Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण चौथें
दिव्यत्व आणि अदिव्यत्व
सर्वद्रष्टा, तत्त्वचिंतक, स्वयंभू, सर्वस्थानीं सरूप होऊन राहणारा जो परमात्मा त्यानें सर्व वस्तुजाताची व्यवस्था अनादि काळापासून यथोचित केलेली आहे.
- ईश उपनिषद् श्लोक ८
अनेकजण ज्ञानतपानें शुद्ध होऊन माझ्याशीं समान अवस्थेचे झाले आहेत; त्यांच्या जीवनविषयक नियमाच्या बाबतींत माझ्याशीं समानधर्मी झाले आहेत.
- गीता ४-१०; १४-२
तेंच ब्रह्म आहे हें ओळख; माणसें ज्याची येथें उपासना करतात तें हें ब्रह्म नव्हे. -- केन - उपनिषद् १-४
सर्व भूतांचें नियमन करणारा सर्वांचा अन्तरात्मा एकच आहे ... विश्वाचा नेत्र सूर्य, बाह्य नेत्र-दोषांनीं स्पर्शिला जात नाहीं, त्याप्रमाणें हा भूतांचा अन्तरात्मा विश्वांतील दुःखांनीं स्पर्शिला जात नाहीं.
- कठ उपनिषद् ५-१२, ११
ईश्वर सर्वभूतांच्या हृदयांत वास करतो.
- गीता १८-६१
काल-स्थलदृष्ट्या अनंत, अव्यक्त अशा विश्वगर्भ सद्वस्तूची विश्व ही अभिव्यक्ति आहे; ती दिव्य सद्वस्तु, तो दिव्य पुरुष, जें जें कांहीं आहे त्याच्या अंतर्यामीं वास करतो; आमचा आत्मा तोच आहे. आमचें खोलांत खोल अस्तित्व तोच आहे; आमच्या अन्तरांत गुप्तपणें वास करणारा विज्ञानमय पुरुष त्या दिव्य जाणिवेचा आणि त्या तत्त्वाचा (दिव्यपुरुषाच्या तत्त्वाचा) एक अंश आहे. आमच्या अस्तित्वासंबंधानें आम्हीं जी दृष्टि स्वीकारली आहे व प्रतिपादली आहे ती वरील प्रकारची आहे : दिव्य-जीवन म्हणून एक जीवनपद्धति आहे. मानवी विकास शेवटीं मानवाला तें दिव्य जीवन उपलब्ध करून देणारा आहे, असेंहि आम्हीं
पान क्र. १७०
प्रतिपादिलें आहे. अर्थात् आमचें प्रस्तुतचें जीवन आणि आम्हां मानवांच्या खालीं असणारें प्राणिजीवन हें सर्व अदिव्य जीवन आहे, असा आमच्या प्रतिपादनांतून ध्वनि निघतो. सकृत् दर्शनीं हें प्रतिपादन स्वत: मांडलेल्या सिद्धांताच्या विरोधी सिद्धांताचें समर्थन करणारें दिसतें. सर्वच विश्वव्यवहार ईश्वराच्या दिव्य अभिव्यक्तीचा व्यवहार आहे, असें म्हटल्यावर दिव्य जीवन आणि अदिव्य जीवन असा भेद करण्यापेक्षां, दिव्य जीवनाच्या एका पातळीवरून तिच्याहून उंच अशा पातळीवर आम्ही जाऊं इच्छितों व जातों आणि ह्या दोन्ही जीवनभूमिका ईश्वरी दिव्य अभिव्यक्तीच्या पोटांत आहेत, अशी मांडणी करणें अधिक तर्कशुद्ध होईल व तात्विक दृष्ट्या पाहतां हें म्हणणें मान्य करावें लागेल. वस्तुजाताच्या पोटीं जी सद्वस्तु आहे तिच्याकडेच केवळ लक्ष दिलें, बाह्य परिसरांत घडणाऱ्या गोष्टींमुळें ज्या कल्पना उभ्या राहतात त्यांकडे दुर्लक्ष केलें, तर आमच्या विकाराचें स्वाभाविक स्वरूप, निसर्गांत आम्ही जें रूपान्तर पावणार आहों त्याचें स्वरूप, एका दिव्य विकासभूमीवरून तिजहून उंच असलेल्या विकास भूमीवर जाणें याच प्रकाराचें आहे; विश्वव्यापी दृष्टि ज्याला लाभली आहे, ज्याची दृष्टि एकांगीं नाहीं, ज्ञानअज्ञान या द्वंद्वाचा ज्या दृष्टीला उपसर्ग, संपर्क नाहीं, दोष नाहीं, मंगलअमंगल, पुण्य-पाप, सुख-दुःख या द्वंद्वांची बाधा ज्या दृष्टीला नाहीं -- सच्चिदानंदाच्या अप्रतिहत जाणिवेचा आणि आनंदाचा भोग ज्या दृष्टीला उपलब्ध आहे -- त्या दृष्टीला, आम्ही दिव्य जीवनाच्या एका विकासभूमीवरून तिच्याहून उंच अशा विकासभूमीवर मार्गक्रमण करीत आहों असेंच दृश्य दिसेल, हें स्पष्ट आहे. पण ही तात्विक दृष्टि झाली; मूळ सद्वस्तूची दृष्टि, त्या सद्वस्तूशीं एकरूप झालेल्याची दृष्टि झाली. दुसरीहि दृष्टि आहे; आमची सापेक्ष दृष्टि, व्यवहारी दृष्टि ही ती दुसरी दृष्टि होय. या दुसऱ्या दृष्टीला दिव्य जीवन आणि अदिव्य जीवन या दोन गोष्टी स्पष्टपणें भिन्न दिसतात; ही भिन्नता, हा भेद या दृष्टीला सारखा जाचत असतो; या दृष्टीला हा भेद अर्थपूर्ण आहे; टाळण्यासारखा नाहीं. तेव्हां या प्रश्नावर कांहीं प्रकाश टाकणें, या प्रश्नाचें महत्त्व मापणें आम्हांला आवश्यक आहे.
दिव्य जीवन आणि अदिव्य जीवन हा जो भेद आम्ही करतो, त्याचा व्यावहारिक अर्थ असा कीं, ज्ञानावर आधारलेलें जीवन, आत्मजाणिवेनें चाललेलें जीवन, ज्ञानाच्या सामर्थ्यानें चाललेलें जीवन म्हणजे
पान क्र. १७१
दिव्य जीवन आणि उलटपक्षीं अशा ज्ञानाच्या अभावानें, अज्ञानानें चाललेलें जीवन म्हणजे अदिव्य जीवन. अचेतनाच्या पायांतून विश्व हळू हळू वर येत आहे, विकास पावत आहे, अनेक अडचणींना तोंड देऊन विकास पावत आहे; चेतना आणि ज्ञान जेथें हळू हळू ज्ञानशून्य अचेतनांतून उदित होत आहे, वाढत आहे अशा विश्वांत अज्ञानाचें जीवन म्हणजे अदिव्य जीवन आणि ज्ञानाचें जीवन म्हणजे दिव्य जीवन असाच भेद आम्हांला करावा लागतो : अचेतन ज्ञानशून्यता हाच ज्या जीवनाचा पाया आहे त्या जीवनांत मौलिक अपूर्णता असणारच. असें जीवन आत्मसंतुष्ट असूं शकेल पण जें अपूर्ण आहे, विसंवादी आहे, विसंगत गोष्टींची गोधडी हेंच ज्याचें स्वरूप आहे असेंच हें ''आत्मसंतुष्ट'' जीवन असणार यांत संशय नाहीं; कारण त्याचा पाया, मूलाधार जड अचेतन द्रव्य आहे. ज्याचा अचेतन जड हा पाया नाहीं असें शुद्ध प्राणिक जीवन, मानसिक जीवन त्याच्या त्याच्या मर्यादित क्षेत्रांतहि ''पूर्ण'' असूं शकेल. आत्मशक्ति, आत्मज्ञान त्या जीवनांत मर्यादित असलें, तरी तें सुसंवादी असूं शकतें आणि हा सुसंवाद ''पूर्ण''तेचें मुख्य लक्षण आहे. सुसंवादी आत्मशक्तीवर, आत्मज्ञानावर आधारलेलें जीवन म्हणजे पूर्ण ''जीवन'', दिव्य जीवन. अदिव्य जीवन तें कीं, ज्या जीवनांत कायमची विसंगति, विसंवाद आहे, कायमची अपूर्णता आहे; दिव्य जीवन पायरीपायरीनें विकास पावत असतें -- पण प्रत्येक पायरीवर त्याचें तात्विक आणि तपशिलाचें स्वरूप सुसंवादानें परिपूर्ण असतें. दिव्य जीवन ही अशी पक्की भूमि असते कीं, तिच्यावर खरी स्व-तंत्रता आणि पूर्णता स्वभावत:च फुलते, फळते, आणि त्यांचें जें अंतिम श्रेष्ठ स्वरूप तें त्यांना क्रमश: स्वभावत: प्राप्त होतें; स्वतंत्रता आणि पूर्णता दिव्य जीवनाच्या भूमीवर शुद्ध, शुद्धतर, शुद्धतम होत जातात, विस्तारानेंहि सारखें अधिकाधिक क्षेत्र व्यापीत जातात आणि याप्रमाणें त्यांना शक्य असलेलें सूक्ष्मतम, शुद्धतम, महत्तम वैभव स्वभावत: क्रमश: शेवटीं त्यांना प्राप्त होतें. दिव्य जीवन आणि अदिव्य जीवन यांतील अंतराचा विचार करतांना सर्व प्रकारची पूर्णता व सर्व प्रकारची अपूर्णता विचारांत घ्यावयास हवी; पण सामान्यत: आम्ही या दोन जीवनांतील अंतराचा जेव्हां विचार करतों, तेव्हां आम्ही तो विचार मानव या नात्यानें करीत असतो -- आम्ही मानवजीवनाच्या अनेक अडचणीशीं झगडत जीवन कंठीत असतों, आम्हांला आपत्तींत टाकणाऱ्या ज्या अगदीं निकटच्या गोष्टी असतात, आम्हांला क्षणोक्षणीं बोचणारीं जीं कोडीं
पान क्र. १७२
असतात, त्या कोड्यांचा आणि आपत्तींचा विचार हाच दिव्य आणि अदिव्य जीवनांतील अंतर ठरवितांना आमच्यासमोर प्रामुख्यानें असतो; आम्ही दुष्टपणा आणि सुष्टपणा जो संसारांत अनुभवतों, दुःख आणि सुख जें आमच्या वांट्यास येतें त्याचाच विचार, दिव्य-अदिव्य जीवनाचा प्रश्न आम्हांपुढें असतांना, आमच्या लक्षांत प्रामुख्यानें येतो. वस्तुजाताच्या पोटीं दिव्य ईश्वरी सत्ता आहे कीं नाहीं, विश्व हें ईश्वरापासून निघालें आहे कीं नाहीं, विश्वांतील व्यवहार ईश्वराच्या नियंत्रणाखालीं चालतो किंवा कसें, या गोष्टींचा जेव्हां आम्ही आपल्या बुद्धीनें विचार करतों, तेव्हां विश्वांत जो दुष्टपणा दिसतो, विश्वांत जें दुःख दिसतें, मानसिक, शारीरिक दुःख व क्लेश यांजकडे निसर्गांत जो मोठा प्रभावशाली कार्यभाग सोंपविलेला दिसतो, त्यावरून, त्यायोगें आमची बुद्धि ''हतबुद्ध'' होते; या क्रूरतेच्या गोष्टी आमच्या बुद्धीला पटत नाहींत आणि याचा परिणाम, आमची स्वाभाविक मानवी श्रद्धा नाहींशी करण्यांत होतो. विश्वाची उत्पत्ति ईश्वरानें केली आहे, विश्वाचें नियंत्रण ईश्वर करीत आहे, ईश्वर सर्वव्यापी, सर्वदर्शी, सर्वनियामक आहे, ही आमची स्वाभाविक श्रद्धा आमच्या समोर असलेल्या क्रौर्याच्या घटनांनीं पार नाहींशी केली जाते. चांगुलपणा, वाईटपणा आणि सुखदुःख या द्वंद्वांहून इतर अडचणीहि संसारांत आहेत -- पण त्याचें कांहींतरी स्पष्टीकरण फार डोकें न चालवितां आम्ही देऊं शकूं आणि या सुलभ स्पष्टीकरणानें संतोष मिळवूं शकूं : वरील क्रूर द्वंद्वांचें मात्र तसें नाहीं; त्यांनीं आमच्या श्रद्धेला धक्का बसणें अटळ आहे. आमच्या बुद्धीची ही सर्व अडचण लक्षांत घेऊनहि असें म्हणतां येतें कीं, दिव्य-अदिव्यत्व ठरविण्यास आम्हीं हें जें न्यायाचें माप घेतलें आहे, तें तितकेसें व्यापक नाहीं; तें फारच मोठ्या प्रमाणांत केवळ मानवी दृष्टीचें माप आहे. मानवी दृष्टीच्या पलीकडे अधिक व्यापक दृष्टीनें चांगलें-वाईट आणि सुख-दुःख या द्वंद्वांकडे पाहिल्यास हीं द्वंद्वें डोळ्यांत भरण्यासारखीं असलीं, वाईट आणि दुःख या घटना दुर्लक्षिण्यासारख्या नसल्या, तरी त्या कांहीं आमच्या जीवनांतील अपूर्णता व दोष पूर्णतया दाखविणाऱ्या नाहींत; आमच्या जीवनांतील मूळ उणीव या घटनांत नसून ती वेगळीच आहे, असें दिसून येतें. विश्वांत अपूर्णता, दोष अनेक प्रकारचे आहेत; वर उल्लेखिलेले दोन दोष म्हणजे कांहीं दोषांची संपूर्ण यादी नव्हे; आमचें आत्मिक-भौतिक जीवन साधुता आणि सुख गमावून पतन पावलें आहे, आमच्या प्रकृतीला
पान क्र. १७३
असाधुता आणि दुःख यांजवर विजय मिळवितां आलेला नाहीं, हें खरें असलें, तरी एवढेंच कांहीं आमचें पतन नव्हे, एवढाच कांहीं आमचा पराभव नव्हे. नैतिक बुद्धीचें समाधान नाहीं, सुखवादी बुद्धीचें समाधान नाहीं अर्थात् चांगुलपणा जगांत फार थोडा आहे, आनंदहि फार थोडा आहे, हें तर खरेंच, पण ईश्वरी मापाच्या दृष्टीनें आणखीहि दोष या विश्वांत आहेत : ज्ञान, सत्य, सौंदर्य, सामर्थ्य, ऐक्य या गोष्टी दिव्य जीवनाच्या घटकांत मोडतात, आणि या गोष्टीहि फार काटकसरीनें अगदी कद्रूपणे आम्हांला दिल्या गेल्या आहेत. ईश्वरी स्वभावांत, खऱ्या दिव्य जीवनांत या गोष्टींची उपस्थिति सामान्य प्रमाणांत नसून अगदी उच्चतम प्रमाणांत असते. ज्ञानाची व इतर उपरिनिर्दिष्ट गुणांची पराकोटी ईश्वरी प्रकृतींत अन्तर्भूत असते.
आम्हां मानवांची व आमच्या विश्वाची अदिव्यता, अपूर्णता यथार्थपणें वर्णन करावयाची, तर केवळ नैतिक दोष, दुष्टपणा आणि इन्द्रियगत दुःख यांचेंच महत्त्व या वर्णनांत असतां उपयोगी नाहीं : विश्वाच्या कोड्यांत या दोन गोष्टीइतकेंच महत्त्व इतर अनेक दोषांनाहि आहे, हें आतां स्पष्ट झालें आहे. नैतिक दोष किंवा पाप आणि दुःख ही फळें आहेत. एका सर्वसाधारण तत्त्वाची आम्हांला फार जांचणारीं फळें आहेत. तें तत्त्व म्हणजे, ''अपूर्णता'' होय. या अपूर्णतारूपी मूळ दोषाचा बारकाईनें विचार केल्यास असें दिसते कीं, जीं ईश्वरी तत्त्वें आमच्यामध्यें आहेत, तीं मर्यादांनीं संकुचित झालेलीं आहेत; ईश्वरी तत्त्वांचा हा मर्यादितपणा, त्यांचें ईश्वरीयत्व वस्तुत: नाहींसें करून टाकतो, त्यांची दिव्यता संपुष्टांत आणतो; मर्यादांनीं ईश्वरी गुणांची दिव्यता नाहींशी झाल्यानंतर त्यांच्यांत अनेक प्रकारची विकृति उत्पन्न होते; ईश्वरी गुणांचे विरोधी ''गुण'' या विकृतींतून निघतात, मूळ अस्तित्वाचें, सद्वस्तूचें जें ध्येयभूत सत्य त्यापासून दूर व त्याला खोटें पाडणारें असें असत्य आमच्या प्रकृतींत येऊन बसतें -- अपूर्णतेचा हा असा आविष्कार क्रमशः आमच्या ठिकाणीं होतो. आमच्या मनाला सद्वस्तूचें सत्य प्रत्ययाला येत नाहीं पण तें सत्य काय असावें याची कल्पना आमचे मन करूं शकतें. या कल्पनेमुळें आम्ही त्या सत्यापासून किती दूर आहोंत, या गोष्टीचा प्रत्यय आमच्या मनाला येतो. हा दूरभाव आमचें मन दोन तऱ्हांनीं स्वतःपुढें चित्रित करतें : एक, आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या वर उंच होतों आणि कांहीं कारणानें तेथून खालीं पडलों आहों असें एक चित्र
पान क्र. १७४
मन स्वतःपुढें ठेवतें; दुसरें, आमची शक्ति, शक्यता आमच्या कल्पनेला दिसणाऱ्या सत्याला आत्मसात् करण्याची आहे पण तें आम्हांला आत्मसात् करतां येत नाहीं, तें ध्येय म्हणूनच नेहमीं आमच्यासमोर आम्हांला आकर्षण करीत उभें असतें, आम्ही सत्यापासून दूर आहोंत, या वस्तुस्थितीचें चित्र आमचें मन चितारीत असतें. आमच्या अन्तरांत जो आत्मा आहे त्याला एकदां कधीं पूर्वीं व्यापक जाणीव आणि ज्ञान उपलब्ध होतें; महान् आनंद, प्रेम, सौंदर्य, सामर्थ्य, पात्रता, सुसंवाद, मांगल्य आणि साधुत्व एकदां एके काळीं त्याचे ठिकाणीं होतें. त्या सर्व गोष्टी आतां तो गमावून बसला आहे, या गोष्टी फारच अल्प प्रमाणांत आज त्याचे ठिकाणीं आहेत; महान् आत्म्याचें हें पतन, हा अधःपात आमचे ठिकाणीं झाला असला पाहिजे एक; किंवा आमच्या समोर आम्हांला स्वभावत: प्रिय, इष्ट असें दिव्य अस्तित्व आणि जीवन आहे पण आमच्या प्रकृतींत धडपड चालू असून तिला तें इष्ट जीवन साध्य होत नाहीं, आमची प्रकृति तें जीवन जगण्यास असमर्थ ठरली आहे अशी तरी वस्तुस्थिति असली पाहिजे. हा अधःपात म्हणा किंवा असमर्थता म्हणा, त्याचें मूळ बारकाईनें तपासून शोधूं लागल्यास आपल्याला असें आढळेल कीं, हें मूळ एकाच गोष्टींत, एकाच प्राथमिक वस्तुस्थितींत आहे : ईश्वरी दिव्य अस्तित्वाची मूळ एकता, अद्वितीयता, अभिन्नता, भेदशून्यता मोडली, तेथें अनेकता, फूट, भेद आला : मग हा भेद, तत्त्व म्हणून आला असो वा परिणामकारक अतात्विक घटना म्हणून आला असो, या भेदाच्या पायावर आमचें अस्तित्व, आमची जाणीव, सामर्थ्य, वस्तुविषयक अनुभव या सर्व गोष्टी उभ्या आहेत : अर्थात् आमच्या अस्तित्वाच्या, जाणिवेच्या व इतर गुणांच्या गाभ्याला भेदाचा स्पर्श नाहीं; तो फक्त त्यांच्या पृष्ठभागच्या व्यावहारिक स्वरूपाला आहे. एकतेचे तुकडे पडल्याचा अटळ असा व्यवहारांतला परिणाम असा होतो कीं, दिव्य ईश्वरी जाणीव व ज्ञान, दिव्य ईश्वरी आनंद आणि सौंदर्य, दिव्य ईश्वरी सामर्थ्य आणि पात्रता, दिव्य ईश्वरी सुसंगति आणि साधुता या सर्व गोष्टींना आमच्या ठिकाणीं मर्यादा पडतात; पूर्णता ''अपूर्ण'' होते; मर्यादित होते. या दिव्य गोष्टी आम्हांला यथार्थतेनें दिसत नाहींत -- आमच्या दृष्टीला जणों अंधत्व येतें; या गुणांचा आमचे ठिकाणीं जो उपयोग आम्ही करूं इच्छितों, तो जणु आमच्या पंगुत्वानें आम्हांला नीट करतां येणें अशक्य होतें, आम्हांला या गुणांचा जो अनुभव येतो तोहि तुकडया-
पान क्र. १७५
तुकड्यांचा येतो, त्यांतील समर्थता, तीव्रता, सत्व आमच्या अनुभवाला, मूळ स्वरूपांत न येतां, पुष्कळ कमी होऊन येतात : हें सर्व घडण्याची कारणें दोन असूं शकतात. आध्यात्मिक उच्च स्थानावरून खालीं पडल्यानें, खालीं उतरल्यानें या गोष्टी घडूं शकतात किंवा अचेतनाच्या संवेदनाशून्य स्थितींतून जाणीव नुकतीच वर आलेली असल्यानें असे अनुभव येऊं शकतात. आम्ही उंच आध्यात्मिक भूमीवर असतांना आमचे गुण ज्या तीव्रतेनें स्वभावत:च आमच्या ठिकाणीं प्रकट होतात, ते गुण त्या उत्कट स्वरूपांत आम्ही खालीं उतरल्यावर राहत नाहींत; आम्हांला जडाच्या आश्रयानें जें अस्तित्व लाभतें, त्या भौतिक अस्तित्वाच्या खालच्या दर्जाच्या धर्मांशीं जुळून दिसतील अशा प्रकारें उच्च गुणांची उच्चता आणि तीव्रता आमच्या भौतिक जीवनांत कमी केली जाते. या भौतिक अस्तित्वांतील उणीवांचा एक दुय्यम परिणाम असा होतो कीं, उच्च गुणांची विकृति होते, मर्यादित मनाला असंवेदना आणि भ्रामक संवेदना यांची बाधा होते; आमच्या प्रकृतींत सर्वत्र अज्ञान भरून राहतें. आमचें ज्ञान आणि इच्छाशक्ति अपूर्ण व त्यांत त्यांना भलतें वळण, तसेंच आमच्या संकुचित जाणीवशक्तीच्या स्वाभाविक प्रतिक्रिया व आमच्या घटकद्रव्याच्या दरिद्रतेमुळें होणाऱ्या सदोष प्रतिक्रिया या सर्व कारणांमुळें मुळांत जे दिव्य गुणधर्म होते त्यांच्या विरोधी असे अनेक गुणधर्म आमच्या ठिकाणीं उत्पन्न होतात : अक्षमता, जडता, असत्य, प्रमाद, दु:ख, संताप, अपकृत्य, वैर, दुष्टता वगैरे. आमच्यामध्यें या ज्या दुःखदायक गोष्टी उदयास येतात त्यांना दूर करावें, त्यांच्यांत काटछाट करावी, त्यांना सर्वस्वीं नष्ट करावें, अशा प्रवृत्ती आमच्या ठिकाणीं जरी प्रकट जाणिवेंत प्रकट दिसल्या, तरी खोल कोठेंतरी भेदाचें जीवन आम्हांला गोड वाटत असतें, एकतेच्या अस्तित्वाऐवजीं भेदमय अस्तित्वाचें आकर्षण आमच्या अंतरांत कोठेंतरी प्रभावी असतें आणि म्हणून वर निर्देशिलेल्या दु:खजनक गोष्टी आम्हांला कमी करतां येत नाहींत, दूर करतां येत नाहींत. जाणीवशक्ति आणि आनन्द हीं ईश्वरी सत्तेचीं आद्यतत्त्वें ईश्वरी आविष्काराच्या मुळाशीं आहेत आणि म्हणून अशी कोणतीहि गोष्ट या विश्वांत (ईश्वरी आविष्कारांत) उदयास येणार नाहीं व टिकणार नाहीं कीं, जिला आमच्या स्वभावातीत इच्छा-पुरुषाची (आत्म्याची) संमति व आमच्या कोणत्या तरी अंगाला
पान क्र. १७६
होणारें गुप्त वा विकृत, कसलें तरी टिकाऊ सुख, यांचा आधार नाहीं.
