Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण तेरावें
दैवी माया
परमेश्वर आणि प्रकाशमाता यांच्या नांवांचा उपयोग करून (त्यांच्या आज्ञेनें) मायापतींनीं त्या मातेच्या शक्तीला रूप दिलें, तिला मोजमाप दिलें. (तिला मर्यादा घातल्या.) त्या शक्तीचें विविध सामर्थ्य क्रमाक्रमानें झग्याप्रमाणें अंगावर घेऊन, मायापतींनीं या निराकार पुरुषोत्तमाचे ठिकाणीं आकार निर्माण केले.
- ऋग्वेद ३.३८.७
मायापतींनीं त्यांच्या मायेच्या आश्रयानें सर्व आकार तयार केले, सर्वांना रूप दिलें, या पितरांना, पूर्वजांना (मायापतींना) दिव्यदृष्टि आहे, ते पूर्वज (मायापती) त्या आकारांच्या पोटीं त्याला ठेवतात, जन्म घेणाऱ्या मुलाला ठेवावें त्याप्रमाणें; अर्थात् आकारांच्या पोटीं तो ठेवला गेला म्हणजे पुढें तो योग्यवेळीं जन्म घेतो -- साकार म्हणून उदयास येतो.
- ऋग्वेद ९.८३.३
आमचें वास्तव स्वरूप, आमच्या सर्व वृत्तींचें, सर्व वर्तनप्रकारांचें मूळ तत्त्व, आमचें करणें, होणें, निर्माण करणें या सर्व गोष्टींचें कारण, हेतु व साध्य एक महान् सद्वस्तु आहे, जी आपल्या सामर्थ्यानें कृतिशील होते आणि विविध निर्मिति करते; आणि हें सर्व स्वतःच्या जाणीवयुक्त अस्तित्वाच्या शुद्ध निर्भेळ आनंदासाठीं, आनंदाच्या प्रेरणेनें करीत असते. कवि, कलाकार, संगीतज्ञ कांहीं निर्माण करतो, तेव्हां त्याच्या अव्यक्त आत्म्यांतील कांहीं सामर्थ्य विकसित व व्यक्त करण्यापलीकडे तो वस्तुत: कांहीं करीत नाहीं; विचारक, मुत्सद्दी, यंत्रविशारद जेव्हां त्यांच्या अंतरांत गुप्तसुप्त असलेलें कांहीं आकारास आणतात, तेव्हां तें त्यांच्यापासून वेगळें असें कांहीं नसतें; आकारास येण्यापूर्वीं, आकारास आल्यानंतर तें
पान क्र. २०९
त्यांचेंच अव्यक्त वा व्यक्त रूप असतें -- ही जशी वस्तुस्थिति असते तशीच गोष्ट शाश्वत मूळ सद्वस्तु आणि हें विश्व यांची आहे. सर्व निर्मिति, सर्व रूप-धारण, सर्व नामरूप हें मूळ सद्वस्तूचें, निराकार अव्यक्त सद्वस्तूचें साकार होणें, व्यक्त होणें आहे, दुसरें कांहीं नाहीं. अस्तित्वांत अगोदरच असलेलें, रूपयुक्त होण्याची इच्छा नियतीनुसार धारण करणारें, रूप घेण्याचा आनंद पूर्वींच निश्चित झालेलें, असें जें कांहीं मूळबीजांत अगोदरच असेल, तेंच त्या बीजांतून वर येतें, विकसित होतें. मूळ जीव, बीजांत पुढें निर्माण होणारा जीव, अस्तित्वाची, जीवत्वाची शक्ति या रूपानें असतोच. जेथें जेथें रूप, आकार अस्तित्वांत येतो तेथें तेथें स्वतःला जाणणारी, विशिष्ट रूप स्वतःचें पोटीं धारण करणारी, आपल्या दृष्टीपासून लपलेली, शक्ति सर्वत्र असते. त्या शक्तीचे ठिकाणीं विशिष्ट रूपानें व्यक्त होण्याची अनिवार्य अशी प्रेरणा असते, अखेर या अनिवार्य प्रेरणेच्या दडपणामुळें ही शक्ति स्वतःचें विशिष्ट रूप, व्यक्त रूप धारण करते; एवढेंच कीं, व्यक्तिरूप मनुष्य आपणांतूनच सर्व कांहीं विकसित किंवा निर्माण करीत असूनहि त्याच्यामध्यें कार्य करणारी शक्ति व ज्या द्रव्याचा उपयोग कार्यासाठीं करण्यांत येतो किंवा ज्यावर क्रिया करण्यांत येतें तें द्रव्य, यांजमध्यें तो स्वत: एकता मानीत नाहीं -- हें सर्व भिन्न भिन्न आहे असें मानतो. खरी गोष्ट अशी आहे कीं, त्याच्यांत काम करणारी शक्ति तो स्वतःच असतो, ही शक्ति जिचा साधन म्हणून उपयोग करते, ती वैयक्तिक जाणीव तो स्वतःच असतो, जें द्रव्य ती वापरते, तें द्रव्यही तो स्वतःच असतो आणि या शक्तीचा वगैरे परिणाम म्हणून जें रूप, जो आकार बनतो, तें रूप, तो आकार तो स्वतःच असतो. दुसऱ्या शब्दांत हीच गोष्ट सांगावयाची, तर असें म्हणतां येईल कीं, एकच अस्तित्व, अस्तित्वाची शक्ति व अस्तित्वाचा आनंद असलेला असा आत्मा निरनिराळ्या स्थानीं स्वत:ला केन्द्रित करून, प्रत्येक स्थानासंबंधानें ''हा मी आहे'' असा वाक्प्रयोग करतो आणि त्या प्रत्येक स्थानीं स्वतःचीं निरनिराळी रूपें बनविण्यासाठीं स्वतःच्या शक्तीचा निरनिराळा प्रयोग करून काम करीत असतो.
या कार्यानें तो जें निर्माण करतो, तें अर्थांतच तो स्वतःच असतो; आणि स्वतःखेरीज दुसरें कांहीं तें असूंच शकणार नाहीं. कारण हा आत्मा आपल्या स्वतःचें अस्तित्व, स्वतःची जाणीवशक्ति व स्वतःचा अस्तित्वाचा आनंद आपल्या क्रियाव्यापारांनीं गतिमान् करून त्यांचा
पान क्र. २१०
एक विशिष्ट लीलाप्रयोग, एक विशिष्ट सुसंगत प्रयोग, एक विशिष्ट सुविकसित आकार उदयास आणण्यासाठीं धडपडत असतो. म्हणून विश्वांत जें कांहीं उदयास येतें, त्याची धडपड केवळ याचसाठीं चाललेली असते कीं, आपण अस्तित्वांत असावें, आपला नियोजित आकार आपणांस मिळावा, त्या आकारांत आपलें आत्मास्तित्व आपण विस्तृत करावें. आपल्यांत जी जाणीव व जी शक्ति आहे, ती कोणतीहि सीमा न मानतां आपण विकसित करावी, व्यक्त करावी, वाढवावी, कार्यान्वित करावी; व्यक्त रूपांत येण्याचा आनंद आपण उपभोगावा; अर्थात् विशिष्ट आकाराचा आनंद, विशिष्ट जाणीव-रागदारीचा आनंद, विशिष्ट शक्तिप्रयोगाचा आनंद आपण उपभोगावा; हा आनंद आपण वाढवावा, पूर्णतेस न्यावा व हें करतांना आपल्या खोल अंतरांत जो आत्मा (अस्तित्व-जाणीव-शक्ति-आनंदरूप आत्मा) सक्रिय झालेला आहे, त्यानें स्वतःसंबंधाची जी कल्पना सुचविली असेल, त्या कल्पनेला धरून सर्व शक्य साधनांचा सर्व दिशांनीं आपण उपयोग करावा -- कसेंहि करून वर सांगितलेला आपला त्रिविध आनंद वाढवावा व पूर्णतेस न्यावा.
