या आणि निकट जागींच्या वस्तूंच्या देखाव्याचें अर्धवट अप्रत्यक्ष ग्रहण करण्यास उपयोगी पडतात, आणि स्मृति, कल्पना, विचार या साधनांनीं वर्तमान क्षणाच्या बाहेरचे, निकट जागेच्या बाहेरचे देखावे मन स्वतःसमोर चित्ररूपानें अधिक अप्रत्यक्षपणें उभें करतें. अगदीं

पान क्र. ३७४

 

खरेंखुरें प्रत्यक्ष ज्ञान जें मनाला होतें, तें वर्तमान क्षणींच्या स्वतःच्या अस्तित्वाचें. येथें साधनाची आवश्यकता नसते. वर्तमान क्षणींचा प्रत्यक्ष आत्म-प्रत्यय जो मनाला होतो, त्या प्रत्ययाच्या द्वारां नित्य सद्‌वस्तूच्या अस्तित्वाचा अनुभव मनाला येऊं शकतो, मनाच्या पाठीमागें ही सद्‌वस्तु कायम उपस्थित असते आणि तिचें प्रत्यक्ष दर्शन आपल्या स्वतःच्या दर्शकाबरोबर घडूं शकतें. या सद्‌वस्तूखेरीज बाकी सर्व वस्तू अनित्य रूपसत्तेच्या वर्गांत घालण्यास मन प्रवृत्त होतें; एवढेंच नव्हे तर या वस्तू भ्रमरूप आहेंत, अज्ञानकार्य आहेत, दृष्टिप्रमादजन्य आहेत असाहि निष्कर्ष मन काढूं शकतें, काढतें; सद्‌वस्तूप्रमाणें प्रत्यक्ष ज्ञानानें यांचें सत्यत्व मनाला प्रतीत होत नाहीं म्हणून मन याप्रकारें आपला निर्णय देतें. हा मायावादी निर्णय बुद्धाच्या पंथांतील तत्त्वज्ञ मूळ सद्‌वस्तूलाहि लावतात; मूळ सद्‌वस्तु नाहीं, तो एक भ्रम आहे; मनाची कल्पना आहे, अस्तित्वाची खोटी संवेदना आहे, खोटी कल्पना आहे असें ते मानतात; मनाची ही कहाणी हेंच सांगते कीं, मनाला स्वतःला स्वत:संबंधानें असें वाटत असतें कीं, मी एक विचित्र जादुगार आहे; तें स्वत: आणि त्याचीं कार्यें एकाच वेळी अस्तित्वांत आहेत असें म्हणतां येतें, अस्तित्वांत नाहींत असेंहि म्हणतां येतें, तें (आणि त्याचीं कार्यें) नित्य टिकणारी सत्य वस्तु आहे असेंहि म्हणतां येतें किंवा त्याचें (आणि त्याच्या कार्यांचें) अस्तित्त्व एक क्षणिक भ्रम आहे असेंहि म्हणतां येतें; आपल्या अस्तित्वाचें, आपल्या कार्यांचें स्पष्टीकरण मन देतें किंवा देत नाहीं, पण एक गोष्ट तें निश्चितपणें ठरवितें कीं, स्वतःचा आणि स्वतःच्या कृतींचा पसारा सर्व मोडून, खलास करून टाकावयाचा आणि कालातीत नित्य ब्रह्माच्या किंवा शून्याच्या नित्य शांतींत स्वत:ला विलीन करून त्या शांतीचा भोग घ्यावयाचा -- व्यर्थ, अर्थशून्य असा स्वतःचा आणि वस्तुप्रदर्शनाचा देखावा सोडून अलग होऊन, ब्रह्मनिर्वाणाचा किंवा शून्य निर्वाणाचा आश्रय घ्यावयाचा.

      पण आंतील आणि बाहेरील, वर्तमान आणि भूत हे जे आत्म-जाणिवेचे भेद आहेत, ते मुळांत नसून मनाच्या क्षणिक कार्याचा, मर्यादाबद्ध कार्याचा एक भाग आहेत; मनाच्या पाठीमागें सुस्थिर अशी जाणीव आहे, या जाणिवेची बाह्य पृष्ठवर्ती क्रिया मन हें आहे; या सुस्थिर जाणिवेंत वर्तमानकालीन जाणीव आणि भूत वा भविष्यकालीन जाणीव असें वैचारिक बंधनकारक विभक्तपण नाही. ही सुस्थिर जाणीव आपलें

पान क्र. ३७५

 

कालगत रूप ओळखते, वर्तमान भूत भविष्य हे कालाचे भाग व त्यांत खंडित भासणारें आपलें अस्तित्व ओळखते, पण त्याबरोबर स्वत:च्या अखंडपणाची ओळखहि तिला असते; ही अखंड जाणीव कालांकित आत्म्याचे (जाणिवेचे) चलनप्रधान परिवर्तनशील सर्व अनुभव आपल्या पोटांत सामावून घेते; अक्षर, अपरिवर्तनशील, कालातीत आत्मा हा या कालांकित आत्मगत अनुभवांचा आधार असतो -- सुस्थिर आत्मा (आत्मजाणीव) अस्थिर अनुभवांचा पाया असतो. मनाच्या क्रिया आणि मन यांजकडे पाठ फिरवून आम्हीं आंत गेलों, किंवा मनाची हालचाल शांत झाली म्हणजे आम्हांला या सर्वसमावेशक क्रियासंग्राहक सुस्थिर जाणिवेची भेट होते, तिचें ज्ञान होतें, तिची ओळख पटते. पण अगोदर, मन शांत झाल्यावर किंवा मन टाकून आम्ही आंत गेल्यावर आम्हांला निश्चल जाणिवेची प्रतीति येते. निश्चल आणि चंचल अशा दोन जाणिवा नाहींत. एकच जाणीव निश्चल आणि चंचल अशी आहे. पण मन शांत झाल्यावर अगोदर जाणिवेच्या निश्चल अवस्थेची प्रतीति आम्हांला होते आणि या अवस्थेवर आम्हीं आपलें लक्ष केन्द्रित केलें, तर ही निश्चल जाणीव, हा निश्चल आत्मा केवळ कालातीतच नाहीं, तर क्रियातीत, क्रियाशून्य आहे -- विचार, कल्पना, स्मृति, इच्छा, इत्यादि आंदोलन त्याचे ठिकाणीं नाही, तो स्वयंपूर्ण आहे, स्वत:चे ठिकाणीं मग्न आहे, विश्वासंबंधीं कसलीहि क्रिया तेथें नाहीं असा अनुभव आम्हांला येतो. या अनुभवामुळें हा निश्चल आत्माच काय तो सत्य आहे आणि बाकी रूपसंभार हा खोट्या प्रतीकांचा पसारा आहे, या पसाऱ्यांत सत्यत्व नाहीं, केवळ स्वप्नाप्रमाणें हा पसारा खोटा आहे असें आम्हांला वाटतें. पण याप्रमाणें निश्चल आत्म्यांत मग्न असणें ही एक आमच्या जाणिवेची क्रिया आहे -- चंचल विचार, स्मृति, संकल्प यांत आत्मा पांगविणें ही जशी एक आमच्या जाणिवेची क्रिया, तशीच आत्मकेन्द्रित निश्चल अवस्था हीहि एक जाणिवेची क्रिया असते. खरा आत्मा हा असा नित्य पुरुष आहे कीं, कालगत चंचलता आणि कालाधार निश्चलता दोन्हीहि अवस्था त्याला घेतां येतात, एकाच वेळीं तो या दोन अवस्थांत असूं शकतो. या दोन अवस्था आमच्या समोर आहेत हाच, खऱ्या आत्म्याची खरी स्थिति द्विरूप असल्याचा पुरावा आहे. एक अवस्था नसते देखावे उत्पन्न करते व एक स्वरूपस्थ असते असें मानलें तरी दोन समकालिक रूपांचा, अवस्थांचा असा एकमेव नित्य पुरुष हाच

पान क्र. ३७६

 

खरा आत्मा आहे हें मान्य करावें लागतें -- हा खरा आत्मा, परमात्मा, परब्रह्म, परपुरुष या नांवांनीं गीतेंत वर्णिलेला आहे. निश्चल पुरुष हा सर्व अस्तित्वाचा, विश्वाचा आत्मा आणि चंचल पुरुष हा या अस्तित्वाचा, विश्वाचा महेश्वर आणि दोन्ही पुरुष ज्याचे अंगभूत तो परपुरुष, परब्रह्म, परमात्मा अशी गीतेची मांडणी आहे.

      कालाच्या ओघांत मनाची जी आत्म-जाणीव आम्ही अनुभवतो, (आणि मनाची ही कालांकित आत्म-जाणीव आमच्यापुढील आद्य दृश्य आहे) त्या आत्मजाणिवेच्या संबंधांत मन आणि स्मृति यांच्या स्वरूपाचा आणि कार्याचा आम्हीं जो विचार केला, त्या विचारानें आम्हांला गीतेच्या परब्रह्मापर्यंत पोंचविलें आहे. मनाला आत्मजाणीव असते तशी इतर-विषयक जाणीवहि असते. मनाचा इतर-विषयक अनुभव तो त्याच्या आत्मविषयक अनुभवाबरोबर लक्षांत घेऊन जर आम्ही मन आणि स्मृति यांची तपासणी केली, तर वरीलसारखाच त्या तपासणीचा शेवट होतो -- पण अज्ञानाच्या स्वरूपावर या तपासणीनें अधिक प्रकाश पडतो; या तपासणीचें फळ म्हणून पुष्कळ अधिक गोष्टी आम्हांला कळतात; असो. आतांपर्यंत जें आम्हांला कळलें, दिसलें तें थोडक्यांत मांडूं; एक नित्य पुरुष आहे, मनाचें अस्थिर कार्य या पुरुषाच्या प्रेरणेनें चालतें, सुस्थिर आत्मजाणिवेच्या पायावर मनाचें कार्य उभें असतें, नित्य पुरुषाकडून उभें केलें जातें; या निश्चल आत्मजाणिवेचा कालाशीं संबंध नसतो, कालाच्या क्रियेचा या निश्चल आत्मजाणिवेवर कांहीं परिणाम होत नाहीं; मनाच्या ज्ञानाहून नित्य पुरुषाचें ज्ञान अर्थात् खूपच श्रेष्ठ असतें; या श्रेष्ठ ज्ञानानें तो कालगत सर्व हालचाली आपल्या कर्तृत्वानें चालवितो; असें करीत असतांच मनाच्या व्यापारानें तो कालाच्या पोटांत वस्ती करतो. म्हणजे काल त्या नित्य पुरुषाच्या पोटांत आहे आणि तरीहि कालाच्या पोटांत नित्यपुरुष आहे. कालाच्या पोटांतील नित्यपुरुषाची कहाणी अशी आहे : क्षणिक आणि अनिश्चित वस्तू असें त्याचें स्वरूप असतें, आणि क्षणिक आणि अनिश्चित अशा वस्तू तो आपल्या स्वाधीन करून घेऊं पाहत असतो, पण या वस्तू त्याच्या हातीं कांहीं टिकत नाहींत. पृष्ठवर्ती बाह्य मानसिक पुरुष असें त्याचें कालोदरांतील सोंग असतें; हा मनोमय पुरुष क्षणाक्षणाचा प्रवासी असतो, त्याला त्याचा स्वत:चा मूळ आत्मा, नित्य पुरुष, दिसत नाहीं; कालचक्रांतील अनुभव मात्र त्याला दिसतात आणि त्या अनुभवांशीं त्याचें जें

पान क्र. ३७७

 

नातें असतें, होतें तें तो जाणतो; कालचक्रांत ज्या गोष्टी भविष्यकाळीं घडावयाच्या असतात, त्या या मनोमय पुरुषाला अज्ञात राहतात, या गोष्टी अज्ञान आणि अभाव यांच्या वस्तुशून्य भांडारांत जणु भरलेल्या असतात -- पण वस्तुत: हें भविष्य-भांडार पूर्णतया वास्तव गोष्टींनीं भरलेलें असतें -- मात्र मनोमय पुरुषाला हें भांडार अनुभूत होणें शक्य नसतें; या मनोमय पुरुषाला वर्तमान क्षणांतील अनुभव, स्वतःच्या आणि वस्तूंच्या अस्तित्वाचा अनुभव प्रत्यक्षपणें घेतां येतो; स्वतःच्या अस्तित्वाचा पूर्ण प्रत्यक्ष आणि वस्तूंचा अर्धवट प्रत्यक्ष अनुभव त्याला मिळतो; हा अनुभव, हें ज्ञान तो भूतकालांत जमा करतो, हा भूतकाल भविष्यासारखा अज्ञान आणि अभाव यांचें भांडार बनतो; मात्र भविष्यांत अनुमानाशिवाय प्रकाश मुळींच नसतो, भूतकालांत स्मृतीचा प्रकाश अर्धवट काम करीत असतो, त्यांत जमा केला गेलेला वर्तमानकाळ स्मृति अंशत: जिवंत ठेवते -- याप्रमाणें कालाच्या पोटांत वस्ती करणारा नित्य पुरुष स्वत: क्षणजीवि अनिश्चित वस्तूंचें रूप घेतो आणि क्षणिक अनिश्चित वस्तूंचा संग्रह करूं पाहतो -- पण या वस्तू त्याच्या संग्रहांत कांहीं टिकत नाहींत. पण हें कालोदरांतील रूप नित्य पुरुषानें घेतलेलें सोंग असतें; वस्तुत: त्याचें नित्यपुरुषत्व कांहीं तो गमावीत नाहीं, तो नित्याचा स्थिर आणि आत्मतंत्र असतो, त्याची जाणीव अतिमानसिक असते, तो ज्या वस्तुजाताचा ताबा घेऊं पाहत असतो, तो वस्तुसंभारहि क्षणिक नसून, त्याच्या सारखाच नित्याचा स्थिर असतो, कारण हा वस्तुसंभार तो स्वतःच बनतो. कालाच्या पोटांत क्रमवारीनें घडणाऱ्या घटना हें स्वरूप तो घेतो आणि मनाच्या द्वारां या क्रमशील घटनांचा तो अनुभव घेत असतो - त्याच्या अतिमानसिक जाणिवेला जें एका दृष्टिक्षेपांत दिसतें, तें मानसिक दृष्टीनें तो क्रमबद्ध स्वरूपांत पाहत असतो, पण तो पाहत असतो स्वतःलाच.

      जाणीवयुक्त अस्तित्वाला अनुभव आणि कार्य या मूल्यांचें रूप देऊन हीं मूल्यें सांठवून ठेवणारी पेढी म्हणजे काल होय. पृष्ठवर्ती मनोमय पुरुष या पेढींतून भूत (आणि भविष्य) घटना घेऊन त्यांचें वर्तमान घटनांत रूपान्तर करण्याचें कार्य सारखें करीत असतो; हा पुरुष त्यानें मिळविलेलें घटनांचें धन भूतकाल नांवाच्या सांठवणीच्या पेटींत घालतो -- त्याला हें ज्ञान नसतें कीं भूतकालीन सर्वकांहीं आमचे ठिकाणीं सर्वकाल उपस्थित असतें, सांठ्यांतून त्याला जरूर असेल तेवढें

पान क्र. ३७८

 

नाणें आणि ज्ञान या रूपांत तो स्वतःच्या उपयोगांत आणतो आणि मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रियांच्या रूपानें वर्तमानाच्या व्यवहारांत आपल्या जवळचें हें ज्ञान आणि अनुभवाचें नाणें तो व्यापारी दृष्टीनें उपयोगास लावतो; या वर्तमानाच्या व्यवहारांत घातलेल्या धनांतून भविष्यकालचें धन निर्माण होतें असें त्याच्या दृष्टीला दिसतें. ज्याला आम्ही अज्ञान म्हणतो, तें नित्यपुरुषाच्या आत्मज्ञानाचा विशिष्ट उपयोग होय. नित्यपुरुषाचें आत्मज्ञान कालांकित अनुभवाला उपयुक्त व्हावें, कालांकित क्रियेला साधनभूत व्हावें अशा तऱ्हेनें त्या आत्मज्ञानाची जी योजना केली जाते ती अज्ञान होय. या आत्मज्ञानांतून ज्या ज्ञानाचा आम्ही मानसिक अनुभवासाठीं अद्यापि उपयोग केला नाहीं, किंवा ज्याचा असा उपयोग करणे आम्हीं थांबविलें आहे तें ज्ञान म्हणजे आम्हांला (मनोमय पुरुषाला) अज्ञात असें ज्ञान होय -- या अज्ञात ज्ञानांतून (अज्ञातांतून) कालांकित अनुभव, कालांकित क्रिया निघतात -- या बाह्य अज्ञानाच्या पाठीमागें नित्यपुरुषाला सर्व कांहीं ज्ञात असतें, सर्व कांहीं उपयोगासाठी तयार असतें : नित्यपुरुष काल, स्थल, कारणभाव यांच्या निर्बंधांच्या क्षेत्रांत जें कांहीं करावयाचें ठरवील, त्या ठरावानुसार अज्ञानाच्या पडद्यामागील सर्व ज्ञान उपयोगी पडावयाला तयार असतें. आपण असें म्हणूं शकतों कीं, आमचें पृष्ठवर्ती अस्तित्व -- आमचा मनोमय पुरुष हा आमचा खोल खोल असलेला नित्यपुरुषच आहे -- तोच मनोमय पुरुषाच्या रूपानें बाहेर, वरतीं, पृष्ठभागावर कालाच्या क्षेत्रांत साहसी जीवन जगण्याच्या उद्देशानें आला आहे, अनंत शक्यता हें धन घेऊन तो सट्टेबाजी करीत आहे; त्यानें स्वतःला मर्यादा घातली आहे, एका क्षणांतून दुसऱ्या क्षणांत, दुसऱ्यांतून तिसऱ्यात, असें क्षणनिष्ठ (क्षणांतून क्षणांत वाटचाल करणारें) जीवन त्यानें पसंत केलें आहे; साहसाचा आनंद पूर्णपणें भोगतां यावा, क्षणोक्षणीं नवें कांहीं पाहून, भोगून, करून साहसी जीवनाची गंमत पूर्णपणें अनुभवावी हा त्यांतील उद्देश आहे. अर्थात् या साहसासाठीं नित्यपुरुषाला आपलें आत्मज्ञान, आपलें पूर्ण आत्मत्व मागें ठेवावें लागतें, विसरून जावें लागतें. मनोमय पुरुष झाल्यानें त्याला आपलें सर्व कांहीं नष्ट झाल्याचा भास होतो आणि हें सर्व पुन्हां परत मिळविल्याचा साहसी आनंद या मनोमय बनलेल्या नित्यपुरुषाला लाभतो. नित्यपुरुषच मनोमय पुरुष होत असल्यानें, आपलें सर्व स्वत्व आणि सर्वस्व घालविण्याचें व परत मिळविण्याचें नाटक

पान क्र. ३७९

 

तो करीत असतो, असें म्हणणें प्राप्त आहे. या नाटकांत नित्यपुरुषाला नित्य आकांक्षा, शोध, धडपड यांत अनुस्यूत असणारा नित्य बदलणारा आनंद आणि खेद, सुखभोग आणि दुःखभोग अनुभवावयास मिळतो. न बदलणारा नित्य आनंद त्याच्या कालातीत स्वरूपांत असतो; त्याच्या कालव्याप्त स्वरूपांत सुखदुःखांचीं विविध रूपें घेणारा, नित्य बदलणारा आनंद त्याला अनुभवतां येतो घालविलेलें स्वत्व व सर्वस्व परत मिळविण्याच्या कालांकित कार्यक्रमांत नित्यपुरुषाला, विविध सुखदुःखांतून  (आकांक्षेच्या, शोधाच्या, धडपडीच्या सुखदुःखांतून) जावें लागतें; या सुखदुःखांतून मार्ग क्रमून नित्यपुरुष शेवटीं आपलें सर्व स्वत्व व सर्वस्व परत मिळवितो; या कार्यक्रमांत साहसाचें सुख आहे आणि त्याचसाठी नित्यपुरुष पृष्ठवर्ती मनोमय पुरुषाचें रूप घेतो असें आपण म्हणूं शकतों.

पान क्र. ३८०

 

प्रकरण नववें

स्मृति, अहम् आणि आत्मानुभव

 

      हा मनरूपी देव, स्वप्नामध्यें पूर्वीं एकदां अनुभवलेल्या गोष्टींचा पुन:-पुन: अनुभव घेतो, पाहिलेलें, न पाहिलेलें, ऐकलेलें, न ऐकलेलें, अनुभवलेलें, न अनुभवलेलें, अस्तित्वांत असलेलें आणि नसलेलें, सर्व कांहीं पाहतो, सर्व होतो आणि सर्व पाहतो.

- प्रश्न उप० ४.५

     

आपल्या खऱ्या अस्तित्वांत (स्वरूपांत) राहणें हा मोक्ष होय. अहम्‌ची भावना हें पतन आहे, आपल्या सत्य स्वरूपाला सोडून खालीं पडणें आहे.

- महोपनिषद् ५.२

     

अनेक जन्मांतून प्रवास करणारा एकच एक पुरुष आमचीं हृदयें पाहत असतो; तो सागरासारखा आहे, त्या एका सागरांत हालचालींचे सर्व प्रवाह वाहतात, तो या सर्वांचा संग्राहक आहे.

- ऋग्वेद १०-५.१

 

      मनोमय पुरुष प्रत्यक्ष आत्मजाणिवेनें आपल्या मनोमयतेच्या पाठीमागें जातो, कालातीत किंवा नित्य वर्तमान असें जें त्याचें आत्मस्वरूप तें तो तेथें पहातो; हें त्याचें नामरूपातीत स्वरूप होय, विभक्ततेच्या भेदमय आत्मानुभवाचा प्रवाह बाह्यवर्ती व हें स्वरूप त्याच्या पाठीमागें अंतर्वर्ती असतें; या स्वरूपांत नित्य आत्मद्रव्य असतें आणि याच्यापुढें बाह्य भूमीवर या आत्मद्रव्यांतून बनलेले मनोमय आकार असतात; बाह्य भूमीवर अहम् असतो आणि याच्या पाठीमागें मनाचा आत्मा, कालातीत नित्यवर्तमान असा खरा आत्मा, वर सांगितल्याप्रमाणें असतो आणि मनाला प्रत्यक्ष आत्मजाणिवेनें त्याचें ज्ञान होतें. हें आत्मस्वरूप नित्य एकरस असतें, भूत, वर्तमान, भविष्य या मानसिक भेदाच्या पलीकडे तें ''नित्यवर्तमान'' किंवा कालातीत असें असतें. मनानें भूत वर्तमान भविष्य हा जो

पान क्र. ३८१

 

कालभेद केलेला असतो, त्या भेदाचा संपर्क नित्य आत्मस्वरूपाला होत नाहीं. स्थलभेद, परिसरभेद यांचाहि या आत्मस्वरूपावर कांहीं परिणाम होत नाहीं. मनोमय पुरुष सामान्यत: ''मी शरीरांत आहे, मी येथें आहे, मी तेथें आहे, मी दुसरीकडे असेन'' असें स्वत:संबंधानें बोलत असतो; पण जेव्हां तो आपल्या प्रत्यक्ष आत्म-जाणिवेचा आश्रय घेतो, हा आश्रय कायमपणें घेण्याची संवय करतो, तेव्हां त्याला लवकरच हें समजूं लागतें कीं, ही भेदमय भाषा त्याच्या बदलणाऱ्या आत्मानुभवाची आहे; हा बदलणारा भेदमय आत्मानुभव त्याच्या पृष्ठवर्ती बाह्य जाणिवेचें परिसराशीं असलेलें, घडणारें नातें व्यक्त करतो, बाह्य वस्तूंशी येणारे संबंध व्यक्त करतो. या भेदांपासून मनोमय पुरुष अलिप्तपणें दूर राहूं शकतो आणि याप्रमाणें अलिप्त राहून त्याला हें ज्ञान होऊं शकतें कीं, ज्या आत्मस्वरूपाचें ज्ञान त्याला प्रत्यक्ष जाणिवेनें होतें तें आत्मस्वरूप बाह्य भेदांनीं ? भिन्न होत नाहीं, शरीरभेदानें, मनाच्या भिन्न रूपांनीं, क्षेत्राच्या भेदांनीं त्या आत्मस्वरूपांत कांहीं फरक होत नाहीं. हें आत्मस्वरूप तत्त्वत: विशेषशून्य, संबंधशून्य शुद्ध जाणीवयुक्त अस्तित्व आहे, तें स्वयंपूर्ण आहे, स्वत:च्या शुद्ध अस्तित्वाच्या शुद्ध आनंदानें नित्य आनंदमय असें आहे. निश्चल आत्मा याप्रमाणें आमच्या प्रतीतीला येतो, नित्य अक्षर अस्ति, अस्मि हें त्याचें स्वरूप आहे, तेथें व्यक्तित्व (अहम्) नाहीं, काल नाहीं; अहम्, व्यक्तित्व ही कालगत कालांकित वस्तु आहे.

      निश्चल आत्म्याची कालातीत जाणीव स्वत:मध्यें कालतत्त्वहि पाहूं शकते; बदलणारा अनुभव या कालाच्या क्षेत्रांत (आंतरिक क्षेत्रांत) आत्म्याला येत असतो, किंवा असेंहि म्हणतां येतें कीं, बदलणाऱ्या अनुभवाला कारण कालच असतो. अशा या भेदमय अनुभवाचें कारण किंवा आंतरिक क्षेत्र असणारा काल हा स्वत:मध्यें प्रतिबिंबित झालेला असा निश्चल आत्म्याला दिसत असतो. अशा स्थितींत निश्चल आत्मा नित्य 'मी' चें रूप धारण करतो आणि या नित्य 'मी' च्या अक्षर नित्य जाणिवेच्या पृष्ठभागावर कालाच्या क्रमांत बदलणारा अनुभव आपलें आसन ठेवतो. तलवर्ती नित्य जाणीव आणि पृष्ठवर्ती अनित्य, सारखी बदलणारी जाणीव अशा दोन जाणिवा, एक (नित्य) आधारभूत आणि दुसरी (अनित्य) त्या आधारावर आपलें कार्य करणारी असा देखावा निर्माण होतो. पृष्ठवर्ती जाणीव आपल्या अनुभवांत सारखी भर टाकीत असते, आपल्या अनुभवांतून कांहीं अनुभव सारखा त्याज्य

पान क्र. ३८२

 

म्हणून बाजूला टाकीत असते -- आणि या संग्रहानें आणि त्यागानें, दोन्हीं कृतींनीं आपल्या स्वरूपांत सारखा बदल करीत असते; ''क्षणापूर्वीं मी जो होतो, तोच मी या क्षणीं आहे'' असें प्रामाणिकपणें पृष्ठवर्ती आत्म्याला (जाणिवेला) म्हणतां येत नाही. तलवर्ती आत्मा (जाणीव) मुळींच बदल न होणारा असा असतो. त्याच्याच आधारावर, त्याच्याच पोटीं पृष्ठवर्ती आत्मा सारखा बदलत, आपली अनुभवाची वाढ करीत असतो. पण ज्यांना या पृष्ठवर्ती आत्म्याखेरीज दुसऱ्या तलवर्ती आत्म्याची ओळख नाहीं, किंवा तिकडे वळण्याची संवय नाहीं, त्यांना आपलें स्वरूप पृष्ठवर्ती आत्मा हेंच आहे असें स्वाभाविकपणें वाटतें. अर्थात् बुद्धपंथीयांप्रमाणें हा आत्मा कल्पना, अनुभव व क्रिया यांचा सतत वाहणारा प्रवाह आहे, त्या प्रवाहाचे घटक सारखे बदलत असतात हें त्यांना पटतें आणि खरा नित्य आत्मा म्हणून कांही वस्तु नाहीं, या अनित्य-नित्य अनुभव-प्रवाहामागें शून्याचें ''अस्तित्व'' आहे हा बौद्ध सिद्धान्त त्यांना मान्य होतो. ज्ञानाचा अनुभव येतो पण ज्ञाता कोणीहि नसतो; अस्तित्वाचा अनुभव येतो पण अस्तित्वांत कोणीहि नसतो; बदलत्या घटकभूत गोष्टींचा अनुभव येतो, पण या बदलत्या घटकांना एकत्र करणारी एक वस्तू नसते; या निरनिराळ्या अनुभवांतून, त्यांच्या संयोगानें दोन भ्रम निर्माण होतात -- ज्ञाता, ज्ञेय (ज्ञात) व ज्ञान हा एक भ्रम; पुरुष, अस्तित्व आणि अस्तित्वाचा अनुभव हा दुसरा भ्रम. असा एकंदर शून्यवाद्यांचा सिद्धान्त आहे. नित्य परिवर्ती पृष्ठवर्ती आत्म्याचे उपासक हा मान्य करूं शकतात -- किंवा दुसरा कालवाद्यांचा सिद्धान्तहि मान्य करूं शकतात. कालवाद्यांचा सिद्धान्त असा आहे कीं, काल ही खरी सत्य वस्तु आहे, आणि हे आत्मे (पृष्ठवर्ती आत्मे) या कालाचीं अपत्यें आहेत. याप्रकारें पुरुष, आत्मा (नित्य जाणीवयुक्त अस्तित्व) हा भ्रम आहे असा निर्णय, पृष्ठवर्ती आत्म्याकडे अलिप्ततेनें पाहणाराला घ्यावा लागतो, अर्थात् पृष्ठवर्ती आत्मा हेंच आपलें नित्य बदलणारें स्वरूप आहे असें मानणारा तो असतो. अशा मान्यतेच्या विचारकाला विश्व खरें वाटत असेल किंवा खोटें वाटत असेल. आत्मा (नित्य) मात्र खोटा वाटतो, भ्रमरूप वाटतो; दुसरे जे विचारक, अपरिवर्ती नित्य एकरस अशा अंतर्वर्ती तलवर्ती आत्म्यावर लक्ष केन्द्रित करतात, त्यांना विश्व असत्य दिसतें, भ्रमरूप दिसतें, आत्मा मात्र एकमेव सत्य आहे अशी त्यांची निश्चिति असते. आत्म्याखेरीज बाकी सर्व (अनात्मा)

पान क्र. ३८३

 

सारखें बदलणारें दिसतें आणि हें सर्व बदलणारें वस्तुजात जाणिवेची एक जादुगारी आहे, आभासोत्पादक कला आहे असें ते मानतात.

      आतां पृष्ठवर्ती बाह्य जाणिवेच्या व्यवहाराच्या खऱ्या गोष्टी काय आहेत हें पाहणें उपयुक्त होईल. कोणतीहि उपपत्ति बसवून, निदर्शनास आलेल्या गोष्टींचें स्पष्टीकरण करण्याचे काम सध्यां बाजूला ठेवूं. शून्यवादी, कालवादी, मायावादी उपपत्ती वर दिल्या आहेत; त्यानंतर आणखी कांहीं उपपत्ती देण्याची घाई न करतां पृष्ठवर्ती जाणिवेकडे बारकाईनें पाहणें व तिच्या संबंधांतील वास्तव गोष्टीची इत्थंभूत माहिती करून घेणें उपयुक्त होईल. या संबंधांत पहिली गोष्ट ही कीं, पृष्ठवर्ती जाणीव ही आत्म्याची शुद्ध आंतरिक मानसिक घटना आहे. कालबिंदु सारखा बदलत असतो, त्वरेनें बदलत असतो, या बदलण्याला क्षणभर देखील आळा घालणें अशक्य आहे. स्थल-परिस्थिति मुळींच न बदलली, तरी कालबिंदूंच्या धांवण्यामुळें जाणिवेंत सारखा बदल होत असतो. जाणीव ज्या शरीरांत राहते, ज्या रूपांत राहते, त्या शरीरांत त्या रूपांत सारखा बदल होत असतो; त्याचप्रमाणें या शरीराची, या रूपाची ज्या बाह्य परिस्थितींत (विश्वशरीरांत) बैठक असते, त्या परिस्थितींतहि सारखा फरक होत असतो. जाणिवेवर दोन्ही गोष्टींचा परिणाम होत असतो; शरीराचा परिणाम अधिक होतो, बाह्य परिस्थितीचा परिणाम यापेक्षां कमी होतो, कारण स्वतःच्या शरीरांतील फरकांचें प्रत्यक्ष ज्ञान जाणिवेला होत असतें, विश्वांतील (विश्व शरीरांतील) फरकांचें ज्ञान इंद्रियांच्या द्वारां अप्रत्यक्षपणें होत असतें; तसेंच विश्वाचा शरीरावर परिणाम होऊन, मग त्याच्याद्वारां जाणिवेवर परिणाम होत असतो, म्हणजे हाहि परिणाम अप्रत्यक्षच असतो. कालाचा बदल जितका त्वरेनें होत असतो, व त्वरेनें भासत असतो, तितक्या त्वरेनें शरीरगत किंवा परिस्थितिगत फरक त्वरेनें होतहि नाहीं व भासतहि नाहीं; तथापि हा फरक क्षणाक्षणाला होत असतो, ही गोष्ट खरी आहे आणि हा फरक थांबविण्यासारखा नसतो हीहि गोष्ट खरी आहे. पण आपणाला असें आढळून येतें कीं, हे जे बदल होतात, त्यांत जाणिवेवर परिणाम करणारे, त्याच्या मानसिक अनुभवांत बदल करणारे, त्या अनुभवांत नवे संस्कार उत्पन्न करणारे, त्याच्या मानसिक देहांत संस्कार व फरक करणारे असे जेवढे बाह्य शरीरांतील व बाह्य विश्वांतील बदल असतील त्यांचीच दखल मनोमय पुरुष घेतो -- या गोष्टीचें कारण असें

पान क्र. ३८४

 

कीं, मनाच्या द्वारांच मनोमय पुरुषाला बदलत्या शारीर गृहाची आणि बदलत्या विश्व-घटनांची ओळख होते. याप्रकारें कालबिंदूचा बदल, स्थलक्षेत्राचा बदल, यांजबरोबर कालाच्या प्रवाहांत आणि स्थलाच्या विस्तारांत, एकंदर परिसरांत सारखा बदल होत असतो आणि या बदलाचा परिणाम म्हणून मानसिक व्यक्तित्वांत सारखा बदल घडून येत असतो. आमचा पृष्ठवर्ती बाह्यदर्शनी आत्मा म्हणजे ही मनोमय व्यक्ति होय. परिसराचा बदल तत्त्वज्ञानांत कार्यकारणभाव या नांवानें ओळखला जातो; कारण विश्वाच्या व्यवहाराच्या प्रवाहांत पूर्वींची घटना (स्थिति) नंतरच्या घटनेचें (स्थितीचें) कारण आहेसें भासतें, किंवा असें म्हणतां येईल कीं, नंतरची अवस्था, व्यक्ति, पदार्थ, शक्ति यांच्याकडून घडलेल्या पूर्वक्रियेचा वा क्रियांचा परिणाम आहे असें दिसत असतें. तथापि असेंहि असूं शकेल कीं, कारण म्हणून ज्या गोष्टीला आम्ही नांव देतों ती गोष्ट परिस्थितीचा केवळ एक घटक असेल. तेव्हां मनाला स्वत:च्या व आत्म्याच्या अस्तित्वासंबंधीं प्रत्यक्ष आत्म-जाणीव असते आणि त्याबरोबर अप्रत्यक्ष आणि बदलणारा असा आत्मानुभव असतो. या त्याच्या बदलत्या अनुभवाचे तें दोन भाग पाडतें; एक आंतरिक अनुभव; यांत सारख्या बदलणाऱ्या व्यक्तिगत मानसिक अवस्था येतात; दुसरा भाग बाह्य अनुभव; यांत सारख्या बदलणाऱ्या परिस्थिती येतात. परिस्थिति आणि  व्यक्ति यांचा कार्यकारणसंबंध त्याला अनुभवास येतो; व्यक्तीच्या क्रिया सर्वथा किंवा अंशत: परिस्थिति घडविते आणि व्यक्तीच्या कृतींनीं परिस्थितींत बदल होतो अशी अन्योन्य कार्यकारणभावाची स्थिति या ठिकाणीं अनुभवास येते. पण हा सर्व अनुभव मूलत: आंतरिक किंवा मानसिकच असतो -- कारण ज्याला बाह्य वस्तुविषयक अनुभव म्हणून आम्ही ओळखतो, तो अनुभवहि मनाला प्रतीत होतो तो मानसिक संस्कारांच्या द्वारांच प्रतीत होतो. हा जो पृष्ठवर्ती मनाचा दोन प्रकारचा अनुभव, त्याच्या बाबतींत स्मृतीचा फार उपयोग होतो. प्रत्यक्ष आत्मजाणीव हा जो मनाचा व्यापार आहे, त्यांत स्मृतीला एवढेंच काम असतें कीं, तिनें मनाला त्याच्या पूर्व अस्तित्वाची आठवण करून द्यावी, प्रस्तुत क्षणांत तें आहे तसेंच तें पूर्व क्षणांतहि होतें ही आठवण मनाला करून देणें एवढेंच काम प्रत्यक्ष ज्ञानाच्या विषयाच्या (आत्मजाणिवेच्या) बाबतींत स्मृतीला असतें. पण भेदमय असा जो पृष्ठवर्ती जाणिवेचा अनुभव आहे, त्याच्या बाबतींत स्मृतीला फार महत्त्वाचें स्थान आहे. स्मृति ही मनांत जुने

पान क्र. ३८५

 

नवे अनुभव जोडणारी शक्ति आहे; भूत आणि वर्तमान व्यक्तित्व जोडणारी शक्ति आहे. अनुभवांचा गोंधळ आणि अनुभवांची ताटातूट पृष्ठवर्ती मनांत होऊं नये, अनुभवाचा प्रवाह अखंड असा त्या मनांत प्रतीत व्हावा यासाठीं स्मृतिशक्ति उपयोगी पडते. मात्र स्मृतीचें महत्त्व वर्णितांना तिच्या संबंधांत अतिशयोक्ति होण्याचा संभव असतो -- अहम्-बुद्धि ही स्मृतीनेंच केवळ बनते असा जो स्मृतिसंबंधाचा गैरसमज आहे, तो स्मृतीच्या कार्याची कल्पना अतिशयोक्त केल्यानें होत असतो. स्मृति ही वस्तुत: एक मध्यस्थ शक्ति आहे, अनुभव घेणारें इंद्रियरूप मन आणि अनुभवांचें एकत्रीकरण करणारी बुद्धि या दोहोंना जोडणारी शक्ति स्मृति ही आहे. अनुभवाचा भूतकालीन भाग स्मृति बुद्धीपुढें ठेवते, हेंच तिचें मुख्य काम आहे. मन पृष्ठभागावर क्षणाक्षणांतून धांवत असतें व अनुभव घेत असतें -- घेतलेले अनुभव तें क्षणींक्षणीं बरोबर घेऊन धांवूं शकत नाहीं -- ते अनुभव कोठें तरी सांठविणें मनाला भाग पडतें. ते सांठविण्याची जागा म्हणजेच स्मृति.

      मनाच्या कार्याचें बारीक पृथक्‌करण करून, त्यांत कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात तें पाहणें आतां आवश्यक आहे. या कार्याचे चार घटक दिसतात. मानसिक जाणिवेचा विषय, मानसिक जाणिवेची जाणण्याची कृति, ही कृति करण्याचा प्रसंग आणि कृति करणारा पुरुष, आत्मा, अहम्. आंतला आत्मनिरीक्षण करणारा जो मनोमय पुरुष असतो, त्याला निरीक्षणांत जो स्वानुभव येतो, आपल्या स्वरूपाचा अनुभव येतो त्यांत जाणिवेचा विषय पाहिल्यास, तो, स्वतःची (जाणीवयुक्त अस्तित्वाची) एखादी अवस्था, एखादी हालचाल, एखादी लहर असा कांहींतरी असतो. राग, दुःख किंवा दुसरी एखादी भावना, प्राणमय पुरुषाची भूक किंवा दुसरी एखादी निकड, जीवनाची आंतर प्रतिक्रिया, कसली तरी संवेदना, दर्शन, वैचारिक कृति -- असाच कांहींतरी विषय मनाच्या जाणिवेला असतो. जाणिवेच्या विषयानंतर जाणिवेची ज्ञानकृति पाहिली, तर ती वरील विषयांचें मानसिक निरीक्षण, विचारकृत मूल्यमापन या स्वरूपाची असते; एखाद्या भावनेची वगैरे मनोमय संवेदना, ज्या संवेदनेंत निरीक्षण आणि मूल्यमापन अंतर्भूत आहे किंवा विलीन झालेलें आहे अशी संवेदनाहि जाणिवेची कृति म्हणून आपल्या प्रत्ययास येते. या संवेदनारूप कृतींत मनोमय पुरुष जाणिवेची कृति आणि जाणिवेचा विषय कांहीं लक्षणांच्या आधाराने अलग अलग ठेवतो किंवा कृतीचा

पान क्र. ३८६

 

व विषयाचा अलगपणा, त्याचा गोंधळ झाल्यामुळें, त्याला कायम ठेवतां येत नाहीं. उदाहरणासाठीं क्रोधमय जाणीव घेऊं. मनोमय पुरुष केव्हां केव्हां क्रोधाशीं एकरूप होऊन जातो, क्रोधापासून स्वत:ला अलग ठेवीत नाहीं, त्याजवर विचार करीत नाहीं, त्याजवर दाब आणीत नाहीं, त्याच्यापासून घडणाऱ्या कृतीवर नियंत्रण ठेवीत नाहीं. पण केव्हां केव्हां तो आपली क्रोधमय स्थिति आपल्यापासून अलग ठेवून तिचें निरीक्षण करतो, तिच्यावर विचार करतो, आणि अशा शब्दांत आपलें निरीक्षण मांडतो कीं, ''मी रागावलों आहे''. पण जाणिवेच्या क्रोध या लहरीशीं मनोमय पुरुष जेव्हां एकरूप होतो, तेव्हां तो पुरुष, त्याची स्वानुभवाची कृति (क्रोधाचें निरीक्षण), आणि त्याच्या स्वानुभवाचा विषय (मनाचें क्रोधरूप होणे), या तीन वस्तु एकत्र गुंडाळल्या जातात; गतिमान् जाणीवशक्तीची एक लहर (क्रोध) हें रूप त्या तीन वस्तूंच्या गुंडाळीला येतें. उलट, ''मी रागावलो आहे'' असें विधान करणारा पुरुष वरील तीन वस्तू त्वरेनें अलग अलग करीत असतो आणि आत्मानुभवाची कृति (क्रोधाचें निरीक्षण) आणि आत्मानुभवाचा विषय (क्रोध) यांजमध्यें असलेलें अंतर कमीअधिक प्रमाणांत कायम ठेवतो. जाणिवेचा विषय जी क्रोधभावना तिच्यापासून अलग राहिल्यानें, मनोमय पुरुषाला स्वत:च्या रूपान्तराचा क्रम डोळसपणें बघतां येतो, आपल्या जाणीवशक्तीची हालचाल निरीक्षतां येते, स्वत:चें बदलतें रूप पाहून, त्यापासून अलग राहून, त्याचे गुणदोष पाहतां येतात, आणि अलगपणा पुरता असल्यास, विषयरूप भावनेचें नियंत्रण करून, तिच्यापासून स्वाभाविकपणें घडणाऱ्या कृतीचें नियंत्रण करतां येतें; आपलें रूपान्तरहि थोडेंबहुत नियंत्रित करतां येतें.

      परंतु आत्मनिरीक्षणाच्या कृतींत बहुधा एक उणीव राहत असते. जाणिवेचा विषय आणि जाणिवेची निरीक्षणकृति यांजमध्यें थोडाबहुत अलगपणा राखला जातो; पण मनोमय पुरुष आणि मनाची (जाणिवेची) निरीक्षणकृति यांजमध्यें अलगपणा राखावा तसा राखला जात नाही. पुरुष आणि त्याची निरीक्षणकृति यांची एक गुंडाळी केली जाते; तसेंच पुरुष जे भावनामय रूपान्तर धारण करतो, त्यांत आणि पुरुषांत अलगपणा राखावा तसा राखला जात नाहीं. माझ्या अस्तित्वाचें जाणीवयुक्त द्रव्य क्रोधभावनेनें रूपान्तरित झालेलें मी पाहतो आणि या रूपान्तराचें वैचारिक ग्रहणहि मी पाहतो; या दोन्हीं अवस्थांत मी

पान क्र. ३८७

 

आहे हें माझ्या लक्षांत येतें. पण वैचारिक ग्रहण हेंहि माझें रूपान्तरच आहे, मी नव्हे हें माझ्या स्पष्ट लक्षांत येत नाहीं; माझ्या मनाच्या व्यापारांत मी गुडाळला जातो, त्यांशीं एकरूप होतो, त्याजपासून अलग, मोकळा राहत नाहीं. माझीं रूपान्तरें आणि त्यांचें ग्रहण (हेंहि एक रूपान्तरच असतें) यांजपासून माझें अलगपण माझ्या प्रत्यक्ष अनुभवास येत नाहीं; माझ्या क्रियाशील जाणिवेला जीं रूपें येतात, माझ्या मानसिक आणि प्राणिक स्वभावाचें द्रव्य जी जाणीवशक्ति, तिच्या सागरासमान विस्तारावर ज्या लहरी उठतात, त्या लहरींत माझ्या क्रियाशील जाणिवेला जीं रूपें मी देतों, किंवा असें म्हणा कीं, त्या लहरीत माझ्या क्रियाशील जाणिवेचीं जीं रूपें मी धारण करतों -- त्या रूपांहून मी अलग आहे, वेगळा आहे ही जाणीव मला प्रत्यक्षपणें होत नाहीं; मनोमय पुरुष आणि त्यानें स्वतःचा अनुभव घेण्याची त्याची कृति यांत पूर्ण अलगपणा मला राखतां आला तरच प्रथम, शुद्ध अहमचें स्पष्ट व पूर्ण ज्ञान मला होतें, आणि शेवटीं साक्षी आत्म्याचें ज्ञान, विचार करणाऱ्या मनोमय पुरुषाचें स्पष्ट ज्ञान मला होतें; हा पुरुष, हा आत्मा, क्रोधमय होतो, आपली क्रोधमयता पाहतो, पण या क्रोधानें किंवा क्रोधनिरीक्षणानें त्याच्या अस्तित्वांत कांहीं कमीअधिक होत नाहीं; त्याच्या स्वरूपावर कांहीं बंधन, मर्यादा येत नाहीं. उलट तो शाश्वत असा अनुभव-घटक असतो; त्याला अमर्याद आणि क्रमवार अशा जाणिवेच्या हालचाली दिसत असतात, हालचालीचे अनुभव येत असतात. या सर्व क्रमवार हालचालींत व हालचालींच्या अनुभवांत त्याला स्वतःचें अस्तित्व वेगळेपणानें जाणवत असतें. शिवाय या क्रमवार हालचालींच्या पाठीमागें त्यांना आधारभूत, त्यांना सामावून घेणारें असें स्वतःचें स्वरूप त्याला दिसत असतें; त्याचें अस्तित्व नेहमीं एकरूप असें त्याला दिसतें, त्याची स्वरूपशक्ति नेहमीं सारखी असते -- त्याची जाणीवशक्ति मात्र अनेक बदलणारीं रूपें आणि अवस्था यांतून जात असतांना त्याला दिसते. याप्रमाणें हा साक्षी आत्मा, अक्षर अपरिवर्तनीय स्वरूपाचा आहे आणि त्याबरोबरच तो कालाच्या क्रमांत सारखीं रूपान्तरें, नवीं नवीं रूपे नित्य धारण करीत राहणारा आहे.

      आत्मे दोन नाहींत, एकच आत्मा, जाणीवयुक्त पुरुष आहे. तो आपल्या जाणीवयुक्त शक्तीच्या लहरी उठवितो आणि या लहरींत तो लहरीनुसार स्वतःला बदलतांना दिसतो; वस्तुत: त्यांत कांहीं बदल होत नाहीं,

पान क्र. ३८८

 

कमीअधिक होत नाहीं. भौतिक विश्वांत मूळ भौतिक द्रव्य किंवा भौतिक शक्ति कधींहि कमीअधिक होत नाहीं -- तिच्या घटकतत्त्वांचे संयोग सारखे बदलत असतात. तशीच एका अक्षर आत्म्याच्या दर्शनी परिवर्तनाची गोष्ट आहे. भौतिक शक्तीकडे पाहणारी जी जाणीव आहे तिला ही अक्षर शक्ति बदलतांना दिसते. कारण ही जाणीव वरच्या देखाव्यांतच गढून राहते. मूळ अस्तित्व, मूळ द्रव्य, मूळ शक्ति यांची ओळख जोपर्यंत या पृष्ठवर्ती जाणिवेला होत नाहीं, तोपर्यंत तिला मूळ द्रव्यांत (शक्तींत) बदल होत आहे असेंच दिसणार. ही वरवर पाहणारी जाणीव आंत शिरून, तिनें खोल असलेल्या अक्षर वस्तूचें (भौतिक शक्तीचें) ज्ञान करून घेतलें, म्हणजे वरच्या देखाव्याला ती खोटा देखावा असें म्हणून कांहीं धिक्कारीत नाहीं. तिला अक्षर अशी सत्ता, द्रव्य, शक्ति, केवळ दृश्य नसणारी, इंद्रियांना अंकित नसणारी अशी शक्ति दिसते; आणि या सत्यशक्तीचें (द्रव्याचें, सत्तेचें) खरें रूपान्तर होत आहे असेंहि दिसतें. इंद्रियांनीं हें रूपान्तर ग्रहण करतां येतें, इंद्रियांकडूनच या रूपान्तराचा संबंध आत्म्याशी लावतां येतो, म्हणूनच या रूपान्तराला मूळ सत्ताद्रव्य न म्हणतां त्या मूळ रूपाचें रूपान्तर म्हणावें लागतें. आत्मजाणिवेला जें प्रत्यक्ष दिसतें, तिच्या सर्वसमावेशक ज्ञानाला, शुद्ध निरुपाधिक ग्रहणशक्तीला जें दिसतें तें मूळ सत्ताद्रव्य म्हटलें जातें. सोपाधिक (इंद्रियांकित) ग्रहणशक्ति ज्या गोष्टींचें ग्रहण करूं शकते, त्या गोष्टी रूपान्तरित मूळ द्रव्य या सदराखालीं येतात. जी गोष्ट भौतिक मूळ सत्ता, द्रव्य वा शक्ति यांची आहे, तीच गोष्ट आत्मसत्ता, आत्मद्रव्य, आत्मशक्ति यांची आहे. आत्मा आमच्या आत्मजाणिवेकडून प्रत्यक्षपणें जाणला जातो, तो अक्षर, अव्यय, कधींहि कमीअधिक न होणारा आहे हें ज्ञान आमच्या आत्मजाणिवेला प्रत्यक्षपणें होत असतें; असें असलें तरी आमच्या मनरूप इंद्रियाला, मनोमय अनुभूतीला या अक्षर आत्म्यामध्यें अनेक रूपरूपान्तरें होत आहेत असें दिसतें. आमची मूळ जाणीव मनाच्या उपाधीनें ग्रासली म्हणजे तिला आत्मा अनेक रूपें घेतांना दिसतो. मूळ शूद्ध जाणिवेला तो न बदलणारा, सदैव एकरस असा दिसतो.

      आम्हांला अनुभवांचा क्रमवार प्रवाह दिसतो; अनुभव घेणारी जाणीव स्वतःच्या शुद्ध स्थितींत अनुभव घेत नाही, तर मनाच्या उपाधीद्वारां अनुभव घेते; अनुभवांची क्रमशीलता या उपाधीमुळेंच उत्पन्न होते.

पान क्र. ३८९

 

स्मृति ही योजना या मनाला मदत करण्यासाठीं आहे. मनाची ही प्राथमिक अनुभवपद्धति आहे कीं, कालाचे क्षणरूप तुकडे करावयाचे, कालाच्या तुकड्यांच्या आधारें आपले स्वतःचे तुकडे करावयाचे आणि या क्षणांकित, क्षणनिष्ठ अशा स्वतःच्या अंशांनीं अनुभव घ्यावयाचा. जाणिवेनें एखादें रूप घेतलें, अस्तित्वाची जाणीवयुक्त एखादी हालचाल झाली, तर त्या हालचालीचा, त्या रूपाचा क्षणनिष्ठ निकटचा अनुभव मन घेतें. त्यावेळीं त्याला स्मृतीची जरूर नसते, तेव्हां स्मृति कार्यहि करीत नाहीं. उदाहरणार्थ मी रागावत आहे ही कांहीं स्मृतीची उक्ति नव्हे. ही तात्कालिक संवेदना आहे. मी रागावलों आहे हें मी पाहत आहे हीहि स्मृतीची क्रिया नाहीं. ही बौद्धिक विषयग्रहणाची क्रिया आहे; माझा अनुभव कालाच्या क्रमाशीं मी जोडूं लागलों, म्हणजे स्मृतीचा उपयोग असतो; माझ्या जाणिवेच्या क्रिया, रूपरूपान्तरें मी भूत, वर्तमान, भविष्य अशा कालविभागांनीं विभागूं लागलों, म्हणजे मनाला स्मृति उपयोगी पडते. ''एका क्षणापूर्वी मी रागावलो होतों'', ''मी रागावलों आहे, अद्यापि रागांत आहे'' ''एकदां मी रागावलों होतों, तसाच प्रसंग पुन: प्राप्त झाला, तर पुन्हां मी रागावेन'' या विधानांत स्मृति उपयोगांत आली आहे. होऊन गेलेल्या (भूतकालीन) अन्यायाची वा दुःखाची स्मृति, दुःख किंवा राग ही भावना मनांत उभी करते; तात्कालिक प्रसंग पूर्वप्रसंगाची आठवण करून देऊन, जुनें दुःख किंवा राग पुन्हा मनांत उभा करतो -- या दोनहि ठिकाणीं स्मृति ही जाणिवेच्या हालचालीचा, विचाराचा भाग बनली आहे; कारण या हालचालीचा प्रसंग सर्वथा किंवा अंशत: भूतकालीन आहे. जाणिवेच्या पृष्ठभागावर आमचें भूतकालीन जीवन आम्हीं ठेवूं शकत नाहीं, राखूं शकत नाहीं, म्हणून हरवलेली किंवा अस्तित्वांतून गेलेली वस्तु परत मिळवावी त्याप्रमाणें आम्हांला हें भूतकालीन जीवन परत जाणावयाचें आहे व हें काम स्मृतीचा उपयोग करून आम्ही करतो -- विचारशील मनाची विचाराची (वगैरे) पुनरावृत्ति करण्याची आणि विचार वगैरे एकमेकांना जोडण्याची क्रिया हें स्मृतीचें स्वरूप आहे -- आमच्यांतील भूतकालीन जीवन जाणिवेच्या पृष्ठभागावर आम्ही राखूं शकत नाहीं, असें वर म्हटलें आहे, तेथें हें आम्हीं ध्यानांत ठेवावयास हवें कीं, हें भूतकालीन जीवन या पृष्ठभागाच्या खालीं, पाठीमागें, आंत सदैव उपस्थित असतें एवढेंच नव्हे, तर बहुधा तें तेथें क्रियाशीलहि असतें. विचारशील मनाची

पान क्र. ३९०

 

दुसरी एक क्रिया किंवा शक्ति या ठिकाणीं नजरेस आणणें योग्य होईल; ती म्हणजे कल्पना होय. आमचें मर्यादित पृष्ठवर्ती मन जे अनुभव घेतें, त्या अनुभवाच्या वास्तव क्षेत्रांत ज्या वस्तू नाहींत, त्या वस्तु-कल्पना आम्ही त्याच्या क्षेत्रांत आणतो. वास्तवांत येण्यासारख्या व न येण्यासारख्या सर्व शक्य संभवनीय गोष्टी, कल्पनाशक्ति आमच्या मनाच्या म्हणजे अज्ञानाच्या क्षेत्रांत आणून सोडते.

      कालाच्या क्रमांत अनुभवाच्या अखंडतेसाठीं स्मृतीची आवश्यकता असण्याचें कारण, अखंडित अशा जाणिवेच्या हालचालींची अखंडित जाणीव आमच्या ठिकाणीं शक्य नसते, आमच्या द्रष्ट्या जाणिवेला एका क्षणांतून दुसऱ्या क्षणांत धांवावें लागतें, गत हालचाल जाणिवेच्या पकडींतून निघून जाते आणि आगामी हालचाल सर्वथा जाणिवेच्या आवांक्याबाहेर असतें हें होय. वस्तुत: कालाच्या ओघांत जाणिवेमध्यें जे विकार, बदल होतात, त्यांचा एक अखंड असा प्रवाह असतो, त्यांत कोठेंहि खंड नसतो -- खंड असतो तो त्या जाणिवेंत असतो -- अज्ञानग्रस्त अशी आमची जाणीव असते आणि अज्ञानाची चाल मर्यादित असते. त्याला एका क्षणावरून दुसऱ्या क्षणावर, दुसऱ्या क्षणावरून तिसऱ्या क्षणावर असें उड्या मारीत चालावें लागतें. अस्तित्वाचा, जाणिवेचा विकार-संभार कालक्रमांत अखंड प्रवाहरूप असतो, त्याप्रमाणें अस्तित्वाचें, जाणिवेचें मूलद्रव्य, मूलतत्त्व स्थलांत विभागलेलें असें नसून त्याचाहि एक अखंड महासागर असतो; पण ज्याप्रमाणें खंडित अशा बघणाऱ्या जाणिवेमुळें कालक्रमांतील रूपरूपान्तरांचा प्रवाह खंडित म्हणून अनुभवास येतो, त्याप्रमाणें खंडित जाणिवेमुळेंच स्थलगत अस्तित्वाचा महासागर खंडित म्हणून अनुभवास येतो. आमची संवेदनाशक्ति, इंद्रियशक्ति मर्यादित आहे. अस्तित्वाचे भागभागच ती पाहूं शकते. अस्तित्वानें घेतलेले आकार ती भिन्नभिन्न असे पाहते; आणि मूळ अस्तित्वाची एकता तिच्या आवांक्याबाहेर असल्यानें हे आकार मुळांतच स्वतंत्र आहेत असें तिचें ज्ञान असतें. काल आणि स्थल या अस्तित्वाच्या व अस्तित्वविकारांच्या क्षेत्रांत वस्तूंची व्यवस्था अवश्य असते. परंतु या दोन्हीहि क्षेत्रांत मोकळी जागा, खंड, विभक्तता असें कांहींहि नसतें. सगळें क्षेत्र सागराप्रमाणें, नदीप्रमाणें अखंड भरलेलें असतें; मात्र आमच्या अज्ञानाला तें खंडित भासतें. आमच्या अज्ञानाला अपरिहार्यपणें अनुभवास येणाऱ्या मोकळ्या जागा भरून काढण्यासाठीं आणि वेगवेगळे भाग

पान क्र. ३९१

 

जोडून देण्यासाठी आमची मानसिक जाणीव अनेक युक्तिप्रयुक्तींचा, योजनांचा उपयोग करते. या अनेक योजनांपैकीं स्मृति ही एक उपयुक्त योजना आहे.

      तेव्हां विश्वरूप सागराचा अखंड प्रवाह माझे ठिकाणीं, माझ्या अंतरंगांत असतो. त्या प्रवाहांत क्रोध, दुःख इत्यादि लहर उत्पन्न होते आणि ती बराच काळ अखंडपणें टिकूं शकते. ही अखंडता स्मृतिशक्तीचा परिणाम नसतो. अर्थात् स्मृति या लहरीचा काल लांबवूं शकेल. ही लहर पुन्हां उत्पन्न करूं शकेल -- स्मृतीच्या अभावीं ही लहर आपोआप नष्ट झाली असती, प्रवाहांत विलीन झाली असती ती स्मृतीमुळें आणखी कांहीं काळ टिकूं शकते व विरून गेलेली पुन्हां उद्‌भवूं शकते, ही गोष्ट खरी आहे पण वस्तुत: ही लहर कांहीं प्रसंगामुळें उत्पन्न होते. माझ्या जाणीव-शक्तीची ही लहररूप हालचाल, तिला गति देणारी जी प्रारंभीची प्रेरणा असेल तिच्या जोरावरच, काही काळपर्यंत, बऱ्याच दीर्घ काळापर्यंत टिकते, टिकूं शकते. स्मृति मधें आली, तर ती क्रोधाच्या प्रसंगाची विचारी मनाला आठवण करून देऊन जाणिवेंतील प्रक्षोभ आणखी कांही काळ टिकवूं शकते; किंवा कल्पनाशील मनाला पूर्वींच्या क्रोध-भावनेची, त्या भावनेच्या युक्ततेची, आठवण करून देऊन क्रोधभावना पुनरुद्दीपित करून तिचा काळ आणखी लांबवूं शकते. स्मृति मधें न आली, तर जाणिवेचा प्रक्षोभ हळूं हळूं समाप्त होतो; आणि त्या प्रक्षोभाला कारण झालेला प्रसंग पुन्हां उद्‌भवला तरच प्रक्षोभहि पुन्हां डोकें वर काढतो. कांहीं प्रसंगामुळें क्रोधादि लहर जाणिवेच्या समुद्रावर येते, हा कांहीं स्मृतीचा परिणाम नव्हे. तसेंच, तसाच प्रसंग किंवा त्या सारखा प्रसंग पुन्हां आला, तर क्रोधादि लहर पुन्हां उठते, हाहि स्मृतीचा व्यापार नव्हे. ही लहर स्मृति जोरदार करूं शकते. मनाला या लहरीच्या, अधिक अंकित करूं शकते इतकेंच. भौतिक जगांतील द्रव्य आणि शक्ति आणि मानसिक जगांतील द्रव्य आणि शक्ति यांत अंतर आहे. मानसिक द्रव्य आणि शक्ति यांत घनता कमी आहे; त्यांचे आकारविकार सुलभतेनें होतात व बदलतां येतात. तथापि तुलनात्मक दृष्टीनें अधिक घन आणि कमी सुलभतेनें आकारविकार करूं देणारें व बदलूं देणारें भौतिक द्रव्य आणि शक्ति, यांच्या बाबतींत जें कार्यकारणाचें नातें असतें तेंच मानसिक द्रव्य आणि शक्ति यांच्या बाबतींत असतें. मानसिक जगांत प्रसंग पुन्हां आला कीं

पान क्र. ३९२

 

त्या प्रसंगाला अनुरूप जी लहर पूर्वीं उठली होती तीच पुन्हां उठते. भौतिक जगांत कार्यकारणभाव केवळ यांत्रिक असतो. मानसिक जगांत तो तितका नसतो, इतकेंच. असें म्हणतां येईल कीं, शक्ति आणि शक्तिकार्य यांचा संबंध विशिष्ट प्रकारचा पुन्हां पुन्हां आढळुन येतो, याचें कारण, निसर्गाच्या सर्व प्रकारच्या शक्तींत (मानसिक, भौतिक इ.) अजाणती स्मृति असते -- पूर्वीं घडलेलें सांठवणारी स्मृति, सर्व प्रकारच्या नैसर्गिक शक्तीच्या पोटीं असते; आणि म्हणून विशिष्टशक्तिप्रकार आणि विशिष्ट कार्य असा संबंध आपल्या अनुभवास न चुकतां नेहमीं येतो, पण असें म्हणण्यात स्मृति या कल्पनेची व्याप्ति प्रमाणाबाहेर वाढते. म्हणून आपणांला पुनरावृत्तीचा नियम मानणें सोईचें पडतें. हा नियम येणेंप्रमाणें : जाणीव-शक्तीच्या लहरींच्या क्रियांत, ती जाणीवशक्ति एक प्रकारची सुसूत्रता राखते, विशिष्ट प्रसंग, तर विशिष्ट लहर इ. -- अशाप्रकारें प्रसंग पुनरावृत्त झाला तर लहरीची पुनरावृत्ति, असा पुनरावृत्तीचा नियम, जाणीवशक्ति आपल्या क्रियांसंबंधानें अंमलांत आणते. जाणिवेचे व्यापार बघणारें मन, आपल्या सोईसाठीं स्मृति ही वस्तु उपयोगांत आणते. कालाच्या क्रमांत, कालांकित अनुभवासाठीं, जाणिवेच्या व्यापारांची उत्पत्ति, पुनरावृत्ति वगैरे सर्व व्यापारांची जुळणी करणें हें काम स्मृतीचें आहे. जाणिवेचे व्यापार एकत्र जोडावयाचे ते इच्छाशक्तीनें त्यांच्यांत अधिकाधिक सुसंबद्धता आणून, त्याचा जीवनासाठीं अधिकाधिक उपयोग करावा, त्याचप्रमाणें बुद्धीनें त्यांचा मेळ वाढवून आपलें वाढतें मूल्यनिश्चितीचें कार्य सारखें वाढत्या प्रमाणांत करीत रहावें, यासाठीं जोडावयाचे असतात, आणि हें जोडावयाचें महत्त्वाचें कार्य, स्मृति या वस्तूकडून मन करून घेतें. अचेतनता ही आमच्या विकासाची पहिली पायरी -- ही अचेतनता शेवटीं पूर्ण जाणीव बनते; पूर्ण आत्म-जाणीवेचें रूप घेतें. मनोमय पुरूषाचें अज्ञान, आपल्या नाना रूपें घेण्याच्या व्यवहारांत, स्वतःसंबंधींची जाणीव उदयास आणतें आणि विकसित करतें -- हें जें आमचें विकासकार्य घडतें, तें स्मृति आणि इतर वस्तू किंवा योजना (प्रक्रिया) यांच्या आधारानें घडतें. हें विकासकार्य वाढतां वाढतां शेवटीं आत्मानुभवाच्या सर्व गोष्टी, मनाची इच्छाशक्ति आणि ज्ञानशक्ति यांना, पूर्णपणें उपयोगांत आणतां येऊं लागतात. विकासाचा क्रम, या प्रकारचा असल्याचें आमच्या अनुभवास येतें. स्वतांत, स्वतांच्या व्यवहारात मग्न असल्यानें जिला

पान क्र. ३९३

 

दुसरें कांहींहि दिसत नाहीं अशी, दिसायला मन नसलेली अशी, जड शक्ति भौतिक विश्वांत आमच्या अनुभवाला येते; या जड शक्तींतून मन ही वस्तु विकास पावते. या विकासाची प्रक्रिया पाहतां ती आतांच वर्णन केल्याप्रमाणें आमच्या अनुभवाला येते; आणि या प्रक्रियेंत स्मृतीचा महत्त्वाचा भाग असतो.

      मात्र स्मृति एकटीच कांहीं हा विकास साधीत नाहीं -- मनाचें अज्ञान हें, अहम्‌बुद्धि ही दुसरी वस्तु स्मृतीच्या बरोबर उपयोगांत आणून मनोमय पुरुषाला स्वतःची जाणीव करून देण्याच्या कामीं यशस्वी होतें. मनोमय पुरुषाच्या व्यवहारांत, व्यवहाराचे विषयभूत पदार्थ, व्यवहाराचे प्रसंग, व्यवहाराची क्रिया आणि या सर्व गोष्टी अनुभवणारा अशा चार वस्तू असतात. अनुभवणारा जो मनोमय पुरुष, त्याला स्वतःची जाणीव होणें हें कार्य अहंबुद्धीनें मुख्यत: साधतें. अहम्-बुद्धि स्मृतीचीच बनते, असें प्रथमदर्शनीं वाटण्याचा संभव आहे. ''कांहीं वेळापूर्वीं जो रागावला होता व आतां जो पुन्हां रागावला आहे तो तोच मी आहे. कांहीं वेळापूर्वीं रागावलेला होता आणि अद्यापिहि रागावलेला आहे तो तोंच मी आहे'' हें विधान स्मृति करते असें आम्हांस वाटतें. पण स्मृति एवढेंच करूं शकते : जाणीवयुक्त क्रियेचें मर्यादित क्षेत्र जें होतें तेंच आहे. या क्षेत्रात जें पूर्वीं घडले, तेंच विकारदृश्य घडलेलें आहे एवढेंच स्मृति आपल्या सामर्थ्यानें सांगू शकते. काय घडतें तें हें : मानसिक विकार पुनरावृत्त होतो, मनोद्रव्यांत रूपघटनेची लहर पुनरावृत्त होते -- या पुनरावृत्तरूप घटनेची वा विकाराची संवेदना मनाच्या ''इंद्रियाला'' ताबडतोब होते, प्रत्यक्षपणें होते; पुनरावृत्ति वा पुनरावृत्त घटना किंवा विकार एकत्र जोडायला स्मृति येते आणि त्यायोगें मनाच्या इंद्रियाला (इंद्रियरूप मनाला) हें कळतें कीं, त्याच मनोद्रव्यांत, तोच चलनात्मक विकार, आकार घडला आहे आणि हा विकार अनुभवणारें मनाचें इंद्रियहि तेंच आहे. इंद्रियरूप मन, संवेदनाशील मन हें एक केंद्र करून तेथें आपलें बिऱ्हाड थाटतें -- अनुभवाचें क्षेत्र विस्तृत असतें. या क्षेत्रावर, संवेदनाशील इंद्रियरूप मन, घटनांच्या, विकारांच्या संवेदना घेत हिंडत बसत नाहीं, तर एक स्थान निश्चित करून तेथून सर्व संवेदनेचें काम करतें. हें जें संवेदना-केंद्र, ती ''अहम्'' बुद्धि. अहम्‌ची स्मृति अहंबुद्धीहून वेगळी. ही स्मृति अहम्-बुद्धीला बळकटी आणते. पण अहम्‌बुद्धि म्हणजे मात्र स्मृति नव्हे. खालच्या मानवेतर वर्गांतील प्राण्यांत अहमबुद्धि, व्यक्तित्व,

पान क्र. ३९४

 

मानवासारखें प्रगत नसतें. क्षणाक्षणांत मी तोंच आहे अशी संवेदना, इतराहून मी वेगळा आहे ही संवेदना, मानवेतर प्राण्यांत असते; आणि ही संवेदनाहि कमी-अधिक अस्पष्टच असते. मानवामध्यें ही संवेदना स्पष्ट असून शिवाय ज्ञानशील संवेदना एकत्र बांधणारें मन असतें. संवेदनाशील मनाची संवेदना आणि स्मृति, या दोहोंची क्रिया हा आपला पाया करून, हें ज्ञानशील मन अहम्‌बुद्धीची स्पष्ट कल्पना उभी करतें. या स्पष्ट कल्पनेबरोबर प्राथमिक प्राणिसुलभ नित्य-स्फूर्त अशी अहम् संवेदनाहि, हें मन कायम ठेवतें. ज्ञानशील मनाची अहम्-बुद्धि-विषयक कल्पना अशी असते : अहम्‌कडे इंद्रियासारखें विषयग्रहणाचें, भावनेचें, आठवणीचें, विचार करण्याचें काम असतें. अहम् हें सर्व काम करतें. त्याला आठवण असते, नसते. तो आठवणारा आहे आणि न आठवणारा पण आहे. जाणीवयुक्त मनोद्रव्य हें एकाच जाणीवयुक्त पुरुषाचें असतें, हें ज्ञानशील मन ओळखतें. हा पुरुष (हा अहम्) भावना वागवतो (भावनावश होतो) भावना थांबवितो (भावनाशून्य होतो); आठवतो, विसरतो; बाह्यविषयक ज्ञान मिळवितो; हें ज्ञान सोडून झोपेंत मग्न होतो. स्मृति निर्माण केली जाण्याच्या पूर्वीं हा असतो, नंतरहि हा असतो. हा बालकांत असतो, दुबळ्या, म्हाताऱ्या, अति लाड करणाऱ्या माणसांत असतो; हा झोंपेंत असतो, जागृतींत असतो. दर्शनी जाणिवेंत आणि दर्शनी नेणिवेंत असतो. हा कामें करून ती विसरतो. केल्या कामांची आठवण ठेवतो. त्याच्या व्यक्तित्वांत, त्याच्या दर्शनीं स्वरूपांत, सारखे बदल होत असतात. या दर्शनी स्वरूपांतील रूपान्तरांच्या पाठीमागें तो, कांहींहि बदल न झालेला असा, नित्य उपस्थित असतो. ज्ञानशील मन, या गोष्टी ओळखतें; मानवी अहम् च्या ज्ञानाचें मानवांमधील हें कार्य, मनांतील घटना संघटित करणारी ही त्याची बुद्धि, आत्मजाणीव, आत्मानुभव वरीलप्रकारें व्यवस्थित स्वरूपाचा करण्याचें त्याचें कार्य हें सर्व, मानवेतर प्राण्यांत आढळणारा जो स्मृतिघटित अहम् आणि संवेदनाशील अहम्, त्याजपेक्षां, त्याच्या कार्यापेक्षां, कितीतरी श्रेष्ठ पायरीवरचें आहे; आणि तें खऱ्या आत्म्याच्या ज्ञानाला अगदीं जवळ आहे, असें आपल्याला म्हणतां येतें. मानवी अहम्, मानवेतर प्राण्यांच्या अह्म् हून, खऱ्या अहम् ला (आत्म्याला) खूप जवळ आहे, असें आपण म्हणूं शकतो. निसर्गाचा उघडा व्यवहार आणि गुप्त व्यवहार, दोहोंचा जर अभ्यास केला, तर सर्व अहम्-संवेदना,

पान क्र. ३९५

 

सर्व अहम्-स्मृति ही एक व्यवस्थित व्यवहारासाठीं योजलेली कृति आहे असें आपल्या लक्षांत येतें. विश्वव्यापक जाणीवशक्ति अप्रत्यक्षपणें ही कृति योजीत असते. या जाणीवशक्तींत गुप्त असें ज्ञानशील मन, संघटना करणारें मन असतें. त्याजकडून ही अहम्‌ची कृति योजिली जाते. या ज्ञानशील मनाला विकासक्रमांत मानवाचे ठिकाणीं असलेली विवेकबुद्धि, हें स्वरूप येतें. या मानवी विवेकबुद्धीचें संघटनतत्त्व आणि तिची कार्यपद्धति, अपूर्ण आणि मर्यादित अशीच अद्यापि आहे. तिचा विकास चालूं आहे. जे अचेतन दिसतें त्याचे पोटीं गुप्त ज्ञान असतें. स्वाभाविक, मानवी बुद्धीहून श्रेष्ठ अशीं विवेकबुद्धि असते. विश्वांत ज्या बेताल वाटणाऱ्या हालचाली चालतात, त्या हालचालींत एक प्रकारची संघटना, सुसंबद्धता ही गुप्त ज्ञानशील, श्रेष्ठ बुद्धि निर्माण करीत असते.

      मनुष्याचे व्यक्तित्व दुभंगतें, दोन व्यक्ती एकाच माणसांत अनुभवास येतात, एकाच माणसांत, मनाच्या दोन अवस्था, एकदां एक व नंतर दुसरी, अशा प्रतीतीस येतात. या भंगलेल्या व्यक्तित्वाच्या किंवा दुहेरी व्यक्तित्वाच्या बाबतींत स्मृतीचें महत्त्व आपल्या अनुभवास येतें. एका मनोवस्थेंत (व्यक्तित्वांत) जेव्हां मनुष्य (दुहेरी व्यक्तित्वाचा मनुष्य) असतो, तेव्हां त्या अवस्थेंत तो जसा होता, त्यानें जें कांहीं केलें होतें तेंच आणि तेवढेंच तो स्वच्छ आठवतो आणि व्यवस्थितपणें मांडतो. दुसऱ्या अवस्थेंतलें कांहींहि, त्याला पहिल्या अवस्थेंत असतांना आठवत नाहीं. एका अवस्थेंत जें आपलें नांव, जीवन, भावना हा मनुष्य व्यक्त करतो, तें नांव, जीवन, भावना दुसऱ्या अवस्थेंत व्यक्त करीत नाहीं. तेथें सर्व निराळें असतें. यावरून त्याचे ठिकाणीं भिन्न भिन्न अशा दोन व्यक्ती सुसंघटितपणें बनल्या आहेत असें म्हणावे लागतें. स्मृति हीच व्यक्तित्वाची एकमेव घटक, संघटक आहे असें या बाबतींत प्रथमदर्शनीं दिसतें. परंतु अशीहि गोष्ट अनुभवास येते कीं स्मृतीचे तुकडे झाले आहेत आणि व्यक्तित्व अभंग आहे. मनुष्यावर मोहिनीविद्येचा प्रयोग करून, त्याला झोंप आणली म्हणजे या संमोहित स्थितींत तो अशा अनुभवांचा, आठवणींचा पाढा वाचतो, कीं ज्या आठवणी, अनुभव त्याच्या जागृत मनाला मुळींच आठवत नाहींत. पण याप्रकारें जागृत मन व संमोहित मन, स्मृति भंगून तिचें दोन स्वतंत्र भाग झाल्याची, साक्ष देतात, तरी त्याचें व्यक्तित्व भंगलें आहे असें कांहीं त्यावरून म्हणतां येत नाही : तो

पान क्र. ३९६

 

स्वतःला अभंग व्यक्तित्वाचाच मानतो, मी जागृतींत होतो तोच संमोहित स्थितींत होतो. संमोहित स्थितींत होतो तोच पूर्वींचा मी जागृतींत आहे असेंच तो म्हणतो व तसाच तो असतो. असेंहि घडतें कीं मनुष्य आपली पूर्व जीवनकथा सर्वथा विसरतो; नांव देखील विसरतो. पण आपला अहम् बदलला आहे, आपलें व्यक्तित्व बदललें आहे, असें तो मानीत नाहीं. अर्थात् स्मृति म्हणजेच व्यक्तित्व, हें समीकरण चुकीचें ठरतें. जाणिवेची अशी अवस्थाहि शक्य आहे कीं जिच्यांत स्मृतीला मध्येंच पोकळी निर्माण झाली नाहीं; स्मृति अगदीं अखंड आहे. तरी शीघ्र विकासानें मनुष्याला आपलें सर्व अस्तित्व बदललें आहे, आपलें मन कणांकणांत वेगळें झालेलें आहे, असें प्रामाणिकपणें वाटतें. आपण नवीच व्यक्ति बनलों आहोंत, आपला जणुं नवा जन्म झाला आहे अशी प्रतीति येते. त्याला मनाचे सर्व व्यवहार संघटित करणारी बुद्धि हात न देती, तर त्याला असेंच वाटलें असतें कीं, हा नवा माणूस (जो शीघ्र विकासानें बनला आहे तो) आणि तो जुना माणूस (विकासापूर्वींचा) एकच व्यक्ति आहे, ही गोष्ट साफ खोटी आहे. आपलें शरीर तेंच आहे, आपलें मनोद्रव्य तेंच आहे ही स्मृति त्याला स्पष्ट असते. पण जुनें व्यक्तित्व आणि नवें व्यक्तित्व अगदीं अलग अलग आहेत असेंच त्याला वाटतें. एकांतून दुसरें विकसित झालेलें आहे, हें त्याला पटणें अवघड जातें. येथें स्मृति अखंडित आहे आणि व्यक्तित्व अखंडितपणें विकसित झालें आहे. पण विकासाच्या शीघ्रतेमुळें नव्या जुन्या व्यक्तित्वाची एकता पटणें दुःसाध्य होतें. या सर्व घटनांचा विचार करतां असें दिसतें कीं, जाणिवेचे विकारव्यवहार अलग अलग टिपणारी मनाची संवेदनाशक्ति, ही पायाभूत प्रमुख शक्ति आहे. स्मृति जणुं धागा आहे; संवेदनाशक्तीनें टिपलेले अनुभव या स्मृतीच्या धाग्यांत ओंवले जातात. संवेदनाशक्तीनें स्वतःचा स्वत: अनुभव घेणारें मन, आपले अनुभव स्मृतीच्या धाग्यांत ओंवण्याचें काम करतें. नंतर सर्व मनोव्यापारांचें संघटन करणारी मनाची शक्ति (बुद्धि) स्मृतीनें पुरविलेलें सर्व साहित्य, भूत, वर्तमान, भविष्य जोडणारे तिचे जोड (दुवे), सर्व एकत्र जुळविते आणि अहम्‌शीं त्या सर्वाचा संबंध जोडते. हा अहम् कालाच्या सर्वक्षणांत एकरूप असतो. अनुभव बदलत रहातात, व्यक्तित्व बदलत रहातें, पण हे सर्व बदल होत असतां अहम् मात्र बदलत नाहीं, सदैव एकरूप राहतो.

पान क्र. ३९७

 

      मनोमय पुरुषाचे ठिकाणीं खरें आत्मज्ञान विकसित होण्यासाठीं प्राथमिक पाया, पूर्वतयारी, एवढेंच अहम्‌संवेदनेचें महत्त्व आहे. आकार धारण करणारें देहधारी मन क्रमश: विकसित झालें आहे व होत आहे. त्याचा आरंभ अचेतनतेपासून झाला व तें शेवटीं स्वतःचें ज्ञान प्राप्त करून घेणार आहे, स्वतःचें ज्ञान नाहीं, वस्तुजाताचेंहि ज्ञान नाहीं, येथपासून देहधारी मनाचा आरंभ झाला; तें स्वतःचें ज्ञान आणि वस्तुजाताचें ज्ञान शेवटीं पूर्णतया मिळविणार आहे -- इतकी त्याची प्रगति होणार आहे; आज ते येथवर प्रगत झालें आहे; त्याच्या पृष्ठवर्ती जाणिवेंत जे विकार, व्यवहार घडतात ते अहम् चे आहेत, असें ज्ञान त्याला होतें. हा अहम् मनाच्या पृष्ठवर्ती विकारांचा ज्ञाता, कर्ता, भोक्ता असतो. या अहम् संबंधानें देहधारी मनाची अशी कल्पना असते कीं, तो जाणिवेच्या विकारांशीं अंशत: एकरूप असतो. अंशत: तो या विकारांपलीकडे असतो, विकारातीत असतो. हा अहम् शाश्वत आहे, अविकार्य आहे, अशीहि मनाची त्याच्यासंबंधानें कल्पना होते. बुद्धीची मदत घेऊन -- वस्तूमध्यें भेद करणें व भिन्न वस्तूंना संघटित करणें, हें जिचें काम आहे, अशा बुद्धीची मदत घेऊन -- मन असें ठरवूं शकतें कीं, जाणिवेचे विकार हेच त्याच्या खऱ्या आत्मगत अनुभवाचे घटक आहेत. आत्मा सारखा बदलत आहे, हाच त्याचा खरा आत्मानुभव आहे. तदितर जें कांहीं, ती मनाची मिथ्या कल्पना आहे. अर्थात् शाश्वत अस्तित्व म्हणून मुळांत कांहीं नाहीं. जें आहे तें नित्य बदलणारें तत्त्व आहे; नित्य बदलण्याची क्रिया आहे. उलटपक्षीं, त्याच बुद्धीच्या आधारानें मन असाहि निर्णय घेऊं शकतें कीं, त्याचा आत्मा शाश्वत अस्तित्वरूप आहे. या शाश्वत आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव हाच त्याचा आत्मानुभव आहे; आणि जाणिवेचा विकार, व्यवहार सर्व खोटा आहे, विकार, व्यवहार आहे, ही गोष्ट प्रथम तें कबूलच करीत नाहीं. अविकार्य आत्माच फक्त अनुभवास येतो असा त्याचा आग्रह असतो -- पण विकाराची दखल त्याच्या जाणिवेला घ्यावी लागली, तर मन आणि इंद्रिय यांनी उभा केलेला तो मिथ्या पसारा आहे किंवा तो कनिष्ठ अस्तित्वाचा अर्थशून्य देखावा आहे, असा तें निर्णय घेतें.

      विभक्तपणावर आधारलेली अहम्‌संवेदना ज्याचा पाया आहे तें आत्मज्ञान पूर्ण असूं शकत नाहीं. कोणतेंच ज्ञान अहम् च्या एकट्या पायावर किंवा प्रमुखतः या पायावर उभारलें गेलें, तर तें पूर्ण होऊं

पान क्र. ३९८

 

शकत नाहीं, अहम्‌संवेदनेची प्रतिक्रिया, हा ज्या ज्ञानाचा पाया केला जाईल, तें देखील निश्चितपणें पूर्ण होऊं शकत नाहीं. अहम्‌संवेदनेवर आधारलेलें ज्ञान वरवरच्या (पृष्ठवर्ती) मानसिक व्यवहाराचें असतें, वरवरच्या मानसिक अनुभवांचें असतें. या पृष्ठवर्ती मानसिक व्यवहारांचे पाठीमागें जे जाणिवेचे व्यापार फार मोठ्या प्रमाणांत चाललेले असतात, ते सर्व या अहम् च्या ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर असतात. अर्थात् हें अहम् चें ज्ञान, त्या संबंधांत अज्ञानच असतें. दुसरी गोष्ट, व्यक्ति आणि व्यक्तीचे अनुभव यांत जें कांहीं अस्तित्वाचें आणि त्याच्या पोटी होणाऱ्या रचनांचें, घटनांचें ज्ञान, मर्यादित ज्ञान असेल, तेवढेंच अहम् च्या ज्ञानात येऊं शकतें. या अहम्‌ला त्याचेखेरीज जें जग, तें सर्व ''अनात्मा'' असतें. सर्व जग स्वतःच्या अस्तित्वाचा एक भाग आहे, ही प्रतीति अहम्‌ला नसते, त्याची जाणीव जगाशीं एकरूप नसते, अलग स्वतंत्र असते; आणि जग स्वतःबाहेर, या जाणिवेबाहेर असून, तें स्वतःच्या जाणिवेचा विषय म्हणून स्वत: समोर येतें, अशी अहम्‌ची कल्पना असते. व्यक्तीला (अहम्‌ला) स्वतःच्या अस्तित्वाचें आणि त्याच्या पोटीं घडणाऱ्या घटनाचें जसें प्रत्यक्ष ज्ञान होतें, तसें तें जगाच्या विशाल अस्तित्वाचें आणि त्या अस्तित्वाच्या पोटी घडणाऱ्या विशाल निसर्गगत घटनांचें होत नाही अर्थात् अहम्‌चें या बाबतींत अज्ञानच विशाल असतें, ज्ञान अगदीं मर्यादित असते. विशाल अज्ञानाच्या विस्तारामध्यें अगदीं मर्यादित ज्ञान वर डोकें काढतें, ही अहम्‌च्या 'आत्मज्ञानाची' खरी स्थिति असते. तिसरी गोष्ट, अस्तित्व आणि अस्तित्वाच्या पोटीं, त्यांतून घडल्या जाणाऱ्या रचना या दोघांचा खरा संबंध काय, हें पूर्ण ज्ञानानें ठरविलें जात नाहीं, तर अज्ञानाच्या बंधनांत, मर्यादित ज्ञानाच्या बंधनात राहून ठरविलें जातें. याचा परिणाम असा होतो कीं, मन अंतिम ज्ञानासाठीं तळमळीनें पाउलें टाकीत असतां, जो निर्णय घेतें त्यानें अस्तित्वाची एक बाजू समूळ बाजूला फेंकली जाते. हा निर्णय घेतांना मन अर्थात् बुद्धीचा आश्रय घेतें. वस्तूंचें विघटन आणि संघटन करण्याचें बुद्धीचें काम असल्यानें आणि इच्छाशक्तीही बुद्धीप्रमाणें विघटन-संघटन-वादी असल्यानें, समोरचे अनुभव आणि समोरच्या शक्यता यांच्या आधारावर बुद्धि व इच्छाशक्ति आपलें वैशिष्ट्य खर्चून मनाला अस्तित्वाची एक बाजू अजिबात फेंकून देण्याचा निर्णय घेण्यांत मदत करतात. स्वतंत्र अहम्‌च्या पायावर आत्मज्ञान उभें करण्यामध्यें वर सांगितलेल्या

पान क्र. ३९९

 

अडचणी असल्यामुळें, या प्रयत्नाचा जो एकंदर परिणाम घडून येतो, तो आम्हीं यापूर्वीं उल्लेखिलेलाच आहे. मनोमय पुरुष एकतर प्रत्यक्ष आत्म्याच्या जाणिवेंत स्वतःला मग्न करून घेतो आणि या आत्म्याच्या पोटांत होणाऱ्या नामरूपात्मक घटना सर्वस्वी अंगाबाहेर टाकतो किंवा तो या नामरूपात्मक घटनांच्या संसारांत स्वतःला मग्न करून घेतो आणि स्थायी आत्मजाणिवेला सर्वस्वी अंगाबाहेर टाकतो. वस्तुत: आत्मा आणि नामरूपात्मक विश्व या दोन्ही बाजू मनाला स्वाभाविक आहेत. पण अज्ञानाच्या अवस्थेंत आत्मवादी मन, विश्वाला असत्य ठरवितें; आणि विश्ववादी मन आत्म्याला, ईश्वराला, असत्य ठरवितें, मनाचा खेळ ठरवितें. विश्व हें आत्म्याचें प्रभावी परिणामकारक स्वप्न आहे, असें आत्मवादी मन म्हणतें. आत्मा, ईश्वर हा परिणामकारक असा मनानें उठविलेला भास आहे, आभास आहे, असें विश्ववादी मन म्हणतें. विश्व निरपेक्ष-सत्य ठरलें कीं आत्मा वा ईश्वर हा असत्य किंवा सापेक्ष-सत्य ठरतो. आत्मा वा ईश्वर निरपेक्ष-सत्य ठरला कीं विश्व असत्य किंवा सापेक्ष-सत्य ठरतें. अस्तित्वाच्या या दोन अंगांमधील खरा संबंध आमच्या मर्यादित ज्ञानाच्या बुद्धीला कळून येणें अशक्य असतें. या बुद्धीला अस्तित्वाचीं हीं दोन अंगें विसंवादी, नित्य विरोधी अशींच दिसावयाचीं. जाणिवेचा विकास जो चालला आहे, त्याचा अंतिम हेतु  (अंतिम साध्य) पूर्ण ज्ञान हा आहे -- आत्मा आणि वस्तुजात यांचें पूर्ण ज्ञान, समग्र सत्य, जाणिवेच्या विच्छेदनांत, जाणिवेचा एक भाग जवळ करून दुसरा भाग दूर फेंकून देण्यांत, असूं शकत नाहीं. निश्चल आत्मा हेंच एक सत्य असेल, तर विश्वाच्या अस्तित्वाची शक्यता अशक्य होते. चंचल निसर्ग हेंच एक सत्य असेल, तर विश्वगत घटनांचें चक्र शक्य होईल. पण अचेतनांतून चेतनाचा विकास जो होत आहे, त्या विकासाला त्या निसर्गगत घटनाचक्रांत कांहीं आत्मतत्त्वाचा आधार असणार नाहीं. मानवाची मर्यादित जाणीव स्वतःच्या मर्यादा उल्लंघून पार होण्याची जी तीव्र स्थायी आकांक्षा धरीत आहे, स्वतःच्या अस्तित्वाचें समग्र ज्ञानयुक्त सत्य आणि सर्व अस्तित्वाचें पूर्ण ज्ञान हस्तगत करण्याची जी तीव्र स्थायी आकांक्षा धरीत आहे, त्या आकांक्षेला अवश्य असलेला आत्मतत्त्वाचा आधार, निसर्गगत घटनाचक्रांत असणार नाहीं. या विचारणेचा इत्यर्थ हा कीं, आत्मा आणि निसर्ग (विश्व) दोनहि वस्तू सत्य आहेत, हें पूर्णज्ञान होय.

पान क्र. ४००

 

      अज्ञानाचें साम्राज्य आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वांत निष्कंटकपणें चालतें, ज्ञानासाठीं आम्हांला आमच्या अंतरांत जावयास हवें, आंतरिक दृष्टीनें बघण्यास हवें. पृष्ठावर, बाहेर जें कांहीं साकार झालें आहे, तें आमच्या महान् गुप्त अस्तित्वाचें लहान प्रमाणावरचें चित्र आहे. निश्चल आत्मा आमच्या अंतरांत आहे. तो फार खोलांत आहे. पृष्ठावर त्याचें ज्ञान होतें, तें केवळ अंतःस्फूर्त अशी जी आत्मसंवेदना, आत्म्याच्या अस्तित्वाची संवेदना, त्या संवेदनेनें होतें. मनोमय, प्राणमय, अन्नमय अहम् जो आम्हांला प्रतीत होतो, त्या अहम्‌द्वारां आत्म्याची खोटी कल्पना आमच्या पुढें ठेवली जाते. या त्रिविध अहम्‌च्या उलाढाली जेव्हां सर्व बंद कराव्या, मन जेव्हां अगदीं शांत करावें तेव्हांच निश्चल आत्म्याचें दर्शन आम्हांला घडूं शकतें. आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वाला जशी अक्रिय साक्षी-अहम्‌ची बाजू असते, तशी त्याला सक्रिय प्रकृतीची बाजू असते. आमच्या गुप्त प्रकृतीच्या अंतरांत खोल असलेल्या बिऱ्हाडांत ज्या महान् सक्रिय वस्तू आहेत, त्यांचें लहान प्रमाणावरचें चित्र आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वाच्या सक्रिय अंगांत दिसतें. आमची पृष्ठवर्ती स्मृति, पृष्ठवर्ती कल्पनाशक्ति या अंतर्वर्ती स्मृति आणि कल्पनाशक्ति यांच्याहून फारच लहान आहेत. अंतर्वर्ती स्मृति आम्हांला घडणारा विश्वविषयक अनुभव सर्वचा सर्व घेऊन सांठवून ठेवते. वरच्या मनाच्या दृष्टींतून जें निसटतें, या मनाला जें समजतहि नाहीं तें देखील सर्व, अंत:स्मृतीच्या भांडारांत सांठविलेलें सांपडतें. या आंतील भांडारांतून कांहीं थोड्या फुटकळ गोष्टी बाहेर ओढून काढणारी, तुटक तुटक अशी परिणामशून्य क्रिया म्हणजे बाह्‌य पृष्ठवर्ती स्मृति होय. ही बाह्य पृष्ठवर्ती कल्पनाशक्ति, जाणिवेची जी अंतर्वर्ती चित्रनिर्माणशक्ति फार परिणामकारक आणि फार व्यापक अशी आहे, तिच्या चित्रांतून कांहीं थोडीं चित्रें बाहेर घेऊन येत असते. आमचें पृष्ठवर्ती विकासाचें जें कार्य चाललें आहे तें, अंतर्वर्ती मन, प्राण, सूक्ष्म भौतिक द्रव्य घडवून आणीत आहे. अंतर्मनाच्या वस्तुग्रहणशक्ती बाह्य मनाहून फार सूक्ष्म आणि व्यापक असतात. अंतःप्राणशक्ति बाह्य प्राणशक्तीहून फार अधिक कर्तृत्वशील असतें. सूक्ष्म देहाचें सूक्ष्म भौतिक द्रव्य, संस्कार-क्षमतेंत बाह्य देहद्रव्याहून खूप अधिक सूक्ष्मता आणि व्यापकता धारण करतें आणि हें असें आंतरिक मन, प्राण, शरीर, बाह्य मन-प्राण-शरीराचा विकास आपल्या सामग्रीच्या व सामर्थ्याच्या आधारावर घडवून आणीत

पान क्र. ४०१

 

आहेत. मनाच्या आंत चाललेले गुप्त व्यापार, आंतरिक मन-प्राण-शरीरांचें गुप्त व्यापार, यांना खरा आधार आंतील पुरुषाचा, आंतरात्म्याचा आहे. आमचें व्यक्तित्व वस्तुत: या अंत:पुरुषावर आधारलेलें आहे. बाहेर अहम् हा ''आत्म्याचें'' काम करतो. पण तो खरा आत्मा नव्हे, त्या आत्म्याचा मुनीम आहे. आमचा आत्मविषयक अनुभव, आमचा विश्वविषयक अनुभव हा गुप्त आंतरात्मा स्वत:चे ठिकाणीं स्वत:च्या आधारावर एकत्र करून धारण करतो. निसर्गानें वरच्या कार्यासाठीं पृष्ठभागावर घडून तयार केलेली एक रचना, हें मानसिक, प्राणिक, शारीरिक बाह्य अहम्‌चें खरें स्वरूप आहे. आमचा आत्मा आणि आमची प्रकृति सामग्र्यानें आम्ही पाहूं, वर पृष्ठभागावर आणि आंत खोल असलेलें आमचें ''आत्मस्वरूप'' आणि आमच्या प्रकृतीचें रूप सामग्र्यानें आम्ही पाहूं, तेव्हांच आम्हांला ज्ञानाचा खरा पाया सांपडतो, सांपडेल.

पान क्र. ४०२

प्रकरण १० वें

अभेद-अधिष्ठित ज्ञान आणि भेद-अधिष्ठित ज्ञान

 

      ते आत्म्याचे (स्वत:चे) ठिकाणीं आत्मा (स्वतःला) आत्म्यानें (स्वत:) पाहतात.

- गीता ६.२०

 

      जेथें द्वैत असेल तेथें एक दुसऱ्याला पाहतो, त्याचें ऐकतो, त्याला स्पर्श करतो, त्याचा विचार करतो, त्याचें ज्ञान मिळवितो. पण जेथें सर्व मीच (आत्माच) आहे असें पाहणारा पाहतो, तेथें याहून वेगळें सर्वाचें ज्ञान कसलें मिळवावयाचें आणि तें कोणत्या साधनानें मिळवावयाचें ? आत्म्याच्या स्वतःच्या प्रकाशानेंच, हें जें सर्व, त्याचें ज्ञान आत्म्याला (स्वतःला) होतें.

- बृहदारण्यक ४.५.१५

 

      आत्म्याचे (स्वतःचे) ठिकाणीं हें 'सर्व' न पाहतां तें इतरत्र आहे असें जो पाहतो, त्याचा 'सर्व' त्याग करतें. कारण हें जे 'सर्व' आहे तें ब्रह्म (आत्मा) आहे. सर्व भूतें आणि हें 'सर्व' जें कांहीं आहे तें आत्माच आहे.

- बृहादारण्यक ४.५.७

 

      स्वयंभू परमात्म्यानें देहाला इंद्रियांचीं द्वारें, बाहेर पाहणारीं अशीं, पाडलीं; म्हणून कोणीहि पाहणारा, बाहेर पाहतो, बाहेरच्या गोष्टी पाहतो; स्वतःच्या अंतरांत पहात नाहीं; अमृतत्व इच्छिणारा कोणी विरळा बुद्धिमान ज्ञानी आपली दृष्टि आंत वळवितो; त्याला आत्मा (परमात्मा) प्रत्यक्ष दिसतो.

- कठ. उप. ४.१

पान क्र. ४०३

     

      पाहणाऱ्याच्या दृष्टीचा लोप होत नाहीं, बोलणाऱ्याच्या बोलण्याचा.... ऐकणाऱ्याच्या ऐकण्याचा... जाणणाऱ्याच्या जाणण्याचा... लोप होत नाहीं, कारण पाहणें, बोलणें, ऐकणें, जाणणें या शक्ती अविनाशी आहेत; पण स्वतःहून वेगळा दुसरा कोणी, दुसरें कांहीं तेथें अस्तित्वांत नसतें. तेथें कोणी जे (ज्याला) पाहणार ज्याशीं बोलणार, ज्याचें ऐकणार, ज्याला (जें) जाणणार, तें (तो) सर्व तोच स्वत: असतो, स्वतःहून वेगळें तेथें कांहीं नसतें, स्वतःहून वेगळें तेथें कोणी नसतें.

-- बृहादारण्यक उप० ४.३.२३ ते ३०

 

      आमची पृष्ठवर्ती ज्ञानक्रिया, आमच्या मनाच्या मर्यादांनीं संकोचित झालेला असा दृष्टिकोन व दर्शनक्रिया -- आमचा आत्मा, आमच्या आंतरिक हालचाली, आमच्या बाहेरचें जग, त्या जगांतील वस्तू आणि घटना यांजकडे पाहण्याचा आमच्या मनाचा मर्यादित दृष्टिकोन व दर्शनक्रिया -- अर्थात् आमची पृष्ठवर्ती ज्ञानक्रिया कोणत्या घटकांची बनली आहे तें पाहिल्यास असें दिसून येतें कीं, ज्ञानसंपादनाचे जे चार प्रकार आहेत त्या चारहि प्रकारांतून त्यांचे घटक आमच्या पृष्ठवर्ती ज्ञानक्रियेंत कमीअधिक प्रमाणांत आले आहेत. अगदीं मूळ पायाभूत ज्ञानमार्ग, वस्तुजातांतील गुप्त आत्म्याचा स्वभावसिद्ध ज्ञानमार्ग, 'अभेदानें, तादात्म्य दृष्टीनें ज्ञान संपादन' हा आहे. दुसरा ज्ञानमार्ग, हा मूळ ज्ञानमार्गांतून निघालेला दुग्यम दर्जाचा ज्ञानमार्ग आहे; प्रत्यक्ष संपर्क या साधनानें या मार्गांत ज्ञानसंपादन केलें जाते; याच्या मुळाशीं हा मार्ग गुप्त अभेदाधिष्ठित ज्ञानाशी जोडलेला असतो. केव्हां केव्हां त्या अभेदाधिष्ठित गुप्त ज्ञानातूनच याचा आरंभ असतो, पण वास्तवांत हा मार्ग त्याच्या मुळापासून तोडलेला असतो; म्हणून या मार्गांतील ज्ञानक्रिया सामर्थ्यवान् असली तरी ती पूर्ण असत नाहीं; अपूर्ण, अपुरी असते. तिसरा ज्ञानमार्ग : या मार्गांत निरीक्षणाच्या विषयभूत वस्तूपासून निरीक्षक वेगळा झालेला असतो, दूर झालेला असतो. या मार्गांत ज्ञान संपादन करणारा, वस्तूचें ज्ञान दुरून संपादन करून घेतो. पण यांत प्रत्यक्ष संपर्काचा या मार्गाला आधार असतो. अंशत: तादात्म्याचा, अभेदाचाहि आधार केव्हां केव्हां असतो. चौथा ज्ञानमार्ग : या मार्गांत ज्ञान संपादन करणारा, ज्ञान विषयापासून

पान क्र. ४०४

 

पूर्णपणें दुरावलेला असतो. या मार्गानें मिळविलेलें ज्ञान, पूर्णतया भेदाधिष्ठित असतें. यांत ज्ञानविषयाशी प्रत्यक्ष संपर्क नसतो. कांहींतरी यंत्राच्या द्वारां, साधनांच्या द्वारां अप्रत्यक्ष संपर्क घडविण्याची तरतूद या मार्गांत असते. हें ज्ञान साधनांच्या द्वारां खटपट करून मिळवावयाचें असतें. तरी पण आमच्या अंतरांत अगोदरच जें ज्ञान असतें तें त्यांतील कमीअधिक भाग वर काढणें किंवा आम्हांला समजेल अशा  रीतीनें आमच्यापुढें मांडणें, हेंच काम या मार्गांत केलें जातें. अर्थात् हें काम जाणीवपूर्वक केलें जात नाहीं. तेव्हां निसर्गाच्या ज्ञानसंपादन-पद्धती चार आहेत : तादात्म्याची किंवा अभेदाची पद्धति, प्रत्यक्ष संपर्काची पद्धति, निकटच्या प्रत्यक्ष संपर्काची पद्धति, दुरूनच्या भेदाधिष्ठित प्रत्यक्ष संपर्काची पद्धति.

