Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics, expounding a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth.
Sri Aurobindo's principal work of philosophy and metaphysics. In this book, Sri Aurobindo expounds a vision of spiritual evolution culminating in the transformation of man from a mental into a supramental being and the advent of a divine life upon earth. The material first appeared as a series of essays published in the monthly review Arya between 1914 and 1919. They were revised by Sri Aurobindo in 1939 and 1940 for publication as a book.
प्रकरण नववें
स्मृति, अहम् आणि आत्मानुभव
हा मनरूपी देव, स्वप्नामध्यें पूर्वीं एकदां अनुभवलेल्या गोष्टींचा पुन:-पुन: अनुभव घेतो, पाहिलेलें, न पाहिलेलें, ऐकलेलें, न ऐकलेलें, अनुभवलेलें, न अनुभवलेलें, अस्तित्वांत असलेलें आणि नसलेलें, सर्व कांहीं पाहतो, सर्व होतो आणि सर्व पाहतो.
- प्रश्न उप० ४.५
आपल्या खऱ्या अस्तित्वांत (स्वरूपांत) राहणें हा मोक्ष होय. अहम्ची भावना हें पतन आहे, आपल्या सत्य स्वरूपाला सोडून खालीं पडणें आहे.
- महोपनिषद् ५.२
अनेक जन्मांतून प्रवास करणारा एकच एक पुरुष आमचीं हृदयें पाहत असतो; तो सागरासारखा आहे, त्या एका सागरांत हालचालींचे सर्व प्रवाह वाहतात, तो या सर्वांचा संग्राहक आहे.
- ऋग्वेद १०-५.१
मनोमय पुरुष प्रत्यक्ष आत्मजाणिवेनें आपल्या मनोमयतेच्या पाठीमागें जातो, कालातीत किंवा नित्य वर्तमान असें जें त्याचें आत्मस्वरूप तें तो तेथें पहातो; हें त्याचें नामरूपातीत स्वरूप होय, विभक्ततेच्या भेदमय आत्मानुभवाचा प्रवाह बाह्यवर्ती व हें स्वरूप त्याच्या पाठीमागें अंतर्वर्ती असतें; या स्वरूपांत नित्य आत्मद्रव्य असतें आणि याच्यापुढें बाह्य भूमीवर या आत्मद्रव्यांतून बनलेले मनोमय आकार असतात; बाह्य भूमीवर अहम् असतो आणि याच्या पाठीमागें मनाचा आत्मा, कालातीत नित्यवर्तमान असा खरा आत्मा, वर सांगितल्याप्रमाणें असतो आणि मनाला प्रत्यक्ष आत्मजाणिवेनें त्याचें ज्ञान होतें. हें आत्मस्वरूप नित्य एकरस असतें, भूत, वर्तमान, भविष्य या मानसिक भेदाच्या पलीकडे तें ''नित्यवर्तमान'' किंवा कालातीत असें असतें. मनानें भूत वर्तमान भविष्य हा जो
पान क्र. ३८१
कालभेद केलेला असतो, त्या भेदाचा संपर्क नित्य आत्मस्वरूपाला होत नाहीं. स्थलभेद, परिसरभेद यांचाहि या आत्मस्वरूपावर कांहीं परिणाम होत नाहीं. मनोमय पुरुष सामान्यत: ''मी शरीरांत आहे, मी येथें आहे, मी तेथें आहे, मी दुसरीकडे असेन'' असें स्वत:संबंधानें बोलत असतो; पण जेव्हां तो आपल्या प्रत्यक्ष आत्म-जाणिवेचा आश्रय घेतो, हा आश्रय कायमपणें घेण्याची संवय करतो, तेव्हां त्याला लवकरच हें समजूं लागतें कीं, ही भेदमय भाषा त्याच्या बदलणाऱ्या आत्मानुभवाची आहे; हा बदलणारा भेदमय आत्मानुभव त्याच्या पृष्ठवर्ती बाह्य जाणिवेचें परिसराशीं असलेलें, घडणारें नातें व्यक्त करतो, बाह्य वस्तूंशी येणारे संबंध व्यक्त करतो. या भेदांपासून मनोमय पुरुष अलिप्तपणें दूर राहूं शकतो आणि याप्रमाणें अलिप्त राहून त्याला हें ज्ञान होऊं शकतें कीं, ज्या आत्मस्वरूपाचें ज्ञान त्याला प्रत्यक्ष जाणिवेनें होतें तें आत्मस्वरूप बाह्य भेदांनीं ? भिन्न होत नाहीं, शरीरभेदानें, मनाच्या भिन्न रूपांनीं, क्षेत्राच्या भेदांनीं त्या आत्मस्वरूपांत कांहीं फरक होत नाहीं. हें आत्मस्वरूप तत्त्वत: विशेषशून्य, संबंधशून्य शुद्ध जाणीवयुक्त अस्तित्व आहे, तें स्वयंपूर्ण आहे, स्वत:च्या शुद्ध अस्तित्वाच्या शुद्ध आनंदानें नित्य आनंदमय असें आहे. निश्चल आत्मा याप्रमाणें आमच्या प्रतीतीला येतो, नित्य अक्षर अस्ति, अस्मि हें त्याचें स्वरूप आहे, तेथें व्यक्तित्व (अहम्) नाहीं, काल नाहीं; अहम्, व्यक्तित्व ही कालगत कालांकित वस्तु आहे.
निश्चल आत्म्याची कालातीत जाणीव स्वत:मध्यें कालतत्त्वहि पाहूं शकते; बदलणारा अनुभव या कालाच्या क्षेत्रांत (आंतरिक क्षेत्रांत) आत्म्याला येत असतो, किंवा असेंहि म्हणतां येतें कीं, बदलणाऱ्या अनुभवाला कारण कालच असतो. अशा या भेदमय अनुभवाचें कारण किंवा आंतरिक क्षेत्र असणारा काल हा स्वत:मध्यें प्रतिबिंबित झालेला असा निश्चल आत्म्याला दिसत असतो. अशा स्थितींत निश्चल आत्मा नित्य 'मी' चें रूप धारण करतो आणि या नित्य 'मी' च्या अक्षर नित्य जाणिवेच्या पृष्ठभागावर कालाच्या क्रमांत बदलणारा अनुभव आपलें आसन ठेवतो. तलवर्ती नित्य जाणीव आणि पृष्ठवर्ती अनित्य, सारखी बदलणारी जाणीव अशा दोन जाणिवा, एक (नित्य) आधारभूत आणि दुसरी (अनित्य) त्या आधारावर आपलें कार्य करणारी असा देखावा निर्माण होतो. पृष्ठवर्ती जाणीव आपल्या अनुभवांत सारखी भर टाकीत असते, आपल्या अनुभवांतून कांहीं अनुभव सारखा त्याज्य
पान क्र. ३८२
म्हणून बाजूला टाकीत असते -- आणि या संग्रहानें आणि त्यागानें, दोन्हीं कृतींनीं आपल्या स्वरूपांत सारखा बदल करीत असते; ''क्षणापूर्वीं मी जो होतो, तोच मी या क्षणीं आहे'' असें प्रामाणिकपणें पृष्ठवर्ती आत्म्याला (जाणिवेला) म्हणतां येत नाही. तलवर्ती आत्मा (जाणीव) मुळींच बदल न होणारा असा असतो. त्याच्याच आधारावर, त्याच्याच पोटीं पृष्ठवर्ती आत्मा सारखा बदलत, आपली अनुभवाची वाढ करीत असतो. पण ज्यांना या पृष्ठवर्ती आत्म्याखेरीज दुसऱ्या तलवर्ती आत्म्याची ओळख नाहीं, किंवा तिकडे वळण्याची संवय नाहीं, त्यांना आपलें स्वरूप पृष्ठवर्ती आत्मा हेंच आहे असें स्वाभाविकपणें वाटतें. अर्थात् बुद्धपंथीयांप्रमाणें हा आत्मा कल्पना, अनुभव व क्रिया यांचा सतत वाहणारा प्रवाह आहे, त्या प्रवाहाचे घटक सारखे बदलत असतात हें त्यांना पटतें आणि खरा नित्य आत्मा म्हणून कांही वस्तु नाहीं, या अनित्य-नित्य अनुभव-प्रवाहामागें शून्याचें ''अस्तित्व'' आहे हा बौद्ध सिद्धान्त त्यांना मान्य होतो. ज्ञानाचा अनुभव येतो पण ज्ञाता कोणीहि नसतो; अस्तित्वाचा अनुभव येतो पण अस्तित्वांत कोणीहि नसतो; बदलत्या घटकभूत गोष्टींचा अनुभव येतो, पण या बदलत्या घटकांना एकत्र करणारी एक वस्तू नसते; या निरनिराळ्या अनुभवांतून, त्यांच्या संयोगानें दोन भ्रम निर्माण होतात -- ज्ञाता, ज्ञेय (ज्ञात) व ज्ञान हा एक भ्रम; पुरुष, अस्तित्व आणि अस्तित्वाचा अनुभव हा दुसरा भ्रम. असा एकंदर शून्यवाद्यांचा सिद्धान्त आहे. नित्य परिवर्ती पृष्ठवर्ती आत्म्याचे उपासक हा मान्य करूं शकतात -- किंवा दुसरा कालवाद्यांचा सिद्धान्तहि मान्य करूं शकतात. कालवाद्यांचा सिद्धान्त असा आहे कीं, काल ही खरी सत्य वस्तु आहे, आणि हे आत्मे (पृष्ठवर्ती आत्मे) या कालाचीं अपत्यें आहेत. याप्रकारें पुरुष, आत्मा (नित्य जाणीवयुक्त अस्तित्व) हा भ्रम आहे असा निर्णय, पृष्ठवर्ती आत्म्याकडे अलिप्ततेनें पाहणाराला घ्यावा लागतो, अर्थात् पृष्ठवर्ती आत्मा हेंच आपलें नित्य बदलणारें स्वरूप आहे असें मानणारा तो असतो. अशा मान्यतेच्या विचारकाला विश्व खरें वाटत असेल किंवा खोटें वाटत असेल. आत्मा (नित्य) मात्र खोटा वाटतो, भ्रमरूप वाटतो; दुसरे जे विचारक, अपरिवर्ती नित्य एकरस अशा अंतर्वर्ती तलवर्ती आत्म्यावर लक्ष केन्द्रित करतात, त्यांना विश्व असत्य दिसतें, भ्रमरूप दिसतें, आत्मा मात्र एकमेव सत्य आहे अशी त्यांची निश्चिति असते. आत्म्याखेरीज बाकी सर्व (अनात्मा)
पान क्र. ३८३
सारखें बदलणारें दिसतें आणि हें सर्व बदलणारें वस्तुजात जाणिवेची एक जादुगारी आहे, आभासोत्पादक कला आहे असें ते मानतात.
