Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण बारावें
अस्तित्वाचा आनंद - उत्तर
त्या ब्रह्माचें नांव आनंद आहे; आनंद म्हणून त्या ब्रह्माची आम्हीं पूजा केली पाहिजे, आणि आनंद म्हणून त्या ब्रह्माच्या प्राप्तीसाठीं यत्न केला पाहिजे, साधना केली पाहिजे.
- केन उपनिषद् ४.६
अगाध शांत सागर असावा आणि त्या सागराच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारें फेंसाळणाऱ्या लाटांचा खेळ चालावा, त्याप्रमाणें आमच्या जीवनाचें स्वरूप आहे. आमच्या जीवनांत खोल, अस्तित्वाच्या आनंदाचा अनंत अगाध सागर आहे; हा आनंद आमच्या जीवनाशीं अविभाज्यपणें निगडित आहे आणि त्यावर लाटांप्रमाणें आमच्या बाह्य पृष्ठभागीय संवेदनांचा खेळ चाललेला आहे. कधीं सुखसंवेदना, कधीं दुःखसंवेदना, कधीं ना दु:ख ना सुख असा तीन प्रकारचा खेळ भरती-ओहोटीप्रमाणें आमच्या जीवनाच्या आद्यस्थानीं व अन्तीं असलेल्या अस्तित्वानंदरूप सागराच्या पृष्ठभागावर चाललेला असतो. विश्वाचें मूळ आनंद असतांना, त्याच आनंदाच्या विश्व-रचनाव्यापारांत दुःख घुसलें कसें ? या प्रश्नाचें खरें उत्तर वरील प्रकारचें आहे. सृष्टीचा आत्मा म्हणजे अनंत, अविभाज्य व एकच एक असें अस्तित्व, सद्वस्तु. त्या अस्तित्वाचा मूलभूत स्वभाव किंवा शक्ति ही ज्ञानमय, आत्मजाणीवयुक्त पुरुषाची अनंत अमर शक्ति आहे; आणि या आत्मजाणिवेचा मूळ स्वभाव किंवा तिचें स्वतःविषयीचें मूलभूत ज्ञान हें अस्तित्वाचें अनंत अटळ सुख आहे. सृष्टीचें मूळ असलेली स्वयंभू सद्वस्तु आपला स्वाभाविक आत्मानंद नित्य टिकवून असते; अरूप असतांना, आणि धारण केलेल्या सर्व रूपामध्यें आपला आत्मानंद सद्वस्तु नित्य भोगीत असते; स्वतःच्या अनंत अविभाज्य अस्तित्वाचें त्या सद्वस्तूला असणारें ज्ञान, कधीं खंड न पावणारें, नित्य
पान क्र. १८६
आत्मानंदपूर्ण असतें. तिचीं विभक्त असणारीं, मर्यादित व नानाप्रकारचीं जीं रूपें असतात त्या रूपांमध्येंहि ही सद्वस्तु नित्य आत्मानंदपूर्ण असते. सामान्यतः स्वत:ची जी बाह्य कृत्रिम संवय किंवा आत्मजाणीवयुक्त जीवनाची जी विशिष्ट रीति असते, त्या संवयीच्या व त्या जीवनरीतीच्या बंधनांत राहून आमचा आत्मा व्यवहार करीत असतो; या बंधनांतून त्यानें स्वतःस वर काढलें म्हणजे त्याला जड द्रव्याच्या दर्शनी नेणिवेंत, अनंत जाणीवयुक्त शक्तीचें दर्शन घडतें; ही शक्ति जडांत नित्य वसति करून आहे, ती आपलें स्थान कधींहि सोडीत नाहीं, अचलपणें ध्यानमग्न अशी राहून कार्य करीत असते, असें ज्ञान आमच्या आत्म्याला होतें. त्याचप्रमाणें जडाच्या दर्शनी संवेदनाशून्यतेंत आमच्या बंधनमुक्त आत्म्याला अनंत ज्ञानयुक्त आनंदाचें दर्शन घडतें. जडांत हा आनंद सर्वव्यापी आहे, निरतिशय स्वरूपाचा आहे, कोणत्याहि कारणानें त्यांत न्यूनता येऊं शकत नाहीं, असें ज्ञान त्यास होतें आणि या ज्ञानामुळें तो जडांतील आनंदाशीं समरस होतो. हा जो आनंद आमच्या आत्म्याला जडांत प्रतीत होतो, तो त्याचाच आत्मानंद असतो; जडांत असणारा आत्मा त्याचाच आत्मा (तोच) असतो. हा आत्मा सर्वत्र व सर्वव्यापी असतो; परंतु आमचें सृष्टीविषयींचें व स्वत:विषयींचें जें सामान्य ज्ञान तें वस्तूच्या अंतरंगाला स्पर्शच करीत नाहीं, तें वरवरच्या भागांतच जागृत राहतें, वावरत राहतें. या ज्ञानापासून आमचा स्वतःचा आत्मानंद किंबहुना आमचा स्वतःचा आत्मा लपलेला राहतो. आमच्या सामान्य ज्ञानाच्या कक्षेंत आमचा आत्मा व आत्मानंद न आल्याकारणानें ते खोल खोल दूरवर आहेत अशीच सामान्य ज्ञानाची भावना होते. खरोखरी आत्मानंद जसा सर्व रूपांत तसाच तो सर्व अनुभवांतहि असतो. सुखाचे, दु:खाचे आणि उदासीनतेचे सर्व अनुभव वस्तुतः आत्मानंदपूर्ण असतात. या सर्व अनुभवांत आत्मानंद गुप्त, खोल व अर्धनेणिवेनें व्याप्त अशा स्थितींत असतो आणि यामुळेंच सर्व वस्तूंना व जीवांना अस्तित्वांत राहणें शक्य होतें. दुःखाच्या, निसर्गक्षोभाच्या प्रतिकूल परिस्थितींतहि तो अस्तित्व टिकवून धरतो. जड वस्तु व जीव अस्तित्वाला चिकटून राहतात, अस्तित्वांत राहण्याची इच्छा सर्व परिस्थितीवर मात करते, याचें कारण सर्वगत आत्मानंद होय. जीवांत जी स्वत:च्या संरक्षणाची उपजत प्रेरणा असते, केव्हांहि नष्ट न होण्याचा जो स्वभावधर्म जडांत असतो व मनांत जी अमरत्वाची आंतरिक भावना
पान क्र. १८७
असते त्या सर्वाचें मूळ, अस्तित्वाची दुर्दम्य इच्छा हें होय व त्या इच्छेचें मूळ गूढ आत्मानंद होय. सरूप, साकार अस्तित्व स्वत:चा विकास करीत असतें व त्या विकासाच्या सर्व अवस्थांत मुळाशी हा आनंद दडलेला असतो; एवढेंच काय पण कधीं कधीं, आत्महत्या करण्याची जी प्रेरणा प्राण्यास होते ती देखील अस्तित्वाची, आनंदरूप शुद्ध अस्तित्व टिकविण्याचीच दुर्दम्य इच्छा असते. एवढेंच कीं ती विपरीत रूपांत व्यक्त होत असते. वास्तविक आत्महत्येची इच्छा म्हणजे प्रस्तुत जीवनाहून वेगळ्या जीवनाचें आकर्षण होय. या आकर्षणामुळें प्रस्तुत जीवनाविषयीं घृणा उत्पन्न होत असते. आनंद म्हणजेच अस्तित्व, आनंद हाच सृष्टीचें गूढ कारण, आनंद हाच जन्माचें मूळ, आनंद हाच जीवनांत टिकण्याचें कारण, आनंद हाच जन्माचा शेवट असून आनंदांतच सृष्टि विलीन होते. उपनिषदांत म्हटलें आहे : ''आनंदांतूनच ही सर्व भूतें जन्म पावतात, आनंदामुळेंच ती जगतात नि वाढतात व शेवटीं आनंदाप्रत जाऊन त्यांत विलीन होतात.''
मूळ सद्वस्तु (आत्मा, पुरुष) वस्तुतः एकरूप आहे. परंतु आमच्या मनाला तिचीं सत् चित् आनंद अशीं तीन अंगें वेगवेगळीं कल्पावीं लागतात. केवळ विभक्त जाणिवेला भासणारीं मूळ एका तत्त्वाचीच हीं तीन अंगें किंवा मुखें आहेत. हें लक्षांत ठेवलें म्हणजे जुन्या दर्शनांच्या विभिन्न सूत्रांचा समन्वय लागूं शकतो व प्रत्येकाला त्याचें त्याचें स्थान प्राप्त होऊन त्यांच्यामधील अन्योन्यविरोध मिटूं शकतो. विश्व हें माया आहे, या सूत्राचा प्रथम विचार करूं. मूळ अस्तित्व शुद्ध, अनंत, अविभाज्य व अव्यय आहे. या मूळ अस्तित्वाशीं विश्वाच्या अस्तित्वाचा जो संबंध आहे तो लक्षांत घेतला आणि विश्वाकडे पाहतांना केवळ त्याच्या दर्शनी रूपांकडे लक्ष दिलें म्हणजे विश्व, विश्वाचें अस्तित्व हें माया असल्याचा प्रत्यय येऊं शकतो; आणि त्याचें वर्णन 'माया' या शब्दानें करण्याचा अधिकार आम्हांस पोंचतो. मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें दृश्य विश्व माया आहे असें आम्ही लेखावयास कोणतीच हरकत नाहीं. माया या शब्दाचा मूळ अर्थ 'समावेशक संग्राहक जाणीव' असा आहे; ही जाणीव आकार व रूपें घेणारी आहे, कारण ती विषयाला व्यापून, मापून मर्यादेंत बसविणारी आहे; अरूप अस्तित्वांत वस्तूची बाह्य-रेषा काढणें, तिची लांबी-रुंदी-उंची निश्चित करणें, आणि या प्रमाणें अरूपांत रूप ढाळणें हें मायेचें काम आहे; जें अज्ञेय आहे त्याच्या
पान क्र. १८८
विषयीं मनानें कल्पना करून त्याला ज्ञानाच्या कक्षेंत आणल्यासारखें करणें हें मायेचें काम आहे; भूमितीची निर्मिति करून तिच्या साह्यानें अमर्याद असलेल्याचें मोजमाप घेतल्यासारखें करणें हें मायेचें काम आहे. याप्रमाणें 'माया' शब्दाच्या मूळ अर्थात ज्ञान, कौशल्य, बुद्धि या गोष्टींचा समावेश होत असे. पण पुढें या शब्दाचें अवनतीकरण होऊन माया म्हणजे धूर्तता, फसवेगिरी, आभास असे मायेचे अर्थ झाले आणि नंतर दर्शनकारांनीं 'माया' हा शब्द आभास, इंद्रजाल या अलंकारिक अर्थानें आपल्या तत्त्वज्ञानांत वापरावयास आरंभ केला. सर्व दर्शनांत तो या अर्थानेंच येतो.