      ज्ञानसंपादनाचा पहिला मार्ग, त्याच्या शुद्ध स्वरूपांत पृष्ठवर्ती मनाच्या ज्ञानसंपादन-क्रियेंत उपयोगिलेला जो सांपडतो तो, आमच्या स्वत:च्या सारभूत अस्तित्वाचें ज्ञान आम्हांला जें होतें त्याच्या संबंधांत सांपडतो. कारण हें ज्ञान आम्हांला आमच्या तात्विक अस्तित्वाच्या प्रत्यक्ष जाणिवेनेंच होत असतें. या ज्ञानांत आत्मा आणि अस्तित्व या शुद्ध सत्य वस्तूखेरीज दुसरी कांहींहि वस्तु असत नाहीं. पृष्ठवर्ती मनाच्या ''मी'' ला ''मी आत्मा आहे'' हें ज्ञान तादात्म्याच्या, अभेदाच्या पद्धतीनें होतें. विश्वांतील दुसऱ्या कोणत्याहि वस्तूचें ज्ञान पृष्ठवर्ती मनाला या प्रत्यक्ष जाणिवेच्या अभेदाच्या पद्धतीनें होत नाहीं. पण आमच्या आंतरिक जाणिवेची रचना आणि हालचाल या बाबतींत आम्हांला जें ज्ञान होतें, त्यांत अभेदनिष्ठ ज्ञानाचा कांहीं भाग असतो. आमच्या जाणिवेच्या व्यापारांत, आम्ही स्वत:ला कळत न कळत फेंकून गुंतवू शकतो; तादात्म्यानें गुंतवूं शकतो, अभेदानें गुंतवूं शकतो. उदाहरणार्थ क्रोधाची उसळी आली म्हणजे क्षणभर कां होईना आमची सर्व जाणीव जणु क्रोधरूप होते. प्रेम, दु:ख, आनंद या भावनाहि आम्हांला अल्प काळ सर्वथा व्यापून टाकूं शकतात. विचारदेखील आम्हाला सर्वथा व्यापून टाकू शकतो; इतका कीं, विचार करणारा स्वत:ला विसरतो आणि विचारविषयाशीं, विचारक्रियेशीं पूर्णत: एकरूप होतो. सामान्यत: आमच्या अस्तित्वांत व जाणिवेंत एकाच वेळीं दुहेरी क्रिया घडते. आमचा एक भाग विचार किंवा भावना बनतो आणि आमचा दुसरा भाग, विचार किंवा भावनारूप झालेल्या पहिल्या भागाला कमीअधिक चिकटून राहून

पान क्र. ४०५

 

त्याचेबरोबर वाटचाल करतो, किंवा त्याचे मागोमाग अगदीं चिकटून चालतो आणि निकटच्या प्रत्यक्ष संपर्कानें त्याचें स्वरूप जाणून घेतो. अर्थात् दुसरा भाग पहिल्याशीं तादात्म्य पावत नाहीं किंवा त्याच्या व्यापारांत गुरफटून स्वतःला सर्वथा विसरून जात नाहीं.

      आतांच वर्णिलेलें तादात्म्य किंवा अभेद आणि अंशत: भेद व अंशत: अभेद शक्य होण्याचें कारण आमच्या भावना वगैरे या आमच्या अस्तित्वांत घडणाऱ्या घटना असतात. आमच्या मनोद्रव्याचे आणि मनाच्या शक्तीचे विशेष आकार-विकार असतात. आमच्या प्राणिक द्रव्याचे आणि शक्तीचे विशेष आकार-विकार असतात. या घटना, हे आकार-विकार, आमच्या अस्तित्वाचा एक भाग, एक लहान भाग असतात, म्हणून त्यांच्याशीं आम्हीं एकरूप व्हावें असें बंधन आमच्यावर असत नाही, आम्ही या घटनांपासून अलग राहूं शकतो. आमचें अस्तित्व आणि त्यांचें तात्पुरतें अल्प काळ टिकणारें साकारत्व अलग करूं शकतो. त्या साकार सविकार अस्तित्वाचें निरीक्षण करणें, त्याचें नियंत्रण करणें, तें संमत करणें किंवा त्याच्या आविष्काराला प्रतिबंध करणें या गोष्टी आम्ही करूं शकतों. याप्रकारें आंतरिक भेद दाखवून, मानसिक किंवा आत्मिक अलगपणा ठेवून, आम्ही मानसिक प्राणिक प्रकृतीचा आमच्या अस्तित्वावर मुळींच किंवा अंशत: तरी जोर, अधिकार, अंमल चालूं नये, अशी व्यवस्था करूं शकतों; आणि साक्षीची, ज्ञात्याची, शासकाची भूमिका स्वत: घेऊं शकतो. याप्रमाणें आमच्या अंतरांत घडणाऱ्या हालचालींचें दुहेरी ज्ञान आम्हांला असतें. आंतरिक द्रव्य आणि त्याची क्रियाशक्ति यांचें तादात्म्यनिष्ठ ज्ञान, अगदीं निकटचें ज्ञान आम्हांला असतें. आमच्या बाहेर चाललेल्या घटनांचें ज्ञान आम्हांला असतें. आमच्या बाहेर चाललेल्या घटनांचें, आम्हांला सर्वस्वीं ''अनात्मभूत'' ''स्वेतर'' असलेल्या घटनांचें भेद-अधिष्ठित, वस्तुनिष्ठ ज्ञान इतके निकटचें, अंतरंग-व्यापक, असूं शकत नाहीं; या अभेदनिष्ठ ज्ञानाबरोबर, अलगपणें निरीक्षण करण्यानें होणारें ज्ञान आम्हांला असतें; निरीक्षणासाठीं अलग होतां येते व निरीक्षणविषयाशीं प्रत्यक्ष संपर्कहि ठेवतां येतो. या अलगपणाच्या भूमिकेमुळें निसर्गशक्तीच्या व्यापारांत आम्ही अगतिकपणें बुडत नाहीं आणि आम्हांला आमच्यासमोर दिसणारी आंतरिक हालचाल आमच्या अस्तित्वाच्या शेष भागाशीं आणि विश्वाच्या अस्तित्वाशीं योग्यप्रकारें संबंधित करतां येते. हा अलगपणा आम्हांला

पान क्र. ४०६

 

शक्य झाला नाहीं, तर निसर्गरूप आत्मा -- घटना, चंचलता, क्रिया या स्वरूपाचा नैसर्गिक आत्मा -- आमच्या अस्तित्वरूप आणि प्रभुत्वमय ज्ञानरूप आत्म्याला आपल्या अंकित करून टाकतो आणि आम्हांला निरीक्षण-विषयभूत आंतरिक हालचाल अगदीं आंतून जवळून समजली, तरी आमचें तिच्यावर शासन चालत नाहीं, तिच्यावर आमची हुकमत चालण्याइतकी ती पूर्णतया आम्हांला कळत नाहीं. ही आपत्ति टाळावयाची तर निरीक्षण-विषयभूत हालचालींशीं आम्हीं एकरूप होणें आणि त्याबरोबर आमच्या आंतरिक अस्तित्वाच्या शेष भागाशींहि आम्हीं एकरूप होणें हें दुहेरी तादात्म्य आम्हांला साधावयास हवें. अर्थात् आमच्या अस्तित्वाच्या पोटीं जी भावनेची वगैरे लाट उठेल, तिच्यांत बुडी मारणें आणि त्याबरोबर मनानें तिचें निरीक्षक, साक्षी, नियंत्रक बनणें या दोन गोष्टी आम्हांला साधावयास हव्या. पण हें साधणें सोपें नाहीं; कारण आमची जाणीव विभागलेली आहे : प्राणिक जाणीव आणि मानसिक जाणीव असे तिचे दोन भाग पडले आहेत. आमची प्राणिक प्रकृति -- बळ, वासना, तृष्णा, क्रिया यांनीं युक्त अशी आमची प्राणिक प्रकृति -- आमच्या मानसिक प्रकृतीवर कुरघोडी करूं पाहते; तिला आपल्या स्वत:च्या यशाखालीं घालूं पाहते आणि मनाला हें दास्य टाळावयाचें असतें, उलट, प्राणावर यंत्रणा करावयाची असते. मनाला हें शक्य व्हावयास प्राणापासून स्वत:चा अलगपणा काळजीनें राखावा लागतो; प्राणाशीं एकरूप होण्याची मनाची तयारी असेल, तर तें आपलें स्वत्व घालवून बसतें. प्राणिक हालचालींत बुडून, त्या हालचालींबरोबर फरफटलें जातें. तरीपण, प्राण आणि विचार असा भेद करून आम्हांला प्राणाशीं आमच्या अस्तित्वाच्या एका भागानें आणि विचाराशीं दुसऱ्या भागानें एकरूप होतां येतें. (या दुहेरी तादात्म्यव्यवहारांत समतोलपणा राखणें हें अवघड असतें हें मात्र खरें) एखादी तीव्र भावना आमच्या ठिकाणीं उठली, तर त्या भावनेचा अनुभव मिळावा या उद्देशानें विचारशील आत्मा तिजकडे पाहतो आणि तिची क्रिया चालूं देतो; किंवा असेंहि घडूं शकतें कीं, प्राणिक निकडीमुळें विचारमय आत्म्याला त्या भावनेला अनुमति द्यावीच लागते. दुसरा प्राणमय आत्मा, ही जी निसर्गाची लहर आमच्यामध्यें उसळते तिला धरून तिजबरोबर वाहत जाण्याचें पसंत करतो. या आमच्या आत्मगत आंतरिक अनुभवांत आमच्या जाणिवेचें असें क्रियामय क्षेत्र सांपडतें कीं, जेथें तीन प्रकारच्या

पान क्र. ४०७

 

ज्ञानक्रिया एकत्र भेटतात. एक प्रकारचें तादात्म्यनिष्ठ ज्ञान, प्रत्यक्ष संपर्कनिष्ठ ज्ञान आणि यांजवर अवलंबित असे भेदनिष्ठ ज्ञान.

      विचार करणारा आणि विचाराची क्रिया यांना अलग ठेवणें हा, विकार आणि विकारवान यांना अलग ठेवण्याच्या व्यवहाराहून अधिक अवघड व्यवहार आहे. सामान्यत: विचारकर्ता त्याच्या विचारांत विलीन किंवा विचारप्रवाहांत पकडला जाऊन त्या प्रवाहाबरोबर वाहवला जातो, विचारप्रवाहाशीं तो एकरूप होतो; विचार करतांना त्याचक्षणीं किंवा विचारक्रिया चालूं असतांनाच ती निरीक्षिणें, विचार करणाराला सामान्यत: साधत नाहीं. विचारक्रिया पूर्ण झाल्यावर तिच्याकडे तो वळून पाहूं शकतो. या कामांत स्मृतीची मदत त्याला घ्यावी लागते. केलेल्या विचारांतील गुणदोष पाहून मग पुढें पाऊल टाकावयाचें, असें त्यानें ठरविल्यास, या गुणदोष-परीक्षणासाठींहि तो झालेल्या विचाराकडे वळूं शकतो. तथापि विचार करणें आणि विचारक्रियेला मार्गदर्शन करणें या दोन क्रिया अंशत: समकालीन होऊं शकतात. जेव्हां विचार करणाराला विचार सर्वथा व्यापून टाकणारा नसेल, तेव्हां विचार करणारा संवयीनें, अभ्यासानें मनाच्या शक्तीपासून (विचारक्रिया करणाऱ्या शक्तीपासून) अलग राहून, प्रत्येक विचारक्रियेच्या वेळीं आपल्या मनोमय आत्म्याच्या बैठकींत पाऊल मागें घेऊन उभें राहावयाची शक्ति कमावील, तर विचार करणें आणि विचारक्रियेला मार्गदर्शन करणें या दोन क्रिया सर्वथा आणि पूर्णतया समकालीन होऊं शकतील. विचाराच्या वेळीं पाऊल मागें घेऊन, मनोमय व आत्म्यांत बैठक घेण्याची शक्ति कमावली, म्हणजे विचाराच्या व्यापारांत आम्ही बुडून जात नाहीं. विचाराच्या प्रक्रियेचा अंधुक भास होणें यापलीकडे आम्ही जाऊं शकतो. आम्ही मनोमय दृष्टीनें ही प्रक्रिया पाहूं शकतो. विचार उद्‌भवतात कसे, त्यांची गतिप्रगति कशी होत जाते हें आम्ही पाहूं शकतो; आणि कांहीं अंशीं मूल्यविषयक शांत, तटस्थ विचारानें, कांहीं अंशीं विचारावर विचार करण्याच्या प्रक्रियेनें, आमच्यासमोर चाललेल्या विचारव्यापाराचें मूल्यमापन करतो; आणि त्यावर बरावाईट वगैरे न्यायसंमत निर्णय देतो. आमचें विचारव्यापारांशीं तादात्म्य कशाहि प्रकारचें होवो, येवढें खरें कीं, आमचें आंतरिक व्यापारांचें ज्ञान दोन अंगांचें बनलेलें असतें. एक अंग भेदाधिष्ठित असतें; दुसरें, प्रत्यक्षसंपर्क-अधिष्ठित असतें. आम्ही विचारव्यापारांपासून स्वत:ला अलग करतो, तेव्हां देखील

पान क्र. ४०८

 

त्या व्यापाराशीं निकटचा संपर्क आम्ही कायम ठेवतों. नेहमीं प्रत्यक्ष संपर्कावरच आमचें ज्ञान अधिष्ठित असतें. अभेदाचा, तादात्म्याचा, थोडाबहुत अंश असलेली प्रत्यक्ष जाणीव, हीच आमच्या आंतरिक व्यापारांच्या ज्ञानाची जन्मदात्री असते, पायाभूत बैठक असते. चिकित्सक मन (बुद्धि) आणि क्रियाशील गतिशील मन असे आमच्या मनाचे जे दोन भाग पडतात, त्यांचा व्यवहार वेगळावेगळा होतो. बुद्धि आंतरिक व्यापार पाहून, त्यांचें ज्ञान करून घेतांना, अलग होते; सामान्यत: भेदाची वृत्ति तिच्या ठिकाणीं अधिक असते, असावी लागते. गतिशील मनाची पद्धति वेगळी असते. त्याचे ठिकाणीं आंतरिक व्यापारांशीं चिकटून जाण्याची वृत्ति अधिक असते, असावी लागते. हें क्रियाशील मन, आमच्या संवेदना, आमच्या भावना, वासना यांच्याशीं मिळून-मिसळून जाण्याचा क्रम ठेवतें. तरीपण या संयोगाचा व्यापार चालूं असतां, विचारशील मन (बुद्धि) मध्यें पडून अलगपणें त्या संयोगाचें मिळण्यामिसळण्याचें निरीक्षण करूं शकतें, आणि क्रियाशील मनावर व प्राणिक, शारीरिक हालचालीवर नियंत्रण ठेवूं शकतें. आमच्या भौतिक अस्तित्वाच्या निरीक्षण करण्यासारख्या सर्व हालचाली, आंतरिक व्यापारांप्रमाणेंच पाहिल्या जातात आणि नियंत्रित केल्या जातात. निकट संपर्काचा मार्ग आणि अलग अलग राहाण्याचा मार्ग या दोन्ही मार्गांचा उपयोग या बाबतींतहि केला जातो. आमचें शरीर आणि त्याच्या हालचाली, आमच्या शरीराचा अविभाज्य भाग म्हणून निकट संपर्कानें आम्ही जाणतो आणि तरीहि मन या हालचालींपासून व शरीरापासून अलग राहून त्यांजवर अलगपणें नियंत्रण ठेवूं शकतें. आमचें स्वत:चें अस्तित्व आणि आमची प्रकृति, यासंबंधीचें आमचें ज्ञान सामान्यत: वर सांगितलेल्या ज्ञानविषयक स्थितीमुळें बऱ्याच अंशीं प्रत्यक्षतेचें, निकटतेचें, अभेदाचें असतें. असें असलें तरी, तें अपूर्ण असतें, बऱ्याच अंशी वरवरचें असतें, ही गोष्ट विसरून चालणार नाहीं. आमच्या बाहेर असणाऱ्या जगाच्या आम्हांला होणाऱ्या ज्ञानांत वरील ज्ञानाचा निकटपणा वगैरे असत नाहीं. जगाचें आणि त्यांतील वस्तूंचें आणि व्यापारांचें जें ज्ञान आम्हांला होतें, त्यांत प्रत्यक्षपणा असत नाहीं. बाह्य विश्व हा आमच्या अस्तित्वाचा भाग आहे, असें आम्हांला भासत नाहीं. आमची जाणीव या बाह्य वस्तूंशीं प्रत्यक्ष संपर्क ठेवूं शकत नाहीं. इंद्रियें हें साधन वापरून, आम्हांला बाह्य विश्वाचें ज्ञान करून घ्यावें

पान क्र. ४०९

 

लागतें. अर्थात् हें इंद्रियरूपी साधन, विश्वाचें प्रत्यक्ष, निकटचें ज्ञान आम्हांला देऊं शकत नाही. विश्वाचें एक चित्र तें आमच्यापुढें ठेवतें. हें चित्र विश्वाचें ज्ञान करून घेण्यासाठी एक प्राथमिक पुरावा म्हणून, आम्हांला उपयोगी पडतें.

      बाह्य वस्तूंच्या, ज्ञानाच्या संबंधांत आमचा पाया सर्वस्वी भेदनिष्ठ असतो. बाह्यविषयक ज्ञानाची प्रक्रिया, त्याची साधनसामुग्री, सर्वकांहीं अप्रत्यक्ष-ज्ञान-साधक असतें. बाह्य वस्तूंशीं आम्ही एकात्म होत नाहीं. दुसऱ्या मनुष्यांशी देखील आम्ही एकात्म होत नाहीं. दुसरे सर्व मानव आमच्याच प्रकृतीचे असतात. तरीहि, ते आमच्या बाहेरचे, एवढ्यासाठीं आम्ही त्यांच्याशी एकात्मता पावत नाहीं. त्याचें अस्तित्व जणूं आपलेंच आहे अशाप्रकारें त्या अस्तित्वाचें ज्ञान आम्ही करून घेऊं शकत नाहीं. त्यांचें आणि त्यांच्या हालचालींचें ज्ञान आमच्या स्वतःच्या आणि स्वतःच्या हालचालींच्या ज्ञानासारखें प्रत्यक्षतेनें, निकटतेनें, अभेदानें आम्ही करून घेऊं शकत नाहीं. त्यांच्या आमच्यामध्यें अभेद तर शक्यच होत नाही, पण प्रत्यक्ष संपर्क देखील शक्य नसतो. आमची जाणीव, त्यांची जाणीव, आमचें घटकद्रव्य, त्यांचें घटकद्रव्य, आमचें आत्मत्व, त्यांचें आत्मत्व या जोड्या प्रत्यक्ष संपर्काच्या कक्षेंत येत नाहींत, त्या प्रत्यक्ष संपर्कापासून दूर असतात. इंद्रियांच्या द्वारां काय तो त्यांचा संपर्क -- इंद्रिय-प्रत्यक्ष संपर्क घडतो, दृष्टि, श्रवण, स्पर्श या इंद्रियशक्ती वस्तूंचा आमचा संबंध आणू शकतात पण हा संबंध खरोखरी, 'प्रत्यक्ष संबंध' असत नाही. ज्ञेय वस्तूचें चित्र, तिनें आमच्या नाड्यांमध्यें निर्माण केलेलें स्पंदन काय तें आमच्या जाणिवेला 'प्रत्यक्ष' असतें. या नाडीस्पंदनावरून किंवा चित्रावरून आम्हांला ती वस्तु जाणावयाची असते. हे नाडीचें किंवा चित्राचें साधन ज्ञान मिळवावयाला अगदींच अपुरें असतें. त्याच्या मदतीला संवेदनाशील मनाची अंतस्फूर्त दृष्टि येते. प्राणशक्तीची अन्त:स्फूर्त ग्रहणशक्ति येते, कल्पनाशील मनाची अन्तःस्फूर्त कल्पनाशक्ति येते. संवेदनाशील मन आपल्या अन्त:स्फूर्त दृष्टीनें बाह्यवस्तूचें चित्र किंवा तज्जनित नाडी-स्पंदन पाहून, तें त्या वस्तूचें म्हणून ओळखतें; प्राणशक्ति आपल्या अन्त:स्फूर्त ग्रहणशक्तीनें बाह्य वस्तूची क्रियाशक्ति ओळखते.  (ही ओळख पटण्यास वस्तूला झालेल्या इंद्रियाच्या स्पर्शानें उत्पन्न होणारें नाडीगत विशिष्ट स्पंदन मदत करतें); हा सर्व पुरावा घेऊन कल्पनाशील मन, आपल्या अन्त:स्फूर्त कल्पनाशक्तीनें बाह्य वस्तूची बरीच

पान क्र. ४१०

 

यथार्थ कल्पना उभी करतें. या प्रक्रियेनें बाह्य वस्तूच्या चित्राचा जो अर्थ ठरतो, त्यांत असलेली उणीव, दोष आमची चिकित्सक बुद्धि, सर्वांगपूर्ण यथार्थदर्शी बुद्धि दूर करते. वर जें अन्त:स्फूर्त संयुक्त ज्ञान वर्णिलें आहे, तें जर प्रत्यक्ष-संपर्काचें फलरूप असतें, किंवा एकंदर अन्त:स्फूर्त ज्ञानयुक्त मनाची वस्तुविषयक कल्पना बांधण्याचें निरंकुश प्रभुत्व असणाऱ्या मनाची क्रिया म्हणून, तें अन्त:स्फूर्त संयुक्त ज्ञान उद्‌भवलें असतें, तर त्याच्यांतील उणीव दूर करण्यासाठीं चिकित्सक, यथार्थदर्शी, सर्वंकश बुद्धीची गरज लागली नसती. ही बुद्धि मग, इंद्रियद्वारां न पुरविलेल्या ज्ञानाची व्यवस्था करण्यासाठीं आणि त्यांनी पुरविलेल्या ज्ञानाच्या आधारावर, नवे शोध करण्यासाठीं वापरली गेली असती; तिला दुसरें वरच्यासारखें काम करावें लागलें नसतें. पण वर उल्लेखिलेलें अन्तःस्फूर्तज्ञान प्रत्यक्ष-संपर्कजनित नसून किंवा प्रभुत्वयुक्त मनाची क्रिया नसून इंद्रियांनीं पुरविलेलें, अप्रत्यक्ष पुराव्यादाखल असलेलें बाह्मवस्तूचें जें चित्र, त्यावर मखलाशी करणारें असतें, वस्तूचें चित्र, वस्तूनें नाडीसंघांत उत्पन्न केलेलें स्पंदन हें सदोष, अपुरे असें चित्रण असतें; अन्तःस्फूर्त ज्ञानहि मर्यादित असून आणि प्रकाशहीन माध्यमांतून येणारें असून, त्याला अर्धवट अंधारांत काम करावें लागतें; म्हणून बाह्यवस्तूसंबंधाचें जें अखेरचें चित्र, अंतःस्फूर्त ज्ञान त्याला मिळालेल्या मसाल्याचा उपयोग करून काढीत असतें, तें सदोष, निदान अपुरेंच राहतें. त्यांतील अपुरेपणाची पूर्तता बुद्धि करूं शकते. मनुष्यांत बुद्धीचा विकास झाला आहे तो, त्याला तीन तऱ्हेनें उपयोगी पडतो. बाह्य वस्तूंचें ज्ञान मिळविण्यासाठीं मनुष्याला, इंद्रिय हें जें साधन दिलेलें आहे, तें साधन सदोष व अपुरें आहे. (१) बुद्धीचा आश्रय घेऊन इंद्रियाची उणीव भरून काढतां येते. (२) मनुष्याचें स्थूल (भौतिक) मन ज्या वस्तूविषयक कल्पना करतें त्यांतील प्रमाद दूर करण्याचें काम बुद्धि करते. (३) मनापुढें जो बाह्यविषयक पुरावा येतो त्याचा अर्थ लावण्यांत भौतिक मनाची चूक (अपुरेपणाची चूक) होऊं शकते, ती दुरुस्त करण्याचें काम बुद्धि करते -- भौतिक मनाला त्याच्या संकुचितपणामुळें पुराव्याचा पुरा अर्थ उमगत नाहीं; बुद्धि पुराव्याचा पुरता अर्थ लावण्यांत उपयोगी पडते.

      तेव्हां आमचें विश्वविषयक ज्ञान हें मोठ्या प्रयासानें मिळतें आणि या ज्ञानाची इमारत उभी करणें अवघड आहे हें उघड झाले. या

पान क्र. ४११

 

इमारतीचे घटक पहा : इंद्रियांनीं तयार केलेली वस्तुप्रतिमा सदोष आणि अपुरी, मन (त्रिविध मन) या अपुऱ्या सदोष प्रतिमेंतून आपल्या सहजस्फूर्त ज्ञानानें बाह्यवस्तुविषयक अर्थ काढणार, (त्रिविध मन म्हणजे संवेदनाशील इंद्रियरूप मन, प्राणमय मन आणि कल्पनाशील मन); बाह्य इंद्रियांच्या आणि त्रिविध मनाच्या या कार्यानंतर बुद्धि आपलें तपासणीचें काम करणार. त्रिविध मनानें केलेल्या इंद्रियरचित प्रतिमेच्या अर्थांत भर घालणें, त्यांतील चुकांची दुरुस्ती करणें, तिच्यापुढें आलेल्या ज्ञानांत आणखी ज्ञानाची भर घालणें, ज्ञानाचें संघटन करणें ही कामें बुद्धि करते; इतक्या सगळ्या खटाटोपानंतर आमचें विश्वविषयक ज्ञान संकुचित असतें, सदोष असतें, आमच्यासमोर आलेल्या पुराव्यांचा व त्यांच्या महत्त्वाचा अर्थ संशयव्याप्त असतो. आमच्या ज्ञानांतील उणीव, अपुरेपणा दूर करण्यासाठीं कित्येक साधनांचा संसार आम्ही उभा करतो व उपयोगास आणतो : कल्पनाशक्ति, अनुमानशक्ति, विवेचकशक्ति, समोर आलेला पुरावा तोलणें व त्यावर युक्तिवाद करणें, अनुमानें काढणें, मापें घेणें, परीक्षा करणें, इंद्रियांच्या पुराव्यात चुकी आढळेल ती दुरुस्ती करणें व त्या पुराव्यांत भर घालणें, या कामी नव्या विज्ञानाची भरपूर मदत घेणें -- हा सगळा साधन-संभार आमच्या ज्ञानांत पूर्णता यावी म्हणून आम्ही उपयोगांत आणतो, पण इतकें सगळें करूनहि आमचें ज्ञान काहीं पूर्ण होत नाहीं; आम्ही या सर्व खटपटीनंतर जें फळ म्हणून मिळवितों, त्यांत काय काय असतें तें येणेप्रमाणें : अप्रत्यक्ष ज्ञान अर्धे निश्चित, अर्धे संशयव्याप्त) इंद्रियांनीं पुरविलेल्या आणि कल्पनेनें रंगविलेल्या सार्थ चित्रांचा ढीग; या चित्रांवरून सुचणारीं अमूर्त विचारसूत्रें, तात्पुरत्या उपपत्ती, निश्चित उपपत्ती, सामान्य सिद्धान्त आणि याबरोबर संशयाचें ढीग, कधीं न संपणारी चर्चा, कधीं न संपणारी तपासणी. अशी मोठ्या खटपटींनीं बांधलेली आमची ज्ञानाची इमारत आहे. ज्ञानाबरोबर सामर्थ्य येतें; पण आमचें ज्ञान अपुरें व सदोष असल्यानें आम्ही आमच्या सामर्थ्याचा उपयोग कसा करावा, आमच्या ज्ञानाचा खरा उपयोग कोणता, हें आम्हांला मुळींच समजत नाहीं, याची आम्हांला मुळींच कल्पना नाही; आमचें ज्ञान व सामर्थ्य कोणत्या हेतूसाठीं, कोणत्या उद्देशासाठीं परिणामकारक रीतीनें उपयोगांत आणावें यासंबंधीं आम्हांला आमच्या ज्ञानाच्या अपुरेपणामुळें, कांहींहि कल्पना निश्चितपणें ठरवितां येत नाही. आत्मज्ञानाच्या बाबतींत आमची जी अपूर्णता आहे तिच्या योगानें ही स्थिति

पान क्र. ४१२

 

आणखी वाईट होते : आमचें आत्मज्ञान, जें आहे तें फारच अल्प, अगदींच अपुरें आणि तेंहि केवळ आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वाचें व पृष्ठवर्ती जाणिवेचें; आमच्या दर्शनी नामरूपात्मक ''आत्म्याचें'' आणि प्रकृतीचें आहे. आमच्या खऱ्या आत्म्याचें ज्ञान आम्हांला नाहीं, आमच्या अस्तित्वाच्या खऱ्या प्रयोजनाचें ज्ञान आम्हांला नाहीं. ज्ञानाचा उपयोग करणारे आम्ही, आम्हांला ''खरें आत्मज्ञान'' नाहीं, खरी आत्मप्रभुता नाहीं. विश्वविषयक ज्ञान जें आम्हांला प्राप्त आहे, विश्वासंबंधीं सत्ता जी आम्हांला प्राप्त आहे, त्या ज्ञानाचा, त्या सत्ते या उपयोग करण्याच्या कार्यांत जें शहाणपण हवें, जी योग्य इच्छा हवी, ती योग्य इच्छा, तें शहाणपण आमच्याजवळ नाहीं.

      आमची पृष्ठवर्ती अवस्था ज्ञानाचीच अवस्था आहे, पण हें आमचें ज्ञान मर्यादित आहे, त्याला चोहोंकडून अज्ञान वेढून आहे, त्यावर चोहोंकडून अज्ञानाचें आक्रमण आहे; या आमच्या ज्ञानाच्या मर्यादितपणामुळें तें बहुतांशीं एक प्रकारचें अज्ञानच आहे, निदान अज्ञान-ज्ञान संमिश्रण तरी आहेच आहे. आमच्या ज्ञानाची ही अवस्था अपरिहार्य आहे; कारण, आमचें विश्वविषयक ज्ञान भेद-अधिष्ठित असतें; केवळ विश्वाचा वरवरचा भाग पाहून मिळविलेलें असतें; हें ज्ञान मिळविण्यासाठीं आमचीं जीं साधनें आहेत, तीं अप्रत्यक्ष साधनें आहेत; आमचें स्वत:संबंधींचें ज्ञान अधिक प्रत्यक्ष असतें, पण तें आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वाचेंच केवळ असतें; आमच्या खऱ्या आत्म्याचें ज्ञान आमच्या स्वभावाच्या खऱ्या मूळ उगमांचें ज्ञान, आमच्या खटपटींच्या बुडाशीं असणाऱ्या खऱ्या प्रेरक शक्तीचें ज्ञान आम्हांला नसतें आणि यामुळें आमचें जें प्रत्यक्ष ज्ञान तेंहि अधिक कोतें पडतें; केवळ पृष्ठवर्ती अस्तित्वाची मर्यादा असल्यामुळें आमचें प्रत्यक्षज्ञान जें आधीं कोतेंच असतें, त्यांत पुन्हां आमच्या खऱ्या आत्म्याच्या वगैरे आमच्या ठिकाणीं असलेल्या अज्ञानामुळें तें अधिक कोतें पडतें. आम्हांला स्वत:संबंधींचें जें ज्ञान आहे तें अगदीं वरवरचें आहे हें उघड आहे. आमच्या जाणिवेचा, विचारशक्तीचा उगम आम्हांला गूढ आहे. आमचें मन, आमची स्मृति, आमच्या भावना, संवेदना या सर्व गोष्टी गूढ आहेत. म्हणजे त्यांचें खरें प्राकृतिक स्वरूप गूढ आहे; आमच्या अस्तित्वाचें मूळ, आमच्या अस्तित्वाचा शेवट दोन्ही गोष्टी गूढ आहेत. आमच्या जीवनाचें प्रयोजन, आमच्या खटपटीचें प्रयोजन गूढ आहे. आम्हांला खरें

पान क्र. ४१३

 

आत्मज्ञान, खरें विश्वज्ञान असतें, तर वरीलसारखें गूढांचें ओझें आम्हांला वहावें लागलें नसतें.

      आमच्या ज्ञानाचा मर्यादितपणा आणि सदोषपणा याचें कारण पहातां असें आढळून येतें कीं, आमची जी बाह्यदर्शी जाणीव आहे, तिनें जी भिंत उभी केली आहे किंवा असें म्हणतां येईल कीं, तिच्यासाठीं जी भिंत उभी केली गेली आहे, त्या भिंतीच्या पाठीमागें आमच्या एकंदर स्वभावाची गुपितें, आमच्या आत्म्याच्या खोल जागा दडल्या आहेत; आणि आमचें सर्व लक्ष वरवरच्या गोष्टींवर केंद्रित झालें आहे. या भिंतीचा उद्देश, आमच्या बाह्यजाणिवेला आपली अहंकेंद्रित कृति, मन, प्राण, शरीर यांची अहंकेंद्रित कृति, निर्वेधपणें करतां यावी हा आहे. ही भिंत नसेल, तर या संकुचित कृतीचा मार्ग आमच्या विशाल जीवनाच्या खोल आणि व्यापक सत्याच्या जाणिवेनें रोधला जाईल. या भिंतीमधून, या भिंतीला असलेल्या बारीक चिरांमधून, भोंकांमधून आमच्या अंतवर्ती आत्म्याकडे, सत्तत्त्वाकडे आम्ही नजर लावूं शकतो. पण या नजरेला तेथें विशेष कांहीं दिसूं शकत नाही. या भिंतीच्या चिरांमधून आम्हांला जें दिसतें त्यावरून तेथें गूढ अंधुक अंधुक कांहीं तरी आहे एवढेंच आम्हांला म्हणतां येतें. आमचें (आमच्या जाणिवेचें) अहंकेंद्रित व्यक्तित्व आमच्या खोल, व्यापक एकमेव अनंत अशा आत्म्यापासून भेदाच्या भिंतीनें दुरावलेलें असतें; तें त्याच भिंतीनें विश्वाच्या अनंतत्वापासूनहि दुरावलेलें आहे. भेदाची भिंत अहंकेंद्राभोंवतीं प्रदक्षिणा न घालणाऱ्या सर्व गोष्टी (बाह्य विश्व) अनात्म म्हणून आमच्या जाणिवेपासून दूर ठेवते. याप्रमाणें आंतलें आत्मविश्व व देहाबाहेरचें विश्व सर्वच आमच्या अहं-जाणिवेपासून दूर रहातें. पण आमचें जें अहंव्यक्तित्व, तें अनात्मा म्हटल्या जाणाऱ्या विश्वाचा भागच असतें. त्या विश्वाबरोबर त्याला दिवस काढावयाचे असतात; त्यावर तें अवलंबून असतें. त्या विश्वामध्येंच एक रहिवासी म्हणून तें वावरत असतें. अर्थात् या विश्वाशीं त्याला संबंध ठेवावाच लागतो. या संबंधासाठीं कांहीं साधनें त्याला उपयोगांत आणावीं लागतात. त्याला ज्या गरजा असतात त्या पुरविणें, बाह्यविश्वाच्या हातांत असतें. तेव्हां या बाह्य विश्वावर अधिकार गाजवितां यावा, आपल्या वैयक्तिक अहम्‌ला आणि सामुदायिक अहम्‌ला जरूर असणारी सेवा या बाह्य विश्वाकडून करून घेतां यावी, यासाठीं बाह्य विश्वाचें ज्ञान मिळवून त्यावर अधिकार गाजविण्यासारखी परिस्थिति

पान क्र. ४१४

 

निर्माण करणें हें एक अहम्‌चें कामच असतें. आमच्या जाणिवेला शरीर इंद्रियरूपी दरवाजे पुरवितें. या दरवाज्यांच्या द्वारां आमची जाणीव बाह्य जगाशीं संबंध ठेवूं शकते. पाहणी आणि करणी या दोन्ही गोष्टी इंद्रियद्वारां आमच्या जाणिवेला करतां येतात. इंद्रियांना मदत म्हणून, आणखी कांहीं यांत्रिक, तांत्रिक साधनें मन शोधून काढतें; आणि इंद्रियांच्या व या मदतगार यंत्रतंत्रांच्या साह्यानें मन कांहीं एक व्यवस्थित ज्ञानसंग्रह उभा करतें; या ज्ञानसंग्रहाचा उपयोग अहम्‌च्या तात्कालिक गरजा पुरविण्यास होतो. त्याचप्रमाणें बाह्य परिसरांतील महान् अस्तित्व आपल्या हुकमतीखालीं घेऊन त्याचा उपयोग करण्याची स्वत:ची इच्छा पुरी करण्यासाठींहि या ज्ञानसंग्रहाचा उपयोग त्याला होतो. जेथें बाह्य पसारा हुकमतीखालीं आणतां येण्यासारखा नसेल, तेथें त्या पसाऱ्याशीं व्यवहार करण्याकरितांहि या ज्ञानसंग्रहाचा उपयोग होतो; पण आमची जाणीव हें जें ज्ञान मिळवितें तें वस्तुनिष्ठ ज्ञान असतें; वस्तूंच्या पृष्ठभागांचें ज्ञान असतें; पृष्ठभागाखालीं, जवळच जें असेल त्याचें ज्ञान असतें. केवळ व्यवहारोपयोगी, मर्यादित, अनिश्चित, असुरक्षित असें हें ज्ञान असतें. अहंव्यक्तित्वाच्या संरक्षणासाठीं तें खऱ्या आंतरात्म्यापासून भेदाच्या भिंतीनें दूर ठेवलेलें असतें. बाह्य विश्वांतील वस्तूपासूनहि दूर ठेवलेलें असतें. पण हें संरक्षण, बाह्य वस्तूंच्या उपयोगावांचून शक्य नसल्यानें त्याचें ज्ञान वगैरे अहं-व्यक्तित्वाला मिळवावें लागतें. अर्थात् या बाह्यविश्वसंपर्कानें अहम्-व्यक्तित्वाला थोडीबहुत असुरक्षितता येते. विश्वशक्तीपासूनहि अहम्-व्यक्तित्व सुरक्षित राहूं पाहतें. पण तें त्याला साधत नाहीं. विश्वशक्तीचा त्याजवर अदृश्यरीतीनें सूक्ष्म मार्गांनी मारा चालूं असतो. अहम्-व्यक्तित्वाच्या विचारांत, इच्छांत, भावनेंत, प्राणिक वासनेंत, आपल्या माऱ्यानें बाह्य विश्वशक्ति कमी-अधिक बदल करीत असते. दुसऱ्या अहम्‌वादी माणसांचे विचार, इच्छा, विकार, प्राणिक गरजा यांचा मारा अहम्‌वर सारखा होत असतो; विश्वव्यापी निसर्गाचा माराहि त्याजवर होत असतो -- आणि त्याच्या विचारविकारांत बदल करत असतो. अहम्‌च्या संरक्षणासाठीं म्हणून जी भेदाची भिंत उभी केलेली असते, त्या भिंतीमुळें अहम्‌ला त्यामधील व विश्वामधील क्रियेप्रतिक्रियेचें नीट ज्ञान होऊं शकत नाहीं. इंद्रियांच्या दरवाज्यांतून किंवा मनाच्या पिंजऱ्यांतून जें काय आंत येईल तें अहम्‌ला नीट समजतें. या पुराव्यावरून तर्कबुद्धि जें काय अनुमान करील तेंहि

पान क्र. ४१५

 

अहम्‌ला समजतें. पण इंद्रियांनीं व मनानें पुरविलेलीं चित्रें सदोष असण्याचा संभव असल्यानें, त्याचें हें सर्व ज्ञान अपुरें आणि सदोष असतें आणि इंद्रियांना व मनाला डावलून जें कांहीं बाह्य विश्वाकडून व विश्वशक्तीकडून अहम्‌च्या ''सुरक्षित'' प्रांतांत घातलें जात असतें त्या संबंधानें अहम्‌ला पूर्ण अज्ञानांत रहावें लागतें.

      आमचें ज्ञान मर्यादित असतें, आमचे ठिकाणीं अज्ञान असतें, याचें कारण पृष्ठवर्ती अहम्‌च्या किल्ल्यांत आम्हीं स्वत:ला बंद करून घेतलें आहे, हें आहे. आमच्या तुरुंगाला दुहेरी भिंत आहे. बाह्य विश्वाला दूर ठेवणारी एक भिंत व आंतरिक आत्मविश्वाला दूर ठेवणारी दुसरी भिंत. आमचें अस्तित्व स्वभावत:च, असें स्वत:ला अहम् च्या बंदिखान्यांत ठेवणारें असतें, तर आमच्या अज्ञानाला आमच्या ठिकाणीं कायम रहातां आलें असतें पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, ज्या बाह्य अहम्‌चें संगोपन, संवर्धन सारखें चाललेलें असतें, तो अहम् वस्तुजातांतील मूळ जाणीवशक्तीनें योजिलेलें एक तात्पुरतें साधन आहे; वस्तुजाताच्या पोटीं आत्मचैतन्य आहे; खरी व्यक्ति हें सुप्त आत्मचैतन्य आहे. या खऱ्या आत्मरूप व्यक्तीचें प्रतिनिधित्व अहम्‌कडे असतें. भौतिक निसर्गांत, अज्ञानमय निसर्गांत मूळ जाणीवशक्ति आत्मचैतन्यासाठीं अहम्‌रूप प्रतिनिधीची व्यवस्था करते. विश्वव्यापी अचेतनतेंतून चेतन विश्व क्रमशः वरती येत असतांना, अज्ञानाचा म्हणून जो अपरिहार्य टप्पा लागतो, त्या अज्ञानाच्या क्षेत्रांत अहम्‌रूप प्रतिनिधि नेमून व निर्मून गुप्त आत्मरूप व्यक्तीच्या विकासाची प्राथमिक तरतूद करून ठेवणें हें काम जाणीवशक्ति करते. एवढेंच करणें अज्ञानाच्या क्षेत्रांत तिला शक्य असतें. आमचें आत्मविषयक अज्ञान आणि विश्वविषयक अज्ञान कमी होत होत, त्याचें पूर्ण आत्मज्ञान आणि पूर्ण विश्वज्ञान व्हावयाचें असतें. आमचा मर्यादित अहम् आणि त्याची अर्धी आंधळी जाणीव ज्या प्रमाणांत आमचें विशाल आंतरिक अस्तित्व आणि जाणीव आणि वास्तव आत्मसत्ता यांच्या दिशेनें प्रगति करील, तसेंच त्याच्या (अहम्‌च्या) बाहेर असलेल्या ''अनात्म्याला'' आत्मा म्हणून ज्या प्रमाणांत अहम् ओळखूं लागेल, त्या प्रमाणांत आमची, पूर्ण आत्मज्ञान आणि पूर्ण विश्वज्ञान यांच्या दिशेनें प्रगति होईल. आमच्या स्वत:च्या आत्मसत्तेचा अमर्याद विस्तार म्हणजेच आमची मूळ महान् आत्मसत्ता होय. आमच्या प्रकृतीला घडवणारी महान् प्रकृति म्हणजेच आमची मूळ पराप्रकृति होय. पूर्ण विश्वज्ञान

पान क्र. ४१६

 

म्हणजे मूळ पराप्रकृतीचें ज्ञान; आणि पूर्ण आत्मज्ञान म्हणजे मूळ अनंत आत्मसत्तेचें ज्ञान होय. ''अहम् जाणिवेच्या'' भिंती आमच्या आत्मसत्तेनें उभ्या केल्या आहेत. त्या भिंती पाडणें हें त्या आत्मसत्तेचें काम आहे. हें काम करून आमच्या आत्म्यानें आपल्या एका विशिष्ट देहापलीकडे आपला संसार पसरून विश्वशरीर धारण करावयास हवें आणि तसें त्याला करावें लागणार आहे. सध्यां अप्रत्यक्ष संपर्कानें आत्मा विश्वाचें ज्ञान मिळवितो; या ज्ञानाला पूरक म्हणून किंवा हें ज्ञान बाजूस सारून आमच्या आत्म्यानें प्रत्यक्ष संपर्काचें ज्ञान व आणखी पुढें जाऊन तादात्म्यानें मिळणारें ज्ञान मिळविणें अगत्याचें आहे -- व हेंहि त्याला करावें लागणार आहे. सध्यां तो मर्यादित असा सान्त आत्मा आहे. तो अमर्याद सान्त व्हावयास हवा आहे व होणार आहे. तो त्यापुढें जाऊन शुद्ध, अनंत आत्मा व्हावयास हवा आहे व होणार आहे.

आमच्या अस्तित्वाची जी आंतरिक सत्यें आहेत त्यांचें ज्ञान करून घेणें ही गोष्ट प्रथम व्हावी लागते. आमचा आंतरात्मा आम्हांला सांपडला म्हणजे आमचा विश्वव्यापी आत्मा आम्हांला समग्र सांपडणें सर्वथा शक्य होत असतें. आमच्या आंतर-अस्तित्वांत शिरून तेथें राहण्याची आम्हीं संवय केली पाहिजे. तेथें बैठक घेऊन आमचें बाह्य जीवन जगावयास आम्हीं शिकलें पाहिजे. बाह्य मन, प्राण, शरीर हे आम्हांला बाहेरच्या खोलीसारखे व्हावयास हवेत. आमचा कायम मुक्काम आंत, आंतल्या खोलींत, आंतर-अस्तित्वांत झाला पाहिजे. आम्ही बाहेर जें कांहीं असतों, होतो, तें सर्व, आम्ही आंत काय असतो, आमच्या गुप्त अस्तित्वांत, आमच्या आंतर, खोल जगांत काय असतों त्यावरच अवलंबून असतें, ही वस्तुस्थिति आहे. आमच्या गुप्त आद्य प्रेरणा तेथून येतात. आमच्या आत्मप्रभावी रचना तेथून येतात. आमच्या सहजभावना, स्फूर्ति, जीवन-उद्देश, मानसिक आवडीनिवडी, आमच्या इच्छेच्या पसंती-नापसंती तेथूनच येतात. बाह्य विश्वाचे आघात, गुप्त आघात आमच्यावर सारखे होत असतात. त्या गुप्त आघातांचाहि वांटा वरील गोष्टींत असतो -- हें गुप्त आघात वरील कांहीं गोष्टी स्वतःच उदयास आणतात, किंवा आमच्या आंतून त्या उदयास आल्यावर त्यांजवर आपला प्रभाव पाडतात. या ज्या प्रेरणा, हे जे प्रभाव आंतून वर येतात, यांचा उपयोग जो आम्ही करीत असतो, तो मात्र आमच्या अगदीं बाहेरचा जो स्वभाव असतो त्यावर पुष्कळदां अवलंबून रहातो.

पान क्र. ४१७

 

अर्थात् या आंतरप्रेरणांना वगैरे या वस्तुस्थितीमुळें परिणामदृष्टीनें खूप मर्यादा पडते. तेव्हां आमचा जो आद्यप्रेरणा देणारा आंतर आत्मा आहे, त्याचें ज्ञान आम्हांला मिळविलें पाहिजे. आमचा बाहेरचा जो साधनभूत आत्मा आहे, त्याचेंहि कांटेकोर ज्ञान आम्हांला मिळविलें पाहिजे; आणि आमच्या म्हणजे आमच्या अस्तित्वाच्या, जाणिवेच्या वगैरे बांधणींत या दोहोंचा जो भाग आहे त्याचेंहि ज्ञान आम्हांला मिळविलें पाहिजे.

      आमची पृष्ठवर्ती अवस्था जर पाहिली, तर असें दिसतें कीं, आमचा आत्मा पृष्ठावर, बाहेर जेवढा संघटित झाला आहे, तेवढादेखील आम्हांला पूर्ण अवगत होत नाहीं. त्याचे कांहीं बिंदू, कांहीं भाग स्वच्छ दिसतात. बाकी भाग साधारणत: अस्पष्टच दिसतात. मानसिक अंतर्निरीक्षणानें देखील, आत्म्याचे तुकडे तुकडेच एकत्र केलेले असे, आमच्या नजरेस येतात. आमचें खरें समग्र व्यक्तित्व, आम्हांला अंतर्निरीक्षणानेंहि दिसत नाहीं. त्यांत पुन्हां, या मर्यादित आत्मज्ञानाला विद्रूप करणाऱ्या, त्याला कमी-अधिक अंधारांत टाकून विफल करणाऱ्या कांहीं गोष्टी नित्याच्या आहेत. आमचा बाह्य प्राणमय आत्मा, हा सारखा मध्यें लुडबुडत असतो. आमचें आत्मज्ञान त्यायोगें दूषित होत असतें. विचारी मनाला स्वत:चे चाकर बनविणें, इकडे प्राणमय आत्म्याचें सर्व लक्ष लागलेलें असतें. त्याला आत्मज्ञानाशीं कांहीं कर्तव्य नसतें -- आपलें घोडें पुढें ढकलणें, आपलें तें खरें करणें, आपल्या वासनाविकारांची तृप्ति करणें एवढेंच त्याचें ध्येय व धोरण असतें -- अहम्‌चा बडेजाव त्याला प्रिय असतो. हा प्राणमय आत्मा, स्वतःच्या सोईसाठीं, मनावर नित्य दाब आणीत असतो. मनोमय आत्म्याला, आपल्या सोईचा मनोमय आत्मा बनविण्यासाठीं, मनामागें प्राणमय आत्मा सारखा लागलेला असतो. आपल्या वासनाविकारांचें समर्थन, अहम्‌चा बडेजाव या गोष्टी प्राणमय आत्म्याला प्रिय असतात, त्याचप्रमाणे आत्मनिंदाहि केव्हां केव्हां त्याला प्रिय असते. अतिरिक्त आत्मदूषण त्याला प्रिय असतें; प्राणमय अहम् (आत्मा) हा पुष्कळ वेळां कृतिशून्य बडबड्या असतो; पुष्कळ वेळां स्वत:च्या व इतरांच्या करमणुकीसाठीं तो केवळ नाटक करीत असतो. तेव्हां एकंदरींत, आमचें आत्मविषयक अज्ञान आणि आत्मविषयक फसवणूक, हा प्राणमय आत्मा (अहम्) सुव्यवस्थितरीतीनें घडवीत असतो, वाढवीत असतो. आम्हीं आमच्या अंतरांत खोल शिरून पहावें तेव्हां या

पान क्र. ४१८

 

गोंधळांतून आणि अंधारांतून बाहेर पडण्याचा मार्ग व या सर्व उपद्व्यापाचें मूळ आम्हांला दिसूं शकेल.

      आमच्या आंत विशाल मनोमय आंतरपुरुष आहे, विशाल प्राणमय आंतरपुरुष आहे -- आमचा पृष्ठवर्ती शारीर जाणिवेचा पुरुष वेगळा व हा सूक्ष्म आंतर भौतिक पुरुष वेगळा. आम्हीं आंत शिरून या पुरुषांत प्रवेश केला, त्यांजशीं एकरूप झालों म्हणजे आमच्या विचारांचा, भावनांचा उगम जेथून होतो तीं स्थानें आम्ही पाहूं शकतो; आमची कृति कोणत्या हेतूंनीं, कोणत्या मुळांतून होते तें आम्हीं पाहूं शकतो; अर्थात् आमची पृष्ठवर्ती व्यक्तिता उभारणाऱ्या कार्यकारी शक्ती कोणत्या त्या आम्ही पाहूं शकतों. या आंतरपुरुषाचा शोध आम्हांला लागतो, आम्ही त्याची ओळख करून घेऊं शकतो; आमच्या ठिकाणीं आंतर मनोमय पुरुष गुप्तपणें विचार करीत असतो, गुप्तपणें वस्तुग्रहण करीत असतो; आंतरप्राणमय पुरुष गुप्तपणें भावनावश, विकारवश होतो आणि जीवनावर आमच्याद्वारां परिणाम करीत असतो; आमचें शरीर आणि आमचीं इंद्रियें यांच्याद्वारां वस्तूंचा जो आम्हांला संपर्क घडतो, तो गुप्तपणें, आम्हांला न कळत, स्वतःला घडवून घेऊन त्या संपर्काची योग्य प्रतिक्रिया करून ती आमच्या शरीराच्या व अवयवांच्याद्वारां बाहेर दाखविणें हें काम आमचा सूक्ष्म शारीरपुरुष करीत असतो. आम्ही पृष्ठवर्ती बैठकींतून जो विचार करतो, ज्या भावना कामना बाळगतो त्या आमच्या ठिकाणीं आंतील प्रेरणा आणि बाहेरील आघात यांच्या संयुक्त परिणामस्वरूप असतात. त्या भावना, विचार वगैरे गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या स्वरूपांत आमच्या ठिकाणीं उद्‌भवतात आणि आमचा गोंधळ उडवितात. आमची संघटनकुशल बुद्धि या विचार-विकार-भावनांच्या पसाऱ्यांत कांहीं थोडीबहुत व्यवस्था आणूं शकते; पण ती व्यवस्था थोडीशीच व अपूर्ण अशीच असते. पण आपण आंत गेलों म्हणजे तेथें या बाह्य फलभूत विचार-विकार-भावनांचे वेगळे वेगळे उगम आम्हांला स्पष्ट दिसूं शकतात. मानसिक शक्ति, प्राणशक्ति, भौतिक शारीर शक्ति यांचे निरनिराळे व्यवहार स्पष्ट दिसतात. प्रत्येक पृष्ठवर्ती विचाराचा, विकाराचा भावनेचा प्रत्येक घटक आम्हांला स्पष्ट दिसतो, या घटकांचा अन्योन्यांवर होणारा परिणाम स्पष्ट दिसतो; आंतरात्मदर्शन घडविणारा स्वच्छ आंतरप्रकाश आम्हांला आंतील प्रत्येक मानसिक, प्राणिक, शारीर व्यापार व सामर्थ्य स्पष्ट दाखवितो. आमच्या पृष्ठवर्ती जाणिवेंत जे विरोध, जे

पान क्र. ४१९

 

झगडे आम्हांला दिसतात, त्यांचें मूळ पुष्कळ प्रमाणांत, आमच्या मानसिक प्राणिक, शारीरिक इच्छा, आकांक्षा, वृत्ती, प्रवृत्ती परस्पर विसंवादी असतात या गोष्टींत असतें -- आणि या विसंवादी विरोधी आकांक्षादि गोष्टींचें मूळ, आमच्या अस्तित्वांत असलेल्या अनेक आंतरिक विसंवादी शक्यतांच्या पसाऱ्यांत असतें. केव्हां केव्हां हें मूळ, आमच्या आंतरिक भिन्न भिन्न व्यक्तित्वांत असतें. प्रत्येक भूमीवर -- मानसिक, प्राणिक, शारीरिक भूमीवर -- आमच्या अंतरांत भिन्न व्यक्ती असूं शकतात; आणि या व्यक्तिभेदामुळेंहि मानसिक, प्राणिक, शारीरिक वृत्तिप्रवृत्तींत भेद आणि विसंवाद आढळून येतो. आमची बाह्य प्रकृति ही मिश्र वृत्तिप्रवृत्तींची बनलेली दिसते -- याचें मूळ, आतांच स्पष्ट केलेल्या आंतरव्यक्तिभेदांत किंवा विसंवादी अशा आंतर मानसिक, प्राणिक, शारीरिक वृत्तिप्रवृत्तींत आहे. पृष्ठवर्ती प्रकृतींतील मन, प्राण, शरीर यांच्या वृत्तिप्रवृत्ती एकमेकांत गुंतलेल्या आणि गोंधळांत पडणाऱ्या असतात. पण अंतरंगांत खोल गेल्यावर या वृत्तिप्रवृत्ती वेगवेगळ्या, त्यांच्या कारणांसह, आम्हांला स्पष्ट दिसतात; आणि आमचा आंतर मनोमय पुरुष, त्यांच्यामध्यें एकप्रकारचा सुसंवाद निर्माण करूं शकतो -- 'प्राण आणि शरीर यांचा नेता' असें मनोमन पुरुषाला उपनिषदांत गौरविलें आहे (मनोमय: प्राणशरीरनेता -- मांडूक्य उपनिषद उप०२-२-७) मनोमय पुरुषापेक्षां सुसंवाद-निर्मितीचें काम आमच्या केंद्रवर्ती चैत्य पुरुषाला (आंतरात्म्याला) चांगलें साधतें; मात्र हें काम मनोमयाला किंवा आंतरात्म्याला नीट साधावें असें वाटत असेल, तर आमचा मानसिक आणि आत्मिक संकल्प योग्य आणि समर्थ असा असावयास हवा. प्राणिक अहम्‌च्या हेतूपूर्तीसाठीं जर आम्हीं अंतर्वर्ती अस्तित्वांत प्रवेश केला, तर त्याचा परिणाम भयंकर होण्याचा संभव आहे. आमच्या जीवनांत त्यायोगें धोके उत्पन्न होण्याचा, आमचा सर्वनाश होण्याचा संभव आहे -- निदान पक्षीं, आमचा अहम्, आमची वासना, आमची स्वार्थी प्रवृत्ति बलवत्तर होईल; आमचें अज्ञान विशाल आणि सामर्थ्यवान् होईल; विशाल आणि सामर्थ्यवान् ज्ञानापासून आम्हीं फार दूर राहूं; एवढा तरी परिणाम, आम्हीं प्राणमय अहम् च्या हेतूपूर्तीसाठीं अंतर्वर्ती अस्तित्वांत प्रवेश केल्यानें निश्चित होईल. अंतर्वर्ती अस्तित्वांत, मानसिक व इतर वृत्ति-प्रवृत्ती त्यांच्या कारणांसह वेगळ्या वेगळ्या स्पष्ट दिसतात आणि त्याबरोबर आंतून कोणत्या प्रेरणांचा उगम आहे आणि बाहेरून,

पान क्र. ४२०

 

म्हणजे इतरांकडून आणि विश्वप्रकृतीकडून, कोणत्या प्रेरणा येतात हें स्पष्ट दिसतें. अर्थात् नियंत्रण, पसंती वगैरे काम सुकर होतें. आमची पृष्ठवर्ती व्यक्तिता मिश्रणाची आहे; आमची अंतर्वर्ती व्यक्तिता शुद्ध आहे. आमच्या बाह्य व्यक्तित्वाला नियंत्रण, पसंती-नापसंती, इच्छेनुसार कोणतीहि प्रेरणा स्वीकारणें न स्वीकारणें आणि याप्रकारें आपली स्वतांची इमारत आपल्या मर्जीनुरूप तयार करणें, आपल्या घटकभूत वृत्तिप्रवृत्तींत, इच्छाआकांक्षांत सुसंवाद निर्माण करणें या गोष्टी नीट करतां येत नाहींत, याला कारण, त्या व्यक्तित्वाची मिश्रता होय. आमची अंतर्वर्ती व्यक्तिता शुद्ध व स्पष्टदर्शी असल्यानें तिला या गोष्टी नीट करतां येतात; तिचा हा अधिकार आहे. आम्ही आमच्या अंतरांत खोल गेलो, म्हणजे आमचें अंतर्वर्ती अस्तित्व, पडदा बहुतेक दूर झाल्यानें, उघडपणें सरळपणें बाहेरच्या साधनभूत जाणिवेवर पूर्ण प्रभाव पाडूं शकतें आणि म्हणून आमच्या भौतिक विश्वांतील जीवनांत स्पष्टपणें आपलें अंतरंग साकार करूं शकतें.

      आमच्या बाह्य मनाचें पृष्ठवर्ती ज्ञान आणि आमच्या आंतरपुरुषाचें ज्ञान या दोहोंचे घटक तत्त्वत: तेच आहेत, पण या दोन ज्ञानांत हें अंतर आहे कीं बाह्यज्ञान अर्धे आंधळेपणानें ग्रासलेलें असतें; आणि आंतरज्ञान स्पष्ट दृष्टीचें आणि जाणिवेचें असतें; त्याचें साधन अधिक समर्थ व अधिक प्रत्यक्ष असें असते, त्याचें घटक अधिक व्यवस्थेनें रचलेले असतात. तादात्म्यानें होणारें ज्ञान, पृष्ठवर्ती मनाला असतें तें केवळ आपल्या आत्म्याच्या अस्तित्वाचें आणि तेंहि अंधुक व सहजसंवेदनेच्या रूपाचें असतें. तसेंच आमच्या आंतील हालचालींचेंहि तादात्म्यअधिष्ठित ज्ञान पृष्ठवर्ती मनाला अर्धवट होऊं शकतें; पण आम्हीं आंत गेलो म्हणजे तेथे आमचें तादात्म्य-अधिष्ठित ज्ञान विस्तारानें आणि खोलीनें खूप वाढतें; आंतील समग्र व्यक्ति तादात्म्यानें जाणतां येते. आमचा समग्र मनोमय पुरुष आम्हांला तादात्म्यानें प्रत्यक्ष, स्वच्छ दिसतो. आमच्या मानसिक आणि प्राणिक शक्ती ज्या हालचाली करतात त्या सर्व आम्हांला समग्र जवळून पहावयास मिळतात. त्यांच्याशीं आमचा निकट संपर्क होतो. आमच्या आत्म्याच्या पोटांत ज्या घटना घडतात त्या आम्हीच बनतो, हें आम्हांला स्वच्छ दिसतें; आणि त्यांचे साक्षीहि आम्हीं अगदीं जवळून बनतो, आम्हीच पुरुष आणि आमचें आत्मप्रगटीकरण म्हणजे आंतरिक मनाची प्राणाची हालचाल, घटनांची घटक आणि त्या घडवणारी आमची प्रकृति व आम्ही तिचें साक्षी -- अशी वस्तुस्थिति

पान क्र. ४२१

 

अंतरंगांत स्पष्ट होत असल्यानें, आम्ही पुरुष या नात्यानें आमच्या प्रकृतीचें पूर्ण नियंत्रण करूं शकतो. वर पृष्ठवर्ती अस्तित्वाच्या ज्या हालचाली होतात त्या अगदीं अलिप्तपणें आम्हांला बघतां येतात; आणि प्रत्यक्ष जाणिवेनें या हालचाली आम्हांला स्पष्ट दिसत असल्यानें, त्या हालचालींत जे भ्रम असतील, ज्या चुका होत असतील, ते भ्रम त्या चुका दुरुस्त करतां येतात, दूर करतां येतात; आमची मानसिक दृष्टि तीक्ष्ण असते, आमच्यांत ज्या आंतरिक घटना घडतात त्यांचें मानसिक संवेदन यथार्थ होऊं शकतें, आमची आंतरिक दृष्टि आमची समग्र प्रकृति पूर्णतया जाणूं शकते आणि आपल्या तंत्रानें (म्हणजे पुरुषाच्या तंत्रानें) तिला वागवूं शकते. आमचें आत्मिक आणि मानसिक घटक सामर्थ्यवान् असतील, तर प्राणमय पुरुष त्यांच्या तंत्रानें, त्यांच्या मार्गदर्शनानुसार वागतो; पृष्ठवर्ती मन, त्याला आपल्या तंत्रानें फारसें चालवूं शकत नाहीं. प्राणमय पुरुषाहून अधिक मठ्ठ असा शारीर पुरुष आणि त्याच्या शक्ती यांदेखील समर्थ मनाची इच्छाशक्ति नरम करूं शकते आणि त्याला आणि त्याच्या शक्तींना आंतरात्म्याचें विनयपूर्ण आज्ञाधारक साधन बनवूं शकते. जर मानसिक आणि आत्मिक घटक असमर्थ असतील, तर मात्र प्राणमय पुरुष अनावर होतो. आंतरप्राणमयांत शिरल्यानें आमची शक्ति खूप वाढलेली असते आणि अलिप्तपणा, विवेक कमी झालेला असतो. ज्ञान हें विस्तारानें आणि शक्तीनें वाढलेलें असतें, पण त्यांत अशुद्धता असते. मार्गदृष्टि नसते, भलतीकडे जाण्याची प्रवृत्ति असते -- अर्थात् तेथें आत्मसंयम अशक्य होऊन, प्राणमय पुरुष बेफाटपणें, बेशिस्तीनें सैरावैरा धांवतो, किंवा शिस्तीनें भयंकर स्वार्थी गैरवर्तनांत गुंग होतो. असें घडण्याचें कारण, अंतर्वर्ती अस्तित्व ज्ञान-अज्ञानाची संमिश्र अवस्था असते हें होय. तेथें ज्ञान अधिक असतें, पण त्याबरोबर अधिक स्वार्थमय अज्ञानाचीहि शक्यता असते. अधिक आत्मज्ञान म्हणजे पूर्ण आत्मज्ञान नव्हे. बाह्य पृष्ठवर्ती आत्म्यापेक्षां तलवर्ती आंतरात्म्यांत अधिक ज्ञान अवश्य असतें -- प्रत्यक्ष संपर्क हें याचें ज्ञानसाधन असल्यानें त्याला अधिक ज्ञान करून घेणें सोपें जातें; पण हें अधिक ज्ञान, जसें ज्ञानाच्या घटनांचें आणि शक्तीचें असूं शकतें तसें, तें अज्ञानाच्या घटनांचें आणि शक्तीचेंहि असूं शकतें -- म्हणून जोपर्यंत पूर्ण ज्ञान नाहीं तोपर्यंत गैरवर्तनाचा धोका आत्म्याचे ठिकाणीं कायम राहतो.

पान क्र. ४२२

 

      तलवर्ती आंतरपुरुष हा आंतरिक घटना ज्याप्रमाणें प्रत्यक्ष संपर्कानें जाणूं शकतो, त्याप्रमाणें प्रत्यक्ष संपर्कानें विश्वांतील घटनाहि तो जाणूं शकतो; इंद्रियें पृष्ठवर्ती मनाला कांहीं वस्तुप्रतिमा पुरवितात, कांहीं इंद्रिय-स्पंदनें पुरवितात आणि या स्पंदनांचा व प्रतिमांचा अर्थ, हें बाह्य मन, स्वत:च्या आणि प्राणाच्या सहजस्फुरित ज्ञानाच्या साह्यानें लावतें. बुद्धीचीहि मदत घेऊन या अर्थांत स्पष्टता आणतें, भर घालतें आणि याप्रमाणें विश्वाचें ज्ञान अप्रत्यक्षपणें मिळवितें. आंतर तलवर्ती मन वा पुरुष या अर्थाचा लाभ घेऊन शिवाय प्रत्यक्ष संपर्कानें विश्वाचें ज्ञान मिळवूं शकतो. या आंतरपुरुषाच्या प्रकृतींत आंतर-इंद्रियशक्तीहि असते. सूक्ष्म दृष्टि, सूक्ष्म श्रवण, स्पर्श-घ्राण-रसास्वादशक्ति या आंतरप्रकृतींत असते. भौतिक परिसरांतील वस्तूंचीं चित्रें मनाला पुरविणें एवढेंच कांहीं या आंतर-सूक्ष्म-इंद्रियांचें काम नसतें. स्थूल इंद्रियांचा प्रांत फार मर्यादित असतो. या प्रांतापलीकडील प्रांतांतल्या वस्तूंचीं चित्रें आणि स्पंदनें; दुसऱ्या पातळ्यांवरील अर्थात् अस्तित्वाच्या स्थूल भौतिक अन्य भूमींवरील वस्तूंची चित्रें व स्पंदनें; दृष्टिगत, श्रवणगत, स्पर्शगत व इतर इंद्रियगत चित्रें व स्पंदनें सूक्ष्म आंतरपुरुषाला, जाणिवेला सूक्ष्म इंद्रियें पुरवूं शकतात. ही जी आंतर-पुरुषाची आंतर-इंद्रियशक्ति आहे ती वास्तव प्रतिमांप्रमाणें प्रतीकरूप प्रतिमाहि पुरवूं शकते. प्रतीकरूप देखावे, प्रतीकरूप आवाज ही इंद्रियशक्ति निर्माण करूं शकते. या प्रतीकांच्या द्वारां साकार होऊं शकणारीं रचनाचित्रें आणि दुसऱ्या माणसांच्या मनांतून येणाऱ्या सूचना, विचार, कल्पना, हेतू ती आम्हांला कळवूं शकते. तसेंच निसर्गांतील शक्तींची किंवा शक्यतांची चित्रेंहि ती आपल्या जाणिवेला पुरवूं शकते. ही इंद्रियशक्ति जें पाहूं शकत नाहीं वा चितारूं शकत नाहीं असें कांहीं नाहींच म्हटलें तरी चालेल. दूर-विचार-वाहन, दूरदर्शन, सूक्ष्मदर्शन, दिव्यदृष्टि आणि इतर असामान्य शक्ती वस्तुत: आंतर तलवर्ती पुरुषाच्या ठिकाणीं असतात; बाह्य मनाच्या ठिकाणीं असत नाहींत. बाह्य जाणिवेंत या शक्ती केव्हां केव्हां दिसतात, याचें कारण, आमच्या बाह्य व्यक्तित्वानें (अहम्‌नें) अस्तित्वाचे आंतर आणि बाह्य असे दोन भाग पाडणारी जी भिंत उभी केली आहे त्या भिंतीला चिरा असतात; किंवा कांहीं कारणानें चिरा पडतात आणि या चिरांतून आंतरजाणिवेच्या खास शक्ती बाहेरच्या जाणिवेंत प्रकट होतात हें आहे. आंतर तलवर्ती जाणिवेंतील गुंतागुंत वरील प्रकारची

पान क्र. ४२३

 

असल्यानें या जाणिवेच्या ऐंद्रिय संवेदना आणि चित्रसंभार आम्हांला गोंधळांत पाडणारा आणि चुकीच्या मार्गानें नेणारा होऊं शकतो -- विशेषत: या संवेदनांचा आणि चित्रांचा अर्थ जेव्हां आमचें बाह्य मन लावू पाहतें, तेव्हां आमचा गोंधळ निश्चितपणें अटळ होतो. कारण या आंतर तलवर्ती पुरुषाच्या व्यापार-व्यवहारांच्या रहस्याचें ज्ञान बाह्य मनाला नसतें; तेथें ज्या प्रतीकरूप रचना केल्या जातात, त्यांची भाषा बाह्य मनाला ''परकी'' असते. आमच्या ठिकाणीं आंतर सहज ज्ञानाची शक्ति आणि विवेचक शक्ति मोठ्या प्रमाणांत असेल, तरच आंतर तलवर्ती जाणिवेनें उभ्या केलेल्या प्रतिमा व अनुभव यांचा आम्हांला योग्य अर्थ लावतां येईल, आणि त्यांचा बरेबाईटपणा निर्णीत करतां येईल. तें कसेंहि असलें, तरी आंतर जाणिवेनें ज्या प्रतिमा आणि जे अनुभव आमच्या समोर ठेवलेले असतात, त्यांनीं आमच्या ज्ञानाचें क्षेत्र खूप मोठें होतें; आमच्या ज्ञानाच्य मर्यादा खूप लांबरुंद होतात. भौतिक बाह्य इंद्रियांनीं आमची बाह्य भौतिक जाणीव बांधली गेल्यानें ती अगदी लहानशा क्षेत्रांत कोंडली जाते; पण आंतर तलवर्ती मनाची आम्हांला मदत झाल्यास तशी तिची अवस्था राहूं शकत नाहीं.

      तलवर्ती आंतर जाणिवेची वरच्याहून अधिक महत्त्वाची एक शक्ति ही आहे कीं, या जाणिवेला दुसऱ्यांच्या जाणिवेशीं प्रत्यक्ष संबंध स्थापित करतां येतो. वस्तूंशींहि असा संबंध स्थापित करतां येतो; कोणतेंहि वेगळें साधन वापरावें न लागतां, आपल्या स्वत:च्या घटकद्रव्यांत स्वभावत: असलेल्या शक्तींनीं आपलें काम उरकतां येतें. वस्तूंचें प्रत्यक्ष मानसिक दर्शन, वस्तूंचा प्रत्यक्ष मानसिक स्पर्श तिला घडत असतो. वस्तूला बाहेरून सर्व बाजूंनीं अगदीं जवळून व्यापून आणि तिच्या पोटांत जिव्हारीं शिरून, तिच्यांतील अंतर्गत गोष्टी आपल्या अधीन करून घेऊन परतणें, हें कार्य ही आंतरजाणीव करूं शकते. कोणत्याहि मनाच्या घटकद्रव्यावर प्रत्यक्ष आघात करून त्यांतील गोष्टी बाह्य चिन्हांच्या मदतीशिवाय ती जाणूं शकते. याप्रमाणें कोणत्याहि मनांतील विचार, भावना, शक्ती तिला अवगत होऊं शकतात. याप्रमाणें आपल्या स्वभावगत साधनांनीं व्यक्तींचें, वस्तूंचें, निसर्गांतील गुप्त शक्तींचें प्रत्यक्ष ज्ञान -- अगदीं आंतूनचें व निर्दोष बिनचूक ज्ञान -- हा तलवर्ती पुरुष मिळवूं शकतो. निसर्गांतील गुप्त शक्ती आमच्या सर्व बाजूंनीं वावरत असून आमचें व्यक्तित्व, आमचें शरीर, आमच्या मनाची शक्ति, आमची प्राणशक्ति या

पान क्र. ४२४

 

सर्वांवर त्या निसर्गांतील गुप्त शक्तींचा परिणामकारक मारा होत असतो. आमच्या पृष्ठवर्ती मनामध्यें केव्हां केव्हां अशी जाणिवेची प्रतीति येते कीं, जिला दुसऱ्यांच्या विचारांची चाहूल लागते किंवा त्यांचें स्पष्ट ज्ञान होतें. दुसऱ्यांच्या मनांतील प्रतिक्रिया जिला स्पष्ट, अस्पष्ट दिसतात, तसेंच इंद्रियांच्या मदतीशिवाय वस्तूंचें आणि व घटनांचें जिला ज्ञान होतें किंवा जी यांसारख्या दुसऱ्या असामान्य शक्ती दाखविते -- पण या सर्व शक्ती या बाह्य जाणिवेच्या ठिकाणीं अस्पष्ट असतात, प्राथमिक स्वरूपांत असतात आणि त्याहि क्वचित् प्रसंगींच दाखविल्या जातात. या शक्ती स्वभावत: आमच्या गुप्त तलवर्ती आत्म्याच्या आहेत -- आत्म्याच्या त्या क्रिया किंवा शक्ती वर पृष्ठावर येतात तेव्हां त्या बाह्य जाणिवेच्या म्हणून भासतात. तलवर्ती पुरुषाचे हे व्यापार जे पृष्ठावर येतात ते किंवा त्यांतील जे कांहीं सध्यां तपासले जात आहेत, त्यांना कोणी आध्यात्मिक घटना म्हणतात. पण खरा आत्मा आणि हा तलवर्ती आत्मा एक नाहींत. खरा आंतरात्मा वेगळा आणि हा आंतरपुरुष वेगळा. खरा आंतरात्मा आमच्या अंतरांत सर्वातं खोल ठिकाणीं असतो. हा आंतर तलवर्ती म्हटला जाणारा पुरुष आंतरमन, प्राण, सूक्ष्म भौतिक देह यांचा बनलेला असतो. आंतरतम आत्मा (आंतरात्मा), आंतर-आत्मा (सूक्ष्म मन, प्राण, शरीर) आणि बाह्य-आत्मा (स्थूल मन, प्राण, शरीर) अशी आमच्या आत्म्याची विविध व्यवस्था आहे. आंतर-आत्म्याचें जें संशोधन चालूं आहे, त्याला निर्णायक फळें येत नाहींत; आणि त्यांचें प्रमाणहि अल्पच असतें. कारण संशोधनाच्या पद्धती, प्रयोगाच्या पद्धती आणि पुराव्याच्या पद्धती बाह्य मनाला आणि त्याच्या ज्ञान-व्यवस्थेला, म्हणजे अप्रत्यक्ष संपर्कानें मिळणाऱ्या; त्याच्या ज्ञान-संभाराला, ज्या परिचयाच्या व यथोचित आहेत त्याच आंतरपुरुषाच्या व्यवहारांना लावण्यांत येतात, जेथें त्या उचित नाहींत. अर्थात् आंतरमनाच्या जेवढ्या दूरदर्शनादि हालचाली बाह्य मनांत प्रकट होऊं शकतात तेवढ्याच, या परिस्थितींत तपासल्या जाऊं शकतात. या बाह्य मनाला त्या नेहमींच्या नसून अपवादात्मक असतात, सामान्याहून वेगळ्या असतात; आणि म्हणून तौलनिक दृष्टीनें विरळा घडणाऱ्या, अपुऱ्या व समजावयास अवघड अशा त्या असतात. ज्या आंतरजाणिवेला या हालचाली सामान्य, स्वाभाविक असतात त्या जाणिवेला दूर ठेवणारी भिंत जी बाह्य मनानें उभी केली आहे ती भिंत

पान क्र. ४२५

 

काढून, पाडून टाकली किंवा आम्ही आंत सहज मोकळेपणें जाऊं शकलों, तेथें मोकळेपणें राहूं शकलों, तरच ज्ञानाचें हें आंतरक्षेत्र आम्हांला सकारण समजूं शकेल; त्याला आमच्या एकंदर जाणिवेचा भाग बनवितां येईल आणि आमच्या प्रकृतीच्या जागृत शक्तीच्या कार्यक्षेत्रांत या आंतरक्षेत्राचा समावेश करून घेतां येईल.

      आमच्या बाह्य पृष्ठवर्ती मनाला दुसऱ्या माणसांसंबंधींचें ज्ञान देखील प्रत्यक्ष साधनांनीं होऊं शकत नाहीं. आमच्याच जातीचे प्राणी, आमच्या सारखीच मनाची अवस्था त्यांजमध्यें आहे; त्यांचा आमचा प्राणमय पिंड, शरीर पिंड एकाच नमुन्याबरहुकूम बनविलेला आहे; असें असून देखील या आमच्या मानवबंधूंची ओळख करून घेण्यास आमच्या बाह्य मनापाशीं प्रत्यक्ष साधन नाहीं. मानवी मनाचें आणि शरीराचें सर्वसाधारण ज्ञान आम्हांला करून घेतां येतें आणि हें ज्ञान आम्ही दुसऱ्या मानवांच्या बाबतींत उपयोगांत आणतो. माणसाच्या आंत चालणाऱ्या हालचालींच्या निदर्शक अशा नेहमींच्या बाह्य खुणा आमच्या परिचयाच्या असतात; त्यांचाहि आम्ही दुसऱ्या माणसांसंबंधींचें ज्ञान करून घेण्यासाठीं उपयोग करतो. शिवाय विशिष्ट माणसाच्या वैयक्तिक स्वभावाची आणि संवयींची आम्हांला माहिती असते, तीहि त्याच्या बाबतींत आम्हांला उपयोगी पडते -- शिवाय आमचें स्वत:संबंधीचें जें ज्ञान आम्हांला असतें, त्याचाहि न कळत, सहज प्रेरणेनें, दुसऱ्या माणसांची मन:स्थिति समजून घेण्यासाठीं, त्यांजविषयीं बरावाईट निर्णय घेण्यासाठीं व दुसऱ्यांचें बोलणें, वागणें यांजवरून त्यांच्यासंबधीं अनुमान बसविण्यासाठीं आम्ही उपयोग करीत असतो. सूक्ष्म आंतरनिरीक्षण, सहानुभूतीची आंतर्दृष्टि याहि गोष्टी आम्हांला दुसऱ्या माणसांसंबंधीं ज्ञान करून घेण्यास उपयोगी पडतात. पण या सर्व प्रकारांनीं इतरांविषयींचें ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला, तरी त्या प्रयत्नाचें फळ फारसें समाधानकारक असत नाहीं. आम्हीं या पद्धतींनीं मिळविलेलें ज्ञान अपुरें असतें, फसवेंहि असूं शकतें; आम्ही अनुमानें रचतो, तीं जितकीं बरोबर तितकीं चुकीचींहि असतात. बाह्य खुणांवरून आम्हीं आंतर स्थितीचा जो अर्थ लावतो तो अजमास असतो व तोहि चुकूं शकतो. आमचें सामान्य ज्ञान, आमचें आत्मज्ञान आम्ही उपयोगांत आणतो तेंहि, व्यक्तींव्यक्तींच्या स्वभावांत, संवयींत वगैरे जें अंतर असतें त्या अंतरामुळें बरोबर काम देत नाहीं; चुकीचें निर्णय करवितें. आमची आंतरदृष्टि अविश्वसनीय

पान क्र. ४२६

 

असते, ती निश्चित ज्ञान देणारी नसतें -- म्हणून वर सांगितल्याप्रमाणें या सर्व प्रकारांचा उपयोग करूनहि आम्हांला पुरेसें ज्ञान मिळवितां येत नाहीं व जें मिळवितां येतें तें फसवें असूं शकतें. ही अशी स्थिति असल्यानें मानवी प्राणी एकमेकांना परके असावेत असे ते वागतात -- त्यांना एकत्र बांधावयास, थोडीशी अन्योन्यविषयक सहानुभूति आणि थोडासा अन्योन्यांचा अन्योन्यांना येणारा अनुभव येवढाच काय तो आमच्याजवळ असतो; अगदीं आमच्या जवळचीं जीं माणसें असतात, त्यांच्याविषयींहि आम्हांला पुरेसें ज्ञान नसतें; एवढेंच काय, आम्ही स्वतःला सुद्धां फारसे ओळखीत नाहीं -- आणि साहजिकच जितके आम्ही स्वतःला ओळखतो तितके कांहीं दुसऱ्यांना आम्ही ओळखूं शकत नाहीं. अशी आमच्या बाह्य जाणिवेची स्थिति आहे. आंतर तलवर्ती जाणिवेची गोष्ट अगदीं निराळी आहे. तेथें आमच्या सभोंवार जे विचार, ज्या भावना वावरतात त्या प्रत्यक्ष कळणें शक्य असतें. त्यांचा आम्हांला घडलेला संपर्क आम्हांला स्पष्ट कळतो. त्यांच्या हालचाली आम्हांला स्पष्ट दिसूं शकतात. तेथे मन, हृदय वाचणें, त्यांत काय चाललें आहे तें ओळखणें हें बाहेरच्या मनापेक्षां कमी कठीण असतें; अधिक निश्चित असतें. एकत्र मिळणारे, एकत्र राहणारे जे कोणी असतात, त्यांच्यामध्यें मानसिक, प्राणिक, सूक्ष्म दैहिक विचारादि विनिमय सारखा होत असतो -- हा विनिमय होत आहे हें त्यांचें त्यांना माहीत होत नाहीं -- भाषण, कृति, बाह्यस्पर्श यांच्याद्वारां नित्य चाललेला विचारादि विनिमय त्यांना काय कळेल तेवढाच. सूक्ष्मपणें, अदृश्यपणें भेटणाऱ्या किंवा एकत्र राहणाऱ्यांमध्यें विचारादि विनिमय सारखा होत असतो. आंतर मन, प्राण, सूक्ष्म देह यांचा परस्पर क्रियाविनिमय जो होतो तो आंतर- मनाच्या, प्राणाच्या, शरीराच्याद्वारां बाहेरच्या मन-प्राण-शरीराला प्रतीत होतो आणि नंतर भाषणादि द्वारां इतरांना प्रतीत होतो. पण या आंतरमन-प्राण-शरीरांत आम्हीं जाणिवेनें हिंडू फिरूं लागलो, म्हणजे हा सारखा चाललेला आंतरविचारादि विनिमय, विचारादिकांचें संमिश्रण आम्हांला आमच्या अंतरांत ताबडतोब प्रतीत होतें. याचा परिणाम असा होतो कीं, आमच्यावर इतरांकडून जे विचारादि आघात होतात त्यांची गुलामी, न जाणतां, आम्हांला करावी लागत नाहीं; नको असलेल्या विचारांपासून वगैरे आम्हीं आमचें संरक्षण करूं शकतो. हवे असलेले विचार घेऊं शकतो; नको असलेलें दूर ठेवूं शकतो. तसेंच, दुसऱ्याला

पान क्र. ४२७

 

नुकसान पोंचेल असें कृत्य न जाणतां किंवा अनिच्छेनें, आमच्या हांतून घडू शकत नाहीं. दुसऱ्यांची गरज जाणून त्यांना मदत होईल असें काम आम्हांला करतां येतें. दुसऱ्यांना आमचे चांगले विचार, भावना देतां येतात. त्यांची सोय होईल असे आम्हांला वागतां येतें; त्यांचें आमचें आंतरऐक्य घडवून आणतां येतें. आंतरज्ञानाच्या अभावीं आज आम्हां मानवांची, बाह्यत: राहण्याची व्यवस्था एकत्र असून, आमच्यांत मनाची विभक्तता असते. एकमेकांची सहकारिता मर्यादित असते. एकमेकांचे एकमेकांविषयीं अनेक गैरसमज असतात. एकमेकांच्या वागण्याचा भलताच अर्थ आम्हीं करीत असतो आणि फलत: एकमेकांशी आम्हीं वागतो त्या रीती चुकीच्या असतात.

      माणसामाणसांमधील ऐक्यांत वाढ होण्याच्या कामीं आंतर तलवर्ती पुरुषाची जाणीव जशी फार उपयुक्त होऊं शकते, तशी ती आमच्या सभोंवार ज्या विश्वशक्ती व्यक्तिनिरपेक्षतेनें, व्यक्तित्वशून्य सर्वसमानतेनें काम करीत असतात, त्यांच्याशीं आमचा होणारा व्यवहार सांप्रतच्या स्वरूपाहून वेगळ्या स्वरूपाचा होण्याच्या कामी फार उपयोगी पडते, पडूं शकते. विश्वशक्तींशीं घडणाऱ्या व्यवहारांतील बदल आणि माणसामाणसांतील व्यवहारांत घडणारा बदल हे सारखेच महत्त्वाचे आहेत. विश्वशक्ती त्यांच्या दृश्य कार्यावरून, त्यांच्या दृश्य परिणामांवरून आम्ही ओळखतो. आमची बाह्य जाणीव अधिक कांहीं जाणूं शकत नाहीं. विश्वशक्तींपैकीं भौतिक शक्ती कांहीं कांहींशा आमच्या थोड्याबहुत परिचयाच्या होतात. अदृश्य मानसिक शक्ती, अदृश्य प्राणिक शक्ती या ज्या विश्वशक्ती आहेत, त्यांचें अस्तित्वदेखील आम्हांला ज्ञात नसतें; पण त्यांचा आमच्या सभोंवार सारखा नाच चाललेला असतो. हा नाच आंतरपुरुषाची जाणीव आमच्या नजरेस आणूं शकते, आमच्या परिचयाचा करूं शकते; तिला हा नाच प्रत्यक्ष संपर्कानें माहीत होतो; अंतर्दृष्टि, आत्मिक संवेदना हा नाच तिला परिचयाचा करून देतात. तिला याप्रमाणें परिचित झालेला विश्वशक्तींचा पिंगा ती आम्हांला सर्व माहीत करून देऊं शकेल. सांप्रत, केवळ कांहीं सूचना वगैरे बाहेरच्या जाणिवेला ती देऊं शकते; या सूचनांचा वगैरे अर्थ आम्हांला नीट कळत नाहीं. आंतून प्रसंगीं सावधगिरीच्या सूचना येतात, अमुक घडेल असें वाटूं लागतें, कसलें तरी आकर्षण उत्पन्न होतें, कसली तरी घृणा उत्पन्न होते, कांहीं अनपेक्षित कल्पना मनांत येतात, कांहीं

पान क्र. ४२८

 

अंधुक स्फूर्ति होते, अमुक करावें अशी टोंचणी आंतून होते; अशा या अंतर्गत हालचाली बाहेरच्या वक्रमार्गी जाणिवेपर्यंत अधूनमधून अर्धवटपणें पोंचतात. आंतरजाणिवेच्या क्षेत्रांत आम्ही प्रत्यक्ष उतरूं शकत नाहीं तोंवर यापेक्षां अधिक ज्ञान आमच्या (बाह्य) जाणिवेला होऊं शकत नाहीं. आंतरजाणिवेंत आपण उतरलो म्हणजे सर्वच बदलतें. विश्वशक्तींचा निकटचा हेतु आणि हालचाल या जाणिवेला प्रत्यक्ष दिसतात. या हालचालींचे दूरचे परिणामहि तिला दिसतात. एवढेंच नव्हे, तर या विश्वशक्तींचें भावी कार्य, अमुक वेळेला अमुक होईल असें कांहीं प्रमाणांत, अगोदर या आंतर जाणिवेला वर्तवितां येतें. कालाची बंदी मोडून, पुढें होणाऱ्या घटनांचे स्पंद, कालाच्या दूर अंतरावर होणाऱ्या घटनांचें स्पंद, ही आंतरवाणी अगोदर जाणूं शकते; भविष्यांत ती डोकावूं शकते. तेथें काय ठरलें आहे तें आत्मसात् करूं शकते. अर्थात् हें ज्ञान अगदीं पूर्ण नसतें. ज्ञान-अज्ञान असें मिश्रण या ज्ञानांत असतें. आंतर जाणीव कांहीं तादात्म्यानें ज्ञान मिळवीत नाहीं, (तादात्म्यानें मिळविलेलें ज्ञान पूर्ण आणि पूर्णत: यथार्थ असतें) तर प्रत्यक्ष संपर्कानें मिळवितें. हें ज्ञान भेद-अधिष्ठित असल्यानें तिला जसें यथार्थ वस्तुग्रहण करतां येतें, तसें अयथार्थ ग्रहणहि तिजकडून होतें. अर्थात् बाझ प्रकृतीला जितकें यथार्थ ज्ञान मिळवितां येते, त्यापेक्षां आंतरप्रकृतीला भेद-अधिष्ठित ज्ञानहि अधिक यथार्थ मिळवितां येतें. आंतर मानसिक आणि प्राणिक प्रकृति ही ज्ञान-अज्ञानाची मिश्र पात्रता बाळगते; यामुळें आंतरजाणिवेंत अधिक ज्ञानाबरोबर अधिक अज्ञानहि मिळविते. हा जो आंतरप्रकृतीचा मिश्रपणाचा दोष, तो दूर करण्याचा उपाय म्हणजे अधिक आंत, अधिक खोल जाऊन, वैयक्तिक प्राण-शरीराचा आधार जो आंतरात्मा, चैत्य पुरुष, त्याचा आश्रय करणें हा आहे. हा आंतरात्मा तलवर्ती मन-प्राण-शरीराधिष्ठात्मा, आंतर आत्म्याच्या पाठीमागें असतो, खालीं असतो, सर्वांत खोल जागीं असतो. आमच्या ठिकाणीं आत्म-व्यक्ति विकासक्रमांत खोल जागीं तयार होऊन क्रियाशील होत आहे. आमच्या बाह्य मन-प्राण-शरीरासाठीं या आंतील आत्मव्यक्तीचा प्रतिनिधि आमच्या बाह्य प्रकृतींतहि विकसित झाला आहे. खोल जागीं असलेल्या आत्मव्यक्तीनेंच हा आपला सूक्ष्म प्रतिनिधि बाह्य प्रकृतींत धाडला आहे. पण हा बाह्य प्रकृतींतील सूक्ष्म आत्मा बाह्य मन-प्राण-शरीरावर आपल्या प्रकटीकरणासाठीं अवलंबून असतो. तो आमच्या बाह्य क्रियांचा, विचारांचा पूर्ण स्वामी नसतो. त्याला पराभूत करून मन आणि प्राण

पान क्र. ४२९

 

कित्येक प्रसंगीं, बहुतेक प्रसंगीं आपलीच इच्छा अंमलांत आणतात. त्याच्या मार्गदर्शनाला कांहीं किंमत देत नाहीत. मात्र हा सूक्ष्म आत्मप्रतिनिधि, आपल्या मूळ गुप्तरूप, स्वामीरूप महान् आत्मव्यक्तीशीं सारखा जोडलेला राहूं शकला, म्हणजे त्याचें परावलंबित्व संपतें. आम्ही तलवर्ती आंतर आत्म्यांत खोल शिरून, त्याच्या पलीकडे असलेल्या विशाल आत्म्याशीं आमच्या सूक्ष्म आत्म्याची गांठ घालून देऊन, ही नित्य सहचारिता उत्पन्न करूं शकतो. आमचा बाह्य प्रकृतींतील सूक्ष्म आत्मा, त्याच्या खऱ्या असलेल्या स्वरूपाशी, आंतरात्म्याशीं नित्याचा जोडला गेला, म्हणजे त्याचें सामर्थ्य वाढतें; तो खरा स्वामी होतो. वस्तुजाताचें आत्मिक सत्य त्याला स्वाभाविक आत्मदृष्टीनें दिसतें. त्याला स्वाभाविक पूर्ण विवेचकशक्ति येते. अज्ञान आणि अचेतनता यांनीं निर्मिलेल्या असत्य घटनांपासून सत्य घटना त्याला अलग करतां येतात. आविष्काराच्या क्षेत्रांत खरें दिव्यत्व कोठें आहे, त्याचा अभाव व अदिव्यत्व कोठें आहे, हें त्याला स्पष्ट कळतें; आणि या ज्ञानाच्या आधारें तो आपल्या इतर अंगांचा खरा मार्गदर्शक होऊं शकतो, ज्ञानी नेता होऊं शकतो. हें घडून आलें, म्हणजे आमच्या प्रकृतीचें पूर्ण रूपान्तर घडविणें आणि पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेणें, हें जें आमचें उद्दिष्ट, हें जें निसर्गाचें उद्दिष्ट, हें जें विकास-योजनेचें उद्दिष्ट, त्याच्या दिशेनें मार्गक्रमण करण्यास आम्हीं सुरुवात केली असें म्हणतां येईल. आंतर जाणिवेचे गतिमान नियत व्यापार आणि तिची व्यवहारोपयोगी मूल्यें, वर सांगितल्याप्रमाणें आहेत; आम्हीं सध्यां जी तपासणी चालविली आहे, तिच्या दृष्टीनें हें आम्हांला पहावयाचें आहे कीं, या जाणिवेचा जो ज्ञानमार्गी कृतिमार्ग आहे, त्यावरून या विशाल आणि सखोल (बाह्य जाणिवेच्या तुलनेनें) जाणिवेचें खरें स्वरूप काय दिसतें आणि खऱ्या ज्ञानाशीं तिचा काय संबंध दिसतो या जाणिवेचा विषयाशीं किंवा अन्य जाणिवेशीं, प्रत्यक्ष संपर्क येतो व त्या प्रत्यक्ष संपर्कानें या जाणिवेला त्या विषयाचें (वस्तूंचें) किंवा दुसऱ्या जाणिवेचें ज्ञान होतें; हें या जाणिवेचें व तिच्या पदरांत पडणाऱ्या ज्ञानाचें प्रधान स्वरूप, आमच्या नजरेस येतें; आंतर जाणिवेची ही ज्ञानार्जनशक्ति, तादात्म्याधिष्ठित गुप्त ज्ञानाची परिणामरूप आहे. एकता, अभेद, तादात्म्य या सत्यावर मूळ ज्ञान अधिष्ठित असतें. आंतरजाणिवेला जें ज्ञान मिळतें, तें एकतेच्या, अभेदाच्या तादात्म्याच्या द्वारां मिळत नाहीं; तर भेदाच्या द्वारां मिळतें. संपर्क प्रत्यक्ष असो, अप्रत्यक्ष असो, त्यांत

पान क्र. ४३०

 

भेद अनिवार्य आहे. प्रत्यक्ष संपर्कांत जो जाणीव-जाणीव यांचा भेद असतो, जाणीव-वस्तु यांचा भेद असतो, तो फार थोडा असतो इतकेंच. आमची सामान्य जाणीव अप्रत्यक्ष संपर्कानें ज्ञान मिळवितें; आमचा जीव आणि त्याच्या बाहेरचें अस्तित्व यांचें एकत्र मीलन होतें, किंवा संघर्ष होतो आणि या मीलनानें किंवा संघर्षणानें ज्ञानाची ठिणगी आमच्या जाणिवेच्या ठिकाणीं उत्पन्न होते; ही बाह्य जाणिवेची ज्ञानपद्धति; आंतर जाणिवेलाहि थोड्याशा संपर्काची आवश्यकता असते. हा संपर्क लाभला म्हणजे, पूर्वींच तयार असलेलें गुप्त ज्ञान गतिमान् होतें आणि पृष्ठाकडे, आंतर जाणिवेकडे येतें; कारण जाणीव इथून तिथून एक आहे. ज्ञाता आणि ज्ञेय दोहोंमध्यें एक जाणीव अखंडपणें आहे. एका अस्तित्वाचा दुसऱ्या अस्तित्वाशीं संपर्क झाला कीं, मूळ जी जाणिवेची एकता असते, ती एका ज्ञात्या आत्म्याचें ज्ञान जागृत करते, प्रकट करते. बाह्य जाणिवेंत आणि आंतर जाणिवेंत भेद इतकाच कीं, बाह्य जाणिवेला अखंड जाणिवेंतील नित्य पूर्वोपस्थित ज्ञान साधनांच्या द्वारां अप्रत्यक्षपणें मिळवावें लागतें आणि आंतर जाणिवेला बाह्य जाणिवेसारखीं साधनें लागत नाहींत; ती जाणीव स्वत: सर्व प्रत्यक्ष पाहाते. ती आंतून सर्व ज्ञान मिळविते; जणुं स्मृतींत सांठविलेलें ती बाहेर काढते; ती आंतरजाणीव अंतःस्फूर्तियुक्त असेल तर तिला स्वयंप्रमाण स्वयंसिद्ध म्हणून ज्ञान मिळतें; वस्तुसंपर्कानें वस्तूचें ज्ञान तिला मिळतें तेंहि वस्तु अगदीं आंतून तिच्या ओळखीची असल्याप्रमाणें वस्तुसंपर्क घडतांक्षणींच वस्तुज्ञान तिला प्राप्त होतें. पृष्ठवर्ती जाणिवेंत ज्ञान जें असतें तें, बाहेरच्या संचयाचें, बाहेरून आलेलें अशा स्वरूपाचें दिसतें. वस्तू बाहेर असते आणि ती वस्तु स्वतःविषयीचें ज्ञान आमच्याकडे फेंकते, असा देखावा आमच्या बाह्य जाणिवेच्या ज्ञानाचा असतो; इंद्रियाला वस्तूचा स्पर्श होऊन त्या स्पर्शाला उत्तर म्हणून जी प्रतिक्रिया जाणिवेंत होते, तें आमचें बाह्य ज्ञान, असेंहि म्हणतां येतें. वस्तु बाहेर 'वस्तु' म्हणून असते आणि तिचें मनानें इंद्रियांच्या आधारें काढलेलें चित्र म्हणजे बाह्य जाणिवेचें ज्ञान, असेंहि आमच्या ज्ञानाचें वर्णन करतां येईल. आमच्या पृष्ठवर्ती मनाला, आपल्या ज्ञानाचें अशा प्रकारांनीं वर्णन करावें लागतें, याचें कारण असें आहे कीं, मन आणि बाहेरचें जग यांच्यामध्यें भिंत आहे व या भिंतींत इंद्रियरूपी दरवाजे आहेत. या दरवाज्यांच्या द्वारां बाहेरच्या वस्तूंचा पृष्ठभाग मनाला दिसतो; त्या वस्तूंच्या पोटांतलें कांहीं दिसत नाहीं. दुसरी गोष्ट,

पान क्र. ४३१

 

बाह्य मनाच्या आंत त्याचेंच जें आंतरस्वरूप आहे तें, आंतरमन आणि बाह्य मन यांच्यामध्यें जी भिंत आहे तिच्यांत कांहीं तयार दरवाजा नाहीं : अर्थात् आंतरमनांत काय आहे, तें बाह्य मनाला दिसत नाहीं. आंतून जें ज्ञान बाहेर येतें त्याची प्रक्रियाहि बाह्य मनाला कळत नाहीं, दिसत नाहीं; अशा परिस्थितींत बाह्य मनाला त्याला मिळणाऱ्या ज्ञानाचें कारण, बाह्य वस्तु -- त्याला दिसूं शकते ती बाह्य वस्तु -- आहे किंवा त्याचा पृष्ठभाग आहे, असेंच मानणें प्राप्त होतें. आमचें वस्तुजातासंबंधाचें मानसिक ज्ञान याप्रमाणें बाह्यवस्तुनिष्ठ, बाह्यवस्तुवश म्हणून आम्हांला दिसतें, बाहेरून आमच्या मनावर लादलेलें सत्य या स्वरूपाचें तें दिसतें; आमच्या अस्तित्वांत अंतर्भूत नसलेल्या 'कशाचें तरी प्रतिबिंब', चित्र, मनोमय लेखन हें या ज्ञानाचें स्वरूप दिसतें. वस्तुत: वस्तूचा स्पर्श झाल्यावर गुप्त आंतरजाणिवेकडून प्रतिक्रिया होते; ही आतील प्रतिक्रिया वस्तूच्या अंतरंगाचें ज्ञान आम्हांला (बाह्यजाणिवेला) पुरविते. (आमच्या विशाल आत्म्याचा एक घटक, हें कोणत्याहि वस्तूचें खरें स्वरूप असतें.) पण दुहेरी पडदा हें आंतून आलेलें ज्ञान विकृत करतो. आमचा अज्ञानग्रस्त बाह्य आत्मा आणि आमचा आंतरात्मा यांच्यामध्यें पडदा असतो आणि आमचा पृष्ठवर्ती बाह्य आत्मा आणि स्पर्शविषयक वस्तु यांच्यामध्येंहि पडदा असतो. या दुहेरी पडद्यामुळें आंतून निघालेलें अंतरंगज्ञान पृष्ठवर्ती जाणिवेच्या पटावर अर्धवट चित्राच्या स्वरूपांत उतरतें.