आतां पृष्ठवर्ती बाह्य जाणिवेच्या व्यवहाराच्या खऱ्या गोष्टी काय आहेत हें पाहणें उपयुक्त होईल. कोणतीहि उपपत्ति बसवून, निदर्शनास आलेल्या गोष्टींचें स्पष्टीकरण करण्याचे काम सध्यां बाजूला ठेवूं. शून्यवादी, कालवादी, मायावादी उपपत्ती वर दिल्या आहेत; त्यानंतर आणखी कांहीं उपपत्ती देण्याची घाई न करतां पृष्ठवर्ती जाणिवेकडे बारकाईनें पाहणें व तिच्या संबंधांतील वास्तव गोष्टीची इत्थंभूत माहिती करून घेणें उपयुक्त होईल. या संबंधांत पहिली गोष्ट ही कीं, पृष्ठवर्ती जाणीव ही आत्म्याची शुद्ध आंतरिक मानसिक घटना आहे. कालबिंदु सारखा बदलत असतो, त्वरेनें बदलत असतो, या बदलण्याला क्षणभर देखील आळा घालणें अशक्य आहे. स्थल-परिस्थिति मुळींच न बदलली, तरी कालबिंदूंच्या धांवण्यामुळें जाणिवेंत सारखा बदल होत असतो. जाणीव ज्या शरीरांत राहते, ज्या रूपांत राहते, त्या शरीरांत त्या रूपांत सारखा बदल होत असतो; त्याचप्रमाणें या शरीराची, या रूपाची ज्या बाह्य परिस्थितींत (विश्वशरीरांत) बैठक असते, त्या परिस्थितींतहि सारखा फरक होत असतो. जाणिवेवर दोन्ही गोष्टींचा परिणाम होत असतो; शरीराचा परिणाम अधिक होतो, बाह्य परिस्थितीचा परिणाम यापेक्षां कमी होतो, कारण स्वतःच्या शरीरांतील फरकांचें प्रत्यक्ष ज्ञान जाणिवेला होत असतें, विश्वांतील (विश्व शरीरांतील) फरकांचें ज्ञान इंद्रियांच्या द्वारां अप्रत्यक्षपणें होत असतें; तसेंच विश्वाचा शरीरावर परिणाम होऊन, मग त्याच्याद्वारां जाणिवेवर परिणाम होत असतो, म्हणजे हाहि परिणाम अप्रत्यक्षच असतो. कालाचा बदल जितका त्वरेनें होत असतो, व त्वरेनें भासत असतो, तितक्या त्वरेनें शरीरगत किंवा परिस्थितिगत फरक त्वरेनें होतहि नाहीं व भासतहि नाहीं; तथापि हा फरक क्षणाक्षणाला होत असतो, ही गोष्ट खरी आहे आणि हा फरक थांबविण्यासारखा नसतो हीहि गोष्ट खरी आहे. पण आपणाला असें आढळून येतें कीं, हे जे बदल होतात, त्यांत जाणिवेवर परिणाम करणारे, त्याच्या मानसिक अनुभवांत बदल करणारे, त्या अनुभवांत नवे संस्कार उत्पन्न करणारे, त्याच्या मानसिक देहांत संस्कार व फरक करणारे असे जेवढे बाह्य शरीरांतील व बाह्य विश्वांतील बदल असतील त्यांचीच दखल मनोमय पुरुष घेतो -- या गोष्टीचें कारण असें
पान क्र. ३८४
कीं, मनाच्या द्वारांच मनोमय पुरुषाला बदलत्या शारीर गृहाची आणि बदलत्या विश्व-घटनांची ओळख होते. याप्रकारें कालबिंदूचा बदल, स्थलक्षेत्राचा बदल, यांजबरोबर कालाच्या प्रवाहांत आणि स्थलाच्या विस्तारांत, एकंदर परिसरांत सारखा बदल होत असतो आणि या बदलाचा परिणाम म्हणून मानसिक व्यक्तित्वांत सारखा बदल घडून येत असतो. आमचा पृष्ठवर्ती बाह्यदर्शनी आत्मा म्हणजे ही मनोमय व्यक्ति होय. परिसराचा बदल तत्त्वज्ञानांत कार्यकारणभाव या नांवानें ओळखला जातो; कारण विश्वाच्या व्यवहाराच्या प्रवाहांत पूर्वींची घटना (स्थिति) नंतरच्या घटनेचें (स्थितीचें) कारण आहेसें भासतें, किंवा असें म्हणतां येईल कीं, नंतरची अवस्था, व्यक्ति, पदार्थ, शक्ति यांच्याकडून घडलेल्या पूर्वक्रियेचा वा क्रियांचा परिणाम आहे असें दिसत असतें. तथापि असेंहि असूं शकेल कीं, कारण म्हणून ज्या गोष्टीला आम्ही नांव देतों ती गोष्ट परिस्थितीचा केवळ एक घटक असेल. तेव्हां मनाला स्वत:च्या व आत्म्याच्या अस्तित्वासंबंधीं प्रत्यक्ष आत्म-जाणीव असते आणि त्याबरोबर अप्रत्यक्ष आणि बदलणारा असा आत्मानुभव असतो. या त्याच्या बदलत्या अनुभवाचे तें दोन भाग पाडतें; एक आंतरिक अनुभव; यांत सारख्या बदलणाऱ्या व्यक्तिगत मानसिक अवस्था येतात; दुसरा भाग बाह्य अनुभव; यांत सारख्या बदलणाऱ्या परिस्थिती येतात. परिस्थिति आणि व्यक्ति यांचा कार्यकारणसंबंध त्याला अनुभवास येतो; व्यक्तीच्या क्रिया सर्वथा किंवा अंशत: परिस्थिति घडविते आणि व्यक्तीच्या कृतींनीं परिस्थितींत बदल होतो अशी अन्योन्य कार्यकारणभावाची स्थिति या ठिकाणीं अनुभवास येते. पण हा सर्व अनुभव मूलत: आंतरिक किंवा मानसिकच असतो -- कारण ज्याला बाह्य वस्तुविषयक अनुभव म्हणून आम्ही ओळखतो, तो अनुभवहि मनाला प्रतीत होतो तो मानसिक संस्कारांच्या द्वारांच प्रतीत होतो. हा जो पृष्ठवर्ती मनाचा दोन प्रकारचा अनुभव, त्याच्या बाबतींत स्मृतीचा फार उपयोग होतो. प्रत्यक्ष आत्मजाणीव हा जो मनाचा व्यापार आहे, त्यांत स्मृतीला एवढेंच काम असतें कीं, तिनें मनाला त्याच्या पूर्व अस्तित्वाची आठवण करून द्यावी, प्रस्तुत क्षणांत तें आहे तसेंच तें पूर्व क्षणांतहि होतें ही आठवण मनाला करून देणें एवढेंच काम प्रत्यक्ष ज्ञानाच्या विषयाच्या (आत्मजाणिवेच्या) बाबतींत स्मृतीला असतें. पण भेदमय असा जो पृष्ठवर्ती जाणिवेचा अनुभव आहे, त्याच्या बाबतींत स्मृतीला फार महत्त्वाचें स्थान आहे. स्मृति ही मनांत जुने
पान क्र. ३८५
नवे अनुभव जोडणारी शक्ति आहे; भूत आणि वर्तमान व्यक्तित्व जोडणारी शक्ति आहे. अनुभवांचा गोंधळ आणि अनुभवांची ताटातूट पृष्ठवर्ती मनांत होऊं नये, अनुभवाचा प्रवाह अखंड असा त्या मनांत प्रतीत व्हावा यासाठीं स्मृतिशक्ति उपयोगी पडते. मात्र स्मृतीचें महत्त्व वर्णितांना तिच्या संबंधांत अतिशयोक्ति होण्याचा संभव असतो -- अहम्-बुद्धि ही स्मृतीनेंच केवळ बनते असा जो स्मृतिसंबंधाचा गैरसमज आहे, तो स्मृतीच्या कार्याची कल्पना अतिशयोक्त केल्यानें होत असतो. स्मृति ही वस्तुत: एक मध्यस्थ शक्ति आहे, अनुभव घेणारें इंद्रियरूप मन आणि अनुभवांचें एकत्रीकरण करणारी बुद्धि या दोहोंना जोडणारी शक्ति स्मृति ही आहे. अनुभवाचा भूतकालीन भाग स्मृति बुद्धीपुढें ठेवते, हेंच तिचें मुख्य काम आहे. मन पृष्ठभागावर क्षणाक्षणांतून धांवत असतें व अनुभव घेत असतें -- घेतलेले अनुभव तें क्षणींक्षणीं बरोबर घेऊन धांवूं शकत नाहीं -- ते अनुभव कोठें तरी सांठविणें मनाला भाग पडतें. ते सांठविण्याची जागा म्हणजेच स्मृति.