विश्वांतील व्यक्तीच्या व वस्तुजाताच्या धडपडीला जर कांहीं साध्य असेल आणि पूर्णता हें जर तें साध्य असेल, तर व्यक्तीमध्यें आणि व्यक्तींनीं बनणाऱ्या मानवसमाजामध्येंहि स्वतःच्या अस्तित्वाची पूर्णता, स्वतःच्या शक्तीची आणि जाणिवेची पूर्णता, स्वतःच्या अस्तित्वानंदाची पूर्णता हेंच तें साध्य असणें शक्य आहे. विश्वांतील धडपडीचें दुसरें कोणतेंहि साध्य असणें शक्य नाहीं. पण ही ध्येयभूत पूर्णता, समग्रता, वैयक्तिक आकारांत कोंडलेल्या वैयक्तिक जाणिवेला लाभणें अशक्य आहे; असीम निरतिशय पूर्णता, सीमित साकाराचें ठिकाणीं शक्यच नाहीं. कारण सीमिताची स्वतःची स्वत:संबंधाची कल्पना, असीम पूर्णतेच्या कल्पनेला अर्थातच सर्वस्वीं विरोधी आहे. यासाठीं व्यक्तीमध्यें, सीमित जाणिवेच्या ठिकाणीं, असीम अनंत जाणीव उदयास येणें, उदयास आणणें हेंच एक व्यक्तीच्या धडपडीचें अंतिम ध्येय असलें पाहिजे; व्यक्तीनें आत्मज्ञान व आत्मप्रतीति यांच्या आधारानें आपलें मूळ स्वरूप, सत्य पुन: आपलेसें केलें पाहिजे; आपण मूळ रूपांत अस्तिवानें अनंत आहोंत, जाणिवेनें अनंत आहोंत, आनंदानें अनंत आहोंत हें तिनें ओळखलें पाहिजे आणि हा तिचा त्रिमुखी मूळ वास्तव आत्मा तिनें पुन्हां आपलासा केला पाहिजे; तसेंच आपलें सीमित रूप हें केवळ एक आवरण, विविध प्रकारच्या आविष्कारांचें
पान क्र. २११
साधन म्हणून आपण अंगीकारलें आहे, हें व्यक्तीनें पक्केपणीं जाणलें पाहिजे.
विश्वाचा जो खेळ सच्चिदानंदानें अस्तित्वांत आणला आहे, त्याचा स्वरूपधर्म पाहता असें दिसतें कीं, सच्चिदानंदानें आपलें मूळ अस्तित्व काल आणि आकाश (अवकाश) या कल्पनांच्या द्वारां अति विस्तृत करून, त्या विस्तृत आधारावर विश्वाचा खेळ उभारला आहे; या खेळांत कमी अधिक घन असें जड द्रव्य आहे, हें द्रव्य विभाज्य आहे, त्याच्या विभाज्यतेला सीमा नाहीं; या द्रव्याच्या पोटीं जाणीवयुक्त मूळशक्तियुक्त अस्तित्व, अर्थात् मूळ आत्मा लपतो, द्रव्यांत जणुं विलीन होतो -- समाधिस्थ होतो; द्रव्याची असीम विभाज्यता आत्म्याला मर्यादित व विविध आकार धारण करावयास उपयोगी पडते; जड द्रव्याच्या पोटीं चैतन्यानें -- चैतन्यशक्तीनें, आत्म्यानें लपणें हा विश्वलीलेचा पहिला अंक आहे; या लीलेच्या दुसऱ्या अंकांत, स्वतःला द्रव्याच्या पोटीं कोंडून घेणारी आत्मशक्ति प्रकट होते; साकार आत्मा, जीवयुक्त आत्मा, विचारसमर्थ आत्मा अशीं रूपें हा आत्मा प्रकट होऊन क्रमाक्रमानें घेतो; लीलेच्या तिसऱ्या अंकांत साकार विचारसमर्थ आत्मा, विचारमार्गानें प्रवास करून, शेवटीं असा साक्षात्कार संपादन करतो कीं, विश्व-खेळ खेळणारा एकच एक अनंत आत्मा मीच आहे -- याप्रमाणें अज्ञानाच्या बंधनांतून पूर्णपणें मुक्त होऊन, आरंभीं जडद्रव्यलीन झालेला आत्मा शेवटीं पुन: आपलें मूळस्वरूप, अनंत सत्-चित्-आनंदरूप प्रकटपणें साकारतेंत प्राप्त करतो; अर्थात् गुप्तपणें आजहि तो सच्चिदानंदच आहे, तो शाश्वतचाच सच्चिदानंद आहे, त्याचें वास्तव रूप सदासर्वदा, अरूप वा सरूप अवस्थेंत, सच्चिदानंद हेंच आहे व असावयाचें. असो. बुद्धीला दुर्गम असलेल्या विश्वखेळाचा सुगमतेनें बोध करून घ्यावयास या खेळाची तीन अंकांत केलेली वरील मांडणी उपयोगी पडेल. या तीन अंकांत गतिमान् सच्चिदानंदाची त्रिपदा-प्रवृत्ति समाविष्ट आहे.
जो क्रमविकासाचा आधुनिक सिद्धान्त विश्वांतील घटनांना लावण्यांत येतो, तो वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें प्राचीन वेदान्ताच्या विश्वात्मक सनातन सिद्धान्ताच्या पोटांत अंतर्भूत आहे. हा सनातन सिद्धान्त आधुनिक सिद्धान्तावर प्रकाश टाकून, त्याचा पूर्ण अर्थ आमच्या मनावर ठसवितो व त्याचें पूर्ण समर्थन करतो. आधुनिक सिद्धान्ताची पूर्ण सार्थता सनातन वेदान्ती सिद्धान्ताच्या साह्याशिवाय होतच नाहीं. जडद्रव्य आणि जडशक्ति यांच्या अभ्यासावरून आधुनिकांनीं क्रमविकासाचा
पान क्र. २१२
सिद्धान्त बसविला. पूर्ण निराकार विश्वात्मा कालदृष्ट्या क्रमाक्रमानें साकारतेंत (जडता, जीवता, विचारशीलता असा) स्वतःचा विकास करीत, मानवतेच्या आजच्या विकासावस्थेपर्यंत येऊन पोंचला आहे आणि मानव शेवटीं साकार ''व्यक्तीचा'' साकार विश्वात्मा होणार आहे किंवा विकासशील विश्वात्मा मानवाच्या आकारांत स्वतःचा पूर्ण विकास करून घेऊन, संकुचित व्यक्तित्व टाकून पुन: विश्वात्मा होणार आहे, असा सिद्धान्त प्राचीन वेदान्त्यांनीं विश्वाच्या सर्व अंगांचा अभ्यास करून प्रस्थापित केला. विश्वांतील विचारवन्त पाश्चात्यांचा नवा जडविकास-सिद्धान्त व पौर्वात्यांचा जुना आत्मविकास-सिद्धान्त दोन्ही एकत्र अभ्यासीत आहेत आणि विश्वांतील विचारसरणी आजच असें वळण घेत आहे कीं, जुनें पौर्वात्य व नवें पाश्चात्य या ज्ञानांचें मीलन झाल्यास ती गोष्ट दोघांनाहि लाभदायक आहे, कारण या मीलनानें दोघांनीं स्वतंत्रपणें प्रस्थापित केलेल्या सत्यविषयक सिद्धान्तांचा एकमेकांवर प्रकाश पडून, दोन्ही सिद्धान्तांतील सत्यांश पूर्वींपेक्षां अधिक स्पष्ट होतो.
विश्वांतील सर्व वस्तू, सर्व घटना या स्वरूपतः सच्चिदानंद आहेत, ही गोष्ट आपण शोधून काढली पण एवढ्यानें विश्वाचें स्पष्टीकरण पूर्ण होत नाहीं. विश्वाचें मूळ सत्य, अरूप रूप, आपल्याला सापडलें; पण हें मूळ अरूप सत्य आजचें विश्वाचें दृश्य रूप घेतांना कोणकोणत्या प्रक्रियांतून गेलें, तें अद्यापि आपण पाहिलेलें नाहीं. विश्वाच्या कूट प्रश्नाची गुरुकिल्ली आपल्या हातांत आलेली आहे, आतां ही गुरुकिल्ली कोणत्या कुलपांत चालतें तें पहावयाचें आहे. जादूगार आपलें जादूचें जग शब्दानें निर्माण करतो, तशी या विश्वाची किंवा विश्वांची उभारणी सच्चिदानंदानें कांहीं केवळ लहरी शब्दानें किंवा मंत्रानें केलेली नाहीं. येथें आपल्याला विशिष्ट कायदा, नियम, पद्धति, प्रक्रिया दिसते. मूळ सच्चिदानंद एकदम विश्वरूप घेत नाहीं, लहरीनेंहि घेत नाहीं -- तो मूळ पुरुष विशिष्ट कायद्यानें काम करतो.
