Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण १० वें
अभेद-अधिष्ठित ज्ञान आणि भेद-अधिष्ठित ज्ञान
ते आत्म्याचे (स्वत:चे) ठिकाणीं आत्मा (स्वतःला) आत्म्यानें (स्वत:) पाहतात.
- गीता ६.२०
जेथें द्वैत असेल तेथें एक दुसऱ्याला पाहतो, त्याचें ऐकतो, त्याला स्पर्श करतो, त्याचा विचार करतो, त्याचें ज्ञान मिळवितो. पण जेथें सर्व मीच (आत्माच) आहे असें पाहणारा पाहतो, तेथें याहून वेगळें सर्वाचें ज्ञान कसलें मिळवावयाचें आणि तें कोणत्या साधनानें मिळवावयाचें ? आत्म्याच्या स्वतःच्या प्रकाशानेंच, हें जें सर्व, त्याचें ज्ञान आत्म्याला (स्वतःला) होतें.
- बृहदारण्यक ४.५.१५
आत्म्याचे (स्वतःचे) ठिकाणीं हें 'सर्व' न पाहतां तें इतरत्र आहे असें जो पाहतो, त्याचा 'सर्व' त्याग करतें. कारण हें जे 'सर्व' आहे तें ब्रह्म (आत्मा) आहे. सर्व भूतें आणि हें 'सर्व' जें कांहीं आहे तें आत्माच आहे.
- बृहादारण्यक ४.५.७
स्वयंभू परमात्म्यानें देहाला इंद्रियांचीं द्वारें, बाहेर पाहणारीं अशीं, पाडलीं; म्हणून कोणीहि पाहणारा, बाहेर पाहतो, बाहेरच्या गोष्टी पाहतो; स्वतःच्या अंतरांत पहात नाहीं; अमृतत्व इच्छिणारा कोणी विरळा बुद्धिमान ज्ञानी आपली दृष्टि आंत वळवितो; त्याला आत्मा (परमात्मा) प्रत्यक्ष दिसतो.
- कठ. उप. ४.१
पान क्र. ४०३
पाहणाऱ्याच्या दृष्टीचा लोप होत नाहीं, बोलणाऱ्याच्या बोलण्याचा.... ऐकणाऱ्याच्या ऐकण्याचा... जाणणाऱ्याच्या जाणण्याचा... लोप होत नाहीं, कारण पाहणें, बोलणें, ऐकणें, जाणणें या शक्ती अविनाशी आहेत; पण स्वतःहून वेगळा दुसरा कोणी, दुसरें कांहीं तेथें अस्तित्वांत नसतें. तेथें कोणी जे (ज्याला) पाहणार ज्याशीं बोलणार, ज्याचें ऐकणार, ज्याला (जें) जाणणार, तें (तो) सर्व तोच स्वत: असतो, स्वतःहून वेगळें तेथें कांहीं नसतें, स्वतःहून वेगळें तेथें कोणी नसतें.
-- बृहादारण्यक उप० ४.३.२३ ते ३०
आमची पृष्ठवर्ती ज्ञानक्रिया, आमच्या मनाच्या मर्यादांनीं संकोचित झालेला असा दृष्टिकोन व दर्शनक्रिया -- आमचा आत्मा, आमच्या आंतरिक हालचाली, आमच्या बाहेरचें जग, त्या जगांतील वस्तू आणि घटना यांजकडे पाहण्याचा आमच्या मनाचा मर्यादित दृष्टिकोन व दर्शनक्रिया -- अर्थात् आमची पृष्ठवर्ती ज्ञानक्रिया कोणत्या घटकांची बनली आहे तें पाहिल्यास असें दिसून येतें कीं, ज्ञानसंपादनाचे जे चार प्रकार आहेत त्या चारहि प्रकारांतून त्यांचे घटक आमच्या पृष्ठवर्ती ज्ञानक्रियेंत कमीअधिक प्रमाणांत आले आहेत. अगदीं मूळ पायाभूत ज्ञानमार्ग, वस्तुजातांतील गुप्त आत्म्याचा स्वभावसिद्ध ज्ञानमार्ग, 'अभेदानें, तादात्म्य दृष्टीनें ज्ञान संपादन' हा आहे. दुसरा ज्ञानमार्ग, हा मूळ ज्ञानमार्गांतून निघालेला दुग्यम दर्जाचा ज्ञानमार्ग आहे; प्रत्यक्ष संपर्क या साधनानें या मार्गांत ज्ञानसंपादन केलें जाते; याच्या मुळाशीं हा मार्ग गुप्त अभेदाधिष्ठित ज्ञानाशी जोडलेला असतो. केव्हां केव्हां त्या अभेदाधिष्ठित गुप्त ज्ञानातूनच याचा आरंभ असतो, पण वास्तवांत हा मार्ग त्याच्या मुळापासून तोडलेला असतो; म्हणून या मार्गांतील ज्ञानक्रिया सामर्थ्यवान् असली तरी ती पूर्ण असत नाहीं; अपूर्ण, अपुरी असते. तिसरा ज्ञानमार्ग : या मार्गांत निरीक्षणाच्या विषयभूत वस्तूपासून निरीक्षक वेगळा झालेला असतो, दूर झालेला असतो. या मार्गांत ज्ञान संपादन करणारा, वस्तूचें ज्ञान दुरून संपादन करून घेतो. पण यांत प्रत्यक्ष संपर्काचा या मार्गाला आधार असतो. अंशत: तादात्म्याचा, अभेदाचाहि आधार केव्हां केव्हां असतो. चौथा ज्ञानमार्ग : या मार्गांत ज्ञान संपादन करणारा, ज्ञान विषयापासून
पान क्र. ४०४
पूर्णपणें दुरावलेला असतो. या मार्गानें मिळविलेलें ज्ञान, पूर्णतया भेदाधिष्ठित असतें. यांत ज्ञानविषयाशी प्रत्यक्ष संपर्क नसतो. कांहींतरी यंत्राच्या द्वारां, साधनांच्या द्वारां अप्रत्यक्ष संपर्क घडविण्याची तरतूद या मार्गांत असते. हें ज्ञान साधनांच्या द्वारां खटपट करून मिळवावयाचें असतें. तरी पण आमच्या अंतरांत अगोदरच जें ज्ञान असतें तें त्यांतील कमीअधिक भाग वर काढणें किंवा आम्हांला समजेल अशा रीतीनें आमच्यापुढें मांडणें, हेंच काम या मार्गांत केलें जातें. अर्थात् हें काम जाणीवपूर्वक केलें जात नाहीं. तेव्हां निसर्गाच्या ज्ञानसंपादन-पद्धती चार आहेत : तादात्म्याची किंवा अभेदाची पद्धति, प्रत्यक्ष संपर्काची पद्धति, निकटच्या प्रत्यक्ष संपर्काची पद्धति, दुरूनच्या भेदाधिष्ठित प्रत्यक्ष संपर्काची पद्धति.
ज्ञानसंपादनाचा पहिला मार्ग, त्याच्या शुद्ध स्वरूपांत पृष्ठवर्ती मनाच्या ज्ञानसंपादन-क्रियेंत उपयोगिलेला जो सांपडतो तो, आमच्या स्वत:च्या सारभूत अस्तित्वाचें ज्ञान आम्हांला जें होतें त्याच्या संबंधांत सांपडतो. कारण हें ज्ञान आम्हांला आमच्या तात्विक अस्तित्वाच्या प्रत्यक्ष जाणिवेनेंच होत असतें. या ज्ञानांत आत्मा आणि अस्तित्व या शुद्ध सत्य वस्तूखेरीज दुसरी कांहींहि वस्तु असत नाहीं. पृष्ठवर्ती मनाच्या ''मी'' ला ''मी आत्मा आहे'' हें ज्ञान तादात्म्याच्या, अभेदाच्या पद्धतीनें होतें. विश्वांतील दुसऱ्या कोणत्याहि वस्तूचें ज्ञान पृष्ठवर्ती मनाला या प्रत्यक्ष जाणिवेच्या अभेदाच्या पद्धतीनें होत नाहीं. पण आमच्या आंतरिक जाणिवेची रचना आणि हालचाल या बाबतींत आम्हांला जें ज्ञान होतें, त्यांत अभेदनिष्ठ ज्ञानाचा कांहीं भाग असतो. आमच्या जाणिवेच्या व्यापारांत, आम्ही स्वत:ला कळत न कळत फेंकून गुंतवू शकतो; तादात्म्यानें गुंतवूं शकतो, अभेदानें गुंतवूं शकतो. उदाहरणार्थ क्रोधाची उसळी आली म्हणजे क्षणभर कां होईना आमची सर्व जाणीव जणु क्रोधरूप होते. प्रेम, दु:ख, आनंद या भावनाहि आम्हांला अल्प काळ सर्वथा व्यापून टाकूं शकतात. विचारदेखील आम्हाला सर्वथा व्यापून टाकू शकतो; इतका कीं, विचार करणारा स्वत:ला विसरतो आणि विचारविषयाशीं, विचारक्रियेशीं पूर्णत: एकरूप होतो. सामान्यत: आमच्या अस्तित्वांत व जाणिवेंत एकाच वेळीं दुहेरी क्रिया घडते. आमचा एक भाग विचार किंवा भावना बनतो आणि आमचा दुसरा भाग, विचार किंवा भावनारूप झालेल्या पहिल्या भागाला कमीअधिक चिकटून राहून
पान क्र. ४०५
त्याचेबरोबर वाटचाल करतो, किंवा त्याचे मागोमाग अगदीं चिकटून चालतो आणि निकटच्या प्रत्यक्ष संपर्कानें त्याचें स्वरूप जाणून घेतो. अर्थात् दुसरा भाग पहिल्याशीं तादात्म्य पावत नाहीं किंवा त्याच्या व्यापारांत गुरफटून स्वतःला सर्वथा विसरून जात नाहीं.
आतांच वर्णिलेलें तादात्म्य किंवा अभेद आणि अंशत: भेद व अंशत: अभेद शक्य होण्याचें कारण आमच्या भावना वगैरे या आमच्या अस्तित्वांत घडणाऱ्या घटना असतात. आमच्या मनोद्रव्याचे आणि मनाच्या शक्तीचे विशेष आकार-विकार असतात. आमच्या प्राणिक द्रव्याचे आणि शक्तीचे विशेष आकार-विकार असतात. या घटना, हे आकार-विकार, आमच्या अस्तित्वाचा एक भाग, एक लहान भाग असतात, म्हणून त्यांच्याशीं आम्हीं एकरूप व्हावें असें बंधन आमच्यावर असत नाही, आम्ही या घटनांपासून अलग राहूं शकतो. आमचें अस्तित्व आणि त्यांचें तात्पुरतें अल्प काळ टिकणारें साकारत्व अलग करूं शकतो. त्या साकार सविकार अस्तित्वाचें निरीक्षण करणें, त्याचें नियंत्रण करणें, तें संमत करणें किंवा त्याच्या आविष्काराला प्रतिबंध करणें या गोष्टी आम्ही करूं शकतों. याप्रकारें आंतरिक भेद दाखवून, मानसिक किंवा आत्मिक अलगपणा ठेवून, आम्ही मानसिक प्राणिक प्रकृतीचा आमच्या अस्तित्वावर मुळींच किंवा अंशत: तरी जोर, अधिकार, अंमल चालूं नये, अशी व्यवस्था करूं शकतों; आणि साक्षीची, ज्ञात्याची, शासकाची भूमिका स्वत: घेऊं शकतो. याप्रमाणें आमच्या अंतरांत घडणाऱ्या हालचालींचें दुहेरी ज्ञान आम्हांला असतें. आंतरिक द्रव्य आणि त्याची क्रियाशक्ति यांचें तादात्म्यनिष्ठ ज्ञान, अगदीं निकटचें ज्ञान आम्हांला असतें. आमच्या बाहेर चाललेल्या घटनांचें ज्ञान आम्हांला असतें. आमच्या बाहेर चाललेल्या घटनांचें, आम्हांला सर्वस्वीं ''अनात्मभूत'' ''स्वेतर'' असलेल्या घटनांचें भेद-अधिष्ठित, वस्तुनिष्ठ ज्ञान इतके निकटचें, अंतरंग-व्यापक, असूं शकत नाहीं; या अभेदनिष्ठ ज्ञानाबरोबर, अलगपणें निरीक्षण करण्यानें होणारें ज्ञान आम्हांला असतें; निरीक्षणासाठीं अलग होतां येते व निरीक्षणविषयाशीं प्रत्यक्ष संपर्कहि ठेवतां येतो. या अलगपणाच्या भूमिकेमुळें निसर्गशक्तीच्या व्यापारांत आम्ही अगतिकपणें बुडत नाहीं आणि आम्हांला आमच्यासमोर दिसणारी आंतरिक हालचाल आमच्या अस्तित्वाच्या शेष भागाशीं आणि विश्वाच्या अस्तित्वाशीं योग्यप्रकारें संबंधित करतां येते. हा अलगपणा आम्हांला
पान क्र. ४०६
शक्य झाला नाहीं, तर निसर्गरूप आत्मा -- घटना, चंचलता, क्रिया या स्वरूपाचा नैसर्गिक आत्मा -- आमच्या अस्तित्वरूप आणि प्रभुत्वमय ज्ञानरूप आत्म्याला आपल्या अंकित करून टाकतो आणि आम्हांला निरीक्षण-विषयभूत आंतरिक हालचाल अगदीं आंतून जवळून समजली, तरी आमचें तिच्यावर शासन चालत नाहीं, तिच्यावर आमची हुकमत चालण्याइतकी ती पूर्णतया आम्हांला कळत नाहीं. ही आपत्ति टाळावयाची तर निरीक्षण-विषयभूत हालचालींशीं आम्हीं एकरूप होणें आणि त्याबरोबर आमच्या आंतरिक अस्तित्वाच्या शेष भागाशींहि आम्हीं एकरूप होणें हें दुहेरी तादात्म्य आम्हांला साधावयास हवें. अर्थात् आमच्या अस्तित्वाच्या पोटीं जी भावनेची वगैरे लाट उठेल, तिच्यांत बुडी मारणें आणि त्याबरोबर मनानें तिचें निरीक्षक, साक्षी, नियंत्रक बनणें या दोन गोष्टी आम्हांला साधावयास हव्या. पण हें साधणें सोपें नाहीं; कारण आमची जाणीव विभागलेली आहे : प्राणिक जाणीव आणि मानसिक जाणीव असे तिचे दोन भाग पडले आहेत. आमची प्राणिक प्रकृति -- बळ, वासना, तृष्णा, क्रिया यांनीं युक्त अशी आमची प्राणिक प्रकृति -- आमच्या मानसिक प्रकृतीवर कुरघोडी करूं पाहते; तिला आपल्या स्वत:च्या यशाखालीं घालूं पाहते आणि मनाला हें दास्य टाळावयाचें असतें, उलट, प्राणावर यंत्रणा करावयाची असते. मनाला हें शक्य व्हावयास प्राणापासून स्वत:चा अलगपणा काळजीनें राखावा लागतो; प्राणाशीं एकरूप होण्याची मनाची तयारी असेल, तर तें आपलें स्वत्व घालवून बसतें. प्राणिक हालचालींत बुडून, त्या हालचालींबरोबर फरफटलें जातें. तरीपण, प्राण आणि विचार असा भेद करून आम्हांला प्राणाशीं आमच्या अस्तित्वाच्या एका भागानें आणि विचाराशीं दुसऱ्या भागानें एकरूप होतां येतें. (या दुहेरी तादात्म्यव्यवहारांत समतोलपणा राखणें हें अवघड असतें हें मात्र खरें) एखादी तीव्र भावना आमच्या ठिकाणीं उठली, तर त्या भावनेचा अनुभव मिळावा या उद्देशानें विचारशील आत्मा तिजकडे पाहतो आणि तिची क्रिया चालूं देतो; किंवा असेंहि घडूं शकतें कीं, प्राणिक निकडीमुळें विचारमय आत्म्याला त्या भावनेला अनुमति द्यावीच लागते. दुसरा प्राणमय आत्मा, ही जी निसर्गाची लहर आमच्यामध्यें उसळते तिला धरून तिजबरोबर वाहत जाण्याचें पसंत करतो. या आमच्या आत्मगत आंतरिक अनुभवांत आमच्या जाणिवेचें असें क्रियामय क्षेत्र सांपडतें कीं, जेथें तीन प्रकारच्या
पान क्र. ४०७
ज्ञानक्रिया एकत्र भेटतात. एक प्रकारचें तादात्म्यनिष्ठ ज्ञान, प्रत्यक्ष संपर्कनिष्ठ ज्ञान आणि यांजवर अवलंबित असे भेदनिष्ठ ज्ञान.
विचार करणारा आणि विचाराची क्रिया यांना अलग ठेवणें हा, विकार आणि विकारवान यांना अलग ठेवण्याच्या व्यवहाराहून अधिक अवघड व्यवहार आहे. सामान्यत: विचारकर्ता त्याच्या विचारांत विलीन किंवा विचारप्रवाहांत पकडला जाऊन त्या प्रवाहाबरोबर वाहवला जातो, विचारप्रवाहाशीं तो एकरूप होतो; विचार करतांना त्याचक्षणीं किंवा विचारक्रिया चालूं असतांनाच ती निरीक्षिणें, विचार करणाराला सामान्यत: साधत नाहीं. विचारक्रिया पूर्ण झाल्यावर तिच्याकडे तो वळून पाहूं शकतो. या कामांत स्मृतीची मदत त्याला घ्यावी लागते. केलेल्या विचारांतील गुणदोष पाहून मग पुढें पाऊल टाकावयाचें, असें त्यानें ठरविल्यास, या गुणदोष-परीक्षणासाठींहि तो झालेल्या विचाराकडे वळूं शकतो. तथापि विचार करणें आणि विचारक्रियेला मार्गदर्शन करणें या दोन क्रिया अंशत: समकालीन होऊं शकतात. जेव्हां विचार करणाराला विचार सर्वथा व्यापून टाकणारा नसेल, तेव्हां विचार करणारा संवयीनें, अभ्यासानें मनाच्या शक्तीपासून (विचारक्रिया करणाऱ्या शक्तीपासून) अलग राहून, प्रत्येक विचारक्रियेच्या वेळीं आपल्या मनोमय आत्म्याच्या बैठकींत पाऊल मागें घेऊन उभें राहावयाची शक्ति कमावील, तर विचार करणें आणि विचारक्रियेला मार्गदर्शन करणें या दोन क्रिया सर्वथा आणि पूर्णतया समकालीन होऊं शकतील. विचाराच्या वेळीं पाऊल मागें घेऊन, मनोमय व आत्म्यांत बैठक घेण्याची शक्ति कमावली, म्हणजे विचाराच्या व्यापारांत आम्ही बुडून जात नाहीं. विचाराच्या प्रक्रियेचा अंधुक भास होणें यापलीकडे आम्ही जाऊं शकतो. आम्ही मनोमय दृष्टीनें ही प्रक्रिया पाहूं शकतो. विचार उद्भवतात कसे, त्यांची गतिप्रगति कशी होत जाते हें आम्ही पाहूं शकतो; आणि कांहीं अंशीं मूल्यविषयक शांत, तटस्थ विचारानें, कांहीं अंशीं विचारावर विचार करण्याच्या प्रक्रियेनें, आमच्यासमोर चाललेल्या विचारव्यापाराचें मूल्यमापन करतो; आणि त्यावर बरावाईट वगैरे न्यायसंमत निर्णय देतो. आमचें विचारव्यापारांशीं तादात्म्य कशाहि प्रकारचें होवो, येवढें खरें कीं, आमचें आंतरिक व्यापारांचें ज्ञान दोन अंगांचें बनलेलें असतें. एक अंग भेदाधिष्ठित असतें; दुसरें, प्रत्यक्षसंपर्क-अधिष्ठित असतें. आम्ही विचारव्यापारांपासून स्वत:ला अलग करतो, तेव्हां देखील
पान क्र. ४०८
त्या व्यापाराशीं निकटचा संपर्क आम्ही कायम ठेवतों. नेहमीं प्रत्यक्ष संपर्कावरच आमचें ज्ञान अधिष्ठित असतें. अभेदाचा, तादात्म्याचा, थोडाबहुत अंश असलेली प्रत्यक्ष जाणीव, हीच आमच्या आंतरिक व्यापारांच्या ज्ञानाची जन्मदात्री असते, पायाभूत बैठक असते. चिकित्सक मन (बुद्धि) आणि क्रियाशील गतिशील मन असे आमच्या मनाचे जे दोन भाग पडतात, त्यांचा व्यवहार वेगळावेगळा होतो. बुद्धि आंतरिक व्यापार पाहून, त्यांचें ज्ञान करून घेतांना, अलग होते; सामान्यत: भेदाची वृत्ति तिच्या ठिकाणीं अधिक असते, असावी लागते. गतिशील मनाची पद्धति वेगळी असते. त्याचे ठिकाणीं आंतरिक व्यापारांशीं चिकटून जाण्याची वृत्ति अधिक असते, असावी लागते. हें क्रियाशील मन, आमच्या संवेदना, आमच्या भावना, वासना यांच्याशीं मिळून-मिसळून जाण्याचा क्रम ठेवतें. तरीपण या संयोगाचा व्यापार चालूं असतां, विचारशील मन (बुद्धि) मध्यें पडून अलगपणें त्या संयोगाचें मिळण्यामिसळण्याचें निरीक्षण करूं शकतें, आणि क्रियाशील मनावर व प्राणिक, शारीरिक हालचालीवर नियंत्रण ठेवूं शकतें. आमच्या भौतिक अस्तित्वाच्या निरीक्षण करण्यासारख्या सर्व हालचाली, आंतरिक व्यापारांप्रमाणेंच पाहिल्या जातात आणि नियंत्रित केल्या जातात. निकट संपर्काचा मार्ग आणि अलग अलग राहाण्याचा मार्ग या दोन्ही मार्गांचा उपयोग या बाबतींतहि केला जातो. आमचें शरीर आणि त्याच्या हालचाली, आमच्या शरीराचा अविभाज्य भाग म्हणून निकट संपर्कानें आम्ही जाणतो आणि तरीहि मन या हालचालींपासून व शरीरापासून अलग राहून त्यांजवर अलगपणें नियंत्रण ठेवूं शकतें. आमचें स्वत:चें अस्तित्व आणि आमची प्रकृति, यासंबंधीचें आमचें ज्ञान सामान्यत: वर सांगितलेल्या ज्ञानविषयक स्थितीमुळें बऱ्याच अंशीं प्रत्यक्षतेचें, निकटतेचें, अभेदाचें असतें. असें असलें तरी, तें अपूर्ण असतें, बऱ्याच अंशी वरवरचें असतें, ही गोष्ट विसरून चालणार नाहीं. आमच्या बाहेर असणाऱ्या जगाच्या आम्हांला होणाऱ्या ज्ञानांत वरील ज्ञानाचा निकटपणा वगैरे असत नाहीं. जगाचें आणि त्यांतील वस्तूंचें आणि व्यापारांचें जें ज्ञान आम्हांला होतें, त्यांत प्रत्यक्षपणा असत नाहीं. बाह्य विश्व हा आमच्या अस्तित्वाचा भाग आहे, असें आम्हांला भासत नाहीं. आमची जाणीव या बाह्य वस्तूंशीं प्रत्यक्ष संपर्क ठेवूं शकत नाहीं. इंद्रियें हें साधन वापरून, आम्हांला बाह्य विश्वाचें ज्ञान करून घ्यावें
पान क्र. ४०९
लागतें. अर्थात् हें इंद्रियरूपी साधन, विश्वाचें प्रत्यक्ष, निकटचें ज्ञान आम्हांला देऊं शकत नाही. विश्वाचें एक चित्र तें आमच्यापुढें ठेवतें. हें चित्र विश्वाचें ज्ञान करून घेण्यासाठी एक प्राथमिक पुरावा म्हणून, आम्हांला उपयोगी पडतें.