मनाच्या कार्याचें बारीक पृथक्करण करून, त्यांत कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात तें पाहणें आतां आवश्यक आहे. या कार्याचे चार घटक दिसतात. मानसिक जाणिवेचा विषय, मानसिक जाणिवेची जाणण्याची कृति, ही कृति करण्याचा प्रसंग आणि कृति करणारा पुरुष, आत्मा, अहम्. आंतला आत्मनिरीक्षण करणारा जो मनोमय पुरुष असतो, त्याला निरीक्षणांत जो स्वानुभव येतो, आपल्या स्वरूपाचा अनुभव येतो त्यांत जाणिवेचा विषय पाहिल्यास, तो, स्वतःची (जाणीवयुक्त अस्तित्वाची) एखादी अवस्था, एखादी हालचाल, एखादी लहर असा कांहींतरी असतो. राग, दुःख किंवा दुसरी एखादी भावना, प्राणमय पुरुषाची भूक किंवा दुसरी एखादी निकड, जीवनाची आंतर प्रतिक्रिया, कसली तरी संवेदना, दर्शन, वैचारिक कृति -- असाच कांहींतरी विषय मनाच्या जाणिवेला असतो. जाणिवेच्या विषयानंतर जाणिवेची ज्ञानकृति पाहिली, तर ती वरील विषयांचें मानसिक निरीक्षण, विचारकृत मूल्यमापन या स्वरूपाची असते; एखाद्या भावनेची वगैरे मनोमय संवेदना, ज्या संवेदनेंत निरीक्षण आणि मूल्यमापन अंतर्भूत आहे किंवा विलीन झालेलें आहे अशी संवेदनाहि जाणिवेची कृति म्हणून आपल्या प्रत्ययास येते. या संवेदनारूप कृतींत मनोमय पुरुष जाणिवेची कृति आणि जाणिवेचा विषय कांहीं लक्षणांच्या आधाराने अलग अलग ठेवतो किंवा कृतीचा
पान क्र. ३८६
व विषयाचा अलगपणा, त्याचा गोंधळ झाल्यामुळें, त्याला कायम ठेवतां येत नाहीं. उदाहरणासाठीं क्रोधमय जाणीव घेऊं. मनोमय पुरुष केव्हां केव्हां क्रोधाशीं एकरूप होऊन जातो, क्रोधापासून स्वत:ला अलग ठेवीत नाहीं, त्याजवर विचार करीत नाहीं, त्याजवर दाब आणीत नाहीं, त्याच्यापासून घडणाऱ्या कृतीवर नियंत्रण ठेवीत नाहीं. पण केव्हां केव्हां तो आपली क्रोधमय स्थिति आपल्यापासून अलग ठेवून तिचें निरीक्षण करतो, तिच्यावर विचार करतो, आणि अशा शब्दांत आपलें निरीक्षण मांडतो कीं, ''मी रागावलों आहे''. पण जाणिवेच्या क्रोध या लहरीशीं मनोमय पुरुष जेव्हां एकरूप होतो, तेव्हां तो पुरुष, त्याची स्वानुभवाची कृति (क्रोधाचें निरीक्षण), आणि त्याच्या स्वानुभवाचा विषय (मनाचें क्रोधरूप होणे), या तीन वस्तु एकत्र गुंडाळल्या जातात; गतिमान् जाणीवशक्तीची एक लहर (क्रोध) हें रूप त्या तीन वस्तूंच्या गुंडाळीला येतें. उलट, ''मी रागावलो आहे'' असें विधान करणारा पुरुष वरील तीन वस्तू त्वरेनें अलग अलग करीत असतो आणि आत्मानुभवाची कृति (क्रोधाचें निरीक्षण) आणि आत्मानुभवाचा विषय (क्रोध) यांजमध्यें असलेलें अंतर कमीअधिक प्रमाणांत कायम ठेवतो. जाणिवेचा विषय जी क्रोधभावना तिच्यापासून अलग राहिल्यानें, मनोमय पुरुषाला स्वत:च्या रूपान्तराचा क्रम डोळसपणें बघतां येतो, आपल्या जाणीवशक्तीची हालचाल निरीक्षतां येते, स्वत:चें बदलतें रूप पाहून, त्यापासून अलग राहून, त्याचे गुणदोष पाहतां येतात, आणि अलगपणा पुरता असल्यास, विषयरूप भावनेचें नियंत्रण करून, तिच्यापासून स्वाभाविकपणें घडणाऱ्या कृतीचें नियंत्रण करतां येतें; आपलें रूपान्तरहि थोडेंबहुत नियंत्रित करतां येतें.
परंतु आत्मनिरीक्षणाच्या कृतींत बहुधा एक उणीव राहत असते. जाणिवेचा विषय आणि जाणिवेची निरीक्षणकृति यांजमध्यें थोडाबहुत अलगपणा राखला जातो; पण मनोमय पुरुष आणि मनाची (जाणिवेची) निरीक्षणकृति यांजमध्यें अलगपणा राखावा तसा राखला जात नाही. पुरुष आणि त्याची निरीक्षणकृति यांची एक गुंडाळी केली जाते; तसेंच पुरुष जे भावनामय रूपान्तर धारण करतो, त्यांत आणि पुरुषांत अलगपणा राखावा तसा राखला जात नाहीं. माझ्या अस्तित्वाचें जाणीवयुक्त द्रव्य क्रोधभावनेनें रूपान्तरित झालेलें मी पाहतो आणि या रूपान्तराचें वैचारिक ग्रहणहि मी पाहतो; या दोन्हीं अवस्थांत मी
पान क्र. ३८७
आहे हें माझ्या लक्षांत येतें. पण वैचारिक ग्रहण हेंहि माझें रूपान्तरच आहे, मी नव्हे हें माझ्या स्पष्ट लक्षांत येत नाहीं; माझ्या मनाच्या व्यापारांत मी गुडाळला जातो, त्यांशीं एकरूप होतो, त्याजपासून अलग, मोकळा राहत नाहीं. माझीं रूपान्तरें आणि त्यांचें ग्रहण (हेंहि एक रूपान्तरच असतें) यांजपासून माझें अलगपण माझ्या प्रत्यक्ष अनुभवास येत नाहीं; माझ्या क्रियाशील जाणिवेला जीं रूपें येतात, माझ्या मानसिक आणि प्राणिक स्वभावाचें द्रव्य जी जाणीवशक्ति, तिच्या सागरासमान विस्तारावर ज्या लहरी उठतात, त्या लहरींत माझ्या क्रियाशील जाणिवेला जीं रूपें मी देतों, किंवा असें म्हणा कीं, त्या लहरीत माझ्या क्रियाशील जाणिवेचीं जीं रूपें मी धारण करतों -- त्या रूपांहून मी अलग आहे, वेगळा आहे ही जाणीव मला प्रत्यक्षपणें होत नाहीं; मनोमय पुरुष आणि त्यानें स्वतःचा अनुभव घेण्याची त्याची कृति यांत पूर्ण अलगपणा मला राखतां आला तरच प्रथम, शुद्ध अहमचें स्पष्ट व पूर्ण ज्ञान मला होतें, आणि शेवटीं साक्षी आत्म्याचें ज्ञान, विचार करणाऱ्या मनोमय पुरुषाचें स्पष्ट ज्ञान मला होतें; हा पुरुष, हा आत्मा, क्रोधमय होतो, आपली क्रोधमयता पाहतो, पण या क्रोधानें किंवा क्रोधनिरीक्षणानें त्याच्या अस्तित्वांत कांहीं कमीअधिक होत नाहीं; त्याच्या स्वरूपावर कांहीं बंधन, मर्यादा येत नाहीं. उलट तो शाश्वत असा अनुभव-घटक असतो; त्याला अमर्याद आणि क्रमवार अशा जाणिवेच्या हालचाली दिसत असतात, हालचालीचे अनुभव येत असतात. या सर्व क्रमवार हालचालींत व हालचालींच्या अनुभवांत त्याला स्वतःचें अस्तित्व वेगळेपणानें जाणवत असतें. शिवाय या क्रमवार हालचालींच्या पाठीमागें त्यांना आधारभूत, त्यांना सामावून घेणारें असें स्वतःचें स्वरूप त्याला दिसत असतें; त्याचें अस्तित्व नेहमीं एकरूप असें त्याला दिसतें, त्याची स्वरूपशक्ति नेहमीं सारखी असते -- त्याची जाणीवशक्ति मात्र अनेक बदलणारीं रूपें आणि अवस्था यांतून जात असतांना त्याला दिसते. याप्रमाणें हा साक्षी आत्मा, अक्षर अपरिवर्तनीय स्वरूपाचा आहे आणि त्याबरोबरच तो कालाच्या क्रमांत सारखीं रूपान्तरें, नवीं नवीं रूपे नित्य धारण करीत राहणारा आहे.