आतां हें खरें कीं, येथें जो कायदा आम्हांला दिसतो, त्याचें विश्लेषण केल्यास आमच्या नजरेस प्रथमदर्शनीं असें येतें कीं, येथें विविध शक्तींचा समतुलनाचा खेळ चालला आहे आणि या खेळांत ज्या विशिष्ट प्रक्रिया किंवा क्रियापद्धती निश्चित होतात, त्या पूर्वयोजनेनें निश्चित होत नसून, विकासक्रियेंतील आकस्मिक व्यापार व घटना आणि अगोदरच जी शक्ति कार्यान्वित झाली आहे, तिची कार्य करण्याची सहज पडलेली
पान क्र. २१३
संवय, या दोन गोष्टींनीं निश्चित होतात. विश्वाच्या कायद्याचें हें जें स्वरूप दिसतें, तें दर्शनी व दुय्यम स्वरूप आहे. आपण जोपर्यंत केवळ शक्तीचा विचार करतों, तोंपर्यंत कायद्याचें हें दर्शनी स्वरूप त्याचें खरें अंतिम स्वरूप आहे असें आम्हांला वाटतें. पण शक्ति ही स्वयंभु सदवस्तूची स्वतःला व्यक्त करण्याची प्रवृत्ति आहे, सद्वस्तूचा आत्माविष्कार म्हणजे शक्ति हें आपण ध्यानांत घेतलें म्हणजे, जी कार्यपद्धति किंवा प्रक्रिया ही शक्ति अनुसरते; ती कार्यपद्धति किंवा प्रक्रिया मूळ सद्वस्तूच्या कोणत्यातरी निजीं-सत्याला धरून असते आणि त्या कार्यपद्धतीचें अंतिम साध्य आणि तें साधण्याचा कमी अधिक वळणाचा मार्ग हें सद्वस्तूचें विशिष्ट आत्मीय सत्य पूर्णाधिकारानें ठरवीत असतें, हें आपल्या लक्षांत येतें. जाणीव, ज्ञानमयता हा मूळ स्वयंभु सद्वस्तूचा स्वभावधर्म असल्यानें आणि ही जाणीव तिच्या शक्तीची प्रकृति असल्यानें, त्या सद्वस्तूचें विशिष्ट निजीं-सत्य पुरुषाचें विशिष्ट आत्मदर्शनरूप असलें पाहिजे; अर्थात् तें सत्य म्हणजे मूळ ज्ञानमय पुरुषाची स्वतःची कांहीं आंतरिक योजना असली पाहिजे, हें उघड आहे. त्याचप्रमाणें त्या सत्याची शासकता म्हणजे ज्ञानमय पुरुषाच्या ज्ञानामध्यें असलेली स्वाभाविक स्वयंशासकता होय. अर्थात् हें आत्मशासक ज्ञान स्वतःच्या शक्तीची प्रक्रिया ठरवितें व स्वतःच्या मूळ योजनेनुसार या प्रक्रियेचा मार्ग तर्कशुद्ध रीतीनें ठरवून आपल्या शक्तीला त्या मार्गानें, स्वत: निश्चित केलेल्या साध्यापर्यंत घेऊन जातें. अशी एकंदर ''शक्तीच्या प्रक्रियेची'' कथा आहे. तेव्हां, विश्वाची उभारणी सच्चिदानंदाच्या विश्वव्यापक ज्ञानानें आपल्या अध्यक्षत्वाखालीं, आपल्या मार्गदर्शकत्वाखालीं आपल्या पूर्ण पूर्वयोजनेनुसार केलेली आहे. त्याच्या विश्वात्मक ज्ञानांत स्वयंशासनाचें सामर्थ्य आहे, त्याच्या अनंत अस्तित्वाच्या स्वाभाविक आत्मजाणिवेमध्यें स्वतःमधील विशिष्ट सत्य बघण्याचें सामर्थ्य आहे; तसेंच या विशिष्ट सत्याच्या मार्गानें आपली निर्माणशक्ति, आविष्कारशक्ति चालविण्याचेंहि सामर्थ्य त्या आत्मजाणिवेमध्यें आहे.
अनंत ज्ञान, त्या ज्ञानाची एक क्रियाशील विशिष्ट शक्ति आणि नंतर विशिष्ट विश्वाचा आविष्कार अशी मांडणी वर केलेली आहे. अनंत ज्ञान आणि विश्वरचना, अनंत ज्ञान व त्याच्या क्रियाशीलतेचें फल या दोहोंच्यामध्यें त्या ज्ञानाच्या एका विशिष्ट शक्तीची योजना करण्याचें कारण काय ? अनंताची आत्मजाणीव जर स्वैरपणें रूपें निर्माण
पान क्र. २१४
करीत राहिली व त्या जाणिवेनें त्यांना विलीन होण्याचा आदेश देईपर्यंत तीं अनंतांत वावरलीं व नंतर तिच्या स्वैर आदेशानुसार विलीन झालीं, तर त्यांत बिघडेल काय ? ज्यू लोकांचा धर्मग्रंथ सांगतो : ''ईश्वर बोलला, प्रकाशानें आतां प्रकट व्हावें आणि ईश्वर असें बोलतांच प्रकाश प्रकट झाला''. आतां असें पहा कीं, ''प्रकाशानें प्रकट व्हावें, असें ईश्वर बोलला.'' असें आपण जेव्हां म्हणतो, तेव्हां आपण एक महत्त्वाची गोष्ट गृहीत धरीत असतो, प्रकाशाखेरीज इतर गोष्टींनीं दूर राहून प्रकाशानें मात्र पुढें यावें, हें अधिकारानें ठरविण्याची ईश्वराच्या ज्ञानशक्तीची एक क्रिया आपण गृहीत धरीत असतो. ईश्वराची ज्ञानशक्ति ही क्रिया करते असा आपल्या म्हणण्याचा आशय असतो. तसेंच ''आणि प्रकाश प्रकट झाला'' असें आपण म्हणतो, तेव्हां ईश्वराच्या ज्ञानशक्तीची दुसरी क्रिया -- निवडीनुसार मार्गदर्शनाची क्रिया -- आपण गृहीत धरतो. अनंत गोष्टींतून प्रकाश या गोष्टीची निवड करणें व नंतर त्या निवडलेल्या गोष्टीला योग्य मार्गदर्शन करून, तिच्या मार्गांतील विघ्नें दूर करून तिच्या ठरीव स्थानीं तिला बसविणें या ज्ञानशक्तीच्या दोन क्रिया गृहीत धराव्या, तेव्हांच ज्यू धर्मग्रंथांतील वरील वाक्य सार्थ होतें. अनंत ज्ञान अनंततेनें स्वैरपणें क्रियाशील झाल्यानें, अनंत स्वैर फलांची निष्पत्ति होणार, दुसरें कांहीं होणें शक्य नाहीं. कोणतेंहि विश्व निश्चित सत्याला किवा सत्यसंघाला धरून उभारावयाचें, त्या सत्याला किंवा सत्यसंघाला व्यक्त करण्यासाठीं उभें करावयाचें, तर असें सत्य किंवा असा सत्यसंघ निश्चित करणें व तदनुसार विश्वरचना करणें, या क्रियांसाठीं अनंत ज्ञानाच्या पोटीं विशिष्ट सान्त गोष्टीची निवड करणारी व त्या निवडीनुसार अनंतांत (अनंत निराकार सद्रूपांत) सान्त दृश्यरचना आकारास आणण्यास समर्थ असलेली व नियुक्त केलेली अशी एक विशिष्ट ज्ञानशक्ति असणें अवश्य आहे व अशी शक्ति अनंत सद्वस्तूच्या आत्मभांडारांत आहे.