विश्व माया आहे, मिथ्या, असत्य आहे याचा अर्थ विश्वाला कसल्याच प्रकारचें अस्तित्व नाहीं असा नव्हे. कारण विश्व हें आत्म्याचें स्वप्न मानलें, तरीहि स्वप्न असेंपर्यंत आपल्याला तें सत्यच आहे. स्वप्न संपेल तेव्हां तें अस्तित्वांतून नाहींसें होईल, मिथ्या होईल असें फारतर कोणी म्हणूं शकेल. विश्वाला कोणत्याहि प्रकारें शाश्वत अस्तित्व नाहीं म्हणून तें मिथ्या असेंहि म्हणतां येत नाहीं; विशिष्ट विश्वें, विशिष्ट रूपें व आकार स्थूल दृष्टीनें, पदार्थ दृष्टीनें नाहींसे होऊं शकतात, होतात; मनाच्या दृष्टीनें त्यांच्यासंबंधानें असलेली व्यक्ततेची जाणीव अव्यक्ततेच्या जाणिवेंत रूपांतरित होते. परंतु या तात्त्विक वस्तू कांहीं केव्हांहि नाहींशा होत नाहींत; त्या शाश्वत टिकणाऱ्या आहेत. त्या वस्तू व्यक्तांतून अव्यक्तांत जातात व अव्यक्तांतून परत व्यक्तांत येतात; नित्य अगदीं अटळपणें त्यांची व्यक्तांत पुनरावृत्ति होत राहते. नित्य एका रूपांत त्या टिकत नसतील पण पुन: पुन: व्यक्तांतून अव्यक्तांत व अव्यक्तांतून व्यक्तांत येत जात राहतात. त्यांचें दृश्य-रूप नेहमीं बदलतें पण त्यांची एकंदर संख्या व त्यांचा मूळ पाया कधींहि न बदलणारा आहे. एवढेंच नव्हे तर नित्य असें जें जाणीवयुक्त अस्तित्व, आत्मतत्त्व आहे त्याच्यापुढें, कोणत्या ना कोणत्या प्रकारचें विश्व, कोणत्यातरी प्रकारच्या अस्तित्वाचा खेळ नसलेला कालखंड होता किंवा नव्हता अथवा तसा कधीं येईल किंवा नाहीं याविषयीं आम्हांला खात्री देतां येत नाहीं. असें एक अंतःस्फूर्त ज्ञान मात्र आम्हांला होऊं शकतें कीं, आम्हांला ज्ञात असलेलें विश्व त्या मूळ आत्मतत्त्वांतून येऊं शकतें आणि परत त्यांत जाऊं शकतें, त्यांतून तें येतें व त्यांत तें परत जातें, आणि ही ये-जा नित्य चाललेली असते.
पान क्र. १८९
विश्व माया आहे या सूत्रांत माया म्हणजे काय नव्हे तें वर सांगितलें. माया म्हणजे कसल्याहि प्रकारच्या अस्तित्वाचा किंवा शाश्वत अस्तित्वाचा अभाव असें नव्हे. विश्व माया आहे म्हणजे विश्व हें अनंत अस्तित्वाचें मूळ-सत्य नव्हे तर तें, या सत्याची, या आत्मज्ञानपूर्ण मूळ आत्मतत्त्वाची निर्मिति आहे, त्यानें केलेली रचना आहे. ही रचना मूळ शाश्वत सत्यानें मूळ शून्यांत किंवा मूळ शून्यापासूनहि केलेली नाहीं, तर आपल्या स्वतःच्या पोटीं आपल्या स्वत:तून केलेली आहे. -- या विश्वाची सामग्री, म्हणजेच त्याचा उगम, त्याचें सर्वव्यापक वसतिस्थान मूळ सत् किंवा अस्तित्व आहे. त्यांत जे आकार आहेत ते बदलणारे असले, तरी ते त्या सत्याचे स्वतःचे आहेत, व त्या सत्याला, त्याच्या ज्ञानयुक्त दृष्टीला ते तसे दिसतात. त्यांची सर्व रूपरेखा त्या सत्याच्या निर्मितिकुशल ज्ञानशक्तीनें ठरवलेली व रचलेली असते -- हे सत्याचे आकार व्यक्त होऊं शकतात, व्यक्ताचे अव्यक्त होऊं शकतात, अव्यक्त राहूं शकतात, अव्यक्त झालेले पूर्वींहून निराळ्या प्रकारें व्यक्त होऊं शकतात. व्यक्त आकार अव्यक्त झाल्यानंतर पुन: व्यक्त होतांना पूर्वींच्याच रूपांत व्यक्त झाला पाहिजे असा नियम नाहीं, त्याचप्रमाणें व्यक्त आकार नेहमीं एका रूपांत राहिला पाहिजे असाहि नियम नाहीं. आकारांची ही रूपविषयक व व्यक्तताविषयक अशाश्वति लक्षांत घेऊन त्यांना अनंत ज्ञानाचे आभास, अनंत जाणिवेचे भ्रम, असें आम्हीं हवें तर म्हणावें. पण असें म्हणण्यांत, जिला भ्रमाची, असत्याची पकड कधींच स्पर्श करणार नाहीं, अशा मनाहून श्रेष्ठ असलेल्या असीम जाणिवेला, मनाचे दोष चिकटविण्यासारखें होतें हें विसरून चालणार नाहीं. मन हें मर्यादित जाणिवेचें आहे, तें चुका करूं शकतें, त्यांत अक्षमता असते. पण मनाचे हे दोष किंवा त्यांची छाया असीम जाणिवेवर टाकणें हें एक असमर्थनीय धाडस आहे. अस्तित्वाचें मूळ-तत्त्व, मूळ-द्रव्य हें मिथ्या नाहीं, सत्य आहे; अविभक्त अविभाज्य आत्मजाणीवयुक्त मूळ अस्तित्वाचें कोणतें तरी एखादें सत्य, आमच्या विभक्त, मानसिक जाणिवेकडून घडणाऱ्या चुकांत, तिच्या विकृत वृत्तींत आणि कृतींत व्यक्त होत असतें; या गोष्टी लक्षांत घेतां विश्वासंबंधानें आम्हांला असें म्हणतां येतें कीं, तें सद्रूप ब्रह्माचें मूळ तात्त्विक सत्य नाहीं, तें सद्रूपाच्या मूलभूत अव्यय एकतेचें सत्य नाहीं, तर तें त्याच्या अनिर्बंध अनेकतेचें रूपात्मक दृश्य-सत्य आहे, तें त्याच्या अमर्याद
पान क्र. १९०
रूपांतर-योग्यतेचें, आकारविषयक अमर्याद रूपांतरक्षमतेचें दृश्य सत्य आहे. विश्वासंबंधानें आम्हांला एवढेंच म्हणतां येतें; यापलीकडे कांहीं म्हणतां येत नाहीं. (विश्व माया आहे या सूत्राचा अर्थ, या वरील विवेचनांत व विधानांत स्पष्ट केलेला आहे. ब्रह्माचीं सत्, चित् व आनंद हीं जीं मनानें कल्पिलेलीं तीन अंगें आहेत, त्यांतील सत् या अंगाशीं विश्वाच्या अस्तित्वाची तुलना करून, विश्वाला कोणत्या अर्थीं माया म्हणतां येतें व सद्ब्रह्माला सत्य कां म्हणतात तें वर दाखविलें आहे.)
मायावादांत विश्वाला माया म्हणतात, त्याप्रमाणें सांख्य दर्शनांत (प्रकृतिपुरुषवादांत) विश्व ही प्रकृतीची कृति आहे असें म्हणतात. सत् आणि आनंद हीं अंगें बाजूस ठेवून विश्वाच्या अस्तित्वाकडे केवळ जाणिवेच्या अंगाकडून, ब्रह्माच्या 'चित्' या अंगाकडून पाहिलें तर जाणीव ही शक्तिरूप असल्यानें विश्व हें शक्तीची कृति आहे अशी दृष्टि आपल्याला स्वीकारतां येते; शक्तीची कृति म्हणजे विश्व असें विश्वाचें वर्णन आपण करूं शकतो आणि तसा प्रत्ययहि आम्हांला येऊं शकतो. अर्थात् विश्वरचना करणाऱ्या या शक्तीला कामाला लावणारी ब्रह्माच्या जाणिवेची गुप्त इच्छाशक्ति आहे, किंवा जी ब्रह्मजाणीव विश्वाची मालक आहे व निरीक्षक आहे तिनें विश्वरचना करणाऱ्या शक्तीवर आपल्या मालक-निरीक्षकपणानें कांहींतरी अनिवार्य बंधन न कळत लादलें आहे व म्हणून ती शक्ति विश्वरचना करीत आहे असें म्हणणें आपणांस प्राप्त होतें. विश्व हें ब्रह्मजाणिवेच्या दृष्टीनें प्रकृतीची क्रीडा आहे; प्रकृति म्हणजे क्रियाशक्ति, जाणिवेची क्रियाशक्ति; पुरुष म्हणजे क्रियाशक्तीच्या कृतीकडे बघणारें, आणि दर्शनानंद भोगणारें जाणीवयुक्त अस्तित्व; पुरुषाच्या आनंदासाठीं, पुरुषाला राजी राखण्यासाठीं प्रकृति जो खेळ खेळते त्याचें नांव विश्व, असें या नव्या दृष्टीनें म्हणतां येतें; किंवा असेंहि म्हणतां येईल कीं, पुरुषाचें प्रतिबिंब शक्तीच्या (प्रकृतीच्या) हालचालींत पडतें, आणि या प्रतिबिंबयुक्त प्रकृतीच्या हालचाली माझ्याच आहेत असें पुरुष समजतो, असा हा प्रकृतीच्या पुरुष-प्रतिबिंबयुक्त हालचालींचा खेळ आहे. तेव्हां वस्तुजाताची जननी जी शक्ति किंवा प्रकृति तिचा खेळ म्हणजे विश्व होय; सर्व काळ न थांबतां अनंत आकार घेण्याची व घेत राहण्याची प्रेरणा या विश्वजननीचे ठिकाणीं आहे; नाना अनुभव स्वत: घेण्याचा व पुरुषाला देण्याचा हव्यास या प्रकृतीला आहे, आणि हा तिचा हव्यास शाश्वतचा आहे, कधीं पुरा न होणारा आहे.