सर्व जें कांहीं प्रकट होत आहे तें, ईश्वराचें दिव्य व्यक्त स्वरूप आहे असें आम्ही जेव्हां म्हणतों, ज्याला आम्ही अदिव्य असें नांव देतों तेंहि दिव्य ईश्वरी व्यक्त स्वरूप आहे, असें जेव्हां आम्ही म्हणतों, तेव्हां त्याचा अर्थ, तत्त्वत: सर्व व्यक्त विश्वाचा गाभा दिव्य आहे असा असतो. व्यक्तांतील कांहीं गोष्टी, कांहीं व्यक्त रूपें आमच्या बुद्धीला आकलन होत नाहींत, आमच्या भावनांना धक्का देतात, 'नकोत ते प्रकार' असा तीव्र उबग आमच्या मनांत उत्पन्न करतात -- तरी त्याच्याहि पोटीं खोल, दिव्यत्व आहे, ईश्वरी तत्त्व आहे असा, ''सर्व व्यक्त विश्व ईश्वरी तत्त्वाचा आविष्कार आहे'' या आमच्या म्हणण्याचा अर्थ असतो. तीच गोष्ट दुसऱ्या एका प्रकारें मांडल्यास आमच्या बुद्धीला लवकर उमजेल व पटेल : आमचे म्हणणें असें आहे कीं, सर्व वस्तूंच्या पोटीं एक आदिम सत्य, सद्वस्तु आहे; आत्मा, ईश्वर, ब्रह्म कोणतेंहि नांव त्या वस्तूला द्या. हें आदितत्त्व नित्य, शुद्ध, पूर्ण, आनंदरूप, अनन्त असें आहे : संबंधमय वस्तूंच्या मर्यादांनीं त्या अनन्ताला मर्यादा पडत नाहींत; आमच्या पापांनीं आणि दुष्टतेनें त्याची शुद्धता व मांगल्य कलंकित होत नाहीं; आमच्या मानसिक शारीरिक दु:खांनीं त्याच्या आनंदांत कमतरता येत नाहीं; जाणीव, ज्ञान, इच्छाशक्ति, ऐक्यभाव या संबंधांत आम्हांमध्यें जे दोष आणि उणीवा आहेत, त्यांयोगें त्याच्या पूर्णतेंत कांहीं अपूर्णता येत नाहीं. उपनिषदांत असें वर्णन सांपडेल कीं, आत्मा, दिव्यपुरुष हा अग्नि आहे, सूर्य आहे -- सर्व रूपांत हा अग्नि प्रविष्ट झाला आहे, त्या त्या रूपानुरूप असें रूप त्यानें घेतलें आहे; हा सूर्य सर्व रूपांना सारखेंच तेज व प्रकाश देतो. आमच्या दृष्टींत दोष असतात ते दोष कांहीं या सूर्याला बाधा करीत नाहींत. मूळ दिव्य सद्वस्तुसंबधानें हीं जीं विधानें केलीं गेलीं आहेत, त्यांनीं आमच्यापुढील प्रश्न सुटत नाहींत : जें आदितत्त्व स्वत: सर्वदा शुद्ध, पूर्ण, आनंदरूप, अनन्त आहे त्यानें आपल्या व्यक्त स्वरूपांत अपूर्णता, संकुचितता, अशुद्धता, दु:ख, असत्य, अमांगल्य यांना सवड द्यावी, नव्हे यांना उत्तेजन द्यावें आणि संरक्षण द्यावें (कारण असा प्रकार आम्हांला भासतो) असें कां, हा आमचा प्रश्न आहे; वरील ब्रह्मविषयक औपनिषदीय वचनांत जें द्वैत (शुद्ध ब्रह्म आणि अशुद्ध विश्व) आमच्या प्रश्नांत अन्तर्भूत आहे तें स्पष्टपणें मांडलें आहे; त्या द्वैताचें स्पष्टीकरण व समाधान त्या वचनांत नाहीं.
पान क्र. १७७
अस्तित्वांत असणाऱ्या, विशुद्ध ब्रह्म आणि अशुद्ध विश्व या एकमेकींशीं न जुळणाऱ्या दोन गोष्टी, जर त्यांचें कांहीं समाधानकारक स्पष्टीकरण न शोधतां आम्हीं आमच्यासमोर राहूं दिल्या, तर असा निर्णय घेणें प्राप्त होईल कीं, या दोन गोष्टींत संगति नाहीं आणि संगति असणें शक्य नाहीं. शुद्ध तात्विक वस्तुगर्भांतील सद्वस्तु-ब्रह्म जो आनंद आम्हांला देतें, त्या आनंदाचा अनुभव अधिकाधिक खोल आणि आत्मस्पर्शी करून त्याला चिकटून राहावें आणि बाहेरचा जो विसंवादी पसारा आहे त्याच्याशीं कसें तरी जुळवून घ्यावें -- प्रयत्न मात्र असा असावा कीं, या विसंवादी पसाऱ्यांत त्याच्या अगदीं विरुद्ध स्वभावाच्या ईश्वरी दिव्य तत्त्वाचा व्यवहारनियम अमलांत शक्य तितक्या लवकर यावा. शुद्ध ब्रह्म आणि अशुद्ध विश्व यांचा समन्वय आम्हांला न साधल्यास वरीलप्रमाणें आम्हांला वागतां येईल किंवा समन्वयाच्या अभावीं द्वैताच्या प्रश्नापासून पळण्याचा, दूर जाण्याचा मार्गहि आम्हांला घेतां येईल. आम्हांला असें म्हणतां येईल कीं, अंतर्यामींची सद्वस्तु हें सत्य आहे आणि बाह्य विसंवादी पसारा सर्व असत्य आहे, मिथ्या आहे, अज्ञानाच्या गूढत्वानें उभा केलेला तो आभास आहे; या मिथ्या पसाऱ्यांतून गूढ सद्वस्तूच्या सत्यांत हें व्यक्त विश्वरूप प्रविष्ट कसें व्हावयाचें, हाच काय तो आमच्यापुढील खरा प्रश्न आहे, दोन सत्य वस्तूंचा प्रश्नच आमच्यापुढें नाहीं. द्वैताचा प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधीत न बसतां, सद्वस्तु सत्य आणि विश्व मिथ्या असें म्हणण्याचा जसा एक पंथ आमच्यापुढें आश्रयार्थ आहे, तसा बौद्ध पंथहि आहे. बौद्ध पंथ म्हणतो : द्वैताचें स्पष्टीकरण कशास हवें ? अपूर्णता ही व्यवहारांत अनुभवास येणारी गोष्ट आहे. अनित्यता ही तशीच गोष्ट आहे; आत्मा, ईश्वर, ब्रह्म हें सर्वच आमच्या जाणिवेनें उभारलेला आभास आहे. तेव्हां आम्हांला अपूर्ण, अनित्य जंजालांतून मुक्ति हवी असली, तर आमच्या कल्पनांची चिवट इमारत, आमच्या कर्माची चिवट शक्ति जी अनित्याच्या पसाऱ्यांत, प्रवाहांत नित्यतेचा, अखंडतेचा डोलारा उभा करून आम्हांला सतावते ती शक्ति आणि ती इमारत आम्ही अस्तित्वांतून दूर केली पाहिजे, तिच्यापासून आम्ही दूर झालें पाहिजे. बौद्ध पंथांत निर्वाणांत मुक्ति आहे. अर्थात् ''अहम्'' म्हणून जो चिवट कर्मकल्पनासंघ आहे, त्याच्या नाशांत मुक्ति आहे. अहम्-नाश झाला कीं विश्वाचा प्रश्न उरतच नाहीं. हा एक आपत्तींतून सुटण्याचा मार्ग आहे, पण हाच
पान क्र. १७८
एक मार्ग आहे व हाच एकटा खरा मार्ग आहे असें दिसत नाहीं. दुसऱ्या उत्तरांनींहि पूर्ण समाधान होत नाहीं. खरी गोष्ट ही आहे कीं, विसंवादी व्यक्त विश्व, केवळ बाह्य अ-तात्विक वस्तु आहे असें मानून आमच्या आंतरिक जाणिवेंतून ती दूर ठेवली, अंतरांत जी शुद्ध पूर्ण सद्वस्तु अनुभवास येते तिलाच आम्ही सर्वस्व मानून धरून राहिलों, तर व्यक्तिदृष्टीनें या निःशब्द शांत दिव्य वस्तूचा आम्हांला खोलपर्यंत सुखमय संपर्क होतो, या वस्तूच्या पवित्र अंतर्गृहांत आम्ही प्रवेश करूं शकतों, तेथील दिव्य प्रकाश आणि दिव्य सुख यांचा आम्हाला अखंड लाभ होतो. नित्य, सत्य, ब्रह्मावर ध्यानानें सर्व चित्त एकाग्र करून, बाह्य विश्वापासून सर्वथा दूर होतां येतें. त्या ब्रह्मांत विलीन होतां येतें आणि या आत्मलयाचा आश्रय करून, विश्वांतील विसंवादांचा आमच्या अंतरावरचा पगडा सर्वस्वीं दूर करतां येतो, हें खरें आहे. पण आमच्या अंतरंगांत खोल अशी एक वृत्ति आमच्या अनुभवास येते कीं, विश्वाला दूर करणारी जाणीव ही पूर्ण जाणीव नव्हे. पूर्ण जाणिवेची, सर्वांगीण जाणिवेची तीव्र इच्छा आमच्या अंतरंगांत आम्हांला प्रतीत होते; सर्वस्पर्शी सर्वात्मक पूर्ण ईश्वरत्व अनुभवावयास हवें, अशी निसर्गाला सार्वत्रिक गूढ अशी क्षुधा जणों लागलेली दिसते; अस्तित्वाची समग्र जाणीव, अस्तित्वाचा समग्र आनंद, अस्तित्वाचें समग्र सामर्थ्य अनुभवास यावें, म्हणून त्या दिशेनें धडपडण्याची प्रवृत्ति आमच्या अंतरंगांत प्रत्ययास येते. पूर्ण अस्तित्वाची ही तीव्र इच्छा, पूर्ण ज्ञानाची ही तीव्र इच्छा, थोडक्यांत पूर्णतेची तीव्र इच्छा जी आमच्या स्वभावांत खोल बसलेली आहे तिचें समाधान आतांपर्यंतच्या उत्तरांनीं पुरेसें होत नाहीं. विश्व हें ईश्वराचें दिव्य प्रकट रूप आहे, असें विश्वाचें स्पष्टीकरण जोपर्यंत आम्हांला शक्य होत नाहीं, तोपर्यंत ईश्वराची, ब्रह्माची ओळख आम्हांला पूर्णपणें झाली असें म्हणतां येत नाहीं; कारण ''विश्वहि तें ब्रह्म आहे''. आमच्या जाणिवेला आणि जाणिवगत शक्तींना हें विश्व दिव्य ईश्वर स्वरूप म्हणून जोपर्यंत भासत नाहीं आणि दिव्य ईश्वर-स्वरूप म्हणून आत्मसात् करतां येत नाहीं, तोपर्यंत ईश्वराचें पूर्णत्वानें आमच्या आत्म्याच्या ठिकाणीं ज्ञान व स्थान झालें, आम्हांला पूर्ण ईश्वर लाभला असें होणें नाहीं.
विश्वासंबंधींचा, विश्वाच्या दिव्यतेचा हा प्रश्न, विश्वव्यवहार अदिव्य दिसत असतांहि सोडविण्याचा -- किंवा सोडून देण्याचा म्हणा -- एक मार्ग आहे :
पान क्र. १७९
विश्वाच्या पोटीं ब्रह्म, दिव्य सारभूत सद्वस्तु आहे याबद्दल वाद नाहींच : प्रश्न या वस्तूच्या व्यक्त स्वरूपाचा आहे. हें व्यक्त स्वरूप दिव्य आहे असें म्हणून त्याचें समर्थन आम्हाला असें करतां येईल कीं, दिव्यतेसंबंधाची, अर्थात् पूर्णतेसंबंधाची जी मानवाची दृष्टि आहे ती चुकीची आहे, ती मानसिक, मर्यादित अतिमर्यादित मानदंड घेऊन पूर्णतेचें माप घेते, म्हणून ती दूर ठेवावयास हवी; ती दूर ठेवली किंवा निर्दोष करून घेतली, कीं विश्वांतील सर्व वस्तूंचें व व्यवहारांचें दिव्यत्व, पूर्णत्व पटावयास अडचण येणार नाहीं. वस्तुजातांतील आत्मतत्त्व निखालस पूर्ण आणि दिव्य आहे, एवढेंच नव्हे तर प्रत्येक वस्तु सापेक्ष दृष्टीनें दिव्य आणि पूर्ण आहे; प्रत्येक वस्तु स्वत: पूर्ण आणि दिव्य आहे इतकेंच नव्हे, तर अस्तित्वाच्या शक्यता ज्या तिला व्यक्त करावयाच्या आहेत त्या व्यक्त करावयाचें कामहि ती पूर्णतेनें करीत आहे; एकंदर सद्वस्तु-प्रकटनांत तिचें जें योग्य स्थान आहे तेंहि, पूर्णता व दिव्यता प्रकट होईल अशा रीतीनें तिनें घेतलें आहे. प्रत्येक वस्तु स्वत: दिव्य आहे, कारण ती ईश्वराची कल्पना आहे, ती ईश्वरनियोजित घटना आहे, ईश्वराचें ज्ञान आणि संकल्प त्या वस्तूच्या द्वारां कार्यान्वित होत आहे, प्रकट होत आहे. या विशिष्ट प्रकटनाचा जो ईश्वरी नियम आहे त्या नियमानुसार न चुकतां हें प्रकटन होत आहे. जी गोष्ट वस्तुसंबंधानें खरी आहे, ती जीवासंबंधानेंहि खरी आहे. प्रत्येक जीवाला ज्ञान, शक्ति, अस्तित्वाचें सुख (त्यांचा प्रकार व त्यांचें प्रमाण) त्या जीवाच्या प्रकृतीला योग्य तेंच लाभलेलें आहे; अनुभवांच्या क्रमवार श्रेणींत प्रत्येक जीव क्रमवार पावलें टाकीत अनुभव घेत असतो; त्याच्या अंतरींची गूढ, दिव्य इच्छाशक्ति, त्याच्या प्रकृतीचा नियम, त्याच्या आत्म्याची स्वाभाविक शक्ति आणि एकंदर आविष्काराचें गूढ प्रयोजन ही अनुभवाची श्रेणी ठरवून देत असतात; याप्रमाणें या जीवाकडून ज्या घटना घडतात त्या त्याच्या जीवनाच्या दिव्य नियमानुसार घडत असतात; अर्थात् घटना व जीवननियम यांचें नातें पूर्णतायुक्त असतें. त्या नियमांशीं सर्व घटना सुसंवादी असतात, त्या नियमांतून त्या निघत असतात. त्या नियमाचा जो हेतु त्या हेतूशीं जुळत्या अशा त्या घटना असतात -- त्या जीवाच्या अंतरंगांत ईश्वरी ज्ञान आणि संकल्प कार्यान्वित करीत असतात आणि हें त्यांचें कार्य अचूक व निर्दोष होत असल्यानें त्या जीवाचें बाह्यवर्तन आणि आन्तरिक दिव्य नियम यांचा सर्वथैव सुसंवाद असतो.