या विशिष्ट ज्ञानशक्तीला वैदिक ऋषि ''माया'' म्हणत. अनंत अस्तित्वाच्या अमर्याद, अतिमहान् सत्यांतून नाम आणि रूप ग्रहण करण्याची, तें आपल्यांत सामावून घेण्याची आणि तें साकार करण्याची, ''मापून उभें करण्याची,'' अनंत जाणिवेची जी विशिष्ट शक्ति तिला वैदिक ऋषि माया म्हणत. मूळ अस्तित्व हें स्थितिशील सत्य आहे. स्थितिशील अस्तित्वाला गतिशील व्यवस्थाप्रधान अस्तित्वाचें रूप देणारी जी शक्ति, ती मायाशक्ति होय. तत्त्वज्ञानाच्या अधिक तात्त्विक भाषेंत असें
पान क्र. २१५
म्हणतां येईल कीं मूळ सर्वोत्तम अस्तित्वांत -- पुरुषांत भेदक जाणिवेचा पडदा नव्हता व सर्वच सर्वरूप होतें; त्यांत मायेनें साकार अस्तित्वपुरुष उदयास येतो व या साकार पुरुषांत प्रत्येकांत सर्व व प्रत्येक सर्वांत अशी व्यवस्था असते. या व्यवस्थेचा हेतु, एका अस्तित्वाचा दुसऱ्या अस्तित्वाबरोबर, एका जाणिवेचा दुसऱ्या जाणिवेबरोबर, एका आनंदाचा दुसऱ्या आनंदाबरोबर लीलेचा व्यवहार व्हावा हा असतो. पण हा हेतु एकदम सिद्ध होत नाहीं. प्रथम मनाचा खेळ सुरू होतो, त्यांत मायेचा भ्रम आम्हांला चकवितो -- ''प्रत्येकांत सर्व, प्रत्येक सर्वांत'' ही अनुभूति मनाचा खेळ चालूं असेपर्यंत पडद्याआड गुप्त रहाते; मन किंवा माया आमची प्रत्येकाची अशी कल्पना करून देते कीं, ''मी सर्वांत आहे. पण सर्व माझ्यांत नाहीं; आणि सर्वांत मी आहे तो अविभक्त सर्वांशीं अविभाज्यपणें एकरूप नसून विभक्तपणें आहे.'' मनाची माया संपून आणि ओलांडून आम्ही जेव्हां अतिमानसी क्षेत्रांत चढून जातों, तेव्हां आमची चूक संपते, आमचा भ्रम संपतो आणि मायेचें सत्य आमच्या अनुभवास येतें. अतिमानसी क्षेत्रांत एकमेव सत्य आणि त्याचीं अनेक प्रतीकें, अर्थात् ''प्रत्येक'' आणि ''सर्व'' एकाच वेळीं अटळपणें अस्तित्वांत असल्याचें आणि एका सत्याची आणि त्याच्या अनेक प्रतीकांची एकता अतूट असल्याचें आमच्या अनुभवास येतें. मनाची माया आज आहे, ही खालच्या प्रतीची आणि भुलविणारी माया आहे; ही आम्ही अगोदरच आपली स्वामिनी म्हणावयाची व नंतर हिच्यावर स्वामित्व मिळवावयाचें अशीं योजना आहे; या अपरा मायेच्या राजवटींत भेद, अंधार, मर्यादा; वासना, संघर्ष आणि दुःख यांनीं भरलेला खेळ ईश्वर खेळतो. स्वत:तून उदय पावलेल्या शक्तीचा तो अंकित होतो, ही शक्ति स्वत: अंधकारमय असते व या शक्तीच्या आवरणानें ईश्वर स्वत:ला झांकून घेतो. ही मनाची माया अतिमानसी मायेला आवरणरूप असते. म्हणून ती झांकलेली श्रेष्ठ माया आम्ही प्रथम बाजूला ठेवून, मनाची माया आपली करतों -- परंतु मनाच्या भ्रमवती मायेचें क्षेत्र ओलांडून आम्ही शेवटीं अतिमानसी सत्यवती माया आपली करतों -- अशी ईश्वरी योजना आहे. या श्रेष्ठ मायेच्या संसारांत, ईश्वराचा खेळ कनिष्ठ मायेच्या राजवटींतल्या खेळाहून अगदीं वेगळा असतो. येथें शक्तीचें अंकितत्व सोडून, ईश्वर मोकळा झालेला असतो, त्याचें स्वामित्व शक्तीवर चालते, ज्या हेतुकरितां ती त्याज-
पान क्र. २१६
पासून निघून कामाला लागली, तो हेतु तिला तो प्रकाशमय करून पूर्ण, सिद्ध करतो; येथें अतिमानसी मायेच्या क्षेत्रांत अस्तित्वाला मर्यादा नसतात - अनंत अस्तित्व आणि अस्तित्वप्रकार, तेजोमय ज्ञानाचे तेजस्वी प्रयोग, आत्मांकित शक्तीच्या वैभवशाली क्रिया, असीम प्रेमाचा विविध अमाप आनंद या गोष्टी अनुभवास आणून देणारा असा ईश्वरी खेळ या श्रेष्ठ मायेच्या क्षेत्रांत चालतो.
माया दोन प्रकारची आहे, कनिष्ठ माया आणि श्रेष्ठ माया. जें निराशावादी किंवा भ्रमवादी तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाला मायेचे हे दोन प्रकार आणि त्यांतील अंतर हें एकतर अज्ञान असतें किंवा या गोष्टीकडे त्याचें दुर्लक्ष झालेलें असतें. परंतु विश्वाच्या वास्तव रचनेंत हे दोन प्रकार आहेत आणि विश्वविषयक विचारांतहि हे दोन प्रकार आहेत. विचारांतील आणि वास्तवांतील हा दुवा -- दोन भिन्न मायांचें अस्तित्व हा दुवा -- दुर्लक्षित किंवा दुर्गम झाल्यानें निराशावादी व भ्रमवादी तत्त्वज्ञान अस्तित्वांत आलें आणि प्रसृत केलें गेलें. या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनें मनाची माया किंवा फार तर अधिमानसी माया विश्वाची जननी आहे; आणि मनाच्या मायेनें निर्माण केलेलें विश्व हें सहजच अनिर्वचनीय अशा विरोधांनीं आणि विरोधाभासांनीं भरलेली घटना असणार; जाणिवेनें युक्त अशा जीवनाचें भयंकर, सतत बदलणारें परंतु कायमचें स्वप्न, असें या मनोनिर्मित विश्वाचें स्वरूप असणार; या अशा विश्वाला सत्यहि म्हणतां येणार नाहीं व असत्य किंवा भ्रमरूपहि म्हणतां येणार नाहीं -- भ्रमवादी तत्त्वज्ञानांत, निराशावादी तत्त्वज्ञानांत, विश्वाचें वर्णन वरील प्रकारचें येतें तें, अर्थात् त्यांची दृष्टि मनानें मर्यादित असल्यानें त्यांना साजेसेंच आहे व त्यांची दृष्टि खरी मानल्यास तें खरेंहि आहे. पण आम्हांला जें शिकावयाचें आहे, तें हें कीं, मन ही अंतिम अवस्था नाहीं, मधली अवस्था आहे -- निर्माण करणारें सर्वशासक ज्ञान (किंवा आत्मा) वरतीं आणि आपण निर्माण केलेल्या रचनांत कैद होऊन पडलेला आत्मा (किंवा ज्ञान) खालतीं आणि मध्यें मन अशी वस्तुस्थिति आहे. सच्चिदानंद परमात्मा ज्या लीला करतो, त्यांत एका कनिष्ठ लीलेंत तो आपल्या शक्तींत मग्न होऊन स्वतःला विसरतो, शक्तीहि तिच्या क्रियेनें निर्माण झालेल्या रूपांत गुप्त होते -- हा आत्मविस्मृत परमात्मा आत्मविस्मृति टाकून परत आपल्या मूळ ज्ञानरूपाकडे येतो; वरून खालीं येतांना व खालून
पान क्र. २१७
वर जातांना, मन हें एक साधन त्याला उपयोगी पडणारें आहे. निर्मितीचें कार्य वरून खालीं येत असतें -- वरून खालीं उतरणाऱ्या निर्माणकार्याचें एक साधन मन आहे; तें निर्माण करणारें ज्ञान नव्हे -- तसेंच खालून वर येण्याची जी आत्म्याची क्रिया, त्या क्रियेंत मन ही एक मधली पायरी आहे; आमचें मूळ, सर्वोच्च उगमस्थान, विश्वांतील आमच्या अस्तित्वाची सर्वोच्च अवस्था मनाच्या पुष्कळ वरतीं आहे, मन नव्हे.