पान क्र. १९१
मूळ अस्तित्वाच्या दृष्टीनें विश्वाला माया म्हणतां येतें; मूळ जाणीवशक्तीच्या दृष्टीनें विश्वाला शक्ति प्रकृतीचा पसारा म्हणतां येतें. आतां तिसरी दृष्टि मूळ आत्मानंदाची. शाश्वत अस्तित्व असणाऱ्या मूळ आत्म्याचा निजानंद आणि विश्व या दोहोंकडे एकदम दृष्टि टाकली कीं बालाचा आनंद, कवीचा आनंद, नटाचा आनंद, यंत्रनिर्मात्याचा आनंद ज्याप्रमाणें नाना प्रकारांनीं व्यक्त होतो त्याप्रमाणें मूळ आत्म्याच्या निजानंदाची लीला विश्वरूपानें व्यक्त झाली आहे, अशा प्रकारचें विश्वाचें वर्णन आपण यथार्थतेनें करूं शकतो आणि तसा प्रत्ययहि आपणांस येऊं शकतो. विश्वाचा वस्तुजाताचा आत्मा नित्य-युवा आहे, त्याचा आनंद कधींहि न संपणारा आहे. हा आनंदरूप आत्मा स्वत:च्या पोटांत स्वत:ला पुन: पुन: निर्माण करतो, आणि हा व्याप ते केवळ स्वत:मध्यें स्वत:च्या निर्मितींत होणाऱ्या आनंदासाठींच करतो. स्वत:च्या आविष्कारांत त्याला जो आनंदलाभ होतो त्या आनंदलाभासाठीं तो स्वत:मध्यें आविष्कार करीत राहतो. या सर्व व्यापांत लीला तोच, लीला करणारा तोच, लीला-भूमि तोच -- अशी ही अद्भुत वस्तुस्थिति आहे.
शाश्वत निश्चल अक्षर सच्चिदानंदाच्या दृष्टीनें विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करतां माया, प्रकृति व लीला या तीन कल्पनांवर आधारलेलीं अशीं जीं तीन सामान्य विधानें आमच्या दर्शनग्रंथांत सांपडतात आणि जीं सामान्यत: अन्योन्यविरोधी म्हणून मांडण्यांत येतात तीं तीन विधानें वस्तुत: एकमेकांशीं पूर्णपणें सुसंवादी व एकमेकांना पूरक आहेत. विश्वाचा आणि जीवनाचा संपूर्ण पसारा समग्रतेनें ध्यानांत आणावयाच्या दृष्टीनें हीं तीन विधानें सर्व मिळून एकत्र मांडणें अवश्य आहे. ज्या विश्वाचा एक भाग आम्ही आहों तें विश्व म्हणजे शक्तीचा गतिमान् अस्तित्वाचा पिंगा घालणें आहे असें उघड उघड दिसतें. (अस्तित्व म्हणजे गतिहीन शक्ति व शक्ति म्हणजे गतिमान् अस्तित्व असा येथें अर्थ होतो.) परंतु या शक्तीच्या दृश्य धडपडीच्या अंतरंगांत आम्ही शिरलों तर ती शक्ति म्हणजे एका निर्मितिसमर्थ अशा ज्ञानाचें नित्य व तरीहि नित्य बदलणारें असें तालबद्ध स्पंदन आहे असें आमच्या प्रत्ययास येतें; हें ज्ञान आपल्या शाश्वत अनंत अस्तित्वाचीं दृश्य सत्य-रूपें आपणां स्वत:च्या पोटांत आपल्या तालबद्ध स्पंदनानें निर्माण करून आपल्यापुढें उभीं करीत असतें. आत्मप्रकटन करणारीं स्वत:ची असंख्य रूपें लीलेसाठीं निर्माण करण्यांत मग्न झालेला अस्तित्वाचा अनंत आनंद
पान क्र. १९२
हा या तालबद्ध ज्ञानस्पंदनाचें अंतरंग कारण व हेतु असल्याचें दिसून येतें. विश्वासंबंधानें आम्हांला यथार्थ ज्ञान व्हावें यासाठीं हें सच्चिदानंदाचें त्रिमुखी दर्शन आम्हीं आरंभीं आत्मसात् करावयास हवें.
अस्तित्वाचा अनंत, अक्षर आनंद गतिशील होऊन, अनंत क्षर-रूपें धारण करण्याचा, अनंत क्षर आनंदाचा भोग घेत असतो -- हें विश्वाचें स्वरूप आहे, विश्वाच्या एकंदर प्रश्नाची गुरुकिल्ली या एका प्रत्ययांत आहे. तेव्हां, आमच्या संवेदनात्मक अस्तित्वांत ज्या सुख, दु:ख व उदासीन वृत्ति आलटून पालटून आमच्या वांट्याला येतात त्या सर्वाच्या पाठीमागें एक अविभाज्य जाणीवयुक्त अस्तित्व आहे, तें आपल्या नित्य स्वभावगत आनंदाचा आधार या सर्व सुखादि वृत्तींना, तसेंच अनुभवांना देतें, आपल्या आनंदाच्या विविध गतीनें या वृत्तींतील व अनुभवांतील विविधता निर्माण करतें, असें आम्हीं ओळखलें पाहिजे. हें आनंदमय ज्ञानमय अस्तित्व आमचा खरा आत्मा आहे. ज्या मनोमय पुरुषाला सुख, दु:ख आणि उदासीनता या तीन वृत्तींचा - स्पंदनांचा अपरिहार्यपणें अनुभव येतो, तो या आमच्या खऱ्या आत्म्यानें वस्तूचा संवेदनात्मक अनुभव घेण्यासाठीं पुढें केलेला त्याचा प्रतिनिधि आहे. विश्वाच्या विविध स्पर्शांना उत्तर म्हणून, त्यांची प्रतिक्रिया म्हणून घडणारें आमच्या विभक्त जाणिवेचें पहिलें तालबद्ध स्पंदन आमच्या संवेदनात्मक प्रत्ययांत आहे. हें उत्तर ही प्रतिक्रिया अपूर्ण व सदोष असते. हें स्पंदन संकीर्ण तालवैविध्यामुळें विसंवादपूर्ण असतें. आमच्या खऱ्या आत्म्याची पूर्ण एकता-प्रधान लीला आमच्यांत पुढें उदयास यावयाची असते. त्या भावी लीलेची पूर्वतयारी, प्रस्तावना या अपूर्ण, संकीर्ण व विसंवादी तालगतीच्या त्रिविध संवेदना करीत असतात; त्रिविध संवेदनाप्रत्ययांत खऱ्या पूर्ण स्वरमेळाचा, सुसंवादाचा अनुभव आम्हांला येत नाहीं. आमचा खरा आत्मा एकच एक विश्वात्मा आहे; कोणत्याहि अनुभवाचे प्रसंगीं, विविध अनुभव घडत असतां त्या एकच एक आत्म्याशीं आम्ही भावनेनें एकरूप व्हावयास शिकलों, त्याचा सर्वगामी पूर्ण स्वतंत्र सुसंवाद आम्ही आमच्या मनाचे ठिकाणीं अभ्यासानें प्रतिबिंबित करावयासं शिकलों म्हणजे विश्वांत सर्व संवेदनांच्या प्रसंगीं आत्म्याच्या पूर्ण स्वरमेळाचा, पूर्ण सुसंवादाचा आम्हांला अनुभव येऊं शकेल.