बाह्य वस्तूंच्या, ज्ञानाच्या संबंधांत आमचा पाया सर्वस्वी भेदनिष्ठ असतो. बाह्यविषयक ज्ञानाची प्रक्रिया, त्याची साधनसामुग्री, सर्वकांहीं अप्रत्यक्ष-ज्ञान-साधक असतें. बाह्य वस्तूंशीं आम्ही एकात्म होत नाहीं. दुसऱ्या मनुष्यांशी देखील आम्ही एकात्म होत नाहीं. दुसरे सर्व मानव आमच्याच प्रकृतीचे असतात. तरीहि, ते आमच्या बाहेरचे, एवढ्यासाठीं आम्ही त्यांच्याशी एकात्मता पावत नाहीं. त्याचें अस्तित्व जणूं आपलेंच आहे अशाप्रकारें त्या अस्तित्वाचें ज्ञान आम्ही करून घेऊं शकत नाहीं. त्यांचें आणि त्यांच्या हालचालींचें ज्ञान आमच्या स्वतःच्या आणि स्वतःच्या हालचालींच्या ज्ञानासारखें प्रत्यक्षतेनें, निकटतेनें, अभेदानें आम्ही करून घेऊं शकत नाहीं. त्यांच्या आमच्यामध्यें अभेद तर शक्यच होत नाही, पण प्रत्यक्ष संपर्क देखील शक्य नसतो. आमची जाणीव, त्यांची जाणीव, आमचें घटकद्रव्य, त्यांचें घटकद्रव्य, आमचें आत्मत्व, त्यांचें आत्मत्व या जोड्या प्रत्यक्ष संपर्काच्या कक्षेंत येत नाहींत, त्या प्रत्यक्ष संपर्कापासून दूर असतात. इंद्रियांच्या द्वारां काय तो त्यांचा संपर्क -- इंद्रिय-प्रत्यक्ष संपर्क घडतो, दृष्टि, श्रवण, स्पर्श या इंद्रियशक्ती वस्तूंचा आमचा संबंध आणू शकतात पण हा संबंध खरोखरी, 'प्रत्यक्ष संबंध' असत नाही. ज्ञेय वस्तूचें चित्र, तिनें आमच्या नाड्यांमध्यें निर्माण केलेलें स्पंदन काय तें आमच्या जाणिवेला 'प्रत्यक्ष' असतें. या नाडीस्पंदनावरून किंवा चित्रावरून आम्हांला ती वस्तु जाणावयाची असते. हे नाडीचें किंवा चित्राचें साधन ज्ञान मिळवावयाला अगदींच अपुरें असतें. त्याच्या मदतीला संवेदनाशील मनाची अंतस्फूर्त दृष्टि येते. प्राणशक्तीची अन्त:स्फूर्त ग्रहणशक्ति येते, कल्पनाशील मनाची अन्तःस्फूर्त कल्पनाशक्ति येते. संवेदनाशील मन आपल्या अन्त:स्फूर्त दृष्टीनें बाह्यवस्तूचें चित्र किंवा तज्जनित नाडी-स्पंदन पाहून, तें त्या वस्तूचें म्हणून ओळखतें; प्राणशक्ति आपल्या अन्त:स्फूर्त ग्रहणशक्तीनें बाह्य वस्तूची क्रियाशक्ति ओळखते. (ही ओळख पटण्यास वस्तूला झालेल्या इंद्रियाच्या स्पर्शानें उत्पन्न होणारें नाडीगत विशिष्ट स्पंदन मदत करतें); हा सर्व पुरावा घेऊन कल्पनाशील मन, आपल्या अन्त:स्फूर्त कल्पनाशक्तीनें बाह्य वस्तूची बरीच
पान क्र. ४१०
यथार्थ कल्पना उभी करतें. या प्रक्रियेनें बाह्य वस्तूच्या चित्राचा जो अर्थ ठरतो, त्यांत असलेली उणीव, दोष आमची चिकित्सक बुद्धि, सर्वांगपूर्ण यथार्थदर्शी बुद्धि दूर करते. वर जें अन्त:स्फूर्त संयुक्त ज्ञान वर्णिलें आहे, तें जर प्रत्यक्ष-संपर्काचें फलरूप असतें, किंवा एकंदर अन्त:स्फूर्त ज्ञानयुक्त मनाची वस्तुविषयक कल्पना बांधण्याचें निरंकुश प्रभुत्व असणाऱ्या मनाची क्रिया म्हणून, तें अन्त:स्फूर्त संयुक्त ज्ञान उद्भवलें असतें, तर त्याच्यांतील उणीव दूर करण्यासाठीं चिकित्सक, यथार्थदर्शी, सर्वंकश बुद्धीची गरज लागली नसती. ही बुद्धि मग, इंद्रियद्वारां न पुरविलेल्या ज्ञानाची व्यवस्था करण्यासाठीं आणि त्यांनी पुरविलेल्या ज्ञानाच्या आधारावर, नवे शोध करण्यासाठीं वापरली गेली असती; तिला दुसरें वरच्यासारखें काम करावें लागलें नसतें. पण वर उल्लेखिलेलें अन्तःस्फूर्तज्ञान प्रत्यक्ष-संपर्कजनित नसून किंवा प्रभुत्वयुक्त मनाची क्रिया नसून इंद्रियांनीं पुरविलेलें, अप्रत्यक्ष पुराव्यादाखल असलेलें बाह्मवस्तूचें जें चित्र, त्यावर मखलाशी करणारें असतें, वस्तूचें चित्र, वस्तूनें नाडीसंघांत उत्पन्न केलेलें स्पंदन हें सदोष, अपुरे असें चित्रण असतें; अन्तःस्फूर्त ज्ञानहि मर्यादित असून आणि प्रकाशहीन माध्यमांतून येणारें असून, त्याला अर्धवट अंधारांत काम करावें लागतें; म्हणून बाह्यवस्तूसंबंधाचें जें अखेरचें चित्र, अंतःस्फूर्त ज्ञान त्याला मिळालेल्या मसाल्याचा उपयोग करून काढीत असतें, तें सदोष, निदान अपुरेंच राहतें. त्यांतील अपुरेपणाची पूर्तता बुद्धि करूं शकते. मनुष्यांत बुद्धीचा विकास झाला आहे तो, त्याला तीन तऱ्हेनें उपयोगी पडतो. बाह्य वस्तूंचें ज्ञान मिळविण्यासाठीं मनुष्याला, इंद्रिय हें जें साधन दिलेलें आहे, तें साधन सदोष व अपुरें आहे. (१) बुद्धीचा आश्रय घेऊन इंद्रियाची उणीव भरून काढतां येते. (२) मनुष्याचें स्थूल (भौतिक) मन ज्या वस्तूविषयक कल्पना करतें त्यांतील प्रमाद दूर करण्याचें काम बुद्धि करते. (३) मनापुढें जो बाह्यविषयक पुरावा येतो त्याचा अर्थ लावण्यांत भौतिक मनाची चूक (अपुरेपणाची चूक) होऊं शकते, ती दुरुस्त करण्याचें काम बुद्धि करते -- भौतिक मनाला त्याच्या संकुचितपणामुळें पुराव्याचा पुरा अर्थ उमगत नाहीं; बुद्धि पुराव्याचा पुरता अर्थ लावण्यांत उपयोगी पडते.
तेव्हां आमचें विश्वविषयक ज्ञान हें मोठ्या प्रयासानें मिळतें आणि या ज्ञानाची इमारत उभी करणें अवघड आहे हें उघड झाले. या
पान क्र. ४११
इमारतीचे घटक पहा : इंद्रियांनीं तयार केलेली वस्तुप्रतिमा सदोष आणि अपुरी, मन (त्रिविध मन) या अपुऱ्या सदोष प्रतिमेंतून आपल्या सहजस्फूर्त ज्ञानानें बाह्यवस्तुविषयक अर्थ काढणार, (त्रिविध मन म्हणजे संवेदनाशील इंद्रियरूप मन, प्राणमय मन आणि कल्पनाशील मन); बाह्य इंद्रियांच्या आणि त्रिविध मनाच्या या कार्यानंतर बुद्धि आपलें तपासणीचें काम करणार. त्रिविध मनानें केलेल्या इंद्रियरचित प्रतिमेच्या अर्थांत भर घालणें, त्यांतील चुकांची दुरुस्ती करणें, तिच्यापुढें आलेल्या ज्ञानांत आणखी ज्ञानाची भर घालणें, ज्ञानाचें संघटन करणें ही कामें बुद्धि करते; इतक्या सगळ्या खटाटोपानंतर आमचें विश्वविषयक ज्ञान संकुचित असतें, सदोष असतें, आमच्यासमोर आलेल्या पुराव्यांचा व त्यांच्या महत्त्वाचा अर्थ संशयव्याप्त असतो. आमच्या ज्ञानांतील उणीव, अपुरेपणा दूर करण्यासाठीं कित्येक साधनांचा संसार आम्ही उभा करतो व उपयोगास आणतो : कल्पनाशक्ति, अनुमानशक्ति, विवेचकशक्ति, समोर आलेला पुरावा तोलणें व त्यावर युक्तिवाद करणें, अनुमानें काढणें, मापें घेणें, परीक्षा करणें, इंद्रियांच्या पुराव्यात चुकी आढळेल ती दुरुस्ती करणें व त्या पुराव्यांत भर घालणें, या कामी नव्या विज्ञानाची भरपूर मदत घेणें -- हा सगळा साधन-संभार आमच्या ज्ञानांत पूर्णता यावी म्हणून आम्ही उपयोगांत आणतो, पण इतकें सगळें करूनहि आमचें ज्ञान काहीं पूर्ण होत नाहीं; आम्ही या सर्व खटपटीनंतर जें फळ म्हणून मिळवितों, त्यांत काय काय असतें तें येणेप्रमाणें : अप्रत्यक्ष ज्ञान अर्धे निश्चित, अर्धे संशयव्याप्त) इंद्रियांनीं पुरविलेल्या आणि कल्पनेनें रंगविलेल्या सार्थ चित्रांचा ढीग; या चित्रांवरून सुचणारीं अमूर्त विचारसूत्रें, तात्पुरत्या उपपत्ती, निश्चित उपपत्ती, सामान्य सिद्धान्त आणि याबरोबर संशयाचें ढीग, कधीं न संपणारी चर्चा, कधीं न संपणारी तपासणी. अशी मोठ्या खटपटींनीं बांधलेली आमची ज्ञानाची इमारत आहे. ज्ञानाबरोबर सामर्थ्य येतें; पण आमचें ज्ञान अपुरें व सदोष असल्यानें आम्ही आमच्या सामर्थ्याचा उपयोग कसा करावा, आमच्या ज्ञानाचा खरा उपयोग कोणता, हें आम्हांला मुळींच समजत नाहीं, याची आम्हांला मुळींच कल्पना नाही; आमचें ज्ञान व सामर्थ्य कोणत्या हेतूसाठीं, कोणत्या उद्देशासाठीं परिणामकारक रीतीनें उपयोगांत आणावें यासंबंधीं आम्हांला आमच्या ज्ञानाच्या अपुरेपणामुळें, कांहींहि कल्पना निश्चितपणें ठरवितां येत नाही. आत्मज्ञानाच्या बाबतींत आमची जी अपूर्णता आहे तिच्या योगानें ही स्थिति
पान क्र. ४१२
आणखी वाईट होते : आमचें आत्मज्ञान, जें आहे तें फारच अल्प, अगदींच अपुरें आणि तेंहि केवळ आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वाचें व पृष्ठवर्ती जाणिवेचें; आमच्या दर्शनी नामरूपात्मक ''आत्म्याचें'' आणि प्रकृतीचें आहे. आमच्या खऱ्या आत्म्याचें ज्ञान आम्हांला नाहीं, आमच्या अस्तित्वाच्या खऱ्या प्रयोजनाचें ज्ञान आम्हांला नाहीं. ज्ञानाचा उपयोग करणारे आम्ही, आम्हांला ''खरें आत्मज्ञान'' नाहीं, खरी आत्मप्रभुता नाहीं. विश्वविषयक ज्ञान जें आम्हांला प्राप्त आहे, विश्वासंबंधीं सत्ता जी आम्हांला प्राप्त आहे, त्या ज्ञानाचा, त्या सत्ते या उपयोग करण्याच्या कार्यांत जें शहाणपण हवें, जी योग्य इच्छा हवी, ती योग्य इच्छा, तें शहाणपण आमच्याजवळ नाहीं.
आमची पृष्ठवर्ती अवस्था ज्ञानाचीच अवस्था आहे, पण हें आमचें ज्ञान मर्यादित आहे, त्याला चोहोंकडून अज्ञान वेढून आहे, त्यावर चोहोंकडून अज्ञानाचें आक्रमण आहे; या आमच्या ज्ञानाच्या मर्यादितपणामुळें तें बहुतांशीं एक प्रकारचें अज्ञानच आहे, निदान अज्ञान-ज्ञान संमिश्रण तरी आहेच आहे. आमच्या ज्ञानाची ही अवस्था अपरिहार्य आहे; कारण, आमचें विश्वविषयक ज्ञान भेद-अधिष्ठित असतें; केवळ विश्वाचा वरवरचा भाग पाहून मिळविलेलें असतें; हें ज्ञान मिळविण्यासाठीं आमचीं जीं साधनें आहेत, तीं अप्रत्यक्ष साधनें आहेत; आमचें स्वत:संबंधींचें ज्ञान अधिक प्रत्यक्ष असतें, पण तें आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वाचेंच केवळ असतें; आमच्या खऱ्या आत्म्याचें ज्ञान आमच्या स्वभावाच्या खऱ्या मूळ उगमांचें ज्ञान, आमच्या खटपटींच्या बुडाशीं असणाऱ्या खऱ्या प्रेरक शक्तीचें ज्ञान आम्हांला नसतें आणि यामुळें आमचें जें प्रत्यक्ष ज्ञान तेंहि अधिक कोतें पडतें; केवळ पृष्ठवर्ती अस्तित्वाची मर्यादा असल्यामुळें आमचें प्रत्यक्षज्ञान जें आधीं कोतेंच असतें, त्यांत पुन्हां आमच्या खऱ्या आत्म्याच्या वगैरे आमच्या ठिकाणीं असलेल्या अज्ञानामुळें तें अधिक कोतें पडतें. आम्हांला स्वत:संबंधींचें जें ज्ञान आहे तें अगदीं वरवरचें आहे हें उघड आहे. आमच्या जाणिवेचा, विचारशक्तीचा उगम आम्हांला गूढ आहे. आमचें मन, आमची स्मृति, आमच्या भावना, संवेदना या सर्व गोष्टी गूढ आहेत. म्हणजे त्यांचें खरें प्राकृतिक स्वरूप गूढ आहे; आमच्या अस्तित्वाचें मूळ, आमच्या अस्तित्वाचा शेवट दोन्ही गोष्टी गूढ आहेत. आमच्या जीवनाचें प्रयोजन, आमच्या खटपटीचें प्रयोजन गूढ आहे. आम्हांला खरें
पान क्र. ४१३
आत्मज्ञान, खरें विश्वज्ञान असतें, तर वरीलसारखें गूढांचें ओझें आम्हांला वहावें लागलें नसतें.
आमच्या ज्ञानाचा मर्यादितपणा आणि सदोषपणा याचें कारण पहातां असें आढळून येतें कीं, आमची जी बाह्यदर्शी जाणीव आहे, तिनें जी भिंत उभी केली आहे किंवा असें म्हणतां येईल कीं, तिच्यासाठीं जी भिंत उभी केली गेली आहे, त्या भिंतीच्या पाठीमागें आमच्या एकंदर स्वभावाची गुपितें, आमच्या आत्म्याच्या खोल जागा दडल्या आहेत; आणि आमचें सर्व लक्ष वरवरच्या गोष्टींवर केंद्रित झालें आहे. या भिंतीचा उद्देश, आमच्या बाह्यजाणिवेला आपली अहंकेंद्रित कृति, मन, प्राण, शरीर यांची अहंकेंद्रित कृति, निर्वेधपणें करतां यावी हा आहे. ही भिंत नसेल, तर या संकुचित कृतीचा मार्ग आमच्या विशाल जीवनाच्या खोल आणि व्यापक सत्याच्या जाणिवेनें रोधला जाईल. या भिंतीमधून, या भिंतीला असलेल्या बारीक चिरांमधून, भोंकांमधून आमच्या अंतवर्ती आत्म्याकडे, सत्तत्त्वाकडे आम्ही नजर लावूं शकतो. पण या नजरेला तेथें विशेष कांहीं दिसूं शकत नाही. या भिंतीच्या चिरांमधून आम्हांला जें दिसतें त्यावरून तेथें गूढ अंधुक अंधुक कांहीं तरी आहे एवढेंच आम्हांला म्हणतां येतें. आमचें (आमच्या जाणिवेचें) अहंकेंद्रित व्यक्तित्व आमच्या खोल, व्यापक एकमेव अनंत अशा आत्म्यापासून भेदाच्या भिंतीनें दुरावलेलें असतें; तें त्याच भिंतीनें विश्वाच्या अनंतत्वापासूनहि दुरावलेलें आहे. भेदाची भिंत अहंकेंद्राभोंवतीं प्रदक्षिणा न घालणाऱ्या सर्व गोष्टी (बाह्य विश्व) अनात्म म्हणून आमच्या जाणिवेपासून दूर ठेवते. याप्रमाणें आंतलें आत्मविश्व व देहाबाहेरचें विश्व सर्वच आमच्या अहं-जाणिवेपासून दूर रहातें. पण आमचें जें अहंव्यक्तित्व, तें अनात्मा म्हटल्या जाणाऱ्या विश्वाचा भागच असतें. त्या विश्वाबरोबर त्याला दिवस काढावयाचे असतात; त्यावर तें अवलंबून असतें. त्या विश्वामध्येंच एक रहिवासी म्हणून तें वावरत असतें. अर्थात् या विश्वाशीं त्याला संबंध ठेवावाच लागतो. या संबंधासाठीं कांहीं साधनें त्याला उपयोगांत आणावीं लागतात. त्याला ज्या गरजा असतात त्या पुरविणें, बाह्यविश्वाच्या हातांत असतें. तेव्हां या बाह्य विश्वावर अधिकार गाजवितां यावा, आपल्या वैयक्तिक अहम्ला आणि सामुदायिक अहम्ला जरूर असणारी सेवा या बाह्य विश्वाकडून करून घेतां यावी, यासाठीं बाह्य विश्वाचें ज्ञान मिळवून त्यावर अधिकार गाजविण्यासारखी परिस्थिति
पान क्र. ४१४
निर्माण करणें हें एक अहम्चें कामच असतें. आमच्या जाणिवेला शरीर इंद्रियरूपी दरवाजे पुरवितें. या दरवाज्यांच्या द्वारां आमची जाणीव बाह्य जगाशीं संबंध ठेवूं शकते. पाहणी आणि करणी या दोन्ही गोष्टी इंद्रियद्वारां आमच्या जाणिवेला करतां येतात. इंद्रियांना मदत म्हणून, आणखी कांहीं यांत्रिक, तांत्रिक साधनें मन शोधून काढतें; आणि इंद्रियांच्या व या मदतगार यंत्रतंत्रांच्या साह्यानें मन कांहीं एक व्यवस्थित ज्ञानसंग्रह उभा करतें; या ज्ञानसंग्रहाचा उपयोग अहम्च्या तात्कालिक गरजा पुरविण्यास होतो. त्याचप्रमाणें बाह्य परिसरांतील महान् अस्तित्व आपल्या हुकमतीखालीं घेऊन त्याचा उपयोग करण्याची स्वत:ची इच्छा पुरी करण्यासाठींहि या ज्ञानसंग्रहाचा उपयोग त्याला होतो. जेथें बाह्य पसारा हुकमतीखालीं आणतां येण्यासारखा नसेल, तेथें त्या पसाऱ्याशीं व्यवहार करण्याकरितांहि या ज्ञानसंग्रहाचा उपयोग होतो; पण आमची जाणीव हें जें ज्ञान मिळवितें तें वस्तुनिष्ठ ज्ञान असतें; वस्तूंच्या पृष्ठभागांचें ज्ञान असतें; पृष्ठभागाखालीं, जवळच जें असेल त्याचें ज्ञान असतें. केवळ व्यवहारोपयोगी, मर्यादित, अनिश्चित, असुरक्षित असें हें ज्ञान असतें. अहंव्यक्तित्वाच्या संरक्षणासाठीं तें खऱ्या आंतरात्म्यापासून भेदाच्या भिंतीनें दूर ठेवलेलें असतें. बाह्य विश्वांतील वस्तूपासूनहि दूर ठेवलेलें असतें. पण हें संरक्षण, बाह्य वस्तूंच्या उपयोगावांचून शक्य नसल्यानें त्याचें ज्ञान वगैरे अहं-व्यक्तित्वाला मिळवावें लागतें. अर्थात् या बाह्यविश्वसंपर्कानें अहम्-व्यक्तित्वाला थोडीबहुत असुरक्षितता येते. विश्वशक्तीपासूनहि अहम्-व्यक्तित्व सुरक्षित राहूं पाहतें. पण तें त्याला साधत नाहीं. विश्वशक्तीचा त्याजवर अदृश्यरीतीनें सूक्ष्म मार्गांनी मारा चालूं असतो. अहम्-व्यक्तित्वाच्या विचारांत, इच्छांत, भावनेंत, प्राणिक वासनेंत, आपल्या माऱ्यानें बाह्य विश्वशक्ति कमी-अधिक बदल करीत असते. दुसऱ्या अहम्वादी माणसांचे विचार, इच्छा, विकार, प्राणिक गरजा यांचा मारा अहम्वर सारखा होत असतो; विश्वव्यापी निसर्गाचा माराहि त्याजवर होत असतो -- आणि त्याच्या विचारविकारांत बदल करत असतो. अहम्च्या संरक्षणासाठीं म्हणून जी भेदाची भिंत उभी केलेली असते, त्या भिंतीमुळें अहम्ला त्यामधील व विश्वामधील क्रियेप्रतिक्रियेचें नीट ज्ञान होऊं शकत नाहीं. इंद्रियांच्या दरवाज्यांतून किंवा मनाच्या पिंजऱ्यांतून जें काय आंत येईल तें अहम्ला नीट समजतें. या पुराव्यावरून तर्कबुद्धि जें काय अनुमान करील तेंहि
पान क्र. ४१५
अहम्ला समजतें. पण इंद्रियांनीं व मनानें पुरविलेलीं चित्रें सदोष असण्याचा संभव असल्यानें, त्याचें हें सर्व ज्ञान अपुरें आणि सदोष असतें आणि इंद्रियांना व मनाला डावलून जें कांहीं बाह्य विश्वाकडून व विश्वशक्तीकडून अहम्च्या ''सुरक्षित'' प्रांतांत घातलें जात असतें त्या संबंधानें अहम्ला पूर्ण अज्ञानांत रहावें लागतें.