मन हेंच विश्वाचें निर्माण करणारें आहे, असें कांहीं दर्शनें मानतात, कांहीं दर्शनें, विश्व निर्माण करणारें तत्त्व मनाहून वेगळें मानतात, पण या तत्त्वामध्यें व विश्वांतील रूपांमध्यें केवळ मनच मध्यस्थाचें काम करतें असें मानतात. या दर्शनांचे दोन वर्ग पडतात. रूपतत्त्ववादी (Noumenal) दर्शनें आणि कल्पनातत्त्ववादी किंवा आदर्शतत्त्ववादी (Idealistic) दर्शनें. ''विश्व हें मनाचें, विचाराचें, कल्पनेचें कार्य आहे; कल्पना स्वैररूप असूं शकेल, अस्तित्वाच्या कोणत्याहि सत्याशीं कल्पनेचा तात्विक संबंध असला पाहिजे असें नाहीं; असें कांहीं अस्तित्वाचें सत्य असेल, तर ते शुद्ध विश्वनिरपेक्ष असें असेल, ज्याच्यांत वस्तूंचे अन्योन्यसंबंध निश्चित आहेत, अशा विश्वाशीं त्याचा कांहीं संबंध नसेल, कोणत्याहि संबंधापासून तें अलिप्त असेल'': रूपतत्त्ववादी दर्शनांची विश्वविषयक कल्पना या प्रकारची आहे. समोर दिसणारें कल्पना-रूप आणि त्याच्या पाठीमागचें सत्य यांचा संबंध आहे असें कल्पनातत्त्ववादी दर्शनें मानतात; पण हा संबंध विरोधात्मक, विसंवादात्मकच असला पाहिजे असें मानीत नाहींत. येथें विश्वविषयक जो सिद्धान्त मी मांडीत आहे, तो कल्पनातत्त्ववादी असला, तरी वर्तमान कल्पनातत्त्ववादाच्या पुढें जाणारा असा आहे. या सिद्धान्तानुसार विश्व निर्माण करणारी कल्पना शून्यांतून उदय पावत नाहीं किंवा ती खोट्या, नसत्या गोष्टी निर्माण करीत नाहीं. ही विश्व निर्माण करणारी कल्पना सत्य-कल्पना आहे, ती सत्य अस्तित्वाला व्यक्त करणाऱ्या ज्ञानमय शक्तीचें एक अंगभूत सामर्थ्य आहे, ती सत्य अस्तित्वांतून उगम पावली आहे आणि सत्य अस्तित्वाचा जो स्वभावधर्म, तो या कल्पनेचा स्वभावधर्म आहे. माझ्या सिद्धान्तानुसार, विश्व निर्माण करणारी कल्पना ही आत्मज्ञानसंपन्न सद्वस्तु आहे. तिचा अरूप आत्मा अक्षर आणि अविनाशी आहे, या आपल्या अरूप आत्मद्रव्यांतून ती क्षर आकार निर्माण करते, अर्थात् ती स्वतःच क्षर आकार बनते -- आपल्या अक्षर आत्मद्रव्यांतून क्षर नामरूपात्मक आत्मे
पान क्र. २१८
ती निर्माण करते, अर्थात् ती स्वत: हे आत्मे बनते -- तेव्हां हें नामरूपात्मक विश्व, विश्वात्मक मनांतील स्वैर कल्पना नव्हे -- विश्वात्मक मनाच्या पलीकडे असणाऱ्या सद्वस्तूचें ज्ञानपूर्वक आकारास येणें आहे, एका सद्वस्तूनें स्वतःतून अनेक आकार बनवून, त्या आकारांत तिनें स्वत: जाणीवपूर्वक वसति केली आहे -- येथील सर्व आकारांना जाणीवयुक्त सत्य-अस्तित्वाचा आधार आहे. या आकारांच्या द्वारां तें सत्य-अस्तित्व आपलें स्वरूप व्यक्त करतें. याप्रमाणें व्यक्त झालेल्या किंवा होणाऱ्या अस्तित्वाच्या सत्याला अनुरूप, त्याशीं अनुस्यूत जें ज्ञान, तें अतिमानसी *सत्य-जाणीव या स्वरूपांत सर्वशासक असतें, तें सत्य-कल्पना व्यवस्थेनें संघटित करतें -- या सर्व सत्य-कल्पना एकमेकींशीं पूर्णतया सुसंवादी रहाव्या अशी त्यांची अतिमानसी ज्ञानाकडून सुसंघटित व्यवस्था केली जाते, व नंतर त्या सत्य-कल्पना, मन-प्राण-जडतत्त्व यांच्या सांच्यांत त्याचेकडून ओतल्या जातात. मन-प्राण-देह ही त्रिमूर्ति-जाणीव आहे, जाणिवेचेंच एक रूप आहे. परंतु तें रूप कनिष्ठ पायरीचें रूप आहे, तें सद्वस्तूचें व तिच्या जाणिवेचें व्यक्तीकरण आहे; पण अगदीं अल्पांशस्पर्शी असें व्यक्तीकरण आहे. विविध विकासाच्या मार्गानें स्वतःचें श्रेष्ठ रूप मिळविण्यासाठीं हें कनिष्ठ रूप झगडत असतें. मनापलीकडील अतिमानस ज्ञानामध्यें हें श्रेष्ठ रूप तयार असतेंच. त्या ज्ञानाच्या पायरीवर मूळ सत्य-कल्पना आहे. ही सत्य-कल्पना, मन-प्राण-देह ही त्रिमूर्ति, तिच्या स्वतःच्या परिस्थितीला धरून जेवढ्या प्रमाणांत व्यक्त करतां येईल, तेवढया प्रमाणांत व्यक्त करण्यासाठीं खटपट करीत असते.
आपण विकासक्रमाच्या मार्गानें खालून वर चढत आहों, तेव्हां या चढण्याच्या दृष्टीनें असें म्हणतां येईल कीं, सद्वस्तु, मूळ वास्तव पुरुष सर्व अस्तित्वाच्या पाठीमागें आहे; ही मूळ सद्वस्तु प्रथम एखाद्या आदर्श सत्य-कल्पनेचें रूप घेते. या रूपांत तिचें स्वतःशीं सुसंवादी असें एखादें सत्य
-------------------------
* ऋग्वेदांत ऋत-चित् असें एक पद येतें; सत्य चित्, ऋत चित्, बृहत् चित् किंवा सत्यं हृतं बृहत् (चित्) एवढा सगळा अर्थ ऋत-चित् पदानें दाखविला जातो : सत्यम् = अस्तित्वाच्या मूळ सत्याची जाणीव. हृतम् = क्रियाशील अस्तित्वाच्या सुसंघटित सत्याची जाणीव. बृहत् = महान् अनंत आत्म-जाणीव. महान् अनंत आत्म-जाणिवेच्या पोटींच सत्य-जाणीव आणि ऋत-जाणीव असूं शकते.