ही वरील दृष्टि व विचारसरणि बरोबर असेल, तर या दृष्टीचे
पान क्र. १९३
व विचारसरणीचे परिणाम म्हणून अपरिहार्यपणें कांहीं विशिष्ट गोष्टी आम्हांला मानाव्या लागतात. पहिली गोष्ट : आमच्या खोल अंतरांत आम्ही एकमेवाद्वितीय सच्चिदानंद ब्रह्म आहों, आमचें खरेंखुरें अस्तित्व पाहतां आम्ही अविभाज्य सर्वगामी जाणीव आहों आणि म्हणून स्वभावत: अटळपणें आम्ही सर्वागामी आनंद आहों, त्या अर्थीं आमच्या संवेदनात्मक अनुभवांत अनुस्यूत असलेलीं सुख, दुःख व उदासीनता हीं तीन स्पंदनें आमच्या अस्तित्वाच्या बाह्य व्यवस्थेचा भाग म्हणून असलीं पाहिजेत; आणि आमच्या जागृतींतील जाणिवेनें युक्त असा जो आमच्या अस्तित्वाचा सर्वांत बाहेरचा, सर्वांत वरचा मर्यादित भाग आहे, त्यानें ही व्यवस्था केलेली असली पाहिजे. या बाह्य व्यवस्थेच्या पाठीमागें खोल आमच्या अंतरांत वरच्या बाह्य जाणिवेपेक्षां पुष्कळच व्यापक खोल आणि सत्य असें कांहींतरी असलें पाहिजे आणि या आंतर वस्तूला बाहेरील सर्व अनुभवांत समानतेनें आनंदाचा नित्य अनुभव येत असला पाहिजे; वरचें मानसिक अस्तित्व या आंतरिक गूढ आनंदाच्या आधारानेंच काम करीत असलें पाहिजे. सर्व तऱ्हेच्या खटपटींत दुःखयातनांत कसोटीच्या प्रसंगांत -- रूपधारणाच्या या खळबळयुक्त घटनेंत मनोमय अस्तित्वाला अर्थात् पुरुषाला चिकाटीनें, धैर्यानें आपलें काम करीत राहण्याचें बळ या आंतरिक आनंदापासूनच मिळत असलें पाहिजे. आम्ही ज्याला आत्मा म्हणतो, मी म्हणतो, तो आमच्या अस्तित्वाच्या वरच्या पृष्ठभागावर कंपायमान असा एक आत्मकिरण असतो, त्याच्या पाठीमागें, त्याच्या खालीं सर्वत्र महान् अर्धजागृत जाणीव, तसेंच महान् अतिमानसिक जाणीव असते; या दोन्ही जाणिवांना बाहेरच्या सर्व प्रकारच्या अनुभवांतून कांहींतरी लाभ होत असतो; आमचा अर्धजागृत आणि अतिमानसिक जाणीवयुक्त आत्मा बाह्य 'मी'ला हे नानाविध अनुभव बुद्धिपुर:सर घ्यावयास लावीत असतो; विश्वांतील वस्तूंचा व घटनांचा संपर्क होण्यासाठीं हा बाह्य 'मी'चा एक प्रकारचा नाजुक ठसे घेणारा पडदाच जणुं आंतरिक द्विमुख आत्म्यानें अस्तित्वाच्या पृष्ठभागावर बसविलेला असतो; अर्धजागृत किंवा अधोमानसिक आणि अतिमानसिक जाणिवेचा महान् आत्मा स्वत: पडद्याआड असतो. बाह्य जगाचे संपर्क व त्यांचे अनुभव बाह्य 'मी'च्या पडद्याच्या द्वारां घेऊन तो आत्मसात् करतो आणि त्यांतून पहिल्यापेक्षां अधिक सत्य अधिक गूढ नि गाढ, अधिक सामर्थ्यवान व निर्माणकुशल अशी अनुभूति-अनुभूतिमूल्यें
पान क्र. १९४
तो अंतरात्मा अस्तित्वांत आणतो; हीं मूल्यें तो आपल्या खोल वसतिस्थानीं तयार करून मग वर पाठवितो; वरच्या 'मी' मध्यें वैयक्तिक बल, शील, ज्ञान, स्फूर्ति, या रूपांनीं तीं दृग्गोचर होतात; या महान् गुणांचीं बीजें येतात कोठून हें आम्हांला गूढ असतें; कारण आमचें मन फक्त वरतीं वरतीं फिरत, थरथरत असतें; त्याला एकाग्र होऊन खोल अंतरात्म्यांत राहून जीवन जगण्याचे ज्ञान आणि शिक्षण मिळालेले नसतें.
आमच्या सामान्य बहिर्मुख जीवनांत आमच्या खऱ्या आत्म्याचें हें सत्य आम्हांला अज्ञात असतें, आम्हांपासून लपलेलें असतें; केव्हां केव्हां या सत्याचें अंधुक दर्शन आम्हांला घडत असतें; हें सत्य आम्हांला सामान्य जीवनांत ज्ञात झालें, तरी तें आम्हांला पूर्णपणें ज्ञात होत नाहीं, पक्केपणें आमच्यांत तें स्थिर होत नाहीं. आम्ही आंतरिक जीवन जगण्यास शिकलों म्हणजे अगदीं निश्चितपणें आम्हांला आमच्या खऱ्या आत्म्याचें दर्शन घडतें; हा आमचा आत्मा खोल, गंभीर वृत्तीचा, शांत आनंदमय, सामर्थ्यसंपन्न आहे, विश्वाचा हुकुम त्याचेवर चालत नाहीं, तर विश्वावर त्याची सत्ता चालते, हा आत्मा स्वत: ईश्वर नाहीं, परंतु त्या ईश्वराचा आमच्या अंतरांत कार्य करणारा दिव्य तेजोमय अंश आहे; हा आमचा अंतरात्मा, ईश्वरांश आमच्या पृष्ठभागीं काम करणाऱ्या 'मी' ला आंतून आधार देतो, साह्य करतो, लहान बालकाप्रमाणें या 'मी'स तो वागवितो, 'मी'च्या चुका, त्याच्या रागलोभादि वृत्ती, त्याच्या सुखाच्या उड्या व दुःखाच्या हांका यांजकडे हा अंतरात्मा सस्मित होऊन पाहत असतो व त्या सर्व प्रसंगीं 'मी'ला धीर देऊन व सहानुभूति देऊन त्याचा हळूहळू विकास करीत असतो. एकदां आम्ही आंतरिक जीवन जगूं लागलों म्हणजे ही गोष्ट आमच्या प्रत्ययास येते. मुळांत जेथें होतों तेथें जर आम्ही परत गेलों -- अंतरात्म्यांत शिरलों -- आणि बाह्य अनुभवांशीं एकरूप न होतां आंतील ईश्वरी तेजोमय अंशाशीं एकरूप झालों, तर त्या आंतरिक तेजाच्या ईश्वरी वृत्तीनें जगांतील घटनांचा संपर्क आम्ही तोलूं शकूं, आमचें शरीर, प्राण, मन यांच्या संपर्कांच्या सुखदुःखांपासून दूर, आमच्या समग्र जाणिवेच्या स्थानीं आम्ही सुखेनैव राहूं शकूं; इतकेंच नव्हे तर, हे सर्व अनुभव आमच्या मर्यादित बाह्य जाणिवेचे अनुभव आहेत हें जाणून त्यांचा आम्ही योग्य तो उपयोग करूं; पण आमच्या आत्म्यावर -- आमच्या खऱ्या समग्र जाणिवेच्या अस्तित्वावर -- ज्यांचा परिणाम बाह्य जाणिवेवरील परिणामासारखा
पान क्र. १९५
होणार नाहीं. आंतील ईश्वरी अंशाशीं एकरूप झाल्यानें आम्हांला हें सर्व सहज करतां येईल. मनोमय कोशाच्या पाठीमागें आनंदमय कोश आहे; मनोमय कोश लहानसा मर्यादित आहे, तर आनंदमय कोश महान् आहे. तोच आमचा आनंदमय आत्मा आहे आणि विश्वसंपर्कानें क्षोभ पावणारी त्याची छाया म्हणजे मनोमय कोश किंवा मानसिक आत्मा होय. आमचा सत्य आत्मा वर पृष्ठभागावर नाहीं, तर तो आंत खोल आहे.
सुख, दुःख व उदासीनता ही स्पंदनव्यवस्था, आमच्या विकासाच्या अपूर्ण स्थितींतली वरवरची व्यवस्था असल्यानें, ही कायमची, अंतिम, अनिवार्य व्यवस्था होऊं शकत नाहीं, ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आम्हीं ध्यानांत घेतली पाहिजे. अमुक संपर्क झाला कीं त्याची प्रतिक्रिया म्हणून सुखाची वा दुःखाची अथवा उदासीनतेची अमुकच संवेदना झाली पाहिजे असा कांहीं अटळ नियम होऊं शकत नाहीं; संवयीप्रमाणें आमचे शरीर, प्राण, मन प्रतिक्रिया करतात; कांहीं एक विशिष्ट संपर्कानें आम्हांला सुख किंवा दुःख होतें याचें कारण एवढेंच कीं, तशी संवय आमच्या प्रकृतीला झाली आहे, तसें नातें आम्हीं त्या विशिष्ट संपर्काशीं नेहमींचें करून ठेवलें आहे. ज्या संपर्काला सुखसंवेदनेनें आम्हीं प्रतिक्रिया देत असतो, त्या संपर्काची प्रतिक्रिया उलट दुःखसंवेदनेनें देणें आणि जेथें आम्ही प्रतिक्रिया म्हणून दुःखसंवेदना प्रकट करतों, तेथें उलट सुखसंवेदना प्रकट करणें हें आम्हांला सर्वथा शक्य आहे. इतकेंच नव्हे, तर आमचे शरीर-प्राण-मनयुक्त बाह्य अस्तित्व विश्वाच्या संपर्कांना प्रतिक्रिया म्हणून सुख, दुःख किंवा उदासीन वृत्ति हें जें उत्तर संवयीने देतें, त्याचे ऐवजीं आमच्या खऱ्या महान् आनंदमय आत्म्याचा नित्यस्वभाव असलेल्या अक्षर आनंदाच्या रूपानें सर्वस्वीं स्वावलंबी असें उत्तर संवयीनें आम्ही देऊं शकूं, तें आमच्या स्वाधीन आहे. बाहेर शरीर-प्राण-मन यांना सुख-दुःख-उदासीनता यांची संवयीप्रमाणें प्रतीति होणें आणि खोल आंत आंतरात्म्यानें ह्या बाह्य प्रतिक्रिया नित्य अलिप्तपणें व आनंदानें स्वीकारणें यापेक्षां बाहेरच शरीर-प्राण-मन यांनीं सर्व संपर्कांना, अलिप्त आनंदानें उत्तर देणें यांत श्रेष्ठतर आत्मविजय असून, त्यात आत्मोपलब्धि-आत्मलाभ गाढतर व पूर्णतर झाल्याचा पुरावा आहे. आमचा खरा आत्मा पूर्णतया 'आमचा' झाला म्हणजे बाहेरच्या अनुभवांनीं आमच्या बाहेरच्या अस्तित्वांत उत्पन्न होणारी त्रिविध प्रतिक्रिया तत्काळ रूपांतर पावून, तिचे ठिकाणीं
पान क्र. १९६
आत्म्याचा नित्य आनंद प्रतीत होतो. सुख-दुःख व उदासीनता या प्रतिक्रिया आत्मदृष्टीनें अपूर्ण आणि खोट्या आहेत, त्या अपूर्ण प्रतिक्रिया बाहेर होत असतां आंतरात्मा नेहमींच त्या सर्वांचें सारखें स्वागत करतो व आपण नित्यानंदांत असतो. हाच आत्मा पूर्णपणें आम्हीं आपलासा केला म्हणजे बाह्य अस्तित्वांत देखील नित्य आनंद स्थिर होतो, सुख-दु:ख-उदासीनता या प्रतिक्रिया मुळींच होत नाहींत किंवा क्षणभरांत नाहींशा होऊन नित्यानंदाचें रूप घेतात.
