Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण चौदावें
अतिमानस हें सृष्टीची उभारणी करतें.
ईश्वरी ज्ञानानें स्वतःचें केलेलें विविध आविष्करण म्हणजे विश्वांतील सर्व वस्तु व घटना होत.
- विष्णु पुराण २.१२.३९.
मूळ निश्चल आत्मैकतुष्ट एकतत्त्व आणि अनेक चंचल वस्तूंचा हा विश्वांचा पसारा या दोहोंमध्यें एक मध्यगामी शक्ति आहे, मध्यवर्ति अस्तित्वदशा आहे. हें मध्यस्थ अस्तित्व आणि सामर्थ्य म्हणजे मन नव्हे, तर मनापेक्षां श्रेष्ठ, मनापलीकडे असणारें, क्रियाशील संकल्पाचें (इच्छाशक्तीचें) आणि ज्ञानाचें तत्त्व होय. या तत्त्वानें विश्वाचा पसारा निर्माण केला आहे. सृष्टीची उभारणी करण्याचें काम, या ज्ञानाचें, या अतिमानसिक विज्ञानाचें आहे. हें विज्ञानाचें तत्त्व आम्हांला अगदींच परकें आहे असें नव्हे; आम्हांहून अगदीं वेगळा असा एक आत्मा आहे आणि त्याच्या एकट्याच्या मालकीचें हें तत्त्व त्याजपाशीं असून त्याला तें इतरांना देतां येण्यासारखें नाहीं अशी स्थिति नाहीं; किंवा अशीहि गोष्ट नाहीं कीं, एक अस्तित्वाची अवस्था आहे, जेथें हें तत्त्व स्वभावत: असतें, जेथून गूढ रीतीनें आम्हांला बाहेर काढून जन्माला घालण्यांत येतें पण ज्या ठिकाणीं आम्हांला परत जातां येत नाहीं, परत येऊं दिलें जात नाहीं -- अशी अस्तित्वाची अवस्था नाहीं. ही गोष्ट खरी कीं, हें विश्वनिर्मायक तत्त्व आमच्या वरतीं, फार फार उंचावर असलेल्या प्रदेशांत प्रतिष्ठित असल्याचें आम्हांला दिसतें -- पण हा उंचावरचा प्रदेश आम्हांला परका नाहीं; आमच्या अस्तित्वाचाच तो भाग आहे आणि आम्हांला तेथें जातां येतें, वावरतां येतें ही गोष्टहि तितकीच खरी आहे. तें महान् सत्य आम्हांला केवळ अनुमानानेंच जाणतां येतें, त्याचें केवळ ओझरतेंच दर्शन आम्हांला
पान क्र. २२८
घडतें असें नव्हे, तर आम्हांला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतां येतो, तें आमचें स्वतःचें करण्याची शक्ति आम्हांत आहे. या सत्याच्या उंच प्रदेशीं चढून जावें असें आम्हांला वाटल्यास आम्ही तसें करूं शकतों, आम्ही आमचा क्रमाक्रमानें विकास करीत तेथें जाऊं शकतों किंवा ज्ञानाच्या प्रकाशाचा एकदम संस्कार घडून आम्ही आमच्या प्रस्तुत आत्मावस्थेंतून तत्काल वर चढून त्या प्रदेशांत तांतडीनें पाऊल टाकूं शकतों; हें आमचे त्या प्रदेशांत पाऊल टाकण्याचे क्षण आम्हीं एकदां अनुभवल्यानंतर ते आम्ही कधींहि, केव्हांहि विसरू शकत नाहीं; आम्हांला वाटल्यास आम्ही त्या उंच प्रदेशीं कांहीं तास, कांहीं दिवस घालवूं शकतों -- सामान्य मानवाच्या वांट्याला कधींच येणार नाहीं असा सर्वश्रेष्ठ दिव्य अतिमानवी अनुभव या तासांत, या दिवसांत आम्हांला सारखा येत असतो. या उंच प्रदेशावरून आम्ही परत खालीं उतरलों म्हणजे आमचा या प्रदेशाशीं संबंध तुटलाच पाहिजे असें नाहीं; आमचा प्रदेश आणि तो उंच प्रदेश जोडणारे दरवाजे आम्ही नेहमीं उघडे ठेवूं शकतों, किंवा ते सारखे बंद होत राहिले, तर पुन: सारखे उघडे करूं शकतों. आमची क्रमाक्रमानें विकास पावणारी जी मानवी जाणीव आहे, तिचें ध्येय आत्मलय नसून आत्मपूर्णता असेल, तर तिच्यासमोर सर्वोच्च अंतिम साध्य हेंच आहे कीं, वर वणिलेलें जें निर्मित आणि निर्मायक अस्तित्वाचें उंच आणि शेवटचें शिखरस्थान आहे, त्या स्थानावर तिनें कायम वस्ती करावी. हें शिखरस्थान म्हणजेच एकमेव मूळ सत्यानें सृष्टि-निर्माणासाठीं पुढें केलेली मूलभूत सत्य-कल्पना होय; हेंच स्थान विकासगम्य अंतिम सत्य व अंतिम सुसंवादपूर्ण अस्तित्व होय; येथूनच आम्ही विश्वांत उतरलों आणि विश्वांत आम्ही जें क्रमवार आत्म-आविष्करण करीत आहों, त्या आविष्करणाच्या द्वारां आम्हांला येथेंच पोंचावयाचें आहे; आमच्या आत्माभिव्यक्तीचें पूर्वनियत साध्य हेंच आहे.
तथापि अशी शंका आम्हांला येणें वाजवी आहे कीं, मानवी बुद्धीला उमजेल अशा रीतीनें या उच्च अवस्थेची माहिती देणें आज किंवा केव्हांतरी शक्य आहे काय ? अशीहि शंका येणें रास्त आहे कीं, या उच्च अवस्थेंतील दिव्य व्यापार आमचें मानवी ज्ञान व मानवी कार्य उन्नत करण्यासाठीं उपयोगांत आणतां येतील किंवा नाहीं, त्यांच्या अशा उपयोगासाठीं कोणालाहि वापरतां येण्याजोगा मार्ग तयार करणें शक्य
पान क्र. २२९
आहे किंवा नाहीं ? असा संशय येण्याचें कारण कीं, या दिव्य शक्तीचें मानवी व्यवहारांतील कार्य दाखविणाऱ्या ज्या घटना आमच्या नजरेस आणल्या जातात, त्या एकतर फार विरळा घडतात व दुसरें, त्या घटना संशयातीत नसतात; तसेंच या दिव्यशक्तीचें कार्य आणि आमचें सामान्य मानवी, तपासण्यासारखें ज्ञान व अनुभव या दोहोंत फार फार अंतर आहे; पण या कारणांपेक्षां आमच्या संशयाचें जास्त प्रभावी कारण हें आहे कीं, मानवाचें मन आणि ईश्वरी दिव्य विज्ञान यांत त्यांच्या आंतर प्रकृतींच्या दृष्टीनें आणि त्यांच्या बाह्य व्यापारांच्या दृष्टीनें तीव्र अन्योन्यविरोधित्व आम्हांला प्रथम दर्शनीं तरी स्पष्ट दिसत आहे.