पान क्र. १८०
एकंदर विश्वसमष्टींत त्या जीवाचें स्थान निश्चित असतें, त्याच्या नियतस्थानींच तो असतो, अर्थात् समष्टीशीं असलेलें त्याचें नातें पूर्ण आणि दिव्य असतें; या नात्याच्या दृष्टीनेंहि जीव पूर्ण आणि दिव्य असतो, या समष्टीला जीवाची जरुरी असते, या समष्टीच्या व्यवहारांत जीव कांहीं विशिष्ट भाग घेतो; हा भाग, ही भूमिका जीवानें घेतल्यानें सामष्टिक सुसंवादाच्या तात्कालिक आणि भावी विकासी पूर्णतेला मदत होते; प्रत्येक जीव याप्रमाणें वागत असल्यानें समष्टीचें जें सामष्टिक प्रयोजन, त्या प्रयोजनाच्या सिद्धीला सर्व जीवांची मदत होते. याप्रमाणें विश्वव्यवहार दिव्य आणि पूर्ण आहे. आम्हांला हा व्यवहार कोठें कोठें अदिव्य भासतो, ईश्वराच्या स्वभावाशीं अमुक घटना जुळत नाहीं असें म्हणून आपण तिचा धिक्कार करतों याचें कारण, ईश्वराचा हेतू आणि प्रयोजन या विश्वव्यवहारांत कोठें काय आहे याचें पूर्ण ज्ञान आम्हांला नाहीं, हें आहे. आम्हांला सर्व विश्व, सर्व विश्वव्यवहार एकदम दिसूं शकत नाहींत -- विश्वाचे तुकडे, विश्वव्यवहाराचे तुकडे आम्हांला दिसतात, या तुकड्यांकडे पाहून जणुं कांहीं सर्व आम्हांला दिसतें अशा आविर्भावानें आम्ही त्या तुकड्यांवरून सर्व विश्वाची, सर्व विश्वव्यवहाराची किंमत करतों, त्याला बरें-वाईट ठरवितों; दुसरी गोष्ट ही कीं, आम्हांला बाह्य घटना दिसतात, त्या घटनांच्या मागें काय हेतु आहे तो दिसत नाहीं; आणि असें असूनहि आम्ही त्या घटनेला बरी-वाईट ठरवितों; अर्थात् अशा तऱ्हेनें मत बनविणें व निर्णय घेणें मुळांतच चुकीचें असतें. कोणतीहि वस्तु किंवा घटना वेगळी वेगळी पूर्ण असत नाहीं. विश्वसमष्टि ही समष्टिदृष्टीनें दिव्य सुसंवादानें परिपूर्ण आहे आणि म्हणून पूर्ण आहे; या समष्टीच्या सुसंवादाला तिच्यांतील प्रत्येक वस्तूची व घटनेची आपआपल्या परीनें मदत होत असते. समष्टीचा अंश म्हणून समष्टीच्या पूर्णतेच्या पोटीं प्रत्येक वस्तु व घटना ''पूर्ण'' असते, ती वेगवेगळी पूर्ण असत नाहीं, असूं शकत नाहीं -- वेगळी वेगळी वस्तु वा घटना हा आभास आहे, विश्वसमष्टि हेंच एक सत्य आहे, ही गोष्ट विसरतां उपयोगी नाहीं.
वरील गोष्टी आणि त्याजवरून घेतलेला निर्णय कांहीं एका मर्यादेपावेतों बरोबर आहे. तरीपण हें कांहीं आमच्या प्रश्नाला पूर्ण उत्तर नव्हे. यानें कांहीं आमचें पूर्ण समाधान होत नाहीं. यांत मानवी जाणिवेला योग्य तें महत्त्व दिलेलें नाही. ज्या मानवी दृष्टिकोनांतून
पान क्र. १८१
आम्हांला विश्वाच्या निरीक्षणाला प्रारंभ करावा लागतो त्या दृष्टिकोनाला अवश्य तें महत्त्व वरील उत्तरांत दिलेलें नाहीं. विश्वांत, विश्वव्यवहारांत सुसंवाद आहे असें वर म्हटलें आहे, पण असें म्हणणारा कोणी हा सुसंवाद आमच्या नजरेस आणून देत नाही. सुसंवाद आहे असें केवळ म्हटल्यानें आम्हांला सुसंवादाची प्रतीति होत नाहीं; अर्थात् या म्हणण्यानें आमची खात्री पटत नाही -- आमची सुसंवादाच्या अनुभूतीची मागणी पुरी होत नाहीं -- उलट विश्वांत आम्हांला जें दुष्टत्व, अमांगल्य, अपूर्णत्व तीव्रतेनें अगदीं शंभर टक्के सत्य म्हणून प्रतीत होते, त्याला असत्य ठरविण्यासाठीं बुद्धीनें उभी केलेली कोरडी भावनाशून्य कल्पना, वरील उत्तरांत आमच्या पुढें मांडली गेली आहे; दुसरी गोष्ट, आमच्या अन्तरात्म्यांत जें आत्मतत्त्व आहे, ज्याला ज्ञानाची व सत्याची भूक आहे, तीव्र आकांक्षा आहे, आत्मविजयाची -- अपूर्णता आणि दुष्टत्व यावर विजय मिळविण्याची -- प्रबळ इच्छा आणि आशा आहे, त्या आत्मतत्त्वाला वरील उत्तरांत कांहींच मार्गदर्शन घडत नाहीं. या उत्तरांत वस्तुजाताचें जें दर्शन घडविलें आहे, त्या दर्शनांत सामान्य जनांत जो एक सुलभ ''सिद्धांत'' रूढ आहे त्यापेक्षां अधिक कांहीं नाहीं. हा सिद्धान्त असा कीं, जें कांहीं आहे तें अगदीं बरोबर आहे; कारण ईश्वरानें आपल्या दिव्य प्रज्ञेनें सर्व गोष्टी निर्दोष रीतीनें निश्चित केल्या आहेत. या उत्तरांत सुखासीनतेचा बौद्धिक, तात्विक आशावाद आहे, त्या पलीकडे कांहीं नाहीं; शारीरदु:ख, मनस्ताप, विसंगति आणि वैर या गोष्टी मानवी जाणिवेला अहोरात्र सतावीत असतांना, आम्हांला नित्य बेचैन करीत असणाऱ्या या सर्वथा सत्य घटनांवर कांहींच प्रकाश या उत्तरामध्यें टाकलेला नाहीं -- एक कल्पना मात्र या उत्तरांत अशी सुचविली आहे कीं, या सर्व बेचैन करणाऱ्या घटनांचा उलगडा करणारी गुरुकिल्ली, या घटनांच्या मागें जी ईश्वरी प्रज्ञा आहे तिच्यांत आहे -- अर्थात् ही गुरुकिल्ली आमच्या हाताला लागण्यासारखी नाहीं. ही सूचना कांहीं आमच्या असंतोषाला आणि उच्च आकांक्षेला समाधान देऊं शकत नाहीं. आमच्या अस्तित्वाच्या पोटीं खोल कांहीं दिव्य सत्य, सद्वस्तु आहे, म्हणूनच आजच्या आमच्या ''अदिव्य'' स्थितींत आम्हांला असमाधान वाटत असते आणि दिव्य स्थितीकडची ओढ, आकांक्षा आम्हांला नित्य अस्वस्थ करीत असते यांत संशय नाहीं. आमचें असमाधान, आमची आकांक्षा अगदीं शुद्ध नसते, त्याजमध्यें दुसरे भावनिक हेतू मिसळलेले
पान क्र. १८२
असतात, त्यांच्या प्रतिक्रिया अविचारी असतात हें खरें; पण आमच्या अंतरंगांत खोल कांहीं तरी दिव्य आकर्षक सत्ता असल्याखेरीज अदिव्यत्वानें असमाधान आणि दिव्यत्वाची ओढ आम्हांला अनुभवास आली नसती. पूर्ण दिव्य तत्त्व जर त्याच्या अंशांच्या अपूर्णतेच्या कारणानें दिव्य असेल, तर त्याची पूर्णता केवळ अपूर्णतेंतील पूर्णता असण्याचा खूपच संभव आहे; क्रमानें सिद्ध होणारें पण सिद्ध न झालेलें असें कांहीं प्रयोजन, त्या पूर्ण होऊं घातलेल्या तत्त्वाला आहे आणि सिद्धीच्या मार्गावरील एक विशिष्ट टप्पा तें ''पूर्णतत्त्व'' पूर्णत्वानें दाखवितें, एवढाच त्याच्या पूर्णत्वाचा अर्थ असूं शकतो; तें तात्कालिक ''पूर्ण'' आहे, अंतिम ''पूर्ण तत्त्व'' नव्हे. या पूर्णाच्या दृष्टीनें दिव्य असा पुरुष पुढें केव्हांतरी दिव्य होणारा असतो, आज तो दिव्य नसतो. क्रमाक्रमानें तो दिव्य होत असतो. याप्रकारें वरील परिच्छेदांत वर्णिलेला ईश्वर, दिव्य पुरुष, अदिव्य ठरतो, अपूर्ण ठरतो; खरा ईश्वर आमच्या अंतरांत गूढ रूपानें आहे, आमच्या पातळीच्या वरच्या सर्वोच्च पातळीवर आहे असें मग ओघानेंच मानावें लागतें : हा आमच्या अंतरांत खोल लपून असलेला आणि आमच्या भूमीच्या वर उंच ठिकाणीं राहून आमच्यावर हुकमत गाजविणारा ईश्वर शोधून काढणें आणि त्याच्याशीं समरस होणें यांतच आमच्या प्रश्नाचें खरें उत्तर आहे; तो पूर्ण आहे तसें आम्ही पूर्ण होणें, त्याच्याशीं सादृश्य, साधर्म्य मिळवून मुक्तिलाभ करून घेणें यांतच आम्ही आमचा प्रश्न सोडविण्याचें कार्य होणार आहे.
मानवी जाणिवेला अपूर्णता ही विश्वांत अपरिहार्य भासत असेल, विश्व अपूर्ण आहे या प्रतीतीशीं मानवी जाणीव कायमची बांधली गेली असेल, आमच्या जीवनाचा धर्म, आमच्या अस्तित्वाची खास विशिष्टता अपूर्णता आहे ही गोष्ट मान्य करणें आम्हांला अटळ असेल, ज्याप्रमाणें पशू सामान्यत: बुद्धिशून्य अशा आपल्या स्वभावानुसार अपूर्णतेच्या नियमाला आंधळेपणानें मान्यता देतात, त्याप्रमाणें आमच्या बुद्धियुक्त स्वभावानुसार बुद्धीचा उपयोग करून अपूर्णता-नियमाला विचारयुक्त मान्यता आम्हांला द्यावयाची असेल, तर आम्हांला असें म्हणतां येईल कीं, ईश्वराच्या आत्म-आविष्काराची मानवीप्राण्यांत जी मर्यादा ठरली आहे ती मर्यादा आम्हीं गांठलेली आहे, आमचे ठिकाणीं जो ईश्वराचा स्वरूपाविष्कार आज दिसत आहे तोच त्याची मानवांतील अंतिम मर्यादा आहे; आम्ही अशीहि श्रद्धा ठेवूं शकतों कीं, आम्हांला अनेक तऱ्हेच्या अपूर्णतेपासून, दोषां-
पान क्र. १८३
पासून आणि दु:खांपासून त्रास होत असला, तरी एकंदर विश्वांत सुसंगति आणि पूर्णता नांदण्यासाठीं आमच्या दोषांचा आणि दुःखांचा उपयोग होत आहे. आम्हांला मानसिक शहाणपण बेताचेंच आहे, आमच्या प्राणिक वासना उतावळ्या, अनावर अशा आहेत, अशा स्थितींत आमच्या जीवनांत, जीवनाच्या मार्गांत जे खाचखळगे आहेत ते टाळून मार्गक्रमण करणें काहीं आम्हांला विशेष साधेल असें नाहीं; आम्हांला वेळोवेळीं खड्ड्यांत पडून दु:ख भोगणें पडेल, तथापि शक्यतोंवर आमची बुद्धि वापरून व्यवहारी शहाणपण दाखवून आम्ही खड्डे टाळण्याचा प्रयत्न करूं, ते न टळतील तेथें तत्त्वज्ञान्याची तटस्थ आणि स्वार्थनिरपेक्ष वृत्ति स्वीकारून आमचीं दु:खें आणि दोष जगाच्या सुखाला, सुसंवादाला, पूर्णतेला आवश्यक आहेत अशी आमच्या जखमांवर फुंकर घालणारी, जखमांना रामबाण मलमासारखी उपयोगी पडणारी श्रद्धा आम्ही बळकट करून ठेवूं. ही तत्त्वश्रद्धा अपुरी पडली, तर तिच्या जोडीला धर्मश्रद्धा घेऊं : ईश्वराची इच्छा असेल तसें जग व आमचें जीवन चालतें व चालणार. त्याच्या इच्छेपुढें मान वांकविणें यांतच आमचें कल्याण आहे, हें जग सुटल्यावर दुसऱ्या जगांत, स्वर्गांत आमच्या येथील दु:खांची, दोषांची भरपाई आम्हांला करून दिली जाईल, तेथें आमची प्रकृति अधिक विशुद्ध, अधिक पूर्ण असेल आणि आमचें जीवन अधिक आनंदमय असेल. तत्त्वश्रद्धा जेथें अपुरी पडेल तेथें आम्ही ही धार्मिक श्रद्धा, आत्मसात करू. या श्रद्धेंत, तत्त्वश्रद्धेंहून अधिक समाधान देण्याची शक्ति आहे; तिचा आम्ही उपयोग करूं; पण मानवांत जशी पशूपेक्षां त्याचें वैशिष्ट्य दाखविणारी श्रेष्ठ बुद्धि आहे तशी दुसरी एक, त्याच्या क्रियाशील जाणिवेचा सारभूत भाग म्हणून असणारी वस्तु आहे. पशूंत थोडी बहुत बुद्धि सांपडते म्हणून मानव हा बुद्धिगुणांत पशूहून थोर आहे एवढेंच म्हणतां येतें; पण ही दुसरी शक्ति पशूंत जवळ जवळ मुळींच सांपडत नाहीं म्हणून पशु आणि मानव यांच्यातला भेद स्पष्टपणें दाखविणारा असा हा त्याच्या (मानवाच्या) जाणिवेचा सारभूत भाग आहे; ही दुसरी शक्ति म्हणजे आत्मिक शक्ति होय. मानसिक शक्ति (बुद्धि), वर सांगितल्याप्रमाणें आमच्यांतील व आमच्या विश्वांतील ''अपूर्णता'' विवेक करून मान्य करते, उलट ही आत्मशक्ति ''अपूर्णता'' अमान्य करते. आमच्या पार्थिव जीवनाचा अपूर्णता हा अटळ नियम आहे ही गोष्ट आत्म्याला मान्य नाहीं; किंवा असें म्हणतां येईल कीं, प्रकृतीं-
पान क्र. १८४
तील अपूर्णता हा नियम आम्हांला जेवढा अटळ भासतो तेवढाच अटळ नियम ''या अपूर्णतेविषयीं आत्म्याला तीव्र असमाधान वाटणें आणि ती सर्वथा आमच्या प्रकृतींतून दूर करण्याची दृढ आकांक्षा आत्म्यानें धरणे'' हाहि आहे. प्रकृतींतून अपूर्णता दूर करावयाची ती अर्थातच स्वर्गांत दूर करावयाची असा अर्थ नाहीं -- तेथें स्वभावत: पूर्णता आम्हाला लाभते. अपूर्ण सदोष वर्तन तेथें आपोआपच अशक्य होतें -- अपूर्णता दूर करावयाची ती येथें पृथ्वीवर आणि या प्रस्तुतच्या जीवनांत दूर करावयाची, अशी आत्म्याची तीव्र आकांक्षा असते; येथें पार्थिव जीवनांत अपूर्णता दूर करावयाचें काम क्रमविकासाच्या, झगड्याच्या मार्गानेच करणें शक्य असतें, आणि हा मार्ग पत्करून झगडा करून क्रमश: पूर्णता मिळविणें ही आत्म्याची आकांक्षा असते. अपूर्णतेविषयीं तीव्र असमाधान ही दिव्य वस्तु आहे, पूर्णतेसाठीं तीव्र-आकांक्षा-प्रेरित क्रमविकासगत अंतर्गत युद्धाचा कार्यक्रम हीहि दिव्य वस्तु आहे. तेव्हां अपूर्णता आणि अपूर्णताविरोध (पूर्णताविकास) दोन्हीहि गोष्टी ईश्वरानें आमच्या प्रकृतींत ठेवल्या आहेत. आमचे ठिकाणीं एक महान् तेजोमय शक्ति आहे, या शक्तीचें अंगभूत प्रकाशमय तेज आमचे ठिकाणीं अपूर्णतेविषयीं दिव्य तिटकारा आणि पूर्णतेविषयीं सक्रिय दिव्य आकांक्षा उत्पन्न करून नित्य जागृत ठेवते ती एवढ्याकरतां कीं, आमच्यांत खोल आत्मिक गूढस्थानांत जी गुप्त सद्वस्तु ब्रह्म किंवा ईश्वर आहे ती तेथेंच गुप्त न राहतां आमच्या पार्थिव प्रकृतींत तिनें क्रमविकासाच्या मार्गानें स्वतःला पूर्णतया प्रकट करावें.