आमचें ज्ञान मर्यादित असतें, आमचे ठिकाणीं अज्ञान असतें, याचें कारण पृष्ठवर्ती अहम्च्या किल्ल्यांत आम्हीं स्वत:ला बंद करून घेतलें आहे, हें आहे. आमच्या तुरुंगाला दुहेरी भिंत आहे. बाह्य विश्वाला दूर ठेवणारी एक भिंत व आंतरिक आत्मविश्वाला दूर ठेवणारी दुसरी भिंत. आमचें अस्तित्व स्वभावत:च, असें स्वत:ला अहम् च्या बंदिखान्यांत ठेवणारें असतें, तर आमच्या अज्ञानाला आमच्या ठिकाणीं कायम रहातां आलें असतें पण वस्तुस्थिति अशी आहे कीं, ज्या बाह्य अहम्चें संगोपन, संवर्धन सारखें चाललेलें असतें, तो अहम् वस्तुजातांतील मूळ जाणीवशक्तीनें योजिलेलें एक तात्पुरतें साधन आहे; वस्तुजाताच्या पोटीं आत्मचैतन्य आहे; खरी व्यक्ति हें सुप्त आत्मचैतन्य आहे. या खऱ्या आत्मरूप व्यक्तीचें प्रतिनिधित्व अहम्कडे असतें. भौतिक निसर्गांत, अज्ञानमय निसर्गांत मूळ जाणीवशक्ति आत्मचैतन्यासाठीं अहम्रूप प्रतिनिधीची व्यवस्था करते. विश्वव्यापी अचेतनतेंतून चेतन विश्व क्रमशः वरती येत असतांना, अज्ञानाचा म्हणून जो अपरिहार्य टप्पा लागतो, त्या अज्ञानाच्या क्षेत्रांत अहम्रूप प्रतिनिधि नेमून व निर्मून गुप्त आत्मरूप व्यक्तीच्या विकासाची प्राथमिक तरतूद करून ठेवणें हें काम जाणीवशक्ति करते. एवढेंच करणें अज्ञानाच्या क्षेत्रांत तिला शक्य असतें. आमचें आत्मविषयक अज्ञान आणि विश्वविषयक अज्ञान कमी होत होत, त्याचें पूर्ण आत्मज्ञान आणि पूर्ण विश्वज्ञान व्हावयाचें असतें. आमचा मर्यादित अहम् आणि त्याची अर्धी आंधळी जाणीव ज्या प्रमाणांत आमचें विशाल आंतरिक अस्तित्व आणि जाणीव आणि वास्तव आत्मसत्ता यांच्या दिशेनें प्रगति करील, तसेंच त्याच्या (अहम्च्या) बाहेर असलेल्या ''अनात्म्याला'' आत्मा म्हणून ज्या प्रमाणांत अहम् ओळखूं लागेल, त्या प्रमाणांत आमची, पूर्ण आत्मज्ञान आणि पूर्ण विश्वज्ञान यांच्या दिशेनें प्रगति होईल. आमच्या स्वत:च्या आत्मसत्तेचा अमर्याद विस्तार म्हणजेच आमची मूळ महान् आत्मसत्ता होय. आमच्या प्रकृतीला घडवणारी महान् प्रकृति म्हणजेच आमची मूळ पराप्रकृति होय. पूर्ण विश्वज्ञान
पान क्र. ४१६
म्हणजे मूळ पराप्रकृतीचें ज्ञान; आणि पूर्ण आत्मज्ञान म्हणजे मूळ अनंत आत्मसत्तेचें ज्ञान होय. ''अहम् जाणिवेच्या'' भिंती आमच्या आत्मसत्तेनें उभ्या केल्या आहेत. त्या भिंती पाडणें हें त्या आत्मसत्तेचें काम आहे. हें काम करून आमच्या आत्म्यानें आपल्या एका विशिष्ट देहापलीकडे आपला संसार पसरून विश्वशरीर धारण करावयास हवें आणि तसें त्याला करावें लागणार आहे. सध्यां अप्रत्यक्ष संपर्कानें आत्मा विश्वाचें ज्ञान मिळवितो; या ज्ञानाला पूरक म्हणून किंवा हें ज्ञान बाजूस सारून आमच्या आत्म्यानें प्रत्यक्ष संपर्काचें ज्ञान व आणखी पुढें जाऊन तादात्म्यानें मिळणारें ज्ञान मिळविणें अगत्याचें आहे -- व हेंहि त्याला करावें लागणार आहे. सध्यां तो मर्यादित असा सान्त आत्मा आहे. तो अमर्याद सान्त व्हावयास हवा आहे व होणार आहे. तो त्यापुढें जाऊन शुद्ध, अनंत आत्मा व्हावयास हवा आहे व होणार आहे.
आमच्या अस्तित्वाची जी आंतरिक सत्यें आहेत त्यांचें ज्ञान करून घेणें ही गोष्ट प्रथम व्हावी लागते. आमचा आंतरात्मा आम्हांला सांपडला म्हणजे आमचा विश्वव्यापी आत्मा आम्हांला समग्र सांपडणें सर्वथा शक्य होत असतें. आमच्या आंतर-अस्तित्वांत शिरून तेथें राहण्याची आम्हीं संवय केली पाहिजे. तेथें बैठक घेऊन आमचें बाह्य जीवन जगावयास आम्हीं शिकलें पाहिजे. बाह्य मन, प्राण, शरीर हे आम्हांला बाहेरच्या खोलीसारखे व्हावयास हवेत. आमचा कायम मुक्काम आंत, आंतल्या खोलींत, आंतर-अस्तित्वांत झाला पाहिजे. आम्ही बाहेर जें कांहीं असतों, होतो, तें सर्व, आम्ही आंत काय असतो, आमच्या गुप्त अस्तित्वांत, आमच्या आंतर, खोल जगांत काय असतों त्यावरच अवलंबून असतें, ही वस्तुस्थिति आहे. आमच्या गुप्त आद्य प्रेरणा तेथून येतात. आमच्या आत्मप्रभावी रचना तेथून येतात. आमच्या सहजभावना, स्फूर्ति, जीवन-उद्देश, मानसिक आवडीनिवडी, आमच्या इच्छेच्या पसंती-नापसंती तेथूनच येतात. बाह्य विश्वाचे आघात, गुप्त आघात आमच्यावर सारखे होत असतात. त्या गुप्त आघातांचाहि वांटा वरील गोष्टींत असतो -- हें गुप्त आघात वरील कांहीं गोष्टी स्वतःच उदयास आणतात, किंवा आमच्या आंतून त्या उदयास आल्यावर त्यांजवर आपला प्रभाव पाडतात. या ज्या प्रेरणा, हे जे प्रभाव आंतून वर येतात, यांचा उपयोग जो आम्ही करीत असतो, तो मात्र आमच्या अगदीं बाहेरचा जो स्वभाव असतो त्यावर पुष्कळदां अवलंबून रहातो.
पान क्र. ४१७
अर्थात् या आंतरप्रेरणांना वगैरे या वस्तुस्थितीमुळें परिणामदृष्टीनें खूप मर्यादा पडते. तेव्हां आमचा जो आद्यप्रेरणा देणारा आंतर आत्मा आहे, त्याचें ज्ञान आम्हांला मिळविलें पाहिजे. आमचा बाहेरचा जो साधनभूत आत्मा आहे, त्याचेंहि कांटेकोर ज्ञान आम्हांला मिळविलें पाहिजे; आणि आमच्या म्हणजे आमच्या अस्तित्वाच्या, जाणिवेच्या वगैरे बांधणींत या दोहोंचा जो भाग आहे त्याचेंहि ज्ञान आम्हांला मिळविलें पाहिजे.
आमची पृष्ठवर्ती अवस्था जर पाहिली, तर असें दिसतें कीं, आमचा आत्मा पृष्ठावर, बाहेर जेवढा संघटित झाला आहे, तेवढादेखील आम्हांला पूर्ण अवगत होत नाहीं. त्याचे कांहीं बिंदू, कांहीं भाग स्वच्छ दिसतात. बाकी भाग साधारणत: अस्पष्टच दिसतात. मानसिक अंतर्निरीक्षणानें देखील, आत्म्याचे तुकडे तुकडेच एकत्र केलेले असे, आमच्या नजरेस येतात. आमचें खरें समग्र व्यक्तित्व, आम्हांला अंतर्निरीक्षणानेंहि दिसत नाहीं. त्यांत पुन्हां, या मर्यादित आत्मज्ञानाला विद्रूप करणाऱ्या, त्याला कमी-अधिक अंधारांत टाकून विफल करणाऱ्या कांहीं गोष्टी नित्याच्या आहेत. आमचा बाह्य प्राणमय आत्मा, हा सारखा मध्यें लुडबुडत असतो. आमचें आत्मज्ञान त्यायोगें दूषित होत असतें. विचारी मनाला स्वत:चे चाकर बनविणें, इकडे प्राणमय आत्म्याचें सर्व लक्ष लागलेलें असतें. त्याला आत्मज्ञानाशीं कांहीं कर्तव्य नसतें -- आपलें घोडें पुढें ढकलणें, आपलें तें खरें करणें, आपल्या वासनाविकारांची तृप्ति करणें एवढेंच त्याचें ध्येय व धोरण असतें -- अहम्चा बडेजाव त्याला प्रिय असतो. हा प्राणमय आत्मा, स्वतःच्या सोईसाठीं, मनावर नित्य दाब आणीत असतो. मनोमय आत्म्याला, आपल्या सोईचा मनोमय आत्मा बनविण्यासाठीं, मनामागें प्राणमय आत्मा सारखा लागलेला असतो. आपल्या वासनाविकारांचें समर्थन, अहम्चा बडेजाव या गोष्टी प्राणमय आत्म्याला प्रिय असतात, त्याचप्रमाणे आत्मनिंदाहि केव्हां केव्हां त्याला प्रिय असते. अतिरिक्त आत्मदूषण त्याला प्रिय असतें; प्राणमय अहम् (आत्मा) हा पुष्कळ वेळां कृतिशून्य बडबड्या असतो; पुष्कळ वेळां स्वत:च्या व इतरांच्या करमणुकीसाठीं तो केवळ नाटक करीत असतो. तेव्हां एकंदरींत, आमचें आत्मविषयक अज्ञान आणि आत्मविषयक फसवणूक, हा प्राणमय आत्मा (अहम्) सुव्यवस्थितरीतीनें घडवीत असतो, वाढवीत असतो. आम्हीं आमच्या अंतरांत खोल शिरून पहावें तेव्हां या
पान क्र. ४१८
गोंधळांतून आणि अंधारांतून बाहेर पडण्याचा मार्ग व या सर्व उपद्व्यापाचें मूळ आम्हांला दिसूं शकेल.
आमच्या आंत विशाल मनोमय आंतरपुरुष आहे, विशाल प्राणमय आंतरपुरुष आहे -- आमचा पृष्ठवर्ती शारीर जाणिवेचा पुरुष वेगळा व हा सूक्ष्म आंतर भौतिक पुरुष वेगळा. आम्हीं आंत शिरून या पुरुषांत प्रवेश केला, त्यांजशीं एकरूप झालों म्हणजे आमच्या विचारांचा, भावनांचा उगम जेथून होतो तीं स्थानें आम्ही पाहूं शकतो; आमची कृति कोणत्या हेतूंनीं, कोणत्या मुळांतून होते तें आम्हीं पाहूं शकतो; अर्थात् आमची पृष्ठवर्ती व्यक्तिता उभारणाऱ्या कार्यकारी शक्ती कोणत्या त्या आम्ही पाहूं शकतों. या आंतरपुरुषाचा शोध आम्हांला लागतो, आम्ही त्याची ओळख करून घेऊं शकतो; आमच्या ठिकाणीं आंतर मनोमय पुरुष गुप्तपणें विचार करीत असतो, गुप्तपणें वस्तुग्रहण करीत असतो; आंतरप्राणमय पुरुष गुप्तपणें भावनावश, विकारवश होतो आणि जीवनावर आमच्याद्वारां परिणाम करीत असतो; आमचें शरीर आणि आमचीं इंद्रियें यांच्याद्वारां वस्तूंचा जो आम्हांला संपर्क घडतो, तो गुप्तपणें, आम्हांला न कळत, स्वतःला घडवून घेऊन त्या संपर्काची योग्य प्रतिक्रिया करून ती आमच्या शरीराच्या व अवयवांच्याद्वारां बाहेर दाखविणें हें काम आमचा सूक्ष्म शारीरपुरुष करीत असतो. आम्ही पृष्ठवर्ती बैठकींतून जो विचार करतो, ज्या भावना कामना बाळगतो त्या आमच्या ठिकाणीं आंतील प्रेरणा आणि बाहेरील आघात यांच्या संयुक्त परिणामस्वरूप असतात. त्या भावना, विचार वगैरे गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या स्वरूपांत आमच्या ठिकाणीं उद्भवतात आणि आमचा गोंधळ उडवितात. आमची संघटनकुशल बुद्धि या विचार-विकार-भावनांच्या पसाऱ्यांत कांहीं थोडीबहुत व्यवस्था आणूं शकते; पण ती व्यवस्था थोडीशीच व अपूर्ण अशीच असते. पण आपण आंत गेलों म्हणजे तेथें या बाह्य फलभूत विचार-विकार-भावनांचे वेगळे वेगळे उगम आम्हांला स्पष्ट दिसूं शकतात. मानसिक शक्ति, प्राणशक्ति, भौतिक शारीर शक्ति यांचे निरनिराळे व्यवहार स्पष्ट दिसतात. प्रत्येक पृष्ठवर्ती विचाराचा, विकाराचा भावनेचा प्रत्येक घटक आम्हांला स्पष्ट दिसतो, या घटकांचा अन्योन्यांवर होणारा परिणाम स्पष्ट दिसतो; आंतरात्मदर्शन घडविणारा स्वच्छ आंतरप्रकाश आम्हांला आंतील प्रत्येक मानसिक, प्राणिक, शारीर व्यापार व सामर्थ्य स्पष्ट दाखवितो. आमच्या पृष्ठवर्ती जाणिवेंत जे विरोध, जे
पान क्र. ४१९
झगडे आम्हांला दिसतात, त्यांचें मूळ पुष्कळ प्रमाणांत, आमच्या मानसिक प्राणिक, शारीरिक इच्छा, आकांक्षा, वृत्ती, प्रवृत्ती परस्पर विसंवादी असतात या गोष्टींत असतें -- आणि या विसंवादी विरोधी आकांक्षादि गोष्टींचें मूळ, आमच्या अस्तित्वांत असलेल्या अनेक आंतरिक विसंवादी शक्यतांच्या पसाऱ्यांत असतें. केव्हां केव्हां हें मूळ, आमच्या आंतरिक भिन्न भिन्न व्यक्तित्वांत असतें. प्रत्येक भूमीवर -- मानसिक, प्राणिक, शारीरिक भूमीवर -- आमच्या अंतरांत भिन्न व्यक्ती असूं शकतात; आणि या व्यक्तिभेदामुळेंहि मानसिक, प्राणिक, शारीरिक वृत्तिप्रवृत्तींत भेद आणि विसंवाद आढळून येतो. आमची बाह्य प्रकृति ही मिश्र वृत्तिप्रवृत्तींची बनलेली दिसते -- याचें मूळ, आतांच स्पष्ट केलेल्या आंतरव्यक्तिभेदांत किंवा विसंवादी अशा आंतर मानसिक, प्राणिक, शारीरिक वृत्तिप्रवृत्तींत आहे. पृष्ठवर्ती प्रकृतींतील मन, प्राण, शरीर यांच्या वृत्तिप्रवृत्ती एकमेकांत गुंतलेल्या आणि गोंधळांत पडणाऱ्या असतात. पण अंतरंगांत खोल गेल्यावर या वृत्तिप्रवृत्ती वेगवेगळ्या, त्यांच्या कारणांसह, आम्हांला स्पष्ट दिसतात; आणि आमचा आंतर मनोमय पुरुष, त्यांच्यामध्यें एकप्रकारचा सुसंवाद निर्माण करूं शकतो -- 'प्राण आणि शरीर यांचा नेता' असें मनोमन पुरुषाला उपनिषदांत गौरविलें आहे (मनोमय: प्राणशरीरनेता -- मांडूक्य उपनिषद उप०२-२-७) मनोमय पुरुषापेक्षां सुसंवाद-निर्मितीचें काम आमच्या केंद्रवर्ती चैत्य पुरुषाला (आंतरात्म्याला) चांगलें साधतें; मात्र हें काम मनोमयाला किंवा आंतरात्म्याला नीट साधावें असें वाटत असेल, तर आमचा मानसिक आणि आत्मिक संकल्प योग्य आणि समर्थ असा असावयास हवा. प्राणिक अहम्च्या हेतूपूर्तीसाठीं जर आम्हीं अंतर्वर्ती अस्तित्वांत प्रवेश केला, तर त्याचा परिणाम भयंकर होण्याचा संभव आहे. आमच्या जीवनांत त्यायोगें धोके उत्पन्न होण्याचा, आमचा सर्वनाश होण्याचा संभव आहे -- निदान पक्षीं, आमचा अहम्, आमची वासना, आमची स्वार्थी प्रवृत्ति बलवत्तर होईल; आमचें अज्ञान विशाल आणि सामर्थ्यवान् होईल; विशाल आणि सामर्थ्यवान् ज्ञानापासून आम्हीं फार दूर राहूं; एवढा तरी परिणाम, आम्हीं प्राणमय अहम् च्या हेतूपूर्तीसाठीं अंतर्वर्ती अस्तित्वांत प्रवेश केल्यानें निश्चित होईल. अंतर्वर्ती अस्तित्वांत, मानसिक व इतर वृत्ति-प्रवृत्ती त्यांच्या कारणांसह वेगळ्या वेगळ्या स्पष्ट दिसतात आणि त्याबरोबर आंतून कोणत्या प्रेरणांचा उगम आहे आणि बाहेरून,
पान क्र. ४२०
म्हणजे इतरांकडून आणि विश्वप्रकृतीकडून, कोणत्या प्रेरणा येतात हें स्पष्ट दिसतें. अर्थात् नियंत्रण, पसंती वगैरे काम सुकर होतें. आमची पृष्ठवर्ती व्यक्तिता मिश्रणाची आहे; आमची अंतर्वर्ती व्यक्तिता शुद्ध आहे. आमच्या बाह्य व्यक्तित्वाला नियंत्रण, पसंती-नापसंती, इच्छेनुसार कोणतीहि प्रेरणा स्वीकारणें न स्वीकारणें आणि याप्रकारें आपली स्वतांची इमारत आपल्या मर्जीनुरूप तयार करणें, आपल्या घटकभूत वृत्तिप्रवृत्तींत, इच्छाआकांक्षांत सुसंवाद निर्माण करणें या गोष्टी नीट करतां येत नाहींत, याला कारण, त्या व्यक्तित्वाची मिश्रता होय. आमची अंतर्वर्ती व्यक्तिता शुद्ध व स्पष्टदर्शी असल्यानें तिला या गोष्टी नीट करतां येतात; तिचा हा अधिकार आहे. आम्ही आमच्या अंतरांत खोल गेलो, म्हणजे आमचें अंतर्वर्ती अस्तित्व, पडदा बहुतेक दूर झाल्यानें, उघडपणें सरळपणें बाहेरच्या साधनभूत जाणिवेवर पूर्ण प्रभाव पाडूं शकतें आणि म्हणून आमच्या भौतिक विश्वांतील जीवनांत स्पष्टपणें आपलें अंतरंग साकार करूं शकतें.
आमच्या बाह्य मनाचें पृष्ठवर्ती ज्ञान आणि आमच्या आंतरपुरुषाचें ज्ञान या दोहोंचे घटक तत्त्वत: तेच आहेत, पण या दोन ज्ञानांत हें अंतर आहे कीं बाह्यज्ञान अर्धे आंधळेपणानें ग्रासलेलें असतें; आणि आंतरज्ञान स्पष्ट दृष्टीचें आणि जाणिवेचें असतें; त्याचें साधन अधिक समर्थ व अधिक प्रत्यक्ष असें असते, त्याचें घटक अधिक व्यवस्थेनें रचलेले असतात. तादात्म्यानें होणारें ज्ञान, पृष्ठवर्ती मनाला असतें तें केवळ आपल्या आत्म्याच्या अस्तित्वाचें आणि तेंहि अंधुक व सहजसंवेदनेच्या रूपाचें असतें. तसेंच आमच्या आंतील हालचालींचेंहि तादात्म्यअधिष्ठित ज्ञान पृष्ठवर्ती मनाला अर्धवट होऊं शकतें; पण आम्हीं आंत गेलो म्हणजे तेथे आमचें तादात्म्य-अधिष्ठित ज्ञान विस्तारानें आणि खोलीनें खूप वाढतें; आंतील समग्र व्यक्ति तादात्म्यानें जाणतां येते. आमचा समग्र मनोमय पुरुष आम्हांला तादात्म्यानें प्रत्यक्ष, स्वच्छ दिसतो. आमच्या मानसिक आणि प्राणिक शक्ती ज्या हालचाली करतात त्या सर्व आम्हांला समग्र जवळून पहावयास मिळतात. त्यांच्याशीं आमचा निकट संपर्क होतो. आमच्या आत्म्याच्या पोटांत ज्या घटना घडतात त्या आम्हीच बनतो, हें आम्हांला स्वच्छ दिसतें; आणि त्यांचे साक्षीहि आम्हीं अगदीं जवळून बनतो, आम्हीच पुरुष आणि आमचें आत्मप्रगटीकरण म्हणजे आंतरिक मनाची प्राणाची हालचाल, घटनांची घटक आणि त्या घडवणारी आमची प्रकृति व आम्ही तिचें साक्षी -- अशी वस्तुस्थिति
पान क्र. ४२१
अंतरंगांत स्पष्ट होत असल्यानें, आम्ही पुरुष या नात्यानें आमच्या प्रकृतीचें पूर्ण नियंत्रण करूं शकतो. वर पृष्ठवर्ती अस्तित्वाच्या ज्या हालचाली होतात त्या अगदीं अलिप्तपणें आम्हांला बघतां येतात; आणि प्रत्यक्ष जाणिवेनें या हालचाली आम्हांला स्पष्ट दिसत असल्यानें, त्या हालचालींत जे भ्रम असतील, ज्या चुका होत असतील, ते भ्रम त्या चुका दुरुस्त करतां येतात, दूर करतां येतात; आमची मानसिक दृष्टि तीक्ष्ण असते, आमच्यांत ज्या आंतरिक घटना घडतात त्यांचें मानसिक संवेदन यथार्थ होऊं शकतें, आमची आंतरिक दृष्टि आमची समग्र प्रकृति पूर्णतया जाणूं शकते आणि आपल्या तंत्रानें (म्हणजे पुरुषाच्या तंत्रानें) तिला वागवूं शकते. आमचें आत्मिक आणि मानसिक घटक सामर्थ्यवान् असतील, तर प्राणमय पुरुष त्यांच्या तंत्रानें, त्यांच्या मार्गदर्शनानुसार वागतो; पृष्ठवर्ती मन, त्याला आपल्या तंत्रानें फारसें चालवूं शकत नाहीं. प्राणमय पुरुषाहून अधिक मठ्ठ असा शारीर पुरुष आणि त्याच्या शक्ती यांदेखील समर्थ मनाची इच्छाशक्ति नरम करूं शकते आणि त्याला आणि त्याच्या शक्तींना आंतरात्म्याचें विनयपूर्ण आज्ञाधारक साधन बनवूं शकते. जर मानसिक आणि आत्मिक घटक असमर्थ असतील, तर मात्र प्राणमय पुरुष अनावर होतो. आंतरप्राणमयांत शिरल्यानें आमची शक्ति खूप वाढलेली असते आणि अलिप्तपणा, विवेक कमी झालेला असतो. ज्ञान हें विस्तारानें आणि शक्तीनें वाढलेलें असतें, पण त्यांत अशुद्धता असते. मार्गदृष्टि नसते, भलतीकडे जाण्याची प्रवृत्ति असते -- अर्थात् तेथें आत्मसंयम अशक्य होऊन, प्राणमय पुरुष बेफाटपणें, बेशिस्तीनें सैरावैरा धांवतो, किंवा शिस्तीनें भयंकर स्वार्थी गैरवर्तनांत गुंग होतो. असें घडण्याचें कारण, अंतर्वर्ती अस्तित्व ज्ञान-अज्ञानाची संमिश्र अवस्था असते हें होय. तेथें ज्ञान अधिक असतें, पण त्याबरोबर अधिक स्वार्थमय अज्ञानाचीहि शक्यता असते. अधिक आत्मज्ञान म्हणजे पूर्ण आत्मज्ञान नव्हे. बाह्य पृष्ठवर्ती आत्म्यापेक्षां तलवर्ती आंतरात्म्यांत अधिक ज्ञान अवश्य असतें -- प्रत्यक्ष संपर्क हें याचें ज्ञानसाधन असल्यानें त्याला अधिक ज्ञान करून घेणें सोपें जातें; पण हें अधिक ज्ञान, जसें ज्ञानाच्या घटनांचें आणि शक्तीचें असूं शकतें तसें, तें अज्ञानाच्या घटनांचें आणि शक्तीचेंहि असूं शकतें -- म्हणून जोपर्यंत पूर्ण ज्ञान नाहीं तोपर्यंत गैरवर्तनाचा धोका आत्म्याचे ठिकाणीं कायम राहतो.