      आंतरजाणीव बाहेरच्या जाणिवेशीं गुप्तपणें संलग्न आहे, आमचें ज्ञान गुप्त पद्धतीनें तयार होतें, ही गोष्ट बाह्य जाणिवेला, आमच्या सध्यांच्या मनाला स्पष्टपणें जाणवत नाहीं, त्याच्यापासून ती लपलेली आहे. आंतर तलवर्ती पुरुष व्यक्तित्वाच्या मर्यादा मोडून आणि बाह्य पृष्ठवर्ती मनाला बरोबर घेऊन, विश्वजाणिवेंत प्रवेश करतो, तेव्हां वरील गोष्ट (आंतरजाणीव बाह्य जाणिवेशी संलग्न आहे ही गोष्ट) आमच्या बाह्य मनाला स्पष्ट होते. आमच्या अस्तित्वाचे जे कोश (देह) आहेत, त्या कोशांमुळें आंतरपुरुष विश्वपुरुषापासून वेगळा झालेला आहे. आम्हांला सूक्ष्म मनोदेह, प्राणदेह आणि भौतिक देह आहेत. आमची बाह्य पृष्ठवर्ती प्रकृति आणि विश्वप्रकृति यांच्यामध्यें जशी स्थूल भौतिक कोशाची (देहाची) भिंत आहे, तशीच आमची आंतरप्रकृति आणि विश्वप्रकृति यांच्यामध्यें आंतरसूक्ष्म कोशांची (देहांची) भिंत आहे. मात्र ही चोहोंबाजूंनीं आंतर-पुरुषाला वेढणारी भिंत अधिक पारदर्शक आहे;

पान क्र. ४३२

 

ही खरी भिंत नसून कुंपणासारखी व्यवस्था आहे. या कुंपणासारख्या सूक्ष्म मन-प्राण-शरीरांच्या मर्यादा पार करून, सभोंवार बऱ्याच क्षेत्रावर पसरलेली जाणीव असलेली, व त्याची अंगभूत परिसरदर्शिनीचें काम करणारी अशी रचना या आंतरपुरुषाला असते. हें त्याचें परिसरव्यापी ज्ञानसमर्थ अंग, विश्वाचे संपर्क (आंतरपुरुषांत प्रवेश करूं इच्छिणारे विश्वसंपर्क) परिसरांत येतांच ग्रहण करतें आणि त्यांचा स्वत:च्या मुख्य शरीरांत (कुंपणांत) प्रवेश होण्यापूर्वीं त्यांची योग्य ती व्यवस्था करतें. हें आपलें परिसरज्ञ आत्मावरणरूप अंग आंतरपुरुष हवें तितकें लांबवर पसरूं शकतो. हवें तितकें मोठें करून सभोंवारच्या विश्वजीवनाच्या क्षेत्रांत अधिकाधिक दूरवर तें फेकूं शकतो. अशी एक परिस्थिति शेवटीं येऊं शकते कीं, जेव्हां विश्वरूप आणि आमचा आंतर पुरुष यांच्यामधील विभक्तता अजिबात नष्ट होते, आणि आंतरपुरुष विश्वपुरुषाशीं मिळून जातो, त्याच्याशीं तादात्म्य पावतो, स्वत: विश्वव्यापित्व भोगतो, सर्व अस्तित्वाशीं एकरूप होतो. विश्वपुरुषांत आणि विश्वप्रकृतींत मोकळेपणें आमचा आंतरपुरुष प्रवेश करूं लागला, म्हणजे आमच्या व्यक्ति-पुरुषाला महान् मुक्तीचा लाभ होतो, आमचा व्यक्तिपुरुष विश्वजाणीव संपादन करतो, विश्वजाणिवेचा स्वामी होतो, थोडक्यांत विश्वव्यक्ति होतो. या रूपांतराचें पहिलें फळ विश्वात्म्याचा साक्षात्कार हें असतें. विश्वांत भरून राहिलेला एकच एक आत्मा आम्हांला भेटतो; या भेटीनें, या ऐक्यानें आमचा व्यक्तित्वाचा भाव समूळ नाहींसा होऊं शकतो; आमचा अहं विश्वपुरुषांत विलीन होऊं शकतो. आमच्या रूपांतराचा दुसरा परिणाम असा होतो कीं, विश्वशक्ति आम्हांला सर्वस्वी आमची होते, आमचा आंतरपुरुष बाह्यपुरुषासह विश्वशक्तीचें मोकळें क्षेत्र बनतो : आमचें मन, आमचा प्राण, आमचें शरीर यांच्यामध्यें विश्वशक्ति काम करीत आहे, अशी प्रतीति आम्हांला येते; वैयक्तिक कार्याची भावना नष्ट होते. ही अंतिम फळें झालीं. सामान्यत: यापेक्षां कमी व्याप्तीचीं पुढील फळें आंतरपुरुषाच्या परिसरज्ञ अंगाच्या सारख्या वाढत्या व्यापाला आलेली पहावयास मिळतात. आम्हांला विश्वपुरुष आणि विश्वशक्ति यांची प्रत्यक्ष प्रतीति येते. विश्वमन आणि त्याच्या शक्ती या आमच्या मनाला अधिकाधिक प्रमाणांत खुल्या होतात. आमचें मन यांना अधिकाधिक प्रमाणांत खुले होतें. स्वत:च्या व्यक्तीची विश्वपुरुषाशी एकता झाल्याची कमी अधिक संवेदना

पान क्र. ४३३

 

स्वतःच्या जाणिवेंत विश्व समाविष्ट झाल्याची आणि विश्वात्म्याच्या जाणिवेंत स्वतःचा समावेश पूर्णतेनें झाल्याची प्रतीति, हे अनुभव, आमचें मन विश्वपुरुषाला, विश्वशक्तीला खुलें झाल्यानें, वारंवार येतात किंवा नित्याचे होतात. या गोष्टीचा परिणाम म्हणून दुसऱ्या जीवांशीं स्वतःच्या एकतेची आमची प्रतीति अधिक जोरदार होते. या सर्व घटनांमुळें, विश्वपुरुषाचें अस्तित्व हें निःसंदिग्ध सत्य आहे, हें आम्हांला कळतें, तें केवळ कल्पनेचें दृश्य रहात नाहीं.

      विश्वपुरुषाची विश्वजाणीव तादात्म्यानें सर्व वस्तू जाणते. सर्वाचा आत्मा मी आहे, सर्व मी बनलों आहे, सर्व मजमध्यें आहे, सर्व प्रकृति माझ्या प्रकृतीचा भाग आहे -- अशा स्वरूपाचें विश्वपुरुषाचें ज्ञान आहे, असतें. त्याच्या पोटीं जें कांहीं आहे (आणि सर्व कांहीं त्याच्या पोटींच आहे) तें त्याच्याशीं एकरूप आहे आणि तो हें तादात्म्यद्वारां जाणतो आणि निकटचें, आपल्या पोटांतलें असेंहि या सर्वाचें ज्ञान त्याला असतें. सर्वांशीं एकरूप आणि सर्वांहून अधिक, प्रत्येक वस्तूशीं एकरूप आणि प्रत्येक वस्तूहून अधिक, अशी विश्वात्म्याची सर्वविषयक व वस्तूसंबंधाची जाणीव असते; वस्तूशीं एकरूप असल्यानें त्या वस्तूचें पूर्ण ज्ञान विश्वात्म्याला असतें. वस्तूहून विश्वात्मा अधिक असल्यानें, तो वस्तूला स्वतःच्या पोटांत स्थान देतो आणि त्या वस्तूच्या पोटांत स्वत: स्थान घेतो. अर्थात् त्या वस्तूचें आंतून बाहेरून सर्व प्रकारचें ज्ञान त्याला असतें. सर्व वस्तूंच्या संबंधांत विश्वात्म्याचें ज्ञान -- वरील प्रकारचें, एकरूपतेनें, बाह्य व्याप्तीनें व आंतरव्याप्तीनें मिळालेलें असें, -- सर्वथा पूर्ण असतें. विश्वात्मा सर्वांच्या पोटीं असतो, प्रत्येकाच्या पोटींहि असतो, आणि सर्वापेक्षां तो मोठा असतो; अर्थात् त्याचें जें आत्मदर्शन आणि विश्वदर्शन असतें, त्यांत त्याला भेद-शक्ति, विभक्ततेची शक्ति असते, जी मुळें तो, त्याची जाणीवशक्ति कोणत्याहि वस्तूच्या किंवा जीवाच्या पोटीं कोंडली जाऊं शकत नाहीं. या वस्तूंच्या व जीवांच्या ठिकाणीं, सर्वव्यापी आत्मा आणि सर्वव्यापी आत्मशक्ति या स्वरूपांत तो, त्याची विश्वजाणीव राहते; जें कांहीं व्यक्तित्वकरण घडतें तें त्या त्या वस्तूपुरतें, त्या त्या जीवांपुरतें घडतें; विश्वात्म्याला या व्यक्तित्वाचें बंधन असत नाहीं. तो प्रत्येक वस्तु बनतो, पण त्यामुळें, त्याचें सर्वसमावेशक विशाल अस्तित्व कमी होत नाहीं. महान् विश्वव्यापी एकता, एकरूपता (विश्वरूपता) आणि या महान् एकतेच्या, एकरूपतेच्या पोटीं

पान क्र. ४३४

 

लहान, लहान अनेक एकता, अगण्य एकरूपता अशी विश्वात्म्याची एकरूपतेची तादात्म्याची गोष्ट आहे : विश्वजाणिवेंत भेदनिष्ठ ज्ञान जें जें असतें किंवा प्रविष्ट होतें तें तें या दुहेरी तादात्म्यावर आधारलेलें असतें; या दुहेरी एकतेला तें विसंवादी असत नाहीं. कांहीं प्रसंगानें कोणत्याहि वस्तूपासून अलग होऊन संपर्कानें तिचें ज्ञान मिळविण्याची विश्वात्म्याला, किंवा विश्वात्म्यांत प्रविष्ट झालेल्या आत्म्याला, गरज उत्पन्न झाली, तर तें अलग होणें व संपर्क करणें हें कार्य, मूळ महान् वा लहान एकात्मता, एकरूपता कायम ठेवून होत असतें; कारण कोणत्याहि व्याप्तीच्या वस्तूच्या पोटांत जी वस्तु असते ती (पोटांतील वस्तु) त्या महान् वस्तूच्या आत्म्याचा एक भाग असते, त्याशीं एकरूप असते.

      विश्वमय जाणिवेंतील भेदज्ञान, अभेदज्ञानावर उभें राहतें. विश्वमय जाणीवच स्वत: तिच्या पोटांतील प्रत्येक वस्तु बनत असल्यामुळें विश्वजाणिवेच्या पोटांत अनेक वस्तुमय जाणिवा असतात. अर्थात् महान् विश्वमय जाणीव हें अभेदज्ञान असतें. त्याप्रमाणें लहान वस्तुमय जाणीव हेंहि अभेदज्ञान असतें. विश्वमय जाणिवेंत लहानमोठ्या भेदज्ञानाची गरज पडते तेव्हां, अभेदज्ञान कायम राखून भेदज्ञान आपलें काम करते. भेदज्ञान आणि अभेदज्ञान समकालीन असतात. दोन्हीं ज्ञानें सारख्या तोलाचीं असतात. कांहीं कारणानें भेदमयत्व, अधिक तीव्र करावयाचें झालें, तर मात्र अभेदज्ञान मागें पडतें; स्वतःला पडद्याआड ठेवून, स्वतःपेक्षां कमी योग्यतेचें प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असें भेदनिष्ठ ज्ञान तें पुढें करतें. हें पुढें केलेलें भेदज्ञान स्वतःच्या उगमाला (अभेदाला) पारखें असतें; तरीपण नेहमी हा अभेदसागरच आपल्या पृष्ठभागावर, प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष, ज्ञानाच्या लहरी किंवा शिंतोडे उत्पन्न करीत असतो, ही गोष्ट विसरूं नये.

      विश्वात्म्याच्या विश्वजाणिवेची व तिच्यांतील भेदाभेदांची ही गोष्ट झाली. आतां त्याच्या विश्वशक्तींच्या कार्याच्या बाबतींत काय स्थिति असते तें पाहूं : या विश्वशक्ती प्रवाहांच्या, लाटांच्या, संघांच्या हालचाली करतात; या हालचालींत जीव, जड पदार्थ बनविणें, मोडणें, पुन्हां बनविणें हा त्यांचा व्यापार अखंडपणें चाललेला असतो; अनेक घटना, अनेक आंदोलनें या विश्वशक्तींच्या हालचालींत घडत असतात, विघटित होत असतात, पुन्हां सुघटित होत असतात. जीव, पदार्थ, घटना, आंदोलनें आदिक या सर्व गोष्टींतून विश्वशक्ती शिरत असतात; त्यांतून

पान क्र. ४३५

 

मार्ग काढून बाहेर जात असतात, त्यांत स्वतःच्या कांहीं रचना करीत असतात, त्यांतून दुसऱ्या जीवांवर व पदार्थांवर आक्रमण करीत असतात.

      प्रत्येक नैसर्गिक शक्ति ही या विश्वशक्तींना सांठ्याच्या पात्राप्रमाणें सांठविणारी आणि विद्युज्जनकाप्रमाणें त्यांचा उत्पादनपूर्वक विस्तार व प्रसार करणारी वस्तु असते. मानसिक आणि प्राणिक विश्वशक्तींचा प्रवाह, प्रत्येक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सारखा वहात असतो; भौतिक निसर्गाच्या शक्तीप्रमाणें मानसिक व प्राणिक शक्तीहि विश्वव्यापी प्रवाहांच्या रूपानें मार्गक्रमण करीत असतात. आमच्या पृष्ठवर्ती मनाला जें प्रत्यक्ष संवेदन आणि ज्ञान होतें, त्यांत, मध्यें पडदा असल्यानें मानसिक, प्राणिक, शक्तींचें कार्य अंतर्भूत होत नाहीं. आंतरपुरुषाला या शक्तींचें संवेदन घडतें व ज्ञानहि होते; मात्र त्यालाहि प्रत्यक्ष स्पर्श या साधनाच्या द्वारां या शक्तींच्या प्रवाहांची प्रतीति घडते. विश्वजाणिवेंत व्यक्ति, आंतरव्यक्ति प्रविष्ट झाली, म्हणजे विश्वशक्तींचा खेळ तिला अधिक विस्तारश:, अधिक अंतरंगांतून प्रतीत होतो; या शक्ती अधिक स्पष्टपणें तिच्या पोटांत वावरत असल्याचें तिला कळतें. विश्वशक्तींच्या कार्याचें वरीलप्रकारें ज्ञान झाल्यानें आंतरपुरुषाचें ज्ञान अधिक पूर्ण होतें. परंतु या ज्ञानाला कार्यप्रवण करणें, कार्यान्वित करणें मात्र आंतरपुरुषाला पूर्णतेनें साधत नाहीं. आंतरपुरुषाला विश्वात्म्याशीं पायाभूत किंवा अक्रिय एकता साधली, (आणि ती त्याला साधूं शकते) तरी या विश्वात्म्याच्या विश्वप्रकृतीशीं क्रियाशील एकता पूर्णपणें साधणें आंतरपुरुषाला शक्य नसतें. मानसिक आणि प्राणिक पातळीवर ज्या शक्ती काम करतात त्या स्वभावत: व्यक्तिनिष्ठ निवडीनें निवडलेल्या असतात; विश्वशक्ति हीच प्राणिक, मानसिक पातळीवर काम करीत असली, तरी तिची कार्यपद्धति, व्यक्तिरूप जिवंत विद्युज्जनकाच्या यंत्रांत विशिष्ट व्यक्तिरूप (वैयक्तिक रचनेचें रूप) धारण करून काम करणें चालूं राहते. आंतरपुरुष विश्वपुरुषाशीं एकरूप होऊन आपलें वेगळेंपण विसरला, तरी त्याच्या प्राणिक, मानसिक पातळीवर, विश्वशक्तीचें व्यक्तिविशिष्ट रूप घेऊन काम करणें चालूं राहतें. कारण व्यक्तित्व हें विद्युज्जनकाचें कार्य करण्यासाठीं हेतुपुरःसर योजलेलें आहे; या विद्युज्जनकाचें कार्य म्हणजे विश्वशक्तींतून विशिष्ट भाग निवडणें, त्यांना केंद्रित करून त्यांना विशिष्ट रूप देणें आणि विशिष्ट प्रवाहाच्या रूपानें विशिष्ट पात्रांतून त्यांना फिरविणें हें आहे. विश्वशक्ति सामग्ऱ्यानें प्रवाहित झाली, तर

पान क्र. ४३६

 

त्याचा अर्थ, हा व्यक्तिरूप विद्युज्जनक आवश्यक राहिला नाहीं; त्याला बाजूला काढला, रद्द केला तरी चालेल, असा होईल; वैयक्तिक मन-प्राण-शरीरानें वैयक्तिकरीत्या कार्य करण्याचें सोडावयाचें, व्यक्ति ही निर्व्यक्तिक केन्द्र किंवा पात्र बनून या व्यक्तित्वशून्य ''व्यक्ति'' केन्द्रांतून वा पात्रांतून विश्वशक्ती अप्रतिहत रीतीनें, निवडानिवडशून्य प्रकारानें, वहावयाच्या असा, सामग्ऱ्यानें विश्वशक्ति प्रवाहित होण्याचा अर्थ होईल. अशी गोष्ट घडूं शकत नाहीं असे नाहीं. परंतु असा विश्वशक्तीचा समग्र प्रवाह शक्य होण्यास आजची जी सर्वसाधारण मानसिक पातळी आहे, तिच्यापेक्षां फार उंच अशी आध्यात्मिकतेची पातळी गांठावी लागेल. आंतरविश्वमय झालेला पुरुष अभेदानें होणारे विश्वज्ञान, अक्रिय विश्वज्ञान मिळवितो, तेव्हां विश्वात्मा आणि दुसऱ्या सर्व जीवांचे गुप्त आत्मे स्वतःशीं एकरूप आहेत अशी या आंतरपुरुषाला प्रतीति येते; परंतु या ज्ञानाला सक्रिय स्वरूप बेतानेंच प्राप्त होऊं शकतें. या एकात्मतेच्या संवेदनेनें त्याच्या जाणिवेचा सर्वांशीं प्रत्यक्ष संबंध, संपर्क अधिक निकटचा होऊं शकतो, अधिक प्रमाणांत होऊं शकतो; त्याच्या जाणिवेच्या शक्तीचा वस्तूंवर व इतर जीवांवर अधिक प्रमाणांत, अधिक जिव्हाळ्याचा, अधिक परिणामकारक आघात होऊं शकतो; इतर जीव व वस्तु यांना अधिक परिणामकारक रीतीनें तो आपल्या पोटांत सामावूं शकतो व स्वत: त्यांच्या पोटांत अधिक परिणामकारक रीतीनें जाऊं शकतो; त्याला जवळून सर्व पाहतां येतें, जवळून सर्वांना स्पर्श करतां येतो; त्याची दृष्टि, भावना व दुसऱ्या ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती (त्याच्या प्रकृतीला अनुरूप असतात अशा सर्व शक्ती) अधिक तीव्र आणि कार्यकारी होतात; पण यापलीकडे त्याची मजल जाऊं शकत नाहीं.

      तेव्हां आंतरपुरुष विश्वात्म्याशीं, त्याच्या जाणिवेशी एकरूप झाला, तरी त्यायोगें अगदीं पूर्ण आणि मूळ ज्ञान त्याला लाभत नाहीं -- त्याहून कमी दर्जाचें मोठे ज्ञान मात्र लाभतें. अभेदज्ञान शुद्ध स्वरूपांत कसें असतें, ज्ञानाच्या दुसऱ्या शक्ती तें कशा आणि किती प्रमाणांत निर्माण करते, आपल्या कार्यांत येऊं देतें किंवा उपयोगास आणतें हें सर्व पहावयाचें असेल तर आम्हांला आंतर मन, प्राण, सूक्ष्मशरीर यांच्या पलीकडे असलेलीं आंतरजाणिवेचीं दोन बाजूंचीं टोंकें तपासलीं पाहिजेत. एका बाजूला अवचेतनता आणि दुसऱ्या बाजूला अतिचेतनता हीं तीं आतरजाणिवेची दोन टोंकें होत. अवचेतन प्रांतांत सर्व कांहीं आंधळें असतें; जमावाच्या

पान क्र. ४३७

 

जाणिवेंत संपणारें, आंधळें, अर्धबोबडें विश्वमयत्व अवचेतनांत असतें; त्यांत आंधळें, अर्धबोबडें व्यक्तित्व सुद्धां असतें; असलें व्यक्तित्व सामान्य मानवांत सांपडत नाहीं; रोगी किंवा रोगट प्रकृतीच्या मानवांत सांपडूं शकतें. सहजभावनेचें, वेडीवांकडी बनावट असलेलें असें हें अवचेतनांतील व्यक्तित्व असतें. या अवचेतनाच्या प्रांतांत आंधळें अभेदज्ञान -- अचेतनांत प्रतीतीस येतें तें -- पायाभूत असतें; परंतु हें ज्ञान स्वतःचें स्वरूप आणि स्वतःचें गुपित आम्हांला उघडून दाखवीत नाहीं, दाखवूं शकत नाहीं. दुसरें टोंक जें अतिचेतन जाणिवेचें, त्याची वेगळी कहाणी आहे. आमच्या जाणिवेला अज्ञात अशा अतिचेतन जाणिवेच्या अनेक श्रेष्ठ भूमी आहेत. त्यांचा पाया आध्यात्मिक जाणीव हा आहे. तेजोमय स्वयंप्रकाश, सर्वबंधनातीत, पूर्ण स्वतंत्र अशी ही पायाभूत आध्यात्मिक जाणीव असते. अर्थात् येथें अतिचेतनाच्या प्रांतांत ज्ञानाची मूळ शक्ति शोधाअंतीं आम्हांला सांपडते, येथें आम्हांला अभेदज्ञान (अभेद अधिष्ठित ज्ञान) आणि भेदज्ञान (भेद अधिष्ठित ज्ञान) या एकमेकांपासून स्पष्टपणें वेगळ्या असणाऱ्या ज्ञानवर्गांचा उदय कसा, कोठें होतो आणि त्या दोहोंतील अंतर काय, हें सूक्ष्मतेनें पहावयास सांपडतें.

      जें सर्वश्रेष्ठ कालातीत अस्तित्व (सद्रूप) आहे, आध्यात्मिक अनुभूतींत जें अस्तित्व प्रतिबिंबित होतें, तें अस्तित्व आणि जाणीव यांचें बनलेलें असतें. आम्हांला या सर्वश्रेष्ठ अस्तित्वाची ओळख होते ती आध्यात्मिक अनुभूतींतील त्याच्या प्रतिबिंबावरूनच होते आणि या अनुभूतींतील प्रतिबिंबाची तपासणी केली असतां, तेथें अस्तित्व आणि जाणीव एकत्र एकरूप आहेत असें आम्हांला दिसतें : जाणिवेवांचून अस्तित्व नाहीं, अस्तित्वावांचून जाणीव नाहीं, अशी व्यवस्था मुळांत असतें हें आमचा आध्यात्मिक अनुभव आम्हांला सांगतो. इंद्रियांच्या आणि मनाच्या कांहीं विशिष्ट व्यापारांना आम्ही जाणिवेचे व्यापार म्हणतो; या व्यापारांवांचून जाणीव असत नाहीं; हे व्यापार म्हणजे जाणीव, अशी आमची समजूत झालेली आहे. या व्यापारांशीं जाणिवेचें अभेद्य तादात्म्य मानण्याची आमची परंपरा आहे. जेथें विशिष्ट मानसिक व इंद्रियगत व्यापार दिसत नाहीत, सुप्त असतात किंवा प्रत्ययास येत नाहींत, तेथें त्या अवस्थेला आम्ही नेणिवेची जाणीवहीन अवस्था, अचेतन अवस्था मानतो व म्हणतो; परंतु उघड दिसणारे चेतनेचे, जाणिवेचे व्यापार किंवा लक्षणें जेथें नाहींत, तेथेंहि चेतना, जाणीव असूं शकते, वस्तूमध्यें

पान क्र. ४३८

 

शुद्ध अस्तित्वांत जाणीव बुडून गेलेली असते, नास्तित्वाच्या देखाव्यांत दडलेली असते -- जाणिवेच्या अस्तित्वाचीं प्रकट लक्षणें वस्तूंमध्यें मागें घेतलेलीं असतात -- पण जाणीव तेथें असतेच. अस्तित्वांत स्वभावतःच जाणीव उपस्थित असते; अस्तित्वाच्या स्वभावांतच जाणीव अपरिहार्यपणें अंतर्भूत आहे : ती अस्तित्वांत स्वयंसिद्ध स्वयंभू असते; ती शांत असेल, निष्क्रिय असेल, पडद्याआड असेल, जडवत् झाली असेल -- स्वकार्यांत निमग्न होऊन किंवा स्वतःच्या कार्यरूप वस्तूंत बुडून जाऊन, दडून राहून ती जडरूप दिसत असेल -- पण या सर्व स्थितींत ती नाहींशी होत नाहीं; अस्तित्व असेल तेथें ती असतेच; गाढ स्वप्नहीन झोंप, गाढ नेणिवेची तंद्री किंवा समाधि, ज्ञानविनाश, ज्ञानाचा अभाव -- या सर्व अवस्थांत जाणीव अस्तित्वांत राहते; सर्वश्रेष्ठ कालातीत अशी जी सद्वस्तूची मूळ अवस्था, तेथें जाणीव अस्तित्वाशीं एकरूप असते आणि चलनहीन निश्चल असते; तेथें ती अस्तित्वाहून वेगळी वस्तु नसते. अस्तित्वांत स्वभावत: अंतर्भूत असलेलें आत्मज्ञान, आत्मजाणीव हें तिचें शुद्ध साधें स्वरूप त्या ठिकाणीं असतें. आपण ज्याला ज्ञान (ज्ञेयाचें ज्ञात्याला ज्ञान होणें) म्हणतो तें तेथें नसतें; त्याची गरज असत नाहीं. ज्ञानाची आपल्याला परिचित असलेली प्रक्रिया तेथें असत नाहीं; अस्तित्व स्वतःला स्वयंज्ञात, स्वयंप्रमाण, स्वयंसिद्धच असतें. स्वतांकडे त्यानें पहावें, स्वतःची ओळख होण्याकरितां, स्वतःचें अस्तित्व जाणण्याकरितां स्वतःकडे त्यानें नजर टाकावी अशी गरज मूळांत नसते. शुद्ध अस्तित्वासंबंधानें ज्याप्रमाणें आमची ज्ञानप्रक्रिया आवश्यक नसते, त्याप्रमाणें आद्य सर्व अस्तित्वासंबंधानेंहि आमच्या ज्ञानप्रक्रियेची आवश्यकता नसते; शुद्ध आत्मा असतो आणि आपलें अस्तित्व स्वभावतःच जाणतो; शुद्ध आत्म्याचे अस्तित्वांत त्याचें अस्तित्वज्ञान स्वभावत: अंतर्भूत असतें, त्याप्रमाणें या आत्म्याला त्याच्या अस्तित्वांत जें कांहीं अंतर्भूत आहे त्या सर्वाचेंहि ज्ञान स्वभावसिद्ध असतें; त्याकरितां ज्ञानाची क्रिया लागत नाहीं, त्यासाठीं स्वतःकडे पहावें लागत नाहीं, पाहण्याची क्रिया करावी लागत नाहीं. आत्मा  'असतो', तसा आत्मा 'सर्वकांहीं' असतो, म्हणून जसें त्याला स्वतःच्या अस्तित्वाचें ज्ञान स्वाभाविक आहे, तसें स्वतःमधील सर्वाच्या अस्तित्वाचेंहि ज्ञान स्वाभाविक स्वयंसिद्ध आहे. याप्रमाणें आत्मा, मूळ पुरुषोत्तम आपल्या कालातीत शुद्ध अस्तित्वाला ज्याप्रमाणे स्वभावत: (आमच्या परिचयाच्या ज्ञानप्रक्रियेमधून) जाणतो, त्याप्रमाणें तो आपलें कालांकित

पान क्र. ४३९

 

अस्तित्व आणि कालाच्या पोटांत जें जें असतें तेंहि स्वभावत: जाणतो; हीं दोनहि ज्ञानें स्वाभाविक, पूर्ण, समय, ज्ञानप्रक्रियाशून्य अशीं असतात; या ज्ञानाला, जाणिवेला मूलभूत अभेदज्ञान म्हणतात. विश्व-अस्तित्वाच्या बाबतींत मूलभूत अभेदज्ञान जें असतें त्याचा अर्थ मूळ आत्म्याला विश्वाची जाणीव असते, ती स्वयंसिद्ध असते, सहज असते -- अशा जाणिवेचें कारण हें कीं, हा आत्मा सर्व कांहीं स्वतःच होतो, सर्व कांहीं त्याच्या अस्तित्वाचें घटकभूत, अंगभूत असतें.

      आत्म्याच्या जाणिवेची ही जी शुद्ध अवस्था, तिच्यांतून निघाल्यासारखी वाटणारी, तिच्यापासून वेगळी अशी दिसणारी दुसरी एक अवस्था आहे -- मात्र ही अवस्था आत्म्याला त्याच्या शुद्ध ज्ञानावस्थेइतकीच स्वाभाविक आहे, अंगभूत आहे; अभेदज्ञान हें आत्माच्या स्वतःविषयीं ज्ञानाचें नेहमींच खास स्वरूप असतें, त्याचें सर्वस्व असतें; पण त्याबरोबर दुय्यम म्हणून स्वतःच्या सर्वसमावेशकत्वाचें आणि सर्वांतर्यामित्वाचें ज्ञानहि आत्म्याला स्वभावसिद्ध असतें, शुद्ध ज्ञानाशीं समकालीन असतें. ही जी दुसरी ज्ञानावस्था ती पहिल्या अभेदज्ञानावस्थेचा शाश्वतपणा कमी करीत नाहीं; तिच्यांत कसलाहि बदल करीत नाहीं. स्वयंभू आत्मा अस्तित्वांतील सर्व वस्तूंना स्वतःच्या एकमेव अस्तित्वाच्या पोटीं पाहतो, त्या सर्वांचा समावेश स्वतःमध्यें करतो, आपल्या अस्तित्वाचें अस्तित्व, आपल्या जाणिवेची जाणीव, आपल्या शक्तीची शक्ति, आपल्या आनंदाचा आनंद, या सर्व गोष्टी तो आपल्या पोटीं असलेल्या वस्तूच्या ठिकाणीं पाहतो; त्याबरोबर, अपरिहार्यपणें तो सर्व वस्तूच्या पोटीं त्यांचा, प्रत्येक वस्तूचा, आत्मा म्हणून निवास करतो आणि त्यांच्या अंतरंगांतील सर्वकांहीं आपल्या व्यापक अंतर्यामित्वानें जाणतो; हें सर्व ज्ञान, वर सांगितल्याप्रमाणें स्वाभाविक स्वयंसिद्ध ज्ञानक्रियेवांचून झालेलें असें असतें; हें ज्ञान म्हणजे एकादी क्रिया नसून तें अवस्थारूप असतें; शुद्ध शाश्वत अंगभूत स्वाभाविक अवस्था हें या ज्ञानाचें स्वरूप असतें. आत्मज्ञान, आध्यात्मिक जाणीव कोणतीहि घेतली, तरी तिचा पाया पाहतां अभेदाची जाणीव आणि अभेदनिष्ठ ज्ञान हाच असतो. सर्व मी आहे, मी सर्व आहे, हें ज्ञान तिजमध्यें (अभेद अधिष्ठित जाणिवेमध्यें) स्वभावत: असतें. आमच्या जाणिवेचा जो प्रकार आहे त्या प्रकारांत या अभेदज्ञानाचें रूपान्तर केल्यास तें विविध ज्ञान बनतें; उपनिषदांत हें त्रिविध ज्ञान सांगितलें आहे : १) यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति २) सर्वभूतेषु

पान क्र. ४४०

 

चात्मानम् (३) यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत् (१) जो सर्व भूतें आपल्या ठिकाणीं पाहतो तो (२) जो स्वत:ला सर्व भूतांचे ठिकाणीं पाहतो तो (३) ज्याचे ठिकाणीं तोच (आत्माच) सर्व भूतें झाला आहे. (ईशावास्य उप०) या त्रिविध ज्ञानांत समावेशकता, अंतर्यामिता व अभेद या आत्म्याच्या तीन प्रकारांचा समावेश होतो. मूलभूत आत्म्याची मूलभूत जाणीव पाहिल्यास, हें जें वर सांगितलेलें त्रिविध दर्शन, तें तेथें मूळ आत्म्याचें स्वाभाविक आत्मसंवेदन असतें. आत्मज्योतीच्या प्रकाशांत घडणारें त्रिपुटीरहित आत्मदर्शन असतें. (त्रिपुटी : ज्ञाता + ज्ञेय + ज्ञान) तेथें आत्मा स्वत: स्वत:ला विषय करून त्याजकडे बघतो अशी स्थिति, अशी क्रिया घडत नाहीं; कारण या क्रियेंत भेदाची दृष्टि येते; आणि मूलभूत आत्मजाणिवेंत, तर भेददृष्टि मुळींच नसते. तथापि या मूलभूत आत्मजाणिवेंत, जाणिवेचें स्वत:कडे पाहणें ही क्रिया घडूं शकते. अशी क्रिया आत्म्याचे ठिकाणीं स्वभावत: शक्य असते, ती एक आत्म्याची अंगभूत शक्ति आहे. पण सर्वश्रेष्ठ जाणिवेचें स्वयंप्रकाशत्व, स्वयंभूत्व, स्वयंसिद्धत्व कार्यकारी असतांना ही शक्ति वापरांत आणली जात नाहीं. ही शक्ति वापरांत आणल्यानें सर्वश्रेष्ठ जाणिवेची क्रियायुक्त अवस्था अस्तित्वांत येते : जाणिवेची जी मूलभूत अक्रिय अवस्था, त्रिपुटीशून्य अवस्था शाश्वत असते, तिच्या जोडीला आतां त्रिपुटीयुक्त अवस्था येते : ही दुसरी अवस्था पहिल्या अवस्थेच्या पोटीं असतेच : फक्त तिला प्रकट करण्याची आवश्यकता असते : या दुसऱ्या अवस्थेंत आत्मा स्वत:कडे पाहतो, ज्ञाता आणि ज्ञेय होतो, विषयी, विषय असें दुहेरी रूप घेतो; पण या दुहेरी रूपांत एकता, अविभक्तता असते. विषय तोच विषयी असतो आणि विषयी तोच विषय असतो. हें ज्ञानदेखील मूळ जाणिवेप्रमाणें स्वभावगत, सहज, स्वयंभू असतें, स्वयंप्रमाण असतें, अभेदज्ञान असतें. या ठिकाणीं ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान या त्रिपुटीक्रियेनें अभेद व्यक्त केला जातो एवढेंच. आम्ही ज्या ज्ञानाला भेदनिष्ठ ज्ञान म्हणून ओळखतो, तसलें भेदज्ञान हें असत नाहीं.

      ज्ञाता ज्ञेय एकरूप न राहतां ज्ञाता ज्ञेयापासून थोडा दूर राहूं लागला (वस्तुत: ज्ञाता हाच ज्ञेय होत असतो) म्हणजे अभेदज्ञानाचा तिसरा, तिसऱ्या दर्जाचा प्रकार अस्तित्वांत येतो. (एकरस अभेदज्ञान हा पहिला प्रकार, त्रपुटीयुक्त अभेदज्ञान हा दुसरा प्रकार.) या ज्ञानप्रकारांत ज्ञाता आत्मा ज्ञेयाचें अगदीं अंतरंगदर्शन घेऊं शकतो, तो ज्ञेयांत शिरूं शकतो,

पान क्र. ४४१

 

त्याला आंतून बाहेरून व्यापूं शकतो, त्याला 'सर्व 'मी' आहे' अशी दृष्टि येते, भावना येते, सर्व वस्तूंचा संपर्क करतांना स्वतःचाच संपर्क करीत आहे असें त्याला प्रतीत होतें. वस्तु आणि ती जें कांहीं असेल किंवा जें कांहीं तिच्या पोटांत असेल त्याची आत्मिक प्रतीति घेण्याची शक्ति ज्ञात्या आत्म्यांत असते; त्या वस्तूला आत्मा बाहेरून व आंतून व्यापतो आणि याप्रमाणें ज्ञेयाशीं अभिन्नता, एकरूपता पाहून त्याचें सर्व ज्ञान त्याला प्राप्त होतें. ज्ञात्याची ज्ञेयाशीं अभिन्नता, एकरूपता हाच तद्विषयक ज्ञानाचा आत्मा असतो -- वस्तूंचें ग्रहण ''मी ही वस्तु आहे'' असें अभेदज्ञानाचें स्वरूपच असतें. वस्तूचें आत्मकृत ग्रहण किंवा ज्ञान, संवेदन आणि या प्रकारचें अभेदरूप होऊन गेल्यानंतर उत्पन्न होणारा वस्तुविषयक विचार हाहि आत्मस्वरूपांत सामान्य विचारांहून वेगळ्या प्रकारचा असतो. आमचा सामान्य विचार अज्ञात गोष्टी शोधून उजेडांत आणतो, असा अध्यात्मिक विचार नसतो. तो त्याला स्वाभाविकपणें ज्ञात असलेली स्वतांतील गोष्ट स्वतःपासून जणुं वेगळी करून आध्यात्मिक स्थलामध्यें तिची स्वतांपासून अंतरावर मांडणी करतो; आपलें आत्मजाणिवेचें अस्तित्व विस्तारून, त्या विस्तारलेल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या क्षेत्रांत ती वस्तु, ज्ञातरूप स्वतःपासून दूर मांडतो आणि तिला विचारजन्य ज्ञानाचा विषय बनवितो. वस्तुविषयक आध्यात्मिक ज्ञान (दर्शन), आध्यात्मिक विचार विशिष्ट प्रकारचा असतो, त्याप्रमाणें तद्विषयक आध्यात्मिक भावना, आध्यात्मिक संवेदना व प्रतीति विशिष्ट प्रकारची असते. या आध्यात्मिक व्यवहारांत एकतेशीं एकता, अस्तित्वाशीं अस्तित्व जाणिवेशीं जाणीव, अस्तित्वाच्या आनंदाशीं अस्तित्वाचा आनंद मिळून जात असतो. मुळांत सर्वांचा अभेद असतो, या अभेदाच्या अधिष्ठानावर भेद (ज्ञाता-ज्ञेय भोक्ता-भोग्य) आत्मा स्वत: निर्माण करतो आणि या भेदनिर्माणानंतर पुन्हां भेदांत अगदीं एकजीवपणाचा अनुभव तो घेतो, जणु भेदांत ''अभेद'' भोगतो, अभेदाच्या मूळ प्रतीतींत भेदनिष्ठ एकजीवपणाचा आनंद, मूळ सर्वोच्च एकतेच्या प्रतीतींत प्रेम प्रेमाशीं मिळण्याचा गोड अनुभव आत्मा भोगीत असतो. निराकारांत नाना आकार उदयास आणण्याचा आनंद, नित्य एकतेच्या पोटीं नानाशक्ती, नाना सत्यें, नाना जीव उदयास येण्याचा, आणण्याचा आनंद, आत्मा भोगीत असतो. मूळ चैतन्याच्या, आत्म्याच्या जाणिवेंत या ज्या शक्ती असतात त्या शक्तींवर, मूळ एकरूप अस्तित्वाच्या पोटीं नाना घटना

पान क्र. ४४२

 

घडण्याचा, घडविण्याचा खेळ आधारलेला असतो. या ज्या आध्यात्मिक शक्ती त्या मूलभूत तत्त्वांतर्भूत शक्ती असतात, त्या साधनरूप शक्ती नसतात. त्या योजनेंतून, निर्माणक्रियेंतून, संघटनक्रियेंतून निघालेल्या नसतात : आत्मा जो एकच एक असतो, त्याचें स्वस्वरूपज्ञ तेजोमय घटकद्रव्य म्हणजेच या शक्ती होत; हें आत्मज्ञ आत्मतत्त्व स्वतःमध्यें स्वतःला विषय करून त्याजवर क्रियाशीलतेनें क्रिया करूं लागलें म्हणजे या शक्ती प्रादुर्भूत होतात -- आत्माच दृष्टि होतो, आत्माच भावना होतो, आत्माच दर्शन होतो, विचार होतो, आत्मा स्वतःवर प्रकाश टाकणारा होतो. हें सर्व अभेदज्ञानच खरोखर असतें, त्याच्या शक्ती स्वयंसिद्ध असतात, मुळांत एकतेचें ज्ञान हें आत्मस्वरूपाचें लक्षण असतें. हें आत्मस्वरूप नानावस्तुमयत्व धारण करतें, तें स्वयंगतीनेंच धारण करतें -- नानावस्तुरूपत्व घेतांना आपलें मूळ एकत्व आत्मतत्त्व टिकवून असतें : एकत्व आणि नानात्व एकाच वेळीं आत्मतत्त्व भोगतें. आत्म्याला अनंततेचा जो आत्मानुभव येतो तो अनुभव, एका बाजूला शुद्ध एकरस एकता आणि दुसऱ्या बाजूला नानारूपधारी एकता यांच्यामध्यें अखंडपणें वावरत असतो; आत्ममग्न आत्मसमाधीचा आनंद एकीकडे आणि नाना वस्तुरूप, भेदमय झालेल्या परंतु या भेदमयत्वांत अतिनिकटत्वाचा परिचय घेत असलेल्या एकतेचा आनंद दुसरीकडे आणि मध्यें नाना प्रकारचे कमीअधिक दर्जाचे आनंद, अशी एक-अनेकरूप आत्म्याची आनंदसंपत्ति असते.

      अभेदाच्या संवेदनाहून भेदाचें संवेदन अधिक जोरदार झालें म्हणजे भेद-अधिष्ठित ज्ञानाचा आरंभ होतो. आत्म्याला ''मी पदार्थाशीं एकरूप आहे'' ही जाणीन असते, पण तो भेदाची भावना पराकोटीला पोंचवितो. आरंभीं आरंभीं आत्म्याला इतरासंबंधानें माझा दुसरा आत्मा हीच जाणीव व भावना असते -- पुढें मग मी आत्मा आणि दुसरें सर्व अनात्मा, अशी जाणीव व भावना होते. दुसऱ्याशीं अभेदाचें ज्ञान, दुसऱ्यासंबंधीं अभेदनिष्ठ ज्ञान या गोष्टी आत्म्याचे ठिकाणीं कांहीं प्रमाणांत असतात. पण हीं ज्ञानें हळूंहळूं खालीं दबलीं जातात आणि संपर्क व अन्योन्यविनिमय यांच्या द्वारां होणारें ज्ञान अभेदज्ञानाची जागा घेतें -- मग हें अभेदज्ञान दुसऱ्या दर्जाचें वाटूं लागतें. अन्योन्य संपर्काचें परिणामरूप तें (अभेदज्ञान) आहे असें वाटूं लागतें. वस्तुत: अन्योन्यसंपर्क हा अभेदाचा, अभेदज्ञानाचा परिणाम असतो. अलग अलग

पान क्र. ४४३

 

भासणाऱ्या आत्म्यांचा अन्योन्यप्रवेश, त्यांची अन्योन्यव्यापकता, वस्तुत: त्यांच्या अभेदापासून निर्माण होत असतां, अभेदज्ञान हें त्यांच्यापासून  (अन्योन्यप्रवेशापासून) निर्माण होतें, अशी नवी उलटी भावना होते. ज्ञानाच्या स्वरूपांत असा बदल होत होत शेवटीं अभेद पडद्याआड जाऊन बसतो आणि एका अस्तित्वाचा दुसऱ्या भिन्न जाणिवेशीं व्यवहार होत आहे असें ह्या आत्म्याच्या खेळाला स्वरूप येतें. या भिन्नतेच्या पोटी अभिन्नता, एकता असते, पण तिचा अनुभव आतां येत नाहीं; या अभेदाऐवजीं आतां प्रत्यक्ष स्पर्शाचें, एकमेकांत प्रवेश करून देणाऱ्या संपर्काचें, स्पर्शाचें राज्य सुरूं होतें; एकमेकांत मिळणेंमिसळणें, एकमेकांपासून घेणेंदेणें या गोष्टी आतां अभेदाची जागा घेतात. आतां एकमेकाची ओळख किंवा वस्तूची आत्म्याला ओळख व्हावयाची, कमीअधिक गाढ ओळख व्हावयाची ती, अन्योन्यांच्या ज्या क्रियाप्रतिक्रिया एकमेकांवर होतात त्यांच्याद्वारां होऊं शकते. आतां आत्मा स्वत:च्या आत्म्याला भेटतो, अशी जाणीव वा भावना नसते, तर दोन भिन्न आत्मे एकमेकांशीं जिव्हाळ्यानें व्यवहार करतात अशी भावना असते. आत्म्याआत्म्यांमध्यें अगदीं पूर्ण वेगळेपणा अद्यापि आलेला नसतो, पूर्णतेनें ते एकमेकांना ''इतर'' झालेले नसतात. अर्थात् अज्ञानाचा उदय झालेला नसतो. आतां जाणीव कमी व्यापक झालेली असते -- तरी मूळ ज्ञानाची कांहीं शक्ति तिच्यांत राहिलेली असते; ही शक्ति भेदाच्या उदयानें कमी झालेली असते, मूळ तात्विक पूर्णतेच्या अभावानें कमी झालेली असते, ही शक्ति आतां भेदाला प्राधान्य देऊन काम करते; ती एकता, एकात्मता प्रस्थापित करूं शकत नाही; विषयाचा व विषयीचा निकटचा संबंध मात्र ती प्रस्थापित करूं शकते. जाणिवेच्या पोटांत समोरची वस्तु सामावून घेणें, त्या वस्तूला चोहोंकडून व्यापून राहणें, आपल्या ज्ञानाच्या पोटांत ती घेणें ही गोष्ट करण्याची शक्ति आत्म्यांत आतांहि शिल्लक राहते; पण आतां वस्तु ही स्वत:च्या अस्तित्वाच्या पोटांत नसून ती त्याबाहेर आहे आणि असें असतां तिला पोटांत, जाणिवेच्या पोटांत घ्यावयाची आहे, अशी आत्म्याची नवी परिस्थिति असते; आतां हें पोटांत घेणें, पूर्वीं स्वयंसिद्ध असलेलें पण नव्या परिस्थितींत दूर झालेलें ज्ञान पुन: मिळवून करावयाचें असतें. वस्तूवर ध्यान लावून हें कार्य करावें लागतें; एकाग्र चिंतन करून, स्वत:च्या अस्तित्वाचा भाग असलेली पण नव्या परिस्थितींत त्यांतून बाहेर गेल्यासारखी झालेली वस्तु, परत स्वत:च्या

पान क्र. ४४४

 

अस्तित्वांत सामावून घ्यावी लागते; बाहेरून व्यापण्याच्या शक्तीप्रमाणें वस्तूच्या पोटांत शिरण्याची शक्तीहि आत्म्यांत शिल्लक असते; तथापि आतां ती तितकी व्यापक असत नाहीं. अभेदाची स्थिति ती उत्पन्न करूं शकत नाहीं. कांहीं गोष्टी ती अंत:प्रवेशानें मिळविते आणि ज्ञात्या आत्म्याला ज्ञेय वस्तूंतील अंतर्गत माल त्याच्या कार्यासाठीं पुरवितें. जाणिवेचा जाणिवेशीं प्रत्यक्ष आणि प्रवेशक संपर्क आतांहि होऊं शकतो, पण स्पष्ट आणि अंतरंगदर्शक अपूर्ण ज्ञानाखेरीज हा संपर्क आणखी कांहींहि ज्ञात्या आत्म्याला पुरवूं शकत नाहीं -- संपर्काचीं जीं स्थानें आणि संपर्काचा जो व्याप असेल त्या स्थानांपुरतेंच व त्या अपूर्ण व्यापापुरतेंच वस्तूचें ज्ञान आत्म्याला नव्या परिस्थितींत होऊं शकतें. अद्यापि वस्तूचें प्रत्यक्ष संवेदन आत्म्याला होऊं शकतें -- वस्तूच्या आंत असलेल्या गोष्टी, वस्तूच्या बाहेरची बाजू, तिचा पृष्ठभाग, आत्मा अद्यापिहि जाणिवेची दृष्टि, जाणिवेचा स्पर्श उपयोगांत आणून प्रत्यक्षपणें पाहूं शकतो, हाताळूं शकतो. आत्म्यांच्या अस्तित्वांत आणि अस्तित्वांत, जाणिवेंत आणि जाणिवेंत अन्योन्यप्रवेश, अन्योन्यविनिमय अद्यापिहि होऊं शकतो; विचारांच्या लहरी, भावनांच्या लहरी, सर्वप्रकारच्या शक्तींच्या लहरी यांची आत्म्या-आत्म्यांत देवघेव, जा - ये अद्यापिहि चालते. ही हालचाल सहानुभूति आणि ऐक्य निर्माण करणारी असेल किंवा विरोध आणि द्वंद्व निर्माण करणारी असेल, ऐक्यजन्य असेल किंवा विरोधजन्य असेल. दुसऱ्यांना आपल्या स्वाधीन करून घेऊन किंवा दुसऱ्यांनीं आपल्याला स्वाधीन करून घेण्याच्या क्रियेला आपली संमति देऊन एकता स्थापण्याचा प्रयत्न या परिस्थितींत आत्म्याकडून होत असतो, होऊं शकतो, असेंहि होऊं शकतें कीं, दोन्ही पक्ष एकमेकांना अन्योन्यसमावेशानें, अन्योन्यव्याप्तिद्वारां, अन्योन्य स्वामित्वाच्या बळावर ऐक्याच्या अवस्थेकडे जाण्याची प्रेरणा देत असतात, तिकडे ढकलीत असतात. प्रत्यक्ष संपर्कानें ज्ञान मिळविणारा ज्ञाता या सर्व क्रिया-प्रतिक्रिया अनुभवीत असतो, आणि अनुभवाच्या पायावर सभोंवतालच्या जगाशीं तो आपले संबंध निश्चित करीत असतो. आमच्या आंतरपुरुषाला वस्तूंचें हें प्रत्यक्ष संपर्काधिष्ठित ज्ञान स्वाभाविक असतें; आमच्या पृष्ठवर्ती पुरुषाला हें ज्ञान नसतें; असलें तर अगदीं अपूर्ण असें असूं शकतें.

      पहिल्या आरंभाच्या पायरीचें भेदमय अज्ञान असें या वर वर्णिलेल्या ज्ञानभूमिकेला म्हणतां येईल. येथें ज्ञानाचाच खेळ असतो;

पान क्र. ४४५

 

इतकेंच कीं, हें ज्ञान भेदमय असतें, संकुचित असतें, हा खेळ विभागलेल्या अस्तित्वाचा असतो. ह्या विभागलेल्या अस्तित्वाच्या खालीं अभेद, एकता असते; या वरच्या भेदयुक्त खेळांत गुप्त असा पायाभूत अभेदाचा, एकतेचा कांहीं थोडासा परिणाम प्रकट होऊं शकतो. अस्तित्वाचे दोन अर्धगोल कल्पिले, तर वरच्या उच्च अर्धगोलांत पूर्ण स्वाभाविक अभेदज्ञान, आणि अभेदअधिष्ठित ज्ञानक्रिया या वस्तू स्वयंसिद्ध असतात; प्रत्यक्ष संपर्काच्या द्वारां ज्ञानलाभ ही गोष्ट, जाणिवेचे मानसिक अतिभौतिक सर्वोच्च जे प्रदेश आहेत त्यांचें प्रमुख वैशिष्ट्य आहे. आमचा पृष्ठवर्ती पुरुष या प्रदेशांपासून दूर ठेवला गेला आहे. एक अज्ञानाची भिंत या प्रदेशांना आमच्या पृष्ठवर्ती पुरुषांपासून दूर ठेवते; उच्च प्रदेश सोडून दुसरे जे खालच्या दर्जाचे अतिभौतिक मानसिक प्रदेश आहेत तेथेंहि प्रत्यक्षसंपर्कजनित ज्ञान, त्या प्रदेशांचा स्वभावधर्म म्हणून मिळूं शकतें -- मात्र येथें भेदमयता अधिक प्रमाणांत असते, आणि अर्थात् ज्ञान कमी प्रमाणांत मिळतें; अतिभौतिक प्रदेशावर सर्वत्र प्रत्यक्ष संपर्कजन्य ज्ञान हा घटक असतो, किंवा आपण आणूं शकतो. आमचा आंतरपुरुष जो असतो, त्याचें ज्ञानसाधन प्रामुख्यानें प्रत्यक्ष संपर्कच असतो; कारण उच्च अतिभौतिक प्रदेश आणि अवचेतनाचा प्रदेश यांना जोडणारा असा आमचा आंतरपुरुषाचा प्रदेश असतो. उच्च अतिभौतिक मानसिक जाणिवेनें आपला हात लांब करून अवचेतन प्रदेशावर जणु ठेवलेला असतो. हा लांबलेला हात म्हणजे आंतरपुरुष म्हणतां येईल : आंतरपुरुषाचें जन्मस्थान उच्च मानसिक प्रदेश असल्यानें, तेथील जाणिवेची विशेषता त्या पुरुषांत स्वभावत:च येते; आमचें बाह्य अस्तित्व पाहिलें, तर अचेतनाची आपण अपत्ये आहोंत. आमचें आंतरअस्तित्व, मानसिक प्राणिक आत्मिक उच्च प्रदेशांचा वारसा घेऊन येत असतें; आम्ही आमची कवाडें उघडून जसेजसे आंत शिरूं, आंत आंत जाऊं, आंतच जीवन जगूं, आंतून काय ज्ञान येईल तें घेऊं, तशी तशी अचेतनाच्या आमच्या उगमस्थानाची गुलामी आमच्या वृत्तिप्रवृत्तींतून कमी कमी होत जाईल आणि आज जें स्थान आमच्या अज्ञानमय जाणिवेच्या पलीकडे आहे, तें स्थान आम्हांला अधिकाधिक जवळ होत जाईल.

      अस्तित्व अस्तित्वापासून, वस्तु वस्तूपासून, जीव जीवापासून अगदीं वेगळा झाला म्हणजे अज्ञानदशा पूर्ण होते. जाणिवेचा जाणिवेशीं प्रत्यक्ष संपर्क आतां जवळजवळ अशक्य होतो; मध्यें जाड पडदा येतो, पडदा

पान क्र. ४४६

 

पूर्ण असतो, निदान पूर्णाच्या जवळ तरी असतो. आमच्या आंतरपुरुषाच्या प्रदेशांत मात्र जाणिवेचा जाणिवेशी प्रत्यक्ष संपर्क घडत असतो; अभेद, एकता ही देखील प्रत्यक्ष संपर्काच्या खालीं गुप्तपणें असते -- पण जाणिवेचा प्रत्यक्ष संपर्क आमच्या बाह्य पुरुषाला उपलब्ध नसतो, त्याप्रमाणें ही गुप्त एकताहि त्याला अज्ञात असते. पृष्ठभागावर पूर्ण विभक्तता असते, आत्मा आणि अनात्मा असा तीव्र भेद पृष्ठभागावर कार्यान्वित होतो; अनात्मा प्रत्यक्ष ज्ञानानें समजावून घेणें, अनात्म्यावर हुकमत चालविणें यासाठीं आत्म्याला प्रत्यक्ष साधनाची मदत पृष्ठभागावर नसते; पण या अनात्माशीं व्यवहार  करणें तर त्याला आवश्यक असतें; तेव्हां अशा परिस्थितींत प्रकृति आत्म्याला अप्रत्यक्ष साधनसामग्री पुरविते; अनात्माशीं संपर्क घडविण्यासाठीं भौतिक इंद्रियें व अवयव आत्म्याला दिले जातात; नाडीसंघ त्याला पुरविला जातो. नाडीसंघाच्या प्रवाहांच्या द्वारां बाहेरून घडणाऱ्या संपर्कांची दखल आत्म्याला घेतां येते; या भौतिक अवयवांच्या कार्याला पूरक म्हणून, मन प्रतिक्रिया करतें आणि संपर्काची जुळवणी व व्यवस्था करतें; 'अप्रत्यक्ष ज्ञानाच्या पद्धती' या वर्गांत वरील सर्व क्रिया पडतात; कारण जाणिवेला या साधनांवर ज्ञानासाठीं व क्रियेसाठीं अवलंबून राहणें भाग असतें; कोणत्याहि वस्तूवर जाणीव प्रत्यक्षपणें क्रिया करूं शकत नाहीं. भौतिक इंद्रियें, नाडीसंघ आणि मन यांच्या जोडीला बुद्धीचेंहि साधन, आत्म्याला निसर्ग उपलब्ध करून देतो : बुद्धीबरोबर विवेकशक्ति आणि स्फूर्ति यांचीहि मदत निसर्ग आत्म्याला देतो. जें ज्ञान भौतिक इंद्रियें वगैरे साधनें या शक्तीच्या समोर आणून देतात तें त्या व्यवस्थेनें लावतात, आणि अनात्म्यासंबंधानें अधिक ज्ञान मिळविण्यासाठीं व त्यावर शक्य ती हुकमत चालविण्यासाठीं त्याचा उपयोग करतात; त्याच्याशीं शक्य तेवढी एकात्मता, एकता (आंशिक एकता) साधण्यासाठींहि या उपलब्ध ज्ञानाचा या शक्ती उपयोग करतात; पुरुष पुरुषापासून, वस्तूपासून वेगळा झालेला असतो, तेव्हां या मूलभूत विभक्तीस परवडेल तेवढी थोडीशीं अनात्म्याशीं एकात्मता साधण्यासाठीं बुद्धि वगैरे निसर्गदत्त शक्तींचा आत्मा उपयोग करतो. हीं सर्व साधनें सहजच आत्म्याला त्याच्या हेतूच्या सिद्धीसाठीं अपुरीं पडतात, तीं कित्येक वेळां तितकी कार्यक्षमहि ठरत नाहींत; आणि मनाच्या क्रियांचा आधार अप्रत्यक्ष ज्ञानसामग्री हा असल्यानें, त्याचें ज्ञान मूलभूत अनिश्चितीनें दूषित झालेलें

पान क्र. ४४७

 

असतें. आमच्या भौतिक अस्तित्वाचा प्रकृतिधर्म अपुऱ्या साधनसामग्रीनें जीवनारंभ करणें हा आहे. अवचेतनांतून वर येणारें सर्वच अस्तित्व अपुऱ्या साधनांनीं आपलें जीवनकार्य आरंभीत असतें.

      अचेतनता ही उलटी केलेली सर्वश्रेष्ठ अतिचेतनता आहे; सर्वश्रेष्ठ अतिचेतनतेच्या बरोबर उलटी घडण अचेतनतेची आहे. अतिचेतनता ही स्वयंचलनशील यंत्राप्रमाणें सहजपणें क्रिया करते, तिचें अस्तित्व सर्वनिरपेक्ष असतें. हे गुण अचेतनतेंत अतिचेतनतेइतकेच स्वाभाविक आहेत. मात्र अचेतनतेंत जाणीव नसते, जाणिवेची तंद्री, समाधि असते; अस्तित्व स्वतःमध्यें बुडालेलें, स्वतःच्या अनंतत्वाच्या अगाध सागरांत विलीन झालेलें, स्वतःला हरवलेलें असें अचेतनतेचें वर्णन करतां येईल. अतिचेतन अस्तित्व हें प्रकाशमय आणि स्वतांत रमलेलें अस्तित्व असतें; अचेतन अस्तित्व हें उलट तमोमय असतें; जणु गुंडाळून टाकलेलें, स्वतःची गुंडाळी करून घेतलेलें आणि प्रकाशांतून अंधारांत घुसलेलें असें अचेतन अस्तित्व असतें. ''तम आसीत् तमसा गूढम्'' (ऋग्वेद) असें या अचेतनतेचें वर्णन ऋग्वेदांत सांपडतें; अचेतन अस्तित्व हें, नास्तित्व, सत्तेचा अभाव या स्वरूपाचें दिसतें. येथें अतिचेतनतेची स्वाभाविक प्रकाशमय आत्मजाणीव असत नाहीं, उलट आत्मनेणिवेच्या डोहांत बुडालेली जाणीव येथें असते; अस्तित्वांत जाणीव अंगभूत असते, पण येथें अचेतनांत ती जागी नसते. अस्तित्वांत बुडालेली ही जाणीव, गुप्त अशा अभेदनिष्ठ ज्ञानाच्या स्वरूपाची असते; अस्तित्वगत सर्व सत्यें या सुप्त गुप्त जाणिवेच्या पोटीं सुप्त गुप्त असतात; आणि ही जाणीव क्रियाशील होऊन निर्मिति करूं लागली, म्हणजे अंगभूत स्वभावगत ज्ञानाच्या रेखीव पूर्णतेनें सर्व गोष्टी ही निर्मिते आणि व्यवस्थेनें मांडते; -- आरंभीं जाणीव या स्वरूपानें ती क्रिया करीत नाहीं, तर जडशक्तीच्या स्वरूपानें ती क्रियाशील होते. कोणतीहि भौतिक वस्तु घ्या, सर्व वस्तूंच्या पोटीं मूक आणि झांकलेली  (स्वत: आवरणांत लपलेली) अशी सत्य-कल्पना असते; तेथे प्रभावी, स्वयंफलित होणारी स्फूर्ति असते, तेथें निर्नेत्र परंतु निर्दोष असें दर्शन असतें, तेथें स्वयंचलित यंत्रधर्मी बुद्धि असते, जी तिच्या शब्दविषय आणि विचारविषय न झालेल्या कल्पना कार्यान्वित करीत असते; तेथें निश्चित बिनचूक पाहणें असतें, पण हें पाहणें डोळ्यांवांचून होत असतें; तेथें दबलेली पण न चुकणारीं मूक भावना असते, पण या भावनेला अ-संवेदनेचें आवरण असतें; जें जें कांहीं घडवून आणावयाचें असतें, तें

पान क्र. ४४८

 

तें वस्तूंच्या पोटीं असलेल्या, या वर दिलेल्या, सत्य-कल्पना आदिक गोष्टी बरोबर घडवून आणतात. अचेतनाचें हें सर्व कार्य आणि स्वरूप, शुद्ध अतिचेतनाच्या स्वरूपासारखें आणि कार्यासारखें आहे, हें उघड आहे. एवढेंच कीं, अतिचेतन अस्तित्व हें मूलभूत आत्मप्रकाशानें भरलेलें असतें आणि उलट अचेतन अस्तित्व हें आत्म-तमोमयतेनें भरलेलें असतें. जड भौतिक आकारांत, वर दिलेल्या सत्य-कल्पना आदिक सर्व शक्ती स्वभावतःच वास करीत असतात, पण त्या आकाराला त्या शक्ती, असून नसल्यासारख्या असतात, त्या आकाराच्या आधीन त्या असत नाहींत; त्या आकाराच्या आंतून, तेथें असलेल्या मूक अवचेतनतेच्या द्वारां अर्थात् अर्ध-जाणिवेच्या, अर्ध-नेणिवेच्या द्वारां त्या काम करीत असतात.

      जाणीव किंवा चेतना ही अचेतनांत गुंडाळलेली, नसल्यासारखी झालेली असते. ती त्या अवस्थेंतून हळूं हळूं वर येते, विकास पावते; या विकासाच्या, प्रकटनाच्या पायऱ्या आतां आम्हांला पूर्वींपेक्षां अधिक स्पष्टपणें सांगतां येतील; भौतिक अस्तित्व, भौतिक व्यक्तित्वानें युक्त असतें; तेथें आमच्या परिचयाचें मानसिक व्यक्तित्व असत नाहीं; पण तेथें आंतर प्रच्छन्न मनाहून खोल व व्यापक व्यक्तित्वशून्य पुरुष असतो; अ-जाणिवेच्या, नेणिवेनें भरलेल्या वस्तूंमध्यें एक जाणिवेचा, जाणीवयुक्त व्यक्तिपुरुष असतो; हा आंतर व्यापक पुरुष त्या वस्तूच्या पोटीं असलेल्या शक्तीचें कार्य कसें घडावयाचें तें ठरवीत असतो. जड वस्तु सभोंवतालच्या वस्तूंच्या संपर्कांचें संस्कार घेते आणि स्वतःमध्यें सांठविते; ह्या जड वस्तूंतून नाना शक्ती बाहेर पडतात; या संस्कारांचा आणि शक्तींचा उपयोग करून गुप्त-विद्या त्या वस्तूचें भूत चरित्र जाणूं शकते, त्या वस्तूपासून निघणाऱ्या शक्तींचा प्रत्यय आम्हांला देऊं शकते, इत्यादि गोष्टी ज्ञानवान् लोक सांगतात : अर्थात् परिसराचे संस्कार घेण्याची पात्रता कोणत्याहि जड वस्तूला जी येते, ती तिच्या ठिकाणीं असणाऱ्या असंघटित व्यापक जाणिवेमुळें -- जी जाणीव अद्यापि त्या वस्तूच्या आकाराला ज्ञानयुक्त करूं शकत नाहीं त्या व्यापक असंघटित जाणिवेमुळें (पुरुषामुळें) -- येते, ही गोष्ट उघड आहे. बाहेरून आपल्याला जें दिसतें तें हें कीं, वनस्पति आणि खनिज ह्यांसारख्या पदार्थांमध्यें त्यांच्या त्यांच्या शक्ती असतात, गुणधर्म असतात, आंतरिक प्रभाव असतात. पण हे गुणधर्म वगैरे प्रकट करण्याची शक्ति किंवा साधनसामुग्री त्यांजमध्यें अंगची नसल्यानें हे पदार्थ जेव्हां माणसाशीं किंवा इतर पदार्थांशीं संबद्ध होतात किंवा जीव

पान क्र. ४४९

 

जेव्हां त्यांचा जाणीवपूर्वक उपयोग करतात तेव्हांच त्यांच्यामधील प्रभावकारी शक्ती कार्यान्वित होऊं शकतात. मानवानें जी शास्त्रें निर्माण केलीं आहेत, त्यांतील कित्येक शास्त्रांची व्यावहारिक बाजू, वस्तूंच्या अंतरंगीं असलेल्या प्रभावी शक्तींचा मानवाच्या हेतुपूर्ततेसाठीं उपयोग करणें ही आहे. पण ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे कीं, वस्तूंच्या अंगच्या या ज्या शक्ती व प्रभाव आहेत, ते केवळ वस्तूंतील अनिश्चित द्रव्याचे गण नसून, तिच्यांतील पुरुषाचे, जाणीवयुक्त अस्तित्वाचे गुण आहेत, ते आत्म्याचे गुण आहेत -- स्वरूपमग्न अचेतन अस्तित्व हें जें अतिचेतन आत्म्यानें रूप घेतलें, त्या त्याच्या अचेतन रूपांतून त्याच्या शक्तिप्रभावानें वर येणारे असे हे त्याचे गुण आहेत. भौतिक वस्तूंचें यांत्रिक कार्य हें याप्रमाणें जाणिवेचें (जाणीवयुक्त शक्तीचें) कार्य असतें; वस्तूच्या अंतरंगीं स्वाभाविकपणें असलेल्या स्वरूपमग्न दर्शनी अचेतन आत्म्याचेंच तें कार्य असतें. भौतिक जड वस्तूनंतर विकासक्रमांत वनस्पतिरूप प्राथमिक जीवकांचा वर्ग येतो; या प्राथमिक जीवकांत, मनाच्या खालच्या पातळीवरचीं प्राणिक स्पंदनें हें रूप जाणीवयुक्त आत्मशक्ति घेते; या स्पंदनांत विकासक्रमांत पुढें प्रकट होणारी संवेदना गर्भित असते; वनस्पती आपल्या वाढीसाठीं प्रकाश, हवा, जागा यांच्या प्राप्तीसाठीं धडपडत असतात; त्यांचे ठिकाणीं स्वसंगोपन व स्वसंवर्धनबुद्धि असते; पण ही स्वाभाविक बुद्धि प्रकट करण्यासाठीं त्यांच्याजवळ अवयवांचें साधन नसतें. वनस्पती स्थावर ठिकाणाला जखडलेल्या असतात; त्यांच्या अंतरंगांतील स्वाभाविक, स्वसंगोपनेच्छा अंतरंगांतच राहते; तिला बाहेर व्यक्त होतां येत नाहीं. सभोंवरच्या ? वस्तूंशीं संबंध जोडण्यासाठीं ज्यांत कांहीं व्यवस्था नाहीं अशी स्थावर अवस्था, जागेला जखडल्याची अवस्था वनस्पतींची असते. स्थावर स्थितिशील अचल वनस्पती आलेले संपर्क सहन करतात, त्यांचा परिणाम स्वत:च्या ठिकाणीं पचवितात : त्या आपला संपर्क स्वेच्छेनें कोणावर लादूं शकत नाहींत, पण जवळ आलेल्यावर हा संपर्क अनिच्छेनें त्या लादतात; वनस्पतींमध्यें अचेतनतेचें राज्य प्रभावी असतें. अचेतनतेला गुप्त असें अभेदनिष्ठ वस्तुज्ञान असतें आणि या ज्ञानाच्या आधारावर अचेतनता वनस्पतींच्या ठिकाणीं कार्य करीत असते; वनस्पतींच्या पृष्ठभागावर जाणीवयुक्त ज्ञानाची, ज्ञानलाभाची संपर्कनिष्ठ साधनें तयार झालेलीं नसतात; या साधनांचा उदय स्थितिशील वनस्पतींपेक्षां पुढच्या वरच्या

पान क्र. ४५०

 

गतिशील जीवांमध्यें होतो; हे जीव बाह्य जाणीवयुक्त जीवन जगूं लागलेले असतात. या जीवांच्या बाबतींत बंदींत असलेली जाणीव वर पृष्ठभागावर येण्यासाठीं धडपडत असते. जीवाची ही धडपड, त्याचा इतर जीवांशीं व जगताशीं जाणीवयुक्त संबंध प्रस्थापित करण्याकरितां चाललेली असते. जीव आतां बाह्य जीवनानें इतरांपासून वेगळा झालेला असतो आणि प्रथम अर्धवट आंधळेंपणानें आणि पुढें जाणतेपणें इतर जीवांशी आणि जगताशीं तो आपला संबंध स्थापित करूं पाहत असतो. आपले संपर्क संख्येनें वाढवून तो आपली जाणीव वाढवीत असतो. इतरांचे जितके संपर्क तो घेईल आणि जितके संपर्क तो इतरांना देईल, तितकी त्याच्या जाणिवेच्या वाढीस मदत होते. जीवाला कांहीं गरजा असतात, त्याला कांहीं प्रेरणा असतात. या गरजांच्या पूर्तीसाठीं, या प्रेरणांच्या तृप्तीसाठीं त्याला संपर्क घ्यावे द्यावे लागतात. याप्रमाणें संपर्कांच्या देवघेवीनें जीव आपली जाणीव वाढवीत अचेतनाच्या पातळींतून वर येतो, अवचेतनाच्या पातळींत जीवन जगतो व पुढें आणखी विकास पावत पावत तो मर्यादित विभक्ततानिष्ठ ज्ञानाचा अधिकारी होतो.

      आत्म्याची मूळ स्वयंभू जाणीव नाना शक्तींनीं युक्त असते; त्या जाणिवेंत या शक्ती अंगभूत, स्वाभाविक असतात; अचेतन अवस्था ही, मूळ अतिचेतन आत्मदशेची उलटी अवस्था असून, तेथें अभेदनिष्ठ ज्ञान गुप्त आणि आवरणांखालीं झांकलेलें असतें. या गुप्त आवरणांखालीं अभेदज्ञानांत सर्व आत्मशक्ती स्वभावत: वास करतात; अचेतन अवस्थेंतून आत्मजाणीव जसजशी वर येऊं लागते, तसतशी तिची एक एक शक्ति प्रकट होऊं लागते; अचेतन अवस्थेनंतर क्रमानें भेदनिष्ठ जाणीव प्राथमिक जीवामध्यें उदय पावून, हळू हळू वाढत जाते. या विकासक्रमांत आत्म्याच्या सर्व स्वाभाविक शक्ती हळू हळूं प्रकट होतात. त्यांचा आरंभींचा आविष्कार पाहिला, तर त्यांचें स्वरूप अगदीं संकुचित आणि चांचपडत कार्य करणारें असें असतें; मूळ आत्मजाणीव प्रथम अगदीं दडपलेल्या दडलेल्या प्रमादपूर्ण संवेदनेचें रूप घेते; पुढें ही संवेदना रेखीव बिनचूक संवेदनेचें रूप घेते. तिला पुढें जीवनगत सहजप्रेरणेची, गुप्त जीवन-प्रेरणेची मदत मिळूं लागते; पुढें प्राणनिष्ठ मन उदय पावतें, या प्राणिक मनाची वस्तुदर्शन शक्ति काम करूं लागते; या शक्तीच्या पाठोपाठ अंधुक अशी जाणीवदृष्टि वस्तूंचें निरीक्षण करीत येते;

पान क्र. ४५१

 

वस्तूंचा स्पर्शहि या अंधुक जाणिवेला होऊं लागतो; नंतर भावना उदय पावते; ती आपली स्पंदनें बाहेर पाठविते; दुसऱ्यांशीं देवघेव करूं पाहते. पृष्ठभागावर शेवटी उदय पावणारी वस्तु म्हणजे विचारशक्ति होय; वस्तूंचे सर्वांगीण ज्ञान ही शक्ति करून घेऊं पाहते; तिच्यासमोर येणारा पुरावा तपासून एकत्र करून, ती त्यांतून वस्तुविषयक ज्ञानाची इमारत उभारते. पण या सर्व शक्तींमध्यें अपूर्णता असते; विभक्तताजन्य अज्ञानानें सर्व शक्ती लुळ्यालंगड्या झालेल्या असतात. आरंभींची अचेतनता आपलें अंधारमय आवरण सर्वांवर घालून, त्यांचें सामर्थ्य लपवीत असते. सर्व शक्ती आपल्या कार्यासाठीं बाह्य साधनांवर अवलंबून असतात. त्यांना स्वयंसिद्ध अधिकारानें कार्य करतां येत नसतें. जाणीव प्रत्यक्षपणें जाणिवेवर कार्य करूं शकत नाहीं. मानसिक पातळीची जाणीव, ही वस्तूंना कांहीं स्वयंनिर्मिति साधनांनीं व्यापून व त्यांच्यांत या साधनांनीं प्रवेश करून, तत्संबंधीं ज्ञान मिळविते. तथापि मानसिक जाणिवेला कोणतीहि वस्तु खरी स्वाधीन करून घेतां येत नाहीं. तिला अभेदनिष्ठ ज्ञान लाभत नाहीं. मूळ जाणिवेप्रमाणें कोणत्याच वस्तूशीं तद्रूप होऊन तिचें ज्ञान मानसिक जाणिवेला मिळवितां येत नाहीं. आंतर व्यापक पुरुष पृष्ठभागीय मनावर आणि संवेदनाशील इंद्रियांवर स्वत:च्या गुप्त क्रिया, शुद्ध स्वरूपांत लादूं शकतो. मानसिक चिकित्साशक्तीच्या सामान्य रूपांत त्यांना परिवर्तित न होऊं देतां लादूं शकतो. तेव्हां त्याच्या ज्या आंतर ज्ञानपद्धती आहेत, त्या प्राथमिक स्वरूपांत पृष्ठभागावर अनुभवास येऊं शकतात. पण ही घटना अपवादात्मक असते; आम्ही आमचें ज्ञान सामान्यत: अप्रत्यक्ष साधनांनीं मिळवितो; या ज्ञानाच्या सामान्य पद्धतीच्या दृष्टीनें, केव्हां केव्हां पृष्ठभागावर दृष्टोत्पत्तीस येणारी ज्ञानपद्धति असामान्य भासते -- असामान्य दोषयुक्त किंवा असामान्य गुणयुक्त, हीन दर्जाची किंवा उच्च दर्जाची भासते. आंतर अस्तित्वांत आम्ही मोकळेपणें पदार्पण करूं शकलों, आंतर अस्तित्व आणि बाह्म अस्तित्व यांच्यामधील भिंतीला आम्हीं दरवाजा केला व तो आम्हीं उघडा ठेवला, तर मात्र बाहेरचें अप्रत्यक्ष ज्ञान आम्हांला मिळून, त्याला आंतून मिळणाऱ्या प्रत्यक्ष निकटच्या ज्ञानाची जोड देतां येते. आंतर पुरुषाच्याहि पलीकडे खोलांत खोल जागीं आमचा खरा आत्मा असतो, तेथें अतिचेतन जाणीव असते. हा आमचा आंतरतम आत्मा, अतिचेतन जाणिवेचा आत्मा आम्ही आपलासा केला, आमची जागृति

पान क्र. ४५२

 

वाढवून वाढवून, या आन्तरतम आत्म्याचे ठिकाणीं आम्हीं जागृति धरली, म्हणजे खरें आध्यात्मिक ज्ञान आम्हांला मिळूं लागतें -- या ज्ञानाचा पाया या ज्ञानाची घटकशक्ति, या ज्ञानाचें स्वाभाविक सारतत्त्व तद्रूपता, तादात्म्य, अभेद, एकरूपता, एकता हें असतें.

पान क्र. ४५३

 

 

प्रकरण अकरावें

अज्ञानाच्या सीमा

 

      हेंच एक जग, हाच एक लोक आहे. परलोक म्हणून कांहीं नाहीं असा कोणी कोणी दावा करतात.

- कठ उप० २.६

     

      अनंताच्या पोटांत तो पसरलेला आहे... शिर (अतिचेतनता) नाहीं, पाय (अचेतनता) नाहींत असा तो आहे... हीं आपलीं दोन टोकें त्यानें गुप्त, झांकून ठेवलीं आहेत.

- ऋग्वेद ४.१.७, ११

     

      मी ब्रह्म आहे अशी जाणीव ज्याला होते, असते, तो हें सर्व जें आहे तें होतो; एकमेव आत्मा सोडून जो दुसऱ्या कोणत्याहि देवतेची उपासना करतो, आणि ''हा आत्मा वेगळा, आणि मी वेगळा'' अशी कल्पना करतो तो अज्ञान, ज्ञानापासून दूर आहे.

- बृदहारण्यक उप० १.४.१०

     

      हा आत्मा चतुर्विध आहे : चार पादांचा, पायऱ्यांचा, अवस्थांचा आहे : जागृतींतील आत्मा हा त्याचा पहिला पाद होय : हा बहि:प्रज्ञ असतो, बाह्य वस्तूंचा भोग घेतो; स्वप्नांतील आत्मा हा त्याचा दुसरा पाद : हा अंतःप्रज्ञ असतो, सूक्ष्म वस्तूचा भोग घेतो; गाढ झोंपेंतील आत्मा हा त्याचा तिसरा पाद : येथें (जागृतींतील आणि स्वप्नांतील अनेकता जाऊन) एकदा आलेली असते, प्रज्ञा घनीभूत झालेली असते, हा आनंदमय असतो, आनंदाचा भोग घेत असतो; हाच सर्वेश्वर, सर्वज्ञ, सर्वांचें आतून नियमन करणारा असतो; चतुर्विध आत्म्याचा चौथा पाद हा खरा आत्मा होय; या खऱ्या आत्म्याचें ज्ञान करून घेणें आमचें कर्तव्य आहे : हा खरा आत्मा, अदृश्य असतो, त्याचें कांहींहि लक्षण सांगतां येत नाहीं. हा स्वयंसिद्ध एकच एक आत्मा म्हणून आम्हांला खोल अंतरंगांत स्वयंप्रत्यक्ष असतो.

- मांडूक्य उप० श्लोक २ ते ७

पान क्र. ४५४

 

      आमच्या आत्म्याच्या मध्यभागी माणसाच्या अंगठ्याएवढा जाणीवयुक्त पुरुष राहतो; तो भूतकालाचा आणि वर्तमानकालाचा स्वामी आहे : आज तो आहे; उद्यांहि तोच आहे.

- कठ उप० ४.१२,१३

     

      अज्ञान किंवा भेद-अधिष्ठित ज्ञान हें आमच्या मानवी मनाचें स्वरूप आहे, आमच्या मानवी पातळीच्या खालीं जाणिवेचा जो विकास झालेला आहे, त्या विकासांतील सर्व प्रकारची जाणीव आमच्या मनाहून अस्पष्ट अशा स्वरूपांत वर सांगितलेल्या भेद-अधिष्ठित ज्ञानाचीच बनलेली आहे. या भेद-अधिष्ठित ज्ञानाची किंवा अज्ञानाची वाटचाल, धडपड अभेद-अधिष्ठित ज्ञानाच्या दिशेनें चाललेली आहे. अशा या अज्ञानाचें रेखाचित्र, ठळक ठळक रेखांचें असें रेखाचित्र आतां आपल्याला रेखाटतां येऊं शकेल. आम्हांमधील अज्ञान, भेदज्ञान वर्णावयाचें तर असें म्हणतां येईल : अस्तित्व आणि शक्ति यांच्या लहरी आम्हांवर बाहेरून आघात करीत असतात, आमच्या आंतहि अशा लहरी उठत असतात : आमच्या जाणिवेचें घटकद्रव्य या लहरींचेंच असतें; आत्मा आणि तदितर वस्तू, कालांत आणि स्थलांत वावरत आहेत असें मानसिक संवेदन आणि ज्ञान हें रूप, या जाणिवेंतील लहरींना आमच्या ठिकाणीं येतें. काल आम्हांला प्रवाहासारखा भासतो. गतिशील आंदोलनाचा प्रवाह हें कालाचें स्वरूप आम्हांला दिसतें. स्थल किंवा अवकाश (आकाश) हें क्षेत्र, वस्तु भरलेलें, आम्हांसमोर असलेलें क्षेत्र म्हणून आम्हांला दिसतें. कालाचा आंदोलनप्रवाह आणि स्थलांतील वस्तुसंभार हा आमच्या अनुभवासाठीं असतो; विकास पावत असलेली अपूर्ण अशी आमची जाणीव, कालस्थलांतील कर्मप्रवाहाच्या आणि वस्तुसंभाराच्या अनुभवानें वाढत जावी, हा या व्यवस्थेंत निसर्गाचा हेतु असतो. आमचा मनोमन पुरुष कालाबरोबर गतिमान् असतो. नेहमीं वर्तमानकालांत याचें अस्तित्व याला प्रत्यक्ष जाणिवेनें भासत असतें. नित्य वर्तमानकालाचा निवासी असें स्वतःचें स्वरूप मनोमय पुरुषाला प्रत्यक्ष प्रतीतीने दिसतें; याला स्मरणशक्तीची मदत असते. स्मरणानें आत्मविषयक आणि वस्तुविषयक अनुभवाचा कांहीं भाग हा स्वतःजवळ राखून ठेवूं शकतो. स्वभावत: भूतकालांत त्याचा अनुभव वाहून जाऊन त्याला हा पारखा होत असतो; पण स्मृतीमुळें या भूतकालांत वाहून जात राहणाऱ्या आपल्या अनुभवाचा कांहीं भाग वांचवून तो, तो आपल्याजवळ ठेवू

पान क्र. ४५५

 

शकतो. त्याला स्मृतीप्रमाणें विचार, संकल्पशक्ति, कृति यांची मदत असते. या मदतीनें मनाची, प्राणाची, शरीराची जी शक्ति त्याजजवळ असते त्या त्रिविध शक्तीच्या सहाय्यानें स्वतःच्या वर दिलेल्या अनुभवाचा उपयोग करून वर्तमान कालचें आणि भविष्यकालांतील आपलें स्वरूप मनोमय पुरुष बनवितो, बनवीत असतो. या मनोमय पुरुषाच्या वर्तमानकालीन स्वरूपाची रचना त्याच्यांतील अस्तित्वगत शक्तीनें केलेली असते; आणि हीच शक्ति त्याचें भविष्यकालीन स्वरूप विकसित करते आणि ते विस्तृत, व्यापक आणि चिरंजीवी करण्याचें काम करीत असते. आत्मप्रकटनाला उपयोगी पडणारें अनुभवसाहित्य, वस्तुजाताचा मिळालेला अनुभव, पृष्ठभागीय आत्म्याला (मनोमय पुरुषाला) टिकवून धरतां येत नाहीं; हें त्याचें ज्ञान एकांगी, अपूर्ण असें असतें, कालाच्या क्रमवार गतीच्या परिस्थितींत बाह्य आत्मा आपलें असुरक्षित, तुटकें ज्ञान जमवीत असतो -- या ज्ञानाला व्यवस्थित करण्याचें काम या आत्म्याची (मनोमय पुरुषाची) ग्रहणशक्ति, बुद्धि, स्मृति या शक्ती करीत असतात; त्याची अस्तित्वांत टिकून राहण्याची इच्छा हीहि त्याच्या ज्ञानाला व्यवस्थित स्वरूप देण्याच्या कामीं सहाय्यक होते. हें व्यवस्थित केलेलें त्याचें त्रोटक ज्ञान त्याला त्याचें स्वरूप सारखें नवें नवें करण्याच्या कामीं उपयोगी पडतें; जुनें स्वरूप कांहीं भागांत पक्कें करण्याच्या कामीं उपयोगी पडतें. मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रिया, या ज्ञानाच्या आधारावर तो करतो आणि ही क्रिया तो वर्तमानकालांतील आपलें अंतरंग प्रकट करण्यासाठीं आणि भविष्यकालांतील स्वतःचें स्वरूप निश्चित करून तें घडवून आणण्यासाठीं उपयोगांत आणतो. त्याचे ठिकाणीं अहम्-संवेदना असते. या अहम्-संवेदनेचें केंद्र, ह्या बाह्य मनोमय पुरुषाचा सर्व जाणीवगत अनुभव आणि सर्व शक्ति-व्यय संघटित करण्यास उपयोगी पडतें. निसर्गाचे जे संपर्क ह्या पुरुषाला घडतात, ते त्याच्या मर्यादित जाणीवयुक्त अस्तित्वाच्या क्षेत्रांत घडत असतां, त्यांना उत्तररूप प्रतिक्रिया करण्यासाठी अहम्-संवेदनेचें केंद्र त्याला उपयोगी पडतें. हें केन्द्र नसतें, तर मनोमय पुरुषावर घडणारे संपर्क व संस्कार अव्यवस्थितपणें ढीग घातलेल्या, घरंगळून जात राहणाऱ्या फुटकळ मण्याप्रमाणें भासले असते. या संस्कारांना संघटित स्वरूप आमच्या संवेदनाकेन्द्रामुळें येत असतें. या अहम्‌संवेदन-केन्द्राप्रमाणें मनोमय पुरुषाचे ठिकाणी दुसरें अहम्-कल्पनेचें केन्द्र असतें. बाह्य आत्म्याच्या प्राणिक द्रव्याला संघटित रूप देणारें अहम्‌चें संवेदन-केन्द्र

पान क्र. ४५६

 

आणि त्याच्या मानसिक द्रव्याला संघटित रूप देणारें अहम्-कल्पनेचें केन्द्र हीं दोन केन्द्रें भेदनिष्ठ अहम्‌चीं केन्द्रें होत. हा अहम् बाह्य पुरुषाचे ठिकाणीं खऱ्या आत्म्याचें प्रतिनिधित्व करतो; खरें अस्तित्व भोगणारा चैतन्यरूप खरा आत्मा हा गुप्त असतो, आमच्या अंतरंगांत खोल ठिकाणी असतो. अहम्‌चे केन्द्र हें बाह्य मनोमय पुरुषांत नेहमींच प्रभावी असतें. या पुरुषाचे केवळ स्वार्थपर व्यवहार अहम् प्रभावित असतात असें नाहीं, तर त्याचे परार्थ परोपकारी व्यवहारदेखील अहम्-प्रभावित असतात. त्याचा परार्थ, परोपकारहि स्वार्थपूर्ण असतो. आमचें निसर्गचक्र, प्रकृतिचक्र गतिमान् असतांना त्याच्या गतीला विशिष्ट वळण लावण्यासाठी, ती गति विशिष्ट दिशेनें होत रहावी यासाठीं कृत्रिम अहम्-केन्द्राची योजना असते; खरा आत्मा, खरा चैतन्यपुरुष विकासक्रमानें मनोमय पुरुषाची जागा घेईपर्यंत अहम्-केन्द्राच्या कृत्रिम योजनेची गरज संपत नाहीं आमचा सर्वश्रेष्ठ चैतन्यपुरुष हा चक्रहि असतो आणि गतिहि असतो, आणि गतिमान् चक्र फिरविणारें सुस्थिर केन्द्रहि असतो; तोच केन्द्र, तोच परिघ आहे. असा हा चैतन्यपुरुष आमचे ठिकाणीं उदयास आला, म्हणजे अहम्‌च्या कृत्रिम कामचलाऊ केन्द्राची आवश्यकता संपते आणि मग तो अहम् चैतन्यपुरुषांत विलीन होतो.

      आमच्या एकंदर अस्तित्वाचा तपास घेतां असें दिसून येतें की, आमचा अनुभव जो आम्ही संघटित करून जीवनव्यवहारासाठीं जाणतेपणें उपयोगांत आणतों, तो अनुभव, आमच्या केवळ जागृतीतील वैयक्तिक जाणिवेचा एक अगदी लहानसा भाग असतो. आमचें अस्तित्व अखंड वर्तमानकालांत वावरत असतें -- या अखंड वर्तमानकालीन अस्तित्वांत आमच्या बाह्य पृष्ठगत जाणिवेंत आत्मविषयक आणि वस्तुविषयक मानसिक संवेदना आणि विचार मोठ्या संख्येने येत असतात; या विचारांतील आणि संवेदनांतील फार थोड्या संवेदना आणि विचार आम्ही धरून ठेवतो, धरून ठेवूं शकतो. वर्तमानाचा सारखा भूतकाल होत असतो. भूतकाळाच्या खड्ड्यांत आमच्या धरलेल्या संवेदना आणि विचार-कल्पना सारख्या गडप होत असतात, आमची स्मरणशक्ति त्यांतील कांहीं थोड्या आमच्यासाठीं राखून ठेवू शकते. स्मृतिसंग्रहित ठेव्यापैकीं लहानसा भाग आमची बुद्धि संघटित ज्ञानाच्या रूपाला आणूं शकते आणि बुद्धि जेवढा भाग वापरते त्यापेक्षांहि लहान भाग कृतिशील इच्छाशक्ति कृतीसाठीं वापरते. तेव्हां भौतिक विश्वांत निसर्गाची जी व्यवहार-पद्धति अनुभवास येते तीच आमच्या

पान क्र. ४५७

 

जाणीवयुक्त आत्मरचनेच्या रूपरूपान्तरग्रहणाच्या व्यवहारांत त्याची पद्धति आहे असें दिसतें; म्हणजे उपलब्ध मालांतील अगदीं थोडा माल कामासाठीं निवडावयाचा, पुष्कळसा नापसंत करावयाचा किंवा बाजूला राखून ठेवावयाचा; कद्रुपणा आणि उथळेपणा करावयाचा, साधनसामग्री पुष्कळशी फुकट घालवावयाची (उधळून टाकावयाची), उपयोगांत आणावयासारखी पुष्कळ सामग्री असून तिचा उपयोग करावयाचा नाहीं, राहिलेल्या थोड्या सामग्रीचा खर्च उपयोगासाठीं करावयाचा तो कद्रूपणानें अव्यवस्थितपणें करावयाचा; ही निसर्गाची व्यवहारपद्धति जड भौतिक क्षेत्रांत आणि आमच्या जाणीवयुक्त क्षेत्रांत सारखीच प्रभावी दिसते. पण निसर्गाची दर्शनी उधळपट्टी वगैरे दर्शनीच असते; वस्तुत: निसर्ग कांहींहि फुकट जाऊं देत नाहीं; स्मृति ज्या संवेदन-कल्पना वांचवून राखून ठेवते म्हणून वर सांगितलें त्याखेरीज असणारा संवेदन-कल्पनांचा माल निसर्ग नष्ट होऊं देतो, हें खरें नाहीं, फुकट जाऊं देतो हें खरें नाहीं. जो माल आमची बुद्धि आणि कृतिशील इच्छाशक्ति वापरते, त्याखेरीज बाकीचा माल फुकट घालविला जातो हेंहि खरें नाहीं. जडविश्वांत काय किंवा आमच्या चेतन विश्वांत काय, निसर्ग कांहींहि फुकट घालवीत नाहीं. आमच्या आत्मरचनेंत स्मृतीनें न राखलेल्या संवेदना-कल्पनांचा उपयोग निसर्ग गाजावाजा न करतां करीत असतो. आमची बुद्धि, इच्छाशक्ति ज्या मालमसाल्याचा उपयोग आमच्या वाढीसाठीं वगैरे करीत नाहींत किवा करूं शकत नाहींत तो मालमसालाहि, आमची वाढ घडविण्यांत, आमची कृति घडविण्यांत निसर्ग खर्च करीत असतो. जो संवेदना-कल्पनांचा मसाला याप्रमाणें निसर्ग उपयोगांत आणतो, त्यापेक्षां अधिक मसाला तो बाजूला राखून ठेवून, या सांठ्याचा उपयोग तो वेळोवेळीं करीत असतो. आम्ही सर्वस्वी विसरून गेलेल्या मालाचा हा सांठा असल्याकारणानें आम्हांला त्याचा उपयोग करतांना असा भास होतो कीं, आम्हीं तो नव्यानेंच निर्माण केला आहे; वास्तविक तो आम्ही निर्माण करीत नसतो, निसर्गानें तो अगोदरच राखून ठेवलेला असतो, निसर्ग त्याला विसरत नाहीं, आम्ही मात्र विसरतो व नवा माल नर्माण केल्याच्या, खोट्या कर्तृत्वानें फुगतो. आमचें कर्तृत्व, तयार असलेल्या मालाची जुळवाजुळव करण्यापुरतेंच असतें. असो. पुनर्जन्म हा निसर्गाच्या व्यवस्थेचा एक भाग आहे, हें आपण मान्य करीत असलों तर आमचा झाडून सर्व अनुभव उपयोगी आहे, उपयोगी पडतो हें आम्हांला कबूल

पान क्र. ४५८

 

करावें लागतें. जीवनाची चिरंतन शाश्वत रहाणारी, वाढणारी इमारत घडवितांना निसर्गाला सर्व तऱ्हेच्या सर्व मालाचा उपयोग असतो -- कांहींहि माल तो नापसंत करीत नाहीं; ज्याचा उपयोग संपला आहे आणि भविष्यकालीन जीवनावर ज्याचा केवळ भार होणार आहे, तेवढाच माल निसर्ग बाजूला टाकून देतो, नापसंत करतो. आमच्या पृष्ठगत जाणिवेंत आज काय घडतें त्यावरून निसर्गाच्या व्यवहाराविषयीं मत बनविणें चुकीचें होईल. कारण आम्ही अभ्यास करून निसर्गाचा, प्रकृतीचा व्यवहार समजून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आम्हांला कळतें कीं, आमच्यांत प्रकृतीची जी वाढ होते, प्रकृतीचें जें कार्य होतें त्या कार्यापैकीं फार थोडें कार्य, त्या वाढीपैकीं फार थोडी वाढ आमच्या जाणिवेच्या क्षेत्रांत येते. आम्हांला न कळताच प्रकृति पुष्कळसें कार्य आमच्या ठिकाणीं करीत असते. आम्हांला न कळतांच प्रकृतीची पुष्कळशी वाढ आमच्या ठिकाणीं होत असते; प्रकृतीच्या जडविषयक व्यवहारांत जाणीवरहित कार्य चालतें व वाढ चालते; तसाच प्रकार मोठ्या प्रमाणांत आमच्या जीवनाच्या क्षेत्रांतहि होत असतो. आमचें आम्हांला थोडेसें ज्ञान आहे; आमच्या अस्तित्वाची, जीवनाची माहिती आम्हांला थोडीशी आहे, आमचें सर्व अस्तित्व, सर्व जीवन आमच्या ज्ञानाच्या आवांक्यांतलें नाहीं, आम्हांला माहीत नाहीं असा आमच्या अस्तित्वाचा व जीवनाचा फार मोठा प्रदेश आहे : आमचें अस्तित्व आणि जीवन सागरासारखें आहे आणि त्याच्यावर क्षणभर तरंगणारा एक बुडबुडा हें आमच्या क्षणिक व्यक्तित्वाचें, जाणीवयुक्त अहम्‌चें खरें स्वरूप आहे.

      आमच्या जागृतींतील जाणिवेंत वरवर शोध केला, तिचें वरवर निरीक्षण केलें, तर हें दिसून येतें कीं, आमच्या वैयक्तिक अस्तित्वाचा आणि जीवनाचा फार मोठा भाग आम्हांला अज्ञात आहे; हा आमचा भाग आमच्या दृष्टीनें अचेतन भाग आहे; वनस्पति, धातु, पृथ्वी, जडतत्त्वें यांचें ''जीवन'' अचेतनाच्या प्रांतांत आहे, तद्वतच आमचें पुष्कळसें अस्तित्व आणि जीवन आमच्या दृष्टीनें अचेतनाच्या प्रांतांत आहे असें, आमच्या जागेपणींचें ज्ञान वरवर निरीक्षिलें असतां, आमच्या लक्षांत येतें. केवळ वरवर न पाहतां खोल अभ्यास करून आमचें ज्ञान वाढविण्याचें आम्हीं ठरविलें, मानसिक प्रयोग आणि निरीक्षण सामान्य मर्यादांच्या पलीकडे आम्हीं नेटानें चालूं ठेवलें, तर आमचें (आमच्या अस्तित्वाचें) जें आम्हांला अचेतन भासणारें, अवचेतन (गुप्तचेतन) भासणारें क्षेत्र आहे तें

पान क्र. ४५९

 

फारच मोठें आहे आणि आमच्या जागृत आत्मजाणिवेच्या क्षेत्रांत आमच्या अस्तित्वाचा फारच लहान तुटका भाग येतो, असें आमच्या नजरेस येतें. आमचें जागृत मन आणि मी, हा आमच्या अंतरीं बुडी मारून बसलेल्या आमच्या आंतर-आत्म्याचा, पुरुषाचा पृष्ठगत दर्शनी भाग आहे; मंदिराचा मोठा भाग महाजलाशयात बुडालेला असावा आणि त्याचा कळस आणि घुमट मात्र पाण्यावर दिसावें तशी आमच्या अस्तित्वाची स्थिति आहे, आमचें जागृत मन व मी, ही दुक्कल त्या घुमट व कळसासारखी आहे आणि त्या मंदिराच्या मुख्य भागासारखा आमचा आंतरपुरुष आहे. या आंतरपुरुषाची अनुभव घेण्याची शक्ति बाह्य 'मी' पेक्षां आणि मनापेक्षां फारच मोठी आहे.