ही दिव्य विज्ञानाची, अतिमानसाची जाणीव आणि मानवी मन यांचें जर कांहींच नातें नसतें, मनोमय पुरुषाशीं (mental being) या जाणिवेचें कोठेंहि, कसलेंहि ऐक्य नसतें, तर आमच्या मानवी कल्पनाशक्तीला समजेल अशा रीतीनें या दिव्य जाणिवेचें कसलेंहि वर्णन देतां येणें अशक्य झालें असतें. तसेंच, हें दिव्य विज्ञान जर स्वभावत: 'केवळ ज्ञानाची दृष्टि' या स्वरूपाचें असतें आणि त्यांत ज्ञानाची क्रियाशील शक्ति नसती, तर या विज्ञानाच्या संपर्कानें आम्हांला मनाची प्रकाशमय आनंदमय स्थिति फक्त अनुभवतां आली असती, त्या संपर्कापासून विश्वांतील व्यवहारासाठीं आजच्याहून थोर प्रकाश व सामर्थ्य आम्हांला लाभलें नसतें. परंतु ही दिव्य विज्ञानशक्ति विश्वाची जननी आहे; अर्थात् ती केवळ निष्क्रिय ज्ञानावस्था नव्हे, ती ज्ञानाची क्रियाशील अवस्थाहि आहे; ती केवळ प्रकाशविषयक आणि दर्शनविषयक इच्छा नाहीं, तर सामर्थ्यविषयक आणि क्रियाविषयक इच्छाहि आहे. या विज्ञानशक्तीनें विश्वाची जी निर्मिति केली, तिचा एक भाग मनाची निर्मिति हा आहे. स्वतःच्या सामर्थ्याला स्वतःच मर्यादा घालून, मनाची निर्मिति विज्ञानानें केलेली आहे. विज्ञान स्वत: सर्वश्रेष्ठ, एकमेवाद्वितीय चैतन्याची मूळ क्रियाशक्ति आहे. विश्वनिर्मितिसाठीं ही शक्ति त्यानें स्वत:मधून उभी करून पुढें केली. विश्व आणि तें चैतन्य यांच्यामध्यें मध्यस्थाचें काम ही विज्ञानशक्ति करते. मनाचे आणि विज्ञानाचे (Supermind) वास्तवांतील आकार-प्रकार कितीहि भिन्न असले, त्यांच्या क्रियाव्यापारांच्या ठाम झालेल्या रीती कितीहि भिन्न असल्या, नव्हे त्यांत कितीहि अन्योन्यविरोध दिसत असला, तरी मनाची आणि विज्ञानाची आंतरप्रकृति एकच आहे आणि मनाच्या पोटीं विज्ञानाची शक्यता
पान क्र. २३०
गुप्तपणें भरलेली आहे. तेव्हां आमच्या बुद्धिप्रधान ज्ञानाच्या शब्दांत आणि त्याच्याच दृष्टीनें साम्य आणि वैषम्य दाखवून, जिज्ञासूंस या विज्ञानाची कांहीं कल्पना आणून देण्याचा प्रयत्न करणें खात्रीनें गैरफायद्याचें किंवा गैरवाजवी होणार नाहीं. ही जी कल्पना आम्ही आणून देऊं इच्छितों, ती कल्पना, जे शब्द आम्ही वापरणार ते शब्द, विज्ञानभूमीचें यथार्थ ग्रहण होण्यास अपुरे पडतील, ही गोष्ट शक्य आहे. तथापि मार्गदर्शक तेजोमय अंगुलीप्रमाणें त्यांचा उपयोग निश्चित होईल. त्यांच्यायोगें आम्हांला आमचा पुढचा मार्ग कांहीं अंतरापर्यंत तरी स्वच्छ दिसेल व तेवढा मार्ग आम्ही चालून जाऊं शकूं. मनाला विज्ञानाच्या उंचीवर चढणें अवघड असलें, तरी विज्ञानाच्या खालीं आणि सामान्य मनाच्या वर कांहीं ज्ञानभूमिका आहेत, तेथें मनाला फार प्रयास न करतां चढून जातां येतें. विज्ञानभूमींतील ज्ञानाचें सामर्थ्य आणि प्रकाश, कांहीं बदल होऊन या ज्ञानभूमीवर उतरत असतो; या प्रकाशाचें व सामर्थ्याचें प्रभावी कार्य मनाला अभूतपूर्व उज्ज्वल ज्ञान, स्फूर्ति, साक्षात्कार, संस्पर्श यांच्याद्वारां प्रतीत होतें. तथापि या उच्च ज्ञानभूमीवर वस्ती करून, तेथून विश्वाकडे पाहण्याची व विश्वांत कार्य करण्याची पात्रता अद्यापि मानवी मनाला लाभलेली नाहीं.
विज्ञानभूमीचें ज्ञान आमच्या बुद्धीला होईल असा प्रयत्न करावयाचे बाबतींत प्रथम, आमच्या प्राचीन ज्ञानाला विचारून, तेथें या अ-शोधित ज्ञानविभागासंबंधानें कांहीं मार्गदर्शक प्रकाश मिळतो कां तें पाहिलें पाहिजे. आम्हीं या विभागाला अतिमानस किंवा विज्ञान (Supermind) असें नांव दिलें आहे. अतिमानस म्हणजे मनाच्या श्रेष्ठ पातळीच्याहि वर असलेली ज्ञानभूमि; मनांत मूलभूत बदल केल्यानेंच प्राप्त होऊं शकेल अशी ज्ञानभूमि. ती मनाच्या पलीकडे असल्यामुळे तिला 'अतिमानस' म्हणतां येऊं शकेल. तथापि 'अतिमानस' या शब्दानें शेवटली ज्ञानभूमि, एकमेवाद्वितीय सच्चिदानंदाची भूमि समजावयाची नाहीं; असो. अतिमानसाचें थोडेसें स्पष्ट वर्णन केल्यानें, त्याचें बरोबर स्थान कोणतें, 'अतिमानस' या शब्दाला अर्थदृष्ट्या कोणती मर्यादा घातली पाहिजे हें लक्षांत येईल.
आमच्या वेद-वाङ्मयांत कांहीं गूढ भाषा असलेले मंत्र आहेत, ऋचा आहेत. या ऋचांत गूढपणें दिव्य अनश्वर अतिमानसाचें तारक ज्ञान भरलेलें आहे. या ऋचांतील गूढाच्या पडद्यांतून बाहेर पडणारे
पान क्र. २३१
कांहीं तरल प्रकाशाचें उज्ज्वल किरण आमच्या बुद्धीला मार्गदर्शक होतात. या तरल प्रकाशाच्या साह्यानें आम्हांला गूढ वेदवचनांतील अतिमानसाची कल्पना आत्मसात् करतां येते. ती कल्पना अशी आहे : अतिमानस ही ज्ञानभूमि अति महान् आहे, आमच्या सामान्य मानसिक जाणिवेचें आकाश अलीकडे आहे. त्याच्या पलीकडे अतिमानसाचें अति महान् आकाश आहे, या अतिमानसिक ज्ञानाकाशांत अस्तित्वाचें सत्य आणि हें अस्तित्व व्यक्त करणारे सर्व कांहीं अभिन्न आहे, एक आहे आणि प्रकाशमय आहे; तेथें अस्तित्व जितकें सत्य असतें, तितकेंच वस्तुदर्शन, आकार, व्यवस्था, शब्द, कृति, गति, गतीचे फल, कृतीचें आणि आविष्कृतीचें फल हेंहि सर्व सत्य असतें, तेथील कायदा हा कधींहि चूक न करणारा असतो -- तेथें ही सर्व सत्यता स्वाभाविक आणि अटळ अशी आहे. वेदांतील अतिमानसाच्या वर्णनांत जो सारभूत भाग -- जी सारभूत शब्द योजना आहे, ती अशी : ''अतिमानसांत सर्व कांहीं सामावलेलें आहे, अतिमहान् सर्वसमावेशकता हा अतिमानसाचा एक विशेष आहे. या अतिमहान् विस्तारांत अस्तित्वाचें प्रकाशमय सत्य, अस्तित्वाचा प्रकाशमय सुसंवाद आहे. तेथें गोंधळ नाहीं, अस्पष्टता नाहीं, आत्मविस्मृति नाहीं, अज्ञान नाहीं; तेथें अस्तित्वाचें सुसंवादपूर्ण सत्य जसें आहे, तसेंच तें व्यक्त करणारें कायद्याचें, कृतीचें व ज्ञानाचेंहि सत्य आहे'' -- अतिमानसाचें वैदिक वर्णन हें असें आहे. वेदांत देवदेवता आहेत. अतिमानसाच्या (विज्ञानाच्या) विविध शक्ती हेंच या देवांचें श्रेष्ठ गूढ स्वरूप आहे. हे देव अतिमानसापासून जन्म घेतात. अतिमानस हें त्यांचें खरें धाम, वसतिस्थान आहे, तेथें ते राहतात; त्यांचें ज्ञान 'सत्यदर्शी,' त्यांचें कार्य 'दर्शित्वसंपन्न संकल्पाचें' असतें. देवांची जाणीव-युक्त शक्ति जेव्हां कृति करण्याकडे, निर्मिति करण्याकडे वळते, तेव्हां जें कांहीं करावयाचें असेल, निर्मावयाचें असेल त्याचें प्रत्यक्ष पूर्ण ज्ञान, त्याचें अंतःस्वरुप, त्याचा कायदा, यांचें प्रत्यक्ष पूर्ण ज्ञान या देवांना असतें व तेंच त्यांना मार्गदर्शक होतें. या ज्ञानामुळें त्यांची संकल्पशक्ति पूर्णपणें परिणामकारक बनते; ती आपला मार्ग चालतांना किंवा परिणाम घडवितांना किंचितहि चांचपडत नाहीं; किंवा इकडे तिकडे ढळत नाहीं. तिच्या सत्य-दृष्टीला जें करावयाचें म्हणून दिसतें, तें ती कृतींत अटळपणें आणि स्वाभाविकपणें यशस्वीं करून टाकते. या देवांच्या बाबतींत, या अतिमानसाच्या क्षेत्रांत,
पान क्र. २३२
शक्ति आणि ज्ञान यांच्यांत अभेद असतो; इच्छाशक्तीचा ताल आणि ज्ञानाचें स्पंद एकरूप असतात आणि इच्छा व ज्ञान दोन्हींहि परिणामाशीं एकरूप असतात. ही एकरूपता अर्धवट नसते, तर परिपूर्ण असते; परिणाम अगदीं खात्रीनें, इच्छेनुसार होतो आणि हा परिणाम घडवितांना इच्छाशक्तीला व ज्ञानाला आयास करावें लागत नाहींत. परिणामाची 'ज्ञान-इच्छा' या जोडीशीं एकरूपता होण्यासाठींहि कसलेच कष्ट पडत नाहींत. ईश्वरी प्रकृतींत दोन प्रकारची शक्ति आहे. जी वस्तु व्यक्त व्हावयाची असते, ती आपल्या सारभूत सत्त्वांतून आपला विशिष्ट आकार आणि आपल्यांतील घटकांची विशिष्ट व्यवस्था स्वभावत: स्वयंस्फूर्तीनें घेऊन व्यक्त होते; तिच्यांत जें मूळ सत्य असतें, तें या विशिष्ट आकारानें आणि व्यवस्थाप्रकारानें व्यक्त केलें जातें. याप्रमाणें आकार आणि अंत:संघटनविषयक स्वयंस्फूर्त स्वयंकारिता ही एक दिव्य प्राकृतिक वस्तूची शक्ति आहे; दुसरी शक्ति ज्ञानाचें आत्मगत सामर्थ्य; जी वस्तु व्यक्त व्हावयाची असते, तिच्यांत स्वभावत: हें आत्मसामर्थ्ययुक्त ज्ञान असतें; ती वस्तु या ज्ञानामुळें सहज स्वयंस्फूर्तीनें आपलें अटळ अंत:संघटन व अंतर्व्यवस्था करून घेते.