पान क्र. ४२२
तलवर्ती आंतरपुरुष हा आंतरिक घटना ज्याप्रमाणें प्रत्यक्ष संपर्कानें जाणूं शकतो, त्याप्रमाणें प्रत्यक्ष संपर्कानें विश्वांतील घटनाहि तो जाणूं शकतो; इंद्रियें पृष्ठवर्ती मनाला कांहीं वस्तुप्रतिमा पुरवितात, कांहीं इंद्रिय-स्पंदनें पुरवितात आणि या स्पंदनांचा व प्रतिमांचा अर्थ, हें बाह्य मन, स्वत:च्या आणि प्राणाच्या सहजस्फुरित ज्ञानाच्या साह्यानें लावतें. बुद्धीचीहि मदत घेऊन या अर्थांत स्पष्टता आणतें, भर घालतें आणि याप्रमाणें विश्वाचें ज्ञान अप्रत्यक्षपणें मिळवितें. आंतर तलवर्ती मन वा पुरुष या अर्थाचा लाभ घेऊन शिवाय प्रत्यक्ष संपर्कानें विश्वाचें ज्ञान मिळवूं शकतो. या आंतरपुरुषाच्या प्रकृतींत आंतर-इंद्रियशक्तीहि असते. सूक्ष्म दृष्टि, सूक्ष्म श्रवण, स्पर्श-घ्राण-रसास्वादशक्ति या आंतरप्रकृतींत असते. भौतिक परिसरांतील वस्तूंचीं चित्रें मनाला पुरविणें एवढेंच कांहीं या आंतर-सूक्ष्म-इंद्रियांचें काम नसतें. स्थूल इंद्रियांचा प्रांत फार मर्यादित असतो. या प्रांतापलीकडील प्रांतांतल्या वस्तूंचीं चित्रें आणि स्पंदनें; दुसऱ्या पातळ्यांवरील अर्थात् अस्तित्वाच्या स्थूल भौतिक अन्य भूमींवरील वस्तूंची चित्रें व स्पंदनें; दृष्टिगत, श्रवणगत, स्पर्शगत व इतर इंद्रियगत चित्रें व स्पंदनें सूक्ष्म आंतरपुरुषाला, जाणिवेला सूक्ष्म इंद्रियें पुरवूं शकतात. ही जी आंतर-पुरुषाची आंतर-इंद्रियशक्ति आहे ती वास्तव प्रतिमांप्रमाणें प्रतीकरूप प्रतिमाहि पुरवूं शकते. प्रतीकरूप देखावे, प्रतीकरूप आवाज ही इंद्रियशक्ति निर्माण करूं शकते. या प्रतीकांच्या द्वारां साकार होऊं शकणारीं रचनाचित्रें आणि दुसऱ्या माणसांच्या मनांतून येणाऱ्या सूचना, विचार, कल्पना, हेतू ती आम्हांला कळवूं शकते. तसेंच निसर्गांतील शक्तींची किंवा शक्यतांची चित्रेंहि ती आपल्या जाणिवेला पुरवूं शकते. ही इंद्रियशक्ति जें पाहूं शकत नाहीं वा चितारूं शकत नाहीं असें कांहीं नाहींच म्हटलें तरी चालेल. दूर-विचार-वाहन, दूरदर्शन, सूक्ष्मदर्शन, दिव्यदृष्टि आणि इतर असामान्य शक्ती वस्तुत: आंतर तलवर्ती पुरुषाच्या ठिकाणीं असतात; बाह्य मनाच्या ठिकाणीं असत नाहींत. बाह्य जाणिवेंत या शक्ती केव्हां केव्हां दिसतात, याचें कारण, आमच्या बाह्य व्यक्तित्वानें (अहम्नें) अस्तित्वाचे आंतर आणि बाह्य असे दोन भाग पाडणारी जी भिंत उभी केली आहे त्या भिंतीला चिरा असतात; किंवा कांहीं कारणानें चिरा पडतात आणि या चिरांतून आंतरजाणिवेच्या खास शक्ती बाहेरच्या जाणिवेंत प्रकट होतात हें आहे. आंतर तलवर्ती जाणिवेंतील गुंतागुंत वरील प्रकारची
पान क्र. ४२३
असल्यानें या जाणिवेच्या ऐंद्रिय संवेदना आणि चित्रसंभार आम्हांला गोंधळांत पाडणारा आणि चुकीच्या मार्गानें नेणारा होऊं शकतो -- विशेषत: या संवेदनांचा आणि चित्रांचा अर्थ जेव्हां आमचें बाह्य मन लावू पाहतें, तेव्हां आमचा गोंधळ निश्चितपणें अटळ होतो. कारण या आंतर तलवर्ती पुरुषाच्या व्यापार-व्यवहारांच्या रहस्याचें ज्ञान बाह्य मनाला नसतें; तेथें ज्या प्रतीकरूप रचना केल्या जातात, त्यांची भाषा बाह्य मनाला ''परकी'' असते. आमच्या ठिकाणीं आंतर सहज ज्ञानाची शक्ति आणि विवेचक शक्ति मोठ्या प्रमाणांत असेल, तरच आंतर तलवर्ती जाणिवेनें उभ्या केलेल्या प्रतिमा व अनुभव यांचा आम्हांला योग्य अर्थ लावतां येईल, आणि त्यांचा बरेबाईटपणा निर्णीत करतां येईल. तें कसेंहि असलें, तरी आंतर जाणिवेनें ज्या प्रतिमा आणि जे अनुभव आमच्या समोर ठेवलेले असतात, त्यांनीं आमच्या ज्ञानाचें क्षेत्र खूप मोठें होतें; आमच्या ज्ञानाच्य मर्यादा खूप लांबरुंद होतात. भौतिक बाह्य इंद्रियांनीं आमची बाह्य भौतिक जाणीव बांधली गेल्यानें ती अगदी लहानशा क्षेत्रांत कोंडली जाते; पण आंतर तलवर्ती मनाची आम्हांला मदत झाल्यास तशी तिची अवस्था राहूं शकत नाहीं.
तलवर्ती आंतर जाणिवेची वरच्याहून अधिक महत्त्वाची एक शक्ति ही आहे कीं, या जाणिवेला दुसऱ्यांच्या जाणिवेशीं प्रत्यक्ष संबंध स्थापित करतां येतो. वस्तूंशींहि असा संबंध स्थापित करतां येतो; कोणतेंहि वेगळें साधन वापरावें न लागतां, आपल्या स्वत:च्या घटकद्रव्यांत स्वभावत: असलेल्या शक्तींनीं आपलें काम उरकतां येतें. वस्तूंचें प्रत्यक्ष मानसिक दर्शन, वस्तूंचा प्रत्यक्ष मानसिक स्पर्श तिला घडत असतो. वस्तूला बाहेरून सर्व बाजूंनीं अगदीं जवळून व्यापून आणि तिच्या पोटांत जिव्हारीं शिरून, तिच्यांतील अंतर्गत गोष्टी आपल्या अधीन करून घेऊन परतणें, हें कार्य ही आंतरजाणीव करूं शकते. कोणत्याहि मनाच्या घटकद्रव्यावर प्रत्यक्ष आघात करून त्यांतील गोष्टी बाह्य चिन्हांच्या मदतीशिवाय ती जाणूं शकते. याप्रमाणें कोणत्याहि मनांतील विचार, भावना, शक्ती तिला अवगत होऊं शकतात. याप्रमाणें आपल्या स्वभावगत साधनांनीं व्यक्तींचें, वस्तूंचें, निसर्गांतील गुप्त शक्तींचें प्रत्यक्ष ज्ञान -- अगदीं आंतूनचें व निर्दोष बिनचूक ज्ञान -- हा तलवर्ती पुरुष मिळवूं शकतो. निसर्गांतील गुप्त शक्ती आमच्या सर्व बाजूंनीं वावरत असून आमचें व्यक्तित्व, आमचें शरीर, आमच्या मनाची शक्ति, आमची प्राणशक्ति या
पान क्र. ४२४
सर्वांवर त्या निसर्गांतील गुप्त शक्तींचा परिणामकारक मारा होत असतो. आमच्या पृष्ठवर्ती मनामध्यें केव्हां केव्हां अशी जाणिवेची प्रतीति येते कीं, जिला दुसऱ्यांच्या विचारांची चाहूल लागते किंवा त्यांचें स्पष्ट ज्ञान होतें. दुसऱ्यांच्या मनांतील प्रतिक्रिया जिला स्पष्ट, अस्पष्ट दिसतात, तसेंच इंद्रियांच्या मदतीशिवाय वस्तूंचें आणि व घटनांचें जिला ज्ञान होतें किंवा जी यांसारख्या दुसऱ्या असामान्य शक्ती दाखविते -- पण या सर्व शक्ती या बाह्य जाणिवेच्या ठिकाणीं अस्पष्ट असतात, प्राथमिक स्वरूपांत असतात आणि त्याहि क्वचित् प्रसंगींच दाखविल्या जातात. या शक्ती स्वभावत: आमच्या गुप्त तलवर्ती आत्म्याच्या आहेत -- आत्म्याच्या त्या क्रिया किंवा शक्ती वर पृष्ठावर येतात तेव्हां त्या बाह्य जाणिवेच्या म्हणून भासतात. तलवर्ती पुरुषाचे हे व्यापार जे पृष्ठावर येतात ते किंवा त्यांतील जे कांहीं सध्यां तपासले जात आहेत, त्यांना कोणी आध्यात्मिक घटना म्हणतात. पण खरा आत्मा आणि हा तलवर्ती आत्मा एक नाहींत. खरा आंतरात्मा वेगळा आणि हा आंतरपुरुष वेगळा. खरा आंतरात्मा आमच्या अंतरांत सर्वातं खोल ठिकाणीं असतो. हा आंतर तलवर्ती म्हटला जाणारा पुरुष आंतरमन, प्राण, सूक्ष्म भौतिक देह यांचा बनलेला असतो. आंतरतम आत्मा (आंतरात्मा), आंतर-आत्मा (सूक्ष्म मन, प्राण, शरीर) आणि बाह्य-आत्मा (स्थूल मन, प्राण, शरीर) अशी आमच्या आत्म्याची विविध व्यवस्था आहे. आंतर-आत्म्याचें जें संशोधन चालूं आहे, त्याला निर्णायक फळें येत नाहींत; आणि त्यांचें प्रमाणहि अल्पच असतें. कारण संशोधनाच्या पद्धती, प्रयोगाच्या पद्धती आणि पुराव्याच्या पद्धती बाह्य मनाला आणि त्याच्या ज्ञान-व्यवस्थेला, म्हणजे अप्रत्यक्ष संपर्कानें मिळणाऱ्या; त्याच्या ज्ञान-संभाराला, ज्या परिचयाच्या व यथोचित आहेत त्याच आंतरपुरुषाच्या व्यवहारांना लावण्यांत येतात, जेथें त्या उचित नाहींत. अर्थात् आंतरमनाच्या जेवढ्या दूरदर्शनादि हालचाली बाह्य मनांत प्रकट होऊं शकतात तेवढ्याच, या परिस्थितींत तपासल्या जाऊं शकतात. या बाह्य मनाला त्या नेहमींच्या नसून अपवादात्मक असतात, सामान्याहून वेगळ्या असतात; आणि म्हणून तौलनिक दृष्टीनें विरळा घडणाऱ्या, अपुऱ्या व समजावयास अवघड अशा त्या असतात. ज्या आंतरजाणिवेला या हालचाली सामान्य, स्वाभाविक असतात त्या जाणिवेला दूर ठेवणारी भिंत जी बाह्य मनानें उभी केली आहे ती भिंत
पान क्र. ४२५
काढून, पाडून टाकली किंवा आम्ही आंत सहज मोकळेपणें जाऊं शकलों, तेथें मोकळेपणें राहूं शकलों, तरच ज्ञानाचें हें आंतरक्षेत्र आम्हांला सकारण समजूं शकेल; त्याला आमच्या एकंदर जाणिवेचा भाग बनवितां येईल आणि आमच्या प्रकृतीच्या जागृत शक्तीच्या कार्यक्षेत्रांत या आंतरक्षेत्राचा समावेश करून घेतां येईल.
आमच्या बाह्य पृष्ठवर्ती मनाला दुसऱ्या माणसांसंबंधींचें ज्ञान देखील प्रत्यक्ष साधनांनीं होऊं शकत नाहीं. आमच्याच जातीचे प्राणी, आमच्या सारखीच मनाची अवस्था त्यांजमध्यें आहे; त्यांचा आमचा प्राणमय पिंड, शरीर पिंड एकाच नमुन्याबरहुकूम बनविलेला आहे; असें असून देखील या आमच्या मानवबंधूंची ओळख करून घेण्यास आमच्या बाह्य मनापाशीं प्रत्यक्ष साधन नाहीं. मानवी मनाचें आणि शरीराचें सर्वसाधारण ज्ञान आम्हांला करून घेतां येतें आणि हें ज्ञान आम्ही दुसऱ्या मानवांच्या बाबतींत उपयोगांत आणतो. माणसाच्या आंत चालणाऱ्या हालचालींच्या निदर्शक अशा नेहमींच्या बाह्य खुणा आमच्या परिचयाच्या असतात; त्यांचाहि आम्ही दुसऱ्या माणसांसंबंधींचें ज्ञान करून घेण्यासाठीं उपयोग करतो. शिवाय विशिष्ट माणसाच्या वैयक्तिक स्वभावाची आणि संवयींची आम्हांला माहिती असते, तीहि त्याच्या बाबतींत आम्हांला उपयोगी पडते -- शिवाय आमचें स्वत:संबंधीचें जें ज्ञान आम्हांला असतें, त्याचाहि न कळत, सहज प्रेरणेनें, दुसऱ्या माणसांची मन:स्थिति समजून घेण्यासाठीं, त्यांजविषयीं बरावाईट निर्णय घेण्यासाठीं व दुसऱ्यांचें बोलणें, वागणें यांजवरून त्यांच्यासंबधीं अनुमान बसविण्यासाठीं आम्ही उपयोग करीत असतो. सूक्ष्म आंतरनिरीक्षण, सहानुभूतीची आंतर्दृष्टि याहि गोष्टी आम्हांला दुसऱ्या माणसांसंबंधीं ज्ञान करून घेण्यास उपयोगी पडतात. पण या सर्व प्रकारांनीं इतरांविषयींचें ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न केला, तरी त्या प्रयत्नाचें फळ फारसें समाधानकारक असत नाहीं. आम्हीं या पद्धतींनीं मिळविलेलें ज्ञान अपुरें असतें, फसवेंहि असूं शकतें; आम्ही अनुमानें रचतो, तीं जितकीं बरोबर तितकीं चुकीचींहि असतात. बाह्य खुणांवरून आम्हीं आंतर स्थितीचा जो अर्थ लावतो तो अजमास असतो व तोहि चुकूं शकतो. आमचें सामान्य ज्ञान, आमचें आत्मज्ञान आम्ही उपयोगांत आणतो तेंहि, व्यक्तींव्यक्तींच्या स्वभावांत, संवयींत वगैरे जें अंतर असतें त्या अंतरामुळें बरोबर काम देत नाहीं; चुकीचें निर्णय करवितें. आमची आंतरदृष्टि अविश्वसनीय
पान क्र. ४२६
असते, ती निश्चित ज्ञान देणारी नसतें -- म्हणून वर सांगितल्याप्रमाणें या सर्व प्रकारांचा उपयोग करूनहि आम्हांला पुरेसें ज्ञान मिळवितां येत नाहीं व जें मिळवितां येतें तें फसवें असूं शकतें. ही अशी स्थिति असल्यानें मानवी प्राणी एकमेकांना परके असावेत असे ते वागतात -- त्यांना एकत्र बांधावयास, थोडीशी अन्योन्यविषयक सहानुभूति आणि थोडासा अन्योन्यांचा अन्योन्यांना येणारा अनुभव येवढाच काय तो आमच्याजवळ असतो; अगदीं आमच्या जवळचीं जीं माणसें असतात, त्यांच्याविषयींहि आम्हांला पुरेसें ज्ञान नसतें; एवढेंच काय, आम्ही स्वतःला सुद्धां फारसे ओळखीत नाहीं -- आणि साहजिकच जितके आम्ही स्वतःला ओळखतो तितके कांहीं दुसऱ्यांना आम्ही ओळखूं शकत नाहीं. अशी आमच्या बाह्य जाणिवेची स्थिति आहे. आंतर तलवर्ती जाणिवेची गोष्ट अगदीं निराळी आहे. तेथें आमच्या सभोंवार जे विचार, ज्या भावना वावरतात त्या प्रत्यक्ष कळणें शक्य असतें. त्यांचा आम्हांला घडलेला संपर्क आम्हांला स्पष्ट कळतो. त्यांच्या हालचाली आम्हांला स्पष्ट दिसूं शकतात. तेथे मन, हृदय वाचणें, त्यांत काय चाललें आहे तें ओळखणें हें बाहेरच्या मनापेक्षां कमी कठीण असतें; अधिक निश्चित असतें. एकत्र मिळणारे, एकत्र राहणारे जे कोणी असतात, त्यांच्यामध्यें मानसिक, प्राणिक, सूक्ष्म दैहिक विचारादि विनिमय सारखा होत असतो -- हा विनिमय होत आहे हें त्यांचें त्यांना माहीत होत नाहीं -- भाषण, कृति, बाह्यस्पर्श यांच्याद्वारां नित्य चाललेला विचारादि विनिमय त्यांना काय कळेल तेवढाच. सूक्ष्मपणें, अदृश्यपणें भेटणाऱ्या किंवा एकत्र राहणाऱ्यांमध्यें विचारादि विनिमय सारखा होत असतो. आंतर मन, प्राण, सूक्ष्म देह यांचा परस्पर क्रियाविनिमय जो होतो तो आंतर- मनाच्या, प्राणाच्या, शरीराच्याद्वारां बाहेरच्या मन-प्राण-शरीराला प्रतीत होतो आणि नंतर भाषणादि द्वारां इतरांना प्रतीत होतो. पण या आंतरमन-प्राण-शरीरांत आम्हीं जाणिवेनें हिंडू फिरूं लागलो, म्हणजे हा सारखा चाललेला आंतरविचारादि विनिमय, विचारादिकांचें संमिश्रण आम्हांला आमच्या अंतरांत ताबडतोब प्रतीत होतें. याचा परिणाम असा होतो कीं, आमच्यावर इतरांकडून जे विचारादि आघात होतात त्यांची गुलामी, न जाणतां, आम्हांला करावी लागत नाहीं; नको असलेल्या विचारांपासून वगैरे आम्हीं आमचें संरक्षण करूं शकतो. हवे असलेले विचार घेऊं शकतो; नको असलेलें दूर ठेवूं शकतो. तसेंच, दुसऱ्याला
पान क्र. ४२७
नुकसान पोंचेल असें कृत्य न जाणतां किंवा अनिच्छेनें, आमच्या हांतून घडू शकत नाहीं. दुसऱ्यांची गरज जाणून त्यांना मदत होईल असें काम आम्हांला करतां येतें. दुसऱ्यांना आमचे चांगले विचार, भावना देतां येतात. त्यांची सोय होईल असे आम्हांला वागतां येतें; त्यांचें आमचें आंतरऐक्य घडवून आणतां येतें. आंतरज्ञानाच्या अभावीं आज आम्हां मानवांची, बाह्यत: राहण्याची व्यवस्था एकत्र असून, आमच्यांत मनाची विभक्तता असते. एकमेकांची सहकारिता मर्यादित असते. एकमेकांचे एकमेकांविषयीं अनेक गैरसमज असतात. एकमेकांच्या वागण्याचा भलताच अर्थ आम्हीं करीत असतो आणि फलत: एकमेकांशी आम्हीं वागतो त्या रीती चुकीच्या असतात.