      आंतर गुप्त जाणीव आणि आत्मा (आंतरपुरुष) हा आमचें खरें पूर्ण अस्तित्व होय. बाह्य आत्मा, बाह्य अस्तित्व हें या पूर्ण अस्तित्वाचा केवळ एक दृश्यरूपात्मक भाग आहे, पृष्ठगत व्यवहाराकरिता पूर्ण खऱ्या अस्तित्वाचा कांहीं भाग निवडून तो बाह्य आत्मा म्हणून कामास लावला आहे. वस्तूंचे जे संपर्क आम्हांला (बाह्य आत्म्याला) घडतात त्यांपैकी फार थोडे आम्ही जाणू शकतो; आंतरपुरुष मात्र, जें जें आम्हांला किंवा आमच्या परिसराला स्पर्श करतें किंवा परिसरांत अथवा आमच्यांत शिरतें तें तें सर्व जाणतो; आमच्या अस्तित्वाचा आणि जीवनाचा व्यवहार थोडासा आम्ही जाणूं शकतो; आंतर पुरुषाला इतकें ह्यासंबंधीचें ज्ञान असतें व होतें की त्याच्या नजरेंतून बहुधा कांहींहि सुटत नाहीं, असें आपणांला म्हणतां येईल. आम्हांला ज्या गोष्टी दिसतात व कळतात त्यांपैकीं कांहीं थोड्या आमची स्मरणशक्ति राखून ठेवते आणि स्मरणसंग्रहांत असलेल्या या गोष्टींपैकीं पुष्कळशा गोष्टी आम्हांला जरूर असतात तेव्हां सांपडत नाहींत, उलटपक्षीं आंतरपुरुषाला दिसलेली, लाभलेली कोणतीहि गोष्ट तो विसरत नाहीं आणि त्याला ती केव्हांहि हाताशीं असते. आम्हांला दिसलेल्या गोष्टी आणि आम्ही स्मरणांत ठेवलेल्या गोष्टी यांचा उपयोग करून आम्ही आमचें ज्ञान आणि आकलनबुद्धि संघटित करीत असतो, पण त्यासाठीं आमच्या मानसिक ग्रहणशक्तीला आणि विचारशक्तीला वस्तूंचें स्वरूप व संबंध ओळखण्याचें शिक्षण देऊन तयार करावें लागत असतें. ह्या शक्ती जितपत अशा रीतीनें तयार झाल्या असतील तितपतच, दिसलेल्या आणि स्मरलेल्या गोष्ट त्या उपयोगांत आणू शकतात; या गोष्टीचें अलग अलग खरें स्वरूप आणि त्यांचें परस्परसंबंध

पान क्र. ४६०

 

ओळखणें ही गोष्ट, विशिष्ट शिक्षणक्रमांतून आमची ग्रहणशक्ति व विचारशक्ति जाईल तेव्हांच तिला शक्य होते -- अर्थातच दिसलेल्या, स्मरलेल्या गोष्टींपैकीं फारच थोड्या गोष्टी आम्हांला ज्ञान व आकलनशक्ति संघटित करण्यासाठीं वापरतां येतात. आंतरपुरुषाच्या ग्रहणशक्तीला, विचारशक्तीला शिक्षणाची आवश्यकता नसते; त्याला दिसलेल्या, स्मरलेल्या सर्व गोष्टींचीं रूपें आणि अन्योन्यसंबंध तो बिनचूकपणें जाणतो आणि संग्रहित करतो; वस्तूंचा अर्थ त्याला अगोदर अवगत नसला, तर हा अर्थ समजण्यास त्याला मुळींच वेळ लागत नाहीं वस्तु दिसतांक्षणीं तिचा अर्थ तो ओळखूं शकतो. (हा शेवटचा गुणधर्म आंतरपुरुषाचे ठिकाणीं आहे ही गोष्ट सर्वांना सहज मान्य होईल अशी नाहीं.) आमचीं भौतिक इंद्रियें काय जें थोडें येथें, थोडें तेथें टिपून घेतील तेवढेंच आमच्या जागृत मनाचें पाहणें. आंतरपुरुषाची गोष्ट अगदी वेगळीं, भौतिक इंद्रियांचें जेवढें क्षेत्र आहे त्यापेक्षां आंतरपुरुषाचें दर्शनक्षेत्र फार मोठें आहे; त्याला सूक्ष्म इंद्रियें, इंद्रियशक्ती आहेत. या इंद्रियशक्तींचें क्षेत्र फारच मोठें आहे, त्याच्या मर्यादा ठरविणें सोपें नाहीं. (दूर विचारवाहनाच्या गोष्टी नजरेस येतात त्यावरून आंतरपुरुषाला उपलब्ध असलेल्या सूक्ष्म इंद्रियशक्तींची कल्पना येऊं शकते); आंतरपुरुषाची प्रेरणा आणि बाह्य इच्छेची प्रेरणा यांचा संबंध नीट तपासला गेलेला नाहीं. (आंतरपुरुषाच्या प्रेरणेला कोणी कोणी अचेतनाची किंवा अवचेतनाची प्रेरणा म्हणतात, पण हें म्हणणें बरोबर नाहीं -- आंतरपुरुष हा अचेतन आणि अवचेतन सदरांत येत नाहीं.) या प्रेरणांचा संबंध असामान्य आणि अव्यवस्थित आविष्कारांपुरताच तपासला गेला आहे, रोगट मानवी मनांत ज्या असाधारण दुर्घटना घडतात, त्यांच्या बाबतींतहि आंतर व बाह्य प्रेरणांचा संबंध तपासला गेला आहे. पण एवढी तपासणी या संबंधाची यथार्थ कल्पना येण्यास अगदीं अपुरी आहे; आम्ही जर ही आमची तपासणी योग्य प्रकारें पुढें नेली, तर आम्हांला दिसून येईल कीं, आंतरपुरुषाचें ज्ञान आणि प्रेरणाच आमच्या सर्व बाह्य जाणीवयुक्त व्यवहाराच्या बुडाशीं असतात; आंतरपुरुष गुप्तपणें धडपड करीत असतो; सिद्धि मिळवीत असतो; या धडपडीचा आणि यशाचा कांहीं थोडा भाग आमच्या जीवनाच्या पृष्ठभागावर उमटून येतो, या वर उमटलेल्या भागाला आम्ही आमचा (बाह्य आत्म्याचा) जाणीवयुक्त व्यवहार मानतो, वस्तुत: सर्वच व्यवहार हा आंतर आत्म्याचा असतो. आमच्या आत्म्याचें ज्ञान करून

पान क्र. ४६१

 

घेणें खऱ्या आत्मज्ञानाची प्राप्ति करून घेण्याच्या मार्गांतील पहिलें पाऊल असतें.

      खऱ्या आत्म्याचा शोध लावावयाचें आम्हीं पत्करलें आणि आंतरपुरुषाची आमची कल्पना थोडी विस्तारून आमचें खालच्या पातळीवरचें अवचेतन क्षेत्र आणि वरच्या पातळीवरचें अतिचेतन क्षेत्र -- आंतरपुरुषाच्या खास क्षेत्राचीं दोन्हींकडचीं दोन टोंकें -- आंतर पुरुषाच्या क्षेत्रांत धरलीं, तर आम्हांला असा शोध लागतो कीं, हा आंतरपुरुषच खरोखरी आमच्या दर्शनी, वरच्या, अस्तित्वाचा सर्व मालमसाला पुरवितो; आमच्या वस्तुप्रतिमा, आमच्या स्मृती, आमच्या इच्छाशक्तीच्या क्रिया, आमच्या बुद्धिशक्तीची क्रिया या सर्व गोष्टी हाच आंतरपुरुष आम्हांला पुरवितो; आमच्या वस्तुप्रतिमा वगैरे गोष्टी त्या आंतरपुरुषाच्या वस्तुप्रतिमा वगैरेपैकींच असतात; त्यांतून पुष्कळशा वगळून कांहीं थोड्याशा वर बाह्य अस्तित्वांत प्रकट झालेल्या असतात; आमचा ''मी'' देखील त्याच्या आत्म-जाणिवेचा, आत्म-अनुभवाचा लहानसा पृष्ठगत प्रतिनिधिरूप आकार असतो. आमचें जाणीवयुक्त नानाविध रूपात्मक अस्तित्व हें सागरांतील लहरीप्रमाणें आहे -- आमचें आंतरपुरुषाचें अस्तित्व हा सारखा उसळणारा सागर आणि त्यांतून उठणाऱ्या लहरी म्हणजे आमचें नानाविध रूपात्मक अस्तित्व, अशी वस्तुस्थिति असल्याचें आम्हांला शोधाअंतीं आढळून येतें. या सागराच्या मर्यादा कोणत्या ? या सागराचा विस्तार कोठपर्यंत आहे ? त्याची मूलभूत प्रकृति कोणती ? सामान्यत: आमच्या जागृत पृष्ठभागावर जें नाहीं तें सर्व अवचेतन अस्तित्वांत आम्ही घालतों; पण ''अवचेतन अस्तित्व'' हें नांव सर्व आंतर-आत्म्याच्या अस्तित्वाला तर देतां येत नाहींच, पण त्याच्या बऱ्याच मोठ्या भागालाहि हें नांव लागू पडत नाहीं. अवचेतन म्हटलें कीं, अंधुक अचेतनता, अर्धचेतनता, आमच्या जागृत, संघटित चेतनतेच्या खालची, खालच्या दर्जाची, आंत दबलेली चेतनता -- असा आम्ही अर्थ घेतो; ही दबलेली चेतनता आमच्या जागृत चेतनेहून कमी स्वायत्तता भोगणारी असते असा आमचा अर्थ असतो. पण आम्ही आंत गेलों म्हणजे आंतरपुरुषाच्या अस्तित्वाच्या एका भागांत आम्हांला आमच्या पृष्ठगत जाणिवेहून, रोजचें तासानुतासाचें जीवन बघणाऱ्या जाणिवेहून, पुष्कळच अधिक व्यापक, पुष्कळच अधिक प्रकाशमय, पुष्कळच अधिक स्वायत्त आणि वस्तुस्वामित्वयुक्त जाणीव आमच्या प्रत्ययास येते; या जाणिवेचें आंतरअस्तित्व म्हणजे आमचा आंतरपुरुष असें आम्हीं लक्षांत ठेवलें पाहिजे;

पान क्र. ४६२

 

आणि ''अवचेतन'' हें नांव आम्हीं आमच्या प्रकृतीच्या गुप्त, अगदीं खालच्या दर्जाच्या प्रांतासाठीं राखून ठेवलें पाहिजे. (आंतरपुरुषाच्या अस्तित्वाचा सर्वच प्रांत वर सांगितल्याप्रमाणें आमच्या जागृत जाणिवेहून व्यापक, प्रकाशमय, स्वायत्त नसतो -- त्यांतील कांहीं भाग अज्ञानमय, अंधकारमय असतो हेंहि आपण विसरूं नये.) याप्रमाणें अवचेतन आणि आंतरपुरुष यांच्या प्रांतांची व्यवस्था सांगितल्यानंतर आणखी एक गोष्ट सांगावयाची ती ही कीं, आमच्या एकंदर अस्तित्वांत ''अतिचेतन'' म्हणून एक भाग आहे. या भागांत आमचा खरा उच्चतम आत्मा आम्हांस सांपडतो; हा अतिचेतन प्रांत आमच्या प्रकृतीचा गुप्त, उच्चतर प्रांत आहे.

      आतां, अवचेतन ज्याला म्हणतात त्या प्रांताची व्यवस्था विस्तारानें पाहूं. अवचेतन प्रांत सुरू कोठें होतो ? आमचें पृष्ठगत अस्तित्व आणि अवचेतन ह्यांचा संबंध कसा असतो ? आंतरपुरुषाशीं त्याचा संबंध कसा असतो ? आंतरपुरुषाच्या प्रांतांत अवचेतनाचा प्रांत थोडाबहुत समाविष्ट होतोसा दिसतो, पण ह्या दोघांचा खराखुरा संबंध कोणत्या प्रकारचा असतो ? हें पाहणें आवश्यक आहे. आम्ही आमचें शरीर जाणतो, म्हणजे आम्हांला शरीर आहे हें आम्ही जाणतों, भौतिक अस्तित्व आम्हांला आहे हें आम्ही जाणतों; ह्या अस्तित्वाशीं आम्ही बहुतांशीं तद्‌रूपहि होतों, तरी ह्या शरीराच्या भौतिक अस्तित्वाच्या बहुतेक क्रिया आमच्या मनोमय पुरुषाच्या जाणिवेच्या बाहेर -- खालीं अवमनस्क (अवमानसिक) अशा असतात, आमचें मन त्यांत कांहीं भाग घेत नाहीं इतकेंच नव्हे, तर आमची अशी समजूत असते कीं, त्या गुप्त भौतिक क्रियांचें ज्ञान आमच्या भौतिक अस्तित्वालादेखील नसतें; आमच्या भौतिक अस्तित्वाला त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाचेंहि ज्ञान स्वतःच्या शक्तीनें होत नाहीं, अशीहि आमची समजूत आहे; अंतःकरणाच्या संवेदनेनें आणि बुद्धीच्या निरीक्षणानें जेवढ्या अस्तित्वाच्या भागावर प्रकाश पडतो, तेवढाच अस्तित्वाचा भाग भौतिक अस्तित्वाला ज्ञात होऊं शकतो, निदान भासमान होऊं शकतो अशी समजूत असते. आमच्या शरीरांत प्राणशक्ति काम करीत आहे हें ज्ञान आम्हांला आहे; वनस्पतींमध्यें, खालच्या दर्जाच्या प्राण्यांमध्यें जशी प्राणशक्ति असते, तशीच आमच्यामधील प्राणशक्ति आहे हें आम्ही ओळखतों; आम्हांला प्राणमय अस्तित्व आहे हें आम्ही जाणतो : हें अस्तित्व बहुतांशीं आमच्या मानसिक जाणिवेच्या बाहेर, अवमानसिक असें असतें, या अस्तित्वाचा कांहीं थोडा भाग, या अस्तित्वाच्या कांहीं

पान क्र. ४६३

 

थोड्या हालचाली आणि प्रतिक्रिया मात्र आमच्या मनाला समजतात, विदित होतात. प्राणमय अस्तित्वाच्या ज्या क्रिया आम्हांला ज्ञात होतात, त्या विशेषत: बिघडलेल्या प्रकृतीच्या असतात; प्राणमयाच्या गरजा आम्हांला जाणवतात; त्याची तृप्ति आमच्या जाणिवेंत विशेष स्पष्टपणें येत नाहीं; त्याच्या रोगांची, बिघाडाची जाणीव आम्हांला तीव्रतेनें होते; त्याची निरोगिता, नियमित तालबद्ध गति आम्हांला विशेष भासतहि नाहीं; त्याचें जीवन आम्हांला स्पष्टपणें जाणवत नाहीं; त्याचें मरण मात्र फार बोंचतें; आम्ही जाणीवयुक्त रीतीनें जेवढे प्राणमय अस्तित्व पाहूं शकतों, उपयोगांत आणू शकतों तेवढेंच आम्हांला नीट कळतें, जें प्राणमय अस्तित्व, दुःख, सुख, इतर वेदना, संवेदना आमच्यासमोर उभें करतें तेंहि आम्ही ओळखतो; नाड्यांची, स्थूल शारीर अवयवांची प्रक्षोभाची अवस्था व प्रतिक्रिया ज्या प्राणिक अस्तित्वामुळें घडून येते, तेंहि प्राणिक अस्तित्व आमच्या मनाला समजतें; पण याहून वेगळें जें प्राणिक अस्तित्व तें आमच्या जाणिवेच्या टप्पाच्या बाहेर असतें. या कारणानें आमची अशी समजूत होते कीं, जो प्राणिक (आणि शारीरिक-प्राणिक) अस्तित्वाचा भाग आमच्या जाणिवेच्या कक्षेंत येत नाहीं, तो भाग स्वतःच्या क्रिया देखील नेणिवेनें करीत असतो; त्याचे ठिकाणीं वनस्पतीसारखी दबलेली जाणीव किंवा नेणीवच असते किंवा प्राथमिक जीवाप्रमाणें अगदीं प्राथमिक अशी अंधुक अंधुक जाणीव असते; त्याचे ठिकाणीं स्वतःची जी जाणीव निर्माण होते ती, आपलें मन आणि बुद्धि त्यावर प्रकाश पाडते, त्याला निरीक्षणाचा विषय करते त्यामुळें आणि तेवढ्यापुरतीच, निर्माण होते.

      शारीरिक, प्राणिक किंवा प्राणिक-शारीरिक अस्तित्वाला स्वतःची, स्वत: करीत असलेल्या क्रियांची जाणीव नसते, असा जो वाद आहे तो, आम्ही जाणीव आणि मन, मानसिक जाणीव यांचा घोटाळा करीत असतो, म्हणून सत्यच होतो. जाणीव म्हणजे मानसिक जाणीव हें आमचें समीकरण चुकीचें आहे. भौतिक शरीर आणि भौतिक प्राणमय अस्तित्व यांच्या ज्या खास हालचाली असतात, त्यांच्याशीं मन कांहीं मर्यादेपर्यंत तद्रूप होऊन त्या हालचाली आपल्याशा करून टाकते, आणि त्यामुळें जाणीव तेवढी सारी मानसिकच असते, असा भास उत्पन्न होतो. परंतु शारीरिक हालचालींपासून मन हें साक्षी म्हणून वेगळें, दूर ठेवलें तर आपल्या नजरेस येतें कीं, अगदीं भौतिकाचा कळस ज्यांत आहे अशा

पान क्र. ४६४

 

जीवनाच्या (प्राणाच्या) हालचालींत, शरीर, प्राण, यांत त्यांची त्यांची खास अशी जाणीव आहे, प्राथमिक जीवजंतूंना जशी असते तशी जाणीव आहे; एवढेंच कीं, आम्हांमध्यें या जाणिवेंत मनाचा अंशत: प्रवेश झाला आहे आणि म्हणून तिला मानसिक जाणिवेचें स्वरूप तेवढ्यापुरतें प्राप्त झालें आहे. शरीर, प्राण जेव्हां स्वतंत्ररीत्या गतिमान होतात, क्रिया करतात तेव्हां, आम्हांला जशी मानसिक जाणीव आहे, तशी जाणीव त्यांना नसते; मन त्यांच्या पोटांत लपलेलें असतें, सुव्यवस्थित अशी आत्मजाणीव, शुद्ध शारीर, प्राणिक क्रियांत नसते; केवळ क्रिया-प्रतिक्रिया यांची संवेदना, तसेंच हालचाल, प्रेरणा आणि वासना, भूक, सहजभावना, दुःख, सुख यांचीं संवेदना, बधिरतेची संवेदना या गोष्टी शुद्ध शारीर व प्राणिक हालचालींत दिसून येतात. याप्रमाणें प्राणिक, शारीरिक अस्तित्वांत जाणीव जी असते, ती मनाहून खालच्या दर्जाची असते; अंधुक मर्यादित, आपोआप कृति करणारी अशी ती असते -- तिला अवमानसिक जाणीव म्हणतां येईल; कारण ती आमच्या मानसिक जाणिवेइतकी स्वायत्त असत नाहीं. अर्थात् तिला आमच्या अस्तित्वाचा अवचेतन भाग म्हणणें मात्र बरोबर नाहीं. त्या जाणिवेपासून मन दूर केलें, म्हणजे ती जाणीव नाडीगत जाणीव आहे, अर्थात् शुद्ध भौतिक शारीरिक किंवा प्राणिक जाणीव आहे असें आपणांस स्पष्टपणें दिसतें -- ही जाणीव ऐंद्रिय संवेदनात्मक जाणीव असते; हिच्या द्वारां विचार न करतां निसर्गाला काम करून घेतां येतें; स्वयंगतिक, स्वयंचलित, स्वयंकार्यकारी अशी ही जाणीव असते; संपर्क घडला कीं, ही जाणीव प्रतिक्रिया करते; या प्रतिक्रिया मनाच्या प्रतिक्रियेहून वेगळ्या आणि स्वतंत्र असतात; मनाची वस्तुग्रहणशक्ति आणि उत्तर देण्याची शक्ति यांजवर ही नाडीगत प्रतिक्रिया कांहीं अवलंबून नसते -- जाणिवेची ही एक स्वतंत्र पातळी आहे : मनाची जाणिवेची पातळी वेगळी आणि ही भौतिक, प्राणिक जाणिवेची पातळी वेगळी. या प्राणिक, शारीरिक (अवमानसिक) जाणिवेहून खरी अवचेतन जाणीव ही वेगळी असते. खरी अवचेतन जाणीव ही मानसिक, अवमानसिक जाणिवेच्या खालच्या सीमाप्रांतांत हालचाल करणारी अचेतन ''जाणीव'' असते; या कंपनशील अचेतनतेंतून अथवा अवचेतन जाणिवेंतून तिच्या कंपनांचा थवा वर फेंकला जात असतो -- या कंपनांचें रूपांतर मानसिक जाणिवेच्या घटकांत व्हावयाचें असतें, होत असतें; आमच्या पृष्ठगत मानसिक जाणिवेंत जे संस्कार सारखे होत असतात ते

पान क्र. ४६५

 

भूतकालीन होऊन या अवचेतनाच्या प्रांतांत उतरतात. आमच्या गत अनुभवाचे संस्कार अवचेतनांत सांठविले जातात; आमच्या जाणीवशून्य संवयीचीं बीजें या अवचेतनांत सांठविलेल्या संस्कारांत असतात; अवचेतन जाणीव, हे बीजरूप संस्कार वर पृष्ठगत जाणिवेकडे पाठविते, सारखे पाठवीत असते; पण हा व्यवहार अव्यवस्थितपणें चाललेला असतो. पुष्कळसा अर्थशून्य किंवा भयंकर माल याप्रमाणें अवचेतनांतून वर येत असतो; या मालाचें मूळ आम्हांला कळत नाहीं. स्वप्नामध्यें, सर्व प्रकारच्या यांत्रिक पुनरुक्तींमध्यें, आकस्मिक प्रेरणांमध्यें, अकारण हेतूंमध्यें, मानसिक, प्राणिक, शारीरिक प्रक्षोभांमध्यें व बंडांमध्यें, आमच्या प्रकृतीच्या अंधकारमय भागांत उठणाऱ्या मूळ स्वयंगतिक आकांक्षांमध्यें आणि निकडींच्या गरजांमध्यें अवचेतनांतून अव्यवस्थितपणें वर फेकल्या जाणाऱ्या या संस्कारांचा प्रत्यय आम्हांला येत असतो.

      अवचेतन प्रांत कसा असतो याची कल्पना याप्रमाणें दिल्यानंतर हें सांगणें अवश्य आहे कीं, आंतर आत्मा तपासल्यास त्यांत या अवचेतनाचीं लक्षणें बिलकुल सांपडत नाहीत; मन, प्राणशक्ति, सूक्ष्म भौतिक (शारीरिक) स्वच्छ वस्तुसंवेदना या गोष्टी पूर्णतया आंतर पुरुषाचे ठिकाणीं असतात; आमच्या जागृत पुरुषाच्या ठिकाणीं ज्या शक्ती आहेत, त्या सर्व आंतर पुरुषाच्या ठिकाणीं आहेत. मात्र आंतर पुरुषाच्या या शक्ती जागृत बाह्य पुरुषापेक्षां अधिक व्यापक, अधिक विकसित, अधिक प्रभुत्वयुक्त आहेत; त्याचे ठिकाणीं सूक्ष्म संवेदनशक्ति आहे, वस्तुचित्र घेण्याची शक्ति आहे, व्यापक स्मृति आहे, निवडानिवडीची तीक्ष्ण बुद्धि आहे : आमच्या मनालाहि या शक्ती कमी विकसित अवस्थेंत आहेत -- पण मनाला नसणाऱ्या शक्तीहि आंतर पुरुषाचे ठिकाणीं आहेत, हा त्याचा खास विशेष आहे. या पुरुषाला साधनाशिवाय प्रत्यक्ष ज्ञानाची शक्ति आहे, त्याचा आत्मा स्वतःविषयीं निरीक्षणादि क्रिया करीत असला किंवा वस्तुविषयक निरीक्षणादि करीत असला, तरी दोन्हीहि प्रसंगीं त्याला सर्व गोष्टींचें प्रत्यक्ष ज्ञान होऊं शकतें; आणि म्हणून त्याला ज्ञान अविलंबानें, त्वरित होऊं शकतें. त्याची कर्तृत्वशक्ति (इच्छाशक्ति) वेगानें यशस्वी क्रिया करूं शकते; वासनांचा प्रेरणांचा थांगपत्ता त्याला अगदीं खोलवर लागतो आणि त्यांची तृप्ति त्याला खोलवर करतां येते. आमचें पृष्ठगत मन हें, खरें मनपण असलेली वस्तु आहे, असें म्हणणें धाडसाचें होईल. त्याला खरें मन म्हणतांना संकोचच वाटतो; कारण, शरीर, शारीर

पान क्र. ४६६

 

जीवन, नाडीसंघाच्या आणि शारीर अवयवांच्या संकुचित मर्यादा यांच्या बंधनांत हें आमचें पृष्ठगत मन कायमचें पडलेलें आहे. या उपाधी त्याच्या गतीला, कृतीला कायम अडथळा करणाऱ्या आहेत : या उपाधींच्या दडपणामुळें, दबावामुळें त्याची गति सारखी कुंठित होत असते. उलटपक्षीं आंतर आत्म्याची मानसिक शक्ति या मर्यादांना, उपाधींना न जुमानणारी आहे; स्थूल शारीर मन, स्थूल शारीर अवयव आणि त्यांची क्रिया आंतर पुरुषाला (त्याच्या खऱ्या मनाला) विदित असते, उपयोगी पडते; पण या मनाहून, अवयवांहून त्याची ज्ञानशक्ति, क्रियाशक्ति फार अधिक असते; वस्तुत: या मनाचें आणि अवयवांचें जनकत्व मोठ्या प्रमाणांत आंतर पुरुषाकडे (त्याच्या खऱ्या मनाकडे) असतें. या आंतर पुरुषाला अवचेतन म्हणावयाचें तर या अर्थानें म्हणतां येईल कीं, आपलें सर्व स्वरूप किंवा स्वरूपाचा मोठा भाग तो पृष्ठगत आत्म्याप्रमाणें दृश्य करीत नाहीं, आपले बहुतेक स्वत्व पृष्ठगत न करतां पडद्याआड ठेवतो, नेहमींच पडद्याआड राहून तो काम करतो; त्याला अवचेतन म्हणण्यापेक्षां गुप्त आंतरचेतन आणि परिचेतन म्हणणें शोभेल; कारण बाह्य प्रकृतीला त्याचा आधार असतो, एवढेंच नव्हे, तर त्या प्रकृतीला बाहेरून चोहोंबाजूंनीं तो व्यापून असतो आणि बाह्य आत्म्याच्या (मनोमय पुरुषाच्या) दृष्टीनें आंत राहून काम करतो (बाह्य आत्म्याला आधार देतो) हें जें वर्णन आहे तें आंतर पुरुषाच्या विशेष खोल असणाऱ्या अस्तित्वाला सर्वांत अधिक लागूं पडतें; या आंतर पुरुषाचे, आमच्या बाह्य पुरुषाच्या जवळ जवळ असणारे, जे भाग आहेत त्यांत खोल असलेल्या भागांहून अधिक अज्ञानमय कार्य घडत असतें; जे कोणी स्वत:च्या आंत प्रवेश करतात आणि बाह्य पुरुषाला लागून आंत असलेल्या ज्या भागांत संघटना कमी आहे अशा भागापर्यंतच पोचतात, खऱ्या आंतर पुरुषाच्या आणि पृष्ठगत पुरुषाच्या मध्यें जी व्यवस्थाशून्य अराजकाची जागा आहे त्या जागेंतच जे थांबतात, त्यांचा अर्थांतच फार गोंधळ उडतो, त्यांना फार भ्रमांत पडावें लागतें; पण हा भाग देखील अवचेतनाच्या गुणधर्माचा असत नाहीं, अज्ञानाच्या गुणधर्माचा असतो. अचेतन क्षेत्र आणि हीं त्याच्यावरचीं मध्यवर्ती क्षेत्रें यांच्यांत स्पष्ट भेद आहे : या मध्यक्षेत्रांतील गोंधळ आणि अचेतन-अवचेतनांतील गोंधळ यांची जात एक नाहीं, हें लक्षांत ठेवणें योग्य आहे. आमच्या एकंदर अस्तित्वाचे तीन घटक आहेत, असें वरील विवेचनावरुन म्हणतां येतें : एक घटक अवमानसिक आणि अवचेतन प्रांत,

पान क्र. ४६७

 

हा प्रांत आम्हांला अचेतनवत् भासतो; आमच्या अस्तित्वाचा भौतिक जड पाया या प्रांतांत येतो, आमच्या जीवनाचा (प्राणमय अस्तित्वाचा) आणि शरीराचा मोठा भाग या प्रांतांत येतो; दुसरा घटक आंतर पुरुषाचा प्रांत. आंतर मन, प्राण, शरीर, आणि या सर्वांचा आधार असणारा आत्मा किंवा चैत्य पुरुष या दुसऱ्या प्रांतांत येतात; तिसरा घटक आमची जागृत जाणीव, आंतर पुरुष आणि अवचेतन अस्तित्व यांतून ही जागृत जाणीव वर पृष्ठभागावर येते; ही जाणीव त्या गुप्त खळबळणाऱ्या जलाशयावरील लहरीसारखी असते. आमच्या अस्तित्वाचा हा हिशोबहि अपुराच आहे : आमच्या सामान्य आत्मजाणिवेच्या मागें, खोल, खालीं आमचें अस्तित्व जसें पसरलें आहे, तसें तें आमच्या सामान्य आत्मजाणिवेच्या वरतीं उंच प्रदेशीं पण पसरलें आहे. हा वरचा प्रदेश आमच्या खऱ्या आत्म्याचा प्रदेश आहे. आंतर पुरुष हा ज्ञान-अज्ञानमय पुरुष आहे. त्याला आमच्या जागृत मनाहून खूप अधिक प्रकाश, सामर्थ्य, व्यापकता आहे, पण तो कांहीं आमचें सर्वोच्च अस्तित्व नव्हे, आमच्या अस्तित्वाचें सारसर्वस्व नव्हे, आमच्या अस्तित्वाचें अंतिम रहस्य नव्हे; तो वर सांगितल्याप्रमाणें ज्ञान-अज्ञानाच्या प्रांतांतला असाच आमच्या एकंदर अस्तित्वाचा घटक आहे. वर आमच्या अस्तित्वाचे जे तीन घटक सांगितले त्या घटकांच्या जाणिवेपलीकडे असलेला असा आमच्या अस्तित्वाचा अतिचेतन प्रांत, आमच्या विशिष्ट प्रसंगींच्या अनुभवाचा विषय होत असतो -- हा आमच्या खऱ्या आत्म्याचा प्रदेश होय. या उच्च प्रांताप्रमाणें आम्हांला एका उच्चतम वस्तूचाहि अनुभव येतो; ही वस्तु वरील सर्व प्रांतांचा आधार असून त्याच्या पलीकडे तिचें अस्तित्व आहे. या सर्वोच्च सर्वश्रेष्ठ वस्तूला, सद्‌वस्तूला आम्ही माणसें चैतन्य, ईश्वर, परमात्मा अशीं नांवें देतो; तिचें स्पष्ट ज्ञान आम्हां सामान्य मानवांना नसतें. अतिचेतन प्रांतांतून आम्हां सामान्य मानवांच्या जीवनांत मधून मधून कांहीं गोष्टी अकस्मात् येतात; आमचें जें सर्वोच्च अस्तित्व व जीवन, त्याचा ओढा या अतिचेतन प्रदेशाकडे असतो, तसाच तो या प्रदेशाच्याहि पलीकडे असणाऱ्या आणि या प्रदेशाला आधारभूत होणाऱ्या सर्वश्रेष्ठ चैतन्याकडेहि असतो. तेव्हां आमच्या अस्तित्वाच्या एकंदर प्रदेशांत जसा अवचेतन प्रदेश आहे, अचेतन प्रदेश आहे, तसा अतिचेतन प्रदेशहि आहे -- आमचा जागृत आत्मा आणि आमचा आंतर आत्मा यांना हा अतिचेतन प्रदेश चोहोंबाजूंनीं व्यापून आहे. त्यांच्या मर्यादांच्या वर उंच या प्रदेशाचें

पान क्र. ४६८

 

सर्वसमावेशक स्वरूप विशिष्ट प्रसंगीं अनुभवास येतें -- आम्हां सामान्य मानवांना हा प्रदेश अज्ञात आहे. आम्हांला तो अप्राप्य भासतो, त्याच्याशीं कांहीं संबंध ठेवतां येईल अशी शक्यता दिसत नाहीं.

      आमचें ज्ञान वाढलें म्हणजे वर ईश्वर, परमात्मा म्हणून वर्णिलेलें सर्वश्रेष्ठ चैतन्य आमचा स्वतःचाच आत्मा आहे, सर्वोच्च सर्वांतर सर्वाधिक विस्ताराचा आमचा स्वतःचा आत्मा आहे, हें आम्हांला कळतें. तो त्याच्या सर्वोच्च स्थानीं आमच्या प्रत्ययास येतो, त्याचें प्रतिबिंब आमच्या अंतरंगांत प्रत्ययास येतें. त्याचे स्वरूप ''सच्चिदानंद'' हें आहे; आमची निर्मिति त्यानें केली आहे; आमचें विश्व त्यानें निर्मिलें आहे; या निर्मितीच्या कार्यांत त्यानें आपल्या दिव्य ज्ञानयुक्त इच्छाशक्तीचा उपयोग केला आहे व आजहि तिचा उपयोग तो करीत आहे; ही शक्ति आध्यात्मिक शक्ति आहे. अतिमानसिक, सत्य-जाणिवेची, अनंत अशी शक्ति आहे. हें सर्वश्रेष्ठ चैतन्यच खरें अस्तित्व, खरा पुरुष आहे. सर्वांचा स्वामी आहे, स्रष्टा आहे; हाच विश्वात्मा होऊन, मन, प्राण, जडतत्त्व यांत लपून, ज्याला आम्ही अचेतन तत्त्व म्हणतो त्यांत उतरला आहे; तो आपलें अचेतन आणि अवचेतन अस्तित्व आपल्या अतिमानसिक ज्ञान आणि इच्छाशक्ति यांच्या सामर्थ्यानें बनवितो आणि त्या अस्तित्वाला मार्गदर्शन पण करतो; अचेतनांतून तो वर आलेला आहे, आंतर पुरुषांत तो वास करीत आहे. या पुरुषाचें अस्तित्वहि त्यानें आपल्या ज्ञानयुक्त इच्छाशक्तीनेंच बनविलें आहे आणि त्या अस्तित्वाला पण त्याचेंच मार्गदर्शन आहे; आंतर पुरुषांतून आमचें पृष्ठगत अस्तित्व तोच वर फेंकतो; या अस्तित्वाच्या पोटींहि तोच गुप्तपणें वास करतो आणि आमच्या या पृष्ठगत पुरुषाच्या चांचपडत, अडखळत घडणाऱ्या हालचालींवर तो वर सांगितलेल्या सर्वश्रेष्ठ ज्ञानयुक्त इच्छाशक्तीनें, स्वामित्वसुलभ प्रभावानें परिणामकारक नजर ठेवीत असतो, देखरेख करीत असतो, त्या हालचालींतील उणीव भरून काढीत असतो, दोष दूर करीत असतो. अवचेतन अस्तित्व आणि आंतर (तलवर्ती) अस्तित्व हें सागरासारखें आहे असें मानलें, तर आपलें पृष्ठगत मानसिक अस्तित्व हें या सागरांतून वर उठलेल्या, सागरानें वर फेंकलेल्या लहरीसारखें आहे, आणि अतिचेतन अस्तित्व हें आकाशासारखे (ईथर सारखें) आहे. हें अतिचेतनरूप आकाशतत्त्वच, सागर आणि त्यावरील लहरी, तसेंच सागराच्या आणि लहरींच्या हालचाली यांत भरलेलें आहे. या सागराला आणि त्याच्या

पान क्र. ४६९

 

लहरींना आपल्या पोटांत हें आकाशतत्त्व सामावून घेत आहे. या सागरावर व लहरींवर या आकाशतत्त्वाचेंच आच्छादन आहे, हें आकाशतत्त्वच या सागराच्या आणि लहरींच्या पोटांत वास करीत आहे आणि त्यांच्या सर्व हालचालींचे स्वरूप तेंच निश्चित करीत आहे. हें जें अतिचेतनरूप उच्च आकाशतत्त्व आहे, त्या आकाशतत्त्वांत प्रविष्ट होऊनच आम्हांला आमच्या खऱ्या आत्म्याची जाणीव होते; तेथें ही जाणीव स्वाभाविक असते, अपरिहार्य असते. येथें खालच्या पातळीवर आम्ही आहोंत तोंवर, आमच्या शांत झालेल्या मनांत या आत्म्याचें प्रतिबिंब आम्ही पाहूं शकतो, एवढेंच. प्रयत्नानें, साधना करून, आमच्यांत जो गूढ पुरुष आहे त्यांचें ज्ञान मिळविल्यानेंहि आम्हांला आत्म्याचे दर्शन आमच्या अंतरीं घडूं शकतें; अतिचेतनाच्या तत्त्वांतून जाऊनच आम्हांला सर्वश्रेष्ठ अवस्था, सर्वोच्च ज्ञान, सर्वोत्तम अनुभूति प्राप्त करून घेतां येते. आमचें हें जें अतिचेतन अस्तित्व आहे, ज्याच्यामधून जाऊन आम्हांला आमचा खरा आत्मा जो सर्वश्रेष्ठ चैतन्य त्याच्या अवस्थेप्रत पोंचतां येतें, त्या अतिचेतन अस्तित्वाची सामान्यतः आम्हांला आमच्या इतर अस्तित्वापेक्षांहि कमी जाणीव असते. त्यासंबंधाचें आमचें अज्ञान आमच्या इतर अस्तित्वासंबंधींच्या अज्ञानापेक्षां सामान्यत: अधिक असतें. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, अचेतनांत गडप झालेलें आमचें अस्तित्व, जें विकासक्रमानें वर येत आहे आणि सारखें वर वर जाण्यासाठीं धडपडत आहे, त्याचा, त्याच्या विकासाच्या धडपडीचा उद्देश, आमच्या या अतिचेतन अस्तित्वाचें ज्ञान प्राप्त करून घेणें हाच आहे. आमचें सर्वप्रथम महत्त्वाचें, आमच्या सर्व अज्ञानाच्या शिरोभागीं असणारें आमचें अज्ञान म्हणजे, आमच्या पृष्ठगत अस्तित्वाची ही कोंडी, ही मर्यादा, आमच्या सर्वोच्च, सर्वांतर आत्म्यासंबंधानें त्याचें ठिकाणी असलेलें अज्ञान होय.

      आम्ही बाह्य पृष्ठगत अस्तित्व भोगतो, तें अस्तित्व कालांकित, कालगत असें नामरूपात्मक अस्तित्व असतें; हें जें आमचें कालांकित अस्तित्व, त्या अस्तित्वांतील एक भाग म्हणजे आमचें पृष्ठगत मन आहे. (आम्ही या मनालाच ''आमचा आत्मा'' म्हणत असतों) हें पृष्ठगत मन, त्याचा लांबलचक भूतकाळ व लांबलचक भविष्यकाळ जाणत नाहीं; त्याला केवळ त्याचें लहानसें त्याच्या स्मरणांत रहाणारें जीवन ठाऊक असतें; या लहानशा जीवनाचा पुष्कळसा भाग पृष्ठगत मनाला पहावयास मिळत नाहीं; आणि पहावयास मिळालेल्या पुष्कळशा भागाचें त्याच्या स्मृतींतून उच्चाटन

पान क्र. ४७०

 

होत असतें; म्हणजे लहानशा जीवनाचाहि फार थोडा भाग पृष्ठगत मनाला ज्ञात असतो. आमचा विश्वास या गोष्टीवर सहज बसतो कीं, जड शरीराच्या जन्माबरोबर आम्ही जन्मास आलों आणि जड शरीर मरण पावतांच आम्ही मरणार -- काय थोडीशी शारीरिक हालचाल या जन्मांत आम्ही करतों ती संपली कीं आम्ही संपतों. आमचें जड शरीर आणि या शरीरावर अवलंबून असणारा शारीर प्राण आणि शारीर मन हें सर्व मरणाचें भक्ष्य होतें हें खरें आहे -- कारण यांना जन्म आहे, जन्मतांना यांची रचना होत असते, मरणानें ती संपते, नष्ट होते. पण आमचें खरें कालांकित, कालगत, नामरूपात्मक अस्तित्व जड शरीराबरोबर जन्मणारें आणि त्या शरीराबरोबर मरणारें नसतें. विश्वांत आमचा खरा आत्मा आहे, तो अतिचेतन जाणिवेचा आहे; आंतर पुरुष हा अतिचेतन आत्माच बनत असतो; आमचा दृश्य पृष्ठगत आत्मा म्हणून जो आहे, तोहि आमच्या खऱ्या आत्म्यानें आपल्या सागरासारख्या आंतर पुरुषरूप अस्तित्वांतून वर फेंकलेला असतो, त्याला मर्यादित अल्पकाळापुरतें काम दिलेलें असतें; जन्म आणि मरण यांच्या मधला काळ त्यानें काम करावयाचें असतें; अचेतन निसर्गाचा भाग असलेल्या विश्वाच्या घटकद्रव्याच्या साहाय्यानें मूळ अस्तित्वाला खरा आत्माच जाणीवयुक्त, रूपात्मक अस्तित्वाचें स्वरूप देत असतो. हें स्वरूप म्हणजे आमचा आजचा अल्प जीवन जगणारा व मरणारा बाह्य पृष्ठगत आत्मा होय. आम्ही वस्तुत: खरें अस्तित्व आहों, एका जन्माच्या समाप्तीनें हें खरें अस्तित्व समाप्त होत नाहीं; नाटकांत काम करणारा नट, त्याची एक भूमिका संपली म्हणजे संपत नाहीं; कवि एक कविता संपवली कीं स्वत: संपत नाहीं; आमची मर्त्य व्यक्तिता या नटाच्या भूमिकेप्रमाणें असते, कवीच्या कवितेप्रमाणे असते, आमच्या खऱ्या आत्म्याला स्वतःच्या स्वरूपाचें आविष्करण करावयाचें आहे, तें आविष्करण अंशत: जन्ममरणवश पृष्ठगत आत्म्याच्या द्वारां तो करीत असतो; आमचा आत्मा, चैत्य पुरुष या पृथ्वीवर अनेक मानवी शरीरें धारण करतो, अनेक जन्म घेतो ही उपपत्ति मान्य करा वा न करा, ही गोष्ट सर्वथा खरी आहे कीं, आमचें कालांकित, कालगत, नामरूपात्मक अस्तित्व एका जन्मापुरतें नाहीं, त्याला फार मोठा भविष्यकाळहि आहे. कारण अतिचेतन आत्मा कालाच्या थोड्याशा क्षणांनी मर्यादित होत नाहीं; अतिचेतन आत्मा कालातीत शाश्वत पुरुष आहे. काल त्याच्या आविष्काराची एक पद्धति आहे आणि आंतर पुरुषाला

पान क्र. ४७१

 

काल हा त्याच्या नानाविध अनुभवांचें अनंत असें क्षेत्र आहे; आंतर पुरुषाचें अस्तित्व म्हटलें कीं त्याचा अर्थच, सर्व भूतकाळ व तसाच सर्व भविष्यकाळ ज्या अस्तित्वाचा काळ आहे तें अस्तित्व, असा घ्यावा लागतो. आमचें आजचें अस्तित्व ज्या स्वरूपाचें आहे त्या स्वरूपाचें तें कां आहे, याचें स्पष्टीकरण म्हणजे या आमच्या अस्तित्वाच्या मागें असलेला आमचा सर्व भूतकाळ. पण आमचें आजचें शारीर जीवन आणि त्यांतील स्मृतिगत गोष्टी एवढाच आमचा भूतकाळ आमच्या मनाला ज्ञात आहे. त्याला आमचा भविष्यकाळ तर बिलकुल ठाऊक नाहीं; पण आमच्या रूपात्मक अस्तित्वाची विकासगति या आमच्या अज्ञात भविष्यानें क्षणोक्षणीं ठरत असते, अशी वस्तुस्थिति आहे. आमच्या अज्ञानग्रस्त अनुभवाची एवढी छाप, एवढी भक्कम पकड आमच्यावर आहे कीं आम्ही असें आग्रहानें म्हणत असतों कीं, भूतकाळ हा आम्हांला केवळ त्यानें ठेवलेल्या खुणांवरून, निशाण्यांवरून कळूं शकतो आणि भविष्यकाळ आम्हांला कळणें शक्यच नाहीं : कारण भविष्यकाळ हा अद्यापि अस्तित्वांत आलेलाच नाहीं तर तो कसा कळणार ? आणि भूतकाळ अस्तित्वांत येऊन आतां अस्तित्वांतून गेला आहे, तेव्हां कांहीं निशाण्यांचा आधार घेऊनच त्याचें ज्ञान, थोडेसें ज्ञान, आम्ही करून घेऊं शकूं, एरव्हीं हें ज्ञान आम्हांला कसें होणार? अशी आमची विचारसरणी असते; पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, हे दोनहि काळ आमच्या ठिकाणीं या क्षणीं आहेत : भूतकाळ हा दडून बसून कार्य करीत आहे आणि भविष्यकाळ विकासक्रमांत उदयास येण्याच्या नेहमीं तयारींत असतो. गुप्त आत्मा अखंडपणें सर्व काळ व्यापून आहे, त्याचा आविष्कार अखंडपणें चालूं आहे; त्या आविष्काराच्या क्रमांत भविष्यकाळ हा नेहमीं उदयास येत असतो व येऊं पहात असतो भूत आणि भविष्य यांसंबंधाचें आमचें हें अज्ञान, आम्हांला संकुचित करणारें आणि निराशेनें ग्रासून टाकणारें असें हें आमचें अज्ञान म्हणजे वर सांगितलेल्या सर्वप्रथम महत्त्वाच्या आमच्या अज्ञानाला साथ देणारें दुसऱ्या दर्जाचें अज्ञान होय असें म्हणतां येईल.

      मनुष्याचें स्वतःसंबंधींचें अज्ञान येथेंच संपत नाहीं; त्याला त्याच्या अतिचेतन आत्म्याची ओळख नाहीं, आंतरचेतन आत्माची ओळख नाहीं, अवचेतन आत्म्याची ओळख नाहीं. एवढेंच नव्हे, तर ज्या जगांत तो राहत आहे त्याचीहि त्याला ओळख नाहीं. हें जग अविश्रांतपणें त्याजवर कार्य करीत असतें, त्याच्या द्वारां कार्य करीत असतें, तसेंच मनुष्यहि त्याजवर

पान क्र. ४७२

 

क्रिया करीत असतो; मनुष्याच्या जगद्विषयक अज्ञानाची ही खूण आहे कीं, तो जगाला स्वत:पासून अगदीं वेगळी वस्तु मानतो, अनात्मा मानतो; कारण एवढेंच कीं, त्याचा अहम् आणि त्याची वैयक्तिक प्रकृतिगत मूर्ति जगापासून वेगळी दिसते. त्याला त्याचा अतिचेतन आत्मा जेव्हां दिसतो, तेव्हां प्रथम त्या आत्म्यालाहि तो स्वत:हून वेगळा, बाह्य पदार्थ, बाह्य पुरुष, विश्वातीत परमेश्वर, विश्वाहून वेगळा परमेश्वर मानीत असतो. त्याला त्याचा आंतरचेतन आत्मा जेव्हां दिसतो, तेव्हां त्यालाहि स्वत:हून वेगळा असा महापुरुष, त्याला स्वत:ला आचार देणारा आणि मार्गदर्शन करणारा पुरुष तो मानतो. त्याचा प्राण आणि त्याचें शरीर हा जगाचा एक लहानसा भाग, त्याला तो आपला ''स्व'' मानतो. सागराच्या पृष्ठभागावर क्षणभर उठणाऱ्या फेंसाच्या बुडबुड्यासारखा असणारा जगाचा हा भाग (मनुष्याचें प्राणयुक्त शरीर) मनुष्याला ''आत्मा'' म्हणून भासतो. पण आम्हीं आंतर पुरुषाच्या जाणिवेंत प्रवेश केला म्हणजे असा अनुभव येतो की, ही जाणीव, स्वत:च्या विस्तारानें सर्व जग व्यापून टाकते, सर्व जगाइतकी मोठी होते; आम्ही आमच्या अतिचेतन आत्म्यांत प्रविष्ट झालों म्हणजे आम्हांला जग हें अतिचेतन आत्म्याचें साकार प्रकटन आहे, याहून दुसरें कांहीं नाही हें कळून येतें. जगांत एकच एक आत्मचैतन्य भरलेलें आहे, जगांत सर्वकांहीं जें आहे तें आमचा आत्माच आहे असें ज्ञान आम्हांला होतें; अविभाज्य एकच एक जड भौतिक तत्त्व, अविभाज्य एकच एक प्राणतत्त्व, अविभाज्य एकच एक मनस्तत्त्व, अविभाज्य एकच एक चैतन्य, आत्मतत्त्व -- आमचें शरीर ही अखंड भौतिक तत्त्वाला दिलेल्या गांठींपैकीं एक गांठ; आमचा प्राण हा अखंड प्राणतत्त्वाच्या जलाशयातील एक लहानसा भोंवरा; आमचें मन हें अखंड मनस्तत्त्वाच्या पसाऱ्यांतील एक संदेश घेणारें, देणारें, संदेश तयार करून पाठविणारें, संदेश संग्रह करून ठेवणारें कार्यालय; आमचा आत्मा वा व्यक्तित्व हा अखंड चैतन्याचा एक अंश, एक आविष्कार; -- असें या विश्वाचें स्वरूप आहे ही गोष्ट, आम्हीं अतिचेतन प्रांतांत प्रवेश केल्यावर आम्हांला स्पष्टपणें दिसते. अविभाज्य चैतन्य, मन, प्राण, जडतत्त्व यांचा हा विश्वसंभार असतांना येथें विभक्तता आम्हांला जाणवते. या गोष्टीचें कारण आमची अहम्-संवेदना आहे. आम्ही अज्ञानमय पृष्ठवर्ती पुरुष आहों, या आमच्या अज्ञानाला अहम्‌ची मदत असल्यानें तें, त्यानें (अज्ञानानें) स्वत: निर्माण केलेल्या भिंती, ज्या त्याला तुरुंगाच्या भिंतीसारख्या

पान क्र. ४७३

 

होतात त्या, फार काळ टिकवू शकतें; अहम्‌च्या जोरावर अज्ञानाला स्वनिर्मित भिंतींचा तुरुंग टिकवितां येतो. आम्ही अज्ञानाला पुष्कळ काळ बांधलेले राहतो त्याला कारण, आमचा ''मी''. ''मी'' ची गांठ सर्वांत भयंकर आहे, या गांठीमुळें आमचें अज्ञानाचें बंधन लवकर सुटत नाहीं; तथापि हें लक्षांत ठेवणें अवश्य आहे कीं, अज्ञानानें उभ्या केलेल्या भिंती कितीहि भक्कम दिसल्या व अहम्‌चा कितीहि जोर असला, तरी या भिंतीतून ज्ञान पाझरून येऊन अज्ञानावर कमीअधिक प्रभाव पाडू शकतें; या भक्कम भिंतीहि सूक्ष्म छिद्रांनीं व्यापलेल्या असतात आणि या छिद्रांचा उपयोग करून ज्ञानाचा पाझर केव्हांहि या भिंतींतून अज्ञानाच्या क्षेत्रांत येईल अशी व्यवस्था करतां येते.

      आमचें जें कालांकित अस्तित्व, त्याविषयीं आमच्या ठिकाणीं, आम्हांला आठवणारी लहानशी घटका सोडून, पूर्ण अज्ञान असतें, ही जशी आमच्या कालगत अस्तित्वाची गोष्ट आहे, तशीच आमच्या स्थलगत अस्तित्वाचीहि गोष्ट आहे. या आमच्या स्थलगत अस्तित्वाचा एक लहानसा भाग आम्हांला आमचा म्हणून ज्ञात असतो, एक शरीर आणि त्याच्याशी एकात्मता पावलेला प्राण व मन एवढेंच आमचें स्थलगत अस्तित्व आम्हांला आमचें म्हणून ज्ञात असतें; या शरीराच्या सभोंवारचें जें आमचें स्थलगत अस्तित्व, त्याला आम्ही ''अनात्मा'' मानतो, आणि या परिसराला ''इतर'' समजून त्याच्याशीं आम्ही व्यवहार करतो, त्याचा उपयोग करतो आणि करूं चाहतो; वरील एकात्मतेंत आणि वरील व्यवहारविषयक कल्पनेंत अहम् चें विभक्त जीवन आहे. वस्तूचें सह-अस्तित्व, आत्म्यांचें सह-अस्तित्व या पलीकडे ''स्थल'' (अवकाश, आकाश) या कल्पनेंत अधिक कांहीं नाहीं, असा एक वाद आहे, अशी एक दृष्टि आहे. सांख्यांच्या मतें आत्मे अनेक असून त्यांचें अस्तित्व वेगळें वेगळें, स्वतंत्र स्वतंत्र आहे. या स्वतंत्र आत्म्यांचें अनुभवक्षेत्र प्रकृति साहे. या अनुभवक्षेत्राच्या, प्रकृतीच्या निसर्गशक्तीच्या एकतेमुळें सांख्यप्रतिपदित आत्म्यांचें सह-अस्तित्व शक्य होतें. प्रकृतीमध्यें आत्म्यांचें सह-अस्तित्व याचा अर्थ, एका परम पुरुषाचे ठिकाणीं या अनेक पुरुषांचें सहअस्तित्व असा होतो. कारण प्रकृति ही पुरुषाची अंगभूत शक्ति आहे. हा परम पुरुष म्हणजे एकमेव चैतन्य, अस्तित्व होय. या चैतन्यमय अस्तित्वाची जाणीवयुवत शक्ति (प्रकृति) अंगभूत असते. या शक्तीचें (प्रकृतीचें) आंदोलन-क्षेत्र, हें चैतन्य स्वतःच्या पोटांत प्रकट करतें; हें क्षेत्र म्हणजे ''स्थल, अवकाश, आकाश'' होय; हें

पान क्र. ४७४

 

क्षेत्र म्हणजे एकच एक जो चैतन्यपुरुष, त्याचा आत्मकल्पित विस्तार असेंहि म्हणतां येईल. या चैतन्यपुरुषाचीं जाणीवयुक्त शक्ति (प्रकृति) नाना शरीरांत, प्राणांत, मनांत केंद्रीभूत होऊन राहते, आणि आत्मा मात्र एकेका शरीरांत, प्राणांत, मनांत अध्यक्षत्व करतो. असें असल्यानें आमचा मनोमय आत्मा एका शरीर-प्राण-मनांत केंद्रित होतो, आपल्या निवासालाच केवळ ''मी'' मानतो आणि निवासाखेरीज बाकी सर्व ''अनात्मा'', ''इतर'' या सदरांत ढकलतो; सर्व भूत आणि भविष्य कापून टाकून केवळ एक जन्म म्हणजे आपलें सर्व कालांकित अस्तित्व हा जसा अज्ञानामुळें आमच्या आत्म्याचा खोटा समज होतो, त्याप्रमाणेंच एक शरीर (व तत्संबद्ध प्राण-मन) सोडून बाकी सर्व विश्व ''अनात्मा'' आहे असा त्याचा खोटा समज अज्ञानामुळें होतो. वस्तुस्थिति अशी आहे कीं, आमचें स्वतःचें मन खऱ्या रीतीनें जाणावयाचें, तर तें विशाल, विश्वव्यापी, एकमेव अविभाज्य मन जाणल्याशिवाय जाणतां येत नाहीं; आमच्या स्वतःच्या प्राणाची व शरीराचीहि खरीखुरी ओळख ही, विश्वव्यापी, एक अविभाज्य प्राण, विश्वव्यापी, एक अविभाज्य भौतिक जड तत्त्व यांची ओळख करून घेतल्यावरच होऊं शकते; कारण आमच्या मनाचें, प्राणाचें, शरीराचें स्वाभाविक स्वरूप, या विश्वव्यापी मनाच्या, प्राणाच्या, भौतिक जड तत्त्वाच्या स्वभावावर अवलंबून असतें. एवढेंच नव्हे, तर आमच्या मनाच्या, प्राणाच्या, शरीराच्या हालचाली क्षणीं क्षणीं विश्वव्यापी मनानें, प्राणानें, जड तत्त्वानें प्रभावित होत असतात, प्रवर्तित होत असतात. याप्रमाणें अस्तित्वाचा महान् सागर आम्हांवर चोहोंकडून येऊन आदळत आहे. पण या महान् अस्तित्वाची महान् जाणीव आम्हांला पारखी असते; आम्ही या महान् अस्तित्वाशी जाणिवेनें एकरूप होऊं शकत नाहीं. आमच्या मनाच्या पृष्ठभागीय विभागांत जेवढें अस्तित्व आणतां येईल व संघटित करतां येईल तेवढेंच अस्तित्व आम्ही आमचें म्हणून ओळखूं शकतों. आम्हांमध्यें विश्व जीवन जगत असतें, विश्व विचार करीत असतें, विश्व साकार होत असतें. पण आमची अशी खोटी कल्पना होते कीं, आम्ही अलग अलग, स्वतःकरितांच व स्वतःच्या बळावर जीवन जगत आहों, विचार करीत आहों आणि आमच्या अस्तित्वाला विविध आकार देत आहों. आमचा कालातीत आत्मा, आमचा अतिचेतन आत्मा, आमचा आंतरचेतन आत्मा, आमचा अवचेतन आत्मा यांचीं आम्हांला जशी ओळख नाहीं, तशी आम्हांला आमच्या विश्वव्यापी आत्म्याचीहि ओळख नाहीं; असें

पान क्र. ४७५

 

आमचें अज्ञान आहे. त्यांतल्या त्यांत ही एक गोष्ट आणि ही एकच गोष्ट आम्हांला तारक होणारी आहे कीं, आत्मज्ञान आणि आत्मप्राप्ति सिद्ध करण्याच्या दिशेनें नित्य धडपडत राहण्याचा आमच्या अज्ञानाचा स्वभावधर्म आहे; कोणत्याहि, कितीहि अडचणींना तोंड देऊन अखेर आत्मज्ञान मिळवावयाचें, आत्मप्राप्ति करून घ्यावयाची, अशी अनिवार्य प्रेरणा आमच्या अज्ञानाच्या पोटीं स्वभावत:, त्याच्या अस्तित्वाच्या नियमानुसारच वास करीत आहे. मनुष्य हा मनोमय पुरुष आहे; त्याच्या जाणिवेचें लक्षण करावयाचें तर असें म्हणतां येईल कीं, ही जाणीव म्हणजे धडपडणारें अनेकविध अज्ञान असून, या अज्ञानाला सर्वस्पर्शी व सर्वसमावेशक ज्ञानाचें रूप देण्यासाठीं तिची (त्या जाणीवेची) धडपड चाललेली आहे; या जाणिवेकडे दुसऱ्या बाजूनें पाहून तिची अशीहि व्याख्या करतां येईल : मनुष्याची जाणीव म्हणजे वस्तूंचें भेद-अधिष्ठित मर्यादित ज्ञान असून, स्वतःच्या या ज्ञानाचें पूर्ण अभेद-ज्ञान करण्यासाठीं तिची धडपड चाललेली आहे.

पान क्र. ४७६

 

प्रकरण बारावें

अज्ञानाचा उगम

 

      जाणिवेच्या तपानें ब्रह्म घन होतें. या घनीभूत ब्रह्मापासून जड भौतिक तत्त्व उत्पन्न होतें, जड तत्त्वापासून प्राण, मन आणि लोक उत्पन्न होतात.

- मुण्डक उप० १.१.८

 

      त्याला इच्छा झाली ''मी अनेक व्हावें.'' त्यानें तप केलें; तप करून (तपानें) त्यानें विश्व निर्माण केलें. विश्व निर्माण करून त्यांत तो प्रविष्ट झाला; प्रविष्ट होऊन तो सत् आणि असत्, व्यक्त आणि अव्यक्त, ज्ञान आणि अज्ञान, सत्य आणि अनृत झाला. तो सत्य झाला; हें सर्व जें कांहीं अस्तित्वांत आहे तें तो झाला. ''तें सत्य'' असें त्याला म्हणतात.

- तैत्तिरीय उप० २.६

     

      जाणिवेचें तप हें ब्रह्म आहे.

- तैत्तिरीय उप० ३-३ ते ५.

     

      अज्ञानाच्या संबंधानें बऱ्याच गोष्टी आतां निश्चित झाल्या आहेत; तेव्हां या अज्ञानाचा उगम कसा झाला, व्यवहारांत हें अज्ञान कसें उदयास आलें, जाणिवेच्या कोणत्या प्रक्रियेनें त्याला जन्म दिला, हा प्रश्न बारकाईनें हाताळणें आतां शक्य आहे, व असें करणें अवश्यहि आहे. अस्तित्वाचें सत्य एकमेव पूर्ण ब्रह्म आहे, एकच एक पूर्ण तत्त्व आहे, हा आपल्या विचाराचा पाया असणार. हा पाया न सोडतां अज्ञानाच्या उदयाचीं जीं भिन्न कारणें सांगितलीं जातात, सांगितलीं जाणें शक्य आहे त्यांचा विचार करावयाचा आहे. आमच्या पायाभूत सत्याशीं, अज्ञानाच्या उगमासंबंधींच्या कोणत्या शक्य कल्पना, कितपत जुळणाऱ्या आहेत तें आपल्याला पहावयाचें आहे. मूळ परमपुरुष, एकच एक आदिपुरुष तो पूर्ण आहे, त्याची जाणीव पूर्ण आहे; अर्थात् अज्ञानाच्या गुलामींत ही पूर्ण जाणीव जाणें किंवा

पान क्र. ४७७

 

राहणें शक्य दिसत नाहीं -- असें असतां या परम पुरुषाच्या अस्तित्वाच्या पोटीं नानाविध अज्ञान, स्वतःला अतिशय मर्यादित करणारें भेद-अधिष्ठित ज्ञान उत्पन्न कसें झालें, क्रियाशील कसें झालें, आणि क्रियाशील कसें राहूं शकलें, हा प्रश्न आहे. अविभाज्य अशा या परमपुरुषाच्या अस्तित्वांत व जाणिवेंत दर्शनी भेद तरी, दर्शनी विभागणी तरी परिणामकारक रीतीनें कशी केली गेली आणि कायम राखली गेली हा प्रश्न आहे. हा परम पुरुष एकच एक आणि सर्वथा परिपूर्ण असल्यानें स्वतःविषयीचें अज्ञान त्याचे ठिकाणीं संभवतच नाहीं; सगळ्या वस्तू तोच झाला आहे, त्या अस्तित्वांतच उभीं केलेलीं, त्या अस्तित्वाचींच जाणीवयुक्त रूपरूपांतरें, जाणीवयुक्त विशिष्ट आकार म्हणजे सर्व वस्तू, ही वस्तुस्थिति असल्यानें या परमपुरुषाला या वस्तूंची, त्यांच्या खऱ्या स्वभावधर्मांची, त्यांच्या खऱ्या क्रियांची माहिती नसणें शक्यच नाहीं; पण आम्ही प्रत्येकजण ब्रह्म, परम पुरुष आहों; जीवात्मा परमात्मा आहे, पूर्ण पुरुषच आहे त्यावेगळा नाहीं -- असें आम्ही म्हणत असलों, तरी आम्हांला स्वतःसंबंधाचें आणि वस्तूंच्या संबंधाचें खरें ज्ञान नाहीं, पूर्ण ज्ञान नाहीं ही गोष्ट निःसंशय खरी आहे; तेव्हां या वस्तुस्थितींतून हा विरोध, हा अंतर्गत विरोध प्रत्ययास येतो कीं, ज्याच्या किंवा ज्याच्या प्रकृतीच्या, कणाकणांत अज्ञानाच्या उदयाची संपूर्ण अशक्यता असली पाहिजे, तोच पुरुष अज्ञानाचें स्थान बनूं शकतो; त्यानें अज्ञानांत उडी घेतली आहे, बुडी घेतली आहे. मग या घटनेचें कारण, त्याची कांहीं अस्तित्वगत इच्छा असो, अथवा त्याच्या प्रकृतींतील कांहीं निकड वा शक्यता असो. अज्ञानाचें स्थान मन आहे, मन हें मायाकार्य आहे. अर्थात् असत् आहे, ब्रह्म नव्हे; ब्रह्म हें एकच सत् आहे, त्याला असत् अशा मनाच्या अज्ञानाचा स्पर्श होत नाहीं; या प्रकारें ब्रह्माची परम पुरुषाची बाजू घेतां येईल; पण मूळ तत्त्व, एकमेव पूर्ण असें ब्रह्म आहे असें मानणारांना पळवाट म्हणून ही वकीली उपयोगी पडणारी नाहीं; कारण ब्रह्म हें एकच एक अस्तित्व असेल, तर माया ही या एकच एक अस्तित्वाची शक्ति असली पाहिजे; त्याच्या अस्तित्वांतून ही शक्ति निघते किंवा त्याच्या जाणिवेची शक्ति म्हणजे माया असेंच मान्य करणें भाग आहे : आणि ब्रह्माशीं एकरूप असलेला जीवात्मा जर त्याच्या मायेचा अंकित होत असेल, तर जीवात्म्यांतील ब्रह्म हें मायेचें अंकित आहे असें होतें. वर जी वकीली केली आहे तिच्यांत केवळ शब्दाची किंवा कल्पनेची ''माया'' किंवा हातचलाखी वापरली आहे. भ्रमशून्य ब्रह्म आणि भ्रमरूप माया या वस्तुत: दोन स्वतंत्र वस्तू

पान क्र. ४७८

 

आहेत, अगदीं विरुद्ध स्वभावाच्या दोन वस्तू आहेत; एकच एक अस्तित्व म्हणजे ब्रह्म अशी व्याख्या करून, दुसऱ्या एका तद्विरोधी स्वभावाच्या वस्तूला त्या ब्रह्माशीं एकरूप ठरविण्याचा प्रयत्न वरील मायावादांत आहे; पण बारीक नजरेला त्यांतील फोलपणा स्पष्ट दिसतो. असो. ब्रह्मानें मायेचें, भ्रमाचें, अज्ञानाचें अंकित होणें हें त्याच्या स्वभावाच्या, मूलभूत प्रकृतीच्या विरुद्ध असल्यानें, अगदीं अशक्य आहे; अशी अंकित होण्याची शक्यता असेल, तर ती निसर्गाच्या, प्रकृतीच्या पसाऱ्यांतील एखाद्या वस्तूच्या ठिकाणीं असूं शकेल; ही वस्तु निसर्गाच्या, प्रकृतीच्या कांहीं एका क्रियेच्या अंकित होऊं शकेल. ही प्राकृतिक क्रिया म्हणजे वस्तूंच्या पोटीं असणाऱ्या ब्रह्माच्या, परम पुरुषाच्या जाणीवयुक्त स्वतंत्र व्यापाराचा, क्रियाकलापाचा एक भाग असणार, हें उघडच आहे. सर्वज्ञ परम पुरुषाच्या, ब्रह्माच्या आत्माविष्काराचा जो खेळ चाललेला आहे, त्या खेळाचा एक भाग कोणतीहि प्राकृतिक क्रिया असते व प्रकृतीच्या पसाऱ्यांतील विशिष्ट वस्तूवर या क्रियेची मात होऊं शकते; ब्रह्मावर अशी मात होऊं शकत नाहीं, हा वरील कहाणीचा इत्यर्थ आहे. तेव्हां अज्ञान हें, एकमेव पूर्ण ब्रह्माच्या हालचालीचा एक भाग असला पाहिजे, त्याच्या जाणिवेच्या विकासशील व्यवहाराचा एक भाग असला पाहिजे, हा जाणिवेचा विशिष्ट व्यवहार (अज्ञान) ब्रह्मानें जाणिवपुर:सर मान्य केला असला पाहिजे; या प्रयोजनाच्या सिद्धीसाठीं ब्रह्म अज्ञानाचा उपयोग करतें, त्याजवर अज्ञान कांहीं जुलूमानें लादलें जात नाहीं अशी वस्तुस्थिति असली पाहिजे.

      आमच्या अज्ञानाचें जें स्पष्टीकरण मायावादी देतात, तें आमच्या पायाभूत सिद्धान्ताशीं (एकच एक ब्रह्म हें अस्तित्वाचें मूलभूत सत्य आहे हा सिद्धान्त आमचा पायाभूत सिद्धान्त आहे) विसंगत आहे, हें आपण पाहिलें. जीवात्मा आणि परमात्मा एक नाहींत, दोन आहेत, नित्य दोन रहातात; जीवात्मा अज्ञानाधीन आहे आणि परमात्मा अस्तित्वांत, जाणिवेंत पूर्ण आहे, आणि म्हणून ज्ञानांतहि पूर्ण आहे, असा पक्ष कोणी मांडतात. यानें अंतर्विरोधाची आपली आपत्ति दूर होते; पण हा पक्ष आम्हांला मान्य करतां येत नाहीं, कारण अनुभूति या पक्षाच्या विरुद्ध आहे. अस्तित्त्व एकच एक आहे; प्रकृतीच्या व्यवहारांत कसलेंहि अनेकत्व असो, कसलेहि भेद असोत, अस्तित्व अभिन्न, अभेदरूप एकच एक आहे, असा सर्वोच्च अनुभव आहे, सार्वत्रिक अनुभव आहे. विश्वाच्या

पान क्र. ४७९

 

बांधणींत भेदांत अभेद, अनेकतेंत एकता ही गोष्ट सर्वत्र प्रतीत होऊं शकते; सर्व सारभूत अस्तित्वाच्या दृष्टीनें आम्ही एकच वस्तु आहों, सारभूत प्रकृतीच्या दृष्टीनें एकच वस्तु आहों; आमच्या आत्म्याच्या आकारांत वेगळेपणा आहे, क्रियाशील प्रकृतींत वेगळेपणा आहे, म्हणून आम्ही एक वस्तु असूनहि भिन्न भिन्न वस्तू आहोंत; नित्य-द्वैत पक्षाला नित्य द्वैताच्या पोटीं नित्य अद्वैत असतें, अनुभवास येतें हें उत्तर ठीक आहे; पण यानें अंतर्विरोधाची आपत्ति दूर होत नाहीं : अस्तित्वाच्या सारभूत भागाच्या बाबतींत, जो जीवात्मा पूर्ण ब्रह्माशीं एकरूप आहे, आणि म्हणून जो ब्रह्माशीं आणि सर्वांशीं जाणिवेच्या बाबतींतहि एकरूप असावयास हवा, तो अज्ञानाचा अंकित कसा झाला, तो आत्म्याच्या गतिमान आकाराच्या आणि त्याच्या क्रियाशीलतेच्या बाबतींत ब्रह्मापासून विभक्त कसा झाला, हा प्रश्न वरील उत्तर देऊनहि कायम राहतोच; आणखी शिवाय या गोष्टीचीहि दखल घेणें अवश्य आहे की, ब्रह्माच्या स्थिर सारभूत एकत्वाशीं जीवात्मा एकरूप होऊं शकतो त्याप्रमाणें तो त्याच्या क्रियाशीलतेशींहि एकरूप होऊं शकतो आणि म्हणून जीवात्मा आणि परमात्मा नित्य भिन्न राहणाऱ्या वस्तू आहेत हा पक्षच असत्य आहे. असो. मायावाद आणि द्वैतवाद आमच्या अज्ञानाचें योग्य स्पष्टीकरण देऊं शकत नाहींत, हें पाहिल्यानंतर अज्ञेयवाद काय म्हणतो तें पाहूं. अस्तित्व आणि त्यांतील प्रश्न यांच्या पलीकडे, त्यांच्या वरती उंच जागीं अज्ञेय सद्‌वस्तु आहे. ती अज्ञेय वस्तु आमच्या अनुभवाच्या पलीकडे, अनुभवाच्या क्षेत्राहून फार उंच जागीं आहे; मायाकार्य अज्ञेय वस्तूंतच सुरू झालें, विश्वनिर्मितीपूर्वीं सुरू झालें आणि म्हणून तेंहि अज्ञेय आहे, त्याचें मूळ, त्याचें कारण बुद्धीला समजावून सांगणें शक्य नाहीं. जड अज्ञेयवाद असतो तसा, हा कल्पनानिष्ठ अजड अज्ञेयवाद आहे. सर्व प्रकारच्या अज्ञेयवादासंबंधानें असें म्हणतां येतें कीं, हा अज्ञेयवाद, खरोखरी जाणून घेण्याची इच्छा मनुष्याच्या ठिकाणीं जितकी तीव्र असावयास पाहिजे तितकी ती तीव्र नसल्यानें उत्पन्न होतो; जाणिवेच्या अनुभवास येणारा दर्शनी मर्यादितपणा, संकुचितपणा, अनिवार्य म्हणून, प्रयत्न न करतां, मान्य करण्याची प्रवृत्ति ही अज्ञेयवादाला जन्म देते; ज्ञान-शक्तिविषयक दुर्बलतेची भावना अज्ञेयवादाच्या मुळाशीं असते. मनाच्या प्रस्तुत मर्यादा लक्षांत घेतां, त्यानें अज्ञेयवादाच्या आहारीं जाणें हें स्वाभाविक असल्यामुळें समर्थनीय म्हणतां येईल; पण ब्रह्माशीं, परमात्म्याशीं एकरूप असणाऱ्या जीवात्म्याच्या

पान क्र. ४८०

 

संबंधात कोणताहि अज्ञेयवाद समर्थनीय होऊं शकत नाहीं. कारण त्याचे ठिकाणीं ज्ञानशक्तीची दुर्बलता असूं शकत नाहीं. परमात्म्याला स्वत:संबंधाचें ज्ञान असलेंच पाहिजे. अर्थात् त्याला अज्ञानाचेंहि मूळ ठाऊक असलें पाहिजे आणि म्हणून जीवात्म्याला ज्ञानासंबंधांत निराश होण्याचें कांहीं कारण नाहीं; पूर्ण परमात्म्याचें ज्ञान करून घेण्याची पात्रता त्याचे ठिकाणीं आहे, आणि म्हणून त्याच्या स्वतःच्या ठिकाणीं जें अज्ञान आज आहे, त्याचे मूळ कारण काय आहे त्याचेंहि ज्ञान करून घेण्याची पात्रता त्याचे ठिकाणीं आहे; ही पात्रता नाकारण्याचें जीवात्म्याला कांहीं कारण नाहीं.

      अज्ञेय असें कांहीं असेलच तर सच्चिदानंदाची उच्चतम अवस्था, उच्चतम अवस्थेंतील सच्चिदानंद, अस्तित्व-जाणीव-सुख संबंधींच्या आमच्या उच्चतम कल्पनांपलीकडे ज्याचें अस्तित्व-जाणीव-सुख आहे, असें सच्चिदानंद म्हणजे अज्ञेय तत्त्व, अशी गोष्ट असली पाहिजे. तैत्तिरीय उपनिषदांत ''आरंभीं केवल 'असत्' होतें, या असतापासून सत् निर्माण झालें'' असें जें वचन आहे त्या वचनांतील 'असत्', अशा अज्ञेय सच्चिदानंदाचें वाचक असलें पाहिजे हें उघड आहे; बुद्ध ज्याला निर्वाण म्हणतो त्या निर्वाणाचा खोलांत खोल अर्थहि असाच, म्हणजे अत्युच्च अज्ञेय सच्चिदानंदरूप अवस्था हाच असावा, आमची प्रस्तुतची अवस्था निर्वाणप्राप्तीनें नष्ट होते याचा अर्थ निर्वाणप्राप्ति म्हणजे आत्म्याची कल्पना किंवा अनुभव असणाऱ्या कोणत्याहि अवस्थेपलीकडील उच्चतम अवस्था प्राप्त होणें, अस्तित्वासंबंधींच्या आमच्या संवेदनेपासून, वेदनामय संवेदनेपासून पूर्ण मुक्तता झाल्याची अनिर्वचनीय सुखमय प्रतीति ज्या अवस्थेंत येते ती अवस्था प्राप्त होणें असाच असावा. उपनिषदांत अनिर्वचनीय, अ-बुद्धिगम्य असा जो निरुपाधिक केवल आनंद सांगितला आहे, त्या आनंदाला ''अज्ञेय'' म्हणतां येईल. कारण जाणीव आणि अस्तित्व या पदांनीं जिचें वर्णन करतां येईल, जिची कल्पना करतां येईल, त्या कोणत्याहि वस्तूच्या पलीकडे, त्या कोणत्याहि वस्तूपेक्षां श्रेष्ठ अशी, निरुपाधिक केवल आनंद ही वस्तु आहे. अज्ञेयाचा हा अर्थ आम्हांला मान्य आहे, आम्हीं मान्य केला आहे. अनंताच्या विकासक्रमांतील उर्ध्वगतीला मर्यादा नाहीं, मर्यादा घालतां येत नाहीं; ही मर्यादा घालण्याची गोष्ट आमच्या जाणीवशक्तीच्या पलीकडील आहे, असा आमचा मान्यतेचा अर्थ आहे. अज्ञेयतत्त्व हें असें कांहीं नसून (उपरिनिर्दिष्ट असत्, निर्वाण, आनंद नसून) अगदीं निरुपाधिक

पान क्र. ४८१

 

शुद्ध अस्तित्वाहून देखील वेगळें आहे असें म्हणणें असेल, तर तें शून्यवादी विचारकांचें शुद्ध शून्य असलें पाहिजे.

      शुद्ध शून्यांतून, शुद्ध अ-भावांतून, शुद्ध असत् मधून कांहींहि निघू शकत नाहीं; केवळ देखाव्यापुरतें, केवळ भ्रमात्मक देखील कांहीं निघूं शकत नाहीं. शुद्ध शून्याचा हा अर्थ घ्यावयाचा नसेल, तर अनंतकालांत कधींहि वास्तवांत न येऊं शकणारी शुद्ध अनंत शक्यता अथवा शक्ति असा शुद्ध शून्याचा अर्थ घेणें भाग आहे. या अर्थानुसार गूढरूप शून्य हें विश्वाचें आद्याद्य स्वरूप; हें ''अज्ञेय'' विश्वारंभीं असून त्यांतून, या निरपेक्ष अज्ञेय शून्यांतून, सापेक्ष शक्ती केव्हांहि वर डोकें काढतात; पण या वर डोकें काढणाऱ्या सापेक्ष शक्तींपैकीं कांहीं थोड्या मात्र साकार होऊं शकतात -- हा शुद्ध शून्याचा एकंदर नवा अर्थ लक्षांत घेऊन या शुद्ध शून्यापासून काय निर्माण होऊं शकेल याचा थोडा विस्तारानें विचार करूं. या अनंत गूढ शून्यांहून कांहींहि निघूं शकेल; काय निघू शकेल, जें निघेल तें कां निघेल हें कांहीं सांगतां येणार नाहीं, सांगता येणें शक्य नाहीं. हें शुद्ध शून्य शुद्ध गोंधळाचें बीज होय, व्यवहारदृष्ट्या तें दुसरें कांहीं नाहीं -- प्रस्तुत व्यवस्था, विश्वव्यवस्था, व्यवस्थित विश्व त्या शून्यांतून वर आलें आहे, हा एक योगायोग आहे; मग त्याला बरा म्हणा, वाईट म्हणा, भाग्याचा म्हणा, दुर्भाग्याचा म्हणा. आपण रहात आहों तें विश्व व्यवस्थित आहे असें आतांच म्हटलें, परंतु असें म्हणणें आवश्यक नाहीं; विश्व आहे तें व्यवस्थाशून्य आहे, आम्हांला जी व्यवस्था म्हणून वाटते ती आमच्या इंद्रियांची संवयीनें झालेली गैरसमजूत आहे, आमच्या प्राणमय जीवनाची संवयीनें झालेली गैरसमजूत आहे, मनाला संवयीनें व्यवस्था म्हणून वाटू लागलेली गैर व्यवस्था आहे, येथे व्यवस्था आहे ही मनाची कल्पना, आधारशून्य कल्पना आहे; येथें असलेल्या पसाऱ्यांत, पसाऱ्यापाठीमागें व्यवस्थाप्रिय बुद्धि आहे, अशा कल्पनेनें या पसाऱ्याची पाहणी करणें निराशजनक ठरेल. शुद्ध गोंधळ हें जेथें बीज आहे, तेथें त्यांतून अन्योन्यविरोधी गोष्टींचा, निर्बुद्ध घटनांचा बाजार उत्पन्न व्हावा हें साहजिक आहे; हें विश्व असा बाजार आहे, येथें गूढ अशी कोडीं, विसंवाद भरपूर आहेत; विश्व हें एक भयंकर, आदि ना अंत असें प्रमादांचें आगर आहे; वात झालेल्याला दिसतात, भासतात तशा कारण-कार्य-क्रमाला फांटा देणाऱ्या अफाट विनोदी आणि विषादजनक घटनांचें विश्व हें भांडार आहे, असें प्रतिपादन करणारा एक पक्ष

पान क्र. ४८२

 

आहे. पूर्ण जाणीव, पूर्ण ज्ञान (अर्थात् सच्चिदानंद) अशा व्यवस्थाशून्य विश्वाला जन्म देऊं शकणार नाहीं; त्याचा जन्मदाता पूर्ण नेणीव, पूर्ण अज्ञान हाच असण्याचा संभव आहे. अशा विश्वांत कांहींहि घडूं शकेल, सगळ्या वस्तू शन्यांतून निघाल्या असतील, विचार करणारें मन हा ''रोग'' असेल, अ-विचारी शक्तीचा किंवा अ-चेतन जडाचा ''रोग'' असेल; येथें जी व्यवस्था दिसते ती व्यवस्था म्हणजे वस्तुजाताच्या मुळाशीं असलेल्या सत्यानुसार चाललेला वस्तूंचा अस्तित्वक्रम, जीवनक्रम आहे, असा ज्या व्यवस्थेचा आम्ही पोवाडा गातो ती येथील व्यवस्था, वस्तुत: ज्ञानकार्य नसून, सर्वोच्च स्व-तंत्र ज्ञानयुक्त इच्छाशक्तीनें चालविलेलें स्वतःचें व्यवस्थापूर्ण विकासकार्य नसून, शाश्वत अज्ञानाच्या, आत्मविषयक शाश्वत अज्ञानाच्या यांत्रिक नियमाचें दर्शन आहे, प्रदर्शन आहे असें असूं शकेल; शाश्वत शून्यानें शाश्वत अस्तित्व हें कायमचें रूप धारण केलें असेल -- विश्वाच्या, वस्तुजाताच्या मुळांत गोंधळाचें बीज आहे, निश्चित आरंभस्थान नाहीं, विश्वचक्राच्या भ्रमन्तीला निश्चित अंतिम-स्थान नाहीं, असा पक्ष घेतल्यावर विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला यासंबंधीं वाटेल ती उपपत्ति शक्य होते, सर्व उपपत्ती सारख्याच दर्जाच्या होतात, कारण सर्व सारख्याच प्रमाण किंवा अप्रमाण असूं शकतात. वर जेवढी विश्वोत्पत्तिविषयक मतें विचारांत घेतलीं, तीं कांहीं काल्पनिक नाहींत; कोणीं ना कोणीं तीं मतें प्रतिपादिलीं आहेत. मानवी मनानें कल्पिलेल्या या सर्व मतांनीं मानवाला कांहीं ना कांहीं लाभ झालेला आहे : मतें चुकीचीं वाटलीं किंवा ठरलीं, तरी एक गोष्ट निश्चित आहे कीं, मनाला त्याच्या सर्व चुका उपयुक्त असतात; अशीच ईश्वरी योजना आहे कीं, सत्याकडे नेणारीं द्वारें मनाला त्याच्याकडून घडणाऱ्या चुकांनीं उघडावीं : चुका, चुकीचीं मतें दुसऱ्या कांहीं विरोधी पण चुकीच्याच मतांचा निकाल लावतात : चुकीचीं मतें हें जरुरीचें विध्वंसक कार्य करतात, पण येथेंच त्यांचें कार्य संपत नाहीं; त्याचें विधायक कार्यहि असतें; नवी जी रचनात्मक उपपत्ति तयार केली जाते, तिची घडण करतांना चुकीच्या वाटणाऱ्या किंवा ठरणाऱ्या मतांपासून कांहीं उपयुक्त कल्पना घेतां येते, घेतां येतात. असो. अज्ञेय तत्त्व विश्वाच्या मुळाशीं आहे, या मताचा विचार आतांपर्यंत केला. अज्ञेय तत्त्व म्हणजे अनंत शक्यतांचें रहस्यमय, सर्वतोपरि वास्तवांत केव्हांहि न येणारें भांडार, या मताचाहि शेवटीं विचार केला. अशा या अर्थानें "अज्ञेय'' हें विश्वाचें मूळ समजावयाचें असेल, तर

पान क्र. ४८३

 

तत्त्वज्ञानाचा उद्देश मुळींच साधणार नाहीं, ही गोष्ट लक्षांत घेणें अवश्य आहे. तत्त्वज्ञान ज्ञानाच्या पाठीमागें लागलेलें असतें. ''अनंत शक्यतांचा गोंधळ विश्वाच्या मुळाशीं आहे'' असलें गोंधळाचें दर्शन तत्त्वज्ञानाला निरुपयोगी आहे; विश्वाचें मूळ वर सांगितल्याप्रकारचें 'अज्ञेय' आहें, हें सांगण्यासाठीं तत्त्वज्ञानाचा खटाटोप केला जात नाहीं, केला जाऊं नये. विश्वाचें मूळ ''ज्ञेय'' आहे आणि तें असें ज्ञेय आहे कीं, त्याच्या ज्ञानानें सर्व ज्ञात होतें, असें उपनिषदांत सांगितलें आहे, आणि तत्त्वज्ञानाचा उद्देश सिद्ध व्हावयास अंतिम ज्ञेय हें अशाच प्रकारचें असणें अवश्य आहे. या अंतिम ज्ञेयाला ''अज्ञेय'' हें नांव अशा अर्थानें देतां येईल कीं, तें मनाला ज्ञेय नाहीं. मनाला ज्याचें ज्ञान शक्य आहे, त्या अस्तित्वाहून श्रेष्ठ असें हें ''अज्ञेय'' अस्तित्व आहे; सर्वथा अज्ञेय असें मात्र हें अस्तित्व नाहीं. मनाला अज्ञेय अशा या अस्तित्वाचे ठिकाणीं सत्तेचें घनत्व मनोमय मानवाला प्राप्य अशा सर्वोच्च अस्तित्वापेक्षां अधिक आहे : या सत्ताघन अस्तित्वाला स्वतःसंबंधीचें ज्ञान जितकें आणि जसें आहे, तसें व तितकें त्या सत्ताघनाचें ज्ञान आम्हांला झालें, तर तें ज्ञान आम्हांला मनाच्या शक्तीनें मिळणाऱ्या सर्वोच्च ज्ञानाला धक्का लावील किंवा नाहींसें करील, अशी गोष्ट नाहीं; तर आमच्या ज्ञानाला कांहीं अंशांनीं तें पुढें नेईल. आम्हीं आत्मदृष्टीनें आत्म-अनुभवानें मिळविलेल्या ज्ञानाला तें अधिक पूर्णता आणील. तें ज्ञान आमच्या ज्ञानांत विशालतर उच्चतर सत्याची भर टाकील. सर्व सत्यें ज्या सत्यांत, अस्तित्वांत अंतर्भूत आहेत, ज्या सत्याचा सर्व सत्यांना आधार आहे, ज्या सत्याच्या आश्रयानें सर्व सत्यांचा अन्योन्यसुसंबंध सिद्ध होतो, तें पूर्ण सत्य होय. हें पूर्ण, सर्वसमावेशक, सर्वाधार, सर्वनिरपेक्ष सत्य, आमचें (मनोमय पुरुषाचें) ज्ञान वाढवीत वाढवीत आम्हीं जाणून घ्यायचें आहे; हें सत्य शोधून काढून, आमचा निरीक्षणाचा आणि विचाराचा आरंभ-बिंदु आणि शाश्वत पाया म्हणून हें पूर्ण सत्य नजरेपुढें ठेवून, आमच्यापुढील प्रश्नाचें उत्तर आम्हांला शोधावयाचें आहे; विश्वांतील विरोधमय दृश्यांची सुसंवादिता पटवून देणारी गुरुकिल्ली या पूर्ण सत्यांतच आम्हांला मिळणें शक्य आहे; आमच्या अज्ञानाचा उगम कोठें आहे, वगैरे प्रश्नांचीं उत्तरें या पूर्ण सत्याच्या आश्रयानेंच आम्हांला मिळूं शकतील.

      हें पूर्ण सत्य त्याच्या प्रकट प्रकृतीकडे लक्ष देतां ''सच्चिदानंद'' आहे; पूर्ण अस्तित्व, पूर्ण जाणीव, पूर्ण आनंद या तीन तत्त्वांनीं बनलेलें त्रिमुखी

पान क्र. ४८४

 

एकतत्त्व आहे. अज्ञानाच्या प्रश्नाचा विचार करतांना या प्राथमिक सत्यापासून आपण आरंभ करावयास हवा : अशा रीतीनें आपण अज्ञानाचा प्रश्न हाताळू लागलों, म्हणजे सच्चिदानंदाच्या जाणिवेच्या क्रियेंतून अज्ञान ही घटना घडली असली पाहिजे हें उघड होतें : सच्चिदानंदाची जाणीव क्रियाशील होऊन ज्ञानरूपानें प्रकट होते, आणि या ज्ञानाला ती जाणीव अशा मर्यादा घालते कीं त्या मर्यादांमुळें त्या ज्ञानाचें अज्ञान व्हावें. जाणीवशक्ति क्रियाशील झाल्यानें अज्ञान ही घटना घडते. अज्ञान ही कांहीं मूलभूत गोष्ट नाहीं, तर एक निर्मिति, निर्मित वस्तु आहे, जाणीवशक्तीच्या क्रियेचा परिणाम आहे; तेव्हां जाणिवेची ती एक शक्ति आहे, या दृष्टीनें विचार करणें उपयुक्त होईल. पूर्ण जाणीव ही स्वभावत: पूर्ण शक्ति असणार; जाणिवेचा स्वभावच शक्ति आहे; ही शक्ति ज्ञानासाठीं किंवा कृतीसाठीं केंद्रित करून कार्यप्रवण, कार्यान्वित केली जाते, तिला उत्पादक शक्तीचें, निर्माणशक्तीचें रूप दिलें जातें, मूळ जाणीवयुक्त परम पुरुष आपली जाणीवशक्ति क्रियाशील करतो, ही शक्ति स्वतःचे ठिकाणीं ध्यानमग्न होते आणि या ध्यानाच्या तपानें तिच्या पोटीं असलेल्या सर्व गोष्टी, सर्व सत्यें आणि शक्यता, त्यांचें बीज, त्यांची वृद्धि प्रकट करते, बाहेर काढते. या प्रकारें विश्वाची निर्मिति मूळ

-------------------------

      १ तप : तप म्हणजे (शब्दार्थानें) ताप, उष्णता. जाणीवशक्ति स्वतांवर किंवा वस्तूवर एकाग्रतेनें क्रिया करीत असतां तिच्या कोणत्याही प्रकारच्या शक्तियुक्त क्रियेला ''तप'' म्हणतात. विश्व हें तपाच्या साधनानें अंड्याच्या आकाराचें बनविलें गेलें; नंतर तें तपानें फोडलें गेलें व त्यांतून, अंड्यांतून, पक्षी निघावा तसा प्रकृतीत वावरणारा आत्मा, पुरुष निघाला असें प्राचीन वर्णन आहे. तपस्या म्हणजे ''पेनन्स'', (प्रायश्चित्त) असें इंग्रजींत भाषांतर केले जातें तें बरोबर नाहीं : भारतांतील संन्याशांच्या तपस्येंत प्रायश्चित्ताची कल्पना बहुधा नसे, शरीराला यातना देणें हा हेतूहि त्यांच्या कठोरांत कठोर तपस्येंत नसे. त्यांचा तपस्येंतील हेतू, जाणिवेवरची शरीराची पकड निर्बळ करण्याचा असे. जाणिवेचें क्षेत्र, जाणिवेची शक्ति वाढविण्याचा असे; इच्छाशक्तीचें सामर्थ्य व क्षेत्र वाढविण्याचा असे : आध्यात्मिक किंवा दुसरा एखादा हेतु सिद्ध करण्यासाठी ते इच्छाशक्ति व जाणीव यांची शक्ति व क्षेत्र वाढविण्याची खटपट तपस्येनें करीत असत.

पान क्र. ४८५

 

सच्चिदानंदानें केलेली आहे. आम्ही आमच्या जाणिवेची तपासणी करून पाहिली, तर आम्हांला असें दिसून येईल कीं, या जाणिवेच्या शक्तीनें त्या शक्तीच्या विषयावर आपलें लक्ष केंद्रित केलें कीं महान् विधायक क्रियाशक्तीचें रूप तिला येतें; या विधायक शक्तीच्या बळावर आमची जाणीव तिला प्राप्त होणारें सर्व ज्ञान मिळविते, तिजकडून होणारी सर्व कृति करते, सर्व निर्मिति करते. आमच्या दृष्टीनें आमच्या क्रियाशील जाणिवेला दोन विषय आपलें कर्तृत्व प्रकट करण्यासाठीं असतात : १) आम्ही स्वत: किंवा आंतर विश्व, आणि २) इतर जीव व जड वस्तु, अर्थात् आमच्या भोंवतालचें विश्व, बाह्य विश्व. आंतर विश्व, बाह्य विश्व हा भेद सच्चिदानंदाचे ठिकाणीं नसतो. अर्थात् या भेदाचे क्रियादृष्टीनें व फलदृष्टीनें होणारे परिणाम सच्चिदानंदाचे ठिकाणीं अस्तित्वांत येत नाहींत; सच्चिदानंदाला, सर्व-कांहीं त्याचे पोटांत असतें, सर्व-कांहीं तोच असतो, तोच होत असतो; आम्ही आमच्या मनाच्या मर्यादांमुळें जो भेद, जी विभागणी करतो, ती सच्चिदानंद करत नाहीं. दुसरी गोष्ट; आमच्या बाबतीत, आमचें इच्छापूर्वक होणारें जें कार्य, मानसिक किंवा इतर क्रियेंत मग्न झालेली आमची जी इच्छाशक्ति, त्या इच्छाशक्तीशीं, त्या कार्याशीं आमच्या अस्तित्वाची थोडीशी शक्ति तादात्म्य पावते, आमच्या अस्तित्वाची बाकीची शक्ति (आमच्या पृष्ठगत मनाच्या ज्ञानानुसार) अनिच्छेनें कार्य करीत असते; किंवा ती अवचेतन असते, किंवा अतिचेतन असते; या विभागणीमुळें व्यवहारतः महत्त्वाचे असे पुष्कळच परिणाम घडतात : सच्चिदानंदाच्या बाबतींत ही विभागणी नसते, तिचें परिणामहि नसतात; कारण तेथें सर्व त्याचा अविभाज्य एकमेवाद्वितीय आत्माच असतो, तेथें सर्व क्रिया आणि क्रियेचे परिणाम त्याच्या एकमेव अविभाज्य इच्छाशक्तीचें, त्याची एकमेव अविभाज्य जाणीवशक्ति क्रियाशील झाल्यानें घडलेलें नाना प्रकारचें आंदोलन असतें. आमच्या जाणिवेच्या विशिष्ट गुणधर्माच्या क्रियेला ''तप'' म्हणतात, त्याप्रमाणें सच्चिदानंदाच्या जाणिवेच्या विशिष्ट गुणधर्माच्या क्रियेलाहि ''तप'' म्हणतात. सच्चिदानंदाचें तप हें पूर्ण तप, त्याच्या अविभाज्य अस्तित्वांत चाललेलें, त्याच्या पूर्ण जाणिवेचें पूर्ण तप असतें.

      येथें असा एक प्रश्न उत्पन्न होतो कीं, अस्तित्वांत आणि निसर्गांत क्रिया, गतिशीलता आहे तशी अ-क्रियता, निष्क्रियता, निश्चलता स्थितिशीलतापण आहे; तेव्हां ही जी जाणिवेची शक्ति तिचें आणि तिच्या

पान क्र. ४८६

 

केन्द्रीकरणाचें, या स्थितिशील अवस्थेच्या संबंधांत काय कार्य असतें, कोणतें स्थान असतें ? आमच्या बाबतींत आम्हांला अशी संवय आहे कीं, तप किंवा जाणीवयुक्त शक्ति म्हणजे क्रियाशील सक्रिय जाणीव, कार्यमग्न शक्ति, आंतर किंवा बाह्य क्रिया आणि गतिमानता यांत मग्न असलेली शक्ति, असा तपाचा (जाणीवयुक्त शक्तीचा) अर्थ घ्यावयाचा. आमच्यांत जें स्थितिशील आहे तें क्रिया उत्पन्न करीत नाहीं, किंवा अनिच्छेनें यंत्रवत् क्रिया उत्पन्न करतें, या आमच्या स्थितिशील अंगांचा आमच्या इच्छेशीं किंवा जाणीवयुक्त शक्तीशीं आम्ही संबंध जोडीत नाहीं; तथापि त्या स्थितिशील अंगाचे ठिकाणीं क्रियेची, यंत्रवत् क्रियेची शक्यता असल्यानें त्या ठिकाणीं स्थितिशील प्रतिक्रिया करणारी, किंवा यंत्रवत् हालचाल करणारी जाणीवयुक्त शक्ति आहे असें मानावें लागतें; किंवा दुसऱ्या शब्दांत, अक्रिय, क्रियाविमुख तप किंवा गुप्तपणें सक्रिय, क्रियासंमुख असणारें तप, त्या स्थितिशील अंगाचे ठिकाणीं आहे असें मानावें लागतें. आमच्या स्थितिशील अंगाकडून जी अनिच्छायुक्त क्रिया घडते, तिच्या पाठीमागें आमच्या अस्तित्वांतील आम्हांला अज्ञात  होते किंवा विश्वशक्तीच्या संपर्कांना, सूचनांना, प्रेरणांना उत्तर म्हणून प्रतिक्रिया करते, अशी कोणतीतरी शक्ति, अनिच्छायुक्त क्रिया करणाऱ्या आमच्या स्थितिशील अंगाच्या पाठीमागें असण्याचा संभव आहे. निसर्गांतहि ज्या स्थिर, जड, अप्रतिकारक वस्तू असतात, त्यांच्या शक्तीला टिकवून धरण्याचें काम नित्य, अखंड, गुप्त गतीच करीत असते; म्हणजे क्रियाशील शक्ति ही दर्शनी स्थिरता टिकवून धरण्याचें काम करते. शक्तीच्या अस्तित्वामुळें, तिच्या केन्द्रीकृत सामर्थ्याच्या क्रियेमुळें, तिच्या तपामुळें निसर्गांतील व अस्तित्वांतील स्थितिशील वस्तूंचें शक्तियुक्त स्वरूप टिकूं शकते, हें आतांपर्यंत आपण पाहिलें. आमच्या जाणिवेची सापेक्ष स्थिरता आणि गतिमानता, सापेक्ष सक्रियता आणि अक्रियता आमच्या अनुभवास येते, त्याप्रमाणें पूर्ण निश्चलताहि आमच्या अनुभवास येऊं शकते; जाणिवेच्या या पूर्ण निश्चल स्थितींत मानसिक, शारीरिक सर्व हालचाल बंद झालेली आमच्या अनुभवास येते. तेव्हां जाणीव ही चंचल किंवा क्रियाशील आणि निश्चल किंवा क्रियाशून्य, अशा दोन प्रकारची आहे असें दिसतें : क्रियाशील जाणीव आपल्या शक्तिकार्यानें ज्ञान आणि कृति स्वतांमधुन

पान क्र. ४८७

 

मधून निर्माण करते (या जाणिवेला तप-विशिष्ट जाणीव म्हणतां येईल). दुसरी क्रियाशून्य जाणीव मात्र असें शक्तिकार्य करून दाखवीत नाहीं; ती स्थितिशील अवस्थेंत असते (या जाणिवेला तपविहीन जाणीव म्हणतां येईल). येथें तप म्हणजे क्रियाशील, क्रियामग्न शक्ति असा अर्थ घ्यावयाचा आहे. स्थितिशील अवस्थेंतील आमच्या जाणिवेची दर्शनी तपविहीनता खरोखरीच तपविहीनता असतें कां ? सच्चिदानंदाचे ठिकाणीं स्थितिशील जाणीव, गतिशील जाणीव असा परिणामकारक भेद आहे कां ? कोणी म्हणतात असा भेद आहे : ब्रह्म नितान्त शांत अवस्थेंत असतें, ब्रह्म निर्मितिशील अवस्थेंत असतें; तें निर्गुण असतें, तें सगुणहि असतें. भारतीय तत्त्वज्ञानांत हें निर्गुण-सगुण द्वन्द्व, या द्वंद्वांत असलेला भेद एक फार महत्त्वाचा आणि फार परिणामकारक असा भेद आहे. आध्यात्मिक अनुभवांत या भेदाचा अनुभव हा एक महत्त्वाचा अनुभव गणला जातो.