मनाच्या ज्या प्रतिक्रिया असतात, त्यांत विशिष्ट संपर्काची प्रतिक्रिया सुख किंवा दु:ख होणें हें केवळ संवयीवर अवलंबून आहे, ही गोष्ट लक्षांत यावयास कठीण नाहीं. आमच्यांतील नाडीमय पुरुषाची (Nervous Being) गोष्ट निराळी आहे; त्याच्या बाबतींत प्रतिक्रिया थोडीबहुत नेहमींची ठरलेली असते, त्याच्या प्रतिक्रिया बदलूं शकणाऱ्या नाहींत असा त्याचा समज असतो, पण तो खोटा असतो. या नाडीमय पुरुषाला कोणत्याहि प्रकाराचा विजय, सिद्धि, मानसन्मान, सुदैव या गोष्टी जात्याच निरपवादपणें सुखद आहेत असें वाटतें. साखर ही जशी गोड लागलीच पाहिजे तशा या गोष्टी सुखद असल्याच पाहिजेत असें त्यास वाटतें; उलटपक्षीं कोणत्याहि प्रकारचा पराजय, असिद्धि, निराशा, अवमान, दुर्दैव या गोष्टी जात्याच निरपवादपणें दु:खद आहेत, कारलें जसें कडूच लागणार तशाच या वस्तू दु:खदच असणार, असें या नाडीपुरुषाला वाटतें. या प्रतिक्रियांत बदल करणें हें त्याच्या दृष्टीनें वास्तवापासून दूर जाणें आहे, अस्वाभाविक किंबहुना विकृत, रोगी वृत्तीचें आहे; नाडीमय पुरुष हा संवयींचा अंकित आहे, गुलाम आहे; विशिष्ट संपर्काला नेहमीं एका निश्चित प्रतिक्रियेनें मनुष्याकडून उत्तर मिळावें व संपर्कांसंबंधीं मनुष्याचा अनुभव विशिष्ट प्रतिक्रियांनींच व्यक्त व्हावा आणि त्यावरून मनुष्याच्या विश्वजीवनाशीं येणाऱ्या संबंधाचा निश्चित नकाशा तयार करतां यावा यासाठीं, या योजनेचें साधन म्हणून निसर्गानें नाडीपुरुष निर्मिला आहे. नाडीमय पुरुषाशीं तुलना करतां मनोमय पुरुष पुष्कळच स्वतंत्र आहे. कारण मनुष्यांत लवचिकपणा यावा, त्यांत बदल सुलभ व्हावा, त्यांत विविधता यावी, त्याची प्रगति सोपी व्हावी यासाठीं निसर्गानें या मनोमय पुरुषाची योजना केली आहे. हा पुरुष संवयींचा ताबेदार असला, तरी ती ताबेदारी जोंपर्यंत तो खुषीनें पत्करतो तोंपर्यंतच ती असते; त्याची इच्छा होईल तेव्हां
पान क्र. १९७
तो एक संवय टाकून दुसरी संवय लावून घेऊं शकतो; नाडीमय पुरुषाला स्वतःवर हुकमत करण्याची जोपर्यंत त्यानें मुभा दिली असेल, तोंपर्यंतच तो विशिष्ट संवयींचा गुलाम असतो; वस्तुत: नाडीमय पुरुष हा मनोमय पुरुषाचें एक साधन आहे, एक हत्यार आहे. मनोमय पुरुषाची सत्ता नाडीमय पुरुषावर चालते व चाललीच पाहिजे, ही स्वाभाविक सत्ता त्यानें न चालविण्याचें ठरविलें कीं नाडीमय पुरुषाची सत्ता त्याजवर चालू होते. वस्तुत: पराजय, अवमान, नुकसान या गोष्टींनीं मनोमय पुरुषाला दुःख झालें पाहिजे असें कांहीं त्याजवर बन्धन नाहीं; या गोष्टी आणि इतर अशा गोष्टी किंवा कोणत्याहि गोष्टी घडल्या असतां दुःख करणें किंवा त्यांजकडे पूर्णपणें कानाडोळा करणें किंवा त्यांचें मोठ्या आनंदानें स्वागत करणें ही त्याच्या खुषीची गोष्ट आहे; तो यांपैकी कांहींहि करूं शकतो. अशी वस्तुस्थिति असल्यानें मज्जातंतूव्यूह किंवा नाडीसंघ (Nerves) आणि शरीर यांची सत्ता आपल्यावर चालूं द्यावयाची नाहीं असें जितक्या प्रमाणांत मनुष्य ठरवितो व त्याच्या शारीर व प्राण-संबंधीं अंगांच्या विश्वविषयक संपर्कांशीं आणि प्रतिक्रियांशीं जितक्या प्रमाणांत तो तटस्थतेनें वागतो, तितक्या प्रमाणांत त्याचें जीवन स्वातंत्र्यसंपन्न होतें. तेव्हां, मनुष्य मनांत आणील तर बाह्य स्पर्शाची गुलामगिरी पार झुगारून देऊं शकेल आणि विश्वाच्या संपर्कांना कोणत्या प्रतिक्रियांनीं उत्तर द्यावयाचें हें तो आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार ठरवूं शकेल.
शारीरिक सुखदुःखाला वर दिलेला संवयींच्या सार्वत्रिक सत्याचा नियम लावणें थोडें अवघड आहे. कारण नाडीसंघ आणि शरीर यांचा हा खास प्रांत आहे. बाह्य संपर्क, बाह्य दडपण यांची ज्यावर स्वाभाविकपणें हुकमत चालते, त्याची वसतीची जागा, त्याचें केंद्र हा प्रांत आहे. तरीपण येथेंहि त्या सार्वत्रिक सत्याचें ओझरतें दर्शन घडते. आपण असें पाहतों कीं संवय असेल त्याप्रमाणें विशिष्ट शारीर संपर्क एकाला सुखद तर दुसऱ्याला दुःखद, एकाच मनुष्याला आज सुखद तर उद्यां भिन्न परिस्थितींत किंवा भिन्न विकासावस्थेंत दुःखद भासेल. आपण असेंहि पाहतो कीं, फार मन:क्षोभाचा किंवा फार उच्च नैतिक किंवा भावनिक ध्येयविलासाचा काळ असतांना किंवा ध्येयसिद्धीच्या फार मोठया आनंदाच्या काळांत, साधारण स्थितींत तीव्र यातना देणारे संपर्क आणि त्या संपर्काचे दुःख मनुष्याला भासत देखील नाहीं आणि
पान क्र. १९८
भासलेंच तर त्या संबंधानें तो बेफिकीरपणें वागतो, त्याची दखल घेत नाहीं. पुष्कळ उदाहरणें अशीं असतात कीं, अतिक्षोभाचा, अतिआनंदाचा काळ संपून मज्जातंतूंच्या स्वाभाविक शारीर प्रतिक्रियेला पुन: वाव मिळाला आणि त्या विशिष्ट प्रसंगीं दुःख करण्याचें मनाचें संवयीचें कर्तव्य किंवा धर्म आहे अशी मनाला आठवण करून देतां आली म्हणजे मन पुन्हां दु:ख करूं लागते; पण या संवयीच्या प्रतिक्रियेला परत वाव देणें किंवा मिळणें अपरिहार्य नाहीं. तोहि संवयीचाच प्रकार आहे, निसर्गाचा नियम नाहीं. संमोहन विद्येच्या प्रयोगांत (Hypnotism) असें दिसून येतें कीं, प्रयोगविषय झालेल्या मनुष्याला प्रयोगकाळीं अर्थात् प्रयोगनिर्मित अस्वाभाविक मनोवस्थेंत जखमेचें किंवा कापण्याचें दु:ख वाटतां कामा नये असा यशस्वी आदेश जसा देतां येतो तसा तो पुन: जागृतीवर आल्यावर देखील त्याला नेहमीच्या संवयीप्रमाणें दु:ख वाटतां कामा नये असाहि आदेश यशस्वीपणें देतां येतो. या घटनेचें कारण अगदीं सरळ आहे. नाड्यांच्या-मज्जातंतूंच्या नेहमींच्या प्रतिक्रियांची गुलाम असलेली प्रयोगविषयाची जागृतींतली नेहमींची जाणीव आपल्या मोहिनीक्रियेनें कामावरून दूर करून, हा मोहिनीप्रयोग करणारा मनुष्य तिच्या पाठीमागें खोल असलेल्या अंतर्यामींच्या मनोमय पुरुषाला विनवून कामाला लावीत असतो; हा अंतर्यामींचा पुरुष नाडीसंघ आणि शरीर या दोहोंचा मालक असून, आपल्या इच्छेनुसार तो आपली मालकी गाजवूं शकतो. अर्थात् या मालकाकरवीं जागृतींतहि, मोहिनीमुक्त झाल्यावरहि, दु:ख न करण्याचा आदेश मोहिनीप्रयोगकार प्रयोगविषयाला देत असतो. सुखदु:खांच्या प्रतिक्रियांपासून ही जी स्वतंत्रता, प्रयोगविषय झालेल्या मनोमय पुरुषाला लाभते, ती मोहिनीकाराच्या इच्छेनें, अस्वाभाविकपणें, मोहिनीनिर्मित कृत्रिम व्यवस्थेनें लाभते; ती त्वरेनें लाभते -- पण ही स्वतंत्रता ''परतंत्र'' असते, ती प्रयोगविषयाच्या खऱ्या मालकीची नसते; अर्थात् ती त्याला वाटेल तेव्हां उपलब्ध होऊं शकत नाहीं. तथापि मोहिनीकाराची इच्छाशक्ति जें घडवून आणते, तें आमची स्वत:ची इच्छाशक्तीहि घडवून आणूं शकते; अर्थात् त्याकरतां मनाला हळूहळू पाठ द्यावे लागतात. आपल्या स्वत:च्या इच्छाशक्तीनें स्वत:च्या मनाला पाठ देऊन शरीराच्या नाडीगत संवयीच्या प्रतिक्रियांवर जें प्रभुत्व मनाला प्राप्त होतें, तें त्याच्या स्वभावाचा भाग होऊन सर्वस्वीं त्याच्या मालकीचें होतें -- वाटेल तेव्हां त्याला तें गाजवतां येतें. हें प्रभुत्व पूर्ण व सर्वांगीण असेल किंवा
पान क्र. १९९
आंशिक व एकांगी असेल; तें आमच्या इच्छाशक्तीच्या कार्यक्षमतेवर व आकांक्षेवर अवलंबून राहील.