या नव्या मांडलेल्या ईश्वरी योजनेच्या प्रकाशांत विश्वव्यवहाराकडे पाहतां असें म्हणता येईल कीं, हा व्यवहार ईश्वरी प्रज्ञेच्या प्रकाशांत अगदीं निर्दोषपणें चाललेला आहे व शेवटीं ईश्वरी प्रयोजन या व्यवहारानें सिद्ध होणार आहे; आणि म्हणून पूर्वी सांगितल्याप्रमाणें आज जेथें जी वस्तु व घटना आहे ती तेथें असणेंच बरोबर आहे; मात्र प्रत्येक वस्तु व घटना योग्य ठिकाणीं आहे असें आम्ही जें म्हणतों त्याचें कारण आतांच सांगितल्याप्रमाणें पुढें जें होणार आहे, होऊं शकतें त्यावरून म्हणतो; आतांच्या वस्तुस्थितीचें समर्थन भावी गोष्टीवर, पुढें जें घडून येणार असें आम्हांला दिसतें त्यावर अवलंबून आहे. पुढें जें कांहीं व्हावयाचें आहे तें होणार नाहीं, अशी आमची भावना व कल्पना असती, तर आजच्या दुःखमय दोषमय वस्तुस्थितीचें समर्थन आम्हांला
पान क्र. १८५
करतां आलें नसतें; ही गोष्ट निःसंशय आहे कीं, व्यवहार जो दिसतो त्याचें पूर्ण समर्थन ईश्वरी योजनेंत आहे. आमच्या आजच्या बुद्धीला सामान्यत: विश्वव्यवहाराचें बाह्य स्वरूप मात्र दिसतें, त्याचा बाह्य अर्थ मात्र उमजूं शकतो; या व्यवहाराला आंतलें अंग आहे, तें सूक्ष्म आहे, खोल आहे; या व्यवहाराचा गूढ अर्थ बाह्य अर्थाहून अगदीं वेगळा आहे, आणि तोच त्याचा खरा अर्थ आहे -- आणि असें असल्यानें बाह्यविश्व-व्यवहार चालला आहे तो ठीक चालला आहे, असें त्या व्यवहाराचें समर्थन दिव्य ईश्वरी बुद्धि करूं शकते -- पण आम्हाला अप्राप्त अशा ईश्वरी बुद्धीनें केलेल्या समर्थनानें आमचें समाधान होऊं शकत नाहीं -- त्या समर्थनावर आम्ही विश्वास ठेवूं शकतो, पण या विश्वासानें आमचें समाधान होऊं शकत नाहीं. आमच्या अस्तित्वाचा धर्मच, विश्वव्यवहाराची जी आध्यात्मिक ईश्वरी गुरुकिल्ली असेल तिचा शोध करणें आणि ती मिळविणें, हा आहे. या गुरुकिल्लीच्या प्राप्तीची खरी खूण, आजच्या पातळीवरून वर चढून, आध्यात्मिक ज्ञान व सामर्थ्य मिळविणें आणि त्या योगें आमच्या जीवनाचे बाह्य आचार, त्यांचे नियम सर्व बदलून, विश्वव्यवहाराचा जो ईश्वरी हेतु आहे, जें ईश्वरी ध्येय आहे त्या हेतुनुसार, त्या ध्येयानुसार आमच्या आचारांचें आणि आचारनियमांचें स्वरूप शक्य तेवढें घडवून आणणें, ही आहे. जें चाललें आहे तें ठीक आहे, कारण आम्हांला न कळण्यासारखें कांहीं ईश्वरी प्रयोजन या सर्व व्यवहाराच्या बुडाशीं आहे असा, तत्त्वज्ञान्याला सुलभ अशा आकलनाचा आणि अपरिहार्यापुढें समाधानानें मान लवविण्याचा विचार म्हणजे कांहीं विश्वव्यवहाराची आध्यात्मिक गुरुकिल्ली सांपडल्याची खरी खूण नव्हे. दुःख आणि दोष शांतपणें ईश्वराची इच्छा म्हणून सहन करणें हें बरोबर आहे, शहाणपणाचे आहे; पण केव्हां ? आमच्या अवयवांवर, अंगांवर अपूर्णतेचा नियम बंधनकारक आहे, ईश्वरानें तो बंधनकारक केला आहे. त्याच्या इच्छेला, आजच्या या इच्छेला शिरोधार्य मानलें पाहिजे, असा सहिष्णुतेचा विचार शहाणपणाचा म्हणतां येईल -- पण केव्हां ? जेव्हां ईश्वराची दुसरी इच्छा आम्ही या इच्छेप्रमाणेंच शिरोधार्य करूं तेव्हां. दोष आणि दुःख यांतून आम्हीं पार गेलें पाहिजे; आमचे दोष दूर करून आम्हीं पूर्णता मिळविली पाहिजे; ईश्वरी प्रकृतीचा जो उच्चतर नियम आहे त्या नियमानुसार आम्हीं आपला आचार विचार उच्चतर केला पाहिजे; हीहि पण ईश्वराची
पान क्र. १८६
इच्छा आहे हें ओळखून आम्ही तदनुसार वागूं, तेव्हांच आज असलेल्या दोषमय प्रकृतीचा जाच शांतपणें तात्पुरता सहन करणें शहाणपणाचें ठरेल. आमच्या मानवी जाणिवेंत खऱ्या अस्तित्वाचा आदर्श आहे, दिव्य स्वभावाचा आदर्श आहे, देवत्वाचा, प्राथमिक देवत्वाचा आदर्श आहे -- त्या उच्च आदर्श जीवनाच्या सत्याशीं तुलना करतां, आमची आजची अपूर्णतेची दोषमय जीवनावस्था अदिव्यच म्हणावी लागते, ज्या विश्वपरिसरांत आम्ही आमचें जीवन जगण्यास आरंभ करतो तो परिसर अदिव्य आहे असेंच म्हणावें लागतें -- आज अनुभवास येणारे विश्वांतील व आमच्या जीवनांतील दोष, ईश्वरी अस्तित्वाचे आणि ईश्वरी प्रकृतीचे नियोजित आविष्कार आहेत असें मात्र नव्हे. ते ईश्वरी अस्तित्वानें आणि ईश्वरी प्रकृतीनें वापरलेले प्राथमिक बुरखे आहेत हें आम्ही लक्षांत ठेवणें अवश्य आहे. आमच्या अंतरंगांत गुप्तपणें जो ईश्वर राहत आहे त्या ईश्वरानें आमच्यांत उच्चतर जीवनाची आकांक्षा उत्पन्न केली आहे, ध्येयभूत जीवनाची प्रतिमा त्यानेंच आमच्या अंतरंगांत चितारलेली आहे व आमचा आजच्या दोषमय जीवनासंबंधांतील असंतोष त्यानेंच जागृत ठेवला आहे; ईश्वरानें घेतलेला दोषांचा बुरखा फाडून टाकून, काढून टाकून आमच्या (आम्हां पार्थिव प्राण्यांच्या) प्रकट आत्म्यांत, मनांत, प्राणिक व्यवहारांत, शरीरांत त्याला (ईश्वराला) साकार करून प्रकट करावें अशी प्रेरणा तोच ईश्वर देतो. आमची आजची प्रकृति तात्पुरत्या उपयोगाची आहे, आमची आजची अपूर्ण दोषशील अवस्था आमच्या जीवनाची प्राथमिक अवस्था आहे, ही अवस्था म्हणजे एक दिव्य संधि आहे. या अवस्थेचा, या संधीचा उपयोग करून हिच्याहून उच्चतर, विस्तारानें व्यापक आणि गुणांनीं महान्, महत्तर अशी अस्तित्वाची आणि जीवनाची अवस्था आम्हांला प्राप्त करून घ्यावयाची आहे. ती अवस्था दिव्य आणि पूर्ण असेल; केवळ आमच्या अंतरंगांत खोल लपून बसलेल्या ईश्वराच्या गुप्त सांनिध्यामुळें नव्हे, तर आमच्या प्रकट बाह्यतम जीवनाच्या स्वरूपाच्या दृष्टीनेंहि ती दिव्य आणि पूर्ण असेल. अशा भावी दिव्य आणि पूर्ण जीवनाची प्राथमिक पायरी म्हणून आजची अपूर्ण दोषमय जीवनाची ''संधि'' आम्हांला दिलेली आहे, ही विचारप्रणालीच सत्याला धरून आहे, असली पाहिजे.
विश्वांतील अस्तित्वाच्या दृश्य घटना आणि आमचा आंतरिक आत्मानुभव यांजवर वरील अन्त:स्फूर्त किंवा बुद्धिसंमत प्राथमिक विचार
पान क्र. १८७
आधारलेले आहेत; अज्ञान, अपूर्णता, दु:ख यांचें खरें मूळ आणि विश्वाच्या योजनेंत किंवा व्यवस्थेंत त्यांचें स्थान, जेव्हां आम्हांला कळेल तेव्हांच या विचारांची यथार्थता आम्हांला पूर्णतया सिद्ध करतां येईल, पूर्णतया पटेल. ईश्वर आहे अशी श्रद्धा असणाऱ्या मानवतेची सर्वसामान्य जाणीव आणि विवेक-बुद्धि ईश्वर आणि विश्व यांच्या संबंधांत तीन सिद्धांतांना मान्यता देते : या तीन पैकी एक सिद्धान्त -- विश्वाच्या विशिष्ट स्वरूपामुळें अपरिहार्य होणारा सिद्धान्त -- दुसऱ्या दोहोंशीं जुळत नाहीं, आणि या विसंगतीमुळें आमचें मानवी मन विरोधी भावनांच्या असामान्य गोंधळांत पडतें आणि संशय आणि नास्तिकता यांचा शेवटीं आश्रय करतें; अगदीं इच्छा नसतांहि शेवटीं संशयवादी आणि नास्तिक बनतें. शुद्ध, पूर्ण, आनन्दरूप सत्य सर्वव्यापी ईश्वर आहे, त्यावांचून कांहींहि अस्तित्वांत असूं शकत नाहीं, कारण जें कांहीं अस्तित्वांत असतें तें तें त्याच्या कर्तृत्वानें आणि आश्रयानें, त्याच्या अस्तित्वाच्या पोटांतच अस्तित्वांत असतें. नास्तिकवाद, भौतिकवाद आणि प्राथमिक मानवधर्मी ईश्वरवाद सोडला, तर ईश्वरविषयक विचार वरील सिद्धान्त मान्य करूनच सुरूं होतो किंवा आरंभींच हा सिद्धान्त मान्य न करतां युक्तिवादाच्या कांहीं पायऱ्यानंतर ईश्वरविषयक विचारक्रम या सिद्धांताला मान्यता देतो. कांहीं धर्मांत विश्वावेगळा ईश्वर मानला आहे असें दिसतें; ईश्वराचें अस्तित्व वेगळें, विश्वाचें वेगळें; ईश्वराच्या पोटांत विश्व नसून ईश्वराच्या बाहेर ईश्वरानें विश्व निर्माण केलें आहे असें कांहीं धर्म मानतांना दिसतात. पण या धर्माचें आध्यात्मिक तत्त्वज्ञान किंवा देवपुराण तयार केलें जातें, तेव्हां या धर्मांतहि ईश्वराचें सर्वव्यापित्व, सर्वांतर्यामित्व मान्य केलें जातें. आत्मविषयक विचार ईश्वराच्या, परमात्म्याच्या सर्वव्यापित्वाच्या सिद्धान्ताशिवाय पुरा होतच नाहीं. हा सिद्धान्त अध्यात्मांत अनिवार्यपणें येऊन बसतो. ईश्वर, परमात्मा, परात्पर सत्य कोणतेंहि नांव द्या, हें जर परम तत्त्व आहे तर तें सर्वगामी आहे, एकमेव अद्वितीय आहे, अविभाज्य आहे, त्याच्या अस्तित्वाच्या बाहेर कसलेंच कशाचेंच ''अस्तित्व'' असूं शकत नाहीं, त्याच्या खेरीज इतर कशापासून कशाचाहि जन्म होऊं शकत नाहीं; त्याचा आश्रय नाहीं असें काहींही असूं शकत नाहीं, त्याला सोडून स्वतंत्र असें अस्तित्व कशालाहि असूं शकत नाहीं, त्याच्या अस्तित्वाच्या प्राणानें प्राणयुक्त आणि त्याच्या अस्तित्वाच्या सामर्थ्यानें सामर्थ्ययुक्त न झालेलें असें कांहीं असूं शकत नाहीं --
पान क्र. १८८
जें कांहीं आहे त्या सर्वांत त्याचाच प्राण आणि सामर्थ्य भरलेलें आहे. अज्ञान, अपूर्णता, किंवा दोष, दुःख जें या विश्वांत अनुभवास येतें, त्याला ईश्वराच्या सत्तेचा आधार नाहीं, त्याचा ईश्वराशीं कांहीं संबंध नाहीं असें कोठें कोठें प्रतिपादण्यांत येत असतें; हे प्रतिपादन मान्य करावयाचें तर दोन ईश्वर मानणें भाग पडेल; आर्मझ्द (पुण्यमय ईश्वर) आणि अह् रिमन (पापमय ईश्वर), सत्प्रेरणा देणारा ईश्वर आणि असत् प्रेरणा देणारा ईश्वर, असे दोन ईश्वर एका पंथांत (पारशी धर्मपंथांत) मानले आहेत; ख्रिस्तशकारंभकाळीं ग्नॉस्टिक (ज्ञानवादी : श्रद्धेनें मोक्ष नाहीं, ज्ञानानें मोक्ष असें मानणारे) विश्वातीत, पूर्ण, विश्वांतर्यामी ईश्वर आणि विश्वनिर्माता अपूर्ण ईश्वर असे दोन ईश्वर मानीत; दिव्य ईश्वर आणि अदिव्य असा ईश्वराहून वेगळा निसर्ग, अशाहि दोन विभूती मानून विश्वांतील दुःख, दोष, अज्ञान, यांचा ईश्वराशीं संबंध नाहीं असा पक्ष घेतां येईल. हे पक्ष शक्य आहेत, पण आमची श्रेष्ठांत श्रेष्ठ विवेकबुद्धि हे पक्ष असंभवनीय मानते. दोन ईश्वरांचीं वगैरे जी कल्पना आहे ती असंभवनीय नसली, तर निदान गौण तरी खास आहे. विश्वाचें मूळ सत्य, विश्वाचें पूर्ण सत्य दोन ईश्वर वगैरे कांहीं असूं शकत नाहीं; तसेंच सर्वात राहणारा एकच एक आत्मा आणि सर्वांची निर्मिति करणारी शक्ति एकमेकांपासून भिन्न आहेत, त्यांचें स्वरूप अन्योन्यविरोधी आहे, त्यांची वेगळी वेगळी इच्छा आहे, वेगळें वेगळें प्रयोजन आहे -- या गोष्टीहि आम्ही मान्य करूं शकत नाहीं. एकच एक विशुद्ध, सर्वनिरपेक्ष, पूर्ण ईश्वरी अस्तित्व (सद् वस्तू) सर्व वस्तूंच्या ठिकाणीं आहे, सर्व जीवांमध्यें आहे; सर्व वस्तु आणि जीव हेंहि या सद्वस्तूच्या पोटांत आहेत, या सद्वस्तूच्या इच्छेनें आणि आश्रयानें अस्तित्वांत आहेत, या सर्वांतर्यामी, सर्वाधार सद्वस्तूच्या अस्तित्वाशिवाय कांहींहि अस्तित्वांत असूं शकत नाहीं, कांहींहि घडूं शकत नाहीं -- हें सर्वोच्च सत्य आहे अशी आमच्या बुद्धीची ग्वाही आहे, आमच्या अन्त:स्फूर्त जाणिवेची अनुभूति आहे, आमच्या आध्यात्मिक अनुभवाची साक्ष आहे.
वरील प्रकारचा ईश्वर आहे असें गृहीत धरल्यावर आमची बुद्धि त्यावरून स्वभावत: असा सिद्धान्त करते कीं, या सर्वव्यापी ईश्वरानें आपल्या सर्वोच्च जाणिवेचा, सर्वोच्च शक्तीचा, परिपूर्ण सर्वविषयक ज्ञानाचा आणि दिव्य प्रज्ञेचा उपयोग करून विश्वांतील सर्व व्यवहार, त्यांचे पायाभूत अन्योन्य संबंध आणि त्यांच्या प्रक्रिया व्यवस्थेनें ठरविल्या
पान क्र. १८९
आहेत आणि आपल्या शासनाखालीं चालविल्या आहेत. आतां विश्वांतील व्यवहार पहावे, तर त्यांची आमच्या अनुभवास येणारी प्रक्रिया, त्यांचे आमच्या अनुभवास येणारे संबंध हे दोषमय, संकुचित, कडक मर्यादांनीं जखडलेले असे आहेत; येथें एक प्रकारची विसंगति, विकृति, दिव्य ईश्वरी सत्तेची आमची कल्पना खोटी ठरविणारी परिस्थिति आहे; ईश्वर नाहींच असें प्रबळपणें भासविणारीं दृश्यें, निदान ईश्वराच्या सत्तेला ओंगळ स्वरूप देणारीं किंवा अदिव्य आवरणानें दृष्टीआड करणारीं दृश्यें येथें आहेत. विश्वांतील व्यवहाराचें हें स्वरूप पाहून तिसरा सिद्धान्त आमची बुद्धि असा करते कीं, ईश्वरी मूळ सत्य आणि विश्वरूपी सत्य या दोन सत्यांत तत्त्वत: भेद आहे, निदान त्यांच्या दर्जांत भेद आहे; आणि हा भेद इतका मोठा आहे कीं, विश्वांतील ईश्वर हवा असेल तर विश्वाचा त्याग केला पाहिजे : विश्वाचा तो शास्ता आहे, विश्व त्यानेंच निर्मिलें आहे किंवा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या पोटीं अव्यक्ताचें व्यक्त केलें आहे, आणि तो येथे नित्य वस्तीला आहे, पण तो हवा असेल तर त्याचें हें विश्व आम्हीं सोडावयास हवें, इतका त्याच्यांत आणि त्याच्या विश्वांत तत्त्वाचा किंवा दर्जाचा भेद आहे; असे हे तीन सिद्धान्त आहेत. पहिला सिद्धान्त अटळ आहे, दुसराहि अटळ आहे; जर सर्वव्यापी ईश्वर, विश्वांत राहणारा ईश्वर विश्वाच्या आविष्काराशीं, बांधणीशीं, रक्षणाशीं, शासनाशीं कांहीं संबंध ठेवीत असेल तर दुसरा सिद्धान्तहि अटळ आहे -- आणि तिसरा तर स्वयंसिद्ध भासतो पण तो दुसऱ्या दोहोशीं न जुळणारा आहे; आणि ही विसंगति आमच्या पुढें असा प्रश्न उपस्थित करते कीं ज्याचें समाधानकारक उत्तर मिळणार नाहीं असें वाटतें, ज्याला समाधानकारक उत्तर असणें शक्य नाहीं असें दिसतें.
ही विसंगतीची अडचण दूर करण्याचा मार्ग सांपडणार नाहीं असें नाहीं. तत्त्वज्ञानी युक्तिवाद किंवा देववादी युक्तिवाद असा उभा करतां येईल कीं, ज्यायोगें वरील विसंगतीचा प्रश्न दूर होईल. एपिक्युरस मानीत होता तशा देवासारखा, कांहीं न करणारा, स्वत: आनंदमग्न असणारा ईश्वर मानतां येईल : प्रकृतीचा यांत्रिक नियम, विश्व बरें वाईट चालवीत आहे आणि निजानंदमग्न ईश्वर त्याजकडे तटस्थतेनें बघत आहे, असें मानतां येईल. विश्वामध्यें साक्षी आत्मा आहे, शांत आत्मा आहे, शांत पुरुष आहे. प्रकृति काय करील तें तिला हा
पान क्र. १९०
पुरुष करूं देतो, आणि ती जें काय करील, जी व्यवस्था, अव्यवस्था करील ती आपल्या निष्क्रिय निर्मळ जाणिवेंत प्रतिबिंब रूपानें घेऊन त्या प्रतिबिंबाकडे शांतपणें बघण्यांत कृतार्थता मानतो, अशी कल्पना करतां येईल. परमात्मा, पुरुषोत्तम हा स्वयंपूर्ण, शांत, अक्रिय, संबंधशून्य असा आहे, त्याच्यापासून किंवा त्याला आधारुन विश्व किंवा विश्वभ्रम अतर्क्य रीतीनें उत्पन्न झाला आहे -- या विश्वांतील किंवा विश्वभ्रमांतील व्यवहाराशीं परमात्म्याला कांहीं कर्तव्य नाहीं, कालग्रस्त जीवांना मोह पाडणें आणि दुःख देणें हेंच या विश्वाचें किंवा विश्वभ्रमाचें कार्य आहे, अशीहि कल्पना करतां येईल. या सर्व कल्पनांत विश्वासंबंधींचा आमचा अनुभव आणि ईश्वरासंबंधींची आमची भावना व आध्यात्मिक अनुभूति यांच्यामधील विसंवाद प्रतिबिंबित झालेला आहे. आमच्या अनुभवांचा समन्वय यांत नाहीं, त्यांचें स्पष्टीकरण यांत नाहीं; प्रकट किंवा अप्रकट द्वैत उभें करून, जें मूळ तत्त्व अविभाज्य आहे, त्याचें मुळांतच विभाजन करून, आमच्या अनुभवाला येणारी विसंगति मान्य केली आहे, वेगळ्या शब्दांत आमच्यापुढें ठेवली आहे. व्यवहारत: दोन ''ईश्वर'' या कल्पनांत मानले आहेत. आत्मा किंवा पुरुष आणि प्रकृति असें ''ईश्वराचें'' द्वैत या कल्पनांत आहे. पण वस्तुजातांतील शक्ति (प्रकृति) ही आत्म्याचीच, पुरुषाचीच शक्ति असली पाहिजे -- ती कांहीं स्वतंत्र वस्तु नाहीं. अर्थात् ती जें कांहीं करील त्याला आत्म्याची संमति असली पाहिजे, तिच्या खटपटीवर आत्म्याच्या संमतीचा किंवा निषेधाचा (असंमतीचा) परिणाम होत असला पाहिजे. प्रकृतीचा कारभार म्हणजे जड शक्तीचा पुरुषाच्या जडवत् तटस्थतेवर होत रहाणारा अत्याचार होय, अशी कांहीं प्रकृतीच्या कारभाराची कल्पना करतां येत नाहीं. असो. अक्रिय साक्षी आत्मा आणि क्रियाशील निर्माणकर्ता ईश्वर अशा जोडीचीहि कल्पना करतां येईल. पण ही कल्पनाहि आपल्या उपयोगी पडणार नाहीं; कारण निर्माता ईश्वर हा क्रियाशील एकाच साक्षी आत्म्याचा क्रियाशील अंश आहे किंवा साक्षी आत्मा हा एकाच ईश्वराचा अक्रिय अंश आहे असा या जोडीचा शेवटीं अर्थ होतो. या कल्पनेंत क्रियाशील पुरुष आणि ज्ञानशील द्रष्टा पुरुष या एकाच आत्म्याच्या दोन अंगांत विरोध प्रतिपादला असून, या विरोधाचा परिहार तींत नाहीं, जणुं हा विरोध अटळ आहे असें मत या कल्पनेंत अन्तर्भूत आहे. यानंतर अशीहि कल्पना करतां येते कीं, मूळ सद्वस्तु जें ब्रह्म, त्या ब्रह्माला दोन प्रकारची
पान क्र. १९१
जाणीव आहे किंवा त्याला दोन स्वतंत्र जाणिवा आहेत. एक स्थितिशील आणि दुसरी क्रियाशील. स्थितिशील जाणीव ही सारभूत आत्मिक जाणीव आहे. या जाणिवेचा आत्मा (ब्रह्म) पूर्ण आणि सर्वनिरपेक्ष आहे; दुसरी जाणीव रूपनिष्ठ, व्यावहारिक; या जाणिवेच्या आश्रयानें ब्रह्म अनात्म वस्तू होतें, विश्व होतें. सर्वनिरपेक्षत्व आणि पूर्णत्व यांशीं या जाणिवेचा कांहीं संबंध नसतो. मूळ पूर्ण ब्रह्म हें कालातीत सत्य असतें आणि अनात्मत्व धारण करणारें ब्रह्म हें कालग्रस्त असतें; कालातीत ब्रह्माच्या पोटीं कालनिष्ठ ब्रह्माची उभारणी होते. कालग्रस्त अनात्मरूप ब्रह्माशीं पूर्णत्वाचा (पूर्ण ब्रह्माचा) कांहींच संबंध येत नाहीं. ही कल्पना बुद्धीला नसत्या गोंधळांत टाकणारी आहे; कारण कालाश्रयी (कालग्रस्त, कालनिष्ठ) जाणीव आणि तिच्या रचना, शेवटीं एका आत्म्याच्या, ब्रह्माच्या शक्तीच आहेत, त्या एकच एक ब्रह्मावर अवलंबून आहेत, त्याच्या आश्रयानेंच अस्तित्वांत येऊं शकतात आणि राहूं शकतात; ब्रह्माच्या सामर्थ्याच्या आश्रयानेंच जें मूळ सत्य अस्तित्वांत येतें आणि अस्तित्वांत राहतें त्याचा त्या ब्रह्मांशीं (पूर्ण सर्वनिरपेक्ष - ब्रह्माशीं) कांहीं संबंध नसणें अशक्य आहे; तसेंच स्वत:च्या शक्तिप्रभावानें बनलेल्या विश्वाशीं या ब्रह्माचा (पूर्ण ब्रह्माचा) संबंध नसणेंहि अशक्य आहे. आम्ही केवळ विश्वगत अर्ध-अस्तित्व व अर्ध-जाणिव भोगतो. परंतु आम्ही विश्वांत म्हणजे पूर्ण-ब्रह्माच्या जीवनरूप अर्धस्वप्नांत राहतों, आणि निसर्गानें आम्हाला या स्वप्नांत न टाळतां येणारें नित्याचें भयंकर कर्तव्य-भोक्तव्य दिलेलें आहे व या स्वप्नाला पूर्ण सत्य मानूनच आम्हांला आमचा व्यवहार करावा लागतो; असें असल्यानें दोन स्वतंत्र जाणिवांचें ब्रह्म वगैरे जी कल्पना आम्हापुढें मांडण्यांत येते तिचें नुसतें गूढ स्वरूप उकलून पाहणें आम्हाला भाग पडते. तें उकललें म्हणजे पूर्ण विश्वनिरपेक्ष ब्रह्माचा आणि विश्वाचा अन्योन्य संबंध निश्चित आहे असें वर सांगितल्याप्रमाणें स्पष्ट होतें. असो. विश्व हें सर्वश्रेष्ठ आत्म्याच्या अंगभूत शक्तीनें अस्तित्वांत येतें असें ठरल्यावर त्याची व्यवस्था, त्यांतील संबंध त्या शक्तीचाच कारभार असला पाहिजे हें उघड ठरतें; मूळ आत्म्याची जाणीव व अस्तित्व यांचा कोठला तरी नियम, विश्वाला त्याचे नियम घालून देत असला पाहिजे हेंहि ठरतें. ब्रह्माच्या अस्तित्वांत जी विश्व-जाणीव असते, त्या जाणिवेची जाणीव ब्रह्माला असली पाहिजे, एवढेंच नव्हे, तर विश्वजाणिवेच्या पोटींहि ब्रह्म
पान क्र. १९२
जाणिवेनें असलें पाहिजे. ब्रह्माची शक्ति, कोठली तरी शक्ति विश्वांतील घटना व व्यवहार नित्य ठरवीत असली पाहिजे, निदान संमत करीत असली पाहिजे; प्रकृति, निसर्ग असें कांहीं स्वतंत्र तत्त्व, मूळ शाश्वत ब्रह्मापासून न निघालेले विश्वव्यवहार चालवीत आहे अशी वस्तुस्थिति असणें शक्य नाहीं, कारण अशा स्वतंत्र तत्त्वाचें अस्तित्व एकमेवाद्वितीय ब्रह्मावेगळें संभवत नाहीं. जाणीवयुक्त असें ब्रह्म सर्वगामी आहे, एवढी गोष्टच विश्व उभें करण्यास समर्थ आहे, विश्वाचे व्यवहार निश्चित करण्यास समर्थ आहे; आणि ब्रह्माची विश्वनिर्मिति-समर्थ, विश्वसंचालन-समर्थ जाणीव आपलें सामर्थ्य कार्यान्वित करीत असली पाहिजे. विश्वाच्या कारभाराची धडपड अनंत ब्रह्मांत आहे, त्याप्रमाणें त्या धडपडीच्या व तत्संबंधी जाणिवेच्या पाठीमागें शांत, निःशब्द, स्थितिशील अवस्था पण ब्रह्मजाणिवेंत आहे असा आध्यात्मिक अनुभव आहे -- विश्वाचा, सृष्टीचा स्थितिशील अचल द्रष्टा असें या शांत जाणिवेचें स्वरूप असतें; पण आध्यात्मिक अनुभव शांत ब्रह्माच्या अनुभवांत सर्व येऊन जातो असें नाहीं. ज्ञानाची ती एक बाजू आहे, पण ज्ञानाच्या एका अंगाच्या आश्रयानें विश्वाचें मूलभूत सर्वस्पर्शी स्पष्टीकरण मिळणें शक्य नाहीं.