       आम्हीं आमच्या ठिकाणीं जाणिवेची शान्त, गतिशून्य अवस्था निर्माण केली, तर आम्हांला असा अनुभव येतो कीं, आमचें जें ज्ञान अल्प आणि तुकड्या तुकड्यांचे, वेगळ्या वेगळ्या विशिष्ट गोष्टीचें असतें, तें रूपांतर पावून महान् होतें, त्यांत एकसूत्रता येते, एकता येते; दुसरा अनुभव असा येतो कीं, आमच्या (मानसिक) क्षेत्राच्या पलीकडे असलेल्या क्षेत्रांतील शक्तींना आमच्या अंतरांत प्रवेश करण्यासाठीं आवाहन केलें, आम्ही सर्वभावानें उच्चतर शक्तींना संमुख झालों, तर आम्हांला असें स्पष्ट ज्ञान होतें कीं, एक श्रेष्ठ शक्ति, जी आमची (आमच्या अहम्-प्रधान व्यक्तित्वाची) नव्हे, अशी श्रेष्ठ शक्ति आमच्यावर क्रिया करीत आहे; ही शक्ति विश्वशक्ति आहे, किंवा विश्वातीत शक्ति आहे; आणि ही शक्ति आमच्या द्वारां ज्ञानाचा, शक्तीचा, कृतीचा, फलाचा व्याप, पसारा मोठा व्हावा म्हणून काम करीत आहे; हा व्याप, हा पसारा आमचा नसून ईश्वराचा आहे, सच्चिदानंदाचा आहे, आम्ही केवळ या पसाऱ्याचें क्षेत्र म्हणून, पात्र म्हणून वापरले जात आहों, असेंहि स्पष्ट ज्ञान आम्हांला होतें. आमची वैयक्तिक जाणीव, स्वतःचें अज्ञानमय मर्यादित कार्य करण्याचें बंद करते आणि श्रेष्ठ शांत अवस्था किंवा श्रेष्ठ कृतिशील अवस्था स्वतःला प्राप्त व्हावी म्हणून उच्चतर शक्तींना आवाहन करते, म्हणून एकता-एकसूत्रता-प्रधान महान् ज्ञानाची शांत अवस्था किंवा महान् कृतीच्या क्षेत्राची अवस्था तिला प्राप्त होते. दुसऱ्या अवस्थेंत, ज्ञान आणि कृति यांचा महान् व्याप आमच्या अंतरी प्रत्ययास येतो; या व्यापाला

पान क्र. ४८८

 

तप म्हणावेंच लागतें. पण पहिल्या शांत ज्ञानमय अवस्थेंतहि ज्ञानाचा व्याप वाढविण्याची शक्ति असते; जाणिवेची एकाग्रता तिच्या निश्चल अवस्थेला आणि आत्मानुभूतीला साहाय्यक होत असते; अर्थात् येथेंहि जाणिवेची अवस्था तपाची असते यांत संशय नाहीं. तेव्हां ब्रह्माची कृतिशील जाणीव आणि शांत स्थितिशील जाणीव या दोन्ही ठिकाणीं जाणीवशक्तीची एकाग्रता, केन्द्रीकरण असतें; अर्थात् तप हें ब्रह्मावस्थांचें लक्षण असतें; आणि आमच्या शांत अवस्थेंतहि तिला श्रेष्ठ सच्चिदानंदाच्या व्यापाराचें साधन बनविणारें तप, गुप्त तप असतें, अर्थात् जाणिवेची एकाग्रता असते. निर्मिति, कृति, गति सच्चिदानंदाकडून किंवा आम्हांकडून होत असतां, जाणिवेच्या शक्तीची एकाग्रता हाच निर्मिति वगैरेंना आधार असतो; तसेंच आमची व सच्चिदानंदाची शांत स्थितिशील अवस्था, सर्वांत निश्चल आणि शांत अवस्था, अनंत शांति, शाश्वत शांति या अवस्था देखील, त्यांना आंतून जाणिवेच्या शक्तीच्या एकाग्रतेचा     असा एक मुद्दा उपस्थित होण्यासारखा आहे कीं, ब्रह्माची शांत अवस्था आणि त्याची सक्रिय अवस्था, या अवस्था एकाच ब्रह्माच्या असल्या तरी त्या दोन अवस्थांत इतका भेद आहे कीं, त्या दोन ब्रह्मावस्था अगदीं भिन्न स्वतंत्र वस्तू आहेत असें म्हणावें लागतें; कारण त्या अवस्थांचा आश्रय करणाराला, केवळ भिन्न नव्हे, तर विरुद्ध फलांचा लाभ होतो. ब्रह्माची शांत अवस्था ज्या साधकानें आत्मसात् केली, त्याचें ऐहिक व्यवहाराचें जीवन, अस्तित्व समाप्त होतें; उलट पक्षीं सक्रिय ब्रह्माचा जो आश्रय करील, त्याचे व्यवहारी ऐहिक अस्तित्व, जीवन चालूं रहातें. पण येथें वैयक्तिक आत्म्याचा ऐहिक जीवनव्यवहार समाप्त होणें किंवा चालूं रहाणें हें कां घडतें, याचा विचार करतां असें दिसतें कीं, हा आत्मा विश्वगत ब्रह्मजाणीव आपलीशी करतो तेव्हां, विश्वांतील आपले व्यवहार चालवूं शकतो; कारण, ही ब्रह्मजाणीव विश्वगत कर्माचा आधार असते; या विश्वगत ब्रह्मजाणिवेला सोडून व्यक्तिगत आत्मा विश्वातीत ब्रह्मजाणिवेशीं समरस झाला, म्हणजे त्याचा व्यवहार स्थगित होतो; कारण तेथें विश्वापलीकडे असलेली ब्रह्म-जाणीव आपली शक्ति विश्वगत कर्माच्या खटाटोपांतून मागें घेत असते. दोन्हीं ठिकाणीं एकाग्र केलेल्या जाणीवशक्तीचा उपयोग करूनच (तप करूनच) इष्टसिद्धि केली जाते. विश्वगत कर्मांत अस्तित्वाच्या शक्तीचा खर्च तपानेंच, तप:सामर्थ्यानेंच शक्य

पान क्र. ४८९

 

होतो; विश्वगत कर्मांत खर्च होणारी ही शक्ति मागें घेणें ही गोष्टदेखील तपानेंच, तपःसामर्थ्यानेंच, एकाग्र केलेल्या जाणीवशक्तीच्या बळानेंच शक्य होते. तेव्हां हें उघड आहे कीं, ब्रह्माची जाणीवशक्ति दोन अवस्था घेत असली, तरी या दोन अवस्था अन्योन्यविरोधी, विसंवादी नाहींत; तिची शांत अवस्था ही संचयाची, स्वत:च्या संग्रहाची अवस्था असते आणि तिची सक्रिय अवस्था ही स्वत:चे दान करण्याची, स्वत:च्या संचयाचा, संग्रहाचा उपयोग करण्याची अवस्था असते -- टाकींत किंवा जलाशयांत पाणी शांत असावें, व तें वेळोवेळीं त्यांतून काढून दिलेल्या नळांतून वहात रहावें तशी ही ब्रह्माची शांत आणि सक्रिय अवस्था आहे. या दोन अवस्थांत विरोध तर नाहींच, तर उलट एक दुसरीला मदत करणारी आहे. क्रिया म्हटली कीं, तिच्या पाठीमागें अस्तित्वाची स्थिर, शांत, अ-क्रिय शक्ति असते व असावी लागते; क्रिया ही या अ-क्रिय शक्तीतूनच उत्पन्न होते, क्रियेला हिचाच आधार असतो; ही संचित अ-क्रिय शक्तीच, क्रियेला पाठीमागून मार्गदर्शन करून तिचें नियंत्रण करीत असते, क्रियेशीं ती सामग्ऱ्यानें केव्हांच एकरूप होत नाहीं; अर्थात् सर्व संचित अ-क्रिय शक्ति सगळीच क्रियेंत स्वतःला ओढून घेत नाहीं; क्रियेपासून ती आपलें पृथकत्व अनिवार्यपणें राखीत असते. क्रिया कितीहि महान् असो, सामग्ऱ्यानें तिच्याशी सर्व अक्रिय शक्ति एकरूप होणें अशक्य असतें : मूळ शक्ति, जी मोठ्यांत मोठ्या क्रियेला जन्म देते ती, त्या क्रियेंत आपलें सर्वस्व संपवून टाकीत नाहीं, कांहीं भाग मागें ठेवूनच त्या विशिष्ट क्रियेंत स्वत:चा खर्च करीत असते. आम्ही आमच्या स्वत:च्या क्रियेपासून दूर उभें राहिलों, आमच्या जाणीवयुक्त अस्तित्वांत बैठक मारून आमच्या क्रियेकडे आम्ही पाहूं लागलो आणि ती कशी घडते याचें निरीक्षण केलें, तर आम्हांला असें आढळून येतें कीं, आमच्या विशिष्ट क्रियेमागें किंवा विशिष्ट क्रियाकलापामागें आमचें सर्व अस्तित्व उभें असतें; आमच्या समग्र अस्तित्वाचा लहानसा भाग क्रियामग्न असतो; आमच्या अस्तित्वाच्या शक्तीपैकीं कांहीं शक्तीचा खर्च क्रियेंत होत असतो, बाकी अस्तित्व (अस्तित्वाची शक्ति) शांत अ-क्रिय असते; पण ही शांत स्थिति, शक्ति संचित करणारी स्थिति असते; जड, शक्तिशून्य अवस्था नसते. हीच गोष्ट अनंताच्या जाणीवयुक्त अस्तित्वाला अधिक पूर्णतेनें लागू आहे. अनंताची शक्ति ही, जशी अक्रिय शांत अवस्थेंत, तशीच सक्रिय निर्मितिशील अवस्थेंत अनंतच असणार हें उघड आहे.

पान क्र. ४९०

 

ज्या अवस्थेंतून सर्व निर्माण होतें, ती ब्रह्माची शांत निष्क्रिय अवस्था निरपेक्ष आहे कीं सापेक्ष (दृश्य कृति जिच्यांत नाहीं, दृश्य कृतींपासून जी मागें हटते ती सापेक्ष) आहे, अर्थात् कसलीच दृश्य व अदृश्य कृति, केव्हांच न करणारी अशी निरपेक्ष अवस्था म्हणजे ब्रह्माची शांत, निष्क्रिय अवस्था मानावयाची कीं अदृश्य कृति असूं शकेल, दृश्य मात्र नसणार, अशी सापेक्ष शांत निष्क्रिय अवस्था ब्रह्माचे ठिकाणीं मानावयाची हा प्रश्न सध्यां बाजूला ठेवूं. सध्यां एवढेंच लक्षांत ठेवूं कीं, शांत ब्रह्म वेगळें आणि सक्रिय ब्रह्म वेगळें अशी वस्तुस्थिति नाहीं, एकच एक ब्रह्म आहे, एकच एक अस्तित्व आहे, जें शांत अवस्थेंत आपलें तप राखून ठेवतें आणि सक्रिय अवस्थेंत निर्मितिसाठीं स्वतःचें दान करतें : आत्मशक्तिसंचयाचें तप शांत अवस्थेंत आणि आत्मशक्तिदानाचें, आत्मशक्तिव्ययाचें तप सक्रिय अवस्थेंत, एकच एक अस्तित्व, ब्रह्म करीत असतें; कृतीसाठीं अस्तित्वाचे ठिकाणीं दोन शक्तिस्थानें असतात, निर्मितिसाठीं दोन शक्तींची आवश्यकता असते : कृति ही चक्राकार गतीची असते; संचयस्थानातून, शक्तिसंचयाच्या स्थानापासून कृतीच्या गतीचा प्रारंभ होतो, कृति आपलें भ्रमण पुरें करून पुन: संचयस्थानीं शक्ति घेऊन येते; ही परत आणून घातलेली शक्ति पुन: कृतिरूपानें प्रवासाला निघूं शकते; ब्रह्माची शांत अवस्था ही तपाच्या स्वरूपाची आहे; ब्रह्माचें अस्तित्व एकाग्रतेनें स्वतःवर लक्ष लावून असतें, त्याची निश्चल शक्ति स्वतःचे ठिकाणीं एकाग्रपणें ध्यानमग्न असते; ब्रह्माचें शांत अवस्थेंतील तप या प्रकारचें असतें; ब्रह्माची सक्रिय अवस्था हीहि तपाच्या स्वरूपाची असते; ब्रह्माचें अस्तित्वाचें तप स्वतःच्या शक्तीचा संचय करून असतें तें, ब्रह्माच्या सक्रिय अवस्थेंत या संचित शक्तीला निश्चल अवस्थेंतून गतिमान अवस्थेच्या मार्गाला लावतें; ब्रह्माची सक्रियता म्हणजे संचित शक्तीची ही गतिमानता होय; क्रियेच्या लाखों लहरी या गतियुक्त शक्तींतून निघतात; कृतीच्या प्रत्येक लहरीवर ब्रह्माचें लक्ष असतें, प्रत्येक लहरीच्या निमित्तानें, प्रत्येक लहरीच्या क्षेत्रांत ब्रह्म त्याच्या अस्तित्वाच्या घटकभूत असलेलीं सत्यें आणि शक्यता, संचयाच्या बंदींतून मोकळ्या करून कामाला लावतें; ब्रह्माचें सक्रिय अवस्थेंतील तप हें या प्रकारचें असतें. अ-क्रिय अवस्थेंत जसें शक्तीचें केन्द्रीकरण असतें, तसें या सक्रिय अवस्थेंतहि शक्तीचें केन्द्रीकरण असतें; एवढेंच कीं सक्रिय अवस्थेंत अनेक स्थानीं शक्तीचें केन्द्रीकरण केलें जातें; या अनेकताप्रधान केन्द्रीकरणाला आम्ही शक्तीचें

पान क्र. ४९१

 

विस्कळीतपण समजतों; परंतु हा समज खोटा आहे. शक्ति कांहीं पोकळींत, ब्रह्माहून वेगळ्या बाह्य खोट्या अशा पोकळींत व्यर्थ फेंकली जात नाहीं; ब्रह्म आपली शक्ति स्वतःच्या अस्तित्वाच्या क्षेत्रांतच कामाला लावीत असतें; तें ही शक्ति कमी न होऊं देतां तिचीं रूपांतरें घडवून आणीत असतें; ही शक्तीच्या रूपांतराची प्रक्रिया सारखी चालूं असते; एक रूप, त्यांतून दुसरें, त्यांतून तिसरें असें सारखें रूपनिर्माण चालूं असतें -- पण या रूपनिर्माणाच्या आणि रूपभेदाच्या प्रक्रियेंत शक्तीचें मूळ माप कमी होत नाहीं. ब्रह्माची शांत अवस्था म्हणजे शक्तीचा महान् संचय, तपाचा महान् संचय असतो; यांतून, याच्या आधारानें अनेक आंदोलनें सुरू होतात, रूपें आणि घटना याचा महान् पसारा संचित शक्तीच्या आंदोलनांतून, तिच्या नानाविध रूपपरिवर्तनांतून निर्माण होतो. ब्रह्माची जी सक्रिय अवस्था असते तींतहि शक्तीचा संचय होत असतो; मात्र तो आंदोलनांच्या प्रक्रियेंत, रूपरूपान्तराच्या प्रक्रियेंत होत असतो. आमच्या ठिकाणीं ज्याप्रमाणें अ-क्रिय आणि सक्रिय अवस्था समकालीन असतात, त्याप्रमाणें ब्रह्माचे ठिकाणींहि त्या समकालीन असतात; आमचे ठिकाणीं या दोन अवस्था अन्योन्यसापेक्ष असतात, तशा त्या ब्रह्माचे ठिकाणींहि अन्योन्यसापेक्ष असतात : आमचे ठिकाणीं काय, ब्रह्माचे ठिकाणीं काय, एकाच अस्तित्वात दोन टोंकाला, या दोन अवस्था आपापलें काम करून दुसरीला सहाय्यक होत असतात.

      मूळ सद्‌वस्तु (ब्रह्म) निश्चल अस्तित्वाची शाश्वत शांत अवस्था नव्हे वा आंदोलनमय अस्तित्वाची शाश्वत सक्रिय अवस्था नव्हे किंवा या दोन अवस्था, एकीनंतर दुसरी, दुसरीनंतर पहिली, पुन: पहिली नंतर दुसरी अशा क्रमानें, आळीपाळीनें येत राहणें ही कालगत शाश्वत अशी अ-क्रिय सक्रिय अवस्थांची क्रमवारी हीहि मूळ सद्‌वस्तु, मूळ सत्य नव्हे. ब्रह्माच्या सत्यांतील पूर्णसत्यत्व, अक्रियता किंवा सक्रियता यांपैकीं कोणत्याहि एका पर्यायांत नाहीं : ब्रह्माची जाणीव क्रियाशील असतां या दोन पर्यायांत विरोध दिसतो आणि असतो; जाणीव क्रियाशील नसेल तेथें हा विरोध दिसत नाहीं, असत नाहीं. ब्रह्म हें, आपल्या अस्तित्वाची जाणीवयुक्त शक्ति विश्वगत कार्यांत प्रकट करतें असें आम्ही पाहातों तेव्हां, त्या ब्रह्माला आम्ही सक्रिय, चंचल ब्रह्म म्हणतो; जेव्हां ब्रह्म आपल्या अस्तित्वाची जाणीवयुक्त शक्ति

पान क्र. ४९२

 

कार्यापासून निवृत्त अशा स्थितींत राखून ठेवतें (शक्ति राखून ठेवण्याची ही क्रिया, कांहीं शक्ति कार्यनिविष्ट करण्याच्या क्रियेबरोबरच होत असते) हें आम्हीं पहातों, तेव्हां ब्रह्माला आम्ही निश्चल, शांत ब्रह्म म्हणतों : सगुण (सक्रिय), निर्गुण (अक्रिय); क्षर (सक्रिय), अक्षर (अक्रिय); हीं दुहेरीं नांवें एकाच ब्रह्माला दिलीं जातात; एकच ब्रह्म नसतें, तर या जोड्या अर्थशून्य झाल्या असत्या; ब्रह्म, मूळ सत्य एकच एक आहे; मुळांत दोन स्वतंत्र सत्यें नाहींत, एक निश्चल, एक चंचल अशीं दोन स्वतंत्र सत्यें मुळांत नाहींत, ही गोष्ट आपण पक्की लक्षांत ठेवणें अवश्य आहे. आमच्या व्यक्तिगत आत्म्याची प्रवृत्ति, विकासशील कार्यप्रवणता, आणि त्याची निवृत्ति, कार्यपराङ्मुखता आणि शांतता या दोन अवस्थांच्या संबंधांत सामान्यत: असें मानण्यांत येतें कीं, आत्मा कार्यप्रवृत्त असतां अज्ञानानें घेरला जातो, त्याचें खरें अस्तित्व, जें शांत अक्रिय अस्तित्व, त्याचें त्याला विस्मरण होतें; तो शांत झाला असतां त्याला त्याच्या सक्रियतेचें कायमचें विस्मरण होतें. सक्रिय अस्तित्व हें केवळ दर्शनी, खोटें अस्तित्व असतें. हें असें मत आत्म्याच्या प्रवृत्ति-निवृत्तिसंबंधांत आम्हीं बनवितो, याचें कारण प्रवृत्ति ही क्रिया आणि निवृत्ति ही क्रिया आमच्या व्यक्तिगत आत्म्याच्या संबंधांत एकदम घडत नाहींत; एक अगोदर, एक नंतर अशा क्रमानें घडतात. आमची निद्रा आणि आमची जागृती या क्रिया समकालीन नसतात; जागृतीमध्यें आम्हांला सुषुप्तिकालीन अवस्थेचें अज्ञान असतें, सुषुप्तीमध्यें आम्हांला जागृतींतील अस्तित्वाचें अज्ञान असतें -- तशीच गोष्ट आमच्या आत्म्याच्या प्रवृत्ति-निवृत्तीची आहे. पण निद्रा व जागृति, जागृति व निद्रा या अवस्थांतून क्रमश: जाणारें आमचें अस्तित्व आमच्या पूर्ण अस्तित्वाचा एक अंश मात्र असतें, आणि या अंशाला आम्ही आमचें पूर्ण अस्तित्व मानतों, येथें आमची चूक होत असते. आम्हांला खोल मानसिक अनुभव घेतां आला म्हणजे आमच्या विशाल अस्तित्वाची आम्हांला ओळख होते; हें आमचें आंतरिक विशाल अस्तित्व निद्रा, जागृति या घटकांनीं बांधलें जात नाहीं; आमच्या पृष्ठगत आंशिक अस्तित्वाला जी अवस्था नेणिवेची भासते, त्या अवस्थेंत (निद्रेंत) होणाऱ्या क्रिया, हें आमचें विशाल अस्तित्व, जाणिवेंत (जागृतींत) होणाऱ्या क्रियांप्रमाणें स्पष्टपणें जाणतें. आमचें ब्रह्माशीं जें नातें आहे, त्या संबंधांत असेंच घडत असतें : ब्रह्म हें आमचें खरें समग्र अस्तित्व आहे; पण अज्ञानाच्या स्थितींत आमच्या जाणिवेच्या एका अंगाशीं, मानसिक किंवा आत्मिक- मानसिक

पान क्र. ४९३

 

प्रकृतीच्या अंशाशीं, आम्ही तादात्म्य करून घेतों. हा अंश सक्रिय स्थितींत स्वतःच्या अक्रिय शांत अवस्थेला मुकतो, सर्वथा विसरतो; क्रियेची अवस्था संपली कीं या अंशाला शांत अवस्था लाभते; पण त्याबरोबर सक्रियतेचें त्याला विस्मरण होतें; तेव्हां मानसिक किंवा मन:प्रधान आत्मिक जाणिवेच्या क्षेत्रांत अर्थात् अज्ञानाच्या क्षेत्रांत सक्रिय आत्मा आणि अक्रिय शांत आत्मा एकाच वेळीं आमच्या अनुभवास येत नाहींत. पूर्ण अक्रियता मनाला साधली म्हणजे तें निद्रामग्न होतें, किंवा त्याची समाधी लागते, किंवा त्याला आध्यात्मिक शांति (मुक्ति) लाभते; ही शांतिरूप मुक्ति अज्ञानाच्या बंधनांतून आम्हांला मुक्त करते. अंशमात्र अस्तित्व, क्रियेच्या भोंवऱ्यांत गिरक्या खाणारें अंशमात्र अस्तित्व म्हणजे 'आम्ही'; हें आमचें अज्ञानाचें बंधन तुटण्यासाठीं (आध्यात्मिक शांतीसाठीं) सक्रिय ब्रह्माचें अज्ञान किंवा सक्रिय ब्रह्मापासून विभक्तता पत्करणें मात्र आम्हांला भाग पडतें. शांत सारभूत मूलभूत अशा स्वतःच्या विशाल अस्तित्वाच्या अवस्थेंत आमचें मानसिक-आध्यात्मिक अस्तित्व एकाग्रतेनें बुडून जातें, मग त्याला सक्रिय जाणिवेची पात्रता राहत नाहीं, किंवा सक्रियतेची घृणा त्याचे ठिकाणीं उत्पन्न होते; आमच्या आत्म्याला ही एकांगी शांतीची मुक्ति अनुभवूनच पुढें पूर्ण (सक्रिय-अक्रिय) ब्रह्माकडे मार्गक्रमण करावें लागतें; कारण आमचा आत्मा अचेतनांतून वर येऊन अज्ञानाच्या (जाणिवेच्या एका अंगाशीं, मनाशीं तादात्म्य पावणाऱ्या) स्थितींतून ज्ञानाकडे जात असतो. पण शेवटीं तो आपलें इष्टस्थान प्राप्त करून घेतो. आमच्या खऱ्या समग्र अस्तित्वाची पूर्ण दशा आम्हांला शेवटीं लाभते; या दशेंत आमच्या आत्म्याच्या दोनहि बाजू, सक्रिय आणि अक्रिय, सगुण आणि निर्गुण, पूर्ण मुक्त होतात. आमचे खरें समग्र अस्तित्व, पूर्ण ब्रह्म आमचें होतें आणि या ब्रह्माचे ठिकाणी आमच्या दोन्ही, निर्गुण आणि सगुण आत्मकक्षांना आधार मिळतो, कारण हें पूर्ण ब्रह्म, शांति किंवा क्रिया यांपैकीं कशाचेंहि बंधन मानत नाहीं, तें एकसमयावच्छेदेंकरून शांतिपूर्ण आणि क्रियाशील असतें.

      ब्रह्म अशा स्वरूपाचें नसतें, शांतींत क्रियाशून्य, क्रियाशीलतेंत शांतिशून्य, अशी क्रमवार अवस्था ब्रह्म अनुभवीत असतें, तर विश्व असतांना शांत ब्रह्माचें अस्तित्व राहिलें नसतें, सर्व कांहीं क्रिया, क्रिया असें झालें असतें -- आणि विश्व संपतांच, क्रियाशील ब्रह्माचा अवतार संपला असतां,

सर्व कांहीं शांत, शांत झालें असतें. पण अशी वस्तुस्थिति नाहीं; कारण

पान क्र. ४९४

 

आम्हांला असा अनुभव येतो कीं, विश्वांतील व्यापार, व्यवहार, विश्वाची एकाग्रतेनें नानामुखी हालचाल, चालूं असतां त्या व्यापारव्यवहारांत, त्या नानामुखी हालचालींत, आंतून सर्वव्यापी असणारी अशी, त्या हालचालींना आणि व्यवहारांना आधार देणारी (विश्वजनक सद्‌वस्तूची) शाश्वत अक्रिय आत्मकेन्द्रित शांत शांत अवस्था पूर्णतेनें विद्यमान असते. पूर्ण ब्रह्म एकाच वेळीं शांत आणि सक्रिय असतें; आम्ही झोंप आणि जागेपण एकावेळीं न अनुभवतां क्रमानें अनुभवतों, तसें शांति आणि क्रियामग्नता ब्रह्म अनुभवीत नाहीं; असा (शांतींचा आणि सक्रियतेचा) क्रमशील अनुभव ब्रह्माचा नसतो, तर आम्हांमधील एकांगी अंशव्यापी अशी जी कांहीं क्रिया, प्रवृत्ति असते तिला असा अनुभव येत असतो; आम्ही या प्रवृत्तींशीं आमचें तादात्म्य करून घेतों, त्यामुळें एका अज्ञानांतून (सक्रियेच्या किंवा शांतीच्या) दुसऱ्या अज्ञानाकडे (शांतीच्या किंवा सक्रियतेच्या) आम्ही प्रवास करतों असा आम्हांला अनुभव येतो पण हा अनुभव दर्शनी, पृष्ठगत अस्तित्वापुरता आणि जाणिवेपुरता असतो. आमचें खरे समग्र अस्तित्व अशा विरोधांचें अंकित नसतें; त्याला शांतीचा आत्मा आत्मसात् करण्यासाठीं सक्रिय आत्मा दृष्टीआड करावा लागत नाहीं, विसरावा लागत नाहीं. आम्हांला पूर्ण ज्ञान झालें, आमचा आत्मा आणि आमची प्रकृति यांना अंशमात्र अज्ञानग्रस्त संचित अस्तित्वाच्या स्वभावगत अक्षमता, न्यूनता यांच्या कचाट्यांतून पूर्णतया मुक्तता मिळाली म्हणजे आम्ही सक्रिय आणि शांत अवस्था एकाच वेळीं अनुभवू शकूं; विश्वसंसाराचीं हीं दोन टोंकें आहेत; शांति हें एक टोंक आहे व क्रियाशीलता हें दुसरें टोंक आहे. आत्म्याच्या, परमात्म्याच्या या दोन शक्ती आहेत, प्रकृतीशीं संबंध असतां एक शक्ति (क्रियाशक्ति) काम करते, प्रकृतीशीं संबंध तोडणारी अशी दुसरी शक्ति (शांतिशक्ति) असते. या दोन्ही शक्ती एकसमयावच्छेदेंकरून परमात्म्याचे ठिकाणीं काम करतात, तशा त्या, आम्हांला पूर्ण ज्ञान झाल्यावर आमच्या ठिकाणींहि एकाच वेळीं काम करूं लागतील.

      गीतेंत क्षर, (सगुण, सक्रिय) आणि अक्षर (निर्गुण, निष्क्रिय) पुरुषांहून पुरुषोत्तम (पूर्ण ब्रह्म) अधिक शक्तीचा आहे असें सांगितलें आहे : दोन्हीं एकत्र केल्यानेंहि पुरुषोत्तमाचें स्वरूप पूर्णतया प्रकट केल्यासारखें होऊं शकत नाहीं. सगुणता (सक्रियता) आणि निर्गुणता (निष्क्रियता) एकाच वेळीं ब्रह्माचे ठिकाणीं असतात, याचा अर्थ तो एक

पान क्र. ४९५

 

पूर्णांक आहे आणि हा पूर्णांक दोन अपूर्णांकांच्या बेरजेनें होतो, असा आम्ही घेत नाहीं हें उघड आहे; आम्ही असें समजत नाहीं कीं, ३/४ ब्रह्म शांत आहे आणि १/४ ब्रह्म सक्रिय आहे; असेंच जर असेल, तर ब्रह्म हें अज्ञानाची बेरीज असूं शकेल, शांत ३/४ ब्रह्म १/४ सक्रिय ब्रह्मासंबंधानें उदासीन किंवा पूर्ण अज्ञानांत, आणि १/४ सक्रिय ब्रह्म ३/४ शांत ब्रह्मासंबंधानें पूर्ण अज्ञानांत -- आणि ही शांतता, सक्रिय ब्रह्माला हवी असल्यास त्यानें सक्रियता सोडल्याशिवाय गत्यंतर नाहीं -- अशी स्थिति असूं शकेल. ''बेरीज ब्रह्म'' त्याच्या घटकभूत अपूर्णांकांहून अगदीं भिन्न देखील असूं शकेल. गूढ माया ही हट्टानें या ब्रह्माच्या अस्तित्वाच्या ३/४, १/४ या क्षेत्रांत शांतता आणि क्रियाशीलता गाजवीत असेल आणि ''बेरीज ब्रह्म'' या मायाकृत व्यवहारासंबंधानें पूर्ण अज्ञानांत असूं शकेल; अर्थात् त्या व्यवहाराची कोणतीहि जबाबदारी ''बेरीज ब्रह्मावर'' नसेल; व्यवहाराच्या पातळीहून अगदीं उंच अशा वरच्या पातळीवर, तें व्यवहारासंबंधानें पूर्ण अज्ञानांत आणि त्या संबंधींच्या जबाबदारीपासून सर्वथा मुक्त असूं शकेल. पण पूर्ण ब्रह्म, पुरुषोत्तम हें असलें ''बेरीज ब्रह्म'' असूं शकणार नाहीं; कारण या असल्या ''बेरीज ब्रह्मांत'' पूर्णतेचा पूर्ण अभाव आहे. पूर्ण ब्रह्माला आपली अक्रिय अवस्था आणि सक्रिय अवस्था दोन्ही सर्वदा, सर्वथा ज्ञात असल्याच पाहिजेत. या अवस्थांपैकीं कोणतीहि एक किंवा दोन्हीं मिळून आपली पूर्ण ब्रह्मता होत नाही, हेंहि त्या पूर्ण ब्रह्माला कळत असलें पाहिजे; स्वतःच्या विश्वरूपाच्या या दर्शनी विरोधी पण संवादी (अन्योन्य सहाय्यक) अशा दोन ध्रुवावस्था आहेत, ही गोष्ट त्याला स्पष्टपणें प्रतीत होत असली पाहिजे. ब्रह्म नित्य शांत (अक्रिय) असतें; म्हणून त्याला स्वतःचे व्यापारव्यवहार सर्वथा अज्ञात, असतात; तें सर्वथा त्या व्यापारांपासून दूर, अस्पष्ट असतें अशी गोष्ट होऊं शकत नाहीं; हा ब्रह्म-पुरुषोत्तम सर्वथा आत्मतंत्र, बंधनातीत असतो : सर्व व्यापारव्यवहार तो आपल्या अंतरांत ठेवून असतो, त्यांना तो आधार देतो, आपल्या नित्य शांतिशक्तीनें आधार देतो; आपल्या शक्तीच्या नित्य शांत अवस्थेंतच तो या व्यापारव्यवहारांना आरंभ करून देतो. हा पुरुषोत्तम क्रियामग्न असतां स्वतःच्या शांत अवस्थेला विसरतो, पारखा होतो हीहि गोष्ट अशक्य आहे; तो सर्वव्यापी आहे, सर्व व्यापारव्यवहारांना तो शांत राहूनच आधार देत असतो, आंदोलनाच्या धुमाकुळांत त्याची शांति विचलित होत नाहीं, तो नित्य शांत, स्वस्थ, स्वतंत्र, आनंदमय असा

पान क्र. ४९६

 

असतो; त्याच्या शक्तींच्या अमर्याद भ्रमन्तींत, या भ्रमन्तीच्या अंतरंगांत, हृदयांत त्याची बैठक नित्य असते आणि ती नित्य शांतीची, स्वस्थतेची, स्वतंत्रतेची, आनंदाची अशी असते. आणखी एक गोष्ट. पुरुषोत्तम हेंहि जाणतो कीं, त्याचें ''पूर्ण अस्तित्व'' अक्रियतेनें किंवा सक्रियतेनें किंवा दोहोंच्या बेरजेनें पूर्णतेनें व्यक्त केलें जात नाहीं : हें अव्यक्त पूर्णत्व सक्रियतेनें तो व्यक्त करीत असतो, अक्रियतेनें व्यक्त करीत असतो : सक्रियतेला, अक्रियतेला अर्थ येतो, मोल येतें, तें त्याच्या अव्यक्त पूर्णत्वामुळें येतें. या अव्यक्त पूर्णत्वाची त्या पूर्ण पुरुषोत्तमाला नेहमींच पूर्ण जाणीव असते; अक्रिय असतांना जाणीव असते, सक्रिय असतांना जाणीव असते. पूर्ण पुरुषोत्तम (ब्रह्म) आणि त्याची सक्रियता व अक्रियता या संबंधांत जें सत्य वर सांगितलें आहे, तें आमच्या प्रत्ययास येत नाहीं याचें कारण, आम्ही ब्रह्माच्या एका अंशाशीं तादात्म्य करून घेतों हें आहे : या आंशिक तादात्म्यामुळें आम्हांला पूर्ण ब्रह्माची अनुभूति घडत नाहीं. आमचें अंतरंग पूर्ण ब्रह्माच्या स्वागताला मोकळें नसेल, तर तेथें त्यानें यावें कसें ?

      पूर्ण ब्रह्माचे वर्णन वर आलें आहे, त्यावरून हें स्पष्ट होत आहे कीं, पूर्ण ब्रह्माच्या अस्तित्वांत अज्ञान उगम पावत नाहीं, पूर्ण सच्चिदानंदाच्या अस्तित्वांत तें उगम पावत नाहीं; अज्ञानाच्या अस्तित्वाचें मूळ, विभागणी करणाऱ्या त्याच्या क्रियांचा आरंभबिंदु, पूर्ण ब्रह्मांत नसून त्याच्या अस्तित्वाच्या एकांगी क्रियेंत आहे; आम्ही या एकांगी क्रियेशीं तादात्म्य करून घेतो, या आमच्या एकांगी एकरूपतेंत आहे; आमची पृष्ठगत एकांगी जाणीव झोंप आणि जागेपण क्रमानें अनुभवते आणि या जाणिवेशीं आम्ही एकरूप होऊन आमचा आत्मा, जागृति आणि सुषुप्ति क्रमानें अनुभवतो असें मानतो. त्याप्रमाणें ब्रह्माच्या एकदेशी अस्तित्वाशी (पूर्ण अस्तित्वाशीं नव्हे) एकरूप झालेली आमची जाणीवच अज्ञानाच्या मुळाशीं असते : ब्रह्म केवळ सगुण, केवळ निर्गुण, केवळ सगुण निर्गुण आहे, एकाच वेळीं सगुणनिर्गुण नाहीं; सगुणत्व कांहीं काळ, नंतर निर्गुणत्व अशा क्रमानें ब्रह्म सगुणनिर्गुण असतें -- या कल्पना 'अज्ञान' या वर्गांत येतात. पूर्ण ब्रह्माशीं एकरूप झालेल्या आत्माच्या ठिकाणीं या अज्ञानाच्या कल्पना येऊं शकत नाहींत; पूर्ण ब्रह्माच्या प्रकृतींत अज्ञान घटकरूपानें असूं शकत नाहीं, हें ठरलें म्हणजे अज्ञान ही मूळ वस्तु, आदिवस्तु, विश्वाच्या मुळाशीं असलेली वस्तु असूं शकत नाहीं. पूर्ण शाश्वत ब्रह्माच्या जाणिवेची

पान क्र. ४९७

 

एक मूळ शक्ति ''माया'' आहे असें आम्हीं मानलें, तर ही माया म्हणजे अज्ञान किंवा अज्ञानाच्या जातीची वस्तु नसून, आत्मज्ञान आणि सर्वज्ञान या द्विविध ज्ञानाची विश्वव्यापी आणि विश्वनिरपेक्ष अशी शक्ति असली पाहिजे, हें उघड आहे; अज्ञान हें आमच्या प्रत्ययास येतें तें, या आदिमायेच्या कार्याच्या पसाऱ्यांत केव्हांतरी नंतर येतें. अज्ञान ही मायेसारखी प्रथम आणि प्रधान हालचाल नसून, गौण आणि मध्येंच येणारी दुय्यम हालचाल असते; ही हालचाल एकदेशी, सापेक्ष असते : आतां प्रश्न असा कीं, आत्मा मुळांत एकच एक असतो, तो अनेक आत्म्यांचें रूप धारण करतो; या अनेकतेंत अंगभूत अनिवार्य घटक म्हणून अज्ञान असतें किंवा कसें ? अनेक आत्म्यांतील प्रत्येक आत्मा अनिवार्यपणें अज्ञानानें व्यापलेला असतो कीं काय ? ब्रह्मानें स्वतःला अनेक आत्म्यांचे ठिकाणीं पाहण्यास आरंभ करतांच अज्ञान सुरू होतें काय ? ब्रह्माची ही अनेकात्मता म्हणजे अपूर्णांकरूप असलेल्या आत्म्याची बेरीज असते कां ? प्रत्येक आत्मा (अनेकात्मतेंतील आत्मा) स्वतःच अपूर्णांक रूप असतो, हें खरें कां ? प्रत्येक आत्मा जाणिवेंत इतर सर्व आत्म्यांपासून वेगळा, विभक्त असतो, त्याला इतर आत्म्यांचें जें ज्ञान होतें त्या ज्ञानांत त्याला इतर आत्मे स्वतःच्या बाहेर प्रतीतीस येतात, या आत्म्यांशीं त्याचा संबंध शरीराच्या किंवा मनाच्या द्वारां घडूं शकतो, अन्यथा घडूं शकत नाहीं,  ''सर्व आत्म्यांशीं मी एकरूप आहे'' या प्रकाराची एकता कोणत्याहि आत्म्याचे ठिकाणीं अनुभवास येणें अशक्य असतें -- हें खरें कां ? अर्थात् ब्रह्म एकात्मता टाकून अनेकात्मता धारण करतें झालें कीं लागलींच अनेकात्मतेंतील प्रत्येक आत्म्याला अज्ञान झपाटतें कां ? असा प्रश्न आहे. 'या प्रश्नाचें उत्तर ''नाहीं'' असें आहे. आमचा जो जाणिवेचा पृष्ठगत, अगदीं बाहेरचा थर असतो, बाहेरचें शरीर आणि मन यांच्या ठिकाणीं जी आमची जाणीव असते, तिच्या संबंधांत ही गोष्ट खरी आहे कीं, अज्ञानाचें तेथें राज्य असतें; पण जेथें आमची सूक्ष्म, खोल, विशाल जाणीव असते तेथें आम्ही पोंचलों म्हणजे तेथें विभक्ततेच्या भिंती पातळ असलेल्या आमच्या अनुभवास येतात; आमच्या सूक्ष्मतर, विशालतर, गाढतर, जाणिवेंत त्या आणखी पातळ असलेल्या दृष्टोत्पत्तीस येतात; असें होता होतां शेवटीं भेदाची भिंत नाहींशी झालेली दिसते, अज्ञानाचें राज्य पूर्णपणें संपुष्टांत येतें.

      जाणिवेच्या दर्शनी विभक्ततेचा अगदीं खालचा पाया, अगदीं

पान क्र. ४९८

 

बाहेरची निशाणी म्हणजे शरीर होय; प्रकृतीनें हें जाणिवेचें दर्शनी विभक्तपण अस्तित्वांत आणलें आहे; अज्ञान, आत्मनेणीव प्रकृतीनें स्वीकारली आहे; अज्ञानांत, आत्मनेणिवेंत बुडी घेऊन शेवटीं अगदीं खालच्या टोंकाला तिनें शरीर निर्माण केलें आहे -- तिनें दर्शनी भेदाचा कळस येथें केलेला आहे. जेथें दर्शनी भेदाचा कळस प्रकृतीनें केला आहे तें शरीर, व्यक्तिगत आत्म्याचे ठिकाणीं एकतेची पुनर्जागृति करण्याच्या कार्यांत, प्रकृतीनें आरंभस्थान केलें आहे : प्रकृतीची जाणीव एकरूप होती ती अनेकरूप झालेली आहे. जाणिवेच्या अनेक रूपांतील कांहीं रूपें, अतिरेकी भेदाचीं स्थानें आहेत; या अतिरेकी भेदाचीं स्थानें असलेल्या रूपांत, शरीरांत राहणाऱ्या जीवात्म्याला शरीरांत राहत असतांच, आपल्या मूळ एकतेची पुन: प्राप्ति व्हावी यासाठीं प्रकृतीचा खटाटोप, आत्म्यानें शरीर धारण केल्या क्षणापासून सुरू झालेला आहे. असो. शरीरें एकमेकांशीं बाह्य साधनांनींच संबंध ठेवूं शकतात; बाह्यता ही खिंड दोन शरीरांच्या मध्यें कायमची असते. एका शरीरानें दुसऱ्यांत प्रवेश करायचा, तर दुसऱ्या शरीराला छेद करणें अवश्य होतें; किंवा दुसऱ्या शरीरांत कोठें छेद असेल त्याचा फायदा घेणें अवश्य होतें. एक शरीर दुसऱ्या शरीरांशीं मिळून जावयाचें, एकरूप व्हावयाचें, तर एकानें दुसऱ्याचे तुकडे करणें व तें भक्षण करून टाकणें किंवा तुकडे न करतां गिळणें व पचविणें अवश्य होतें, किंवा दोन्हीं शरीरें, दोन्हीं रूपें आकार नाहींसे होऊन तिसरा स्वतंत्र आकार आपल्या घटकांतून निर्माण करून त्याच्या रूपानें एकरूप होऊं शकतात : अर्थात् दोन आकार वितळवून त्यांना एकरूप करतां येतें. ही शरीराची कथा झाली. शरीराशीं एकरूप असणाऱ्या मनालाहि शरीराचीं बंधनें लागूं होतात; परंतु मन स्वत: शरीराहून सूक्ष्म आहे; दोन मनें एकमेकांना इजा न करतां एकमेकांत छेद न करतां एकमेकांत प्रविष्ट होऊं शकतात; एकमेकांना न दुखवितां, एकमेकांचा माल देऊं, घेऊं शकतात : एका अर्थानें तें एकमेकांचे घटकभाग होऊं शकतात; तथापि मनालाहि त्याचा आकार म्हणून असतो, या आकारामुळें एका मनाचा दुसऱ्या मनापासून वेगळेपणा प्रतीत होऊं शकतो, आणि ही आकाराच्या वेगळेपणाची बैठक घेऊन कोणतेंहि मन आपला सवता सुभा बनवूं शकतें. मनाच्या पलीकडे आमचा आत्मा असतो; आत्मजाणीव आम्हांला पुन: प्राप्त झाली म्हणजे एकतेच्या मार्गावरील अडचणी कमी होऊं लागतात, आणि शेवटीं समूळ

पान क्र. ४९९

 

नाहींशा होतात; आत्म्याआत्म्यांची एकदा प्रस्थापित होते. आत्मा आपल्या जाणिवेनें दुसऱ्या आत्म्याशीं तादात्म्य पावूं शकतो, त्यांना आपल्या स्वत:च्या अंतरंगांत सामावून घेऊं शकतो, त्या दुसऱ्या आत्म्यांत प्रविष्ट होऊन त्यांना आपलें वसतिस्थान करूं शकतो, त्यांच्याशीं स्वतःची एकता अनुभवूं शकतो; आणि हा सर्व एकरूपतेचा व्यवहार पूर्ण जागृतींत तो करूं शकतो, या जागृतींत सर्व प्रकारचे भेद तो आत्मा पाहत असतो, अनुभवीत असतो; पण हे सर्व भेद अनुभवून तो त्यांच्या पलीकडील, त्यांना पोटांत घेणारी एकताहि अनुभवूं शकतो. आत्म्याच्या आत्मजाणिवेची ही महति आहे; निर्वाण स्थितीमध्यें आत्मा, मन, शरीर हे सर्व भेद नष्ट होत असतात, सर्व व्यक्तित्व (आत्म्यांचे, शरीरांचें, मनांचें व्यक्तित्व) शून्य होत असतें, म्हणून त्या स्थितींत आत्म्याला एकरूपतेचा अनुभव येणें सोपें असतें; सुषुप्तींत विशेष, भेद सर्व मावळून जात असतो, म्हणून तेथें एका दृष्टीनें एक रूपतेचा अनुभव सोपा असतो; परंतु पूर्ण जागृतींत एकरूपतेचा, एकतेचा अनुभव येणें सोपें नसतें. आत्मा क्रमश: आपली जाणीव विशालतर करीत करीत शेवटीं सर्व आत्म्यांशीं व सर्व आत्म्यांच्या आत्म्याशीं एकरूपता अनुभवतो.

      आत्मे अनेक झाले कीं या अनेकांपैकीं प्रत्येक आत्मा अज्ञान आणि आत्मबंधनकारक विभक्तता यांना स्वभावतःच पत्करतो, त्यांना तो टाळूंच शकत नाहीं अशी वस्तुस्थिति नाहीं; ब्रह्म अनेक झालें कीं स्वभावतःच अज्ञान आणि मर्यादा घालणारा भेद त्याला आपल्या पकडींत घेतात, ही गोष्ट खरी नाहीं. ब्रह्म किंवा पुरुषोत्तम हा शांति (अक्रियता) आणि सक्रियता या दोन अवस्थांहून अधिक आहे, त्याप्रमाणें एकता आणि अनेकता या दोन अवस्थांहूनहि तो अधिक आहे. तो स्वभावतःच एक आहे, पण त्याची एकता त्याला बंधन घालणारी नाहीं; एकतेबरोबरच अनेक होण्याचीहि शक्ति त्याचे ठिकाणीं आहे; या अनेकतेच्या शक्तीला तेथें बहिष्कृत केलेलें नाहीं; शरीराची, मनाची एकता विभक्ततासंपादित, विभक्ततानिष्ठ असल्यानें तेथें अनेकतेच्या शक्तीला बहिष्कार आहे : अशी गोष्ट मूळ एकतेची, ब्रह्माच्या, पुरुषोत्तमाच्या एकतेची नाहीं; ही एकता स्वत:ला एकतेंत कायमचें कोंडून घेणारी नाहीं, अनेकतेला वाळींत टाकणारी नाहीं -- अनेकतेबरोबर सहकार्य करणारी आहे : पुरुषोत्तम हा कांहीं गणितांतला 'एक' नव्हे; गणितांतील 'एक' स्वतःच्या पोटीं शंभर (कोणतीहि स्वत:हून वेगळी संख्या) धारण करूं शकत नाहीं

पान क्र. ५००

 

आणि म्हणून तो शंभराहून लहान आहे आणि लहानच राहतो. पुरुषोत्तम हा 'एक' शंभराला स्वतःमध्यें धारण करतो आणि सर्व शंभरांत 'एक' म्हणून असतो व रहातो. पुरुषोत्तम स्वत: एकच एक आहे, अनेकांतील एकच आहे, आणि ते अनेक त्याच्या ठिकाणीं एक आहेत, त्याच्या एकत्वानें एक आहेत. दुसऱ्या शब्दांत, ब्रह्म स्वतःचें मूळ, चैतन्याचें एकत्व जाणतें व त्याबरोबरच स्वतःमधील अनेक आत्म्यांनाहि जाणतें; तसेंच त्याच्या अनेक आत्म्यांपैकीं प्रत्येकाच्या ठिकाणीं जी जाणीव आहे त्या जाणिवेनें तें सर्व आत्म्यांशीं एकताहि अनुभवतें. प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणीं ब्रह्म किंवा पुरुषोत्तम असतो, तो प्रत्येकाच्या हृदयांत अंतर्यामी ईश्वर म्हणून राहतो आणि स्वतःचें एकत्व सर्वत्र अनुभवतो. जीवात्म्याला त्याजकडून ज्ञानाचा प्रकाश मिळतो, या प्रकाशाच्या आश्रयानें जीवात्मा ईश्वराशीं स्वतःचें ऐक्य ओळखतो, आणि सहजच या ऐक्याच्या द्वारां सर्व जीवात्म्यांशीं स्वतःचें ऐक्य असल्याचें तो अनुभवतो. शरीर, विभक्तप्राण, विभागणारें मन यांच्याशीं आमची पृष्ठगत जाणीव तादात्म्य पावते आणि म्हणून ती अज्ञानानें व्याप्त असते; तथापि या जाणिवेलाहि प्रकाश मिळूं शकतो आणि या प्रकाशाच्या साह्यानें तिलाहि सर्व आत्म्यांच्या एकतेचें ज्ञान होऊं शकतें; तसेंच पुरुषोत्तमाशीं प्रत्येक आत्म्याच्या असलेल्या एकतेचें ज्ञान होऊं शकतें : आत्म्यांची अनेकता ही आत्म्याच्या अज्ञानाच्या मुळाशीं अनिवार्यपणें आहे ही गोष्ट खरी नाहीं, हें वरील विवेचनाचें सार आहे.

      ब्रह्म एकाचें अनेक होतें तेव्हांपासून अज्ञान निर्माण होत नाहीं. तें पुढें निर्माण होतें : मन आपल्या आत्मिक, अतिमानसिक मूळ आधारापासून तोडलें जातें, तेव्हां अज्ञानाच्या आक्रमणाला आरंभ होतो; आणि या पृथ्वीवरील जीवनांत अज्ञान कळसाला पोंचतें; कारण या पार्थिव जीवनांत व्यक्तीची जाणीव, विभागणाऱ्या मनाच्या आकाराशीं, शरीराशीं तादात्म्य पावते. विभाजनाचा अत्यंत सुरक्षित पाया, एकमेव सुरक्षित आधार म्हणजे आकार वा शरीर होय. आकार म्हणजे काय तें आतां पाहावयाचें आहे. आम्हांला येथें या पृथ्वीवर आकार म्हणून जो दिसतो, ती शक्तीची, केन्द्रीभूत शक्तीची, एक रचना असते; जाणीवशक्ति क्रियाशील, गतिमान झाली म्हणजे या चंचल शक्तीच्या भ्रमन्तींत अनेक गांठी तयार होतात. अशा गांठींतील एक गांठ म्हणजे आकार होय; ही गांठ गांठींच्या रूपांत टिकविण्यासाठीं गति, क्रिया एकसारखी

पान क्र. ५०१

 

भिरभिरत ठेवावी लागते. आकाराचा उगम सर्वातीत सत्यांत आहे; आकार कांहीं अंशांनीं सर्वातीत सत्य व्यक्त करीत असतो; पण तें कसेंहि असलें, तरी आकाराचा कोणताहि भाग, व्यक्त आकाराचा कोणताहि भाग टिकाऊ असत नाहीं, नित्य असत नाहीं. आकार हा सगळा, साकल्यानें नित्य टिकणारा नाहीं, त्याचे घटकहि, घटक परमाणूहि नित्य टिकणारे नाहींत. या परमाणूंना फोडतां येतें; शक्ति एकाग्रतेनें सारखी भिरभिरत असते, गांठी करून भिरभिरत राहते -- या भिरभिरणाऱ्या गांठीं म्हणजे परमाणु : या गांठी स्थिर भासतात, याचें कारण शक्तीचें भिरभिरणें, विशिष्ट प्रकारें भिरभिरणें. या भिरभिरण्याला त्याच्या विशिष्ट गतीहून वेगळी गति देतां येते, त्याची गति थांबवितांहि येते, आणि अशा युक्तीनें परमाणू (गांठी) फोडतां येतात; अर्थात् ते नित्य नाहींत व त्यांनीं बनलेला आकारहि नित्य नाहीं हें उघड आहे. असो. शक्तीच्या क्रियाशीलतेंत, कोणत्याहि आकारावर तपाची (जाणीवशक्तीची) एकाग्रता होते आणि त्यामुळें हा आकार अस्तित्वांत टिकविला जातो; या प्रक्रियेनें विभागणीचा भौतिक पाया तयार होतो. ब्रह्माच्या जाणीवशक्तीचें तिच्या विषयावरील एकाग्रतायुक्त कार्य, अर्थात् तपाचें कार्य म्हणजेच क्रियाशील ब्रह्माच्या व्यवहारांतील सर्व गोष्टी होत. तेव्हां अज्ञानाचें मूळ शोधावयाचें तर तें तपाच्या विशिष्ट आत्मसमाधींत, आत्मविस्मृति घडविणाऱ्या एकाग्रतेंत शोधावयास हवें; क्रियाशील मूळ जाणीवशक्तीनें आत्मविस्मरण घडविणाऱ्या एकाग्रतेनें शक्तीची कोणतीहि भेदनिष्ठ हालचाल चालविण्यांत अज्ञानाचें मूळ असावें, असा सिद्धान्त करतां येतो : अज्ञानाचा आम्हांला जो अनुभव येतो त्यांत, मन भेदाच्या हालचालीशीं दर्शनी तादात्म्य करून घेतें, आणि या भेदमय हालचालींत जे आकार तयार होतात त्यांतील प्रत्येक आकाराशींहि दर्शनी तादात्म्य करून घेतें. याप्रमाणें भेदाची भिंत उभी करून, स्वतःच्या पूर्ण आत्म्याविषयीं, दुसऱ्या शरीरधारी जाणिवांविषयीं आणि विश्वपुरुषाविषयीं, प्रत्येक आकारांतील जाणीव अज्ञानांत राहील अशी मन व्यवस्था करतें. शरीरधारी मनोमय पुरुषाचे ठिकाणीं जें अज्ञान दिसतें, भौतिक निसर्गांत जी महान् अचेतनता दिसते, त्या दर्शनी अवचेतनतेचें व दर्शनी अज्ञानाचें गुप्त कारण हें मूळ जाणीवशक्तीच्या व मनाच्या उपरिनिर्दिष्ट तादात्म्यरूप तपांत आहे, हें स्पष्ट आहे. आतां आपल्यापुढें प्रश्न आहे तो या एकाग्रतेचा. आत्म्याला आत्मविस्मृत करणाऱ्या, विषयरूप करणाऱ्या, भेदमय

पान क्र. ५०२

 

करणाऱ्या या एकाग्रतेचा, स्वभावधर्म काय, तिचें स्वाभाविक स्वरूप काय हा आतां प्रश्न आहे : या एकाग्रतेंत विश्वरूप चमत्काराचें रहस्य सांठविलेलें आहे.

पान क्र. ५०३

प्रकरण तेरावें

जाणीवशक्तीची अनन्य एकाग्रता व अज्ञान

 

      मूळ जाणिवेच्या शक्तीचा अग्नि पेटविला गेला, या अग्नींतून सत्य जन्मास आलें, सत्याचा नियम जन्मास आला; त्यापासून रात्र, रात्रीपासून अस्तित्वाचा प्रवाही सागर जन्मास आला.

- ऋग्वेद १०.१९०.१

 

      ब्रह्माचें सारभूत विश्वात्मक अस्तित्व पाहतां, तें एक आहे आणि अनेकहि आहे; एकता आणि अनेकता, एकमेकींना ज्ञात असतात आणि अनेकतेंत एकता अशी त्याची परस्परविषयक व्यवस्था असते; असें हें ब्रह्म सत्य दृष्टीनें एकत्व आणि अनेकत्व यांच्या पलीकडे असतें, या दोन अवस्था त्याच्या पोटीं असतात, दोन्ही अवस्था त्याला ज्ञात असतात; अशी वस्तुस्थिति असल्यानें अज्ञान जें आम्हांस अनुभवास येतें तें ब्रह्मांतील प्रधान अंग नसून, एक गौण घटना म्हणून उदयास येत असलें पाहिजे हें उघड आहे : ही घटना घडते कशी याचा विचार करतां हें स्पष्ट दिसतें कीं, अस्तित्वाच्या एकांगी ज्ञानावर, एकांगी क्रियेवर ब्रह्माची जाणीव एकाग्र व केन्द्रित होऊन ती आपल्या ज्ञानकक्षेंतून बाकी सर्व अस्तित्व आणि त्याचा व्यवहार बाहेर ठेवीत असली पाहिजे. ब्रह्म एकतेच्या आपल्या अवस्थेवर आपली जाणीव केन्द्रित करून, अनेकतेची अवस्था तिच्या कक्षेबाहेर ठेवतें, ठेवूं शकतें; आपल्या अनेकतेच्या अवस्थेंतील कोणत्याहि एका आत्म्याच्या क्रियेवर आपली जाणीव केन्द्रित करून तिच्या कक्षेबाहेर आपली सर्वज्ञता ठेवू शकतें; 'व्यक्तिगत आत्मा' या आपल्या स्वरूपांत तें स्वत:वर (व्यक्तिगत आत्म्यावर) जाणीव केन्द्रित करून, आपली मूळ एकता आणि अनेकतेंतील दुसरें सर्व व्यक्तिगत आत्मे, यांना तिच्या कक्षेबाहेर ठेवूं शकतें. हे दुसरे व्यक्तिगत आत्मे त्या व्यक्तिगत आत्म्याला अशारीतीनें वेगळे वेगळे, स्वतंत्र आत्मे भासतात; त्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या कक्षेबाहेर या सर्व

पान क्र. ५०४

 

व्यक्तिगत आत्म्यांचा व्यवहार असतो. अनन्य एकाग्रतेच्या या तीन दिशा होऊं शकतात; या तीनहि दिशांनीं अनन्य एकाग्रता करण्याचा सर्वसाधारण नियम प्रकृतीच्या अर्थात् क्रियाशील अस्तित्वाच्या शक्तीच्या पसाऱ्यांत कोठेंतरी असूं शकतो, कोठेंतरी येऊं शकतो : भेदनिष्ठ हालचालीवर भेदनिष्ठ क्रियाशील जाणिवेची अनन्य एकाग्रता, वर सांगितलेल्या तीनहि दिशांनीं होऊं शकते. अज्ञानाच्या उदयासंबंधानें ही उपपत्ति इतर उपपत्तींहून बरी असल्यानें आम्हीं ती स्वीकारली आहे. इतर कोणतीहि उपपत्ति केवळ स्वत:च्या बळावर अस्तित्वाच्या सर्व गोष्टींचें स्पष्टीकरण देऊं शकत नाहीं, सर्व गोष्टींशीं जुळत नाहीं, सर्व गोष्टी सामावून घेत नाहीं; पूर्ण ब्रह्म पूर्णता ठेवून अज्ञानाचा उगम होऊं शकत नाहीं; कारण पूर्णता स्वभावत:च सर्वज्ञता, सर्व-जाणीव असते. एक ब्रह्म घेतलें तर तें आपलें पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्व ठेवून स्वतांतून ''अनेक'' बाहेर घालवूं शकत नाहीं; कारण ''अनेकाला'' जर तें स्वतांतून बाहेर ढकलील तर तें ''अनेक'' अस्तित्वांत टिकूं शकणार नाहीं; पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्वाचें असलेलें एक ब्रह्म फार तर विश्वक्रीडेपासून आपल्या जाणिवेंत कोठेंतरी अलग राहूं शकेल -- एवढ्यासाठीं कीं, व्यक्तिगत आत्म्यालाहि असें विश्वक्रीडेपासून अलग राहतां यावें. अनेकरूप ब्रह्म, त्याचें पूर्ण अनेकत्व घेतलें किंवा त्याचें प्रत्येक आत्म्यांतील अस्तित्व घेतलें, तरी तें स्वत:चें एकत्व किंवा अनेकतेंतील इतर आत्मे, दृष्टीआड करूं शकेल हें शक्य नाहीं; कारण अनेकीभूत ब्रह्म याचा अर्थच असा आहे कीं, एकच दिव्य आत्मा अनेकांतील सर्वांचे ठिकाणीं आहे, तो व्यक्तिरूप झाला असला तरी त्या व्यक्तिरूप आत्म्याचें जाणीवयुक्त अस्तित्व इतर व्यक्तिरूप आत्म्यांच्या अस्तित्वांहून वेगळें झालेलें नाहीं, सर्व व्यक्तिरूप आत्म्यांचें जाणीवयुक्त अस्तित्व एका विश्वात्मतेंत आहे; व्यक्तिरूप आत्मा याप्रमाणें जाणिवेनें विश्वात्म्याशीं एकरूप असतो, आणि तो विश्वाच्या पलीकडे असणाऱ्या मूळ एकच एक ब्रह्माशींहि जाणिवेनें एकरूप असतो. तेव्हां अज्ञान ही कांहीं आत्म्याच्या जाणिवेची, व्यक्तिरूप आत्म्याच्या जाणिवेची देखील प्रकृति नव्हे, स्वभावधर्म नव्हे; क्रियाशील जाणीवशक्तीकडून जेव्हां एखादी विशिष्ट गोष्ट घडवून आणणारी क्रिया घडते, आणि या क्रियेंत ती शक्ति मग्न होऊन सर्वथा आत्मविस्मृत होते, आत्म्याला विसरते, प्रकृतीची खरी पूर्णता विसरते, प्रकृतीचें पूर्ण सत्यस्वरूप विसरते, तेव्हां अज्ञानाचा उदय होतो. ही जी क्रिया अज्ञानोत्पादक

पान क्र. ५०५

 

म्हणून सांगितली ती सर्व अस्तित्वाची किंवा अस्तित्वाच्या सर्व शक्तीची असूं शकत नाहीं; कारण या पूर्ण अस्तित्वाचा, अस्तित्वाच्या पूर्ण शक्तीचा स्वभावधर्म पूर्ण जाणीव हा असतो; एकांगी, अंशजाणीव हा नसतो. अज्ञानोत्पादक क्रिया ही अस्तित्वाची किंवा अस्तित्वशक्तीची पृष्ठगत, एकांगी हालचाल असून ती जाणिवेच्या आणि शक्तीच्या एकांगी पृष्ठगत क्रियेच्या व्यापांत बुडून गेलेली असली पाहिजे; कांहीं रचना करण्यांत अनन्य एकाग्रतेनें जाणिवेचें येथें कार्य होत असलें पाहिजे; या रचनेच्या कक्षेंत नसलेल्या, किंवा प्रकटपणें तेथें नसलेल्या सर्व गोष्टींचा या एकाग्र जाणिवेला सर्वथा विसर पडत असला पाहिजे. अज्ञान म्हणजे प्रकृतीनें आत्म्याला आणि विश्वाला (सर्वाला) हेतुपुर:सर विसरणें आहे : अज्ञानाच्या क्रियेंत प्रकृति हेतुत: आत्म्याला आणि सर्व वस्तुज्ञाताला बाजूला ठेवून देते, आपल्या पाठीमागें ठेवून देते; तिचा हेतु हा असतो कीं, अस्तित्वाच्या विशिष्ट पसाऱ्यांत, लीलेंत तिला जें कांहीं कर्तव्य असतें तें कर्तव्य, तिला एकनिष्ठतेनें करतां यावें.

      अस्तित्व अनंत आहे, त्याची जाणीव अनंत आहे; या अनंत अस्तित्वांत आणि जाणिवेंत तप, जाणिवेची एकाग्रता नेहमींच असते. ही एकाग्रता, केन्द्रितता, जाणीवशक्तीचा अंगभूत स्वभावधर्म आहे. या एकाग्रतेंत जाणीव स्वत्व एकत्र करून स्वतांवर स्वबुद्धीनें, स्वत:च्या अंतरांत सर्व लक्ष केन्द्रित करते; स्वतांवर लक्ष केन्द्रित करते त्याप्रमाणें स्वत:चा जो विषय असेल त्यावरहि आपलें लक्ष केन्द्रित करीत असते; जाणिवेचा स्वत:चा विषय हा वस्तुत: ती स्वत:च असते, तिचें स्वत:चें अस्तित्व असतें, किंवा त्या अस्तित्वाचें एखादें प्रकटन वा आंदोलन असतें. एकाग्रता चार प्रकारची आहे. सारनिष्ठ, एकतानिष्ठ, अनेकतानिष्ठ, भेदनिष्ठ. सारनिष्ठ एकाग्रतेंत जाणीव केवळ स्वत:चे ठिकाणीं तल्लीन असते, स्वत:च्या सारभूत भागावर तिचें सर्व लक्ष एकाग्र झालेलें असतें; ही एकाग्रता प्रकाशयुक्त असूं शकते, प्रकाशहीन आत्मविस्मृतियुक्तहि असूं शकते. अतिचेतन शांत अवस्था आणि अचेतन अवस्था ही या प्रकारची एकाग्रता असते. एकतानिष्ठ एकाग्रता ही सच्चिदानंदाची एकताप्रधान अवस्था होय. येथें भेदज्ञानाला गौण स्थान असतें. अतिमानसिक एकाग्रता असें या दुसऱ्या एकाग्रतेला नांव देतां येईल. तिसरी अनेकतानिष्ठ एकाग्रता ही अधिमानसिक एकाग्रता होय. या एकाग्रतेंत अनेकताज्ञान प्रधान असतें, अनेकतेबरोबर त्या अनेकतेचें एकत्र गौण रीतीनें नजरेसमोर ठेवण्यांत

पान क्र. ५०६

 

येतें.

      चौथी भेदनिष्ठ एकाग्रता; या एकाग्रतेंत अज्ञानाचा जन्म होतो. अज्ञानाचा खास स्वभावगुण म्हणजे ही चौथी एकाग्रता. येथें अस्तित्वाचें एखादेंच क्षेत्र, आंदोलनाचें एखादेंच क्षेत्र एकाग्र दृष्टीचा विषय असतें; या क्षेत्रावर, तें एक स्वतंत्र क्षेत्र आहे अशा भावनेनें, दृष्टि एकाग्र केलेली असते. अस्तित्वाच्या एखाद्या केन्द्रावर, अस्तित्वाच्या वस्तुस्वरूप झालेल्या एखाद्या केन्द्रावर, अस्तित्वाच्या वस्तुस्वरूप झालेल्या एखाद्या भागावर या भेदनिष्ठ एकाग्रतेंत सर्व लक्ष केन्द्रित झालेलें असतें. केवळ ब्रह्म, परात्पर पूर्ण ब्रह्म स्वत:च्या जाणिवेच्या या सर्व अवस्था एकत्र, एकाच वेळीं धारण करतें; तें एकच एक अविभाज्य अस्तित्व असतें, त्याची आत्मसंमुख दृष्टि एकाच वेळी आपलें सर्व अस्तित्व, आपल्या अव्यक्त अस्तित्वाच्या सर्व व्यक्त अवस्था पाहूं शकते आणि पाहते.

      जाणीवयुक्त अस्तित्वाचा हा खास स्वभावच म्हणतां येतो कीं, त्याचे ठिकाणीं विशिष्ट एकाग्रता असते. मूळ स्वतांवर किंवा स्वत:समोर असलेल्या विषयरूप बनलेल्या स्वतांवर, जाणिवेची एकाग्रता करणें हा जाणीवयुक्त अस्तित्वाचा खास धर्म असतो. जाणीव ही अनंत विस्तार पावली असेल, ती विखुरलेली असेल पण हा विस्तार, हें विखुरणें तिच्या पोटांत, तिच्या आधारानें झालेलें असतें. तिच्या शक्ती विखुरल्यासारख्या दिसतात, पण हें विखुरणें वस्तुत: एक प्रकारचें नियमबद्ध वांटप असतें; हें पृष्ठगत क्षेत्रांतील ''विखुरणें'' (दर्शनी विखुरणें) जें घडतें, तें पृष्ठाखालीं जाणिवेनें स्वेच्छेनें, एकाग्रतेनें स्वत:चें जें केन्द्रीकरण केलेलें असतें, त्या केन्द्रीकरणाच्या आधारानें घडतें, घडणें शक्य होतें. एकमात्र विषयी अथवा एकमात्र विषय, एकमात्र अस्तित्व-कक्षा अथवा एकमात्र आंदोलन-कक्षा यांजवर अनन्य एकाग्रतेनें जाणिवेनें बैठक घेणें याचा अर्थ, ती आपल्या सर्वगामी ज्ञानाला रजा देते, असा नव्हे, तर तपाचा, जाणिवेच्या आत्मकेन्द्रीकरणाचा ''अनन्य एकाग्रता'' हा एक प्रकार असतो एवढेंच. अनन्य एकाग्रतेनें एखादा विषय (स्वत:चें एखादें रूप) जाणिवेनें व्यापला म्हणजे तिचें स्वत:संबंधीचें बाकीचें ज्ञान ती मागें ठेवते; एकाग्रतेच्या विषयाखेरीज बाकीच्या गोष्टी जाणिवेला दिसत असून त्या तिला दिसत नाहींत अशाप्रकारें ती वागू शकते; अर्थात् अशी स्थिति असेल तेथें अज्ञान आहे असें मात्र आम्ही म्हणूं शकत नाहीं. जाणिवेनें अनन्य एकाग्रतेनें आपल्याभोंवतीं भिंत उभी केली, आणि स्वत:च्या आंदोलनांतील एका क्षेत्रांत, निवासांत कोंडून घेतलें, आणि या बंदीमुळें (या भिंतीमुळें)

पान क्र. ५०७

 

विश्वाचीं बाकीचीं क्षेत्रें, निवास आपल्याबाहेर आहे असा प्रत्यय तिला येऊं लागला म्हणजे तेथें स्वतःला मर्यादित करून काम करण्याचें तत्त्व जाणिवेनें स्वीकारलें असें म्हणतां येतें. या मर्यादातत्त्वांतून भेदनिष्ठ ज्ञान निघूं शकतें, आणि त्यांतूनच क्रमश: अज्ञान, परिणामकारक निखालस अज्ञान, भेदनिष्ठ ज्ञानाचा कळस म्हणून उदयास येऊं शकतें.

      मनोमय मनुष्याचे ठिकाणीं जाणिवेची अनन्य एकाग्रता कशा प्रकारची असते हें पाहिल्यास मर्यादातत्त्व आणि त्याचें व्यावहारिक परिणाम यांसंबंधानें आपल्याला कांहीं कल्पना येऊं शकेल. प्रथम ही गोष्ट नमूद करणें अवश्य आहे कीं, ''मनुष्य'' या शब्दानें मनुष्याचा जो भाग सामान्यतः दाखविला जातो तो त्याचा आंतर आत्मा नव्हे. त्याच्या जाणिवेची आणि शक्तीची एकीकृत भूत-वर्तमान-भविष्यकालीन दृश्य अखंड हालचाल ही सामान्यत: ''मनुष्य'' या शब्दानें दाखविली जाते. ही त्याची शक्ति  (आणि जाणीव) त्याचीं सर्व कामें करते, त्याचे सर्व विचार प्रसवते, भावना अनुभवते, असें आपणांस बाह्यत: दिसतें; ही त्याची कार्यकारी जाणीवयुक्त शक्ति हा, त्याच्या कालांकित अशा आंतर व बाह्य क्रियांच्या प्रवाहावर एकाग्र झालेल्या त्याच्या जाणीवशक्तीचा व्यापार असतो. या कालांकित शक्तिकार्यप्रवाहाच्या पाठीमागें त्याच्या जाणिवेचा सागर असतो. या सागराला बाहेरच्या प्रवाहाची पूर्ण माहिती असते; मात्र त्या प्रवाहाला सागराची ओळख नसते. पृष्ठगत शक्ति व तिचें सर्व कालांकित दृश्य कार्य हें अदृश्य असलेल्या शक्तीच्या सांठ्यांतून निवडून बाहेर दृश्यांत फेंकलेलें असतें. या बाहेर पाठविलेल्या शक्तीखेरीज बाकी सर्व शक्ति (जाणीवशक्ति) तिच्या पाठीमागें अदृश्य सागरासारखी पसरलेली असते. आंतर आत्मा, अतिचेतन, अवचेतन, आंतरचेतन आणि परिचेतन अस्तित्व (पुरुष) आणि या सर्वांना एकत्र बांधणारा चैत्य पुरुष किंवा खरा आत्मा (जीवात्मा) मिळून जाणिवेचा उपरिनिर्दिष्ट अदृश्य सागर होतो. या सागरांतून वर बाहेर आलेला शक्तिप्रवाह म्हणजे प्रकृतींतील पृष्ठगत बाह्य मनुष्य होय. त्यानें आपली जाणिवेची क्रियाशील शक्ति (तप) बाह्य क्षेत्रांत बाह्य कार्यांच्या विशिष्ट समूहावर अंशत: केन्द्रित केलेली असते; या बाह्यकेन्द्रित अंशाखेरीज बाकीची शक्ति तो मागें राखून ठेवतो. त्याला या शेष शक्तीचा प्रत्यय येत नाहीं, कारण तो बाह्य व्यापारांत मग्न होत असतो. बाह्यतः साकार न झालेलें त्याचें जाणीवयुक्त अस्तित्व जें असतें, तेथें त्या शेष शक्तीचा प्रत्यय अंधुकपणें तरी त्याला येत असला

पान क्र. ५०८

 

पाहिजे. अंतरंगांत, खोल ठिकाणीं त्याला स्वतःविषयीचें अज्ञान नसतें; वर जो पृष्ठगत व्यवहार त्याला करावयाचा असतो त्या व्यवहारासाठीं व त्या व्यवहाराच्या व्यापांत, त्याला स्वतःचा विसर मात्र पडतो; स्वतःच्या विशालत्वाचा विसर पडतो, खऱ्या स्वत्वाचा (गुप्त शक्तिसागराचा) विसर पडतो. पण हें लक्षांत घेणें अवश्य आहे कीं, बाहेर जें कार्य घडत असतें तें देखील, बाह्य शक्तिप्रवाह स्वतःच्या बळावर करीत नसून, तें कार्य वस्तुत: गुप्त शक्तिसागरच करीत असतो. बाह्य कार्याचा उगम त्या सागरांतून होत असतो; त्यानें वर केलेली बाह्य जाणीव-लहरी कांहीं बाह्य कार्य उभारीत नाहीं. कार्यमग्न, कार्यांतच जीवन जगणारी, कार्याखेरीज दुसरें कांहीं पाहण्यास असमर्थ झालेली अशी ही बाह्य-लहरी बाह्य कार्यासंबंधानें वेगळा विचार करीत असेल, (मी हें कार्य करते असा विचार करीत असेल) तर करो पण सत्य कांहीं त्या विचारांत नसतें. सत्य हें असतें कीं, अदृश्य शक्तिसागर, खरा आत्मा, पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्व, अस्तित्वाची पूर्ण शक्ति हीच आंतील व बाहेरील सर्व कार्य करीत असते आणि हें सर्व जाणिवेनें करीत असते; तिचे ठिकाणीं अज्ञान मुळींहि नसतें. वरच्या लहरीसंबंधानें ही गोष्ट सांगणें अवश्य आहे कीं, तिला आंतील सागरासंबंधानें अज्ञान असलें, तरी हें अज्ञान अनिवार्य नसतें. तिच्या अंतरांत सर्व सागर असतोच; पूर्ण जाणीव बाजूला ठेवून ती आपलें काम करीत असते. त्या कामांत गढून जाऊन ती पूर्ण जाणिवेला पाठमोरी होत असते; व्यवहारापुरता, व्यवहारासाठीं हा तिचा विसर असतो. हा विसर, हें आत्मविषयक अज्ञान तिच्या ठिकाणीं स्वाभाविक बंधनकारक असें नसतें; तिच्या अनन्य एकाग्रतेचें स्वरूप या प्रमाणें पारमार्थिक (खरी) आत्मविस्मृति नसून, व्यवहारापुरती आत्मविस्मृति हें असतें; पण या आत्मविस्मृतीनें अज्ञान जन्माला येतें हें मात्र खरें.

      मनुष्य म्हणजे जाणिवेची आणि शक्तीची एकीकृत भूतवर्तमानभविष्यकालीन अखंड दृश्य हालचाल होय, असें आपण सामान्यत: समजतो, असें वर सांगितलें; आणि या बाह्य मनुष्याच्या आंतरस्वरूपाची, गुप्तशक्तिसागराची थोडीशी कल्पना वर दिली. आतां, या (बाह्य) मनुष्याची भूतवर्तमानभविष्यसंबंधीं स्थिति सांगावयाची आहे. मनुष्य हा वस्तुत: कालांकित जाणीवयुक्त शक्तीचा (तपाचा) अखंड व अविभाज्य प्रवाह असतो; तो वर्तमानांत जो व्यवहार करतो, तो व्यवहार करण्याची पात्रता भूतकालांतील त्यानें केलेल्या व्यवहारांतून त्याला लाभत असते;

पान क्र. ५०९

 

त्याचा भूतकालीन व्यवहार आणि वर्तमानकालीन व्यवहार, त्याचें भविष्य निश्चित करीत असतो; अशी वस्तुस्थिति असतां, तो वर्तमान क्षणांतच मग्न होऊन जगत असतो, क्षणांतून क्षणाकडे तो प्रवास करीत असतो. त्याचें भविष्य त्याच्या पृष्ठगत जाणिवेला अज्ञात असतें, त्याचें भूतकालीन अस्तित्वहि, स्मृतींतून काय थोडें ज्ञात होत असेल तेवढें खेरीज करून, त्याला अज्ञातच असतें. भूतकालीन अस्तित्व अंशत: त्याच्या स्मृतिगत ज्ञानाचा विषय होत असलें, तरी त्या भूतकालांत तो जीवन जगूं शकत नाहीं; स्मृतीनें त्याच्या पुढें केलेलें त्याचें भूतकालीन जीवन हें, वास्तविक जीवन नसून त्या जीवनाचें काल्पनिक छायाचित्र असतें; त्याचें भूतकालीन वास्तविक जीवन त्याच्या दृष्टीनें अस्तित्वांतून नाहींसें झालेलें, मरण पावलेलें असतें. पण त्याच्या पृष्ठगत अज्ञानग्रस्त जाणिवेपुरतें हें मरण असतें; त्याची खरी जाणीव, जी आंत असते तिला त्याचा भूतकालीन व्यवहार नष्ट झालेला असत नाहीं; आंतर जाणिवेला तो स्पष्ट दिसत असतो. भूतकालीन जीवन त्या जाणिवेनें धरून, संग्रह करून ठेवलेलें असतें; तिच्या क्षेत्रांत तें जिवंत असतें, कार्यकारी असतें; त्या जीवनाचीं फळें तयार असतात, तयार होत असतात; आंतर जाणीव बाह्य जाणिवेला मधून मधून स्मरणाच्या द्वारां हें भूतकालीन जीवन परिचित करून देते; शिवाय मनुष्याच्या भूतकालीन कर्माचीं, त्यानें गति दिलेल्या भूतकालीन कारणपरंपरेचीं फळें, त्याच्या भूतकालीन जीवनाचीं फळें आंत तयार असतात, किंवा होतात, तीं फळें आंतर जाणीव त्याला वरतीं वेळोवेळीं पाठवीत असते; आंतर जाणीव, भूतकालीन जीवन स्मृतिरूपानें वर पाठवून शिवाय फलरूपानेंहि तें वर पाठवीत असते. कर्मसिद्धान्तांतील कर्माचें तात्विक तर्कशुद्ध स्पष्टीकरण मनुष्याच्या आदर जाणिवेच्या उपरिनिर्दिष्ट व्यवहारांत मिळतें. ज्याप्रमाणें भूतकालीन जीवन आंतर जाणिवेला ''जिवंत'' असतें, त्याप्रमाणें भविष्यकालीन जीवनहि तिला ''जिवंत'' असूं शकतें, तिला भविष्याचें स्पष्ट ज्ञान असूं शकतें. आंतर पुरुषाचे ठिकाणीं कोठेंतरी असें ज्ञानक्षेत्र असतें कीं जेथें भविष्यविषयक ज्ञान येऊं शकतें. मागें पाहण्याची शक्ति जशी त्याला असते, तशी पुढें पाहण्याची शक्तिहि त्याला असते; तिन्ही कालांत अविभाज्यपणें, अखंडपणें जीवन जगणारें असें कांहीं तरी आंतरपुरुषांत असतें. या तीन कालांचें दर्शनी विभाग सर्व त्या पुरुषांशांत अविभक्तपणें दिसतात, भविष्यकालीन जीवन तेथें तयार असतें; केवल त्याचें प्रकटीकरण व्हावयाचें

पान क्र. ५१०

 

असतें, तें योग्य भविष्यकालांत होत असतें. तेव्हां मनोमय मनुष्य आंतर व्यवहार सर्व सोडून, बाह्य व्यवहारांत मग्न असतो ही एक गोष्ट व दुसरी गोष्ट ही कीं, तो बाह्य व्यवहारांपैकीं केवळ वर्तमानकालीन व्यवहारावर आपलें सर्व लक्ष केन्द्रित करून असतो. हें दोन प्रकारचें अनन्य केन्द्रीकरण मनुष्याचे ठिकाणीं आपणांस अनुभवयास मिळतें. पहिल्या केन्द्रीकरणानें घडून येणाऱ्या जाणिवेच्या, पुरुषाच्या मर्यादितपणांत दुसऱ्या केन्द्रीकरणानें भर पडते; पण त्यामुळें एक गोष्ट सोयीची होते ती ही कीं, पुरुष जें कार्य करतो त्याचा क्रम, दर्शनी क्रम सोपा होतो; कारण त्याचा संबंध कालाच्या अनंत प्रवाहाशीं राहत नसून, निश्चित अशा क्रमवारीनें येणाऱ्या व निघून जाणाऱ्या क्षणांशीं येतो.

      तेव्हां मनुष्याची पृष्ठगत जाणीव घेतली, तर मनुष्य क्रियादृष्टीनें, व्यवहारदृष्टीनें वर्तमानक्षणवर्ती मनुष्य असतो; तो भूतवर्ती नसतो, भविष्यवर्तीहि नसतो. भूतवर्ती मनुष्य या दृष्टीनें तो नष्ट झालेला असतो, भविष्यवर्ती या दृष्टीनें तो अस्तित्वांत यावयाचा असतो, आलेला नसतो; आपल्या भूतवर्ती अंश-मनुष्याबरोबर वर्तमानवर्ती मनुष्य स्मृतीनें संबंध जोडतो, आपल्या भविष्यवर्ती अंश-मनुष्याबरोबर तो अपेक्षेनें, आशेनें संबंध जोडतो; तिन्हीं कालांत अखंडपणें राहणारी अशी ''मी'' संवेदना त्याचे ठिकाणीं असते; पण ही संवेदना मानसिक केन्द्रीकरणनिष्ठ रचना असते; ज्यांत भूत, वर्तमान, भविष्य अस्तित्व समाविष्ट आहे असें, तात्विक, मूलभूत किंवा विस्तारित अस्तित्व, असें कांहीं ''मी'' चें स्वरूप नसतें. मी-च्या पाठीमागें असा विशाल आत्मा असल्याची अंतःस्फूर्त जाणीव मनुष्याचे ठिकाणीं असते. पण हा आत्मा मनुष्याच्या बाह्य क्षणवर्ती अस्तित्वाच्या खालीं, खोल ठिकाणीं एकरूप असा असतो; आणि ''मी'' च्या रूपान्तरांनीं त्या आत्म्याच्या स्वरूपांत कांहीं कमीअधिक होत नाहीं. क्षणवर्ती अस्तित्व हें मनुष्याचें खरें पूर्ण अस्तित्व नसतें; पृष्ठगत जीवनाच्या व्यवहारासाठीं व या जीवनाच्या मर्यादेंतच त्याचें व्यावहारिक महत्त्व असतें; तें क्षणवर्ती अस्तित्व सत्य असतें, पण बाकी अस्तित्वाच्या अज्ञानामुळें तें मर्यादित आणि विकृत होऊं शकतें; मनुष्याचें जाणीवयुक्त अस्तित्व, जीवन त्याचें जें पूर्ण खरें अस्तित्व असतें त्याला धरून चालविलें जात नाहीं; कारण या अस्तित्वाची त्याला (पृष्ठवर्ती क्षणवर्ती मनुष्याला) जाणीवहि नसते; त्याचें जीवन तो चालवितो तें अर्धे खरें, अर्धे खोटें ज्ञान, अर्थात् अज्ञान त्याला सांगेल तसें तो चालवितो. तथापि, त्याचा

पान क्र. ५११

 

खरा आत्मा त्याच्या पाठीमागें राहून सर्व कांहीं ठरवितो आणि नियंत्रित करतो; अशी वस्तुस्थिति असल्यानें, ज्ञान हेंच त्याच्या साकार जीवनाचा आकार निश्चित करीत असतें, असें म्हटलें पाहिजे. पृष्ठगत अज्ञान काय जें करतें तें एवढेंच कीं, त्याच्या जीवनाला आवश्यक अशी मर्यादा घालणारी बाह्य रेखा ठरवितें, आंखतें, आणि त्याच्या प्रस्तुत मानवी आयुष्यक्रमाला आणि त्याच्या प्रस्तुत क्षणाला अवश्य असा बाह्य रंग आणि वळण त्याच्या जाणिवेला आणि कृतीला ज्या गोष्टी देऊं शकतील अशा गोष्टी पुरवितें. जाणिवेचें अनन्य केन्द्रीकरण मनुष्याला बाह्य व्यवहारांत कोंडतें, बाह्य व्यवहारांतील केवळ क्षणवर्ती व्यवहारांत कोंडतें, त्याप्रमाणें तें त्याला प्रस्तुत जन्मांतील नांवांत (गुणांत) आणि आकारांत कोंडतें; प्रस्तुत जन्मापूर्वींचें त्याचें भूतकालीन जीवन त्याला अज्ञात असतें, प्रस्तुत जन्मानंतरचें भविष्यकालीन जीवनहि त्याला अज्ञात असतें; तथापि त्याच्या अंतरंगांत जी पूर्ण जाणीव उपस्थित असते, ती सर्व कांहीं स्वतःचे ठिकाणी संभाळून असते; तो जें कांहीं विसरतो, तें सर्व त्या आंतर जाणिवेंत ''जिवंत'' असतें; परिणामकारक अवस्थेंत हजर असतें.

      पृष्ठगत जाणिवेचें अनन्य केन्द्रीकरण व्यवहारतः सामान्य बाबतींतहिं कसें उपयोगी असतें आणि त्याचें स्वरूप व फळ काय असतें, तें अल्पकालीन केन्द्रीकरणाचीं उदाहरणें पाहिलीं असतांहि समजून येईल. बाह्य मनुष्य क्षणवर्ती जीवन जगत असतां प्रस्तुत जीवनांत अनेक भूमिका घेत असतो; यांपैकीं कोणतीहि एक भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेवर तो आपलें सर्व बळ, चित्त केन्द्रित करूं शकतो; या केन्द्रीकरणांत तो आपली त्या भूमिकेखेरीज बाकी भूमिका करण्याची पात्रता निखालस बाजूला ठेवतो, विसरतो; या विस्मृतीच्या प्रमाणांत त्याला आत्मविस्मृति होत असते. क्षणापुरता तो नट होतो, कवि होतो, सैनिक होतो, त्याच्या अस्तित्वशक्तींतील वैशिष्टयानें त्याला काय बनविलें असेल तें होतो; आणि या भूमिकेंतील त्याचें यश जाणिवेच्या केन्द्रीकरणावरच अवलंबून असतें; त्या भूमिकेवर जितक्या प्रमाणांत तो आपलें बाकीचें शक्तिसर्वस्व विसरेल, तितक्या प्रमाणांत त्याची भूमिका यशस्वी होत असतें; पण वस्तुस्थिति काय असते ? मनुष्याचा कोणताहि एकच अंश कोणतीहि भूमिका घेत नाहीं किंवा वठवीत नाहीं. सगळा मनुष्य प्रत्येक भूमिका घेतो व वठवितो; मनुष्य जें काम करतो तें काम, तें काम करण्याचा त्याचा मार्ग, तें काम करण्यांत जे गुण त्यानें प्रकट केलेले असतात ते गुण, त्या

पान क्र. ५१२

 

कामाला जे खास रूप तो देतो तें रूप, हें सर्व कशावर अवलंबून असतें ? त्याचें एकंदर शील आणि स्वभाव, त्याचें मन, त्याची माहिती, त्याची प्रतिभा या सर्व गोष्टींवर तो कोणतें काम अंगावर घेईल, तें कशाप्रकारें करील वगैरे सर्व अवलंबून असतें; आणि हें त्याचें शील व स्वभाव, त्याचें मन वगैरे कोठून येतें ? अर्थात् त्याच्या भूतकालीन जीवनांतून; या जन्मांतीलच केवळ नव्हे, तर अन्य जन्मांतीलहि त्याच्या भूतकालीन जीवनांतून. आतां, आणखीहि थोडें पुढे गेलें पाहिजे. ज्याप्रमाणें त्याचें भूतकालीन जीवन त्याचा स्वभाव वगैरे बनवीत असतें, त्याप्रमाणें तो स्वभाव वगैरे घडण्यांत त्याचें वर्तमानकालीन जीवन आणि त्याचें नियत भविष्यकालीन जीवनहि भाग घेत असतें; एवढेंच नव्हे, तर सर्व जगाचें भूतकालीन, वर्तमानकालीन आणि नियत भविष्यकालीन जीवन देखील त्याचा स्वभाव वगैरे घडण्यांत भाग घेत असतें, त्याचें काम कोणतें तें ठरवीत असतें, तें तो कसें करील वगैरे सर्व ठरवीत असतें. नट, कवि, सैनिक हा जो विशिष्ट प्रसंगीं एकाद्या मनुष्यांतून बाहेर प्रकट होतो, तो त्याच्या तपाचें, जाणिवेच्या अनन्य व भेदनिष्ठ एकाग्रतेचें, केन्द्रीकरणाचें फळ म्हणून प्रकट होतो; त्याच्या अस्तित्वाची शक्ति विशिष्ट क्रियेकरितां संघटित केली गेली आहे, असा त्याच्या प्रासंगिक नट वगैरे भूमिकांचा अर्थ असतो -- हें भेदनिष्ठ शक्तिसंघटन, आणि विशिष्ट भूमिका करतांना स्वत:ला विसरून जाणें हा कांहीं जाणिवेचा दुबळेपणा, दोष नसतो, ती जाणिवेची एक थोर शक्ति असते; नट वगैरे भूमिका करतांना मनुष्य त्या विशिष्ट भूमिकेशीं सर्वथा समरस होऊन आपलें बाकीचें सर्व अस्तित्व विसरत असला, तरी तें अस्तित्व सर्व काळ प्रकट भूमिकेच्या मागें सर्वच्या सर्व उपस्थित असतें; चालूं भूमिकेंतहि तें असतें आणि भूमिका वठविण्याच्या कामांत भाग घेत असतें. विशिष्ट भूमिका करतांना स्वत:ला विसरणें आणि बाह्य मनुष्यानें बाह्य व्यापारांत मग्न होऊन आंतर मनुष्याला विसरणें, या दोन गोष्टींत एवढाच फरक आहे कीं, भूमिकेच्या बाबतींत भेदाची भिंत पातळ असून फार काळ टिकणारी नसते; भूमिकेच्या बाबतींत मनाला आपलें केन्द्रीकरण केव्हांहि थांबवितां येतें, दूर करतां येतें आणि आपली विशाल जाणीव केव्हांहि चटकन् परत आपलीशी करतां येते; पण बाह्य व्यापारांत मग्न झालेला मनुष्य, त्याच्या आंत असलेल्या त्याच्या खऱ्या स्वरूपाला आपल्या इच्छेनुसार केव्हांहि चटकन् आपलें करूं शकत नाहीं; हा दोहोंत फरक आहे. पृष्ठगत, दर्शनी, बाह्य मनुष्याला

पान क्र. ५१३

 

विशिष्ट बाधा झाली किंवा त्याच्या अतिमानसिक पातळींतून त्याच्या मनावर कांहीं असामान्य संस्कार झाला, अर्थात् त्याचें मन कोणत्याहि कारणानें अपवादात्मक स्थितींत गेलें किंवा त्यानें दीर्घकाळपर्यंत कठोर साधना केली, आत्म्याची खोली, उंची, व्यापकता वाढावी, खूप मोठी व्हावी ह्यासाठीं त्यानें कठोर प्रदीर्घ साधना केली, तर या साधनेचें फळ म्हणून त्याला आपलें खरें स्वरूप आपलेंसें करतां येतें. अर्थांतच साधनेचें फळ दीर्घकाळ टिकणारें, कमीअधिक कायमचें टिकणारें आणि अपवादात्मक स्थितींतल्यापेक्षां पुष्कळ अधिक पूर्ण असतें हें सांगावयास नको. अपवादात्मक मानसिक स्थितींतला, स्व-स्वरूप-प्रवेश अल्पकाळ टिकणारा आणि अंशमात्र असतो. तें कांहीं असलें, तरी महत्त्वाची गोष्ट ही कीं, बाह्य मनुष्य आंत जाऊन आपलें खरें स्वरूप प्राप्त करून घेऊं शकतो : नटादि भूमिका काय, किंवा बाह्य पुरुषाची ''भूमिका'' काय, दोन्हीं ठिकाणीं अनन्य एकाग्रता किंवा केन्द्रीकरण हेंच त्या भूमिकांच्या मुळाशीं असतें.

      आपल्या महान् आत्म्याचा एक विशिष्ट व्यवहार घेऊन त्या व्यवहारावर एकाग्रतेनें आपली सर्वशक्ति केन्द्रित करणें, ही क्रिया पूर्ण आत्मविस्मृतीच्या दशेपर्यंत नेतां येते. नट हा राम, रावण इत्यादि भूमिका करतांना स्वत:ला सर्वथा विसरूं शकतो. राम रावणादिकांचा स्वभाव, त्यांची विशिष्ट करणी यांच्याशीं तो पूर्ण तादात्म्य पावूं शकतो : कवि स्वत:ला सर्वथा विसरून, त्याचे ठिकाणीं काम करणाऱ्या संस्फूर्त निर्व्यक्तिक प्रतिभाशक्तीशीं एकरूप होऊन, अंतरांतील शब्द, नाद, ताल यांना साकार करण्यांत तन्मय होऊं शकतो; सैनिक स्वत:ला सर्वथा विसरून रणधुमाळींतील चढाई, लढाई, कापाकापी, गोळागोळी या क्रियांशीं, चौफेर हत्या करण्याच्या आपल्या कर्तव्याशीं पूर्ण तादात्म्य पावूं शकतो. भूमिकांची ही कथा झाली. अनैच्छिक विकारांची गोष्ट अशीच आहे -- अतिशय क्रोधाच्या कह्यांत गेलेला मनुष्य स्वत:ला सर्वथा विसरतो, तो क्रोधरूप होतो; क्रोधरूप झाला असतां तो स्वत:च्या दुसऱ्या अनेक विकारांना, विकारनियंत्रणाच्या स्वत:च्या शक्तीला, स्वत:ला मार्गदर्शन करण्याऱ्या स्वत:च्या शक्तीला, स्वत:च्या इतर सर्व अस्तित्वाला सर्वथा पारखा होतो. पण हें सर्व विसरणें तात्पुरतें असतें : नट, कवि, सैनिक, तसाच क्रोधादि विकारमय झालेला मनुष्य आपल्या भूमिकेतून, विकारांतून कमीअधिक वेळानें बाहेर येतोच येतो : साधारण मनाचा व्यापार, त्याची

पान क्र. ५१४

 

आत्मविस्मृति, ही अवस्था कितीहि पूर्ण असली तरी ती, फार वेळ टिकूं देत नाहीं; भूमिकेच्या किंवा विकाराच्या कोंडींतून आत्मविस्मृत मनुष्याला बाहेर काढून त्याची विशाल जाणीव त्याला परत भेटविण्याचें काम मानवी मन स्वभावत: करीत असतें; या कामाला केव्हां कमी वेळ लागतो, तर केव्हां अधिक वेळ लागतो, इतकेंच.

      मनुष्याच्या मर्यादित जाणिवेंत अनन्य एकाग्रतेनें जी आत्मविस्मृति घडून येते ती अल्पकालीन असते व असणार; परंतु अमर्याद, विशाल, विश्वव्यापी जाणिवेची गोष्ट वेगळी आहे. तिच्या ठिकाणीं एकाग्रतेची व तन्निमित्त होणाऱ्या आत्मविस्मृतीची स्थिति पराकोटीला नेण्याची शक्ति सहाजिकच असते; ही पराकोटीची आत्मविस्मृति मानवी नेणिवेंत होऊं शकत नाहीं. मानवी नेणीव टिकाऊ नसते; जागृत जाणीवयुक्त अस्तित्व, मानवी नेणीवयुक्त अस्तित्वाच्या मागून लवकरच हजर होतें; मनुष्य हा स्वभावत: आणि सामान्यत: जागृतीच्या जाणिवेचा उपयोग करणारा असतो आणि ही स्वाभाविक जागृति त्याला त्याच्या नेणिवेच्या अवस्थेंतून लवकरच बाहेर काढीत असते. पराकोटीची एकाग्रतानिमित आत्मविस्मृति भौतिक निसर्गाच्या अचेतनतेंत प्रत्ययास येते. ही अचेतनता खरी अचेतनता नसते; आमच्या अल्पकालीन अस्तित्वांत, आमच्या जागृत जाणिवेवर, अनन्य एकाग्रतेनें जें अज्ञानाचें आवरण पडतें, त्या आवरणासारखेंच या अचेतनतेचें आवरण असतें. परमाणु, धातु, वनस्पति, भौतिक निसर्गांतील कोणताहि साकार पदार्थ, भौतिक निसर्गांतील कोणतीहि शक्ति यांच्या पोटीं, आमच्या अंतरंगांत असतो तसा, गूढ आत्मा असतो, गूढ इच्छाशक्ति असते, गूढ बुद्धि असते. आमचा किंवा परमाणु धातु आदिकांचा मूळ आकार, आत्मविस्मृतींत मग्न असा दिसला आणि असला, तरी त्या आमच्या वा परमाणु आदिकांच्या आकाराच्या पोटीं, अंतरंगांत लपलेला गुप्त आत्मा, इच्छाशक्ति, बुद्धि काम करीत असते; उपनिषदांत, सर्व वस्तूंच्या पोटीं, नेणीवयुक्त वस्तूंच्या पोटींहि, चेतन पुरुष अर्थात् इच्छा-बुद्धियुक्त आत्मा असतो, असें म्हटलें आहे; हा पुरुष सर्वत्र गुप्त राहून काम करीत नसता, त्याची जाणीवशक्ति वस्तूंचें अंतरंग व्यापून तप (एकाग्रतायुक्त कार्य) करीत नसती, तर निसर्गांतील कोणतेंहि कार्य घडून आलें नसतें; घडून येणें अशक्य होतें. निसर्गांत अचेतन, नेणीवयुक्त अशी वस्तु म्हणजे प्रकृति असते; प्रकृतीची शक्ति आकारबांधणीचें, गतीचें कार्य करीत असते. ती अचेतन असते, ती आपल्या

पान क्र. ५१५

 

कार्याशीं एकरूप झालेली असते, एकाग्रतेच्या समाधींत किंवा तंद्रींत असते. प्रकृति आकारांत बंद आहे तोपर्यंत तिचा खरा आत्मा जो पुरुष (पूर्ण जाणीवयुक्त अस्तित्व आणि या अस्तित्वाची पूर्ण शक्ति) तो आत्मा, या प्रकृतीला दूर असतो, हा आत्मा तिनें मागें ठेवलेला असतो, तंद्रींत असतांना तिला त्याजकडे परत जातां येत नाहीं; कार्याच्या आनंदमय समाधींत आत्म्याला ती पार विसरून जाते. प्रकृति ही पुरुषाची कार्यकारी शक्ति; ती आपल्या अंतरंगांत पुरुषाला धरून असते. पण बाह्यतः आकाराचे ठिकाणीं ती या पुरुषाला पार विसरून असते; अचेतन होऊन बसते; अचेतनाच्या तंद्रींतून जाणीव जसजशी वर येऊं लागते तसतशी क्रमश: प्रकृतीला पुरुषाची जाणीव होऊं लागते. प्रकृति पुरुषासाठीं आकार बनविते, हे आकार पुरुष स्वखुषीनें मान्य करून धारण करीत असतो. प्रकृतीच्या तंत्रानें वागून पुरुष अचेतनाचा आकार, स्थूल भौतिक अस्तित्वाचा आकार, प्राणमय अस्तित्वाचा आकार, मनोमय अस्तित्वाचा आकार धारण करीत असतो. पण ही त्याची दर्शनीं रूपें असतात; या सर्व रूपांत वावरतांना पुरुष वस्तुत: आपलें खरें पूर्ण प्रकाशमय स्वरूप बाळगून असतो; अचेतन स्वरूपांतील प्रकृतीचें कार्य असो, किंवा क्रमश: वाढती जाणीव असलेल्या रूपांतील प्रकृतीचें कार्य असो, प्रकृतीच्या पोटांत गुप्त असलेल्या पूर्ण जाणिवेच्या पुरुषाचा या कार्याला आधार असतो; त्याच्या प्रकाशानें सर्व रूपांतील सर्व कार्य चाललेलें असतें.