शारीर आणि मानसिक दुःख ही निसर्गाची अर्थात् आद्यशक्तीची योजना आहे. या शक्तीच्या उर्ध्वमुखी विकासक्रमांत, एक विशिष्ट संक्रमणविषयक हेतु साधण्यासाठीं ही दुःखाची व्यवस्था आहे. व्यक्तीच्या दृष्टीनें हा अनेक शक्तींचा, गुंतागुंतीचा, व्यक्तीला नाना प्रकारचे धक्के देणारा खेळ आहे. व्यक्ती म्हणजे मर्यादित अनेक घटकांचा बनलेला, बनविलेला असा जीव आहे; त्या जीवाची शक्ति मर्यादित आहे; विश्वाच्या संकीर्ण शक्तींच्या मध्यें त्याचें स्थान आहे; या विश्वशक्तींकडून त्याला अगणित धक्के बसतात; त्या धक्यांनीं त्याला जखमा होतात, त्याचा एखादा अवयव नाहींसा होतो, त्याचा देह-प्राणादि घटक-वर्ग मोडून तोडून जातो, जीर्णजर्जर होतो, शेवटीं तो ज्याला 'मी' म्हणतो त्याचाहि विनाश होतो. या सर्व गोष्टी व्यक्तीच्या बाबतींत होऊं शकतात; व्यक्तीला अपायकारक असा संपर्क किंवा धक्का यापासून शरीराला आणि नाडीसंघाला वांचविणारा व त्यापासून दूर करणारा शरीराचा आणि नाडीसंघाचा संकोचात्मक अथवा घृणादर्शक व्यापार, असें व्यक्तींच्या ठिकाणीं असलेल्या या दुःखाचें स्वरूप आहे. उपनिषदांत ज्या व्यापाराला 'जुगुप्सा' म्हणतात, त्याचा दुःख हा एक भाग आहे; आपणाहून दुसरें कोणी किंवा आपल्याशीं सहानुभूति नसलेलें, आपणाशीं विसंवादी अशा प्रकृतीचें जें कांहीं असेल, त्याच्यापासून दूर राहण्यासाठीं स्वतःच्या मर्यादित अस्तित्वाचा संकोच करणें, 'दुसऱ्यांच्या' हल्ल्याविरुद्ध, सहजप्रेरणेनें स्वसंरक्षणाची व्यवस्था करणें हा 'जुगुप्सा' शब्दाचा भावार्थ आहे. काय टाळावें तें सुचविणारी किंवा तें यशस्वीरीतीनें टाळतां न आलें, तर त्यावर उपाय करणें अवश्य आहे हें सुचविणारी निसर्गयोजना म्हणजे दुःख होय. शुद्ध जड जगतांत ही व्यवस्था नसते, असण्याचें कारणहि नाहीं, त्या जड जगतांत प्राणतत्त्व उदयास आलें म्हणजे ही व्यवस्था केली जाते; जड जगतांत दुःख टाळण्याची क्रिया यांत्रिक रीतीनें करतां येते -- जीववर्गांत यांत्रिक रीति पुरेशी नसते म्हणून 'दुःख संवेदनेची' रीति उपयोजिली जाते. जीव दुर्बळ व नाजूक शरीररचनेचा असतो. त्याची स्वतःच्या जडघटकांवरची सत्ता अगदीं तोकडी असते. म्हणून असा जीव जड जगतांत अस्तित्वांत येतांच ही 'दुःखसंवेदनेची' योजना बरोबर आणतो. जीवांत मनाचा अविर्भाव होऊन, त्याची जसजशी वाढ होत
पान क्र. २००
जाते, तसतशी त्याच्या बरोबर जन्माला आलेली व कामाला लागलेली दु:खयोजना वाढीस लागते. जोपर्यंत शरीर आणि जीव किंवा प्राण यांच्या बंधनांत मन वागत आहे, विश्वविषयक ज्ञानासाठीं व विश्वांत कृति करण्यासाठीं तें प्राणावर व देहावर अवलंबून रहात आहे, त्यांच्या मर्यादा तें स्वत:च्याच मर्यादा मानीत आहे व या मर्यादांमुळें उत्पन्न होणाऱ्या अहंमय स्वार्थी प्रेरणांना व हेतूंना शिरोधार्य मानून कार्य करीत आहे तोपर्यंत ह्या निसर्गनिर्मित दु:खसंवेदनेच्या योजनेची जरुरी असते. मनुष्याचें मन स्वतंत्र, अहंभावशून्य झालें, दुसऱ्या सर्व जीवांशीं आणि विश्वशक्तींच्या खेळाशीं जुळवून घेऊन खेळीमेळीनें राहण्याची कला त्याला साधली म्हणजे दु:खाचे नियोजित कार्य संपतें, त्याची उपयुक्तता संपते. जवळजवळ पूर्णपणें स्वतंत्र, अहंभावशून्य व विश्वमय झालेल्या मनुष्यांत जर तें दिसलें, तर त्याला जुन्या प्रकृतीचा केवळ अवशेष व संवयीचा निरुपयोगी प्रकार असें म्हणतां येईल. तरीपण नियतीच्या कार्यक्रमांत मनुष्याच्या आत्म्याचा अंतिम विजय निश्चित आहे. आज मनुष्याचा आत्मा जडाचें अंकितत्व करीत आहे; मनाच्या पातळीवरील अहंमयतेनें मर्यादित आहे. निश्चितपणें यांतून तो मुक्त होणार आहे आणि या मुक्ततेचा, या अंतिम विजयाचा एक महत्त्वाचा सारभूत घटक म्हणजे दु:खसंवेदनेचा अंतिम विलय हा असणार हेंहि निश्चित आहे.
दु:खसंवेदनांचा अंतिम विलय शक्य आहे याचें कारण मूळ अस्तित्वाचा आनंद हा सुखदु:खाच्या मुळाशीं आहे. सुख आणि दुःख दोन्हीहि या मूळ आनंदाच्याच प्रवाहांत आहेत. सुख-प्रवाह हा अपूर्ण प्रवाह आहे तर दु:ख-प्रवाह हा विकृत प्रवाह आहे. ही अपूर्णता आणि ही विकृति निर्माण होण्याचें कारण मूळ पुरुषाच्या जाणिवेचें अखंडत्व जाऊन, तिचें विभजन होऊन, त्यामुळें पुरुषाच्या आत्म्याचें विभजन झालें आहे हें आहे. मूळ पुरुषाला मर्यादा घालणारी व त्याचें मोजमाप करणारी जी माया, तिनें हें विभजन केलें आहे; या विभजनामुळें व्यक्ति व व्यक्तीचा 'मी' निर्माण झाला आहे आणि व्यक्तीच्या ठिकाणीं समग्र जाणिवेचा अभाव असल्यानें, तिला विश्वाच्या संपर्काचा अनुभव, खंडश: आणि 'मी'च्या अहंमय मर्यादित दृष्टीनें घ्यावा लागतो. हा खंडश: घेतलेला 'मी' दृष्टीचा अनुभव, मूळ आनंदाचे भिन्न भिन्न प्रवाह बनवून त्यांत कांहीं अपूर्ण व कांहीं विकृत करण्यास कारणीभूत होतो. जो आत्मा विश्वव्यापी आहे त्याला सर्व वस्तू आणि सर्व वस्तूंचे सर्व
पान क्र. २०१
संपर्क आनंदाच्या सत्त्वानें सुसंपन्न असेच वाटतात. या आनंदसत्त्वाला 'रस' म्हणतात; वस्तूंतील जीवनभूत द्रव्य किंवा सत्त्व आणि वस्तूंचा आस्वाद किंवा रुचि या दोन्ही गोष्टींना 'रस' हें नांव आहे. 'रस' हा सौंदर्यशास्त्रांतला शब्द आहे. आमचा ज्या गोष्टींशीं संबंध येतो, त्यांचा 'रस', त्यांतील आनंदसत्त्व आम्ही शोधीत नाहीं; सर्व वस्तूंत सर्व काळ असणाऱ्या आनंदसत्त्वाचें भान आम्हांला नसतें, आम्हांला आमच्या वैयक्तिक 'मी'च्या वासना, शंका, भीती, आवडीनिवडी यांचें तीव्र भान असतें आणि कोणत्याहि गोष्टीचा संबंध आला, कीं तिच्यामुळें आमच्या वासनादिकांवर काय परिणाम होतो इकडे आमचें सारें लक्ष असतें, म्हणून त्या गोष्टींतील आनंदरस आम्हांला त्याच्या स्वाभाविक स्वरूपांत प्रतीत होत नाहीं, तर तो केव्हां दुःख आणि यातना, केव्हां अल्पकालिक अल्प सुख, केव्हां औदासीन्य किंवा स्पष्ट संवेदनेची अक्षमता अशा नाना रूपांत अनुभवास येतो. आम्ही जर आमचे वैयक्तिक स्वार्थमय विचार आणि भावना पूर्णपणें दूर ठेवूं शकलों आणि आमच्या नाडीमय पुरुषावर आमची ही नितान्त निःस्वार्थता आम्हांला लादतां आली, तर आनंदरसाची विकृत आणि अपूर्ण रूपें, दुःखे आणि सुखें, हळूहळू आम्हांला नाहींशी करतां येतील आणि आमच्या आत्म्याचा स्वाभाविक धर्म असलेल्या अस्तित्वाच्या