विश्वाचें शासन ईश्वर करीत आहे ही गोष्ट मान्य केल्यावर शासनाची ईश्वरी सत्ता पूर्ण आहे, अनियंत्रित आहे, सर्वंकष आहे हेंहि मान्य करणें आवश्यक आहे. हें मान्य न केलें तर अनन्त आणि अनियंत्रित अस्तित्व आणि जाणीव ज्याचें ठिकाणीं आहे, त्याला वस्तुजाताच्या नियंत्रणाच्या बाबतींत मर्यादित ज्ञान, मर्यादित इच्छा आहे, असें मानावें लागेल किंवा त्याचें ज्ञान व त्याची इच्छा पुरी करतांना त्याचें कार्य कोणाकडून तरी अडविलें जात आहे, त्यांच्या कार्यांत कोठून तरी विघ्न येत आहे, असें मानावें लागेल. अशी एक कल्पना मान्य करतां येईल कीं, ईश्वर हा सर्वांतर्यामी, सर्वश्रेष्ठ, सर्वसत्ताधारी असला, तरी त्याच्या पूर्ण स्वरूपाच्या कक्षेंत कोणी एक शक्ति, स्वत: अपूर्ण आणि अपूर्णता निर्माण करणारी अशी उदयास आली आहे व ईश्वर या शक्तीकडे तिला पटेल त्याप्रकारें करण्याकरतां कांहीं काम सोंपवीत आहे, तिला मर्यादित कर्मस्वातंत्र्य बहाल करीत आहे; स्वत: अपूर्ण आणि अपूर्णता निर्माण करणारी अशी एक शक्ति, निसर्ग, अचेतन निसर्ग, अज्ञानग्रस्त निसर्ग ही आहे; क्रियाशील मानवी मन, मानवी इच्छा ही दुसरी अपूर्ण शक्ति आहे; पायाभूत अचेतनतेच्या आधारानें वावरणारी, जाणीवपूर्वक दुष्ट
पान क्र. १९३
तामसी कार्य करणारी, अनेक प्रकारची तमोमय अमंगल शक्ति ही तिसरी अपूर्ण आणि अपूर्णता निर्माण करणारी शक्ति ईश्वराच्या पूर्ण स्वरूपाच्या कक्षेंत निर्माण झाली आहे -- या सर्व अपूर्ण शक्तींकडे कांहीं काम ईश्वरानें सोंपविलें आहे व तें काम त्यांनीं त्यांना पटेल त्या रीतीनें करावें असें कांहीं कर्मस्वातंत्र्य त्यांना ईश्वरानें दिलेलें आहे. या कल्पनेचा आतां आपण विचार करूं. हा विचार करतांना प्रथम ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे कीं, या ज्या अपूर्ण शक्ती वर सांगितल्या, त्या ईश्वराच्या अस्तित्वावर, स्वभावावर, जाणिवेवर अवलंबून आहेत, स्वतंत्र नाहींत आणि या ईश्वराच्या उपस्थितींत व त्याच्या संमतीनें त्या काम करूं शकतात, स्वतंत्रपणें काम करूं शकत नाहींत. मानवाचें स्वातंत्र्य निरपेक्ष नाहीं, सापेक्ष मर्यादित आहे; त्याच्या स्वभावांतील अपूर्णतेबद्दल, दोषांबद्दल तो स्वतःच केवळ जबाबदार आहे असें म्हणतां येणार नाहीं. निसर्गांत अचेतनता आहे, अज्ञान आहे पण ही अचेतनता, हें अज्ञान कांहीं स्वयभू नाहीं, तर तें स्वयंभू, एकमेव ईश्वराच्या पोटीं उदयास आलेलें आहे; अर्थात् निसर्गाची, प्रकृतीची कामगिरी जर दोषपूर्ण असेल, तर त्या दोषाचा वांटा सर्वांतर्यामी ईश्वराच्या इच्छाशक्तीकडे अवश्यमेव येतो हें निश्चित : ही इच्छाशक्ति दोषापासून अजीबात सुटते असें होऊं शकत नाहीं. हें मान्य करतां येईल कीं, एकदां एखाद्या शक्तीला चालना दिली कीं त्या शक्तीचा जो गतिनियम असेल, त्या नियमानुसार तिला आपलें कार्य पूर्ण करण्यास मुभा द्यावी लागते; पण ही शक्ति सर्वज्ञ, सर्वसमर्थ ईश्वरानें आपल्या सर्वव्यापी अस्तित्वाच्या पोटीं उदयाला येऊं दिली, कामावर येऊं दिली, तेव्हां ती जें काय करील तें ईश्वरानें करण्याचें ठरविलें होतें व केलें असेंच आम्हांला मानावें लागतें; कारण या ईश्वराच्या आज्ञेशिवाय ही शक्ति आणि तिचें कार्य उदयास आलेंच नसतें, अस्तित्वांत टिकून राहिलेंच नसतें हें उघड आहे. ईश्वरानें हें विश्व व्यक्तांत आणलें आहे, अर्थात् अशा या विश्वाशीं त्याचा कांहीं संबंध असेल, तर तो विश्वाचा स्वामी हाच संबंध आहे; या विश्वाचें स्वामित्व इतर कोणाकडे जाऊंच शकत नाहीं. तो स्वयंभू सर्वगामी ईश्वर विश्वाचें स्वामित्व टाळूं शकत नाहीं, तें त्याजकडे अनिवार्यपणें येतें; तेव्हां विश्वांत अपूर्णता आहे, दोषमयता आहे, दुःख आहे, अनिष्ट आहे या वस्तुस्थितीचा विचार करतांना व तिचें कारण शोधतांना ईश्वराचें विश्वस्वामित्व आणि या स्वामित्वांत अन्तर्भूत होणारीं सत्ये आम्हीं
पान क्र. १९४
दृष्टिआड न करतां या सत्यांच्या पायावरच आमच्या विचाराची उभारणी आम्हीं करावयास हवी. विश्वांतील वस्तुस्थितीचा व तिच्या कारणांचा विचार करतांना प्रथम ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे, आपल्याला पटली पाहिजे कीं, विश्वांत अज्ञान आहे, प्रमादांचें राज्य आहे, मर्यादितता संकुचितता आहे, दु:ख आहे, भेदाभेद आणि वैमनस्यें आहेत एवढयावरूनच विश्वांत ईश्वर नाहीं, ईश्वरी ज्ञान, सामर्थ्य, ईश्वरी जाणीव, संकल्प, आनंद विश्वांत नाहीं असा जो आपण घाईघाईनें सिद्धान्त करतो तो अविचाराचा आहे : विश्वाच्या कारभाराचा सामग्ऱ्यानें विचार केला म्हणजे या समग्र दर्शनांत अज्ञान, प्रमाद आदि गोष्टींना जें स्थान आणि महत्त्व आहे तें आपल्या स्पष्टपणें निदर्शनास येतें आणि मग असा अविचाराचा सिद्धान्त आपण करीत नाहीं. कोणत्याहि पूर्ण वस्तूचा एखादा तुकडा आपण वेगळा काढून त्याचेकडे पाहूं लागलों, तर तो दोषमय, विद्रूप, अनाकलनीय असा दिसेलहि -- पण तोच वस्तूंत, जेथें आहे तेथेंच, पाहिला तर त्या वस्तूच्या सुसंबद्ध रचनेचा तो एक आवश्यक भाग आहे असें आपल्या नजरेस येईल; तो जेथें आहे तेथें त्याला कांहीं अर्थ आहे, उपयुक्ततेच्या दृष्टीनें कांहीं महत्त्व आहे असें आपल्याला कळेल. हीच विचारसरणी ईश्वरी विश्ववस्तूला लागूं पडते. ईश्वरी विश्वगत व विश्वातीत अस्तित्व जे अनंत अमर्यादित आहे, त्या अमर्यादित अस्तित्वाच्या पोटांत जिकडे तिकडे मर्यादित अस्तित्व आपल्या नजरेस येतें. आमचेंच अस्तित्व घेतलें, तर त्याचा आरंभ मर्यादित अस्तित्व हाच असतो. आमचा संकुचित अहम् आणि त्याच्या स्व-केंद्रित धडपडी आमच्या मर्यादित अस्तित्वाचा पुरावाच आहेत. पण आम्हांला आमच्या आत्म्याचें सामग्ऱ्यानें ज्ञान झालें म्हणजे आमच्या अस्तित्वाला मर्यादा नाहींत, आम्हीहि अनंत आहोंत हें आम्हांला दिसतें. आमचा 'मी' हा विश्वपुरुषाचा एक अंश आहे, एक अंग आहे, त्याला स्वतंत्र अस्तित्व नाहीं; आमची दर्शनी विभक्त व्यक्तिता ही वरवरची पृष्टभागावरची हालचाल आहे. तिच्या पाठीमागें आमची खरी व्यक्तिता आहे; ही खरी व्यक्ति चहूं बाजूंनीं व्यापक, सर्व वस्तूंशीं एकता धारण करणारी, त्याचप्रमाणें वरतीं, उच्च पातळी चढून सर्वातीत दिव्य अनन्ताशीं एकता साधणारी अशी आहे. तेव्हां आमचा 'मी' अस्तित्वाला मर्यादित करणारा असा जो दिसतो, तो वस्तुतः अनन्ताची
पान क्र. १९५
एक शक्ति आहे. विश्वांत वस्तूंचा व जीवांचा अमर्याद बाजार आहे, ही अमर्याद अनेकता मूळ अमर्याद अनंततेचा पुरावा आहे, त्या अनन्ततेचाच परिणाम आहे; मूळ वस्तु मर्यादित आहे असें कांहीं विश्वांतील अमर्याद अनेकता सिद्ध करीत नाहीं; मूळ मर्यादित वस्तूपासून अमर्याद अनेकता निघाली नसती. विश्वांतील दर्शनी विभक्तता वास्तव विभक्तता होऊं शकत नाहीं; या दर्शनी विभक्तपणाला अविभाज्य एकतेचा आधार आहे. विभक्तपणा जो दिसतो तो या एकतेमुळें सहजच खोटा ठरतो; मूळ अविभाज्य एकता कोणत्याहि विभक्तीकरणाच्या व्यापारानें विभक्त होऊं शकत नाहीं. विश्वांत 'मी' आहेत, दर्शनी विभक्तता आहे. त्यांचा दर्शनी स्वतंत्र कारभार आहे, तरीपण त्यावरून एकता आणि अविभाज्यता हा जो ईश्वरी अस्तित्वाचा स्वभावधर्म तो असिद्ध होत नाहीं; ईश्वरी अनंत एकतेची एक शक्तिप्रक्रिया म्हणजे विश्वांतील अनंत अनेकता आहे आणि या अनंत अनेकतेचे दर्शनी वरच्या थरांतले परिणाम 'मी', 'विभक्तता' आणि त्यांचे विभक्त व्यापार हे होत.
तेव्हां ईश्वराच्या अस्तित्वाचे, सत्ताद्रव्याचे तुकडे वास्तवांत कोठें पडलेले नाहींत; सर्वगामी ईश्वरी अस्तित्वाच्या सत्याला मूलत: विरोध करणारें असें कांहीं विश्वांत नाहीं. तथापि ईश्वरी जाणिवेला मात्र वास्तव मर्यादा पडलेल्या आहेत असें दिसतें; आत्म्याचें अज्ञान, आंतरिक ईश्वरत्वाला झांकणारा पडदा या वस्तू मात्र विश्वांत दिसतात. विश्वांत जी अपूर्णता, जी दोषमयता दिसते ती या पडद्याचा, अज्ञानाचा परिणाम म्हणून अस्तित्वांत येते. आमची जी वरवरची अहंची जाणीव आहे, त्या जाणिवेशी शरीरतः, प्राणतः आणि मनानें आम्ही एकरूप होऊन राहतों; हा अहम् म्हणजेच आम्ही, आमचा आत्मा, असा आमचा प्राथमिक अनुभव असतो; हा अनुभव आमच्या कणाकणांत नित्य भरून राहिलेला असतो -- अर्थात् या आमच्या एकांगीं एकरूपतेनें मूळ सत्यापासून, अविभाज्य एकतेपासून आम्ही वस्तुत: दूर जातो असें होत नाहीं -- तथापि व्यवहारांत हें आमचें एकांगीं तादात्म्य आमच्यावर विभक्तता लादतें आणि अर्थात् या विभक्ततेचे अनिष्ट असे व्यावहारिक परिणामहि आम्हांला भोगावे लागतात. पण येथेंहि एक गोष्ट आमच्या शोधक बुद्धीला समजून येते ती ही कीं, ईश्वराच्या कारभाराच्या दृष्टीनें विश्वांत 'अज्ञान' म्हणून ज्याला आम्ही नांव देतों तें खरें अज्ञान नसून ईश्वरी ज्ञानाची ती एक प्रक्रिया आहे -- आमच्या
पान क्र. १९६
वरवरच्या बहिर्मुख मर्यादित दृष्टीला ''अज्ञानाचें'' कांहींहि अनुभव येवोत, ''अज्ञानाच्या'' कसल्याहि प्रतिक्रिया घडोत, वस्तुत: ''अज्ञान'' ही ईश्वरी ज्ञानाची एक प्रक्रिया असते, ही गोष्ट आमच्या शोधक बुद्धीला कळूं शकते. अविभाज्य सर्वज्ञान पाठीमागें आणि अज्ञान पुढें, ही त्याची दृश्य, वरवरची क्रिया; अशी ही व्यवस्था असते. एका विशिष्ट क्षेत्राला बांधून घेणारी सर्वज्ञता म्हणजे अज्ञान; कांहीं विशिष्ट मर्यादांच्या आंत कांहीं विशिष्ट ज्ञानक्रिया करणारी सर्वज्ञता म्हणजे अज्ञान; सर्वज्ञता ही अज्ञानरूपी ज्ञानक्रिया करतांना त्या प्रक्रियेंत वापरलेल्या ज्ञानाखेरीज करून बाकीचें आपलें ज्ञान, पाठीमागें आपल्याजवळ कार्याची वाट पाहणारा गुप्त संचय म्हणून संभाळून ठेवते. निसर्गांत आमच्या जीवनाचा जो विकास व्हावयाचा असतो त्या विकासाच्या कार्यासाठीं ही सर्वज्ञता हा गुप्त ज्ञानाचा आणि शक्तीचा सांठा वापरीत असते. पुढें केलेलें ''अज्ञान'' त्याच्यांतील उणीवांमुळें दुर्बल असतें; या उणीवा भरून काढणें, अज्ञान अडखळेल तेथें त्याला मदत देणें व मार्गीं लावणें, हें काम सर्वज्ञता आपल्या गुप्त ज्ञानशक्ति-संचयाच्या द्वारां गुप्तपणें करीत असते; अज्ञानाच्या अडखळण्यामुळें, सर्वज्ञतेंत पूर्वीं योजून ठेवलेला परिणाम न घडून येतां दुसरेंच कांहीं घडण्याचा जो संभव असतो तो अज्ञानाला विघ्नप्रसंगीं हात देऊन सर्वज्ञता दूर करते; जीवाचा अज्ञानक्षेत्रांत विकास व्हावयाचा असतो, या विकासाला उपयुक्त असा धडा अनुभवांतून घेण्याच्या क्रियेंत सर्वज्ञता त्याला गुप्तपणें मदत करते; जीवाची जी व्यक्तिता अनुभवासाठीं निसर्गांत हालचाल करीत असते, त्या व्यक्तीला दुःखाचे, प्रमादाचे जे अनुभव मिळतात त्यांतूनहि स्वतःच्या विकासाला उपयुक्त अशी सामग्री वापरण्यास व निरुपयोगी झालेली सामग्री दूर ठेवण्यास, जीवाला गुप्त सर्वज्ञताच शिकवीत असते. विशिष्ट मर्यादित क्रियेसाठीं सर्वज्ञता आपल्या ज्ञानशक्तीचें एकाग्रतेनें केंद्रीकरण करते. हें एकाग्रतेचें केंद्रीकरण म्हणजेच दर्शनी अज्ञानशक्ति होय : आमच्या मानसिक व्यक्तींत विशिष्ट कार्यांत सर्व लक्ष केंद्रित करण्याची शक्ति आहे; याप्रकारें विशिष्ट कार्यांत विशिष्ट हेतूसाठीं आम्ही गढून गेलों म्हणजे आम्ही या कार्याला, या हेतूला आवश्यक तेवढेंच ज्ञान, तेवढ्याच कल्पना उपयोगांत आणतों, असें आम्हांला वाटतें; त्या कार्याला, त्या हेतूला निरुपयोगी किंवा विरोधी असें ज्ञान, अशा कल्पना आम्ही तात्पुरत्या बाजूला ठेवतों असें आम्हांला वाटतें; परंतु
पान क्र. १९७
वस्तुत: आमची जाणीव, आमचें ज्ञान अविभाज्य आहे; ही अविभाज्य जाणीवच, काय बघायचें तें शांतपणें बघत असते, काय करायचें तें शांतपणें करीत असते; आमच्या जाणिवेचा एकादा तुकडा, बहिष्कारी अज्ञान हें कांहीं खरेंखुरें ज्ञान, खरा ज्ञाता किंवा खरा कर्ता नसते. आमच्या मानवी मनाचा जसा हा शक्तिकेंद्रीकरणाचा व्यापार असतो, तसाच व्यापार आमच्यांतील सर्वज्ञतेचा असतो : तिचें विशिष्ट मर्यादित क्रियेसाठीं केंद्रीकरण म्हणजेच दर्शनी अज्ञान होय.