      भौतिक निसर्गाची अचेतनता वरकरणी असते; जागृत मानवी मन कोणत्याहि विषयावर एकाग्र झालें असतां, त्याला वरकरणी इतर-विषयक अज्ञान व्यापतें, किंवा मनुष्याच्या झोंपलेल्या मनाला वरकरणी अचेतनता किंवा अवचेतनता व्यापते, पण आंत सर्वज्ञ पुरुष असतो; तद्‌वत् निसर्गांतील अचेतनता असते. तिच्या पोटीं सर्वज्ञ पुरुष असतो; अचेतनता ही सर्वथा दर्शनी रूपात्मक वस्तु असते; मात्र ती पूर्ण असते, अचेतनतेचा देखावा तेथें निर्दोष असतो. हा देखावा इतका पूर्ण आणि निर्दोष असतो कीं, अचेतन अशा जड भौतिकांत प्रकृतीला तिचा आत्मा (पुरुष) केव्हांहि भेटूं शकत नाहीं. विकासशील जाणीव अचेतनांतून दुसरे आकार तयार करते, या आकारांत अचेतनतेची क्रियापद्धति सैल केली जाते, तेव्हां मग प्रकृति या आकारांच्या द्वारां पुरुषाला हळूं हळूं अधिकाधिक प्रमाणांत ओळखूं लागते : अर्थात् तिची क्रियापद्धति अधिकाधिक जाणीवयुक्त होऊं लागते. जाणीव आणि शक्ति पूर्णतया अलग झाल्यानें

पान क्र. ५१६

 

अचेतनता निर्माण होते. शक्ति मूलत: जाणीवयुक्तच असते, पण कार्याचे ठिकाणीं तिच्या एकाग्र केन्द्रिततेची परमावधि झाली, म्हणजे ती जाणिवेपासून विभक्त होते. आंत जाणीव, बाहेर शक्ति किंवा शक्तिकार्यरूप आकार, अशी व्यवस्था होते. या पूर्ण अचेतनतेंतून मग चेतनतेचा क्रमश: विकास होऊं लागतो. आंतली जाणीव (म्हणजे पुरुष) आपल्या इच्छेनें अचेतनाच्या पायावर सचेतन आकारांची उभारणी करतो. प्रकृति म्हणजे पुरुषाची शक्ति. ही प्रकृति अचेतनांतून जाणिवेला, म्हणजे पुरुषाला पूर्णपणें पारखी होते, विसरते. पुढें विकासशील जाणिवेच्या, म्हणजे पुरुषाच्या प्रेरणेनें अचेतनाच्या पायावर सचेतन आकारांची बांधणी सुरू झाली कीं प्रकृति क्रमश: अधिकाधिक जाणीवयुक्त होत जाते. मनुष्येतर प्राण्यांचे ठिकाणीं ती थोडीशी जाणीवयुक्त होते, मनुष्य चांगला प्रगत झाला म्हणजे त्याचे ठिकाणीं पृष्ठगत विभागांत खरें जाणीवयुक्त कार्य ती करूं लागते. मुख्य लक्षांत ठेवण्याची गोष्ट ही कीं, जाणिवेच्या बाह्य एकाग्रतेनें अज्ञानांकित झालेला पृष्ठगत मनुष्य आणि खरा आंतर मनुष्य हे जसे अविभक्त असतात, पण विभक्त दिसतात, तशीच गोष्ट अचेतन प्रकृति आणि पुरुष (जाणीव) यांची असते : तत्त्वत: विश्वाच्या व्यवस्थेंत भौतिक निसर्गाची अचेतनता ही जाणिवेच्या एकाग्रतेचें, अनन्य एकाग्रतेचेंच एक रूप आहे; जागृत मन एकाग्रतेनें एखाद्या कार्यांत मग्न होऊन जसें स्वतःला मर्यादित करतें, तशीच गोष्ट अचेतनतेच्या बाबतींत घडत असते; एवढेंच कीं स्वतःला मर्यादा घालण्याचें कार्य अचेतनतेच्या बाबतींत जाणिवेनें पराकोटीला नेलेलें असतें; या पराकोटीच्या मर्यादित जाणिवेच्या अवस्थेंत आत्मविस्मृति देखील पराकोटीला जाते; ती मग तात्कालिक किंवा अल्पकालीन राहत नाहीं, तर निसर्गाच्या क्रियेचा नियम बनते. अर्थात् नेणीव किंवा अचेतनता ही भौतिक निसर्गांत जाणिवेच्या ठिकाणीं पूर्ण आत्मविस्मृति, आत्मज्ञानाचा पूर्ण अभाव या स्वरूपाची असते. मनुष्यांत थोडेसें ज्ञान व पुष्कळसें अज्ञान असतें तें जाणिवेचें आत्मविषयक अज्ञान कमी झाल्याचें द्योतक असतें; विकासक्रमांत जाणीव पूर्ण आत्मज्ञानाकडे वाटचाल करीत असते, या वाटचालींत मनुष्याचें अज्ञानयुक्त अल्प आत्मज्ञान हा एक टप्पा असतो; पण भौतिक निसर्गाचें पूर्ण अज्ञान मनुष्याचें अपूर्ण अज्ञान या दोन्हीचें कारण तपासतां, जाणीवयुक्त शक्तीची आत्मविस्मृतियुक्त अनन्य एकाग्रता हेंच तें कारण दिसतें; ही एकाग्रता पृष्ठगत असते आणि एका विशिष्ट व्यापारावर किंवा व्यापारकक्षेवर

पान क्र. ५१७

 

जाणीव एकाग्र झालेली असते : अर्थात् हा व्यापार किंवा ही व्यापारकक्षा हीच फक्त जाणिवेला दिसत असते; या व्यापाराशीं किंवा व्यापारकक्षेशीं जाणीव तद्रूप झालेली असते; ज्या व्यापारांत जाणीव केन्द्रित झाली असेल, त्या व्यापारापुरतें तिचें अज्ञान (इतर विषयक अज्ञान) परिणामकारक असतें; पण हें अज्ञान दर्शनी असतें, एकांगी असतें, पृष्ठगत असतें; तें कांहीं मौलिक असत नाहीं, पूर्ण असत नाहीं, खरें असत नाहीं. खरें असत नाहीं याचा अर्थ, पूर्णतया खरें असत नाहीं, असा घ्यावयाचा आहे; आमच्या अस्तित्वाचें पूर्ण सत्य या दर्शनी सत्यानें व्यक्त होत नाहीं, (विशिष्ट व्यापारापुरतें तें सत्यच असतें, हें वर सांगितलेंच आहे) -- एवढेंच नव्हे, तर या अज्ञानाकडे पाहतांना इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केलें, तर या अज्ञानांतील सत्यांश देखील आमच्या जाणिवेला विकृत स्वरूपांत दिसतो. अज्ञानाचें पूर्णतया खरें सत्यस्वरूप हें आहे कीं, जाणिवेनें व ज्ञानानें स्वतःला पडद्याआड लपविलें, म्हणजे जाणिवेला व ज्ञानाला नेणिवेचें (अचेतनतेचें) स्वरूप येतें. ही नेणीव, हें अज्ञान जाणिवेच्या अनन्य एकाग्रतेचें फळ असतें हें वर आलेंच आहे. पडदे बनवून स्वतःला पूर्णपणें लपविण्याची क्रिया संपतांच उलट क्रिया, पडदे दूर करून, फाडून व्यक्त होण्याची, विकासाची क्रिया सुरूं होते. पडदे बंद झालेली जाणीव व ज्ञान, विकासमार्गाला लागून पुन: आपलें मूळ पूर्ण स्वरूप परत मिळविण्याच्या मार्गाला लागतात. या विकासमार्गावरच्या, आपले पडदे दूर करूं लागलेल्या पडदेबंद जाणिवेला व ज्ञानाला आम्ही अज्ञान हें नांव देतों. हें अज्ञानाचें पूर्णतया खरें सत्यस्वरूप आहे. पडदा पांघरून जाणिवेची ही नेणीव (अचेतनता) आणि जें अज्ञान बनतें तें अज्ञान आणि ती नेणीव त्या त्या व्यवहारांत कार्यक्षम असते, हें आपण पाहिलेंच आहे.

      अज्ञानाचा मूळ स्वभाव आतां आपल्याला समजला आहे : जाणीवयुक्त शक्ति आपल्या कार्यांत मग्न होते, व आपला पूर्ण आणि खरा आत्मा विसरते, बाह्यतः विसरते; ही शक्ति मर्यादा घालणारी भेदनिष्ठ शक्ति असते; ही शक्ति कांहीं खरोखरीच भेद उत्पन्न करीत नाहीं, खरोखरीची विभागणी करीत नाहीं, केवळ दर्शनी विभागणी करते; अशी दर्शनी विभागणी व्यवहारासाठीं करणारी आणि कार्यांत मग्न होऊन आपला आत्मा, खरें स्वरूप बाह्यतः विसरणारी जाणीवयुक्त शक्ति म्हणजे अज्ञान होय. ही अज्ञानाची क्रिया कां व कोठें उद्‌भवते आणि ती कशी शक्य होते

पान क्र. ५१८

 

या प्रश्नाचा विचार आतां करावयाचा आहे. विश्वांत अज्ञान कशासाठीं व कां आहे ? त्याची आवश्यकता काय ? या प्रश्नाचें उत्तर : ब्रह्माच्या नामरूपात्मक आविष्कारासाठीं, विशिष्ट प्रकारच्या आविष्कारासाठीं आणि पूर्ण आविष्कारासाठीं, त्याचा आविष्कार जसा घडावा आणि घडला आहे तसा तो घडण्यासाठी अज्ञानाची आवश्यकता होती व आहे. अज्ञान नाना प्रकारचें आहे, अज्ञानाचा प्रत्येक प्रकार आवश्यक म्हणूनच अस्तित्वांत आला आहे; अज्ञान नसतें, तर मनुष्य आपल्या कालातीत अस्तित्वांत रमला असता. हें आपलें कालातीत अस्तित्व बाजूला राखून, ठेवून तो कालाच्या प्रवाहांत स्वखुशीने पडला आहे, ही गोष्ट अज्ञानामुळें शक्य झाली आहे. या कालप्रवाहांतील मनुष्याचें जीवन कालातीत जीवनाहून वेगळें आहे -- तें जीवन अक्षर, अपरिवर्ती आणि हें जीवन क्षणाक्षणाला परिवर्तन पावणारें, क्षर; -- अज्ञानामुळेंच मनुष्याला हें जीवन शक्य होतें. अज्ञान नसतें, तर कालातीत मनुष्य कालांकित, क्षणांकित जीवनांत उतरला नसता, उतरूं शकला नसता. जर अज्ञान नसतें, तर अतिचेतन किंवा आंतर चेतन आत्म्याच्या रूपानें त्याच्या क्षेत्रांत राहणारा मनुष्य तेथेंच राहिला असता. अज्ञानाची शक्ति नसती, तर आज त्याला जी मानसिक व्यक्तिता आहे आणि जिच्यामुळें जगाशीं नाना प्रकारचे गुंतागुंतीचे सबंध जोडणें, तोडणें त्याला भाग पडत आहे, ती व्यक्तिता व तिच्या प्रेरणेनें करावा लागणारा खटाटोप अतिचेतनाचे, आंतर चेतनेचें क्षेत्र सोडून त्यानें पत्करला नसता. अज्ञानाची शक्ति नसती, तर विश्वात्म्यांतील आपली बैठक मनुष्यानें सोडली नसती, त्याला ''मी'' ची भेदनिष्ठ जाणीव लाभली नसती, आणि ''मी'' च्या अभावी विश्वाच्या कार्यक्रमांत ''मी''नें जी भर घातली आहे ती त्याजकडून घातली गेली नसती; ''मी'' आहे म्हणून मनुष्य भेदनिष्ठ कार्य करतो, स्वत:ची स्वतंत्र व्यक्तिता दाखवितो, स्वतःला पुरुष किंवा एकच एक कार्यकेन्द्र मानून सर्व निरीक्षण आणि व्यवहार करतो. मनुष्याला कालविषयक अज्ञान, मनोविषयक अज्ञान आणि अहम् विषयक अज्ञान पांघरावें लागतें एवढ्याकरितां कीं, अनंताचा प्रकाश, विश्वात्म्याची विशालता यांची ''बाधा'' त्याला न व्हावी : ही बाधा टाळणारा अज्ञानाचा संरक्षक पडदा उभा करून तो विश्वामध्यें आपली कालांकित व्यक्तिता उभी करतो आणि संवर्धित करतो. त्याला भूतकालविषयक आणि भविष्यकालविषयक, स्वतःच्या अनंत भूतकालाचे आणि भविष्यकालाचें अज्ञान पांघरावें लागतें; एकच प्रस्तुत जन्म त्याला आहे,

पान क्र. ५१९

 

अशा प्रतीतीनें त्याला वागावें लागतें. हें अज्ञान नसेल, तर त्याला आपल्या परिसराशीं जे विशिष्ट संबंध उभे करून निभवावयाचे असतात, ते त्याला उभे करतां आले नसते, त्याचें ज्ञान, विशाल ज्ञान त्याच्या विशिष्ट भूमिकेच्या आड आलें असतें; त्याच्या कार्याचें धोरण, प्रमाण व त्याचें रूप आज जें आहे तें अज्ञानाच्या अभावीं शक्य झालें नसतें. तो मनांत वास करतो, आपलें शारीर जीवन चालविण्यांत मग्न होऊन तो मनांत आपली बैठक ठेवतो, तो अतिमानसिक क्षेत्रांत राहत नाहीं; असें तो न करता, तर अज्ञानाच्या भिंती आज ज्या त्याला ''संरक्षण'' देऊन त्याजकडून विशिष्ट कार्य करवून घेतात, त्या भिंती उभ्या करतां आल्या नसत्या किंवा त्या फार पातळ व पारदर्शक होऊन त्याचें विशिष्ट कार्य त्याजकडून घडण्याच्या आड आल्या असत्या. आज ज्या भिंती आहेत त्या मनाच्या, मर्यादा घालणाऱ्या, भेद करणाऱ्या, विभागणी करणाऱ्या शक्तीमुळें उभ्या झाल्या आहेत.

      अज्ञान, अर्थात् जाणिवेची अनन्य एकाग्रता ही कोणत्या हेतूनें अस्तित्वांत आली आहे ? कशाकरितां या अज्ञानाची आवश्यकता आहे ? गुप्त चैतन्य, प्रकृतीच्या क्षेत्रांत अज्ञान पांघरतें तें अशाकरितां कीं, एक विशिष्ट आनंद त्याला भोगतां यावा : पूर्णरूप स्वतःला विसरत विसरत पूर्णपणें स्वतःला विसरणें व नंतर स्वतःला, विस्मृतीच्या अनेक पडद्याआड दडलेल्या स्वतःला, शोधीत शोधीत स्वतःचा पूर्ण शोध लावून आपलें पूर्णरूप पुन: आपलें करणें, हा चक्री कार्यक्रम चैतन्याला विशिष्ट आनंद देणारा आहे आणि या आनंदासाठीं अज्ञानाचा (जाणिवेच्या अनन्य एकाग्रतेचा) उपयोग करून चैतन्याला हा चक्री कार्यक्रम आंखून तो पार पाडावा लागतो. विश्वाचा आविष्कार अज्ञानाच्या अभावीं मुळींच होणार नाहीं, होऊं शकणार नाहीं, अशी गोष्ट नाहीं; परंतु अज्ञानाच्या अभावी जें विश्व उभें केलें जाईल तें, आजच्या आपल्या विश्वाहून वेगळें असेल; अज्ञानाच्या अभावीं, ईश्वराच्या अस्तित्वाच्या ज्या उच्च भूमी आहेत त्या उच्चभूमींपुरती उच्च विश्वरचना होईल; जेथें विकासाचा कार्यक्रम नाहीं, अशा प्रकारचें विश्वहि अज्ञानाच्या अभावीं निर्माण होऊं शकेल; या विश्वांत प्रत्येक जीव आपल्या स्वभावांतील सर्व प्रकाश वापरून जीवन जगेल; अविकासी, म्हणजेच आपापल्या परी पूर्ण, अशा जीवांचें हें जग असेल; आमच्यासारखें विकासी जीवांचें जग असणार नाहीं. या आमच्या जगांत ज्याला आम्हीं आमचे साध्य समजतो व ज्याच्याकरितां विकासक्रमाच्या पायऱ्या चढूं इच्छितो,

पान क्र. ५२०

 

तो जीवनक्रम त्या जगांत नित्यसिद्ध जीवनक्रम असणार; या आमच्या जगांत ज्या अस्तित्वाला विकासक्रमांतील एक पायरी म्हणून आम्हीं महत्त्व देतो तें अस्तित्व, त्या जगांत कायमचें सांचेबंद अस्तित्व असणार. असो. सच्चिदानंद ईश्वर (चैतन्य, परमात्मा, पुरुषोत्तम) खालीं उतरून भौतिक अचेतनतेंत शिरला आहे; तेथील पूर्ण अज्ञान म्हणजे नेणीव, त्यानें सोंगाचें बाह्य आवरण म्हणून स्वीकारलें आहे, या आवरणांत तो स्वतःला स्वत:च्या जाणीवयुक्त शक्तीपासून लपवितो. ती शक्ति, स्वतःच्या आत्म्याला विसरून, आपलीं नियोजित कार्यें करण्यांत, रूपें घडण्यांत मग्न असते; तिला तशी मग्न ठेवून भौतिक अचेतनेच्या नेणिवेच्या पडद्याआड सच्चिदानंद लपून बसतो. हा सर्व व्यवहार सच्चिदानंद एवढ्याकरितां करतो कीं, स्वतःचें अस्तित्व आणि स्वतःचा स्वभाव यांच्या उलट जी स्थिति आहे, अर्थात् जेथें नित्यता नाहीं, चेतना नाहीं, आनंद नाहीं, अशा स्थितींत आपलें सच्चिदानंदत्व प्रस्थापित करावयाचें ही आपली लहर कार्यान्वित करतां यावी. त्याची जाणीवशक्ति जीं रूपें तयार करते, त्या रूपांत आत्मा हळूंहळूं जागा होऊं लागतो, तेथें या क्रमश: जाग्या होणाऱ्या आत्म्याला आपली अनिवार्य अवस्था म्हणून बाह्यतः अज्ञान पत्करावें लागतें. या रूपांत आरंभाला पूर्ण अचेतनता राज्य करीत असते; या अचेतनतेंतून ज्ञान हळूंहळूं क्रमाक्रमानें जागृत होऊन आत्म्याला सहकार्य देतें. या क्रमश: वाढणाऱ्या ज्ञानालाच आम्हीं अज्ञान म्हणतो : सच्चिदानंदाला विसरून त्याच्या शक्तीनें जें अचेतनाचें क्षेत्र निर्माण केलेलें असतें, त्या नव्या क्षेत्रांत, क्रमश: वाढणाऱ्या ज्ञानाच्या सहकारानें आत्म्याला आपलें मूळ स्वरूप (सच्चिदानंदत्व) पुन: शोधून काढून ओळखावयाचें असतें, आणि त्या स्वरूपाच्या प्रकाशांत आपलें जीवन बदलून दिव्य करावयाचें असतें; अचेतनाच्या क्षेत्रांत ईश्वर ज्या हेतूनें उतरला तो हेतु, आत्मा त्या क्षेत्रांत जागा होऊन याप्रमाणें पूर्ण करीत असतो. त्याचें जीवन हळूंहळूं परिस्थितीशीं झगडत तो हेतु पूर्ण करण्यासाठीं श्रमत असतें. विश्वचक्राचा हेतु, पूर्ण प्रकाश आणि आनंद जेथें नित्याचा असतो, अशा स्वर्गांत शक्य तितक्या लवकर आत्म्याने परत जावें, हा नाहीं; किंवा विश्वातीत अवस्थेचा आनंद शक्य तितक्या लवकर आत्म्यानें परत मिळवावा असा नाहीं; लांबलचक असमाधानकारक अशा अज्ञानाच्या चाकोरींतून जीवनाचा गाडा आत्म्यानें फिरवीत रहावें, ज्ञानासाठीं त्यानें धडपड करीत असावें आणि तें त्याला केव्हांहि मिळूं नये, पूर्णतेनें केव्हांहि मिळूं नये, अर्थात्

पान क्र. ५२१

 

आत्म्यानें जीवनाचा गाडा बिनाहेतु फिरवीत रहावें, निष्फळ फेरे घालीत रहावें, कसलीहि सिद्धि न अपेक्षितां पुन: पुन्हां चक्कर मारीत रहावें, असाहि विश्व चक्राचा हेतु नाहीं. विश्वाच्या चक्राकार भ्रमन्तीला कांहीं हेतूच नसला, तर सर्वज्ञ ईश्वरानें अज्ञान (जाणिवेची एकाग्रता) उभें करण्यांत घोडचूक केली आहे, अगम्य प्रमाद केला आहे असें म्हणावें लागेल, किंवा त्याचा हा प्रमाद नसेल, तर त्याला हें दुःखमय निष्फळ अज्ञान अटळ निकडीमुळें अस्तित्वांत आणावें लागलें आहे, असें म्हणावें लागेल; पण ही निकड अटळ कशी, ही गोष्ट अगम्यच राहील. पण ईश्वराला अशी निकडच पडत नाहीं आणि तो प्रमादहि करीत नाहीं; त्याच्या विश्वाच्या भ्रमन्तीला हेतु आहे, आणि तो हा आहे कीं, विश्वगत अस्तित्वांत विश्वातीत अस्तित्वांतील आत्मानंद आत्म्यानें प्राप्त करून घ्यावा. शरीरयुक्त भौतिक अस्तित्वांत मूळ चैतन्याच्या परिस्थितीच्या विरोधी परिस्थिति अनेक प्रकारची असते; या विरोधी परिस्थितींत आत्म्यानें त्याचा प्रकाशपूर्ण आनंदाचा स्वर्ग निर्माण करावा, हा या विश्वभ्रमन्तीचा हेतु आहे; अर्थात् आपलें मूळ स्वरूप आत्म्यानें प्राप्त करून घेतल्याशिवाय हा स्वर्गाचा आनंद किंवा आत्मानंद मिळणार नसल्यानें, विश्वगत आत्म्यानें आत्मस्वरूप शोधून काढण्याचा नवा आनंद भोगीत मार्गक्रमण करावें, या मार्गक्रमणांत आनंदार्थ धडपडीचा आनंद भोगावा, असा मानवी शरीरांत आत्म्याला जन्म मिळण्याचा खरा हेतु आहे; मानववंश विश्वाच्या भ्रमन्तीबरोबर जे फेऱ्यावर फेरे मारीत राहिला आहे, त्या फेऱ्यांचाहि हेतु मानववंशाला या विश्वगत अस्तित्वांत आत्मानंद, स्वर्गानंद प्राप्त करतां यावा हाच आहे. अज्ञान पांघरूनच विश्वव्यापी ज्ञान, ईश्वरी ज्ञान हा कार्यक्रम करूं शकतें; म्हणून अज्ञान अनिवार्यपणेंच अस्तित्वांत येतें; अर्थात् अज्ञान हा प्रमाद नव्हे, अधःपात नव्हे, तर ईश्वरानें खाली उतरून बुद्धिपुरःसर निर्माण केलेली अवस्था आहे; अज्ञान हा शाप नाहीं, तर दिव्य गोष्टीच्या प्राप्तीकरितां आत्म्याला दिलेलें दिव्य साधन, दिव्य संधि असें अज्ञानाचें स्वरूप आहे. आत्मा, आत्मचैतन्य भौतिक विश्वांत जन्म घेतें -- या चैतन्याला जें कार्य करावयाचें आहे, तें ईश्वराला भौतिक जडद्रव्याचें मंदिर करून देणें हें आहे; अन्यत्र शक्य नसून जें भौतिक परिसरांतच शक्य आहे, तें अनंत ईश्वरी अस्तित्वाचें ईश्वरी जीवन भौतिक परिसरांत वास्तवांत आणणें, हें कार्य भौतिकांत जन्म घेणाऱ्या चैतन्याला करणें आहे. ब्रह्माण्डाची सूक्ष्म आवृत्ति जो

पान क्र. ५२२

 

भौतिक मानवी पिंड, त्या मानवी पिंडांत जन्म घेऊन, तेथें सर्वात्म्याच्या सर्व भोगांचा सर्वानंद, विदेही विश्वात्म्याचा विश्वानंद, सदेह करणें हें कार्य भौतिकांत जन्म घेणाऱ्या चैतन्याला करावयाचें आहे; तें त्याचें ईश्वरनियत कर्तव्य आहे.

      अज्ञान हें गुप्त आत्म्याचे ठिकाणीं नसतें, तें प्रकट प्रकृतीच्या ठिकाणीं असतें; समग्र प्रकृतीला तें व्यापीत नाहीं. प्रकृति ही सर्वज्ञ ईश्वराची कृति असल्यानें या कृतीला अज्ञान व्यापूं शकत नाहीं. अज्ञान उदयास येतें तें, प्रकृतीचा मूळ प्रकाश व तिचें मूळ पूर्ण सामर्थ्य यांतून कांहीं घटना तयार झाल्यावर, त्या घटनांपैकीं कोणत्यातरी घटनेबरोबर उदयास येतें. अस्तित्वाच्या कोणत्या तत्त्वांत, कोणत्या भूमींत अज्ञानाला उदयाची संधि सांपडते ? अस्तित्वाच्या कोणत्या पायरीवर तें प्रथम उदयास येतें ? अनंत अस्तित्व, अनंत जाणीव, अनंत आनंद ह्या अस्तित्वाच्या सर्वोच्च भूमी आहेत, तेथें अज्ञान असूं शकत नाहीं. सर्व कांहीं या भूमींतूनच निघतें. आमच्या परिचयाचें जें अंधुक प्रकाशाचें, अनिश्चित, अस्थिर रूपांचें व्यक्त विश्व आहे, तें सर्व या उच्च भूमींतून खालीं आलेलें आहे. अतिमानसांतहि अज्ञानाला स्थान असू शकत नाहीं. अनंत प्रकाश व अनंत सामर्थ्य अतिमानसाच्या क्षेत्रांत नेहमीं उपस्थित असतात, अतिशय मर्यादित घटना व वस्तू देखील अतिमानसिक क्षेत्रांत अनंत प्रकाश व अनंत सामर्थ्य यांच्याच प्रकट आधारानें असतात व उदयास येतात. एकतेची जाणीव अतिमानसिक क्षेत्रांत सर्व भेदज्ञानाला व्यापून असते; तेथें भेदज्ञान गौण व एकता प्रधान असते. मनाची भूमि मात्र अशी भूमि असते कीं, तेथें अज्ञान -- अर्थात् खरें आत्मज्ञान मागें टाकणें -- ही क्रिया संभवते. मन ही जाणीवयुक्त अस्तित्वाची (पुरुषाची) अशी शक्ति आहे कीं, ती वस्तूवस्तूंमध्यें, घटनेघटनेमध्यें भेद करते, भेदाच्या मार्गानें चालते. भेदाचें ज्ञान त्याचे ठिकाणीं प्रधान असतें, स्वभावगत असतें; त्याचे ठिकाणीं एकतेचें ज्ञान अगदीं गौण असतें, स्वाभाविक नसतें. भेदज्ञानाच्या मागें अप्रधान, दुय्यम दर्जाची म्हणून एकतेची भावना उपस्थित असते; मनाच्या क्रियांत, त्याचें हृद्गत म्हणून, त्याचें अंतरंग म्हणून एकतेची भावना असत नाहीं. भेदज्ञानाला अभेदाचा आधार देणारी ही एकतेची संवेदना, कोणत्याहि कारणानें मागें घेतां आली, मागें पडली, अतिमानस आणि मन यांच्यामध्यें कशाहि रीतीनें पडदा निर्माण झाला, (कारण एकतेची संवेदना, भावना ही अतिमानसांतून येते, मन ही वस्तु अतिमानसांतून निघालेली

पान क्र. ५२३

 

आहे, अतिमानसाच्या प्रकाशानेंच, प्रतिबिंबित प्रकाशानेंच मन आपले कार्य करीत असतें; एकतेची भावना ही मनाची खाजगी मालमत्ता नव्हेच.) कीं सत्याचा अतिमानसांतील प्रकाश मनाला मिळणार नाहीं, किंवा या मधल्या पडद्यांतून तो प्रकाश विस्कळित किरणांच्या रूपानें, विकृत आणि विभक्त झालेल्या किरणांच्या रूपानें येऊं लागेल आणि मग अज्ञान ही घटना अस्तित्वांत येऊं शकेल; अनेकता, स्वतंत्रांची अनेकता गाजू लागेल. हा जो पडदा सांगितला तो वास्तवांत आहे, मनाच्या क्रियेचेंच फळ म्हणून तो निर्माण झाला आहे, असें उपनिषदांत सांगितलें आहे. अधिमानस हाच तो पडदा म्हणतां येईल. अतिमानस आणि मानस (मन) याच्यामध्यें अधिमानस आहे. हें अधिमानस अतिमानसिक सत्याला झांकणारें सोन्याचें पात्र आहे. हें झांकण अतिमानसिक सत्याचा चेहरा झांकून टाकतें, पण त्याची प्रतिमा स्वच्छपणें प्रतिबिंबित करतें. अधिमानसानंतर मन येतें तें अधिमानसाप्रमाणें स्वच्छ प्रतिबिंब दाखवीत नाहीं -- धुरकट असें, अपारदर्शक असें, किंचित् प्रकाश (प्रकाश किरण) प्रतिबिंबित करणारें असें, मन हें झांकण आहे. मनाच्या ज्या क्रियेनें पडदा उत्पन्न होतो ती क्रिया, भेदांवर, विविधतेवर मनानें एकाग्रतेनें लक्ष देऊन तद्रूप होणें, ही आहे. मनाच्या पातळीवरच्या वर अतिमानसिक क्षेत्रांत एकतेवर एकाग्रतेनें लक्ष दिलें जातें. मन खालीं अनेकतेवर आपलें लक्ष केन्द्रित करतें व यांतूनच पडदा निर्माण होतो. मनाची विशिष्ट स्वाभाविक क्रिया भेदनिष्ठता हीच आहे, भेद हे अभेदांतून निघतात, अभेदमय ऐक्य आविष्कृत करणारे ते असतात. सर्वोच्च एकतेच्या पोटीं जें कांहीं आहे, तें अनेकता व्यक्त करीत असतें; एकता ही अनेकतेचें मायपोट असतें; अनेकतेचा आधार, उगम एकता असते. पण मन अनेकतेवर आपलें लक्ष केन्द्रित करून तिचें मूळ व आधार जी एकता ती विसरून जातें. एकतेला मन विसरलें, तरी एकता मनाला विसरत नाहीं, अतिमानसिक एकताच मनाला आधार देऊन त्याचे व्यवहार शक्य करते; मनाची कार्यमग्न शक्ति मात्र आपलें मूळ विसरते. आपला विशाल खरा आत्मा विसरते. मन आपलें मूळ विसरून रूपें निर्माण करणाऱ्या शक्तीच्या कार्यांत एकाग्र झाल्यानें त्या शक्तीशीं तद्रूप होतें; स्वतःवरचा स्वतःचा ताबा घालविते; कार्याच्या समाधींत स्वतःला पूर्णपणें विसरतें या पूर्ण आत्मविस्मृतीच्या स्थितींत तें आपलें कार्य करीत रहातें; निद्रेंत चालणारा मनुष्य वागतो त्याप्रमाणे मन वागते, नेणीव मनाला ग्रासते आणि या

पान क्र. ५२४

 

नेणिवेंत मन आपलें काम करीत राहतें. या कार्याची जाणीवहि त्याला नसते. जाणीव खालीं उतरत येते, ती या अवस्थेला शेवटीं येते; गाढ झोंप, गाढ समाधि, तंद्री ही ती शेवटली अवस्था असते. ही अवस्था भौतिक निसर्गाच्या व्यवहाराचा सखोल असा पाया होते; या अवस्थेवर भौतिक निसर्गाचा सर्व व्यवहार उभा केलेला असतो.

      जाणीवशक्तीची एकदेशीय हालचाल, रूप आणि क्रिया करण्यांत मग्न होणारी तिची हालचाल जेव्हां तिच्या कार्यक्षेत्रांत एका मर्यादित विभागांत होत असते, तेव्हां तिची एकता, पूर्णता वस्तुत: विभागली जाते असा भाग नाहीं, हें लक्षांत ठेवावयास हवें. मर्यादित क्षेत्रांत पुढें तोंडावर राहून कार्यमग्न झालेली जी शक्ति असते, ती एकंदर पूर्ण जाणीवशक्तीचा एक भाग असतो - हा भाग पुढें आणि बाकीचा भाग मागें गुप्त - पुढें असलेल्या भागाच्या दृष्टीनें गुप्त -- अशी जाणीवशक्तीच्या एकाग्रतेनें विशिष्ट व्यवहार करण्याच्या क्रियेंत, (अचेतनतेंत व अज्ञानांत) वस्तुस्थिति असते; कार्याच्या कोणत्याहि मर्यादित क्षेत्रांत पूर्ण जाणीवशक्ति उपस्थित असते, भौतिक क्षेत्रांत अचेतनतेमागें लपलेली ही पूर्ण शक्ति पूर्ण आत्मसत्तेच्या आधारानें, पुढें केलेल्या अंशशक्तीनें घडत असलेलें सर्व काम त्या अंशशक्तीच्या द्वारां करीत असते, आणि ही अंशशक्ति जीं रूपें तयार करते त्या सर्व रूपांत आत्मरूपानें ही पूर्ण पुरुषप्रकृति कायमचें बिऱ्हाड करते. अज्ञानाचा पडदा जाणीवशक्तीच्या विशिष्ट कार्यांतील अनन्य एकाग्रतेनें तयार होतो हें आपण पाहिलेंच आहे; हा पडदा दूर करण्याची क्रिया ही पण एकाग्रतेची, उलट्या अनन्य एकाग्रतेची क्रिया असते. व्यक्तीच्या जाणिवेंत प्रकृतीची बाह्य आघाडीवर बाह्य एकाग्रतेनें जी क्रिया चाललेली असते, ती बंद करून जाणीवशक्ति गुप्त आंतर पुरुषावर सर्व लक्ष केन्द्रित करते; आत्म्यावर किंवा खऱ्या आंतर चैत्य पुरुषावर, मनोमय पुरुषावर, प्राणमय पुरुषावर जाणीवशक्ति सर्व लक्ष केन्द्रित करते आणि याप्रमाणें त्या पुरुषाचें दर्शन घेते, त्याला गुप्ततेंतून बाहेर काढते. ज्या अनन्य एकाग्रतेनें पुरुष प्रकट होतो त्या अनन्य एकाग्रतेला चिकटून रहावें असें कांहीं पुरुषाच्या जाणीवशक्तीवर बंधन नाहीं; बाह्य एकाग्रता आणि आंतर एकाग्रता ज्या जाणिवेच्या क्रिया असतात, तिला पुन: पूर्ण किंवा व्यापक जाणिवेनें राहणें केव्हांहि शक्य असतें; या पूर्ण वा व्यापक जाणिवेच्या अस्तित्वांत, पुरुषाचें अस्तित्व आणि प्रकृतीची कृति, आणि त्याची उपकरणसामग्री, आत्मा आणि त्याची क्रियाशील आत्मशक्ति

पान क्र. ५२५

 

या दोन्हींचा समावेश असतो. (पूर्ण जाणिवेंत एकाग्रता प्रधान आणि अनेकता गौण असते; व्यापक जाणिवेंत अनेकता प्रधान आणि एकता गौण असते). अशी पूर्णता, व्यापक जाणिवेनें पत्करली, म्हणजे तिच्यापासून जें नामरूपात्मक विश्व तयार झालें होतें त्या विश्वाला विशाल ज्ञानानें, ती स्वतांत समाविष्ट करूं शकते. जाणिवेला पूर्वींची मर्यादा आतां नसते. अंतर्यामी चैतन्याचा विसर प्रकृतीला पूर्वींच्या मर्यादित जाणिवेमुळें पडत होता व त्यामुळें कांहीं विशिष्ट परिणाम घडत होते, त्या परिणामांचा अभाव आतां असतो. अप्रकट पूर्ण जाणिवेचा पुरुष प्रकट अंश-प्रकृतीच्या द्वारां कार्य करीत होता, तो आतां प्रकट होऊन सरळपणें प्रकृतीच्या अंशांकडून कार्य करून घेऊं लागतो; अर्थात् प्रकृतीच्या व्यवहारांत पुष्कळ सुधारणा या परिवर्तनानें होऊं शकते. पण पूर्ण व्यापक जाणीव या व्यवहारापलीकडे जाऊं शकते; प्रकट केलेलें समग्र कार्य स्थगित करून ती पुरुष-प्रकृतीच्या उच्चतर भूमीवर आपलें लक्ष एकाग्र करून, आपलें व पुरुषाचें स्थान त्या उच्चभूमीवर कायम करूं शकते आणि तेथून उच्च शक्ति खालीं आणून, पूर्वींचें आपलें विश्वकार्य त्या उच्चस्थानीय उच्च शक्तींच्या साह्यानें परिवर्तित करूं शकते; त्याला उच्चतर स्वरूप देऊं शकते. प्रकृतिपुरुषाच्या कार्यभूमी अनेक आहेत; आपलें विश्व ज्या कार्यभूमीवर आहे त्याहून उच्च अशा कार्यभूमी आहेत, त्या उच्चकार्यभूमींवर उच्च कार्यसाधनें आहेत, उच्च मूल्यें आहेत; तेथें उच्च अशी सृष्टि, आत्माविष्कारणाची सृष्टि तयार होते; या सृष्टींत, परिवर्तित, उच्च स्वरूप दिलेलें, आमच्या कनिष्ठ भूमीवरचें विश्वकार्य समाविष्ट केलें जातें. आमची जाणीवशक्ति आपलें विकासकार्य मानसिक भूमीवरून अतिमानसिक भूमीवर नेण्याचें ठरविते, तेव्हां ती अतिमानसिक भूमीवर एकाग्रतेनें लक्ष देऊन वर वर्णन केलेलें परिवर्तन घडवून आणते. खालीं उतरून अचेतनतेंत किंवा अज्ञानांत लपण्याची क्रिया काय किंवा वर अतिमानसिक (ज्ञानाच्या) क्षेत्रांत चढण्याची क्रिया काय जाणिवेच्या दोन्ही क्रिया तपाच्या क्रिया आहेत; अनन्य एकाग्रतेच्या क्रिया आहेत; अनंत जाणीव आपल्या प्रकट आत्मरचनेचा प्रकार ठरविते, त्याची साधन-सामग्री ठरविते, त्याची प्रक्रिया ठरविते आणि या पूर्वनियत व्यवस्थेला धरून ती तपाचा आश्रय करते; अर्थात् जशी पूर्वनियत व्यवस्था अनंत जाणिवेनें ठरविली असेल, तिला अनुसरून तिचें तप असतें (तिची अनन्य एकाग्रता असते) आणि म्हणून नियतव्यवस्थाभिन्नतेनें भिन्न झालेल्या

पान क्र. ५२६

 

तपांचीं फळेंहि भिन्न येतात, एकीकडे मानसिक अज्ञान आणि अचेतनता, दुसरीकडे अतिमानसिक ज्ञान आणि अतिचेतनता, अशीं विविध फळें तपाला येतात.

      याप्रमाणें अज्ञानाचें स्वरूप व त्याचें साधन आमच्या लक्षांत आल्यावर आतां असा प्रश्न उभा राहतो कीं, बाह्यतः कां होईना, पण सर्वज्ञ ईश्वर, अज्ञान आणि अचेतनता यांचा अंगीकार करतो; त्याच्या जाणीवयुक्त शक्तीच्या समग्र कार्यांत नव्हे, तर आंशिक कार्यांत अज्ञानी होतो, अचेतन होतो -- ही गोष्ट शक्य कशी होते ? या शक्यतेची गोष्ट गूढच राहते असें मानून चाललें. तरी या रहस्याची क्रिया बरोबर कशी असते, तिचें स्वरूप काय असतें, तिच्या मर्यादा कोणत्या हे ठरवितां आलें, तर तें ज्ञान फायद्याचेंच होईल. त्यायोगें या क्रियेची आपल्याला नसती भीति तरी वाटणार नाहीं, या क्रियेपासून काय साधतें तें कळेल आणि तिच्या प्रयोजनासंबंधीं आपला गैरसमज राहणार नाहीं. तसेंच या क्रियेमुळें आम्हांला कांहीं अनुकूल संधि लाभत असेल, तर तेंहि कळेल आणि त्या संधीचा फायदा आम्हांला घेतां येईल. पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, सर्वज्ञ ईश्वर अज्ञानी होतो, अचेतन होतो यांत गूढ कांही नाहीं. या क्रियेला गूढाचें, रहस्याचें रूप मन देतें; अविभाज्याचे भाग पाडणारी बुद्धि ही मानसिक शक्ति, सरळ व्यवहाराला रहस्य करून सोडते. दोन वास्तव घटना व्यक्त करणाऱ्या नांवांमध्यें किंवा कल्पनांमध्यें, या बुद्धीला तर्कदृष्ट्या विरोध दिसला किंवा उत्पन्न करतां आला, कीं त्या दोन दृश्य वास्तव घटनांमध्यें खराच विरोध आहे असा निर्णय ती घेते आणि मग तिला अन्योन्यविरोधी दिसणाऱ्या या दोन गोष्टी अस्तित्वांत एकत्र असूं शकत नाहींत, त्यांच्यामध्यें एकता, अद्वैत असूं शकत नाहीं असा सिद्धांत ती करते आणि त्यामुळें या ''विरोधी'' गोष्टींचें साहचर्य, एकत्व तिला रहस्य होऊन बसतें. वस्तुत: अज्ञान ही ज्ञानाची (सर्वज्ञ ईश्वराच्या ज्ञानाची) एक शक्ति आहे. स्वतःला मर्यादित करण्याची शक्ति आहे, हातीं घेतलेल्या कार्यांत अनन्य एकाग्रतेनें मग्न होण्याची शक्ति आहे. विशिष्ट व्यवहारांत ही एकाग्रता करून, या व्यवहाराच्या पाठीमागें ज्ञान हें आपल्या समग्र ऐश्वर्यानें उपस्थित राहून कार्य करूं शकतें. व्यवहाराची पार्श्वभूमि त्यानें स्वतःच ठरविलेली असते आणि आपल्या प्रकृतीला, क्रियाशक्तीला, त्या पार्श्वभूमीची दखल घेऊन वागण्याचा आदेश त्यानें दिलेला असतो. बुद्धिपुरःसर विशिष्ट हेतूनें स्वत:ला मर्यादा घालून

पान क्र. ५२७

 

घेणें ही त्या हेतूच्या सिद्धीच्या दृष्टीनें सामर्थ्याची क्रिया आहे, दुबळेपणाची नव्हे. पुरुषानें कोणत्याहि हेतूनें एकाग्रतेचा आश्रय करणें यांत त्याचें सामर्थ्य दिसून येतें, यांत सामर्थ्याचाच भाग असतो, दुबळेपणाचा भाग नसतो. अर्थात् अतिमानस आणि मन या भिन्न क्षेत्रांत अनन्य एकाग्रतेचा परिणाम भिन्न भिन्न असतो. अतिमानस जी आत्मशक्तीची एकाग्रता करतें त्या एकाग्रतेंत एकता आणि अनेकता या दोन्ही विश्वविभागांचा समावेश असतो; ही एकाग्रता सर्वसमावेशक, परिपूर्ण, असीम, मर्यादातीत, असते; उलटपक्षीं, मनाची एकाग्रता मर्यादाबद्ध असते, भेद उत्पन्न करणारी असते; या मर्यादांमुळें आणि भेदमयतेमुळें या एकाग्रतेनें वस्तूंचीं जीं मूल्यें निर्माण होतात, तीं एकांगीं, विकृत, अर्धसत्य किंवा असत्य अशीं असतात; पण मर्यादांचा हेतु आपण पाहिला आहे, ज्ञानाच्या एकांगितेचा हेतु आपण पाहिला आहे. हा हेतु जर आम्हीं मान्य केला, तर हा हेतु सिद्ध करणारी शक्ति ही केवल विश्वातीत पुरुषोत्तमाचे ठिकाणीं त्याच्या विश्वनिरपेक्ष पूर्ण शक्तीचा भाग म्हणून असली पाहिजे व असते, हेंहि आम्हीं मान्य करावयास हवें. या पुरुषोत्तमाची पूर्ण जाणीवशक्ति आणि विशिष्ट कार्याकरितां स्वतःला मर्यादित करण्याचें तिचें सामर्थ्य, या दोहोंत विसंवादिता मानण्याचें कांहींच कारण नाहीं; उलट अनंत पुरुषोत्तमाच्या ज्या विविध शक्ती आहेत त्या शक्तींच्यापैकीं, स्वतःला मर्यादित करण्याची, आतांच नमूद केलेली शक्ति ही एक असणें स्वाभाविक आहे, असेंच आम्हीं मानावयास हवें, असें आम्हीं मानणेंच तर्कशुद्ध आहे.

      सर्वज्ञ सर्वातीत निःसंबंध पुरुषोत्तम स्वतःच्या पोटीं संबंधमय विश्व निर्माण करण्याच्या क्रियेनें स्वतःला मर्यादित करीत असतो अशी कांहीं गोष्ट नाहीं; या क्रियेनें त्याला कांहीं मर्यादा पडते ही गोष्ट खोटी आहे; असें विश्व निर्माण करणें हा त्याचा स्वाभाविक खेळ आहे. त्याचें सर्वातीत, सर्वनिरपेक्ष अस्तित्व, जाणीव (चैतन्य, चेतना), शक्ति (सामर्थ्य), आत्मानंद यांतून स्वाभाविकपणेंच विश्वाची लीला निघते. अनंत पुरुषोत्तम स्वतःच्या अंतरांत अन्योन्यसंबद्ध, अनंत मर्यादित वस्तू व घटना निर्माण करतो, म्हणून कांहीं त्याला या कृतीनें मर्यादा पडत नाहीं, तर त्याचें स्वाभाविक आत्माविष्करणच या निर्मितीनें होत असतें; एकमेवाद्वितीय पुरुषोत्तम अनेक होतो. या अनेकतेनें तो मर्यादित होऊं शकत नाहीं. या अनेकतेच्या आश्रयानें तो आपलें एकमेव अस्तित्व विविध प्रकारें भोगतो. अनंताच्या एकमेवाद्वितीय, अनंत अशा सत्तेचें खरें वर्णन

पान क्र. ५२८

 

करावयाचें तर त्यांत त्याची अनंतप्रकारें अनेक होण्याची शक्ति समाविष्ट करणें आवश्यक आहे. मर्यादित असा अचल काल्पनिक, 'गणिती एकम्' (एक) आणि हा वास्तव, चंचल-अचल, अनंत एकम् (एक) यांत कांहींच साम्य नाहीं. एका टोंकाला अवास्तव 'गणिती एकम्' आणि दुसऱ्या विरुद्ध टोंकाला ''वास्तव'', ''निर्गुण'', ''अनंतगुण'' एकम् अशी वस्तुस्थिति आहे. या पुरुषोत्तमाची, जाणीवयुक्त महासत्तेची एकाग्रता, स्वतःला मर्यादित करणारी एकाग्रता, विविध व्यापारांत स्वतःला बुडवून घेणारी एकाग्रता म्हणजे अज्ञान अशी स्थिति असते : पुरुषोत्तमाच्या ठिकाणची ही, विविधतेनें एकाग्र होण्याची शक्ति, म्हणजेच अज्ञान, म्हणजे काय असतें ? स्वतःच्या आत्मजाणीवयुक्त ज्ञानांत विविधता आणण्याची त्याची जी स्वाभाविक शक्ति तिचेंच नांव अज्ञान. नि:संबंध, पूर्ण पुरुषोत्तम आत्माविष्कारांत ज्या अनेक संबंधमय अवस्था अनुभवूं शकतो, त्या अनेकींपैकीं एक संबंधमय अवस्था, तो अज्ञान या शक्तीनें अनुभवीत असतो; अनंत पुरुषोत्तम सान्त, समर्याद घटनांच्या ज्या माला आपल्या आत्माविष्कारांत उभ्या करतो, त्या मालांपैकीं एक माला, अज्ञान-शक्तीनें, तो उभी करीत असतो. एकमेवाद्वितीय पुरुषोत्तम अनेकतापूर्ण विश्वांत जो आत्मानंद भोगतो, त्या आत्मानंदाचा एक प्रकार तो अज्ञानशक्तीच्या द्वारां भोगीत असतो. अर्थात् निःसंबंध, पूर्ण, अनंत, एकमेवाद्वितीय पुरुषोत्तमाला ज्या अनेक अवस्था अथवा भूमिका शक्य आहेत, त्यांपैकीं एक अवस्था अथवा भूमिका म्हणजेच ही अज्ञान-अवस्था आहे. पुरुषोत्तमाच्या जाणीवशक्तीची एकाग्रतेची जी शक्ति आहे, तिचा एक प्रकार म्हणजे आत्ममग्न होऊन विश्वाला विसरणें. (विश्वाची विस्मृति जाणिवेला झाली, तरी विश्व कांहीं अस्तित्वांतून नाहींसें होत नाहीं; विश्वाची उपस्थिति आणि विश्वाची विस्मृति समकालीन असतात); एकाग्रतेच्या शक्तीचा दुसरा प्रकार म्हणजे जाणिवेनें विश्वाच्या व्यवहारांत बुडून जाऊन आत्म्याला विसरणें. येथें सुद्धां विश्वव्यवहारी जाणीव आत्म्याला विसरली म्हणून आत्मा विश्वव्यवहाराला विसरतो असें नाहीं, तर तो गुप्त राहून विश्वाचा व्यवहार सर्व काळ करीत राहतो. हे दोन प्रकार उत्तर व दक्षिण ध्रुवांसारखे एकमेकांपासून दूर आणि एकमेकांना विरोधी भासणारे आहेत. पण सच्चिदानंद पुरुषोत्तम या दोन शक्तींपैकीं एकीनेंहि बांधला जात नाहीं; त्याचें परिपूर्ण आत्मज्ञ अस्तित्व या दोन दर्शनी विरोधी शक्तींना पोटांत वागवितें व त्या दोहोंच्या वरतीं,

पान क्र. ५२९

 

दोहोंना पुरून उरतें. या शक्ती एकमेकींचा विरोध करीत असल्यासारख्या दिसल्या, तरी या विरोधाच्या द्वारांहि त्या दोघीहि अन्योन्यसाहाय्यक होऊन, अनिर्वचनीय अशा पुरुषोत्तमाचें प्रकट दर्शन घडवीत असतात, त्याच्या अव्यक्त स्वरूपाला व्यक्त करीत असतात.

पान क्र. ५३०

 

 

प्रकरण चौदावें

असत्य, प्रमाद, अन्याय आणि अमंगल [पाप] मूळ आणि निराकरण

 

      ईश्वर कोणत्याहि पुण्याचा किंवा पापाचा स्वीकार करीत नाहीं : ज्ञान अज्ञानानें झांकलें गेल्यानें मर्त्य मानव मोहांत पडतात.

- गीता ५.१५

 

      आत्म्यासंबंधाची सत्याहून वेगळी कल्पना करून त्या कल्पनेला धरून ते जीवन जगतात; मोहमूढ, आसक्त, अनृत व्यक्त करणारें असें त्यांचें जीवन असतें; मोहनीवश झाल्याप्रमाणें ते अनृताला सत्य मानून चालतात.

- मैत्री उप० ७.१०

 

      अविद्येला वश होऊन ते जीवनाचे फेरे करीत राहतात; हे फेऱ्यावर फेरे करीत असतां त्यांना, आंधळ्या पाठीमागें जाणाऱ्या आंधळ्यांप्रमाणें अडखळत आणि ठेंचाळत चालावें लागतें.

- मुण्डक उप० १.२.८

 

      ज्याच्या बुद्धीनें एकत्व प्राप्त करून घेतलें आहे, तो पुण्य आणि पाप दोहोंचाहि संबंध तोडतो.

- गीता २.५०

 

      शाश्वत तत्त्वाचें (ब्रह्माचें) सुख ज्याला लाभलें आहे, त्याला ''मी सत्कर्म कां केलें नाहीं, असत्कर्म कां केलें'' असला विचार ताप देत नाहीं. ज्याला आत्मज्ञान झालें आहे, तो या दोन्ही कर्मांतून स्वत:ला बाहेर काढतो.

- तैत्तिरीय उप० २.९

पान क्र. ५३१

 

विश्वांत पुष्कळ असत्य आहे ही गोष्ट ओळखणारे असे हे असतात; सत्याच्या घरांत हे वाढत असतात; अनंताचे हे बलवान् अजिंक्य पुत्र असतात.

- ऋग्वेद २.९.

 

      विश्वाचा आरंभ सत्य आहे, विश्वाचा कळस सत्य आहे -- मध्यें असत्य आहे; असत्याच्या दोन्ही बाजूंना सत्य आहे, आणि या सत्यांतून* तें असत्य आपल्या अस्तित्वाचे घटक मिळवीत असतें.

- बृहदारण्यक उप० ५.५.१

      अज्ञानाचें स्वाभाविक स्वरूप आतां आपण पाहिलें आहे : अज्ञान हें ज्ञानच असतें; पण तें स्वतःच्या पूर्ण स्वरूपाला विसरणारे, स्वतःला मर्यादित करून विश्वव्यवहाराच्या एका क्षेत्रांत किंवा त्याच्या बाह्य पृष्ठभागावर अनन्य एकाग्रतेनें काम करणारें असें ज्ञान असतें; अज्ञानाचें स्वरूप या प्रकारचें मानल्यावर विश्वांतील अमंगलाचा, पापाचा, दुष्टाव्याचा प्रश्न या मतानुसार कसा सोडवावयाचा, हा आपल्यासमोर महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो; मनुष्य स्वतःच्या अस्तित्वाचें रहस्य आणि विश्वाच्या अस्तित्वाचें रहस्य यांचा विचार करतो, तेव्हां त्याला जो प्रश्न सारखा सतावीत असतो आणि तीव्र अंतस्ताप देत असतो तो प्रश्न, विश्वांत व स्वतःच्या जीवनांत त्याच्या प्रत्ययास येणाऱ्या अमंगलाचा, पापाचा, दुष्टाव्याचा असतो. गुप्त सर्वज्ञतेनें आधार देऊन पुढें केलेलें मर्यादित ज्ञान, हें एक साधन आहे. कांहीं अनिवार्य मर्यादांच्या आंत या मर्यादित ज्ञानाच्या साधनानें मर्यादित अशी विश्वव्यवस्था निर्माण करतां येत असल्याकारणानें, विश्वव्यापी जाणीव आणि शक्ति अशा

-------------------------

* सत्:- असत्याच्या खालच्या बाजूला भौतिक सत्य असतें, वरच्या बाजूला आध्यात्मिक, अतिचेतन सत्य असतें; मध्यें मानसिक आंतर व्यक्तिगत सत्यें असतात; यांत असत्य प्रवेश करूं शकतें. हें व्यक्तिगत सत्यांतील असत्य, वरच्या किंवा खालच्या सत्यांतून द्रव्य घेऊन आपलें स्वत:चें अस्तित्व उभें करीत असतें; हीं खालचीं वरचीं सत्यें, त्यांतून बांधल्या जाणा-या असत्यावर दडपण आणून त्याच्या विकृत रचनांतून, जीवनाचें सत्य आणि आत्म्याचें सत्य उभें करण्यासाठीं धडपडत असतात.

पान क्र. ५३२

 

मर्यादित ज्ञानाचा उपयोग करते आणि त्यानें उभारता येईल असें विश्व उभारते, हें समजण्यासारखें आहे; परंतु असत्य आणि प्रमाद, अमंगल आणि अन्याय यांची आवश्यकता किंवा उपयोग, सर्वत्र असणाऱ्या ईश्वराच्या कार्यांत असतो ही गोष्ट समजायला कठीण आहे. पण ईश्वर अथवा विश्व यांचें आदिसत्य ज्या स्वरूपाचें आम्हीं मानलें आहे, त्या स्वरूपाचें तें असेल, तर त्या सत्याला विरोधी अशा ज्या असत्य आदि घटना आहेत, किंवा दिसत आहेत त्यांचीहि आवश्यकता त्याच्या कार्यांत असली पाहिजे; त्यांचेंहि कांहीं नियत उद्दिष्ट असलें पाहिजे, विश्वाच्या संसारांत त्यांचेंहि कांहीं निश्चित कार्य असलें पाहिजे, म्हणून त्या तेथें दिसत आहेत, त्या तेथें घडत आहेत असें आम्हीं मानणें भाग आहे. ब्रह्म आणि ज्ञान या वस्तू विभक्त होऊं शकत नाहींत. ब्रह्म ज्ञानरूप आहे. पूर्ण आत्मज्ञान आणि पूर्ण सर्वज्ञान (कारण ब्रह्माचा आत्माच सर्व बनतो) हें ब्रह्माचें स्वरूप आहे. विश्वाचें आदिसत्य, विश्वाचा ईश्वर हा असा असल्यानें, येथें या विश्वांत असत्य आदि घटना आकस्मिक म्हणून घडून येऊं शकत नाहींत. 'ईश्वराकडून विश्व घडलें गेलें व नंतर त्यांत  ''अपघातानें'', अनपेक्षितपणें असत्यादि घटना घडूं लागल्या, ईश्वर सर्वज्ञ खरा, पण त्याच्या जाणीवशक्तींत कांहींतरी गोंधळ निर्माण होतो, तिला तिची इच्छा नसतां विस्मृति गांठते आणि या गोंधळामुळें आणि अनैच्छिक विस्मृतीमुळें असत्यादि घटना घडून येतात, या घटना ईश्वरालाहि घृणास्पद वाटतात, ''दुर्देवी'' घटना वाटतात, ईश्वराला या घटना घडतील अशी कल्पनाहि नव्हती; तो आत्मरूपानें विश्वांत, व्यक्तींत आहे आणि त्याला या दुर्दैवी घटनांच्या विश्वांत कैद्याची अवस्था आली आहे; तो येथें अनंत आडव्या तिडच्या वाटांच्या आडरानात अडकल्यासारखा झाला आहे; त्याचीं पावलें बाहेर निघण्याचा रस्ता शोधीत आहेत, पण तीं सारखीं चुकीचीं पडत आहेत आणि या आडरानांतून बाहेर निघणें त्याला मुष्कील झालें आहे' -- ब्रह्माचे व असत्यादि घटनायुक्त विश्वाचें वर्णन अशा प्रकारचें करणें, ही गोष्ट, ब्रह्माचें स्वरूप लक्षांत घेतां, सर्वथा अयुक्त होईल हें उघड आहे. असत्यादि घटना विश्वांत घडणें ही एक गूढ गोष्ट आहे, एक कोडें आहे, अस्तित्वाचें अनादि शाश्वतचें रहस्य आहे, त्याचें मूळ सांगतां येणें अशक्य आहे. ब्रह्म, सर्वज्ञ सर्वज्ञानदाता ईश्वर त्याचें स्पष्टीकरण स्वतःला किंवा इतरांना देऊं शकत नाही, असें म्हणणेंहि अयुक्त होईल हें सांगावयास नकोच. तेव्हां या

पान क्र. ५३३

 

विश्वांत असत्यादि घटनांचें जें जाळें दिसत आहे, त्याच्या पाठीमागें सर्वज्ञ ब्रह्माचा कांहीं हेतु असला पाहिजे, सर्वशक्तिमान् ब्रह्मानें आपल्या सामर्थ्यानें, स्वतःच्या इच्छेनें तें अस्तित्वांत आणलें असलें पाहिजे. या ब्रह्माच्या संमतीनेंच हें ''विरोधी'' घटनांचें जाळें आपलें कार्य करीत असलें पाहिजे या जाळ्याचा ब्रह्माला विश्वव्यवस्थेत कांहीं उपयोग असला पाहिजे, आमच्या आत्मविषयक आणि विश्वविषयक अनुभवाचा आजचा नानाविध व्यवहार या ''विरोधी'' घटनांवांचून अडत असला पाहिजे; या ''विरोधी'' घटनांचें या व्यवहारांत कांहीतरी आवश्यक असें कार्य असले पाहिजे - असा सिद्धांत करणेंच युक्त ठरेल. जीवनांतील हा असत्यादि घटनांचा पक्ष आतां बारकाईनें प्रत्यक्ष तपासावयाचा आहे; जीवनाच्या या अंगाचें मूळ काय आहे, तें निश्चित करावयाचें आहे. निसर्गांत त्याचें स्थान कोणतें, त्याची सत्यता कोठपर्यंत, त्या सत्यतेच्या मर्यादा कोणत्या, या गोष्टीहि निश्चित करावयाच्या आहेत.

      विरोधी घटनांचा हा प्रश्न तीन दृष्टिकोनांतून हाताळतां येईल : मूळ केवल ब्रह्माशी या विरोधी घटनाचें नातें काय आहे ? विश्वाच्या व्यवहारांत या घटनांचें मूळ कोठें सांपडतें आणि या व्यवहारांत या घटनांचें स्थान कोणतें ? व्यक्तीच्या जीवनांत या घटनांना अवसर देणारें, आधार देणारें स्थान कोणतें आणि त्यांचें कार्य कोणत्या प्रकारचें आहे ? असत्यादि विरोधी घटनांसंबंधानें तीन दृष्टिकोनांतून हे तीन प्रश्न विचारतां येतात. केवल ब्रह्म, सर्वश्रेष्ठ सत्य आणि या घटना यांच्या संबंधाचा प्रथम विचार करूं: -- सर्वश्रेष्ठ मूळ तत्त्वांत, ब्रह्मांत या विरोधी घटनांना मूळ धरण्यासारखें कांही नाही आणि तेथें या घटनासारखें कांहीं नाहीं हें उघड आहे. अज्ञान आणि अचेतनता यांतून या विरोधी घटनांची निर्मिति होते, मूळ सद्‌रूपाच्या मूलभूत, आद्य अंगांपैकीं या घटना नाहींत, विश्वातीत केवलाच्या स्वभावांत या घटना मूळ धरीत नाहींत, विश्वपुरुष जो अनंतशक्तिमान् असतो, त्याच्या अनंत शक्तीच्या स्वभावांतहि या घटना जन्मत नाहींत. असा युक्तिवाद केव्हां केव्हां करण्यात येतो कीं, सत्य आणि शिव (मंगल) यांची पूर्ण, परम अवस्था असते, तशी असत्य आणि अशिव (अमंगल) यांचीहि पूर्ण परम अवस्था असली पाहिजे; आणि असें कांहीं नसेल, तर दोन्ही जोड्यांचें स्थान सापेक्ष द्वंद्वमय क्षेत्रांतच केवळ असलें पाहिजे, सत्य-असत्य, मंगल-अमंगल यांना अस्तित्व केवळ अन्योन्यसंबंधांत आहे; द्वंद्वांचें क्षेत्र नसेल तेथें त्यांना अस्तित्व नाहीं. परन्तु

पान क्र. ५३४

 

या युक्तिवादांत या विरोधी जोड्यांसंबंधाच्या मूलभूत सत्याकडे दुर्लक्ष केलें जातें : असत्य आणि अमंगल उघड उघड अज्ञानाचे परिणाम आहेत, अज्ञान नसेल तेथें असत्य असू शकत नाहीं, अमंगलहि असूं शकत नाहीं; स्वयंभू ईश्वराचे ठिकाणीं असत्य आणि अमंगल स्वयंभूपणें लवमात्र असूं शकत नाहींत. त्याच्या परा प्रकृतीचे स्वाभाविक घटक असत्य आणि अमंगल असूं शकत नाहींत. सत्य आणि मंगल यांची गोष्ट याच्या अगदीं उलट आहे. या वस्तू अज्ञानाच्या परिणामरूप नाहींत; जेथें अज्ञान नाहीं तेथें, ईश्वराचे ठिकाणीं, परा प्रकृतीचे घटक म्हणून या वस्तू असतात. अज्ञान, म्हणजेच मर्यादांनीं संकुचित झालेलें ज्ञान, आपल्या मर्यादा टाकून देईल, पूर्ण ज्ञानांत मिळून जाऊन आपलें संकुचितत्व, अज्ञानत्व समाप्त करील, तर अमंगल आणि असत्य हेहि आपलें अस्तित्व संपवितील; त्यांना अज्ञानाच्या अभावीं टिकाव धरतां येणार नाहीं. या दोन्हीहि वस्तू, नेणिवेची आणि चुकीच्या जाणिवेचीं फळें असतात; अज्ञान जाऊन त्याचे ठिकाणीं खरें पूर्णज्ञान आलें की या वस्तूंना अस्तित्वात टिकावयास आधारच राहत नाहीं. म्हणून असत्याची परम, पूर्ण अवस्था म्हणून कांहीं असूं शकत नाहीं; विश्वाच्या व्यवहारांत, त्या व्यवहाराच्या पोटीं दुय्यम तिय्यम दर्जाच्या ज्या वस्तू उदयास येतात, त्यांपैकी असत्य, अमंगल या वस्तू आहेत; विश्वाचा भौतिक पाया असलेली अचेतनतेची जमीन ही असत्य, अमंगल आणि दु:ख यांच्या मुळांना जन्म देते व पोसते. सत्य आणि मंगल यांची गोष्ट निराळी आहे; त्यांची पूर्ण परम अवस्था असावयाला कांहीच स्वाभाविक अडचण (असत्य आणि अमंगलाच्या बाबतींत असते तशी) असत नाहीं. आमच्या अनुभवांत सापेक्ष सत्य आणि प्रमाद, सापेक्ष मंगल आणि अमंगल यांचा अनुभवहि असतो; पण अस्तित्वाचा नित्य असा स्वाभाविक घटक अशी ही सापेक्षता नाहीं, अस्तित्वाच्या क्रमांत मध्येंच उत्पन्न होणारी दुय्यम दर्जाची वस्तु आहे. आमची जी मानवी जाणीव आहे, तिनें निर्मिलेल्या मूल्यांत ही सापेक्षता असते. आमचें अर्धवट ज्ञान, अर्धवट अज्ञान या सापेक्षतेच्या मुळाशीं असतात.

      आम्हांला सत्य सापेक्ष असतें याला कारण, आमच्या ज्ञानाला अज्ञानाचें वेष्टण आहे, आमच्या ज्ञानाच्या सभोंवार अज्ञानाची भिंत आहे. आमची दृष्टि बाह्य देखावा अचूकपणें पाहूं शकतें, पण या देखाव्यापलीकडे आमच्या अचूक दृष्टीची गति नाहीं; पण वस्तु-सत्य पूर्णतया बाह्य देखाव्यांत असत नाहीं. आम्ही जेव्हां आंत खोलांत जातो, तेव्हां

पान क्र. ५३५

 

या संबंधांत कांहीं प्रकाश आम्हांला मिळतो. पण हा प्रकाश अनुमानांचा अजमासांचा, अंतःसूचनांचा प्रकाश असतो. यांत आम्हाला कांहीं निःसंदेह सत्यांचें निःसंशय दर्शन घडत नाही. अर्थात् आमचे सत्यासंबंधींचे बौद्धिक निर्णय एकांगी असतात, कल्पनाप्रधान असतात, त्रोटक संदिग्ध गोष्टींच्या आधारावर कष्टानें रचलेले असे ते असतात; हे सत्यासंबंधींचे बौद्धिक निर्णय आम्ही शब्दांत मांडतो; ही मांडणी म्हणजे आम्हांला सत्याचा जो अप्रत्यक्ष संपर्क घडतो त्या संपर्काचें शब्दचित्र असतें. या मांडणींत, निवेदनांत असलेलीं शब्दचित्रें, हीं सुद्धां मानसिक चित्रांचीं चित्रें असतात. प्रत्यक्ष सत्य मनाला दिसत नाहीं, इंद्रियें मनाकडे कांहीं संवेदना पाठवितात, या संवेदनांतून बुद्धीच्या द्वारां मन सत्याचें चित्र तयार करतें आणि मग या मानसिक चित्राचें शब्दांत चित्र काढून तें आम्ही लोकांपुढें मांडूं शकतों. सत्याचीं आम्ही जीं शब्दचित्रें काढतों तीं, आतांच सांगितलेली वस्तुस्थिति लक्षांत घेतल्यास, अगदीं अपूर्ण असतात, अपारदर्शक असतात. हें उघड आहे. त्या चित्रांत अज्ञानाची, प्रमादाची छाया सहजच पडलेली असते. हें विवक्षित सत्याचें चित्र काय करतें ? दुसरी सत्यें जणों नाहीतच अशी आमची समजूत करून देतें; दुसऱ्या सत्यांना आपल्याजवळ स्थान देत नाहीं, त्यांना बाजूला फेंकून देतें. शिवाय, जें सत्य तें चित्रित करतें, तेंहि पूर्णतया चित्रित करीत नाहीं, त्या सत्याचें पूर्ण मूल्य चित्रांत व्यक्त होत नाहीं; त्या सत्याचें एक टोंक किंवा एक कडच फक्त चित्रांत स्पष्टपणें व्यक्त होते व बाकीचा सर्व भाग छायेंत अदृश्य असतो, किंवा अंधुकपणें दृश्य असतो, किंवा विकृत स्वरूपांत दृश्य असतो. असें म्हणावयास हरकत नाहीं कीं, मनानें तयार केलेलें कोणतेंहि वस्तुविषयक निवेदन पूर्णतया सत्य असत नाहीं, असूं शकत नाही. सत्याचें शरीरदर्शन, सत्याच्या शुद्ध अनावृत स्वरूपाचें दर्शन या निवेदनांत घडत नाहीं. हें निवेदन म्हणजे वस्त्राच्छादित सत्य असतें. पुष्कळ प्रसंगीं केवळ वस्त्रच आम्हांला दिसत असतें, सत्य मुळींच दिसत नाहीं. प्रत्यक्ष क्रियेनें जाणीव सत्यज्ञान करून घेते. तादात्म्यानें सत्याचें ज्ञान करून घेतलें जातें तेव्हां गोष्ट वेगळी असते. मानसिक ''सत्य-दर्शन'' आणि हें तादात्म्यानें किंवा जाणिवेच्या प्रत्यक्ष क्रियेनें घडलेलें सत्यदर्शन यांत फार अंतर असतें : या दुसऱ्या सत्यदर्शनांत दर्शन अल्प असेल, अल्प अंशाचें असेल, पण तें खऱ्याचें खरें मौलिक दर्शन असतें (मानसिक दर्शन असें नसतें हें वर विस्तारानें सांगितलेंच आहे). मौलिक, वास्तव दर्शन हें पूर्ण दर्शनांतील

पान क्र. ५३६

 

पहिली पायरी समजली पाहिजे. वस्तूचें प्रत्यक्ष दर्शन किंवा तादात्म्यद्वारां जें दर्शन घडतें त्यांतहि चूक प्रवेश करूं शकेल. पण ही चूक मूळच्या दर्शनांत नसते. मनाकडून त्या दर्शनाची कक्षा वाढविली जाते, त्याचा अर्थ लावला जातो. या कक्षा वाढविण्याच्या क्रियेंत, या अर्थ लावण्याच्या क्रियेंत चूक होत असते. कक्षा भलतीच किंवा भलतीकडेच वाढविली जाते, अर्थ भलताच लावला जातो आणि याप्रमाणें मुळांत सत्यदर्शन निर्दोष असतांहि त्यांत दोष (मनाकडून) उत्पन्न होतो. हें जें मौलिक किंवा तादात्म्यभावानें वस्तूंचें दर्शन घडते किंवा अनुभव येतो तें दर्शन किंवा अनुभव हें खरें ज्ञान होय, ज्ञानाचें खरें स्वरूप या दर्शनात, या अनुभवांत आहे. आत्म्याच्या अंतरंगी, अस्तित्वाच्या पोटीं हें खरें ज्ञान स्वयंसिद्ध असतें. मनाच्या ठिकाणीं ज्ञान स्वयंसिद्ध रूपानें असत नाहीं, तर स्वयंभू ज्ञानाला तेथें वेगळें रूप दिलें जातें. हें रूप, हा आकार अमौलिक असतो, साधनद्वारां साधलेला दुय्यम असा असतो आत्म्याच्या ठिकाणीं ज्ञान स्वयंसिद्ध असतें, तसें अज्ञान असत नाहीं. अज्ञान हें मूलत: अस्तित्वाच्या अंतरंगांतील मौलिक, स्वयंभू वस्तु नाहीं. ज्ञान मर्यादित केलें गेलें, तें अनुपस्थित असलें, तें स्थगित केलें गेलें म्हणजे अज्ञानाचा उदय होतो. अज्ञानाचें अस्तित्व ज्ञानाच्या स्थगितीवर, अनुपस्थितीवर मर्यादित केलें जाण्यावर अवलंबून असतें. सत्यापासून दूर गेल्यानें प्रमाद अस्तित्वांत येतो; सत्याची विकृति केली गेली म्हणजे असत्याची निर्मिति होते; सत्याला नकार दिल्यानें, त्याच्या विरोधानेंहि असत्याला अस्तित्व लाभतें. अज्ञानाप्रमाणें ज्ञानाची गोष्ट नाहीं; अज्ञानाला मर्यादा घालण्यानें, तें अभावानें असल्यानें किंवा तें स्थगित केल्यानें ज्ञान उदय पावतें असें नाहीं -- ज्ञानाचें अस्तित्व अज्ञानाशीं याप्रमाणें स्वभावत: बांधलेलें असत नाही; अज्ञानाला मर्यादित करणें, त्याचें कार्य थांबविणें हें, मानवी मनांत त्याचा उदय होण्यास अंशत: उपयोगी पडत असेल, मनाच्या अल्प प्रकाशाला जो अंधकार झांकीत असतो तो मागें सरला म्हणजे मनांत अल्प प्रकाश (ज्ञान) दिसूं लागतो, ही गोष्ट खरी असेल. मानवी मनामध्यें अज्ञानाचें क्रमानें परिवर्तन, रूपांतर होऊन ज्ञान बनतें असा देखावा दिसत असेल पण या देखाव्यापाठीमागें वस्तुस्थिति अशी आहे कीं, आमच्या अंतरंगांत अस्तित्वांत खोल ठिकाणीं ज्ञान हें मूलत: असतें. तेथें त्याची खास जन्मभूमि आहे. तेथें तें स्वतंत्रपणें (अज्ञाननिरपेक्ष) जन्म घेतें आणि तेथून तें मनाच्या पृष्ठभागावर येतें.

पान क्र. ५३७

 

      मंगल-अमंगल (साधुता-असाधुता, पुण्य-पाप, चांगलें-वाईट) या संबंधीं विचार करतां असें म्हणतां येतें कीं, मंगल हें सत्य-जाणिवेच्या आश्रयानें असतें. असत्य, प्रमादी जाणिवेचा आश्रय मिळाला तरच अमंगल जन्म घेतें व टिकूं शकतें; अगदीं निर्भेळ अशी सत्यदर्शी, सत्यमय, सत्यपूर्ण जाणीव असेल, तर मंगलच केवळ अस्तित्वांत राहूं शकेल; त्याच्यांत अमंगलाची भेसळ होणार नाहीं, त्याच्या उपस्थितींत अमंगल साकार होणार नाहीं. मानवी मंगल आणि अमंगल ही मूल्यें सत्य आणि प्रमाद यांप्रमाणें सापेक्ष आणि संदिग्ध असतात; एका स्थळीं किंवा काळीं ज्याला सत्य म्हणून मान मिळतो, तेंच दुसऱ्या स्थळीं, काळी प्रमादपूर्ण ठरतें. मंगल आणि अमंगल यांचीहि गोष्ट अशीच आहे; एका स्थळीं ज्याला मंगल म्हटलें जातें त्याला दुसरीकडे अमंगल समजतात; एका काळीं जें मंगल समजलें जातें तें इतर काळात अमंगल मानलें जातें, आम्ही असेंहि पाहतो कीं, आम्ही ज्याला अमंगल, वाईट म्हणतों त्यांतून मंगल, चांगलें निघतें; आम्ही ज्याला मंगल, चांगलें म्हणतों त्यांतून अमंगल, वाईट निघतें. मंगलांतून अमंगल निघणें हा जो दुर्दैवी परिणाम त्याचे कारण हें असतें कीं, ज्ञान आणि अज्ञान यांची भेसळ होते, यांचा गोंधळ होतो, अप्रमादी सत्य-जाणिवेंत प्रमादी जाणिवेचा प्रवेश होतो आणि त्यामुळें आमचें जें मंगल किंवा चांगलें म्हणून असतें, त्याची व्यवहारात व्यवस्था करतांना, तें कार्यान्वित करतांना अज्ञानपूर्ण किंवा प्रमादपूर्ण व्यवस्था किंवा कार्य केलें जातें; किंवा विरोधी शक्ती आडव्या येतात आणि मंगलातून अमंगलाची निपज करतात. उलट, जेव्हां अमंगलांतून मंगल निघतें तेव्हां हा सुखद परिणाम घडून येण्याचें कारण हें असतें कीं, प्रमादी जाणिवेच्या आणि इच्छेच्या पाठीमागें आणि तिला कमीअधिक दडपून टाकणारी अशी थोडीबहुत अप्रमादी जाणीव आणि शक्ति काम करीत असते किंवा अमंगलांतून मंगल निघण्यास, अमंगल-विरोधी शक्तींचा हस्तक्षेप कारण होतो. मानवी मनाच्या कार्यांत आणि मानवी जीवनांत विश्वशक्तीच्या, घडणाऱ्या कार्यांत ही सापेक्षता, ही भेसळ एक अनिवार्य उपाधि म्हणून दिसून येते. मंगल आणि अमंगल यांचें मौलिक सत्य हें नव्हे, मुळांत अशी भेसळ, अशी सापेक्षता नाहीं, असू शकत नाही. शारीरिक वेदना, बहुतेक शारीरिक दु:ख हें जें शारीरिक ''अमंगल'' आहे, तें ज्ञान-अज्ञान, अप्रमादी-प्रमादी जाणीव यांच्याशीं संबद्ध नाहीं, तर शरीरस्वभावांत तें अंगभूत आहे, असा एक पक्ष आहे. वेदना

पान क्र. ५३८

 

 

आणि दुःख कसलेंहि असों, तें मूलत: पृष्ठगत पुरुषांत जाणीव-शक्ति अपुरी असल्याचा परिणाम असतो; ही जाणीव-शक्ति अपुरी असल्यानें स्वतःशीं व निसर्गाशीं योग्य तो व्यवहार आम्ही (बाह्य पुरुष) करूं शकत नाहीं; विश्वशक्तीचे जे आघात आमच्यावर अनिवार्यपणें होत असतात त्याच्याशीं, आमची वागणूक आम्हांला जुळवून घेतां येत नाहीं, किंवा ते आघात आम्हांला ''पचवितां'' येत नाहींत. कोणतीहि शारीरिक वेदना व दुःख आमचे ठिकाणीं आम्हांला अनुभवास येणार नाही, जर आमचे ठिकाणी पूर्ण प्रकाशमय जाणीव आणि पूर्ण पुरुषाची दिव्य शक्ति उपस्थित असेल तर. तेव्हां या विवेचनाचा निष्कर्ष असा आहे कीं, मंगल-अमंगल, सत्य-असत्य, यांचा संबंध अन्योन्यावलंबनाचा नाहीं, तर प्रकाश आणि छाया यांच्याप्रमाणें अन्योन्यविरोधाचा आहे; छाया आपल्या अस्तित्वासाठीं प्रकाशावर अवलंबून असते, छायेवर प्रकाश अवलंबून नसतो. पूर्ण स्वयंभू परमात्म्याचे ठिकाणीं असत्य आणि अमंगल यांना अप्रकट, गुप्त असें देखील स्वयंभू अस्तित्व नाहीं. स्वयंभू सद्‌रूपाच्या मूलभूत स्वभावाचा अंगभूत भाग, हें स्वरूप असत्य आणि अमंगल यांचें बिलकुल नाही; असत्य, अमंगल यांचे ठिकाणीं अनंतता, शाश्वतता मुळीच नाही ; पूर्ण अस्तित्वांत असत्य, अमंगल मूलभूत अंग म्हणून असत नाहींत; मंगल-अमंगल, सत्य-असत्य हीं पूर्ण पुरुषाचीं मूलभूत अन्योन्यविरोधी अंगें नाहींत, पूर्ण पुरुषांत केवळ मंगल आणि सत्यच असतें, असू शकतें.

      ही गोष्ट निःसंशय खरी आहे की, सत्य किवा मंगल प्रकट झालें कीं, असत्य, अमंगल या कल्पना शक्य होतात; कोणतेंहि अस्तिपक्षीं विधान केलें गेलें, कीं त्याचें नास्तिपक्षीं विधान कल्पनेनें शक्यतेच्या कोटींत येतें, कोणताहि वास्तव अस्तिपक्ष, त्याच्या उलट असणारा नास्तिपक्ष कल्पनेच्या शक्य कोटींत आणतो. अस्तित्व, जाणीव, आनंद (सच्चिदानंद) प्रकट होतांच, व्यक्त होतांच, अस्तित्वाचा अभाव, जाणिवेचा अभाव, संवेदनेचा अभाव शक्य कल्पनेच्या कोटींत आला, आणि साहजिकच कल्पनारूपानें शक्य झालेली ही गोष्ट वास्तवांत येणें एकापरीनें अटळ झालें; कारण, शक्यता म्हणून जितक्या आहेत तितक्या वास्तवांत उतरण्यासाठीं धडपडत असतात; आणि ही धडपड तेव्हांच थांबते जेव्हां ती सफळ होते, असा नियम आहे. ईश्वरी अस्तित्वाच्या अंगांच्या ज्या विरोधी गोष्टी अमंगल, असत्य.... त्यासंबंधानेंहि वरील नियम खरा असणार व आहे. तेव्हां हा मुद्दा घेऊन असें म्हणतां येईल कीं, प्रकट

पान क्र. ५३९

 

होणाऱ्या ईश्वरी जाणिवेला प्रकटनाच्या उंबरठ्यावरच अमंगल, असत्य.. या शक्य विरोधी गोष्टी प्रत्यक्ष प्रतीत होत असल्या पाहिजेत आणि म्हणून त्या, पूर्णाच्या (ईश्वराच्या) ‘वास्तव अंगांत सूचित असलेल्या, पूर्णाच्या' (ईश्वराच्या) 'अंगभूत गोष्टी' या वर्गांत घालतां येतील, आणि कसलेंहि विश्वगत अस्तित्व या सूचित गोष्टींपासून दूर राहूं शकणार नाहीं, विभक्त असूं शकणार नाहीं. या संबंधांत पहिली गोष्ट ही सांगावयाची कीं, विश्वाच्या अस्तित्वांत या गोष्टी शक्य असतात हें खरें असलें तरी त्या फक्त तेथेंच शक्य असतात, विश्वापूर्वींच्या कालातीत पूर्ण ब्रह्मांत त्या अगोदरपासून शक्य असत नाहींत, हेंहि तितकेंच खरें आहे. कालातीत पूर्ण ब्रह्म हें एकता आणि आनंद या घटकद्रव्यांचें बनलेलें असल्यानें, या घटकांशीं विसंवादी अशा गोष्टी तेथें असू शकत नाहीत. अमंगल, असत्य.... या गोष्टी अद्वैत आणि आनंद याच्याशीं मुळींच जुळणाऱ्या नाहींत आणि म्हणून त्या तेथें असूं शकत नाहीत. विश्वाची गोष्ट घेतली तरी तेथेंहि, निरपवादपणें सर्व विश्वगत अस्तित्वांत या गोष्टी अंतर्भूत असतात किंवा शक्य असतात, हें खरें नाहीं. सत्य आणि मंगल मर्यादित होऊन त्यांना एकदां कां एकांगी, सापेक्ष रूप प्राप्त झालें, अस्तित्वाची आणि जाणिवेची एकता, अद्वैत मोडून एकदां का जाणीव आणि अस्तित्व भेदयुक्त झालें, म्हणजे मग असत्य, अमंगल अस्तित्वांत येऊं शकतात, एरव्हीं या वस्तू अस्तित्वांत येऊं शकत नाहींत. अनेकता अस्तित्वांत आल्यावर, भेद अस्तित्वांत आल्यावर देखील जाणिवेची (जाणीव शक्तीची) एकता आणि पूर्ण अन्योन्यता साकार आत्म्यांचे ठिकाणीं असूं शकते आणि अशी स्थिति ज्या आत्म्यांसंबंधानें असेल त्यांच्या बाबतींत आत्मज्ञान आणि अन्योन्यविषयक ज्ञान हें सत्य, व यांचें फलरूप सत्य स्वयंगतिशील असतें, आणि म्हणून आत्मविषयक आणि अन्योन्यविषयक अज्ञान हें असत्य, आणि त्यांचें फलरूप असत्य अस्तित्वांत येणें अशक्य असतें. आत्म-जाणिवेच्या पायावर जेथें सत्य हें, पूर्ण अखंड सत्याच्या स्वरूपांत उभें असतें, तेथें असत्य व प्रमाद गतिशील करण्याच्या त्यांच्या प्रक्रियेसह प्रमादी जाणीव व प्रमादशील इच्छा, अस्तित्वांत येऊं शकत नसल्यानें, असत्याचा प्रवेश तेथें होऊं शकत नाहीं आणि अमंगलाचाहि प्रवेश होऊं शकत नाहीं. विभक्तता, भेद, खंडितपणा आला कीं असत्य, अमंगल या वस्तू तेथें प्रवेश करूं शकतात : तथापि भेदा-बरोबर लागलीच असत्य अमंगल यांचा प्रादुर्भाव व्हावयाचाच असा कांहीं

पान क्र. ५४०

 

नियम नाहीं. आत्म्या-आत्म्यामध्यें पुरेशी (जाणिवेची) अन्योन्यता असली म्हणजे -- मग क्रियाशील असें एकतेचें ज्ञान व भावना त्यांच्यामध्यें नसली तरी -- त्यांच्या व्यवहारांत सुसंवादिता आणि सत्य प्रभुत्वानें नांदूं शकतात, आणि अमंगलाचा प्रवेश तेथें होऊ शकत नाहीं; मात्र हे वेगळें आत्मे, त्यांचें मर्यादित ज्ञान ठरवील त्या नैतिक शिष्टाचाराचा भंग करण्याचें, त्यापासून च्युत होण्याचें कटाक्षाने टाळीत असतील, तरच अमंगलाचा प्रवेश त्यांच्या व्यवहारांत होऊं शकणार नाहीं, तरच त्यांच्या व्यवहारांत परस्पर मेळ व सत्य प्रभुत्वानें नांदूं शकेल. तेव्हां असत्य, अमंगल या वस्तू ज्याप्रमाणें कालातीत पूर्ण सत्तत्त्वाचीं अंगें नाहींत, त्याप्रमाणें विश्वरूप पूर्णाचीहि तीं अटळ, सर्वगामीं रूपें नाहींत, या वस्तू उपाधिरूप आहेत, परिणामरूप आहेत, अज्ञानाच्या विशिष्ट अवस्थेंतील उपाधी आहेत, परिणाम आहेत. जेव्हां भेदमयता वाढत वाढत विरोधाचें स्वरूप धारण करते, जेव्हां अज्ञान वाढत वाढत आद्य नेणिवेचें स्वरूप धारण करतें, आणि ज्ञानाच्या या अभावांतून, गाढ विस्मृतींतून प्रमादयुक्त जाणीव, प्रमादशील ज्ञान आणि त्यांतून प्रमादी इच्छा, प्रमादी भावना, प्रमादी क्रिया, प्रमादी प्रतिक्रिया उदय पावतात, तेव्हां या गोष्टींचें फल म्हणून असत्य, अमंगल यांचा जन्म होतो. आतां प्रश्न असा आहे कीं, विश्वाची अभिव्यक्ति कोणत्या पायरीवर आली म्हणजे या विरोधी वस्तू उदयास येतात ? पूर्ण जाणीव क्रमश: आवरणें घेत घेत अधिकाधिक गुप्त होत असते. पूर्ण जाणीव ही, भेदप्रधान मन आणि प्राण या आवरणांत खालीं उतरत उतरत गुप्त झाली, म्हणजे असत्य, अमंगल जन्मास येत असतील; किंवा पूर्ण जाणीव पूर्ण नेणिवेंत गुप्त होऊन विकासक्रमानें वर येऊं लागली आणि जड भौतिक शरीरांत प्राणाच्या व मनाच्या आकारानें साकार झाली म्हणजे मग असत्य, अमंगल जन्मास येत असतील. म्हणजे मग प्रश्न असा येतो कीं असत्य, प्रमाद, अन्याय, अमंगल या गोष्टी मनाच्या आणि प्राणाच्या पातळीवर मूलत: अस्तित्वांत येतात, मन आणि प्राण हीच त्यांची जन्मभूमि आहे ? कीं जड भौतिक पातळी ही त्यांची जन्मभूमि आहे ? -- (जड भौतिक शरीरांतील मन, प्राण यांत आम्हांला असत्यादि अनुभवास येतात, तेव्हां जड भौतिक अचेतनाचा अंधकार हा मन, प्राण यांत असत्यादींच्या प्रादुर्भावाचें मूळ कारण असूं शकेल; मूळ मन, प्राण यांत असत्यादींचे अस्तित्व नसेल, असा हा संशय आहे) मूळ अतिभौतिक मनांत, प्राणांत असत्यादि निश्चितपणें असतात असें ठरलें,

पान क्र. ५४१

 

तर असा प्रश्न उभा राहतो कीं, या वस्तू तेथें अटळ आहेत काय ? तेथेंच त्यांचा जन्म होतो काय ? कारण जड भौतिक चैतन्याविष्कारांतून या वस्तू त्या आविष्कारांचा परिणाम किंवा विस्तार या नात्यानें अतिभौतिक चैतन्य-आविष्कारांत (मनांत, प्राणांत) शिरल्या असतील असें मानतां येतें. समजा असें मानणें अयुक्त ठरलें, तर अशी कल्पना करतां येते कीं, अतिभौतिक मन, प्राण यांत असत्य, अमंगल प्रथम उदयास येतें आणि तें पूर्ण पुरुषाकडून विशिष्ट हेतूनें तेथें उदयास आणलें जातें : असत्य, अमंगल या गोष्टी, निर्मितिशील अचेतनतेचा अटळ परिणाम आहेत; जड भौतिक जो चैतन्य-आविष्कार, त्या आविष्कारांतच त्या स्वाभाविकपणें नांदूं शकतात; पण नांदण्यासाठीं त्या आविष्कारांत त्या यावयाच्या, तर अगोदर त्या अतिभौतिक विश्वमनांत आणि विश्वप्राणांत अवश्य असल्या पाहिजेत आणि म्हणून त्या त्याठिकाणीं पूर्ण पुरुषाकडून अस्तित्वांत आणल्या जातात. तेव्हां पूर्ण पुरुषाची पूर्ण जाणीव खालीं उतरत उतरत भेदप्रधान मन-प्राण या आवरणांत आली, कीं असत्य, अमंगल आदि तेथें उदयास येतात; नंतर पूर्ण जाणीव खालीं उतरून अचेतनाचें आवरण घेते; नंतर उलट क्रम (विकास क्रम) सुरू होतो आणि या क्रमांत जेव्हां प्राण, मन आविर्भूत होतात, तेव्हां, त्यांत असत्य, अमंगल स्पष्टपणें प्रत्ययास येतात; अशी एकंदर वस्तुस्थिति दिसते.

      परंपराप्राप्त ज्ञान म्हणून, मानवी मन असें दीर्घकाळपावेतों मानीत होतें कीं, आम्ही भौतिक पातळींतून वर चढलों कीं त्या अतिभौतिक क्षेत्रांत असत्य, अमंगल या गोष्टी आम्हांला अनुभवास येतात. पार्थिव अस्तित्वांत विसंवादी, दोषपूर्ण, विकृत रूपें आणि शक्ती -- प्राणमय मनाची आणि प्राणाची विसंवादी रूपें आणि शक्ती -- जीं आमच्या अनुभवास येतात, त्या रूपांचा आणि शक्तींचा भौतिक-पूर्व पाया अतिभौतिक क्षेत्रांत असतो. तेथें प्राणमय मनाच्या आणि प्राणाच्या ज्या शक्ती आणि जी रूपें असतात, त्यांतूनच पार्थिव क्षेत्रांतील त्यांच्या विसंवादी, विकृत, दोषपूर्ण शक्ती आणि रूपें निघतात. अतिभौतिक विश्वांत अशा शक्ती आहेत; आणि या शक्ती साकार करणारे असे अतिभौतिक प्राणीसुद्धां, आंतरचेतनाच्या अनुभवाप्रमाणें, तेथें आहेत कीं, जें मुळांत, अज्ञान, अंधकारपूर्ण तामसी जाणीव, सामर्थ्याच्या दुरुपयोग, विकृत सुख, आम्ही अमंगल म्हणतो त्या गोष्टींचीं सर्व कारणें आणि सर्व परिणाम यांना स्वभावत: चिकटून असतात, त्यांच्याशीं जोडलेले असतात. या शक्ती

पान क्र. ५४२

 

(आणि हे प्राणी) पृथ्वीवरील प्राण्यांवर स्वत:च्या विपरीत रचना लादण्यांत गढलेल्या असतात; अभिव्यक्त विश्वांत स्वत:चें साम्राज्य टिकवण्याची हांव त्यांना असते आणि म्हणून प्रकाश, सत्य, मंगल यांच्या वाढीला त्यांजकडून येथें विरोध होत असतो; दिव्य जाणीव आणि दिव्य अस्तित्व यांच्या दिशेनें आत्मा प्रगति करीत असतां या प्रगतीला त्यांजकडून सारखा अडथळा करण्यात येत असतो. प्रकाश-अंधकार, मंगल-अमंगल, विश्वमेळ आणि विश्वगोंधळ निर्माण करणाऱ्या परस्परविरोधी शक्तींच्या पारंपारिक संघर्ष-कथांत अस्तित्वाची ही बाजू प्रतिबिंबित झालेली आढळते. प्राचीन कल्पित कथा, धर्म, गुप्तविद्येच्या सर्व शाखा यांत सर्वत्र या पारंपरिक संघर्ष-कथा आढळतात.

      ही पारंपरिक ज्ञानाची उपपत्ति सयुक्तिक आहे आणि आंतर अनुभवानें तिची सत्यता पडताळून पाहतां येते. अतिभौतिक अस्तित्व आम्हीं मान्य केलें, भौतिक अस्तित्व एवढीच सत्य गोष्ट आहे असें मानून आम्ही आपलें क्षेत्र संकुचित न केलें, तर वरील उपपत्ति आम्हांला मान्य करावीच लागते. विश्व आणि विश्वांतील प्राणी यांना व्यापून राहणारा आणि आधार देणारा विश्वात्मा आहे, विश्वचैतन्य आहे, त्याप्रमाणें अशी विश्वशक्ति आहे कीं, जी सर्व वस्तूंची हालचाल चालविते. ही जी आद्य शिवशक्ति आहे, तिच्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक विश्वगत शक्ती आहेत. या शक्ती मूळ शक्तीच्या पोटशक्ती आहेत किंवा मूळ विश्वशक्तीच्या विश्वव्यापी क्रियेचीं रूपें आहेत. विश्वामध्यें जें जें साकार झालेलें आहे त्या साकाराच्या मागें, त्याला आधार देणाऱ्या शक्ती आहेत; या शक्ती त्या साकार वस्तूचा किंवा प्राण्याचा अस्तित्व-हेतु पुरा करण्यासाठी धडपडतात, त्याची प्रगति घडविण्यासाठीं श्रमतात. त्यानें आपलें कार्य करीत राहण्यांत या शक्तीचा पाया भक्कम होतो; त्याच्या यशामध्यें या शक्तींचें यश असतें; त्याची वाढ होण्यांत, त्यांची इतरांवर प्रभुता होण्यांत या शक्तींचाच विजय असतो; त्याच्या यशांत, त्याच्या टिकून राहण्यांत या शक्तीची इच्छापूर्ति असते, त्यांच्या अस्तित्वाचा काळ वाढतो. जशा ज्ञानाच्या, प्रकाशाच्या शक्ती आहेत, त्याप्रमाणें अज्ञानाच्या, अंधकाराच्या शक्ती आहेत. या दुसऱ्या शक्तींचें कार्य अज्ञानाचें, अचेतनतेचें राज्य शक्य तेवढें हे दीर्घकाल टिकवून धरण्याचें असतें. सत्याच्या शक्ती आहेत, त्याप्रमाणें असत्यावर जगणाऱ्याहि शक्ती आहेत; या शक्ती असत्याला आधार देतात, त्याचा पाठपुरावा करतात, त्याला विजय

पान क्र. ५४३

 

मिळावा म्हणून खपतात. मंगलाची प्रेरणा, मंगलाची कल्पना, मंगलाचें अस्तित्व यांशीं ज्यांचें अस्तित्व अतिशय निगडित झालेलें आहे, अशा शक्ती ज्याप्रमाणें आहेत, त्याप्रमाणें अमंगलाची प्रेरणा, कल्पना व अस्तित्व यांशीं ज्यांचें अस्तित्व निगडित आहे अशाहि शक्ती आहेत. अदृश्य विश्वप्रांताचें हें सत्य, प्राचीन श्रद्धेनुसार विशिष्ट प्रतीकांनीं व्यक्त करीत असत. विश्वावर ताबा मिळविण्यासाठीं, मानवी जीवनावर सत्ता चालविण्यासाठीं, प्रकाशशक्ति आणि अंधकारशक्ति, मंगलशक्ति आणि अमंगलशक्ति यांजमध्यें स्पर्धा, संघर्ष, युद्ध चालूं असतें, अशी प्राचीनकालीन श्रद्धा आपली या सत्याविषयींची प्रतीकरचना करी. वैदिक देवदेवता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी तमाचे आणि भेदाचे पुत्र यांच्यामधील स्पर्धेचा अर्थ म्हणजे हेंच सत्य होय; हेंच सत्य नंतरच्या पारंपरिक कथांत अंतर्भूत करतांना, तमोमय भेदकारी शक्तींना असुर, राक्षस, पिशाच म्हटलेलें आहे, झरथुष्ट्र पंथीयांत अह् रिमन व अहुर् मज्द हीं दोन आद्य तत्त्वें अनुक्रमें अमंगल व मंगल शक्तींचीं द्योतक आहेत. ईश्वर व त्याचे देवदूत एका बाजूला आणि सैतान व त्याची सेना दुसऱ्या बाजूला, या सेमिटिक पारंपरिक कथेंत हेंच सत्य व्यक्त होतें, या सर्व प्रतीकात्मक कथांत अदृश्य विश्वाचें हेंच सत्य सांगितलें आहे कीं, ईश्वरी प्रकाश, सत्य, मंगल यांच्या दिशेनें मानवाला नेणाऱ्या अदृश्य शक्ती आणि व्यक्ती आहेत, त्याप्रमाणें त्याला अ-दिव्य अशा अंधकाराच्या, असत्याच्या व अमंगलाच्या तत्त्वाचा दास करून राबवावे यासाठीं त्याला मोहांत पाडणाऱ्या शक्ती व व्यक्ती अदृश्य विश्वांत आहेत. विज्ञानानें शोधून काढलेल्या किंवा निर्माण केलेल्या अदृश्य शक्तींखेरीज दुसऱ्या अदृश्य शक्ती आधुनिक विचारवंत मानीत नाहींत, जाणत नाहींत. आमच्या भोंवतीं भौतिक जगांत माणसें, जनावरें, पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे, किडे, जंतू, अणुजीव आढळतात -- यापेक्षां वेगळे प्राणी निसर्ग करूं शकत असेल, या गोष्टीवर आधुनिक विचारवंतांचा विश्वास बसत नाहीं. परंतु जड पदार्थांच्या द्रव्यावर व आकारावर परिणाम करणाऱ्या भौतिक स्वरूपाच्या विश्वव्यापी अदृश्य शक्ती जर आहेत, तर मानसिक, प्राणिक स्वरूपाच्या विश्वव्यापी अदृश्य शक्ती मानवाच्या मनावर आणि प्राणशक्तीवर परिणाम करणाऱ्या अशा कां असूं नयेत, याला कांहीं समर्पक कारण देतां येत नाहीं; आणि मन आणि प्राण या निर्व्यक्तिक शक्ती भौतिक जगांत जाणीवयुक्त व्यक्ती बनवितात, तसेंच येथील व्यक्तींचा उपयोग

पान क्र. ५४४

 

करतात आणि याप्रकारें भौतिक आकार घेऊन साकार होतात, भौतिक जगांत वावरतात, तेथें जड द्रव्यावर व जड द्रव्याच्या द्वारां प्राण्यांवर परिणाम करतात, हें जर खरें आहे, तर ही गोष्ट अशक्य मानतां येत नाहीं कीं, मन आणि प्राण त्यांच्या त्यांच्या खास पातळीवर जाणीवयुक्त व्यक्ती, आम्हांला अदृश्य अशा द्रव्याच्या बनवीत असतील, आणि आपल्या आपल्या पातळीवरून भौतिक निसर्गांतील वस्तूंवर व प्राण्यांवर परिणाम करूं शकत असतील. जुन्या काळांतील लोकांचा अनुभव किंवा विश्वास चित्रित करणाऱ्या पारंपरिक कथा कितपत सत्य आहेत किंवा कल्पित आहेत याबद्दल आमचीं मतें भिन्न होऊं शकतील, पण या पारंपरिक कथांत अदृश्य विश्वांतील अदृश्य व्यक्तींसंबंधानें किंवा शक्तींसंबंधानें जें वर्णन सांपडतें, तें तत्त्वतः खऱ्या गोष्टींचें चित्रण आहे, एवढें आम्हांला वरील युक्तिवादाचा विचार करतां मान्य करावें लागेल हें उघड आहे. अर्थात् हें एकदां मान्य केलें म्हणजे पार्थिव जीवनांत किंवा अचेतनांतून चेतनाचा विकास होण्याच्या क्रियेंत मंगल-अमंगलाची प्राथमिक जन्मभूमि नसून, ती मूळ अतिपार्थिव जीवनांत आहे, अतिभौतिक विश्वांतील जीवनांत आहे व विशाल अतिभौतिक निसर्गांत मंगल-अमंगलाचा प्रथम उदय होत असून, भौतिक निसर्गांत त्या अतिभौतिक मंगल-अमंगलाचें प्रतिबिंब पडत असतें, असा पक्ष घेणें आम्हांला भाग पडतें.