वरील सारभूत गोष्टीखेरीज कांहीं गौण परंतु महत्त्वाच्या अशा तपशिलाच्या गोष्टी वैदिक ऋषींनीं सांगितल्या आहेत. जो आत्मा सत्यदर्शी, सत्यज्ञानी असतो, त्याच्या ठिकाणीं दोन प्राथमिक शक्ती आढळतात असें वैदिक ऋषि सांगतात. या दोन प्राथमिक शक्ती म्हणजे एक पाहण्याची शक्ति व दुसरी ऐकण्याची शक्ति, अर्थात् सत्यदर्शन व सत्यश्रवण; सत्य-जाणीवसंपन्न आत्म्याला जें स्वाभाविक ज्ञान असतें, त्या ज्ञानाचें प्रत्यक्ष अतींद्रिय व्यापार, सत्यदर्शन आणि सत्यश्रवण या शब्दांनीं वर्णन करण्यासारखे असतात. आमच्या मानवी मनांत या वरील शक्तींचें दूरदूरचें प्रतिबिंब पहावयास मिळतें. मनाची अंत:साक्षात्कारशक्ति (Revelation) ही सत्यदर्शनशक्तीची छाया आहे व त्याची अंत:प्रेरणाशक्ति (Inspiration) ही सत्यश्रवणशक्तीची छाया आहे. अतिमानसाच्या एकमेकीपासून भिन्न अशा दोन प्रकारच्या ज्ञानक्रिया वेदवाङ्मयांत वर्णिल्या आहेत. एका ज्ञानक्रियेंत अतिमानसिक जाणीव ही ज्ञान-विषयाला व्यापून आपल्यांत समाविष्ट करून घेते; आमच्या मनाला जी तादात्म्य-अधिष्ठित, स्व-विषयक ज्ञानक्रिया परिचित आहे, तिला ही अतिमानसिक ज्ञान-क्रिया पुष्कळ जवळ आहे; दुसऱ्या
पान क्र. २३३
अतिमानसिक ज्ञानक्रियेंत, अतिमानसिक जाणीव ज्ञान-विषयाला व्यापीत नाहीं. ती ज्ञानविषयाकडे झेंप घेते, त्याच्यासमोर राहून त्याला स्पर्श करते; ही ज्ञानक्रिया बाह्यपदार्थविषयक ज्ञानाची प्रारंभिक क्रिया आहे. वेद वाङ्मयांत अतिमानसासंबंधानें ज्या सूचक गोष्टी सांपडतात, त्या वर दिल्या आहेत. आमच्या प्राचीन ऋषींचा, वर दिलेला अतिमानसविषयक अनुभव ध्यानांत घेऊन, अतिमानस या शब्दाला पर्याय शब्द म्हणून 'सत्य-जाणीव' हा शब्द आम्हीं वापरणें उचित होईल. अतिमानस या शब्दांत जी अतिव्याप्ति शक्य आहे, ती या पर्यायशब्दानें दूर केली जाते; या पर्यायशब्दानें अतिमानस या शब्दाचा अर्थ योग्य रीतीनें मर्यादित केला जातो.
अतिमानस किंवा सत्य-जाणीव या शक्तीच्या वर दिलेल्या विशेष गुणांवरून ही शक्ति मध्यस्थ शक्ति आहे हें उघड आहे; हिच्या वरतीं हिच्याहून श्रेष्ठ वस्तु आहे आणि हिच्या खालीं हिच्याहून कनिष्ठ वस्तु आहे. कनिष्ठ वस्तु हिच्याद्वारां श्रेष्ठ वस्तूंतून उदयास येतें, अर्थात् उलट मार्गानें ती कनिष्ठ वस्तु हिच्याद्वारां त्या सर्वश्रेष्ठ वस्तूकडे, आपल्या खऱ्या उगमस्थानाकडे जाऊं शकेल, हें स्पष्ट आहे. हिच्या वरतीं जी वस्तु आहे, ती सच्चिदानंद होय; शुद्ध सच्चिदानंदाची अविभाज्य, एकतामय, अद्वैती जाणीव ही सत्य-जाणिवेच्या वरतीं आहे; या अद्वैती, अभेदमय जाणिवेंत कसलेहि भेद, कसलेहि अलग अलग भाग नाहींत; हिच्या खालतीं मन आहे. मानसिक जाणीव ही विभाजक, विश्लेषक व भाग पाडणारी जाणीव आहे; दोन वस्तू एकमेकींपासून वेगळ्या करून, त्या दोहोंतला भेद शोधून, मानसिक जाणीव आपलें ज्ञान मिळविते; तिला ज्ञान मिळविण्याचा हा एकच मार्ग आहे; एकता, अनंतता या गोष्टी मनाला कळतात, पण अंधुकपणें कळतात; अप्रत्यक्षपणें समजून घ्याव्या लागतात. मन विभागणी करतें आणि विभागांची जुळणी करून, एक तऱ्हेची एकता पण निर्माण करतें, तथापि खरी अविभक्त, अविभाज्य एकता किंवा सर्वैकता त्याला आपल्या शक्तीनें कळणें अशक्य आहे. सच्चिदानंद आणि मन या दोहोंच्यामध्यें अतिमानस आहे, सत्य-जाणीव आहे; ही जाणीव सर्व-समावेशक व सर्व-निर्मायक आहे; या सत्य-जाणिवेची सर्वसमावेशक सर्वव्यापक ज्ञानशक्ति, ब्रह्माच्या-सच्चिदानंदाच्या, ''सर्व मी आहे'' या तादात्म्य-अधिष्ठित आत्मजाणिवेपासून जन्मास आलेली आहे -- ''सर्व मी आहे,'' ही ब्रह्माची नित्य
पान क्र. २३४
ज्ञानावस्था आहे; अतिमानसाची, सत्य-जाणिवेची दुसरी शक्ति -- विषयाकडे झेंप घेण्याची, त्याच्यासमोर जाऊन त्याला स्पर्श करण्याची ज्ञानशक्ति -- ही मनाच्या भेद-अधिष्ठित ज्ञानाच्या स्वाभाविक प्रक्रियेला जन्माला घालणारी आहे. ब्रह्माची कन्या आणि मनाची जननी अशी अतिमानसाची अथवा सत्य-जाणिवेची मध्यस्थाची भूमिका आहे.