मानवी मनांत ज्या शक्ती आहेत त्या सर्वांत श्रेष्ठ शक्ति, निदान श्रेष्ठ शक्तींपैकीं एक शक्ति म्हणजे, मन एके ठिकाणीं एकाग्रतेनें लावण्याची शक्ति, असें आपण मानतों तें योग्यच आहे; आमच्या जाणिवेच्या हालचालींचें मूल्यमापन करतांना, वरील मानसिक शक्ति सर्वांत जास्त मोलाची आहे; निदान जास्त मोलाच्या शक्तीपैकीं एक आहे असें आपण समजतों तें न्याय्यच आहे. आमच्या जाणिवेला जें माप आम्ही लावतों, तेंच ईश्वरी जाणिवेला लावणें युक्त आहे. अर्थात् जी ईश्वरी जाणिवेची शक्ति आम्हांला अज्ञान म्हणून भासते, पण जी वस्तुत: दर्शनी मर्यादित ज्ञानानें काम करण्याची शक्ति असते, ती ईश्वरी जाणिवेच्या ठिकाणच्या श्रेष्ठ शक्तींपैकीं एक शक्ति आहे, असें आम्हीं मान्य केलें पाहिजे. कार्य करतांना स्वत:ला मर्यादा घालून घेणें आणि अशा दर्शनी ''अज्ञानाच्या'' द्वारां स्वत:चे सर्व हेतू पूर्णतया सिद्धीस नेणें, ही किमया केवळ सर्वश्रेष्ठ व स्व-सत्ताक ज्ञानालाच शक्य आहे. विश्वांत हें सर्वश्रेष्ठ ज्ञान काम करीत आहे; अनेक अज्ञानांच्या द्वारां तें काम करीत आहे; या अज्ञानांपैकीं प्रत्येक अज्ञान आपल्या आंधळेपणानें जमेल तसें कार्य करीत आहे; असें असतां या सर्व आंधळ्या अज्ञानांच्या द्वारां कार्य करून विश्वांतील सर्वश्रेष्ठ ज्ञान, त्याला इष्ट असलेल्या विश्वव्यापी सुसंबद्ध रचना उभारीत आहे, पार पाडीत आहे. आम्हांला ''अचेतन'' जें भासतें त्याचें कार्य पहा : या कार्यांत ईश्वरी जाणिवेची सर्वज्ञता किती अद्भुत कामगिरी करूं शकते, तें सर्वात अधिक प्रभावी तऱ्हेनें आमच्या समोर मांडलें जातें. विजेचा अणु, रासायनिक अणु, जीवपेशी, वनस्पति, कीटक, अगदीं तळाजवळचे प्राथमिक प्राणी यांजकडे पहा : यांजमध्यें पूर्ण किंवा अपूर्ण नेणीव, आमच्या मानवी अज्ञानाहून खूपच गाढ अशी नेणीव आहे : या पदार्थांत कोठे पूर्ण अचेतन प्रेरणा, तर कोठें सहज किंचित् चेतन प्रेरणा दिसून येते; पण या प्रेरणांच्या पाठीमागें, प्रेरणांच्या
पान क्र. १९८
पडद्यामागें सर्वज्ञ ईश्वरी जाणिवेनें कांहीं साध्य योजून उभें केलेलें आहे; अणु, पेशी इत्यादि सर्व पदार्थ म्हणजे या साध्याला वास्तवांत आकार देण्यासाठीं निर्मिलेलीं यांत्रिक अस्तित्वें आहेत; या यंत्रीभूत अस्तित्वांना, पदार्थांना ईश्वरी साध्याचें कांहींच ज्ञान नसतें; हें साध्य या पदार्थांतील अचेतन सचेतन सहज प्रवृत्तींच्या द्वारां, त्यांना अज्ञात अशा रीतीनें आपली सिद्धी करून घेत असतें : या पदार्थांच्या विश्वांत त्यांच्या पूर्ण अपूर्ण नेणिवेच्या द्वारां सर्वज्ञ ईश्वरी जाणीव सुंदर व्यवस्था उभारीत असते. आपल्या साध्याच्या दिशेनें या पदार्थांना, त्यांतील प्रेरणांना न कळत नेत असते, आणि ही कामगिरी अगदीं शंभर टक्के व्यवस्थित होत असते. हें सर्व पाहिलें म्हणजे अणुसारख्या ''अचेतन'' किंवा कीटकासारख्या किंचित् चेतन विश्वांत अचेतनता किंवा अज्ञान जरी काम करतांना दिसत असलें, तरी तें अचेतन हें खरें अचेतन नव्हे, तें अज्ञान हें खरें अज्ञान नव्हे, तर तें, सर्वज्ञ आत्मजाणीव, सर्वज्ञ विश्वजाणीव जी सर्वत्र कार्यकारी आहे तिची एक शक्ति आहे, एक निशाणी आहे, एक पुरावा आहे, हें आम्हीं मान्य केलें पाहिजे, हें आम्हांला मान्य करावें लागतें. अज्ञानाच्या पाठीमागें अविभाज्य सर्वज्ञता काम करीत असते, याला निसर्गांत बाह्य पुरावा सर्वत्रच मिळतो; पण याला आमच्या अंतरांतील वैयक्तिक पुरावा आम्हाला पाहिजे असेल, तर तोहि अगदीं हवा तितका भरपूर मिळूं शकतो; मात्र त्याकरतां आम्हीं आमच्या पृष्ठभागीय ''अज्ञानाच्या'' पडद्याच्या मागें पाऊल टाकलें पाहिजे. तेथें आमचें खोल आंतर-अस्तित्व आहे, विशाल उच्च आध्यात्मिक पातळी आहे. तेथें दिव्य ईश्वरी कल्पना, दिव्य ईश्वरी इच्छा आम्हाला प्रतीत होऊं शकते; या प्रतीतीनें, संपर्कानें अविभाज्य सर्वज्ञतेचा पुरावा आम्हांला भरपूर प्राप्त होतो : तेथें आम्हांला हें स्पष्टपणें जाणवतें कीं, आम्ही आमच्या अज्ञानांत स्वत: म्हणून जें कांहीं करीत होतों, केलें तें सर्व, अदृश्य अविभाज्य सर्वज्ञ पुरुष आपल्या नजरेखाली घालून, स्वनियोजित फलाच्या दिशेनें आमच्या कार्याला गति देत होता; आमचें करणें अज्ञानाचें असलें, तरी त्याला संभाळून योग्य दिशेनें नेणारें महान् ईश्वरी कर्तृत्व त्याच्या मागें असतें, हें तेथें आमच्या लक्षांत येतें. त्या कर्तृत्वाचें ध्येय, प्रयोजन, आमच्याकडून त्याला काय करून घ्यावयाचें आहे तें साध्य, आम्हांला तेथें प्रत्ययास येतें : आणि हें घडल्यावर आज ज्यांची आम्ही केवळ श्रद्धाळूपणानें पूजा करतो, त्याचें ज्ञान आम्हांला
पान क्र. १९९
तेथें होतें, त्याचें दर्शन तेथें आम्हांला घडतें; शुद्ध विश्वात्मा, सर्व निसर्गाचा आणि जडाजडाचा स्वामी तेथें आम्हांला भेटतो आणि त्याला तेथें आम्ही पूर्णतया ओळखतो.
जी गोष्ट अज्ञानाची तीच त्याच्यापासून घडणाऱ्या परिणामांची. हे परिणाम म्हणजे अक्षमता, दुर्बलता, असामर्थ्य, शक्तिसंकोच, आमच्या इच्छाशक्तीनें चालविलेला विघ्नांनीं भरलेला झगडा, तिचा कोंडमारा झालेला परिश्रम. हे परिणाम ईश्वराच्या, त्याच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनें आपण पहावे, म्हणजे त्यांचें स्वरूप वेगळें असल्याचें दिसेल : ईश्वरी शक्ति सर्वज्ञ आहे पण त्या सर्वज्ञ शक्तीनें आपल्या स्वतंत्र इच्छेनें आपल्या स्वत:ला योग्य त्या मर्यादा घालून काम चालविलेलें आहे. जें काम करावयाचें त्या कामाला लागेल तेवढीच शक्ति पृष्ठभागाकडे पाठवावयाची असा तिचा क्रम आहे. पृष्ठभागीय शक्ति, तिला जो प्रयत्न करावयाचा त्या प्रयत्नाला लागेल तेवढीच असावी. या शक्तीला जें यश किंवा अपयश यावयाचें ठरलेलें असेल त्याला अनुरूप येवढीच ती शक्ति असावी (अपयश हें कार्यदृष्टीनें अवश्य असेल, तर अपयश यावें अशीच ईश्वरी योजना असते), तसेंच अनेक शक्ती जेथें काम करीत असतात तेथें विवक्षित पृष्ठभागीय शक्ति या शक्तिसंघाताचा केवळ एक भाग असल्यानें, या भागकार्यापुरतीच ती असावी अशी व्यवस्था सर्वज्ञ शक्तीला करावी लागते; तसेंच शक्तिसंघाताच्या एकंदर कार्याचा कांहीं एक थोर परिणाम ठरविलेला असतो आणि या विवक्षित पृष्ठभागीय शक्तीच्या परिणामांचे स्वरूप, या थोर परिणामाचे अविभाज्य भाग, असें असतें म्हणून त्या नियोजित थोर परिणामाला आवश्यक तेवढी ही पृष्ठभागीय शक्ति असावी अशीहि व्यवस्था सर्वज्ञ शक्तीला करावी लागते : सर्वज्ञ शक्तीचा हा सर्व कार्यक्रम लक्षांत घेतां, वर अज्ञानाचे परिणाम म्हणून अक्षमता, दुर्बळता वगैरे जी यादी केली, त्या यादींतील प्रत्येक बाब म्हणजे सर्वज्ञ शक्तीनें आपल्या स्वेच्छेनें स्वत:ला योग्य त्या मर्यादा घालून उभी केलेली बाब आहे -- अर्थात् अक्षमता ही खरी अक्षमता नसून कार्यानुरूप मर्यादित क्षमता आहे व ती स्वेच्छेनें सर्वज्ञ सर्वसमर्थ शक्तीनें कार्यानुरूप घेतलेलें रूप आहे, हें आपल्या बुद्धीला समजतें. जी गोष्ट अक्षमतेची तीच दुर्बळता इत्यादि गुणांची व कर्मांची समजावयाची. पुढें पृष्ठभागीय शक्ति ही मर्यादित असावयाची आणि तिच्या पाठीमागें सर्व-शक्ति असा-
पान क्र. २००
वयाची; पुढें जी मर्यादित शक्ति असते तिच्याद्वारां सर्व-शक्ति हीच वस्तुत: काम करीत असते : अनेक मर्यादित क्रियाशक्तींच्या कार्यसंघाच्या द्वारां अविभाज्य सर्वसमर्थ ईश्वरी शक्ति आपलीं साध्यें अचूकपणें सिद्ध करून घेते -- सर्वज्ञ सर्वसमर्थ शक्तीची विश्वकार्यांतील ही अशी व्यवस्था आहे. याप्रमाणें आपली शक्ति मर्यादित करण्याचें सामर्थ्य, या मर्यादित शक्तीच्या द्वारां कार्य करण्याचें सामर्थ्य, अर्थात् परिश्रम, संघर्ष, अडचणी दर्शनी अपयशांची किंवा अर्धवट यशांची मालिका यांच्याद्वारां कार्य करण्याचें सामर्थ्य, आणि या कार्यांच्या द्वारां आपला गुप्त हेतु सिद्ध करण्याचें सामर्थ्य, हें जें विश्वांत आपल्या नजरेस येतें तें, सर्वश्रेष्ठ अद्वितीय सर्वसमर्थ शक्ति विश्वांत काम करीत असल्याचा सर्वश्रेष्ठ पुरावा आहे. हा कांहीं असामर्थ्याचा पुरावा नव्हे. दर्शनी अज्ञान हा जसा सर्वज्ञतेचा, तसेंच दर्शनी असामर्थ्य हा सर्वसमर्थतेचा पुरावा विश्वांत आमच्या प्रत्ययास येतो.
आतां दुःखाचा प्रश्न घेऊं. विश्वांत अनुभवास येणाऱ्या दु:खामुळें विश्वाचें कोडें उलगडण्यास अवघड पडतें. हें दुःख जाणिवेच्या मर्यादितपणाचा परिणाम आहे, शक्तीच्या मर्यादितपणाचा परिणाम आहे; आम्हाला जी शक्ति, आमच्या शक्तीहून भिन्नशक्ति वाटते त्या भिन्नशक्तीचा आमच्यावर आघात झाला, तिचा आम्हाला संपर्क घडला तर तो संपर्क, तो आघात पचविण्याची, आत्मसात् करण्याची क्रिया आम्हांला आमच्या मर्यादित शक्तीमुळें, मर्यादित जाणिवेमुळें करतां येत नाहीं -- ही अक्षमता, ही विसंवादाची अवस्था संपर्काचा आनंद आम्हांला होऊं देण्याच्या आड येते, उलट संपर्कामुळें असमाधानाची, दुःखाची प्रतिक्रिया घडविते; संपर्कानें आम्हांला कांहींतरी उणें पडतें, किंवा नको इतकें अधिक होतें. दोन शक्तींच्या विसंवादानें आम्हांला आंतरिक किंवा बाह्य इजा होते : ही सर्व प्रक्रिया म्हणजे, आमच्या अस्तित्वाची शक्ति आणि आम्हांशीं संपर्क करणाऱ्या अस्तित्वाची शक्ति यांच्यामध्यें विभक्तपणा असल्याच्या कल्पनेचा परिणाम आहे. पृष्ठभागीय ''मी'' ला विभक्तपणाच्या कल्पनेमुळें दुःख होणें अटळ आहे. त्याच्या पाठीमागें आमचा खरा आत्मा आमच्या अंतरीं असतो, त्याचे अंतरीं सर्वव्यापी सर्वात्म्याचा सर्वानंद सर्वदा उपस्थित असतो, प्रतीत होतो; हा सर्वव्यापी आत्मा ''भिन्न'' शक्तीच्या घडलेल्या संपर्काची, स्पर्शाची नोंद घेतो; या संपर्कानें ''अप्रिय'', दुःख झालें असेल तें, सहिष्णुतेनें
पान क्र. २०१
सोसण्याचा आनंद प्रथम भोगतो; नंतर तें दु:ख आपलें दु:खत्व टाकून देईल असा आनंदमय विजय त्यावर मिळवितो, आणि शेवटीं दु:खाचें आनंदांत रूपान्तर करण्याचा आनंद मिळवितो : मूळ अस्तित्वाचा सर्वगामी आनंद हाच, शारीरिक मानसिक दु:ख हें विकृत रूप, धारण करीत असतो आणि या विकृत रूपाला त्याचें मूळ आनंदरूप घेण्याचें सामर्थ्य असतें. सर्वानंद हा सर्वात्म्यांतच असतो असें नसून, तो आमच्या बाह्य ''मी'' मागील वैयक्तिक आंतरात्म्यांतहि असतो; हा अन्तरात्मा, त्याला अनुभवास येणाऱ्या अनुकूल प्रतिकूल सर्व गोष्टींचा उपयोग करून, त्याच्या अनुभवांपैकीं त्याज्यांचा त्याग व ग्राह्यांचा संग्रह करून वाढत असतो -- आम्हाला अतिशय ताप देणाऱ्या दु:खांतून, संकटांतून, आपत्तींतून कांहीं दिव्य ईश्वरी धडा तो हुडकून काढतो आणि त्याचा आपल्या संवर्धनासाठीं उपयोग करतो. अन्तरात्म्याचे आणि सर्वात्म्याचे ठिकाणीं हा जो सर्वगामी आनंद उपस्थित आहे त्यालाच, आमच्यावर किंवा स्वत:वर वर सांगितलेलें अतिकटु अनुभव लादण्याचें किंवा लादून घेण्याचें धाष्टर्य किंवा धैर्य होऊं शकतें; या आनंदाखेरीज कशालाहि, कोणालाहि असला उद्योग करणें शक्य झालें नसतें : त्याचप्रमाणें असले अनुभव स्वत:च्या उपयोगाला आणणें किंवा या अनुभवांना आमच्या हिताला उपकारक असें स्वरूप देणें, या अनुभवांच्या द्वारां आमचें हित करून देणें, ही गोष्टहि या सर्वानंदाखेरीज इतर कशालाहि, कोणालाहि शक्य झाली नसती. सर्वात्म्याचा सर्वानन्द ज्याप्रमाणें एक किमयागार आहे त्याप्रमाणें सर्वात्म्याची स्वभावगत एकता, अद्वितीयता हीहि किमयागार आहे. या स्वाभाविक अनिवार्य एकतेमुळें विश्वांत सुसंगति, सुसंबद्धता व सुसंवादाचें सौंदर्य अनिवार्यपणें असतें किवा येतें; कारण अस्तित्वाच्या स्वाभाविक एकतेंत स्वाभाविक सुसंगति अटळपणें, अढळपणें उपस्थित असते. या स्वाभाविक सुसंगतीलाच हें शक्य होत असतें कीं विश्वांत अनेक प्रकारें भयंकर विसंगति, दिसण्यापुरती उत्पन्न करावी; शेवटीं ही सर्व प्रकारची दर्शनी विसंगति विश्वांत सुसंगतीच्या स्थापनेलाच मदत करणारी होते, स्वत:च वर्धिष्णु अशा सुसंगतीची घटकभूत होते : ही सर्वात्म्याच्या स्वभावगत एकतेची किमयागारी आहे. तेव्हां आमच्या पृष्ठभागीय जाणिवेला जें जें ''अदिव्य'' या नांवानें संबोधावें लागतें -- आणि आमच्या दृष्टीनें ही संज्ञा बरोबरही असते -- त्या अदिव्याच्या पाठीमागें दिव्य सत्वस्तु आहे हा शोध आम्हांला अनुभवाच्या
पान क्र. २०२
सर्व क्षेत्रांत लागतो, ही गोष्ट आम्ही आमच्या नजरेसमोर सतत ठेवावयास हवी. ''अदिव्य'' गोष्टी दर्शनी पडद्यासारख्या आहेत, या पडद्यापाठीमागें दिव्य ईश्वरी पूर्णता बसलेली आहे; हा पडदा सध्यां आवश्यक असला, तरी तो कांहीं वस्तुस्थितीचें खरें आणि पूर्ण चित्र नव्हे, हें आम्हीं लक्षांत ठेवावें.