माणसामाणसांमधील ऐक्यांत वाढ होण्याच्या कामीं आंतर तलवर्ती पुरुषाची जाणीव जशी फार उपयुक्त होऊं शकते, तशी ती आमच्या सभोंवार ज्या विश्वशक्ती व्यक्तिनिरपेक्षतेनें, व्यक्तित्वशून्य सर्वसमानतेनें काम करीत असतात, त्यांच्याशीं आमचा होणारा व्यवहार सांप्रतच्या स्वरूपाहून वेगळ्या स्वरूपाचा होण्याच्या कामी फार उपयोगी पडते, पडूं शकते. विश्वशक्तींशीं घडणाऱ्या व्यवहारांतील बदल आणि माणसामाणसांतील व्यवहारांत घडणारा बदल हे सारखेच महत्त्वाचे आहेत. विश्वशक्ती त्यांच्या दृश्य कार्यावरून, त्यांच्या दृश्य परिणामांवरून आम्ही ओळखतो. आमची बाह्य जाणीव अधिक कांहीं जाणूं शकत नाहीं. विश्वशक्तींपैकीं भौतिक शक्ती कांहीं कांहींशा आमच्या थोड्याबहुत परिचयाच्या होतात. अदृश्य मानसिक शक्ती, अदृश्य प्राणिक शक्ती या ज्या विश्वशक्ती आहेत, त्यांचें अस्तित्वदेखील आम्हांला ज्ञात नसतें; पण त्यांचा आमच्या सभोंवार सारखा नाच चाललेला असतो. हा नाच आंतरपुरुषाची जाणीव आमच्या नजरेस आणूं शकते, आमच्या परिचयाचा करूं शकते; तिला हा नाच प्रत्यक्ष संपर्कानें माहीत होतो; अंतर्दृष्टि, आत्मिक संवेदना हा नाच तिला परिचयाचा करून देतात. तिला याप्रमाणें परिचित झालेला विश्वशक्तींचा पिंगा ती आम्हांला सर्व माहीत करून देऊं शकेल. सांप्रत, केवळ कांहीं सूचना वगैरे बाहेरच्या जाणिवेला ती देऊं शकते; या सूचनांचा वगैरे अर्थ आम्हांला नीट कळत नाहीं. आंतून प्रसंगीं सावधगिरीच्या सूचना येतात, अमुक घडेल असें वाटूं लागतें, कसलें तरी आकर्षण उत्पन्न होतें, कसली तरी घृणा उत्पन्न होते, कांहीं अनपेक्षित कल्पना मनांत येतात, कांहीं
पान क्र. ४२८
अंधुक स्फूर्ति होते, अमुक करावें अशी टोंचणी आंतून होते; अशा या अंतर्गत हालचाली बाहेरच्या वक्रमार्गी जाणिवेपर्यंत अधूनमधून अर्धवटपणें पोंचतात. आंतरजाणिवेच्या क्षेत्रांत आम्ही प्रत्यक्ष उतरूं शकत नाहीं तोंवर यापेक्षां अधिक ज्ञान आमच्या (बाह्य) जाणिवेला होऊं शकत नाहीं. आंतरजाणिवेंत आपण उतरलो म्हणजे सर्वच बदलतें. विश्वशक्तींचा निकटचा हेतु आणि हालचाल या जाणिवेला प्रत्यक्ष दिसतात. या हालचालींचे दूरचे परिणामहि तिला दिसतात. एवढेंच नव्हे, तर या विश्वशक्तींचें भावी कार्य, अमुक वेळेला अमुक होईल असें कांहीं प्रमाणांत, अगोदर या आंतर जाणिवेला वर्तवितां येतें. कालाची बंदी मोडून, पुढें होणाऱ्या घटनांचे स्पंद, कालाच्या दूर अंतरावर होणाऱ्या घटनांचें स्पंद, ही आंतरवाणी अगोदर जाणूं शकते; भविष्यांत ती डोकावूं शकते. तेथें काय ठरलें आहे तें आत्मसात् करूं शकते. अर्थात् हें ज्ञान अगदीं पूर्ण नसतें. ज्ञान-अज्ञान असें मिश्रण या ज्ञानांत असतें. आंतर जाणीव कांहीं तादात्म्यानें ज्ञान मिळवीत नाहीं, (तादात्म्यानें मिळविलेलें ज्ञान पूर्ण आणि पूर्णत: यथार्थ असतें) तर प्रत्यक्ष संपर्कानें मिळवितें. हें ज्ञान भेद-अधिष्ठित असल्यानें तिला जसें यथार्थ वस्तुग्रहण करतां येतें, तसें अयथार्थ ग्रहणहि तिजकडून होतें. अर्थात् बाझ प्रकृतीला जितकें यथार्थ ज्ञान मिळवितां येते, त्यापेक्षां आंतरप्रकृतीला भेद-अधिष्ठित ज्ञानहि अधिक यथार्थ मिळवितां येतें. आंतर मानसिक आणि प्राणिक प्रकृति ही ज्ञान-अज्ञानाची मिश्र पात्रता बाळगते; यामुळें आंतरजाणिवेंत अधिक ज्ञानाबरोबर अधिक अज्ञानहि मिळविते. हा जो आंतरप्रकृतीचा मिश्रपणाचा दोष, तो दूर करण्याचा उपाय म्हणजे अधिक आंत, अधिक खोल जाऊन, वैयक्तिक प्राण-शरीराचा आधार जो आंतरात्मा, चैत्य पुरुष, त्याचा आश्रय करणें हा आहे. हा आंतरात्मा तलवर्ती मन-प्राण-शरीराधिष्ठात्मा, आंतर आत्म्याच्या पाठीमागें असतो, खालीं असतो, सर्वांत खोल जागीं असतो. आमच्या ठिकाणीं आत्म-व्यक्ति विकासक्रमांत खोल जागीं तयार होऊन क्रियाशील होत आहे. आमच्या बाह्य मन-प्राण-शरीरासाठीं या आंतील आत्मव्यक्तीचा प्रतिनिधि आमच्या बाह्य प्रकृतींतहि विकसित झाला आहे. खोल जागीं असलेल्या आत्मव्यक्तीनेंच हा आपला सूक्ष्म प्रतिनिधि बाह्य प्रकृतींत धाडला आहे. पण हा बाह्य प्रकृतींतील सूक्ष्म आत्मा बाह्य मन-प्राण-शरीरावर आपल्या प्रकटीकरणासाठीं अवलंबून असतो. तो आमच्या बाह्य क्रियांचा, विचारांचा पूर्ण स्वामी नसतो. त्याला पराभूत करून मन आणि प्राण
पान क्र. ४२९
कित्येक प्रसंगीं, बहुतेक प्रसंगीं आपलीच इच्छा अंमलांत आणतात. त्याच्या मार्गदर्शनाला कांहीं किंमत देत नाहीत. मात्र हा सूक्ष्म आत्मप्रतिनिधि, आपल्या मूळ गुप्तरूप, स्वामीरूप महान् आत्मव्यक्तीशीं सारखा जोडलेला राहूं शकला, म्हणजे त्याचें परावलंबित्व संपतें. आम्ही तलवर्ती आंतर आत्म्यांत खोल शिरून, त्याच्या पलीकडे असलेल्या विशाल आत्म्याशीं आमच्या सूक्ष्म आत्म्याची गांठ घालून देऊन, ही नित्य सहचारिता उत्पन्न करूं शकतो. आमचा बाह्य प्रकृतींतील सूक्ष्म आत्मा, त्याच्या खऱ्या असलेल्या स्वरूपाशी, आंतरात्म्याशीं नित्याचा जोडला गेला, म्हणजे त्याचें सामर्थ्य वाढतें; तो खरा स्वामी होतो. वस्तुजाताचें आत्मिक सत्य त्याला स्वाभाविक आत्मदृष्टीनें दिसतें. त्याला स्वाभाविक पूर्ण विवेचकशक्ति येते. अज्ञान आणि अचेतनता यांनीं निर्मिलेल्या असत्य घटनांपासून सत्य घटना त्याला अलग करतां येतात. आविष्काराच्या क्षेत्रांत खरें दिव्यत्व कोठें आहे, त्याचा अभाव व अदिव्यत्व कोठें आहे, हें त्याला स्पष्ट कळतें; आणि या ज्ञानाच्या आधारें तो आपल्या इतर अंगांचा खरा मार्गदर्शक होऊं शकतो, ज्ञानी नेता होऊं शकतो. हें घडून आलें, म्हणजे आमच्या प्रकृतीचें पूर्ण रूपान्तर घडविणें आणि पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेणें, हें जें आमचें उद्दिष्ट, हें जें निसर्गाचें उद्दिष्ट, हें जें विकास-योजनेचें उद्दिष्ट, त्याच्या दिशेनें मार्गक्रमण करण्यास आम्हीं सुरुवात केली असें म्हणतां येईल. आंतर जाणिवेचे गतिमान नियत व्यापार आणि तिची व्यवहारोपयोगी मूल्यें, वर सांगितल्याप्रमाणें आहेत; आम्हीं सध्यां जी तपासणी चालविली आहे, तिच्या दृष्टीनें हें आम्हांला पहावयाचें आहे कीं, या जाणिवेचा जो ज्ञानमार्गी कृतिमार्ग आहे, त्यावरून या विशाल आणि सखोल (बाह्य जाणिवेच्या तुलनेनें) जाणिवेचें खरें स्वरूप काय दिसतें आणि खऱ्या ज्ञानाशीं तिचा काय संबंध दिसतो या जाणिवेचा विषयाशीं किंवा अन्य जाणिवेशीं, प्रत्यक्ष संपर्क येतो व त्या प्रत्यक्ष संपर्कानें या जाणिवेला त्या विषयाचें (वस्तूंचें) किंवा दुसऱ्या जाणिवेचें ज्ञान होतें; हें या जाणिवेचें व तिच्या पदरांत पडणाऱ्या ज्ञानाचें प्रधान स्वरूप, आमच्या नजरेस येतें; आंतर जाणिवेची ही ज्ञानार्जनशक्ति, तादात्म्याधिष्ठित गुप्त ज्ञानाची परिणामरूप आहे. एकता, अभेद, तादात्म्य या सत्यावर मूळ ज्ञान अधिष्ठित असतें. आंतरजाणिवेला जें ज्ञान मिळतें, तें एकतेच्या, अभेदाच्या तादात्म्याच्या द्वारां मिळत नाहीं; तर भेदाच्या द्वारां मिळतें. संपर्क प्रत्यक्ष असो, अप्रत्यक्ष असो, त्यांत
पान क्र. ४३०
भेद अनिवार्य आहे. प्रत्यक्ष संपर्कांत जो जाणीव-जाणीव यांचा भेद असतो, जाणीव-वस्तु यांचा भेद असतो, तो फार थोडा असतो इतकेंच. आमची सामान्य जाणीव अप्रत्यक्ष संपर्कानें ज्ञान मिळवितें; आमचा जीव आणि त्याच्या बाहेरचें अस्तित्व यांचें एकत्र मीलन होतें, किंवा संघर्ष होतो आणि या मीलनानें किंवा संघर्षणानें ज्ञानाची ठिणगी आमच्या जाणिवेच्या ठिकाणीं उत्पन्न होते; ही बाह्य जाणिवेची ज्ञानपद्धति; आंतर जाणिवेलाहि थोड्याशा संपर्काची आवश्यकता असते. हा संपर्क लाभला म्हणजे, पूर्वींच तयार असलेलें गुप्त ज्ञान गतिमान् होतें आणि पृष्ठाकडे, आंतर जाणिवेकडे येतें; कारण जाणीव इथून तिथून एक आहे. ज्ञाता आणि ज्ञेय दोहोंमध्यें एक जाणीव अखंडपणें आहे. एका अस्तित्वाचा दुसऱ्या अस्तित्वाशीं संपर्क झाला कीं, मूळ जी जाणिवेची एकता असते, ती एका ज्ञात्या आत्म्याचें ज्ञान जागृत करते, प्रकट करते. बाह्य जाणिवेंत आणि आंतर जाणिवेंत भेद इतकाच कीं, बाह्य जाणिवेला अखंड जाणिवेंतील नित्य पूर्वोपस्थित ज्ञान साधनांच्या द्वारां अप्रत्यक्षपणें मिळवावें लागतें आणि आंतर जाणिवेला बाह्य जाणिवेसारखीं साधनें लागत नाहींत; ती जाणीव स्वत: सर्व प्रत्यक्ष पाहाते. ती आंतून सर्व ज्ञान मिळविते; जणुं स्मृतींत सांठविलेलें ती बाहेर काढते; ती आंतरजाणीव अंतःस्फूर्तियुक्त असेल तर तिला स्वयंप्रमाण स्वयंसिद्ध म्हणून ज्ञान मिळतें; वस्तुसंपर्कानें वस्तूचें ज्ञान तिला मिळतें तेंहि वस्तु अगदीं आंतून तिच्या ओळखीची असल्याप्रमाणें वस्तुसंपर्क घडतांक्षणींच वस्तुज्ञान तिला प्राप्त होतें. पृष्ठवर्ती जाणिवेंत ज्ञान जें असतें तें, बाहेरच्या संचयाचें, बाहेरून आलेलें अशा स्वरूपाचें दिसतें. वस्तू बाहेर असते आणि ती वस्तु स्वतःविषयीचें ज्ञान आमच्याकडे फेंकते, असा देखावा आमच्या बाह्य जाणिवेच्या ज्ञानाचा असतो; इंद्रियाला वस्तूचा स्पर्श होऊन त्या स्पर्शाला उत्तर म्हणून जी प्रतिक्रिया जाणिवेंत होते, तें आमचें बाह्य ज्ञान, असेंहि म्हणतां येतें. वस्तु बाहेर 'वस्तु' म्हणून असते आणि तिचें मनानें इंद्रियांच्या आधारें काढलेलें चित्र म्हणजे बाह्य जाणिवेचें ज्ञान, असेंहि आमच्या ज्ञानाचें वर्णन करतां येईल. आमच्या पृष्ठवर्ती मनाला, आपल्या ज्ञानाचें अशा प्रकारांनीं वर्णन करावें लागतें, याचें कारण असें आहे कीं, मन आणि बाहेरचें जग यांच्यामध्यें भिंत आहे व या भिंतींत इंद्रियरूपी दरवाजे आहेत. या दरवाज्यांच्या द्वारां बाहेरच्या वस्तूंचा पृष्ठभाग मनाला दिसतो; त्या वस्तूंच्या पोटांतलें कांहीं दिसत नाहीं. दुसरी गोष्ट,
पान क्र. ४३१
बाह्य मनाच्या आंत त्याचेंच जें आंतरस्वरूप आहे तें, आंतरमन आणि बाह्य मन यांच्यामध्यें जी भिंत आहे तिच्यांत कांहीं तयार दरवाजा नाहीं : अर्थात् आंतरमनांत काय आहे, तें बाह्य मनाला दिसत नाहीं. आंतून जें ज्ञान बाहेर येतें त्याची प्रक्रियाहि बाह्य मनाला कळत नाहीं, दिसत नाहीं; अशा परिस्थितींत बाह्य मनाला त्याला मिळणाऱ्या ज्ञानाचें कारण, बाह्य वस्तु -- त्याला दिसूं शकते ती बाह्य वस्तु -- आहे किंवा त्याचा पृष्ठभाग आहे, असेंच मानणें प्राप्त होतें. आमचें वस्तुजातासंबंधाचें मानसिक ज्ञान याप्रमाणें बाह्यवस्तुनिष्ठ, बाह्यवस्तुवश म्हणून आम्हांला दिसतें, बाहेरून आमच्या मनावर लादलेलें सत्य या स्वरूपाचें तें दिसतें; आमच्या अस्तित्वांत अंतर्भूत नसलेल्या 'कशाचें तरी प्रतिबिंब', चित्र, मनोमय लेखन हें या ज्ञानाचें स्वरूप दिसतें. वस्तुत: वस्तूचा स्पर्श झाल्यावर गुप्त आंतरजाणिवेकडून प्रतिक्रिया होते; ही आतील प्रतिक्रिया वस्तूच्या अंतरंगाचें ज्ञान आम्हांला (बाह्यजाणिवेला) पुरविते. (आमच्या विशाल आत्म्याचा एक घटक, हें कोणत्याहि वस्तूचें खरें स्वरूप असतें.) पण दुहेरी पडदा हें आंतून आलेलें ज्ञान विकृत करतो. आमचा अज्ञानग्रस्त बाह्य आत्मा आणि आमचा आंतरात्मा यांच्यामध्यें पडदा असतो आणि आमचा पृष्ठवर्ती बाह्य आत्मा आणि स्पर्शविषयक वस्तु यांच्यामध्येंहि पडदा असतो. या दुहेरी पडद्यामुळें आंतून निघालेलें अंतरंगज्ञान पृष्ठवर्ती जाणिवेच्या पटावर अर्धवट चित्राच्या स्वरूपांत उतरतें.
आंतरजाणीव बाहेरच्या जाणिवेशीं गुप्तपणें संलग्न आहे, आमचें ज्ञान गुप्त पद्धतीनें तयार होतें, ही गोष्ट बाह्य जाणिवेला, आमच्या सध्यांच्या मनाला स्पष्टपणें जाणवत नाहीं, त्याच्यापासून ती लपलेली आहे. आंतर तलवर्ती पुरुष व्यक्तित्वाच्या मर्यादा मोडून आणि बाह्य पृष्ठवर्ती मनाला बरोबर घेऊन, विश्वजाणिवेंत प्रवेश करतो, तेव्हां वरील गोष्ट (आंतरजाणीव बाह्य जाणिवेशी संलग्न आहे ही गोष्ट) आमच्या बाह्य मनाला स्पष्ट होते. आमच्या अस्तित्वाचे जे कोश (देह) आहेत, त्या कोशांमुळें आंतरपुरुष विश्वपुरुषापासून वेगळा झालेला आहे. आम्हांला सूक्ष्म मनोदेह, प्राणदेह आणि भौतिक देह आहेत. आमची बाह्य पृष्ठवर्ती प्रकृति आणि विश्वप्रकृति यांच्यामध्यें जशी स्थूल भौतिक कोशाची (देहाची) भिंत आहे, तशीच आमची आंतरप्रकृति आणि विश्वप्रकृति यांच्यामध्यें आंतरसूक्ष्म कोशांची (देहांची) भिंत आहे. मात्र ही चोहोंबाजूंनीं आंतर-पुरुषाला वेढणारी भिंत अधिक पारदर्शक आहे;
पान क्र. ४३२
ही खरी भिंत नसून कुंपणासारखी व्यवस्था आहे. या कुंपणासारख्या सूक्ष्म मन-प्राण-शरीरांच्या मर्यादा पार करून, सभोंवार बऱ्याच क्षेत्रावर पसरलेली जाणीव असलेली, व त्याची अंगभूत परिसरदर्शिनीचें काम करणारी अशी रचना या आंतरपुरुषाला असते. हें त्याचें परिसरव्यापी ज्ञानसमर्थ अंग, विश्वाचे संपर्क (आंतरपुरुषांत प्रवेश करूं इच्छिणारे विश्वसंपर्क) परिसरांत येतांच ग्रहण करतें आणि त्यांचा स्वत:च्या मुख्य शरीरांत (कुंपणांत) प्रवेश होण्यापूर्वीं त्यांची योग्य ती व्यवस्था करतें. हें आपलें परिसरज्ञ आत्मावरणरूप अंग आंतरपुरुष हवें तितकें लांबवर पसरूं शकतो. हवें तितकें मोठें करून सभोंवारच्या विश्वजीवनाच्या क्षेत्रांत अधिकाधिक दूरवर तें फेकूं शकतो. अशी एक परिस्थिति शेवटीं येऊं शकते कीं, जेव्हां विश्वरूप आणि आमचा आंतर पुरुष यांच्यामधील विभक्तता अजिबात नष्ट होते, आणि आंतरपुरुष विश्वपुरुषाशीं मिळून जातो, त्याच्याशीं तादात्म्य पावतो, स्वत: विश्वव्यापित्व भोगतो, सर्व अस्तित्वाशीं एकरूप होतो. विश्वपुरुषांत आणि विश्वप्रकृतींत मोकळेपणें आमचा आंतरपुरुष प्रवेश करूं लागला, म्हणजे आमच्या व्यक्ति-पुरुषाला महान् मुक्तीचा लाभ होतो, आमचा व्यक्तिपुरुष विश्वजाणीव संपादन करतो, विश्वजाणिवेचा स्वामी होतो, थोडक्यांत विश्वव्यक्ति होतो. या रूपांतराचें पहिलें फळ विश्वात्म्याचा साक्षात्कार हें असतें. विश्वांत भरून राहिलेला एकच एक आत्मा आम्हांला भेटतो; या भेटीनें, या ऐक्यानें आमचा व्यक्तित्वाचा भाव समूळ नाहींसा होऊं शकतो; आमचा अहं विश्वपुरुषांत विलीन होऊं शकतो. आमच्या रूपांतराचा दुसरा परिणाम असा होतो कीं, विश्वशक्ति आम्हांला सर्वस्वी आमची होते, आमचा आंतरपुरुष बाह्यपुरुषासह विश्वशक्तीचें मोकळें क्षेत्र बनतो : आमचें मन, आमचा प्राण, आमचें शरीर यांच्यामध्यें विश्वशक्ति काम करीत आहे, अशी प्रतीति आम्हांला येते; वैयक्तिक कार्याची भावना नष्ट होते. ही अंतिम फळें झालीं. सामान्यत: यापेक्षां कमी व्याप्तीचीं पुढील फळें आंतरपुरुषाच्या परिसरज्ञ अंगाच्या सारख्या वाढत्या व्यापाला आलेली पहावयास मिळतात. आम्हांला विश्वपुरुष आणि विश्वशक्ति यांची प्रत्यक्ष प्रतीति येते. विश्वमन आणि त्याच्या शक्ती या आमच्या मनाला अधिकाधिक प्रमाणांत खुल्या होतात. आमचें मन यांना अधिकाधिक प्रमाणांत खुले होतें. स्वत:च्या व्यक्तीची विश्वपुरुषाशी एकता झाल्याची कमी अधिक संवेदना
पान क्र. ४३३
स्वतःच्या जाणिवेंत विश्व समाविष्ट झाल्याची आणि विश्वात्म्याच्या जाणिवेंत स्वतःचा समावेश पूर्णतेनें झाल्याची प्रतीति, हे अनुभव, आमचें मन विश्वपुरुषाला, विश्वशक्तीला खुलें झाल्यानें, वारंवार येतात किंवा नित्याचे होतात. या गोष्टीचा परिणाम म्हणून दुसऱ्या जीवांशीं स्वतःच्या एकतेची आमची प्रतीति अधिक जोरदार होते. या सर्व घटनांमुळें, विश्वपुरुषाचें अस्तित्व हें निःसंदिग्ध सत्य आहे, हें आम्हांला कळतें, तें केवळ कल्पनेचें दृश्य रहात नाहीं.