आत्मे दोन नाहींत, एकच आत्मा, जाणीवयुक्त पुरुष आहे. तो आपल्या जाणीवयुक्त शक्तीच्या लहरी उठवितो आणि या लहरींत तो लहरीनुसार स्वतःला बदलतांना दिसतो; वस्तुत: त्यांत कांहीं बदल होत नाहीं,
पान क्र. ३८८
कमीअधिक होत नाहीं. भौतिक विश्वांत मूळ भौतिक द्रव्य किंवा भौतिक शक्ति कधींहि कमीअधिक होत नाहीं -- तिच्या घटकतत्त्वांचे संयोग सारखे बदलत असतात. तशीच एका अक्षर आत्म्याच्या दर्शनी परिवर्तनाची गोष्ट आहे. भौतिक शक्तीकडे पाहणारी जी जाणीव आहे तिला ही अक्षर शक्ति बदलतांना दिसते. कारण ही जाणीव वरच्या देखाव्यांतच गढून राहते. मूळ अस्तित्व, मूळ द्रव्य, मूळ शक्ति यांची ओळख जोपर्यंत या पृष्ठवर्ती जाणिवेला होत नाहीं, तोपर्यंत तिला मूळ द्रव्यांत (शक्तींत) बदल होत आहे असेंच दिसणार. ही वरवर पाहणारी जाणीव आंत शिरून, तिनें खोल असलेल्या अक्षर वस्तूचें (भौतिक शक्तीचें) ज्ञान करून घेतलें, म्हणजे वरच्या देखाव्याला ती खोटा देखावा असें म्हणून कांहीं धिक्कारीत नाहीं. तिला अक्षर अशी सत्ता, द्रव्य, शक्ति, केवळ दृश्य नसणारी, इंद्रियांना अंकित नसणारी अशी शक्ति दिसते; आणि या सत्यशक्तीचें (द्रव्याचें, सत्तेचें) खरें रूपान्तर होत आहे असेंहि दिसतें. इंद्रियांनीं हें रूपान्तर ग्रहण करतां येतें, इंद्रियांकडूनच या रूपान्तराचा संबंध आत्म्याशी लावतां येतो, म्हणूनच या रूपान्तराला मूळ सत्ताद्रव्य न म्हणतां त्या मूळ रूपाचें रूपान्तर म्हणावें लागतें. आत्मजाणिवेला जें प्रत्यक्ष दिसतें, तिच्या सर्वसमावेशक ज्ञानाला, शुद्ध निरुपाधिक ग्रहणशक्तीला जें दिसतें तें मूळ सत्ताद्रव्य म्हटलें जातें. सोपाधिक (इंद्रियांकित) ग्रहणशक्ति ज्या गोष्टींचें ग्रहण करूं शकते, त्या गोष्टी रूपान्तरित मूळ द्रव्य या सदराखालीं येतात. जी गोष्ट भौतिक मूळ सत्ता, द्रव्य वा शक्ति यांची आहे, तीच गोष्ट आत्मसत्ता, आत्मद्रव्य, आत्मशक्ति यांची आहे. आत्मा आमच्या आत्मजाणिवेकडून प्रत्यक्षपणें जाणला जातो, तो अक्षर, अव्यय, कधींहि कमीअधिक न होणारा आहे हें ज्ञान आमच्या आत्मजाणिवेला प्रत्यक्षपणें होत असतें; असें असलें तरी आमच्या मनरूप इंद्रियाला, मनोमय अनुभूतीला या अक्षर आत्म्यामध्यें अनेक रूपरूपान्तरें होत आहेत असें दिसतें. आमची मूळ जाणीव मनाच्या उपाधीनें ग्रासली म्हणजे तिला आत्मा अनेक रूपें घेतांना दिसतो. मूळ शूद्ध जाणिवेला तो न बदलणारा, सदैव एकरस असा दिसतो.
आम्हांला अनुभवांचा क्रमवार प्रवाह दिसतो; अनुभव घेणारी जाणीव स्वतःच्या शुद्ध स्थितींत अनुभव घेत नाही, तर मनाच्या उपाधीद्वारां अनुभव घेते; अनुभवांची क्रमशीलता या उपाधीमुळेंच उत्पन्न होते.
पान क्र. ३८९
स्मृति ही योजना या मनाला मदत करण्यासाठीं आहे. मनाची ही प्राथमिक अनुभवपद्धति आहे कीं, कालाचे क्षणरूप तुकडे करावयाचे, कालाच्या तुकड्यांच्या आधारें आपले स्वतःचे तुकडे करावयाचे आणि या क्षणांकित, क्षणनिष्ठ अशा स्वतःच्या अंशांनीं अनुभव घ्यावयाचा. जाणिवेनें एखादें रूप घेतलें, अस्तित्वाची जाणीवयुक्त एखादी हालचाल झाली, तर त्या हालचालीचा, त्या रूपाचा क्षणनिष्ठ निकटचा अनुभव मन घेतें. त्यावेळीं त्याला स्मृतीची जरूर नसते, तेव्हां स्मृति कार्यहि करीत नाहीं. उदाहरणार्थ मी रागावत आहे ही कांहीं स्मृतीची उक्ति नव्हे. ही तात्कालिक संवेदना आहे. मी रागावलों आहे हें मी पाहत आहे हीहि स्मृतीची क्रिया नाहीं. ही बौद्धिक विषयग्रहणाची क्रिया आहे; माझा अनुभव कालाच्या क्रमाशीं मी जोडूं लागलों, म्हणजे स्मृतीचा उपयोग असतो; माझ्या जाणिवेच्या क्रिया, रूपरूपान्तरें मी भूत, वर्तमान, भविष्य अशा कालविभागांनीं विभागूं लागलों, म्हणजे मनाला स्मृति उपयोगी पडते. ''एका क्षणापूर्वी मी रागावलो होतों'', ''मी रागावलों आहे, अद्यापि रागांत आहे'' ''एकदां मी रागावलों होतों, तसाच प्रसंग पुन: प्राप्त झाला, तर पुन्हां मी रागावेन'' या विधानांत स्मृति उपयोगांत आली आहे. होऊन गेलेल्या (भूतकालीन) अन्यायाची वा दुःखाची स्मृति, दुःख किंवा राग ही भावना मनांत उभी करते; तात्कालिक प्रसंग पूर्वप्रसंगाची आठवण करून देऊन, जुनें दुःख किंवा राग पुन्हा मनांत उभा करतो -- या दोनहि ठिकाणीं स्मृति ही जाणिवेच्या हालचालीचा, विचाराचा भाग बनली आहे; कारण या हालचालीचा प्रसंग सर्वथा किंवा अंशत: भूतकालीन आहे. जाणिवेच्या पृष्ठभागावर आमचें भूतकालीन जीवन आम्हीं ठेवूं शकत नाहीं, राखूं शकत नाहीं, म्हणून हरवलेली किंवा अस्तित्वांतून गेलेली वस्तु परत मिळवावी त्याप्रमाणें आम्हांला हें भूतकालीन जीवन परत जाणावयाचें आहे व हें काम स्मृतीचा उपयोग करून आम्ही करतो -- विचारशील मनाची विचाराची (वगैरे) पुनरावृत्ति करण्याची आणि विचार वगैरे एकमेकांना जोडण्याची क्रिया हें स्मृतीचें स्वरूप आहे -- आमच्यांतील भूतकालीन जीवन जाणिवेच्या पृष्ठभागावर आम्ही राखूं शकत नाहीं, असें वर म्हटलें आहे, तेथें हें आम्हीं ध्यानांत ठेवावयास हवें कीं, हें भूतकालीन जीवन या पृष्ठभागाच्या खालीं, पाठीमागें, आंत सदैव उपस्थित असतें एवढेंच नव्हे, तर बहुधा तें तेथें क्रियाशीलहि असतें. विचारशील मनाची
पान क्र. ३९०
दुसरी एक क्रिया किंवा शक्ति या ठिकाणीं नजरेस आणणें योग्य होईल; ती म्हणजे कल्पना होय. आमचें मर्यादित पृष्ठवर्ती मन जे अनुभव घेतें, त्या अनुभवाच्या वास्तव क्षेत्रांत ज्या वस्तू नाहींत, त्या वस्तु-कल्पना आम्ही त्याच्या क्षेत्रांत आणतो. वास्तवांत येण्यासारख्या व न येण्यासारख्या सर्व शक्य संभवनीय गोष्टी, कल्पनाशक्ति आमच्या मनाच्या म्हणजे अज्ञानाच्या क्षेत्रांत आणून सोडते.
कालाच्या क्रमांत अनुभवाच्या अखंडतेसाठीं स्मृतीची आवश्यकता असण्याचें कारण, अखंडित अशा जाणिवेच्या हालचालींची अखंडित जाणीव आमच्या ठिकाणीं शक्य नसते, आमच्या द्रष्ट्या जाणिवेला एका क्षणांतून दुसऱ्या क्षणांत धांवावें लागतें, गत हालचाल जाणिवेच्या पकडींतून निघून जाते आणि आगामी हालचाल सर्वथा जाणिवेच्या आवांक्याबाहेर असतें हें होय. वस्तुत: कालाच्या ओघांत जाणिवेमध्यें जे विकार, बदल होतात, त्यांचा एक अखंड असा प्रवाह असतो, त्यांत कोठेंहि खंड नसतो -- खंड असतो तो त्या जाणिवेंत असतो -- अज्ञानग्रस्त अशी आमची जाणीव असते आणि अज्ञानाची चाल मर्यादित असते. त्याला एका क्षणावरून दुसऱ्या क्षणावर, दुसऱ्या क्षणावरून तिसऱ्या क्षणावर असें उड्या मारीत चालावें लागतें. अस्तित्वाचा, जाणिवेचा विकार-संभार कालक्रमांत अखंड प्रवाहरूप असतो, त्याप्रमाणें अस्तित्वाचें, जाणिवेचें मूलद्रव्य, मूलतत्त्व स्थलांत विभागलेलें असें नसून त्याचाहि एक अखंड महासागर असतो; पण ज्याप्रमाणें खंडित अशा बघणाऱ्या जाणिवेमुळें कालक्रमांतील रूपरूपान्तरांचा प्रवाह खंडित म्हणून अनुभवास येतो, त्याप्रमाणें खंडित जाणिवेमुळेंच स्थलगत अस्तित्वाचा महासागर खंडित म्हणून अनुभवास येतो. आमची संवेदनाशक्ति, इंद्रियशक्ति मर्यादित आहे. अस्तित्वाचे भागभागच ती पाहूं शकते. अस्तित्वानें घेतलेले आकार ती भिन्नभिन्न असे पाहते; आणि मूळ अस्तित्वाची एकता तिच्या आवांक्याबाहेर असल्यानें हे आकार मुळांतच स्वतंत्र आहेत असें तिचें ज्ञान असतें. काल आणि स्थल या अस्तित्वाच्या व अस्तित्वविकारांच्या क्षेत्रांत वस्तूंची व्यवस्था अवश्य असते. परंतु या दोन्हीहि क्षेत्रांत मोकळी जागा, खंड, विभक्तता असें कांहींहि नसतें. सगळें क्षेत्र सागराप्रमाणें, नदीप्रमाणें अखंड भरलेलें असतें; मात्र आमच्या अज्ञानाला तें खंडित भासतें. आमच्या अज्ञानाला अपरिहार्यपणें अनुभवास येणाऱ्या मोकळ्या जागा भरून काढण्यासाठीं आणि वेगवेगळे भाग
पान क्र. ३९१
जोडून देण्यासाठी आमची मानसिक जाणीव अनेक युक्तिप्रयुक्तींचा, योजनांचा उपयोग करते. या अनेक योजनांपैकीं स्मृति ही एक उपयुक्त योजना आहे.