वरतीं शाश्वत, स्थिर आणि अव्यय असें एकतत्त्व; खालतीं नित्य बदलणाऱ्या स्वरूपाची व सारख्या प्रवाही असलेल्या वस्तुजातांत स्थिर आणि अव्यय असा एखादा बिंदु शोधण्यांत मग्न असलेली अशी अनेकता आहे. परंतु असा स्थिर बिंदु तिला बहुधा सांपडत नाहीं; या दोहोंच्यामध्यें अतिमानसाचें स्थान आहे, हें स्थान सर्व त्रिमुखी वस्तूंचें व सर्व द्विमुरवी वस्तूंचें स्थान आहे. ''एकांत अनेक'' होऊन जें ''अनेकांत एक'' हें आपलें एकत्व टाकीत नाहीं, अशा सर्व वस्तुजाताचें तें स्थान आहे; आरंभीं एकच एक असणारें परंतु अनेक होण्याची पात्रता नित्य आपल्या अंतरीं ठेवणारें असें तत्त्व सर्वाच्या मुळाशीं असल्यानें 'एक-अनेक अनेक-एक' असें विश्वसंसारांतील सर्व वस्तूंचें व घटनांचें स्वाभाविक स्वरूप होऊं शकतें. एक स्थिर एकत्व आणि एक अस्थिर अनेकत्व अशा दोन वस्तूंमधली अतिमानस ही वस्तु, वरील कारणास्तव सर्व सृष्ट संसार आणि तेथील सर्व क्रम, व्यवस्था यांचा आरंभ आणि शेवट आहे व यांचा आद्य आणि अंत्य वर्ण आहे; सर्व भेदांचें आरंभस्थान या मधल्या वस्तूंत आहे, सर्व एकीकरणाचें स्थान येथेंच आहे; या सृष्ट संसारांत ज्या अनेक तालबद्ध, सुसंगत व सुंदर रचना झाल्या आहेत, किंवा होणार आहेत, त्या सर्वांची पूर्वयोजना, त्यांची उभारणी, त्यांची पूर्ण वाढ व परिपूर्णता याच ठिकाणीं होते. या मध्यस्थ वस्तूला मूळ 'एकच एक' वस्तूचें पूर्ण ज्ञान आहे आणि या एका वस्तूच्या पोटीं ज्या अनेक वस्तुसंभारांचा संसार दडलेला आहे, तो सर्व संसार बाहेर काढण्याचें काम ही मध्यस्थ वस्तु करीत असते; अनेकता व्यक्त करूनहि, ही मध्यस्थ वस्तु त्या अनेकतेच्या भेदाभेदांत स्वतःचें स्वरूप विसरत नाहीं व त्या अनेकांची एकताहि विसरत नाहीं. अनेकता व्यक्त करणारी ही मध्यस्थ वस्तु आणि हिच्या वरची अनिर्वचनीय एकत्व असणारी श्रेष्ठ वस्तु यांच्या पलीकडे, एकत्व आणि अनेकत्व या आपल्या मनाच्या कल्पनांना न मानणारी, यापैकीं कोणत्याहि एका कल्पनेनें बद्ध न होणारी, पूर्ण मुक्त अशी 'एकत्व-अनेकत्व-अतीत', मनाला सर्वस्वीं अचिंत्य अशी
पान क्र. २३५
वस्तु -- खरी केवलता, निःसंबंधता व सत्यता असलेली वस्तु -- असावी अशी आमची कल्पना आहे. ही वस्तु सर्वश्रेष्ठ स्थानीं ठेवली म्हणजे एक ईश्वर आणि अनेकतेचा विश्व-संसार या दोहीं संबंधींचें आमचें ज्ञान सत्यज्ञान म्हणून समर्थन करण्याची पूर्ण सोय होते.
या गोष्टी फार मोठ्या आणि मोठाले दुर्बोध शब्द वापरल्यानें समजायला अधिक कठीण आहेत. आतां आपण स्पष्ट अशा तपशिलांत शिरून, या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूं. एकच एक वस्तूला आपण 'सच्चिदानंद' म्हणतो -- म्हणजे तीन वस्तु आहेत असें प्रथम कल्पून, नंतर त्या एकत्र करून, एक त्रिमुखी वस्तु आम्ही बनवितों. अस्तित्व आहे, जाणीव आहे व आनंद आहे असें प्रथम कल्पून नंतर या तीन वस्तू भिन्न नसून, अभिन्न एक आहेत असें आम्ही म्हणतों. ही मांडणी मनाला परिचित व स्वाभाविक अशी आहे. मात्र एकताप्रधान एकत्वमय जाणीव अशी कल्पना करूं शकत नाहीं -- अस्तित्व म्हणजेच जाणीव, या दोहोंमध्यें किंचितहि अलगपणा असूं शकत नाहीं; जाणीव म्हणजेच आनंद, या दोहोंतहि कांहीं अलगपणा नाहीं. याप्रमाणें अस्तित्व, जाणीव व आनंद सर्वथा एकरूप आणि पूर्णतया अभिन्न असल्यानें, अशा एकापासून विश्व होऊं शकत नाहीं. असें एकतत्त्व हें जर एकच एक सत्य वास्तव तत्त्व असेल, तर विश्व नाहीं, विश्व केव्हांहि नव्हतें. विश्वाची कल्पनादेखील केव्हांहि करणें अशक्य होतें. जी जाणीव अविभाज्य आहे, ती जाणीव स्वभावत: अविभाजकहि असणार; भाग करणें व भागाभागांत भेद करणें हें अविभाज्य जाणिवेला अशक्य आहे. अर्थात् एकतत्त्व अविभाज्य सच्चिदानंद या मुळापासून विश्वाची उभारणी कल्पितां देखील येत नाहीं -- आणि विश्व तर आहे; तेव्हां वरील मांडणींतून आम्हांला अखेर एक ''निर्बुद्ध सिद्धान्त'' मात्र प्राप्त होतो. अशक्य व अनिवार्य असा अन्योन्यविरोध हा या सिद्धान्तानुसार आम्हांला विश्वाचा पाया म्हणून मानावा लागेल. विश्वाचा असा पाया आम्ही मान्य करूं शकत नाहीं.
सच्चिदानंदाची अभेद्य एकत्वाची कल्पना घेऊन आपण एका निर्बुद्ध सिद्धान्तापर्यंत प्रवास केला. आतां मनाच्या स्वभावधर्मापासून काय निघतें तें पाहूं. मनाला भेद स्पष्टपणें सत्य दिसतात. भिन्न वस्तू एकत्र जुळवून, एकतऱ्हेची समग्रता, संयुक्त एकता मनाला कल्पितां येते; मर्यादित वस्तूचा विस्तार होत राहून, ती वाटेल तितकी विस्तृत होऊं शकते हें मनाला समजतें; अलग असणाऱ्या वस्तूंचे समूह मन
पान क्र. २३६
कल्पूं शकतें आणि या समूहांतील सर्व घटक-वस्तूंत काय सामान्यधर्म आहे तें त्याला समजतें; समूहासमूहांतहि सामान्यधर्म मन ओळखूं शकतें; परंतु अंतिम शुद्ध एकता, अंतिम शुद्ध अनंतता या वास्तव गोष्टी म्हणून मनाच्या जाणिवेला ग्रहण करतां येत नाहींत. या गोष्टींना अवास्तव कल्पना असें नांव मन देतें; मनाला त्या स्वभावतःच अवास्तव वाटतात, असत्य वाटतात; आणि त्या सत्य आहेत व त्याच खऱ्या 'सत्य' आहेत, इतर गोष्टी सत्य नाहींत, ही गोष्ट तर मनाला अगदीं अनाकलनीय अशी असते. सच्चिदानंदाची अखंड एकरस एकत्वाची जी स्वाभाविक अभेद्य जाणीव वर वर्णिली, तिच्या अगदीं उलट ही मनाची जाणीव आहे. या मनाच्या जाणिवेंत अनेकता हीच स्वाभाविक आहे, या जाणिवेला एकत्वाची अनुभूति हवी असेल, तर स्वतःचा विलय करून घेणें हाच एक मार्ग तिला यासाठीं मोकळा आहे; पण असें तिनें केलें म्हणजे स्वतःची अनेकतेची जाणीव हा वस्तुत: भ्रम होता, खरोखरी तिला अस्तित्व नव्हतें, असें एकत्वाच्या अनुभूतीनें तिनें कबूल केल्यासारखें होतें. परंतु खरी गोष्ट अशी आहे कीं, अनेकतेची अनेकता सत्य आहे ही जाणीव मनाला होती, या जाणिवेनें एकतेच्या जाणिवेसाठी खटपट करून ती मिळविली, व ती मिळवण्यांत स्वतःचा विलय करून घेतला. तेव्हां, येथेंहि मनाच्या स्वाभाविक जाणिवेपासून आरंभ करून, आपण एका निर्बुद्ध सिद्धान्तापर्यंत आलों आहोंत. येथेंहि एकच गोष्ट 'आहे आणि नाहीं' असा बुद्धीला धक्का देणारा, अगतिक करणारा, अनिवार्य विरोधमय सिद्धान्त आमच्यापुढें उभा राहतो आणि तो आम्हांला मान्य होऊ शकत नाहीं.