तथापि दर्शनी गोष्टी म्हणजे खोट्या गोष्टी असें नव्हे : विश्वाचें अन्त:स्वरूप दिव्य असल्याचें आपण पाहिलें, पण त्या बरोबरच, आमची मर्यादित मानवी जाणीव विश्वांत ज्या गोष्टी पाहते त्या सर्वथा खोट्या आहेत, मूलत: भ्रामक आहेत असें म्हणून त्या दुर्लक्षिणें आम्हांस योग्य नाहीं. शारीरिक मानसिक दु:ख, यातना, चुक्या, खोटेपणा, अडाणीपणा, दुबळेपणा, दुष्टपणा, अकार्यक्षमता, करावयाचें तें न करणें, जें न करावें तें करणें, संकल्पच्युति, संकल्पविरोध, संकल्पविध्वंस, अहंकार, संकुचितता, ज्यांच्याशीं अगदीं ऐक्यभावानें वागावें त्यांच्यापासून विभक्तता -- थोडक्यांत ज्या गोष्टी आम्ही अनिष्ट म्हणून म्हणतो, आमच्याकडून अनिष्टाची प्रभावी मूर्ति ज्या गोष्टींची बनविली जाते त्या गोष्टी म्हणजे कांही कल्पित रचना नाहींत, मिथ्या भ्रमरूप नाहींत; तर विश्वाच्या संबंधीं आमचें जें ज्ञान, त्या ज्ञानाचा एक भाग, खरा भाग आहेत. -- अर्थात् एक गोष्ट खरी कीं, आमच्या अज्ञानामुळें या गोष्टींचा जो आम्ही अर्थ करतो, या गोष्टींचें जें मूल्य आम्ही समजतों, तो अर्थ, तें मूल्य कांहीं त्यांचें खरें, पूर्ण मूल्य किंवा अर्थ नव्हे. मात्र आम्ही बाह्य दृष्टीनें जो अर्थ लावतो, तो त्यांच्या खऱ्या अर्थाचा एक आवश्यक भाग आहे, त्यांचें जें मूल्य आम्ही मानतों तें, खऱ्या दृष्टीनें खरें मूल्य पूर्ण होण्यास आवश्यक आहे, हेंहि आम्हीं विसरूं नये. आम्हीं बाहेरची मर्यादित जाणीव सोडून आमच्या अंतरीची विशाल आणि खोल जाणीव आमची केली, म्हणजे हें एक सत्य आम्हांला दिसतें कीं, आम्हांला बाह्य दृष्टीनें जें हितविरोधी व अनिष्ट असें दिसतें तें, विश्वाच्या व आमच्या वैयक्तिक हिताच्या दृष्टीनें उपयोगी असतें; दु:ख, अज्ञान, प्रमाद, दुर्बलता, अपयश, भेदाभेद किंवा बेकी, दुही -- या अनिष्ट गोष्टींचा विचार केल्यास त्यांचें इष्टत्व कशांत आहे तें समजून येतें. दु:खाचा अनुभव नसेल, तर या दु:खांतून जें दिव्य सुख जन्मावयाचें असतें त्याचें अगणित मोल आमच्या अनुभवाला येणार नाही; अज्ञान हें ज्ञानाच्या तेजोगोलाभोवतीं छायेच्या परिघाप्रमाणें आहे; अर्थात् अज्ञानाच्या मार्गानें आपण ज्ञानाचें तेज जवळ
पान क्र. २०३
करीत असतों; प्रमाद हा सत्याचा शोध लागण्याची शक्यता दाखवितो, त्या शोधासाठीं चाललेल्या प्रयत्नाचा तो भाग असतो -- अर्थात् प्रत्येक प्रमाद हा आपल्याला कोठल्यातरी सत्याच्या जवळ नेत असतो; दुर्बलता आणि अपयश यांच्याद्वारां, बळ आणि यश आपल्यापासून किती दूर आहेत त्याचा अजमास घेत घेत आपण त्यांच्या दिशेनें पुढें पुढें जात असतो; अनेक प्रकारचे भेद, बेकी, दुही या घटनांतील हेतु हाच असतो कीं, अनेक प्रकारचे ऐक्य सिद्ध करण्यांत विविध गोडीचा आनंद आहे, हा अनुभव आम्हांला आणून द्यावा. वर ज्या गोष्टी अनिष्ट म्हणून वर्णिल्या त्या सर्व अनिष्ट गोष्टींतून वर सांगितल्याप्रमाणें शाश्वत इष्ट निघत असतें; सर्व अनिष्ट, वाईट हें अपूर्णतेचें लक्षण आहे आणि अचेतनांतून चेतनाचा जो विकास होतो, त्या विकासाच्या नियमानुसार भरपूर अपूर्णता ही पहिली पायरी चढून, गुप्त दिव्य ईश्वरत्व पुढें अधिकाधिक पूर्णतेनें प्रकट रूप घेत जातें; तेव्हां अपूर्णता, अनिष्ट, वाईट, अमंगल हा विकासी चेतनाचा, पूर्ण ईश्वरत्व स्वत:चें ठिकाणीं प्रकट करण्याचा ईश्वरनियोजित मार्ग आहे आणि म्हणून तो समाधानानें चालत जाणें युक्त आहे. तथापि आपल्यामध्यें अमंगलासंबंधानें, सदोषतेसंबंधानें जी विरुद्ध भावना उसळून येते, तीहि आम्हीं महत्त्वाची आणि आवश्यक अशी भावना मानली पाहिजे; आम्हीं या अमंगल, सदोष गोष्टींना प्रथम निभवून घ्यावयाचें, त्या सहन करावयाच्या, अशी जरी नैसर्गिक व्यवस्था असली, तरी आम्हांवर ही अखेर जबाबदारी आहे, आम्हाला शेवटीं अशी आज्ञा आहे कीं, या अनिष्ट गोष्टींना काढून टाकून, त्यांजवर विजय मिळवून आम्हीं आमचें जीवन, आमची प्रकृति बदलावयास हवी. या अनिष्ट गोष्टी आम्हांला आपल्या दोषांनीं सारखें डिवचीत असतात यांतील हेतूच हा आहे कीं, आम्हीं, आमच्या आत्म्यानें, ''अज्ञान'' या महान् दोषाचे परिणाम नीट ओळखून लक्षांत ठेवावे. त्या परिणामांच्या प्रतिक्रिया अनुभवाव्या आणि या प्रतिक्रियांची टोंचणी ही आपल्याला एक प्रकारें अनिष्टांवर हुकमत मिळविण्याची प्रेरणा आहे, अशा तीव्र भावनेनें आम्हीं या विजयासाठीं धडपड करावी व शेवटीं आमची प्रकृति बदलून टाकण्यासाठीं सामान्य प्रकृतीचा प्रांत ओलांडून उच्चतर दिव्यप्रकृतीच्या क्षेत्रांत प्रवेश करण्यासाठीं आम्ही पहिल्यापासूनहि अधिक खटपट करावी. आम्हीं बाहेरून आंवरतें घेऊन अंतरंगांत खोल प्रवेश केला व तेथील नियमानुसार वागूं
पान क्र. २०४
लागलों, म्हणजे आंतरिक साम्याची व शांतीची अवस्था आम्ही भोगूं शकतों; या अवस्थेंत बाह्य निसर्गाच्या प्रतिक्रिया आम्हांला स्पर्श करीत नाहींत, विचलित किंवा विव्हल करीत नाहींत. ही अवस्था मोक्षाचीच अवस्था आहे; मात्र ही कांहीं पूर्ण मोक्षाची अवस्था नव्हे -- आमची बाह्य प्रकृति, आंतील प्रकृतीप्रमाणें शांतिमय झाली म्हणजेच आम्हीं पूर्ण मोक्ष मिळविला असें होऊं शकेल : आंतील प्रकृतीप्रमाणें बाह्य प्रकृतीचाहि मोक्षावर हक्क आहे आणि तो हक्क तिला मिळेपर्यंत आमचा आंतरिक मोक्ष हा अपूर्णच समजला पाहिजे. आणखीहि एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, आम्ही स्वत: अंतर्बाह्य मोक्ष पूर्णतया मिळवून बसलों, तरी दुसरे जीव आहेत, त्यांना दुःख आहे, विश्व त्रस्त आहे तों पावेतों आम्हांला -- महान् आत्म्याला -- तटस्थ उदासीन राहतां येणार नाहीं. सर्व जीव एक-मूल आहेत, आमच्या अंतरात्म्याला सर्व जीवांशीं स्वतःची एकरूपता प्रतीत होते आणि म्हणून या सर्व जीवांची मुक्ति स्वतःच्या मुक्तीचाच एक अंगभूत भाग आहे अशी त्याची तीव्र भावना असते, आणि तशी ती असणें योग्य आहे, आवश्यक आहे.
येथें अनुभवास येत असलेल्या सदोषतेचें, अपूर्णतेचें मूळ, ईश्वराच्या आविष्काराचा नियम हेंच आहे, हें आम्हीं वर पाहिलें. आविष्काराचा क्रमविकास-नियम (येथील अपूर्णतेचें मूळ) हा केवळ आविष्काराचा नियम आहे आणि तोहि, आम्ही ज्या आंदोलनाचा भाग आहोंत त्या आंदोलनापुरता, खास नियम आहे ही गोष्ट खरी आहे. आविष्काराची हालचालच नसती, निदान ज्या हालचालींत आम्ही जीवन जगत आहोंत ती हालचाल नसती, तर हा (अपूर्णतेचें मूळ असलेला) विशिष्ट क्रमविकासनियम अस्तित्वांतहि आला नसता, ही गोष्टहि खरी आहे. परंतु आविष्कार ठरला आणि प्रस्तुतचा आविष्काराचा विशिष्ट आंदोलन-प्रकार ठरला, म्हणजे आम्हांला परिचित झालेला (अपूर्णतेचा जनक) क्रमविकासनियम हाहि क्रमप्राप्तच ठरतो, अनिवार्यच ठरतो. हा अपूर्णतेचा जनक क्रमविकासनियम आणि त्याच्या अंगभूत द्वंद्वात्मक गोष्टी, हें सर्व भारूड -- मिथ्या भारूड -- आमच्या मानसिक जाणिवेनें उभें केलें आहे -- ईश्वराचे ठिकाणीं या मिथ्या नियमादि गोष्टी नाहींत; या द्वंद्वांकडे -- सुखदुःखाकडे, चांगल्या वाईटाकडे तटस्थ रीतीनें पाहणें, किंवा या ईश्वराच्या आविष्काराच्या क्षेत्रांतून ईश्वराच्या विशुद्ध अस्तित्वांत उडी घेऊन विलीन होणें, हेंच एक खरें शहाणपण आहे, असें म्हटलें
पान क्र. २०५
जातें; पण हें म्हणणें अर्थ-सत्य आहे : आमच्या मानसिक जाणिवेनें या सर्व द्वंद्वात्मक गोष्टी उभ्या केल्या आहेत हें खरें, पण आमचें मन कांहीं स्वतंत्रपणें, प्रमुखपणें या गोष्टीबद्दल जबाबदार नाहीं, त्याची जबाबदारी आहे ती गौण, दुय्यम जबाबदारी आहे -- आपण वर पाहिलेंच आहे कीं, या गोष्टी ईश्वरी जाणिवेनें निर्माण केल्या आहेत असें, खोल जाऊन अनुभव घेतांच आपणांस दिसतें, आणि हेंच यांतील आन्तरिक पूर्ण सत्य आहे : ईश्वर आपलें सर्व ज्ञान मागें ठेवून, मन या मर्यादित ज्ञानाच्या वस्तूला पुढें करतो आणि या रीतीनें आपल्या स्वतःच्या सर्वशक्तिमत्ता, सर्वज्ञता, सर्वानंद, सर्वभूतमय अस्तित्व, अद्वितीय एकता या स्वभावधर्मांच्या विरुद्ध असणाऱ्या मर्यादित, अनित्य दुःख-सुखादि गोष्टी, 'मर्यादित मन' या वस्तूच्या द्वारां वास्तवांत निर्माण करतो. याप्रमाणें मनाची द्वंद्वाबद्दलची जबाबदारी दुय्यम प्रकारची आहे. ईश्वरी जाणीव ही, दुःखप्रमादादि ज्या गोष्टी निर्माण करते, त्या गोष्टी आणि त्या निर्माण करणारी ईश्वरी क्रिया, यांना आम्ही शाश्वत सत्य नसणाऱ्या आणि मूलभूत सत्य नसणाऱ्या गोष्टी, या अर्थानें ''मिथ्या'' हें नांव देऊं शकतों; अस्तित्वाचें जें मूलभूत आणि अंतिम सत्य, त्याच्या विरोधी या गोष्टी आहेत म्हणून त्यांना आम्ही ''असत्य''हि म्हणूं शकतों; तथापि आमची सध्यांची जी अवस्था आहे -- ईश्वरी आविष्काराची जी सध्यांची पातळी आहे त्या पातळीच्या -- त्या अवस्थेच्या दृष्टीनें या सर्व गोष्टींमध्यें अविचल सत्यहि आहे आणि त्यांना अटळ महत्त्वहि आहे. ईश्वरी ज्ञानाकडून कांहीं तरी चूक होऊन या गोष्टींची निर्मिति झाली, त्यांना ईश्वरी प्रज्ञेच्या दृष्टीनें कांहीं प्रयोजन नाहीं, कांहीं अर्थ नाहीं असें नव्हे. ईश्वरी आनंद, ईश्वरी सामर्थ्य, ईश्वरी ज्ञान यांचा कांहीं हेतु या गोष्टींच्या अस्तित्वामुळें साधतोच साधतो; आणि म्हणून त्यांचें अस्तित्व या ईश्वरी दृष्टीनें समर्थनीय आहे. आम्ही बाह्य अनुभवाच्या कोंडींत जीवन कंठीत आहों तोंपर्यंत ईश्वरी योजनेचें हें कोडें आम्हांला कोडेंच राहणार, गूढच राहणार एवढें मात्र निश्चित.
निसर्गांत आमचें पृष्ठभागीय जीवन अंतर्भूत आहे. हेंच जीवन आमचें खरें जीवन असें आम्हीं मान्य केलें, निसर्गांत जीवनाचा नियम मनुष्याखेरीज इतरत्र जसा कायम ठशाचा अविकासबद्ध आहे, निसर्गांत मनुष्येतर वस्तू व प्राणी आपआपल्या गुणधर्मांनीं जसे कायमचे बांधलेले आहेत, त्याप्रमाणें मनुष्यहि त्याच्या अपूर्णतेला, दोषसंघाला कायमचा
पान क्र. २०६
बांधलेला आहे, त्याचें अज्ञान, पाय, दुबळेपण, दुष्टपण, दुःख हें सर्व अनिवार्यपणें त्याच्या जीवनांत निसर्गनियमानुसार कायमचें राहणारें आहे अशी आम्ही भूमिका घेतली, तर आमच्या जीवनांत, आमच्या जीवनाला, खरा अर्थ कांहीं राहत नाहीं. मनुष्य आपल्या प्रकृतींत असलेल्या अंधारांतून, अपूर्णतेंतून बाहेर पडण्यासाठीं सारखा धडपडत असतो; ही त्याची धडपड, त्याचें जीवन खरोखरी कायम ठशाचें असल्यास, या जगांत तो असेपर्यंत फलद्रुप होणें अशक्य आहे -- कदाचित् या जीवनांतून, या जगांतून, मनुष्याच्या कोटींतून तो बाहेर पडल्यावर त्याचें ध्येय त्याला प्राप्त होईल; अर्थात् देवलोकांत किंवा ईश्वराच्या लोकांत किंवा अनिर्वचनीय ब्रह्माच्या कैवल्यांत मनुष्य येथून गेला, म्हणजे त्याची येथील कायमच्या अपूर्णतेंतून सुटका होईल; सुटका होत असेल कदाचित्. तें पुढचें कांहीं असो. मनुष्याला विकासनियम अज्ञात किंवा अमान्य असेल, तर त्याच्या आन्तरात्म्यांत असलेल्या शाश्वत पूर्णतेच्या गोष्टी तो या जीवनांत तरी प्रकट करूं शकणार नाहीं -- सत्य आणि ज्ञान यांना, असत्य आणि अज्ञान यांच्या कोंडीतून तो बाहेर काढूं शकणार नाहीं; मांगल्य आणि सौंदर्य यांना, अमांगल्य आणि कुरूपता यांच्या बंदीतून मोकळें करूं शकणार नाहीं; सामर्थ्य, आणि सुयश यांना, दुर्बलता आणि दुष्टता यांच्या कांचांतून सोडवूं शकणार नाहीं; सुखसमाधान आणि आनंद यांना, दुःख, असमाधान आणि यातना यांच्या जाचांतून सोडवूं शकणार नाहीं -- अपूर्णतेच्या गोष्टींच्या पाठीमागें आंतरात्म्यांत पूर्णतेच्या गोष्टी उपस्थित असतात आणि त्यांनी अपूर्णतेच्या गोष्टींच्या विरोधी परिस्थितींतून मार्ग काढून प्रकट व्हावें असा ईश्वरी विकासाचा नियम आहे. हा नियम मनुष्याला अमान्य किंवा अज्ञात असेल, तर वर सांगितल्याप्रमाणें तो अपूर्णतेंतून बाहेर पडण्यासाठीं विकासमार्गीय प्रयत्न करण्याऐवजीं, अपूर्णतेंतील द्वंद्वें -- अज्ञान आणि मानवी ज्ञान, अमंगल आणि मानवी मंगल, दुर्बलता आणि मानवी बळ आणि सामर्थ्य, संघर्ष व यातना -- यांजबरोबर मानवी प्रेम आणि मानवी सुख हीं द्वंद्वें टाकून देईल आणि देवलोकांची वगैरे आशा धरून सयत्न होईल. आमच्या सध्यांच्या प्रकृतींत ज्ञान-अज्ञान, सुख-दुःख इत्यादि जोड्या अभेद्य आहेत; आणि या जोड्यांचा कायाकल्प जर होणार नसेल, त्यांचें उन्नतीकरण, परिवर्तन होऊन त्यांतून शुद्ध शाश्वत ज्ञान, सुख आदि गोष्टी जर निघणार नसतील, सामान्य मनुष्यत्वाची परिणति
पान क्र. २०७
या जगांतच जर दिव्य मनुष्यत्वांत होणार नसेल, तर हीं द्वंद्वें, या जोड्या टाकून देऊन मनुष्यानें मोकळें होणेंच युक्त ठरेल : यांतून मुक्त होणारा मनुष्य दिव्य कैवल्य भोगील किंवा ईश्वराचें सांनिध्य सुख अनुभवील, किंवा ईश्वराचें साधर्म्य प्राप्त करून घेईल -- धर्म आणि दर्शनें (तत्त्वज्ञानें) यासंबंधांत भिन्न भिन्न गोष्टी सांगतात. मनुष्याचें पृथ्वीवरील जीवन, या जीवनाच्या नियमानुसार शाश्वत अपूर्णतेला बांधलेलें आहे. दिव्य ईश्वरी अस्तित्वाच्या पोटीं मनुष्याचें अस्तित्व हें अदिव्य, ''अनीश्वरी'' दोषमय प्रदर्शन आहे आणि हें अस्तित्व असेंच नित्याचें दोषपूर्ण राहणार आहे, त्यांत केव्हांहि बदल होणार नाहीं, होणें अशक्य आहे हें मत मात्र वरील विश्वविरक्त दर्शनांत व धर्मांत सारखेंच सांपडतें. आत्मा मनुष्यत्व धारण करून जन्म घेऊन या जगांत आला तेव्हांच, जन्म घेण्याच्या क्रियेनेंच तो पतित झाला, दिव्यत्वापासून च्युत झाला, मौलिक पाप करून बसला, निदान मोठा प्राथमिक गुन्हा करून बसला; त्याला कळूं लागलें, आपल्या परिस्थितीचें व आत्म-स्थितीचें ज्ञान त्याला झालें, म्हणजे आपली मुळांतली चूक, मनुष्यत्व धारण करून जन्म घेण्याची चूक, समूळ दुरुस्त करणें हाच त्याचा एकच आध्यात्मिक आत्मोद्धारक हेतु असला पाहिजे, आपण केलेल्या पापाचें, गुन्ह्याचें प्रायश्चित्त पूर्णपणें त्यानें घेतलें पाहिजे, असें वर सांगितलेल्या दर्शनांचें व धर्माचें सर्वसामान्य सांगणें आहे.