तेव्हां विश्वरूप सागराचा अखंड प्रवाह माझे ठिकाणीं, माझ्या अंतरंगांत असतो. त्या प्रवाहांत क्रोध, दुःख इत्यादि लहर उत्पन्न होते आणि ती बराच काळ अखंडपणें टिकूं शकते. ही अखंडता स्मृतिशक्तीचा परिणाम नसतो. अर्थात् स्मृति या लहरीचा काल लांबवूं शकेल. ही लहर पुन्हां उत्पन्न करूं शकेल -- स्मृतीच्या अभावीं ही लहर आपोआप नष्ट झाली असती, प्रवाहांत विलीन झाली असती ती स्मृतीमुळें आणखी कांहीं काळ टिकूं शकते व विरून गेलेली पुन्हां उद्भवूं शकते, ही गोष्ट खरी आहे पण वस्तुत: ही लहर कांहीं प्रसंगामुळें उत्पन्न होते. माझ्या जाणीव-शक्तीची ही लहररूप हालचाल, तिला गति देणारी जी प्रारंभीची प्रेरणा असेल तिच्या जोरावरच, काही काळपर्यंत, बऱ्याच दीर्घ काळापर्यंत टिकते, टिकूं शकते. स्मृति मधें आली, तर ती क्रोधाच्या प्रसंगाची विचारी मनाला आठवण करून देऊन जाणिवेंतील प्रक्षोभ आणखी कांही काळ टिकवूं शकते; किंवा कल्पनाशील मनाला पूर्वींच्या क्रोध-भावनेची, त्या भावनेच्या युक्ततेची, आठवण करून देऊन क्रोधभावना पुनरुद्दीपित करून तिचा काळ आणखी लांबवूं शकते. स्मृति मधें न आली, तर जाणिवेचा प्रक्षोभ हळूं हळूं समाप्त होतो; आणि त्या प्रक्षोभाला कारण झालेला प्रसंग पुन्हां उद्भवला तरच प्रक्षोभहि पुन्हां डोकें वर काढतो. कांहीं प्रसंगामुळें क्रोधादि लहर जाणिवेच्या समुद्रावर येते, हा कांहीं स्मृतीचा परिणाम नव्हे. तसेंच, तसाच प्रसंग किंवा त्या सारखा प्रसंग पुन्हां आला, तर क्रोधादि लहर पुन्हां उठते, हाहि स्मृतीचा व्यापार नव्हे. ही लहर स्मृति जोरदार करूं शकते. मनाला या लहरीच्या, अधिक अंकित करूं शकते इतकेंच. भौतिक जगांतील द्रव्य आणि शक्ति आणि मानसिक जगांतील द्रव्य आणि शक्ति यांत अंतर आहे. मानसिक द्रव्य आणि शक्ति यांत घनता कमी आहे; त्यांचे आकारविकार सुलभतेनें होतात व बदलतां येतात. तथापि तुलनात्मक दृष्टीनें अधिक घन आणि कमी सुलभतेनें आकारविकार करूं देणारें व बदलूं देणारें भौतिक द्रव्य आणि शक्ति, यांच्या बाबतींत जें कार्यकारणाचें नातें असतें तेंच मानसिक द्रव्य आणि शक्ति यांच्या बाबतींत असतें. मानसिक जगांत प्रसंग पुन्हां आला कीं
पान क्र. ३९२
त्या प्रसंगाला अनुरूप जी लहर पूर्वीं उठली होती तीच पुन्हां उठते. भौतिक जगांत कार्यकारणभाव केवळ यांत्रिक असतो. मानसिक जगांत तो तितका नसतो, इतकेंच. असें म्हणतां येईल कीं, शक्ति आणि शक्तिकार्य यांचा संबंध विशिष्ट प्रकारचा पुन्हां पुन्हां आढळुन येतो, याचें कारण, निसर्गाच्या सर्व प्रकारच्या शक्तींत (मानसिक, भौतिक इ.) अजाणती स्मृति असते -- पूर्वीं घडलेलें सांठवणारी स्मृति, सर्व प्रकारच्या नैसर्गिक शक्तीच्या पोटीं असते; आणि म्हणून विशिष्टशक्तिप्रकार आणि विशिष्ट कार्य असा संबंध आपल्या अनुभवास न चुकतां नेहमीं येतो, पण असें म्हणण्यात स्मृति या कल्पनेची व्याप्ति प्रमाणाबाहेर वाढते. म्हणून आपणांला पुनरावृत्तीचा नियम मानणें सोईचें पडतें. हा नियम येणेंप्रमाणें : जाणीव-शक्तीच्या लहरींच्या क्रियांत, ती जाणीवशक्ति एक प्रकारची सुसूत्रता राखते, विशिष्ट प्रसंग, तर विशिष्ट लहर इ. -- अशाप्रकारें प्रसंग पुनरावृत्त झाला तर लहरीची पुनरावृत्ति, असा पुनरावृत्तीचा नियम, जाणीवशक्ति आपल्या क्रियांसंबंधानें अंमलांत आणते. जाणिवेचे व्यापार बघणारें मन, आपल्या सोईसाठीं स्मृति ही वस्तु उपयोगांत आणते. कालाच्या क्रमांत, कालांकित अनुभवासाठीं, जाणिवेच्या व्यापारांची उत्पत्ति, पुनरावृत्ति वगैरे सर्व व्यापारांची जुळणी करणें हें काम स्मृतीचें आहे. जाणिवेचे व्यापार एकत्र जोडावयाचे ते इच्छाशक्तीनें त्यांच्यांत अधिकाधिक सुसंबद्धता आणून, त्याचा जीवनासाठीं अधिकाधिक उपयोग करावा, त्याचप्रमाणें बुद्धीनें त्यांचा मेळ वाढवून आपलें वाढतें मूल्यनिश्चितीचें कार्य सारखें वाढत्या प्रमाणांत करीत रहावें, यासाठीं जोडावयाचे असतात, आणि हें जोडावयाचें महत्त्वाचें कार्य, स्मृति या वस्तूकडून मन करून घेतें. अचेतनता ही आमच्या विकासाची पहिली पायरी -- ही अचेतनता शेवटीं पूर्ण जाणीव बनते; पूर्ण आत्म-जाणीवेचें रूप घेतें. मनोमय पुरूषाचें अज्ञान, आपल्या नाना रूपें घेण्याच्या व्यवहारांत, स्वतःसंबंधींची जाणीव उदयास आणतें आणि विकसित करतें -- हें जें आमचें विकासकार्य घडतें, तें स्मृति आणि इतर वस्तू किंवा योजना (प्रक्रिया) यांच्या आधारानें घडतें. हें विकासकार्य वाढतां वाढतां शेवटीं आत्मानुभवाच्या सर्व गोष्टी, मनाची इच्छाशक्ति आणि ज्ञानशक्ति यांना, पूर्णपणें उपयोगांत आणतां येऊं लागतात. विकासाचा क्रम, या प्रकारचा असल्याचें आमच्या अनुभवास येतें. स्वतांत, स्वतांच्या व्यवहारात मग्न असल्यानें जिला
पान क्र. ३९३
दुसरें कांहींहि दिसत नाहीं अशी, दिसायला मन नसलेली अशी, जड शक्ति भौतिक विश्वांत आमच्या अनुभवाला येते; या जड शक्तींतून मन ही वस्तु विकास पावते. या विकासाची प्रक्रिया पाहतां ती आतांच वर्णन केल्याप्रमाणें आमच्या अनुभवाला येते; आणि या प्रक्रियेंत स्मृतीचा महत्त्वाचा भाग असतो.