मन हें सारभूत ज्ञानाचें साधन आम्ही मानतों, म्हणून अडचण उत्पन्न होते; पण तें तसें नाहीं, तें वियोजनाचें आणि संयोजनाचें साधन आहे. आमच्या जाणिवेची प्राथमिक अवस्था म्हणजे मन होय. अज्ञात स्वरूपाच्या मूळ वस्तूचा कांहीं भाग आपल्या वियोजनाच्या, विभाजनाच्या (विश्लेषण-पृथक्करणाच्या) शक्तीनें मन अस्पष्टपणें वेगळा काढतें आणि हा वेगळा मापलेला मर्यादित भाग, एक सगळी वस्तु आहे असें कल्पून, मन तिचे पुन: भाग पाडतें आणि या भागांना आपले विषय मानून त्यांचा अभ्यास करतें. वस्तूचे भाग आणि गौण गुणधर्म यांचें स्पष्ट दर्शन मनाला घडतें आणि त्याच्या कुवतीप्रमाणें याचेंच ज्ञान त्याला होते. वस्तूच्या समग्रतेसंबंधानें मनाची अशी स्पष्ट निश्चित कल्पना असते कीं, ती एकत्र केलेल्या भागाभागांची बनलेली
पान क्र. २३७
आहे, एकत्र केलेले गुणधर्म आणि असारभूत विशेष, यांची बनलेली आहे. कोणतीहि समग्र वस्तु दुसऱ्या वस्तूचा भाग आहे किंवा ती स्वत: भागाभागांची, गुणांची, विशेषांची झालेली आहे, यापेक्षां वेगळा समग्रतेचा प्रत्यय मनाला फार अंधुकपणें घडतो; वस्तूचें विश्लेषण करावें, दुसऱ्या एका समग्र वस्तूच्या पोटांत समोरच्या समग्र वस्तूला घालावें, तेव्हांच ''आतां मला ही वस्तु समजली'' असें मन म्हणूं शकतें; आणि खरी गोष्ट अशी असते कीं, मनाला ती वस्तु समजत नाहीं, ज्ञात होत नाहीं -- त्याला समजतें फक्त त्यानें केलेलें पृथक्करण आणि या पृथक्करणानें त्याला सांपडलेल्या भागांचे व गुणधर्मांचें त्यानें केलेलें एकीकरण. एवढेंच मनाचें खरें काम असतें, त्याची स्वाभाविक शक्ति इतकीच; यापेक्षां अधिक, अधिक खोल आणि खरेंखुरें ज्ञान हवें असेल तर तें मनाकडून मिळावयाचें नाहीं -- आपल्याला खरें खोल ज्ञान झालें अशी तीव्र भावना मनाच्या कांहीं खोल भागांना केव्हां केव्हां येते. त्या तसल्या आकारशून्य भावनेला खरें ज्ञान म्हणतां येत नाहीं. असल्या भावनेपलीकडे व पृथक्करणपूर्वक एकीकरणानें मिळणाऱ्या 'ज्ञाना' पलीकडे, खरें श्रेष्ठ दर्जाचें गाढ ज्ञान मिळावयास मनाच्या पलीकडे असलेल्या जाणिवेची आवश्यकता आहे. मनानें अर्धवट मिळविलेल्या ज्ञानाच्या वरतीं जाऊन, मनाच्या वरतीं जाऊन, त्याच्या क्रियेच्या उलट क्रिया करून, ही जाणीव मनानें अर्धवट मिळविलेलें ज्ञान पुरें करूं शकते. या जाणिवेला वस्तूचें खरें समग्र दर्शन, सार-दर्शन स्वाभाविकपणें घडत असतें. मनाच्या ज्ञानाची जी परिसीमा असते, ती मनाच्या पातळीवरून उडी मारून मनापलीकडे, त्याच्या वरतीं जावयास, त्याच्याहून श्रेष्ठ असलेल्या, खरें ज्ञान देणाऱ्या जाणिवेला उपयोगी पडते. जडाच्या अंधःकारमय बंदीखान्यांतून बाहेर पडलेल्या व आमच्या ठिकाणीं आलेल्या अर्धवट अंधुक दृष्टीच्या जाणिवेला शिस्त लावणें, तिनें बरोबर आणलेल्या आंधळ्या प्रेरणांना, भटक्या स्फूर्तींना, अस्पष्ट संवेदनांना आपल्या जवळच्या प्रकाशानें अनुक्रमें डोळस करणें, स्थिरता देणें, स्पष्टता देणें हें मनाचें खरें मोठयांत मोठें नियत कार्य आहे. जडांतून वर आलेली अर्धवट जड जाणीव, मनाच्या या शिस्तीनें व शिक्षणानें आपली ज्ञानपात्रता वाढवीत वाढवीत, मनापलीकडे चढून जाण्याला व तेथें जो प्रकाश आहे, तो आत्मसात् करण्याला समर्थ होते. अंतिम स्थानाकडे जाण्याचा मन हा केवळ मार्ग आहे, तें अंतिम स्थान नव्हे.
पान क्र. २३८
ही मनाची गोष्ट झाली. आतां, सच्चिदानंदाच्या अविभाज्य एकत्वाचा, शुद्ध एकरस जाणिवेचा विचार करूं. हें एकत्व, ही एकरस जाणीव पूर्णतया निर्वस्तुक आहे; विश्वांतील अखिल वस्तू या निर्वस्तुक मूळ एकत्वांतून, शून्यानें भरलेल्या एकत्वांतून बाहेर आलेल्या आहेत आणि शेवटीं या सर्व वस्तू त्या मूळ शून्यमय एकत्वांत विलीन होऊन नाहींशा होतात; ही एकत्वाची कल्पना सच्चिदानंदाशीं जोडली गेल्यानें अडचणी उत्पन्न होतात. एकत्वाची ही कल्पना विश्वाच्या उगमस्थानाशीं जोडणें स्वच्छ तर्कबुद्धीला केवळ अशक्य कोटींतील आहे. विश्वाच्या कालस्थलनिष्ठ आविष्कारांत जें जें कांहीं व्यक्त झालेलें आहे किंवा होणार आहे, तें सर्व कालस्थलातीत अशा सच्चिदानंदाच्या पोटीं पूर्णतया आत्मसमाविष्ट, आत्मकेन्द्रस्थित अशा मूळ स्वरूपांत असलेंच पाहिजे. अगदीं अचिंत्य व अनिर्वचनीय असें अस्तित्व आरंभीं सर्व कांहीं आंवरून, आत्मकेन्द्रस्थ एकत्व रूपानें असतें. शून्यवादी (Nihilist) आपल्या मनाशीं या अस्तित्वासंबंधानें अशी कल्पना करतो कीं, आम्ही जें कांहीं आहों आणि जें कांहीं जाणतों, त्या सर्वाचें मूलस्थान हें नकारात्मक अस्तित्व अथवा शून्य आहे; सर्वातीतवादी (Transcendentalist) या अस्तित्वासंबंधानें आपल्या मनाशीं अशी वेगळी कल्पना करतो कीं, आम्ही जें कांहीं आहों आणि जें कांहीं जाणतों, तें सर्व नकारात्मक अस्तित्वाच्या पोटीं नसून, भावात्मक अस्तित्वाच्या पोटीं आहे; हें भावनात्मक मूळअस्तित्व मूळ सत्य आहे, तें आमच्या मनाला अमुक म्हणून ओळखतां येत नाहीं, इतकेंच. वेदान्तांत ''आरंभीं एक अस्तित्व होतें, दुसरें कांहीं नव्हतें'' असें म्हटलें आहे. विश्वाच्या आरंभीं एकच एक अद्वितीय अस्तित्व होतें हें वेदान्ताचें म्हणणें बरोबर आहे; आरंभाच्या पूर्वीं काय होतें तें वेदान्तानें सांगितलेलें नाहीं. आरंभाच्या पूर्वीं, आरंभाच्या नंतर, आज, सर्व काळ आणि काळ नसतांना, काळाच्या पलीकडे अशी वस्तु आहे कीं, तिला अद्वितीय एक असें तर्कशुद्ध दृष्टीनें म्हणतां येत नाहीं. तिच्याविषयीं आपल्याला प्रथम हें कळतें कीं, ही मूळ वस्तु प्रथम सर्व कांहीं स्वतःच्या आत्म्यांत, निजरूपांत सांठवून राहिली; या तिच्या आद्य आत्मकेन्द्रीकरणाला अविभाज्य, अद्वितीय एकतत्त्व म्हणून ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करतों; यानंतर तिजविषयीं दुसरी गोष्ट आम्हांला अशी कळते कीं, या प्रथम धारण केलेल्या एकत्वरूपांत जें सांठविलें होतें, त्याचें एकत्व जणुं मोडून भाग भाग होतात व तें
पान क्र. २३९
चोहोंकडे पसरतात, विखुरले जातात. मन विश्वाची कल्पना करतें, ती या प्रकारची असते; आणि तिजविषयीं जी तिसरी गोष्ट आम्हांला कळते ती ही कीं, ती निश्चितपणें आणि व्यवस्थेनें स्वतःचा विस्तार करून सत्य-जाणीव, सत्य-कल्पना हें रूप धारण करते; यालाच अतिमानस, विज्ञान असें म्हणतात. हें विज्ञान स्वतःला आणि स्वत: जें जें बनतें त्याला सत्यत्वानें पूर्णपणें जाणतें; मनानें या पसाऱ्याला जें मोडतोडीचे स्वरूप दिलेलें असतें, तसें स्वरूप खरोखरीच त्याला येऊं नये, अशी काळजी हें विज्ञान घेतें. अधिकांत अधिक भेदाच्या पसाऱ्यांत तें अभेद, एकत्व राखतें; पराकोटीच्या अस्थिर पसाऱ्यांत स्थिरता जपून ठेवतें; सार्वत्रिक झगड्याच्या प्रदर्शनांत आग्रहानें सुसंवाद स्थापन करतें; व्यवस्थापूर्ण अशी विश्वरचना सर्व काळ संभाळून टिकवितें -- मनाची गति अशा व्यवस्थेपर्यंत होऊं शकत नाहीं -- मनाला विश्व हा अव्यवस्थित बाजार असतो, मनाच्या दृष्टीनें नित्यश: हा पसारा कांहींतरी व्यवस्थित आकार धारण करण्याचा प्रयत्न करीत असतो पण हा प्रयत्न त्याच्या दृष्टीनें नित्यशः अयशस्वी होत असतो. मनाला विश्वरूपाचें दर्शन हें असें घडत असतें.