      आमचा असा निश्चित अनुभव आहे कीं, पृष्ठगत देखाव्यांतून आम्ही आंत गेलों, खोल आंत गेलों म्हणजे आम्हांला तेथें असें दृश्य दिसतें कीं, मानवाचें मन, हृदय, संवेदनात्मक अंग या सर्वांना मानवाच्या ताब्याबाहेरच्या शक्ती हलवीत, चालवीत आहेत; विश्वव्यापी स्वरूपाच्या शक्तींच्या हातांतील तो एक यंत्र बनला आहे आणि हें सर्व त्याला कळतहि नाहीं; त्याच्याकडून घडणाऱ्या व्यवहारांचें खरें उगमस्थान त्याला कळत नाहीं. मनुष्य जेव्हां वरच्या भौतिक पातळीवरून खालीं आंत, मागें पाऊल टाकतो, आपल्या आंतर अस्तित्वांत प्रवेश करतो, आंतर जाणिवेचा आश्रय करतो, तेव्हां त्याला या 'अदृश्य' शक्ती दिसतात, त्यांची तो प्रत्यक्ष ओळख करून घेऊं शकतो आणि त्यांचे स्वतांवर घडणारे परिणाम जाणून त्यांच्याशीं जाणीवपूर्वक व्यवहार करूं शकतो. तेथें आंत त्याला हें स्पष्ट होतें कीं, बाह्य पातळीवर असतांना ज्या आंतरिक प्रेरणा त्याला स्वतःच्या वाटत होत्या आणि ज्यांच्याशीं तो झगडत होता त्या प्रेरणा त्याच्या स्वतःच्या मनांत जन्मल्या नव्हत्या, तर त्या बाहेरून तेथें येऊन,

पान क्र. ५४५

 

तेथीलच असल्याचें सोंग घेऊन त्याला या दिशेनें, त्या दिशेनें ओढून नेण्याच्या खटपटींत होत्या. मनुष्य हा जाणीवयुक्त प्राणी, जाणीवशून्य जगांत जाणीवशून्य जडभौतिक बीजांतून कसा तरी, अगम्य रीतीनें उत्पन्न झाला आहे आणि अंधकारमय आत्मनेणिवेनें, अज्ञानाच्या अंधारांत, कोठेंतरी भटकत आहे अशी वस्तुस्थिति नसून, तो देहधारी आत्मा आहे, त्याच्या द्वारां, त्याच्या व्यवहारांच्या द्वारां, विश्वप्रकृति आपलें इष्ट सिद्धीस नेण्याच्या खटपटींत आहे ही वस्तुस्थिति, बाह्य पातळी टाकून आंतर अस्तित्वाचा आणि जाणिवेचा आश्रय केल्यानें आमच्या अनुभवास येते. अज्ञानाच्या गाढ अंधकारांतून हा देहधारी आत्मा येथें भौतिक जगांत प्रकट होतो; या आत्म्याचें पार्थिव जीवन हें महान् युद्धाचें जणुं जिवंत क्षेत्र आहे -- अज्ञानाचा अंधकार आणि ज्ञानाचा प्रकाश या दोन शक्तींमध्यें हें महान् युद्ध चाललेलें आहे -- प्रकाश ऊर्ध्वमुख आहे आणि क्रमश: वाढत  आहे : युद्धाचा शेवट देहधारी आत्म्याला अजमावतां येत नाहीं; या गोष्टीहि आमच्या आंतर जाणिवेला स्पष्ट होतात. मनुष्याला, देहधारी आत्म्याला ज्या शक्ती (मंगल शक्ती, अमंगल शक्ती आणि इतर शक्ती) प्रेरणा देऊन क्रियाशील करीत आहेत, त्या विश्वव्यापी निसर्गशक्ती आहेत, पण भौतिक विश्वाच्याच त्या शक्ती असतात असें नसून, भौतिकाच्या पलीकडील अतिभौतिक प्राणमय आणि मनोमय विश्वाच्याहि त्या असतात असें आम्हांला आंत गेल्यावर दिसतें.

      या शक्ती जेव्हां क्रियाशील होतात तेव्हां त्यांचें कार्य मानवी सापेक्ष मापाच्या फार पलीकडे जातें, ही गोष्ट मुख्यतः आमच्या लक्षांत येते. त्यांचें कार्य मोठ्या प्रमाणावर होतें व तें अतिमानवी म्हणावें लागतें -- कार्यविस्ताराच्या दृष्टीनें या शक्तींना दिव्य (ईश्वरी) म्हणावें लागतें किंवा आसुरी, राक्षसी म्हणावें लागतें -- त्या अतिमानवी असतात, श्रेष्ठांत श्रेष्ठ मानवी शक्तीहून श्रेष्ठ असतात म्हणून त्यांना दिव्य (ईश्वरी) किंवा आसुरी, राक्षसी हें नांव देणें भाग पडतें. या शक्ती मनुष्याच्या ठिकाणीं ज्या रचना, जे बनाव घडवितात ते मोठेपणांत प्रचंड असतात, किंवा लहानपणांतहि प्रचंड, म्हणजे अतिलहान असतात; मनुष्याचा मोठेपणा त्या प्रचंड प्रमाणांत वाढवितील किंवा त्याचा लहानपणा (क्षुद्रपणा) प्रचंड प्रमाणांत त्या वाढवितील. मनुष्याला वेळोवेळीं कांहीं क्षणापुरतें ताब्यांत घेऊन कांहीं क्षणच त्या ढकलीत नेतील किंवा त्याला वेळोवेळीं दीर्घकाळ ताब्यांत घेऊन दीर्घकाळ पावेतों त्या ढकलीत राहतील;

पान क्र. ५४६

 

मनुष्याच्या प्रेरणांवरच त्या प्रभाव पाडतील, किंवा त्याच्या व्यवहारावरच त्या प्रभाव पाडतील, किंवा असा एकांती प्रभाव न पाडतां त्याचा सर्व स्वभाव त्या आपल्या प्रभावाखालीं आणतील, सर्वच्या सर्व मनुष्य ताब्यांत घेऊन त्यावर आपली हुकमत चालवतील. मनुष्य या शक्तींनीं ताब्यांत घेतला, म्हणजे तो मंगल करील (चांगलें करील) तर तें सामान्य मानवी प्रमाणाच्या फार पलीकडलें मंगल (चांगलें) असेल, तो अमंगल (वाईट) करील तर तें सामान्य मानवी प्रमाणाच्या फार पलीकडलें अमंगल (वाईट) असेल. मानवाच्या ठिकाणीं होणाऱ्या या शक्तींच्या अतिमानवी प्रेरणांमुळें चांगल्या किंवा वाईटाचा अतिरेक त्याजकडून होत असतो. विशेषत: 'वाईट' हें अशी रूपें धारण करतें, कीं त्यांजकडे पाहून मनुष्याला धक्का बसतो. वाईटाचीं, अमंगलाचीं हीं रूपें अति अवाढव्य असतात, सर्व मानवी मर्यादा मागें टाकणारीं असतात; म्हणून असा प्रश्न उभा राहूं शकतो कीं, मंगलाप्रमाणें अमंगलालाहि पूर्णरूप म्हणून कांहीं असतें असें कां मानू नये ? मनुष्याच्या ठिकाणीं अशी प्रेरणा, आकांक्षा, तळमळ असते कीं, पूर्ण सत्य, पूर्ण मंगल, पूर्ण सौंदर्य आपण आत्मसात् करावें -- अर्थात् मूळ पूर्ण सत्य-मंगल-सौंदर्य ज्याप्रमाणें मनुष्याच्या द्वारां  (अपूर्ण रूपांतून) आपल्या स्वाभाविक पूर्णत्वाकडे ओढ घेत असतें, त्याप्रमाणें मूळ पूर्ण अमंगल मनुष्याच्या द्वारां (अपूर्ण रूपांतून) आपल्या स्वाभाविक पूर्णत्वाकडे ओढ घेत असतें, असें कां मानूं नये असा प्रश्न आहे. अमर्याद शारीर वेदना, अमर्याद मानसिक दु:ख आणि आतांच वर्णन केलेलें अमर्याद अमंगल पाहतां, पूर्ण अमंगल म्हणून कांहीं मुळांत असून तें मनुष्याच्या ठिकाणीं आपलें पूर्णत्व, अर्थात् आपलें आत्मस्वरूप, प्रकट करण्यासाठीं धडपडत असतें असा निष्कर्ष कां काढूं नये असा प्रश्न आहे. या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, प्रमाणाचा अमर्यादपणा हें कांहीं पूर्णाचें लक्षण नव्हे; पूर्ण हें तत्त्वतः मोजमाप असलेली साकार वस्तु मुळीं नसतेच; पूर्ण हें अमर्याद आहे, असें आपण म्हणूं शकतो; पण तें केवळ आकारानें अमर्याद आहे असा याचा अर्थ घ्यावयाचा नसतो, तर तात्विक अस्तित्वाच्या दृष्टीनें त्याला मर्यादा नाहीं, या दृष्टीनें तें स्वतंत्र, स्वयंभू आहे; तें अतिमहान् अनंताच्या द्वारां व्यक्त होऊं शकतें आणि अतिसूक्ष्म पराकोटीच्या सूक्ष्म परमाणुद्वारांहि प्रकट होऊं शकतें, असा अर्थ घ्यावयाचा. मनाच्या पातळीवरून आम्ही आत्म्याच्या पातळीवर चढलों -- हें चढणें म्हणजे पूर्णाच्या दिशेनें वाटचाल करणें आहे -- म्हणजे आमच्या

पान क्र. ५४७

 

मानवी मर्यादा मागें पडल्याचें द्योतक म्हणून आमचें क्षेत्र सूक्ष्म आणि विस्तृत होतें, आम्हांला मिळणारा प्रकाश सारखा वाढत जातो व प्रखर होत जातो : हीं सर्व चिन्हें आम्ही उंच वाढल्याचीं, व्यापक होत असल्याचीं, आकाराच्या सामान्य मर्यादा उल्लंघून जात असल्याचीं आहेत; पूर्णाची आंतर - स्वयंभूत्वाची पूर्णता या चिन्हांनीं व्यक्त होत नाहीं. वाढता प्रकाश, वाढती शक्ति, शांति, आनंद हा, अनंत प्रकाश, अनंत शक्ति, शांति, आनंद या असीमतेच्या ''सीमेला'' येणें म्हणजें पूर्णानें आपलें मूळ पूर्णत्व पुन: संपादन करणें होय. पूर्ण आहे, तें स्वयंसिद्ध आहे. तें अणूहून अणु, तर महानाहून महत्तर असें आहे. वेदना, दुःख, अमंगल यांना असली पूर्णता नाहीं, त्यांना ती प्राप्त होत नाहीं. या वेदनादि घटना मर्यादाबद्ध आहेत, त्या मौलिक नाहींत, दुय्यम अस्तित्वानें युक्त आहेत. वेदना मर्यादेपलीकडे गेली, कीं ती स्वतःचा अंत करून घेते किंवा ज्या प्राण्याचे ठिकाणीं ती व्यक्त होऊन वावरत असते, त्याचा अंत करते; केव्हां केव्हां ती संवेदनाशून्यता निर्माण करून विराम पावते; क्वचित् विरळा प्रसंगीं ती आनंद-समाधीचें रूप घेऊन नाहींशी होते, आनंद-समाधींत रूपान्तर पावते. अमंगल हें, एकच एक अस्तित्व म्हणून टिकलें आणि असीम झालें, अमेय झालें, तर तें विश्वाचा अंत करील; किंवा जेथून तें उदयास आलें, ज्याच्या आधारानें तें अस्तित्वात टिकलें त्याचा अंत करील. अमंगल प्रमाणाबाहेर वाढून एकमेव राहिल्यास सर्व वस्तू आणि तें स्वत: विघटनाच्या प्रक्रियेनें परत शून्यांत जमा होईल. अंधकार आणि अमंगल यांचा पाठपुरावा करणाऱ्या शक्ती स्वतःची वाढ करीत अनंत, असीम होण्याचा देखावा उत्पन्न करण्यासाठीं धडपडतात. परन्तु या धडपडीनें त्या अतिमहान् होतात, पण असीम, अनंत होऊं शकत नाहींत : आपलें स्वतःचें रूप अचेतनाच्या तोडीचें अगाध, अनंत असल्याचा देखावा या शक्ती केव्हां केव्हां निर्माण करूं शकतात, पण हा केवळ देखावाच असतो; अर्थात् देखाव्याचें हें अनंतत्व खोटें असतें; स्वयंभू पुरुषाचा शाश्वत अंगभूत अंश म्हणून स्वयंभूपणा किंवा स्वतःचें सारभूत अस्तित्व म्हणून स्वयंभूपणा असणें हें पूर्णतेचें, खऱ्या अनंततेचें लक्षण आहे. प्रमाद, असत्य, अमंगल या विश्वशक्ती आहेत; पण त्या स्वभावत: सापेक्ष आहेत, निरपेक्ष पूर्णतेच्या नाहींत; अप्रमाद, सत्य, मंगल, या ज्या त्यांच्या विरोधी शक्ती, त्या शक्तींना विकृत करण्यानें किंवा विरोध करण्यानें प्रमाद, असत्य, अमंगल यांचा उदय होतो; याप्रमाणें पाहतां त्यांचें अस्तित्व

पान क्र. ५४८

 

परावलंबी आहे. उलट, 'स्वयंभू ब्रह्माचीं स्वाभाविक अंगें' या वर्गांत सत्य, मंगल या शक्ती पडतात.

      असत्य, अमंगल या शक्ती स्वतंत्र पूर्ण विश्वतत्त्वें असल्याचा संशय त्यांच्या अतिमानवी कार्यामुळें ज्याप्रमाणें उत्पन्न होतो, त्याप्रमाणें तो त्यांच्या भौतिकपूर्व अतिभौतिक अस्तित्वामुळें सुद्धां उत्पन्न होतो. त्यांचें अतिमानवी कार्य कितीहि प्रचंड असलें, तरी त्यायोगें त्यांचें पूर्णत्व वा स्वयंसिद्धत्व सिद्ध होत नाहीं ही गोष्ट आतांच स्पष्ट केली. त्यांच्या भौतिकपूर्व अतिभौतिक अस्तित्वाच्या बाबतींत प्रथम हें लक्षांत घ्यावयाचें कीं, खालच्या अतिभौतिक प्राण-भूमींवर या शक्ती आहेत; त्यांच्यापलीकडे त्यांचें अस्तित्व नाहीं. प्राणतत्त्व हें, भौतिक विश्वाच्या वरील कांहीं विश्वांत, प्राणविश्वांत आणि प्राणप्रधान मनोविश्वांत प्रभुत्वयुक्त आणि अनिवार्य अंगभूत असें असतें. या मध्य विश्वांत असत्य व अमंगल या शक्ती आढळतात; त्यांना ''वायुराजाच्या शक्ती'' असें प्राचीन कथांत म्हणतात; ''वायु'' हें प्राचीन प्रतीक प्राणतत्त्व दाखविणारें आहे. असो. तेव्हां ''विश्वाच्या आद्य शक्ती'' या वर्गांत, असत्य व अमंगल या शक्ती पडत नाहींत, तर त्या प्राणाच्या किंवा प्राणगत मनाच्या निर्मिती आहेत; प्राणानें किंवा प्राणगत मनानें त्या अस्तित्वांत आणल्या आहेत ही वस्तुस्थिति आहे. या शक्तींचीं जीं अतिभौतिक विविध कार्यें व रूपें आढळतात आणि पार्थिव प्रकृतीवर त्यांचा जो प्रभाव पडलेला आढळतो त्याचें कारण, पूर्णाच्या उतरत्या संकोचक्रमांत बनलेलीं विश्वें आणि त्याच्या चढत्या विकासक्रमांत बनलेली विश्वें समांतरपणें, सहअस्तित्वानें आहेत हें आहे. विकासक्रमांतील पार्थिव बनावांना आधार म्हणून संकोचक्रमांतील समांतर विश्वांची निर्मिति केलेली असते; या अतिभौतिक समांतर विश्वांत अमंगलाचा उदय होऊं शकतो; सर्व प्राणमयांत, सर्व जीवनांत स्वाभाविक, अंगभूत म्हणून हें अमंगल उदय पावतें, असें मात्र नव्हे -- कोणतीहि शक्यता अंतीं वास्तवांत अनिवार्यपणें येतेच हा जो निसर्गनियम आहे, त्या नियमानुसार हें अमंगल उदय पावत असतें; आणि अतिभौतिक प्राण-भूमींत तें उभें राहिलें म्हणजे अचेतनांतून चेतना (जाणीव) विकासक्रमानें वर येत असतांना त्या भौतिकनिष्ठ उदयाच्या क्रमांत या अतिभौतिक, अमंगलाची आवृत्ति निघावयाचीच असा नियम आहे. असत्य, प्रमाद, अन्याय, अमंगल यांचें नीट निरीक्षण करून त्यांचें मूळ समजून घ्यावयाचें असेल, तर अचेतनांतून

पान क्र. ५४९

 

या वस्तू वर कशा येतात, तें आम्ही पाहिलें पाहिजे. अचेतनता परत चेतनाकडे वळून वाटचाल करूं लागली म्हणजे असत्यादि विरोधी वस्तू किंवा शक्ती साकार होतांना दिसतात; या वाटचालींत या गोष्टी स्वाभाविकपणें वावरतांना दिसतात, आणि येथें त्या अपरिहार्यहि आहेत असें पण दिसतें.

      अचेतनांतून प्रथम जड भौतिक द्रव्य बाहेर निघतें; या जडांत असत्य अमंगल या वस्तू वा शक्ती असूं शकत नाहींत; कारण भेदनिष्ठ, भागमय, अज्ञानग्रस्त, पृष्ठगत जाणीव (चेतना) आणि तिच्या प्रतिक्रिया यांतून असत्य वा अमंगल यांची निर्मिति होत असते. जड भौतिक शक्ती वा पदार्थ यांचे ठिकाणीं अशी पृष्ठगत, संघटित, क्रियाशील जाणीव नसते; अशा जाणिवेच्या प्रतिक्रिया नसतात. या शक्तींच्या, पदार्थांच्या पोटीं जी जाणीव गुप्तपणें असते ती अविभक्त, एक, मूळ अशी जाणीव असते. भौतिक पदार्थ हा भौतिक शक्तीचा बनलेला असतो; या भौतिक शक्तीच्या पोटीं अक्रिय, अंगभूत स्वभावगत अशी एकतापूर्ण, अभिन्न मूक जाणीव असते; ही जाणीव स्वतःच्या गुप्त कल्पनेनुसार विशिष्ट भौतिक पदार्थ घडवून आणते आणि अस्तित्वांत टिकविते; याखेरीज ती तेथें कांहीं करीत नाहीं. ती तेथें आपलें हृद्‌गत व्यक्त करण्याच्या भानगडींत पडत नाहीं; स्वत: निर्माण केलेल्या जड शक्तींच्या पोटीं आत्ममग्न होऊन राहते, ध्यानस्थ होऊन राहते; जड आकारानुसार ही गुप्त जाणीव आपल्या अस्तित्वाचा आकार वेगळा वेगळा घेते (रूपम् रूपम् प्रतिरूपो बभूव). पण कोणत्याहि जडांत ती मनाचें संघटन करीत नाहीं; जाणीवपूर्वक क्रिया-प्रतिक्रियांची व्यवस्था कोणत्याहि जड पदार्थांत ती करीत नाहीं. भौतिक जड पदार्थांचा जाणीवयुक्त प्राण्यांशीं संबंध आला म्हणजे मात्र चांगले किंवा वाईट म्हणण्यासारखें संस्कार ते करतात; पण संपर्क आलेल्या प्राण्याला जे साह्यकारक ते संस्कार चांगले; त्याला जे उपद्रवकारक ते संस्कार वाईट; असें हें वर्गीकरण असतें. चांगलेपणा, वाईटपणा हे गुण जड पदार्थांच्या ठिकाणीं नसतात; तर या पदार्थांचा उपयोग करणाऱ्या शक्ती किंवा या पदार्थांच्या संपर्काचा प्रसंग आलेली जाणीव, हे गुण, हीं मूल्यें त्या पदार्थावर आरोपित करतात किंवा त्या पदार्थांत निर्माण करतात. अग्नि माणसाला ऊब देतो, अग्नि माणसाला भाजतो; माणसानें बुद्धिपूर्वक अग्नीची ऊब घेतली, तर तो त्याला ऊब देतो; माणूस न कळत अग्नीच्या धगींत

पान क्र. ५५०

 

सांपडला, तर तो त्याला भाजतो. माणसाला औषधि बरी करते, विष माणसाचा जीव घेतें. अग्नि काय, औषधि काय, विष काय यांना, उपयोग करणारा, आपल्या उपयोग करण्याच्या क्रियेनें चांगलेंपणा, वाईटपणा देत असतो. विष माणसाला मारूं शकतें, तसें बरेंहि करूं शकतें. औषधि माणसाला बरें करूं शकते, हितकर होऊं शकते, तशी ती त्याला मारूंहि शकते, उपद्रवहि पोंचवूं शकते. शुद्ध जड विश्व या बाबतींत तटस्थ असतें, जबाबदारीच्या पलीकडे असतें; मानवी प्राणी मानीत असलेलीं मूल्यें, चांगलेपणा, वाईटपणा हे गुण जड निसर्गांत अस्तित्वांत असत नाहींत. उच्चतम परा प्रकृतींत, ईश्वरी प्रकृतींत चांगले-वाईट, मंगल-अमंगल हें द्वंद्व नाहीं, त्याप्रमाणें कनिष्ठतम अपरा जड प्रकृतींतहि हीं मूल्यें, हे गुण हें द्वंद्व नाहीं. कनिष्ठ अपरा जड प्रकृति या मूल्यांच्या खालच्या पातळीवर आहे; उच्चतम परा प्रकृति या मूल्यांच्या वरतीं असलेल्या पातळीवर आहे. भौतिक ज्ञान हें एवढेंच आपलें ज्ञान आहे असें असेल, तर जड पदार्थाच्या ठिकाणीं चांगुलपणा, वाईटपणा नसतो हें म्हणणें बरोबर आहे; पण या ज्ञानाच्या पाठीमागें जाऊन गुप्त विद्येच्या संशोधनानें प्राप्त झालेलें ज्ञान आम्हीं मान्य केले तर जड पदार्थांविषयींहि थोडें निराळें बोलावें लागेल. गुप्त विद्या सांगते कीं, जड पदार्थ देखील जाणीवयुक्त संस्कारांनीं संस्कारित असूं शकतात, आणि हे संस्कार अर्थात् चांगले आणि वाईट दोन्ही सदरांत पडतात. पण जड पदार्थ तटस्थ असतात या विधानाला येथेंहि बाधा येत नाहीं. कारण संस्कारित जड पदार्थ व्यक्ति-जाणिवेनें कांहीं स्वत: काम करीत नाहींत, त्यांचे ठिकाणी ''मी अमुक'' अशी व्यक्ति-जाणीव नसते; त्यांचा उपयोग चांगल्यासाठी, वाईटासाठी किंवा चांगल्यासाठीं आणि वाईटासाठीं दुसऱ्यांकडून होत असो. जड भौतिक तत्त्वाचे ठिकाणीं चांगलें-वाईट, मंगल-अमंगल हें द्वंद्व स्वाभाविक नाहीं, तें तेथें जन्म घेत नाहीं; जड विश्वांत त्याचा अभावच आहे.

       मंगल-अमंगल, चांगले-वाईट, इष्ट-अनिष्ट हें द्वंद्व व यांच्यासारखीं दुसरीं द्वंद्वें यांची उत्पत्ति, जाणीवयुक्त जीवनाबरोबर होते; जीवनांत मनाचा उदय झाला म्हणजे हें द्वंद्वाचें राज्य पूर्णपणें चालू होतें, अनिष्ट, अमंगल ही वस्तु आणि त्याबरोबरच अनिष्टाची, अमंगलाची संवेदना जी अस्तित्वांत येते, ती प्राणप्रधान मन, वासनामय, संवेदनाशील मन याच्यामुळें अस्तित्वांत येते. मनुष्येतर प्राणिजीवंनात अनिष्ट ही वस्तु असते, दुःखरूपी अनिष्ट असतें, दुःखाची संवेदना पण असते. तसेंच हिंसा,

पान क्र. ५५१

 

क्रौर्य, झगडा, फसवाफसवी हीं अनिष्टें पण प्राणिजीवनांत असतात. पण नैतिक अनिष्टाची संवेदना मात्र मनुष्येतर प्राण्यांत नसते. या प्राण्यांत पाप-पुण्य हें द्वंद्व नसतें, जीवन-रक्षणासाठीं सर्व प्रकारचा व्यवहार योग्य (समर्थनीय) मानला जातो, स्वाभाविक जीवनप्रेरणा तृप्त करण्यासाठीं करावे लागणारे सर्व व्यवहार समर्थनीय मानले जातात; त्यांत पाप-पुण्य हे वर्गीकरण नसतें, ते सर्व व्यवहार तटस्थ वर्गांत पडतात. दुःख-सुख जीवन (वासना) तृप्ति-अतृप्ति यांत संवेदनात्मक इष्ट-अनिष्ट हीं मूल्यें स्वभावत:च प्रतीत होतात; परंतु मानवाला हीं मूल्यें इतर प्राण्यांप्रमाणें केवळ संवेदनात्मक राहत नाहींत. त्यांत तो आपल्या मनानें वैचारिक आणि नैतिक कल्पनांची भर घालतो. त्याचे ठिकाणीं संवेदनेचें इष्ट-अनिष्ट, वैचारिक इष्ट-अनिष्ट, नैतिक इष्ट-अनिष्ट सुद्धां बनतें. अर्थात् मनानें निर्माण केलेली वैचारिक, नैतिक मूल्यें म्हणजे केवळ मनाच्या रचना आहेत आणि म्हणून खोट्या वस्तू आहेत, मिथ्या कल्पना आहेत असें अनुमान करणें मात्र संयुक्तिक होणार नाहीं. निसर्गाचे सर्व व्यवहार तटस्थ बुद्धीनें, समबुद्धीनें आम्हीं पहावे आणि भोगावे, निसर्ग जें कांही करतो तें ईश्वरी नियमानुसार करतो, निसर्गनियमानुसार करतो, आणि या नियमांत कोणत्याहि व्यवहाराला सारखेंच स्थान आहे; या व्यवहारांपैकीं कांहींवर इष्ट, कांहींवर अनिष्ट, असा वैचारिक वा नैतिक शिक्का मारणें चुकीचें आहे, कारण मनाच्या रचना मिथ्या गोष्टींत मोडतात -- असा युक्तिवाद करणें संयुक्तिक नाही. निसर्ग जें कांहीं करतो तें ईश्वरी नियमानुसार करतो..... निसर्गाचे व्यवहार तटस्थ बुद्धीनें, समबुद्धीनें पहावे या म्हणण्यांत तथ्य नाहीं असें नाहीं. पण संपूर्ण सत्य त्यांत नाही. निसर्गाच्या व्यवहारावर वैचारिक व नैतिक इष्ट-अनिष्टतेचा शिक्का मारणें यांतहि काहीं सत्य आहे. मनुष्याच्या द्वारां निसर्ग विकासाच्या पायऱ्या चढत आहे; या विकासप्रक्रियेला साहाय्यक अशी एक मानवी जाणिवेची क्रिया, म्हणजे नैतिक इष्ट-अनिष्टाची दृष्टि होय. ही दृष्टि येणें, - नैतिक मूल्यांची आवश्यकता मनुष्याला पटणें व त्यांचें महत्त्व त्याच्या नजरेंत भरून त्याच्या व्यवहाराला नैतिक वळण लागणें या गोष्टी विकासशील निसर्गाच्या वाटचालींतील अवश्य व अनिवार्य असे टप्पे आहेत. विशिष्ट ''नैतिक'' निर्णयांची योग्यायोग्यता कमीअधिक असू शकेल, उपयुक्तता कमीअधिक असू शकेल, पण नैतिक निर्णय हे मनुष्याच्या विकासाला केवळ उपकारकच नव्हेत, तर अनिवार्यपणे

पान क्र. ५५२

 

आवश्यक आहेत हें लक्षांत घेणें आवश्यक आहे. मनुष्याची वैचारिक, नैतिक इष्ट-अनिष्टाची दृष्टि देणारी जाणीव ही सत्याचीच एक बाजू आहे, हें लक्षांत वागवून आतां सत्याच्या दुसऱ्या बाजूंचा विचार -- मानवी बुद्धीच्या पातळीखालीं असणाऱ्या सत्याचा, अनासक्त अलिप्त मानवी बुद्धीला प्रतीत होणाऱ्या सत्याचा आणि बुद्धीच्या पातळीच्या वर असलेल्या आध्यात्मिक पातळीवरील सत्याचा विचार -- करणें उपयुक्त होईल. जीवन (प्राणमय) आणि जड भौतिक तत्त्व हा सत्याचा भाग बुद्धीच्या पातळीच्या खाली आहे; जडतत्त्व आणि प्राणतत्त्व, तटस्थ आणि निःपक्षपातीपणानें सर्व वस्तू व घटना ह्या निसर्गाच्या वस्तू व घटना म्हणून सारख्याच मान्य करतात, जीवनाची निर्मिति, स्थिति आणि विनाश यांसाठीं निसर्गाच्या सर्व वस्तू व घटना उपयोगी पडणाऱ्या आहेत व म्हणून त्या सर्व सारख्याच स्वागतार्ह आहेत अशी प्राणतत्त्व आणि जडतत्त्व यांची निश्चिति आहे : विश्वशक्तीच्या व्यवहारांत निर्मिति, निर्मितीचें रक्षण व विनाश या तीनहि अन्योन्यनिगडित व्यवहारांची सारखीच आवश्यकता आहे, त्यांची योग्यताहि त्यांच्या त्यांच्या स्थानीं सारखीच आहे : आणि निसर्गांतील घटना (व वस्तू) जीवनाच्या निर्मितीला, जीवनाच्या रक्षणाला किंवा त्याच्या नाशाला किंवा या व्यवहारांतून दोन व्यवहारांना अथवा तीनहि व्यवहारांना उपयोगी पडणाऱ्या, म्हणून सारख्याच उपयुक्त आहेत, अशी तटस्थ व नि:पक्षपाती वृत्ति, या बुद्धीच्या खालच्या पातळीवर असणाऱ्या जडतत्त्व आणि प्राणतत्त्व या तत्त्वांचे ठिकाणीं आढळते. अलिप्त बुद्धीनें सत्य पाहतां, तेथेंहि तटस्थ व निःपक्षपाती दृष्टि दिसते; निसर्गाला त्याच्या जड तत्त्वाशीं आणि प्राण-तत्त्वाशीं होणाऱ्या व्यवहारात ज्या वस्तू व घटना उपयोगी पडतात, त्या ही अलिप्त बुद्धि शांतपणें मान्य करते; तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक यांच्यामध्यें ही जिज्ञासु अलिप्त बुद्धि असते; ही बुद्धि निसर्गाचा व्यवहार समजून घेण्यासाठीं आसुसलेली असते; विश्वशक्तीच्या नैसर्गिक व्यवहारावर इष्ट-अनिष्टतेचा शिक्का मारण्याचा खटाटोप तिला अर्थशून्य आणि निष्फळ वाटतो. अलिप्त बुद्धीनंतर आतां आपण बुद्धीच्या पातळीच्या वरतीं असलेल्या आध्यात्मिक पातळीवर असलेलें सत्याचें स्वरूप पाहूं. येथें विश्वांत शक्य असलेल्या सर्व घटना आत्मा सारख्याच नि:पक्षपातीपणें स्वागतार्ह मानतो; अज्ञान आणि अचेतन विश्वांत, अज्ञान-अचेतनामुळें अगदीं स्वाभाविक आणि योग्य अशाच घटनांचा व परिणामांचा पसारा

पान क्र. ५५३

 

त्याला समोर दिसत असतो, किंवा हा पसारा ईश्वरी कार्यक्रमाचा एक भाग आहे असें तो मानतो : अर्थात् हा पसारा पाहतांना तो शांत असतो, पण त्याच्या ठिकाणीं करुणा जागृत असते आणि जेथें त्याला परिणामकारकपणें कोणाचें अनिष्ट दूर करतां येण्यासारखें असेल, तेथें तो साह्य देण्यासाठीं तत्पर असतो : अर्थात् अनिष्टापासून मुक्त होण्याचा एकच प्रभावी मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे मानवाचे ठिकाणी उच्च जाणीव, उच्च ज्ञान उदयास येणें हा आहे, हें तो स्वानुभवानें जाणतो. त्याचे स्वतःचे ठिकाणीं उच्च जाणीव आणि उच्च ज्ञान असतें. अर्थात् त्यामुळें तो स्वत: अनिष्ट-मुक्त असतो; पण अनिष्ट-बद्ध जीवांविषयीं त्याच्या अंत:करणांत करुणा असते, ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. असो. तेव्हां विश्वांतील घटना तटस्थपणें, नैतिक इष्ट-अनिष्टाचा शिक्का न मारतां पाहण्याचें काम बुद्धीच्या पातळीखालीं असलेल्या जडाला किंवा प्राणयुक्त जडाला साधतें, अलिप्त अशा तत्त्वज्ञ तत्त्वजिज्ञासु, वैज्ञानिक बुद्धीला आणि आध्यात्मिक ''बुद्धीला'' साधतें; सामान्य मानवी बुद्धि मात्र विश्वांतील घटनांवर वैचारिक, नैतिक इष्ट-अनिष्टतेचा शिक्का मारल्याशिवाय राहूं शकत नाहीं -- असा शिक्का मारून तदनुसार आचार घडवून आणणें हा तिच्या विकासाच्या क्रमाचा एक आवश्यक भाग आहे; इतका विचार येथपर्यंत झाला.

      आतां हा प्रश्न आहे कीं, मानवी जाणिवेची ही जी इष्ट-अनिष्ट- विषयक जागृति, तिचा उगम कोठें आहे ? इष्ट-अनिष्ट संवेदना मनुष्याच्या कोणत्या अंगांतून जन्मास येते ? मनुष्याच्या जीवनांत तिला जें स्थान आणि महत्त्व आहे तें तिला कोठून प्राप्त होतें ? या संवेदनेची नुसती प्रक्रियाच पाहिली, तर असें दिसतें कीं, प्राणमय मनच इष्ट-अनिष्ट हा भेद अस्तित्वांत आणतें. हें मन प्रथम जो भेद अस्तित्वांत आणतें, त्यांत व्यक्तीची संवेदना ही केवळ व्यक्तीपुरती लक्षांत घेतलेली असते; व्यक्तीच्या प्राणमय, वासनामय ''मी'' ला जें सुखकर, अनुकूल व फायद्याचें असेल, तें इष्ट आणि त्याला जें दुःख देणारें, त्रास देणारें, गैरफायद्याचें, विध्वंसक वाटेल तें अनिष्ट, असें हें पहिलें इष्ट-अनिष्ट द्वंद्व जीवनांकित मन उभें करतें. यानंतर समाजहित, सामाजिक उपयोगिता यांना प्राधान्य देऊन इष्ट-अनिष्ट हें द्वंद्व जीवनांकित प्राणप्रधान मन ठरवितें. सामुदायिक जीवनाला साहाय्यक असेल अशी व्यक्तीची वागणुक समुदाय टिकण्यासाठीं, सामुदायिक जीवनाच्या सुव्यवस्थेसाठीं हें जीवन

पान क्र. ५५४

 

टिकावें, त्याच्या गरजा भागाव्या, त्याचा विकास व्हावा आणि त्याबरोबर समाजघटक ज्या व्यक्ती, त्यांचाहि विकास व्हावा यासाठीं समाजदृष्टीनें अवश्य असणारी व्यक्तीची वागणूक 'इष्ट' या सदरांत, आणि समाजाच्या दृष्टीला व्यक्तीची जी वागणूक समाजहितविरोधी दिसेल ती 'अनिष्ट' या सदरांत पडते. यानंतर जीवननिष्ठ मनाचीं मूल्यें बाजूस सारून विचारनिष्ठ मन स्वतःचीं मूल्यें निर्माण करूं लागतें; मूल्यांना बौद्धिक पाया शोधूं लागतें; बुद्धीचा किंवा विश्वाचा नियम किंवा तत्त्व, बुद्धीनें निश्चित करून, त्या तत्त्वाला किंवा नियमाला विचारनिष्ठ मन इष्ट-अनिष्टाचा पाया बनवितें व याप्रमाणें तें कर्मसिद्धान्त उभा करतें. बुद्धीवर आधारलेलीं नीतिप्रणाली, सौंदर्यकल्पनेवर किंवा सहानुभूतीच्या भावनेवर किंवा सुखवासनेवर आधारलेली नीतिप्रणाली म्हणजे या विचारनिष्ठ मनाची निर्मिति असते; धर्मबुद्धि पण या कार्यक्रमांत आपला वांटा उचलते. आज्ञा किंवा नियम ईश्वरानें प्रसृत केले आहेत, असें धर्म सांगतो. आम्हीं सन्मार्गानें चालावें अशी ईश्वराची आज्ञा आहे. आम्ही असन्मार्गानें चाललों तरी तें निसर्ग खपवून घेतो किंवा आम्हांला असन्मार्गाला जाण्याची प्रेरणा देतो. पण आमचें असें वागणें ईश्वर कांहीं पसंत करीत नाहीं; सन्मार्ग धरा अशीच त्याची आज्ञा आहे असें धर्म सांगतो; किंवा सत्य आणि सदाचार हाच ईश्वर आहे, हें ईश्वराचें रूप आहे, यांखेरीज दुसरा ईश्वर नाहीं असेंहि, 'धर्माचें सांगणें' म्हणून सांगितलें जातें. तेव्हां धर्मदृष्ट्या सत्य, सदाचार हें इष्ट व दुसरें अनिष्ट, अशी नीति ठरते. मानवी प्रकृतींत जी नैतिक प्रेरणा आहे, तिचें आम्हीं व्यवहारांत अवलंबन, अनुसरण करावें यासाठी व्यावहारिक, बौद्धिक विविध द्वंद्वयोजना वरीलप्रमाणें कल्पिल्या असल्या, तरी या द्वंद्वांच्या योजनांत, कल्पनांत कांहींतरी उणीव आहे; इष्टानिष्टविषयक सत्य यांपेक्षां खोल आहे, असें आम्हांला सारखें वाटत राहतें. आतांपर्यंत इष्ट-अनिष्टविषयक ज्या कसोट्या सांगितल्या, त्या फार संकुचित आणि कठीण तरी आहेत किंवा फार संकीर्ण (गुंतागुंतीच्या) आणि गोंधळाच्या आहेत, अनिश्चित स्वरूपाच्या आहेत; मनांत वा जीवनांत बदल झाल्यानें, तसेंच विकासक्रमांतील वाटचालीनेंहि बदलणाऱ्या आहेत. या कसोट्यांहून सत्य वेगळें आहे, तें खोल आहे, तें शाश्वत टिकणारें आहे आणि हें सत्य, अंतःस्फूर्तीनें ज्याला कळतें असें कांहींतरी ज्ञानतत्त्व आमच्या अंतरंगांत आहे, असें आम्हांला सारखें वाटत राहतें. थोडक्यांत, खरी इष्ट-अनिष्टाची

पान क्र. ५५५

 

कसोटी आंतरिक आहे, आध्यात्मिक आहे, अंतःपुरुष आहे. जो सदसद्विवेक आमच्या आंतून आम्हांला इष्ट-अनिष्ट, बरें-वाईट शिकवितो त्यालाच परंपरेचें मत अंतःपुरुष, अंत:साक्षी मानतें; पण हा विवेक अर्धवट मानसिक, अर्धवट अंतःस्फूर्तीचा असा मिश्र असतो; ही विवेकशक्ति अविश्वसनीय असते, ही मौलिक नसून पृष्ठवर्ती, मनानें निर्माण केलेली अशी असते; या शक्तीपलीकडे, तिच्याहून श्रेष्ठ असा आंतर स्वयंभू प्रकाश आमच्या ठिकाणी आहे; हा प्रकाश म्हणजे आत्मतत्त्वाचें इष्टानिष्ट दर्शन होय; हें आध्यात्मिक दर्शन आमच्या अंतरंगांत खोल ठिकाणीं असतें, त्याजवर पृष्ठवर्ती गोष्टींचीं पुष्कळ आवरणें असतात, म्हणून हें दडलेलें, दडपलेलें दर्शन क्रियाशील होणें अवघड असतें इतकेंच.

      आतां हा अंतःसाक्षी, अंतरात्मा जो सर्व पाहणारा आहे आणि इष्टा- निष्ट ठरविणारा आहे, त्याचें स्वरूप काय आणि त्याला जें इष्ट वा अनिष्ट वाटतें त्या इष्ट-अनिष्टाला तो काय किंमत देतो ? या इष्ट-अनिष्टाचें त्याच्या दृष्टीनें महत्त्व कोणतें ? असा प्रश्न आहे. या प्रश्नाचें एक उत्तर असें संभवतें कीं, हा आत्मा म्हणजे या पृथ्वीवर देह धारण करून वावरणारा चैतन्यपुरुष आहे, आणि त्याला जें इष्टानिष्टदर्शन घडतें त्या दर्शनाचा उपयोग, त्या दर्शनाचे महत्त्व त्याला असें आहे कीं, त्याला या दर्शनामुळें या अचेतन-अज्ञानमय विश्वाच्या स्वरूपाची जाणीव होते, येथें जें दुःख आणि अमंगल आहे त्याचें सम्यक् ज्ञान होतें आणि येथील मंगल व सुख केवळ सापेक्ष आहे ही गोष्ट त्याला पटून, तो या विश्वाला कंटाळून, याच्या बुडाशीं जें पूर्ण तत्त्व आहे तें प्राप्त करून घेण्याच्या मार्गाला लागतो. दुसरें उत्तर असें संभवतें कीं, देहधारी आत्म्याला इष्टानिष्ट - दर्शनाचा उपयोग असा आहे कीं, त्यायोगें त्याला आपल्या प्रकृतींतून अनिष्ट दूर करून तेथें इष्टाचा, मंगलाचा प्रभाव वाढवितां येतो आणि या मार्गानें आपली प्रकृति विशुद्ध करून श्रेष्ठांत श्रेष्ठ मंगल जें काय असेल त्याचें दर्शन घेतां येतें व त्याच्या प्राप्तीसाठीं ईश्वराकडे सर्व लक्ष लावून विश्वाला पाठमोरें होतां येतें. तिसरें उत्तर असें संभवतें कीं, इष्टानिष्टदर्शनाचा उपयोग आत्म्याला हा आहे कीं, तो त्या दर्शनाचा फायदा घेऊन व आतांच सांगितल्याप्रमाणें आपली प्रकृति विशुद्ध करून, आपल्या अज्ञाननिर्मित विकृत अहम्-बुद्धीचा विलय करून, व्यक्तित्व आणि तज्जन्य दुःख यांजपासून स्वतःला मुक्त करूं शकतो; हे उत्तर बुद्धप्रणीत नीतिधर्माला धरून आहे. चवथें उत्तर असें संभवतें

पान क्र. ५५६

 

कीं, आत्मा विकासक्रमानें वर चढत आहे आणि या विकासक्रमांत इष्टानिष्टविषयक जागृति हा एक अनिवार्य टप्पा आहे; आत्मा अज्ञानांतून बाहेर पडून वाढावा यासाठीं हा टप्पा अवश्य आहे; अज्ञानांतून आत्मा बाहेर पडल्याशिवाय दिव्य ईश्वरी एकतेचें सत्य त्याला अनुभवास येत नाहीं, म्हणून हा टप्पा अपरिहार्य आहे; आत्म्याचे ठिकाणीं दिव्य जाणीव आणि दिव्य अस्तित्व क्रमविकासानेंच विकसित होतें व या क्रमविकासाचा एक भाग म्हणून आत्म्याला इष्टानिष्टदर्शन आवश्यक असतें. मन इष्टाकडे, चांगल्याकडे वळेल तसें अनिष्टाकडे, वाईटाकडेहि वळेल; प्राणाचेंहि (जीवनाचेंहि) असेंच आहे; मन, प्राण यांना इष्ट-अनिष्ट, चांगलें-वाईट हा भेद असतो; पण या भेदाची जाणीव त्यांना वाईटापासून परावृत्त करतेच असें नाहीं. या भेदावर मनापेक्षां, प्राणापेक्षां अंतःपुरुषाचें, आत्म्याचें अधिक लक्ष असतें; या भेदांविषयीं मनापेक्षां, प्राणापेक्षां आत्मा अधिक आग्रही असतो; अर्थात् केवळ नीतिदृष्टीनें केलेला इष्ट-अनिष्ट भेद आणि आत्मदृष्टीनें केलेला इष्ट-अनिष्ट भेद यांत अंतर असतें. आत्मदृष्टि नीतिदृष्टीपेक्षां (नीतिदृष्टि ही मनाची दृष्टि असते.) विशाल असते. हा भेद आत्मा आग्रहानें करतो व मानतो, याचें कारण त्याची वाढ मंगल, सत्य, सौंदर्य असें जें इष्ट, त्यानें होत असते. आत्मा हा नित्य अनिवार्यपणें मंगलाकडे, सत्याकडे, सौंदर्याकडे ओढ घेत असतो; याच गोष्टींचें त्याला स्वाभाविक आकर्षण असतें. अमंगल असत्य अ-सौंदर्य असें जें अनिष्ट, त्याचा अनुभव आत्म्याला घ्यावा लागतो; हा अनुभव त्याला अवश्य आणि अपरिहार्य असतो. पण या अनुभवांतून त्याला पार जावयाचें असतें; त्याच्या अस्तित्वांत, आध्यात्मिकतेंत जी वाढ व्हावयाची ती, अमंगलांतून, असत्यांतून अ-सौंदर्यांतून तो पार गेल्यानेंच होऊं शकते; त्याचे ठिकाणीं मंगलाची, सत्याची, सौंदर्याची वाढ झाल्यानेंच त्याची व त्याच्या आध्यात्मिकतेची वाढ होऊं शकते. आम्हांमध्यें आंतरात्मा हा मूलभूत चैतन्य आहे. चैतन्याचा क्रमश: आविष्कार हें विश्वाचें स्वरूप या आंतरात्म्याला स्पष्ट दिसत असतें; चैतन्याच्या या क्रमश: आविष्कारांत, त्याला मिळणारा सर्व अनुभव या पार्थिव जीवनांत मिळतो म्हणून या पार्थिव जीवनाचा आणि सर्व अनुभवाचा आनंद आमचा आंतरात्मा, आदि चैतन्याचा वारस म्हणून, पूर्णतया भोगीत असतो. हा जो आनंद तो भोगतो, त्याचें भोगतत्त्व काय असतें ? आंतरात्म्याला जे संपर्क घडतात, ज्या घटना त्याच्या अनुभवांत

पान क्र. ५५७

 

येतात, त्या संपर्कांत, त्या घटनांत ईश्वरी गुप्त अर्थ असतो, ईश्वरी गुप्त तत्त्व असतें, त्यांच्यामागें ईश्वरी योजना असते; ईश्वरी कार्यक्रमांत त्यांचा विशिष्ट उपयोग असतो; हा ईश्वरी अर्थ, तत्त्व, योजना, उपयोग आमचा आंतरात्मा या सर्व संपर्कांतून आणि घटनांतून शोधून काढून, त्याचा आनंद भोगतो; या आनंदाचा आणखीहि एक महत्त्वाचा भाग असतो; आमचें मन, आमचा प्राण अचेतनांतून निघून, सर्वोच्च चेतनेकडे (जाणिवेकडे) वाटचाल करीत असतो : अज्ञानाच्या भेदांतून सर्वसमावेशक संपूर्ण जाणिवेकडे आणि ज्ञानाकडे वाटचाल करीत असतो; अनुभवसार काढण्याच्या आपल्या कार्यक्रमानें ही वाटचाल आंतरात्मा सुखाची आणि वेगाची करूं शकतो (सर्व अनुभव मनप्राणांच्या द्वारांच आंतरात्मा घेत असतो, आणि ते त्याच्या स्वत:च्या आणि मनप्राणांच्या उन्नतीसाठीं असतात हें स्पष्टच आहे); अर्थात् मनाची, प्राणाची वाटचाल सुखाची व वेगाची करण्याचा आनंद हा, या विश्वांतील घटनांचा ईश्वरी अर्थ शोधून काढून आत्मसात् करण्याच्या आनंदांत आणखी भर घालतो. मन-प्राणयुक्त आत्म्याची, त्याच्या (ईश्वराच्या) स्वत:च्या सत्यमय, मंगलमय, सौंदर्यमय स्वरूपाकडे ओढ लागावी व शेवटीं या स्वरूपाची जोड त्याला व्हावी हाच घटनांचा ईश्वरी अर्थ असतो. असो.

      आंतरात्मा प्राण-तत्त्वाला घेऊन क्रमश: वर चढत असतो; एका जन्मीं जेवढी चढण चढून झाली असेल तिच्यापुढील चढण पुढच्या जन्मीं, याप्रमाणें जन्मोजन्मीं तो वर चढण्याचा कार्यक्रम वाढत्या नेटानें करीत असतो. तो अचेतनाच्या गाढ अंधकारांतून आदि चैतन्याच्या प्रकाशाकडे वर चढत असतो; असत्यांतून सत्याकडे, दु:खांतून स्वत:च्या सर्वोच्च विश्वव्यापी आनंदाकडे चढत असतो. इष्ट-अनिष्ट-मंगल-अमंगल-विषयक त्याचें दर्शन हें त्याला चढण्याला मदत करीत असतें : उच्च प्रकाशाकडे नेणारें तें इष्ट, मंगल; उलट त्या प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला नेणारें तें अनिष्ट, अमंगल; हा भेद आंतरात्म्याला स्पष्ट कळतो व या दर्शनानुसार तो मन-प्राणाला घेऊन मार्गक्रमण करतो; मनाच्या कृत्रिम कसोट्या आणि आंतरात्म्याची कसोटी (इष्ट-अनिष्टविषयक) यांत अंतर असतें. आंतरात्म्याचें दर्शन मनापेक्षां अधिक खोल, अधिक सत्यस्पर्शी असतें हें सांगावयास नकोच. शुद्ध विचारनिष्ठ मनाला जो प्रकाश उपलब्ध असतो, त्यापेक्षां कमी दर्जाचा प्रकाश प्राणाला आणि प्राणप्रधान मनाला उपलब्ध असतो. या कमी दर्जाच्या प्रकाशांत वैचारिक वा नैतिक असे,

पान क्र. ५५८

 

इष्ट-अनिष्ट, मंगल-अमंगल असत नाहीं. त्याचप्रमाणें सर्वोच्च आध्यात्मिक प्रकाशांत मनाचें वैचारिक वा नैतिक असें, इष्ट-अनिष्ट, मंगल-अमंगल असत नाहीं. विशुद्ध मन हें मध्यगामी स्थान आहे. खालीं प्राणाचा आणि प्राणप्रधान मनाचा प्रदेश, वरतीं अध्यात्माचा प्रदेश अशी व्यवस्था आहे. तेव्हां नैतिक इष्ट-अनिष्ट मध्य-प्रदेशांत आहे आणि अध्यात्म प्रदेश हा नैतिक इष्ट-अनिष्टाच्या पलीकडे, वरतीं आहे; प्राणाचा आणि प्राणप्रधानाचा प्रदेश नैतिक इष्ट-अनिष्टाच्या पलीकडे खालतीं आहे. यासंबंधानें बरेंच विवेचन पूर्वीं येऊन गेलें आहे. येथें अध्यात्म प्रदेशासंबंधानें हें पुनः स्पष्ट करणें युक्त आहे कीं, येथें नैतिक इष्ट-अनिष्ट हें मनाचें वर्गीकरण नसण्याचें कारण, या वर्गीकरणाचें विकासक्रमांतील काम संपलेलें असतें हें होय. अध्यात्मप्रदेशांतील प्रखर चैतन्यप्रकाशांत अस्तित्वाचा सर्वश्रेष्ठ नियम काम करीत असतो आणि कनिष्ठ मनोरचित नियमाची मदत या नियमाला आवश्यक नसते. अध्यात्मप्रदेशांत खऱ्या मंगल-प्रेरणा स्वभावतःच प्रभावी असतात आणि अमंगल-प्रेरणा स्वभावत:च प्रभावशून्य असतात. सर्वश्रेष्ठ सत्याचा (सद्‌वस्तूचा, चैतन्याचा) नियम स्वयंभू असतो; हा नियम सर्व निकषांच्या वरतीं असतो. सर्वश्रेष्ठ अनंताची प्रकाशमय जाणीव कठोर, कठीण असत नाहीं; मृदु, लवचिक व सौम्य असते. या सर्वश्रेष्ठ, मृदु, अनंत जाणिवेची अनंत मृदुता तिला प्रतीत होणाऱ्या सर्वश्रेष्ठ मंगलाचे ठिकाणीं असते -- हें मंगल सर्वश्रेष्ठ सत्याचे ठिकाणीं, सद्वस्तूचे ठिकाणीं अंगभूत असतें, स्वाभाविक असतें; तें स्वयंभू, स्वयंप्रज्ञ, स्वयंचलित, स्वयंनियत व सर्वकल्याणसाधक असें असतें. अशा स्वयंभू मंगलाच्या उच्चतम अध्यात्मप्रदेशांत कनिष्ठ प्रदेशांतील इष्ट-अनिष्ट, मंगल-अमंगलविषयक वर्गीकरण असण्याची आवश्यकता नसते, हें उघड आहे.

      परम सद्‌वस्तूचे ठिकाणीं सत्य आणि मंगल स्वाभाविक असतात, तद्‌वत् असत्य, अमंगल हे अचेतनाचे स्वाभाविक परिणाम होत. अचेतनांतून प्राण, मन विकासक्रमानें वर येत असतां, अज्ञानाच्या प्रदेशांतून, प्रक्रियेंतून त्यांना जावें लागतें आणि तेथें विकासक्रमाचा एक भाग म्हणून, असत्य व अमंगल यांचा उदय होत असतो. हा यांचा उदय जो होतो तो कसा व कोणत्या प्रकारें होतो, त्यांचें अस्तित्व कशावर अवलंबून असतें आणि त्यांच्यापासून मुक्त होण्याचा, त्यांचें निराकरण करण्याचा मार्ग कोणता, याचा विचार आतां करावयाचा आहे. अचेतनांतून प्राणिक जाणीव आणि

पान क्र. ५५९

 

मानसिक जाणीव जेव्हां पृष्ठावरतीं येते, तेव्हां पृष्ठावर प्रकट होण्याच्या या तिच्या प्रक्रियेंत असत्य आणि असत् (अमंगल, अनिष्ट) या वस्तूंचा उदय होतो. असत्य आणि असत् यांचा उदय एकदमच होतो; यांच्या या समकालीन उदयाला कारण होणाऱ्या दोन गोष्टी आहेत : एक, मनाला कठीण माध्यमांतून वर यावें लागतें; दोन, त्याला स्वतंत्ररूपानें साकार झालेल्या जीवांत प्रकट व्हावें लागतें. आतां प्रथम माध्यमाची कहाणी घेऊं : मूळ जाणिवेचे दोन थर झालेले असतात; खालचा थर आणि वरचा थर. खालच्या थरांत गुप्त जाणीव आणि तिची स्वाभाविक अंगभूत ज्ञानशक्ति असते; वरील थर प्राणिक भौतिक जाणिवेच्या अनिश्चित अव्यवस्थित साकार द्रव्याचा असतो, मनाला खालच्या थरांतून निघून वरच्या थरांतून बाहेर पडावयाचें असतें; हें वरच्या थराचें माध्यम पार करावयाला कठीण असतें; तें अंधकारप्रधान असतें. मन या माध्यमावर -- साकार प्राणिक भौतिक अंधकारप्रधान अव्यवस्थित जाणिवेवर -- आपलें शासन चालवूं इच्छितें; तो त्याचा अधिकार असतो. कठीण माध्यमांतून बळानें रस्ता काढून वर येऊन, त्या मध्यस्थ प्राणिक भौतिक जाणिवेवर मन हुकुम चालवूं लागतें; पण या कार्यासाठीं त्याला अंगभूत स्वाभाविक ज्ञानशक्तीचा आधार नसतो; ज्ञान आपल्या श्रमानें उभें करायचें, जोडायचें आणि मग त्याचा उपयोग हुकमत चालविण्यासाठीं करावयाचा, हा मार्ग मनाला धरावा लागतो; ही माध्यमाची कहाणी झाली. मनाच्या ठिकाणीं असत्य आणि असत् यांच्या होणाऱ्या जन्माचें हें एक कारण. दुसरें कारण, स्वतंत्र रूपानें साकार झालेल्या विभक्त विभक्त जीवांत मनाला प्रकट व्हावें लागतें हें आहे. ज्या माध्यमांतून मनाला वर यावें लागतें तें सलग अखंड नसतें; त्याचे तुकडे पडलेले असतात; वेगळे वेगळे जीव साकार झालेले असतात. या साकार झालेल्या स्वतंत्र स्वतंत्र जीवांचे ठिकाणीं मनाला प्रकट व्हावें लागतें : या जीवाला आपलें अस्तित्व टिकवावयाचें असतें तें, त्याला आकार देणाऱ्या जड तत्त्वाच्या स्वाभाविक गतिशून्यतेविरुद्ध धडपड करून टिकवावयाचें असतें; तसेंच साकार झालेलें जड द्रव्य परत विघटनाच्या दिशेनें ओढ घेत असतें, परत मूळ अचेतनतेकडे ओढ घेत असते -- या त्याच्या स्वाभाविक ओढीविरुद्ध जीवाला स्वत:च्या अस्तित्वासाठीं धडपड करावी लागत असते. शिवाय, प्रत्येक जीवाला सर्व बाह्य जग एक प्रकारें विरोध करीत असतें; जीवाच्या अस्तित्वाला जगाचा मौलिक विरोध नसतो, पण

पान क्र. ५६०

 

जगांत अनेक संकटें, धोके जीवाला असतात. जीवाला जगावर आपला अधिकार जमवून आपल्या स्वतःकरितां जागा करून घ्यावयाची असते आणि आपली जगांतील स्थिति संतानोत्पत्तिद्वारां टिकवावयाची असते. संकटमय, अफाट जगाला तोंड देतांना जीवाला मर्यादित अशा परस्परसहकाराच्या (जड आणि प्राण यांच्या सहकाराच्या) तत्त्वाचा थोडासा आधार असतो, इतकेंच. अशा स्थितींत मनाची जाणीव जीवाचे ठिकाणीं किंचित् उदयास आली, म्हणजे तिच्या बळावर प्राणिक, भौतिक (शरीरधारी), अहंप्रभावित, स्वार्थसाधक व्यक्ति अस्तित्वांत येते, निसर्गाची ही एक निर्मिति असते; या निर्मितींत जड द्रव्य आणि प्राण एकत्र बांधलेला असतो; या प्राणयुक्त जडाच्या (जीवाच्या) पोटीं खरी व्यक्ति, आंतरात्मा, अंतःपुरुष असतो. या अंतःपुरुषाला आपलें हृद्गत व्यक्त करतां यावें यासाठीं निसर्ग प्राणयुक्त जड (जीव) रूपी साधन निर्माण करतो. मनाची जाणीव वाढत गेली, म्हणजे प्रारंभीं प्रधानतः प्राणिक भौतिक रूपाची असलेली व्यक्ति अधिक विकसित स्वरूप धारण करते. नित्यशः स्वार्थ साधणारी अशी मन-प्राण-शरीरयुक्त अहंस्वरूपाची ती बनते. आमची पृष्ठवर्ती जाणीव आणि आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वाचें विशिष्ट स्वरूप, आमचें नैसर्गिक जीवन आज ज्या तऱ्हेचें बनलें आहे त्या तऱ्हेचें ते बनण्यास वर वर्णन केल्याप्रमाणें दोन गोष्टी कारण झाल्या आहेत. अव्यवस्थितपणें साकार झालेल्या प्राणगत शरीरगत जाणीवरूपी कठीण माध्यमातून मनोगत जाणिवेला वर यावें लागते ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट ही कीं, अलग अलग जीवांत तिला प्रकट व्हावें लागते. या दोन गोष्टी जाणिवेच्या विकासशील प्रकटनाच्या पायाभूत अनिवार्य अशा उपाधी आहेत.

      जाणीव ही जडाला अगदीं विरुद्ध, अगदीं ''परकी'' अशी वस्तु असून, ती प्रथम अचेतन निसर्गांत उदयास येते आणि हळूहळू अनेक अडचणींतून मार्ग काढीत वाढत राहते; ही गोष्ट चमत्कार या सदरांत पडण्यासारखी खचितच आहे. ज्ञान मिळविलें जातें, अगदीं शून्यांतून जणों तें निर्माण केलें जातें, ज्ञानाचा अभ्यास केला जातो, तें वाढविलें जातें, त्याचा संग्रह केला जातो -- आणि हें सर्व करणारा कोण, तर क्षणभंगुर अज्ञानी जीव. या जीवाच्या जन्मक्षणीं त्याचें ठिकाणीं हें पुढें मिळविलेलें ज्ञान मुळींच नसतें; जें काय असतें तें आनुवंशिक ज्ञानप्राप्तिसामर्थ्य असतें आणि हें सामर्थ्य हळूहळू शिकणाऱ्या अज्ञानी जीवाच्या विकासक्रमांतील

पान क्र. ५६१

 

त्या त्या पायरीला अनुसरून कमीअधिक असतें. अस्तित्वांत घडून येणाऱ्या घटना मेंदूच्या पेशींवर मूळ अचेतनता (नेणीव) यंत्राप्रमाणें (अजाणता) उमटविते, लिहिते; हें यांत्रिक लिखाण यंत्रवत् ''वाचून'' त्याला उत्तर म्हणून त्या पेशी कांहीं यांत्रिक प्रतिक्रिया अजाणतांच करतात; आम्ही जिला जाणीव म्हणतो ती वस्तु हें लिखाण, वाचन व उत्तर हें सर्व मिळून बनते, असा एक अनुमानपक्ष संभवतो. पण या अनुमानांत जें कथन आहें तें पूर्ण सत्य नाहीं. या कहाणीप्रमाणें निरीक्षण आणि यांत्रिक क्रिया होत असेल कदाचित्; पण कल्पना करणें, विचार घडणें, अनुमान करणें, स्वत: निरीक्षिलेल्या वस्तुसंभाराशीं नाना तऱ्हेचा जो मुक्त व्यवहार बुद्धि करते तो व्यवहार घडणें या गोष्टींचें स्पष्टीकरण वरील कहाणींत नाहीं; आणि असें स्पष्टीकरण ''यांत्रिकता'' पक्ष देऊंच शकत नाहीं, निरीक्षण आणि यांत्रिक क्रिया, ''यांत्रिकता'' पक्षांत समजण्यासारख्या आहेत, असें वर म्हटलें आहे; पण नेणीवयुक्त लिखाण आणि उत्तर हे जाणीवयुक्त निरीक्षणांत रूपान्तरित कसें होतें, वस्तूची आणि आत्म्याची जाणीवयुक्त संवेदना नेणिवेच्या लिखाणांतून आणि उत्तरांतून कशी निघते, या गोष्टी ''यांत्रिकता'' पक्ष स्पष्ट करूं शकत नाही. असो जाणीव आणि ज्ञान विकासक्रमानें उदयास येतें व वाढत जातें ही गोष्ट घडते कशी, याचें एकच समर्पक उत्तर, वस्तुजाताच्या पोटीं जाणीव अगोदरच गुप्त रूपांत अस्तित्वांत आहे, आणि या जाणिवेच्या कांही स्वाभाविक अंगभूत शक्ती आहेत, आणि ही दडलेली शक्तियुक्त जाणीव अंशाअंशानें क्रमश: प्रकट होत असते, हें आहे. मनुष्येतर प्राण्यांचें जीवन ज्या घटनांचें बनतें, त्या घटना, तसेंच जीवांत मनाच्या उदयानें घडून येणाऱ्या घटना या पाहिल्यावर आम्हांला हा सिद्धान्त अपरिहार्यपणें करावा लागतो कीं, वर सांगितलेल्या, दडलेल्या जाणिवेच्या ठिकाणी ज्ञान आणि ज्ञानशक्ति स्वाभाविक आहे, आणि परिसराशीं जीवाचा संपर्क घडत जातो त्याप्रमाणें अनिवार्यपणें ही तळाशीं असलेली ज्ञानशक्ति व ज्ञान पृष्ठभागावर प्रकट होत जातें.

      जेव्हां पशुकोटींतील जीव पहिली स्वार्थसाधक क्रिया जाणिवेनें करतो, तेव्हां त्याला ज्ञानाचा पुरवठा दोन ठिकाणाहून होतो. एक, मूळ जाणीवशक्ति, जी अचेतनांत गुप्त असते ती, त्याला थोडेसें अंतर्ज्ञान पुरविते. दोन, जगाशीं या जीवाचा जो बाह्य पृष्ठगत संबंध येतो, जो संपर्क घडतो, त्या संपर्कांतून प्रथम जाणीवयुक्त संवेदना, नंतर

पान क्र. ५६२

 

ऐंद्रियज्ञान आणि त्या नंतर बुद्धि यांचा उदय होतो. ज्ञानाच्या या दोन उगमांसंबंधानें थोडें विस्तारानें लिहिणें आवश्यक आहे. पहिला उगम मूळ गुप्त जाणीवशक्ति; पशुजीव ज्ञानशून्य, असहाय असतो; त्याला बाह्य पृष्ठगत जाणीव अगदींच तुटपुंजी असते आणि अज्ञात अशा जगांत त्याला दिवस काढावयाचे असतात, म्हणून मूळ गुप्त जाणीवशक्ति बाहेर त्याच्याकडे थोडेसें अंतर्ज्ञान पाठविते. त्याला स्वतःचें अस्तित्व टिकवितां यावें, जगण्यासाठीं आणि प्रजोत्पत्तिसाठीं आवश्यक असणाऱ्या क्रिया त्याला करतां याव्या एवढ्यापुरतेंच अंतर्ज्ञान त्याजकडे पाठविलें जात असतें. हें अंतर्ज्ञान पशुजीवावर सत्ता चालवून त्याच्या हालचाली घडवून आणीत असतें. या ज्ञानावर पशुजीवाची सत्ता चालत नाहीं. पशुजीवांत जाणिवेचें जें प्राणद्रव्य आणि शारीर भूतद्रव्य असतें, त्या द्रव्याच्या कणांत हें अंतर्ज्ञान प्रकट होत असतें; जीवनाच्या एखाद्या गरजेचें दडपण येतें तेव्हांच आणि त्या प्रसंगापुरतेंच हें अंतर्ज्ञान प्रकट होऊन जीवाकडून जरूर ती क्रिया करवून घेतें; या अंतर्ज्ञानाचे बाह्य संस्कार जमा होतात आणि त्यांतून, जीवांत दृष्टोत्पत्तीस येणारी स्वयंक्रियाशील उपजतबुद्धि निर्माण होते; ही बुद्धि जीववंशाची मत्ता होते; आणि कोणत्याहि वंशातील घटकजीवाला ती उपजतच मिळते. अंतर्ज्ञान आणि उपजतबुद्धि यांत अंतर आहे तें हें की, अंतर्ज्ञान (अंतःस्फूर्ति किंवा स्फूर्ति) कधींहि चुकत नाही; उपजतबुद्धि सामान्यत: बरोबर काम करीत असली तरी तीं चुकूं शकते व प्रसंगी चुकतेहि; बाह्य पृष्ठगत जाणीव, अर्ध-विकसित बुद्धि ही उपजतबुद्धीच्या कामांत हस्तक्षेप करूं लागली की उपजत बुद्धि नीट काम देईनाशी होते किंवा घोडचुका करूं लागते; परिस्थिति बदलली असतां, गरज अस्तित्वांत नसतां उपजतबुद्धि यांत्रिकपणें जीवाकडून हालचाल घडविते, तेव्हांहि ती चुका करते. ही झाली मूळ जाणीवशक्तीकडून जीवाला मिळणाऱ्या अंतर्ज्ञानाची (स्फूर्तीची ? कथा. आतां, ज्ञानाचा दुसरा उगम विचारांत घेऊ : बाह्य जगाचा संपर्क जीवाला घडला म्हणजे या संपर्कांतून प्रथम जाणीवयुक्त संवेदना, नंतर ऐंद्रिय ज्ञान व त्यानंतर बुद्धि अशा क्रमाने जीवाला ज्ञान मिळतें, असें वर आलेंच आहे. यासंबंधांत आणखी जें सांगावयाचें तें हें कीं, बाह्य जगाच्या संपर्कानें संवेदना, ऐंद्रिय ज्ञान जें उत्पन्न होतें त्याला, संपर्क हा कांहीं सर्वथा कारण नव्हे. जीवाच्या आंत, खोल जाणीव गुप्त नसती, तर संपर्क निष्फल झाला असतां. वस्तुस्थिति अशी आहे कीं, जीवाच्या आंत

पान क्र. ५६३

 

आंतर-अस्तित्व असतें; अवचेतन प्राणतत्त्व आपल्या प्राथमिक गरजांनीं आणि तदर्थ हालचालींनीं या आंतर अस्तित्वाला प्राणयुक्त अस्तित्व बनवितें; हा आंतर-जीव (प्राणयुक्त अस्तित्व) बाह्य संपर्कानें डिवचला जातो, त्यांत कांहींतरी संवेदना होते आणि या संवेदनेची प्रतिक्रिया म्हणून तो बाह्य जीवांत हालचाल घडवितो. आंतर-जीवानें घडविलेली ही बाह्य जीवाची हालचाल म्हणजे त्याच्या पृष्ठगत जाणिवेचा, ज्ञानाचा आरंभ असतो; हें ज्ञान क्रमश: वाढत जातें. जीवाचा संपर्क ज्या पदार्थाशीं होतो, त्या पदार्थांत आणि जीवांत दोन्हीं ठिकाणीं जाणीवशक्ति अंतर्गत प्रच्छन्न रूपानें अस्तित्वांत असते; जीवांत प्राणतत्त्व जरुरीपुरतें संवेदनाशील झालें, म्हणजे पदार्थाचा संपर्क घडतांच ही प्रच्छन्न जाणीव त्याचे ठिकाणीं प्रतिक्रियारूपानें बाहेर प्रकट होते; या अशा प्रतिक्रियेनें पशुजीवाच्या मनाची (प्राणप्रधान मनाची) घडण सुरू होते. विकासक्रमांत हें मन वाढत वाढत विचारशील बुद्धीचें रूप घेतें; याप्रमाणें गुप्त जाणीव बाह्य पृष्ठगत संवेदनेचें, ऐंद्रिय ज्ञानाचें रूप घेते आणि गुप्त (जाणीवयुक्त) शक्ति बाह्य पृष्ठगत प्रेरणेचें रूप घेते.

      आंतर जाणीव स्वत:च जर बाहेर आली, पृष्ठवर्ती झाली, तर बाह्य ज्ञात्याची जाणीव आणि ज्ञेयांतील द्रव्य यांचा प्रत्यक्ष संबंध येईल, आणि त्यायोगें ज्ञात्याला ज्ञेयाचें प्रत्यक्ष ज्ञान होईल; परन्तु आंतर जाणीव बाहेर येणें ही गोष्ट अचेतन द्रव्याच्या अडचणीमुळें अशक्य होते; तसेंच पृष्ठगत जाणीव हळूंहळूं वाढावी असा विकाससंकेत निसर्गांत आहे, म्हणून पृष्ठगत ज्ञात्याला ज्ञेयाचें ज्ञान प्रत्यक्ष होऊं शकत नाहीं. आंतर जाणिवेला वर येऊन ज्ञेयाचें प्रत्यक्ष ज्ञान करून घेतां येत नसल्यामुळें ज्ञेयाच्या अप्रत्यक्ष ज्ञानासाठीं अवयवांचा विकास करणें, सहजप्रेरणांचा विकास करणें तिला प्राप्त होतें; बाह्य ज्ञान, बाह्य बुद्धि प्रकट होते, प्रकट केली जाते ती, अगोदरच तयार केल्या गेलेल्या जाणीवयुक्त द्रव्यघटित रचनेंत प्रकट केली जाते. निश्चित आकार नसलेली ही पृष्ठगत जाणीवयुक्त रचना, अगदी प्राथमिक जाणिवेनें युक्त अशी असते; तिला अंधुक संवेदनाशक्ति असते आणि अंधुक प्रतिक्रियाशक्ति असते. जीवाच्या अगदीं तलवर्ती वर्गांत ही स्थिति असते. त्याहून वरच्या दर्जाचे जीव तयार होतात ते प्राणप्रधान मन, प्राणनिष्ठ बुद्धि यांच्या निर्मितीनें तयार केले जातात. हें मन, ही बुद्धि आरंभी यांत्रिक स्वयंगतिमान् असते; जीवसुलभ प्राथमिक गरजा, वासना, प्रेरणा यांचाच या मनांत, बुद्धींत

पान क्र. ५६४

 

व्यवहार चालतो. तलवर्ती आंतर जाणीव याप्रमाणें बाह्य पृष्ठावर प्रथम अंधुक संवेदनेच्या व अंधुक प्रतिक्रियेच्या रूपानें, नंतर यांत्रिक मनाच्या, बुद्धीच्या रूपानें प्रकट होते -- पुढें हें मन प्राणाच्या (वासनांच्या वगैरे दास्यांतून हळूंहळूं मोकळें होऊन स्वतंत्रपणें काम करूं लागतें, तें प्राणाच्या गरजांसाठीं, वासनांसाठी काम करण्याचें चालूं ठेवतें, पण त्याबरोबर त्याचें स्वत:चें विशिष्ट कार्य -- निरीक्षण, शोध, उपायनिर्मिति, हेतु-योजना, हेतु-सिद्धि वगैरे -- सुरु करतें; मनाच्या योगें मूळ प्राणिक संवेदना आणि वासना भावनेनें युक्त होऊं लागते. मनुष्येतर प्राणिवर्गांत शुद्ध, श्रेष्ठ मानसिक क्रिया व्यक्त होत नाहींत, तर तेथें उपजतबुद्धि, प्राणिक-प्रेरणा यांचाच प्रभाव मनावर मोठ्या प्रमाणावर असतो. श्रेष्ठ मनुष्येतर प्राण्यांत विचारशील बुद्धि किंचित् प्रमाणांत उदयास येते, व किंचित् प्रमाणांत प्राण्याच्या श्रेष्ठत्वानुसार वाढते.

      मनुष्यामध्यें मनुष्येतर किंवा पशुवर्गीय प्राण्यांच्या बुद्धीला मानवी बुद्धीची जोड मिळते; मानवामध्यें पायाभूत पशुबुद्धि क्रियाशील असते; या पायाभूत पशुबुद्धींत खास मानवी बुद्धि बराच बदल घडवून आणते : मनुष्याची जाणीवयुक्त इच्छाशक्ति व हेतुशक्ति मूळ पशुबुद्धीला सूक्ष्म करतात, उच्च करतात; मनुष्यामध्यें उपजत प्रेरणेचा, वासनिक स्फूर्तीचा यांत्रिक व्यवहार कमी होतो; त्याचें प्रमाण कमी होतें, आणि शुद्ध, आत्मज्ञ, विचारशील बुद्धीचें प्रमाण वाढतें; स्फूर्ति (= अंतःस्फूर्ति = अंतर्ज्ञान) ही शुद्ध राहत नाहीं; प्राणिक स्फूर्ति जोरदार असली, तरी तिचें प्राणिक (वासनामय) स्वरूप मनाच्या विचारशीलतेनें झांकलें जातें; तसेंच मानसिक स्फूर्ति ही देखील शुद्ध राहत नसून तिला भेसळीचें स्वरूप येतें; मनाच्या दृष्टीनें व्यवहारोपयोगी होण्यासाठीं, मानसिक स्फूर्तींत दुसरा कांहीं (वासनेचा) माल घातला जातो. पशूमध्येंहि स्फूर्ति थोडीबहुत बदलली जात असते, अडविली जात असते; हें अडविण्याचें, बदलण्याचें काम करणें हा पृष्ठगत जाणिवेचा धर्मच आहे; परंतु पशूमध्यें पृष्ठगत जाणिवेची शक्ति ही मानवी पृष्ठगत जाणिवेपेक्षां कमी असल्यानें, पशूमधील स्फूर्ति कमी अडविली जाते, कमी बदलली जाते; प्रकृतीचें यांत्रिक स्वयंगतिमान् सहजप्रेरणेचें कार्य कमी प्रमाणांत प्रतिबद्ध होतें. मनःप्रधान मनुष्यामध्यें वर पृष्ठाकडें स्फूर्ति येत असतां, ती तेथें पोंचण्यापूर्वीं तिचें रूपान्तर विचारशील बुद्धीच्या भाषेंत करण्यांत येतें, मानसिक अर्थ तिच्यावर बसविण्यांत येतो, आणि या रीतीनें

पान क्र. ५६५

 

मनुष्याच्या या ज्ञानाचें मूळचे स्फूर्ति-स्वरूप लपविलें जातें, उपजतबुद्धि देखील मनुष्यामध्यें तर्कबुद्धीनें लपेटली जाते, तिच्या मूळच्या स्फूर्तिस्वरूपांत यामुळें दोष उत्पन्न होतो; तिचे स्फूर्तिस्वरूप मोठ्या प्रमाणांत नाहीसे होते. अर्थात् यामुळें उपजतबुद्धि कार्यक्षमतेत कमी पडते, तिला मदत म्हणून किंवा तिच्या ऐवजीं मानवी तर्कबुद्धि काम करूं लागते. या तर्कबुद्धीनें परिसरांतील वस्तुज्ञानाच्या शक्ती मनुष्याला आपल्या अनुकूल करून घेतां येतात, किंवा परिसराशीं त्याला आपली अंतर्बाह्य स्थिति जुळती करून घेतां येते. प्राणमय जीवनांत (जीवात) मन उदयास आल्यानें विकासी जाणीवशक्तीची कार्यक्षमता खूप वाढते, तिचें क्षेत्रहि खूप वाढते. पण या वाढीबरोबर तितक्याच प्रमाणात प्रमादाचें क्षेत्र वाढते, प्रमादाची पात्रता वाढतें. विकासाच्या पायऱ्या मन जसजसें चढत जातें, तसतशी त्याची प्रमादरूप छायाहि वाढत जाते; मनुष्यामध्यें जाणिवेची वाढ, ज्ञानाची वाढ यांजबरोबर प्रमादाची वाढ निरंतर होत असते.

      विकासक्रमांत पृष्ठगत जाणीव स्फूर्तीच्या (= अंतःस्फूर्तीच्या = अंतर्ज्ञानाच्या) क्रियेचा नेहमीं लाभ घेऊं शकत असती, तर प्रमादाच्या संभवाची शक्यताच राहिली नसती. स्फूर्ति ही प्रकाशाच्या शलाकेसारखी आहे. ही प्रकाश-शलाका गुप्त अतिमानसाकडून मनाकडे फेंकली जात असते; या शलाकेमुळें सत्य-ज्ञान मनाचे ठिकाणीं उदय पावतें; हें ज्ञान कितीहि मर्यादित असलें, तरी त्याची उपस्थिति कधींहि निष्फळ होत नाहीं, त्याचें कार्य अगदी बिनचूक आणि खात्रीचें असतें. अशी अंत:स्फूर्ति ही पृष्ठगत जाणिवेची कायमची सहकारी असतांना, उपजतबुद्धि मनुष्याच्या ठिकाणीं तयार झालीच असती, तर ती या स्फूर्तीला नित्य वश होणारी, या स्फूर्तीच्या तंत्रानें नित्य चालणारी अशीच तयार झाली असती. वाढते विकासगत भेद, परिसरगत भेद, आंतर भेद या सर्व भेदांना अनुरूप असें स्वरूप या उपजतबद्धीनें मोकळेपणें घेतलें असतें. त्याचप्रमाणे मनुष्यामध्यें तर्कबुद्धि (अंतःस्फूर्ति नित्य वर येत असतां) तयार झाली असती, तर ती त्या स्फूर्तीला स्वामित्व देणारी, स्वतःकडे तिचे अंकितत्व घेणारी अशीच झाली असती; स्फूर्तीचें अगदीं बिनचूक, मानसिक चित्रण तर्कबुद्धीनें केलें असतें, ही बुद्धि मार्ग चुकली नसती, भलतीकडे वाहवली नसती, स्वतःमधील अंधकारामुळें असत्यांत किंवा प्रमादात बुडूं शकली नसती. परंतु अशी अप्रमादी उपजतबुद्धि (सहजप्रेरणा) आणि अप्रमादी

पान क्र. ५६६

 

तर्कबुद्धि मनुष्यामध्यें निर्माण होणें शक्य नसतें; कारण अंतःस्फूर्ति नित्यशः जाणिवेच्या मदतीला येणें शक्य नसतें; ज्या पृष्ठगत शरीरद्रव्याच्या द्वारां प्राण आणि मन यांना आपलें इंगित व्यक्त करावें लागतें तें द्रव्य, अचेतनतेच्या दडपणाखालीं असते, आणि त्यामुळें या पृष्ठगत द्रव्यांतील जाणीव, आंतून येणारा हा स्फूर्तिप्रकाश मोकळेपणें स्वतःच्या जोडीला घेऊंच शकत नाहीं; आणखी असें आहे कीं, निसर्गाची, प्रकृतीची योजनाच अशी आहे कीं, सत्य-ज्ञानाचा मनुष्याचे ठिकाणीं जो विकास व्हावयाचा, तो द्रुत गतीनें होऊं नये; निसर्गाची योजनाच अशी असल्यानें, मनुष्याची तर्कबुद्धि प्रमादी बनते, उपजतबुद्धि प्रमादी बनते. स्फूर्तीच्या सूचना मनुष्याच्या बुद्धीला अनाकलनीय असतात, आणि या न कळणाऱ्या सूचनांतून, स्वतःला सुस्पष्ट कळणाऱ्या कल्पनाच कार्यान्वित करणें मानवी बुद्धीला सोईचें वाटतें व सोईचें असतें -- हें सर्व निसर्गाच्या योजनेनुसार घडत असतें. पृष्ठगत जाणीव प्रमादी बुद्धिरूपी दोष निभावून घेते; कारण निसर्गाचीच तशी योजना असते. निसर्गाची योजनाच अशी आहे कीं, अचेतनाचा विकास हळूंहळूं अनेक अडचणींना तोंड देत व्हावा, अज्ञानाचा त्यांतून हळूंहळूं उदय व्हावा, तदनंतर अज्ञानाचा विकास हळूंहळूं ज्ञानाच्या दिशेनें व्हावा. प्रथम मिसळीचें, एकांगी, सदोष ज्ञान हें स्वरूप अज्ञानानें घ्यावें आणि या रीतीनें त्यानें उच्चतर सत्य-जाणीव आणि सत्य-ज्ञान हें स्वरूप घेण्याची आपली तयारी करून ठेवावी. तेव्हां सत्य-जाणीव व सत्य-ज्ञान हें रूपांतर अज्ञानाला प्राप्त व्हावें यासाठीं, आपली सदोष बुद्धि ही एक मधली आवश्यक पायरी निसर्गानें ठरविली आहे, हें आपण लक्षांत घेणें योग्य आहे.

      निसर्गाच्या व्यवहारांत विकासाची प्रक्रिया चाललेली असते ती जाणीवयुक्त अस्तित्वाच्या दोन टोंकांच्या आधारानें, त्या दोन टोंकाच्यामध्यें,चाललेली असते. एका टोंकाला पृष्ठवर्ती अचेतनतापूर्ण अज्ञान असतें, तर दुसऱ्या टोंकाला गुप्त जाणीवशक्ति असते; पृष्ठवर्ती अचेतनतेचें (पूर्ण अज्ञानाचें) क्रमश: रूपान्तर होत होत ज्ञानाचें स्वरूप त्याला यावयाचें असतें; जी गुप्त जाणीवशक्ति दुसऱ्या टोंकाला असते, तिच्या ठिकाणीं सर्व ज्ञानशक्ति असते, आणि ही सर्व ज्ञानशक्ति क्रमश: पृष्ठवर्ती अचेतनतेंत, पूर्ण अज्ञानांत व्यक्त व्हावयाची असते. अर्थात् अचेतनतेचें, पूर्ण अज्ञानाचें क्रमश: रूपांतर होत होत त्याचें पूर्ण ज्ञान व्हावयाचें असतें. पृष्ठवर्ती अज्ञानांत, अचेतनतेंत जेथें कोणत्याहि

पान क्र. ५६७

 

विषयाचें आकलन, ग्रहण होऊं शकत नाहीं, तेथें क्रमश: बदल होत जाऊन शेवटीं ज्ञान, पूर्ण ज्ञान उभें राहूं शकतें याचें कारण, अचेतनतेंत, अज्ञानांत ज्ञान, जाणीव दडलेली आहे हें आहे; अचेतनता म्हणजे खरोखरीच जाणिवेचा पूर्ण अभाव असें असतें, तर तिचें रूपान्तर होऊन तिच्या जागीं जाणीव येणें, ज्ञान उभें राहणें अशक्य झालें असतें : विकासक्रमांत गुप्त जाणीव ही हें अचेतनतेचें रूप टाकून हळूंहळूं चेतनेचें रूप घेते. गरज आणि बाह्य संपर्क यांच्या निमित्तानें अचेतनता प्रथम संवेदनेचें रूप घेते, प्रतिक्रियेचें रूप घेते. पुढें पुढें हें नवें (केवळ चेतनेचें) रूप टाकून हळूंहळूं अज्ञानाचें -- ज्ञान मिळविण्याकरितां धडपडणाऱ्या अज्ञानाचें रूप घेते. या विकासकार्यांत जगाशीं, जगांतील शक्तींशीं आणि पदार्थांशीं संबंध येणें, ही गोष्ट साधन म्हणून उपयोगांत आणली जाते काष्ठमंथनानें ठिणगी पडावी त्याप्रमाणें गुप्त जाणिवेनें घेतलेल्या नानाविध रूपांतील दडलेली जाणीव दुसऱ्या रूपांच्या संपर्कानें जाणीव स्फुलिंगाचें रूप घेते. दोन रूपांचा संपर्क घडला, कीं एका रूपाच्या आंतून किंवा दोन्ही रूपांच्या आंतून उत्तर म्हणून जी प्रतिक्रिया होते ती 'जाणीव-स्फुलिंग' होय. रूपांची एक श्रेणि आहे. सचेतनता भिन्न भिन्न रूपांत कमीअधिक प्रमाणांत आढळून येते; खनिज, उद्भिज्ज, (मनुष्येतर) प्राणी वा मनुष्य, हे वर्ग रूपभिन्नतेनें व चेतनाप्रमाणभिन्नतेने युक्त आहेत. मूळ जाणीव सर्वव्यापी आहे; सर्व जीवांच्या आंत पूर्णतया आहे. जीवाची पृष्ठगत जाणीव त्याच्या आंत असलेल्या गुप्त जाणिवेचा एक अल्प प्रकट अंश आहे. ही प्रकट बाह्य पृष्ठगत जाणीव अज्ञानरूप आहे; हे अज्ञान, बाह्य शक्तींशीं किंवा पदार्थांशीं जीवाचा संपर्क घडला म्हणजे, त्याच्या आंतून येणाऱ्या प्रतिक्रियेनें युक्त होतें -- पण ही अंतःस्फूर्तीची प्रतिक्रिया मूळ आंतर स्वरूपांत बाहेर प्रकट होऊं शकत नाहीं; त्या प्रतिक्रियेंत अज्ञानाच्या स्वरूपानुसार व प्रमाणानुसार फरक केला जातो, मूळ प्रतिक्रिया, (अंतःस्फूर्ति) प्रकट रूप धारण करतांना अंधुक होते, सदोष होते. एक तर बाह्य अज्ञान हें अंतःस्फूर्तीला पूर्णतया पकडूं शकत नाहीं, किंवा तिचें स्वरूप जसें मुळांत असतें तसें न समजल्यानें अज्ञान तिला विपरीत रूप देतें; तरीपण संपर्काला उत्तर म्हणून जी, विपरीत किंवा अपूर्ण रूपांत बाह्य अज्ञानमय जाणिवेंत स्फूर्तिरूप प्रतिक्रिया येते, तिच्या योगानें प्रतिक्रियात्मक जाणीव उदयाला येते; हळूंहळूं या प्रतिक्रियांच्या पुनरुक्तींनीं सहजप्रेरणेचा (उपजतबुद्धीचा) उदय होतो; पुढें संपर्काचें

पान क्र. ५६८

 

जाणीवयुक्त ज्ञान होऊं लागतें. ही ग्रहणशक्ति पुढें वाढत जाते व घटनांचा अर्थ समजण्याची शक्ति उदयास येते. जाणीवयुक्त प्रतिक्रिया करण्याची शक्ति उदयास येते, दूरदृष्टीनें क्रिया स्वतंत्रपणें करण्याची शक्ति उदयास येते -- याप्रमाणें जाणीव विकासक्रमानें वाढत जाते, तींत अर्धें ज्ञान अर्धें अज्ञान असें मिश्रण असतें. जीवाला अज्ञानाकडे ज्ञानांतून जावें लागतें, पण 'ज्ञात' जें असतें त्यासंबंधींचें त्याचें ज्ञान अपूर्ण, सदोष असतें; संपर्कांचें ग्रहण आणि त्यांच्याविषयीं प्रतिक्रिया, या दोन्ही गोष्टी जीवाच्या या सदोष, अपूर्ण ज्ञानाला, सदोष अपूर्ण रीतीनेंच करणें शक्य असतें; म्हणून कोणताहि नवा संपर्क घडला, तर त्याचें विपरीत ग्रहण करणें आणि त्याला उत्तर म्हणून जी आंतर स्फूर्ति-प्रतिक्रिया होते तिचेंहि बाह्यांत विपरीत, सदोष प्रकटन करणें, या दोन तऱ्हांनीं जीव चूक करूं शकतो, करतो.

      वरील कहाणीवरून हें ध्यानांत येईल कीं, विकासक्रमांत अचेतनतेंतून चेतनेचा (जाणिवेचा) आरंभ होत असल्यानें आणि तिला अचेतन द्रव्याच्या घडलेल्या रूपांतच काम करावें लागत असल्यानें, तिचा क्रमश: हळूहळू ज्ञानाकडे प्रवास चालला असतां, तिजकडून प्रमाद होणें ही तिच्या विकासाची अपरिहार्य अशी उपाधि आहे, अटळ पायरी आहे, अनिवार्य साधन आहे, आवश्यक सहचर आहे. विकासशील जाणिवेला अप्रत्यक्ष साधनांनीं ज्ञान मिळवावें लागतें; अर्थात् या ज्ञानांत निश्चितता, सत्यता अगदीच अल्प असते; किंबहुना केव्हां केव्हां मुळींच नसते; पदार्थांशीं जीवाचा (विकासी जाणिवेचा) संपर्क घडला, म्हणजे प्रथम शुद्ध भौतिक शारीर स्पंदन निर्माण होतें; पदार्थाची भौतिक प्रतिमा तयार होते, आणि त्यायोगें प्राणिक संवेदना उदय पावते; मनाला या स्पंदनाचा, संवेदनेचा अर्थ लावावा लागतो. अर्थात् त्यांतून अनुरूप मानसिक प्रतिमा, कल्पना तयार करावी लागते -- नंतर या इंद्रियांनीं अनुभवलेल्या आणि मनानें जाणलेल्या पदार्थांचा, गोष्टींचा परस्परसंबंध निश्चित करावा लागतो; यानंतर, न जाणलेल्या गोष्टी निरीक्षण करून, शोध करून जाणून घ्याव्या लागतात; आणि अगोदरच्या अनुभवात आणि ज्ञानांत या नव्या ज्ञानाची भर घालावी लागते; हें नवें ज्ञान जुन्या ज्ञानांत बसेलसें करण्याची क्रिया नीट झाल्यानंतरच त्याची जुन्या ज्ञानांत उपयुक्त अशी भर होऊं शकते. या ज्ञानसंपादनाच्या कार्यांत प्रत्येक पायरीवर खरी गोष्ट, खरी घटना काय आहे, घटनेचा अर्थ काय, निर्णय कितपत बरोबर

पान क्र. ५६९

 

आहे, अर्थ कितपत बरोबर आहे, संबंध निश्चित केले ते कितपत बरोबर आहेत -- असे प्रश्न असतात; निर्णय तपासावे लागतात, मग त्यांतून कांहीं चूक म्हणून टाकावे लागतात, कांहीं बरोबर म्हणून कायम करून घ्यावे लागतात; ज्ञानसंपादनाचा मार्ग हा असा असल्यानें चुका वा प्रमाद टाळणें अशक्य आहे; चुका करावयाच्या नाहींत असें ठरविलें, तर ज्ञानसंपादन करावयाचें नाहीं असेंच ठरवावें लागेल, अशी ज्ञान विकास-कार्यांतील वस्तुस्थिति आहे. मनाला ज्ञानसंपादनासाठीं प्रथम वस्तूंचें किंवा घटनांचें निरीक्षण करावें लागत असतें; आणि निरीक्षण ही क्रिया कांही सरळ नाही, फार घोटाळ्याची संकीर्ण आहे. निरीक्षक जाणीव ही अज्ञानी असल्यानें, पावलापावलाला तिच्याकडून चूक होण्याचा संभव असतो; वस्तूंचें किंवा घटनांचें ग्रहण करतांना इंद्रिय विपरीत किंवा सदोष ग्रहण करूं शकतात; इंद्रियावलंबी मन इंद्रियांसारखें चुकूं शकतें; कांहीं गोष्टी निरीक्षण करतांना गाळल्या जाऊं शकतात; ज्या गोष्टी निवडून एकत्र बांधल्या जातात, त्या गोष्टींच्या निवडींत चूक होण्याचा संभव असतो, एकत्र बांधण्यांत चूक होण्याचा संभव असतो. जें पाहिलें जातें त्यांत पहाणाराच्या व्यक्तिगत विशिष्ट समजुतीमुळें वा प्रतिक्रियेमुळें नसत्या गोष्टींची अजाणता भर होण्याची चूक होऊं शकते. परिणामतः निरीक्षक जाणीव निरीक्षणविषयाचें जें चित्र तयार करते, तें अनेक दोषांनीं भरलेलें, अर्थात् बऱ्याच प्रमाणांत सत्याविरोधी, असत्य असें तयार होणें अपरिहार्य असतें : यानंतर अनुमानाच्या क्रियेंत चुका होऊं शकतात; पाहिलेल्या गोष्टींचा अर्थ लावण्याच्या क्रियेंत चुका होऊं शकतात; निर्णय देण्याच्या क्रियेंत चुका होऊं शकतात; निरीक्षणाच्या चुकांत बुद्धीच्या या चुकांची भर पडत असते : निरीक्षणानें जमा केलेला बुद्धीपुढें येणारा हा पुरावाच जर सदोष आणि संशयित असतो, तर बुद्धीनें घेतलेला निर्णयहि तसाच संशयित आणि सदोष असणार, हें उघड आहे.