पान क्र. २१९
अंतर्भूत असतें; ही आदर्श सत्य-कल्पना बदलत जाणारें असें जाणीवयुक्त अस्तित्व -- ज्ञानयुक्त जीव उदयास आणते; हा जीव साकार सत्याचें रूप घेतो; या साकार सत्याची ओढ त्याच्या मूळ सत्याकडे अपरिहार्यपणें असते. या ओढीच्या जोरदार प्रेरणेनें हें साकार सत्य, हा ज्ञानयुक्त जीव, आपलें मूळ सत्य-स्वरूप पूर्णपणें आपलें करण्यासाठीं सामान्य क्रममार्गानें आदर्श सत्य-कल्पनेच्या (ज्या कल्पनेच्या द्वारां तो मूळ सत्यांतून दृश्य सृष्टींत अवतरला, त्या कल्पनेच्या) आश्रयानें खटपट करतो, किंवा हा स्वाभाविक सामान्य क्रममार्ग सोडून, एक तऱ्हेचें त्वेषयुक्त आंतरिक उड्डाण करून, आपलें मूळ स्वरूप तो मिळवूं पहातो. अशी ही व्यवस्था कल्पिली म्हणजे अनेक गोष्टींचा उलगडा होतो. मानवी-जीवन अपूर्ण सत्य असल्याचें मनाला दिसतें; मनोमय जीवांत पूर्णतेकडे जाण्याची किंवा पूर्णता प्राप्त करून घेण्याची स्वाभाविक आकांक्षा असते; पूर्णता आपल्या आवांक्यापलीकडे आहे असें मनाला नेहमींच वाटत असलें, तरीहि तें पूर्णतेचाच मार्ग क्रमीत असतें; ज्यांत सर्वत्र सुसंवाद अनुभवास येईल, असें आदर्श जीवन किंवा पूर्ण जीवन मनापासून लपलेलें असतें व मन त्याकडे ओढ घेत असतें, धांव घेत असतें आणि आदर्श जीवनाच्याहि पलीकडे सर्व आदर्शांचें मूळ-भांडार असलेलें जें सर्वातीत सत्य, त्याजकडे आत्मा उसळी मारून जाऊं पहातो -- वर जी व्यवस्था कल्पिली आहे, तिनें या सर्व गोष्टींचा उलगडा होतो. आमच्या जाणिवेच्या वास्तव गोष्टी, आमच्या जाणिवेची रचना, तिच्या निकडीच्या गरजा यावरून असें तर्कशुद्ध, निश्चित अनुमान करतां येतें कीं, विश्वव्यवस्थेंत मूळ सद्वस्तु, आदर्श सत्य-कल्पना आणि साकार जीव अशी तीन पायऱ्यांची त्रिपदी व्यवस्था आहे. एका टोंकाला केवळ निरपेक्ष सद्वस्तु आणि दुसऱ्या टोंकाला केवळ सापेक्षता-साकार, सत्य, अन्योन्यावलंबी जीवांचा पसारा -- अशी दोन पायऱ्यांची द्विपदी व्यवस्था नाहीं. या दुसऱ्या कल्पित व्यवस्थेंत दोन टोंकांच्या दोन वस्तूंचा जो अन्योन्यविरोध आहे तो मिटण्यासारखा व मिटवतां येण्यासारखा नाहीं -- आणि तो वस्तुस्थितीस सर्वस्वीं सोडून आहे.
विश्वांतील अस्तित्व उलगडून दाखविण्यास मन पुरें पडत नाहीं. मूळ अनंत जाणीवेनें प्रथम अनंत ज्ञानशक्तीचें किंवा आमच्या दृष्टीनें सर्वज्ञतेचें रूप घ्यावें लागतें. परंतु मन ही कांहीं ज्ञानाची शक्ति नव्हे, सर्वज्ञतेचें एक साधन असेंहि मनाचें स्वरूप नाहीं; ज्ञानाचा शोध
पान क्र. २२०
करण्याची शक्ति, या शोधानें जें ज्ञान लाभेल तें सापेक्ष विचाराच्या विशिष्ट सांच्यांत व्यक्त करण्याची शक्ति आणि तें ज्ञान विशिष्ट क्रियासामर्थ्य उत्पन्न करण्यासाठीं उपयोगांत आणण्याची शक्ति, अशी त्रिविध शक्ति म्हणजे मन होय. ज्ञानाचा शोध करून मनानें कांहीं सत्य हस्तगत केलें, तरी त्या सत्याचें स्वामित्व त्याला असाध्य असतें -- तें कोणतेंहि सत्य जवळ बाळगीत नाहीं, त्या सत्याचें चलनी नाणें थोडें बहुत जवळ बाळगतें -- स्मृति ही मनाची पेढी आहे, या पेढींत हें चलनी नाणें मन ठेवतें व त्याच्या गरजेनुसार हें नाणें पेढींतून तें वेळोवेळीं काढीत असतें. ज्याला सत्याची ओळख नसते, सत्याची ओळख करून घेण्यासाठीं जें धडपडतें, पण ज्याला मलिन कांचेंतून एखाद्या दृष्याचें दर्शन घडल्याप्रमाणें सत्याचें घडलेंच तर अगदीं अंधुक दर्शन घडतें तें मन. विश्वव्यापी अस्तित्वाचें सत्य मनासमोर असतें -- पण मन ज्या कार्यक्षेत्रांत वावरतें, त्या क्षेत्रांत व्यवहारोपयोगी होईल एवढाच आणि असाच अर्थ तें या विश्वव्यापी अस्तित्वाच्या सत्यांतून काढतें -- एवढीच मनाची शक्ति आहे. विश्वव्यापी अस्तित्वाला ओळखणारी, त्याला मार्गदर्शन करणारी शक्ति मन नव्हे; अर्थात् हें विश्वाचें अस्तित्व निर्माण करणारी अथवा आविष्कृत करणारी शक्ति मन नव्हेच नव्हे; ही शक्ति मन असूंच शकत नाहीं, हें उघड आहे.
आपणाला असलेल्या कोणत्याहि मर्यादा नसलेलें अनंत मन विश्वाची उत्पत्ति करतें, असें कोणी म्हटलें तर हें मान्य केलें पाहिजे कीं, अशा या मनाला विश्वाची उत्पत्ति करतां येईल ही गोष्ट खरी आहे. पण हें जें 'मन' म्हणून आम्ही कल्पितों, तें आमच्या मनाहून अगदीं वेगळें, आमच्या मनाच्या फार पलीकडलें, वस्तुत: अतिमानसिक तत्त्व आहे, हें आम्ही विसरतों. ज्याला आम्ही जाणतों, त्या मनाच्या अर्थानें मन ही संज्ञा त्या अनंत तत्त्वाला लावणेंच चुकीचें होईल. आमचें मन जसें बनलेलें आहे तशा बनावटीचें ''अनंत'' मन निर्मितीच्या भानगडींत पडलें, तर अनंत गोंधळ मात्र निर्माण करील, त्याचें ध्येय नेहमीं गोंधळाचें व अनिश्चित असणार -- या ध्येयाकडे तें चांचपडत धांवणार आणि अनेक संभवांचा, अपघातांचा, स्थित्यंतरांचा अनावर अफाट परस्परसंघर्ष असेंच आणि एवढेंच काय तें मनाच्या ''विश्वाचें'' स्वरूप असणार ! अनंत, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान् मन अशी मनाची कल्पना करणें, हें मनाच्या सर्वमान्य व्याख्येला दृष्टीआड करणें आहे. हीं विशेषणें अतिमानसिक
पान क्र. २२१
सत्यज्ञानालाच लावणें योग्य आहे. तेव्हां विश्वाची उत्पत्ति मनाकडून होणें शक्य नाहीं. तें कार्य अतिमानसिक ज्ञानाचें आहे.
आम्हांला जें मन माहीत आहे, तें प्रतिबिंब घेऊन दाखविणाऱ्या आरशाप्रमाणें आहे; अगोदरच अस्तित्वांत असलेल्या सत्याच्या अथवा वास्तव घटनेच्या, स्वतःच्या बाहेर असलेल्या, निदान स्वतःहून मोठ्या असलेल्या सत्याच्या अथवा घटनेच्या प्रतिमा, प्रतिबिंबें या मनाच्या आरशांत घेतलीं जातात. जें कांहीं दृश्य घडत असतें किंवा घडलेलें असतें, तें क्षणाक्षणाला स्वतःच्या समोर ठेवणें ही क्रिया मन करीत असतें; त्याला अशीहि शक्ति आहे कीं, जी घटना त्याच्यासमोर आली आहे, तिच्या प्रतिमांखेरीज दुसऱ्या शक्य अशा प्रतिमा स्वतःचे ठिकाणीं उभ्या कराव्या; म्हणजे जें दृश्य घडलें आहे, त्याच्या देखाव्याप्रमाणें, जें दृष्य घडूं शकेल त्याचाहि देखावा तें स्वतःचें ठिकाणीं उभा करूं शकतें -- अर्थात् त्यानें उभे केलेले भावी संभाव्य देखावे घडून येतीलच असा कांहीं त्याचा अर्थ नसतो. जें कांहीं घडलें असेल किंवा घडत असेल तेंच पुन: निश्चित घडणार अशी वस्तुस्थिति असेल, तरच मनाची तद्विषयक चितारणी खात्रींची, संभाव्य चितारणी होऊं शकते. मनाला आणखीहि एक शक्ति आहे : जें घडलें आहे आणि जें घडणे संभवनीय आहे, जी शक्यता पूर्ण झाली आहे आणि जी अपूर्ण आहे, अशा दोन गोष्टी एका ठिकाणीं करून, मन नवें कांहींतरी त्यांतून उभें करूं शकतें आणि हें नवें कांहींतरी वास्तवांत उभें करण्याच्या आधीं मन त्याचें भविष्य सांगू शकतें. हें भविष्य वर्तविल्यानंतर त्यानें योजलेली नवी रचना मन कधीं कधीं अगदीं योजनेनुसार यशस्वीपणें उभी करूं शकतें; कधीं कधीं असें करूं शकत नाहीं, परंतु सामान्यत: असें घडतें कीं, योजनेहून वेगळीच रचना त्याच्याकडून घडविली जाते; आणि ज्या हेतूनें, ज्या इच्छेनें ही रचना मन करीत असतें, तो हेतु किंवा ती इच्छा अपूर्ण राहून, ती रचना वेगळ्याच कामाला लाविली जाते.