विज्ञान किंवा अतिमानस हा ब्रह्माचा बृहत्, अतिमहान् आत्मविस्तार आहे. सर्वकांहीं सामावून घेऊन, त्याचा आपल्या पोटांत आविष्कार किंवा विकास करण्याचा या विस्तृत ब्रह्मरूपाचा धर्म आहे. अविभाज्य एकत्वाच्या स्वरूपांत असलेलें सत्-चित्-आनंद हें जें मूलतत्त्व, त्याचें कल्पनेच्या आश्रयानें, विज्ञान त्रिमुखी एकतत्त्व बनवितें. या तीन अंगांना विभागून अलग अलग न करतांहि, त्यांच्यामध्यें भेदाची कल्पना विज्ञान करतें. एकांतून तीन आविष्कृत करणें हें काम विज्ञान करतें. मन, तीन अलग अलग घटकांचें एक तत्त्व बनवितें. त्याच्या उलट विज्ञानाची ही कृति आहे, एकतत्त्वाचें त्रिमुखी एकतत्त्व बनवून, विज्ञान त्याच्यांत अनेकता आणि एकता एकाच वेळीं स्थापन करते. विज्ञान सर्वसमावेशक, सर्वज्ञतासंपन्न असल्यानें, त्याच्याकडून अभिव्यक्त झालेल्या पसाऱ्यांत एकता नित्य अनुस्यूत असते. प्रथम सच्चिदानंदाला सत्, चित्, आनंद असें त्रिधा भिन्न (अर्थात् एकत्व न सांडतां) कल्पून, विज्ञान हें विश्वाच्या आविष्काराला आरंभ करतें. या भेद-कल्पनेनंतर या तीनपैकीं कोणतीहि एक दिव्य वस्तु मुख्य म्हणून, मुख्य देवता म्हणून तें निश्चित करतें; या मुख्य देवतेंत दुसऱ्या दोन देवता अव्यक्त
पान क्र. २४०
किंवा अप्रकटपणें अंतर्भूत धरल्या जातात. यानंतर विज्ञान जे अनेक भेद कल्पितें, ते सर्व या नमुन्याप्रमाणें असतात. सर्वत्र विकासाची, अभिव्यक्तीची प्रक्रिया वरीलप्रमाणेंच -- एक मुख्य, दुसरें त्यांत अव्यक्त वा अप्रकटपणें अंतर्भूत -- अशीच असते. सच्चिदानंद या त्रिमुखी एकतत्त्वांतूनच तें नाना तत्त्वें, नाना शक्यता आविष्कृत करतें, विकसित करतें; कोणतेंहि तत्त्व वा शक्यता व्यक्त करणें, विकसित करणें, प्रकट करणें ही शक्ति विज्ञानांत आहे; अर्थात् या शक्तीची पूरक, म्हणजे अव्यक्त करणें, संकोचित करणें, अप्रकट करणें हीहि दुसरी शक्ति विज्ञानांत आहे. एका अर्थानें सगळी सृष्टि दोन अव्यक्तीकरणाच्या क्रियांमधील, दोन अव्यक्त-भांडारांमधील वाटचाल आहे. सृष्टीचें वरचें टोंक आत्मा हें एक अव्यक्त भांडार आहे, त्यांत सर्व कांहीं अव्यक्त रूपांत सांठविलेलें आहे; हें सर्व काही अव्यक्त आत्म्यांतून व्यक्त होत होत, सृष्टीचें दुसरें ध्रुवटोंक जें जडतत्त्व, तेथपर्यंत तळाला पोचतें; या तळाच्या जडतत्त्वांत सर्व व्यक्त सांठविले जातें, सर्व व्यक्त अव्यक्त होऊन बसतें -- तें क्रमानें त्या जडतत्त्वांतून बाहेर निघून पुनरपि व्यक्त होत होत, वरचें आत्म्याचें ध्रुवटोंक गांठतें.
तेव्हां सत्य कल्पनेच्या आश्रयानें सच्चिदानंदांत भेद कल्पून, नंतर त्या भेदांत आणखी भेद कल्पून विज्ञान विश्वनिर्मिति करतें. या विश्वनिर्मितीसंपादक एकंदर भेदप्रक्रियाव्यवहारांत विज्ञान खरोखरी अनेक तत्त्वें, अनेक शक्ती, अनेक आकार उभे करीत असतें; विज्ञानाची सर्वसमावेशक जाणीव या तत्वादिकांपैकीं प्रत्येकांत तदितर सर्व अस्तित्व समाविष्ट असलेलें पाहते; आणि त्याची सर्वस्पर्शी जाणीव या प्रत्येकाच्या पाठीमागें इतर सर्व अस्तित्व अव्यक्त दशेंत पाहते. म्हणजे 'सर्व प्रत्येकांत आहे आणि प्रत्येकाच्या पाठीमागें म्हणा, आंत म्हणा, सर्व आहे' असें नित्यज्ञान विज्ञानाला असतें. प्रत्येक वस्तुबीज अनंत शक्यता आपल्या अंतरीं सांठवून असतें; तथापि वाढीच्या क्रियेचा आणि अंतिम फळाचा एक विशिष्ट नियम तें पाळीत असतें -- हा नियम मूळ संकल्पशक्ति किंवा इच्छाशक्ति त्याला घालून देत असते. अर्थात् ही इच्छाशक्ति म्हणजे मूळ जाणीवयुक्त अस्तित्वाची (ज्ञानमय पुरुषाची) ज्ञानशक्ति असते. हा पुरुष, हा आत्मा, आत्माविष्कार करीत असतो; त्याच्या अंतरीं जी सत्य-कल्पना असते, तिचें त्याला असलेलें पूर्ण निश्चित ज्ञान कामाला लावून त्या कल्पनेनुसार आपले स्वत:चें
पान क्र. २४१
आकार आणि हालचाली तो अगोदरच योजून ठेवतो. ही योजना वर सांगितलेल्या विशिष्ट नियमाचें मूळ होय. मूळ स्वयंभू अस्तित्व -- ज्ञानमय आत्मा -- आपल्या अंतरीं आपल्या अस्तित्वांतील जें एखादें सत्य विशेष दृष्टीनें पाहतो, तें वस्तुबीज होतें; विशिष्ट आत्मदर्शनाचें तें विशिष्ट बीज जें फळ स्वतःतून निर्मितें, तें आत्म-व्यापाराचें सत्य होय; विकासाचा, आकार-धारणाचा, क्रियात्मकतेचा विशिष्ट स्वाभाविक नियम हेंच आत्म-व्यापाराचें स्वरूप होय; विशिष्ट आत्म-दर्शन हें विशिष्ट आत्मव्यापाराला अटळपणें कारणीभूत होतें; आणि आत्मदर्शनांत जें मूळ सत्य असतें, त्यांत गर्भित असलेल्याच विकासप्रक्रिया हा आत्मव्यापार कांटेकोरपणें कार्यान्वित करीत असतो. तेव्हां, सर्व निसर्ग हा केवळ ज्ञानमय, मूळ आत्म्याची कार्यमग्न ज्ञानशक्ति किंवा ज्ञानयुक्त इच्छाशक्ति आहे. ज्ञानमय आत्म्यानें प्रथम स्वत: कल्पनेचें रूप घेतलें, ही त्याची सत्यकल्पना जें सत्य स्वाभाविकपणें स्वत: जवळ बाळगीत होती, त्या सर्व सत्याला शक्तीच्या आणि आकाराच्या स्वरूपांत विकसित, संवर्धित करण्याचें काम, ज्ञानमय आत्म्याची ज्ञानशक्ति किवा ज्ञानयुक्त इच्छाशक्ति करते आणि हें कार्य म्हणजेच निसर्ग होय.