      जाणीव तिच्या ज्ञानसंपादनाच्या कार्यांत ज्ञाताकडून अज्ञाताकडे जात असते; आपले अनुभव, स्मृति, संस्कार, निर्णय, या सर्वांचें मिळून एक  'बांधकाम' ती तयार करते. हा तिचा मिश्र मानसिक 'बंगला' ठाम दिसतो, पण तो सारखा रूपांतर करीत असतो. नवें ज्ञान घेतांना, जुन्या ज्ञानाच्या आधारानें, त्याच्या प्रकाशांत या नव्या ज्ञानाची तपासणी केली जाते, त्याची योग्यायोग्यता वगैरे ठरविली जाते आणि या परीक्षेनें

पान क्र. ५७०

 

ठरलेल्या त्याच्या योग्यतेनुसार त्याला जुन्या ज्ञानाच्या ''बंगल्यांत'' स्थान दिलें जातें; तें या जुन्या बांधकामांत सहजासहजीं नीट बसत नसलें, तर 'कांहींतरी' करून तें त्यांत बसविलें जातें किंवा हें साधणें अशक्य झालें, तर त्याला त्याज्य म्हणून बाजूला टाकलें जातें; पण जुनें ज्ञान आणि त्यावर बांधलेली 'इमारत' किंवा त्याच्या कसोट्या नव्या ज्ञानविषयाला किंवा ज्ञानक्षेत्राला गैरलागू असण्याचा संभव असतो; तसेंच नवें ज्ञान जुन्यांत बसविलें असेल, तर तें तेथें बसण्यासारखें नसून अयोग्य कारवाईनें तें तेथें बसविलें गेलें असण्याचा संभव असतो; तसेंच नवें ज्ञान बाजूला टाकलें गेलें असेल तर तें तसें चुकीनें टाकलें गेलें असण्याचा संभव असतो : याप्रमाणें घटनांचें अयथार्थ ग्रहण व अन्याय्य महत्त्वमापन या चुका ज्ञानसंपादनाच्या कार्यांत घडत असतात -- आणि त्यांत आणखी अनेक चुकांची भर पडत असते: ज्ञानाचा अयोग्य उपयोग, ज्ञानघटकांचें अयोग्य एकत्रीकरण, ज्ञानाची विपरीत अव्यवस्थित रचना, ज्ञानविषयाचें अयोग्य चित्रण -- मानसिक प्रमादांची ही अशी नानामुखी उत्यादनसामग्री आहे. याप्रमाणें आमच्या मनाचीं अंगें आणि कार्यें अंधकार आणि प्रकाश याच्या भेसळीनें भरलेलीं असतात; पण येथेंहि गुप्त स्फूर्ति (न चुकणारी अंत:स्फूर्ति, अंतर्ज्ञान) आपली स्वाभाविक धडपड करीत असते, हें विसरतां कामां नये; ही स्फूर्ति सत्योन्मुख, सत्यमय, प्रकाशरूप असते आणि ही चुकांची दुरुस्ती स्वत: करण्यांत किंवा बुद्धीकडून करविण्यांत गढलेली असते; घटनांचें यथार्थ चित्रण व्हावें, यथार्थ अर्थग्रहण व्हावें यासाठीं ही स्फूर्ति स्वत: खटपट करते व बुद्धीला अशी खटपट करण्याची प्रेरणा देते. अंतःस्फूर्ति याप्रमाणें धडपड करते खरी, पण मानवी मन तिला तिच्या स्वतःच्या तंत्रानें काम करूं देत नाहीं; मानवी मन तिच्या सूचना जशाच्या तशा स्वीकारीत नाहीं, त्या सूचनांत आपल्या अज्ञानानें तें कमीअधिक करतें; स्फूर्त सूचना या शरीरविषयक, प्राणविषयक, मनोविषयक असतात; पण मूळ अनावृत स्वरूपांत या सूचना मन स्वीकारीत नाहीं; मन आपला स्वतःचा पोषाख त्यांना थोडाबहुत चढवितें किंवा सर्वस्वीं आपण तयार केलेल्या कपड्यांत लपेटून टाकतें; असें झालें म्हणजे स्फूर्तीचें, स्फूर्त सूचनांचें मूळ स्वरूपच बदलून जातें आणि त्या बहुधा निरुपयोगी होतात : स्फूर्त सूचना या घडलेल्या गोष्टींच्या असतात, घडणाऱ्या गोष्टींच्या असतात, शक्यतांच्या असतात, वस्तुजातांच्या मागें असणाऱ्या नियामक सत्यांच्या असतात; मनाला या सूचना स्पष्टपणें

पान क्र. ५७१

 

समजत नाहींत, त्यांच्यांतला भेद उमगत नाहीं, एका वर्गांतील सूचना तें दुसऱ्या भिन्न वर्गांतील समजते, याप्रमाणें सूचनांचा विषयभेद न उमगल्यानें मनाकडून यासंबंधांत अनेक प्रमाद घडतात. एकंदरींत मानवी ज्ञानाचें स्वरूप सदोष आणि प्रमादपूर्ण असतें; मानवी मन जी ज्ञानसामग्री जमा करतें ती त्याला अर्धवट समजलेली असते, शिवाय ही सामग्री व्यवस्थितपणें रचलेली नसते; अर्धवट समजलेल्या, अव्यवस्थितपणें पसरलेल्या सामग्रीच्या आधारानें मन ज्ञानाची इमारत प्रयोगादाखल बांधीत असतें, मोडीत असतें, पण पुन: बांधीत असतें, आत्मा, आपण स्वत: आणि स्वत: समोरील वस्तुजात यांचें जें चित्रण मन करतें तें, दिसायला रेखीव पण गोंधळाचें असतें; या चित्रांतील कांहीं भाग खरा, कांहीं चुकीचा असतो, कांहीं भाग सुघटित, कांहीं विपरीत असतो; कांहीं भाग व्यवस्थेनें मांडलेला, कांहीं अव्यवस्थित असतो; आणि सर्व भागांत दोष असतात; याप्रमाणें मानवी ज्ञान एकंदरींत दोषपूर्ण, प्रमादपूर्ण असतें.       प्रमाद हा अनिवार्यपणें मानवी ज्ञानांत उत्पन्न होतो पण प्रमाद म्हणजे कांहीं असत्यता नव्हे. प्रमाद हा असत्यतेपर्यंत पोंचलाच पाहिजे असें कांही नाहीं; सत्य अपूर्ण असणें हें प्रमादाचें स्वरूप असूं शकतें व बहुधा असतें; शक्यता अनेक असतात, त्यांपैकीं प्रमादीपक्षांत कांहीं विचारांत घेतल्या जातात, कांहीं घेतल्या जात नाहींत : आम्हांला ज्या विषयांत खरे ज्ञान प्राप्त झालेलें नाहीं, त्या विषयांत शक्यता विचारांत घेणें आवश्यक असतें, या शक्यता वास्तव रूप घेतीलच असा कांहीं दावा करतां येत नाहीं; अशा शक्यतांचा स्वीकार करून जी विचारप्रणाली आम्ही उभी करूं, ती अपूर्ण, अयुक्त असण्याचा संभव आहे; पण या विचारप्रणालीनें नवें ज्ञान मिळण्याचा संभव असतो, अगदी अनपेक्षित दिशेनें नवे ज्ञान मिळण्याचा संभव असतो आणि हा संभव खरा ठरला, म्हणजे ती अपूर्ण विचारप्रणाली समर्थनीय ठरते; या नव्या ज्ञानाचा लाभ झाल्यावर ती विचारप्रणाली जरूर पडल्यास टाकून देतां येते, किंवा तिच्यांत कमीअधिक करून ती पूर्ण करतां येते, आणि या मार्गानें आमचें ज्ञान, आमचा अनुभव वाढवितां येतो -- नव्या ज्ञानामुळें असेंहि होऊं शकेल कीं, अपूर्ण विचारप्रणालीनें झांकलें गेलेलें एखादें सत्य स्पष्ट होईल आणि या सत्याच्या लाभामुळें आपलें ज्ञान वाढेल. शक्यतांच्या आणि वास्तव अनुभवांच्या एकत्रीकरणानें आम्ही मिश्र अशी विचारधारा उभी करतो; पण अशा मिश्र विचारधारांच्या द्वारां, जाणीव, बुद्धि, तर्क यांची वाढ

पान क्र. ५७२

 

हळूंहळूं होऊं शकते आणि क्रमश: वाढलेली जाणीव ही आत्मा आणि विश्व यांसंबंधींचें आपलें चित्र, आपलें ज्ञान सत्याच्या अधिक जवळ नेऊं शकते, तें अधिक स्पष्ट करूं शकते. याप्रमाणें हळूंहळूं मूळ सर्वव्यापी अचेतनतेचें, जाणिवेला विरोध करणारें बंड कमी कमी होत जातें; मानसिक जाणीव वाढत जाऊन, तिची स्पष्टता आणि समग्रताहि वाढत जाते. शेवटीं ही समग्र स्पष्ट जाणीव प्रत्यक्ष ज्ञानाच्या गुप्त शक्ती, अंत:स्फूर्तीच्या गुप्त शक्ती प्रकट होण्यास मदत करते; या गुप्त शक्ती पृष्ठवर्ती जाणिवेच्या क्षेत्रांत प्रकट झाल्या म्हणजे त्या मानसिक शक्तींना स्वत:च्या कामीं लावतील; त्यांजकडून पृष्ठवर्ती जाणिवेच्या क्षेत्रांत सत्याची इमारत उभी करून घेतील.

      हें सर्व होऊं शकतें आणि होईल; पण विकासक्रमांत दुसरी एक शर्त आहे; मानवी जाणिवेला, बुद्धीला शक्यतांतून, प्रमादांतून वाट चालत आपला ज्ञानसंपादनाचा कार्यक्रम चालवावयाचा असतो. ही एक विकासक्रमाची शर्त आहे, आणि दुसरी शर्त ही कीं, मानवी अहम् संभाळून, त्याच्या कलानें घेऊन, मानवी जाणिवेला आपलें ज्ञानसंपादनविषयक विकासकार्य करावयाचें असतें. ज्ञानसंपादनाची खटपट ही निर्व्यक्तिक मानसिक प्रक्रिया असती, तर मानसिक बौद्धिक शक्तीचा सर्वसाधारण मर्यादितपणा एवढीच अडचण ज्ञानसंपादनाच्या मार्गांत असती -- पण ही खटपट निर्व्यक्तिक खटपट नाहीं. अहम्, शारीर अहम्, प्राणिक अहम् मनुष्याचे ठिकाणीं विशेष जोरानें काम करीत असतो; आणि हा अहम् आत्मज्ञानाचा भुकेला नसतो, वस्तुसत्याचा शोध घ्यावा, जीवनांचें सत्य शोधावें अशी त्याची हौस किंवा हांव नसते -- त्याला आपल्या वासनांची तृप्ति हवी असते; मानसिक अहम् हा देखील स्वत:चें घोडें पुढें ढकलणारा असतो, आणि याखेरीज प्राणिक वासना आपल्या तृप्तीसाठीं मानसिक अहम्‌ला पुष्कळच वापरीत असते. मन विकास पावतें तेव्हां त्या विकासाबरोबर मानसिक अहम्‌पण, मानसिक व्यक्तित्व विकास पावत असतें; या मानसिक व्यक्तीचें वळण, वृत्ति विशिष्ट प्रकारची असते. पृष्ठवर्ती मानसिक व्यक्ति अहम्‌केन्द्रित असते. जगाकडे, वस्तुजाताकडे, घटनांकडे पहाण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन या अहम्‌प्रभावित व्यक्तीचा असतो; जगाचें मूळ स्वरूप, घटनांचें मूळ स्वरूप या अहम्‌प्रभावित व्यक्तीला दिसत नाहीं -- तिला स्वत:ला जगापासून, घटनांपासून काय लाभालाभ होत असेल, त्यावर तिचें जगासंबंधींचें, घटनांसंबंधींचें

पान क्र. ५७३

 

दर्शन अवलंबून असतें. परिसरांतील गोष्टींकडे पाहतांना स्वतःच्या वृत्तीला, स्वतःच्या स्वभाववैशिष्ट्याला अनुकूल असा त्यांचा अर्थ व्यक्ति लावते; आपल्या सोईप्रमाणें त्या गोष्टींना वळण देते. त्यांपैकीं कांहीं गोष्टी निवडून स्वीकारते, काहीं त्याज्य ठरविते; आपल्या मानसिक सोईप्रमाणें, गोडीप्रमाणें सत्याची रचना, व्यवस्था ती करते. निरीक्षण काय, निर्णय काय, युक्तिवाद काय, सर्वकांहीं व्यक्तित्वाच्या वैशिष्ट्यानें प्रभावित होत असतें, निश्चित होत असतें. स्वतःच्या अहम्‌च्या गरजा पाहून, त्या गरजांना उपकारक होईल अशा रीतीनें, निरीक्षण आदि क्रियांना व्यक्तीकडून वळण दिलें जातें. सत्यदृष्टि, बुद्धि ही शुद्ध व पूर्ण व्यक्तित्वरहित, पूर्ण तात्विक असावी असा जेव्हां प्रयत्न मन करतें, तेव्हां देखील शुद्ध निर्व्यक्तिकता त्याला साधत नाहीं; अगदीं जागरुक बुद्धि, कठोर संयमनशील बुद्धि ही देखील वस्तुस्थिति, कल्पना, यांचा स्वीकार करतांना आणि आपली ज्ञानाची इमारत उभारतांना सत्याला मुरड घालीत असते, अनेक प्रकारें सत्याची मोडतोड करीत असते, आणि हें सर्व आपण करीत आहों हें तिच्या लक्षांतहि येत नाहीं. तेव्हां या सगळ्या मानसिक प्रपंचांत सत्याचें विपरीत रूप होण्यास, सत्याला विकृत स्वरूप देण्यास खूप वाव आहे हें उघड आहे; सत्याचे विकृत स्वरूप म्हणजेच असत्य. याशिवाय स्वार्थसाधु मन शुद्ध असत्याचा मांड मांडण्यासहि कचरत नाहीं; मनाचे ठिकाणीं अर्धजागृत, अर्धसुप्त अशी चुकीचा मार्ग धरण्याची इच्छाहि असते. खरेंखोटें पाहून मग कल्पना किंवा घटना स्वीकारावयाच्या ही रीति टाकून, आपल्या आवडीनिवडीप्रमाणें, आपल्या सोईप्रमाणें, आपल्या वृत्तीला जुळेल अशा रीतीनें, आपल्या पूर्वग्रहाला मान देऊन, खरेंखोटें न पाहतां, त्याकडे दुर्लक्ष करून, कल्पनांची व घटनांची तरफदारी करावयाची, त्यांचा आपल्याजवळ संग्रह करावयाचा, अशी मनाची पद्धति असल्यानें, असत्याच्या उदयाला व वाढीला मानसिक प्रपंचांत भरपूर वाव मिळतो. मनाच्या भूमींत असत्य चांगलें रुजूं शकतें, वाढूं शकतें; मनाला एकच नव्हे, अनेक दरवाजे आहेत कीं ज्या दरवाजांनीं असत्य लपून छपून किंवा सरळ आक्रमण (मनाला पसंत असें आक्रमण) करून मनांत शिरूं शकतें –- हें वरील विवेचनावरून उघड होईल. सत्यहि मनांत शिरूं शकतें, सत्यहि मनांत बैठक मारून बसूं शकतें; पण मनाची या गोष्टीला संमति असेल तरच हें घडूं शकतें. सत्य हक्कानें मनांत शिरूं शकत नाहीं, राहूं शकत नाहीं.

पान क्र. ५७४

 

      सांख्य मानसशास्त्रानुसार मानसिक व्यक्तित्वाचें तीन वर्ग पडतात. तामसिक, राजसिक आणि सात्विक. अचेतनांतून प्रथम तामसिक व्यक्तित्व उदयास येतें; जडता व अंधकार यांचें साम्राज्य या व्यक्तित्वांत असतें; वासनाविकारांचें साम्राज्य आणि अखंड धडपड ही राजसिक व्यक्तित्वाची प्रकृति असते; प्रकाश, सुसंवाद व समतोल या गुणांचा संभार हें सात्विक व्यक्तित्वाचें वैशिष्ट होय. तामसिक बुद्धीचें स्थान शारीर, भौतिक मनांत असतें; नव कल्पनांचें ग्रहण या मनाकडून होत नाहीं; 'अधिकारी' गणला जाणारा, सर्वसामान्य असा कोणी पुरुष वा ग्रंथ असेल, तर त्याच्या कल्पना तामसिक बुद्धि अंधपणें व जडपणें स्वीकारते; या कल्पनांचा स्वीकारहि ती जागरूकतेनें करीत नाही, अर्धवटपणें करते; आपल्या क्षेत्राचा विस्तार करण्यास ती नाराज असते, नवी प्रेरणा तिला नको असते; ती स्थितिशील, गतिशून्य असते; सर्वमान्य ज्ञानाला ती चिकटून असते. पुन: पुन्हां करण्याची पुराणक्रिया ती आनंदानें करते; हा व्यवहारीपणा तिचा चांगला गुण आहे; पण तिचा व्यवहार फार मर्यादित क्षेत्रांत चालतो -- रूढ गोष्टी, अगदीं उघड गोष्टी, परिचित, प्रस्थापित व सुरक्षित गोष्टी -- हा तिचा व्यवहाराचा प्रांत असतो; नवें किंवा तिला धक्का देणारें असें कांहींहि, ती जवळ करीत नाहीं. राजसिक बुद्धीचें स्थान मुख्यत: प्राणिक मनांत असतें. हिचे दोन प्रकार आहेत : पुराण-संरक्षणवादी आणि नवग्रहणवादी. पुराण-संरक्षण-बुद्धि संरक्षणाच्या कार्यांत अतिरेकी भावनेचा, अत्याचाराचा प्रयोग करण्यास मागेंपुढें पाहत नाही; आपलें व्यक्तित्व, त्याशीं जुळणारे जें कांहीं असेल तें, आपल्या इच्छेला पसंत असेल तें, आपल्या जीवनदृष्टीला अनुकूल असेल तें, सर्व जुनें कायम ठेवण्यासाठीं पुराणसंरक्षणबुद्धि हिरीरीनें व त्वेषानें लढत असते; तसेंच आपल्या अहम्‌च्या, आपल्या वैयक्तिक मताच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींवर निकराचा हल्ला चढवून त्यांना पराभूत करण्याचा व नष्ट करण्याचा ही बुद्धि प्रयत्न करते; याप्रमाणें पुराणप्रिय राजसिक बुद्धीची वृत्ति आणि वर्तन असतें, आतां नव-प्रिय राजसिक बुद्धि कशी असते तें पाहूं : हिला नव्या गोष्टींविषयीं फार हव्यास असतो; तिचा आग्रह, तिचा त्वेष, तिची अमर्याद धडपड ही नव्या गोष्टींच्या स्वीकारासाठीं, निर्मितिसाठीं असते. ती कशालाच चिकटून असत नाहीं; सारखी अस्थिर व चंचल वृत्तीची असते; सत्य काय आहे, हें ती पाहत नाहीं. ज्ञानाच्या प्रकाशाची ती फिकीर करीत नाहीं, तिला बौद्धिक संग्राम सारखा हवा असतो; सारखी चळवळ

पान क्र. ५७५

 

सारखें साहस व धाडस ती पसंत करते. तामसिक आणि राजसिक बुद्धींची कहाणी झाल्यावर आतां सात्विक बुद्धीची कहाणी पाहूं : ही बुद्धि ज्ञानासाठीं तळमळत असते; ज्ञान ज्ञान, ज्ञान ! सांपडेल तेथून तिला ज्ञान हवें असतें; कोणत्याहि गोष्टीचा बारकाईनें विचार करणें, वस्तुस्थितीशीं आपली किंवा इतरांची कल्पना पडताळून पाहणें, न्यायाच्या तागडींत संशयित गोष्टी तोलून पाहणें, अमुक गोष्ट सत्य आहे असें विचारान्तीं ठरलें, तर आपला हेका न चालवितां त्या सत्याशीं मिळतें घेणें, आपल्या शक्तीनुसार जें जें ज्ञान पचवितां येईल तें तें घेणें व पचविणें, सत्याची कुशलतेनें सुसंवादी बौद्धिक इमारत उभी करणें -- या वृत्ती व कृती सात्विक बुद्धीच्या अंगभूत असतात. पण मनाचा प्रकाश स्वभावतःच मर्यादित असतो; अर्थात् या सात्विक बुद्धीचा प्रकाशहि मर्यादित असतो; म्हणून या बुद्धीला सर्व सत्य, सर्व ज्ञान सारखेंच स्वागतार्ह असत नाहीं; सर्व सत्याचें व ज्ञानाचें सारखेंच स्वागत करण्याइतकें मोठेंपण, व्यापकपण तिच्या मर्यादित प्रकाशामुळें या बुद्धीला धारण करतां येत नाहीं -- तिलाहि बौद्धिक अहम् असतो; सत्वगुणी, प्रकाशयुक्त असा बौद्धिक अहम् असतो, आणि या अहम्‌च्या धोरणानें तिला निरीक्षण, निर्णय, युक्तिवाद, पसंती-नापसंती या क्रिया कराव्या लागतात. बहुतेक माणसांत या तीनपैकीं एका गुणाचें प्राधान्य असतें, प्रभुत्व असतें. पण त्याबरोबर या गुणांचे मिश्रणहि त्यांचे ठिकाणी असतें. एकच मन एका दिशेनें सात्विक असेल, उघडें लवचीक व सुसंवादी असेल, तर दुसऱ्या दिशेनें तेंच वासनांकित, धडपडणारें अविचारी, पूर्वग्रहांनीं भरलेलें व बेताल असेल; तिसऱ्या दिशेनें अंधकारमय, ग्रहणशक्तिशून्य असेल. व्यक्तित्वानें मर्यादित होणें, व्यक्तित्वाची बाजू घेऊन त्याचा संघर्षप्रसंगीं सांभाळ करणें, जें आपल्याला आत्मसात् करतां येण्यासारखें नाहीं तें स्वीकारण्याचें नाकारणें, या गोष्टी विकासदृष्टीनें व्यक्तीला आवश्यकच आहेत; कारण, विकासक्रमामध्यें आज ज्या पायरीवर मानवी व्यक्ति आलेली आहे, त्या पायरीवर असतांना तिच्या अस्तित्वाचा नियम, धर्म तिच्या मनाचा आणि प्राणाचा जीवनधर्म, म्हणजे विशिष्ट प्रकारचें आत्मप्रकटन, विशिष्ट प्रकारचा अनुभव घेणें व विशिष्ट प्रकारें अनुभवाचा उपयोग करणें, हाच स्वभावत: असणार. व्यक्तित्व टाकून जोपर्यंत व्यक्ति विश्वमय झाली नाहीं, मनाच्या क्षेत्रापलीकडील अतिमानसिक क्षेत्रांत जाऊन वावरण्याची व्यक्तीची तयारी झाली नाहीं, तोपर्यंत आमच्या वैयक्तिक प्रकृतीचा धर्म म्हणजे व्यक्तित्वानें

पान क्र. ५७६

 

मानसिक जाणिवेला मर्यादा पडणें, सत्याला मनाच्या आवडीनिवडींनीं, त्याच्या विशिष्ट स्वभावगुणांनीं मुरड घातली जाणें, हाच असणार. अर्थात् ही परिस्थिति प्रमादाला जन्म देणारी, अटळपणें प्रमाद घडविणारी आहे हें उघड आहे. या परिस्थितीमुळें कोणत्याहि क्षणीं व्यक्तीकडून सत्याचें असत्य होऊं शकेल, अजाणतां किंवा अर्धवट जाणतांहि आत्मवंचना होऊं शकेल, खरें ज्ञान स्वीकारण्याला नकार दिला जाऊं शकेल, सोईचें प्रमादपूर्ण ज्ञान खरें ज्ञान आहे असा आग्रहहि धरला जाऊं शकेल, या गोष्टी सहज समजण्यासारख्या आहेत.

      ज्ञानाच्या, विचाराच्या क्षेत्रांत काय घडतें, काय घडूं शकतें, व्यक्तीच्या आजच्या विकासक्रमांतील पायरीचा विचार करतां काय घडणें अनिवार्य असतें तें आपण पाहिलें. इच्छाशक्तीचा, संकल्पशक्तीचा किंवा कृतीचा जो प्रान्त आहे, त्या प्रांतांतहि विचारप्रांतांतील नियम लागूं होतो. विचाराच्या आणि आचाराच्या प्रांतांत एकच नियम चालणें स्वाभाविक आहे. अज्ञान हें प्रमादी जाणीव निर्माण करतें, व्यक्तींचा, वस्तूंचा व घटनांचा संपर्क झाला असतां ही प्रमादी जाणीव जी प्रतिक्रिया घडविते ती, अर्थात् प्रमादपूर्णच असते : संपर्काच्या प्रसंगानें आंतून आंतरात्म्याकडून, गुप्त आंतरतम जाणिवेकडून तिजकडे येणाऱ्या क्रिया करण्याच्या किंवा न करण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याची, त्यांचा विपरीत अर्थ लावण्याची व त्या अमान्य करण्याची संवय ही पृष्ठवर्ती अज्ञानमय जाणीव लावून घेते. या आंतरात्म्याच्या योग्य सूचनांऐवजीं ती मनाच्या, वासनामय प्राणाच्या अयोग्य व तमोमय सूचना मान्य करते. वासनामय अहम्‌च्या मागण्या, प्रेरणा शिरोधार्य करून तदनुसार वागते, क्रिया करते. अज्ञानांतून ज्ञानाकडे जाणीव प्रवास करीत असते ती विकासक्रमाच्या दोन उपाधींना तोंड देऊन प्रवास करीत असते : एक उपाधि प्रमाद व दुसरी उपाधि अहम्. प्रमादांतून अप्रमादी ज्ञानाकडे, अहम्‌मधून अनहम्‌कडे, विश्वमयतेकडे असा जाणिवेचा प्रवास विकासक्रमानुसार व्हावयाचा असतो. अहम् ही उपाधि फार बिकट आहे. विभक्त प्राणमय पुरूषाचा अहम् हा जगाला स्वत:हून अगदीं वेगळें मानतो, आणि हा अहम् या जगांत आपलें प्रभुत्व स्थापन करण्याच्या मागें असतो; हा प्राणमय ''आत्मा'' अज्ञानग्रस्त असल्यानें त्याचें प्रभुत्व म्हणजे जगांत विसंवाद, विरोध उभे करणारी एक प्रमुख शक्ति ठरली आहे; जीवनांत अंतर्बाह्य गोंधळ उत्पन्न करणारी, अन्याय आणि अमंगल (पाप, अनिष्ट) निर्माण करणारी एक

पान क्र. ५७७

 

प्रमुख शक्ति ठरली आहे. आमच्यामध्यें जें नैसर्गिक प्राणतत्त्व आहे, तें आपल्या प्राथमिक अवस्थेंत स्वैर, असंयत असतांना सत्याची, योग्य विचाराची, योग्य आचाराची बिलकुल कदर करीत नाहीं; आपल्या अहम्‌ची सत्ता आणि कदर जगांत झाली पाहिजे, आपल्याला लागेल तें आपल्या ताब्यांत आलें पाहिजे, आपल्या सर्व ऊर्मी तृप्त झाल्या पाहिजेत, आपल्या वासना काय असतील त्या सर्वप्रकारें तृप्त झाल्या पाहिजेत, ही एकच एक काळजी त्याला असते. या त्याच्या गरजा आणि इच्छा प्राणमय आत्म्याला सर्वप्रथम महत्त्वाच्या वाटतात. या गरजा व इच्छा पुरविण्यासाठीं धडपडतांना तो सत्य, न्याय, भलाई किंवा दुसरा कसलाहि विचार आड येऊं देणार नाहीं; ही त्याची साहजिक प्रवृत्ति असते. पण सत्यादि कल्पना असणारें मनहि, प्राणमय ''आत्म्या''बरोबर आमच्यामध्यें आहे. सत्यादि दर्शन असणारा आत्माहि प्राणमयाबरोबर आमच्यामध्यें आहे; तेव्हां साहजिकच आपल्या साहजिक प्रवृत्तीला मनाकडून दुजोरा मिळविण्याचा प्राणमय आत्मा प्रयत्न करतो; मनावर तो दडपण आणतो, आणि आपली स्वतःची (प्राणमयाची) जी जी इच्छा असेल ती ती मनाला मंजूर आहे, संमत आहे, आणि ती प्राणमयानें कार्यान्वित करावी असा मनाकडून फतवा काढवितो. प्राणमय जें योजील व करील तें सत्य, तें न्याय्य व तें चांगलें, प्राणमयाच्या वासना, ऊर्मी, क्रिया या सर्व सत्य, न्याय्य, मंगल या वर्गांत पडणाऱ्या आहेत, असा फतवा तो मनाकडून, त्याजवर दडपण आणून, वजन आणून काढवितो. प्राणमयाला अशा समर्थनाची मदत होते. आपली इच्छा सर्वथा पुरी करतां यावी या दृष्टीनें अशा समर्थनासाठीं तो खटपट करून मनाकडून तें समर्थन मिळवितो. मनाकडून समर्थन मिळविण्यांत प्राणमय यशस्वी झाला, कीं मग सत्य इत्यादि खऱ्या कसोट्या तो सर्वस्वीं बाजूला ठेवतो आणि एकच कसोटी आपल्या हालचालीला लावतो; ती म्हणजे स्वत:च्या अहम्‌ची तृप्ति, वाढ, बळ, थोरवी ज्या हालचालीनें साधेल ती योग्य; ती हालचाल ''सत्य, न्याय्य, मंगल'' असा उद्‌घोष करून करावयाची हा त्याचा खाक्या चालतो. प्राणमयाला जागेचा हव्यास असतो, विस्तार हवा असतो; आपलें जग आपल्या ताब्यांत असावें असें वाटत असतें, वस्तुजातांवर आणि जीवांवर आपली सत्ता चालावी, आपलें नियंत्रण चालावें अशी हांव असते, -- स्वत:करितां, तसेंच ज्यांच्याशीं त्याचा संबंध आहे त्यांच्या करितां, वैयक्तिक अहम्‌करितां आणि सांघिक अहम्‌करितां त्याला इच्छातृप्ति, जीवनक्षेत्र, मोकळें मैदान, दीर्घ

पान क्र. ५७८

 

आयुष्य हवें असतें : त्याच्या कांहीं कल्पना, संप्रदाय, ध्येयें, हितसंबंध, मनोराज्यें असतात; त्यांच्यासाठीं त्याला जीवनक्षेत्र, मोकळें मैदान इ० हवें असतें; हीं आणि दुसरीं जीं रूपें अहंता आणि ममता त्याचे ठिकाणीं धारण करते, त्या रूपांना वाव मिळावा, आपल्या सभोंवारच्या जगावर हीं रूपें लादतां यावीं, अशी हांव प्राणमयाला असते : हें लादण्याचें काम साधण्यासारखें नसेल, तेथें तो आपल्या सोयीप्रमाणें आणि शक्तीप्रमाणें या गोष्टींचा पाठपुरावा करून त्या टिकवून धरण्याचा प्रयत्न करीत असतो. हें सर्व करतांना, त्याला योग्य वाटतील ते उपाय प्राणमय आत्मा अंमलांत आणतो; वस्तुत: अयोग्य उपायांवरहि प्रसंगीं योग्यतेचा शिक्का मारून प्राणमय आत्मा त्यांचा उपयोग करतो; अत्याचार, कपट, खोटेपणा, विध्वंसक आक्रमण, जीवघात या उपायांचा उघड उघड उपयोग करतांना तो मागें पुढें पाहत नाहीं; आपलें तें खरें करण्यामागें तो असतो; साधन, नैतिक बैठक या गोष्टी त्याला दुय्यम महत्त्वाच्या असतात. कोणतेंहि साधन त्याला चालतें; हितसंबंधांची गोष्ट असो, विचारांची, धर्माची गोष्ट असो, सर्व क्षेत्रांत आपली आत्मप्रतिष्ठेची, आत्मप्रभुत्वाची वृत्ति प्राणमय आत्मा धरून असतो; झगडा, अत्याचार, जुलूम, दडपशाही, असहिष्णुता, आक्रमण हा त्याचा सर्व क्षेत्रांत कार्यक्रम असतो; बौद्धिक सत्याच्या, आध्यात्मिक सत्याच्या क्षेत्रांतहि प्राणमय आत्म्यानें आपल्या अहम्‌चें, आपल्या स्वार्थाचें तत्त्व घुसविलें आहे. स्वार्थसिद्धीच्या कार्यक्रमांत जें जें त्याच्या अहम्‌ला धक्का पोंचवील, जें जें त्याच्या वृद्धीच्या आड येईल त्याचा स्वार्थपरायण जीव (प्राणमय आत्मा) द्वेष करतो, त्याचा तिरस्कार करतो; क्रूरता, कपट, सर्व प्रकारचा दुष्टावा, साधन म्हणून किंवा आपल्या प्रकृतीची साहजिकच क्रिया वा प्रतिक्रिया म्हणून, स्वार्थपरायण जीव आपल्या इष्टसिद्धीसाठीं उपयोगांत आणतो; न्याय, अन्याय न पाहतां, आपल्या ऊर्मीची, वासनेची तृप्ति तो करीत असतो; या तृप्तीसाठीं स्वतःच्या नाशाचा धोका तो पत्करतो; या तृप्तीसाठीं येतील त्या यातना तो सहन करतो; कारण निसर्गानें प्राणमय आत्म्याला जें ध्येय म्हणून दिलें आहे, तें केवळ आत्मरक्षणाचेंच नाहीं, तर आत्मप्रभुत्वाचें, आत्मतृप्तीचें (अर्थात् प्राणप्रभुत्वाचें, प्राणतृप्तीचें) ध्येय त्याला दिलें आहे; तसेंच प्राणशक्ति आणि प्राणपुरुष यांना साकार करण्याचेंहि ध्येय निसर्गानें प्राणमय आत्म्याला दिलें आहे. निसर्गाच्या प्रेरणेनेंच, यातना व प्रसंगीं आत्मनाश पत्करूनहि, प्राणमय आत्मा या सर्व ध्येयांच्या परिपूर्तीसाठीं धडपडत असतो.

पान क्र. ५७९

 

      प्राणमय व्यक्ति स्वभावत: वर वर्णन केलेल्या प्रकारची आहे, तिच्यांत अधिक कांहीं नाहीं, ती स्वभावत:च दुष्ट आहे असा कांहीं, वरील विवेचनाचा अर्थ घेऊं नये. सत्य आणि भलेंपण यांचा आद्य महत्त्वाच्या गोष्टी म्हणून ती विचार करीत नाहीं, ही गोष्ट खरी; पण सत्य आणि भलेंपण यांबद्दल या व्यक्तीला तीव्र आपलेपणा असूं शकतो; सत्याचा आणि भलेपणाचा पुरस्कार ती तीव्र भावनेनें करूं शकते : आनंद आणि सौंदर्य या वस्तूंसंबंधानें तिच्या अंत:करणांत जशी सहज, उत्कट हांव आणि हौस असते, तशीच तिच्या अंत:करणांत सत्य आणि भलेंपण यांजबद्दलहि हौस आणि हांव असूं शकते; एवढेंच कीं, ती तितकी सहज, स्वयंस्फूर्त असत नाहीं. प्राणशक्तीनें जें कांहीं उदयाला आणलें असेल, विकसित केलें असेल, त्याबद्दल या व्यक्तीच्या अंतरंगांत, कोठेंतरी गुप्त असा, आपुलकीचा आनंद उचंबळत असतो; प्राणशक्तीनें चांगलें केलें असेल, वाईट केलें असेल, या चांगल्याचा आनंद तिला असतो; या वाईटाचाहि आनंद तिला असतो; याचप्रमाणें प्राणशक्तिनिर्मित सत्य-असत्य, जीवन-मरण, सुख-दु:ख, स्वत:च्या यातना-दुसऱ्याच्या यातना, स्वत:चें सुख - दुसऱ्याचें सुख, स्वत:चें कल्याण - दुसऱ्याचें कल्याण या सर्व गोष्टी प्राणमय व्यक्तीला आनंददायी असतात. प्राणशक्ति आपला पुरुषार्थ करतांना चांगले आणि वाईट, भलेंपण आणि दुष्टपण, मंगल आणि अमंगल, पुण्य आणि पाप दोन्ही प्रकारचा पुरुषार्थ करीत असते; तिच्या ठिकाणीं दुसऱ्याला साह्य करण्याची प्रेरणा असते, दुसऱ्याशीं सहकार्य करून संघटना बनविण्याची (उभी करण्याची) प्रेरणा असते; उदारपणा, स्नेहसलोखा, निष्ठा, आत्मसमर्पण या सर्व प्रेरणा तिच्या ठिकाणीं असतात; स्वार्थ ती पसंत करते, त्याप्रमाणें परोपकाराचें कामहि ती अंगावर घेते; दुसऱ्यांचा नाश करते, त्याप्रमाणेंच स्वत:चेंहि ती बलिदान करते; ती जें कांहीं करते त्यांत सर्वत्र प्राणिक पुरुषार्थसिद्धीची हांव सारखीच तीव्र असते; क्रियाशक्ति आणि क्रियासिद्धीची आकांक्षा सर्वत्र सारखीच जोरदार असते. मानवाच्या पातळीहून खालच्या पातळीवरचे जीव पाहिले, तर तेथें प्राणमयाचा हा स्वभाव, त्याची ही जीवनशैली (जिच्यांत चांगले-वाईट, भलेंपण-दुष्टपण हें द्वंद्व असलें, तरी तें प्रधान प्रेरणेच्या स्वरूपाचें नसतें) उघडपणें अनुभवास येते; मानवाचे ठिकाणीं बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक विवेक उदयास आलेला असल्याकारणानें प्राणमयाच्या या स्वभावावर

पान क्र. ५८०

 

जीवनशैलीवर या विवेकाचें नियंत्रण येतें; प्राणमय हें नियंत्रण थोडेंबहुत मानतो, थोडेंबहुत मानल्याचें नाटक करतो; पण आपल्या स्वभावांत तो कांहींहि बदल करीत नाहीं. निसर्गाला आपलें काम करावयास, मन, शरीर यांच्या शक्ती उपयोगांत यावयास, या जीवनांत त्यांचें इष्ट सिद्ध व्हावयास प्राणमय आत्मा हाच साहाय्यक होतो; प्राणमय आत्मा आणि या आत्म्याची प्राणशक्ति आणि आपलें स्वत्व गाजविण्याची त्यांची धडपड निसर्गाला, मनाला, शरीराला त्यांच्या त्यांच्या कार्यांत यशस्वी होण्यास आवश्यक असे साहाय्यक आहेत; आत्मशक्ति उघडपणें मानवांत कार्यकारी होत नाहीं तोंपोवतों, प्राणशक्तीच्या साह्यानेंच मानवाचा संसार होत राहतो, व होत राहणार. बाह्य प्राणमय व्यक्तीऐवजीं आंतर प्राणयम, खरी प्राणमय शक्ति काम करूं लागली, म्हणजे मात्र बाह्य प्राणिक अहम्‌चा जोर सर्वस्वीं मागें पडून प्राणशक्ति आत्म्याची सेवा करूं लागेल आणि आमच्या खऱ्या आध्यात्मिक पुरुषाला त्याचें इष्ट साधण्यासाठीं प्रभावी साधन म्हणून या प्राणशक्तीचा उपयोग होऊं लागेल.

      व्यक्तीच्या जाणिवेंत आणि इच्छाशक्तींत प्रमाद, असत्य, अन्याय, अमंगल यांचें जें मूळ आणि स्वरूप अनुभवास येतें तें वरीलप्रमाणें आहे. अचेतनांतून मर्यादित जाणीव हळूंहळूं वर येते, ही मर्यादित जाणीव प्रमादाचें मूळ आहे; मर्यादित जाणिवेविषयीं वैयक्तिक आसक्ति, त्या जाणिवेनें जन्मास घातलेल्या प्रमादाविषयीं वैयक्तिक आसक्ति, हें असत्याचें मूळ आहे; आणि प्राणिक अहम्‌च्या शासनाखालीं वावरणारी प्रमादी जाणीव ही अमंगलाच्या मुळाशीं आहे. हें उघड आहे की, प्रमाद, असत्य, अमंगल या वस्तू स्वतंत्र नसून सापेक्ष आहेत; विश्वशक्तीनें या वस्तूंना जो आकार दिला आहे, तो विकासशील आत्मप्रकटनाच्या तिच्या कार्यासाठीं दिला आहे; विश्वशक्तीचें विकासशील आत्माविष्करण हा या वस्तूंचा जीवनहेतु आहे हें आपण ध्यानांत घ्यावयास हवें. प्राणमय अहम् हें विश्वप्रकृतीचें साधन आहे; व्यक्तीचें व्यक्तित्व प्रस्थापित करण्यासाठीं प्राणमय अहम्‌चा उपयोग विश्वप्रकृति करते; अवचेतन द्रव्याचा अनिश्चित आकाराचा जो गोळा असतो, त्यांतून व्यक्तित्व वेगळें काढावयाचें असतें; अचेतनानें जी भूमि (अवचेतनाची भूमि) तयार करून दिलेली असते, त्या भूमीवर जाणीवयुक्त जीवाचा (व्यक्तित्वाचा) उदय घडवावयाचा असतो; या कार्यासाठीं विश्वप्रकृति प्राणमय अहम् अस्तित्वांत आणीत असते. व्यक्तित्वशून्य अवचेतन द्रव्याच्या गोळ्यांतून व्यक्तित्व

पान क्र. ५८१

 

वेगळें काढण्यासाठीं प्राणमय अहम्‌ची निर्मिति विश्वप्रकृति करते; अर्थात् या अहम्‌नें आपलें अस्तित्व गाजवावें हें ओघानेंच येतें. वैयक्तिक अहम् ही व्यावहारिक कार्यक्षम कल्पना आहे; गुप्त आत्मा पृष्ठवर्ती जाणिवेंत या अहम्‌चें रूप घेऊन येतो; पृष्ठवर्ती अनुभवाच्या संग्रहासाठीं खऱ्या आत्म्याचा प्रतिनिधि म्हणून वैयक्तिक अहम्‌ची योजना असते. आंतील दिव्य आत्म्यापासून आणि बाह्य इतर व्यक्तींपासून अज्ञान त्याला वेगळें अस्तित्व देतें; पण बाह्य विविधतेंत विकाससाध्य एकता त्यानें संपादन करावी अशासाठीं आंतून गुप्तपणें त्याला प्रेरणा मिळत असते; तो मर्यादित असतो, पण अमर्याद अनन्तत्व त्यानें प्राप्त करून घ्यावें अशी प्रेरणा त्याला पाठीमागून मिळत असते. पण अहम्‌ची अज्ञानव्याप्त बाह्य जाणीव या प्रेरणांचा अर्थ तिला शोभेल असा लावते; हा वैयक्तिक अहम् आंतील एकताविषयक, अनन्तत्वविषयक प्रेरणा घेऊन, त्यांचा भलता (अज्ञानसुलभ) अर्थ लावून आपला कार्यक्रम आंखतो : त्या प्रेरणांतून बळ घेऊन, स्फूर्ति घेऊन तो स्वत: खूप मोठें, खूप विस्तृत होण्याचा संकल्प करतो, आपलें मर्यादित रूप अमर्याद करण्याचा संकल्प करतो, आपल्या रूपांत जें कांहीं समाविष्ट करून घेतां येईल ते सर्व आत्मसात् करण्याचा संकल्प करतो, प्रत्येक वस्तूंत शिरून तिचा ताबा घेण्याचा संकल्प करतो; आपल्या खुषीसाठीं तिच्या ताब्यांत जाण्याचाहि संकल्प तो केव्हां केव्हां करतो; दुसऱ्यांच्या ताब्यांत जाऊन आपली वाढ होणार आहे असें दिसल्यास तो त्यांच्या ताब्यांत जाण्याचा संकल्प करतो; दुसऱ्यांचें अंकित होऊन परिणामीं त्यांची शक्ति, त्यांचें अस्तित्व आपल्या अस्तित्वांत पचवून टाकतां येईल असें दिसलें, कीं तो दुसऱ्यांचा अंकित होण्याचा संकल्प करतो; दुसऱ्यांच्या ताब्यांत गेल्यानें आपलें अस्तित्व गाजविण्याला, जीवनानंद मिळण्याला, आपलें मानसिक, प्राणिक; शारीरिक जीवन परिपुष्ट होण्याला मदत होईल, त्यासाठीं जोरदार प्रेरणा प्राप्त होईल असें वैयक्तिक अहम् स्वत:ला पटवूं शकला, तर दुसऱ्याचा अंकित होण्याचा संकल्प तो आनंदानें करतो -- आणि हे सारे संकल्प तो यथाशक्ति कार्यान्वित करतो हें वेगळें सांगणें नको. आंतून येणाऱ्या एकताविषयक आणि अनंतत्वविषयक प्रेरणा म्हणजेच वरील संकल्प करून ते कार्यान्वित करण्याच्याच प्रेरणा आहेत, असा अर्थ वैयक्तिक अहम् लावतो व त्याच्या अज्ञानव्याप्त जाणिवेला हाच अर्थ बरोबर वाटतो. असो.

      वैयक्तिक अहम् वर सांगितलेले संकल्प कार्यान्वित करतो ते, स्वतंत्र

पान क्र. ५८२

 

''आत्मा'' म्हणून कार्यान्वित करतो; स्वतःच्या फायद्यासाठीं कार्यान्वित करतो. तो इतर ''आत्म्यांशीं'', अहम्‌शीं जाणीवपूर्वक विचारविनिमय करून सर्वांच्या, परस्परांच्या फायद्याच्या दृष्टीनें संकल्पांचा कार्यक्रम करीत नाहीं, सर्वांचें ऐक्य घडावें या हेतूनें संकल्पांचा कार्यक्रम करीत नाहीं; अर्थात् त्याच्या कार्यक्रमांतून जीवांच्या जीवनांत विसंवाद, संघर्ष, वैर उभें राहतें; आणि विसंवाद आणि वैर ज्या गोष्टींना जन्म देतात त्यांना आम्ही अन्याय, अमंगल हीं नावें देतों. निसर्ग स्वतःच्या कार्यांत अन्याय, अमंगल आणि त्यांचीं कारणें या सर्वांचा संग्रह करतो; कारण विकासाचें काम या उपाधींशिवाय शक्य नसतें; विकासाच्या या अटळ उपाधी आहेत म्हणून निसर्ग यांना मान्यता देतो; विभक्त व्यक्तीच्या वाढीला या उपाधींची आवश्यकता असते; या उपाधी अज्ञानापासून उत्पन्न होतात, अज्ञानी जाणीव त्यांचा पाठपुरावा करते. (ही जाणीव भेदावरच उभी असते); अज्ञानी इच्छाशक्ति, जी भेदाच्या द्वारांच काम करते व अज्ञानी जीवनानंद, जो भेदांत सुखी असतो, या दोहोंचा या उपाधींना पाठिंबा असतो. मंगल आणि अमंगल दोहोंच्याहि द्वारां विकासाचा हेतु आपलें विकासाचें कार्य करीत असतो; कारण अज्ञानाच्या क्षेत्रांत मंगल मर्यादित असतें, अमंगलहि मर्यादित असतें; विकासाचा कार्यक्रम मर्यादित मंगलाला चिकटून बसेल, तर इच्छित विकास रोखला जाईल, बन्दींत पडल्यासारखा होईल; म्हणून विकासयोजना (विकासयोजक) मिळेल तो माल घेऊन विकास-कार्यक्रमांत त्याचा होईल तो उपयोग करून घेते. विकासकार्य असें चालत असल्यानें, आम्ही ज्याला मंगल म्हणतों त्यांतून अमंगल, आणि आम्ही ज्याला अमंगल म्हणतो त्यांतून विकासक्रमांत मंगल निघतांना आमच्या नजरेस येतें; अमंगल वाटत होतें तें पुढें मंगल म्हणून स्वीकारलें जातें, आणि उलटपक्षीं मंगल वाटतें तें पुढें अमंगल म्हणून ठरलें जातें. याचें कारण हें आहे कीं, मंगल-अमंगलाच्या कसोट्या विकासशील असतात, मर्यादित आणि परिवर्तनशील असतात; विकासी प्रकृति, पार्थिव विश्वशक्ति प्रारंभीं मंगल-अमंगल द्वंद्वांतील कोणत्याहि एका कोटीची पक्षपाती नसते; आपल्या योजनेसाठीं दोन्ही कोटींचा ती उपयोग करते असें दिसतें; पण पुढें हीच प्रकृति, हीच शक्ति मनुष्यावर मंगल-अमंगलाची, इष्ट-अनिष्टाची, चांगल्या-वाईटाची, सदसताची, साधुत्व-असाधुत्वाची, पापपुण्याची.... विवेचकबुद्धि लादते आणि ही बुद्धि, हा विवेक फार महत्त्वाचा आहे असा आग्रह धरते : यावरून हें उघड आहे

पान क्र. ५८३

 

कीं, या विवेचक बुद्धीच्या मुळाशीं विकासाची योजना आहे, विकासासाठीं ही विवेचकबुद्धि मनुष्याचे ठिकाणीं असणें आवश्यक आहे; मनुष्यानें कांहीं विशिष्ट गोष्टी मागें टाकाव्या, आणि कांहीं विशिष्ट गोष्टींच्या दिशेनें पुढें जावें; याप्रमाणें मंगलांतून, अमंगलांतून मार्ग क्रमीत शाश्वत, अनंत अशा एका मंगलाला त्यानें गांठावें, अशी विकासाची योजना असल्यानें त्याचे ठिकाणीं मंगल-अमंगलविवेचकबुद्धि ठेवली आहे, प्रकृतीनें निर्माण केली आहे असें उघड दिसतें.

      प्रकृतीची विकासयोजना काय आहे हें आपण पाहिलें. आतां प्रश्न असा आहे कीं, ही योजना सिद्धीस जावी यासाठीं काय तजवीज आहे ? कोणती शक्ति, कोणतें साधन व साधनें, कोणती प्रेरणा, कोणतें निवडीचें आणि संवादित्व साधण्याचें तत्त्व आणि प्रक्रिया उपयोगांत आणून विकासयोजना सिद्धीस नेली जाते ? मनुष्यानें (मनुष्याच्या मनानें) युगानुयुगें जी पद्धति उपयोगांत आणली आहे ती, ग्राह्य-अग्राह्य ठरविणारें कसलें तरी तत्त्व वापरून आपला मार्ग काढावयाचा, ही आहे : धार्मिक विधिनिषेध, सामाजिक नैतिक जीवननियम, नैतिक आदर्श, ही रूपें मानवी मनाच्या या विकासपद्धतीनें धारण केलीं आहेत. पण चांगलें- वाईट ठरविण्याची ही पद्धति वरवरच्या अनुभवावर आधारलेली अशी आहे; प्रश्नाच्या मुळाला ही स्पर्श करीत नाहीं; जो रोग दूर करण्यासाठी ही पद्धति कंबर बांधते, तो रोग झाला कसा आणि कां याविषयीं या पद्धतीला ज्ञान नाहीं; रोगाचीं चिन्हें पाहून त्या चिन्हांवर या पद्धतींत उपाययोजना केली जाते, आणि तीहि अर्धवटपणें केली जाते; कारण प्रकृतीच्या योजनेंत या ''रोग-चिन्हांना'' कांहीं ''नियत कार्य'' आहे तें या पद्धतीला अज्ञात आहे. तसेंच मनाचे आणि प्राणाचे ठिकाणीं, या चांगल्याला आणि वाईटाला आधार देणारें आणि त्यांचें अस्तित्व टिकविणारें असें कांहीं आहे, तें काय आहे तेंहि या पद्धतीच्या दृष्टीला दिसत नाहीं. शिवाय मानवी चांगलें-वाईट सापेक्ष असतें, आणि नीतिशास्त्रानें उभ्या केलेल्या कसोट्या अनिश्चित आणि सापेक्ष आहेत; या किंवा त्या धर्मानें निषिद्ध मानलेलें, समाजाला उपकारक किंवा अपकारक मानलें गेलेलें, अल्पकाल टिकणारा एखादा मानवी कायदा जें कायदेशीर किंवा बेकायदेशीर मानतो, स्वतःला किंवा दुसऱ्यांना फायद्याचें किंवा नुकसानीचें मानले जाणारें तें, या किंवा त्या आदर्शाला धरून असणारें तें सदसद्‌विवेक नांवाची उपजतबुद्धि जें योग्य म्हणून सुचविते किंवा अयोग्य

पान क्र. ५८४

 

म्हणून धिक्कारते तें -- नीतीच्या अनेकरंगी कल्पनेंत, नीतीच्या संकीर्ण घटकद्रव्यांत, आतांच दिलेल्या जंत्रींतील योग्यायोग्यविषयक सर्व दृष्टिकोन, सर्व मतें एकत्र मिसळलेली आहेत. या प्रत्येक दृष्टिकोनांत, या प्रत्येक मतांत, सत्य, अर्धसत्य, प्रमाद यांचें मिश्रण कायमचें असलेलें सांपडेल. मानसिक मर्यादित ज्ञान-अज्ञान ज्या कांहीं हालचाली करतें, त्या सर्व हालचालींत सत्य, अर्धसत्य आणि प्रमाद यांचें मिश्रण नेहमींच असतें. आम्हां मानवांना मानसिक नियंत्रणाची आवश्यकता आहे, आमच्या प्राणिक आणि शारीरिक सहजवासना आणि इतर वासना आणि इच्छा यांजवर नियंत्रण लागतें, आमचें वैयक्तिक आणि सामाजिक वर्तन आणि कार्य यांजवर नियंत्रण हवें असतें; दुसऱ्यांशीं आम्ही जो व्यवहार करतो त्याजवर नियंत्रण लागते आणि (मानसिक) नीतिशास्त्र एक असा कित्ता घालून देतें कीं, त्याच्याकडे पाहून आम्हीं आपला मार्ग ठरवावा, आणि आमच्या व्यवहारावर आणि विकार-वासनांवर नित्याचा लगाम उपयोगांत आणावा : पण हा लगाम, हें नियंत्रण नेहमींच अपूर्ण व सदोष असतें. हें नियंत्रण म्हणजे कांही प्रश्नाची सोडवणूक असत नाहीं; तें एक तात्पुरतें कार्यनिर्वाहक कसब असतें; या सर्व नियंत्रणानंतर, मनुष्य होता तसाच, आहे तसाच राहतो; चांगलें आणि वाईट, पुण्य आणि पाप, यांची भेसळ हेंच त्याचें स्वरूप कायम राहतें, 'स्वतःच्या मानसिक, प्राणिक, शारीरिक प्रकृतीवर अपूर्ण अधिकार असलेला, पूर्ण सत्ता गाजवूं न शकणारा असा मानसिक अहम्' हेंच मनुष्याचें स्वरूप कायम राहतें.

      आमची जाणीव, आमची कृति यांत जें चांगलें असेल (दिसेल) तें ठेवणें, वाईट असेल (दिसेल) तें काढून टाकणें आणि या रीतीनें आमचें अस्तित्व, स्वरूप पुनर्घटित करणें, सुधारणें, आमच्या समोरील आदर्शाची प्रतिमा आम्ही व्हावें असा प्रयत्न या सुधारणेच्या उद्योगानें करणें, यांत मामुली नियंत्रणाहून फार व सखोल असा नैतिक हेतु निःसंशय आहे; हा सुधारणेचा उद्योग खऱ्या प्रश्नाच्या जवळ आम्हांला नेतो; कारण आमचें जीवन ही विकासी घटना आहे, आणि या जीवनाचा विकास करीत करीत आम्हांला कांहीं विशिष्ट 'वस्तु' व्हावयाचें आहे आणि त्या विशिष्ट 'वस्तूच्या' स्वरूपांत रहावयाचें आहे, या सत्यपूर्ण कल्पनेवर हा उद्योग आधारलेला असतो. परंतु हें जे कांहीं आदर्श म्हणून आमचें मन निर्माण करतें, ते सापेक्ष असतात, त्याच्या पसंतीचे असतात; या आदर्शानुसार आम्हीं आपली प्रकृति कांटेकोरपणें बनविणें, म्हणजे आम्हीं स्वतःला मर्यादित

पान क्र. ५८५

 

करून घेणें आहे, विशालतर अस्तित्व पुढें ठेवून हळूंहळूं त्या अस्तित्वाच्या इतकी आपली वाढ करावयाची, हें जें आमचें खरें ध्येय आहे तें या मर्यादित आदर्शाच्या कांटेकोर अनुकरणानें साध्य होत नाहीं. अनंत आणि परात्पर तत्त्व आम्हांला हांक देत आहे आणि त्या तत्त्वाकडे धांव घेणें हें आमचें खरें कर्तव्य आहे; या. तत्त्वाचा आमच्यावरचा हक्क हा खरा हक्क आहे, प्रकृतीनें आमच्या ठिकाणीं आत्मभोगाचें आणि आत्मत्यागाचें जें 'व्रत' लादलेलें आहे, तें व्रत व त्या व्रतानुसार आमची धांवाधांव, ही खरोखरी परात्पर अनंताच्या दिशेनें होणारी धांवाधांव आहे, पण आत्मभोगाचा आणि आत्मत्यागाचा अहम्‌चा रस्ता चुकीचा असतो, कारण तो अज्ञानाचा रस्ता असतो; या चुकीच्या रस्त्याऐवजीं खरा बिनचूक रस्ता आम्हांला शोधून काढणें आहे; प्रकृतीच्या आत्मभोगांत आणि आत्मत्यागांत विरोध असतो; एक हवासा वाटत असतो, एक (त्याग) नकोसा वाटत असतो: हा प्रकृतीचा (अहम्‌चा) ''हवें-नको''चा विरोध जेथें नाहीं, असा अन्योन्यपूरक भोग-त्यागाचा अनंताकडे नेणारा रस्ता आम्हांला शोधून काढणें आहे; अनंताकडे नेणारा हा भोगत्यागाचा बिनचूक मार्ग आम्हांला शोधून सांपडला नाहीं, तर पूर्ण जीवनाचें आमचें ध्येय (परात्पर अनंताच्या मार्गावरचें) कांहींतरी मर्यादित असें ठेवावें लागणार; आणि या मर्यादित ध्येयाची सिद्धि आमच्या प्राणमय अतिरेकी वासनाप्रेरित ढकलाढकलीमुळें होऊं शकणार नाहीं, झालीच तर अर्धवट होईल; किंवा अज्ञानाची जीवनावरील पकड सुटण्यासारखी नसून, ही पकड सोडविण्यांत आपल्याला यश मिळणें अशक्य आहे, असा निराशावाद जीवाला ग्रासील. मग जीवनाचा त्याग, संन्यास हा एकच, जीवनाच्या कोंडींतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे, असें जीवाला वाटूं लागेल. जीवनांतून बाहेर पडण्याचा हाच मार्ग सामान्यतः धर्म दाखवितो; देवानें अमुक नीतिमार्ग आज्ञापिला आहे, त्या मार्गानें जीवनाच्या बाहेर जातां येतें असें सांगण्यांत येतें. अमुक धर्मांत भक्तीचा, सदाचाराचा, पुण्याचा अमुक मार्ग सांगितला आहे, अमुक मानवाच्या अंतःस्फूर्तीनें देवाचा, देवानें दिलेला जीवनाचा कायदा निश्चित केला आहे, तो अमुक आहे; हा पुण्याचा मार्ग, हा जीवनाचा कायदा अनुसरला असतां जीवनाच्या बाहेर जातां येतें, असें सांगण्यांत येतें. पण हें जीवनाच्या बाहेर जाणें जरी साधलें, तरी विशिष्ट व्यक्तीपुरतें तें साधतें : विश्वांतील जीवनाचें कोडें कांहीं त्यामुळें सुटत नाहीं, तें कोडें कोडेंच राहतें. भारतीयांच्या प्राचीन

पान क्र. ५८६

 

आध्यात्मिक तत्त्वज्ञानांत असें सांगितलें आहे कीं, आत्मानुभूतीसाठीं व्यवहारांत सत्याचा, सद्‌गुणाचा, सत्संकल्पाचा, सद्‌वर्तनाचा अवलंब करणें अगत्याचें आहे; पण आत्मसाक्षात्कारी जीवाला आत्मसाक्षात्कार घडल्यानें आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेंत अनंताची, शाश्वताची विशाल जाणीव लाभते आणि ही जाणीव लाभलेला जीव पुण्य-पाप या द्वंद्वाचें ओझें झटकून टाकतो, या द्वंद्वाच्या पलीकडे तो जातो. कारण हें द्वन्द्व सापेक्ष, अज्ञानग्रस्त जीवनांतच असूं शकतें. तेंच त्याचें जन्मस्थान आणि वसतिस्थान आहे -- सापेक्ष सत् (चांगले, साधुत्व) ही अभ्यासभूमि आहे. विश्वप्रकृतीनें ही अभ्यासभूमि आमच्याकरितां निर्माण केली आहे. या भूमीत सापेक्ष साधुत्वाचा अभ्यास करून, पुढें आम्हांला निरपेक्ष, शुद्ध व खरेंखुरें साधुत्व प्राप्त करून घ्यावयाचें असतें. हें साधुत्व सच्चिदानंदाचें स्वाभाविक अंग असतें, तें विश्वनिरपेक्ष असतें. साधुत्व-असाधुत्व, मंगल-अमंगल... हे प्रश्न मनाच्या अज्ञानव्याप्त जीवनाच्या क्षेत्रांतले आहेत मनाच्या वरतीं आम्ही जातों, तेव्हां ते आमच्याबरोबर येत नाहींत. मनाच्या पलीकडे, वरतीं अनंत सत्य-ज्ञान व सत्य-जाणीव असते. तेथें सत्य-असत्य, अप्रमाद-प्रमाद हें द्वन्द्व असत नाहीं; सत्य-प्रमाद हें द्वन्द्व जसें अनंत सत्य-जाणिवेच्या क्षेत्रांत नसतें, तसें चांगलें-वाईट हेंहि द्वन्द्व तेथें नसतें. तेथें अनंत सत् (चांगलें) असतें. सदसतापासून तेथें मुक्तता असते. चांगले-वाईट, इष्ट-अनिष्ट या द्वन्द्वांच्या अतीत, असें तें क्षेत्र असतें.

      इष्ट-अनिष्ट, साधुत्व-असाधुत्व... हा प्रश्न मानवजातीला नेहमींच सतावीत आला आहे. या प्रश्नाचें समाधानकारक उत्तर तिला सांपडलेलें नाहीं. कांहींतरी कृत्रिम उपाय योजून या प्रश्नाची सोडवणूक करणें शक्य नाहीं. सदसताच्या ज्ञानाचा वृक्ष गोड आणि कडू फळें देणारा आहे व अचेतनाच्या प्रकृतींत त्याचीं गुप्त मुळें आहेत. अचेतनांतून आमचें अस्तित्व निघालें आहे व अचेतनाच्या जमिनीवर तें अद्यापि उभें आहे. आमच्या शारीरिक अस्तित्वाचा पाया अद्यापि अचेतनच आहे. अचेतनांत मुळें असलेला हा सदसताचा ज्ञानवृक्ष, अज्ञानाच्या अनेक फांद्यांनीं विस्तारलेला आहे. अज्ञान हें अद्यापि आमच्या विकासी जाणिवेची मोठी उपाधि आहे, आमच्या जाणिवेचा मोठा भाग अद्यापि अज्ञानच आहे; सर्वश्रेष्ठ परिपूर्ण जाणीव हें आमचें अंतिम प्राप्तव्य आहे, या प्राप्तव्याच्या दिशेनें आमच्या जाणिवेचा विकास अनेक अडचणींना तोंड देत देत चालूं आहे; सदसताच्या वृक्षाला अज्ञानाची पोषक हवा जोंवर मिळत आहे,

पान क्र. ५८७

 

ज्या अचेतनाच्या जमिनीत या वृक्षाचीं मुळें आहेत ती जमीन जोंवर या वृक्षाच्या मुळांना जागा देत आहे, तोंवर हा वृक्ष वाढतच जाणार, आपलीं द्वन्द्वरूपीं फुलें देत राहणार व मिश्र स्वभावाचीं आपलीं फळें आमच्या ठिकाणीं सांठवीत राहणार. आम्ही अचेतनतेंतून पूर्ण जाणिवेपर्यंत जोवर पोंचलों नाहीं, अचेतनतेच्या जागीं विशाल जाणीव जोंपर्यंत आम्हीं कार्यान्वित केली नाहीं, आमच्या जीवनाचा पाया म्हणून आत्म्याचें सत्य जोंवर आम्हीं स्वीकारलें नाहीं व अज्ञानाचें रूपान्तर श्रेष्ठ ज्ञानांत जोंपर्यंत आम्ही करूं शकत नाहीं, तोंपर्यंत सदसताचा प्रश्न कायमचा निकालांत निघूं शकत नाहीं, ही गोष्ट या वृक्षाच्या (प्रश्नाच्या) वरील सत्यकथेवरून लक्षांत येईल. आमच्या स्वभावाचें मुळापासून पूर्ण रूपान्तर घडवून आणणें, हाच सदसताचा प्रश्न कायमचा निकालांत काढण्याचा एक मार्ग आहे. दुसरे सर्व उपाय तात्पुरत्या उपयोगाचे आणि अर्धवट ठरतात आणि ठरतील. आम्हांला आमच्या आत्म्याची आणि सभोंवारच्या वस्तूंची जी जाणीव व्हावयाची, तिच्या आड अचेतनत्व आपलें मूळ तमोमयत्व उभें करतें; अपूर्ण आणि विभक्त (विभागलेल्या) चेतनेवर आमची, आमच्या आत्म्यासंबंधाची आणि परिसरांतील वस्तूसंबंधाची जाणीव अज्ञान उभी करतें -- अशा या तमोमय आणि भेदमय क्षेत्रांत आम्ही वावरतो, आम्हांला वावरावें लागतें. अशा स्थितीत आमचे ज्ञान आणि आमची इच्छा प्रमादपूर्ण होतात; प्रमादी ज्ञानांतून चुका आणि असत्य गोष्टी यांचा प्रादुर्भाव होतो; आमच्या क्रियाशील अंगांत चुकांचा आणि मिथ्या गोष्टींचा सुकाळ झाला, कीं अन्यायी इच्छा आमच्या अवयवांमध्यें उद्‌भवते; आणि या अन्यायी इच्छेंतून अन्यायी कृति आणि अमंगलता, अनिष्टता जन्म घेते. अचेतनत्व आणि अज्ञान ही मूळ कारणें जोंवर टिकून आहेत, तोंवर त्यांचे परिणाम व त्या परिणामांची सांखळी, आमच्या कृतींत आणि आमच्या प्रकृतींत टिकून राहणार, हें उघड आहे मानसिक नियंत्रणेनें आम्ही परिस्थिति सांवरण्याचा प्रयत्न करतो; पण नियंत्रणा ही नियंत्रणा; ती कांहीं (अनिष्टाचा) रोग बरा करणारी उपाययोजना नव्हे. ती (अनिष्टाचा) रोग थोडाबहुत 'नियंत्रित' करूं शकेल, पण निकालांत काढूं शकणार नाहीं. मनानें एखादी शिकवण, एखादा नियम, एखादी कसोटी, किंवा आदर्श व्यवस्था आमच्या मार्गदर्शनासाठीं आमच्या समोर ठेवली, तर एक कृत्रिम चाकोरी आणि एक कृत्रिम चौकट आमच्या कृतीकरितां आणि प्रकृतीकरितां निर्माण केल्यासारखें

पान क्र. ५८८

 

होईल : आमची कृति या चाकोरींतून यांत्रिक तऱ्हेनें (सहज) किंवा अडखळत फिरत राहील; आणि आमची प्रकृति या संकुचित मर्यादित चौकटीच्या कोंडींत जी काय व जेवढी काय प्रगति करतां येईल ती करील. अनिष्ट पूर्णपणें दूर होण्यासाठीं, जाणीव पूर्णपणें बदलणें अवश्य आहे, प्रकृति मुळांतून बदलणें अवश्य आहे; दुसरा कांहींहि उपाय येथें लागूं पडणार नाहीं.

      अनिष्टाचा, अन्यायाचा अवघड प्रश्न आमच्या पुढें उभा राहण्याचें मूळ कारण, अस्तित्व मुळांत 'एकमेव' असून तें विश्वसंसारांत भंगलेलें आहे, त्याचे (जाणिवेच्या दृष्टीनें) अनंत मर्यादित, वेगळे वेगळे तुकडे पडलेले आहेत, हें आहे. तेव्हां जाणीव पूर्णपणें बदलणें अवश्य आहे, त्यावांचून अनिष्टाचा पूर्ण निरास होऊं शकणार नाहीं, असें जें आतांच म्हटलें, त्यांत जो 'बदल' सुचविला आहे तो कोणता, हें आतां सहज समजेल. तो बदल म्हणजे, अस्तित्वाबरोबर जाणीव जी भंगलेली आहे, (जाणीव भंगल्यानेंच अस्तित्व भंगलेलें दिसतें) ती पुन: अभंग व अखंड होणें हा आहे. आमच्या अस्तित्वाची अंगभूत जाणीव खंडित झालेली आहे, हा आमचा रोग आहे, हें आमचें दुखणें आहे; आणि त्यावर अखंड एकीभूत जाणीव हाच एक उपाय आहे. जाणिवेची विभागणी अनेकमुखी झालेली आहे, तेव्हां जाणिवेच्या एखाद्या विभागांत बदल करून भागावयाचें नाहीं; सर्व विभागांत बदल घडवून आणला पाहिजे. सर्वांगीण पूर्ण बदल, सर्वांगीण अखंडता हाच एक उपाय आहे. आमच्या खंडित जाणिवेचें पूर्ण रूपान्तर घडवून आणलें पाहिजे. असें केलें, तरच अनिष्टादि उद्भवण्याचें बंद पडेल. आमच्या अहम्‌नें केलेली पहिली विभागणी लक्षांत घेणें अवश्य आहे. आमचा प्राणिक अहम् सर्वांत अधिक जोरदारपणें, सर्वांत पुढें होऊन अस्तित्वाचे आणि जाणिवेचे, अगदीं स्पष्ट नजरेंत भरणारे तुकडे पाडणारा आहे : हा अहम् स्वतःला दुसऱ्या प्रत्येक जीवांपासून वेगळा मानतो; आत्मा (मी) आणि अनात्मा (मी सोडून इतर) अशी विभागणी करतो आणि आम्हांला आत्मकेन्द्रितपणाला (अहं केन्द्रितपणाला) बांधून ठेवतो, आमचा सर्व आत्मवादी व्यवहार हा अहंवादी, अहंनिष्ठ व अहंपूजक असला पाहिजे, असा कठोर कायदा, आमचा प्राणिक अहम् आमच्यावर बंधनकारक म्हणून लादतो. या असल्या अहंपूजक आत्मप्रकाशनांत ज्या चुका होतात, त्यांतून अन्याय, अनिष्ट आणि अमंगल यांचा प्रथम उद्भव होतो. आमच्या प्रत्येक अंगांत, विचारशील मनांत, भावनात्मक

पान क्र. ५८९

 

हृदयांत, प्राणप्रधान (वासनापूजक) मनांत, संवेदनात्मक अंगांत, शारीर जाणिवेंत देखील अहंपूजक प्रमादी जाणीव, प्रमादी इच्छा निर्माण करते; ही प्रमादी इच्छा, या सर्व अंगांकरवीं, प्रमादी कृति करविते -- त्यांजकरवीं अनेक प्रमाद घडविते. विचार, संकल्प, संवेदना व भावना या सर्व व्यवहारांत वक्रता, वक्रतेचे अनेक प्रकार, ही प्रमादी इच्छा घडवून आणते; आणि जोपर्यंत दुसरे जीव आम्हांला 'दुसरे' वाटत आहेत, परके वाटत आहेत, तोंपर्यंत हें असेंच चालावयाचें, तोंपर्यंत त्यांच्याशीं आमचा व्यवहार न्यायाचा होऊं शकणार नाहीं. या दुसऱ्या जीवांची आंतरिक जाणीव, त्यांच्या आत्म्याची गरज, त्यांच्या मनाची, हृदयाची गरज, त्यांच्या जीवनाची (प्राणाची) गरज, शरीराची गरज ही आम्हांला पूर्णपणें किंवा बहुतांशीं जोंपर्यंत अज्ञात आहे, तोंपर्यंत आमचें त्यांच्यासंबंधीचें वर्तन न्याय्य आणि योग्य होऊं शकणार नाहीं. दुसऱ्यांच्या संबंधांत आम्हांकडून खरी कृति, खरी वागणूक व्हावी, यासाठीं ज्या जाणिवेची आमचे ठिकाणीं आवश्यकता आहे, तिचा फार थोडा अंश वस्तुतः आमचे ठिकाणीं आज आहे, इतरांसंबंधीं थोडीशी सहानुभूति, थोडेसें ज्ञान, थोडीशी सदिच्छा आमचे ठिकाणीं आज आहे. कायदा, आमची गरज आणि सहकार्याची, सहचाराची संवय यांच्या परिणामीं आमच्यांत इतरांसंबंधानें थोडीशी सहानुभूति, ज्ञान, सदिच्छा उत्पन्न झाली आहे; पण एवढ्या थोड्याशा पुंजीवर आमच्याकडून त्यांच्यासंबंधांत खरी योग्य कृति, वागणूक होऊं शकणार नाहीं. आज आहे त्यापेक्षां मोठें मन, मोठें हृदय मोठी आणि उदार प्राणशक्ति आमचे ठिकाणीं आणतां येईल, तर आम्हांला व दुसऱ्यांना या गोष्टींचा कांहीं अधिक उपयोग होईल; आमच्याकडून अगदीं भयंकर अपराध घडण्याचें या गोष्टींमुळें टळेल; पण आमच्या ध्येयाच्या दृष्टीनें हें कांहीं पुरेंसें होणार नाहीं; आम्ही जें इष्ट म्हणून पसंत करूं तें इष्ट, आणि इतरांना जें पसंत असेल तें इष्ट, यांचा संघर्ष तरीहि होत राहीलच; आपत्तींचा आणि अनिष्टांचा डोंगर फारसा कमी होणार नाहीं. आमच्या अहम्‌चा आणि अज्ञानाचा स्वभावच असा आहे कीं, मोठ्या दिमाखानें, अभिमानानें स्वार्थत्यागाच्या आचार-विचारांत आम्ही असतो, तेव्हांहि स्वार्थीपणानेंच वागत असतो. आमच्या ज्ञानाचा आणि शहाणपणाचा आम्ही गर्व वाहत असतो, तेव्हांहि अज्ञानाच्या अंधारांतच वागत असतो. परोपकार हा जीवनाचा नियम म्हणून स्वीकारला, तरी आमच्या अडचणींतून तो आमची सुटका करीत नाहीं.

पान क्र. ५९०

 

अहम् अगदींच जो क्षुद्रपणा करीत असतो, तो तेवढा परोपकाराच्या व्रतानें दूर होतो. या व्रतानें आत्म्याची व्यापकता वाढते, पण अहम् कांहीं या व्रतानें नष्ट होत नाहीं; किंवा त्याच्यांत परिवर्तन होऊन तो सर्वांशीं ऐक्य असणारा खरा आत्मा कांहीं या व्रतानें बनत नाहीं. परोपकारी माणसाचा अहम् हा स्वार्थी माणसाच्या अहम्इतकाच शक्तिमान् आणि आग्रही असतो. कित्येक ठिकाणीं तर तो स्वार्थी माणसाहून अधिक शक्तिमान् आणि अधिक आग्रही असतो -- कारण तो स्वत:ला सद्‌गुणसंपन्न आणि महामना समजत असतो. आपला आत्मा दुसऱ्यांचा अंकित करावयाचा या उदात्त हेतूनें आम्ही आमच्या आत्म्यावर, मनावर, प्राणावर व शरीरावर अन्याय करूं लागलों, तर परोपकाराच्या व्रतानें जें आध्यात्मिक नुकसान होण्याचा संभव असतो, त्याहून अधिक नुकसान स्वतःवर केलेल्या या अन्यायानें होतें. आपण सर्वांशीं एकरूप होऊं, अशा भावनेनें आपल्या अस्तित्वाचें, आपल्या जीवनाचें आविष्करण आपण व्यवहारांत योग्य रीतीनें करावें, हा खरा मार्ग आहे, हें खरें आचरणाचें तत्त्व आहे. स्वत:ला विकलांग करणें किंवा स्वतःचा होम करणें हें कांहीं आचरणाचें खरें तत्त्व नव्हे. केव्हां केव्हां आत्महोमाची आवश्यकता असेल, अपवाद म्हणून एकाद्या ध्येयाकरितां आत्महोम योग्य आणि अवश्य असेल; हृदयाची तशीच आर्त हांक आली असेल, एखादें न्यायाचें कार्य, एखादें उदात्त साध्य आत्महोमाची मागणी करीत असेल, तर आत्महोम न्याय्य होईल -- पण आत्महोम हा जीवनाचा वा प्रकृतीचा सामान्य नियम होऊं शकत नाहीं; आत्महोम हा सामान्य नियम केला, तर तो एक अतिरेक होईल आणि त्याचा परिणाम दुसऱ्यांचा अहम् फुगवण्यांत किंवा एखादा सामाजिक अहम् फुगविण्यांत होईल -- पण याप्रमाणें दुसऱ्यांच्या अहम्‌ला फाजील व अतिरेकी मोठेंपण दिल्यानें वा एखाद्या सामाजिक अहम्‌ला अतिरेकी मोठेंपण दिल्यानें, आमचें खरें ध्येय सिद्ध होणार नाहीं. आमचें खरें अस्तित्व शोधून काढून त्याचा व्यवहारांत आविष्कार करणें हें ध्येय, आत्महोम 'सामान्य' केल्यानें कांहीं साधणार नाहीं. मानवजातीनें आपलें खरें अस्तित्व शोधून काढून त्याचा आविष्कार जीवनांत करावा ही गोष्ट कांहीं आत्महोम 'सामान्य' करून, एखादा सामाजिक अहम् फुगविल्यानें साधणार नाहीं. त्याग, आत्मदान हें तत्त्व खरें आहे; आत्म्याला या गोष्टींची आवश्यकता असते, आमच्या अस्तित्वाचा, आत्म्याचा योग्य आविष्कार त्यागाशिवाय, आत्मदानाशिवाय होऊं शकत नाहीं; आमच्या

पान क्र. ५९१

 

अहम्‌हून मोठी वस्तु पाहून तिच्यासाठीं त्याग, आत्मदान करणें हें अगदीं योग्य आहे; पण हा त्याग, हें आत्मदान खऱ्या ज्ञानावर आधारलेल्या योग्य संकल्पानें योग्य जाणिवेनें घडलें पाहिजे, तरच त्याचा उपयोग. मनाच्या चौकटीच्या संकुचित मर्यादेंत असतांना आमच्या प्रकृतीचें सात्विक अंग विकसित करणें एवढेंच आम्ही जास्तींत जास्त करूं शकतो. सत्वगुण संवर्धित करणें म्हणजे ज्ञान वाढविणें; ग्रहणशक्ति, समतोल, सुसंवादित्व, सहानुभूति, सदिच्छा, दया, बंधुभाव, आत्मनिग्रह हे मनाचे गुण वाढविणें; न्यायशुद्ध, सुव्यवस्थित, सुसंवादपूर्ण क्रिया करण्याची वृत्ति वाढविणें असा अर्थ आहे. आमच्या अज्ञानाची कोंडी फोडून जीवन शक्य तेवढें मंगलमय करण्यासाठीं ही सत्वसंवर्धनाची खटपट मनापासून करणें एवढेंच आम्ही जास्तींत जास्त करूं शकतो; पण हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, सात्विक प्रकृतीचा विकास हीहि एक पायरीच आहे. हा विकास म्हणजे आमचें कांहीं अंतिम विरामस्थान नव्हे; आमच्या अस्तित्वाच्या, जीवनाच्या विकासाचें अंतिम ध्येय सत्वविकासाच्या पलीकडे आहे. मन आहे यापेक्षां मोठें करणें, परोपकार, त्याग, सत्वविकास इत्यादि उपाय आमच्या उद्धाराला थोडीबहुत मदत करतात; पण आमच्या इतरविषयक वृत्तीचा आणि कृतीचा प्रश्न पूर्णपणें सुटावयास या उपायांचें साह्य होत नाहीं. आमच्या अवघड प्रश्नाची पूर्ण सोडवणूक हे करूं शकत नाहींत; तरीपण आमच्या ध्येयाकडे आम्ही वाटचाल करीत असतां, या उपायांचा आम्हांला उपयोग होतो; प्रश्न कमी बिकट करण्याला यांची मदत होते; प्रश्न अंशत: हाताळण्यास हे उपाय अगदीं अवश्य असेच आहेत. आमच्या पात्रतेच्या सध्यांच्या स्थितींत, आम्हांला मार्गदर्शन आणि मदत म्हणून हे तात्पुरते उपाय आणि निकष फार उपयोगी पडतात. आमच्या प्रश्नाचें खरें उत्तर तेव्हांच आम्हांला सांपडेल, जेव्हां तें दृष्टीस पडण्याइतका आमचा विकास होईल. सारखें त्याच्याच मागें लावून, तें हस्तगत करावयाचेंच, असा आमचा दृढ निश्चय होण्याइतका आमचा विकास झाला, म्हणजे तें उत्तर आम्हांला दिसेल; आणि मग आमच्या प्रश्नाची पूर्ण सोडवणूक आम्हांला करतां येईल. अर्थात् यासाठीं दिसलेल्या मार्गानें जावयाचेंच, असा दृढनिश्चय करून त्याप्रमाणें वाटचाल करीत राहणें, हें आमचें मुख्य कर्तव्य समजून आम्हांला धडपड करावी लागेलच.

       आमची आध्यात्मिक वाढ क्रमश: होत होत, जेव्हां आम्ही व्यक्तिश: सर्व जीवांशीं आत्मदृष्टीनें मिळून जाऊं, सर्व जीव आमच्या आत्म्याच्या

पान क्र. ५९२

 

पोटांत आहेत, आमच्या आत्म्याचा भाग आहेत असें ज्ञान जेव्हां आम्हांला व्यक्तिश: होईल, स्वत:शीं आम्ही वागतो तसें, सर्व जीवांना ''स्व'' (स्वकीय नव्हे) जाणून, आम्ही त्यांच्याशीं व्यक्तिश: वागूं लागूं, तेव्हां आमच्या प्रश्नाची खरी पूर्ण सोडवणूक होईल. कारण एकमेव असलेल्या अशा अस्तित्वाची, जाणिवेची विभागणी हें जें आमचें दुखणें असतें, तें अस्तित्वाच्या, आत्म्याच्या ऐक्यानें नाहीसें झाल्यावर आमच्या प्रश्नाचा कठीणपणा आपोआप संपतो. मी स्वतंत्र, इतरांहून वेगळा आत्मा आहे, ही जाणीव असली म्हणजे माझा आत्माविष्कार व आत्मव्यवहार वेगळेपणाचा व्हावयाचा, हा वर्तनाचा कायदा मला शिरोधार्य असतो, आणि हा वेगळेपणाचा माझा व्यवहार स्वभावत:च इतरांच्या हिताचा घात करणारा होऊं शकतो. आत्म्यांची विभक्तता संपून अविभक्तता, एकता स्थापन झाल्यावर, वरील विभक्त वर्तनाचा कायदा आपला संकुचितपणा टाकून देतो -- त्याला दुसऱ्या कायद्याची जोड मिळते. हा कायदा म्हणजे, जसा मी स्वत:करितां आत्मव्यवहार करीत होतों, तसाच आत्मव्यवहार आतां दुसऱ्यांकरितां करावयाचा हा होय. दुसऱ्यांना आत्मलाभ होणें, आत्मसाक्षात्कार होणें म्हणजे मलाच आत्मलाभ होणें आहे, असा या दुसऱ्या नव्या जोड-कायद्याचा अर्थ असतो. धार्मिक नीतिशास्त्रांत असे वर्तननियम दिले आहेत कीं, सार्वत्रिक करुणा आमच्या वर्तनाचें अधिष्ठान असावें. स्वतांवर आम्ही प्रेम करतो तसें आम्हीं शेजाऱ्यांवर प्रेम करावें; दुसऱ्यांनीं आमच्याशीं ज्या प्रकारची वागणूक ठेवावी असें आम्हांला वाटतें, त्या प्रकारची वागणूक आम्हीं दुसऱ्यांशीं ठेवीत जावी व दुसऱ्यांचें सुखदु:ख तेंच आमचें सुखदु:ख, अशी जाणीव व भावना आमचे ठिकाणीं असावी. अहम्‌केन्द्रांत राहून जीवन जगणारा कोणीहि मनुष्य या गोष्टी यथार्थतेनें, पूर्णपणें करूं शकत नाहीं. प्रामाणिक प्रयत्न करून माझी अहंकारी अशोधित प्रकृति थोडी तरी मीं सुसंस्कृत करावी, आणि हें साधण्यासाठीं उच्च आदर्श समोर ठेवून मीं जीवन जगावें, अशी माझ्या बुद्धीची मागणी आहे, माझ्या हृदयाची आकांक्षा आहे, माझ्या इच्छाशक्तीची धडपड आहे; आणि ही मागणी, आकांक्षा, धडपड धार्मिक नीतिशास्त्रानें दिलेल्या वर्तननियमांत व्यक्त झाली आहे, म्हणून ते वर्तननियम मी मान्य करतो; एवढेंच अहम्‌केन्द्रित मनुष्य म्हणूं शकतो आणि त्या नियमांनुसार वागण्याचा प्रयत्न करूं शकतो, यापलीकडे त्याच्या हांतून अधिक कांहीं होऊं शकत नाहीं,

पान क्र. ५९३

 

हे नियम तो कांहीं यथार्थतेनें पूर्णपणें पाळूं शकत नाहीं. हें पूर्णतेचें ध्येय माझ्या जीवनाचा स्वाभाविक स्वयंस्फूर्त नियम होऊन, तत्त्व म्हणून तेव्हांच व्यवहार-निविष्ट होऊं शकतें, जेव्हां इतर मीच आहे अशी स्पष्ट जाणीव मला होते आणि तशी जिव्हाळ्याची सखोल संवेदना माझ्या ठिकाणीं स्फुरते. हेंहि लक्षांत घ्यावयास हवें कीं, केवळ दुसऱ्यांशीं एकता अनुभवणें ही गोष्ट स्वतः कांहीं, आमचें ध्येय आम्हांला मिळवून देऊं शकणार नाहीं. कारण दुसऱ्यांच्या अज्ञानाशीं पण एकता होऊं शकते. अशी एकता झाली, तर अज्ञानाचा कायदा आपला अंमल गाजवील आणि प्रमादयुक्त कृति आणि अन्यायाची कृति आमच्या हांतून घडत राहील; प्रमादाचें मान, अन्यायाचें प्रमाण कमी होईल, त्याचें स्वरूप सौम्य राहील, परिणाम सौम्य घडेल, पण त्याचा पूर्ण निरास आमच्या व्यवहारांतून होणार नाहीं. दुसऱ्यांशीं आमची जी एकता व्हाव्याची ती मौलिक झाली पाहिजे. त्यांच्या आत्म्याशीं, दिव्य चैतन्याशीं, आमच्या आत्म्याची, आमच्या दिव्य चैतन्याची एकता झाली पाहिजे. त्यांच्या मनाशीं, हृदयाशीं, प्राणमय पुरुषाशीं, अहम्‌तत्त्वाशीं एकता झाल्यानें आम्हांला पूर्णता येत नाहीं. आमची जाणीव विश्वमय झाली म्हणजे सर्वांचीं मनें वगैरे त्या जाणिवेंत समाविष्ट होऊन राहतात. तरीपण या समावेशानेंहि, या एकतेनेंहि आमचें काम पुरें होत नाहीं. आत्म्याची आत्म्यांशीं, परम पुरुषाची परम पुरुषांशीं एकता झाली पाहिजे; आणि ही एकता तेव्हांच होऊं शकते, जेव्हां आम्ही अपरा प्रकृतींतून (मनांतून वगैरे) वर चढून, मोकळे होऊन आत्मज्ञानी, परमात्मज्ञानी होतो. अहम्‌च्या बंधनांतून सुटणें, आमचा खरा आत्मा अनुभवणें ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. ही गोष्ट सिद्ध झाली, म्हणजे तिचा अपरिहार्य परिणाम म्हणून, तिचें तेजोमय फळ म्हणून बाकी सर्व सिद्ध करतां येतें. याकरितां अध्यात्माची मागणी, (आत्म्याची हांक) आमच्या अंतरांतून आली कीं तिला प्रथम शिरोधार्य मानलें पाहिजे. अज्ञानाच्या क्षेत्रांतील मागण्या बाजूस सारून आत्म्याच्या, अध्यात्माच्या मागणीप्रमाणें आम्हीं वाटचाल करूं लागलें पाहिजे; बुद्धीची मागणी, नीतीची मागणी, समाजाची मागणी -- या सर्व मागण्या अज्ञानाच्या क्षेत्रांतल्या आहेत. अज्ञानाच्या क्षेत्रांत सद्विषयक, हितविषयक जो कायदा चालतो तो मनाचा कायदा असतो. हा कायदा असत्, अहित थोडेंबहुत हरवूं शकतो, सौम्य करूं शकतो; पण त्याचा समूळ नाश, निकाल करूं शकत नाहीं. आध्यात्मिक परिवर्तन मात्र खरें पूर्ण हित वस्तुसृष्टींत आणूं

पान क्र. ५९४

 

शकतें; कारण आत्म्याच्या द्वारां, क्रिया आणि अस्तित्व यांच्या मुळाला आम्ही हात घालूं शकतो. आध्यात्मिक परिवर्तनानें घडणारें कार्य, दुसरी कोणतीहि योजना घडवून आणूं शकत नाहीं, तें कार्य घडवून आणण्यास ती अपुरी पडते.

      आत्मविषयक आध्यात्मिक ज्ञान तीन पायऱ्यांनीं आत्मसात् करावयाचें असतें -- या तीन पायऱ्या एकाच ज्ञानाचे तीन घटक, तीन विभाग असतात. पहिली पायरी, विचार-भावना-वासनात्मक बाह्य (पृष्ठवर्ती) 'आत्मा' ज्या आमच्या खऱ्या आंतरात्म्याचा प्रतिनिधि असतो, तो गुप्त अंत:पुरुष, तो आमच्यांतील ईश्वरी अंश शोधून काढणें ही आहे. आमच्या प्रकृतीवर या आमच्या आंतरात्म्याची सत्ता चालूं लागली, आम्ही वस्तुत: हा अंतरात्मा आहों, आणि आमचें मन, प्राण, शरीर ही त्रयी (प्रकृति) आमचीं, या आंतरात्म्याचीं यंत्रें आहेत, व्यवहाराचीं साधनें आहेत ही स्पष्ट जाणीव आम्हांला झाली, म्हणजे आम्हांला (आमच्या प्रकृतीला) योग्य मार्गदर्शक लाभला आहे, हें आम्हांला कळतें. सत्य काय, श्रेय (हित, मंगल...) काय, अस्तित्वांतील सौंदर्य व आनंद कशांत आहे याचें उत्तम ज्ञान या मार्गदर्शकाला असतें; हा मार्गदर्शक आपल्या प्रकाशमय कायद्यानें आमच्या हृदयावर आणि बुद्धीवर नियंत्रणा ठेवून, आध्यात्मिक पूर्णतेच्या दिशेनें आमचें अस्तित्व आणि जीवन, स्वत: त्यांचें नेतृत्व घेऊन चालवीत असतो. आम्ही अज्ञानाच्या क्षेत्रांत असल्यानें, अज्ञानाच्या तमोमय व्यवहारांचा आमचा संबंध तुटत नाहीं. पण आंतरात्म्याचें मार्गदर्शकत्व लाभल्यानें अज्ञानाच्या क्षेत्रांतहि आमची वाटचाल व्यवस्थित होत राहते. कारण आंतरात्मा हा आमच्या प्रकृतीच्या सर्व व्यवहारांचा साक्षी असतो, निरीक्षक असतो; आणि आमचा वाटाड्या पण असतो. अर्थात् त्याचें शासन आम्हांला (आमच्या प्रकृतीला) लाभल्यानें आमची व्यवस्था अशी असते : आमच्या अंतरंगांत जिवंत प्रकाश, जिवंत विवेक हा, सर्व व्यवहार प्रकाशपूर्ण व विवेकपूर्ण करीत असतो. आमची संकल्पशक्ति, इच्छाशक्ति विवेकाच्या प्रकाशांत काम करीत असल्यानें, गैर मार्गानें जाण्यास स्पष्ट नकार देते; मनानें मांडलेल्या विचारांत सत्य आणि प्रमाद यांची जी भेसळ असते, त्या भेसळींतून ती सत्य निवडून घेते आणि प्रमाद बाजूला काढते. हृदयाचीं स्पंदनें ती तपासते आणि त्यांतील खरीं जिव्हाळ्याचीं, श्रेयसाधक स्पंदनें ती ग्राह्य म्हणून एका बाजूला काढते आणि दुसरीं अनुचित व अन्याय्य मागणीचा

पान क्र. ५९५

 

पुरस्कार करणारीं त्याज्य स्पंदनें ती दुसऱ्या बाजूला काढते. आमच्या प्राणमय प्रकृतींत स्वार्थाचीं कृष्णकारस्थानें चालतात, घाणीनें बरबटलेलीं असत्यें वावरतात, विकृत वासनांचा धिंगाणा चाललेला असतो, आणि त्याबरोबर जीवनाचीं खरी श्रेयसाधक, उत्साहपूर्ण, विशाल, महान् आंदोलनेंहि चालूं असतात -- आमची विवेकी संकल्पशक्ति हीं आंदोलनें पुरस्कारार्ह म्हणून एका बाजूला काढते आणि दुसऱ्या गोष्टी तिरस्कारार्ह म्हणून दुसऱ्या बाजूला टाकून देते. आत्मविषयक आध्यात्मिक ज्ञानाची, आत्मानुभूतीची ही पहिली पायरी : अहम्‌चें साम्राज्य काढून घेऊन, त्याचे जागीं अंतरात्म्याला, आमच्यांतील ईश्वरी अंशरूप अंत:पुरूषाला सिंहासनारूढ करणें ही आत्मसाक्षात्काराच्या मार्गांतील पहिली पायरी. दुसरी पायरी, सर्व जीवांच्या आत्म्यांशीं एकरूप असलेला आमच्यांतील स्वयंभू शाश्वत आत्मा ओळखणें आणि त्याच्याशीं एकरूप होणें : आत्मविषयक ही दुसरी अनुभूति मनुष्याला व्यक्तित्वांतून मुक्त करते, त्याला विश्वमय करते, विश्वरूप करते. या अनुभवानंतरहि, आमची कृति जरी अज्ञानाच्या रूढ व्यवहारपद्धतीनें कांहीं काल होत राहिली, तरी ती आम्हांला बंधक होत नाहीं. स्वतःच्या योग्यायोग्यतेसंबंधानें ती आमच्यांत भ्रम निर्माण करूं शकत नाहीं. कारण आत्मज्ञानाच्या प्रकाशांत आमच्या आंतर-अस्तित्वानें आसन ठोकलेलें असतें आणि तें अस्तित्व (त्याची जाणीव) आत्मज्ञानाच्या प्रकाशांत अज्ञानाचा व्यवहार, 'अज्ञानाचा' म्हणून निःसंदिग्धपणें ओळखते, अर्थात् त्यानें तें फसलें जात नाहीं. आत्मविषयक आध्यात्मिक ज्ञानाची तिसरी पायरी आतां पहावयाची : आमच्यांतील ईश्वरी अंशाचें (जीवात्म्याचें, आंतरात्म्याचें) दर्शन आम्हीं घेतलें, आमच्यांतील स्वयंभू विश्वरूप ईश्वराचें, शाश्वत विश्वात्म्याचें दर्शन आम्हीं घेतलें; यानंतर मुख्य ईश्वराचें दर्शन घेणें ही तिसरी पायरी आहे : हा मुख्य ईश्वर एकाच वेळी आमचा परात्पर सर्वातीत आत्मा किंवा पुरुषोत्तम, विश्वपुरुष (आमच्या विश्वमयतेचा आधार) आणि आमचा अंतर्यामी ईश्वर असतो. या अंतर्यामीचा (अर्थात् परंपरेनें पुरुषोत्तमाचा आणि विश्वात्म्याचा) अंश आमचा आंतरात्मा, जीवात्मा असतो; आमच्या प्रकृतींत खरा विकासशील व्यक्तिपुरुष हा जीवात्मा असतो. ईश्वर हा शाश्वत अग्नि आणि जीवात्मा हा त्याचा स्फुलिंग म्हणतां येईल. हा स्फुलिंग वाढत वाढत अग्नि व्हावयाचा असतो. ईश्वराचा ज्ञानप्रकाश, सामर्थ्य, आनंद आणि सौंदर्य यांचा, जाणिवेनें युक्त असा वाहक आमचा आंतरात्मा (जीवात्मा) असतो.

पान क्र. ५९६

 

आमच्या बाह्य ''आत्म्याला'' ईश्वराचें अस्तित्व पटवून देण्यास समर्थ असा हा आमच्या अंतरांत नित्य राहून ईश्वराचें दर्शन घेणारा आणि त्याचें ज्ञान, सामर्थ्य, आनंद व सौंदर्य स्वतःच्या व विश्वाच्या विकासार्थ वाहून आणणारा असा आमचा आंतरात्मा आहे. आत्मविषयक आध्यात्मिक ज्ञानाची तिसरी पायरी आम्ही चढून गेलो आणि आमचें आत्मज्ञान याप्रमाणें आम्ही पूर्ण केलें, म्हणजे आमच्या हांतून घडणाऱ्या कृतीला पूर्णत्व येतें. आमच्या अस्तित्वाचा आणि कृतीचा स्वामी जो ईश्वर आहे त्याची आमची ओळख झाली, म्हणजे त्याच्या शक्तीच्या प्रवाहाचीं पात्रें आम्ही हळूंहळूं होऊं शकतों. ती ज्या आज्ञा करील, ती आमच्या अंतरांत जो तिचा सामर्थ्यसंपन्न ज्ञाननिर्मित वर्तननियम आमच्यापुढें ठेवील त्या नियमानुसार, त्या आज्ञांनुसार आम्ही हळूंहळूं वागू शकतो. आमच्या ईश्वराची आमची ओळख झाल्यानंतर आमच्या कृतीवर, प्राणमयाच्या स्वार्थी प्रेरणेचें किंवा मनोमयाच्या एखाद्या कठोर आदर्शाचें प्रभुत्व चालणार नाही. कारण ईश्वराची आत्मशक्ति ही शाश्वत मार्दवयुक्त (लवचिक) वस्तुसत्याला अनुरूप अशी क्रिया करीत असते. जें वस्तुसत्य म्हणून मन निर्माण करतें, तें शाश्वत वस्तुसत्याहून भिन्न असूं शकतें आणि बहुधा असतें. म्हणून ईश्वरी शक्ति या मनोनिर्मित सत्यानुसार वागत नाही. मनोनिर्मित सत्यापलीकडे उच्चतर, गाढतर, सूक्ष्मतर सत्य -- प्रत्येक हालचालीसंबंधाचें, प्रत्येक परिस्थितिसंबंधाचें उच्चतर, गाढतर, सूक्ष्मतर सत्य -- विश्वांतील सर्वश्रेष्ठ ज्ञानाला ज्ञात असणारें, विश्वांतील सर्वश्रेष्ठ इच्छेला इष्ट असणारें असें सत्य असतें; त्या सत्यानुसार ईश्वराची शक्ति क्रिया करीत असते. ज्ञान हें आत्मशुद्धि करणारें आहे. सत्य हें प्रकृतीच्या बंधांतून आत्म्याला मुक्त करणारें आहे. ज्ञानानें आत्म्याला मुक्ति लाभली, म्हणजे मग या मुक्तीचा व्यवहारी परिणाम म्हणून आत्म्याची क्रियाशक्ति, इच्छाशक्ति प्रकृतीच्या बंधांतून मुक्त होते. विश्वाच्या संसारांत अमंगल, असत्, पाप, दुष्टपणा -- जें दिसत आहे तें आत्मविषयक अज्ञानाचें फळ आहे. तें नष्ट व्हावयाचें, तर आमची जाणीव विकास पावून, आध्यात्मिक व अध्यात्मसंपन्न व्हावयास पाहिजे. आमच्या अंतरांत अध्यात्मज्ञानाचा प्रकाश भरला पाहिजे. दुसऱ्या कोणत्याहि मार्गानें तें नष्ट होणें शक्य नाही. दुसऱ्यांच्या अस्तित्वापासून आमच्या अस्तित्वाची विभागणी झाली आहे; ती विभागणी नष्ट व्हावयाची, तर आमच्या प्रकृतीची आंतरिक आत्मसत्याशीं जी फारकत

पान क्र. ५९७

 

झालेली आहे ती फारकत संपविली पाहिजे; आमचें आत्मसत्तेचें सत्य आणि या सत्तेनें (अस्तित्वानें) आमच्या ठिकाणीं जें विविध रूप धारण केलें आहे व करीत आहे तें रूप, या दोहोमध्यें, आमची मूळ सत्ता  (अस्तित्व) आणि आमची रूपात्मक सत्ता (अस्तित्व) यांजमध्यें, जो पडदा आहे तो पडदा दूर केला गेला पाहिजे. प्रकृतीच्या पोटांत आमचें जें व्यक्तिरूप आहे तें, प्रकृतीच्या पोटांत आणि प्रकृतीच्या वरतीं असलेल्या सर्वव्यापी सत्यापासून, ईश्वरापासून दुरावलेलें आहे; ईश्वराला आणि आमच्या व्यक्तिरूपाला जोडणारा सेतु (पूल) आम्ही निर्माण करावयास हवा हें केल्याशिवाय दुसऱ्यांच्या अस्तित्वापासून आमच्या अस्तित्वाची जी विभागणी झालेली आहे ती नष्ट होणार नाहीं. ही विभागणी सर्व अनर्थाचें मूळ आहे हें आपण पाहिलेंच आहे.

      आमची प्रकृति (अपरा प्रकृति) आणि ईश्वराची आत्मशक्ति (परा- प्रकृति) यांची फाळणी दूर होणेंहि अगत्याचें असतें; पण हें कार्य इतर तत्सम कार्यांच्या नंतर, शेवटीं होतें. ज्ञान-अज्ञानमय अपरा प्रकृति काम करीत असतांनाहि, आत्म्याचें अपूर्ण व्यवहारसाधन म्हणून ही अपरा प्रकृति वापरली जात असतांहि, आमच्या द्वारां ईश्वराची ही पराप्रकृति काम करूं शकते; आणि अमुक गोष्ट परा-प्रकृति करीत आहे असें ज्ञानहि आपल्याला होऊं शकतें. पण तिचा प्रकाश, तिचे सामर्थ्य आपली मूळ तेजस्विता बाजूला ठेवून, अशा वेळीं कमीअधिक सौम्य स्वरूप धारण करतें; अशाकरितां कीं, अपरा प्रकृतींतील मन, प्राण, शरीर यांना तें सामर्थ्य आणि तो प्रकाश आपल्या अंगीं सामावून घेऊन पचवितां यावा; त्यांचा योग्य आणि शक्य तेवढा उपयोग करतां यावा. पण अपरा प्रकृतीच्या मन, प्राण, शरीरांत परा प्रकृतीनें सौम्य स्वरूप धारण करून काम केल्यानें आमची इष्टसिद्धि होऊं शकत नाहीं. आम्ही ज्या स्वरूपाचे व ज्या स्वभावाचे आज आहोंत, त्या स्वरूपाची व त्या स्वभावाची समूळ पुनर्रचना व्हावयास हवी; ईश्वरी परा प्रकृतीचें सामर्थ्य व तिचा व्यवहारमार्ग पूर्णपणें आमचा व्हावयास हवा. आमचें भंग पावलेलें अस्तित्व पूर्णतया अभंग, अखंड व एकरस होण्यासाठीं आमचा व्यवहारहि पूर्णपणें, वेगळ्या स्वरूपाचा (पराप्रकृतिघटित) झाला पाहिजे; आमच्या अस्तित्वाचे आणि जीवनाचे आंतर-मार्ग थोडेसे प्रकाशपूरित होऊन भागणार नाहीं; थोडेसे परिवर्तित होऊन भागणार नाहीं. आमची सर्व प्रकृति, आमच्या प्रकृतीचे सर्व पैलू बदलून उच्च पातळीवर

पान क्र. ५९८

 

नेले गेले पाहिजेत. शाश्वत सत्य-जाणिवेनें आमचा ताबा घेतला पाहिजे. आमच्या प्रकृतीचे सर्व पैलू उन्नत, उदात्त केले पाहिजेत. सत्य-जाणिवेच्या अस्तित्वाला, ज्ञानाला व कृतीला जें रूप आहे, तें रूप आमच्या प्रकृतीच्या पैलूंना आलें पाहिजे. असें झालें म्हणजे आमच्या प्रकृतीला पूर्णत्व येईल. पूर्ण प्रकृतीचा पूर्ण धर्म आमच्या ठिकाणीं प्रकट होईल. अर्थात् स्वयंस्फूर्त सत्य-ज्ञान, सत्य-संकल्प, सत्य-भावना, सत्य-प्रवृत्ति, सत्य-व्यवहार या गोष्टी आम्हांला स्वाभाविक होतील, आणि अस्तित्वाच्या फाळणीवर, विभागणीवर आधारलेली अनर्थांची कथा, तिचा आधार सर्वस्वी तुटल्यामुळें संपूर्णपणें समाप्त होईल.

पान क्र. ५९९

***

 

 









Let us co-create the website.

Share your feedback. Help us improve. Or ask a question.

Image Description
Connect for updates