अशा स्वभावधर्माचें मन, अनंत असेल तर असा संभव आहे कीं, तें एखादें विश्व आकस्मिकपणें उभें करूं शकेल; या विश्वांत अनेक शक्यता असतील व त्या अन्योन्यविरोधी असतील; तें अनंततासंपन्न मन या विश्वाला अशी एक वस्तु बनवील कीं, जी नेहमीं बदलत राहील, नेहमीं क्षणभंगुर असेल, नेहमीं कोठेंतरी अनिश्चितपणें वाहत जात असेल, धड सत्य नाहीं - असत्य नाहीं असें जिचें स्वरूप असेल आणि जिला कांहींहि
पान क्र. २२२
निश्चित प्रयोजन वा हेतु असणार नाहीं. सारखीं बदलणारीं अनेक क्षणिक प्रयोजनें त्या वस्तूला इकडे तिकडे सारखी खेंचीत असतील. अर्थात् त्यामुळें असल्या खेंचाखेंचींत कोणत्याहि निश्चित हेतूची पूर्तता ती केव्हांहि करूं शकणार नाहीं. ज्ञान हीच श्रेष्ठ मार्गदर्शक शक्ति असल्यामुळें, तें ज्ञानसामर्थ्य नसलेलें अनंत मन विश्व म्हणून कांहीं उभें करूं शकणार नाहीं. अशा अनंत मनाच्या कल्पना विश्वांतील रूपांच्या मुळाशीं आहेत असें शुद्धरूपतत्त्ववाद (Noumenalism) मानतो. शून्यवाद (Nihilism) भ्रमवाद (Ilusionism) किंवा अशा सारखा आणखी एखादा वाद हेंच एक असल्या रूपतत्त्ववादाचें तर्कशुद्ध फळ होऊं शकतें. रूपतत्त्ववादानुसार पाहिलें असतां, अनंत (ज्ञानशून्य) मनानें उभें केलेलें विश्व म्हणजे जी वस्तु जशी नाहीं तशी ती मनानें प्रतिबिंबित करणें, तशी ती स्वतःपुढें ठेवणें आहे, अर्थात् सदा सर्वदा शेवटपर्यंत असें विश्व म्हणजे असत्याचें प्रदर्शन असणार, जें आहे त्याचें विकृत प्रतिबिंब असणार; या विश्वांतील जीवन सर्वच्या सर्व मनाच्या अयशस्वी खटपटीच्या स्वरूपाचें असणार -- मन आपल्या कल्पना वास्तवांत पूर्णपणें आणण्याकरितां खटपट करीत रहाणार आणि नित्यश: त्याला अपयश येत रहाणार -- कारण या कल्पनांना आत्मसत्याचा सर्वशासक आधार नसतो. मन आपल्या शक्ती खर्च करीत रहाणार, त्याच्या भूतकालीन शक्तींचा दिशाशून्य प्रवाह त्याला कोठेंतरी ओढून नेत रहाणार, कांहीं निश्चित हेतूची सिद्धि अशा मनाच्या विश्वपसाऱ्यापुढें ध्येय म्हणून देखील नसल्यामुळें, कोठेंतरी कशीतरी भ्रमन्ती करीत, हें विश्व आणि तें उभें करणारें मन शेवटीं स्वतःचा नाश करून घेणार किंवा शाश्वत शांततेंत त्याचा अंत होणार आणि असा अंत त्याला नसेल, तर त्याची भ्रमन्ती शाश्वत चालणार. मनाच्या या प्रपंचाचा आमूलाग्र विचार केला, म्हणजे या प्रपंचांतून शून्यवाद आणि भ्रमवाद उभा करून तो पोसला जातो असें दिसून येईल. मनाला विश्वजनक मानावयाचें, तर या वादांतील तत्त्वज्ञान हेंच एक आमचें सांसारिक शहाणपण होऊं शकतें; जर आणि जोंपावेतों, आमच्या मानवी मनाला किंवा तत्सम शक्तीला श्रेष्ठतम विश्वशक्तीचा मान आम्ही देत राहूं, विश्वाच्या उभारणींतील मूळ योजकशक्तीचा मान देत राहूं, तर आणि तोंपावेतों आमचें संसारिक शहाणपण शून्यवाद आणि भ्रमवाद मान्य करण्यांतच आहे हें निःसंशय.
पान क्र. २२३
आमचें मानवी मन शक्तीनें संपन्न आहे; पण या शक्तीहून श्रेष्ठ अशी ज्ञानाची मूळ आद्यशक्ति विश्वांत आहे. या श्रेष्ठ शक्तीचा शोध आपल्याला लागला, कीं त्या क्षणीं वर उभी केलेली विश्वाची कल्पना आपल्या बुद्धीला अपुरी वाटते, अयथार्थ वाटते आणि म्हणून ती आपल्या बुद्धीला अमान्य व अप्रमाण होते. या वरील कल्पनेंत सत्य कांहींच नाहीं असें नाहीं; तींत सत्य आहे, पण सर्व सत्य तींतच आहे असें नव्हे. विश्व प्रथमदर्शनीं कसें दिसतें किंवा कसें दिसेल त्याचा नियम वरील विश्वकल्पनेंत आहे. परंतु विश्वाचें आद्य सत्य आणि अंतिम वास्तवता, वरील विश्वकल्पनेंतील नियमांत अंतर्भूत होत नाहीं. मन-प्राण-शरीर यांच्या व्यापाराच्या पाठीमागें कांहीं एका वस्तूचें आम्हांला दर्शन घडतें. ही वस्तु शक्तीच्या ओघाला आपल्या पोटांत वागविणारी असून, त्याजवर सत्ता चालविणारी, त्याचें नियंत्रण करणारी आहे, त्या शक्तीच्या ओघाच्या धारेंत सांपडून वाहवत जाणारी नाहीं; आपल्या अस्तित्वाच्या पोटीं या वस्तूनें विश्व निर्माण केलें आहे आणि या विश्वांत ती सर्वज्ञता भोगते -- ती विश्वाच्या पोटीं जन्म घेऊन, त्या जन्मदात्या विश्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणारी नाहीं; या वस्तूच्या जाणिवेच्या पोटीं तिचें स्वतःचें एक पूर्ण रूप वावरत असून, तें जाणिवेंतील निराकार रूप या विश्वांत ती क्रमाक्रमानें व्यक्त करीत आहे -- तिला अनावर झालेल्या भूतकालीन शक्तीच्या सर्वस्वीं आहारीं जाऊन, त्या शक्ती नेतील तिकडे वाहत जाणारी आणि अशी अगतिकपणें वाहवत असतां, आपल्यांतून स्वतःहून कांहीं वेगळी रचना उभी करण्यासाठीं बहुधा अयशस्वीपणें सदैव धडपडणारी अशी वस्तु नाहीं. मन-प्राण-शरीर यांच्या व्यापारांच्या पाठीमागें ज्या वस्तूचें दर्शन आम्हांला घडतें, ती वस्तु ही अशी आहे. मनाशीं तिची तुलना करून तिचें श्रेष्ठपण वर दाखविलें आहे. ही वस्तु विश्वाचें आद्य सत्य व अंतिम वास्तवता आहे. अगोदरच या वस्तूला स्पष्ट दिसत असलेल्या सत्याचें आविष्करण म्हणजे हें विश्व आहे; अगोदरच पुढची योजना निश्चित करणाऱ्या दिव्य संकल्पशक्तीचे-इच्छाशक्तीचे नियम हें विश्व पाळीत आहे; आद्य सत्याला स्वतःच्या ठिकाणीं जें विशिष्ट रूपविषयक दर्शन प्रतीत होतें, त्या दर्शनानुसार या विश्वांत रूपरचना प्रत्यक्षांत येत असते; जी दिव्य सृष्टि अगोदरच तयार असते, तिची क्रमाक्रमानें वाढत जाणारी प्रतिमा म्हणजे हें विश्व होय.