मानसिक जाणीव आणि सत्य-जाणीव यांतील सारभूत भेद कोणता तें वर दिलेल्या विवेचनावरून ध्यानांत येईल. अस्तित्व ही वस्तु वेगळी आणि विचार ही वस्तु वेगळी असें आपण मानतों; विचार ही द्रव्यमय वस्तु नाहीं, भावरूप आहे; सत्य वास्तव गोष्ट असें विचाराला म्हणतां येत नाहीं, विचार ही भावरूप, अद्रव्यरूप गोष्ट कोठून तरी उदयास येते, कोठून तें आम्हांला समजत नाहीं; द्रव्यमय सत्यविषयापासून ही अद्रव्यरूप गोष्ट स्वतःला अलग करते आणि मग त्या विषयाचें निरीक्षण करणें, तो विषय समजून घेणें, त्यासंबंधीं निर्णय घेणें या क्रिया ती करते; विचाराची हकीकत आमच्या मनाला ही अशी दिसते आणि आमचें मन म्हणजे एक सर्व विभागणारी, सर्व पृथक् पृथक् करणारी वस्तु असल्यानें, वर सांगितल्याप्रमाणें मनाला दिसणारें विचाराचें स्वरूप मनाच्या दृष्टीनें पूर्ण सत्य आहे. वस्तू वेगळ्या वेगळ्या करण्याचें, वस्तूमध्यें चिरा, भेगा पाडण्याचें, वस्तूचे तुकडे करण्याचें मनाचें आद्य कार्य आहे; वस्तु स्पष्टतेनें समजून घेण्याकडे मनाचें तितकें लक्ष नसतें; मनाच्या या स्वभावधर्मामुळें विचार आणि सत्य वस्तु, विचार आणि सत्य-अस्तित्व यांच्या अविभक्त सलग रूपामध्यें त्यांना विभक्त
पान क्र. २४२
व अलग करणारा चिरा मनानें कल्पिला आहे. अति-मानसाच्या क्षेत्रांत कोणतेंहि अस्तित्व जाणिवेपासून अलग असत नाहीं, जाणीव ही अस्तित्वाची नित्यसहचारिणी व त्याच्याशीं एकरूप अशी असते; कल्पना (जिचें वर विवेचन आलें आहे ती) जाणिवेचें स्पंदन आणि त्याचवेळीं अस्तित्त्वाचेंहि स्पंदन असते, दोन्हीं स्पंदनें अनेक परिणाम घडविणारीं असतात; अस्तित्वाचें स्पंदन हें नाना आकार व जाणिवेचें स्पंदन नाना जाणीवप्रकार उदयास आणतें; सत्य-कल्पना हें आरंभीचें निर्मायक आत्मज्ञान आहे; निष्क्रिय, निर्मितिविमुख अशी आत्मजाणिवेच्या पोटीं जें केन्द्रित झालेलें, एकत्र सांठविलेलें होतें, त्याचें निर्मायक आत्मजाणीवरूपानें आरंभींचें बहिरागमन म्हणजे कल्पना किंवा सत्य-कल्पना होय; हेंच अतिमानस, विज्ञान, सत्य-जाणीव वगैरे नांवांनीं ओळखलें जातें. जी निर्मायक आत्म-जाणीव किंवा कल्पना अ-निर्मायक आत्मजाणीवेच्या पोटीं दडलेली असते, तिचें बाहेर येणें हें सृष्टीच्या निर्मितींतील पहिलें पाऊल. ही जी कल्पना बाहेर येते, ती सत्य-कल्पना म्हणूनच बाहेर येते, तिचें सत्यत्व, सद्वस्तुत्व पुढें आत्मविकास करून घेतें; ही क्रिया तें नेहमीं आपल्या अंतर्गत ज्ञानाच्या आणि शक्तीच्या आश्रयानें चालवितें; तें नेहमीं स्वत:ला जाणतें, स्वत:चा स्वत: विकास घडवितें; कल्पनेच्या पोटीं स्वभावत:च इच्छाशक्ति असते, त्या शक्तीच्या बळावर तें आपला विकास करून घेतें; त्याच्या प्रत्येक प्रेरणेच्या पोटीं स्वभावत: असलेल्या ज्ञानाच्या बळावर तें आपला आविष्कार करीत असतें. निर्मिति व विकास हा असा चालतो. सर्व निमितीचें, सर्व विकासाचे वास्तव स्वरूप वर दर्शविल्याप्रमाणें असतें.
अतिमानसांत अस्तित्व, ज्ञानाची जाणीव व इच्छाशक्तीची जाणीव या गोष्टी विभागलेल्या नसतात; आमच्या मानसिक क्रियांमध्यें या गोष्टी अलग अलग भासतात; खरोखरी त्या तिन्ही मिळून एक वस्तु होते; तीन परिणामकारक अंगांची एकच कृति, तीन परिणामकारक घटकांचा एकच व्यापार या अस्तित्वादि त्रितयीनें व्यक्त होतो; प्रत्येक अंगाचा स्वतंत्र परिणाम असतो -- अस्तित्वामुळें त्या व्यापारांत द्रव्यत्वाचा परिणाम, जाणिवेमुळें त्यांत ज्ञानाचा परिणाम, स्वत:चें मार्गदर्शन करणाऱ्या, स्वत:ला आकार देणाऱ्या कल्पनेचा परिणाम, सर्वसमावेशक आणि सर्वस्पर्शी ज्ञानक्रियेचा परिणाम, इच्छाशक्तीमुळें त्या व्यापारांत स्वत:ची योजना-परिपूर्ति करणाऱ्या शक्तीचा परिणाम -- अशा विविध परिणामांचा
पान क्र. २४३
एक व्यापार, अतिमानसाच्या अस्तित्वादि त्रितयाच्या एकतेमुळें व अविभक्ततेमुळें घडून येत असतो. मूळ सद्वस्तु प्रकाशमय असते, या सद्वस्तूचा जो प्रकाश किंवा जें ज्ञान, त्यालाच कल्पना म्हटलें आहे; हें ज्ञान किंवा कल्पना म्हणजे, मानसिक विचार किंवा मानसिक कल्पना नव्हे; हें ज्ञान किंवा कल्पना म्हणजे सत्याची परिणामकारक आत्मजाणीव होय. ही कल्पना सत्य-कल्पना (Truth Idea) होय.