विश्वपुरुषाची विश्वजाणीव तादात्म्यानें सर्व वस्तू जाणते. सर्वाचा आत्मा मी आहे, सर्व मी बनलों आहे, सर्व मजमध्यें आहे, सर्व प्रकृति माझ्या प्रकृतीचा भाग आहे -- अशा स्वरूपाचें विश्वपुरुषाचें ज्ञान आहे, असतें. त्याच्या पोटीं जें कांहीं आहे (आणि सर्व कांहीं त्याच्या पोटींच आहे) तें त्याच्याशीं एकरूप आहे आणि तो हें तादात्म्यद्वारां जाणतो आणि निकटचें, आपल्या पोटांतलें असेंहि या सर्वाचें ज्ञान त्याला असतें. सर्वांशीं एकरूप आणि सर्वांहून अधिक, प्रत्येक वस्तूशीं एकरूप आणि प्रत्येक वस्तूहून अधिक, अशी विश्वात्म्याची सर्वविषयक व वस्तूसंबंधाची जाणीव असते; वस्तूशीं एकरूप असल्यानें त्या वस्तूचें पूर्ण ज्ञान विश्वात्म्याला असतें. वस्तूहून विश्वात्मा अधिक असल्यानें, तो वस्तूला स्वतःच्या पोटांत स्थान देतो आणि त्या वस्तूच्या पोटांत स्वत: स्थान घेतो. अर्थात् त्या वस्तूचें आंतून बाहेरून सर्व प्रकारचें ज्ञान त्याला असतें. सर्व वस्तूंच्या संबंधांत विश्वात्म्याचें ज्ञान -- वरील प्रकारचें, एकरूपतेनें, बाह्य व्याप्तीनें व आंतरव्याप्तीनें मिळालेलें असें, -- सर्वथा पूर्ण असतें. विश्वात्मा सर्वांच्या पोटीं असतो, प्रत्येकाच्या पोटींहि असतो, आणि सर्वापेक्षां तो मोठा असतो; अर्थात् त्याचें जें आत्मदर्शन आणि विश्वदर्शन असतें, त्यांत त्याला भेद-शक्ति, विभक्ततेची शक्ति असते, जी मुळें तो, त्याची जाणीवशक्ति कोणत्याहि वस्तूच्या किंवा जीवाच्या पोटीं कोंडली जाऊं शकत नाहीं. या वस्तूंच्या व जीवांच्या ठिकाणीं, सर्वव्यापी आत्मा आणि सर्वव्यापी आत्मशक्ति या स्वरूपांत तो, त्याची विश्वजाणीव राहते; जें कांहीं व्यक्तित्वकरण घडतें तें त्या त्या वस्तूपुरतें, त्या त्या जीवांपुरतें घडतें; विश्वात्म्याला या व्यक्तित्वाचें बंधन असत नाहीं. तो प्रत्येक वस्तु बनतो, पण त्यामुळें, त्याचें सर्वसमावेशक विशाल अस्तित्व कमी होत नाहीं. महान् विश्वव्यापी एकता, एकरूपता (विश्वरूपता) आणि या महान् एकतेच्या, एकरूपतेच्या पोटीं
पान क्र. ४३४
लहान, लहान अनेक एकता, अगण्य एकरूपता अशी विश्वात्म्याची एकरूपतेची तादात्म्याची गोष्ट आहे : विश्वजाणिवेंत भेदनिष्ठ ज्ञान जें जें असतें किंवा प्रविष्ट होतें तें तें या दुहेरी तादात्म्यावर आधारलेलें असतें; या दुहेरी एकतेला तें विसंवादी असत नाहीं. कांहीं प्रसंगानें कोणत्याहि वस्तूपासून अलग होऊन संपर्कानें तिचें ज्ञान मिळविण्याची विश्वात्म्याला, किंवा विश्वात्म्यांत प्रविष्ट झालेल्या आत्म्याला, गरज उत्पन्न झाली, तर तें अलग होणें व संपर्क करणें हें कार्य, मूळ महान् वा लहान एकात्मता, एकरूपता कायम ठेवून होत असतें; कारण कोणत्याहि व्याप्तीच्या वस्तूच्या पोटांत जी वस्तु असते ती (पोटांतील वस्तु) त्या महान् वस्तूच्या आत्म्याचा एक भाग असते, त्याशीं एकरूप असते.
विश्वमय जाणिवेंतील भेदज्ञान, अभेदज्ञानावर उभें राहतें. विश्वमय जाणीवच स्वत: तिच्या पोटांतील प्रत्येक वस्तु बनत असल्यामुळें विश्वजाणिवेच्या पोटांत अनेक वस्तुमय जाणिवा असतात. अर्थात् महान् विश्वमय जाणीव हें अभेदज्ञान असतें. त्याप्रमाणें लहान वस्तुमय जाणीव हेंहि अभेदज्ञान असतें. विश्वमय जाणिवेंत लहानमोठ्या भेदज्ञानाची गरज पडते तेव्हां, अभेदज्ञान कायम राखून भेदज्ञान आपलें काम करते. भेदज्ञान आणि अभेदज्ञान समकालीन असतात. दोन्हीं ज्ञानें सारख्या तोलाचीं असतात. कांहीं कारणानें भेदमयत्व, अधिक तीव्र करावयाचें झालें, तर मात्र अभेदज्ञान मागें पडतें; स्वतःला पडद्याआड ठेवून, स्वतःपेक्षां कमी योग्यतेचें प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असें भेदनिष्ठ ज्ञान तें पुढें करतें. हें पुढें केलेलें भेदज्ञान स्वतःच्या उगमाला (अभेदाला) पारखें असतें; तरीपण नेहमी हा अभेदसागरच आपल्या पृष्ठभागावर, प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष, ज्ञानाच्या लहरी किंवा शिंतोडे उत्पन्न करीत असतो, ही गोष्ट विसरूं नये.
विश्वात्म्याच्या विश्वजाणिवेची व तिच्यांतील भेदाभेदांची ही गोष्ट झाली. आतां त्याच्या विश्वशक्तींच्या कार्याच्या बाबतींत काय स्थिति असते तें पाहूं : या विश्वशक्ती प्रवाहांच्या, लाटांच्या, संघांच्या हालचाली करतात; या हालचालींत जीव, जड पदार्थ बनविणें, मोडणें, पुन्हां बनविणें हा त्यांचा व्यापार अखंडपणें चाललेला असतो; अनेक घटना, अनेक आंदोलनें या विश्वशक्तींच्या हालचालींत घडत असतात, विघटित होत असतात, पुन्हां सुघटित होत असतात. जीव, पदार्थ, घटना, आंदोलनें आदिक या सर्व गोष्टींतून विश्वशक्ती शिरत असतात; त्यांतून
पान क्र. ४३५
मार्ग काढून बाहेर जात असतात, त्यांत स्वतःच्या कांहीं रचना करीत असतात, त्यांतून दुसऱ्या जीवांवर व पदार्थांवर आक्रमण करीत असतात.
प्रत्येक नैसर्गिक शक्ति ही या विश्वशक्तींना सांठ्याच्या पात्राप्रमाणें सांठविणारी आणि विद्युज्जनकाप्रमाणें त्यांचा उत्पादनपूर्वक विस्तार व प्रसार करणारी वस्तु असते. मानसिक आणि प्राणिक विश्वशक्तींचा प्रवाह, प्रत्येक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सारखा वहात असतो; भौतिक निसर्गाच्या शक्तीप्रमाणें मानसिक व प्राणिक शक्तीहि विश्वव्यापी प्रवाहांच्या रूपानें मार्गक्रमण करीत असतात. आमच्या पृष्ठवर्ती मनाला जें प्रत्यक्ष संवेदन आणि ज्ञान होतें, त्यांत, मध्यें पडदा असल्यानें मानसिक, प्राणिक, शक्तींचें कार्य अंतर्भूत होत नाहीं. आंतरपुरुषाला या शक्तींचें संवेदन घडतें व ज्ञानहि होते; मात्र त्यालाहि प्रत्यक्ष स्पर्श या साधनाच्या द्वारां या शक्तींच्या प्रवाहांची प्रतीति घडते. विश्वजाणिवेंत व्यक्ति, आंतरव्यक्ति प्रविष्ट झाली, म्हणजे विश्वशक्तींचा खेळ तिला अधिक विस्तारश:, अधिक अंतरंगांतून प्रतीत होतो; या शक्ती अधिक स्पष्टपणें तिच्या पोटांत वावरत असल्याचें तिला कळतें. विश्वशक्तींच्या कार्याचें वरीलप्रकारें ज्ञान झाल्यानें आंतरपुरुषाचें ज्ञान अधिक पूर्ण होतें. परंतु या ज्ञानाला कार्यप्रवण करणें, कार्यान्वित करणें मात्र आंतरपुरुषाला पूर्णतेनें साधत नाहीं. आंतरपुरुषाला विश्वात्म्याशीं पायाभूत किंवा अक्रिय एकता साधली, (आणि ती त्याला साधूं शकते) तरी या विश्वात्म्याच्या विश्वप्रकृतीशीं क्रियाशील एकता पूर्णपणें साधणें आंतरपुरुषाला शक्य नसतें. मानसिक आणि प्राणिक पातळीवर ज्या शक्ती काम करतात त्या स्वभावत: व्यक्तिनिष्ठ निवडीनें निवडलेल्या असतात; विश्वशक्ति हीच प्राणिक, मानसिक पातळीवर काम करीत असली, तरी तिची कार्यपद्धति, व्यक्तिरूप जिवंत विद्युज्जनकाच्या यंत्रांत विशिष्ट व्यक्तिरूप (वैयक्तिक रचनेचें रूप) धारण करून काम करणें चालूं राहते. आंतरपुरुष विश्वपुरुषाशीं एकरूप होऊन आपलें वेगळेंपण विसरला, तरी त्याच्या प्राणिक, मानसिक पातळीवर, विश्वशक्तीचें व्यक्तिविशिष्ट रूप घेऊन काम करणें चालूं राहतें. कारण व्यक्तित्व हें विद्युज्जनकाचें कार्य करण्यासाठीं हेतुपुरःसर योजलेलें आहे; या विद्युज्जनकाचें कार्य म्हणजे विश्वशक्तींतून विशिष्ट भाग निवडणें, त्यांना केंद्रित करून त्यांना विशिष्ट रूप देणें आणि विशिष्ट प्रवाहाच्या रूपानें विशिष्ट पात्रांतून त्यांना फिरविणें हें आहे. विश्वशक्ति सामग्ऱ्यानें प्रवाहित झाली, तर
पान क्र. ४३६
त्याचा अर्थ, हा व्यक्तिरूप विद्युज्जनक आवश्यक राहिला नाहीं; त्याला बाजूला काढला, रद्द केला तरी चालेल, असा होईल; वैयक्तिक मन-प्राण-शरीरानें वैयक्तिकरीत्या कार्य करण्याचें सोडावयाचें, व्यक्ति ही निर्व्यक्तिक केन्द्र किंवा पात्र बनून या व्यक्तित्वशून्य ''व्यक्ति'' केन्द्रांतून वा पात्रांतून विश्वशक्ती अप्रतिहत रीतीनें, निवडानिवडशून्य प्रकारानें, वहावयाच्या असा, सामग्ऱ्यानें विश्वशक्ति प्रवाहित होण्याचा अर्थ होईल. अशी गोष्ट घडूं शकत नाहीं असे नाहीं. परंतु असा विश्वशक्तीचा समग्र प्रवाह शक्य होण्यास आजची जी सर्वसाधारण मानसिक पातळी आहे, तिच्यापेक्षां फार उंच अशी आध्यात्मिकतेची पातळी गांठावी लागेल. आंतरविश्वमय झालेला पुरुष अभेदानें होणारे विश्वज्ञान, अक्रिय विश्वज्ञान मिळवितो, तेव्हां विश्वात्मा आणि दुसऱ्या सर्व जीवांचे गुप्त आत्मे स्वतःशीं एकरूप आहेत अशी या आंतरपुरुषाला प्रतीति येते; परंतु या ज्ञानाला सक्रिय स्वरूप बेतानेंच प्राप्त होऊं शकतें. या एकात्मतेच्या संवेदनेनें त्याच्या जाणिवेचा सर्वांशीं प्रत्यक्ष संबंध, संपर्क अधिक निकटचा होऊं शकतो, अधिक प्रमाणांत होऊं शकतो; त्याच्या जाणिवेच्या शक्तीचा वस्तूंवर व इतर जीवांवर अधिक प्रमाणांत, अधिक जिव्हाळ्याचा, अधिक परिणामकारक आघात होऊं शकतो; इतर जीव व वस्तु यांना अधिक परिणामकारक रीतीनें तो आपल्या पोटांत सामावूं शकतो व स्वत: त्यांच्या पोटांत अधिक परिणामकारक रीतीनें जाऊं शकतो; त्याला जवळून सर्व पाहतां येतें, जवळून सर्वांना स्पर्श करतां येतो; त्याची दृष्टि, भावना व दुसऱ्या ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती (त्याच्या प्रकृतीला अनुरूप असतात अशा सर्व शक्ती) अधिक तीव्र आणि कार्यकारी होतात; पण यापलीकडे त्याची मजल जाऊं शकत नाहीं.
तेव्हां आंतरपुरुष विश्वात्म्याशीं, त्याच्या जाणिवेशी एकरूप झाला, तरी त्यायोगें अगदीं पूर्ण आणि मूळ ज्ञान त्याला लाभत नाहीं -- त्याहून कमी दर्जाचें मोठे ज्ञान मात्र लाभतें. अभेदज्ञान शुद्ध स्वरूपांत कसें असतें, ज्ञानाच्या दुसऱ्या शक्ती तें कशा आणि किती प्रमाणांत निर्माण करते, आपल्या कार्यांत येऊं देतें किंवा उपयोगास आणतें हें सर्व पहावयाचें असेल तर आम्हांला आंतर मन, प्राण, सूक्ष्मशरीर यांच्या पलीकडे असलेलीं आंतरजाणिवेचीं दोन बाजूंचीं टोंकें तपासलीं पाहिजेत. एका बाजूला अवचेतनता आणि दुसऱ्या बाजूला अतिचेतनता हीं तीं आतरजाणिवेची दोन टोंकें होत. अवचेतन प्रांतांत सर्व कांहीं आंधळें असतें; जमावाच्या
पान क्र. ४३७
जाणिवेंत संपणारें, आंधळें, अर्धबोबडें विश्वमयत्व अवचेतनांत असतें; त्यांत आंधळें, अर्धबोबडें व्यक्तित्व सुद्धां असतें; असलें व्यक्तित्व सामान्य मानवांत सांपडत नाहीं; रोगी किंवा रोगट प्रकृतीच्या मानवांत सांपडूं शकतें. सहजभावनेचें, वेडीवांकडी बनावट असलेलें असें हें अवचेतनांतील व्यक्तित्व असतें. या अवचेतनाच्या प्रांतांत आंधळें अभेदज्ञान -- अचेतनांत प्रतीतीस येतें तें -- पायाभूत असतें; परंतु हें ज्ञान स्वतःचें स्वरूप आणि स्वतःचें गुपित आम्हांला उघडून दाखवीत नाहीं, दाखवूं शकत नाहीं. दुसरें टोंक जें अतिचेतन जाणिवेचें, त्याची वेगळी कहाणी आहे. आमच्या जाणिवेला अज्ञात अशा अतिचेतन जाणिवेच्या अनेक श्रेष्ठ भूमी आहेत. त्यांचा पाया आध्यात्मिक जाणीव हा आहे. तेजोमय स्वयंप्रकाश, सर्वबंधनातीत, पूर्ण स्वतंत्र अशी ही पायाभूत आध्यात्मिक जाणीव असते. अर्थात् येथें अतिचेतनाच्या प्रांतांत ज्ञानाची मूळ शक्ति शोधाअंतीं आम्हांला सांपडते, येथें आम्हांला अभेदज्ञान (अभेद अधिष्ठित ज्ञान) आणि भेदज्ञान (भेद अधिष्ठित ज्ञान) या एकमेकांपासून स्पष्टपणें वेगळ्या असणाऱ्या ज्ञानवर्गांचा उदय कसा, कोठें होतो आणि त्या दोहोंतील अंतर काय, हें सूक्ष्मतेनें पहावयास सांपडतें.
जें सर्वश्रेष्ठ कालातीत अस्तित्व (सद्रूप) आहे, आध्यात्मिक अनुभूतींत जें अस्तित्व प्रतिबिंबित होतें, तें अस्तित्व आणि जाणीव यांचें बनलेलें असतें. आम्हांला या सर्वश्रेष्ठ अस्तित्वाची ओळख होते ती आध्यात्मिक अनुभूतींतील त्याच्या प्रतिबिंबावरूनच होते आणि या अनुभूतींतील प्रतिबिंबाची तपासणी केली असतां, तेथें अस्तित्व आणि जाणीव एकत्र एकरूप आहेत असें आम्हांला दिसतें : जाणिवेवांचून अस्तित्व नाहीं, अस्तित्वावांचून जाणीव नाहीं, अशी व्यवस्था मुळांत असतें हें आमचा आध्यात्मिक अनुभव आम्हांला सांगतो. इंद्रियांच्या आणि मनाच्या कांहीं विशिष्ट व्यापारांना आम्ही जाणिवेचे व्यापार म्हणतो; या व्यापारांवांचून जाणीव असत नाहीं; हे व्यापार म्हणजे जाणीव, अशी आमची समजूत झालेली आहे. या व्यापारांशीं जाणिवेचें अभेद्य तादात्म्य मानण्याची आमची परंपरा आहे. जेथें विशिष्ट मानसिक व इंद्रियगत व्यापार दिसत नाहीत, सुप्त असतात किंवा प्रत्ययास येत नाहींत, तेथें त्या अवस्थेला आम्ही नेणिवेची जाणीवहीन अवस्था, अचेतन अवस्था मानतो व म्हणतो; परंतु उघड दिसणारे चेतनेचे, जाणिवेचे व्यापार किंवा लक्षणें जेथें नाहींत, तेथेंहि चेतना, जाणीव असूं शकते, वस्तूमध्यें
पान क्र. ४३८
शुद्ध अस्तित्वांत जाणीव बुडून गेलेली असते, नास्तित्वाच्या देखाव्यांत दडलेली असते -- जाणिवेच्या अस्तित्वाचीं प्रकट लक्षणें वस्तूंमध्यें मागें घेतलेलीं असतात -- पण जाणीव तेथें असतेच. अस्तित्वांत स्वभावतःच जाणीव उपस्थित असते; अस्तित्वाच्या स्वभावांतच जाणीव अपरिहार्यपणें अंतर्भूत आहे : ती अस्तित्वांत स्वयंसिद्ध स्वयंभू असते; ती शांत असेल, निष्क्रिय असेल, पडद्याआड असेल, जडवत् झाली असेल -- स्वकार्यांत निमग्न होऊन किंवा स्वतःच्या कार्यरूप वस्तूंत बुडून जाऊन, दडून राहून ती जडरूप दिसत असेल -- पण या सर्व स्थितींत ती नाहींशी होत नाहीं; अस्तित्व असेल तेथें ती असतेच; गाढ स्वप्नहीन झोंप, गाढ नेणिवेची तंद्री किंवा समाधि, ज्ञानविनाश, ज्ञानाचा अभाव -- या सर्व अवस्थांत जाणीव अस्तित्वांत राहते; सर्वश्रेष्ठ कालातीत अशी जी सद्वस्तूची मूळ अवस्था, तेथें जाणीव अस्तित्वाशीं एकरूप असते आणि चलनहीन निश्चल असते; तेथें ती अस्तित्वाहून वेगळी वस्तु नसते. अस्तित्वांत स्वभावत: अंतर्भूत असलेलें आत्मज्ञान, आत्मजाणीव हें तिचें शुद्ध साधें स्वरूप त्या ठिकाणीं असतें. आपण ज्याला ज्ञान (ज्ञेयाचें ज्ञात्याला ज्ञान होणें) म्हणतो तें तेथें नसतें; त्याची गरज असत नाहीं. ज्ञानाची आपल्याला परिचित असलेली प्रक्रिया तेथें असत नाहीं; अस्तित्व स्वतःला स्वयंज्ञात, स्वयंप्रमाण, स्वयंसिद्धच असतें. स्वतांकडे त्यानें पहावें, स्वतःची ओळख होण्याकरितां, स्वतःचें अस्तित्व जाणण्याकरितां स्वतःकडे त्यानें नजर टाकावी अशी गरज मूळांत नसते. शुद्ध अस्तित्वासंबंधानें ज्याप्रमाणें आमची ज्ञानप्रक्रिया आवश्यक नसते, त्याप्रमाणें आद्य सर्व अस्तित्वासंबंधानेंहि आमच्या ज्ञानप्रक्रियेची आवश्यकता नसते; शुद्ध आत्मा असतो आणि आपलें अस्तित्व स्वभावतःच जाणतो; शुद्ध आत्म्याचे अस्तित्वांत त्याचें अस्तित्वज्ञान स्वभावत: अंतर्भूत असतें, त्याप्रमाणें या आत्म्याला त्याच्या अस्तित्वांत जें कांहीं अंतर्भूत आहे त्या सर्वाचेंहि ज्ञान स्वभावसिद्ध असतें; त्याकरितां ज्ञानाची क्रिया लागत नाहीं, त्यासाठीं स्वतःकडे पहावें लागत नाहीं, पाहण्याची क्रिया करावी लागत नाहीं. आत्मा 'असतो', तसा आत्मा 'सर्वकांहीं' असतो, म्हणून जसें त्याला स्वतःच्या अस्तित्वाचें ज्ञान स्वाभाविक आहे, तसें स्वतःमधील सर्वाच्या अस्तित्वाचेंहि ज्ञान स्वाभाविक स्वयंसिद्ध आहे. याप्रमाणें आत्मा, मूळ पुरुषोत्तम आपल्या कालातीत शुद्ध अस्तित्वाला ज्याप्रमाणे स्वभावत: (आमच्या परिचयाच्या ज्ञानप्रक्रियेमधून) जाणतो, त्याप्रमाणें तो आपलें कालांकित
पान क्र. ४३९
अस्तित्व आणि कालाच्या पोटांत जें जें असतें तेंहि स्वभावत: जाणतो; हीं दोनहि ज्ञानें स्वाभाविक, पूर्ण, समय, ज्ञानप्रक्रियाशून्य अशीं असतात; या ज्ञानाला, जाणिवेला मूलभूत अभेदज्ञान म्हणतात. विश्व-अस्तित्वाच्या बाबतींत मूलभूत अभेदज्ञान जें असतें त्याचा अर्थ मूळ आत्म्याला विश्वाची जाणीव असते, ती स्वयंसिद्ध असते, सहज असते -- अशा जाणिवेचें कारण हें कीं, हा आत्मा सर्व कांहीं स्वतःच होतो, सर्व कांहीं त्याच्या अस्तित्वाचें घटकभूत, अंगभूत असतें.