आनंदाचा खरा मूळ स्वाद विविध संपर्कांत व विविध प्रकारांनीं आम्हांला अनुभवतां येईल. कला आणि काव्य यांनीं आमच्यापुढें उभ्या केलेल्या वस्तूंचें व प्रसंगांचें आम्ही जेव्हां रसिकपणें ग्रहण करतों, तेव्हां सर्व वस्तूंत व सर्व प्रसंगांत एकच प्रकारचा नव्हे, तर विविध प्रकारचा आनंद अनुभवण्याची पात्रता, सामर्थ्य व शक्ति आमच्या ठिकाणीं थोडीबहुत असल्याचें आमच्या प्रतीतीस येतें. काव्यकृतींतील व कलाकृतींतील करुण, भयानक किंवा बीभत्स प्रसंग देखील आमच्या ठिकाणीं आनंदवृत्ति जागृत करतात; या विविध प्रसंगांतील करुण, भयानक, बीभत्स इत्यादि विविध रस आम्ही अनुभवूं शकतो व अनुभवतो. याचें कारण काव्यकृति व कलाकृति आम्ही अलिप्ततेनें बघत असतों; आमच्या वासनादिकांचा विचार, आमच्या संरक्षणाचा विचार (जुगुप्सा) त्या वेळीं आम्हांला त्रस्त करीत नसतो; केवळ समोरील चित्र आणि त्यांतील सारभूत भाग याकडेच आमचें सर्व लक्ष लागून राहिलेलें असतें. वस्तुसंपर्कांचें रसिकतेनें केलेलें हें रसग्रहण, ही आनंदप्रतीति, शुद्ध अस्तित्वानंदाच्या प्रतीतीचें अचूक प्रतिबिंब म्हणून
पान क्र. २०२
मानतां येत नाहीं. कारण शुद्ध अस्तित्वानंद हा मनाच्या क्षेत्रापलीकडील, कलातीत उच्च भूमिकेवरील अतिमानसिक आनंद आहे; या आनंदानें दुःख, भीति, भयानकता, बीभत्सता यांचा व त्यांच्या कारणांचाहि विलय होत असतो; कलेंतील आनंद असा विलय करीत नाहीं; तथापि वस्तुजातांत क्रमश: व्यक्त होतांना विश्वमय आत्म्याला जो अधिकाधिक आनंद अनुभवास येतो, त्या आनंदाची एक अवस्था अपूर्णपणें कां होईना कलानंद आमच्या प्रत्ययास आणतो, अपूर्णपणें ती अवस्था प्रतिबिंबित करतो. आमच्या स्वभावाच्या एका अंगास कलानंद मी-प्रधान संवेदनेपासून अलिप्त राहण्यास शिकवितो आणि विश्वात्मक वृत्तीहि शिकवितो. या वृत्तीमुळें आमचा एकचएक आत्मा एकाच परिस्थितींत आमच्या विभागलेल्या 'मी'हून वेगळ्या अनुभवाचा लाभ घेऊं शकतो; जेथें 'मी'ला अव्यवस्था आणि विसंवाद दिसतो, तेथेंच एकचएक आत्म्याला सुव्यवस्था, सुसंवाद, सौंदर्य प्रतीत होतें. आमच्या कलात्मक वृत्तींत आम्ही जी स्वतंत्रता व अहंमुक्तता उपभोगतों, ती जेव्हां आमच्या स्वभावाच्या सर्व वृत्तींत आमच्या वांट्यास येईल, तेव्हां आम्ही पूर्णपणें स्वतंत्र होऊं -- पूर्णपणे अहंमुक्त होऊं. आमचें ज्ञान वाढून आमचा दृष्टिकोन विश्वात्मक झाला, सर्वच वस्तूंसंबंधानें आमच्या ठिकाणीं अलिप्तता, असंगता निर्माण झाली, अनासक्ति असूनहि आम्ही आमच्या भावनात्मक व नाडीमय जीवनांत सर्वांशीं सहानुभूति ठेवून वागूं लागलों, म्हणजे आम्ही पूर्णपणें स्वतंत्र झालों व अहंमुक्त झालों असें होईल आणि आम्हांला सर्वत्र सौंदर्य प्रत्ययास येईल, सर्वत्र आनंदच आनंद लाभेल.
दु:खाचें स्वरूप, त्याचा स्वभाव आतां आपल्याला समजला. आम्हांमध्यें जी सामान्य जाणीव आहे, तिला विश्वाकडून होणाऱ्या आघातांना तोंड देण्याची, ते सहन करण्याची शक्ति नसते, म्हणून हे आघात टाळण्यासाठी किंवा हे आघात आल्यावर त्यांचा परिणाम म्हणून आमची जाणीव संकोचन पावते, आपलें अंग आंवरून घेते. हें संकोचन म्हणजे दु:ख होय. हें दु:ख होण्याचें कारण आमची आघात झेलण्याची व ते आत्मसात् करण्याची शक्ति सर्व आघातांच्या बाबतींत सारखी नाहीं; तसेंच, आमची आघात झेलण्याची शक्ति आणि आमच्यावर आघात करणारी विश्वाची स्वत:ची सर्वस्वामित्वशक्ति या दोहोंत सारखेपणां नाहीं; आम्ही आपली शक्ति 'मी' कल्पनेनें मर्यादित केलेली आहे; व विश्वशक्ति मात्र अमर्यादित आहे. आम्हीं 'मी' तंत्र होण्याचें कारण
पान क्र. २०३
आमचें खऱ्या आत्म्यासंबंधाचें अज्ञान, सच्चिदानंदविषयक अज्ञान हें होय. दु:खाचें हें स्वरूप आणि मूळ लक्षांत घेता दु:खाचें निर्मूलन कोणत्या मार्गानें होईल हें समजू शकतें. या निर्मूलनाची पहिली पायरी म्हणजे आघातप्रसंगींचें संकोचन - 'जुगुप्सा' - टाकून 'तितिक्षे'चा अंगीकार करणें ही होय. 'तितिक्षा' म्हणजे विश्वाच्या आघातांना तोंड देणें, ते सहन करून त्यांच्यावर जय मिळवणें. तितिक्षापूर्वक विजय मिळविल्यानें आम्ही हळूहळू दुसरें पाऊल टाकूं शकूं, ही दुसरी पायरी किंवा पाऊल म्हणजे 'वृत्तीची समता'. ही दोन प्रकारची असूं शकते. कोणताहि आघात असला, तरी उदासीन राहणें, आघाताचा कसलाच परिणाम स्वत:वर न होऊं देणें हा एक प्रकार, यांत सर्व आघातांना आम्ही सारखेच परिणामशून्य करतों. या उलट सर्व आघात सारख्याच आनंदानें स्वीकारावयाचे हा समतेचा दुसरा प्रकार. यापैकीं कोणतीहि समता आमची कायमची स्वाधीन होण्यासाठीं आम्ही प्रथम आमच्या 'मी' जाणिवेला (सुखदु:खबद्ध जाणिवेला) बाजूला करून, तिच्या जागीं सदानंद, सर्वानंद अशी 'सच्चिदानंद-जाणीव' पक्की केली पाहिजे. 'सच्चिदानंद-जाणीव' ही एकतर विश्वातीत किंवा विश्वापासून अलिप्त असूं शकेल; सारख्या औदासिन्यानें सर्व संपर्कांचा 'समाचार' घ्यावयाच्या मार्गानें ही दूरची आनंदावस्था प्राप्त होते; हा मार्ग संन्यास-मार्ग होय. तसेंच 'सच्चिदानंद-जाणीव,' विश्वातीत आणि विश्वमय अशी एकाच वेळींहि असूं शकेल; या सार्वकालिक व सर्वव्यापी आनंदावस्थेला पोंचण्याचा मार्ग म्हणजे समर्पण; 'मी'ने विश्वमय आत्म्याच्या स्वाधीन होणें, त्यांत विलीन होणें; सर्व संपर्कांचा सारख्याच सर्वस्पर्शी आनंदानें परामर्श घेणें हा आहे; प्राचीन वैदिक ऋषींचा हा मार्ग आहे. तथापि सुखाचे अपूर्ण संपर्क आणि दु:खाचे विकृत संपर्क, यांना सारख्याच औदासिन्यानें, तटस्थतेनें किंवा अलिप्ततेनें वागविणें ही गोष्ट आत्मनियंत्रणाचा पहिला प्रत्यक्ष व स्वाभाविक परिणाम असतो. ही गोष्ट साधल्यावर या तटस्थ वृत्तीचे रूपांतर सर्व संपर्कांचें सारख्याच 'गोडीनें' स्वागत करणाऱ्या आनंद-वृत्तींत हळूहळू घडून येऊं शकतें. सामान्यत: आत्मनियंत्रणाच्या मार्गानें साधक प्रथम सर्वत्र 'तटस्थ वृत्ति' व नंतर सर्वत्र 'आनंद-वृत्ति' सिद्ध करतो. सुख, दु:ख व उदासीन वृत्ति या त्रिमुखी स्पंदनाचें सर्वप्रेमी आनंदवृत्तींत एकदम रूपांतर करणें अशक्य नाहीं; परंतु मनुष्यप्राण्याला ही गोष्ट तितकी सोपी नाहीं. वर सांगितलेल्या
पान क्र. २०४
दोन टप्प्यांनीं हें ध्येय गांठणें त्याला अधिक सोपें असतें.