मात्र स्मृति एकटीच कांहीं हा विकास साधीत नाहीं -- मनाचें अज्ञान हें, अहम्बुद्धि ही दुसरी वस्तु स्मृतीच्या बरोबर उपयोगांत आणून मनोमय पुरुषाला स्वतःची जाणीव करून देण्याच्या कामीं यशस्वी होतें. मनोमय पुरुषाच्या व्यवहारांत, व्यवहाराचे विषयभूत पदार्थ, व्यवहाराचे प्रसंग, व्यवहाराची क्रिया आणि या सर्व गोष्टी अनुभवणारा अशा चार वस्तू असतात. अनुभवणारा जो मनोमय पुरुष, त्याला स्वतःची जाणीव होणें हें कार्य अहंबुद्धीनें मुख्यत: साधतें. अहम्-बुद्धि स्मृतीचीच बनते, असें प्रथमदर्शनीं वाटण्याचा संभव आहे. ''कांहीं वेळापूर्वीं जो रागावला होता व आतां जो पुन्हां रागावला आहे तो तोच मी आहे. कांहीं वेळापूर्वीं रागावलेला होता आणि अद्यापिहि रागावलेला आहे तो तोंच मी आहे'' हें विधान स्मृति करते असें आम्हांस वाटतें. पण स्मृति एवढेंच करूं शकते : जाणीवयुक्त क्रियेचें मर्यादित क्षेत्र जें होतें तेंच आहे. या क्षेत्रात जें पूर्वीं घडले, तेंच विकारदृश्य घडलेलें आहे एवढेंच स्मृति आपल्या सामर्थ्यानें सांगू शकते. काय घडतें तें हें : मानसिक विकार पुनरावृत्त होतो, मनोद्रव्यांत रूपघटनेची लहर पुनरावृत्त होते -- या पुनरावृत्तरूप घटनेची वा विकाराची संवेदना मनाच्या ''इंद्रियाला'' ताबडतोब होते, प्रत्यक्षपणें होते; पुनरावृत्ति वा पुनरावृत्त घटना किंवा विकार एकत्र जोडायला स्मृति येते आणि त्यायोगें मनाच्या इंद्रियाला (इंद्रियरूप मनाला) हें कळतें कीं, त्याच मनोद्रव्यांत, तोच चलनात्मक विकार, आकार घडला आहे आणि हा विकार अनुभवणारें मनाचें इंद्रियहि तेंच आहे. इंद्रियरूप मन, संवेदनाशील मन हें एक केंद्र करून तेथें आपलें बिऱ्हाड थाटतें -- अनुभवाचें क्षेत्र विस्तृत असतें. या क्षेत्रावर, संवेदनाशील इंद्रियरूप मन, घटनांच्या, विकारांच्या संवेदना घेत हिंडत बसत नाहीं, तर एक स्थान निश्चित करून तेथून सर्व संवेदनेचें काम करतें. हें जें संवेदना-केंद्र, ती ''अहम्'' बुद्धि. अहम्ची स्मृति अहंबुद्धीहून वेगळी. ही स्मृति अहम्-बुद्धीला बळकटी आणते. पण अहम्बुद्धि म्हणजे मात्र स्मृति नव्हे. खालच्या मानवेतर वर्गांतील प्राण्यांत अहमबुद्धि, व्यक्तित्व,
पान क्र. ३९४
मानवासारखें प्रगत नसतें. क्षणाक्षणांत मी तोंच आहे अशी संवेदना, इतराहून मी वेगळा आहे ही संवेदना, मानवेतर प्राण्यांत असते; आणि ही संवेदनाहि कमी-अधिक अस्पष्टच असते. मानवामध्यें ही संवेदना स्पष्ट असून शिवाय ज्ञानशील संवेदना एकत्र बांधणारें मन असतें. संवेदनाशील मनाची संवेदना आणि स्मृति, या दोहोंची क्रिया हा आपला पाया करून, हें ज्ञानशील मन अहम्बुद्धीची स्पष्ट कल्पना उभी करतें. या स्पष्ट कल्पनेबरोबर प्राथमिक प्राणिसुलभ नित्य-स्फूर्त अशी अहम् संवेदनाहि, हें मन कायम ठेवतें. ज्ञानशील मनाची अहम्-बुद्धि-विषयक कल्पना अशी असते : अहम्कडे इंद्रियासारखें विषयग्रहणाचें, भावनेचें, आठवणीचें, विचार करण्याचें काम असतें. अहम् हें सर्व काम करतें. त्याला आठवण असते, नसते. तो आठवणारा आहे आणि न आठवणारा पण आहे. जाणीवयुक्त मनोद्रव्य हें एकाच जाणीवयुक्त पुरुषाचें असतें, हें ज्ञानशील मन ओळखतें. हा पुरुष (हा अहम्) भावना वागवतो (भावनावश होतो) भावना थांबवितो (भावनाशून्य होतो); आठवतो, विसरतो; बाह्यविषयक ज्ञान मिळवितो; हें ज्ञान सोडून झोपेंत मग्न होतो. स्मृति निर्माण केली जाण्याच्या पूर्वीं हा असतो, नंतरहि हा असतो. हा बालकांत असतो, दुबळ्या, म्हाताऱ्या, अति लाड करणाऱ्या माणसांत असतो; हा झोंपेंत असतो, जागृतींत असतो. दर्शनी जाणिवेंत आणि दर्शनी नेणिवेंत असतो. हा कामें करून ती विसरतो. केल्या कामांची आठवण ठेवतो. त्याच्या व्यक्तित्वांत, त्याच्या दर्शनीं स्वरूपांत, सारखे बदल होत असतात. या दर्शनी स्वरूपांतील रूपान्तरांच्या पाठीमागें तो, कांहींहि बदल न झालेला असा, नित्य उपस्थित असतो. ज्ञानशील मन, या गोष्टी ओळखतें; मानवी अहम् च्या ज्ञानाचें मानवांमधील हें कार्य, मनांतील घटना संघटित करणारी ही त्याची बुद्धि, आत्मजाणीव, आत्मानुभव वरीलप्रकारें व्यवस्थित स्वरूपाचा करण्याचें त्याचें कार्य हें सर्व, मानवेतर प्राण्यांत आढळणारा जो स्मृतिघटित अहम् आणि संवेदनाशील अहम्, त्याजपेक्षां, त्याच्या कार्यापेक्षां, कितीतरी श्रेष्ठ पायरीवरचें आहे; आणि तें खऱ्या आत्म्याच्या ज्ञानाला अगदीं जवळ आहे, असें आपल्याला म्हणतां येतें. मानवी अहम्, मानवेतर प्राण्यांच्या अह्म् हून, खऱ्या अहम् ला (आत्म्याला) खूप जवळ आहे, असें आपण म्हणूं शकतो. निसर्गाचा उघडा व्यवहार आणि गुप्त व्यवहार, दोहोंचा जर अभ्यास केला, तर सर्व अहम्-संवेदना,
पान क्र. ३९५
सर्व अहम्-स्मृति ही एक व्यवस्थित व्यवहारासाठीं योजलेली कृति आहे असें आपल्या लक्षांत येतें. विश्वव्यापक जाणीवशक्ति अप्रत्यक्षपणें ही कृति योजीत असते. या जाणीवशक्तींत गुप्त असें ज्ञानशील मन, संघटना करणारें मन असतें. त्याजकडून ही अहम्ची कृति योजिली जाते. या ज्ञानशील मनाला विकासक्रमांत मानवाचे ठिकाणीं असलेली विवेकबुद्धि, हें स्वरूप येतें. या मानवी विवेकबुद्धीचें संघटनतत्त्व आणि तिची कार्यपद्धति, अपूर्ण आणि मर्यादित अशीच अद्यापि आहे. तिचा विकास चालूं आहे. जे अचेतन दिसतें त्याचे पोटीं गुप्त ज्ञान असतें. स्वाभाविक, मानवी बुद्धीहून श्रेष्ठ अशीं विवेकबुद्धि असते. विश्वांत ज्या बेताल वाटणाऱ्या हालचाली चालतात, त्या हालचालींत एक प्रकारची संघटना, सुसंबद्धता ही गुप्त ज्ञानशील, श्रेष्ठ बुद्धि निर्माण करीत असते.