आत्म्याच्या जाणिवेची ही जी शुद्ध अवस्था, तिच्यांतून निघाल्यासारखी वाटणारी, तिच्यापासून वेगळी अशी दिसणारी दुसरी एक अवस्था आहे -- मात्र ही अवस्था आत्म्याला त्याच्या शुद्ध ज्ञानावस्थेइतकीच स्वाभाविक आहे, अंगभूत आहे; अभेदज्ञान हें आत्माच्या स्वतःविषयीं ज्ञानाचें नेहमींच खास स्वरूप असतें, त्याचें सर्वस्व असतें; पण त्याबरोबर दुय्यम म्हणून स्वतःच्या सर्वसमावेशकत्वाचें आणि सर्वांतर्यामित्वाचें ज्ञानहि आत्म्याला स्वभावसिद्ध असतें, शुद्ध ज्ञानाशीं समकालीन असतें. ही जी दुसरी ज्ञानावस्था ती पहिल्या अभेदज्ञानावस्थेचा शाश्वतपणा कमी करीत नाहीं; तिच्यांत कसलाहि बदल करीत नाहीं. स्वयंभू आत्मा अस्तित्वांतील सर्व वस्तूंना स्वतःच्या एकमेव अस्तित्वाच्या पोटीं पाहतो, त्या सर्वांचा समावेश स्वतःमध्यें करतो, आपल्या अस्तित्वाचें अस्तित्व, आपल्या जाणिवेची जाणीव, आपल्या शक्तीची शक्ति, आपल्या आनंदाचा आनंद, या सर्व गोष्टी तो आपल्या पोटीं असलेल्या वस्तूच्या ठिकाणीं पाहतो; त्याबरोबर, अपरिहार्यपणें तो सर्व वस्तूच्या पोटीं त्यांचा, प्रत्येक वस्तूचा, आत्मा म्हणून निवास करतो आणि त्यांच्या अंतरंगांतील सर्वकांहीं आपल्या व्यापक अंतर्यामित्वानें जाणतो; हें सर्व ज्ञान, वर सांगितल्याप्रमाणें स्वाभाविक स्वयंसिद्ध ज्ञानक्रियेवांचून झालेलें असें असतें; हें ज्ञान म्हणजे एकादी क्रिया नसून तें अवस्थारूप असतें; शुद्ध शाश्वत अंगभूत स्वाभाविक अवस्था हें या ज्ञानाचें स्वरूप असतें. आत्मज्ञान, आध्यात्मिक जाणीव कोणतीहि घेतली, तरी तिचा पाया पाहतां अभेदाची जाणीव आणि अभेदनिष्ठ ज्ञान हाच असतो. सर्व मी आहे, मी सर्व आहे, हें ज्ञान तिजमध्यें (अभेद अधिष्ठित जाणिवेमध्यें) स्वभावत: असतें. आमच्या जाणिवेचा जो प्रकार आहे त्या प्रकारांत या अभेदज्ञानाचें रूपान्तर केल्यास तें विविध ज्ञान बनतें; उपनिषदांत हें त्रिविध ज्ञान सांगितलें आहे : १) यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति २) सर्वभूतेषु
पान क्र. ४४०
चात्मानम् (३) यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूत् (१) जो सर्व भूतें आपल्या ठिकाणीं पाहतो तो (२) जो स्वत:ला सर्व भूतांचे ठिकाणीं पाहतो तो (३) ज्याचे ठिकाणीं तोच (आत्माच) सर्व भूतें झाला आहे. (ईशावास्य उप०) या त्रिविध ज्ञानांत समावेशकता, अंतर्यामिता व अभेद या आत्म्याच्या तीन प्रकारांचा समावेश होतो. मूलभूत आत्म्याची मूलभूत जाणीव पाहिल्यास, हें जें वर सांगितलेलें त्रिविध दर्शन, तें तेथें मूळ आत्म्याचें स्वाभाविक आत्मसंवेदन असतें. आत्मज्योतीच्या प्रकाशांत घडणारें त्रिपुटीरहित आत्मदर्शन असतें. (त्रिपुटी : ज्ञाता + ज्ञेय + ज्ञान) तेथें आत्मा स्वत: स्वत:ला विषय करून त्याजकडे बघतो अशी स्थिति, अशी क्रिया घडत नाहीं; कारण या क्रियेंत भेदाची दृष्टि येते; आणि मूलभूत आत्मजाणिवेंत, तर भेददृष्टि मुळींच नसते. तथापि या मूलभूत आत्मजाणिवेंत, जाणिवेचें स्वत:कडे पाहणें ही क्रिया घडूं शकते. अशी क्रिया आत्म्याचे ठिकाणीं स्वभावत: शक्य असते, ती एक आत्म्याची अंगभूत शक्ति आहे. पण सर्वश्रेष्ठ जाणिवेचें स्वयंप्रकाशत्व, स्वयंभूत्व, स्वयंसिद्धत्व कार्यकारी असतांना ही शक्ति वापरांत आणली जात नाहीं. ही शक्ति वापरांत आणल्यानें सर्वश्रेष्ठ जाणिवेची क्रियायुक्त अवस्था अस्तित्वांत येते : जाणिवेची जी मूलभूत अक्रिय अवस्था, त्रिपुटीशून्य अवस्था शाश्वत असते, तिच्या जोडीला आतां त्रिपुटीयुक्त अवस्था येते : ही दुसरी अवस्था पहिल्या अवस्थेच्या पोटीं असतेच : फक्त तिला प्रकट करण्याची आवश्यकता असते : या दुसऱ्या अवस्थेंत आत्मा स्वत:कडे पाहतो, ज्ञाता आणि ज्ञेय होतो, विषयी, विषय असें दुहेरी रूप घेतो; पण या दुहेरी रूपांत एकता, अविभक्तता असते. विषय तोच विषयी असतो आणि विषयी तोच विषय असतो. हें ज्ञानदेखील मूळ जाणिवेप्रमाणें स्वभावगत, सहज, स्वयंभू असतें, स्वयंप्रमाण असतें, अभेदज्ञान असतें. या ठिकाणीं ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान या त्रिपुटीक्रियेनें अभेद व्यक्त केला जातो एवढेंच. आम्ही ज्या ज्ञानाला भेदनिष्ठ ज्ञान म्हणून ओळखतो, तसलें भेदज्ञान हें असत नाहीं.
ज्ञाता ज्ञेय एकरूप न राहतां ज्ञाता ज्ञेयापासून थोडा दूर राहूं लागला (वस्तुत: ज्ञाता हाच ज्ञेय होत असतो) म्हणजे अभेदज्ञानाचा तिसरा, तिसऱ्या दर्जाचा प्रकार अस्तित्वांत येतो. (एकरस अभेदज्ञान हा पहिला प्रकार, त्रपुटीयुक्त अभेदज्ञान हा दुसरा प्रकार.) या ज्ञानप्रकारांत ज्ञाता आत्मा ज्ञेयाचें अगदीं अंतरंगदर्शन घेऊं शकतो, तो ज्ञेयांत शिरूं शकतो,
पान क्र. ४४१
त्याला आंतून बाहेरून व्यापूं शकतो, त्याला 'सर्व 'मी' आहे' अशी दृष्टि येते, भावना येते, सर्व वस्तूंचा संपर्क करतांना स्वतःचाच संपर्क करीत आहे असें त्याला प्रतीत होतें. वस्तु आणि ती जें कांहीं असेल किंवा जें कांहीं तिच्या पोटांत असेल त्याची आत्मिक प्रतीति घेण्याची शक्ति ज्ञात्या आत्म्यांत असते; त्या वस्तूला आत्मा बाहेरून व आंतून व्यापतो आणि याप्रमाणें ज्ञेयाशीं अभिन्नता, एकरूपता पाहून त्याचें सर्व ज्ञान त्याला प्राप्त होतें. ज्ञात्याची ज्ञेयाशीं अभिन्नता, एकरूपता हाच तद्विषयक ज्ञानाचा आत्मा असतो -- वस्तूंचें ग्रहण ''मी ही वस्तु आहे'' असें अभेदज्ञानाचें स्वरूपच असतें. वस्तूचें आत्मकृत ग्रहण किंवा ज्ञान, संवेदन आणि या प्रकारचें अभेदरूप होऊन गेल्यानंतर उत्पन्न होणारा वस्तुविषयक विचार हाहि आत्मस्वरूपांत सामान्य विचारांहून वेगळ्या प्रकारचा असतो. आमचा सामान्य विचार अज्ञात गोष्टी शोधून उजेडांत आणतो, असा अध्यात्मिक विचार नसतो. तो त्याला स्वाभाविकपणें ज्ञात असलेली स्वतांतील गोष्ट स्वतःपासून जणुं वेगळी करून आध्यात्मिक स्थलामध्यें तिची स्वतांपासून अंतरावर मांडणी करतो; आपलें आत्मजाणिवेचें अस्तित्व विस्तारून, त्या विस्तारलेल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या क्षेत्रांत ती वस्तु, ज्ञातरूप स्वतःपासून दूर मांडतो आणि तिला विचारजन्य ज्ञानाचा विषय बनवितो. वस्तुविषयक आध्यात्मिक ज्ञान (दर्शन), आध्यात्मिक विचार विशिष्ट प्रकारचा असतो, त्याप्रमाणें तद्विषयक आध्यात्मिक भावना, आध्यात्मिक संवेदना व प्रतीति विशिष्ट प्रकारची असते. या आध्यात्मिक व्यवहारांत एकतेशीं एकता, अस्तित्वाशीं अस्तित्व जाणिवेशीं जाणीव, अस्तित्वाच्या आनंदाशीं अस्तित्वाचा आनंद मिळून जात असतो. मुळांत सर्वांचा अभेद असतो, या अभेदाच्या अधिष्ठानावर भेद (ज्ञाता-ज्ञेय भोक्ता-भोग्य) आत्मा स्वत: निर्माण करतो आणि या भेदनिर्माणानंतर पुन्हां भेदांत अगदीं एकजीवपणाचा अनुभव तो घेतो, जणु भेदांत ''अभेद'' भोगतो, अभेदाच्या मूळ प्रतीतींत भेदनिष्ठ एकजीवपणाचा आनंद, मूळ सर्वोच्च एकतेच्या प्रतीतींत प्रेम प्रेमाशीं मिळण्याचा गोड अनुभव आत्मा भोगीत असतो. निराकारांत नाना आकार उदयास आणण्याचा आनंद, नित्य एकतेच्या पोटीं नानाशक्ती, नाना सत्यें, नाना जीव उदयास येण्याचा, आणण्याचा आनंद, आत्मा भोगीत असतो. मूळ चैतन्याच्या, आत्म्याच्या जाणिवेंत या ज्या शक्ती असतात त्या शक्तींवर, मूळ एकरूप अस्तित्वाच्या पोटीं नाना घटना
पान क्र. ४४२
घडण्याचा, घडविण्याचा खेळ आधारलेला असतो. या ज्या आध्यात्मिक शक्ती त्या मूलभूत तत्त्वांतर्भूत शक्ती असतात, त्या साधनरूप शक्ती नसतात. त्या योजनेंतून, निर्माणक्रियेंतून, संघटनक्रियेंतून निघालेल्या नसतात : आत्मा जो एकच एक असतो, त्याचें स्वस्वरूपज्ञ तेजोमय घटकद्रव्य म्हणजेच या शक्ती होत; हें आत्मज्ञ आत्मतत्त्व स्वतःमध्यें स्वतःला विषय करून त्याजवर क्रियाशीलतेनें क्रिया करूं लागलें म्हणजे या शक्ती प्रादुर्भूत होतात -- आत्माच दृष्टि होतो, आत्माच भावना होतो, आत्माच दर्शन होतो, विचार होतो, आत्मा स्वतःवर प्रकाश टाकणारा होतो. हें सर्व अभेदज्ञानच खरोखर असतें, त्याच्या शक्ती स्वयंसिद्ध असतात, मुळांत एकतेचें ज्ञान हें आत्मस्वरूपाचें लक्षण असतें. हें आत्मस्वरूप नानावस्तुमयत्व धारण करतें, तें स्वयंगतीनेंच धारण करतें -- नानावस्तुरूपत्व घेतांना आपलें मूळ एकत्व आत्मतत्त्व टिकवून असतें : एकत्व आणि नानात्व एकाच वेळीं आत्मतत्त्व भोगतें. आत्म्याला अनंततेचा जो आत्मानुभव येतो तो अनुभव, एका बाजूला शुद्ध एकरस एकता आणि दुसऱ्या बाजूला नानारूपधारी एकता यांच्यामध्यें अखंडपणें वावरत असतो; आत्ममग्न आत्मसमाधीचा आनंद एकीकडे आणि नाना वस्तुरूप, भेदमय झालेल्या परंतु या भेदमयत्वांत अतिनिकटत्वाचा परिचय घेत असलेल्या एकतेचा आनंद दुसरीकडे आणि मध्यें नाना प्रकारचे कमीअधिक दर्जाचे आनंद, अशी एक-अनेकरूप आत्म्याची आनंदसंपत्ति असते.
अभेदाच्या संवेदनाहून भेदाचें संवेदन अधिक जोरदार झालें म्हणजे भेद-अधिष्ठित ज्ञानाचा आरंभ होतो. आत्म्याला ''मी पदार्थाशीं एकरूप आहे'' ही जाणीन असते, पण तो भेदाची भावना पराकोटीला पोंचवितो. आरंभीं आरंभीं आत्म्याला इतरासंबंधानें माझा दुसरा आत्मा हीच जाणीव व भावना असते -- पुढें मग मी आत्मा आणि दुसरें सर्व अनात्मा, अशी जाणीव व भावना होते. दुसऱ्याशीं अभेदाचें ज्ञान, दुसऱ्यासंबंधीं अभेदनिष्ठ ज्ञान या गोष्टी आत्म्याचे ठिकाणीं कांहीं प्रमाणांत असतात. पण हीं ज्ञानें हळूंहळूं खालीं दबलीं जातात आणि संपर्क व अन्योन्यविनिमय यांच्या द्वारां होणारें ज्ञान अभेदज्ञानाची जागा घेतें -- मग हें अभेदज्ञान दुसऱ्या दर्जाचें वाटूं लागतें. अन्योन्य संपर्काचें परिणामरूप तें (अभेदज्ञान) आहे असें वाटूं लागतें. वस्तुत: अन्योन्यसंपर्क हा अभेदाचा, अभेदज्ञानाचा परिणाम असतो. अलग अलग
पान क्र. ४४३
भासणाऱ्या आत्म्यांचा अन्योन्यप्रवेश, त्यांची अन्योन्यव्यापकता, वस्तुत: त्यांच्या अभेदापासून निर्माण होत असतां, अभेदज्ञान हें त्यांच्यापासून (अन्योन्यप्रवेशापासून) निर्माण होतें, अशी नवी उलटी भावना होते. ज्ञानाच्या स्वरूपांत असा बदल होत होत शेवटीं अभेद पडद्याआड जाऊन बसतो आणि एका अस्तित्वाचा दुसऱ्या भिन्न जाणिवेशीं व्यवहार होत आहे असें ह्या आत्म्याच्या खेळाला स्वरूप येतें. या भिन्नतेच्या पोटी अभिन्नता, एकता असते, पण तिचा अनुभव आतां येत नाहीं; या अभेदाऐवजीं आतां प्रत्यक्ष स्पर्शाचें, एकमेकांत प्रवेश करून देणाऱ्या संपर्काचें, स्पर्शाचें राज्य सुरूं होतें; एकमेकांत मिळणेंमिसळणें, एकमेकांपासून घेणेंदेणें या गोष्टी आतां अभेदाची जागा घेतात. आतां एकमेकाची ओळख किंवा वस्तूची आत्म्याला ओळख व्हावयाची, कमीअधिक गाढ ओळख व्हावयाची ती, अन्योन्यांच्या ज्या क्रियाप्रतिक्रिया एकमेकांवर होतात त्यांच्याद्वारां होऊं शकते. आतां आत्मा स्वत:च्या आत्म्याला भेटतो, अशी जाणीव वा भावना नसते, तर दोन भिन्न आत्मे एकमेकांशीं जिव्हाळ्यानें व्यवहार करतात अशी भावना असते. आत्म्याआत्म्यांमध्यें अगदीं पूर्ण वेगळेपणा अद्यापि आलेला नसतो, पूर्णतेनें ते एकमेकांना ''इतर'' झालेले नसतात. अर्थात् अज्ञानाचा उदय झालेला नसतो. आतां जाणीव कमी व्यापक झालेली असते -- तरी मूळ ज्ञानाची कांहीं शक्ति तिच्यांत राहिलेली असते; ही शक्ति भेदाच्या उदयानें कमी झालेली असते, मूळ तात्विक पूर्णतेच्या अभावानें कमी झालेली असते, ही शक्ति आतां भेदाला प्राधान्य देऊन काम करते; ती एकता, एकात्मता प्रस्थापित करूं शकत नाही; विषयाचा व विषयीचा निकटचा संबंध मात्र ती प्रस्थापित करूं शकते. जाणिवेच्या पोटांत समोरची वस्तु सामावून घेणें, त्या वस्तूला चोहोंकडून व्यापून राहणें, आपल्या ज्ञानाच्या पोटांत ती घेणें ही गोष्ट करण्याची शक्ति आत्म्यांत आतांहि शिल्लक राहते; पण आतां वस्तु ही स्वत:च्या अस्तित्वाच्या पोटांत नसून ती त्याबाहेर आहे आणि असें असतां तिला पोटांत, जाणिवेच्या पोटांत घ्यावयाची आहे, अशी आत्म्याची नवी परिस्थिति असते; आतां हें पोटांत घेणें, पूर्वीं स्वयंसिद्ध असलेलें पण नव्या परिस्थितींत दूर झालेलें ज्ञान पुन: मिळवून करावयाचें असतें. वस्तूवर ध्यान लावून हें कार्य करावें लागतें; एकाग्र चिंतन करून, स्वत:च्या अस्तित्वाचा भाग असलेली पण नव्या परिस्थितींत त्यांतून बाहेर गेल्यासारखी झालेली वस्तु, परत स्वत:च्या
पान क्र. ४४४
अस्तित्वांत सामावून घ्यावी लागते; बाहेरून व्यापण्याच्या शक्तीप्रमाणें वस्तूच्या पोटांत शिरण्याची शक्तीहि आत्म्यांत शिल्लक असते; तथापि आतां ती तितकी व्यापक असत नाहीं. अभेदाची स्थिति ती उत्पन्न करूं शकत नाहीं. कांहीं गोष्टी ती अंत:प्रवेशानें मिळविते आणि ज्ञात्या आत्म्याला ज्ञेय वस्तूंतील अंतर्गत माल त्याच्या कार्यासाठीं पुरवितें. जाणिवेचा जाणिवेशीं प्रत्यक्ष आणि प्रवेशक संपर्क आतांहि होऊं शकतो, पण स्पष्ट आणि अंतरंगदर्शक अपूर्ण ज्ञानाखेरीज हा संपर्क आणखी कांहींहि ज्ञात्या आत्म्याला पुरवूं शकत नाहीं -- संपर्काचीं जीं स्थानें आणि संपर्काचा जो व्याप असेल त्या स्थानांपुरतेंच व त्या अपूर्ण व्यापापुरतेंच वस्तूचें ज्ञान आत्म्याला नव्या परिस्थितींत होऊं शकतें. अद्यापि वस्तूचें प्रत्यक्ष संवेदन आत्म्याला होऊं शकतें -- वस्तूच्या आंत असलेल्या गोष्टी, वस्तूच्या बाहेरची बाजू, तिचा पृष्ठभाग, आत्मा अद्यापिहि जाणिवेची दृष्टि, जाणिवेचा स्पर्श उपयोगांत आणून प्रत्यक्षपणें पाहूं शकतो, हाताळूं शकतो. आत्म्यांच्या अस्तित्वांत आणि अस्तित्वांत, जाणिवेंत आणि जाणिवेंत अन्योन्यप्रवेश, अन्योन्यविनिमय अद्यापिहि होऊं शकतो; विचारांच्या लहरी, भावनांच्या लहरी, सर्वप्रकारच्या शक्तींच्या लहरी यांची आत्म्या-आत्म्यांत देवघेव, जा - ये अद्यापिहि चालते. ही हालचाल सहानुभूति आणि ऐक्य निर्माण करणारी असेल किंवा विरोध आणि द्वंद्व निर्माण करणारी असेल, ऐक्यजन्य असेल किंवा विरोधजन्य असेल. दुसऱ्यांना आपल्या स्वाधीन करून घेऊन किंवा दुसऱ्यांनीं आपल्याला स्वाधीन करून घेण्याच्या क्रियेला आपली संमति देऊन एकता स्थापण्याचा प्रयत्न या परिस्थितींत आत्म्याकडून होत असतो, होऊं शकतो, असेंहि होऊं शकतें कीं, दोन्ही पक्ष एकमेकांना अन्योन्यसमावेशानें, अन्योन्यव्याप्तिद्वारां, अन्योन्य स्वामित्वाच्या बळावर ऐक्याच्या अवस्थेकडे जाण्याची प्रेरणा देत असतात, तिकडे ढकलीत असतात. प्रत्यक्ष संपर्कानें ज्ञान मिळविणारा ज्ञाता या सर्व क्रिया-प्रतिक्रिया अनुभवीत असतो, आणि अनुभवाच्या पायावर सभोंवतालच्या जगाशीं तो आपले संबंध निश्चित करीत असतो. आमच्या आंतरपुरुषाला वस्तूंचें हें प्रत्यक्ष संपर्काधिष्ठित ज्ञान स्वाभाविक असतें; आमच्या पृष्ठवर्ती पुरुषाला हें ज्ञान नसतें; असलें तर अगदीं अपूर्ण असें असूं शकतें.
पहिल्या आरंभाच्या पायरीचें भेदमय अज्ञान असें या वर वर्णिलेल्या ज्ञानभूमिकेला म्हणतां येईल. येथें ज्ञानाचाच खेळ असतो;
पान क्र. ४४५
इतकेंच कीं, हें ज्ञान भेदमय असतें, संकुचित असतें, हा खेळ विभागलेल्या अस्तित्वाचा असतो. ह्या विभागलेल्या अस्तित्वाच्या खालीं अभेद, एकता असते; या वरच्या भेदयुक्त खेळांत गुप्त असा पायाभूत अभेदाचा, एकतेचा कांहीं थोडासा परिणाम प्रकट होऊं शकतो. अस्तित्वाचे दोन अर्धगोल कल्पिले, तर वरच्या उच्च अर्धगोलांत पूर्ण स्वाभाविक अभेदज्ञान, आणि अभेदअधिष्ठित ज्ञानक्रिया या वस्तू स्वयंसिद्ध असतात; प्रत्यक्ष संपर्काच्या द्वारां ज्ञानलाभ ही गोष्ट, जाणिवेचे मानसिक अतिभौतिक सर्वोच्च जे प्रदेश आहेत त्यांचें प्रमुख वैशिष्ट्य आहे. आमचा पृष्ठवर्ती पुरुष या प्रदेशांपासून दूर ठेवला गेला आहे. एक अज्ञानाची भिंत या प्रदेशांना आमच्या पृष्ठवर्ती पुरुषांपासून दूर ठेवते; उच्च प्रदेश सोडून दुसरे जे खालच्या दर्जाचे अतिभौतिक मानसिक प्रदेश आहेत तेथेंहि प्रत्यक्षसंपर्कजनित ज्ञान, त्या प्रदेशांचा स्वभावधर्म म्हणून मिळूं शकतें -- मात्र येथें भेदमयता अधिक प्रमाणांत असते, आणि अर्थात् ज्ञान कमी प्रमाणांत मिळतें; अतिभौतिक प्रदेशावर सर्वत्र प्रत्यक्ष संपर्कजन्य ज्ञान हा घटक असतो, किंवा आपण आणूं शकतो. आमचा आंतरपुरुष जो असतो, त्याचें ज्ञानसाधन प्रामुख्यानें प्रत्यक्ष संपर्कच असतो; कारण उच्च अतिभौतिक प्रदेश आणि अवचेतनाचा प्रदेश यांना जोडणारा असा आमचा आंतरपुरुषाचा प्रदेश असतो. उच्च अतिभौतिक मानसिक जाणिवेनें आपला हात लांब करून अवचेतन प्रदेशावर जणु ठेवलेला असतो. हा लांबलेला हात म्हणजे आंतरपुरुष म्हणतां येईल : आंतरपुरुषाचें जन्मस्थान उच्च मानसिक प्रदेश असल्यानें, तेथील जाणिवेची विशेषता त्या पुरुषांत स्वभावत:च येते; आमचें बाह्य अस्तित्व पाहिलें, तर अचेतनाची आपण अपत्ये आहोंत. आमचें आंतरअस्तित्व, मानसिक प्राणिक आत्मिक उच्च प्रदेशांचा वारसा घेऊन येत असतें; आम्ही आमची कवाडें उघडून जसेजसे आंत शिरूं, आंत आंत जाऊं, आंतच जीवन जगूं, आंतून काय ज्ञान येईल तें घेऊं, तशी तशी अचेतनाच्या आमच्या उगमस्थानाची गुलामी आमच्या वृत्तिप्रवृत्तींतून कमी कमी होत जाईल आणि आज जें स्थान आमच्या अज्ञानमय जाणिवेच्या पलीकडे आहे, तें स्थान आम्हांला अधिकाधिक जवळ होत जाईल.