अतिमानस अवस्थेंत कल्पनेंत (Idea) जें ज्ञान असतें, तें त्या कल्पनेंतील इच्छाशक्तीपासून वेगळें निघालेलें नसतें; कल्पनेंतील ज्ञान अस्तित्वाशीं किंवा वस्तुद्रव्याशींहि एकरूप असतें. द्रव्याची प्रकाशमय शक्ति हेंच त्या ज्ञानाचें स्वरूप असतें; वस्तुद्रव्यापासून तें वेगळें निघालेलें नसतें. ज्याप्रमाणें अग्निद्रव्यापासून दाहक प्रकाशशक्ति वेगळी नसते, त्याप्रमाणें कल्पनेच्या शक्तीची गोष्ट आहे; जें मूळ अस्तित्व विस्तारप्रक्रियेनें कल्पनेचें आणि कल्पनेच्या विकासाचें रूप घेतें, त्या अस्तित्वाच्या घटकद्रव्याशीं कल्पनेंतील शक्ति एकरूप असते, त्या द्रव्यापासून वेगळी असत नाहीं. आमच्या मनाची स्थिति अगदीं निराळी आहे. आमच्या मनांत एक कल्पना येते, त्या कल्पनेला अनुरूप अशी इच्छा होते, किंवा आमच्या मनांत इच्छेची विशिष्ट प्रेरणा होते आणि त्या प्रेरणेंतून एक विशिष्ट कल्पना वेगळी होऊन मनांत उभी राहते; परंतु एक गोष्ट आम्ही न चुकतां करतों, ती ही कीं, कल्पना वेगळी, इच्छा वेगळी आणि आम्ही दोन्ही गोष्टींहून निराळे, हा सर्वांना स्पष्टपणें अलग अलग वस्तु समजणारा विचार, आम्ही सत्य मानतों. आमच्या मनाच्या दृष्टीनें वरील तीन वस्तू एकमेकींपासून अगदीं स्वतंत्र, अलग आहेत. मी आहे; माझ्यामध्यें कल्पना उदयास येते, ती कांहीं एखादी वस्तु नव्हे, ती केवळ एक भावना, गूढ वस्तुगुणरूप गोष्ट आहे; इच्छा ही माझ्यांत उदयास येणारी एक दुसरी गूढ गोष्ट आहे; वस्तुद्रव्याजवळ असलेली परंतु वस्तु नव्हे अशी शक्ति म्हणजे ही इच्छा आहे; पण एक गोष्ट निश्चित कीं, कल्पना असो वा इच्छा असो, या गोष्टी म्हणजे मी नव्हे, या गोष्टी मीपासून निराळ्या -- या मजमध्यें असतात, येतात, मला एकाएकीं सुचतात, भंडावतात; पण मी वेगळा व त्या वेगळ्या. माझी इच्छाशक्ति, तिचें साधन व तिचा परिणाम या गोष्टीहि 'मी' एकमेकींपासून निराळ्या समजतों; त्या एकमेकींमध्येंहि मोठी दरी 'मी' निर्माण करतो; इच्छेचीं साधनें, त्या इच्छेचे परिणाम म्हणजे माझ्या बाहेर
पान क्र. २४४
असणाऱ्या, मजपासून वेगळ्या सत्य वस्तू आहेत असें 'मी' मानतो. अर्थात् मी स्वत:, माझ्यांत उद्भवणारी कल्पना किंवा इच्छा यांपैकीं कोणीहि स्वत:ची स्वत: परिपूर्ति करूं शकत नाहीं. कल्पना कदाचित् मजपासून दूर होईल, इच्छा कदाचित् मला सोडून जाईल, साधन कदाचित् उपलब्ध होणार नाहीं किंवा या गोष्टींपैकीं एखादी किंवा सर्वच अनुपलब्ध होऊन, मी स्वत: अयशस्वी, अपूर्णकाम होईन -- असा संभव आमच्या मानसिक संसारांत असतो.
अतिमानसिक संसारांत मानसिक संसारासारखी निर्बळ करणारी विभागणी नसते; ज्ञान हें स्वत:मध्यें भाग भाग पाडीत नाहीं. शक्ति स्वतांत तुकडे पाडीत नाहीं, अस्तित्व स्वतांत विभाग करीत नाहीं. या वस्तू स्वत: परिपूर्ण, अखंडित राहतात आणि एकमेकींना धरून एकतेनें असतात; अतिमानस हें बृहत्, अतिमहान्, अति व्यापक, अति विस्ताराचें तत्त्व आहे; एकता किंवा अभेद हा त्या तत्त्वाचा आद्यमंत्र आहे, भेद नव्हे; मूलत: अतिमानस हें सर्वसमावेशक आहे; भेद ही तेथें गौण क्रिया आहे. म्हणून जेव्हां अस्तित्वाचें कोणतेंहि सत्य व्यक्त होत असेल, तेव्हां कल्पना त्या सत्याला अगदीं अनुकूल अशीच असेल, इच्छाशक्तिहि कल्पनेला पूर्ण अनुकूल अशीच असेल आणि परिणाम इच्छाशक्तीला अनुरूप असाच होणार. इच्छाशक्ति ही जाणिवेचें, अर्थात् कल्पनेचें स्वाभाविक सामर्थ्य असतें, म्हणून जेथें कल्पना, तेथें तिला अनुकूल इच्छाशक्ति स्वभावतःच असते. अतिमानसिक संसारांत एक कल्पना दुसऱ्या कल्पनांशीं विसंवादी नसते; त्याचप्रमाणें इच्छा-इच्छांचा किंवा शक्ती-शक्तींचाहि विसंवाद तेथें नसतो. हें सर्व विसंवाद-प्रकरण मनुष्यांत आणि त्याच्या विश्वांत मिळावयाचें; अतिमानसिक जाणीव ही अतिमहान्, अतिव्यापक जाणीव आहे; तिच्याबरोबर स्वभावत: अतिव्यापक इच्छाशक्ति असते -- अतिमानसिक जाणीव ही सर्व कल्पना स्वत:मध्यें समाविष्ट करून असते; सर्व कल्पना तिच्या स्वत:च्या असतात आणि या सर्वांमध्यें योग्य सुसंवादी संबंध ती निर्माण करते; त्याचप्रमाणें अतिमानसिक अतिव्यापक जाणिवेची स्वाभाविक सहचरी जी अति व्यापक इच्छाशक्ति, तिच्या पोटीं सर्व शक्ती तिच्या अंगभूत म्हणून वावरतात आणि या सर्वांमध्यें सुसंवादी संबंध ती निर्माण करते. अतिमानसिक जाणिवेच्या क्षेत्रांत, कल्पना व इच्छा एकोप्यानें काम करतात; ही जोडी अगोदर योजना ठरवून, त्या योजनेनुसार विशिष्ट प्रसंगीं अस्तित्वाचें एखादें सत्य पुढें नेते वा एखादें मागें ठेवते.
पान क्र. २४५
आज रूढ असलेल्या धर्मकल्पनांत ईश्वर हा सर्वव्यापी, सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् आहे. या ईश्वरविषयक धर्मकल्पनांचें समर्थन वरील अतिमानसिक शक्तीमध्यें सांपडतें. या कल्पना बुद्धीला, विचारशक्तीला सोडून नाहींत; त्या पूर्णपणें बुद्धिसंमत विचारविहित आहेत. सर्वसंग्रही व्यापक तत्त्वज्ञानाचें तर्कशास्त्र किंवा निरीक्षण आणि अनुभव यांना वरील धर्मकल्पना विरोध करीत नाहींत. आमची चूक होते ती ही कीं, ईश्वर आणि मनुष्य, ब्रह्म आणि विश्व यांच्यामध्यें आम्ही सेतुदेखील बांधतां येणार नाहीं अशी, दोघांना एकमेकांपासून कायमचें दूर ठेवणारी महान् दरी आमच्या कल्पनेनें उभी करतों. या चुकीमुळें असें होतें कीं, अस्तित्व, जाणीव आणि शक्ति यांच्यामध्यें वास्तवांत व्यवहारासाठीं जे भेद आहेत, त्यांना आम्ही सारभूत मानतों; हे भेद वरवरचे किवा व्यवहारापुरते नसून, मुळांतच अस्तित्वादि वस्तु अलग अलग आहेत असें आम्ही मानतों. या प्रश्नाकडे विशेष लक्ष पुढें केव्हां तरी देऊं. सध्यां एवढेंच ध्यानांत ठेवावयाचें कीं, आपण विचाराच्या मार्गानें दिव्यनिर्मितिशील अतिमानसतत्त्वाची कांहीं कल्पना समजून घेतली आहे आणि हें तत्त्व 'आहे' असें ठरविलें आहे. आमच्या विचारदृष्टीप्रमाणें हें तत्त्व अभेदाधिष्ठित भेदाचें आहे; येथें मूळ अस्तित्व, जाणीव, इच्छाशक्ति आणि आनंद या गोष्टी भिन्न नसून एकरूप आहेत; सर्व कांहीं या चतुर्मुखी मूळ एकतत्त्वांत एकत्वानें, अभेदानें राहतें. या अभेदनिष्ठ एकतत्त्वामध्यें, भेदाची अनंत अमर्याद शक्ति आहे. ही भेदशक्ति एकतत्त्वाचें एकत्व सांभाळून त्याचा अनंत विस्तार करते. या अनंत विस्तारांत जें द्रव्य आहे, तें सत्याचें आहे, सत्य आहे; मूळ सत्य अस्तित्त्वाचा हा सत्यविस्तार आहे. येथें मूळ सत्य हें कल्पनारूपानें व्यक्त होतें, तेंच सत्य आकारांत व्यक्त होतें; येथें ज्ञान आणि इच्छा अभिन्न सत्यरूप आहेत; मूळ अस्तित्वाचें ज्ञान व इच्छाशक्ति येथें अभिन्न असल्यानें, येथें आत्म-परिपूर्तीचें आणि म्हणून आत्मानंदाचेंहि सत्य राहतें; कारण आनंद हा आत्म-परिपूर्तींत असतो; या वरील कारणांसाठीं येथें नाना प्रकारचे संयोग, नाना प्रकारचीं रूपांतरे घडत असलीं, तरी या सर्व व्यवहारांत सर्वदा स्वयंभू स्वाभाविक अपरिहार्य असा सुसंवाद, मेळ, गोडवां असतो.
पान क्र. २४६
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.