वेदान्तानें समग्रतेच्या दृष्टीनें जो सिद्धान्त प्रतिपादिला आहे, त्या सिद्धान्तावरून विश्वाचे वरील प्रकारचें दृश्य आपल्यासमोर उभें राहतें. वेदान्तानुसार एक अस्तित्व, सद्वस्तु आहे; ती अनंत आहे, अविभाज्य आहे. तिची शुद्ध आत्म-जाणीव पूर्ण आनंदमय आहे; ही जाणीव शक्तिरूप आहे, ही आनंदमय जाणीवशक्तीची शुद्ध निश्चल सद्वस्तु चलायमान होते, जाणीवशक्तीचा विविध खेळ उभा करते; प्रकृतीचा गतिमान् संसार व मायेचा खेळ उभा करते. जड भौतिक विश्वांत, तिच्या खेळाच्या पायाभूत विभागांत, जाणिवेच्या पातळीखालीं या सद्वस्तूचा अस्तित्वाचा आनंद असतो. तिच्या स्वतःच्या अंतरांत एकीभूत झालेला, जणुं आत्मध्यानमग्न असा तो असतो; नंतर हा आनंद एका तटस्थ वृत्तीचें, महान् सामूहिक तटस्थ स्पंदनाचें रूप घेतो; नेणिवेंतून किंचित् वर येतो; तथापि अद्यापि त्याला संवेदनेचें स्वरूप आलेलें नसतें; यानंतर मन आणि 'मी' उदयास येऊन वाढूं लागतांच हा आनंद त्रिमुखी स्पंदनाचें -- सुख-दुःख-औदासीन्याचें रूप धारण करतो; सर्वगत आनंदानें हें त्रिमुखी रूप घ्यावयाचें कारण म्हणजे रूपामध्यें, आकारामध्यें कोंडल्यामुळें त्याच्या जाणीवशक्तीचा संकोच झालेला असतो, तिला मर्यादा पडलेली असते आणि तिजवर आघात येतात ते सर्वव्यापी विश्वशक्तीचे येतात; हे आघात मर्यादित झालेल्या जाणिवेला परक्या शक्तीचे भासतात; तिचें स्वतःचें मोजमाप, प्रमाणमाप लहान झालेलें असल्यामुळें त्या मानानें तिला विश्वशक्ति अतिमहान् वाटते. तिच्याशीं या आकारबद्ध क्षुद्र शक्तीचें जुळत नाहीं आणि म्हणून विश्वशक्तीचा संपर्क तिला विसंवादी भासतो. अस्तित्वाचा मूळ आनंद याप्रमाणें भिन्न अवस्थांतून मार्ग क्रमून विश्वव्यापकता, समता, आत्मलाभ व प्रकृतीवरील विजय या मार्गानें शेवटीं मूळ सच्चिदानंद होतो. विश्वाच्या गतीचा मार्ग, प्रवाह, हा असा आहे.
आतां, असा एक प्रश्न विचारतां येण्यासारखा आहे कीं, एकच एक असें जें अस्तित्व मुळांत होतें व जें आनंदमय होतें त्याला, आपल्या अनुभवास येणाऱ्या या विश्वव्यापाराची आवश्यकता कां भासली ? त्याला अशा व्यापारांत आनंद कां वाटतो ? या प्रश्नाचे उत्तर असें देतां येतें कीं, मूळ सत् अनंत आहे. अनंत सद्रूपामध्यें अनंत शक्यता आहेत; या सद्वस्तूचा आनंद मूळ अक्षर अरूप स्वरूपांतहि आहे आणि क्षर,
पान क्र. २०५
बदलणारीं अशीं रूपें धारण करण्यांतहि आहे. अनंत स्वतंत्र सद्वस्तु कशानेंहि बांधलेली नाहीं. एकरूप वा अरूपच राहिलें पाहिजे असें कांहीं तिजवर बंधन असूं शकत नाहीं. तेव्हां अरूपाच्या पोटीं आपलें रूप विविध करण्यांत तिला आनंद होतो म्हणून ती तसें करते. ज्या शक्यता तिच्यांत आहेत, त्या अनेक प्रकारांनीं वास्तवांत आणणें यांतच साकारतेचा आनंद तिला भोगतां येतो. ज्या विश्वाचे आम्ही भाग आहोंत, तें विश्व म्हणजे त्या अनंत सद्वस्तूच्या पोटांतील अनंत शक्यतांपैकीं वास्तवांत आणलेली एक शक्यता होय. येथें सच्चिदानंद ही मूळ सद्वस्तु तिच्या अगदीं विरुद्ध स्वभावाच्या भासणाऱ्या वस्तूंत प्रथम लपते आणि शेवटीं या विरुद्धस्वभावी भासणाऱ्या वस्तूच्या पडद्यांत राहूनहि आपलें आवरणरहित स्थितींतलें मूळ सच्चिदानंदत्व प्रकट करते. अनंत असें मूळ अस्तित्व, दर्शनीं नास्तित्व भासणाऱ्या वस्तूच्या पोटी लपतें आणि तेथें पुढें अनंतत्व जणुं टाकून सांत आत्म्याच्या रूपानें प्रकट होतें. मूळ अनंत जाणीव दर्शनीं महान् रूपरेखाशून्य असलेल्या नेणिवेच्या पोटीं लपते. आणि पुढें तेथें मर्यादित उथळ जाणिवेच्या रूपानें प्रकट होते. स्वयंपूर्ण स्वप्रतिष्ठित आणि अनंत मूळ शक्ति, दर्शनीं अव्यवस्थामय अणूंच्या पसाऱ्याच्या रूपांत जणुं प्रथम नाहींशी होते आणि पुढें अस्थिर तोल असलेलें विश्व या रूपानें प्रकट होते. मूळ अनंत आनंद, दर्शनीं संवेदनाशून्य भौतिक द्रव्यांत लपतो आणि पुढें तेथें सुख-दुःख-औदासीन्य किंवा प्रेम-द्वेष-तटस्थता या त्रिमुखी बेसूर संवेदनांच्या रूपानें प्रकट होतो. मूळ अनंत एकत्व हें अव्यवस्थामय अनेकतेच्या रूपांत लपतें आणि पुढें तेथें शक्तींचा व जीवांचा संघर्ष या रूपांत प्रकट होतें. मूळ एकता परत स्थापण्यासाठीं एका जीवानें दुसऱ्याला अंकित करावें, त्याचा अंत करावा, भक्षण करावें; प्रत्येक शक्तीनेंहि असेंच करावे -- शक्तींचा व जीवांचा अशा स्वरूपाचा संघर्ष मूळ एकतेची जागा घेतो. ही अशी सृष्टि मूळ सच्चिदानंदांतूनच निर्माण होते. अशा या सृष्टींत खऱ्या मूळ सच्चिदानंदानें पुन: प्रकट व्हावयाचें आहे. या प्रक्रियेंत, व्यक्तीचें रूप घेतलेल्या मनुष्याला विश्व-समरस जीव होऊन विश्वमय जीवन जगावयाचें आहे; त्याची मर्यादित मानसिक जाणीव व्यापक होऊन अतिमानसिक एकतासंपन्न व्हावयाची आहे, जीमुळें मनुष्य सर्व चराचराला आपल्या आत्म्यांत समाविष्ट करून घेईल. आज आकुंचित व कृपण
पान क्र. २०६
असलेल्या मानवाच्या हृदयाला अनंत चराचराला आपल्या कवेंत घेण्यास व आपल्या तीव्र स्वार्थी वासना व विसंवाद टाकून सर्वांवर प्रेम करण्यास शिकावयाचें आहे. मनुष्याच्या संकुचित प्राणनिष्ठ जीवनास विश्वाचे कसलेहि आघात सहन करण्याजोगेंच नव्हे, तर कसल्याहि आघातांचें मोठ्या आनंदानें स्वागत करण्यास, सर्वत्र सर्व परिस्थितींत आनंदानुभव घेण्यास समर्थ व्हावयाचें आहे. त्याच्या शारीर जीवनास देखील सर्व जीवनाशीं भिन्नत्व नव्हे तर स्वतःचें ऐक्य अनुभवावयाचें आहे; मूळ अविभाज्य शक्तीचा सर्व ओघ स्वत:शी एकरूप मानून, त्या प्रचंड शक्तिप्रवाहाला आधारभूत होण्यासारखी शक्ति धारण करावयाची आहे. एकूण, त्याच्या वैयक्तिक रूपांत त्याच्या स्वभावाच्या सर्व अंगांत आणि एकंदर स्वभावांत, परात्पर सच्चिदानंदरूप मूळ सद्वस्तूची एकता, सुसंवादिता, सर्वतामय एकता आणि एकतामय सर्वता पुन: आविष्कृत केली जाणार आहे. आजच्या मानवी व्यक्तींत हें सर्व परिवर्तन व्हावयाचें आहे.
या सर्व लीलेंत सर्व परिस्थितींत गुप्त सत्य एकच आहे. तें म्हणजे सर्वदा सर्वत्र एकच एक समान असा अस्तित्वाचा आनंद. व्यक्तीच्या उदयापूर्वीं नेणिवेची सुषुप्ति असते, तेथें हा आनंद असतो; मूळ अस्तित्वाचा आनंद हा नेणिवेच्या सुषुप्तींत राहून व तेथील आनंद भोगून नंतर व्यक्तिकेन्द्रित अर्धवट जाणिवेच्या स्वप्नाचें रूप घेतो. या स्वप्नांत अनेक वळणें वळणें घेऊन मार्ग क्रमावा लागतो. या वळणांच्या गोंधळांत अस्तित्वाचा आनंद आपला स्वतःचा शोध घेत हिंडतो. या शोधाच्या खटपटींत त्याला आनंद असतो. या शोधासाठीं कराव्या लागणाऱ्या झगड्यांतहि त्याला आनंद असतो. शोधाची धडपड अनेक प्रकारची असते. कमी अधिक यश-अपयश यांनीं धडपडीला विविधता येते. शोधाची खटपट विकृतपणेंहि केली जाते, या खटपटीचें स्वरूप कधीं उच्च होते व पुन: मूळ पदावर येतें, या सर्व परिस्थितींत व परिवर्तनांत अस्तित्वानंद आनंद अनुभवतो. शेवटीं अर्धवट जाणिवेचें स्वप्न संपतें आणि व्यक्तिकेन्द्रांत पूर्ण जागृत स्थिति येते; (व्यक्तीला ही पूर्ण जागृति शेवटीं यावयाची आहे; या पूर्ण जागृतींत व्यक्ति अविभाज्य अशा सच्चिदानंद सद्वस्तूशीं एकरूप होणार आहे.) या जागृतींत अस्तित्वाचा आनंद हा पूर्ण जागृत व्यक्तीच्या रूपानें, अतिमानसिक पूर्ण जाणिवेनें युक्त असा, शाश्वत आत्मलाभाचा आनंद अनुभवतो. याप्रमाणें मूळ सद्वस्तु आनंदमय आणि तिची सर्व लीला आनंद-हेतुक व
पान क्र. २०७
आनंदमय आहे. या भौतिक विश्वांत आम्हांला जो विचाराचा दृष्टिकोन लाभलेला आहे, त्या दृष्टिकोनांतून आमच्या प्रकाशपूर्ण, बंधनशून्य व पूर्ण-मुक्त जाणिवेला एकच एक परमतत्वाच्या, परमेश्वराच्या, सर्वरूपाच्या खेळाचे जें दर्शन घडलें आहे, व जें परमतत्वानें घडविलें आहे तें हें असें आहे.
पान क्र. २०८
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.