अस्तित्व अस्तित्वापासून, वस्तु वस्तूपासून, जीव जीवापासून अगदीं वेगळा झाला म्हणजे अज्ञानदशा पूर्ण होते. जाणिवेचा जाणिवेशीं प्रत्यक्ष संपर्क आतां जवळजवळ अशक्य होतो; मध्यें जाड पडदा येतो, पडदा
पान क्र. ४४६
पूर्ण असतो, निदान पूर्णाच्या जवळ तरी असतो. आमच्या आंतरपुरुषाच्या प्रदेशांत मात्र जाणिवेचा जाणिवेशी प्रत्यक्ष संपर्क घडत असतो; अभेद, एकता ही देखील प्रत्यक्ष संपर्काच्या खालीं गुप्तपणें असते -- पण जाणिवेचा प्रत्यक्ष संपर्क आमच्या बाह्य पुरुषाला उपलब्ध नसतो, त्याप्रमाणें ही गुप्त एकताहि त्याला अज्ञात असते. पृष्ठभागावर पूर्ण विभक्तता असते, आत्मा आणि अनात्मा असा तीव्र भेद पृष्ठभागावर कार्यान्वित होतो; अनात्मा प्रत्यक्ष ज्ञानानें समजावून घेणें, अनात्म्यावर हुकमत चालविणें यासाठीं आत्म्याला प्रत्यक्ष साधनाची मदत पृष्ठभागावर नसते; पण या अनात्माशीं व्यवहार करणें तर त्याला आवश्यक असतें; तेव्हां अशा परिस्थितींत प्रकृति आत्म्याला अप्रत्यक्ष साधनसामग्री पुरविते; अनात्माशीं संपर्क घडविण्यासाठीं भौतिक इंद्रियें व अवयव आत्म्याला दिले जातात; नाडीसंघ त्याला पुरविला जातो. नाडीसंघाच्या प्रवाहांच्या द्वारां बाहेरून घडणाऱ्या संपर्कांची दखल आत्म्याला घेतां येते; या भौतिक अवयवांच्या कार्याला पूरक म्हणून, मन प्रतिक्रिया करतें आणि संपर्काची जुळवणी व व्यवस्था करतें; 'अप्रत्यक्ष ज्ञानाच्या पद्धती' या वर्गांत वरील सर्व क्रिया पडतात; कारण जाणिवेला या साधनांवर ज्ञानासाठीं व क्रियेसाठीं अवलंबून राहणें भाग असतें; कोणत्याहि वस्तूवर जाणीव प्रत्यक्षपणें क्रिया करूं शकत नाहीं. भौतिक इंद्रियें, नाडीसंघ आणि मन यांच्या जोडीला बुद्धीचेंहि साधन, आत्म्याला निसर्ग उपलब्ध करून देतो : बुद्धीबरोबर विवेकशक्ति आणि स्फूर्ति यांचीहि मदत निसर्ग आत्म्याला देतो. जें ज्ञान भौतिक इंद्रियें वगैरे साधनें या शक्तीच्या समोर आणून देतात तें त्या व्यवस्थेनें लावतात, आणि अनात्म्यासंबंधानें अधिक ज्ञान मिळविण्यासाठीं व त्यावर शक्य ती हुकमत चालविण्यासाठीं त्याचा उपयोग करतात; त्याच्याशीं शक्य तेवढी एकात्मता, एकता (आंशिक एकता) साधण्यासाठींहि या उपलब्ध ज्ञानाचा या शक्ती उपयोग करतात; पुरुष पुरुषापासून, वस्तूपासून वेगळा झालेला असतो, तेव्हां या मूलभूत विभक्तीस परवडेल तेवढी थोडीशीं अनात्म्याशीं एकात्मता साधण्यासाठीं बुद्धि वगैरे निसर्गदत्त शक्तींचा आत्मा उपयोग करतो. हीं सर्व साधनें सहजच आत्म्याला त्याच्या हेतूच्या सिद्धीसाठीं अपुरीं पडतात, तीं कित्येक वेळां तितकी कार्यक्षमहि ठरत नाहींत; आणि मनाच्या क्रियांचा आधार अप्रत्यक्ष ज्ञानसामग्री हा असल्यानें, त्याचें ज्ञान मूलभूत अनिश्चितीनें दूषित झालेलें
पान क्र. ४४७
असतें. आमच्या भौतिक अस्तित्वाचा प्रकृतिधर्म अपुऱ्या साधनसामग्रीनें जीवनारंभ करणें हा आहे. अवचेतनांतून वर येणारें सर्वच अस्तित्व अपुऱ्या साधनांनीं आपलें जीवनकार्य आरंभीत असतें.
अचेतनता ही उलटी केलेली सर्वश्रेष्ठ अतिचेतनता आहे; सर्वश्रेष्ठ अतिचेतनतेच्या बरोबर उलटी घडण अचेतनतेची आहे. अतिचेतनता ही स्वयंचलनशील यंत्राप्रमाणें सहजपणें क्रिया करते, तिचें अस्तित्व सर्वनिरपेक्ष असतें. हे गुण अचेतनतेंत अतिचेतनतेइतकेच स्वाभाविक आहेत. मात्र अचेतनतेंत जाणीव नसते, जाणिवेची तंद्री, समाधि असते; अस्तित्व स्वतःमध्यें बुडालेलें, स्वतःच्या अनंतत्वाच्या अगाध सागरांत विलीन झालेलें, स्वतःला हरवलेलें असें अचेतनतेचें वर्णन करतां येईल. अतिचेतन अस्तित्व हें प्रकाशमय आणि स्वतांत रमलेलें अस्तित्व असतें; अचेतन अस्तित्व हें उलट तमोमय असतें; जणु गुंडाळून टाकलेलें, स्वतःची गुंडाळी करून घेतलेलें आणि प्रकाशांतून अंधारांत घुसलेलें असें अचेतन अस्तित्व असतें. ''तम आसीत् तमसा गूढम्'' (ऋग्वेद) असें या अचेतनतेचें वर्णन ऋग्वेदांत सांपडतें; अचेतन अस्तित्व हें, नास्तित्व, सत्तेचा अभाव या स्वरूपाचें दिसतें. येथें अतिचेतनतेची स्वाभाविक प्रकाशमय आत्मजाणीव असत नाहीं, उलट आत्मनेणिवेच्या डोहांत बुडालेली जाणीव येथें असते; अस्तित्वांत जाणीव अंगभूत असते, पण येथें अचेतनांत ती जागी नसते. अस्तित्वांत बुडालेली ही जाणीव, गुप्त अशा अभेदनिष्ठ ज्ञानाच्या स्वरूपाची असते; अस्तित्वगत सर्व सत्यें या सुप्त गुप्त जाणिवेच्या पोटीं सुप्त गुप्त असतात; आणि ही जाणीव क्रियाशील होऊन निर्मिति करूं लागली, म्हणजे अंगभूत स्वभावगत ज्ञानाच्या रेखीव पूर्णतेनें सर्व गोष्टी ही निर्मिते आणि व्यवस्थेनें मांडते; -- आरंभीं जाणीव या स्वरूपानें ती क्रिया करीत नाहीं, तर जडशक्तीच्या स्वरूपानें ती क्रियाशील होते. कोणतीहि भौतिक वस्तु घ्या, सर्व वस्तूंच्या पोटीं मूक आणि झांकलेली (स्वत: आवरणांत लपलेली) अशी सत्य-कल्पना असते; तेथे प्रभावी, स्वयंफलित होणारी स्फूर्ति असते, तेथें निर्नेत्र परंतु निर्दोष असें दर्शन असतें, तेथें स्वयंचलित यंत्रधर्मी बुद्धि असते, जी तिच्या शब्दविषय आणि विचारविषय न झालेल्या कल्पना कार्यान्वित करीत असते; तेथें निश्चित बिनचूक पाहणें असतें, पण हें पाहणें डोळ्यांवांचून होत असतें; तेथें दबलेली पण न चुकणारीं मूक भावना असते, पण या भावनेला अ-संवेदनेचें आवरण असतें; जें जें कांहीं घडवून आणावयाचें असतें, तें
पान क्र. ४४८
तें वस्तूंच्या पोटीं असलेल्या, या वर दिलेल्या, सत्य-कल्पना आदिक गोष्टी बरोबर घडवून आणतात. अचेतनाचें हें सर्व कार्य आणि स्वरूप, शुद्ध अतिचेतनाच्या स्वरूपासारखें आणि कार्यासारखें आहे, हें उघड आहे. एवढेंच कीं, अतिचेतन अस्तित्व हें मूलभूत आत्मप्रकाशानें भरलेलें असतें आणि उलट अचेतन अस्तित्व हें आत्म-तमोमयतेनें भरलेलें असतें. जड भौतिक आकारांत, वर दिलेल्या सत्य-कल्पना आदिक सर्व शक्ती स्वभावतःच वास करीत असतात, पण त्या आकाराला त्या शक्ती, असून नसल्यासारख्या असतात, त्या आकाराच्या आधीन त्या असत नाहींत; त्या आकाराच्या आंतून, तेथें असलेल्या मूक अवचेतनतेच्या द्वारां अर्थात् अर्ध-जाणिवेच्या, अर्ध-नेणिवेच्या द्वारां त्या काम करीत असतात.
जाणीव किंवा चेतना ही अचेतनांत गुंडाळलेली, नसल्यासारखी झालेली असते. ती त्या अवस्थेंतून हळूं हळूं वर येते, विकास पावते; या विकासाच्या, प्रकटनाच्या पायऱ्या आतां आम्हांला पूर्वींपेक्षां अधिक स्पष्टपणें सांगतां येतील; भौतिक अस्तित्व, भौतिक व्यक्तित्वानें युक्त असतें; तेथें आमच्या परिचयाचें मानसिक व्यक्तित्व असत नाहीं; पण तेथें आंतर प्रच्छन्न मनाहून खोल व व्यापक व्यक्तित्वशून्य पुरुष असतो; अ-जाणिवेच्या, नेणिवेनें भरलेल्या वस्तूंमध्यें एक जाणिवेचा, जाणीवयुक्त व्यक्तिपुरुष असतो; हा आंतर व्यापक पुरुष त्या वस्तूच्या पोटीं असलेल्या शक्तीचें कार्य कसें घडावयाचें तें ठरवीत असतो. जड वस्तु सभोंवतालच्या वस्तूंच्या संपर्कांचें संस्कार घेते आणि स्वतःमध्यें सांठविते; ह्या जड वस्तूंतून नाना शक्ती बाहेर पडतात; या संस्कारांचा आणि शक्तींचा उपयोग करून गुप्त-विद्या त्या वस्तूचें भूत चरित्र जाणूं शकते, त्या वस्तूपासून निघणाऱ्या शक्तींचा प्रत्यय आम्हांला देऊं शकते, इत्यादि गोष्टी ज्ञानवान् लोक सांगतात : अर्थात् परिसराचे संस्कार घेण्याची पात्रता कोणत्याहि जड वस्तूला जी येते, ती तिच्या ठिकाणीं असणाऱ्या असंघटित व्यापक जाणिवेमुळें -- जी जाणीव अद्यापि त्या वस्तूच्या आकाराला ज्ञानयुक्त करूं शकत नाहीं त्या व्यापक असंघटित जाणिवेमुळें (पुरुषामुळें) -- येते, ही गोष्ट उघड आहे. बाहेरून आपल्याला जें दिसतें तें हें कीं, वनस्पति आणि खनिज ह्यांसारख्या पदार्थांमध्यें त्यांच्या त्यांच्या शक्ती असतात, गुणधर्म असतात, आंतरिक प्रभाव असतात. पण हे गुणधर्म वगैरे प्रकट करण्याची शक्ति किंवा साधनसामुग्री त्यांजमध्यें अंगची नसल्यानें हे पदार्थ जेव्हां माणसाशीं किंवा इतर पदार्थांशीं संबद्ध होतात किंवा जीव
पान क्र. ४४९
जेव्हां त्यांचा जाणीवपूर्वक उपयोग करतात तेव्हांच त्यांच्यामधील प्रभावकारी शक्ती कार्यान्वित होऊं शकतात. मानवानें जी शास्त्रें निर्माण केलीं आहेत, त्यांतील कित्येक शास्त्रांची व्यावहारिक बाजू, वस्तूंच्या अंतरंगीं असलेल्या प्रभावी शक्तींचा मानवाच्या हेतुपूर्ततेसाठीं उपयोग करणें ही आहे. पण ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे कीं, वस्तूंच्या अंगच्या या ज्या शक्ती व प्रभाव आहेत, ते केवळ वस्तूंतील अनिश्चित द्रव्याचे गण नसून, तिच्यांतील पुरुषाचे, जाणीवयुक्त अस्तित्वाचे गुण आहेत, ते आत्म्याचे गुण आहेत -- स्वरूपमग्न अचेतन अस्तित्व हें जें अतिचेतन आत्म्यानें रूप घेतलें, त्या त्याच्या अचेतन रूपांतून त्याच्या शक्तिप्रभावानें वर येणारे असे हे त्याचे गुण आहेत. भौतिक वस्तूंचें यांत्रिक कार्य हें याप्रमाणें जाणिवेचें (जाणीवयुक्त शक्तीचें) कार्य असतें; वस्तूच्या अंतरंगीं स्वाभाविकपणें असलेल्या स्वरूपमग्न दर्शनी अचेतन आत्म्याचेंच तें कार्य असतें. भौतिक जड वस्तूनंतर विकासक्रमांत वनस्पतिरूप प्राथमिक जीवकांचा वर्ग येतो; या प्राथमिक जीवकांत, मनाच्या खालच्या पातळीवरचीं प्राणिक स्पंदनें हें रूप जाणीवयुक्त आत्मशक्ति घेते; या स्पंदनांत विकासक्रमांत पुढें प्रकट होणारी संवेदना गर्भित असते; वनस्पती आपल्या वाढीसाठीं प्रकाश, हवा, जागा यांच्या प्राप्तीसाठीं धडपडत असतात; त्यांचे ठिकाणीं स्वसंगोपन व स्वसंवर्धनबुद्धि असते; पण ही स्वाभाविक बुद्धि प्रकट करण्यासाठीं त्यांच्याजवळ अवयवांचें साधन नसतें. वनस्पती स्थावर ठिकाणाला जखडलेल्या असतात; त्यांच्या अंतरंगांतील स्वाभाविक, स्वसंगोपनेच्छा अंतरंगांतच राहते; तिला बाहेर व्यक्त होतां येत नाहीं. सभोंवरच्या ? वस्तूंशीं संबंध जोडण्यासाठीं ज्यांत कांहीं व्यवस्था नाहीं अशी स्थावर अवस्था, जागेला जखडल्याची अवस्था वनस्पतींची असते. स्थावर स्थितिशील अचल वनस्पती आलेले संपर्क सहन करतात, त्यांचा परिणाम स्वत:च्या ठिकाणीं पचवितात : त्या आपला संपर्क स्वेच्छेनें कोणावर लादूं शकत नाहींत, पण जवळ आलेल्यावर हा संपर्क अनिच्छेनें त्या लादतात; वनस्पतींमध्यें अचेतनतेचें राज्य प्रभावी असतें. अचेतनतेला गुप्त असें अभेदनिष्ठ वस्तुज्ञान असतें आणि या ज्ञानाच्या आधारावर अचेतनता वनस्पतींच्या ठिकाणीं कार्य करीत असते; वनस्पतींच्या पृष्ठभागावर जाणीवयुक्त ज्ञानाची, ज्ञानलाभाची संपर्कनिष्ठ साधनें तयार झालेलीं नसतात; या साधनांचा उदय स्थितिशील वनस्पतींपेक्षां पुढच्या वरच्या
पान क्र. ४५०
गतिशील जीवांमध्यें होतो; हे जीव बाह्य जाणीवयुक्त जीवन जगूं लागलेले असतात. या जीवांच्या बाबतींत बंदींत असलेली जाणीव वर पृष्ठभागावर येण्यासाठीं धडपडत असते. जीवाची ही धडपड, त्याचा इतर जीवांशीं व जगताशीं जाणीवयुक्त संबंध प्रस्थापित करण्याकरितां चाललेली असते. जीव आतां बाह्य जीवनानें इतरांपासून वेगळा झालेला असतो आणि प्रथम अर्धवट आंधळेंपणानें आणि पुढें जाणतेपणें इतर जीवांशी आणि जगताशीं तो आपला संबंध स्थापित करूं पाहत असतो. आपले संपर्क संख्येनें वाढवून तो आपली जाणीव वाढवीत असतो. इतरांचे जितके संपर्क तो घेईल आणि जितके संपर्क तो इतरांना देईल, तितकी त्याच्या जाणिवेच्या वाढीस मदत होते. जीवाला कांहीं गरजा असतात, त्याला कांहीं प्रेरणा असतात. या गरजांच्या पूर्तीसाठीं, या प्रेरणांच्या तृप्तीसाठीं त्याला संपर्क घ्यावे द्यावे लागतात. याप्रमाणें संपर्कांच्या देवघेवीनें जीव आपली जाणीव वाढवीत अचेतनाच्या पातळींतून वर येतो, अवचेतनाच्या पातळींत जीवन जगतो व पुढें आणखी विकास पावत पावत तो मर्यादित विभक्ततानिष्ठ ज्ञानाचा अधिकारी होतो.
आत्म्याची मूळ स्वयंभू जाणीव नाना शक्तींनीं युक्त असते; त्या जाणिवेंत या शक्ती अंगभूत, स्वाभाविक असतात; अचेतन अवस्था ही, मूळ अतिचेतन आत्मदशेची उलटी अवस्था असून, तेथें अभेदनिष्ठ ज्ञान गुप्त आणि आवरणांखालीं झांकलेलें असतें. या गुप्त आवरणांखालीं अभेदज्ञानांत सर्व आत्मशक्ती स्वभावत: वास करतात; अचेतन अवस्थेंतून आत्मजाणीव जसजशी वर येऊं लागते, तसतशी तिची एक एक शक्ति प्रकट होऊं लागते; अचेतन अवस्थेनंतर क्रमानें भेदनिष्ठ जाणीव प्राथमिक जीवामध्यें उदय पावून, हळू हळू वाढत जाते. या विकासक्रमांत आत्म्याच्या सर्व स्वाभाविक शक्ती हळू हळूं प्रकट होतात. त्यांचा आरंभींचा आविष्कार पाहिला, तर त्यांचें स्वरूप अगदीं संकुचित आणि चांचपडत कार्य करणारें असें असतें; मूळ आत्मजाणीव प्रथम अगदीं दडपलेल्या दडलेल्या प्रमादपूर्ण संवेदनेचें रूप घेते; पुढें ही संवेदना रेखीव बिनचूक संवेदनेचें रूप घेते. तिला पुढें जीवनगत सहजप्रेरणेची, गुप्त जीवन-प्रेरणेची मदत मिळूं लागते; पुढें प्राणनिष्ठ मन उदय पावतें, या प्राणिक मनाची वस्तुदर्शन शक्ति काम करूं लागते; या शक्तीच्या पाठोपाठ अंधुक अशी जाणीवदृष्टि वस्तूंचें निरीक्षण करीत येते;
पान क्र. ४५१
वस्तूंचा स्पर्शहि या अंधुक जाणिवेला होऊं लागतो; नंतर भावना उदय पावते; ती आपली स्पंदनें बाहेर पाठविते; दुसऱ्यांशीं देवघेव करूं पाहते. पृष्ठभागावर शेवटी उदय पावणारी वस्तु म्हणजे विचारशक्ति होय; वस्तूंचे सर्वांगीण ज्ञान ही शक्ति करून घेऊं पाहते; तिच्यासमोर येणारा पुरावा तपासून एकत्र करून, ती त्यांतून वस्तुविषयक ज्ञानाची इमारत उभारते. पण या सर्व शक्तींमध्यें अपूर्णता असते; विभक्तताजन्य अज्ञानानें सर्व शक्ती लुळ्यालंगड्या झालेल्या असतात. आरंभींची अचेतनता आपलें अंधारमय आवरण सर्वांवर घालून, त्यांचें सामर्थ्य लपवीत असते. सर्व शक्ती आपल्या कार्यासाठीं बाह्य साधनांवर अवलंबून असतात. त्यांना स्वयंसिद्ध अधिकारानें कार्य करतां येत नसतें. जाणीव प्रत्यक्षपणें जाणिवेवर कार्य करूं शकत नाहीं. मानसिक पातळीची जाणीव, ही वस्तूंना कांहीं स्वयंनिर्मिति साधनांनीं व्यापून व त्यांच्यांत या साधनांनीं प्रवेश करून, तत्संबंधीं ज्ञान मिळविते. तथापि मानसिक जाणिवेला कोणतीहि वस्तु खरी स्वाधीन करून घेतां येत नाहीं. तिला अभेदनिष्ठ ज्ञान लाभत नाहीं. मूळ जाणिवेप्रमाणें कोणत्याच वस्तूशीं तद्रूप होऊन तिचें ज्ञान मानसिक जाणिवेला मिळवितां येत नाहीं. आंतर व्यापक पुरुष पृष्ठभागीय मनावर आणि संवेदनाशील इंद्रियांवर स्वत:च्या गुप्त क्रिया, शुद्ध स्वरूपांत लादूं शकतो. मानसिक चिकित्साशक्तीच्या सामान्य रूपांत त्यांना परिवर्तित न होऊं देतां लादूं शकतो. तेव्हां त्याच्या ज्या आंतर ज्ञानपद्धती आहेत, त्या प्राथमिक स्वरूपांत पृष्ठभागावर अनुभवास येऊं शकतात. पण ही घटना अपवादात्मक असते; आम्ही आमचें ज्ञान सामान्यत: अप्रत्यक्ष साधनांनीं मिळवितो; या ज्ञानाच्या सामान्य पद्धतीच्या दृष्टीनें, केव्हां केव्हां पृष्ठभागावर दृष्टोत्पत्तीस येणारी ज्ञानपद्धति असामान्य भासते -- असामान्य दोषयुक्त किंवा असामान्य गुणयुक्त, हीन दर्जाची किंवा उच्च दर्जाची भासते. आंतर अस्तित्वांत आम्ही मोकळेपणें पदार्पण करूं शकलों, आंतर अस्तित्व आणि बाह्म अस्तित्व यांच्यामधील भिंतीला आम्हीं दरवाजा केला व तो आम्हीं उघडा ठेवला, तर मात्र बाहेरचें अप्रत्यक्ष ज्ञान आम्हांला मिळून, त्याला आंतून मिळणाऱ्या प्रत्यक्ष निकटच्या ज्ञानाची जोड देतां येते. आंतर पुरुषाच्याहि पलीकडे खोलांत खोल जागीं आमचा खरा आत्मा असतो, तेथें अतिचेतन जाणीव असते. हा आमचा आंतरतम आत्मा, अतिचेतन जाणिवेचा आत्मा आम्ही आपलासा केला, आमची जागृति
पान क्र. ४५२
वाढवून वाढवून, या आन्तरतम आत्म्याचे ठिकाणीं आम्हीं जागृति धरली, म्हणजे खरें आध्यात्मिक ज्ञान आम्हांला मिळूं लागतें -- या ज्ञानाचा पाया या ज्ञानाची घटकशक्ति, या ज्ञानाचें स्वाभाविक सारतत्त्व तद्रूपता, तादात्म्य, अभेद, एकरूपता, एकता हें असतें.
पान क्र. ४५३
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.