मनुष्याचे व्यक्तित्व दुभंगतें, दोन व्यक्ती एकाच माणसांत अनुभवास येतात, एकाच माणसांत, मनाच्या दोन अवस्था, एकदां एक व नंतर दुसरी, अशा प्रतीतीस येतात. या भंगलेल्या व्यक्तित्वाच्या किंवा दुहेरी व्यक्तित्वाच्या बाबतींत स्मृतीचें महत्त्व आपल्या अनुभवास येतें. एका मनोवस्थेंत (व्यक्तित्वांत) जेव्हां मनुष्य (दुहेरी व्यक्तित्वाचा मनुष्य) असतो, तेव्हां त्या अवस्थेंत तो जसा होता, त्यानें जें कांहीं केलें होतें तेंच आणि तेवढेंच तो स्वच्छ आठवतो आणि व्यवस्थितपणें मांडतो. दुसऱ्या अवस्थेंतलें कांहींहि, त्याला पहिल्या अवस्थेंत असतांना आठवत नाहीं. एका अवस्थेंत जें आपलें नांव, जीवन, भावना हा मनुष्य व्यक्त करतो, तें नांव, जीवन, भावना दुसऱ्या अवस्थेंत व्यक्त करीत नाहीं. तेथें सर्व निराळें असतें. यावरून त्याचे ठिकाणीं भिन्न भिन्न अशा दोन व्यक्ती सुसंघटितपणें बनल्या आहेत असें म्हणावे लागतें. स्मृति हीच व्यक्तित्वाची एकमेव घटक, संघटक आहे असें या बाबतींत प्रथमदर्शनीं दिसतें. परंतु अशीहि गोष्ट अनुभवास येते कीं स्मृतीचे तुकडे झाले आहेत आणि व्यक्तित्व अभंग आहे. मनुष्यावर मोहिनीविद्येचा प्रयोग करून, त्याला झोंप आणली म्हणजे या संमोहित स्थितींत तो अशा अनुभवांचा, आठवणींचा पाढा वाचतो, कीं ज्या आठवणी, अनुभव त्याच्या जागृत मनाला मुळींच आठवत नाहींत. पण याप्रकारें जागृत मन व संमोहित मन, स्मृति भंगून तिचें दोन स्वतंत्र भाग झाल्याची, साक्ष देतात, तरी त्याचें व्यक्तित्व भंगलें आहे असें कांहीं त्यावरून म्हणतां येत नाही : तो
पान क्र. ३९६
स्वतःला अभंग व्यक्तित्वाचाच मानतो, मी जागृतींत होतो तोच संमोहित स्थितींत होतो. संमोहित स्थितींत होतो तोच पूर्वींचा मी जागृतींत आहे असेंच तो म्हणतो व तसाच तो असतो. असेंहि घडतें कीं मनुष्य आपली पूर्व जीवनकथा सर्वथा विसरतो; नांव देखील विसरतो. पण आपला अहम् बदलला आहे, आपलें व्यक्तित्व बदललें आहे, असें तो मानीत नाहीं. अर्थात् स्मृति म्हणजेच व्यक्तित्व, हें समीकरण चुकीचें ठरतें. जाणिवेची अशी अवस्थाहि शक्य आहे कीं जिच्यांत स्मृतीला मध्येंच पोकळी निर्माण झाली नाहीं; स्मृति अगदीं अखंड आहे. तरी शीघ्र विकासानें मनुष्याला आपलें सर्व अस्तित्व बदललें आहे, आपलें मन कणांकणांत वेगळें झालेलें आहे, असें प्रामाणिकपणें वाटतें. आपण नवीच व्यक्ति बनलों आहोंत, आपला जणुं नवा जन्म झाला आहे अशी प्रतीति येते. त्याला मनाचे सर्व व्यवहार संघटित करणारी बुद्धि हात न देती, तर त्याला असेंच वाटलें असतें कीं, हा नवा माणूस (जो शीघ्र विकासानें बनला आहे तो) आणि तो जुना माणूस (विकासापूर्वींचा) एकच व्यक्ति आहे, ही गोष्ट साफ खोटी आहे. आपलें शरीर तेंच आहे, आपलें मनोद्रव्य तेंच आहे ही स्मृति त्याला स्पष्ट असते. पण जुनें व्यक्तित्व आणि नवें व्यक्तित्व अगदीं अलग अलग आहेत असेंच त्याला वाटतें. एकांतून दुसरें विकसित झालेलें आहे, हें त्याला पटणें अवघड जातें. येथें स्मृति अखंडित आहे आणि व्यक्तित्व अखंडितपणें विकसित झालें आहे. पण विकासाच्या शीघ्रतेमुळें नव्या जुन्या व्यक्तित्वाची एकता पटणें दुःसाध्य होतें. या सर्व घटनांचा विचार करतां असें दिसतें कीं, जाणिवेचे विकारव्यवहार अलग अलग टिपणारी मनाची संवेदनाशक्ति, ही पायाभूत प्रमुख शक्ति आहे. स्मृति जणुं धागा आहे; संवेदनाशक्तीनें टिपलेले अनुभव या स्मृतीच्या धाग्यांत ओंवले जातात. संवेदनाशक्तीनें स्वतःचा स्वत: अनुभव घेणारें मन, आपले अनुभव स्मृतीच्या धाग्यांत ओंवण्याचें काम करतें. नंतर सर्व मनोव्यापारांचें संघटन करणारी मनाची शक्ति (बुद्धि) स्मृतीनें पुरविलेलें सर्व साहित्य, भूत, वर्तमान, भविष्य जोडणारे तिचे जोड (दुवे), सर्व एकत्र जुळविते आणि अहम्शीं त्या सर्वाचा संबंध जोडते. हा अहम् कालाच्या सर्वक्षणांत एकरूप असतो. अनुभव बदलत रहातात, व्यक्तित्व बदलत रहातें, पण हे सर्व बदल होत असतां अहम् मात्र बदलत नाहीं, सदैव एकरूप राहतो.
पान क्र. ३९७
मनोमय पुरुषाचे ठिकाणीं खरें आत्मज्ञान विकसित होण्यासाठीं प्राथमिक पाया, पूर्वतयारी, एवढेंच अहम्संवेदनेचें महत्त्व आहे. आकार धारण करणारें देहधारी मन क्रमश: विकसित झालें आहे व होत आहे. त्याचा आरंभ अचेतनतेपासून झाला व तें शेवटीं स्वतःचें ज्ञान प्राप्त करून घेणार आहे, स्वतःचें ज्ञान नाहीं, वस्तुजाताचेंहि ज्ञान नाहीं, येथपासून देहधारी मनाचा आरंभ झाला; तें स्वतःचें ज्ञान आणि वस्तुजाताचें ज्ञान शेवटीं पूर्णतया मिळविणार आहे -- इतकी त्याची प्रगति होणार आहे; आज ते येथवर प्रगत झालें आहे; त्याच्या पृष्ठवर्ती जाणिवेंत जे विकार, व्यवहार घडतात ते अहम् चे आहेत, असें ज्ञान त्याला होतें. हा अहम् मनाच्या पृष्ठवर्ती विकारांचा ज्ञाता, कर्ता, भोक्ता असतो. या अहम् संबंधानें देहधारी मनाची अशी कल्पना असते कीं, तो जाणिवेच्या विकारांशीं अंशत: एकरूप असतो. अंशत: तो या विकारांपलीकडे असतो, विकारातीत असतो. हा अहम् शाश्वत आहे, अविकार्य आहे, अशीहि मनाची त्याच्यासंबंधानें कल्पना होते. बुद्धीची मदत घेऊन -- वस्तूमध्यें भेद करणें व भिन्न वस्तूंना संघटित करणें, हें जिचें काम आहे, अशा बुद्धीची मदत घेऊन -- मन असें ठरवूं शकतें कीं, जाणिवेचे विकार हेच त्याच्या खऱ्या आत्मगत अनुभवाचे घटक आहेत. आत्मा सारखा बदलत आहे, हाच त्याचा खरा आत्मानुभव आहे. तदितर जें कांहीं, ती मनाची मिथ्या कल्पना आहे. अर्थात् शाश्वत अस्तित्व म्हणून मुळांत कांहीं नाहीं. जें आहे तें नित्य बदलणारें तत्त्व आहे; नित्य बदलण्याची क्रिया आहे. उलटपक्षीं, त्याच बुद्धीच्या आधारानें मन असाहि निर्णय घेऊं शकतें कीं, त्याचा आत्मा शाश्वत अस्तित्वरूप आहे. या शाश्वत आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव हाच त्याचा आत्मानुभव आहे; आणि जाणिवेचा विकार, व्यवहार सर्व खोटा आहे, विकार, व्यवहार आहे, ही गोष्ट प्रथम तें कबूलच करीत नाहीं. अविकार्य आत्माच फक्त अनुभवास येतो असा त्याचा आग्रह असतो -- पण विकाराची दखल त्याच्या जाणिवेला घ्यावी लागली, तर मन आणि इंद्रिय यांनी उभा केलेला तो मिथ्या पसारा आहे किंवा तो कनिष्ठ अस्तित्वाचा अर्थशून्य देखावा आहे, असा तें निर्णय घेतें.
विभक्तपणावर आधारलेली अहम्संवेदना ज्याचा पाया आहे तें आत्मज्ञान पूर्ण असूं शकत नाहीं. कोणतेंच ज्ञान अहम् च्या एकट्या पायावर किंवा प्रमुखतः या पायावर उभारलें गेलें, तर तें पूर्ण होऊं
पान क्र. ३९८