मनुष्याचें अपूर्ण व दोषपूर्ण अस्तित्व ईश्वराच्या पूर्ण निर्दोष अस्तित्वाच्या पोटीं कायमचें अपूर्ण व दोषपूर्ण राहणारें आहे, हें जर खरें असेल, तर या विरोधमय ईश्वरी कृतीचें स्पष्टीकरण हें एकच असूं शकतें कीं, ही विश्वरचना ईश्वरी लीला आहे, ईश्वराची करमणूक आहे; ईश्वर अदिव्यपणाचें सोंग घेतो, केवळ मनोरंजनार्थ नाटकाच्या हेतूनें तो नटासारखा भलता मुखवटा धारण करतो असें दिसेल किंवा ईश्वरानें अदिव्यत्व, अज्ञान, पाप, दु:ख आदि गोष्टी विविध निर्मितीच्या आनंदाचा भोग घेण्यासाठीं निर्माण केल्या असतील; अथवा कांहीं धर्म विचित्र कल्पना करतात त्या कल्पनांप्रमाणें, ईश्वरानें हीन जीव अशासाठीं निर्माण केले आहेत कीं, या हीन जीवांनीं त्याची (ईश्वराची) स्तुति करावी, त्याचा अखंड चांगुलपणा, शहाणपणा, आनंद, सर्वसमर्थता यांचें कौतुक करावें आणि स्वत: किंचित् त्याच्यासारखे होऊन त्याच्या आनंदांत अल्पांशानें सहभागी व्हावें किंवा हा त्यांचा प्रयत्न विफल
पान क्र. २०८
झाल्यास (आणि बहुसंख्य जीवांचा प्रयत्न त्यांच्या अपूर्णतेमुळें विफल होणारच) या विफलतेबद्दल देहदंड (शाश्वत देहदंड असें कांहीं धर्मांत आहे) भोगावा. लीलेची ही विचित्र अतिप्राकृत कल्पना पुढें आली कीं तिला उत्तर म्हणून असें चटकन् सांगतां येतें कीं, ईश्वर स्वत: आनंदमय, स्वत: निर्माण केलेल्या दुसऱ्या जीवांच्या दु:खानें सुखांत रमणारा, स्वत: अपूर्णयुक्त जीव निर्माण करून त्या अपूर्णत्वांतून होणाऱ्या चुकांबद्दल जीवांना धारेवर धरणारा -- हा असा ईश्वर खरा ईश्वरच नव्हे; मनुष्याला जी नैतिक बुद्धि आहे आणि तार्किक विचारशक्ति आहे ती अशा ईश्वराला मानणार नाहीं किंवा असा ईश्वरच (त्याचें अस्तित्वच) मानणार नाहीं : विश्व ही ईश्वरी लीला आहे. ईश्वराचाच एक अंश मनुष्याचा आत्मा आहे, मनुष्यांतील ईश्वरी चैतन्य अपूर्णतेचा मुखवटा धारण करतें, तें मनुष्याच्या रूपांत तेथें असलेलें अपूर्णतेचें नाना प्रकारचें दु:ख भोगण्यास तयार होतें, अशी कल्पना घेऊन निर्णयास येतां येतें कीं, मनुष्याचा आत्मा ईश्वरी चैतन्याकडे ओढला जावा अशी ईश्वरी योजना आहे. येथें जो अपूर्णतेचा खेळ आहे, त्या खेळांत ईश्वर आणि मनुष्यजीव हे खेळगडी आहेत, आणि या विश्वाहून इतरत्र ईश्वराच्या पूर्ण अस्वित्वाच्या पूर्ण आनंदांत मानवी जीव सवंगडी म्हणून सहभागी होणार आहेत -- ईश्वरी लीलेच्या या कल्पना वस्तुत: रहस्यमय व आत्मविरोधयुक्त असल्या तरी, त्यांत क्रूरतेचा भाग नाहीं, त्यांत शिसारी आणण्यासारखा भाग नाहीं; ही लीला विचित्र आहे, आणि आमच्या बुद्धीला या लीलेचें रहस्य कळण्यासारखें नाहीं, एवढेंच आम्ही या लीलेबद्दल म्हणूं. मनुष्याचा आत्मा जाणीवपूर्वक या खेळाच्या आविष्काराला आपली संमति देत असेल; तसेंच हा खेळ अर्थयुक्त, प्रयोजनयुक्त असून, ईश्वरी सर्वज्ञता हा खेळ सकारण खेळत असेल आणि तें ईश्वरी कारण, प्रयोजन आमच्या बुद्धीला पटण्याजोगें असेल, तर मात्र या ईश्वरी खेळाचें, लीलेचें रहस्य, आम्हांला ''रहस्य'' राहणार नाहीं; ही लीला ठीक आहे असें आम्ही म्हणूं.
विश्वलीलेंत निश्चित रूप व निश्चित गुण यांच्या साकार श्रेणी आहेत; प्रत्येक श्रेणी ही ईश्वरी निसर्ग-व्यवस्थेंतील एक पायरी आहे; जडाच्या बनलेल्या रूपांत, सशरीर झालेल्या आत्म्यांच्या क्रमवार प्रगतीसाठीं, उन्नतीसाठीं प्रत्येक श्रेणी ही एक भक्कम पायरी आहे; ईश्वरी आविष्कार क्रमाक्रमानें व्हावा यासाठीं, ही नैसर्गिक आधारश्रेणींची
पान क्र. २०९
व्यवस्था आहे -- ईश्वरत्वाचा आविष्कार अचेतनाच्या पायापासून सुरूं होतो व तो अतिमानसिक भूमिका, सर्वज्ञतेची भूमिका येथपर्यंत अनेक पायऱ्यांवरून प्रगति (ऊर्ध्वगामी) करीत मार्गक्रमण करतो; मानवी जाणीव ही या आविष्कार-विकासाची मधली महत्त्वाची पायरी आहे; या पायरीपाशीं विकासाचें निश्चित मार्गान्तर होत असतें -- ईश्वरी लीलेसंबंधानें वरील गोष्टी शोधक बुद्धीला कळल्या म्हणजे ही लीला विशेष विचित्र व अंतर्विरोधपूर्ण वाटत नाहीं : अपूर्णता ही अशा विकासलीलेचा एक आवश्यक भाग असणार, हें बुद्धीला सहज पटतें; कारण अचेतनाच्या पोटांत सर्व ईश्वरी प्रकृति जी गुप्तपणें उपस्थित आहे, ती क्रमाक्रमानेंच अचेतनाच्या आवरणांतून बाहेर प्रकट करतां येणें शक्य असतें. अर्थात् तशीच क्रमाक्रमानें ती मोकळी करणें भाग असतें. ही क्रमवार प्रकटनाची योजना, स्वभावत:च ईश्वरी प्रकृतीचा थोडासा अंश अगोदर थोडासा, त्यानंतर थोडासा, त्याहून पुढें थोडासा थोडासा, असा प्रकट करण्याची योजना होते; आणि हें अल्प अंशानें ईश्वरी प्रकृतीचें आविष्करण, अर्थातच अपूर्णतेला वाव देते, अपूर्णता अपरिहार्य करते. क्रमविकासमार्गानें आविष्करण होणें जेथें अनिवार्य आहे, तेथें विकासाच्या पायऱ्या, पातळ्या बनणेंहि अनिवार्य असतें; आणि या पायऱ्या जेथें आहेत तेथें अशी एक विकासाची मधली अवस्था येते कीं, त्या अवस्थेच्या खालीं विकासाच्या पायऱ्या आहेत आणि वरहि विकासाच्या पायऱ्या आहेत; मनुष्याची मानसिक जाणीव ही अशी एक मधली अवस्था आहे : या अवस्थेंत विकासी-जाणिवेची थोडें ज्ञान, थोडें अज्ञान अशी मिश्र ज्ञान-अज्ञानाची भूमिका असते; ही अवस्था अस्तित्वाच्या विकासक्रमांत मधली स्थिति असते; हिचा आधार अचेतनता हा असतो; अचेतनतेंतून अस्तित्व वर आलेलें असतें, पण अचेतनतेच्या आधारावांचून त्याला विकासमार्ग क्रमतां येत नाहीं; तें या आधारानेंच हळूंहळूं, वरती वरती सर्वज्ञ ईश्वरी प्रकृतीच्या स्थानाकडे जात असतें; तें स्थान गांठल्यावांचून विकासी अस्तित्वाला विसांवा नाहीं. अस्तित्वाचें कांहीं अंशानें प्रकटीकरण, विकसन झालेलें -- अर्थात् या आंशिक विकासनाबरोबर अपूर्णता आणि अज्ञान अस्तित्वाचे सहचर झालेले, अशा स्थितींत आणखी एका वस्तूचें साहचर्यहि अटळ होतें, अटळ होऊं शकतें; अस्तित्वाचें मूळ सत्य हें दर्शनी विकृत, विपरीत अवस्थेंत अंशत: विकसित अस्तित्वाचें अज्ञानाबरोबर साहचर्य करतें, करूं शकतें : कांहीं विशिष्ट
पान क्र. २१०
क्रियांसाठीं आधार म्हणून, पाया म्हणून या विकृत मूळाचा उपयोग आंशिक अस्तित्वाला होत असतो. अपूर्णता, अज्ञान, अंशविकसित अस्तित्वाला पूर्ण विकासाच्या दिशेनें मार्गक्रमण करावयाला अवश्य असतें -- आणि हें अज्ञान टिकावयाचें तर, त्याला विकृत मूळ सत्य समोर दिसावें, भासावें लागतें : मूळ सत्य अस्तित्व, ईश्वरी प्रकृति, एकता, सर्वज्ञता, सर्वसमर्थता, सर्व-सुसंगति, सर्व-हित, सर्वानंद या लक्षणांनीं युक्त असतें; याच्या उलट अनेकताकृत संकुचितता, विसंवाद, नेणीव, विसंगति, असमर्थता, भान-शून्यता, दुःख, अमंगळ या गोष्टी समोर दिसणें, भासणें, अनुभवणें, हें, अज्ञान, अपूर्णता टिकाऊ व विकाससाहाय्यक होण्यासाठीं अवश्य असतें. मूळ ईश्वरी प्रकृतीचें विकृत स्वरूप समोर नसेल, तर अपूर्णतेला आधार राहत नाहीं, ती आपलें स्वरूप, स्वधर्म मोकळेपणें प्रकट करूं शकत नाहीं आणि गुप्त ईश्वरत्वाला विरोध करून आपलें स्वरूप, स्वधर्म टिकवूं शकत नाहीं. अंशज्ञान म्हणजे अपूर्णज्ञान आणि अपूर्णज्ञान अपूर्णतेच्या पुरतें ईश्वरी प्रकृतीच्या सर्वज्ञतेच्या विरोधी अज्ञान असतें. अज्ञानाच्या (म्हणजे अंश-ज्ञानाच्या) आवांक्याबाहेर, क्षेत्राबाहेर ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींसंबंधानें ''अज्ञान'' विचार करूं लागलें, म्हणजे तें ईश्वरी ज्ञानाचें अकरणात्मक, विरोधक न राहतां, करणात्मक विरोधक बनतें : चूक, खोटें ज्ञान, वस्तूंशी अन्याय्य व्यवहार, जीवनाशीं कर्तृत्वांशीं चुकीचा व्यवहार या गोष्टी करणात्मक अज्ञान करूं लागतें; चुकीचें खोटें ज्ञान हें चुकीच्या संकल्पाचें स्वरूप धारण करतें; प्रथम ही गोष्ट दुर्लक्षानें घडत असेल, पण पुढें इच्छापूर्वक चुकी करणें घडूं लागतें -- बुद्धिपुरःसर चुकीचा संकल्प करण्यांत येतो, कोणत्यातरी आकर्षणानें, आसक्तीनें चुकीची इच्छा बुद्धिपुरःसर केली जाते, खोट्या गोष्टी बोलण्यांत, करण्यांत आनंद वाटतो, म्हणून खोटे बोलण्याचा, करण्याचा संकल्प बुद्धिपुरःसर केला जातो : ईश्वरी ज्ञानाचा सामान्य विरोध हें ज्या अज्ञानाचें मूळ स्वरूप असतें तें अज्ञान, संकीर्ण विकृतीचें स्वरूप धारण करतें. अचेतनता, अज्ञान यांना एकदां मान्यता दिली, कीं वरील सर्व विकृती अगदीं तर्कशुद्धरीतीनें, या मान्यतेचा स्वाभाविक परिणाम म्हणून पुढें येतात, आणि त्यांचाहि जीवनाचे अवश्य घटक म्हणून स्वीकार करावा लागतो; प्रश्न शेवटीं हा उत्पन्न होतो कीं, या प्रकारचे विकासी क्रमवार स्वरूप-आविष्करण (दुःखमय आविष्करण) ईश्वराला करावें लागतें तें कां ?
पान क्र. २११
आमच्या बुद्धीला आकलन न होणारा हा एवढाच प्रश्न आतां बाकी आहे.
याप्रकारचें ईश्वराचें व्यक्तीकरण किंवा स्व-निर्माण, किंवा लीला समर्थनीय समजावयाची, तर ती जीवावर लादली जात नाहीं ना, हें पाहिलें पाहिजे; जीवाची इच्छा नसून त्याला या लीलेंत भाग घ्यावा लागत नाहीं ना, हें पाहिलें पाहिजे; प्रकृति पुरुषाच्या संमतीशिवाय कोणतेंहि कार्य करूं शकत नाहीं, या वस्तुस्थितीकडे लक्ष दिल्यास देहधारी चैतन्य (जीव) लीलेला संमति देत असतें हें उघड आहे; विश्वनिर्माण शक्य होण्यास ईश्वरी पुरुषाची इच्छा निर्माणाची असावी लागते, इतकेंच नव्हे तर व्यक्तिपुरुषाचीहि या निर्माणास संमति असावी लागते -- कारण त्याच्या (विश्वनिर्माणाच्या) पोटीं व्यक्तीचें आविष्करण असतें व या आविष्करणाला व्यक्तिपुरुषाची संमति आवश्यक असते. तेव्हां ज्या अर्थीं आमच्यासमोर व्यक्तिसहित विश्व आहे, त्या अर्थीं ईश्वराची आणि जीवात्म्याची दोघांचीहि संमति या व्यक्तियुक्त विश्वाच्या निर्मितीस लाभलेली आहे असें गृहीत धरण्यास हरकत नाहीं. पण असा एक मुद्दा उपस्थित होऊं शकेल कीं, इतकें अवघड आणि दु:खमय ईश्वरत्व-प्रकटन ईश्वरानें कां संकल्पावें, कां इच्छावें ? त्याला यामध्यें आनंद कसा होतो हें गूढ आहे, तसेंच जीवात्मा या असल्या दु:खमय दिव्यत्वप्रकटनाला संमति कां देतो हेंहि गूढ आहे -- आणि या दोन गूढांचा उकल होणें युक्त आहे. यासंबंधांत आपण आपल्या स्वत:च्या आजच्या स्वभावाकडे नजर टाकणें उपयुक्त होईल. या स्वभावांत जें कांहीं नजरेस येईल तशासारखेंच कांहीं, विश्वाच्या आरंभीं ईश्वराच्या आणि जीवात्म्याच्या प्रकृतींत असावें, असा तर्क आम्ही करूं शकतों. त्यांच्या प्रकृतींतून आमची व्यक्तिगत बाह्य प्रकृति उदयास आली आहे; या व्यक्तिगत बाह्य प्रकृतीचा उदय ईश्वराच्या आणि जीवात्म्याच्या प्रकृतीच्या ज्या धडपडींतून झाला ती धडपड आमच्या आजच्या प्रकृतीच्या धडपडीसारखी असावी, असली पाहिजे असा तर्क आपण केल्यास वावगें होणार नाहीं. आम्ही असें पाहतों कीं, अतिशय आकर्षक असा खेळ जर कोणता असेल, अतिशय आनंद जर कोणत्या खेळांत मिळत असेल, तर तो 'लपवलेलें हुडकून काढण्याचा' खेळ होय -- एकानें लपवावें दुसऱ्यानें हुडकून हस्तगत करावें, यापेक्षां, आपणच प्रामाणिकपणें लपवावें आणि आपणच शोधून मिळवावें यांत खूपच अधिक आनंद असतो. हा आपला स्वभाव आहे आणि मुळांत तर आत्मवस्तु लपविण्याचा आणि
पान क्र. २१२
शोधून काढण्याचा खेळ, ईश्वर आणि जीवात्मा खेळत आहेत; तेव्हां त्यांचा आनंद अतुलनीय असणार यांत संशय नाहीं; असो. अडचणींवर मात करून विजय मिळविण्यांत मनुष्याला अप्रतीम आनंद मिळतो; ज्ञान काय, सत्ता काय, निर्मिति काय, या सर्व बाबतींत अडचणींवर मात करून, अशक्य वाटणारें शक्य करून विजय मिळविण्यांत मनुष्याला अपार आनंद लाभतो; श्रम -- दु:खपूर्ण श्रम -- करून सिद्धि मिळविण्यांत, यातनेच्या कठीण दिव्यांतून पार पडून सिद्धि मिळविण्यांत, मनुष्याला पराकाष्ठेचा आनंद होतो. प्रिय माणसाचा विरह घडल्यानंतर जें दोघांचें मीलन होतें त्यांत मनुष्याला उत्कट सुख भासतें. आपलाच आत्मा जणूं आपणांपासून दूर झाला आणि तो परत भेटला म्हणजे तें भेटीचें सुख आम्हांला बेभान करतें. अज्ञान आम्हांला शोधाचा आनंद देतें म्हणून, अज्ञानाचें देखील माणसाला आकर्षण आहे; शोधाचा खटाटोप करतां करतां नवीन, अगदीं अनपेक्षित अशी कांहीं निर्मिति, हातून घडते व या निर्मितीचा आनंद फार मोठा असतो, म्हणून या आनंदाला कारण होणारें अज्ञान आम्हांला आकर्षक वाटतें; जीवात्मा साहसाचा आनंद अज्ञानामुळेंच मिळवूं शकतो, म्हणून अज्ञान त्याला कडू वाटत नाहीं, गोड वाटतें; प्रवासाचे, संशोधनाचे श्रम करून कांहीं गोष्ट प्राप्त करून घेण्यांत मनुष्याला आनंद आहे; लढाई लढून विजय-मुकुट प्राप्त करून घेण्यांत आनंद आहे; परिश्रम करून त्याचें फळ मिळो न मिळो, परिश्रमांत, लढण्यांत, संशोधनांत, प्रवासांत, साहसांत -- या क्रियांतच मुळीं मनुष्याला आनंदलाभ होत असतो. असा आमचा आजचा स्वभाव आहे या वरून, मुळांत काय घडलें असेल याचा तर्क आपण करूं शकतों : विश्व अस्तित्वांत येण्याचें, आणण्याचें रहस्य अस्तित्वाचा आनंद असेल, तर आतांपर्यंत वर्णन केलेला व्यक्ति-पुरुषाचा आनंद हें एक अज्ञानांकित, द्वंद्वमय, दर्शनी दिव्यत्वविरोधी, विश्वलीलेचें कारण आहे असें मानण्यास हरकत नाहीं. दु:खमय दिव्य प्रकटनाला जीवात्म्याची संमति कां मिळते हें कळलें. आतां ईश्वरानें हें अवघड ईश्वरत्वप्रकटन कां इच्छावें याचें उत्तर हवें. तें उत्तर असें आहे कीं, सच्चिदानंद, ईश्वर, आपल्या स्वभावाच्या बरोबर उलट अशा, अचेतनांत, अचेतनाच्या सांच्यांत आपलें सच्चिदानंदत्व पूर्णतया प्रकट करूं इच्छितो. अनंताला अनंतप्रकारें अभिव्यक्त होण्याचा अधिकार स्वभावत:च आहे आणि अचेतनाच्या सांच्यांत आपलें पूर्ण सच्चिदानंद स्वरूप भरणें हा अभिव्यक्तीचा एक
पान क्र. २१३
प्रकार आहे; तेव्हां हा प्रकार त्यानें पसंत करून त्याकरितां, त्यांतील आनंदाकरितां दर्शनी अवघड मार्ग पत्करावा यांत बुद्धीला न पटण्यासारखें कांहीं नाहीं.
पान क्र. २१४
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.