पान क्र. २२४
आमचें मन दृश्याच्या शासनाखाली काम करणारें आहे. जोंपावेतों या मनाच्या चालीनें आम्ही चालत असतों, तोंपावेतों सर्व दृश्याच्या व मन-प्राण-शरीर यांच्या व्यापाराच्या पाठीमागें, त्यांच्या पलीकडे आणि त्याबरोबर या सर्वांत, सर्वदा सर्वत्र भरून राहिलेलें तत्त्व आम्हांला अनुमानानेंच जाणावें लागतें, त्याचें अस्तित्व आम्हांला अगदीं अंधुकपणेंच प्रतीत होऊं शकतें. आम्हांला दृष्यांत व आमच्यांत प्रगति दिसते, वळणावळणानें, चक्राकार गतीनें ही प्रगति चाललेली आमच्या नजरेस येते आणि त्यावरून आम्हीं असें अनुमान करतो कीं, अगोदरच माहीत असलेल्या कसल्यातरी वस्तूची कोठेंतरी पूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे आणि ही वस्तु अवश्य अधिकाधिक पूर्ण होणार आहे. आम्हांला चोहोंकडे कायदा काम करतांना दिसतो आणि हा कायदा आत्मतत्त्वाच्या अस्तित्वावर आधारलेला, आत्मतत्त्वांतून निघालेला आहे असें दिसते; या कायद्याचें काम आंतून बारकाईनें पाहिलें, त्या कामांत दिसून येणारी कार्यकारणदृष्टि तपासली म्हणजे आपल्या लक्षांत येतें कीं, हा कायदा विश्वरूपानें व्यक्त होणाऱ्या, आत्मतत्त्वांत स्वभावत: असलेल्या ज्ञानाचें प्रकट रूप आहे आणि हें आत्मतत्त्व किंवा मूळ अस्तित्व ज्या शक्तीच्या द्वारां व्यक्त होतें, त्या शक्तीच्या कार्यांत हा कायदा तिचा अंगभूत म्हणून तिचें नियंत्रण करतो; तो ज्ञानानें बनविलेला असून प्रगतीला साहाय्यक होईल अशा तऱ्हेनें बनविलेला आहे. त्या कायद्यावरून असें अनुमान निघतें कीं, आमची व विश्वाची गति, चाल ज्या दिशेनें चालू आहे, ती दिशा विश्वजनक दिव्य सत्तेनें ठरविलेली आहे आणि या सत्तेनें अगोदरच जें अंतिम साध्य आम्हांसाठीं व विश्वासाठीं ठरविलें आहे, त्या साध्याच्या दिशेनें आमची व विश्वाची वाटचाल चालूं आहे. आपल्या हेंहि लक्षांत येतें कीं, आमचें जें मन अगतिकपणें वहात जात असतें, त्या मनामधून बुद्धि बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि बाहेर आल्यावर त्या मनावर सत्ता चालविण्याच्या व त्याची अगतिक गति आपल्या स्वत:च्या धोरणानें ठरविण्याच्या कामांत ती मग्न होते. पुढें आमच्या प्रतीतीला असें येतें कीं, आमची बुद्धि मनाला मार्गदर्शक होत असली, तरी ती कांहीं स्वयंसिद्ध नाहीं -- ती केवळ दूताचें, प्रतिनिधीचें काम करणारी आहे, तिच्याहून श्रेष्ठ अशी जाणीव तिच्यापलीकडे आहे -- या श्रेष्ठ जाणिवेचें प्रतिनिधित्व, दूतकार्य बुद्धि करीत असते, या जाणिवेच्या छायेप्रमाणें ही बुद्धि आहे -- ती जाणीव बुद्धीप्रमाणें
पान क्र. २२५
बुद्धिवाद करून सत्य-स्थापना करीत नाहीं. तीच सर्व असल्यानें आणि जें जें आहे तें तें मी आहे अशी नित्य प्रतीति तिला असल्यानें, तिला बुद्धिवाद करून कोणत्याहि गोष्टीचें ज्ञान करून घेण्याचें कारण पडत नाहीं. या स्वयंभू सर्वरूप ज्ञानापर्यंत आपण पोंचल्यावर आपल्याला असें अनुमानतां येतें कीं, बुद्धीचें हें उगमस्थान आणि विश्वांत कायदा म्हणून शासन-व्यवहार करणारें ज्ञान ह्या दोन्हीं एकच वस्तु आहेत. हें ज्ञान आपला स्वतःचा कायदा पूर्णाधिकारानें, सार्वभौमत्वानें ठरविते; कारण, होऊन गेलेलें, विद्यमान असलेलें आणि भविष्यकाळीं घडणारें सर्व त्याला ज्ञात असतें. त्याला असें ज्ञान असण्याचें कारण तें स्वत: शाश्वत आहे, सार्वकालिक आहे आणि स्वतःचें त्याचें ज्ञान असीम व अनंत आहे. जें अस्तित्व, आत्मतत्त्व अनंत ज्ञानरूप आहे, जें अनंत ज्ञान सर्वसमर्थ शक्तिरूप आहे, तें एखादें विश्व -- अर्थात् स्वतःची एक सुरेल सुसंवादपूर्ण अमूर्त ''मूर्ति'' -- आपल्या जाणिवेचा जेव्हां विषय करतें, तेव्हां तें आपल्या विचारशक्तीला विश्वास्तित्व, विश्वात्मतत्त्व म्हणून प्रतीत होतें -- स्वतःचें सत्य या आत्मतत्त्वाला विदित आहे आणि स्वतःला विदित असणारें स्वतःचें जें सत्य तें नाना आकारांच्या द्वारां दृष्य सृष्टींत दाखल करतें, तें सत्यहि आमच्या विचारशक्तीला विश्वात्म-तत्त्वाचा स्वभाव म्हणून प्रतीत होतें.
पण विचारद्वारां येणारी प्रतीति वेगळी आणि प्रत्यक्ष अनुभूति वेगळी. आम्ही बुद्धिवाद करण्याचें सोडून, जेव्हां आमच्या अंतरांत खोल खोल उतरतों आणि जेथें मनाची धडपड शांत होते, अशा गुप्त स्थानीं पोंचतों, तेव्हांच बुद्धीहून श्रेष्ठ अशी अनंत आणि विश्वरूप जाणीव तेथें खरोखरी आमच्या प्रत्यक्ष अनुभवास येते; अर्थात् आम्हांला मानसिक प्रतिक्रियेची, मानसिक कोंडीची मर्यादितपणाची फार काळाची संवय असल्यानें, ही प्रत्यक्ष अनुभूति थोडीबहुत अपूर्णच असते; तथापि पूर्वीं बुद्धीच्या मंद आणि अस्थिर प्रकाशांत ज्या गोष्टी आम्ही विचारानें जाणून घेऊनहि ज्यांच्याविषयी कांहींसा संशय आमच्या बुद्धींत कायम राहिला, त्या गोष्टी या प्रत्यक्ष अनुभूतीनंतर अधिकाधिक उज्ज्वल प्रकाशांत आम्हांला स्पष्टपणें विदित होऊं शकतात आणि त्यांच्या विषयींचा आमचा संशय पार नाहींसा होतो. मन आणि बुद्धि यांच्या युक्तिवादाच्या पलीकडे खरें ज्ञान आहे. हें ज्ञान जिज्ञासूंची वाट पहात आपल्या सिंहासनावर बसलेलें आहे; हें सिंहासन अतिमहान् तेजोमय प्रदेशांत आहे; या
पान क्र. २२६
प्रदेशांत ज्ञानाला सर्व दिशांकडे आत्मदर्शन घडतें, या दर्शनाला कोणत्याच दिशेला सीमा असत नाहीं, या दर्शनाला कालाचीहि सीमा नसते.
(दिक्कालाद्यनवच्छिन्नानंत चिन्मात्र मूर्तये ।
स्वानुभूत्येकमानाय नम: शान्ताय तेजसे ।। -- भर्तृहरि)
पान क्र. २२७
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.