शकत नाहीं, अहम्संवेदनेची प्रतिक्रिया, हा ज्या ज्ञानाचा पाया केला जाईल, तें देखील निश्चितपणें पूर्ण होऊं शकत नाहीं. अहम्संवेदनेवर आधारलेलें ज्ञान वरवरच्या (पृष्ठवर्ती) मानसिक व्यवहाराचें असतें, वरवरच्या मानसिक अनुभवांचें असतें. या पृष्ठवर्ती मानसिक व्यवहारांचे पाठीमागें जे जाणिवेचे व्यापार फार मोठ्या प्रमाणांत चाललेले असतात, ते सर्व या अहम् च्या ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर असतात. अर्थात् हें अहम् चें ज्ञान, त्या संबंधांत अज्ञानच असतें. दुसरी गोष्ट, व्यक्ति आणि व्यक्तीचे अनुभव यांत जें कांहीं अस्तित्वाचें आणि त्याच्या पोटी होणाऱ्या रचनांचें, घटनांचें ज्ञान, मर्यादित ज्ञान असेल, तेवढेंच अहम् च्या ज्ञानात येऊं शकतें. या अहम्ला त्याचेखेरीज जें जग, तें सर्व ''अनात्मा'' असतें. सर्व जग स्वतःच्या अस्तित्वाचा एक भाग आहे, ही प्रतीति अहम्ला नसते, त्याची जाणीव जगाशीं एकरूप नसते, अलग स्वतंत्र असते; आणि जग स्वतःबाहेर, या जाणिवेबाहेर असून, तें स्वतःच्या जाणिवेचा विषय म्हणून स्वत: समोर येतें, अशी अहम्ची कल्पना असते. व्यक्तीला (अहम्ला) स्वतःच्या अस्तित्वाचें आणि त्याच्या पोटीं घडणाऱ्या घटनाचें जसें प्रत्यक्ष ज्ञान होतें, तसें तें जगाच्या विशाल अस्तित्वाचें आणि त्या अस्तित्वाच्या पोटी घडणाऱ्या विशाल निसर्गगत घटनांचें होत नाही अर्थात् अहम्चें या बाबतींत अज्ञानच विशाल असतें, ज्ञान अगदीं मर्यादित असते. विशाल अज्ञानाच्या विस्तारामध्यें अगदीं मर्यादित ज्ञान वर डोकें काढतें, ही अहम्च्या 'आत्मज्ञानाची' खरी स्थिति असते. तिसरी गोष्ट, अस्तित्व आणि अस्तित्वाच्या पोटीं, त्यांतून घडल्या जाणाऱ्या रचना या दोघांचा खरा संबंध काय, हें पूर्ण ज्ञानानें ठरविलें जात नाहीं, तर अज्ञानाच्या बंधनांत, मर्यादित ज्ञानाच्या बंधनात राहून ठरविलें जातें. याचा परिणाम असा होतो कीं, मन अंतिम ज्ञानासाठीं तळमळीनें पाउलें टाकीत असतां, जो निर्णय घेतें त्यानें अस्तित्वाची एक बाजू समूळ बाजूला फेंकली जाते. हा निर्णय घेतांना मन अर्थात् बुद्धीचा आश्रय घेतें. वस्तूंचें विघटन आणि संघटन करण्याचें बुद्धीचें काम असल्यानें आणि इच्छाशक्तीही बुद्धीप्रमाणें विघटन-संघटन-वादी असल्यानें, समोरचे अनुभव आणि समोरच्या शक्यता यांच्या आधारावर बुद्धि व इच्छाशक्ति आपलें वैशिष्ट्य खर्चून मनाला अस्तित्वाची एक बाजू अजिबात फेंकून देण्याचा निर्णय घेण्यांत मदत करतात. स्वतंत्र अहम्च्या पायावर आत्मज्ञान उभें करण्यामध्यें वर सांगितलेल्या
पान क्र. ३९९
अडचणी असल्यामुळें, या प्रयत्नाचा जो एकंदर परिणाम घडून येतो, तो आम्हीं यापूर्वीं उल्लेखिलेलाच आहे. मनोमय पुरुष एकतर प्रत्यक्ष आत्म्याच्या जाणिवेंत स्वतःला मग्न करून घेतो आणि या आत्म्याच्या पोटांत होणाऱ्या नामरूपात्मक घटना सर्वस्वी अंगाबाहेर टाकतो किंवा तो या नामरूपात्मक घटनांच्या संसारांत स्वतःला मग्न करून घेतो आणि स्थायी आत्मजाणिवेला सर्वस्वी अंगाबाहेर टाकतो. वस्तुत: आत्मा आणि नामरूपात्मक विश्व या दोन्ही बाजू मनाला स्वाभाविक आहेत. पण अज्ञानाच्या अवस्थेंत आत्मवादी मन, विश्वाला असत्य ठरवितें; आणि विश्ववादी मन आत्म्याला, ईश्वराला, असत्य ठरवितें, मनाचा खेळ ठरवितें. विश्व हें आत्म्याचें प्रभावी परिणामकारक स्वप्न आहे, असें आत्मवादी मन म्हणतें. आत्मा, ईश्वर हा परिणामकारक असा मनानें उठविलेला भास आहे, आभास आहे, असें विश्ववादी मन म्हणतें. विश्व निरपेक्ष-सत्य ठरलें कीं आत्मा वा ईश्वर हा असत्य किंवा सापेक्ष-सत्य ठरतो. आत्मा वा ईश्वर निरपेक्ष-सत्य ठरला कीं विश्व असत्य किंवा सापेक्ष-सत्य ठरतें. अस्तित्वाच्या या दोन अंगांमधील खरा संबंध आमच्या मर्यादित ज्ञानाच्या बुद्धीला कळून येणें अशक्य असतें. या बुद्धीला अस्तित्वाचीं हीं दोन अंगें विसंवादी, नित्य विरोधी अशींच दिसावयाचीं. जाणिवेचा विकास जो चालला आहे, त्याचा अंतिम हेतु (अंतिम साध्य) पूर्ण ज्ञान हा आहे -- आत्मा आणि वस्तुजात यांचें पूर्ण ज्ञान, समग्र सत्य, जाणिवेच्या विच्छेदनांत, जाणिवेचा एक भाग जवळ करून दुसरा भाग दूर फेंकून देण्यांत, असूं शकत नाहीं. निश्चल आत्मा हेंच एक सत्य असेल, तर विश्वाच्या अस्तित्वाची शक्यता अशक्य होते. चंचल निसर्ग हेंच एक सत्य असेल, तर विश्वगत घटनांचें चक्र शक्य होईल. पण अचेतनांतून चेतनाचा विकास जो होत आहे, त्या विकासाला त्या निसर्गगत घटनाचक्रांत कांहीं आत्मतत्त्वाचा आधार असणार नाहीं. मानवाची मर्यादित जाणीव स्वतःच्या मर्यादा उल्लंघून पार होण्याची जी तीव्र स्थायी आकांक्षा धरीत आहे, स्वतःच्या अस्तित्वाचें समग्र ज्ञानयुक्त सत्य आणि सर्व अस्तित्वाचें पूर्ण ज्ञान हस्तगत करण्याची जी तीव्र स्थायी आकांक्षा धरीत आहे, त्या आकांक्षेला अवश्य असलेला आत्मतत्त्वाचा आधार, निसर्गगत घटनाचक्रांत असणार नाहीं. या विचारणेचा इत्यर्थ हा कीं, आत्मा आणि निसर्ग (विश्व) दोनहि वस्तू सत्य आहेत, हें पूर्णज्ञान होय.
पान क्र. ४००
अज्ञानाचें साम्राज्य आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वांत निष्कंटकपणें चालतें, ज्ञानासाठीं आम्हांला आमच्या अंतरांत जावयास हवें, आंतरिक दृष्टीनें बघण्यास हवें. पृष्ठावर, बाहेर जें कांहीं साकार झालें आहे, तें आमच्या महान् गुप्त अस्तित्वाचें लहान प्रमाणावरचें चित्र आहे. निश्चल आत्मा आमच्या अंतरांत आहे. तो फार खोलांत आहे. पृष्ठावर त्याचें ज्ञान होतें, तें केवळ अंतःस्फूर्त अशी जी आत्मसंवेदना, आत्म्याच्या अस्तित्वाची संवेदना, त्या संवेदनेनें होतें. मनोमय, प्राणमय, अन्नमय अहम् जो आम्हांला प्रतीत होतो, त्या अहम्द्वारां आत्म्याची खोटी कल्पना आमच्या पुढें ठेवली जाते. या त्रिविध अहम्च्या उलाढाली जेव्हां सर्व बंद कराव्या, मन जेव्हां अगदीं शांत करावें तेव्हांच निश्चल आत्म्याचें दर्शन आम्हांला घडूं शकतें. आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वाला जशी अक्रिय साक्षी-अहम्ची बाजू असते, तशी त्याला सक्रिय प्रकृतीची बाजू असते. आमच्या गुप्त प्रकृतीच्या अंतरांत खोल असलेल्या बिऱ्हाडांत ज्या महान् सक्रिय वस्तू आहेत, त्यांचें लहान प्रमाणावरचें चित्र आमच्या पृष्ठवर्ती अस्तित्वाच्या सक्रिय अंगांत दिसतें. आमची पृष्ठवर्ती स्मृति, पृष्ठवर्ती कल्पनाशक्ति या अंतर्वर्ती स्मृति आणि कल्पनाशक्ति यांच्याहून फारच लहान आहेत. अंतर्वर्ती स्मृति आम्हांला घडणारा विश्वविषयक अनुभव सर्वचा सर्व घेऊन सांठवून ठेवते. वरच्या मनाच्या दृष्टींतून जें निसटतें, या मनाला जें समजतहि नाहीं तें देखील सर्व, अंत:स्मृतीच्या भांडारांत सांठविलेलें सांपडतें. या आंतील भांडारांतून कांहीं थोड्या फुटकळ गोष्टी बाहेर ओढून काढणारी, तुटक तुटक अशी परिणामशून्य क्रिया म्हणजे बाह्य पृष्ठवर्ती स्मृति होय. ही बाह्य पृष्ठवर्ती कल्पनाशक्ति, जाणिवेची जी अंतर्वर्ती चित्रनिर्माणशक्ति फार परिणामकारक आणि फार व्यापक अशी आहे, तिच्या चित्रांतून कांहीं थोडीं चित्रें बाहेर घेऊन येत असते. आमचें पृष्ठवर्ती विकासाचें जें कार्य चाललें आहे तें, अंतर्वर्ती मन, प्राण, सूक्ष्म भौतिक द्रव्य घडवून आणीत आहे. अंतर्मनाच्या वस्तुग्रहणशक्ती बाह्य मनाहून फार सूक्ष्म आणि व्यापक असतात. अंतःप्राणशक्ति बाह्य प्राणशक्तीहून फार अधिक कर्तृत्वशील असतें. सूक्ष्म देहाचें सूक्ष्म भौतिक द्रव्य, संस्कार-क्षमतेंत बाह्य देहद्रव्याहून खूप अधिक सूक्ष्मता आणि व्यापकता धारण करतें आणि हें असें आंतरिक मन, प्राण, शरीर, बाह्य मन-प्राण-शरीराचा विकास आपल्या सामग्रीच्या व सामर्थ्याच्या आधारावर घडवून आणीत
पान क्र. ४०१
आहेत. मनाच्या आंत चाललेले गुप्त व्यापार, आंतरिक मन-प्राण-शरीरांचें गुप्त व्यापार, यांना खरा आधार आंतील पुरुषाचा, आंतरात्म्याचा आहे. आमचें व्यक्तित्व वस्तुत: या अंत:पुरुषावर आधारलेलें आहे. बाहेर अहम् हा ''आत्म्याचें'' काम करतो. पण तो खरा आत्मा नव्हे, त्या आत्म्याचा मुनीम आहे. आमचा आत्मविषयक अनुभव, आमचा विश्वविषयक अनुभव हा गुप्त आंतरात्मा स्वत:चे ठिकाणीं स्वत:च्या आधारावर एकत्र करून धारण करतो. निसर्गानें वरच्या कार्यासाठीं पृष्ठभागावर घडून तयार केलेली एक रचना, हें मानसिक, प्राणिक, शारीरिक बाह्य अहम्चें खरें स्वरूप आहे. आमचा आत्मा आणि आमची प्रकृति सामग्र्यानें आम्ही पाहूं, वर पृष्ठभागावर आणि आंत खोल असलेलें आमचें ''आत्मस्वरूप'' आणि आमच्या प्रकृतीचें रूप सामग्र्यानें आम्ही पाहूं, तेव्हांच आम्हांला ज्ञानाचा खरा पाया सांपडतो, सांपडेल.
पान क्र. ४०२
Home
Sri Aurobindo
Books
SABCL
Marathi
Share your feedback. Help us improve. Or ask a question.